Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

लॉकडाऊन करावे लागण्याचा खरा अर्थ

ऑक्सफर्ड, केंब्रिज व तत्सम प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दकोषांच्या दरवर्षी नव्या आवृत्त्या येतात. त्यात, काही नवे शब्द समाविष्ट केले जातात, म्हणजे काय तर अन्य काही भाषांमधील ज्या शब्दांचा वापर त्या वर्षी मोठ्या प्रमाणात झाला असेल ते शब्द सामावून घेतले जातात. शिवाय, त्या वर्षी जगभरात सर्वाधिक वापरला गेलेला इंग्रजी शब्द कोणता, हेही जाहीर केले जाते. तर, आणखी सात महिन्यांनी त्या शब्दकोषांच्या नव्या आवृत्त्या येतील, तेव्हा ‘टाळेबंदी’ हा शब्द कदाचित त्यांनी समाविष्ट करून घेतलेला असेल आणि ‘लॉकडाऊन’ हा या वर्षी सर्वाधिक वापरला गेलेला इंग्रजी शब्द म्हणून घोषित झालेला असेल.

कोरोना संकटामुळे संपूर्ण भारत देशाने लॉकडाऊनचा अनुभव सलग 50 दिवस घेतला. जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी विशिष्ट वेळेपुरते किंचित शिथिलीकरण सोडले, तर संपूर्ण देशातील व्यवहार व आदान-प्रदान बंद ठेवण्याची ज्ञात इतिहासातील ही पहिलीच वेळ होती. पाश्चिमात्त्य जगातील अनेक प्रगत देश हैराण झालेले असताना आणि हे संकट गुणाकाराच्या वेगाने घोंगावत आहे असे दिसत असताना, भारताने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय 24 मार्च रोजी जाहीर केला. (तेव्हा भारतात कोरोनाने नुकताच प्रवेश केला होता.) त्याकडे कोरोना रोखण्यासाठीची प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाहिले जाणे साहजिक होते. त्यानंतर पुढील 21 दिवस, कोरोनाची लागण व त्यामुळे मृत्यू याबाबत भारताचे आकडे अन्य देशांच्या तुलनेत नगण्य म्हणावेत असेच होते. त्या वेळी असेही सांगितले जात होते की, तपासण्या व चाचण्या कमी झालेल्या आहेत म्हणून हे आकडे कमी आहेत. पण ते मान्य करूनही एकूण जनमत असेच होते की, लॉकडाऊनचा निर्णय योग्य आहे. जगभरातील तज्ज्ञांकडूनही तशीच पावती मिळत होती. परिणामी, आपल्या देशाच्या पंतप्रधानांचे कौतुक होत होते. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचेही कौतुक होत होते. आपले राज्यकर्ते कसोटीच्या प्रसंगी धोरणी पद्धतीने वागतात, असा सर्वसाधारण सूर होता आणि जनमानसात चिंतेचे वातावरण असले तरी असमाधानाचे चित्र नव्हते.

लॉकडाऊनचा दुसरा कालावधी 19 दिवसांसाठी जाहीर झाल्यावर मात्र अस्वस्थता आकार घेऊ लागली. मजूर व कामगार यांचे आधीच्या लॉकडाऊनमध्ये जे काही हाल झाले त्याची तीव्रता अधिक प्रमाणात अधोरेखित होऊ लागली. त्याचे बरेच विदारक चित्र क्रमाक्रमाने पुढे येऊ लागले. आणि मग केंद्र व राज्य सरकारे यांच्याबाबत नाराजीचे सूर उमटू लागले. कोंडून घेण्यासाठी घर आणि उपजीविकेसाठी आवश्यक शिल्लक आहे, अशा लोकांसाठी दुसरा कालावधीही सुसह्य राहिला. पण ज्यांच्याकडे त्या दोन्ही सुविधा नाहीत त्यांचे हाल मात्र उग्र रूप धारण करू लागले. आणि तशात लॉकडाऊनचा तिसरा कालावधी (14 दिवस) सुरू झाला. या काळात मात्र सर्व स्तरांवरील खदखद बाहेर पडू लागली. कामगार व नोकरवर्गाला आगामी काळातील रोजगार व वेतन यांची चिंता अधिक भेडसावू लागली. उद्योगक्षेत्राला आपला डोलारा कसा सावरला जाणार याची काळजी वाटू लागली. शेतकरी वर्गासमोर आपल्या शेलमालाच्या मुळात विक्रीची व त्याला मिळणाऱ्या भावाची गत काय होणार हा प्रश्न उभा ठाकला. राज्यकर्त्या वर्गाला आर्थिक स्थिती पूर्वपदावर कशी आणायची याचे उत्तर कळेनासे झाले. त्यातच भर म्हणजे लॉकडाऊनच्या या तिसऱ्या काळात, भारतातील कोरोनाची लागण व त्यामुळे मृत्यू हे दोन्ही आकडे मोठ्याच गतीने वाढत चालले. शिवाय स्थलांतरित मजुरांचे हाल अधिकाधिक चव्हाट्यावर येऊ लागले. या सर्वांची परिणती केंद्र व राज्य सरकारे यांच्याविषयी, सर्वसाधारण जनतेला वाटत असलेली सहानुभूतीची किंवा आपुलकीची भावना झपाट्याने कमी होऊ लागली, तिची जागा असंतोषाचे घ्यायला सुरुवात केली.

आणि अशा या टप्प्यावर जीवनव्यवहार पुन्हा सुरळीत करायला हळूहळू सुरुवात आणि त्याच वेळी चौथा लॉकडाऊन, अशी अपरिहार्यता वाट्याला आली आहे. परस्परपूरकही आणि परस्परविरोधीही वाटावी अशी विचित्र परिस्थिती. आता कोरोनाची लागण व त्यामुळे मृत्यू या आकड्यांचे कोणालाही फार काही वाटेनासे झाले आहे. त्यासंदर्भातील बातम्या व भाकिते यांच्याकडे लक्ष जाईनासे झाले आहे. प्रसारमाध्यमे फार आश्वस्त करू शकत नाहीत हे स्पष्ट झाले. परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारे कितपत सक्षम ठरतील, याबाबत खात्री वाटेनाशी झाली आहे. जागतिक स्तरावरही आश्वस्त व्हावे असे घडताना दिसत नाही. उलट किंचित भीती ही आहे की, अमेरिका व चीन यांच्यातील कुरबूर टोकाला जाऊन काही अघटित तर घडणार नाही ना? काही देशांनी थोडी वेगळी रणनीती अवलंबल्यामुळे ते बऱ्या स्थितीत आहेत असे चित्र पुढे येत आहे, पण त्यामुळे आनंदित व्हावे इतका विश्वास निर्माण होत नाहीये. एकंदरीत काय तर, कोरोनासह जीवनव्यवहार सुरू करायची तयारी सुरू झाली आहे, प्रजेची आणि राज्यकर्त्यांचीही!

अशा पार्श्वभूमीवर मागे वळून पाहिले आणि एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला तर काय दिसते... प्रश्न असा की, संपूर्ण देश लॉकडाऊन करावा लागणे याचा खरा अर्थ काय? कोरोनामुळे देशभरात मिळून 900 रुग्ण व 20 मृत्यू अशी स्थिती होती तेव्हाच 130 कोटी लोकसंख्येचा हा अवाढव्य देश संपूर्ण बंद करावा लागणे याचा अर्थ काय? देशातील अर्ध्याहून अधिक राज्यांत, कित्येक जिल्ह्यांत आणि हजारो खेडेगावांत कोरोनाने प्रवेश केलेला नसतानाही ते सर्व तब्बल 21 दिवस बंद याचा अर्थ काय? किंबहुना कोरोनाची लागण काही ठरावीक शहरे व काही हजार व्यक्ती इतकी मर्यादित असताना, उर्वरित प्रदेशांत संपूर्ण जनजीवन ठप्प का? या देशातील काही कोटी लोकांना डोक्यावर छप्पर नाही आणि काही कोटी लोकांना रोजचे काम नसेल तर पोटाची गरज भागवता येत नाही, अशी स्थिती असताना त्या सर्वांना ‘जिथे आहात तिथेच पुढील 21 दिवस थांबा’ असा आदेश येणे याचा अर्थ काय? एवढेच नाही तर तो आदेश त्यानंतर दोन वेळा वाढवला जाऊन, 50 दिवसांपर्यंत तशीच स्थिती ठेवावी लागणे याचा अर्थ काय? यामुळे अभूतपूर्व महामंदीचा सामना करावा लागणार हे कळत असूनही संपूर्ण देश लॉकडाऊन करावा लागणे याचा अर्थ काय?

अर्थातच, याचे अनेक अर्थ निघतात. पहिला अर्थ असा निघतो की, विज्ञानाने कितीही प्रगती केलेली असली तरी कोरोना विषाणू रोखण्यासाठी पुढील काही महिने (कदाचित काही वर्षे) उपाय सापडणार नाही असा मिळणारा संदेश. दुसरा अर्थ, सुप्त अवस्थेत असलेला हा विषाणू प्रचंड वेगाने फैलावत जाणार आणि मृत्यूचे तांडव (नृत्य?) सुरू राहणार ही भीती. तिसरा अर्थ, तशा परिस्थितीत लागण व मृत्यू रोखण्यासाठी आपली आरोग्ययंत्रणा तुटपुंजी ठरणार याची खात्री. चौथा अर्थ, कोरोना रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे आपली जनता काटेकोर पालन करणार नाही याचीही पुरेपूर खात्री. पाचवा अर्थ, अर्धवट वा निराधार बातम्या आणि अतिरिक्त घबराट पसरवणाऱ्या अफवा यांचा मारा प्रसारमाध्यमांकडून होणार म्हणजे होणार. आणि असेच आणखी काही अर्थ सांगता येतील.

