Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

उपद्रवी राजांना भवितव्य ते कसले?

2005 च्या नोव्हेंबरअखेर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि जानेवारी 2006 मध्ये त्यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या पक्षाची स्थापना केली. दरम्यानच्या महिनाभरात त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि अनेक लहान-थोरांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या, अपेक्षा उंचावून ठेवल्या होत्या. त्या वेळी याच संपादकीय जागेवर आम्ही (युवा अतिथी संपादक या नात्याने) जे संपादकीय लिहिले होते, त्याचे शीर्षक होते- ‘राज ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती हा भाबडेपणाच ठरेल!’ (साधना : 31 डिसेंबर 2005). त्या वेळी ते संपादकीय अनेक मध्यममार्गी, उदारमतवादी व पुरोगामी माणसांनाही फारसे रुचले नव्हते. राज यांच्याकडे इतक्या संशयी नजरेने पाहू नये, असे त्यांचे म्हणणे होते. राज नवी भाषा बोलताहेत व नवी स्वप्ने दाखवताहेत तर त्यांना संधी दिली पाहिजे- असेही त्या लोकांना मनापासून वाटत होते. आणि त्या संपादकीय लेखाचा मध्यवर्ती सूर नेमका याच्या विरोधी होता. तो असा होता की, राज हे नवी भाषा बोलत नाहीत, नवी स्वप्ने दाखवत नाहीत, नवे विचार मांडत नाहीत आणि त्यांना नवे राजकारणही करता येणार नाही. वस्तुतः त्या संपादकीय लेखात अफलातून म्हणावे असे काही विश्लेषण नव्हते, सर्वांच्या हाता-तोंडाशी असलेली तथ्ये पुढे करून केलेले ते भाकीत होते. तब्बल चौदा वर्षे झाली त्या घटनेला, पण ते भाकीत खोटे ठरावे असे वर्तन राज यांच्याकडून अद्याप घडत नाही.

राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना आपले काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहिले होते. ‘तुम्ही माझ्यावर अन्याय केलात, तुम्ही पक्षपाती आहात, तुम्ही कमजोर झालात’- असे घणाघाती आरोप त्या पत्रातून केले होते. आणि ‘युअर टाईम स्टार्टस्‌ नाऊ’, असा इशाराही दिला होता. त्यानंतर महिनाभर ते महाराष्ट्रात फिरत होते आणि ‘माझे काकाच माझे दैवत आहेत’ असे सांगत होते. आणि ‘तुमच्या मनगटातील रग केव्हा व कुठे दाखवायची हे मी तुम्हाला वेळ आल्यावर सांगेन,’ असे ते आपल्या समर्थकांना सांगत होते. मुळातच ती एक विचित्र मांडणी होती. स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केल्यावर त्याचे नामकरण त्यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ असे केले, तेही चुकीचे होते. कारण राज्याच्या नवनिर्माणासाठी त्यांच्याकडे तशी काही दृष्टी नव्हती. ‘माझ्याकडे नव्या महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आहे’, असे ते म्हणत होते. पण ते पोकळ शब्द होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पक्षाच्या ध्वजात भगव्याचा अंश घेतला होता, आता तो ध्वजच बदललाय. संपूर्ण भगवा केलाय. खरे तर त्यांनी आपल्या पक्षाचे नावच बदलायला हवे, कारण जे जमणार नाही ते करणार असल्याचा आव कशाला आणायचा?

राज यांनी शिवसेना सोडली तेव्हा ते केवळ 38 वर्षांचे होते, त्यामुळे त्यांच्यापुढे मोठी संधी आहे असे अनेक लोकांना वाटणे साहजिक होते. पण त्यांची एकूण जडणघडण ज्या घरात व ज्या पर्यावरणात झाली आणि जी कार्यपध्दती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनली होती, ती पाहता, रचनात्मक काम त्यांना करताच येणार नव्हते. म्हणजे उपयुक्तता मूल्य असलेले काम त्यांना फारसे जमणार नव्हते, उपद्रवमूल्य हीच त्यांची खरी ताकद होती. आणि नंतरच्या 14 वर्षांत हे त्यांनी पुन्हा पुन्हा सिध्द केले आहे. इ.स. 2009 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 14 जागा मिळाल्या होत्या. पक्ष स्थापन झाल्यावर केवळ तीन वर्षांनी आलेल्या त्या निवडणुकीतील ते यश म्हणजे जनतेने आधीचे सारे विसरून उदार हस्ते दिलेले दान होते. पण राज यांच्या त्या 14 आमदारांनी नव्या विधानसभेत प्रवेश केल्यावर पाहिले काम कोणते केले, तर अबू आझमी या आमदाराला भर विधानसभेत मारहाण केली आणि स्वतःवर निलंबन ओढवून घेतले. तेवढे कमी म्हणून की काय, त्या कृत्याचा अभिमान मिरवत ते सर्वत्र फिरत राहिले. आणि ती कर्तबगारी आहे असे राज ठाकरे मानत राहिले. त्यानंतरची दहा वर्षे महाराष्ट्र विधानसभेत त्यांच्या पक्षाची पाटी जवळपास कोरी राहिली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व गुजरातचा विकास यांचे जोरदार कौतुक करण्याची आघाडी उघडली आणि ‘मी तसेच करू इच्छितो’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत स्वपक्षाचे उमेदवार उभे केले, अर्थातच भाजप उमेदवारांच्या विरुध्दही. मात्र ‘आमचे निवडून आलेले सदस्य नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा देतील’ असे जाहीर केले. ही अशी भूमिका निवडणुकीआधीच घेणे विचित्रच होते. तो एकूण प्रकार हास्यास्पद होता. कारण ‘तसे असेल तर आम्ही मोदींच्या भाजपचे उमेदवारच निवडून देतो ना’, असे सर्वसामान्य माणसेही म्हणत होती. बरे, यातून राज यांनी काही धडा घेतला आणि 2019 मध्ये काही वेगळे केले का, तर तसेही नाही. किंबहुना जास्तच उलट झाले. या लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वपक्षाचे उमेदवार उभे केले नाहीत, अन्य पक्षांना पाठिंबा जाहीर केला नाही, आणि तरीही मोठ्या प्रचारसभा घेतल्या. त्यातून मोदी व शहा यांच्याविरोधी धडाकेबाज भाषणे केली आणि काठावरच्या जनतेची वाहवा मिळवली. अर्थात, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याशी त्यांनी संगनमत केले अशी चर्चा झाली; काँग्रेस व राष्ट्रवादी यांची बी टीम अशी मनसेची संभावनाही झाली. मधल्या काळात थेट दिल्लीला जाऊन सोनिया गांधींची भेट घेतली, पण काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याशी आघाडी होऊ शकली नाही. आणि आता काय तर, नागरिकत्व कायद्याच्या समर्थनाचे निमित्त करून अडचणीत सापडलेल्या भाजपला मदत करीत आहेत. गेल्या महिन्यात देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यावर ते भाजपकडे जाणार असे संकेत मिळत आहेत. पण आगामी काळात सेना व भाजप एकत्र येणारच नाहीत असेही नाही. त्यामुळे भाजपने नारायण राणे यांना खेळवले तसे ते राज यांच्याबाबत करणारच नाहीत असेही नाही.

हे खरे आहे की स्थळ, काळ व परिस्थिती यांच्यानुसार राजकीय पक्षांना लवचिकता दाखवावी लागते, भूमिका बदलाव्या लागतात, आणि व्यवहारिक राजकारण करायचे ठरले तर मोठ्या तडजोडीही कराव्या लागतात. पण राज ठाकरे यांचे राजकारण पाहता ते सदैव गोंधळलेले राहिले, आवेश मात्र असा की, सारे काही स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या चार मोठ्या पक्षांनी व्यापलेला असल्याने राज यांचे असे होत असेल. कदाचित बौध्दिक सल्लागारांचे ऐकून ते असले अचाट प्रयोग करत असतील. शरद पवारांचाही सल्ला ते अधूनमधून घेतात, पण त्यामुळे त्यांचा गोंधळ अधिकच होत असावा. आताही असेच झाले असावे, पवारांनी त्यांना काहीएक डावपेच मागील निवडणुकीच्या वेळी दिले असावेत. पण विधानसभा निवडणूक निकालानंतर पवारांनीच स्वतःचा बचाव करण्यासाठी डावपेच बदलले आणि थेट शिवसेनेला सोबत घेतले. त्यामुळे राज यांची कोंडी झाली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ते आता भाजपकडे झुकलेत हे उघड आहे. अर्थात, भाजपने मधल्या काळात त्यांच्या मागे ईडी चौकशी लावण्याचा प्रयत्न केला, त्यातून सुटका करून घेण्यासाठीही आताचा देखावा असणार. असो.

तर, राज यांचे राजकारण लंबकाप्रमाने हेलकावे खात राहणार यात आश्चर्य वाटावे असे काही नाही. त्यामुळे त्यांच्याकडून भलत्याच अपेक्षा बाळगणारांच्या वाट्याला भ्रमनिरास येणार यात विशेष ते काय!

आपला देश मूलत: लहान-मोठ्या राजेमहाराजांच्या परंपरा चालवणारांचा आहे. ब्रिटिश काळातही लहान-मोठी अशी साडेपाचशे संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर त्या राजेमहाराजांचे स्वरूप थोडे बदलले, जनतेच्या मानसिकतेही थोडे बदल झाले. पण अद्याप नवे राजेमहाराजे व त्यांच्यामागे भक्तिभावाने फरफटत जाणारी जनता हे चित्र कायम आहे. त्यामुळे प्रत्येक राजघराण्यात कितीही फाटाफुटी झाल्या, तरी प्रत्येकाला भक्तगण मिळत असतो. तसेच राज ठाकरे यांच्याबाबतही होत राहणार, त्यांनी कितीही उलटसुलट भूमिका घेतल्या, त्यांचा कितीही गोंधळ उडाला तरी त्यांच्या भाषणांना गर्दी करून टाळ्या पिटणारी जनता मिळत राहणार. आणि ‘राज आता बदलताहेत’ असे म्हणणारे भाबडे लोकही प्रत्येक वेळी त्यांना मिळत राहणार. म्हणून यांची दखल अधूनमधून घ्यावी लागते. अन्यथा यांच्यावर लिहावे लागणे हा कंटाळवाणा प्रकार आहे.

Share on Social Media

न्यायदेवतेच्या (न लिहिलेल्या) डायरीतून

कायद्याच्या राज्याची वीट निखळते आहे का?

प्रतापसिंह साळुंके

अमिताभ बच्चन आणि रोहिणी हट्टंगडी या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने अजरामर झालेल्या ‘अग्निपथ’ या चित्रपटात, तत्त्वनिष्ठ आई व तिचा गुन्हेगारी क्षेत्रात गेलेला मुलगा यांचे अतिशय ताणलेले संबंध आणि त्यामुळे आई-मुलाच्या नात्यावर झालेला परिणाम प्रभावीपणे चित्रित केलेला आहे. गुन्हेगारी क्षेत्रात का आलो, याचे समर्थन करताना अमिताभ म्हणतो- लहानपणी ज्यांनी माझ्या हातावर ‘याचा बाप चोर आहे’ हे वाक्य, तत्त्वनिष्ठ शिक्षक असणाऱ्या माझ्या वडिलांविषयी गोंदणाने कोरले, त्या अन्यायामुळे! दुसऱ्या बाजूला, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी स्वतः अन्यायी आणि गुन्हेगार होणे आईला कदापिही मान्य नसते. मुलाच्या प्रभावी युक्तिवादाने आईचे समाधान होत नाही. या दोघांमधले मोजकेच पण खूप आशयगर्भ असे संवाद ते दोघे दोन वेगळ्या ध्रुवावर आहेत, याची जाणीव करून देतात.

सर्वोच्च न्यायालयाने हैदराबाद येथील कथित एन्काऊंटरप्रकरणी चौकशीसाठी तीनसदस्यीय समिती गठित केल्याची घोषणा दि. 3 फेब्रुवारी 2020 रोजी केली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही.एस. शिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती आर.पी. सुंदर बलदोटा व केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सी.बी.आय.) यांचा समावेश असणार आहे. या बातमीने माझे लक्ष 6 डिसेंबर 2019 च्या सकाळच्या बातमीपाशी जाऊन पोहोचले. या दिवशी सकाळी आलेल्या बातमीने भारतीय समाजमनात एक खळबळ उडवून दिली होती.

हैदराबाद येथील व्हेटर्नरी डॉक्टर असणाऱ्या एका तरुणीवर चार व्यक्तींनी सामूहिक बलात्कार करून नंतर तिचा मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचे धक्कादायक कृत्य केल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली होती. असेही सांगण्यात येते की, त्या तरुणीची पंक्चर झालेली दुचाकी नीट करून देण्याच्या बहाण्याने तिला निर्जन स्थळी नेऊन हे घृणास्पद कृत्य करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास चालू असताना तपासाचा नैमित्तिक भाग म्हणून त्या गुन्ह्याच्या पुनर्निर्माण (रिक्रिएशन ऑफ क्राईम सीन) साठी त्या चौघा संशयितांना गुन्ह्याच्या कथित जागेवर नेण्यात आल्यावर, त्या संशयितांनी पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात चौघेही संशयित ठार झाले.

मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्या व समाजमाध्यमांवर या बातमीने उडवून दिलेल्या खळबळीमुळे कथित घटनास्थळी लोकांची प्रचंड गर्दी जमा झाली. यानंतर जे घडले ते एखाद्या लोकप्रिय चित्रपटातील दृश्य शोभू शकेल, असे चित्र पाहायला मिळाले. ते म्हणजे हैदराबाद पोलिसांवर जमावाने पुष्पवृष्टी करून त्यांनी केलेल्या कृतीला आपला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले. गुन्हा घडल्यावर त्याचा तपास पोलीस जलदगतीने करत नाहीत किंवा ते राजकीय दबावाखाली असल्यामुळे निष्पक्षपातीपणे तपास करत नाहीत अशी तक्रार अनेक वेळा केली जाते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी असे काही तरी करणे हे लोकांना एक सुखद धक्का देणारे होते. ते लोकांच्या तत्काळ प्रतिक्रियेवरून किंवा समाजमाध्यमांवर त्या वेळी जे मिम्स, विनोद, विडंबन, उपहास टाकण्यात आले, त्यांच्यांतून भारतीय न्यायदान प्रक्रियेविषयी खंत व रागही व्यक्त करण्यात आला.

हैदराबादच्या या प्रकरणामुळे काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले. एक- न्यायालयीन कामकाजातील दिरंगाईमुळे न्यायालयांच्या न्याय देण्याच्या क्षमतेवरच समाजाचा अविश्वास निर्माण झाला आहे का? दोन- झटपट न्याय- मग भले तो कायद्याच्या, संविधानाच्या, न्यायदानाच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत असेल तरीही- केवळ जलदगतीने मिळतो आहे आणि सर्वसाधारण न्यायदानाच्या प्रक्रियेने तो मिळणे शक्यतेच्या कोटीतील वाटत नसल्याने एका हतबलतेतून हा पाठिंबा तयार होतो आहे का? तीन- भारतात मानवी हक्कांचा अतिरेक होत असून ही मंडळी फक्त गुन्हेगारांच्याच हक्कांबद्दल बोलतात; पण अशा गुन्ह्यांमध्ये बळी पडलेल्या व्यक्तींच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या मानवी हक्कांबद्दल कधीच बोलत नाहीत, त्यामुळे त्यांना फारसे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही.

चार- सराईत व निर्ढावलेले गुन्हेगार यांच्या बाबतीत अतिसंवेदनशील असण्याची काहीही गरज नाही; उलट त्यांच्या बाबतीत जास्तीत जास्त कठोर वागले पाहिजे, तसे वागल्यानेच अशा गुन्हेगारांवर जरब बसून गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल. न्यायालयीन दिरंगाईचा गुन्हेगारांना फायदा आणि गुन्ह्यातील पीडित व्यक्तीला व त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मानसिक त्रासच होतो, त्यामुळे झटपट न्याय कितीही आक्षेपार्ह वाटत असला तरी सर्वसामान्य माणसाचा अशा कृत्याला पाठिंबाच आहे. पाच- यामध्ये ज्या चार संशयितांना अटक करण्यात आली होती त्यांनीच गुन्हा केल्यामुळे पोलिसांनी त्यांना धडा शिकविण्यासाठी एन्काउंटर केले, हे गृहीत धरले जाते आहे. त्यामुळे हे एन्काउंटर जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे, याविषयी त्याला पाठिंबा देणाऱ्या लोकांना कसलीही शंका नाही; उलट अशा कृत्यामुळे पोलिसांची विश्वासार्हता वाढेल आणि त्यांनी यासारख्या इतर गुन्हेगारांसाठी हा ‘पॅटर्न’ वापरावा, असे त्यांना मनोमन वाटते.

यातील पहिला मुद्दा आहे तो न्यायालयीन दिरंगाईचा. आता तो अशा टप्प्यावर येऊन पोहोचला आहे का की, लोकांना आता न्यायसंस्थेकडून काही ठोस कृती होऊ शकते यावरच विश्वास उरलेला नाही? 2006 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत सर्वोच्च, उच्च आणि कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या 3.5 कोटी इतकी मोठी असल्याची ग्वाही ‘नॅशनल डेटा ज्युडिशिअल ग्रिड’च्या ऑगस्ट 2019 च्या ताज्या अहवालानुसार सांगितले जाते. गेल्या तेरा वर्षांत ही वाढ 22 टक्क्यांवर येऊन पोहोचली आहे. यापैकी कनिष्ठ न्यायालयांसमोर प्रलंबित खटल्यांचे प्रमाण 87 टक्के, उच्च न्यायालयांसमोर प्रलंबित खटल्यांचे प्रमाण 12 टक्के, तर सर्वोच्च न्यायालयांसमोर प्रलंबित खटल्यांचे प्रमाण 0.2 टक्के इतके असल्याचे समोर आले आहे.

सर्वसामान्य माणसाचा सर्वांत जास्त संबंध येतो, त्या कनिष्ठ न्यायालयांसमोरील प्रलंबित खटल्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने त्याचे सर्वांत जास्त दुष्परिणाम सर्वसामान्यांना सहन करावे लागतात, ते चिंताजनकच आहे. त्यामुळे लोकांना न्याययंत्रणांवर विश्वासच उरलेला नाही, या निष्कर्षाप्रत आपण येऊ शकतो का? याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण आजही रस्त्यावरच्या भांडणांमध्येही ‘मी तुला कोर्टात खेचेन’ हे अहमहमिकेने सांगितले जाते. सर्वसामान्यांचा अजूनही न्यायालयावरचा विश्वास अबाधित असल्याचा तो जिवंत पुरावाच मानता येईल. तर अशा प्रसंगांची तीव्रता इतकी असते की, काही काळासाठी आपली न्यायबुध्दी क्षीण होत असली तरी, ती नाहीशी होत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित असण्याचे प्रमुख कारण आहे, मोठ्या संख्येने नवे खटले दर वर्षी न्यायालयात दाखल होत आहेत. हे याचेच निदर्शक आहे की, सामान्यांचा अजूनही न्यायालयांवर विश्वास आहे.

दुसरा मुद्दा आहे तो न्यायालयीन दिरंगाईमुळे झटपट निकाल हाच खरा न्याय वाटायला लागतो. ‘न्यायदानातील दिरंगाई हा अन्यायच असतो’ हे न्यायतत्त्व असले तरी, न्यायदानासाठी काहीएक वेळ लागणार, हे गृहीत आहे. आपली गफलत कुठे होते? तर अनेक वेळा आपल्या न्यायव्यवस्थेची तुलना युरोप व पाश्चिमात्य राष्ट्रांशी केली जाते, तेव्हा. त्या वेळी एक मुद्दा कदाचित आपल्या नजरेतून सुटू शकतो, तो म्हणजे- त्या देशांची अतिशय मर्यादित असणारी लोकसंख्या. तपासयंत्रणाची स्वायतत्ता, उपलब्ध मनुष्यबळ आणि आर्थिक पाठबळ या पातळ्यांवर विचार करता भारतीय न्यायव्यवस्था कामगिरीच्या शिखरावर आहे असे आपण म्हणणार नाही; पण म्हणून सदासर्वकाळ झटपट न्यायाच्या पक्षात असणेही योग्य नाही. भारतीय समाज मध्यममार्गी आहे.

कुठल्याही प्रकारचा अतिरेक तो फार काळ सहन करत नाही. झटपट न्यायाचे क्षणिक आकर्षण त्याला वाटत असले तरी, एक मूलभूत गफलत होते. ती म्हणजे, अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये ‘दुसरा’ कुणी तरी असणार आहे, हे गृहीतक. अर्थातच ते अत्यंत तकलादू आहे. कारण अशा प्रकारच्या झटपट न्यायाला समाजमान्यता व राजमान्यता मिळू लागली, तर कायद्याच्या राज्यासमोर त्याच्या अस्तित्वाचेच प्रश्न उभे राहतील. न्यायालयीन दिरंगाई ही बाब आता सर्वसामान्य लोकांसाठी परिचयाची झाली असून, त्यामुळेही अशा प्रकारच्या अटीतटीच्या प्रसंगी झटपट न्यायाला पाठिंबा देऊन लोक अशा प्रकारच्या मानसिक त्रासातून आपली मुक्तता होईल, या कल्पनाशक्तीतून आपल्या तीव्र भावनांचे विरेचन करत असतात. वरवर पाहता, अशा प्रकारच्या कृत्याला पाठिंबा त्यांचा असतो असे आपण मानत असलो तरी, थोडा काळ गेल्यावर आणि अशा प्रकारच्या निवाड्यावर लोक पुन्हा सारासार विवेक शाबूत ठेवून विचार करू लागतात; तेव्हा ते अशा गोष्टीला पाठिंबा देत नसल्याचे पाहायला मिळालेले आहे. याचे अगदी सोपे उदाहरण म्हणजे- मुंबईवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या कसाबला कुठल्याही खटल्याशिवाय सी.सी. टी.व्ही. फूटेजच्या आधारावर ताबडतोब फासावर लटकवावे, कुठल्याही वकिलाने कसाबचे वकीलपत्र घेऊ नये असे म्हणणाऱ्या आग्रही, आततायी व भावनिक झालेल्या समाजमानाने नंतर अल्पावधीतच न्यायालयीन प्रक्रियेच्या अपरिहार्यतेला व व्यवहार्यतेला स्वीकारून न्यायालयीन कामकाजामध्ये सहकार्य केले, हे नक्कीच आश्वासक होते. न्यायालयीन दिरंगाईची कारणे- पायाभूत सुविधा व मनुष्यबळाची उपलब्धता यामध्ये दडलेली आहेत. आणि याच्या पाठीशी आहे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. पण ती निर्माण व्हावी यासाठी जनमताचा रेटा राजकीय व्यवस्थेवर निर्माण होतो आहे, असे फारसे पाहायला मिळत नाही.

