Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

अतिरिक्त भीती आणि अवास्तव अपेक्षा

कोरोना संकट चीनमध्ये उद्‌भवले आणि त्यानंतर एक एक करीत जगातील सर्व देश त्याने पादाक्रांत केले, त्याला आता साडेचार महिने झाले आहेत. सुरुवातीची अडीच महिने त्याचा पुरेसा अंदाज व धोका कमी लोकांच्या लक्षात आला होता. त्यानंतर मात्र सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकू लागली. या साडेचार महिन्यांचा (कोरोनाची लागण व त्यामुळे मृत्यू यासंदर्भातील) आलेख पहिला तर, आधीच्या अडीच महिन्यांत तो जमिनीवर सरपटणारा दिसतो. त्यानंतर मात्र तो आलेख असे दाखवतो की, त्या संकटाने उड्डाण (टेक ऑफ) केले आहे. म्हणजे 10 मार्च ते 10 मे या दोन महिन्यांत कोरोनाची लागण व त्यामुळे मृत्यू यांची जगातील संख्या अनुक्रमे 3 लाख व 4 हजार इथपासून, 42 लाख व 3 लाख इथपर्यंत आली आहे. याच काळात भारताची आकडेवारी (लोकसंख्या व अन्य देशांशी तुलना करता) काहीशी सुसह्य राहिली आहे, पण ते आकडेसुद्धा अनुक्रमे 61 व 1 इथपासून 65 हजार व 2200 इथपर्यंत आले आहेत. आणि हा अंक प्रसिद्ध झाला, तोपर्यंत तरी जागतिक व भारतीय स्तरावरील आलेख पठारालाही लागलेला नाही, उतार केव्हा सुरू होणार याबाबत भाकित करायला कोणीही तयार नाही.

मात्र या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जगाने व भारतानेही दुसऱ्या पर्वात प्रवेश केला आहे. पाहिले पर्व गाजले ते संपूर्ण देश किंवा देशातील बहुतांश प्रदेश लॉकडाऊन केल्यामुळे. काही देशांनी ही सुरुवात लवकर केली, काहींनी उशीरा. मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव मोठा पर्याय जगभर अवलंबला गेलेला आहे. आणि तरीही भूमितीच्या वेगाने तो पसरतच चाललेला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्याचे चित्र तर आहेच, पण लोकांच्या सहनशीलतेचा अंत जवळ आल्याचेही दिसू लागले आहे. आणि प्राप्त परिस्थितीत या दोन्ही बाबतींत कोणत्याही सरकारकडे काहीही इलाज नाही. त्यामुळे लॉकडाऊन क्रमाक्रमाने हटवून या संकटाला सामोरे जायचे, असेच बहुतांश देशांच्या सरकारांनी ठरवले आहे. म्हणजे या दुसऱ्या पर्वात जनतेला मोकळीक मिळाल्यामुळे कोरोनाची लागण व त्यामुळे मृत्यू यांच्या संख्येत अधिकाधिक वाढ होत राहणार आणि त्याचवेळी जनतेचा कोंडमारा कमी व उद्योग व्यापार वाढल्याने आर्थिक कोंडीही कमी, अशा विचित्र प्रकारचे दुसरे पर्व असणार आहे. वस्तुतः ही काही निवड नाही, अपरिहार्यतेतून आलेला हा पर्याय आहे. यात आशेला किंचितसा वाव आहे तो एवढाच की, साडेचार महिन्यानंतर या संकटाचा फैलाव जगातील दोनशेपैकी दीडशे देशांत तरी नियंत्रणात आहे. आणि यानंतरच्या काळात इंटर्नल चेक अँड बॅलन्स या तत्त्वानुसार खूप फैलावल्यानंतर कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. पण ही एक शक्यता आहे, यातून उलटही घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अर्थात, तसे दिसू लागताच पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय अवलंबावा लागणार हे उघड आहे.

असे इतके अनिश्चित असताना, कोरोनानंतरचे जग कसे असेल याबाबतच्या चर्चा मागील महिनाभर या ना त्या स्वरूपात होत आहेत. वेगवेगळी भाकिते केली जात आहेत. आव्हाने व संधी याबाबत बोलले जात आहे. वस्तुतः आताचे हे संकट जगभर घोंगावत आहे, मानवजातीच्या ज्ञात इतिहासात या प्रकारची स्थिती पहिल्यांदाच ओढवली आहे. विविध देशांमध्ये किती वाताहात झाली आणि विविध क्षेत्रांवर काय परिणाम झाला आहे, याचा अंदाज बांधता येणेही अशक्य आहे. आणि आपण या संकटाच्या पठारावर आहोत की आणखी काही शिखरे बाकी आहेत, हेही स्पष्ट झालेले नाही. शिवाय, जगाचे रहाटगाडे एकरेषीय पद्धतीने कधीच चालत नसते. कमालीची व्यामिश्रता व अनाकलनीयता हे तर मानवी जीवनव्यवहाराचे केंद्रीभूत वैशिष्ट्य आहे. त्यामुळे, कोणतीही भाकिते किती गांभीर्याने घ्यायची हा एक प्रश्नच आहे. मात्र तरीही प्रत्येक क्षेत्रातील विशेषज्ज्ञ काय म्हणत आहेत, याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. त्यांचे अंदाज किंवा भाकिते किती खरी ठरतील हा भाग आता तरी बाजूला ठेवायला हरकत नाही. पण ते ज्या गृहितकांच्या आधारावर बोलत वा लिहीत आहेत, त्यावर विचार करायला हवा. कारण वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये अंतिम निष्कर्षापेक्षा त्या निष्कर्षाप्रत येण्याची प्रक्रिया महत्त्वाची असते.

वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द वापरला जातो, तेव्हा आपल्या नजरेसमोर प्रामुख्याने निसर्गविज्ञानाच्या विविध शाखा आणि त्यातील सूत्र, तत्त्व, नियम व सिद्धांत येतात. याचे उघड कारण हे आहे की, तिथे मांडले गेलेले ठोस असे निष्कर्ष सर्वत्र व सर्वकाळ तपासता येतात, त्यांची प्रचिती घेता येते (आणि म्हणूनच निसर्ग विज्ञानाचा क्षेत्रांतील लोक सध्याच्या काळात जवळपास गप्प आहेत). सामाजिक शास्त्रांच्या बाबतीत मात्र विविध विचारप्रवाह वेगवेगळी भाकिते करतात, त्यात परस्परविरोधी म्हणावीत इतकी भिन्नता ही असते. त्या निष्कर्षाप्रत येण्यासाठी काही प्रवाहामध्ये विशिष्ट प्रक्रिया असते, काहींमध्ये ती अर्धवट स्वरूपात असते, काहींमध्ये ती नावापुरती असते. व्यक्तींच्या बाबत तर यासंदर्भात किती तरी टोकाचे विश्लेषण व मतभिन्नता संभवते. फार थोडे विशेषज्ज्ञ आपल्या विद्याशाखेचे सिद्धांत व हाती आलेले तपशील यांच्यावर तर्क लढवून निष्कर्ष काढतात. अनेक लोक मात्र आपल्या अंतःप्रेरणा काय सांगतात, त्यावर विसंबून व्यक्त होत राहतात. आणि उर्वरित लोक व्यक्तिगत अनुभवावरूनच सामाजिक सिद्धांत मोठ्या आवेशाने मांडत राहतात. हा शेवटचा प्रकार सर्वाधिक धोकादायक असतो आणि त्याचीच चलती सर्वाधिक असते. तर अशा या परिस्थितीत राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती, इतिहास इत्यादी क्षेत्रांतील लोक काय सांगत आहेत, याकडे तर लक्ष द्यायला हवेच. पण अर्थकारण व मानसशास्त्र या दोन क्षेत्रांतील लोक काय सांगताहेत याकडे अधिक सजगपणे पाहायला हवे. मात्र जेवढा मोठा अर्थतज्ज्ञ तेवढा अधिक सावधतेने बोलताना दिसतो आहे. आणि मानसशास्त्राच्या क्षेत्रात व्यक्तीच्या स्तरावर जेवढे लिहिले बोलले जाते, त्या तुलनेत समूहाच्या वा सामाजिक मानसशास्त्राबाबत फार कमी बोलले लिहिले जाते. त्यामुळे मानसशास्त्राच्या क्षेत्रातील तज्ज्ञही सध्या कमीच व्यक्त होताना दिसतात. या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांकडे लक्ष वेधून आपल्या वाचकांना थोडे आश्वस्त केले पाहिजे, असे आम्हाला वाटते.

अर्थकारणाच्या क्षेत्रातील बदल अधिक वेगवान, अधिक सर्वव्यापी व अधिक दूरगामी असतात. त्यामुळे जेवढ्या वेगाने घसरण होते तेवढ्याच वेगाने चढण होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे गेल्या साडेचार महिन्यांत जागतिक अर्थव्यवस्थेची घसरण ज्या वेगाने झाली त्याच वेगाने ही चढण होईल का? यासंदर्भात, रघुराम राजन यांना शिकागो विद्यापीठातील मुलाखतीत असा प्रश्न विचारला गेला की, कोरोना संकटांनंतर जागतिक अर्थव्यवस्था त पद्धतीने पूर्ववत होईल की ण पद्धतीने? म्हणजे आतापर्यंत तळाशी आलेली अर्थव्यवस्था तशाच वेगाने उसळी घेऊन पूर्ववत होईल, की काही काळ तळाशी सरपटत राहून पूर्ववत होईल? या दोन्ही शक्यतांबाबत राजन यांनी ठोस असे भाष्य केले नाही, दोन्ही शक्यता नाकारल्याही नाहीत. पण जगाचा इतिहास लक्षात घेतला तर पुढे येते ते हेच की, सरकारे कितीही आली व गेली, त्यांनी कोणतीही व कशीही धोरणे अवलंबली, किंबहुना सरकारे असली नसली तरीही अर्थव्यवस्थेचा गाडा चालूच राहात असतो. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था पूर्ववत होणार हे निश्चित! ती किती काळात (काही महिन्यांत की काही वर्षांत) आणि किती नुकसान करून (प्रामुख्याने कोणत्या घटकांचे) पूर्ववत होणार एवढाच काय तो कुतूहलजनक प्रश्न!

सामाजिक मानसशास्त्राच्या क्षेत्रात होणारे बदल खूपच संथ, अनेक वेळा मर्यादित वर्तुळात व कमी काळासाठी असे असतात. त्यामुळे समूहाच्या घसरणीचा वेग कमी आणि साहजिकच त्याबाबतीत चढणीचा वेगही कमीच. त्यामुळे गेल्या साडेचार महिन्यांत आपल्या समाजाच्या स्तरावरील मानसिक घसरण कमीच राहिली आहे, ती पूर्ववत व्हायला फारशी अडचण येणार नाही. किंबहुना, कोरोनानंतरचे जग कसे असेल, याबाबत जी भाकिते केली जात आहेत ती समाजाच्या मानसिकतेला फार लागू होणारी नाहीत. अनेक नैसर्गिक संकटे समाज अनुभवत असतो, उदा. पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, साथीचे रोग. अनेक मानवनिर्मित संकटेही समाज अनुभवत असतो. उदा. हिंसक दंगली, युद्धे. त्या प्रत्येकी वेळी मानवतेला नवे अंकुर फुटू लागल्याचे दिसते. परंतु ते संकट दृष्टीआड झाले की, आपले समाज पूर्वस्थितीला येऊ लागतात. एवढेच कशाला इतके साधु-संत, समाजसुधारक, इतके साहित्यिक, इतके तत्त्ववेत्ते आणि इतके उत्तुंग नेते होऊन गेल्यानंतरही आपला समाज कासवगती सोडायला तयार नाही. एकेका बारक्या सुधारणेसाठी काही पिढ्या जाव्या लागतात, अनेक लहान-थोरांना त्यासाठी आयुष्ये खर्ची करावी लागतात ते उगाच नाही. सारांश, कोरोनानंतरचे जग कसे असेल या प्रश्नाचा विचार करताना, अतिरिक्त भीती व अवास्तव अपेक्षा यापासून दूर राहणे यातच खरे शहाणपण आहे!


Share on Social Media

चिकित्सा

आकलन आणि अभिव्यक्ती

डॉ. आनंद नाडकर्णी

कोरोनासारखी भौतिक अडचण एका बाजूला संपूर्ण मानव-जातीला एकाच मापात (थोड्याफार फरकाने) मोजत आहे. पण ह्या प्रसंगी समाजाचे विघटन आणि विचारांचे जहाल ध्रुवीकरण करणाऱ्या विचारांनाही जोम मिळत असेल, तर त्यावर चर्चा व्हायला हवी. प्रत्येक व्यक्तीचे आकलन हे गुणात्मक दृष्टीने अगदी वेगळ्या पातळीवरचे असणार. पण पुरेसे आकलन न होताच ‘व्यक्त होण्याची घाई’ हा घटक मला दिसला. उपलब्ध माहितीला, आपल्या विचारांना पोषक पुरावा म्हणून वापरण्याची चतुराई दिसली. समोरची व्यक्ती चिडत असताना होणारा आसुरी आनंद (Sadistic pleasure) सुद्धा काही संवादांमध्ये उघड दिसत होता. स्वतःच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचा बेलगाम विश्वास तर ठायी-ठायी दिसत होता. ह्या संवादामध्ये सहभागी झालेल्या किती व्यक्ती त्या मुद्द्यांचा नव्याने अभ्यास करतील; मला ठाऊक नाही... विवादामध्ये अडकलेल्या मंडळींच्या अभ्यासूपणाच्या क्षमतेबद्दल नव्हे, पण इच्छेबद्दल मला शंका वाटली. ‘आम्हाला कळले तेच अंतिम सत्य’ हा अभिनिवेश नसता, तर ह्या चर्चा सखोल झाल्या असत्या.

लॉकडाऊनच्या काळामध्ये, भोवतालची परिस्थिती आणि आपले मन ह्यावर विविध अंगांनी विचार करत गेलो आणि माझे लिखाण सुरू झाले. पंतप्रधानांनी रात्रीच्या दीपदर्शनाचे प्रतीकात्मक आवाहन केल्यावर माझ्या मनात विचार आला की, कोणत्याही कल्पनेला उथळ उत्सवी स्वरूप देण्यापेक्षा (तसा पूर्वानुभव लॉकडाऊनच्या सुरुवातीचा होताच) आपण काय करतो आहोत, ते समजून घेऊन तरी सहभागी व्हा. ज्यांना हे पटत नाही, त्यांना सहभागी न होण्याचे स्वातंत्र्य आहेच. म्हणून मी, ‘प्रकाश आणि माणूस’ यांच्या नात्यावरचे एक टिपण तयार केले. त्यामध्ये प्रकाशाचे प्रतीक परंपरेमध्ये कसे वापरले गेले आहे त्याचा आढावा होता. हे टिपण लेखी व ऑडिओ स्वरूपात बऱ्यापैकी व्हायरल झाले आणि माझ्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला, अक्षरश: पाऊस! त्यातल्या काही भावुक होत्या, काही मुद्देसूद, काही टीका करणाऱ्या. ‘तुम्ही आता मोदीभक्त बनला आहात’, ‘ह्या विषयावर लिहिण्याची वेळच चुकीची आहे.’ इथंपासून ‘तुम्ही उजव्या विचारसरणीला बळकटी देत आहात’ अशा भावना व्यक्त झाल्या. दुसऱ्या बाजूने ‘उजव्या’ विचाराच्या व्यक्ती-संघटनांना झालेला ‘आनंद’ही त्यांनी माझ्यापर्यंत पोचवला. काही जणांची नकारात्मक प्रतिक्रियाही समतोल होती. ‘तुमचा लेख हा लालित्य आणि माहितीपूर्णता ह्यात उत्तम होता, पण तुम्ही एका अशास्त्रीय अभिव्यक्तीला नकळतपणे पाठिंबा दर्शवलात.’ अशा प्रतिक्रियांना मी माझे खुलासा करणारे मतही पाठवले.

पण मला गंमत वाटली अशी की, मजकूर वाचतानाच आपले मन विचारसरणीच्या, भेदांच्या काटेकोर रेघा मारायला लागते. माझ्या राजकीय-सामाजिक धारणेच्या अनुकूल मत नसले तर ती व्यक्ती आता ‘माझ्या बाजूची, विचारांची’ राहिलेली नाही, असा निष्कर्ष काढला जातो. त्याच वेळी काही मने उल्हसितही होतात की, ह्या मजकुराचा आणि (जमल्यास) व्यक्तीचा वापर मी माझ्या उद्दिष्टांसाठी कसा करणार?

अगदी छोट्या प्रमाणात मला जो अनुभव आला, तो प्रत्येक लेखकाचा सार्वकालीन अनुभव आहे. काही मते आवडतील, काही पटतील, काही नाही पटणार... संवाद साधून सांगू की एकमेकांना... पण भिन्न विचार-सरणींबद्दल, न पटणाऱ्या विचार धरणाऱ्या व्यक्तींबद्दल का रोष पकडायचा? का दोषारोप करायचा?

समाजमाध्यमांमधून येणारी आक्रमकता आणि पूर्वग्रहाचे अत्यंत हीन शब्दांमध्ये होणारे प्रकटीकरण ह्या गोष्टी जर वाढीला लागल्या असतील, तर त्याचाही अभ्यास करायला हवा. म्हणून मी दि. 20 ते 27 एप्रिल ह्या दरम्यानचे राजकीय-सामाजिक विषयांवरचे मराठी-मधले एकूण दहा युट्यूब व्हिडिओ निवडले. ते ज्या चॅनेल्समध्ये होते, त्यांची वर्गणीदार संख्या पन्नास हजारांवर आहे असे पाहिले. ह्या दहा कार्यक्रमांमध्ये विविध राजकीय-सामाजिक विषयांवरचे कार्यक्रम येतील असे पाहिले आणि व्हिडिओ प्रसृत झाल्यावर पहिल्या तीन दिवसांमध्ये आलेल्या सर्व प्रतिक्रिया वाचल्या. त्यांची संख्या 1920 भरली. प्रत्येक कार्यक्रमातल्या पुढच्या काळातल्या प्रत्येकी आठ लेखी प्रतिक्रिया घेऊन माझा Sampal Size मी 2000 केला.

आता ह्या दोन हजार लेखी प्रतिक्रियांमध्ये काही एकदाच केलेल्या होत्या, ज्यांच्यावर पुढे वाद-विवाद झाले नव्हते. आणि एक गट असा होता, ज्यावर पुढे बऱ्यापैकी घुसळण झाली होती. काही प्रतिक्रिया अगदी थोडक्यात आणि ‘छान... छान’ अशा होत्या. काही तपशिलात जाऊन, ‘काय आवडले, काय नाही’ अशी चिकित्सा करणाऱ्या होत्या.

ताठरपणा दाखवणाऱ्या, दुराग्रहाकडे जाणाऱ्या आणि दोषारोप करणाऱ्या प्रतिक्रीया वेगळ्या काढण्यासाठी मी वापरलेले निकष असे- शिव्या आणि दूषणांचा वापर :

ज्याने लिहिले त्याला

ज्यावर चर्चा सुरू आहे त्या व्यक्तीला (टिळक, फुले, मोदी, ठाकरे)

जो सादरकर्ता/वक्ता आहे त्याला.

मुद्द्याचा प्रतिवाद न करता एककल्ली आरोप करणे. धमकीचा मजकूर : ‘बघून घेऊ’, ‘गाठ आहे’, ‘याद राखा’ असे शब्दप्रयोग. त्यातच ‘सहनशक्तीचा अंत’ ही भावना दाखवणारे प्रतिसादही आले.

तीव्र नकारात्मक भावना : उदा.- द्वेष, संताप आता आपण पहिल्यांदा तक्ता पाहू या.

तक्ता - 1

एकूण कार्यक्रम : 10

सरासरी कालावधी : 35 मिनिटे

भाषा : मराठी

चॅनेल्स : खासगी वृत्तविषयक सामाजिक-सांस्कृतिक

सरासरी सदस्यसंख्या : 50,000

कालावधी : 20 ते 27 एप्रिल

तक्ता - 2

अभ्यासलेल्या एकूण प्रतिक्रिया : 2000

आकलनावर वाद नाही (वाद-विवाद नाही) : 585

चिकित्सक प्रतिक्रिया (संवाद झाला) : 230

तीव्र प्रतिक्रिया (पूर्वग्रहदूषित) : 1185

विवाद मालिका (संभाषण-साखळी सुरू झाली अशा) : 85

सरासरी लांब (किती पोस्ट्‌स) : 26

मी हे स्पष्ट करतो की, ही काही काटेकोर शास्त्रीय पाहणी नाही. माझ्या आकलनासाठी मी केलेला हा मर्यादित अभ्यास आहे. त्यातही प्रस्तुत कालखंडही मानसिक तणावाचा आहे. परंतु ह्या कालखंडामध्ये आपली ‘खरी’ भावनिक रूपे बाहेर पडू शकतात. पुन्हा ‘सोशल मीडिया’वर असा सक्रिय गट हा मर्यादित असणार. पण महत्त्वाचे निरीक्षण असे की, लिहिण्याच्या शैलीवरून यामध्ये ‘ज्येष्ठ’ वयोगटातील मंडळी कमी आहेत. वाद न झालेल्या आणि चिकित्सक प्रतिक्रियांमध्ये स्त्रियांच्या प्रतिक्रिया जवळजवळ 65 टक्के आहेत. ज्या विवाद्य संवादमालिका आहेत, त्यांतील एकूण 1185 प्रतिक्रियांपैकी स्त्रियांची नावे असलेल्या जेमतेम 147 आहेत. कधी कधी समाजमाध्यमांवर स्त्री-पुरुष कोण, हे नीटपणे कळत नाही. म्हणजे बहुसंख्येने पुरुषांचे प्रतिसाद आक्रमक आहेत.

संख्येच्या पलीकडे जाऊन ह्या व्यक्ती कोणत्या तऱ्हेचे पूर्वग्रह मांडतात, त्याचा अभ्यास आता करू या. विचारप्रक्रिया समजून घेण्यासाठी ते महत्त्वाचे. एकूण ‘विवाद-मालिकां’पैकी पंचवीस ते सत्तावीस ठिकाणी मला ‘उचकवण्याचा’ उघड सूर दिसला. म्हणजे ‘हे कुठले लोकमान्य, हे तर भटमान्य’ अशी सुरुवात करणे. ‘‘ xxx ला मेडिकल कशाशी खातात, ठाऊक आहे का?’’ किंवा सरळ शिवीगाळ... ह्याला आपण Active Trolling म्हणू शकतो.

एकूण प्रतिक्रियांपैकी 50 टक्क्यांहून जास्त भावनिक दृष्टीने तीव्र आहेत. त्यातल्या जातिवाचक प्रतिसादांची संख्या 350 च्या घरात जाते. धर्मविषयक लेबलिंग असलेला आशय 250 च्या घरात. म्हणजे 60 टक्के ‘लेबलिंग’ हे जात आणि धर्म ह्या दोन मुद्द्यांवर होतं आहे. ब्राह्मण-ब्राह्मणेतर, दलित-अन्य, हिंदू-मुस्लिम, हिंदू-बौद्ध असे ठळक विवाद दिसतात. ते वादविवाद त्या-त्या जातीत जन्मलेल्या लोकोत्तर पुरुषांपर्यंत नेण्याची तर वहिवाटच दिसते.

उरलेले जवळजवळ चाळीस टक्के पूर्वग्रह हे कार्यक्रम सादर करणाऱ्या किंवा तिथे वक्ता म्हणून बोलावलेल्या वक्त्यांबद्दल अचकट-विचकट आणि प्रसंगी अश्लील बोलले गेलेले आहे. ह्या अभ्यासात घेतलेल्या दहाच्या दहा कार्यक्रमांना कोरोनाची पार्श्वभूमी आहे.

अशा प्रकारचा अभ्यास खरे तर फेसबुक पोस्ट्‌सचाही व्हायला हवा. त्यासाठीचे संख्याशास्त्रीय आणि अन्य निकष शोधायला हवेत. पण माझ्या वैयक्तिक आणि तुटपुंज्या, अपूर्ण अभ्यासाने मला विचारप्रवृत्त केले, हे नक्की.

कोरोनासारखी भौतिक अडचण एका बाजूला संपूर्ण मानव-जातीला एकाच मापात (थोड्याफार फरकाने) मोजत आहे. पण ह्या प्रसंगी समाजाचे विघटन आणि विचारांचे जहाल ध्रुवीकरण करणाऱ्या विचारांनाही जोम मिळत असेल, तर त्यावर चर्चा व्हायला हवी. प्रत्येक व्यक्तीचे आकलन हे गुणात्मक दृष्टीने अगदी वेगळ्या पातळीवरचे असणार. पण पुरेसे आकलन न होताच ‘व्यक्त होण्याची घाई’ हा घटक मला दिसला. उपलब्ध माहितीला, आपल्या विचारांना पोषक पुरावा म्हणून वापरण्याची चतुराई दिसली. समोरची व्यक्ती चिडत असताना होणारा आसुरी आनंद (Sadistic pleasure) सुद्धा काही संवादांमध्ये उघड दिसत होता. स्वतःच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचा बेलगाम विश्वास तर ठायी-ठायी दिसत होता. ह्या संवादामध्ये सहभागी झालेल्या किती व्यक्ती त्या मुद्द्यांचा नव्याने अभ्यास करतील; मला ठाऊक नाही... विवादामध्ये अडकलेल्या मंडळींच्या अभ्यासूपणाच्या क्षमतेबद्दल नव्हे, पण इच्छेबद्दल मला शंका वाटली. ‘आम्हाला कळले तेच अंतिम सत्य’ हा अभिनिवेश नसता, तर ह्या चर्चा सखोल झाल्या असत्या.

