Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

साहित्य महामंडळाने ठाम राहावे!

उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. ही निवड अखिल भारतीय साहित्य महामंडळाने एकमताने केली असे जाहीर झाले आहे. अन्य काही नावे चर्चेत होती, परंतु फादर दिब्रिटो यांच्या नावावर सहमती झाली हे दोन कारणांनी विशेष महत्त्वाचे आहे. एक म्हणजे दिब्रिटो यांचे साहित्यात पुरेसे योगदान आहे, याबाबत महामंडळ सदस्यांच्या मनात शंका नाही. दुसरे म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद), विदर्भ साहित्य संघ (नागपूर), मुंबई मराठी साहित्य संघ (मुंबई) या चार प्रमुख घटकसंस्था आणि त्यांच्या उपघटकसंस्था यांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन एखाद्या नावावर सहमती दाखवणे असे योग दुर्मिळ राहिले आहेत. दहा-वीस वर्षांनी असे योग येत राहिले आहेत. अर्थातच त्यात ती व्यक्ती तेवढी स्पृहणीय व आदरणीय असणे आवश्यक असते, हा एक भाग झाला तरी, साहित्यिक म्हणून काही एक निश्चित योगदान अपेक्षित असतेच.

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणूकप्रक्रिया राबवून निवडला जावा, ही काही दशकांची परंपरा मोडीत काढून गेल्या वर्षीपासून, संमेलन अध्यक्षाची निवड महामंडळाच्या सदस्यांनीच करावी अशी दुरुस्ती करण्यात आली. ही नवी प्रक्रिया किती योग्य व किती अयोग्य यावर मतमतांतरे आहेत. पण दोन्ही पर्यायांमध्ये काही चांगले व काही वाईट भाग आहेत, यावर सर्वसाधारण एकमत आहे. त्यामुळेच नवी पद्धत अधिक योग्य आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी महामंडळाची म्हणजेच त्यांच्या घटक व उपघटक संस्थांची आहे. ते सिद्ध करण्याचा पहिला मार्ग म्हणजे सर्वार्थाने योग्य व्यक्तीची निवड करणे. दुसरा मार्ग ती निवड एकमताने झालेली असो वा बहुमताने, त्या अध्यक्षाचा सन्मान राखला जाईल याची काळजी घेणे. म्हणजे अध्यक्षाच्या मागे ठामपणे उभे राहणे. कारण आपण लोकशाही पद्धतीने मराठी साहित्याचा दूत म्हणून त्या वर्षीसाठी ती निवड केलेली असते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या आतापर्यंतच्या अध्यक्षांच्या नावावर नजर टाकली तर, प्रकर्षाने हे जाणवेल की चार दोन अपवाद वगळता त्या निवडी चुकीच्या होत्या असे म्हणता येणार नाही. हो, यांच्यापेक्षा अधिक चांगली नावे त्या वर्षी होती की, असे काहींच्याबाबत जरूर म्हणता येईल, पण त्यांचे साहित्यात काहीच योगदान नसताना ते निवडले गेले असे म्हणता येणार नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, कितीही टीका होत असली तरी, अ.भा. म.सा. संमेलन हे मोठ्या आकर्षणाचे केंद्र अद्यापही आहे. किंबहुना तसे ते आहे म्हणूनच त्या निमित्ताने वादसंवाद दरवर्षी झडत असतात.

साहित्य महामंडळाने आपले हे बलस्थान लक्षात घेऊन ते अधिक बळकट करायला हवे. नव्या प्रक्रियेनुसार गेल्या वर्षी अरुणा ढेरे आणि या वर्षी फादर दिब्रिटो यांची निवड करून साहित्य महामंडळाने चांगले काम केले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या संमेलनाच्या उद्‌घाटक नयनतारा सहगल यांचे आमंत्रण मागे घेतले होते, तेव्हा साहित्य महामंडळाने कच खाल्ली होती. महामंडळाच्या अध्यक्षांनी जरा उशीरा का होईना राजीनामा दिला होता, पण तरीही महामंडळाने त्या चुकीची दुरुस्ती केली नव्हती. या वर्षी फादर दिब्रिटो यांच्या निवडीमुळे काही मूठभर लोक विक्षेप आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे लक्षात घेता महामंडळाने दिब्रिटोंच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे!

काल-परवा

गांधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : काही ऐतिहासिक नोंदी

रामचंद्र गुहा

फ्रेंच लेखक ला रॉशफुको याने अतिशय योग्यपणे दांभिकतेची परिभाषा केली आहे. त्याच्यामते दांभिकता म्हणजे ‘अनैतिकने नैतिकतेला केलेले अभिवादन’ असते. 2 ऑक्टोबर रोजी भारतीयांना या म्हणीचा चांगल्याच प्रकारे सहउदाहरण प्रत्यय येईल. कारण या दिवशी ज्या संघाने त्यांच्या हयातीत गांधींचा तिरस्कार आणि त्यांचा दुष्ट प्रचार केला, त्याच संघाचे प्रचारक राहिलेल्या पंतप्रधानांपासून तर संघाचे इतर सर्व लहान-मोठे नेते महात्मा गांधीची महती गातील. संघ सार्वजनिकरीत्या गांधींची कितीही वाहवाह करत असला तरी आजदेखील संघाच्या मनात गांधींविषयी खोलवर अढी आहे. याचे कारण असे आहे की, ‘गांधी एक अशी व्यक्ती होती ज्यांनी भारत हे हिंदू राष्ट्र नसून इथे इतर धर्मीयांचादेखील समान हक्क आहे, या एकाच तत्त्वासाठी आपले उभे जीवन (आणि मृत्यू) समर्पित केले होते.’

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीला काहीच दिवस शिल्लक असताना हा स्तंभ प्रकाशित होत आहे. पूर्वी संघ प्रचारक राहिलेली व्यक्ती आज देशाच्या पंतप्रधानपदी आहे. आपल्या राजकीय व सामाजिक जीवनावर संघाने पूर्ण पकड मिळवली आहे. या पार्श्वभूमीवर ही जयंती साजरी होणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधांनांकडून आणि संघाशी संबंधित व्यक्तींकडून गांधींविषयी चांगल्या चांगल्या गोष्टी बोलल्या जातील आणि त्यामुळेच महात्मा गांधी हयात असताना, त्यांचे आणि संघाचे संबंध कशा प्रकारचे होते याविषयीचा ऐतिहासिक लेखा-जोखा मांडून वाचकांना सतर्क करणे आवश्यक आहे.

संघाविषयीचा पहिला उल्लेख महात्मा गांधी समग्र साहित्याच्या 87 व्या खंडात येतो. 1947 मधील एप्रिलचा महिना होता. हिंदू-मुस्लिम एकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनासभेत गांधी म्हणाले की, संघाकडून त्यांना एक पत्र प्राप्त झाले आहे. गांधींच्या प्रार्थनासभेत कुराण आणि गीतेतील ओळी एकत्रित म्हणण्याच्या प्रथेविरोधात नुकत्याच करण्यात आलेल्या आंदोलनात आपला काहीच संबंध नसल्याचे संघाने या पत्राद्वारे कळवले आहे. संघाचा हा नकार ऐकून गांधींना आनंदच झाला. या प्रार्थनासभेत गांधी पुढे म्हणाले की, ‘कोणतीही संघटना जोपर्यंत पूर्णपणे पारदर्शक व्यवहार करत नाही तोपर्यंत मानवी जीवन अथवा धर्म यापैकी कशाचेही ती रक्षण करू शकत नाही.’ 1947 च्या सप्टेंबर महिन्यात गांधी नवी दिल्ली येथे संघाच्या काही कार्यकर्त्यांना भेटले.

यावेळी गांधी त्यांना म्हणाले, ‘आपणास खरोखरच समाजासाठी उपयुक्त कार्य करायचे असल्यास, त्याग भावनेला शुद्ध हेतू व खऱ्या ज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे.’ मुस्लिमांविषयी संघाचे मत फारसे चांगले नसल्याची बातमी एव्हाना गांधींपर्यंत पोहोचलीच होती. हिंदू धर्माचे स्वरूप मर्यादित नाही, हिंदूंना इस्लामशी वैरभाव ठेवण्याचे काहीच कारण नाही अशी त्यांची ठाम श्रद्धा होती. संघाच्या ताकदीचा वापर एकतर भारताच्या हितासाठी केला जाऊ शकतो अथवा अहितासाठी केला जाऊ शकतो, असे गांधीजींना वाटत होते. गांधी त्या काळी संघाबाबत द्विधा मन:स्थितीमध्ये होते. संघाचा मात्र त्यावेळीही गांधींवर प्रचंड अविश्वास होता पार्श्वभूमीवर. सप्टेंबर 1947 मध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये होत असलेल्या हिंसेला रोखण्यासाठी गांधी कलकत्त्यामध्ये उपोषणास बसले. शांती स्थापित करण्यासाठी गांधींनी सुरू केलेल्या प्रयत्नांची संघाच्या ‘ऑर्गनायझर’ या मुखपत्रातून, ‘जेव्हा रोम जळत होते तेव्हा निरो फिड्‌ल वाजवत होता’ अशा शब्दात खिल्ली उडवली गेली.

ऑर्गनायझरच्या या लेखात पुढे म्हटले गेले, ‘आपल्यासमोर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. तिकडे पंजाब आणि इतर ठिकाणी इस्लामच्या नावे आणि अल्लाहू अकबरचा नारा देत अत्यंत निर्दयी आणि निर्लज्जपणे अत्याचार केले जात आहेत; तर इकडे महात्मा गांधी इस्लामची वाहवाह करत आहेत. स्वतः अल्लाहू अकबरचा नारा देत इतर हिंदूंनादेखील तसेच करण्याचा ते सल्ला देत आहेत.’ कलकत्त्यामधील गांधींच्या उपोषणाने हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांना शरमेने मान खाली घालून आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले होते.

एका सत्त्याहत्तर वर्षांच्या वृद्धाने विश्वास व अहिंसा या तत्त्वांच्या नैतिक बळावर आपापसात लढणाऱ्या दोन समुदायांमध्ये शांती प्रस्थापित केली होती. यानंतर गांधी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीला पोहोचून तिथे राहणाऱ्या मुस्लिमांना सुरक्षेची खात्री देऊन त्यांना भयापोटी दिल्लीतून पळ काढण्यापासून रोखणे हा गांधींचा उद्देश होता. 9 सप्टेंबर रोजी गांधी दिल्लीला पोहोचले. येथे त्यांची भेट सरसंघचालक गोळवलकरांसोबत झाली. गोळवलकर म्हणजे धीरगंभीर भासणारे दाढी वाढवलेले गृहस्थ होते. नाझींच्या वेडगळ वांशिक शुद्धीच्या संकल्पनेची, ‘हिंदुस्थानातील आपल्या सर्वांसाठी एक चांगला धडा ज्यापासून आपण बोध घेऊन त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे’ अशा शब्दात त्यांनी प्रशंसा केली होती.

गांधी आणि गोळवलकर यांच्यामध्ये झालेल्या या भेटीचा वृत्तांत महात्मा गांधींच्या समग्र साहित्यात आला आहे. 12 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी आंतरधर्मीय प्रार्थना सभेत बोलले. या भाषणाच्या वृत्तांताचा शेवट या परिच्छेदाने होतो- ‘गांधींजीनी यावेळी डॉ.दिनशॉ मेहता यांच्या सोबतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुंबरोबर झालेल्या संभाषणाचा दाखला दिला. गांधीजींना सांगण्यात आले होते की, संघाचे हातदेखील रक्ताने माखलेले होते. मात्र यात काहीच तथ्य नाही, असे सांगत गुरुजींनी गांधीजींना आश्वस्त केले.

संघ कुठल्याही मनुष्याचा शत्रू नाही. मुस्लिमांच्या हत्येचे संघ समर्थनही करत नाही. आपल्या सर्व क्षमतेनिशी हिंदुस्थानाचे रक्षण करणे हाच त्यांच्या संघटनेचा उद्देश होता. ते स्वतः शांतीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी गांधीजींना आपले हे विचार सार्वजनिक करण्यास सांगितले होते.’ गोळवलकरांनी गांधीजींना जे सांगितले त्यात अजिबात तथ्य नव्हते. संघ आणि त्यांचे नेते मुस्लिमांचा अतिशय तिरस्कार करत होते. गांधींच्या चरित्रावर काम करत असताना मी सप्टेंबर 1947 ते जानेवारी 1948 या निर्णायक महिन्यांतील दिल्ली पोलिसांची कागदपत्रे तपासली. त्यात मला संघाच्या अनेक बैठकांचे संदर्भ सापडले. त्यांमध्ये मुस्लिमांची आणि गांधींची अत्यंत विखारी भाषेत टीका करण्यात आली होती.

ऑक्टोबरमधील संघाच्या एका बैठकीबाबतच्या पोलीस अहवालात पुढील गोष्ट नमूद करण्यात आली होती- ‘संघ कार्यकर्त्यांनुसार, दिल्लीमध्ये काही दिवस अगोदर चालवली गेली होती, त्या प्रकारची मुस्लिमांच्या शिरकाणाची आणखी एक मोहीम चालवली गेली तरच भारतातील मुस्लिम भारत सोडतील. संघ कार्यकर्ते गांधीजींच्या दिल्ली प्रस्थानाच्या प्रतीक्षेत होते. कारण जोपर्यंत गांधीजी दिल्लीमध्ये होते तोपर्यंत संघ कार्यकर्त्यांना आपली योजना पूर्णत्वास घेऊन जाता येत नव्हती.’ अशा प्रकारचे पोलीस अहवाल गांधीजींच्या वाचण्या-पाहण्यात आले नसणार. मात्र संघ आणि त्यांचे नेते (भेटीदरम्यान आपल्याशी) खोटे बोलत होते याची माहिती गांधीजींना आपल्या स्रोतांपासून मिळाली असेलच. 15 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीसमोर त्यांनी अतिशय उद्‌बोधक भाषण दिले. यात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांना काँग्रेसच्या मूलभूत तत्त्वांशी एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला. ज्या तत्त्वासाठी काँग्रेसने गेली 60 वर्षे कष्ट घेतले होते, त्या हिंदू-मुस्लिम एकतेसाठी लढत राहण्यास सांगितले. मुस्लिमांना भारतात सुरक्षित वाटावे यासाठी शक्य असतील ते सर्व प्रयत्न करावेत असे त्यांनी आपल्या पक्ष सहकार्यांना बजावले होते. ‘हिंसक दंगेखोरीने’ हिंदू किंवा शीख, यांपैकी कुठल्याच धर्माचे रक्षण होऊ शकणार नाही’ अशी टिप्पणी त्यांनी या वेळी केली होती.

गांधी पुढे म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी अनेक गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत. या सर्व घडामोडींमागे संघाचा हात आहे, असे मी ऐकले आहे. पण जनमतात नेहमीच हजार तलवारींपेक्षा अधिक बळ असते याचा आपणाला विसर पडत कामा नये. हिंदू धर्माचे रक्षण काही हिंसक तांडवाच्या बळावर होऊ शकत नाही. तुम्ही आता स्वतंत्र आहात. या स्वातंत्र्याचे रक्षण आता तुम्हालाच करावे लागणार आहे. इतरांसोबत अधिक मानवतेने वागून आणि नेहमी सतर्क राहून येणाऱ्या संकटांना अधिक धैर्याने गेलात तरच या स्वातंत्र्याचे तुम्ही रक्षण करू शकाल. अन्यथा एक दिवस असा येईल जेव्हा तुम्हाला स्वातंत्र्याचे हे सुंदर बक्षीस तुमच्या हातातून निसटून जाईल आणि तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल. असा दिवस कधीच न येवो अशी मी आशा करतो.’ दुसऱ्या दिवशी आपल्या नियमित प्रार्थनासभेत गांधी म्हणाले की, ‘धार्मिक ध्रुवीकरण मुस्लिम लीगकडून तर घडवून आणले जात आहेच. परंतु दुसरीकडे हिंदू महासभा आणि त्यांच्या सहकाऱ्यास असलेले संघ कार्यकर्तेदेखील आहेत. भारतामधून मुस्लिमांना हाकलून लावण्यात यावे अशी या मंडळींची इच्छा आहे.’

गांधीजींना संघाबाबत आता मात्र कोणताच संभ्रम राहिला नव्हता. गांधींबाबतचा संघाचा तिरस्कारदेखील आणखीच वाढला होता. पाकिस्तानात हिंदू आणि शीख समुदायावर जो प्रसंग आला होता तशी वेळ स्वतंत्र भारतातच राहण्याचा निर्णय घेणाऱ्या मुस्लिमांच्या वाट्याला येऊ नये आणि त्यांना समान अधिकार आणि नागरिकत्वाचे हक्क दिले जातील, या बाबतीत गांधी आग्रही होते. गांधींबद्दलच्या तिरस्काराचे हे प्रमुख कारण होते. डिसेंबर 1947 च्या पहिल्या आठवड्यात सरसंघचालक गोळवलकर यांनी संघाच्या एका सभेला संबोधित केले. त्यात मुस्लिमांना उद्देशून त्यांनी म्हटले, ‘जगातील कोणतीच ताकद मुस्लिमांना हिंदुस्थानात थांबवू शकत नाही. त्यांना हा देश सोडून जावेच लागेल. मुस्लिमांच्या मताचा काँग्रेसला निवडणुकीत फायदा व्हावा केवळ यासाठीच गांधीजी मुस्लिमांना भारतात ठेवू इच्छितात. परंतु तोपर्यंत भारतात एकही मुस्लिम शिल्लक राहणार नाही. महात्मा गांधी संघाची आणखी दिशाभूल करू शकत नाही. आमच्याकडे असे उपाय आहेत ज्याने अशा व्यक्तींना लागलीच शांत केले जाऊ शकते, परंतु हिंदूंना अपाय पोहोचवण्याची आमची अजिबातच परंपरा नाही. परंतु आमच्यावर अशी वेळ आणली गेली, तर मात्र या पर्यायाचा अवलंब आम्हाला करावा लागेल.’

जानेवारीमध्ये गांधी दिल्ली येथे उपोषणास बसले आणि कलकत्त्याप्रमाणेच दिल्लीतदेखील उपोषणाद्वारे हिंदू आणि मुस्लिमांच्या दरम्यान शांती प्रस्थापित करण्यात त्यांना यश आले. यानंतर पाकिस्तानातील हिंदू आणि शीख समुदायाच्या सुरक्षेची हमी घेण्यासाठी पाकिस्तानात जाण्याचे त्यांचे नियोजन होते. परंतु 30 जानेवारी रोजीच गांधींना संघाचा कार्यकर्ता राहिलेल्या नथुराम गोडसेने कायमचे शांत केले. लागलीच संघावर बंदी आणली गेली आणि सरसंघचालकांसोबत अनेक संघ नेत्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

गोळवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉटस’ हे पुस्तक म्हणजे संघाचे बायबल. 1966 मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक म्हणजे गोळवलकरांच्या संभाषण आणि भाषणांचे संकलन आहे. आपल्या संकल्पना आणि पूर्वग्रह यांचे सार म्हणजे अशी पुस्तके. कम्युनिस्टांमध्ये ‘कम्युनिस्ट मॅनिफिस्टोचे’ जे स्थान आहे अगदी तेच स्थान संघामध्ये गोळवलकरांच्या या पुस्तकाचे आहे. गोळवलकर गांधींना (आपल्या भेटीदरम्यान) म्हणाले होते की, ‘त्यांचे संघटन कोणत्याच मनुष्याचा शत्रू नव्हते.’ ही बाब विशेष असली तरी असत्य होती. आपल्या पुस्तकात गोळवलकरांनी राष्ट्राचे तीन प्रमुख अंतर्गत शत्रू स्पष्टपणे नमूद केले होते. या तीन अंतर्गत शत्रूंच्यामुळे कथितपणे भारताच्या राष्ट्र-सुरक्षेला बाधा पोहोचणार होती, असे त्यांना वाटत होते की- सरसंघचालकांच्या मतानुसार हे तीन अंतर्गत शत्रू म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट होते.

