Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

एक तप, एक हॅट्रीक

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी, साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले. गेली 71 वर्षे ते अखंड प्रकाशित होत आहे. गुरुजींच्यानंतर आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, नानासाहेब गोरे, वसंत बापट, ग.प्र.प्रधान या संपादकांनी अनेक लहानथोरांच्या मदतीने साधना ला सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत आणले. त्यानंतरची पंधरा वर्षे डॉ.नरेंद्र दाभोलकर साधनाचे संपादक होते. साधना साप्ताहिकातून प्रामुख्याने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन प्रसिद्ध केले जाते. त्यातील भूमिका भारतीय संविधानाला सुसंगत राहतील अशी दक्षता घेतली जाते. त्यामुळे साधनाची ओळख एक वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक अशीच राहिली आहे.

तरीही अगदी सुरुवातीपासून साधनाच्या अंकांतून बालकुमारांसाठी दरमहा एक-दोन पाने राखून ठेवलेली असायची, वर्षातून एखादा विशेषांकही निघायचा. त्यामुळे ‘साधनातील लेखन आम्ही लहान असताना वाचले आहे, त्याचा आमच्यावर प्रभाव पडला होता,’ अशा प्रतिक्रिया आजही अनेक लोक देत असतात. त्यातही साधनाने बालकुमारांसाठी स्वतंत्र अंक, दरवर्षी अतिशय नियमितपणे काढले, तो कालखंड म्हणजे 1957 ते 68 ही बारा वर्षे. ते अंक साने गुरुजींच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी 11 जूनला काढले जात असत. त्यात लहानांची अभिव्यक्ती (चित्रे, कविता व अन्य मजकूर) असे, पण मोठ्यांनी लहानांसाठी केलेले लेखनच प्रामुख्याने असे. अगदी ना.ग.गोरे, श्री.म.माटे, दुर्गा भागवत यांच्यापासून हमीद दलवाई यांच्यापर्यंतचे अनेक मान्यवर त्या अंकासाठी लेखन करीत असत. त्यामुळे त्या बारा वर्षांच्या काळातल्या बालकुमारांवर साधनाचा प्रभाव जास्त राहिला असावा.

असाच काहीसा प्रभाव 2008 ते 2019 या बारा वर्षांच्या काळातील बालकुमारांवर असू शकतो. कारण ही बारा वर्षे अतिशय सातत्याने साधनाने बालकुमार दिवाळी अंक काढले आणि ते मोठ्या प्रमाणात पोहोचवले. या सर्व अंकांमधून प्रामुख्याने मोठ्यांनी लहानांसाठी केलेले लेखन आहे. विविध क्षेत्रांतील अनेक नामवंतांचा सहभाग त्यात आहे. या बारा वर्षांपैकी शेवटची तीन वर्षे मात्र एक थीम घेऊन अंक काढले आहेत.

2017 या वर्षी सहा वेगवेगळ्या देशांतील सहा बालकुमारांचे पराक्रम (ज्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली) सांगणारे गोष्टीवजा लेख प्रसिद्ध केले होते. या अंकाचे अभूतपूर्व स्वागत झाले होते. इतके की, त्यानंतरच्या वर्षी कोणती थीम घेऊन अंक काढला तर आधीच्याइतका नाही, पण त्याच्या जवळपास जाईल असा प्रश्न आम्हाला पडला होता. उपलब्ध वेळेत त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते, म्हणून मग गेल्या वर्षीही आणखी वेगवेगळ्या सहा देशांतील सहा मुला-मुलींची (आंतरराष्ट्रीय म्हणावी अशी) कर्तबगारी सांगणारा अंक काढला होता. त्या अंकालाही जवळपास आधीइतका प्रतिसाद मिळाला होता.

आणि मग या वर्षी त्या थीममध्ये किंचित बदल करून भारतातील सहा राज्यांतील सहा मुला-मुलींवर अंक काढला आहे. म्हणजे मागील एक तपाच्या बालकुमार अंकांमध्ये अशी एक हॅट्रीक साधली गेली आहे. पुढील म्हणजे तेराव्या वर्षी मात्र ‘विज्ञान’ किंवा ‘संशोधन’ किंवा ‘विषय’ यापैकी एक थीम घेऊन अंक काढला जाणार आहे. कदाचित पुढे याच तीन थीमवरील अंक दुसरी हॅट्रीक साधणारे ठरतील.

Share on Social Media

अर्धाच ग्लास, प्लीज!

गर्विता गुल्हाटी (कर्नाटक)

गर्विताने Why Waste? (वाया का घालवायचे?) या नावाने एक संस्था स्थापन केली, तेव्हा तिचे वय होते 15 वर्षे. तेव्हा तिने दहावीची परीक्षा नुकतीच दिली होती. नंतरच्या चार वर्षांत तिने बरीच मोठी मजल मारली आहे, उत्तुंग म्हणावी अशी झेप घेतली आहे. जवळपास 200 हॉटेल्समध्ये ‘अर्धाच ग्लास, प्लीज’ ही मोहीम यशस्वी झालेली आहे. हॉटेलचालकांनी ती स्वीकारली आणि ग्राहकांनीही.

दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याकडे शांत, सुखी व समृद्ध राज्य म्हणून पाहिले जाते. त्याची राजधानी असलेले बंगळुरू हे शहर तर अधिक चांगल्या कारणांसाठी ओळखले जाते. त्यातही सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आल्हाददायक हवामानासाठी बंगळुरू शहराचा अव्वल नंबर आहे. दुसरे म्हणजे साहित्य, कला आणि संस्कृती यांची उत्तम अभिरुची असलेल्या अनेक व्यक्ती, संस्था, संघटना या शहरात आहेत. या शहराला पूर्वी गार्डन सिटी म्हणजे बगीचांचे शहर असे म्हटले जात असे. गेल्या काही वर्षांत मात्र बंगळुरूला आयटी हब असे संबोधले जाते, म्हणजे भारतातील माहिती- तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू.

या सर्व पार्श्वभूमीमुळे या शहरात, नव्या कल्पना घेऊन प्रत्यक्ष कृती करणाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी, अनेक लहान-मोठ्या व्यक्ती व संस्था पुढे येत असतात. तर अशा या बंगळुरू शहरात राहणारी गर्विता गुल्हाटी नावाची 19 वर्षांची एक मुलगी आहे. आता ती बी.टेक.चे शिक्षण घेत आहे. पुढच्या वर्षी ती इंजिनिअर होणार आहे. तिने कथ्थक या नृत्यकलेत विशेष प्रावीण्य मिळवले आहे. तिला वाचनाची चांगली आवड आहे, पत्रलेखनाची आवड आहे आणि कॅलिग्राफी म्हणजे सुलेखनकलेवरही तिचे प्रभुत्व आहे.

या गर्विताचे आई-वडील नोकरी-व्यवसाय करतात. एक भाऊ आहे, तो शिकतोय. चौघांचे हे कुटुंब सुखी-समाधानी आहे. सर्वांचे आरोग्य उत्तम आहे. कमतरता अशी कशाचीच नाही. गर्विता शाळेत असतानाही अभ्यासात हुशार होती, कला-क्रीडा क्षेत्रांतही रमत होती. तिच्यात एक संवेदनशील मन आकाराला आले होते. त्यामुळे सभोवतालची परिस्थिती तिला अधिक कळू लागली होती. चर्चा-संवाद, बातम्या यांद्वारे अनेक चांगल्यावाईट गोष्टी तिच्या कानांवर आदळत होत्या, पाहायला मिळत होत्या. पण त्यातही विशेष लक्षात राहणारा प्रसंग तिच्याबाबत घडला, ती सहावीत असताना. एका वृत्तपत्रातील असे एक व्यंगचित्र तिने पाहिले, जे तिच्या मनात रुतूनच बसले. काय होते त्यात?

‘एका गाडीचा ड्रायव्हर काही पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळं दाखवतो आहे. त्यात एक प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे मोठे झाड आणि ते पाहायला आलेल्या पर्यटकांच्या पाठीवर ऑक्सिजनच्या बॅगा होत्या.’ आता व्यंगचित्रच होते ते, त्यामुळे त्यात कमी-अधिक अतिशयोक्ती असणार, हे उघड होते. पण त्याचा भावार्थ मात्र एका स्वतंत्र लेखातूनही मांडता येणार नाही इतका मोठा होता. पर्यावरणाची आपण किती हानी करीत चाललो आहोत, हे सांगणारे आणि पर्यावरणाचा ऱ्हास खूप टोकाला गेला तर काय होऊ शकते, हे सूचित करणारे ते व्यंगचित्र होते.

ते व्यंगचित्र बरेच दिवस गर्विताच्या मनात घोळत होते किंवा मानगुटीवर बसले होते असेच म्हणा ना! त्यामुळे झाले काय- तर पर्यावरणाच्या संदर्भातील बातम्या, लेख, भाषणे यांकडे तिचे अधिक लक्ष जाऊ लागले. त्यानंतर दोन-तीन वर्षे गेली. ती चौदा-पंधरा वर्षांची असताना म्हणजे 2014 मध्ये देशातील अनेक भागांत दुष्काळ पडला होता, त्याची झळ कर्नाटकातील काही भागांना बसली होती. त्याचा परिणाम बंगळुरू शहरावरही काही प्रमाणात झाला होता. दुष्काळाच्या त्या बातम्यांनी गर्विता अस्वस्थ होऊ लागली... आणि तशात आणखी एक प्रसंग घडला.

तिचे दहावीचे वर्ष नुकतेच सुरू झाले होते. तिच्या शाळेत Reap Benefit या संस्थेचे कुलदीप दंतेवाडिया यांचे एक व्याख्यान झाले. विषय होता- पर्यावरण आणि पाण्याचा वापर. त्यांनी बऱ्याच स्लाईड्‌स दाखवल्या, चित्रे-आलेख दाखवले, आकडेवारी दिली, पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारणे सांगितली आणि उपाययोजना काय असू शकतात याविषयीही सांगितले. त्यांच्या त्या व्याख्यानातील एका साध्या वाटणाऱ्या आकड्याने गर्विताच्या मनाचा कब्जाच घेतला.

कुलदीप यांनी सांगितले होते की, भारतभरात लहान- मोठी अशी लक्षावधी हॉटेल्स आहेत; त्या सर्व ठिकाणी ग्राहकांना जेवण, चहा-नाश्ता घेताना जे पाणी दिले जाते आणि त्यातून जे उरते व उष्टे म्हणून वाया घालवले जाते, ते सर्व पाणी एकत्रित मोजले तर रोजचा आकडा 1 कोटी 40 लाख लिटर इतका आहे. हा आकडा ऐकून गर्विता अचंबित झाली, हिशोब करू लागली. एका लिटरमध्ये साधारणत: तीन ग्लास पाणी असते. याचाच अर्थ, चार कोटींपेक्षा जास्त पिण्याचे ग्लास इतके पाणी रोज वाया घालवले जाते. भले त्यातील काही स्वच्छतेसाठी किंवा सांडपाणी म्हणून वापरले जात असेल आणि काही पाण्याचा पुनर्वापरही केला जात असेल, पण तरीही पिण्याचे म्हणावे असे बरेच स्वच्छ पाणी वाया घालवले जातेच!

त्या व्याख्यानानंतर घरी आलेली गर्विता नेहमीपेक्षा जास्तच अस्वस्थ होती. आई-वडिलांशी बोलली. दुसऱ्या दिवशी पर्यावरण विषय शिकवणाऱ्या शिक्षकांशी बोलली. त्यांनी सांगितले, ‘‘हो, खरे आहे. पण हे थांबवण्यासाठी तुमच्यासारख्या मुलांनी- तरुणांनी, नव्या पिढीनेच पुढाकार घेतला पाहिजे.’’

त्यानंतर गर्विताने सुरू केला रिसर्च. पाण्याची उपलब्धता, पाण्याचे स्रोत, पाण्याचा वापर, पाण्याचे प्रदूषण, पाण्याचे वाटप- असे बरेच काही. त्याही पुढे जाऊन ती या सर्वांचा समाजाच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर काय परिणाम होतोय, याचाही शोध घेऊ लागली. वृत्तपत्रे व पुस्तकांचे वाचन करून, टीव्ही व इंटरनेटवरून माहिती मिळवून आणि शिक्षक व अन्य काही जाणकारांशी/तज्ज्ञांशी बोलून तिच्या हाती जे तपशील आले, ते प्रचंड धक्कादायक होते. त्यातून आपल्या देशाचे जे चित्र उभे राहत होते, ते थरारून टाकणारे होते! आणि हे असेच चालू राहिले तर, पुढे काय-काय होऊ शकते याची कल्पना तर भयकंपित करणारी होती...

या सर्व प्रक्रियेमुळे गर्विताला पाणीप्रश्नाने झपाटून टाकले. काही तरी केले पाहिजे असे तिला वाटू लागले, स्वस्थ बसणे अवघड जाऊ लागले. मग ती अनेक मित्र-मैत्रिणींशी बोलू लागली. काहींनी तिला ‘इतका विचार का करतीयेस?’ असे म्हणून वेड्यात काढले. काहींनी तिला हसत-हसत उडवून लावले. काही मित्र- मैत्रिणींनी मात्र ‘आपण काही तरी केले पाहिजे’ असे बोलून दाखवले. मग ‘आपण काय केले पाहिजे?’ यावर त्यांच्यात चर्चा रंगू लागल्या. ‘आपण लहान आहोत, संख्येने थोडे आहोत, आपली ताकद कमी आहे, आपल्याकडे पैसा नाही, आपण शालेय विद्यार्थी आहोत’; हे सर्व माहीत असल्याने, येणाऱ्या मर्यादांची त्यांना जाणीव होतीच. ‘पण तरीही आपण शक्य असेल ते केलेच पाहिजे’, यावर त्यांचे एकमत झाले.

मग त्यांनी एक कृतिकार्यक्रम आखला. शाळा सुटल्यानंतर रोज तास-दोन तास आणि सुट्टी असेल तेव्हा अधिक वेळ, बंगळुरू शहरातील हॉटेलांमध्ये जायचे आणि ‘पाणी वाया घालवू नका’, अशी विनंती हॉटेलचालकांना वा व्यवस्थापकांना, तेथील नोकरांना आणि तिथे येणाऱ्या ग्राहकांनाही करायची. जवळपास 40 मुले-मुली या मोहिमेसाठी तयार झाली. म्हणून चार-पाच जणांचे गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटासाठी हॉटेल्सचे वाटप केले गेले, कोणत्या रस्त्यावर कधी जायचे आणि कोणत्या वेळी जायचे, याचे नियोजन करण्यात आले.

मग गर्विता व तिच्या मित्र- मैत्रिणींना बरेच वेगवेगळे अनुभव यायला लागले. ‘पाणी वाया घालवू नका, हा संदेश देण्यासाठी आम्ही आलोय’ असे सांगितल्यावर हॉटेलमधील बहुतेक सर्व जण ‘हो, ते आम्हाला मान्य आहे’ असे म्हणायचे. ‘पण तुम्ही हे असले उद्योग कशाला करता? स्वत:ची शाळा व अभ्यास नीट करायचे सोडून, इतरांना शहाणपण शिकवायला कशाला जाता?’ अशाच सर्वसाधारण प्रतिक्रिया असायच्या. ‘वेटर्स व ग्राहक यांच्याशी आम्ही बोलू का?’ असे विचारले, तर बहुतांश हॉटेलमालक किंवा त्यांचे व्यवस्थापक नकार द्यायचे. जवळपास 60 हॉटेल्सला त्यांनी भेट दिली, तेव्हा केवळ चार हॉटेल्समध्ये त्यांना जरा बरा प्रतिसाद मिळाला.

