Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

हत्तीने मुंग्यांवर जय मिळवला...

स्वातंत्र्योत्तर भारतात सर्वाधिक चर्चिला गेलेला आणि मुख्य म्हणजे जनतेच्या रेट्यातून निर्माण झालेला कायदा म्हणून माहितीचा अधिकार कायदा ( Right to Information Act : RTI ) ओळखला जातो. बहुतांश कायदे जनतेने पाळायचे आणि सरकारी यंत्रणेने- प्रशासनाने- त्यांची अंमलबजावणी करायची असा प्रकार असतो, माहिती अधिकार कायदा मात्र प्रशासनाने पाळायचा आणि जनतेने त्याची अंमलबजावणी नीट होते आहे की नाही हे पाहायचे, या प्रकारातील आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि काही कर्तव्ये सांगितली आहेत. माहितीचा अधिकार हे असे हत्यार किंवा साधन (Tool) आहे, जे हक्क आणि कर्तव्य यांचे संयुग आहे.

हा कायदा अस्तित्वात आला त्याला उद्याच्या ऑक्टोबरमध्ये 14 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तो अस्तित्वात यावा यासाठी त्याआधीची 16 वर्षे देशभर मोठी घुसळण झाली होती. म्हणजे प्रजासत्ताक भारताच्या 70 वर्षांच्या वाटचालीतील 30 वर्षे ‘माहितीचा अधिकार’ चर्चेत राहिला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीच्या 16 वर्षांत कुठे-कुठे आणि काय-काय घडले, याचा अनेक खंडांचा दस्तऐवज तयार करायला हवा. आणि अर्थातच तो अस्तित्वात येण्यासाठी देशभरात कुठे कुठे व काय काय घडून आले याचाही सर्वंकष आढावा घेणारा अनेक खंडांचा दस्तऐवज तयार करायला हवा.

या संदर्भात खूप महत्त्वाचा प्रारंभ किंवा खंड 1 म्हणता येईल असा ऐवज पुस्तकरूपाने गेल्या वर्षी आलेला आहे. The RTI Story: Power to the People या नावाने चारशे पानांचे पुस्तक दिल्ली येथील रोली बुक्स या प्रकाशन संस्थेकडून आलेले आहे. अरुणा रॉय यांनी मजदूर किसान शक्ती संघटनच्या (MKSS) सहकाऱ्यांच्या मदतीने ते लिहिले आहे. माहितीचा अधिकार देणारा कायदा अस्तिवात यावा यासाठी, 1990 नंतरचे दीड दशक भारतभर अनेक लहान मोठी आंदोलने झाली, त्यात अनेक स्वयंसेवी संस्था, लोकशाही मार्गाने लढणाऱ्या संघटना, पत्रकार, कलाकार, लेखक- साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, निवृत्त प्रशासकीय अधिकारी यांचा सहभाग होता.

या व्यक्ती आणि संघटना कधी स्वतंत्रपणे तर कधी एकत्र येऊन या अधिकारासाठी लढत होत्या. एकाच वेळी अनेक राज्यांमध्ये ही चळवळ आकार घेत होती. राजस्थान, महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये या चळवळीचा जोर जास्त होता. महाराष्ट्रात अण्णा हजारे यांच्या पुढाकारातून व त्यांच्या नेतृत्वाखाली यासाठी मोठा व दीर्घकालीन लढा झाला. तसाच आधी राजस्थानात आणि मग केंद्रीय स्तरावर असा संघर्ष अरुणा रॉय यांच्या पुढाकारातून व त्यांच्या नेतृत्वाखाली झाला. किंबहुना देशात माहिती अधिकार कायद्यासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण भूमिका कोणी बजावली हे सांगायचे असेल तर, अरुणा रॉय व मजदूर किसान शक्ती संघटन यांचा उल्लेख करावा लागेल. तेच या कायद्याचे उद्‌गाते (पायोनिअर) म्हणता येतील.

आज पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या अरुणा रॉय पन्नास वर्षांपूर्वी आय.ए.एस. झाल्या, पण सात वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर त्यांनी राजीनामा दिला आणि राजस्थानातील देवडुंगरी नावाच्या लहान खेड्यात त्यांनी एका झोपडीवजा घरात राहून एका महान प्रयोगाचा प्रारंभ केला. तिथे त्यांना शंकरसिंग हा शेतकरी आणि निखिल डे हा तरुण येऊन मिळाला.

कामाची सुरुवात अगदी छोट्या वाटाव्या अशा प्रश्नापासून झाली. मजुरांना सरकारी कामातून जी रोजंदारी मिळते ती ठरल्याप्रमाणे व वेळेवर मिळणे यासाठीचा तो संघर्ष होता. बारक्या वाटणाऱ्या त्या कामासाठीही रक्त आटवणारा संघर्ष करावा लागतो, असा तो अनुभव होता. स्थानिक पातळीवरील प्रशासनाचा गाडा हाकणारे अधिकारी व कारकून, गावातील राजकारणी वा मुखिया आणि त्यांच्याशी संगनमत करणारे जमीनदार- ठेकेदार, अशा तीन आघाड्यांवरील तो संघर्ष होता.

हा संघर्ष करण्यासाठी सर्वसामान्य लोकांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची व शोषणाची जाणीव करून देणे; ते शोषण/अन्याय दूर व्हावेत यासाठी त्यांना संघटित करणे, आणि अंतिमतः वरील तिन्हींच्या बड्या आघाडीविरुद्धच्या लढ्यास तयार करणे, अशी तिहेरी कसरत दूरवरून पाहणारांना वाटते तितकी सोपी नसते. ही कसरत करण्यासाठी अरुणा रॉय व त्यांच्या संघटनेने सर्वप्रथम संवादाची वा जन-जागृतीची मोहीम हाती घेतली, त्यातून प्रश्नांच्या दाहकतेची तीव्रता समजली आणि त्याच वेळी या सर्वसामान्य माणसांत दडलेल्या/ सुप्तावस्थेत असलेल्या हुशारीची व ऊर्जेची तीव्रताही लक्षात आली. त्यातूनच जागविणे व चेतविणे हे पर्व सुरू झाले.

त्यासाठी पारंपरिक गाणी, लोकसाहित्यातून आलेल्या कथा, संवादातून आकाराला आलेल्या घोषणा, सभोवताली घडतेय त्याला नाट्यरूप देऊन रस्त्यावर झालेले खेळ असे अगदीच प्राथमिक वाटणारे काम सुरू झाले. पण त्यातून भीती कमी होणे आणि आत्मविश्वास वाढत जाणे असा प्रकार किसान व मजूर यांच्या जगण्यात घडून आला. मग प्रशासकीय कामकाजाची व असलेल्या कायद्यांची/ नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी आग्रह सुरू झाला. त्यासाठी माध्यमांचा, विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांचा कमी अधिक सहभाग घेणे, आणि आवश्यक तेव्हा न्यायालयीन लढ्याची तयारी ठेवणे इतके सारे सुरू झाले. त्यातून सुरू झाली जय आणि पराजय यांची साखळी आणि अखेरीस लढायला मिळाले माहिती अधिकार कायदा व्हावा यासाठीचे युद्ध! आधी हा कायदा राजस्थान विधानसभेने करावा यासाठी आणि तो झाल्यावर संसदेने करावा यासाठी! अर्थातच, दरम्यानच्या काळात अन्य राज्यांतूनही लहान-मोठ्या प्रमाणात असेच लढे चालूच होते.

जनसामान्यांसाठी लढा करणारे लोक सामान्यतः दस्तऐवजीकरणाला महत्त्व देत नाहीत, त्याचा कंटाळा करतात, संदर्भहीन समजतात, काहीजण तर तुच्छताही बाळगतात. त्यातून त्यांच्या कामाचे, संस्थेचे-संघटनेचे व एकूणच समाजाचे किती नुकसान होते याचाही अंदाज त्यांना शेवटपर्यंत येत नाही. त्यामुळे अनेक चांगल्या संधी व शक्यता संपुष्टात येतात. मात्र ही चूक अरुणा रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली दिसत नाही. त्यामुळेच त्यांच्या पुस्तकात लहान-मोठ्या तपशिलांसह तो प्रवास व्यवस्थित आला आहे.

पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकल्यावर काय दिसते? देवडुंगरी खेड्यातील प्रारंभ, सोहनगड या गावात जमीन बळकावणारांच्या विरोधातील संघर्ष, मजदूर किसान शक्ती संघटन या कल्पनेचा उदय, किमान मजुरी मिळावी यासाठी केलेले पहिले उपोषण, दुसरे उपोषण पाणी वाटपासाठी, मग प्रशासनात पारदर्शकता आणावी ही मागणी, मग ठिकठिकाणी जनसूनवाई, त्यावर राजकीय आश्वासने, ती पाळली जात नाहीत म्हणून मेवाड व जयपूर येथे (हमारा पैसा हमारा हिसाब या मागणीसाठी) धरणे, आणि मग माहिती अधिकार कायदा राज्याने करावा यासाठी राज्यभर प्रचार अभियान. त्यासाठी राजस्थानात विभागीय पातळीवर धरणे, त्यानंतर बऱ्याच प्रक्रिया घडून राजस्थान विधिमंडळाने कायदा मंजूर करणे. त्यानंतर संसदेने कायदा करावा यासाठी विविध राज्यांतील व्यक्ती व संघटनांच्या बरोबर पुन्हा मोठा संघर्ष. हा प्रवास कमालीची चिकाटी व सातत्य यामुळेच घडून आला.

यासंदर्भातील सूत्र गोपाळकृष्ण गांधी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील पहिल्याच परिच्छेदात अधोरेखित झाले आहे. (आय.ए.एस. अधिकारी, राजदूत आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल राहिलेले गोपाळकृष्ण यांची ठळक ओळख विचारवंत म्हणून आहे, महात्मा गांधी व सी.राजगोपालाचारी यांचे नातू ही ओळख तुलनेने कमी आहे). त्या सूत्राचा अर्थ हा आहे की, ‘माहिती कशासाठी तर वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी, वस्तुस्थिती कशासाठी समजून घ्यायची तर शांती प्रस्थापित करण्यासाठी. माहिती नाही याचा अर्थ अंधारात वास्तव्य करणे, म्हणजे आहे तिथे व तसेच राहणे. या स्थितीला माणसाचे जगणे म्हणता येणार नाही. याउलट माहितीवर प्रक्रिया करून होणारी ज्ञानप्राप्ती म्हणजे इंधन, त्याला बुद्धिमत्तेची जोड देणे म्हणजे ऊर्जा लावणे, यातून बदल घडतात. मानवी जीवन अधिक सुखकर होत आले आहे ते यामुळेच!’

तर असे महत्त्व असणारा माहिती अधिकार कायदा बऱ्याच उलाढालीनंतर 2005 मध्ये संसदेत मंजूर झाला. देशभरातील अनेक व्यक्तींचा, संघटनांचा व माध्यमांचा रेटा, डाव्या पक्षांचा दबाव (त्यावेळी यूपीए सरकार त्यांच्या पाठिंब्यावर होते) आणि मनमोहनसिंग हे पंतप्रधान होते, या सर्व घटकांमुळे तो कायदा आला. अर्थातच, प्रशासनातील भ्रष्टाचार कमी करणे हा जरी त्याचा मुख्य हेतू दिसत असला तरी, अकार्यक्षमतेला अटकाव आणि निर्णयप्रक्रियेला गती मिळणे हे त्याचे बायप्रॉडक्ट अधिक उपयुक्त ठरणार होते. हा कायदा अस्तिवात आल्यानंतरच्या 14 वर्षांत तसेच झाले असण्याची शक्यता आहे. दरवर्षी आठ ते दहा लाख लोकांनी या कायद्याचा वापर केला म्हणजे आतापर्यंत जवळपास दीड कोटी लोकांनी.

या कायद्याच्या गैरवापराची चर्चा आपण ऐकत व वाचत असतो, पण योग्य कारणांसाठी झालेल्या वापराच्या तुलनेत ते प्रमाण अत्यल्पच आहे. आणि तशी ओरड करणारे लोक हे लक्षात घेत नाहीत की, कोणत्याही कायद्याचा गैरवापर करणारे महाभाग कोणत्याही काळात असतातच. उलट या कायद्याचा प्रभावी वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात ज्या हिंसक घटना घडल्या, त्यात जवळपास 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. या कायद्याने भारतातील जनमानसाला खूप मोठा दिलासा दिला आहे. लढणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांवर व मंत्र्यांवरही काहीअंशी वचक बसवला आहे.

भारतासारख्या अवाढव्य व प्रचंड गुंतागुंतीच्या देशात इतके सारे इतक्या कमी काळात घडून येणे अन्य कोणत्याही कायद्यामुळे झाले नसावे. आणि म्हणूनच जगभर या कायद्याची वाखाणणी झाली. काही सर्वेक्षणांमधून असेही पुढे आले की, माहिती अधिकाराच्या संदर्भात सक्षम कायदे व प्रभावी अंमलबजावणी या दोन्ही निकषांवर भारतातील माहिती अधिकार कायदा जगात तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानता येईल.

भारतातील माहिती अधिकार कायद्याच्या लढाईचे वर्णन करताना बेझवदा विल्सन (सफाई कर्मचारी आंदोलनाचे नेते, मॅगसेसे पुरस्कारप्राप्त) यांनी ‘हत्तीच्या विरोधात मुंग्यांनी दिलेल्या लढतीची गोष्ट’ असे केले होते. ताकद, रूबाब, आवाका आणि गती यांचा विचार करता हत्तीचे रूपक भारतातील सरकारला व प्रशासनाला लावता येते आणि त्याच निकषांवर त्या कायद्यासाठी लढणाऱ्या नामवंत व्यक्ती, संस्था, संघटना यांना मुंग्यांचे रूपक वापरता येईल. मुंग्या एकेकट्या वावरतात तेव्हा साधी फुंकर मारून वाऱ्याबरोबर उडवून लावता येतात, मात्र मोठ्या समूहाने मुंग्या एकत्र येतात तेव्हा हत्तीलाही त्या जागेवरून पाय काढून घ्यावा लागतो.

आता मात्र उलटे झाले आहे. सर्व मुंग्या आपापल्या वारूळात पहुडल्यात, किंवा निस्तेज अवस्थेत आहेत, अशा वेळी हत्तीने चाल केली आहे. म्हणजे कोणाच्याही ध्यानीमनी नसताना, कोणाचीही मागणी किंवा तक्रार नसताना नरेंद्र मोदी सरकारने माहिती अधिकार कायदा दुरुस्ती विधेयक, खासदारांना कल्पना न देता, कसलीही चर्चा होऊ न देता लोकसभेत मांडले आणि मंजूर करून घेतले. दुसऱ्या दिवशी राज्यसभेत (केंद्र सरकाराला बहुमतासाठी पाच-सहा जागा कमी आहेत, त्यामुळे) थोडेसे वादळ निर्माण होण्याची शक्यता दिसताच, ते दाखल न करता त्या रात्री जगनमोहन, नवीन पटनाईक व तत्सम पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा मिळवून तिसऱ्या दिवशी राज्यसभेतही मंजूर करून घेतले. त्या वेळी शरदराव पवार व त्यांच्या पक्षाचे राज्यसभा सदस्य अनुपस्थित होते, अशा बातम्या आल्या आहेत. आणि आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर दुरुस्तीसहचा माहिती अधिकार कायदा अस्तित्वात येईल.

काय आहे या कायद्यातील दुरुस्ती? 2005 च्या कायद्यानुसार केंद्रात व राज्यांत मुख्य माहिती आयुक्त आणि त्या त्या प्रदेशांची जबाबदारी सोपवली जाते ते माहिती आयुक्त असतात. त्यांचा कालावधी पाच वर्षांचा असतो, त्यांची पुनर्नियुक्ती करता येत नाही. हे माहिती आयुक्त सरकारकडूनच नियुक्त करण्याची तरतूद आहे. परंतु छोट्या वाटणाऱ्या व प्रशासकीय सोयीसाठी सांगण्यात येणाऱ्या नव्या दुरुस्तीनुसार राज्यांतील व केंद्रातील सर्व माहिती आयुक्तांचा कालावधी व त्यांचे वेतन ठरवण्याचा अधिकार सरकारला असणार. या एकूण प्रक्रियेवर केंद्र सरकारचेच वर्चस्व राहणार. म्हणजे पाहिजे तेव्हा माहिती आयुक्तांची सेवा संपुष्टात आणण्याचे किंवा पाहिजे तितका काळ ती सेवा घेण्याचे हत्यार आता केंद्र सरकारने या दुरुस्तीअन्वये हस्तगत केले आहे. या हत्याराचा वापर कसा केला जाणार आहे, कशासाठी केला जाणार आहे, हे सांगायला मुत्सद्याची गरज नाही आणि ज्योतिषाचीही!

कालपरवा

आपले भवितव्य ठरविणारे द्रव्य

रामचंद्र गुहा

विवेकी किंवा शाश्वत वापराची शक्यताही दुरावली जाते. बंगळुरूचे बहुतांश रहिवासी हे सुखवस्तू आणि सामर्थ्यवान आहेत. आपल्या घरगुती आणि व्यावसायिक गरजा भागविण्यासाठी आवश्यक असणारा पाण्याचा ओघ कायम सुरूच राहील, असा समज दुर्दैवाने या मंडळींनी करून घेतला आहे. मी राहत असलेल्या शहराविषयीच मी विस्ताराने लिहिले आहे. पण, बंगळुरूचा प्रश्न आणि बंगळुरूच्या वाढीमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचे पडसाद देशभर उमटणार आहेत. भारत ही चुकांची गंगोत्री असली, येथे असंख्य समस्या आ वासून उभ्या असल्या; तरी आपल्याला भेडसावणारी सर्वांत मोठी समस्या जर कुठली असेल, तर ती आहे पाणीसमस्या. उपलब्धता आणि दर्जाच्या अनुषंगाने भविष्यात भारताच्या केंद्रस्थानी तेल नव्हे तर पाणी असेल, असे भविष्यसूचक विधान पर्यावरणतज्ज्ञ जयंत बंदोपाध्याय यांनी 80 च्या दशकात केले होते. त्या वेळी त्यांचे ते विधान सर्वांनी उडवून लावले. आज मात्र समंजस मंडळींना बंदोपाध्याय यांच्या विधानाची सत्यता पटू लागली आहे.

पर्यावरणीय जबाबदारीविषयीची एक उल्लेखनीय व्याख्या काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आली. त्यानुसार, ‘आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन जर एका मर्यादित क्षेत्रातच होत असेल, तर आपल्याला उत्पादनप्रक्रियेवर लक्ष ठेवता येते. मात्र, गरजा भागविण्यासाठी आपल्याला पृथ्वीचे दुसरे टोक गाठावे लागल्यास, तेथील उत्पादनाच्या एकूणच स्थितीबद्दल हमी देता येणे केवळ अशक्य आहे.’ महात्मा गांधींच्या खास मर्जीतल्या व्यक्तींपैकी एक असणारे अर्थतज्ज्ञ जे.सी. कुमारप्पा यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच, म्हणजे 1948 मध्ये ही व्याख्या केली होती.

कर्नाटकातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची नुकतीच बंगळुरू येथे बैठक झाली. बंगळुरू शहराच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी ग्रामीण भागातील पाणी वळविले जाणार आहे. या मंडळींच्या आंदोलनाविषयी वाचत असताना कुमारप्पा यांचे इशारेवजा शब्द मला आठवले. मी राहतो ते शहर (बंगळुरू) समुद्रसपाटीपासून 3000 फूट उंचावर असणाऱ्या व कठीण खडकापासून बनलेल्या पठारावर वसलेले आहे. एके काळी बंगळुरूच्या गरजा जवळपास असणारे तलाव, तळी आणि जलाशय आदींच्या जाळ्यांद्वारे भागविल्या जात असत. या नगराचे शहरात रूपांतर होत असताना येथील लोकसंख्याही अनेक पटींनी वाढली.

परिसरातील जलाशय आणि तलावांमध्ये भराव टाकण्यात आले, काँक्रीटने फरसबंदी करून तेथे बसडेपो, जिमखाने, शॉपिंग मॉल्स आणि गृहनिर्माण संस्था उभारण्यात आल्या. 40 च्या दशकातील बंगळुरूमध्ये लहानाचे मोठे होत असताना येथील महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या डझनभर तळ्यांमध्ये पोहल्याच्या किंवा तिथून सायकलवरून सैर केल्याच्या आठवणी माझे वडील सांगत असत. उलसूर येथील दोन सरोवरे आणि संकेय येथील एक तळे वगळता आज यांपैकी कशाचेच अस्तित्व उरलेले नाही. बंगळुरूच्या गरजा भागविण्यासाठी येथील जलसाठे अपुरे ठरतील असे लक्षात आल्यावर, 30 च्या दशकात शहरापासून 20 मैल दूर थिप्पेगोंडाहळ्ळी येथे एक जलाशय बांधण्यात आले. अरकावती व कुमदवती या दोन नद्यांचा विसर्ग या ठिकाणी एकत्र येतो आणि या जलाशयाद्वारे हे पाणी बंगळुरूला पुरवले जाते.

मी वास्तव्यास असलेल्या या शहराची लोकसंख्या 1931 मध्ये जवळपास 3 लाख होती. 70 च्या सुरुवातीला ती पाचपट वाढली आणि 15 लाख इतकी झाली. दरम्यानच्या काळात बंगळुरूचे प्रचंड वेगाने औद्योगिकीकरण झाले होते. शहराजवळील थिप्पेगोंडाहळ्ळी आणि इतर जलाशय शहराच्या पाण्याच्या गरजा भागविण्यासाठी अगदीच अपुरे पडणार होते. त्यामुळे कावेरीचे पाणी बंगळुरूकडे वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. कावेरी नदी शहरापासून पश्चिमेला तब्बल 60 मैल दूर होती. म्हणजे पाण्याच्या शोधात बंगळुरू मैलोन्‌मैलाचे अंतर कापणार होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून पंपाच्या साह्याने या पाण्याचा उपसा केला जाणार होता आणि अतिशय खडबडीत मार्गाने त्याचे वितरण केले जाणार होते.

दुसरीकडे शहर चहूबाजूंनी वाढतच होते. लोकसंख्यादेखील 20 लाखांहून थेट एक कोटीच्या पलीकडे गेली. कावेरीच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी आणखी नव्या प्रकल्पांची आखणी करण्यात आली. प्रकल्पांच्या पुढे लावण्यात येणाऱ्या (रोमन) अंकांवरून त्याची कल्पना येऊ शकेल. उदा.- कावेरी पाणी योजना टप्पा I, II, III, IV (सध्या सुरू असणारा टप्पा) V. आता कावेरीकडे देण्यासाठी काहीच शिल्लक नसावे, असे वाटते. त्यामुळे बंगळुरूला आणखी लांबची शोधयात्रा करत शरावती नदी गाठावी लागणार आहे. पश्चिम घाटात उगम पावणारी ही नदी पुढे होन्नावर या गावाजवळ अरबी समुद्रास जाऊन मिळते. बंगळुरूच्या वायव्येकडे 180 मैलांवर ही नदी आहे. (जिच्यातून भव्य जोग धबधबा तयार होतो).