फाळणीच्या वीस वर्षांनंतरदेखील गोळवलकर मुस्लिमांच्या बाबतीत अतिशय भयशंका बाळगून होते. (कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत) त्यांनी भारतात असंख्य ‘छोटे पाकिस्तान’ वसलेले आहेत अशी टिप्पणी केली होती. सतराव्या शतकातील फ्रेंच लेखक ला रॉशफुको याने दांभिकतेची अचूक व्याख्या केली आहे. त्याच्यामते दांभिकता म्हणजे ‘अनैतिकतेने नैतिकतेला केलेले अभिवादन’ असते. दि.2 ऑक्टोबर रोजी भारतीयांना याचे सोदाहरण प्रत्यय येईल. ज्या संघाने तहहयात गांधींचा तिरस्कार आणि त्यांच्याविषयी दुष्प्रचारच केला, त्याच संघाचे प्रचारक राहिलेल्या पंतप्रधानांपासून तर संघाचे इतर सर्व लहान-मोठे नेते महात्मा गांधीची या दिवशी महती गाऊ लागतील. संघ सार्वजनिकरित्या गांधींची कितीही वाहवाह करत असला तरी संघाच्या मनात आजदेखील गांधींविषयी खोलवर अढी आहे. कारण, गांधी एक अशी व्यक्ती होती- जिने भारत हे हिंदू राष्ट्र नसून इथे इतर धर्मीयांचादेखील समान हक्क आहे, या एकाच तत्त्वासाठी आपले उभे जीवन (आणि मृत्यू) समर्पित केले होते.

(अनुवाद : साजिद इनामदार)

रामचंद्र गुहा, बेंगळुरू

जवाहरलाल नेहरु । 28

नेहरूंची अखेर

सुरेश द्वादशीवार

नेहरूंच्या मृत्यूचे वृत्त सर्वत्र वाऱ्यासारखे पसरले. काही क्षणांतच तीन मूर्ती भवनाचे आवार आणि व्हरांडे शोकाकुल स्त्री-पुरुषांच्या गर्दीने भरून गेले. टी.टी. कृष्णम्माचारी आणि जगजीवन राम हे मंत्री प्रथम आले. पाठोपाठ सारे मंत्रिमंडळही आले. तेवढ्या शोकाकुल अवस्थेतही तीन मूर्ती भवनाच्या प्रमुख दालनात मंत्रिमंडळाची तातडीची बैठक झाली आणि तीत गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांची हंगामी पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. देश दु:खात बुडाला आणि जग काळजीने अंधारले. देशोदेशीचे अध्यक्ष, पंतप्रधान. नेते, विद्वत्‌जन, लेखक व नामांकित लोक दिल्लीला आले. देशातून जनौघ आला. अंधार पडू लागताच नेहरूंचे शव तीन मूर्ती भवनाच्या खालच्या दालनात जनतेच्या दर्शनासाठी आणले गेले. आता ते फुलांच्या पाकळ्यांनी झाकले होते. सारी रात्र लोक येत होते आणि आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचे अभिवादन करीत होते.

काँग्रेस पक्षाने 2 फेब्रुवारी 1959 रोजी इंदिरा गांधींची आपल्या अध्यक्षपदी निवड केली. तेव्हा प्रत्यक्ष नेहरूंनीच त्यांच्या निवडीचा घाट घडवून आणला, अशी टीका अनेकांनी केली. ती तशी होणे स्वाभाविकही होते. प्रत्यक्षात त्या निवडीवर नेहरू मनातून नाखूश होते. तोपर्यंतचे पक्षाचे अध्यक्ष गुजरातचे उच्छ्रंगराय ढेबर हे निवृत्त झाले होते आणि त्यांच्या जागेवर दक्षिणेतील एका ज्येष्ठ नेत्याची निवड व्हावी, असे पक्षातील अनेकांसोबतच नेहरूंच्याही मनात होते. त्यासाठी तेव्हा मद्रासचे अर्थमंत्री सी. सुब्रह्मण्यम यांचे नाव अनेकांसमोर होते. परंतु त्यांना आपल्या मंत्रिमंडळातून जाऊ द्यायला मुख्यमंत्री के.कामराज तयार नव्हते. शिवाय आपण हाती घेतलेली कामे अर्धवट सोडून पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायला सुब्रह्मण्यमही राजी नव्हते.

अनेक नावे त्या पदासाठी तेव्हा पुढे आली; पण अध्यक्षपद, पक्ष व सरकार यांच्यात एकवाक्यता आणि संवाद राखू शकेल, असे नाव पक्षाला हवे होते. तेव्हा केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी इंदिरा गांधींचे नाव त्यासाठी सुचविले. त्याआधी अर्थातच त्यांनी त्याला नेहरूंची नाइलाजाची संमती मिळवली होती. ‘‘मी पंतप्रधान असताना इंदिराने पक्षाध्यक्ष व्हावे, हे फारसे चांगले नाही’’ असे ते जाहीररीत्या तेव्हा म्हणालेही. स्वत: इंदिरा गांधीही ते पद घ्यायला फारशा उत्सुक नव्हत्या. त्यांचे पती फिरोज गांधी आणि त्यांच्यात दुरावाही येत होता. मुले शिकत होती आणि प्रत्यक्ष नेहरूंची व त्यांच्या तीन मूर्ती भवन या निवासस्थानाची सारी जबाबदारीही त्यांच्यावर होती.

पंतांनी त्यांचे मन वळविले व त्यांना ते पद घ्यायला लावले. त्या वेळी मात्र नेहरू म्हणाले, ‘‘इंदिरा माझी मुलगी आहे. स्वाभाविकच माझे तिच्यावर प्रेम आहे. तिच्या कार्यक्षमतेवर माझा विश्वास आहे. ती सुस्वभावी व सत्यप्रिय आहे. हे गुण तिने बहुधा तिच्या आईकडून घेतले असावेत.’’ इंदिरा गांधींची अध्यक्षपदाची कारकीर्द अवघी अकरा महिन्यांची. पण ती प्रचंड घडामोडींनी भरलेली व त्यांच्या कार्यशक्तीची परीक्षा घेणारी ठरली. नेहरू म्हणाले, ‘‘आरंभी ती माझी सल्लागार व मैत्रीण होती. आता ती माझी नेता झाली आहे.’’ पक्षाच्या एका बैठकीत दक्षिणेतील एक प्रतिनिधी त्यांचे म्हणणे मांडत असताना नेहरू अस्वस्थ होऊन उभे राहिले व त्यांना थांबवीत बोलू लागले, तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांनाही आपल्या अध्यक्षपदाचा हिसका दाखवून त्यांना खाली बसायला लावले आणि ‘त्या प्रतिनिधींचे म्हणणे सभागृहाला ऐकू द्या’ असा दमच त्यांनी नेहरूंना दिला.

त्याआधीही 1954, 56 व 58 या तीन वर्षांत त्यांनी नेहरूंना पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली होती. सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. अनेक मंत्र्यांविरुद्ध तशा तक्रारी वृत्तपत्रातून प्रकाशित होत होत्या. स्वत: फिरोज गांधीही अशा मंत्र्यांचे चेहरे लोकांसमोर आणत होते. (त्या आधी मंत्र्यांसाठी आचारसंहिता असावी, असा एक ठराव आचार्य शंकरराव देव यांनी 1950 च्या सुमारास काँग्रेसच्या अधिवेशनात आणला होता. त्याला विरोध करीत नेहरू म्हणाले होते, ‘‘ज्यांनी देशासाठी आठ-आठ आणि दहा-दहा वर्षे तुरुंगात काढली, त्यांच्या निष्ठांविषयी संशय घेणे वा त्याची अशी वाच्यता करणे अनाठायी आहे.’’ परिणामी, तो ठराव मागे घेतला गेला आणि आता नेहरूंवरच त्यांच्या सहकाऱ्यांच्या ‘तशा’ बाजूने उभे राहण्याची वेळ आली होती.) त्यांनी 1958 मध्ये त्यांचा राजीनामा जाहीरही केला.

तेव्हा इंदिरा गांधींनी घरातल्या घरातच त्यांना सविस्तर पत्र लिहून ‘आता मागे सरू नका’, असे बजावले होते. राजीनामा जाहीर करणे व मग तो मागे घेणे हा प्रकार हास्यास्पद ठरणारा आहे, असे त्या पत्रात त्यांनी लिहिले होते. त्यांनी जगभरचा प्रवास केला होता. ज्या देशांना सहसा कुणी भेटी देत नाही, ते देशही त्यांनी पाहिले होते. त्यांतील नेत्यांशी संपर्क साधला होता. सामान्य माणसांशी व विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रियांशी बोलणे त्यांना आवडत होते. हीच माणसे आपली परंपरा व संस्कृती टिकविणारी आहेत, असा विश्वास त्यांना होता. आपल्या प्रत्येकच पत्रपरिषदेत ‘देशाची गरिबी दूर करणे हा आपला अग्रक्रमाचा कार्यक्रम असला पाहिजे’, असे त्या म्हणत.

त्यांची अध्यक्षीय कारकीर्द खरी गाजली ती त्यांनी केरळातील कम्युनिस्टांचे सरकार घालविले तेव्हा. त्या पक्षाने 1957 च्या निवडणुकीत कॉ. एस.नम्बुद्रीपाद यांच्या नेतृत्वात तेथे बहुमत मिळविले होते. त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली होती. मात्र ते सरकार अधिकारारूढ होताच त्याने केरळचा जुना शालेय अभ्यासक्रम बदलण्याचा आणि त्यात मार्क्स, लेनिन, साम्यवाद व डावा विचार आणण्याचा विचार जाहीर केला. देशाच्या एकूण शैक्षणिक धोरणाला हा प्रादेशिक फाटा होता व तसे होणे देशाच्या एकात्म व निकोप वाढीला मारक ठरले असते. त्यामुळे ते सरकारच बरखास्त करा, असा आग्रह इंदिरा गांधींनी गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्याकडे धरला. परंतु जनतेने निवडलेले सरकार असे घालविता येणार नाही, असे सांगून त्यांनी तसे करायला नकार दिला. नंतर तोच आग्रह त्यांनी पंतप्रधानांकडे केला. त्यांनीही त्यांचा नकार त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितला, तेव्हा इंदिरा गांधींनी थेट राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत आपली मागणी पोहोचवली.

या काळात इंदिरा गांधींनी केरळला भेट देऊन तेथील वातावरणाची पाहणी केली. त्यांचा अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष नेहरूच त्रिवेंद्रमला गेले. तेथील वातावरणातले अस्वस्थपण व त्यात वाढलेली राजकीय तेढ पाहून त्यांनीच नम्बुद्रीपादांना नव्याने निवडणुका घेण्याचा सल्ला दिला. तो त्यांच्या पक्षाने मनावर घेतला मात्र नाही. इंदिरा गांधींचे पती फिरोज हे डाव्या विचारांचे होते व कम्युनिस्ट पक्षात त्यांचे निकटचे मित्रही होते. इंदिरा गांधींच्या या कारवाईवर ते संतापले होते. त्या वेळी ‘‘तुझ्याशी लग्न करताना मी जसे साऱ्यांचे वैर घेतले, तसे या प्रश्नावर मी तुझ्याशीही भांडण पत्करेन’’ असे इंदिरा गांधींनी त्यांना स्पष्टपणे ऐकविले. हळूहळू त्यांच्या मागणीमागे त्यांचा पक्ष व लोकमतही उभे होऊ लागले. परिणामी, नेहरू व पंत यांचा नाइलाज होऊन त्यांनी नम्बुद्रीपादांचे सरकार बरखास्त केले. त्यासाठी काँग्रेसवर देशात व विदेशातही बरीच टीका झाली. विशेषत: रशियन राज्यकर्ते फार नाराज झाले. पण इंदिरा गांधी खंबीरच राहिल्या. नेहरूंसोबत तीन मूर्ती भवनात राहिल्याने त्यांना पंतप्रधानपदाचे काम आणि देशाचे राजकारण असे सारेच अवगत होते. नेहरूंसोबत त्या सरकारी दौऱ्यावरही जात. त्यामुळे त्यांना जगाचे नेते, त्यांचे स्वभाव, धोरण आणि राजकारण यांचीही पुरेशी माहिती होती. बांडुंग येथे भरलेल्या तटस्थ राष्ट्रांच्या परिषदेलाही त्या नेहरू, नासेर, टिटो आणि चौ एन लाय यांच्यासोबत हजर होत्या. राजकारणाची शिकवणूक त्यांना लहानपणापासूनच मिळाली होती. नंतरच्या काळात त्या जगाचेही राजकारण आत्मसात करीत गेल्या. त्यांचे धाडस, धिटाई, प्रसंगी समोरच्याशी लढत देण्याचे बळ याही गोष्टी लक्षणीय होत्या...

त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात या साऱ्याचा अनुभव देश व जगालाही आलाच. हा काळ त्यांनी नेहरूंना दिलेल्या आधाराचाही होता. चीनच्या आक्रमणानंतर नेहरू मनाएवढेच देहानेही खचले होते. त्यांच्या चालण्यात दोष आला होता. परिणामी, देशात ‘नेहरूंनंतर कोण?’ या प्रश्नाची प्रथम हळू आवाजात व पुढे वृत्तपत्रांतून चर्चा सुरू झाली. पक्षात अनेक नावे पुढे होती. त्यात मोरारजी देसाई होते, लालबहादूर शास्त्री होते, पटनायक होते आणि यशवंतराव चव्हाणही होते. मात्र त्याच वेळी पक्षाच्या एका मोठ्या गटात इंदिरा गांधींच्या नावाचीही चर्चा होती. त्याविषयी पत्रपरिषदेत नेहरूंना विचारणा करण्यापर्यंत पत्रकारांची मजल गेली होती. अशाच एका पत्रपरिषदेत एकाने त्यांना विचारले, ‘‘तुमचा वारसदार कोण असेल?’’ त्यावर एका क्षणाचाही विचार न करता नेहरू म्हणाले, ‘‘मी आणखी अनेक दिवस जगणार आहे.’’ त्या उत्तरावर पत्रपरिषदेत टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मात्र हे नेहरूंच्या जीवनातील मावळतीचे दिवस होते. प्रकृती ढासळत होती. चालण्याचा त्रास सुरू झाला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांची स्वत:चीच जीवनेच्छा मंदावत चालली होती. विजयालक्ष्मींनी त्यांना एकदा विश्रांतीचा सल्ला या काळात दिला. त्यावर ‘‘कशासाठी? पुन्हा बळ मिळवायचे ते तरी कशासाठी?’’ असे उत्तर नेहरूंनी दिले.

हळूहळू त्यांचा दैनंदिन व्यवहाराशी व राजकीय वातावरणाशीही संबंध कमी होत गेला. नेमक्या त्या काळात देशात झालेल्या लोकसभेच्या तीन पोटनिवडणुकांत आचार्य कृपलानी, डॉ.राममनोहर लोहिया आणि दीनदयाळ उपाध्याय हे त्यांचे कडवे टीकाकार निवडून आले. ‘मी या पहाडाला भेग पाडून दाखवीनच’, अशी डॉ.लोहियांची प्रतिज्ञा होती. ते समाजवाद्यांचे, कृपलानी कृषक प्रजा पार्टीचे तर उपाध्याय हे जनसंघाचे प्रतिनिधी होते. त्या तिघांनी नेहरूंविरुद्ध संसदेत व देशात एक जोरदार प्रचारमोहीमच उघडली. नेहरू व त्यांचे पंतप्रधानपद हे त्यांच्या टीकेचे एकमेव लक्ष्य होते. तशातच काँग्रेसमधील तरुणांचा वर्ग ‘नव्या रक्ताला वाव द्या’, अशी मागणी करीत संघटित होत होता. काहींच्या मते, या गटाला इंदिरा गांधींचीही साथ होती. नेहरूंच्या मंत्रिमंडळातील अनेक जण भ्रष्टाचार व ढिसाळपणाच्या आरोपाने आता ओळखले जात होते. या साऱ्या वर्गांची मागणी लक्षात घेऊन व पक्षात आलेल्या स्थितिवादाची दखल घेऊन प्रत्यक्ष नेहरूंनीच मग कामराज यांच्या मदतीने ऑगस्ट 1963 मध्ये कामराज योजना पुढे आणली. पक्षातील जुन्या व दीर्घ काळ मंत्रिपदावर राहिलेल्या लोकांनी राजीनामे द्यावते व पक्षकार्याला वाहून घ्यावे, असे या योजनेचे थोडक्यात स्वरूप होते. काहींना हा पक्षात नवेपणा आणण्याचा प्रकार वाटला, तर काहींनी ‘नको त्यांना सरकारातून घालविण्याची चाल’ असे या योजनेचे वर्णन केले. या योजनेची विश्वसनीयता वाटावी म्हणून प्रत्यक्ष नेहरूंनीच त्यांच्या पदाचा राजीनामा प्रथम जाहीर केला. पण पक्ष व देश यांना नेहरूंची गरज असल्याचे मत बळकट झाल्याने त्यांनी तो मागे घेतला.

पुढे 25 ऑगस्टला कामराज, मोरारजी देसाई, लालबहादूर शास्त्री, जगजीवन राम, बिजू पटनायक, स.का.पाटील आणि उत्तर प्रदेशचे चंद्रभानू गुप्ता यांनी त्यांचे राजीनामे सादर केले. कोणाचे राजीनामे मंजूर करायचे याचा अंतिम अधिकार नेहरूंना असल्याने ते देणाऱ्यांतील अनेक जण त्यांच्यावर नाराज झाले. काहींना तो त्यांचा अपमान वाटला. त्यानंतर लगेच कामराज यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने घरी बसविण्यात आलेले सगळे मंत्री व नेते नेहरूंवर रुष्टही झाले. परंतु नेहरूंच्या लोकप्रियतेचा साऱ्यांनाच धसका असल्याने त्याची वाच्यता करताना त्यातले कोणी दिसले नाही. वृत्तपत्रांनी मात्र या प्रकारामागचे राजकारण शोधण्याच्या नावाने त्याची बरीच राळ उठविली. या योजनेमागे इंदिरा गांधींचा हात होता, हा आरोपही या काळात होत राहिला. पक्षातील आपले प्रतिस्पर्धी दूर करावेत, असे त्यांच्या मनात होते, असे बोलले गेले. प्रत्यक्षात पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना इंदिरा गांधींमध्ये पंतप्रधानपद पेलून धरण्याची क्षमता आहे, असे वाटत नव्हते. त्यात त्या स्त्री असल्याचाही एक विचार होताच. उलट दुसरीकडे, इंदिरा गांधींच्या मनात पक्षातील ज्येष्ठ नेते नेहरूंच्या प्रकृतीचा फायदा घेऊन त्यांच्याविरुद्ध कट रचत असल्याची व त्यांना पंतप्रधानपदावरून दूर करण्याची योजना आखत असल्याची शंका होती. कामराज योजना अशी गाजली.

मात्र त्यानंतर काही काळातच नेहरूंची प्रकृती आणखी ढासळली. भुवनेश्वरला काँग्रेसचे 68 वे अधिवेशन 1964 मध्ये भरले होते. त्याला हजर राहायला आलेल्या नेहरूंचे जनतेने विमानतळापासून अधिवेशनस्थळापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वागत केले. मात्र अधिवेशनाच्या व्यासपीठावरच त्यांना पक्षाघाताचा झटका आला. इंदिरा गांधींनी त्यांना आधार देऊन सावरले. गर्दीपासून दूर राखत त्यांना सुरक्षित जागी बसविले गेले. पुढे लागलीच त्यांची विमानाने दिल्लीला जाण्याची व्यवस्था केली गेली. प्रसंगाचे आव्हान ओळखून कामराज यांनी लालबहादूर शास्त्री व टी.टी. कृष्णम्माचारी या दोघांना बोलावून त्यांना पंतप्रधानपदाचे काम पाहायला सांगितले. त्यात कृष्णम्माचारींनी परराष्ट्रव्यवहार, तर शास्त्रीजींनी अंतर्गत कारभार पाहावा, असेही त्यांना सांगितले गेले. दिल्लीला पोहोचल्यानंतरही नेहरू कार्यालयीन कामे पाहतच होते. धोरणविषयक निर्णय घेत होते. इंदिरा गांधींनी त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या. त्यांचे रोजचे अठरा तासांचे काम बारा तासांवर आणले. मंत्री व अधिकारी आणि पंतप्रधान यांच्यातील मध्यस्थ म्हणून त्याच मग कामही पाहू लागल्या...