गर्विता हे निराशेचे अनुभव आई-वडिलांना व शिक्षकांना सांगायला जात असे, तेव्हा ‘अधिक चिकाटीने व अधिक कल्पकतेने काम केले, तरच यश मिळेल’ असे उत्तर त्यांच्याकडून मिळत असे. त्यानंतर गर्विता व तिचे मित्र-मैत्रिणी यांनी अनेक पोस्टर्स व बॅनर्स तयार केले, व्यंगचित्रे काढली, घोषणा असलेल्या पट्ट्या तयार केल्या. या सर्व कामात चमकदार शब्द वापरून, मार्मिक निरीक्षणे नोंदवून माणसांच्या वर्तनातील विसंगती ते दाखवू लागले. त्यासाठी नर्मविनोदांचा वापर करू लागले. त्यातून त्यांना मोहिमेचे सोपे सूत्र सापडले. ‘अर्धाच ग्लास, प्लीज!’ असे ते सूत्र.

‘वेटर्सनी ग्राहकांना पाणी देताना अर्धाच ग्लास द्यावा, नंतर लागेल तसे पाणी द्यावे. मागितल्याशिवाय पूर्ण ग्लास देऊ नये’ असे विनंतीवजा आवाहन एकीकडे. त्याच वेळी ग्राहकांनाही विनंतीवजा आवाहन की, ‘अर्धाच ग्लास पाणी भरायला वेटरला सांगा, नंतर लागेल तसे घ्या.’ यापुढे जाऊन, प्रत्येक टेबलावर जग किंवा बाटली ठेवली तर ग्राहक आपल्याला हवे तेव्हाच व हवे तेवढेच पाणी घेण्याची शक्यता वाढते, हे लक्षात घेऊन तसे करण्याबाबत हॉटेलमालकांना विनंती करणे सुरू झाले. आणखी पुढे जाऊन, ‘शक्य असेल त्यांनी पाण्यासाठी मोठे ग्लास न वापरता, लहान किंवा मध्यम आकाराचे ग्लास ठेवावेत’ अशी विनंती सुरू झाली.

हे सर्व करताना त्यांनी ठरवले : छोट्या-छोट्या गटाने जायचे, गोड बोलून, हसत मुद्दा समजावून सांगायचा. नकार आला तर वाद न घालता, न रागावता, निराश न होता बाहेर पडायचे आणि पुढच्या हॉटेलच्या दिशेने चालायचे. घेतलीच त्यांनी पत्रके किंवा भित्तिपत्रके तर ठीक, नाही तर त्याबाबतही आग्रही सूर ठेवायचा नाही. अशी ही मोहीम गर्विता व तिच्या मित्र-मैत्रिणींनी सातत्याने राबवायला सुरुवात केली आणि मग हळूहळू प्रतिसाद मिळू लागला. काही हॉटेलचालक काही सूचनांचा अवलंब करायला तयार होऊ लागले. ग्राहकांच्या सवयी सहजासहजी बदलत नाहीत म्हणून, काही हॉटेलचालक ‘तुमच्या सूचना सध्या तरी आम्ही स्वीकारू शकत नाही, पण असे व्हायला हवे, करायला हवे’ असे म्हणू लागले. ही मुले आली तर लगेच हिडीस-फिडीस करून बाहेर घालवण्याचा विचार करणारे पूर्वीचे हॉटेल चालक-मालक, मुलांचे ऐकून घ्यायला तयार होऊ लागले. मग या छोट्याशा कृतिकार्यक्रमाची बंगळुरु शहरातील प्रसारमाध्यमांकडून दखल घेतली जाऊ लागली. वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या, रेडिओ-टीव्ही यांनी वृत्तांत दिले. काही सुजाण नागरिकांनी प्रोत्साहन दिले. काही स्वयंसेवी संस्थांनी मुलांना पाठिंबा दिला, आर्थिक मदत देऊ केली. आणि मग ‘गर्विता हे सर्व प्रसिद्धीसाठी करते आहे’ असे म्हणणारे इतर मित्र-मैत्रिणींही तिला सामील होऊ लागले.

या सर्व प्रक्रियेत पूजा ही एक मैत्रीण गर्विताला सुरुवातीपासून उत्तम साथ देत होती. मग दोघींनी पुढाकार घेऊन Why Waste? (वाया का घालवायचे?) या नावाने एक संस्था स्थापन केली. तेव्हा गर्विताचे वय होते 15 वर्षे. तेव्हा तिने दहावीची परीक्षा नुकतीच दिली होती. नंतरच्या चार वर्षांत तिने बरीच मोठी मजल मारली आहे, उत्तुंग म्हणावी अशी झेप घेतली आहे. जवळपास 200 हॉटेल्समध्ये ‘अर्धाच ग्लास, प्लीज’ ही मोहीम यशस्वी झालेली आहे. हॉटेलचालकांनी ती स्वीकारली आणि ग्राहकांनीही. त्यामुळे तेथील पाण्याची गरजही थोडी कमी झाली आहे.

Why Waste? या संस्थेत आता 20 वर्षांपेक्षा कमी वयाची अनेक मुले-मुली आहेत. ते स्वयंसेवी पद्धतीने काम करतात. पत्रके, भित्तिपत्रके अशा पारंपरिक माध्यमांचा वापर तर ते करतातच, पण सोशल मीडियाचा वापरही चांगला करतात. त्यांनी स्वतंत्र वेबसाईटही केली आहे. काही ऑडिओ, व्हिडिओ केले आहेत. त्यांचे हे काम पाहून अशोका या संस्थेने Why Waste? ला आर्थिक व तांत्रिक मदत केली. Lead Younge Initiative या प्रकल्पाच्या अंतर्गत Why Waste? ने बंगळुरू, नागपूर, मुंबई, चेन्नई अशा काही मोठ्या शहरांतही असेच काम सुरू केले आहे. त्यात 600 पेक्षा अधिक शाळांमधील मुला-मुलींनी सहभाग नोंदवला आहे.

गेल्या वर्षी म्हणजे ऑगस्ट 2018 मध्ये स्वित्झर्लंड येथे ‘ग्लोबल चेंजमेकर’ची एक परिषद भरवण्यात आली होती. त्या परिषदेत सहभागी होण्यासाठी 185 देशांतून अर्ज मागवण्यात आले होते. त्या हजारो अर्जांची तीन राऊंडमधून छाननी करून, फक्त 60 मुला-मुलींची निवड होणार होती. ही सर्व मुले-मुली 18 ते 23 वर्षे या वयोगटातील असणार होती. तर त्या 60 जणांमध्ये गर्विताची निवड झाली होती. त्या परिषदेला जगातील 42 देशांमधून आलेले जे युवा होते, त्यात गर्विता ही एकमेव भारतीय होती. त्याचे मुख्य कारण खूप लहान किंबहुना क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींची ताकद तिने ओळखली होती, त्यासाठी चिकाटीने व सातत्याने कृती केली होती, अनेकांचा सहभाग मिळवण्यात ती यशस्वी झाली होती आणि मोठ्या समस्येला हात घालून मोठ्या बदलासाठीची दिशा तिने दाखवली होती. तिची ‘अर्धाच ग्लास, प्लीज’ ही कल्पना आता जगातील प्रत्येक देशात राबवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

स्वित्झर्लंडच्या परिषदेसाठी निवड झाल्याचे कळल्यावर गर्विताला प्रचंड आनंद झाला, पण तो व्यक्त करतानाच्या तिच्या भावना मात्र ती किती जमिनीवर आहे, हेच सूचित करणाऱ्या होत्या. ‘‘जगभरातून आलेल्या मुला-मुलींशी संवाद साधून, त्यांच्यासोबत एक आठवडा घालवून, मला खूप शिकायला मिळणार आहे. खूप नव्या कल्पना मी तिथून घेऊन येईन आणि भारतातील तरुण नेतृत्व विकसित होण्यासाठी त्यांचा वापर करीन’’ असे ती म्हणाली.

त्या परिषदेत कोणत्याही मोहिमेचा प्रचार-प्रसार कसा करायचा, त्यासाठी आर्थिक निधी कसा उभा करायचा, प्रकल्प व्यवस्थापन कसे करायचे, नेतृत्व विकसित कसे करायचे आणि जनतेशी संपर्क-संवाद कसा ठेवायचा, इत्यादी अनेक गोष्टी (वेगवेगळ्या देशांतून आलेल्या 60 जणांकडून) तिला शिकायला मिळाल्या.

त्या परिषदेहून भारतात आल्यावर गर्विताने कमी वेळात, कमी श्रमात, कमीत कमी साधने वापरून व कमीत कमी खर्च करून अधिक परिणामकारक काम कसे होईल यावर लक्ष केंद्रित केले. सामाजिक उद्योजकता आणि इनोव्हेशन्स या माध्यमातून मूलगामी व मोठे बदल घडवण्यासाठी ती आता काम करते आहे. मार्च 2019 मध्ये तिच्या या प्रयत्नांना खूपच मोठे यश मिळाले आहे. राष्ट्रीय हॉटेलचालक संघटनेचे (NRAI) अध्यक्ष राहुल सिंग यांनी गर्विताची संस्था Why Waste? बरोबर भागीदारी केली आहे. ती भागीदारी कशासाठी? तर गर्विताला अभिप्रेत पाण्याची बचत करणे व वाया न घालवणे यासाठी. म्हणजे Why Waste? चा कृतिकार्यक्रम NRAIने स्वीकारला आहे. NRAI या संघटनेत एक लाखांपेक्षा अधिक हॉटेल्सचा समावेश आहे. लवकरच त्या संघटनेच्या अध्यक्षांकडून सर्व एक लाख हॉटेल्सना अशी नोटीस जाणार आहे की, ‘Why Waste? ने सुचवलेल्या पर्यायांचा अवलंब करावा.’

गर्विता व तिची संस्था आपर्यंत प्रामुख्याने पाणी- वापराबाबत जनजागृती करीत आली आहे. परंतु त्याचबरोबर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबतही काम चालू आहे. घरोघरी तयार होणारा ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्र साठवणे, स्वतंत्र कुंड्यामध्ये टाकणे, स्वतंत्र गाड्यांनी तो वाहून नेणे यासाठी लोकांचे प्रबोधन करीत आहेत. घरातील लोकांचे, हॉटेलात काम करणारांचे व तो कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांच्या कामगारांचे ही इतके साधे काम जरी सातत्याने व मोठ्या प्रमाणात होत राहिले, तरी आपल्या पर्यावरणाचे प्रदूषण कितीतरी कमी होईल, असे गर्विता व पूजा मोठ्या पोटतिडकीने व कल्पकतेने पटवून देत आहेत.

गर्विताचे हे यश पाहूनच बीबीसी वर्ल्ड या वृत्तवाहिनीने तिचा उल्लेख भारताची ग्रेटा थुनबर्ग असा केला आहे. तर ‘अर्धाच ग्लास, प्लीज’ ही आता घोषणा म्हणून सार्वत्रिक व्हायला हवी. हॉटेल्समध्ये, घरांमध्ये, कार्यालयांमध्ये आणि शाळा- कॉलेजांमध्येही!

गर्विता म्हणते, ‘‘आपल्याकडे अर्धा ग्लास भरलेला आहे असे म्हणणाऱ्यांना आशावादी तर अर्धा ग्लास रिकामा आहे असे म्हणणाऱ्यांना निराशावादी असे संबोधले जाते. मी मात्र आशावादी नाही आणि निराशावादीही नाही, मी संवर्धनवादी आहे.’’ म्हणजे आपल्याजवळ काय आहे आणि काय नाही, यांवर वाद-चर्चा करण्यापेक्षा जे काही आहे ते जपून वापरणे, त्याचा गैरवापर थांबवणे आणि ते सर्वांना मिळेल असे पाहणे हे आता गर्विताचे जीवनध्येय झाले आहे. या वर्षीच्या जागतिक जलदिनाची थीम होती, ‘कोणालाही मागे सोडू नका’ (Leave no one behind). त्यासाठी गर्विताने हाती घेतलेले काम कोणाही भारतीयाला गर्व वाटावा असे आहे!

ताजा कलम :

महात्मा गांधींचे एक अनुयायी जी.रामचंद्रन यांनी सेवाग्राम आश्रमातील एक आठवण नोंदवून ठेवली आहे. एका भल्या दुपारी कडक उन्हाळ्यात गांधीजी त्यांच्या कुटीत बसले आहेत, लोक भेटायला येत आहेत. एकाशी बोलणे होईपर्यंत इतर मागे शांतपणे बसून आहेत. बराच वेळ बसून असलेल्या, पण नंबर अद्याप आलेला नाही असा एक माणूस उठतो, खिडकीत ठेवलेल्या माठातून ग्लासने पाणी घेतो, पितो आणि उरलेले खिडकीच्या बाहेर असलेल्या छोट्या झाडावर ओतून देतो. तत्क्षणी, गांधीजी समोरच्याशी चालू असलेले बोलणे थांबवून त्या गृहस्थाला पुढे बोलावतात. विचारतात, ‘तुमचे वय किती आहे?’ तो गृहस्थ गडबडून जातो, हा प्रश्न बापू का विचारताहेत हे त्याला कळेनासे होते. तरीही तो घाबरत का होईन सांगतो, ‘बावन्न वर्षे’. गांधीजी पुढे विचारतात, ‘तुम्ही स्वत:च्या हाताने घेऊन पाणी कधीपासून पिता?’ तो पुन्हा गोंधळून जातो आणि उत्तरतो, ‘पाच-सहा वर्षांचा असेन तेव्हापासून.’ गांधी विचारतात, ‘याचा अर्थ, तुम्ही मागील 47 वर्षे स्वत:च्या हाताने घेऊन पाणी पिता?’

‘हो’ तो गृहस्थ उत्तरतो.

गांधीजी पुढे प्रश्न विचारतात, ‘आणि तरीही, आपल्याला एका वेळी तहान लागल्यावर किती पाणी लागते याचा अंदाज तुम्हाला येत नाही?’

लेखन : विनोद शिरसाठ

vinod.shirsath@gmail.com

Share on Social Media

भारताचा जॅक्सन पोलॉक?

शौर्य महानोत (मध्य प्रदेश)

शौर्यच्या या चित्रकलेमुळे वयाच्या पाचव्या वर्षीच एक विलक्षण घटना घडली. रॅमन मॅगसेसे पुरस्कारविजेते, पद्मभूषणप्राप्त प्रख्यात व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी शौर्यला आपल्या पुण्यातील निवासस्थानी बोलावून घेतले. आणि त्याच्या चित्रकलेचे प्रात्यक्षिक पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. शौर्यने त्यांच्यासमोर एक चित्र काढून दाखवले. त्या वेळी त्याच्या कलेने लक्ष्मण आनंदित झाले. ‘कायम चित्र काढत राहा’ असा आशीर्वादही त्यांनी दिला.

आज आपण रंगांसोबत खेळणाऱ्या एका मुलाची गोष्ट वाचणार आहोत. आज तो बारा वर्षांचा आहे. 2011 मध्ये हा मुलगा चार वर्षांचा होता, तेव्हा त्याने काढलेल्या चित्रांचं मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये प्रदर्शन भरलं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे, संपूर्ण प्रदर्शन फक्त त्याच्या चित्रांनीच सजलं होतं. प्रदर्शन भरलं एवढीच आश्चर्याची गोष्ट नाहीये, तर हा मुलगा ‘स्वतःची पेंटिंग स्टाईल’ असणारा जगातला सर्वांत लहान चित्रकार म्हणून ओळखला जातोय. या मुलाचे नाव आहे शौर्य महानोत! मध्य प्रदेश राज्यातल्या निमच या छोट्या शहरात राहणारा शौर्य त्याच्या अमूर्त चित्रशैलीसाठी ओळखला जातो. अमूर्त चित्रांना इंग्रजीत ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणतात.

