Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

‘आरटीआय’चा संदर्भ असलेली तीन पुस्तके

हिरकमहोत्सवानंतरच्या बारा वर्षांत साधना साप्ताहिकाचे सहाशे अंक प्रकाशित झाले आहेत. त्यातील अनेक अंकांचे वाचकांकडून भरपूर कौतुक झाले असले तरी, आम्ही मात्र फक्त सहा अंकांनाच ‘अप्रतिम’ हे लेबल लावले आहे. ते लेबल पहिल्यांदा लावले तो अंक म्हणजे ‘दलपतसिंग येती गावा’ हा 1 मे 2010 चा विशेषांक. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण होत होती, तेव्हा साधनाचा तो विशेषांक आला होता. त्याच्या आधीच्या वर्षी साधना दिवाळी अंकात, राजा शिरगुप्पे यांनी लिहिलेला ‘शोधयात्रा : ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागांची’ हा पन्नास पानांचा रिपोर्ताज प्रसिध्द झाला होता आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे तोच धागा पुढे घेऊन जाणाऱ्या दमदार विषयाच्या शोधात आम्ही होतो आणि नेमके त्याचवेळी ‘दलपतसिंग येती गावा’ हे नाटक आले होते. माहितीचा अधिकार देणारा कायदा कसा अस्तित्वात आला याची झलक दाखवणारे ते नाटक होते. दरम्यान, तो कायदा अस्तित्वात येऊन पाच वर्षे झाली होती आणि त्याभोवती दरारायुक्त वलय निर्माण झाले होते. ते नाटक आम्ही दोनेक आठवड्यांच्या कालावधीत तीन वेळा पाहिले आणि मग क्रमाक्रमाने एकेक टप्पा पुढे जात विशेषांकच आकाराला आला. ते नाटक अफलातून तर होतेच, पण त्याहून अधिक अफलातून होती त्या नाटकाच्या निर्मितीची प्रक्रिया!

त्याबाबत बऱ्यापैकी विस्ताराने त्या अंकाच्या संपादकीयामध्ये लिहिले आहे. पण त्यात न सांगितलेल्या दोन गोष्टी इथे सांगणे आवश्यक वाटते. एक- ‘या वर्षीचा 1 मे विशेषांक कशावर काढताय?’ असा प्रश्न काही हितचिंतक वाचक त्या दरम्यानच्या काळात विचारत होते. त्याला ‘दलपतसिंग येती गावा या नाटकावर’, असे उत्तर आमच्याकडून दिले जायचे. तेव्हा काहीशा चमत्कारिक नजरेने प्रतिप्रश्न यायचा, ‘काय, महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाच्या समाप्तीचा अंक नाटकावर?’ तेव्हा आमचे उत्तर, ‘होय, राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षासाठी इतका चांगला विषय दुसरा मिळाला नसता.’ असे असायचे. दुसरी गोष्ट अशी की, त्या विशेषांकाचे प्रकाशन त्यावेळचे राज्य माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांच्या हस्ते साधना कार्यालयाच्या सभागृहातच केले होते. आणि त्यानंतर त्यांना माहिती आयुक्ताचे अनुभव लिहिण्याची विनंती केली होती. तेव्हा त्यांनी लिहिलेला पाच हजार शब्दांचा अप्रतिम लेख त्यानंतरच्या साधना दिवाळी अंकात प्रसिध्द केला होता. (मागील बारा वर्षांत सहा हजार लेख साधनातून प्रसिध्द झाले, त्यातील अनेक लेख गाजले असले तरी शंभरेक लेखांनाच ‘अप्रतिम’ हे लेबल आम्ही लावतो.) असो. तर साधनाचा तो अप्रतिम अंक पुस्तकरूपाने आज ना उद्या आणायचा असा विचार मनात होताच, पण त्यासाठी योग्य निमित्त मिळत नव्हते. अखेर ते मिळाले... 2018 च्या अखेरीस अरुणा रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांनी लिहिलेले ‘द आरटीआय स्टोरी’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाले. पण त्यानंतरच्या सात-आठ महिन्यांतही त्याची मराठी आवृत्ती आल्याचे दिसले नाही. म्हणून ते पुस्तक साधना प्रकाशनाकडून मराठीत आणायचे, त्याच्या प्रकाशनासाठी अरुणा रॉय यांना बोलवायचे आणि त्याच वेळी ‘दलपतसिंग’चा विशेषांक पुस्तकरूपाने आणायचा असे ठरवले होते. त्यानंतर अवधूत डोंगरे या तरुणाने ‘द आरटीआय स्टोरी’ या चारशे पानांच्या पुस्तकाचा अचूक व प्रवाही अनुवाद (कहाणी माहिती अधिकाराची) अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण केला. त्यामुळे 12 जानेवारी 2020 रोजी, त्या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील पत्रकार भवनच्या सभागृहात करण्याचे ठरवले आहे.

त्या पुस्तकाचे प्रकाशन नाटकातील दलपतसिंग व अलकाताई (राजकुमार तांगडे व वीणा जामकर) यांच्या हस्ते आणि अर्थातच नाटकाचे लेखक व दिग्दर्शक (मकरंद साठे व अतुल पेठे) यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. शिवाय, अरुणा रॉय यांची मुलाखत वीणा जामकर घेणार आहेत. आणि म्हणून दलपतसिंगवरील विशेषांकाचे पुस्तकही त्याच कार्यक्रमात प्रकाशित करीत आहोत. यात आणखी एक छोटी पण महत्त्वपूर्ण भर टाकली आहे, ती म्हणजे दलपतसिंग या नाट्यसंहितेचे पुस्तकही याचवेळी साधना प्रकाशनाकडूनच आणत आहोत. म्हणजे माहिती अधिकाराचा संदर्भ असलेली तीन पुस्तके एकाच वेळी प्रकाशित होत आहेत. ही तीनही पुस्तके आता एकत्र प्रकाशित करून, या विषयाचे महत्त्व अधोरेखित करीत आहोत. विशेषत: सध्याच्या अस्वस्थ काळात आणि चार महिन्यांपूर्वी केंद्र सरकारकडून माहिती आयुक्तांचे वेतन व त्यांचा कालावधी यासंदर्भात कायद्यात केलेली दुरुस्ती पाहता, या विषयाकडे अधिक लक्ष देण्याची गरजही आहे. यापैकी ‘कहाणी माहिती अधिकाराची’ या पुस्तकात 1990 नंतरच्या तीस वर्षांच्या काळात अरुणा रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या लढ्याचा दस्तावेज आहे. हा ऐवज माहिती अधिकाराच्या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी तर उपयुक्त आहेच; पण त्याची अधिक उपयुक्तता आहे- सामाजिक चळवळी व आंदोलने कशी चालवली जावीत, त्याला किती विविध आयाम असतात, त्यासाठी किती सखोल व व्यापक तयारी करावी लागते, त्यासाठी किती जास्त चिकाटी व संयमाची आवश्यकता असते, हे सर्व नव्याने समजून घेण्यासाठी!

देवडुंगरी हे राजस्थानातील लहान गाव ते नवी दिल्लीतील केंद्र सरकार असा पट या पुस्तकातून उलगडत जातो आणि त्यामुळे प्रचंड गुंतागुंत लक्षात येते, तशीच ‘केल्याने होत आहे रे’ हा संदेशही मिळतो. अरुणा रॉय यांच्या लढ्यावर आधारित चित्रपटाची पटकथा लिहिण्याचे काम मराठीतील महत्त्वाचे नाटककार मकरंद साठे यांच्याकडे आले होते. तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष त्या लढ्याच्या ठिकाणी जाऊन सहअनुभूती घेऊन आणि लढ्याचा अभ्यास करून ती पटकथा लिहिली, पण काही कारणांमुळे तो चित्रपट येऊ शकला नाही. नंतर त्या पटकथेचे झालेले रूपांतर म्हणजे ‘दलपतसिंग येती गावा’ हे नाटक. हे नाटक अतुल पेठे यांनी जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ या गावात जाऊन तेथील तरुणांना हाताशी धरून कसे उभे केले याची कहाणी सांगणारा तो विशेषांक म्हणजे ‘नाट्यनिर्मितीची प्रक्रिया’ हे आता येत असलेले पुस्तक. वरील तिन्ही पुस्तके वाचणारांना सार्वजनिक जीवनातील एक मोठे व महत्त्वाचे दालन उघडल्यानंतर जे काही दिसते तसा अनुभव येईल, आपले आकलन बरेच पुढे सरकल्याची प्रचिती येईल!

Share on Social Media

कालपरवा

जपानी पर्यटक : पूर्वीचे आणि आताचे

रामचंद्र गुहा

ख्रिसमसच्या दिवशी लिहिलेला हा लेख वाचकांच्या हातात पडलेला असेल तेव्हा नवे वर्ष सुरू झालेले असेल. त्यामुळे मी असे ठरवले आहे की, किमान या आठवड्यात तरी एखाद्या ज्वलंत विषयावर लेख नको, तर तसा हा आहे. परदेशातील स्मारकांना किंवा स्मृतिस्थळांना भेट देण्यासाठी गर्दी करणाऱ्या जपानी पर्यटकांची एक ठाशीव व साचेबध्द प्रतिमा जगभर आहे. एका संकेतस्थळावर तर असे म्हटले आहे, "जगभरात ‘जिथे तिथे आढळणारे" अशी जपानी पर्यटकांची प्रतिमा तयार झाली आहे. सामान्यतः हा किंवा ही पर्यटक एखाद्या सहलगटाचा भाग असतात; जिथे एखादा लहानसा झेंडा फडकवत त्यांचा वाटाड्या दिवसभराच्या नियोजनानुसार जलद गतीने गटाचे संचलन करत असतो. आणि कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डर, कदाचित एखाद्या पक्ष्याचा आवाज टिपण्यासाठी टेपरेकॉर्डरसुध्दा, एवढे ओझे हे पर्यटक स्वतःसोबत वागवत असतात. अशा गटांतील व्यक्तींचे कपडेही (काही किरकोळ वेगळेपणासह) साधारणत: एकसारखेच दिसतात. या सहलगटांचे भटकंतीचे नियोजनही समान असते; आणि गटांतील सदस्यांप्रमाणेच, एकसारखीच दिसणारी प्रवासी वाहनेही एकमेकांच्या मागोमाग जातात.’

एकविसाव्या शतकात दोन देशांदरम्यान प्रवास करणे पूर्वीच्या काळाच्या तुलनेत बरेचसे सोपे झाले आहे. देशविदेशात तात्काळ ये-जा करता येते. पहाव्याशा वाटणाऱ्या ठिकाणी अगदी कमी वेळात धावती भेट देता येते. त्यामुळे ताजमहाल, अजिंठा व वेरूळ, व्हिक्टोरिया मेमोरियल, हुमायूनची कबर आणि अशा शेकडो ठिकाणी जपानी पर्यटकांचे जत्थे वावरताना दिसतात. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारताला भेट देणाऱ्या जपानी प्रवाशांचे प्रवासवर्णन वाचताना मला हे उलगडले की, त्या काळची गोष्टच फार वेगळी होती. त्यातील नोंद घेण्यालायक गोष्ट अशी की, ते सर्व प्रवासी यात्रेकरू आणि साधक होते; आताच्याप्रमाणे सुख-साधक नव्हते. ‘सिकिंग साक्यमुनी : साऊथ एशिया इन द फॉर्मेशन ऑफ मॉडर्न जॅपनीज बुध्दीझम’ या रिचर्ड जॅफी यांच्या ताज्या पुस्तकामध्ये त्या यात्रेकरूच्या व साधकांच्या कथा पुन्हा उजागर केल्या गेल्या आहेत.

नान्जो बुन्‌ (Nanjo Bun'yu - 1849 -1927) हा भारताला भेट देणाऱ्या अगदी सुरुवातीच्या जपानी प्रवाशांपैकी एक होता. ऑक्सफर्डमध्ये मॅक्सम्युलरसह त्याने संस्कृतचे अध्ययन केले होते आणि त्यातून बुच्या भूमीविषयी जाणून घेण्याची त्याची जिज्ञासा जागृत झाली होती. 1887 मध्ये तो भारतात आला. त्यानंतर भारतातील वा श्रीलंकेतील किंवा दोन्ही ठिकाणच्या बौध्द तीर्थस्थळांना भेट देणाऱ्या जपानी विव्दानांचा ओघ सुरू झाला. जॅफी लिहितात त्यानुसार, दक्षिण आशियाच्या मध्यभागांतून येणाऱ्या प्राचीन बौध्द प्रवाशांचे हे साहसी प्रवास म्हणजे काही जपान ते युरोप प्रवासांदरम्यान जाण्या-येण्याला सोयीस्कर केंद्रे निवडून, संधी मिळताच हाती घेतलेल्या उथळ सहली नव्हत्या. जपानी लोक दक्षिण आशियातील या संकटमय बौध्द तीर्थयात्रांचा धसका बाळगून असत (आणि या प्रवासादरम्यान कित्येक जपानी बौध्द मृत्यूही पावत असत), यांवरून 19 व्या शतकाच्या शेवटी आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला जपानी बौध्द प्रवाशांसाठी दक्षिण आशिया किती महत्त्वाचे स्थान बजावत होता हे अधोरेखित होते.

इथे येणारे काही प्रवासी बौध्दस्थळांना भेट देऊन परत गेले. काही मात्र बुध्दाचा खरा मार्ग आणि त्याचा ज्ञानवंश यांच्याबाबत अधिक आकलनाच्या अपेक्षेपोटी भारतीय पंडितांसह प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी व भाषा शिकण्यासाठी आलेले होते. इथून परत जाताना ते बौध्द तत्त्वज्ञानाशी संबंधीत पुस्तके, अवशेष व कलाकृती सोबत घेऊन गेले. त्यामुळे आपली आणि त्यांची भूमी यांच्या संबंधांतील जवळीक वाढण्यास मदतच झाली. भारत आणि श्रीलंका येथे त्यांनी जे पाहिले व ज्याचा अभ्यास केला त्याआधारे त्यांनी जपानी बौध्दांच्या धार्मिक पध्दती व स्थापत्यशैलीला नवा आयाम दिला. जॅफी यांच्या प्रतिपादनानुसार, 19 व्या शतकात जपान आणि भारत यांच्यादरम्यानचा प्रवास दोन नव्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांमुळे शक्य झाले- वाफेच्या इंजिनाचे जहाज आणि रेल्वे. सुरुवातीला जपान आणि दक्षिण आशिया यांच्यादरम्यान असलेले आदान-प्रदान कालांतराने संपूर्ण आशियांतर्गत झाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारत-जपान यांच्यादरम्यान (विशेषत: कापूस उत्पादनांचा) व्यापार भरभराटीला आला, तोपर्यंत एकमेकांपासून अविभक्त असणाऱ्या दोन महान आणि प्राचीन संस्कृतींमधील संवाद अधिक दृढ होत गेला. ‘पॅन एशियनिझम’ या संकल्पनेनुसार विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी आशियावरील युरोपचे प्रभुत्व संपुष्टात आणण्याच्या ध्येयाने खंडांतर्गत ऐक्याचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेही ही सांस्कृतिक देवाण-घेवाणाची प्रक्रिया सुलभ झाली.

हा पॅन एशियनिझम दोन प्रकारचा होता. पहिल्या प्रकारामध्ये सर्व आशियायींमधल्या आध्यात्मिक तत्त्वांच्या महत्त्वावर भर होता, त्याव्दारे त्यांना भौतिकतावादी युरोपीय आणि अमेरिकनांच्या विरोधी भूमिकेत उभे केले गेले. आणि दुसऱ्या राजकारणभारित प्रकारानुसार, युरोपीय व अमेरिकन वसाहतवादी शक्तींविरोधातील संघर्षामध्ये जपानकडे आशियायी देशांच्या संघटनाचे (अपरिहार्य व रास्त) नेतृत्व म्हणून पाहिले गेले. या दुसऱ्या प्रकाराबद्दल जॅफी लिहितात, ‘यशस्वी आधुनिकीकरण, लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक सुधारणा यांच्यामुळे युरोप व अमेरिका यांच्याविरुध्दच्या संघर्षात जपान हा इतर आशियायी देशांचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारा एकमेव देश होता.’ कावागुची एकाई (Kawaguchi Ekai - 1866-1945) ही ‘सीकिंग सांक्यमुनी’ या पुस्तकातील मध्यवर्ती व्यक्ती आहे. या जपानी विव्दानाने जवळपास दोन दशके भारत आणि तिबेट येथे व्यतीत केली. त्यांपैकी पूर्ण सात वर्षे तो बनारसला राहिला. हिंदूंच्या या पवित्र शहरात त्याच्या गुरुजनांशी असणाऱ्या दैनंदिन व्यवहाराचे वर्णन जाफी यांनी असे केले आहे- ‘साडेपाच वाजता झाझेन (झेनपंथीयांचा ध्यानप्रकार) आणि स्नानाने कावागुचीच्या दिवसाची सुरुवात होत असे. साडेनऊ वाजेपर्यंत तो धम्मसंगिनीचे इंग्रजी भाषांतर वाचत असे. त्यानंतर दोन तास संस्कृत वाचन आणि व्याकरणाचा अभ्यास चाले. मग तीस मिनिटांत भोजन उरकून काही काळ विश्रांती घेऊन तो दुपारी दोन ते पाच तोंडी संस्कृत भाषांतराचा सराव करीत असे. आणि पुढे साडेसहा वाजेपर्यंत संस्कृत व्याकरणाची उजळणी करत असे.

संध्याकाळी साडेसात ते साडेआठ असा तासभर तो विद्यार्जनासाठी जाई. पुन्हा रात्री दहा वाजेपर्यंत तोंडी भाषांतराचा सराव व पुढे तासभर उजळणी!’ असे हे जपानी ‘प्रवासी’ आपल्याला आज दिसणाऱ्या जपानी पर्यटकांहून पूर्णपणे वेगळे होते. आधुनिक भारताच्या राजकीय कल्पनाविेशात जपान ही सुभाषचंद्र बोस आणि त्यांची इंडियन नॅशनल आर्मी यांना आश्रय देणारी भूमी आहे. तर आधुनिक भारताच्या तंत्रज्ञानाच्या कल्पनाविेश्वात जपान ही अहमदाबाद व मुंबई या दोन औद्योगिक केंद्रांना अत्यल्प वेळात आणि कार्यक्षमपणे जोडणारी भूमी आहे. ‘सीकिंग साक्यमुनी’ हे पुस्तक आपल्याला आय. एन. ए. आणि बुलेट ट्रेनपूर्वीच्या अशा काळात घेऊन जाते, ज्या काळात आध्यामिक प्रेरणांनी भारताकडे आकृष्ट झालेल्या जपानी लोकांनी या दोन देशांना जवळ आणले होते.

(अनुवाद: सुहास पाटील)

रामचंद्र गुहा, बंगळुरु

Share on Social Media

चिनी महासत्तेचा उदय : 3

यादवी युध्द आणि क्रांती

सतीश बागल

नोव्हेंबर 1948 ते जानेवारी 1949 पर्यंत चाललेली हुआइ है ही यु नोव्हेंबर 1948 ते जानेवारी 1949 पर्यंत चाललेली हुआइ है ही युध्द मोहिम लष्करी इतिहासातील महत्त्वाची समजली जाते. कुओमिंगटांगचे 6 लाख सैन्य व 5 लाख कम्युनिस्ट सैन्य यांच्यातील हा मोठा संघर्ष होता. कम्युनिस्टांनी सैन्यदलाला अन्न, सामग्री व रसद पुरविण्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन केले होते. याशिवाय घोडे, बैल इत्यादी भारवाहक प्राण्यांचीही जमवाजमव केली होती. या युध्दात माओने आपल्या जनरल्सना चँग कै शेकच्या सैन्यदलातील जनरलपेक्षाही जास्त (स्थानिक व दैनंदिन निर्णय घेण्याचे) अधिकार दिले होते. त्यामुळेच कुओमिंगटांगच्या सैन्याचा पराभव होऊ शकला. विशेष म्हणजे, या मोहिमेत डेंग यांच्याकडे सेनेचे नेतृत्व होते. या मोहिमेपासून कम्युनिस्ट पक्षाचा युध्दावर वरचष्मा राहिला. डेंग यांच्याबाबत या मोहिमेत अनेक वादग्रस्त प्रसंग घडले. लिऊ बोचेंग सैन्याची खूप काळजी घेत असत. बचावासाठी पुरेसे खंदक खोदल्यशिवाय, पुरेसे बंकर्स तयार केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नसत. डेंग मात्र फारशी काळजी न करता सैनिकांचा जीव धोक्यात घालीत असत.

युध्दातून पराभूत होऊन शांघायला परतणाऱ्या डेंग यांना आणखी काही दु:ख पचवायचे होते. त्यांची पत्नी झँग जीयुआन इस्पितळात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. प्रसूतिवेळी गर्भाशयात इन्फेक्शन होऊन तिचे निधन झाले आणि नंतर त्यांच्या तान्ह्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यानंतर शांघायमध्ये डेंग यांनी एक वर्ष काढले. पक्षाने त्यांना जिआंझी प्रांतातील चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आधिपत्याखाली असलेल्या ‘सोव्हिएत’मध्ये कामगिरीवर पाठविले. जिआंझी प्रांतातील डोंगराळ प्रदेशाच्या पलीकडे माओ झेडुंग यांनी अनेक जिल्हे कम्युनिस्ट पक्षाच्या आधिपत्याखाली आणून त्या प्रदेशाचे आदर्श सोव्हिएत वा कम्यून करण्याचा प्रयोग आरंभिला होता. उत्तरेकडील पर्वतरांगांपासून ते दक्षिणेकडील सुपीक व सपाट पठारापर्यंतचा शेकडो मैलांचा अनेक जिल्ह्यांचा प्रदेश माओ यांच्या या महत्त्वाच्या सोव्हिएतमध्ये अंतर्भूत होता. तेथे जमीन सुधारणा व इतर कार्यक्रम यांनी सुरू केले होते.