भारतात मानवी हक्कांचा अतिरेक होतोय का? या गृहीतकाला तपासण्यासाठी मुळात या गृहितकाचा उगम कशात आहे- हे पाहिले तर असे लक्षात येते की, ज्याला आपण मानवी हक्कांचा अतिरेक वगैरे समजतोय, ते खरे तर फौजदारी प्रक्रिया संहितेत दिलेले अतिशय मूलभूत अशा स्वरूपाचे अधिकार आहेत. ते देण्याचा वा ना देण्यासंदर्भात चर्चा, उपचर्चा, वादविवाद असे काहीही करण्याची आवश्यकता नाही. कायद्याचे राज्य या संकल्पनेत आपण एक समाज म्हणून ज्या कायद्यांना मान्यता दिली, त्या कायद्यांची प्रतिष्ठा जपणे ही त्या समाजाची महत्त्वाची जबाबदारी असते. ज्यांनी तो बनविला आहे तेच लोक जर त्या कायद्याचा आदर ठेवणार नसतील, तर मग अशा कायद्याच्या भवितव्याविषयी गंभीर विचार करणे गरजेचे बनते.

फौजदारी प्रक्रिया संहितेतील हे हक्क किंवा मानवी हक्क यांची आवश्यकता का आहे, हे तपासून पाहताना त्या ठिकाणी क्षणभरासाठी स्वतःला ठेवून पाहा. मग हे खरोखरच अनावश्यक ठरतात की आवश्यक वाटतात, याचे उत्तर मिळू शकते. अशी कल्पना करा की- मध्यरात्री तुमच्या घराचे दार ठोठावून पोलीस तुमच्या घरात प्रवेश करतात, तुम्हाला कुठलेही कारण न देता अटक करतात, तुम्हाला कुठल्या पोलीस कोठडीत ठेवले आहे आणि न्यायालयासमोर कधी, कुठे, केव्हा हजर करणार आहेत याची तुम्हाला व तुमच्या नातेवाइकांना कसलीही कल्पना देत नाहीत. कोठडीमध्ये तुमच्यावर अनन्वित अत्याचार होतोय, पण ते सांगण्यासाठी वर्षानुवर्षे तुम्हाला कुठल्याही न्यायालयासमोर सादर केले जात नाही. तुमचे आरोग्य, जेवण याची सातत्याने हेळसांड होते आहे, पण तुम्हाला या सगळ्याविरोधात काहीही आवाज उठवता येत नाही. हे सारे अतिशय विदारक आहे.

ते तसे होऊ नये यासाठीच हे मूलभूत अधिकार दिलेले असतात. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतो. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांकडून दबाव येऊ शकतो, हे गृहीत धरूनच 1857 च्या बंडाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या भारतीय पुरावा कायद्यातील कलम 25 आणि 27 नुसार पोलिसांसमोर दिलेली साक्ष संशयित आरोपीवर बंधनकारक मानलेली नाही. त्यामुळे न्यायाधीशांच्या उपस्थितीत त्याला गुन्ह्याची हकिगत पुन्हा एकदा कथन करण्याची मुभा देण्यात आली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सनदी आणि जाहीरनामे यांच्या माध्यमातून वेळोवेळी मानवाची प्रतिष्ठा राखण्यासाठी त्या त्या राष्ट्रांनी आपल्या नागरिकांना नवे अधिकार द्यावेत असे निर्देश दिले जातात. त्यांचे पालन करणे हे आपण ज्या नव्या जागतिक परिस्थितीत राहतो आहोत तिथे गरजेचे मानलेले आहे.

जे सराईत वा निर्ढावलेले गुन्हेगार असतात, त्यांना अतिप्रेमाने वागविण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत असताना त्या विशिष्ट गुन्ह्यासाठी आरोपी म्हणून न्यायालयात आणलेली व्यक्ती खरोखरच गुन्हेगार आहे, हे मानणे कितपत योग्य ठरू शकते? कारण एखाद्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही न्यायालयाने शिक्षा ठरविताना लक्षात घेणे गरजेचे ठरू शकते, मात्र त्या आधारावर त्याला/तिला सरसकटपणे जबाबदार धरणे न्यायिक तत्त्वांशी फारकत घेतल्यासारखे होईल. गुन्हा सिध्द होईपर्यंत त्याला/तिला निर्दोष मानणे हे व्यापक जनहिताच्या दृष्टीने योग्य ठरले आहे, कारण हे न्यायतत्त्व भारतीय न्यायप्रणालीचे आधारतत्त्व म्हणून स्वीकारत असताना, राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते- ‘भारतासारख्या देशात जिथे शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे, गरिबी आहे, लोक आपल्या अधिकारांविषयी अनभिज्ञ आहेत, अशा परिस्थितीत आरोपीवरील गुन्हा सिध्द करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची असणे अधिक सयुक्तिक ठरते.’

गुन्हेगारी संपविण्यासाठी ‘हैदराबाद पॅटर्न’ योग्य आहे, हा युक्तिवाद करणाऱ्या लोकांनी जी गृहीतके मानलेली आहेत, ती फार गंभीरपणे विचार करायला लावतात. यात पोलिसांनी हे एन्काउंटर जाणीवपूर्वक केले, कारण त्यांना गुन्हेगारांच्या मनात दहशत बसवायची होती आणि न्यायालयात शिक्षा व्हायला एक तर वेळ अधिक लागला असता, कदाचित त्यातून ते आरोपी सहीसलामत सुटूही शकले असते. त्यामुळे पोलिसांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे त्याचे जोरदार समर्थन केले जाते. क्षणभर ते आकर्षक वाटले तरी त्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत, याचा सखोल विचार करणे गरजेचे आहे. युक्तिवादासाठी आपण हे मान्य जरी केले की, एन्काउंटरमध्ये मारले गेलेले संशयित आरोपी हेच खरे गुन्हेगार होते आणि त्यामुळे त्यांना मारणे महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी, अशा प्रकारचे गुन्हे करू शकणाऱ्या भविष्यातील गुन्हेगारांसाठी तो स्पष्ट इशारा असेल- अशा प्रकारचा गुन्हा कराल ‘तर त्याचा परिणाम हा असा गंभीर असू शकतो.’ पण या युक्तिवादामध्येच एक मूलभूत दोष आहे. तो म्हणजे भीती, दहशत असली की- गुन्हेगार गुन्हे करत नाहीत असे मानणे. खरे तर हे गृहीतक किती पोकळ आहे, हे रोजचे वर्तमानपत्र आणि त्यातील गुन्हेविषयक बातम्या वाचल्या तरी सहज लक्षात येते. म्हणजे फक्त शिक्षा कठोर असून गुन्हे थांबणार नाहीत. विशेषतः महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये आणि एकूण समाजाची पाहण्याची सदोष दृष्टी आणि पुरुषसत्ताक वातावरणात मुलांना वाढविले जाते, हे या गुन्ह्यांचे खरे कारण आहे की शिथिल कायदे हे त्याचे कारण आहे?

ए.व्ही. डायसी यांनी 1905 मध्ये लिहिलेल्या पण आजही तितकेच ताजेतवाने असलेल्या पुस्तकात अतिशय विचारप्रवृत्त करायला लावणारी मांडणी आहे. ‘लॉ अँड पब्लिक ओपिनियन इन इंग्लंड’ हे ते पुस्तक. या पुस्तकात त्यांनी काही महत्त्वाची विचारसूत्रे मांडली आहेत. त्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यात आवडत्या गृहीतकावर आघात केला आहे. तो म्हणजे, कायदा हा लोकमताच्या आधारावर बनविला जातो. खरे तर अनेक वेळा जनमत वेगळेच असते आणि प्रत्यक्षात कायदे बनविणारे स्वतःच्या हितसंबंधांचा विचार करून त्याला बाधा पोहोचणार नाही या पध्दतीने कायदे बनवीत असतात. यात एक गुंतागुंतीचा विचार काहीशा आकर्षक पध्दतीने मांडला आहे, तो असा की, जेव्हा काही समाजघटक एखाद्या कायद्याला विरोध करत असतात, तेव्हा त्याच्या मुळाशी ती परिस्थिती समजून घेण्याची त्या समाजघटकांची सदोष पध्दत हे खरे कारण असते. पण ती पध्दती सदोष आहे, याचा पत्ता त्या समाजघटकाला नसतो. यासाठी त्यांनी अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करण्याचा कायदा करण्यात आला त्याला विरोध करणाऱ्या (मळेमालक आणि गुलाम यांच्यातील) मध्यस्थांच्या वर्गाचे उदाहरण दिले आहे.

गुलामगिरी ही मळेमालकांना स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध करून देणारी आणि त्याच वेळी गुलामांनाही ठरावीक रक्कम खात्रीशीरपणे उपलब्ध करून देणारी व्यवस्था आहे, असे त्या मध्यस्थ वर्गाला वाटत होते. खरे तर या गृहीतकामध्ये अनेक दोष आहेत. आपण काही तरी चुकीचा विचार करतोय असे त्या वर्गाला अजिबात वाटत नव्हते. ते मनापासून हेच मानत होते की, आपला योग्य आहे. यामध्ये हा विचार अधिक सोपा करून सांगताना लेखक अशी मांडणी करतो की, कुठले कायदे अधिक यशस्वी होतात, तर ज्याच्या पाठीमागे प्रबळ जनमत उभे राहते; आणि कुठले कायदे अपयशी ठरतात, तर ज्यांच्या पाठीमागे प्रबळ जनमत उभे करण्यात कायदा करणारे अपयशी ठरतात. म्हणजे इथेही कायदा आणि जनमत या दोन गोष्टी वेगळ्या असल्याचे अधोरेखित केले आहे.

सप्टेंबर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पीठाने चार विरुध्द एक अशा बहुमताने केरळमधील शबरीमाला मंदिरात दहा ते पन्नास वयोगटातील स्त्रियांना प्रवेश करण्यापासून रोखता येणार नाही, कारण ही कृती राज्यघटनेतील कलम 14 मध्ये अंतर्भूत केलेल्या समानतेच्या तत्त्वाशी विसंगत असल्याचा अतिशय सुस्पष्ट निकाल दिला. या निकालाविरोधात लोकांची, काही राजकीय पक्षांची, धार्मिक गटांची मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. मात्र 1985 मधील शाहबानो खटल्यानानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात निदर्शने झाल्याचे पाहायला मिळाले नव्हते. खरे तर सर्वोच्च न्यायालयानंतर या देशात कुठलेही न्यायालय नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला अंतिमत्व असण्याचे कारण म्हणजे राज्यघटनेचे कलम 141 नुसार त्याला कायद्याचे स्वरूप प्राप्त होते. देशातील सर्व न्यायालयांवर तो बंधनकारक असतो. म्हणजे एकदा आपण सामूहिकपणे ‘कायद्याच्या राज्याचा’ स्वीकार केल्यानंतर पुन्हा झुंडशाहीच्या हाती आपणच निर्माण केलेल्या व्यवस्था देऊन त्यांचे पतन होताना पाहण्यात कोणते शहाणपण सामावलेले आहे?

रा.गो. भांडारकर यांनी एके ठिकाणी खूप सुंदर म्हटले आहे की, ‘समाज हा इमारतीसारखा असतो आणि ही इमारत ज्याच्यावर तरलेली असते, ती म्हणजे त्या इमारतीच्या बांधकामातील वीट. जर ती वीट पक्की असेल तर बांधकाम पक्के होते, मजबूत होते. पण ही वीटच जर कच्ची असेल, तर ते बांधकाम पक्के राहू शकत नाही. समाजाच्या इमारतीमधील ही वीट म्हणजे व्यक्ती. समाज कसा आहे याचे मूल्यमापन करताना व्यक्ती कशी आहे यावरच समाजाची उंची अवलंबून असते. व्यक्ती वेगळा आणि समाज वेगळा अशा तुकड्या-तुकड्यांमध्ये समाज व व्यक्ती यांच्या परस्परसंबंधाचे योग्य मूल्यमापन होऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्ती कायद्याचा किती आदर करते, रोजच्या जगण्यामध्ये कायद्याच्या गाभ्याविषयी किती आत्मीयता ठेवते, यांवर कायद्याच्या राज्याच्या इमारतीचे मजबूत असणे-नसणे अवलंबून असते. याचाच अर्थ प्रत्येक व्यक्तीला कायद्याविषयी आणि कायद्याच्या राज्याविषयी आदर व आत्मीयता असेल, तर कायद्याच्या राज्यासमोर अस्तित्वाचे व सक्षमतेविषयीचे प्रश्न उपस्थित होणार नाहीत.’

अमिताभ बच्चन आणि रोहिणी हट्टंगडी या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने अजरामर झालेल्या ‘अग्निपथ’ या चित्रपटात, तत्त्वनिष्ठ आई व तिचा गुन्हेगारी क्षेत्रात गेलेला मुलगा यांचे अतिशय ताणलेले संबंध आणि त्यामुळे आई-मुलाच्या नात्यावर झालेला परिणाम प्रभावीपणे चित्रित केलेला आहे. गुन्हेगारी क्षेत्रात का आलो, याचे समर्थन करताना अमिताभ म्हणतो- लहानपणी ज्यांनी माझ्या हातावर ‘याचा बाप चोर आहे’ हे वाक्य, तत्त्वनिष्ठ शिक्षक असणाऱ्या माझ्या वडिलांविषयी गोंदणाने कोरले, त्या अन्यायामुळे! दुसऱ्या बाजूला, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी स्वतः अन्यायी आणि गुन्हेगार होणे आईला कदापिही मान्य नसते. मुलाच्या प्रभावी युक्तिवादाने आईचे समाधान होत नाही. या दोघांमधले मोजकेच पण खूप आशयगर्भ असे संवाद ते दोघे दोन वेगळ्या ध्रुवावर आहेत, याची जाणीव करून देतात. यापैकी एक खूप उद्‌बोधक संवाद आहे. तू गुन्हेगारीचा रस्ता निवडणे किती भयंकर चूक होती, हे लक्षात आणून देण्यासाठी आई सांगते, ‘सदियाँ बिती इन्सान को जानवर से इन्सान बनते बनते, तुम्हे जरा भी वक्त नहीं लगा इन्सान से शैतान बनने में!’ सारांश, कायद्याचे राज्य किती जनावरांना माणूस बनवेल हे सांगता येणार नाही, पण माणसाचा सैतान होऊ नये आणि त्याच्यातला माणूस शाबूत राहावा यासाठी ते नक्कीच काम करते! त्यासाठी माणूसपणाची वीट अधिक मजबूत करणे आणि ती निखळू नये यासाठी सतत सजग राहणे गरजेचे असते. माणसाचे माणूसपण शाबूत ठेवण्यासाठी मोठ्या निष्ठेने आपल्याला हे करावे लागेल.

प्रा.डॉ.प्रतापसिंह भीमसेन साळुंके

1982prataps@gmail.com

मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे

Share on Social Media

चिनी महासत्तेचा उदय : 8

नव्या युगाची सुरुवात

सतीश बागल

हुआ गुओफेंग यांनी पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीची खास बैठक बोलाविण्याच्या निमित्ताने जियांग शिंग आणि तिच्या चौकडीला शिताफीने अटक करून या चौकडीचा डाव उधळून टाकला खरा; मात्र हुआ हे दीर्घकालीन नेतृत्व करू शकतील, असा विश्वास इतरांना सोडाच, पण स्वत: हुआ यांनाही वाटत नव्हता. हुआ हुशार होते, तरी त्याच्याकडे नेतृत्वासाठी आवश्यक असलेला करिष्मा नव्हता आणि ते प्रत्येक बाबतीत अतिसावध असत. ते सुधारणावादी होते आणि त्यांची बरीचशी मते व धोरणे डेंग झिओपेंग यांच्यासारखी होती. मात्र त्यांना कम्युनिस्ट क्रांतिकाळाचा, परराष्ट्रधोरणाचा व उच्च स्थानावर काम करण्याचा अनुभव नव्हता. त्यांच्याभोवती क्रांतीचे वलय नव्हते. अशा परिस्थितीत आपल्या हातून चुका होतील का, याचे दडपण त्यांना सातत्याने जाणवे. आपली निवड ही माओंनी त्यांचा वारसा जपला जावा या हेतूने केली होती याची जाणीव त्यांना होती.

डेंग व त्यांच्या सहकाऱ्यांवरील हल्ले तीव्र होत असताना झाऊ एन लाय यांचा कर्करोग दिवसागणिक वाढत होता. नोव्हेंबर/डिसेंबर 1975 मध्ये पॉलिट ब्युरोच्या बैठकांना झाऊ हे उपचार म्हणून हजर राहात असत. ते सरळ हॉस्पिटलमधून ॲम्ब्युलन्समध्ये बैठकीला येत असत. 140 पौंड वजन असणाऱ्या झाऊ यांचे वजन शेवटी-शेवटी 88 पौंड इतके होते. आजारपणाच्या काळात डेंग अनेकदा झाऊ यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला जात. मात्र माओ झाऊ यांना कधीही भेटायला गेले नाहीत. अखेर 8 जानेवारी 1976 रोजी झाऊ यांचे निधन झाले. झाऊ यांच्याकडे विदेश मंत्रालय असल्याने त्यांचे अनेक जागतिक पुढाऱ्यांबरोबर घनिष्ठ संबंध होते. त्यापैकी अनेकांना झाऊंच्या अंत्ययात्रेला यायचे होते. माओ यांनी चीनमधील परदेशी राजदूतांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची व अंत्ययात्रेला येण्याची परवानगी दिली; मात्र चीनबाहेरील कोणीही येऊ नये, असेही फर्मान काढले.

झाऊ यांच्या मृत्यूने चीनमधील अनेक लोक हेलावले. विशेषत: बुध्दिमंत वर्ग तर खूपच! माओंनी त्यांना सांस्कृतिक क्रांतीदरम्यान वाईट वागवावयास नको होते, असे सर्वांचे म्हणणे होते. झाऊ यांनी अनेकांना सांस्कृतिक क्रांतीच्या भीषण सावटातून बाहेर काढले होते. माओंच्या वेडसरपणातून अनेकांना वाचविणारा माणूस, अशी त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांची भावना होती. दि.11 जानेवारी रोजी बीजिंगमधील तिआनमेन चौकात नागरिक, तरुण, विद्यार्थी इत्यादी झाओ यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. तिथून ती अंत्ययात्रा बड्या क्रांतिकारकांसाठी राखीव असणाऱ्या बाओशान या स्मशानभूमीत जाणार होती. कडाक्याच्या गोठविणाऱ्या थंडीतही जवळजवळ 20 लाख लोक तिआनमेन चौकात जमले होते. राष्ट्रध्वजात झाओ यांचे गुंडाळलेले शव पाहून अनेकांना शोक आवरेना. हजारो लोकांनी बिजिंगमधील इम्पेरिअल सिटीमधील हॉल ऑफ ॲनसेस्टरमध्ये 12 जानेवारी रोजीही जाऊन श्रध्दांजली वाहिली. पॉलिट ब्युरोतर्फे व पार्टीतर्फे डेंग यांनी श्रध्दांजली वाहिली. भाषण करताना डेंग यांचा कंठ दाटून आला. त्यात झाऊ यांनी पक्ष, देश, क्रांती व चीनच्या लोकांसाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.

दरम्यान, डेंग यांनी स्वत:हून दोन वेळा आत्मनिभर्त्सना करूनही माओ व पक्षनेत्यांचे समाधान झाले नाही. डेंग यांची माओंना प्रत्यक्ष भेटू देण्याची विनंतीही मान्य करण्यात आली नाही. शेवटी डेंग यांनी माओंना एक राजीनामा देऊ करणारे पत्र पाठविले. ‘गेले दोन महिने मी अनेक प्रकारच्या टीकेला सामोरे जात आहे; अशा परिस्थितीत माझ्या हातून चुका होऊ शकतील, तेव्हा मला या पदांच्या जबाबदारीतून मुक्त करावे’ अशा आशयाचे हे पत्र होते. डेंग यांच्याबरोबर छायेसारखे असणाऱ्या जनरल झंग एडपिंग, हु याओबँग, वान ली आणि झोऊ रोंग्झिन या चार सहकाऱ्यांचाही छळ सुरू झाला. त्यापैकी रोंग्झिन यांच्याविरोधात पक्षशिस्तीची कारवाई सुरू झाल्यावर दोन महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला. अखेरीस डेंग यांचा राजीनामा स्वीकृत करून त्यांना सर्व पदांवरून हटविण्यात आले. त्यानंतरच डेंग यांच्याविरोधातील हल्ल्यांची तीव्रता कमी झाली.

झाऊ एन लाय यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधानाचे पद रिकामे होते. त्या जागेवर माओ यांनी हुआ गुओंफेंग यांची नेमणूक केली. ते तरुण होते. तत्पूर्वी ते हुनान प्रांताचे पक्ष सचिव होते. त्यांनी माओंबरोबर शेतीच्या समूहकरणाचे काम उत्तम रीतीने केले होते, यामुळे माओंचे त्यांच्याबद्दल चांगले मत होते. याशिवाय पक्षात 1959 मध्ये पेंग देहुआई (झशपस ऊशर्हीरळ) व नंतर 1970 मध्ये लिन बिआओ प्रकरणात ते माओंच्या मागे खंबीरपणे उभे होते. वँग हाँगवेन स्वभावाने तापट होते; त्यामानाने हुआ यांचे पक्षातील अनेकांशी व अनेक समूहांशी- अगदी डेंग यांच्याबरोबरही चांगले संबंध होते. डेंग यांच्यावरील टीका प्रखर होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, त्याच वेळेला हुआ यांच्याकडे नव्या पदाची जबाबदारी येत होती. त्या पदावर त्यांना स्थिर होऊ देण्यासाठी डेंग यांना सार्वजनिक जीवनातून हलविणे आवश्यक होते. वास्तविक पाहता, हुआ हे प्रशासनात सुधारणावादी व माओंपेक्षा थोडे मवाळच असल्याने डेंग यांचे त्यांच्याशी जमण्यासारखेही होते. डेंग यांच्या राजीनाम्याने माओंकडून हुआ यांच्याकडे सत्तासंक्रमण होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र या राजीनाम्यानंतरही माओंना असे कुठे तरी वाटत होते की डेंग हे सांस्कृतिक क्रांतीबद्दल आपले जाहीर मत बदलतील व त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा होईल. म्हणूनच राजीनाम्यानंतर डेंग यांच्यावरील टीकेचा रोख बराच कमी झाला. आपल्या मृत्यूनंतरही आपल्या विचाराप्रमाणे चालणाऱ्या नेत्याकडे माओंना कारभार द्यायचा होता. डेंग ऐकत नाहीत हे पाहिल्यावर हुआ यांच्याकडे माओंनी कारभार सोपवला.

डेंग यांना सत्तेवरून घालविणे, हुआ गुओफेंग यांची महत्त्वाच्या पदी नेमणूक करून त्यांना माओंचा वारसदार नेमणे या घडामोडी चालू असतानाच झाऊ यांच्या मृत्यूनंतर सर्वसामान्य लोकांमध्ये झाऊ यांच्याबद्दल सहानुभूतीची मोठी लाट निर्माण झाली आणि पाहता-पाहता तिचे स्वरूप राजकीय झाले. चीनमध्ये त्यांच्या पारंपरिक सौर दिनदर्शिकेनुसार दर वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंगमिंग हा पूर्वजांना श्रध्दांजली वाहण्याची प्रथा असणारा एक महत्त्वाचा सण असतो. हा दिवस 5 एप्रिल 1976 रोजी होता. त्याच्या एक आठवड्यापूर्वी शांघायमध्ये वेनहुई बाओ (Wenhui Bao) या वर्तमानपत्रात डेंग व झाऊ यांच्याबद्दल जियांग शिंग व तिच्या गँगकडून बरीच टीका आली. झाऊ यांच्याबद्दल अशी टीका झाल्याने पूर्वाश्रमीचे अनेक रेड गाडर्‌सही खवळून उठले. शांघायमध्ये या वर्तमानपत्राच्या विरोधात जोरदार निदर्शने झालीच, परंतु त्याचबरोबर नानजिंग विद्यापीठात व नानजिंग शहरातही जियांग शिंग व तिच्या चौकडीविरोधात निदर्शने सुरू झाली.