काही का असो, आता माझ्या शहरातील नागरिकांचा डोळा या पाण्यावर आहे. त्यांना स्वतःसाठी हे पाणी हवे आहे. आणि हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी कर्नाटक सरकारकडून ‘विस्तृत प्रकल्प अहवाल’ तयार केला जात आहे. कावेरी व शरावती या नद्यांचे सौंदर्य अवर्णनीय आहे. (दोहोंच्या सखल भागातून मी प्रवासही केला आहे.) निसर्गाने दोघींना उन्मुक्त बनवले. मानवाच्या मनात मात्र काही वेगळेच होते. त्याने सर्वप्रथम सिंचनासाठी आणि घरे उजळविण्यासाठी (विजेसाठी) या नद्यांवर धरणे बांधली. आता घरातील भांडी, बागेतील कुंड्या आणि भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरातील औद्योगिक शीत संयंत्रे (cooling plants)आदींसाठी या नद्यांच्या पाण्यावर डल्ला मारण्याचा त्याचा विचार आहे.

वीस मैलांवरील नदी, मग साठ मैल लांब असणारी नदी आणि आता तब्बल 180 मैल दूर असलेली नदी- असा हा प्रवास सुरू आहे. बंगळुरू जसे वाढतेय, तसे त्याला मनुष्यप्राण्याला अत्यावश्यक असणाऱ्या या द्रव्यासाठी, पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र त्यासाठी माझ्या शहराने निव्वळ आर्थिक उधळपट्टी चालवली आहे. कारण (इतक्या दूरवरून पाणी आणण्यासाठी) पाईप टाकावे लागणार आहेत, पाणी उपशासाठी आणि पठारावर वसलेल्या बंगळुरूपर्यंत ते पोहोचविण्यासाठी विजेची आवश्यकता भासणार आहे. या उठाठेवी सामाजिक दृष्ट्याही अन्यायकारक ठरणाऱ्या आहेत, कारण या नद्यांचे पाणी बंगळुरूकडे वळविण्यात आल्यामुळे ग्रामीण भाग आणि छोटी नगरे या पाण्यापासून वंचित राहणार आहेत. (शरावतीचे पाणी वळवून राजधानीला देण्याच्या विरोधात ही नदी उगम पावते तेथील जिल्ह्याच्या ठिकाणी, म्हणजे शिवमोगा येथे नुकताच बंद पुकारण्यात आला होता.)

इतकेच नव्हे, तर पर्यावरणासाठीदेखील हे प्रकल्प हानिकारक ठरणार आहेत. जे.सी. कुमारप्पा यांनी अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे, आवश्यक संसाधनांचे स्रोत आणि त्यांचा उपभोग घेणारे लोक यांतील अंतर वाढल्यास या संसाधनांच्या विवेकी किंवा शाश्वत वापराची शक्यताही दुरावली जाते. बंगळुरूचे बहुतांश रहिवासी हे सुखवस्तू आणि सामर्थ्यवान आहेत. आपल्या घरगुती आणि व्यावसायिक गरजा भागविण्यासाठी आवश्यक असणारा पाण्याचा ओघ कायम सुरूच राहील, असा समज दुर्दैवाने या मंडळींनी करून घेतला आहे.

मी राहत असलेल्या शहराविषयीच मी विस्ताराने लिहिले आहे. पण, बंगळुरूचा प्रश्न आणि बंगळुरूच्या वाढीमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचे पडसाद देशभर उमटणार आहेत. भारत ही चुकांची गंगोत्री असली, येथे असंख्य समस्या आ वासून उभ्या असल्या; तरी आपल्याला भेडसावणारी सर्वांत मोठी समस्या जर कुठली असेल, तर ती आहे पाणीसमस्या. उपलब्धता आणि दर्जाच्या अनुषंगाने भविष्यात भारताच्या केंद्रस्थानी तेल नव्हे तर पाणी असेल, असे भविष्यसूचक विधान पर्यावरणतज्ज्ञ जयंत बंदोपाध्याय यांनी 80 च्या दशकात केले होते. त्या वेळी त्यांचे ते विधान सर्वांनी उडवून लावले. आज मात्र समंजस मंडळींना बंदोपाध्याय यांच्या विधानाची सत्यता पटू लागली आहे.

आपल्या लहान-मोठ्या नद्यांमध्ये प्रचंड प्रदूषण झालेले आहे. देशातील सर्वच राज्यांतील जलसाठ्यांनी (विहिरी, तलाव इ.) तळ गाठलेला आहे. तेथील भूजल दूषित झालेले आहे, पावसाचे एकूणच स्वरूप बदललेले आहे. अधिकाधिक जिल्ह्यांचा समावेश दुष्काळग्रस्तांच्या यादीत होऊ लागलेला आहे. पाण्याशी निगडित अशा सर्वच समस्यांमुळे पाण्याचा वापर व गैरवापर, त्याची उपलब्धता आणि तुटवडा आदी गोष्टी उशिरा का होईना सार्वजनिक चर्चेचा आणि राजकीय वाद- विवादाचा विषय होऊ लागल्या आहेत. भारताला आपल्या जल संसाधनाचा विनियोग अधिक प्रभावी व शाश्वतपणे कसा करता येऊ शकेल? देशातील प्रत्येक नागरिकाला, हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकालाच या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता असेल.

आपल्याला वेळ व या विषयात स्वारस्य असेल, तर या विषयाशी संबंधित पुढील काही पुस्तके वाचायला हवीत. यांपैकी दोन पुस्तके इंग्रजी भाषेत असून एक हिंदी भाषेत आहे आणि ही सर्व पुस्तके उपलब्धही आहेत. ही पुस्तके पुढीलप्रमाणे : मिहिर शाह आणि पी. एस. विजयाशंकर संपादित "Water : Growing Understanding, Emerging Perspectives', जयंत बंदोपाध्याय लिखित Water, Ecosystems and Society: - Confluence of Disciplines आणि अनुपम मिश्रा यांचे ‘आज भी खरे है तालाब’. (वाचकांनी जर अजून भेट दिली नसेल तर सोबतच, http://www.indiawaterportal.org/ या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी. येथे विषयानुरूप अनेक उकृष्ट लेख आणि विश्लेषण वाचायला मिळू शकेल.)

मी काही जलव्यवस्थापनातील तज्ज्ञ नाही. मात्र, गेली अनेक वर्षे या विषयाचा पाठपुरावा करत असल्यामुळे निष्कर्ष म्हणून काही इशारेवजा गोष्टी मी सांगू इच्छितो. पहिली बाब म्हणजे, शहरांना लोभ आणि लोलुपतेसाठी दोषी धरले तरी ग्रामीण भागातील स्थितीही फारशी काही वेगळी नाही. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्याराज्यामध्ये स्पर्धा लागल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी मोफत विजेच्या या तरतुदी (विजेच्या) उधळपट्टीला चालना देतील.

दुसरी गोष्ट म्हणजे, पाण्याच्या (खऱ्या किंवा काल्पनिक) तुटवड्यापासून बचाव करण्यासाठी नवनवीन खर्चिक योजना आखण्याऐवजी लोकांनी पाण्याचा वापर दूरदर्शीपणे करावा यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. म्हणजेच पुरवठ्याऐवजी मागणीच्या बाजूचा दृष्टिकोन आपण स्वीकारायला हवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या समस्यांवर उपाय शोधताना आपण पोकळ अध्यात्माऐवजी भक्कम विज्ञानाचा आधार घेतला पाहिजे. हिंदू नद्यांना पवित्र मानतात असा दावा आपण करतो. असे असूनही आपल्या सर्वांत पवित्र नद्या सर्वांत प्रदूषित आणि शापित कशा? या समस्यांच्या निवारणासाठी साधू, बुवा- बाबांकडे जाण्याऐवजी (ज्याची सध्या सर्वाधिक शक्यता आहे) केंद्र आणि राज्य सरकारांनी जलतज्ज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, शहर नियोजक व पर्यावरणीय अर्थतज्ज्ञ आदी अभ्यासकांचे सल्ले अधिक लक्षपूर्वक ऐकावेत असे मी त्यांना सुचवीन.

चौथी आणि शेवटची बाब म्हणजे, अर्थशास्त्राच्या नियमांपेक्षा निसर्गनियम अधिक अपरिवर्तनीय आणि प्रलयकारी असतात. आर्थिक नियमांकडे काणाडोळा केल्यास एखादा व्यक्तिगत उपक्रम वा व्यवसाय डबघाईला येईल किंवा आर्थिक तुटीत वाढ होईल; मात्र निसर्गनियमांकडे दुर्लक्ष केल्यास एखादे गाव वा शहर, राज्य, सर्व देश किंवा संपूर्ण संस्कृतीच (civilization) नष्ट होण्याचा धोका असतो.

(अनुवाद : समीर दिलावर शेख)

मागोवा

तो एक अश्वत्थामा...

सुधीर जोगळेकर

6 ऑगस्टला सकाळी 9.15 वाजता विमानाची झडप उघडून 31 हजार फुटांवरून साडेचार हजार किलो वजनाचा ‘लिटिल बॉय’ अणुबॉम्ब हिरोशिमावर फेकला गेला. बॉम्ब सोडताच टिब्बेट्‌सने झर्रकन विमान वळवले. बॉम्ब फुटला तोवर ‘एनोला गे’ अकरा मैल दूर निघून गेले होते, पण तरीही त्यांना विजेच्या धक्क्यासारखे झटके बसले. साठ हजार फूट उंचीवरून शहराला तीनदा प्रदक्षिणा घालून ‘एनोला गे’ तळाकडे निघाले.

‘लिटल बॉय’ हिरोशिमावर फुटला तेव्हा सकाळ असल्याने लोक कामाला निघाले होते. मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर होते. इशारा देणारे भोंगे पुन्हा वाजवण्यात आले, पण तोवर उशीर झाला होता. एक दशांश सेकंदात 2,80,000 सेल्सियस तापमानाचा 100 फूट व्यासाचा गोळा शहरावर पडला. न्युट्रॉन आणि गॅमा किरण शहरात घुसले. हजारो लोकांची क्षणार्धात वाफ होऊन गेली. शहराच्या नव्वद हजार इमारतींपैकी साठ हजार इमारती भुईसपाट झाल्या. 80,000 लोक जागीच मृत्युमुखी पडले. जखमी झालेले अनेकजण नंतर मृत झाल्याने ही संख्या 1,60,000 च्या पुढे गेली.

पांडवांचा वंश समाप्त करण्यासाठी कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या अखेरीस उत्तरेच्या पोटातील गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग करणाऱ्या अश्वत्थाम्याला चिरवेदना भोगावी लागली. तशीच गती दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या पर्वात हिरोशिमावर अणुबॉम्ब फेकणाऱ्या विमानांच्या ताफ्यातल्या क्लॉड इथर्ली या वैमानिकाची झाली. त्या अमानुष कृत्याने पश्चात्तापदग्ध होऊन त्याला उत्तर आयुष्याची काही दशके दुःस्वप्ने पहात मनोरुग्णालयात घालवावी लागली, त्याची ही कहाणी.

क्लॉड इथर्लीचा जन्म 2 ऑक्टोबर 1918 रोजी अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षणानंतर त्याने शिक्षकी पेशासाठी नॉर्थ टेक्सास टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. क्लॉड कॉलेजात असताना सप्टेंबर 1939 मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यानंतर दुसरे महायुद्ध युरोपात पेटले. अमेरिका अद्याप युद्धात पडली नव्हती तरी 1940 साली फ्रान्सच्या पाडावानंतर अमेरिकेत युद्धाची तयारी सुरू झाली; सैनिक भरती मोठ्या प्रमाणात सुरू झाली व देशप्रेमाने भारलेला क्लॉड शिक्षण सोडून आर्मी एअर कोअरमध्ये भरती झाला. ऑगस्ट 1941 मध्ये तो सैन्याच्या बॉम्बर स्कूलमधून प्रशिक्षण घेऊन सेकंड लेफ्टनंट झाला. त्याची नियुक्ती 393 बॉम्ब स्क्वॅड्रनमध्ये बी-29 फायटर विमानावर झाली.

जपानने पर्ल हार्बर या पॅसिफिक बेटांवरील अमेरिकन तळावर हवाई हल्ला केल्यानंतर डिसेंबर 1941 मध्ये अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली. जर्मनी अणुबॉम्ब तयार करत असल्याची वदंता होती. 1942 साली अमेरिकेने रॉबर्ट ऑपेनहायमेर या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली गुप्तपणे ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’ या सांकेतिक नावाने अणुबॉम्बसाठी अत्यंत वेगाने संशोधन सुरू केले. 1944 साली उत्तर पॅसिफिक महासागरामधल्या मरीना बेटांवर अमेरिकेने हल्ला चढवून ती काबीज केली. जपानवर विमानांनी थेट हल्ला चढवण्याच्या टप्प्यात ही बेटे असल्याने, रणनीतीत या बेटांचे विशेष महत्त्व होते.

या बेटांपैकी टिनियन या बेटावर 509 काम्पोझिट ग्रुपमध्ये मेजर क्लॉड इथर्लीची नेमणूक ‘स्ट्रेट फ्लश’ नावाच्या बी-29 बॉम्बरचा वैमानिक म्हणून झाली. बी-29 सुपरफोरट्रेस या तत्कालीन अत्याधुनिक विमानांची निर्मिती बोर्इंगने केली होती व त्यातील सिल्व्हरप्लेट जातीच्या विमानांत अणुबॉम्ब नेण्यासाठी विशेष सोय केली होती. या बॉम्बर ग्रुपचा प्रमुख लेफ्टनंट कर्नल पॉल टिब्बेट्‌स होता. टिनियन बेटाच्या नॉर्थ फील्डस विमानतळावरून 1944-45 मध्ये जपानवर तूफान ज्वालाग्राही बॉम्बवर्षाव करण्यात अन्य पायलटांबरोबर इथर्ली व टिब्बेट्‌स दोघांचाही प्रमुख सहभाग होता. एका प्रसंगी क्लॉड इथर्लीने जपानी सम्राटाच्या राजवाड्यावर बॉम्बफेकीचा प्रयत्न केला, पण नेम चुकून शेजारचा पूल उद्‌ध्वस्त झाला.

दरम्यान 7 मे 1945 रोजी जर्मनीने बिनशर्त शरणागती पत्करल्याने युरोपमधील युद्ध संपुष्टात आले. पण जपानबरोबरचे पॅसिफिकमधील युद्ध अद्याप सुरूच होते. 16 जुलै 1945 रोजी, न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात अमेरिकेने ‘ट्रिनिटी प्रकल्प’ या नावे अणुबॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. ‘लिटल बॉय’ या सांकेतिक नावे ओळखल्या जाणाऱ्या युरेनियम बॉम्बचे व ‘फॅट मॅन’ नावे प्लुटोनियम बॉम्बचे भाग टिनियन बेटावरील तळावर गुप्तपणे आणून त्यांची जोडणी करण्यात आली. दि.26 जुलै 1945 रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रूमन, ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल व चीनच्या चँग कै शेक सरकारचे प्रतिनिधी यांच्यातील पोट्‌सडॅम ठरावाप्रमाणे जपानला ‘विनाशर्त शरण’ येण्यासाठी निर्वाणीचा इशारा अमेरिकेने दिला. 29 जुलै रोजी जपानी सरकारने हा इशारा धुडकावून लावला.

इकडे बॉम्ब आणलेली अमेरिकन बोट जपानने 30 जुलै रोजी बुडवली, त्यात 879 अमेरिकन नाविक मरण पावले. जपानमधील पाच शहरे बॉम्बहल्ल्यासाठी निवडण्यात आली होती. त्यात सुरुवातीला नागासाकीचा समावेश नव्हता. पण निवडलेले क्योटो हे शहर सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे व अनेक बुद्ध मंदिरे असल्याने ते वगळून त्याऐवजी नागासाकी शहर हल्ल्याच्या केवळ आठवडाभर आधी निवडण्यात आले. दि.6 ऑगस्ट 1945 रोजी मध्यरात्री 12.00 वाजता लेफ्टनंट कर्नल पॉल टिब्बेट्‌सने हिरोशिमावरील हल्ल्यात सहभागी होणाऱ्या सात विमानांच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यानुसार मेजर क्लॉड इथर्लीचे ‘स्ट्रेट फ्लश’ बॉम्बर आधी जाऊन हवामानाची पाहणी करणार होते. एक विमान राखीव म्हणून वाटेतल्या इवो जिमा बेटावर ठेवण्यात आले. पॉल टिब्बेट्‌सचे ‘एनोला गे’ मुख्य बॉम्बहल्ला करणार होते. 12.05 वाजता फादरला बोलवून या प्रसंगासाठी रचण्यात आलेली विशेष प्रार्थना सगळ्यांनी म्हटली. पहाटे 1.37 वाजता क्लॉड इथर्लीचे ‘स्ट्रेट फ्लश’ व त्याच्या सोबतच्या दोन बी-29 सिल्व्हरप्लेट विमानांनी टिनियनवरून उड्डाण केले. त्यानंतर पहाटे 2.45 वाजता ‘एनोला गे’ व त्याचे रक्षण करणाऱ्या दोन विमानांनी उड्डाण केले. कर्नल पॉल टिब्बेट्‌सच्या आईचे नाव ‘एनोला गे’ होते, आपल्या आईच्या स्मरणार्थ तेच नाव त्याने आपल्या विमानाला दिले होते. या विमानातून जगातला पहिला ॲटम बॉम्ब ‘लिटल बॉय’ नेण्यात आला. टिनियनहून निघाल्यावर तासाभराने ‘लिटल बॉय’ला त्याचे फ्यूज जोडण्यात आले. सकाळी 7.15 वाजता बॉम्बचे सेफ्टी डिव्हाइस काढून टाकण्यात आले. सकाळी 8.09 वाजता क्लॉड इथर्लीचे ‘स्ट्रेट फ्लश’ हे विमान व दोन साथीदार विमाने जपानी हद्दीत शिरली, तेव्हा हिरोशिमामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे भोंगे वाजवण्यात आले व जपानी नागरिक सुरक्षित स्थानी लपले. 8.24 वाजता क्लॉड इथर्लीने पॉल टिब्बेट्‌सला सांकेतिक भाषेत हवामान उत्तम असून बॉम्बहल्ला कर असा इशारा दिला. 8.31 वाजता इथर्लीच्या विमानाने हिरोशिमा सोडले. तेव्हा विमाने गेली व संकट टळले असे वाटून ‘सारे काही ठीक’ असल्याचा इशारा शहरातील भोंग्यांनी वाजवला, नागरिक सुरक्षित जागांमधून बाहेर पडले.

तेवढ्यात 9.12 वाजता ‘एनोला गे’चा ताफा हिरोशिमावर आला. 6 ऑगस्टला सकाळी 9.15 वाजता विमानाची झडप उघडून 31 हजार फुटांवरून साडेचार हजार किलो वजनाचा ‘लिटिल बॉय’ अणुबॉम्ब हिरोशिमावर फेकला गेला. बॉम्ब सोडताच टिब्बेट्‌सने झर्रकन विमान वळवले. बॉम्ब फुटला तोवर ‘एनोला गे’ अकरा मैल दूर निघून गेले होते, पण तरीही त्यांना विजेच्या धक्क्यासारखे झटके बसले. साठ हजार फूट उंचीवरून शहराला तीनदा प्रदक्षिणा घालून ‘एनोला गे’ तळाकडे निघाले.

‘लिटल बॉय’ हिरोशिमावर फुटला तेव्हा सकाळ असल्याने लोक कामाला निघाले होते. मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर होते. इशारा देणारे भोंगे पुन्हा वाजवण्यात आले, पण तोवर उशीर झाला होता. एक दशांश सेकंदात 2,80,000 सेल्सियस तापमानाचा 100 फूट व्यासाचा गोळा शहरावर पडला. न्युट्रॉन आणि गॅमा किरण शहरात घुसले. हजारो लोकांची क्षणार्धात वाफ होऊन गेली. शहराच्या नव्वद हजार इमारतींपैकी साठ हजार इमारती भुईसपाट झाल्या. 80,000 लोक जागीच मृत्युमुखी पडले. जखमी झालेले अनेकजण नंतर मृत झाल्याने ही संख्या 1,60,000 च्या पुढे गेली. पुढील पिढ्यांना विविध विकृतींचा सामना करावा लागला. जपानने त्वरीत शरणागती पत्करावी, अन्यथा आणखी भयानक परिणाम भोगावे लागतील, अशा अर्थाची पत्रके पुढे दोन दिवस अमेरिकेने विमानांतून जपानवर टाकली.

दरम्यान जपानने सोव्हिएत युनियनला शरणागतीची बोलणी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनवणी केली. सोविएत युनियनने दोस्तांकडे प्रस्ताव ठेवला असता तर कदाचित नागासाकीवरील हल्ला टळला असता. सोविएत युनियन व जपानमध्ये 1941 पासून युद्धबंदीचा करार होता. पण स्टालिनने जपानची मध्यस्थीची विनंती तर फेटाळलीच, शिवाय सोविएत-जपान युद्धबंदी करार एकतर्फा मोडून जपानशी युद्ध जाहीर केले आणि 9 ऑगस्ट रोजी सोव्हिएत फौजांनी मांचुरियावर हल्ला केला. महासत्तांमध्ये जग विभागण्याची प्रक्रिया युरोपमध्ये सुरू झालीच होती, ती आशियातही विस्तारली.

दि.9 ऑगस्ट रोजी हिरोशिमाप्रमाणेच नागासाकीवर ‘बॉक्स कार’ विमानातून ‘फॅट मॅन’ प्लुटोनियम बॉम्ब टाकण्यात आला. खरं तर जपानचे कोकुरा शहर बॉम्बहल्ल्याचे मुख्य लक्ष्य होते, पण तेथील खराब हवामानामुळे नागासाकीकडे विमाने वळवण्यात आली. नागासाकीमध्ये 75,000 लोक त्वरीत मृत्युमुखी पडले. नागासाकीवर बॉम्बहल्ला झाला, त्यावेळी शरणागतीची तयारी करण्यासाठी जपानी इम्पेरिएल सुप्रीम वॉर कौन्सिलची बैठक टोकियोमध्ये सुरू होती. 10 ऑगस्टला जपानी सम्राट हिरोहिटोने वॉर कौन्सिलमध्ये हस्तक्षेप करून पोट्‌सडॅम ठरावाप्रमाणे शरणागती करण्याचे ठरवले व तसा संदेश अमेरिकेला पाठवला. काही जपानी जनरलनी बंड पुकारून युद्ध सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, पण अखेर 15 ऑगस्टला जपानने शरणागती पत्करली.

