Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

त्यांच्यातील दरी कमी होईल, आपल्यातील?

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्या वतीने मागील 26 वर्षे साहित्य व समाजकार्य पुरस्कार प्रदान केले जातात, त्यांच्या कार्यवाहीत साधनाचा सहभाग मागील 11 वर्षांपासून राहिला आहे. सुनील देशमुख यांच्या पुढाकारातून चालू असलेला तो उपक्रम पावशतकभर महाराष्ट्राच्या समाजजीवनात योग्य प्रकारचा हस्तक्षेप करीत आहे. त्या दोन क्षेत्रांतील राज्यभरातील जाणकारांना त्याची चांगली कल्पना आहे. मात्र त्याच उपक्रमाला जोडून एक छोटा उपक्रम मागील चार वर्षांपासून रावबला जातो आहे, त्याची कल्पना पुणे शहाराबाहेरील लोकांना फारशी नाही. महाराष्ट्र फाउंडेशनचे सदस्य डॉ. सुरेश तलाठी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम चालवला जात आहे. (मुक्तांगण मित्र आणि साधना ट्रस्ट यांच्यामार्फत त्याचे आयोजन केले जाते.) ‘पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना’ ही या उपक्रमाची मध्यवर्ती कल्पना आहे. त्यात विविध क्षेत्रांतींल तीन किंवा चार व्यक्तींची एकत्रित अशी दीर्घ मुलाखत आयोजित केली जाते. प्रामुख्याने तरुणाईला समोर ठेवून या मुलाखती घेतल्या जातात. स्वाभाविकच तरुणाईला जिव्हाळ्याचे वाटतात असे विषय आणि आयडॉल वाटतात असे वक्ते त्यासाठी निवडले जातात. दरवर्षी युवादिनाच्या पुढे-मागे हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

2017 च्या जानेवारीमध्ये पहिला कार्यक्रम झाला- तीन डॉक्टरांची मुलाखत. अनिल अवचट, अभय बंग व आनंद नाडकर्णी या तीन डॉक्टरांची मुलाखत घेतली होती विवेक सावंत यांनी. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या त्या कार्यक्रमाला, ठरलेल्या वेळेच्या आधीच 1100 आसनक्षमतेचे बालगंधर्व रंगमंदिर तुडुंब भरले होते. दोन तास चाललेल्या त्या मुलाखतीला तरुणाईचा इतका उदंड प्रतिसाद होता की, त्यानंतर पुढील आठवड्यात पुण्याच्या पुरोगामी वर्तुळात चर्चा होत होती, आश्चर्य व्यक्त केले जात होते- इतका प्रतिसाद कसा?

त्यानंतर म्हणजे 2018 च्या फेब्रुवारीमध्ये, तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुलाखत हा कार्यक्रम झाला. त्यात भारतीय विदेश सेवेतील अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी महेश भागवत, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रेरणा देशभ्रतार या तिघांची मुलाखत निखिल वागळे यांनी घेतली होती. वस्तुत: त्या तिघांना सोयीची तारीख असलेल्या त्या दिवशी पुण्यात एकही ‘मोठे’ सभागृह उपलब्ध नव्हते, म्हणून केवळ ‘खूप मोठे’ असलेले गणेश कला क्रिडा मंच त्यासाठी निवडले होते. मात्र सकाळी नऊची वेळ असूनही 2200 आसनक्षमतेचे ते सभागृह साडेआठ वाजताच तुडुंब भरले होते. त्या मुलाखतीलाही तरुण वर्गाचा भरणाच लक्षणीय होता आणि दोन तासांच्या मुलाखतीनंतरही त्या सर्वांना ती कमीच वाटली होती.

तिसऱ्या वर्षी म्हणजे 2019 च्या मार्चमध्ये चार दिग्दर्शकांची मुलाखत हा कार्यक्रम आयोजित केला होता. सुमित्रा भावे, उमेश कुलकर्णी, समीर विद्वांस आणि वरुण नार्वेकर या चार मराठी सिने-दिग्दर्शकांची मुलाखत डॉ.आनंद नाडकर्णी यांनी घेतली होती. त्या कार्यक्रमाला आधीच्या दोन मुलाखतींच्या तुलनेत कमी प्रतिसाद होता. अर्थातच मार्च महिन्यात ती आयोजित करणे, आडवळणाचे (मॉडर्न कॉलेजचे) सभागृह असणे, आमच्या बाजूने प्रचार-प्रसार कमी पडणे आणि सिनेमा हे माध्यम तरुणाईला उपयुक्ततेच्या दृष्टीने दूरचे वाटणे- ही चार प्रमुख कारणे त्यामागे होती. मात्र त्या कार्यक्रमातून, या दिग्दर्शकांच्या कलाविषयक जाणीवांमध्ये सामाजिक भानाची तीव्रता नुसतीच जास्त नाही तर मध्यवर्ती आहे, हे ठळकपणे अधोरेखित झाले होते.

आणि आता चौथ्या वर्षी म्हणजे 4 मार्च 2020 रोजी, तीन उद्योजकांची मुलाखत हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिरात झाला. परसिस्टंट सिस्टिम्स लिमिटेडचे आनंद देशपांडे, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड आणि अन्नपूर्णा परिवारच्या मेधा सामंत या तीन उद्योजकांची मुलाखत घेण्यासाठी डॉ.आनंद नाडकर्णी यांनाच विनंती केली होती. (ऐनवेळी हणमतंराव गायकवाड येऊ न शकल्याने, त्यांच्या उद्योगात साथसंगत करणारे त्यांचे बंधू दत्ता गायकवाड आले होते.) या मुलाखतीला गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आणि आधीच्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला. अर्थातच याचीही कारणे गेल्या वर्षीसाठी जी होती तीच आहेत. मात्र त्यात आणखी एका कारणाची भर पडली, ती अशी की उद्योग व व्यापार या क्षेत्राच्या बाबतीत आपल्या समाजमनात असलेली नकारात्मक भावना! उदासीनता, अनास्था, अनाकर्षण ही तर त्यामागील उपकारणे आहेतच, पण उद्योग व व्यापार करणारे लोक सचोटीने तो करतात अशी उदाहरणे सभोवताली कमी दिसतात हे त्यामागचे खरे कारण आहे. भ्रष्टाचार, शोषण, लबाडी, लुबाडणूक, कायदे वाकवणे, विधिनिषेध न पाळणे असे सारे अवगुण उद्योग क्षेत्राला जास्त लावले जातात. परिणामी उद्योग व व्यापार करणारा माणूस मोठा झाला असेल तर, त्या मार्गाने गेला/जातच असणार असे गृहीत धरले जाते. त्यामुळे संपत्ती आहे तिथे घोटाळा आहे, असाच सर्वसाधारण समज सर्वत्र आहे.

या क्षेत्राविषयी दुरावा आणि तुच्छता यांचा संगम पुरोगामी वर्तुळात तर जास्तच आहे. म्हणूनच, अशा कार्यक्रमांतून ती दरी कमी होण्याच्या दिशेने पावले पडतील का, याचा अंदाज आम्हाला घ्यायचा होता. आणि या कार्यक्रमाला जो प्रतिसाद मिळाला त्यावरून असे लक्षात आले की, होय अधिकाधिक संवादामुळे ही दरी कमी होत जाईल आणि ती कमी व्हायलाच हवी! कारण जीवनाचे असे कोणतेही क्षेत्र नाही जे उद्योग व व्यापार यांपासून अलिप्त आहे. किंबहुना उद्योग व व्यापार या क्षेत्रांचा दु:स्वास असाच चालू राहिला तर (राजकीय तर सुटलेच) सामाजिक क्षेत्रातूनही पुरोगामी शक्तींच्या ऱ्हासाची गती वाढत जाणार यात शंकाच नाही. त्या तीनही उद्योजकांच्या मुलाखतीची थीम होती ‘उद्योजकता आणि सामाजिकता’. आणि या मुलाखतीतून/वैचारिक मंथनातून वर आलेला निष्कर्ष हा आहे की, ‘पुढील काही वर्षांत उद्योजक आणि सामाजिक उद्योजक यांच्यातील दरी नाहीशी होणार आहे.’ असो. तर त्यांच्यातील दरी हळूहळू का होईना संपुष्टात येईल, पण आपल्यातील मानसिक दरीचे काय? ती कमी करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम अधिक प्रमाणात व्हायला हवेत!

Share on Social Media

चिनी महासत्तेचा उदय : 12

ग्रामीण भागातील सुधारणा आणि कारखानदारी

सतीश बागल

डेंग यांच्या या सुरुवातीच्या आर्थिक सुधारणांच्या काळात टीव्हीई (TVE) किंवा टाऊन अँड व्हिलेज एंटरप्राइझ या नावाने चीनमधील छोटे व मध्यम आकाराचे उद्योग आकारास आले. त्यांनी चीनमधील भविष्यातील कारखानदारी व ग्रामीण भागातील उद्योजकतेचा पाया घातला. त्यांची निर्मिती, वाढ आणि विकास ही चीनमधील कारखानदारीची रोमहर्षक कहाणी आहे. ग्रामीण भागात शेतीविषयक सुधारणा होत असतानाच त्याचाच एक परिणाम- एक साईड इफेक्ट- म्हणून टाऊन अँड व्हिलेज एंटरप्राइझ ही संस्था अस्तित्वात आली. ही संस्था चीनच्या पुढील काळातील आर्थिक विकासाचा एक भक्कम पाया झाली. सामूहिक शेतीची कम्युन्स 1982 मध्ये बरखास्त केली. त्या कम्युन्समधील वर्कशॉप्स व छोटे उद्योग हे कम्युन्सच्या नियंत्रणातून बाहेर येऊन जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या नियंत्रणाखाली आले.

ग्वांगडाँग, फुजियान व इतर किनारी भागात उच्च आर्थिक विकासाची अनेक केंद्रे उघडण्याचा धडाका सुरू असतानाच इतर भागांमध्ये- विशेषतः ग्रामीण भागात - आर्थिक विकासाचे अनेक नवीन प्रयोग सुरू झाले. या प्रयोगांमध्ये डेंग यांना 1975 मध्ये रेल्वे सुधारणांमध्ये महत्त्वाची मदत करणारे वॅन ली यांचा मोठा पुढाकार होता. चीनमध्ये अन्नधान्याची परिस्थिती 1978 मध्ये चिंताजनक होत होती. सामूहिक शेतीचे प्रयोग 1955 मध्ये सुरू झाले होते. त्यात सुरुवातीला उत्पादकता वाढली, शिवाय अनेक ठिकाणी धरणे व जलसिंचनाचे मोठे प्रकल्पही उभे राहिले. मात्र पुढे-पुढे उत्पादकता इतकी घसरली की, चीनपुढे उपासमारीचे संकट उभे राहिले. Great Leap Forward कार्यक्रमानंतर आणि त्यामुळे झालेल्या उपासमारी नंतर सामूहिक शेतीचा प्रयोग सीमित करण्यात आला. आता खतांचा पुरवठा वाढला, अन्नधान्य उत्पादन वाढले; तरीही वाढत्या लोकसंख्येसाठी ते पुरेसे नव्हते. तिसऱ्या प्लेनममध्ये शेतकी सुधारणांवर चर्चा होऊन सामूहिक शेतीविषयी पुनर्विचार झाला. मात्र सामूहिक शेतीचे मॉडेल तसेच ठेवून खते, पाणी, सुधारित बियाणे, यांचा योग्य वापर करून उत्पादकता वाढविण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. सामूहिक शेतीच्या मॉडेलमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव रद्द केला; कारण मुळात सामूहिक शेतीमुळे ग्रामीण भागात जे काही संघटन झाले होते, त्या भोवतीच पक्षाचे ग्रामीण भागातील राजकीय संघटन गुंफलेले होते. आता सामूहिक शेतीच्या मॉडेलला हात लावणे म्हणजे ग्रामीण भागात मोठे राजकीय आणि संघटनात्मक बदल करण्यासारखे होते; शिवाय त्यात स्थानिक राजकीय नेत्यांचे हितसंबंधही गुंतलेले होते. त्यामुळे तेथे मूलभूत सुधारणा करण्यास कोणीच तयार नव्हते. भीती अशीही होती की, सामूहिक शेतीचा प्रयोग बंद करून वैयक्तिक शेतकऱ्यांकडे शेती सुपूर्द करायचे ठरविल्यास आणि त्यांना मालकी हक्क दिल्यास जमीनदारी व भांडवलशाही मागल्या दराने आत येईल. त्यातून 1949 पूर्वीची परिस्थिती निर्माण होईल व हे सारे क्रांतीविरोधी झाले असते. डेंग 1978 मध्ये याला फारसे तयार नव्हते, कारण त्यामुळे कडव्या माओवाद्यांना आर्थिक सुधारणांना विरोध करण्यास आयते बळ मिळेल, अशी भीती त्यांना वाटत होती.

डेंग यांचे राजकीय पुनर्वसन 1977 मध्ये होत असतानाच त्यांचे एक विश्वासू सहकारी वॅन ली (Wan Li) यांना आनहुई (Anhui) प्रांताचे पक्ष सचिव म्हणून नेमण्यात आले होते. वॅन हे सुधारणावादी तर होतेच, शिवाय त्यांनी डेंग यांना पूर्वी रेल्वे सुधारणा करण्यात मोलाची मदत केली होती. आनहुई प्रांत ग्रामीण व मागासलेला होता आणि तेथे अन्नधान्याच्या कमतरतेने कुपोषणाचा मोठाच प्रश्न होता. ग्रेट लीप फॉरवर्डमधील काळात येथे मोठ्या प्रमाणावर भूकबळी व उपासमार होत असे. तेथील परिस्थितीची पाहणी केल्यावर वॅन ली यांनी काही उपाययोजना सुचविल्या. त्यापूर्वीही या विषयावर पक्षाच्या ग्रामीण धोरण संशोधन विभागाचेही काम सुरू होते. वॅन ली यांच्या सहा कलमी कार्यक्रमात सामूहिक शेतीच्या मोठ्या संस्थेपेक्षाही कमी आकाराच्या लहान संस्था, ग्रामीण जनतेला वैयक्तिक स्तरावर उत्पादनांची जबाबदारी देणे, त्यांना बाजारात धान्य विकण्याची मुभा देणे, धान्याचा कोटा कमी करणे, टीममधील व्यक्तींना स्वतःच्या व इतर खासगी शेतात काम करण्यासही परवानगी देणे- अशा अनेक सुधारणांचा समावेश होता. एकंदरीतच शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना या उत्पादनप्रक्रियेत समाविष्ट करून त्यांना प्रोत्साहन देणे, बाजारात धान्य विकण्याची परवानगी देणे अशा प्रकारच्या सामूहिक शेतीच्या तत्त्वाला मुरड घालणाऱ्या व भांडवलशाहीवादी वाटणाऱ्या सुधारणांचा समावेश होता. ही तत्त्वे राष्ट्रीय धोरणाविरुद्ध होती. डेंग यांच्या नजरेस येताच त्यांनी वॅन ली यांना प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्यास परवानगी दिली. प्रयोग करून, प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याचे परिणाम पाहावेत आणि नंतर धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी डेंग यांची भूमिका असे. वॅन ली यांच्या प्रयोगाची सुरुवात तर उत्तम झाली. धान्य उत्पादन 1978 मध्ये वाढले आणि मुख्य म्हणजे वाजवी किमतीत बाजारात धान्य मिळू लागले. कुपोषण व उपासमारीवर एक चांगला उपाय मिळाला.

सिचुयान प्रांतातील पार्टी सेक्रेटरी झाओ झियांग यांनीही डेंग यांच्या सूचनेनुसार सिचुआन प्रांतात अशाच प्रकारचा प्रयोग सुरू केला. मात्र असे असले, तरी हुआ गुओफेंग सत्तेत असेपर्यंत सामूहिक शेतीपद्धतीमध्ये कोणताही बदल करण्याचे हुआंनी नाकारले. परदेशी भांडवल, तंत्रज्ञान, विज्ञान व व्यवस्थापन हे सर्व आयात करण्यात आणि काही बाबतींत बाजारप्रणीत अर्थव्यवस्थेच्याही अनिवार्यतेबाबत आग्रही असणारे हुआ शेतीबाबत बरेच पुराणमतवादी होते, कारण ग्रामीण भागातील पक्षसंघटना सामूहिक शेती संकल्पनेभोवती गुंफलेली होती. ते हुआंना बदलायचे नव्हते; शिवाय आधुनिक रासायनिक खते, शेतीसाठी अधिक पाणी, सुधारित बियाणे अशांचा वापर करून शेती उत्पादन वाढविण्यावर त्यांचा भर होता. 1978 पासून 1982 पर्यंतच्या चार वर्षांत खतांचे उत्पादन दुप्पट झाले, कारण 1975 मध्ये डेंग यांच्या सुधारणा कार्यक्रमात 18 खत कारखान्यांचे आयोजन केले होते. या चार वर्षांत ग्रामीण भागात वीजपुरवठा दुपटीने वाढला व बऱ्याच कम्युन्समध्ये ट्रॅक्टर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. हुआ यांचा भर अशा रीतीने उत्पादनवाढीवर होता. डेंग मात्र शेतीच्या आर्थिक प्रश्नाच्या मुळाशी जाऊन शेतकऱ्यांना सामील करून घेऊन, त्यांना प्रोत्साहन देऊन, स्वातंत्र्य देऊन उत्पादकता वाढवावी या मताचे होते. त्यांचे सहकारी व वित्तमंत्री चेन युन हेही माओंच्या काळापासूनच या विचाराचे होते. त्यामुळे डेंग सत्तेत आल्यावर आनहुई प्रयोगाला प्रोत्साहनच मिळाले. आनहुई येथील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्या प्रयोगाची माहिती सर्व राज्यांना पाठविण्यात आली. यामुळे 1978 मध्ये तिसऱ्या प्लेनममध्ये दाझाई शेतीपद्धतीचे समर्थन केले असले तरी 1982 पर्यंतच्या चार वर्षांच्या काळात शेती उद्योगात वित्तीय प्रोत्साहन, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि बाजारप्रणीत पद्धतीला असणारा विरोध पूर्णपणे नाहीसा झाला. सप्टेंबर 1980 मध्येच याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले. 1979 ते 1980 च्या दरम्यान New China News - Gency चा प्रभावशाली रिपोर्टर वू झियांग (Wu Xiang) याने आनहुईमधील अनुभवावर आधारित अनेक लेख वर्तमानपत्रातून लिहिले, अनेक सक्सेस स्टोरीज प्रकाशित केल्या. अशा रीतीने 1955 पासून सुरू झालेल्या सामूहिक शेतीची पद्धत गुंडाळण्यास सुरुवात झाली आणि विविध प्रांतांमध्ये जमेल तसे व स्थानिक घटक/परिस्थिती लक्षात घेऊन नवी पद्धती अमलात आणणे सुरू झाले.

डेंग यांनी स्वतःच्या मर्जीतील सुधारणावादी नेत्यांची मोक्याच्या जागी नेमणूक केली. हु याओबांग आणि झाओ झियांग अनुक्रमे पक्षाध्यक्ष व पंतप्रधान झाले, तर वॅन ली उपपंतप्रधान व शेती आयोगाचे (Agricultural Commission) प्रमुख झाले. डेंग यांना विरोध करणारे हुआ गुओफेंग व त्यांच्या सहकाऱ्यांना नारळ देण्यात आला आणि शेतीचे दाझाई मॉडेल गुंडाळण्यात आले. बीजिंगमधून 1980 मध्ये 75 नंबरच्या आदेशाने चीनमध्ये शेतीविषयक धोरणात महत्त्वाचे बदल करण्यात आले. शेतीतज्ज्ञ दु रुनशेंग (Du Runsheng) यांच्या मदतीने वॅन ली यांनी शेतीव्यवस्थेत मूलभूत बदल आणले. कम्युन-ब्रिगेड-प्रॉडक्शन टीम ही ग्रामीण भागातील महत्त्वाची शृंखला काढून टाकण्यात आली. मात्र स्थानिक परिस्थितीनुसार शेती-उत्पादनाची जबाबदारी प्रामुख्याने शेती करणाऱ्या ग्रामीण भागातील कुटुंबांकडे देण्यात आली. या व्यवस्थेत स्थानिक अधिकारी व ही कुटुंबे यांच्यात करार करण्यात येऊन त्याप्रमाणे विशिष्ट प्रकारच्या अन्न-धान्याच्या उत्पादनांची जबाबदारी कंत्राटान्वये कुटुंबाला देण्यात येत असे. स्थानिक प्रशासनाकडून काही मार्गदर्शन, मदत व सवलती देण्यात येत. कंत्राटात दर्शविलेल्या अन्न-धान्याच्या उत्पादनापेक्षा जास्त झालेले उत्पन्न शेतकऱ्यांना स्वतःसाठी ठेवण्याची वा बाजारात बाजारमूल्याला विकण्याची मुभा होती. जमिनीची मालकी सरकारकडेच असे. कुटुंबांनी हे काम नाकारल्यास वा काही इतर कारणांनी करू शकत नसल्यास ती जमीन व ते काम इतर कुटुंबांना देण्याची सोय होती. कम्युन ब्रिगेड प्रॉडक्शन टीम ही उतरंडव्यवस्था राजकीय स्वरूपाची होती. त्यांची राजकीय व इतर कामे काढून ती स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आली. कम्युनमध्ये अंतर्भूत असणारे वर्कशॉप, स्थानिक कारखाने व फॅक्टरी या शासनाच्या संस्था म्हणून काम करू लागल्या. असे असले तरी काही अतिदुर्गम व दुष्काळी भागात- विशेषतः उत्तरेकडील भागात- शेतीची अवस्था वा परिस्थिती वाईट होती. तेथे मात्र शासकीय व्यवस्थेकडूनच काम सुरू राहिले.

दरम्यानच्या काळात 1978 ते 1982 या चार वर्षांत अन्नधान्याच्या आधारभूत किमती 20 टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील उत्पन्न वाढू लागले. शिवाय कुटुंबाना शेतीउत्पादनात अधिक उत्पन्न घेण्यासाठी प्रोत्साहन मिळत असल्याने उत्पन्न वाढले, त्यांची उत्पादकता वाढली. ग्रामीण भागातील उत्पन्न 1978 ते 1982 या चार वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढले. शेतीक्षेत्रातील या मूलभूत बदलाने- विशेषतः त्यातील अधिक अन्नधान्य उत्पादनासाठी असलेल्या प्रोत्साहन योजनेमुळे- लोकांमध्ये उत्साह संचारला. 1977 ते 1984 या सात वर्षांत अन्नधान्य उत्पादन 25 टक्क्यांनी वाढले. 1981 नंतर अन्नधान्याव्यतिरिक्त, फळे, भाज्या व नगदी पिके (कापूस इत्यादी) यांचेही उत्पादन वाढले. शिवाय मांस, अंडी, पोर्क, बीफ यांचा वापरही खूप वाढला. पुढे-पुढे अन्नधान्याचे उत्पादन इतके वाढले की, ते विकत घेण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधीही नव्हता. त्या वेळी सरकारने त्या रकमांच्या बदल्यात शेतकऱ्यांना कर्जरोखे व प्रॉमिसरी नोट्‌स दिल्या. कारण शेतकऱ्यांना द्यायची किंमत व अन्नधान्य विकण्याच्या किमतीत फरक असल्याने सरकारला मोठी सबसिडी द्यावी लागे. पुढे नागरी भागातील किमतीतील सबसिडी काढून टाकण्यात आली. सरकारने 1985 नंतर शेतकऱ्यांकडून धान्य विकत घेण्याची सक्ती काढून टाकली. अशा रीतीने शेतकी उत्पादनाच्या किमती बाजारभावात ठरू लागल्या. सुरुवातीस याचा त्रास झाला. शेतकऱ्यांनी अन्नधान्याचे उत्पादन कमी केले, त्यामुळे बाजारात पुरवठा कमी झाला. पुढे 1989 मध्ये परत एकदा 1984 पेक्षा जास्त धान्य उत्पादन झाले.

