साधनाविषयी

साधना साप्ताहिक

स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरु केले. गेली 71 वर्षे ते अखंड प्रकाशित होत आहे. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील लेखन प्रामुख्याने साधनातून प्रकाशित केले जाते. विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन प्राधान्याने प्रकाशित केले जाते. एक ध्येयवादी व परिवर्तनवादी नियतकालिक अशी साधनाची ओळख आहे. भारतीय संविधानाशी सुसंगत भूमिका घेत साधनाची वाटचाल राहिली आहे. "स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधनां , करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना" हे साधना साप्ताहिकाचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ : समता व शांती प्रस्थापित करण्यासाठी जे कोणी शुद्ध साधनांचा म्हणजे योग्य मार्गांचा अवलंब करून सतत कार्यरत राहतील, त्यांना उत्स्फूर्त ठेवण्यासाठी हे साप्ताहिक प्रयत्नशील राहील.

साधनाचे संपादक

साने गुरुजींच्या नंतर आचार्य जावडेकर व रावसाहेब पटवर्धन ( 1950 ते 56 ), यदुनाथ थत्ते ( 1956 ते 82 ), नानासाहेब गोरे ( 1982 ते 84 ), वसंत बापट व ग. प्र. प्रधान ( 1984 ते 1998 ) आणि नरेंद्र दाभोलकर ( 1998 ते 2013 ) अशा larger than life संपादकांची परंपरा साधनाला आहे. दरम्यानच्या काळात दुर्गा भागवत, मंगेश पाडगांवकर, सदानंद वर्दे, अनिल अवचट, कुमुद करकरे, ना.य. डोळे, जयदेव डोळे, अशा काही मान्यवरांनी साधनाचे सहसंपादक किंवा संपादक मंडळातील सदस्य म्हणून काम केले आहे. डॉ दाभोलकरांची ओळख जरी प्रामुख्याने 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते' अशी असली तरी, त्यांनी 15 वर्षे साधना साप्ताहिकाचे संपादक म्हणून काम करताना खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी हत्या झाली, त्यानंतर साधनाचे संपादक म्हणून विनोद शिरसाठ काम पाहत आहेत. त्याआधी साडेनऊ वर्षे ते साधनात डॉ दाभोलकरांचे निकटचे सहकारी म्हणून कार्यरत होते. त्यातील सुरुवातीची तीन वर्षे स्तंभलेखक व अतिथी संपादक, नंतरची तीन वर्षे युवा संपादक, त्यानंतरची साडेतीन वर्षे कार्यकारी संपादक अशी त्यांची साधनातील वाटचाल राहिली आहे. त्यांच्या साधनातील दोन युवा सदरांच्या पुस्तिका 'लाटा लहरी' व 'थर्ड अँगल' या नावाने प्रकाशित झाल्या आहेत. युवा संपादक व कार्यकारी संपादक असताना त्यांनी लिहिलेल्या संपादकीय लेखांचे पुस्तक 'सम्यक सकारात्मक' या नावाने प्रकाशित झाले आहे.

वार्षिक वर्गणी

साधना साप्ताहिक पुणे येथून प्रसिद्ध होते. प्रत्येक सोमवारी साधनाचा अंक छापायला जातो, गुरुवारी पोस्टात पडतो, शनिवारी वाचकांच्या हातात जातो आणि पुढील शनिवारची तारीख त्या अंकावर छापलेली असते. या साप्ताहिकाची वार्षिक, द्विवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800 व 2700 रुपये आहे. हे सर्व अंक साधनाच्या खर्चाने पोस्टाद्वारे त्या त्या आठवड्यात घरपोच मिळतात. सध्या साधनाचे साडेसहा हजार वार्षिक वर्गणीदार असून, ते महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत विखुरलेले आहेत. भारतातील अन्य काही राज्यांत व अन्य काही देशांतही साधनाचे काही वर्गणीदार वाचक आहेत. वर्षभरात मिळून साधनाचे 48 अंक प्रकाशित होतात, त्यात पाच विशेषांक व तीन दिवाळी अंक असतात. नियमित अंक 44 पानांचा व ब्लॅक अँड व्हाईट छपाईचा असतो, त्याची किंमत प्रत्येकी 20 रुपये असते. विशेषांक बहुरंगी - 52 ते 80 पानांचे - असतात, त्यांची किंमत प्रत्येकी 50 ते 80 रुपये या दरम्यान असते. बालकुमार, युवा व मुख्य असे तीन दिवाळी अंक बहुरंगी असतात. बालकुमार अंक 44 पानाचा , युवा अंक 60 पानांचा व मुख्य दिवाळी अंक 200 पानांचा असतो, त्यांची किंमत अनुक्रमे 40, 50 व 150 रुपये असते. साधनाचा बालकुमार अंक मागील दहा वर्षे दरवर्षी सरासरी अडीच लाख प्रती , तर युवा अंक मागील पाच वर्षे दरवर्षी सरासरी पन्नास हजार प्रती इतक्या मोठ्या प्रमाणात वितरित होत आला आहे. मुख्य दिवाळी अंक दरवर्षी दहा हजार प्रतींच्या दरम्यान जातो.