या वेळी आचार्य विनोबा भावे यांनी नेहरूंना बासरी शिकण्याच्या सल्ला दिला. त्यावर संतापलेले नेहरू म्हणाले, ‘‘या वयात मला बासरी वाजवायला सांगतात, याचा अर्थ काय?’’ यावर त्यांना आराम पडावा म्हणून विनोबांनी तसे सुचविले असेल, असे इंदिरा गांधींनी त्यांना समजावले. पण स्वत: तत्त्वज्ञानाचे अभ्यासक असलेल्या नेहरूंनाच मग ॲरिस्टॉटलचे म्हणणे आठवले. ‘सभ्य पुरुषांनी बासरी शिकावी’ असे तो म्हणाला होता. मात्र त्यांनी ती फार चांगलीही वाजवायला नको, अशी पुस्तीही जोडली होती. नेहरूंची धाकटी बहीण कृष्णा हाथीसिंग यांनी 27 मे रोजी मुंबईतच असलेल्या विजयालक्ष्मींना फोन करून ‘भार्इंची तब्येत चांगली नसल्याचे कळले’ हे सांगितले. कृष्णाजींनी लगेच दिल्लीला फोन केला, तेव्हा इंदिरा गांधींना नीट बोलता येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. ‘‘त्यांना बरं नाही. ते खूप-खूप गंभीर आहेत. डॉक्टरांनाही काय करायचं ते कळत नाही.’’ असेच काहीसे त्या म्हणाल्या. तशाच स्थितीत दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी नेहरूंचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांच्या मनोबलानुसार त्यांना काम करताना मृत्यू आला होता.

अंथरुणावर पडून त्यांना त्याची आराधना करावी लागली नव्हती. नेहरूंच्या मृत्यूचे वृत्त सर्वत्र वाऱ्यासारखे पसरले. काही क्षणांतच तीन मूर्ती भवनाचे आवार आणि व्हरांडे शोकाकुल स्त्री-पुरुषांच्या गर्दीने भरून गेले. टी.टी. कृष्णम्माचारी आणि जगजीवन राम हे मंत्री प्रथम आले. पाठोपाठ सारे मंत्रिमंडळही आले. तेवढ्या शोकाकुल अवस्थेतही तीन मूर्ती भवनाच्या प्रमुख दालनात मंत्रिमंडळाची तातडीची बैठक झाली आणि तीत गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांची हंगामी पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. देश दु:खात बुडाला आणि जग काळजीने अंधारले.

देशोदेशीचे अध्यक्ष, पंतप्रधान. नेते, विद्वत्‌जन, लेखक व नामांकित लोक दिल्लीला आले. देशातून जनौघ आला. अंधार पडू लागताच नेहरूंचे शव तीन मूर्ती भवनाच्या खालच्या दालनात जनतेच्या दर्शनासाठी आणले गेले. आता ते फुलांच्या पाकळ्यांनी झाकले होते. सारी रात्र लोक येत होते आणि आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचे अभिवादन करीत होते. तीन मूर्ती भवनात व पुढे तिथून यमुनेपर्यंत गेलेल्या पाच मैलांच्या अंत्ययात्रेत किमान चाळीस लाख लोकांनी नेहरूंचे अखेरचे दर्शन घेतले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांची रक्षा गंगेत विसर्जित केली गेली. काही हिमालयावर पसरली, तर काही देशातील शेतमळ्यांत पसरली गेली.

सुरेश द्वादशीवार नागपूर

निमित्त

मृत्युशय्येवर

मोहनदास करमचंद गांधी

सकाळ झाली. मी जिवंत होतो. मृत झालो नव्हतो, तरीही मला ‘मी जगणार आहे’ अशी खात्री वाटत नव्हती. शक्य तेवढा वेळ सहकाऱ्यांकडून गीतापठण ऐकत होतो. काही काम करावं अशी शक्तीच नव्हती शरीरात, काही वाचू म्हटलं तर तेवढेही त्राण नव्हते... कुणाशीही बोलावंसं वाटत नव्हतं. थोडंसं बोललो तरी डोकं भणभणायचं. त्यामुळे जगण्यातला सगळा आनंद, उत्साह संपून गेला होता. केवळ जगण्यासाठी जगणं मला कधीच आवडलं नव्हतं. कुठलंही काम न करता, सहकाऱ्यांची सेवा घेत हे जीर्ण-अशक्त शरीर टिकवण्यात मला रस नव्हता, उलट ते अत्यंत त्रासदायक वाटत होतं. असाच मी मरणाची वाट बघत होतो, तेवढ्यात डॉक्टर तळवलकर एका विचित्र माणसाला घेऊन आले. ते महाराष्ट्रीय आहेत. भारतात त्यांना कुणी ओळखत नाही. त्यांना बघताच मला जाणवलं की, तेही माझ्यासारखेच ‘चक्रम’ आहेत. ते त्यांचे उपचार माझ्यावर करणार होते.

सैन्यात दाखल होण्यासाठी येणाऱ्या तरुण उमेदवारांच्या निवडीच्या कामामुळे (रंगरूट भरती) मी फार थकून गेलो होतो. शरीर दमलं होतं. त्या वेळी माझ्या आहारात भाजून कुटलेले शेंगदाणे, त्यासोबत थोडा गूळ, केळी किंवा तत्सम फळ अन्‌ दोन-तीन लिंबांचा रस असलेलं लिंबूपाणी एवढ्या गोष्टी असायच्या. शेंगदाणे प्रमाणाबाहेर खाल्ले तर पोट बिघडतं, हे माहीत असूनही मी ते खाल्ले. त्यामुळे पोटात मुरडा यायला लागला. मी आश्रमात वेळोवेळी येत असे. या मुरड्याकडे फार लक्ष द्यावं, असं मला वाटलं नाही. रात्री मी आश्रमात पोहोचलो. त्या वेळी मी औषधं अजिबात घेत नसे. एक वेळचं जेवण बंद केलं की, पोट बरं होणार, याची मला खात्री होती. दुसऱ्या दिवशी सकाळी काही खाल्लं नाही. त्यामुळे पोटातला मुरडा, पोटात दुखणं बऱ्यापैकी थांबलं होतं.

मला हे पण ठाऊक होतं की, अशा वेळी मला उपास सुरू ठेवायला हवा किंवा खायचंच असलं, तर फळांचा रस किंवा असंच काही घ्यायला हवं. त्या दिवशी कुठला तरी सण होता. मला आठवतंय, मी कस्तुरबाला म्हटलं होतं की, मी दुपारी जेवणार नाही. पण तिनं मला आग्रह केला अन्‌ मी मोहाला बळी पडलो. त्या वेळी मी कुठल्याच पशूचं दूध पीत नसे. त्यामुळे ताक, तूप वगैरेही मी सोडलं होतं. कस्तुरबा म्हणाली, ‘‘तुमच्यासाठी दळलेल्या गव्हाच्या रव्याची तेलावर परतून लापशी केली आहे अन्‌ खास तुमच्यासाठी अख्खे मूगही केले आहेत.’’ हे ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मात्र मी मनातून हेच ठरवलं होतं की, कस्तुरबाचं मन राखण्यासाठी उगीच थोडं खायचं. चवही बघून होईल, थोडंसं खाणंही होईल, त्यामुळे पोटाची काळजीही घेतली जाईल. पण सैतान जणू वाटच बघत होता. जेवायला बसताना अगदी थोडं खायचं हे ठरवूनच बसलो होतो, पण मी आधाशासारखा पोट भरून जेवलो. पदार्थांची चव छानच होती, पण घोटाळा झाला. यमराजाला आमंत्रण गेलं. जेवण आटोपून तासभरही झाला नाही, तोच पोटात जोराच्या कळा सुरू झाल्या. रात्री नडियादला परत जायचं होतं. साबरमती स्टेशनपर्यंत पायीच गेलो. अंतर फक्त सव्वा मैलाचं होतं, पण चालताना ब्रह्मांड आठवत होतं.

अहमदाबाद स्टेशनवर वल्लभभाई भेटणार होते. ठरल्याप्रमाणे ते भेटले. माझी तब्येत बरी नाहीये, हे त्यांच्या लक्षात आलं. पण मला असह्य त्रास होतोय, हे मी त्यांना किंवा इतर सहकाऱ्यांना कळू दिलं नाही. नडियादला पोचलो. तिथून अनाथाश्रमात जायचं होतं. ते अंतर अर्ध्या मैलापेक्षाही कमी होतं, पण त्या दिवशी मात्र ते दहा मैलांपेक्षाही जास्त वाटलं. कसाबसा घरी पोचलो, परंतु पोटातल्या कळा वाढतच होत्या. पंधरा-पंधरा मिनिटांनी शौचाला जावं लागत होतं. शेवटी मी हरलो. मी माझी वेदना बोलून दाखवली अन्‌ अंथरूण गाठलं. मी नेहमीच आश्रमात असलेलं सार्वजनिक शौचालय वापरत असे, पण त्याऐवजी मी दुसऱ्या मजल्यावर कमोड मागवून घेतला. खरं तर खूप लाज वाटत होती, पण माझा नाइलाज होता. फूलचंद बापूजींनी ताबडतोब कमोड आणून दिला.

माझे सर्व साथीदार काळजीयुक्त चेहऱ्यानं माझ्याभोवती कडं करून बसले होते. माझ्यावरील त्यांच्या प्रेमाने मी भारावून गेलो. माझं दु:ख ते घेऊ शकत नव्हते. माझा हट्टीपणाही टोकाचा होता. डॉक्टरला बोलावू नका, या माझ्या म्हणण्यावर मी ठाम होतो. औषधं मी घेणारच नव्हतो. मी साधा विचार केला की, चूक आपण केलीय तर शिक्षाही आपणच भोगायला हवी. बिच्चारे सहकारी निमूटपणे ऐकून घेत चेहरे पाडून बसले होते. चोवीस तासांत तीस-चाळीस जुलाब झाले. जेवण मी बंद केलं होतं. सुरुवातीला तर मी फळांचा रसही घेत नव्हतो. घेण्याची इच्छाच होत नव्हती. आत्तापर्यंत मला वाटायचं की, माझं शरीर दगडासारखं टणक आहे. पण आत्ता त्याची अवस्था ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणे झाली होती. शक्तीच उरली नव्हती. ‘औषधं घ्या’ म्हणून सहकारी समजावत होते, मी त्यांना नकार दिला. ‘निदान इंजेक्शन तरी घ्या’, या त्यांच्या विनंतीला मी धुडकावून लावलं. त्या वेळी इंजेक्शनविषयीचं माझं ज्ञान- खरं तर अज्ञान- हास्यास्पद होतं. मला वाटायचं, यात कोणती तरी लस असणार, पण नंतर समजलं की, ते इंजेक्शन म्हणजे निर्दोष वनस्पतींपासून तयार केलेलं औषध होतं. पण हे सगळं समजलं तोवर वेळ निघून गेली होती. जुलाब सुरूच होते. अशक्तपणामुळे तापही आला होता. घेरी येत होती. शुद्ध हरपत होती. सहकारी खूपच घाबरले. दुसरे डॉक्टरही आले. पण रोगी ऐकूनच घेत नाहीत, त्याला ते तरी काय करणार?

शेठ अंबालाल आणि त्यांची पत्नी, दोघंही नडियाद येथे आले. सहकऱ्यांशी चर्चा करून त्यांनी मला अत्यंत हळुवारपणे त्यांच्या मिर्जापूरच्या बंगल्यावर हलवलं. माझ्या या आजारपणात एक गोष्ट मला समजली, ती ही की, इतक्या लोकांचं निर्मळ प्रेम अन्‌ निरपेक्ष सेवा, जी मला लाभली, तशी कुणाला लाभली नसेल. मला सतत बारीक ताप असायचा. कमालीचा अशक्तपणा आला होता. आता हे आजारपण अजून किती लांबेल, या आजारातून आपण उठू तरी शकू की नाही... असे विचार मनात येऊ लागले.

अंबालालशेठच्या घरात इतक्या प्रेमळ माणसांच्या गराड्यात असतानाही मी बेचैन झालो. अशात कमालीचा अशांत झालो. मी त्यांना प्रार्थना केली की, मला आश्रमात नेऊन पोचवा. माझा हट्ट बघून शेवटी त्यांनी मला आश्रमात आणलं. मी आश्रमात होतो. अजूनही आजारीच होतो. तेव्हा वल्लभभार्इंनी बातमी आणली की, जर्मनीचा पूर्ण पाडाव झालेला असून कमिशनर म्हणाले आहेत, आणखी रंगरूट पाठवण्याची गरज नाही. हे ऐकून माझी एक मोठी काळजी दूर झाली. मन थोडं शांत झालं. त्या काळात मी जलोपचार घेत होतो. त्यामुळे माझा देह तग धरून होता. आता त्रास थांबला होता, पण शरीर अशक्त झालं होतं. शक्ती भरून येत नव्हती. वैद्य-डॉक्टर मित्र अनेक सल्ले देत होते. मी मात्र कोणतंही औषध घ्यायला तयार नव्हतो. एक-दोन मित्रांनी सल्ला दिला, ‘‘दूध घ्यायचं नसेल तर, नका घेऊ; पण मांसाचं कढण घ्यायला काही हरकत नाही. औषध म्हणून मांसाहार करायला हरकत नाही.’’ आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी त्यांनी आयुर्वेदाचे दाखले दिले. कुणा एकानं अंडं खा म्हणून सुचवले, पण मी यापैकी कुठलाच सल्ला स्वीकारू शकलो नाही. प्रत्येक सल्ल्याला माझं एकच उत्तर होतं, ‘‘नाही.’’

खाद्य काय, अखाद्य काय- हा निर्णय माझ्यासाठी फक्त शास्त्रांमधील श्लोकांपुरता मर्यादित नव्हता, तर माझ्या आयुष्याशी तो स्वतंत्रपणे निगडित होता. काहीही खाऊन किंवा कोणतेही उपचार घेऊन जीव जगवण्याचा मला किंचितही मोह नव्हता. जे निकष मी माझ्या पत्नीसाठी, मुलांसाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी लावले; ते निकष केवळ जगण्याच्या मोहापायी मी कसे धुडकावून लावू?

या प्रकारे मला, माझ्या या खूपच लांबलेल्या आणि आयुष्यातल्या पहिल्याच अशा आजारपणात धर्माचं निरीक्षण करण्याची, त्याला व्यवहारच्या कसोटीवर पारखण्याची जणू एक अलभ्य संधीच मिळाली. एका रात्री तर मी सगळी आशाच सोडली. मला असा भास झाला की, माझा मृत्यू अगदी जवळ आलाय. श्रीमती अनसूयातार्इंना निरोप पाठवला. त्या आल्या. वल्लभभाई आले. डॉक्टर कानुगा आले. त्यांनी माझी नाडी बघितली. ते म्हणाले, ‘‘नाडी अगदी व्यवस्थित आहे. मला तरी तुमच्यात मरण्याची काही लक्षणं/चिन्हं दिसत नाहीत. फक्त अशक्तपणामुळे तुम्हाला घाबरल्यासारखं होतंय.’’

पण माझ्या मनाला काही ते पटलं नाही. रात्र कशीबशी संपली, पण काही मी झोपू शकलो नाही. संपूर्ण रात्र जागाच होतो. सकाळ झाली. मी जिवंत होतो. मृत झालो नव्हतो, तरीही मला ‘मी जगणार आहे’ अशी खात्री वाटत नव्हती. शक्य तेवढा वेळ सहकाऱ्यांकडून गीतापठण ऐकत होतो. काही काम करावं अशी शक्तीच नव्हती शरीरात, काही वाचू म्हटलं तर तेवढेही त्राण नव्हते... कुणाशीही बोलावंसं वाटत नव्हतं. थोडंसं बोललो तरी डोकं भणभणायचं. त्यामुळे जगण्यातला सगळा आनंद, उत्साह संपून गेला होता.

केवळ जगण्यासाठी जगणं मला कधीच आवडलं नव्हतं. कुठलंही काम न करता, सहकाऱ्यांची सेवा घेत हे जीर्ण-अशक्त शरीर टिकवण्यात मला रस नव्हता, उलट ते अत्यंत त्रासदायक वाटत होतं. असाच मी मरणाची वाट बघत होतो, तेवढ्यात डॉक्टर तळवलकर एका विचित्र माणसाला घेऊन आले. ते महाराष्ट्रीय आहेत. भारतात त्यांना कुणी ओळखत नाही. त्यांना बघताच मला जाणवलं की, तेही माझ्यासारखेच ‘चक्रम’ आहेत. ते त्यांचे उपचार माझ्यावर करणार होते. तेवढ्यासाठीच ते आले होते डॉ. तळवलकरांनी त्यांची शिफारस केली होती. त्यांचं शिक्षण ग्रान्ट मेडिकल कॉलेजात झालं होतं, पण मेडिकलचं शिक्षण होऊनही त्यांनी डिग्री घेतली नव्हती. मग समजलं, ते ब्राह्मो समाजी आहेत. त्यांचं नाव केळकर. अत्यंत मुक्त स्वभावाचे आहेत.

ते बर्फाच्या उपचारांचे पुरस्कर्ते आहेत. माझ्या आजाराबद्दल ऐकून ते माझ्यावर बर्फोपचार करण्यासाठी आले होते. त्या दिवसापासून आम्ही त्यांना ‘आइस डॉक्टर’ म्हणू लागलो. स्वत:च्या उपचाराबद्दल ते अत्यंत आग्रही होते. इतर डिग्रीधारी डॉक्टरांपेक्षाही त्यांना अधिक ज्ञान आहे, त्यांनी काही विलक्षण शोधही लावले आहेत, याबद्दल त्यांना खात्री होती. पण त्यांना स्वत:बद्दल असणारा विश्वास ते माझ्या मनात निर्माण करू शकले नाहीत. आम्हा दोघांच्याही दृष्टीने ही बाब एकंदरीत दु:खदच होती. एका मर्यादेपर्यंत मला त्यांच्या उपचारांवर विश्वास होताही, तरीसुद्धा मला असं वाटलं की, काही निष्कर्ष काढण्यात त्यांनी जरा घाईच केली आहे. पण त्यांचे शोध, योग्य-अयोग्य, कसेही असले तरी मी त्यांना माझ्या शरीरावर प्रयोग करण्याची परवानगी दिली. शरीरावर बाहेरून केलेले उपचार मला चालतात, आवडतातही. त्यातून उपचार बर्फाचा म्हणजेच पाण्याचा होता. डॉ. केळकरांनी माझ्या शरीरावर बर्फ चोळायला सुरुवात केली. या उपचारामुंळे मी शंभर टक्के बरा होणार, अशी त्यांना खात्री होती. तेवढा काही परिणाम दिसून आला नाही, तरीही माझ्यात सकारात्मक बदल नक्कीच झाला.

मी जो रोज मृत्यूची वाट बघत होतो, तो आता मरण्याऐवजी जगण्याची भाषा बोलू लागलो. जगण्याची आशा नक्कीच पालवली होती. मला उत्साह वाटू लागला. मनाचा उत्साह शरीरातही जाणवू लागला. माझा आहार थोडा वाढला. अगदी जो निजून होतो, तो दहापाच मिनिटं चालू लागलो. आता त्यांनी सुचवलं, ‘‘जर तुम्ही अंड्याचा रस घेतलात, तर आत्ता जेवढी शक्ती तुम्हाला वाटतेय, त्याहूनही अधिक शक्ती वाढेल याची गॅरंटी मी देतो. अंडीही दुधासारखी निरापद असतात. अंडी म्हणजे मांस नाही. प्रत्येक अंड्यातून पिल्लू जन्माला येतं, असं नाही. काही अंडी निर्बीज, निर्जीव असतात. अशी अंडी खायला हरकत नाही. हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो.’’ पण मी ती निर्जीव अंडी खायलाही तयार नव्हतो. तरीही माझी गाडी थोडी पुढे सरकली अन्‌ आता मी माझ्या भोवतालच्या कामात थोडा-थोडा रस घेऊ लागलो.

