डॉ. दाभोलकरांनी साधना कशी वाढवली?

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

विनोद शिरसाठ

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे १५ ऑगस्ट १९४८ रोजी साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. दि. ११ जून १९५० रोजी गुरुजींचे निधन झाल्यावर आचार्य जावडेकर व रावसाहेब पटवर्धन या दोघांकडे साधनाचे संपादकपद आले. यदुनाथ थत्ते १९५६ मध्ये संपादक झाले आणि पुढील २५ वर्षे त्यांनी ते पद सांभाळले. त्यामुळे एक वैचारिक, परिवर्तनवादी व ध्येयवादी नियतकालिक म्हणून साधनाची ओळख रूढ करण्यात यदुनाथजींचा वाटा सर्वांत मोठा आहे. सन १९८२ ते ८४ या काळातील दोन-अडीच वर्षे नानासाहेब गोरे संपादक राहिले. त्यांच्यानंतर वसंत बापट व ग. प्र. प्रधान यांनी १४ वर्षे म्हणजे १९९८ पर्यंत साधनाचे संपादकपद भूषविले. १९९८ हे साधनाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते, त्या वर्षी १ मे रोजी नरेंद्र दाभोलकर व जयदेव डोळे या दोघांकडे संपादकपद सोपवले गेले, पण पाच-सहा महिन्यांनंतर जयदेव डोळे यांनी संपादकपद सोडले. तेव्हापासून पुढील १५ वर्षे म्हणजे २० ऑगस्ट २०१३ पर्यंत डॉ. दाभोलकर संपादकपदावर राहिले. या १५ वर्षांच्या डॉक्टरांच्या संपादकीय कारकिर्दीवर लिहायचे ठरवले, तर दोनेकशे पानांचे एक 'वाचनीय' पुस्तक तयार होईल; पण इथे अडीच-तीन हजार शब्द मर्यादेतील लेख लिहायचा असल्याने, काही क्षणचित्रे (सिनेमाच्या परिभाषेत 'ट्रेलर') तेवढी दाखवता येतील. त्यातही मोठी अडचण ही आहे की, जितके जास्त विश्लेषण व भाष्य करायचे असेल, तितके जास्त तपशील व त्यांचे संदर्भ द्यावे लागतील. म्हणून या लेखात थोडेसे तपशील व माफक भाष्य एवढेच करता येणार आहे. दुसरी एक छोटी पण महत्त्वाची अडचण ही आहे की, डॉक्टरांच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीचे प्रत्येकी साडेसात वर्षांचे दोन भाग करावे लागतील. त्यांतल्या पहिल्या भागाविषयी मला मोठ्या अधिकाराने लिहिता येणार नाही, कारण मी त्या काळातील डॉक्टरांच्या कारकिर्दीचा साक्षीदार नाही. मात्र, आज हयात असलेल्या व्यक्तींमध्ये त्या काळाविषयी 'आतून' माहीत आहे अशांमध्ये कुमुदताई करकरे यांच्यानंतर माझाच नंबर लागेल. डॉक्टरांच्या कारकिर्दीतील दुसऱ्या भागाविषयी मात्र मला इतकी इत्थंभूत माहिती आहे की, तो संपूर्ण काळ व त्यातील बारीक-सारीक घडामोडींसह ती वाटचाल एखाद्या चलत्चित्रपटाप्रमाणे माझ्या नजरेसमोर आहे. अर्थात, डॉक्टरांच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीचे प्रत्येकी साडेसात वर्षांचे दोन भाग करण्याचे एक कारण डॉक्टर व साधना यांच्याबरोबर माझे असणे व नसणे हे तर आहेच; पण दुसरे कारण अधिक महत्त्वाचे आहे, ते म्हणजे हीरकमहोत्सवाचे पडघम वाजू लागण्यापूर्वीची साधना व नंतरची साधना! तर, अशा या दोन (पूर्वार्ध व उत्तरार्ध) भागांविषयी अगदी थोडक्यात सांगतो...