पुढे कापूस, जवस, तंबाखू ही उत्पादनेही मोठ्या प्रमाणावर येऊ लागली. कापसाचे उत्पादन 1981 नंतर इतके वाढले की, तीन वर्षांत कापूस निर्यात होऊ लागला. विविध प्रकारची उत्पादने, उपलब्धतता यामुळे सर्व लोकांमध्ये समाधानाची जाणीव निर्माण झाली. ग्रामीण भागातील लाखो लोकांना दारिद्य्ररेषेबाहेर काढण्यात आले. पुढे-पुढे तर 1985 नंतर पुरेशी वाहतूक, साठवणूक व शीतगृहांची व्यवस्था यामुळे शेतीउत्पादनांत कमालीची वाढ झाली. या सर्व व्यवहारात डेंग यांची भूमिका आणि सहभाग मोठाच होता. केवळ सैद्धांतिक वा आदर्शवादी न राहता आणि जे योग्य होते व जे करता आले, ते त्यांनी केले. विशेषतः साम्यवादाची सर्वसामान्य मूळ चौकट न सोडता त्यांनी ते होऊ दिले वा केले.

टाऊन अँड व्हिलेज एंटरप्राइझ (TVE)

डेंग यांच्या या सुरुवातीच्या आर्थिक सुधारणांच्या काळात टीव्हीई (TVE) किंवा टाऊन अँड व्हिलेज एंटरप्राइझ या नावाने चीनमधील छोटे व मध्यम आकाराचे उद्योग आकारास आले. त्यांनी चीनमधील भविष्यातील कारखानदारी व ग्रामीण भागातील उद्योजकतेचा पाया घातला. त्यांची निर्मिती, वाढ आणि विकास ही चीनमधील कारखानदारीची रोमहर्षक कहाणी आहे. ग्रामीण भागात शेतीविषयक सुधारणा होत असतानाच त्याचाच एक परिणाम- एक साईड इफेक्ट- म्हणून टाऊन अँड व्हिलेज एंटरप्राइझ ही संस्था अस्तित्वात आली. ही संस्था चीनच्या पुढील काळातील आर्थिक विकासाचा एक भक्कम पाया झाली. सामूहिक शेतीची कम्युन्स 1982 मध्ये बरखास्त केली. त्या कम्युन्समधील वर्कशॉप्स व छोटे उद्योग हे कम्युन्सच्या नियंत्रणातून बाहेर येऊन जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या नियंत्रणाखाली आले. कम्युन्स हा शेतीमधला मोठा प्रयोग असला तरी त्यात शेतीमालाच्या वाहतुकीसाठी असणारी वाहने, शेतीची अवजारे, ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी, पाण्याचे पंप व इतर दैनंदिन यंत्रसामग्री दुरुस्त करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील इतर कामांसाठी सुशिक्षित व अर्धशिक्षित तरुणांनी वर्कशॉप व छोटे उद्योग काढले होते. कम्युन्स बरखास्त झाल्यावर याच छोट्या उद्योगांनी व वर्कशॉपनी पुढे उत्पादनात प्रचंड झेप घेतली. अनेक कम्युन्समध्ये पूर्वीचे अन्नप्रक्रिया करणारे छोटे उद्योग, कुटिरोद्योग, सॉस/जॅम तयार करणारे उद्योग, विटा तयार करणारी, पारंपरिक औषधे तयार करणारी युनिट्‌स होती. खतांची व ऑरगॅनिक खते तयार करणारी छोटी-छोटी युनिट्‌सही होती. कम्युन्स बरखास्त झाल्यानंतर ग्रामीण भागातील या उद्योजकांना मोठे स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्यात कमालीची लवचिकता होती. शिवाय त्यातील कामगार-संख्याही कमी असे. कोणतीही स्थानिक उत्पादने घेण्याचे व विक्री करण्याचे त्यांना स्वातंत्र्य होते. इतर उद्योगांप्रमाणे त्यांच्यावर आकाराचे बंधन नव्हते. शिवाय शेती करताना उत्पादन करणाऱ्या कुटुंबांना भरपूर स्वातंत्र्य असल्याने, कुटुंबातील व्यक्ती भरपूर काम करून पैसे मिळवीत. त्यामुळे कुटुंबातील इतर तरुणमंडळी टाऊन अँड व्हिलेज एंटरप्राइजमध्ये काम करण्यासाठी मोकळी असत. कापूस, जवस, तंबाखू इत्यादी नगदी पिके व फळे, भाज्या यांचे उत्पादन वाढल्यामुळे या कच्च्या मालापासून वस्तू व इतर पक्क्या वस्तू निर्माण करण्याचे अनेक छोटे-छोटे उद्योगधंदेही ग्रामीण भागात निर्माण झाले.

अशा रीतीने ग्रामीण भागात पूर्वीपासून चालत आलेले छोटे उद्योग, वर्कशॉप, कुटिरोद्योग यांचे एक मोठे जाळे तयार झाले होते. कम्युन्स बंद पडल्यावर या उद्योगांनी पंख पसरले. त्यांच्यावर कोणतीही बंधने नसल्याने खुल्या अर्थव्यवस्थेचा पूर्ण फायदा घेत हे उद्योग प्रचंड वेगाने वाढू लागले. पुढे टीव्हीईच्या (TVE)आधुनिकीकरणासाठी बाहेरून पैसाही येऊ लागला. त्यातील निम्मे उत्पादन ग्वांगडाँग, फुजियान, झोजियांग (Zhejiang), जिआंग्त्सू (Jiangtsu) व शँन्डाँग (Shandong) या दक्षिणेकडील राज्यांच्या किनारपट्टीच्या भागातून होऊ लागले. यातील गुंतवणूकही हाँगकाँग आणि तैवानमधून येऊ लागली. अनेकांनी परदेशी तंत्रज्ञान आणून, स्थानिक अधिकाऱ्यांना भागीदार घेऊन उद्योगविस्तार केला आणि जगभरासाठी वस्तूंचे उत्पादन सुरू केले. कम्युन्स बरखास्त केल्यानंतर त्यातील अनेक उद्योग स्वतंत्र होऊन बाजार न्याहाळीत बाजारातील मागणीनुसार उत्पादन करू लागले. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि राष्ट्रीयीकृत उद्योगांनी काही टीव्हीईना बरोबर घेऊन भागीदारी केली व त्यांची उत्पादने विकत घेतली. राष्ट्रीय उद्योग वा सार्वजनिक उद्योगांवर पारंपरिक दृष्ट्या अनेक बंधने होती. मूलभूत उद्योग (सिमेंट, स्टील, फर्टिलायझर), वाहतुकीची साधने (ट्रॅक्टर, ट्र्‌क्स, बसेस) रेल्वे, रेल्वेचे व वाहतुकीसाठी लागणारे सुटे भाग इत्यादींसाठी उत्पादनाचा कोटा (Quota) ठरवून दिलेला असे. मात्र टीव्हीईवर कोट्याची बंधने नव्हती; त्यामुळे टीव्हीईना मार्केटशी जुळवून घेणे व त्याप्रमाणे उत्पादन करणे शक्य होते. आपल्या कर्मचाऱ्यांना घरे, वेल्फेअर/कल्याणकारी योजना, वैद्यकीय साह्य इत्यादी देण्याचे बंधन टीव्हीईवर नव्हते. 1978 मध्ये 2.83 कोटी लोक टीव्हीईमध्ये काम करीत होते. 1992 मध्ये जेव्हा डेंग निवृत्त झाले, त्या वेळी टीव्हीईमध्ये 10.58 कोटी लोक काम करीत होते. 1978 मध्ये TVE चे उत्पन्न 47 बिलियन युआन होते; तर 1992 मध्ये ते चाळीसहून अधिक पटींनी वाढून 1800 बिलियन युआनवर गेले. चीनमध्ये कम्युन्समधील उद्योगातून 1978 मध्ये 9 टक्के औद्योगिक उत्पादन येत असे, 1990 मध्ये 25 टक्के, तर 1994 मध्ये ते 42 टक्के झाले. पुढे पुढे जसजसे टीव्हीई वाढले तसतसे टीव्हीईमध्ये सरकारी उपक्रमामधून कामगार व तंत्रज्ञ येऊ लागले. इतकेच नव्हे, तर आठवडाभर सरकारी उपक्रमांमध्ये काम करणारे इंजिनिअर्स शनिवारी आणि रविवारी TVE मध्ये काम करीत. त्यामुळे शेवटी सरकारलाच काळजी वाटू लागली आणि TVE वर नियंत्रणे येऊ लागली. अशा रीतीने सार्वजनिक उपक्रमांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागल्याने व त्यांची साधनसामग्री टीव्हीईकडे (TVE) जाऊ लागल्याने काही नियंत्रणे घातली गेली. मात्र तोपर्यंत टीव्हीईनी ग्रामीण भागात व गावा-गावांमध्ये उद्योग भरभराटीस आणले आणि सामान्य माणसातील उद्योजकता जागविली.

गृहोद्योग :

अशा रीतीने 1980 च्या दशकात चीनमध्ये विदेशी गुंतवणूक व उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेवाक्षेत्रातील उद्योग, अस्तित्वात असणारे सरकारी लहान-मोठे उद्योग आणि कम्युन्स बरखास्त केल्यानंतर सहकारी तत्त्वावर निर्माण झालेले व स्थानिक सरकारच्या नियंत्रणाखाली असलेले टीव्हीई (टाऊन अँड व्हिलेज एंटरप्राइज) अशी अनेक स्तरांवर जोमदार कारखानदारी सुरू झाली. आता यामध्ये गरज भासू लागली ती छोटे व्यावसायिक व सेवा-क्षेत्रातील उद्योग- जसे हॉटेल्स, रेस्टॉरंट, विविध सेवा देणाऱ्या संस्था दुकाने इत्यादी, यांची. याच काळात सांस्कृतिक क्रांतीच्या काळात ग्रामीण भागात पाठविलेले व मूळ शहरी भागातील तरुणही आपापल्या घरी वा शहराकडे/गावाकडे परतू लागले. त्यापैकी काहींनी विद्यापीठामध्ये नावे नोंदवून उच्च शिक्षण घेतले. विशेषतः ग्रामीण भागात शेतकरी त्यांचे अतिरिक्त उत्पादन बाजारात विकून टाकीत, त्यामुळे शहरी भागात अन्नधान्याचा तुटवडा असल्याने कडक रेशनिंग व्यवस्था होती व धान्यासाठी सरकारकडून कुपने दिली जात. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात उदरनिर्वाहासाठी येण्यावर अनेक बंधने होती. माओंच्या मृत्यूनंतर 1978-79 पासून 1983 पर्यंत जवळजवळ 2 कोटी सुशिक्षित तरुण, कामगार, बुद्धिमंत- जे पूर्वी शहरी भागात होते ते- आपापल्या घरी/गावात परतले. याच काळात तरुणवर्गातील गुन्हेगारीनेही कळस गाठला. म्हणून डेंग यांनी असा निर्णय घेतला की- वैयक्तिक स्तरावर कुटुंबांना व व्यक्तींना दुकाने, सेवाकेंद्रे, दुरुस्तीसाठीचे वर्कशॉप्स इत्यादी अनेक प्रकारच्या सुविधा देणारे छोटे उद्योग चालू करता येतील. त्यामुळे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स्‌, हॉटेल्स, दुरुस्तीची वर्कशॉप्स, विक्रीची दुकाने अशा अनेक प्रकारचे लघु व गृहउद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. असे उद्योग व ते चालविणारे उद्योजक आणि त्यांची कुटुंबे यांना भांडवलशाहीवादी म्हणणे कितपत योग्य आहे, असाही प्रश्न तेव्हा निर्माण झाला. गंमत म्हणजे, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने यावर नामी युक्ती शोधून काढली. छोट्या व गृह उद्योगात सातपर्यंत कामगार असतील व मालक स्वतःच त्यांच्याबरोबर काम करीत असेल तर, अशा प्रकारचा आक्षेप घेता कामा नये. त्यामुळे छोटे उद्योग जोमदारपणे वाढू लागले. अशा रीतीने थोड्या मोठ्या प्रमाणात मुळात घरगुती असलेल्या छोट्या उद्योगांचे एक प्रचंड जाळे चीनभर निर्माण झाले. पुढे-पुढे अशा उद्योगांमध्ये सातपेक्षा अधिक लोक काम करू लागले. मात्र अशा उद्योगधंद्याचे नियंत्रण कठोरपणे करण्याचे डेंग आणि चेन युन यांनी टाळले. पुढे 1987 मधील तेराव्या पार्टी काँग्रेसमध्ये त्यांनी निर्णय घेऊन सात सदस्यांचा नियमही काढून टाकला आणि सातपेक्षा अधिक लोकांना असा उद्योग करण्यात परवानगी देण्यात आली.

एकंदरीतच 1978 ते 1988 या दशकात डेंग यांच्या नेतृत्वशैलीमुळे अनेक भागांत आर्थिक सुधारणांचे व लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी घेतल्या गेलेल्या आर्थिक कार्यक्रमांमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग केले गेले. ते प्रयोगशील होते. कोणतीही भूमिका सैद्धांतिक रीत्या मांडण्याऐवजी त्यासंबधी काही प्रयोग करून पाहणे, थोडा अनुभव घेणे, लोकांवर त्याचा सकारात्मक परिणाम कसा होतो हे पाहणे व त्यानंतर ती अधिकृत भूमिका अथवा धोरण स्वीकारणे, त्यासंबंधीचे चांगले अनुभव देशातील इतर भागांमध्ये पोहोचविणे- अशा टप्प्यांतून ते जात असत. शिवाय खुलेपणे चर्चा करणे, प्रयोग करू देणे, हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. आर्थिक प्रयोगासाठी आवश्यक असणारे किमान स्वातंत्र्य असावे, या मताचे ते होते. तरीही लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य या संकल्पना त्यांनी दूर ठेवल्या. तसेच या संकल्पना घेऊन त्याआधारे चळवळ करणाऱ्या चळवळ्यांचा त्यांनी थोड्या निष्ठुरपणेच बीमोड केला.

नोव्हेंबर 1987 मध्ये सहाव्या राष्ट्रीय खेळ स्पर्धांचे आयोजन ग्वांगडाँग येथील अद्ययावत स्टेडियममध्ये करण्यात आले. या शानदार सोहळ्याचे आयोजन 1984 मधील लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या धर्तीवर करण्यात आले. त्यानिमित्ताने ग्वांगडाँगमधील तंत्रज्ञान, व्यवस्थापन, बांधकाम विभाग, तेथील कारखानदारी, दर्जेदार उपभोग्य वस्तू इत्यादींचे शानदार प्रदर्शन करण्यात आले. याच पद्धतीने 1990 मधील एशियन गेम्सचे आयोजन झाले. पुढे तर 2008 मधील ऑलम्पिक स्पर्धांचे दिमाखदार प्रदर्शन करून चीनने आपण पाश्चात्त्य देशांच्या बरोबरीनेच नव्हे, तर त्यांना मागे टाकून पुढे जाऊ असे दमदार प्रतिपादन केले.

चीनने 1978 ते 1987 पर्यंतच्या दहा वर्षांत धडाडीने अर्थव्यवस्था खुली करण्याचे धारिष्ट्य दाखविले. याच काळात भारताने जुन्याच समाजवादी पद्धतीने वाटचाल सुरू ठेवली. डेंग 1978 मध्ये नवनवे आर्थिक प्रयोग करीत असताना भारताने सैद्धांतिक भूमिका घेत आयबीएमसारख्या उच्च तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या व आर्थिक वाटचालीच्या भविष्यात डोकावण्याची क्षमता असलेल्या कंपनीला बाहेरचा रस्ता दाखविला. राजीव गांधींच्या 1984 मध्ये आलेल्या सरकारने तंत्रज्ञानविषयक क्षेत्रांत महत्त्वाची पावले उचलली हे खरे; मात्र त्यात अर्थव्यवस्था खुली करण्याबाबत विचार नव्हता. त्यामुळे त्या काळात भारतात उद्योजकता, उद्यमशीलता फुललेली दिसली नाही. आर्थिक प्रश्न अधिक जिकिरीचे झाले. पुढे 1991 मध्ये पराकोटीच्या आर्थिक अडचणींमुळे नरसिंह राव व मनमोहनसिंग यांनी अर्थव्यवस्था खुली केली, त्यानंतर भारताची आर्थिक वाटचाल अधिक दमदारपणे होऊ लागली. मात्र आर्थिक विकासाच्या वाटेवर भारत दीड दशक मागे राहिला. याशिवाय शहरी भागातील थेट विदेशी गुंतवणूक आणि ग्रामीण व अर्ध शहरी भागातील टीव्हीए व इतर लघु उद्योगांत दिसून येणारी उसळती उद्यमशीलता यामुळे चीनचा आर्थिक विकास जोमदारपणे झाला. चीन व भारत यांच्या आर्थिक विकासात जो मोठा फरक दिसतो, तो या कालखंडामुळे!

डॉ. सतीश बागल, नाशिक

bagals89@gmail.com

Share on Social Media

चिंतन : 7

एकट्या व एकाकी जगाविषयी आस्था की तिरस्कार?

सुरेश द्वादशीवार

लिंकनने गुलामांना मुक्त केल्यानंतर त्यांच्या प्रमुख नेत्यांची एक परिषद आपल्या अध्यक्षीय प्रासादात बोलविली. तीत त्या साऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, ‘तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना फसवून व विकत घेऊन येथे आणले गेले आहे. त्या घटनेचा मला व माझ्यासारख्या अनेकांना पश्चात्ताप आहे. तुमच्यापैकी ज्या कोणाला वा सर्वांना पुनःश्च आपल्या मायदेशी परत जावे असे वाटत असेल, तर तशी व्यवस्था माझे सरकार आपल्या खर्चाने करील.’ लिंकनला उत्तर देताना ते नेते म्हणाले, ‘आमच्या कित्येक पिढ्या येथे राहिल्या, राबल्या आणि मेल्या. त्यांचा घाम व रक्त या भूमीत मिसळले आहे. आता अमेरिका हीच आमची जन्मभूमी व पितृभूमी आहे. आम्हा साऱ्यांना हाच आपला देश वाटू लागला आहे. सबब, आम्ही येथेच राहू.’ लिंकन व त्यांच्या सहकाऱ्यांनी मग त्यांचे स्वागत केले व त्यांच्या कायम पुनर्वसनाच्या योजना आखल्या.

मूल जन्माला येते तेच मुळी एकाकीपण घेऊन. त्याचे तेव्हाचे अबोल अन्‌ हसरे बालपण मातृत्व जागविते. पितृत्वालाही साद घालते. जोवर त्याचे माता-पित्यावरचे अवलंबन संपत नाही, तोवर तेही त्यांच्या जीवनाचा भाग होते. जसजसे ते वाढू लागते व त्याला त्याचे आत्मभान येऊ लागते, तसतसे ते या साऱ्यापासून नकळत दूर होऊ लागते. शिक्षण, वाढ आणि स्वयंपूर्णता लाभेपर्यंतचा त्याचा कुटुंबावलंबी स्वभाव पुढे लोप पावतो. प्रगत, शिक्षित व स्वतंत्र वृत्तीत जगणाऱ्या कुटुंबातील मुलात हे लवकर येते. समूहावलंबी व काहीशा मागासलेल्या कुटुंबात ते उशिरा येते, एवढेच. आपण काही खऱ्या गोष्टी स्पष्टपणे बोलायचे टाळतो, कारण त्यात आपल्या परंपरा आडव्या येतात; पण ते खरेपण वडिलधाऱ्या जाणकारांच्या लक्षात यायला फार वेळ जावा लागत नाही.

हे सांगत असताना वात्सल्य, मातृप्रेम, कुटुंबातील इतरांविषयीची आस्था नाकारायची नाही; त्याच वेळी लहानपणाचे सवंगडी, त्यांचे मैत्र हेही सोबत असते- झालेच तर जात, धर्म व देश यांच्याविषयीचे प्रेमही असतेच. हे सारे उपजत असते की सहवासाने येते, हा प्रश्न असतो. एखाद्या सवर्ण कुटुंबात जन्माला आलेले मूल आदिवासी वा दलित कुुटुंबात वाढविले किंवा एखादे भारतीय मूल पाकिस्तान वा बांगलादेशात वाढविले, तर ते कोणाचे व कोठले संस्कार घेऊन मोठे होईल? जन्माचे की सहवासाचे? या प्रश्नाच्या उत्तरात सारे जन्मदत्त व समाजदत्त विषय लक्षात येणारे आहेत. रक्तसंबंध महत्त्वाचे असतात, ते व्यक्तीला त्याचे समाजातील स्थान व त्यातली कमी-अधिक प्रतिष्ठा मिळवून देतात. मात्र रक्तसंबंधाने दिलेल्या या स्थानाचे व प्रतिष्ठेचे मोल आजच्या बदलत्या जगात पुरते ओसरले आहे. समर्थ रामदास म्हणाले, ‘ब्राह्मण कितीही भ्रष्ट झाला तरी तो साऱ्यांना पूज्यच असतो.’ रामदासांचे हे वचन आता ब्राह्मणांनाही मान्य होणारे नाही. बाकीचा समाज तर तो कुचेष्टेचा प्रकार म्हणूनच स्वीकारत असतो. माणसे कुठेही जन्माला येवोत- ती अनुभव, ज्ञान, कलासंपन्नता आणि नेतृत्वगुण या बळावर मोठी होतात. गांधी या महात्म्याची जात कोणती याची कोणी चौकशी केली नाही आणि टिळकांच्या जातीचा बहुजन समाजाने विचारही केला नाही. मौलाना आझाद हे मुसलमानांचे कमी आणि हिंदूंचेच नेते अधिक होते. तिकडे स्वतःला प्रोटेस्टंट म्हणविणाऱ्या अमेरिकेत केनेडी आणि क्लिंटन हे दोन रोमन कॅथॉलिक अध्यक्षपदी निवडून आले. झालेच तर स्वतःला कॉकेशियन वंशाचे गौरवर्णी म्हणवून घेणाऱ्या त्या देशाने बराक ओबामा या कृष्णवर्णीय नेत्यालाही अध्यक्षपदी निवडले. सोनिया गांधी जन्माने इटालियन असल्या, तरी त्या भारताच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक आहेत. ही उदाहरणे जन्माहून कर्तृत्व आणि रक्तसंबंधांहून गुणकार्य मोठे ठरत असल्याचे सांगणारी आहे. भारतीय संगीताचे बहुतेक सारे मानकरी मुसलमान धर्माचे होते. या देशाला ताजमहाल-सारख्या ज्या वास्तूंचा अभिमान आहे, त्या वास्तूचे निर्मातेही हिंदू नव्हते, मुसलमान होते. याहून स्पष्ट सांगायचे तर- प्रत्यक्ष दशरथाची मुले, सीता, पांडव, कौरव आणि द्रौपदी या साऱ्यांचेच जन्म आज संशयास्पद वाटावेत असे आहेत. जाती-वर्णाचा विचार केला तर रावण ब्राह्मण, राम क्षत्रिय आणि कृष्ण शूद्र होता. मात्र ही दैवते साऱ्यांच्याच पूजेचा व श्रद्धेचा वंदनीय भाग बनली. संस्कार, ही माणूस व समाज घडविणारी सर्वांत मोठी व्यवस्था आहे हे सांगणारे हे वास्तव आहे, त्यात आजही बदल नाही. झालेच तर हे वास्तव यापुढल्या काळात अधिक प्रखर व जगन्मान्य होत जाणार आहे.