युद्धानंतर क्लॉड इथर्ली अमेरिकेत परतला व त्याची सैन्यात सेवा सुरू राहिली. पॉल टिब्बेट्‌स, क्लॉड इथर्ली व अन्य अधिकाऱ्यांना शौर्य पदकांनी गौरवले गेले. बॉम्ब पडला तेव्हा क्लॉड इथर्लीचे विमान हिरोशिमा सोडून टिनियन बेटाच्या दिशेने निघाले होते, त्यामुळे त्याने विध्वंसाचे प्रत्यक्ष दृश्य पाहिले नव्हते. पण अणुबॉम्बमुळे झालेल्या प्रचंड मनुष्यहानीचे तपशील जसजसे प्रसिद्ध होऊ लागले, तसा इथर्ली अस्वस्थ होऊ लागला. अपराधीपणाच्या भावनेने त्याला ग्रासले. त्याची अणुबॉम्बविरोधी भूमिका अर्थातच प्रस्थापनाला आवडली नाही. सैन्याच्या परीक्षेत घोटाळा केल्याचा आरोप ठेवून इथर्लीला 1947 साली निवृत्त करण्यात आले. मग त्याने टेक्सासमधील एका तेलकंपनीत नोकरी धरली.पगाराचा काही भाग तो नियमितपणे अणुहल्ल्यात बळी पडलेल्या अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी पाठवू लागला. त्यासोबत तो त्या मुलांची क्षमायाचना करणारे पत्र जोडत असे. पण अपराधी भावना दिवसेंदिवस वाढतच गेली. त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला. अनेकदा टेक्सासमधल्या मोठ्या स्टोअर्समध्ये आणि पोस्ट ऑफिसांमध्ये घुसून, खेळण्यातल्या बंदुकीचा धाक दाखवून तिथली रोकड एका डब्यात घालायला तो सांगे, पण ते पैसे न घेताच निघून जाई. ‘वॉर हीरो’ म्हणून असलेली आपली प्रतिमा नष्ट करून या गुन्ह्यांमधून स्वतःला शिक्षा व्हावी म्हणून तो असे प्रकार करत असे, असे मत काही मनोविश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

एकदा चेकची अफरातफर करून ती रक्कम त्याने हिरोशिमाच्या मुलांच्या मदतीसाठी पाठवली. त्याबद्दल खटला चालून त्याला एक वर्षाची कैदेची शिक्षाही झाली. पुढे क्लॉडची अपराधीपणाची भावना वाढतच गेली. तो झोपेतून किंचाळत उठत असे. ‘रोज रात्री मला दुःस्वप्नात उसळत्या लालभडक ज्वालांमध्ये जळणारी हिरोशिमातली मुले दिसतात. माझा मेंदू जळत आहे.’ असे त्याने त्याच्या भावाला सांगितले होते. पुढे एका हॉटेलच्या खोलीत त्याने आत्महत्येचा पुन्हा प्रयत्न केला, पण सुदैवाने त्याला वाचवण्यात यश आले. त्याला वेडसर ठरवून सैनिकांसाठी असलेल्या एका मनोरुग्णालयात ठेवण्यात आले.

हिरोशिमा-नागासाकीवर बॉम्बफेक करणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही वैमानिकाला अशा तऱ्हेचा पश्चात्ताप झाला नव्हता. हिरोशिमावर प्रत्यक्ष बॉम्ब फेकणाऱ्या ‘एनोला गे’चा वैमानिक पॉल टिब्बेट्‌स याने आयुष्याच्या अखेरपर्यंत अणुबॉम्बचे जाहीर समर्थन केले. त्याच विमानातील आणखी एक अधिकारी कॅप्टन रॉबर्ट लुई याने तर एनोला गे विमानातील हल्ल्यावेळी लिहिलेल्या लॉगचा (नोंदीचा) बेकायदेशीर लिलाव करून तीन लक्ष एक्क्याण्णव हजार डॉलर कमावले! काही लोकांनी क्लॉड इथर्लीला देशद्रोही ठरवायलाही कमी केले नाही. एका वैमानिकाने म्हटले, ‘क्लॉडला स्वतःच तो अणुबॉम्ब टाकायचा होता, पण ज्येष्ठतेमुळे ती संधी पॉल टिब्बेट्‌सला दिली गेल्याने वैफल्यग्रस्त होऊन क्लॉड अणुबॉम्बचा निषेध करत आहे.’

‘इथर्लीला प्रसिद्धी आणि पैसा हवे होते, म्हणून त्यानं अणुबॉम्बविरोधी संघटनांशी संगनमत करून बॉम्ब टाकल्याबद्दल पश्चात्ताप होत असल्याचे नाटक केले आहे,’ असाही आरोप त्याच्यावर करण्यात आला. क्लॉडच्या समर्थनार्थ त्याचा एकमेव सहकारी पॉल गिडरी म्हणाला, ‘क्लॉड इथर्ली 100 टक्के सच्चा अमेरिकन आहे, अतिशय प्रेमळ मनुष्य आहे’. ‘एनोला गे’वरील आणखी एक वैमानिक थिओडर व्हॅन कर्कने अणुबॉम्बची भीषणता वर्णन करताना म्हटले, ‘ते दृश्य पुन्हा कुणाला पाहावे लागू नये, अशी माझी प्रार्थना आहे. किती नुकसान झाले, किती प्राण गमावले! आम्ही पहिला अणुबॉम्ब टाकला आणि माझी अशी आशा आहे की आपण कायमचा धडा शिकलो आहोत अशी पाळी पुन्हा कोणावर येणार नाही.’

क्लॉडने मनोरुग्णालयातून शांतीसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवक गटांशी संपर्क साधला. व्हिएन्नामधील गुंथर अँडर्स या अणुबॉम्बविरोधी प्रसिद्ध जागतिक नेत्याशी त्याचा बराच पत्रव्यवहार झाला. हा पत्रव्यवहार ‘बर्निंग कॉन्शन्स’ (ज्वलंत सद्‌सदविवेकबुद्धी) या नावे प्रसिद्ध झाला आहे. क्लॉडने एका पत्रात लिहिले आहे, ‘अमेरिकन समाज माझी अपराधीपणाची भावना स्वीकारू शकत नाही, कारण त्यामुळे अधिक खोल अशा सामूहिक अपराधीपणाची भावना समाजाला स्वीकारावी लागेल.’ त्यावर अँडर्सनी लिहिले, ‘केवळ वेडे ठरवण्यात आलेले लोकच असे लिहीत आहेत, असा हा किती दुर्दैवी काळ आहे.’

या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत नोबेल शांती पुरस्कारप्राप्त बर्ट्रांड रसेल यांनी ‘क्लॉड इथर्लीला मनोरुग्ण ठरवले, हे त्या डॉक्टरनाही पटले नसेल’ असे लिहिले आहे. ते लिहितात, ‘हत्याकांडात भाग घेतल्याबद्दल जग त्याचा सत्कार करायला तयार होते, पण त्याला पश्चात्ताप झाला तेव्हा जगाला त्यात स्वतःचा धिःकार दिसला.’ शेवटी मृत्यूनेच त्याची मानसिक यातनांतून सुटका केली. 1 जुलै 1978 रोजी वयाच्या साठाव्या वर्षी क्लॉड इथर्लीचा कॅन्सरने मृत्यू झाला, अपराधी भावनेने तगमगणारा एक जीव कायमचा शांत झाला. एका अश्वत्थाम्याची चिरवेदनेतून मुक्तता झाली. पण क्लॉड इथर्लीच्या व्यथेतून जगातले सत्ताधारी काही शिकले का?

सुधीर जोगळेकर, बेळगाव

संदर्भ :

1) http://marcuse.faculty.history.ucsb.edu/projects/anders/- nders1962BurningConscienceEatherlyOCR.pdf

2) https://www.atomicheritage.org/history/hiroshima-andnagasaki-bombing-timeline

3) http://evangelicalfocus.com/blogs/1911 facingsupsjosesdessegoviasmanuelscruz

4) https://ww2db.com/personsbio.php?personsid=510 5) https://www.youtube.com/watch?v=-4-j1FyiWvw

मागोवा

चेर्नोबिल

समीर शिपूरकर

चेर्नोबिलच्या परिसरातला 30 किमी त्रिज्येचा परिसर 1986 पासून मनुष्यवस्तीसाठी अयोग्य म्हणून जाहीर झाला आहे. पुढच्या 20 हजार ते 50 हजार वर्षांसाठी. त्या मोडक्या, गळक्या इमारतीतून किरणोत्सर्ग कमीत कमी व्हावा यासाठी तिथं सतत नवनवीन उपाय योजून प्रचंड खर्च करण्यात येत आहे. पुढची शेकडो-हजारो वर्षं हे काम सतत चालू ठेवावं लागणार आहे. चेर्नोबिलच्या स्फोटाची तीव्रता हिरोशिमापेक्षा 400 पटीनं जास्त किरणोत्सर्गी होती. आज जगभरात सुमारे 450 अणुभट्ट्या आहेत. त्यातल्या भारतात सुमारे 22 आहेत. या अणुभट्ट्या विजेची निर्मिती करतात आणि मानवजातीच्या वाढत्या गरजा भागवतात. याव्यतिरिक्त अणुशक्तीचा उपयोग करून बनवलेली संहारक अस्त्रं अनेक देशांकडं आहेत. हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये अणुबाँबची विध्वंसक ताकद आपल्याला दिसली. चेर्नोबिलनं त्याची भीषणता आणखी तीव्रपणे दाखवली.

‘हॉटस्टार’ नावाच्या वेबठिकाणी ‘चेर्नोबिल’ नावाची पाच भागांची मालिका दिसते आहे. ती महत्त्वाचा विषय मांडते आहे. त्यासंदर्भात, त्यानिमित्ताने थोडेसे... सोव्हिएत रशिया नावाचा देश अस्तित्वात असताना युक्रेन प्रांतातल्या चेर्नोबिल या ठिकाणी (प्रिप्यात शहराजवळ) असलेल्या अणुभट्टीचा स्फोट झाला आणि त्याचे पडसाद जगभर उमटले. आज सोव्हिएत रशिया अस्तित्वात नाही. युक्रेन हा आता एक स्वतंत्र देश आहे. चेर्नोबिल हे ठिकाणसुद्धा अस्तित्वात आहे, पण जवळजवळ निर्मनुष्य. किमान 20 हजार वर्षं तिथं मनुष्यवस्ती होऊ शकत नाही. (काही कागदपत्रांमध्ये 20,000 ऐवजी 50,000 वर्षे असं नोंदवलं आहे). मानवी इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली.

किरणोत्सर्ग, युरेनियम, त्याचं हाफलाईफ वगैरे गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत, लवकर समजत नाहीत; म्हणूनच सामान्य लोकांना यातलं गांभीर्य लवकर कळत नाही. 20 हजार ते 50 हजार वर्षांच्या हिशेबात एखादी गोष्ट आपण बोलू शकतो, हेसुद्धा मनाला सहजासहजी कळत नाही. आणि तसं पाहता चेर्नोबिलला आजसुद्धा तशीच स्वच्छ- सुंदर हवा दिसते. तसेच निळेशार ढग दिसतात. इमारती दिसतात, रस्ते दिसतात. पण सगळंच फसवं आहे, मायावी आहे.

दि.26 एप्रिल 1986. चेर्नोबिलला चार रिॲक्टर्स असलेली एक अणुभट्टी होती. तिथलेच काही तंत्रज्ञ एक चाचणी घेत होते. त्यात गफलत झाली आणि चारपैकी एका रिॲक्टरचा स्फोट झाला. परिस्थिती हाताबाहेर जातेय, हे कळूनही तंत्रज्ञांना काही करता आले नाही. अणुभट्टीचं छप्पर कोसळलं. त्यातून बाहेर निघालेली आग, धूर, राख, अणुभट्टीच्या अवयवांचे तुकडे सगळीकडं पसरले. वाऱ्याबरोबर आकाशात पसरले. वाऱ्याला जाती-धर्माच्या, राष्ट्र-राज्याच्या, नैतिकतेच्या, सत्य-असत्याच्या मर्यादा नसतात. वारा पार स्वीडनपर्यंत पसरला.

रशियन राज्यकर्ते जो किरणोत्सर्ग दाबू बघत होते, तो पार शत्रूंच्या राज्यापर्यंत जाऊन फितुरी करत वर्दी देता झाला. आता बातमी दडवून ठेवणं शक्य नव्हतं. पण तरीसुद्धा किती गोष्टी उघडपणे मान्य करायच्या आणि किती दुर्लक्षित ठेवायच्या, याचे आडाखे बांधणं चालूच होतं. अशा परिस्थितीत वेगवेगळे लोक काय करत होते? अणुवैज्ञानिक-संशोधक-शास्त्रज्ञ मोठ्या पेचात होते. कारण खरं नुकसान, खरा धोका त्यांनाच माहिती होता. त्यांचा शब्दन्‌शब्द आता महत्त्वाचा होता. त्यांच्या एका इशाऱ्यानं लाखो लोकांचे प्राण वाचणार किंवा जाणार होते. त्यांच्या मूक राहण्यानं काही राजकारण्यांची मोठी सोय होणार होती. त्यांच्या स्पष्ट बोलण्यानं काही लोक गजाआड जाणार होते. पण त्याचमुळे पुढच्या पिढ्या वाचणार होत्या.

अशा अतिशय आव्हानात्मक प्रसंगात या वैज्ञानिकांनी कसा विचार केला असेल? त्यांची बांधिलकी त्यांनी कुणाशी राखली असेल? त्यांच्या त्या वेळच्या सहकाऱ्यांशी, की राजकारणातल्या बॉसशी? की वर्तमानकाळाशी, की भविष्यकाळाशी? चेर्नोबिल गावातल्या लोकांशी, की पूर्ण रशियातल्या लोकांशी? की संपूर्ण जगातल्या लोकांशी, मानवतेशी? सगळ्या लोकांचं हित कशात आहे हे ठरवण्याची जबाबदारी एकाच माणसावर येते, तेव्हा तो ते ओझं कसं पेलत असेल? जो अणूच्या आरपार बघू शकतो, तो शास्त्रज्ञ काळाच्या आरपारसुद्धा बघू शकला पाहिजे; तरच तो स्थळ- काळाच्या भिंती ओलांडणारा खरा मानवी-शास्त्रज्ञ बनू शकेल. तर, चेर्नोबिलच्या प्रकरणात अशा जागल्या वैज्ञानिकांनी आपलं काम चोखपणे केलेलं आहे. त्या वेळी तिथल्या अनेक शास्त्रज्ञांना ‘देशद्रोही’ संबोधण्यात आलं. पण आपल्या प्राणाची किंमत देऊन आपलं मानवजातीसाठीचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं.

आता वेगळाच घटक. खाण कामगार. जमिनीवरच्या लोकांना सूर्य दिसावा म्हणून स्वतः अंधार पत्करून भुयार काढत, खोदत जमिनीखाली पसरत जाणारे कष्टकरी जीव. सोव्हिएत रशियाचा कोळसामंत्री स्वतः या कामगारांना भेटायला खाणीपाशी आला आहे- विनंतीयुक्त आदेश घेऊन. या कामगारांना तातडीनं चेर्नोबिलच्या अणुभट्टीच्या तळाशी घुसून मोठं भुयार करायचं आहे. त्यांनी हे काम नाकारलं तर किरणोत्सर्ग जमिनीत शिरून, संपूर्ण पाण्यात पसरून नदीत शिरेल आणि समुद्रापर्यंतची सगळी जमीन, पाणी विषारी होईल. अवधी फक्त काही दिवसांचा, काही तासांचा आहे. हे खाण कामगार हे आव्हान स्वीकारून भुयार खणायला लागतात. अणुभट्टीच्या उष्णतेमुळं भुयारातलं तपमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत वाढतं. कामगारांचा नेता रागावून येतो आणि ‘मोठे पंखे हवेत’ अशी मागणी करतो. तिथला अधिकारी शांतपणे सांगतो की, ही धूळ एरवीच्या धुळीपेक्षा वेगळी आहे. भुयारात पंखे लावले तर सगळे कामगार काही तासांत मरून जातील. त्यामुळं काहीच करता येणार नाही. मग कामगार त्याच परिस्थितीत काम सुरू ठेवतात. पुढच्या शॉटमध्ये सगळे कामगार अंगावरचे पूर्ण कपडे काढून संपूर्ण नागड्या अवस्थेत काम करताना दिसतात. कामगार नेता म्हणतो, ‘आमचे बापजादे उष्णतेपासून वाचण्यासाठी याच पद्धतीनं काम करत आलेत. तेच आता आम्ही करतोय.’ हे खाणकामगार आणि त्यानंतर मदतीला घेतलेले तब्बल सात लाख लोक यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता तिथलं मदतकार्य केलं आहे. आपल्या बलिदानामुळं काही लाख लोकांचे जीव वाचणार आहेत, हीच काय ती त्यांची प्रेरणा होती.

आणि इकडं सैनिक बंदुका घेऊन गावोगाव, खेड्यापाड्यांत हिंडतायत. घरोघरी जातायत. सगळी गावं निर्मनुष्य. बेजान. नाही म्हणायला फक्त गावातली कुत्री आणि मांजरं आहेत. या सैनिकांची चाहूल लागली की माणूस भेटण्याच्या आनंदात, खायला मिळेल अशा आशेनं हे प्राणी त्यांच्याजवळ धावत येतात. या सैनिकांचं हे काम आहे की, या कुत्र्या-मांजरांना थेट गोळ्या घालून ठार मारणं. कारण हे प्राणी आता किरणोत्सर्गी झाले आहेत. हे नेहमीसारखे दिसत असले तरी आता हे नेहमीचे प्राणी राहिलेले नाहीत. त्यांना नुसतं ठार मारूनही भागत नाही. प्राणी मेले तरी त्यांच्यातून किरणोत्सर्ग पसरत राहतो. म्हणून जमिनीत खोल खड्डा काढून त्यात सगळे प्राणी ओतून त्यावर सिमेंट काँक्रीटचा जाड थर पसरण्यात येतो. किरणोत्सर्गापासून पुढच्या पिढ्या वाचाव्यात म्हणून हे करणं आवश्यक आहे.

हे काम करायला सैनिक कमी पडतायत म्हणून विशीतल्या तरुणांना मदतीला घेतलं आहे. कधी बंदूक न चालवलेल्या मुलाच्या हातात आता बंदूक आलीय. आणि जो प्राणी प्रेमानं आपल्या जवळ येतोय, त्याला गोळी घालून ठार मारण्याचं काम करताना हा मुलगा कासावीस होतोय. मरणाऱ्या कुत्र्याच्या डोळ्यांत बघण्याचा धीर त्याला होत नाहीय. एकदा तर त्याला कुत्र्याची पिल्लं आईचं दूध पिताना दिसतात. एक अनुभवी सैनिक म्हणतो, ‘पहिल्या दिवशी प्रत्येकाला हाच त्रास होतो.’

जे लोक अणुभट्टीजवळ जाऊन आग विझवण्याचं किंवा इतर मदतीचं काम करतायत, त्यांच्या पेशीपेशीत आता किरण शिरले आहेत. आत शिरलेले किरण तातडीनं पेशी आतूनच नष्ट करण्याचं काम सुरू करतायत. दोनेक आठवड्यांत पेशी फुटण्याचं काम वेग घेतं आणि माणूस संपूर्ण अंगभर रक्तानं माखून जातो. आतूनच सगळं फुटत- फुटत आल्यानं वेदना सहनशक्तीच्या बाहेर असतात. मॉर्फिनसारखी औषधं काहीच मदत करू शकत नाहीत. या माणसांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांना कुणी हातसुद्धा लावू शकत नाही. त्यांची शवपेटी जमिनीखाली खोल खड्ड्यात सोडली जाते आणि त्यावर तोच पातळ काँक्रीटचा जाडसर थर पसरवला जातो.

सिमेंटची ही थडगी आता हजारो वर्षे पुरावा म्हणून काम करणार असतात- अणू नको तिथं फोडण्याची किंमत म्हणून. एका खेडेगावात सैनिक माणसांना गोळा करून ट्रकमध्ये घालतायत, दूर घेऊन जाण्यासाठी. गावातली एक आडमुठी म्हातारी एका सैनिकाशी वाद घालतीय. ‘तातडीनं ट्रकमध्ये बैस’ म्हणून सैनिक आदेश देतोय. आणि म्हातारी शांतपणे गाईची धार काढतीय. सैनिक संतापतो आणि दुधानं भरलेली बादली चिडून ओतून देतो. म्हातारी पुन्हा बादली घेते आणि शांतपणे धार काढायला लागते. सैनिक आता बंदूक रोखतो आणि खटका ओढतो. म्हातारी मेली की काय, असं म्हणता-म्हणता गाय मरून पडलेली दिसते. गाईचे डोळे हळूहळू मिटत जातात. जाताना ती बघत जाते- म्हातारीकडं की सैनिकाकडं? आणि तिचा पान्हा अजून ओथंबून वाहतोय. चारी आचळांमधून दूध टपटप करतंय. म्हातारी सुन्न होऊन बघतेय. तिला माहिती नाही, पण आपल्याला माहिती आहे की हे दूध विनाशकारी, किरणोत्सर्गी आहे. अमृत आणि विष यांच्यातली सीमारेषा इतकी पुसट क्वचितच झाली असेल.

तर असा हा अवेळी फुटलेला, नको त्या पद्धतीनं सुटलेला, रागावलेला अणू किती उत्पात घडवून आणतो, हे माणसाला स्वतःलाच अजून माहीत नव्हतं. छोट्या अणूनं नुसतं उग्र रूपच धारण केलं नाही, तर माणसानं स्वतःच्या आत जे जे अमंगल-अपवित्र दडवून ठेवलं होतं, ते सगळं बाहेर उघड्यावर आणून फेकलं. माणूस किती निर्बुद्ध, किती स्वार्थी, किती खोटारडा, किती राजकारणी वागू शकतो, हे माणसालाच दाखवून दिलं.

चेर्नोबिलच्या परिसरातला 30 किमी त्रिज्येचा परिसर 1986 पासून मनुष्यवस्तीसाठी अयोग्य म्हणून जाहीर झाला आहे. पुढच्या 20 हजार ते 50 हजार वर्षांसाठी. त्या मोडक्या, गळक्या इमारतीतून किरणोत्सर्ग कमीत कमी व्हावा यासाठी तिथं सतत नवनवीन उपाय योजून प्रचंड खर्च करण्यात येत आहे. पुढची शेकडो-हजारो वर्षं हे काम सतत चालू ठेवावं लागणार आहे. चेर्नोबिलच्या स्फोटाची तीव्रता हिरोशिमापेक्षा 400 पटीनं जास्त किरणोत्सर्गी होती.