या सर्वांतून तीन निष्कर्ष निघतात. एक- निसर्गचक्रातून उद्‌भवलेल्या अभूतपूर्व अशा जागतिक संकटाचा सामना करण्यासाठीदेखील मानवी समूह पुरेसे शिस्तबद्ध वागू शकत नाहीत, म्हणजे त्यांचे सुसंस्कृत होणे खूपच बाकी आहे. दोन- अर्थव्यवस्था व राज्यव्यवस्था यांचे पुरेसे विकेंद्रीकरण झालेले नाही, अन्यथा असे रोगापेक्षा इलाज भयंकर या स्वरूपाचे निर्णय घ्यावे लागले नसते. तीन- अंतिमतः मानवी संस्कृतीचा विकास होण्यासाठी विज्ञानच सर्वाधिक महत्त्वाची व कळीची भूमिका बजावत आले आहे, म्हणून विज्ञानाच्या सार्वत्रिक प्रसाराची आवश्यकता आहे.

सारांश, कोरोनानंतरच्या जगाची पुनर्बांधणी करायची असेल तर वरील तीन निष्कर्ष समोर ठेवूनच वाटचाल करायला हवी, भले धिम्या गतीने पण निश्चिंतपणे!

Share on Social Media

चिकित्सा

विचारांचे पूर्वग्रह आणि कसोटीचा काळ

डॉ. आनंद नाडकर्णी

म्हणजे मनःपूर्वक अभ्यास जिथे कमी पडतो तिथे पूर्वग्रहांना थारा मिळतो. दुराभिमान वाढतो. ‘माझे तेच खरे’ असा हटवाद निर्माण होतो. मग विरोधकांवर प्रसंगी शारीरिक, पण बहुतेक वेळा वाईट शब्दांचे हल्ले होतात. योग्य अभ्यासाविना मंडळी बाजू घ्यायला लागतात. विरुद्ध बाजूच्या मंडळींना ‘ट्रोल’ करतात... उचकवतात... उत्तम उचकवणाऱ्यांना राजकीय-आर्थिक पाठबळही मिळते, असे ऐकून आहे. समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराबरोबर आपण जुन्या पूर्वग्रहांना खतपाणी घालणे, नव्यांना जन्माला घालणे या गोष्टी नव्या जोमाने करू लागलो आहोत. लॉकडाऊनच्या काळात तर आपल्याला उसंतही मिळाली आणि सामग्रीसुद्धा. त्यामुळे ताळतंत्र सोडलेल्या शेऱ्यांची संख्या आणि तीव्रताही वाढवली. ह्याला आंधळं धाडस म्हणायचं की मर्यादित बुद्धीला लागलेला चळ, हे मला ठाऊक नाही; परंतु कोणत्याही विषयावरील मते बनवताना अभ्यास न करणे, उथळ माहिती जमवण्याला अभ्यास मानणे आणि सध्या पटणाऱ्या बाजूचाच एकांगी अभ्यास करणे ह्या प्रवृत्ती वाढताहेत का, हे खरं तर प्रत्येकानेच आपल्या मनापुरते तरी तपासून पहायला पाहिजे.

माझे वडील मला त्यांच्या आयुष्यातली एक आठवण सांगायचे. काळ होता मोठ्या धामधुमीचा. गेल्या शतकामधला. एकीकडे दुसरे महायुद्ध भरात आलेले आणि भारतामध्ये ‘चले जाव’ आंदोलनाचा काळ. माझे वडील होते कोल्हापूर शहरात. राजकीय दृष्टीने ते होते डाव्या, मार्क्सवादी विचारांचे. त्या काळामध्ये राजकीय विचार स्वीकारताना वाचन, अभ्यास, चर्चा करण्याची पद्धत आजच्यापेक्षा जास्त होती. मी वाचायला लागलो तेव्हाही वडिलांच्या संग्रहात मार्क्स, एंजल्ससोबत गॉर्की, चेकॉव्ह, टॉलस्टॉय यांची पुस्तके असायची. त्यांना सुबक कव्हर्स घातलेली. त्यावर हाताने काढलेला भारताचा नकाशा आणि त्यात रंगवलेला लाल तारा. तर, या तरुणांनी त्या वेळी ‘बुक स्टॉल रिपब्लिक’ नावाचे पुस्तक दुकानही काढले होते. पुढे ‘लाल निशाण’ गटाचे नेते झालेले यशवंत चव्हाण, संतराम पाटील हे माझ्या वडिलांचे मित्र. पुढे ह्या साऱ्यांबरोबरची त्यांची मैत्री टिकून होती. तो भाग ओघात येईलच.

तर, ह्या साऱ्या कट्टर डाव्या तरुणांनी ठरवले की, कट्टर उजव्या गटाचे विचार समजून घ्यायला हवेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अशाच भारलेल्या तरुण गटाबरोबर ही बौद्धिक चर्चा झाली. अनेक तास चालली. तापली, थंड झाली, भरकटली, मार्गावर आली. शेवटी जाणीव झाली की, मध्यरात्र उलटून उत्तररात्र सुरू झाली आहे. तरीही गाडी काही Agree to Disagree म्हणजेच ‘आपले मतभेद आहेत, राहणार हे मान्य करू या’ ह्यापुढे जायला तयार नव्हती. तेव्हा तोड निघाली. एका तरुणाने त्याच्या सुरेल आवाजात देशभक्तीची गाणी गायची. त्याबद्दल एकमत झाले. ते तरुण गायक होते संघीय गटामध्ये. त्या सुरांनी भारावलेल्या अवस्थेत सारे पांगले. त्या गायकाचे नाव होते सुधीर फडके.

ही आठवण नव्याने घोळायला लागली माझ्या मनात. आत्ताच्या लॉकडाऊनच्या कालखंडात. आपण ज्या राजकीय-सामाजिक विचारांचे नाही, त्या विचारांना जाणून घ्यायचे कुतूहल आणि अशा माणसांचा ‘माणूस’ म्हणूनचा स्वीकार ह्यामध्ये आज आपण किती अन्‌‌ कसे बदललो आहोत, ते मला समजून घ्यावेसे वाटले. खास करून समाजमाध्यमांमध्ये होणारे कर्कश संवाद वाचून. कसोटीच्या काळामध्ये नवे मतभेद होणार, जुने आळवले जाणार; पण त्या प्रवासात अनाठायी, आक्रमकतेचे पूर्वग्रहदूषित असे लिखाण व वर्तन व्हायलाच हवे का, ह्याची मानसशास्त्राच्या दृष्टीने केलेली ही मांडणी... प्रत्येक वाचकाच्या चिंतनासाठी.

माझ्या वडिलांच्या आठवणीमधले ठळक मुद्दे पाहू या. दोन्ही गट आपापल्या मतांबद्दल आग्रही होते, पण त्यांनी दुसरी बाजू नीटपणे ऐकली. विचारांच्या देवाण-घेवाणीतील दरीला ‘माणूस’ म्हणूनच्या, म्हणजे माणुसकीच्या व्यवहारात आणले नाही. एकमेकांच्या स्वदेशनिष्ठेबद्दल संशय घेतला नाही. संगीत नावाच्या ऐक्य निर्माण करणाऱ्या घटनेने ह्या चर्चेची सांगता करण्याचा विवेकही दाखवला.

पुढे वडील प्राध्यापक म्हणून काम करण्यासाठी खानदेशात आले आणि साने गुरुजींच्या प्रभावाखाली आले. राष्ट्र सेवादलात आले. पण डाव्या चळवळीतल्या एकाही मित्राबरोबरचे त्यांचे नाते तुटले नाही, तसेच उजव्या चळवळीतल्याही. मला आता फारच गंमत वाटते की, आमच्या घरी येणारे प्रा. ग. प्र. प्रधान आणि प्रा. रामभाऊ कापसे हे दोघेही माझ्यासाठी सारखेच आदरणीय ‘काका’ होते.

नरहर कुरुंदकरांच्या लिखाणामध्ये साधारणपणे अकरा-बाराव्या शतकांपर्यंत चालणाऱ्या धर्मचर्चांचा संदर्भ आहे. वैदिक धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्म यातील पंडितांमध्ये तत्त्वज्ञानाचे वाद-विवाद व्हायचे. अर्थातच प्रत्येकाला आपल्या विरोधी मांडणीच्या धर्म-विचाराचाही सखोल अभ्यास करायला लागायचा. ह्याचा फायदा संपूर्ण समाजाला झाला. वादविवादात हरल्यावर अग्निकाष्ठे भक्षण करण्यासारख्या अतिरेकी गोष्टी अपवादानेच होत्या, हे नमूद करून ते लिहितात की, एकसुरी-जहाल-एकांगी विचारापासून संस्कृतीची जणू सुटकाच झाली ह्या संवादांमुळे.

आता आपण ‘मते कशी बनतात’ ती प्रक्रिया प्रथम समजून घेऊ. त्यानंतर ती आग्रही कशी बनतात, दुराग्रही कशी बनतात ते पाहू. अगदी लहान वयापासूनच मते बनवण्यासाठी एक गोष्ट आवश्यक असते. ती म्हणजे, प्रत्यक्ष अनुभव. पण ह्या घटकाची व्याप्ती लहानपणी मर्यादित असल्यामुळे व्यक्ती मते बनवते ती आजूबाजूच्या महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या मतानुसार. ह्याला म्हणतात, Acquisition किंवा ‘मिळकत’... ही प्रक्रिया जेव्हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होते, तेव्हा तिला आपण म्हणतो संस्कार. माणूस वयाने मोठा होतो तसा तो ‘स्वतः’ची विचारशक्ती चालवू लागतो. (अलीकडे ही वाढ अगदी दीड-दोन वर्षांच्या मुलातही दिसते.) घटनेकडे पाहण्याचा स्वतःचा दृष्टिकोन तयार होण्याची ती सुरुवात असते.

