साठी नंतरची पाच वर्षे

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

विनोद शिरसाठ

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे १५ ऑगस्ट १९४८ रोजी, साने गुरुजींनी सुरू केलेले 'साधना' साप्ताहिक येत्या १५ ऑगस्टला ६६ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. म्हणजे 'साधना'च्या ६५ व्या वर्षातील हा शेवटचा अंक आहे. 'साधना'च्या हीरकमहोत्सवी वर्षात (२००७-०८) ग. प्र. प्रधान व रा. ग. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आधीच्या ५९ वर्षांतील जवळपास तीन हजार अंकांचे विहंगमावलोकन करून 'निवडक साधना' हा आठ खंडांचा ग्रंथसंच प्रकाशित केला होता. त्या वर्षभरात 'साधना'ने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते आणि विविध उपक्रम सुरू केले होते. हीरकमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला होता आणि हीरकमहोत्सवी वर्षाच्या समारोप कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील आल्या होत्या. हीरकमहोत्सवी वर्षातील कार्यक्रम व उपक्रम ही 'साधना'च्या अमृतमहोत्सवी वाटचालीची पायाभरणी होती, असे आम्ही राष्ट्रपतींच्या उपस्थितीत जाहीर केले होते. बरोबर पाच वर्षे झाली त्या घटनेला! म्हणजे अमृतमहोत्सवी वाटचालीतला एक-तृतीयांश टप्पा ओलांडला गेला आहे. या टप्प्यावर मागे वळून ओझरती नजर टाकली तर, बरेच काही करता आल्याचे समाधान आणि खूप काही करायचे राहून गेल्याचे असमाधान अशा संमिश्र भावना गर्दी करीत आहेत. त्यामुळे एक प्रकारचा तटस्थपणा अनुभवाला येतो आहे. अगदी मनातले पण थोडक्यात सांगायचे तर; आपण पठारावर आलो आहोत आणि पुढची अवघड चढण बाकी आहे, या भावनेची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे वाचकांशी थोडेसे हितगुज करावेसे वाटते आहे. हे हितगुज चार प्रकारचे आहे. एक- काय चांगले करता आले, दोन- काय करणे नीट जमले नाही, तीन- आक्षेप व अपेक्षा काय आहेत, चार- आव्हाने व संधी काय आहेत.

एक

१. साने गुरुजींना ज्याचे सर्वाधिक अगत्य होते, त्या बाल-कुमार वाचकांसाठी सुरू केलेल्या 'साधना' बाल-कुमार दिवाळी अंकाला मिळालेले सातत्यपूर्ण यश ही गेल्या पाच वर्षांतील सर्वांत मोठी उपलब्धी आहे. पहिल्या वर्षी केवळ ११ हजार, दुसऱ्या वर्षी जवळपास दीड लाख, तिसऱ्या वर्षी पावणेचार लाख, चौथ्या वर्षी साडेचार लाखांपेक्षा थोड्या कमी आणि पाचव्या वर्षी साडेतीन लाखांहून अधिक इतक्या प्रतींचा खप हे आकडे तर पुरेसे बोलके आहेतच; पण पहिली तीन वर्षे आठ रुपये आणि नंतरची दोन वर्षे १० रुपये इतक्या अल्प किमतीत हे अंक उपलब्ध करून महाराष्ट्रातील जवळपास २५ जिल्ह्यांत ते वितरित केले आहेत. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना समोर ठेवून काढत असलेल्या या अंकाला मिळत असलेला प्रतिसाद असाच टिकवता आला, वाढवता आला; तर भावी काळात 'साधना' साप्ताहिकाचे वर्गणीदार वाचक वाढविण्यासाठी मोठीच 'स्पेस' निर्माण होणार आहे.