माझे वैयक्तिक मत असे बनले की, ह्या प्रतिक्रियांपैकी अभ्यासू आणि चिकित्सक प्रतिक्रियांचे प्रमाण खूप कमी होते. समाजमाध्यमांचा बहुसंख्याकांवरचा वाढता प्रभाव आणि अभ्यासू प्रतिक्रियांचे व्यस्त प्रमाण हा मुद्दा मला काळजी करण्यासारखा वाटला.

समाजातले विविध घटक ‘विचार’ कोणत्या प्रकारे करतात, हे त्या समाजाची उन्नती किंवा ऱ्हासाचे प्रमुख कारण असते. आपण सर्व तऱ्हेच्या पाहण्या करतो; पण माणसं विचार कोणता आणि कशी करतात, ह्याचे संशोधन प्रकल्प खूप मर्यादित असतात. या निमित्ताने मानसशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र अशा विविध विद्याशाखांनी एकत्र येऊन माणसांचे दृष्टिकोन (Attitudes) आणि धारणा (Beliefs) ह्यावर अभ्यास आखणे जरुरीचे आहे.

पूर्वग्रह म्हणजे Prejudices आणि दुष्टग्रह म्हणजे Delusional Prejudices! पूर्वग्रहाचे रूपांतर दुष्टग्रहात होणे म्हणजे मातीच्या भिंतीच्या जागी चिरेबंदी तट तयार होणे. समाजामध्ये आणि माणसामध्येही पूर्वग्रह राहणार. निवडलेल्या सामाइक ध्येयासाठी पूर्वग्रहांना बाजूला ठेवून सहकार्य करता आले तरी उत्तम. मात्र पूर्वग्रहांचे दुष्टग्रह होऊ लागले तर विखार वाढतो, आत्ममग्नता वाढते. कडवेपणातून येणारी आक्रमकता प्रसंगी विवेकाला हतबल करू शकते. म्हणूनच माणसाची वैचारिकता कशी घडते, कशी घडावी याची मानसशास्त्रीय मांडणी करणे गरजेचे वाटते.

डॉ. आनंद नाडकर्णी, ठाणे.

या लेखाचा उत्तरार्ध म्हणावा असा लेख पुढील अंकात-

विचारांचे पूर्वग्रह आणि कसोटीचा काळ

कोणत्याही विषयावरच्या एकांगी विचारांमुळे आजवर ढ़जग पुढे गेलेलं नाही. खरे तर अनेक विचारधारांचे स्वागत करत त्यांना तपासणे आणि त्यांची आपल्या उद्दिष्टाप्रमाणे जुळवणूक करणे महत्त्वाचे. करोनाची लस करण्यासाठी शास्त्रज्ञांचा जागतिक गट किती पद्धतीने विचार करत असेल आज...वेगवेगळ्या जागतिक सत्तांचे काही नेते आपले पूर्वग्रह दूषित बोलणे हेच अंतिम सत्य मानताहेत...पण ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ‘भेदाभेद अमंगळ’ ही उक्ती जगणारे मात्र जगाला एका संकटापासून वाचवायची साधना करतााहेत; विघटनाच्या पूर्वग्रहांच्या तटबंद्या पार करत़!

Share on Social Media

कालपरवा

अधिक चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी क्रिकेटने मदत केली तेव्हा...

रामचंद्र गुहा

इंग्लड व ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI ’ यांच्यातील ते पाच क्रिकेट सामने आधी अधिकृत कसोटी सामने मानले गेले होते. नंतर मात्र आयसीसीने तो दर्जा काढून घेतला. त्यामुळे त्या कसोटी सामन्यांमध्ये जे खेळले, त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या सांख्यिकी माहितीत या सामन्यांना मोजले गेलेले नाही. पण त्याने काहीही फरक पडत नाही. कोणतीही गोष्ट- मी पुन्हा एकवार सांगतो, कोणतीही गोष्ट 50 वर्षांपूर्वी इंग्लडमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यांचे ऐतिहासिक महत्त्व हिरावून घेऊ शकणार नाही. हे खरे आहे की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमध्ये अधिक असे काही क्वचितच असते. मात्र त्या दोन महिन्यांमध्ये खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होते. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचे समाजातील स्थान व अधिकार ठरवले जाण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.

सन 2008 मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या तेरा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडते आहे की, या वर्षी ही स्पर्धा होणार नाही. त्यामुळे आयपीएलचे चाहते नक्कीच निराश झाले असतील. त्यापैकी काहीं जणांना आपण या वर्षी आयपीएलच्या आनंदापासून वंचित राहिलो असेही वाटले असेल. पण त्यांनी इंग्लिश क्रिकेट- चाहत्यांचा विचार केल्यास त्यांचे दुःख थोडे हलके होईल. कारण इंग्लंडमध्ये 1946 पासून आतापर्यंत म्हणजे गेली 74 वर्षे कौंटी क्रिकेट (आपल्याकडे जशी रणजी ट्रॉफी असते तशी इंग्लंडमधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा) नियमितपणे चालत आले आहे. या वर्षी मात्र कौंटीचे सामने होणार नाहीत. त्यामुळे इंग्लिश क्रिकेटचाहते त्या मोठ्या आनंदाला मुकणार आहेत.

दुसरे महायुद्ध 1945 मध्ये संपले, तेव्हापासून दर वर्षीच्या उन्हाळ्यात इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेटचे सामने खेळले जातात. तसेच, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटही नियमितपणे खेळले जात आहेच. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ 1970 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर येणार होता. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी व्यवस्थेच्या (apartheid regime) धोरणानुसार त्या संघातील सर्व खेळाडू श्वेतवर्णीय असणार होते. मात्र याच सुमारास दक्षिण आफ्रिकेशी क्रीडाविषयक संबंधांवर बहिष्कार टाकावा यासाठीची चळवळ इंग्लंडमध्ये जोर धरत होती. याचे कारण होते डी ऑलिव्हिएरा प्रकरण. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर 1968-69 मध्ये जाणाऱ्या इंग्लंडच्या क्रिकेट संघात बेसिल डी ऑलिव्हिएरा हा (दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन इथे जन्मलेला व नंतर ब्रिटिश नागरिक झालेला) मिश्रवर्णीय क्रिकेटपटू असणार होता. ‘हा खेळाडू जर दौऱ्यावर येणार असेल तर आम्ही इंग्लंडच्या संघाबरोबर खेळणार नाही’, असे दक्षिण आफ्रिकेने जाहीर केले होते. मात्र या दौऱ्यातून डी ऑलिव्हिएराला वगळण्यास इंग्लंडने नकार दिला होता. त्यामुळे मग इंग्लंडच्या संघाचा 1968-69 चा पूर्वनियोजित दक्षिण आफ्रिका दौराच रद्द झाला होता. (पुढे हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रीडावर्तुळात फारच गाजले. क्रिकेटच्या बाहेरसुद्धा याची दखल घेतली गेली. डी ऑलिव्हिएरा प्रकरणामुळे 1970 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वर्णभेदी दक्षिण आफ्रिकेशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यावर बंदी घातली. याचबरोबरीने अशी बंदी इतरही खेळांवर घालण्यात आली होती व ही बंदी 1992 पर्यंत टिकली.)

मात्र सर्व श्वेतवर्णीय खेळाडू असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या (स्प्रिंगबॉक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या) रग्बी संघाने 1969-70 मध्ये इंग्लडचा दौरा केला होता. त्या दौऱ्याच्या निमित्ताने डाव्या विचारसरणीच्या ‘न्यू स्टेट्‌समन’ या साप्ताहिकाने 'Apartheid is Not a Game' या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध करून त्या दौऱ्यावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले होते; तर उजव्या विचारसरणीच्या ‘स्पेक्टॅटर’ या नियतकालिकाने न्यू स्टेट्‌समनच्या लेखाचा प्रतिवाद करताना असे उत्तर दिले होते की, खेळ आणि राजकारण यांची सरमिसळ करता कामा नये. अर्थात रग्बी संघाचा नियोजित तो दौरा यथास्थित पार पाडला. मात्र दक्षिण आफ्रिकेचा रग्बी संघ जिथे जिथे गेला तिथे तिथे त्याना निषेधाला तोंड द्यावे लागले होते. एकदा तर त्या संघाच्या बसचे अपहरणही करण्यात आले होते.

त्या काळात ‘मेरिलिबॉन क्रिकेट क्लब’ (एमसीसी) या संस्थेचे इंग्लिश क्रिकेटवर वर्चस्व होते. अतिशय कर्मठ दृष्टिकोन असेलेल्या या संस्थेने 1970 मध्ये नियोजित असलेला दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा पार पडायला हवा मार्टिन विल्यमसन यांनी अशी भूमिका घेतली होती. या सर्व वाद-विवादाचा छोटेखानी पण उत्कृष्ट रीतीने इतिहास लिहिला आहे. त्यांनी असे लिहिले होते की, ‘(एमसीसीचे पदाधिकारी म्हणजेच) इंग्लिश क्रिकेटचे धुरीण त्यांच्या निर्णयावर ठाम होते. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा दौरा होऊ द्यावा, अशी त्यांची भूमिका होती. एमसीसी व आयसीसी यांच्या काही बैठकांच्या नोंदीनुसार असे लक्षात येते की, इंग्लिश क्रिकेटचे धुरीण इंग्लंडमध्ये मेट्रिक (दशमान) मापनपद्धती लागू करण्यात आल्यामुळे (अंतरे व वजने यांच्यामध्ये) होणाऱ्या बदलांबाबत चिंताग्रस्त होते. उदा.- खेळपट्टीची लांबी 22 यार्डांऐवजी 20.12 मीटर होणार आहे आणि क्रिकेटच्या चेंडूचे वजन साडेपाच औन्सवरून 155.8 ग्रॅम होणार आहे. या बदलांशी कसे जुळवून घ्यायचे याची त्यांना चिंता होती.’ (See https://www.espncricinfo.com/story/š/id/22252177/politics-killed-tour) एकीकडे असे होत असतानाच दुसऱ्या बाजूला, मूळचे दक्षिण आफ्रिकेचे पण आता अनिवासी रहिवासी म्हणून इंग्लंडमध्ये राहणारे पीटर हेन यांच्यासारख्या काही कार्यकर्त्यांनी वर्णभेदी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा दौरा होऊ नये, अशी आग्रही भूमिका घेतली होती. तो दौरा होऊ नये या भूमिकेला अनेकांनी पाठिंबा दिला, त्यात क्रिकेटविषयी लिहिणारे नामवंत लेखक व समालोचक जॉन अर्लोट यांचाही समावेश होता. तेदेखील आयुष्यभर वर्णभेदाच्या धोरणाचे कडवे विरोधक होते. (डी ऑलिव्हिएराला इंग्लडमध्ये येण्यासाठी त्यांनीच मदत केली होती.) ‘जर हा दौरा झालाच, तर त्या सामन्यांचे समालोचन मी करणार नाही,’ अशी भूमिका अर्लोट यांनी घेतली. इतर पत्रकारांनीही त्यांना पाठिंबा दिला. परंतु, ‘पहिली कसोटी पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल’, असे 20 मे 1970 रोजी जाहीर करून इंग्लिश क्रिकेटच्या धुरिणांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

मात्र, या घोषणेनंतर केवळ तीनच दिवसांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा इंग्लंड दौरा रद्द करण्यात आला आहे, असे जाहीर झाले. इंग्लिश क्रिकेटच्या धुरिणांना इतक्या लवकर शरणागती का पत्करावी लागली, या प्रश्नाचे उत्तर क्रिकेटच्या बाहेर होते. तेव्हा इंग्लडमध्ये मजूर पक्षाची सत्ता होती आणि त्या पक्षातील सदस्यांचा एक मोठा गट वर्णभेदाच्या विरोधात होता. त्यामुळे ब्रिटनचे तत्कालीन गृहमंत्री जेम्स कॅलाघन यांनी एमसीसीला एक खरमरीत पत्र लिहिले होते व तो दौरा रद्द करण्यात यावा, असे सांगितले होते. ब्रिटिश सरकारला दुखवू इच्छित नसल्यामुळे एमसीसीने ते सामने रद्द केले होते. तेव्हा ब्रिटनमध्ये हुजूर पक्ष सत्तेत असता तर कदाचित तो दौरा झाला असता आणि मग त्याचे काय परिणाम झाले असते, कोण जाणे!

या साऱ्या गदारोळात 1970 च्या कौंटी क्रिकेटचे सामने नेहमीप्रमाणे चालूच होते. मात्र आंतरराष्ट्रीय कसोटी सामनेच होणार नसतील, तर त्यामुळे निर्माण झालेली वेळापत्रकातील पोकळी कशाने भरून निघणार होती? याच सुमारास उर्वरित जगातील अव्वल क्रिकेट खेळाडूंचा एक संघ ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ या नावाने पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर येणार, असे ठरले. एक विलक्षण प्रेरणादायी मानावे असे हे पाऊल होते. गिनीस या मद्य कंपनीने त्या कसोटी मालिकेसाठी 20 हजार पौंड रकमेचे प्रायोजकत्व देण्याची तयारी दर्शवली. त्या काळी ही रक्कम बरीच मोठी होती.

तर, बरोबर 50 वर्षांपूर्वी याच महिन्यात (मे 1970 मध्ये) उर्वरित जगातील विविध वंशांच्या अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूंचा संघ ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ इंग्लडच्या संघाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळण्यासाठी निवडला गेला. क्रिकेट इतिहासातला आजवरचा सर्वोत्तम क्रिकेटपटू मानला जातो, त्या वेस्ट इंडीजच्या सर गारफिल्ड सोबर्सकडे त्या संघाचे नेतृत्व होते. सोबर्सशिवाय वेस्ट इंडीजचेच रोहन कन्हाय, क्लाइव्ह लॉईड, लान्स गिब्स व डेरिक मरे हे अन्य चार कृष्णवर्णीय खेळाडूही निवडले गेले. दक्षिण आफ्रिकेतून बॅरी रिचड्‌र्स, ग्रॅहॅम पोलॉक, एडी बार्लो, पीटर पोलॉक (शॉन पोलॉक या प्रसिद्ध खेळाडूचे वडील) आणि माईक प्रॉक्टर हे पाच श्वेतवर्णीय खेळाडू निवडले गेले. पाकिस्तानचे इंतिखाब आलम व मुश्ताक महम्मद, ऑस्ट्रेलियाचा ग्रॅहम मॅकेन्झी आणि भारताचा फारूक इंजिनिअर हे खेळाडूही त्या संघात होते.

खेळातील कौशल्याच्या बाबतीत यजमान इंग्लडचा संघ ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’वर मात करू शकेल इतक्या ताकदीचा नव्हता. मात्र इंग्लंडच्या संघामध्येही काही उत्तम खेळाडू होते. भरपूर अनुभव असलेला कप्तान रे इलिंगवर्थ हा चातुर्य व डावपेचात्मक बुद्धी यासाठी ओळखला जात असे. जेफ बॉयकॉट व कॉलिन कॉड्री हे दर्जेदार फलंदाज आणि जॉन स्नो व डेरेक अंडरवूड हे चांगले गोलंदाज त्या संघात होते. इंग्लंडचा ॲॅलन नॉट तर जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणून ओळखला जात होता.

अशा रीतीने यजमान इंग्लंड विरुद्ध ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली. पहिल्या सामन्याचा प्रारंभ लंडनमध्ये 17 जून 1970 रोजी (क्रिकेटची मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) ‘लॉर्ड्‌स’- च्या मैदानावर झाला, तर शेवटचा सामना लंडनमधीलच ‘द ओव्हल’ या दुसऱ्या क्रिकेट मैदानावर झाला. ही कसोटी मालिका बरोबर दोन महिने चालली. नॉर्टिगहॅम येथे खेळला गेलेला दुसरा कसोटी सामना इंग्लडने जिंकला. इतर चार सामने मात्र रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI संघाने जिंकले. या मालिकेत सोबर्स, लॉईड आणि बार्लो यांनी प्रत्येकी दोन शतके झळकावली. अन्य काही पाहुण्या खेळाडूंचीही उत्कृष्ट फलंदाजी इंग्लंडमधील क्रिकेटप्रेमींना पाहता आली. दक्षिण आफ्रिकेच्या एडी बार्लोने अष्टपैलू कामगिरी करत त्याच्याच देशातील माईक प्रॉक्टर याच्याप्रमाणेच उत्तम गोलंदाजीही केली.

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने 1965 मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात डावखुरा फलंदाज ग्रॅहम पोलॉक याने लक्षणीय कामगिरी करून चांगलाच ठसा उमटवला होता. त्यामुळे 1970 च्या मालिकेत ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ कडून खेळणाऱ्या पोलॉककडून पुष्कळ अपेक्षा होत्या. पहिल्या चारही सामन्यांत त्याची कामगिरी मध्यम दर्जाची होती. मात्र ‘द ओव्हल’वर झालेल्या अखेरच्या सामन्यात मात्र त्याने सहजसुंदर आणि उत्कृष्ट फटकेबाजी करीत आकर्षक असे शतक झळकावले. या डावादरम्यान पोलॉकने गॅरी सोबर्ससह खेळपट्टीवर बराच काळ टिकाव धरून फलंदाजी केली. या दोघांनी अतिशय कमी कालावधीत दीडशे धावांची भागीदारी केली.

ग्रॅहम पोलॉकच्या त्या शतकी खेळीचे काही भाग युटयूबवर उपलब्ध आहेत. ते पाहून त्या भागीदारी संदर्भात त्या काळी काय लिहिले गेले होते, हे वाचण्याची इच्छा वाचकांना होऊ शकेल. जॉन अर्लोट यांनी ‘द गार्डियन’मध्ये लिहिले होते, (त्या दिवशी) जगातील दोन उत्कृष्ट डावखुरे फलंदाज सामन्याचा शेवट निश्चित करण्यासाठी व मैदान व्यापून टाकण्यासाठी एकत्र आले होते. पोलॉक खेळायला आल्यानंतर साधारण तासाभराने सोबर्स फलंदाजीला आला. (म्हणजे सोबर्स फलंदाजीला आला तेव्हा पोलॉक खेळपट्टीवर चांगलाच सेट झालेला होता.) तरीही या दोघांमध्ये चित्ताकर्षक अशी जुगलबंदी काही काळ चालू होती. पोलॉकने एक आकर्षक फटका मारला की, संधी मिळताच सोबर्सही तितकाच आकर्षक फटका मारत होता. एकाच्या पाठोपाठ दुसऱ्याचा टोला असे करत बरोबरी साधली जात होती. त्यांचे कव्हर ड्राइव्हज व स्क्वेअर कट्‌स यांची तुलना करणे म्हणजे उत्कृष्ट मनोरंजन होते. पण लवकरच सोबर्समधील कप्तानाला याची जाणीव झाली की, पोलॉकला अधिक मोकळीक देण्याची गरज आहे. मग त्याने कुशलतेने खेळत, मात्र स्वतःच्या वकुबाची जाणीव प्रेक्षकांना करून देण्यासाठी अधून-मधून फटके मारत, पोलॉकला जास्त स्ट्राईक देण्यातच समाधान मानले.

जॉन वूडकॉक यांनी ‘द टाइम्स’मध्ये लिहिले : गेली काही वर्षे या दोघांपैकी सर्वोत्तम फलंदाज कुणाला म्हणावे, याविषयी क्रिकेटपटू चर्चा करत होते. या कसोटी सामन्यामध्ये स्वतःच्या विजयाची खात्री बाळगणाऱ्या इंग्लडच्या संघविरोधात हे दोघे सोनेरी सूर्यप्रकाशात धावबाद होईपर्यंत एकत्र होते. दिवस मावळतीला जात असताना पोलॉकच्या प्रत्येक ड्राइव्हची बरोबरी तितकाच शानदार ड्राइव्ह मारून सोबर्स करत होता. काही काळानंतर मात्र तो पोलॉकची कामगिरी कामगिरी पाहणे पसंत करू लागला. याला ‘सिंहासनाचा त्याग’ म्हणण्यापेक्षा, त्याच्या मोठेपणाचे लक्षण मानणे योग्य ठरेल. समान क्षमतेच्या खेळाडूंमध्ये त्या दिवशी पोलॉक हा सर्वोत्तम फलंदाज होता. मात्र (हेही तितकेच खरे होते की) या मालिकेत सोबर्सची बरोबरी करणारे कुणीच नव्हते.

तर, अर्लोट नक्कीच आणि कदाचित वूडकॉक हे जाणून होते की ते त्या वेळी जे काही पाहत आहेत, ते खेळाच्या संदर्भात आणि सामाजिकदृष्ट्यादेखील फार महत्वाचे होते. पोलॉक आणि सोबर्स यांचे एकत्र खेळपट्टीवर असणे ही केवळ "aesthetic treat' नव्हती, तर अधिक चांगल्या आणि न्याय्य जगाची ती झलक होती. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे श्वेतवर्णीय व वेस्ट इंडीजचे कृष्णवर्णीय खेळाडू कधीही एकत्र खेळले नव्हते. या कसोटी मालिकेत मात्र सोबर्सच्या नेतृत्वाखाली पाच श्वेतवर्णीय दक्षिण आफ्रिकन खेळाडू समाधानाने खेळत होते, ही बाब वर्णभेदाचा सिद्धांत व त्याप्रमाणे केले जाणारे वर्तन यांचे निर्णायक रीत्या खंडन करण्यासाठी पुरेशी होती. इंग्लडच्या संघात पूर्वीचे दक्षिण आफ्रिकेचे असलेले व नंतर इंग्लडचे नागरिक झालेले श्वेतवर्णीय टोनी ग्रेग आणि मिश्रवर्णीय बेसिल डी ऑलिव्हिएरा हे दोघे एकत्र खेळत होते, ही बाबदेखील दखल घेण्याजोगी होती. कारण त्या दोघांच्या मातृभूमीमध्ये त्यांनी असे एकत्र खेळणे याची कल्पनासुद्धा शक्य नव्हती.

ऑगस्ट 1970मध्ये मी बारा वर्षांचा होतो आणि मला क्रिकेटचे वेड लागलेले होते. त्या वेळी बीबीसी रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ‘टेस्ट मॅच स्पेशल’ कार्यक्रमामध्ये या सामन्यांचे समालोचन मी ऐकले, आणि वृत्तपत्रांतून त्यांच्याविषयी वाचले. हा लेख लिहायला घेण्यापूर्वी काही प्राथमिक स्रोत पाहिले, त्या वेळी मला एक गोष्ट प्रकर्षाने आठवली की, एका सामन्यात (तो कोणता, याविषयी मला खात्रीने सांगता येत नव्हते) गॅरी सॉबर्स आणि ग्रॅहम पोलॉक एका अभेद्य भागीदारीसाठी एकत्र आले होते. त्या भागीदारीतील काही भाग मी रेडिओवर नक्की ऐकला असेल किंवा ‘क्रिकेटर’ या नियतकालिकात (माझे लाड पुरवणाऱ्या वडिलांनी माझ्यासाठी त्याचे सभासदत्व घेतले होते.) वाचला असेल. ते काहीही असो; श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय अशा त्या खेळाडूंमधील जुगलबंदीने इतक्या दूर भारतातील एका शाळकरी मुलाला प्रचंड प्रभावित केले होते, हे मात्र खरे. असाही विचार मनात येऊन जातो की, त्याच घटनेमुळे दक्षिण आफ्रिकेतील काही श्वेतवर्णीय, कृष्णवर्णीय आणि मिश्रवर्णीय मुलांवरदेखील तसाच प्रभाव पडला असेल.

इंग्लड व ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड XI’ यांच्यातील ते पाच क्रिकेट सामने आधी अधिकृत कसोटी सामने मानले गेले होते. नंतर मात्र आयसीसीने तो दर्जा काढून घेतला. त्यामुळे त्या कसोटी सामन्यांमध्ये जे खेळले, त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या सांख्यिकी माहितीत या सामन्यांना मोजले गेलेले नाही. पण त्याने काहीही फरक पडत नाही. कोणतीही गोष्ट- मी पुन्हा एकवार सांगतो, कोणतीही गोष्ट 50 वर्षांपूर्वी इंग्लडमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यांचे ऐतिहासिक महत्त्व हिरावून घेऊ शकणार नाही. हे खरे आहे की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमध्ये अधिक असे काही क्वचितच असते. मात्र त्या दोन महिन्यांमध्ये खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होते. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचे समाजातील स्थान व अधिकार ठरवले जाण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.

दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढाई लढली (व जिंकलीही) गेली ती प्रामुख्याने राजकीय आघाडीवर. मात्र खेळानेही त्यात- मर्यादित का होईना- भूमिका बजावली होती. गॅरी सोबर्स हा ‘वर्णभेदाच्या विरोधात मोहीम उघडणारा प्रचारक’ म्हणून ओळखला जात नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची राजकीय कृती करण्यासाठीही त्याची ओळख नक्कीच नाही. मात्र 1970च्या उन्हाळ्यात तो तसा होता आणि त्याच्या संघात व विरोधात खेळणारेही तसेच होते!