यासंबंधीची सर्वांत मोठी व साऱ्यांचे डोळे उघडणारी गोष्ट अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीची आहे. अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत गुलामगिरी रद्द करण्याचे कायदे करून ते अमलात आणले. परिणामी, सारे गुलाम मुक्त झाले. त्या देशातील अनेक राज्यांनी तो कायदा अमलात आणण्याची नंतरही फार काळ खळखळ केली, पण लिंकनपुढे कोणाचे फारसे चालले नाही. कृष्णवर्णीयांना संरक्षण देण्याची ही जबाबदारी थेट जॉन एफ.केनेडींपर्यंतच्या अध्यक्षांना वाहून न्यावी लागली.

लिंकनने गुलामांना मुक्त केल्यानंतर त्यांच्या प्रमुख नेत्यांची एक परिषद आपल्या अध्यक्षीय प्रासादात बोलविली. तीत त्या साऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, ‘तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना फसवून व विकत घेऊन येथे आणले गेले आहे. त्या घटनेचा मला व माझ्यासारख्या अनेकांना पश्चात्ताप आहे. तुमच्यापैकी ज्या कोणाला वा सर्वांना पुनःश्च आपल्या मायदेशी परत जावे असे वाटत असेल, तर तशी व्यवस्था माझे सरकार आपल्या खर्चाने करील.’ लिंकनला उत्तर देताना ते नेते म्हणाले, ‘आमच्या कित्येक पिढ्या येथे राहिल्या, राबल्या आणि मेल्या. त्यांचा घाम व रक्त या भूमीत मिसळले आहे. आता अमेरिका हीच आमची जन्मभूमी व पितृभूमी आहे. आम्हा साऱ्यांना हाच आपला देश वाटू लागला आहे. सबब, आम्ही येथेच राहू.’ लिंकन व त्यांच्या सहकाऱ्यांनी मग त्यांचे स्वागत केले व त्यांच्या कायम पुनर्वसनाच्या योजना आखल्या. (या ठिकाणी लिंकन व ट्रम्प यांच्यातील फरक लक्षात येणारा आहे. त्याच वेळी आसामात पिढ्यान्‌पिढ्या राहिलेल्या, फाळणीपूर्वी आसामात येऊन स्थायिक झालेल्या व आसामातील चहा-मळ्यात काम मिळविण्याच्या आशेने केवढ्या तरी काळापासून तेथे राहत असलेल्या बंगाली लोकांची व त्यांच्याविषयीच्या आपल्या सरकारची भूमिकाही या ठिकाणी लक्षात घ्यावी अशी आहे.)

जुन्या पिढ्या साने गुरुजींच्या पुस्तकांचे संस्कार घेऊन वाढल्या. त्यात ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव’ असे संस्कार होते. समाजाच्या सर्वच वर्गांत कमी-अधिक प्रमाणात ते होत आले. पण आज जरा डोळसपणे व परखडपणे पाहिले तर साधारणतः मॅट्रिकच्या वर्गात गेलेल्या मुला-मुलींना आपल्या आईला फारसे काही कळत नाही आणि तिला आमच्या गरजांची जाणीवच नसते, असे वाटू लागते. बारावीतल्या मुला-मुलींना बापाविषयी व कॉलेजात काही दिवस घालविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राध्यापका-विषयीही हेच वाटू लागते. मुले बोलत नाहीत आणि वडिलधारे बोलायचे टाळतात. त्यामुळे हा लपंडाव चालतो व खपतो. नव्या पिढ्या बिघडत असल्याचा हा प्रकार नाही; त्या जुन्या पिढ्यांच्या तुलनेत अधिक लवकर वयात येत असल्याचा परिणाम आहे. प्रस्तुत लेखकाने दूरदर्शन पहिल्यांदा वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी पाहिला. आताच्या पिढ्या संगणकासहच जन्माला येतात. त्यांची दृष्टी, जाण, समाजाविषयीचे दृष्टिकोन, आप्तांविषयीच्या भावना वेगळ्या असतील. कधी कधी त्या विचित्रही वाटतील. मात्र त्या त्यांच्या असतात, हे लक्षात घेतलेच पाहिजे. या वास्तवाच्या जाणिवा दोन्ही पिढ्यांना असतातच. पाश्चात्त्य देशात मुलांना लहानपणापासूनच वेगळे व स्वतंत्र वाढविले जाते. तशात मुले व मुली शक्य तेवढ्या लवकर घरापासून दूर होतात आणि आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतात. (आपल्याकडची मुलांना परावलंबी करून ठेवण्याची व बांधील राखण्याची वडिलधाऱ्यांची वृत्ती या संदर्भात फार वेगळी विचारात घ्यावी लागते.)

स्वतंत्रपण, आत्मभान आणि ‘स्व’ची जाणीव या गोष्टी मुला-मुलींना व तरुणांना त्यांचे वेगळेपण जाणवून देत असते. शिक्षण आणि ज्ञानाचा स्फोट यामुळे ही बाब पूर्वीच्या तुलनेत आता फार लवकर घडते, एवढेच. वास्तव हे की, हे साऱ्याच प्राणिमात्रांबाबत खरे आहे. गांधी म्हणाले, ‘‘काम करील त्याला दाम, घाम गाळील त्याला पैसा. मग त्या तर्काने बापाची मालमत्ता मुलांना का मिळावी? ती समाजाच्या कल्याणासाठी वापरली गेली पाहिजे. प्रत्येक पिढीने आपले स्वतंत्रपण आपल्या पायावर उभे राहून जपले पाहिजे.’’ (दुर्दैवाने गांधीजींचा हा क्रांतिकारी अर्थविचार साऱ्यांनीच दडवून ठेवण्याचा प्रयत्न आपापल्या परीने केला.) या विचारात परावलंबन संपविणे व स्वावलंबन शक्यतो लवकर उभे करणे, ही बाब अनुस्यूत आहे. गांधींचा हा विचार न स्वीकारल्याने आपल्याकडची मुले बापाची इस्टेट, जात, धर्म व झालेच तर त्याचा राजकीय पक्षही सांभाळत उभी होतात व तशीच राहतात.

वंशपरंपरा हा प्रकार आपल्याहून प्रगत देशात फारसा नाही. तेथे तो प्रकार व त्याचा संस्कार ऐन तारुण्यात वा त्या आधीच गळून पडत असल्याने वंशपरंपरेचे संरक्षण, आवरण व त्याचा संस्कारही जातो. परिणामी, माणसे एकाकी होतात. आपल्याकडे नवरा, मुलगा वा मुलगी शोधण्याचा प्रकार तिकडे कधीचाच इतिहासजमा झाला आहे. सारे काही स्वप्रयत्नाने व स्वबळावर उभे राहण्याची प्रवृत्ती तेथील सामाजिक पर्यावरणच तरुणांत विकसित करते. अगदी अध्यक्षांची मुलेदेखील हॉटेलात वेटरची कामे करून पैसा मिळविण्यात वा आपल्या पायावर उभी होण्यात कमीपणा मानत नाहीत. श्रमाची प्रतिष्ठा माणसांच्या इभ्रतीहून मोठी झाली की, असे प्रकार होतात. आपल्याकडील मोठ्या कुटुंबात व प्रगत कुटुंबात ही बाब आता येऊ लागली आहे. मुले व मुली आपली लग्ने स्वतःच ठरवतात. नोकऱ्या मिळताच व शिक्षण पूर्ण होताच स्वयंपूर्ण होतात. गरीब आणि श्रमिकांच्या मुला-मुलींना हे सांगावे लागत नाही. ती स्वतःच स्वयंभूपण अंगी बाणतात आणि लहानपणापासूनच आपल्याला आपल्या पायावर उभे व्हायचे आहे याची जाणीव ठेवतात.

प्रस्तुत लेखकाचे घर ज्या वस्तीत आहे ती श्रमिकांची, कष्टकऱ्यांची, कामगार व गरिबांची आहे. माणसे, बायका सारा दिवस राबतात. मुलांना शिकवतात, संसाराचे शकट ओढतात आणि शांतपणे जगतात. पूर्वी त्यांच्यात भांडणे होत. पिऊन हाणामाऱ्या होत. ते आता फार कमी, नगण्य म्हणावे एवढे झाले आहे. मात्र त्यांची मुले फारसे न शिकता कामाला लागली. व्यवसायात शिरली. त्यांनी कसकसली दुकाने उघडली, गाड्या काढल्या. त्याची विक्री केली. तसेच मिळेल ती संधी शोधून पैसे मिळवू लागले. शहरानजीक कुठे कोळशाच्या खाणी निघाल्या. गावातील पोरांनी तिथल्या अधिकाऱ्यांशी संधान जुुळवून त्या कोळशाची चोरी सुरू केली. प्रथम सायकलीवर, मग मोटारसायकलींवर तर पुढे जीपगाड्या घेऊन त्यावर ते कोळसा पळवून विकू लागले. त्यातील काहींनी अल्पावधीत चांगली घरे बांधली, बँकांत खाती उघडली, मुला-मुलींना शाळा-कॉलेजात पाठविले... त्यानंतर काहीच दिवसांत काही समाजसेवकांच्या कृपेने जिल्ह्यात दारूबंदी झाली. दारूची दुकाने बंद झाली. शहराकाठची नदी ओलांडली की, दुसरा जिल्हा लागतो. त्यात दारू वाहते. मग काही पोरांनी सकाळी नदी ओलांडून जाऊन दारू आणणे सुरू केले. चोरीच्या दारूला भाव अधिक. काळ्या बाजारातील तिच्या किमती फार. मग ही मुले पाहता-पाहता मोटार-सायकलींवरून दारूचा धंदा करू लागली. दिवसाकाठी दोन अन्‌ चार हजार रुपयांची कमाई करू लागली. त्यांची घरे चांगली झाली, मुले-मुली चांगल्या शाळा-कॉलेजात जायला लागल्या. जाताना नटून-थटून अन्‌ शासनाचे गणवेश व्यवस्थित अंगावर चढवून जाऊ लागल्या. त्यातल्या एकाने जरा हिंमत करून पोलिसांशीच संधान बांधले. सट्टा सुरू केला, क्रिकेटपासून निवडणुकीपर्यंतचा. तो काही महिन्यांतच लखपती झाला. तीस-चाळीस लाखांचे घर बांधले. लवकरच काही जमिनी घेतल्या. आपण जे करतो ते अवैध आहे, त्यात आपण पकडले जाऊ हे त्याला व इतरांनाही कळते. पण आपली सुटका करणारी माणसेही अशांनी जमविलेलीच असतात. या पोरांना दोष द्यायचा, नावे ठेवायची की मिळाली ती संधी त्या बिचाऱ्यांनी घेतली याचे कौतुक करायचे? त्यातली काही कधी भेटतात, म्हणतात, ‘‘सर, हे सारे चूक आहे. कधी तरी आम्ही हे बंदही करू. पण पूर्वी पोटालाच नव्हते, आता निदान घरचे खाऊ-पिऊ लागले.’’ अशा वेळी मनात येते, त्यांनी तरी काय करायचे असते? उपाशी राहायचे, की पोट भरायला धोका पत्करून मिळेल ते काम करायचे?

वेश्येच्या व्यवसायातही तिथल्या काही मुली व स्त्रिया आहेत. त्यांच्या पुढचे पर्याय लक्षात घेतले की, आपलीच नीतिमत्ता दुबळी झाल्याचे जाणवते. त्यातली एक स्त्री आमच्याकडे कामाला होती. बाकीच्या शेजारणी तिची तक्रार घेऊन घरी आल्या आणि तिला कामावरून काढून टाकायला माझ्या पत्नीला सांगायला लागल्या. त्यावर माझी पत्नी म्हणाली, ‘‘अहो, तिला चार पोरं. नवरा घर सोडून गेलेला. घरगड्याच्या कामाने इतरांची पोटं ती कशी भरणार? आपण मदत करू, पण किती काळ? तिचा राग करू नका. अशा वेळी सहानुभूतीच मनात आली पाहिजे.’’ आता ही मुले व मुली एकटी असली की, एकाकीच असतात. त्यांचे भरलेले पोट व भरलेले मनच त्यांच्याविरुद्ध भडकून उठते. ती तसे बोलूनही दाखवितात. मग मनात येते- यात ही मुले किती दोषी व आपण किती अपराधी? शिवाय समाज व सरकारचाही यात काही दोष आहे की नाही? ही मुले अशी स्वीकारली म्हणून ती स्वीकारणाऱ्यांचा राग करायचा, की त्यांना त्यांच्या एकाकीपणात दुसरी साथ नव्हती म्हणून त्यांच्याविषयीची आस्था ठेवायची?

माणसांचे एकाकीपण खोट्या श्रीमंतीतही जागे असते, याची ही उदाहरणे. कधी कधी मनात येते, हे थांबावे. थांबवावे. पण लगेच दुसऱ्या क्षणी जाणवते, अगोदरच्या पिढ्यांनी तरी वेगळे काय केले? मिळेल तेच केले. जमेल ती संधी वापरून घेतली. ही पोरे तशीच राहू शकतील उपाशीपोटी आणि त्या सात कोटी बेकारांच्या रांगेत... मग खाईना का पोटभर... त्यांना उपाशी पाहून आपण तरी जेवलो असतो काय? हा प्रश्न केवळ व्यक्तीच्या एकाकीपणाचा नाही, त्या एकटेपणाने समाजाला व विशेषतः त्यातल्या गरजू गरिबांना आणलेल्या दुबळेपणाचा आहे; तसाच अगदी लहानपणीच आपल्या पुढल्या जबाबदाऱ्यांची जाणीव झालेल्या त्यांच्या मुलांचाही आहे. हे अनीतीचे शिकवणे नाही. ज्यांची मुले सोन्या-चांदीचे चमचे तोंडात घेऊन जन्माला येतात, त्यांचा हा प्रश्न नव्हे. समाजाला नुसतीच नीती शिकवून आपल्या पुढच्या पिढ्यांची बेगमी करणाऱ्या समाजसेवकांचाही तो नव्हे. बापकमाईवर वा पैतृक सामाजिक प्रतिष्ठेवर जगणाऱ्यांना जगाला नुसतेच नीती व धर्माचे धडे द्यायला लागते काय? जगणे हीच ज्यांची खरी अडचण आहे, त्यांना परंपरांचे आणि धर्माचे धडे द्यायचे नसतात. विवेकानंद त्याचमुळे म्हणाले, ‘उपाशी माणसाला धर्म सांगणे याएवढा अधर्म दुसरा नाही.’

एकाकीपणाचेच हे प्रकार. ते कधी हाती भिकेचा कटोरा देतात, तर कधी मैत्रीचे आश्रितही बनवितात. हे एकाकीपण श्रीमंत असले तरी अन्‌ अनाथ असले तरी, ते का यावे?

सुरेश द्वादशीवार, चंद्रपूर

sdwadashiwar@gmail.com

Share on Social Media

नवे पुस्तक

सातपाटील कुलवृत्तांत : मराठा समाजाच्या इतिहासाचा पॅनोरमा

सुहास पाटील

कादंबरीकाराचं निरीक्षण असं आहे की- कितीही राजकीय स्थित्यंतरं झाली; त्या-त्या काळांतील राज्यकर्ते हिंदू, पठाण, मुसलमान, इंग्रज किंवा कुणीही असले तरी शोषणकर्ता वर्ग आणि शोषित यांच्यातलं समीकरण कायम होतं. इतकंच नव्हे, तर त्याचं थेट रूप असणारी गावगाड्याची जातीय उतरंडही कायम अबाधित होती. त्यामुळे यादवकाळ, पेशवाई या काळांतील सामान्यांची स्थितीही अस्मानी आणि सुलतानीपेक्षा वेगळी नव्हती, असं चित्र कादंबरीत दिसतं. शेतकऱ्यांना नागवणारी स्थानिक सत्ताकेंद्रं, धाडी घालून लुटणाऱ्या टोळ्या, धर्माच्या नावाखाली लुबाडणारे भिक्षुक यांची प्रदीर्घ परंपरा, कुठल्याही काळात स्त्रियांच्या वाट्याला येणारं दैन्य... अशी निरीक्षणं कादंबरीकार मांडतो. असा हा महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या इतिहासाचा अनेक अंगांनी दाखवलेला पॅनोरमा आहे. मात्र कादंबरीकाराचं हे समाजशास्त्रीय चिंतन कादंबरीचा म्हणून जो कलात्मक अनुभव असतो, त्यावर कुठेही मात करत नाही. किंवा कादंबरीतील पात्रांचं आत्मचिंतन अवाजवी लांबलचक वाटत नाही.

सामान्यतः जगभरातील साहित्यविषयक जाणकार असं मानतात की, प्राचीन काळातील महाकाव्यं व धर्मग्रंथ यांची जागा अर्वाचीन काळात कादंबरी या साहित्यप्रकाराने घेतली आणि ज्ञान-विज्ञानाच्या विविध शाखांचा, विविध शास्त्रांचा परिचय जसजसा होत गेला, तसतशा या साहित्यप्रकारातील अनेक शक्यता विकसित होत गेल्या. आजघडीला त्यामध्ये बऱ्यापैकी आंतरवैविध्य निर्माण झालेलं आहे. तरीदेखील कादंबरीचं जे मूळ ‘एपिक’ रूप आहे, त्याचं आकर्षण मात्र तसूभरही कमी झालेलं नाही. महाभारत, रामायणादी पल्लेदार कथानकांवर पुन:पुन्हा नव्या ढंगात येणाऱ्या टीव्ही मालिका, शिवकालीन तसेच पेशवाईकालीन विषयांवरील ऐतिहासिक पुस्तकांचे (ऐतिहासिक) खप, अगदी अलीकडच्या काळातील तरुणाईचं प्रचंड आकर्षणाचं केंद्र बनलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’सारख्या अमेरिकी वेब सिरीज ही काही ढोबळ उदाहरणं. भूतकाळाविषयी असणाऱ्या नैसर्गिक कुतूहलापोटी इतिहासातील वास्तव किंवा कल्पित कथानकांवर घडलेल्या कलाकृती अगदी प्राथमिक स्तरातील वाचकालाही आकृष्ट करत असाव्यात. अशा कलाकृती मग केवळ सुजाण वाचकांच्या कंपूतच अडकून राहत नाहीत, सर्वसामान्य वाचकाच्या उत्सुकतेचाही त्या विषय होतात. त्यामुळेच सामान्य वाचकांच्या मध्य प्रवाहाची अभिरुची ठरवण्यात त्यांचा वाटा मोठा असतो. अशा धाटणीच्या ‘एपिक’ कादंबरीची मराठी साहित्य-विश्वात मोठीच प्रतीक्षा होती. रंगनाथ पठारे यांच्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीमुळे ती पूर्ण झाली आहे.

‘सातपाटील कुलवृतांत’ ही कादंबरी तिच्या शैलीच्या (सशपीश) दृष्टीने मात्र मराठी साहित्यामध्ये नवीच म्हणावी लागेल. एकाच नायकाभोवती फिरणारं मुख्य कथानक आणि आनुषंगिक उपकथानकं असं जे कादंबरीचं सर्वपरिचित स्वरूप असतं, तसं या कादंबरीत आपल्याला दिसणार नाही. काहीएका विशिष्ट कालखंडात, एखाद्या विशिष्ट समूहामध्ये होत गेलेली राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थित्यंतरं- असं तिचं ढोबळ वर्णन करता येईल. या प्रकाराचं दुसरं समांतर उदाहरण द्यायचं तर सुनील गंगोपाध्याय यांच्या मराठीत अनुवादित झालेल्या ‘प्रथम आलो’ या बंगाली कादंबरीचं देता येईल. एकोणिसाव्या शतकातील बंगाल प्रांताचं कॅलिडोस्कोपिक दर्शन या कादंबरीत घडतं. बंकिमचंद्र, रवींद्रनाथ, ईश्वरचंद्र घोष, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, जगदीशचंद्र बोस- अशी त्या शतकातील विविध क्षेत्रांतील काही महत्त्वाची बंगाली व्यक्तिमत्त्वं आणि त्यांच्या समकालीन समाजांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्यांच्याइतक्याच महत्त्वाच्या मानून घडवलेल्या काल्पनिक व्यक्तिरेखा- या सगळ्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील घटितं मिळून त्या कादंबरीचा आशय पूर्ण झाला आहे. ‘विशिष्ट काळातील समाज’ हाच त्या कादंबरीचा नायक आहे आणि त्या समाजाचा तुकड्या-तुकड्याने पाहिला गेलेला, नोंदवला गेलेला, अभ्यासला गेलेला तपशील त्या कादंबरीमध्ये समग्रपणे एकवटलेला आहे. ही कादंबरीदेखील काहीशी याच धाटणीची आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र ते स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्र असा टप्पा या कादंबरीमध्ये येतो. मात्र या दोन कादंबऱ्यांच्या रचनेतला एक फरक असा की, ‘प्रथम आलो’मध्ये वर उल्लेख केलेल्या जगप्रसिद्ध व्यक्ती कादंबरीतील व्यक्तिरेखा म्हणूनच येतात. ‘सातपाटील कुलवृत्तांत’ची सुरुवात निवेदनापासून होते व अधेमधे येणारे कथानकाच्या कालखंडांचे- मुख्यतः राजकीय- तपशील निवेदनाच्याच स्वरूपात येतात. त्या-त्या कालखंडातील राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील सर्वपरिचित व्यक्ती कादंबरीचा थेट भाग होत नाहीत. पात्रांच्या जीवनव्यवहारांच्या परिघांवर त्यांचं येणं-जाणं असतं.

देवधर्म-कुळाचार यांच्याशी व्यक्तिगत बांधिलकी नसणारा, पण जनरीत म्हणून सोपस्कार करणारा निवेदक आपल्या वंशाविषयीची कथा एका धार्मिक विधीसाठी आलेल्या पुरोहिताला सांगतो आहे, अशी या कादंबरीची सुरुवात आहे. या निवेदकाच्या वंशवृक्षाचं झाड सातशे वर्षं जुनं आहे! साधारणपणे तेराव्या शतकाच्या आसपास सुरू होणारा कादंबरीचा काळ एकविसाव्या शतकात संपतो आहे. सातपाटील या मराठी मुलुखातील घराण्याचा इतिहास हे या कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र आहे. कादंबरीचा परिसर हा मुख्यत्वेकरून आजच्या अहमदनगर ते सातारा या पट्‌ट्यातील आहे. अर्थात कथानकानुरूप तो उत्तर भारत व खैबरखिंडीपलीकडे बलुचिस्तान व अफगाणिस्तानापर्यंत विस्तारलेला आहे. सातपाटील घराण्याच्या वेगवेगळ्या कालखंडांतील पिढ्यांतील मुख्य पुरुष हे या कादंबरीचे नायक आहेत. पहिला शिरपती/श्रीपती हा पैठणजवळच्या डोंगरकिनी या गावातला एक मेंढपाळ आहे. देवगिरीच्या रामदेवराव यादवाचा पराभव अल्लाउद्दीन खिलजीने करण्याचा हा काळ आहे. दुसरा नायक साहेबराव हा मूर्तजा निजामशाहाच्या राजवटीतील आहे. तिसरा- दसरत, ज्याचा काळ पेशवाईतला व मुख्यतः पानिपतच्या लढायांदरम्यानचा आहे. चौथा- जानराव हा दुसऱ्या बाजीरावाची अखेर होण्याच्या आणि ईस्ट इंडिया कंपनीचा साम्राज्यविस्ताराच्या कालखंडात येतो. पाचवे- रखमाजी आणि पिराजी- हे व्हिक्टोरिया राणीच्या म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या काळातील आहेत. सहावा- शंभुराव हा पहिल्या जागतिक महायुद्धादरम्यानच्या काळातील आहे. आणि सातवा- देवनाथ हा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळाच्या पार्श्वभूमीवर आहे. आठशे पृष्ठसंख्येच्या या सज्जड कादंबरीने हा असा प्रदीर्घ काळ पेललेला आहे. कादंबरीच्या कालखंडाचा हा सगळा पट सविस्तर उलगडून सांगण्याचा उद्देश असा की, राजकीय स्थित्यंतराचे कोणकोणते टप्पे कादंबरीकाराने निवडलेले आहेत, याचा अंदाज यावा. राजकीय स्थित्यंतराचा हा प्रवाह वाचकाला स्पष्ट व्हावा यासाठी कादंबरीत प्रत्येक कथानकाच्या सुरुवातीला निवेदन येतं आणि दोन-तीन पानांतील या निवेदनामुळे पुढचं संपूर्ण कथानक कोणत्या राजकीय पार्श्वभूमीवर घडणार आहे, याची वाचकाला कल्पना येते. त्या बळावर कादंबरीकार कथानकाच्या अतिशय गुंतागुंतीच्या मांडणीसाठी सज्ज होतो.