२. गेल्या पाच वर्षांत प्रकाशित केलेले विशेषांक हे 'साधना'चे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. 'भारतातील प्रादेशिक पक्ष', 'भारताचे शेजारी', 'नक्षलवादाचे आव्हान', 'दलपतसिंग येती गावा', 'शेती आणि शेतकरी', 'विदर्भाला सुखी करा', 'मराठवाडा शब्द निरर्थक व्हावा', ही त्या विशेषांकांची नावे लक्षात घेतली तरी 'साधना'ने हाताळलेल्या विषयांची व्याप्ती व खोली लक्षात येईल. 'साधना'च्या दिवाळी विशेषांकांतूनही अधिक सकस व गंभीर मजकूर देण्याचा प्रयत्न राहिला आहे. गेल्या तीन वर्षांतील 'साधना'चे दिवाळी अंक तर- 'शोध आणि बोध', 'वेग आणि वेध', 'मागोवा आणि कानोसा' या 'थीम' घेऊन काढले आहेत. दीर्घ लेख हे गेल्या पाच वर्षांतील 'साधना'चे आणखी एक वैशिष्ट्य राहिले आहे. त्यात राजा शिरगुप्पे यांनी केलेल्या प्रत्येकी एक ते दोन महिन्यांच्या तीन शोधयात्रा लक्षणीय आहेत. 'शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागांची', 'शोधयात्रा : ग्रामीण बिहारची', 'शोधयात्रा : ईशान्य भारताची' या तीनही शीर्षकांतून विकासातील असमतोल अधोरेखित केला आहे.

३. गेल्या पाच वर्षांत 'साधना'तून प्रसिद्ध झालेली सदरे व लेखमाला यांची संख्या ५० पेक्षा अधिक आहे. त्यांत गोविंद तळवलकर, सुरेश द्वादशीवार, रामचंद्र गुहा, सदानंद मोरे, अवधूत परळकर, ज्ञानेश्वर मुळे, लक्ष्मीकांत देशमुख, राजन गवस, राजन खान, अरुणा ढेरे, रेणू गावस्कर, ज्ञानदा नाईक, अशोक पवार, राजा शिरगुप्पे, संजय भास्कर जोशी... अशी अनेक नावे सांगता येतील. त्यांतून २० पुस्तके तयार झाली आहेत. 'साधना' प्रकाशनाकडूनच ही पुस्तके आलेली असूनही (किंबहुना म्हणूनच) यातील बहुतांश पुस्तकांच्या दुसऱ्या-तिसऱ्या आवृत्त्या चालू आहेत, हे लक्षात घेतले, तर त्या लेखमाला व सदरे यांचा दर्जा समजून घेता येईल. नामदेव माळी लिखित 'शाळाभेट' या पुस्तकाच्या १२ हजार प्रतींची विक्री केवळ वर्षभरात झाली, हे सांगताना आमच्या मनात त्या आकड्याचे अप्रूप नाही, तर महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या हातांत मोठ्या प्रमाणात ते पुस्तक पोहोचले याचा आनंद आहे...

४. भारताच्या केवळ अंतर्गत सुरक्षिततेलाच नव्हे तर भारताच्या संसदीय लोकशाहीला सर्वांत मोठा धोका नक्षलवादापासून आहे, अशी सुस्पष्ट भूमिका घेऊन 'साधना'ने गेल्या पाच वर्षांत ज्या दर्जाचे व ज्या प्रमाणात लेखन प्रकाशित केले; तसे मराठीतील अन्य कोणत्याही नियतकालिकाने केलेले नाही, ही वस्तुस्थिती म्हणून नोंदवणे आवश्यक आहे. सन २००९ च्या १५ ऑगस्टला काढलेला विशेषांक आणि नंतर देवेंद्र गावंडे यांची लेखमाला व त्याचे पुस्तक यातून नक्षलवादाच्या आव्हानाचे स्वरूप अशा प्रकारे स्पष्ट केले आहे की, या विषयावरील हे मराठीतील सर्वांत उपयुक्त पुस्तक मानले जाते. इंग्रजीतही या प्रकारचे पुस्तक अद्याप आलेले नाही.

