महाराष्ट्र फाउंडेशन ( अमेरिका )

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

पुरस्कार : २०१६

१) साहित्य जीवनगौरव : अरूण साधू (मुंबई)

२) समाजकार्य जीवनगौरव : हमीद दलवाई (मरणोत्तर )

३) डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार : अतुल पेठे (पुणे)

४) ललित ग्रंथ पुरस्कार : अंजली जोशी (विरंगी मी विमुक्त मी) (मुंबई)

५) विशेष ग्रंथ पुरस्कार : अरुण जाखडे (इर्जिक) (पुणे)

६) रा.शं. दातार नाट्य पुरस्कार : अनिलकुमार साळवे (औरंगाबाद)

७) सामाजिक प्रबोधन : देवाजी तोफा (गडचिरोली )

८) सामाजिक असंघटित कष्टकरी : सुशीला नाईक (निपाणी )

९) सामाजिक प्रश्न : विजय दिवाण (गागोदे)

पुरस्कार निवडीचे निकष

मराठी ललित किंवा वैचारिक साहित्याच्या क्षेत्रांत आपल्या आयुष्यभराच्या कार्याने मोलाची भर घालणाऱ्या साहित्यिकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याचा सन्मान करण्यासाठी दोन लक्ष रुपये आणि मानचिन्ह असा एक जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.

दरवर्षी ललित किंवा वैचारिक यांपैकी एकाच विभागात हा पुरस्कार दिला जातो. या जीवनगौरव पुरस्कारासाठी नावांचा विचार करताना खालील बाबी विचारात घेतल्या जातात.

जीवनगौरव : ललित साहित्याच्या संदर्भात...

ज्यांच्या साहित्यातून मानवी स्वातंत्र्य, समता, न्याय यांच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक परिवर्तनाची जाणीव व्यक्त झाली आहे.

ज्यांच्या साहित्यातून मानवी जीवनाचे समर्थ दर्शन घडविले गेले आहे.

ज्यांच्या साहित्यातून सार्वकालीन व सार्वजनिक मूल्यांचा आविष्कार झालेला आहे.

ज्यांच्या साहित्यामुळे मराठी साहित्याच्या संचितात मोलाची भर पडली आहे किंवा ज्यांचे साहित्य मराठी साहित्याच्या इतिहासात महत्त्वाचे ठरले आहे.

जीवनगौरव : वैचारिक साहित्याच्या संदर्भात...

इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान, साहित्य-संशोधन व समीक्षा यांसारख्या वैचारिक क्षेत्रांत ज्यांच्या मराठी लेखनामुळे महत्त्वाची भर पडली आहे.

त्या त्या क्षेत्रात ज्या साहित्यिकांनी नि:स्पृह वृत्तीने व निर्भयपणे तात्त्विक सत्याचा शोध घेतला आहे.

ज्यांची जाणीव मानवी स्वातंत्र्य, समता व न्याय यांच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरणेने उद्युक्त झाली आहे.

मराठी समाजाच्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने ज्यांचे लेखन महत्त्वाचे ठरले आहे.

ग्रंथांसाठी पुरस्कार :

समकालीन मराठी साहित्याला प्रोत्साहन म्हणून तीन मराठी ग्रंथांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे पुरस्कार दिले जातात. पुरस्कार दिल्या जाणाऱ्या वर्षालगतच्या मागील तीन वर्षातील पुस्तकांचा विचार केला जातो. या वर्षी जानेवारी २०११ ते डिसेंबर २०१३ या तीन वर्षांतील पुस्तके विचारात घेतली आहेत.

रा. शं. दातार नाट्य पुरस्कार

नाटक या प्रकारासाठी २००३ सालापासून हा पंचवीस हजार रुपयांचा पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जातो. एखाद्या महत्त्वाच्या सामाजिक समस्येविषयी आशयसंपन्न नाट्यकृती सादर करण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या नाट्यकर्मीला हा पुरस्कार देण्याची योजना आहे.

समाजकार्य पुरस्कार

१९९६ पासून 'समाजकार्य पुरस्कार योजना' सुरू झाली. महाराष्ट्रात परिवर्तनवादी सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती व संस्था यांच्या कार्याचे मोल जाणून घेऊन त्याबद्दल त्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करावा या हेतूने हे पुरस्कार सुरू केले.

समाजप्रबोधन, स्त्रियांचे प्रश्न व पर्यावरण-संतुलन, संरक्षण तसेच परिवर्तनक्षम शैक्षणिक कार्य, दलितांचे प्रश्न आणि जातीय सलोखा या क्षेत्रांतील व्यक्तींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा कार्यकर्ता पुरस्कार देण्यात येतो.

२००५ पासून समाजबदलाच्या चळवळींमध्ये अविरत काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या गौरव पुरस्कारासाठी व्यक्तींच्या नावाचा विचार करताना खालील बाबी विचारात घेतल्या.

१. ज्या व्यक्ती आपले कार्य व विचार यांच्या साहाय्याने विवेकनिष्ठा, वैज्ञानिक दृष्टी व सामाजिक न्याय ही मूल्ये रुजवण्यासाठी सातत्याने प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.

२. पर्यावरण संतुलनाचा ध्यास घेऊन त्यासाठी संशोधन, प्रयोग, लोकशिक्षण, जनसंघटन यांसारख्या विविध मार्गांनी निसर्गाच्या संरक्षणाकरता ज्या व्यक्ती अविरत कार्य करीत आहेत.

३. ज्या व्यक्तींच्या कार्यामुळे स्त्रियांमध्ये स्वावलंबन व स्वातंत्र्य यांविषयीच्या जाणीवा वाढत आहेत आणि अन्यायाविरुद्ध झगडण्याची त्यांची ईर्ष्या जागृत होत आहे.

महाराष्ट्र फाउंडेशनच्या कोणत्याही पुरस्कारासाठी अर्ज करावे लागत नाहीत. निवड समित्यांचे सदस्य त्या त्या क्षेत्रांतील जाणकारांशी चर्चा करून प्रत्येक पुरस्कारासाठी तीन नावांची शिफारस अमेरिकेतील निवड समितीला करतात आणि त्यातून अंतिम निवड केली जाते.