पूर्वार्ध

सन १९९८ हे वर्ष साधना साप्ताहिकाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते हे खरे; पण त्याआधी दोन-अडीच वर्षे आतल्या गोटात अशी चर्चा चालू होती की, साधना साप्ताहिक चालू ठेवायचे की बंद करायचे? याची दोन प्रमुख कारणे होती. एक कारण हे होते की, उदारीकरण पर्व अवतरून पाच-सात वर्षे झाली होती. तंत्रज्ञानाचा व भांडवलाचा रेटा असा निर्माण झाला होता की, येऊ घातलेल्या परिस्थितीमध्ये (इंटरनेट, टीव्ही चॅनेल्स, वृत्तपत्रांच्या पुरवण्या व आवृत्त्या) छोट्या नियतकालिकांचा निभाव लागणे कठीण बनणार होते. त्यामुळे पायाभूत सुविधा वाढविणे, व्यावसायिकता आणणे आणि स्पर्धेमध्ये टिकून राहू शकेल असे उत्पादन तयार करणे- असे तिहेरी आव्हान होते. दुसरे कारण असे होते की, प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीतून पुढे आलेली पिढी, परिवर्तनवादी चळवळी / आंदोलनांतील अनेक नेते-कार्यकर्ते काळाच्या पडद्याआड गेले होते; उरले होते त्यांतील बरेचसे वयोमानापरत्वे थकले होते, काहींची उमेद संपली होती. त्यामुळे असा एक जोरदार प्रवाह होता की, 'गुरुजींच्या धडपडणाऱ्यामुलांनी एक ध्येयवादी नियतकालिक पन्नास वर्षे मोठ्या निष्ठेने चालवले, आता बास झाले; साधनाचे प्रयोजन संपले.' पण नव्या दमाच्या लोकांकडे साधनाची धुरा सोपवून पाहावी, असाही एक क्षीण मतप्रवाह होता. त्यानुसार संपादकांचा शोध सुरू झाला आणि नरेंद्र दाभोलकर व जयदेव डोळे यांच्याजवळ तो थांबला. पण त्याआधी आठ नावे चर्चिली गेली होती, त्यांतील काहींनी (बुडत्या जहाजाचे कॅप्टन व्हायला नको म्हणून) संपादकपद स्वीकारायला नकार दिला होता आणि काहींच्या नावावर विश्वस्तांचे एकमत झाले नव्हते. डॉ. दाभोलकर व जयदेव डोळे यांना संपादक करताना विचार असा केला गेला होता की, अंकाच्या दैनंदिन कामाची जबाबदारी जयदेव डोळे पाहू शकतील (त्या वेळी ते वृत्तपत्रविद्या विभागात प्राध्यापक होते) आणि व्यवस्थापन / अर्थकारण याची जबाबदारी डॉ. दाभोलकर चांगली पेलवू शकतील. (त्या वेळी, सामाजिक कृतज्ञता निधीच्या व्यवस्थापन-कौशल्यासाठी डॉ. दाभोलकरांचे बरेच कौतुक झाले होते.) पण जयदेव डोळे लवकरच बाहेर पडल्यामुळे दोन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या डॉक्टरांवर येऊन पडल्या आणि कार्यकर्त्याचा पिंड व उत्तम संघटनकौशल्य यांच्या बळावर त्यांना त्या निभावता आल्या. त्या संदर्भात त्यांना प्रमुख चार आघाड्यांवर लढावे लागले.

१. साधना अंकाचे स्वरूप : साधना परिवाराचे साप्ताहिक ही ओळख पुसट करत जाणे आणि सुशिक्षित व सामाजिक जाणिवा असलेल्या पुरोगामी कुटुंबाला साधना साप्ताहिक आपले वाटायला लावणे, हे आव्हान सर्वांत मोठे होते. त्यासाठी डॉक्टरांनी विविध विषयांचे लेखन साधनात आणायला सुरुवात केली आणि साधना परिवाराच्या बाहेरच्या / परिघावरच्या लेखकांना सामावून घ्यायला सुरुवात केली. विषयांबाबत सांगायचे तर राजकारण (प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय), समाजकारण (चळवळी, आंदोलने, कार्यकर्ते), अर्थकारण, साहित्य, बालसाहित्य, विज्ञान, महिलाविश्व, नाटक-चित्रपट, क्रीडा, कला, संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील लेख महिन्यातून एकदा का होईना येतील, अशी सदरांची आखणी केली आणि राबवायला सुरुवात केली. दिवाळी अंकांमधून ललित, वैचारिक, परिसंवाद, कथा, कविता, अनुवादित कथा, विनोद, बालविभाग, व्यंगचित्रं असे विभाग द्यायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या व्यक्तींकडे त्यांच्या संपादनाची जबाबदारी सोपवली. दर वर्षी दोन-तीन विशेषांक करताना त्यासाठी अतिथी संपादक नेमायला सुरुवात केली. पन्नालाल सुराणा, रा. ग. जाधव, सुहास पळशीकर व राजेंद्र व्होरा, सुभाष वारे, संजय संगवई, अवधूत परळकर, हेरंब कुलकर्णी, रेणू गावस्कर, राजीव तांबे यांनी त्या काळातील एक किंवा दोन अंकांचे अतिथी संपादक म्हणून कामकेले. राजा कांदळकर, मंजिरी घाटपांडे, प्रसाद मणेरीकर अशा तरुणांना युवा अतिथी संपादक; तर अरुणा ढेरे, रझिया पटेल, सुबोध वागळे, राजन खान, इंद्रजित भालेराव, प्रज्ञा दया पवार यांना संपादक मंडळावर घेतले. (ही केवळ वानगीदाखल काही नावे आहेत. डॉक्टरांनी ज्यांचे सहकार्य मिळवले, त्यांची यादी बरीच मोठी आहे.)

२. संपादन करताना लेखक व विषय यांत वैविध्य आणताना सुरुवातीच्या तीन-चार वर्षांत पारंपरिक साधना वाचकांचा व परिवारातील लोकांचा बराच रोष डॉक्टरांना पत्करावा लागला. साधना परिवारातील अनेक लोकांकडून येणारे कार्यक्रमांचे वृत्तांत, मृत्युलेख, प्रासंगिक लेख, साठी-पंचाहत्तरी निमित्ताने लिहिलेले व्यक्ती वा संस्था यांच्यावरील गौरवपर लेख आणि खूप चर्चिले गेलेले सैद्धांतिक स्वरूपाचे लेख छापण्यावर डॉक्टरांनी बरेच नियंत्रण आणले. अगदीच महत्त्वाचे आणि राज्यभरातील वाचकांना रस असेल असेच लेख छापायचे धोरण आखले. त्याची काटेकोर अंमलबजावणी शक्य नव्हती; पण प्रवास धीम्या गतीने का होईना, त्याच दिशेने चालू ठेवला. त्यामुळे 'साधना अंकाची विविधता व वाचनीयता वाढत आहे' अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि मग विरोधाची धार कमी होऊ लागली.