पुढे आपापल्या वकुबाप्रमाणे व्यक्ती शिकते. म्हणजे माहिती गोळा करते. त्याचे आकलन, पृथ:करण करते. त्यासाठी वाचणे, ऐकणे, पाहणे ही सारी माध्यमे असतात. या सगळ्या ‘विचारमंथना’मधून जे सूत्र आपले मन स्वतःचे म्हणून स्वीकारते, त्याला म्हणतात ‘मत’... मत म्हणजे पक्का होऊ घातलेला दृष्टिकोन... बहुतेक वेळा व्यक्ती आपल्या मतानुसार वागून पाहते. त्यातला प्रतिसाद पाहते. इतरांच्या मताबरोबर ते मत जुळते, न जुळते हे तपासते... जुळले तर ते ‘पक्के मत’ (Opinion) बनते... विश्वासार्ह मत म्हणजे Belief! हा बिलीफ जर इतरांच्या विरोधात असेल, तर मनाला वैचारिक बंडखोरीची किंमत काढावी लागते. ही किंमत व्यावहारिक असते आणि भावनिकसुद्धा... या टप्प्यावर माणूस किती ‘अभ्यासू’ वृत्तीचा आहे, हा मुद्दा येतो.

अभ्यास म्हणजेच त्या-त्या विचारसूत्राच्या, विषयाच्या संदर्भात जे उपलब्ध असेल आणि जे वाचणे शक्य असेल अशा मतांचा, माहितीचा शोध घेऊन त्याचे वाचन-मनन करणे. त्यामुळे विश्वासार्ह दृष्टिकोनाचे रूपांतर धारणेमध्ये म्हणजेच (Firm Belief) मध्ये होते. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या चरित्रातून ही प्रक्रिया शिकता येते. त्यांच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर ते आणि त्यांचे वडील ह्यांच्यातील मतभेद विकोपाला जातात. ज्योतिरावांचा आपला अभ्यास व चिंतनावर आधारित दृष्टिकोन एकीकडे तर गोविंदराव फुल्यांचा परंपरावादी दृष्टिकोन दुसरीकडे. 1948 च्या ऑगस्ट महिन्यात मुलींची शाळा (आणि तीही सर्व जातींच्या मुलींसाठी) काढल्यावर ज्योतिराव आणि सावित्रीबार्इंना वडिलोपार्जित घराला रामराम ठोकावा लागतो.

ज्योतिबा जसे समता आणि विषमतानिर्मूलन ह्या तत्त्वांना चिकटून राहतात, तेव्हा त्यांच्या विरोधकांची संख्या व संताप दोन्ही वाढतो. मग विचारांच्या विरोधाऐवजी ते ज्योतिबांनाच संपवण्यासाठी मारेकरी घालतात... हा पर्याय मानवी इतिहासात अनेक आधुनिक धारणांना खतम करण्यासाठी वापरला गेला आहे... त्याचे कारण फुल्यांविषयी निर्माण झालेले पूर्वग्रह. आपल्या अभ्यासू ठामपणाच्या आधारावर महात्मा फुले ह्या पाशवी आक्रमकतेचा सामना करतात. त्याचा पुरावा असा की, मारेकऱ्यांपैकी एक धोंडीराम कुंभार हा ज्योतिबांच्या प्रभावाखाली येऊन शिकला, सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता झाला आणि त्याने पुस्तकही लिहिले.

ह्या कालखंडातले फुल्यांचे वर्तन ध्येयनिष्ठ आणि विवेकी दिसते. त्यांना उच्च जातींतील (तथाकथित आणि समकालीन) अनेकांचा विरोध होता, पण त्यांचे काही सहकारीही अशा जातीतले होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातही हे म्हणता येईल. म्हणजे स्वतःच्या मतावर ठाम राहूनही, विरोधी मतांचा वैचारिक प्रतिकार करूनही ‘माणूस’ ह्या पातळीवरचा आदर राखणे मानवाला शक्य असते.

विचार, मते, विचारसूत्रे आणि धारणा अशा ह्या घडणीच्या प्रवासात ‘विवेकी’ कशाला म्हणायचे? माझ्या धारणेबद्दल मला खात्री, विश्वास आहे आणि तो वरवरचा नसून मी केलेल्या अभ्यासातून आला आहे. म्हणूनच मी माझ्या धारणेवर आधारित वैचारिक भूमिकेचा अंगीकार आणि पुरस्कार करणार. परंतु माझ्या धारणेसंदर्भातल्या नव्या पैलूंचा, माहितीचा, ज्ञानाचा मी अव्हेर न करता तेही समजून घेईन. त्या अभ्यासानंतरच मी ठरवेन की, माझ्या भूमिकेत फरक करायचा की नाही? मला न पटणाऱ्या मतांचा मी उपहास-धिक्कार न करता, पुरावे आणि वैचारिकता याचा वापर करत विरोध करेन. पण, दुसऱ्या माणसाचे मत माझ्यासारखे असायलाच हवे, असा हट्ट धरणार नाही. वैचारिक विरोध करणाऱ्या व्यक्तीला ‘विरोधक’ असे लेबल देऊन त्याच्याशी शत्रुत्व करण्याचे मला कारण नाही. त्याने तसे केल्यास मी अनुरूप मार्गाने स्व-विचारांचे संरक्षण करेन. माझ्या धारणा ह्या जगातील अपरिवर्तनीय सत्य आहेत, असे न मानता मी त्यांची वारंवार तपासणी करेन.

हा मजकूर लिहिताना गांधीजींची एक भूमिका आठवली. ते लिहितात की- एकाच विषयावरची माझी भिन्न मते आढळली, तर काल दृष्ट्या जे ताजे ते माझे (त्या विषयावरचे) मत मानावे. 'If the reader still believes in my sanity' असा मिश्किल शेराही त्यांनी मारला आहे.

समोरच्या व्यक्तीचे मत-वर्तन आपल्याला पटले नाही, तर त्यावर प्रखर टीका करण्याचा पर्याय घ्यावा लागतो. पण आपण त्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह न बाळगता, किंबहुना योग्य आदर बाळगून तसे करू शकतो. गांधीजींचा विषय निघाला म्हणून त्यांनी सुभाषबाबूंना लिहिलेल्या एका पत्रातला मजकूर इथे उद्‌धृत करतो. पत्र लिहिले आहे 3 जानेवारी 1930ला, लाहोरच्या वार्षिक काँग्रेस अधिवेशनानंतर. सुभाषबाबूंची काही जाहीर वक्तव्ये, वर्तन, पावलांनंतर गांधीजींचे म्हणणे असे...

‘तुझे वागणे मला कोड्यात पाडणारे झाले आहे. लाहोर अधिवेशनातले तुझे वागणे समजण्याच्या पलीकडचे, अगम्य तर होतेच; पण त्याला उथळ असूयेचा गंधही होता... मला दमदार विरोधाचे कधीच काही वाटत नाही. मी त्यावरच पोसला गेलो आहे आणि मित्रांपेक्षा विरोधकांकडूनच जास्त शिकलोही आहे. पण लाहोरमध्ये तू (दुर्दैवाने) अडथळे उभे करणारा ठरलास.

‘कोणत्याही विषयावरच्या तुझ्या दृष्टिकोनात तू बदल कर, असे मला सांगायचे नाही आहे. पण तुझे दृष्टिकोन ठोसपणे सादर करताना तू जसे वर्तन करतोस, त्यामध्ये मात्र बदल करावास, असे मला नक्की वाटते.’’ हा उतारा पुन:पुन्हा वाचण्यासारखा आहे. एकीकडे कठोर टीका आहे. आपली निरीक्षणे गांधीजीआडपडदा न ठेवता मांडतात. आपला आक्षेप ‘नेमका’ कशाला, ते सांगतात. सुभाषबाबूंचे विचार ‘त्यांचे’ म्हणजे बापूंना न पटणारे असू शकतात, हे मान्यही करतात. परंतु संघभावनेला, म्हणजेच समान ध्येयाला तडा जाणारे वर्तन होता कामा नये, असे ठामपणे बजावतात.

‘व्यक्ती’ आणि ‘वर्तन’ ह्यामधला फरक, ‘विचार’ आणि ‘आचार’ ह्यातला भेद जर मनात स्पष्ट असेल, तर तो विवेकी विरोध म्हणायचा. मीच सत्याचा ठेका घेतला आहे, असे विवेकशक्ती कधीच म्हणत नाही.

विनोबा लिहितात : ‘सत्याग्रही तोच असेल, जो सत्याचा दावा तर सोडणार नाही; परंतु समोरच्या जवळ सत्य नाहीच, असेही मानणार नाही. सत्याचा एक अंश माझ्यापाशी आहे, जो मी सोडणार नाही; परंतु दुसरा अंश त्याच्यापाशी असू शकतो आणि तो अंश कमी-अधिक असू शकतो. तटस्थ बुद्धीने त्याची चर्चा होऊ शकते... म्हणून सत्याग्रही बनण्यासाठी प्रथम सत्यग्राही बनायला हवं.’

विनोबा सांगताहेत की- ‘सत्याला कणा असतो पण ते हेकेखोर नसतं... त्यात लवचिकपणा असतो. तो प्रथम अभ्यासाने आणि नंतर व्यासंगाने येतो. अभ्यासामध्ये वाचन, शोधन, उत्खनन, चर्चा, वैचारिक जोडणी हे सारे आहेच. व्यासंग ही पुढची पायरी... अभ्यासाची बैठक अधिक विस्तारणारी... आशयाचे नवे आयाम देणारी. विविध ज्ञानशाखांबरोबरचे धागे शोधणारी. ‘व्यासंग’ ही बहुअंशी अंतर्गत प्रक्रिया. तुलनेने अभ्यासामध्ये ‘करणे’ येते. व्यासंग तर पुढे-पुढे घडत जातो. तो अधिक Holistic म्हणजे सर्वसमावेशक असतो. जगातील सर्व काही कवेत घेणाऱ्या व्यासांचा सहवास म्हणजे व्यासंग!

