पहिले संपादकीय

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

आद्य संपादकीय निवेदन

साने गुरुजी

(१५ ऑगस्ट १९४८ रोजी प्रसिद्ध झालेल्या 'साधना' साप्ताहिकाच्या पहिल्या अंकात संस्थापक-संपादक साने गुरुजी यांनी 'साधना' साप्ताहिक प्रकाशित करण्यामागील भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध केलेले निवेदन.) आज १५ ऑगस्ट. स्वातंत्र्याचे बाळ जन्मून एक वर्ष झाले. स्वातंत्र्यबाळाचा हा पहिला वाढदिवस. किती आपत्तींतून हे बाळ वाढत आहे! या बाळासाठी महात्माजींचे प्राणही खर्च पडले. हे बाळ त्रिभुवनमोलाचे आहे. त्याचा सांभाळ व्हावा, ते वाढावे, यासाठी कितीही किंमत द्यावी लागली तरी ती कमीच आहे. किती तरी गोष्टी डोळ्यांसमोर येतात. हृदय दु:खी होते, सद्गदित होते. डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू येतात. संमिश्र भावनांचा सिंधू हृदयात उसळतो, उचंबळतो. परंतु आवेग आवरून विवेकाने कामाला लागायला हवे. प्राप्त परिस्थितीतील कर्तव्य करायला ज्याने त्याने आपापल्या वृत्ती-प्रवृत्तीप्रमाणे लागले पाहिजे. ज्याची जशी शक्ती, तशी त्याने ती वेचावी.

स्वातंत्र्य म्हणजे संधी

स्वातंत्र्य म्हणजे सर्वांच्या विकासाला संधी. स्वातंत्र्य म्हणजे सुखसंपन्न होण्याचे साधन. अत:पर या देशात कोणी दु:खी कष्टी नको. सर्वांना स्वाभिमानाने जगता येऊ दे. कोणाच्याही विकासाच्या आड आता दारिद्र्य येता कामा नये. स्वच्छता, आरोग्य येऊ दे. अन्याय जाऊ दे. उपासमार जाऊ दे. नको वशिला, नको लाचलुचपत. नको कोणी उन्मत्त. सर्वांची सरळ मान होऊ दे. सर्वांनाच वाव असू दे. सर्वांना अन्न वस्त्र मिळो, राहायला साधेसुधे घरदार असो. मिरासदारी कोणाचीच नको. जमीन नसेल त्याला जमीन द्या. तो स्वत: कसायला तयार असला म्हणजे झाले! कामगारांचे हितसंबंध आधी संरक्षिले जावोत. अहिंसक रीतीने सर्वांना संघटना करण्याची मोकळीक असो. सरकारी सत्तेने कोणावर दडपण आणू नये. श्रमणाऱ्यांनी आपली प्रतिष्ठा ओळखावी. मालकांनी नम्रता शिकावी. वरच्यांनी खाली यावे. खालच्यांनी वर चढावे; दोघांनी एकमेकांस भेटून रामराज्य करावे.

स्वातंत्र्य म्हणजे संयम

स्वातंत्र्यात असे हे सारे आपणांस निर्मावयाचे आहे. एक नवे युग आणायचे आहे. एक नवी सृष्टी उभी करावयाची आहे. हे महान कार्य आहे. त्यासाठी सर्वांनी संयम पाळायलाही शिकले पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे उच्छृंखलपणा नव्हे; स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे! स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. आपण एकमेकांच्या भावना ओळखायला शिकले पाहिजे. सर्वांना सांभाळले पाहिजे. सर्वांना सन्मानिले पाहिजे. माझी जात, माझा प्रांत, माझी भाषा, माझा धर्म, असे सारखे म्हणणे बरे नव्हे. अखिल भारतीय दृष्टी कधी विसरून चालणार नाही. एवढेच नव्हे, तर आज भारतीय असूनही अतिभारतीय झाले पाहिजे. आपण जगाचे नागरिक एका अर्थाने झाले पाहिजे. म्हणून क्षुद्र कुंपणे नका घालू. क्षुद्र घरकुले नका बांधू. विशाल दृष्टी, व्यापक सहानुभूती यांची अत्यंत आवश्यकता आहे; तरच संस्कृती फुलेल, मानवता फुलेल.

नैतिक भावना

आपल्या सर्व व्यवहारात एक प्रकारची नैतिक तळमळ हवी. स्वराज्य, लोकशाही म्हणजे थट्टा नाही. ती एक गंभीर वस्तू आहे. आपल्याला जनतेचे कल्याण करावयाचे आहे. एखाद्या जातीचे, पंथाचे स्तोम नाही माजवायचे. सार्वजनिक नीती म्हणून काही वस्तू आहे.

