प्रास्ताविक

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

सध्याचे विश्वस्त मंडळ :

विजया चौहान (अध्यक्ष),
हेमंत नाईकनवरे (विश्वस्त सचिव),
गणपतराव पाटील,
सुहास पळशीकर,
विवेक सावंत,
डॉ. हमीद दाभोलकर,
विनोद शिरसाठ.

सल्लागार :

सुनील देशमुख,
जे. बी. पाटील,
दत्ता वान्द्रे.

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. रवींद्रनाथ टागोर यांचे 'साधना' हे पुस्तक गुरुजींना आवडले होते आणि त्यातून साधना या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती ख-या अर्थाने प्रतिबिंबित होते, म्हणून गुरुजींनी आपल्या साप्ताहिकाचे नाव 'साधना' असे ठेवले. साने गुरुजींच्या धडपडणा-या मुलांपैकी एक असलेले कवीवर्य वसंत बापट यांनी अनेक संस्थांना, नियतकालिकांना घोषवाक्ये दिलेली आहेत. उदा. 'पत्र नव्हे मित्र' हे 'महाराष्ट्र टाइम्स'चे घोषवाक्य आणि 'लोकमान्य लोकशक्ती' हे 'लोकसत्ता'चे घोषवाक्य वसंत बापट यांनीच तयार केले आहे. अशा या बापटांनीच साधनाचे घोषवाक्य तयार केले आहे.

स्थापण्या समता शांती! ठेवुनी शुद्ध साधनां करिती साधना! त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना

या घोषवाक्याचा अर्थ - 'समता आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी शुद्ध साधनांचा (साध्यसाधन विवेकाचा) अवलंब करून जे कोणी सतत प्रयत्नशील राहतील, त्यांना उत्स्फूर्त ठेवण्यासाठी हे साधना साप्ताहिक प्रयत्नशील राहील.'साधना साप्ताहिक सुरू झाल्यानंतर अवघ्या पावणेदोन वर्षांनीच साने गुरुजींचे निधन झाले. त्यांच्यानंतर आचार्य जावडेकर व रावसाहेब पटवर्धन या दोघांनी साधनाचे संपादक व्हावे, असे गुरुजींनीच आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवले होते. 1948 ते 56 ही आठ वर्षे मुंबई येथून साधना प्रकाशित होत होते, त्यानंतर साधनाचे कार्यालय पुणे येथे हलवण्यात आले. 1956 ते 80 असा तब्बल 25 वर्षांचा कालखंड यदुनाथ थत्ते यांच्या संपादकपदाचा होता आणि त्याच काळात साधनाने महाराष्ट्रातील जनमानसाचा कब्जा घेतला. यदुनाथ थत्ते यांच्यानंतर दोन वर्षे नानासाहेब गोरे आणि त्यांच्यानंतर 14 वर्षे वसंत बापट व ग. प्र. प्रधान यांनी संपादकपद सांभाळले. साधनाच्या सुवर्णमहोत्सवानंतर (1998) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी 15 वर्षे म्हणजे 2013 पर्यंत संपादकपद भूषवले.

गेली 67 वर्षे साधनाची वाटचाल अखंड चालू आहे. प्रत्येक शनिवारी साधनाचा अंक प्रकाशित होतो आणि महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत व अन्य काही राज्यांत साधनाचे वर्गणीदार- वाचक आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे लेख साधऩातून प्रसिद्ध केले जातात. वर्षभरात सहा – सात विशेषांक हे साधनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि त्यातही बालकुमार व युवा दिवाळी अंक, या दोन अंकांनी विक्रीचे उच्चांक निर्माण केले आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख लेखकांनी साधनात कधी ना कधी लेखन केलेले आहे.

साधनाची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे, हे वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक आहे. विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन करण्यासाठी व वाचण्यासाठी साधना हे आज मराठीतील सर्वांत महत्त्वाचे 'विचारपीठ' समजले जाते. भारतीय राज्यघटनेतील ध्येय – धोरणांशी सुसंगत भूमिका घेऊन साधनाची वाटचाल होत आली आहे. त्यामुळे संविधानाशी बांधील राहून सनदशीर मार्गाने होत असलेल्या अहिंसक व लोकशाहीवादी चळवळी – आंदोलने यांना साधनाचा सतत पाठिंबा राहिला आहे. स्वातंत्र्य, न्याय, समता प्रस्थापित करण्याचा आणि धर्मनिरपेक्ष, लोकशाही समाजवादी गणराज्य घडवण्याचा संविधानाचा निर्धार पूर्णत्वास जावा, यासाठी साधना यथाशक्ती प्रयत्न करीत आहे. हे करताना उपेक्षित, शोषित, वंचित घटकांना अधिक झुकते माप देणे आणि जात, धर्म, भाषा, प्रदेश, लिंग याबाबतच्या संकुचित विचारांना थारा न देणे, याबाबत साधनाच्या संपादकीय धोरणाचा कटाक्ष राहिला आहे.

साधना साप्ताहिक विश्वस्त मंडळींकडून चालवले जाते. साधना प्रकाशन आणि साधना मीडिया सेंटर या अन्य दोन शाखा व साधना साप्ताहिक या सर्वांचे नियंत्रण 'साधना ट्रस्ट'मार्फत केले जाते.