Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

अर्थवास्तवाचे उथळ आकलन नको!

पाच लाख कोटींचा भोज्या शिवण्याचे स्वप्न डोळ्यांपुढे ठेवणारा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या एकाच महिन्यांत अर्थव्यवस्थेचे एकदम काळवंडलेले चित्र कसे काय पुढ्यात अवतरते आहे?... अर्थव्यवस्थेचे हे ऱ्हासपर्व गेले अनेक महिने चालू असेल, तर सरकारने मग तुम्हा- आम्हाला अंधारात का ठेवले?... भारतीय अर्थव्यवस्था खरोखरच भयाण मंदीच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे का?... हे निराश वातावरण निवळवण्यासाठी सरकार सध्या जारी करत असलेले उपाय उचित आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे पुरेसे आहेत का?...

क्षीण बनत असलेली वा बनलेली देशांतर्गत क्रयशक्ती आणि पर्यायाने मागणी हेच जर या सगळ्या अनवस्थेचे एक मुख्य कारण असेल, तर अर्थव्यवस्थेत मागणी निर्माण कशी करायची?... अर्थसंकल्पाबाबत कॉर्पोरेट विश्वाची झालेली निराशा या सगळ्यांतून प्रतिबिंबित होते आहे का?... जगभरात आजमितीस सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात नांदत असलेल्या आर्थिक अनिश्चिततेच्या पांघरुणाखाली बलदंड कॉर्पोरेट विश्व एक प्रकारे सरकारला ‘ब्लॅकमेल’ करते आहे का?... 2016 मध्ये सरकारने एकाएकीच राबवलेल्या नोटाबदली कार्यक्रमापायी मुळापासून हादरलेले देशातील असंघटित क्षेत्र अजूनही न सावरल्याचा हा परिणाम समजायचा का?... प्रथम नोटाबदली आणि मग ‘रेरा’सारखी अस्तित्वात आणली गेलेली नियामक यंत्रणा यांच्या सापटीत गवसलेल्या बांधकाम- क्षेत्रातील दुर्धरावस्था एकंदरीच्या नरमाईला कारणीभूत ठरते आहे का?... कामगारकपात अवलंबणे, करांमधील सवलती पदरात पाडून घेणे यांसारखे एरवी सहजासहजी साध्य करता न येणारे लाभ चिमटीत सापडलेल्या सरकारकडून उद्योगपती वसूल करत आहेत का?... केवळ एकाच तिमाहीमध्ये आर्थिक वाढीचा सरासरी वेग सहा वर्षांतील नीचांकी पातळीपर्यंत घसरल्याने भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्य खरोखरच दुस्तर दिसते का?... अर्थकारणातील सध्याची अस्वस्थता वास्तवातच इतकी गंभीर आहे, की तिचा प्रमाणाबाहेर गवगवा केला जातो आहे?...

जुन्यापुराण्या वाड्यातील मोठ्या भिंतीवर कोळ्याने घनदाट जाळे विणावे तसे प्रश्नांचे असे एक सघन जाळे सध्या सर्वसामान्यांच्या मनात गुंफले गेलेले आहे. कोणाला काहीच उमगत नाही अथवा नसावे, अशी एक सार्वत्रिक भावना यातून मूळ धरताना दिसते. त्यांतच, फारशी कोणाशीही चर्चा वगैरे करण्याच्या भानगडीत न पडता केंद्रातील सत्ताधारी, मूठभर प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यापक स्तरावर पडसाद उमटवण्याची क्षमता व शक्यता असणारे संरचनात्मक बदल घडवणारे निर्णय धडाधड घेत आहेत. नाणावलेले अर्थतज्ज्ञ त्या संदर्भात उलटसुलट मतप्रदर्शन करताना दिसतात. दूरचित्रवाणीवरील चर्चांच्या वादळी व गोंगाटी आतषबाजीद्वारे ही सगळी गुंतागुंत स्पष्ट होण्याऐवजी निव्वळ गोंधळातच भर पडते आहे.

या सगळ्या वातावरणापायी अर्थउद्योगाच्या विश्वातील दिग्गजच केवळ नव्हे तर अगदी सामान्य ग्राहक, नोकरदार, गृहिणी, कामगार, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, दुकानदार... असे जवळपास सगळेच आर्थिक घटक सध्या कमालीचे धास्तावलेले आहेत. ते स्वाभाविकही आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या सर्व काही आलबेल आहे, असे भासवण्याचा प्रयत्न दिल्लीपती कितीही कसोशीने करत असले तरी देशी अर्थकारण मोठ्या संकटाच्या दिशेने सरकते आहे, अशा आशयाचे एक विधान भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ.रघुराम राजन यांनी केले आणि प्रशांत जलाशयात खडा पडल्यानंतर तळ्याचा पृष्ठभाग ढवळून निघावा त्याप्रमाणे अर्थविषयक चर्चांचे विश्व एकदम ढवळून निघाले. त्यापाठोपाठ, गेली पाच वर्षे पत्रकारांची पत्रासच न ठेवणाऱ्या माननीय पंतप्रधानांनी अर्थविषयक एका अग्रगण्य इंग्रजी दैनिकाला एकाएकीच प्रदीर्घ मुलाखत दिल्याने सगळ्यांचेच कान एकदम टवकारले गेले. ‘अरेच्या! ज्या अर्थी दस्तुरखुद्द पंतप्रधानच अर्थवास्तवाबाबत टिप्पण्णी करत आहेत, त्या अर्थी अर्थव्यवस्थेत दखल घेण्याइतपत सखोल अस्वस्थता आहे याची जाणीव सत्ताधाऱ्यांना आता झालेली आहे,’ असा संदेश पंतप्रधानांच्या त्या वार्तालापाद्वारे सर्वत्र पसरला.

त्यानंतर काहीच दिवसांनी नीती आयोगाचे अध्वर्यू असणारे डॉ.राजीवकुमार यांनी, देशातील वित्तव्यवस्थेमध्ये गेल्या 70 वर्षांत इतकी भयाण परिस्थिती अनुभवायला मिळाली नव्हती, असे निवेदन करून मुळातल्या उदंड खळबळीमध्ये भक्कम भरच घातली. त्यापाठोपाठ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लगोलग पत्रकार परिषद घेऊन कॉर्पोरेट विश्वाला दिलासा देणारे कायदेविषयक काही बदल जाहीर केले. लगेचच, परकीय थेट गुंतवणुकीला आवतण देणारे बदल अवतरले. मग, देशातील बँकिंग क्षेत्राच्या एका मोठ्या पुनर्रचनेचे ऐलान झाले व एका झटक्यात अनेक बँकांच्या एकत्रीकरणाची घोषणा झाली.

त्या वेळी, दुसरीकडे 2019-20 या सध्या चालू असलेल्या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये देशाचे वास्तव ठोकळ उत्पादन अवघ्या पाच टक्क्यांनी वाढल्याचे केंद्रीय सांख्यिकी संघटनेने जाहीर केले आणि क्रमाने काळवंडत आलेले अर्थविश्व एका झटक्यात पारच काळेठिक्कर भासू लागले!

गेल्या अवघ्या काही दिवसांतील घटनाक्रम हा असा आहे. अलीकडील काही वर्षांत कधीही नव्हती एवढी भीतीची आणि अनिश्चिततेची प्रगाढ भावना लोकांच्या मनात आज दाटलेली आहे. तज्ज्ञ, निष्पक्ष अभ्यासक, संशोधक, सल्लागार यांची टोकाची ‘ॲलर्जी’ सध्याच्या राजकीय व्यवस्थेतील उच्चपदस्थांना आहे. ॲडम स्मिथ यांनी पायाभरणी केल्यापासून गेली दोन-अडीच शतके उत्क्रांत होत आलेले यच्चयावत अर्थविज्ञान पाश्चात्त्य विचारप्रभावाखालील असल्याने उच्च भारतीय संस्कृती व परंपरेशी ते मुदलातच विसंगत आहे, अशी एक अचाट धारणा सध्या धोरणप्रणालीमध्ये मोक्याच्या ठिकाणी नियुक्त करण्यात येत असलेल्यांच्या मनीमानसी मुरलेली दिसते. त्यामुळे, अशा परदेशी वैचारिक प्रभावा- खालील(?) विश्लेषकांबाबत या सरकारला केवळ आस्था नाही, एवढेच नाही, तर उच्च कोटीतील तिटकारा आहे. सगळे पश्चिमी अर्थविज्ञान न-नैतिक आहे, अशीही एक भावना यात बलवत्तर आहे. कोणतेही शास्त्र नैतिक अथवा अनैतिक नसते, तर त्या शास्त्राचे उपायोजन करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांच्या नैतिकतेवर (अथवा तिच्या अभावावर) त्या शास्त्राच्या ‘ॲप्लिकेशन’ची फलश्रुती अवलंबून असते, इतके साधे तर्कशास्त्रही विचारात घेण्याच्या मन:स्थितीत त्यामुळे सध्या कोणीच नाही. त्यामुळे डॉ.रघुराम राजन, डॉ.अरविंद पनगढीया, डॉ.अरविंद सुब्रह्मण्यन्‌, डॉ.ऊर्जित पटेल, डॉ.विरल आचार्य... यांच्यासारख्या व्यावसायिक अर्थवेत्त्यांची, धोरणप्रणाली निश्चित करण्याच्या व्यवस्थेतून पद्धतशीर उचलबांगडी करण्यात आली.

आर्थिक सर्वेक्षण अहवालातील प्रकरणांच्या प्रारंभी पाश्चात्त्य अर्थशास्त्रज्ञांची इंग्रजी भाषेतील उद्‌धृते देण्याऐवजी संस्कृतातील वचने छापण्याने भारतीय अर्थविषयक चिंतनविश्वाची मूस अर्थाभ्यासाच्या पौर्वात्य परंपरेशी जोडली जाईल, इतपत थिल्लर आकलन असणाऱ्या व्यवस्थेकडून यापेक्षा निराळी अपेक्षाही नाही. याचा परिणाम झाला आहे तो इतकाच की, देशी अर्थव्यवस्था बिकट पर्वामधून आज वाटचाल करत असताना त्या परिस्थितीवर मात करण्याचे मार्ग तज्ज्ञांशी विचारविनिमय करून निश्चित केले जात आहेत, की सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला उभे राहून त्यांचे ‘होयबा’ होण्यातच धन्यता मानणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तालावर उपाययोजना ठरवल्या जात आहेत, याचा उलगडा सर्वसामान्यांना आज अणुमात्रही होत नाही. सध्याच्या आर्थिक अस्वस्थतेमागील एक मुख्य कारण हे आहे.

ही भयशंका निर्माण होण्यास सध्याची राजकीय व्यवस्थाच बव्हंशी कारणभूत आहे. कारण, विद्यमान अर्थसंकटाची विरोधी पक्षांकडून केली जाणारी चिकित्साही निखळ राजकीय हेतूंनी प्रेरित आणि म्हणूनच प्रचंड आक्रस्ताळी शाबीत होते आहे. या सगळ्या अशा वातावरणाला मग सर्वसामान्य नागरिकांकडून दिला जाणारा प्रतिसादही तितकाच असमंजस असावा, हे ओघानेच येते.

मुळात, किमान अर्थसाक्षरतेचाही आपल्या समाजात दुष्काळच आहे. त्यांतच, तारतम्याचा घाऊक तुटवडा असणारे आपल्या देशातील माध्यमजगत आणि कोणाचेही कसलेच नियंत्रण नसल्याने बोकाळलेला बाष्कळ ‘सोशल मीडिया’ यांच्या प्रभावाखाली असलेले जनसामान्यांचे विचारविश्व पुढ्यात उलगडणाऱ्या अर्थवास्तवाला उतावळा आणि अतिरेकी भावुक प्रतिसाद देऊन मोकळे होते. दि.1 एप्रिल 2019 ते 30 जून 2019 या काळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वास्तव वेग पाच टक्के इतकाच होता, असे संबंधित सरकारी यंत्रणेने अधिकृतरीत्या जाहीर केल्यानंतर जो गदारोळ उठला वा उठवला गेला, तो मनोरंजक ठरला. वाजपेयी सरकारच्या काळात केवळ एकाच तिमाहीमध्ये वास्तव विकासदराने नऊ टक्क्यांच्या पायरीला स्पर्श केल्यानंतर प्रदर्शित झालेला उन्माद जितका अनाठायी होता तितकीच, केवळ एकाच तिमाहीमध्ये पाच टक्क्यांवर घसरलेला विकासदर पाहून बडवली जाणारी भयघंटाही अस्थानी आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सगळे कसे छान-छान व गुलाबी आहे, असे इथे अजिबातच सुचवायचे नाही. सध्याचे आर्थिक पर्यावरण कमालीचे अनिश्चित, अस्थिर व दोलायमान आहे, हे नीट समजावून घेऊन त्याचा सामना करण्यासाठी तितक्याच प्रगल्भ उपाययोजनेची निकड आजमितीस सर्वाधिक आहे. परंतु, ज्या प्रकारे एका तिमाहीतील नीचांकी वास्तव वाढीचा गवगवा पसरला, त्यामुळे अधोरेखित झाला तो किमान तारतम्याचा अभाव.

राजीव गांधींचे 1985 मध्ये सत्तेवर आलेले सरकार हा जर भारतीय पुनर्रचना पर्वाचा प्रारंभबिंदू मानला, तर आर्थिक सुधारणापर्व आज पस्तिशीच्या उंबरठ्यावर आहे. 1991 ही जर उदारीकरणाची सुरुवात मानली, तर आणखी दोन वर्षांनी सुधारणापर्व त्याच्या वयाची तिशी गाठेल. 1978 मध्ये उदारीकरणाची पायाभरणी करणाऱ्या चिनी अर्थव्यवस्थेनेही यंदा सुधारणापर्वाची चाळिशी गाठलेली आहे. म्हणजेच, चीन व भारत या आशिया खंडातील दोन बलदंड आणि साधारणपणे तीन दशके सलग आर्थिक पुनर्रचना राबविणाऱ्या दोन विशाल अर्थव्यवस्था आज एका वळणावर येऊन ठेपलेल्या आहेत. 1978 ते 2012-13 अशी सलग 34-35 वर्षे सरासरी वार्षिक 10 टक्के वास्तव दराने आगेकूच करणारी चिनी अर्थव्यवस्था आज सहा-साडेसहा टक्क्यांवर घुटमळते आहे. म्हणजेच चिनी अर्थव्यवस्थेबाबतीत विकासाच्या वास्तव दरातील घट साधारणपणे साडेतीन ते चार पर्सेन्टेज पॉइंट्‌सची आहे. 2008 मध्ये बसलेला ‘सब्प्राइम’ कर्जांचा दणका आणि 2016 पासून ट्रम्प महाशयांनी छेडलेले व्यापारयुद्ध या दुहेरी पेचापायी सलग तीन दशके निर्यातप्रधान विकासधोरणाची कास धरलेली चिनी अर्थव्यवस्था आज अडचणीत दिसते.

भारतीय अर्थव्यवस्थेने निर्यातप्रधान विकासधोरणाचा अवलंब कधीच केलेला नव्हता. प्रचंड गुंतागुंतीचे अर्थवास्तव, बहुपक्षीय राजकारणाने नटलेली गतिमान लोकशाही राज्यप्रणाली, सजग अशी संघराज्यव्यवस्था, उदंड स्तरीकरण असलेली समाजरचना... अशांसारख्या बहुविध वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या भारतीय अर्थकारणाने उदारीकरणाच्या प्रारंभापासून भरवसा धरला होता तो देशांतर्गत मागणी-बचत-गुंतवणूक या त्रिसूत्रीचा.

गेल्या तीन दशकांतील केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक व राजकीय स्थित्यंतरांच्या लाटा पचवत मार्गक्रमण करत आलेली भारतीय अर्थव्यवस्था, तीन दशके साधारणपणे साडेसहा ते सात टक्क्यांनी वाटचाल केल्यानंतर, एका तिमाहीमध्ये पाच टक्क्यांवर उतरली, ही बाब या सगळ्या चौकटीमध्ये समजावून घ्यावयास हवी. 30 वर्षांतील वास्तव वाढीच्या सरासरी दराशी तुलना केली तर ही विकासदरातील तिमाही घट दीड ते दोन पर्सेन्ट पॉइंट्‌सची दिसते. एरवी उठसूट चीनशी तुलना करणारे आपण सगळे हे वास्तव कसे समजावून घेतो, त्यांवर सध्याच्या कठीण अर्थवास्तवाला आणि सरकार त्याच्या परीने त्याबाबत करत असलेल्या उपाययोजनेला आपला प्रतिसाद कितपत सुजाण असेल ते अवलंबून राहील. तो प्रतिसाद प्रगल्भ राहण्यासाठी आज निर्माण झालेल्या अर्थवास्तवातील गुंतागुंत आणि तिच्या मुळाशी असलेली कारणपरंपरा नीट आकलन होणे गरजेचे ठरते.

अभय टिळ

agtilak@gmail.com

Share on Social Media

जवाहरलाल नेहरू । 26

काश्मीरचा लढा

सुरेश द्वादशीवार

काश्मीरच्या प्रश्नाची चर्चा करणारी माणसे या लष्करी वास्तवाकडे फारसे लक्ष देत नाहीत. हा प्रश्न केवळ राजकीय वा धार्मिक आहे आणि तो फाळणीमुळे निर्माण झाला, एवढ्यावरच त्यांची चर्चा थांबते. या प्रश्नाचे एक वास्तव लष्करी आहे. या वास्तवापुढे जेवढा भारताचा तेवढाच पाकिस्तानचाही तत्कालीन नाइलाज व अपुरी तयारी कारण आहे, ही बाब मुळातच लक्षात घेतली जात नाही. शिवाय अशी चर्चा करणाऱ्यांपैकी अनेकांना त्यातले सत्य जाणूनही घ्यायचे नसते. त्यांना या प्रश्नासाठी कोणाला तरी ‘आरोपी’ ठरवायचे असते आणि हा आरोपी त्यांच्या मनात नक्की ठरलेलाही असतो... देश नुकताच स्वतंत्र झाला आहे, त्याचे लष्कर व युद्धसामग्री अपुरी आहे, ही स्थिती नाइलाजातून येणारे उत्तर योग्य वाटायला लावणारी आहे आणि देशाच्या तत्कालीन नेतृत्वानेही तेच केले आहे.

नेहरूंवर सर्वाधिक विषारी टीका झाली ती त्यांनी काश्मीर व चीन हे प्रश्न ज्या तऱ्हेने हाताळले, त्यासाठी. त्यावर पुस्तके लिहिली गेली, लेखमाला आल्या आणि भली-भली माणसेही त्यासाठी नेहरूंवर तोंडसुख घेताना आढळली. लष्करातील जाणकार अधिकारीही त्यासाठी पुढे आलेले दिसले. त्या साऱ्यांच्या लिखाणात नेहरूंची ढिलाई, सरकारचे सुस्तपण आणि नेहरूंना चीनविषयी वाटलेला चुकीचा विश्वास याच गोष्टी अधोरेखित कराव्याशा वाटल्या. या टीकेला बळ मिळाले ते नेहरूंच्या त्या प्रश्नांबाबतच्या मौनामुळे. या टीकेचे खरे उत्तर त्यांच्याजवळ होते. मात्र त्यांची अडचण ही की, ते त्यांना सांगता येत नव्हते. मग त्यांचे मौन हेच त्यांच्यावर मारा करणाऱ्यांना पुरेसे वाटले.

दुर्दैव याचे की, या टीकाकारांनाही नेहरूंचे मौन व त्यामागची कारणे समजून घ्यावीत, असे कधी वाटले नाही आणि काहींना ती समजून घेणे राजकीयदृष्ट्या गैरसोईचेही होते. परिणामी, त्यांनी ती समजूनही न समजल्यासारखी केली. शिवाय पंतप्रधानांवर टीका हे तेव्हा पराक्रमाचेही लक्षण होते. या संदर्भातली पुस्तके व लिखाणही या प्रश्नांच्या मुळाशी जात नाही. त्यातील पराजयाची कारणे शोधण्याच्या भानगडीत ती पडत नाहीत. भारत व पाकिस्तान किंवा भारत व चीन यांच्यातल्या वादाला अनुक्रमे फाळणीची आणि धार्मिक व प्रादेशिक कारणे कारणीभूत होती. त्याहून महत्त्वाची बाब ही की, त्यातील माघारीची कारणे लष्करी वास्तवात होती. हे वास्तव दडविणे हे नेहरूंच्या जबाबदारीचे, तर टीकाकारांच्या बेजबाबदारीचे कारण आहे. पूर्वेला चीन (व तिबेट), उत्तरेला रशिया व अफगाणिस्तान आणि पश्चिमेला पाकिस्तान हे देश असलेली काश्मीरची भूमी खरे तर एका जागतिक युद्धाचीच भूमी ठरायची. त्यातून रशिया व चीन यांच्यातील तेढ आणि रशियाने दीर्घ काळपर्यंत केलेला पाकिस्तानचा राग साऱ्यांनाच ज्ञात असलेला. तशीही रशिया, अमेरिका, पाश्चात्त्य राष्ट्रे व इस्लाममधील तालिबानांसारख्या कडव्या संघटना यांच्यातील अफगाणिस्तान ही म्हटली तर प्रत्यक्ष युद्धांची व हत्याकांडांची भूमीच आजवर राहिली आहे आणि अजूनही ती युद्धे थांबली नाहीत.

या युद्धांची झळ काश्मीरच्या खोऱ्याला मात्र फारशी पोहोचली नाही. त्याच्या पूर्वेला व उत्तरेला हिमालयाची उंच व भक्कम तटबंदी आहे. उत्तर-पश्चिमेला हिंदुकुश हा पर्वत उभा आहे आणि दक्षिणेला पीरपुंजालची पर्वतरांग आहे. शिवाय हा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असून तो त्याच्या सुरक्षाव्यवस्थेशी जुळला आहे. काश्मीर हा कश्यप महामुनींचा प्रदेश आहे. कश्यप मार्‌- कश्यपाची भूमी- हे नाव त्याचमुळे त्याला मिळाले आहे. पौराणिक कथा सांगतात, या प्रदेशात एक प्रचंड सरोवर होते. कश्यपाने त्याला भगदाडे पाडून ते रिकामे केले व त्यात मनुष्यवस्ती केली. प्रथम ऋषी-मुनींचे आश्रम वसले, पुढे सगळी मनुष्यवस्ती त्यात राहायला आली. कालांतराने त्यात बौद्ध आले व आपल्या धर्माचा प्रसार करून त्यांनी त्याच भूमीचा आश्रय घेतला. मग मुसलमान आले. त्यांनी त्यांचा धर्मही सोबत आणला. कश्यपाच्या काळात वैदिकांचा असलेला हा प्रदेश नंतर बौद्धांचा व पुढे इस्लाममधील सूफी पंथाच्या संतांनी आपल्या शिकवणीने इस्लाममय केला. हा सारा काळ तुलनेने शांतततेचा होता. क्वचित कधी पूर्वेकडून मंगोल टोळीवाल्यांचे हल्लेच तेवढे होत.