इंग्लंडमध्ये प्रधानालाही त्याने सार्वजनिक वाहतुकीचा नियम मोडला म्हणून दंड करण्यात आला. परंतु आपल्याकडे काय आहे प्रकार? संयुक्त प्रांतातील माजी मंत्री पालीवाल आपली मोटार चुकीच्या बाजूने हाकीत होते. पोलिसांनी अडविली. श्री. पालीवालांनी म्हणे उतरून त्या पोलिसास चोप दिला. ''प्रधानाची मोटर, कळत नाही?'' अशी धमकी दिली. मागून या गोष्टीचा बभ्रा झाल्यावर त्यांनी दिलगिरी दाखविली म्हणतात. या बाबतीत पंडित जवाहरलाल आदर्श आहेत. नागपूरहून रात्रीच्या वेळेस वर्ध्याला घाईने मोटारीतून ते येत होते. वाटेत एक मुलगा मोटारीखाली सापडला. त्यांनी या मुलाला मोटारीत घालून वर्ध्यास आणले. त्याची दवाखान्यात व्यवस्था केली. लगेच ते पोलीसठाण्यावर गेले. आपण होऊन सारे सांगून ते म्हणाले, ''माझ्यावर रीतसर खटला भरा. सामान्य माणसाप्रमाणेच मलाही मानले पाहिजे.'' स्वराज्यात आपण कायद्याची प्रतिष्ठा पाळली पाहिजे. हातून बेकायदा काही झाले, तर दिलगिरी दाखवावी. शिक्षा दंड झाला, तर भोगावा. अन्याय्य कायदे असतील, तर त्यांच्याविरुद्ध आपण जनमत तयार करू शकतो. परंतु जे कायदे जनतेचे जीवन नीट चालावे म्हणूनच केलेले असतील; सार्वजनिक व्यवस्थेसाठी असतील, ते मोडणे पाप आहे. ते मोडून पुन्हा त्यात प्रतिष्ठा मानणे, हे तर महापाप. तो माझ्या पक्षाचा, तो माझ्या जातीचा, तो माझ्या धर्माचा, तो माझा सखा, असले संबंध न्यायासमोर आणू नयेत. जनतेने हे शिकायचे आहे. जनतेच्या पुढाऱ्यांनी स्वत:च्या थोर वर्तनाने हे जनतेला शिकवायचे आहे. आपण अजून, सर्व राष्ट्राची, सर्व समाजाची अशी दृष्टी घेऊ शकत नाही. परंतु ही जोपर्यंत येणार नाही तोवर लोकशाही म्हणजे थट्टा होईल. आलेले स्वातंत्र्य, मिळालेले स्वराज्य जर टिकवायचे असेल, कार्य जर करायचे असेल, तर संकुचितता, क्षुद्रता, स्वार्थ इत्यादी गोष्टी आपण दूर करायला शिकले पाहिजे. काही तरी सार्वजनिक भान आपणाला आले पाहिजे.

'साधना'

स्वराज्य आले. गांधीजी मागील वर्षी म्हणाले, ''स्वराज्य आले म्हणतात, मला तर ते दिसत नाही. भाऊ भावाचा गळा कापीत आहे. हे का स्वराज्य? स्वराज्य म्हणजे का माणुसकीचा अस्त, संस्कृतीला तिलांजली?'' स्वराज्याच्या महान् 'साधना'ने आपण मानव्य फुलवायचे आहे. संस्कृती समृद्ध करायची आहे. त्यासाठी अखंड 'साधना' हवी. जीवन अनेकांगी आहे. जीवनाच्या क्षेत्रात, सर्व व्यवहारांत आपण साधकाच्या वृत्तीनेच वागण्याची धडपड केली पाहिजे. यालाच पुरुषार्थ म्हणतात. उत्तरोत्तर अधिक चांगले होण्याची खटपट करणे. एका अमेरिकन लेखकाने 'पुन्हा धर्माकडे' म्हणून एक सुंदर अनुभवजन्य पुस्तक लिहिले आहे. त्यांत त्याने Betterism असा शब्द योजिला आहे. 'बेटरिझम' म्हणजे माणसाने मी चांगला होईन, अधिक चांगला होईन, हा ध्यास घेणे. चांगले कसे होता येईल? जीवन अधिक समृद्ध, अंतर्बाह्य संपन्न कसे करता येईल? 'मी आणि माझे' हे तुणतुणे दूर करून दुसऱ्यांच्या सुखदु:खाचा जेव्हा आपण विचार करू, सेवा करू, अधिक लोकांशी मिसळायला लागू; तेव्हा दुसऱ्यांचे चांगले ते घेऊ, सर्वांचे स्वागत करू, अधिक चांगले होण्याचा मार्ग लाभेल. भारतीय जनतेला हे शिकायचे आहे. येथे अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक जातिजमाती, अनेक धर्म यांचा संगम आहे. अशा देशात जर खरी संस्कृती वाढवायची असेल तर मिळते-जुळते घेऊनच वागावे लागेल. विनोबाजी दिल्लीला गांधीजींच्या चौथ्या मासिक श्राद्धदिनी म्हणाले,