दि.5 एप्रिल रोजीच्या किंगमिंग या स्मरण दिवशी काय होणार याची चाहूल लागत होती. बीजिंगमध्ये दि.30 मार्चपासूनच तिआनमेन चौकात झाऊ एन लाय यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फुले व पुष्पचक्रे यांचा ओघ सुरू झाला, तसेच त्यांच्या गौरवार्थ आणि जियांग शिंगच्या विरोधात भाषणेही सुरू झाली. तिथे लावलेल्या पोस्टर्सवर तर डेंग झिओपिंग यांच्याबद्दलच्या घोषणाही होत्या. पाहता-पाहता निदर्शकांचा जोर खूप वाढला व पक्षनेत्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. परदेशी राजनैतिक अधिकारी व निरीक्षकांना हे कळायला लागले की, झाऊ व डेंग यांच्या बाजूने असलेल्या या निदर्शनांचा रोख माओ व त्यांच्या जहाल नेत्यांविरोधात होता. माओंच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक होती. पाच एप्रिलला पहाटेच सकाळी सरकारी गाड्यांचा वापर करून तिआनमेन चौकात वाहिली गेलेली फुले व पुष्पचक्रे काढून टाकण्यात आली. त्यामुळे परिस्थिती बिघडली व निदर्शकांचा जोर वाढला. बळाचा वापर करून निदर्शने मोडून काढण्याचा विचार झाला, परंतु निदर्शकांची संख्या व त्यांच्या अनावर झालेल्या भावना पाहता बळाचा वापर करण्याचा विचार सोडून देण्यात आला. दोन दिवसांत निदर्शकांची संख्या जशी कमी झाली तसा बळाचा वापर सुरू झाला आणि शंभरावर निदर्शकांवर लाठीहल्ला करून त्यांना अटक करण्यात आली.

पॉलिट ब्युरोच्या सदस्यांनी या निदर्शनांची गंभीर दखल घेतली. हा पूर्वनियोजित कट असून माओ व त्याच्या सहकाऱ्यांना सत्ताभ्रष्ट करण्यासाठीची ‘क्रांतीविरोधातील विद्रोही निदर्शने’ असे याचे वर्णन करण्यात आले. आतापर्यंत माओंना अंधुक अशा होती की, डेंग हे हुआ यांच्याबरोबर काम करतील. मात्र 5 एप्रिलची गंभीर निदर्शने बघितल्यावर माओंनी डेंग यांना सर्वच अधिकारपदांच्या जबाबदारीतून तत्काळ मुक्त केले आणि हुआ गुओफेंग यांना पंतप्रधान व पक्षाचे पहिले उपाध्यक्ष करून सत्तांतराचा मार्ग मोकळा केला. मात्र जहाल नेते- विशेषतः जियांग शिंग व तिची गँग- डेंग यांच्या जीवावर उठलेले आहेत, हे माओ जाणून होते. म्हणून त्यांचे रक्षण करण्यासाठी डेंग यांना बीजिंगमध्ये अज्ञात ठिकाणी हलविण्यात आले. डेंग यांच्या विनंतीवरून त्यांच्या पत्नीच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ती मदतही करण्यात आली. एप्रिलमध्येच बीजिंगच्या आजूबाजूच्या परिसरात अतिशय तीव्र व उंच क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला आणि त्यात दोन लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. बीजिंगमधील अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले. डेंग यांनाही राहत्या घरातून बाहेर पडून बाजूच्या बागेत मुक्काम करावा लागला. अनेकांनी या भूकंपाचा संबंध ‘चीनमधील पुढे येणाऱ्या मोठ्या बदलाची निसर्गाने घेतलेली दखल’ असाही जोडला.

एका महिन्यानंतर मे 1976 मध्ये माओ यांना हृदयविकाराचा मोठा झटका आला. त्यातून वाचले; मात्र पूर्णपणे विकलांग झाले होते. कामकाज पाहणे त्यांना शक्य नव्हते. जूनमध्ये दुसरा झटका आला आणि सप्टेंबर 9 रोजी त्यांचे निधन झाले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव तिआनमेन चौकातील एका हॉलमध्ये ठेवण्यात आले. डेंग व त्यांच्या सहकाऱ्यांना मात्र अंत्ययात्रेतून वगळण्यात आले होते. माओंच्या मृत्यूनंतर हुआ गुओफेंग यांच्याकडे सत्ता आली खरी; परंतु तरीही जियांग शिंग आणि तिचे सहकारी जहाल विचारप्रणालीचे, जहाल राजकारणाचे केंद्रस्थान व प्रेरणा होते. माओंच्या मृत्यूनंतर तिने त्यांच्या कागदपत्रांचा ताबा घेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र असे असले तरी उच्च राजकीय पदासाठी ती लायक आहे, असे माओंनाही कधी वाटले नाही. हुआ गुओफेंग यांच्याविरोधात बंड करण्याचीही तिची तयारी होती व तशी तिची पावलेही पडत होती. त्यामुळे हुआ गुओफेंग, मार्शल ये आणि पक्षप्रमुख वँग डॉनझिंग काळजीत होते.

दि.6 ऑक्टोबरला माओंच्या विचारांच्या पाचव्या खंडाच्या प्रकाशनाच्या संबंधात पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीची बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीस जियांग शिंग व तिच्या सहकाऱ्यांनाही बोलाविले होते. पुढील अर्ध्या तासातील एखाद्या चित्तथरारक गुप्तहेर चित्रपटात शोभाव्यात अशा नाट्यपूर्ण हालचालीनंतर वँग हाँगवेन, झँग चुनकिओ आणि याओ वेन युन या जियांग शिंगच्या सहकाऱ्यांना तत्काळ अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच रात्री जियांगलाही तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. शांघायमध्ये तिचा मोठा प्रभाव होता. मात्र तिला व तिच्या चौकडीलाच अटक झाल्याने शांघायमधील जहालपंथीयही गजाआड झाले. बीजिंगमधील माओंचे सहायक माओ युनक्सिन व त्यांच्या सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली. अशा रीतीने मार्शल ये आणि हुआ गुओफेंग यांनी एकही गोळी न झाडता कडव्या व जहाल राजकारणाचा कायमचा बंदोबस्त केला आणि सर्वसामान्य लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पुढच्या पॉलिट ब्युरो मीटिंगमध्ये हुआ गुओफेंग यांना पक्षाचे व सेन्ट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष करण्यात आले आणि माओंच्या विचारांच्या पाचव्या खंडाच्या प्रकाशनाचे काम हुआ यांच्या मार्गदर्शनाखाली होईल, असा निर्णय झाला. जहालांचा बंदोबस्त झाल्यावर हुआ यांच्यावरचा विश्वासही वाढला. मार्शल ये आणि ली झियानीन या जुन्या वरिष्ठ नेत्यांनी अशा रीतीने हुआ गुओफेंग यांना अधिक प्रबळ केले. माओंचाच वारसा चालवीत असल्याने हुआ यांनी डेंग यांच्यावरील शिस्तभंग कारवाई व टीका सुरूच ठेवली. हुआ यांच्यापेक्षा डेंग झिओपेंग अनेक बाबतीत वरिष्ठ आणि अनुभवी होते. शिवाय क्रांतीतील सहभागामुळे त्यांच्याभोवती एक वेगळे वलय होते. त्यामुळेच हुआ त्यांना सत्तेपासून, सरकारपासून दोन हात लांब ठेवू पाहत होते. जियांग शिंग आणि तिच्या चौकडीच्या अटकेचे वृत्त समजताच डेंग यांनी हुआ यांचे अभिनंदन केले. डेंग यांच्याविरोधातील कारवाई औपचारिक रीत्या सुरू राहिली, मात्र तरीही डेंग यांचे पक्षातील स्थान पुन्हा एकदा बळकट होऊ लागले. हुआ व डेंग परस्परांच्या संपर्कातही होते. अनेकांना असे वाटत होते की, डेंग लवकरच पक्षात व सरकारमधे परततील आणि त्यांना हुआ यांच्या हाताखालील महत्त्वाचे पद देण्यात येईल. तसे पुढे झालेही; मात्र अनेक राजकीय हालचाली, शह-काटशहाचे राजकारण झाल्यावर!

आता चीनमधील वातावरण बऱ्यापैकी निवळत होते. माओ यांचा जहालवाद संपुष्टात आला होता. त्याची सुरुवात माओंच्या हयातीतच झाली होती. माओंनी स्वत:च सांस्कृतिक क्रांतीच्या हिंसाचाराला व गोंधळाला कंटाळून राजवटीच्या स्थैर्याला प्राधान्य दिले होते. डेंग यांच्या महत्त्वाच्या सुधारणाही 1975 मध्ये सुरू झाल्या होत्या. माओंच्या शेवटच्या काळात त्यांच्या आजारपणामुळे जहाल नेतृत्व मागे पडले होते. जियांग शिंगच्या अटकेनंतर तर जहाल माओवाद भलताच पिछाडीला गेला आणि आधुनिक चीनच्या इतिहासातील एक अत्यंत हिंसक व गोंधळाचे पर्व संपुष्टात आले.

हुआ गुओफेंग यांनी पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीची खास बैठक बोलाविण्याच्या निमित्ताने जियांग शिंग आणि तिच्या चौकडीला शिताफीने अटक करून या चौकडीचा डाव उधळून टाकला खरा; मात्र हुआ हे दीर्घकालीन नेतृत्व करू शकतील, असा विश्वास इतरांना सोडाच, पण स्वत: हुआ यांनाही वाटत नव्हता. हुआ हुशार होते, तरी त्याच्याकडे नेतृत्वासाठी आवश्यक असलेला करिष्मा नव्हता आणि ते प्रत्येक बाबतीत अतिसावध असत. ते सुधारणावादी होते आणि त्यांची बरीचशी मते व धोरणे डेंग झिओपेंग यांच्यासारखी होती. मात्र त्यांना कम्युनिस्ट क्रांतिकाळाचा, परराष्ट्रधोरणाचा व उच्च स्थानावर काम करण्याचा अनुभव नव्हता. त्यांच्याभोवती क्रांतीचे वलय नव्हते. अशा परिस्थितीत आपल्या हातून चुका होतील का, याचे दडपण त्यांना सातत्याने जाणवे. आपली निवड ही माओंनी त्यांचा वारसा जपला जावा या हेतूने केली होती याची जाणीव त्यांना होती. शिवाय पक्षातही ते बरेच कनिष्ठ असल्याने इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटणे अशक्य होते.

वरिष्ठांचा त्यांना उघड विरोध होता. त्यामुळे ते संक्रमणकाळातील नेतृत्व होते, असे अनेकांना वाटत असे. हुआ हे (डिसेंबर 1978 पर्यंत) जवळजवळ दोन वर्षे सत्तेवर होते. अर्थव्यवस्था खुली करण्याच्या दृष्टीने चिनी उच्च राजकीय नेत्यांची शिष्टमंडळे परदेशी पाठविणे, परदेशी गुंतवणुकांना प्रोत्साहन देणे, पहिला स्पेशल इकॉनॉमिक झोन प्रकल्प सुरू करणे इत्यादी विषयींची धोरणे व निर्णय हुआ यांचे होते. मात्र त्यांचे नेतृत्व प्रभावहीन होते. दीड वर्षातील अनेक घटनाक्रमांतून जात त्यांना अखेर डेंग यांच्याकडे सत्ता सुपूर्द करावी लागली.

हुआ एकाच वेळी पक्षाध्यक्ष, पंतप्रधान व सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष अशी तीन सर्वोच्च पदे धारण करीत होते; तरीही त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह होते. हुआ यांचा अधिकार बराचसा औपचारिक स्वरूपाचा होता. प्रचंड संस्थात्मक पडझड झालेल्या चीनपुढील राष्ट्रबांधणीची व पुनर्रचनेची समस्या इतकी विशाल व गुंतागुंतीची होती की, त्यासाठी विश्वास निर्माण करणारे व दीर्घ अनुभव असलेले नेतृत्व आवश्यक होते. माओंच्या मृत्यूनंतर हुआ यांना महत्त्वाची तारेवरची कसरत करणे भाग होते. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान ज्या नेत्यांची परवड झाली, जे देशोधडीला लागले होते; त्यांचे पुनर्वसन करून त्यांना दिलासा देण्याची गरज होती. तसेच कडवी धोरणे-विशेषत: आर्थिक धोरणे- शिथिल करणे, अर्थव्यवस्था थोडी खुली करणे आणि थोडे स्वातंत्र्य देणेही आवश्यक होते. मात्र सांस्कृतिक क्रांतीपूर्वी आणि दरम्यान सत्ता उपभोगणारी व माओंचे समर्थन करणारी मंडळीही मोठ्या प्रमाणावर होती. त्यांना हुआ यांचे माओंच्या मृत्यूनंतरचे हे घूमजाव आवडले नसते. जियांग शिंग व तिच्या सहकाऱ्यांना अटक केल्याने आणि त्यांचा डाव उधळून लावल्याने पक्षातील सुधारणावादी खूष असले तरी कडवे माओवादी चांगलेच बिथरले होते. म्हणून माओंच्या विचारांची चौकट भेदून पुढे जाणे हुआ यांना परवडणारे नव्हते.

हुआ यांच्यावर पक्षाकडून- विशेषत: जहालांकडून सातत्याने टीका होत असे. जहाल गटाला राजी ठेवण्यासाठी त्यांनी 7 फेब्रुवारी 1977 रोजी ‘पीपल्स डेली’, ‘रेड फ्लॅग’ या पक्षाच्या व जी फाँग्जुन बाओ (गळश ऋरपसर्क्षीप इरे) या सैन्यदलाच्या वर्तमानपत्रातून सैद्धांतिक लेख प्रसिद्ध करून माओंनी जी काही धोरणे अंगीकारली व ज्या काही सूचना दिल्या, त्याप्रमाणेच चालले पाहिजे- अशी भूमिका घेतली. हा सैद्धांतिक लेख पुढे घडणाऱ्या सत्ता राजकारणाच्या केंद्रभागी राहिला. त्यामुळे हुआ हे वैचारिक दृष्ट्या माओंचे वारसदार व समर्थक आहेत, असा राजकीय अर्थ होत होता. पाश्चात्त्य देशांमध्ये हा लेख व ही भूमिका टू व्हॉटेव्हर्स (Two Whatevers') या नावाने प्रसिध्द आहे. काहीही झाले तरी माओंची धोरणे व त्यांनी इतरत्र दिलेल्या सूचना यांचे पालन झालेच पाहिजे; माओंचे विचार हे राज्यव्यवस्था व व राज्यव्यवस्थेच्या तत्त्वज्ञानाच्या केंद्रभागी असतील. असा विचार या लेखात मांडला होता. माओंनंतर हुआंकडे आलेल्या वारसा अधिकाराला वैधता देऊन पक्षाची सहमती घेणे आवश्यक होते.

आपल्या अधिकारावर शिक्कामोर्तब करून घेण्यासाठी हुआ यांनी 12 ते 18 ऑगस्टदरम्यान अकरावी पार्टी काँग्रेस आमंत्रित करून नव्या युगाची, नव्या पर्वाची सुरुवात केली. तसेच मार्च 1978 मध्ये नॅशनल पीपल्स काँग्रेसचे पाचवे अधिवेशनही भरविले गेले. या अधिवेशनात राष्ट्रबांधणी व आर्थिक प्रगतीचा आराखडा सादर करण्यात आला. परराष्ट्रीय धोरण व आंतरराष्ट्रीय राजकारण याचा त्यांना फारसा अनुभव नव्हता व विशेष गतीही नव्हती. मात्र देशांच्या सार्वभौमत्वाची किंमत न देताही प्रगत तंत्रज्ञान व परदेशी भांडवल आयात करता येते, हे त्यांनी पाहिले होते. पूर्व युरोपमधील कारखाने व उद्योग चीनमधील उद्योगांपेक्षा आधुनिक व अधिक कार्यक्षम होते. बाह्य जगाशी खुले संबंध ठेवायचे धोरण पुढे 1978 मध्ये डेंग यांनी मंजूर करून घेतले, मात्र त्याची नांदी हुआ यांनी केली होती. माओंच्या पश्चात डेंग व हुआ यांच्यात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू होईल, असे पाश्चात्त्य देशातील नेत्यांना व प्रसारमाध्यमांना वाटत असे. झाऊ यांनी ज्याप्रमाणे सर्व हयात माओंच्या नेतृत्वाखाली काम केले, तसेच डेंग हे हुआ यांच्या नेतृत्वाखाली काम करू शकतील का, यावर चर्चा होत असे. जुन्या नेतृत्वापैकी मार्शल ये आणि ली झियानिन हे वरिष्ठ नेते हुआ यांचे मार्गदर्शक होते.

हे तिघेही माओंच्या राजवटीत मध्यममार्गी व जुळवून घेणारे नेते होते. सांस्कृतिक क्रांतीपूर्वी राजवटीशी जुळवून घेणारे, सांस्कृतिक क्रांतीदरम्यान पोळले न गेलेले व माओंच्या मृत्यूनंतर विरोधकांना संक्रमणकाळात का होईना पण स्वीकारार्ह असे हे नेते होते. मार्शल ये व ली झियानिन यांना डेंग यांचे पुनर्वसन करून त्यांना सरकारमध्ये महत्त्वाची पदे द्यावीत, असे वाटत होते. माओंच्या एकछत्री कारभाराच्या आठवणी ताज्या असल्याने एकाच्या हाती सत्ता केंद्रित करण्याऐवजी सर्वांनाच सामावून घेणारे सामूहिक नेतृत्व हवे, असेही त्यांना वाटे. एप्रिल 1976 मध्ये किंगमिंगच्या निमित्ताने तिआनमेन चौकात झालेल्या निदर्शनांचा ठपका माओंनी डेंग यांच्यावर ठेवला होता. ही निदर्शने साधी नसून त्यांचे स्वरूप क्रांतीविरोधी, पक्षविरोधी व म्हणून देशविरोधी होते, असा निर्णय घेऊन डेंग यांना पदच्युत करण्यात आले होते.

आता पक्षात व सरकारात प्रथम डेंग यांना या आरोपातून मुक्त करावे, असा विचार सुरू होता. जियांग शिंग व तिच्या ‘शांघाय गँग’ला अटक केल्यानंतर एक गोष्ट उघडकीस आली, ती अशी की- या निदर्शनांमागे डेंग आहेत हे दर्शविणारा खोटा पुरावा या चौकडीनेच तयार केला होता. त्यामुळेच डेंग यांच्यावरील आरोप मागे घेण्याचा व त्यांना काही जबाबदाऱ्या देण्याचा विचार सुरू झाला. तरीही डेंग यांना सन्मानाने परत येता येईल, अशी परिस्थिती नव्हती. कारण ‘पीपल्स डेली’मधील माओंच्या तत्त्वज्ञानाला शासन व राज्यव्यवस्थेच्या केंद्रभागी ठेवणारा ‘टू व्हॉटेव्हर्स’ हा सैध्दांतिक लेख हुआ यांच्या सत्तेचा व त्यांच्या वैधतेचा (लेजीटमसी) पाया होता. हा सैध्दांतिक लेख काळजीपूर्वक पाहिल्यास तो प्रामुख्याने डेंग यांच्या भूमिकेच्या विरोधात होता, असे दिसेल. तरीही वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळे हुआ यांनी डेंग यांच्या विरोधात सुरू केलेली ‘निभर्त्सना मोहीम’ वर्ग केली.

11 व्या काँग्रेसनंतर मार्च 1977 मध्ये धोरणदिशा ठरविण्यासाठी ‘सेंट्रल पार्टी वर्क कॉन्फरन्स’ आयोजित केली होती. या कॉन्फरन्समध्ये वरिष्ठ नेतृत्वाचे सदस्य मोठ्या प्रमाणावर होते. डेंग यांनी माओंच्या हाताखालीच सुधारणांचे काम केले, शांघाय चौकडीविरोधात कडवी झुंज दिली, परदेशातही चीनची बाजू उत्तमरीत्या लावून धरली, शिवाय एप्रिल 1976 च्या निदर्शनांत डेंग यांना शांघाय चौकडीने विनाकारण गोवले, हेही आता सिध्द झाले आहे; अशा परिस्थितीत त्यांच्या परतीचा मार्ग हुआ यांनीच मोकळा करावा, अशा शब्दांत अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांची बाजू मांडली. याचा परिणाम असा झाला की, हुआ यांनी डेंग विरोधातील निभर्त्सना मोहीम थांबवायचा आदेश दिला. शिवाय 5 एप्रिलची निदर्शने ही क्रांतीविरोधी नव्हती, अशीही भूमिका घेऊन ते सर्व प्रकरणच बंद करावे, अशी भूमिका घेतली. डेंग यांच्या राजकीय जीवनातील अंधकार नष्ट होऊ लागला होता.

डॉ. सतीश बागल, नाशिक

bagals89@gmail.com

Share on Social Media

चिंतन : 6

एकाकीपण की समाजविन्मुखता?

सुरेश व्दादशीवार

माणसे सारखी नसतात. ‘व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती’ असे आपणच म्हणतो. प्रत्येकाचे संस्कार, अनुभवविश्व आणि वैचारिक वेगळेपण लक्षात घेतले की; त्या साऱ्यांचे एकाकीपणही सारखे नसणार, हे लक्षात येते. कोणी अंत:स्थ होईल, तर कोणाला बाह्य जगताची ओढ वाटू लागेल. कोणी शांत, तर कोणी अस्वस्थ असेल. एखाद्याचा दाबून ठेवलेला संताप कधी तरी उफाळेल, तर कधी काहींचे दडवलेले प्रेम उगवू पाहील. सगळी माणसे साधू वा संत नसतील. त्यांना ईश्वरचरणी लीन होण्यात एकाकीपण घालवावेसे वाटेल. सामान्य माणसांचे साधेपण त्याहून वेगळे असते. त्यातून आताचे जग व्यक्तिकेंद्री, विकेंद्रित होत जाणारे, व्यक्तीला स्वयंभूपण देणारे आणि तिचे आत्मभान वा अहंता वाढविणारे आहे. त्यामुळे एकाचा विचार वा निष्कर्ष साऱ्यांना लागू करता येणार नाही. तसे करणे हा साऱ्यांवरचा अन्याय होईल. परिणामी, प्रत्येकाचे एकाकीपण हा एक स्वतंत्र विषय होतो.

ज्यांचा साऱ्यांना आधार वाटतो, ज्यांच्या अस्तित्वामुळेच अनेकांच्या मना-जीवनात एक सुरक्षिततेची व आश्वस्ततेची भावना येते, त्यांना कोणाचा आधार असतो? त्यांना कोणामुळे त्यांचे एकाकीपण घालविता येते? अशी माणसे राष्ट्राच्या जीवनात असतात, समाजजीवनात असतात आणि कुटुंबातही असतात. बाकीची माणसे त्यांच्याकडे मार्गदर्शन, दिशा, सल्ला असे सारेच मागतात वा तशी अपेक्षा त्यांच्याकडून राखतात. या लोकांच्या आश्वस्त असण्याचा प्रश्न नसतो; ते ज्यांच्यामुळे आश्वस्त होतात त्यांचा असतो. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर सोनिया गांधी बरीच वर्षे राजकारणापासून दूर राहिल्या.