अमूर्त चित्र किंवा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगबद्दल तुम्ही कधी काही ऐकलंय? तुम्हाला कधी एखादं ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग बघायला मिळालंय? नाही? हरकत नाही. पण कधी तरी एखाद्या संध्याकाळी निळं आकाश दिसत असताना, त्यावरून हळूच सरकणारे पांढरे ढग बघणं आणि त्या ढगांमध्ये दिसणाऱ्या विविध आकृती शोधणं, असा खेळ तुम्ही कधी खेळला आहात का? निश्चित खेळला असणार! या खेळाची एक गंमत म्हणजे, आपल्यासोबतच्या प्रत्येक व्यक्तीला एकाच ढगात वेगवेगळ्या आकृती दिसतात! ‘ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्ज’चंसुद्धा असंच काही तरी आहे. ही पेंटिंग्ज आपण बघतो तेव्हा त्यात काही रंग ओतल्यासारखे, पसरवल्यासारखे दिसतात आणि त्यातूनच काही आकार आपोआपच तयार झालेले दिसतात. या पेंटिंग्जकडे बघणाऱ्या प्रत्येकालाच त्यात वेगवेगळे काही तरी दिसू शकते. म्हणूनच तर त्याला अमूर्त म्हणतात. अमूर्त किंवा ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजेच जे मूर्त नाही.

थोडक्यात काय, तर ज्या चित्रांत प्रत्येकाला आपले आकार शोधता येतात, अर्थ लावता येतात- ती अमूर्त/ॲब्स्ट्रॅक्ट चित्रे. बाप रे! इतक्या लहान शौर्यला हे सगळं कसं काय माहीत? त्याने त्याचं पहिलं चित्र कसं काढलं असेल? त्याला हे कुणी शिकवले असेल?- असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनात आले ना? तर एकदा घडलं असं...

शौर्यच्या मोठ्या बहिणी श्रेया आणि श्रुती रंगांचे डबे व कागद घेऊन चित्र काढत बसल्या होत्या. काही तरी कामानिमित्त आईने त्यांना बाहेरच्या खोलीत बोलवलं. बराच वेळ त्या काही परत आल्या नाहीत. खेळत-खेळत तीन वर्षांचा शौर्य त्यांच्या खोलीत पोहोचला, तेव्हा त्याचं लक्ष त्या रंगांच्या डब्याकडे गेलं. त्याला ते रंग इतके आकर्षक वाटले की, त्याने त्यातले काही रंग कागदावर मनसोक्त ओतले आणि पूर्ण ताकदीने आपले हात वेगवेगळ्या प्रकारे त्या कागदावर फिरवले. बराच वेळ तो त्यात रमला होता. काही वेळाने त्याच्या बहिणी आल्याने तो एकदम भानावर आला.

शौर्यने केलेला हा पराक्रम पाहून एका बहिणीने आईला मोठ्याने हाक मारली. हाक मारल्याबरोबर शौर्य घाबरला आणि पटकन जाऊन एका टेबलाखाली लपला. आई आली आणि झालेला प्रकार पाहून ती थक्क झाली. तिने शौर्यला प्रेमाने बाहेर बोलावून घेतले आणि त्याचे भरभरून कौतुक केले. संध्याकाळी शौर्यचे बाबा घरी आल्यानंतर आई आणि दोघी बहिणींनी मोठ्या कौतुकाने शौर्यचे चित्र बाबांना दाखवले. बाबाही ते पाहून खूप आश्चर्यचकित झाले. त्याची बहीण बाबांना म्हणाली, ‘‘शौर्यच्या मनात रंगांबाबतीत एक अनामिक आकर्षण तर आहेच, पण त्याला त्याची आवडसुद्धा दिसत आहे. आपण त्याला रंगांचा बॉक्स आणि काही कॅनव्हास गिफ्ट देऊ या का? त्याला ते आवडेल.’’

आणि तिथूनच शौर्यचा चित्रकलेचा प्रवास सुरू झाला. तो त्याच्या आकारापेक्षा मोठ्या कॅनव्हासवर तासन्‌तास बसून त्यावर वेगवेगळे रंग शिंपडायचा. कधी कधी तर त्यासाठी वेगवेगळ्या करामतीही करायचा. आता पाहा हां- जसं आपण क्रिकेट खेळताना बॉलिंग करतो, तसं हातात रंगाने माखलेला ब्रश घेऊन, खांद्यापासून गोल हात फिरवत तो समोर असलेल्या कॅनव्हासवर त्या ब्रशमधले रंग शिंपडायचा. त्याला त्यात मजा वाटायची आणि काही वेळानंतर समोर एक अद्‌भुत चित्र तयार झालेलं असायचं. शौर्यला रंगनिवडीचे ज्ञानही जणू काही ‘गॉड गिफ्ट’ आहे, असं त्याचं चित्रं पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटायचं.

तेव्हा शौर्य इतका लहान होता की, त्याला त्याच्या रंगांच्या बाटल्यासुद्धा स्वतःहून उघडता येत नव्हत्या. त्याचे मोठमोठे कॅनव्हास आणि पेंटिंगसाठी लागणारं सारं सामान आणण्यासाठी, आवरण्यासाठी, नीट रचून देण्यासाठी, त्याच्या दोन्ही बहिणी आणि आई-वडील खूप मदत करायचे.

शौर्यचे बाबा आणि आजी हेसुद्धा उत्तम कलाकार आहेत, मात्र निमचसारख्या छोट्याशा शहरात राहत असल्याने त्यांची कला फार लोकांपर्यंत पोहोचली नाही. आपल्या मुलाबाबत असं होऊ नये, म्हणून ते कुटुंब शौर्यच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या क्षेत्राबद्दलची विविध प्रकारची महत्त्वाची माहिती शौर्यला मिळवून देणे, त्याला लागणाऱ्या वस्तू आणून देणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्याच्यावर कोणतीही जबरदस्ती न करणे; त्याच्या मनाप्रमाणे त्याला वाटेल तेव्हा, वाटेल तितका वेळ चित्र काढत राहू देणे- अशा प्रकारे त्याचे कुटुंबीय त्याला वागवतात. कधी कधी तर शौर्य चित्र काढता-काढताच खेळायला पळतो, भलतंच काही तरी काम करतो किंवा थोडा वेळ ब्रेक घेऊन मग उरलेलं चित्र काढतो.

अर्थात, शौर्य काही दिवसभर चित्रच काढत बसत नाही. काही वेळा कार्टून बघतो. शाळेचा होमवर्क करायला त्रासही देतो. कधी कधी बास्केट बॉल, क्रिकेट या खेळांमध्ये रमतो आणि इतकं सगळं करून परत रंगांच्या दुनियेकडे धाव घेतो. शौर्य इतका लहान आहे की, त्याला चित्रांबाबत तांत्रिक गोष्टी माहीतसुद्धा नाहीत. म्हणजे अगदी त्याने दोन रंग मिसळून तिसरा नवा रंग तयार केला तरी त्याला त्या रंगाचं नावसुद्धा सांगता येत नाही. मात्र त्याला त्या रंगांचे स्पर्श आवडतात. वेगवेगळ्या रंगांना एकत्र करणं आवडतं. त्यातून तयार होणाऱ्या नक्षी, आकार त्याला भावतात. मजा येते म्हणून तो पेंटिंग करतो. जेव्हा जसा मूड असतो तसे रंग तो निवडतो, कॅनव्हासवर ते उतरवतो.

शौर्यचा आवडता पेंटर जॅक्सन पोलॉक आहे आणि गंमत म्हणजे जगभरातल्या अनेक लोकांनी शौर्यला छोटा जॅक्सन पोलॉक असंदेखील म्हटलं आहे. या जॅक्सन पोलॉकची गोष्टसुद्धा वेगळीच आहे. जॅक्सन 1912 मध्ये अमेरिकेत जन्माला आला. भित्तिचित्रे काढण्यामध्ये त्याचं शिक्षण झालं होतं. पण नंतर त्याने ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग सुरू केलं. तो भल्या मोठ्या कॅनव्हासवर रंग ओतायचा आणि संपूर्ण शरीराचा जोर वापरून ते रंग पसरवायचा. कधी कधी तर तो ब्रशऐवजी चाकू, झाडूच्या काड्या, काठ्या, वाळू या वस्तूसुद्धा वापरायचा. त्यातून चित्राला एक वेगळाच इफेक्ट यायचा. कधी कधी तर त्याच्या चित्रांवर त्याच्या पायाचे ठसेदेखील असायचे.

जॅक्सन पॉलॉकचं असं म्हणणं होतं की, अशा प्रकारे चित्र काढल्याने अंतर्मनातल्या भावना कॅनव्हासवर उमटतात आणि चित्र पाहणाऱ्यापर्यंत विविध पद्धतीने पोहोचतात. या कलेच्या प्रकाराला ॲब्स्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम असं म्हणतात. या प्रकारात फारसे नियम नसल्याने, कलाकाराने स्वतःचीच एक नवी शैली तयार करून ही चित्रं काढायची असतात. कधी कधी याला ‘ऑटोमॅटिझम’ असंसुद्धा म्हणतात. याचा अर्थ असा की- तुम्हाला कशाचं चित्र काढायचं आहे, तुमच्या डोक्यात कोणता विषय घोळत आहे, अशी कुठलीही आखणी तुम्ही चित्र काढण्याआधी बनवत नाही. अशी चित्रं बनवण्यासाठी बाय चान्स किंवा अनपेक्षितपणा याचा वापर करता.

हे इतकं मजेशीर आहे की, याची एक कृती तर आपण करून बघायलाच पाहिजे. उदाहरणार्थ एक कागद आणि पेन घ्या. कागदावर पेनाचे टोक कुठे तरी ठेवा आणि तुमचे डोळे बंद करून वाटेल तिकडे तो पेन फिरवा. काही वेळानंतर डोळे उघडा आणि ढ्याणटॅढ्याण! या प्रकारातली तुमची पहिली कलाकृती साधारण तयार झाली!

तर, जितकी गंमत आपल्याला ही कलाकृती करताना येईल, तितकीच मजा शौर्यला त्याचे चित्र काढताना येत असते. केवळ रंगांसोबत खेळणे इथपर्यंत शौर्य थांबला नाही, पुढच्या काहीच वर्षांत त्याने स्वतःची एक वेगळी शैली शोधून काढली. या शैलीत तो त्याचे ठरलेले रंग त्याला आवडत असलेल्या पद्धतीने कॅनव्हासवर पसरवतो. नंतर ते चित्र वाळेपर्यंत थांबतो आणि मग काही विशिष्ट आकारात किंवा पद्धतीने त्या चित्रावर चिकटपट्टी चिकटवून, त्यावर पांढऱ्या रंगाचा एक हलकासा थर देतो आणि तो थर वाळल्यावर त्या चिकटपट्‌ट्या ओढून काढतो. त्यानंतर निर्माण झालेलं चित्र अद्‌भुत असतं.

शौर्य आता बारा वर्षांचा आहे. सर्वांत लहान वयाच्या चित्रकारांपैकी एक असणाऱ्या या शौर्यने आजवर त्याच्या एकट्याच्या चित्रांची प्रदर्शने ठिकठिकाणी भरवली आहेत. त्यातील काही नावं सांगायची तर- न्यूयॉर्क येथील आर्टएक्स्पो, मुंबईमध्ये मायक्रोसॉफ्ट्‌स फ्युचर डिकोडेड प्रदर्शनात. अमेरिकेतील न्यू जर्सी येथील गॅलरीमध्ये तो फिचर्ड आर्टिस्ट आहे. अमेरिकेतील जॉन लेनोन हा संगीतकार व अँथोनी क्वीन या अभिनेत्यांच्या चित्रांसोबतही त्याची चित्रे प्रदर्शनात लागली आहेत. आजपर्यंत एकूण 62 हजार डॉलर्स इतकी कमाई त्याच्या चित्रांनी केली आहे!

शौर्यच्या या चित्रकलेमुळे तो पाच वर्षांचा होता तेव्हा एक विलक्षण घटना घडली. रॅमन मॅगसेसे पुरस्कारविजेते, पद्मभूषणप्राप्त विख्यात व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी शौर्यला पुण्यातील निवासस्थानी बोलावून घेतले होते आणि त्याच्या चित्रकलेचे प्रात्यक्षिक पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. शौर्यने त्यांच्यासमोर एक चित्र काढून दाखवले. त्या वेळी लक्ष्मण त्याच्या कलेने आनंदित झाले. ‘कायम चित्र काढत राहा’ असा आशीर्वादही त्यांनी दिला, त्याचा सत्कारही केला.

एका नामवंत व्यंगचित्रकाराकडून अशी दाद मिळणे ही शौर्यसाठी खूप भारावून टाकणारी गोष्ट होती. शौर्यने स्वतःची वेबसाईटसुद्धा स्वतःच डिझाईन केली आहे. तिथे त्याच्या चित्रांविषयी, आजवरच्या प्रवासाविषयी माहिती उपलब्ध आहे. त्याची सुंदरसुंदर चित्रेही इथं पाहायला मिळतात. नेहमीप्रमाणे या कामीही त्याला कुटुंबीयांनी मदत केली.

आणि हो, आणखी एक विशेष म्हणजे, नुकताच त्याने मायक्रोसॉफ्टबरोबर एक करारही केला आहे. या करारांतर्गत तो त्याची ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्ज डिजिटल पद्धतीने बनवणार आहे. शौर्यचे आई-वडील पुष्पा व आदित्यसिंग महानोत, दोन बहिणी श्रेया व श्रुती आणि त्याच्या कलेची जाण असणारे इतर लोक यांच्यामुळे शौर्यला अनुकूल वातावरण मिळत गेले. त्यामुळे तो त्याच्या संपूर्ण क्षमता अजमावू शकत आहे. ‘मोठेपणी तुला काय व्हायला आवडेल?’ असं एका मुलाखतीत विचारल्यावर शौर्य अगदी निरागसपणे म्हणाला, ‘‘आर्टिस्ट.’’ तुमच्या आमच्यातसुद्धा असा एक आर्टिस्ट कायम असतो. आपण आपल्यातला असा आर्टिस्ट शोधण्याचा प्रयत्न केला, तर तो कुठल्या ना कुठल्या रूपात सापडेलच.

लेखन : दिपाली अवकाळे

Deepaliawkale.25@gmail.com

Share on Social Media

तांड्यातून एव्हरेस्टवर

पूर्णा मलावत (तेलंगणा)

एका बाजूला बर्फाचा कडा, दुसऱ्या बाजूला दरी. शेवटी बरंच अंतर पुढं चालून गेल्यावर बसायला जागा मिळाली. पाहिलं तर तिचा ऑक्सिजन संपलेला होता. तिला दुसरा सिलिडर लावला आणि पुन्हा ट्रेक सुरू झाला. ती निडरपणे सलग 52 दिवस चढाई करत राहिली. मोहीम फत्ते व्हायला पंधरा मिनिटांचं अंतर बाकी होतं, नेमक्या त्या वेळी समोर एक मृतदेह दिसला. एवढीशी पोर क्षणभर बिचकली. ‘आपणही इथंच तर मरून पडणार नाही ना... आपण परत जाऊ ना?’ अशी शंका तिच्या मनात आली.

हैदराबादजवळील भोनगीर डोंगराच्या पायथ्याशी उभी राहून तेरा वर्षांची पूर्णा विचारात पडली. साडेसातशे फुटांचा हा खडक कसा चढून जायचा? आयुष्यात पहिल्यांदाच ती रॉक क्लायंबिंग करणार होती. पायथ्याशी क्षणभर घाबरली, पण मग सरसर चढली. तेही दोरखंडाचा आधार न घेताच. त्यानंतर तीन महिन्यांनीच ती माऊंट एव्हरेस्टच्या बेसकॅम्पपर्यंत पोहोचली. जगातील सर्वांत उंच 29,029 फूट उंचीचे पांढरे शुभ्र शिखर तिच्यासमोर उभे होते. ती क्षणभर त्या शिखराकडे पाहत प्रशिक्षकांना उत्साहाने म्हणाली, ’It’s not that tall, we can climb in day- एव्हरेस्ट काही फार उंच वाटत नाहीये, आपण एका दिवसांत चढून जाऊ शकतो.’ छोटासा डोंगर चढायची भीती वाटलेली पूर्णा निरागसतेने एव्हरेस्टच्या उंचीला वाकुल्या दाखवत होती. सरांनी हलकं स्मित केलं.