त्या राज्याच्या नैर्ऋत्य भागातील रुजिन या जिल्ह्यात पक्षाचे सचिव म्हणून डेंग यांची नेमणूक झाली. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर एका वर्षातच डेंग यांच्या आयुष्यात रोमँटिक प्रेमाचा दुसरा अध्याय सुरू झाला होता. शांघायमधील एक अतिशय बुध्दीमान, पुरोगामी विचाराच्या व क्रांतिकार्याला वाहून घेतलेल्या जिन वेयिंग या तरुणीच्या ते निकट आले आणि तिच्याशी विवाहध्दही झाले. ऑगस्ट 1931 मध्ये ते रुजिनमध्ये पक्षाचे सचिव म्हणून रुजू झाले, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची दुसरी पत्नी जिन वेयिंगही होती. डेंग यांनी त्यांच्या काम करण्याच्या शैलीने लवकरच रुजिनमधील कार्यकर्त्यांना व अधिकाऱ्यांना आपलेसे केले. डेंग तिथे येण्यापूर्वी पक्षाची गुपिते कुओमिंगटांगकडे जातात आणि त्यात अनेक स्थानिक अधिकारी, नेते व कार्यकर्ते सामील आहेत, असा संशय होता. संशयावरून मोठ्या प्रमाणावर धरपकड होऊन अनेक कार्यकर्त्यांना देहांताची कठोर शिक्षा देऊन दहशत निर्माण करण्यात आली होती. डेंग यांनी या साऱ्या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणली. त्यामुळे तुरुंगात असणारे अनेक कार्यकर्ते सुटले आणि अनेकांना जीवदान मिळाले. उलट, या साऱ्यात निर्दोष पक्ष कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबणाऱ्या नेत्याला तिथून जावे लागले.

झिआंझी प्रांतात डेंग यांना माओचे सोव्हिएत जवळून पाहता आले. हुनान प्रांतात स्थानिक बलवान प्रादेशिक सेनानींकडून पराभव झाल्याने मूठभर सैन्य व कार्यकर्ते यांना घेऊन माओ मोठ्या शिताफीने पूर्वेकडील डोंगराळ भागातून सटकले आणि झिआंझी प्रांतात येऊन त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिपत्याखाली पहिले स्वतंत्र क्रांतिकारी सोव्हिएत निर्माण केले होते. प्रादेशिक स्वतंत्र सैन्यदलाशी लढणे, टिकून राहणे, अगदी यशस्वी माघार घेणेही किती अवघड असते, हे डेंग यांनी बैसे आणि लाँगझौ येथे स्वतःच्या झालेल्या दारुण पराभवातून अनुभवले होते. त्यामुळे माओबद्दलचा त्यांचा आदर खूप वाढला. रुजिनमध्ये एक वर्ष झाल्यानंतर डेंग यांची नेमणूक रुजिनच्या दक्षिणेकडील हुइचांग जिल्ह्याच्या पक्षप्रमुखपदी करण्यात आली. त्याचबरोबर झुनफू आणि आनफू या जिल्ह्यांतील कम्युनिस्ट पक्षाचे प्रशासनही ते पाहू लागले. हुईचांग येथे सचिवपदी आल्यानंतर मात्र त्यांचे सारेच ग्रह जणू वक्री झाले. माओप्रमाणेच डेंगही असे मानीत असत की, चीनसारख्या ग्रामीण देशात यशस्वी क्रांतिकारी उठाव करण्याची क्षमता प्राप्त करेपर्यंत कम्युनिस्ट पक्षाने ग्रामीण भागातच पक्षाचे बस्तान बसवावे आणि मगच सत्तेच्या केंद्रांकडे म्हणजे शहरी व नागरी भागाकडे वळावे.

याच वेळेला माओ यांच्या कम्युनिस्ट क्रांतीत ग्रामीण भागाला जास्त महत्त्व देण्याचे धोरण कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला फारसे मान्य नव्हते. म्हणून पक्षातील माओ यांच्या प्रभावाखाली येणाऱ्या डेंग यांना इतरही काही आरोप ठेवून पदच्युत करण्यात येऊन इतरत्र हलविण्यात आले. दुर्दैवाने या साऱ्या मानहानिकारक प्रकारात डेंग यांना पत्नीने साथ तर दिली नाहीच; उलट तिने त्यांच्या विरोधकांशी हातमिळवणी करून डेंग यांच्यावरील आरोप सिध्द करण्यास मदत केली. पुढे तर तिने कळसच केला. हुइचांग येथील डेंग यांचेच प्रतिस्पर्धी ली विहान यांच्याशी लग्न करून तिने डेंग यांचे जीवन अशक्य करून टाकले. डेंग यांच्या सुदैवाने फ्रान्समध्ये असतानाचे त्यांचे सहकारी व झिआंझी प्रांताच्या कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ली फुकन यांनी स्वत:चे वजन वापरून डेंग यांना या साऱ्या प्रकारातून सोडविले व झिआंझी प्रांताच्या प्रचार विभागाचे प्रमुख केले. पहिल्या पत्नीचा मृत्यू, फारसे कारण नसताना पक्षाकडून मिळालेली शिक्षा, दुसऱ्या पत्नीने दिलेला घटस्फोट या साऱ्याने डेंग अक्षरश: हबकून गेले होते. या प्रसंगापासून मूळचे आनंदी व थोडे बिनधास्त असणारे डेंग अधिक गंभीर, अबोल व अंतर्मुख झाले. मात्र याच काळात माओंचे पक्षातील नेतृत्वाचे पारडे जड होऊ लागले, त्यामुळे डेंग हळूहळू परत सत्ताकेंद्राजवळ आले आणि नेहमीच माओच्या आसपास राहिले.

पुढे 1969 मध्ये सांस्कृतिक क्रांतीदरम्यान हे प्रकरण उकरून काढण्यात आले आणि डेंग यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. चँग कै शेक यांना व कुओमिंगटांगच्या इतर नेत्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या वाढत्या प्रभावाची काळजी वाटत होती; त्यांनी झिआंझीमधील कम्युनिस्ट सोव्हिएत नष्ट करण्यासाठी मोठ्या तयारीनिशी हल्ल्याची तयारी केली. यातील पहिल्या चार मोहिमांमध्ये माओच्या सोव्हिएतने कुओमिंगटांगचे सारे हल्ले परतवून लावले. मात्र शेवटच्या पाचव्या मोहिमेत कुओमिंगटांगने कम्युनिस्टांचा मोठा पराभव केला व झिआंझीमधून त्यांना हाकलून दिले. माओ यांनी या पराभवानंतर यशस्वी माघार घेत उत्तरेकडे कूच केले. चीनच्या कम्युनिस्ट क्रांतीमध्ये ही यशस्वी माघार महत्त्वाचा टप्पा मानली जाते. जवळजवळ एक वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये माओ आणि त्यांच्या साथीदारांनी उत्तर शांझीमध्ये नवा तळ उभारला. या लाँग मार्चमध्ये कम्युनिस्टांचे अतोनात नुकसान झाले. 6000 मैलांचा प्रवास झाला; 86,000 लोक माघारीच्या प्रवासास निघाले, त्यापैकी फक्त 10,000 उत्तर शांझी येथे पोहोचले. उर्वरित सैनिक एक तर युध्दात कामी आले अथवा सोडून गेले.

ऑक्टोबर 1935 मध्ये शांझी येथील कम्युनिस्टांनी त्यांचे स्वागत केले. या लाँग मार्चदरम्यान डेंग हे झिआंझी प्रांतांच्या प्रचार विभागाचे प्रमुख असल्याने या काळात सैन्याचे व पक्षाचे मनोबल टिकून राहण्यासाठी ते सैनिकांच्या संपर्कात सातत्याने असत आणि त्यांची माओशीही वारंवार भेट होत असे. लाँग मार्चदरम्यान जानेवारी 1935 मध्ये गिझौ प्रांतातील झुनयी येथे जी महत्त्वाची बैठक झाली, त्यात माओ यांनी कम्युनिस्ट पक्षाचे सैन्यदलच स्वतःच्या नियंत्रणाखाली आणले. या बैठकीने माओ यांचे चीनच्या कम्युनिस्ट पक्षातील स्थान पक्के केले. डेंग या बैठकीचे निमंत्रित सदस्य नसले, तरी या बैठकीची इतिवृत्ते घेण्यासाठी त्यांची नेमणूक झाली होती आणि म्हणून पुढे कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासात त्यांची नोंद या बैठकीचे महासचिव वा सेक्रेटरी जनरल म्हणून घेण्यात आली. लाँग मार्चच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांत डेंग हे नियमितपणे ‘रेड स्टार’ नावाचे छोटेखानी पत्रक काढीत. पुढे-पुढे मोहिमेवर लिखाणाचे व छपाईचे सामान नेणे अवघड झाल्याने व सायक्लोस्टाईल मशीन नसल्याने डेंग यांचे सारे कम्युनिकेशन तोंडी होऊ लागले. दरम्यानच्या काळात जपानने 1931 मध्ये हल्ला करून मांचुरिया गिळंकृत केला होता.

पुढे 1937 मध्ये तर जपानने चीनवर मांचुरियामधून हल्ले सुरू केले. मांचुरियामधून जपानी हल्ले सुरू झाल्याने कुओमिंगटांगपेक्षाही जपानी सैन्य हाच कम्युनिस्टांचा मुख्य शत्रू झाला. याच वेळी अशी एक घटना घडली की, त्यामुळे चीनमधील साम्यवादी चळवळीला नवी ऊर्जा मिळाली. डिसेंबर 1936 मध्ये कुओमिंगटांगचे प्रादेशिक सेनानी झांग झ्युलोंग यांच्या शिपायांनी चक्क कुओमिंगटांगचे प्रमुख चँग कै शेक यांचेच अपहरण करून त्यांना कैदेत ठेवले. त्यांना सोडविण्यासाठी कम्युनिस्टांची मदत आवश्यक होती. किंबहुना, मांचुरियामधून होणाऱ्या जपानच्या मोठ्या मोहिमेविरुध्द लढता यावे म्हणून कम्युनिस्ट पक्षाबरोबर आघाडी करावी, यासाठीच हे अपहरणनाट्य रचण्यात आले होते. त्यामुळे कुओमिंगटांगने परत एकदा कम्युनिस्ट पक्षाशी हातमिळवणी केली व जपानी सैन्याशी लढाई सुरू ठेवली. कम्युनिस्टांवरील कुओमिंगटांगचा दबाव नाहीसा होताच कम्युनिस्टांनी 1937 मध्ये उत्तर शांझीमधील यानानमध्ये आपला तळ अधिक व्यापक केला. तिथे डेंग प्रसिध्दी व प्रचार विभागाचे प्रमुख होते. भाषणे, लेख, वार्तापत्रे व बुलेटिन्स याव्यतिरिक्त संगीत, कला व नाटक यांचाही उपयोग त्यांनी प्रचारासाठी केला. एकंदरीतच प्रसिध्द व प्रचार या तंत्राचा कार्यक्षमतेने वापर प्रत्यक्ष केलेला असल्याने कम्युनिकेशन व प्रचार या क्षेत्रात ते अतिशय वाकबगार झाले. याच वेळी जपानी सैन्य उत्तरेकडून, मांचुरियाकडून चीनमध्ये येऊन अनेक शहरांचा ताबा घेत होते.

मोठ्या ग्रामीण भागात कम्युनिस्टांचे प्राबल्य, तर शहरे जपानकडे- अशी परिस्थिती होती. त्यामुळे सारा उत्तर चीन लढाया व सशस्त्र संघर्ष यांनी पेटून उठला. उत्तरेकडून चढाई करीत येणाऱ्या व आधुनिक प्रगत युध्दयंत्र अवगत केलेल्या जपानी सैन्याला रोखण्यासाठी कुओमिंगटांग व कम्युनिस्ट हे एकत्र आले खरे, मात्र हे सहकार्य तात्पुरत्या स्वरूपाचे होते. परस्परांविषयीच्या संशयामुळे परिस्थिती तणावपूर्वच होती. दोन्ही पक्षांच्या एकत्रित सेनादलाला आठवे सैन्यदल (8th Route Army) असे संबोधिले जात असे. या आठव्या सैन्यदलाचे मुख्यालय कम्युनिस्टांच्या मुख्य तळावर शांझी पठारावर होते. तिेथे सैन्यासाठी अन्न व इतर रसदपुरवठा करणे शक्य होते, तसेच जपानी सैन्याचे तळही उत्तरेला जवळ असल्याने त्यांच्यावरही अधूनमधून गनिमी काव्याने हल्ले चढविणे शक्य होते. माओने 1937 मध्ये आठव्या सैन्यदलाचे कार्यक्षम प्रमुख अधिकारी लिऊ बोचेंग यांना चढाईसाठी प्रसिध्द असलेल्या 129 व्या डिव्हिजनचे प्रमुख म्हणून धाडले. शिवाय या डिव्हिजनमध्ये पक्षाच्या वतीने डेंग यांची नेमणूक केली.

सर्वसाधारणपणे सैन्यदलाच्या जनरलला पक्षाच्या प्रथम सचिवपदी व पक्षाच्या बिगर लष्करी अधिकाऱ्याला दुय्यम सचिवपदी नेमले जात असे. माओ यांनी या प्रथेत बदल करून डेंग यांना सैन्यदलातील पक्षाचे पहिले सचिव म्हणून नेमले आणि बोचेंग यांना पक्षाचे दुय्यम सचिवपद दिले. पक्षाच्या प्रमुखाला सैन्यदलातील मोहिमेवर पाठविताना ‘पोलिटिकल कॉमिसार’ असे संबोधित असत. कॉमिसारचे काम म्हणजे सैन्यदलाच्या तयारीनुसार स्थानिक राजकीय निर्णय घेणे, लष्कराने व्यापलेल्या प्रदेशाची आर्थिक-राजकीय व प्रशासकीय घडी बसविणे आणि सैन्यदलात व सैन्यदलाने व्यापलेल्या प्रदेशात राजकीय प्रचार व प्रसिध्दी यांची धुरा वाहणे. डेंग झिओपेंग व लिऊ बोचेंग यांनी परस्परांना उत्तम सहकार्य करून या डिव्हिजनमार्फत अनेक जिल्ह्यांमध्ये कम्युनिस्ट राजवट स्थापन केली.

1937 ते 1945 या आठ वर्षांत जपानी सैन्याला त्यांनी उत्तमरीत्या रोखले; 1945 नंतर जपानी सैन्याचे आव्हान संपुष्टात आल्यावर नागरी युध्दात कुओमिंगटांगच्या सैन्यदलाबरोबर त्यांनी उत्तम लढत दिली. लिऊ बोचेंग व डेंग यांची जोडी इतकी प्रसिध्द झाली की, त्यांना संयुक्तरीत्या लिऊ डेंग या नावाने संबोधित असत. गंमत अशी की, लिऊ बोचेंग यांच्यापेक्षा डेंग हे अधिक कणखर म्हणून ओळखले जात. लिऊ बोचेंग सैन्यप्रमुख असूनही सैन्यदलातील जवानांबाबत थोडे मवाळपणे वागत असत. हेरगिरी वा अशा प्रकरणी जवानांना कडक शिक्षा देताना लिऊ बोचेंग थोडे भावनिक व संवेदनशील होत. मात्र डेंग शिस्तीच्या बाबतीत अतिशय कडक व काटेकोरपणे वागत. 1937 ते 1945 या काळात जपानी सैन्याशी गनिमी काव्याने लढताना या दोघांनी सैन्यदलाचा तळ पूर्व शांझीमधील टाईहँग पर्वतरांगेमध्ये सतत फिरता ठेवला होता. डेंग यांना टार्इंहँग पर्वतरांगेतील त्यांच्या तळावरील, आजूबाजूच्या परिसराकडे आणि तेथील स्थानिक जनतेचे प्रशासन, राजकारण व अर्थव्यवस्था यांच्याकडे जातीने लक्ष द्यावे लागे. तेथील नागरिकांसाठी व सैन्यदलासाठी पुरेशा अन्नधान्याची तरतूद करणे, प्रदेशातील छोट्या- मोठ्या उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाची तरतूद करणे इत्यादी जबाबदाऱ्याही त्यांच्याकडे होत्या.

स्थानिक कर प्रशासनही त्यांच्याकडे होते. त्यात त्यांनी काही महत्त्वाचे बदलही केले. विविध करांचे दर वाजवी तर असले पाहिजेतच, याशिवाय कर आकारताना अलीकडच्या काळातील सरासरी उत्पादन लक्षात घ्यावे याबाबत ते दक्ष असत. यानान येथे 1939 मध्ये आले असताना त्यांची ओळख झुओ लिन या अतिशय हुशार मुलीबरोबर झाली आणि त्यांनी 35 व्या वर्षी तिसरे लग्न केले. तिचे वडील उद्योजक व व्यापारी होते, ही त्यांची तिसरी मुलगी. ज्या काळात चीनमध्ये मुली अजिबात शिकत नसत, त्या काळात तिने व तिच्या दोन्ही बहिणींनी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. या तिन्ही बहिणी विद्यापीठात शिकत असतानाच कम्युनिस्ट चळवळीकडे ओढल्या गेल्या होत्या. झुओ लिन यांना तर बीजिंग विद्यापीठात पदार्थविज्ञान शाखेत प्रवेश मिळाला होता. (पुढे उच्च शिक्षण झाल्यानंतर त्या बीजिंग विद्यापीठात पदार्थ- विज्ञानाच्या प्राध्यापक झाल्या.) डेंग यांच्या साधेपणाने संपन्न झालेल्या विवाहास यानान येथील कम्युनिस्ट चळवळीतील महत्त्वाची मंडळी होती; त्यात स्वतः माओ झेडुंग, लिऊ शाओची व ली फुकन हेही होते. डेंग व झुओ लिन यांचे लग्न शेवटपर्यंत टिकले. त्यांना एकूण पाच अपत्ये. लिन, नाम व राँग या तीन मुली आणि पुफांग व झिफांग ही दोन मुले.

डेंग यांचा त्यांच्या मुलांवर फार जीव होता. मुलगी राँग डेंग हिने तर पुढे वडिलांचे चरित्रही लिहिले. दुसऱ्या महायुध्दानंतर जपानचे सैन्य चीनमधून माघारी फिरले. त्यानंतर चीनमध्ये जे यादवी युध्द झाले, त्यात कम्युनिस्टांच्या सैन्याला कुओमिंगटांगबरोबर कडवी झुंज द्यावी लागली. तोपर्यंत कम्युनिस्टांचा प्रभाव अनेक राज्यांमध्ये होता, ती राज्ये कम्युनिस्ट पक्षाच्या आधिपत्याखाली आली. चीनमधील उत्तर सीमेवरील ज्या प्रदेशाला जीन, जू, लुयू म्हटले जाते, त्या प्रदेशात एकूण चार प्रांतांचा (हेबेई, शांझी,, शॅनडाँग, व हेनान) समावेश होता. कम्युनिस्ट पक्षाने या चारही प्रांतांत घट्ट पाय रोवले होते. या प्रदेशात कम्युनिस्ट पक्षात डेंग हे सर्वांत वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जात. दुसऱ्या महायुध्दानंतर मुख्य सामना कुओमिंगटांगबरोबर असल्याने त्या मोठ्या चढाईसाठी आपल्या सैन्यदलाला डेंग चढाईचे प्रशिक्षण देत असत, प्रोत्साहित करीत असत. ही जबाबदारी पेलवतील अशा सहकाऱ्यांच्या नेतृत्वाच्या शोधात डेंग असत. या काळातच झाओ झियांग व वॅन ली हे दोन उत्तम संघटक डेंग यांना मिळाले. (पुढे 1978 मध्ये हाती सत्ता आल्यानंतर डेंग यांच्या आर्थिक व प्रशासकीय सुधारणांच्या कामात या दोघांची खूप मदत झाली.)

माओ यांनी लिऊ बोचेंग व डेंग यांच्या सैन्यदलाला 1946 मध्ये नैर्ऋत्य चीन व मध्य चीन येथील डाबी पर्वतच्या टोकाकडील पठाराकडे कूच करण्याचे आदेश दिले. कुओमिंगटांग सैन्याची उत्तरेकडे व वायव्य चीनकडे मोठी जमवाजमव सुरू असल्याने आणि कम्युनिस्ट पक्षाच्या उत्तरेकडील प्रांतामधील अस्तित्वास धोका निर्माण झाल्याने कुओमिंगटांगच्या काही सैन्यदलाला दक्षिणेकडे गुंतवून ठेवण्यासाठी केलेली ही एक खेळी होती. शिवाय चीनमधील युध्दाचा इतिहास असे दर्शवितो की, सैन्यदलाच्या मदतीने संपूर्ण चीन देशावर नियंत्रण आणण्यासाठी ज्या-ज्या लढाया झाल्या, त्यात अखेरच्या लढाया व सामने हे मध्य चीनच्या सपाट प्रदेशांमध्ये झाले. म्हणून मध्य चीनमध्ये कम्युनिस्टांची खडी फौज असणे आवश्यक होते. लिऊ व डेंग यांची सेना अशा रीतीने दक्षिणेकडे निघाली; मात्र पुरेशी रसद, शस्त्रास्त्रे, युध्द सामग्री व गरम कपडे यांच्या अभावामुळे दक्षिणेकडे सरकताना अनेक सैनिक कामास आले, थंडी व पुरेशा अन्यधान्याच्या अभावी दक्षिणेकडे पोहोचू शकले नाहीत. तरीही अशा परिस्थितीत सैन्याने मध्य चीनमध्ये आपला तळ उभारला.

नागरी युध्दामध्ये शेवटच्या हुआई है या निर्णायक यु मोहिमेसाठी मध्य चीनमधील सैन्यदलाला याचा मोठा उपयोग झाला. नोव्हेंबर 1948 ते जानेवारी 1949 पर्यंत चाललेली हुआइ है ही युध्द मोहिम लष्करी इतिहासातील महत्त्वाची समजली जाते. कुओमिंगटांगचे 6 लाख सैन्य व 5 लाख कम्युनिस्ट सैन्य यांच्यातील हा मोठा संघर्ष होता. कम्युनिस्टांनी सैन्यदलाला अन्न, सामग्री व रसद पुरविण्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन केले होते. याशिवाय घोडे, बैल इत्यादी भारवाहक प्राण्यांचीही जमवाजमव केली होती. या युध्दात माओने आपल्या जनरल्सना चँग कै शेकच्या सैन्यदलातील जनरलपेक्षाही जास्त (स्थानिक व दैनंदिन निर्णय घेण्याचे) अधिकार दिले होते. त्यामुळेच कुओमिंगटांगच्या सैन्याचा पराभव होऊ शकला. विशेष म्हणजे, या मोहिमेत डेंग यांच्याकडे सेनेचे नेतृत्व होते. या मोहिमेपासून कम्युनिस्ट पक्षाचा युध्दावर वरचष्मा राहिला. डेंग यांच्याबाबत या मोहिमेत अनेक वादग्रस्त प्रसंग घडले. लिऊ बोचेंग सैन्याची खूप काळजी घेत असत. बचावासाठी पुरेसे खंदक खोदल्यशिवाय, पुरेसे बंकर्स तयार केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नसत. डेंग मात्र फारशी काळजी न करता सैनिकांचा जीव धोक्यात घालीत असत, असा अनेकांचा आक्षेप होता. तरीही शेवटी कम्युनिस्ट सैन्याने कुओमिंगटांगचा पराभव केला. त्यानंतर यांगत्झी नदी पार करून कम्युनिस्ट सैन्याने दक्षिणेकडे व पश्चिमेकडे त्वरेने कूच करून सारा देश पादाक्रांत केला.