म्हणजे मनःपूर्वक अभ्यास जिथे कमी पडतो तिथे पूर्वग्रहांना थारा मिळतो. दुराभिमान वाढतो. ‘माझे तेच खरे’ असा हटवाद निर्माण होतो. मग विरोधकांवर प्रसंगी शारीरिक, पण बहुतेक वेळा वाईट शब्दांचे हल्ले होतात. योग्य अभ्यासाविना मंडळी बाजू घ्यायला लागतात. विरुद्ध बाजूच्या मंडळींना ‘ट्रोल’ करतात... उचकवतात... उत्तम उचकवणाऱ्यांना राजकीय-आर्थिक पाठबळही मिळते, असे ऐकून आहे. समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराबरोबर आपण जुन्या पूर्वग्रहांना खतपाणी घालणे, नव्यांना जन्माला घालणे या गोष्टी नव्या जोमाने करू लागलो आहोत. लॉकडाऊनच्या काळात तर आपल्याला उसंतही मिळाली आणि सामग्रीसुद्धा. त्यामुळे ताळतंत्र सोडलेल्या शेऱ्यांची संख्या आणि तीव्रताही वाढवली. ह्याला आंधळं धाडस म्हणायचं की मर्यादित बुद्धीला लागलेला चळ, हे मला ठाऊक नाही; परंतु कोणत्याही विषयावरील मते बनवताना अभ्यास न करणे, उथळ माहिती जमवण्याला अभ्यास मानणे आणि सध्या पटणाऱ्या बाजूचाच एकांगी अभ्यास करणे ह्या प्रवृत्ती वाढताहेत का, हे खरं तर प्रत्येकानेच आपल्या मनापुरते तरी तपासून पहायला पाहिजे.

पूर्वग्रहातून निर्माण होतात ‘निवाडे’... विचारांचा विरोध झाला की, माझे मन समोरच्या व्यक्तीवरचे एक जजमेंट- फैसला-निवाडा पास करते. तो एक तर माझ्या ‘बाजूचा मित्र’ किंवा ‘विरोधी शत्रू.’... ही धारणा घट्ट होत जाते. Mind of prejudiced person is like pupil of the eye, the more you throw light upon it, more it contracts. पूर्वग्रहदूषित माणसाचे मन डोळ्यातल्या बाहुलीसारखे असते. सत्याचा, पुराव्यांचा किती प्रकाश टाकाते, आकुंचित-संकुचितच राहणार. मानसशास्त्र सांगते की, असे Judgemental Attitudes ­ म्हणजे मानसिक अनारोग्याची सुरुवात. आपण असेही मान्य करू की, माणूस म्हणून आपल्याला संपूर्णपणे पूर्वग्रहमुक्त होणे अशक्य आहे. पण त्या संदर्भातली जाणीव होणे आणि त्यावर डोळसपणे काम करणे महत्त्वाचे.

म्हणजे काय करायचं?... निवाडा करणाऱ्या विचारांसोबत येणाऱ्या भावना अत्यंत तीव्र असतात. मग तो राग असो वा लोभ. ह्या भावना उसळल्या की आपलं ‘ऐकणं’ संपतं, बंद होतं. खरं तर हे सिग्नल असतात माझ्या मनातले, मला सावध करणारे.

समोरच्या व्यक्तीचे विचार समजून घेण्यापेक्षा मी जेव्हा तिथेच- ‘पुरावे’ शोधायला लागतो, तेव्हा समजावे आपण घसरतोय... पुरावे कसले, तर त्याला खोटे पाडणारे! त्याच्या वैचारिक साखळीतली कमजोर कडी शोधणे, ही वेगळी प्रक्रिया आहे... एवढी मॅच्युरिटी कुठे यायला लोकांमध्ये!... असे म्हणून आपण हा विषय बाजूला न सारता निदान ही परिपक्वता काय, कुठे, कशी ह्याचे दिग्दर्शन तरी करायला हवं.

आतापर्यंत मांडलेली ही भूमिका मनात उतरावी म्हणून (पुन्हा) विनोबांकडे वळतो. त्यांनी ‘बुद्धी’ आणि ‘प्रज्ञा’ ह्यामध्ये भेद केला आहे. ते सांगतात, ‘बुद्धी’ माणसाच्या मनोविकाराप्रमाणे पालटणारी असते. ही रंगीत बुद्धी बिनचूक निर्णय देण्याचे कार्य करू शकत नाही. (दयाबुद्धि-द्वेषबुद्धि) शुद्धबुद्धी म्हणजे प्रज्ञा नेमका निर्णय देते. कारण तिला स्वतःचा रंग नसतो. ती थर्मामीटरसारखी असते. थर्मामीटरला स्वतःला ताप आलेला नसतो, म्हणूनच तो इतरांच्या तापाचे मापक होऊ शकतो.

हे सगळे वाचताना मस्त वाटले तरी प्रत्यक्षात यायला कठीण. त्याचे एक मूलभूत कारण आहे, आपल्यातली आदिम अशी ‘कळपात’ राहण्याची उर्मी. मी एकदा ‘बाजू घेतली’, ‘गट पकडला’ की- त्या प्राचीन काळात मला शारीरिक व भावनिक सुरक्षितता मिळायची. एकांडे राहण्यापेक्षा हे बरं, असं म्हणून मी माझी मते बहुसंख्येकडे वळवायचो. प्रभावी नेतृत्व करणारी व्यक्ती मला नेमकी हीच सुरक्षा देत असते. त्या व्यक्तीच्या विचारांची दिशा-व्याप्ती महत्त्वाची की त्याच्या व्यक्तिमत्त्वातून मला मिळणारी सुरक्षित भावना- ह्यामध्ये भल्या-भल्यांचा गोंधळ होतो... कोणत्याही क्षेत्रातील पुढाकारी, प्रभावी नेतृत्वाच्या विरोधाला जशी धार येते तशी ‘अंधभक्त’ आणि ‘अंधशत्रू’ ह्या दोन्ही धारणा वाढीला लागतात. लोकोत्तर व्यक्तींपैकी अनेकांना आपल्या हयातीत अंधशत्रूंशी मुकाबला करावा लागला आणि त्यांचे निर्वाण झाल्यावर त्यांच्या अंधभक्तांनीच त्यांच्या वारशाला मलिन केले. हीसुद्धा बुद्धदेवांपासूनची परंपरा आहे.

कर्तृत्ववान माणसांच्या कर्तृत्वाइतकेच त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रहसुद्धा टिकून राहतात, हे निरीक्षणही बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत खरे ठरते. नुकत्याच एका प्रतिरूप संवादात (Virtual Session) मी लोकमान्यांच्या गोष्टी सांगत होतो. तर एका विद्यार्थिनीचा प्रतिसाद आला- मी त्यांच्याबद्दल आजवर वाईट-साईटच ऐकले आहे. असा प्रतिसाद गांधीजी, नेहरू, सुभाषबाबू, विवेकानंद, सावरकर, आंबेडकर अशा अनेक व्यक्तींबद्दल ऐकायला मिळतो. त्याचे कारण असते लहानपणापासूनचे घरातले वातावरण आणि संस्कार (मिळकत). समाजातल्या जाती- धर्म-भेदांचे पूर्वग्रह त्या-त्या जातीत जन्मलेल्या माणसांना का बरं सोडतील?...

आणि लोकोत्तर असली तरी सगळी माणसं ही माणसंच होती, हे आपण का विसरायचं?... प्रत्येकाला कळलेल्या सत्याचे अंश त्यांनी आपल्यासाठी सोडले आहेतच की. आणि त्यांच्या महान गुणांच्या सोबत त्या काळाच्या, त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या-व्यक्तिमत्त्वाच्या काही मर्यादा असणारच. काही मर्यादा तर ह्या माणसांनीच स्वतः स्वतःवर घालून घेतलेल्या. आपण एक तर ह्या व्यक्ती आणि त्यांचे विचार-धारणा ह्यातला भेद लक्षात ठेवावा. म्हणजे, ‘आदर्श’ किंवा ‘दैवी’ व्यक्ती असे न मानता त्यांच्या गुणांमधून, कर्तृत्वावरून आपल्याला काय कळते, त्याचा अभ्यास करावा. जिथून ठाम विचार, खंबीर धारणा ऐकायला-वाचायला मिळताहेत, त्या आत घेऊन त्यावर आपल्याला स्वतःचा अभ्यास करायचा आहे, हे लक्षात ठेवावे. बुद्धाचा पट्टशिष्य आनंद आपली भूमिका मांडतो, ‘गौतम बुद्ध बोलत असताना मी जे ऐकले, ते मी सांगत आहे.’ बुद्धाच्या वाणीवरही आनंदाचे मन संस्कार करत असणार आणि त्यानंतर तो बोलत असणार... वृत्तीचा हा आरस्पानीपणा अभ्यासाला नेहमी पोषक असतो.