या प्रदेशाचा संबंध 19 व्या शतकात प्रथम पंजाबशी आला. पीरपुंजालचे संस्थानिक राजे गुलाबसिंग हे जम्मू प्रदेशाचेही अधिपती होते. शिवाय ते लाहोरचे महाराजा रणजीतसिंगांचे सेनापती व राजकीय सल्लागार होते. महाराजा रणजीतसिंगांचा मृत्यू 1839 मध्ये झाला. त्यांच्या जागी त्यांचा मुलगा खरगसिंग हा राजा झाला. त्याला राजकारणाचे फारसे ज्ञान नव्हते आणि त्याच काळात त्याच्या साम्राज्यावर इंग्रजांच्या फौजा चालून येऊ लागल्या. जोवर युद्धाचे पारडे शीख सत्तेकडे झुकले होते, तोवर गुलाबसिंह त्या फौजेसोबत होता. पुढे तो इंग्रजांच्या बाजूने वळला व सरळ इंग्रजांना जाऊन मिळाला. परिणाम, शिखांच्या जगातील एकमेव साम्राज्याचा (खलिस्तान) अंत झाला व त्याचा प्रदेश इंग्रजांना मिळाला.

गुलाबसिंहाला त्याच्या या फितुरीचे बक्षीस म्हणून इंग्रजांनी काश्मीरचा सारा प्रदेश अवघ्या 75 लक्ष रुपयांना विक्री करून दिला. गुलाबसिंहाला काश्मिरी जनता, तिची भाषा, संस्कृती व तेथील एकूणच जीवनपद्धती ठाऊक नसल्याने त्याने त्या भूमीचा ताबा घेताच आपल्या सरकारात जम्मूमधून डोग्रा या त्याच्या समाजाची माणसे आणली. या लोकांना काश्मिरी जनतेशी काही घेणे-देणे नव्हते. परिणामी, त्यांनी तेथील जनतेकडे गुलामांसारखेच पाहिले आणि त्यांच्या विकासाची कोणतीही जबाबदारी कधी अंगावर घेतली नाही. शिवाय गुलाबसिंह व त्याच्या पश्चात गादीवर आलेला त्याचा मुलगा हरिसिंह हे कमालीचे हेकट व दुष्ट वृत्तीचे राज्यकर्ते होते. त्यांना विरोध चालत नव्हता, सूचना नको होत्या, मनातील लहर हाच त्यांचा कायदा होता. परिणामी, हे सरकार आरंभापासूनच लोकांच्या नापसंतीचा व शत्रुत्वाचाही विषय बनले. संस्थानिकांकडून केंद्राला (व्हाईसरॉय) मिळणारा कराचा भाग मिळाला की, ते सरकारही त्यांच्या अंतर्गत कारभारात फारसा हस्तक्षेप कधी करीत नसे.

या क्षेत्रात लोकजागृतीची पहिली लाट भारतात सुरू झालेल्या स्वातंत्र्यलढ्यामुळे आली. विशेषत: गांधीजींचा असहकाराचा लढा व पुढे त्यांनी हाती घेतलेली ‘चले जाव’ची उग्र चळवळ यामुळे काश्मिरी जनतेतही आपल्यावरील हुकूमशाही अमलाची जाणीव होत जाऊन तिनेही ‘चले जाव’ची भाषा बोलायला सुरुवात केली. ‘हे राज्य आपले नाही, त्यावर आपला कोणताही अधिकार नाही, आपण संस्थानिकाचे प्रजाजन म्हणजे गुलामच तेवढे आहोत’ ही जाणीव त्यांच्यात स्वातंत्र्याची ऊर्जा उत्पन्न करणारी ठरली. शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या सोर्इंची उणीव, रस्ते नाहीत, शेतीला पाणी नाही आणि माणसांच्या हाताला काम नाही. याहून महत्त्वाची बाब म्हणजे- या गोष्टी मागण्याची सोय नाही, सवय नाही आणि ती कधी जागलीही नाही.

नेमक्या अशा स्थितीत जनतेची बाजू घेणारे काही लढाऊ वृत्तीचे तरुण पुढे आले. शेख अब्दुल्ला हे त्यातले एक होते. घरचे अमर्याद दारिद्य्र अनुभवलेले हे अब्दुल्ला त्यांच्या वडिलांना चौथ्या पत्नीपासून झालेले तिसरे अपत्य होते. त्यांच्या वडिलांचा मृत्यू त्यांच्या जन्माआधीच झाल्याने त्यांच्या संगोपनाची सारी जबाबदारी आईवर आली. ती शेजारी-पाजारी कुठे धुणीभांडी, तर कुठे स्वयंपाक करून घर चालवायची व आपली मुले जगवायची. अब्दुल्लाची शाळा त्यांच्या खेड्यापासून 20 मैल लांब अंतरावर होती. परिणामी, त्यांना दर दिवशी 40 मैलांची पायपीट करावी लागे. पुढे त्यांना मिळालेली पुढची शाळा 23 मैल अंतरावर होती. एवढ्या कष्टाने शिकलेला हा मुलगा पुढे अलिगढ विद्यापीठाचा पदवीधर झाला व त्याने समाजकारणाएवढीच राजकारणाची सूत्रेही हाती घेतली. छोट्या संघटना उभ्या करून त्यांना राजकीय लढतीसाठी तयार करणे व जनतेच्या मागण्या सरकारसमोर मांडणे अशा चळवळींना त्याने सुरुवात केली. त्याच्या चळवळींचा रोष अर्थातच काश्मीरच्या जुलमी राजसत्तेवर होता.

आरंभी मुस्लिम धर्माचे संघटन चालविणाऱ्या अब्दुल्लांचा नेहरूंशी संबंध आल्यानंतर त्यांचा एका सेक्युलर विचाराच्या नेत्यात बदल झाला. मग त्यांनी आपल्या संघटनेचे ‘जम्मू ॲन्ड काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स’ हे नाव बदलून तिला ‘नॅशनल कॉन्फरन्स’ हे नाव दिले. दिवसेंदिवस ते वृत्तीने आणखी सेक्युलर होत गेले. आपल्या मागण्यांसाठी दिलेल्या लढ्यांखातर त्यांना अनेकवार काश्मिरात तुरुंगवासही भोगावा लागला. भारताचा काश्मीरबाबतचा वाद खऱ्या अर्थाने सुरू झाला तो देशाच्या फाळणीनंतर. मुस्लिम बहुसंख्येचे प्रदेश पाकिस्तानात गेल्यानंतर काश्मीरचे संस्थानही पाकिस्तानकडे जावे असे मानणाऱ्यांत माऊंटबॅटन, सरदार पटेल, डॉ.आंबेडकर व देशातील इतर अनेक नेते होते. तसे करताना लोकसंख्येची धार्मिक कसोटीवर अदलाबदल व्हावी, अशीही त्यापैकी काहींची अट होती. नेहरूंना मात्र या प्रदेशाबाबत वेगळी आस्था होती.

आपले पूर्वज या भूमीतून आले, हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्याच वेळी त्या प्रदेशाचे सौंदर्य व इतिहास याविषयीचा त्यांना वाटणारा ओढा मोठा होता. तथापि, तो त्यांच्या राजकीय निर्णयांच्या आड येणारा नव्हता. ‘देशाचे हित आणि व्यक्तिगत आवड यात अंतर आले, तर जवाहर नेहमीच देशहिताच्या बाजूने उभा राहील. त्याची आवड त्याच्या नेतृत्वावर कधीही मात करणार नाही’ हे त्यांच्याविषयी सरदार पटेलांनी काढलेले उद्‌गार येथे लक्षात घ्यावे असे आहेत. भारतीय नेत्यांच्या अशा भूमिका प्रगट होत असताना काश्मिरात मात्र वेगळे नाट्य घडत होते.

ब्रिटिश सरकारच्या भूमिकेनुसार आपले संस्थान भारत आणि पाकिस्तान यापैकी कोणत्या देशात विलीन करावे, हे ठरविण्याचा अधिकार संस्थानिकाला होता. शिवाय काँग्रेसची भूमिका संस्थानिकाच्या निर्णयाला पाठिंबा देणारी, मात्र त्याला जनमताचा कौल असावा- अशी होती. त्या स्थितीत काश्मीरचे संस्थान लागलीच पाकिस्तानात विलीन झाले असते, तर भारताचा त्यावरचा उजर फक्त जनमताच्या कौलापुरता मर्यादित राहिला असता. भारताने असा जनमताचा कौल जुनागढ व हैदराबादमध्ये घेतलाही. परंतु काश्मीरच्या जनतेतील एक मोठा वर्ग काश्मीर हे स्वतंत्र सार्वभौम राज्य व्हावे, या मताचा होता. स्वत: महाराजा हरिसिंहही त्याच मताचा होता.

शेख अब्दुल्लांना भारत जवळचा व आपला वाटत होता. मात्र स्वातंत्र्याच्या वाटाघाटीत संस्थानिकांना भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या बाहेर जाण्याचा हक्क दिला गेला नव्हता. (तसा हक्क वायव्य सरहद्द प्रांतानेही मागितला होता, हे येथे नोंदविले पाहिजे.) हरिसिंहाचा निर्णय होत नव्हता. त्याला जीनांनी गळ घातली होती. पाकिस्तानातील विलीनीकरणासाठी ते त्याच्या कोणत्याही अटी मान्य करायला तयार होते. भारत मात्र स्तब्ध होता. कारण काश्मिरातील जनमताबाबत सारे साशंक होते. काश्मीरची बहुसंख्य जनता मुस्लिमधर्मी होती आणि देशाची फाळणीही धर्माच्या आधारावर झाली होती. त्यामुळे संस्थानिकाचा व जनतेचा कल लक्षात घ्यायला भारताचे नेतृत्व थांबले होते. पाकिस्तानची ती तयारी नव्हती. त्याची उताविळी वाढली व महाराजांचा निर्णय होण्याआधीच पाकिस्तानने आपले अरबी टोळीवाले सैन्याच्या मदतीनिशी दि. 22 ऑक्टोबर 1947 या दिवशी काश्मिरात घुसविले. काश्मीरचा उत्तर-पश्चिम भाग त्याने तातडीने ताब्यात घेतला आणि त्याच्या फौजा काही काळातच श्रीनगरपासून 13 कि.मी. अंतरावर येऊन पोहोचल्या. तरीही राजाचा निर्णय होत नव्हता. शेख अब्दुल्ला व त्यांचे अनुयायी भारताच्या बाजूने आपला कौल घेऊन उभे होते, तरीही साम्राज्याच्या अटी तोडून वागायला भारताचे राज्यकर्ते तयार नव्हते. पाकिस्तानी सैन्याने श्रीनगरचा गळाच जेव्हा आवळला, तेव्हा हरिसिंहाने भारताकडे संरक्षणाची मदत मागितली. त्या वेळी नेहंरूंनी त्याला ‘आधी विलीनीकरण व नंतरच लष्करी साह्य’ असे स्पष्ट शब्दांत ऐकविले.

कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्याने त्या महाराजाने अखेर भारतातील विलीनीकरणाला संमती दिली. त्यानुसार काश्मीरची परराष्ट्रव्यवहार, संरक्षण, दळणवळण व चलन यासारखी खाती दिल्लीकडे यायची आणि बाकीची संस्थानिकाकडे राहायची होती. काश्मीरला स्वत:ची घटना बनविण्याचा, आपला ध्वज राखण्याचा व त्याच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान म्हणवून घेण्याचा अधिकार राहणार होता. हरिसिंहाने या मसुद्यावर नाइलाजाने सही केली; तेव्हा त्यावर जनतेच्या वतीने अब्दुल्लांचीही सही असावी, असा आग्रह नेहंरूंनी धरला व ती घेतली. विलीनीकरणाच्या जाहीरनाम्यावर या सह्या झाल्यानंतर काही तासांतच भारताची लष्करी विमाने त्यांच्या लष्करी पथकांसह श्रीनगरच्या विमानतळावर उतरली आणि त्यांनी काश्मीरच्या रक्षणाची आखणी व बंदोबस्त यांना सुरुवात केला. दि.22 ऑक्टोबर 1947 या दिवशी सुरू झालेले हे युद्ध रखडत-रखडत 1 जानेवारी 1949 या दिवशी, म्हणजे तब्बल चौदा महिन्यांनी थांबले.

(नेहरूंनी काश्मीरचा प्रश्न युनोत नेण्याची घाई केल्यामुळे युद्ध थांबले, अन्यथा सारा काश्मीर तेव्हाच मुक्त झाला असता- अशी टीका अनेक जण करतात. मात्र प्रत्यक्षात हे युद्ध चौदा महिने चालल्यानंतर थांबले, हे वास्तव ही माणसे लक्षात घेत नाहीत. ‘ते आणखी दोन दिवस वा दोन आठवडे चालायला हवे होते’ असे म्हणणाऱ्या या टीकाकारांच्या लक्षात हे वास्तव येत नाही की, चौदा महिने ते चालवूनही भारतीय सैन्य पाकिस्तानी सेनेला फारसे मागे ढकलू शकले नाही. त्यामुळे एवढ्या लढाईनंतर जेवढे साध्य होईल ते साध्य करून सरकारने लढाई थांबविली. त्यामुळे काश्मिरातील तेव्हाची युद्धबंदी रेषा आजही तशीच श्रीनगरपासून जेमतेम काही किलोमीटर अंतरावर राहिली आहे.)

युद्धाला तोंड लागण्याआधी पाकिस्तानी फौजा जम्मूत आल्या नव्हत्या. लडाख या काश्मीरच्या भागापासूनही त्या दूर होत्या. त्यांचा सारा रोख श्रीनगर व काश्मीरवर होता. तिथेच या युद्धाची सुरुवात झाली आणि युद्धाने ताब्यात घेतलेल्या प्रदेशात फारसा फेरफार न करता हे युद्ध आज आहे त्या युद्धबंदी रेषेवरच थांबले. पाकिस्तानने व्यापलेल्या काश्मीरच्या प्रदेशाची राजधानी मुझफ्फराबाद ही श्रीनगरहून अवघ्या 170 कि.मी. अंतरावर आहे आणि प्रत्यक्ष नियंत्रणरेषा श्रीनगरच्या अधिक जवळ आहे, हेही येथे लक्षात घ्यायचे. हे युद्ध निकाली न होण्याची व ते एवढे दिवस रखडण्याची कारणे भारत व पाकिस्तान यांच्या तेव्हाच्या लष्करी सिद्धतेत व युद्धसामग्रीच्या समानतेत दडली आहेत.

देशाची फाळणी झाली तेव्हा ती केवळ प्रदेश व लोकसंख्या यांचे विभाजन करणारीच नव्हती; तर लष्कर, लष्करी सामग्री व देशाच्या गंगाजळीची विभागणी करणारीही होती. देश स्वतंत्र झाला तेव्हा त्यात पाच लाखांचे लष्कर होते. त्यापैकी 2 लक्ष 80 हजार सैनिक भारतात राहिले, तर 2 लक्ष 20 हजारांनी पाकिस्तानात जाणे पत्करले. लष्करी विमाने, रणगाडे व इतर शस्त्रसामग्रीही बरोबरीने वाटली गेली.

परिणामी, 1947 मध्ये भारत व पाकिस्तान हे दोन्ही देश लष्करी दृष्ट्या तुल्यबळ होते. त्यातून भारताची बरीच मोठी फौज उत्तरपूर्वे कडील प्रदेशांच्या- हैदराबाद व जुनागडच्या बंदोबस्तात गुंतली होती. देशात आलेल्या निर्वासितांचे पुनर्वसन हीदेखील त्याचीच जबाबदारी होती. भारताची भौगोलिक रचनाही अशी की, त्याला आपले सारे सैन्य देशभरातून एकत्र करून काश्मीरच्या सीमेवर उभे करणे तांत्रिक व लष्करी दृष्ट्याही अशक्य होते. याउलट पाकिस्तानला त्याचे सैन्य काश्मीरच्या सीमेवर नेणे जमणारे होते, शिवाय त्याला अफगाण टोळीवाल्यांची साथ होती. युद्धाची भूमी पाकिस्तानी सैन्याच्या परिचयाची, तर भारतीय सैनिकांना ठाऊक नसणारी होती.

काश्मीरच्या राजाच्या पदरी पाच हजारांची फौज होती. तिच्यातील तीन हजार मुस्लिम सैनिकांनी पाकिस्तानी हल्लेखोरांची बाजू घेतली. ती घेण्याआधी आपल्या सैन्यातील उरलेल्या दोन हजारांची त्यांनी कत्तलही केली होती. प्रदेश दुर्गम व अनोळखी, युद्धसामग्री बरोबरीची व अपुरी आणि सैन्यसंख्याही कमी- अशा विषम स्थितीत भारतीय सैन्याला ते युद्ध लढावे लागले. त्यात विजय मिळायचा नव्हता, पण पराजयाची नामुष्कीही नको होती. त्यामुळे हा प्रश्न नेहरूंनी संयुक्त राष्ट्रसंघटनेत नेला. त्या वेळी सरदार पटेल देशाचे उपपंतप्रधान होते व ते नेहरूंसोबत होते, हे टीकाकारांनी लक्षात घ्यायचे. (काश्मीरच्या महाराजांची या साऱ्या घटनांबाबतची बेफिकिरी व बेजबाबदारी सांगणारी एक हकिगत इंदिरा गांधींनी त्यांच्या नोंदवहीत तेव्हा लिहिली आहे. युद्धाच्या आरंभी त्या नेहरूंसोबत श्रीनगरला गेल्या होत्या. महाराजांच्या राजवाड्यात देशाचे पंतप्रधान, उपपंतप्रधान व लष्कराचे वरिष्ठ अधिकारी युद्ध प्रयत्नांची आखणी करीत असताना महाराज मात्र बाहेरच्या शाही वऱ्हांड्यात लावलेल्या पाळण्यावर पहुडले होते आणि त्याही स्थितीत ते ‘कोंबडीचे अंडे किती वेळ पाण्यात उकळले तर अधिक चवदार होते’ याची चर्चा आपल्या महाराणीसाहेबांसोबत करीत होते.)

काश्मीरच्या प्रश्नाची चर्चा करणारी माणसे या लष्करी वास्तवाकडे फारसे लक्ष देत नाहीत. हा प्रश्न केवळ राजकीय वा धार्मिक आहे आणि तो फाळणीमुळे निर्माण झाला, एवढ्यावरच त्यांची चर्चा थांबते. या प्रश्नाचे एक वास्तव लष्करी आहे. या वास्तवापुढे जेवढा भारताचा तेवढाच पाकिस्तानचाही तत्कालीन नाइलाज व अपुरी तयारी कारण आहे, ही बाब मुळातच लक्षात घेतली जात नाही. शिवाय अशी चर्चा करणाऱ्यांपैकी अनेकांना त्यातले सत्य जाणूनही घ्यायचे नसते. त्यांना या प्रश्नासाठी कोणाला तरी ‘आरोपी’ ठरवायचे असते आणि हा आरोपी त्यांच्या मनात नक्की ठरलेलाही असतो...

देश नुकताच स्वतंत्र झाला आहे, त्याचे लष्कर व युद्धसामग्री अपुरी आहे, ही स्थिती नाइलाजातून येणारे उत्तर योग्य वाटायला लावणारी आहे आणि देशाच्या तत्कालीन नेतृत्वानेही तेच केले आहे. हा प्रश्न युनोमध्ये नेताना भारताच्या बाजूने मांडले गेलेले मुद्दे असे-

1) भारतातील विलीनीकरणाला काश्मीरच्या महाराजांची संमती आहे आणि ती विलीनीकरणाच्या सर्व कायदेशीर अटी पूर्ण करणारी आहे.

2) काश्मिरातही जुनागडसारखे जनमत घ्यावे, ही पाकिस्तानची भूमिका भारताला मान्य आहे.

3) मात्र त्यासाठी पाकिस्तानने व्यापलेल्या काश्मीरच्या प्रदेशातून त्याचे सैन्य मागे घेतले गेले पाहिजे व आक्रमणापूर्वीची (म्हणजे भारत व पाक यांचे सैन्य तेथे जाण्याआधीची स्थिती निर्माण केली पाहिजे.

4) घेतले जाणारे जनमत संयुक्त राष्ट्रसंघटनेसारख्या जागतिक व तटस्थ संस्थेकडून घेतले गेले पाहिजे. यातली न समजण्यासारखी वा साऱ्यांना ठाऊक असणारी गोम अशी की, आपण बेकायदारीत्या व्यापलेल्या प्रदेशातून पाकिस्तान आपले सैन्य व त्या प्रदेशावरील त्याचा ताबा कधी मागे घेणार नाही, ही गोष्ट भारतासह सारे जग कधीपासूनच जाणत आहे. सबब, हा प्रश्न 1 जानेवारी 1949 या दिवशी ज्या जागी थांबला, तिथेच तो आजवर स्थिरावला आहे.

सुरेश द्वादशीवार, नागपूर

Share on Social Media

मागोवा

टॉलस्टॉय आणि गांधी

लुई फिशर

19 एप्रिल 1910 रोजी टॉल्स्टॉयनी आपल्या रोजनिशीत अशी नोंद केली आहे, ‘तीव्र भावनेनी प्रक्षुब्ध झालेली दोन जपानी माणसे सकाळी सकाळी माझ्याकडे आली, आणि युरोपियन संस्कृतीत असलेले दोष व अपूर्णत्व याचे वर्णन करणारे, एका हिंदूने लिहिलेले एक पत्र व पुस्तक आजच मला मिळाले.’ दुसऱ्या दिवशी डायरीत उल्लेख आहे; ‘संस्कृतीविषयी गांधींनी लिहिलेले अत्यंत सुंदर पत्र मी काल वाचले.’ परत त्याच्या दुसरे दिवशी असा उल्लेख आहे, ‘गांधींच्यावर लिहिलेले पुस्तक मिळाले. अत्यंत महत्वाचे. त्यांना उत्तर पाठवलेच पाहिजे!’ जे.जे. डोकेंनी लिहिलेले ‘गांधींचे चरित्र’ हे ते पुस्तक होते व गांधींनी ते टॉल्स्टॉयना पाठवले होते. त्यानंतर एके दिवशी आपला मित्र चेर्टकोव्ह याला लिहिलेल्या पत्रात गांधींच्याविषयी ‘आपला व माझा अत्यंत जवळचा माणूस’ असा उल्लेख टॉल्स्टॉयनी केला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील या हिंदू वकिलाप्रमाणेच, युरोपच्या मध्यपूर्वेस राहाणारा एक उच्चकुलीन गृहस्थ आध्यात्मिक विचारांच्या दृढ अलिंगनात अडकल्याप्रमाणे भारावून गेला होता. युरोपच्या पलीकडे काऊंट लिओ टॉल्स्टॉय यांच्या विचारदर्शनाने मोहनदास के. गांधी यांना त्यांच्या संघर्ष-प्रसंगी सुखद असा विरंगुळा मिळाला. गांधींच्या व्यावसायिक कार्यालयामध्ये टॉल्स्टॉय यांची धार्मिक विषयावरील बरीच पुस्तके होती; परंतु तुरुंगातील निवांत वेळीच त्यांना या रशियन लेखकाच्या विचारदर्शनाचा लाभ घेता आला.

केवळ आकारमानानेच नव्हे तर आपल्या शब्दरचनेुळे आदर्श निर्माण करणाऱ्या ‘वॉर अँड पीस’, ‘ॲना कॅरेनिना’ व ‘रिसरेक्शन’ या त्यांच्या तीन पुस्तकांनी टॉल्स्टॉयना प्रचंड यश व जगन्मान्यता मिळवून दिली होती. तरीदेखील त्यांचा अंतरात्मा त्यांना क्लेश देऊन सतावीत असे. येशू ख्रिस्तांची शिकवण व माणसाच्या प्रत्यक्ष जीवनातील तऱ्हा, यांतील तफावत पाहून त्यांना अत्यंत दु:ख होत असे. गर्भश्रीमंत परंपरेचा अधिकार असलेल्या कुळात 1828 साली त्यांचा जन्म झाला. वयाच्या सत्तावनाव्या वर्षी उच्चभ्रू स्तराचा त्यांनी त्याग केला, अत्यंत साधेपणाने ते राहू लागले, अनवाणी चालू लागले.