साधना ट्रस्ट

साधना साप्ताहिक साधना ट्रस्ट मार्फत चालवले जाते. एस.एम.जोशी, मोहन धारिया, दादासाहेब रुपवते, आप्पासाहेब सा. रे. पाटील, किशोर पवार, पी.व्ही. मंडलिक व अन्य काही मान्यवरांनी विश्वस्त म्हणूम साधनाच्या विकासात उल्लेखनीय सहभाग दिला आहे. सध्या विजया चौहान अध्यक्ष तर हेमंत नाईकनवरे सचिव असून , गणपतराव पाटील, सुहास पळशीकर, विवेक सावंत, डॉ.हमीद दाभोलकर हे अन्य विश्वस्त आहेत. शिवाय, सुनील देशमुख, जे. बी. पाटील व दत्ता वान्द्रे हे तिघे ट्रस्ट चे सल्लागार आहेत. याशिवाय अनेक हितचिंतक साधनाच्या कार्यवाहीत वेगवेगळ्या प्रकारचे योगदान उत्स्फूर्तपणे करीत असतात.

साधना प्रकाशन व साधना मीडिया

साधना ट्रस्टच्या अंतर्गत साधना प्रकाशन व साधना मीडिया सेंटर ही अन्य दोन युनिट्स कार्यरत आहेत. साधना प्रकाशनाची सध्या शंभराहून अधिक पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असू , ती सर्व मागील दहा वर्षांत प्रकाशित झालेली आहेत. आशयसंपन्न मजकूर, दर्जेदार निर्मिती व तरीही किमंत कमी आणि त्यावर सवलत जास्त या चतुसूत्रीवर हे प्रकाशन चालवले जाते. पुणे येथील शनिवार पेठेत, साधना मीडिया सेंटर हे सुसज्ज असे ग्रंथदालन असून , त्यात मराठीतील 500 पेक्षा अधिक प्रकाशकांची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एकूण टायटल्सची संख्या आठ हजारांपेक्षा जास्त आहे. वैचारिक, परिवर्तनवादी व चळवळी-आंदोलने या प्रकारची पुस्तके हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणून मीडिया सेंटरची ओळख आहे.

साधना साप्ताहिकातून तयार झालेली पुस्तके :