आज जगभरात सुमारे 450 अणुभट्ट्या आहेत. त्यातल्या भारतात सुमारे 22 आहेत. या अणुभट्ट्या विजेची निर्मिती करतात आणि मानवजातीच्या वाढत्या गरजा भागवतात. याव्यतिरिक्त अणुशक्तीचा उपयोग करून बनवलेली संहारक अस्त्रं अनेक देशांकडं आहेत. हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये अणुबाँबची विध्वंसक ताकद आपल्याला दिसली. चेर्नोबिलनं त्याची भीषणता आणखी तीव्रपणे दाखवली. जपानच्या फुकुयामा अणुभट्टीत 2011 मध्ये अपघात झाला (त्सुनामीमुळं). त्याही वेळी अणुऊर्जेचं प्रलयकारी रूप आपल्याला दिसलं आहे.

‘अणुऊर्जा आवश्यक आहे, तिला पर्यायच नाही. लोकांची ऊर्जेची गरज भागवायची तर अणुशक्तीला पर्यायच नाही,’ असं अनेकांचं म्हणणं आहे. मानवजातीची ऊर्जेची भूक वाढत जातीय, हे स्पष्टच आहे. विकासासाठी वीज किती लागते, ती कुठून येते, त्याची खरी किंमत काय? या प्रश्नांशी सर्वसामान्य जनतेला काही देणं-घेणं नसतं. म्हणजे तसा विचारच त्यांच्या मनात येत नाही. ही जाणीव निर्माण होणं आवश्यक आहे, असं चेर्नोबिल मालिका सांगते. ही ऊर्जा मिळवण्याची धडपड किती जीवघेणी आहे याचं भान असायला पाहिजे, असा आग्रह धरते. संपूर्ण पृथ्वीवर असे हजारो बॉम्ब टिकटिकत आहेत. आपण किती मोठ्या बॉम्बवर बसलो आहोत, याची थरारक जाणीव सतत होत राहिली पाहिजे, असं चेर्नोबिल मालिकेचे निर्माते आपल्याला त्यांच्या संपूर्ण शक्तिनिशी सांगत आहेत.

अणुशक्ती हा एका अर्थानं तंत्रज्ञानाचा विषय नसून राजकारणाचा विषय आहे. कारण राजसत्ता ठरवते की अणू कोणत्या कारणासाठी कधी, कुठं फोडायचा. या फोडाफोडीभोवती नेहमीच स्वार्थ, संकुचित हेतू, असत्याचा आधार घेणं, जनतेची दिशाभूल करणं, अर्धवट माहिती देणं या गोष्टी घडत असतात. अशा वेळी जे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ या कामाच्या केंद्रस्थानी असतात, त्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्या वेळी ते ‘देशद्रोही’ ठरतात, कारण त्यांनी त्या वेळी खोटारड्या राजसत्तेला विरोध केलेला असतो. सत्य लोकांसमोर मांडलेलं असतं. असे लोक नंतरच्या काळात मानवजातीला आधार देणारे लोक ठरतात, कारण त्यांच्याच त्यागामुळं नंतरच्या अणुभट्ट्या जास्त सुरक्षित व पारदर्शक बनलेल्या असतात. आणि अणुऊर्जा वापरण्याचा फेरविचार अनेक देश आता करू लागलेले असतात.

समीर शिपूरकर, पुणे

sameership007@gmail.com

जवाहरलाल नेहरू

कॅबिनेट मिशनचेही अपयश

सुरेश द्वादशीवार

21 दि.2 सप्टेंबरला पं.नेहरू देशाच्या हंगामी सरकारचे पंतप्रधान झाले. त्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले आचार्य कृपलानी म्हणाले, ‘‘आपले नेते आता सत्ताधीश झाले आहेत.’’ त्या सायंकाळी गांधीजींनीही आपल्या प्रार्थनेत हा सोन्याचा दिवस असल्याचे सांगितले. त्याच वेळी नेहरू आणि त्यांचे सहकारी चांगले काम करतील व उद्या आपले मुस्लिम बांधवही त्यांच्यासोबत सरकारात दिसतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. जीनांनी मात्र तो काळा दिवस असल्याचे सांगत देशभरात काळे झेंडे लावण्याचा आदेश लीगला दिला. तेवढ्यावर न थांबता ते म्हणाले, ‘‘भारतातील घडामोडींकडे रशियाची नजर आहे आणि तो आमच्यापासून फार दूर नाही.’’ जीनांची ही भाषा अनाकलनीय होती आणि पाकिस्तान निर्माण करण्यासाठी रशियाची मदत घेण्याची त्यांची तयारी उघड करणारी होती. पंजाबमधील लीगचे एक शक्तिशाली नेते फिरोज खान नून म्हणाले, ‘‘आपल्याला लढावेच लागले तर रशिया आपल्यासोबत येईल आणि तो येथील मुसलमानांचा संरक्षक होईल.’’

1942 चे उग्र जनआंदोलन, त्यात सर्व राष्ट्रीय नेत्यांना घडलेला प्रदीर्घ कारावास, आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू पावलेले शेकडो स्त्री-पुरुष, देशातले भरलेले तुरुंग आणि या आंदोलनाला जनतेने दिलेल्या प्रतिसादाएवढा जगभरच्या वृत्तपत्रांनी दिलेला एकमुखी पाठिंबा यामुळे प्रत्यक्ष ब्रिटिश सरकारच हादरले. त्या सरकारचे अमेरिकेसह सारे मित्रदेश त्याला भारताच्या स्वातंत्र्याबाबत तातडीने कार्यवाही करायला सुचवू लागले. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांचा दबाव मोठा होता. शिवाय दुसऱ्या महायुद्धात विजय मिळाला असला, तरी इंग्लंडची सैन्यहानीही फार मोठी झाली होती. भारतासारखा मोठा देश व इंग्लंडच्या जगभर पसरलेल्या वसाहतींमुळे नियंत्रण ठेवण्याएवढे बळही त्या देशाजवळ शिल्लक राहिले नाही. तशात त्या वेळी इंग्लंडवर राज्य करणारे क्लेमंट ॲटली यांचे मजूर पक्षाचे सरकार भारताला स्वातंत्र्य देण्याच्या मताचे होते व ते मत 1942 पासूनच कायम केले होते.

या स्थितीत ॲटली सरकारने भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेऊन भारतात कॅबिनेट मिशन पाठविण्याचा निर्णय घेतला. भारतमंत्री लॉर्ड पेथिक लॉरेन्स, बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष सर स्ट्रॅफोर्ड क्रिप्स आणि इंग्लंडच्या आरमाराचे प्रमुख ॲडमिरल अल्बर्ट व्ही. अलेक्झांडर यांचा त्यात समावेश होता. ‘1948 नंतर आम्ही भारतात राहणार नाही’ अशी आगाऊ घोषणा करूनच हे मिशन भारतात आले होते. दिल्लीला येताच त्यांनी सर्व संबंधितांशी चर्चा सुरू केली. त्यासाठी त्यांनी गांधीजींना दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले. काँग्रेस कार्यकारिणीचे सर्व सभासद आणि बॅरिस्टर जीनांसह मुस्लिम लीगचे सर्व वरिष्ठ नेते यांनाही त्यांनी दिल्लीला पाचारण केले.

काँग्रेस नेत्यांशी मिशनने केलेली चर्चा कधी त्याच्या विलिंग्डन क्रिसेंट या निवासस्थानी, तर कधी गांधीजी राहत असलेल्या भंगी कॉलनीत झाली. लीगचे नेते मिशनला स्वतंत्रपणे भेटत राहिले. या दोन्ही पक्षांनी स्वातंत्र्याविषयीच्या त्यांच्या योजना तयार करून आम्हाला द्याव्यात, असे मिशनने प्रथम दोन्ही पक्षांना सुचविले. त्यासाठी त्या दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी चार नेत्यांसोबत मिशनने एकत्र चर्चाही केली. नेहरू आणि जीना यांना त्यांनी स्वतंत्रपणे चर्चेसाठी बोलावून घेतले. परंतु दोन्ही पक्षांची मते एवढ्या परस्परविरोधी टोकाची आणि त्यांच्या भूमिकांमागील इतिहास एवढ्या शतकांचा की, त्यांना एकत्र येऊन एक संयुक्त योजना तयार करणे व ती या मिशनला सादर करणे अखेरपर्यंत जमले नाही. शेवटी गांधीजींनीच मिशनला त्याची योजना सांगायची सूचना केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन दि. 16 मे 1946 या दिवशी मिशनने आपली योजना दोन्ही पक्षांसह साऱ्या देशासमोर जाहीररीत्या मांडली.

ती मांडताच ‘भारताला शक्य तेवढे लवकर स्वातंत्र्य देण्याची ब्रिटिश सरकारची इच्छा आहे’ असेही त्याने स्पष्ट केले. ही योजना जाहीर करतानाच हिंदू व मुसलमान यांच्यात परस्परांविषयी असलेला दुरावा व संशय मोठा असल्याने त्यांना एका व्यवस्थेत आणता येणे अवघड आहे, अशी कबुलीही मिशनने दिली. त्यामुळे त्या दोन धर्मांच्या लोकांना त्यांचे स्वायत्त अस्तित्व राखण्याची आपण व्यवस्था केली आहे, असेही त्यांनी जाहीर केले. हिंदू व मुसलमान यांना एकत्र राहता यावे आणि त्याच वेळी त्यांना त्यांचे राजकारण व समाजकारण स्वतंत्रपणे हाताळता यावे असे आम्ही आमच्या योजनेत आखले आहे, असेही ते म्हणाले.

या योजनेत मुस्लिमबहुल असलेल्या दोन प्रदेशांचा (उत्तर-पूर्व भारत व पश्चिम भारत) त्याने स्वतंत्र उल्लेख करून त्यांच्या स्वायत्त व्यवस्थेचा विचार मांडला. त्यातले वायव्य सरहद्द प्रांत, पंजाब व सिंध या प्रांतांचा एक आणि आसाम व बंगाल या मुस्लिमबहुल प्रांतांचा दुसरा गट असावा, असे या मिशनचे म्हणणे पूर्वीच्या क्रिप्स मिशनसारखेच होते. उर्वरित हिंदुबहुल भारताचा तिसरा गट त्यानेही सुचविला होता. मात्र आपले म्हणणे मांडताना कॅबिनेट मिशनने त्यात महत्त्वाची दुरुस्तीही सुचविली होती. पूर्वेकडील मुस्लिमबहुल गटात 38.31 टक्क्यांहून अधिक हिंदू व अन्य धर्मीयांचा समावेश राहणार होता, तर पश्चिमेकडील गटात हिंदूंची संख्या 37.93 टक्के राहणार होती. शिवाय उर्वरित हिंदुबहुल भारतात दोन कोटींहून अधिक मुसलमान राहणार होते. ही व्यवस्था दोन्हीकडील अल्पसंख्याकांवर अन्याय करणारी होती. त्यामुळे मिशनच्या मते, हा अन्याय दूर करायचा तर पंजाब व बंगाल या दोन प्रांतांची फाळणी करणे आवश्यक होते.

पंजाबातील मुस्लिमबहुल भाग मुस्लिम गटाकडे, तर शीख आणि हिंदुबहुल भाग हिंदू गटाकडे असावा; तसेच बंगालसाठीही केले जावे, असे या मिशनचे म्हणणे होते. त्याच वेळी केंद्र सरकारात दोन्ही धर्मांच्या प्रतिनिधींना समान प्रतिनिधित्व असणारे मंत्रिमंडळ स्थापन व्हावे, देशाच्या कायदे मंडळात दोन्ही धर्मांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिले जावे. मात्र कोणताही धार्मिक व सामाजिक महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळात किंवा कायदे मंडळात घेताना तो संबंधित धर्माच्या सभासदांच्या तीन-चतुर्थांश मताने घेतला जावा, असे त्याचे म्हणणे होते. केंद्र सरकारकडे संरक्षण, परराष्ट्र- व्यवहार, दळणवळण व चलन या विषयांचे अधिकार असावेत आणि बाकीचे सर्व अधिकार गटांच्या सरकारांना व प्रांतांना दिले जावे, अशी मिशनची सूचना होती. त्याच वेळी प्रांतांच्या विधीमंडळांनी देशासाठी एक घटना समिती निवडावी आणि या समितीने स्वतंत्र भारताची घटना तयार करावी, असेही सुचविले गेले.

थोडक्यात, क्रिप्स मिशनच्या योजनेत काही दुरुस्त्या करणारी ही सुधारित व्यवस्था होती. ही योजना प्रथम जीनांनी नाकारली. पंजाब व बंगालचे विभाजन त्यांना मान्य नव्हते. ते दोन्ही प्रांत आहे त्या स्वरूपात अविभक्त राहावेत आणि ते मुस्लिम गटात सामील व्हावेत, असा त्यांचा आग्रह होता. त्याच वेळी केंद्रीय मंडळातील मुसलमान प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार फक्त लीगला, तर हिंदू प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार काँग्रेसला असावा, असा त्यांचा हट्ट होता. काँग्रेसला या दोन्ही गोष्टी मान्य नव्हत्या. पंजाब व बंगालमधील हिंदूंना मुस्लिम गटात डांबणे त्याला जसे मान्य नव्हते तसे काँग्रेसने फक्त हिंदू मंत्री नेमावेत हेही त्याला मान्य होणारे नव्हते. मिशन मात्र यापुढे या वाटाघाटी लांबवायला तयार नव्हते. ‘आम्ही योजना दिली आहे, तिचा वापर तुम्हाला कसा करायचा तसा करा; आम्ही मात्र यापुढे जायला तयार नाही आणि येथे थांबणारही नाही’ असे त्याने सरळ-सरळ दोन्ही पक्षांना ऐकवले.

त्याच वेळी या योजनेची जमेल तशी अंमलबजावणी करण्याचे अधिकार त्याने व्हाईसरॉय वॅव्हेल यांना दिले. तेवढे करून त्यांनी इंग्लंडला परतण्याची तयारी केली. दि. 24 मे या दिवशी या योजनेवर टीका करताना जीना म्हणाले, ‘‘ही योजना यशस्वी होण्याची जराही शक्यता नाही.’’ जीनांना साऱ्या मुस्लिम प्रदेशाचा एक देश हवा होता. झालेच तर पूर्व आणि पश्चिम या दोन भागांतील मुस्लिमबहुल प्रांतांना जोडणारा 80 मैल रुंदीचा एक कॉरिडॉर हिंदुबहुल भागातून जाणाराही त्यांनी मागितला होता. जीना कमालीचे हट्टी होते व ते कोणाचेही ऐकून घ्यायला तयार नव्हते. मात्र खुद्द विन्स्टन चर्चिल यांनीच ही योजना त्यांच्या गळी उतरवून ती त्यांना मान्य करायला लावली. जीना आणि लीग यांनी कॅबिनेट मिशनची योजना आम्हाला मान्य आहे, असे त्यामुळे 4 जून या दिवशी जाहीर केले.

आता साऱ्यांचे लक्ष काँग्रेसच्या निर्णयाकडे लागले होते. काँग्रेसने ही योजना मान्य वा अमान्य केल्याचा कोणताही निर्णय घेतला नाही. देश एकत्र राहत असेल, तरच तो काँग्रेसला हवा होता. शिवाय त्याचे तीन विभागांतले धार्मिक विभाजन त्याला नको होते. त्यातून यातले काहीही स्वीकारले तरी त्याचा दोष पक्षावर येणार होता. काँग्रेसचा फाळणीला विरोध होता. पण असे दुबळे व अधिकारशून्य केंद्रही त्याला नको होते. नव्याने स्वतंत्र होणाऱ्या देशाचा राज्यकारभार करायला एक समर्थ सरकार केंद्रस्थानी असावे, अशी त्या पक्षाची भूमिका होती.

काँग्रेसच्या या अनिर्णायकी भूमिकेचे कारणही समजून घ्यावे असे आहे. मुस्लिम प्रांतांचे दोन गट स्थापन होणे, अल्पसंख्य असूनही मुसलमानांना बहुसंख्येच्या बरोबरीने मंत्रिमंडळात जागा मिळणे आणि देशातील बहुसंख्येचे नव्या व्यवस्थेवर जराही नियंत्रण नसणे, ही बाब देशातील बहुसंख्य हिंदूंनाच आवडणारी नव्हती. त्याच वेळी ही योजना फेटाळणे याचा अर्थ, दाराशी आलेले स्वातंत्र्य आणखी दूर लोटणे असा झाला असता. काँग्रेस निर्णय घेत नाही हे पाहून वॅव्हेल यांनी दि. 14 जूनला काँग्रेस व लीग यांची या योजनेवर सहमती होत नसल्याचे सांगून ‘केंद्रात 14 सदस्यांचे हंगामी सरकार आपणच नेमत आहोत’ अशी घोषणा केली.

काँग्रेससमोरचा आताचा प्रश्न या सरकारात जायचे की नाही, हा होता. त्याच वेळी नियोजित घटना समितीत भाग घेऊन देशाची घटना तयार करायची की नाही, हेही त्या पक्षाला या स्थितीत करायचे होते. जीना यांचा या साऱ्याच गोष्टींना विरोध होता. संपूर्ण बंगाल व सगळा पंजाब असलेले मुस्लिमबहुल प्रदेशांचे देशाच्या पूर्व व पश्चिम सीमेवरील दोन्ही भागांत असलेले पाकिस्तान हे स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र व्हावे, याखेरीज त्यांची कशालाही मान्यता नव्हती.

दोन पक्षांतील हे मतभेद कायम असतानाही वॅव्हेल यांनी त्यांना पत्रे लिहून नव्या सरकारतली त्यांच्या प्रतिनिधींची नावे पाठविण्याची सूचना केली. मात्र त्याही सूचनेत काँग्रेसने हिंदूंखेरीज दुसऱ्या कोणत्याही धर्माचा प्रतिनिधी पाठवू नये, असेही लिहिले. काँग्रेसला ही अट मान्य नव्हती. आपली सर्वधर्मसमभावाची भूमिका अधोरेखित करीत त्या पक्षाने आपल्या प्रतिनिधीद्वारे वॅव्हेल यांच्याकडे पाठविली. जीनांनी ती पाठवायला नकार दिला. त्या वेळी नेहरूंनी आपले सहा सदस्यांचे मंत्रिमंडळ स्वतःच जाहीर केले. त्यात पाच हिंदू व एक दलित मंत्री समाविष्ट होता. त्याशिवाय त्यांनी एक ख्रिश्चन, एक शीख, एक पारशी आणि दोन मुस्लिम प्रतिनिधींची नावेही काँग्रेसच्या वतीने वॅव्हेल यांच्याकडे सुपूर्द केली. याही वेळी वॅव्हेल यांनी जीनांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याची एकवार विनंती केली. जीनांनी तिलाही नकार दिला.

तेवढ्यावर न थांबता दि.16 ऑगस्ट 1946 या दिवशी जीनांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी प्रत्यक्ष कारवाईची म्हणजे लढ्याची (डायरेक्ट ॲक्शन) घोषणा केली. चार दिवस चाललेल्या त्या वेळच्या दंगलीत पाच हजारांवर माणसे मृत्युमुखी पडली आणि पंधरा हजार लोक जखमी झाले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सर शहाफत अहमद खान या मुस्लिम लीगच्या नेत्याने लीगचा राजीनामा देऊन नेहरूंच्या मंत्रिमंडळात येण्याची तयारी जाहीर केली. तेव्हा लीगच्या हस्तकांनी त्यांना पळवून नेऊन त्यांच्यावर सुऱ्याचे वार केले.

दि.2 सप्टेंबरला पं.नेहरू देशाच्या हंगामी सरकारचे पंतप्रधान झाले. त्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले आचार्य कृपलानी म्हणाले, ‘‘आपले नेते आता सत्ताधीश झाले आहेत.’’ त्या सायंकाळी गांधीजींनीही आपल्या प्रार्थनेत हा सोन्याचा दिवस असल्याचे सांगितले. त्याच वेळी नेहरू आणि त्यांचे सहकारी चांगले काम करतील व उद्या आपले मुस्लिम बांधवही त्यांच्यासोबत सरकारात दिसतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. जीनांनी मात्र तो काळा दिवस असल्याचे सांगत देशभरात काळे झेंडे लावण्याचा आदेश लीगला दिला. तेवढ्यावर न थांबता ते म्हणाले, ‘‘भारतातील घडामोडींकडे रशियाची नजर आहे आणि तो आमच्यापासून फार दूर नाही.’’ जीनांची ही भाषा अनाकलनीय होती आणि पाकिस्तान निर्माण करण्यासाठी रशियाची मदत घेण्याची त्यांची तयारी उघड करणारी होती. पंजाबमधील लीगचे एक शक्तिशाली नेते फिरोज खान नून म्हणाले, ‘‘आपल्याला लढावेच लागले तर रशिया आपल्यासोबत येईल आणि तो येथील मुसलमानांचा संरक्षक होईल.’’

हिंदू व मुसलमानांचे संयुक्त सरकार बनविण्याचा प्रयत्न काँग्रेस व गांधी करीत असताना जीना व लीग मात्र वेगळेपणावर ठाम असल्याचे आणि त्यासाठी ते रशियाची मदत घेण्याच्या तयारीत असल्याचे यातून उघड झाले. स्वबळावर पाकिस्तान मिळविता आले नाही तर ते परकीयांच्या मदतीने मिळविण्यासाठी त्या देशांशी लीगची बोलणी आधीपासूनच सुरू असावीत, असे सांगणारी ही वक्तव्ये आहेत. (रशियावर स्टालिनचे राज्य होते आणि तो नेहरू व पटेलांना अमेरिकन भांडवलशहांचे हस्तक म्हणत होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही 1953 पर्यंत स्टालिनने भारताच्या राजदूताची भेट घ्यायलाही नकार दिला होता. जीना आणि रशिया यांचे संबंध विश्वसनीय वाटू लागावेत असे सांगणारी ही बाब आहे. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी रशियाची मदत घेण्याची जीनांची तयारी ती त्यांच्यात भिनलेल्या भारतद्वेषाची कडाही दाखविणारी आहे.)

हा सारा काळ हिंदू व मुसलमानांमध्ये साऱ्या देशात उसळलेल्या हिंसाचाराचा आहे. त्यांच्यातील वैमनस्य वाढवीत नेण्याचा प्रयत्न कडव्या मुस्लिम नेत्यांएवढा कडव्या हिंदुत्ववाद्यांनीही या काळात केला. जीनांना तेच हवे होते आणि गांधी आपल्या सर्व शक्तिनिशी हा हिंसाचार थांबविण्याचा प्रयत्न करीत होते. वॅव्हेल यांनी केलेल्या अखेरच्या प्रयत्नांना यश येऊन लीगने आपले चार प्रतिनिधी मंत्रिमंडळात पाठविण्याची तयारी केली. त्या चौघांसोबत आपण एक दलित प्रतिनिधीही पाठवू, असेही लीगने वॅव्हेल यांना कळविले.