पुढे 1984 मध्ये जपानच्या पंतप्रधानांनी डेंग यांना ‘तुमच्या आयुष्यातील सगळ्यात यशस्वी व आनंदी प्रसंग कोणता?’ असे विचारले असता, डेंग यांनी ‘तीन वर्षांचा नागरी युध्दाचा व दक्षिणेकडील हुआई है मोहिमेतील यांगत्झी नदी पार करण्याच्या कामगिरीचा’ असे उत्तर दिले होते. सैन्य जसजसे पुढे जाऊन शहरे व प्रदेश काबीज करीत व कुओमिंगटांगचा स्थानिक विरोध मोडून काढीत, तसतसे कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य स्थानिक प्रशासनाचा ताबा घेत असत आणि तेथील प्रशासनाची घडी बसवीत असत. या कार्यात डेंग पुढे असत आणि स्थानिक नेत्यांना व अधिकाऱ्यांना कम्युनिस्ट पक्षाची व क्रांतीची संकल्पना ते स्पष्ट करीत; प्रशासनाची भूमिका व तत्त्वज्ञान समजावून सांगत. शांघाय शहरावर ताबा मिळविण्यासाठी त्यांनी स्वतः तिथे बराच काळ मुक्काम केला होता. अशा रीतीने डेंग यांनी प्रत्यक्ष युध्द व नंतर पोलिटिकल कॉमिसार या दोन्ही भूमिका उत्तमपणे पार पाडल्या. कम्युनिस्टांनी ईशान्य चीनचा ताबा 1947 मध्ये घेतला. त्यानंतर संबंध देशावर ताबा मिळविण्यासाठी त्यांना दोन वर्षे लागली. या दोन वर्षांत डेंग यांनी नव्या चीनची प्रशासकीय घडी बसविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या दोन वर्षांत चीनमधील एकूण सहा विविध प्रदेश कम्युनिस्ट पक्षाने आपल्या नियंत्रणाखाली आणले. त्यांच्या प्रशासनासाठी प्रत्येक प्रदेशाला स्वतंत्र ब्युरो किंवा प्रशासकीय केंद्र निर्माण करण्यात आले. सहाही प्रदेशांचा कारभार स्वतंत्रपणे या सहा ब्युरोंमधून 1952 पर्यंत चालत असे. दरम्यानच्या काळात कम्युनिस्ट पक्षाने बीजिंग येथे केंद्र सरकारची स्थापना केली. या साऱ्याच प्रदेशांचे प्रशासन ब्युरोमार्फत चालविण्यासाठी त्या-त्या प्रदेशातील कम्युनिस्ट नेत्यांची मदत घेण्यात आली.

नागरी युध्द संपल्यानंतर व शांतता प्रस्थापित झाल्यानंतर नैर्ऋत्य चीनमधील ब्युरोचे पहिले सचिव म्हणून डेंग यांची नेमणूक झाली. हा प्रांत व ब्युरो कम्युनिस्टांचा सर्वांत शेवटचा प्रांत होता. यातच तिबेटचा समावेश होता. शांतता काळात प्रशासनाची घडी बसविणे; शिक्षण, सांस्कृतिक कार्य, आर्थिक विकासासाठी व्यापार, उद्योग व शेती इत्यादींना चालना देणे; कम्युनिस्ट पक्षासाठी सदस्य-नेते यांची निवड करणे- अशी अनेक कामे डेंग करू लागले. तेथील ग्रामीण भाग प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता, कारण कुओमिंगटांगचे सैन्य माघार घेत या प्रदेशात आले होते. तिथून काही शरण आले, काही पळून गेले व काही चक्क तेथील स्थानिक जनतेत मिसळून गेले. काहींनी कम्युनिस्टांना विरोध सुरू ठेवला. सगळ्यात शेवटी नियंत्रणाखाली येणारा प्रांत म्हणजे तिबेट. तिबेटची सेना अगदीच कमकुवत असल्याने तिबेट लवकरच नियंत्रणाखाली आला. डेंग यांना माहीत होते की, प्रशासकीय व्यवस्था अधिक कार्यक्षम होण्यासाठी निष्णात व चांगले कार्येकर्ते व अधिकारी पक्षात हवे. कुओमिंगटांग पक्षातील कार्यकर्ते, सैनिक व अनेक अधिकाऱ्यांना डेंग यांनी आपल्या पक्षात व प्रशासनात सामावून घेतले आणि प्रशासनव्यवस्था कार्यक्षम केली. सतत भाषणे देऊन व लेख लिहून डेंग यांनी कम्युनिस्ट पक्षाची ध्येय-धोरणे सामान्य माणसांपर्यंत नेली, मोठ्या प्रमाणावर जमीन सुधारणा केल्या आणि मोठ्या जमीनदारांच्या जमिनींचे वाटप प्रत्यक्ष कष्टकरी जनतेला केले. याशिवाय चोंगकिंग आणि चेंगडू यादरम्यानची रेल्वेबांधणी सुरू करून 1952 मध्ये त्यांनी ती पूर्णही केली. लाँग मार्चपासून सातत्याने मिळणारे यश, गाठीशी प्रचंड अनुभव, माओशी असणारी जवळीक आणि मोठी अंगभूत कार्यक्षमता पाहता केंद्र शासनातील मोठ्या पदासाठी त्यांचा विचार न होता, तरच नवल! आणि मग 1952 मध्ये डेंग हे बीजिंगला केंद्र शासनात उपपंतप्रधान म्हणून गेले.

डॉ. सतीश बागल, नाशिक

bagals89@gmail.com

Share on Social Media

मागोवा

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे पहिले दशक

शमसुद्दिन तांबोळी

मुस्लिम समाजात प्रबोधनाचा विचार, चिकित्सेचा मुद्दा मुस्लिमांनी घेऊन जायला हवा. यासाठी समाजातील लोकांनी ‘आपले घर’ दुरुस्त करण्याच्या भूमिकेतून संघटना उभारावी असा विषय मांडला गेला. मग समविचारी कार्यकर्त्यांची बैठक ‘साधना’ कार्यालयात घेण्यात आली. दि.22 मार्च 1970 रोजी झालेल्या त्या ऐतिहासिक बैठकीत डॉ. बाबा आढाव यांनी या संघटनेला ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ हे नाव सुचवले. सर्वानुमते त्यास संमती मिळाली. मंडळाच्या स्थापनादिनी बाबा आढाव बैठकीस मिरवणुकीने गाजावाजा करीत आले होते. यदुनाथ थत्ते, ग. प्र. प्रधान, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी आणि या काळातील समाजवादी, समतावादी मंडळींनी मुस्लिम सत्यशोधकचे स्वागत व समर्थन केले. मुस्लिम सत्यशोधकच्या आरंभीच्या काळात ए. जे. शेख यांनी काही काळ मंडळाचे अध्यक्ष म्हणून साथ दिली. मंडळाच्या स्थापनेच्या दिवशी वर्तमानपत्रातील बातमी वाचून स्वातंत्र्यसैनिक बाबूमियाँ बँडवाले हे श्रीगोंदा येथून बैठकीला आले होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनकाळात आधुनिक विचारांचा प्रसार होत राहिला. या विचारांना मिळणारा प्रतिसाद मात्र संमिश्र राहिला. एका बाजूला परकीयांबरोबर संघर्ष करीत असतानाच धर्मवर्चस्ववादी विचारमानसिकता डोके वर काढीत होती. यातूनच हिंदू महासभा, मुस्लिम लीग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जमाते इस्लामी यांसारख्या संघटनांनी जनसामान्यांवर आपल्या विचारांची छाप पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या विभाजनवादी विचाराला प्रतिबंध घालून, सर्वसमावेशक धोरण आखून नवसमाज निर्मितीसाठी राष्ट्र सेवादलासारख्या समतावादी संघटना उभ्या राहिल्या. हमीद दलवार्इंवर बालवयात राष्ट्र सेवादलाने राष्ट्रप्रेम, समता आणि सुधारणेचे संस्कार केले.

देशाला स्वातंत्र्य मिळाले ते देशाच्या विभाजनाची किंमत मोजून, मात्र नंतरही धर्मवादी संघटना आणि जमातवादी मानसिकता खदखदत राहिली. मुस्लिम समाजातील धर्मवादी नेतृत्वाने आधुनिकतेकडे घेऊन जाणाऱ्या विचाराला त्या काळात कडाडून आणि आक्रमकपणे विरोध केला. सर सय्यद अहमद खान आणि त्यांच्या धर्तीवर धर्मसुधारणा करणाऱ्यांचीही अवहेलना केली. उलट, हिंदू समाजात राजा राममोहन रॉय, महात्मा फुले यांच्या परंपरेला विरोध होत राहिला तरी सुधारणावादी विचार रुजत गेला. महात्मा गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी हिंदुत्ववाद व हिंदू जमातवाद परतवून लावला. परिणामी, आधुनिक राष्ट्र घडवणारे भारतीय संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात निर्माण झाले. मौलाना आझाद, डॉ. झाकीर हुसेन, बद्रुद्दीन तय्यबजी आदी मंडळींना मुस्लिम जमातवादी मानसिकता रोखता आली नाही.

अश्रफी- उच्चवर्णीयांनी पाकिस्तानची वाट धरली; मात्र या मातीशी एकरूप झालेला गरीब, बलुतेदार, श्रमिकवर्ग भारतात राहिला. या सामान्य मुस्लिम समाजाला आधुनिकतेची दिशा देण्याऐवजी त्यांचे मागासपण आणि धर्मवादी मानसिकता कायम ठेवणारे नेतृत्व वरचढ झाले. या काळातील मुस्लिम समाजाचे चित्रण हमीद दलवाई वयाच्या अठराव्या वर्षापासून साहित्यरूपात मांडत राहिले. दलवार्इंनी ‘इंधन’ या कादंबरीतून आणि जवळपास पन्नास कथांतून खऱ्या अर्थाने मुस्लिम मराठी साहित्याला जन्मास घातले. मुस्लिम समाज त्यांच्या निरक्षरतेमुळे आणि मराठी भाषेच्या पूर्वग्रहदूषित वर्तनामुळे दलवार्इंच्या साहित्याला प्रतिसाद देऊ शकला नाही. मात्र मराठीतील पत्रकारिता, हिंदू समाजातील प्रबोधनाचे प्रयत्न दलवार्इंना प्रभावित करीत होते. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीला शंभर वर्षे होऊ घातली होती.

हिंदू समाजातील जुनाट धर्मनिष्ठा बदलण्याचा प्रयत्न होत होता आणि मुस्लिम समाज मात्र कालविसंगत अशा परंपरांना हात न लावण्याचा आटापिटा करीत होता. हिंदू समाजात आधुनिक मानवी राष्ट्रवादाचे, धर्मनिरपेक्षतेचे, समतेचे आणि आधुनिक मानवी मूल्यांचे प्रवाह बळकट होत होते. या पार्श्वभूमीवर भारतीय समाजप्रबोधनाच्या चळवळीत मुस्लिम समाज मागे राहिला, तर या समाजात अनेक समस्या निर्माण होतील आणि या प्रबोधनाचे समतोल उद्देश साध्य करण्यात अपयश येईल, ही जाणीव दलवार्इंना अस्वस्थ करीत होती. जगातील समाजप्रबोधनाच्या चळवळीचा प्रारंभ हा स्त्रीदास्यमुक्तीच्या मूल्यापासून सुरू होतो. हा धागा विचारात घेऊन दलवार्इंनी मुस्लिम महिलांच्या मानवी हक्कांचा मुद्दा सर्वप्रथम हाती घेतला.

दि. 18 एप्रिल 1966 रोजी आपली पत्नी, बहीण आणि इतर पाच महिला- अशा सात मुस्लिम महिलांचा मोर्चा काढून मुस्लिम महिलांच्या तोंडी तलाक, बहुपत्नीत्व, हलाला, मूल दत्तक घेण्यास असणारा मज्जाव या विषम-अन्यायी तरतुदींविरोधात इस्लामच्या इतिहासातील पहिला आवाज उठवला आणि समान नागरी कायद्याची मागणी करणारे निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना दिले. महिलांनी संघटितपणे आपल्या हक्कांची लढाई पुढे घेऊन जावी, यासाठी त्यांनी ‘सदा-ए- निसवाँ’ (महिलांची हाक) ही संघटना उभारणीचा प्रयत्न केला? मात्र तिला हवा तसा प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यानंतर त्यांनी मुस्लिम जमातवादाची चिकित्सा केली. जमातवादी मानसिकता आधुनिक राष्ट्रवादाच्या उभारणीतील पहिली अडचण आहे, असा त्यांचा विश्वास होता. या निमित्ताने त्यांनी भारतातील विचारवंत आणि मुस्लिम बुध्दीजीवींशी चर्चा केली. देशाच्या सीमांलगतच्या भागात दौरा केला. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ मराठा दैनिकातून रेखाटले. मुस्लिम बुध्दीजीवी, तथाकथित राष्ट्रवादी मुस्लिम आणि मुस्लिम नेतृत्वाशी केलेल्या चर्चेतून त्यांना ‘मुस्लिम जातीयतेचे स्वरूप- कारणे व उपाय’ याचा शोध लागला.

साधना प्रकाशनाने हे विचार पुस्तकरूपाने प्रकाशित केले. या पुस्तकात भर घालून, दिलीप चित्रे यांनी दलवार्इंची मुलाखत घेतली आणि भारतभर गाजलेले इंग्रजी अनुवादित पुस्तक ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे 1968 मध्ये प्रथम नचिकेत प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केले. त्याच वर्षी प्रा. अ. भि. शहा, हमीद दलवाई आणि इतर सेक्युलॅरिस्ट मंडळींनी ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ची स्थापना केली. प्रा. अ. भि. शहा हे अध्यक्ष होते आणि दलवाई या सोसायटीचे उपाध्यक्ष होते. या सोसायटीमार्फत ‘द सेक्युलॅरिस्ट’ प्रकाशित होत होते. लेखांतून आणि व्याख्यानांतून विज्ञाननिष्ठ सेक्युलॅरिझम मांडण्यात येत होता. समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि वैज्ञानिक मनोभूमिकेवर आधारलेला हा सेक्युलॅरिझम भारतीय समाजात रुजावा, ही भूमिका घेऊन त्यांनी केलेले प्रयत्न हे सेक्युलॅरिझमसाठी मोठे योगदान आहे. पण दलवार्इंना अपेक्षित असणारी सेक्युलॅरिझमची परिभाषा मुस्लिमांना सोडा- आधुनिकतेचे वारे लागलेल्या हिंदू समाजालाही परवडत नव्हती.

सन 1966 ते 70 हा काळ मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या खऱ्या अर्थाने गरोदरपणाचा काळ म्हटला पाहिजे. मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवरील पहिला मोर्चा, अभ्यासदौरा, संवाद अभियान, वैचारिक पुस्तकांचे लेखन, लेखमाला, इंडियन सेक्युलर सोसायटी- हे सर्व बुध्दीजीवी वर्गात मर्यादित राहत होते. पण ज्या समाजातील प्रबोधनाची दरी भरून काढायची होती तो समाज उदासीन, जैसे थे आणि प्रभावहीन होता. म्हणून दलवार्इंना मुस्लिम समाजकेंद्रित संघटना उभारणे जास्त महत्त्वाचे वाटले. मग ही चळवळ ‘क्लास’मध्ये अडकून न पडता ‘मास’मध्ये जायला हवी, या तळमळीतून त्यांनी समविचारी मित्रांशी संवाद केला. या कामी भाई वैद्य, बाबा आढाव यांच्यासह साधना आणि समाजवादी परिवारातील विचारवंत कार्यकर्त्यांनी साथ दिली. भार्इंच्या घरात अनेक बैठका झाल्या. त्या काळात राष्ट्र सेवादलाच्या संपर्कात असलेल्या उदारमतवादी मुस्लिम कार्यकर्त्यांची ओळख भार्इंनी करून दिली. मुस्लिम समाजात प्रबोधनाचा विचार, चिकित्सेचा मुद्दा मुस्लिमांनी घेऊन जायला हवा. यासाठी समाजातील लोकांनी ‘आपले घर’ दुरुस्त करण्याच्या भूमिकेतून संघटना उभारावी असा विषय मांडला गेला. मग समविचारी कार्यकर्त्यांची बैठक ‘साधना’ कार्यालयात घेण्यात आली. दि.22 मार्च 1970 रोजी झालेल्या त्या ऐतिहासिक बैठकीत डॉ. बाबा आढाव यांनी या संघटनेला ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ हे नाव सुचवले. सर्वानुमते त्यास संमती मिळाली.

मंडळाच्या स्थापनादिनी बाबा आढाव बैठकीस मिरवणुकीने गाजावाजा करीत आले होते. यदुनाथ थत्ते, ग. प्र. प्रधान, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी आणि या काळातील समाजवादी-समतावादी मंडळींनी मुस्लिम सत्यशोधकचे स्वागत व समर्थन केले. मुस्लिम सत्यशोधकच्या आरंभीच्या काळात ए. जे. शेख यांनी काही काळ मंडळाचे अध्यक्ष म्हणून साथ दिली. मंडळाच्या स्थापनेच्या दिवशी वर्तमानपत्रातील बातमी वाचून स्वातंत्र्यसैनिक बाबूमियाँ बँडवाले हे श्रीगोंदा येथून बैठकीला आले होते. नि:स्पृह, धार्मिक आणि सात्त्विक विचाराच्या बाबूमियाँनी मंडळाचे अध्यक्ष व्हावे, अशी इच्छा दलवार्इंनी व्यक्त केली. बाबूमियांनी ही जबाबदारी आनंदाने घेतली. साधना ट्रस्टने हमीदभार्इंचे व्याख्यान 1968 मध्ये आयोजित केले होते. या वेळीच सय्यदभाई- दलवाई यांचा परिचय झाला होता. त्यांनीही चळवळीत सक्रिय व्हायची भूमिका घेतली. दलवार्इंशी कोल्हापूरहून पत्रव्यवहार करणारे हुसेन जमादार मंडळाशी जोडले गेले. अमरावतीचे वजीर पटेल यांनी ‘यंग मुस्लिम असोसिएशन’ या नावाची संस्था काढून मुस्लिम विकासाचे काम सुरू केले होते. त्यांनी दलवार्इंच्या कार्यात वाहून घेतले; शिवाय मरियम रफाई, पत्रकार सय्यद मुनीर, हुसेन दलवाई, अब्दुल कादर मुकादम, अन्वर शेख, महंमद नगारजी, बशीर शेख, अमीर शेख, ॲड. नजमा, रशिद शेख, फजल शेख, मुमताज रहिमतपुरे, मुमताज मोमिन, डॉ. शमीम आत्तार, मुंबईचे महंमद दलवाई, ॲड. मुलाणी, लतीफ खाटिक, राजसाब मुलाणी, कोल्हापुरातील महंमद सोलापुरे, नसरुद्दीन बारगीर, खदिजा बागवान, गणी फरास, अहमदनगर येथील निसार बाटलीवाला, मेहबूब बँडवाले, पठाण टेलर, चिपळूणचे दादाभाई पटेल, जोहरा भाटकर, फलटण-सातारा जिल्ह्यातील इलाही मोमिन, करीम खान, प्रा. ए. डी. आत्तार, डॉ. बाबालाल मणेर, प्रा. विलायत शेख, महमूदमियाँ दारूवाले व इतर, अमरावतीचे अजीज बारी, सोलापुरातील प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर, सय्यद मुजीर, महमंद हनीफ, बालम शेख आणि मंडळी दलवाई हयात असताना जोडली गेली आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे दूत होऊन कामाला लागली.

हमीदभार्इंच्या निधनानंतर अन्वर राजन, शमसुद्दीन तांबोळी, चाँदसाब, रजिया सुलताना, समद खान, बानू शेख, समीर मणियार, मुसा मुलाणी, बशीर तांबोळी, प्रा. मोदी, प्रा.तसनीम पटेल, प्रा. ऐनुल आत्तार, प्रा. आशा अपराद, बाबासाहेब काझी, शबनम सोमजाळ अशा अनेक कार्यकर्त्यांनी सत्यशोधक चळवळीस बळ दिले. हमीदभार्इंच्या निधनानंतर मेहरुन्निसा दलवाई यांनी मंडळात सक्रिय होऊन मंडळाचे नेतृत्व केले. मंडळाच्या पहिल्या दशकातील कार्यकर्त्यांची यादी बरीच मोठी आहे, ती जवळपास तीनशेच्या आसपास होती. दलवार्इंच्या सत्यशोधकी भूमिकेला साथ देणारी ही फक्त महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची यादी आहे. दलवाई यांच्या मुस्लिम समाजप्रबोधनाला पाठिंबा देणाऱ्यांत प्रा. कुलसुम पारेख, प्रा. मुनीर शाकीर, ॲड. अब्दुल शेख, प्रा. असफ फैजी, एम. आर. ए. बेग या बुध्दीजीवी व्यक्तींचा समावेश आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या पहिल्या दशकास सुवर्णकाळ असे म्हणण्याचे कारण हा दलवाई यांच्या हयातीतील झंझावाती कार्यक्रमांचा काळ आहे. इस्लामच्या जगतातील ही अव्दितीय चळवळ पहिल्या दशकातच एका उंचीवर गेली होती.

या चळवळीचे क्रांतिकारकत्व त्याच्या दीड-दोन पानांच्या जाहीरनाम्यात दिसून येते. या जाहीरनाम्यातील मध्यवर्ती मजकूर असा आहे- ‘मुस्लिम समाजप्रबोधनाच्या आरंभीच्या काळातील प्रयत्न वगळल्यास एरवी निराशाच पदरी पडली. सर सय्यद अहमद खानांचा सुधारणेचा गाडा विभक्ततावादाच्या दलदलीत रुतून बसला. हिंदू समाजात पुरोगामित्वाचे प्रयत्न होत असताना, मुस्लिम समाज मात्र कालसुसंगत बदलांविरूध्द आटापिटा करीत होता. बहुसंख्य हिंदू परिवर्तनवादी मंडळीही कळत-नकळत या प्रक्रियेला हातभार लावत होती. बदललेल्या परिस्थितीचे भान आणि आव्हान समाज स्वीकारू शकला नाही. प्रजासत्ताक भारतात मुस्लिम समाज एक सन्माननीय घटक म्हणून नांदण्यासाठी लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समतावादी मूल्य स्वीकारले नाही तर संविधानाचा पाया कमकुवत राहील; हे कार्य व्हावे म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करण्यात येत आहे. मंडळाचे हे नाव महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाची जाणीव म्हणून या मंडळाच्या संस्थापक सभासदांपुढे आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात अशी सुधारणावादी चळवळ विशिष्ट धर्मगटासाठी नको होती, परंतु मुस्लिम समाजाच्या प्रबोधनावर भर देण्यासाठी मंडळाचे कार्यक्षेत्र या समाजापुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे.