''रामराज्याचे वर्णन तुलसीदासांनी पुढीलप्रमाणे केले आहे :
वैर न कर काहुसन कोई
राम-प्रताप विषमता खोई

वैराचा अभाव आणि विषमता नसणे, ही रामराज्याची दोन लक्षणे होत. हीच व्याख्या गांधीजींनीही केली होती. पण त्यांनी पाहिले, की स्वराज्याचे दर्शन झाले नाही तोच वैराचे शमन होणे तर दूरच राहिले; वैराची अशी काही आग भडकली, की तिला क्वचितच तुलना असेल. हे पाहून स्वाभाविकच गांधीजी दु:खी राहात. स्वराज्याची ही दोन्ही लक्षणे पूर्णपणे आपण सिद्ध केली पाहिजेत. हिंदुस्थानात इतके विविध समाज राहात आहेत; ते मित्र-भावाचा पाठ शिकण्यासाठी आहेत, असे आपण समजावे. आपल्या उदार संस्कृतीचा हा बोध जर आपण घेतला तर वैरभावही नाहीसा होईल आणि विषमताही नष्ट होईल.''

वैरभाव नि विषमता नष्ट करण्याची थोर 'साधना' आपणास करावयाची आहे. हे 'साधना' साप्ताहिक या ध्येयाने जन्मत आहे. किती तरी दिवसांपासून हे साप्ताहिक निघेल निघेल म्हणून मित्र वाट पाहात होते. मध्यंतरी सायंदैनिक 'कर्तव्य'च क्षणभर जन्माला आले. ते बंद करून त्याचेच प्रात:दैनिक करण्याची आकांक्षा होती. स्वत:चा छापखाना असल्याशिवाय दैनिक काढणे अशक्य. म्हणून त्या खटपटीला लागलो. कसाबसा छापखाना उभा केला आहे. परंतु दैनिक आज नीट सुरू करण्याइतकी शक्ती नाही. तेव्हा सध्या साप्ताहिक 'साधना' सुरू करून समाधान मानीत आहे. हे जर स्वावलंबी झाले, छापखानाही जरा वाढला, सुरळीत चालू लागला, साधनसामुग्री जर वाढली तर 'कर्तव्य' दैनिक केव्हा तरी सुरू करण्याची मला तळमळ तर आहे. तोवर मित्रांनी या साप्ताहिकालाच आधार द्यावा, नि प्रभूने आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना आहे.

'साधना'चे स्वरूप

या साप्ताहिकाचे स्वरूप कसे असेल? निरनिराळ्या भाषांतील मोलवान प्रकार येथे तुम्हांला दिसतील. भारतातील प्रांतबंधूंची येथे प्रेमाने ओळख करून देण्यात येईल. देशातील नि जगातील नाना संस्कृतींचे रंग नि गंध तुम्हांला दाखवण्यात येतील, देण्यात येतील. नाना धर्मातील सुंदरता, उदात्तता यांची येथे भेट होईल. शेतकरी, कामगार, यांच्या जगातही आपण येथे वावरू. त्यांचे प्रश्न चर्चू, त्यांची स्थिती समीक्षू. शिक्षणाच्या क्षेत्रातही आपण जाऊ. मुलांच्या संगीतात रमू. ती आपल्याला गोष्टी-गंमती सांगतील; आपण त्यांना सांगू. समाजात अनेक अज्ञात माणसे सेवा करून समाजवृक्षाला ओलावा देत असतात. त्यांच्या हकीगती येथे येत जातील. कधी येथे प्रश्नोत्तररूप महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा आढळेल. गंभीर विषयांवरचे निबंध येतील. सुंदर गोष्टी वाचायला मिळतील. कधी आपण साहित्याच्या मंदिरात दर्शनाला जाऊ, कधी विज्ञानाच्या पराक्रमी कथा ऐकू. कधी निर्मळ समाजवादाचे उपनिषद वाचू. मनात कितीतरी आहे. जेवढे जमेल तेवढे करीन. ते गोड करून घ्या. 'कर्तव्य' लवकर बंद पडले. 'साधना' साप्ताहिकाची तरी काय शाश्वती? प्रभूची इच्छा प्रमाण. ज्याला दोन दिवसच सेवा करता आली, त्याची तेवढीच गोड माना. असे नका म्हणू, हे आरंभशूरत्व आहे. म्हणा, की ही धडपड करतो. राहवत नसते म्हणून माणूस धडपड करतो; परंतु कोणी काही म्हणतो. आशेने 'साधना' साप्ताहिक आज स्वातंत्र्याच्या प्रथम वाढदिवसाच्या सुमुहूर्ताने मी सुरू तर करीत आहे. जोवर शक्ती असेल तोवर 'साधना' टिकेल. आसक्ती कशाचीच नको.

(१५ ऑगस्ट १९४८)