आता नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते स्वतः पंतप्रधान, सरदार पटेल (गृह, माहिती व प्रसार), सरदार बलदेवसिंग (संरक्षण), चक्रवर्ती राजगोपालाचारी (शिक्षण), बॅरि.असफअली (रेल्वे), जगजीवन राम (श्रम), डॉ.राजेंद्रप्रसाद (अन्न आणि शेती) तर जॉन मथाई (उद्योग) या काँग्रेस मंत्र्यांचा समावेश होता. तर लीगचे लियाकतअली खान (अर्थ), अब्दुल रब निश्तार (पोस्ट आणि विमान वाहतूक), इब्राहिम इस्माईल चुंद्रीगर (वाणिज्य), गझनफार अली खान (आरोग्य) आणि जोगेंद्रनाथ मंडल (विधी) यांचा समावेश होता. या मंत्रिमंडळाच्या स्थापनेच्या वेळीच ‘‘आम्ही हे सरकार आघाडीचे असल्याचे मानत नाही. त्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांशी आमचे कोणतेही संबंध नाहीत. लीगचे मंत्री त्यांचा कारभार स्वतंत्रपणे चालविणार आहेत.’’ असे लियाकतअली यांनी जाहीरच केले होते. परिणामी, हे सरकार फार काळ टिकणार नाही, याची साऱ्यांनाच कल्पना आली होती.

जीनांना ते मोडायचे होते आणि पाकिस्तानच्या निर्मितीवर भर द्यायचा होता. गांधींना ते टिकवायचे होते आणि देश एकसंध राखायचा होता... प्रत्यक्षात मात्र या साऱ्याची परिणती देशाच्या फाळणीत व पाकिस्तानच्या निर्मितीत झाली. काँग्रेस आणि लीग यांचे संयुक्त सरकार तुटावे, ते तसे तुटले व देशाची फाळणी अटळ आहे याची कल्पना साऱ्यांना आली. या वेळी पंजाबात प्रथम धार्मिक दंगली सुरू झाल्या. त्यांचे स्वरूप एवढे उग्र होते की- 18 सप्टेंबर 46 ते 18 मे 47 या काळात त्या प्रांतात तीन हजारांवर निरपराधांची हत्या झाली. त्याचे पडसाद बंगाल, बिहार, आसाम, ओरिसा व अन्यत्रही उमटले. हंगामी सरकारची क्षमता व लष्कर या साऱ्यांची ताकद या दंगली शमवायला पुरेशी नव्हती.

मंत्रिमंडळाच्या बैठका होत होत्या आणि कोणत्याही निर्णयावाचून त्या संपत होत्या. दंगली थांबविण्याच्या आणि निरपराध स्त्री-पुरुषांचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात गांधी नावाचा एकच माणूस त्याच्या मूठभर सहकाऱ्यांनिशी बंगालमधील ग्रामीण भागात तेव्हा पायी हिंडत होता. इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांनी तेव्हा नेहरू, जीना, बलदेवसिंग व लियाकतअली या चौघांना नोव्हेंबर 1946 मध्ये इंग्लंडला बोलविले आणि त्यांच्यात समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार 9 डिसेंबरला घटना समितीचे कामकाज सुरू व्हायचे होते. तीत लीगने भाग घ्यावा, हा ॲटलींचा प्रयत्न होता. मात्र लीगने आपल्या भूमिका वेळोवेळी बदलून ती जबाबदारी अखेरपर्यंत टाळली.

16 मे या दिवशी घटना समितीत यायला तयार असलेल्या लीगने पुढे तिच्यावर बहिष्कारच टाकला. जीनांचा त्याबाबतचा आक्षेप मिशनच्या योजनेतून 19 व्या कलमाबाबतचा होता. या कलमाने घटना समितीची पहिली बैठक दिल्लीत होईल व पुढे तिचे तीन गटांत विभाजन करून त्यांना त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या प्रांतांच्या सरकारांसाठी घटना तयार करता येतील, असे सुचविले होते. या काळात मध्य भारतातील हिंदुबहुल गटांसाठी एक, पश्चिमेकडील मुस्लिमबहुल गटांसाठी दुसरी आणि पूर्वीकडील मुस्लिमबहुल गटांसाठी तिसरी विभाजित बैठक व्हायची होती. ज्या प्रांताला या गटात सामील व्हायचे नसेल, त्याने त्यापासून दूर राहावे व स्वतंत्र कारभार करावा, अशीही यातली एक तरतूद होती. जीनांना ती तरतूद मान्य नव्हती.

त्यांना सारा मुस्लिमबहुल प्रदेश त्यांच्या ताब्यातील दोन गटांत यायला हवा होता. गांधीजींना मात्र हिंदुबहुल प्रदेश मुस्लिम गटात जाऊ देणे मान्य नव्हते. ‘हिंदू आसामला मुस्लिम बंगालच्या दावणीला कसे बांधायचे?’ हा त्यांचा प्रश्न होता. वायव्य सरहद्द प्रांत मुस्लिमबहुल असला तरी काँग्रेससोबत राहणारा होता. त्यालाही तुम्ही लीगच्या ताब्यात देणार काय, हा गांधींचा प्रश्न होता. गटांची सीमा न मानता जनतेची इच्छा महत्त्वाची मानली गेली पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. आसामच्या प्रतिनिधींनी गांधीजींना नौखालीत भेटून आम्हाला बंगालसोबत बांधू नका, अशी विनंती केली. त्यावर तुमचा स्वयंनिर्णय तुम्ही वापरू शकता, असा स्पष्ट सल्ला गांधीजींनी त्यांना दिला.

1942 च्या सुमारासच ते म्हणाले होते, ‘‘जे लोक भारतात स्वेच्छेने राहू इच्छित नाहीत, त्यांच्यावर मी भारत लादणार नाही.’’ ही बाब या प्रश्नाकडे पाहण्याची गांधींची दृष्टी धार्मिक नसून मानवी होती, हे सांगणारी आहे. जीनांच्या मनातील मुस्लिम साम्राज्यवाद आणि गांधीजींची लोकशाही निष्ठा या गोष्टी अधोरेखित करणारा हा तिढा आहे. प्रांतांमधील जनमताचा तिढा सोडविण्यासाठी नेहरू, जीना, बलदेवसिंग आणि लियाकतअली यांनी पुन्हा एकवार डिसेंबरमध्ये इंग्लंडची वारी केली. पण त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. मुळात कॅबिनेट योजना हीच जीनांना झुकते माप देणारी व प्रांतांच्या दोन गटांचे सर्वाधिकार त्यांच्याकडे सोपविणारी होती आणि त्याच वेळी ती त्यात राहणाऱ्या 40 टक्क्यांएवढ्या हिंदूंवर अन्याय करणारी होती. इंग्रज त्यातून मार्ग काढायला तयार नव्हते. जीनांना मार्ग नको होता आणि काँग्रेसला हिंदूंवर अन्याय लादला जाणे अमान्य होते. डिसेंबरच्या इंग्लंडवारीत जीनांनी जाहीररीत्याच पाकिस्तानची मागणी केली. ‘‘हिंदू व मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे झाल्याखेरीज हा प्रश्न निकालात निघणार नाही’’ असे या वेळी ते म्हणाले.

ब्रिटिश सरकारच्या मनातील त्यांच्याविषयीची सहानुभूती त्यांना ठाऊक होती. ते गांधींसारखे ब्रिटिशांशी लढले नव्हते. परिणामी, गांधी व काँग्रेस हा प्रथम चर्चिल यांना व नंतर ॲटलीच्या मंत्रिमंडळातील अनेकांना त्यांचा शत्रुपक्षच वाटत होता. त्याला अडवायचे तर जीना व लीग यांचा अडसर उपयोगाचा आहे, हेही त्यांना कळत होते. सारांश, क्रिप्स मिशनप्रमाणे कॅबिनेट मिशनही अपयशी झाले होते. तेव्हाचे काँग्रेसचे अध्यक्ष मौ.आझाद यांनी 1942 मध्येच पं.नेहरूंच्या उपस्थितीत एका ब्रिटिश पत्रकाराला देशाची व काँग्रेसची अडचण सांगितली होती. ते म्हणाले, ‘‘काँग्रेसला फाळणी नको, पण ती नेहमीसाठी नाकारता येणेही आता शक्य दिसत नाही.

येथील मुसलमानांना हिंदूंसोबत राहायचे नाही. मात्र लग्नाआधीच घटस्फोट घ्यायला आम्हीही तयार नाही. काही काळ आम्हाला एकत्र राहू द्या. तसे राहणे जेव्हा असह्य होईल, तेव्हा फाळणीचा विचार कदाचित योग्य ठरेल.’’ एकत्र राहण्याचा अनुभव नेहरू, पटेल व आझाद या साऱ्यांनी हंगामी सरकारात घेतला होता. काँग्रेसची प्रत्येकच योजना लीगचे मंत्री हाणून पाडत होते. परिणामी, सरकार असून नसल्यासारखे व सत्ता असून निष्प्रभ झाल्यासारखी होती. या स्थितीत पंतप्रधान ॲटलींनी 20 फेब्रुवारी 1947 या दिवशी पार्लमेंटमध्ये आपण जून 48 पूर्वी भारत सोडणार असल्याची घोषणा केली.

त्याच वेळी त्यांनी लॉर्ड वॅव्हेल यांच्या जागी लॉर्ड माऊंटबॅटन या राणी व्हिक्टोरिया यांच्या पणतूची नियुक्तीही जाहीर केली. माऊंटबॅटन हे भारताचे विसावे व अखेरचे व्हाईसरॉय राहणार होते. याही स्थितीत इंग्लंडचे सरकार भारताची केंद्रसत्ता कोणाच्या हाती सोपविणार, हा प्रश्न कायम होता. त्यावर ‘केंद्रात निर्माण होणाऱ्या कोणत्याही सरकारच्या किंवा प्रांत सरकारांच्या हाती ती दिली जाईल’, असे कमालीचे मोघम उत्तर ॲटलींनी दिले. तरीही नेहरूंनी ॲटलींच्या धाडसाचे जाहीर स्वागत केले आणि काँग्रेससह देशानेही त्यांना साथ दिली.

सुरेश द्वादशीवार, नागपूर

sdwadashiwar@gmail.com

अभिवादन

अनंत भालेराव : लोकनेता संपादक

नरेंद्र चपळगावकर

आधी साप्ताहिक, मग अर्धसाप्ताहिक आणि नंतर दैनिक ‘मराठवाडा’चे संपादक म्हणून अनंतराव भालेराव यांची ओळख आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या काळात मराठवाडा आणि अनंतराव यांचे योगदान तर मोठे आहेच. पण मराठवाडा हा प्रदेश महाराष्ट्र राज्याशी जोडला गेल्यानंतर त्या प्रदेशाचे प्रश्न, समस्या आणि संस्कृती यांच्यासाठी अनंतराव अखेरपर्यंत कार्यरत राहिले. त्यांचे अग्रलेख विशेष उल्लेखनीय मानले जायचे. अनंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून न्या.नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेल्या ‘अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व’ या चरित्राचे प्रकाशन 13 ऑगस्ट 2019 रोजी, औरंगाबाद येथे डॉ.अभय बंग यांच्या हस्ते होत आहे. त्या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा काही भाग.

‘मराठवाडा’ वृत्तपत्र आणि संपादक अनंतरावांची भाषा या दोन्हींचे ‘मराठवाडा’ या भूप्रदेशाच्या संस्कृतीशी अजोड नाते होते. मराठवाड्यात सामान्य माणसे जी भाषा बोलत, जे वाक्‌प्रचार वापरीत, जी उदाहरणे देत, परंपरेने घडवलेले आणि विशिष्ट अर्थ प्राप्त झालेले जे शब्द उपयोगात आणत, तेच सगळे अनंतरावांच्या शैलीचाही भाग झाले होते. आपले लिखाण ललित व्हावे, रंजक व्हावे अशा उद्देशाने अनंतरावांनी कधी लिहिले नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी हे आशयाबरोबरच भाषेबद्दल आणि शैलीबद्दलसुद्धा खरे आहे.

सहज आणि सोपे मराठी लिहिणारे गद्यकार म्हणून डॉ. आंबेडकरांची आपल्याला ओळख आहे. बाबासाहेब एकदा हैदराबादला आले असताना मराठवाडा साहित्य परिषदेच्या त्या वेळी इसामिया बाजारात असलेल्या कार्यालयात अनौपचारिक भेटीसाठी आले. अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा झाली. अनंतराव या बैठकीला परिषदेचे कार्यकर्ते आणि ‘मराठवाड्या’चे सहसंपादक या दोन्ही नात्यांनी उपस्थित होते. ‘आपल्या या चर्चेचा वृत्तान्त प्रसिद्ध केला तर चालेल काय’ असा प्रश्न अनंतरावांनी आंबेडकर परत जाण्यास निघाले असता त्यांना विचारला. आंबेडकर क्षणभर स्तब्ध राहिले आणि नंतर म्हणाले ‘वृत्तांत लिहून तू मला अगोदर दाखव व मी मान्य केल्यावर तो प्रसिद्ध कर.’

थोड्याशा धास्तावलेल्या अवस्थेतच अनंतरावांनी तो लिहिला. आंबेडकरांना दाखवण्यासाठी अनंतराव दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेले. आंबेडकरांनी तो वाचला. थोडेसे आश्चर्य व्यक्त करीत ते म्हणाले, ‘चांगला लिहिला आहेस. तुझं मराठी लेखनही चांगलं आहे. जशाच्या तसा छापून टाक.’ तुझं मराठी लेखन चांगलं आहे, हे बाबासाहेबांनी तरुण अनंतरावांना दिलेले प्रमाणपत्र फार महत्त्वाचे होते. निजामी राजवटीत वाढलेला एक तरुण उत्तम मराठी लिहितो याचे आंबेडकरांना थोडे आश्चर्य वाटले असावे.

अनंतरावांच्या लेखनशैलीबद्दल त्यांचे निकट स्नेही प्रा.भगवंतराव देशमुख यांनी लिहिलेली आठवण बोलकी आहे. ‘‘अनंतरावांच्या लेखनाला एक पक्की वैचारिक बैठक होती. भाषेवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. शिवाय सारे लेखन साधे, सरळ सहजगम्य असे. अनाकलनीय गुंतागुंतीचे असे ते सहसा लिहीत नसत. मात्र ही सहजता कमावलेली होती. ते अनेकदा म्हणत, ‘ज्या सर्वसामान्य माणसांत मी वावरलो, त्यांनी माझ्या भाषेला बळ दिले आहे.’ आपल्या भाषेबद्दल ते अत्यंत जागरूक असत. एखादा शब्द नेमका अर्थ व्यक्त करतो की नाही, याचा संशय आला की ते मित्रमंडळीत तो बोलून दाखवत आणि चर्चा करीत.... आता शब्द वापरला आहे, राहू द्या अशी त्या शब्दाची (आणि स्वतःचीही) गय त्यांनी कधी केली नाही.’’

‘मांदियाळी’ची प्रस्तावना लिहिताना प्रा.सुधीर रसाळांनी भाषेबद्दलच्या त्यांच्या काटेकोरपणाबद्दल एक आठवण सांगितली आहे. ‘‘एखाद्या वारकरी निरूपणासारखा आकार त्यांच्या लेखनाला मिळत असे. त्यात वाचकाला विश्वासात घेऊन केलेले नैतिक- भावनिक आवाहन असे. अग्रलेखात त्यांना शब्दाचा सैल, अनमानधपक्याचा वापर अजिबात चालत नसे. एखाद्या शब्दाच्या अर्थाबद्दल किंवा त्यातील व्यंजनेबद्दल जेव्हा ते साशंक होत, तेव्हा ते लेखन थांबवत. मग प्रा.भगवंत देशमुखांना फोन जाई. त्या शब्दाच्या अर्थाबद्दल, अर्थच्छटांबद्दल, व्युत्पत्तीबद्दल आणि त्याच्या वेगवेगळ्या रूपांबद्दल फोनवर चर्चा होई. एरव्ही छुपं असलेलं अनंतरावांचं संस्कृत पांडित्य अशा वेळी लखाकून चमके. त्यांचं पूर्ण समाधान झाल्यावर ते शब्दनिश्चिती करत आणि मग लेखन पुढं चालू होई.’’

अनंतरावांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहाचे नाव ‘मांदियाळी’ असे आहे. ‘मांदियाळी’ हा ज्ञानेश्वरीतला शब्द आहे. ‘मांदियाळी’ म्हणजे मेळावा. अनंतरावांच्या भावजीवनात प्रारंभीच्या काळात ईशनिष्ठांची मांदियाळी होती. वारकरी संप्रदायात ज्यांनी धर्म हा व्यक्तीजीवनाला शुद्ध ठेवण्याचा मार्ग हा त्याचा खरा अर्थ जाणला, अशा अनेक वारकऱ्यांची शब्दचित्रे अनंतरावांनी रेखाटलेली आहेत. त्यांची चित्रे रेखाटता रेखाटता अनंतरावांनी अभावितपणे आपले स्वतःचेही चित्र रेखाटले आहे. वारकऱ्यांचा जीवनक्रम, त्यांची निर्लोभी वृत्ती याबरोबरच त्यांच्या मुखातून सतत बाहेर पडणाऱ्या संतवचनांचा खोलवर परिणाम अनंतरावांच्या मनावर झालेला आहे. काशिनाथबुवांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी अनंतरावांच्या गळ्यात वीणा अडकवू पाहणारे सावताबुवा, संत वाङ्‌मयाचे भरपूर वाचन आणि चिंतन असलेले व अनंतरावांनी चांगले निरूपणकार व्हावे म्हणून त्यांना जबरदस्तीने निरूपणासाठी उभे करणारे मास्तर, बेढब शरीराचा पण मृदंग वादनाच्या आपल्या कौशल्याने भल्याभल्यांना खिळवून ठेवणारा रायरंदाचा गजानन, दिंदवाड्याचे ऐलाजी पाटील आणि एकाक्षणात सगळ्या सांसारिक वैभवातून बाजूला सरकून विरक्त झालेले विठ्ठलकाका, अशी सगळी ही ‘मांदियाळी’ आहे. अनंतरावांच्या भावजीवनात तर त्यांचे स्थान आहेच; पण त्यांच्या भाषेतसुद्धा वारकरी संस्कार खोल शिरलेला आहे. म्हणूनच त्यांच्या लेखनात आणि विशेषतः शीर्षकात संतवचने आणि त्याचे अंश वारंवार येतात.

‘मराठवाड्या’त त्या वेळी अनंतरावांचे सहकारी असलेले एक सहसंपादक अरविंद ग. वैद्य (छोटे) यांनी मला एक आठवण सांगितली. अब्दुल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकदा औरंगाबादला त्यांनी मराठवाड्यासाठी करावयाच्या गोष्टींचे ‘पॅकेज’ जाहीर केले. अगदी पत्रकार परिषदेतसुद्धा कुणी ऐनवेळेला एखाद्या गोष्टीची सूचना केली तर तीही करू असे भरघोस आश्वासन अंतुल्यांनी त्या दिवशी दिले. या त्यांच्या आश्वासनाबद्दल अनंतरावांनी अग्रलेख लिहिला. त्याचे शीर्षक होते ‘कल्पवृक्षातळी।गाठी बांधलिया झोळी.’ तुकारामांच्या अभंगातली ही ओळ आहे. प्रत्यक्ष विठूनेच आम्हाला जन्माला घातले आहे, तेव्हा आम्ही मागून मागून काय मागणार? कल्पवृक्ष सर्व इच्छा पुरवीत असतानाच ते घेण्यासाठी गाठी बांधलेली फाटकी झोळी कशी पुरेशी होणार? अनंतरावांच्या भाषेतला सूक्ष्म उपरोध सहज लक्षात येण्यासारखा आहे.

त्या दिवशी झाले असे की, अंतुल्यांनी तो अग्रलेख वाचला आणि खूश होऊन अनंतरावांना सुभेदारी विश्रामगृहावर जेवणाचे निमंत्रण दिले. अर्थात अनंतराव गेले नाहीत. नंतरही एकदा अंतुल्यांच्या देकाराला अनंतरावांनी आणि त्यांच्या ‘मराठवाड्या’तील सहकाऱ्यांनी नकार दिला होता. एकदा त्यांनी पत्रकारांना सुटकेसेस वाटण्याचे ठरवले. अनंतरावांनी स्वतः तर ती घेतलीच नाही, पण आपल्या सहकाऱ्यांनीसुद्धा घेऊ नये, असा त्यांना सल्ला दिला. अनंतराव फक्त वारकऱ्यांची भाषा लिहीत नव्हते, तर त्यांच्यासारखेच ते निर्लोभीही होते.

पत्रकार मंडळींना सत्तेत असलेल्या किंवा जाऊ इच्छिणाऱ्या पुढाऱ्यांचे एक प्रकारचे आकर्षण असते. कधी तो त्यांच्या व्यावसायिक गरजेचा भाग असतो, तर काही वेळा त्याचाच मोह पडू लागतो. अनंतरावांना राजकारणातल्या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्याबद्दल असे आकर्षण अजिबात नव्हते. ते स्वतःहून नेते मंडळींना भेटण्याची कधी धडपडही करत नव्हते. दिगंबरराव बिंदू काही दिवस हैदराबाद राज्याचे गृहमंत्री होते. तो काळ आणि बिंदूंचे साधेपण असे होते की, तेव्हा सत्तापदाभोवती वलयच नव्हते. नंतर यशवंतराव आले. ते अनंतरावांना ओळखत; पण एकमेकांच्या फारशा भेटी होत नव्हत्या. पत्रकाराला सत्तेवर असलेल्या नेत्याचेसुद्धा कठोर आणि तटस्थ मूल्यमापन करावे लागते. अनंतराव ते निर्भीडपणे करत असत.

यशवंतराव चव्हाणांविषयी अनंतरावांनी लिहिले आहे, ‘‘यशवंतरावांनी जातीयतेचा वापर राजकारणासाठी केला; पण ते जातीयवादी होते असे माझे मत कधीच नव्हते. उलट त्यांची दृष्टी कोणत्याही अव्वल दर्जाच्या भारतीय नेत्याइतकीच व्यापक होती. सुदैवाने त्यांच्या या राजकीय व्यक्तिमत्त्वाला व्यापक चिंतनाची, रसज्ञतेची, गुणग्राहकतेची व विवेकी शालीनतेची जोड मिळाली होती. त्यामुळे टिळकांच्यानंतर त्यांच्याइतका मोठा दुसरा नेता महाराष्ट्रात झाला नाही, असेच माझे मत आहे... संकटाच्या प्रसंगी संघर्षाला तयार असणारे विरोधी नेते म्हणून मात्र ते टिकू शकले नाहीत. यशवंतराव कायम सत्तेमध्ये राहिले. या सत्तेमुळेच त्यांच्यातली संघर्षाची ताकद कमी कमी होत गेली.’’