रशियन शेतकऱ्यासारखा ढगळा शर्ट-पॅन्ट असा पोशाख करून, अन्य शेतकऱ्यांसमवेत नांगरणी, कोळपणी, पेरणी असली कामे करू लागले. त्यांनी धूम्रपान, मांसाहार व शिकार हे सारे सोडून दिले. शेतातून लांबवर अनवाणी फिरत जाण्याचा वा सायकलवरून दूरवर प्रवास करण्याचा त्यांना छंद लागला. असह्य झालेल्या ऐषआरामाचा त्याग करून आपली प्रचंड मालमत्ता त्यांनी पत्नी व मुलांच्या स्वाधीन केली आणि ग्रामशिक्षण, दुष्काळ निवारण, शाकाहार, विवाहप्रणाली, ब्रह्मज्ञान अशा विषयांवर त्यांनी लेखन चालू केले. चर्च-संस्थेवर त्यांनी तीव्र दोषारोप सुरू केले. पुरुष व स्त्रियांच्यासाठी खऱ्याखुऱ्या श्रद्धेचा शोध घेण्याची त्यांना ओढ लागली.

यात्स्नाया पोल्याना येथील त्यांचे घर हे त्यांचे तीर्थक्षेत्रच ठरून गेले. ऐहिक सुखाचा पुरेपूर उपभोग घेतल्यानंतर वयाच्या सत्तरीत ईश्वराचा शोध घेण्यासाठी निघालेल्या, प्रसिद्ध व तेजस्वी अशा या सरदाराच्या पायाशी जगाच्या कानाकोपऱ्यांतून आलेले ख्रिश्चन, ज्यू, मुस्लीम व बौद्धधर्मी लोक लीन होऊन बसले होते. परदेशांतून आलेल्या या पाहुण्यांध्ये शिकागोच्या हिल्‌ हाऊसच्या जेन ॲडम्स; पुढे अमेरिकेच्या गृहखात्याचे सचिव झालेले विल्यम जेनिंग्ज ब्रायन; फिलाडेल्फियाचे यहुदी धर्मगुरू जोसेफ क्राऊसकॉफ; झारच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन सैबेरियाला भेट देऊन परतल्यानंतर, तेथील अधिकारी आपल्या कैद्यांना क्रूरपणे कसे वागवतात याचा जाहीर निषेध करणारा अमेरिकन पत्रकार जॉर्ज केन्नन; जर्मन कवयित्री रैनर-मारिया रिल्के व पुढे झेकोस्लावाकियाचा राष्ट्रपती झालेला थॉस जी. मसोरिक इत्यादींचा समावेश होता. त्या सर्व यात्रेकरूंमध्ये उभे ठाकले होते खंदे वीर टॉल्स्टॉय!

आपली जीवनतत्वे आणि वागणूक यांचा समन्वय साधण्याचा त्यांचा प्रयत्न, सर्वांच्या उत्सुकतेचा विषय होता. शारीरिक श्रम, कमीतकमी गरजा, मालमत्तेपासून मुक्ती आणि प्राणीहत्येला विराम हे आता त्यांच्या जीवनाचे आधारस्तंभ बनले. जमीनदारी हे मोठे पाप आहे असे ते म्हणू लागले. सरकारला केवळ एकच कर देण्याच्या, हेन्री जॉर्जच्या प्रतिपादनाचे त्यांनी स्वागत केले. सक्तीच्या सैन्यभरतीचा त्यांनी निषेध केला. सद्‌सद्‌विवेकबुद्धीशी प्रामाणिक राहणाऱ्यांचे ते समर्थन करीत असत. युद्ध व हिंसाचारी वृत्ती ही नैतिक दृष्ट्या असमर्थनीय असून, शांततामय मार्गाने त्यांचे निराकरण करावे अशा मताचा आग्रह धरणाऱ्या ड्युखोबोरला, कॅनडात स्थलांतर करण्यासाठी त्यांनी मदत केली. रशियातील ज्यूंची कत्तल करण्याचे समर्थन करणाऱ्या किशेनेव्हचा त्यांनी निषेध केला. विल्यम लॉईड गॅरिसनच्या शांततामय प्रतिकार- तत्वाचे त्यांनी स्वागत केले. खेड्यांतील प्राथमिक शाळांत शिकवण्याचे काम त्यांनी स्वीकारले. पैशाचा स्वीकार न करण्याच्या आपल्या तत्वाला अनुसरून त्यांनी नोबेल पुरस्कारही स्वीकारला नाही!

स्वाभाविकच सनातनी मताच्या चर्चनी त्यांना ख्रिस्ती धर्मातून बहिष्कृत केले! तुरुंगात असलेल्या आपल्या मित्राला उद्देशून लिहिताना- ‘दुर्दैवाने मी तुरुंगात नाही...’ असा त्यांनी उल्लेख केला होता. नैतिक विषयावरील त्यांच्या लहान लहान पुस्तिकांच्या शीर्षकांतून त्यांच्या मनाचा ठाव घेता येतो. ‘तू कोणाचीही हत्या करणार नाहीस;’ ‘एकमेकांशी प्रेानेच वागा,’ ‘सर्वसामान्य ख्रिश्चन माणूस, विशेषत: रशियन माणूस विपन्नावस्थेत का आहे?’, ‘येशू ख्रिस्ताची मुलांसाठी शिकवण,’ ‘देहांताची शिक्षा व येशू ख्रिस्त,’ ‘धार्मिक सहिष्णूता,’ ‘स्वत:तील निर्दोषत्व’.... इत्यादी शीर्षकेच त्याचे निदर्शक आहेत. आपल्या पत्नीचा व मुलांचाही त्याग करून मन:शांती मिळवण्यासाठी ते निघून गेले. टॉल्स्टॉय वसाहतीतील एका मठात राहायला गेलेल्या लिओ टॉल्स्टॉय यांचा 20 नोव्हेंबर 1910 रोजी मृत्यू झाला. आपल्याच विचारांचे प्रतिपादन वाटावे अशा, ‘ईश्वराचे सिंहासन तुमच्या हृदयात वसलेले असते’ या टॉल्स्टॉय यांच्या पुस्तकातून गांधींना त्यांची ओळख झाली. ‘चर्चचा इतिहास हा क्रौर्य व अत्यंत किळसवाण्या भीतीने भरला आहे...’ असे ते उघडपणे प्रतिपादन करतात. ‘पापापासून मुक्त होण्याचे, पापविमोचन करण्यासंबंधीचे प्रत्येक चर्चचे तत्वज्ञान, आणि सर्वांत कळस म्हणजे सनातनी विचारांतील व्यक्तिपूजा, -हे सगळे येशू ख्रिस्ताच्या तत्वज्ञानाला सोडून चालले आहे’ असे त्यांचे प्रतिपादन होते.

अत्यंत नि:पक्षपातीपणे व थंडपणे केलेल्या युक्तिवादातून, असंख्य उतारे उद्‌धृत करून स्वत:चे पूर्ण समाधान झाल्यावर, ‘सगळी ख्रिश्चन चर्चेस येशू ख्रिस्ताचा खराखुरा अर्थ दडवून ठेवतात’ असे ते म्हणत असत. त्याच मापाने टॉल्स्टॉय हे शासनावर टीका करीत असत. धूसर अशा पुरातन कालखंडाविषयी ते लिहितात की, ‘माणसे एकमेकांशी बोलताना एकमेकांचं भलं होवो’ असं चिंतीत असत. परंतु आता युरोपातील ख्रिश्चन राष्ट्रे अठ्ठावीस दशलक्ष लोकांना शस्त्रास्त्रांच्या धाकाखाली ठेवून, काहींची हत्या करून त्यांचे प्रश्न सोडवू पाहतात. त्याच्या समर्थनार्थ ‘गाय दि मोपासां’ या फ्रेंच लेखकाचे विचार ते उद्‌धृत करतात. ‘युद्ध’ या शब्दाचा नुसता उच्चार कानी पडताच सर्व समाज एकदिलानं त्याच्या विरोधात आवाज का उठवीत नाही; याचे त्यांना महदाश्चर्य वाटत असे.

महान रशियन साहित्य समीक्षक अलेक्झांडर हरझेन म्हणतो की, ‘तारायंत्राची सुविधा हाती असलेली आक्रमक लष्करशाही म्हणजे चेंगिजखानच आहे.’ टॉल्स्टॉय दडपशाहीच्या संदर्भात त्यांच्याशी सहमती दर्शवीत म्हणत, ‘ख्रिश्चन राष्ट्रे काफिरापेक्षाही अधिक दुष्ट आहेत!’ आशियाचा गाढा व्यासंग असलेला मॅक्स मुल्लर वर्णन करतो की, ‘एका भारतीय गृहस्थाने ख्रिश्चन धर्माच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर त्याने आश्चर्यकारकरित्या ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश केला व नंतर तो युरोपमध्ये येऊन राहिला आणि ख्रिश्चन लोकांच्या विचाराप्रमाणे त्याने आपले आयुष्य व्यतीत केले.’ तत्वज्ञान आणि आचरण यांमध्ये असलेल्या दरीविषयी थोरोप्रमाणेच टॉल्स्टॉयही त्या मताचे होते व त्यासंबंधी मॅक्स मुल्लर यांच्या विचारांचा ते वारंवार उल्लेख करीत असत.

‘महाभारतातील भगवद्‌गीता व बायबलमधील पर्वत शिखरावरचे प्रवचन या दोहोंच्या विचारांत साम्य आहे,’ असा गांधींनी निष्कर्ष काढला होता. ‘जुलमी सरकारचे आदेश शांततेच्या मार्गाने व स्वत:ला क्लेश घेऊन झुगारावेत’ अशी टॉल्स्टॉयची शिकवण होती. त्या संबंधात ते म्हणत की, ‘सरकारशी निष्ठा बाळगणे, कोर्टात शपथ घेणे अशा वागण्याला ख्रिश्चन तत्वज्ञानाने मनाई केली आहे. पोलिसाचे काम, सैन्यातील नोकरी व कर देणे या सगळ्या गोष्टी धर्म-निषिद्ध आहेत. त्या गोष्टींच्या विरोधी वागणूक असणाऱ्यांवर काय कारवाई करावी,’ असा प्रश्न टॉल्स्टॉय विचारतात. स्मट्‌सपुढे नेमका हाच तर प्रश्न होता. भारतीयांचे काय करावे हे त्यांस समजेनासे झाले. ‘ख्रिश्चन ज्यावेळी धर्माचा प्रसार करतात त्यावेळी सरकारने काय पवित्रा घ्यावा;’ असा प्रश्न टॉल्स्टॉय विचारतात, आणि असे सरकार उलथून टाकण्यासारखी गंभीर परिस्थिती आपोआपच निर्माण होते हे त्यांचे त्यावर उत्तर होते.’ थोरोही असेच म्हणत असे.

गांधींनी स्वत:लाच मुक्त करून घेण्यास सुरुवात केली. ही प्रक्रिया हळूहळू चालू होती. कित्येक श्रृंखलांनी माणूस जखडलेला असतो, आंतरिक बंधनात तो अडकलेला असतो. चर्च वा सरकारमुळे असेच घडते. ‘ईश्वराचे सिंहासन तर तुमच्याच हृदयात स्थापन झालेले असते. आपण जसे करू तसा परमेश्वर होत असतो. तुम्ही मुक्त नसता; कारण तुम्हीच स्वत:ला जखडून ठेवलेले असते. ‘सत्याप्रत पोहोचण्यासाठी बाह्य बंधनाचा त्याग केला, तरच तुम्ही ईश्वरी सत्तेपर्यंत पोहोचू शकाल’ असे टॉल्स्टॉय म्हणत असत. आपल्याच हृदयात स्थानापन्न असलेल्या त्या दैवी राज्यापर्यंत पोचण्यासाठी मार्गात पसरलेली मालमत्ता व सुखभोगाचे अडथळे गांधींनी झुगारून दिले. 1 ऑक्टोबर 1909 रोजी वेस्टमिन्स्टर पॅलेस हॉटेल, 4 व्हिक्टोरिया स्ट्रीट, एस.डब्ल्यू, लंडन येथून टॉल्स्टॉयना इंग्लिशमध्ये एक पत्र लिहून, गांधींनी त्यांच्याशी पहिला व्यक्तिगत संपर्क प्रस्थापित केला. त्यावेळी टॉल्स्टॉय यांचे वास्तव्य मध्य रशियातील यात्स्नाया पोल्याना येथे होते. त्या पत्रात गांधींनी ट्रान्सवालमध्ये आपण करीत असलेल्या ‘सविनय कायदेभंगा’चा तपशील दिला होता.

टॉल्स्टॉयनी लिहिलेल्या डायरीत 24 सप्टेंबर 1909 रोजी त्या पत्राचा उल्लेख आहे. पश्चिमात्य दिनदर्शिकेपेक्षा रशियन दिनदर्शिका तेरा दिवसांनी मागे होती, त्यामुळे त्या तारखांत फरक दिसतो. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘ट्रान्सवालमधील एका हिंदूकडून आलेले मनोरंजक पत्र मिळाले!’ चार दिवसांनंतर आपला परममित्र असलेल्या व्लादिमिर जी.चेर्टकोव्हला लिहिलेल्या पत्रात ते लिहितात की, ‘ट्रान्सवालमधील एका हिंदूने लिहिलेल्या पत्राने माझ्या हृदयाचा ठाव घेतला आहे!’ टॉल्स्टॉयच्या लिखाणाचे संपादकत्व करणाऱ्या चेर्टकोव्हच्या नोंदीत तसा उल्लेख आहे.

रशियन दिनांक 7 ऑक्टोबर 1909 रोजी म्हणजे इंग्रजी 20 तारखेला यात्स्नाया पोल्याना येथून टॉल्स्टॉयनी रशियन भाषेत गांधींना उत्तर पाठविले. टॉल्स्टॉयची मुलगी तातियाना हिने त्याचे इंग्रजीत भाषांतरही केले होते; ते लिहितात, ‘तुमचे अत्यंत चित्तवेधक पत्र नुकतेच मिळाले, ते वाचून मला अत्यानंद झाला. ट्रान्सवालमधील आपल्या सहकाऱ्यांना व बांधवांना ईश्वर नक्कीच साहाय्य करेल. इथे देखील दुर्बल विरुद्ध बलदंड, सहनशील -प्रेमळ विरुद्ध अहंकार व दांडगाई असे प्रसंग वर्षानुवर्षे दृष्टोत्पत्तीस येतात. तुमच्या बंधुत्वाच्या भावनेचे मी आनंदाने स्वागत करतो. तुमच्या संपर्कात राहण्यात मला आनंदच वाटेल. तुमचा टॉल्स्टॉय.’

गांधींनी आपले दुसरे पत्र जोहानास्बर्ग येथून 4 एप्रिल 1910 रोजी टॉल्स्टॉयना लिहिले. त्या पत्रासोबत त्यांनी लिहिलेली ‘हिंद स्वराज्य’ व ‘इंडियन होरूल’ ही दोन छोटेखानी पुस्तके पाठवली होती. पत्रात त्यांनी लिहिले, ‘मी तुमचा एक नम्र सेवक असून, मूळ गुजराथीत मी लिहिलेल्या या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर पाठवले आहे. आपल्याला त्रास द्यायची मला बिलकूल इच्छा नाही, तथापि आपल्या तब्येतीने साथ दिली व आपल्याला वेळ मिळाला तर माझ्या पुस्तकावरील आपला अभिप्राय पाठवलात तर तो मला मोलाचा वाटेल.’ 19 एप्रिल 1910 रोजी टॉल्स्टॉयनी आपल्या रोजनिशीत अशी नोंद केली आहे, ‘तीव्र भावनेनी प्रक्षुब्ध झालेली दोन जपानी माणसे सकाळी सकाळी माझ्याकडे आली, आणि युरोपियन संस्कृतीत असलेले दोष व अपूर्णत्व याचे वर्णन करणारे, एका हिंदूने लिहिलेले एक पत्र व पुस्तक आजच मला मिळाले.’ दुसऱ्या दिवशी डायरीत उल्लेख आहे; ‘संस्कृतीविषयी गांधींनी लिहिलेले अत्यंत सुंदर पत्र मी काल वाचले.’ परत त्याच्या दुसरे दिवशी असा उल्लेख आहे, ‘गांधींच्यावर लिहिलेले पुस्तक मिळाले. अत्यंत महत्वाचे. त्यांना उत्तर पाठवलेच पाहिजे!’ जे.जे. डोकेंनी लिहिलेले ‘गांधींचे चरित्र’ हे ते पुस्तक होते व गांधींनी ते टॉल्स्टॉयना पाठवले होते. त्यानंतर एके दिवशी आपला मित्र चेर्टकोव्ह याला लिहिलेल्या पत्रात गांधींच्याविषयी ‘आपला व माझा अत्यंत जवळचा माणूस’ असा उल्लेख टॉल्स्टॉयनी केला आहे.

यात्स्नाया पोल्याना येथून टॉल्स्टॉयनी 25 एप्रिल(8 मे) 1910 रोजी गांधींना उत्तर पाठवले. त्यात ते लिहितात, ‘प्रिय मित्र, आपले पत्र व त्यासोबत पाठवलेले ‘इंडियन होरूल’ हे पुस्तक मिळाले. त्या पुस्तकात तुम्ही ज्या विषयांचा ऊहापोह केला आहे व जे प्रश्न उभे केले आहेत ते सगळे मी अगदी उत्सुकतेने वाचले. केवळ भारताच्या दृष्टीने नव्हे तर सर्व मानवतेच्या दृष्टीनेही त्यांपैकी ‘सविनय कायदेभंग’ हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. ‘आपली पूर्वीची काही पत्रे माझ्या हाती आली नाहीत, पण मि.जे. टोक्कनी (टॉल्स्टॉयनी मि.डोकेंचा चुकून असा उल्लेख केला आहे) लिहिलेले आपले चरित्र वाचायला मिळाले. ते वाचल्यानंतर त्या न मिळालेल्या पत्रांत आपण काय लिहिले असावे, याचा मला अंदाज आला. माझी तब्येत आता ठीक नसल्यामुळे इतकेच म्हणेन की, आपल्या पुस्तकातील अत्यंत महत्वाचा विषय मी जाणतो. आपण हाती घेतलेल्या कामाविषयी मला जे वाटते ते लिहिणे अवघड आहे. माझी प्रकृती ठीक झाल्यावर मी त्यावर सविस्तर लिहीन. आपला परममित्र व बंधू लिओ टॉल्स्टॉय.’

टॉल्स्टॉयनी शुद्ध रशियन भाषेत हे पत्र लिहिलेले आहे. गांधींनी 21-24 कोर्ट चेंबर्स, रिस्सिक अँड अँडरसन रोड कॉर्नर, जोहानास्बर्ग येथून 15 ऑगस्ट 1910 रोजी टॉल्स्टॉयना तिसरे पत्र लिहिले. 8 मे रोजी टॉल्स्टॉयनी लिहिलेल्या पत्राची त्यात साभार पोच दिली व पुढे लिहिले की, ‘आपण पत्रात लिहिल्याप्रमाणे मी आपल्या सविस्तर अभिप्रायाची उत्सुकतेने वाट पाहात आहे.’ शिवाय त्यांनी व कॅलेनबॅकने ‘टॉल्स्टॉय फार्म’ची स्थापना केल्याचे या पत्रात कळवून ‘टॉल्स्टॉय फार्म’विषयी लवकरच आपल्याला कॅलेनबॅक सविस्तर पत्र लिहीलं.’ असे म्हटले. गांधींनी व कॅनेलबॅकनी लिहिलेली पत्रे, व त्यासोबत गांधींच्या ‘इंडियन ओपिनियन’ या साप्ताहिकाचे अंक वाचून टॉल्स्टॉयना गांधींच्याबद्दल मोठेच औत्सुक्य वाटू लागले. 6(19) सप्टेंबर 1910 रोजी टॉल्स्टॉय आपल्या रोजनिशीत लिहितात, ‘ट्रान्सवाल वसाहतीमधील ‘सविनय कायदेभंगाविषयी’ अत्यंत आनंदाची वार्ता समजली.’ त्यासमयी आत्यंतिक आध्यात्मिक खिन्नतेमुळे व आजारीपणामुळे टॉल्स्टॉय विव्हल झाले होते, तरीदेखील गांधींचे पत्र त्यांना ज्या दिवशी मिळाले त्याच दिवशी त्यांनी पत्रोत्तर पाठवले.

टॉल्स्टॉयनी 5 व 6 सप्टेंबरच्या रात्री (18 व 19) ते उत्तर सांगितले व दुसऱ्याकडून लिहून घेतले. दुसऱ्या दिवशी त्या पत्राच्या मसुद्यात थोडी दुरुस्ती करून व त्यावर सही करून, इंग्लिशमध्ये भाषांतर करण्यासाठी त्यांनी ते चेर्टकोव्हकडे पाठवले. चेर्टकोव्हने टॉल्स्टॉय यांचे हे पत्र, आणि त्यात स्वत:चे एक पत्रही त्यासोबत गांधींच्याकडे पाठवले. त्यात तो लिहितो, ‘माझे मित्र टॉल्स्टॉय यांना आपले 15 ऑगस्टचे पत्र पोहोचले आहे. त्याची पोहोच देण्याविषयी मला त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी आपल्यासाठी 7 सप्टेंबर(20) रोजी रशियन भाषेत लिहिलेले पत्र इंग्लिशमध्ये भाषांतर करून आपल्याकडे पाठविण्यास मला सांगितले आहे. ‘मि.कॅलेनबॅकने लिहिलेले पत्र वाचून टॉल्स्टॉयना खूप आनंद झाला असून त्यांनी सांगितल्यावरून कॅलेनबॅक यांच्या पत्राची पोचही मी देत आहे. तुम्ही व तुमच्या सहकाऱ्यांनी जे काम हाती घेतले आहे त्याला टॉल्स्टॉयनी शुभेच्छा देऊन यशस्वी होण्यासाठी मन:पूर्वक सदिच्छा प्रदर्शित केल्या आहेत. रशियन भाषेतील त्यांच्या पत्राचे इंग्लिशमध्ये हे भाषांतर आहे, त्यावरून आपल्या कामाचे त्यांनी जे गुणवर्णन केले आहे त्याची प्रचिती येईल. इंग्लिश भाषांतर करताना त्यात काही चुका आढळल्या तर त्यासाठी मी दिलगीर आहे; परंतु मी इथे राहात असल्यामुळे, त्या दुरुस्तीसाठी इंग्रजी जाणणारा माणूस मिळणे शक्य नाही!

‘टॉल्स्टॉयनी लिहिलेले हे पत्र त्यांच्या परवानगीने लंडनमधील वृत्तपत्रात आमच्या मित्रातर्फे प्रसिद्ध करण्यात येईल. त्या वृत्तपत्राची एक प्रत, व ‘दि फ्री राज प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रात टॉल्स्टॉय यांचे प्रसिद्ध झालेले लिखाण याची प्रतही आपणाकडे पाठविण्यात येईल. आपण चळवळ उभी केली आहे ती अधिकाधिक इंग्लिश लोकांना समजावी या हेतूने, टॉल्स्टॉय व माझ्या ग्लॅसगो येथील मिसेस मेयो या सहकारीला तुमच्याबरोबर पत्रव्यवहार करण्याविषयी पत्राने सुचवले आहे.’