५. अंकातील मजकुराव्यतिरिक्त 'साधना' साप्ताहिकाच्या अन्य काही महत्त्वाच्या कृती आहेत. उदा. 'साधना'ने केलेली मदतीची आवाहने. बार्शीच्या महेश माळी या विद्यार्थ्याचे ऑपरेशन, सोलापूरच्या स्वाती गायकवाड या मुलीचे थांबलेले शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठीचा खर्च, जातपंचायतीने अमरावतीच्या परसंता पवारला ठोठावलेला दंड, नक्षलवाद्यांनी हत्या केली त्या चंद्रपूरच्या बहादूर शहा आलाम याच्या घराचे अर्धवट राहिलेले काम, अहमदनगर व सातारा जिल्ह्यांतील दलित हत्याकांडातील कुटुंबीयांसाठी सहवेदना निधी यासाठी प्रत्येक वेळी ५० हजार ते दीड लाख रुपये इतकी मदत 'साधना'च्या वाचकांकडून दिली गेली. 'साधना'ला मिळालेल्या देणग्यांतून हिनाकौसर खान, नीलेश मोडक, राजा शिरगुप्पे, विश्वास पाटील, विनय सावंत, नीलू आपटे यांना अभ्यासवृत्ती प्रदान करून काही महत्त्वाच्या विषयांवरील लेखन मिळवण्याचा प्रयत्न करता आला. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारांचे संयोजन पाच वर्षांपूर्वी 'साधना'कडे आले. त्यांच्या दरवर्षी जवळपास आठ लाख रुपयांच्या 'साहित्य' व 'समाजकार्य' पुरस्कारांची कार्यवाही करताना त्या दोनही क्षेत्रांमध्ये 'साधना'ला आपला पाया विस्तारता आला.

दोन

१. महिलांचे प्रश्न हाताळणारे लेखन व चळवळी-आंदोलने यांची दखल घेणारे लेखन यांचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत 'साधना'तून खूपच कमी राहिले, हे सर्वांत मोठे न्यून आहे. यातील पहिल्या प्रकारचे लेखन मिळवण्यात विशेष अडचणी नाहीत; ते मिळवण्याकडे लक्ष केंद्रित करता आले नाही, हेच खरे. यासाठी कोणतेही समर्थनीय कारण देता येणार नाही. पण दुसऱ्या प्रकारचे लेखन मिळवण्यात मात्र बऱ्याच अडचणी आहेत. म्हणजे प्रत्यक्ष चळवळी-आंदोलने कारणारे लोक लिहू शकत नाहीत; त्यांतील ज्यांना लिहिता येते त्यांना उसंत नसते आणि बाहेरच्या लोकांना प्रत्यक्ष संघर्षात्मक लढाईतील वा विधायक कार्यातील ताणेबाणे नीट उलगडून दाखवता येत नाहीत... असे असले तरी अधिक प्रयत्न करून हे 'न्यून' दूर करावेच लागेल.

२. ताज्या घटना-घडामोडींवरील लेखनाचे प्रमाण कमी राहिले आहे, ताज्या विषयांवरील विश्लेषणात्मक लेखन मिळवण्यात व ते प्रसिद्ध करून वाचकांपर्यंत पोहोचविण्यात मुख्य अडचण वेळेची आहे. साप्ताहिक असल्याने लेख लिहायला सांगणे ते वाचकांना वाचायला मिळणे यादरम्यान किमान आठ-दहा दिवसांचा काळ जातो. पण तरीही अंकाची वाचनीयता वाढविण्यासाठी ही त्रुटी कमी करत जायला हवी याची आम्हांला जाणीव आहे. त्यासाठी काही नव्या दमाच्या लेखकांची 'टीम' तयार करणे, हाच त्यावर उपाय आहे. शब्दांकनाच्या माध्यमातून ताज्या विषयांवरील लेख व मुलाखती प्रसिद्ध करणे हा एक चांगला पर्याय आहे, त्याचा अवलंब पुढील काळात वाढलेला दिसेल.

३. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतील व वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लेखकांना अधिक लिहिते करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो, पण त्याबाबत आम्हांला समाधानकारक यश मिळालेले नाही. 'साधना' अंकांतून प्राधान्याने सामाजिक-राजकीय भूमिका घेण्याच्या व मांडण्याच्या आमच्या धोरणामुळे ललित साहित्याचा मजकूर कमी-कमी होत गेला आहे; त्यामुळे तोल ढळल्याचे काहीसे जाणवते, हे खरे आहे.