पूर्णा बिचारी... तिला वाटलं तसं ती काही एका दिवसात एव्हरेस्ट चढली नाही. ते शक्यच नव्हतं. हं, मात्र 52 दिवस सलग चढाई करून शिखराला पायाखाली घेतलेच तिने! दि.25 मे 2014- शिखर सर केलेला दिवस. त्या दिवसानंतर संपूर्ण जग तिला एव्हरेस्ट शिखरावर चढणारी सर्वांत लहान वयाची मुलगी म्हणून ओळखतं. हा जागतिक विक्रम घडला तेव्हा तिचं वय होतं- फक्त 13 वर्षे 11 महिने. खरं तर ती नेपाळच्या ज्या अवघड कठड्यावरून चढत गेली, तिथून चढण्याचे धाडस फार कमी लोक करतात आणि 16 वर्षांखालील मुलांना तर परवानगीच देत नाहीत. पण मुली काहीही करू शकतात, हे पूर्णाने सिद्ध करून दाखवलं.
पूर्णा मलावत, तेलंगणाच्या निझामाबाद जिल्ह्यातील पाकाला तांड्यातली आदिवासी मुलगी. पाकाला हा आधुनिक वस्तीपासून शेकडो मैल लांब निबिड अशा अरण्यात, डोंगराच्या कुशीत वसलेला छोटासा तांडा. अवघी शे-दीडशे झोपडीवजा घरं. रस्ते, वीज, दवाखाना इत्यादी सुविधा तिथं पुरेशा नाहीत. याच तांड्यावरचे देवीदास आणि लक्ष्मी या दांपत्याच्या घरी एका भावाच्या पाठी पूर्णाचा जन्म झाला. चौकोनी कुटुंब, पण खायची ददात. पूर्णाचे आई-वडील दोघंही शेतमजूर. दुसऱ्याच्या शेतात जाऊन राबत आणि त्यातून येणाऱ्या मजुरीवर आपल्या कुटुंबाची गुजराण करत.

पाकाला गावातल्याच शाळेत पूर्णाने पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. घरची आर्थिक परिस्थिती पाहता पाचवीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी तिला घरापासून दूर जाणं भाग होतं. तेलंगणामध्ये एक चांगली सोय आहे. तिथं उपेक्षित, दुर्लक्षित अशा आदिवासी जमातीतल्या मुलांना मोफत शिक्षण आणि उत्तम आहार मिळावा म्हणून शासनाच्या निवासी शाळा (आश्रमशाळा) आहेत. त्याला तेलंगणा सोशल वेल्फेअर रेसिडेन्शियल स्कूल म्हटलं जातं. पूर्णाने अशाच अशाच एका निवासी शाळेत प्रवेश घेतला. अवघ्या दहाव्या वर्षी ती या निवासी शाळेत शिक्षणासाठी आली.

एवढ्या लहान वयात घर सोडून येताना काय काय वाटलं असेल ना तिला! पण शिक्षणसुद्धा महत्त्वाचं आहेच. हळूहळू ती शाळेत रमली. जेवणाची भ्रांत असणाऱ्या पूर्णाला पौष्टिक आहारही मिळू लागला. शाळा तिला आवडू लागली. शाळेत तिचा खेळाकडे चांगला ओढा निर्माण झाला.

खरं तर जंगलात राहणारी आदिवासी मुलं चांगलीच काटक असतात. पूर्णादेखील कबड्डी, व्हॉलीबॉल आणि ॲथलेटिक्स या खेळांमध्ये चमकदार कामगिरी करत होती. खेळातली तिची रुची क्रीडाशिक्षकांच्या लक्षात आली होती. बघता-बघता, सोशल वेल्फेअर शाळेत आलेली पूर्णा नववीत गेली. तिचं शाळा, खेळ, अभ्यास हे रुटीन सुरूच राहिलं.

दरम्यान सोशल वेल्फेअर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ॲडव्हेंचर स्पोटर्‌स आयोजित केले पाहिजेत, असा कल्पक विचार आर.एस. प्रवीणकुमार यांनी मांडला. प्रवीणकुमार हे आयपीएस अधिकारी आहेत. त्याचबरोबर सोशल वेल्फेअर सोसायटीचे सचिवही. त्यांना नावीन्यतेचा नेहमीच ध्यास. त्यातून ते मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कल्पक उपक्रम राबवतात. ॲडव्हेंचर स्पोटर्‌सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गिर्यारोहणाची संधी देऊन त्यांचा आर्थिक भारही उचलायचा, असा त्यांचा उद्देश होता. क्रीडाशिक्षकांनी पूर्णाला बोलावून घेतले आणि सांगितलं, ‘‘पूर्णा, या उपक्रमासाठी तुझी निवड केली आहे.’’

पूर्णाला आनंद होण्यापेक्षा प्रश्न पडला- ‘गिर्यारोहण’ हे काय बरं असतं? पर्वत चढाई हा काय क्रीडाप्रकार आहे? तोवर तिनं कधी उंच पर्वतरांगा पाहिल्याच नव्हत्या. आता ते सारं तिला माहीत होणार होतं. हैदराबादपासून 43 किमी अंतरावर असणाऱ्या भोनगीर इथं रॉक क्लायंबिंग ट्रेनिंगसाठी ती गेली.

भोनगीरचा मूळ उच्चार भुवनगिरी. पण लोक भोनगीरच म्हणतात. भोनगीरच्या टेकडीवरचा किल्ला पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. भोनगीरच्या दगडी भिंतीवर दोरखंडाच्या मदतीने चढाई केली जाते. रॉक क्लायबिंगमध्ये नैसर्गिक किंवा कृत्रिम दगडी भिंतीच्या बाजूने चढाई केली जाते. काही वेळा दोरखंडाच्या साह्याने सुरक्षेची तजवीज करून चढाई केली जाते, तर काही वेळा दोरखंडाशिवाय. पूर्णा मात्र या डोंगराची 750 फूट उंची पाहून घाबरली. ‘बापरे, किती उंच...! पोटात भीतीचा गोळा आला. कसं होणार? ही दगडी भिंत कशी चढायची?’ इथं तिच्या मदतीला धावून आले शेखरबाबू बचीनेपल्ली. त्यांनी तिला धीर दिला. ‘‘तू करू शकतेस पूर्णा... फार अवघड नाहीये.’’ प्रोत्साहन देतच त्यांनी चढाईसंदर्भातील काही सूचना सांगितल्या.

हे शेखरबाबू स्वत: गिर्यारोहक. त्यांनी स्वत: माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली आहे. पूर्णाच्या या ट्रेनिंगचे प्रशिक्षक. शेखरबाबूंच्या सूचनांवर विश्वास ठेवत पूर्णाने भोनगीरच्या दगडी भिंतीवर दोरखंडाशिवायच चढाई केली. शेखरबाबू तिची ही कमाल पाहतच राहिले. ‘या मुलीत काही तरी स्पार्क आहे’- त्यांनी मनातल्या मनात तिची नोंद केली. भोनगीर रॉक क्लायंबिंग पूर्ण झाले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आधीची भीती नव्हती, उलट उत्साहच होता. ‘‘मला फार छान वाटतंय. चढण्याआधी पाय लटपटत होते, पण आता पाय लटपटायचे थांबलेत. मला ही चढाई जमली.’’ पूर्णा आनंदाने सर्वांना सांगत राहिली.

पुढं पाच दिवस प्रशिक्षण चाललं. रॉक क्लायंबिंग, रॅपलिंग, बाऊंडरिंग शिकवण्यात आलं. या प्रशिक्षणात ‘ए’ ग्रेड मिळवून ती पहिली आली. तिच्यासोबत 110 विद्यार्थी होते. त्यातील 20 जणांची निवड पुढच्या ट्रेनिंगसाठी झाली. खरं तर रॉक क्लायंबिंग ट्रेनिंगची ही सुरुवात पूर्णाच्या जागतिक विक्रमाची मुहूर्तमेढ आहे, हे शेखरबाबू सोडून कोणालाच ठाऊक नसणार. उत्तम प्रशिक्षकाने आपला उत्तम शिष्य निवडून झाला होता, आता त्याला आकार देण्याचं काम बाकी होतं. पुढचं ट्रेनिंग दार्जिलिंगला होणार होतं. सचिव प्रवीणकुमार आणि शेखरबाबू यांनी पूर्णाच्या कुटुंबीयांना फोन केला. गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी पूर्णाला दार्जिलिंगला घेऊन जाणार असल्याचे कळवले. आपली मुलगी काही तरी करू पाहतेय, असे म्हणत तिच्या पालकांनी आनंदाने पाठिंबा दिला.

पुढची लहान-मोठी तयारी करून शेखरबाबूंसोबत वीस जणांची टीम दार्जिलिंगला पोहोचली. पूर्णा आयुष्यात पहिल्यांदाच बर्फ पाहत होती. तिने बर्फातून चालून पाहिलं. तिला मज्जा वाटू लागली. पण तिथं ती नुसती मौज करायला गेली नव्हती. तिनं स्थानिक प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणं गरजेचं होतं. मात्र जेव्हा ती स्थानिक प्रशिक्षकांना भेटली, तेव्हा ते गडबडले. ‘‘अरे, ही लहान मुलं काय करणार आहेत? आम्हाला वाटलं, तुम्ही मोठ्या व्यक्तींना घेऊन येत आहात. ही चिल्लीपिल्ली काय करणार आहेत?’’ पूर्णाला वाटलं, ‘का नाही करू शकणार? जरूर करू शकतो. आता तर उलट करूनच दाखवू.’ तिची जिद्द अधिक वाढली. प्रशिक्षण 20 दिवस चाललं. या प्रशिक्षणाचा भाग म्हणून तिने 17 हजार फूट उंचीचा माऊंट रिनॉकदेखील सर केला. या प्रशिक्षणानंतर अकरा जणांची गळती झाली आणि फक्त नऊ जणांची पुढच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्यात पूर्णाचा समावेश होता.

प्रशिक्षणाचा पुढचा टप्पा तर अधिकच अवघड होता. लडाखमध्ये त्या वेळेस थंडीचे दिवस सुरू होते, उणे 30-35 डिग्री सेल्सिअस तापमान होते. इतकी थंडी असल्याने स्थानिक लोक आपापली गावं सोडून अन्य ठिकाणी जात होते आणि नेमक्या त्याच दिवसांत पूर्णा लडाखला चालली होती. तिथे 15 दिवस प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणात खूप थंडीत, उणे तापमानात कसं तग धरून राहायचं, थंडीशी सामना करण्यासाठी शरीरावर किती स्तरांत कपडे व हातमोजे-पायमोजे घालायचे, ते कसे घालायचे हे शिकवले, टेन्टमध्ये कसं राहायचं या गोष्टींचा अभ्यास केला गेला.

या दोन्ही प्रशिक्षणांनंतर नऊपैकी किती जणांची निवड व्हावी? तर फक्त दोघांची! अकरावीतला आनंद कुमार आणि नववीतली पूर्णा. कुठल्याही साध्यासुध्या नव्हे, तर जगातले सर्वांत उंच शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टच्या चढाईसाठी ही निवड होती. माऊंट एव्हरेस्ट चढायचा असल्याने आणखी एका विशेष प्रशिक्षणाची गरज होती. हे प्रशिक्षण तीन महिने चालणार होतं. शारीरिक तयारीबरोबर मानसिक तयारीही करायची होती.

त्यामुळे तिचा दिवस पहाटेच सुरू व्हायचा. 25 ते 30 किमी धावणे, मग व्यायाम, योगासने, मेडिटेशन आणि उत्तम आहार. या प्रशिक्षणाच्या दिवसांमध्ये तिचा शालेय अभ्यासही सुरूच होता. दरम्यान, एप्रिलमध्ये तिने नववीची अंतिम परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर शेखरबाबूंनी तिच्या पालकांना बोलावून घेतले. गिर्यारोहणाला जाण्यापूर्वी पालकांची परवानगी घेणं आवश्यक होतं. देवीदास-लक्ष्मी या तिच्या आई-बाबांना समोर बसवून शेखरबाबूंनी माऊंट एव्हरेस्टचे काही फोटो व व्हिडिओ दाखवले. ‘‘या उंच शिखरावर चढण्यासाठी तुमची मुलगी सज्ज आहे. फक्त एकच मुद्दा आहे- ही चढाई अवघड आहे. कदाचित काही अनर्थ घडलाच तर तिथंच मृत्यूसुद्धा येण्याची शक्यता आहे. तिची खरं तर शारीरिक-मानसिक पूर्ण तयारी करून घेतलेली आहे, तरीही तुमची परवानी हवी.’’

शेखरबाबूंचं बोलून होताच देविदास तत्काळ उत्तरले, ‘‘तुम्ही इतके दिवस तिची तयारी करून घेतलीय आणि आता तीसुद्धा एव्हरेस्ट चढाईसाठी सक्षम झाली आहे. शिवाय तुम्हीच तिला घेऊन जाणार आहात. त्यामुळे मला कशाचीही चिंता नाही. माझी मुलगी निश्चितच तुमच्या अपेक्षा पूर्ण करून दाखवेल, यात शंका नाही.’’ वडिलांनी असा विश्वास टाकल्यावर पूर्णाला अधिकच प्रोत्साहन मिळालं. आईला मात्र रडू कोसळलं. पूर्णाने आपल्या आईला विश्वास दिला की, ‘‘तू रडू नकोस मला काही होणार नाही. मी यशस्वी होऊन पुन्हा तुझ्याकडं येणार आहे.’’ शेवटी लेकीच्या जिद्दीपुढं आई विरघळली.

पूर्णाची एव्हरेस्टमोहीम सुरू झाली. माऊंट एव्हरेस्टचे शिखर हिमालयात आहे. एव्हरेस्टच्या एका बाजूने नेपाळ व चीनचा सीमाभागही येतो. एप्रिलच्या 14 तारखेला एव्हरेस्ट बेसकॅम्पवर ती पोहोचली. ती एव्हरेस्टचं शिखर पहिल्यांदाच पाहत होती. पण त्या उंचीने जराही घाबरली नाही. तिथं पाच दिवस टेन्टमध्ये राहून तिने हिमरस्त्यावरून चालण्याचा व्यायाम केला. त्याच दिवसांत बातमी आली- ‘नेपाळच्या बाजूने हिमस्खलन झाल्यामुळे 17 शेरपांचा मृत्यू झाला आहे.’ ही बातमी कळताच प्रवीणकुमार यांनी फोन केला. ‘‘बेटा, तुम्ही परत या. तुमच्या जीवाला धोका आहे.’’ ते म्हणाले.

‘‘सर तुम्हीच म्हणालात ना, आपल्या शाळेतील मुलांसाठी रिव्हर्स गियर नसतो. मृत्यूच्या या बातमीनं मी दु:खी जरूर झाले आहे; मात्र मी माझा आत्मविश्वास, ऊर्जा आणि इच्छाशक्ती गमावू शकत नाही. माझ्यासमोर माझं ध्येय दिसत आहे. आता मी ही चढाई यशस्वी करूनच येणार.’’

या मृत्यूच्या बातमीने तिचं चित्त डगमगलं नाही. गिर्यारोहणाची मोहीम सुरू झाली. जसजसं वर जाता तसतशी ऑक्सिजनची मात्रा कमी होते, त्यामुळे गिर्यारोहकाला ऑक्सिजन सिलिंडरही घेऊन चालावं लागतं. एका सिलिंडरमध्ये चार किलो ऑक्सिजन. असे सहा सिलिंडर व सॅक पाठीवर टाकून पूर्णा एव्हरेस्ट चढू लागली. मात्र त्यातही अनेक अडचणी होत्या. वाटेत दरी लागायची. दरी पार करण्यासाठी शिडी टाकून चालावं लागायचं. त्यांनी पायात घातलेले शूज हे बर्फात चालण्यासाठी अनुकूल असायचे. मात्र या शूजने शिडीवरून चालणं अडचणीचं व्हायचं. पाय सटकला तर थेट दरीतच जाणार.