अनुवाद : प्रतिमा डिके

(‘अंतिमजन’ दिल्ली, त्रैमासिकाच्या एप्रिल-मे- जून 2019 लेखावरून)

मुलाखत

पारोमिता गोस्वामी यांची मुलाखत

जयश्री कापसे

चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या प्रणेत्या पारोमिता गोस्वामी यांच्या निवडणुकीसाठी लोक स्वतःहून आर्थिक मदतीसाठी पुढे येत आहेत. यात महिलांचं प्रमाण लक्षणीय आहे. जिल्ह्यातील दारूबंदीसाठी उभारलेला लढा सर्वांना ठाऊक आहे. हजारो महिलांच्या समर्थनानं हा लढा त्यांनी यशस्वी करून दाखवला. तेव्हापासून त्या महिलांच्या गळ्यातील ताईत झाल्या. आता त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतल्यावर मतदारसंघातील महिला पुढाकार घेऊन त्यांच्या विजयासाठी निधी जमा करीत आहेत. अनामत रक्कम जमवण्यासाठी गावागावांतून महिला आर्थिक मदत करीत आहेत. ‘‘लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी मी वचनबद्ध आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा, यासाठी माझी उमेदवारी आहे. मात्र निवडणुकीत लागणारा मोठा खर्च करण्याची ऐपत नाही. त्यामुळे समाजातून देणगी स्वीकारण्यात येत आहे.’’ असे त्या म्हणतात.

प्रश्न - ताई आपल्याबद्दल थोडक्यात सांगा?

  • माझा जन्म कोलकात्यात झाला. मात्र, बालपण तिथे गेले नाही. वडील सैन्यात असल्याने सतत दोन, कधी तीन वर्षांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली व्हायची. जम्मू, पठाणकोट, बराकपूर, आसामसह सबंध उत्तर भारताचा अस्थिर प्रवास यातून घडला. छावणीतील वातावरण कसं शिस्तबद्ध असायचं. त्यामुळे इतर सामान्य मुलांपेक्षा तेथील जग काहीसं वेगळं होतं. कदाचित नवल वाटेल, पण आमचे खेळही बाहुला-बाहुलीसारखे नव्हे तर भारत-पाकिस्तान युद्ध, स्वातंत्र्याचा लढा, बांगलादेशची निर्मिती असे असायचे. देशभक्ती, देशसेवा, देशकर्तव्य अशाच संकल्पनांभोवती आमचं जग फिरायचं. सैनिकांच्या मुलांना आईच्या दुधातून देशसेवेचे बाळकडू मिळते, हे मी ठामपणे सांगू शकते. म्हणूनच देशसेवा आमच्या रक्तात आहे.

आठवीपर्यंतचे माझे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले होते. मात्र, यानंतर दहावी, बारावी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण मी कोलकात्यातच पूर्ण केले. या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात एक आवाज मनाला सतत अस्वस्थ करीत होता. तो म्हणजे, ‘आपल्याला काही तरी करायचं आहे’. अनेक स्वप्नं आणि अनेक पर्याय होते, मात्र नेमकी वाट मिळत नव्हती. याच द्विधा मनस्थितीत 1991-92 मध्ये जाधवपूर येथे एम.ए. करण्याकरिता प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी उत्तीर्ण झाले, दुसरे वर्ष सुरू झाले. मात्र, मनात घोंघावणाऱ्या आवाजाचे आता एका मोठ्या वादळात रूपांतर झाले होते. याच दरम्यान मोनादीपा बॅनर्जी ही माझी जुनी मैत्रीण खूप दिवसांनंतर भेटली. ती मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टिस्स) येथे शिकत होती. तिने मला तेथील समाजशास्त्राच्या शिक्षणाबद्दल सांगितले. समाजकार्य म्हणजे उत्स्फूर्त भावनेतून केलेले कार्य, अशीच माझी कल्पना होती. मात्र, याचे रीतसर शिक्षणही असते, याचा साक्षात्कार पहिल्यांदाच झाला. वाटलं- वर्षानुवर्षे अंधारलेल्या माझ्या जगात लख्ख प्रकाश पडला.

बस्स... मागचा-पुढचा कुठलाही विचार न करता मी ठरविलं, मला मुंबईला जायचं आहे. हा निर्णय घरी सांगितला. सर्वसामान्य आई-वडिलांप्रमाणे त्यांनाही थोडी चिंता वाटली. मात्र, मी या निर्णयावर ठाम होते. 1993 मध्ये मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आणि मला अंतर्बाह्य बदलवून टाकणाऱ्या शिक्षणाची सुरुवात झाली. आतापर्यंत समाजाचे ऋण फेडण्याच्या भावनेने केलेले कार्य, गरजूंना मदत करणे हीच समाजसेवा- अशी समज होती. मात्र, ही भावना म्हणजे एखाद्या हिमनगाप्रमाणे होती. देशाची राज्यघटना, वर्गव्यवस्था, जातिप्रथा, समाजकारण, राजकारण, शोषण यांसारख्या गोष्टी हे समाजकार्यामागचे महत्त्वाचे घटक आहेत, हे याच वेळी कळले. एका सुखवस्तू घरात जन्म घेतल्यामुळे सारं काही सहज मिळत होतं. अशा व्यवस्थेचे चटके कधी मला बसलेच नव्हते. त्यामुळे या साऱ्या गोष्टी मला अंतर्मुख करणाऱ्या होत्या. त्यामुळे दोन वर्षांनंतर 1995 मध्ये या इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडले ती अस्वस्थ होऊनच.

प्रश्न - आपण समाजकार्याला कशी सुरुवात केली?

  • मला काही तरी काम हवं होतं. प्रा.जानकी अंधारिया यांनी मला त्यांच्या एका प्रोजेक्टमध्ये काम करायची संधी दिली. यादरम्यान विवेक पंडित यांच्याशी ओळख झाली. त्यांची श्रमजीवी संघटना होती. मी त्यांच्या संघटनेत काम करायला लागले. ठाणे जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. यासोबतच वीटभट्टी, कारखाने, गिरण्यांत काम करणाऱ्या मजुरांचाही येथे वावर होता. त्यांचे अनेक प्रश्न, समस्या होत्या. देशाची आर्थिक राजधानी, उच्चभ्रू लोकांचे विकसित शहर अशी बिरुदावली असलेल्या मुंबई शहरापासून अवघ्या 50 किलोमीटरवर हे टोकाचे विदारक वास्तव होते. येथूनच मी आपल्या प्रत्यक्ष कार्याची सुरुवात केली.

मजुरांच्या मुलांचे जीवन, त्यांचे शैक्षणिक व आरोग्याचे प्रश्न, आदिवासी समाजाची जीवनपद्धती, त्यांचे होणारे शोषण, समस्या हे सर्व काही जवळून प्रत्यक्ष पाहायला मिळालं. फेरफार, सातबारा, खसरा या सर्व प्रशासकीय बाबी काय असतात, याची ओळख झाली. या लोकांची भाषा मला कळत नव्हती. मात्र, त्यांची तळमळ, त्यांचे दु:ख, वेदना नक्कीच माझ्यापर्यंत पोचत होत्या. माझे सहकारी मला याचा अर्थ हिंदी किंवा इंग्रजीमध्ये समजावून सांगत. मला मराठी भाषा हळूहळू समजायला लागली, ती मी थोडीफार बोलूही लागले. यामुळे संवादाचे अडथळे दूर झाले. तानसा नदीतून 1996 मध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा अवैधरीत्या केला जात होता. यात एक खूप मोठे रॅकेट सक्रिय होते. त्याला आम्ही कडाडून विरोध केला. माझ्यासह अन्य कार्यकर्त्यांवर 302 सारखा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण लावून धरले. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी हे प्रकरण सीआयडीकडे सोपविले.

यादरम्यान या प्रकरणाच्या अनेक सुनावण्या होत होत्या. मी 1999 पर्यंत ठाण्यातच होते. आता तिथे राहायचा मला कंटाळा आला होता. आणखी बरेच काही करायचे होते. मात्र, न्यायालयाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र सोडता येत नव्हता. विवेक पंडित यांनी मला चंद्रपूर जिल्ह्यात जाऊन काम करायला सुचविले. मूल तालुक्यातील बाबा वडलकोंडावार यांना जाऊन भेट, ते तुला मदत करतील, असे त्यांनी सांगितले. मागचा-पुढचा काहीही विचार न करता हातात एक बॅग आणि डोळ्यांत खूप सारी स्वप्नं घेऊन मी मूलकडे निघाले.

प्रश्न - श्रमिक एल्गार संघटनेची स्थापना कशी झाली?

  • चंद्रपूरमध्ये येऊन आता काही महिने उलटले होते. निवडणुकीचा तो काळ होता. एवढ्यात सिंदेवाही तालुक्यातील चिटकी या गावात एक प्रकरण घडले. आदिवासी समाजाच्या गावडे भावंडांमध्ये शेतीच्या वादातून भांडण झाले. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. यात गोपाळ गावडेला अटक करण्यात आली. त्याला सोडविण्यासाठी त्याच्या बायकोकडे पाच हजारांची मागणी करण्यात आली. ती कुठून देणार?

क्षुल्लक वाद असल्यामुळे गावकऱ्यांनीही त्याला सोडविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हाती निराशा आली. या वेळी अशोक येरमे नावाच्या युवकाला माझ्याबद्दल कुठून तरी कळले. तो माझ्याकडे गोपाळच्या अटकेची कागदपत्रेच घेऊन आला. ते वाचून मला धक्काच बसला. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्याला अटक केल्याचे दाखविले होते. बरं, हा गोपाळ निवडणुकीत उमेदवार नव्हता, की कुठल्या राजकीय पक्षाशी त्याचा संबंधही नव्हता. मात्र, त्यावर तहसीलदारांनीही डोळे झाकून सही केली होती. निवडणुकीच्या काळात गोपाळमुळे तर काही व्यत्यय आला नव्हता, तरीही पोलीस, प्रशासनाने हे केलं.

मी कलेक्टरकडे गेले. एका निर्दोष व्यक्तीवर अशा प्रकारचा बेजबाबदार गुन्हा नोंदविल्याबाबतची सारी कैफियत सांगितली. त्यांना ते पटलं. त्यांनी काय केले, माहिती नाही; मात्र, पुढील दोन दिवसांतच गोपाळ सुटला. त्याच्यासोबत आम्हीही गावी गेलो. बस नसल्यामुळे चार किलोमीटर पायी जावं लागलं. परतीच्या वेळी संध्याकाळ झाली. दगड-मातीचा रस्ता आणि भोवती घनदाट जंगल, त्यामुळे तिथेच मुक्काम करण्याचं आम्ही ठरविलं. तोवर गावात माझ्याबद्दल बरेच कुतूहल निर्माण झाले होते. ही कोण बंगाली मुलगी आपल्या गावात आली?’ असे म्हणून अनेक जण मला भेटायला आले. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी आपली कैफियत माझ्यासमोर मांडली. तलाठी पैसे खातो, फॉरेस्टवाले त्रास देतात. पोलीसही पिळवणूक करतात. महिलांनीही आपल्या समस्या मांडल्या. मी त्यांना त्यांचे हक्क, कायदा, देशाचे संविधान त्यांना पटेल अशा भाषेत समजावून सांगितले.

या वेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपल्याला अशा समस्या सोडविण्यासाठी एक संघटना काढायला हवी. गावातील बायकांनीही याला पाठिंबा दिला. पुढे एक-दोन बैठका झाल्या. संघटनेचं नाव कसं तडफदार हवं, ही सर्वांची इच्छा होती. त्यामुळे दलित, शोषित, पीडित, कामगारांचे प्रतिनिधित्व करणारा ‘श्रमिक’ हा शब्द हवाच होता; तर पुढचा शब्द एल्गार ठरविला. सुरेश भटांच्या गझलांचे माझ्यावर गारूड होते. एकदा मुंबईत असताना विवेक पंडित काही तरी मराठीत गुणगुणत होते. मी विचारलं, ‘हे काय?’ ते म्हणाले, ‘ही सुरेश भटांची गझल आहे.’ मी म्हटलं, ‘छे, मराठीत कुठे आली गझल? ती उर्दूमध्ये.’ ते म्हणाले, ‘नाही. सुरेश भटांनी ती मराठीत आणली आहे, हे बघ- ‘करू नका एवढ्यात पराभवाची, रणात आहे झुंजणारे अजूनही काही!’. ही ओळ ऐकली की आजही अंगावर शहारे येतात. त्यानंतर भटांच्या गझलांची मी फॅनच झाले. त्यांच्या एल्गार या संग्रहामध्ये फार सुंदर गझल आहे- साध्याच माणसांचा एल्गार आहे, चोर-गांडुळांचा भोंदू जमाव नाही... याच गझलमधून मी एल्गार हा शब्द संघटनेच्या नावात लावला. हे श्रेय भटांचंच.

प्रश्न - राजकीय क्षेत्राची वाट धरण्याची गरज का भासली?

  • मागील 20 वर्षांपासून संघटनेचे काम करीत असताना समाजातील छोटे-छोटे प्रश्न हाती घेणे सुरू केले. चिन्ना मटानीच्या प्रकरणापूर्वी मी तुरुंगात गेले होते. रेशनच्या धान्यासाठी लढताना आम्हाला नागपूरच्या तुरुंगात डांबण्यात आले. अनेकांना वाटलं, आता या बाईची संघटना संपली. मात्र, झालं याच्या उलटंच. आम्ही आणखी स्ट्राँग होऊन परतलो. आजवर शेकडो आंदोलने केलीत. निराधार, जबरनजोत, बांबू कामगार, फुटपाथ व्यायसायिक, रेशन, बससेवा आदी प्रश्न मांडलेत. श्रीमंत लोकांकडून गरिबांचे शोषण यामुळे त्रस्त असलेला चंद्रपूर जिल्हा विकासाच्या बाबतीत आजही मागे आहे.

फक्त सहा महिन्यांसाठी रोजगार उपलब्ध होतो. बहुतेक लोक बेरोजगार व गरीब आहेत. या क्षेत्रात सिंचनाचा अभाव, मानवी-वन्य जीव संघर्ष, रोजगारासाठी तरुणांचे हंगामी स्थलांतर, वनहक्कांवर प्रवेश करण्यात अडचणी, प्राथमिक व माध्यमिक शालेय पायाभूत सुविधा नसणे इत्यादी समस्या सोडविण्यात राजकीय उदासीनता आहे. या मूलभूत मुद्यांविरुद्ध सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कोणताही आवाज उठवत नाहीत. म्हणून राजकीय क्षेत्राची वाट धरण्याची गरज भासली. आपण समाजातील सर्व घटकांतील समस्यांना न्याय देऊ शकतो, असा विश्वास आहे.

प्रश्न – आम आदमी पार्टीचे तिकीट घेण्यामागील उद्देश काय?

  • मी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय मागील दीड वर्षापूर्वीच घेतला होता. तेव्हापासूनच तयारीही केली. लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. प्रतिसाद उत्स्फूर्त होता. श्रमिक एल्गारच्या माध्यमातून ऑगस्ट संपर्क अभियान राबविले. यातून अनेक प्रश्न पुढे आले. जनसंपर्क वाढल्यानंतर निवडणूक लढायचीच, हा निर्णय झाला. वीस वर्षांहून अधिक काळ सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आम आदमी पार्टीनेही उमेदवारीविषयी विचारणा केली. आमचे कार्य आणि आपची विचारधारा एक असल्याने आपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. राजकीय लोकशाही प्रक्रियेत प्रवेश करून लढा आणखी एक पाऊल पुढे न्यायचा आहे. विधानसभेत संधी मिळाल्यास गरीब आणि उपेक्षित समाजासाठी हा एक मोठा विजय ठरेल.

    प्रश्न - प्रस्थापितांविरुद्ध कसा लढा देणार?

    • माझा लढा थेट भाजप, काँग्रेस या बड्या राजकीय पक्षांशी आहे. मागील अनेक वर्षांपासून ते प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र, सामान्य माणसांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. या लोकांच्या समस्या फार मोठ्या नाहीत. मात्र, राजकीय उदासीनता असल्याने कित्येक वर्षांपासून हे प्रश्न प्रलंबित आहेत, म्हणूनच लोकांमध्ये नाराजी आहे. ते सोडविण्याची ताकद ‘आप’च्यात आहे. त्याला मोठा जनपाठिंबा लाभत आहे. हीच ‘आप’ची ताकद आहे. शक्तिशाली लोक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, याचीदेखील जाणीव आहे. त्याविरुद्ध मोठा लढा द्यावा लागेल. त्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. म्हणूनच, आम्ही पाठिंबा घेण्यासाठी क्राउडफंडिंग करीत आहोत.

चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या प्रणेत्या पारोमिता गोस्वामी यांच्या निवडणुकीसाठी लोक स्वतःहून आर्थिक मदतीसाठी पुढे येत आहेत. यात महिलांचं प्रमाण लक्षणीय आहे. जिल्ह्यातील दारूबंदीसाठी उभारलेला लढा सर्वांना ठाऊक आहे. हजारो महिलांच्या समर्थनानं हा लढा त्यांनी यशस्वी करून दाखवला. तेव्हापासून त्या महिलांच्या गळ्यातील ताईत झाल्या. आता त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतल्यावर मतदारसंघातील महिला पुढाकार घेऊन त्यांच्या विजयासाठी निधी जमा करीत आहेत. अनामत रक्कम जमवण्यासाठी गावागावांतून महिला आर्थिक मदत करीत आहेत. ‘‘लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी मी वचनबद्ध आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा, यासाठी माझी उमेदवारी आहे. मात्र निवडणुकीला लागणारा मोठा खर्च करण्याची ऐपत नाही. त्यामुळे समाजातून देणगी स्वीकारण्यात येत आहे.’’ असे त्या म्हणतात.

मुलाखत : प्रा.जयश्री कापसे-गावंडे, चंद्रपूर

नवे पुस्तक

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

संकल्प गुर्जर

हे पुस्तक वाचून असा कोणाचाही गैरसमज होऊ शकतो की, हे पुस्तक केवळ राजकारणाविषयीच असावे, पण तसे नाही. इराक व इराणमधल्या समाजजीवनाकडे टिकेकर अगदी विचक्षण दृष्टीने पाहत होते. त्यामुळेच ते लिहितात की, इराणमध्ये वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवली जात असली, तरीही इराकमध्ये ब्रिटिश सत्तेचा पराभव असल्याने वाहने डाव्या बाजूने चालवावीत असा नियम आहे. इराकमध्ये खजुराशिवाय इतर कोणतेही झाड दिसत नाही. तसेच बसरा शहरात कोठेही गटारे नाहीत व अगदी मोठ्या कालव्यांतसुद्धा घाणेरडे पाणी असते. लोकांच्या स्वच्छतेच्या सवयीविषयी टिकेकर लिहितात की, ‘अरब म्हणजे अगोदरच गलिच्छ व अमंगळ लोक. त्यात इकडील थंडीचे निमित्त मिळाले की, सहा-सहा महिने त्यांना स्नान मिळत नाही’. इराणमध्येही असाच प्रकार होता. तिथे तर एकाच कालव्यात एकमेकांपासून काही फूट अंतरावरच कपडे धुणे, भांडी घासणे व पाणी पिणे असे तिन्ही उद्योग बिनदिक्कतपणे चालले असायचे.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठीत जे महत्त्वाचे लेखक आणि पत्रकार होऊन गेले, त्यात श्रीपाद रामचंद्र टिकेकर यांचा समावेश होतो. मराठी आणि इंग्रजी मिळून एकूण 37 पुस्तके नावावर असलेल्या टिकेकरांना इतिहासापासून अर्थशास्त्रापर्यंत कोणताही विषय वर्ज्य नव्हता. 1930 मध्ये गांधीजींच्या दांडीयात्रेत जे निवडक 79 जण सहभागी झाले होते, त्यांत ‘केसरी’चे विशेष प्रतिनिधी म्हणून 29 वर्षीय श्री. रा. टिकेकर गेले होते. अशा या टिकेकरांच्या ‘मुसलमानी मुलखांतली मुशाफरी’ या पुस्तकाची नवी आवृत्ती आता आली आहे. या दोनशे पानी पुस्तकाला आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासक मनीषा टिकेकर यांनी प्रस्तावना लिहिलेली असून संदर्भासाठी शेवट टिपा व नकाशेही जोडलेले आहेत.

मराठीमध्ये पंडिता रमाबार्इंनी इंग्लंड व अमेरिकेच्या प्रवासावर लिहिलेली पुस्तके, अनंत काणेकरांचे युरोप व रशियाच्या प्रवासावर आधारित ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’, प्रभाकर पाध्येंचे जपानच्या प्रवासावरील ‘तोकोनामा’ अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. ही पुस्तके केवळ प्रवासवर्णने नाहीत, या पुस्तकांच्या माध्यमातून त्या-त्या प्रदेशाचा चांगला परिचय मराठी वाचकांना होतो. या पुस्तकांमधला समान धागा असा की, साधारणतः 1850 च्या नंतर मराठी समाजात वाचन-लेखन करणाऱ्या व सामाजिक भान असलेल्या माणसांपैकी ज्यांनी कामानिमित्त किंवा हौसेने परदेश प्रवास केले, त्यांच्यापैकी अनेकांनी आपले अनुभव लिहून ठेवले. श्री.रा. टिकेकरांचे पुस्तक याच परंपरेत बसू शकेल असे आहे.