डॉक्टर साधनाचे संपादक झाले, त्या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवर्तक / प्रणेते अशी त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात होती. कारण त्याआधी दहा-बारा वर्षे ते अंनिसचे काम करीत होते. पण त्यामुळेच साधनाच्या अनेक हितचिंतकांकडून अशी शक्यता व भीती व्यक्त केली गेली की, ''आता साधना हे अंनिसचे मुखपत्र बनणार.'' पण डॉक्टरांनी स्वत:साठी अशी आचारसंहिता आखून घेतली की, अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित एकही वृत्तलेख, बातमी, वैचारिक लेख साधनात येऊ द्यायचा नाही. (अपवाद वर्षातून एखादा संपादकीय लेख, तोही त्यांनी स्वत: लिहिलेला) आणि ही आचारसंहिता त्यांनी शेवटपर्यंत पाळली. त्यामुळे, त्या १५ वर्षांत साधनात 'अंधश्रद्धा निर्मूलन' या विषयावर १८ ते २० संपादकीय लेखांपलीकडे काहीही प्रसिद्ध झाले नाही. एवढेच नाही तर, साधनाच्या कामासाठी आलेल्या माणसांकडे डॉक्टर 'अंनिस'चा विषय (अगदीच अपवाद वगळता) स्वत:हून कधीही काढत नसत. ते अनेक वेळा म्हणत की, ''मी सोमवारी सकाळी पुण्यात येताना ब्रेनमध्ये साधनाचे सॉफ्टवेअर टाकतो आणि मंगळवारी रात्री परत जाताना अंनिसचे सॉफ्टवेअर टाकतो.'' पण हे सॉफ्टवेअर क्षणा-क्षणाला बदलण्याची त्यांची ताकद अफाट होती.

३. डॉक्टर साधनाचे संपादक झाले, तेव्हा साधनाच्या दर आठवड्याला छापल्या जात असलेल्या प्रतींची संख्या अडीच हजारांच्या आसपास होती. त्यात भेटअंक दोनशे-तीनशे होते, आजीव सभासद दोनशेच्या पुढे होते, वर्गणी संपली तरी अंक चालू ठेवला आहे असे वर्गणीदारही दोनशे-तीनशे असायचे. या सर्वांचा परिणाम म्हणून आर्थिक तोटा बराच जास्त होता. त्यामुळे डॉक्टरांनी सर्व विश्वस्तांशी बोलणी करून, प्रधानसरांच्या सहीचे पत्र सर्व संबंधितांना पाठवले आणि बहुतांश भेटअंक बंद केले, 'आजीव सभासद वर्गणी' ही योजना संपुष्टात आणली, वर्गणी संपल्यावर दोन स्मरणपत्रे पाठवायची आणि तरीही वर्गणीची रक्कम आली नाही, तर दोन महिन्यांनी अंक बंद करायचे, अशी शिस्त व्यवस्थापनात आणली. यामुळे आर्थिक घडी जरा सुरळीत झाली, पण अतिशय संयमाने ती परिस्थिती हाताळूनही अनेकांची नाराजी डॉक्टरांना पत्करावी लागली. (१५ वर्षे होऊन गेली तरी त्यातील काही लोक अधूनमधून माझ्याकडे / इतरांकडे ती नाराजी व्यक्त करतात). दुसऱ्या बाजूला, वर्गणीदारवाढीसाठी डॉक्टरांनी 'मोहीमच आखायला सुरुवात केली. तीन-चार वर्षे खपून दशसहस्र वर्गणीदार अभियान राबवले. त्यात मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळवून देऊ शकणाऱ्या लोकांचे सहकार्य मिळवले. त्या काळात विजया चौहान (युनिसेफमध्ये होत्या), लक्ष्मीकांत देशमुख (सांगली जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. होते) आणि आप्पासाहेब सा. रे. पाटील (शिरोळचे आमदार व साधनाचे विश्वस्त) या तिघांनी प्रत्येकी एक हजाराहून अधिक वर्गणीदार साधनाला मिळवून दिले. (गणेश चिंचोले, अर्जुन कोकाटे यांच्यासारखे काही कार्यकर्तेही नंतरच्या टप्प्यावर शे-दोनशे वर्गणीदार मिळवून देण्यासाठी पुढे आले.) अर्थात दहा हजार वर्गणीदार केल्यानंतर, दरवर्षी त्यांचे नूतनीकरण करणे, ही अवघड प्रक्रिया होती. कारण 'बल्क' स्वरूपात जे वर्गणीदार मिळतात ते (ती व्यक्ती तिथून गेल्यानंतर) टिकून राहत नाहीत. पण त्यानंतर साधनाच्या वर्गणीदारांची संख्या सहा हजारांच्या खाली कधीच गेली नाही.