चेर्टकोव्हने मि.कॅलेनबॅक यांनाही स्वतंत्र पत्र लिहिले. गांधींचा व टॉल्स्टॅाय यांचा जो पत्रव्यवहार झाला होता, त्यातील सर्वांत प्रदीर्घ असलेल्या, टॉल्स्टॉय यांच्या 7 सप्टेंबर(20) 1910च्या पत्राचे भाषांतर करून, ते गांधींकडे लंडनहून रवाना करण्याविषयी एका मध्यस्थाला सांगितले होते; परंतु तो मध्यंतरी आजारी पडला. नंतर त्याने ते पत्र 1 नोव्हेंबर रोजी गांधींच्याकडे पोस्टाने पाठवले. दुर्दैवाने काऊंट लिओ टॉल्स्टॉय यांच्या निधनानंतर कित्येक दिवसांनी ते गांधींना मिळाले.

टॉल्स्टॉयनी त्यात लिहिले होते; ‘जसजसे माझे वय वाढते आहे, आणि विशेषत: मी मृत्यूच्या अगदी समीप पोचल्याचे स्पष्टपणे जाणवते आहे, अशा वेळी माझ्या मनात अत्यंत महत्वाचा विचार तरळतो आहे. ज्याला ‘सविनय कायदेभंग’ म्हणतात तो विषय दुसरा तिसरा काही नसून, नीतिमत्तेचा दांभिक ऊहापोह न करता केवळ प्रेमाच्या शिकवणीचा आदर बाळगून वाटचाल करावी असे मला तीव्रतेने जाणवते आहे. सर्वांना ते सांगावे अशी माझी मनोकामना मला सांगते आहे.

‘ते प्रेम...म्हणजेच माणसाच्या जीवनात सर्वोच्च असलेला कायदा आहे; निरागस बालकात आपल्याला जो प्रकर्षाने जाणवतो, तोच प्रत्येक माणसाच्या आत्म्यात खोलवर रुजलेला आहे याची त्याला जाण येते किंवा ज्ञान होते. विश्वासाच्या खोट्या शिकवणीच्या जाळ्यातून तो बाहेर पडतो. त्यावेळी अंतर्यामीच्या कायद्याचा जाहीररित्या पुरस्कार केला जातो; -मग तो मनुष्य चिनी, हिब्रू, ग्रीक वा रोन -कुणीही असो!’ ‘ज्यावेळी प्रेमाचे बळजबरीत रूपांतर होते त्यावेळी जीवनात प्रत्यक्ष प्रेमाचा कायदाच शिल्लक राहात नाही. त्यावेळी कोणताच कायदा शिल्लक राहात नाही! जे काही शिल्लक राहते ती जबरदस्ती -जुलमी राजवट!! असले जीवन ख्रिश्चन नागरिक साऱ्या एकोणीसाव्या शतकात व्यतीत करीत आहेत.’

मृत्यूच्या उंबरठ्यावर ठाकलेला हा वृद्ध, एका तरुणाला हे आशयगर्भ पत्र लिहीत होता. गांधी तरुण होतेच, परंतु शारीरिक वयापेक्षा ते मनाने पंचवीस वर्षे तरुण होते. टॉल्स्टॉय मनस्वी दु:खी होते. ‘वॉर अँड पीस’च्या अंतरंगाची जाणीव असून देखील जो माणूस आपल्या सदसद्‌विवेक बुद्धीला नाकारतो, किंवा येशू ख्रिस्ताच्या शिकवणीतूनही ज्याला आनंदाची गुरुकिल्ली सापडत नाही, तो दु:खीच राहणार! गांधींची मात्र अशी ठाम समजूत होती की आपल्याप्रमाणेच इतरांचेही परिवर्तन आपण घडवून आणू शकू. त्या विचाराप्रमाणे ते कृती करत होते, त्याचा त्यांना आनंद होत असे!

(अनुवाद : वि. रा. जोगळेकर)

साधना प्रकाशनाकडून या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकातील एक प्रकरण.

Share on Social Media

दृष्टिक्षेप

नर्मदा घाटीत निकराचा बेमुदत उपोषण सत्याग्रह!

संजय मंगला गोपाळ

ही झाली एका नर्मदा लढ्याची अत्यंत संक्षिप्त कहाणी. कहाणीचे नायक-नायिका आहेत तेथील लढणारे आदिवासी, शेतकरी, महिला, युवा नागरिक. त्यांना साथ देणारे देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन नर्मदेत ठाण मांडून बसलेले अनेक कार्यकर्ते आणि त्या साऱ्यांना एकत्र गुंफून अत्यंत निर्धाराने आणि नेकीने हे आंदोलन सातत्याने फुलवत ठेवणाऱ्या मेधा पाटकर! या कहाणीतील खलनायक मात्र कहाणीच्या कथानकाच्या बाहेर नायक बनून फुशारक्या मारत फिरत आहेत. विकासाच्या नावाखाली देशाच्या कानाकोपऱ्यात पुन्हा पुन्हा नव्या नव्या नर्मदा संघर्ष कहाण्या निर्माण करत आहेत. नर्मदेच्या किनाऱ्यावर छेडलेला बेमुदत उपोषणाचा आव्हान सत्याग्रह म्हणजे या बेमुर्वतखोर विनाशखोरीला शांत परंतु निश्चयी सुरात घातलेला लगाम आहे.

‘नर्मदाकी घाटीमें अब लडत जारी है! चलो उठो, चलो उठो, रोकना विनाश है!!’ या निश्चयाने नर्मदा खोऱ्यातील आदिवासी, शेतकरी, कामगार-कष्टकरी, व्यापारी, बलुतेदार, स्त्रिया, मुले, युवा, प्रौढ सगळे जण अन्याय्य बुडितात ढकलले जाण्याविरुद्ध गेली सुमारे 35 वर्षे नेटाने लढत आहेत.

खोऱ्यातली जंगले, शेती, पुरातन वास्तू, गाव, नगरे अनावश्यक कारणांसाठी उदध्वस्त होऊ नयेत आणि स्वतःचा जीव, परिसर, निसर्ग व रोजी-रोटी टिकून राहावी यासाठी त्यांचा संघर्ष सतत सुरू आहे. जे जागरूक स्थानिक नागरिक 35 वर्षांपूर्वी या आंदोलनात सामील झाले, त्यांच्या पुढच्या दोन पिढ्या आता आंदोलनात सक्रिय झालेल्या आहेत. इतक्या प्रदीर्घ काळ नेटाने आणि संपूर्णपणे अहिंसक व शांततापूर्ण सनदशीर मार्गांनी चाललेले दुसरे कुठले आंदोलन अलीकडच्या इतिहासात कदाचित सापडणार नाही.

आंदोलन सुरू झालं. उभं राहिलं. पुढे-पुढे जात राहिलं. देशभरचेच नव्हे तर जगभरचे समर्थक उभे केले. देशभरातील अन्य आंदोलनांनाही बळ मिळेल अशी व्यापक समन्वयाची प्रक्रियाही गंभीरपणे या आंदोलनाने आजतागायत सुरू ठेवली आहे. नर्मदा आंदोलन म्हणजे मेधा पाटकर असे समीकरण जरी रूढ झाले असले तरी याच आंदोलनाने नूरजी पाडवी, देवराम कनेरा, कमळूदीदी यांसारखे ताकदीचे कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने दिलेले आहेत.

नर्मदा घाटीत सुरू बेमुदत उपोषणाचा आव्हान सत्याग्रह!

नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 25 ऑगस्टपासून नर्मदेच्या किनाऱ्यावर बडवानी जिल्ह्यातील अंजडजवळील छोटा बडदा या गावात बेमुदत उपोषणाचा आव्हान सत्याग्रह सुरू केला आहे. मध्य प्रदेशातली 192 गावे आणि एक नगर यांचे न्याय्य पुनर्वसन न करताच ती बुडवली जाण्याचा हट्ट गुजरात राज्य सरकार व केंद्र सरकार एक प्रकारच्या जबरदस्तीने पुढे रेटत आहे. विदेश दौऱ्यावरून परतलेले पंतप्रधान सरदार सरोवर धरणात पाण्याची पातळी क्रमाक्रमाने वाढत असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे याच धरण प्रकल्पामुळे विस्थापित होऊ घातलेले आदिवासी व शेतकरी त्यांच्या खिजगणतीतही नाहीत अशी क्रूर संवेदनशून्यता त्यांना व्यक्ती म्हणून कदाचित शोभतही असेल, पण पंतप्रधान या नात्याने ही देशवासीयांची क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल.

सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यासमोर सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे 8 फेब्रुवारी 2017 रोजी निकाल दिला की, नर्मदेवर प्रस्तावित सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित सर्व परिवारांचे पुनर्वसन पूर्ण झालेले आहे, त्यामुळे धरण पूर्ण करण्यात यावे आणि प्रभावित नागरिकांनी 31 जुलै 2017 पर्यंत आपापली गावे रिकामी करून पुनर्वसनस्थळी निघून जावे.

नर्मदा बचाओ आंदोलनाच्या मते, हा निकालच मुळात खोट्या दाव्यांच्या आधारे मिळवण्यात आलाय. त्या वेळी 2017 मध्ये या प्रकल्पाशी संबंधित गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व राजस्थान या चारही राज्यांत आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाची सरकारे होती. पंतप्रधान गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांनी हा प्रकल्प प्रतिष्ठेचा बनविला होता. त्यामुळे या सगळ्यांनी राजकीय संगनमताने न्यायालयासमोर पुनर्वसन पूर्ण झाले, शून्य काम बाकी आहे- अशा प्रकारची खोटी शपथपत्रे दाखल करून न्याय मिळवल्याच्या नावाखाली प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्तांवर घोर अन्यायच केला.

खरे तर 956 कोटी रुपये खर्चून पुनर्वसन वसाहती बांधून काढल्याचा दावा सरकार करीत आहे. वास्तवात या सर्व वसाहती म्हणजे निव्वळ पत्र्याच्या शेड्‌स आहेत. माणसं, जनावरं यांना राहण्यासाठी ही ठिकाणे अत्यंत निकृष्ट स्वरूपाची आहेत. आंदोलनाच्या या म्हणण्याची सत्यासत्यता तपासण्यासाठी थेट नर्मदा घाटीत जाण्याची आवश्यकता नाही. शिल्पा बल्लाळ या लघुपट निर्मातीने 2018 आणि 2019 मध्ये शूटिंग केलेली ‘लकिर के इस पार’ ही आंदोलनावरची फिल्म जरी कुणी पाहिली, तरी या पत्र्याच्या अक्षरशः टिनपाट शेड्‌स दिसू शकतात. त्यातल्याही तीन पुनर्वसन वसाहती बुडिताखाली गेल्या आहेत! म्हणजे पुनर्वसन झाल्याचा दावा केलेल्यांचे पुनर्विस्थापन!

सत्याग्रहींच्या आत्ताच्या मागण्या!

2017 आणि 2018 मध्ये धरण पूर्ण भरेल असा पाऊसच न झाल्याने प्रभावित क्षेत्र बुडिताखाली गेले नाही. दुसरीकडे पुनर्वसन पूर्ण झाले, हा दावाच खोटा असल्याने प्रभावित नागरिकही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत म्हणजे 2017 च्या जुलैअखेर आधी आपापली गावे रिकामी न करता आजवरप्रमाणेच राहत होती. दुसरीकडे, तुम्ही न्यायालयात दावा केलेले न्याय्य पुनर्वसन पूर्ण करा, याकरता सरकारविरोधात नियमित आंदोलनही करीत होती. आंदोलनाची भूमिका स्पष्ट आहे- नर्मदा आमची जीवनवाहिनी, नाही मरणदायिनी! न्याय्य पुनर्वसनाशिवाय बुडिताखाली येणे नामंजूर!! नर्मदा लिंक प्रकल्प आणि सर्व धरणांबाबत पुनर्विचार करा!!!

यंदा पाऊस असल्याने नर्मदेवर उभारलेल्या सरदार सरोवर धरणात पूर्ण 139 मीटरपर्यंत पाणी भरण्याचा अट्टहास गुजरात सरकारने जाहीर केला आहे. आंदोलनाच्या मते, याचा आधार आहे 2018 पर्यंत नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने राज्य सरकारच्या नावाने प्रकाशित केलेली खोटी माहिती. मध्य प्रदेशातली 192 लहान-मोठी गावं आणि एक नगर यात राहणाऱ्या 32 हजार कुटुंबीयांचे सर्व अधिकार व पुनर्वसन वसाहतीत सर्व सुविधा मिळाल्याशिवाय तसेच राज्याच्या वाट्याची वीज मिळाल्याशिवाय, बुडित आम्ही मान्य करणार नाही, अशी ठाम भूमिका मध्य प्रदेश सरकारने घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र व गुजरातमधील आदिवासींचेही पुनर्वसन नीटपणे झालेले नाही. शेकडो कुटुंबांना वनाधिकारापासून भू-अधिकारापर्यंत वंचित ठेवलेले असून भूसंपादनही अर्धवटच झालेले आहे. रोजगाराच्या आश्वासनाबाबतही संबंधितांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. आंतरराज्य लवादाचा दर्जा असणारे नर्मदा नियंत्रण प्राधिकरण म्हणजे सिन्हा नावाच्या एका पती-पत्नी आय.ए.एस. अधिकारी असलेल्या कुटुंबाच्या हातातले बाहुले बनलेले आहे. पती सिन्हा या लवादाचे अध्यक्ष; तर पत्नी सिन्हा एकाच वेळी सदस्य- स्थापत्य, सदस्य- पर्यावरण, सदस्य- ऊर्जा आदीचे अधिकार असलेल्या.

आंदोलनाच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत

1.122 मीटरपर्यंत पाणी भरल्यास प्रभावित असलेल्या गावांचे पुनर्वसन झालेले नसल्याने लवादाचा निकाल, न्यायालयीन अटी, राज्याची पुनर्वसन नीती आणि अन्य शासकीय आदेशांनुसार संपूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय एकही नागरिक बुडिताखाली ढकलण्यात येणार नाही, या शासकीय निर्धारानुसार सरदार सरोवर धरणाचे गेट त्वरित उघडून धरण 122 मीटरपेक्षा अधिक भरणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. अद्याप 32 हजार कुटुंबीयांचे न्याय्य पुनर्वसन होणे बाकी आहे. तोवर बुडिताखाली येणे नामंजूर!

  1. 139 मीटर या पूर्ण धरणक्षमतेपर्यंत पाणी साठविण्याचे वेळापत्रक एक वर्ष पुढे ढकलण्यात यावे, ज्यामुळे योग्य पुनर्वसन पूर्ण करण्यास अवधी मिळू शकेल. यासाठी मध्य प्रदेश सरकारने गुजरात राज्य आणि केंद्र सरकारसमोर निकराने लढण्याच्या पवित्र्यात जाणे आवश्यक आहे.

  2. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील सर्व प्रभावितांचे योग्य पुनर्वसन झाल्याशिवाय कोणालाही बुडिताखाली ढकलणे नामंजूर!

  3. पुनर्वसनाबाबतची सर्व वास्तविकता, आकडेवारी आणि अन्य कागदपत्रे वेबसाईटवर प्रसिद्ध करा म्हणजे याबाबतचा भ्रष्टाचार थांबविता येईल.

  4. नर्मदा लवाद निवाड्यानुसार पुनर्वसन, पर्यावरण संरक्षण आदी सर्व खर्च गुजरात राज्याने करायचे आहेत. तो सर्व खर्च गुजरात सरकारकडून वसूल करण्यात यावा.

गेला महिनाभर आंदोलनाचे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत!

सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलै 2019 रोजी गावे रिकामी करण्याची मुदत दिलेल्या तारखेचा दुसरा स्मृतिदिन. या निमित्ताने हजारोंच्या उपस्थितीत मध्य प्रदेशमधील बडवानी येथे आंदोलनाने विशाल रॅली आयोजित केली होती. त्या वेळी सौराष्ट्र निवासी, गुजरातचे भूतपूर्व पर्यावरणमंत्री प्रवीणसिंह जडेजा यांनी गुजरातच्या वतीने नर्मदा घाटीतील जनतेची माफी मागितली. ‘गुजरातमधील कच्छ-सौराष्ट्र या दुष्काळग्रस्त विभागाला पाणी मिळण्याच्या आशेने आम्ही या धरणाला आधी पाठिंबा दिला, ते चूक ठरलं आणि आंदोलनाने उचललेला प्रत्येक मुद्दा खरा ठरतोय. गुजरात राज्य व केंद्र सरकार ना विस्थापितांच्या बाजूने आहेत, ना शेतकऱ्यांच्या! सगळं पाणी अदानी-अंबानीला दिलं जातंय. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून नर्मदा नदी वाचवली पाहिजे,’ असे आवाहन त्यांनी केले.

मध्य प्रदेशचे माजी आमदार डॉ.सुनीलम आणि आराधना भार्गव यांच्या मते, नर्मदेतील मोठ्या लिंक प्रकल्पांबाबतही पुनर्विचार व्हायला हवा. नदी-धरण व्यवस्थेवरील अभ्यासक परिणीता दांडेकर यांनी नद्या बांधायच्या नाहीत, तर खुल्या करण्याची गरज प्रतिपादली. अमेरिकेत हजारो धरणे तोडून नद्या मुक्त करत असल्याचा दाखला त्यांनी दिला.

6 ऑगस्टपासून नर्मदेचे पाणी चढू लागले. घररस्ता- गाव पाण्याखाली जाऊ लागले. बडवानीतल्या राजघाटावर 7 ऑगस्टला सत्याग्रह सुरू करण्यात आला. पाणी वाढतंय तर धरणाचे दरवाजे उघडा, ही मागणी घेऊन. स्थानिक आमदारांना दि.7 ऑगस्टला पत्र देण्यात आलं. निवडणूक प्रचारावेळी दिलेल्या ओशासनांची आठवण त्यांना करून देण्यात आली. आंदोलन व मध्य प्रदेश राज्य सरकार यांचा दबाव वाढल्यावर गुजरात सरकारने अखेरीस धरणाचे 30 पैकी 25 दरवाजे उघडले. ‘आंदोलनकी भारी जीत’, म्हणत सत्याग्रह स्थगित करण्यात आला. गुजरात सरकारने अतिशय निर्ममपणे पुन्हा दहा दरवाजे बंद केले. मेधा पाटकर त्यावर कडाडल्या ‘हे मॉबलिंचिंग नाही, मास लिंचिंग आहे!’

मध्य प्रदेशचे नर्मदा विकासमंत्री व स्थानिक लोक प्रतिनिधी सुरेंद्रसिंह हनीभैय्या बाघेल यांच्यासोबत आंदोलकांनी उघड्या पेंडॉलमध्ये तीन तास चर्चा केली. त्यांनीही न्याय मिळवून देण्याची हमी दिली. गुजरात सरकारने टप्प्याटप्प्याने भरत 50 दिवसांत धरण पूर्ण भरण्याचे जाहीर केले. एका परीने मध्यप्रदेशमधल्या जनतेच्या जीवावर धरणाचे टेस्टिंग करण्याचे त्यांनी घोषित केले. आंदोलनाने मुंबई-आग्रा हायवे 13 ऑगस्टला दुपारी 12 ते 6 रोखून इशारा दिला- ‘अन्याय हम नहीं सहेंगे!’ न्यायाची अपेक्षा व्यक्त करणारं एक खुले पत्रही आंदोलनाने पंतप्रधानांना पाठवलं. दिल्लीत 21 ऑगस्टला विशाल धरणे धरत जलसंसाधन मंत्रालयाचे मुख्य सचिव उपेंद्र प्रसादसिंह यांना आंदोलक भेटले. ‘सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. आम्ही त्याला बांधिल आहोत,’ असं म्हणत त्यांनी हात वर करायचा प्रयत्न केला. मात्र वास्तव मांडल्यावर मध्य प्रदेशच्या संबंधित सचिवाशी बोलण्याची तयारी त्यांनी दाखवली.

इकडे घाटीत रोज डूब वाढते आहे. अधिकारी येऊन गावकऱ्यांना जबरदस्तीने घराबाहेर काढताहेत. बडवानी- जवळच्या जांगरवा गावातल्या एका घरात तहसीलदार श्री.आहेरिया धाकदपटशा दाखवत असताना घाबरून गेल्याने मानसिक धक्का बसून लक्ष्मण गोपाळचे निधन झाले. त्याआधी बुडिताखाली येणाऱ्यांना मदत करताना विजेचा धक्का बसून दोन लोकांचे निधन झाले. आंदोलकांनी मध्य प्रदेश सरकारचे मुख्य सचिव व अन्य अधिकाऱ्यांना भेटून घाटीला वाचविण्याचे आवाहन 24 ऑगस्टला केले. आता 25 ऑगस्टपासून सुरू झाला आहे, बेमुदत उपोषण आव्हान सत्याग्रह. मेधा पाटकर आणि घाटातील बारा प्रभावित बेमुदत उपोषणाला बसले असून रोज प्रभावित साखळी उपोषण करीत आहेत. हा सत्याग्रह सुरू होताच मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी उपोषणस्थळी येऊन मागण्यांना पाठिंबा जाहीर केला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी मेधा पाटकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. गुजरात राज्य सरकार आणि केंद्र सरकार मात्र नुसतं ढिम्मच बसून राहिलेलं नाही, तर विस्थापितांवर अन्याय्य बुडिताच्या केलेल्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे.

सरदार सरोवरासारखे विनाशकारी प्रकल्प म्हणजे भविष्यातील आपत्तीची पायाभरणी!

वर सांगितलेली माहिती झाली सरदार सरोवर धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांची. या प्रकल्पाचे एकूण विस्थापित आहेत तीन लाख. मात्र या धरण प्रकल्पाच्याच अनुषंगाने खोदलेले कालवे, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारून निर्माण केलेले पर्यटनस्थळ, शूळपाणेश्वर अभयारण्य आदी योजनांमुळे झालेले विस्थापित धरले तर ते एकूण सुमारे दहा लाख लोक प्रभावित आहेत, असा नर्मदा बचाओ आंदोलनाचा दावा आहे. या अधिकच्या सात लाख विस्थापितांच्या न्याय्य पुनर्वसनाचं काय, हा अजूनच नवा मुद्दा आहे.