सामाजिक बदलाची दरी नष्ट झाल्यास हे मंडळ मुस्लिम समाजापुरते काम करणार नाही- मंडळाच्या वेगळ्या अस्तित्वाची आवश्यकता उरणार नाही, अशी अवस्था यावी म्हणून हे मंडळ कार्य करीत राहील.’ हा सारांश मंडळाची ध्येय- धोरणे आणि वैचारिक अधिष्ठानाचा आत्मा आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने आरंभीच्या काळात घेतलेले कार्यक्रम हे मुस्लिम महिलांना पुरुषप्रधान मानसिकतेतून मुक्त करून त्यांना समानतेचा संविधानात्मक हक्क मिळवून देणे, धर्मनिरपेक्षता व लोकशाही मूल्यांशी बांधिलकी म्हणून समान नागरी कायद्याची मागणी, जमातवादी-विघटनवादी मानसिकतेविरुध्द संघर्ष करून, मुस्लिम चिकित्सा करून समाजाला आधुनिकतेकडे घेऊन जाण्यासाठी कार्यक्रम घेणे, मुस्लिम समाजाच्या ऐहिक विकासासाठी आधुनिक शिक्षण, प्रादेशिक भाषेचा सन्मान व स्वीकार आणि कुटुंबनियोजनासाठी लोकाधार मिळवून देणे यास प्राधान्य देण्यात आले. राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्ष एकात्म समाजाच्या प्रस्थापनेबरोबरच मुस्लिम समाजप्रबोधनासाठी पहिल्या दशकात मंडळाच्या स्थापनेनंतर आयोजित केलेले कार्यक्रम असे आहेत.

8 एप्रिल 1970- मंडळाच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या पंधरवड्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि इंडियन सेक्युलर सोसायटीतर्फे 500 मुस्लिम स्त्रीपुरुषांच्या सह्याचे निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना देण्यात आले. यात ‘समान नागरी कायद्याची’ मागणी करण्यात आली होती.

31 मे 1970- मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कोल्हापूर शाखेचे उद्‌घाटन वि. स. खांडेकर यांच्या हस्ते आणि माधवराव बागल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मुस्लिम सत्यशोधक मंडळासाठी कोल्हापूर भागात अनेकांनी सहकार्य केले.

16 ते 18 जून 1970 - या वर्षात मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य मुस्लिमांशी त्यांच्या मोहल्ल्यात जाऊन संवाद करण्याची मोहीम आखली. पुण्यातील मोमिनपुरा भागात हमीद दलवाई यांनी संवाद करण्यासाठी कार्यक्रम आखला. तेव्हा गैरसमजाने पछाडलेल्या मुस्लिमांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. यानिमित्त महाराष्ट्रातील अग्रणी वर्तमानपत्रांत अग्रलेख छापून आले. दलवार्इंना पोलीस तक्रार नोंदवण्याचा सल्ला देण्यात येत होता, मात्र त्यांनी मुस्लिमांविरुध्द तक्रार न नोंदवण्याचा निर्धार केला. तशी भूमिका घेतली.

3 ऑगस्ट 1970- मंडळाच्या वतीने परमवीर अब्दुल हमीद व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली. पुण्यातील अहिल्या आश्रमात स्वातंत्र्यवीर मोहन रानडे आणि कायदेतज्ज्ञ ए. ए. ए. फैजी यांचे व्याख्यान झाले.

18, 19 सप्टेंबर 1971 रोजी गणेश मंगल कार्यालय, कोल्हापूर येथे पहिले कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले. यात हमीद दलवाई, प्रा. अ. भि. शहा या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

4 नोव्हेंबर 1971- इस्लामचा आधुनिक दृष्टिकोन या विषयावर प्रा. असफ ए. फैजी यांचे कोल्हापूर येथे व्याख्यान झाले.

28 नोव्हेंबर 1971- पुणे येथे नेहरू मेमोरियल हॉलमध्ये महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी मंडळातर्फे अखिल महाराष्ट्र मुस्लिम परिषद आयोजित करण्यात आली. याच महिन्यात गांधी भवन पुणे येथे कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शहा- दलवार्इंबरोबरच यदुनाथ थत्ते, अनिल अवचट यांनी मार्गदर्शन केले.

3-4 डिसेंबर 1971- महाराष्ट्रात सुरू झालेली सत्यशोधक चळवळ राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न मंडळाच्या स्थापनेनंतर दीड वर्षात करण्यात आला.

देशातील पुरोगामी विचारवंतांना एकत्र करून दिल्ली येथे ‘ऑल इंडिया कॉन्फरन्स फॉर फॉरवर्ड लुकिंग मुस्लिम’ परिषद आयोजित करण्यात आली. भारत-पाक युध्दाच्या काळात झालेल्या या परिषदेसाठी लखनौ, अलिगढ अशा मुस्लिमबहुल भागांतून प्रतिनिधी आले होते.

27-28 नोव्हेंबर 1971- पुणे येथे मुस्लिम महिला परिषद आयोजित करण्यात आली. यात सुमारे दोनशे महिला उपस्थित होत्या. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांबरोबरच अहमदाबाद, कलकत्ता, दिल्ली येथून अनेक महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. तलाकपीडित महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. फकर बेगम- दिल्ली, जहाँआरा बेगम- कलकत्ता यांनी मुस्लिम महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्याची मागणी केली.

1971 मध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन राज्यपाल श्री. अलियावर जंग यांची भेट घेऊन समान नागरी कायद्यासाठी निवेदन दिले.

1971 - मध्ये दिल्ली, बुलंद शहर, तंजावर, बंगलोर, हैदराबाद, लखनौ, मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील सुमारे 500 मुस्लिम महिलांची त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी पाहणी केली. यामध्ये 150 महिला तलाकपीडित असल्याचे लक्षात आले.

1971 - हे वर्ष मंडळासाठी कार्यक्रमांच्या ५ धूमधडाक्याचे म्हणावे लागेल. कोल्हापूरप्रमाणेच या वर्षात अहमदनगर (श्रीगोंदा), सोलापूर, पंढरपूर येथे मंडळाच्या शाखा स्थापन झाल्या. मंडळाच्या सुधारणावादी विचाराचा परिणाम म्हणून धर्मवाद्यांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ प्रोटेक्शन कमिटी’ स्थापन केली, ती नंतर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ म्हणून कार्यरत राहिली.

8 जुलै 1972 - मुस्लिम सत्यशोधक मंडळाने वेळोवेळी दिलेली निवेदने, आयोजित केलेले कार्यक्रम विचारात घेऊन महाराष्ट्राचे तत्कालीन कायदामंत्री बॅ. अंतुले यांनी महाराष्ट्र विधानसभेत मुस्लिमांसाठी व्दिभार्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आणण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्रातर्फे केंद्र सरकारकडे असा कायदा आणण्यासाठी पाठपुरावा करू, असे बॅ. अंतुले म्हणाले होते.

23-24 सप्टेंबर 1972 - आंतरभारती हायस्कूल- कोल्हापूर येथे अभ्यास आणि स्नेहमीलन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात हमीद दलवाई, बाबूमियॉं बँडवाले, आण्णासाहेब सहस्रबुध्दे अ. का. मुकादम, हुसेन जमादार, बानूबी पठाण यांनी मार्गदर्शन केले.

शिबिराचे उद्‌घाटन प्रा. अ. भि. शहा यांनी केले. जानेवारी 1973 - मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे मुखपत्र ‘मुस्लिम सत्यशोधक पत्रिका’, कोल्हापूर येथून सुरू करण्यात आली. अंकाच्या संपादनाची जबाबदारी हुसेन जमादार यांनी घेतली. सुरेश शिपूरकरांच्या भारती मुद्रणालयातून ते छापण्यात येई. पत्रिकेचे काही अंक प्रकाशित झाले, नंतर 1974 पासून पुण्यातून पत्रिका काढण्याचा निर्णय झाला. पत्रकार सय्यद मुनीर यांनी संपादनाची जबाबदारी स्वीकारली.

फेब्रुवारी 1973 - देशप्रेम, राष्ट्रभक्ती ही धर्मातीत असते. मुस्लिम जमातवाद्यांकडून ‘वंदे मातरम्‌’ला केला जाणारा विरोध अनाठायी असल्याची भूमिका घेऊन मंडळामार्फत वंदे मातरम्‌च्या पहिल्या दोन कडव्यांच्या गायनासाठी अभियान सुरू केले. हमीद दलवाई यांनी व्याख्याने आणि लेखांतून लोकशिक्षण केले.

11 मार्च 1973 - मराठा मंदिर मुंबई- येथे ‘महाराष्ट्र मुस्लिम सामाजिक परिषद’ आयोजित करण्यात आली. समता, शिक्षण, कायदा या विषयांवर चर्चा करण्यात आली. यात कुलसुम पारेख, दलवाई, फैजी, अ. भि. शहा, डॉ. मोईन शाकीर यांची भाषणे झाली.

11-12 ऑगस्ट 1973 - कोल्हापूर येथे 200 कार्यकर्त्यांसाठी शैक्षणिक शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दलवाई, भाई वैद्य, अ. भि. शहा, बँडवाले आदींनी मार्गदर्शन केले.

1973 - सनातनी मुस्लिम बांधवांनी समान नागरी कायद्यास विरोध करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची स्थापना करण्यासाठी मुंबईत परिषद घेतली. त्या परिषदेला सुमारे 10,000 प्रतिनिधी होते. या परिषदेच्या ठिकाणी हमीद दलवार्इंसह कार्यकर्त्यांनी निषेधाची निदर्शने केली.

30-31 डिसेंबर 1973 - कोल्हापूर येथे मुस्लिम शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून सुमारे 800 प्रतिनिधी उपस्थित होते. आधुनिक शिक्षण, प्रादेशिक भाषेचा स्वीकार, मदरशाचे आधुनिकीकरण या विषयांवर चर्चा झाली. अनेक ठराव मांडण्यात आले. शिक्षणक्षेत्रातील अनेकांनी उपस्थिती लावली.

9 जून 1974 - चिपळूण येथे मुस्लिम महिलांचा मेळावा आयोजित केला होता. या वेळी सनातनी मंडळींनी निदर्शने केली. रस्ते अडविले, धमक्या दिल्या. आदल्या दिवशी मिरजोळी येथील दलवार्इंच्या घरी मध्यरात्री दोन ट्रक आणि जीप्समधून मोठ्या संख्येने विरोधक दंगा करीत होते. अशा परिस्थितीत डॉ. शमीम आत्तार यांनी मेळाव्याचे उद्‌घाटन केले. अध्यक्षस्थानी मेहरुन्निसा दलवाई होत्या.

1974 - लोकसंख्यावाढ नियंत्रणात ठेवली नाही, तर भारतीय समाज समृध्द व सदृढ होणार नाही. मुस्लिम समाजात कुटुंबनियोजनाचे प्रमाण वाढवले पाहिजे, त्यांचे गैरसमज दूर केले पाहिजेत याकामी अमरावतीचे वजीर पटेल यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी स्त्री-पुरुषांची शिबिरे आयोजित करून कुटुंबनियोजन घडवून आणले. हमीद दलवाई हयात असेपर्यंत त्यांनी दर वर्षी कुटुंबनियोजनाचा उपक्रम धाडसाने आणि जीव धोक्यात घालून राबविला. ‘बागबान’ नावाचे उर्दू साप्ताहिक चालवून त्यांनी समाजजागृती केली. 2 नोव्हेंबर 1975 - खादी ग्रामोद्योग केंद्र- कोल्हापूर येथे तलाकपीडित महिलांची विभागीय परिषद आयोजित करण्यात आली. कोल्हापुरात मोफत कायदा सल्ला केंद्र सुरू करण्यात आले. 15 नोव्हेंबर 1975 - तलाकपीडित महिलांच्या शिष्टमंडळाने सांगलीला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोंडी तलाक रध्द करण्यासाठी निवेदन दिले. 23 नोव्हेंबर 1975 - पुणे येथे ‘जिहाद-ए-तलाक’ या राज्यव्यापी सामाजिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे 500 महिला उपस्थित होत्या. सय्यदभार्इंच्या पुढाकारातून भरवलेल्या त्या परिषदेत प्रा. कुलसुम पारेख, ॲड. नजमा शेख आणि अन्य महिला प्रतिनिधींनी मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवर विचार मांडले.

1976 - हमीदभाई यांचे मूत्रपिंडाचे आजार वाढतच होते. या आजारातून बरे वाटत असताना...

1976 मध्ये अमेरिकन स्वातंत्र्याच्या व्दिशताब्दीनिमित्त फिलाडेल्फिया येथे ते उपस्थित राहिले. या वेळी अमेरिका, जर्मनी, इंग्लंड असा दौरा त्यांनी केला. कार्यकर्त्यांशी चर्चा, विविध शाखांना भेटी चालूच होत्या. आजारपणात मा. शरद पवार, अ. भि. शहा, वसंत नगरकर, गोविंदराव तळवलकर आणि इतरांनी दलवार्इंना सहकार्य केले. शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री निधीतून 50,000 रुपये दलवार्इंच्या आजारपणासाठी दिले.

3 मे 1977 - हमीद दलवाई यांचे निधन झाले. त्यांच्या निरीश्वरवादी, निधर्मी भूमिकेप्रमाणे त्यांनी मृत्युपत्र तयार केले होते. कोणतेही धार्मिक विधी न करता चंदनवाडीतील विद्युत दाहिनीत शरीरदहन केले. हे दु:खाचे सावट असतानाही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करून दलवार्इंना अभिवादन केले. साधना साप्ताहिकाने 14 मे 1977 रोजी हमीद दलवाई स्मृतिविशेषांक काढून मान्यवरांचे लेख प्रकाशित केले.

22 मे ते 2 जून 1977 - कोल्हापूर येथील जिल्हा ग्रामोद्योग संघात मुस्लिम महिलांचे दहा दिवसांचे शिबिर आयोजित केले. महिलांना कौशल्य-प्रशिक्षणाबरोबरच समानता, एकात्मता, शिक्षण यांवर बौध्दिक देण्यात आले. यात कुलसुम पारेख, कमल पाध्ये, नरहर कुरुंदकर, यदुनाथ थत्ते, दत्ता शिंदे, बापूसाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले.

23 ऑक्टोबर 1977 - अहमदनगर येथे तलाकपीडित मुस्लिम महिला मेळावा आयोजित केला. यामध्ये 100 महिलांनी भाग घेतला .

26 डिसेंबर 1977 - अमरावती येथे विदर्भातील सुमारे 700 महिलांची ‘जिहाद-ए-तलाक’ परिषद घेण्यात आली. नरहर कुरुंदकर, मेहरुन्निसा दलवाई, मुमताज रहिमतपुरे, श्रीमती बारी, वजीर पटेल आदींनी मार्गदर्शन केले. या परिषदेत तलाकपीडित महिला इतक्या प्रमाणात उपस्थित होत्या की, पुरुषांना महिलांसाठी सभागृह रिकामे करून द्यावे लागले. मंडळाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी परिषद वजीर पटेल यांनी आयोजित केली. मुस्लिम सत्यशोधक विश्वस्त निधी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्य पुढे चालले पाहिजे. भारतीय संविधानात म्हटल्याप्रमाणे जात, धर्म, वंश, प्रदेश, स्त्रीपुरुष भेदरहित अखिल भारतीय नागरिकत्व विकसित व्हावे. दलवाई यांचे सत्यशोधकी विचारकार्य कार्यरत राहावे, म्हणून साधनाचे संपादक यदुनाथ थत्ते यांनी पुढाकार घेऊन मेहरुन्निसा दलवाई, बाबूमियाँ बँडवाले, बाबा आढाव आणि यदुनाथ थत्ते आदींचे विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचे घोषित करून आर्थिक साह्याचे आवाहन केले. साधनाच्या शनिवार पेठ, पुणे या पत्त्यावर धनादेश मागवण्यात आले. मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचा विशेषांक काढण्यात आला.

3 मे 1978 - दलवाई यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पुणे-कोल्हापूर आणि त्या-त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मंडळाच्या मागण्यांबाबत निवेदने दिली. मुंबई शाखेने पत्रक काढून वितरित केले.

6 मे 1978 - सातारा येथे ‘जिहाद-ए-तलाक’ परिषद घेण्यात आली. त्यात महिला प्रतिनिधींबरोबरच डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी मार्गदर्शन केले.

3 मे 1979 - दलवार्इंच्या व्देतीय स्मृतिदिनी पुणे- कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कचेरीवर विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले.

मे 1979 - नेरळ येथे मुस्लिम तरुणांचे अभ्यास शिबिर आयोजित केले. दहा दिवसांच्या या शिबिरकाळात न्या. पटवर्धन, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, नरहर कुरुंदकर, कुलसुम पारेख यांनी अभ्यासवर्ग घेतले.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वैचारिक भूमिकेचा सर्वसामान्य वाचकांना परिचय व्हावा, या हेतूने इंडियन सेक्युलर सोसायटीने ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ - उद्देश व भूमिका’ हे पुस्तक प्रकाशित करून मंडळास सहकार्य केले. मंडळाचे कार्यकर्ते अन्वर शेख यांनी पुस्तिकेच्या लेखनात मोठे योगदान दिले. दि. 26 जानेवारी 1979 रोजी प्रकाशित केलेल्या या पुस्तकास मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष बाबूमियाँ बँडवाले यांनी प्रस्तावना लिहिली आहे. या पुस्तकाची सुधारित आवृत्ती मंडळाने 47 व्या वर्धापनदिनी पुन्हा प्रकाशित केली.

मंडळाचा हा कार्यकाळ जसा भरगच्च कार्यक्रम, आंदोलन, लोकशिक्षणासाठी केलेल्या विविध उपक्रमांनी भरला आहे; तसाच विचारवंतांच्या विचारमंथनातून वैचारिक अधिष्ठानाची प्रतिष्ठापना करणारा आहे. म्हणूनच हे दशक मंडळाचे सुवर्णदशक आहे.

शमसुद्दिन तांबोळी, पुणे

Mob.9822679391

Share on Social Media

चिंतन : 3

एकाकी निर्मितीला श्रद्धेचा अडसर

सुरेश द्वादशीवार

‘सारे इंद्रियगोचर जग ईश्वराला अनुभवाच्या क्षेत्रात आणू शकत नाही, ही त्याची मर्यादा. आणि ही मर्यादा ओलांडता न येणे ही ईश्वरी जगताची मर्यादा.’ अशा अतिशय साध्या भाषेत मानवी व ईश्वरी जगताची विभागणी करणारा इमॅन्युएल कांट हा जर्मन होता. ज्ञानाच्या उपासनेसाठी त्याने त्याची ठरत आलेली दोन लग्ने मोडली. तो एकटाच रहायचा. त्याची मदतनीस त्याच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करायची. सारा काळ तो घराच्या आड रहायचा. नेमका दुपारी साडेतीनच्या सुमाराला पूर्ण वेशभूषा करून व हातात छत्री घेऊन तो घराबाहेर पडायचा आणि ठरलेल्या रस्त्यावरून जाऊन परत यायचा. याही काळात तो कोणाशी काही बोलत नसे. वैमार्ग शहराच्या त्याच्या त्या एकाकी मार्गाला लोक ‘फिलॉसॉफर्स वॉक’ म्हणायचे. (प्रस्तुत लेखकाने या मार्गावरून चालत जाऊन आपले ठेंगणेपण अनुभवले आहे.)

एकाकीपण म्हणजे एकांत नव्हे. एकटे असणेही नव्हे. एकाकीपण ही मनाची अवस्था आहे. ती का, केव्हा व कशी येईल याचा नेम नसतो. ती केव्हा जाईल वा दूर होईल, हेही सांगता येत नाही. तिचा अनुभव नेहमी दुःखदायकच असतो असे नाही, तो आनंददायी असण्याची शक्यताही बरीच असते. आजचे जग समूहकेंद्री न राहता व्यक्तिकेंद्री झाले आहे. परिणामी, माणसांचे परस्परावलंबन कमी झाले आहे. एकाकीपणाच्या शक्यता व व्याप्तीही वाढल्या आहेत, कारण एकाकीपण ही व्यक्तिगत स्थिती आहे. ती समूहगत नाही. लोकशाही असो वा हुकूमशाही; तीत घेतले जाणारे सगळे निर्णय अंतिमतः एकाकी अवस्थेतच तिचे नेते घेत असतात. चर्चा होते, सल्लामसलत होते, मार्गदर्शन घेतले जाते; पण सरतेशेवटी निर्णय सर्वश्रेष्ठ नेताच घेत असतो. अमेरिकेत ती जबाबदारी अध्यक्षांची आहे. संसदीय लोकशाहीतील मंत्रिमंडळात चर्चा होते, मात्र त्यात मतदान घेतले जात नाही; निर्णय घेण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर सोपविली जाते. त्यामुळे राज्यव्यवस्था कोणतीही असली तरी तीत अखेरचा निर्णय एकच व्यक्ती घेते. तो तिच्या एकाकीपणातला कौल असतो. हे निर्णय बहुधा अचूक असतात, कारण त्यामागे अनेकांचा सल्ला असतो. तो सल्ला पारखणे व त्यातील योग्य तो निवडणे हे नेतृत्वाचे काम असते. त्यातली चूक केवळ त्यालाच भोवत नाही, ती समाज व देश यांच्या उत्थानाला वा विनाशालाही कारणीभूत होते. त्याचमुळे नेतृत्वाला काटेरी मुकुट म्हणतात. त्याचा मान मोठा असला, तरी त्याचे ओझे आणि टोचही मोठी असते. एकाकीपण आणि एकटेपण यातला फरक लक्षात घेतला की, आणखीही एका निष्कर्षापर्यंत जाता येते.

उपरोक्त राजकीय निर्णय नेते एकटेपणी घेतात. मन शांत, निकोप व गंभीर असतानाचा तो एकट्याचा निर्णय असतो. तो त्याच्या प्रज्ञेचा आवाज असतो. गांधी त्यालाच ‘आतला आवाज’ म्हणायचे. तो तर्क, बुध्दी वा श्रध्दा यातून येणारा नव्हता. मन व मेंदूच्या क्षेत्रातून सहजपणे येणारा होता. श्रध्दावानातले काही जण त्याला ईश्वरी निर्णय असे म्हणतात. प्रज्ञेचा संदेश आणि नेतृत्वाने एकटेपणी घेतलेला निर्णय यातला हा सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक आहे. नेहरूंना गांधीजींच्या आतल्या आवाजाविषयी नेहमीच शंका यायची. ‘‘तुमचे हे आवाजच मला जास्तीचे बुचकळ्यात टाकणारे व प्रसंगी तर्कविरोधी वाटतात’’ असे ते गांधींना एकदा म्हणालेही. मात्र गांधींची प्रज्ञाच आपल्या तर्काहून श्रेष्ठ व योग्य असल्याचे त्यांच्या यथावकाश लक्षात यायचे आणि ते त्याची कबुलीही द्यायचे. वेदांतली सूक्ते, उपनिषदांतले अध्याय, भगवद्‌गीता किंवा रामायण आणि महाभारतासारखी महाकाव्ये त्यांच्या निर्मात्यांनी मनाच्या ज्या अवस्थेत सिध्द केली, ती अवस्था एकाकीच असणार. ‘इलियड’ची निर्मिती व आपले संतवाङ्‌मयही तसेच असणार.