(अनुवाद : सुहास पाटील)

रामचंद्र गुहा, बंगळुरू

Share on Social Media

दृष्टिक्षेप

वुहान विषाणू व कन्फ्युशिअसची युद्धनीती

भाग 1 : काळ तर मोठा कठीण आला!

डॉ. निरुपमा व सुषमा गोविंद तळवलकर

वुहान विषाणूच्या साथीमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे तात्पुरते वा कायमचे बंद पडून जगभरच आर्थिक मंदी आली आहे. सर्व व्यवहार बंद असल्यामुळे अनेक छोटे धंदे बंद होऊन अमेरिकेत गेल्या 6 आठवड्यांत 3 कोटी लोकांनी बेकारीसाठी सरकारी मदत मिळावी म्हणून अर्ज केले. जूनपर्यंत हे प्रमाण लोकसंख्येच्या सुमारे 16 ते 20 टक्के होण्याची शक्यता आहे. 1930 च्या महामंदीनंतर अशी भीषण बेकारी व आर्थिक मंदी प्रथमच येत आहे. या वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांत अमेरिकेचे स्थूल उत्पादन सुमारे 5 टक्क्यांनी कमी झाले. गेल्या 3 वर्षांत ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अनेकांना नोकऱ्या मिळाल्या. जानेवारीत अमेरिकेतील बेकारांची संख्या सुमारे 2 लाख म्हणजे फक्त 3.5 टक्के होती. पण वुहान विषाणूमुळे लोकांच्या आरोग्याबरोबरच पोटावरही गदा आली, अनेक जण बेकार झाले व ही संख्या वाढत जाणारी आहे. पोलीस व अग्निशामक दलाच्या लोकांच्याही नोकऱ्याही गेल्या आहेत व आणखी जातील. ग्रंथालयांतही पुस्तकांची खरेदी कमी करणार आहेत.

‘‘युद्ध न करता शत्रुपक्षावर विजय मिळवायची कन्फ्युशिअसची युद्धनीती वापरून अमेरिकेस शह देणे आणि जगातील एकमेव महासत्ता असा मुकुट धारण करणे, गरीब देशांना मांडलिक पातळीवर उतरवून सर्वंकष अधिसत्ता गाजवणे ही चीनची महत्त्वाकांक्षा असून, त्या दृष्टीने गेली तीसएक वर्षे तो सर्व जगभर शिस्तबद्ध, योजनापूर्वक जाळे पसरीत आहे, याबद्दल सर्व जगाने सावध राहून चीनच्या साम्राज्यवादाला आळा घातला पाहिजे. सामूहिक हित महत्त्वाचे असून व्यक्तिस्वातंत्र्य गौण आहे, हे कन्फ्युशिअसचे तत्त्व कम्युनिस्ट तत्त्वप्रणालीतही आहे. सर्व जगभर अर्थव्यवस्था, बंदरे, दळणवळण, शिक्षण, प्रसारमाध्यमे, हॉस्पिटले, संशोधन संस्था व अनेक खात्यांत प्रवेश करून आपले वजन वाढविणे, काही भाग अंशत: वा पूर्णत: ताब्यात घेणे, तेथील स्थानिक लोकांत चीनचा प्रभाव व शक्ती वाढवणे, चीनला अनुकूल मतप्रवाह बनविणे, चीनविरोधकांच्या विरुद्ध वातावरण तयार करणे- हे कम्युनिस्ट तंत्र गेली काही वर्षे चीनने चालविले आहे, हे चिंताजनक आहे’’, असे आमचे वडील गोविंदराव तळवलकर नेहमी म्हणायचे. चीन व सौदी अरेबियाप्रणीत मुस्लिम दहशतवाद हे सध्या जगातील सर्वांत मोठे धोके आहेत, याबद्दल ते मोठा लेख लिहिणार होते. चिनी संस्कृतीच्या प्रचारासाठी अमेरिकेत अनेक ‘कन्फ्युशिअस संस्था’ चीनने स्थापन केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी काही सिनेटरांनी त्यांचा प्रचार व हेरगिरीविरुद्ध आवाज उठवून आणि पुरावे दाखवून त्यांतील काही बंद करायला लावल्या.

विषाणूच्या कवचावर मुकुटासारखी टोके असल्यामुळे कोरोना विषाणूच्या घराण्याला ते नाव दिले गेले. त्यांच्या रचनेत आरएनए हा घटक आहे. सर्दी व फ्लू या रोगांचे विषाणूही कोरोना घराण्याचे आहेत. पण नोव्हेंबर 2019 मध्ये चीनच्या हुबे परगण्यातील वुहान येथे प्रथम प्रादुर्भूत झालेल्या कोव्हिड-19 या विषाणूवर फ्लूच्या प्रतिबंधक लसीप्रमाणे लस अजून उपलब्ध नसल्यामुळे हा विषाणू सध्या तरी फ्लूपेक्षा काही पटींने अधिक संसर्गजन्य व घातक आहे.

या महासाथीची जगभरातील रुग्णसंख्या व मृतसंख्या पाहिल्यास 30 टक्के रुग्ण अमेरिकेत असून, मृतांपैकी 27 टक्के अमेरिकेत आहेत. तथापि, ज्या चीनमध्ये या साथीचा उद्‌भव झाला तिथे मात्र फक्त साधारणत: 83 हजार रुग्ण व 4 हजार मृत असल्याचा प्रचार चीनने चालविला आहे. मात्र खरी संख्या खूपच जास्त असणार. चीन खरे आकडे देत नसल्यामुळे सर्व देशांचे आकडे देताना त्यात चीनचे देणार नाही, असे ब्रिटनने जाहीर केले आहे.

अमेरिकेतील रुग्णांतील मृतांची टक्केवारी पाहिल्यास त्यांतील 36 टक्के न्यूयॉर्कमध्ये असून न्यूयॉर्क व न्यू जर्सीची एकत्रित टक्केवारी 48 टक्के होते. न्यूयॉर्क व कॅलिफोर्नियाच्या काही भागांत अलीकडे तपासणी केल्यावर दिसले की, बाधित लोकांपैकी (बाधित रुग्णांपैकी नव्हे) 50 टक्के लोकांत या रोगाची काहीही लक्षणे आढळली नव्हती. यातून असा निष्कर्ष निघतो की, अमेरिकेतील बाधित पण काहीच त्रास न झालेल्यांची संख्या पुष्कळ असणार. आधीचे अंदाज चुकीचे होते. म्हणजे या विषाणूची विनाशक शक्ती आधी वाटली तेवढी जास्त नाही. हे चांगले आहे. अमेरिकेत या विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांत 99.2 टक्के लोक हे साठीपेक्षा अधिक वयाचे असून त्यांना स्थूलता, मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडाचे विकार, हृदयविकार अशा इतर विकारांनी आधीच ग्रासले होते. रुग्णांच्या व मृत्यूंच्या संख्येत आफ्रिकी कृष्णवर्णीय व दक्षिण अमेरिकेतून आलेल्या वंशीयांचे प्रमाण जास्त आहे. या लोकांत गरिबीचे प्रमाणही जास्त असते. 24 टक्के रुग्ण नर्सिंग होममध्ये होते यात आश्चर्य वाटायला नको, कारण अमेरिकेतील शुश्रूषालये ही मृत्यूचे सापळे आहेत. या सर्वांची चौकशी करून ती कायमची बंद करणे आवश्यक आहे.

वुहानमध्ये नोव्हेंबर 2019 च्या मध्यासच ही साथ उद्‌भवून फोफावली, अनेक लोक मृत्यू पावले, असे आता बाहेर आले आहे. फेब्रुवारी-मार्चपासून इटली, अमेरिका व इतरत्र ही साथ वाढू लागल्यावर जगात लोकांना थोडी कल्पना येऊ लागली व विषाणूच्या संहारक शक्तीचा प्रत्यय आला. साथीचा प्रादुर्भाव झाल्यावर चीनने लगेचच ते जाहीर करून जागतिक आरोग्य संस्थेला माहिती दिली असती, तर या साथीचा जगभरातील प्रसार 95 टक्क्यांंनी कमी होऊन एवढी मनुष्यहानी झाली नसती.

‘‘थुंकण्यास कायमची बंदी करून थुंकणाऱ्यांना व रस्त्यांवर कचरा वा काहीही टाकणाऱ्यांना दंड ठोठाण्याचा सिंगापूरसारखा कायदा भारतात केल्यास ‘स्वच्छता हे देवाचे दुसरे नाव आहे’ अशा पाट्या न लावताच देव प्रसन्न होऊन आरोग्य सुधारण्याचे आणि गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे पुण्य सर्वांना मिळेल’’, असे बाबा म्हणायचे. आता असा कायदा केल्यास तो पाळण्यास विषाणूच्या भीतीने लोक अनुकूल असण्याची शक्यता आहे. शेकहँड्‌स करण्याऐवजी कोपराला कोपर लावावे, असे सांगण्यात आले आहे, पण ते चूक आहे. कारण यामुळे दुसऱ्या व्यक्तीपासून अंतर रहात नाही. हात जोडून नमस्कार करायची वा वाकून लवायची पद्धत आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे.

एकच घराणे असले तरी भावंडे, आई-वडील, मुले, पुढील पिढ्या यांत फरक होत जातो, तसाच अमेरिकेत व युरोपात या विषाणूंच्या प्रजावळीत फरक पडला. ए.बी.सी. असे तीन प्रकार युरोपात उद्‌भवले. जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाचे डॉ.गाट्टिनोनी यांनी सांगितले की, या रोगामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यावर तो रोगी अतिभराभर व जोराने श्वास घेऊन स्वत:च्या फुप्फुसांवर ताण पाडून त्यांना इजा करण्याची शक्यता असते. त्यामुळे श्वास घ्यायला जास्त त्रास होऊ लागण्यापूर्वी अगदी सुरुवातीलाच, रोग सौम्य अवस्थेत असताना श्वासनलिकेत नळी न घालता सीपॅप ( CPAP = continuos positive air pressure) हा जास्त दाबाची हवा नाकातून देण्याचा उपाय अवलंबिल्यास तो रोग लवकर आटोक्यात येऊन मग श्वसनयंत्र वापरण्याची गरज भासत नाही. अशा प्राथमिक सौम्य अवस्थेत श्वासनलिकेत नळी घालून कृत्रिम श्वसनयंत्र (व्हेंटिलेटर) वापरण्याचा आक्रमक उपाय करण्याची गरज नाही. आर्ड्‌स (ए.आर.डी.एस.) या फुप्फुसांच्या रोगात फुप्फुसांच्या लवचिकपणावर परिणाम होतो, फुफ्फुसातील हवेच्या व रक्ताच्या पुरवठ्यात फरक पडतो, श्वास घेण्यास विशेष त्रास होत नाही; पण त्या मानाने रक्तातील प्राणवायूचे प्रमाण मात्र कमी झालेले दिसते. वुहान विषाणूमुळे नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचा आर्ड्‌स होतो, असे त्यांनी सांगितले. बाधित रुग्णांचा अभ्यास करून डॉ.गाट्टिनोनींनी ते दोन प्रकारांत विभागले- फुप्फुसातील दुखापत झालेला भाग कमी असणारा, एल (इंग्रजीत लो या अर्थाने) हा सौम्य प्रकार; फुप्फुसातील अधिक भाग दुखापत होऊन हवा नसलेला व वजनदार असा, एच (इंग्रजीतील हाय या अर्थाने) हा जास्त गंभीर प्रकार. श्वासनलिकेत नळी घालून तिला श्वसनयंत्र जोडून हवेचा दाब जास्त देण्याचा उपाय आर्ड्‌ससाठी करावा लागतो. तसाच इलाज एच प्रकारच्या रुग्णांना उपयोगी पडतो. एल या सौम्य स्थितीत सुरुवातीलाच सीपॅपचा उपाय केल्यास दुखणे वाढणारच नाही व एचच्या गंभीर अवस्थेस ते पोचणार नाही, असे त्यांनी प्रतिपादिले. एचच्या रुग्णांना काही वेळ पोटावर उपडे झोपवल्यास त्यांचे प्राणवायूचे प्रमाण वाढण्यास उपयोग होतो. आजारातून बरे होताना डॉक्टरांच्या देखरेखीखाली श्वसनाचे व्यायाम करणे फायद्याचे आहे. सीपॅप व श्वसनयंत्र यांची तुलना केल्यावर सीपॅप वापरलेल्या रुग्णांत मृत्यूचे प्रमाण कमी होते, असे ‘जामा’ (जर्नल ऑफ अमेरिकन मेडिसिन) मधील लेखात दिले आहे. ब्रिटनमध्येही सीपॅपचा अनुभव चांगला असून श्वसनयंत्र वापरलेल्या रुग्णांपेक्षा मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

अमेरिकेत (व युरोपातही) ही साथ उद्‌भवल्यावर नक्की उपाययोजना कशी करावी, याबद्दल प्रथम कोणालाच माहिती नव्हती. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांनीही प्रथम चुका केल्या, पण मग सुधारल्या. अनेक रुग्णांना गरज नसताही श्वसनयंत्रावर टाकण्यात आले व त्यातील अनेक मृत्यू पावले. त्यामुळे सीपॅप लवकर वापरून मग श्वसनयंत्र लागणार नाही, असे आता बघितले जाते. न्यूयॉर्क शहरातील हॉस्पिटलांत कोव्हिडच्या रुग्णांमुळे सर्व अतिदक्षता विभाग भरून गेल्यामुळे दुसऱ्या काही विभागांत बदल करून तेही अतिदक्षता विभाग म्हणून वापरले गेले. श्वसनयंत्रे वापरताना त्यातील प्राणवायूचे प्रमाण, हवेचा दाब, हवेचे प्रमाण, रोग्याने श्वास घेण्याची गती, इत्यादी अनेक परिमाणे मोजूनमापून ठरवावी लागतात आणि रोग्याच्या अवस्थेप्रमाणे लगेच बदलावी लागतात, नाही तर अपाय होऊन रोगी दगावण्याचा संभव असतो. म्हणजे रोगापेक्षा उपाय जास्त वाईट ठरतो. अतिदक्षता विभागात काम करणे व श्वसनयंत्रे वापरता येणे हे तज्ज्ञांचे काम असते, केवळ एम.बी.बी.एस. झालेल्यांना ते ज्ञान नसल्यामुळे ते जमणार नाही. पण या साथीमुळे भरमसाट रोगी येऊन अशा तज्ज्ञांचा न्यूयॉर्क शहर व बाजूचे पाच विभाग यात तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे एम.बी.बी.एस. झाल्यावर पुढे फॅमिली डॉक्टर वा मानसोपचाराचे तज्ज्ञ होण्यासाठी शिक-णाऱ्या डॉक्टरांवर हॉस्पिटलांच्या अतिदक्षता विभागांतील व श्वसनयंत्रांवरील रोग्यांची देखभाल करण्याची वेळ आली. त्यांनी खूप चुका केल्या, जरूर नसताना काही रोग्यांना श्वसनयंत्रांवर टाकले, योग्य परिमाणे उपयोगात आणली नाहीत, अति हवा-दाब-गती वगैरे हानिकारक होऊन अनेक रोगी मृत्यू पावले. याबद्दल चिंता व्यक्त केली वा तक्रार केली तर शिक्षा म्हणून हॉस्पिटलमधील पुढचे शिक्षण बंद करतील, या भीतीने हे शिकाऊ डॉक्टर त्यांना येत नसून व करायची इच्छा नसूनही ही तज्ज्ञांची कामे करीत राहिले.

महासाथ आल्यावर फ्लूसारखीच वुहान विषाणूची चिन्हे प्रथम लक्षात आली होती. तथापि, हृदयावरही या विषाणूचा परिणाम होत असल्याचे सुरुवातीच्या काळात कोणाच्या लक्षात आले नव्हते. पण फेब्रुवारीतील न्यूयॉर्क शहरातील सर्व रोगांच्या रुग्णांच्या माहितीचे आता सिंहावलोकन केल्यावर असे दिसून आले की, तिथे त्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आलेल्यांचे व हृदयक्रिया बंद पडण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा 5 पट अधिक होते. कोव्हिड विषाणू संसर्ग शहराच्या ज्या भागात जास्त झाला होता, त्या भागातच ही हृदयविकाराचा झटका आलेल्यांची व त्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही जास्त होती. कोव्हिडमुळे हृदयविकार होऊन हे झटके आले, असे आता जमा झालेल्या माहितीवरून दिसते.

डब्लिनमधील रक्ताच्या रोगांचे तज्ज्ञ डॉ.ओडॉनेल यांनी ‘ब्रिटिश जर्नल ऑफ हिमॅटॉलॉजी’त लिहिले आहे की- कोव्हिड-19 मुळे गंभीररीत्या आजारी असलेल्या रुग्णांना केवळ न्यूमोनियाच झाला नाही, तर रक्ताच्या शेकडो सूक्ष्म गुठळ्या- विशेषत: फुप्फुसांतील रक्तवाहिन्यांत- झाल्या, रक्तात डी-डायमर या घटकाचे प्रमाण वाढले. 15 टक्के मृत्यू पावले. जे 27 टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात होते, त्यांच्या फुप्फुसांतील रक्तप्रवाह गुठळ्यांमुळे कमी झाल्यामुळे प्राणवायू खूप कमी झाला होता. इतर जंतू वा विषाणूंमुळे होणाऱ्या न्यूमोनियांमध्ये फुप्फुसांत अशा सूक्ष्म रक्तगुठळ्या आढळत नाहीत. ते कोव्हिड-19 चे वैाशिष्ट्य दिसते. या गुठळ्या होण्याची प्रक्रिया समजून घेतली; तर कोणते औषधोपचार उपयोगी पडतील हे समजण्यास मदत होईल, नवी औषधेही शोधता येतील. फुप्फुसंतील पेशींमधील एका घटकाशी (ACE 2 रिसेप्टर) संलग्न होऊन, या विषाणूंनी पेशींत प्रवेश करून इजा केल्यामुळे रक्तगुठळ्या होतात, असा एक मतप्रवाह आहे. पेशींमध्ये सायटोकाइन हे घटक असतात, ते विषाणूंचा नाश करण्यास शरीरातील प्रतिकारक पेशींना प्रवृत्त करतात. या प्रतिकारक पेशी वाजवीपेक्षा अधिक संख्येने उद्‌भवल्या, तर त्या शरीरांतील निरोगी पेशींचाही नाश करतात. याला सायटोकाइनचे वादळ म्हणतात. रक्ताच्या गुठळ्या होण्याचे हे कारण आहे, असा दुसरा मतप्रवाह आहे. सायटोकाइनच्या वादळामुळे रक्तातील थ्रॉम्बिनचे प्रमाण वाढून फुप्फुसांत फायब्रिन जमा होते व रक्त गोठते. फुप्फुस हे सूक्ष्म पेशी व रक्तवाहिन्यांचे आवरण असलेल्या हवेच्या असंख्य सूक्ष्म फुग्यांनी बनलेले असते. कोव्हिड-19 मुळे होणाऱ्या आर्ड्‌समध्ये या हवेच्या फुग्यांबरोबरच रक्तप्रवाहावरही आघात होतो. या दुहेरी आघातामुळे हवा शुद्ध होण्यास अडथळा होऊन प्राणवायूचे प्रमाण खूप घसरते. रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात, शिवाय रक्तवाहिन्यांच्या आवरणांतून रक्तही गळते. त्यामुळे रक्तदाब खाली जातो. गुठळ्या होऊ नयेत म्हणून औषधे देऊनही 20 ते 40 टक्के रोग्यांत असे झाल्याचे ॲटलांटाच्या एमरी विद्यापीठातील डॉक्टरांनी सांगितले. हृदयाच्या रक्तवाहिन्यांत गुठळ्या होऊन प्रवाह अडल्यास हृदयविकाराचा झटका येतो वा हृदय लगेच बंद पडते. मानेतील मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांतील प्रवाह अडल्यास पक्षघात होतो. पायांतील प्रवाह अडल्यावर उपचार करून त्या गुठळ्या काढून न टाकल्यास पांगळेपणा येऊ शकतो वा पायाचा भाग कापावा लागतो. गौरवंशाच्या लोकांत पायांतील अशुद्ध रक्तवाहिन्यांत गुठळ्या होण्याची शक्यता अधिक असते. पायाच्या या रक्तवाहिन्यांतून त्या गुठळ्या फुप्फुसांतील रक्तवाहिन्यांत जाऊन मृत्यू येऊ शकतो. फुप्फुस व हृदयाच्या रक्तप्रवाहातील अडथळा, हे या विषाणूमुळे येणाऱ्या मृत्यूचे एक मुख्य कारण आहे.

या विषाणूसाठी कोणती औषधे वापरावीत, याबद्दल या वर्षात आतापर्यंत तेराशेच्या वर शास्त्रीय संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत, पण निश्चित उपाय काय हे समजलेले नाही, असे अमेरिकन मेडिकल असोसिएशनने लिहिले आहे. 291 संशोधनपर लेखांचा अहवाल एप्रिलच्या ‘जामा’मध्ये आहे. क्लोरोक्विन, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, रेमडेसेव्हिर, रोटिनाव्हिर, युमिफेनोेव्हिर, फेविपिराव्हिर, टोक्लिझुमाब या औषधांचा यात ऊहापोह केला आहे. या औषधांच्या उपयुक्ततेबद्दल अजून पुरेशी माहिती समजलेली नाही. त्यांचे दुष्परिणामही लक्षात घ्यावे लागतात. सर्व उपाय थकून आशा राहिली नाही, असा दुर्धर रोग असेल तर त्यावर तशीच फारशी आशा न धरता दुर्धर उपाय करायची वेळ येते, हे तत्त्व हिप्पोक्रॅटिसने तेवीसशे वर्षांपूर्वीच प्रतिपादिले होते. शेक्सपिअरच्या हॅम्लेटने त्यावर परत शिक्का मारला. कोव्हिड-19 या विषाणूमुळे अत्यवस्थ झालेल्यांवर अखेरचा उपाय म्हणून क्लोरोक्विन, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, रेमडेसेव्हिर ही औषधे वापरून बघण्यास अमेरिकेच्या औषधनियंत्रण खात्याने आणीबाणीतील औषधे म्हणून डॉक्टरांना घाईघाईने परवानगी दिली. इबोला या विषाणूवर रेमडेसेव्हिर हे औषध परिणामकारी ठरले होते. अखेरचा उपाय म्हणून ही औषधे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कुठल्या रोग्यांना, केव्हा व किती द्यायची हे डॉक्टरांनी ठरवून त्यांनीच फक्त द्यायची आहेत, रोग्यांनी स्वत:च ठरवून दुकानातून आणून वापरायला परवानगी नाही, घरी घ्यायलाही नाही. या रोगातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील पेशी वेगळ्या केल्यावर जो पेशीविरहित द्रव (प्लाझ्मा) राहतो, त्यात विषाणुप्रतिकारक प्रतिद्रव्ये (अँटिबॉडी) असतात. हा प्लाझ्मा रक्तवाहिनीतून इंजेक्शनने आजारी रुग्णास देण्याचा उपायही करून पाहण्यात येत आहे.

नियाडचे (नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी ॲन्ड इन्फेक्शस डिसिझेस) प्रमुख डॉ.फाउची यांनी 29 एप्रिलला जाहीर केले की, 21 फेब्रुवारीपासून अनेक देशांतील हॉस्पिटलांत प्रयोग म्हणून काही वुहान विषाणूग्रस्त रुग्णांना गिलिआड कंपनीचे रेमडेसिव्हिर हे औषध 10 दिवस रक्तवाहिनीत इंजेक्शन देऊन दिले गेले व काहींना दिले नाही. ते सर्वच गंभीररीत्या आजारी असून त्यातील 30 टक्के श्वसनयंत्रावर होते. ज्यांना हे औषध दिले होते ते 11 दिवसांत बरे झाले, पण हे औषध न दिलेल्या रुग्णांना 15 दिवस लागले. हा फरक लक्षणीय होता. मृत्यूचे प्रमाणसुद्धा रेमडेसिव्हिर दिलेल्या रुग्णांत कमी म्हणजे 8 टक्के होते, तर न दिलेल्यांत 11 टक्के. या औषधाची उपयुक्तता व निकड पाहून एफडीएने (फूड ॲन्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन) तातडीनेे सर्व तपासून हे औषध वापरण्यास मान्यता दिली. सध्या दुसरा काहीच उपाय नसताना ते वापरून बघायला हरकत नाही, पण त्यामुळे प्रश्न सुटला असे नाही. यापेक्षा आणखी परिणामकारक औषधे तयार करता येऊन कोणते जास्त चांगले, हे ठरवावे लागेल. औषध व लस या दोन्हींचा उपयोग करावा लागेल. गिलिआडने दुसरा एक प्रयोग म्हणून हे औषध काही रुग्णांना 5 दिवस व काहींना 10 दिवस दिले. दोन्ही कालखंडातील रुग्णांना तेवढाच चांगला गुण आला. म्हणजे 10 ऐवजी 5 दिवस औषध दिले तरी पुरेसे आहे. याचा अर्थ ते रुग्ण हॉस्पिटलमध्ये कमी दिवस राहून खर्च कमी होईल व त्यांच्या खाटा दुसऱ्यांसाठी लवकर मोकळ्या होतील. गंभीर अवस्थेस पोचलेल्यांप्रमाणेच सुरुवातीच्या सौम्य अवस्थेतील रुग्णांनाही रेमडेसिव्हिर उपयुक्त असल्याचे या प्रयोगात आढळले. आता रेमडेसिव्हिरबरोबर मोनोक्लोनल अँटिबॉडी या प्रकारचे औषध देऊन या संयुक्त उपायाचा फायदा होतो काय आणि ही औषधे 5 दिवस की 10 दिवस वापरावत, हे बघण्याच्या प्रयोगास सुरुवात केली आहे. यकृतात रेमडेसिव्हिरचे पचन होऊन जात असल्यामुळे या औषधांच्या गोळ्या खाऊन उपयोग होणार नाही, सध्या रक्तवाहिनीतच इंजेक्शन द्यावे लागेल. पण त्चचेखाली टोचून वा नाकातून उपयोग होईल काय, हे बघण्याचे प्रयोग गिलिआड करीत आहे. ऑक्टोबरपासून नव्याने साथ येणार असेल, तर ज्या लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला असेल त्यांना रोगप्रतिबंधक म्हणून रेमडेसिव्हिर एकदा वा दोनदा दिल्यास उपयोग होऊ शकेल. नाकातून देता येत असेल, तर अधिक सोईचे होईल.