एक उदाहरण असं सांगता येईल- रखमाजी आणि पिराजी हे दोन सातपाटील बंधू साधारण 1858 च्या आसपासच्या काळातील आहेत. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपून व्हिक्टोरिया राणीची, म्हणजे ब्रिटिशांची सत्ता सुरू झाली आहे. त्याआधी नुकताच 1857 चा उठावही होऊन गेलेला आहे. ज्योतिबा, सयाजीरावमहाराज, शाहू छत्रपती, टिळक, आगरकर यांच्या कारकिर्दी सुरू होण्याच्या काही वर्षं अलीकडचा हा काळ आहे. इथून सुरू झालेलं हे रखमाजी-पिराजीचं कथानक पुढे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतच्या काळात विस्तारलेलं आहे. असा हा सगळा राजकीय तपशील सुरुवातीला निवेदनात मांडला की, पुढे त्याचा प्रत्यक्ष कथानकाशी संबंध केवळ परिघावरूनच राहतो. कादंबरीचं कथानक हे संपूर्णतः सातपाटलांच्या संबंधाने त्या काळच्या ग्रामीण जीवनाला केंद्रस्थानी ठेवतच पुढे जातं. मग रखमाजी-पिराजी यांचे परस्परसंबंध, त्यांचे परस्परविरोधी स्वभावधर्म, त्यांच्या गृहसंबंधांतील गुंतागुंती, त्यांच्याशी असलेले इतर समाजघटकांचे संबंध अशा सगळ्या गुंत्यात कादंबरीकार शिरतो. कादंबरीची कथनाची पद्धत किंवा नॅरेटिव्ह स्ट्रक्चर हे साधारपणे असं आहे. त्यामुळे वर उल्लेखलेल्या इतरही नायकांची कथानकं याच सूत्राने येतात. या वेगवेगळ्या कालखंडांतील सातपाटील पिढ्यांच्या राहण्याची ठिकाणं असलेली जी गावं आहेत, त्यांचं अनभिषिक्त प्रमुखत्व कथानकाच्या ओघात सातपाटलांकडे येतं. त्यामुळे इतर समाजघटकांशी- जातींशी असणारे त्यांचे व्यवहार, त्या काळातली समाजाची जातिव्यवस्थेची जाचक उतरंड हीदेखील कथानकात दिसत राहते. सातपाटील घराणं हेच या कादंबरीमध्ये मध्यभागी असल्यामुळे आज ज्याला आपण मराठा समाज म्हणतो, त्याचा जीवनव्यवहार हा कादंबरीत मुख्यत्वाने दिसतो. मात्र त्यामध्येही कादंबरीकाराने मांडलेली या समाजातली वांशिक गुंतागुंत हे या कादंबरीचं आणखी एक वेगळेपण नक्कीच ठरू शकतं. या कादंबरीचा नायक असलेला मराठा समाज हा एकाच वेळी कुणबी म्हणून शेतात राबणारा आहे आणि प्रसंगी लढाईसाठी शिलेदारकीही करणारा आहे. त्यामुळे आपसूकच एकाच वेळी विशिष्ट काळातील गावगाड्याची स्थिती आणि त्याच काळातील राज्यकर्त्या वर्गाची स्थिती यांचं चित्रण कादंबरीत झालेलं आहे.

सामान्यतः कथानकाच्या काळाचा आवाका मोठा असेल, तर कादंबरीकाराला त्याचा दृष्टिकोन नेमकेपणाने मांडण्यासाठी पुरेसा अवकाश मिळतो. अर्थात असा मोठा आवाका स्वीकारल्याने कादंबरीला केवळ काही घटनांच्या जंत्रीचं रूप येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पण हे सगळंच अंतिमतः कादंबरीकाराच्या क्षमतेवर अवलंबून असतं. त्यामुळे अशा कादंबऱ्यांमध्ये कोणत्या घटनांचा विस्तार किती सूक्ष्मपणे करायचा, याची काहीएक निश्चिती कादंबरीकाराकडून त्याला मांडायच्या दृष्टिकोनानुरूप केली गेलेली असते. ‘सातपाटील’मध्ये कादंबरीकाराला जे विधान करायचं आहे त्याकरता एका बाजूला कथानक एका मितीत पुढे जात आहे आणि दुसऱ्या बाजूला तेच कथानक निवडलेल्या मोठ्या कालावकाशात आवर्तनंही घेत आहे. हे लक्षात घेतलं, तर कादंबरीच्या ‘लयीचं’ निदान वाचकाला करता येऊ शकतं. याचबरोबरीने येणारा आणखी एक मुद्दा म्हणजे, कादंबरीकाराला त्याच्या कादंबरीतून जो काही दृष्टिकोन मांडायचा आहे; त्याच्याविषयी कादंबरीकाराचं आकलन कितपत नि:संदिग्ध आहे, हे वाचक स्वतःच्या कळत-नकळत पडताळत असतो. त्यासाठी वाचकाची भिस्त सामान्यतः कादंबरीकाराने निवडलेल्या घटनांवर असते. भूतकाळात घडून गेलेल्या कुठल्या तरी घटनेशी संबंधित अशा एखाद्या कादंबरीमध्ये हा दृष्टिकोन म्हणजे तर आपल्या भूतकाळासंबंधी-इतिहासासंबंधी- अभ्यास व तर्क यांच्या आधाराने अर्थ लावून- घेतलेली भूमिका असते. या भूमिकेत नवं काही सापडण्याच्या जिज्ञासेपोटी वाचक ती स्वतःच्या तोवरच्या ज्ञानाशी ताडून पाहत असतो.

विशेषतः कादंबरी सर्वश्रुत असलेल्याच काळाचा, घटनांचा, तथ्यांचा वापर करत असेल; तर त्यांच्यासंबंधीची कादंबरीकाराची स्वतःची काही खास निरीक्षणं आहेत का, अशी उत्सुकताही त्यात असते. उदाहरणार्थ- देवगिरीचं साम्राज्य, यादवराजे, त्या काळचा समृद्ध समाज आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीनंतर या सगळ्याचा अंत- अशी ढोबळ माहिती सामान्यपणे वाचकाला असतेच. कादंबरीकाराने या सगळ्याचा प्रचलित समजापेक्षा वेगळा अर्थ लावला असेल, तर वाचकासाठी तो अधिक औत्सुक्याचा भाग असतो. अशा वेळी कादंबरीकारही इतिहासाविषयीची स्वतःची स्वायत्त भूमिका तयार होण्यासाठी साहित्याच्या प्रांतातून अलगद सरकून काही अंशी तत्त्वचिंतनाच्या प्रांतात शिरलेला असतो. त्याच्या स्वतःच्या चिंतनातून अशी काही भूमिका निर्माण होण्याजोगी नसेल किंवा एखादा आधीच मांडला गेलेला दृष्टिकोन त्याला अधिक स्वीकारार्ह वाटत असेल, तर मग त्याने तो प्रयत्नपूर्वक अभ्यासाने पचवलेलाही असू शकतो. त्याच्याही पुढे जाऊन, भूतकाळाकडे पाहण्याचा हा नवा दृष्टिकोन त्याला कादंबरीच्या घाटाचं भान स्वीकारून कलात्मक अनुभवात उतरवावा लागतो. घटनांचा विस्तृत व खोल अभ्यास, चिंतनातून दृष्टिकोन व भूमिका घडण्याची प्रक्रिया आणि तिचं कलात्मक अनुभवात रूपांतर यांपैकी कोणताही एक टप्पा निसटला; तर कादंबरी विस्कटण्याची शक्यता असते. अशा वेळी तिला डॉक्युमेन्टेशनचं कलाविहीन स्वरूप येऊ शकतं किंवा अभ्यासहीन रंजनमालिकेचं ढोबळ रूप येऊ शकतं. हा विषय इतका विस्तारण्याचं कारण म्हणजे, आपल्याकडच्या बऱ्याचशा ऐतिहासिक कादंबऱ्या अशाच दोन टोकांना गेलेल्या असण्याची चर्चा समीक्षावर्तुळात, जाणकार वाचकांत होताना दिसते.

अशा कादंबऱ्या वाचताना वाचकाला त्या एक तर समाजशास्त्रीय निरीक्षणांवर बेतलेल्या म्हणून कंटाळवाण्या डॉक्युमेंटवजा वाटू शकतात किंवा मग अपुऱ्या तर्कनिष्ठेअभावी काही तरी अचाट कल्पनांनी भरलेल्या मिथ्यकथा वाटू शकतात. ‘सातपाटील कुलवृत्तांत’मध्ये मात्र कादंबरीकार या तीनही पातळ्यांवर बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे, असं म्हणता येतं. देवगिरीचे यादवराजे, निजामशाही व आदिलशाही, पेशवाई आणि ब्रिटिश सत्ता या सर्व काळांतील समाज-व्यवस्थेविषयीची या कादंबरीतली बरीचशी निरीक्षणं ही मराठी समाजाच्या समाजशास्त्राचा आणि वांशिक गुंतागुंतीचा अभ्यास असणाऱ्या वाचकांसाठी कदाचित नवी नसतीलही; मात्र केवळ ललित साहित्यातच अभिरुची असणारा वाचकांचा जो एक मोठा मध्यप्रवाह आहे, त्याला ती नव्याने जाणवण्याची खास शक्यता आहे. कारण ‘आपल्यावर जोवर परकीय सत्ता नव्हती, तोवर आपला देश सुखा-समाधानात नांदत होता; घराघरांतून सोन्याचा धूर निघत होता; परचक्र आलं आणि त्या परकीय सत्ताधीशांनी इथल्या समाजाला लुटून भिकेला लावलं’ अशी धारणा असणारा एक मोठा वाचकसमूह आजही आपल्या आसपास आहे. त्याचं पोषण ज्या विचारांवर झालं आहे, त्यात इतिहासाविषयीचं अपुरं भान बाळगून लिहिल्या गेलेल्या साहित्याचा वाटा नक्कीच मोठा आहे. या बाबतीत ‘सातपाटील’मध्ये कादंबरीकाराचं निरीक्षण असं आहे की- कितीही राजकीय स्थित्यंतरं झाली; त्या-त्या काळांतील राज्यकर्ते हिंदू, पठाण, मुसलमान, इंग्रज किंवा कुणीही असले तरी शोषणकर्ता वर्ग आणि शोषित यांच्यातलं समीकरण कायम होतं. इतकंच नव्हे, तर त्याचं थेट रूप असणारी गावगाड्याची जातीय उतरंडही कायम अबाधित होती. त्यामुळे यादवकाळ, पेशवाई या काळांतील सामान्यांची स्थितीही अस्मानी आणि सुलतानीपेक्षा वेगळी नव्हती, असं चित्र कादंबरीत दिसतं. (जाता-जाता एक टिपणी म्हणजे, या कादंबरीत शिवकाळावरची कमेंट अगदीच त्रोटक आहे, असं मात्र वाटत राहतं.) शेतकऱ्यांना नागवणारी स्थानिक सत्ताकेंद्रं, धाडी घालून लुटणाऱ्या टोळ्या, धर्माच्या नावाखाली लुबाडणारे भिक्षुक यांची प्रदीर्घ परंपरा, कुठल्याही काळात स्त्रियांच्या वाट्याला येणारं दैन्य (जे आजच्या गावगाड्यातही शिल्लक असलेलं आपण पाहतो)- अशी निरीक्षणं कादंबरीकार मांडतो. असा हा महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या इतिहासाचा अनेक अंगांनी दाखवलेला पॅनोरमा आहे. मात्र कादंबरीकाराचं हे समाजशास्त्रीय चिंतन कादंबरीचा म्हणून जो कलात्मक अनुभव असतो, त्यावर कुठेही मात करत नाही. किंवा कादंबरीतील पात्रांचं आत्मचिंतन अवाजवी लांबलचक वाटत नाही. किंवा जिथे कादंबरी वास्तव सोडून कल्पिताच्या प्रदेशात जाते, तिथेही पात्रांच्या भावस्थितीचं चित्रण कृत्रिम वाटत नाही. अर्थात याविषयीचं अनुमान वाचकानुरूप निराळं असू शकेल. पण याशिवाय निवेदनाची अधूनमधून बदलणारी- काही ठिकाणी तिरकस होणारी भाषा, त्यातून दिसणाऱ्या व्यंगार्थसूचक छटा, मधूनच वास्तवातून अतिवास्तवाच्या आभासी जगात तरंगत नेणारा कल्पनाविलास, मनुष्य आणि प्राणी यांच्यातील शब्दरहित संवादांचे उत्कट प्रसंग... ही काही सूक्ष्म सौंदर्यस्थळं कादंबरीच्या वाचकांना नक्कीच जाणवतील. सर्वांत आधी कदाचित सातपाटलांच्या आडनावाविषयीच वाचकाला स्वाभाविक उत्सुकता असू शकेल. त्यामागची कथादेखील समाजाला टिकवून ठेवणाऱ्या व्यक्तीतल्या शहाणपणाचा अनुभव वाचकाला देऊ शकेल.

या कादंबरीविषयीचा एक शेवटचा आणि विशेष मुद्दा म्हणजे, या कादंबरीतून जाणवणारं आणखी एक महत्त्वाचं विधान; जे या वर उल्लेखलेल्या चित्रांच्या पार्श्वभूमीवर राहिलेलं आहे आणि तेही या कादंबरीचं वेगळेपण प्रामुख्याने अधोरेखित करणारं आहे. हे विधान म्हणजे, या कथानकातील स्त्री-व्यक्तिरेखांचं असलेलं उपजत शहाणपण! स्त्रिया सृजनाच्या प्रत्यक्षच वाहक असतात. त्यामुळे बलिदानाची महत्त्वाकांक्षा बाळगणं पुरुषाला परवडू शकतं, स्त्रीला नाही. हे जे परंपरागत अनुभवांतून वाहत आलेलं सत्य आहे, ते या कादंबरीच्या संपूर्ण पटासोबत समांतर जाणवत राहतं. या कादंबरीतील देशमुखीणबाई, आर्याना ऊर्फ आरेनाबाई साहेबराव, आफिया ऊर्फ आफुबाई दसरत, सरूबाई जानराव, उल्फी पिराजी, तेजबाई शंभुराव या सातपाटील स्त्रिया व कथानकाच्या ओघात येणाऱ्या इतरही स्त्रियांनी आपापल्या आयुष्यात ओढवलेल्या परिस्थितीवर मोठ्या धैर्याने तोड काढली आहे; आपापल्या पुरुषांना मार्ग दाखवून त्यांना त्यांच्या कर्तृत्वाची वाट मोकळी करून दिलेली आहे. केवळ अनुभवांतून विकसित झालेली गावगाड्यातील स्त्रियांची शहाणीव किती तीव्र होती आणि सदोष व्यवस्थेमुळे त्यांना मिळालेल्या मर्यादित अवकाशातही त्या स्वतःचं बौद्धिक-भावनिक सामर्थ्य किती कौशल्याने वापरत होत्या, कुटुंबसंस्थेचा अख्खा डोलारा त्यांनी कशा रीतीने अल्लाद तोलून धरलेला होता- या सगळ्याचा दिपवून टाकणारा प्रत्यय या कादंबरीत येतो. स्त्रियांच्या संबंधाने एक गमतीदार उदाहरण इथे अप्रस्तुत ठरू नये. या कुटुंबातील स्त्रिया त्यांच्या उत्तरायुष्यात (त्यांच्याही नकळत) आपापल्या पुरुषांशी खासगीत नावाने आणि एकेरीत बोलू लागतात, असे दोन प्रसंग कादंबरीत आलेले आहेत. हे आपसूक कसं काय होतं याचा उलगडा मात्र त्या स्त्रियांना तर होत नाहीच, शिवाय त्यांच्या पुरुषांनाही तो होत नाही. त्याचा शोध वगैरे घेण्याच्या भानगडीत तेही पडत नाहीत आणि निवेदकही. हे निरीक्षण वरकरणी क्षुल्लक वाटू शकेल; पण ज्यांची पाळंमुळं अजूनही एखाद्या खेडेगावात आहेत, त्यांना हा न उलगडणारा गमतीदार पेच स्वतःच्या अनुभवाचाही भाग वाटू शकेल. कथानकामध्ये अधिक रंजकता आणणारी अशी लहानसहान मार्मिक निरीक्षणंही कादंबरीत ठिकठिकाणी आहेत.

असे निरनिराळ्या पातळ्यांवरील अनुभव या कादंबरीमध्ये वाचकांना घेता येतील. आपल्याच भूतकाळाचं प्रचलिताहून काहीएक वेगळं अर्थनिर्णयन म्हणूनही ती वाचली जावी. कादंबरीचा आकार पाहता, वरकरणी ती दमवणारी नक्कीच वाटते; मात्र वाचनीयतेमुळे ती वाचकाला खिळवूनही ठेवते. कादंबरीप्रकाराची एक वेगळी धाटणी आणि निराळी समाजशास्त्रीय भूमिका यासाठी ती नक्कीच वाचण्याजोगी आहे. ‘सातपाटील कुलवृतांत’ हा मराठी कादंबरीचा परिघ विस्तारणारा एक भव्य प्रयोग आहे, असंच म्हणावं लागेल.

सुहास पाटील

suhas.horizon@gmail.com

सातपाटील कुलवृत्तांत

लेखक : रंगनाथ पठारे

शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, जि.अहमदनगर

पृष्ठे 800, किंमत 1000 रुपये

Share on Social Media

न्यायदेवतेच्या (न लिहिलेल्या) डायरीतून

अयोध्या निकालाने निर्माण केलेले यक्षप्रश्न (उत्तरार्ध)

प्रतापसिंह साळुंके

न्यायालयीन निकाल लिहिण्याच्या ज्या काही परंपरा आहेत, त्यातील एक महत्त्वाची परंपरा म्हणजे- निकाल एकमताने दिलेला असला तरी, ज्या न्यायाधीशाने तो लिहिला असेल, त्याने तो ‘इतर न्यायाधीशांच्या वतीने लिहिला आहे’, असा उल्लेख त्या निकालपत्रात असतो. देशाच्या न्यायालयीन इतिहासात कदाचित हे पहिल्यांदाच झाले असेल की, 1045 पानी निकालपत्राला कुणा लेखकाच; नाव नाही. व्यावहारिक अर्थाने तो कुणी तरी लिहिला असणार आहे. त्यामुळे न्यायालयीन परंपरा पाहता, ते नाव यायला हवे होते. निकालपत्राच्या लेखकाचा उल्लेख न करण्याचे कारण काय? भारतीय परंपरेमध्ये हिंदू धर्मीयांना महत्त्वाचे असणारे वेद अपौरुषेय म्हणजे कुणी एका पुरुषाने म्हणजे व्यक्तीने लिहिलेले नसून, त्याचा कुणी एकच एक लेखक नाही असे सांगितले जाते. न्यायालयाचा निकाल अपौरुषेय असल्याचे पहिल्यांदा पाहायला मिळाले. या साक्षात्काराचा अर्थ काय लावायचा?

एम. सिद्दीक विरुद्ध महंत सुरेश दास या ऐतिहासिक खटल्याच्या निकालाकडून या खटल्याशी संबंधित वादी-प्रतिवादी असणाऱ्या लोकांच्या तर अपेक्षा होत्याच; पण त्याहीपेक्षा भारतात राहणाऱ्या आणि धर्मनिरपेक्षता व शांततामय सहजीवन मानणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या या निकालाकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु दहावी-बारावीच्या परीक्षेत बोर्डात वा गुणवत्तायादीत येणाऱ्या मुलाने विद्यापीठाच्या परीक्षेत नापास व्हावे, तसा काहीसा मती गुंग करायला लावणारा हा निकाल आहे. फार तर सर्वच विषयांत नापास न होता एखाददुसऱ्या विषयात पास झाल्याने मोठी नामुष्की टळली, असे म्हणून केविलवाणे समाधान करून घेण्यासारखे ते आहे. मात्र या निकालाचे विश्लेषण वस्तुनिष्ठपणे- निर्भीडपणे व्हायला हवे होते, तसे ते झालेले नाही. एक तर केंद्र सरकारने या निकालाविषयी कुठल्याही प्रकारे टीका करायला काही काळ मनाई घातली होती. केंद्र सरकारच्या गृह विभागातर्फे तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर 1045 पानांचे निकालपत्र वाचून, समजून, उमजून त्यावरती तत्काळ भाष्य करणे व्यवहार्यही नव्हते. त्यामुळे निकालाविषयी जी चर्चा झाली, तिचा स्तर एक तर अत्यंत बाळबोध, अतिसुलभीकरण यांच्या मार्गाने जाणारा होता; किंवा वरवरची माहिती संकलित करून आपली अभिनिवेशी भूमिका त्यात मिसळून हेच न्यायालयाचे म्हणणे असल्याचा आभास निर्माण करायचा, असा होता. शिवाय पक्षीय-धार्मिक अभिनिवेश बाजूला ठेवून कायद्याच्या तर्ककठोर कसोटीवर विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्यासारखेच असल्याचे चित्र तयार केले गेले होते. त्यामुळे या निकालावर जी सर्वसाधारण चर्चा झाली, ती म्हणजे- ‘हा अत्यंत ऐतिहासिक निकाल आहे. सर्वांनी शांतपणे त्याचा स्वीकार करावा. धार्मिक सलोखा राखण्यासाठी या निकालावर काही प्रतिक्रिया देऊ नये. संयमाने त्याचा स्वीकार करावा,’ या थाटाची होती. खरे तर न्यायालयीन निकालांचे विविध कसोट्यांवर आणि आणि स्तरांवर विश्लेषण होणे ही फक्त कायद्याच्या क्षेत्राचीच नाही, तर व्यापक समाजहिताच्या दृष्टीनेही महत्त्वाची अशी गोष्ट आहे.