कोणत्याही विषयावरच्या एकांगी विचारांमुळे आजवर जग पुढे गेलेले नाही. खरे तर अनेक विचारधारांचे स्वागत करत त्याना तपासणे आणि त्यांची आपल्या उद्दिष्टाप्रमाणे जुळवणूक करणे महत्त्वाचे. कोरोनावरची लस करण्यासाठी शास्त्रज्ञांचा जागतिक गट किती पद्धतीने विचार करत असेल आज... वेगवेगळ्या जागतिक सत्तांचे काही नेते आपले पूर्वग्रहदूषित बोलणे हेच अंतिम सत्य मानताहेत... पण ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ‘भेदाभेद अमंगळ’ ही उक्ती जगणारे मात्र जगाला एका संकटापासून वाचवायची साधना करताहेत- विघटनाच्या पूर्वग्रहांच्या तटबंद्या पार करत!

डॉ. आनंद नाडकर्णी, ठाणे

Share on Social Media

वर्तमान

टोळधाडीचे संकटही पसरत आहे?

संकल्प गुर्जर

आफ्रिका खंडातील ही टोळधाड केवळ आफ्रिकेपुरतीच मर्यादित नसून ती मध्य-पूर्वेतील देशांतही पसरली आहे. आफ्रिका खंडाला लागुनच असलेल्या अरेबियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात- म्हणजे येमेन, सौदी अरेबिया व ओमान या देशांमध्ये ही टोळधाड पसरलेली आहे. तसेच या प्रदेशाच्या शेजारी देशांत म्हणजे इराक आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनाही याचा फटका बसलेला असून, या टोळधाडीचा मुकाबला कसा करावा या चिंतेत या साऱ्या देशांची सरकारे आहेत. मध्य-पूर्वेतील या देशांना जवळ असलेल्या व आपल्याही शेजारीच असलेल्या इराण व पाकिस्तान या देशांनाही या टोळधाडीचे तडाखे बसलेले असून, या देशांच्या माध्यमातून भारताच्या राजस्थानातही हे कीटक आलेले आहेत. राजस्थानातील सुमारे पावणेदोन लाख हेक्टर जमिनीवरील पिकांना यामुळे नुकसान सहन करावे लागले आहे. असा अंदाज आहे की- उत्तर-पूर्व आफ्रिकेतील या टोळधाडीला वेळीच रोखले नाही, तर जून-जुलै महिन्यात याहून अधिक तीव्र अशी टोळधाड येऊ शकते आणि तिचा फटका भारतातील अनेक राज्यांना बसू शकतो.

कृषिक्षेत्रासमोर जी काही अस्मानी व सुलतानी संकटे (पूर, दुष्काळ, पिकांवर रोग पडणे, प्रतिकूल सरकारी धोरणे, भावातले चढ-उतार वगैरे) येतात, त्यामध्ये टोळधाड हेसुद्धा एक प्रमुख संकट मानले जाते. एखाद्या प्रदेशात टोळधाड येते, म्हणजे नेमके काय होते? तर, वातावरणीय घटकांमुळे (मुख्यतः पाऊस आणि उन्हामुळे) त्या प्रदेशातील वनस्पतींचा फडशा पाडणाऱ्या कीटकांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती तयार होते आणि कोट्यवधी कीटक त्या विशिष्ट प्रदेशात येतात. साधारणतः पंधरा-वीस वर्षांत एकदा मोठी टोळधाड येते आणि विशिष्ट विभागातील पिकांचे व हरित प्रदेशाचे प्रचंड प्रमाणात नुकसान करून जाते. आज विज्ञान इतके प्रगत झाले असले, तरी आजही टोळधाडीला आटोक्यात आणणे कठीणच मानले जाते. उलट, वातावरण, बदलाच्या प्रक्रियेमुळे इथून पुढे हे आव्हान अधिकच तीव्र होत जाणार आहे, अशीच लक्षणे दिसत आहेत. सध्या अशाच एका मोठ्या टोळधाडीचे संकट आपल्यासमोर उभे ठाकलेले आहे.

एका बाजूला सारे जग कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यात गुंतलेले आहे. मात्र आफ्रिका खंडातील उत्तर-पूर्वेला असलेले काही देश कोरोनाच्या बरोबरीनेच टोळधाडीच्या संकटाला सामोरे जात आहेत. गेल्या अनेक वर्षांत आफ्रिका खंडातील इथिओपिया, केनिया आणि सोमालिया या देशांना इतक्या तडाखेबंद टोळधाडीचा सामना करावा लागला नव्हता. त्यामुळे या सध्याच्या टोळधाडीची तीव्रता आणि त्यामुळे होणारे नुकसान पाहता, त्याची दखल घेणे भाग आहे.

सध्याची ही टोळधाड Desert Locust Worms मुळे निर्माण झालेली असून गेल्या शंभर वर्षांत त्यांच्यामुळे सहा मोठ्या, खूप जास्त तीव्रतेच्या टोळधाडी निर्माण झाल्या होत्या. त्यापैकी एक धाड तर तब्बल तेरा वर्षे टिकली होती. सध्या आलेल्या या टोळधाडीचे वैशिष्ट्य म्हणजे हे कीटककेवळ शेतातील अन्नधान्यच खाऊन फस्त करतात असे नव्हे, तर त्यांच्या मार्गात आलेल्या व खाण्यास योग्य असलेल्या अशा प्रत्येक गोष्टीचा ते फडशा पाडतात. त्यामुळे उभी शेते, झाडेझुडपे, चरण्यासाठी राखून ठेवलेली गवताळ जमीन, जंगले अशा सर्व ठिकाणी या धाडीचा परिणाम जाणवतो आहे. या टोळधाडीमुळे आफ्रिका खंडातील या देशांच्या कृषिक्षेत्रावर व पर्यायाने संपूर्ण अर्थव्यवस्थेवरच गंभीर संकट निर्माण झालेले आहे.

अर्थात, आफ्रिका खंडातील ही टोळधाड केवळ आफ्रिकेपुरतीच मर्यादित नसून ती मध्य-पूर्वेतील देशांतही पसरली आहे. आफ्रिका खंडाला लागुनच असलेल्या अरेबियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात- म्हणजे येमेन, सौदी अरेबिया व ओमान या देशांमध्ये ही टोळधाड पसरलेली आहे. तसेच या प्रदेशाच्या शेजारी देशांत म्हणजे इराक आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनाही याचा फटका बसलेला असून, या टोळधाडीचा मुकाबला कसा करावा या चिंतेत या साऱ्या देशांची सरकारे आहेत. मध्य-पूर्वेतील या देशांना जवळ असलेल्या व आपल्याही शेजारीच असलेल्या इराण व पाकिस्तान या देशांनाही या टोळधाडीचे तडाखे बसलेले असून, या देशांच्या माध्यमातून भारताच्या राजस्थानातही हे कीटक आलेले आहेत. राजस्थानातील सुमारे पावणेदोन लाख हेक्टर जमिनीवरील पिकांना यामुळे नुकसान सहन करावे लागले आहे. असा अंदाज आहे की- उत्तर-पूर्व आफ्रिकेतील या टोळधाडीला वेळीच रोखले नाही, तर जून-जुलै महिन्यात याहून अधिक तीव्र अशी टोळधाड येऊ शकते आणि तिचा फटका भारतातील अनेक राज्यांना बसू शकतो.

आफ्रिका खंडाच्या उत्तर-पूर्वेला असलेल्या इथिओपिया, सोमालिया आणि सुदान या देशांच्या दुष्काळाच्या करुण कहाण्या आपल्याला ऐकून माहिती असतात. दुष्काळामुळे सातत्याने होरपळून निघालेल्या या प्रदेशाला अन्नाचा तुटवडा व मोठ्या संख्येने होणारे भूकबळी ही काही तशी नवी बाब नाही. भुकेने मरणासन्न अवस्थेला आलेले लहान मूल व त्याच्या जवळच वाट पाहत असलेले एक गिधाड हा फोटो अनेकांनी पाहिला असेल. (त्या फोटोला प्रतिष्ठेचे पुलित्झर पारितोषिक मिळाले होते आणि ज्या फोटोग्राफरने तो फोटो काढला, त्याने पारितोषिक जिंकल्यानंतर काहीच महिन्यांत आत्महत्या केली होती.)

अशा या शापित प्रदेशालाच सध्या टोळधाडीचा फटका बसलेला आहे. इथिओपिया, सोमालिया, इरिट्रिया, केनिया आणि जिबूती हे देश या टोळधाडीच्या तडाख्याने होरपळून निघत आहेत. तसेच या देशांच्या शेजारीच असलेल्या सुदान, दक्षिण सुदान, युगांडा आणि काँगो या देशांतही हे कीटक पसरत गेले आहेत. यापैकी केनियाला गेल्या सत्तर वर्षांत इतक्या भयानक टोळधाडीचा सामना करावा लागलेला नव्हता; तर सोमालिया, इथिओपिया आणि जिबूती या तीन देशांसाठी ही गेल्या पंचवीस वर्षांतील सर्वांत मोठी टोळधाड आहे. या धाडीमुळे या चार देशांतील सुमारे दोन ते अडीच कोटी लोकांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

हे वाचून असा प्रश्न पडलेला असेल की- अचानक ही टोळधाड याच प्रदेशात, आताच कशी काय उद्भवली? सर्वसाधारण परिस्थितीत, सुमारे दोनशे मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस असलेल्या प्रदेशात हे कीटक वावरत असतात. त्यामुळे मॉरिटानिया हा पश्चिम आफ्रिकेतील देश ते भारत इतक्या मोठ्या विस्तीर्ण प्रदेशातील वाळवंटी-अर्धवाळवंटी प्रदेशात हे कीटक वास्तव्यास असतात. तसेच या प्रदेशाच्या दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरातील पावसाचा आणि तापमानातील बदलांचा प्रभाव या कीटकांच्या वाढीवर पडतो.