फायझर, जॉन्सन, मर्क, मॉडर्ना, इनोव्हियो, क्युअर व्हॅक इत्यादी 70 कंपन्या या विषाणूवर प्रतिबंधक लस तयार करण्याचे 100 हून अधिक प्रयोग करीत आहेत आणि या वेगवेगळ्या लसींचा वेगवेगळ्या प्रसंगी व अवस्थांत उपयोग होऊ शकेल. विविध प्रकारे व बऱ्याच उत्पादकांनी लस करणे आवश्यक आहे. कोणती लस सर्वाधिक प्रभावी असेल, हे आताच कळायला मार्ग नाही. काहींच्या चाचण्या माणसांमध्ये करायला मार्चमध्ये सुरुवात झाली. ऑक्सफर्डची जेन्नर संस्थाही एक प्रायोगिक लस करीत असून तिचे उत्पादन सिरम ही भारतीय कंपनी करीत आहे. सप्टेंबरच्या सुमारास आणीबाणीसाठी अत्यावश्यक म्हणून या लसी वापरण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. बायोएनटेक या जर्मन कंपनीकडे चार प्रकारच्या प्रायोगिक लसी असून अमेरिकेत फायझरबरोबर व चीनमध्ये फोसम फार्माबरोबर तिची भागीदारी आहे. चीनमधील चार कंपन्यांही लस करण्याच्या प्रयत्नात आघाडीवर आहेत, त्यापैकी एक चिनी लष्कराची आहे. चिनी कंपन्यापूर्वी युरोप, अमेरिकेतील कंपन्यांना यश मिळाल्यास चांगले.

साथ आल्यापासून हृदयविकाराचा झटका वा पक्षाघाताचा झटका आला तरी या विषाणूच्या भीतीने काही जण डॉक्टरकडे वा हॉस्पिटलात जाईनासे झाले. अशांची मृत्युसंख्याही नेहमीपेक्षा बरीच वाढली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यास तत्काळ उपाययोजना करावी लागते. बंद झालेल्या रक्तवाहिनीतील प्रवाह स्टेंट घालून चालू करायचा की सर्जनने ऑपरेशन करून चालू करायचा, हे ठरवावे लागते. या विषाणूचा संसर्ग होणार नाही अशी सर्व खबरदारी हॉस्पिटलमध्ये घेतली जाते, असा विश्वास लोकांनी बाळगणे आवश्यक आहे. छातीत दुखून हृदयविकाराचा झटका असल्याची शंका असल्यास लगेच हॉस्पिटलमध्ये यावे, विलंब करू नये, असे अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिऑलॉजीने मार्गदर्शनपर पत्रक काढले. झटका आला असेल तर इतर वेळी निर्णय घेतले जातात त्याच तत्त्वांवर या साथीतही घेऊन योग्य उपाययोजना केली जाते. कोव्हिडमुळे हृदयावर वेगवेगळे दुष्परिणाम होऊन ईसीजीत अनेक चिन्हे दिसू शकतात, त्यामुळे नक्की काय झाले आहे व काय उपाय करायचे, हे ठरवताना ही सर्व कारणे विचारात घ्यावी लागतात. कोव्हिडमुळे काही रुग्णांची हृदयाची शक्ती खूप झाल्यामुळे एक्मो हा उपचार वापरावा लागतो, तो फक्त हार्ट सर्जन व कार्डिऑलॉजिस्ट करू शकतात. त्यामुळे फक्त विद्यापीठांच्या किंवा संलग्न हॉस्पिटलात तो उपलब्ध असतो आणि तिथे अतिदक्षता विभागातल्या खाटा यामुळे अडून हृदयाच्या इतर अत्यावश्यक ऑपरेशनांसाठी कमी पडू शकतात. हृदयाची इतर काही ऑपरेशने या साथीत थोडी लांबवली आहेत, फार लांबवून चालत नाही. पण ज्यांना लांबवून चालणार नाही, अशी अत्यावश्यक ऑपरेशने लगेच केली जातात.

डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील इतरांनाही हॉस्पिटलमध्ये विषाणुबाधा होण्याचा धोका असतो. काही जण यामुळे मृत्युमुखी पडले आहेत. या साथीत विषाणुबाधा झालेल्या रुग्णांशी संबंध येऊन घरी गेल्यावर घरच्याा लोकांना तो संसर्ग होऊन बाधा होऊ नये, म्हणून असे डॉक्टर व परिचारिका हॉस्पिटलमधील त्या दिवसाचे काम संपले की घरी जाण्याऐवजी हॉस्पिटलमध्येच वा तेथील अंगणात वा घराच्या अंगणात तंबू ठोकून राहायला लागले, काही त्यांच्या मोटारीत राहू लागले. टाळेबंदी झाल्यावर राहण्यासाठी लोक येईनासे झाल्यामुळे त्या शहरातील हॉटेले ओस पडली. न्यूयॉर्कच्या कम्फर्ट इन वगैरे काही हॉटेलांनी मग त्यांच्या खोल्या डॉक्टर व परिचारिकांना राहण्यास दिल्या. हॉस्पिटले रोग्यांनी भरून गेल्यावर काही हॉटेलांतील खोल्या बरे झालेल्या रोग्यांना घरी पाठवायच्या अगोदर थोडे दिवस तिथे ठेवण्यासाठी वापरण्यास सुरुवात झाली.

या काळात हॉस्पिटलच्या विविध विभागांत काही बदल करावे लागले. नातलगांना व कोणालाही रुग्णांना भेटायला येण्यास बंदी केली गेली. काही रोगी अतिदक्षता विभागात अत्यवस्थ होऊन निधन पावले, पण त्यांना भेटायला वा मृत्यूसमयी त्यांच्याजवळ कोणीही नातलग जाऊ शकले नाहीत. काही रोगी हॉस्पिटलात दाखल झाले, पण त्यांचे नातलग हजार-दोन हजार मैलांवर दुसऱ्या प्रांतात व साथीमुळे तिथून येऊ शकत नाहीत, अशी केविलवाणी स्थिती उद्‌भवली. इंटरनेटवरून हॉस्पिटलमधील खोलीशी जोडून त्या मृत्युशय्येवरील प्रिय आप्तास बघून लांबूनच शेवटचा निरोप देण्याचा प्रसंग नातलगांवर आला. दुर्धर विषाणूने सर्वांनाच हतबल केले. रुग्णाच्या निधनानंतर अंत्यसंस्कार करायलाही कोणी जाऊ शकत नाही.

हॉस्पिटलमध्ये दाखल नसलेल्या, पण नेहमीच्या रक्त व इतर तपासण्यांसाठी प्रयोगशाळांत बाहेरून येणाऱ्या लोकांना खोलीत न बसवता 6 फुटांच्या अंतरावर रांगेत बाहेर उभे करून चाचण्या कराव्या लागतात. अगदी निकड नसेल त्यांच्या या चाचण्या पुढे ढकलल्या जातात. कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह, कोलेस्टेरॉल, गरोदर स्रियांची तपासणी, लहान मुलांना लस टोचणे, इत्यादींसाठी ठरावीक काळाने नियमित चाचण्या वा उपचार करण्याचीही सोय अनेक ठिकाणी राहिली नाही. काही छोट्या-मोठ्या हॉस्पिटलांनी नेहमीची भोजनगृहे बंद केली आहेत. त्याऐवजी एका खोलीत न्याहारी व सकाळ-संध्याकाळच्या जेवणाचे खाद्य पदार्थ विकण्यात येतात, ते घेऊन लगेच तिथून निघून जायचे व दुसरीकडे जाऊन इतरांपासून लांब राहून खायचे- अशी व्यवस्था आहे. विषाणुग्रस्त रोग्यांनी मोठ्या शहरांतील काही मोठी हॉस्पिटले भरून गेली व न्यूयॉर्कसारख्या राज्यातील काही भागांतील छोटी हॉस्पिटलेही. तथापि, टाळेबंदी व दूरता पाळण्याची गरज यामुळे फक्त अत्यावश्यक शस्त्रक्रिया चालू व बाकी सर्व उपचार बंद. नेहमीसारखे रुग्ण हॉस्पिटलात दाखल करून घेऊ शकत नाही, खाटा रिकाम्या. यामुळे आवक कमी वा बंद, पण खर्च चालूच- असा खूप तोटा होऊन देशाच्या अनेक भागांतील छोट्या-मोठ्या हॉस्पिटलांची, दवाखान्यांची व डॉक्टरांच्या ऑफिसांची अवस्था बिकट झाली. यापैकी काहींवर कायमचा गाशा गुंडाळण्याची वेळ आली. डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेकांच्या नोकऱ्या गेल्या व आणखी जातील. अनेक डॉक्टरांनी व हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्यांनी आपणहून पगारकपात घेण्याचे ठरवले. सर्व परत चालू व्हायला काही दिवस वा महिने लागतील व प्रथम मंद गती असेल. टेक्सास व काही राज्यांत आता अत्यावश्यक नसलेल्या काही शस्त्रक्रिया व उपचार चालू करण्याची परवानगी दिली असल्याने रुग्णांची व लोकांची सोय होईल आणि वैद्यकीय क्षेत्रांतील लोकांनाही काम मिळेल.

मोठ्या शहरांतील साथीचे भीषण स्वरूप पाहून अशी साथ परत आली तर गर्दीमुळे ती जास्त घातक होणार व आपल्या कुटुंबातील कोणास झाली तर कशी व्यवस्था करायची, हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली तर प्रवेशही मिळणार नाही, नातलगांना भेटता येणार नाही... मुलांचे त्यांच्या शाळेचे काय होणार इत्यादींचा विचार करून अनेक जण आता शहर सोडून कमी गर्दीच्या उपनगरांत कायमचे राहायला जाऊ लागले आहेत. त्यामुळे या शहरातील अनेक फ्लॅट रिकामे होऊन अनेक उद्योगांचे उत्पन्न कमी होईल, करही कमी जमा होईल. या वर्षी न्यूयॉर्क शहरात सुमारे 5 लाख लोक नोकरीधंदा गमावल्यामुळे बेकार होतील. तिथे दुकाने बंद असून आजूबाजूला कोणी नाही, यामुळे चोरट्यांनी अनेक दुकाने लुटली. टाळेबंदीमुळे तेथील लोकांचे भुयारी रेल्वेतून प्रवास करणे जवळजवळ बंद झाले. पण शहरातील असंख्य बेघर लोकांनी याचा फायदा घेतला. सर्व सामानासकट ते त्या डब्यांत रात्रंदिवस राहून घाण करीत असल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रात्री स्टेशन बंद करून, गाड्या धुऊन स्वच्छ करण्यात येतात.

टाळेबंदी जाहीर केल्यावर आम्ही दुकानात पाव व दूध आणायला गेलो होतो. पाव ठेवतात त्या सर्व फळ्या रिकाम्या होत्या व दूधही नव्हते. फळे व भाज्या सोडल्यास जवळजवळ सगळेच विभाग रिकामे होते. बाबांनी रशियामध्ये लोक पावासाठी तासन्‌तास कसे उभे राहतात यावर लेख लिहिले होते, त्या लेखांची आठवण झाली. अमेरिकेत असे दृश्य दिसेल असे वाटले नव्हते. पण येथे कारण वेगळे आहे. लोकांनी साठे केले. रस्त्यावर मोटारी दिसेनाशा झाल्या, कधीच चालायला न येणारे लोक फिरण्यासाठी जाऊ लागले.

आता मोठ्या शहरांतील साथीचे प्रमाण कमी होऊ लागले असले, तरी हळूहळू खेड्या-पाड्यांत ही साथ पसरण्याचा धोका आहे. असे झाले तर तेथील परिस्थिती अधिकच बिकट असेल. छोट्या हॉस्पिटलांत आवश्यक तेवढे वैद्यकीय व इतर आवश्यक मनुष्यबळ, सर्व औषधोपचार व साधने उपलब्ध असण्याची शक्यता नाही गंभीर आजारांवर उपचार करू शकतील, श्वसनयंत्र वापरू शकतील असे तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिका नाहीत. संसर्गामुळे साथही जोरात फैलावेल, अशी भीती आहे.

वुहान विषाणूच्या साथीमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे तात्पुरते वा कायमचे बंद पडून जगभरच आर्थिक मंदी आली आहे. सर्व व्यवहार बंद असल्यामुळे अनेक छोटे धंदे बंद होऊन अमेरिकेत गेल्या 6 आठवड्यांत 3 कोटी लोकांनी बेकारीसाठी सरकारी मदत मिळावी म्हणून अर्ज केले. जूनपर्यंत हे प्रमाण लोकसंख्येच्या सुमारे 16 ते 20 टक्के होण्याची शक्यता आहे. 1930 च्या महामंदीनंतर अशी भीषण बेकारी व आर्थिक मंदी प्रथमच येत आहे. या वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांत अमेरिकेचे स्थूल उत्पादन सुमारे 5 टक्क्यांनी कमी झाले. गेल्या 3 वर्षांत ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अनेकांना नोकऱ्या मिळाल्या. जानेवारीत अमेरिकेतील बेकारांची संख्या सुमारे 2 लाख म्हणजे फक्त 3.5 टक्के होती. पण वुहान विषाणूमुळे लोकांच्या आरोग्याबरोबरच पोटावरही गदा आली, अनेक जण बेकार झाले व ही संख्या वाढत जाणारी आहे. पोलीस व अग्निशामक दलाच्या लोकांच्याही नोकऱ्याही गेल्या आहेत व आणखी जातील. ग्रंथालयांतही पुस्तकांची खरेदी कमी करणार आहेत.

देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या 90 टक्के घटली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी उड्डाणांची संख्याही खूप कमी केली आहे. त्या अनेक कर्मचाऱ्यांना तात्पुरते घरी बसवले आहे. विमान कंपन्यांना सरकारने मदत केली असून खानावळी, दुकाने इत्यादी छोट्या उद्योगधंद्यांनाही अनेक सवलती दिल्या आहेत. कर्ज उशिरा फेडण्याची परवानगी दिली आहे, पैसे देऊ केले आहेत. काही मोठ्या कंपन्यांनीही याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आल्यावर टीका होऊन त्यांना पैसे परत करावे लागले. लोकांच्या नोकऱ्या खात्रीपूर्वक राहाव्यात यासाठी पगारसंरक्षणाची योजना ट्रम्प सरकारने सुचवली आणि ती काँग्रेस व सिनेटने मान्य केली. काही ठरावीक उत्पन्नरेषेच्या खाली मिळकत असलेल्यांना एप्रिलपासून 3 महिने सरकारने चेकने दरमहा 1200 डॉलर पाठविण्यास सुरुवात केली. न्यूयॉर्कमध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून दर आठवड्याला बेकारभत्ता म्हणून प्रत्येकी 1104 डॉलर देण्याची योजना आहे. खाटकांच्या दुकानात नेहमी काम करणाऱ्यांस यापेक्षा कमी पगार मिळतो. बेकार राहून जास्त भत्ता मिळत असल्यामुळे अशा व इतर दुकानांत कामाला माणसे मिळणे कठीण झाले आहे, अशी त्या दुकानदारांची तक्रार आहे. त्यामुळे हा भत्ता कमी करावा असे अनेकांचे मत आहे. पोस्टाची अवस्था बिकट आहे. 2009 मध्ये मंदी आली, तेव्हा घरे विकण्याचा धंदा पार बसून त्यांना कर्ज देणाऱ्या बँकाही कोसळल्या होत्या. पण गेल्या 3 वर्षांत ट्रम्प यांच्या राज्यात आर्थिक उर्जितावस्था येऊन योग्य त्या खबरदारीच्या योजना करण्यात येत आहेत, त्यामुळे बँका कोसळणार नाहीत अशी आशा आहे. अमेरिकेत लोकांना बचत करायची सवय नाही. ऋण काढून सण साजरा करण्याची सवय असल्यामुळे अनेकांकडे फक्त 2-3 महिने पुरतील एवढेच पैसे असतात. नोकरी गेल्यावर मग फार पंचाईत होते. बेकारीमुळे नैराश्य येऊन व्यसनाधीनता व आत्महत्येचे प्रमाणही वाढत आहे. घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी अन्नछत्रांपुढे लोकांच्या लांब रांगा लागत आहेत. सॅन ॲन्टोनिओत 3 हजारांवर लोक पहिल्याच दिवशी गेले होते. शाळेत जाणाऱ्या गरीब मुलांना शाळेत मोफत न्याहारी व जेवण दिले जाते, ते आता त्यांना आठवड्यातून एकदा घरी नेऊन देण्यात येते.

जगभर मंदी येऊन 160 कोटी लोकांच्या नोकऱ्या या वर्षभरात जाऊन जगातील काम करणारे निम्मे लोक बेकार होतील, असा अंदाज आहे. आता हळूहळू उद्योगधंदे सुरू झाले तरी विषाणुसंसर्ग होईल, या भीतीने बरेच लोक पूर्वीसारखे खरेदीला, हॉटेलात, नाटक-सिनेमाला, खेळ बघायला जाणार नाहीत. त्यामुळे अनेक छोटे उद्योग चालू ठेवणे परवडणार नाही. सर्व कार्यालये, उद्योगधंदे व वाहतूक पूर्ववत्‌ व्हायला आणि उत्पादन व अर्थव्यवस्था सुधारायला काही महिने लागतील. मंदी किती गंभीर असेल व किती काळ चालेल, हे कोणी सांगू शकत नाही. चीनमध्ये मात्र विषाणूची साथ मार्चमध्येच आटोक्यात आल्यामुळे सर्व उत्पादन लवकरच पूर्ववत्‌ होईल, सर्व जगातून मागणी वाढून व काहीच स्पर्धा न राहून त्यांची आर्थिक स्थिती अधिकच सुधारेल. म्हणजे जगभर मंदी पण चीनची भरभराट आणि ज्याच्यामुळे ही आपत्ती आली, त्या चीनचीच मदत जगातील लोक मागत आहेत, असे चित्र आहे.

अमेरिकेत बहुतेक लोक स्वत:च्या मोटारीने कार्यालयात जातात. पण आता घरात बसल्यामुळे मोटार चालवण्याचे प्रमाण नेहमीच्या 10 टक्के आहे. पेट्रोलला मागणी नसल्याने येथील इंधनासाठीच्या तेलाचे भाव पार गडगडले. गेल्या दीडशे वर्षांत इतका कमी भाव कधी नव्हता. आणखी साठ्यास जागा नाही, अशी अवस्था एप्रिलमध्ये झाली. काही कंपन्या कायमच्या बंद पडल्या. तेलाची इतकी स्वस्ताई आहे, पण त्याचा फायदा घेऊन मोटारीने लांब प्रवास करणे हे साथीमुळे येथे शक्य नाही. शेव्हरॉनसारख्या तेलाच्या काही कंपन्यांनी जगातील काही महत्त्वाच्या बाजारपेठांत तेल साठवण्यासाठी जागा भाड्याने दिल्या. खरे तर सरकार हे करते. या स्वस्ताईचा फायदा कोणाला करून घेता आला तर चांगले.

‘‘चांगले रस्ते बांधून सर्व गावांना पिण्याचे पाणी मिळेल, वीज मिळेल अशी व्यवस्था करण्यास भारत सरकार व मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य दिले तर लहान गावातही बारीकसारीक उद्योगधंदे चीनप्रमाणे सुरू करता येतील. मोठे उद्योगही सुरू करता येतील, परदेशी कंपन्यांना तिथे वाहतुकीसाठी अडचण येणार नाही व कारखाने सुरू करता येतील. चीनऐवजी भारतात देशी व परदेशी कंपन्यांनी उत्पादन वाढवून चीनला शह देण्याचा विचार सर्व पक्षांनी एकजुटीने केला पाहिजे’’, असे बाबांचे मत होते.

नव्या साथीची काहीच माहिती फेब्रुवारीत जगात कोणालाच नसल्याने साथीचा आलेख नेमका कसा असेल, याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधण्यात येत होते. जसजशी रुग्णांची संख्या वाढून जास्त माहिती हाती येऊ लागली तसतसे लक्षात आले की, आलेखाचा आकार त्रिकोणी डोंगरासारखा नाही. पायथ्याशी एकाच पातळीवर बरेच दिवस लहान संख्या राहून मग एकदम उंच वाढत जाऊन वर पोचल्यावर, टोकदार निमुळते शिखर नसून सह्याद्रीसारखे सपाट पठार आहे. काही दिवस तशीच मोठी संख्या राहिल्यामुळे त्या उंचीवर सपाट रेघ असेल व काही दिवसांनी उतरणीस लागून संख्या कमी होत जाईल मग पायथ्याशी आल्यावर त्या खालच्या पातळीवर हळूहळू कमी होईल. साथ आटोक्यात आल्यावर हळूहळू सर्व कार्यालये, उद्योगधंदे, वाहतूक वगैरे कोणती दक्षता घेऊन उघडावी याबद्दल ट्रम्प यांच्या सरकारने काही सर्वसामान्य तत्त्वे देणारी मार्गदर्शक पत्रिका काढली आहे; पण प्रत्येक राज्य, विभाग व गावातील स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून त्या-त्या लोकांनी ते निर्णय घ्यायचे आहेत.

ग्रीक पुराणात पँडोराच्या पेटीची कथा आहे. प्रोमिथिअसने स्वर्गातून अग्नी चोरल्याबद्दल कोप होऊन, सूड घेण्यासाठी देवांचा राजा झूस याने नजराणा म्हणून पँडोराला पाठवले व तिच्याबरोबर एक पेटी दिली. तिथे गेल्यावर ही पेटी पँडोराने उघडताच त्यातून अनेक रोग, विषारी जनावरे, जिवाणू, मृत्यू व आपत्ती बाहेर पडून दुर्धर स्थिती झाली. जगाने चीनचे काहीही वाकडे केलेले नसता, जगास अंधारात ठेवून अधिराज्य मिळवण्यासाठी चीनने पाठवलेली विनाशकारी वुहान विषाणू पेटी या जमान्यातील पँडोराची पेटी आहे.

डॉ. निरूपमा आणि सुषमा गोविंद तळवलकर, अमेरिका

Share on Social Media

नवे ऋतुचक्र

मे : ग्रीष्माची नाजूक टोपली

विश्वास वसेकर

पांगारा हे सध्या फुललेलं रंगसुंदर झाड आहे. झपाट्याने वाढणाऱ्या या वृक्षाची उंची दहा ते पंधरा मीटरपर्यंत वाढू शकते. अनेकांना पळस आणि पांगाऱ्यात फरक करता येत नाही. दोन्ही एकाच वेळी फुलतात, दोघांचीही फुलं लालभडक असतात. पण फुलांच्या आकारात फरक आहे. पांगाऱ्याची खोडे चांगली सरळ वाढतात. पांगाऱ्याच्या खोडावर वल्काचे बनलेले जाड-जाड आखुडसे काटे असतात. उन्हाळा जितका तीव्र असेल, तितका पांगारा अधिक फुलतो.

भोगावा उन्हाळा । होऊन पांगारा

तापल्या उन्हाचा । लावून अंगारा

मुंबईतील वसंतागममध्ये दुर्गा भागवत लिहितात : एप्रिलच्या माध्यावर पांगाऱ्याच्या झाडाला तांबड्या-लाल मखमली फुलांचे घोस आले आहेत. एकही पान नाही, पण माथे लाल-लाल. जणू पेटल्यासारखे. धरणीच्या पोटातला, आकाशाच्या कडांतला सगळा तेजस्वी लाल रंग फुलांच्या सौम्य स्वरूपात या झाडांवर स्वार झाला आहे.