जगभरातील तत्त्वज्ञ माणसांचे ज्ञानग्रंथही त्यांना त्यांच्या एकाकी अवस्थेतच सिध्द करता आले असणार. मात्र हे एकाकीपण सुटे नसेल. त्या मागे व त्याला जुळलेले त्यांचे प्रदीर्घ व कदाचित आयुष्यभराचे चिंतन असेल. निषादाने क्रौंच पक्ष्याच्या युगुलाला मारलेला बाण पाहून वाल्मीकी व्यथित झाला असेल, पण त्याच एका क्षणाने सारे रामायण जन्माला आले नसेल. ‘‘भारतीय युध्दाच्या अखेरीस मी साडेआठ हजार श्लोकांचा ‘जय’ नावाचा इतिहास लिहिला.’’ हे व्यासांचे म्हणणे त्यांची इतिहासकाराची दृष्टी व चिंतनकाराची प्रज्ञा सांगणारे आहे. पण ‘जय’ ही बाबही त्यांच्या एकाकी अवस्थेनेच जगाला दिलेली देण आहे. इलियड ज्या काळात जन्माला आले, त्या काळातल्या ग्रीक देवता सगळ्या मानवी गुणावगुणांनी भरल्या होत्या. हेलनची प्रेमकथा, त्यातून झालेला ट्रॉयचा विनाश हाही एका प्रदीर्घ चिंतनाचा व महाकवी होमरच्या एकाकी अवस्थेतील आविष्कारच असणार. सॉक्रेटिसची विव्दत्ता तो शिष्यांसोबत बोलताना खुलत असे. पण प्लेटो व ॲरिस्टॉटलपासून थेट शॉपेन हॉवर आणि नित्शेपर्यंतचे तत्त्वज्ञही त्यांच्या एकाकी व एकट्या अवस्थेतच आपल्या विचारांची मांडणी करीत. बेकनपासून रसेलपर्यंतचे अनेक जण एकांत जपत. माणसे टाळत. कारण त्यांना चिंतन व लिखाण यासाठी केवळ एकांतच नव्हे, तर एकाकीपणही लागत असे. गर्दीत वा कुटुंबाच्या वर्दळीत राहून लिहिणारे लेखक व कवी नाहीत असे नाही, पण ते फार तर ललित लेखन करतात. कविता, कथा, कादंबऱ्या वा व्यक्तिरेखा लिहितात. त्यांच्यातल्या किती जणांनी तत्त्वज्ञानपर गंभीर लेखन केले?

येथे आणखीही एका अप्रिय गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. प्रस्तुत लेखकाच्या संग्रहात जागतिक मान्यता पावलेले तत्त्वज्ञानाचे सहा कोश आहेत. या कोशात एकाही भारतीय तत्त्वज्ञाचा समावेश नाही. बेकन ते चॉम्‌स्की हे सारे जर्मन, इंग्लिश, फ्रेंच व अमेरिकन तत्त्वज्ञच त्यात आहेत. कारण भारतीय विचारपरंपरा तर्क वा विचार याहून श्रध्देवर अधिक आधारलेली आहे. विचार करा, परंतु तो वेदानुकूलच करा. वेदविरोधी वा वेदबाह्य विचार हेच पाप ठरविणाऱ्या धर्मात नवा विचार वा तत्त्वज्ञान कसे जन्माला येईल? मग वेदानुकूल परंपरा, तसेच ब्राम्हणग्रंथ, उपनिषदे, गीता, संतसाहित्य हे सारे ‘भाष्यकाराते वाट पुसतु’ असे येते आणि भाष्यकारही ‘वेदाते वाट पुसतु’ असे येतात. त्यामुळे मूळ वेदात आला असेल तेवढाच तत्त्वविचार खरा. बाकीची त्यावरची नुसती भाष्ये. वेदांचाही विचार जरा काळजीपूर्वक केला, तर त्यात पुरुषसूक्ताखेरीज नवे वा वेगळे काही नाही. नुसत्याच प्रार्थना व आरत्या. हे पुरुषसूक्तही एखाद्या कवितेसारखे आहे. ते पुरावाशुध्द नाही आणि त्याच्या सत्याची साक्ष कोणी देत नाही. या स्थितीत येथे तत्त्वज्ञाने जन्माला येणार कशी? आपल्यातील काही जण सारे ‘जग व्यासोच्छिष्ट आहे’ असे सांगून व्यासाच्या लिखाणात सारे आले आहे, असा बडिवार मिरवितात. पण व्यासामध्ये मार्क्स कुठे आहे, फ्रॉईड कुठे आहे; त्याआधीचे तत्त्वज्ञ तरी त्यात कुठे बसणारे आहेत?

बायबलचा प्रकारही तोच. मुळात आजचे बायबल येशूच्या पश्चात चारशे वर्षांनी कॉन्स्टंटाईन राजाने त्याचा धर्म स्वीकारल्यानंतर संपादित झाले. त्या वेळी अस्तित्वात असलेली येशूची 84 चरित्रे रध्द ठरवून फक्त चार चरित्रे बायबलातल्या समावेशासाठी घेतली गेली. त्यातले एक चरित्र प्रत्यक्ष मेरी मॅक्‌डेलीनीने लिहिले होते. ही चरित्रे रध्द ठरविल्यानंतर ती नष्टही करण्यात आली. त्यातले एखादे शिल्लक राहिले, तर ते समाजाला वेगळा विचार करायला लावू शकते, अशी भीती त्या वेळच्या धार्मिक नेत्यांना होती. पुढे बायबलविरोधी विचार हाच धर्मद्रोह ठरविला गेला. बायबलहून वेगळा विचार, तर्क वा संशोधनही धर्मविरोधी मानले गेले. फार कशाला- स्वतंत्र विचार हाच अपराध ठरविला गेला. स्वतंत्र विचार करणारी स्त्री चेटकीण असते आणि प्रत्येक चेटकीण ही वध्य असते, हे चौथ्या शतकातच पोपने जाहीर केले. परिणामी, युरोपात स्वतंत्र विचार करणाऱ्या शेकडो स्त्रिया जाळल्या गेल्या. गॅलिलिओलाही त्याचे संशोधन नाकारावे लागले. जी गोष्ट बायबलात बसत नाही, ती धर्मद्रोही ठरली. परिणामी, बायबलानुसार जगाची उत्पत्तीच सात हजार वर्षांपूर्वी झाल्याचे सांगितले गेले. श्रध्दा वाढल्या की तर्क मरतात आणि तर्क व विचार या एकाकी मनाच्या बाबी आहेत. परिणामी, श्रध्देने एकाकीपणही निकालात काढले. हीच गोष्ट कुराणाची. ‘सारे ज्ञान कुराणात आहे; सबब जगभरची ग्रंथालये जाळून टाका’ असा फतवाच आरंभीच्या खलिफांनी आणि धर्मगुरूंनी काढला. अलेक्झांड्रिया व भारतातले नालंदा हे विद्यापीठे त्यातील प्रचंड ग्रंथालयासह त्याचमुळे जाळली गेली. प्रत्यक्ष कुराणाची आजची संहिताही पैगंबराच्या पश्चात खलिफांच्या काळात केली गेली.

मौलाना आझाद म्हणतात, तसे करताना त्या लोकांनी मागच्या आयती पुढे व पुढच्या आयती मागे केल्या. आपल्या राजकारणाच्या सोईसाठी त्यांना तसे करणे भाग होते. प्रत्यक्ष त्याच्या मूळ रूपातही राजकीय सोईनुसार बदल केले गेले. पैगंबरांची आवडती पत्नी हफशा हिच्याजवळ असलेला कुराणपाठ रध्द ठरविला गेला. आजचे कुराणच मग पैगंबरांचा अंतिम व खरा संदेश ठरून त्याविरूध्द वा त्याहून वेगळा विचार रद्दबातल बनला. या इस्लामने अरबांवर केलेल्या चढायांनंतर त्या परिसरातील तत्त्वज्ञानाच्या परंपराही नष्ट झाल्या. अल्‌ किंदी, अल्‌ फराबिया यासारखे तत्त्वज्ञ व त्यांचे लिखाण लुप्त झाले. मग कुराण हाच धर्मग्रंथ व तोच तत्त्वग्रंथ ठरला. धर्माच्या उठावाने तर्क संपविला, विचार मारले आणि तत्त्वज्ञाने इतिहासजमा केली. हे सर्वत्र व सर्वच धर्मांबाबत खरे आहे. तर्क जाणे वा विचार जाणे, ही बाब समूहांच्या श्रध्देंना मान्यता देणारी आणि व्यक्तीचा विचार व तिचा तर्क तिच्या एकाकी अवस्थेसह नाकारणारी होती. धर्म आणि श्रध्दा यांनी एकाकीपण मारून एवढा आकांत केला असेल तर त्यात ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि विव्दत्ता यांचा केवढा खच पडला असेल याची कल्पना करता यावी. हेसुध्दा शतकानुशतकाचे प्रकरण आहे. अखेर हे श्रध्दा व तर्क यांच्यातले भांडण वा मन आणि मेंदू यांच्यातला वाद आहे. त्यासंबंधीचे तारतम्य हाच त्यावरचा खरा उपाय आहे.

माणसाचे एकाकीपण त्याला जाचक होते, की त्याला त्याच्या खऱ्या स्वरूपाकडे वा उंचीकडे नेते, एवढाच यातला खरा प्रश्न आहे. दुःख याचे की, धर्म व धर्मश्रध्दा माणसाला स्थितीवादी बनवतात आणि तसे करताना त्याचे एकाकीपण, मूकपणा व अंधश्रध्देत बदलून टाकतात. एकाकी मन जागे असते. त्यात विचारांच्या शृंखला येत नसतात वा सलग कोणता विचारही येत नसतो. पण हे मन काही तरी पाहत व तेही स्वतःच्या आत शोधत असते. या शोधातून कधी काही चांगले हाती लागते, तर खूपदा हे पाहणे काहीएक हाती न लागता थांबते. ज्यांची प्रज्ञा चिंतनाच्या बळावर मोठी झाली वा अनुभवाने संपन्न झालेली असते, त्यांचा हा अंतरंग शोध मात्र त्यांच्या मनात व बुध्दीत नवी भर घालत असतो. तत्त्वविचार बहुधा असेच जन्माला येतात. गांधीजींचा 1930 च्या सुमाराचा एक अनुभव असा आहे. सत्याग्रह थांबला होता. 1921 व 24 च्या निवडणुका जिंकल्या होत्या. पण इंग्रजांविरोधी लोकलढा थांबला होता. परिणामी, सशस्त्र लढे वाढले होते आणि त्यांच्याविषयीचे कुतूहल व आकर्षणही लोकांत वाढत होते. सामुदायिक सत्याग्रह, व्यक्तिगत सत्याग्रह असे सारे उपाय झाले होते. नवा मार्ग हवा होता आणि अचानक समुद्राच्या काठावर एका ब्रिटिश पत्रकाराशी बोलत असताना त्यांना तो स्फुरला. समुद्राची संगत, त्याच्या लाटांची गाज आणि नव्या मार्गाची निकड यातून तो आला होता. त्याचा त्या पत्रकाराशी चाललेल्या संवादाशीही संबंध नव्हता. एकाएकी ते बोलायचे थांबले आणि त्या पत्रकाराला म्हणाले, ‘चला आता मला नवा मार्ग सापडला आहे...

मिठाचा सत्याग्रह.’ त्यासाठी काढलेली दांडीयात्रा, आणि तिने देशाला दिलेली नवी जाग हे सारे त्या क्षणी त्यांच्या मनात उगवलेल्या विचारांची परिणती होते. मात्र हा एकट्या गांधींचाच अनुभव नाही. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत शंकराचार्यांचे वेदाध्ययन पूर्ण कसे झाले, ज्ञानेश्वराला वयाच्या अठराव्या वर्षी गीतेवर भाष्य कसे लिहिता आले किंवा मौलाना आझादांनी वयाच्या अठराव्या वर्षीच कुराणशरिफावरील भाष्यग्रंथ कसा सिध्द केला? जगभरच्या संतांच्या, वैज्ञानिकांच्या व तत्त्वज्ञांच्या अशा कहाण्या आणि त्यांचे एकाकी अवस्थेतले उगम सांगता व पाहता येतील. मात्र एकाकीपण नेहमी चांगल्या गोष्टीच सुचविते असे नाही. खून, दरोडेखोरी व चोरीसारखे गुन्हेही अशाच अवस्थेत सुचत असतात. एकाकी माणसाचे मन विवेकाधीन असणे हे येथे महत्त्वाचे आहे. त्याला एकटे ठेवू नका, असे काही माणसांबाबत का म्हटले जाते, हे यातून कळावे. एकाकी मनांची आणखी एक लक्षणीय बाब ही की, ती बहुधा कमालीची खोल असतात. त्या मनांच्या खोलीत काय दडले असते, ते पुष्कळदा आणि अनेकांच्या बाबतीत तसे खोलवर गाडलेलेच राहते. क्वचित कधी एखाद्या अनपेक्षित क्षणी ते बाहेर येते, तेव्हा त्याचे विलक्षण वेगळेपणही जाणवते. पण असे फार थोडा काळ व काहींबाबतच घडते.

ही मने कधी खुली झाली आणि त्यात दडलेली वा दडविलेली सत्ये बाहेर आली, तर जागतिक वाङ्‌मयाची व ज्ञानाची दालने त्यामुळे समृध्द होतील. मात्र तसे व्हायला समाज, कुटुंब व एकूणच सामाजिक पर्यावरण फार खुले व मोकळे व्हावे लागते. दुर्दैवाने त्याच्या शक्यता कमी असतात. त्यामुळे मनात येते की, ही गूढे खोलवर दडून राहिल्यानेही आपले कौटुंबिक व सामाजिक जीवन शांत राहत असावे, पण हे शांत जीवन एक अपुरेपण अनुभवत असते, त्याचे काय? ‘सारे इंद्रियगोचर जग ईश्वराला अनुभवाच्या क्षेत्रात आणू शकत नाही, ही त्याची मर्यादा. आणि ही मर्यादा ओलांडता न येणे ही ईश्वरी जगताची मर्यादा.’ अशा अतिशय साध्या भाषेत मानवी व ईश्वरी जगताची विभागणी करणारा इमॅन्युएल कांट हा जर्मन होता. ज्ञानाच्या उपासनेसाठी त्याने त्याची ठरत आलेली दोन लग्ने मोडली. तो एकटाच रहायचा. त्याची मदतनीस त्याच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करायची. सारा काळ तो घराच्या आड रहायचा. नेमका दुपारी साडेतीनच्या सुमाराला पूर्ण वेशभूषा करून व हातात छत्री घेऊन तो घराबाहेर पडायचा आणि ठरलेल्या रस्त्यावरून जाऊन परत यायचा. याही काळात तो कोणाशी काही बोलत नसे. वैमार्ग शहराच्या त्याच्या त्या एकाकी मार्गाला लोक ‘फिलॉसॉफर्स वॉक’ म्हणायचे. (प्रस्तुत लेखकाने या मार्गावरून चालत जाऊन आपले ठेंगणेपण अनुभवले आहे.) डार्विनचा पुत्र व बिस्मार्कचा भाऊ म्हणून जर्मनीत ओळखला जाणारा नित्शे हा थोर तत्त्वज्ञ ज्यात राहायचा ते घर प्रस्तुत लेखकाने पाहिले आहे. हाही त्याच्या घरात सारा दिवस कोंडल्यासारखा रहायचा.

‘दस स्पेक झरतृष्ट’ यासारखा अजरामर तत्त्वग्रंथ लिहिणारा आणि सुपरमॅनचे स्वप्न चिंतिणारा हा नित्शे कमालीचा विक्षिप्त व तेवढाच सहृदयी होता. एका घोड्याला त्याचा मालक चाबकाने बेदम मारत असलेला पाहून तो कळवळला आणि त्या घोड्याच्या गळ्यात पडून बेशुध्द होईपर्यंत रडत राहिला. तिथेच त्याला वेड लागले. अखेरीस तो बहिणीच्या आश्रयाने राहू लागला. एकवार आपल्याकडे पाहून अश्रू गाळणाऱ्या त्या बहिणीला तो म्हणाला, ‘‘का रडतेस? आपली आर्थिक स्थिती चांगली आहे न?... ’’ तशाच अर्धवट अवस्थेत तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला हा महान एकाकी माणूस मृत्यू पावला.

सुरेश द्वादशीवार, चंद्रपूर

sdwadashiwar@gmail.com

Share on Social Media

थेट सभागृहातून

सत्तरी तालुका मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण

अनुजा जोशी

विविध प्रकारच्या सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक आक्रमणांचा वेढा या ‘हिरव्या सोन्या’ भोवती घट्ट होत जाताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत आपली संवेदनशीलता सतत जागी व धारदार राहण्याची गरज निर्माण झाली आहे. पणजीत जाऊन ‘मांडवी’ बनलेली ‘महादई’ नदी सत्तरीच्या परिसरात उगम पावते अन्‌ पिढ्यान्‌ पिढ्या आपल्या काठांवर हे अनोखं संस्कृतिसंचित फुलवते आहे. आता तर तिने फुलवलेली नि अनेक दुर्मिळ वन्य प्रजाती सांभाळणारी घनदाट वनराई म्हादई अभयारण्य म्हणून घोषित झाली आहे. आपल्या शब्दांच्या नसानसांमधे तिचं हे हिरवं रक्त खेळायला हवं आहे. आपल्या शब्दांचा पैस हे सगळं वैभव कवेत घेण्याएवढा व्यापक व्हायला हवा आहे. इथला साहित्यिक वारसा फार प्राचीन आहे. खास सत्तरीचे म्हणून असणारे धालो, फुगड्या, रोमटामेळ, रणमाले यांसारखे अनेक लोकगीतांचे व लोककलांचे एक सो एक प्रकार आणि ते रचणारे अनाम लेखक-कवी, जुने-जाणते अज्ञात भूमिपुत्र हे खरे इथले आद्य साहित्यिक आहेत.

नैसर्गिक व सांस्कृतिक समृध्द असलेला गोमंतक प्रदेश आणि या देखण्या राज्याच्या भाळावरचं कुंकवाचं बोट म्हणता येईल तसा हा आपला सत्तरी तालुका. पर्यटकांच्या दृष्टीने हा ‘अन्सीन गोवा’- महादई नदीच्या काठावर फुललेल्या समृध्द वनराईचा, डोंगरांचा, जंगलांचा! सर्वसाधारणपणे समुद्र, बिचेस्‌ म्हणजे गोवा; हे चित्र इथे नाही. खेड्यापाड्यांत शेती-कुळागरात वसलेला खरा गोवा म्हणजे आपला सत्तरी तालुका आणि या तालुक्याचं हे संमेलन. मी आज प्रथम पुण्यस्मरण करेन ते माझ्या सासर- कुलातले मराठीतील आद्य कथाकार, संस्कृतिकोशकार पंडित महादेवशास्त्री जोशी यांचं. सुमारे सत्तर छोट्या- मोठ्या खेड्यांच्या या ‘सत्तरी’ तालुक्यातलं आंबेडे- नगरगाव हे त्यांचं जन्मगाव. मला आनंद या गोष्टीचा की- फक्त आडनावानेच नव्हे तर पंडितजींचं आंबेडे हे गाव, आमचं खडकी तसंच वेळगे, गवाणे, मलपण, अडवई, वान्ते, हेदोडे, नगरगाव, धावे, बांबर आणि कोदाळ अशा गावांतील श्री वडनाथ व्याघ्रेश्वराच्या या संपूर्ण जोशी कुलपरिवाराची सून म्हणून पंडित महादेवशास्त्री जोशींचा साहित्यवारसा मला पुढे चालवता येतो आहे. दुसरा महत्त्वाचा रक्तवारसा असा की, माझे वडील शरद काळे (खारेपाटण-सिंधुदुर्ग) हे कोकणचे ज्येष्ठ कथाकार, ललित लेखक आणि कवी. बाबा त्यांच्या महाविद्यालयीन काळात वि. स. खांडेकर यांचे छात्रलेखनिक आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे विद्यार्थी. अर्थातच, भाऊसाहेब खांडेकर या ‘ज्ञानपीठा’कडून व डॉ. दभिसर या ‘शब्दपीठा’कडून बाबांना मिळालेलं हे ‘साहित्यपाथेय’ मला सत्तरीच्या पंडित महादेवशास्त्री जोशी या ‘संस्कृतिपीठा’शी जोडता आलं, हे माझं महद्‌भाग्य!

हेच पूर्वसंचित घेऊन ‘बिल्वदल’ आयोजित सातव्या सत्तरी साहित्य संमेलनाची अध्यक्ष म्हणून मी नम्रपणे आपणासमोर माझे काही विचार मांडणार आहे. मराठीचा अमृतवारसा आपण अनेक शतकांपासून चालवतो आहोत. रामायण-महाभारत यासारखी महाकाव्ये, प्राचीन साहित्यकाळ, ज्ञानेश्वर-तुकारामांची संतपरंपरा, लोकसाहित्य, ऐतिहासिक काळ, स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्योत्तर काळ, आधुनिक म्हटला गेलेला व लेखनजाणिवा बदललेला मर्ढेकर-केशवसुतांपासूनचा साहित्यप्रवाह हा आपला प्रदीर्घ शब्देतिहास आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातला मुख्य मराठी साहित्यप्रवाह आणि गोवा, कर्नाटक, हैदराबाद, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात या प्रांतांतला बृहन्महाराष्ट्रीय साहित्यप्रवाह अशी विभागणी झाली आहे. तसेच मराठीच्या विविध बोली हे मराठीचं वैभव आहे. उदा. सत्तरीत आजही टिकून असलेली चित्पावनी बोली. या बोलीभाषांमधलं मराठी साहित्य व ग्रामीण भागात बोलली जाणारी मराठी ही मराठीची बलस्थानं आहेत. ढोबळमानाने मांडलेल्या या आकृतिबंधाबरोबरच विविध साहित्यप्रकारांचे विविध रचनाबंध अभ्यासणेही खूप रोचक आहे. विविध साहित्यप्रकार हाताळून नेहमी बघत असले तरी ‘कविता’ हा नेहमीच अधिक जिव्हाळ्याचा विषय. काव्य ही तर माणसाची आदिम प्रेरणा आहे. जखमी क्रौंच पक्ष्याच्या युगुलाला पाहिल्यानंतरचा ओठी आलेला पहिला उद्‌गार हा ‘काव्य’ होता. अगदी एका काव्य या साहित्य- प्रकाराबाबतीतच सांगायचं तर महाकाव्यांपासून सुरू करून निर्मितिप्रक्रिया, प्रतिमा, रूपक, मिथक, अलंकार, वृत्त, छंद, लय, ताल, मुक्तछंद असं करत-करत ग्रामीण, महानगरीय, स्त्रीवादी, दलित, विद्रोही, उत्तर आधुनिक अशी विविध जाणिवांची कविता- अशा अंगाने कवितेचा अभ्यास करता येतो. चार-पाच वर्षांपूर्वी ‘शब्दांच्या अल्याड-पल्याड’ नावाने एक सदर मी एका वृत्तपत्रात वर्षभर चालवलं होतं. त्यानिमित्ताने मला हा अभ्यास करता आला होता.