काँग्रेस पक्षाचे सारे नेतृत्व 1999 च्या सुमारास त्यांच्याकडे येऊन त्याच त्या पक्षाच्या आधारशिला बनल्या. मुले लहान होती आणि पक्षात अनुयायी होते, ते एकनिष्ठही होते. पण अखेरचे निर्णय घेताना, पक्षाला नवी दिशा देताना, त्याला पराजयाकडून विजयाकडे नेताना आणि अखेरच्या क्षणी देशाने दिलेले पंतप्रधानपद सोडून तो सन्मान डॉ.मनमोहनसिंग यांना देताना त्यांच्याजवळ कोण होते? त्यांना कोणाची साथ वा सल्ला होता? सारे निर्णय त्यांचेच होते. अशा व्यक्तींची उदाहरणे इतिहासात व वर्तमानातही अनेक सापडतील. अशा व्यक्तींच्या एकाकी अवस्थेचा विचार करताना आपलीच बुध्दी मार्ग शोधू लागलेली दिसते. नेतृत्वाला जनतेचा आधार असतो, पक्षाचा पाठिंबा असतो; पण ज्यांचे नेतृत्वच नव्याने उदयाला येत असते, त्यांच्या मानसिकतेचे चित्र कसे असते?

हे मनमोहनसिंगांबाबत किंवा वाजपेयींबाबत म्हणता येत नाही. मनमोहनसिंगांवर काँग्रेसाध्यक्ष व यूपीएच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधींचे वर्चस्व होते; शिवाय त्यांची मानसिकता अशी की, उद्या राहुल गांधी पंतप्रधानपदावर आले तर त्यांचा सहकारी म्हणून काम करायलाही मला आवडेल, असे ते म्हणायचे. वाजपेयींचे पक्षावर नियंत्रण नव्हते, त्याची सूत्रे अडवाणींच्या हाती होती आणि संघ परिवार त्यांना जुमानत नव्हता. वाजपेयी नागपूरच्या संघस्थानी गेले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी संघाचा कोणताही मोठा नेता उपस्थित राहू नये, अशी व्यवस्थाच संघाने केली होती. परिणामी- ते आले, त्यांनी एकट्यानेच डॉ.हेडगेवारांच्या समाधीचे दर्शन घेतले व सरळ विमानतळ गाठून ते दिल्लीला रवाना झाले. मोदी सर्वतंत्र स्वतंत्र आहेत. पक्ष मुठीत आणि संघ त्यांच्या भीतीत आहे. त्यामागे फारसे जाण्याचे कारण नाही. नेहरू सर्वश्रेष्ठ होते. इंदिरा गांधींना ते स्थान 1969 नंतर प्राप्त झाले. राजीव गांधींवर नियंत्रणे नव्हती. नंतरचे सारे पंतप्रधान आघाडी सांभाळण्यात त्यांचे स्वत्व घालवितानाच अधिक दिसले. पंतप्रधानपदावरील मोठ्या माणसांसारखीच स्थिती अन्यत्रही आढळते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान किंवा म्यानमारच्या आँग साँग स्यू की या लष्कराच्या हातचे बाहुलेच तेवढे आहेत. मिळेल तेवढ्या मोकळेपणातच त्यांना त्यांचे व्यक्तित्व अनुभवता येते.

उद्योगपती, पक्षनेते, संघटनांचे पुढारी व अगदी कुटुंबप्रमुख यांचीही स्थिती यातल्या काहींसारखीच असते. प्रस्तुत लेखकाच्या संबंधातले एक उद्योगपती आहेत. त्यांच्या गावोगावी इस्टेटी व मालमत्ता आहेत. घरातली मुले दूर राहतात, आई गेली, पत्नी गेली. आपले एकाकीपण घालविण्यासाठी ते जगभर फिरतात, देशातही कुठे कुठे जातात, पण जाणवते हे की, प्रत्येक जागी त्यांचे एकाकीपण त्यांच्यासोबत असते व त्यावर मात करण्याची त्यांची धडपड असते. मात्र अशीही माणसे प्रसंगी विरघळतात. सोबतच्या साऱ्यांची होतात. त्यांचे दूरस्थ एकाकीपण काही काळ हरवल्यासारखे होते. तो क्षण कशाचा असतो? आत्मविस्मृतीचा, आत्मलढ्याचा की ओढून-ताणून आणलेले पांघरूण घेणे. पण यातले खरेपण कधी कधी जाणवते व ते आपल्यालाही स्पर्शून जाते.

ज्यांचे अहंकार मोठे असतात, त्यांनी त्यांच्या आत्मविश्वासावरही मात केलेली असते. त्यांचे एकाकीपण हेच त्यांचे जीवन होत असावे काय? ट्रम्प, पुतिन, जिनपिंग किंवा मोदींचे एकाकीपण या पातळीवरचे आहे काय? इतिहासातले सम्राट, राजे, रजवाडे असेच सांगता येतील. पण त्यातही अंतर आढळते. कौरवांमध्ये ही बाजू दिसते, पांडवांमध्ये दिसत नाही. अहंताच आत्मविश्वासाच्या पातळीवर उतरणारी असेल, तर राम तयार होतो. तेथे एकाकीपण असले, तरी ते जाणवत वा खुपत नाही. एक गोष्ट मात्र नक्की की, अशी ही अहंकारी माणसे सदैव आत्ममग्न राहत असल्याने तशीही एकटी व एकाकीच राहतात. ही आत्ममग्नता समाधान देणारी असते, ती केवळ आपल्या अस्तित्वाचे अतिरिक्त भानच तेवढे देत असते.

आत्ममग्नता म्हटली की, आपल्या पुराणकथांमधील व वैदिक काळातील ऋषी-मुनींची आयुष्ये डोळ्यांसमोर येतात. त्यांच्या कथा ज्ञानी माणसांच्या आहेत, पण समाधानी माणसांच्या नाहीत. तशा त्या नीतीच्याही कमीच आहेत. अशा माणसांचे एकाकी जिणे कसे असेल? वेदांच्या रचयित्यांमध्ये ‘दीर्घतमस काम’ या जन्मांध ऋषीची कथा आहे. त्याच्या अश्लील चाळ्यांना कंटाळलेल्या त्याच्या पत्नीने व मुलाने त्याला दोरांनी बांधून गंगेत सोडून दिले, असे ही कथा सांगते. याज्ञवल्क्याने यतातीच्या मुलीच्या मोबदल्यात त्याला हजार गाई दिल्याचीही एक गोष्ट त्यात येते. मग या कथा वाचू नये, असेच मनात येत राहते. अशा वेदज्ञांच्या जीवनातले एकाकीपण तरी समाधानाचे असेल काय? ऋषींच्या कथा अशा, तर दैवतांच्या? त्याही तशाच. दशरथराजा पुत्रांसाठी दुःखी. मग त्याचे यज्ञयाग. त्याव्दारे त्याला पुत्रप्राप्ती. पुढे पुत्रवियोग. सीतादेखील शेतात सापडलेली. महाभारतात तर कौरव-पांडवांच्या युद्धाएवढ्याच त्यांच्या, त्यांच्या गुरूंच्या व पूर्वजांच्या जन्मकथाही गूढांनीच दडवलेल्या आहेत. त्यातले सत्य सांगणाऱ्या सोबतच्या कथा तर अतिशय व्यथित व अचंबित करणाऱ्या आहेत. ही माणसे त्यांची आयुष्ये कशी जगली असतील? त्यांना त्यांच्या जन्मकथांनी व्यथित केले असेल, की तत्कालीन परंपरांनी त्यांच्या मनांची समजूत खरोखरीच घातली असेल? ही माणसे ज्ञानी होती, राजपदावर होती म्हणून हे विचारायचे. इतरांच्या कथा तर आणखीच दयनीय व विलक्षण.

एकाकीपणाची आणखी एक व्यथा ही की, पुरुषांना ती बोलून दाखविता येते. स्त्रियांना ती चोरटेपणीही सांगता येत नाही. निदान आपल्याकडे नाही. आहे ते सारे व्यवस्थित आहे- घरातली माणसे, मुलेबाळे सारे सांभाळून घेणारी व आपल्यालाही समजून घेणारी आहेत- असा आवच त्यांना बहुधा आणावा लागतो. एकट्या राहणाऱ्या, एकटेपण वाट्याला आलेल्या, अविवाहित, परित्यक्त्या, विधवा वा जाणीवपूर्वक एकट्या राहिलेल्या स्त्रियांची अवस्था कशी असते? ज्या स्त्रियांकडे पाहावे असे वा अशा कुणी नाही. ज्याच्याशी वा जिच्याशी बोलावे, निदान फोन करावा असे कोणी नाही. त्यातून आपल्या एकाकीपणाला दुबळेपण वाटू न देण्याचीच त्यांची शिकस्त असते. मग त्या आणखीच दयनीय होतात. मला आजवर कोणाची कधी गरजच वाटली नाही, वाटत नाही वा वाटणार नाही असे म्हणणारे पुरुष व स्त्रिया या मुळातच अभागी व दुर्दैवी असतात. त्यांचे ते वरपांगी सांगणे सहजपणे लक्षात येणारे असते.

या साऱ्या चर्चेच्या मुळाशी असणारा खरा प्रश्न हे एकाकीपण एकट्याला वा समूहात राहणाऱ्या अनेकांच्या वाट्याला येतेच का व कसे? सहयोगी होणारे कोणी नसते म्हणून की सहयोग करावा असे त्यांच्याजवळ काही नसते म्हणून, सहयोग असतानाही ते येत असेल तर तो सहयोग खोटा असतो की केवळ देखावा? आपले, एकटेपण वा एकाकीपण दयनीय होणे व तसे ते इतरांना वाटू न देणे म्हणून असे केले जाते काय? ‘आहेत ना आमचे, जरा दूर आहेत एवढेच- पण धावून येतात’, असे सांगणाऱ्यांचे दिखाऊपण कळणारे असते की नाही? पण तरीही ते केले जाते, कारण एकाकी असणे व तसे ते जाणवणे हेच भयकारी असते. निराधारपण सांगणारे असते आणि जगात आपले असणारे, तसे जाणणारे कोणी प्रत्यक्षात नसते म्हणूनही.

ग्रीकांच्या थेल्स या पहिल्या तत्त्वज्ञापासून आपल्याकडील ऋषी-मुनींपर्यंतच्या साऱ्यांनी आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे- ‘स्वतःला जाणा’ (नो दायसेल्फ). या शिकवणुकीचा खरा अर्थ या जगाकडे पाठ फिरवा आणि आपल्या आत बघा वा शिरा. त्यात तुम्हाला तुम्ही सापडाल आणि आपल्याला आपली खरी ओळख पटेल. यातली पहिली अडचण ही की- जगाकडे पाठ फिरविली की, जगही त्याची जागा बदलून नव्या दिशेला येते व समोर उभे राहते. जिकडे वळू तिकडे तेही वळते. परिणामी, हे काम फार अवघड होते. आणि दुसरी अडचण ही की, आत शिरल्याचे वा आत पाहिल्याचे प्रत्यक्षात कधी कळतेच असेही नाही. त्यातून त्यातल्या दर वेळी एकच एक आपण सापडतो, की आणखी काही वेगळे हाती येते- ही शंकाही असतेच.

मग आपण आपल्याला पाहिल्याचे व जाणल्याचे कसे समजायचे? डोळे मिटले की अंधारी येते, कान मिटले की बधिरपणा येतो आणि श्वास थांबविला की सारेच संपते. पण ते म्हणतात, माणूस त्या ‘जाणत्या’ अवस्थेत जागा असतो. पूर्णपणे सजीव व समर्थ असतो. समर्थ असेल; पण तेव्हाचे एकाकीपण समाधान देणारे, प्रत्ययकारी व आत्मसामर्थ्य वाढविणारे असते काय? हा अनुभव कधी व कोणी घेतला? घेतला तो खरा होता की आभासरूप? त्यांनी तो सांगितला म्हणून, की शिष्यांनी गौरविला म्हणून? या शोधाच्या वाटचालीत कोणत्याही तऱ्हेच्या अध्यात्मात शिरणे हा हेतू नाही. पण त्यात आलेले व सांगितलेले ते ‘सर्वश्रेष्ठ एकाकीपण’ही कधी तरी तर्काच्या व विचारांच्या कक्षेत आणायचे की नाही? ते तसेच श्रध्देच्या परिघात राहू दिले, तर पुन्हा ते एक गूढ होते आणि आपण त्याच्याचकडे पाठ फिरविल्यागत होतो.

माणसे सारखी नसतात. ‘व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती’ असे आपणच म्हणतो. प्रत्येकाचे संस्कार, अनुभवविश्व आणि वैचारिक वेगळेपण लक्षात घेतले की; त्या साऱ्यांचे एकाकीपणही सारखे नसणार, हे लक्षात येते. कोणी अंत:स्थ होईल, तर कोणाला बाह्य जगताची ओढ वाटू लागेल. कोणी शांत, तर कोणी अस्वस्थ असेल. एखाद्याचा दाबून ठेवलेला संताप कधी तरी उफाळेल, तर कधी काहींचे दडवलेले प्रेम उगवू पाहील. सगळी माणसे साधू वा संत नसतील. त्यांना ईश्वरचरणी लीन होण्यात एकाकीपण घालवावेसे वाटेल. सामान्य माणसांचे साधेपण त्याहून वेगळे असते. त्यातून आताचे जग व्यक्तिकेंद्री, विकेंद्रित होत जाणारे, व्यक्तीला स्वयंभूपण देणारे आणि तिचे आत्मभान वा अहंता वाढविणारे आहे. त्यामुळे एकाचा विचार वा निष्कर्ष साऱ्यांना लागू करता येणार नाही. तसे करणे हा साऱ्यांवरचा अन्याय होईल. परिणामी, प्रत्येकाचे एकाकीपण हा एक स्वतंत्र विषय होतो. त्याचे स्वरूप वेगळे व त्याच्या जाणिवाही वेगळ्या. ही माणसे एकत्र आली तरी परस्परांशी सहयोग करून ते एकाकीपण घालविणार कसे? की ते जपत-जपतच परस्परांशी संबंध राखणार? हा मग एका शास्त्रीय अभ्यासाचा विषय राहत नाही. अनेकांच्या एकाकीपणाचे स्वरूप जाणून घेऊन त्यांचे स्वतंत्र निष्कर्ष काढण्याची गरज सांगणारा तो विषय होतो.

ज्या समाजात समूहभावना मोठी असते, त्या आदिवासींच्या जगात सारी माणसे समाजाला बांधलेली असतात. त्यांचे विचार एकत्र करता येणे व तसे अभ्यासता येणे त्यामुळे शक्य व सोपे होते. प्रगत समाजातल्या माणसांचे आत्मभान त्यांना वेगळे बनवून त्या सामाजिक बांधिलकीपासून मुक्त करते. त्याच वेळी ते माणसांचे एकाकीपण जागवून त्यांच्याही स्वतंत्र सीमारेषा आखत जाते. हा समाज समूहाचा नसतो. खरे तर तो समाजही नसतो, ती माणसांची एकत्र राहण्याची अवस्थाच तेवढी असते. अशी कुटुंबेदेखील आपल्या पाहण्यात असतात; तशा संस्था असतात, संघटना असतात, अगदी देवही असतात. त्यांना गरजांनी बांधलेले असते, मनाने नव्हे. स्वतंत्र माणसांचे एकत्र राहणे नसते. सुरक्षिततेसाठी एकमेकांजवळ राहणाऱ्या परावलंबी माणसांचे ते दूरस्थ जगणे आहे. माणसे प्रेमाने, आस्थेने व आत्मीयतेने जवळ येणे आणि केवळ गरज म्हणून एकत्र राहणे यातले अंतर साऱ्यांना अशा वेळी कळावे.

स्वीडनमध्ये असतानाची एक आठवण येथे नोंदवावीशी. तो देश जगातला सर्वाधिक उत्तम व राहायला योग्य म्हणून गौरविला जाणारा. एका संध्याकाळी त्याच्या राजधानीच्या मध्यवर्ती चौकात असलेल्या सिमेंटच्या बाकड्याशेजारी सतरा-अठरा वर्षे वयाची एक तरुण मुलगी बेशुध्दावस्थेत पडलेली दिसली. माणसे येत होती, जात होती; पण कोणी म्हणून तिच्याकडे बघत नव्हते. मग मीच न राहवून तिथल्या एकाला थांबवून विचारले. पण तिथल्या माणसांना फारसे इंग्रजीही येत नाही. मग दोन-तीन जणांकडे विचारणा करून झाली. त्यातल्या एकाने अत्यंत कोरडेपणाने सांगितले, ‘‘ड्रग घेऊन पडली असेल. शुध्दीवर आली की जाईल आपल्या ठिकाणी.’’ तिच्याकडे न पाहताही तो म्हणाला आणि चालू लागला. स्वयंभू एकाकीपण, दूरस्थ ऐक्य आणि ऐश्वर्यशाली एकाकीपण या साऱ्यांचा तो संयुक्त नमुना फार काही सांगणारा व कायमचे अस्वस्थ करणारा होता.

तिच्याविषयी कोणाला काही वाटत नव्हते काय? ती अनोळखी असली तरी आपली- ‘स्विडिश’ होती. तरुण अन्‌ देखणी होती. तिच्याबाबत काही अभद्र घडू शकले असते म्हणून तरी पोलिसांची मदत घ्यावी, असे कोणालाच का वाटत नव्हते? तिने ड्रग्ज घेतले असतील. कदाचित ते तिचे एकाकीपण घालवायला वा विसरायला तिने ते घेतले असेल; पण तिच्या त्या अवस्थेकडे पाहूनही न पाहिल्यासारखे करणाऱ्यांचे ते वागणेही त्यांचे एकाकीपण सांगणारे नव्हते काय?... माणसांना माणसांविषयी वाटणारी आस्था कमी झाल्याने, की माणसांची आत्ममग्नता वा समाजविन्मुखता वाढल्याने असे होत असेल?

सुरेश व्दादशीवार, चंद्रपूर

sdwadashiwar@gmail.com

Share on Social Media

अभिवादन

विद्या बाळ : ‘बोलत्या व्हा’ संदेशाची जननी

छाया दातार

वैयक्तिक पातळीवर तर विद्या अतिशय उदार होती. पत्रलेखनाचा अफाट पसारा, लांबलचक नाहीत पण अचूकपणे उत्तेजन देणारी पत्रे नवनवीन लेखकांनाच नाहीत तर वैयक्तिक पातळीवर सल्ला मागायला येणाऱ्यांना ती सहजपणे लिहीत असे, तेवढा वेळ देत असे. लोकांचा संग्रह जमविण्यासाठी ही फार मोठी कला आहे आणि ती तिला कमवावी लागली नव्हती. ती तिच्या रक्तात होती. स्त्रीच्या संपादनाचे काम म्हणूनच ती कुशलपणे करू शकली. स्त्री मासिकाच्या भोवती उभी राहिलेली स्त्री सखी मंडळे ही केवळ बाजारपेठीय संकल्पनेतून जन्माला आलेली नव्हती तर तिच्या संघटना-कौशल्याचा भाग आणि स्त्री चळवळीला त्यामुळे मिळालेले प्रोत्साहन असे त्यातून साध्य झाले. त्या काळी म्हणजे साधारण 1970 ते 2000 पर्यंत गावोगावी मध्यमवर्गीय स्त्रियांची महिला मंडळे जरूर असत, पण त्यांना काही प्रमाणात वैचारिक धार लावण्याचे काम या स्त्री सखी मंडळांनी केले असे म्हणता येईल.

विद्या माझी चुलत-चुलत बहीण. ती तात्यासाहेब केळकरांची नात आणि मी गिरिजाबाई केळकरांची नात. म्हणजे दोघींच्या घरी लेखनाचा वारसा. अर्थात लेखनाचे स्वरूप वेगळे. वैचारिक बांधिलकी वेगळी, पण मागील पिढीशी बंडखोरीचे नाते आणि आम्ही केवळ नात्याने नाही तर विचारांनी बांधल्या गेलो. दोघींचाही प्रवास एका टप्प्यापर्यंत सारखा. 18 व्या वर्षी प्रेमविवाह. शिक्षण विवाहानंतर. मुलेबाळे होऊन ती मोठी झाल्यावर काही तरी करण्याची आस. मी मार्क्सवादी चळवळीत काही काळ आणि पुढे स्त्रीमुक्ती चळवळीत प्रदीर्घ काळ असा प्रवास करत आहे. माझा प्रवास हा जनप्रवाहात संपूर्णपणे झोकून दिलेला नाही; तर एका बाजूला शैक्षणिक, वैचारिक दोर धरून पुढे-पुढे जाण्याचा हा प्रयत्न आहे.

स्त्रियांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांतील काही प्रश्न घेत आणि त्यांच्यासाठी उत्तरे शोधत हा प्रवास काहीसा शैक्षणिक अंगाने पुढे जात राहतो. विद्याही तशा अर्थाने ‘मास लीडर’ नव्हती; पण तिने महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय, शिक्षित स्त्रियांची मने निश्चितच जिंकली आहेत- जातिभेदांपलीकडे जाऊन. एका अर्थाने हा स्त्रियांचा गट अधिक कुंठित जीवन जगतो, कारण घरातून नोकरी करण्याची परवानगी मिळतेच असे नाही. खाऊन-पिऊन सुखी असल्यावर बाहेर जाण्याची गरज काय, अशी भूमिका. पण छुप्या पध्दतीने हिंसा चालू राहते. मन मारणे तर सततच. अशा स्त्रियांना घराबाहेर पडण्याचे मोठे धैर्य तिने दिले. म्हणूनच तिचा मुख्य संदेश काय, असा विचार करता मला सुचले की ‘बोलत्या व्हा’ हे आवाहन.

माझी विद्याशी घरातील ओळख. तिच्या विवाह-सोहळ्याला मी उपस्थित होते. ती 18 वर्षांची, मी 10 वर्षांची. थोडीशी कुरबूर मी ऐकल्याचे आठवते की, इतक्या लवकर लग्न कशाला? शिकू दे की. पण एकदा प्रेम जमले आणि नवरा वयाने मोठा असला की लग्नाचा आग्रह दोन्ही बाजूने धरला जातो. लग्नानंतर शिकेल की, हे व्यावहारिक उत्तर तयार असते. माझ्याही बाबतीत हेच तर घडले. बाईला करिअर हवेच, असे गृहीततत्त्व तेव्हा नव्हतेच. त्यानंतर विद्याची आणि माझी इन्टिमेट भेट झाली ती मी फर्ग्युसन कॉलेजला शिकायला आले तेव्हा. मी होस्टेलला आणि ती कालव्याच्या पलीकडे राईलकरांच्या बंगल्यात. तेव्हा ती लेकुरवाळी होती आणि घरी असायची. माझे प्रेमप्रकरण सुरू झाल्यावर मी तिलाच सांगायला गेले पहिल्यांदा. आणि महिनाभरातच माझ्या प्रियकराच्या वडिलांकडून ‘प्रेमप्रकरण संपवा’ असा सल्ला मिळाल्यावर प्रेमभंगाचे दु:ख व्यक्त करण्यासाठीही तिचाच आधार मला मिळाला. माझ्या प्रियकराला अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये स्टुडन्ट एक्स्चेंज कार्यक्रमामध्ये स्कॉलरशिप मिळाल्यामुळे त्याच्या वडिलांनी ठरविले की- हे दूर पल्ल्याचे प्रेम कामाचे नाही, तेव्हा आताच बांधिलकी नको. आमच्यावर सक्त पहारा सुरू केला त्यांनी.