ही झाली एका नर्मदा लढ्याची अत्यंत संक्षिप्त कहाणी. कहाणीचे नायक-नायिका आहेत तेथील लढणारे आदिवासी, शेतकरी, महिला, युवा नागरिक, त्यांना साथ देणारे देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन नर्मदेत ठाण मांडून बसलेले अनेक कार्यकर्ते आणि त्या साऱ्यांना एकत्र गुंफून अत्यंत निर्धाराने व नेकीने हे आंदोलन सातत्याने फुलवत ठेवणाऱ्या मेधा पाटकर! या कहाणीतील खलनायक मात्र कहाणीच्या कथानकाच्या बाहेर नायक बनून फुशारक्या मारत फिरत आहेत. विकासाच्या नावाखाली देशाच्या कानाकोपऱ्यात पुन:पुन्हा नव्या नव्या नर्मदा संघर्ष कहाण्या निर्माण करत आहेत. नर्मदेच्या किनाऱ्यावर छेडलेला बेमुदत उपोषणाचा आव्हान सत्याग्रह म्हणजे या बेमुर्वतखोर विनाशखोरीला शांत परंतु निश्चयी सुरात घातलेला लगाम आहे. निसर्गाच्या मर्यादा बेलगामपणे ओलांडून मोठी धरणे, महाकाय वीजनिर्मिती प्रकल्प, औद्योगिक कॉरिडॉर्स, अमर्याद हायवेज अशा प्रकारचे विनाशकारी प्रकल्प रेटताना आपण खरे तर भविष्यातल्या आपत्तींचा पाया रचत आहोत; हे अलीकडे आलेले महापूर, भूस्खलनाचे प्रकार आदींतून स्पष्टपणे दिसत आहे. या विकासाच्या अविवेकाला विवेकाचा मार्ग दाखविणारा लढा नर्मदा घाटीत गेली सुमारे तीन तपे सुरू आहे. त्यातून प्रेरणा घेतलेली, जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाशी जोडलेली देशातील आणि विदेशातली अनेक आंदोलने आज नर्मदा सत्याग्रहाच्या पाठीशी उभी आहेत. आपल्या देशाच्या, पृथ्वीच्या आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याची ही साद ऐकू येतेय ना? त्या सादेला मन:पूर्वक निर्धाराने साथ देऊ या!

संजय मंगला गोपाळ, मुंबई जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय

Share on Social Media

दृष्टिक्षेप

‘वेध अवलियाचा’ या पुस्तकाची प्रस्तावना

सदा डुम्बरे

अवचटांचा अमृतमहोत्सव हे या पुस्तकाचे निमित्त आहे. वाढदिवसानिमित्त ‘बाबाला’ काय भेट द्यावी याविषयी झालेल्या कौटुंबिक चर्चेतून अवचटांची मुलगी यशोदा वाकणकरला ही पुस्तकाची कल्पना सुचली. तरुण पिढीला अवचटांच्या पुस्तकांविषयी, लेखनाविषयी काय वाटते, ते लेखन आज किती प्रस्तुत आहे याचा शोध घेण्याकरता हा लेखन प्रपंच. एकाच लेखकाच्या सर्व पुस्तकांचा आस्वादक पद्धतीने पुनर्शोध घेण्याचा असा प्रयत्न कदाचित मराठीतील पहिलाच लेखन प्रकल्प असावा. प्रस्तुत पुस्तकातील सर्व लेखक मंडळी ‘यशो’चे आणि परस्परांचेही मित्र आहेत. त्यांनी मुक्तपणे लिहिले आहे. ‘अवचट’ या लेखकाच्या मोठेपणाच्या दडपणाखाली नाही. त्यांच्या उत्साहाला आणि ऊर्मीला ‘संपादकीय’ वळण देण्याचे मी जाणीवपूर्वक टाळले आहे. या पुस्तकाचे नवेपण, ताजेपण सुकणार नाही एवढीच मी काळजी घेतली.

अनिल अवचट लिहिते लेखक आहेत. गेले अर्धशतक त्यांची लेखणी अखंड स्रवते आहे. आजमितीला त्यांची चाळीसएक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आगामी काळात आणखी काही होतील. असे असूनही ‘साहित्यिक’ म्हणून त्यांची गणना होत नाही. बालवाङ्‌मयासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला असला तरी बालसाहित्यकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली नाही. अधूनमधून ते कविता करत असले तरी कवींनी त्यांना आपल्यात घेतलेले नाही. कथा-कादंबऱ्यात असते त्या जातकुळीचे मूलद्रव्य अवचटांच्या लेखनात असले तरी ते वाङ्‌मयकार नव्हेत. प्रचलित व्याख्येत बसविता येईल असे त्यांचे लेखन नाही. या सर्व साहित्यप्रकारांतील आशय आणि शैलीचा एकात्मिक आविष्कार त्यांच्या लेखनात दृग्गोचर होत असला, त्याच गुणवत्तेचे व्यक्तिचित्रण आणि समाजदर्शन तिथे आढळत असले, मानवी भावभावनांचा पट उलगडत असला, जग बदलण्याची ऊर्मी आणि स्वप्नभंगाचे दु:ख एकत्र वास करीत असले तरी समीक्षकांना ‘सर्जनशील लेखक’ या वर्गवारीत, कोटीक्रमात त्यांना बसवता येत नाही.

असे असूनही मग अवचट एवढे लोकप्रिय लेखक का आहेत? त्याचे कारण लेखकाला ललामभूत नसलेले अनेक अवगुण अवचटांमध्ये आहेत. उदाहरणार्थ, वाङ्‌मयातील ‘कल्पित’ वास्तवापेक्षा त्यांना समाजातील प्रखर वास्तवाशीच भांडणतंटा करायचा असतो. लेखकराव अनेकदा समाजापासून फटकून असतो, त्याशिवाय आपले लेखन सार्वत्रिक आणि सार्वकालिक होणार नाही अशी धास्ती त्याला वाटत असते. अवचटांचे तसे नसते. ते अखंड सामाजिक असतात. हा समाज त्यांना बदलायचा असतो. त्यातील अन्याय, अत्याचार त्यांना वेशीवर टांगायचे असतात. विशिष्ट व्यक्ती वा समाजघटकांना न्याय मिळवून द्यायचा असतो. ते अन्यायग्रस्तांच्या बाजूने प्रस्थापित व्यवस्थेला अवघड प्रश्न विचारतात. दंभस्फोट करतात. त्यांच्यातला परिवर्तनवादी कार्यकर्ता, संवेदनशील माणूस, शोधपत्रकार, त्यांच्या लेखकपणावर मात करतो.

वास्तवावर कलात्मक लेप चढवून ते मढविण्याऐवजी वास्तव ते शब्दांनी टिपून घेतात आणि लेखनाची संरचना, त्याचा आकृतीबंध, त्यातील रसनिष्पत्ती यांची फिकीर न करता रोखठोकपणे तुमच्यापुढे सादर करतात. वाचकाला आनंद मिळवून देणे हे काही त्यांचे लेखन उद्दिष्ट नसते. वाचक रागावला, संतापला, अस्वस्थ झाला, की दुःखी झाला याचे सोयरसूतक त्यांना नसते. इंग्रजी शब्द वापरायचा तर त्यांचे लेखन ‘रॉ’ असते. संस्कारीत नसते.

अवचट लोकप्रिय आहेत ते या त्यांच्या ‘रॉ’ लेखनासाठी. आशय आणि शैलीची एकात्मता साधणारे लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. जखमेवर मलमपट्टी न करता ती उघडी करून वाचकाला दाखविण्याचे त्यांचे (अ)वैद्यकीय कौशल्य व्यावसायिक नाही. वेदनेतील सुखमयता आणि त्यातील अंतर्विरोध प्रकट करणारी त्यांची शैली ‘अवचट शैली’ म्हणून आता ख्यातकीर्त झाली आहे. मराठीतील ललितेतर गद्य लेखनात मन्वंतर घडवून आणण्याचे श्रेय त्यांना द्यायला प्रत्यवाय नसावा. वाचकांनी आपल्या लेखनापाशी थांबू नये, त्यातून कृतिशील व्हावे, विचार करावा, चिंतनशील व्हावे, संवेदनशील व्हावे असे त्यांना वाटत असावे का? वाचकाला असा कोणताही छुपा किंवा उघड संदेश ते देत नाहीत. निदान लेखनात ते समाजसुधारक नसतात. त्यांची दृष्टी सत्यशोधनाची असली तरी ते अग्रलेख लिहीत नाहीत. कशाचा तरी जोरदार पुरस्कार किंवा निषेध करण्याच्या फंदात पडत नाहीत.

ते उत्तम प्रकाशचित्र काढतात, आणि चांगले चित्रकारही आहेत. त्याच गुणांचा आविष्कार त्यांच्या लेखनातून होतो. शब्द, वाक्य आणि शैली ते कॅमेरासारखी आणि विसंगती, उपरोध, उपहास, व्यंग शस्त्रासारखे वापरतात. त्यातून निर्माण झालेले चित्र वाचकाला दाखवितात. आणि तिथेच थांबतात. ‘मिडियम इज द मेसेज’ या मार्शल मॅकलुहान यांच्या प्रसिद्ध उक्तीसारखे. अवचट आपली भूमिका वाचकांवर थोपवीत नाहीत. त्यांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करीत नाहीत. त्यांच्या प्रतिपादनात आवेश नसतो. अहमहमिका नसते. वाचकाला ते गुदमरून टाकीत नाहीत. भाषेच्या प्रपातात विस्मयचकित करीत नाहीत. उत्तेजित करीत नाहीत की गोठवून टाकीत नाहीत. वाचकांशी त्यांचा संवाद असतो पण त्यातून ते प्रेमाचे पाश निर्माण करीत नाहीत. अंतर ठेवून असतात. त्या अंतराला ‘इस्थेटिक डिस्टन्स’ म्हणा हवे तर.

वाचकाला आपल्या स्वायत्ततेची हमी मिळाल्यामुळे, मूल्यात्मक निर्णय घेण्याचे त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिल्याने अवचटांचे लेखन त्यांना आवडत राहते. म्हणून अवचट लोकप्रिय होतात. कथाकार आणि कादंबरीकारांना हेवा वाटावा एवढी लोकप्रियता त्यांच्या वाट्याला येते. लोकप्रिय होण्याच्या कोणत्याही युक्त्या, प्रयुक्त्या आणि क्लृप्त्या ते जाणीवपूर्वक टाळतात, कारागिरी आणि सजावटीच्या वाटेला जात नाहीत हेच त्यांच्या लोकप्रियतेचे आद्य कारण आहे.

अवचट लोकप्रिय व्हायचे, शैलीखेरीज तेवढेच महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी लेखनासाठी निवडलेले विषय. त्यांचे बहुतेक विषय दुसऱ्या किंवा तिसऱ्या जगाशी संबंधित आहेत. मराठी मध्यमवर्गाशी फटकून असलेले हे जग आहे. या जगातले प्रश्न, ती समाजरचना, त्या माणसांचे जगणे, त्यातले शोषण, अन्याय, अत्याचार, त्याला जबाबदार असलेली प्रस्थापित व्यवस्था, या व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणारे कार्यकर्ते, त्यांच्या संघटना, असा फार व्यापक पट त्यांच्या लेखनात असतो. हे विषय त्यांना नैसर्गिकपणेच भावतात, त्याचा शोध घ्यायला ते प्रवृत्त होतात कारण त्यांच्या मूळ प्रेरणा परिवर्तनवादी कार्यकर्त्याच्या आहेत.

अवचटांची जडणघडण ज्या काळात झाली तो हा सामाजिक, राजकीय बदलांसाठी संघर्ष करणाऱ्या प्रागतिक, समतावादी, विवेकवादी, विज्ञानवादी चळवळींचा कालखंड आहे. मंतरलेला कालखंड आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील विद्रोहाला समाजमान्यता, किमान सहानुभूती असण्याचा काळ आहे. तोच मुख्य विचारप्रवाह आहे. अवचटांची लेखन कारकीर्द याच कालखंडात विकास पावली. त्यांचे नाव झाले. दबदबा निर्माण झाला. अवचट वाचणे हे क्रमप्राप्तच झाले. ललित लेखनाच्या सामाजिक इतिहासातील हा कालखंड अवचटांना अनुकूल होता. त्यांच्या लेखनाला प्रेरणा देणारा, वाचकांचा उत्साही प्रतिसाद मिळणारा. साठोत्तरी महाराष्ट्राचेच ते लेखक आहेत. हा महाराष्ट्र वेगळा आहे. बिहारच्या भीषण दुष्काळात जयप्रकाश नारायण आणि एस.एम.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने पुण्यातील वैद्यकीय पथक मदतीसाठी तिथे गेले. अवचट त्याचा भाग होते. तेथील पूर्णिया जिल्ह्यातील परिस्थितीचे मर्मभेदी चित्रण करणारे ‘पूर्णिया’ हे त्यांचे पहिले पुस्तक. 1969 मधील.

सामाजिक शोधासाठी बाहेर पडलेल्या अवचटांना स्वत:तील लेखकाचाही शोध इथे लागला. लेखनाचा एक नवा ‘र्फॉही’ त्यांना गवसला. ‘रिपोर्ताज’ या नावाने तो नंतर लोकप्रिय झाला. अनेकांनी त्या शैलीचे पुढे अनुकरणही केले. वेध, छेद, माणसं, संभ्र, वाघ्या मुरळी, कोंडमारा, गर्द, धागे आडवे उभे, धार्मिक, कार्यरत ही त्यांची नंतरची सगळी पुस्तके अशी बुरखा फाडणारी, दंभस्फोट करणारी, वस्त्रहरण करणारी आहेत.

वास्तविक हे सगळे लेखसंग्रह आहेत. त्यातील लेख त्या काळातील अनेक प्रतिष्ठित, लोकप्रिय मासिके, साप्ताहिकात प्रकाशित झालेले आणि त्यामुळे बहुचर्चित होते. लेखांना उदंड प्रतिसाद मिळाला, चर्चांना ऊत आला, आणि त्यातील ऊर्जा बळावर पुस्तकांच्या आवृत्त्या संपत राहिल्या. ‘माणसं’ या पुस्तकाच्या तर तेरा-चौदा आवृत्त्या निघाल्या. मौजेचे प्रकाशन असूनही! अवचटांचे अंतर्भेदी लेखन, सुभाष अवचटांची आक्रमक आणि ठसठशीत रेखाटने आणि मुखपृष्ठ, ज्येष्ठ समाजवादी नेते आणि चिंतक नानासाहेब गोरे यांची विचारपरिप्लुत प्रस्तावना, आणि स्वागतशील मराठी वाचक. सगळेच गणित जुळून आलेले.

अवचटांच्या या लेखनामुळे मराठी माणसांपुढे एक नवे जगच अवतीर्ण होत होते. अंधारातले जग. फडके- खांडेकर आणि तत्सम लेखकांनी निर्माण केलेल्या एका आभासी जगाकडे आशाळभूतपणे पाहणाऱ्या मराठी वाचकांना हे वास्तविक जग तीव्र मानसिक धक्का देणारे होते. त्यांना दु:ख माहीत झाले होते ते जास्तीत जास्त बाबा आमटे यांच्या आनंदवनातील कुष्ठरोग्यांचे. तिथे देणगीची मनीऑर्डर करून समाजसेवेचा सोपा मार्ग उपलब्ध होता. उन्हाळी शिबिरात श्रमदान करून भावनिक विरेचन करता येत होते. अवचटांनी दाखविलेल्या या जगाच्या दर्शनासाठी पर्यटनाची सोयच उपलब्ध नव्हती. सोसवतही नाही आणि सांगताही येत नाही अशा दु:खाच्या नव्या जातकुळीला सामोरे जाण्याची अनवट वाट अवचटांनी मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली. त्यांचे आकाश विस्तारून दिले. अनुभव विश्वाचा परीघ वाढवला. साहित्यिक आणि समीक्षक नसूनही मराठी साहित्यातील समाजदर्शनाकडे पाहण्याची एक प्रगल्भ जाणीव निर्माण केली. त्याचे नवे मानदंड निर्माण केले. किमान नव्या शतकाच्या उदयापर्यंतचा कालखंड त्यांच्या या समाजसाक्षेपी लेखनाने अर्थपूर्ण झाला होता.

अवचटांचे लेखन जरी गरीब, दलित, वंचित, परिघावरील माणसांसंबंधी होते तरी त्यांचा वाचक मुख्यत्वे मध्यमवर्गीयच होता. ‘पुलं’चाच वाचक. पण तोपर्यंत तरी, म्हणजे 90चे जागतिकीकरण सुरू होईपर्यंत, परिवर्तनवादी चळवळींचा तोच मुखंड होता. या वर्गाची सामाजिक जाणीव जागी होती. अवचटांच्या लेखनविषयांसंबंधी त्यांना कणव होती. प्रबोधनाच्या चळवळीतून विकसित झालेला उदारमतवादी, समावेशक विचारव्यूह त्यांनी आपला मानला होता. आपण त्याचे पाईक आहोत असे त्यांना वाटत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून हा वारसा अधिक भक्कम झाला होता. आणीबाणीच्या काळातही त्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा मानणारा किंवा एकूणच संवेदनशील, समाजमनस्क असा हा मध्यमवर्ग जागतिकीकरणानंतर मिळालेल्या संधीमुळे नवश्रीमंत झाला, व्यक्तीवादी झाला आणि चंगळवादीही झाला. समाजाचे वैचारिक नेतृत्व करण्याची आकांक्षा हरवून बसला. अवचटांच्या लेखनविषयांशी संवादी राहिला नाही. आर्थिक भरभराटीमुळे त्याची परिभाषा बदलली. ‘त्यागाकडून स्वार्थाकडे’ असा जीवनशैलीतील बदल त्याने आत्मसात केला.

अवचटांचे लेखन छापणारी माध्यमेही काळानुसार बदलली आणि अवचटांच्या लेखनानेही कूस बदलली. मूल्यभान तेच, पण समाजचित्रण आणि व्यक्तिचित्रणातून ते अधिकतर आत्मचित्रणाकडे वळले. बाहेर बघायच्याऐवजी आत बघू लागले. सामाजिक चित्रणाकडून आत्मचिंतनाकडे वळले. अंतर्मुख झाले. अवचटांचा मूळ पिंड कलाकाराचा. चित्र, शिल्प, रेखाटने, संगीत, वाचन, ओरिगामी आणि असे कितीतरी छंद त्यांचे. तसे छांदिष्टच म्हणायचे. किती नाद केले. त्यातून लेखनाचे नवे विषय त्यांना खुणावू लागले. स्वत:विषयी, आप्त, छंदांविषयी, जगण्यातील काही, दिसले ते, माझी चित्तरकथा ही पुस्तकांची शीर्षके अवचटांचे रूपांतर, अवस्थांतर सूचित करतात. नव्या बाजारकेंद्री जगाला प्रतिक्रिया देत बसण्याऐवजी प्रतिसादाची वैयक्तिक परंतु सर्जनशील वाट धरणे अवचटांना अधिक सुखदायी वाटले असणार. कथा- कादंबऱ्यांपेक्षा आत्मकथनात्मक लेखन वाचण्याकडे वाचकांचाही कल वाढत होता. त्यामुळे अवचटांची ही पुस्तकेही वाचकप्रिय झाली. ती अर्थात आत्मपर असली तरी खाजगी नव्हती, वैयक्तिक होती. या दोन्हीतील सीमारेषा फार धुसर असतात आणि त्या सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. माझे आयुष्य वाचून वाचकाला काहीतरी मिळाले पाहिजे या हेतूने त्यांनी हे लेखन केलेले नाही. त्यांच्या अभिव्यक्तीच्या प्रेरणा स्वान्तसुखाय असल्या तरी त्यांचे व्यक्तिगत जीवन तसे कलात्मकच असल्याने त्यांचे खाजगीपण सार्वजनिक होणे हेही सौंदर्यभान जागविणारेच होते.

बाहेरच्या बाजारकेंद्री जगाचा मूल्यव्यूह बदलल्यामुळे निर्माण झालेल्या परात्मभावाने संवेदनशील माणसांचा कल अधिक मूलगामी व चिरंतन गोष्टींचा ध्यास घेत असणार. अशा वेळी निसर्गाचा त्याला मोठा आधार वाटतो. अवचटांना तर मुळात सगळ्याच गोष्टींचे कुतूहल. मुंग्यांपासून हत्तीपर्यंत. नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची त्यांची जिज्ञासा अफाट आहे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ते शेवटपर्यंत तिचा पाठलाग करतात. अवचटांच्या आयुष्यातील एकविसावे शतक हे निसर्गशोधाचे आहे असे म्हटले तर फारशी अतिशयोक्ती होणार नाही. झाडे, प्राणी, पक्षी व कीटकांपासून ते सूक्ष्मजीवांपर्यंत कशाचाच अपवाद त्यांनी केला नाही. निसर्गातील गुंतागुंतीची प्रमेये फार सोप्या भाषेत त्यांनी उलगडून दाखविली. त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील दिग्गज अभ्यासकांना शरण जाण्यात त्यांनी कमीपणा मानला नाही.

विद्यार्थ्याची भूमिका या वयात निभावणे जरा कठीणच. अवचटांनी ते साध्य केले. त्यांनी मोठ्यांसाठी लिहिले तसे लहानांसाठीही. सृष्टीत-गोष्टीत या पुस्तकासाठी तर बालवाङ्‌याच्या क्षेत्रातील साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि कुतूहलापोटी हे पुस्तक गुलबकावलीतील गोष्टींसारखे वाचकप्रिय झाले. अर्थात निसर्गाविषयी लिहितानाही त्यांच्यातील सामाजिक प्राणी सचेतन होताच. त्यांची परिसर स्नेही- इको फ्रेंडली- भूमिका इथेही अधोरेखित झाली. माणसांपासून निसर्गापर्यंत, अवचट कायम कमकुवतांच्या बाजूने, न्यायाच्या बाजूने उभे दिसतात. त्यांचे लेखन आणि त्याचा रूपबंध यात कालौघात बदल झाला असला तरी मूळ वैचारिक बैठक तीच आहे. स्वत:च्या आतल्या आवाजाला साक्षी ठेवून त्यांनी आपल्या निष्ठा जपल्या आहेत. त्यात तडजोड केलेली नाही.

अवचटांच्या लोकप्रियतेची कारणे शोधताना त्यांच्या लेखनवैशिष्ट्याचा एक पैलू वारंवार आणि ठळकपणे सामोरा येतो. तो म्हणजे अवचट प्रामुख्याने कथनकार आहेत. स्टोरी टेलर. त्यांच्या लेखनात कथेच्या सर्व घटकांचा आढळ असतो. घटना, प्रसंग, पात्रे, परिस्थिती, परिसर, स्वभावदर्शन, संघर्ष वगैरे वगैरे. लेखक सूत्रधार असला तरी अवचटांच्या लेखनात पात्रांना खूपच स्वातंत्र्य असते. लगाम लावून, वेसण घालून पात्रांना ते करकचून बांधून ठेवीत नाहीत. त्यामुळे रूपबंध तोच असला तरी प्रत्येक लेख वेगळा असतो. आता कथा किंवा गोष्ट हा आदिम वाङ्‌मयप्रकार आहे. काळाच्या ओघात तावून सुलाखून निघाला आहे. अनेक अंगांनी विकसित झाला आहे. सगळ्यांनाच तो भावतो. कथा आवडत नाही असा माणूस सापडणार नाही. अवचटांना हा र्फॉर्म फार लवकर गवसला, आणि त्याच्यावर त्यांनी प्रभुत्वही मिळविले.