‘केसरी’चे विशेष प्रतिनिधी असलेल्या टिकेकरांना त्या वेळी खरं तर अफगाणिस्तानला जायचे होते. मात्र ते शक्य न झाल्याने टिकेकर सध्याचा पाकिस्तान, इराण आणि इराक या प्रदेशांत जाऊन आले. त्यांनी आपल्या प्रवासादरम्यान ‘केसरी’साठी लिहिलेल्या वार्तापत्रांनाच 1931 मध्ये पुस्तकरूप दिले होते.

टिकेकरांच्या प्रवासाची सुरुवात झाली पेशावरपासून. अफगाणिस्तानात रशियाचा प्रभाव वाढू नये म्हणून ब्रिटिशांनी अफगाणिस्तानवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केले. त्यामुळेच वायव्य सरहद्द प्रांत भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा. खैबर खिंड याच प्रदेशातील. त्यामुळे तेव्हा राजकीय आणि लष्करी दृष्टीने पेशावर अतिशय मोक्याचे ठाणे मानले जात असे. या प्रदेशाविषयी लिहिताना कोणत्याही सजग मराठी व्यक्तीला पेशव्यांच्या सेनेची अटकेपर्यंतच्या घोडदौडीची आठवण होणे अगदी साहजिक. टिकेकरही याला अपवाद नाहीत. पेशावरच्या जवळच असलेल्या अटकेला त्यांनी आवर्जून भेट दिली. मुस्लिमबहुल असलेल्या या प्रदेशात अटकेच्या किल्ल्यात एका मंदिराचा जीर्णोद्धार कसा केला गेला, याविषयी ते वाचकांना सांगतात. तसेच या प्रदेशातील हिंदू-मुस्लिम तणावाची माहितीही जाता- जाता त्यांच्या लेखनात येऊन जाते.

वायव्य सरहद्द प्रांत हा टोळीवाल्या जमातींच्या वर्चस्वाखालचा प्रदेश. या टोळ्यांना नियंत्रणात ठेवणे हे काम इतके अवघड होते की, साऱ्या जगावर राज्य करण्याची मनीषा बाळगणाऱ्या इंग्रजांना दीडशे वर्षांत या टोळीवाल्यांचा बंदोबस्त करता आला नाही. टिकेकर लिहितात, ‘इथला प्रत्येक जण अगदी राजाप्रमाणे स्वतंत्र, नव्हे निस्तंत्र आहे! या प्रदेशाची डोंगराळ भौगोलिक रचना आणि टोळीवाल्या जनतेची मनोवृत्ती याला कारणीभूत होती. त्यामुळे लष्कराचा वापर करून या प्रदेशावर शक्य आहे, त्या प्रमाणात नियंत्रण बसवणे आणि उरलेल्या प्रदेशाला साम-दाम-दंड-भेद अशा मार्गांचा वापर करून हाताबाहेर जाऊ न देणे, असे धोरण ब्रिटिशांना अवलंबावे लागले. टिकेकर अतिशय मार्मिकपणे या साऱ्याची माहिती देतात.

परतीच्या प्रवासात टिकेकर बलुचिस्तानात गेले होते. तिथेही असाच प्रकार होता. लष्करी ताकदीशिवाय हे दोन्ही प्रदेश ब्रिटिश इंडियाकडे राहू शकत नव्हते. त्यामुळेच उत्तरेला हिमालय व दक्षिणेला हिंदी महासागर यांनी सुरक्षित केलेल्या या देशाच्या लष्करी खर्चात सतत वाढ होत गेली आणि भारतीय जनतेवरील करांचा बोजाही त्या प्रमाणात वाढला, हे टिकेकर नोंदवतात.

टिकेकरांचे हे विवेचन वाचताना ते आजच्या काळाशी अगदी सहजपणे जोडून घेता येऊ शकते. बलुचिस्तान आणि वायव्य सरहद्द प्रांत 1947 नंतर पाकिस्तानात गेले. विरळ लोकसंख्या असलेल्या व खनिजसंपत्तीने समृद्ध बलुचिस्तानात स्वातंत्र्याची उर्मी इतकी प्रबळ आहे की, पाकिस्तान सरकारला दडपशाही न करता बलुचिस्तान पाकिस्तानात ठेवताच येणार नाही. तसेच वायव्य सरहद्द प्रांतावर पाकिस्तान सरकार नियंत्रण ठेवू शकत नाही. या प्रदेशाच्या संरक्षणासाठी कंदाहार आपल्या ताब्यात ठेवावे, अशा आशयाची चर्चा ब्रिटिश मुत्सद्यांमध्ये झाल्याचे उल्लेख टिकेकरांच्या लेखनात येतात.

आपल्या संरक्षणासाठी अफगाणिस्तानवर वर्चस्व ठेवावे, या पाकिस्तानच्या इच्छेकडे याच संदर्भात पाहता येऊ शकते. म्हणजे ब्रिटिश इंडियाला जे प्रश्न भेडसावत होते, तेच प्रश्न आज पाकिस्तानच्या समोरही आहेत. कदाचित ते आता आणखीच तीव्र झाले आहेत. तालिबानसारख्या दहशतवादी गटांचे वर्चस्व असलेल्या या सीमावर्ती प्रदेशात शिक्षणाचे प्रमाण आजही अतिशय कमी असून टोकाचे धर्मवेड जनतेत आढळते. दहशतवाद्यांच्या आदेशाला न जुमानता शाळेत जाणाऱ्या मलालावर याच प्रदेशात जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रदेशात कसे जागोजाग बंदुका तयार करण्याचे कारखाने आढळतात आणि हे लोक कसे बंदुका चालवण्यात तरबेज आहेत, याविषयी टिकेकरांनी लिहिले आहे.

आजही या परिस्थितीत फरक पडलेला नाही. उलट, आधुनिक शस्त्रे आणि लढाईचे तंत्र अवगत केल्याने हा प्रदेश आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्रबिंदू बनलेला आहे. दक्षिण आशिया, पश्चिम आशिया, हिंदी महासागर आणि मध्य आशिया यांना जोडणाऱ्या बलुचिस्तान व वायव्य सरहद्द प्रांताचे सामरिक महत्त्व इतके जास्त आहे की, या प्रदेशात काय होते याचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणात पडत राहणार आहेत. सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानात 1979 मध्ये सैन्य पाठवल्यानंतर अमेरिकेचा जीव कासावीस झाला होता, त्यामागे हेच कारण होते.

टिकेकरांना अफगाणिस्तानात जायचे होते, कारण तेव्हा अफगाणिस्तानात सुधारणापर्व सुरू झाले होते. राजा अमानुल्ला व राणी सुरय्या दोघेही आधुनिकतावादी विचारप्रणालीने प्रभावित झाले होते आणि अफगाणिस्तानला आधुनिक बनवावे, या ध्यासाने 1919 ते 1929 या काळात कार्यरत होते. अतिशय मागासलेल्या समाजात सुधारणा रुजवणे कठीणच असते, मात्र तो प्रयत्न अफगाणिस्तानात केला जात होता. परंतु अफगाणिस्तान व ब्रिटिश इंडियाच्या सीमेवरील टोळीवाल्यांनी उठाव केल्याने अफगाणिस्तानात जाण्याचे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे टिकेकर जाऊ शकले नाहीत. अफगाणिस्तानातून विमानमार्गाने परत आलेल्या परदेशी व्यक्तींना पेशावरमध्ये भेटण्याचा प्रयत्न टिकेकरांनी केला होता. तसेच त्यांनी अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत जाऊन त्या देशाविषयी सविस्तर माहिती काढली होती.

टिकेकर नोंदवतात की- अमानुल्लाचे सगळे सल्लागार तुर्की आहेत, अनेक अफगाण तरुण व तरुणी तुर्कस्तानला शिक्षणासाठी गेले आहेत. तसेच अफगाणिस्तानात तुर्कांचे प्राबल्य जास्त आहे. यामागचे कारण ते सांगतात की, धर्म समान असल्याने असे झाले असावे. मात्र यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण टिकेकरांच्या नजरेतून निसटलेले दिसते. तुर्कस्तानात केमाल पाशाने 1920 च्या दशकात अगदी जोराने सुधारणापर्व सुरू केले होते. भूतकाळ व मागासलेल्या परंपरा बाजूला टाकून एक आधुनिक, सेक्युलर व प्रबळ तुर्कस्तान उभा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या केमाल पाशाचा आदर्श राजा अमानुल्लासमोर असावा. तसेच तुर्कस्तानमध्ये सुधारणेचे वारे कमी-अधिक प्रमाणात एकोणिसाव्या शतकापासून वाहत होतेच. त्यामुळे आपल्या देशाला तुर्कस्तानसारखे बनवण्याचे स्वप्न अमानुल्लाने पाहिले, म्हणून अफगाणिस्तानात तुर्की सल्लागार होते. अर्थात अमानुल्लाच्या स्वतंत्र वर्तनामुळे ब्रिटिश प्रभावाला धोका पोहोचतो, म्हणून त्याला हटवले पाहिजे, हे ब्रिटिशांच्या लक्षात आले होते. त्यामुळे टिकेकर जाऊ पाहत होते तेव्हा अमानुल्लाच्या राज्यकारभाराचे शेवटचे दिवस चालू होते. अर्थात हे टिकेकरांना माहिती असण्याचे काही कारण नव्हते. पुढे 1929 मध्ये ब्रिटिशांनी अमानुल्लाला सत्तात्याग करण्यास भाग पाडले.

अफगाणिस्तानात जायचा मार्ग बंद झाला म्हणून टिकेकर कराचीला गेले व समुद्री मार्गाने इराकला रवाना झाले. इराक 1920 च्या दशकात ब्रिटिश नियंत्रणाखाली होता व साम्राज्यांतर्गत दळणवळण तुलनेने सुलभ होते. त्यामुळे कराचीहून टिकेकर इराकमधील बसऱ्याला गेले. इराक हा इराण आणि सौदी अरेबियाच्या मधे वसलेला देश. टिकेकर 1929 मध्ये लिहितात की, ‘इराकी प्रजेला मुख्य त्रास होतो तो इब्न सौदच्या वहाबी लुटारूंचा. मात्र धोका इतक्यावरच मर्यादित नाही.’ टिकेकरांच्या मते, इराकच्या एका बाजूस इराणी सिंह हातांत नंगी समशेर उगारून बसला आहे, तर दुसरीकडे तुर्कांच्या नव्या मनूचा प्रवर्तक केमाल केव्हा हल्ला करील कोण जाणे, अशा वृत्तीने इंग्रज त्याजकडे पाहत आहेत. याच बरोबरीने इराकपासून रशियासुद्धा फार लांब नसून त्याचेही या प्रदेशातील घडामोडींकडे लक्ष होते, हेही त्यांनी लिहिलेले आहेच.

नव्वद वर्षांपूर्वीची ही निरीक्षणे आहेत. याच प्रदेशात आज काय चालू आहे? तर, इराण व सौदी अरेबिया यांच्यात इराकवर सध्या वर्चस्व कोणी गाजवावे, यावरून तीव्र स्पर्धा सुरू आहे. इराकमधील सद्दाम हुसेनला हटवण्यासाठी केलेल्या लष्करी कारवाईत अमेरिकेच्या बरोबरीने ब्रिटन उत्साहाने सहभागी झाले होते; तर गेल्या काही वर्षांत जेव्हा सिरिया व इराकमध्ये इस्लामिक स्टेटचा उदय झाला, तेव्हा रशिया आणि तुर्कस्तानच्या हस्तक्षेपाला रोखणे अशक्य झाले. म्हणजे काळ बदलला, नव्या सत्ताधाऱ्यांचा उदय झाला तरीही या प्रदेशातील आंतरराष्ट्रीय राजकारण काही बदलले नाही. अर्थात हे वाचून असा कोणाचाही गैरसमज होऊ शकतो की, हे पुस्तक केवळ राजकारणाविषयीच असावे. पण तसे नाही.

इराक व इराणमधल्या समाजजीवनाकडे टिकेकर अगदी विचक्षण दृष्टीने पाहत होते. त्यामुळेच ते लिहितात की, इराणमध्ये वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवली जात असली, तरीही इराकमध्ये ब्रिटिश सत्तेचा पराभव असल्याने वाहने डाव्या बाजूने चालवावीत असा नियम आहे. इराकमध्ये खजुराशिवाय इतर कोणतेही झाड दिसत नाही. तसेच बसरा शहरात कोठेही गटारे नाहीत व अगदी मोठ्या कालव्यांतसुद्धा घाणेरडे पाणी असते. लोकांच्या स्वच्छतेच्या सवयीविषयी टिकेकर लिहितात की, ‘अरब म्हणजे अगोदरच गलिच्छ व अमंगळ लोक. त्यांत इकडील थंडीचे निमित्त मिळाले की, सहा-सहा महिने त्यांना स्नान मिळत नाही’. इराणमध्येही असाच प्रकार होता. तिथे तर एकाच कालव्यात एकमेकांपासून काही फूट अंतरावरच कपडे धुणे, भांडी घासणे व पाणी पिणे असे तिन्ही उद्योग बिनदिक्कतपणे होत असायचे.

कितीही प्रवास झाला तरीही मातृभूमीचा संदर्भबिंदू टिकेकरांच्या मनात सदैव जागा असतो. त्यामुळे तैग्रिस आणि युफ्रेटिस या इराकमधल्या नद्या पाहून ते लिहितात की, ‘नदीचे पात्र हिंदूंना पवित्र वाटते आणि नुसते नाव घेतले तरी पुरे, अनेक धार्मिक संस्कारांचा आणि पौराणिक कथांचा संदर्भ ज्ञानचक्षूंपुढे उभा राहतो. तसा काहीसा प्रकार हिंदुस्तानबाहेरील नद्यांचा नाही. तेव्हा त्यांच्याकडे तासच्या तास पाहत राहिले तरी मनावर काय परिणाम घडणार?’ देशाटन केल्यामुळे ‘स्वदेशप्रीति आणि आपलेपणाला येणारी भरती’ हे फायदे होतात, असेही त्यांना वाटते. इराणमध्ये एक हिंदू देवालय व त्यावर शुद्ध संस्कृतमध्ये लिहिलेले श्लोक पाहूनही टिकेकर आनंदित झाले होते. अर्थात आपल्या मातृभूमीच्या संदर्भात लिहितानाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताचे स्वातंत्र्य आणि त्याविषयीची चर्चा.

इराक व इराण या दोन्ही देशांमध्ये टिकेकर ज्या-ज्या उच्चपदस्थ व्यक्तींना भेटले, त्या सर्वांशी बोलताना हा विषय निघाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यास इतर देशांच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा होईल, ही भावनाही अनेकांनी टिकेकरांना बोलून दाखवली. इराण व इराकमध्ये तेव्हा तेलाचा शोध लागून त्याच्या शुद्धीकरणाचे कारखाने सुरू झाले होते. त्याला आवर्जून भेट देऊन टिकेकरांनी तेलशुद्धीकरण प्रक्रियेविषयी अतिशय सविस्तरपणे लिहिले आहे. कदाचित तेलाच्या शुद्धीकरणाविषयीचा मजकूर मराठीत पहिल्यांदाच लिहिला गेला असावा. टिकेकर लिहितात की, ‘खाणीतून आलेले घट्ट तेल उष्ण केले म्हणजे त्यातून काही वायू बाहेर निघतात. त्यांचा उपयोग पेट्रोल करण्याकडे विशेष होतो. ते वायू थंड केले की, बेन्झिन नावाचे एक महत्त्वाचे द्रव्य तयार होते. नुसते उष्ण केल्याने शुद्ध घासलेट मिळणे कठीण असते. त्यासाठी त्या घासलेटवर पुष्कळ संस्कार करावे लागतात. एक प्रकारच्या विशिष्ट वाळूतून ते गाळून काढले म्हणजे अगदी स्वच्छ होऊन त्यातील साचलेली घाण निघून जाते. पेट्रोलसुद्धा अनेक औषधींच्या साह्याने धुवावे लागते व नंतरच ते विक्रीसाठी योग्य होते.’

या अशा तेलप्रकल्पासाठी व इराकच्या प्रशासनासाठी लागणारे मनुष्यबळ भारतातून आणले होते. गंमत अशी की, आजही पश्चिम आशियातील देशांमध्ये कामानिमित्त राहणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या साठ लाखांहून अधिक आहे. म्हणजे हाही घटक आजच्या काळाशी जोडून घेता येईल. इराकहून टिकेकर गेले इराणला. इराणमध्ये तेव्हा राजेशाही शासन होते. इराणसारख्या मोठ्या देशामध्ये रेल्वेचे अतिशय कमी प्रमाण पाहून टिकेकरांना धक्काच बसला. तसेच ते आधी इराणच्या उत्तर दिशेला जाऊन मग दक्षिणेला असलेली राजधानी तेहरानकडे गेले. त्यामुळे अफगाण सीमेवरचा खडतर डोंगराळ प्रदेश, कराचीचा समुद्र, इराकमधील वाळवंट आणि इराणमधील बर्फाळ व मैदानी प्रदेश असा वैविध्यपूर्ण मुलुख टिकेकरांनी कव्हर केला. इतक्या वैविध्याचा प्रवास करण्यासाठी जहाज, छोट्या बोटी, मोटारी, रेल्वे अशी सर्व साधने त्यांनी वापरली. ज्या व्यक्तीला मराठ्यांची अटकेपर्यंतची दौड माहिती असते, त्याला इराणचा नादिरशहा आणि त्याच्या भारतावरील स्वाऱ्याही माहिती असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनात नादिरशहाचे संदर्भ येत राहतात.

इराणच्या राजधानीतील एक राजवाडा आणि तेथील वस्तुसंग्रहालयांत भारतातून लुटून नेलेल्या वस्तू त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. भारतातून नेलेले रत्नजडित ‘मयूर’ सिंहासन त्यांना पाहायला मिळाले होते. त्याविषयीचे त्यांचे विवेचन मुळापासूनच वाचण्यासारखे आहे. तसेच इराणमध्येच त्यांनी रशियन नागरिक पहिल्यांदा पाहिले. सोव्हिएत रशिया व कम्युनिझम यांच्याविषयी पाश्चात्त्य जगाला 1920 च्या दशकात भीती वाटत होती. रशियन नागरिक व कम्युनिझमविषयी अतिशय विखारी भाषेत प्रचार केला जात असे. त्यामुळेच जेव्हा त्यांनी रशियन नागरिक पाहिले, तेव्हा ते लिहितात की, ‘रशियन म्हणजे काही तरी निराळ्या प्रकारची माणसे असावीत. वाघोबाला भिऊन जशी लहान मुले दूर पळतात किंवा अस्वलाला पाहून कुतूहलमिश्रित भीती त्यांना वाटते तशाच प्रकारचे मन इंग्रजी वर्तमानपत्रांतील बातम्या वाचून बनते. पण प्रत्यक्ष अनुभवाने ते सर्व ग्रह दूर झाले. अगदी माणसासारखा माणूस.’

परदेशी व्यक्तींच्या सहवासात राहिलेल्या किंवा परदेशात राहिलेल्या कोणत्याही भारतीय व्यक्तीला पडतो तो प्रश्न इराणमध्ये टिकेकरांनाही पडला : ‘फार्सी भाषेत उष्टे, खरकटे आणि किळस या तीन शब्दांना प्रतिशब्द आहेत किंवा नाहीत?’ रस्त्यावर विक्रीस ठेवलेले खाद्य पदार्थ बिनदिक्कतपणे हाताळणे, दोन्ही हाताने खाणे, दहा- बारा माणसांनी एकाच ताटात खाणे व एकाच पेल्याने पाणी पिणे- असे प्रकार पाहून हा प्रश्न पडतोच. अशा अनेक गमती-जमती पुस्तकात आहेत. टिकेकर अगदी साक्षेपी नजरेने आजूबाजूचे सारे काही टिपतात आणि त्यातले महत्त्वाचे व वैशिष्ट्यपूर्ण तपशील वाचकांपर्यंत पोहोचवतात.