पण हळूहळू त्यांनी हे आव्हान पार केलं. त्यानंतर ते ॲडव्हान्स बेसकॅम्पवरून कॅम्प एकसाठी निघाले. इथून पुढं हवेतील ऑक्सिजन कमी होतो, सिलिंडर लागतात. ही चढाईदेखील अत्यंत अवघड, कारण यामध्ये तुम्ही उभ्या-सरळ भिंतीसारखं चालत राहता. पूर्णा असं सलग आठ तास चालली. चढत-चढत ती कॅम्प तीनला पोहोचली. त्याला डेथ झोन म्हणतात. कारण इथं सर्वाधिक मृत्यू होतात. कॅम्प तीनवर पोहोचली, तेव्हा तारीख होती 24 मे 2014. त्या रात्रीच 9.30 वाजता ते शेवटच्या चढाईसाठी निघाले. शेवटची रात्र, शेवटचा ट्रेक आणि तोही रात्रीतून. थोडंसं अंतर चालल्यावर पूर्णाला गरगरल्यासारखं झालं. तिने सोबतच्या शेरपांना तसं सांगितलं, पण तिथं बसण्यासाठी कुठलीच सोय नव्हती. एका बाजूला बर्फाचा कडा, दुसऱ्या बाजूला दरी. शेवटी बरंच अंतर पुढं चालून गेल्यावर बसायला जागा मिळाली. पाहिलं तर, तिचा ऑक्सिजन संपलेला होता. तिला दुसरा सिलिंडर लावला आणि पुन्हा ट्रेक सुरू झाला.

ती निडरपणे सलग 52 दिवस चढाई करत राहिली. मोहीम फत्ते व्हायला पंधरा मिनिटांचं अंतर बाकी होतं, नेमक्या त्या वेळी समोर एक मृतदेह दिसला. एवढीशी पोर क्षणभर बिचकली. ‘आपणही इथंच तर मरून पडणार नाही ना... आपण परत जाऊ ना?’ अशी शंका तिच्या मनात आली. पण ते नकारात्मक विचार बाजूला सारत ती पुढे सरसावली.

...आणि रविवार, 25 मे 2014 च्या सकाळी सहा वाजता ती माऊंट एव्हरेस्टवर पोहोचली. तिने एव्हरेस्टवर झेंडा फडकवला. तिथं उभं राहिल्यावर सगळं जग दिसतंय, असाच भाव तिच्या मनात उमटला. एव्हरेस्टवर चढणं जसं अवघड, तसंच उतरणंही. तीही कामगिरी फत्ते करून पूर्णा बेसकॅम्पमध्ये पोहोचली. तिथून तिनं आपल्या आईला फोन केला, आपल्या मातृभाषेत म्हणाली, ‘‘याडी-बा मं चढगी!’’ (आई-बाबा, मी एव्हरेस्टवर चढले.) तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले.

अभावग्रस्तांच्या वाट्याला आलेलं आयुष्य नववीतल्या या चिमुकल्या पूर्णानं नाकारलं. त्यासाठी कष्ट, जिद्द ठेवली. पूर्णा इथंच थांबली नाही. जगातील सात खंडांतील सात शिखरं जिंकण्याचे ध्येय तिने ठेवले आहे. यातील पाच उंच शिखरे- माऊंट किलिमांजारो (आफ्रिका), माऊंट एलब्रस (युरोप), माऊंट ॲकॉनकाग्वा (दक्षिण अमेरिका), माऊंट कार्टेन्झ पिरामिंड (इंडोनेशिया) आणि अर्थातच माऊंट एव्हरेस्ट तिने पादाक्रांत केले आहेत. उरलेली दोन शिखरंही ती लवकरच गाठणार आहे. या प्रवासात प्रवीणकुमार यांचं मार्गदर्शन आणि शेखरबाबू यांचं प्रशिक्षण कायमच तिच्यासोबत आहे. या दोघांकडून तिला आर्थिक पाठबळही मिळत आहे.

तिच्या या संपूर्ण प्रवासाने थक्क होऊन अभिनेता राहुल बोस याने तिच्यावर ‘पूर्णा’ नावाचा हिंदी व इंग्रजी भाषेतील चित्रपट निर्माण केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि प्रवीणकुमार यांचं पात्र राहुल बोसनेच केलं आहे. यात पूर्णाची भूमिका आदिती इनामदार या मुलीने केली आहे. संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग पूर्णाच्या मूळ गावी म्हणजे पाकाला इथं झालं. 2017 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला. अनेक समीक्षकांनी चित्रपट नावाजला. इतकंच नव्हे तर, एप्रिल 2019 मध्ये अर्पणा थोटा यांनी तिच्यावर ‘पूर्णा’ हे इंग्रजीतले पुस्तक लिहिले. प्रिझम बुक्स प्रायव्हेट लिमिटेडने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

आता काय- पूर्णा ‘स्टार’ झाली, शिक्षण वगैरे घेत नसणार, असं कोणाला वाटत असेल तर पुढचं ऐका. आज ती अमेरिकेतल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिन्नेसोटा’ इथून इतिहास आणि अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण घेत आहे. बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात आहे. तिला सात शिखरं तर पादाक्रांत करायचीच आहेत, शिवाय सिव्हिल सर्व्हिसेसमध्येही स्थान पटकावयाचे आहे. म्हणजे शिखर गाठलेल्या पूर्णाचे पाय जमिनीवरच आहेत. पूर्णाचे आई-वडील अजूनही शेती करतात. तीदेखील एखाद्या चढाईची तयारी करण्याआधी गावी जाते. शेतात लागेल ते काम करते आणि सहज म्हणते, ‘‘जेव्हा कठीण प्रशिक्षण घ्यायचे असते, तेव्हा माझ्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणे मला आवडते.’’

लेखन : हिनाकौसर खान-पिंजार

greenheena@gmail.com

Share on Social Media

तबलावादनाच्या महाद्वाराकडून कौतुक

तृप्तराज पांड्या (महाराष्ट्र)

तबलावादनाची किंवा श्रवणाचीही आवड असणाऱ्या प्रत्येकालाच झाकिर हुसेन नावाच्या महाद्वारामधूनच जावं लागतं. जगभरातल्या तालरसिकांचे ताईत असणारे झाकिरभाई तृप्तराजचेही आदर्श आहेत. झाकिरभार्इंची स्वतःची प्रतिभाही अशीच अगदी नकळत्या वयातच उमलू लागली होती. त्यांचा तर जन्म आणि संगोपनच उस्ताद अल्लारखाँसाहेबांसारख्या वटवृक्षाच्या छायेखाली झालं होतं. त्यामुळं झाकिरभार्इंना तृप्तराजचं विशेष कौतुक आहे आणि त्याच्या भविष्याविषयी मोठ्या आशाही आहेत.

स्वर आणि लय ही संगीताची प्राणतत्त्वं! काही वेळा संगीताचा ध्यास घेतलेल्या एखाद्याला अख्खं आयुष्य वेचूनही ती गवसत नाही, तर काही वेळा अगदी अनाहूतपणे ती एखाद्याच्या ठिकाणी प्रकटतात आणि मग थक्क व्हायला होतं. भारतीय शास्त्रीय संगीताच्या अवकाशातही अगदी लहान वयात अशी अचाट प्रतिभाशक्ती लाभलेली नक्षत्रं काही कमी नाहीत. तबलावादनाच्या क्षेत्रात उगवू पाहणाऱ्या अशाच एका ताऱ्याची ही गोष्ट आहे. त्याचं नाव आहे तृप्तराज अतुल पांड्या.

तृप्तराजला भारत सरकारचा बालशक्ती पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नुकताच मिळाला. पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याचं विशेष कौतुक केलं. त्यामुळे तृप्तराजचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. गेली सहा वर्षे, सर्वांत लहान वयाच्या तबलावादकाचं गिनीज बुक रेकॉर्ड तृप्तराजच्या नावावर आहे. बारा वर्षांच्या लहानग्या तृप्तराजची कामगिरी भल्याभल्यांना चकित करून टाकणारी आहे.

मुंबईतील पश्चिम मुलुंडमध्ये 23 ऑक्टोबर 2006 रोजी तृप्तराजचा जन्म झाला. त्याचे वडील अतुल पांड्या पेशाने टॅक्स कन्सल्टंट. पण त्यांना गाणं ऐकण्याची, स्वतः म्हणण्याची अतिशय आवड. हिंदी गझल, भजनं हार्मोनियमवर स्वतः वाजवत ते गातात. तृप्तराजची आई वीणा यांनाही गाणं ऐकायला, गायला आवडतं. तृप्तराजच्या जन्मापूर्वी- तो पोटात असताना त्या शास्त्रीय संगीतापासून हिंदी गझलांपर्यंत निरनिराळ्या प्रकारचं संगीत आवर्जून ऐकत असत. संगीताची मनापासून आवड असणाऱ्या अशा घरातच तृप्तराजचा जन्म झाला. मात्र तृप्तराजचं कौशल्य खऱ्या अर्थानं ओळखलं ते त्याच्या आजीने..

तृप्तराजच्या आजीला स्वयंपाकघरात काम करताना गुणगुणायची सवय होती. दीडेक वर्षाचा लहानगा तृप्तराज दुडक्या चालीनं आजीपाशी यायचा. स्वयंपाकघरात हाताला मिळतील ती भांडी, डबे घेऊन त्यावर ठेका धरायचा. अवघ्या दीड वर्षाच्या या नातवाचं आजीला भारी कौतुक होतं. तो भांड्यांवर ठेका धरून साथ करू लागला की, आजीही दुप्पट उत्साहानं गाऊ लागायची. आजी चपात्या लाटतेय, लाटता-लाटता गाणी म्हणतेय आणि तृप्तराज ॲल्युमिनियमचे-स्टीलचे डबे हुडकून काढून त्यावर ठेका धरून साथ करतोय- असं चित्र घरी हमखास दिसायचं. तृप्तराजचे आई-बाबा घरी आले की, आजी त्यांना सांगायची, ‘‘मी आणि तृप्तने खूप मजा केली. मी भजनं म्हणत होते आणि त्यानं ताल धरला होता.’’

हळूहळू घरात सगळ्यांच्याच हे लक्षात येऊ लागलं की, तृप्तराजला उपजतच तालाची जाणीव फार चांगली आहे. बोलू लागण्याच्याही आधी त्याने आपलं हे कौशल्य दाखवायला सुरुवात केली होती. पण ‘इतक्या लहान वयातील मुलाच्या या कौशल्याचं नक्की करायचं तरी काय?’ असा प्रश्नच घरातल्यांना पडला होता. थोड्याच दिवसांनी सगळ्यांना अचंबित करून टाकणारा प्रकार घडला आणि हा प्रश्न कायमचाच सुटला...

झालं असं की, एके दिवशी तृप्तराजचे वडील घरातला तबला दुरुस्त करून घेऊन आले. लहानग्या तृप्तराजने ते पाहिलं आणि त्याने आईकडे त्या तबल्यासाठी हट्ट करायला सुरुवात केली. आईने काहीबाही सांगून विषय टाळला. तृप्तराज मात्र राहूनराहून हट्ट करतच होता. रात्री निजानीज झाल्यावर पुन्हा आईपाशी तृप्तराजची भुणभुण सुरू झाली. रात्रीचा दीड वाजला. तृप्तराजचे बाबा एव्हाना झोपी गेले होते. शेवटी नाइलाजाने आईने त्यांना उठवलं आणि म्हटलं, ‘‘आता तुम्हीच सांगा काय करायचं... हा हट्टाला पेटलाय त्या तबल्यासाठी!’’ बाबा आईला म्हणाले, ‘‘दे त्याला तो तबला.’’ आईने त्याला तबला काढून दिला. तबला हातात मिळताच तृप्तराज हरखून गेला. त्यानं आईला खुणा करून गायला सांगितलं. चटकन आठवलं ते भजन आई गाऊ लागली. आणि त्या चिमुकल्या हातांनी तबल्यावर ठेका धरून साथ करायला सुरुवात केली. 18 महिन्यांच्या तृप्तराजला तबल्यावर ठेका धरताना पाहून त्याच्या आई-वडिलांच्याही अंगावर रोमांच उभे राहत होते.

त्याच क्षणी त्यांना जाणवलं की, तृप्तराजच्या अंगभूत गुणांना आता योग्य वळण देऊन ते वाढवायला हवेत. तृप्तराजच्या बाबांनी त्याच्याकडून रोज रियाझ करून घ्यायला सुरुवात केली. तृप्तराजही अगदी आवडीनं तबला शिकू लागला. आपापलं वाजवू लागला. त्याने अगदी पहिलावहिला पब्लिक परफॉर्मन्स दिला तो वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी! मुंबईतल्या सोमैया कॉलेजमध्ये त्याने सर्वांसमोर आपली कला सादर केली आणि तो सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय ठरला. जाहीर कार्यक्रमांबरोबरच त्याने हरियाना रेडिओ स्टेशनमधून ऑल इंडिया रेडिओवर लाइव्ह कार्यक्रमही सादर केला. एवढंच नाही, तर वयाच्या चौथ्या वर्षी त्याने दूरदर्शनवरही कार्यक्रम सादर केला. आता तृप्तराजचे जाहीर कार्यक्रम होऊ लागले होते. तो सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय बनला होता.

पण तृप्तराजच्या आई-वडिलांना याचंही भान होतं की, तृप्तराज अजून लहान आहे. या वयात त्याने त्याचं बालपणही मुक्तपणे अनुभवलं पाहिजे. त्याच्या आवडीचे खेळ खेळले पाहिजेत. वयाला शोभेल अशी दंगामस्ती केली पाहिजे. त्यामुळं लहान वयात अशी सिद्धी लाभूनही तृप्तराजला त्याचं बालपण मनमुराद उपभोगता आलं. Child Prodigy समजली जाणारी मुलं सहसा त्यांच्या पालकांच्या दट्‌ट्याखाली दबून जातात आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील आनंद हरवून जातो. त्यांची वाढ थांबून ती खुरटतात. अशी मुलं लहानपणी अचाट प्रतिभा तर दाखवतात, पण तिची मशागत योग्य तऱ्हेनं न झाल्यामुळं ती आयुष्यभर त्याच पातळीवर राहते. तृप्तराजच्या आई-वडिलांनी त्याच्याबाबतीत हे घडू नये याची पुरेपूर काळजी घेतली.

तृप्तराजच्या वडिलांना असंही वाटलं की, इतक्या लहान वयात तृप्तराजकडे जे कौशल्य आहे, त्याची नोंद घेतली जायला हवी. त्यामुळं त्यांनी तबला वाजवतानाचा तृप्तराजचा व्हिडिओ शूट केला आणि ती व्हिडिओ क्लिप ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडे पाठवून दिली. ‘लिम्का बुक’च्या मुख्य संपादक विजया घोष यांचा त्यांना उत्तरादाखल लगेचच संदेश आला की, तुमचा मुलगा अद्‌भुत आहे! पण आमच्या पॉलिसीनुसार आम्ही बारा वर्षांखालील मुलांचं रेकॉर्ड रजिस्टर करत नाही. त्यामुळं तुम्ही कृपया ‘गिनीज बुक’शी संपर्क साधा...

तृप्तराजच्या बाबांनी तो व्हिडिओ ‘गिनीज बुक’कडे पाठवून दिला. आणि त्या क्लिपमुळे चारच दिवसांत तृप्तराजला ‘जगातील सर्वांत लहान वयाचा तबलावादक’ म्हणून घोषित करण्यात आलं. गिनीज बुकने नोंद घेतल्यामुळे तृप्तराजचं नाव जगभरातल्या लोकांना माहिती झालं. ही अव्वल दर्जाची प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष तबलावादनातही प्रगती साधणं, नवी कौशल्यं हस्तगत करणं तितकंच आवश्यक होतं. त्यासाठी ज्ञानेश्वर पोपलगढ आणि सत्यप्रकाश मिश्रा यांच्याकडं तृप्तराज तबला शिकू लागला. गाण्याप्रमाणेच तबलावादनाचीही काही घराणी आहेत. प्रत्येक घराणं स्वतःची स्वतंत्र वैशिष्ट्यं, वादनाची शैली, रियाजाच्या पद्धती बाळगून असतं. ज्ञानेश्वर पोपलगढ हे उस्ताद झाकिर हुसेन यांच्या शिष्य परिवारातले. तृप्तराज दोन वर्षांचा असल्यापासून त्यांनी त्याला पंजाब घराण्याची तालीम दिली आहे.