त्यानंतर विवाह होऊन मुलेबाळे मोठी झाल्यावर एकदम विद्याची आणि माझी भेट झाली ती स्त्री मासिकाची संपादक म्हणून. लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारी. तशी मी कामगार चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ अशा रस्त्यांवरील चळवळीत रमणारी. पण विद्याने माझ्या कथाकौशल्याला वाव दिला आणि पुढे माझे दोन कथासंग्रह प्रसिध्द झाले. तोपर्यंत विद्याचे कर्तृत्व चांगलेच नावारूपाला आलेले होते. विद्याही काही प्रमाणात रस्त्यावरील चळवळीत उतरू लागली होती. मुंबईला स्त्रीमुक्ती संघटनेची स्थापना आणि पुण्याला ‘नारी समता मंचा’ची स्थापना मला वाटते, साधारण एकाच वेळी झाली होती. मंजुश्री सारडा प्रकरण नारी समता मंचाने लावून धरले होते.

1980 मध्ये मथुरा बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आरोपी पोलिसांना सोडल्याबद्दल सगळ्याच स्त्री संघटनांना संताप आला होता. उपेन्द्र बक्षी, वसुधा धागमवार, लतिका सरकार या तीन ज्येष्ठ वकिलांनी त्या वेळी कायद्यातील त्रुटी दाखवून दिल्या आणि कायद्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता दाखवून दिली. हे प्रकरण केवळ एका घटनेबाबत घडलेल्या अन्यायाबाबत निषेध करून थांबले नाही, तर पुढे लॉ कमिशनने देशभर दौरा काढून अनेक स्त्री संघटनांशी सल्लामसलत करून महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणल्या. दि.16 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणी जसा सर्व देश उसळून उठला, तसाच काहीसा तो प्रसंग होता. त्यातूनच स्त्रियांना किती प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडावे लागते याकडे लक्ष वेधले गेले. त्यातूनच पुढे हुंडाबळी प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे पुढे आली. प्रमिला दंडवतेंनी हुंडाविरोधी बिलाची केलेली मागणी पारित झाली. परित्यक्ता, विधवा, लग्नाविना राहिलेल्या- अशा स्त्रियांचे प्रश्न पुढे आले.

मला आठवते आहे की, या स्त्रियांच्या एका मेळाव्याला विद्याने नाव दिले होते, ‘अपराजिता’. नारी समता मंचामध्ये विद्या नेहमीच कार्यरत होती आणि नवनवे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम घेण्यात तिचा पुढाकार असे. एकतर्फी प्रेमप्रकरणानंतरच्या हिंसाचाराच्या अनेक घटना त्या वेळी गाजल्या होत्या. त्यासाठी तरुण मुला-मुलींना एकमेकांसंबंधी आदरावर आधारित निखळ मैत्रीचे महत्त्व सांगण्यासाठी तिने ‘दोस्ती जिंदाबाद’ हा कार्यक्रम घेऊन आमीर खानला बोलावले होते. पालकांनाही हजर राहायचे आवाहन होते. मला याचे नेहमीच कौतुक वाटत राहिले आहे. अर्थात, त्यामध्ये नारी समताच्या इतर सर्वच कार्यकर्त्यांचा मोठाच वाटा असे.

मी मुंबईला राहत असले तरी माझे पुण्याला जाणे होई. मुंबईतर्फे संपर्क समितीची सभासद म्हणून मी हमखास जाई. मी त्या वेळी 1981 मध्ये हॉलंडहून स्त्रिया व विकास या विषयात एम.ए. ही डिग्री घेऊन आले होते. त्यानिमित्ताने माझा थोडाफार सैध्दांतिक अभ्यास झाला होता. माझे ‘स्त्री-पुरुष’ हे पुस्तक ग्रंथालीने प्रसिध्द केले होते. त्यामुळे नारी समता मंचच्या काही सभासदांबरोबर सैध्दांतिक विषयावर अभ्यास मंडळ सुरू करण्याची कल्पना निघाली होती. विद्या म्हणत असे की, मला काही सैध्दांतिक गोष्टी फारशा कळत नाहीत आणि फार खोलात जाण्याची जरुरी वाटत नाही. तरीही ती चर्चेला बसत असे याचे मला आजही कौतुक वाटते.

ती आम्हा सर्वांपेक्षा वयाने मोठी होती आणि तिला स्त्री चळवळीची कार्यकर्ती किंवा लोकप्रिय पुढारी म्हणून मान्यताही मिळाली होती. तसेच चाकोरीबाहेर जाणारे कुटुंबसंस्थेबाबत रॅडिकल विचार करणारी अशी प्रसिध्दी मिळाल्यामुळे शिव्या-शापही खावे लागत होते, तरीही ती कधीही डगमगली नाही. मात्र पुरुषसत्ता ही भांडवली समाजव्यवस्थेचाच भाग कसा आहे आणि म्हणून स्त्रीमुक्ती ही केवळ आहे त्या परिस्थितीत वैयक्तिक पातळीवर बदलून होऊ शकणार नाही, तर तिचा आवाका हा वाढवीत संबंध समाजव्यवस्था बदलण्यासाठी वापरला पाहिजे. आणि आपल्याला मिळणाऱ्या व्यासपीठांवरून हे सतत आग्रहपूर्वक मांडले पाहिजे. तसेच, पुरुषसत्ता ही लैंगिक प्रेरणेतून, लैंगिक शोषणातून, हिंसाचारातून स्त्रीवर्गावर कशी जरब बसवते याबाबत बोलले पाहिजे- असा सगळा सैध्दांतिक आग्रह तिने फार खोलात जाऊन समजून घेण्याची आवश्यकता मानली नाही. कदाचित म्हणूनही ती मध्यमवर्गाला भावली. पुरुषांनाही भावली. पुढे तर तिने ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या मुखपृष्ठावर जे उपशीर्षक दिले आहे (‘ती’ आणि ‘तो’ यापलीकडचे सर्व ‘ते’ यांचा स्वत:शी आणि परस्परांशी नव्याने संवाद व्हावा यासाठी), ते तिच्या मध्यममार्गी स्वभावाला साजेसे आहे, असे म्हणावेसे वाटते.

स्त्री-मुक्ती संघटना व स्त्री उवाच गट यांनी मिळून 1985 मध्ये पश्चिम महाराष्ट्रात 10 दिवस चालणारी स्त्री-मुक्ती यात्रा काढली होती, तिलाही विद्याने आणि नारी समता मंचने चांगला पाठिंबा दिला होता. पुढे स्त्री उवाच गटाने 8 मार्चला आंतरराष्ट्रीय स्त्रीदिनाच्या निमित्ताने एक वार्षिक काढण्याचे ठरविले. विद्या नुकतीच स्त्री मासिकातून बाहेर पडली होती. किर्लोस्कर समूहाने त्यातून अंग काढून घेतले होते. तिच्यापुढे स्वत:चे मासिक सुरू करण्याचा पर्याय होताच. पण त्यासाठी तिला काही दिवसांच्या मुदतीची आवश्यकता होती. म्हणून आम्ही तिला या वार्षिकाचे संपादन करण्याचे आवाहन केले. तिने प्रतिसाद दिला आणि पहिला अंक तिच्या हातून बाहेर आला. पण तेव्हाही आमचे व तिचे थोडेफार मतभेद झाले. आम्हाला स्त्री मासिकाच्या नेमस्त भूमिकेच्या पुढे जाऊन अधिक ज्वलंत आणि मीमांसक लेख मिळवायचे होते. विश्लेषणात्मक लेख हवे होते. स्त्रीमुक्तीचा व्यापक दृष्टिकोन लोकांपुढे मांडायचा होता. शिवाय आमची संपादनाची कल्पना ही सामूहिक होती, तीही तिला पटणारी नव्हती. अर्थात आम्हाला फायदा मिळाला. कारण आमचा पहिला अंक विद्या बाळ यांच्या हातून बाहेर आला, असे आम्ही फुशारकीने सांगू शकलो.

पुढे विद्या अधिक धीट होत गेली. समलिंगी संबंधांबद्दल तिने समजून घेतले. सेक्स वर्कर्सच्या संघटनेबद्दल तिची मते बदलत गेली. इच्छामरणाबाबत तर तिने खूपच पुढाकार घेतला. तिचा मृत्यूही एक प्रकारे त्याच पध्दतीने झाला, असे म्हणता येईल. आम्ही 1987 ते 1994 असे आठ वार्षिक अंक काढून आमची हौस भागविली. पुढे ही वार्षिके काढायची कल्पना ‘पुरुष उवाच’ आणि ‘पुरुष स्पंदन’ या दोहोंनी उचललेली दिसते. यानंतर मी स्वत: टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत स्त्री-अभ्यास विभागात प्राध्यापिकेची नोकरी स्वीकारली. त्यानिमित्ताने मला ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बचत गट, सेंद्रिय शेती वगैरे प्रश्नांवर काम करण्याची संधी मिळाली. पर्यावरणीय स्त्रीवादाकडे झुकू लागले, तेव्हाही मला विद्याने लिहिण्याचा आग्रह केला. स्त्री-चळवळ हे आमचे एकत्रित काम करण्याचे व्यासपीठ कायम राहिले आहे. शेवटपर्यंत ती कार्यरत होती, याचा मला अभिमान वाटतो आणि आधारही वाटतो. विद्याची मैत्रीण म्हणून कोणत्याही मध्यमवर्गीय स्त्रियांच्या समूहामध्ये स्वीकारले जाण्याचा मानही मिळतो. तिच्या जाण्याने चळवळीमध्ये एक पोकळी झाल्याचे जाणवणार आहे.

विद्याच्या यशस्वी वाटचालीचे आकलन करत असताना असे लक्षात येते की, विद्याला आकाशवाणीवर निवेदिका म्हणून नोकरी मिळाली आणि ती सार्वजनिक जीवनात आली. अतिशय मुलायम पण कणखर आवाज, तो आवश्यकतेनुसार कमी-अधिक फेकण्याचा चपळपणा- ही आवाजाची कसरत तिला पुढेही उपयोगी पडली, स्त्री चळवळीमध्ये लोकांना जोडण्यासाठी. आपला मुद्दा लोकांना खात्रीलायक रीत्या पटवून देण्यासाठी, ऐकणाऱ्यांच्या मनातील व्दिधा मन:स्थिती बाजूला सारून सकारात्मक बाजू ठामपणे उचलून धरण्यासाठी मदत करणारा तो आवाज असे. आवाजाला साजेसे व्यक्तिमत्त्वही तिला लाभले होते. पाच फूट सहा इंच उंची आणि उत्तम बांधा, त्यामुळे सहज लक्ष जाण्यासारखे भारदस्त व्यक्तिमत्त्व.

चेहऱ्यावर सदा हसरे भाव आणि नवे ते सर्व स्वीकारण्याची वृत्ती, त्यामुळे कोणालाही तिच्याजवळ सहज जाता यायचे. ती चळवळीत होती आणि तरीही चळवळीमध्ये असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर जाणवणारा रुक्षपणा तिच्याकडे नव्हता. नवनवीन अनुभवांना सामोरे जाताना आवश्यक कुतूहल ती जपून होती. तिच्या व्यक्तिमत्त्वाने आणि विचाराने प्रभावित झालेल्या अनेक स्त्रिया तिच्या सहवासात होत्या, पण त्यांच्यावर तिचे दडपण नव्हते. त्या तिच्या मैत्रिणी होत्या. स्त्री चळवळीमध्ये फार टोकापर्यंत जाण्याची तिची इच्छाही नव्हती. तिला एक सूर सापडला होता, एक ताल सापडला होता. त्या तालावर जितकी पावले टाकता येतील तितकी सदासर्वदा तेवढ्याच सराईतपणे ती न दमता टाकत असे, शेवटपर्यंत.

त्यामुळेच तिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना कार्यक्रमाची लय साधली जाईल, पुरेसे मनोरंजन होईल याची खात्री असे. खूप काही नवनवीन मिळेल अशी अपेक्षा न ठेवता, पण जमलेल्या लोकांना त्यांचे विचार नक्की आवडतील असा त्यांना विश्वास असे. विद्याचा श्रोता हा मध्यमवर्गीय स्त्रिया आणि पुढे-पुढे पुरुषही असा असे. स्त्रियांच्या मुक्तीसाठी स्त्री-पुरुष संवाद हा तिचा आवडीचा विषय होता. त्यामुळे तिच्या भाषणांना कधी एकारलेपणा आला नाही. आणि, हीच शक्ती होती तिच्या भाषणांच्या लोकप्रियतेची.

वैयक्तिक पातळीवर तर विद्या अतिशय उदार होती. पत्रलेखनाचा अफाट पसारा, लांबलचक नाहीत पण अचूकपणे उत्तेजन देणारी पत्रे ती नवनवीन लेखकांनाच नाही तर वैयक्तिक पातळीवर सल्ला मागायला येणाऱ्यांना सहजपणे लिहीत असे, तेवढा वेळ देत असे. लोकांचा संग्रह जमविण्यासाठी ही फार मोठी कला आहे आणि ती तिला कमवावी लागली नव्हती, ती तिच्या रक्तात होती. स्त्रीच्या संपादनाचे काम म्हणूनच ती कुशलपणे करू शकली. स्त्री मासिकाच्या भोवती उभी राहिलेली स्त्री सखी मंडळे ही केवळ बाजारपेठीय संकल्पनेतून जन्माला आलेली नव्हती, तर तिच्या संघटनाकौशल्याचा भाग आणि स्त्री चळवळीला त्यामुळे मिळालेले प्रोत्साहन असे त्यातून साध्य झाले. त्या काळी म्हणजे साधारण 1970 ते 2000 पर्यंत मध्यमवर्गीय स्त्रियांची महिला मंडळे गावोगावी जरूर असत, पण त्यांना काही प्रमाणात वैचारिक धार लावण्याचे काम या स्त्री सखी मंडळांनी केले, असे म्हणता येईल. स्त्रीविषयक प्रश्न असलेल्या नवनवीन साहित्याची ओळख करून घेण्याचा हा प्रयत्न स्त्रीभानाला निश्चितच पुढे नेणारा होता.

छाया दातार, मुंबई

chhaya.datar1944@gmail.com

Share on Social Media

अभिवादन

विद्याताई : परिवर्तनाच्या लढाईतलं स्त्रीत्व

सरिता आवाड

‘मिळून साऱ्याजणी’च्या जोडीलाच साथ-साथ, अक्षरस्पर्श, नारी समता मंच, स्त्री सखी मंडळ आणि पुरुष उवाच अशा संघटनांचा पैस त्यांनी उभारला. साथ-साथ ही तरुणांना विवाहासाठी चर्चा करणे, ओळख करून घेणे या उद्देशाने चाललेली संघटना आहे. अक्षरस्पर्श हे वाचनालय आहे. नारी समता मंच आणि स्त्री सखी मंडळ या स्त्रियांच्या संघटना आहेत, तर पुरुष उवाचमध्ये स्त्री-पुरुष समतेचं तत्त्व पुरुषांमध्ये- विशेषतः तरुणांमध्ये- रुजवण्याचे प्रयत्न आहेत. पुरुष उवाचला विद्याताई सहावं बोट म्हणत असत. या सर्वांच्या उद्देशाची साखळी परस्परपूरक आहे. निरनिराळ्या दिशेनं स्त्री-पुरुष समतेच्या प्रबोधनासाठी सुरू असलेलं हे काम आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या लढ्याबरोबरच इतरही आंदोलनांना त्यांचा पाठिंबा असायचा. नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रध्दा निर्मूलन समिती या त्यांच्या मित्र संघटनाच होत्या.

डोंबिवलीची भारती मोरे असेल, गोव्याची उज्ज्वला आचरेकर तर नगरची प्रज्ञा हेंद्रे असेल; अनेकांच्या मनात विद्याताई गेल्या म्हणजे घरचंच माणूस गेलं, अशी भावना आहे. खिडकीशी आपल्या जन्माच्या आधीपासून असलेलं झाड उन्मळून पडलं तर सगळं घर उजाड झालं, असं वाटतं. तीच उजाड संवेदना मनात आहे. उजेड निमाल्याचं दु:ख आहे. विद्याताई भेटल्या नाहीत तरी त्या आहेत, 25671321 या नंबरवर फोन केला तर ‘बोल काय म्हणतेस?’ असे शब्द स्नेहशील मृदु आवाजात ऐकू येतातच- असा विश्वास होता. पण आता ते संपलं, या वास्तवाची जाणीव होते आणि माझ्यासारख्या अनेकींचे डोळे भरून येतात.

विद्यातार्इंबद्दल स्नेहभाव आणि आदरभाव दोन्ही एकाच वेळी वाटायचे. ही किमया तपासताना स्मरणाचे धागे उलगडतात. अंदाजे 1966 मध्ये जेव्हा मी 10 वर्षांची होते, तेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिलं. या उंच-सडपातळ, हसऱ्या चेहऱ्याच्या बाई अवजड स्कूटर अगदी सहज स्टँडला लावत होत्या. पुण्यात सायकल चालवणाऱ्या खंडीभर होत्या, पण 50 च्या वेगाने जाणाऱ्या क्वचित होत्या. ‘या स्त्री मासिकाच्या संपादनाचं काम करतात’, असं आईनं मला तेव्हाच कानात सांगितलं आणि माझे डोळे आणखीनच विस्फारले.

स्त्री मासिक आम्ही आवडीनं वाचायचो. त्यातल्या वाचकचर्चा गुंतवून ठेवणाऱ्या असायच्या. काही वर्षं गेली आणि एकदा मीही या चर्चेत भाग घेतला. मी लिहिलेलं चक्क छापून आलं. माझी कॉलर ताठ झाली. नंतर मी पुण्याला आल्यावर विद्याताई अधून-मधून दिसायला लागल्या. एका हातमाग कापडाच्या प्रदर्शनात मला त्या दिसल्या. त्या प्रदर्शन बघत होत्या आणि मी त्यांना बघत होते. त्यांचा ताठ-उंच बांधा, अजिबात पोक न काढता उभं राहणं, या ताठपणाला संतुलित करणारे त्यांच्या चेहऱ्यावरचे मृदू भाव माझी नजर बांधून ठेवत होते. माझी मैत्रीण शैला बापट हिच्यामुळे मला त्यांना जवळून पाहता आलं, त्यांच्याशी बोलता आलं. पण त्यांच्या निकट जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची सवड मला मिळाली नाही. तरीही दुरून का होईना, त्या काय करतायत याकडे लक्ष होतं. उबदार रंगीबेरंगी गोधडीचं चित्र असलेला पहिलावहिला ‘मिळून साऱ्याजणी’चा अंक अनेकांसारखा मी वाचला. पुढचे वाचत गेले. अंक पटकन वाचून संपतो, अशी माझी तक्रार होती. प्रतिक्रिया लिहिली, वाचकचर्चेत भाग घेतला तर अनपेक्षितपणे विद्यातार्इंचं लहानसं आणि नेमकं पत्र यायचं. उत्तेजन देणारं, लिहितं करणारं.

नंतर अनेक वर्षांनी पुण्यात आल्यावर मिळून साऱ्याजणीत काम करण्याचा अनुभव घेतल्यावर विद्यातार्इंच्या कामाचं मोल, त्यांचे अनेक आयाम माझ्या लक्षात येत गेले. जेव्हा स्थिरस्थावर झालेली अनेक मासिकं बंद पडत चालली होती, तेव्हा कसलं पाठबळ नसताना त्यांनी हे मासिक काढायचं धाडस केलं. स्त्रियांसाठी एक अवकाश बनवला. सर्वसामान्य स्त्रीला लिहितं केलं. बोलणं आणि लिहिणं यात फरक आहे. बोलणं उत्स्फूर्त धबधब्यासारखं असतं, तर लिहिताना त्या उत्स्फूर्ततेवर विचारांचे संस्कार होतात. आपल्या भावनांची रचना होते. ‘मिळून’च्या मुखपृष्ठावर लिहिलं जातं तसा आपला स्वतःशी नव्यानं संवाद होतो. किती तरी मुद्यांवर इथे स्त्रिया लिहित्या झाल्या. तुम्ही का शिकलात? लग्न का केलंत? नोकरी का करता? कोणता पोशाख घालता? का घालता? असे प्रश्न समोर ठेवले. किती साधे प्रश्न! पण मनाची दारं या प्रश्नांनी ठोठावली. विचारांच्या इंजिनानं गिअर टाकला. पहिल्यांदाच लिहिण्याचं धाडस करणाऱ्या त्यात कित्येक होत्या.

घराचा पत्ता नाही, हातात पैसा नाही, नोकरी नाही- अशा परिस्थितीत खचून न जाता स्वतःचं मासिक काढायचं स्वप्न विद्यातार्इंनी पाहिलं. प्रथमदर्शनी आक्रित वाटलं तरी या स्वप्नाची पायाभरणी आधी बराच काळ चालू होती. त्यांनी 1971 च्या सुमाराला ‘कमलाकी’ हे त्यांच्या आत्याबाईवर चरित्रात्मक पुस्तक लिहिलं. ते वाचल्यावर त्यांची मैत्रीण शैला म्हणाली, ‘तुमच्या लेखनात खूप पुढचा विचार आहे, पण तसा विचार तुमच्या वागण्यात दिसत नाही.’ ते ऐकल्यावर विद्याताई सावध झाल्या आणि विचार-कृतीमधलं अंतर कमीत कमी असावं, असा त्यांचा प्रयत्न सुरू झाला. हा प्रयत्न प्रामाणिक होता. गृहिणीपणाच्या बंदिस्त चौकटीतून बाहेर काढणारा होता.

तेव्हाच अरुण लिमये या तरुण युक्रांदियांशी त्यांची मैत्री झाली. शैलामुळे विचारांना दिशा मिळाली, तर अरुणमुळे त्या कार्यकर्ती झाल्या. Women, Men and Development या विषयावर इंग्लंडला ससेक्सला त्यांनी 1986 मध्ये प्रशिक्षण घेतलं. 85 साली नैरोबीला आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली, तिलाही विद्याताई गेल्या होत्या. या अनुभवातून त्यांच्यातल्या स्त्रीवादी विचारांचं भरण-पोषण होत होतं. मासिक सुरू करायची ऊर्मी तर होती, पण पैशांचं पाठबळ कसं मिळवायचं, हा प्रश्न होता. तेव्हा ग्रामीण भागात महिलांसाठी प्रोजेक्ट सुरू केला (growing together). त्यासाठी त्यांना फंडिंग मिळालं. हे काम करताना ग्रामीण महिलांकडून खूप काही शिकायची विद्यातार्इंना संधी मिळाली. आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं.