‘वेळ झाली भर माध्यान्ह

माथ्यावर तळपे ऊन

तप्त दिशा झाल्या चारी

भाजतसे सृष्टी सारी

वाहतात वारे जळते

पोळतात फुलत्या तनुते’

हा आहे कवितेतला उन्हाळा. अनिलांची कविता नागपूरच्या उन्हात रापलेली आहे. आम्ही जाणूनबुजून उष्णकटिबंधातच जन्मलो. आम्हाला ऊन नाकारून कसे चालेल? उन्हाळा आहे, म्हणून झाडं फुलायची थांबतात थोडीच? पोर्तुगीज भाषेत अशा अर्थाची म्हण आहे की- जे फूल उन्हात उमलतं, ते कधीच कोमेजत नाही. उलट नुकताच वसंत ऋतू येऊन गेला आहे. सगळ्या सृष्टीला नवपालवी, नवबहार आणि नवचैतन्य देऊन गेला आहे. वसंताला चिकटून उन्हाळा येतो, त्याला काही तरी अर्थ असेलच ना? ऊन आहे, म्हणून आम्ही स्वत:ला वातानुकूलित खोलीत कोंडून घेणारे नाही आहोत. आम्ही शेतकरी आहोत. हे पाहा, सगळं ऊन आनंदाने चाखत लोखंडी नांगराने शेत नांगरून काढायला आणि काश्या वेचायला शेताकडे निघालोत! पाऊस कधीही येवो, अक्षय्यतृतीयेला आपलं रान तयार पाहिजे. गुढी पाडवा हा मुहूर्त असतो, शेतीच्या कामाच्या प्रारंभ करण्याचा. पश्चिम महाराष्ट्रात म्हण आहे- ‘पाडव्याला पाड, अखि-ताला (म्हणजे अक्षय्यतृतीयेला) राड’.

निर्गंध असलं तरी, आपला देखणा रूपोत्सव साजरा करणारं झाड आहे बहाव्याचं. अनेकांना त्याचं अमलतास हे नावच आवडतं आणि मराठीतसुद्धा त्याला या नावानं संबोधतात. हा असा भारतीय वृक्ष आहे, जो इथून नेऊन आपल्या उष्णकटिबंधातील देशात परकियांना लावला. वि. दा. घाट्यांनी ‘कॅशिया भरारला’ लिहून तो साहित्यात अजरामर केला, तर आचार्य अत्र्यांनी त्याला केशवाचं झाड म्हटलं. ‘निरंजन वनी केशव फुलला!’ याची फुले पिवळीजर्द व लोंबती असतात, म्हणून त्याचं इंग्रजी नाव ‘गोल्डन शॉवर’ असं आहे. लांब देठाकडच्या कळ्या अगोदर उमलतात. त्याच्या पाकळ्या पिवळ्या असून, साडेतीन ते पाच सें.मी. व्यासापर्यंत असतात. पाच पाकळ्यांचे हे फूल असते. त्याचा आतून रंग हिरवट-पिवळा असतो. पुंकेसर दहा असून त्यापैकी तीन लांब, चार आखूड व तीन अगदीच लहान असतात. वळदार पुंकेसरांनी झाडाचे सौंदर्य अजूनच वाढते. पावसाळ्यात त्याला रुळाच्या आकार-रंगाच्या शेंगा येतात. अस्वलाला त्या किती आवडतात आणि रेचक असल्याने त्या खूप खाल्ल्याने त्याची कशी बेजारी होते, याची मजेशीर गोष्ट ‘मोहाचे झाड’ नावाने व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिली आहे.

अमलतास मी पाहिल्यांदा पाहिला औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात. अमलतास इतकाच तेव्हा मला प्रिय होता धनंजय गुडदे. विद्यापीठातून बाहेर पडताना मी दोघांपासून दुरावलो. जिथे नोकरी केली, त्या गावात अमलतास नव्हता. म्हणून दोन रोपं आणली, घरासमोर लावली आणि त्यांना नाव दिले धनंजय गुडदे! अल्पवयातच गुडदे वारला आणि त्याचे प्रेम मी दोन अमलतासांना देऊ लागलो. त्याच्याशी सुख-दु:खाच्या गोष्टी करू लागलो. आता अमलतास माझा हमसफर झाला आहे. असे नाते पुन्हा कोणाशी जडले नाही. धनंजय गुडदे- माझा अमलतास. नंतर गुलजारची कविता आली, अमलतास. पक्षी येऊन रोज अमलतासला बहकवतात, भडकवतात आणि उडण्याच्या, आकाशाच्या, थंड हवेच्या आकर्षक गोष्टी सांगून त्याची दिशाभूल करतात अन्‌ एक दिवस वादळाचा हात पकडून अमलतास उडून जाण्याचा प्रयत्न करतो आणि सडकेच्या मध्यभागी जाऊन पडतो... असा त्या कवितेचा सुंदर आशय आहे.

करंजाचं झाड मी असंच उशिरा नात्यात सामील करून घेऊ शकलो. पस्तीस वर्षे नोकरी केली, त्या कॉलेजच्या ग्रंथालयासमोर ते होते. मी त्याच्या जवळून रोज जात होतो. शेवटी गं्रंथापालाने ओळख करून दिली. करंजीच्या आकाराच्या आणि रंगाच्या कठीण कवचाच्या शेंगा दाखवल्या. त्या फोडल्यानंतर यकृताच्या आकाराच्या बिया दिसतात, हेही त्यांनीच मला सांगितले.

करंज! किती सुंदर झाड! त्याची पाने स्पर्शाला किती मुलायम, दिसायला किती चमकदार,पांढरट-गुलाबी रंगाची फुलं किती सुंदर! करंजाचे झाड म्हणे शंभर वर्षे जगते. हत्ती आपली गंडस्थळे त्यावर घासतात, तरीही ते राहते. म्हणजे त्याची जीजिविषा किती ताकदवर. मधमाश्यांना तर ते एवढे आवडते की, त्यांच्याशिवाय करंजाच्या फुलाचे दर्शनही दुर्मिळ! महाकवी कालिदासाच्या रघुवंशात नर्मदाकाठच्या करंजवनांचे उल्लेख आले आहेत.

कुंती हा एक सदाहरित वृक्ष आहे. याची साल साफ, पातळ, पिवळसर रंगाची असते. फांद्या बारीक असतात. पांढऱ्या रंगाची फुले सुगंधित असतात. ब्रह्मदेशात याच्या सालीचा उपयोग साैंदर्यप्रसाधनात होतो. क्षुपरूप आणि वृक्षरूप असे कुंतीचे दोन प्रकार. क्षुपरूप कुंती बागबगीच्यांमध्ये लावली जाते. कारवार वनात आणि श्रीलंकेत मोठमोठे कुंतीवृक्ष आढळतात.

ज्याच्या नावात ‘फळ’ हा शब्द असला, तरी आपण खाद्य पदार्थांत, मिठायांत, पुरणात, श्रीखंडात वापरतो ते जायफळाचे बी असते. त्याची फळं उन्हाळ्यात लागतात. मे किंवा जूनमध्ये ती पक्व होतात. त्याचे झाड मात्र अतिशय अपरिचित आणि पाहायला दुर्मिळ आहे. जाऊ द्या, आपलं पुरण आणि श्रीखंडाला ते सजवतं ना! त्याच्याबद्दल वायफळ गप्पा मारण्यापेक्षा त्याची जायफळनिद्रा सुखाची.

आईन या महावृक्षाची झाडं मे महिन्यात मोहरू लागतात आणि त्याच्या फुलांचा बहर पावसाळ्यापर्यंत टिकतो. या झाडाचं संस्कृत नाव ककुंभ असे आहे. त्याच्या मंद पण सुंदर सुवासाचं वर्णन ‘मेघदूता’तही येतं. याला ओलसर भूमी लागते. त्यामुळे भारत आणि लंकेतल्या या प्रकारच्या जमिनीतच तो वाढतो.

आईन वृक्षाची साल वैशिष्ट्यपूर्ण असते. वरून काळसर व आतून लाल असणाऱ्या सालीला जून झाल्यावर खोल चिरा पडतात. पाने तडतडीत व चिवट असतात. फुले आंब्याच्या फुलांसारखी बारीक असतात, किंचित सुगंधही असतो. हा अर्जुन वृक्षाच्या वंशगटातला आहे. फुलण्याचा ऋतू अर्जुनाप्रमाणेच ग्रीष्म ऋतू हा असतो.

माझ्या गावाकडे शिंदीची खूप झाडं आहेत. माझ्या गावाला चिकटून रामेश्वर नावाचं गाव आहे. आजोबा चेष्टेनं म्हणायचे, लंकेजवळ आहे ते सेतुबंध रामेश्वर आणि वश्याजवळ आहे ते शिंदीबन रामेश्वर. खरोखरच शिंदीची बनंच आहेत तिथं. घाणेरडा जातीयवाद डी.एन.ए.मध्येच असतो की काय! शिंदीच्या झाडातून जे सुंदर पेय मिळतं, ते गावाकडचे सगळे सवर्ण निषिद्ध मानायचे. झाडाला लटकवलेली मडकी (गोवा) पाहतानासुद्धा आम्ही खेड्यातील सवर्णांची मुलं भीतियुक्त नजरेनं पाहायचो. तारुण्य आणि सगळी उमेदीची वर्षे शिंदी न पिताच गेली. साठीनंतर वाचून कळले की, आपल्याकडच्या शिंदीला इकडे ‘नीरा’ म्हणतात. म. गांधीजींनी या वृक्षाचा मोठाच गौरव केला. पुण्याला तर थंडगार नीरेचे सतत गाडे दिसतात आणि लोक मोठ्या आवडीने ते उत्साहवर्धक मधुर पेय पितात, हे कळल्यावर वाईट वाटले खरे. मी श्रद्धापूर्वक नीरा पिऊन पाहिली पण तिचा आनंद नाही घेता आला! शिंदीच्या पन्हाळ्याचा झाडू करतात, त्याला फडा म्हणतात. त्याची एखादी काडी जरी सोवळ्याच्या स्वयंपाकात गेली, तर तो स्वयंपाक म्हणे बाटतो! किती वाईट चाली रीती!

शिंदी या ताडवृक्षाला ‘खजुरी’ असंही एक सुंदर नाव आहे. नीरेपासून स्वादिष्ट आणि पौष्टिक गुळीसाखर करतात ना, म्हणून हे नाव असावे. दिसायलासुद्धा किती छान आहे शिंदीचा वृक्ष. पंधरा ते वीस मीटर एवढा उंच तो वाढू शकतो. गळून पडलेल्या पन्हाळ्याचे, त्यांच्या देठाचे वेडेवाकडे अवशेष शिल्लक राहण्यामुळे शिंदीचे खोड खूपच खडबडीत असते. पानाच्या टोकाला काटे असतात. त्याच्या फळांना शिंदोळ्या म्हणतात. उन्हाळ्यात शिंदोळ्यांचा मुख्य बहर असतो. त्याचे पंचांग उपयोगी असल्यामुळे त्याची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. शिंदीच्या पानांचा, छोट्या-छोट्या पानांनास साळून एक ‘फोक’ तयार करतात. लहानपणी ‘मास्तरां’कडून या फोकाचा भरपूर मार मी खाल्ला आहे. गादी, सतरंजी किंवा चटईवर बसण्यापेक्षा शिंदीच्या पानांचा केलेला बोऱ्या अंथरूण म्हणून भरपूर वापरला आहे.

आपट्याचे झाड जिथे फारसे कुणी पाहिलेले नसते, तिथे आपट्याला येणारा विशिष्ट प्रकारचा फुलोरा कोण पाहणार? आपट्याची फुले देठाकडून टोकाकडे उमलत जाणारी असतात. त्याच्या वनस्पतीशास्त्रीय नावात (बाडहिनिया रेसिमोसा) रेसिमोसा हा जो शब्द आहे, तो या विशिष्ट प्रकारे फुलांचा तुरा येणारे झाड- या अर्थी आहे. कांचन या जातीत आपट्याचा समावेश होतो. कांचनच्या पानांशी त्याचे साम्य असल्याने दसऱ्याला अडाणी लोक सोनं म्हणून आपट्याऐवजी कांचनाचीच पानं वाटतात. प्रथा म्हणून झाडांना ओरबाडणारे अडाणीच नव्हेत का?

विंध्य, सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत किंवा सह्याद्रीच्या सान्निध्यातील आर्द्र आणि शुष्क पानझडी जंगलात किनई किंवा किन्हई नावाने ओळखला जाणारा एक वृक्ष आढळतो. शिरीषाशी असणाऱ्या साम्यामुळे त्याला पांढरा शिरीष म्हणतात. त्याचे फुल पांढरे असते. म्हणजे शिरीषाचे फूल हिरवट-पिवळ्या रंगाचे असते, पर्जन्य ऊर्फ रेनट्रीचे फूल लाल रंगाचे असते आणि किनईचे फूल पांढऱ्या रंगाचे असते. शिरीष आणि किनई अस्सल देशी वृक्ष आहेत. त्यातला शिरीष वसंत ऋतूमध्ये फुलतो आणि किन्हई ग्रीष्म ऋतूत फुलतो.

उन्हाळ्यात फळे येणारा कोकम हा एक अत्यंत सुंदर आणि उपयुक्त असा वृक्ष आहे. झाडावरच्या तांबड्या झालेल्या फळांसकट मी तो दिवेआगरला पाहिला. वृक्ष म्हणता येणार नाही कदाचित, असा लहान आकाराचा, उभट वाढलेला तो होता. मेमध्ये त्याचे गोल आकाराचे, गुळगुळीत, तीन ते पाच सेंमी व्यासाचे फळ लाल असते, नंतर ते जांभळे होते. हीच फळे वाळवून त्याची आमसुले होतात. आमसुले मात्र सर्वत्र किराणा दुकानात मिळतात. त्याचे सार, सरबत छान होते. सोलकढी या स्वादिष्ट पेयामध्ये आमसुलांचाच वापर केलेला असतो. माझ्या लहानपणी हिवाळ्यात थंडीने पाय उलले किंवा भेगा पडल्या की, पांढऱ्या रंगाचा घनपदार्थ त्यावर औषध म्हणून वापरला जायचा. त्यालाही आमसूलच म्हणत. ते म्हणजे कोकमच्या बियांचे तेल असते, हे नंतर कळले.

रवींद्रनाथ टागोरांचे भाऊ महाराष्ट्रात बहुधा सोलापूरला कलेक्टर होते. तेव्हा काही काळ त्यांचे वास्तव्य भावाकडे म्हणजे महाराष्ट्रात होते. झाडांना नवी नावे देण्याचा एक छंद टागोरांना होता आणि त्याचेही सर्वांना फार कौतुक असे. उदाहरणार्थ- निशिगंध या वानसाला त्यांनी रजनीगंधा हे नाव दिले. तेच नाव घेऊन काढणाऱ्यांनी सिनेमा काढला, त्यात या फुलांचा प्रतीकात्मक वापर केला आहे. आता निशिगंधाला रजनीगंधा म्हटले जाते. तद्वत्‌च महाराष्ट्रातले एक झाड त्यांना आवडले- पाडळ. त्याला त्यांनी नाव दिले पारुल. हे नाव बंगालमध्ये लोकप्रिय झाले. टागोरांची मराठी आठवण आणि या झाडाचा मला लागलेला चिरदाह यातून 2012 मध्ये जन्मलेल्या माझ्या मुलीचे नाव ठेवले पारुल. पारुल म्हणजे पाडळ, संस्कृतात पाटल. बाणभट्टाच्या कादंबरीत या पुष्पराजाची सुंदर वर्णने आली आहेत. दुर्गाबार्इंच्या ‘रसमयी’त पाडळ मला भेटला आणि माझी सुरू झाली एक दीर्घ शोधयात्रा.

भारतात नूरजहाँच्या काळात गुलाब आला अन्‌ त्याला सर्व ‘पाटल’ मागे पडला. ‘रसमयी’त बाणभट्टाच्या रंगरुचिरतेबद्दल विस्तृत लिहूनदेखील शेवटी पुन्हा एकदा बाणभट्टाच्या रंगज्ञतेचा गौरव करणारे एक टिपण दुर्गाबार्इंना लिहावे वाटले. ‘पाटल’ या रंगाबद्दल बाणभट्टाला काही खास आकर्षण असलं पाहिजे. हा रंग म्हणजे लाल रंगाच्या सगळ्याच छटा. तरीही प्रामुख्याने गुलाबी- श्वेतरक्त. या टिपणात बाणभट्ट पाटल रंगाचा वापर किती तऱ्हांनी करतो, हे दुर्गाबाई उदाहरणांनिशी दाखवतात.

माझा चिरदाह हा आहे की, वीस वर्षांपासून मी पाडळचा शोध घेतोय. पुण्यात हे झाड श्री. द. महाजनांनी पाहिलंय. इंगळहळ्ळीकरांनी पाहिलंय. कोकण, मावळ भागात तो आजही आहे. ग्रीष्मात गुलाबी, सुगंधी फुलांनी तो फुलून बसलाय, पण मला भेटत नाही. शेवटी मी जाहीरपणे लिहिलंय की, जो कोणी हे सुंदर झाड मला दाखवेल, त्याच्या हातात मी चांदीचं कडं घालेन. शोधा त्याला. जून अखेरपर्यंत त्याला बहर असेल. फुलाचे चित्र पाहा. त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव आहे स्टेरिओपर्मम चेलिनॉईडिस आणि कूळ आहे बिग्नोनिएसी (टेटू).

पांगारा हे सध्या फुललेलं रंगसुंदर झाड आहे. झपाट्याने वाढणाऱ्या या वृक्षाची उंची दहा ते पंधरा मीटरपर्यंत वाढू शकते. अनेकांना पळस आणि पांगाऱ्यात फरक करता येत नाही. दोन्ही एकाच वेळी फुलतात, दोघांचीही फुलं लालभडक असतात. पण फुलांच्या आकारात फरक आहे. पांगाऱ्याची खोडे चांगली सरळ वाढतात. पांगाऱ्याच्या खोडावर वल्काचे बनलेले जाड-जाड आखुडसे काटे असतात. उन्हाळा जितका तीव्र असेल, तितका पांगारा अधिक फुलतो.

भोगावा उन्हाळा । होऊन पांगारा

तापल्या उन्हाचा । लावून अंगारा

मुंबईतील वसंतागममध्ये दुर्गा भागवत लिहितात : एप्रिलच्या माध्यावर पांगाऱ्याच्या झाडाला तांबड्या-लाल मखमली फुलांचे घोस आले आहेत. एकही पान नाही, पण माथे लाल-लाल. जणू पेटल्यासारखे. धरणीच्या पोटातला, आकाशाच्या कडांतला सगळा तेजस्वी लाल रंग फुलांच्या सौम्य स्वरूपात या झाडांवर स्वार झाला आहे.

आशा उगावकरांना वाटते की, तळपत्या सूर्याचा आणि फुलांच्या वासाचा जवळचा संबंध आहे. म्हणून ज्या देशात ऊन नाही, तिथे सुगंधी फुले कमी! आपण मराठी माणसं या बाबतीत भाग्यवान. सूर्यदेवता आपल्यावर प्रसन्न! आपल्याकडे भरपूर ऊन. त्यामुळे फुलांच्या रंंगांची आणि सुगंधांची मजा आपण एकाच वेळी लुटू शकतो. नाही तर रंग आहे पण गंध नाही, असे बहुधा आढळते. जसे गंधाचे उन्हाशी नाते तसे रंगाचेसुद्धा! पांढरा, निळा, जांभळा, गुलाबी हे रंग उन्हाळ्यात डोळ्यांना सुखावतात. म्हणून या रंगांची फुले उन्हाळ्यात फुलण्याची योजना निसर्गाने केली असावी. जाई-जुई आणि सायली यांना कुणीसं तिळ्या बहिणी म्हटलं आहे. तिघींचे आकार, रूप, रंग जवळपास सारखेच- माझ्या विद्यार्थ्यांना त्यातला फरक कळावा म्हणून मी माझ्या शांतिनिकेतन बंगल्यात तिन्ही वेल जवळ-जवळ लावले होते. जुईसारखी तीन दलांची पानं सायलीच्या वेलीलाही असतात. पण जुईसारखं मधलं दल लांबट नसतं. सायलीचं फूल मात्र जाई-जुईपेक्षाही नाजूक असतं, म्हणून तर पुढील कवितेत इंदिरा संत पावसाला धिंगाणा घालू नको म्हणतात –

नको नको रे पावसा

असा धिंगाणा अवेळी

घर माझे चंद्रमौळी

आणि दारात सायली

सायलीची फुलं कुंदासारखी, पण कमी पाकळ्यांची आणि लहान असतात. खूपच सुगंधी असतात. सायली सायंकाळी उमलते. सायलीच्या कळ्या तोडल्या तर बाहेर फुलत नाहीत. पिवळी पडून कोमेजून जाईल, पण आईवेगळी नाही फुलणार. सायलीला बहर येतो उन्हाळ्यात. कालिदासाच्या रघुवंशात उल्लेख असणारी ‘सायंमल्लिका’ म्हणजे सायलीच असावी, असे मानायला जागा आहे. तितक्याच योग्यतेची असून जाई-जुई इतकी सायलीची माणसांना ओळख नसते. आपल्या मुलीचं नाव सायली ठेवणाऱ्यांनाही हे एका फुलवेलीचं नाव आहे, हे माहीत नसतं.

मे फ्लॉवर हे मे महिन्यात फुलतं असं म्हणणं म्हणजे गव्हर्न्मेंटचा जी.आर. आला असं किंवा याही वर्षी गुड फ्रायडे शुक्रवारीच आला, असं म्हणण्यासारखं आहे. वर्षातून एकदा लाल गोंडा किंवा एक चेंडू येणाऱ्या या लिली प्रकारचं वानस मला जवळपास आवडत नाही. तुलनेत मार्च लिली बरी. तिच्या विविधरंगी फुलांचे चारही दिशांना तोंड करून उभे असलेले कर्णे खूप छान दिसतात.

याच दिवसात भुईचाफा पाहायला मिळेल. लिली, निशिगंधासारखे त्याचेही कंद असतात. कंदातून जमिनीलगत येणारे जांभळ्या रंगाचे फूल म्हणजे चाफा. गड्ड्यातून सुरुवातीला पाने येतात आणि ती गळून गेल्यावर तरल जांभळ्या रंगाची, नाजूक मुलायम पाकळ्यांची फुले येतात. कोकण, गोवा, कारवार, बेळगाव एवढ्याच भागात भुईचाफा येतो.

मे महिन्यापासून अनंत फुलायला लागतो. हा एक झुडूपवजा सदाहरित वृक्ष आहे. अनंतासारखे सुगंधाच्या बाबतीत सुंदर फूल दुसरं नाही. बायकोचा अत्यंत आवडता, म्हणून मी माझ्या छोट्या बागशाहीत आणून तो लावला. चार वर्षे झाली, अजूनही त्याला फूल आलेलं नाही.

डॉ. श्री. श. क्षीरसागर यांनी मे महिन्याच्या शेवटी कोकणपट्टीत फुलणाऱ्या ‘सीतेची वेणी’ या ऑर्किडबद्दल फार सुंदर लिहिलं आहे. आंबा, मोह, हिरडा अशा वृक्षांचा आभार घेऊन ती वाढते. या ऑर्किडची बारीक मुळे आधारवृक्षाच्या फांद्यांना घट्ट धरून ठेवतात, तर काही जाडसर मुळं हवेत लटकत राहून हवेतील बाष्प शोषून घेतात. याची हिरवी पानं लिलीच्या लांबलचक पानांसारखी वीस ते तीस सेंमी लांब, अरुंद, जाड, मध्यभागी घडीसारखी पन्हाळी असलेली. आधारवृक्षाच्या पानांपेक्षा अगदी वेगळी दिसणारी ही एकमेकांसमोर येणारी पानं खाली झुकलेली दिसतात. साधारणत: मे महिन्याच्या शेवटी या पानांच्या बेचक्यातून 25 ते 30 सेंमी लांबीचा हिरवा, चिवट काडीसारखा पुष्पदंड निघतो. यावर दाटीवाटीने रचलेल्या कळ्या आठ-दहा दिवसांत फुलल्यावर हा लांब लोंबणारा पुष्पदंड दाटी विणीच्या जाडजूड गजऱ्यासारखा दिसू लागतो. दीड ते दोन सेंमी आकाराची, गुलाबी-जांभळे ठिपके असलेल्या पांढरट गुलाबी पाकळ्यांची ही रेखीव फुलं.

सध्या मी कुठल्या झाडाच्या प्रचंड प्रेमात असेेल, तर पुण्याची एक खासियत असलेल्या आफ्रिकन महोगनीच्या. मी लुब्ध आहे त्याच्या प्रचंड आकारावर. मी लुब्ध आहे त्याच्या उंचीवर. मी लुब्ध आहेत त्याच्या हिरवेपणावर. आपल्याला या पृथ्वीचा एक-तृतीयांश भाग झाडाखाली झाकायचा आहे ना! मग त्यासाठी आफ्रिकन महोगनीसारखे उपयुक्त झाड नाही. सध्या माझे अंतराच्या दृष्टीने सगळ्यात जवळचे नातेवाईक आफ्रिकन महोगनीच आहेत. मी पुण्यात ज्या शनिवारवाड्याजवळ राहतो, त्याच्या दक्षिण आणि पश्चिम बाजूला रांगेने उभे असणाऱ्या महाकाय आफ्रिकन महोगनींना मी रोज भेटतो. दिवसातून एकदा तरी त्यांना हाय-हॅलो केल्याशिवाय मला करमत नाही. अहिल्यादेवी शाळेकडून शिंदेपाराला वळसा घालून न्या. रानडे बालक मंदिराकडे जाताना डाव्या हाताला तीन-चार आफ्रिकन महोगनी भेटतील. पर्यटकांनो, पुण्यात काय पाहावे? याच्या यादीत तुम्ही आफ्रिकन महोगनींचा जरूर समावेश करा.