४. विविध प्रकारचे, प्रवाहांतले, प्रदेशांतले लेखन मिळवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही 'साधना' साहित्य संमेलने आयोजित करायला पाच वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. पहिली चार संमेलने कादंबरी, कविता, कथा, नाटक या चार साहित्यप्रकारांना केंद्रस्थानी ठेवून अनुक्रमे पुणे, गोवा, कोल्हापूर, नाशिक येथे घेतली. चर्चासत्राचा दर्जेदारपणा कायम ठेवून ही संमेलने घडवून आणावीत, असा हेतू होता; प्रत्यक्षात संमेलनांच्या अन्य नियोजनावरच अधिक वेळ व ऊर्जा खर्च करावी लागते असे लक्षात आल्याने ही संमेलने बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. 'साधना' वाचक मेळावे व 'साधना'चे पुस्तक प्रकाशन समारंभ वा अन्य कार्यक्रम महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी व्हावेत असाही प्रयत्न होता, पण मनुष्यबळाची व संसाधनांची अपुरी उपलब्धी आणि खर्च करावा लागणारा जास्तीचा वेळ व ऊर्जा यामुळे त्याबाबतही फार काही करता आलेले नाही.

५. गेल्या पाचही वर्षांत 'साधना'च्या वार्षिक वर्गणीदारांची संख्या साडेसहा ते सात हजार या दरम्यानच राहिली आहे. वैचारिक नियतकालिकासाठी ही संख्या असमाधानकारक निश्चितच नाही, पण ती वाढवण्यासाठी 'स्पेस' भरपूर आहे, हे दिसत असूनही त्याबाबत प्रगती करता आलेली नाही. स्टॉलवर अंक ठेवण्याचे प्रयत्न करून पाहिले, पण त्यात सातत्य राखता आले नाही याचे कारण वितरणव्यवस्थेतील व्यावहारिक अडचणी हेच आहे. त्यातच भर पडली आहे ती पोस्ट खात्याच्या अकार्यक्षमतेची. पोस्ट खात्यापुढेही काही अडचणी आहेत, पण त्यामुळे अंक अनियमित मिळणे वा अजिबात न मिळणे अशा तक्रारी गेल्या पाच वर्षांत क्रमाने वाढत गेल्या आहेत. 'साधना'कडून अगदी नियमितपणे प्रत्येक गुरुवारी अंक पोस्टात पडतात, अंक मिळाला नाही असे कळवणाऱ्यांना पोस्टाने वा कुरिअरने ते ताबडतोब पाठवले जातात आणि प्रत्येक शनिवारी 'साधना'च्या वेबसाईटवर अंक टाकला जातो. तरीही वितरणाची समस्या पूर्णत: दूर झालेली नाही.

तीन

१. गेल्या पाच वर्षांत अंकातील मजकुराची विविधता कमी झाली आहे, असा एक मोठा आक्षेप घेतला जातो. एकेका अंकाचा विचार केला तर हा आक्षेप खरा आहे; वर्षभरातील एकूण अंकांचा विचार केला तर ती विविधता वाढलेली आहे. हे असे घडण्याचे कारण दीर्घ लेखांचे वाढवलेले प्रमाण आणि काही विषयांवर एकाच अंकात एकापेक्षा अधिक लेख दिले जात आहेत; पण त्यामुळे ते-ते विषय अधिक मुळापासून समजून घेणे सोपे जाते. शिवाय, अंक मिळण्यास दिरंगाई होणे, काही अंकच न मिळणे किंवा वाचायचे राहून जाणे असे प्रकार वाढत असल्याने व वाचकांनाही इतर अनेक पर्याय उपलब्ध असल्याने दीर्घ लेख काही भागात न छापता एकाच अंकात देणे वाचकांच्या अधिक सोईचे ठरते. अर्थातच, असे दीर्घ लेख छापताना त्यांची 'वाचनीयता' हा निकष प्राधान्याने लावला जातो आणि बहुसंख्य वाचकांचा प्रतिसाद या दीर्घ लेखनाला अनुकूल असाच आहे.