हा निकाल वाचत असताना याच्या पानापानांमध्ये किती तरी विसंगती, विरोधाभास, अनाकलनीय असे तर्क यांचे अस्तित्व दिसून येते. सर्वप्रथम विरोधाभास म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने स्वतःला हा निवाडा चालविण्यासाठी सक्षम मानणे. त्याचे झाले असे की, दि.6 डिसेंबर 1992 रोजी विवादित बाबरी मशिदीचा ढाचा कारसेवकांच्या जमावाने उद्‌ध्वस्त केला. हे सारे इतके टोकाचे पाऊल उचलण्यापाठीमागे दशकानुदशके केला जाणारा आरोप असा होता की,ही विवादित जागा म्हणजे हिंदूंचे श्रद्धास्थान असणारे प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थान आहे. त्या जागेवर असणारे भगवान श्रीराम प्रभू यांचे मंदिर तोडून त्यावर 1528 मध्ये मुघलसम्राट बाबर याने त्याचा सेनापती मीर बाकी याच्याकरवी मशीद बांधली. त्यामुळे ती मशीद उद्धस्त करून, तिथे पुन्हा एकदा भगवान श्रीराम प्रभूंचे मंदिर उभारणे म्हणजे इतिहासाच्या चुकलेल्या पानांचे पुनर्लेखन करण्यासारखे आहे. काही विचारप्रवाहांचे तर हे म्हणणे होते की, हिंदूबहुल देशात हिंदूंवर झालेला हा ‘घोर अन्याय’ आपण अजिबात सहन करता काम नये. संविधानात अंतर्भाव असणाऱ्या धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, शांततामय सहजीवन, परधर्मसहिष्णुता या सगळ्या तत्त्वज्ञानाचा पाया हिंदूंचे सहिष्णू असणे हाच आहे. इतर धर्माच्या भल्याचा विचार सतत करून हिंदू समाज अतिशय निस्तेज झाला आहे. त्याला स्वधर्माचा काही ‘अभिमान’ उरलेला नाही. त्यांच्यामध्ये काही ‘कडवेपणा’ उरलेला नाही. त्यामुळे ते पूर्वीचे ‘तेज’ पुन्हा एकदा मिळवायचे असेल, तर हिंदूंनी त्यांच्या हिंदू असण्याचा अभिमानाच नाही तर गर्व बाळगला पाहिजे. यातूनच ‘गर्व से कहो हम हिंदू है!’ या घोषणेचा जन्म झाला. या साऱ्याची परिणती बाबरी मशिदीचा ढाचा उद्‌ध्वस्त होण्यामध्ये झाली. जोनाथन स्विफ्ट यांच्या शब्दांत सांगायचे तर- There is enough religion to make us hate but not enough to make us love... आपण एकमेकांचा द्वेष करावा इतके धर्माचे अस्तित्व नक्की आहे, पण ते इतके प्रबळ नाही की पण आपण एकमेकांवर प्रेम करावे!

पहिला यक्षप्रश्न म्हणजे- विवादित जागेवर पूर्वी मंदिर होते आणि ते उद्‌ध्वस्त करून त्यावर ही मशीद बांधली, की मोकळ्या जागेवर बांधलेली मशीद होती? हा त्या जागेच्या मालकीहक्काच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा प्रश्न. हिंदू-मुस्लिम संघर्षामुळे अधिक टोकदार बनलेल्या या प्रश्नावर न्यायालयाने तातडीने आपला निवाडा देणे केंद्र सरकारला गरजेचे वाटले. त्यातून राज्यघटनेच्या कलम 143 नुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडे राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नावर कायदेशीर सल्ला मागता येतो, हे लक्षात घेऊन तशी सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने डॉ. इस्माइल फारुकी विरुद्ध भारतीय संघराज्य या निवाड्यामध्ये राष्ट्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या, संवेदनशील अशा प्रश्नावर आपले कायदेशीर मत, सल्ला द्यायला स्पष्ट शब्दांत नकार दिला. हा नकार देत असताना न्यायालयाने असे कारण दिले होते की, सर्वोच्च न्यायालय हे ‘न्यायालय’ आहे, भारतीय पुरातत्त्व विभाग नाही. त्यामुळे त्या जागेवर मंदिर होते की मशीद, हे ठरविण्यासाठी न्यायालय ही योग्य जागा नाही. जर 1994 मध्ये सर्वोच्च न्यायालय हा निवाडा चालविण्यासाठी योग्य जागा नव्हती, तर मग सर्वोच्च न्यायालयाचा या निर्वाळ्याकडे दुर्लक्ष करून अलाहाबाद उच्च न्यायालयाने दि.30 सप्टेंबर 2010 रोजी विवादित जागेचे तीन सामान वाटे करण्याचा निवाडा कसा काय केला? उच्च न्यायालय हे सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालय असते. कनिष्ठ न्यायालयातून अपील सर्वोच्च न्यायालयात जाते. असे असताना सर्वोच्च न्यायालय जो खटला चालवायला ‘असमर्थ’ होते, तो खटला चालवायला 16 वर्षांनी कनिष्ठ न्यायालय ‘समर्थ’ कसे काय बनले? हे इथेच थांबत नाही, तर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध 14 अपिले सर्वोच्च न्यायालयाने 2011 मध्ये दाखल कशी काय करून घेतली? कारण सर्वोच्च न्यायालयाने तर साधे कायदेशीर मत, सल्ला द्यायलासुद्धा आपण असमर्थ असल्याचे सांगितले होते. मग सल्ला, मत द्यायला असमर्थ असणारे हेच न्यायालय आपली असमर्थता विसरून 14 अपिलांवर निवहडा द्यायला 25 वर्षांनी सक्षम कसे झाले? हा काळाचा महिमाच म्हणावा लागेल. तो या अर्थाने की, 1994 मध्ये अयोध्या प्रकरणावर हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये या विवादाविषयी इतकी टोकदार मते होती की- सर्वोच्च न्यायालयाने काहीही निवाडा दिला असता, तरी तो ज्याच्या विरुद्ध आहे, त्या समुदायाने तो निकाल पाळण्यास नकार दिला असता. शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम तलाकपीडित महिलांना मुस्लिम व्यक्तिगत कायदा शरियाप्रमाणे नाही, तर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 नुसार पोटगी मिळण्याचा अधिकार आहे, असा पुरोगामी निर्णय 1985 मध्ये दिला होता. परंतु मुस्लिम समुदायातील काही संघटनांनी तीव्र विरोध केल्यामुळे केंद्र सरकारने 1986 मध्ये कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय रद्दबातल ठरविला होता. आपल्या सल्ल्याबाबतीत व मतप्रदर्शनाबाबतही असेच होईल, अशी भीती सर्वोच्च न्यायालयाला 1994 मध्ये वाटली का? आणि ते जर खरे असेल, तर लोकमतच्या दबावापुढे संविधानाने घालून दिलेली जबाबदारी पार पाडण्यात सर्वोच्च न्यायालय कमी पडले का? आणि जर ते तसे असेल, तर देशाच्या वाटचालीत असे खूप प्रसंग येणार आहेत, जिथे जनमताचा दबाव आणि संविधानाने घालून दिलेली चौकट, जबाबदारी यांच्यात संघर्ष होणार आहे. या अशा कसोटीच्या प्रसंगी जनमताच्या दबावाला न्यायालय बळी पडणार असेल तर संविधानाची चौकट, सांविधानिक नैतिकता, सांविधानिक तत्त्वे फक्त पुस्तकातच शिल्लक राहतील. प्रत्यक्ष समाजजीवनात त्यांचे अस्तित्व दिसणार नाही. म्हणजे ‘सत्यमेव जयते’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या न्यायालयाने जनमताच्या दबावापुढे सत्यालाच भिडायला नकार देऊन बोटचेपी भूमिका घेणे देशातील ‘कायद्याचे राज्य’ या संकल्पनेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर अशी बाब आहे. संशयाचा फायदा कायम आरोपीला मिळत असतो, हे भारतीय पुरावा कायद्याचे तत्त्व जर आरोपीच्या जागेवर न्यायालयच असेल तर मात्र लागू होणार नाही. असे म्हटले जाते की, Judiciary is very organ which owns neither sword nor pures.न्यायालय हा राज्यव्यवस्थेचा तुलनेने कमकुवत भाग असतो; कारण त्याचा ना तलवारीवर अधिकार असतो, ना पैशाच्या थैलीवर! अलेक्झांडर हॅमिल्टन याने ‘फेडरॅलिस्ट’ या ग्रंथात न्यायालयाच्या बाबतीत मांडलेला हा निष्कर्ष अगदी मार्मिक आहे. कारण तलवार म्हणजे प्रत्यक्ष कृतीचा अधिकार प्रशासनव्यवस्थेला असतो, तर पैशाची थैली म्हणजे आर्थिक निर्णय घेण्याचा अधिकार कायदे मंडळाला असतो. न्यायव्यवस्थेने कायद्याच्या चौकटीत खटल्यांचा निवाडा करणे, एवढेच तिच्या हाती असते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा न्यायव्यवस्थेवर असणाऱ्या अतूट विश्वासाला तडा जाऊ न देणे, न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का लागू न देणे यासाठी न्यायव्यवस्थेने केवळ निःपक्ष-निर्भय असणेच पुरेसे नाही, तर तसे असल्याबद्दल सर्वसामान्यांचे मन निःशंक ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

दुसरा यक्षप्रश्न म्हणजे- साधारणपणे कनिष्ठ न्यायालयात निकाल लागल्यानंतर एका पक्षाला असे वाटते की, निकाल आपल्या बाजूने लागला आहे आणि दुसऱ्या पक्षाला वाटते की, निकाल आपल्या विरोधात लागलेला आहे. परंतु एखाद्या निवाड्यात जवळपास सर्वांनाच असे वाटते की, हा निकाल आमच्यावर अन्याय करणारा आणि दुसऱ्या बाजूच्या पक्षावर अधिक मेहेरनजर करणारा आहे. हे काही तरी अपवादभूत आहे. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयात एकमेकांच्या विरोधात लढलेले विविध पक्षकार सर्वोच्च न्यायालयात अपिलात गेले. खरे तर निकाल कुणाला तरी त्यांच्या बाजूचा आहे असे वाटणे आणि काहींना तो आपल्या विरोधात आहे असे वाटणे नैसर्गिक आहे. परंतु साऱ्याच पक्षांना तो निकाल आपल्या विरोधात आहे, असे एकाच वेळी वाटणे हे काहीसे विचित्र आणि अनैसर्गिक आहे. हे असे का घडले, हे समजावून सांगणारे एक खूप सुंदर वाक्य आहे. There is no key to success but there is a key to failure, and that is try to please everybody...यशाची कुठलीच गुरुकिल्ली नाही, पण अपयशाची गुरुकिल्ली मात्र आहे आणि ती म्हणजे प्रत्येकालाच खूश करायचा प्रयत्न करणे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रत्येकाला समान असे एकूण तीन वाटे करून तो वाद संपविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे बहुपेडी व बहुपदरी जटिल समस्येला अतिसुलभीकरणाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करणे. त्यातून अपयशच पदरी पडणार, हे सांगायला कुणा बुद्धिवंताची गरज नव्हती. जर प्रत्येकालाच खूश करण्याचा प्रयत्न केला तर अपयश नक्की येते. याचे तार्किक कारण म्हणजे प्रत्येकालाच खूश करण्याच्या खटपटीत त्या कृतीचा मूळ उद्देशच हरवून जातो. त्या न्यायालयाने 'Win win formula' अनुसरण्याच्या खटपटीत बरेच काही गमावले!

तिसरा यक्षप्रश्न म्हणजे- फेब्रुवारी 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अयोध्येतील विवादित जागेच्या मालकीहक्काचा वाद न्यायालयाबाहेर सामोपचाराने मिटविण्यासाठी तीनसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एफ.के. मोहम्मद कैफुल्ला, वरिष्ठ वकील श्रीराम व आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा या समितीमध्ये समावेश होता. परंतु अपिलात आलेल्या सर्व पक्षांनी अशा सामोपचाराने तोडगा काढायला स्पष्टपणे नकार दिला. कदाचित या सामोपचाराने निघालेल्या तोडग्यात प्रत्येकाला काहीएक अधिकार मिळाला असता, परंतु तसे काही करायला अपिलात आलेल्या पक्षांनी असमर्थता दर्शविली. त्यानंतर दि.9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने विवादित जागी श्रीराम प्रभूंचा जन्म झाल्याचा हिंदू भाविकांचा दावा (धर्मग्रंथ, प्रवासवर्णने, समकालीन कागदपत्रे इत्यादींवरून) मान्य करून, एक न्यास स्थापन करून त्या ठिकाणी श्रीराम प्रभूंचे मंदिर बांधण्यासाठी निर्देश दिले. मुस्लिम बांधव तसेच निर्मोही आखाडा यांना विवादित जागी कुठलेही मालकीहक्क नसल्याचा निर्वाळा देण्यात आला.

म्हणजे तांत्रिक अर्थाने हिंदू बांधवांचा विवादित जागेवरील मालकी हक्क वगळता इतरांचे अधिकार अमान्य करण्यात आले. त्यामुळे सामोपचाराने हा विवाद सोडवायला नकार देण्याऱ्या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यावर कसलेही भाष्य न करता स्वीकारणे अनाकलनीय आहे. जर खरोखरच पक्षांमध्ये इतके सामंजस्य होते, तर मग सामोपचाराने हा प्रश्न सोडविण्याच्या कृतीला अपयश का आले?

चौथा यक्षप्रश्न म्हणजे- दावा क्रमांक एकमध्ये गोपालसिंग विशारद हे सनातन हिंदू धर्माचे आचरण करणारे म्हणून त्यांना प्रतिनिधित्व करण्याची परवानगी दिली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र राजेंद्रसिंग विशारद यांना सनातन धर्माच्या वतीने दावा क्रमांक 1 पुढे चालू ठेवण्याची परवानगी मिळाली. निर्मोही आखाड्याला शेबाइत म्हणजे सेवा करण्याचे अधिकार नाहीत. मात्र राजेंद्रसिंग विशारद यांना सनातन हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्याचे अधिकार आहेत, हे काहीसे विचित्र आहे. दावा क्रमांक 3 मध्ये निर्मोही आखाड्याने दाखल केलेला दावा कालमर्यादेचे कारण देऊन फेटाळण्यात आला. निर्मोही आखाडा विवादित जागेवर आपली मालकी वा ताबा सिद्ध करू शकला नाही. जर त्यांचा ताबा वा मालकी सिद्ध झाली नाही, तर मग निकालपत्राच्या परिच्छेद क्रमांक 804 मध्ये श्रीराम प्रभूंचे मंदिर निर्माणासाठी जो न्यास तयार केला जाईल, त्या वेळी निर्मोही आखाडाला व्यवस्थापनामध्ये योग्य ती जाबाबदारी व अधिकार देण्यात यावेत, याविषयी निर्देश देण्यात आले आहेत. असे का? एका बाजूला त्यांचा शेबाइत म्हणून हक्क नाकारायचा, दावा फेटाळायचा; पण व्यवस्थापनात मात्र अधिकार द्यायचा, हे अनाकलनीय आहे. हे सगळे करण्याचा पाया काय? याचे समाधानकारक उत्तर निकालात कुठेच मिळत नाही.

पाचवा यक्षप्रश्न म्हणजे- दावा क्रमांक 5 मध्ये भगवान श्रीराम विराजमान यांना स्वतःला वादी बनविले आहे. एक नैसर्गिक व्यक्ती- जो त्यांचा जवळचा मित्र मानला गेला आहे- त्याला भगवान श्रीराम विराजमान यांच्या वतीने दावा दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला होता. हिंदू तत्त्वज्ञानानुसार पृथ्वीतलावरील प्रत्येक चराचरामध्ये भगवंताचा एक दैवी अंश असतो. म्हणजे प्रतिवादीसुद्धा त्या विश्वात्मक चिरंतनाचा अविभाज्य भाग आहेत. असे जर असेल, तर मग त्यांनी प्रतिवादी म्हणून अन्य धर्मीयाला उभे करणे, म्हणजे भगवंताने स्वतःच स्वतःविरुद्ध दावा दाखल केल्यासारखे नाही का? ज्या परमेश्वराच्या मालकीची सारी पृथ्वी, सारे ब्रह्मांड, सारे विश्व आहे- असे उल्लेख धर्मग्रंथांत आहेत, त्या परमेश्वराने 2.77 हेक्टर एकरांवरील मालकीसाठी किंवा 1500 यार्ड बांधकाम असणाऱ्या निर्जीव वास्तूवर दावा दाखल करणे विचित्र वाटते. हिंदूंमधील ज्या समाजघटकांनी दावे दाखल केले, त्यांच्यावरसुद्धा भगवान श्रीराम यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या दावा क्रमांक 5 मध्ये खूप विलक्षण आरोप केले आहेत. त्यापैकी काही आरोप असे आहेत की, त्या लोकांनी दाखल केलेल्या दाव्यांपाठीमागे नफेखोरी करणे हा उद्देश होता, त्यामुळे भगवान श्रीरामाला स्वतःला दावा दाखल करावा लागला. आता धर्मश्रद्धेनुसार माणसाला एखादी कृती करण्यासाठी परमेश्वरच बुद्धी देतो. मग नफेखोरी करण्याची बुद्धी त्या व्यक्तींना नेमकी कोणी दिली? अशा नफेखोरीच्या विचाराचे पालकत्व कुणाचे? परमेश्वराने दावा दाखल केला, असे तांत्रिकतेसाठी क्षणभर मान्य जरी केले तरी- तो कुणासमोर, तर सर्वोच्च न्यायालयासमोर. जर परमेश्वर सर्वशक्तिमान आहे, स्वयंभू आहे, सर्वज्ञात आहे, तर मग त्याने माणसांसमोर त्याच्यावर अन्याय झाल्याची कैफियत मांडावी म्हणजे मनुष्यप्राणी भलताच ‘शक्तिमान’ झाल्याचे निदर्शक मानावे लागेल! मनुष्य ही परमेश्वराची निर्मिती मानली जाते. मग निर्मात्याने निर्मितीसमोर असहायासारखे आपल्यावरील अन्यायाच्या परिमार्जनासाठी यावे, हे अतार्किक वाटते. न्यायशास्त्राच्या दृष्टीने पाहता, न्याय देणारी व्यवस्था ज्याला न्याय दिला जातो त्यापेक्षा श्रेष्ठ मानली जाते. म्हणून तर अन्याय झालेला व्यक्ती न्यायव्यवस्थेकडे एक सक्षम व्यवस्था समजून येत असतो. मग सर्वोच्च न्यायालय हे परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे, असा दावा क्रमांक 5 चा अन्वयार्थ लावायचा का? याच दावा क्रमांक 5 मध्ये भगवान श्रीराम विराजमान कायदेशीर व्यक्ती मानली गेली आहे. परंतु राम जन्मभूमी न्यास ही मात्र कायदेशीर व्यक्ती मानली गेलेली नाही. उलट, न्यास हा कायद्यानुसार नोंदणीकृत केलेली आस्थापना असताना तिला तो दर्जा नाकारून भगवान श्रीराम विराजमान मात्र कायदेशीर मानले गेले आहेत, हे कोड्यात टाकणारे आहे.

सहावा यक्षप्रश्न म्हणजे- निकालपत्रात परिच्छेद क्रमांक 796 मध्ये न्यायालयाने असे म्हटले आहे की, न्यायालय हे विवादित जागेची मालकी कुणाची हे कुठल्या तरी समूहाच्या श्रद्धा, गृहीतके, विश्वास यांचा आधार घेऊन ठरवू शकत नाही. न्यायालय हे साक्षी, पुरावे, कागदपत्रे, न्यायशास्त्रातील मूलभूत तत्त्वे यांच्या आधारे निकाल देत असते. विवादित जागी आतील मशिदीचे बांधकाम आणि बाहेरील बाजूस सीता रसोई, राम चबुतरा, अंगण यांना विभागण्यासाठी बाहेरील बाजूस 1857 मध्ये ब्रिटिशांकडून सुरक्षा भिंत उभारण्यात आली. ही भिंत उभारल्यानंतरही हिंदूंनी बाहेरील बाजूस ताबा आणि पूजा-अर्चाद्वारे आपली वहिवाट कायम ठेवली. परिच्छेद क्रमांक 798 मध्ये न्यायालय असे नमूद करते की, हिंदूंची विवादित जागेवरील पूजा-अर्चा चालू असल्याच्या शक्यता अधोरेखित करणाऱ्या गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आल्या. मात्र मुस्लिमांनी मशिदीचे बांधकाम असलेल्या जागेवर आपला सर्वाधिकार वा ताबा असल्याचे पुरावे सादर केले नाहीत. जर हिंदूंनी विवादित जागी पूजा-अर्चा करणे हे त्या जागेवरील त्यांचा ताबा सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठरते, तर मग 16 डिसेंबर 1949 पर्यंत मशिदीमध्ये नमाज अदा केली जात होती, हे आतील बाजूस त्यांचा ताबा सिद्ध करण्यास पुरेसे का मानले नाही- असा पेच पडतो?

सातवा यक्षप्रश्न म्हणजे- परिच्छेद क्रमांक 799 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने विवादित जागेचे त्रिभाजन करणे सर्वथा चुकीचे होते, असे मत व्यक्त केले आहे. सार्वजनिक शांतता, सुरक्षितता यांचा विचार करता उच्च न्यायालयाने शोधलेला उपाय निरुपयोगी ठरतो. विवादित जागा ही फक्त 1500 यार्ड आहे. ही जागा तीन भागांत विभागून कुणाच्याच उपयोगी पडू शकत नाही. त्यामुळे तो निवाडा चुकीचा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. परंतु मनात एक प्रश्न येतो, तो म्हणजे- न्यायालयाची कायदेशीर पेचप्रसंग सोडविण्याची नेमकी पद्धत काय? साक्षी-पुरावे यांच्या आधारे जे अनुमान निघते ते स्वीकारणे, की त्याची व्यवहार्यता तपासून मग त्याची कायदेशीर बाजू लक्षात घेणे? कारण व्यवहार्यता हा कायदेबाह्य घटक आहे. त्याचा अंतर्भाव एकदा का केला की, मग पुन्हा वस्तुनिष्ठ- कायदेशीर पद्धतीने त्या बाबीकडे पाहणे जिकिरीचे ठरते. व्यावहारिक बाजू ठरविण्याचे ठोकताळे वेगवेगळे असू शकतात. मग महत्त्वाचे काय आहे- व्यवहार्यता की कायदेशीर बाजू? कारण एका धार्मिक समूहाचे अधिकार श्रद्धा, विश्वास यांच्या आधारे मान्य करायचे, परंतु त्याच वेळी दुसऱ्या धार्मिक समूहाला जर तोच न्याय लावून त्यांचा अधिकार मान्य केला तर व्यावहारिक अडचणी वाढतील, असे म्हणून तो हक्क नाकारणे हे कायदेशीर चौकटीत न बसणारे आहे. भारतीय समाजाला हे ठरवावे लागेल की- जास्त महत्त्वाचे हे नाही की आपण कुठल्या धार्मिक समूहाचे अधिकार मान्य करायला उत्सुक आहोत; तर हे जास्त महत्त्वाचे आहे की, जे अधिकार कायद्याच्या कसोटीवर टिकतात, मग भलेही ते ‘गैरसोईचे’, अव्यवहारी असोत. एका समंजस, उन्नत समाजाकडे वाटचाल करण्यासाठी ही वैचारिक शिस्त अंगी बाणवावीच लागेल. कारण सदासर्वकाळ ‘व्यवहार्यता’ हे मूल्य असू शकत नाही. कायदा वस्तुनिष्ठ असतो, व्यवहार्यता सोईची वा गैरसोईची असते. सोय-गैरसोईपेक्षा कायद्याच्या मूल्यांशी आपण एकनिष्ठ राहणे समाजाच्या उन्नतीसाठी गरजेचे आहे.