याच वर्षी मी आफ्रिकन महोगनीची नवपल्लवी पाहिली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात छोट्या-छोट्या लालसर बदामी रंगाच्या पालवीने डवरून आलेला हा भीमरूपी महारुद्र कसला भव्यसुंदर दिसत होता. असा आनंद महाकाय पिंपळाच्या नवपल्लवीने फक्त होतो. संपूर्ण पानगळ झालेला पिंपळ तरी बराच काळ ओकाबोका राहतो, पण महोगनीच्या पालवीला एवढाही धीर नसतो. वसंत ऋतूत पानगळ होते न्‌ होते तोच दरदरून कसल्याशा ओढीने नवीन पालवी येते. संपातीला सावली देण्याची जटायूला जशी घाई झालेली असते, तशी या गरीब धरेला सावली देण्याची याला घाई झालेली असते. भारीच कौतुक आहे मला महोगनीचे.

महोगनीची पाने मोठी, एकांतरित, पिच्छाकृती, संयुक्तपर्ण प्रकारची, गुळगुळीत, हिरवीगार असून पर्णि-कांच्या सहा ते आठ जोड्या असतात. पानाची लांबी 20-25 सेंमी. असते. पर्णिका लांबट, दोन्हीकडे निमु-ळत्या असतात. एप्रिल-मेमध्ये महोगनीला फुले येतात. पानांच्या कक्षांमध्ये छोटे-छोटे, नाजूक तुरे येतात. फुले लहान-लहान पांढरट रंगाची, एकलिंगी असतात. फुलामध्ये चार किंवा पाच सुट्या पाकळ्या असून नर फुलात दहा सूक्ष्म पुंकेसर दिसतात. (श्री. द. महाजन)

महोगनीसारखचं गुलमोहर हे विदेशी झाड. ‘पर म्यां असं न्हाई म्हणणार की मपल्याला ते झाड आवडत न्हाई. कवी हाया न्हवं? कवी लोकास्नी हे झाड कम्पलसरी हाय. मंग त्योव हिंदीतला गुलजारबाबा असू द्या, का मराठीतली बहिणाबाई. समद्यांनी गुलमोहराची बाजू घेतलीच पाह्यजे!’

आपल्या महान आईची गुलमोहराशी निगडित सुंदर आठवण सोपानदेव चौधरींनी लिहून ठेवलीय. आमच्या विहिरीच्या धावेवर गुलमोहराचा वृक्ष होता. त्याला आई म्हणत असे ‘फुलाजी बोवा’, ‘फुलाजीमहाराज’. आईच्या या फुलाजीमहाराजाची सावली विहिरीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या माझ्या चुलत भावाच्या वाटणीवर पडत असे. तो एकदा संतापाने म्हणाला, ‘‘या झाडाच्या सावलीत माझे भाजीचे चार-पाच वाफे मरतात, हे झाड तोडून टाक.’’ आईच्या पोटात धस्स झाले. ती म्हणाली, ‘‘अरे, माझ्या राजा! विहिरीमागचा आपला शेंदऱ्या आंबा सामाईक आहे. याची सावली आमच्या बागायतीवर पडते. मग आंब्याचं झाडही तोडायचं का रे? अरे, आंबे खाऊन पोट भरत असेल, पण या फुलाजीमहाराजाकडे- गुलमोहराकडे पाह्यलं की मन भरून जातं!’’ आणखी एका लेखिकेनं लिहिलं आहे, गुलमोहराच्या छोट्या कळ्या आम्ही लहानपणी बाहुलीच्या लग्नात नारळ म्हणून वापरीत असू.

बाकी भडकपणानं सर्वांचं लक्ष वेधणारा गुलमोहर आता रस्तोरस्ती, खेडोपाडी झालाय. त्याची ओळख करून द्यायची मुळी आवश्यकताच नाही.

महोगनी, गुलमोहर या विदेशी झाडांनंतर आपण श्रीलंकेतून आलेल्या एका विदेशी पाहुण्याला भेटणार आहोत. तो आहे मास्ट प्री किंवा आसुपालव. त्याच्या पानाशी खऱ्या अशोकाच्या (सीता अशोक) पानांचे खूपच साम्य आहे. त्यालाच अशोक म्हणण्याची गल्लत ‘ऋतुचक्र’ या पुस्तकातही दुर्गाबार्इंनी केली आहे. गुलमोहराप्रमाणे याचाही परिचय करून देण्याची गरज नाही. सरळसोट वाढणारा हा खोटा अशोक घराघराच्या अंगणात पोहोचला आहे. तो पर्णशोभिवंत आहे. मेमध्ये त्याला येणारी पोपटी रंगाची नवी पालवी अतिशय सुंदर दिसते, म्हणून त्याची आठवण काढली, एवढेच.

आणखी एक विदेशी पाहुणा आपल्या उद्यानांची शोभा वाढवताना दिसतो, तो म्हणजे बॉटलब्रश. त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव आहे कॅलिस्टेमॉन सिट्रीनस. कॅलिस्टेमॉन याचा अर्थ सुंदर पुंकेसर असलेला. बॉटलब्रशच्या फुलांचे, फुलोऱ्याचे सौंदर्य प्रामुख्याने त्याच्या पुंकेसराच्या मनोहरी लाल रंगामध्ये असते. वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात फुलांचा मुख्य बहर असला तरी हिवाळ्याचे तीन महिने सोडल्यास बॉटलब्रश सर्व काळ कमी-जास्त प्रमाणात फुललेले दिसतील. अत्यंत दिखाऊ, चमकदार, सरळ उभे राहिलेले पुंकेसर फांदीवर अशा प्रकारे गोलाकार रचलेले असतात की, बाटली धुण्याच्या लालभडक केसांच्या लांब ब्रशचीच आठवण व्हावी.

मे महिन्यात फुलणाऱ्या किती तरी सुंदर वेली आहेत. त्यातले एक रूपसुंदर फूल आहे- गोकर्ण. त्याचे नावच प्रतीकात्मक आहे. ही एक बहुवार्षिक, वळसे घेत वाढणारी वेल आहे. खोड बारीक तारेसारखे, केसाळ. पाने पर्णदलांनी युक्त असतात. पर्णदले आकाराने लंब-गोल, टोकाकडे बोथट, गुळगुळीत असतात. फुले निळ्या रंगाची असून पानांच्या देठाच्या खाचेत एखादेच उमलते. गोकर्णाला चपट्या सरळ शेंगा येतात, त्या टोकाकडे अणकुचीदार असतात. बिया पिवळसर-तपकिरी नि गुळगुळीत असतात. महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी ही वेल आहे. उन्हाळ्याच्या मध्यापासून ते हिवाळ्याच्या मध्यापर्यंत ती फुलत राहते. संस्कृतात गोकर्णाला अपराजिता आणि गिरिकर्णिका अशीही नावे आहेत.

पॅशनफ्रूट हा सुंदर सरबत देणारा वेल आहे. कृष्णकमळाशी त्याच्या फुलाचे साम्य आहे. किंबहुना, त्याच्या पॅसिफ्लोरा या प्रजातीमध्ये किंवा कृष्ण-कमळाच्या कुळामध्येच त्याचा समावेश होतो. जातीचे विशेषनाम ‘एड्युलिस’ याचा अर्थ ‘खाण्याजोगे’ असा आहे. वेलाला उन्हाळ्यात व पावसाळ्यात फुले येतात. फुलांचा रंग पांढरा असून, मध्यभाग जांभळट असतो. फुलाच्या मध्यभागी जांभळ्या रांगांचे पुंकेसर आणि केसाळ ‘करोना’ असतो. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. म. वि. आपटे पॅशनफ्रूटच्या ‘करोना’ला गमतीने ‘आयाळ’ म्हणायचे.

या महिन्यात फुलणारी आणखी एक वेल- कुसर. तिला कुसरन असेही नाव आहे. सुवासिक फुलांची ही वेल असून, जाई-जुई-मोगऱ्याच्या कुळातली ती असल्याने तिला रानजाई असेही म्हणतात. मार्च ते जून या काळात म्हणजे उन्हाळाभर तिचा बहर असतो. खरं तर रानातून काढून तिला उद्यानांमध्ये लावायला पाहिजे, इतकी ती सुंदर आणि सुगंधी आहे.

आता अशा एक वेलाविषयी- ज्याची दोन-तीन पाने चावून खाल्ली, तर गोड पदार्थाची चव समजण्याची जिभेची शक्ती नाहीशी होते. म्हणून तिचे नाव आहे मधुनाशिनी. तिला बेडकीची वेल, सडे वेल अशी अनेक नावे आहेत. ही मोठमोठ्या वृक्षांवर वळसे घेत वाढणारी मोठी वेल आहेत. सह्याद्रीच्या माथ्यावरील प्रदेशात ती सगळीकडे आढळते. पाने खोडावर समोरासमोर येतात. आकाराने लंब-गोल, किंचित केसाळ, कुशाग्राकडे टोकदार, देठाकडील भाग गोलाकार असतो. फुले पिवळ्या रंगाची असून गुच्छासारख्या पुष्पसंभारात उमलतात. शेंगा चपट्या असतात. बिया लांब-रुंद, चपट्या, कडा पंखा-धारित, करड्या रंगाच्या असतात. कावळी असेही या वेलीचे एक नाव आहे.

हायस्कूलचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी महा-विद्यालयात विनाकारण सायन्सला प्रवेश घेतला आणि नापास झालो. त्या एका वर्षाचा उपयोग असा की, कवितेत मला मॉरफॉलॉजी ही संज्ञा वापरता आली आणि बोगनवेलीची जी रंगीत दिसतात, ती फुले नसून पानांचे मॉडिफिकेशन आहे- एवढे कळले. बोगनवेलीची पांढऱ्या रंगाची लवंगेच्या आकाराची फुले आत असतात! ब्राझीलमधून आपल्याकडे आलेल्या या वेलाला शोधायला फार लांब जावे लागत नाही. तिच्या प्रत्येक पानाच्या बुडांतून किंवा गाठीतून हुकासारखे आकडे असतात आणि हे आकडेच तिला आधाराशी बिलगून राहण्यास उपयोगी पडतात. बोगनवेलीच्या पुष्कळ जाती आणि उपजाती आहेत. हे सर्व प्रकार प्रामुख्याने उन्हाळ्यात भरभरून फुलतात. हिंदी सिनेमात नायक-नायिकांना गाणे म्हणताना पार्श्वभूमीसारखा बोगनवेलीचा उपयोग होतो. कारण एवढे मोठे ताटवे सहजपणे उपलब्ध होत नाहीत.

गारवेल ही नावाप्रमाणे उन्हाळ्यात शीतलता देणारी वेल आहे. मांडवावर किंवा कुंपणावर सोडण्यास फार सोईची म्हणून उपवनात किंवा घराच्या अंगणातही वाढवण्यात येते. ही पुष्कळ पसरते आणि सदापर्णी असल्याने दाट छाया देते, म्हणून तिला गारवेल म्हणतात. आधारावर फांद्या गुंडाळत जाणारा हा वेल अंगापिंडाने नाजूक असतो. स्पर्श झाला तरी कुठं टोचणार किंवा ओरखडे काढणार नाही. याची पाने साधी, साधारण पाच ते सात सेंमी आकाराची असून पाच ते सात भागांत बुडापर्यंत विभागलेली असतात. फुले पाच सेंमी व्यासाची निळी-जांभळी असून पानांच्या बगलांत येतात. पाच पाकळ्या एकत्र जोडल्या जाऊन घंटाकृती आकार प्राप्त होतो. पाकळ्यांवर फिक्या नक्षीरेषा असतात.

उन्हाळ्यात शिकेकाई या बहुवर्षायू महावेलाला फुले येतात. बाभळीच्या प्रजातीमधला हा वेल असल्याने बाभळीच्या गोंड्यासारखेच गोल-गोल मंजिरीरूप फुलोरे असतात. त्यामध्ये पिवळसर रंगाची अनेक बारीक-बारीक आकाराची फुले येतात. नंतर हिवाळ्यात बाभळीला येतात, तशा शेंगा येतात. ही शेंग आठ ते बारा सेंमी लांबीची असून तिच्यामध्ये आठ-दहा बिया असतात. याच बियांचे चूर्ण करून केस धुवायची शिकेकाई तयार होते. हा काटेरी वेल लावून कुंपणावर सोडण्यासारखा आहे. सह्याद्री परिसर आणि कोकण, मावळ भागात हे वेल विपुल प्रमाणात दिसतील.

असं म्हणतात की- पावसाळा रोगी, हिवाळा भोगी आणि उन्हाळा योगी. मला हे मान्य नाही. ग्रीष्म निष्क्रियता ही संकल्पनाच मला अमान्य आहे. शिक्षकी पेशातल्या माझ्यासारख्यांना ग्रीष्म हा अनेकार्थाने योगी वाटतो. सुट्या असतात. दीर्घ सुट्या असतात. पर्यटन करता येते. मोठे वाचन किंवा लेखन करता येते. रसनेला आम्र महोत्सव साजरा करता येतो. शेतात काही काम नाही, म्हणून शेतकरी घरी बसून झोपा काढत नाहीत आणि गृहिणी?(हाऊसवाईफसाठी हा किती सुंदर शब्द आहे) त्यांची म्हणून खास उन्हाळी कामं असतात. इर्जिक नावाच्या अतिशय सुंदर पुस्तकात अरुण जाखडे लिहितात,

‘उन्हाळी कामं ही कामं नव्हती, तर तो एक सांस्कृतिक खाद्य उत्सवच. लग्नकार्यात, रुखवतात उठून दिसावं म्हणून रंगीत कुरडयांपासून ते कोंड्याच्या पापड्यांपर्यंत किती पदार्थ केले जायचे. वर्षभरासाठी खडेमीठ, रांगोळी, शिकेकाई, हळद अशा गोष्टी घरातल्या उखळात कांडलेल्या, कुटलेल्या, जात्यावर दळलेल्या. ह्या कांडताना-दळताना कोणा बाईला श्रम वाटत नव्हते. कारण अशी कामं करताना तिच्या तोंडातून पटकन येणाऱ्या ओव्या, गाणी ही माहेर-सासर, घरातली नाती, वाडग्यातली गाई-गुरं या सगळ्यांविषयी वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारी. अशा सगळ्या उन्हाळी कामांचा शेवट होई तो कैरीच्या लोणच्याने. ह्या सगळ्या गडबडीत उन्हाळा कधी संपला, ते समजतच नसे.’

या आनंदाला थोडी बाधा वर्तमानपत्रांत, टीव्हीवर तापमानाचे वाढते आकडे पाहून येते खरी. एक्केचाळीस वगैरे ठीक आहे. त्याच्या पुढचे नागपूर, नांदेडचे आकडे काळजी वाढवतात.

‘उरी जेव्हा ज्वालारस झेलून

धरतीने तप केले दारुण

सुकता सुकता नद्या म्हणाल्या

हाच विश्वसंहार!’

ही कविता वाचून घाम फुटतो, पण त्याच कवितेत ‘कोसळली सर दक्षिण उत्तर/घमघमले मातीतून अत्तर’ ही ओळही येते. खरोखर पृथ्वीतलावर मृद्‌गंधासारखे दुसरे अत्तर नाही. उन्हाने शेकलेल्या ढेकळांवर पहिला-वहिला पाऊस पडतो, तेव्हा आपण नांगरलेल्या शेतात असू, तर आपल्यासारखा कोणी भाग्यवान नाही. वर्तमानपत्र उघडले की मॉन्सून कुठवर आला, ही बातमी शोधली जाते. टाइमटेबलनुसार जर तो आला, तर सात जूनला इथे पोचतो. सात जूनला मृग नक्षत्र लागते, परंतु त्याच्याही आधी रोहिणी असते. रोहिणी आणि मृग समवयस्क बहीण-भाऊ. पण-

पाळणा हलतो । भावाआधी बहिणीचा

पाऊस पडतो । मृगाआधी रोहिणीचा

असा पाऊस पडला की, मजाच मजा. दक्षिण भारतात जो मॉन्सून पूर्व पाऊस पडतो, त्याला ‘आम्रवर्षा’ असं सुंदर नाव आहे. कारण तेथील आंब्याचा हंगाम याच दिवसांत असतो. आपण या काळात लालरेशमी मृगाचे किडे पाहायला शेतात जायला पाहिजे. आम्ही एखादा कीडा पकडून आणून पंचपाळ्यातल्या कुंकवाच्या पाळ्यात ठेवायचो अन्‌ त्यात तो दिसायचा नाही. कालिदासाच्या ‘ऋतुसंहारा’त या मृगाच्या किड्यासाठी इंग्रगोप शब्द वापरला आहे.

विश्वास वसेकर, पुणे

(विश्वास वसेकर यांची ‘नवे ऋतुचक्र’ ही लेखमाला जानेवारीपासून सुरू झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्या त्या महिन्याचे निसर्गाच्या संदर्भातील लेख प्रसिद्ध होत असतात.)

Share on Social Media

चिंतन : 10

तर्काच्या विजयाची वाट

सुरेश द्वादशीवार

अगदी अलीकडे आपल्यातील राजा राममोहन रॉयांसारख्या सुधारकाला ब्राह्मो समाजाची स्थापना करावीशी वाटली. जोतिबांनी निर्मिक मानला. सारे संत या श्रद्धेच्या परंपरेतले आणि सुधारकही त्यातलेच (अपवाद एकट्या आगरकरांचा). टिळक, गांधींना गीता हा प्राणग्रंथ वाटायचा. डॉ.राधाकृष्णन्‌ही वेदांतीच. प्रत्यक्ष नेहरू व इंदिरा गांधी स्वतःला वेदांती समजत. आंबेडकरांनाही बुद्धाचा मार्ग स्वीकारावासा वाटला. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही मध्ययुगात ईश्वराची अंतिम सत्ता मानणारे लोक व तत्त्वज्ञ झाले. शास्त्रज्ञ व वैज्ञानिकांतही तो वर्ग होता. सारेच विकेंद्रित व भिन्न असताना त्यांना एकत्र राखणारे एक वैश्विक मन असते, असे हेगेल म्हणाला.

जगाचा कंटाळा आला की, आपल्या आत शिरायचे -एकांतात वा एकाकीपणात. आणि आपला कंटाळा आला की, आपल्यातून बाहेर पडून जगात यायचे- असा हा खेळ आहे. जग विविधांगी, विविधरंगी मुला-माणसांनी, स्त्रियांनी व पुरुषांनीच भरलेल नाही; ते चित्रांनी, शिल्पांनी, विविधरंगी पोषाखांनी, देशांनी, धर्मांनी, शास्त्रांनी आणि जीवनपद्धतींनीही भरले आहे. (तेवढे सारे कोणा एकाच्या वा अनेकांच्या वाट्याला अर्थातच येत नाही. आहे त्या कुंपणात माणसे जगतात. मग ती कुंपणे कंटाळवाणी होतात. तेव्हा हा खेळ सुरू होता. आपला एकाकीपणाही बहुविध ढंगांचा, रंगांचा, चांगल्याचा आणि वाईटाचाही असतो. पण तीच ती चित्रे किती पाहायची आणि तोच तो अभ्यास तरी किती करायचा?) या लपाछपीत आतले बरेचसे बाहेरही आठवत असते आणि बाहेरचेही आत. मग त्यात एकारलेपणा येतो. तोचतोपणाही येतो. मग खऱ्या वैतागाला, उद्विग्नतेला आणि अंतर्कलहाला सुरुवात होेते. बहुतेक माणसांच्या वाट्याला येणारा कंटाळा वा वैताग असा असतो. दर वेळी नवे काय आणायचे? कसे आणि कुठून आणायचे? ते म्हणतात, ‘प्रतिभावानांना एक जग पुरेसे नाही.’ पण तेवढी प्रतिभा असणारे आहेत किती आणि त्यांच्याही प्रश्नांना कुंपणे आहेत ती याच जगाची की नाही? माणसे जेव्हा आपण या आयुष्याला कंटाळलो असे म्हणतात, तेव्हा त्यांना याहून वेगळे काही म्हणायचे नसते. आहे त्यात आनंद मानण्याची, मिळेल तिथून तो मिळविण्याची वृत्ती किती जणांत असते? भारतासारख्या देशात इच्छामरणाची मागणी करणारी माणसे खूप आहेत आणि त्यांचे तसे अर्ज सरकारदरबारी धूळखात पडले आहेत. त्याच वेळी दुसऱ्या ग्रहांवर चक्कर मारून येऊ इच्छिणाऱ्यांचेही अर्ज नासा व इतर संस्थांकडे जमा होत आहेत. या दोन्ही ओढींमागचे सूत्र एकच- कंटाळा. या जगाचा आणि आपलाही. जे आशावादी यातून वेगळा अर्थ काढतील, त्यांचा आशावाद पूर्ण व्हावा एवढीच शुभेच्छा येथे त्यांना द्यायची.

घड्याळाच्या काट्याप्रमाणे चाकोरीबद्ध आयुष्य काढणारी काही माणसे व कुटुंबे असतात. आमचे आयुष्य आणि त्यातली कामे थेट टाइमटेबलातल्यासारखी असतात. त्यात सहभाग असतो, सहयोग असतो. अशा चौकोनी कुटुंबात एकाकीपण कुठे असते? की ते नसतेच?... फक्त त्यातल्या कोणा एकाला वेगळे करून उकलायचेच तेवढे असते. तसे उकलता आले की, त्या व्यक्तींचे व कुटुंबांचे घड्याळातले एकाकीपण व कोरडेपणही समजते. मराठीतील किती थोरामोठ्यांनी आपली आत्मचरित्रे अशा कोरडेपणाने, सत्य टाळून, असत्याची कास धरून व एकाकीपण झाकीत आनंदमय असल्याचे सांगणारी लिहिली आहेत. आपली लग्ने, मुले, त्यांचे संबंध यांची चर्चा न करणारी आत्मचरित्रे महाराष्ट्राला ठाऊक आहेत. काही चरित्रांत वा त्यांच्या चर्चेत एकच एक आनंदपर्व तेवढे येते, प्रेम येते, आस्थेच्या जाहिराती येतात. फक्त वास्तव येत नाही, एकांतामागचे कोरडेपण येत नाही, घरातले एकाकीपण येत नाही.

महाराष्ट्राचे एक थोर साहित्यिक नागपूरच्या एका तशाच नामवंत लेखकाकडे मुक्कामाला होते, तेव्हाची गोष्ट. नागपूरकर लेखकाने त्यांच्या स्वागतासाठी सायंकाळी खूप चांगली माणसे गर्दीने गोळा केली होती. पाहुणेही प्रसन्न होते. जरा वेळाने ते त्यांचे अनुभव त्यातल्या विनोदासह सांगू लागले. सारी मैफिल हसून दाद देत होती. पाहता-पाहता प्रस्तुत लेखकाचे लक्ष दारात बसलेल्या त्यांच्या पत्नीकडे गेले. त्यांचा चेहरा थंड व कोरडा होता. काहीसा कंटाळलेलाही होता. जरा वेळाने त्या उठून खालच्या मजल्यावर गेल्या. न राहवून हा लेखकही त्यांच्या मागे गेला. त्यांना थांबवून म्हणाला,‘‘वर केवढी मैफिल रंगविली आहे त्यांनी आणि तुम्ही अशा खाली एकट्याने का आलात?...’’ जराही न रागावता त्या म्हणाल्या, ‘‘अरे, हे रोजचेच आहे. त्याच त्या गोष्टी मी कितीदा अन्‌ कशा ऐकायच्या?’’ आता अवाक्‌ होण्याची वेळ प्रस्तुत लेखकाची होती. तो त्या दांपत्याकडे आनंदाचे कारंजे म्हणून पाहत आला. त्या कारंज्यात असे कोरडेपण वा एकाकीपण असेल, असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. मतभेद असतात, वाद व चर्चाही असतात; पण येथे उदासीनता होती. त्याच त्या अनुुभवांचा आणि ते ऐकण्याचा कंटाळा होता. हे कारंजे असे, तर बाकीची कोरडी ठणठणीत असणारी व नुसतीच उभी असणारी कारंजी कशी असतील? ज्या दांपत्याविषयी हे लिहिले त्यातले दोघेही लेखक, रसिक, संगीत, कला, नाटक अशा सर्व क्षेत्रांत एकत्र वावरणारे. तरीही त्यांच्यात तोचतोपणाचा व्यत्यय. माणसे जराशी खरवडूनच तेवढी पाहावी लागतात. तशी पाहिली की, ती एकटी व एकाकीच दिसतात. प्रकाशकणांच्या गर्दीत राहतात, पण एकेकटी असतात. ज्यांना त्यांचे आप्तस्वकीय आहेत, नातेवाईक आणि मित्र आहेत, पण तरीही त्यातले आपले म्हणावेसे कोणी वाटत नाही; त्या अभाग्यांच्या एकाकीपणाचे मूळ कशात असते? त्यांच्या अपुरेपणात की त्यांच्या सामाजिकतेच्या तुटकपणात? अशी माणसे व स्त्रिया आपल्या जगात फार आहेत. आपले म्हणावेसे आहेत त्यांना जवळ करता येत नाही आणि सभोवतीचे सारे पुन्हा वेगळेच असतात वा जाणवतात. अशी माणसे या ‘आपल्या’कडून नको तशा जास्तीच्या अपेक्षा बाळगतात काय की, त्यांच्या अपेक्षांना ती पुरी पडत नाहीत. शेवटी आत्मीयता हा दुतर्फा अनुभवाचा विषय आहे. तो अनुभवता येत नसेल तर त्याचा दोष कोणाला तरी द्यावाच लागतो. एक थोर मराठी विचारवंत म्हणाले, ‘‘ज्यांची बुद्धिमत्ता व प्रतिभा फार वरच्या प्रतीची असते, त्यांच्या लैंगिक व मानसिकही वासना फार मोठ्या असतात. त्यांना तेवढा प्रतिसाद देणारी माणसे वा मित्र कसे सापडणार? मग ती माणसे एकाकी राहतात व तसे अनुभवणे त्राग्याचे वा निराशेचे करतात’’... ‘‘ही माणसे तशा मैत्रीखातर पुढाकार घेत नाहीत काय?’’ या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘त्यांना नकाराची भीती वाटते वा शंका असते. शिवाय त्यांच्यातल्या काहींना तो कमीपणाही वाटतो. मग ती नुसतीच मुकाट भिरभिरत असतात.’’ अशी मुकाट भिरभिरणारी मोठी माणसे प्रस्तुत लेखकानेही खूप पाहिली आहेत. त्यातल्या काहींच्या रोजनिशाही वाचल्या आहेत. आपले अपुरेपण प्रामाणिकपणे सांगणाऱ्या.