एकीकडे हजला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बरोबर प्रवास करणारे, एका इराणी डॉक्टरने जेवणाचे आमंत्रण दिले म्हणून जेवायला जाणारे वं तरीही शाकाहारी जेवण घेणारे टिकेकर तितक्याच सहजपणे इराणच्या राजाच्या नववर्ष समारंभाला परदेशी वकिलांबरोबर उभे राहतात आणि राजधानीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वादग्रस्त विषयांवर बोलतात. ते अवघडलेले आहेत असे कुठेही वाटत नाही. पुन्हा हे सारे ते अगदी सहजपणे, वाचनीय भाषेत आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवतात. इराण-इराकसारख्या परकीय समाजांविषयी, तिथल्या चालीरीती-हवामानाविषयी लिहिताना ते महाराष्ट्राशी त्याची तुलना सतत करतात व संधी मिळेल तिथे ब्रिटिशांवर टीका करत राहतात.

टिकेकर गेले होते तो दोन महायुद्धांच्या दरम्यानचा काळ होता. जागतिक आर्थिक मंदीचे मळभ तेव्हा दाटून यायला सुरुवात झाली होती. स्थानिकांना नोकऱ्या द्यायला हव्यात आणि परकीयांना देशाबाहेर काढायला हवे, ही भावना जोर धरू लागली होती. तसेच याच काळात वसाहतवादाविरुद्ध हवा तापायला सुरुवात झाली होती. याची चुणूक ही वार्तापत्रे वाचताना मिळते. या काळात विमानवाहतूक सुरू झाली होती आणि जग जवळ यायला सुरुवात झाली होती. त्याची निरीक्षणे टिकेकरांच्या लेखनात डोकावतात. इराकविषयी लिहिताना ते नोंदवतात की, ‘खाद्य पेयांच्या पदार्थांचा या प्रांतात दुष्काळच आहे, म्हणून काय गमतीचा संगम होतो पहा. स्वित्झर्लंडमधील गोठलेले दूध, फ्रान्समधील साखर, हिंदुस्तानातील चहा, जपानातून आलेली उपकरणी आणि पदार्थ सेवन करणारे अरबस्तानातील रहिवासी. भाजीपाल्यांचीही अडचण असल्याने हॉलंडमधील सोललेले मटार येथे अगदी ताजे अशी मिळतात आणि रोजच्या जेवणातही लिव्हरपूलच्या मिठाशिवाय चालत नाही.’

टिकेकरांची निरीक्षणदृष्टी किती सूक्ष्म आणि मार्मिक असावी, याचे असे अनेक दाखले पुस्तकभर विखुरलेले आहेत. या प्रदेशाविषयी लिहिलेले हे पहिलेच मराठी पुस्तक असावे. त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व आणखीच जास्त आहे. इतके सुंदर पुस्तक दीर्घ काळ आउट ऑफ प्रिंट होते. या पुस्तकात जर श्री.रा. टिकेकरांचा फोटो, चरित्रपट आणि लेखनाची सूची देता आली असती, तर पुस्तकाचे सौंदर्य आणखी वाढले असते. तसेच या निमित्ताने टिकेकरांची इतर पुस्तके पुन्हा प्रकाशित व्हायला हरकत नसावी. आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी, आपल्या शेजारी राष्ट्रांविषयी व पश्चिम आशियाविषयी कुतूहल असलेल्या कोणालाही हे पुस्तक वाचायला आवडेल.

संकल्प गुर्जर

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

प्रथमावृत्ती : 1931 लेखक (मुशाफर) : श्रीपाद रामचंद्र टिकेकर संपादक : मनीषा टिकेकर पृष्ठे : 204, किंमत: रु. 200 प्रकाशक : इंकिंग इनोव्हेशन्स

मागोवा

मौनाचे वर्ष

लुई फिशर

‘केवळ तर्कशास्त्राच्या आधारावर माणूस जगू शकत नाही, त्याला काव्यही पाहिजे असते’ असे गांधींनी एकदा लिहून ठेवले होते. श्रद्धा, सहज प्रवृत्ती, अंतर्ज्ञान व प्रेम हे विषय संवेदनाक्षम आकलनातून व तर्कशुद्ध मानसिक दृष्टिकोणातून पहावेत असे त्यांना वाटे. त्यापासून ढळून, काल्पनिक अतर्क्य गूढ संदेश, चमत्कार, भ्रामक कल्पना व भाकिते करणाऱ्या मानसिक वा शारीरिक विचारसरणीत ते कधीच गढून जात नसत. ‘ज्ञानेंद्रियाला सुखकर वाटणाऱ्याच अस्सल गोष्टी ते मान्य करीत असले तरी, त्याचा सातत्याने जोरदार पाठपुरावा करण्यास ते तयार नसत,’ असे त्यांच्या अनुयायाने म्हटले. माणसांचे व घटनांचे मूल्यमापन ते स्पष्ट अशा निकषांवर ठरवीत. आपले मूल्यमापनदेखील त्यांनी बुद्धीला पटेल अशा निकषांवर केले होते. गूढ व चमत्काराने लोकांच्यावर प्रभाव पाडावा असे त्यांना वाटत नसे. स्वत:चे मूल्यमापनदेखील ते शिस्तबद्ध, शांत चित्ताने करीत. त्यांचे कामकाज वास्तववादी असे, त्यांचे ध्येयही वास्तवावरच आधारलेले असे.

मौन पाळण्याचे गांधींचे वर्षाकाठी 52 दिवस असत, त्या दिवशी ते बोलत नसत. मुलाखतीसाठी आलेल्यांचे ते केवळ ऐकून घेत, क्वचित प्रसंगी उत्तरादाखल कागदाच्या चिटोऱ्यावर पेन्सिलीने दोन-चार शब्द लिहीत. बोलणेच बंद असल्यामुळे आठवड्यातील किमान तो एक दिवस त्यांना एकांतवास लाभे. ‘मौन पाळण्यामागचा आपला काय उद्देश?’ असा प्रश्न मी (लुई फिशरनी) गांधींना 1942 साली केला होता.

त्यावेळी माझ्या शरीराच्या आणि मनाच्या अक्षरश: चिंध्या झाल्या होत्या. अव्याहतपणे मी काम करीत होतो. रेल्वेच्या डब्यातून उकाड्याचा प्रवास, अनेक ठिकाणची व्याख्याने, रेल्वेत वा अन्य ठिकाणी जमलेल्या हजारो लोकांनी विचारलेले प्रश्न व त्यांच्या विनवण्या, आणि माझ्या समवेतच प्रार्थना करण्याची त्यांची इच्छा यांमुळे मी अगदी थकून गेलो होतो. म्हणून आठवड्यातून एक दिवस मला विश्रांतीची आवश्यकता होती. मग मी तेवढा एक दिवस मौन पाळू लागलो. अर्थात्‌ त्यानंतर त्याला मी सर्व सद्‌गुणांचा आध्यात्मिक मुखवटा चढवला!

खरे तर मला आठवड्यातील एक दिवस सुट्टीची जरूरी होती. हे बोलताना ते स्वत:शीच हसले. ‘परंतु हे कशासाठी,’ असा प्रश्न वारंवार विचारला असता तरी, ‘अध्यात्माचे धडे घेण्यासाठी’ असे त्याला उत्तर आले असते. त्यांच्या मौनाचा सोमवार हा दिवस असला तरी वर्षभरात इतर दिवशी त्यांना विश्रांती थोडीच मिळणार होती? त्यांनी तेवढ्यापुरता प्रवास केला नाही, किंवा जनतेपुढे व्याख्याने दिली नाहीत तरी, इतर दिवशी मुलाखती-लिखाण-पाहुण्यांच्या भेटी आणि भारतातील व बाहेर देशांतील हजारो लोकांबरोबर पत्रव्यवहार इत्यादी गोष्टी चालूच होत्या.

1 एप्रिल 1926 रोजी लॉर्ड रीडिंग यांच्या जागी लॉर्ड आयर्विन भारताचे नवीन व्हॉइसरॉय म्हणून आले. (लॉर्ड आयर्विन पुढे लॉर्ड हॅलिफॅक्स म्हणून ब्रिटिश युनियनचे परराष्ट्र सचिव, व नंतर वॉशिंग्टनमधील ब्रिटनचे वकील झाले.) व्हॉइसरॉय बदलाच्या या महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख ‘यंग इंडिया’मध्ये झाला नव्हता, किंवा गांधींनी त्याविषयी अन्यत्रही कोठे उल्लेख केला नव्हता. व्हॉइसरॉयशी चर्चा करण्याऐवजी आता त्यांनी भारतीय जनतेबरोबर असहकाराच्या चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली होती. अंतर्गत स्वातंत्र्य मिळवावे हेच त्यांचे त्यावेळी एकमेव ध्येय होते.

परंतु गांधींच्या भूमिकेत अत्यंत महत्वाचा बदल आता झाला होता. हिंदू-मुस्लिम मैत्रीत बाधा आणण्याचा ब्रिटिशांचा उद्देश आहे, असा त्यांना संशय येऊ लागला. ही भूमिका अविश्वासावर आधारलेली आहे असे त्यांनी 12 ऑगस्ट 1923 रोजी लिहिले होते. ‘अविश्वासातून पक्षपातीपणा आणि पक्षपातीपणातून विभाजन, या गोष्टींचे उगमस्थान संशयात दडलेले आहे’ असे त्यांचे म्हणणे होते. हिंदू-मुस्लिम ऐक्यातूनच भारताला स्वातंत्र्य मिळेल अशी गांधींची धारणा होती. तथापि ब्रिटन हा तिसरा पक्ष अस्तित्वात असेपर्यंत हे ऐक्य अशक्यच आहे हे त्यांच्या लक्षात आले. सरकार तर मुस्लिमधार्जिणे दिसत होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारताला धार्मिक शांततेची निकड होती. हा पेचप्रसंग असला तरी गांधी आशावादी होते. ‘तरीही आपल्यात ऐक्य निर्माण होईल. माणसाचे प्रयत्न जेथे निष्फळ ठरतात तिथे ईश्वर यशस्वी होतो; ब्रिटिशांचे राज्य तोडा-फोडा आणि राज्य करा’ असल्या विचारसरणीवर आधारलेले असते.’ परंतु अद्यापि भारतातील कित्येक ठिकाणी या दोन धर्मीयांच्यात रक्तरंजित झगडे चालूच होते. बहुसंख्य हिंदूंनी अल्पसंख्य मुस्लिम लोकांना योग्य वागणूक द्यावी आणि दोहोंनीही अहिंसेचे पालन करावे हाच हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी उपाय होता.

गांधी मुस्लिमधार्जिणे आहेत असे हिंदू त्यांच्यावर गंभीर आरोप करीत असत. परंतु त्यावर्षी तर कुत्रे हा एक तीव्र वादविवादाचा विषय होऊन बसला. कित्येक महिने हे वादळ त्या महात्म्याच्या मस्तकावर घोंघावत होते. अहमदाबादमधील कापड गिरण्यांचा बडा मालक अंबालाल साराभाई याच्या कारखान्याच्या विशाल परिसरात नेहमी भटकी कुत्री हिंडत असत. एके दिवशी त्यांच्या लोकांनी साठ भटकी कुत्री पकडून नष्ट केली. या घटनेने साराभाई उद्विग्न झाले. आपल्या वेदना त्यांनी महात्म्याच्या कानावर घातल्या. ‘मग दुसरे काय करणार?...’ असे गांधींनी उद्गार काढले. ‘असे असेल तुमचे म्हणणे, तर त्याचा काय अर्थ होतो?’ साराभार्इंनी विचारले.

दोघांधील हे संभाषण अहमदाबादमधील मानवतावादी संस्थेच्या कानावर आले. हा विषय त्यांनी गांधींच्यावर उलटवला. ‘-मग दुसरे काय करणार, असे तुम्ही म्हणाला असाल तर त्याचा काय अर्थ होतो?’ अशाच मजकुराचे पत्र त्यांनी आश्रमाकडे पाठवून गांधींच्याकडे खुलाशाची मागणी केली. ‘कोणत्याही प्राणिमात्राला ठार मारण्याला हिंदू धर्माने प्रतिबंध केला असून, ते पाप आहे असे सांगितले आहे, पिसाळलेली कुत्री माणसांना आणि इतर कुत्र्यांना चावून त्यांनाही पिसाळून सोडतील, या संभाव्य कारणासाठी त्यांची हत्या करणे योग्य आहे असे म्हणण्यास तुम्ही कसे काय धजावता?’ असा जळजळीत सवाल त्यांनी पत्रात केला होता.

हे पत्र गांधींनी जसेच्या तसे ‘यंग इंडिया’च्या अंकात ‘हीच का मानवता?’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. तसेच गांधींनी दिलेले उत्तर दीड पानात छापले होते. ‘मग दुसरे काय करणार? -हे माझे बोलणे खरे आहे.... आणि त्याला या अंकात मी दिलेले उत्तर योग्यच आहे... चुकणे हे मर्त्य माणसातील वैगुण्य आहे’, उत्तरादाखल ते पुढे म्हणतात की, ‘एखाद्या माणसाने अन्य माणसांची हत्या करायला सुरुवात केली तर त्या माणसालाही ठार मारणे हे कर्तव्यच ठरते.’

‘यंग इंडिया’च्या पुढील अंकाच्या मुखपृष्ठावर, ‘हीच का मानवता?’ या मथळ्याखाली त्यांनी लिहिले होते, ‘पहिला लेख वाचल्यानंतर त्याचा तीव्र निषेध करणाऱ्या पत्रांचा लोंढाच आला. माझा अपमान करण्यासाठी लोक जमले. त्यावर कळस म्हणजे दिवसाच्या कामातून थकून भागून मी रात्रीच्या वेळी झोपायच्या तयारीत असताना, तीन मित्रांनी माझी झोपमोड केली आणि मानवधर्म झुगारून त्यांनी माझ्याशी चर्चा सुरू केली.’ इथे गांधींनी मित्र असाच उल्लेख केला होता, कारण दुसऱ्या कुणालाही ते मित्र मानीत असत. त्यांपैकी एक जैन होता. त्याने राग, कडवटपणा आणि उद्धटपणाचा अतिरेक केला होता.’ जैन धर्मातील पवित्र अशा अहिंसेच्या प्रभावाखाली गांधी लहानाचे मोठे झाले होते. ‘म्हणून मी जैन आहे असाच लोकांचा समज होता. महावीर हे जैन धर्माचे संस्थापक, अहिंसेचे आणि अनुकंपेचे तर अवतारच होते! त्यांचे निस्सीम भक्त हे जर खरोखरीच अहिंसेचे भक्त झाले, तर ते किती सुंदर होईल!’ असे गांधींनी लिहिले होते.

गांधी आपल्या मुद्यावर ठाम होते. ‘भटक्या कुत्र्यांची झुंड तयार होणे चुकीचे आहे. कोणी मालक नसलेल्या भटक्या कुत्र्यांची झुंड तयार झाली, तर माणसांच्या अस्तित्वावरच संकट कोसळेल. लोक खरोखरीच धर्माचे पालन करणारे असतील तर कुत्र्याला पालक असला पाहिजे. कुत्रे पाळणे हे एक शास्त्र आहे आणि पश्चिमात्यांकडून ते आपण शिकून घेतले पाहिजे.’

‘कुत्रा’ या विषयावर पत्रे येतच राहिली, काही विरोधक टीकाकारांनी तर सभ्यतेच्या मर्यादेचा भंग केला होता. पुढच्या ‘यंग इंडिया’च्या अंकात या विषयाचा त्यांनी तीन पाने खर्च करून ऊहापोह केला होता. ‘एका गृहस्थाने माझी मुलाखत मागितली होती; आणि माझ्या संमंतीशिवाय छापील हस्तपत्रिकेत त्या मुलाखतीचा सारांश देऊन तो रस्त्यावर पत्रके वाटत होता. या प्रकारे तो मला धडा शिकवणार होता का? जो गुन्हेगार स्वत: रागाने भडकलेला असतो, तो दुसऱ्याला अहिंसा कसा काय शिकवणार?

‘असे असूनही विरोध करणाऱ्या या टीकाकाराने माझी एक प्रकारे सेवाच केली. त्याने मला आत्मचिंतन करायला शिकवले. त्याचा मी रागानेच प्रतिवाद तर केला नाही ना, हे तपासून घ्यायची त्याने मला ही एक संधीच दिली होती. आणि त्याच्या मुळाशी गेल्यानंतर माझ्या लक्षात आले की, त्याच्या पाठीमागे दुसरे काही नसून प्रे दडले आहे.’ या विचित्र निर्णयाप्रत गांधी कसे पोचले होते? ‘त्याला अभिप्रेत असलेल्या अहिंसेप्रमाणे मी नव्हतो, तर त्याच्या विरोधी मी वागतो आहे असे समजून त्याने माझ्यावर राग धरला आहे. ‘त्याच्या रागाचा उद्रेक मी समजू शकतो. त्यामागचा त्याचा हेतू मी जाणतो. म्हणून अत्यंत सहनशीलतेने त्याला पटवून दिले पाहिजे...’

पुढे त्या उपायाच्या रास्तपणाविषयी ते लिहितात की, ‘भटक्या कुत्र्याला खायला घालणे हे पाप आहे. ही खोटी अनुकंपा आहे. एखाद्या भुकेल्या कुत्र्यापुढे तुकडा टाकणे हा त्याचा अपमान आहे. भटकी कुत्री हे समाजाच्या संस्कृतीला व अनुकंपेला शोभत नाही. उलट ते माणसाच्या अज्ञानाचे व सुस्तीचे द्योतक ठरते. खालच्या प्रतीचे प्राणीदेखील आपले भाईबंदच आहेत. वाघ, सिंहाचाही त्यात समावेश होतो. या मांसाहारी प्राण्यांविषयी, विषारी सापाविषयी आपण अज्ञानी असल्यामुळे त्या प्राण्यांना कसे सांभाळून घ्यावे हे आपल्याला समजत नाही. ते समजले तर त्यांच्याबरोबर आपण समन्वयाने नांदू शकू. एवढेच कशाला, दुसऱ्या धर्मातील किंवा अन्य राष्ट्रातील लोकांशी मैत्री कशी करावी हे देखील आपल्याला माहीत नाही.’

कुत्र्यांना ठार मारल्यानंतर त्या कुत्र्यांच्या प्रेमिकांनी आक्रोश केला, परंतु साठ मुस्लिम किंवा इंग्लिश माणसे मारली गेल्यानंतर ते प्रेमिक तसे करणार नाहीत, असे गांधींना वाटू लागले.

भटक्या कुत्र्यांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेला कोणी एखादा द्रव्यसाहाय्य करेल किंवा तो स्वत: त्यांचे पालन करेल, आणि त्याच्या पाठीशी जर सरकार उभे राहणार नसेल तर भटक्या कुत्र्यांचा नाश करण्याशिवाय कोणता पर्यायी उपाय असू शकतो? ‘लुळी पांगळी झालेली जनावरे काय किंवा माणसे काय, त्यांची आपल्या भारतात कुत्र्याप्रमाणे जी वाईट अवस्था झाली आहे ते पाहून मला अतोनात दु:ख होते’ असे गांधी म्हणत. -मग लुळ्या पांगळ्या गायींची हत्या का करू नये? असाही प्रश्न उपस्थित होईल. ‘एखाद्या डोके फिरलेल्या माणसाने तलवार हाती घेऊन जर समोर येईल त्या माणसाला ठार मारायला सुरुवात केली, आणि कोणी त्या माथेफिरूला जिवंतपणी पकडू शकणार नसेल तर, आणि जर कोणी त्याची हत्या करणे हे कर्तव्य समजून त्याचा नाश करेल तर सगळा समाज त्याला धन्यवाद देईल...’ असे गांधींनी पुढे लिहिले.

तुम्ही आमच्या पत्रांना वैयक्तिकरित्या उत्तरे पाठवली नाहीत तर आम्ही तुमच्यावर हल्ला करू, अशी अनेक पत्रे त्यांच्याकडे आली. ‘या विषयावर आलेल्या पर्वतप्राय पत्रांना मी उत्तरे देऊ शकणार नाही, पण त्यांचे उत्तर माझ्या मुखपत्रात देईन’ असे गांधी म्हणाले.