उत्तर-पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये गेल्या पंधरापैकी दहा वर्षे दुष्काळ पडलेला होता. सन 2019 वर्षसुद्धा दुष्काळीच होते. मात्र 2019 च्या अखेरच्या तीन महिन्यांत या प्रदेशाला भीषण पावसाचा तडाखा बसला. दुष्काळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अकाली आलेला भरपूर पाऊस व त्यामुळे तयार झालेल्या पूरसदृश परिस्थितीमध्ये या कीटकांच्या वाढीसाठी अतिशय पोषक परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे 2019 च्या डिसेंबर महिन्यात पाऊस ओसरत गेला आणि या प्रदेशाला या वर्षीच्या जानेवारी महिन्यात टोळधाडीच्या पहिल्या लाटेचा फटका बसला. जानेवारी महिन्यात आलेल्या या टोळधाडीचा सामना करण्यासाठी किमान सात कोटी डॉलर्स लागतील, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ‘फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन’ने वर्तवला होता. मात्र त्यांना केवळ एक कोटी डॉलर्सच उभे करता आले. एकूण गरजेपेक्षा ही रक्कम फारच अपुरी होती. ही लाट जर वेळीच रोखता आली नाही, तर मे-जून महिन्यात येणारी लाट यापेक्षा पाचशे पट अधिक तीव्रतेची असेल, असा अंदाजही या संघटनेने व्यक्त केला होता. आता तो खरा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

अर्थात या लाटा आणि त्यांची तीव्रता किती असते, हे समजून घेण्यासाठी या कीटकांच्या संख्येचा अंदाज घ्यायला हवा. साधारण बोटभर लांबीचे व पाच महिने आयुष्य असलेले हे कीटक हरित प्रदेशावर झुंडीने हल्ला करतात. या झुंडीचा आकार एका चौ. किमीपेक्षा कमी ते शेकडो चौ.किमी इतका मोठा असू शकतो. एक चौरस किमीच्या प्रदेशात साधारणतः आठ कोटी कीटक वावरत असतात. या टोळधाडीच्या लाटेत केनिया व इथिओपियातील काही प्रदेशांत तर आकाश अक्षरशः दिसेनासेच व्हावे व साऱ्या आकाशावर काजळी पसरावी, इतक्या मोठ्या संख्येने हे कीटक आले आहेत. तसेच हे कीटक एका जागी स्थिर राहतात असेही नाही. वारा ज्या दिशेला जाईल त्या दिशेने त्यांचे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर चालूच असते. एकेका दिवसात ते पाच ते दोनशे किमी इतका मोठा पल्ला पार पाडू शकतात. तसेच एक चौ. किमी पसरलेली झुंड एका दिवसात किमान पस्तीस हजार लोकांना पुरेल इतक्या खाद्य पदार्थांचा फडशा पाडते. त्यामुळे या टोळधाडीचा धोका किती मोठा आहे, याचा यावरून अंदाज येऊ शकतो.

या कीटकांना रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्यांच्यावर कीटकनाशकांची फवारणी करणे. पण त्यातही खूपच अडचणी आहेत. अंडी घालणे ते नवा कीटक जन्माला येणे यासाठीचा कालावधी हा अवघा दोन आठवडे इतका लहान असल्याने या कीटकांची पैदास खूप कमी काळात खूप मोठ्या संख्येने होऊ शकते. तसेच काही प्रदेशात हे कीटक कीटकनाशकांशी स्वतःला जुळवून घेत आहेत, असेही दिसून आले आहे. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मधमाश्यांसारखे उपयोगी कीटकही मारले जातात. त्यामुळे कीटकनाशके किती प्रमाणात फवारायची, यावरही बंधने आहेत.

केनिया सरकारने पाच विमाने कीटकनाशकांच्या फवारणीसाठी तैनात केली असून इथिओपियामध्ये चार विमाने या कामासाठी वापरली जातात. मात्र दुर्गम प्रदेशात, दऱ्या-खोऱ्यांत ही फवारणी करणे फारच अवघड असते. त्यामुळे त्या प्रदेशात हे कीटक जिवंत राहून पुन्हा एकदा टोळधाड येईल, अशी शक्यता नेहमीच राहते. सोमालिया या देशात ‘अल-शबाब’ या दहशतवादी गटाच्या ताब्यातील प्रदेशात ही कीटकनाशकांची फवारणी करणे शक्य नाही. तसेच येमेनमध्येही गेली दहा वर्षे यादवी युद्ध चालू असून त्या देशात सरकारचे अस्तित्व नगण्यच आहे. मग या टोळधाडीचा सामना कोण आणि कसा करणार, हा प्रश्न आहेच. मात्र या कीटकांना राष्ट्रांच्या सीमारेषा, यादवी युद्ध, राजकीय मतभेद यापैकी कशाचीही काही अडचण येत नाही. ते त्यांना अनुकूल वातावरण मिळेल त्या प्रदेशात जातात व अन्नधान्य खाऊन टाकतात. त्यामुळे ही टोळधाड आटोक्यात येण्याची शक्यता सध्या तरी खूपच कमी दिसते.

या टोळधाडीला आवरण्यासाठी केनिया-इथिओ-पियातील शेतकऱ्यांनी त्यांना शक्य होते ते उपाय करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये मोठ्याने थाळ्या व वाद्ये वाजवणे, आपापल्या वाहनावरून शक्य आहे त्या प्रमाणात कीटकनाशके फवारणे वगैरे उपाय होते. मात्र एकेकटा शेतकरी या टोळधाडीला आवर घालू शकत नाही. त्यासाठी देशांची सरकारे, मोठ्या खासगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था व आंतरराष्ट्रीय संघटना यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. उत्तर-पूर्व आफ्रिकेतील या देशांना आवश्यक त्या प्रमाणात पर्यावरणपूरक कीटकनाशके मिळवण्यासाठी जपान, हॉलंड आणि मोरोक्को अशा देशांतून पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र लॉकडाऊन व वाहतुकीवर बंधने घातली गेल्यामुळे पुरवठ्याची साखळी 'disrupt' झाली आहे. तसेच वाहतुकीची विमानेही महाग झाल्यामुळे कीटकनाशक खरेदी करण्याचा खर्चही खूपच वाढलेला आहे. अर्थव्यवस्था खंगत गेल्याने आवश्यक त्या प्रमाणात पैसाही उपलब्ध नाहीये. त्यामुळे एकीकडे कीटकांची वाढती संख्या व दुसरीकडे कीटकनाशकांचा तुटवडा- असे हे दुहेरी संकट या देशांसमोर आहे.

यामुळे हे स्पष्ट आहे की, उत्तर-पूर्व आफ्रिकेतील देशांसमोर अन्नसुरक्षेचा मोठाच प्रश्न आ वासून उभा ठाकणार आहे. या प्रदेशातील दक्षिण सुदान, येमेन आणि सोमालिया या देशांच्या जनतेला गेली अनेक वर्षे आधीच चालू असलेल्या यादवी युद्धामुळे (मानवनिर्मित व निसर्गनिर्मित; दोन्ही स्वरूपाच्या) दुष्काळाचे दाहक चटके बसत होतेच. आता या टोळधाडीच्या संकटामुळे या देशांतील जनतेचे काय हाल होतील, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तसेच उत्तर-पूर्व आफ्रिकेतील इथिओपिया-केनियासारख्या देशांसाठी 2019 हे वर्ष तसेही फारच भीषण होते. या प्रदेशाला त्या वर्षी आधी दुष्काळ आणि मग पूर-परिस्थिती अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागला होता. त्यातून हे देश थोडेफार सावरू पाहत होते, तोच हे टोळधाडीचे संकट आले. टोळधाड चालू असतानाच आता कोरोनाचे संकट उद्भवले. कोरोनाच्या संकटामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानामुळे या प्रदेशासमोरील अडचणी आणखीनच वाढणार आहेत. तसेच जून-जुलैमध्ये पावसाच्या आगमनाबरोबरच अधिक जास्त तीव्रतेची टोळधाड येणार आहे. थेट उत्तर-पूर्व आफ्रिकेतून हे किडे भारतात येतील, असे अनुमान व्यक्त केले जाते, परिणामी, या टोळधाडीचा मोठा फटका तेव्हा पेरणीच्या हंगामात असलेल्या भारतालाही बसेल, असा अंदाज व्यक्त केला जातो. (तसेच हे कीटक आफ्रिका खंडातही पश्चिम दिशेला पसरतील आणि चाड, निजेर अशा देशांना याचा फटका बसेल.)

यापूर्वी 1950 व 1993 मध्ये अशा मोठ्या टोळधाडी भारतात आल्या होत्या. तसेच 1987-89 व 2003-2005 मधील टोळधाडींचा अनुभवही भारताला आहे. अगदी गेल्या वर्षीसुद्धा म्हणजे (2018-19 या वर्षात) भारतात टोळधाड आली होती. अर्थात, सध्या आफ्रिकेत आली आहे इतकी ती तीव्र नव्हती. तरीही असा अंदाज आहे की, गेल्या वर्षी दुष्काळ आणि या टोळधाडीमुळे भारताचे कृषी उत्पादन पाच लाख टनांनी घटले होते. Fall Army Worm (FAW) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कीटकांमुळे मागच्या वर्षीची धाड आली होती. या टोळधाडीचा परिणाम देशातील दहा राज्यांवर झाला होता व जवळपास अर्धा देश या कीटकांनी पादाक्रंत केला होता. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि मिझोराम या राज्यांना याचा फटका बसला होता.

सध्याच्या Desert Locust Worm प्रमाणेच मागच्या वर्षीचा Fall Army Worm एकेका दिवसात 100 किमीचे अंतर कापत असे. या वेळेस आफ्रिकेतून हे कीटक भारतात येणार आहेत, त्याचप्रमाणे उगमस्थान अमेरिका खंडात असलेल्या FAW नेदेखील आफ्रिकेच्या मार्गानेच भारतात प्रवेश केला होता. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने अशी संकटे येत राहणार, हे स्पष्ट आहे. तसेच Desert Locust Worm हे इराण व पाकिस्तानातही आढळत असल्याने पोषक परिस्थिती निर्माण झाल्यास ते त्या देशांतूनही भारतात येऊ शकतात.