साहित्यिक पर्यावरण - भान व दृष्टी

‘अमृतातेही पैजा’ जिंकणाऱ्या अमृतवाणी मराठीच्या पंढरीचे आपण वारकरी. तिच्या सौभाग्याच्या गोष्टी असंख्य... आणि भाषावादासारख्या आपल्या दुर्भाग्याच्या गोष्टीही असंख्य! गोवा, कर्नाटक अशा प्रांतांमध्ये असणाऱ्या भाषिक वादामुळे दोन्ही भाषांच्या सृजनशील प्रक्रियेचंच फार मोठं नुकसान झालं आहे. मात्र सत्तरीपुरतं बोलायचं तर- इथे उगम पावलेल्या पुण्यवंती महादईच्या गोड्या पाण्याने कोणत्याही वादाची प्रखरता इथे सौम्य केली आहे. पण व्यापक विचार केला तर विविध आक्रमणांना, दबावांना, गळचेपीला, अन्यायांना मराठीलाच सामोरं जावं लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. संघर्षाच्या या पोर्शभूमीवर आपल्याला स्वतःला सिधध्द करावं लागत आहे. टक्केटोणपे खात, परिपक्व होत वैयक्तिक संघर्ष करावा लागतो. नंतर इथल्या प्रादेशिक मराठी साहित्यक्षेत्रात उभं राहावं लागतं. त्यानंतर मुख्य मराठी क्षेत्राची दारं यत्नाने ठोठावावी लागतात. आपल्यासाठी उघडी करून घ्यावी लागतात. आपल्याला या अशा दुहेरी-तिहेरी संघर्षाला तोंड द्यावं लागतं.

आपलं नाणं आधी खणखणीत घडवणं आणि मग ते खणखणीत आहे हे वाजवून दाखवणं- या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतात, हे आपल्याला ज्ञात आहेच. अशा परिस्थितीत आपण लिहितो आहोत ते निव्वळ हौसेपायी की गंभीर विचार करून, आपल्या लेखनजाणिवा कोणत्या, लेखनातील उणिवा कोणत्या, आपली लेखनक्षमता किती, त्यात पुढे जाण्याच्या शक्यता किती याची चाचपणी कठोरपणे सतत करत राहायला हवी. यासाठी असलेली दृष्टी दोन प्रकारची असते, असं मला वाटतं. भोवतीचा निसर्ग, पर्यावरण, विविध नैसर्गिक प्रक्रिया, प्रदूषणं, समाज, माणसं, प्रश्न, समस्या हे सगळं आपण दोन डोळ्यांच्या ‘बहिर्मुख दृष्टीने’ बघत असतो. पण सृजनाच्या विकासासाठी आवश्यक असते ती ‘अंतर्मुख दृष्टी!’ बहिर्मुख दृष्टीने बघितलेलं चित्र, घटना, अनुभव यांचा ठसा मनावर कसा उमटतोय, तो पुन्हा कागदावर कसा उतरतोय- हे बारकाईने बघणाऱ्या मनःचक्षूंची ‘अंतर्मुख दृष्टी’ खूप महत्त्वाची. ही संमेलने हीच अंतर्मुख दृष्टी देत असतात. या संमेलनातूनही तुम्ही ही दृष्टी, हे सजग भान घेऊन जावं, असं मला वाटतं.

वाङ्‌मयीन दुष्काळाचे दिवस

समकालीन गोमंतकीय मराठी साहित्य क्षेत्राबद्दल काही गोष्टी मी गंभीरपणे बोलणार आहे. हा विचार करायला एका लेखाने मला प्रवृत्त केले. 2009-2010 च्या डिसेंबरमध्ये सरत्या वर्षाचा साहित्यिक आढावा घेणारा, गोमंतकीय ज्येष्ठ साहित्यिक मा. पुष्पाग्रज यांचा एक लेख माझ्या वाचनात आला. ‘वाङ्‌मयीन दुष्काळाचे दिवस’ असं बहुधा त्या लेखाचं नाव होतं. नीट निरीक्षण केल्यानंतर आज 10- 12 वर्षांनंतरही ती वाङ्‌मयीन दुष्काळी स्थिती फारशी बदललेली नसल्याचं दिसून येतं, हे इथं खेदानं नोंदवावंसं वाटतं. मीही गेली अनेक वर्षे इथे साहित्यिक कार्यक्रमांना जाते. पण मोजके अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी आयोजक व साहित्यिक दोघांमध्येही लेखनविषयक पुरेसे वृत्तिगांभीर्य दिसून येत नाही. गोव्याबाहेरही मी कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक नव्या-जुन्या जाणकार समीक्षक मंडळींना भेटते, तेव्हाही गोमंतकीय लेखनाबद्दल नाराजीचा सूर ऐकू येतो. एकूणच गोव्याच्या लोकजीवनातला ‘सुशेगादपणा’ साहित्यक्षेत्रातही आहे, असं गमतीने म्हटलंही जातं. या वस्तुस्थितीची कारणं शोधत पार मुळापर्यंत जावं लागतं. साधारण एका जिल्ह्याएवढं (शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याहूनही छोटं) आपलं एक ‘राज्य!’

अर्थातच एका जिल्ह्याएवढ्या क्षेत्राला एका राज्याच्या सुविधांची उपलब्धी! त्यात पर्यटनामुळे जगभरात मिळालेली उंची- अशी सगळी पायाभूत अनुकूलता, संपन्नता आपल्याला इथे मिळते. एक छोटंसं उदाहरण पाहा- आपले साधे-साधे घरगुती सोहळे, समारंभ, पुस्तक प्रकाशने, मेळावे, वर्धापनदिन इथपासून ते मोठ्या संमेलनांपर्यंत कशालाही पंचसदस्यापासून ते मुख्यमंत्री-राज्यपालांपर्यंत कुणीही पाहुणा म्हणून इथे सहज उपलब्ध होऊ शकतो. इतके एकटोकाच्या सहकार्याचे, जल्लोष व उत्साहाचे वातावरण आपण इथे अनुभवतो. विविध सरकारी योजना, आर्थिक साह्य, भरघोस अनुदानं, देणग्या असं सगळं अगदी पुस्तक प्रकाशनापासून नुकसानभरपाईपर्यंत सगळ्यासाठी भरपूर मिळतं. फार मोठा संघर्ष न करता, फार परिश्रम न घेता राज्यस्तरीय, केंद्रस्तरीय यश पदरात पडतं. फार स्पर्धा न होता पुरस्कार-सन्मान मिळतात. भरपूर व्यासपीठं असतात. साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. भरपूर पुस्तके छापली जातात. वृत्तपत्रांमध्ये पटकन प्रसिद्धी, स्पर्धांमध्ये भरघोस बक्षिसं मिळतात. हे सगळं तुलनेने कमी कष्टांमध्ये इथे मिळतं. इतर राज्यांच्या तुलनेने कमी बेकारी, कमी संघर्ष, कमी धकाधकी-धावपळ व भरपूर साधनसुविधा मिळाल्याचा ओल्या दुष्काळासारखा परिणाम म्हणून कोणत्याही गोष्टीचा संख्यात्मक विकास जोमाने होतो व गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते, ही वस्तुस्थिती आहे. साहित्यक्षेत्रात ही अनुकूलता सकस साहित्यनिर्मितीच्या मार्गातला पहिला मोठा अडसर ठरते, असं मला वाटतं.

अशी कमालीची अनुकूलता प्रयत्न थांबवते. कठोर व्यासंग व परिश्रमांची कास सोडायला लावते. नव्या लिहित्या मंडळींनी हा धोका ओळखून राहायला हवं. अर्थात हे झालं एका बाजूचं चित्र. नाण्याची दुसरी बाजूही अशी आहे की, या सर्वांतूनही स्वत:ला प्रयत्नपूर्वक निर्लेप राखत काही होतकरू मंडळी चांगलं लिहिताहेत. समकालाचं यथायोग्य भान बाळगून आहेत. आयोजकांच्या पातळीवर विचार केला तर- गोवा मराठी अकादमी, कला अकादमी, गोमन्त विद्यानिकेतन, शारदा ग्रंथप्रसारक संस्था, कोकण मराठी परिषद इ.सारख्या विविध संस्था दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन करताहेत. पण गोव्यात जिध्दीने फुलत असलेल्या या मराठी प्रतिभेला नि कार्याला मराठीच्या मुख्य प्रवाहात कितपत सामावून घेतलं जातं? साहित्यासकट विविध क्षेत्रांत इथे येणारे मान्यवर इथल्या प्रतिभावंतांना बाहेर जोडून देण्याचा कितपत प्रयत्न करतात? मराठीचं अस्तित्व व संवर्धनाच्या भरीव कार्यासाठी मुख्य मराठी धारा कितपत स्वागतशील व सहकार्यशील आहे? ही सारी प्रश्नचिन्हेच आहेत. गोव्यासकट बाकीच्या बृहन्महाराष्ट्रीय प्रदेशांचीही हीच तक्रार मुख्य मराठी साहित्यक्षेत्राबद्दल नेहमी ऐकू येते.

मुख्य मराठी प्रवाहात तर अनेक वृत्तीप्रवृत्ती-दुष्प्रवृत्ती आहेत. गटातटाची व कळपकंपूंची भयानक ‘साहित्यकारणं’ (राजकारणासारखी!) आहेत. प्रचंड संघर्ष, स्पर्धा आहे. पण अर्थात पुन्हा त्यातही सन्माननीय अपवाद आहेत. चोख दर्जाला उचलून धरणारे पाठराखते ओशासक हात तिथेही आहेत, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. एक सुजाण लेखक, वाचक म्हणून स्वतःच्या कोशात गुंतून न पडता हातातल्या परिस्थितीचा गोल असा उलट-सुलट फिरवून तपासून पाहत राहायला हवा! एक लेखक म्हणून मी माझ्या लेखनाचा विचार करते तेव्हा जुन्या-जाणत्या पिढीचं साहित्य वाचणं, तो अभ्यास मला सर्वांत आधी महत्त्वाचा वाटतो. नंतर माझे समकालीन काय व कसं लिहिताहेत, लेखनाबद्दल कसा विचार करताहेत, त्यांच्या लेखनजाणिवा काय- हे जाणून घेणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. एका साहित्यिकाची ही अशा प्रकारची गरज असू शकते; असावी! या पोर्शभूमीवर आयोजक व वैयक्तिक अशा दोन्ही पातळ्यांवर चांगले बदल घडायला हवेत. इथल्या व बाहेरच्या साहित्यिकांच्या गाठीभेटी, चर्चा, संवाद सातत्याने घडायला हवेत. कार्यक्रमांमधला तोच-तोपणा जाऊन नवे बदल व्हायला हवेत. वैयक्तिक विकासाकरता तर बरंच काही करता येण्यासारखं आहे.

वाचन-व्यासंग-सर्जनशीलता-अभिव्यक्ती

महाराष्ट्रातून आज विविध दर्जेदार नियतकालिकं निघतात. त्यांचे वर्गणीदार होऊन त्यांचे नियमित वाचन हा खूप महत्त्वाचा स्वाध्याय आहे. समकालाचं भान देणाऱ्या मराठी लघुनियतकालिकांच्या या महत्त्वाच्या चळवळीविषयी इथल्या अनेक साहित्यिकांना पुरेशी माहिती नसल्याचं व ते महत्त्वाचं वाचन नसल्याचं निराशाजनक चित्र इथे दिसतं. वाचनालये सोडल्यास अनेक मराठी नियतकालिकांचे वर्गणीदार अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच इथे आहेत. वरवर साध्या दिसणाऱ्या या गोष्टींचा आज गंभीरपणे विचार होण्याची गरज आहे. होतकरूंनी, नव्यानं लिहिणाऱ्यांनी, महाविद्यालयीन विद्यापीठीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी सजगतेने या छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी आहे. एकेका लेखक-कवीच्या समग्र साहित्याचे वाचन, विविध प्रातिनिधिक संग्रह, विविध भाषांमधील अनुवादित साहित्य, विविध संपादित व समीक्षेचे ग्रंथ, वृत्तपत्रे व त्यांच्या रविवार व विशेष पुरवण्या, रोजचं डायरीलेखन- असे विविध प्रयत्न वैयक्तिक विकास घडवत नेतात.

गोव्यातील समृध्द सेंट्रल लायब्ररी व ठिकठिकाणची वाचनालये यांचा यासाठी चांगला उपयोग करता येऊ शकतो... ‘आरता ये, पण आपडू नको’ (जवळ ये, पण शिवू नको) अशी एक म्हण आपल्याकडे आहे, ती सोशल मीडियाच्या बाबतीत वापरणं हिताचं ठरतं. असा विचार करत आपापल्या क्षेत्रातील सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा कोणत्याही- अगदी घरकाम, शेतीकाम असेल तरीही त्याबद्दलच्या लेखनाचा विचार करू लागलो किंवा प्रत्यक्ष न लिहिताही नव्या विचाराने तिथे- तिथे आपलं आयुष्य समृध्द करू लागलो; तर त्या-त्या क्षेत्रातले आपण साहित्यिकच झालो, असं एक सोपं व नवं समीकरण मला सुचतं आहे. साहित्य हा एक स्वतंत्र कलाप्रांत असला तरी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राच्या मुळाशी शब्द/साहित्य यांचा खोल झरा असतो. प्रत्येक जणच लेख, कथा, कविता, पुस्तकं लिहून साहित्यिक बनण्याची गरज नाही. तसे होत नाहीच. तर ‘शब्द’ म्हणजे आपला आतला आवाज असतो, आतली हाक असते. जीवन समृध्द करण्यासाठी प्रत्येकाने या ‘आतल्या शब्दा’ची साधना करून साहित्यिक व्हावं, असं मला वाटतं.

आपल्या ‘आतल्या शब्दा’विषयीची

‘आतल्या आवाजा’विषयीची जागरूकता जेवढी महत्त्वाची तेवढीच तो आवाज व्यक्त करण्याचीही! अभिव्यक्तीबद्दलचं भान ही खूप कठीण व कष्टसाध्य अशी गोष्ट. आपली व माध्यमांची तोंडं आज इकडे तर वरवर दिसताना पूर्ण खुली पण गळा मात्र आवळलेला- अशी विचित्र परिस्थिती! विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, नैतिक, आर्थिक अशा मजबूत पंज्यांनी सगळेच आवाज दाबून टाकलेले! हे दबलेलं एक टोक जेवढं महत्त्वाचं, तेवढंच दुसरं टोकही जाणून घेण्यासारखं. एक तर पुरेशा चिंतनाच्या अभावी अभिव्यक्तीला उथळ खळखळाट तरी येतो किंवा आज असंही बरेचदा दिसतं की, व्यक्त होण्याच्या जल्लोषात चेहरे अभिनिवेशी होतात. स्वातंत्र्य स्वैराचारी होतं व आतला आवाज ‘आवाजी’ बनत जातो. प्रचारकी, दांभिक व खोटा बनत चाललेला दिसतो! आपल्याला या सगळ्या गोष्टी मध्य सीमेवर राहून तारतम्याने बघता आल्या पाहिजेत. हुंकाराचा उद्‌गार तर झालाच पाहिजे, उद्‌गारातून अंगारही फुलला पाहिजे; पण अंगाराचं गीत परिणामकारक व्हायचं तर ते संयत व सर्जक सुरात गाता आलं पाहिजे. यंत्रयुगाच्या या रेट्यात एखाद्या सर्जनशील साहित्यिकासाठी इतकी अवधानं सतत सांभाळत, प्रामाणिक अभिव्यक्तीच्या वाटेने चालणं ही एक मोठी कसोटीच असते. कस लावणारी असते.

स्त्री-जाणिवांची दुखरी नस

गेली 23-24 वर्षे मी वाळपईमध्ये स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय करते. एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून जगण्याचा, शरीर-मन-बुध्दी अशा तिन्ही बाजूंनी विचार करते. शरीराचा विचार करताना मी डॉक्टर असते. मन व बुध्दीचा विचार करताना साहित्यिक असते. मी हे एवढ्यासाठीच सांगतेय की- आपलं घरकाम, शिक्षण, व्यवसाय, उद्योगधंदा आणि आपली कला, छंद, आवड व आपली जगण्याची पध्दत यांची सांगड आयुष्य समृध्द बनवण्यासाठी आपण कशी घालतो, हा फार महत्त्वाचा विचार आहे. पेशंट म्हणून माझ्याकडे बायका व मुलं जास्त येतात. मलाही खरं तर साहित्यिक वगैरे काहीही न होता ‘स्त्रीरोगतज्ज्ञ’ व्हायचं होतं. पण ते काही कारणांनी साधलं नाही. म्हणून ‘स्त्रीरोगतज्ज्ञ’ ना सही, मी ‘स्त्री आरोग्यतज्ज्ञ’ होता येतं का हे शोधू लागले. स्त्री-शरीराबरोबरच स्त्रीच्या मन व बुध्दीचं जबरदस्त आकर्षण वाटू लागलं. मग ‘दोतोर, कमर दुखता’ ही बाईची साधी तक्रार औषधोपचाराने दूर केल्यावर मी अस्वस्थ होऊ लागले आणि ती अस्वस्थताच मला कवितेत घेऊन गेली. दिलेल्या औषधोपचारानंतर स्त्रीवेदनेची दुखरी नस कवितेतून सापडू लागली. पुढे परंपरांमध्ये जखडलेलं बाईपण, पुरुषी वर्चस्वाने आजवर बांधून ठेवलेलं बाईपण कळलं. संघर्ष समजला. आत्मभानाचं महत्त्व समजलं.

मला कळलेलं स्त्रीत्व, स्त्रीत्वाचा अर्थ, बाईचं ‘माणूस’ असणं, आधी औषधोपचारातून, मग सुसंवादातून, सल्ले- मार्गदर्शन-समुपदेशनातून आणि आता कवितेतून, लेखनातून, साहित्यातून बाईला सांगता-पटवता येऊ लागलं. सत्तरीसारख्या ग्रामीण भागात स्त्रिया अजूनही परंपरा-संस्कृतीची अवास्तव जोखडं मानेवर ठेवून वावरताहेत. गर्भपात, स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या निर्घृण पध्दती स्वतःपासून बंद करण्याऐवजी स्वतःच्या हाताने पुढे ढकलताहेत. नव्यानं लिहित्या मुला-मुलींवर हे डोळसपणे बघण्याची जबाबदारी आहे. स्त्री-पुरुष परस्परसंवादाचे प्रयत्न आधी स्वतःकडून व मग आपल्या लेखनातून होणं गरजेचं ठरलं आहे. म्हणूनच निखळ माणूसपणाचा आपल्या आतला झरा प्रत्येक स्त्री-पुरुषाला सापडावा, अशी माझी निरंतर प्रार्थना आहे. इथल्या लोकसंस्कृतीने अशी अनेक वैशिष्ट्ये जपली आहेत. गोव्यावरच्या पोर्तुगीजांच्या आक्रमणात त्यांना सगळ्यात शेवटी काबीज करता आलेला सत्तरीचा हा बिकट डोंगराळ प्रदेश धनगर, कुणबी, गावडा अशा ‘खुटी मारून मठी जोडलेल्या’ आदिम वस्त्यांनी, डोंगर उतारावरच्या ‘पुरण शेतीने’ व माड-सुपारी-काजू बागायतींनी समृध्द होता.

आज यांत्रिकीकरणाच्या झपाट्यात ते निसर्ग वैभव महत्प्रयासांनी जपावं लागत आहे. विविध प्रकारच्या सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक आक्रमणांचा वेढा या ‘हिरव्या सोन्या’भोवती घट्ट होत जाताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत आपली संवेदनशीलता सतत जागी व धारदार राहण्याची गरज निर्माण झाली आहे. पणजीत जाऊन ‘मांडवी’ बनलेली ‘महादई’ नदी सत्तरीच्या परिसरात उगम पावते अन्‌ पिढ्यान्‌ पिढ्या आपल्या काठांवर हे अनोखं संस्कृतिसंचित फुलवते आहे. आता तर तिने फुलवलेली नि अनेक दुर्मिळ वन्य प्रजाती सांभाळणारी घनदाट वनराई म्हादई अभयारण्य म्हणून घोषित झाली आहे. आपल्या शब्दांच्या नसानसांमधे तिचं हे हिरवं रक्त खेळायला हवं आहे. आपल्या शब्दांचा पैस हे सगळं वैभव कवेत घेण्याएवढा व्यापक व्हायला हवा आहे. इथला साहित्यिक वारसा फार प्राचीन आहे. खास सत्तरीचे म्हणून असणारे धालो, फुगड्या, रोमटामेळ, रणमाले यांसारखे अनेक लोकगीतांचे व लोककलांचे एक सो एक प्रकार आणि ते रचणारे अनाम लेखक-कवी, जुने-जाणते अज्ञात भूमिपुत्र हे खरे इथले आद्य साहित्यिक आहेत.

राम राम म्हणू नये बाई सीतेच्या तोलाचा हिरकणी माझी सीता राम हलक्या दिलाचा असं जात्यावरच्या ओव्यांमध्ये म्हणणारी, नात्यांचे रेशमी धागे असोशीने जपत हा सतेज विद्रोह करणारी एखादी कष्टकरी मालन ही इथली आद्य कवयित्री आहे. त्या जाणत्यांनी दिलेलं हे संचित जपतच आपल्याला पुढे जायचं आहे. गोमंतकाच्या, सत्तरीच्या निसर्गाने दिलेला हा ‘हिरवा वसा’ शब्दांच्या पसा-पायलीने आपल्याला भरभरून घेता यावा आणि आपलं निसर्गदत्त जगणं त्याच्यासारखंच हिरवंगार होऊन जावं, जगणं-लिहिणं एकरूप व समृध्द होऊन जावं- अशा खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद!