‘कुत्रा’ या विषयावर त्यांनी मुखपत्राच्या पुढच्या चार अंकांत उतारेच्या उतारे लिहून त्याला उत्तरे दिली. त्यात त्यांनी उल्लेख केला की, अहमदाबादच्या एका हॉस्पिटलमध्ये 1925 साली पिसाळलेली कुत्री चावण्याच्या 1117, व 1926 साली 990 घटना झाल्याची नोंद होती. यासाठी तुम्ही पाश्चात्यांकडून धडा घ्यावा असे ते म्हणत. ‘पाश्चात्यांना मानवता हा विषय अगम्य आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.’ परंतु मनाला वेदना देणारी वस्तुस्थिती तर पुढेच होती. ‘मानवतेचे ध्येय पश्चिमात्य लोकांच्या दृष्टिकोणात कमी प्रमाणात असले तरी, प्रत्यक्ष कृतीने ते ध्येय आपल्यापेक्षा उच्च पातळीवर नेऊन ठेवतात. आपण उच्च ध्येयाच्या नुसत्या गप्पा मारतो पण त्या मानाने आपली कृती अगदी नगण्य स्वरूपाची असते. आपल्याकडील निकृष्ट दर्जाच्या जनावरांच्या आणि इतर प्राण्यांच्या संख्येवरून ते दिसून येते. आपल्या धर्माला ही गोष्ट शोभणारी नाही, हा अधर्म आहे, हेच त्याचे द्योतक ठरते!’

तुमच्यावर पाश्चात्यांचा प्रभाव आहे हेच त्यावरून सिद्ध होते, असे आरोप टीकाकार त्यांच्यावर करीत. तरीही, बेफाम झालेल्या लोकांना ते शांतपणे तोंड देत. पाश्चात्यांतील काही वाईट चालीरीतींवर गांधी हल्ला करीत आणि काही चालीरीतींचे ते स्वागत करीत. ‘त्याचा उगम कोठून झाला याचा शोध घेत बसण्यापेक्षा, आपण त्याचा मथितार्थ लक्षात घेतला पाहिजे.’ ‘या विषयावर माझ्याकडे पत्रे येतच होती, पण ती विखारी मजकूरांनी भरलेली असल्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले’ असे त्यांनी तिसऱ्या महिन्यात जाहीर केले.

मौनाचे हे वर्ष कुत्र्यांविषयी वादंगाच्या गोंगाटाने निनादून गेले होते, अशा वेळी गायीच्या एका वासराने आणखी एक वादळ निर्माण केले. आश्रमातील एक पाडी आजारी पडली. तिच्यावर उपचार केले तरी तिच्या वेदना वाढत गेल्या, म्हणून तिला संपवावे असा गांधींनी निर्णय घेतला. कस्तुरबार्इंनी त्याला हरकत घेतली. ‘मग तू तिच्यावर औषधोपचार कर आणि तिची सेवाशुश्रुषा कर’ असे त्यांनी कस्तुरबांना सुचवले. त्या प्राण्याच्या वेदना कस्तुरबांना पाहावेनात. मग गांधींच्या उपस्थितीत डॉक्टरांनी त्या वासराला इंजेक्शन दिले, व वासरू गतप्राण झाले. या घटनेचा निषेध करणाऱ्या बेफाम आरोपांची पत्रेही त्यांच्याकडे येऊ लागली. मी केले ते योग्यच केले असे गांधींनी म्हटले.

लैंगिक विषयावर चर्चा करणारी तरुण-तरुणींची कित्येक पत्रे त्यांच्याकडे येऊ लागली, गांधींच्याकडून त्यांना सल्ला पाहिजे होता. या मौनाच्या काळात लाभलेल्या थोड्याबहुत शांततेचा उपयोग करून, कुटुंब व लैंगिक विषयावर हॅवेलॉक एलिस, पॉल ब्यूरोचे ‘मोरल बँकरप्सी (नैतिक दिवाळे)’ आणि युरोपातील अन्य तज्ज्ञांनी केलेले लिखाण गांधींनी वाचले. भारतातील लैंगिक संबंध हा विषय त्यांच्या दृष्टीने महत्वाचा होता. तरुणपणी वरचेवर स्त्री-पुरुषांच्यात समागम होण्याने भारतीयांच्यात शक्तिपात होतो, शिवाय भारताची लोकसंख्याही झपाट्याने वाढते आहे हे गांधींच्या लक्षात आले. 1940 सालापासून दरवर्षी पन्नास लक्ष या वेगाने ती वाढत होती. हा विषय त्यांनी आध्यात्मिक पातळीवर नेऊन ठेवला. भारतातील धार्मिक वाङ्‌मयाचा दाखला देऊन, आर्थिक कारणासाठी लैंगिक पावित्र्य सांभाळले पाहिजे याचे त्यांनी समर्थन केले. त्यातील नैतिक व आर्थिक पैलू लक्षात घेण्यास ते विसरले नाहीत.

1926 च्या मौनाच्या वर्षात आणि नंतरही, त्यांनी शाईने किंवा पेन्सिलीने कित्येक लेख लिहिले. संततीनियमनाच्या साधनांचा उपयोग करण्यास त्यांचा विरोध होता. पाश्चात्यांचा तो दुर्गुण आहे असे ते म्हणत; पण संतती नियमनाला मात्र त्यांचा विरोध नव्हता, उलट त्याचे ते समर्थन करीत. शारीरिक विकारांवर मानसिक नियंत्रण ठेवून आत्मसंयमन केले पाहिजे याला ते महत्व देत.

‘संततीची वृद्धी टाळण्यासाठी आत्मसंयमन करणे हाच एकमेव पवित्र मार्ग आहे’ असे त्यांनी लिहून ठेवले. हा नियम पाळला नाही तर तो पशूपेक्षाही कनिष्ठ दर्जाचा ठरेल. कायमचे किंवा दीर्घकाळ लैंगिक संबंध टाळले तरीदेखील शारीरिक किंवा मानसिक दृष्टीने ते हानीकारक होत नाही.

गांधी व आश्रमातील त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी ब्रह्मचर्येचे किंवा संयमनाचे पालन करीत असत. काही वेळा विषयवासना भागवण्यासाठी नव्हे, तर केवळ संतती प्राप्त व्हावी यासाठी काही लोक लैंगिक विषयाचा अवलंब करतात. ‘माणसाला विषयवासना आवश्यकच असते’ हे गांधींना मान्य नव्हते.

एकाने त्यांना पत्र लिहिले की, ‘जास्तीत जास्त तीन आठवड्यापर्यंत लैंगिक नियमन मला उपयुक्त वाटे, परंतु त्यानंतर मात्र माझ्या शरीराला जडपणा येतो, शारीरिक व मानसिक अस्वस्थता निर्माण होते व मी संतापी व चिडखोर होतो. एक तर समागम केल्यामुळे, किंवा नैसर्गिक वीर्यस्खलन झाल्यामुळे मला आराम मिळतो; मी शांत होतो आणि काहीतरी नवीन करण्याच्या उमेदीने कामाला लागतो.’ अशी कित्येक उदाहरणे गांधींना ऐकायला मिळाली.

आपल्या अनुभवांतून सखोल विचार करून उत्तरादाखल ते लिहितात, ‘वीर्य जतन करून त्याचा संचय करणे ही गोष्ट प्रयत्नपूर्वक साध्य करावी लागते. ते एकदा जमले की शरीर व मन कसे बलवान होते. ज्याच्यात आश्चर्यकारक अशी मनुष्यप्राण्याला जन्म देण्याची ताकद असते अशा मौल्यवान वीर्याचे आपण व्यवस्थितपणे जतन केले तर अपूर्व अशा ऊर्जेत व शक्तीत त्याचे रूपांतर होते.’

14 सप्टेंबर 1935 च्या ‘हरिजन’च्या अंकात बुद्धिप्रामाण्यावर गांधींनी लिहिले होते की, ‘समजा कृत्रिम साधनांनी संततीनियमन करणे काही विशिष्ट परिस्थितीत आवश्यक असले तरी, भारतातील लक्षावधी लोकांसाठी ते उपयुक्त ठरणार नाही.’ भारत अत्यंत गरीब आणि अज्ञानी देश आहे आणि संतती नियमनाची साधने वापरण्याच्या कामी तो अधिकच अज्ञानी आहे. म्हणून लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी गांधी अन्य उपाय सुचवतात. संततीप्रतिबंधक साधने वापरल्यामुळे तो अधिकाधिक विषयवासनेला बळी पडेल आणि अन्य कित्येक कारणांमुळे शक्तिहीन झालेला आपला समाज अधिकच शक्तिहीन होईल.

आपल्या मुलांची लग्ने लांबवावीत, म्हणून गांधी प्रयत्नशील होते. लहानपणी लग्न करण्याच्या प्रथेला आपला विरोध असल्याचे त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवले होते. अशा लग्नांमुळे भरपूर फलप्राप्ती होते व लोकसंख्येत फार वाढ होते. अर्थात जन्मलेल्यांच्या भरण-पोषणासाठी भूातेपासून सर्व काही निर्माण करणे हा माणसाचा धर्मच आहे. गांधी धार्मिक वृत्तीचे असले तरी व्यवहाराची त्यांना चांगली जाण होती. म्हणून लोकसंख्या मर्यादित असावी असे त्यांचे मत होते.

चार्ल्स फ्रीअर अँड्र्यूजला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की, ‘काही सभ्य आणि आत्मखुशीच्या मार्गाने अपत्यप्राप्ती मर्यादित करता आली तर भारताच्या आजच्या हलाखीच्या परिस्थितीत मी त्याचे स्वागत करेन.’ मानसिक शिस्त पाळूनच ते शक्य आहे, असे त्यांना वाटे. जनतेने आयुष्यभर ब्रह्मचर्येचे पालन करावे, उशीरा लग्न करावे -म्हणजे शक्यतो पंचवीस वयाच्या आसपास लग्न करावे, आणि त्यानंतर देखील आत्मसंयमन करावे असे या आग्रही संन्याशाला वाटे. आश्रमातील मुलींच्यावर मात्र एकवीस वर्षांनंतर लग्न करण्याचे बंधन होते. त्यांना माणसातील नैतिक दौर्बल्याची जाण होती. म्हणून खाण्यातील मसालेदार पदार्थ टाळणे, योग्य कपड्यांचा वापर, योग्य पद्धतीचे श्रम, फिरायला जाणे, व्यायाम करणे, चटकदार वाङ्‌मय टाळणे, नित्य प्रार्थना करणे, सात्विक फिल्म पाहणे(तोपर्यंत चित्रपटात चुंबनाला मज्जाव होता) आणि ईश्वरावर श्रद्धा बाळगल्यामुळे आधुनिक जीवनातील ताणतणावांतून माणूस मुक्त होईल. त्यामुळे बहुसंख्य माणसांना अशक्यप्राय आणि अनैसर्गिक वाटणारे विषय-वासनेवरील संयमन त्यांना सहजपणे साध्य करता येईल.

हे सगळे लिखाण ‘यंग इंडिया’ व ‘नवजीवन’ या छोट्याशा गुजराथी अंकांतून प्रकाशित होत होते, तरीही जवळजवळ सर्व भाषांतून देशभर त्यातील शब्दन्‌ शब्दाचे भाषांतर होऊन ते प्रसारित होत असे. मौनाच्या वर्षाच्या काळात आणखी एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले होते, तो विषय होता -‘बालविधवा’. ‘ब्रिटिशांच्या 1921च्या अधिकृत गणनेनुसार 11,892 विधवा पाच ते दहा वर्षाच्या वयोगटातील; 2,32,147 दहा ते पंधरा वयोगटातील; आणि सोळा वर्षांच्या वयोगटाखाली सगळ्या मिळून 3,29,056 एवढ्या होत्या’ असा गांधींनी संदर्भ दिला. ‘बालविधवा’ हा हिंदू धर्मावरचा डाग आहे असे गांधी म्हणत. मुलगी बाल्यावस्थेत असतानाच तिचे पालक दुसऱ्या बाल्यावस्थेतील मुलाशी किंवा म्हाताऱ्याशी- देखील विवाह ठरवीत असत. तिच्या बाल किंवा म्हाताऱ्या नवऱ्याचा मृत्यू झाला तर विधवा झालेली ती मुलगी हिंदू कायद्याप्रमाणे दुसरा विवाह करू शकत नसे.

‘अशा कुमारी विधवेने पुनर्विवाह करणे योग्यच आहे, एवढेच नव्हे तर कुमारी विधवेचे लग्न करणे हे तिच्या पालकांचे कर्तव्यच आहे’ असे गांधी ठासून म्हणत असत. काही विधवा मुली पुढे वेश्या बनत. ‘त्यावर एकच उपाय म्हणजे लहान वयात मुलींचे लग्न करू नये.’ धर्मनिष्ठा असलेल्या काही हटवादींनी अनीतीच्या अनेक प्रघातांना बळ दिले. बाल विधवेने पुनर्विवाह करण्यास बंदी घातली होती. ‘त्यामुळे त्यांचा कधीच विवाह झालेला नसतो.’

मुलीचे लग्न हे धर्मपतन नसून तो एक पवित्र संस्कार विधी आहे. बालविधवेच्या संदर्भातील तीव्र भावना ते एकाच वाक्यात उच्चारीत, ‘त्यांना प्रेम म्हणजे काय हे माहीतच नसते.’ परिपक्व माणसाने आपखुशीने व हेतुपुरस्पर पावित्र्य राखले पाहिजे, पालकाने त्याचे पालन निष्ठुरपणाने मुलांच्यावर लादून चालणार नाही. प्रत्येक माणसाने प्रेकरायला शिकले पाहिजे, असे गांधी म्हणत. परंतु वयात आल्यानंतर लग्न करून नंतर विधवा किंवा विधुर झालेल्याने पुनर्विवाह करू नये, कारण त्यांनी एकदा प्रेमाचा अनुभव घेतलेला असतो, असे गांधी म्हणत. ही एक प्रकारची बंदी असते व संततीनियमनाचे ते एक साधनच ठरते.

या विश्रांतीच्या वर्षात गोरक्षण, वर्णद्वेषाच्या थैानात सापडलेल्या दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांची सुरक्षितता, दारूबंदी व जागतिक शांतता या विषयांवरील त्यांचा उत्साह अपूर्वच होता. एखाद्या वेळी सहजरित्या त्यांच्या लेखणीतून अवचित अशी म्हण, एखादा वाक्‌प्रचार लिहिला जाई, ‘लोकशाहीतील चैतन्याला गुप्ततेमुळे अडथळा येतो. धर्म, राजकारण व अर्थकारण यातून ‘मी’ व ‘माझे’ या शब्दांचे उच्चाटन होऊन आपण त्यापासून मुक्त झालो तर पृथ्वीवर आपण स्वर्ग सहजपणे आणू शकू.’ ही काही उदाहरणे.

क्वचित प्रसंगी धर्म या विषयात त्यांची सफर चाले; परंतु ईश्वर, सत्य व ज्ञान यासंबंधी त्यांनी क्वचितच लिखाण केले होते. त्यातल्या एखाद्या विषयावर विचार करायला, ते आपल्या वाचकाला उद्युक्त करीत. प्रार्थनेच्या सामर्थ्याविषयी त्यांनी एक लेख लिहिला होता. ‘ज्यावेळी बुद्धिप्रामाण्यवादी लोक आपण सर्वशक्तिमान असल्याचा दावा करतात, त्यावेळी त्यांचे हिडिस राक्षसांत रूपांतर होते. ज्यावेळी हे सर्वशक्तीवाले तर्कशक्तीला देखील मानत नाहीत त्यावेळी दगडाला किंवा लाकडी ओंडक्याला ईश्वर मानून त्याची पूजा करण्याइतकेच ते वाईट आहे... बुद्धीला प्रमाण मानणाऱ्या कोणीही, सामान्य श्रद्धेवरही विश्वास ठेवल्याचे आढळणार नाही... लहान मुलासारखी निष्पाप श्रद्धा असलेले सहस्त्रावधी लोक जगनिर्मिती करणाऱ्या ‘त्या’वर विश्वास ठेवून आपले सर्वसाधारण आयुष्य जगत असतात हे आपल्याला माहीतच असते.... ही कारणमीमांसा टाकून द्यावी असे मला वाटत नाही, पण त्या कारणमीमांसेवर सुज्ञांनी विचार केला पाहिजे...’

‘केवळ तर्कशास्त्राच्या आधारावर माणूस जगू शकत नाही, त्याला काव्यही पाहिजे असते’ असे गांधींनी एकदा लिहून ठेवले होते. श्रद्धा, सहज प्रवृत्ती, अंतर्ज्ञान व प्रेम हे विषय संवेदनाक्षम आकलनातून व तर्कशुद्ध मानसिक दृष्टिकोणातून पाहावेत असे त्यांना वाटे. त्यापासून ढळून, काल्पनिक अतर्क्य गूढ संदेश, चमत्कार, भ्रामक कल्पना व भाकिते करणाऱ्या मानसिक वा शारीरिक विचारसरणीत ते कधीच गढून जात नसत. ‘ज्ञानेंद्रियाला सुखकर वाटणाऱ्याच अस्सल गोष्टी ते मान्य करीत असले तरी, त्याचा सातत्याने जोरदार पाठपुरावा करण्यास ते तयार नसत,’ असे त्यांच्या अत्यंत जवळच्या अनुयायाने म्हटले.

माणसांचे व घटनांचे मूल्यमापन ते स्पष्ट अशा निकषांवर ठरवीत असत. आपले मूल्यमापनदेखील त्यांनी बुद्धीला पटेल अशा निकषांवर केले होते. गूढ व चमत्काराने लोकांच्यावर प्रभाव पाडावा असे त्यांना कधीच वाटत नसे. स्वत:चे मूल्यमापन देखील ते शिस्तबद्ध, शांत चित्ताने करीत. त्यांचे कामकाज वास्तववादी असे, त्यांचे ध्येयही वास्तवावरच आधारलेले असे. मुरिअल लेस्टर या इंग्लिश माणसाला, ‘मी कधी अदृष्य असा आवाज ऐकलेला नाही किंवा मला प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन घडलेले नाही’ असे गांधींनी सांगितले होते. कोणताही गूढसदृश अनुभव त्यांच्यावर प्रभाव टाकीत नसे. त्यांच्या श्रद्धेला केवळ तर्कशास्त्राचे पंख लाभत असत. गांधींची कीर्ती जगभर पसरू लागली होती.

रोमा रोलाँ या फ्रेंच लेखकाने त्यांच्यावर एक पुस्तक लिहिले होते. ‘आमच्या भेटीसाठी या’ अशा प्रकारची आमंत्रणे कित्येकांकडून -विशेषत: अमेरिकेतून त्यांच्याकडे आली. परंतु त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही. ‘त्याचे कारण अगदी साधे आहे. अमेरिकेला जाण्याइतका पुरेसा आत्मविश्वास माझ्यात नाही. अहिंसेच्या चळवळीने इथे मूळ धरले आहे आणि ती टिकून राहाणार हे निश्चित. तिला अंतिम यश मिळेल याविषयी मला मुळीच शंका वाटत नाही. अहिंसेच्या क्षमतेविषयी दृश्य काही प्रदर्शन मी करू शकणार नाही; परंतु ते साध्य होईपर्यंत मी माझ्या भारताच्या कर्मभूीवरच प्रचार करीत राहीन.’ असे ते म्हणत. ‘श्रद्धेचा साथी’, ‘शेजारधर्म पाळणाऱ्यांचा संघ’, ‘पौर्वात्य व पश्चिमात्यांची एकजूट’ अशा संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिसेस केली व मिसेस लँगेलॉथ या दोघीजणी, या महात्म्याला अमेरिका भेटीचे निमंत्रण देण्यासाठी साबरमती आश्रमात आल्या. ‘रेल्वे, स्टीमशिप इत्यादी वेगवान वाहनांना तुम्ही हरकत घेता, हे खरे आहे का?’ अशी त्यांनी गांधींची उलट-तपासणी करायला सुरुवात केली. ‘ते खरे आहे आणि नाहीही’ असे त्यांनी दोघींना हसत हसत उत्तर दिले. ‘हजार वेळा ते सत्य आहे’ असे ते बोलले, पण ते समजण्यासाठी तुम्ही प्रथम माझे ‘हिंद स्वराज’ हे पुस्तक वाचा, असा मी सल्ला देईन,’ असे गंभीरपणे गांधींनी त्यांना सुचवले. परंतु शेवटी यंत्र आणि वेग यासंबंधी आपल्या विचारांचे आकलन त्यांना होणार नाही हे गांधींच्या लक्षात आले. पुढची ट्रेन पकडण्याची घाई असल्याचे सांगून त्या त्वरेने निघून गेल्या.