२. अनुवादित लेखांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे, त्याबद्दल काही वाचकांची तक्रार आहे. पण 'साधना'तील अनुवादित लेखनावरून ओझरती नजर टाकली तरी लक्षात येईल, सर्व अनुवादित लेख राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटना-घडामोडींच्या संदर्भातील आहेत. याचे कारण उघड आहे- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर मराठीत लिहिणारे लोक खूपच कमी आहेत, जे आहेत ते आपापल्या कामात व्यग्र आहेत. म्हणजे अनुवादित लेख नको याचा अर्थ, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषय हाताळायला नकोत असाच घ्यावा लागेल. शिवाय कमी वेळात व कमी श्रमात असे लेख मिळवण्याचा अन्य पर्याय कोणत्याही प्रादेशिक भाषेतील नियतकालिकांना उपलब्ध नसतो. शिवाय, 'साधना'तील अनुवादित लेखांची निवड, वैविध्य व वेगळेपण सहज लक्षात येण्यासारखे आहे.

३. तरुणाईला लिहिते केले जात नाही आणि तरुणांसाठीचे लेखनही फारसे प्रसिद्ध केले जात नाही, असा एक आक्षेप घेतला जातो. पण त्यासंदर्भात मुख्य मुद्दा ध्यानात घेतला पाहिजे, तो म्हणजे 'साधना' हे वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक आहे असे आपण म्हणतो; तेव्हा त्यात राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील गंभीर लेखनच अपेक्षित असते. अशा स्वरूपाचे लेखन तरुणांकडून आले तर दर्जाचे नियम थोडे शिथिल करून ते प्राधान्याने प्रसिद्ध केले जाते. गेल्या पाच वर्षांतील अशी बरीच नावे सांगता येतील. शिवाय याच काळात, विद्यापीठांतील विद्यार्थी व प्राध्यापक, स्पर्धापरीक्षा देणारे विद्यार्थी, पत्रकारितेचे शिक्षण किंवा प्रशिक्षण घेणारे तरुण यांच्यामध्ये 'साधना' साप्ताहिक बऱ्यापैकी 'पॉप्युलर' झाले आहे. सुरुवातीला वाचायला थोडेसे जड वाटते, नंतर गोडी लागते आणि मग 'साधना'चे वाचन आवडीचे व सोपे वाटू लागते- अशी प्रतिक्रिया किती तरी तरुणांकडून आलेली आहे.

४. आदरांजली, अभिवादन या प्रकारातील आमचे लेखन छापले जात नाही किंवा थोरा-मोठ्यांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या येतात तेव्हा 'साधना'कडून अभिवादन करणारे लेख येत नाहीत, अशी एक तक्रार काही लोकांची असते. याबाबत आमची भूमिका अत्यंत स्पष्ट व स्वच्छ आहे. ज्या व्यक्तींविषयी फारसे काही प्रसिद्ध झालेले नाही किंवा ज्या व्यक्ती तुलनेने अपरिचित आहेत, त्यांच्याविषयी सर्वसाधारण लेखही प्रसिद्ध केले जातात. पण विख्यात किंवा अतिशय महनीय वा अतिपरिचित व्यक्तींविषयी अगदीच वेगळे लेखन असल्याशिवाय प्रसिद्ध करायला आम्ही नाखूष असतो. तसे वेगळे लेखन प्रत्येक वेळी मिळतेच असे नाही आणि म्हणून प्रत्येक वेळी अभिवादन करणारे लेखन प्रसिद्ध केले जाईलच असे नाही. अशा महनीय व्यक्तींचे विचार व कार्य पुढे घेऊन जाणारे इतरांचे लेखन प्रसिद्ध होत राहणे, हेच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन असते.