आजचे जग ज्ञानाच्या स्फोटाचे आहे. त्यात दाही दिशांतून अंगावर येणारे ज्ञानाचे प्रकाशझोत दिपविणारे आहेत. त्यांचा प्रकाशझोत एवढा दीप्तिमान की, तो पाहणाऱ्याचे डोळे दिपवून टाकतो. परिणामी, खूपदा त्यामुळे माणसांची खरी दिशाच त्यांना दिसेनाशी होते. तसे झाले की त्यांच्या वाट्याला ते भिरभिरणे येते. त्याही प्रकाशझोतात ज्यांना त्यांच्या दिशा व मार्ग ठामपणे दिसत व जाणवत असतात, ते भिरभिरत नाहीत. त्यांना इतरांचे भिरभिरणे दिसत असते. त्यात त्यांना ठाम वाटणारी जवळची माणसेही कधी कधी सापडतात, तर कधी ठाम वाटणाऱ्या माणसांचे पाचोळा असणेही जाणवते. हे प्रकाशझोत खूपदा डोळ्यांपुढे अंधारीही आणतात. त्यात संबंधिताला आपले जरा वरच्या स्तरावरचे अस्तित्व जाणवते. त्याच वेळी तिथे आपल्यासोबत कोणी नाही हेही त्यांच्या ध्यानात येते. माणसाचे मन कधी स्थिर नसते. एका क्षणी या पातळीवर तर दुसऱ्या क्षणी ते दुसऱ्या पातळीवर, जात असते. अशा मनाला मग कधी आत्मीयता जाणवते, जवळचे दिसतात, तर दुसऱ्याच क्षणी त्यांचे दूरत्वही त्यांना दिसू लागते.

एक अभ्यासू महिला म्हणाली, ‘‘मला पहाटे खूपदा शारीरिक व मानसिक एकाकीपण आल्याचे जाणवते. उजाडले की ते नाहीसे होते. नंतरच्या काळात दर दोन अनुभवांदरम्यान ते अधून मधून डोकावते.’’ अनुभव काळाने मर्यादित असतात, पण एकाकीपण तसे नसते. ते अमर्यादही असते आणि क्षणिकही असते. मग मनात येते- आज आपल्याला खरी साथ हे एकाकीपणच देते काय? आपले खरे स्वरूप तेच असते काय? कारण ते न बोलविता येते व राहते. अनुभव येतात, आणावे लागतात, पुढे ते विस्मृतीतही जातात. ते कशाचे स्थिरपण? मग ॲरिस्टॉटल म्हणतो तसा माणूस हा सामाजिक प्राणी असतो की नाही? माणसाचे असणे आणि त्याचे समाजाचे अभिन्न अंग होऊन राहणे यावरच तर साऱ्या जगाच्या समाजकारणाची, राजकारणाची, धर्मकारणाची, संस्कृती व जीवनपद्धतीची मदार उभी आहे. एकाकीपण खरे मानले तर सामाजिकता बाधित होते आणि तिच्या बाधित होण्याने सारेच विषय त्यांच्या आजवरच्या इतिहासासह जमीनदोस्त होतात. सामाजिकता हे सत्य की गृहीत? समाज ही एक अमूर्त कल्पना आहे, असे काही समाजशास्त्रज्ञ अलीकडे म्हणूही लागले आहेत. ती माणसांची एकत्र राहण्याची निखळ गरज असते. समाज नसतोच, असतो तो समूह. ती माणसांची एकत्र राहण्याची निखळ गरज असते. तो समाज नसतो, समूहही नसतो; ती निव्वळ एकेकट्या माणसांची गर्दी असते- त्या क्वांटासारखी किंवा पाण्यातल्या मॉलेक्युलसारखी.

तसेही प्रत्येक माणसाचे जग ही एक स्वतंत्र दुनिया असते. तिचे स्वरूप, आकार आणि वस्तुमान हे सारेच त्याच्या मनाने व बुद्धीने ठरविलेले असते. ते साऱ्यांना सारखे दिसते वा अनुभवता येते असेही नाही. परिणामी, जेवढी माणसे तेवढ्या दुनिया. माणसांच्या संख्येएवढीच मग जगांचीही संख्या. माणसे परस्परांशी जुळवून घेतात म्हणजे तरी काय? आपापल्या जगांच्या मर्यादांना व आकारांना कमी-अधिक करून ती दुसऱ्यांना सामावून घेतात. पण मूळ माणसे एकेकटी व स्वतःच्या जगातलीच असतात. त्यांचे अनुभवच नव्हेत, तर मनोव्यापारही परस्परभिन्न असतात. कधी जुळणारे, तर कधी दुरावणारे. तरीही जग असते. त्यातली माणसे असतात. जंगलातल्या वाघांना एक मर्यादित क्षेत्र त्यांचे स्वायत्त म्हणून हवे असते, असे प्राणिशास्त्र सांगते. माणसांचे मनोव्यापारही असे त्यांच्या क्षेत्रातलेच असतात. त्या क्षेत्रांच्या कडा परस्परांना घासल्या की त्यात संघर्ष उडतात. एरव्ही माणसे परस्परांना समजून व सामावूनही घेतात. पण असे क्वचित घडते व घडते तेही नाइलाजाने, मने मारून आणि स्वतःचा संकोच करून. मग हे जग व्यक्तीचे की समूहाचे, समाजाचे की गर्दीचे?

व्यक्तीच्या अंगाने विचार केला, तर या प्रश्नाचे येणारे उत्तर समाजाच्या केलेल्या विचाराहून वेगळे येते. माणसे परस्परांशी जुळवून घेत या परस्परविसंगत उत्तरांसह जगतात. तेच जीवन व तोच समाज. एकेका समाजात जेवढी माणसे एकत्र येतात तेवढे त्यांचे विकल्प वा कळप होतात. देश, धर्म, वर्ग, जाती, पंथ ही त्याचीच रूपे. यातही माणसे असतात ती एकाकी व एकटीच. पण सुरक्षेची गरज व नाइलाज या गोष्टी त्यांना परस्परांपासून दूर राहू वा जाऊ देत नाहीत, एवढेच.

अशा वेळी ज्या गोष्टींचे स्मरण होते, त्या याहून वेगळ्या आहेत आणि त्या हे वास्तव नाकारणाऱ्या वा दुर्लक्षिणाऱ्या आहेत. जगाला एका सूत्रात राखणारी आदिशक्ती ब्रह्म ही आहे आणि बाकीचे जग ही त्याची आंशिक वा भ्रष्ट रूपे आहेत, असे वैदिक धर्म सांगतो. बौद्ध धर्म असे ब्रह्म वा अंतिम तत्त्व मानत नाही, पण तो जग चालवू शकणारे व त्यातच अंतर्भूत असलेले एक सामर्थ्य मानतो. ते सामर्थ्यच जगाला चालना देते, त्याचा लोभ करते आणि त्याला पुनश्च नवे जीवन प्रदान करते. ज्यू वा ख्रिस्ती धर्म किंवा इस्लाम एखादे होली घोस्ट वा परमपवित्र अल्ला या अंतिम शक्ती मानतात. त्या शक्तीच या जगाचे चालक, पालक व अखेरचे न्यायाधीश असल्याचेही सांगतात. धर्मश्रद्धांना तर्क लावायचे नसतात. त्यांना प्रश्न विचारायचे नसतात व कारणमीमांसाही मागायची नसते. त्या साऱ्या केवळ श्रद्धेने स्वीकारायच्याच तेवढ्या असतात. सारे जग या श्रद्धांवर विसंबून आहे. अगदी अलीकडे आपल्यातील राजा राममोहन रॉयांसारख्या सुधारकाला ब्राह्मो समाजाची स्थापना करावीशी वाटली. जोतिबांनी निर्मिक मानला. सारे संत या श्रद्धेच्या परंपरेतले आणि सुधारकही त्यातलेच (अपवाद एकट्या आगरकरांचा). टिळक, गांधींना गीता हा प्राणग्रंथ वाटायचा. डॉ.राधाकृष्णन्‌ही वेदांतीच. प्रत्यक्ष नेहरू व इंदिरा गांधी स्वतःला वेदांती समजत. आंबेडकरांनाही बुद्धाचा मार्ग स्वीकारावासा वाटला. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही मध्ययुगात ईश्वराची अंतिम सत्ता मानणारे लोक व तत्त्वज्ञ झाले.

शास्त्रज्ञ व वैज्ञानिकांतही तो वर्ग होता. सारेच विकेंद्रित व भिन्न असताना त्यांना एकत्र राखणारे एक वैश्विक मन असते, असे हेगेल म्हणाला. आइन्स्टाईन हा वैज्ञानिकही या विश्वातल्या वस्तुमानाचे वेगळेपण सांगताना वेग व दृष्टी यांच्यामुळे त्यात येणारे एकत्व सांगतो. प्रकाशाचे कणही एकाच प्रवाहात पण वेगळे असतात. एकाकीपण मान्य; पण त्या एकाकीपणाला सांधून ठेवणारे, अजून कोणाला न गवसलेले एक अंतिम सत्य, सूत्र वा तत्त्व असते वा असावेच, असे या साऱ्यांचे म्हणणे आहे. एवढ्या साऱ्या थोरांचे म्हणणे आपण एकाएकी मोडीत कसे काढायचे? तो मार्क्सच तेवढा म्हणाला, ‘हे सारे मानवी जीवन शोषणाच्या व्यवहाराने आणि शोषकांच्या सामर्थ्याने बांधले आहे.’ हॉब्जच्या मते राजतंत्र साऱ्यांना एकत्र व धाकात ठेवते. तर लॉक म्हणतो, एकत्र राहण्याचा करार माणसांनी आपसात केला असतो. रूसो सारे स्वातंत्र्य मान्य करतो. निसर्गातले गुण स्वीकारतो. पण त्यालाही एक करार मान्यच आहे.

सारांश- हे क्षेत्र अजून त्याच्या निर्णायक उत्तरापर्यंत पोहोचायला या वैश्विक श्रद्धांचा अडसर दूर करावा लागतो आणि तो जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तर्क व श्रद्धा, मेंदू व मन यांच्यातले हे सनातन भांडण तसेच पाहावे व अनुभवावे लागते. एक गोष्ट मात्र आश्वस्त करणारी. तर्क कधी हरत नाही आणि सत्य कधी पराभूत होत नाही. त्यांच्या विजयाची जगाला वाट आहे, एवढेच अशा वेळी मनात येते.

सुरेश द्वादशीवार, चंद्रपूर

(लेखमाला समाप्त, या लेखमालेची पुस्तिका पुढील महिन्यांत साधना प्रकाशनाकडून येत आहे.)

Share on Social Media

वर्तमान

करोनाने आपल्यासमोर आरसा धरला आहे

मनीषा गुप्ते

आज संपूर्ण समाजावर शासनाचे जे बारीक लक्ष दिसून येत आहे (ज्याला दुष्यंत कुमार ‘लहूलहान नजर’ म्हणाले आहेत), ते महिलांवर पिढ्यान्‌पिढ्या घराच्या आत राहिलेले आहे. घरात डांबून ठेवल्या गेलेल्या परिस्थितीमध्ये कुटुंबीयांचे (विशेषतः वडीलमंडळी आणि भावांचे) हे नियंत्रण अनावर झाले आहे, हे महिलांच्या अनुभवकथनातून सामोरं येत आहे. हे ऐकत असताना मनात विचार आला की- आपल्या देशातील काही भाग अनेक दशकांपासून अशाच प्रकारच्या (किंबहुना याहून अधिक घट्ट) लॉकडाऊनमध्ये राहिलेला आहे. तिथले लोक सैन्याच्या, पोलिसांच्या किंवा अतिरेक्यांच्या ताब्यात असल्याने भयभीत जीवन जगत आहेत. तिथला कष्टकरी वर्ग आतापर्यंत कसा जिवंत राहिला असेल? घर कसं चालवलं असेल? आणि सद्य परिस्थितीमध्ये देशभरात अडकलेले स्थलांतरित मजूर अन्न, निवारा कसा मिळवत असतील?

आंतरराष्ट्रीय कामगारदिन आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीचा दिवस हे दोन्ही आपल्याला कष्टकऱ्यांच्या लढ्यामुळे लाभले. त्यानिमित्ताने काही विचार तुमच्यापुढे मांडत आहे. अर्थात, कोविडचा संदर्भ मांडणी करताना मनात आहेच.

आपल्या समाजात वर्ग, जात, धर्म, पितृसत्ता आणि लिंगभाव यामुळे पूर्वीपासून (सामाजिक अंतर) राहिलेले आहेच. गरीब, भटके-विमुक्त, दलित, अल्पसंख्य, ट्रान्स जेंडर व्यक्ती, वेश्याव्यवसाय करणारे, कुष्ठरोग असलेले इत्यादी पूर्वीपासून वेगळ्या वस्त्यांमध्ये ठेवले गेले आहेतच की. आपले शेजारीपाजारी कोणत्या जातीचे, धर्माचे, वर्गाचे आहेत हे जर आपण तपासून पाहिले, तर हा मुद्दा नेमका लक्षात येईल. विकलांग व्यक्तीसुद्धा समाजात सहजपणे वावरताना दिसत नाहीत. महिला घराच्या आत आणि पुरुष घराबाहेर, असं पूर्वापार आहेच. कोरोनाच्या साथीचा प्रतिबंध करण्यासाठी नव्याने मांडलेल्या संकल्पनेतून उतरंडीवर आधारित ही व्यवस्था भक्कम होता कामा नये. आपल्याला ही साथ रोखण्यासाठी आवश्यक आहे ते काही काळापुरते असलेले शारीरिक अंतर. खरं तर आजच्या काळात सामाजिक अंतर जितकं कमी करता येईल तितकं केलं पाहिजे. नाही तर शिळ्या कढीला उकळी दिल्याप्रमाणे परत जुने पायंडे पाडले जातील. उदाहरण द्यायचे झाले- तर सुनामीनंतर तमिळनाडूमध्ये उद्‌ध्वस्त झालेल्या गावाची आखणी परत जातीवर आधारित केली जात असताना एका स्त्रीवादी संस्थेला आक्षेप घ्यावा लागला, नकाशा बदलून परत नवी आखणी करा, असा हट्ट धरावा लागला.

घरात महिला आणि मुले यांच्यावर या लॉकडाऊनच्या काळात जगभरात हिंसाचार इतका वाढलेला आहे की, संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी- श्री.अन्तोनिओ गुटेरेश यांनी सर्व देशांना कौटुंबिक हिंसाचारला सामोरं जाण्यासाठी लागणाऱ्या सर्व कार्यवाहींना (पोलीस, न्यायालये, वैद्यकीय, वाहने इत्यादी) अत्यावश्यक सेवा म्हणून जाहीर करण्याचा आग्रह केला. जगभरातील संघर्ष आणि युद्धमय परिस्थितीला आळा घालण्याचे आवाहन-सुद्धा त्यांनी केले आहे. घराच्या आतील आणि बाहेरील हिंसाचाराचा थेट संबंध आपल्याला यावरून लक्षात येतो. भारतात लॉकडाऊनच्या पहिल्या अकरा दिवसांत राष्ट्रीय चाइल्ड हेल्पलाइनवर मुलांद्वारे आलेले ब्याण्णव हजार फोन हे घरात होणाऱ्या हिंसाचारासंबंधीचे होते. आपल्या देशात आणि जगभरात कौटुंबिक हिंसाचार सहन करत असलेल्या महिला आणि मुलांसाठी हेल्पलाइन तातडीने उभ्या कराव्या लागल्या आहेत, यावरूनच पितृसत्ताक घर हे बाई व मुलांसाठी सर्वांत असुरक्षित ठिकाण आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक हिंसाचार जणू काही शिगेला पोहोचले आहेत. असं चित्र दिसून येत आहे. घराच्या चार भिंतींमध्ये किंवा एका खोलीच्या पत्र्याखाली आज महिला आणि मुले आपल्यावर हिंसा करणाऱ्या व्यक्तींसोबत बंदिस्त झालेली आहेत. प्रत्येक हालचालीवर, फोनकॉलवर कडक नियंत्रण असल्यामुळे बाहेरच्या कोणाशी तर बोलणे अशक्यप्राय झालेले आहे, परंतु या सततच्या दबावामुळे अधिक मानसिक त्रास भोगावा लागत आहे. घरात डांबून ठेवलं गेलंय म्हणून पुरुषवर्ग हिंसक झालाय, नोकरी जाईल या भीतीखाली मारहाण करत आहे, वगैरे कारणे पुरुषांच्या वतीने काही जण देत आहेत. घराच्या आत महिलेवर पुरुषापेक्षा जास्त ताण आहे, हे लक्षात घेतले जाणार की नाही? रोज सर्वांची मर्जी राखणे, नवे पदार्थ करणे, सर्व घरकाम करणे, कुटुंबामधील व्यक्तींमध्ये असलेले संघर्ष-मारामाऱ्या-शीत युद्धे सांभाळत आजारी, वृद्ध आणि मुलांची काळजी घेणे, तुटवड्याच्या परिस्थितीत घर चालवणे, मुलांचा अभ्यास बुडत आहे आणि घरच्यांच्या नोकऱ्या किंवा व्यवसाय पुढे राहतील की नाही याबद्दलचे विचार काही कमी ताण देणारे आहेत का?

गावातून शहराकडे शेतमाल गेला नाही, तर बाई (शेतमजूर म्हणून पगार न मिळाल्यामुळे आणि कुटुंबाच्या मालकीच्या शेतावर काम करणारी मजूर म्हणूनसुद्धा) सद्य परिस्थितीत पुरुषांपेक्षा अधिक होरपळून जात आहे. तसेच शहरात शेतीमाल न आल्यामुळे ज्या लोकांच्या घरात काम करत होत्या, त्या महिलांना अतिरिक्त उत्पादनाचे साधन मिळत नाहीये. महिला कामगारांची परिस्थिती पुढील काही वर्षांत अधिक बिकट होणार आहे, हे निश्चित. घराच्या आतले आणि बाहेरचे काम यांचा दुहेरी बोजा त्यांच्यावर असल्यामुळे. पोलीस बाई, आशा, ए.एन.एम. इत्यादी बाहेर लोकांच्या सतत संपर्कात असतात. त्या ड्युटी संपल्यावर घरकाम तर करतातच, पण ‘घरी लागण घेऊन आलीस का?’ अशा ताशेऱ्यांना तोंडसुद्धा देत आहेत. कर्जबाजारी झालेल्या कुटुंबांमधील महिलांना घराच्या आतील संकटांना तर तोंड द्यावेच लागते, परंतु कुटुंबाच्या वतीनं अनेकदा घेणेकरी पुरुषांनाही सामोरं जावं लागतं. त्याचे परिणाम काय होत असतील, ते आपण समजू शकतो.

वंचित घटकांतील महिला तर घराबाहेरसुद्धा या तुटवड्याच्या काळात पाणी, इंधन, भाजीपाला गोळा करत असताना विविध प्रकारचे हिंसाचार झेलत आहे. शहरातून गावाकडे परतलेल्या कुटुंबांची परिस्थिती तर अतिशय बिकट आहे. जातिव्यवस्थेत बुडालेल्या ग्रामीण भागात दलित आणि भटके-विमुक्त लोक कसे काय जगत असतील? स्त्रिया पाणी कुठे भरत असतील? आजपर्यंत आपण जातिव्यवस्था, कर्जबाजारीपणा आणि गावगुंडांचा अत्याचार यामुळे गरिबांचे लोंढे शहराकडे जाताना पाहिले; पण गावाकडे जाण्यासाठीची इतकी केविलवाणी धडपड आजपर्यंत पहिली नव्हती. मुलांच्या शिक्षणाचे काय होणार आहे, हे कोणालाच माहीत नाही. मात्र नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असुरक्षित परिस्थितीमध्ये लहान वयात लग्न आणि बाळंतपणे आपण येत्या काळात पाहणार आहोत यात शंका नाही. जगभरात नको असलेली 80-90 लाख गरोदरपणे उद्‌भवली आहेत, असं म्हणतात. गर्भनिरोधके आणि सुरक्षित गर्भपाताची सोय उपलब्ध नसल्याने एक तर महिलांना आणि तरुण मुलींना असुरक्षित गर्भपात भोगावा लागणार, नाही तर मानस नसताना मूल जन्माला घालावे लागणार. आज बहुतांश खासगी हॉस्पिटल पूर्णपणे बंद आहेत. आपल्या हक्काच्या असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्येसुद्धा ओपीडी सेवा बंद करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत गर्भपात सुविधांची गणती अत्यावश्यक सेवांमध्ये होत नाही, तोपर्यंत महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करायला लागणार आहे. त्यातही गर्भावस्थेचा काळ तीन महिन्यांपेक्षा पुढे गेला, तर कायदेशीर अडथळा आलाच. या एका उदाहरणावरून सर्व आरोग्यसेवा केवळ कोविड-19 साठी वापरणे हे किती धोकादायक आहे, हे लक्षात येईल. पुढील काही महिन्यांत किंवा येत्या वर्षात नको असलेलं बाळंतपण सामोरं आलं, तर येणाऱ्या आर्थिक मंदीच्या काळात मध्यमवर्गातील महिलेला नोकरी सोडणे भाग पडू शकते आणि कष्टकरी वर्गातील महिलेला एक अधिक जबाबदारी पेलावी लागणार आहे. आणखी म्हणेज - दोन मुलं असलेल्या बाईला तिसरे मूल झाले, तर तिचा राजकारणातील सहभाग बंद रेशन कार्डवर तिसऱ्याला धान्य नाही; एवढेच नव्हे तर बाळंतपणाची रजासुद्धा बंद! खरं तर आपल्या देशात 90 टक्के महिला असंघटित क्षेत्रात काम करतात, म्हणून त्यांना बाळंतपणाची रजा आजतागायत मिळालेली नाही. ही रजा सार्वत्रिक करण्याऐवजी, लैंगिक संबंध ठेवणे व गरोदरपण अंगावर घेणे या निर्णयप्रक्रियेत महिलेचा फारसा सहभाग नसताना बाळंतपणाची रजा असलेल्यांची काढून घेणे म्हणजे सांविधानिक आणि मानवी हक्कांवर घालाच म्हणावा लागेल नाही का?

Work from home याचे निकष पुरुष आणि स्त्रीसाठी अत्यंत वेगळे असतात. मध्यमवर्गातील स्त्री चोवीस तास घरी असलेल्या कुटुंबीयांची काळजी घेण्यात अडकली आहे. दुसरीकडे इतरांच्या घरी काम करणारी मजूर महिला सार्वजनिक संडास, पाण्याचा नळ वापरत आहे. कष्टकरी वर्गातील महिला अपेक्षित असलेले फिजिकल अंतर कसं पाळणार? आणि पुढे जाऊन मध्यमवर्गाकडून ‘बघा, तुमच्यामुळे ही साथ आटोक्यात येत नाहीये’ असा तिच्यावर आळ घेतला जाणार आहे, यात शंका नाही. पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये नवऱ्यापासून शारीरिक अंतर पाळणे बायकोला तितके सोपे नाही. घराबाहेर कोणीही पडले असो पण विषाणूची लागण घराच्या आत रोखणे ही महिलेची जबाबदारी मानली गेली असली, तरी त्यासाठीची निर्णयप्रक्रिया तिच्या हातात नाही. कोरोनाच्या काळात आणि त्यानंतर महिला व मुले एकटी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंटाळलेला पुरुष घर सोडून जाऊ शकतो, पुन्हा विवाहसुद्धा करू शकतो. स्त्री काय करणार? या बिकट परिस्थितीमध्ये मुले कशी जगवणार?

जेव्हा पुरुषांची नोकरी जाते, तेव्हा महिला नोकरीच्या शिडीवरून खाली ढकलल्या जातात. कमी पगार असलेली नोकरी किंवा काम करणे अनिवार्य ठरते. कालांतराने महिला घरी बसल्याने कामे करायला लागते (विडी वळणे, भरतकाम करून देणे इत्यादी). कोणाशी बोलायला किंवा जेवायला वेळ नाही. एक कोणी तरी माणूस कापड आणून देतो, कोणी दुसरी व्यक्ती दोरा आणून देते, तिसरा डिझाईनचे तपशील देतो आणि तयार झालेले वस्त्र न्यायला वेगळाच इसम येतो. जर आपला नेमका मालक (?) कोण हेच माहीत नसेल, तर कामगार म्हणून संघटित होणार कसं? मागण्या कोणाकडे करणार? दुसरीकडे एक्सपोर्ट झोनमध्ये काम करणाऱ्यांना संघटना बांधायची बंदी. लग्न झालंय, हे सांगायची बंदी.