यशवंतरावांच्या नंतर मुख्यमंत्री झालेले वसंतराव नाईक आणि शरद पवार हे दोघेही अनंतरावांविषयी आदर बाळगत. राजकारणात त्यांचे ऐकत, असे मात्र नाही, परंतु व्यक्तिगत स्नेह कायम असे. सुभेदारी विश्रामगृहावर वसंतराव नाईक आले म्हणजे मी आता विश्रांती घेतो असे सांगून इतरांची बोळवण करीत व सुभेदारीतून लवाजमा न घेताच अनंतरावांच्या घरी येत व काही घरगुती गप्पा मारत. का कुणास ठाऊक, शंकरराव चव्हाण आणि अनंतराव यांचे फारसे सख्य कधी झालेच नाही. मराठवाड्याच्या हितासाठी एकाच पद्धतीने दोघांनीही विचार केला असता, तर पुष्कळ गोष्टी सुकर झाल्या असत्या. कदाचित वेगवेगळे स्वभाव आडवे आले असावेत.एकदोन वेळा काही मित्रमंडळींनी त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. अनंतराव मायस्थेनियाने आजारी असल्याचे मी त्याकाळात सांगितल्यानंतर ‘आपण त्यांना भेटू’ असे स्वतःहूनच शंकरराव म्हणाले व त्याप्रमाणे सन्मित्र कॉलनीत त्यांची भेटही झाली.

गोविंदभार्इंच्या अभ्यासवर्गात वाचलेल्या मार्क्सने अनंतरावांना एकदम प्रभावित केले नव्हते. पूर्वीचे, विद्यार्थिदशेत झालेले घरचे आणि वारकऱ्यांचे संस्कार पुष्कळ दिवस शिल्लक होते. खुद्द अनंतरावांनीच सांगितले आहे, म्हणून त्यावर विश्वास ठेवावा लागतो. मनोहर सोनदे या आपल्या ‘मोठ्या बाराखडीतल्या मित्राचे एक व्यक्तिचित्र ‘कावड’मध्ये आहे. अनंतरावांनी सेलूच्या शाळेत काम करतानासुद्धा आपण पुष्कळसे कर्मठ कसे होतो हे सांगितले आहे.

ते सकाळ-संध्याकाळ संध्या करीत. विष्णुसहस्रनाम म्हणीत. एकदा त्यांनी काही दिवस गीतेचे वर्गही घेतले. त्यांचा मित्र मात्र पक्का नास्तिक होता. नंतरच्या काळात अनंतरावही पूर्णपणे नास्तिक झाले; पण ही प्रक्रिया गोविंदभार्इंचे वर्ग, सत्याग्रह काळात घडलेला तुरुंगवास, नंतर सेलूच्या शाळेत सहकाऱ्यांच्याबरोबर झालेले वाचन आणि चर्चा या सर्वांमुळे हळूहळू घडत गेली होती. वारकरी संप्रदायातली ईशनिष्ठांची मांदियाळी थोडी दूर गेली आणि ईश्वराला न मानणाऱ्या, पण तेवढीच निष्ठा असणाऱ्यांची नवी मांदियाळी अनंतरावांभोवती जमा झाली. गंमत अशी की, या मांदियाळीचे चित्रण करतानाही अनंतरावांच्या भाषेतून संतवचनेच स्रवताहेत. बाबासाहेब परांजप्यांचे वर्णन करताना त्यांना ‘आम्हावरी सुदर्शन घरटी करी’ असे वचन आठवते आहे.

अनंतरावांची भाषा मराठवाड्याच्या लोकजीवनाचे लेणेही ल्यालेली आहे. यशवंतराव चव्हाणांना अवमानित करण्यासाठी इंदिरा गांधींनी त्यांचे गृहखाते काढून घेतले आणि त्यांना अर्थखाते दिले, तेव्हा ‘बार्इंच्या घरात ते आता चिल्लर मोजीत बसले आहेत’ असे काहीसे अनंतरावांनी लिहिले होते. जनता पक्षाचा अश्वमेधाचा घोडा आम्ही महाराष्ट्रात अडवणार अशी घोषणा काँग्रेस नेत्यांनी केली, त्यावेळी ‘खरारा करणारे अश्वमेधाचा घोडा कसा अडवणार?’ असा टोकदार प्रश्न अनंतरावांनी विचारला. ‘पोटोबा वखवखता असेल तर लोकशाहीचा विठोबा विटेवर टिकणार कसा?’ असा प्रश्नही त्यांनी एकदा विचारला होता.

अनंतरावांनी संपादक म्हणून जे मृत्युलेख लिहिले आहेत, त्यात औपचारिकपणे ज्यांची नोंद घेणे आवश्यक असते अशांबद्दलचे फार थोडे आहेत. ज्यांच्याबद्दल त्यांच्या मनात जिव्हाळा होता, त्यांच्याबद्दल लिहिताना अनंतरावांच्या शब्दकळेला बहर येतो. अनंतरावांनी लिहिलेले मृत्युलेख महत्त्वाचे असण्याचे आणखी एक कारण आहे. मराठवाड्यातल्या अनेक माणसांची आणि त्यांच्या कामाची मराठवाड्याबाहेरच्या पत्रकारांना ओळखच नसते. बाबासाहेब परांजप्यांसारखा तरुणांना चेतवू शकणारा हैदराबाद स्वातंत्र्यलढ्याचा थोर नेता पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात किती लोकांना माहीत आहे? (तपस्वी बाबासाहेब परांजपे वेगळे) अनंतरावांनी त्या त्या व्यक्तींच्या निधनानंतर लिहिले, म्हणून त्यांची नोंद तरी झाली.

एकदा मी अनंतरावांना गंमतीने म्हणालो होतो की, ‘समाजजीवनातल्या एखाद्या क्षेत्रात महत्त्वाचे काम केलेल्या; पण मराठवाड्यात जन्मलेल्या आणि राहिलेल्या व्यक्तीला जर आपल्या कर्तृत्वाची योग्य दखल घेतली जावी असे वाटत असेल, तर त्याने तुमच्या अगोदर मरायला पाहिजे.’ अनंतरावांनी लिहिलेल्या मृत्युलेखांचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, त्या व्यक्तींबद्दल त्यांच्या मनात जो ओलावा असे, स्नेह किंवा भक्तिभाव तो त्यांच्या लेखनातून प्रगट होई. नरहर कुरुंदकरांचा मृत्यू तर औरंगाबादलाच झाला होता. आपल्यापेक्षा वयाने किती तरी लहान असलेल्या कुरुंदकरांच्या मृत्यूने अनंतरावांना अक्षरशः हलवून टाकले होते.

‘मृत्यूही जीवन खुडण्यासाठी स्मरणीय क्षणच निवडत असतो. कुरुंदकरांचे जीवनपुष्प असेच अकाली खुडले गेले. त्यांच्या जीवनाच्या सूर्याला जणू मध्यान्हच माहीत होती. अस्तमान त्याला ठाऊक नव्हता. जगातील बहुतेक बुद्धिमंतांनी सायंकाळ बघितलीच नाही. त्यांची जीवने प्रखर मध्यान्हाचा माथा चढवून तेथेच अंतर्धान पावली... कमलपुष्पाच्या पाकळ्या एक एक करून उमलत जाव्या आणि प्रकाशाला उन्मुख होऊन संपूर्ण पुष्प रेषेरेषेने प्रफुल्लित व्हावे अगदी तसे फुलणे चालू असतानाच कुरुंदकरांची जीवनयात्रा संपली. एकाच व्यक्तीत अनेक नात्यांचे संमीलन व्हावे, तसे कुरुंदकरांचे विलक्षण व्यक्तिमत्व होते. अर्ध्या वाटेवरूनच हा दमदार सवंगडी, सुहृद, चिंतक, अभ्यासक आपल्यातून जावा ही मन विदीर्ण करणारी घटना आहे. कदाचित असेही असेल की इतक्या अप्रूप, संपन्न जीवनाचे आपणच जतन करून शकतो, या विश्वासानेही मृत्यूने कुरुंदकरांना उचलले असेल.’’

कुरुंदकरांच्या मृत्यूने मराठवाड्यात जो दुःखावेग व्यक्त झाला, त्याचे नेमके कारणसुद्धा अनंतरावांनी नमूद केले आहे. ‘मराठवाड्यात अनेकांना असे वाटत आले आहे व वाटत राहील की, आपल्यातले जे काही उत्तम, उन्नत भव्य असेल त्याचे प्रतीक कुरुंदकर होते. मराठवाड्यात त्यांच्याविषयी लहानमोठ्यांच्या मनात जी भूषणाची, गौरवाची आणि अभिमानाची भावना आढळते तिच्यामागे हेच कारण होते. अनेक लोक कुरुंदकरांत आपलेच उन्नयन बघत होते.’

जयप्रकाश नारायणांचे निधन झाले त्यावेळी निर्माण झालेली राजकीय आणि भावनिक पोकळी अनंतरावांनी व्यक्त केली आहे. ‘गांधी गेले तेव्हा इतके पोरके व एकाकी वाटले नव्हते. कारण देशात गांधींच्या नंतर बरीच मोठी माणसे होती. त्यात विशेषतः जयप्रकाशजी होते. आता तेच गेले आणि आत्यंतिक पोरके वाटू लागले. एवढा मोठा यात्रिक गेला. आपण पडलो केवळ वाटसरू. जिथे वाट सरेल तिथेच विराम. आपली वाट तरी किती मोठी, दोन पावलांनी व्यापली जाईल एवढीच. जयप्रकाशजी यांसारखी माणसे सहस्र पावलांनी जीवनयात्रा क्रमित असतात व लाखो पावलांसाठी राजरस्ते निर्माण करीत असतात. गेला, तो वाटाड्याच आज निघून गेला.’

जयप्रकाशजींचा व्यक्तित्वविशेष सांगताना त्यांनी लिहिले, ‘‘सत्त्व गुणाला सगुण करावयाचे ठरले तर जयप्रकाशजींच्या रूपाचा आश्रय करावा लागेल. क्रांतीचा त्यांना ध्यास होता. परंतु त्यांची क्रांती गांधीजींच्या आदर्शाप्रमाणे निर्वैराचा हात धरूनच जाणारी होती... त्यांचे क्रांतिकारकत्व दाहक नव्हते. त्यांच्या क्रांतीला शीतल असे तेज होते. म्हणूनच त्यांना नंदादीपाची उपमा दिली आहे. नंदादीपाचा प्रकाश अंधारालाही सुसह्य वाटतो. फुलाच्या लोभस व मृदू स्पर्शाने हा प्रकाश अंधारात शिरतो आणि त्याला उजळून टाकतो. जयप्रकाशजींच्या व्यक्तिमत्त्वाचा हा आगळा विशेष होता.’’

श्रीनिवासराव बोरीकर हे हैदराबाद स्वातंत्र्य- चळवळीतले निरलस आणि पूर्णपणे निःस्वार्थ कायकर्ते. त्यांनी संघटनेचे सगळे काम केले; पण कोणत्याच पदाची कधी अपेक्षा केली नाही. मराठवाड्यात आणि विशेषतः परभणी जिल्ह्यात बहुजन समाजाला जागृत करून आंदोलनात सहभागी करून घेण्यात त्यांचा मोठाच सहभाग होता. त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी प्रकृतीचे अस्वास्थ्य आणि आयुष्यभर बाळगलेले दारिद्र्य या दोघांची सोबत त्यांना होती. मृत्यूपूर्वी दोन दिवस रस्त्यावर फिरायला जात असताना बोरीकरांची आणि अनंतरावांची गाठ पडली होती. तो सगळा संवाद अनंतरावांनी अग्रलेखात नेमका नोंदवला आहे.

‘‘हल्ली वाचताच येत नाही. एकएक अवयव निकामी होत चालला. मोठी गंमत वाटते आपल्याच शरीराची ही निवृत्ती बघून. ज्यांच्याकडून हयातभर आपण भरपूर काम घेतले, ज्यांना आपण वाटेल तसे वापरले, तेच आता उलटले आहेत. हे पाय बघा सुमारे चाळीस वर्षे मी भाड्याने आणल्याप्रमाणे वापरले. खेड्यापाड्यांतून रानोमाळ पिदाडून घेतले. आता काम करायला तयार नाहीत.’’ बोरीकर थोडावेळ बोलून पुढे निघाले. अनंतरावांनी लिहिले आहे, ‘‘सुमारे पन्नास वर्षांचा मराठवाड्याचा इतिहास काठी टेकीत चालला होता!’’

अनंतरावांनी चळवळीतल्या आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांबद्दल जसे लिहिले, तसेच त्यांनी काशिनाथराव जाधवासारख्या पुढे राजकारणात वेगळी वाट धरलेल्या एका काळच्या सहकाऱ्याबद्दलसुद्धा लिहिले. क्वचित एखाद्या मृत्युलेखात त्या माणसाच्या कार्याचे जसे स्मरण असे, तसेच त्याच्या उत्तुंग कर्तृत्वाचा सोयीस्कर विसर पडलेल्या जगाची निर्भत्सनाही असे. स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेते, आचारानेच नव्हे तर वृत्तीनेही पूर्णपणे संन्यासी. हैदराबादच्या मुक्ततेबरोबरच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीतही त्यांचा सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी झालेल्या चव्हाण-हिरे संघर्षात स्वामीजी आणि त्यांचे सहकारी हिऱ्यांच्या बाजूने होते. त्यामुळे आणि नंतर राजकारणात सर्वत्रच घुसलेल्या अपप्रवृत्ती यामुळे स्वामीजी काँग्रेसच्या दृष्टीने नावडते झाले होते. विरोधी पक्षांनाही त्यांची फारशी बूज राहिलेली नव्हती.

22 जानेवारी 1972 रोजी स्वामीजींचे हैदराबादेत निधन झाले. स्वामीजींच्या भाग्याने त्यांचेच एक शिष्य पी.व्ही.नरसिंहराव तेव्हा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यामुळे स्वामीजींचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात झाले. या अंत्यसंस्काराला महाराष्ट्रातला एकही मंत्री हजर नव्हता. आपण ज्या महाराष्ट्राचे मंत्री आहोत, तो एकसंध महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी या संन्याशाने हातभार लावला आहे, याची त्यांना आठवणच नव्हती. बरोबरचे बरेच महत्त्वाचे सहकारी काँग्रेस पक्ष सोडून गेले असतानाही स्वामीजी काँग्रेस पक्षातच राहिले होते; पण त्या पक्षालाही स्वामीजींबद्दल आपले काही कर्तव्य आहे, याची जाणीवच नव्हती. या उपेक्षेच्या दुःखापेक्षा चीडच अनंतरावांनी लिहिलेल्या ‘स्वामीजी, होय आम्ही कृतघ्न आहो!’ या अग्रलेखात व्यक्त झाली आहे.

अतिशय कडक शब्दांत त्यांनी लिहिले आहे- ‘‘स्वामीजी तुम्ही एखाद्या सहकारी बँकेचे अध्यक्ष असता, एखाद्या साखर कारखान्याचे संचालक असता किंवा सत्तेच्या रिंगणात असेच कुठे तरी असता तर सरकारी अधिकारी झाडून तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले असते. या लोकांना हे प्रासंगिक तंत्र फार पाठ झाले आहे! वर म्हटल्याप्रमाणे एखादा सहकारमहर्षी मेला की, यांचे अष्टभाव जागृत होतात. डोळ्यांचे पाणी खंडत नाही. मृताच्या फोटोसमोर असे बसून राहतात की, जणू यांचा सख्खा बापच मेला आहे! काय तो सुतकी चेहरा, काय ते रडण्याचे सोंग! स्वामीजी नावाचा एक मोठा पुढारी होता, त्याने निजामी सत्तेच्या विरुद्ध बंड केले. लोक संघटित केले आणि भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व आणले वगैरे गोष्टी त्यांना माहीतदेखील नसतील. त्यांना बिचाऱ्यांना दोष लावण्यात काय हशील? जे तुमच्या खांद्यावर चढून मोठे झाले तेच मस्तवाल आहेत. इतरांना काय बोलावे? थोडक्यात एवढेच की, स्वामीजी आम्ही सारेच एकजात कृतघ्न आहो!’’

चक्रवर्ती राजगोपालाचारींनी मद्रास शहरातील उन्मळून पडलेल्या एका झाडाबद्दल एक मृत्युलेख लिहिला होता. अनंतरावांच्या स्मरणात असलेल्या त्या लेखाचा आधार घेत अनंतरावांनी ‘बोलके झाड’ (10 जुलै 1978) या शीर्षकाचा ललित अग्रलेख लिहिला आहे. मद्रासमध्ये दीर्घकाळ जगलेल्या या झाडाला एक इतिहास होता. मागे एकदा उन्मळून पडलेले हे झाड त्यावेळच्या इंग्रज गव्हर्नरने परत लावून घेतले होते. एखाद्या मित्राशी गप्पा माराव्यात तसे तो गव्हर्नर या झाडाशी बोलत असे. मानवी जीवनाशी असलेले झाडांचे नाते सांगत सांगत अनंतरावांनी तीसचाळीस वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या सीमेवर असलेली वृक्षराजी कशी निदर्यपणे नष्ट करण्यात आली हे मांडून, आपला परिसर नयनरम्य करण्यासाठी सरकारी हुकूमशाहीच कशाकरता आवश्यक समजावी असा प्रश्न विचारला आहे. (त्या काळी वृक्षारोपण हा संजय गांधींच्या कार्यक्रमाचा भाग होता) सरकारला एवढे स्थान मिळत गेले, तर हनीमुनसाठीसुद्धा सरकारचा जीआर निघावा लागेल, असे त्यांनी उपहासाने विचारले आहे.

मराठवाड्यात त्यावेळी उद्योगधंदे तर अजिबातच नव्हते; पण पाणभरती जमीन किंवा डेअरीसारखे शेतीपूरक उद्योगसुद्धा अपवादानेच अस्तित्वात होते. शेतकऱ्यांचेच नव्हे तर सर्वच मराठवाड्याचे आर्थिक जीवन कोरडवाहू शेती पिकण्यावर अवलंबून असे. अनंतरावही शेतीवर अवलंबून असण्याची पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबात जन्माला आले होते. विविध निमित्ताने खरे ग्रामीण जीवन त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले होते. मराठवाड्यात त्याकाळी सिंचनाखाली असलेली जमीन फारच थोडी होती व बहुतेक शेती कोरडवाहूच होती. जर पाऊस वेळेवर पडला नाही, तर शेतकरी तर संकटात असेच; पण मराठवाड्याचे एकूण जीवनच शेतीवर अवलंबून असल्याने तेही मरगळून जाई. एखाद्या वर्षी मृग वेळेवर व भरपूर पडला तर ‘मृगाने बहार केली’ सारखा अग्रलेख अनंतरावांच्या लेखणीतून बाहेर पडे. ‘पुढच्या पेरण्याची काळजी’ असले विषयसुद्धा त्यांना अग्रलेखासाठी आवश्यक वाटत.

शेतीतील अडचणींचा अनंतरावांनी सर्व दृष्टीने विचार केलेला असे. गुदस्ता शेजारच्या राज्यात दुष्काळ नव्हता, म्हणून तेथून आपल्याला चारा मागवता आला. यंदा तेथेही दुष्काळ असल्यामुळे तसे करता येणार नाही व गुरांना वाचवणे हा फारच मोठा गंभीर प्रश्न होईल याची त्यांना जाणीव असे व या अडचणीची वाचकांना ते आठवण करून देत. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागात यंदा गव्हाचे पीक चांगले आले आहे. तेथे गव्हाची खळी झाल्यानंतर उरलेला कचरा गुरांसाठी उपयोगी पडू शकतो. तेथून चाराही आणता येऊ शकेल. सरकी, हुलगे, पेंड, तेलबियांचे पाचट या सगळ्यांचा पुरवठा झाला तर हे कठीण दोन महिनेही निघून जातील असा आशावाद अनंतरावांनी व्यक्त केला आहे. (22 नोव्हेंबर 1972) शेतीविषयक स्वतंत्र नियतकालिके नंतर निघाली, पण अनंतरावांचा ‘मराठवाडा’ शेती हा राजकारणाइतकाच महत्त्वाचा विषय आहे, असे मानत असे.

अनंतरावांचे व ‘मराठवाड्या’चे प्रादेशिकत्व भौगोलिक अर्थाचेच नव्हते. ते त्या भूभागाच्या प्रश्नाविषयीच्या आस्थेतून जन्माला आलेले होते. शेतीप्रश्नाप्रमाणेच अनंतरावांना महत्त्वाचे वाटत असे आणखी दोन प्रश्न म्हणजे दलित समाजावर होणारे अन्याय आणि मुस्लिमांची धर्मांधतेकडे सुरूच असलेली वाटचाल. अनंतराव हिंदुत्ववादी कधीच नव्हते. त्यांची घडण संतवाङ्‌मयाच्या वाचिक आणि बौद्धिक सान्निध्यात झाली असली तरी त्याचा मनाला विशाल करणारा संस्कारच त्यांच्या मनावर झाला होता. मुस्लिमांना बरोबरीचे स्थान आणि समान हक्क हे अनंतरावांना मान्य होतेच. गांधीजींच्या मार्गदर्शनाने चाललेला हैदराबादचा मुक्तिलढा हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष होता.

राजा आणि जुलूम करणारे अधिकारी मुस्लिम आणि भरडली जाणारी जनता हिंदू अशी विभागणी असतानाही लढ्याला मुस्लिमविरोधाचे वळण कधीही लागू देण्यात आले नव्हते; परंतु जातीयवादी प्रचाराने सामान्य मुस्लिम कसा भडकू शकतो आणि त्याला कसे बहकवले जाऊ शकते याचा अनुभव निजामी राजवटीत इतरांबरोबर अनंतरावांनीही घेतला होता. त्यामुळे मुस्लिमांबद्दलची त्यांची भूमिका पुस्तकी धर्मनिरपेक्षतेपुरती मर्यादित नव्हती. त्याला वास्तवाच्या आकलनाची एक बाजूही होती. त्यामुळे ती इतर समाजवाद्यांपेक्षा अधिक रोखठोक आणि अधिक स्पष्ट असे. हमीद दलवार्इंसारख्या विचारवंताला म्हणूनच अनंतरावांबद्दल विशेष आस्था होती. निजामी राजवटीतच शिक्षण झाल्यामुळे अनंतरावांना उर्दू उत्तम येत होते. त्यामुळे उर्दू वृत्तपत्रांत आणि पुस्तकांत काय प्रसिद्ध होत आहे, मुस्लिम मंडळींच्या मनात काय चालले आहे, याची त्यांना व्यवस्थित जाणीव असे.