अवचटांना हा रूपबंध कुठे सापडला असावा? त्यांच्या आत्मकथनात्मक लेखनात त्याचे उल्लेख सापडतील. त्यांचे सगळे बालपण आणि शालेय जीवन जिथे व्यतीत झाले त्या ओतूरचा हा प्रभाव. कथा, कीर्तन, प्रवचन, निरूपण, व्रतवैकल्ये ही अवचटांच्या मूलत: धार्मिक-सांस्कृतिक कुटुंबाची देणगी आहे. ही सगळी कथेकरी मंडळी त्यांच्या घरचे आदरातिथ्य स्वीकारीत, तिथेच मुक्काम करीत आणि आपली सेवा रुजू करीत. रामदासबुवा मनसुखांपासून मामासाहेब दांडेकरांपर्यंत अनेकांचा उल्लेख त्यांनी केला आहे. या सर्वांचा सहवास अवचटांना लाभला. त्या वातावरणाने झालेल्या संस्कारांचा ठसा त्यांच्या लेखनात सहजच उमटला असेल. ‘माझी चित्तरकथा’ या चित्रकलेवरील त्यांच्याच एका पुस्तकाच्या शीर्षकाची उसनवारी करून म्हणता येईल की, होय, त्यांच्या लेखनात कथा आहे आणि ती चित्तवेधक आहे. या कथानकाला अर्थगांभीर्य देणारी अनेक विचारसुक्ते त्यांच्या लेखनात आढळतात ही वाचकाला मिळालेली बक्षिसी असते.

अवचटांच्या आत एक तत्त्ववेत्ता लपलाय. व्यक्ती, प्रसंग, घटना... त्यांच्या चिंतनाला कोणतेही निमित्त पुरते. त्यातून निष्पन्न होणारी सुक्ते त्यांच्या लिखाणात इतस्तत: विखुरलेली असतात. उदा. ‘ज्याला भोवतीचा प्रदेश पाहायचाय त्यानं भरधाव वाहनात बसायचं कशाला?’ प्रत्येक वाचक आपापल्या संदर्भात त्याचा अर्थ लावीत बसेल. शहाणीव व्यक्त करणाऱ्या या अर्थगर्भ कुप्या मजकुरात मिरवत मात्र नाहीत, अंग चोरून कोपऱ्यात उभ्या असतात. अवचट आपल्या वाचकांवर आक्रमण करीत नाहीत, त्यांना कह्यात घेत नाहीत, वाचकांशी त्यांचे नाते सौजन्याचे, व सभ्यतेचे आहे असे मी म्हणतो ते प्रत्येकाने स्वत: अनुभवायचे आहे. अवचटांच्या आत जसा एक तत्त्वचिंतक दडला आहे तसे एक लहान मूलही. मुलांना जशी प्रत्येक गोष्टीची उत्सुकता असते, कुतूहल असते तसेच अवचटांचे. त्याचे पर्यवसान मग लेखापासून कलाकृतीच्या निर्मितीपर्यंत कशातही होते. विद्यमान काळात पंचाहत्तर म्हणजे काही फार वय नव्हे. पण या वयातही ही उत्सुकता, नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती जरा दुर्मिळच म्हटली पाहिजे.

अवचट माझे फार जवळचे स्नेही आहेत. गेली चाळीस वर्षे पुण्यात आम्ही एकाच कॉलनीत राहतो. शिवाय आम्ही गाववाले. ओतूरचे. त्यांच्याविषयी व्यक्ती म्हणून मी भरभरून लिहू शकतो. पण तो मोह मी इथे निग्रहाने टाळला आहे. या पुस्तकाचे ते प्रयोजन नाही म्हणून. हे पुस्तक केवळ त्यांच्या लेखनासंबंधी आहे. त्यांची लेखन कारकीर्द पन्नास वर्षांची म्हणजे प्रदीर्घच म्हणायची. आजही ते लिहिते लेखक आहेत. नेहमीप्रमाणे यंदाही पाच-सात दिवाळी अंकांत त्यांची उपस्थिती असणारच आहे. मित्राखेरीज आमचे लेखक-संपादक असेही नाते आहे. ते पूर्णपणे व्यावसायिक आहे. त्यात मैत्रीचा घोळ नाही. मी ‘साप्ताहिक सकाळ’चा संपादक असताना दिवाळी अंकासाठी लागोपाठ पंधरा-वीस वर्षे मला त्यांचे सर्वोत्तम, परंतु अंकाच्या प्रकृतीला साजेसे लेखन मिळत राहिले. दिवाळी अंकांच्या लेखकांच्या नामावलीत अवचट असणे हे त्या काळी तरी फार प्रतिष्ठेचे मानले जात असे. त्यामुळे या माझ्या प्रस्तावना लेखात पुस्तकांच्या पलीकडच्या अवचटांचे दर्शन कटाक्षाने टाळले आहे.

अवचटांचा अमृतमहोत्सव हे या पुस्तकाचे निमित्त आहे. वाढदिवसानिमित्त ‘बाबाला’ काय भेट द्यावी याविषयी झालेल्या कौटुंबिक चर्चेतून अवचटांची मुलगी यशोदा वाकणकरला ही पुस्तकाची कल्पना सुचली. तरुण पिढीला अवचटांच्या पुस्तकांविषयी, लेखनाविषयी काय वाटते, ते लेखन आज किती प्रस्तुत आहे याचा शोध घेण्याकरता हा लेखन प्रपंच. एकाच लेखकाच्या सर्व पुस्तकांचा आस्वादक पद्धतीने पुनर्शोध घेण्याचा असा प्रयत्न कदाचित मराठीतील पहिलाच लेखन प्रकल्प असावा.

प्रस्तुत पुस्तकातील सर्व लेखक मंडळी ‘यशो’चे आणि परस्परांचेही मित्र आहेत. त्यांनी मुक्तपणे लिहिले आहे. ‘अवचट’ या लेखकाच्या मोठेपणाच्या दडपणाखाली नाही. त्यांच्या उत्साहाला आणि ऊर्मीला ‘संपादकीय’ वळण देण्याचे मी जाणीवपूर्वक टाळले आहे. या पुस्तकाचे नवेपण, ताजेपण सुकणार नाही एवढीच मी काळजी घेतली. प्रकाशनानंतरच हे पुस्तक अवचटांच्या हाती जाणार आहे. 75 व्या वाढदिवशी ही अनोखी भेट स्वीकारायला त्यांना नक्कीच आवडेल!

सदा डुम्बरे, पुणे

वेध अवलियाचा संपादक : सदा डुम्बरे पृष्ठे : 294, किंमत : 300 रुपये वितरण : अक्षरधारा बुक गॅलरी, पुणे.

Share on Social Media

मंच-20

अंधश्रद्धेचा वादग्रस्त कार्यक्रम आणि उद्रेक (उत्तरार्ध)

डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस

एकदा मरियेच्या सणाच्या वेळेला धर्मगुरूंनी प्रवचनात रागारागात एक विधान केले होते की, ‘चर्चमधील माउलीची तुम्ही चिंता करू नका; पण तुमच्या घरात ज्या माउल्या आहेत- तुमच्या माता, तुमच्या बहिणी, तुमची पत्नी- त्यांची काळजी तुम्ही घ्या. तेव्हा कुठे या मरियामातेचा खरा सन्मान होईल. फक्त इथे देवळात येऊन तुम्ही फुले वाहता आणि तिथे घरी बायको-मुलींना नोकराप्रमाणे वागवता, हा शुद्ध ढोंगीपणा आहे.’ नेहमी शांत आवाजात बोलणाऱ्या त्या धर्मगुरूंच्या आवाजातील आवेश जाणवून मी फादरांना विचारले की, ‘असे विधान तुम्ही सडेतोडपणे का केलेत? सणाच्या दिवशी तुम्ही शालजोडीतलेही देऊ शकला असता.’ तेव्हा फादरांनी सांगितले होते, ‘अशी छान-छान प्रवचने दिली, असे मंत्रमुग्ध करणारे बोलले; तर ती प्रवचने लोकांना आवडतात. उलट वादग्रस्त विधान केल्याने मात्र घरी गेल्यावर, गावागावात त्यावर चर्चा होतात आणि आपला खरा उद्देश सफल होतो.’ त्यांचे ते उत्तर मला पटले होते.

तो कार्यक्रम झाल्यानंतर पुढच्याच रविवारी इस्लामपूरहून अंनिसचे काही कार्यकर्ते ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम’ या पथनाट्याचा प्रयोग निर्मळ येथे सादर करणार होते. हा कार्यक्रम बाहेर भर नाक्यावर घेण्याचे अगोदरच ठरले होते. त्याप्रमाणे रविवारी या पथनाट्याचे सादरीकरण निर्मळ येथील नाक्यालगतच असलेल्या मंडळाच्या एक जुन्या सदस्याच्या विस्तीर्ण अंगणात झाले. अंनिसच्या युवा कलाकारांनी खूपच जोशपूर्ण आवेशात सॉक्रेटिस, तुकाराम, दाभोलकर, पानसरे यांच्या अविवेकी हत्यांबद्दल या पथनाट्याद्वारे भाष्य केले. या पथनाट्यास बरीच गर्दी जमलेली होती.

गंमत म्हणजे, फादर जोशवांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणणारी ती व्यक्तीही मंचाच्या या कार्यक्रमास हजर होती. फादरांचे म्हणणे त्याला प्रथम पचवणे जड गेले असेल, पण कदाचित नंतर त्याला ते पटले असावे का? त्या व्यक्तीची उपस्थिती मनाला सुखावून गेली. त्यानंतर 10 दिवसांतच मंडळाच्या कार्यकारिणीची सभा होती. हा विषय कार्यकारिणीत नक्कीच चर्चिला जाणार, हे माहीत होते.

मी सभेस आलो. सुनीला, कॅथरिन, ॲड.व्हिन्सेंट, पीटर... जे-जे मंचाचे सदस्य कार्यकारिणीमध्ये होते ते ही या सभेस हजर राहिले होते. डिसोझासरही विश्वस्त समितीचे सदस्य म्हणून उपस्थित होते. सभेस इतर कार्यकारिणीतील व विश्वस्त मंडळातील जवळपास सर्व जण हजर होते. सभेची सुरुवात शांततेत झाली. अर्थात, ती शांतता वादळापूर्वीची होती. मंडळाचे एक विश्वस्त मॅथ्यू क्रॅस्टो हे पुढे बसलेले होते. सुरुवातीपासून विवेकमंचाला त्यांचा विरोध होता. त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. ‘‘फादर जोशवांचा जो कार्यक्रम झाला, तो सपशेल फेल गेला. एक तर त्यामध्ये प्रोटोकॉल पाळला गेला नाही. आपल्या मंडळाचे काही रीती-रीवाज आहेत. अध्यक्ष आणि प्रमुख विश्वस्त हे स्टेजवर बसले पाहिजेत. सरचिटणीसांना आपण किती मान द्यायचो, या कार्यक्रमात त्यांना कवडीचीही किंमत देण्यात आली नाही. हे जर असेच सुरू राहिले तर आपल्याला हे मंडळ बंद करण्याची वेळ येईल, हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजे, फादर जोशवांचे भाषण. काय भाषण केले त्यांनी ते! किती धर्मविरोधी बोलले. काय गरज होती त्यांना तसे बोलण्याची? हे जे काही विवेकमंचात चाललेले आहे ते मला बिलकुल पसंत नाही. समाजामध्ये आपल्या मंडळाविषयी चर्चा होत आहेत. आपल्या मंडळाबद्दल अशी कुजबुज कधीच झाली नाही. आपले मंडळ नेहमी लोकांसाठी अभिमानाचा विषय असायचे; आज या विवेकमंचामुळे मंडळाला समाजामध्ये मान खाली घालायला लागली आहे. आजकालचे धर्मगुरू हे मंडळाबद्दल चांगले बोलत नाहीत. जर मंडळातील एखाद्या कार्यक्रमाची चर्चमध्ये सूचना वाचण्यास पाठवली, तर ती धड वाचली जात नाहीत...’’

क्रॅस्टो यांचा खर्जातला आवाज जोरजोरात कानांवर आदळत होता. ‘‘याचा काही तरी निर्णय घ्यावा लागेल. माझे म्हणणे आहे की, विवेकमंच सहा महिने त्वरित बंद करून टाका. मी तर म्हणेन की, कायमचाच बंद करून टाका. आपली पतपेढी आहे, ह्यामुळे पतपेढीवर परीणाम होऊ शकतो. आपले जे गुंतवणूकदार आहेत, ते आपल्या समाजातीलच आहेत आणि त्यांना हे असे धर्मविरोधी कृत्य आपल्या मंडळात चालते हे पटण्यासारखे नाही. ते कसे आपल्या मंडळात गुंतवणूक करतील? मला वाटते की, आपण या सर्वाचा सारासार विचार करून विवेकमंचावर तत्काळ बंदी घालावी.’’

त्या वेळी अध्यक्ष संजय रॉड्रिग्ज यांनी मॅथ्यू क्रॅस्टो यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत म्हटले, ‘‘सर्वांत आधी म्हणजे- कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला गेला नाही, हे तुमचे म्हणणे मला पटते. दुसरी बाजू तुम्ही मांडलीत, विवेकमंचाची. आपण हे लक्षात घेतले पाहिजे, त्या कार्यक्रमात जे वक्तव्य केले गेले ते त्या वक्त्याचे होते, ते विवेकमंचातील कोणी केले नव्हते. त्यात त्यांचा काही दोष नाहीये. आणखी एक मुद्दा तुम्ही जो मांडलात, तो म्हणजे चर्चमध्ये आपल्या कार्यक्रमाच्या सूचना वाचल्या जात नाहीत त्याबद्दल. आत्तापर्यंत चर्चमध्ये नोटिशी वाचल्या जात नव्हत्या का? पण त्याने आपल्या मंडळाला काही फायदा झाला का? गर्दी वाढली का? तर, नाही. जे दर्दी लोक यायचे तेच कार्यक्रमासाठी येतात. आणखी एक गोष्ट म्हणजे- आपल्या पतपेढीत जे लोक गुंतवणूक करतात, ती आपल्या पतपेढीचे कार्य बघून. मंडळात धर्मविरोधी कोण बोलते, धर्माच्या बाजूने कोण बोलते हे बघून ते त्यांचे पैसे आपल्याकडे ठेवत नाहीत; तर आपली पतपेढी त्यांना चांगला परतावा देते म्हणून ते पैसे ठेवतात. त्यामुळे याचा पतपेढीवर काहीही फरक पडेल, असे मला वाटत नाही.’’

अध्यक्ष संजय रॉड्रिग्ज ह्यांचे विशेष कौतुक वाटले. अगोदर काहीसे विवेकमंचाच्या विरोधात असलेले अध्यक्ष संजय ह्यांना हळूहळू विवेकमंचचे वेगळेपण लक्षात येऊ लागले होते. मंचाच्या विविध चर्चांतही ते सहभागी झालेले होते. अध्यक्षांनी विवेकमंचाची बाजू खंबीरपणे मांडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कार्यक्रमामध्ये विवेकमंचाच्या विरोधी बोलणारे खूप लोक होते. त्यानंतर बोलण्यास उभे राहिले ते दालमेत मास्तर. ‘‘विवेकमंचाला माझा विरोध नाही, पण हे जे काही चालले आहे ते बरोबर नाही. हे 10-15 लोक कुठे तरी कोपऱ्यात बसतात आणि आपापसात चर्चा करतात. त्यातून काय निष्पन्न होणार आहे? तोंडाची वाफ वायफळ बडबड करून दवडू नका. बाहेर जाऊन काही तरी कार्य करा.’’

‘‘हे जे काही चालले आहे, ते खूप चुकीचे आहे. मला खूप दिवसांपासून बोलायचे होते, परंतु मी फक्त संधीची वाट पाहत होतो.’’ मंडळाचे आणखी एक चाळिशीतले कार्यकर्ते फ्रँक कुटिन्हो बोलण्यास उभे राहिले होते, ‘‘त्या दिवशीचा कार्यक्रम म्हणजे एकदम कडेलोट झाला. हे खरोखरच धर्माच्या विरोधात बोलत असतात. ह्यांना बाकीच्या धर्मांत काही त्रुटी दिसत नाहीत का? हिंदू धर्मात काय अंधश्रद्धा कमी आहेत का? ते जे ‘अंनिस’चे सचिन थिटे आले होते, ते हिंदू धर्मातील अंधश्रद्धांबद्दल बोलू शकले असते, पण नाही बोलले. त्यांना आपल्या ख्रिश्चन धर्मात नाक खुपसण्याचा काय अधिकार? हे आम्ही सहन करणार नाही. हे खूपच अति आणि खूपच चुकीचे चालले आहे. हे कोण जोशवा फादर? ह्यांना शोभे का हे? आपल्या पैशाने हे फादर झाले आहेत. मरियामातेविषयी काय बरळले ते? स्वर्ग-नरक वगैरे सगळे थोतांड आहे? असे हे कसे म्हणू शकतात? फादर दिब्रिटो नाहीत का विद्वान? ते कधी असे बोललेले नाहीत. असे चर्चच्या विरोधी बोलणे या धर्मगुरूंना शोभते का? ही खूपच हलकटगिरी चाललेली आहे आणि हे सर्व बंद झाले पाहिजे.’’

फ्रँक खूपच तावातावात बोलत होते. आमची सभा मंडळातील लायब्ररीच्या बाजूला जे कार्यालय आहे तिथे चालली होती. रविवार सकाळची वेळ असल्याने विवेकमंचात सहभागी होण्यासाठी नेहमीचे इतर सदस्य लायब्ररीत आले होते. जे कार्यकारिणीत नव्हते, ते नेहमीप्रमाणे मंचातील चर्चेसाठी जमले होते. त्या चर्चेसाठी ॲड.अनुप हेही आले होते. त्यांना हा जोरजोरात चाललेला आवाज ऐकू जात होता. त्यांना राहवले नाही. ते सभेत आले. दाराशीच उभे राहून त्यांनी शेवटच्या रांगेत बसलेल्या फ्रँक कुटिन्हो ह्यांना मागून हात लावून म्हटले, ‘‘तुम्ही फादर दिब्रिटोंचा उल्लेख केलात, पण फादर दिब्रिटोंनी ‘जे सुबोध बायबल’ लिहिलेले आहे, ते तुम्ही कधी वाचले आहे का?’’

‘‘त्याचा आणि माझ्या बोलण्याचा काय संबंध?’’ ॲड.अनुप यांच्याकडे मागे वळून पाहत फ्रँक म्हणाले.

‘‘संबंध आहे.’’

‘‘ही आमची कार्यकारिणीची सभा आहे, मंचाची नाही.’’

‘‘एक मिनिट- तुम्ही जे बोलताय, त्याच्याशीच हे संबंधित आहे.’’ ॲड.अनुपचाही पारा चढलेला दिसत होता, ‘‘फादर दिब्रिटोंनी त्यांच्या ललित भाषांतर केलेल्या बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे की- स्वर्ग, नरक तसेच बायबलमधील सर्व चमत्कार हे प्रतीकात्मक आहेत. आता हे तुम्ही जर वाचलेलं असतं, तर फादर जोशवांचे म्हणणे तुम्हाला पचवण्यास इतके कठीण पडले नसते.’’ असे बोलत ॲड.अनुप लायब्ररीत जाण्यासाठी माघारी फिरले.

‘‘कोणी काय लिहिलंय ते आम्हाला सवड मिळाल्यावर आम्ही वाचू. आम्हाला सल्ले देऊ नका.’’ फ्रँक ह्यांना असे मधेच कोणी येऊन ऐकवणे आवडले नव्हते. त्यांचा आवाज खूपच वाढला होता, इतरत्र गोंधळ चालला होता.

अर्थात मी विवेकमंचाचा विभागप्रमुख होतो. त्या नात्याने मंचाची बाजू मांडणे मला भाग होते, किंबहुना, ती माझी नैतिक जबाबदारी होती. ‘‘मला बोलायचे आहे. विवेकमंचाचा विभागप्रमुख म्हणून माझे बोलणे ऐकून घ्याल का?’’ मी हात वर केला. अध्यक्षांनी परवानगी दिल्यावर मी माझे बोलणे सुरू केले. ‘‘आजच्या कार्यकारिणी सभेमध्ये विवेकमंचावर बरेच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मी माझ्या परीने प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिला आरोप झाला तो म्हणजे- प्रोटोकॉल पाळला गेला नाही. मला इथे सांगावेसे वाटते की, सरचिटणीसांनी स्वतः सांगितले होते की, आपण काहीच प्रोटोकॉल पाळायचा नाहीये. भरगच्च कार्यक्रम असल्याने, चार वक्ते असल्याकारणाने आपण तत्काळ वक्त्यांच्या भाषणाला सुरुवात करून वेळ वाचवू या. पण मीच त्यांना सांगितले की नाही, काही अंशी तरी प्रोटोकॉल पाळला गेलाच पाहिजे. म्हणून मी प्रास्ताविकासाठी अध्यक्षांना विनंती केली आणि सरचिटणीसांना आभार मानायला सांगितले. आता स्टेजवर ते का बसले नव्हते? तर, अध्यक्षच स्टेजवर बसणार होते, ते अगोदरच ठरलेले होते. वक्ते पकडून आपल्याला सहा खुर्च्या लागणार होत्या, आम्ही तशी व्यवस्थाही केली होती. आपले स्टेज लहान आहे. ऐनवेळेवर अध्यक्षांनीच प्रमुख विश्वस्तांना स्टेजवर बसण्यास सांगितले. ‘माझे नाही तरी भाषण आहेच, तर मी स्टेजसमोरील खुर्चीवर खाली बसेन,’ असे त्यांनी सांगितल्याने आपण तसा निर्णय घेतला. तरीही कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.’’

‘‘दुसरा आरोप म्हणजे- दालमेत मास्तरांनी सांगितले की, कोपऱ्यात बसतात आणि चर्चा करत असतात. मान्य आहे की, इथे 15-16 जणच येतात; पण इथे गर्दी नाही, तर दर्दी लोक येतात. ह्यामधील काही कवी आहेत, तर काही लेखक; काही राजकारणामध्ये आहेत, काही संशोधक. विद्यार्थ्यांपासून ते रिटायर झालेले, तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत, पुरुषांपासून ते स्त्रियांपर्यंत, मुले, सर्व वयोगटांतील अशा लोकांचे प्रतिनिधित्व या 15-16 जणांमध्ये इथे आहे, हे तुम्ही पाहिले आहे का? आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगिवीशी वाटते की, ज्या माणसाने फादर जोशवा यांच्या कार्यक्रमात प्रथम व्यत्यय आणला होता तो, आपण जो लागलीच नंतरच्या रविवारी पथनाट्याचा कार्यक्रम केला होता, त्यासाठी आला होता. कदाचित त्याला फादर जोशवांचे बोलणे पहिल्यांदाच ऐकले तेव्हा ते पटले नसेल, पण नंतर मात्र त्याच्या ते पचनी पडले की नाही ते माहिती नाही; पण तो आपल्या दुसऱ्या कार्यक्रमाला आला, त्याला येथे काही तरी वेगळेपण जाणवले. विवेकमंचाचे हे खरे यश आहे.’’

‘‘आता फादर जोशवांना काही आपण पहिल्यांदाच बोलावले नव्हते, ह्याआधीही ते मंडळात आले होते आणि तेव्हा त्यांच्या कार्यक्रमाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला होता. त्या वेळेला काही त्यांनी असे वादग्रस्त विधान केले नव्हते. खूपच सुंदर कार्यक्रम झाला होता. त्यांचे वक्तव्य आपल्याला जरी वादग्रस्त वाटले, तरी त्यांच्यासारख्या धर्मपंडितांच्या सर्कलमध्ये अशा चर्चा होत असतात, फक्त आपणा सामान्य लोकांसमोर त्यांनी प्रथम असे शेअर केले, म्हणून आपल्याला धक्का बसला. ते फादर आहेत, त्यांचे ज्ञान खूप मोठे आहे.’’