४. साधनाचे अर्थकारण जुळविण्यासाठी जाहिराती हा प्रमुख स्रोत आहे. दर वर्षीचा तोटा भरून काढण्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपयांच्या जाहिराती दिवाळी अंकाला मिळतील, अशी व्यवस्था करावी लागते. त्यातला अर्धा वाटा आप्पासाहेब सा. रे. पाटील उचलत आले आहेत. सदानंद वर्दे, जे. बी. पाटील, दत्ता वांद्रे, विभाकर सुलाखे हे व यांच्या मदतीने अन्य काही लोकांचे सहकार्य घेऊन जाहिरातरूपी देणग्या मिळवण्याची अशी यंत्रणा निर्माण झाली होती की; दिवाळीच्या आधीचा एक-दीड महिना एक सामाजिक मोहीमच चालू असल्याचा भास होत असे. अर्थकारण भक्कमकरीत असतानाच पायाभूत सुविधा कशा वाढतील, साधनाच्या हितचिंतकांचे जाळे कसे विस्तारता येईल यासाठी व्याख्याने, चर्चासत्रे, वाचन-संस्कृती केंद्र अशा माध्यमांतून डॉक्टरांनी प्रयत्न चालू ठेवले होते. राष्ट्रीय स्तरावरील काही आयकॉन्स (उदा. यू. आर. अनंतमूर्ती, तरुण तेजपाल) कार्यक्रमांना बोलावून साधनाची इमेज बिल्डिंग किंवा ब्रँडिंग करणे सेंट पद्धतीने चालू ठेवले होते. याच काळात अंकाचा कागद, पानांची संख्या, आर्टपेपरवर मुखपृष्ठ असे बदलही केले जात होते. असो.

तर, १ मे १९९८ ते डिसेंबर २००५ या साडेसात वर्षांतील डॉक्टरांच्या संपादकीय वाटचालीतील ही काही क्षणचित्रे आहेत. यांच्या अंतर्गत बरेच ताणेबाणे आहेत, ते सर्व सांगता येणे शक्य नाही आणि योग्यही नाही; कारण त्यांतील बरेचसे ताणेबाणे मला तुकड्यांतच माहीत आहेत. अर्थात, त्या काळातील अंक निवांतपणे नजरेखालून घालून, माहीत असलेले अनेक तुकडे जुळवून बऱ्यापैकी समग्र चित्र रेखाटता येईल, पण ते बरेच मोठे व वेळखाऊ काम आहे. त्यामुळे तूर्त इतकेच...

उत्तरार्ध

डॉ. दाभोलकरांशी माझी पहिली भेट ५ जानेवारी २००४ रोजी झाली आणि २००४ व २००५ ही दोन वर्षे मी स्तंभलेखक व अतिथी संपादक म्हणून त्यांच्या बराच जवळ होतो. तरीही डॉक्टरांचे व माझे 'साधना पर्व' जानेवारी २००६ ते ऑगस्ट २०१३ या साडेसात वर्षांचे होते, असे मी मानतो. त्यांतील पहिले वर्ष संपादक मंडळातील सदस्य, नंतरची तीन वर्षे युवा संपादक आणि त्यानंतरची साडेतीन वर्षे कार्यकारी संपादक असे माझे 'नामाभिधान' बदलत गेले असले तरी, त्या साडेसात वर्षांतील आमचे नाते, मी करत असलेले काम आणि मला मिळणारे स्वातंत्र्य यांत फारसा फरक नव्हता.

सन २००६ हे वर्ष मुख्यत: लक्षात आहे ते प्रत्येक महिन्यात वाचनसंस्कृती अभियान अंक या पाया विस्तारासाठी, 'निवडक साधना' या अष्टखंडात्मक ग्रंथसंच प्रकल्पासाठी आणि साधना वेबसाईटच्या निर्माणासाठी! साधनाच्या ५८ वर्षांतील लेखनाचा आढावा घेऊन त्यातील निवडक लेखनाची आठ पुस्तके संचरूपात प्रकाशित करण्याचा (ग. प्र. प्रधान व रा. ग. जाधव संपादक असलेला) तो प्रकल्प बराच महत्त्वाकांक्षी व 'इतिहासमूल्य' असणारा होता. त्या ५८ वर्षांतील सर्व (जवळपास तीन हजार) अंक वेबसाईटवर आणणे, ही योजनाही अगडबंब होती आणि अशी वेबसाईट सुरू करणारे साधना हे मराठीतील पहिले नियतकालिक ठरणार होते; म्हणून त्या योजनेचे वर्णन 'भविष्यदर्शी' असेच करावे लागेल. आणि 'वर्तमानाला' आपलेसे करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून वाचनसंस्कृती अभियान अंक सुरू केले होते. त्या अंकांचा मोठा परिणामअसा झाला की, 'केवळ राजकीय-सामाजिक अंक' या प्रतिमेतून साधनाला बऱ्यापैकी बाहेर काढता आले. असो... तर काल, आज आणि उद्या यांचा वेध घेणारे ते तीनही उपक्रम / प्रकल्प साधनाच्या हीरकमहोत्सवाची पूर्वतयारी होती. त्यांची कार्यवाही करण्यासाठी अनेकांची मदत झाली, पण त्या कल्पनांच्या मागचा 'ब्रेन' आणि कार्यवाहीसाठी आवश्यक असलेला 'रेटा' मात्र निर्विवादपणे डॉक्टरांचाच होता. त्या तीन प्रकल्पांत / उपक्रमांत माझा सहभाग सुरुवातीपासून व अगदी आतल्या वर्तुळातील असा होता. त्यामुळे ते वर्ष माझ्यासाठी बरेच काही शिकवणारे आणि लांबच्या प्रवासासाठी 'शिदोरी' बांधून देणारे असे होते. त्या वर्षात मला साधनाचा 'परस्पेक्टिव्ह' दिसू लागला आणि साधना कुठून आलीय, कुठे आहे व कोणत्या दिशेने जावे लागणार आहे याबाबत चांगली स्पष्टता आली. त्या वर्षभरात माझे क्षितिज खूपच रुंदावले, वास्तवाचे बऱ्यापैकी भान आले आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वासाला उंची मिळत गेली. या सर्वांचा एकत्रित परिणामहा झाला की, मी साधनाला अधिकृतपणे पूर्णवेळ जॉइन व्हावे, असा प्रस्ताव डॉक्टरांनी ठेवला आणि डिसेंबर २००६ मध्ये मी साधनाचा युवा संपादक झालो.