आठवा यक्षप्रश्न म्हणजे- परिच्छेद क्रमांक 800 मध्ये न्यायालयाने असे नमूद केले आहे की- हिंदू आपला ताबा सिद्ध करू शकले, परंतु मुस्लिम आपला ताबा आणि मालकी हक्क सिद्ध करू शकले नाहीत. पण याच परिच्छेदात पुढे असेही म्हटले आहे की- मशिदीचे नुकसान होणे, ही पावित्र्यभंग होणारी कृती आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांना कायद्याच्या राज्यात आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रात अन्याय सहन करावा लागू नये, यासाठी मशिदीच्या बांधकामाला जागा मिळणे फार गरजेची गोष्ट आहे. परिच्छेद 801 मध्ये सुन्नी वक्फ केंद्रीय समितीला मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा देण्याचे निर्देश दिले आहेत. जर मुस्लिमांचा ताबा आणि हक्क नाही ,तर मग पाच एकर जागेची ही ‘मेहेरनजर’ कशासाठी? एका बाजूला कायदेशीर हक्क नाही म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना अयोध्येतच मोक्याच्या ठिकाणी जागा द्यायचे निर्देशही द्यायचे, याचा अर्थ काय लावायचा? ज्यांना काही कायदेशीर हक्कच नसतो, त्यांना कायद्यामध्ये नुकसानभरपाई देण्याची वा पर्यायी जागा देण्याची गरज नसते, हे कायद्याचे मूलभूत तत्त्व आहे. मग असे असताना सर्वोच्च न्यायालयाच्या मनात नेमके कसले शल्य आहे, ज्याचे ‘परिमार्जन’ करण्यासाठी त्यांना जागा देण्याचा निर्देश देण्यात आला आहे?

नववा यक्षप्रश्न म्हणजे- भारतीय पुरातत्त्व खात्याचा अहवाल हा या निकालातील महत्त्वाचा भाग आहे. उत्खननाच्या पद्धती वापरून या अहवालात काही निष्कर्ष काढले गेले. या दाव्याची सुनावणी चालू असताना वेगवेगळ्या टप्प्यांवर न्यायालयाने गरजेनुसार उत्खननाचे आदेश दिले होते. या अहवालात ख्रिस्तपूर्व काळातील सहाव्या शतकापर्यंतच्या व नऊ वेगवेगळ्या कालावधींचा यात उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालातील सगळ्यात महत्त्वाचे मत म्हणजे, मंदिराच्या वैशिष्ट्यांशी साधर्म्य सांगणाऱ्या रचनेचे काही भाग या उत्खननात सापडल्याचा उल्लेख केला आहे. भारतीय पुरातत्त्व खाते आणि त्याचा अहवाल हे विशुद्ध शास्त्र किंवा निसर्गशास्त्र नाही, तर समाजशास्त्र आहे. या खात्याचा अहवाल हा निष्कर्ष नसून ते शक्यतेचा निर्देश करणारे मत आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या अहवालात विवादित जागेवर बाराव्या शतकातील एक मंदिर असल्याचे मत व्यक्त केले आहे आणि विवादित जागेवरील मशीद ही 1528 मध्ये म्हणजे 16 शतकातील असल्याचे उल्लेख आहेत. पण मग मधल्या चार शतकांविषयी हा अहवाल काहीच भाष्य करत नाही. यात लक्षात घेण्यासारखा विरोधाभास म्हणजे, भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अहवालाचे मूल्यमापन ते समाजशास्त्राच्या एका शाखेने व्यक्त केलेले एक मत आहे आणि ते कायद्याच्या परिभाषेत ‘तथ्य’ मानता येणार नाही. कारण मत हे अनेक गृहीतकांवर आधारित असते, तर तथ्य हे स्वतःचे वेगळे अस्तित्व असणारे असते. मत आणि तथ्य यात गल्लत करता कामा नये, परंतु या निकालात मात्र ती झाल्याचे खेदाने नमूद करावे लागते. दि.18 डिसेंबर 1961 रोजी दाखल केलेल्या दाव्यात असा युक्तिवाद केला होता की, मशिदीसाठी विशिष्ट अशी संरचना असण्याची आवश्यकता नसते. यावर भाष्य करताना न्यायालयाने असे म्हटले होते की- जो दावा इतिहासात हरवला आहे, त्यावर न्यायालयीन निवाडा होऊ शकत नाही. मग जर 1961 मध्ये न्यायालय अशा प्रकारे ऐतिहासिक तथ्यांचा निवाडा करण्यामध्ये ‘असमर्थ’ होते, तर 2019 मध्ये ती ‘समर्थता’ कशाच्या आधारावर प्राप्त केली?

दहावा यक्षप्रश्न म्हणजे- दावा क्रमांक 5 मध्ये भगवान श्रीराम विराजमान यांच्यातर्फे जो परस्परविरोधी युक्तिवाद केलेला आहे. तो युक्तिवाद म्हणजे, ‘लॉस्ट ग्रँट’ म्हणजे शासकीय मदत आणि ‘ॲडव्हर्स पझेशन’ म्हणजे प्रतिकूल ताबा हे दोन्ही दावे एकाच वेळी करण्यात आले. ‘लॉस्ट ग्रँट’च्या युक्तिवादात असे म्हटले गेले की, शासकीय मदत देणारी जी लिखित सनद आहे, ती कुठे तरी गहाळ झाली. पण आमचा त्या मालमत्तेवरील वर्तमानातील ताबा आम्ही त्या मालमत्तेचे कायदेशीर मालक असल्याचे गृहीतक प्रबळ करणारा आहे. तर, दुसऱ्या बाजूला भगवान श्रीराम विराजमान हे 1949 मध्ये 22 आणि 23 डिसेंबरच्या रात्री मूर्तींचा रूपात मशिदीच्या आतमधील भागात प्रवेश करते झाले, हा ‘ॲडव्हर्स पझेशन’ म्हणजे प्रतिकूल ताबा अधोरेखित करणारा आहे. खरे तर भगवान श्रीराम विराजमान हे एक तर कायम तिथेच असणे किंवा बाहेरून तिथे आत येणे, यापैकी एकच काही तरी शक्य असू शकते. एकाच वेळी दोन्ही कसे काय शक्य आहे? म्हणजे बाहेरून आत यायचे असेल तर प्रवेश करणारी व्यक्ती पूर्वीपासूनच आत असू शकत नाही. आणि, पूर्वीपासून एखादी व्यक्ती तिथे आतमध्ये असेल, तर ती बाहेरून आत प्रवेश कसा काय करू शकते? विवादित जागा ही भगवान श्रीराम यांचे मंदिर असल्याचा निकाल न्यायालयाने देणे म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीने स्वीकारण्यास अत्यंत अवघड असणारा हा सिद्धांत वा दृष्टांत प्रत्यक्षात न्यायालयाने मात्र स्वीकारला आहे, हे विशेष! जर प्रतिकूल ताबा या युक्तिवादाच्या आधारे विवादित जागी भगवान श्रीराम विराजमान यांचे मंदिर होते असे न्यायालय म्हणत असेल, तर भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अहवालानुसार मंदिर बाराव्या शतकात तर मशीद सोळाव्या शतकात बांधली गेली. बाराव्या शतकातील मंदिराच्या जागेवर सोळाव्या शतकात बांधलेल्या मशिदीच्या बांधकामाबद्दल 1856-57 पर्यंत कुठले विवाद झाल्याचे उल्लेख नाहीत. जर डिसेंबर 1949 च्या प्रतिकूल ताब्याच्या आधारे 2019 मध्ये मालकी सिद्ध होत असेल, तर त्याच न्यायाने 1528 मध्ये मशीद बांधल्यापासून डिसेंबर 1949 पर्यंत मशिदीच्या 328 वर्षांच्या प्रतिकूल ताब्याच्या आधारे मुस्लिम वक्फ केंद्रीय समितीचा मालकी हक्क मान्य करण्यात काय अडचण आहे?

अकरावा यक्षप्रश्न म्हणजे- न्यायालयीन निकाल लिहिण्याच्या ज्या काही परंपरा आहेत, त्यातील एक महत्त्वाची परंपरा म्हणजे- निकाल एकमताने दिलेला असला तरी, ज्या न्यायाधीशाने तो लिहिला असेल, त्याने तो ‘इतर न्यायाधीशांच्या वतीने लिहिला आहे’, असा उल्लेख त्या निकालपत्रात असतो. देशाच्या न्यायालयीन इतिहासात कदाचित हे पहिल्यांदाच झाले असेल की, 1045 पानी निकालपत्राला कुणा लेखकाचे नाव नाही. व्यावहारिक अर्थाने तो कुणी तरी लिहिला असणार आहे. त्यामुळे न्यायालयीन परंपरा पाहता, ते नाव यायला हवे होते. निकालपत्राच्या लेखकाचा उल्लेख न करण्याचे कारण काय? भारतीय परंपरेमध्ये हिंदू धर्मीयांना महत्त्वाचे असणारे वेद अपौरुषेय म्हणजे कुणी एका पुरुषाने म्हणजे व्यक्तीने लिहिलेले नसून, त्याचा कुणी एकच एक लेखक नाही असे सांगितले जाते. न्यायालयाचा निकाल अपौरुषेय असल्याचे पहिल्यांदा पाहायला मिळाले. या साक्षात्काराचा अर्थ काय लावायचा?

दि.9 नोव्हेंबर 2019 रोजी हा निकाल लागला, त्या वेळी केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार या निकालावर प्रतिकूल चर्चा, टीका, धार्मिक सलोखा बिघडेल अशा पद्धतीचे संदेश समाजमाध्यमातून व मुख्य प्रवाहातील माध्यमातून प्रसृत करण्यावर काही काळासाठी निर्बंध घातले होते. खरे तर कुठल्याही न्यायालयीन निकालाचे कठोर विश्लेषण करणे, ही न्यायालयीन प्रक्रियांचा अभ्यास करण्याच्या पद्धतींमधील एक खूप महत्त्वाची पद्धत मानली जाते. मग हे निर्बंध म्हणजे या निकालाच्या विरोधात बोलू नका; मात्र त्याच्या समर्थनार्थ अनिर्बंध बोला, आपला उन्माद व्यक्त करा, आनंद व्यक्त करा, मिठाई वाटा, ढोल आणि इतर वाद्ये वाजवून आपल्या मनातील आनंद व्यक्त करा, दिव्यांची रोषणाई करून दिवाळी साजरी करा- असा होता का? चर्चेला, विश्लेषणाला, ऊहापोहाला एक समाज म्हणून आपण इतके घाबरण्याचे कारण काय? देशाच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणारे अनेक न्यायालयीन निकाल यापूर्वीही न्यायालयाने दिले होते. मात्र एक तर निकालाच्या समर्थनार्थ बोला, नाही तर तोंडावर बोट ठेवून गप्प राहा; अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाईल. हा संदेश उन्नत लोकशाहीचे लक्षण मानता येणार नाही. आपला तिरकसपणा, नर्मविनोद आणि उपहास यासाठी प्रसिद्ध असणारे फ्रान्समधील साप्ताहिक चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर अल-कायदाचे दहशतवादी 7 जानेवारी 2015 रोजी आले. या दहशतवादी संघटनेने हल्ला करून 12 लोकांना ठार केले. या प्रसंगानंतर फ्रान्समध्ये इतरही काही ठिकाणी असे हल्ले झाले. खरे तर फ्रान्स हा धर्मनिरपेक्ष देश; परंतु या हल्ल्यापाठीमागे कुठल्या धर्माचे लोक आहेत, याचा शोध घ्यायचा प्रयत्न काही लोकांनी केला. या हल्ल्यानंतर तिथे शासकीय पातळीवर अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली की, फ्रान्सने धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केल्यापासून त्या देशात धर्माच्या आधारावर जनगणना झाली नाही. ती पुन्हा सुरू करायची का? कारण असे दहशतवादी हल्ले, दंगली, हिंसक निदर्शने यांना पायबंद घालण्यासाठी धर्माच्या आधारावर जनगणना परत सुरू करावी, असा तो सूर होता. यावर तिथल्या धुरिणांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. हा नकार देताना सांगितले की, एक देश म्हणून आपण धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा स्वीकार केल्यानंतर आपला त्या तत्त्वावर किती विश्वास आहे, हे तपासण्याची ही वेळ आहे; कुठल्या धर्माचे लोक देशाच्या कुठल्या भागात राहतात हे तपासण्याची आणि त्यावर आपापल्या सोईने निष्कर्ष काढण्याची नव्हे! फ्रान्स धर्मनिरपेक्ष आहे आणि तो तसाच राहील. त्यासाठी मग भले आपल्याला अजूनही काही किंमत द्यायला लागली तरी हरकत नाही. कसोटीच्या प्रसंगी या तत्त्वांचा आपण खरोखरच आदर-सन्मान करतो का, हे तपासण्याची वेळ असते. म्हणजे एक देश म्हणून, समाज म्हणून आपण धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वामागे ठामपणे उभे आहोत आणि ते तसे कायम असण्यासाठी आपल्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. या प्रसंगातून आपण एक राष्ट्र म्हणून खूप काही शिकण्यासारखे आहे. बंदी घालण्यापेक्षा लोकांच्या मनातील यक्षप्रश्नांना, शंकांना, आक्षेपांना, वेगळ्या मताला आपण एक देश म्हणून कसे सामोरे जातो- हे आपल्या देशातील लोकशाहीचा दर्जा काय आहे, हे ठरविण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते.

यक्षप्रश्नांची ही जंत्री अशीच पुढे नेता येणे शक्य आहे. काही महत्त्वाच्या प्रश्नांचा, विरोधाभासांचाच इथे विचार करण्यात आला. इथून पुढेही याचे वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण होत राहील. यक्षप्रश्न या संकल्पनेला भारतीय विचारपरंपरेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या प्रश्नामध्ये अनेक गोष्टींची व्यामिश्रता सामावलेली असते, अशा प्रश्नाचे उत्तर भावनातिरेकाच्या आहारी न जाता, फक्त उपयुक्ततावादाच्या दृष्टीने न पाहता, बुद्धीच्या-तर्काच्या कसोटीवर अतिशय संयमाने शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून पाहता येते. यक्षप्रश्न फक्त पुराणात, महाकाव्यात, तत्त्वज्ञानाच्या प्रांतात असतात असे नाही; सामाजिक जीवनातही असतात. त्यांना उत्तर द्यायचे टाळून आपलाच हट्ट पुढे रेटायचे ठरविले, तर युधिष्ठिर वगळता इतर पांडवांना ज्याप्रमाणे मृत्यूला कवटाळावे लागले होते, त्याप्रमाणे समाज म्हणून मृत व्हावे लागेल. आपले अस्तित्व राखण्यासाठी खूप कठोर साधना करावी लागते. आपल्या अस्तित्वाविषयी काही गंभीर प्रश्न निर्माण झालेले असतात. ते नाकारून आपल्या संकुचित कोसल्यात जगण्यापेक्षा समाज म्हणून आपण त्यांना थेटपणे भिडायचे टाळणे, आत्मविनाशी ठरू शकते. जटिल आणि गंभीर प्रश्नांना उत्तरे शोधावीच लागतात. म्हणून त्याला भिडणे हाच सर्वोत्तम मार्ग असतो. टाळणे, सोईचे अन्वयार्थ लावणे, प्रश्नांच्या गाभ्याकडे दुर्लक्ष करून वरवरच्या प्रतीकात्मक गोष्टीत अडकून पडणे- हे सर्व टाळण्यासाठी समकालीन यक्षप्रश्नांचा कानोसा घेणे महत्त्वाचे ठरते. आपल्या आजूबाजूची ही यक्षांची तळी आपल्याला भेटण्यातून, त्या यक्षाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यातूनच नवे प्रश्नोपनिषद जन्माला येईल. यामधूनच ‘सनातनी’ भारतापेक्षा ‘आधुनिक भारत’ घडविणे शक्य होणार आहे.

प्रा. डॉ. प्रतापसिंह भीमसेन साळुंके

1982prataps@gmail.com

मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे.

Share on Social Media

जगण्याचे भान : 8

जीवन यांना कळले

डॉ. दिलीप शिंदे

संवेदना शुश्रूषा केंद्रास भेट द्यायला येणारे अनेक मान्यवर त्यांच्या ओळखीचे असायचे. त्या वेळी ते त्यांच्याशी शुश्रूषा केंद्राबद्दल भरभरून बोलायचे. ‘‘काका, तुम्ही आता संवेदना शुश्रूषा केंद्राचे व्यवस्थापक म्हणून ऑफिसमध्येच बसायला सुरुवात करा.’’ मी एकदा गमतीने त्यांना म्हणालोही होतो. एके दिवशी रात्री माझा राउंड संपल्यावर मी घरी जायच्या तयारीत असताना काका माझ्या केबिनमध्ये आले.

‘‘डॉक्टर, रोज सकाळी तुमच्या राऊंडची सुरुवात तुम्ही या प्रार्थनेने करत जा.’’ असे म्हणत त्यांनी ‘अनायासेनं मरणं’ हा श्लोक लिहिलेला कागद माझ्या हातात दिला. ‘‘माणसाला कसं चालता-बोलता मरण यायला हवं. मी रोज सकाळी हीच प्रार्थना करत असतो. इथल्या अंथरुणावर खिळलेले आणि बेडसोर्स झालेले लोक पाहिले की, माझा जीव व्याकूळ होतो. बेडसोर्स होऊ नयेत म्हणून आपल्याला खबरदारी घेता येत नाही का?’’ काकांनी अस्वस्थपणे विचारले.

‘अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम्‌’ ही प्रार्थनेची पहिली ओळ म्हटल्यानंतर कधी-कधी दुसरी ओळच मला चटकन आठवत नाही. मी पॉज घेऊन ती आठवण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात सोबत प्रार्थना म्हणत असणाऱ्या आजी-आजोबा किंवा स्टाफपैकी कोणी तरी ‘देहान्ते तव सायुज्यं देहिमें पार्वतीपते’ ही दुसरी ओळ म्हणू लागते आणि मीही त्यांच्या सुरात सूर मिसळतो. खरं तर गेले कित्येक दिवस रोज सकाळी साडेनऊ वाजता या प्रार्थनेने मी माझ्या राउंडची सुरुवात करतो, पण तरीही अधून-मधून असे होते. त्या वेळी मला प्रार्थनेसाठी हा श्लोक म्हणण्याची कल्पना सुचविणारे किशोरकाका आठवत असतात. अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांसाठी हे संवेदना शुश्रूषा केंद्र चालवत असताना ही प्रार्थना किती अर्थपूर्ण आहे, याची जाणीव मला इथे वारंवार होत असते. सहजपणे मृत्यू म्हणजे- अंथरुणावर खिळून राहण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, दुःख-कष्टाविना जीवन म्हणजे दैनंदिन व्यवहारासाठी इतरांवर विसंबून जगण्याची वेळ येऊ नये आणि मृत्युसमयी ईश्वराचे दर्शन व त्याच्याशी एकरूप होण्याची शक्ती आपल्याला लाभावी- यासाठी शुद्ध अंतःकरणाने ईश्वराकडे केलेली ही प्रार्थना आहे. किशोरकाकांना लाभलेला मृत्यू म्हणजे जणू या प्रार्थनेच्या यशाचे मूर्तिमंत उदाहरणच होते.

संवेदना शुश्रूषा केंद्र सुरू केल्यानंतर पहिल्या काही महिन्यांतच किशोरकाका मला भेटायला आले होते. त्या वेळी मी त्यांना सुरुवातीलाच ‘‘तुम्ही कोणासाठी चौकशी करायला आला आहात?’’ म्हणून विचारले होते. कारण ते हिंडते-फिरते होते आणि प्रथमदर्शनी त्यांची तब्येत बऱ्यापैकी धडधाकट वाटत होती.

‘‘मी माझ्यासाठीच चौकशी करायला आलो आहे.’’ ते हसत-हसत म्हणाले होते, ‘‘मी हृदयविकाराचा पेशंट आहे. माझे हृदय सध्या केवळ 30 टक्केच काम करते आहे. त्यामुळे माझे कधीही ‘राम नाम सत्य’ होऊ शकते. हृदयाची दोन वेळा ऑपरेशन्स झाली आहेत. आता या वयात आणखी फाडाफाडी करून घ्यायची माझी इच्छा नाही. मिळेल तेवढे बोनस आयुष्य समाधानाने आणि शांतपणाने जगायचे ठरवले आहे.’’

‘‘पण आमच्याकडे इथे सर्व अंथरुणावर खिळलेले वृद्ध आहेत. त्यांच्यासोबत राहताना कदाचित तुम्हाला त्रास होईल.’’ मी माझ्या मनातली शंका व्यक्त करत त्यांना विचारले होते.

‘‘घरी मी एकटाच असतो. रात्री सोबतीला एक मदतनीस असतो, पण दिवसभर घरात एकट्याला वेळ जात नाही. तुमचे मित्र डॉ.पाटील यांनी मला तुमच्याकडे भरती होण्याबाबत सुचविले आहे. हृदयविकारासाठी मला त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे. सोबतही मिळेल आणि चोवीस तास देखभालही होईल म्हणाले. ते तुमच्याशी फोनवरून बोलतोही म्हणाले आहेत. मला अधून-मधून धापही लागते. ऑक्सिजन लावावा लागतो. माझ्याकडे ऑक्सिजन सिलिंडर आहे, मी येताना सोबत घेऊन येईन.’’ किशोरकाका सविस्तरपणे एक-एक गोष्ट सांगत होते.

‘‘पण इथे भरती होण्याविषयी तुम्ही तुमच्या नातेवाइकांशी चर्चा केली आहे का?’’ मी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेण्याच्या हेतूने त्यांना विचारले.

‘‘नातेवाइकांची काही हरकत असणार नाही. माझा मुलगा मुंबईला असतो. त्याची फिरतीची नोकरी आहे. मुलगी बेंगलोरला असते, तीही नोकरी करते. दोघेही मला त्यांच्याकडे राहायला बोलवत असतात, पण माझा त्यांच्याकडे वेळ जात नाही. माझी सर्व हयात इथे सांगलीत गेली आहे. पस्तीस वर्षे प्राचार्य म्हणून नोकरी केली आहे, आता रिटायर्ड होऊनही एकोणीस वर्षे झाली. माझे विद्यार्थी, मित्र मला इथे भेटतात. त्यामुळे चार-आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस मी माझ्या मुला-मुलीकडे राहत नाही.’’ काका मला समजावीत म्हणाले.

मी आमच्याकडे व्यवस्थापिका म्हणून काम पाहणाऱ्या माधुरीला बोलवून इथल्या सोई-सुविधांविषयी सर्वत्र फिरून काकांना सविस्तर माहिती द्यायला सांगितले. त्यांना इथली व्यवस्था पसंत असल्यास माहिती पुस्तिका व प्रवेशअर्जही द्यायला सांगितला. भरती व्हायला येण्यापूर्वी एक-दोन दिवस अगोदर कल्पना देऊन येण्याबाबत ही सुचविले.

माहिती घेऊन झाल्यावर किशोरकाका पुन्हा माझ्या केबिनमध्ये आले. छान माहिती सांगितल्याबद्दल त्यांनी माधुरीचे कौतुक केले. तसेच आम्ही सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी त्यांनी माझी पुस्तके वाचण्यासाठी आवर्जून मागून घेतली. ‘भरती व्हायला येण्यापूर्वी एक-दोन दिवस अगोदर तुम्हाला कळवितो’ असे सांगून त्यांनी निरोप घेतला.

पुढच्या आठवड्यात किशोरकाका मला पुन्हा एकदा भेटायला आले. सोबत नेहमीचा रिक्षावाला होता.

‘‘उद्या सकाळी मी भरती व्हायला येतो आहे. आज थोडे साहित्य सोबत आणले आहे, बाकीचे उद्या घेऊन येतो.’’ असे सांगत त्यांनी प्रवेशअर्ज माझ्याकडे दिला. सर्व माहिती व्यवस्थित सुवाच्य अक्षरात भरली होती. सोबत आधारकार्डची झेरॉक्स आणि शुश्रूषा केंद्राच्या नावे फीचा चेक होता.