वैयक्तिक व राष्ट्रीय दृष्टिकोणातून त्यांना तशी कोणतीच निकड नव्हती, म्हणून गांधी एक वर्षभर स्वस्थ राहिले. 1926 हे वर्षभर त्यांच्यासाठी सारे राजकारण पुढे ढकलण्याचे सर्वसंतीने मान्य झाल्यामुळे, त्यांनी त्या कालावधीचा पुरेपूर आनंद लुटला. त्यामुळे त्यांना शारीरिक स्वास्थ्य मिळाले व त्यांच्या आत्म्याला स्वैर चिंतनात विहार करण्याची संधी मिळाली. मुख्यत: ते मुलांच्यात रममाण झाले. आश्रमातल्या सूतकताई चढाओढीत त्यांच्या तरुण नातवंडांकडून गांधी व कस्तुरबा या सर्वांत मोठ्या वयाच्या स्पर्धकांचा पराभव होई.

हा निकाल जाहीर झाला की हसत-खिदळत सर्वजण निकालाचे स्वागत करीत. ज्यांची बुद्धिमत्ता पात्यासारखी धारदार आहे असे मद्रासचे प्रसिद्ध वकील राजगोपालाचारी, महादेव देसाई हा गांधींचा सचिव व मुख्य प्रचारक, आणि गांधींपेक्षा दोन वर्षांनी लहान असलेला व ज्याला ते ‘परोपयोगी’ म्हणत, तो चार्ली अँड्र्यूज यांच्याशी याच कालावधीत त्यांची घनिष्ठ मैत्री जमली. ‘तो माझ्या सख्ख्या भावापेक्षाही अधिक जवळचा आहे; त्याच्यापेक्षा अन्य कोणाशी माझे घनिष्ट संबंध आहेत हे सांगणे अशक्य आहे -इतका मि.अँड्र्यूज माझा परममित्र आहे.’

या हिंदू संन्याशाला अँड्र्यूजपेक्षा अधिक चांगला संन्याशी मिळू शकला नाही; या ख्रिश्चन मिशनऱ्याला गांधींसारखा अधिक चांगला ख्रिश्चन सापडला नाही. बहुधा दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे या भारतीय व इंग्रजी माणसांत बंधुभाव निर्माण झाला हेच त्याचे प्रमुख कारण असावे. धार्मिक प्रवृत्तीने ते एकमेकाच्या समीप आले, त्यामुळेच भिन्न राष्ट्रीयत्व हे त्यांच्यात दुरावा निर्माण करू शकले नाही. ‘इंग्लंड व भारत मला सारखेच प्रिय आहेत’ असे अँड्र्यूज म्हणे. 27 डिसेंबर 1928 रोजी गांधींनी कलकत्त्याहून अँड्र्यूजला एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी लिहिले होते की, ‘मी भारताचीच सेवा करतो म्हणून इंग्लंड व जर्मनी दुखावले जाणार नाहीत अशी मला आशा आहे. अत्यंत पुरोगामी असणारा भारतीय राष्ट्रवादी, पश्चिम देश किंवा इंग्लंड यांचा द्वेष करण्याइतका संकुचित नाही... राष्ट्रवादाच्या वेशातली ती दोन राष्ट्रे आंतरराष्ट्रवादी झाली आहेत....’ राष्ट्रवाद जर मानवसमुदायाचे विभाजन करू शकला नाही, तर धर्मच माणसांत बंधुभाव निर्माण करेल.

(अनुवाद : वि. रा. जोगळेकर)

साधना प्रकाशनाकडून मागील महिन्यात प्रसिद्ध झालेल्या ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकातील एक प्रकरण.

मागोवा

बोधिधर्मन आणि कराटे युद्धविद्येचा इतिहास

मिलिंद पाटील

भारतात कराटे आणि तत्सम प्रकार शिकणाऱ्यांची (आणि शिकविणाऱ्यांची) संख्या वाढत असली तरी या विद्येचा ‘आत्मा’ हरवत चालल्याची खंत वाटते. आपल्या मुलांना कराटे क्लासेसना घालून ‘ब्लॅक बेल्ट’ मिळवणे किंवा थेट राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन मेडल्स मिळविणे आणि काहीच शक्य नसल्यास पांढरे कपडे घालून मिरवणे यापलीकडे पालकांनी सर्वप्रथम याचा विचार करणे आवश्यक आहे. मध्यंतरी महाराष्ट्र राज्य सरकारने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य अथवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केवळ सहभागी झाल्यास 25 गुण राखून ठेवले होते. सरकारने काढलेल्या या जी.आर.चा पालक, विद्यार्थी, शाळेतील शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षक यांनी मिळून अक्षरशः निकाल लावला होता. सर्वच क्रीडाप्रकारांमध्ये मुलं हिरीरीने सहभागी झाली. सरकारने हा निर्णय मागे घेईपर्यंत विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली चमक(!) दाखवली होती.

इ.स. 470 च्या कालखंडात काळी दक्षिण भारतातील कांचीपुरम ही पल्लव साम्राज्याची राजधानी होती. बोधिधर्मन यांचा जन्म मद्रासजवळील कांचीपुरम येथील एका राजघराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव बोधितारा असे होते. मात्र नंतर त्यांचे गुरू प्रज्ञातारा यांनी बोधितारा हे नाव बदलून ‘बोधिधर्मन’ असे ठेवले. बोधिधर्मन यांनी सुरुवातीची बरीच वर्षे दक्षिण भारतात बौद्ध धर्माचा प्रसार केला. मात्र त्यांच्या गुरूंच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘झ्हेन डान’ (चीनचे जुने नाव) येथे जाऊन महायान पंथाचा प्रसार करणे त्यांना महत्त्वाचे वाटते. असे म्हणतात की, बोधिधर्मन प्रत्यक्षात चीनमध्ये पोहोचण्यापूर्वी कांचीपुरम येथून कबुतरांच्या साह्याने त्यांच्या आगमनाचा संदेश चीनमध्ये पाठवण्यात आला होता.

इ.स. 470 ते 543 हा बोधिधर्मन यांचा कालखंड होय. त्यांच्या प्रवासमार्गाबद्दल खात्रीलायक पुरावे नसले, तरीही काही इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे महाबलीपुरम या बंदरातून त्यांनी प्रवासास सुरुवात केली. ‘श्रीविजय’ ही त्या काळी दक्षिण सुमात्रा राज्याची राजधानी होती. तिथून त्यांनी मलेशिया, कंबोडिया, थायलँड आणि व्हिएतनाममार्गे प्रवास केला. तीन वर्षांच्या या प्रवासानंतर इ.स. 520 मध्ये त्यांनी चीनमधील ‘कुआंग’ नावाच्या बंदरात प्रवेश केला. आज हा भाग ‘गुआंगझु’ या नावाने ओळखला जातो. आपल्या या प्रवासादरम्यान बोधिधर्मन यांनी ‘रीड’ गवतापासून बनविलेल्या नावेतून यांगत्से नदी पार केली. सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी खूप खडतर गेला. याच भागातील ‘हुॲलीन’ नावाच्या देवळात त्यांनी बौद्ध भिक्खूंना महायान (चॅन) पंथाची शिकवण देण्यास सुरुवात केली.

आज ‘हुॲलीन’ देवळात बोधिधर्मन यांची मूर्ती पाहावयास मिळते. तेथील ‘शाओलीन’ देवळाच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरातील गुहेमध्ये बोधिधर्मन यांनी नऊ वर्षे ध्यानधारणा केली होती. त्यांच्या या ध्यानसाधनेवेळी शाओलीनमधील त्यांचे शिष्य त्यांच्यासाठी जेवण-पाणी घेऊन जात. त्यांच्या वास्तव्यामुळे ‘शाओलीन’ प्रसिद्ध झाले. महायान पंथाला चिनी भाषेत ‘चॅन बुद्धिझम’ असे म्हणतात, तर त्यालाच कोरिया आणि जपानमध्ये अनुक्रमे ‘सेऑन बुद्धिझम’ व ‘झेन बुद्धिझम’ अशी नावे आहेत. ‘झेन’ हा शब्द संस्कृतमधील ‘ध्यान’ या शब्दाचा जपानी भाषेतील अपभ्रंश आहे.

जपानमधील जवळपास सर्वच ‘झेन’ देवळांमध्ये तथागत गौतम बुद्धांसोबत बोधिधर्मन यांची मूर्ती आहे. बोधिधर्मन यांना चीनमध्ये ‘दामो’ या नावाने ओळखतात, तर जपानमध्ये त्यांना ‘धर्मसेन’ असे नाव आहे. भारतातील महायान पंथाचे ते 28 वे प्रवर्तक होते, तर चीनमधील महायान पंथाचे ते पहिले प्रवर्तक होत. कराटे या आशिया खंडातील युद्धविद्यांचे जनक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. त्या काळात मात्र कराटे ही विद्या फारच निराळ्या स्वरूपात होती. चीनमध्ये या विद्येला ‘वेर्मनिए’ या नावाने ओळखले जाई. बोधिधर्मन यांनी लहान वयातच दक्षिण भारतातील ‘कलरीपायट्ट’ या युद्धविद्येचे धडे गिरविले असल्याने अर्थातच त्या युद्ध प्रकाराशी तिचा जवळचा संबंध होता. काही इतिहासकारांच्या मते, जंगलातील डाकू, दरोडेखोर आणि जंगलीश्वापदे यांना बौद्ध भिक्खू बळी पडू नयेत म्हणून त्यांनी ही युद्धविद्या आपल्या शिष्यांना शिकविली असावी. आत्मिक शक्ती ही आपल्या श्वासाच्या गतीवर अवलंबून असते, अशी त्यांची शिकवण होती. आज यालाच कराटेमध्ये ‘की’ असे म्हणतात. त्यांनी शिकविलेली ही विद्या म्हणजे आत्मज्ञानप्राप्तीचा एक मार्ग होता.

महायान पंथानुसार कित्येक तास ध्यानसाधनेवेळीदेखील शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालवा यासाठी त्यांनी आपल्या शिष्यांना युद्धविद्यांसोबतच श्वसनाच्या विविध पद्धती, प्राणायाम व योग अभ्यासाचे धडे दिले. आज कराटेमधील ‘किबादाची’ किंवा ‘हॉर्स स्टान्स’ हा प्रकार आणि ‘सांचीन’ हा काता प्रकार बोधिधर्मन यांची निर्मिती आहे. ‘किबादाची’ या आसनात बोधिधर्मन व त्यांचे शिष्य ध्यानासाठी कित्येक तास बसत असत. त्यांच्या युद्धविद्येतील शिकवणीकडे त्या काळी जपानमधील ‘सामुराई’ योद्धेदेखील आकर्षित झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शरीर चीनमधील हिनान प्रांतातील ‘शोन एर शान’ या डोंगरात दफन केले गेले. आज जपानमध्ये बोधिधर्मन यांची आठ भव्य मंदिरे आहेत. काही इतिहासकारांनी बोधिधर्मन यांना ‘आशियाई तत्त्वज्ञानाचा प्रकाश स्तंभ’ असे संबोधले आहे.

आज अस्तित्वात असलेल्या सर्वच ‘मार्शल आर्ट्स’ प्रकारचे मूळ त्यांच्या शिकवणीत आहे. त्यांनी शिकविलेली कला पुढे वर्षानुवर्षे मौखिक आणि विशेषतः प्रात्यक्षिकरीत्या जिवंत राहिली. आजही ‘शाओलीन टेंपल’ परिसरात ‘कुंग-फू’ युद्धकलेचे धडे गिरवले जातात. सध्या जगभर शिकविले जाणारे ‘कराटे’ मात्र जपानमधील ‘ओकिनावा- मार्शल आटर्‌स’ आणि चीनमधील ‘कुंग-फू’ यांचे एक अलौकिक मिश्रण आहे. त्या काळी जपानमधील ‘ओकिनावा’ बेटे ही ‘र्युकू’ राज्याचा भाग होती तर ‘नाहा’ ही ओकिनावाची राजधानी होती. कालौेघात जपानमधील शुरी, तोमारी आणि नाहा या बेटांवर ‘ओकिनावा- मार्शल आटर्‌स’ विकसित होत गेली. सन 1332 मध्ये जपान व चीनमधील व्यापारात वाढ झाली आणि याच दरम्यान दोन्ही देशांमधील युद्धविद्यांचा प्रत्यक्ष संबंध आला.

सन 1609 मध्ये जपानमधील सत्सुमा सामुराई यांनी जिगेन-र्यु (आजची केंजुत्सू स्टाईल) ची निर्मिती केली. ताकहारा-पेईचीन (सन 1683 ते 1760) यांना ‘ओकिनावा कराटे’ या विद्येचे जनक असे म्हणतात. त्यांनी कराटे या विद्येला एका वेगळ्या क्षितिजावर नेले. ते स्वतः एक उत्कृष्ट योद्धे होते. ‘ईजो’ (दया, मानवता, विनय आणि नम्रता), ‘फो’ (प्रगल्भता, ध्यानमग्नता व पवित्र कामासाठी स्वतःला वाहून घेणे) आणि ‘कात्सु’ (प्रगल्भ आकलन आणि तंत्रविद्या प्रकारांची सखोल जाण) हा त्यांनी शिकविलेला मार्ग खरे तर कराटेचा आत्मा आहे. ताकहारा-पेईचीन यांचे शिष्य शाकुगावा-कांगा (सन 1733 ते 1851) यांनी ‘टे’ (हात) आणि ‘टोडे’ (चिनी हात) या दोन्ही शैली विकसित केल्या. याचदरम्यान मात्सुमुरा यांनी ‘जिगेन-र्यू’ (तलवार युद्धविद्या) शैली प्रमाणबद्ध केली, तसेच ‘शुरी-टे’ (आजची शुरीन-र्यु) या शैलीची रचना केली. त्यांनी स्वतः तोमारी येथील तीन राजांसाठी विशेष अंगरक्षक म्हणून काम केले होते.

सन 1900 पर्यंत ‘ओकिनावामार्शल आर्ट्‌स’च्या फक्त तीन शैली अस्तित्वात होत्या. त्यांना अनुक्रमे शुरी-टे, नाहा- टे आणि तोमारी-टे या नावांनी ओळखले जाई. अंको इटोसु (1831 ते 1951) यांना ‘आधुनिक कराटे’चे जनक म्हणतात. ते मात्सुमुरा यांचे शिष्य होत. आज शिकवली जात असलेली ‘कराटे’ त्यांनी प्रमाणित केली. कराटेमधील काही प्रकार लहान वयात शिकता यावेत, यासाठी त्यांनी पिनान किंवा हियान शैली रचनाबद्ध केली. त्यांचेच शिष्य केन्वा माबुनी (शितो-र्यु शैलीचे जनक), चोसिन चीबना (शोरीन-र्यु शैलीचे जनक) आणि गिचीन फुनाकोशी (शोतोकॉन शैलीचे जनक) हे होत. 1930 च्या दशकात चोजून मियागी, मोतोबु चोई आणि हिरोनोरी ओहत्सुका यांनी अनुक्रमे गोजु-र्यु, मोतोबो-र्यु आणि वाडो-र्यु या शैली विकसित केल्या. आज जगभरात ‘कराटे’च्या वर उल्लेखलेली विविध शैली शिकविल्या जातात.

खरं तर सन 1935 पर्यंत ‘कराटे’ हा शब्द प्रचलित नव्हता. त्याऐवजी तोडे (चिनी हात) असा शब्द असे. सन 1935 मध्ये काही राजकीय कारणास्तव ‘ओकिनावा मास्टर्स’नी ‘कराटे’ (नि:शस्त्र हात) असा शब्द सुचविला. सन 1950 मध्ये जगातील पहिल्या कराटे स्पर्धा जपानमध्ये पार पडल्या. सन 1963 मध्ये जपान कराटे फेडरेशनची स्थापना झाली. नंतर मात्र कराटे व इतर मार्शल आर्ट्‌सचा जगभर बराच प्रचार-प्रसार झालेला दिसून येतो. सन 1960-70 च्या काळात कराटेबरोबरच इतर प्राचीन आशियाई युद्धविद्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले.

जगभरात कराटेशी साधर्म्य असलेले जवळपास वीसेक प्रकार आहेत आणि त्यातही बरेच पोटप्रकार (स्टाइल्स) असल्याचे समजते. त्यात जपानमधील ज्युडो, कोबुडो आणि अकिडो, थाईलंडमधील मुयी- थाई, कोरियामधील चोई-क्वान्डो व टेंगसुडो तर चीनमधील वुशू, कुंग-फू आणि ताय-ची या प्रकारांचा समावेश होतो. ब्रूस ली, जॅकी चॅन, टोनी जा, डोनाई येन, स्कॉट ॲडकिन्ससारख्या युद्धविद्यांत पारंगत असलेल्या अनेक कलाकारांनी जागतिक फिल्म इंडस्ट्रीच्या रुपेरी पडद्यावर विशेष जागा मिळवली आणि या कलेकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला. बॉलिवूडमध्ये मात्र अक्षयकुमार, विद्युत जामवाल आणि टायगर श्रॉफ यांसारखे कलाकार सोडले तर ‘स्टंटमॅन’ म्हणून काम करणाऱ्यांव्यतिरिक्त क्वचितच कुणा ‘हीरो’ने प्रत्यक्ष युद्धविद्येचे धडे गिरविले असतील.

भारतात एकीकडे कराटे आणि तत्सम प्रकार शिकणाऱ्यांची (आणि शिकविणाऱ्यांची) संख्या वाढत असली तरी या विद्येचा ‘आत्मा’ हरवत चालल्याची खंत वाटते. आपल्या मुलांना कराटे क्लासेसना घालून ‘ब्लॅक बेल्ट’ मिळवणे किंवा थेट राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन मेडल्स मिळविणे आणि काहीच शक्य नसल्यास पांढरे कपडे घालून मिरवणे यापलीकडे पालकांनी सर्वप्रथम याचा विचार करणे आवश्यक आहे. मध्यंतरी महाराष्ट्र राज्य सरकारने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य अथवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केवळ सहभागी झाल्यास 25 गुण राखून ठेवले होते. सरकारने काढलेल्या या जी.आर.चा पालक, विद्यार्थी, शाळेतील शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षक यांनी मिळून अक्षरशः निकाल लावला होता. सर्वच क्रीडाप्रकारांमध्ये मुलं हिरीरीने (केवळ सहभाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आणि कित्येक तर कागदावरच) सहभागी झाली. सरकारने हा निर्णय मागे घेईपर्यंत विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली चमक(!) दाखवली होती.

दक्षिण भारतातील ‘कलरीपायट्‌’पासून उत्क्रांत होत गेलेली ही विद्या आज चीनमधील घराघरांत दिसून येते. आश्चर्य वाटेल की, नेपाळ आणि चीनमधील काही प्राथमिक शाळांनी स्पोर्ट्‌स टीचर ‘ब्लॅक बेल्ट’ असावा, असा नियमच केलाय. प्रत्येक माणसाला स्वसंरक्षण (मारामारी नव्हे!) आलेच पाहिजे आणि त्याची सुरुवात शालेय जीवनात करणे हा या देशांतील एक स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. आज आधुनिक शस्त्र व युद्धसामग्रीपुढे हा ‘नि:शस्त्र लढा’ कदाचित कमी ठरेलही, मात्र शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासोबतच काही सामाजिक प्रश्नांनादेखील भिडण्याची त्याची ताकद वादातीत राहील.

खरे तर ‘कराटे’ ही कला नसून ती एक विद्या आहे. तो फक्त खेळ नसून एक जीवनपद्धती आहे; एक तत्त्वज्ञान आहे. इ.स. 500 च्या दरम्यान बोधिधर्मन यांच्या शिकवणीतून उदयास आलेला हाच ‘नि:शस्त्र लढा’ विेशशांतीचा एक मार्गच म्हणावा लागेल. भारतातील या अतिप्राचीन विद्येचा ऐतिहासिक वानोळा घेत असताना केरळमधील कलरीपायट्टी विद्येचे धडे देणाऱ्या 76 वर्षांच्या मीनाक्षीअम्माची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. आजही त्या हा वसा पुढच्या पिढीकडे देण्याचे कार्य अविरतपणे करत आहेत. त्यांच्या या महान कार्याला मन:पूर्वक वंदन करून इथेच थांबतो.

मिलिंद पाटील, सिंधुदुर्ग