५. वाचकांचा पत्रव्यवहार प्रसिद्ध करताना 'साधना'तील लेखनाच्या किंवा संपादकीय भूमिकेच्या विरोधातील लेखन प्राधान्याने प्रसिद्ध केले जाते. किमान अपेक्षा एवढीच असते की, त्या लेखनाची भाषा सभ्य असावी आणि त्यात विपर्यास केलेला नसावा. वाचकपत्रांतील आक्षेप मान्य नसले तरी ते प्रसिद्ध केले जातात. त्यांना आमच्याकडून अंकात फारच कमी वेळा उत्तरे दिली जातात, कारण काही वेळा वाचकांना पुरेशी माहिती नसते आणि काही वेळा हा मतभिन्नतेचा मुद्दा आहे असे म्हणून सोडून द्यावे लागते. अर्थातच अनेक वेळा वाचकांच्या सूचना, तक्रारी, अपेक्षा रास्तही असतात, म्हणून त्यांनाही उत्तर देण्याचा प्रश्न येत नाही. मात्र प्रत्यक्ष भेटीत किंवा फोनवरून कोणी काही सूचना, तक्रारी केल्या तर त्याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले जाते; चुका झाल्या असतील तर स्पष्ट कबुली दिली जाते. ई-मेलवरून किंवा पत्राद्वारे मात्र असे सविस्तर स्पष्टीकरण देणे शक्य नसते, कारण तितका वेळच हाताशी नसतो. शिवाय, वाचकांकडून एखाद्या विषयाच्या संदर्भात तुकड्या-तुकड्यात पाहिले जाते, ती सोय संपादकांना नसते.

चार

१. अभ्यासपूर्ण व विश्लेषणात्मक लेखन मोठ्या प्रमाणात व सातत्याने मिळवता येणे हे मोठे आव्हान आणि अशा प्रकारच्या लेखनाला मोठ्या प्रमाणात वाचक आहेत, ही मोठी संधी आहे- असे दृश्य आम्हाला दिसते. तुकड्या-तुकड्यांत पाहिले तर हे अनेकांना पटणार नाही, पण समग्रपणे व काल-परवाच्या पार्श्वभूमीवर पाहिले तर हा मुद्दा सहज पटू शकेल.

२. वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया व इंटरनेट यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणात माहिती आदळते आहे, त्यामुळे त्यांनी हाताळलेले विषय 'साधना'तून हाताळताना शिळे झालेले असतात. पण अशा विषयांवरील अंतर्गत ताणेबाणे उलगडून दाखवणारे विवेचन आणि त्या-त्या विषयांच्या संदर्भातील सम्यक् व सकारात्मक दृष्टिकोन देणारे लेखन प्रसिद्ध करण्याची संधी 'साधना'ला अधिक आहे. याचे कारण अन्य माध्यमांवर कार्यरत असलेले दबावगट व अस्तित्वाच्या लढाईतून त्यांना कराव्या लागणाऱ्या व्यावहारिक तडजोडी, या प्रकारचा विशेष ताण 'साधना'ला नाही. त्यामुळे अन्य माध्यमे करू शकत नाहीत, ते आपण करू शकतो, अशी अनुकूलता 'साधना'कडे आहे. अर्थातच हे सर्व करताना अंकाच्या वाचनीयतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागते. कारण अंतिमत: प्रकाशित होणारा अंक लेखक-संपादकांसाठी नसतो; वाचकांसाठी असतो.

३. नव्वदच्या दशकात भारताच्या राजकारणाचे केंद्र जात व धर्म हे होते, आता ते केंद्र विकास व प्रशासन झाले आहे. त्यामुळे भूतकाळाचे विवेचन-विश्लेषण करण्यापेक्षा वर्तमानकाळाचा अभ्यास व आकलन यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी, अर्थसाक्षरतेची गरज कधी नव्हे इतकी निर्माण झाली आहे. किंबहुना, अर्थसाक्षरता नसेल तर होत असलेल्या बदलांचे, शासनसत्तेच्या धोरणांचे व एकूणच व्यवस्थेचे आकलन होण्याला बèयाच मर्यादा येतात. त्यामुळेच यापुढील काळात अर्थकारण, उद्योग-व्यापार, विज्ञान-तंत्रज्ञान व शेती-शिक्षण या विषयांवरील लेखन 'साधना' साप्ताहिकातून वाढवावे लागेल.