‘‘पण यावर तुमच्या मुलाची किंवा जवळच्या नातेवाइकांची सही हवी.’’ फॉर्म वाचून झाल्यावर त्यांना सांगितले.

‘‘माझा मुलगा शनिवारी मुंबईहून येणार आहे. त्या वेळी तो तुम्हाला भेटायला येईल. मी माझ्या मुलाला व मुलीला याबाबत सर्व कल्पना दिली आहे. हवं तर तुम्ही फोनवरून मुलाशी बोलता का? मी तुम्हाला फोन लावून देतो.’’ असे म्हणत काकांनी खिशातून मोबाईल काढला व लगेच आपल्या मुलाला फोन लावला. ‘‘बाबांनी मला सर्व कल्पना दिली आहे. त्यांची तुमच्याकडे भरती व्हायची इच्छा आहे. त्यांना तुमच्याकडची व्यवस्था आवडली आहे. मी याबाबत त्यांच्या डॉक्टरांशीही बोललो आहे. तुम्ही त्यांना भरती करून घ्या. मी शनिवारी सांगलीत आल्यावर तुम्हाला भेटतो.’’ त्यांचा मुलगा मोकळेपणाने म्हणाला.

‘‘ठीक आहे ’’ असे म्हणून मी फोन बंद केला व मोबाईल काकांकडे परत दिला.

‘‘उद्या सकाळी दहा वाजता या. येताना डॉ.पाटीलसरांची ट्रीटमेंटची फाईलही आठवणीने घेऊन या.’’ असे सांगून मी त्यांचा प्रवेशअर्ज माधुरीकडे दिला आणि उद्या सकाळी त्यांच्यासाठी बेड तयार करून ठेवण्याबाबत सूचना दिल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर दहा वाजता किशोरकाका आमच्याकडे भरती व्हायला आले. या वेळी रिक्षावाल्यासोबतच त्यांचा मदतनीस सोमनाथही होता. सोमनाथने पुढाकार घेऊन त्यांचे सर्व साहित्य रूममध्ये व्यवस्थित लावून दिले. दैनंदिन वापरासाठी लागणारी प्रत्येक छोटीशीही गोष्ट किशोरकाका आठवणीने आपल्यासोबत घेऊन आले होते. ऑक्सिजन सिलिंडर-सोबतच रक्तदाब व साखर तपासण्याचे मशीन याही गोष्टी त्यांनी आणल्या होत्या. इतकेच नव्हे, तर आपल्या खोलीत भिंतीवर लावण्यासाठी स्वतःचे घड्याळही घेऊन आले होते. त्यांची शिस्त आणि नीटनेटकेपणा पाहून मला अप्रूप वाटले.

रूममध्ये साहित्य लावून झाल्यावर सोमनाथ मला भेटायला आला. गेली चार-पाच वर्षे तो त्यांच्याकडे मदतनीस म्हणून नोकरी करत होता. रात्री आठ ते सकाळी आठ अशी त्याची ड्युटी होती. दिवसभरातही काही मदत लागली तर काका त्याला फोन करून बोलावून घ्यायचे. हृदयविकारामुळे अचानक छातीत दुखू लागल्यावर दोन्ही वेळा सोमनाथनेच काकांना हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. तो जणू त्यांचा जिवाभावाचा सखाच बनला होता.

सोमनाथने मला काकांच्या सवयींविषयी सांगितले.

‘‘काकांना हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे त्यांना बेडवर आडवे पडून व्यवस्थित झोप लागत नाही. त्यामुळे ते बऱ्याच वेळा आरामखुर्चीत बसूनच झोप घेतात. डॉ.पाटीलसरांनी त्यांना ऑपरेशन करायला सांगितले आहे. पण या वयात काका ऑपरेशन करून घ्यायला तयार नाहीत. आम्ही येताना सोबत आरामखुर्ची घेऊनच आलो आहोत. मला रोज सकाळी सात वाजता त्यांनी इकडे यायला सांगितले आहे. ते रोज सकाळी माझ्याकडून तीळतेलाने बॉडी मसाज करून घेतात. तसेच मी त्यांना व्यायामासाठीही मदत करत असतो. इथे येण्याबाबत काकांनी मला तुम्हाला भेटून तुमची परवानगी घ्यायला सांगितले आहे.’’ तो अदबीने म्हणाला.

‘‘माझी काही हरकत नाही. मी माधुरीला तशी कल्पना देऊन ठेवतो. फक्त रोजच्या रोज इथल्या रजिस्टरमध्ये तुम्ही येऊन गेल्याची नोंद करत जा.’’ मी सोमनाथला अनुमती देत म्हणालो. मला त्याच्या व्यक्तिमत्त्वातला ज्येष्ठांविषयीचा आस्थेवाईकपणा भावला.

‘‘काकांना काही त्रास होऊ लागल्यास रात्री-अपरात्री मला कधीही फोन करा. मी लगेच येईन.’’ तो आपुलकीच्या सुरात म्हणाला व माझे आभार मानून निघून गेला.

त्या दिवशी सायंकाळी चारच्या सुमारास मी किशोरकाकांना भेटण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेलो. त्या वेळी त्यांचे आरामखुर्चीत बसून मोबाईलवरून चॅटिंग सुरू होते. माझी चाहूल लागताच त्यांनी मोबाईल बाजूला ठेवला.

‘‘नातीशी गप्पा मारत होतो. मी तिला होस्टेलवर राहायला आलो आहे म्हणून सांगितले.’’ काका हसत-हसत म्हणाले.

‘‘हा उपक्रम आम्ही नवीनच सुरू केला आहे. तुमची काही गैरसोय होऊ लागल्यास निःसंकोचपणे सांगा.’’ मी त्यांचा अंदाज घेत म्हणालो. इथे भरती झाल्यानंतर बहुतेकांना इथल्या वातावरणामध्ये रुळण्यासाठी चार-आठ दिवस लागतात. त्यामुळे सुरुवातीस काही दिवस त्यांच्याशी आपलेपणाने संवाद साधून धीर देण्याची गरज असते, असा माझा अनुभव आहे.

‘‘आम्ही म्हातारे लोक खूप तक्रारखोर असतो डॉक्टर. तुम्ही कितीही उत्तम व्यवस्था केली, तरी काही तरी खुसपट काढणारच!’’ ते खट्याळपणाने म्हणाले, ‘‘बाकी तुम्ही स्ट्रक्चर छान तयार केले आहे. आता छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये थोडेफार लक्ष घालायला हवे. त्याबाबत मी तुम्हाला वेळोवेळी सुचवत जाईन. त्यांपैकी तुम्हाला जे शक्य असेल ते अमलात आणा. पण हे सर्व करण्यामागची तुमची तळमळ मला खूप महत्त्वाची वाटते.’’ काका कौतुकाच्या सुरात म्हणाले.

‘‘सोई-सुविधांबरोबरच कौटुंबिक वातावरण तयार करण्याकडे आमचा अधिक कल आहे. तुम्हा सर्वांचे इथले वास्तव्य जास्तीत जास्त आनंददायी कसे करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्या दृष्टीने तुम्ही आम्हाला अवश्य मार्गदर्शन करा.’’ मी त्यांना विनंतीच्या सुरात म्हणालो.

‘‘प्राप्त परिस्थितीत आनंदी आणि समाधानी कसे राहायचे, ही तडजोड आम्हा वृद्धांनाही करता यायला हवी; कारण आता दिवसेंदिवस अशा उपक्रमांची आवश्यकता वाढत जाणार आहे. आपण लहान मुलांना पाळणाघरात ठेवतो, मग आम्ही ज्येष्ठांनीही अशा उपक्रमांना स्वीकारण्याची तयारी ठेवायला नको का?’’ काका स्थितप्रज्ञपणे म्हणाले. त्यांच्या बोलण्यातील आणि विचारातील समजूतदारपणा पाहून मला त्यांच्याबद्दल अधिक कुतूहल वाटू लागले.

माझी आणि किशोरकाकांची हळूहळू छान गट्टी जमली. मी वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारायचो. त्यांचे वाचन अफाट होते. मी एकदा त्यांना डायरी लिहिण्याबाबतही सुचविले. पण त्यांनी मला स्पष्ट शब्दांत नकार दिला.

‘‘मी सध्या केवळ वर्तमानात आनंदाने जगायचा प्रयत्न करतो आहे. उगीच भूतकाळ उगाळत बसायचे नाही आणि भविष्याबद्दल विचार करूनही चिंतित व्हायचे नाही, असे मी ठरविले आहे. मला पेंटिंग काढण्याची आवड आहे, त्यासाठी मला साहित्य आणून द्यायला सांगा. मी पेंटिंग काढत जाईन.’’ त्यानुसार मी माधुरीला त्यांना कागद व कलर आणून द्यायला सांगितले.

ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी त्यांचा मुलगा त्यांना भेटायला आला. काकांचे आपल्या मुलाशी मैत्रीपूर्ण नाते असल्याचे त्यांच्यातील गप्पांवरून माझ्या लक्षात आले. वडिलांची विचारपूस करून झाल्यावर तो माझ्या केबिनमध्ये आला.

‘‘माझे वडील खूप शिस्तप्रिय आणि करारी आहेत, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. त्यामुळे आम्ही कोणी त्यांच्या मनाविरुद्ध जात नाही. आज-उद्या दोन दिवसांकरता मी त्यांना घरी घेऊन जातो आहे. सोमवारी सकाळी त्यांना परत आणून सोडतो. बाकी ते तुमच्या इथे छान रुळल्याचे पाहून बरे वाटले.’’ तो समाधानाने म्हणाला. त्यानुसार काका आपल्या घरी दोन दिवस जाऊन आले. पुढच्या आठवड्यात त्यांची मुलगीही त्यांना भेटायला आली. ती मात्र काहीशी भावुक झाली होती. काकांनी तिची समजूत काढली. या वेळी काकांची नातही त्यांना भेटायला आली होती. काकांनी तिला आपल्याकडील वारली पेंटिंग भेट दिलं. त्या दोघांची बराच वेळ धमाल चालली होती. मुलगीही दोन दिवस सांगलीत राहणार होती. पण या वेळी काका आपल्या घरी गेले नाहीत. मुलीला त्यांनी दुसऱ्या दिवशी परत एकदा भेटायला यायला सांगितले. या वेळी काकांच्या मनातील आपल्या नातीविषयीचा हळवा कोपराही माझ्या लक्षात आला. ‘‘घरी गेलो तर नातीला निरोप देणे मला जड गेले असते.’’ ते हळवे होऊन मला म्हणाले होते.

त्यानंतर काकांनी इथल्या व्यवस्थापनामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. सर्वांत पहिल्यांदा त्यांनी आठवडाभरासाठी नाश्त्याच्या वेगवेगळ्या पदार्थांची यादीच करून दिली.

‘‘रोज-रोज तेच ते पदार्थ नकोत. नाश्त्यामध्ये वैविध्य हवे. शेवटी आम्ही दावणीला बांधलेले. तुम्ही द्याल तेच खाणार.’’ काका मला चिडवत म्हणाले. त्यांचे ते बोलणे ऐकून मी खजील झालो, पण तेव्हापासून आमच्या नाश्त्यामध्ये मात्र वैविध्य आले.

दुपारी रिकाम्या वेळी ते सर्व सिस्टर व मावश्यांना एकत्र बोलावून घ्यायचे आणि त्यांना वेगवेगळ्या सूचना द्यायचे.

‘‘कपड्यांच्या घड्या घालून ज्यांच्या-त्यांच्या रूममध्ये ट्रॉलीवर ठेवत जा, म्हणजे सकाळी अंघोळीच्या वेळी गोंधळ होणार नाही.’’ इथपासून ते सिस्टरांनी व मावश्यांनी मास्क वापरून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयीही बजावायचे. विशेष म्हणजे, ते कधीही इथल्या स्टाफशी अरेरावीच्या सुरात बोलले नाहीत. त्यामुळे त्यांची सर्वांशी छान गट्टी जमली होती.

दर महिन्याला ते सोमनाथसोबत डॉ. पाटील यांच्याकडे तपासणीसाठी नियमितपणे जाऊन यायचे. ‘‘तुमच्या इथे भरती झाल्यावर काकांची तब्येत सुधारली आहे बघा.’’ सोमनाथ मला कौतुकाने सांगायचा. ते दिवसभर स्वतःला वेगवेगळ्या उपक्रमांत व्यग्र ठेवायचे. ते मला कधीच कंटाळलेले आणि उदास दिसले नाहीत.

संवेदना शुश्रूषा केंद्रास भेट द्यायला येणारे अनेक मान्यवर त्यांच्या ओळखीचे असायचे. त्या वेळी ते त्यांच्याशी शुश्रूषा केंद्राबद्दल भरभरून बोलायचे. ‘‘काका, तुम्ही आता संवेदना शुश्रूषा केंद्राचे व्यवस्थापक म्हणून ऑफिसमध्येच बसायला सुरुवात करा.’’ मी एकदा गमतीने त्यांना म्हणालोही होतो.

एके दिवशी रात्री माझा राउंड संपल्यावर मी घरी जायच्या तयारीत असताना काका माझ्या केबिनमध्ये आले.

‘‘डॉक्टर, रोज सकाळी तुमच्या राऊंडची सुरुवात तुम्ही या प्रार्थनेने करत जा.’’ असे म्हणत त्यांनी ‘अनायासेनं मरणं’ हा श्लोक लिहिलेला कागद माझ्या हातात दिला.

‘‘माणसाला कसं चालता-बोलता मरण यायला हवं. मी रोज सकाळी हीच प्रार्थना करत असतो. इथल्या अंथरुणावर खिळलेले आणि बेडसोर्स झालेले लोक पाहिले की, माझा जीव व्याकूळ होतो. बेडसोर्स होऊ नयेत म्हणून आपल्याला खबरदारी घेता येत नाही का?’’ काकांनी अस्वस्थपणे विचारले. पहिल्यांदाच काकांना असे दुःखी-कष्टी होताना पाहत होतो.

‘‘एअर बेड वापरणे, सतत पोझिशन बदलणे अशी खबरदारी घ्यावी लागते.’’ मी त्यांना समजावत म्हणालो.

‘‘मी रोज सकाळी माझ्या अंगाला तीळतेल लावून घेत असतो. तुम्ही सर्वांसाठीच हा प्रयोग करून बघायला हरकत नाही.’’ ते आपल्या परीने मला उपाय सुचवीत म्हणाले. ‘ठीक आहे’ म्हणत त्यांना गुड नाइट करून मी त्यांचा निरोप घेतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता मी नेहमीप्रमाणे संवेदना शुश्रूषा केंद्रात आलो. सर्वत्र फेरफटका मारून व विचारपूस करून झाल्यावर माझ्या केबिनमध्ये येऊन वाचत बसलो. किशोरकाका अजून झोपलेले दिसत होते. रात्री त्यांना लवकर झोप येत नसल्याने सकाळी ते उशिरा उठायचे.

साडेसातच्या दरम्यान माधुरी धावतच माझ्या केबिनमध्ये आली.

‘‘सर, किशोरकाका स्टॉप झाले आहेत!’’ ती घाबरलेल्या स्वरात म्हणाली. ते ऐकून मला धक्का बसला. स्टेथास्कोप घेऊन गडबडीने त्यांच्या रूममध्ये गेलो. सोमनाथ त्यांच्या बेडजवळ उभा राहून हुंदके देत रडत होता. मी काकांना तपासून पाहिले. रात्री झोपेतच त्यांचा मृत्यू झाला होता. मी सोमनाथच्या पाठीवर हात फिरवत त्याला धीर दिला.

‘‘मी सात वाजता आल्यावर त्यांना गाढ झोप लागली आहे, असे समजून त्यांना उठवले नाही. पण अर्धा तास झाला तरी त्यांची काहीच हालचाल दिसेना म्हणून जागे करायला गेलो, तेव्हा माझ्या लक्षात आले.’’ सोमनाथ रडतच म्हणाला.

‘‘काकांच्या मुलाला आपण कळवायला हवे.’’ मी सोमनाथला म्हणालो. त्याने आपल्या खिशातील मोबाईल काढून लगेच फोन लावला. मी काकांच्या मुलाला झाल्या प्रकाराची कल्पना दिली.

‘‘मी लगेच तिकडे यायला निघतो आहे. थोड्या वेळात मी तुम्हाला फोन करून पुढच्या व्यवस्थेबद्दल कळवतो.’’ त्यांचा मुलगा स्वतःला सावरत म्हणाला.

‘‘काकांनी मला पुढच्या तयारीबद्दल अगोदरच सर्व सांगून ठेवले आहे. दादा मुंबईहून येईपर्यंत त्यांनी आपली बॉडी भारती हॉस्पिटलमध्ये शवागारात ठेवायला सांगितली आहे. त्यांच्या खिशात नेहमी चार-पाच हजार रुपये असतात. ते घेऊन त्यांनी मला घाटावर जाऊन पुढची सर्व तयारी करून ठेवायला सांगितली आहे. अहो डॉक्टर, काकांनी आपल्या मृत्यूनंतर अंगावर घालायला पांढरा शर्ट आणि विजार स्वतःच्या हातांनी शिवून आपल्या बॅगमध्ये मला दाखवून ठेवली आहे. काकांना मरण मात्र अगदी त्यांच्या मनासारखे आले बघा. आपल्याला असेच सहज मरण यावे, असे त्यांची इच्छा होती.’’ सोमनाथ एकेक गोष्ट सांगत होता. ते ऐकताना मी चक्रावून गेलो होतो. मी काकांचे डेथ सर्टिफिकेट तयार करून सोमनाथकडे दिले. त्यानंतर ॲम्ब्युलन्स बोलवून काकांचा मृतदेह शवागारात ठेवण्यासाठी भारती हॉस्पिटलमध्ये पाठविला. हृदयविकाराचा त्रास असल्याने काकांना कधीही मृत्यू येऊ शकतो, ही गोष्ट माहिती असूनही त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याने मीही सुन्न झालो होतो.

काही दिवसांनंतर काकांचा मुलगा आणि मुलगी मला भेटायला आले.

‘‘बाबांनी तुमच्याकडे जमा असलेल्या डिपॉझिटची रक्कम तुमच्या शुश्रूषा केंद्रासाठी देणगी द्या, असे लिहून ठेवले आहे.’’ काकांचा मुलगा डिपॉझिटची पावती माझ्याकडे देत म्हणाला.

‘‘त्यांच्या बॅगेत आम्हाला काही आंतरदेशीय पत्रे मिळाली. त्यांनी ती आपल्या मित्रांना लिहिली आहेत. ‘तुम्ही शुश्रूषा केंद्राला एकदा भेट द्या आणि तुम्हाला मदत करा’, असे आवाहन त्यात केले आहे. त्यांना तुमच्या कामाविषयी खूप कौतुक वाटायचे. बाबांनी आयुष्यभर आपल्या परीने सर्वांना मदत तर केलीच, पण आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याबाबत ते नेहमी दक्ष असायचे. अगदी आम्हा कुटुंबीयांच्या बाबतीतही त्यांनी आपल्या या भूमिकेत तडजोड केली नाही.’’ त्यांची मुलगी गहिवरल्या सुरात म्हणाली. ते ऐकताना माझ्याही डोळ्यांत अश्रू तरळले होते.

आपल्या मरणाचाही उत्सव करणाऱ्या या अवलियाला कविवर्य बा.भ. बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे जीवन अधिक नेमकेपणाने कळले असेल का?

डॉ. दिलीप शिंदे, विश्रामबाग

सांगली

Share on Social Media

गांधींचे गारूड । 9

मानवी दु:खसागरात उभी मूर्तिमंत सात्त्विकता- सुचेता

संजीवनी खेर

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकीय मतभेद, कृपलानींनी काँग्रेस सोडणे, सुचेताजींनीही सोडणे नि परत येणे- हे घडत गेले. त्यांनी नव्या सरकारात नि:स्पृहपणे भरीव योगदान दिले. उत्तर प्रदेशच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. त्या अगोदर त्यांनी वेगवेगळ्या खात्यांचा पदभार सांभाळला होता. लोकांना आश्चर्य वाटले की, त्या मुख्यमंत्र्यांच्या भव्य बंगल्याऐवजी तिथेच असलेल्या छोट्या बंगलीतून काम करायच्या. स्वत: लालबहादूर शास्त्री साधे राहायचे, त्यांनाही सुचेताजींच्या साधेपणाबद्दल कौतुक वाटे. जेबी लखनौला असत. त्यांना भेटायला जाणेही सुचेताजींना अवघड जात असे. कामाचे डोंगर असायचे, ते संपवल्याखेरीज त्यांना शांत वाटत नसे. रात्रंदिवस काम करून त्यांनी राज्याचा गाडा चालवला. लोकांना हे नवे होते. मुख्यमंत्री किती नि कशी लोकोपयोगी कामं करतात, हे नितळपणे समोर येत असे. त्यांचा लोकसभेतला काळ त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनांनी गाजवला.

सुचेता मुजुमदार आणि आचार्य कृपलानी हे जोडपं वय पाहता अनुरूप नव्हतं. गांधीजी ह्या लग्नाच्या विरोधात होते, कारण त्यांना त्यांचा उजवा हात गमवायचा नव्हता. कृपलानींच्या घरचा इतिहास असा होता की- पुरुष फार वर्षे जगत नसत. सुचेता आणि जे.बी. कृपलानींच्या वयात 20 वर्षांचे अंतर होते. सुचेताने गांधीजींना सांगितले की- ह्या लग्नाने तुमचा उजवा हात जाणार नाही तर, तुम्हाला आणखी एक हात कामाला मिळेल. घरच्यांना समजावले की, आमचे अनेक बाबतींत सहमती आहे. विचार एकसारखे आहेत. त्यामुळे बाकीच्या बाबत मनात शंका येऊ देऊ नका. लग्नावेळी त्या दोघांनी कुणाला सांगितलेच नाही. या जोडप्याने गांधीविचारांसाठी आजन्म काम केलं.

मुजुमदार कुटुंब हे कट्टर ब्राह्मो समाजवादी. सुचेता अत्यंत शिस्तप्रिय, नैतिक, धार्मिक विचारांच्या घरात वाढलेली. माता-पिताही साध्या नि सात्त्विक जगण्याचे व्रत घेऊन काम करीत होते. सेंट स्टिफन कॉलेजात ती शिकली. त्यानंतर बनारस विद्यापीठात ती प्राध्यापक झाली. बौद्धिक कुशलतेचे धडे तिने घरी नि बनारसच्या वातावरणातच तासून घेतले. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर भावंडांची जबाबदारी तिच्यावर पडली. ती तिने निष्ठेने पार पाडली. तिची भावंडे चांगल्या हुद्यांवर काम करू लागली. बनारसलाच तिची जे.बी. कृपलानींशी भेट झाली. या निडर, तडफदार तरुणीच्या प्रेमात जे.बी.पडले. बिहारमधील भूकंपाच्या वेळी दोघांनी बरोबर काम केले. दोघांनी आपणहून ब्रह्मचर्याची शपथ घेतली होती, पण तरीही परस्परांबद्दलची ओढ कधी कमी झाली नाही; उलट त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या दोघांमध्ये अधिक चांगले मित्रत्व निर्माण झाले.