तर, सत्यप्रकाश हे सुप्रसिद्ध तबलावादक कालिनाथ मिश्रा यांचे सुपुत्र. त्यांच्याकडून तृप्तराजला बनारस घराण्याची तालीम मिळते आहे. याशिवाय सध्या तो ज्येष्ठ तबलावादक नयन घोष यांच्याकडूनही शिक्षण घेतो आहे.

या सर्वांकडे तृप्तराजचं प्रत्यक्ष शिक्षण होत असलं तरी तृप्तराजचा आणखीही एक गुरू आहे. तो म्हणजे YouTube! तृप्तराज YouTubeचा भरपूर वापर करतो. तबलावादकांच्या मुलाखती, मैफिली, त्यांची प्रात्यक्षिकं पाहायला त्याला आवडतं. तिथून मिळणाऱ्या गोष्टी तो स्वतःच्या रियाझातही करून पाहतो. तृप्तराजसारख्या स्वयंप्रेरणेने स्वतःच्या कलेत प्रगती करू पाहणाऱ्या मुलांना YouTube मुळे मोठंच घबाड खुलं झालं आहे. अशा मुलांच्या विकसनामध्ये या समाजमाध्यमांचा वाटा मोठा असणार आहे.

तबलावादनाची किंवा श्रवणाचीही आवड असणाऱ्या प्रत्येकालाच झाकिर हुसेन नावाच्या महाद्वारामधूनच जावं लागतं. जगभरातल्या तालरसिकांचे ताईत असणारे झाकिरभाई तृप्तराजचेही आदर्श आहेत. झाकिरभार्इंची स्वतःची प्रतिभाही अशीच अगदी नकळत्या वयातच उमलू लागली होती. त्यांचा तर जन्म आणि संगोपनच उस्ताद अल्लारखाँसाहेबांसारख्या वटवृक्षाच्या छायेखाली झालं होतं. त्यामुळं झाकिरभार्इंना तृप्तराजचं विशेष कौतुक आहे आणि त्याच्या भविष्याविषयी मोठ्या आशाही आहेत.

तृप्तराजचे वडील हौसेने त्याला संगीताच्या मैफिलींना घेऊन जातात. तिथे कलावंतांना भेटून तृप्तराजशी त्यांची ओळखही करून देतात. त्यामुळे झाकिरभार्इंप्रमाणेच हरिप्रसाद चौरासिया, शिवकुमार शर्मा, इक्बाल अहमद खाँ अशा संगीतक्षेत्रातील दिग्गजांचे आशीर्वाद तृप्तराजला मिळाले आहेत. आपापल्या क्षेत्रांमध्ये अव्वल स्थानी पोहोचलेल्या या बुजुर्गांनाही तृप्तराजच्या कलेबद्दल आस्था आहे. ते त्याच्या रियाझाची चौकशी करतात, त्याला प्रोत्साहन देतात. त्यांचं प्रेम ही तृप्तराजसाठी आयुष्यभरासाठीची ठेव आहे.

तबला हे तालवाद्यांमधील अतिशय प्रगत वाद्यांपैकी एक आहे. तबल्यासोबत आकाराने फुगीर रुंद असतो तो डग्गा. तो धातूच्या पत्र्यापासून बनवलेला असतो. तबला आणि डग्ग्यावर जे कातडं चढवलेलं असतं, त्याच्या मधोमध गोलाकार शाई लावलेली असते. त्या भागाच्या आसपास विशिष्ट ठिकाणी बोटांनी आघात केले की, विशिष्ट नाद (ज्यांना ‘बोल’ म्हणतात) निघतात. विशिष्ट बोल, विशिष्ट अंतराने रचून ताल तयार झालेले आहेत. उदा.- धा धि ना। धा ति ना। या तालाचं नाव दादरा. किंवा धिं धिं धागे तिरकिट तू ना। कत्‌ तिन्‌ धागे तिरकिट धी ना। हा एकताल. असे अनेक..

जगातील फार कमी संगीतप्रकारांत इतकं तालवैविध्य आढळतं. तबल्याचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते मुख्यतः तालवाद्य असलं तरी, तबल्यासोबत गाणाऱ्या गायकाचा स्वर किंवा वादकाचं वाद्य यांच्या स्वराशी तबला जुळवून (‘लावून’) घ्यावा लागतो. त्यामुळं तबलावादकाला नुसतं तालज्ञान असून भागत नाही, त्याला स्वरांचंही चांगलंच ज्ञान असावं लागतं. गेल्या शंभरेक वर्षांत तबल्याला साथीच्या वादनासोबतच एकलवादनासाठी म्हणजेच स्वतंत्रपणे वाजवायचं वाद्य म्हणूनही लोकप्रियता लाभली आहे. साथ करतानाचे आणि स्वतंत्र तबलावादनाचे उसूल, त्यासाठीची कौशल्यं वेगवेगळी आहेत. तृप्तराज रोज दीड ते दोन तास तबल्यावर रियाझ करतो. सुट्टीच्या दिवसांतही तो स्वतःहून थोडा जास्त वेळ तबलावादनात घालवतो. यासाठी रियाझ करताना तृप्तराजला मदत होते त्याच्या वडिलांची. वडील त्याला गाऊन किंवा पेटीवर लेहरा धरून साथ करतात. कधी कधी ते स्वतः गातात आणि तृप्तराज त्यांना तबल्याची साथ करतो.

तबलावादनासोबतच हार्मोनियम, ढोलक, ड्रम्स, काँगो इत्यादी वाद्यांमध्येही तृप्तराजला गती आहे. त्याला क्रिकेट आणि फुटबॉल खेळायलाही खूप आवडतं. त्याला त्याच्या स्वप्नांविषयी विचारलं तर तो सांगतो, ‘‘मला सध्या तबलावादनात नैपुण्य मिळवायचं आहे आणि पुढे संगीतातच करियर करायचं आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय ठरेल, असं काही तरी काम मला करायचं आहे.’’

तृप्तराज मुंबई येथील ऐरोलीतील न्यू हॉरिझॉन पब्लिक स्कूल या शाळेत शिकतो. तो म्हणतो, ‘‘या वयात सगळ्याच गोष्टी करणं गरजेचं असतं, त्यामुळं रियाझ करताना शाळेत दिलेला होमवर्कही सांभाळावा लागतो.’’ आजघडीला त्याने सादर केलेल्या कार्यक्रमांची संख्या दोनशेहूनही अधिक आहे. त्याच्या शाळेतल्या गॅदरिंगपासून दिल्लीच्या युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेपर्यंत देशभरात त्याचे कार्यक्रम झाले आहेत. त्याला त्याच्याबद्दल, त्याच्या तबलावादनाबद्दल बोलायला ठिकठिकाणांहून आमंत्रणं येतात. मुंबईत झालेल्या दोन TEDx इव्हेंट्‌समध्येही त्याने सादरीकरण केलं आहे. त्याचे अनेक व्हिडिओज आता YouTube वरही उपलब्ध आहेत.

तालाची जाणीव तृप्तराजला निसर्गतःच मिळाली आहे. त्यामुळं तबल्यासारखं- एरवी भरपूर मेहनतीनेच साध्य होणारं वाद्य त्याला दुरापास्त राहिलेलं नाही. ज्या वयात त्याच्या वयाची इतर मुलं तबला आणि डग्ग्यावर कुठला बोल, कुठं आणि कसा वाजवायचा हे धुंडाळत असतील; नक्की कुठं थाप दिली की, ‘धाऽ’ वाजतो? कुठं टिचकी दिली की, ‘कत्‌’ वाजतं? याचे धडे गिरवत असतील- त्या वयात हा बहाद्दर एखाद्या इंग्रजी पॉप गाण्याला तबल्यावर ठेका धरून लोकांच्या टाळ्या घेतो आहे. त्यामुळं आता यापुढे त्याच्याकडून असणाऱ्या अपेक्षाही मोठ्या आहेत. कितीही नाही म्हटलं तरी आता त्याच्याकडे असणारी कौशल्यं ही त्याच्या प्रगत बौद्धिक क्षमतेचा भाग आहेत. ती केवळ मशागत केलेली जमीन आहे. सृजनाची खरी सुरुवात आता त्याला साधायची आहे. पण त्याचं वय, त्याचं कर्तृत्व आणि त्याची जिद्द पाहता, यशाची असंख्य क्षितिजं तो गाठू शकेल यात शंका नाही. कारण 12 वर्षांच्या तृप्तराजचं स्वतःसाठीचं ब्रीदवाक्य काय आहे, ठाऊक आहे? ते आहे- I am passionate for passion!

लेखन : सुहास पाटील

suhasp455@gmail.com

Share on Social Media

15 व्या वर्षी M.Sc.

सुषमा वर्मा (उत्तर प्रदेश)

सगळे तिचा आदर, कौतुक करायचे आणि त्याचबरोबर तिचं बालपणही जपू द्यायचे. गाणी ऐकणं, चित्र काढणं असे तिचे छंद त्यामुळंच टिकून राहिले. सुषमा तेराव्या वर्षी M.Sc. झाली. त्यातही पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरमध्ये ती महाविद्यालयात पहिली आली. सुषमाचं शिक्षण चांगलं चालू होतं, पण तिच्या मनात खंत होती की, आपल्या आईला वाचता-लिहिता येत नाही. तिने ठरवलं- आपल्या आईला शिकवायचंच.

इ.स.2000 मध्ये जन्माला आलेली सुषमा वर्मा लखनौमध्ये कृष्णानगर इथल्या बर्गावन मोहल्ल्यात राहते. तिच्या घरी टीव्ही नाही. छोट्या बहिणीसोबत खेळणं हाच तिचा विरंगुळा. इतका अभ्यास आपली मुलगी करते आहे म्हणून तिला ट्युशन्स लावाव्यात, तिला नवनवीन वह्या-पुस्तकं आणून द्यावीत, अभ्यासासाठी तिला वेगळी खोली द्यावी- असं तिच्या आई बाबांना वाटत असणार, पण त्यांना ते शक्य नव्हतं. वडील तेजबहादूर आठवी पास झालेले. रोजंदारीवर काम करणारे. आई छायादेवी गृहिणी. कधीच शाळेत न गेलेली, लिहिता-वाचता न येणारी. रोजंदारीवरच्या कामगाराला असे किती पैसे मिळत असणार? मुलांना अशा सोई-सुविधा देणं त्यांना परवडत नव्हतं. जेमतेम एका खोलीचं त्यांचं छोटं घर. त्यात आई-बाबा, मोठा भाऊ शैलेन्द्र, लहान बहीण अनन्या आणि सुषमा असे पाच जण राहायचे. घरच्या कामात आईला मदत करत, लहान बहिणीकडे बघत सुषमा वरच्या वर्गांचा अभ्यास करत होती.

अगदी लहानपणापासूनच सुषमा तिच्या वयापेक्षा मोठमोठ्या गोष्टी करायची. 2003 मध्ये एके दिवशी लखनौमधल्या राय उमानाथ बली प्रेक्षागृहात एक कार्यक्रम चालू होता. त्यामध्ये श्रीरामचरितमानसचा पाठ चालला होता. हजारो लोकांसमोर मंचावर उभं राहून सुषमाने त्यातले श्लोक म्हणायला सुरुवात केली. ‘‘वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि। मङ्गलानां च कर्त्तारौ वन्दे वाणीविनायकौ।।’’

प्रेक्षक चकित होऊन सुषमाकडे बघत होते. सुषमा तेव्हा अवघ्या तीन वर्षांची होती. कार्यक्रम संपल्यावर एकाने तिला विचारलं, ‘‘बेटी, सामने इतने सारे लोग बैठे थे. आपको डर नहीं लगा?’’

‘‘नहीं. मुझे तो ये आता है ना, रामायण. तो फिर डर कैसा?’’

भैय्याची पुस्तकं घेऊन सुषमा धडे वाचून बघत होती, स्वाध्याय सोडवत होती, गणितं करून बघत होती. चुकलेली गणितं पुन:पुन्हा न कंटाळता करून बघत होती. तिचे प्रामाणिक प्रयत्न बघून भैय्याही तिला मदत करायला लागला. ती एखादी शंका घेऊन त्याच्याकडे गेली की, तो सोडवून द्यायचा. सुषमाला भैय्याची शिकवणी सुरू झाली. भैय्याही काही साधा नव्हता. त्यानेही चौदाव्या वर्षी BCA ची डिग्री मिळवली होती, जी सामान्यत: विसाव्या वर्षी मिळते.

सुषमा सातत्याने रोज मन लावून अभ्यास करत असे आणि भैय्याला येतं ते आपल्यालाही यायला हवंच, याचा तिने ध्यासच घेतला होता. सहा वर्षांची छोटी मुलगी जर म्हणाली, ‘मला दहावीची परीक्षा द्यायचीय’ तर कोण विेश्वास ठेवणार? पण सुषमाचा आई-बाबांकडे हट्ट चालूच होता. तिची किती तयारी झालीय, हे पाहण्यासाठी भैय्यानं तिच्या काही परीक्षा घेतल्या. त्याच्याच पुस्तकांवरून तर ती अभ्यास करत होती ना! पण त्याची खात्री पटली की, सुषमा दहावीची परीक्षा देऊ शकते. तेव्हा त्याने आई-वडिलांना पटवून दिलं, तिच्या वडिलांनीही शैलेन्द्रच्या मदतीनं सेंट मीराज इंटर कॉलेजमध्ये अर्ज केला. तिला दहावीची परीक्षा देता यावी म्हणून विनंती केली. पहिली ते दहावी आणि अकरावी, बारावी असं ते इंटर कॉलेज होतं.

‘‘बच्ची को डायरेक्टली बोर्ड एक्झाम्स में तो नहीं बिठा सकते. पर बच्ची होशियार मालूम होती है. इसे बढ़ावाभी देना चाहिए. ये नववी कक्षा के एक्झाम दे दे और फिर अगले साल दसवी भी दे सकती है.’’ बाबूजी आणि सुषमा व्हाईस चॅन्सलर आर.व्ही. सोबतीसरांना भेटले. त्यांनी सुषमाला नववीमध्ये प्रवेश तर दिलाच, पण त्यासोबत तिच्या शिक्षणाच्या खर्चाची व्यवस्थाही केली. ‘‘सुनो तेजबहादूर, बच्ची तो होनहार लगती है. पर तुम्हारे काम का कोई ठिकाना नहीं. आज काम है, कल का पता नहीं. ऐसा करो, हमारे युनिव्हर्सिटी में सफाई सुपरवायजर कि पोस्ट खाली है. जॉईन कर लो.’’

मग काय, बाप-लेक दोघे एकाच इंटर कॉलेजमध्ये जायला लागले. वडील साधे सफाई पर्यवेक्षक आणि लेक असामान्य बालक. सोबतीसरांनी नियमात राहूनही तिला मदत केली. आठव्या वर्षी सुषमा दहावी झाली. अचानक एक दिवस लिम्का बुक ऑफ रेकॉडर्‌सचे लोक सुषमाला शोधत लखनौमध्ये आले. चमत्कार वाटाव्यात अशा जगभरातल्या नैसर्गिक घटना आणि माणसांनी केलेले विक्रम यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करतं. तसंच भारतातल्या विक्रमांची नोंदणी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होते. दहावी पास होणारी सर्वांत लहान वयाची मुलगी म्हणून सुषमाचं नाव नोंदवलं गेलं.