‘मिळून साऱ्याजणी’ सुरू करताना शहरी आणि ग्रामीण स्त्रियांमध्ये सेतू बांधायचं त्यांच्या मनात पक्कं झालं. तसं करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. मासिकात ग्रामीण स्त्रियांसाठी स्वतंत्र संपादकीय असायचं. मासिकाच्या सहाव्या वर्धापनदिनाला ग्रामीण मैत्रिणींना आवर्जून सामील केलं होतं. ‘माझ्या जाणिवेचा प्रवास’ या कार्यक्रमात या मैत्रिणींनी सभा जिंकलीच. दुसऱ्या दिवशी भँवरीदेवी या राजस्थानच्या साथीने आरोग्यसेवा देणाऱ्या सरकारी कार्यकर्तीला बोलावलं होतं. काम करताना गुर्जर समाजातल्या पुरुषांकडून ती स्वतः बलात्कारित होणं, त्याविरुध्द ती लढा करीत असणं विशेष होतं. या सर्व प्रयत्नांतून त्या मध्यमवर्गीय स्त्रियांच्या अनुभवाचा आणि आकलनाचा परिघ विस्तारत होत्या.

त्या आधी 1981-82 ला नारी समता मंचाची रुजवात झाली होती. त्याचं रजिस्ट्रेशन 87 मध्ये झालं. या मंचाच्या माध्यमातून विद्याताई कार्यकर्त्या म्हणून पुढे आल्या. तेव्हापासून समकालीन प्रश्नावर मंचानं आवाज उठवला आहे. कृती केली आहे. मंजुश्री सारडा आणि शैला लाटकर यांच्या हादरवून टाकणारा मृत्यूनं नारी समता मंचाला मैदानात आणलं. प्रदर्शन, मोर्चा, चर्चा, पथनाट्य अशा अनेक माध्यमांतून स्त्री-पुरुष विषमतेचे प्रश्न ऐरणीवर आले. सत्यरंजन साठे यांच्यासारखा विव्दान कायदेतज्ज्ञ मंचाचा आधार बनला. मंजुश्री सारडाच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयापुढे रिव्ह्यू पिटिशन सादर करण्यासाठी मंचानं इतर संघटनांच्या मदतीनं 10 हजार सह्या गोळा केल्या. तो अर्ज देण्यासाठी विद्याताई आणि नीलम गोऱ्हे दिल्लीला जाऊन आल्या. अपराजितांची परिषद तसेच आत्मसन्मान परिषद झाली.

मंजुश्रीच्या निधनाला पाच वर्षे झाल्यावर रात्री प्रकाशफेरी काढण्यात आली. भ्रूणहत्येसंबंधात मोर्चा काढून परिसंवाद घेतला, पथनाट्ये झाली. ‘दोस्ती जिंदाबाद’ हा प्रकल्प राबवून मुलीकडून नकार पचवण्यासाठी, एकतर्फी हिंसक प्रेमापासून परावृत्त करण्यासाठी तरुणाचं प्रबोधन घेण्यात आलं. आमीर खान या लोकप्रिय अभिनेत्याशी तरुणांना संवाद साधता आला. शाळेतील मुलांसाठी लैंगिक शिक्षणाचे प्रयोग झाले. आधारगृहाची स्थापना झाली, कायदेशीर सल्ला देणारं केंद्र तयार झालं. यातले काही प्रयोग यशस्वी झाले नाहीत. पण या सगळ्यांतून विद्यातार्इंची शिकण्याची वृत्ती आणि संवाद साधण्याची हातोटी लक्षात आली. जमिनीशी थेट नातं सांगणारं विवेकी नेतृत्व पुढे आलं.

संवाद साधण्याचं त्यांचं कौशल्य वादातीत होतं. प्रत्येक व्यक्तीशी- मग ती कुणीही असो- त्या सूर जमवायच्या. त्या संवादातले वर्ज्य स्वर त्यांना लगेच समजायचे. पण त्या स्वरांच्या पट्‌ट्या ही संवादिनी उखडून टाकायची नाही. ऐकण्या-बोलण्याचा तोल सांभाळत आपल्या विचारांची समोरच्या व्यक्तीत त्या पेरणी करायच्या. याचं कारण मुळात माणूस त्यांना हवाहवासा होता. माणसांशी बोलताना त्यांची ऊर्जा उसळायची. माझा अनुभव सांगते : 2010 मध्ये महिलादिनाच्या कार्यक्रमासाठी त्या डोंबिवलीला आल्या. माझ्या सुदैवाने माझ्याच घरी उतरल्या. दुपारपासून रात्री 12 पर्यंत त्या सतत कुणाकुणाशी बोलत होत्या. लक्षपूर्वक भाषणं ऐकत होत्या. रात्रीच्या जेवणानंतर इच्छामरणाच्या संकल्पनेवर त्या सविस्तर बोलल्या. शेवटी बारा वाजता न राहवून मी त्यांच्या असीम ऊर्जेला मनःपूर्वक सलाम केला.

पहाटे आम्ही लवकरच उठलो. तेव्हा माझ्या आयुष्यात काय घडामोडी चालल्या आहेत, याची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. माझ्या घराजवळच वृध्दांसाठी डे केअर सेंटर सुरू झालं होतं. हे सेंटर ज्योती पाटकर या उजव्या विचारांच्या कार्यकर्तीनं सुरू केलं होतं. त्या ते सेंटर बघायला आवर्जून गेल्या. आपल्या कामाच्या राजकीय आशयाचं भान त्यांना निश्चितच होतं. म्हणून कुणाचाच टिळा त्यांनी लावला नाही. मतभिन्नता असली तरी चर्चेसाठी त्यांची कायम तयारी असायची. संघीय विचारांची पार्श्वभूमी असलेल्या घरातून आलेल्या, जनसंघाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या विद्याताई विचारपूर्वक बदलल्या आणि हा बदल स्वतःपुरता न ठेवता या प्रक्रियेत त्यांनी अनेकानेकांना सामावून घेतलं. सुरुवातीलाच अनेकांना घरातला माणूस गेल्याचं दु:ख झाल्याचं मी म्हटलं आहे; सामावून घेण्याच्या त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचीच ती परिणती आहे.

पुण्यात 2014 मध्ये आल्यावर मी मिळून साऱ्याजणीमध्ये दोन वर्षे होते. मिळून तेव्हा 25 वर्षांचं झालं होतं. त्या वर्षीच्या वर्धापनदिनाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना बोलावलं होतं. त्यांना बोलतं केलं होतं. या दोन वर्षांत मला विद्यातार्इंना अधिक जवळून पाहण्याची संधी मिळाली. संध्याछाया त्यांना जाणवत होत्या, पण भिववत नव्हत्या. जोपासलेल्या वाढवलेल्या मिळून... पासून त्या संन्यस्त झाल्या होत्या. संपादनाची धुरा आता गीतालीताई सांभाळत होत्या. तरी विद्यातार्इंची नजर घारीसारखी ‘मिळून...’वर होतीच. प्रत्येक अंक त्या निगुतीनं वाचायच्या. आपलं मत नोंदवायच्या. मुद्रणदोष त्यांना व्यथित करायचे. महिन्यातून एकदा तरी सर्वांची मीटिंग हवी, असा त्यांचा आग्रह असायचा. मीटिंगची आम्हाला आठवण राहिली नाही तर त्या फुरंगटायच्या. ‘पुन्हा मी आठवण नाही करून देणार’ असं म्हणायच्या. त्यांची मतं, मार्गदर्शन आम्हाला मोलाचं होतं.

प्रत्येक अंकात त्यांचं मनोगत असायचं. साध्या पाठकोऱ्या कागदावर लिहिलेलं. त्यावर त्या आमची मतं अजमावायच्या. कोऱ्या कागदांची नासाडी केलेली त्यांना आवडायची नाही. माझा धांदरटपणा लक्षात घेऊन दारावर चिकटवलेल्या कागदाकडे माझं लक्ष त्यांनी वेधलं. (बाहेर पडताना) ‘दिवे, पंखे, संगणक, नळ बंद केले आहेत ना?’ असं त्यावर लिहिलं होतं. मला चिमटा तर बसला, पण मुळीच दुखलं नाही. महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा समाजकार्य जीवनगौरव सन्मान 2016 मध्ये त्यांना मिळाला. तेव्हा त्या जोशी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. त्यांचं भाषण तिथेच रेकॉर्ड केलं गेलं. मी आणि मानसी त्यांच्या श्रोत्या होतो. रेकॉर्डेड भाषण नंतर सभागृहात ऐकताना त्यांची सदाहरित मनोवृत्ती जाणवत होती.

मिळून...ची घडी त्यांनी बसवली होती. महाराष्ट्रात आणि परदेशातही त्यांनी प्रतिनिधींचं जाळं उभारलं होतं. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर प्रतिनिधींची बैठक व्हायची. त्यात विद्याताई आणि गीतालीताई आस्थेनं प्रतिनिधींशी संवाद साधायच्या. भाषण नाही, पण आपले विचार मांडायच्या. या प्रतिनिधींच्या मदतीने महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी त्याचप्रमाणे दिल्ली, अहमदाबादला मिळून...च्या प्रकाशनाचे कार्यक्रम झाले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे यात प्रयत्न होते. या प्रयत्नांचा भाग म्हणून महिलादिन विशेषांक तीन भाषांमध्ये दोन वर्षं प्रकाशित झाला. एका अंकाचं प्रकाशन ताराबाई शिंदे-ज्यांचं तडाखेबंद लेखन आजही विचार प्रवृत्त करतं- त्यांच्या बुलढाण्याला झालं.

मिळून साऱ्याजणीच्या जोडीलाच साथ-साथ, अक्षरस्पर्श, नारी समता मंच, स्त्री सखी मंडळ आणि पुरुष उवाच अशा संघटनांचा पैस त्यांनी उभारला. साथ-साथ ही तरुणांना विवाहासाठी चर्चा करणे, ओळख करून घेणे या उद्देशाने चाललेली संघटना आहे. अक्षरस्पर्श हे वाचनालय आहे. नारी समता मंच आणि स्त्री सखी मंडळ या स्त्रियांच्या संघटना आहेत, तर पुरुष उवाचमध्ये स्त्री-पुरुष समतेचं तत्त्व पुरुषांमध्ये- विशेषतः तरुणांमध्ये- रुजवण्याचे प्रयत्न आहेत. पुरुष उवाचला विद्याताई सहावं बोट म्हणत असत. या सर्वांच्या उद्देशाची साखळी परस्परपूरक आहे. निरनिराळ्या दिशेनं स्त्री-पुरुष समतेच्या प्रबोधनासाठी सुरू असलेलं हे काम आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या लढ्याबरोबरच इतरही आंदोलनांना त्यांचा पाठिंबा असायचा. नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती या त्यांच्या मित्र संघटनाच होत्या.

मंदिरप्रवेशाच्या प्रश्नावर विद्यातार्इंनी 2014 नंतर न्यायालयात याचिका दाखल केली. जिंकली. शनी शिंगणापूरचं आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाईला त्यांनी भोंडे कॉलनीतल्या मिळून...च्या ऑफिसमध्ये बोलावलं, आमच्यासमोर तिच्याशी चर्चा केली. महिलांसाठी स्वच्छतागृहांचा संघर्ष चालूच होता. त्याच काळात विचारवेधतर्फे युट्यूबवर विचारवेचे प्रकाशित होत होते. तिथेही स्त्रियांना असलेला पुनरुज्जीवनवादाचा धोका यावर त्यांनी समर्पक नेमकं भाषण केलं. विचारवेच्यांच्या उद्‌घाटनात त्या अध्यक्ष म्हणून सामील झाल्या. अध्यक्षीय भाषणात संवादाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. वार्षिक संमेलनात प्रेक्षक म्हणून त्या आवर्जून उपस्थित होत्या. विचारवेधला त्यांनी भरभक्कम आर्थिक मदतही मिळवून दिली.

2019 च्या मिळून...च्या वर्धापनदिनाला विद्यातार्इंच्या उपस्थितीत माझ्या पहिल्या पुस्तकाचं (हमरस्ता नाकारताना) प्रकाशन झालं, हा माझा मोठा भाग्ययोग होता. त्या दिवशी ‘इथून पुढे मी स्टेजवर नसेन, तर प्रेक्षकांत असेन’ असं त्या म्हणाल्या. मनात शंकेची पाल चुकचुकली. पण तशी शक्यता मन नाकारत होतं. त्यानंतर एका महिन्यात स्त्री सखी मंडळातर्फे त्यांच्याच सूचनेप्रमाणे या पुस्तकावर चर्चा आयोजित झाली. चर्चेमध्ये त्या स्वतः बोलल्या. या कार्यक्रमात माझ्या लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या नीना भेडसगावकरची त्यांना काळजी वाटत होती. कारण तिची खुर्ची व्यासपीठाच्या कडेला होती. ती उगीच धडपडत तर नाही ना, असा प्रश्न त्यांना सतावत होता. माझ्या पुस्तकावर महाराष्ट्र टाइम्ससाठी त्यांनी परीक्षण लिहिलं. माझ्या अंदाजानं त्यांनी लिहिलेले हे शेवटचं परीक्षण असावं. आम्हा सर्वांबद्दल त्यांना अतिशय आपुलकी आणि वडिलधाऱ्यांना असते तशी काळजी होती. म्हणून तर विद्यातार्इंच्यामागे निराधार झाल्याची भावना आम्हा सर्वांच्या मनात आहे.

गेली अनेक वर्षे स्वेच्छामरणाबद्दल त्या सातत्यानं बोलत होत्या. स्वेच्छामरणाचा विचार हा समृध्द आणि स्वावलंबी जगण्याचा विचार आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. ‘दिसो लागे मृत्यू परि न भिववू तो मज शके’ ही त्यांच्या आजोबांनी (साहित्यसम्राट न.चिं.केळकर यांनी) लिहिलेली अखेरची कविता त्यांच्या मनावर कोरलेली होती. आपल्या विचारातलं आणि व्यवहारातलं अंतर कायमचं मिटवून टाकत 30 जानेवारीला त्या मृत्यूला सामोरे गेल्या.

एक विधान मी जबाबदारीनं करू इच्छिते. परिवर्तनाच्या लढाईतलं विद्याताई स्त्रीतत्त्व होत्या. नेतृत्वाची जाणीव त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. पण त्या जाणिवेची रेषा लोभस होती. अंगीभूत ऋजुतेमुळे त्या जाणिवेचं तेज कधीच जाचक झालं नाही.

आरती प्रभूंची कविता मला आठवते. विद्यातार्इंची मैत्रीण शैलू ही कविता छान गात असे....

संपूर्ण मी तरू की, आहे नगण्य पर्ण

सांगेल राख माझी गेल्यावरी जळून...

कोणा फुले दिली मी, माळून कोण गेले

शेल्यावारी कुणाच्या असतील स्पर्श ऊन....

विद्याताई संपूर्ण तरू होत्या.

या तरूचं लिंग स्त्री होतं याचा आम्हाला अभिमान आहे.

सरिता आवाड, पुणे

Share on Social Media

गांधींचे गारूड । 7

सेवार्थ तत्पर

सुशीला नायर

संजीवनी खेर

डॉ.सुशीला नायर यांनी सेवाग्राम इथे एक लहानशी डिस्पेन्सरी 1944 मध्ये सुरू केली. काही दिवसांतच तिचे रूपांतर एका हॉस्पिटलमध्ये झाले. फक्त आश्रमातीलच नव्हे, तर संपूर्ण गावातील लोक त्याचा वापर करू लागले. कस्तुरबा हेल्थ सोसायटी म्हणून त्याचे काम 1964 मध्ये अधिक जोमाने सुरू झाले. गांधींच्या हत्येनंतर डॉ. सुशीला नायर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठात गेल्या. फरिदाबाद इथे क्षयरोग सॅनिटोरियम 1950 मध्ये सुरू केले. त्यानंतर राजकारणात प्रवेश केला. दिल्ली सरकारात 1952 ते 54 मध्ये त्या आरोग्यमंत्री बनल्या. दिल्ली विधानसभेत सदस्य आणि नंतर स्पीकर म्हणून काम पाहिले. केंद्रीय सरकारात 1962-67 पर्यंत त्या आरोग्यमंत्री होत्या. आरोग्यमंत्री असताना प्राथमिक सेवा केंद्रं काढण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांची किती कमतरता आहे, याची कल्पना आली. तिथल्या केंद्रासाठी डॉक्टरांचा तुटवडा होता. लालबहादूर शास्त्रींनी त्यांना ग्रामीण भागात वैद्यकीय कॉलेज काढायला उत्तेजन दिले.

सुशीला तशी तर गांधीजींच्या मांडीवर खेळली होती. एक वडिलधारं माणूस म्हणून ती त्यांच्याकडे पाहत होती. तिचे बंधू प्यारेलाल हे गांधीजींचे सचिव होते. घरात साधेपणाचे संस्कार होतेच; पण एखादी होतकरू बुध्दिवान तरुणी ह्या वयस्काच्या प्रभावाने सारं आयुष्य देशातील रुग्णसेवेत झोकून देईल, याची शक्यता किती होती? वास्तविक तेव्हाही आकर्षक, सुखी, वैभवशाली, आनंदी जीवन जगण्याच्या भरपूर संधी होत्या. देखण्या, हुशार सुशीलेचा जन्म तेव्हाच्या पाकिस्तानातल्या कुंझ गावातला. दिल्लीच्या लेडी हार्डिंग कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले. गांधी आणि कस्तुरबा यांच्या निकट सहवासात ती असे. त्यांची डॉक्टर म्हणूनच ती ओळखली जाई. वास्तविक ती काही फक्त गांधींचीच डॉक्टर नव्हती, तर संपूर्ण आश्रमाची डॉक्टर होती.

अगदी आईच्या कडेवरून ती गांधीजींना भेटायला गेल्याचे तिला स्वच्छ आठवत असे. कराचीला ते गेले असता, आईने तिला बरोबर नेले होते. तिला खरं तर गांधीजींना विनंती करायची होती की- त्यांनी प्यारेलालला घरी जायला सांगावे, विधवा आई नि भावंडांची काळजी घ्यावी. पण त्यांच्याशी बोलताना झाले भलतेच- तिने आपणहून त्यांच्या कामात सहभागी व्हायचे कबूल केले! बायकांनी अशा सभांना, कुणाला भेटायला जाणे घरच्यांना मुळीच पसंत नव्हते. गांधीजींनी छोट्या सुशीलाला उचलून मांडीवर घेतले आणि ते तिच्याशी खेळू लागले. तिला आठवत राहिले ते त्यांचे मायेने भरलेले डोळे. घर श्रीमंत नव्हते, पण अभावग्रस्तही नव्हते. मग सुखासीन आयुष्याचा ध्यास सोडून, उच्चशिक्षित असून साधेपणाने गरिबांच्या सेवेचा मार्ग तिने का निवडला? पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही तिने आरोग्यमंत्री म्हणून आपल्याकडील अनेक समाजोपयोगी कामे- जसे क्षयनिवारण, लसीकरण, खेडापाड्यांत आरोग्यसेवा- पोहोचवण्यासाठीचे अनेक प्रकल्प राबवले. वेगवेगळ्या खात्यांची धुरा सांभाळली.

हे सारे येते कुठून? अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे पटले, ते सर्व जीवन व्यापणारे ठरले. आजच्या पिढीला हे सांगूनही पटणे असंभव! पण हे घडले, असंख्यांच्या बाबतीत घडले. त्यांना या निर्णयाचा कधी पश्चात्ताप झाला नाही, की निर्धार बदलावासा वाटला नाही. ही किमया होती गांधी नावाच्या जादूगाराची! त्या विचाराने तरुणांनी लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला; पण मार्ग सोडला नाही. यशापयशाचा विचारही मनाला शिवला नाही.

फ्रेड ब्लूम ह्या पत्रकार-लेखकाला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत सुशीला नायर यांनी अनेक वादग्रस्त गोष्टींविषयी मोकळेपणाने निवेदन केले आहे. प्यारेलाल यांनी गांधींविषयक आठवणींचे खंड लिहिले आहेत. मला वाटते, गांधींच्या प्रत्येक क्षणाचे दस्तऐवजीकरण झालेले आहे ते अशा सहकाऱ्यांमुळे. या कामात सुशीला भावाला मदत करी. त्याच्या मृत्यूनंतर (1982) तिने ते काम पुढे नेले. ‘कस्तुरबा ए पर्सनल रेमिनेसेन्सेस’, ‘महात्मा गांधीज लास्ट इंप्रीझन्मेंट - द इनसाइड स्टोरी’ अशी पुस्तकं लिहिली. सारे जीवन अविवाहित राहून गांधीजींचे विचार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. फाळणीच्या काळात लोकांमध्ये सलोखा निर्माण करण्याच्या प्रयत्नात पुढाकार घेतला.

1942 मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनावेळी कस्तुरबांनी सभेला संबोधित करावे, असे ठरले होते. त्यांची प्रकृतीही फारशी ठीक नव्हती. म्हणून सुशीला नायर त्यांच्या डॉक्टर असल्याने त्यांना सोबतीला घेतले होते.

गांधीजींच्या उपवासाच्या काळात ती त्यांच्याबरोबर होती- खासकरून त्यांच्या अखेरच्या 21 दिवसांच्या उपवासात. तिने स्वत:ही पाच दिवसांचा उपवास एकदा केला होता. त्या अनुभवाबद्दल तिने म्हटलंय की, प्रथम दोन-तीन दिवस नॉशिया येतो, नंतर अशक्तपणा जाणवू लागतो आणि एक प्रकारचा संथपणा येत जातो. गांधीजी पाणी पीत नसत. पाण्याखेरीज माणूस फार दिवस तग धरू शकत नाही. पाण्यात थोडा लिंबाचा रस, चिमूटभर साखर वा मध वा फळांचा रस घेत असत. नुसते पाणी त्यांना जातच नसे. त्यामुळे दहाव्या-अकराव्या दिवशी त्यांची प्रकृती खूपच खालावली. तोल जाऊ लागला. सुशीलाने त्यांना त्यांच्या प्रकृतीची गंभीर अवस्था समजावली. सरकारचे लक्ष अन्याय्य वागणुकीकडे, दारूबंदीऐवजी दारू पिणाऱ्यांना संरक्षण देणे, देशातले दंगे न थांबवणे याकडे जाण्यासाठी उपवास होता; मरणाच्या वाटेवर जाण्यासाठी नव्हता. अखेर पाण्यात लिंबाचा रस नि साखर द्यायला सुरुवात केली अन्‌ त्यांची तब्येत सुधारली. या त्यांच्या उपवासाचा कस्तुरबांच्या मनावर खू्‌प ताण होता.