मला जे काही सांगायचे होते, ते सर्व मुद्दे मी मांडले. त्यानंतर विवेकमंचाच्या सुनीलाने तर रोखठोक आपले मत मांडताना म्हटले, ‘‘आज सभेत जी आपण चर्चा करत आहोत- सगळ्यांचा आक्षेप असा आहे की फादर जोशवांनी ते वक्तव्य करायला नको होते. पण मला वाटते, त्यात काय चुकीचे आहे? आपण असे मानतो की, मरिया पवित्र आत्म्यांनी गर्भवती राहीली. आज जर कुठली 15- 16 वर्षांची कुमारिका तुमच्याकडे आली आणि तुम्हाला सांगू लागली की, मी पवित्र आत्म्यांनी गर्भवती राहिले आहे, तर तुम्ही ते मानाल का? तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? नाही ना? म्हणजे हा तुमचा दांभिकपणा नाही का? त्यामुळे मला असे वाटते की, फादरांनी जे सांगितले आहे ते अगदी योग्य सांगितले आहे. आपण उगाच त्यावर नाराजी व्यक्त करत आहोत.’’

‘‘अहो मॅडम, तुमचा विवेक आणि शहाणपणा दोन्ही कळला. आता जरा चूप राहा.’’ असे म्हणून तिलाही विरोध केला गेला. खरे तर ‘मातृत्व’ या विषयावर स्वतः दोन मुलांची आई असलेल्या सुनीलाने बोलणे अधिक प्रभावी होते, पण पुरुषांची गर्दी असलेल्या सभेत सगळ्या गोष्टींचा कडेलोट झालेला होता.

मग ॲड.व्हिन्सेंट फर्नांडिस बोलू लागले, ‘‘मी या विवेकमंचाच्या सभेस येत आहे. धर्माविषयीच नाही, तर वेगवेगळ्या विषयांवर हे सर्व जण चर्चा करत असतात आणि जेव्हा धर्माविषयी चर्चा होते, तेव्हा ती दोन्ही बाजूने करावी लागते. धर्माविषयी काही चांगले मुद्दे चर्चिले जातात, तर काही वाईट मुद्देही. अशा वेळी सर्व मुद्दे मला पटतातच असे नाही, पण म्हणून मी काही या सभेस येणे थांबवलेले नाही. मला ही चर्चा ऐकणे आवडते. त्यामुळे विवेकमंच बंद करणे हा काही तोडगा असू शकत नाही, कारण वैचारिक स्वातंत्र्य हा माणसाचा मूलभूत हक्क आहे, असे आपले भारतीय संविधान सांगते. मला त्यात काही वावगं वाटत नाही आणि त्यामुळे मंच बंद करण्याचे मी समर्थन करत नाही.’’ पांढऱ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स परिधान केलेल्या ॲड.व्हिन्सेंट यांनी मंचाची बाजू आपल्या वजनदार आवाजात पेलून धरली होती.

दहा वर्षांपूर्वी आमच्या चर्चमध्ये जॉनी गोन्साल्विस हे एक धर्मगुरू होते. एकदा मरियेच्या सणाच्या वेळेला त्यांनी प्रवचनात रागारागात एक विधान केले होते की, ‘चर्चमधील माउलीची तुम्ही चिंता करू नका; पण तुमच्या घरात ज्या माऊल्या आहेत- तुमच्या माता, तुमच्या बहिणी, तुमची पत्नी- त्यांची काळजी तुम्ही घ्या. तेव्हा कुठे या मरियामातेचा खरा सन्मान होईल. फक्त इथे देवळात येऊन तुम्ही फुले वाहता आणि तिथे घरी बायको-मुलींना नोकराप्रमाणे वागवता, हा शुद्ध ढोंगीपणा आहे.’’ नेहमी शांत आवाजात बोलणाऱ्या त्या धर्मगुरूंच्या आवाजातील आवेश जाणवून मी फादरांना विचारले की, ‘असे विधान तुम्ही सडेतोडपणे का केलेत? सणाच्या दिवशी तुम्ही शालजोडीतलेही देऊ शकला असता.’ तेव्हा फादरांनी सांगितले होते, ‘अशी छान-छान प्रवचने दिली, असे मंत्रमुग्ध करणारे बोलले; तर ती प्रवचने लोकांना आवडतात पण त्याचा काही फायदा होत नसतो. उलट वादग्रस्त विधान केल्याने मात्र घरी गेल्यावर, गावागावात त्यावर चर्चा होतात आणि आपला खरा उद्देश सफल होतो.’ त्यांचे ते उत्तर मला पटले होते.

इथेही फादर जोशवांनी मरियेच्या गर्भसंभवाविषयी जे वक्तव्य केले होते, ते कितीही वादग्रस्त वाटले, तरी त्यांनी उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले होते. मातृत्व आणि कुमारीपण या दोन्ही फक्त ‘शारीरिक स्थिती’शी संलग्न असलेल्या बाबीच मरियेला देवत्वपण बहाल करतात का? बाळ येशूला मुक्तपणे बहरू देणारं असं संगोपन करणारं तिचं वात्सल्य, त्याच्या प्रत्येक बंडखोर कृत्याला पाठिंबा देऊन त्याच्यावर अमर्याद विश्वास दाखवणारा तिच्यातील आत्मविश्वास, सारा समाज मुलाविरुद्ध जाऊनही क्रूस वाहताना त्याला कालवारी टेकडीपर्यंत साथ देणारा तिच्यातील कणखरपणा आणि शेवटी आपल्या मुलाचं मृत शरीर सन्मानाने पांढऱ्या फडक्यात गुंडाळून धीरोदात्तपणाचं तिने घडवलेलं दर्शन... या ‘आत्मिक’ बाबी मरीयेला देवत्व बहाल करण्यास पुरेशा नसाव्यात का? धर्मसत्तेचं वागणं खुद्द येशूच्या विचारसरणीशी किती विरोधाभासाचं आहे!... मनात विविध प्रश्न उभे राहिले.

तसं पाहिलं तर एका महत्त्वाच्या विषयावर येथील लोकांत चर्चा सुरू करण्यात हा अंधश्रद्धाविषयीचा कार्यक्रम यशस्वीच ठरला, असे म्हणावे लागेल. सभा बरीच लांबली होती. एक तासात जी सभा संपायची होती ती दोन तास चालली होती आणि विषय फक्त विवेकमंच अन्‌ विवेकमंच. मात्र एका अर्थाने बरे झाले. बऱ्याच लोकांच्या मनात विवेकमंचाच्या विरोधात एक भावना खदखदत होती आणि त्यांना ती कुठे तरी ओकायची होती. आज फादर जोशवांच्या निमित्ताने जे काही आत होते, ते सगळे बाहेर आले होते. मंडळाची ही सभा खूपच वादग्रस्त ठरली. मंचाची बाजू मंचातील आमच्यासारख्या नव्या सदस्यांनीच समर्थपणे पेलून धरली होती. एरवी मंचात कधी वादविवाद सुरू झाला की, सर परिस्थितीचा ताबा घ्यायचे व चर्चा नियंत्रित करायचे. आज कार्यकारिणीच्या सभेत मात्र ते शांत बसून होते. त्यांनी एक चकारही शब्द काढला नाही. किंबहुना- मी, सुनीला, ॲड.व्हिन्सेंटच आज सरांची भूमिका निभावत होतो. कदाचित आम्ही आता त्यांच्या भूमिकेत यावं, हेच सरांना अपेक्षित असावं. विवेकाच्या वतीने बोलणारे लोक वाढले पाहिजेत. हा कदाचित त्यांचा हेतू असावा.

मॅथ्यू क्रॅस्टोसारख्या मंडळाच्या स्थापनेमध्ये मोलाची कामगिरी बजावलेल्या ज्येष्ठ विश्वस्ताने मंचावर आसूड ओढले होते. त्यामुळे मंचाच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. ‘‘जर मंडळाने आपल्याला येथे बसण्यास परवानगी दिली नाही, तर मग आपण माझ्या घरी रविवारी भेटू.’’ सर शक्यता बोलून दाखवत होते. ‘पुढे काय?’चे प्रश्नचिन्ह घेऊन आम्ही सभा संपल्यावर मंडळाबाहेर उभे होतो. ‘‘माझंही घर आपल्या मंचासाठी खुलं आहे.’’ कॅथरिनही पुढे आली. ‘‘वेगळी चूल मांडावी लागली तरी हरकत नाही, पण आपण आता आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं. माझ्याही घरी सर्वांचं स्वागत आहे.’’ सुनीला म्हणाली.

त्या दिवशी संध्याकाळी बायकोला मी हे कार्यकारिणीच्या सभेविषयी सांगत होतो, ‘‘त्यामुळे मंच आता मंडळात राहू देतात की नाही, ही शंकाच आहे.’’

‘‘चर्चा करण्यासाठी मंडळचं हवं, असं थोडीच आहे? आपलंही घर आहे म्हटलं!’’ ती चटकन म्हणाली, ‘‘नाही तरी मला घरकामामुळे मंडळात येणं शक्य होत नाही, तेव्हा तुम्हा सर्वांच्या चर्चा इथे ऐकायला मला आवडेल.’’

मंचात जरी ती प्रत्यक्ष हजर राहत नसली, तरी तिथे चालणाऱ्या चर्चेविषयी मी तिला वारंवार माहिती देत असायचो. दोन-तीनदा तीही या सभेस हजर होती. त्यामुळे तीही मंचाच्या विचारांशी एव्हाना एकरूप झाली होती. पण तिचे मंचाला जागा देण्याचे चटकन म्हणणे मला सुखावून गेले. जे होईल ते होईल, असा विचार करत आम्ही पुढच्या कार्यकारिणी सभेची वाट पाहत राहिलो.

दोन आठवड्यांनंतर लगेचच कार्यकारिणीची अजून एक सभा जाहीर झाली. सभेची सुरुवात परत मॅथ्यू क्रॅस्टो यांनी केली. ‘‘मागच्या मीटिंगमध्ये मी सांगितल्याप्रमाणे फादर जोशवांना पाठवण्यासाठी मंडळातर्फे निषेधपत्र तयार केले आहे का? त्यांना ते पत्र लवकरात लवकर पाठवावे. ते विधान त्यांनी करायला नको होते, हे त्यांना मंडळाच्या अधिकृत लेटरहेडवरून कळवा आणि विवेकमंचाच्या सभा इथे मंडळात होऊ देऊ नका.’’

‘‘आपण तसे करणे उचित ठरत नाही, कारण त्यांना आमंत्रण आपण दिले होते आणि काय वक्तव्य करायचे, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे हे काही मला पटत नाही. तसेच मत मांडणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे आपला मंचही बंद करावं, ह्याशी मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी सहमत नाही.’’ संजय रॉड्रिग्ज यांनी विश्वस्त मंडळाकडून आपल्याला ह्याची काय किंमत चुकवावी लागेल याचा विचार न करता आश्चर्यकारकरीत्या मंचाची बाजू समर्थपणे घेत म्हटले.

अध्यक्ष आपल्या बाजूला नाहीये आणि कार्यकारिणीतील मंचाचेच काही कार्यकर्ते पाहता, ‘मंच बंद करा’ या त्यांच्या मागणीला बहुसंख्येने पाठिंबा मिळणार नाही, हे कळताच ‘‘हे इथे काय चालले आहे? विवेकमंचाच्या सभा इथे होऊ देऊ नका. खूपच गढूळ वातावरण आहे. वातावरण थोडे निवळू दे. आजूबाजूला खूपच कुजबुज चालू आहे, मंचाच्याविरोधात वातावरण आहे आणि ह्या वेळेस बिशप हाऊसपर्यंत तक्रार गेली आहे. त्यामुळे सहा महिने तरी हा वाद निवळेपर्यंत सभा घेऊ नका. आणखीन एक...’’ अशी काहीशी नरमाईची भूमिका घेत ते म्हणाले, ‘‘मला असे कळले आहे की मंडळाला उद्देशून लिहिलेले एक पत्र आले आहे. कोणी तरी बिशप हाऊसकडे या कार्यक्रमाविरोधात तक्रार केली होती. या संदर्भात ते पत्र आहे. कोणी मला ते पत्र वाचून दाखवेल का?’’ ते पत्र होते विवेकमंचाचे सदस्य मिंगेल डिमेलो यांनी लिहिलेले.

एखाद्या शाळेतील मुलाने, ‘टीचर, तो बघा- तो तिथे मस्ती करतोय, त्याला शिक्षा करा-’ अशी कोणाविरोधात लिखित तक्रार करावी तशाच धर्तीवरचे पत्र मिंगेल यांनी बिशपांना मंचाविरोधात लिहिले होते. सुरुवातीला जरी मंचामध्ये त्यांची फजिती झालेली असली, तरी ते मंचाच्या सभेस वारंवार येत होते आणि हळूहळू तेही मोकळेपणाने व्यक्त होऊ लागले होते. पण त्यांची कृती काही वेगळेच सांगत होती. पत्र वाचल्यानंतर एक ज्येष्ठ सदस्य सॅबी आल्मेडा- जे मागच्या मीटिंगला हजर नव्हते- त्यांनी विवेकमंच हा कसा धर्मविरोधी आहे, समाजविरोधी आहे, कसा मंडळाचे नाव कमी करणारा व नाक कापणारा आहे- असे परत तेच रामायण सुरू केले. क्रॅस्टो मग काही आठवल्यासारखे परत जोरात म्हणू लागले, ‘‘कार्यकारिणीची जी आपण सभा घेतो, ती कार्यकारिणी सदस्यांची असते. अशा वेळेला विवेकमंचाचेच एक ज्येष्ठ सदस्य सभेचे कामकाज चोरून ऐकतात आणि सभेमध्ये येऊन कार्यकारिणी सदस्यांपैकी एकाचा शर्ट मागून पकडून त्यांना सुनावून सभेत व्यत्यय आणतात, हे कोणते विवेकपणाचे लक्षण आहे? तेव्हा तुमचा विवेकवाद कोठे असतो?’’

अर्थात ते वक्तव्य अनुप डिसोझा यांनी जे मागे फ्रँक कुटिन्हो यांना मागे हात लावून त्यांना फादर दिब्रिटोंसंबंधी पुस्तक वाचण्याविषयी सांगितले होते, त्यासंबंधी होते. प्रोटोकॉल भंग केल्याचे निमित्त झाले आणि मग परत एकदा खूप जोरजोरात आवाज करून एकाच मुद्याभोवती ती चर्चा परत सुरू झाली. तोच एक तरुण सदस्य एडिसन ह्याने ‘‘जर आपल्याला असे वाटत असेल की- बाहेरच्या लोकांनी सभेत व्यत्यय आणू नये, तर आपण सभा दुसरीकडे हलवावी. आपण सभा वरच्या मजल्यावर पतपेढीच्या मीटिंगरूममध्येही घेऊ शकतो. आणि दरवाजा बंद करावा म्हणजे तो प्रश्न सुटेल.’’ असे सुचविले. काही असे प्रॅक्टिकल बोलणारे होते, तर काही उगीचच लांबवून धरणारेही होते. विषय विवेकमंचाशी निगडित असल्याकारणाने काहींना तो मुद्दा लांबवून धरायचा होता.

सॅबी रॉड्रिग्ज पुन्हा सुरू झाले, ‘‘हे नेहमी चर्च विरुद्ध बोलत असतात आणि यांच्याबद्दल मी खूप काही ऐकले आहे. माझ्या कानांवर काहीबाही पडत असते की- विवेकमंचात हे चालते, ते चालते आणि त्यातील काहीही चांगलं कानांवर येत नाहीये. मी असं ऐकलेलं की, कोणी तरी येथून पोपला टीका करणारं पत्र लिहिलं म्हणून. काय चाललंय काय येथे? आपल्या मंडळाची सगळीकडे बदनामी होत आहे.’’ परत एकदा विवेकमंचाची बाजू मांडणे गरजेचे होते. मी त्यांना उत्तर देत म्हटले, ‘‘परत परत सांगावं लागतंय. पण येथे चर्चविरोधात काहीही बोलले जात नाही. तुम्ही बोलताय की अमुकांकडून ऐकलं; तमुकांकडून ऐकलं. पण तुम्ही स्वतः कधी मंचामध्ये आलेले आहात का? कधी येऊन चर्चा ऐकली आहे का? आपण जे प्रोटोकॉल-प्रोटोकॉल बोलत आहोत की- हा प्रोटोकॉल पाळला गेला नाही, तो प्रोटोकॉल पाळला गेला नाही; माझी अध्यक्षसाहेबांना अशी विनंती आहे की, विवेकमंचामध्ये तीन सभांना हजेरी लावल्याशिवाय कोणीही विवेकमंचाबद्दल ऐकीव माहितीवर बोलू नये, असा प्रोटोकॉल कंपलसरी करावा.

आता सॅबी म्हणाले की, कोणी तरी टीका करणारे पत्र पोपला लिहिले आहे म्हणून. तुम्ही टीका करणारे पत्र असं म्हटलं, पण त्यात काय लिहिले होते हे तुम्ही वाचलेत का? ते मंचाच्या अनुप डिसोझा यांनी लिहिलेले अनावृत पत्र होते. कशासाठी? तर, धर्मभगिनींना चर्चमध्ये पुरुष धर्मगुरूंच्या बरोबरीने वागणूक मिळावी, यासाठी. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, पण दोन महिन्यांपूर्वीच पोप फ्रान्सिस यांनी चर्चमध्ये धर्मभगिनींनाही पुरुष धर्मगुरूंबरोबर धार्मिक विधी करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. ते चर्चमध्ये महिलांना फादरांच्या बरोबरीने सामावू इच्छित आहेत आणि हा बदल कुठे तरी अनुप डिसोझा यांच्या या अनावृत का असेना, छोट्याशा प्रयत्नांनी झालेला आहे, हे काही कमी नाही. त्यांनी एक टीकेचे पत्र लिहिले हे तुम्हाला कळाले, पण पोपनी हा जो निर्णय घेतला, त्यावर त्यांचे अभिनंदन करणारेही पत्र त्यांनी लिहिले होते, हे तुम्हाला माहीत आहे का? नाही. कृपया अपूर्ण माहितीवर अशी टीका करत जाऊ नका. मंचाच्या सभा येऊन अटेंड करा आणि मगच आपले मत मांडा.’’ मला विवेकमंचाची बाजू एक विभागप्रमुख म्हणून पुन्हा मांडावी लागली.

विवेकमंचासंबंधी मंडळात जणू दोन गट पडले होते. काही जणांनी तर हा वाद इतका वैयक्तिक घेतला की, हितसंबंध विनाकारण दुखावले गेले. कित्येक दिवस मंडळात हा तणाव राहिला. विवेकमंचामध्ये आहे म्हणून ‘विवेकाचे’ मोठे भिंग लावून मंचाच्या प्रत्येक हालचालीवर आता सगळे बारीक नजर ठेवू लागले आहेत. जरासं कुठे खट्टू झालं की, विवेकमंचाविरोधात शंख फुंकणे आणि जर मंडळात मंचाने काही चांगला सहभाग दाखवलाच, तर त्याला अनुल्लेखाने मारणे- असे प्रकार होत होते. खूपच कठीण असे ते दिवस होते. काही सदस्यांचा मात्र विरोध हळूहळू कमी होत होता. त्यांना जे काही विवेकमंचात चालले आहे, ते कळू लागले होते. परंतु अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा होता.

येशू ख्रिस्ताचे एक वक्तव्य आहे, ‘मी इथे शांती आणणार नाही, तर खड्‌ग आणणार आहे. पुरुषाला त्याच्या बापाविरुद्ध, मुलीला आईविरुद्ध...’ (मॅथ्यू 10:34-36). मला नेहमी प्रश्न पडायचा- येशू असं का बोलला असेल? प्रेमाचा पुरस्कार करणारा येशू अशी भांडणं लावून देण्याची भाषा का करत असेल? पण त्या वचनाचा मला बोध हळूहळू होऊ लागला. दुर्गाबाई भागवत म्हणतात, असे वक्तव्य करणारा येशू द्वेषभाव पसरवणारा नव्हता, तर विरोधाचे स्वरूप व संघर्ष ओळखणारा होता. परमोच्च सत्य स्वीकारताना स्वजनांशीही वाकडे पत्करावे लागते, हेच त्याला सांगायचे होते. किती खरे होते ते!

डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस, वसई

danifm2001@gmail.com

Share on Social Media

नवे पुस्तक

अनिल साबळे : कवितेत आयुष्य कोरणारा कवी

प्रमोद मुनघाटे

या कवितेतील प्रतीकात्मकता रंग-रूपाच्या संदर्भात जितकी मौलिक आहे, तेवढीच ती तात्त्विक पातळीवर अधिक अर्थपूर्ण आहे. ‘शेंदूर माखलेले दगड’ या आदिम जाणिवेवरील अलौकिकतेची खोळ बाजूला करून ही प्रतिमा वर्तमानातील निव्वळ भौतिकतेला अधोरेखित करते. आदिवासी आश्रमशाळा आणि तिच्याभोवतालचे जंगल या पर्यावरणातील अनेक वस्तू, घटना आणि शब्द सामान्य वाचकांना नव्या आहेत. मुलांचा स्वयंपाक, भांडी, त्यांचे कुटुंबातील जगणे, रानावनात भटकणे आणि नागर संस्कृतीबद्दलचा न्यूनगंड बाळगणे याही गोष्टी या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. अनिल साबळे कोणतीही टिप्पणी न करता अनुभवाची मांडणी करतात; जणू ते आपले आयुष्यच कवितेतून कोरून काढतात. म्हणून या कवितेकडून मराठी साहित्याला अधिक आशा आहेत.

आई सांगू लागली

मोहाची फुलं वेचताना

समोर अस्वल आलं तर

जमिनीवर प्रेतासारखं

दगड होऊन पडावं

फुलं खाऊन झिंगलेलं

अस्वल आपल्या कानात

हुंगून जातं

जांभळं तोडताना रानात

आपल्या फांदीवर आपल्या

मागोमाग चढलं तर

वानराच्या पिल्लासारखं फांदीला

माय म्हणून चिटकून राहावं

आग्या मोहळाच्या माश्या

झोंबू लागल्यावर नदीच्या

पाण्यात डुबकी मारून बसावं

डुकराची मुसंडी अंगावर

आली तर करवंदाच्या

जाळीवर झोकून द्यावं

रानातली वाळलेली झाडे

तोडताना रेंजर आला तर?

काय करावं...

हे कधीच तू सांगितलं

नाही आई!

‘टाहोरा’ या संग्रहातील कवी अनिल साबळे यांची ही कविता. या संग्रहातील प्रत्येक कविता मोजक्या शब्दांतून आपल्या समोर कवीचे आयुष्यच उभे करते. आपले आयुष्य, भावजीवन आणि आपले शब्द असे क्वचित एकत्र येतात. साबळे हे दुर्गम भागातील एका आदिवासी आश्रमशाळेत स्वयंपाकी आहेत. आदिवासींचे तळाचे जीवन, भोवतालचे जंगल आणि या जंगलाला कवेत घेऊ पाहणारा वर्तमानातील ‘विकास’ हे त्यांच्या दैनंदिन अनुभवाचा अविभाज्य भाग आहेत. म्हणून आदिवासी जीवनाचे सगळे रस आणि कस त्यांच्या सगळ्या कवितांतून आपल्या पुढे येतात ते प्रश्नांचे मोहोळ घेऊनच.