या कोरोनाच्या साथीनंतर कामगार चळवळ बांधणे सोपे असणार नाही, असं एकंदरीत दिसतंय. सरकार तर मालकांना अधिक सवलती देणार हे स्पष्ट आहे, पण त्या पलीकडे जाऊन कामगारसुद्धा निव्वळ जगण्यासाठी सुरू असलेल्या केविलवाण्या धडपडीपोटी, कोणत्याही परिस्थितीत कारखाना चालू राहावा या भूमिकेतून ट्रेड युनियनमध्ये यायला बिचकतील का? मुंबईमध्ये कामगार चळवळीत असलेल्या माझ्या बहिणीकडून मी विषण्ण करणारे अनुभव आधीच ऐकले आहेत. माझे वडील कामगार चळवळीमध्ये आयुष्यभर होते. पण गेल्या काही वर्षांत कामगारांची परिस्थिती फारच बिकट झाली आहे, असं तेही म्हणायचे. मागील शतकात लोकाभिमुख चळवळींनी लढून मिळवलेले कामगारांचे हक्क या शतकात अबाधित राहतील का, हे सांगणं कठीण झालं आहे.

ज्याखाली आपण सध्या आलो आहोत, त्या राज्यकर्त्यांच्या आणि समाजाच्या सततच्या धाकाखाली वंचित समूह अनेक शतकांपासून राहिलेले आहेत. आज संपूर्ण समाजावर शासनाचे जे बारीक लक्ष दिसून येत आहे (ज्याला दुष्यंत कुमार ‘लहूलहान नजर’ म्हणाले आहेत), ते महिलांवर पिढ्यान्‌पिढ्या घराच्या आत राहिलेले आहे. घरात डांबून ठेवल्या गेलेल्या परिस्थितीमध्ये कुटुंबीयांचे (विशेषतः वडीलमंडळी आणि भावांचे) हे नियंत्रण अनावर झाले आहे, हे महिलांच्या अनुभवकथनातून सामोरं येत आहे. हे ऐकत असताना मनात विचार आला की- आपल्या देशातील काही भाग अनेक दशकांपासून अशाच प्रकारच्या (किंबहुना याहून अधिक घट्ट) लॉकडाऊनमध्ये राहिलेला आहे. तिथले लोक सैन्याच्या, पोलिसांच्या किंवा अतिरेक्यांच्या ताब्यात असल्याने भयभीत जीवन जगत आहेत. तिथला कष्टकरी वर्ग आतापर्यंत कसा जिवंत राहिला असेल? घर कसं चालवलं असेल? आणि सद्य परिस्थितीमध्ये देशभरात अडकलेले स्थलांतरित मजूर अन्न, निवारा कसा मिळवत असतील?

सध्याच्या वाढत्या फॅसिझम आणि धर्मावर आधारित राष्ट्रवादाच्या काळात प्रत्येक अनिष्ट घटनेचा वापर सामाजिक दुफळी वाढवण्यासाठी आणि लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्य खिळखिळे करण्यासाठी केला जात आहे, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. या विचित्र रोगराईचे आणि लॉकडाऊनचे अरिष्ट जणू काही मुसलमान समाजाने आणले, असं सतत दर्शवलं जात आहे. आर्थिक बहिष्कार, हिंसाचार, तिरस्कार करणे अधिक समाजमान्य होत आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे लक्ष मी नाझी-जर्मनीत यहुदी लोकांबद्दल (त्यांचा अतिभयंकर मानव संहार करायच्या आधीच्या काळात) जे शब्दप्रयोग आणि विषारी प्रचार केले गेले, त्याकडे वेधू इच्छित आहे. तसेच, कोण थाळी वाजवतंय, कोणी घराचे दिवे बंद केले नाहीत, हे आता शेजाऱ्यांच्या पक्कं नजरेस आलं आहे. स्थानिक पातळीवरच पुरोगामी किंवा वरून आलेला आदेश न पाळणाऱ्याचा काटा काढून टाकणे सोपे होणार आहे. अलीबाबाच्या गोष्टीत एखाद्याच्या घरावर फुली मारून त्याच्यावर नंतर डाका घालायचा, हे आपण लहानपणी वाचलं असेलच. बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने अशा हिंसक कारवायांमध्ये सामील होऊ शकतात; सर्वच धर्मांच्या अतिरेकी विचारांकडे ओढले जाऊ शकतात. मात्र ज्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन जे तुरुंगात वर्षानुवर्षे रखडत बसतील- त्यात दलित, गरीब, कष्टकरी, आदिवासी आणि अल्पसंख्य मोठ्या प्रमाणात असतील, हे नक्की. नाझी जर्मनीमध्ये खाकी कपडे घातलेल्या­(SA Sturmabteilung, , किंवाAssault Division, ज्यांना Storm Troopers किंवा Brown Shirts म्हटलं जायचं) नावाच्या निम्नलष्करी संघटनेमध्ये 1930 च्या दशकात मोठ्या प्रमाणात तरुणांची भरती झाली होती. पुरोगामी व्यक्ती आणि चळवळी, विचारवंत, कामगार चळवळ, यहुदी धर्माचे लोक, आर्य नसलेले लोक, समलिंगी व्यक्ती इत्यादींविरुद्ध अतिशय क्रूर प्रकारे दहशत फैलावणे, घरे लुटणे व सामानाची मोडतोड करणे, लोकांना देशोधडीला लावणे, कायदा हातात घेऊन लोकांना भर रस्त्यात फाशी देणे इत्यादी कारस्थाने ही संघटना करत असे. हिटलरच्या सत्तावृद्धीमध्ये या संघटनेचा मोठा हातभार होता. अर्थात, जर्मन राष्ट्राविषयीची वैचारिक बांधणी करणारी SS (Shutzstaffel) ही संघटना मात्र संपूर्णपणे वेगळी होती. वांशिक वर्चस्ववाद अमलात आणणारी ही संघटना समाजातील अतिउच्च घटकांमधून निर्माण केलेली होती.

आपल्याकडेसुद्धा डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि निर्भय वार्ताहर गौरी लंकेश यांच्या हत्या, तसेच बिथरलेल्या जमावाने मुसलमानांना ठेचून मारणे अशी दहशतीची कृत्ये स्थानिक पातळीवरील पुरुषांनी केली. मुंबईवर भीषण अतिरेकी हल्ला करण्यासाठी पाठवलेले सर्व पाकिस्तानी तरुण गरीब घरातले होते. खरे सूत्रधार मात्र सामोर आले नाहीत, ते सुरक्षित आपल्या ठिकाणी राहिले. सांगायचे तात्पर्य असे की-जितकी गरिबी आणि बेरोजगारी वाढेल तितका कष्टकरी समजातील तरुण मूलतत्त्ववादी, अतिरेकी आणि दहशतवादी संघटनांच्या तावडीत सापडला जाईल. एकीकडे अतोनात कष्ट करून वाढवलेल्या कष्टकरी महिलेच्या मुलावर अशा प्रतिगामी विचारांचा विळखा आणि दुसरीकडे तिच्या मुलीवर अशा प्रखर जातिवादी अथवा धर्मवादी अस्मितेची संस्कृती आणि प्रतिगामी बनत चाललेल्या कुटुंबाची इभ्रत जपून ठेवण्यासाठी जबाबदारी- पारंपरिक पोषाख घालणे, आई-वडिलांनी ठरवून दिलेल्या स्वजातीतील मुलाशी लग्न करणे, कौटुंबिक हिंसाचार सहन करणे इत्यादी. कष्टकरी आईने आपल्या आयुष्याची बेरीज -वजाबाकी कशी करायची? शोकांतिका कुठे मांडायची?

अर्थात, आज आपल्याला लोकशाही पद्धतीने संघर्षाचा मार्ग दाखवला तो कष्टकरी महिलांनी आणि त्यातसुद्धा मुसलमान महिलांनी! देशभरातील शाहीन बागांमध्ये थंडीच्या रात्री मुलाबाळांना घेऊन या हजारो महिला अडीच-तीन महिने नागरिकत्वाच्या मुद्द्याला धरून सामूहिक सत्याग्रहात सामील झाल्या. देशभरातून भरघोस प्रतिसाद व मदत अनेक कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी केली असली, तरीसुद्धा तंबूमध्ये, अहोरात्र बसणाऱ्यांमध्ये उच्चभ्रू मुसलमान महिला नव्हत्या आणि मुस्लिमेतर महिलासुद्धा नव्हत्या. आजपर्यंत पुढे आणलेले तोंडी तलाक आणि बहुपत्नीकत्व एवढेच मुद्दे आमच्या आयुष्यात नाहीत (खरं तर नवऱ्याने टाकून देणे किंवा दुसरी बायको करणे हे हिंदू आणि इतर स्त्रियांच्या आयुष्याचाही भाग आहे, ही सत्यस्थिती आहे) हे जणू काही मुस्लिम महिलांनी अधिरेखित केले. सीएए, एनआरसी आणि एनपीआर हे सर्व वंचित समूहांना ग्रासून टाकणारे मुद्दे या कष्टकरी महिलांनी उचलून धरले. या चकित करणाऱ्या सत्याग्रहाच्या अनुभवावरून उद्याचा इतिहास कष्टकरी समूहातील स्त्री घडवणार आहे, यात तिळमात्र शंका नाही, असं वाटतं. शांती पूर्ण, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही मार्गाने आपल्याला समानतेकडे नेणारी वाटाडी ती असणार आहे याची खात्री पटते.

जर कोविड-19 येण्यापूर्वी आपली समाजरचना भेदभाव, उतरंड आणि असमानतेवर आधारित होती असं आपण मान्य करत असू; तर मग आपण परत त्या दिशेने (तथाकथित पूर्वीच्या- परिस्थितीकडे) जायचंच कशापायी? नवं विश्व कसं घडवता येईल, यावर आपण सामूहिक विचार करू शकतो ना? कोरोनाने आपल्यासमोर केवळ आरसा धरला आहे- समाजात विषमता असल्यावर काय होऊ शकतं, हे आपल्याला दाखवलंय. आपण या चक्रावून टाकणाऱ्या परिस्थितीच्या निमित्ताने का होईना, काही वैकल्पिक मार्ग शोधणार आहोत का? आपल्यापुढे सर्वांत मोठं आव्हान हे आहे, असं मला वाटतं.

सृष्टीला माणसाची गरज नाहीये (किंबहुना, मानव हा निसर्गाच्या दृष्टीने अडसरच असावा), हे या लॉकडाऊनमधून सिद्ध झालंय. मात्र, माणसाला सृष्टीची आणि इतर माणसांची नितांत गरज आहे, हे तितक्याच प्रकर्षाने पुढे आलेले आहे. आतापर्यंत आपण ज्या वाटचालीला ‘विकास’ म्हणत होतो, त्याचे विखारी स्वरूप लक्षात घेणे आवश्यक आहे, आपली ‘प्रगती’कडे जाणारी दिशा आणि वाटचाल नीट पडताळून पाहिली पाहिजे. सत्तापिपासू व रक्तपिपासू समाजव्यवस्था आपल्याला आणि निसर्गाला ओरबाडणारी आहे. व्यक्तिगत आणि सार्वजनिक पातळ्यांवर आमूलाग्र बदल केल्याशिवाय आपण भेदभाव आणि शोषणविरहित शाश्वत विकास (जो मानवी मूल्य, मानवी अधिकार, लोकशाही, सामाजिक न्याय आणि समानतेवर आधारित असेल) घडवू शकणार नाही. आपल्याबरोबर आपल्या पृथ्वीला संपवायचा अधिकार आपल्याला मुळीच नाही, याची जाणीव मनुष्याला होणे अत्यावश्यक आहे.

सर्वांना जिंदाबाद आणि सबरंगी सलाम!

डॉ. मनीषा गुप्ते, पुणे

(स्त्रीवादी आणि समतावादी कार्यकर्ती)

Share on Social Media

सभोवताल

पाकिस्तानातील माध्यमांसमोरील संकटे

जतीन देसाई

काही दिवसांपूर्वी फ्रीडम नेटवर्क नावाच्या संस्थेने पाकिस्तानात माध्यमांच्या स्वातंत्र्याची काय स्थिती आहे, यावर एक अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालात मे 2019 ते एप्रिल 2020 च्या काळात पाकिस्तानात पत्रकार व माध्यमांवर सात हत्यांसह किमान 91 हल्ले करण्यात आले, असे म्हटले आहे. आश्चर्य म्हणजे सगळ्यात जास्त हल्ले पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद येथे झाले आहेत. इस्लामाबाद येथे 31, सिंध प्रांतात 24 आणि पंजाब येथे 22 हल्ले या काळात झाले असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानात हल्ल्यांचं प्रमाण खूप कमी असल्याचंदेखील या अहवालात म्हटले आहे. या निष्कर्षाबद्दल प्रश्न उपस्थित होऊ शकतात. सर्वांत जास्त हल्ले टीव्ही चॅनेलच्या माध्यमांवर, म्हणजे एकूण 69 झालेले. अलीकडे रिपोर्टर्स विदाऊट बोर्डर्सने 2020 चा जागतिक माध्यमस्वातंत्र्य निर्देशांक प्रसिद्ध केला आहे.

जगभरात 3 मे हा ‘माध्यम स्वातंत्र्य दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी एकूण माध्यमांच्या स्वातंत्र्याची काय स्थिती आहे, याचा आढावा घेतला जातो. प्रत्येक देशात माध्यम किती स्वतंत्र आहे याची चर्चा होते. भारत, पाकिस्तानसह दक्षिण आशियातील देशांची स्थिती फारशी चांगली नसल्याचे चित्र परत एकदा उभं राहिलं. पण, कोरोनामुळे या वेळी या ज्वलंत विषयावर मर्यादित प्रमाणात चर्चा झाली. या दिवसाच्या काही दिवस आधी स्वीडनमध्ये एका पाकिस्तानी पत्रकाराचा मृतदेह सापडला. यामुळे एकूण पाकिस्तानात माध्यमं कुठल्या अवस्थेतून जात आहे आणि पत्रकारांची काय स्थिती आहे, त्यावर चर्चा सुरू झाली.

साजिद हुसेन (30) नावाच्या एका पाकिस्तानी पत्र-काराचा मृतदेह स्वीडन येथील उपसला शहरातून 23 एप्रिलला मिळाला. मुळात तो पाकिस्तानच्या अत्यंत संवेदनशील बलुचिस्तान प्रांताचा. पाकिस्तानच्या स्थापनेपासूनच हा प्रांत अशांत आहे. पाकिस्तानचा हा सर्वांत मोठा प्रांत, पण येथे सगळ्यात कमी लोकसंख्या. पाकिस्तानचा सर्वांत गरीब प्रांत असंही त्याचं वर्णन करता येईल. बलुचिस्तान श्रीमंत आहे पण बलोची गरीब, असं या प्रांताबद्दल म्हटलं जातं. खनिज आणि गॅसने तो अत्यंत समृद्ध आहे. पण त्याचा फायदा स्थानिक लोकांना मिळण्याऐवजी पंजाब प्रांताला अधिक मिळतो. या प्रांतात असलेला ग्वादर बंदर ते चीनच्या शीन जियांग प्रांताच्या कासघरला जोडणारा कॉरिडॉर जवळपास 60 अब्ज डॉलर्स खर्च करून चीन बनवत आहे.

काश्मीरप्रमाणे बलुचिस्तानातदेखील वेगवेगळ्या विचारांचे गट सक्रिय आहेत. काही स्वतंत्र बलुचिस्तानचे समर्थक आहेत, तर प्रांताला अधिक स्वायत्तता मिळावी या मागणीचे समर्थन करणारे काही. अलीकडे स्वतंत्रता मागणाऱ्या गटाची ताकद कमी झाल्याचं आढळतं. स्वातंत्र्य मिळावं यासाठी प्रयत्न करणारे असोत किंवा अधिक स्वायत्तता मागणारे गट असोत, त्यातील बहुतेक धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणारे आहेत. त्यांच्या मागण्याला ते धर्माचा आधार देत नाहीत. येथे तालिबानही सक्रिय आहे, पण बलोची लोकांत त्याचा प्रभाव नाही. बलुचिस्तान हा खरा तर एक स्वतंत्र विषय आहे.

मुद्दा आहे तो साजिद हुसेन आणि त्याच्यासारख्या असंख्य तरुणांचा. आजही एखादा तरुण अचानक गायब होतो आणि नंतर काही दिवसांनी त्याचा मृतदेह सापडतो. पत्रकार त्याला अपवाद नाही. साजिद हुसेन ‘द न्यूज इंटरनॅशनल’ नावाच्या इंग्रजी वर्तमानपत्रात सहसंपादक म्हणून पाकिस्तानात आधी काम करायचा. तो प्रामुख्याने अचानक गायब होणाऱ्या तरुणांबद्दल, बंडखोरीबद्दल आणि ड्रग्जबद्दल लिहायचा. अफगाणिस्तानला लागून बलुचिस्तान असल्यामुळे येथे ड्रग्सचा मोठा व्यवसाय आहे. अनधिकृतरीत्या ड्रग्ज अफगाणिस्तानातून पाकिस्तानला आणलं जातं आणि नंतर पुढे पाठवलं जातं. साजिद याला त्याच्या लिखाणाबद्दल सतत धमक्या येत असत. आपला कोणी तरी सतत पाठलाग करत असल्याचं त्याच्या लक्षात आलेलं. एक दिवस काही जण त्याच्या घरात जबरदस्तीने घुसले आणि लॅपटॉप व इतर काही कागदपत्रे घेऊन पळून गेले. तेव्हा एका महत्त्वाच्या बातमीवर तो काम करत होता. शेवटी सप्टेंबरमध्ये त्याने पाकिस्तान सोडलं. अत्यंत कठीण अवस्थेत पत्नी शहनाझ, एक मुलगी व एक मुलाला सोडून त्याला पाकिस्तानातून बाहेर पडावं लागलं. नंतर पण त्याला खूप त्रास सहन करावा लागला. ओमान, दुबई व युगांडा करत शेवटी तो स्वीडनला पोहोचला. गेल्या वर्षी त्याला स्वीडनने राजकीय आश्रय दिला. तो त्याचा मित्र अब्दुल मलिकच्या घरी स्टॉकहोम येथे राहत होता.

‘बलुचिस्तान टाइम्स’ नावाचं ऑनलाइन मॅगेझीन तो काढायचा. तो 2 मार्चपासून तो अचानक गायब झाला. त्याच्या मित्रांनी पोलिसांत तक्रार केली. शेवटी दीड महिन्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. स्वीडन पोलिसांनी पोस्टमॉर्टेम अहवालाच्या आधारे घातपाताची शक्यता स्पष्ट दिसतं नसल्याचं सांगितलं, मात्र हत्येची शक्यता संपूर्णपणे नाकारलीदेखील नाही. पोलीस अजूनही चौकशी करीत आहेत.

त्याने 2 मार्चला स्टॉकहोम येथून उपसला येथे आला. तिथे त्याने विद्यार्थ्यांच्या होस्टेलमध्ये राहण्याचे ठरवले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत तो मित्रांच्या संपर्कात होता, नंतर त्याचा फोन अचानक बंद झाला. ‘रिपोर्टर्स विदाऊट बोर्डर्स’ नावाच्या संस्थेने पाकिस्तानी एजन्सीचा हात असण्याची शक्यता असू शकते, असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी फ्रीडम नेटवर्क नावाच्या संस्थेने पाकिस्तानात माध्यमांच्या स्वातंत्र्याची काय स्थिती आहे, यावर एक अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालात मे 2019 ते एप्रिल 2020 च्या काळात पाकिस्तानात पत्रकार व माध्यमांवर सात हत्यांसह किमान 91 हल्ले करण्यात आले, असे म्हटले आहे. आश्चर्य म्हणजे सगळ्यात जास्त हल्ले पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद येथे झाले आहेत. इस्लामाबाद येथे 31, सिंध प्रांतात 24 आणि पंजाब येथे 22 हल्ले या काळात झाले असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानात हल्ल्यांचं प्रमाण खूप कमी असल्याचंदेखील या अहवालात म्हटले आहे. या निष्कर्षाबद्दल प्रश्न उपस्थित होऊ शकतात. सर्वांत जास्त हल्ले टीव्ही चॅनेलच्या माध्यमांवर, म्हणजे एकूण 69 झालेले. अलीकडे रिपोर्टर्स विदाऊट बोर्डर्सने 2020 चा जागतिक माध्यमस्वातंत्र्य निर्देशांक प्रसिद्ध केला आहे. 180 देशांच्या यादीत पाकिस्तानचा नंबर 145 आहे. भारत या निर्देशांकात 142 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी भारत 140 व्या नंबरावर होता. पाकिस्तान गेल्या वर्षी 142 व्या नंबरावर होता. भारत आणि पाकिस्तानात माध्यमांच्या स्वातंत्र्याची स्थिती सतत खालावत चालली असल्याचे रिपोर्टर्स विदाऊट बोर्डर्सच्या अहवालाचा निष्कर्ष आहे.

पाकिस्तानात सर्वांत लोकप्रिय व सर्वाधिक खपाचे उर्दू दैनिक ‘जंग’ आहे आणि सर्वांत प्रसिद्ध टीव्ही न्यूज चॅनेल जियो आहे. शकील रहमान त्याचे मालक आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाची टीका करण्यात जंग ग्रुप सगळ्यात पुढे असतं. त्यांची विश्वसनीयता अबाधित आहे. अचानक 12 मार्च रोजी शकील-उर रेहमान यांना अटक करण्यात आली. नॅशनल अकउंटॅबिलिटी ब्युरो (एनएबी) ही पाकिस्तानची भ्रष्टाचारविरोधी संस्था. संपत्तीच्या एका 34 वर्षे जुन्या केसमध्ये त्यांना अटक करण्यात येते. खरं म्हटलं तर दोन पक्षांमधला हा वाद तेव्हाच मिटला होता. शकील-उर रेहमान अजूनही तुरुंगात आहेत. माध्यमांमधील पाकिस्तानातल्या सर्वांत प्रभावी माणसाला एका जुन्या केसमध्ये अडकवून तुरुंगात डांबण्यात येतं, हेच बरंच काही सांगतं. पाकिस्तानातील सर्व विरोधी पक्ष, पत्रकार संघटना व सामान्य लोक आज ‘जंग’सोबत या लढ्यात असल्याचं दिसतं. ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे कशा स्वरूपाने उल्लंघन करण्यात येतं, हे यातून दिसतं.

काही वर्षांपूर्वी बलुचिस्तानचा एक तरुण पत्रकार मलिक सिराज अकबरवरदेखील पाकिस्तान सोडून जाण्याची वेळ आलेली. ‘डेली टाइम्स’ नावाच्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रात तो काम करत असे. आता तो अमेरिकेत स्थायिक झाला आहे. त्याला काही वर्षांपूर्वी नवी दिल्ली येथे भेटायची संधी मिळालेली. बलुचिस्तानात माध्यमांवर व इतरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या कहाण्यात्याच्याकडून ऐकल्या होत्या. ते ऐकून मन सुन्न झालं होतं.

गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या सिंध उच्च न्यायालयाने डॅनियल पर्लचा खुनी ओमर शेखची फाशीची सजा रद्द करून त्याला 7 वर्षांच्या कैदची सजा सुनावली. त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांना दहशतवादविरोधी न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द करून त्यांना सोडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे तीव्र पडसाद उमटले. पत्रकार समुदाय आणि इतरांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. डॅनियल मुंबईहून काम करायचा. दहशतवाद्यांची साखळी शोधण्यासाठी व त्यावर बातमी करण्यासाठी तो कराचीला गेला होता. ओमर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याची हत्या केली.

ओमर शेख आणि त्याचे दोन सहकारी यांना हायजॅक करण्यात आलेल्या आयसी 814 विमानाच्या प्रवाशांच्या बदल्यात भारत सरकारने 1999 मध्ये सोडलेलं. 2002 मध्ये त्यांना दहशतवादविरोधी न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. सिंध उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे चारही आरोपी सुटू शकले असते, पण पाकिस्तानने त्यांना परत अटक केली आणि तुरुंगात ठेवले आहे. सिंध सरकारने उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आहे. डॅनियलच्या आई-वडिलांनीदेखील अपील केलं आहे. आपण मात्र आपल्या मुलांसाठी अपील केलं नसून पाकिस्तानच्या लोकांना कुठल्याही प्रकारच्या भीतीशिवाय जगता यावे, याकरता अपील केलं असल्याचं त्याच्या आई-वडिलांनी सांगितलं.

गोदी मीडियाच्या काळात अशा पत्रकारांच्या कहाण्या एक नवी ताकद आणि ऊर्जा देण्याचं काम करतात. मला आठवतं की, माझ्या कराची प्रेस क्लबच्या मित्रांनी काही वर्षांपूर्वी मला सांगितलेलं की- भारत में पत्रकारिता करना आप लोगों के लिए आसान है, हमारी हालत देखियें. आता त्यांना म्हणावसं वाटतं की... उसके बावजूद हमने गोदी मीडिया बनना स्वीकार कर लिया हैं.

जतीन देसाई, मुंबई

Share on Social Media