डॉ. अनुजा जोशी

dr.anupamj@gmail.com

(‘बिल्वदल’ आयोजित सातवे सत्तरी तालुका (गोवा राज्य) साहित्य संमेलन दि. 3 डिसेंबर 2019 रोजी झाले, त्या संमेलनात केलेले अध्यक्षीय भाषण, अंशत: संपादित करून प्रसिध्द करीत आहोत. संपादक)

Share on Social Media

इफ्फी 2019 : 5

युद्धानंतरचे दुष्परिणाम

मीना कर्णिक

इफ्फीमधल्या काही लक्षवेधी सिनेमांच्या मालिकेतला हा शेवटचा लेख. युद्ध संपलं तरी त्याचे परिणाम नंतरचा बराच काळ रेंगाळत राहतात याची आठवण करून देणारे दोन सिनेमे, महोत्सव संपल्यानंतरही बराच काळ मनात रेंगाळत होते...

युध्दकथा म्हटलं की, आपल्याला सर्वसाधारणपणे शौर्यगाथा आठवतात. आपली बाजू जिंकणारी असली तर अंगावर रोमांच उभे करणाऱ्या कहाण्या रंगवून सांगितल्या जातात. त्यातलं साहस आणि जाज्वल्य देशाभिमान काय तो महत्त्वाचा ठरतो. पण युध्द म्हणजे संहार. युध्द म्हणजे दु:ख. आणि युध्द म्हणजे भग्न झालेली आयुष्य’ हे आपण, -विशेषत: युध्दाशी केवळ दूरवरून संबंध असणारे आपण- विसरूनच जातो का? ‘बीनपोल’ पाहताना आपल्याला सतत या भीषण वास्तवाची आठवण होत राहते. दोन मुलींच्या नजरेतून ही गोष्ट सांगितलेली असली तरी पार्श्वभूमीला असलेली युध्द संपल्यानंतरची परिस्थिती क्षणभरही नजरेआड करता येत नाही. इतकी की काही वेळा एखादं दृश्य पाहताना अचानक आपल्या लक्षात येतं की, आपल्यालाही कोंडल्यासारखं वाटतंय. जे घडतंय त्याचा धक्का सहन होत नाहीये.

27 वर्षांळा रशियन दिग्दर्शक कान्तेमिर बालागोव्ह याचा हा दुसरा सिनेमा. सिनेमाचं रशियन नाव आहे ‘डिल्डा’ म्हणजेच ‘बीनपोल’. इया नावाच्या तरुण, पण खूप उंचपुरी धिप्पाड मुलीला तिच्या अशा दिसण्यामुळेच बीनपोल हे नाव पडलंय. ही गोष्ट बीनपोल आणि तिची मैत्रीण माशा यांची आहे. काळ आहे 1945 चा. दुसरं महायुध्द नुकतंच संपलं असलं, रशियाने इतर मित्रराष्ट्रांच्या बरोबर हिटलरवर विजय मिळवला असला तरी, कोणत्याही युध्दात लागतं तसं देशाला खूप मोठं नुकसान सहन करावं लागलंय. तरुण सैनिकांनी हॉस्पिटल्स गच्च भरली आहेत. अशाच एका हॉस्पिटलमध्ये बीनपोल नर्सचं काम करतेय. काही काळ सीमेवर घालवल्यानंतर, आजारपणामुळे तिला परत पाठवण्यात आलंय आणि आता ती लेनिनग्राडमध्ये स्थायिक झालीये. मात्र तिला पीटीएसडी (पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस डिसऑर्डर)शी सामना करावा लागतोय. मधेच तिचा श्वास कोंडला जातो. ती अचानक थिजून जाते आणि मग काही काळ तिला ना हलता येत, ना काही करता येत. बीनपोल पाश्का नावाच्या एका मुलाचा सांभाळ करतेय. आजूबाजूच्यांना तो तिचा मुलगा आहे असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात तो माशाचा मुलगा आहे. काही काळाने माशाही लेनिनग्राडला येते आणि बीनपोल ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत असते, तिथेच नोकरीला लागते.

माशाच्या बाबतीत बीनपोल अत्यंत पोझेसिव्ह आहे. एखाद्या पुरुषाशी ती लाडाने बोललेलंही बीनपोलला सहन होत नाही. मागे सुटून गेलेली आयुष्य’ जोडण्याचा प्रयत्न केवळ बीनपोल आणि माशाच नव्हे, तर तिथला प्रत्येकजण करतोय. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला सैनिक, मानेखाली पूर्णपणे अपंग आहे. पण तरीही आपल्या प्रेयसीची वाट पाहतोय. मात्र असं मधलं सगळं विसरून पुढे जाणं नेहमी शक्य असतंच असं नाही. किंबहुना युध्दासारखा अनुभव घेतल्यानंतर तर कठीणच असतं. बीनपोल आणि माशाची शोकांतिका ही त्या अर्थाने एका उव्दस्त शहराचीही शोकांतिका आहे. दिग्दर्शक बालागोव्ह एक क्षणही आपल्याला ते विसरू देत नाही. दारू पीत असताना, प्रेम करत असताना, भव्य बंगल्यात गाडी नेत असताना... दृश्य कोणतंही असो, पडद्यावरची गडद छाया आपल्याला सतत जाणवत राहते. वातावरणातलं मळभ आपण आपल्या मनावरूनही दूर करू शकत नाही. संपूर्ण सिनेमाला एक दु:खाचं आवरण आहे. दिग्दर्शक आणि छायाचित्रकार सेनिया सेरेदा यांनी आवर्जून त्याची काळजी घेतली आहे हे लक्षात येतं. काही काही दृश्यं तर भयंकर अंगावर येणारी आहेत. लहानग्या पाश्काशी खेळत असताना बीनपोलला अचानक अटॅक येतो आणि ती निश्चिल होते ते दृश्य असो की, केवळ मूल होण्यासाठी सेक्स करायचा असताना मला एकटीला टाकून जाऊ नकोस असं म्हणून बीनपोल माशाला आपल्या बाजूला झोपून राहायला सांगते ते दृश्य असो, प्रेक्षक म्हणून आपल्याला धक्का तर बसतोच पण सुन्न झालेलं मन नंतरचा बराच काळ त्या अनुभवातून बाहेर येत नाही.

खरं तर हा सिनेमा काही फक्त इयाचा नाही. तो इया आणि माशा या दोघींचा आहे. तरीही सिनेमाला ‘बीनपोल’ असं शीर्षक का आहे? दिग्दर्शक बालागोव्ह म्हणतो, ‘माझ्या सिनेमाचं मूळ रशियन नाव आहे ‘डिल्डा’. बीनपोल हा त्याचा अनुवाद आहे. मात्र रशियामध्ये डिल्डामधून वेंधळेपण, ऑकवर्ड असणं किंवा नजाकत नसणं या गोष्टीही ध्वनित होतात. माझ्या दोन्ही नायिकांना युध्दानंतर पुन्हा जगायला सुरुवात करणं जमत नाहीये आणि म्हणून त्यांना डिल्डामधून सूचित होणाऱ्या तीनही भावनांशी सामना करावा लागतोय.’ ‘द अनवुमनली फेस ऑफ वॉर’ या स्वेतलाना ॲलेक्सेविच यांचं पुस्तक ही या सिनेमामागची प्रेरणा आहे. बालागोव्हला युध्द आणि बायकांवर होणारा त्याचा परिणाम याविषयी खोलवर जाणीव या पुस्तकाने करून दिली. ‘बीनपोल’ ही या वर्षीची रशियाची ऑस्करची एन्ट्री आहे. (‘पॅरसाईट’ किंवा ‘बीनपोल’ यासारखे सिनेमे पाहिल्यानंतर भारताने पाठवलेला ‘गलीबॉय’ हा सिनेमा किती सुमार आहे हे लक्षात येतं. इथे ‘गलीबॉय’ला कमी लेखण्याचा उद्देश नाही. उलट, झोया अख्तरचा हा सिनेमा चांगला होता, अनेक स्टिरिओटाईप्स मोडणारा होता, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या प्रकारचे आणि ज्या विषयावरचे सिनेमे बनताहेत आणि पुरस्कारासाठी पाठवले जाताहेत, त्यांच्या दर्जाशी तुलना करता तो स्पर्धेत राहण्याची किंचितही शक्यता नाही हे लक्षात येतं. म्हणूनच ‘पॅरसाईट’ आणि ‘बीनपोल’ला नामांकन मिळतं, ‘गलीबॉय’ला नाही.) गेल्या वर्षीच्या कान चित्रपट महोत्सवातल्या अनसर्तन रिगार्द या स्पर्धेत बालागोव्हला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं पारितोषिक दिलं गेलं तर ‘बीनपोल’ला फिप्रेसी या समीक्षकांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार दिला.

हंगेरियन दिग्दर्शक क्रिस्टॉफ डॅक याचा ‘फोगल्योक’ किंवा ‘कॅपटिव्हज’ही युध्द संपल्यानंतरच्या काळातला असला तरी ‘बीनपोल’च्या तुलनेत हलका-फुलका आहे. या दिग्दर्शकाच्या ‘सिंग’ या लघु चित्रपटाने बेस्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म या विभागात 2016 मध्ये ऑस्कर मिळवलंय. ‘कॅपटिव्हज’ ही त्याची पहिली फिचर फिल्म आहे. आणि ती सत्यकथेवर आधारलेली आहे. काळ आहे 1951 चा. हंगेरीवर आता कम्युनिस्टांचं राज्य आहे. सरकारी पोलीस सगळ्यांवर लक्ष ठेवून आहेत. कोणाही संशयित व्यक्तीच्या घरावर धाड घालून तपास करण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. आणि हाती असलेल्या त्या सत्तेचा ते पूर्ण वापर करताहेत. बहुतेक वेळा हे पोलीस घरी येतात, घरातल्या एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी उचलून नेतात आणि नंतर ती व्यक्ती घरच्यांना पुन्हा कधीही दिसत नाही. स्वाभाविकच या पोलिसांची एक दहशत नागरिकांवर आहे. कोण, कधी, कुठे येईल आणि कुणाला उचलून नेईल याची काहीही श्वाश्वती नसलेल्या वातावरणात राहणं किती भयंकर असेल!

अशा परिस्थितीतला ब्युडापेस्टमधला एक दिवस. एका सर्वसामान्य कुटुंबाच्या घराचं दार ‘स्टेट सिक्रेट पोलीस’ ठोठावतात. घरात एक स्त्री आहे, एक पुरुष आहे, दोन लहान मुलं आहेत. शिवाय एक खोली भाड्याने दिलीये, तिथे राहणारी एक बाई आहे. त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं हळूहळू आपल्यासमोर येतं. पोलीस या कुटुंबातल्या कोणालाही ताब्यात घेत नाहीत. ते घरात शिरतात आणि या कुटुंबाला त्यांच्याच घरात बंदी बनवतात. इतकंच नाही, तर त्यानंतर घरी येणाऱ्या कोणालाही घराबाहेर पडू दिलं जात नाही. घरातल्या बाईची बहीण ती कामावर का आली नाही म्हणून तिच्या शेजारणीच्या घरी फोन करते. शेजारीण तिला विचारायला जाते आणि घरात अडकते. शेजारीण आता फोन उचलत नाही, म्हणून बहीण आपल्या प्रियकराबरोबर तिच्या घरी जाते, आणि तीही बंदी बनते. असं करत करत घरातली माणसं वाढू लागतात. त्यांचं जेवणखाण, झोपण्याची व्यवस्था करणं इतकं सोपं नसतं. दिवस जातात तसं घरातलं सामान संपतं. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या भुवया उंचावू लागतात. हे पोलीस कोणाला त्रास देत नाहीत, पण कोणाला घराबाहेरही पडू देत नाहीत. आणि त्यांना काही सांगतही नाहीत. यातून घरात अडकलेल्या माणसांचं एकमेकांशी वागणं, जुने रागलोभ उफाळून येणं, वाद घालणं असे सगळे प्रकार होतात. दिग्दर्शक एका गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला दडपशाहीविषयी काही सांगू पाहतो. मानवी नात्यांविषयी बोलू पाहतो. आपण ज्या परिस्थितीत अडकलेलो आहोत त्यातून सुटण्यासाठी माणसं काय करू शकतात हे दाखवू मागतो. म्हटलं तर ही परिस्थिती मजेशीरही आहे, आणि दुसऱ्या बाजूने भीतीदायकही.

हिटलरच्या जुलूमातून मुक्त झालेल्या हंगेरीच्या नागरिकांना कम्युनिस्ट रशियाची एकाधिकारशाही सहन करावी लागतेय, त्याविरुध्द अवाक्षरही काढण्याची कोणाची हिंमत नाही. या पोलिसांना नेमकं काय हवंय, ते कशाचा शोध घेताहेत हे थेट विचारण्याची सोय नाही. असं किती दिवस जगावं लागणार आहे याचा थांगपत्ता नाही. हा विचारही घुसमटून टाकणाराच आहे. अगदी आपण तुरुंगात नसलो, घरातच डांबून पडलेलो असलो तरीही. सिनेमाचे पटकथालेखक आहेत आन्द्रा व्होरास. त्यांना अचानक ही गोष्ट मिळाली. मग लेखक आणि दिग्दर्शकाने आर्काईव्हजमधून या घटनेची अधिक माहिती मिळवली, 90 च्या दशकात एका वृध्द बाईने सांगितलेल्या घटना कोणीतरी व्हीएचएसवर टेप करून ठेवल्या होत्या. ती टेप या दोघांनी मिळवली आणि त्यावर आपली पटकथा रचली. ‘एका खोलीत एकाच वेळी सोळा व्यक्तिरेखा वावरताना दाखवणं हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं,’ असं क्रिस्टॉफ डॅकचं म्हणणं आहे. ‘बीनपोल’सारखा ‘कॅपटिव्हज’ अंगावर शहारा आणत नाही. या सिनेमाचा आवाकाही त्या मानाने लहान आहे. दोन्ही सिनेमे युध्द संपल्यानंतरचे असले तरी त्यांची जातकुळी वेगळी आहे. एक जळजळीत वास्तव सांगणारा आहे आणि दुसरा वास्तवच, पण ते साखरेच्या गोळीत घोळून तुमच्यासमोर मांडणारा आहे. व्यक्तिश: मला ‘बीनपोल’ अधिक भावला. सर्वच बाबतीत तो जास्त सकस वाटला. ‘बीनपोल’चा कॅनव्हास आणि ग्राफही अधिक मोठा होता. दिग्दर्शन, छायाचित्रण, अभिनय सगळ्या पातळ्यांवर या सिनेमाने खूप जास्त परिणाम केला, प्रभाव पाडला. पण ‘कॅपटिव्हज’ सारखा सिनेमाही दुर्लक्षिता कामा नये असं वाटलं. हेच तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचं वैशिष्ट्य असतं. नाही तर, एकाच व्यासपीठावर इतकं वैविध्य असणारे सिनेमे दुसरीकडे कुठे पहायला मिळणार?

मीना कर्णिक, मुंबई

meenakarnik@gmail.com

Share on Social Media

जगण्याचे भान : 4

गफलत

डॉ. दिलीप शिंदे

माझ्या असे लक्षात आले की, माझ्याप्रमाणेच संवेदनातील सर्व स्टाफ व इतर आजी-आजोबांनाही कुसुबद्दल आस्था व आदर वाटतो आहे. पण हा आदर म्हणजे केवळ तिच्याबद्दल वाटणारी कणव नसून ती ज्या प्रकारे आपल्या आजाराशी दोन हात करत संघर्ष करत होती, त्याला दिलेली दाद होती. माणसाला नेहमी ज्ञानी, तपस्वी किंवा नेते, कलाकार, वैज्ञानिक यांच्याबद्दल आदर वाटतो तसा तो आपल्या आजाराशी संघर्ष करणाऱ्याबद्दलही वाटत असतो. कुसुचा हा संघर्ष खरोखरच असामान्य होता. कल्पना आणि वास्तविकता यामध्ये गफलत असणे हे स्किझोफ्रेनिया या आजाराचे मुख्य लक्षण असते. आयुष्यभर आपल्या जगण्याबाबत गफलत झालेल्या कुसुने आपल्या मृत्यूबाबत मात्र ती कशी होऊ दिली नसेल? भलेही तिला आपले जीवन आपल्या कल्पनेप्रमाणे जगता आले नसले, तरी ती ज्या पध्दतीने मृत्यूच्या वास्तवाला सामोरी गेली, ते पाहून खुद्द मृत्यूसुध्दा थक्क झाला असेल.

कुसु आज पहाटे देवाघरी गेली. देव आणि पुनर्जन्म वगैरे तुम्ही मानता की नाही, माहीत नाही; पण ‘मृत्यू म्हणजे देवाघरी जाणे’ असं आजी मला लहानपणी सांगायची. पुढे आजी गेली तेव्हा बापूंना धाय मोकलून रडताना पाहून मी त्यांनाही देवाच्या घराबद्दल विचारले होते. पण ‘तू मोठा झाल्यावर तुला समजेल’, असं तेव्हा ते हुंदके देत म्हणाले होते. आता मी मोठा वगैरे झाल्यावर आणि विशेषतः डॉक्टर झाल्यावरही देवाच्या घराबद्दलचे गूढ काही मला समजू शकलेले नाही. पण काही का असेना- किमान कुसुच्या बाबतीत तरी देव आणि देवाचे घर असायला हवे, असे मला प्रकर्षाने वाटते. नाही तर तिने ‘हे असले आयुष्य माझ्या वाट्याला का दिलेस?’ म्हणून आपल्या प्राक्तनाबद्दल जाब तरी कोणाला विचारायचा? देवाने तिला आपल्या कुशीत घेऊन आईच्या मायेने कुरवाळावे आणि ‘तुला आयुष्य देताना माझ्या हातून चूक झाली,’ असे म्हणत तिची समजूत काढावी अन्‌ तिला आपल्या घरात आनंदाने राहू द्यावे, अशी काहीशी भाबडी कल्पना माझ्या मनात आली. अर्थात, देव आणि देवाच्या घराबद्दल जरी मी तुम्हाला खात्रीने काही सांगू शकत नसलो, तरी आमच्या संवेदना शुश्रूषा केंद्रातील कुसुच्या सहा-सात महिन्यांच्या वास्तव्यात तिच्या जगण्यात काही आनंदाचे क्षण निर्माण करू शकलो, याचे समाधान वाटते आहे.

सुरुवातीला तिचा भाऊ आमच्याकडे चौकशी करण्यासाठी आला, तेव्हा तिला आमच्या केंद्रात भरती करून घ्यावे की घेऊ नये- असे व्दंव्द माझ्या मनात निर्माण झाले होते. कुसुला जिभेचा कॅन्सर होता आणि तिचे एका कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नुकतेच ऑपरेशन झाले होते. नाकात नळी होती. त्याव्दारेच द्रवाहार व औषधे सुरू होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिची शुश्रूषा व देखभाल यासाठी तिचा भाऊ तिला आमच्याकडे भरती करू इच्छित होता. पण त्यासोबतच जवळपास गेली पस्तीस वर्षे ती स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारानेही ग्रस्त होती आणि गेली दहा वर्षे एका मनोरुग्णालयात भरती होती. त्यामुळे आमच्या केंद्रात भरती केल्यानंतर ती जर दंगा वगैरे करू लागली तर इतर वृध्दांना तिचा त्रास होऊ शकेल, अशी भीती माझ्या मनात होती. त्याविषयी मी तिच्या भावाशी चर्चा केली. पण स्किझोफ्रेनियासाठी तिला नियमित औषधोपचार सुरू असून सध्या ती व्हायोलंट वगैरे होत नाही, अशी माहिती तिच्या भावाने दिली. तसेच इथे भरती केल्यानंतर तशी काही अडचण आल्यास तिला परत मनोरुग्णालयात दाखल करेन, असे त्याने सांगितले. त्यानुसार मी कुसुला आमच्या केंद्रात भरती करून घ्यायला तयार झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाकात नळी घातलेल्या व तोंडातून गळणारी लाळ रुमालाने सतत पुसणाऱ्या कुसुला घेऊन तिचा भाऊ ठरल्याप्रमाणे आमच्या केंद्रात आला. मी आमच्या केंद्राची व्यवस्थापिका माधुरीला बोलावून कुसुला भरती करून घ्यायला सांगितले.

प्रथमदर्शनी तिचा एकूण अवतार पाहून ती आमच्याकडे कशी रुळेल याची धास्ती मनातून वाटत होती. पण माधुरी आणि इतर नर्सिंग स्टाफने मिळून कावऱ्याबावऱ्या झालेल्या व भेदरलेल्या कुसुशी गप्पा मारत तिच्या मनातली भीती दूर केली. बघता-बघता आमच्या नर्सिंग स्टाफशी कुसुची छान मैत्री जमली. तिने आपल्या वयाची साठी ओलांडली असली, तरी आमच्याकडे भरती करताना तिचा भाऊ तिला परकर-पोलक्यातच घेऊन आला होता. त्यामुळे नकळतपणे मी तिच्याशी ‘अरे-तुरे’ बोलायला सुरुवात केली. पुढे मात्र सर्वच जण तिच्याशी ‘अरे-तुरे’ बोलू लागले. जणू ती आमच्या सर्वांची लाडकी मुलगीच झाली. अनेक वर्षे ती मनोरुग्णालयात भरती असल्यामुळे तिच्या डोक्यात उवा-लिखा झाल्या होत्या. केसांच्याही जटा झालेल्या. आमच्या नर्सिंग स्टाफने तिला न्हाऊ घातले व तिची समजूत काढून छानपैकी बॉबकट केला. तिचे बदललेले रूप पाहून मलाही आश्चर्य वाटले. कारण पहिल्या दिवशी आम्ही भरती करून घेतले, तेव्हा तिला आपल्या रूममध्ये घ्यायला कोणीच आजी तयार नव्हती. त्यामुळे तिला आम्हाला स्वतंत्र खोली द्यावी लागली होती. काही दिवसांतच कुसु आमच्या शुश्रूषा केंद्रात इतकी छानपैकी रुळल्याचे पाहून तिच्या भावालाही नवल वाटले.

ती तोंडाने थोडा-थोडा द्रवाहार व औषधे घेऊ लागल्यावर तिच्या नाकातील नळी काढली. त्यानंतर ती आपल्या घोगऱ्या आवाजात सर्वांशी बोलू लागली. महिन्याभरानंतर तिच्या भावाने तिला फेरतपासणीसाठी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नेऊन आणले. तिचे ऑपरेशन यशस्वी झाले होते. खरं तर एका महिन्यानंतर तिच्या नाकातली नळी काढली की, तिला पुन्हा मनोरुग्णालयात भरती करायचे तिच्या भावाने ठरविले होते. पण ती आमच्याकडे छान रुळल्याचे पाहून त्याने तिला इथेच ठेवण्याचा निर्णय घेतला. ती आमच्या संवेदना शुश्रूषा केंद्राचा हळूहळू एक घटकच बनली. कधी स्वयंपाकघरात जाऊन वहिदाला भाजी निवडण्यासाठी मदत करणे, तर कधी जेवणाच्या वेळी इतर आजी-आजोबांना हवं नको ते पाहणे- अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ती भाग घेऊ लागली. दिवसभर इकडे-तिकडे वावरत असली तरी मी राऊंडला आल्याची चाहूल लागली की मात्र- ती आपल्या बेडवर जाऊन बसायची. तिची विचारपूस केली की, तिला खूप बरे वाटायचे. एके दिवशी मला तिच्या बेडवर एक डायरी दिसली. मी तिला त्याबद्दल विचारले. तिने ती डायरी माधुरीकडून मागून घेतली होती आणि त्यामध्ये अनेक भजने व भावगीते लिहून काढली होती. विशेष म्हणजे, ती सर्व भजने व भावगीते तिला तोंडपाठ होती. तिचे अक्षरही अतिशय सुरेख होते. तिला गायनाची खूप आवड असून लहानपणी ती आपल्या आईसोबत मंदिरात जाऊन भजने गायची, असे तिच्या भावाने मला सांगितले.