फक्त साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखनाची ( लेखमाला, सदरे , विशेषांक ) पुढील 47 पुस्तके 2008 नंतर साधना प्रकाशनाकडून आली आहेत, कंसात लेखकांची नावे दिली आहेत : राजकारणाचा ताळेबंद ( सुहास पळशीकर ), कैफियत ( राजन गवस ), उंबरठ्यावर ( सदानंद मोरे ), नोकरशाईचे रंग ( ज्ञानेश्वर मुळे ) , कालपरवा ( रामचंद्र गुहा ) , तीन मुलांचे चार दिवस ( आदर्श, विकास, श्रीकृष्ण ) , नक्षलवादाचे आव्हान ( देवेंद्र गावंडे ), गांधीजी आणि त्यांचे टीकाकार ( सुरेश द्वादशीवार ), तारांगण ( सुरेश द्वादशीवार ), सेंटर पेज ( सुरेश द्वादशीवार ) , मन्वंतर ( सुरेश द्वादशीवार ), युगांतर ( सुरेश द्वादशीवार ), न पेटलेले दिवे ( राजा शिरगुप्पे ), शाळाभेट ( नामदेव माळी ), माझे विद्यार्थी ( रघुराज मेटकरी ), आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्त ( संपादक : नामदेव माळी ), रुग्णानुबंध ( डॉ दिलीप शिंदे ), बहादूर थापा ( संतोष पद्माकर पवार ), शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्राची ( राजा शिरगुप्पे ), शोधयात्रा : ईशान्य भारताची ( राजा शिरगुप्पे ), प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे ( नरेंद्र दाभोलकर ), समता संगर ( नरेंद्र दाभोलकर ), सम्यक सकारात्मक ( विनोद शिरसाठ ) , लाटा लहरी ( विनोद शिरसाठ ), थर्ड अँगल ( विनोद शिरसाठ ), मला प्रभावित करून गेलेला सिनेमा ( संपादन : विनोद शिरसाठ ), झपाटलेपण ते जाणतेपण ( संपादन : नरेंद्र दाभोलकर, विनोद शिरसाठ ), थेट सभागृहातून ( संपादन : विनोद शिरसाठ ), निवडक बालकुमार साधना ( संपादन : विनोद शिरसाठ, चित्रे: गिरीश सहस्त्रबुद्धे ), भारत आणि भारताचे शेजारी ( संपादक : मनीषा टिकेकर ), वैचारिक व्यसपीठे ( गोविंद तळवलकर ), ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर ( डॉ निरुपमा व सुषमा तळवलकर ), डिकन्स आणि ट्रोलॉप ( गोविंद तळवलकर ), बखर भारतीय प्रशासनाची ( लक्ष्मीकांत देशमुख ), विज्ञान आणि समाज ( संपादन : विनोद शिरसाठ ), सत्यकथा : अन्यायाच्या आणि संघर्षाच्या ( के. डी. शिंदे ), अशी घडले मी ( लीला जावडेकर ), पुढे जाण्यासाठी ( अनिल अवचट, अभय बंग, आनंद नाडकर्णी ), चिखलाचे पाय ( डॉ दिलीप शिंदे ), तीन तलाक विरुद्ध पाच महिला ( हिनकौसर खान- पिंजार ), तात्पर्य ( अवधूत डोंगरे ), सार्क विद्यापीठातील दिवस ( संपादक : संकल्प गुर्जर ), हिरवे पान ( संकल्प गुर्जर ), आठवणी जुन्या शब्द नवे ( मोहिब कादरी ), असेही विद्वान ( प्रभाकर पाध्ये ), अशानं आस व्हतं ( अशोक कौतिक कोळी ), तीन पुस्तिका: बालसाधना- कुमारसाधना- युवासाधना ( संपादक : विनोद शिरसाठ )

साधना प्रकाशनाची ग्रंथसूची साधना प्रकाशनात पाहावी.
कर्तव्य साधना

साधना ट्रस्टच्या मार्फत चौथे युनिट म्हणून, 'कर्तव्य साधना' हे डिजिटल पोर्टल 8 ऑगस्ट 2019 पासून सुरू होत आहे. त्यावर टेक्स्ट मध्ये प्रामुख्याने लेख, मुलाखती, रिपोर्ताज, आणि ऑडिओ व व्हिडीओ या स्वरूपातील मजकूर उपलब्ध करून दिला जाणार आहे. शिवाय, आठवड्यातून एकदा इंग्लिश लेखही अपलोड केले जाणार आहेत. साधारणतः हजार शब्दांचे लेख आणि दहा मिनिटांपेक्षा कमी वेळाचे व्हिडीओ असे हे नियोजन आहे. साप्ताहिकाच्या तुलनेत बरेच ताजे विषय कर्तव्यवर हाताळले जाणार आहेत.


The Independent and Public Spirited Media Foundation has provided financial support to Sadhana Trust (Weekly Sadhana and Kartavya Sadhana) for the purpose of reporting and publishing stories of public interest. IPSMF does not take any legal or moral responsibility whatsoever for the content published by Sadhana on their websites weeklysadhana.in and kartavyasadhana.in or on any of its other media platforms.!