सुषमाला अभ्यासासोबतच चित्रं काढायला आवडतात. रेडिओवरील गाणी ऐकायला आवडतात. बारावीत असताना एके दिवशी ती गुणगुणत चित्रं काढत बसली होती. पेन्सिल आणि रंगांमध्ये रमून गेली होती. त्या दिवशी एक गंमतच घडली. कोण कुठली जपानची संस्था सुषमाला शोधत लखनौमध्ये आली. त्यांना म्हणे, त्यांच्याकडच्या Intelligence Quotient Test (IQ) साठी सुषमाला निमंत्रण द्यायचं होतं. IQ म्हणजे मेंदूची तार्किक क्षमता मोजण्याचे एकक. या टेस्टमध्ये अनेक प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्या सगळ्या परीक्षांचं विश्लेषण करून बुद्‌ध्यांक ठरवला जातो.

असं म्हणतात की, जगातले 95 टक्के लोक 70 ते 130 बुद्‌ध्यांकाचे असतात. स्वतःच्या बुद्धीवर सातत्याने कष्ट घेणारे जे मोजके लोक असतात, त्यांचा बुद्‌ध्यांक 130 हून जास्त असतो. अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग्स यांचा बुद्‌ध्यांक अनुक्रमे 160 आणि 154 एवढा होता.

मग छोट्या गावात, छोट्याशा घरात राहणारी सुषमा एक दिवस विमानात बसून जपानला निघाली. त्या संस्थेने तिची जाण्या-येण्याची, राहण्याची, तिथे फिरण्याची व्यवस्था केली होती. विमान आकाशात झेपावलं तेव्हा सुषमानं खिडकीतून पाहिलं. ‘इतक्या उंचावरून आपलं घर दिसेल का?’ असं तिला वाटत होतं. जपानच्या त्या संस्थेने जपानमधून 35 मुलं गोळा केली होती. त्या वेळी सुषमा 10 वर्षांची होती. इतर मुलं 20-22 वर्षांची. सुषमा त्यांना भेटली. त्यांची भाषा वेगळी होती, खेळ वेगळे होते, खाण्याचे पदार्थ, कपडे सगळं वेगवेगळं होतं. तरी त्या मुलांची एकमेकांशी मैत्री झाली, गप्पा झाल्या. दुसऱ्या दिवशी झालेल्या (IQ) टेस्टमध्ये सगळ्या 35 मुलांतून सुषमा पहिली आली. आत्तापर्यंतचा सर्वोच्च IQ हा 250- 300 विल्यम जेम्स सायडिस याचा होता आणि तो वडील आणि मुलगी एकाच वेळी कॉलेजात जाताना एक असामान्य बालक म्हणून प्रसिद्ध होता; योगायोग म्हणजे सुषमाची गणतीसुद्धा जगातल्या असामान्य बालकांमध्येच होते.

लिम्का बुकमध्ये नाव आलं, जपानमध्ये पहिला नंबर आला तरी सुषमा हुरळून गेली नाही. तिने जपानहून परत आल्यानंतर परत नव्या जोमाने आणि उत्साहाने अभ्यासाला सुरुवात केली. ती वेळापत्रक आखत नाही. पण तिला अभ्यास करणं, नवनवीन काही तरी शिकणं इतकं आवडतं की, तिचा दिवसातला बराचसा वेळ अभ्यासातच जातो. भरपूर मेहनत आणि मनापासून आनंदाने केलेला अभ्यास यामुळे दहाव्या वर्षीच ती बारावी उत्तीर्ण झाली. इतका अभ्यास करणाऱ्या या मुलीने स्वतःला एका ठरावीक वेळापत्रकात कधी बांधून घेतलेलं नाही. ती घड्याळाच्या काट्यावर जगणं पसंत करत नाही. अधून-मधून ती उशिरापर्यंतही झोपते. स्वत:सोबत बहिणीचंही आवरते. बहिणीसोबत भातुकली खेळण्यातही ती रमून जाते.

एके दिवशी बहीण दुपारी झोपल्यावर सुषमा अभ्यासाला बसली. MBBSला प्रवेश मिळण्यासाठी एक पूर्वपरीक्षा (प्रीमेडिकल टेस्ट) द्यावी लागते. त्याची तयारी सुषमा करत होती. दुपारी बसलेली सुषमा रात्री तिचे बाबूजी घरी आले तरी त्याच जागी बसून अभ्यास करत होती. बाबूजींना बघून सुषमा उठली. तिनं त्यांना पाणी आणून दिलं आणि परत अभ्यास करायला लागली.

‘‘कितना समय हुआ बेटाजी, पढाई कर रहे हो?’’ ‘‘क्या पता बाबूजी, मैने तो घडीही नहीं देखी.’’ बाबूजीनी कपाळावर हात मारला.

‘‘अच्छा है. जब तक तुम्हारा जी कर रहा है पढ लेना. फिर खेलने जाना हाँ. ठीक है?’’

थोड्या दिवसांनी पूर्वपरीक्षा झाली. सुषमाला पेपर सोपा गेला. आता लगेच कोणतीच परीक्षा नव्हती. तरी सुषमाचं काही ना काही वाचन, गणितं सोडवणं चालूच होतं. तिला विचारलं तर ती म्हणे- ‘‘अभी एक्झाम नहीं तो क्या हुआ? कहते है कुछ सिखा हुआ बेकार नहीं जाता.’’ सुषमा पूर्वपरीक्षेच्या निकालाची वाट बघत राहिली. तिला डॉक्टर व्हायचं होतं ना! पण विद्यापीठाने तिचा निकाल जाहीरच केला नाही. चौकशी केल्यावर विद्यापीठाने सांगितलं की, सतरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मेडिकल कॉलेजला प्रवेश देऊ शकत नाही.

पुढे काय शिकावे, काय करावे- समजत नव्हते. इतक्या कमी वयात कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं अवघड होतं. पण तिच्या भैय्याने चौदाव्या वर्षी BCA केलं होतं. त्यामुळे विद्यापीठातून परवानगी घेणं, पुस्तकं घेणं हे त्याला माहिती होतं. तशी लखनौच्या भीमराव आंबेडकर विद्यापीठामधून विशेष परवानगी घेऊन तिने B.Sc. ला प्रवेश घेतला. त्यासाठीची पुस्तकं, वह्या इत्यादींचा खर्च तोकडा पगार असणाऱ्या सुषमाच्या बाबूजींना परवडणारा नव्हता. अजून शैलेंद्रभैयाचं शिक्षणही चालू होतं. त्यामुळे आई म्हणाली, ‘‘देखो जी, हम कुछ कर लेंगे. पैसे तो नहीं है, पर बच्चोंको बतानेकी जरूरत नहीं है. हमे ना मिला पर मेरे बच्चोंको तो पढने दो.’’ त्यावर बाबूजींचे उत्तर, ‘‘बताने कि क्या जरूरत है माताजी! एक बारवी हो रखी है, दुसरा ग्रॅज्युएट हो रहा है. हमसे ज्यादा जानकार है दोनो.’’

B.Sc. करताना कॉलेजमधली मुलं-मुली सुषमापेक्षा सात-आठ वर्षे मोठी होती. सुरुवातीला बोलताना तिला अवघड वाटलं, पण एकदा मैत्री झाली की वय आडवं येत नाही, असं ती म्हणते. तिच्या शिक्षकांनी, वर्गातल्या मित्र-मैत्रिणींनी सामावून घेतलं. सगळे तिचा आदर, कौतुक करायचे आणि त्याचबरोबर तिचं बालपणही जपू द्यायचे. गाणी ऐकणं, चित्र काढणं असे तिचे छंद त्यामुळंच टिकून राहिले. ती तेराव्या वर्षी B.Sc. झाली. त्यातही पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरमध्ये ती महाविद्यालयात पहिली आली.

सुषमाचं शिक्षण चांगलं चालू होतं; पण तिच्या मनात खंत होती की, आपल्या आईला वाचता-लिहिता येत नाही. म्हणून तिने ठरवलं- आपल्या आईला शिकवायचंच. ‘‘मम्मी, तुम यहा बैठो. कल जो पढाया उसका रिव्हिजन पहले करेंगे. फिर आगेका सिखेंगे.’’ सुषमा आईच्या मागे लागली होती.

‘‘अभी कहॉ सुषमा. अभी मुझे सब्जी पकानी है.’’

‘‘सब्जी मै बना देता हूँ. मम्मी, आप पढ लेना. सुषमा देखो कितने प्यारसे सिखा रही है आपको.’’

भैयानं भाजी फोडणीला टाकली आणि सुषमाची आई पाटीवर अक्षरं गिरवायला लागली. B.Sc. चा अभ्यास करताना सुषमाच्या असं लक्षात आलं की, आता अधिक खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे. तिला रस होता सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये (Microbiology). माणसाला उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत असे सूक्ष्म जीव असतात. हे जीव माती, पाणी, हवा आणि माणसाच्या व प्राण्याच्या शरीरातही असतात. यातील काही सूक्ष्म जीव आपल्याला उपयोगी असतात, काही अपायकारक असतात. त्यांचा शोध घेणे याच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्र.

सुषमाने सूक्ष्म जीवशास्त्र विषयात B.Sc. ला प्रवेश घेतला, तेव्हा ती बातम्यांमध्ये झळकलेली होती. लोक तिला ओळखायला लागले होते. तरीही कॉलेजमध्ये सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे तिने सर्व अभ्यास केला, सगळ्या परीक्षा दिल्या. परीक्षेच्या बरोबरीने दिला जाणारा होमवर्क, प्रात्यक्षिके- सगळं तिने आवडीने केलं. पंधराव्या वर्षी ती सूक्ष्म जीवशास्त्र विषयात M.Sc. झाली. तिच्या पुढच्या शिक्षणासाठी ‘सुलभ’ नावाच्या सामाजिक संस्थेचे प्रमुख डॉक्टर बिन्देश्वरी पाठक यांनी आठ लाख रुपयांची मदत केली. त्यांनीच तिला मोबाईल फोन, लॅपटॉप, कॅमेरा अशा काही वस्तूही बक्षीस म्हणून दिल्या. लॅपटॉपवर वेळ घालवणे आता तिला खूप आवडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2016 मध्ये सुषमाच्या विद्यापीठात आलेले असताना, त्यांच्या हस्ते तिला मेडलही देण्यात आले.

सुषमा म्हणते, या शिक्षणाच्या प्रवासात तिला हा महत्त्वाचा धडा मिळाला आहे की, ‘तुमच्यामध्ये कौशल्य, बुद्धी असेल आणि त्याच्या सोबतीने जिद्द व चिकाटी असेल तर मदतीचे ओघ आपसूक येतात.’

लखनौच्या आसपासची शेतजमीन कोरडी होत चालली आहे, त्यावर काही तरी उपाय करायला हवा, असं सुषमाला वाटतं. निसर्ग, प्राणी व त्यातील संशोधन या विषयांत तिला रस आहे. प्रदूषण हा तिला विशेष महत्त्वाचा प्रश्न वाटतो. जो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, त्या विषयातलं ज्ञान आपल्याजवळ असायला हवं- त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण असायला हवं - असं ती मानते. म्हणून M.Sc. झाल्यावर तिने कृषी सूक्ष्म जीवशास्त्र (Agricultural Microbilogy) या विषयात Ph.D. साठी प्रवेश घेतला. सध्या तिची Ph.D. अंतिम टप्प्यात आहे.

सुषमा म्हणते, ‘शिक्षण आपल्या विचारांना चालना देतं, आपलं व्यक्तिमत्त्व घडवतं, आपल्या आत कोणती कला-कौशल्ये दडलेली आहेत हे शिक्षणामुळे कळतं. आजूबाजूला काय घडतंय, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे.’’ प्रत्येकाने स्वतःमध्ये सुधारणा केली, तर अख्खं जग बदलेल, असं सुषमाला वाटतं. प्रत्येकाने सृजनाचा ध्यास घ्यावा आणि काही नवं निर्माण करावं, असंही तिला वाटतं.

लेखन : मृद्‌गंधा दीक्षित

mudra6292@gmail.com

Share on Social Media

‘सत्य’धर्माचा पुजारी

वली रेहमानी (प. बंगाल)

आपल्या कामामुळे वली देशभर लोकप्रिय ठरत असला, तरी याच कामामुळे आपल्या समाजातील चुकीचे काम करणारे अनेक लोक दुखावलेही गेले आहेत. ते वलीला ‘आपले काम थांबव’ अशी धमकी देत असतात. वली म्हणतो, ‘‘मला धमकी देणारे अनेक मेसेजेस येतात. मी माझे काम बंद करावे यासाठी ही मंडळी दबाव आणतात. काहींनी तर जीवे मारण्याची धमकीही दिलीये.’’ पण या धमकीने वली अजिबात घाबरला नाही, उलट तो अधिक उत्साहाने कामाला लागलाय. तो अतिशय आत्मविेश्वासाने म्हणतो, ‘‘मैं किसी से डरता नहीं हूँ. दो दिन की जिंदगी है और रोज घरसे ये सोचकर निकलता हूँ की आज दूसरा दिन है!’’

‘आपण शाळेत का जातो बरं?’ असा प्रश्न तुम्हाला विचारला, तर तुम्ही काय उत्तर द्याल? अभ्यास करायला. बरोबर? पुढचा प्रश्न जर असा विचारला की, ‘अभ्यास का करायचा? तर तुम्ही उत्तर द्याल की ‘मोठ्ठं होण्यासाठी.’ आणि शेवटचा प्रश्न जर असा विचारला की, ‘मोठ्ठं होऊन काय बनायचंय तुम्हाला?’ तर तुमच्यापैकी काही जण म्हणतील- मी डॉक्टर होईन, कुणी म्हणेल- मी इंजिनिअर होईन, कुणी आणखी काही सांगतील.

आपल्यापैकी कुणी असा असेल का, जो म्हणेल की, ‘मला मोठ्ठं होऊन नेता व्हायचंय, मंत्री व्हायचंय, संसदेत जायचंय.’ एकही जण नसेल! बरोबर ना? चुकून कुणी पालकांसमोर ही इच्छा बोलून दाखवली, तर कित्ती रागावतील ते; हो ना? पण आपण जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाही देशात राहतो, हे तर तुम्ही जाणताच. आणि आपल्या या भल्या मोठ्या देशाचा राज्यकारभार लोकशाही पद्धतीने चालतो. म्हणजे काय तर, प्रौढ नागरिकांनी मतदान करून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपला देश चालवतात. किती मोठी जबाबदारी असते त्यांच्यावर, किती तरी अधिकारी दिमतीला असतात त्यांच्या. त्यांना मिळणारा सन्मान आणि रुबाब ही वेगळाच असतो. असं असूनही आपल्यापैकी कुणालाच का बरं व्हावंसं वाटत नसेल राजकारणी? तर अगदी असाच प्रश्न दिल्ली- नोएडातील जेनेसिस ग्लोबल स्कूलचा ‘हेडबॉय’ (विद्यार्थी प्रतिनिधी) असलेल्या बारा-तेरा वर्षांचा वली रहमानीलादेखील असताना पडला होता.

लहानगा वली तीन भावंडांमध्ये सर्वांत मोठा. वलीचे कुटुंब मूळचे कोलकात्याचे. त्याचे वडील शिफउद्दीन हे हातरिक्षा चालवायचे. आई शबाना घरीच असायची. हॉटेलात काम करत वलीच्या वडिलांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. मग अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करत त्यांनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला. आपल्या वलीने खूप अभ्यास करावा, डॉक्टर वा इंजिनिअर व्हावं- असं त्याच्या आई-वडिलांना वाटायचं. मात्र वलीला व्हायचं होतं लीडर, म्हणजे नेता. सुरुवातीला त्याने आपली इच्छा घरी बोलून दाखवली नाही. तो अभ्यास करत राहिला आणि चांगल्या मार्कांनी बारावी पास झाला.
दरम्यानच्या काळात तो अभ्यासासोबतच अवांतर वाचनही करायचा. पुस्तके, मासिके वाचायचा. वृत्तपत्रदेखील न चुकता वाचायचा. नेता बनण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती असायला हवी, म्हणून तो या सगळ्या गोष्टी मन लावून करायचा. माहिती मिळविण्यासाठी इंटरनेटही वापरायचा. लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी त्याने फेसबुक अकाउंटही उघडले होते. हे सर्व करत असताना त्याने स्वत:च्या अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नाही. मग त्याने आपल्या नेता बनण्याच्या इच्छेविषयी आई-वडिलांना सांगितले, तेव्हा ते रागवले नाहीत, मात्र त्यांनी हे हसण्यावारीच नेले.