आदिवासी जाणिवेची कविता मराठीला आता नवी नाही. वाहरू सोनवणे आणि भुजंग मेश्राम यांच्यासह अनेकांनी हा प्रवाह अधिकच रुंद करून ठेवला आहे. परंतु अलीकडच्या काळात याही प्रवाहात बरीच कविता नि:सत्त्व निपजली, हे वास्तव आहे. आदिवासींच्या जगण्याचे गद्यप्राय वर्णन, प्रचारकी आक्रोश आणि घोषणाबाज शैली यामुळे सकस आदिवासी कविता दुर्मिळ झाली आहे.

या पार्श्वभूमीवर अनिल साबळे यांच्या ‘टाहोरा’ या नव्या संग्रहाने अपेक्षा उंचावल्या आहेत. आदिवासी जीवनाचे केंद्र त्यांच्या आदिम जीवनशैलीत आहे. हे जीवन निसर्गाचाच एक भाग आहे. त्यांचे जगणे देवदेवस्की, कुलाचार, नाचगाणे भोवतालचे प्राणी-पक्षी आणि जीव-जंतूंच्या कोषातच फुलून येत असते. या कोषाला तडे गेले की, आदिवासी जीवन सैरभैर होतात. तथाकथित विकासाचा बुलडोझर गावातल्या वाटेवरून दऱ्याखोऱ्यांत-घनदाट जंगलात घुसू लागतात, तेव्हा तेथील केवळ प्राणी-पक्षीच भयभीत होत नाहीत, तर तेथील आदिवासीही संभ्रमित होतात. ते आपल्या अस्तित्वाचे तुटू पाहणारे आधार अधिकच घट्ट धरू पाहतात. हे सर्व अनुभव अनिल साबळे यांच्या कवितांमध्ये शब्दबद्ध झाले आहेत.

वर उद्‌धृत केलेल्या ‘आई सांगू लागली’ या कवितेत आदिवासी जीवनावर झालेल्या बाह्य अतिक्रमणाच्या संकटाला कसे तोंड द्यावे, हे कवीला कळत नाही. जंगलात मोहाची फुले गोळा करताना अस्वल, मोहोळाच्या माश्या किंवा रानडुक्कर समोर आले तर काय करावे, हे आईने सांगितले आहे; पण रानातली वाळलेली झाडे तोडताना रेंजर आला तर काय करावे, असा त्याचा प्रश्न आहे.

आदिवासींचे जंगलातील वास्तव्य आदिम आहे. ब्रिटिशकाळात अस्तित्वात आलेला सरकारी वनविभाग हा उपरा आहे. आदिवासींनी वनोपजांचा कधी साठा केला नाही, भांडवल केले नाही. पण वनातील बांबू व सागवानावर सरकारकडून हक्क सांगितला जाऊ लागला आणि जळणासाठी वाळलेल्या काटक्या उचलणाऱ्या आदिवासींना वनविभागाचे कर्मचारी नागवू लागले. साबळे यांचे सगळे भावजीवन आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षणाभोवती फिरताना दिसत असले, तरी त्यांची जाणीव आदिवासींच्या आदिम जीवनाला सतत स्पर्श करते.

‘आमच्या रानाने’ या कवितेत कवी लिहितो की-

आश्रमशाळेचा नवा गणवेश

अंगावर मिरवत आम्ही घरी आलो

आमच्या गायी-म्हशी आमच्यावर शिंग रोखून

धावून आल्या....

आश्रमशाळेच्या बाकाने व पुस्तकाने आदिवासींच्या मुलांना स्वीकारले असले, तरी ‘गणवेशधारी’ मुलांना त्यांच्या रानाने नाकारले असते. या आदिम मूलतत्त्वाचे उदात्तीकरण हे आदिवासींच्या आजच्या जीवनसंघर्षाचे उत्तर आहे का?

‘चुडणी’ या पहिल्याच कवितेत या प्रश्नाचे उत्तर मिळते :

संततधार पावसात चुडणी

पेटवून आम्ही खेकडी

शोधत फिरत होतो...

नागवे पाय गाळातून

उपसत आम्ही खाचरांतून

तोल सांभाळत फिरतोय

नांग्या वर करून

पळणाऱ्या काळ्याभोर खेकडी

पकडताना माझ्यासाठी मागून

भाऊ ओरडला, उजव्या हाताची

बोटं सांभाळ

आपल्या घरात तू एकटाच शिकतोय.

आधुनिक विकासाचे एक गमक धरण हे आहे. ‘धरण’ या कवितेत कवी लिहितो की, पाण्यानं भरलेलं धरण ओलांडताना तुमचा चौकीदार आमच्या छातीवर भरलेला दस्ता मारतोय. ह्या दगडी भिंतीने हे अडवलेलं पाणी आमच्या तहानलेल्या घशांसाठी. हे पाणी वीज निर्माण करतंय कुणासाठी? आमची गावं तर अंधारात चाचपडत निघालीयत.

निसर्गाच्या ओंजळीत रुजलेल्या आदिवासी जीवनाचा धरणे, प्रकल्प, महामार्ग, स्थलांतर व विस्थापनाच्या मार्गाने कसा विचका होत आहे, हे अनेक कवितांमधून वेगवेगळ्या रूपांतून कवी व्यक्त करतो. दारिद्य्र, उपासमार व उपेक्षा आदिवासींच्या आजच्या जीवनाचे खडतर वास्तव आहेच. यातूनच आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक योजना तयार करते. पण या योजना तरी आदिवासींपर्यंत पोचतात का?

‘बैलजोडी’ या कवितेत कवीचा बाप मजुरी बुडवून बैलजोडी प्रकरणाचा एकेक कागद गोळा करत जातो. बैलांच्या गोठ्यासाठी त्याची आई लाकडं गोळा करते, छत शाकारण्यासाठी गवत आणते, कवी तर हरखून जातो बैलांच्या आगमनाने. तो बाजारात शिवळा, पट्‌ट्यातील घुंगरू, शिंग रंगविण्यासाठी गेरू यांचे भाव विचारत फिरतो. बैलजोडीच्या कासऱ्यासाठी घायपाताची उभी पाने गोळा करतो. गोठा उभा होतो, गवताने शाकारला जातो आणि कासराही वळून तयार होतो. पण बापाच्या बैलजोडीच्या प्रकरणावर धूळ साचून राहते.

कवी अनिल साबळे हे अनुभवाची अशी नुसती चित्रं मांडत जातात. त्यातून आदिवासी जीवनाची पाळंमुळं जशी दृश्यमान होतात, तशी नागर समाजाची आदिवासींकडे पाहण्याची दृष्टीही जाणवते. त्यांच्या अस्तित्वाच्या आणि संस्कृतीच्या प्रश्नांची गुंतागुंतही दिसू लागते. भौतिक आणि आधिभौतिक पातळीवर कवीच्या भावविश्वातील संघर्ष अनुभवांच्याच आधारे कवितेत कसा उतरतो, ते ‘भार ठेवलेला देव’ या कवितेतून पाहण्यासारखे आहे.

पिसाट वाहणाऱ्या वाऱ्यात

आश्रमशाळेचे पत्रे थरथरू लागतात

दिसेल तो दगड मुले

पत्र्यांवर मांडू लागतात

तरीही पत्र्यांची थरथर

थांबत नाही

नांदुरकीच्या मुळातले

शेंदूर माखलेले दगड

हलवून मुले सैल करतात

आणि पत्र्यांवर मांडून देतात

पागोळीतून प्राण गेलेल्या

देवाच्या रक्ताची धार

वाहत राहते

आणि भर ठेवलेला देव

पुन्हा दगड होतो.

या कवितेतील प्रतीकात्मकता रंग-रूपाच्या संदर्भात जितकी मौलिक आहे, तेवढीच ती तात्त्विक पातळीवर अधिक अर्थपूर्ण आहे. ‘शेंदूर माखलेले दगड’ या आदिम जाणिवेवरील अलौकिकतेची खोळ बाजूला करून ही प्रतिमा वर्तमानातील निव्वळ भौतिकतेला अधोरेखित करते.

आदिवासी आश्रमशाळा आणि तिच्याभोवतालचे जंगल या पर्यावरणातील अनेक वस्तू, घटना आणि शब्द सामान्य वाचकांना नव्या आहेत. मुलांचा स्वयंपाक, भांडी, त्यांचे कुटुंबातील जगणे, रानावनात भटकणे आणि नागर संस्कृतीबद्दलचा न्यूनगंड बाळगणे याही गोष्टी या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. अनिल साबळे कोणतीही टिप्पणी न करता अनुभवाची मांडणी करतात; जणू ते आपले आयुष्यच कवितेतून कोरून काढतात. म्हणून या कवितेकडून मराठी साहित्याला अधिक आशा आहेत.

प्रमोद मुनघाटे, नागपूर

pramodmunghate304@gmail.com

टाहोरा लेखक : अनिल साबळे लोकवाङ्‌गमय गृह, मुंबई पृष्ठे : 84, किंमत : 130 रुपये

Share on Social Media

2019 च्या निवडणुका आणि पुढची वाट

दि. 20 जूनच्या साधना अंकात भारतीय राजकारणाविषयी बरीच चर्चा आहे. त्यातून माझ्यासारख्या सामान्य वाचकाला काय मिळाले, याबद्दल मी माझ्याशीच केलेला संवाद इथे मांडतो आहे. संपादकीय लेख व दाभोळकरांचा लेख हे निवडणूक प्रक्रियेवर भर देतात. संपादकांच्या मते, भाजपविरुद्ध एक सशक्त नेतृत्व तयार होण्याची वाटच पाहावी लागेल; खरे आहे. पण असे नेतृत्व निर्माण होवो न होवोप्रसारमाध्यमांचे जे नेहमीचे कार्य, म्हणजे जनजागृती करण्याचे आणि सरकारचे जर काही चुकत असेल तर ते प्रकाशात आणण्याचे, ते काम तसेच चालू राहायचे आहे. त्यादृष्टीने पुढील चर्चा व्हायला हव्यात. दाभोळकर म्हणतात की- आज सर्वप्रथम सर्वपक्षीय जनआंदोलन जे हवे आहे ते ‘ईव्हीएम मशीनवर बंदी घाला’ म्हणून.

आनंद करंदीकर यांचे मत अगदी उलट आहे व त्यांच्याशी मी सहमत आहे. निवडणुकीतील मतदानाची मोजणी करताना ‘एकूण झालेले मतदान आणि मोजलेली मते यात जी तफावत दिसून आली आहे’ ती इतकी मोठी नाही की, ज्यामुळे निकालात फरक पडावा, असे करंदीकर म्हणतात. याशिवाय आणखी दोन मुद्दे ईव्हीएमचे समर्थन करतात. एक तर राजकीय पक्षांनीच उपस्थित केलेल्या एका शंकेचे निरसन निवडणूक आयोगाने केले आहे. ईव्हीएमने केलेली मतनोंदणी आणि त्या यंत्रातून निघणारा कागदी पुरावा यांची पडताळणी व्हावी, अशी राजकीय पक्षांची मागणी होती. ती सुप्रीम कोर्टाने अंशत: मान्य केली. त्यानुसार निवडणूक आयोगाने 20,625 यंत्रांच्या बाबतीत पडताळणी केली. त्या पडताळणीत एकही विसंगती न आढळल्याचे जाहीर झाले आहे.

दुसरा मुद्दा ईव्हीएम यंत्राच्या तांत्रिक स्वरूपाचा. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, ईव्हीएम यंत्रे ही स्वत:पुरती काम करणारी यंत्रे आहेत; त्यांचा बाहेरील विद्युत्‌लहरींशी संबंधच येत नाही. हा मुद्दा समजण्यासाठी आपण तीन यंत्रे डोळ्यांसमोर आणू- स्मार्ट फोन, साधा फोन आणि कॅल्क्युलेटर. तिन्ही यंत्रांत सांख्यिकी संदेशांचाच वापर असतो; पण स्मार्ट फोनमध्ये जास्त प्रकारचे संदेश येऊ शकत असल्यामुळे त्यातून व्हायरस येतात, साध्या फोनमध्ये बाहेरच्या लहरी विशिष्ट कार्यापुरत्याच येतात, त्यामुळे व्हायरस येत नाही आणि कॅल्क्युलेटरचा तर बाहेरच्या लहरींशी संबंधच येत नाही. अशा यंत्रांवर दूर अंतरावरून काहीच प्रभाव टाकता येत नाही. ईव्हीएम हे असेच स्टँडॲलोन यंत्र आहे, हे निवडणूक आयोगाने वारंवार स्पष्ट केले आहे. ते अजूनपर्यंत कोणी असिद्ध केलेले नाही.

यानंतरही जर राजकीय पक्ष काही ओरड करत असतील, तर तो वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार म्हटला पाहिजे. या यंत्राविरुद्ध जनआंदोलन उभारणे म्हणजे दुखणे पायाला आणि पट्टी कपाळाला असा प्रकार होईल.

दुखणे काय आहे? निवडणुका कोण जिंकेल, हे देशाचे दुखणे नाही; ते राजकीय पक्षांचे दुखणे आहे. त्याचे काय करायचे, हे ते पक्ष पाहून घेतील. देशाची दुखणी दोन आहेत. एक म्हणजे- आर्थिक विकासाची मंद गती आणि दुसरे म्हणजे- सामाजिक सामंजस्याला जाणारे तडे. आर्थिक क्षेत्रात मोदींची जमेची बाजू रमेश पाध्ये यांनी मांडली आहे. मोदींनी ज्या अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या, त्यातून त्यांनी वीस-पंचवीस कोटी मतांची पुंजी जोडली, असा पाध्यांचा निष्कर्ष आहे. लोकांना पटलेले इतके चांगले काम झाले असेल, तर त्याबद्दल मोदींचे अभिनंदनच करायला पाहिजे; पण हे जे काम झाले त्यातून संपत्तीची फक्त फेरवाटणी झाली, संपत्तीचे उत्पादन वाढले नाही.

नेमकी हीच खंत मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य रथिन रॉय यांनी नुकतीच व्यक्त केली आहे. विकासदर, म्हणजे जीडीपीच्या वाढीचा दर, चांगला असल्याचे सरकारकडून पुष्कळदा सांगितले जाते. पण सरकारी संस्थांकडून जो वाढदर जाहीर केला जातो तो इतर आर्थिक सांगितले जाते; पण सरकारी संस्थांकडून जो वाढदर जाहीर केला जातो तो इतर आर्थिक सूचक- आकड्यांशी मेळ खात नाही, असे कित्येक अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंबंधीचे वाद हे आकलनापलीकडचे आहेत, कारण जीडीपीचा ‘देशातील ढोबळ संपत्तीउत्पादनाचा) आकडा जो निघतो तो शेकडो अंदाजांवर आधारलेला असतो. आधी उत्पादनाचे व सेवांचे शेकडो प्रकार, त्यात अगदी अलीकडेपर्यंत भारतातील पन्नास टक्के आर्थिक व्यवहारांची कुठे नोंदच होत नसे, असे एक सरकारी अहवालच सांगतो. तेव्हा व्यापारातील किंवा वाहतुकीतील घडामोडींवरून इतर अंदाज बांधणे चालू असते. असे अंदाज बांधताना चूक किती होऊ शकते (Probability of error), हे ठरवण्याचेही एक संख्याशास्त्रीय तंत्र आहे. तेव्हा वर म्हटल्याप्रमाणे ही सगळी आकडेमोड सामान्य वाचकांच्या आकलनापलीकडची आहे.

जीडीपीचा आकडा तसाही थोडा फसवाच असतो. कसा, ते दोन उदाहरणे देऊन सांगतो. गावाकडे उत्पादित होणारे दूध तिथे 30 रुपये प्रतिलिटर विकले जात असेल आणि मुंबईला पोचल्यावर तेच दूध 60 रुपये प्रतिलिटर विकले जात असेल; तर जीडीपीत 30 रुपयांची वाढ झाली, दुधाचा एक थेंबही वाढला नाही. दुसरे उदाहरण म्हणजे मुंबईच्या लोकलप्रवासाचे. या प्रवासावर मुंबईकर दर वर्षी 3000 कोटी रुपये खर्च करतात म्हणे. जीडीपी 3000 कोटींनी वाढतो, पण हाती काय येते? फक्त दगदग. तेव्हा आपण या जीडीपीच्या वादात नको पडू या.

उद्योगधंद्यात मरगळ आली आहे आणि रोजगारनिर्मिती पुरेशी होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती तर गेल्या दहा वर्षांपासून आहे, हे सांगणाऱ्या एका पुस्तकाचा परिचय सुलक्षणा महाजन यांनी याच 20 जूनच्या अंकात करून दिला आहे. पण त्या पुस्तकात म्हणा किंवा लेखिकेच्या कथनात म्हणा- या काळातील सत्ताधाऱ्यांवर व्यक्तिगत टीका मात्र आहे, पुढे काय व्हायला पाहिजे याबद्दल एक शब्दही नाही. मोदी सरकारने मात्र एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे, सध्याचे वार्षिक उत्पादन (जीडीपी) येत्या पाच वर्षांत दुप्पट करण्याची- अडीच लाख कोटी डॉलर्सवरून पाच लाख कोटी डॉलर्सपर्यंत नेण्याची. यातील बहुतांश वाढ खासगी (म्हणजे भांडवलशाही) उद्योगातूनच होणे अपेक्षित आहे. तेव्हा खासगी उद्योगाला प्रेरित करण्याकरता करविषयक व पतपुरवठाविषयक काय धोरणे सरकार आखणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अर्थतज्ज्ञ लोक वेगवेगळे उपाय सुचवत आहेत. सरकार प्रत्यक्षात कितपत यश मिळवते, यावरच मतदारांचा पाठिंबा अवलंबून राहील. आता दुसऱ्या दुखण्याकडे- म्हणजे सामाजिक सामंजस्याला पडणाऱ्या तड्यांकडे वळू.

सुरेश द्वादशीवारांनी 20 जुलैच्या ‘देशाला काय हवे? विवेक की श्रद्धा?’ या लेखात आणि 27 जुलैच्या ‘देशाला काय हवे? ऐक्य की एकरूपता?’ या लेखात या दुखण्याचा चांगला वेध घेतला आहे. भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासाचे दाखले देऊन हे दाखवले आहे की, धर्मावर आधारलेली एकता हा आधुनिक राष्ट्राचा आधार असू शकत नाही. त्यांचा हा निष्कर्ष मला मान्यच आहे, पण या बाबतीत आपण काय कृती करायची याचा विचार करताना मला काही थोडेसे वेगळे म्हणावेसे वाटते. द्वादशीवारांनी ‘देशाला काय हवे’ असा प्रश्न विचारताना तसाच असाही प्रश्न विचारला आहे की, ‘भाजपला देशाचा चेहरा कसा हवा आहे?’ या दुसऱ्या प्रश्नाचे दोन उद्देश असू शकतात. एक तर भाजपशी संवाद साधणे किंवा त्याचे पितळ उघडे पाडणे. उद्देश कोणताही असो- त्याकरता आपल्याला प्रतिपक्षाचे रूप नीट कळले पाहिजे. मला वाटते की, संघाला (व पर्यायाने भाजपला) समजण्यात द्वादशीवार चूक करताहेत. द्वादशीवारांना संघ ही धर्मश्रद्ध संघटना वाटते (20 जुलै).

ते म्हणतात की- संघाला जात, धर्म, पंथ यासारख्या जन्मदत्त श्रद्धांविषयीच आस्था अधिक आहे आणि देशभक्ती फक्त उमाळ्यापुरती आहे (20 जुलै). खरे तर संघाची विचारधारा याच्या अगदी उलट आहे. संघ या संस्थेने कोणत्याही विशिष्ट धर्माचा किंवा पंथाचा प्रसार केलेला नाही, कुठल्याही कर्मकांडाचा प्रचार केलेला नाही. संघाचा जन्मच मुळी झाला जातीय दंग्याच्या वातावरणात. त्या काळात युरोपियन पद्धतीच्या राष्ट्रवादाचाही बोलबाला होता. तेव्हा भारतात बाहेरून आलेले धर्म सोडून बाकीचे जे काही पंथ असतील, अशा लोकांचे एक राष्ट्र ही हिंदू-राष्ट्राची कल्पना होती. इतर धर्मीय लोक बाहेरच्या लोकांशी एकनिष्ठ राहणार, हा विचार त्यामागे होता आणि मुस्लिम लीगच्या पाकिस्तानच्या मागणीने तो विचार बळकटही झाला, हिंदूंचे एकीकरण हे संघाचे प्रमुख उद्दिष्ट झाले. त्यामुळे या हिंदूंच्या विविध श्रद्धांना धक्का न देणे हा एक धोरणाचा भाग झाला. धर्मश्रद्धा या केंद्रस्थानी कधीच नव्हत्या. हा मूळचा संघही आता बदलत आहे. 1980 पासून संघाने हिंदू या शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहे.

हिंदू या शब्दाचा अर्थ म्हणे फक्त भारतीय असा आहे. संघात मुसलमानांना प्रवेश द्यायला सुरुवात झाली. मुस्लिम समाजातही संघाचा प्रसार करण्याचे प्रयत्न व्हायला लागले आहेत. तिथे कोणी हिंदू ‘धर्माचा’ प्रसार करणार नाहीये, हे उघड आहे. भाजप हा तर शुद्ध राजकीय पक्ष, धर्मनिष्ठ पक्ष नव्हे. आज मोदींच्या मंत्रिमंडळात मुसलमान मंत्री आहे, पण या संस्था ज्या समाजात आणि ज्या समाजाच्या आधारावर उभ्या राहायच्या, त्या हिंदू समाजात मुसलमानांविषयी असलेला आकस अजूनही बराच जिवंत आहे. पूर्वी मुसलमानांनी जो अलगाववाद जोपासला, त्यात या आकसाचे मूळ आहे. हे मुसलमान समाजानेही लक्षात घ्यावे, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान झाल्यावर म्हटले होते. या आकसाचा राजकीय फायदा भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी घेतला आहे, अजूनही तसा फायदा घेणे चालू आहे ते खरे आहे; पण तात्त्विक भूमिका थोडी-थोडी बदलत आहे, हेही खरे आहे. या परिस्थितीत जो काही लढा लढायचा आहे, त्याचे दोन भाग पडतात- एक लढा हिंदूंच्या व मुसलमानांच्या जुनाट विचारांविरुद्ध आहे आणि दुसरा लढा राजसत्तेच्या गलथानपणाविरुद्ध आहे.

सध्याच्या राजकीय सत्तेचा गलथानपणा असा की ते धर्मनिरपेक्ष कारभाराची व मानवी हक्कांच्या संरक्षणाची संविधानाने नेमून दिलेली जबाबदारी नाकारतही नाहीत आणि नीट अमलातही आणत नाही. किंबहुना, कायदे मोडणाऱ्यांना सरकारची किंवा बड्या नेत्यांची फूस आहे का, असे वाटायला लागते. हा दुसरा लढा लढताना संघावर किंवा भाजपवर धर्मनिष्ठेचा आरोप करणे चुकीचे होईल. त्याचे उत्तर येईल- ‘अगा, जे घडलेचि नाही ते पुसशी काई?’ हा लढा लढताना मला मोहन भागवतांचे एक वाक्य उचलून धरावेसे वाटते. गेल्या वर्षी ते म्हणाले की- त्यांना देश काँग्रेसमुक्त करायचा नाहीये, सर्वांनी युक्त असा करायचा आहे. मला वाटते की, आपला उद्देशसुद्धा तसाच असावा, संघालासुद्धा आपल्याकडे वळवण्याचा असावा. वेळ लागेल, पण वळतील ते.

भ. पां. पाटणकर, नागपूर

Share on Social Media