१९९८ मध्ये डॉक्टर साधनाचे संपादक झाले, तेव्हा ५३ वर्षांचे होते आणि साधनाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष संपत आले होते. त्यानंतरच्या आठ-नऊ वर्षांत डॉक्टरांनी साधनाची सर्वस्तरीय पायाभरणी करून चौफेर संचार सुरू केला होता. त्यामुळे २००७-०८ हे वर्ष साधनाचे हीरकमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी त्यांनी बरीच जय्यत तयारी तर केलीच; पण पुढील १५ वर्षांची म्हणजे साधनाची अमृतमहोत्सवी वाटचाल सुकर व्हावी यासाठी काही उपक्रम दीर्घकालीन हेतू ठेवून सुरू केले. त्यांतील चार-पाच प्रमुख उपक्रमांविषयी थोडक्यात सांगतो.

१. साधना बालकुमार दिवाळी अंक : गुणात्मक व संख्यात्मक या दोनही प्रकारची वाढ होत असेल, तरच 'विकास' ही संज्ञा खऱ्या अर्थाने बहाल करता येते. त्या अर्थाने विचार केला तर बालकुमार अंक हा साधनाचा सर्वांत यशस्वी उपक्रम ठरला आहे. या यशात चार प्रमुख घटक महत्त्वाचे ठरले. ते म्हणजे- साधनाचे गुडविल, अंकाची किंमत, अंकाचा आशय व निर्मितीमूल्ये, डॉक्टरांचे नेटवर्क व धडाकेबाज कार्यशैली. त्यामुळे २००८ मध्येफक्त ११ हजार प्रती काढलेला अंक २००९ मध्ये दीड लाख छापावा लागला आणि त्यानंतरची सलग तीनही वर्षे साडेतीन लाखांपेक्षा जास्त प्रती वितरीत झाल्या. अवघ्या १० रुपयांत ३६ पानांचा पूर्ण रंगीत अंक महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात जातोय. त्याचा वाचनसंस्कृतीच्या वृद्धीसाठी तर उपयोग होतोच आहे; पण अधिक महत्त्वाचे हे आहे की, साधना साप्ताहिकाचे भावी वाचक तयार करण्यासाठी हा अंक पेरणी करतोय. अर्थातच, पेरलेले उगवण्यासाठी आणि जोमाने वाढण्यासाठी साधनाला वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. (आणि म्हणूनच २०१४ पासून युवा दिवाळी अंक काढला जाणार आहे.)

२. साधना साहित्य संमेलने : चर्चासत्राचा दर्जेदारपणा राखून, एकेक वाङ्मयप्रकार केंद्रस्थानी ठेवून साहित्य संमेलने आयोजित करायला २००८ मध्ये सुरुवात केली. कादंबरी, कविता, कथा आणि नाटक या चार वाङ्मयप्रकारांना वाहिलेली चार संमेलने अनुक्रमे पुणे, गोवा, कोल्हापूर व नाशिक या चार ठिकाणी घेतली. अमृतमहोत्सवापर्यंत अशी १५ संमेलने घेण्याचे नियोजन होते, पण चार संमेलनांनंतर तो उपक्रमबंद केला. कारण या संमेलनासाठी खर्च करावी लागत असलेली ऊर्जा व वेळ बरीच जास्त आणि तुलनेने उपयुक्तता कमी आहे असे जाणवले. शिवाय, बालकुमार अंक, महाराष्ट्र फाउंडेशनची पुरस्कार निवडप्रक्रिया आणि दिवाळी अंकाची जाहिरात मोहीमही सर्वच कामे ऑगस्ट ते डिसेंबर या काळात चालू ठेवावी लागत असल्याने, डिसेंबर / जानेवारीमध्ये संमेलन भरवणे व्यवस्थापनाच्या दृष्टीने अडचणीचे होऊ लागले होते. पण मुख्य मुद्दा हा आहे की, संमेलनांचा उपक्रम अयशस्वी झाला आणि म्हणून बंद केला, असे घडलेले नाही; तर एकाच वेळी चार आघाड्यांवर लढणे नको, म्हणून बंद केला. अर्थात, साधनाचे लेखक-वाचकांचे जाळे विस्तारण्यासाठी तो उपक्रमसुरू केला होता, हा हेतू लक्षात घेतला तर त्याचे महत्त्व आजही जाणवते. त्यामुळे पुढे कधी तरी त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार करता येईल. या संमेलनांची कल्पना डॉक्टरांचीच होती आणि 'विचारवेध' संमेलने बंद पडली, म्हणून ही कल्पना त्यांनी पुढे केली होती.

३. महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार : अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने १९९४ पासून साहित्य क्षेत्रातील, तर १९९६ पासून समाजकार्य क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय व अनुकरणीय योगदानासाठी पुरस्कार देऊन गौरविले जाते. दर वर्षी आठ ते दहा व्यक्तींना एकूण दहा लाख रुपयांचे पुरस्कार दिले जातात. पूर्वी या पुरस्कारांचे संयोजन मुंबई येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने केले जात होते, २००९ पासून ते संयोजन साधना ट्रस्टमार्फत होत आहे. महाराष्ट्र फाउंडेशन व साधना ट्रस्ट यांचे हे सहकार्य पर्व सुरू होण्यात त्या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची वैचारिक मैत्री व त्यातून निर्माण झालेले स्नेहबंध प्रामुख्याने कारणीभूत आहे. महाराष्ट्र फाउंडेशनचा पहिला समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार (एक लाख रुपयांचा) महाराष्ट्र अंनिसला १९९६ मध्ये मिळाला होता आणि २००६ मध्ये दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता पुरस्कार (दहा लाख रुपयांचा) डॉ. दाभोलकरांना अमेरिकेत बोलावून दिला गेला होता. शिवाय, १९९८ मध्ये डॉक्टर साधनाचे संपादक झाले, तेव्हा सुनील देशमुख यांनी 'शबनम आणि चोपडीपलीकडे' या शीर्षकाचे 'दूरदर्शी' पत्र व एक लाख रुपयांची देणगी साधनाला पाठवली होती. त्यासंदर्भात विषय निघाल्यावर डॉक्टर म्हणायचे, ''तोपर्यंत साधनाला एकरकमी मिळालेली ती सर्वांत मोठी देणगी होती, त्यामुळे साधना परिवारात माझा भाव संपादकपदावर बसण्यापूर्वीच वधारला होता.'' तर, अशी पार्श्वभूमी व असे स्नेहबंध असल्याने महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांची कार्यवाही साधनाकडे आली होती. त्यातून साधनाचा आर्थिक फायदा फारसा होणार नव्हता (केवळ सर्व्हिस चार्ज म्हणून एक-दीड लाख रुपये व फाउंडेशनच्या खर्चाने साधना वाचकांना एक पुरस्कार विशेषांक); पण साहित्य व समाजकार्य या दोन क्षेत्रांत साधनाचे वर्तुळ विस्तारणार होते आणि साधनाची प्रतिष्ठा वाढणार होती. हा दुसऱ्या प्रकारचा फायदा जास्त महत्त्वाचा होता म्हणून; डॉक्टरांनी पुरस्कारांची निवडप्रक्रिया, प्रसिद्धी, विशेषांक आणि वितरण समारंभ अशी चार टप्प्यांतील घडी व्यवस्थित बसवली. हे कामचार-पाच महिने तरी एका बाजूला गोपनीय व दुसऱ्या बाजूला पारदर्शक पद्धतीने चालते. त्यात अनेक बारकावे तर असतातच, पण गुणवत्ता व विश्वासार्हता यांच्यासंदर्भात संस्थेची ती परीक्षाही असते. साधनाकडे ते काम आल्यावर पहिली चारही वर्षे ज्या सुरळीतपणे डॉक्टरांनी कार्यवाही पार पाडली, तीच पद्धत 'फॉलो' केल्याने गेल्या वर्षी डॉक्टरांची हत्या झाल्यानंतरचा पुरस्कार वितरण समारंभ विशेष संस्मरणीय झाला.

४. साधना साप्ताहिकाची अमृमहोत्सवी वाटचाल सुकर करण्यासाठी आणि आर्थिक कारणांमुळे साप्ताहिकावर ताण येऊ नये यासाठी, साधना मीडिया सेंटर व साधना प्रकाशन ही दोन युनिट्स व्यावसायिक पद्धतीने चालवायची- असे हीरकमहोत्सवी वर्षात ठरवले होते. एवढेच नाही तर, साप्ताहिक सोडले तर अन्य कोणतेही युनिट तोट्यात चालवायचे नाही, अशी डॉक्टरांची भूमिका होती. (अर्थात, जाहिरातींची रक्कम जमेस धरली तर गेल्या सात-आठ वर्षांत साप्ताहिकही तोट्यात नाही.) हीरक महोत्सवानंतरच्या पाच-सहा वर्षांत साधना प्रकाशनाकडून फक्त ३० पुस्तके आली, पण त्यांतील २५ पुस्तके साधना अंकातील लेखमाला किंवा विशेषांक यांची आहेत आणि प्रकाशनाकडे वितरणाची सक्षम यंत्रणा नसूनही केवळ साप्ताहिकातील जाहिराती व वाचकांच्या परिचयाचा मजकूर या बळावर त्यातील बहुतांश पुस्तकांच्या दोन-तीन आवृत्त्या झाल्या आहेत. आशयसंपन्न मजकूर, दर्जेदार निर्मिती, तुलनेने किंमत कमी, तरीही बरीच जास्त सवलत अशी चतु:सूत्री अवलंबल्यामुळे पुस्तके लक्षवेधी झाली आहेत. उदा.- गोविंद तळवलकर (वैचारिक व्यासपीठे), सुरेश द्वादशीवार (मन्वंतर, तारांगण, सेंटर पेज), सुहास पळशीकर (राजकारणाचा ताळेबंद), ज्ञानेश्वर मुळे (नोकरशाईचे रंग), देवेंद्र गावंडे (नक्षलवादाचे आव्हान), नामदेव माळी (शाळाभेट) या लेखमाला गाजल्या आणि त्यांची पुस्तकेही!

५. हीरकमहोत्सवी वर्षाकडून अमृत महोत्सवाच्या दिशेने साधनाचा प्रवास विनाव्यत्यय पार पाडण्यासाठी आर्थिक स्रोत, पायाभूत सुविधा व काही दीर्घकालीन उपक्रम अशी तजवीज डॉक्टरांनी केली होती आणि पुढील १५ वर्षे आपल्याला हे साप्ताहिक नेटाने चालवायचे आहे, अशी खूणगाठ मनाशी बांधली होती. त्यासाठी आणखी एक गोष्ट केली होती...