४. एका मर्यादेनंतर अंकाचा दर्जा हा व्यवस्थापन, वितरण व अर्थकारण यांवरच अवलंबून असतो आणि तशा अवस्थेपर्यंत 'साधना' साप्ताहिक आले आहे. अर्थातच, ध्येयवाद कायम आहे आणि राहीलही, पण त्याची परिणामकारकता वाढवायची असेल तर व्यावसायिकतेची काही मूल्ये अंगी बाणवावीच लागतील. उदाहरणार्थ- अंक चांगला असणे पुरेसे नाही, त्याची निर्मितीही दर्जेदार असली पाहिजे आणि तेवढेही पुरेसे नाही, वितरणाची यंत्रणाही सुलभ व जलद असली पाहिजे. ध्येयवाद व व्यावसायिक नीतिमूल्ये परस्परविरोधी आहेत, असे मानण्याची चूक करून आता चालणार नाही. व्याप्ती व खोली वाढवायची असेल, तर हा संयोग घडवून आणावाच लागेल.

५. आज सभोवतालच्या लोकांकडून सर्वांत मोठी उणीव व्यक्त केली जाते ती माध्यमांकडील वैचारिक भूमिकेची. त्याबाबत मात्र 'साधना'ची स्थिती फारच समाधानकारक आहे. भारतीय राज्यघटनेला सुसंगत भूमिका आम्ही घेत आलो आहोत. काही विषयांवरील वैचारिक भूमिकांत अधिक स्पष्टता येत गेली, त्या भूमिका अधिक विकसित होत गेल्या; पण भूमिकेत बदल करावा लागला, अशी स्थिती गेल्या पाचही वर्षांत कधी आल्याचे दिसणार नाही. याचे कारण आपल्या आकलनाच्या अलीकडेच दोन पावले थांबायचे, या आमच्या सावधपणात दडलेले असावे.

वर्तमानातील परिस्थितीवर भाष्य करताना भाषा, जात, धर्म, लिंग आणि प्रदेश या प्रमुख पाच घटकांच्या बाबतीत वैचारिक भूमिकेत गफलत होण्याची किंवा संकुचितपणा डोकावण्याची किंवा व्यापक समाजहित नजरेआड होण्याची शक्यता कळत-नकळत असते. तसा प्रकार झाल्याचे उदाहरण 'साधना'च्या संपादकीय लेखनातून व भूमिकांतून सापडणार नाही. आर्थिक उदारीकरण या विषयाबाबत मात्र सर्व स्तरांवर व सर्व क्षेत्रांत संभ्रम, विरोध वा मतभिन्नता आहे; त्यामुळे त्या विषयाबाबत आम्ही अधिक सावध भूमिकेत आहोत. उदारीकरणाची काही धोरणे व काही कल्याणकारी योजना हे परस्परांच्या विरोधी नसून परस्परांना पूरक आहेत, असे आम्हांला वाटते. त्याबाबतचे तपशीलवार विवेचन हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे.

वरील चारही प्रकारचे हितगुज करताना ठळक मुद्द्यांचाच उल्लेख अगदी थोडक्यात केलेला आहे. प्रुफे तपासण्यापासून चांगले लेख मिळवण्यापर्यंतच्या आणि अंक छापायला पाठवण्यापासून जाहिराती मिळवण्यापर्यंतच्या अडचणींची-अडथळ्यांची व येत असलेल्या मर्यादांची यादी सादर करायची ठरली, तर ती बरीच मोठी होईल. त्यामुळे, दर मंगळवारी दुपारी अंक छापायला जातो तेव्हा अंक मार्गी लागल्याचे समाधान आणि त्यात काय काय करायचे राहून गेले याचे असमाधान अशी संमिश्र भावना असते. तास-दोन तास ती भावना टिकते, नंतर पुढील अंकाचा विचार सुरू होतो; करावाच लागतो!

(१० ऑगस्ट २०१३)