आपल्या शेजारील पाकिस्तानात या Desert Locust Worm च्या टोळधाडीचा फटका जानेवारीतच बसला होता. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानने आणीबाणी घोषित केली होती आणि Desert Locust Worm च्या विरुद्ध आघाडी उघडली होती. त्यांनी लाखो हेक्टर जमिनीवर कीटक-नाशकांची फवारणी केली होती. तसेच सरकार, सामाजिक संघटना, हवाई वाहतूकक्षेत्र आणि लष्कर अशा सर्वांनी एकत्रितपणे येऊन पिके वाचवण्यासाठी मोहीम उघडली होती. यापूर्वी 1993 मध्येसुद्धा पाकिस्तानला अशा स्वरूपाच्या गंभीर टोळधाडीचा सामना करावा लागला होता. (तेव्हा आपल्या राजस्थान व गुजरातलाही याचे तडाखे बसले होते.)

सध्याची एकूण परिस्थिती पाहता, जून-जुलै महिन्यात आपण कोरोनाचे काय करायचे आणि आपले आयुष्य कसे पुढे रेटायचे, याविषयी चिंताग्रस्त असू. मात्र त्याच वेळेस या कीटकांच्या माध्यमातून जी टोळधाड येऊ शकते, तिचा सामना कसा करायचा व आपले कृषी-उत्पादन कसे सुरक्षित ठेवायचे, याचीही तयारी करायला हवी. अर्थात अशा टोळधाडीमागे केवळ उत्तर-पूर्व आफ्रिकेतील दुष्काळ आणि पूर इतकीच कारणे नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. असे दुष्काळ आणि पुराचे अनियमित चक्र तयार होण्यामागे वातावरणातील बदलांचा मोठा वाटा आहे. तसेच आपण हेही लक्षात ठेवायला हवे की, माणसाने आखलेल्या राष्ट्रा-राष्ट्रांच्या सीमारेषा निसर्ग पाळत नसतो. त्यामुळे अशा टोळधाडीसारख्या संकटांचा सामना करण्यासाठी केवळ आपल्याच देशात प्रयत्न करणे एवढेच पुरेसे नसून केनिया-इथिओपिया व त्या प्रदेशातील इतर देशांना मदत करणेही तितकेच आवश्यक आहे, हे समजून घ्यायला हवे. एकीकडे कोरोनाच्या संकटाच्या काळात ग्लोबलायझेशनचे काय होणार, याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकांना असे वाटते की, कोरोनामुळे ग्लोबलायझेशनचा अंत जवळ आलेला आहे. मात्र टोळधाडीसारखी ही अशी संकटे पाहिल्यास ग्लोबलायझेशनची प्रक्रिया आणखी पुढे नेणे आणि राष्ट्रा-राष्ट्रांनी एकमेकांशी अधिकाधिक सहकार्य करणे याशिवाय आपल्याला पर्याय नाही, हेच लक्षात येईल.

संकल्प गुर्जर, नवी दिल्ली

Share on Social Media

दृष्टिक्षेप

वुहान विषाणू व कन्फ्युशिअसची युद्धनीती

भाग 2 : प्रसार, गोंधळ आणि मदतीचे राजकारण

डॉ. निरुपमा व सुषमा गोविंद तळवलकर

अमेरिकेतील (व अनेक देशांतील) तज्ज्ञांचे या बाबतीत अज्ञान, चुकीचे आडाखे, सार्वजनिक आरोग्यसंस्थांनी केलेला गोंधळ, विलंब, चुकीचे मार्गदर्शन- अशा अनेक गोष्टी साथ वाढण्यास कारणीभूत झाल्या. गुप्तचर संस्था व प्रसारमाध्यमे यांनाही काही माहिती नव्हती. साथीचे गांभीर्य प्रथम कोणाच्या लक्षातच आले नाही. अमेरिकेतील अनेक मान्यवर संस्थांचे तसेच लंडनच्या इंपीरिअल कॉलेजचे आडाखे भरमसाट फुगलेले निघाले. त्यानुसार जगभर असंख्य लोकांना हा रोग होऊन कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडणार होते. अमेरिकेत सव्वा कोटी ते 2 कोटी जीवितहानी होईल, असा अंदाज होता. साथ पसरून अधिकाधिक माहिती मिळू लागली, तेव्हा रोज ही नवी माहिती लक्षात घेऊन त्या पायावर सुधारित आडाखे बांधले गेले. ‘जा.आ. संघटना, नियाड, डॉ.फाउची, सीडीसी, फिमा, गुप्तचर संस्था (सीआयए), प्रसारमाध्यमे काय करीत होती?’ असा प्रश्न 29 एप्रिलच्या वार्ताहर परिषदेत कोमो यांनी विचारला आणि स्वत:चा काही दोष नसून ही साथ पसरल्याबद्दल- या सर्वांना दोष दिला.

चीनच्या हुबे प्रांतातील वुहानमध्ये प्राणिबाजारातील जिवंत वटवाघळे खाल्ल्यामुळे प्रथम लागण होऊन कोव्हिड-19 विषाणूची साथ उद्‌भवून जगभर फैलावली, असे सांगितले जात होते. पण वुहानमधील प्रयोगशाळेतील निष्काळजीपणामुळे 2019 च्या नोव्हेंबरमध्ये (वा त्याआधी) या विषाणूंची लागण तेथील एकीस होऊन तिच्या संसर्गामुळे वुहानमध्ये या रोगाचा फैलाव झाला, अशी अमेरिकन सरकारची माहिती आहे. सध्या अमेरिकेसह अनेक देश वैयक्तिक संरक्षक साहित्य, औषधे तसेच औषधांत व तपासणीपरीक्षेसाठी लागणारे घटक यांसाठी चीनवरच अवलंबून असल्यामुळे चीनला याबद्दल जाब विचारणे व खोलात तपास करणे, हेही साथ आटोक्यात येईपर्यंत करता येणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेला आणि अमेरिका वा इतर कोणत्याही देशाच्या जीवशास्त्र संशोधकांना वुहानच्या प्रयोगशाळेस वा प्राणिबाजारास भेट देऊन तपासणी करण्यास चीनने बंदी केल्यामुळे तिथे खरी काय अवस्था आहे, हे समजू शकत नाही. तपासणी करण्याची मागणी 4 मे रोजी जर्मनी, स्वीडन, ऑस्ट्रेलिया व अमेरिका यांनी केल्यावर चिनी राजदूताने ऑस्ट्रेलियातून वाईन व अन्न आयातीवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली.

आपली प्रयोगशाळा ही अमेरिकन प्रयोगशाळांच्या तोडीचीच नव्हे तर सरसच आहे, हे दाखवण्यासाठी गेली काही वर्षे चिनी शास्त्रज्ञ वुहानच्या प्रयोगशाळेत जंतूंवर प्रयोग करीत होते, जंतूंच्या विषाची तीव्रता वाढवण्याचेही प्रयोग चालू होते. या प्रयोगशाळेस उत्तेजनार्थ म्हणून अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलिया लाखो डॉलर देणगी अनेक वर्षे देत आले आहेत. तिथे जंतू बंदिस्त राहतील, त्यांचा कर्मचाऱ्यांना संसर्ग होणार नाही, ते निष्काळजीपणामुळे वा चुकीमुळे बाहेर फैलावणार नाहीत यासाठी आवश्यक त्या सुरक्षिततेची उपाययोजना करण्यात बेपर्वाई दिसते- अशी सावधगिरीची सूचना 2017 मध्ये अमेरिकेने अहवालात नोंदली होती.

सर्वसामान्य चिनी जनतेत ॲक्युपंक्चर, पारंपरिक चिनी औषधे, वनस्पती वा प्राण्यांचा विविध प्रकारे औषध म्हणून वापर खूप असतो. खेेड्यापाड्यांत अनेकदा चुकीचे निदान करून चुकीची औषधेही दिली जातात. यामुळे हुबेमध्ये लाखो लोकांना या विषाणूची बाधा होऊन अनेक जण मृत्यू पावले असण्याची शक्यता आहे. चिनी सरकारी अधिकाऱ्यांनी या रोगाची बातमी लपवून ठेवून वेळीच उपाययोजना केली नाही. रोग्यांना समाजात मिसळून दिले. त्यामुळे वुहानमध्ये ही साथ सुरू झाली व फोफावली. ती इतकी संहारक व माणसांत संसर्गजन्य असल्याचे चिनी अधिकाऱ्यांना डिसेंबरमध्येच समजल्यावर ती चीनमध्ये इतरत्र फैलावू नये व हुबेमध्येही आटोक्यात राहावी, यासाठी त्यांनी विलगीकरणाचे व आणीबाणीचे कडक उपाय योजले. हुबेमधून चीनच्या इतर भागात जायला व इतर भागांतून हुबेमध्ये यायला बंदी केली. फेब्रुवारीपर्यंत वुहानमध्ये लोकांना घराबाहेर जाण्यासही बंदी होती.