साधनाचे हीरकमहोत्सवी वर्ष २००८ मध्ये संपत असताना डॉक्टरांनी ग. प्र. प्रधान, मोहन धारिया व अन्य विश्वस्तांसमोर अशी भूमिका मांडली की, ''दहा वर्षे मी संपादकपदावर राहिलो आणि माझी साठी उलटली आहे, तर साधनाचा पुढील संपादक आपण आताच ठरवला पाहिजे.'' त्यानुसार २० ऑगस्ट २००८ च्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ''यापुढे संपादक म्हणून नरेंद्र दाभोलकर व विनोद शिरसाठ अशी नावे लावण्यात यावीत'', असा ठराव मंजूर करण्यात आला. त्याच दिवशी 'भारताचे शेजारी' या ६१ व्या वर्धापनदिन विशेषांकाच्या प्रकाशन समारंभाचे प्रास्ताविक करताना डॉक्टरांनी (मालदीवचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत) तशी घोषणा करूनही टाकली. पण दुसऱ्या दिवशी, ''तो निर्णय लांबणीवर टाकावा आणि आणखी एक-दीड वर्ष मला युवा संपादक म्हणूनच राहू द्यावे'' अशी विनंती मी केली, ती मान्य करण्यात आली. त्यानंतर ८ सप्टेंबर २००८ च्या हीरकमहोत्सव सांगता समारंभाच्या प्रास्ताविकात (राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत) डॉक्टरांनी जाहीर करून टाकले की, ''साधना आता ६० वर्षांची आहे, विनोद ३० वर्षांच्या आसपास आहे. साधनाची शताब्दी साजरी होईल तेव्हा विनोदचे वय सत्तरीच्या आसपास- म्हणजे आता व्यासपीठावर बसलेल्या साधना विश्वस्तांपेक्षा कमी असेल.'' त्या घटनेनंतरही मी युवा संपादक हेच नामाभिधान पुढील दीड वर्ष ठेवण्याबाबत आग्रही राहिलो. जानेवारी २०१० मध्ये पुन्हा विचारण्यात आले, तेव्हा 'संपादक' म्हणून डॉक्टरांचे एकट्याचेच नाव असावे आणि मला 'कार्यकारी संपादक' म्हणावे अशी विनंती मी केली; ती मान्य करण्यात आली. पण त्यानंतरच्या काळात ''मी साधनाच्या संपादनातील फार काही पाहत नाही, विनोदच सर्व पाहतो'' असे वक्तव्य अनौपचारिक बोलण्यांतून, जाहीर कार्यक्रमांतून व मुलाखतींमधून डॉक्टरांनी अनेक वेळा केले.

वरील तपशील जरा विस्ताराने व संदर्भासह सांगण्याचे कारण, 'साधनाच्या भावी वाटचालीसाठी संपादक नुसता नियुक्त करून चालणार नाही; तर तशी प्रतिमाही निर्माण करावी लागेल आणि ती आपणच करायला हवी,' अशी डॉक्टरांची भूमिका होती आणि म्हणून ती मांडण्यात त्यांनी कसूर केली नाही. (असाच काहीसा विचार डॉक्टरांनी हेमंत नाईकनवरे यांच्याबाबत केला होता, ते विश्वस्त म्हणून चांगली जबाबदारी दीर्घ काळ पार पाडू शकतात असा विश्वास डॉक्टरांना वाटत होता, म्हणूनच त्यांना अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न ते करत होते.)

या संपूर्ण १५ वर्षांच्या काळात डॉक्टरांना साधनाच्या विश्वस्त मंडळाचा एकमुखी पाठिंबा होता; पण तरीही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती मोहन धारिया, सदानंद वर्दे, ग. प्र. प्रधान, आप्पासाहेब सा. रे. पाटील, किशोर पवार, रा. ग. जाधव या ज्येष्ठांना आणि विजया चौहान, सुनील देशमुख, गणपतराव पाटील या समवयस्कांना विश्वासात घेऊन देण्याचा प्रयत्न डॉक्टर करीत असत. डॉक्टरांना १५ वर्षांच्या वाटचालीत पहिली १२ वर्षे प्रधानसरांची खंबीर साथ होती, नंतरची दहा वर्षे रा. ग. जाधव यांचा आधार होता आणि 'आर्थिक अडचण येऊ देणार नाही', हा विश्वास संपूर्ण १५ वर्षे आप्पासाहेब देत राहिले.

डॉक्टरांनी १५ वर्षांत साधनातून जे संपादकीय लेख लिहिले, त्यांतील निवडक ६० लेखांचे पुस्तक 'समता-संगर' या नावाने नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्याच्या प्रस्तावनेत मी डॉक्टरांचे साधनातील लेखन व वैचारिक भूमिका याविषयी बऱ्यापैकी नेमकेपणाने लिहिले आहे, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती येथे करीत नाही.