महादेवभाई नुकतेच वारले होते. तो धक्काही होताच. कस्तुरबांची तब्येत खराब झाली. सुशीला नायर आगाखान पॅलेसमध्ये सोबतीला होत्या. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीवेळी त्यांच्या शरीरात खूप पाणी झाल्याने वेळ लागत होता. तेव्हा लोकांनी गांधीजींना विश्रांतीसाठी आत यायला सांगितलं, तर ते म्हणाले, ‘‘आमची 60 हून अधिक वर्षांची साथ आहे. आता एवढ्यात तिला एकटी कशी सोडू?’’ ऐकणाऱ्याला हळवा करणारा हा क्षण होता. देशाच्या फाळणीनंतर ते फारच व्यथित झाले होते. तेव्हाही खरं काय, हे जाणून घेण्यासाठी ते हिंदू नि मुस्लिमांना विनवत होते. दोन्हीकडचे लोक घटनांचे अतिरंजित वर्णन देत होते. हल्ले-खून सुरू होतेच. रक्ताचे पाट वाहत होते. या वेळी गांधीजींचा उपवास अधिकच गंभीर होत होता. ते अशक्त झाले, हेलपाटत होते. शांत राहण्याचा, समजून घेण्याचा मार्ग कुणालाच पटत नव्हता. ‘मरू दे गांधींना!’ असे ऐकू येऊ लागले होते. पण चौथ्या दिवशी जेव्हा स्थिती फार गंभीर झाली; तेव्हा हिंदू, शीख व मुस्लिम लोक एकत्र आले. इतर नेत्यांनी लोकांमध्ये समझोता करायचा प्रयत्न केला. उपवासाचा 6-7 वा दिवस होता. गांधींनी सुचवले की- शस्त्रं खाली ठेवा, मुस्लिमाने एखाद्या अनाथ हिंदू मुलाला वा मुलीला आपल्या घरी न्यावे, त्याला चांगल्या हिंदूप्रमाणे वाढवावे; तसेच हिंदूने वा शिखाने दुसऱ्या धर्माच्या अनाथ मुलांना आपल्या मुलांप्रमाणे वाढवावे. मग लोक शांत झाले. या साऱ्या मनस्तापात गांधींचा जीव पणाला लागला होता.

त्याआधी 1944 मध्येही नथुरामने त्यांच्यावर चाकूने हल्ला करायचा प्रयत्न केला होता. त्या आरोपाची सुशीला नायर साक्षीदार होती. फाळणीनंतर सगळीकडे विव्देषाचे वातावरण तापले होते. त्या वेळी भवालपूरच्या नबाबांनी गांधीजींना पत्र लिहिले, ‘हिंदू, मुस्लिम प्रजाजन हे माझे दोन डोळे आहेत. हिंदू हा प्रदेश सोडून जाऊ इच्छित आहेत. तुम्ही त्यांना तसे न करण्याविषयी समजवा.’ पण त्याच वेळी शिखांनी कळवळून लिहिलं होतं की, ‘तिथे तसे सुरक्षित वातावरण मुळीच नाहीये. आम्ही इस्लाम कबूल केला तरच तिथे राहू शकतोय.’ त्यांनी त्यांच्या हलाखीचे अत्यंत भीतिदायक वर्णन केले होते. आता खरं काय? गांधीजी सुशीला नायरला म्हणाले, ‘‘यामागे सत्य काय, हे तू तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहून येऊन मला सांग.’’

ती आणि लेस्ली क्रॉस या क्वेकरपंथाच्या अध्यक्षांबरोबर मुलतानजवळच्या भवालपूरला गेले. जायला, राहायला नि परतायला एकेक दिवस- असा तीन दिवसांचा कार्यक्रम ठरला होता. तिथे गेले तर महाराज कराचीला गेले होते, ते दुसऱ्या दिवशी येणार होते. त्यांनी वाट पाहिली, पण तिसऱ्या दिवशीही त्यांचा पत्ता नव्हता, म्हणून परतायचा निर्णय घेतला. ते चहा घेत असताना डे.कमिशनरची पत्नी धावत येऊन, गांधींना गोळ्या घातल्याची बातमी सांगू लागली. सुशीलाला चैन पडेना. ‘ते बरे राहोत’ अशी प्रार्थना ती करू लागली. रात्रीच्या वेळी एक खास गाडी करून तिला कमिशनरने दिल्लीला गुपचूप रवाना केले. सारे वातावरण प्रचंड तणावाचे नि धोकादायक होते. रेडिओवर तिने जवाहरलालांचे भाषण ऐकले नि तिच्या मनाचा बांध फुटला. अखेर अहिंसक गांधींची हत्या गोळ्या घालून केली गेली. याअगोदरही अनेकदा प्रयत्न झाले होते, पण या वेळी ते यशस्वी झाले.

गांधीजींच्या नैतिक धैर्याची आणि तत्त्वनिष्ठेची परीक्षा फाळणीनंतरच्या काळात सतत होत होती. गांधींना आपल्याकडील अस्पृश्यतेच्या वागणुकीचे अत्यंत दु:ख होते. ते लोकांना सांगत की, ब्रिटिशांनी आपल्याशी न्यायाने वागावे असे का वाटते? आपण स्वत: आपल्याकडील लोकांना किती अमानुषपणे वागवतो. हे योग्य नाही. ते आंबेडकरांना म्हणाले होते की, तुम्हाला परंपरेने अस्पृश्य केले आहे. मी वेषभूषेने अस्पृश्यासारखा राहतो. त्या काळी अस्पृश्यांना कमरेच्या वर आणि गुढघ्याच्या खाली वस्त्रं नेसायची परवानगी नव्हती, म्हणूनच मी अल्पवस्त्र घालतो! पण लोकांना गांधींचे अस्पृश्यतेबाबतचे विचार अजिबात पटत नव्हते. ते संतापलेले होते. कुठे गांधी दिसले तर त्यांना ठोकू, असे बोलत असत. त्यांच्या ट्रेनचा डबा उडवून द्यायची योजना आखली गेली होती. त्यांच्या गाडीवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला गेला.

एकदा क्रोधाने धगधगणारा गर्दीचा लोंढा त्यांच्या मोटारीसमोर येऊन उभा राहिला. काचांवर धक्के मारत राहिला. ‘बाहेर या, म्हणजे दाखवतो!’ गाडीचा चालक घाबरला होता, तो जोराने गाडी चालवू लागला. मागच्या सीटवर सुशीला नायर होत्या. गांधींनी गाडीवानाला थांबायला सांगितले. ते शांतपणे बाहेर पडले. दंगेखोरांना शांत राहायला सांगितले. ‘‘मी तुमचे ऐकून घेणार आहे. सांगा- काय झालंय?’’ गांधीजींच्या शब्दांतली सच्चाई, प्रेम बोलण्यातून निथळत होतं. ते दंगेखोरांपर्यंत पोहोचलं. त्यांच्या उगारलेल्या लाठ्या खाली गेल्या. ‘‘आपण आपल्याच समाजातील लोकांना असे क्रूरपणे वागवतो, हे माणूस म्हणून तुम्हाला योग्य वाटतं का?’’ अगदी प्रेमळपणे ते बोलत होते. त्या समजावणीच्या स्वरांनी तो क्रुद्ध जमाव आश्चर्यकारकतेने शांत झाला. ज्यांनी काठ्या उगारल्या होत्या, त्यांनीच काठ्या आडव्या धरून जणू संरक्षक कवच तयार केलं.

अशीच घटना. फाळणीनंतर दिल्लीत आलेल्या मुस्लिमांनी गांधींकडे निवेदन केले की, त्यांचे खूप हाल होत आहेत. तुम्ही एकदा येऊन पाहा. तेव्हा ही मंडळी पुराना किला नि जुन्या किल्ल्याच्या भागात आश्रयाला राहत होती. त्यांना पाहायला गांधी जाणार म्हटल्यावर इतर लोक चिडले. त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गांधीजी शांतपणे बाहेर आले. उभे राहिलेल्यांचाच आधाराने गाडीतून बाहेर पडले. आपुलकीने त्यांच्याशी बोलू लागले. ‘‘त्यांच्याऐवजी आमच्याशी बोला, आमची स्थिती चिंताजनक आहे.’’ असे कानांवर आले. ‘‘सर्वांचीच विचारपूस करतो’’ म्हणत ते जाऊ लागले. गाडीऐवजी पायीच लोकांत फिरायचा निश्चय त्यांनी केला.

सर्वच निर्वासित वस्त्यांची स्थिती करुणाजनक होती. बायका रस्त्यावरच बाळंत होत होत्या. जखमींवर इलाज होत नव्हते. अन्न, औषधं, निवारा- साऱ्याचीच कमतरता होती. गांधीजी सुशीलाकडे वळून तिला विचारले, ‘‘तू करशील या लोकांना मदत?’’ सर्व जण म्हणाले, ‘‘नको, फार वाईट लोक आहेत. तरुण मुलीला एकटं पाठवू नका.’’ सुशीलाला मुळीच भीती वाटत नव्हती. तिने आपली वैद्यकीय साधनं घेऊन तिथे जाऊन मदतकार्य सुरू केले. जे विरोध करती, तेच तिचे संरक्षक बनले. जखमींना, नवजात बाळांना वाचवणे ही एक तारेवरची कसरत होती. ती वाचली, तरच लोकांचा विश्वास बसला असता. पण देवानेही मदत केली. तिच्या हातांना यश येत गेलं.

गांधी प्रत्येकाला वेगवेगळ्या पातळीवरून हाताळत. नेहरूंशी बोलताना वेगळी भाषा, इतर सामान्य शेतकऱ्याशी वेगळ्या भाषेत बोलत. त्यांच्या मनातील निर्मळ भाव समोरच्यापर्यंत सहज पोहोचत असे. नौखालीतही सुशीलाने हाच अनुभव घेतला. अत्यंत धोकादायक, भीतिमय वातावरणातही तिने माणुसकीने केलेले काम समजून घरातल्या पोरीबाळीसारखे लोकांनी तिचे रक्षण केले, तिला मदत केली. हा गांधीजींनी दिलेल्या निर्भय वागण्याचा परिणाम होता. आध्यात्मिक प्रभावही म्हणता येईल, जो अगदी पारदर्शकपणे थेट लोकांपर्यंत जात होता. ते इतरांनाही उच्च पातळीवर सहज घेऊन जात नि निर्मळतेने वागायला लावत. कुठलेही दडपण न आणता लोकांना सहज साध्य होईल अशी कामं पाहता-पाहता जगड्‌व्याळ होत. हाच त्यांचा करिष्मा होता.

सुशीलाने नोंदवलंय, ‘गांधीजी हे तरुणांसाठी आदर्श वडिलधारे होते. ते आमच्याशी वाद घालत, आम्हाला गप्प करीत नसत. हिटलरपेक्षा ब्रिटिश बरे, असे त्यांचे मत होते. त्यांच्याविरुध्द आपण लढत असलो तरी, ते विचार समजावून घ्यायला तयार असतात. ते ढोंगी नाहीत, लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे; जो हिटलरचा नव्हता. त्यांच्याशी बोलून तरुणांचे विश्व विस्तारत असे.’ सुशीला नायर यांच्या मते, गांधीजींनी स्त्रियांसाठी वेगळे असे काही केले नाही. ह्या संस्कृतीतीलच विचार त्यांनी मांडले, फक्त समानतेच्या पातळीवर नव्हे, तर त्यांच्या मते स्त्रिया या उच्च पातळीवर आहेत हे पटवून देऊन. त्या समर्थ आहेत नि राजकारणात तत्त्वनिष्ठा, त्याग, समर्पण आणू शकतात, हे दाखवून दिले. आपल्या माणसांसाठी त्रास सहन करायची अहिंसक ताकद स्त्रियांत असते, असे त्यांचे मत होते नि स्त्रीमधील ही ताकद जाणून मी अधिकाधिक स्त्री होतो, असे ते म्हणत. स्वत:ला त्रास करून घेऊन इतरांना सत्याची बाजू समजावून द्यायची शक्ती स्त्रियांत असते. माया, ममता, संगोपन, सेवा हे गुण स्वाभाविकपणे त्यांच्यात असतात. त्या गोष्टींनी त्यांचे शोषण होऊ न देता त्यासाठी ठामपणे उभे राहण्याची शक्ती जागी झाल्यानेच त्यांनी राष्ट्रकार्यात आपले योगदान दिले. हक्काच्या अगोदर त्यांनी कर्तव्य केले नि आपले वेगळेपण सिध्द केले.

पुरुषाने हे जाणून स्त्रियांशी बरोबरीच्या नात्याने वर्तन केले; स्वच्छ-निरामय-वासनारहित व्यवहार केला, तर तो त्यांच्यातील उत्तम गुणांना बाहेर काढू शकेल. त्यांच्या ब्रह्मचर्याच्या कल्पनेमागे हीच दृष्टी होती. स्त्रियांवरील अनेक बंधनांविरुध्द त्यांनी अनेकदा आवाज उठवला होता. खास करून बालविवाह, विधवांची स्थिती इत्यादी सामाजिक-वैयक्तिक गोष्टींबाबत त्यांचे विचार क्रांतिकारक होते. सकारात्मक विचार, नैतिकतेचा विचार, सत्याची कास या गोष्टींनी माणसाचे आध्यात्मिक उन्नयन करण्यावर त्यांचा भर होता. माणसातले हीनत्व त्यामुळे गळून जात असे. तुमच्यातील सद्‌विचारांचे, आचरणाचे पडसाद तुमच्या भोवतीच्या कार्यक्षेत्रावरही पडतात. कर्तव्यनिष्ठ माणूस घरदार, राजकारणच नव्हे तर सर्वत्र तसाच वागतो. राजकारण हे बदमाषांचे क्षेत्र समजले जाई, तर गांधींनी ते सर्वहिताचे केले. पुढे ते बदलत गेल्याने त्यांनी ‘पक्षच बरखास्त करावा’ असे सुचवले होते.

सुशीला नायर यांनी गांधीजींचे बोलणे, वागणे जवळून पाहिले होते. त्यांच्याशी विज्ञानाबाबतही वाद घातले होते. कस्तुरबांचा लाघवी सहवासही त्यांना लाभला होता. स्वातंत्र्यानंतर त्यांनी नव्या सरकारात महत्त्वाची पदे भूषवली. नव्याने स्थापित लोकशाहीत मंत्रिपदी जाऊन लोकहिताची अनेक कामे केली. वैद्यकीय संस्था स्थापन केल्या, सामान्य लोकांना वैद्यकीय सेवा योग्य प्रकारे मिळाव्यात यासाठी शासनात रचनात्मक पाया घातला.

वास्तविक 1944 मध्ये डॉ.सुशीला नायर यांनी सेवाग्राम इथे एक लहानशी डिस्पेन्सरी सुरू केली. काही दिवसांतच तिचे रूपांतर एका हॉस्पिटलमध्ये झाले. फक्त आश्रमातीलच नव्हे. तर संपूर्ण गावातील लोक त्याचा वापर करू लागले. कस्तुरबा हेल्थ सोसायटी म्हणून त्याचे काम 1964 मध्ये अधिक जोमाने सुरू झाले. गांधींच्या हत्येनंतर डॉ.सुशीला नायर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठात गेल्या. फरिदाबाद इथे क्षयरोग सॅनिटोरियम 1950 मध्ये सुरू केले. त्यानंतर राजकारणात प्रवेश केला. दिल्ली सरकारात 1952 ते 54 मध्ये त्या आरोग्यमंत्री बनल्या. दिल्ली विधानसभेत सदस्य आणि नंतर स्पीकर म्हणून काम पाहिले. त्या केंद्र सरकारात 1962-67 पर्यंत आरोग्यमंत्री होत्या.

आरोग्यमंत्री असताना प्राथमिक सेवा केंद्रं काढण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांची किती कमतरता आहे, याची कल्पना त्यांना आली. तिथल्या केंद्रांसाठी डॉक्टरांचा तुटवडा होता. लालबहादूर शास्त्रींनी त्यांना ग्रामीण भागात वैद्यकीय कॉलेज काढायला उत्तेजन दिले. ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी राष्ट्रीय आणि प्रांतीय पातळीवर त्यांनी प्रयत्न केले. कुष्ठरोग नि क्षयरोग यासारख्या आजारांवर उपचारांसाठी सेवाग्राममध्ये विभाग सुरू केले. गांधीजींच्या विचाराला पूरक असेच काम त्यांनी उभारले.

संजीवनी खेर, मुंबई

sanjeevanikher@gmail.com

Share on Social Media

जगण्याचे भान : 6

बाबा, मी आहे ना!

डॉ. दिलीप शिंदे

वेळेच्या बाबतीत काटेकोर असणे, हा त्यांचा गुणविशेषच त्यांच्या बाबतीत त्यांची मर्यादा ठरला. त्यांचे पाहूनच मीही काटेकोरपणे वेळ पाळायला शिकलो आहे व समोरच्या-कडूनही तशी अपेक्षा ठेवतो. पण त्याच्यावर कधी सक्ती करत नाही. माझे बाबा मात्र समोरच्यावर लगेच आगपाखड करायचे. त्यामुळे त्यांना फारसे कुणी जिवलग मित्रही जोडता आले नाहीत. त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या हाताखाली काम करणारे दोघे-चौघे हेच त्यांचे मित्र होते. त्यामुळे बाबांच्या स्वभावातला हा अलिप्तपणा आणि त्यातून त्यांच्या वाट्याला आलेला एकटेपणा- यातून मी हे शिकलो की, नात्यांची जपणूक ही जबाबदारीची गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याकडे विनाशर्त स्वीकारण्याची तयारी हवी आणि ही गोष्ट लक्षात आल्यावर मी सर्वांत प्रथम माझ्या बाबांनाच आहे तसे स्वीकारायचे ठरविले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांतील त्यांचा एकटेपणा थोडाफार कमी करू शकलो.’’

एक बाप आपल्या मुलाच्या लहानपणी त्याला आपली प्रत्येक गोष्ट सक्तीने ऐकायला लावतो; तोच बाप आपल्या म्हातारपणी मात्र आपल्या मुलाची प्रत्येक गोष्ट आज्ञाधारकपणे ऐकू लागतो. हा त्यांच्या भावनिक स्थित्यंतराचा प्रवास समजून घेणे कुतूहलाचे नाही का? विशेष म्हणजे म्हातारपणीही ते फक्त आपल्या मुलाचेच तेवढे आज्ञाधारकपणे ऐकायचे, बाकी कोणाचीही सक्ती त्यांच्यावर चालायची नाही. आयुष्यभर ते ‘माझं तेच खरं’ या वर्चस्ववादी भूमिकेने जगले होते. त्यामुळे त्यांना फारसे कोणी जिवाभावाचे सोबतीही लाभले नव्हते. आयुष्याच्या शेवटी-शेवटी त्यांना केवळ आपल्या मुलाशी तेवढी मैत्री करणे जमले होते. लहानपणी जसे प्रत्येक मुलासाठी आपले वडील हे रोल मॉडेल असतात, तसे म्हातारपणी त्यांना आपला मुलगा आपले रोल मॉडेल वाटू लागला होता. आपल्या मुलाबद्दल त्यांना अपार कौतुक आणि अभिमान वाटत होता. त्यामुळेच डिमेन्शियाने स्मृती धूसर झाल्यावरही ते शेवटपर्यंत आपल्या मुलाला तेवढे प्रतिसाद देत होते.

जवळपास चार वर्षांपासून त्यांना डिमेन्शियाचा त्रास सुरू झाला होता. पण अलीकडच्या सहा महिन्यांत मात्र तो अधिक वाढला होता. छोट्या-छोट्या गोष्टीही ते विसरू लागले होते. तसेच किरकोळ कारणांवरूनही ते लगेच अस्वस्थ व्हायचे आणि चिडचिड करायचे. तीन-चार महिन्यांपूर्वी एकदा त्यांचा मुलगा मला भेटून संवेदना शुश्रूषा केंद्राबाबत माहिती घेऊन गेला होता. पण तेव्हा ते हिंडते-फिरते असल्यामुळे जितके दिवस शक्य आहे तितके दिवस घरीच त्यांची सेवाशुश्रूषा करण्याचे मुलाने ठरविले होते, कारण आम्ही आमच्याकडे शक्यतो अंथरुणावर खिळलेल्या वृध्दांनाच सेवाशुश्रूषेसाठी भरती करून घेतो. गेल्या आठवड्यात मात्र त्यांना पॅरालिसिसचा झटका आल्यामुळे तातडीने एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. त्या वेळी इथून पुढे त्यांना आता अंथरुणावरच खिळून राहावे लागणार, ही गोष्ट मुलाच्या लक्षात आली. त्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुलाने त्यांना सेवाशुश्रूषेसाठी आमच्याकडे भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे सायंकाळी चार-पाचच्या सुमारास तो त्यांना आमच्याकडे घेऊन आला. सोबत त्याची आई व बहीणही होती. भरती करून झाल्यानंतर तो माझ्या केबिनमध्ये मला भेटायला आला.

‘‘माझे वडील खूप हट्टी आहेत डॉक्टर. त्यांच्या मनाविरुध्द वागले की, ते लगेच आरडाओरडा व त्रागा सुरू करतात. त्यांच्यावर कोणी सक्ती केलेली त्यांना चालत नाही. तुमच्या स्टाफला थोडं त्यांच्या कलाने वागायला सांगा.’’ मुलगा अजीजीच्या सुरात म्हणाला.‘‘कोणताही नवा वृध्द भरती झाला की, त्यांचा अंदाज यायला आम्हाला एक-दोन दिवस लागतात. मी लक्ष देतो. तुम्ही काळजी करू नका. रात्री त्यांना झोप कशी लागते?’’ ‘‘झोपेसाठी त्यांना एक गोळी सुरूच आहे, पण तिचा फारसा उपयोग होत नाही. तिकडे हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ त्यांचे हात बांधूनच ठेवले होते. नाही तर सारखे बेडवरून खाली यायचा प्रयत्न करायचे. त्यामुळे ते खाली पडणार नाहीत, याची सतत दक्षता घ्यावी लागते.’’

‘‘गरजेनुसार आम्हीही रात्री हाताला रिस्टनर किंवा छातीला चेस्टगार्ड बांधतच असतो. बघू या- काही आवश्यकता वाटल्यास तुमच्याशी संपर्क करतो.’’ मी त्याला धीर देत म्हणालो. माझे आभार मानून तो निघून गेला.

त्या दिवशी पहिल्याच रात्री आठच्यादरम्यान जेवण भरविताना आजोबांनी दंगा सुरू केला. मी सी.सी. टीव्ही कॅमेऱ्यातून सर्व प्रकार पाहत होतो. दोन सिस्टर, दोन मावश्या त्यांच्याभोवती जमून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होत्या, पण ते जेवायला तयार नव्हते. बेडवरून खाली उतरण्याचा प्रयत्न सतत करत होते. सिस्टरनी अडवायचा प्रयत्न केला, तर पाय झाडत त्यांना लाथा मारू लागायचे. मग मी स्वतः त्यांच्या रूममध्ये गेलो.

‘‘काय झाले आहे आजोबा?’’ मी त्यांना प्रेमाने विचारले.

‘‘मला कुठे काय झाले आहे? हे तुमचे लोकच माझ्यावर जेवणासाठी सक्ती करत आहेत.’’ ते माझ्याशी व्यवस्थित बोलू लागले. कदाचित माझ्या गळ्यातील स्टेथास्कोपमुळे त्यांनी मला डॉक्टर म्हणून ओळखले असावे. मी सिस्टर्स आणि मावश्यांना खुणेनं त्यांच्यापासून बाजूला जायला सांगितले.

‘‘तुमचे तुम्हाला हाताने जेवण करायचे आहे का?’’ मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत विचारले.

‘‘नाही, मला इथे जेवायचेच नाही. मला माझ्या घरी जायचे आहे.’’ ते हात नाचवीत म्हणाले.

‘‘तुम्हाला बरे वाटू लागल्यानंतर घरी जायचे. आता खूप रात्र झाली आहे. जेवण करून औषध घ्या आणि झोपा.’’ मी त्यांना समजावीत म्हणालो. ‘‘तुम्हाला तुमच्या मुलाशी बोलायचे आहे का? मी तुम्हाला फोन लावून देतो.’’ असे म्हणत मी माझ्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन लावला. त्याला घडलेला सर्व प्रकार थोडक्यात सांगितला व त्यांची समजून काढायला सांगत फोन आजोबांच्या हातात दिला.