आठवीच्या अभ्यासक्रमाला सरकारने जे इतिहासाचे पुस्तक तयार करून लावले होते त्यात महंमद पैगंबराबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग आहे असा आरडाओरडा काही मुस्लिम मौलवींनी केला. हा वाद निर्माण झाल्यानंतर अनंतरावांनी संपादकाला शोभणाऱ्या जिज्ञासेने त्याच अभ्यासक्रमाचे उर्दू माध्यमाचे पुस्तक मिळवून वाचले. त्यात तर असंख्य चुका होत्या. तुकाराम भागवत धर्माचे मेंबर होते, यासारखी विनोदी वाक्यरचनाही त्यात होती. या पुस्तकावर त्यांनी एक स्वतंत्र लेख लिहिला. तो ‘मराठवाड्या’बरोबरच ‘महाराष्ट्र टाइम्सने’ही प्रकाशित केला. त्यावेळी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होते. विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सरकारला ते पुस्तकच रद्द करावे लागले.

अकारण वाद निर्माण करावे आणि त्याद्वारे आपल्या लोकप्रियतेत भर घालावी हे जातीयवाद्यांचे धोरणच असते. माजलगाव येथे सिंदफणा नदीवर एक धरण आज उभे आहे. त्याचे काम सुरू झाल्याबरोबर तेथील एक दर्गा किंवा तत्सम वास्तू पाण्यात जाईल म्हणून या धरणाचे काम थांबवावे अशी मागणी काही उचापत्यांनी केली. पुढे इसाक जामखानवाला या काही काळ मंत्री असलेल्या काँग्रेस नेत्याने मध्यस्थी केली आणि हा वाद मिटला. अनंतरावांना या पद्धतीने वाद मिटवणे पसंत नव्हते. त्यांनी ‘सरकार कुणाचे? पवारांचे की मुल्ला-मौलवींचे?’ असा परखड अग्रलेख लिहिला. सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्ष एस.एम.जोशी असतानाही त्यांनी सरकारच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतली होती.

नरेंद्र चपळगावकर, औरंगाबाद

nana_judge@yahoo.com

मनोगत

तुम्हाला मुस्लिम म्हणून भारतात कसे वाटते?

शफाअत खान

मला माहीत होते की- मी वेगळा आहे; परका आहे. मी मुस्लिम आहे. तथापि, मी मुस्लिम कॉलनीमध्ये कधीच राहिलो नाही. त्यामुळे मी सुरक्षित असल्याची भावना माझ्यात कधीच रुजली नाही किंवा जे मुस्लिम त्यांच्या कॉलनीत राहायचे आणि त्यांच्यात एक सुरक्षित असल्याची भावना मला दिसायची, तशी भावना माझ्यात कधीच निर्माण झाली नाही. मुस्लिम कुठेही असोत, जिथेही ते जावोत- त्यांना दुष्ट, खलनायक वगैरे समजले जाते. आजही ही गोष्ट आपणास दिसते. म्हणूनच मी जिथे जिथे जाई, तिथे तिथे माझी स्वतःची प्रतिमा बनवण्याचा मी प्रयत्न करू लागलो. कदाचित म्हणूनच फार्स (खूप हास्य निर्माण करणारे नाटक) हा माझ्या नाटकाचा एक अविभाज्य भाग बनला. जसा मी मोठा होत होतो, तसे माझ्या हे लक्षात येत गेले की, आपल्या देशात इतिहास एका विशिष्ट पद्धतीने शिकवला जातो. इतिहासाच्या पुस्तकात मुस्लिम नायकांची कमतरता दिसते. निर्भय शिवाजी आणि अफझलखान यांची लढाई मुलांना त्याच्या वर्गात सांगितली जाते, तेव्हा बहुतेक मुलांना शिवाजी व्हायचे असते. माझ्याही वर्गात हेच होते; यापेक्षा काही वेगळे नव्हते.

ही 1995 ची गोष्ट आहे.

हे वर्ष वाघाचे वर्ष म्हणून ओळखले गेले आणि बॉम्बेचे याच वर्षी मुंबई म्हणून नामकरण झाले. 1992 ची दंगल आणि पुढच्याच वर्षी 1993 मध्ये झालेले बॉम्बस्फोट हल्ले- यामुळे मुंबई कशीतरी उभी राहण्याचा प्रयत्न करत होती. माफिया लोकांच्या हिंसेमुळे मुंबईची ओळख बदलत चालली होती; जमातवादी दंगली होणारे महानगर अशी नवी ओळख मुंबईला प्राप्त झाली होती आणि यातून तिची सुटका होणे जवळपास अशक्य झाले होते. हे सारे भयंकर होते, क्रूर होते. दंगली आणि बॉम्बस्फोट हल्ल्यांच्या कहाण्या घरोघरी उद्‌धृत केल्या जात होत्या; त्या पुन:पुन्हा सांगितल्या जात होत्या. कोपऱ्याकोपऱ्यांवर, नुक्कडवर त्या सांगितल्या जात होत्या. चंदेरी पडद्यावर दाखवल्या जात होत्या. रंगमंचावर सादर केल्या जात होत्या.

ही 1995 ची गोष्ट आहे.

‘राहिले दूर घर माझे’ हे नाटक मी याच वर्षी सादर केले. असगर वजाहत यांच्या- जिसने लाहोर नहीं देखा वो जन्मेही नहीं या हिंदी नाटकाचे हे रूपांतर होते. मुस्लिम कुटुंबाला मध्यवर्ती ठेवून हे नाटक लिहिले गेले होते. मराठी व्यावसायिक नाटकात व महाराष्ट्रात प्रथमच असे घडत होते. मुस्लिम म्हणून भारतात राहणे हा अनुभव या नाटकाचे मुख्य कथासूत्र आहे आणि तुम्ही कोणीही असा, तुमच्या हृदयातला अनुभव तोच राहतो.

नाटककार आणि या देशाचा नागरिक म्हणून हे रूपांतर मी केले होते. यातून हिंसेच्या विरुद्ध उभे राहण्याचा मुख्य उद्देश होता. इथे मी उघडपणे आणि धाडसाने हेच सांगत होतो की, ‘तुम्हाला हिंसेच्या विरुद्ध राहायला हवे. तुम्ही हे केले नाही, तर तुम्ही टिकणार नाही.’

पार्श्वभूमी :

वरवर पाहता सारे काही व्यवस्थित वाटत होते; पण हेही लक्षात येत होते की, काही तरी गोंधळ आहे, कुठे तरी चुकते आहे. हिंदू राष्ट्रवाद्यांप्रीत्यर्थ भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांनी अयोध्येकडे रथयात्रेचा प्रारंभ केला होता. हातात तलवारी धरून राजकारण्यांचे दिमाखदार फोटो वृत्तपत्रांतून झळकत होते. दि.6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद उद्‌ध्वस्त करण्यात आली होती. ही एक भयंकर अशी घडलेली घटना होती, याची कल्पना आम्हाला आली होती. आम्हाला दंगलींचा व्यापक अनुभव होता, पण ही दंगल काही वेगळी होती. याची तयारी खूप आधीपासून केली गेली होती. बाबरी मशीद पाडण्याची कृती सुरू झाली होती. सगळीकडे अस्वस्थता पसरली होती. असहायतेच्या भावनेने आम्हाला घेरले होते. आपण दुर्बल आहोत, हतबल आहोत- ही भावना प्रत्येकात घर करताना दिसत होती. भीती, क्रोध, शंका, उलटसुलट अंदाज, निराशा अशा भावनांनी प्रत्येकजण ग्रस्त होता.

बाबरी मशीद उद्‌ध्वस्त झाल्यानंतर, पाठोपाठ मुंबईत दंगली सुरू झाल्या. यामुळे लोकांचे लक्ष बाबरीकडून दुसऱ्या दिशेला वळले गेले. हिंसा ही काही गुंड आणि राजकीय नेते घडवून आणतात, हा आमचा विश्वास या क्षणापर्यंत होता. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सामान्य माणूस या दंगलीत विनाशकारी कृत्ये करताना आम्ही प्रथमच पाहत होतो. सारा समाज ह्या हिंसेत सहभागी होताना दिसत होता आणि त्यांचा हा विश्वास ढळढळीत दिसत होता की, आता आम्हाला उत्तरेही मिळाली आहेत. लेखक म्हणून मला हे अस्वस्थ करणारे वास्तव दिसत होते. एक लेखक म्हणून माझी काय जबाबदारी आहे, याची मला या वेळी जाणीव झाली. कोणालाही ही दंगल थांबवता येत नव्हती आणि म्हणूनच या दंगलीबाबत कोणीही एखादी कविता किंवा कादंबरी लिहिताना आम्हाला दिसत नव्हते. आणि काहीच घडलेले नाही, या भ्रमात सगळे जण वावरत होते.

पण एक सृजनात्मक कलाकार म्हणून आजूबाजूला काय काय घडत आहे, याचा एक अदमास घेणे हे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटत होते. माझ्या आजूबाजूला काय घडत आहे, यासंबधी लिहिण्याची मला गरज भासू लागली. काही संवाद मी लिहिले- काही पात्रे, एक-दोन अंक- कसा तरी हा माझा प्रयत्न सुरू होता. सत्याचा ठाव घेण्याचा हा माझा प्रयत्न मला फारसा पुढे नेता आला नाही. मग लेखणी बाजूला ठेवून दिली. हा माझा भयंकर भवताल मला काहीही लिहू देता नव्हता, हेच खरे हेाते. मग, काहीही लिहायचे नाही, असे मी ठरवून टाकले.

पण सारे काही शांत होत आहे असे दिसत असतानाच, मार्च 1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट झाले. काही लेखन होईल असे वाटत असताना परत एकदा चिंता आणि भीतीने गाठले. याबद्दल काही लिहायला हवे, ही भावनाच अंधुक होत गेली आणि मग मी ठरवून टाकले की, आता नाटक नाही, कुठले मत नाही; आता काहीच लिहायचे नाही. मी हातावर हात ठेवून दहा दिवस माझ्या घाटकोपरच्या घरी बसून राहिलो.

याच दरम्यान नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांनी मला बोलावले. वजाहतच्या ‘जिसने लाहोर नहीं देखा वो जन्मेही नहीं’ या नाटकाचे वाचन सुरू होते. हे कथानक 1947 च्या पार्श्वभूमीवर बेतलेले होते. लाहोरमध्ये राहणारी एका वृद्ध हिंदू स्त्रीची ही कथा होती. या महिलेचा मुलगा फाळणीच्या दंगलीत नाहीसा झाला आहे. फाळणीमुळे भारतातून विस्थापित झालेले लखनौचे एक मुस्लिम कुटुंब तिच्याकडे आसरा मागायला येते, पण आपल्या मुलाच्या विरहामुळे त्यांना आसरा देण्याचे ही हिंदू स्त्री नाकारते. फाळणीच्या वेदनेने भयग्रस्त झालेले हे मुस्लिम कुटुंब हैराण झाले आहे आणि ते स्थानिक राजकीय गुंडांपासून कटाक्षाने दूर राहण्याच्या प्रयत्नात आहे.

तरीदेखील हे गुंड घरात शिरतातच, परिस्थितीचा ताबा घेतात; शक्य तो फायदा उठवतात. त्यांना मानवी करुणा आणि दया यांच्याशी काही देणे-घेणे नसते. हे सारे अनुभवत असताना मी स्वतः लिहिलेले, मला माझे मराठी नाटक ठळकपणे दिसायला लागले. यावर आधारित मी एक मराठीत रूपांतर लिहितो आणि मला तशी परवानगी मिळावी, अशी विनंती मी जवाहत यांना केली.

थोडे बदल :

जेव्हा केव्हा मी एखादी कथा, कविता, नाटक किंवा इतिहास वाचतो; तेव्हा अमेरिकन कवी ऑडगन नॅश (1902-1971) याच्या पुढील ओळी माझ्या मनात रुंजी घालायला लागतात :

शाळेतल्या मुलासारखे प्रेम करणे

हे कुठल्याही मूर्खाला शक्य असते

पण द्वेष करणे, माझ्या राजा

ही एक कला असते

(‘…. For any kiddie from school

Can love like a fool.

But hating, my boy

Is an art.’)

अशा काळात, मला वाटते की, कलाकाराची जबाबदारीही वाढत जाते. त्याला युद्धभूमीतून पळ काढता येत नाही. कलेच्या माध्यमातून सत्याला पुढे आणण्याची जबाबदारी त्याला पेलावी लागते.

हे नाटक मराठीत रंगमंचावर आणताना दोन-पदरी अडचणी होत्या. भाषिक आणि प्रेक्षकांच्या हे गळी कसे उतरवावे- या दोन्हीही समस्या भेडसावत होत्या. मूळ नाटकात तीन भाषांचा प्रयोग केला होता - हिंदी, लखनौची उर्दू आणि लाहोरची पंजाबी. या साऱ्या भाषांना मराठीत सामावून घेणे, त्याचे रूपांतर करणे हे एक आव्हान होते. याचबरोबर, महाराष्ट्रातला मुख्य धारेतला मध्यमवर्गीय प्रेक्षक हा कौटुंबिक नाटके पाहण्यासाठी सरावलेला होता. त्यांना हसवणारी नाटके पाहायला आवडत होती, त्यात त्यांना अधिक स्वारस्य होते. त्यांच्या जगातील-जगण्यातील त्यांच्या चुकांवर बोट ठेवणे, त्याबद्दल त्यांना जबाबदार धरणे, त्यासाठी त्यांच्यात बदल किंवा परिवर्तन घडावे म्हणून काही आग्रह धरणे- या गोष्टी त्यांना अस्वस्थ करणाऱ्या होत्या. खरे पाहता, या त्यांना नकोच होत्या. आणि या नाटकातून मला हेच नेमके करायचे होते.

आपण कोणत्या वातावरणात राहत आहोत, आपला भोवताल काय आहे, याचे विश्लेषण लोक करत नाहीत. त्यांचे वास्तव काय आहे हे पाहण्यास मी त्यांना भाग पाडतो. म्हणून मला वाटते की, ‘राहिले दूर घर माझे’ यासारखे नाटक हे प्रायोगिक रंगभूमीच्या पलीकडे जाणारे आहे. हे एक व्यावसायिक नाटक म्हणून उभे राहायला हवे, असे मला वाटते. एक प्रायोगिक प्रयत्न म्हणून तुम्ही परंपरेला छेद देणे, सरळ जाणाऱ्या पायवाटेला फाटा देणे किंवा फॉर्ममध्ये विपुल असे प्रयोग करणे हे तुम्ही करू शकता, हे खरे आहे. पण मग तुम्हाला 50 टक्के प्रेक्षकांना मुकावे लागते, हेही खरे आहे. बाबरी मशीद उद्‌ध्वस्त करणारे दंगलखोर, या दंगलीचे समर्थन करणारा समाजातला एक मोठा गट आणि या घटिताला बळ देणारे रस्त्यावरचे लोक यांच्यासाठी हे नाटक लिहिले होते. तुम्हाला जर तुमचे नाटक हे व्यापकरीत्या प्रेक्षकांपर्यंत घेऊन जायचे असेल, तर तुम्हाला नाटकाच्या मुख्य धारेत जावे लागेल.

नाटकाचा शेवट मी बदलला होता, त्याला एक टि्वस्ट दिली होती. दंगलीत मी लोकांना बाहेर येताना पाहिले होते. आपल्या गावांतून बाहेर जाताना पाहिले होते. कॉलनीच्या कॉलनी भयग्रस्त होऊन रित्या-रिकाम्या होताना मी पाहिल्या होत्या. हे सारे ‘धर्माच्या नावाखाली’ झाले होते; होत होते. अल्पसंख्याकांचा मृत्यू, निःपात यातून मला काय सांगायचे आहे ते लोकांपर्यंत पोचणार नाही, हे माझ्या लक्षात आले होते. अल्पसंख्याकांना मी मरू दिले नाही, त्यांना जिवंत ठेवले. हा जिवंत राहिलेला अल्पसंख्याक आपल्या तरुण पिढीला मेसेज देतो, आपला भयकंपित अनुभवाचे कथन करतो. या साऱ्या भयातून मुक्त होताना हे अल्पसंख्याक तरुण, धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन लोकांकडे-समाजाकडे पाहण्याचा संदेश देतात. एक वृद्ध स्त्री, आजी आणि तरुण मुलगी गुंडांना निर्भयतेने सामोरे जाताना हवेलीचा दरवाजा उघडतात, या प्रसंगाने मी नाटकाचा शेवट केला होता.

अशा वेळी आजीचा अनुभव, त्या तरुणीची निष्पाप मनोवृत्ती अधोरेखीत करावी, असे मला वाटले. मनुष्यता हीच सर्वांत मोठी शक्ती आहे, तिचे अधिष्ठान सर्वोच्च आहे, हे मला यातून जोरकसपणे प्रतिबिंबित करता आले. दंगलखोर लोकांनी हे नाटक पहिले. त्यांना हे सारे पाहून निश्चितच त्रास झाला, पण कालांतराने त्यांना हे नाटक आवडले. या नाटकाने हिंसा आणि दंगली थांबवण्याची काही भूमिका बजावली नाही; पण ज्यांनी हे नाटक पाहिले होते, त्यांनी या क्रूर आणि पाशवी कृती करण्याअगोदर किंवा त्यात साह्यभूत ठरण्याअगोदर दोनदा नक्कीच विचार केला असता- अशी आशा नक्कीच वाटत होती.

परकेपणाचा आशय :

‘जिसने लाहोर...’ हे नाटक एका मुस्लिम कुटुंबाचे कथानक सांगते. फाळणीच्या काळात हे मिर्झा कुटुंब लाहोरला स्थलांतरित होते. इथे हिंदूंनी रिकामी केलेली एक हवेली यांना दिली जाते. जसे ते या घरात प्रवेश करतात तशी त्यांना इथे एक हिंदू वृद्ध स्त्री राहत असलेली आढळते. ही स्त्री आपल्या घरावरच्या हक्काचा दावा करते आणि हवेली सोडून जायला नकार देते. आपल्या खऱ्या-खुऱ्या प्रेमातून लखनौहून आलेले, विस्थापित झालेले मुस्लिम कुटुंब या वृद्ध हिंदू स्त्रीची काळजी घेते आणि कालांतराने मिर्झा कुटुंब इथे स्थिरावत जाते. नंतर ते या वृद्ध स्त्रीला हवेली सोडून जाण्याबद्दल कधीही बोलत नाहीत. पण यादरम्यान, पहेलवान व आजूबाजूचे मुस्लिम यांच्यात सतत कुरबुरी आणि वाद होत राहतात.

ज्येष्ठ मौलवी आणि हिदायत हुसेनी हे रतन की माँ- म्हणजे ती हिंदू वृद्ध स्त्री- या हवेलीत एका मुस्लिम कुटुंबाबरोबर कशी काय राहत आहे; हे कुटुंब तिची सेवा कशी काय बरे करत आहे, याबद्दल चुगल्या सुरू होतात. लाहोर सोडायचे नाही, आपले घर-आपली हवेली तर कशी सोडायची आणि पहेलवान व त्याचे इतर मुस्लिम सगेसोयरे यांच्याद्वारे पसरवले गेलेले विष पचवण्याच्या या द्वंद्वात रतन की माँचा अचानक उदास मृत्यू होतो. मौलवी, हिदायत हुसेन आणि अजून बरेच जण रतन की माँ हिचे अंत्यविधी-संस्कार करतात. बऱ्याच गोष्टी लक्षात न घेता, पहेलवान धक्कादायकरीत्या मौलवीला ठार मारतो. यातून आपण कसे खरे मुस्लिम आहोत. हा अभिनिवेश त्याला व्यक्त करायचा असतो.

आता महाराष्ट्रात म्हणावी तेवढी फाळणीची झळ पोचली नव्हती, जी होती ती तुलनात्मक दृष्ट्या फारच मर्यादित स्वरूपात होती. मराठीत फाळणीवर आधारित साहित्य हे म्हणूनच म्हणावे तेवढे निर्माण झाले नाही. फाळणीनंतर माझे मामा (काका) आणि माझा बराच गोतावळा भारत सोडून कराचीला गेला. ते अधेमधे आम्हाला भेटायला भारतात येत असत. भारतातल्या गतस्मृती आणि नव्या देशातल्या गमतीजमती सांगताना ते आम्हाला हेच सांगत असत की, या नव्या देशात त्यांना कसे सामावून घेतले जात नाही. आपण भारत सोडून तिकडे गेलो, ही आपली चूकच झाली आहे, हे त्यांना आता कळून चुकले होते. हा प्रत्यय त्यांच्या बोलण्यातून येत असे.

बाबरी मशीद उद्‌ध्वस्त केली गेली, ही घटना बिगरमुस्लिमांनाही डोळे उघडायला लावणारी होती. मी मुस्लिम असल्याची भेदक जाणीव मला यामुळेच झाली. अर्थात, मी एक पराया आहे; बाहेरचा-परका आहे, हे काही मला आताच समजले होते अशातला भाग नव्हता. लहानपणी मला याची सतत जाणीव असायची आणि मला मराठी समाजाने स्वीकारावे हीच भावना, नाटक लिहिणे या माझ्या कृतीतून व्यक्त होत होती.

माझा जन्म हा सावंतवाडीचा. पण नोकरीमुळे माझ्या वडिलांच्या बदल्या होत असत. म्हणून महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशाच्या अनेक भागांत राहण्याची संधी मला मिळाली. याबद्दल वडिलांचे मला आभारच मानावे लागतील. प्रत्येक दोन किंवा तीन वर्षांनंतर बदली होत असे आणि आम्ही एका नव्या गावात जात असू. कुठल्याही एका ठिकाणी न रमण्याची ही वृत्ती माझ्यात यामुळेच आली असावी. परकेपणाचा हा आशय माझ्यात असा कायम राहिला. मला माहीत होते की- मी वेगळा आहे; परका आहे. मी मुस्लिम आहे. तथापि, मी मुस्लिम कॉलनीमध्ये कधीच राहिलो नाही. त्यामुळे मी सुरक्षित असल्याची भावना माझ्यात कधीच रुजली नाही किंवा जे मुस्लिम त्यांच्या कॉलनीत राहायचे आणि त्यांच्यात एक सुरक्षित असल्याची भावना मला दिसायची, तशी भावना माझ्यात कधीच निर्माण झाली नाही.