आता शेवटचे काही मुद्दे नोंदवतो. वरील विवेचन वाचून, डॉक्टरांची पहिली साडेसात वर्षे व नंतरची साडेसात वर्षे यांत फरक काय आहे, असा प्रश्न काही लोकांच्या मनात येईल. त्याचे बरेच सविस्तर उत्तर द्यावे लागेल आणि पुढे कधीतरी मी ते देईनही, पण मुख्य फरक हा आहे की, दुसऱ्या साडेसात वर्षांत अंकाच्या संपादनाची (तुलनेने सोपी) जबाबदारी त्यांनी क्रमाक्रमाने माझ्याकडे सोपवली आणि व्यवस्थापन, वितरण, अर्थकारण, ब्रँडिंग ही जिकिरीची कामे स्वत: निभावली. या साडेसात वर्षांत बदलता काळ, बदलती परिस्थिती यांचा विचार करून आणि आपण काय चांगले देऊ शकतो, वाचकांना काय हवे आहे, हे लक्षात घेऊन मी काही महत्त्वपूर्ण बदल केले, त्याला डॉक्टरांचा खंबीर पाठिंबा राहिला. उदाहरणार्थ... विश्लेषणात्मक व दीर्घ लेखांचे प्रमाण वाढविले, लेखनातील विविधता कमी करून फोकस अधिक निश्चित केला. या काळात विशेषांक हे साधनाचे प्रमुख बलस्थान राहिले आणि थीम घेऊन दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. मजकुराच्या दर्जाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आणि त्याचबरोबरीने अंकाची निर्मितीमूल्ये वाढवीत नेली. अंक वाचनीय होत असतानाच आकर्षकही झाला पाहिजे, यावर भर दिला. अर्थातच हे सर्व करताना, साधनाचा मूळ गाभा कायमराहील याची दक्षता घेतली. या काळात जवळपास ४० विशेषांक प्रसिद्ध झाले; त्यांत नक्षलवाद, शेती आणि शेतकरी, भारताचे शेजारी, भारतातील प्रादेशिक पक्ष, विदर्भाला सुखी करा, मराठवाडा शब्द निरर्थक व्हावा, दलपतसिंग येती गावा, मला प्रभावित करून गेलेला सिनेमा... असे विविधतापूर्ण व आशयसंपन्न अंक होते. याच काळात राजा शिरगुप्पे यांनी केलेल्या दुर्गमभागांच्या शोधयात्रा (महाराष्ट्र, बिहार, ईशान्य भारत) दीर्घ लेखांच्या रूपाने आल्या आणि नंतर त्यांची पुस्तकेही निघाली... असे तपशील खूपच सांगता येतील. पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे, तो म्हणजे पहिल्या साडेसात वर्षांचा भक्कम पाया नसता तर दुसऱ्या साडेसात वर्षांचे काम उभे राहिलेच नसते! हा लेख घे किंवा तो लेख घेऊ नको; असे मला डॉक्टरांनी एकदाही सांगितले नाही. लेखक व विषयनिवडीचे स्वातंत्र्य तर मला पूर्णत: होतेच, पण मी लिहिलेल्या संपादकीय लेखनात एका शब्दाचाही बदल त्यांनी कधी केला नाही; याउलट, डॉक्टर स्वत: संपादकीय लिहिणार असतील तर 'मी या विषयावर लिहू का?' अशी विचारणा ते बहुतांश वेळा करत. आणखी एक मुद्दा कोणी विचारण्यापूर्वीच सांगतो... आमचे मतभेद कधीही झाले नाहीत, काही विषयांबाबत मतभिन्नता होती, पण त्याचे प्रमाण खूपच कमी होते. आणि म्हणूनच डॉक्टर आणखी तीन वर्षे (म्हणजे त्यांच्या वयाच्या सत्तरीपर्यंत) संपादक व मी कार्यकारी संपादक, अशी रचना मला हवी होती. त्यामुळे डॉक्टरांच्या अशा अचानक जाण्याने माझे किती नुकसान झाले आहे, याची कल्पना कोणालाही येणार नाही.

'त्या' २० ऑगस्टच्या तीनच आठवडे आधी 'राजकारणाचा ताळेबंद' या पुस्तकाच्या कामासाठी मी सुहास पळशीकर यांच्या घरी जरा निवांत बसलो होतो, तेव्हा ते म्हणाले, ''बऱ्याच दिवसांपासून सांगायचे म्हणतोय, पण राहून गेले. पत्र पाठवायचा विचारही मनात आला होता, पण तुम्ही 'प्रतिसाद'मध्ये छापाल आणि त्याची चर्चा होईल म्हणून नाही पाठवले... साधनाचे अंक अधिकाधिक चांगले होत आहेत, ते काम तूच करतोस हे मला माहीत आहे; पण त्याचे श्रेय मी तुझ्यापेक्षा जास्त नरेंद्रला देईन. कारण असे काम करण्यासाठी 'स्वातंत्र्य' खूप आवश्यक असतं. मी इतर ठिकाणी पाहिलंय, असं स्वातंत्र्य दोन-तीन वर्षे मिळतं. पण नरेंद्रने असं स्वातंत्र्य तुला गेली सहा-सात वर्षे दिलंय, म्हणून साधना अंकाचा दर्जा उंचावण्याचे जास्त श्रेय मी नरेंद्रला देतो.''

सुहास पळशीकरांचे हे सांगणे तेव्हाच माझ्या मनावर नोंदवले गेले, पण त्यावर फारसा विचार मी केला नव्हता. आता वर्ष उलटल्यानंतर विचार करताना मला वाटतं- शब्दांचा काटेकोर वापर करणाऱ्या व इतरांचे कौतुक करण्याबाबत बऱ्यापैकी काटकसरी असलेल्या सुहास पळशीकर यांच्या वरील निष्कर्षाशी मी पूर्णत: सहमत आहे!

विनोद शिरसाठ