‘‘काय झाले आहे बाबा?’’ मुलाने आपुलकीने विचारले.

‘‘अरे, तू मला इथे एकट्याला सोडून कुठे गेला आहेस?’’ ते त्रासिकपणाने म्हणाले.

‘‘मी आता घरी आलो आहे. उद्या सकाळी तुम्हाला भेटायला येतो. तुम्ही आता जेवण करा आणि औषध घ्या बघू.’’

‘‘पण मला इथे जेवायचे नाही.’’

‘‘असे नका करू बाबा. तुम्हाला लवकर बरे व्हायचे आहे की नाही? मग तुम्हाला वेळेवर जेवण आणि औषधं घ्यायला हवीत. तुम्ही माझे ऐकणार आहात की नाही?’’

‘‘ठीक आहे. तू सांगतो आहेस म्हणून जेवतो. पण उद्या सकाळी लवकर ये.’’ आजोबा समजूतदारपणे म्हणाले. मुलाचा परिचित आवाज ऐकल्यामुळे ते आता बऱ्यापैकी शांत झाले होते. विशेष म्हणजे, त्यानंतर ते व्यवस्थितपणे स्वतःच्या हातांनी जेवले. सिस्टर्सनी दिलेली औषधे घेतली. मी सिस्टर्सना गर्दी करून त्यांच्यासमोर न जाण्याचा सल्ला दिला आणि परत माझ्या केबिनमध्ये आलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा त्यांना भेटायला आला. त्या वेळी त्यांनी आपल्या मुलाशी व्यवस्थित गप्पा मारल्या, पण नर्सिंग स्टाफला मात्र ते अजिबात सहकार्य करत नव्हते. त्यामुळे त्यांची शुश्रूषा करताना आम्हाला अनेक अडचणी येत होत्या. एकदा तर त्यांना जेवण भरविताना त्यांनी एका सिस्टरचे चक्क बोटच चावले. मी त्यांच्या मुलाशी सविस्तर चर्चा केली. शेवटी आम्ही मानसोपचारतज्ज्ञांना व्हिजिटला बोलावून त्यांचा सल्ला घ्यायचा ठरविले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी मानसोपचारतज्ज्ञ येऊन त्यांना तपासून औषध देऊन गेले. पण त्यांच्या ट्रीटमेंटमुळेही त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. दिवसेंदिवस ते अधिकच व्हायोलंट होऊ लागले.

त्यांचा मुलगा नियमितपणे त्यांना भेटायला यायचा. त्याच्याशी मात्र ते अगदी व्यवस्थित बोलायचे. त्यांची पत्नी आणि मुलगीही त्यांना अधून-मधून भेटून जायची. विशेषतः दिवसभर ते शांत असायचे. पण रात्री जेवणाची वेळ झाली की, त्यांचा दंगा सुरू व्हायचा, तो मग रात्रभर सुरू असायचा. पुढे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली. त्यांनी जेवण घेणेही कमी केले होते. नंतर-नंतर जेवणाचा घास बराच वेळ तोंडात धरून बसायचे. कितीही आग्रह केला तरी घास लवकर गिळायचे नाहीत. त्यांना घास व्यवस्थित गिळता येत नाही, की ते मुद्दाम घास गिळत नाहीत, अशी मला शंका येऊ लागली. त्यासाठी आम्ही नाक, कान, घसा तज्ज्ञांचाही सल्ला घेतला. पण त्यांच्या घशात काही दोष नसल्याचे लक्षात आले. अतिशय शिस्तबध्द आणि काटेकोर आयुष्य जगलेल्या या आजोबांना असे परावलंबी जगणे नकोसे झाले असावे. म्हणून कदाचित ते जेवण घ्यायला विरोध करत असावेत, असे मला वाटत होते. त्यांचा मुलगा त्यांना भेटायला आला की, खाण्याचा आग्रह करायचा आणि ते आपल्या आग्रह करणाऱ्या मुलाकडे डोळे भरून पाहत राहायचे. त्या वेळी त्यांचे डोळे आपल्या मुलाबद्दलच्या प्रेमाने व आपुलकीने काठोकाठ भरलेले असायचे. त्यांच्यातील हे बाप-लेकाचे अनोखे नाते पाहून मला त्या दोघांचेही खूप कौतुक वाटायचे.

एके दिवशी दुपारी त्यांना अचानक हुडहुडी भरली आणि त्यांचे अंग तापाने फणफणले. त्यांना युरिन इन्फेक्शन झाले असावे, अशी मला शंका आली. मी त्यांच्या मुलाशी चर्चा करून त्यांना परत हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला सांगितले. तिथे ॲडमिट केल्यावर दोन-चार दिवसांत त्यांचा ताप कमी झाला, पण प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. त्यातच त्यांना न्यूमोनियाची लागण झाली. छातीत कफ झाल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यासाठीही औषधोपचार सुरू केले. पण ते आता उपचारांना फारसा प्रतिसाद देईनात. शेवटी आठ-दहा दिवसांनंतर त्यांच्या मुलाने त्यांना पुन्हा आमच्या शुश्रूषा केंद्रात शिफ्ट केले. त्या वेळी त्यांच्या नाकात नळी घातलेली होती. त्याद्वारेच त्यांना द्रव आहार व औषधं सुरू होती.

‘‘बाबांचे हे हाल मला बघवत नाहीत डॉक्टर. आयुष्यभर ते बाणेदारपणे जगले आहेत. आता त्यांना अशा अवस्थेत पाहवत नाही.’’ मुलगा कासावीस होऊन म्हणाला.

‘‘शक्य होते ते सर्व प्रयत्न करून झाले आहेत. आता केवळ शुश्रूषा करत राहणे, इतकेच आपल्या हातात आहे.’’ मी त्याची समजूत काढत म्हणालो.

आमच्याकडे शिफ्ट केल्यानंतर दोन दिवसांनी ते आजोबा गेले. शेवटपर्यंत ते आपल्या मुलाला प्रतिसाद देत होते आणि त्यांचा मुलगा त्यांना ‘बाबा, मी आहे ना!’ असे म्हणत धीर देत होता. स्ट्रेचरवर ठेवलेला त्यांचा निश्चेष्ट मृतदेह पाहून त्यांच्या मुलासोबतच माझे व शुश्रूषा केंद्रातील सर्वांचेच डोळे पाणावले. जवळपास दोन महिने त्यांनी आपल्या खणखणीत आवाजाने आमचे शुश्रूषा केंद्र दणाणून सोडले होते.

पुढे आठ-दहा दिवसांनंतर त्यांचा मुलगा भेटायला आला.

‘‘तुमच्या शुश्रूषा केंद्राची खूप मदत झाली. घरी आम्हाला त्यांची अशी व्यवस्था करणे जमले नसते. पण माझ्या बाबांमुळे तुमच्या नर्सिंग स्टाफला मात्र बराच त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल मी तुमच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो.’’ तो ओशाळल्या स्वरात म्हणाला.

‘‘अहो, असे काही मनात आणू नका. आमचे हे कर्तव्यच आहे.’’ मी त्याला अडवीत म्हणालो. ‘‘मला तुमच्या बाप-लेकाच्या नात्याबद्दल जाणून घेण्याविषयी खरंच खूप जिज्ञासा आहे. तुमची हरकत नसेल, तर मला थोडं सविस्तरपणे सांगाल का?’’

‘‘अगदी आनंदाने सांगेन डॉक्टर. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही; पण ते इतके हेकेखोर होते तरीही माझे आणि माझ्या बाबांचे आयुष्यात एकदाही कडाक्याचे भांडण झाले नाही. अगदी अलीकडे या आजारपणाच्या निमित्ताने मी एक-दोन वेळा त्यांच्यावर थोडे ओरडलो असेल तर, तेवढेच. पण आमच्यात कधी मतभेद झाल्याचे मला आठवत नाही. जशी त्यांना शिस्त आवडायची तशी मलाही आवडते. ती त्यांच्या रक्तातूनच माझ्यात आली असावी. त्यामुळे त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता.’’ तो भावुक होऊन सांगू लागला.

‘‘माझ्या बाबांचे बालपण हलाखीत गेले होते. त्यामुळे आयुष्यभर ते चिकाटीने वागले. एखादी गोष्ट ठरवली म्हणजे ती तशीच झाली पाहिजे, असा त्यांचा अट्टहास असे.’’

‘‘त्यांच्या डिमेन्शियाबाबत तुमच्या कधी लक्षात आले?’’

‘‘चार वर्षांपूर्वी लक्षात आले. दोन वेळा त्यांनी हॉलमध्ये लघवी केली. त्याबद्दल त्यांना विचारले तर, ‘हे कोणी केले आहे, मला माहीत नाही’ म्हणून सांगितले. त्यानंतर आम्ही त्यांना दवाखान्यात दाखविले, पण आपल्याला काही समस्या आहे किंवा आपण काही गोष्टी विसरतो आहोत, हेच ते मान्य करायचे नाहीत. त्यामुळे खिशात पत्ता असूनही रस्ता चुकला तरी ते लोकांना काही विचारायचे नाहीत. खूप वेळ भटकत राहायचे. मग आम्ही त्यांना शोधून आणायचो. काही कामानिमित्त बाहेर गेल्यावरही तेथील लोकांशी किरकोळ गोष्टीवरूनही वाद घालायचे.’’

‘‘हा सर्व त्यांच्या आजाराचा भाग झाला. पण तुमच्यावर जो त्यांचा विशेष लोभ आणि भरवसा होता, त्याबद्दल सांगाल का?’’

‘‘डॉक्टर, मला असे वाटते की, माणसाला आपल्या गुणावगुणांसह स्वीकारणारा एक तरी माणूस हवा असतो. माझ्या बाबांच्या बाबतीत कदाचित तसा मी होतो. त्यांच्यासारखाच माझा स्वभावही शिस्तप्रिय व काटेकोर असल्याचा त्यांना अभिमान वाटायचा आणि तरीही मी सर्वांशी जुळवून घेऊ शकतो, याचे त्यांना कौतुक वाटायचे. ते मला तसं कधी कधी बोलूनही दाखवायचे. त्यांना मात्र आपल्या शिस्तप्रिय स्वभावाला व्यावहारिकतेची जोड देता आली नव्हती. त्यामुळे वेळेच्या बाबतीत काटेकोर असणे, हा त्यांचा गुणविशेषच त्यांच्या बाबतीत त्यांची मर्यादा ठरला. त्यांचे पाहूनच मीही काटेकोरपणे वेळ पाळायला शिकलो आहे व समोरच्याकडूनही तशी अपेक्षा ठेवतो. पण त्याच्यावर कधी सक्ती करत नाही. माझे बाबा मात्र समोरच्यावर लगेच आगपाखड करायचे. त्यामुळे त्यांना फारसे कुणी जिवलग मित्रही जोडता आले नाहीत.

त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या हाताखाली काम करणारे दोघे-चौघे हेच त्यांचे मित्र होते. त्यामुळे बाबांच्या स्वभावातला हा अलिप्तपणा आणि त्यातून त्यांच्या वाट्याला आलेला एकटेपणा- यातून मी हे शिकलो की, नात्यांची जपणूक ही जबाबदारीची गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याकडे विनाशर्त स्वीकारण्याची तयारी हवी आणि ही गोष्ट लक्षात आल्यावर मी सर्वांत प्रथम माझ्या बाबांनाच आहे तसे स्वीकारायचे ठरविले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांतील त्यांचा एकटेपणा थोडाफार कमी करू शकलो.’’ तो समाधानाने म्हणाला. मृत्यूप्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांवर सही-शिक्का घेऊन पुन्हा एकदा माझे आभार मानून त्याने निरोप घेतला.

आपल्या लहानपणी वडिलांनी आपल्याला कसे स्वातंत्र्य दिले नाही, हे हिरिरीने सांगणारी आणि प्रसंगी त्यांचा पाणउताराही करणारी अनेक मुले आपण आपल्या अवतीभोवती पाहतच असतो. पण आपल्या हट्टी व हेकेखोर पण शिस्तप्रिय वडिलांना प्रेमाने समजून घेणाऱ्या आणि भावनिक आधार देणाऱ्या या मुलाच्या समंजसपणाचे मला कौतुक वाटले.

वृध्दापकाळी जीवशास्त्रीय बदलांमुळे तसेच मेंदूच्या पेशींचा ऱ्हास झाल्याने अनेक वृध्दांना मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी त्यांच्या मुलांनी आणि कुटुंबीयांनी त्यांना असाच ‘मी आहे ना’ म्हणून प्रेमाने आधार द्यायला हवा.

डॉ. दिलीप शिंदे, विश्रामबाग, सांगली

Share on Social Media

प्रतिसाद

महत्त्वाच्या प्रसंगी मन मोठे केले पाहिजे!

दि. 28 डिसेंबरच्या साधनाचे संपादकीय ‘हमीद दलवार्इंना अधिक मोठे कसे करता येईल?’ वाचले. 18 एप्रिल 1966 रोजी हमीद दलवार्इंनी मुंबईहून काढलेल्या सात मुस्लिम स्त्रियांच्या (जबानी तलाकला विरोध व समान नागरी कायद्याची मागणी करणाऱ्या) ऐतिहासिक मोर्चाचा मी साक्षीदार आहे. तो मोर्चा काळ्या घोड्याजवळ असलेल्या ठिकाणाहून विधानसभेवर गेला तेव्हा श्रीमती कमर अहमद या काँग्रेसच्या आमदार सामोऱ्या गेल्या होत्या, फार थोडे लोक उपस्थित होते.

दलवार्इंना ‘साधना’ने व तत्कालिन समाजवादी परिवाराने मोठा व नैतिक पाठिंबा दिला होता. दलवाई व नरहर कुरुंदकरांनी त्या काळात मुस्लिम समाजसुधारणा, हिंदू समाजाचे आधुनिकीकरण व दोहोंचा परस्परसंबंध यांवर लेखन केले होते, ते साधनामध्ये प्रसिध्द होत असे. सगळ्याच समाजाचे प्रबोधन करणारे ते लेखन होते.

1966 मध्ये दलवाई काळाच्या पुढे होते. दलवार्इंच्या नेतृत्वाखालील मोर्चाच्या मागण्यांपैकी जबानी तलाकबंदीला 2018 साल उजाडावे लागले. असे का झाले? याला जबाबदार काँग्रेस तर होतीच, पण त्याचबरोबर प्रस्थापित पुरोगामी/प्रागतिक पक्षही (डावे पक्ष, समाजवादी व तत्सम पक्ष) तितकेच जबाबदार होते. कुठलीही समाजसुधारणा होण्यासाठी सरकारला अनिष्ट प्रथांमध्ये (हे सर्व धर्मांना लागू) हस्तक्षेप करावा लागतो व योग्य ते कायदे करावे लागतात. ही गोष्ट सुमारे दोनशे वर्षांपूर्वी झालेल्या सतीप्रथाबंदीपासून दिसून आली आहे. मात्र वर उल्लेखिलेल्या सर्व पक्षांनी व त्यांच्या सरकारांनी मुस्लिम मतांच्या लोभापायी असा हस्तक्षेप करणे टाळले. यामुळे सेक्युलॅरिझमचे पाऊल पुढे पडले नाही, आणि मुस्लिम स्त्रियांवरील अन्याय चालूच राहिला. याचा भाजपचा फायदा झाला. भाजपने आता झपाट्याने तिहेरी तलाकबंदीचा कायदा करून टाकला, यात भाजपचा प्रामाणिकपणा किती वगैरे शंका घेऊन त्या कृतीचे महत्त्व कमी करणे हे राजकारण झाले.

उद्या समान नागरी कायदा हा विषय भाजप सरकार हाती घेईल, त्यावेळी अन्य पक्षांची पंचाईत होणार हे निश्चित. या पक्षांकडून फार अपेक्षा नाहीत, पण भाजपचे मात्र फावणार. समान नागरी कायदा हे प्रकरण जबानी तलाक बेकायदा ठरविण्याइतके सोपे नाही, त्यावर सखोल चर्चा-विचार करावा लागेल. सर्व धर्मांच्या रूढ कायद्यांचा, प्रगत देशांतील समान नागरी कायद्यांचाही अभ्यास करावा लागेल. मग सर्वसंमत एकमताचा मार्ग काढावा लागेल. समान नागरी कायद्याच्या विरोधातील सर्वांना विचारात घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन, त्यांची खात्री पटवून तो कायदा करावा लागेल. परस्पर सदिच्छा व विश्वास या बळावर हे करता येईल. वेळ लागेल, पण अशक्य नाही. कुठेतरी सुरुवात करावीच लागेल.

परकीय आक्रमणावेळी जसे आपण एक होतो, तसेच महत्त्वाच्या समाजसुधारणा करताना पक्षभेद विसरून आपले योगदान दिले पाहिजे. राजकारण तर करायचेच आहे, पण अशा महत्त्वाच्या प्रसंगी मन मोठे केले पाहिजे.

म. मो. पेंडसे, मुंबई

दलवार्इंना अधिक मोठे करण्यासाठी या मर्यादावर मात केली पाहिजे!

‘हमीद दलवार्इंना अधिक मोठे कसे करता येईल?’ हे 28 डिसेंबरच्या अंकातील संपादकीय वाचले. ‘हमीदभार्इंना अधिक मोठे करायचे असेल तर त्यांचे विचार, कार्य समजावून घेऊन त्याचा प्रसार केला पाहिजे, हिंदू आणि मुस्लिम धर्मात जन्मास आलेल्या विचारवंत-सुधारकांच्या तुलनेत दलवार्इंचा विचार किती व कुठे प्रागतिक आहे, हे पुढे आणले पाहिजे. मुस्लिम धर्मात जन्मास आलेल्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांची दखल व ओळख करून घ्यावी लागेल. आपले विचारही सतत अद्ययावत ठेवले पाहिजेत;’ हे दलवार्इंना अधिक मोठे करण्यासाठी प्रामुख्याने मांडलेले संपादकीयातील विचार पूर्णतः मान्य आहेत. पण प्रश्न असा आहे की, दलवार्इंना अधिक मोठे करण्याची आपली क्षमता/तयारी किती आहे. संपादकीय वाचल्यानंतर डॉ.दाभोलकरांच्या ‘समता-संगर’ पुस्तकातील सुनील देशमुखांच्या ‘शबनम आणि चोपडीपलीकडे’ या 1998 मधील पत्राचे सहज स्मरण झाले. पत्रामध्ये त्यांनी आपली विचारसरणी जनसामान्यांना कळेल, ती त्यांना आपली वाटेल अशा सोप्या, आकर्षक, प्रभावी भाषेत मांडायला आपण कमी पडतो, शिवाय Technology is the backbone of revolution असे म्हणणारे आपण तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही, ही मते मांडली आहेत. त्याचबरोबर पुढारी किंवा तत्त्वज्ञ जास्त आणि प्रत्यक्ष कार्यकर्ते कमी दिसतात, असेही मत मांडले आहे. 21 वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्या पत्रातील मुद्दे आजही अगदी जसेच्या तसे लागू होतात. फक्त आज आपण तंत्रज्ञानाचा बऱ्यापैकी वापर करू लागलो, पण उजवीकडच्यांचा तुलनेत कमी. दलवार्इंना अधिक मोठे करण्यासाठी या मर्यादांवर मात केली पाहिजे.

सौरभ बागडे, दापोली, जिल्हा रत्नागिरी

नकारात्मक विषयावर सकारात्मक लेख...

दि. 7 डिसेंबर 2019 च्या साधना अंकातील डॉ.दिलीप शिंदे यांचा ‘मावळतीचे बोल’ हा लेख वाचला. वयाच्या मानाने डॉक्टरसाहेब बरेच चिंतनशील असावेत असे वाटते. कारण मृत्यू हा शब्द सर्वसामान्यांना तसा अप्रियच. बहुतेक लोक मृत्यू म्हटल्यावर स्तब्ध होतात, त्यावर बोलायचे टाळतात, काही लोक अस्वस्थ होतात. काही लोकांना मृत्यू अशुभ वाटतो, ते धास्तावतात व मृत्यूबद्दल मोकळेपणाने बोलतसुध्दा नाहीत. फारच थोडे लोक मृत्यू म्हटल्यावर मनापासून विचार करायला लागतात. मृत्यूनंतर आपली अवस्था कशी असेल, प्रत्यक्ष मृत्यूसमयी आपली स्थिती काय असेल वगैरे... यांचा पुढचा विचार म्हणजे आपल्याला चांगला मृत्यू यावा, मृत्यूनंतरही आपल्याला चांगली दैव गती प्राप्त व्हावी इत्यादी.

आपला जन्म झाला आहे तर मृत्यूही होणारच. फक्त तो केव्हा आणि कसा असेल ते माहिती नसते किंवा ते सांगता येत नाही. मृत्यूमुळे व्यक्तीचे या जगाशी व आपल्या परिवाराशी निर्माण झालेले संबंध कायमचे दुरावतात, नव्हे तुटतात. त्यात कुटुंबाशी निर्माण झालेल्या आपलेपणामुळे किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या भविष्याच्या चिंतेमुळे माणसे बेचैन होतात. किंवा आयुष्यभर राबून जमवलेल्या स्थावर/जंगम मालमत्तेला सोडून जावे लागणार आहे, अशा विचारामुळेही मृत्यू माणसाला अप्रिय ठरू शकतो.

आपली संस्कृती याबाबतीत आपल्याला योग्य ते सांगते की, उतारवयात हळूहळू संसारातून लक्ष काढून घ्या व ईश्वर चिंतनात मन गुंतवा. भारतातील प्रत्येक प्रांतात चांगले संत होऊन गेले आहेत. त्यांच्या साहित्यातून, विचारांतून सामान्य लोकांचे जगणे सोपे कसे होईल हे आले आहे, त्याचा मागोवा घ्यावा म्हणजे मृत्यूची भीती निश्चितच कमी होईल.

मृत्यूचा विचार मोकळेपणाने झाला पाहिजे. त्याचे दडपण किंवा भीती अजिबात मानू नये. आज आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनात काही प्रगती केली असेल तर मोठी फुशारकी मारतो, पण काही दिवसांनी आम्ही मरणारच आहोत. आमचे आई-वडील ज्यांनी आम्हाला जन्म दिला ते मरून गेले. त्यांचे आई-वडील तेही मरून गेले, आमची पुढची पिढी आमच्या पश्चात्‌ काही दिवसांनी पुढे मरणारच आहे. मग कसली आली आहे मरणाची भीती? जीर्ण झालेले कपडे बदलण्याप्रमाणे आत्मा शरीर बदलतो, हा भगवत्‌गीतेतला श्लोकही इथे देण्याची गरज नाही, कारण तो सर्वांना माहीत आहे. डॉक्टरांनी मृत्यूसंदर्भात जगण्याचे प्रयोजन सांगितले आहे, ते म्हणजे माणसाने समृद्ध आणि परिपूर्ण जीवन जगले पाहिजे, एक कवी तर म्हणतो...

जगणे सुंदर आहे, मरणे सुंदर आहे,

जगण्या-मरण्यामधील उरणे सुंदर आहे.

डॉ.दिलीप शिंदे यांनी एका वेगळ्या आणि अशुभ, विनाषी व नकारात्मक समजल्या जाणाऱ्या विषयावर सकारात्मक चिंतनशील लेख लिहिला, याबद्दल धन्यवाद.

प्रभाकर बटगेरी, सोलापूर

Share on Social Media