मुस्लिम कुठेही असोत, जिथेही ते जावोत- त्यांना दुष्ट, खलनायक वगैरे समजले जाते. आजही ही गोष्ट आपणास दिसते. म्हणूनच मी जिथे जिथे जाई, तिथे तिथे माझी स्वतःची प्रतिमा बनवण्याचा मी प्रयत्न करू लागलो. कदाचित म्हणूनच फार्स (खूप हास्य निर्माण करणारे नाटक) हा माझ्या नाटकाचा एक अविभाज्य भाग बनला. जसा मी मोठा होत होतो, तसे माझ्या हे लक्षात येत गेले की, आपल्या देशात इतिहास एका विशिष्ट पद्धतीने शिकवला जातो. इतिहासाच्या पुस्तकात मुस्लिम नायकांची कमतरता दिसते. निर्भय शिवाजी आणि अफझलखान यांची लढाई मुलांना त्याच्या वर्गात सांगितली जाते, तेव्हा बहुतेक मुलांना शिवाजी व्हायचे असते. माझ्याही वर्गात हेच होते; यापेक्षा काही वेगळे नव्हते.

माझ्या वर्गात शिवाजी खूप होते, म्हणून अफझलखानची भूमिका वठवण्याची जबाबदारी माझ्या छोट्या खांद्यावर येऊन पडत असे. मला कोणती भूमिका करायची आहे, हे मला कोणीही विचारत नसत. शिवाजी अफझलखानला मारतो, इथे ही लढाई प्रत्यक्षात संपत असे; पण इतिहासातील हे प्रकरण शाळेच्या मधल्या सुट्टीतही माझ्या बाबतीत सुरूच राही. मला वाटते की, मुस्लिम-पार्श्वभूमीमुळेच मी नाटकात काम करू लागलो, मी नाटक लिहू लागलो. मी जेव्हा शाळकरी मुलगा होतो, तेव्हा माझे सवंगडी मला स्वीकारत नसत. हे केवळ माझ्या धर्मामुळे होत होते.

अदृश्य अशा भिंती उभ्या केल्या जात असत. त्या मुलांना घरातून दम भरला जात असे की, मुस्लिम मुलांबरोबर खेळायचे नाही म्हणून. तुम्ही दुसऱ्यांना स्वीकारार्ह कसे होणार? आणि तुम्ही स्वतःला सिद्ध कसे करणार? त्यापेक्षा रंगभूमी काय वाईट? जेव्हा तुम्ही नाटक पाहता, तेव्हा समोरच्या माणसाला तुम्हाला स्वीकारावेच लागते. मला मुस्लिम अस्मिता लपवण्याची सवय लागली. माझे मराठी दिसणे आणि माझे अपारंपरिक असणे याही गोष्टी मला साह्यभूत ठरल्या असाव्यात. माझ्या नाटकात ही मास्कची प्रेरणा परत-परत उगवत असते यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मी खोलवर विचार करतो आणि मला हे तथ्य स्पष्टपणे दिसते की, मी माझा धर्म लपवतो आहे आणि अधिकाधिक मित्र गोळा करतो. एकाकीपणा व संप्रेक्षण न होण्याच्या किंवा चुकीच्या पद्धतीने होण्याच्या क्षमता या न-नाट्याचा (थिएटर ऑफ ॲब्सर्ड) थोडाच भाग आहेत!

कोकणात दशावतार (विष्णूचे दहा अवतार) नावाचे लोकनाट्य खूप लोकप्रिय आहे. सणासुदीला ही लोकनाट्ये देवळासमोर सादर केली जातात. यातील सर्व पात्रे ही देवांची असतात. पण ही पात्रे दैवी वगैरे न वाटता खूप मानवी वाटतात, आपल्या जवळची वाटतात. ही पात्रे म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या जीवनात येणारे लोक वाटतात. साधारणतः धर्म समाजाचे दमन करत असतो. धर्माच्या या दमन करणाऱ्या भावनांचे मामुलीकरण करता येते, ही गोष्ट मला या नाटकांमुळे लक्षात येत गेली. नाटकात याचा एक परिणामकारक शस्त्र म्हणून आपणास वापर करता येईल, हे मला समजत गेले.

यानंतर आम्ही गोवा येथे गेलो. इथे नाटक हा एक धार्मिक विधी होता. ती गावातल्या जत्रेत सादर केली जायची. सणासुदीला किंवा पवित्र दिवसांच्या निमित्ताने नाटक हे सक्तीचे होते. याचा जनसमूहावर विलक्षण असा प्रभाव पडत असे. उदाहरणार्थ- पुरुषांनी वर्णन केलेले स्त्रियांचे दुःख (मंदिरासमोर सादर केलेल्या या प्रयोगात स्त्रीपात्र नसायचे) हे ढोंगी आणि उथळ होते. मला हे पाहताना मजा यायची. या प्रयोगामुळे वास्तवापासून दूर जायला मला मदत होत असे. मराठी नाटकाचा हाच तर गाभा आहे.

गोव्यात संगीत नाटकेही होत असतात. ही नाटके एका छोट्या वर्कशॉपमध्ये तयार केली जात असत आणि हे वर्कशॉप माझ्या शाळेपासून जवळच होते. मोठमोठे रंगवलेले पडदे या नाटकांसाठी लागत असत. तशी ती प्रथा होती. मला या ठिकाणी फार मोठ्या क्षमतेचे पेन्टर्स पाहायला मिळाले. या पडद्यांवर ते मोठमोठे राजवाडे रंगवत असत; कधी घनदाट जंगले, तर कधी महानगरे. ही चित्रे रंगवली जात असताना मी तिथे हे तासन्‌तास पाहत बसे. हे पाहताना माझ्या मनात अनेक कथा रुंजी घालत. दुसऱ्या एका जवळच्याच ठिकाणी गणपतींच्या मोठमोठ्या मूर्ती बनवल्या जात. तिथेही मी तासचे तास वेळ घालवत असे. भिजवलेल्या मातीतून चमकदार फर्निचर हे कारगीर निर्माण करत असत. गणेशोत्सव सण अजून काही आठवडे तरी दूर असायचा. या साऱ्या गोष्टी माझ्यात दडून राहिल्या आणि त्या खूप नंतर माझ्या जाणिवेच्या पृष्ठभागावर अवतरल्या. हीच तर नाटकाची जादू असते.

(मूळ इंग्रजीत लिहिले गेलेले हे निवेदन तन्वी पारेख यांनी शब्दबद्ध केले आहे, ‘बाबरी मस्जिद, 25 इयर्स ऑन’ (कल्पाझ पब्लिकेशन, नवी दिल्ली, 2017) या पुस्तकात हा लेख समाविष्ट केला आहे.)

अनुवाद : डॉ : दीपक बोरगावे

deepak.borgave7@gmail.com

प्रतिसाद

म्हणूनच भाजप हवा आहे...

सुरेश द्वादशीवार यांचा मी फॅन आहे. साधनातील त्यांचा 20 जुलैच्या अंकातील ‘देशाला काय हवे? विवेक की श्रद्धा?’ हा लेख मात्र साधना परंपरेनुसार मोदी-द्वेषाने आणि बराचसा डावीकडे झुकणारा वाटला. पण तरीही मोदी जे सतत सांगतात, त्याप्रमाणे आपल्या देशावर सातशे वर्षे मोगलांनी राज्य केले हे वाक्य आवडले. अशोकानेच काय रामायण- महाभारताच्या युध्दातही मुसलमान-ईसाई माणसे नाही मारली गेली. हिंदूच मेले. संभाजी मालिकेत सध्या काय चाललंय पहात असालच. साधना व आपणही हिंदूच की, कधीतरी उघडपणे सांगा की हिंदू आहोत म्हणून, पण जसं संपूर्ण वंदेमातरमने काही लोक दुखावतात तसं तुम्ही काळजी घेणारच. रोजची पहाट मात्र अजाननी होते या देशात.

महात्मा गांधींनी ‘करा किंवा मरा’ म्हटले, पण असंख्य हिंदू-मुसलमानही मेलेच आणि ते अजूनही दोन्ही देशांत मारले जात आहेत. संपूर्ण जगात इस्लामिक आतंकवाद जो चाललाय त्याला बाबरी प्रकरण जबाबदार नाही. भारतात मुसलमान लोक धार्मिक दंगा करतात. बंगालमध्ये ममता तेच करीत आहेत. आज सर्वत्र संघाचे लोक दिसताहेत, आधी डावे घुसवले होते संघाचेच बरे, देश वाचवतील. ‘मोदी बोले भाजप चाले’ तसेच ‘सोनिया-राहुल-प्रियंका बोले काँग्रेस नाचे’ असे आहेच ना. ऐंशी वर्षांचा कार्यकर्ता राहुलच्या पाया पडताना पाहतोयच की. बेळगावातून कन्हैय्या कुमारच्या निवडणुकीसाठी पैसा पाठवला जातो. या देशाला पाद्री व मौलवीपेक्षा संत अधिक हवेत. रस्तेबांधणी देशकार्य नाही काय? काँग्रेसचे तुकडे कोणी व का केले? आणीबाणी कुणी आणली बरे!

अल्पसंख्यांकावर राग असायलाच हवा, कारण आजही त्यांचे धर्मपरिवर्तनाचे खेळ सुरूच आहे. स्त्रिया शिकल्या पण बुरखाधारी आणि हातात मेणबत्ती घेणाऱ्या आहेतच, मग देवळात नारळ फोडणाऱ्याही असणारच की. जावेद शबानाला नेमक कुठं टोचतंय व का? केतकर, जोशी, अरुण शौरी, सिद्धू, सिन्हा बंधूंच्या मताना किंमत ती काय? दक्षिणेला हिंदी, श्रीराम मान्य नाही, पण भ्रष्ट नेते अभिनेते मान्य? आता तरी त्यांनी एकसंध व्हावं. संघ, सावरकरांनी ब्रिटिशांना विरोध केला नाही, मग इतर महापुरुषांनी किती केला? सातशे वर्षे अत्याचार सहन करूनही ओवेसीला जवळ करायचं धोरण व ब्राह्मण विरोध का? ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ हे 1948 लाच संपलंय, मुसलमान कुठे त्याला मानतात. हमीदभाई दलवाई याविषयी काय म्हणत होते. धर्म, श्रद्धा व स्वामी विवेकानंदांचे विचारच देशाला पुढे नेतील, पण आज व आणखी वीस वर्षे मोदीविचाराची देशाला गरज आहे.

जाता जाता साधनाने चक्क रमेश पाध्येंचा मोदी कौतुकाचा लेख छापावा, वा छान व अभिनंदन.

द्वादशीवारांना नम्र विनंती- त्यांनी आता राहुलबाबावर लेख लिहावा. तोही काँग्रेसचा एक घोटाळाच आहे. काँग्रेसने बरंच केलंय हे मान्य. पण भ्रष्टाचार दिला, गावगुंड दिले, घोटाळे दिले, अरेरावी दिली. शिक्षणपद्धती बिघडविली. म्हणूनच भाजप हवाय.

चूकभूलसाठी क्षमस्व...

किशोर काकडे, बेळगाव

केवळ युवा अंकावर समाधान मानू नका

नेहमीच (इष्ट) विचार देणाऱ्या साधनाचा 20 जुलैचा अंक वाचला आणि तो नेहमीपेक्षा जास्तच आवडला. ‘काँग्रेसचा धोरणलकवा जाणार तरी कधी?’ (संपादकीय), ‘भारतात डाव्या पक्षांना भवितव्य आहे?’ (रामचंद्र गुहा), ‘देशाला काय हवे? विवेक की श्रद्धा?’ (सुरेश द्वादशीवार), ‘नुकत्याच संपलेल्या निवडणुका : एक वेगळा दृष्टिकोन’ (दत्तप्रसाद दाभोळकर), ‘हीच वेळ आहे लोकशाहीवर विश्वास व्यक्त करण्याची’ (आनंद करंदीकर) हे लेख विचार करायला लावणारे आहेत.

गुहांचा लेख वाचला आणि आशेचा अंधुक किरण दिसला. देशात आणि महाराष्ट्रात सरकार भले काँग्रेसचे असेल, पण आमच्या मूठभर समाजवाद्यांनी व कम्युनिस्टांनी शासनावर व जनमानसावर एके काळी नैतिक दबाव ठेवला होता हे कसे विसरता येईल? द्वादशीवार, दाभोळकर यांचे विचार साधना वाचकांपलीकडे पोहोचायला हवेत. या अंकात सर्वांत अप्रतिम लेख ‘कोणे एके काळी, एक देश/राष्ट्र’ (नयनतारा सहगल, अनुवाद- आ.श्री.केतकर). जेसन स्टॅनली आजच्या भारताच्या संदर्भातच बोलतो आहे असे वाटते. खूप वर्षांपूर्वी आयर्व्हिंग वॉलेसची ‘आर.डॉक्युमेंट’ ही कादंबरी वाचताना ‘आपण (त्या वेळच्या) भारतातील आणीबाणीबद्दल वाचत आहोत’ असे वाटले होते. नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून आयत्यावेळी नाकारण्याचा करंटेपणा आपण केला होता, बार्इंचे विचार किती प्रखर आहेत हे वाचकांना समजले असते. अर्थात तेव्हा बार्इंचे प्रत्यक्षात न झालेले भाषण साधनाने आवर्जून छापले होते.

साधनाने विचार देण्याचे काम असेल चालू ठेवावे, त्यासाठी शुभेच्छा, पण त्याबरोबरच हे विचार आजच्या युवक- युवतींकडे अधिक प्रमाणात पोहोचले पाहिजेत. केवळ युवा दिवाळी अंकावर समाधान न मानता, अधिक काही करण्याची आवश्यकता आज कधी नव्हे एवढी आहे.

लीलाधर घाडी, सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग

अक्षरश: शेंडाबुडी हादरून जायला झाले

‘इडा पीडा टळो’, ‘आलोक’ व ‘धुळपेर’ या पुस्तकांमधून ज्यांनी तळपातळीवरच्या अभावग्रस्त माणसांचे जगणे अधोरेखित केले, त्यांच्या प्रश्नांना ऐरणीवर आणले व व्यवस्थेला आपल्या लेखणीने वेळोवेळी भिडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्या आसाराम लोमटे यांनी ‘दुष्काळाने उसवलेले लोकजीवन’ हा साधनाचा 6 जुलैचा अंक केला आहे. एप्रिल महिन्यात त्यांचा लोकसत्तामध्ये ‘दुष्काळझळा : निवडणुकीच्या रंगीबेरंगी सतरंजीखाली दडवलेला कचरा’ हा लेख आला आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत दुष्काळही आहे, हे प्रकर्षाने जाणवायला लागले. तो लेख वाचताना मलाच नाही तर अनेकांना वाटले होते, यावर त्यांनी अजून लिहावे आणि तीच सर्वांची भावना जाणून कदाचित, साधनाच्या संपादकांनी श्री.लोमटे यांना हा अंक एकहाती करायला लावला असावा. त्यांचा तो निर्णय एका मौलिक दस्तऐवजाला आकार देणारा ठरला आहे.

आसाराम लोमटे यांनी ‘पर्जन्याआधीची पीडा’ या अंकाच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे- दुष्काळ हा काही केवळ अन्नधान्याचा, पाण्याचाच असतो असे नाही तर नियोजनाचा, धोरणांचा, राजकीय इच्छाशक्तीचा व मूलभूत अशा उपाययोजनांचाही असतो. हा अंक वाचल्यानंतर मला तर प्रकर्षाने जाणवले की, आपल्यात संवेदनांचा दुष्काळही मोठाच आहे. हंडाभर पाण्यासाठी जीव गमावणारी, आपल्या जितराबांना जगवण्यासाठी चारा छावण्यात राहणारी, दुष्काळाने चिमुकल्या जीवांना घेऊन विस्थापित वा स्थलांतरित आयुष्य जगणारी अनेक अनाम माणसे आणि त्यांच्या आयुष्याचे भोगवाटे वाचून अक्षरशः शेंडाबुडी हादरून जायला झाले.

आदिवासी, मेंढपाळ, पशुपालक, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, भूमिहीन शेतमजूर यांच्या जगण्यात स्वातंत्र्याच्या सातव्या दशकानंतरही काहीच फरक पडलेला नाही, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा नमूद झालेले आहे. जागतिकीकरणाच्या रेट्याने जगण्याचे सगळे संदर्भ बदलून गेले, पण जगण्याचा संघर्ष अधिक तीव्र होत गेलाय हेही तितकेच खरे आहे. महाराष्ट्राच्या चार मोठ्या दुष्काळी पट्‌ट्यांत प्रत्यक्ष जाऊन, तिथले दृश्य-अदृश्य वास्तव पाहून लोमटे यांनी हा जवळपास 50 पानांचा रिपोर्ताज लिहिला आहेत. शिवाय महाराष्ट्रातील विविधता, तेथील भू-जैविक वैशिष्ट्ये, अभावाचे, विवंचनेचे जग या साऱ्या सूत्रांना अपार व्याकूळ मानवतावादी दृष्टीने त्यांनी जोडले आहे.

माणूस म्हणून आपली ओळख पुसून टाकणाऱ्या या संभ्रमित संक्रमणाच्या काळात, परिघाबाहेरच्या व परिघावरच्या माणसांना केंद्रस्थानी ठेवून, त्यांच्याप्रती अपार निष्ठा ठेवणारे व त्यांच्या माणूसपणासाठी आपली लेखणी झिजवणारे आसाराम लोमटे हे आजच्या काळातील महत्त्वाचे लेखक आहेत. साधना चा हा अंक सर्वदूर जावो आणि गेंड्याची कातडी ओढलेल्या सर्व व्यवस्थांना संवेदनांची सचेतना प्राप्त होवो...!

ऋषिकेश गंगाधरराव देशमुख, लातूर

लढवय्यांच्या कहाण्या खचलेल्यांना मार्ग दाखवतील

6 जुलैच्या ‘साधना’तील आसाराम लोमटे यांचा दुष्काळाचा रिपोर्ताज पूर्ण वाचला. दुष्काळाचं हृदयद्रावक वास्तव लोमटेंनी समोर मांडलंय. हे ठळकपणे समोर येणं गरजेचं होतं. त्यांनी ते मूकवास्तव मुखर केलं. त्यांचं अभिनंदन. प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयार केलेला हा एक महत्त्वाचा दस्तावेज. आम्ही राहतो त्या बीड जिल्ह्याचे आणि त्यात पुन्हा आमच्या अंबेजोगाई तालुक्याचे चित्र याहून वेगळे नाही. अंकाच्या ‘आणि शेवटी... ’ लिहिताना ते दुष्काळाच्या आभाळ फाटलेपणावर निरनिराळ्या यंत्रणांचे प्रयत्न कसे फुटकळ आहेत हे अधोरेखित करतात.

दुष्काळ या भागाला नवीन नाही, अनेक वर्षांपासून आपण हे भोगत आहोत. सगळ्या राजकीय पक्षांच्या सरकारांची या प्रश्नाला सोडवण्याची ‘दुर्दम्य’ इच्छाशक्तीही आपण पाहतच आहोत. असलं चित्र कुणालाही खचवेल. मरण सोपं वाटावं असं जगणं कुणाला हवंय? मग जे या दुष्काळाविरुद्ध ठामपणे उभे आहेत, आपल्या परीने अनेक संस्थांच्या मदतीच्या पाठबळावर दुष्काळाशी दोन हात करत आहेत अशांच्यावरही काही ‘रिपोर्ताज’ करता येतील! लढवय्यांच्या अशा कहाण्या खचलेल्यांना मार्ग दाखवतील. त्यांच्या हाती पायी बळ साचेल.

पाणी प्रश्नावर पानी फाऊंडेशन, मानवलोक, ज्ञानप्रबोधिनी, डॉ.अविनाश पौळ, पोपटराव पवार, हनुमंत केन्द्रे अशा अनेकांनी मुलभूत आणि पथदर्शक कामे उभी केली आहेत. त्यांच्यासह त्या त्या गावातल्या लोकांनी अपार कष्ट करून दुष्काळाचा कडवा प्रतिकार केला आहे. काही गावांनी पाणी प्रश्नावर मात करून टँकरमुक्ती साधली आहे! ग्रामीण जनतेच्या या लढ्याची किंवा या कठोर साधनेची दखलही दुसऱ्या भागात ‘साधना’ने घ्यावी असं वाटतं.

नामदेव गुंडाळे, अंबाजोगाई, जि.बीड

त्या अहवालाच्या सार्वत्रिकीकरणाचा आग्रह धरायला हवा!

दि.6 जुलैचा अंक रिपोर्टाज्‌ म्हणून चांगला आहे, पण त्याने समाधान होत नाही. कारण दुष्काळाची वर्णने महाराष्ट्रभर सारखीच असणार, दाहकताही तीच असणार. तपशीलात बदल, अनुभव व्यक्ती परत्वे कमी-जास्त होतील. साधनासारख्या माध्यमातून हे अपेक्षित नाही. एकतर उपाययोजना किंवा सध्याच्या योजनांमधील फोलपणाबाबत 2004 साली राजकारणी आणि नोकरशाही यांच्यासाठी तिसरी फसल मराठवाड्याचा दुष्काळ असा एक अभ्यास झाला होता. तो पब्लिक इन्टेरेस्ट ॲडव्होकसी मुंबई यांनी अहवालरूपाने प्रसिद्ध केला होता. सध्या सरकार सोडून जे कोणी आपल्या पातळीवर प्रयत्न करीत असतील, त्यांनी त्याच्या सार्वत्रिकीकरणाचा आग्रह साधनाने धरायला हवा.

याबाबतीत काही प्रयोग खूप गाजले. पण छोटेछोटे व्यक्ती म्हणून केले गेलेले प्रयोग उजेडात आणले गेले पाहिजेत, अशी माझी साधनाकडून अपेक्षा. जटिल आहे हे पण अशक्य नाही.

देवीदास वडगावकर, उस्मानाबाद

समाजप्रबोधनासाठी डॉक्युमेंटेशन करावे

दि. 11 मेच्या साधना अंकात इतिहासाचे गाढे अभ्यासक रामचंद्र गुहा यांचा ‘सार्वत्रिक निवडणुका : पूर्वीच्या आणि आताच्या’ हा लेख वाचनीय आहे. 1951-52 मध्ये नोंदविलेली कमलनयन बजाज यांची निरीक्षणे 2019 मध्येदेखील तितकीच प्रस्तुत वाटतात. याचे कारण मी 1951-52 पासून आपल्या सार्वत्रिक निवडणुकांचा साक्षीदार आहे. 1951-52 मध्ये त्या वेळच्या इंटर आर्टसला शिकत होतो. 2019 मध्ये पार पडलेली सार्वत्रिक निवडणूक सतरावी असून, यापूर्वीच्या 16 निवडणुकांसंबंधीची निरीक्षणे साधनातून यावीत. वाचकांना त्याचा संदर्भासाठी उपयोग होऊ शकेल. समाजप्रबोधनासाठी असे डॉक्युमेंटेशन उपयुक्त ठरू शकेल.

दत्तात्रय कुलकर्णी, पुणे