बनारस विद्यापीठात त्या चांगल्या रुळल्या होत्या. विद्यार्थ्यांना शिकवणे हे त्यांना मनापासून आवडत होते, पण जमनालाल बजाज यांनी अतीव आग्रहाने वर्ध्याला बोलावले. मुळात कॉलेजची प्राध्यापकी सोडून लहानशा गावात महिलांना शिकवण्याची कल्पना तिला फारशी रुचत नव्हती, त्यांच्या मनात फारसे नव्हते. पण बजाजांच्या आग्रहासाठी त्या तिथे गेल्या. गांधीजींना भेटल्या. मग मागे वळून परतणे नव्हतेच. तिथेच रमल्या. ग्रामीण भागात खूप काम तिच्यासारख्या स्त्रीसाठी वाटच पाहत होते. गांधींशी त्यांची गट्टी जमली. त्या मोकळेपणाने बोलत असत. त्यांचे दडपण अजिबात वाटत नसे. त्यांचे बोलणे ऐकणाऱ्याचे मन भारून टाकत असे. कामात नि बोलण्यात पक्के असले की, मग त्यांच्याशी संवाद सहज शक्य असे. सुचेताजींना त्यांनी सांगितले की- तू जेबींशी लग्न नको करूस, दुसऱ्या कुणाशी तरी कर. त्यावर त्या ताडकन्‌ म्हणाल्या, ‘‘छे : ते कसे शक्य आहे? प्रेम एकावर अन्‌ लग्न दुसऱ्याशी? तीन माणसांचे जीवन दु:खी का करायचे?’’ त्यावर ‘‘करायचे ते करा!’’ असा शेरा मिळाला. सुचेतांनी त्यांना जे योग्य वाटलं तेच केलं- जेबींशी लग्न!

नौखालीला 1946 मध्ये हिंदू-मस्लिम दंगे झाले होते. पण तेथील ब्रिटिश सरकार नि सुऱ्हावर्दी आदी लोक ‘इथं सारं अलबेल आहे, काही काळजी करायचं कारण नाही, लोक उगाचंच बाऊ करताहेत’ वगैरे सांगत होते. पण प्रत्यक्षात सत्य काय आहे, हे समजत नव्हते. सामान्य माणसांचे अपरिमित हाल होत होते. एखाद-दुसरी बातमी येई, ती अस्वस्थ करणारी असे. स्वत: तिथे जाऊन जाणणं गरजेचं होतं.

गांधींनी जेबींना नौखालीला पाठवायचे ठरवले. सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधू शरदचंद्र बोस तेथील नेते होते. जेबींसह जायला सुचेता सिद्ध झाल्या, पण गांधी सुचेताजींना जाऊ द्यायला राजी नव्हते. पण नंतर म्हणाले, ‘‘जा. तू बंगाली आहेस, लोकांशी चांगला संपर्क साधू शकशील.’’ सुचेताजींच्या हिमतीची दाद नौखालीतील त्यांच्या कामाकडे पाहून द्यायला हवी. त्यांनी पीडित हिंदू कुटुंबांना एकत्र करून एक कॅम्प तयार केला. जवळपास आठ हजार लोक तिथे होते. एका श्रीमंताने आपल्या हवेलीत त्यांना आश्रय दिला होता. त्यांनी वस्त्यावस्त्यांत जाऊन स्त्रिया नि मुलींना एकत्र केले होते. त्यांनी सविस्तर रिपोर्ट गांधीजींना पाठवले होते, ते तिथे बऱ्याच काळाने पोहोचले.

गांधीजींनी समजावले, ‘‘तुम्ही मुस्लिम वस्त्यांतही जायला हवं, नाही तर अशाने फूट अधिकच वाढेल. लोकांचे मतपरिवर्तन करायचे, तर हे गरजेचे आहे. हे काम कसे करायचे, हे तुमचे तुम्हीच ठरवायचे आहे. लोकांचे हृदयपरिवर्तन व्हायला हवे. जा आणि कामाला लागा. प्राण द्यायची वेळ आली, तर स्वत:चे अगोदर द्या.’’ खरं तर इथे कामं करायला त्यांच्याकडे तरुण माणसंच नव्हती; पण धैर्याने पुढे जातील अशी मूठभर माणसंही किती काम करू शकतात, हे त्यांना कळले. मुस्लिम वस्तीत गेल्यावर कळले की- तिथे कित्येक मुलं-बायका घाबरलेल्या आहेत, उपाशी आहेत. त्यांची स्थिती हिंदूंप्रमाणेच दयनीय होती. त्यांच्या नेत्यांनी त्यांना उचकवले होते. अनेकांनी दंगलीचा फायदा घेऊन लुटलूटदेखील केली होती. पण आता सारे एकाकी होते. त्यांना धीर द्यायचं काम या मंडळींनी केलं. गरीब मजूर पार उद्‌ध्वस्त झाले होते. कामं बंद होती. बाजार, हॉस्पिटल्स जळली होती. लोकांना हळूहळू धीर येऊ लागला. दोन्ही समाजांना चुका कळू लागल्या. गांधींनी बजावले, ‘‘सुरुवातीला ठीक आहे, पण आता फुकटात काही देऊ नका. काही तरी काम करायला द्या. कुणी बाई उपाशी पोरासाठी काही मागायला आली, तरी तिला काम देऊनच मदत द्या.’’ अगोदर गांधींचे म्हणणे बरोबर नाहीसे वाटले; पण सुचेताजींच्या ध्यानी आले की, अशाने फुकटाची सवय लागेल. गांधीजींच्या मते, ‘त्यांना भीक मागतोय असे वाटता कामा नये.’ मग काही ना काही काम करवून घेऊनच मदत द्यायला सुरुवात केली. हा व्यवहारीपणा गांधींनीच शिकवला.

त्या कोणालाही घाबरत नसत. ब्रिटिश अधिकारी उगीचच रुबाब दाखवत. वास्तव परिस्थितीची त्यांना कशी जाण नाही, ती सुचेताजी तडक जाणवून देत. असेच एका श्रीमंत घरात एक मुलगी विवाह करून राहत होती. पण त्याबद्दल जरा शंका होती. ब्रिटिश अधिकारी, न्यायाधीश आणि सुचेताजींना घेऊन सारी मंडळी त्या माणसाच्या घरी गेली. त्या मुलीला बाहेर बोलावले गेले. त्या गृहस्थाने सांगितले की, या मुलीने नि माझ्या मुलाने प्रेमविवाह केला आहे. त्या मुलीला प्रश्न विचरले गेले. ती किडकिडीत मुलगी नुसती मान हलवून हो वा नाही म्हणत होती. तोंडातून अवाक्षरही तिने काढले नाही. मॅजिस्ट्रेटनी ही घटना प्रेमविवाहाची आहे म्हणून सोडली; पण सुचेताजींनी म्हटले की, त्या मुलीला एकटीला विचारा, आतल्या खोलीत नेऊन तिच्याशी बोला. त्यांनी तिला आत नेले. तशी ती मुलगी त्यांच्या पायांवर पडून ‘मला इथून सोडावा’ असं म्हणू लागली. आता?

तिला कुठल्याशा सुरक्षित आश्रमात ठेवणं क्रमप्राप्त होतं. सुचेताजींनी रातोरात तिची व्यवस्था दूरवरच्या आश्रमात केली. पोलीस व इतरांवर तिला सुरक्षितपणे नेणं ही जबाबदारी टाकली. ही बातमी बाहेर पडली असती, तर शमायला लागलेले दंगे पुन्हा भडकले असते. अवघड प्रसंगी तातडीने निर्णय घेऊन ते अमलात आणायची ताकद नि हिंमत त्यांच्यात होती. सहकाऱ्यांच्या अडचणी समजून लगेच व्यवस्था करणं त्यांना जमत असे. अधिकाऱ्यांनी वा इतरांनी ‘नाही जमणार’ असं म्हटलं की, यांचा होकार तत्काळ येई आणि काम होई. त्यातून त्यांची कार्यतत्परता कळत असे.

तुरुंगातून 1945 मध्ये सुटल्यावर घरी जाऊन पतीबरोबर काही काळ घालवावा नि विश्रांती घ्यावी, असा मनोदय होता. पण तेव्हाच गांधींनी त्यांच्यावर कस्तुरबा ट्रस्टचे काम सोपवले. स्त्रियांकरता रुग्णालये उभारणे, प्रशिक्षण केंद्रांचे जाळेच उभे करायचे काम होते. त्यांनी तातडीने त्या कामाकडे मोर्चा वळवला. गांधींबरोबर काम करायचं, ही एक मोठी पाठशाळा होती. गावातल्या लोकांसाठी सुचेताजींना काम करायचं होतं. हे तर खूप विस्तृत काम होतं. शिक्षण, आरोग्य हे तर प्राथमिक होतं. कस्तुरबांच्या मृत्यूनंतर कस्तुरबा ट्र्‌स्ट सुरू करायचं ठरलं. याअंतर्गत स्त्रियांसाठी असलेली हॉस्पिटल वा इतर संस्था स्त्रियांनीच सुरू करून चालवाव्यात, अशी बापूंची इच्छा होती. त्यांच्या मते- कस्तुरबा ही साधी, खेड्यातली अशिक्षित स्त्री होती. तिच्या नावाचे काम गावातील स्त्रियांनी चालवावे. फार शहरी, सुशिक्षित स्त्री-पुरुष नकोत. हे अवघडच होते. पैसे जमवणे, संस्था चालवणे त्यांना जमेल? पण सुचेता कृपलानींनी ग्रामीण महिलांना प्रशिक्षण दिले. थोडीफार तात्पुरती इतरांची मदत घेतली, पण हळूहळू स्त्रिया तयार झाल्या!! हे सारे बापूंच्या शब्दाने झाले.

गावातील महिलांना लिहिण्या-वाचण्याचे महत्त्व कळले. त्यांच्यातील काहींनी आपल्या घरातच शाळा काढायला जागा दिली. असे करता-करता काम यशस्वी होऊ लागले. कस्तुरबा ट्रस्टने ट्रेनिंग सेंट्रर्स सुरू केली. गांधीजींनी तिला ठक्करबाप्पांबरोबर देशभर फिरून कस्तुरबा ट्रस्टचं काम विस्तृत कसं करता येईल, याचा अंदाज घ्यायला सांगितलं.

गावागावांत शाळा, उपचार केंद्रं, खादी विणायची कामं होऊ लागली. गांधीजींनी सारा देश पालथा घालून लोकांची स्थिती जाणून घेतली होती. तरुणांनी पोटापाण्यासाठी शहराकडे धाव घेण्याऐवजी गावातच काम मिळायला हवे, म्हणून ग्रामसुधाराच्या अनेक कल्पना राबवल्या जाऊ लागल्या. यात सुचेताजींचा खूप मोलाचा वाटा होता. शहरात जाऊन पांढरपेशा नोकरीसाठी रांगा लावण्याऐवजी गावात उद्योग सुरू करणे, इतर प्रशिक्षण घेऊन काम करणे अधिक श्रेयस्कर- असे बापूंचे म्हणणे होते. शिक्षितांनी शारीरिक श्रमाच्या कामाला कमी लेखू नये, म्हणून आश्रमात आपापली कामं करायचा नियम होता. सुचेता आणि जेबी यांचे एकत्र राहणे बऱ्याचदा कामामुळे अवघड होत असे. जेबी हे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य अनेक वर्षे होते. त्यानिमित्ताने त्यांचे राहणे वेगवेगळ्या ठिकाणी असे. सुचेताजींना तुरुंगात जायची जणू हौसच होती. तरुण वय नि धाडसाची ओढ. तुरुंगात जाणं ही अभिमानाची बाब होती. समाजात कौतुकही होई. युद्धविरोधात नि सरकारच्या विरोधात बोलल्याने आणि निदर्शने केल्याने त्यांना 14 महिन्यांची कैद झाली होती.

त्यांचे घर नि पत्ता अलाहाबादचा होता. काम मात्र त्या मुंबईतून करत होत्या. त्याचा फायदा घेत अनेक कार्यक्रम गांधीजींचा सल्ला न विचारता त्यांनी बेधडकपणे हाती घेतले. गांधीजी तेव्हा तुरुंगात होते. काम, ध्येय एकच- ब्रिटिशांना जेरीला आणायचे. अहिंसा ही त्यांच्या मनाने स्ट्रॅटेजी म्हणून अंगीकारली होती. शस्त्रास्त्र घ्यायला साधनं नव्हती, मग हाच मार्ग बरा होता. तरी सळसळत्या रक्ताला धडक कृतीचे आकर्षण होते. भूमिगत राहून रेडिओ स्टेशन चालवणे, रेल्वे उडवणे, घातपाती कारवाया करणे असे उद्योग सुरू होते. त्यांच्या घरी वॉरंट जात, पण तेथे त्यांचा ठावठिकाणा नसे. पण हे फार दिवस चालणे शक्य नव्हते.

सरकारी दमनशाहीने कळस गाठला होता. त्यातच स्वातंत्र्याची चाहूल लागली. सीमेवर हलकल्लोळ सुरू झाला. ब्रिटिश सरकार त्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करतेय, असे वाटू लागले. निर्वासितांचे तांडे दिल्ली व सभोवतालच्या गावांत येऊ लागले. त्यांची हालत बघवत नव्हती. गांधीजी व्यथित होते. आपली अहिंसा थिटी पडली, असे त्यांच्या मनाने घेतले. माणसातला सैतान थैमान घालत होता. हिंदू-मुस्लिम जमातीत सामंजस्य नांदावे म्हणून त्यांनी उपोषण सुरू केले. सुचेताजींनी दिल्लीच्या आसपास आलेल्या, अर्धमेल्या अवस्थेतील निर्वासितांना मदत करायला सुरुवात केली. त्या उत्तम व्यवस्थापक होत्या. त्यांनी आपल्या आत्मिक शक्तीने अनेक बाबतींत गांधीजींशी सल्लामसलत न करता अनेक कामे तडीस नेली होती. इथे त्यांना वाटले की- आपल्या सरकारकडे साधनसामग्री आहे, माणसं आहेत तर ते निर्वासितांचे पुनर्वसन चांगल्या पद्धतीने करू शकतील. म्हणून त्यांनी ते काम सरकारातील अधिकाऱ्याकडे सोपवले. त्यावर गांधीजींनी तिला म्हटले, ‘‘माझ्याशी सल्लामसलत करायची गरज तुला वाटत नाही ना? या लोकांना काय कळतंय- कसे हाताळायचे असे प्रश्न?’’

आणि तसेच झाले. त्यांना ते जमेना. सुचेताजींनी काम परत हातात घेतले नि महिनाभर धडपडून त्यांना कामाची आखणी करून दिली, मगच त्या बाहेर पडल्या. राजकीय कामात एक ग्लॅमर असते, मान असतो. तसे सामाजिक रचनात्मक कामात नसते. खूप कष्टून, लोकांना पटवून शिक्षण, आरोग्य, खादी, ग्रामीण रोजगार यांसारख्या गांधीजींच्या संकल्पनांतून निर्माण झालेल्या संस्थांना आकार देणे अवघड असते. पण सुचेताजींनी दोन्ही आघाड्यांवर आपला ठसा यशस्वीपणे उमटवला. दोन्ही कामांत त्यांना असीम समाधान मिळत होतं. तीच त्यांची कमाई होती.

फाळणी आणि नंतर गांधीहत्येचा धक्का देशाला नि त्यांच्या अनुयायांना सोसावा लागला. त्यांच्या सहवासातील माणिक मोती म्हणजे- त्यांचे अमूल्य शब्द नि त्याप्रमाणे वागणे- यांचा वारसा अनुयायांना चालवायचा होता. गांधी जसे बोलले, तसेच त्यांनी वर्तन केले. प्रत्येकाला आपण त्यांच्या सहवासात विकसित झालो; जगाकडे, समाजाकडे पाहायची वेगळी दृष्टी आपल्याला मिळाली, असे वाटे. ही मिळकत आपल्याला सदाचाराच्या मार्गावर नेत राहील याची खात्री होती.

जेबी कृपलानी आणि सुचेताजी हे असेच अभिन्न, प्रसन्न जोडपे होते. उदात्त विचारांनी भारावलेले, समाजासाठी निरपेक्षपणे सारे जीवन समर्पित करणारे क्रियाशील जोडपे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकीय मतभेद, कृपलानींनी काँग्रेस सोडणे, सुचेताजींनीही सोडणे नि परत येणे- हे घडत गेले. त्यांनी नव्या सरकारात नि:स्पृहपणे भरीव योगदान दिले. उत्तर प्रदेशच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. त्या अगोदर त्यांनी वेगवेगळ्या खात्यांचा पदभार सांभाळला होता. लोकांना आश्चर्य वाटले की, त्या मुख्यमंत्र्यांच्या भव्य बंगल्याऐवजी तिथेच असलेल्या छोट्या बंगलीतून काम करायच्या. स्वत: लालबहादूर शास्त्री साधे राहायचे, त्यांनाही सुचेताजींच्या साधेपणाबद्दल कौतुक वाटे. जेबी लखनौला असत. त्यांना भेटायला जाणेही सुचेताजींना अवघड जात असे. कामाचे डोंगर असायचे, ते संपवल्याखेरीज त्यांना शांत वाटत नसे. रात्रंदिवस काम करून त्यांनी राज्याचा गाडा चालवला. लोकांना हे नवे होते. मुख्यमंत्री किती नि कशी लोकोपयोगी कामं करतात, हे नितळपणे समोर येत असे. त्यांचा लोकसभेतला काळ त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनांनी गाजवला. युनोच्या प्रतिनिधी मंडळाच्या सदस्य म्हणून त्यांनी अनेक देशांचा दौरा केला.

निवृत्तीनंतर जेबींनी एक छोटासा बंगला दिल्लीत बांधला. तेथे ते दोघं राहू लागले. तिथे त्या अगदी साध्या गृहिणीसारख्या घरगुती कामात, पतीच्या सेवेत, पाहुण्यांची उठबस करण्यात नि बागकामात रमून गेल्या. जे घर नि थोडीफार पुंजी जमवली होती, त्यातच त्या भागवत. आपल्यानंतर सारी मिळकत लोककल्याण समितीला गोरगरिबांच्या मदतीसाठी देऊन टाकली. त्या काळात त्यांनी आत्मचरित्र लिहायला घेतले होते, ‘ॲन अनफिनिश्ड ऑटोबायोग्राफी’. त्यातील तीन भाग इलस्ट्रेटेड विकलीमध्ये छापून आले होते, पण ते काम अपूर्ण राहिले. अविश्रांत श्रमाने त्या थकल्या होत्या; परंतु जेबींना शुश्रूषेची गरज होती. त्या जेबींच्या सेवेत रात्रंदिवस गढून गेल्या. परिणामी, स्वत:कडे पूर्ण दुर्लक्ष झाले नि आजारी पतीला एकटं सोडून हृदयविकाराने त्या 29 नोव्हें. 1974 रोजी स्वर्गवासी झाल्या.

संजीवनी खेर, मुंबई

sanjeevanikher@gmail.com

Share on Social Media

प्रतिसाद

आरस्पानी माणूसकीचे प्रतिबिंब

स्त्री-पुरुष समानतेच्या पुरस्कर्त्या विद्या बाळ यांचे अलीकडेच निधन झाले. एकूणच पुरोगामी चळवळींची व्यापकता आणि परिणामकारकता वाढीला लागण्यासाठीचे त्यांचे चिंतन ऐकल्यानंतर आम्ही उभयतांनी त्यांच्यासोबत केलेल्या संवादाची एक आठवण सांगणे मला अगत्याचे वाटते.

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर बहुधा पुण्याच्या साने गुरुजी स्मारकातला दुसरा स्मृतीदिन. पत्नी, अलका आणि मी त्या वेळी हजर होतो. पहिल्या सत्रात मान्यवरांची भाषणे झाली, त्यात एक मान्यवर होत्या विद्या बाळ. त्यांनी डॉक्टरांच्या धडाडीच्या कार्यशैलीवर आणि त्यांनी स्थापलेल्या ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या वाटचालीवर मोजक्या शब्दांत भाष्य केले. पुढे मात्र त्या स्त्री-मुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लढाईतील स्त्रियांच्या अपुऱ्या योगदानाबद्दल विस्ताराने बोलल्या. त्या म्हणाल्या की, ‘महिलांच्या वाढत्या सहभागाने समाजातील इतर महिला पुरोगामी चळवळीत सामील होण्यास उद्युक्त होतात. यामुळे पुरोगामी चळवळी फोफावण्यास मदत होते.’ पुढे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या अपुऱ्या उपस्थितीबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी पुरुषवर्गाला आवाहन केले की, ‘त्यांनी घरी गेल्यावर आज इथे जे काही घडले आहे त्याची सांद्यत माहिती घरातील स्त्रीवर्गाला द्यावी- जेणेकरून त्यांची या कार्याबाबत रुची वाढेल,’ त्याचबरोबर त्यांच्या मनात सन्मानाची भावना निर्माण होईल! शक्य असेल तेथे घरातील स्त्रियांनाही आपल्याबरोबर अशा समारंभात घेऊन यावे, त्यांच्या या आवाहनाने आम्ही दोघेही मनोमन सुखावलो!

सत्र संपल्यावर आम्ही दोघेही स्टेजपाशी जाऊन त्यांना भेटलो आणि वरील मूलगामी विचार व्यक्त केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. आम्हा दोघांच्या उपस्थितीने त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद दिसला. ‘मिळून साऱ्याजणी’चा ताजा अंक आम्हास भेट देऊन अंनिसची चळवळ अधिक बळकट होण्यासाठीचा हा विचार पुढे न्या असे त्यांनी आवर्जून सांगितले!

आरस्पानी माणुसकीचे प्रतिबिंब असलेल्या विद्या बाळ यांची स्मृती जागवत असताना मला तमाम पुरोगामी चळवळींच्या कार्यकर्त्यांना तसेच हितचिंतकांना आवाहन करावेसे वाटते की, त्यांनी अशा चळवळीत स्त्रियांचा सहभाग वाढेल असे प्रयत्न करावेत.

गोविंद काजरोळकर, पुणे 38

कसलाच डामडौल त्यांनी मिरवला नाही

साधनामध्ये भाई उद्धवराव पाटील या आमच्या नेत्याबद्दल विशाल गवळी यांचा लेख वाचला. एक उस्मानाबादकर म्हणून मी आभारी आहे. भार्इंच्या व्यक्तिमत्त्वाचा एका लेखात आढावा घेता येणे अवघड आहे, पण गवळींचा प्रयत्न स्तुत्य आहे. भार्इंची भाषा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असायची, याचा अनुभव मी घेतला आहे. त्यांची राहणी अतिशय साधी. आमदार, खासदार असतानाही कसलाच डामडौल त्यांनी मिरविला नाही. कुठेही त्यांची सहज भेट होत असे. आजच्या राजकीय नेत्यांच्या तुलनेत ते लक्षणीय होते.

देवीदास वडगांवकर, उस्मानाबाद

चार वर्षांपासून पाठलाग

सुरेश द्वादशीवार यांचे एकाकीपणावरील लेख वाचतो. तेव्हा तंत्रज्ञानाच्या क्रांतीतून वाऱ्याचे वेगाने बदलनारे वास्तव जग याची तुलना सुरू झाली. अमुक बदलाचा स्वीकार केला नाही तर नोकरीचे मार्केट आपल्याला बाहेर फेकत असते. हे मार्केटबाहेर फेकले जाणे एकाकीपणाची सुरुवात आहे काय? वेगाने होणारे बदल एककीपणाची कारणे आहेत काय? सर्व जण जवळ असतानादेखील माणसाला एकटेपणा का वाटतो? एकाकीपणा का येतो? हातातून काही सुटत चालल्याचे खेळ मनात का सुरू होतात? मी चार वर्षांपासून या प्रश्नाचा पाठलाग करतोय. एककीपणवर मात करता आलेली नाही.

मिलिंद कीर्ती

Share on Social Media