इ.स.2016 मध्ये वलीचे बारावीचे पेपर सुरू असतानाच उत्तर प्रदेश या आपल्या देशातील सर्वांत मोठ्या राज्याच्या विधानसभा निवडणुका सुरू होत्या. निकाल लागले आणि योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले. लहान असूनही सामाजिक जाणीव असलेला वली अस्वस्थ झाला. अनेक चांगले पर्याय असूनही वादग्रस्त पोर्शभूमी असलेला नेता देशातील सर्वांत मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री होतो, यामुळे तो बेचैन झाला. मग त्याने आपला मोबाईल घेतला आणि एक व्हिडिओ बनवला. मनातली अस्वस्थता त्याने व्हिडिओच्या माध्यमातून शेयर केली. खूप मुद्देसूद बोलला वली. या निवडीमुळे देशाला आणि राज्याला काय अडचणी येतील, याचे त्याने आपल्या परीने विश्लेषणच केले होते. बिचारा रात्री तसाच तळमळत झोपला, पण सकाळी उठून पाहतो तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता. अनेकांनी तो शेयर केला होता. लाखो जणांनी त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आणि त्याची तारीफही केली होती.

या प्रसंगाने वलीच्या मनात एक अंकुर फुटला. बारावीची परीक्षा संपली आणि त्याने आई-वडिलांना सांगितले की, तो पदवीसाठी लगेच ॲडमिशन घेणार नाही. ‘‘मला देशासाठी आणि देशबांधवांसाठी काही तरी करायचे आहे, त्याचा विचार करण्यासाठी मला वेळ हवाय.’’ असं तो म्हणाला. घरचे खूप नाराज झाले, मात्र वलीची जिद्द आणि चिकाटी त्यांना माहीत होती. त्यांनी होकार दिला. मग पुढचं पूर्ण वर्षभर तो आपल्या कल्पनांना आकार देऊ लागला. ‘‘समाजसेवा म्हणजे social work हे work नसून duty म्हणजे कर्तव्य आहे, ते मला माझ्या कामाद्वारे पार पाडायचे आहे.’’ असे त्याने घरी सांगून टाकले.

त्यानंतर फेसबुक, युट्यूब इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाच्या विषयांवर तो बोलू लागला. देशासमोरील प्रश्न, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न यावर आपली मतं मांडू लागला. इतका लहान मुलगा इतक्या मोठ्या प्रश्नांवर मुद्देसूद बोलतो, न घाबरता आपली मतं मांडतो, याचं लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. त्याचे व्हिडिओ लोकप्रिय ठरायला लागले. बघता-बघता वली रहमानीचे लाखो चाहते तयार झाले. सोशल मीडियावर या चाहत्यांना फॉलोअर्स म्हणतात. वलीचे फॉलोअर्स देशभर तयार झाले. त्याचाही आत्मविेशास वाढला. देशसेवेचे, जनसेवेचे कर्तव्य पार पाडण्याचा मार्गही त्याला मिळाला. देशाला आणि लोकांना रोज भेडसावत असणाऱ्या समस्यांवर तो निर्भीडपणे बोलू लागला. पुढील दोनच वर्षांनी वली रहमानी देशातील सर्वांत कमी वयाचा सोशल मीडिया इंफ्लुएन्सर (सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजावर प्रभाव टाकू शकणारी व्यक्ती) बनला.

आपल्या देशामध्ये अनेक समस्या आहेत. त्यांपैकी काही सामाजिक स्वरूपाच्या आहेत, तर काही आर्थिक. या सर्वांवर हा लहानगा अतिशय अभ्यासू पद्धतीने व्यक्त होतो- भले मग तो विषय नोटबंदीचा असो की झुंडबळींचा. राष्ट्रीय महत्त्वाच्या सर्वच विषयांवर तो व्यक्त होतो. त्यासाठी प्रचंड संशोधन आणि अभ्यास करतो. आपल्या देशातील महिला अनेक सामाजिक समस्यांना तोंड देत असतात. त्यांपैकी एक समस्या म्हणजे मुस्लिम समाजातील तीन तलाकचा प्रश्न. या तीन तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयीची अतिशय संतुलित भूमिका त्याने मांडली. देशातील मोठे विचारवंत कोड्यात पडलेले असताना 20 वर्षांच्या वलीने ‘सर्वांनी या निर्णयाचे स्वागत करायला हवे’ अशी भूमिका घेतली. वयाच्या मानाने त्याच्यातील असामान्य परिपक्वताच यातून दिसते, नाही का?

अनेक वेळा काय होतं- लहान वा तरुण मुले एखादी महत्त्वाची गोष्ट सांगत असली तर मोठी मंडळी त्यांना गप्पच बसवतात; वर म्हणतात, तू लहान आहेस, या मोठ्यांच्या गोष्टीतले तुला काय कळणार आहे? आपल्या देशातील पालकांची ही भूमिका वलीला पसंत नाही. तो म्हणतो, ‘‘क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना इंग्रजांनी पहिल्यांदा अटक केली, तेव्हा ते फक्त 14 वर्षांचे होते. भगतसिंग यांना 23 व्या वर्षी फाशी दिले गेले. मौलाना आझादांना वयाची 18 वर्षेही पूर्ण झाली नव्हती, तेव्हा त्यांना आपल्या विद्वत्तेसाठी अबुल कलाम म्हणजे विद्यावाचस्पती अशी पदवी जनतेने दिली होती. हे सगळे महापुरुष माझे आदर्श आहेत. मला यांचेच अनुकरण करायचे आहे.’’

वली रहमानी ज्या विषयांवर बोलतो, त्यांपैकी बहुतेक विषय मोठ्यांचे म्हणजे राजकीय असतात. असे असले तरी वलीच्या मतांवर आणि त्याने मांडलेल्या मुद्यांवर देशभर चर्चा घडून येते. त्याचे जसे अनेक चाहते आहेत, तसे विरोधकही आहेतच. तो एकाच राजकीय पक्षाच्या विरोधात बोलतो, असा आरोपही काही जण करतात. याविषयी वली अतिशय स्पष्टपणे सांगतो, ‘‘मी कुठल्याच राजकीय पक्षाचा विरोधक किंवा समर्थक नाही. मी सत्याचा पुजारी आहे आणि हे सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा मी माझा धर्म समजतो.’

2017 मध्ये वयाच्या अठराव्या वर्षापासून व्हिडिओजच्या माध्यमातून देशातील विविध विषयांवर मुद्देसूद भाष्य करणारा वली आता वीस वर्षांचा आहे. मागील दोन वर्षांत त्याच्या ‘Wali Rehmani’ या युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओजची संख्या 60 च्या पलीकडे गेली आहे. त्यात तो कधी अस्खलित इंग्रजी बोलतो, तर कधी हिंदी अणि उर्दूमध्ये. ‘आतिशी प्रश्नांना घाबरते का?’ या व्हिडिओमध्ये, आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मर्लिना यांची वलीने घेतलेली मुलाखत आहे. त्यात त्याने विचारलेले प्रश्न मोठ्या पत्रकारांनाही धडे देणारे आहेत.

फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम अशा तरुणांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या सोशल मीडिया साईट्‌सवर आता वलीचे लाखो फॉलोअर्स तयार झाले आहेत. वयाने लहान असला तरी त्याची बुद्धी आणि तळमळ पाहून अनेक टीव्ही चॅनेल्सच्या चर्चांमध्ये त्याला तज्ज्ञ म्हणून बोलावले जाते. समोर वयाने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या मंडळींनाही तो आपल्या मुद्देसूद मांडणीने नामोहरम करतो. अनेक सार्वजनिक कार्यक्रम, शाळा- महाविद्यालये, विद्यापीठे इत्यादींमधून त्याला प्रमुख वक्ता म्हणून बोलावले जाते आणि तोही अतिशय आत्मविेशासाने या सभा गाजवून येतो. दि.2 ऑक्टोबर 2018 रोजी म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी मध्य प्रदेशातील 70 हजार आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या सभेला उद्देशून त्याने केलेले भाषण युट्यूबवर प्रचंड गाजले होते.

वली हे सगळं का करतोय, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याने यालाही उत्तर दिलंय, ते असं, ‘‘फ्रान्सचा महान योद्धा नेपोलियनचे एक जगप्रसिद्ध वाक्य आहे, ज्यात तो म्हणतो की- जगात खूप समस्या आहेत, लोक दु:खी आहेत. पण चुकीचं काम करणारे लोक यासाठी जबाबदार नाहीत, तर शांत बसणारी आणि काहीच न करणारी चांगल्या विचारांची माणसं यासाठी दोषी आहेत.’’ वलीला असं शांत बसायचं नव्हतं, त्यासाठी त्याने हा उपद्‌व्याप सुरू केला.

आपल्या या अवाढव्य देशाची लोकसंख्या आता जवळपास 130 कोटी आहे. त्यामानाने आपल्याला उपलब्ध असणाऱ्या सोई-सुविधा अतिशय कमी आहेत. यामुळे आपल्या देशात एकीकडे खूप श्रीमंत लोक दिसतात, तर दुसरीकडे उपाशीपोटी झोपणारे गरीब दिसतात. आपल्या देशातील खूप मोठ्या समाजाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या अन्यायाविषयी वलीच्या मनात प्रचंड चीड आहे. आपल्या देशातील गरीब आणि श्रीमंत हा भेद संपून जावा, लोकांनी एक- दुसऱ्यांशी प्रेमाने वागावे, यासाठी तो पोटतिडकीने काम करतो आहे.

प्रत्येक देशाची राज्यघटना असते, कायदा असतो, नियम असतात; त्यानुसार देशाचा कारभार चालतो. आपला देशही अशाच राज्यघटनेवर चालतो. ‘‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना हे मानवाने निर्माण केलेले जगातील सर्वांत सुंदर पुस्तक आहे,’’ असे वलीला वाटते. या पुस्तकाने प्रत्येक भारतीय नागरिकाला काही अधिकार दिले आहेत, तर काही कर्तव्ये सांगितली आहेत. त्यामुळे आपल्या राज्यघटनेला हवा असणारा भारत घडविण्यामध्ये वली खारीचा वाटा उचलतो आहे. आपल्या कामामुळे वली देशभर लोकप्रिय ठरत असला तरी, याच कामामुळे आपल्या समाजातील चुकीचे काम करणारे अनेक लोक दुखावलेही गेले आहेत. ‘तू आपले काम थांबव’ अशी धमकी ते देत असतात.

त्यासंदर्भात वली म्हणतो, ‘‘मला धमकी देणारे अनेक मेसेजेस येतात. मी माझे काम बंद करावे यासाठी ही मंडळी दबाव आणतात. काहींनी तर जीवे मारण्याची धमकीही दिलीये.’’ पण या धमकीने वली अजिबात घाबरला नाही, उलट तो अधिक उत्साहाने कामाला लागलाय. तो अतिशय आत्मविेश्वासाने म्हणतो, ‘‘मैं किसी से डरता नहीं हूँ. दो दिन की जिंदगी है और रोज घरसे ये सोचकर निकलता हूँ की आज दूसरा दिन है!’’

एकीकडे वली व्हिडिओच्या माध्यमातून देशातील विविध प्रश्नांवर बोलू लागला, तर दुसरीकडे आपल्या वयाच्या आणि विचारांच्या मुलांचा शोधही घेऊ लागला. पण वर्षभर शोधूनही त्याला एकही मुलगा किंवा मुलगी सापडली नाही. आपल्या या शोधमोहिमेविषयी वली म्हणतो, ‘‘माझ्या वयाचे कुणीच मुले-मुली राजकारण, सामाजिक समस्या या विषयावर खुलेपणाने किंवा छुप्याने का होईना, बोलताना फारसे दिसत नाहीत. वर्षभर शोध घेऊनही मला एक जणही मिळाला नाही. तेव्हा मी ठरवले, आपण अशी दहा तरी मुलं तयार करू यात, जी आपल्यासारखं काम करू शकतील.’’

वलीला 2040 मध्ये आपल्या देशाचा पंतप्रधान व्हायचं आहे. त्यासाठी भविष्यात देशाचे सामाजिक आणि राजकीय नेतृत्व करू शकतील, असे सहकारी त्याला तयार करायचे आहेत. मात्र मोठी मुलं निवडायची तर ती आपल्या सामाजिक संस्कारांमुळे राजकारण आणि समाजकारण यांकडे चुकीच्या दृष्टीने पाहू लागतात. म्हणून वलीने लहान बालकांचा शोध घेतला. कारण नेतृत्व तयार करण्यासाठी मुलांच्या नेतृत्वगुणांचा विकास करणे आवश्यक असते. नेते आईच्या पोटातून तयार होत नाहीत, ते घडवावे लागतात. वलीला असे नेतृत्व घडवायचे आहे.

वली म्हणतो, ‘‘मात्र माझ्या या प्रोजेक्टसाठी कोणते आई-वडील आपली लहान मुले मला देणार होती? कोणीच नाही. पुढे, प्रेषित मुहम्मद यांचे अनाथ मुलांविषयीचे वचन एके दिवशी माझ्या वाचनात आले आणि मला मार्ग सापडला. मी ठरवले की, आपण अनाथालय सुरू करायचे. 20 वर्षांचा होईपर्यंत 10 मुलांचा बाप व्हायचे.’’

अनाथालय सुरू करण्याची कल्पना वलीने जवळच्या मंडळींना बोलून दाखवली, तेव्हा अनेकांनी त्याला वेड्यात काढलं. मग या कल्पनेला सत्यात उतरविण्यासाठी त्याने सोशल मीडियातील आपल्या लोकप्रियतेचा उपयोग करायचे ठरवले. त्याने लोकवर्गणीतून अडीच लाख रुपये जमा केले आणि आपल्या मूळ गावी म्हणजे कोलकात्यात ‘उम्मीद’ या संस्थेची 2018 मध्ये स्थापना केली. आता वली 23 मुलांचा ‘अब्बाजी’ (बाप) झाला आहे. ‘उम्मीद’ अनाथालय असले तरी येथे केवळ प्राथमिक गरजाच भागविल्या जातात असे नव्हे. लहान मुलांमध्ये नेतृत्व घडविण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्ये शिक्षणासोबतच येथे शिकवली जातात. आणि हे सर्व केलं जातं अगदी मोफत. जनतेतून मदत मिळावी यासाठी वलीने ऑनलाईन चळवळही उभी केली आहे. त्याच्या आवाहनाला आता लोकांकडून चांगला प्रतिसादही मिळू लागलाय.

वयाची अवघी विशी पूर्ण केलेला वली रेहमानी अशा पद्धतीने अनेक आघाड्यांवर यशस्वी नेतृत्व करतोय. स्वतःला सेलिब्रिटी म्हणवून घेणे त्याला आवडत नाही. तो म्हणतो, ‘‘मी सेलिब्रिटी मुळीच नाही, कारण सेलिब्रिटींचे फॅन्स असतात. मी लीडर आहे आणि माझे चाहते हे माझे फॉलोअर्स.’’ वली या अरबी शब्दाचा अर्थ होतो मदत करणारा आणि रहमानी म्हणजे देवमाणूस. इंटरनेटचा सदुपयोग करत वली आपल्या देशात शांतता नांदावी, लोकांमध्ये बंधुभाव वाढावा यासाठी व्हिडिओजच्या माध्यमातून जनजागृती करतोय. आडबाजूला पडलेल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देतोय. दुसरीकडे ‘उम्मीद’ या संस्थेच्या माध्यमातून भविष्याचे नेते तयार करण्याचा ‘कारखाना’ (हा त्याचाच शब्द) उभा करून तो अनाथांसाठी देवमाणूसही ठरतोय.

लेखन : समीर शेख

sameershaikh7989@gmail.com

Share on Social Media