ती ग्रॅज्युएट असल्याचे समजल्यावर मला आश्चर्य वाटले. तिचा स्वभाव काहीसा तापट आणि हट्टी होता. पण गेली दहा वर्षे तिला मनोरुग्णालयात का ठेवावे लागले, याबद्दल मी एकदा तिच्या भावाला विचारले. ‘‘सध्या तिच्या मानसिक स्थितीत बरीच सुधारणा झाली आहे. आम्ही तिला तिकडे मनोरुग्णालयात ॲडमिट केले, तेव्हा तिच्या मानसिक आजाराने खूप गंभीर स्वरूप धारण केले होते. तिला सतत वेगवेगळे भास व्हायचे. त्यामुळे काही कारण नसतानाही, ती आरडा-ओरडा करायची. घरातील वस्तूंची आदळआपट करायची. आम्ही अडवायला गेलो की आमच्या अंगावर धावून यायची, कधी कधी आईला मारहाणही करायची. आईचेही वय झाले होते. त्या अगोदर जवळपास 15-20 वर्षे आई तिची देखभाल करत आली होती, परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तिच्या विसंगत वागणुकीमुळे आणि आक्रमक वर्तनामुळे आमचाही नाइलाज झाला. तिला मानसोपचारतज्ज्ञांची ट्रीटमेंट सुरूच होती. पण आमच्याकडून ती वेळच्या वेळी औषधे घ्यायची नाही. शेवटी डॉक्टरांनी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून शॉक ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आम्हाला तिला तिकडे ॲडमिट करावे लागले.’’

तिच्या भावाने मला थोडक्यात तिचा पूर्वेतिहास सांगितला. ‘‘तिच्या मानसिक आजाराची सुरुवात कशी झाली, हे तुम्हाला आठवते का?’’ मी तिच्या मानसिक आजाराचे स्वरूप जाणून घेण्याच्या हेतूने विचारले. ‘‘त्या वेळी मी लहान होतो. पण कॉलेजमध्ये असताना ती एक वर्ष नापास झाली. तेव्हापासून ती हळूहळू विचित्र वागायला लागली, असे आई सांगायची. अलीकडे दोनतीन वर्षे तिच्या मानसिक स्थितीत सुधारणा होऊ लागली होती. हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे वेळच्या वेळी औषधेही दिली जात होती. मी तिला घरी घेऊन जाण्याचाही विचार करत होतो. तेवढ्यात तिला हे कॅन्सरचे दुखणे उद्‌भवले.’’ तिचा भाऊ हताशपणे म्हणाला. ‘‘आयुष्यभर तिला खूप हाल-अपेष्टा सोसाव्या लागल्या आहेत. पण तुमच्या शुश्रूषा केंद्रात मात्र ती चांगली रुळली आहे. तुमचा सर्वच नर्सिंग स्टाफ अगत्याने तिची काळजी घेतो आहे.’’ त्याने कृतज्ञतापूर्वक सांगितले. त्याचा हा अभिप्राय ऐकून मलाही समाधान वाटले. हॉस्पिटल आणि घर या दोहोंची सांगड घालत आम्ही हे केंद्र चालवतो आहे. आजारी व्यक्तीस लवकर बरे वाटण्यासाठी हातभार लावावा आणि वृध्दांना आपले म्हातारपण सुसह्य व्हावे, यासाठी आम्ही इथे प्रयत्नशील असतो. त्या दृष्टीने खास कौटुंबिक वातावरण तयार केले आहे.

वेगवेगळे सण-समारंभ वेळोवेळी साजरे करत असतो. आठवणीने प्रत्येकाचा वाढदिवसही साजरा करीत असतो. कुसुच्या वाढदिवसाचा भावस्पर्शी प्रसंग तर मी कधीच विसरू शकणार नाही. इथे आम्ही सर्वांचे वाढदिवस साजरे करतो, हे पाहिल्यावर एके दिवशी कुसुने माझी पत्नी डॉ. नीलम हिच्याकडे ‘माझाही वाढदिवस करा’ अशी इच्छा गुपचूप व्यक्त केली. हा किस्सा नीलमने मला भावुक होऊन सांगितला. त्यानंतर मी कुसुच्या भावाशी संपर्क साधून तिच्या जन्मतारखेबाबत चौकशी केली. त्यांनाही कुसुची जन्मतारीख माहीत नव्हती. आम्ही तिचा वाढदिवस साजरा करू इच्छित असल्याचे ऐकल्यावर त्यांनी एक-दोन दिवसांत चौकशी करून कळवितो, असे सांगितले. योगायोगाने पुढच्या एक-दोन महिन्यांनंतर कुसुचा वाढदिवस होता. त्या दिवशी डॉ. नीलमने पुढाकार घेऊन कुसुच्या वाढदिवसाचे सर्व नियोजन केले. कुसुमच्या वाढदिवसासाठी आम्ही तिच्या भावालाही बोलावले होते. त्यांनी येताना येथील सर्व आजी- आजोबांसाठी घरी बनविलेली मिठाई आणली होती. माधुरीने बेकरीतून विदाउट आयसिंगचा मिक्स फ्रूट फ्लेवरचा केक आणला होता. रूममध्ये फुगे वगैरे टांगून तिची रूम सजविली होती. कुसुच्या आनंदाला तर त्या दिवशी पारावार उरला नव्हता.

भल्या पहाटे उठून तिने अंघोळ वगैरे आटोपून नवे कपडे परिधान केले होते. येथील परिचारिका, मावश्या व आजी-आजोबा यांच्या शुभेच्छा स्वीकारत सर्वत्र वावरताना ती अगदी हरखून गेली. सायंकाळी चार वाजता आम्ही सर्व जण तिच्या रूममध्ये जमलो. एका तिपाईवर मधोध केक मांडून ठेवला होता. त्या शेजारी ठेवलेल्या खुर्चीत कुसु बसली होती. आम्ही सर्व जण तिच्याभोवती जमलो होतो. कुसुने केक कापला, तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. डॉ. नीलमने पुढे होऊन तिला केकचा तुकडा भरवला. तेव्हा त्या दोघींच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यानंतर ती पट्‌कन खुर्चीतून उठली आणि मला काही समजण्याअगोदर नमस्कारासाठी खाली वाकून माझ्या पायाला स्पर्श करू लागली. मी तिला अडवत माझ्याऐवजी तिच्या भावाला नमस्कार करायला सांगितले. कुसुने आपल्या भावालाही नमस्कार केला. त्या वेळी हळवेपणाने भाऊ मला म्हणाला, ‘‘डॉक्टर, तुम्हीही कुसुचे दुसरे भाऊच आहात की!’’ त्याचे ते उत्स्फूर्त उद्‌गार म्हणजे प्रे, विश्वास व सुरक्षितता या कौटुंबिक मूल्याचे जतन करत आस्थापूर्वक सेवा-शुश्रूषा करणारे केंद्र चालवण्यामध्ये आम्ही यशस्वी होत असल्याची पोचपावतीच होती.

कुसु तर जणू हे आपले घरच असल्याप्रमाणे इथे मनमोकळेपणाने वावरत होती. दुर्दैवाने नियतीस कुसुचे हे सुख-समाधानाचे जगणे अधिक काळ बघवले नाही. एके दिवशी सकाळी तिने आपल्या घशात दुखत असल्याचे सांगितले आणि अचानक तिच्या घशातून रक्तस्राव सुरू झाला. मी तातडीने तिच्या भावाला बोलवून तिला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पाठविले. तिकडे ॲडमिट केल्यानंतर तिच्या घशातील रक्तस्राव थांबला. पण तपासण्यांध्ये तिच्या कॅन्सरच्या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याचे लक्षात आले. या वेळी तिच्या घशाबरोबरच छातीमध्येही आजार पसरला होता. त्यानंतर बरेच दिवस ती तिकडे हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होती. पण उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. तिची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच खालावत होती. शेवटी तेथील डॉक्टरांनी तिच्या भावाला तिला घरी नेऊन सेवा-शुश्रूषा करत राहण्याबद्दल सुचविले. त्यानंतर तिचा भाऊ तिला घेऊन पुन्हा आमच्या शुश्रूषा केंद्रात आला. उदास आणि मलूल झालेल्या कुसुला पाहून माझे मन हेलावून गेले. तिच्या नाकात औषध व अन्न देण्यासाठी नळी पुन्हा बसविली होती. तोंडाला दुर्गंधीही येत होती. माझ्या मनात पुन्हा पूर्वीचेच व्दंव्द निर्माण झाले. अशा अवस्थेत पुन्हा आमच्या केंद्रात तिला भरती करून घेतले, तर इतर आजी- आजोबांचे नातेवाईक काही हरकत तर घेणार नाहीत ना? असा विचार मनाला सतावत होता. पण अशा अवस्थेत आम्ही घरी तिची देखभाल व्यवस्थित करू शकणार नाही, अशी तिच्या भावाने कळकळीची विनंती केली.

माझ्याही मनाला कुसुला असे वेदनेच्या वाटेवर शेवटी-शेवटी एकटे सोडणे प्रशस्त वाटेना. पूर्वीप्रमाणे तिला स्वतंत्र खोली देण्याबाबत सूचना देऊन मी माधुरीला तिला भरती करून घ्यायला सांगितले. कुसुला पुन्हा आमच्याकडे भरती करून घेतल्यानंतर तिच्या मनामध्ये ‘आपण आता कोणालाही नकोसे झालो आहोत’ असे विचार डोकावू नयेत, म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करायचो. मी राऊंडच्या वेळी सकाळ-संध्याकाळी तिच्याशी संवाद साधायचो. तेव्हा ती निर्विकारपणे हसायची. तिला स्किझोफ्रेनिया असल्यामुळे आपल्या मृत्यूला सामोरे जाताना ती कदाचित अधिक भयभीत होईल व आक्रस्ताळेपणा करेल, अशी शंका मला वाटत होती. पण प्रत्यक्षात मात्र ती अगदी शहाण्या मुलीसारखी धीराने आपल्या मृत्यूला सामोरी गेली. दिवसभर वेदना सहन करत आपल्या बेडवर पडून राहायची. तिने स्वतःला आपल्या खोलीत बंदिस्त करून घेतले होते. कसलाही विरोध न करता वेळच्या वेळी औषधे व द्रवाहार घ्यायची. माझ्या असे लक्षात आले की, माझ्याप्रमाणेच संवेदनातील सर्व स्टाफ व इतर आजी-आजोबांनाही कुसुबद्दल आस्था व आदर वाटतो आहे. पण हा आदर म्हणजे केवळ तिच्याबद्दल वाटणारी कणव नसून ती ज्या प्रकारे आपल्या आजाराशी दोन हात करत संघर्ष करत होती, त्याला दिलेली दाद होती.

माणसाला नेहमी ज्ञानी, तपस्वी किंवा नेते, कलाकार, वैज्ञानिक यांच्याबद्दल आदर वाटतो तसा तो आपल्या आजाराशी संघर्ष करणाऱ्याबद्दलही वाटत असतो. कुसुचा हा संघर्ष खरोखरच असामान्य होता. कल्पना आणि वास्तविकता यामध्ये गफलत असणे हे स्किझोफ्रेनिया या आजाराचे मुख्य लक्षण असते. आयुष्यभर आपल्या जगण्याबाबत गफलत झालेल्या कुसुने आपल्या मृत्यूबाबत मात्र ती कशी होऊ दिली नसेल? भलेही तिला आपले जीवन आपल्या कल्पनेप्रमाणे जगता आले नसले, तरी ती ज्या पध्दतीने मृत्यूच्या वास्तवाला सामोरी गेली, ते पाहून खुद्द मृत्यूसुध्दा थक्क झाला असेल.

डॉ. दिलीप शिंदे

Share on Social Media

चर्चामंथन

भारतीय राजकारणाची यापुढील दिशा

भ. पां. पाटणकर

दि. 30 नोव्हेंबरच्या साधना अंकात राम मंदिर व महाराष्ट्रातील निवडणुका यांचे चांगले विश्लेषण आले आहे. त्यानंतर दोन महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहेत. झारखंडमध्ये भाजपची झालेली पिछेहाट आणि नागरिकत्व कायद्याविरूध्द उठलेला भयंकर क्षोभ. तेव्हा आता भारतीय राजकारणाचा पुन्हा एकदा आढावा घ्यायला पाहिजे. सध्या स्पष्ट बहुमताच्या जोरावर काँग्रेसकडे छत्तीसगड व पंजाब आणि भाजपकडे गुजरात व उत्तर प्रदेश एवढीच राज्ये आहेत. बाकी सर्व राज्यात प्रादेशिक पक्ष किंवा युत्या किंवा तोडफोड करून जमवलेली बहमुते आहेत. आता आणखी वेगळ्या दिशेने देश वळत आहे. ती दिशा म्हणजे ‘केंद्रिय संसदेने घेतलेले निर्णय आम्ही मानणार नाही’ असेही राज्य सरकारे म्हणायला लागली आहेत. या सगळ्या प्रकारातून वाट काढून भाजपचे केंद्रिय सरकार काय विधायक कार्य करू शकेल आणि त्यांची धोरणे न पटणारे पक्ष एकत्र येऊन काय करू शकतील हे प्रश्न महत्त्वाचे झाले आहेत. सध्या ऐरणीवर आलेला विषय म्हणजे नागरिकत्व कायदा आणि पुढे येऊ घातलेली अखिल भारतीय नागरिक नोंदवही. या दोन कायद्यांनी भाजप काय साधू पाहत आहेत हेच कळत नाही.

अलीकडच्या काळात अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा बांगलादेश येथून भारतात अवैध घुसखोरी होत असल्याचे काही दिसत नाही. जे आलेले आहेत ते बऱ्याच वर्षांपासून येथे राहत आहेत. त्यापैकी मुसलमान सोडून बाकी सर्वांना नागरिकत्व देण्याचा कायदा भाजपने मंजूर करून घेतला आहे. फक्त मुसलमानांपैकी जे अवैधपणे आलेले दिसतील त्यांना निवडून काढून माघारी पाठवण्याचा सरकारचा मानस आहे. पण हे शक्य आहे का? असा एक प्रयत्न नेहरूंच्याच काळात म्हणजे 1961 किंवा 62 मध्ये झाला होता. तेव्हा एकाच महिन्यात आसाम सरकारने 3000 तथाकथित पूर्व पाकिस्तान्यांना पूर्व पाकिस्तानात पिटाळले होते. पाकिस्तान सरकारने याचा तीव्र विरोध केला व प्रकरण संयुक्त राष्ट्रांपर्यंत नेले. त्यांचा एक मुद्दा बिनतोड ठरला. तो असा की- एखादी व्यक्ती भारतीय आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार भारताला आहे, पण ती व्यक्ती पाकिस्तानी आहे हे ठरवण्याचा नाही.

शिवाय, आसाम सरकारने माणसे पिटाळताना केवळ कार्यपालिकेचे बळ वापरले होते. न्यायालयाकडून कोणत्याही व्यक्तीच्या नागरिकत्वाची शहानिशा झालीच नव्हती. यावर बरीच भवती न भवती झाली, दोन गृहमंत्र्यांची चर्चा झाली. मग असे ठरले की, न्यायालयीन निर्णय झाल्याशिवाय कोणालाही हद्दपार केले जाणार नाही, आणि शेवटी हा घरवापसी करण्याचा कार्यक्रम बंदच पडला. आतासुध्दा असेच होणार आहे. फक्त मुसलमान अवैध रहिवासी शोधून काढण्याचे काम किचकट तर राहीलच, त्यात व्यक्तींना सरकारी कचेऱ्यांतून हेलपाटे घालावे लागणार आहेत, सरकारी अधिकाऱ्यांचे ‘समाधान’ करावे लागणार आहे. आणि या खटाटोपातून ज्यांचे नागरिकत्व सिध्द होणार नाही, त्यांना हद्दपार करणे जमणार नाहीच आहे. आणि समजा सबंध भारतातून दहा-पंधरा लाख लोकांना परत पाठवले तरी त्याने 135 कोटी भारतीयांच्या जीवनात काही सुधारणा होणार आहे का? काही फायदा नसलेला हा खटाटोप पत्करून सरकारने मुसलमान समाजात एक क्षोभ निर्माण केला आहे. बाबरी मशिदीसंबंधाचा निकाल मुसलमान समाजाने मान्य केलेला दिसतो असे 30 नोव्हेंबरचे साधनाचे संपादकीय म्हणते, पण एकावर एक क्षोभक धोरणे चालतच राहिली तर मुसलमान समाजामध्ये क्षोभ नक्की वाढणार. त्याने भारताच्या सुरक्षिततेलाही धोका उत्पन्न होऊ शकतो असे मत उच्च पदे भूषवलेल्या दोन अपक्ष व्यक्तींनी व्यक्त केले आहे, ते त्यांच्याच शब्दांत मांडतो..

भारतीय नाविक दलाचे भूतपूर्व प्रमुख अरुण प्रकाश म्हणतात... "At this critical juncture in our history, itis for India’s decision-makers to pause and consider whether India’s security, well-being and international image will be enhanced or undermined by pursuing majoritarianism of any kind by engendering insecurity in any segment of our heterogeneous society and alienating a major section of our citizens through intimidatory or discriminatory legislation? On the other hand, will the nation not be immeasurably strengthened if we retain sharp focus on enhancing internal cohesion through assimilation, inclusivity and maintenance of domestic harmony — and above all, on economic development?" (Indian Express, 21 Dec. 2019) यातला इफेक्टिव्ह हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण अनेक प्रकारचे युक्तिवाद करायचे, उलटसुलट वक्तव्ये द्यायची, पण आपल्याला जे करायचे तेच करायचे असे भाजपचे धोरण आहे. नागरिकत्वाची आणि परदेशी घुसखोरांची चर्चा करताना आसामच्या प्रश्नाचे वेगळेपण लक्षात घ्यायला हवे.

आसामच्या लोकांना परदेशी घुसखोर तर नकोच आहेत, पण स्वदेशी घुसखोरही नको आहेत, मग ते हिंदू असोत की, मुसलमान. हा प्रश्न लोकगर्दीमुळे झालेल्या आर्थिक कोंडीचा आहे. त्या प्रश्नाला सध्या तरी काही उत्तर सापडत नाही, पण ‘युनिटी फाउंडेशन’ या संस्थेने केलेल्या अभ्यासातून एक आशेचा किरण दिसतो. या संस्थेला असे दिसून आले आहे की, भारतातला जन्मदर खूप कमी झाला आहे आणि काही वर्षांनी लोकसंख्या घटू लागेल अशी चिन्हे आहेत. जोडीला आपण आर्थिक विकास करू शकलो तर लोकगर्दीमुळे उद्‌भवणाऱ्या समस्या कमी होतील. आज बिहार किंवा उत्तर प्रदेशमधील लोक दक्षिणेकडे रोजगारासाठी जातात त्याप्रमाणे आसामच्या गर्दीतूनही लोक बाहेर पडू शकतील. तोपर्यंत वेळ काढत राहणे हाच एक राजकीय पर्याय आहे. सध्या काही निर्णय घेता येणार नाही. आणि नरसिंहरावांचे एक प्रसिध्द वाक्य आहे की, ‘निर्णय न घेणे हाही एक निर्णयच असतो.’ तेव्हा आता पुन्हा राजकीय शक्यतांकडे वळू या. भाजपची सध्याची समाजविभाजक धोरणे थांबवण्याची गरज तर आहेच, पण आर्थिक धोरणेही बदलण्याची गरज आहे. कारण काळाबाजार बंद करण्याच्या आणि करवसुली वाढवण्याच्या नादात नोटाबंदी आणि जीएसटीसारखी धोरणे राबवून भाजपने भारतात बऱ्याच प्रमाणात चालणाऱ्या हातोहात इनफॉर्मल उद्योगधंद्याला मोठा धक्का दिला आहे. त्यातून एकंदरच मंदी येऊन करवसुलीचे उद्दिष्ट साध्य होईनासे झाले आहे. त्यात आता उद्योग व मागणी वाढावी म्हणून करांचे दर कमी करायची भाषा सुरू झाली आहे. मग पूर्वी कर न देता चालणारा इनफॉर्मल धंदाच काय वाईट होता? हे सगळे बदलायचे असेल तर केंद्रात एक पर्यायी सरकार येणे आवश्यक आहे. ते कोणत्याही एका पक्षाचे येण्याची शक्यता दिसत नाही. कारण काँग्रेसला पूर्वी संबंध भारतात एक पक्के स्थान होते ती जागा आता प्रादेशिक नेत्यांनी व्यापली आहे.

घराणेशाही ही काँग्रेसच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे असे म्हटले जाते. पण 2019 च्या सार्विंत्रक निवडणुकीत काँग्रेसची खूप पिछेहाट झाल्यानंतर राहुल गांधींनी राजीनामा (अध्यक्षपदाचा) दिला व म्हटले की घराण्याच्या बाहेरचा कुणीतरी अध्यक्ष व्हावा. इतर कोणी ती जागा भरली नाही याला ‘घराणे’ काय करणार? जे पक्ष जसे आहेत, तसेच राहून त्यांनी युत्यांचा प्रयत्न केला पाहिजे. निवडणुकांपूर्वी जमले तर उत्तमच, नाहीतर निवडणुकांनंतरही. नंतर केलेल्या युत्यांनी जनादेश नाकारला जातो असे म्हणण्यात अर्थ नाही. केंद्रात भरघोस यश मिळवलेल्या भाजपला फक्त 39 टक्के मतदारांचा पाठिंबा आहे, बाकीच्या 61 टक्के मतदारांनी एकत्र येऊन पर्यायी सरकार बनवले तर त्यात लोकशाहीविरूध्द काहीच नाही. पण युत्या नीट चालण्याकरता मते जुळावी लागतात, एकमेकांबद्दल आदर निर्माण व्हावा लागतो. हे लांब पल्ल्याचे काम आहे. तेव्हा 2024 च्या निवडणुकांकरता हे काम सर्व पक्षांनी आतापासूनच सुरू केलेले बरे.

भ. पां. पाटणकर, नागपूर

Share on Social Media