जीवितहानीबरोबरच वुहानची आर्थिक व्यवस्थाही पार कोसळली. अनेकांचे धंदे बसले, रोजचे व्यवहार थांबले. ही भीषण अवस्था पाहून डिसेंबरमध्येच इतर देशांना या साथीची माहिती देऊन लगेच सावध करणे, वुहानमधून परदेशप्रवासास बंदी घातून ही साथ जगभर पसरणार नाही हे बघणे- हे चीनचे कर्तव्य होते. पण लोकांना परदेशात जाण्यास मुक्तद्वार ठेवले होते. या काळात वुहान व चीनच्या इतर भागांतून 4 लाख 30 हजार लोक अमेरिकेत आले, 5 हजार इटलीत व काही युरोपात गेले. हे बेजबाबदार वर्तन होते, की पद्धतशीर योजना? दमडीही खर्च न करता, या विषाणूचा गुप्त अस्त्रासारखा उपयोग करून सर्व जगाची व विशेषकरून अमेरिकेची अर्थव्यवस्था कोसळून पाडण्याची आयती संधी मिळत आहे, हे पाहून चीनने हे कपट कारस्थान फार खुबीने पार पाडले असण्याची शक्यता आहे. काही गरीब राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेची या साथीमुळे फारच हलाखीची परिस्थिती होईल, तेव्हा चीनच त्यांना मदतीचा हात देऊन ते देश स्वत:च्या ताब्यात घेईल. आर्थिक मदत दिल्याच्या बदल्यात झांबियातील खाणी ताब्यात घेऊन तेथील खनिजसंपत्तीवर मालकी हक्क सांगण्यासाठी चीन दबाव आणत असल्याची बातमी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिली आहे.

‘डेली मेल’च्या सविस्तर वार्तापत्रांवरून दिसते की, नवा विषाणू उद्‌भवल्याचे 31 डिसेंबरला चीनने जागतिक आरोग्य संघटनेला कळवले पण तो प्राण्यांकडून माणसांत येत असला तरी माणसामाणसांत संसर्गजन्य नाही, अशीही ग्वाही दिली. चीनमधून याबद्दल बातमी देण्यास तेथील प्रसारमाध्यमांवर व डॉक्टरांवर बंदी आणली, काहींना छळ करून मारण्यात आले. रोग्यांची संख्या वाढत असून त्यांचे विलगीकरण करण्यात येत असल्याचे आम्हाला समजले असल्यामुळे जा.आ. संघटनेकडे ‘खरे काय घडत आहे ते सांगावे,’ अशी तैवानने विचारणा केल्यावर संस्थेने उत्तरच दिले नाही. हाँगकाँग व तैवानने डिसेंबरमध्येच आणि दक्षिण कोरियात फेब्रुवारीपासूनच जनतेची तपासणी काटेकोरपणे करून तेथील सरकारने ही साथ तिथे पसरणार नाही, याची खबरदारी घेतली.

दि. 26 मार्चच्या ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’मधील बातमीप्रमाणे जानेवारी-फेब्रुवारीत चीनने अनेक देशांतून अब्जावधी वैयक्तिक शारीरिक संरक्षक साहित्य, एन-95 मास्क वगैरेंची आयात करून आधीच साठेबाजी केली. मार्चपासून साथीचे प्रमाण जगभर वाढून या साहित्याचा तुटवडा भासू लागल्यावर त्याचा पुरवठा करण्यासाठी अमेरिका, इटली व युरोप यांना चीनला विनंती करावी लागली आणि चीनने जगाच्या कल्याणासाठी ही मदत करीत असल्याचा आव आणला.

‘इटलीतील बंदराचे काम चीनला देणे धोक्याचे आहे, चीन त्यामार्गे युरोपात योजनाबद्ध रीतीने विस्तार करून व वाहतुकीवर ताबा मिळवून आपला प्रभाव वाढवेल, त्यामुळे चीनला अशा मोक्याच्या ठिकाणी शिरकाव करू देऊ नये’, अशी विनंती एक-दोन वर्षांपूर्वी ट्रम्प सरकारने केली होती. पण इटलीने चीनला बंदराचे व त्या भागाच्या विकासाचे काम दिले. इटलीच्या लोम्बार्डी प्रांतात 1 लाख चिनी आहेत. फ्लॉरेन्सच्या महापौराने आपण वंशवादी नसून फार पुरोगामी आहोत, याचे प्रदर्शन करण्यासाठी जानेवारीत ‘वुहानमधून परतलेल्या चिन्यांचे आलिंगन देऊन स्वागत करावे’ असे सांगितले. वुहानमध्ये ही साथ किती संहारक आहे हे माहिती असूनही इटलीच्या लोकांत ती पसरू नये, अशी काळजी घेण्याऐवजी नाकावर मास्क घातलेला एक चिनी गृहस्थ गावातील चौकात उभा राहून गाववाल्यांना आलिंगन देत असल्याचे दृश्य टीव्हीवर दिसले. विषाणुबाधित अनेक चिनी इटलीच्या समाजात मिसळल्यामुळे तिथे साथ फोफावून अनेक लोक दगावल्यावर महापौराने आणीबाणी जाहीर करून टाळेबंदी केली. साथीमुळे इटलीतले सर्व व्यवहारही बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बसले. त्याचा फायदा माफियाच्या गुंडांनी उठवला. गरिबांना आर्थिक मदत व औषधपाण्यास मदत करण्याच्या मिषाने त्यांना वर्चस्वाखाली आणले. इटलीतून हा विषाणू ब्रिटन, युरोप व अमेरिकेत पसरला.

टेड्रोस घेब्रेसस यांना जा.आ.संघटनेचे अध्यक्षपद मिळवून देण्याची व्यवस्था चीननेच केली होती. वैद्यकीय डॉक्टर नसूनही संस्थेचे अध्यक्षपद मिळालेले हे पहिलेच होते. टेड्रोस यांनी 14 जानेवारीला चीनचीच री ओढून सांगितले की, हा विषाणू मानवजातीत संसर्गजन्य नाही. तशी वर्गवारी करणे हे त्या रोग्यांसाठी बदनामीकारक आहे, असे अजब विधानही केले. टेड्रोस हे आधी इथिओपियाचे आरोग्यमंत्री होते. आफ्रिकेतील अनेक देशांत चीनने गेली काही वर्षे रस्ते बांधणे, वाहतूक, बंदरे, इतर व्यवसाय यांस आर्थिक व तांत्रिक मदत देण्याच्या नावाखाली बस्तान बसवून ते देश चीनवर अवलंबून राहतील आणि एक प्रकारे चीनच्या वसाहती होतील, असे बघितले आहे. इथिओपियाचे मंत्रिमंडळ, अधिकारी व व्यापारीवर्ग यांचे चीनशी हितसंबंध असून ते चीनच्या प्रभावाखाली आहेत. देशाच्या स्थूल उत्पादनाच्या प्रमाणात जा.आ.संघटनेला त्या देशातर्फे अनुदान दिले जाते. अमेरिका दर वर्षी 40 ते 50 कोटी डॉलर देते, पण चीन देतो फक्त 3 ते 4 कोटी. टेड्रोस यांसह आणखी काही चीनवादीही त्या संघटनेत आहेत. गेल्या वर्षी एड्‌स, कावीळ व इतर संसर्गजन्य रोगनिमूर्लनासाठी या संस्थेने जेवढा खर्च केला त्याच्या दुप्पट खर्च संघटनेच्या अधिकाऱ्यांचा प्रवास, उंची हॉटेलात राहणे, खाणेपिणे यांवर झाला. ट्रम्प सरकारने या संस्थेला जाब विचारून अमेरिकेचा हप्ता 3 महिने तात्पुरता थांबवला आहे.

जा.आ.संघटनेने हा रोग माणसांत संसर्गजन्य असल्याचे 23 जानेवारीला प्रथम मान्य केले. दि. 24 जानेवारीस अमेरिकेच्या नियाड (नॅशनल इन्स्टिट्यढूट ऑफ ॲलर्जी अँड इनफेक्शन्स डिसीझेस) या संसर्गरोग संस्थेचे प्रमुख डॉ.फाउची यांनी ग्वाही दिली की, आपल्याकडे या रोगाच्या अटकावाची तयारी करण्यासाठी व तपासणीसाठी अनेक उपाय आहेत, त्यामुळे जनतेने चिंता करण्याचे वा घाबरून जाण्याचे कारण नाही. हा रोग अमेरिकेत अगदी अल्प हानिकारक असेल, पण तरीसुद्धा आरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र याबद्दल अतिशय जागरूक असायला हवे. दि. 30 जानेवारीला सीडीसी (सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल) या आरोग्यसंस्थेने हा रोग माणसांत संसर्गजन्य असल्याचे सांगितल्यावर अमेरिकेला प्रथमच समजले. चिनी नेत्यांनी या साथीसाठी उपाययोजना करून जगापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे, असे टेड्रोस यांनी टि्‌वट केले. त्यांनी प्रथम सांगितले होते की- ही साथ जगभर पसरण्याची काही शक्यता नाही, तिला आटोक्यात आणले गेले आहे, मास्कचा काही उपयोग नाही. पण 31 जानेवारीला त्यांनी सर्व जगाच्या आरोग्याला धोका असल्याची आणीबाणी जाहीर केली.

त्याच दिवशी ट्रम्प यांनीही साथीमुळे जनतेच्या आरोग्याला व जीविताला गंभीर धोका असल्याची आणीबाणी जाहीर केली. अमेरिकेचे चीनवंशीय नागरिक व ज्यांचे कुटुंबीय अमेरिकेत आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त सर्व परदेशीयांना चीनमधून अमेरिकेत येण्यास 2 फेब्रुवारीपासून बंदी घातली. तेव्हा ते वंशवादी असल्याची टीका डेमॉक्रॅट पक्षनेते व बहुतेक प्रसारमाध्यमांनी केली; कारण युक्रेनसंबंधात ट्रम्प यांच्याविरुद्ध भक्कम पुरावा न देता महाभियोग चालविणेे व म्युलर पुराण परत उकरून खोटे आरोप करणे याशिवाय त्यांना दुसरा कार्यक्रम नव्हता. सर्व ठीक आहे, ही आणीबाणी खरी नसून आपल्याविरोधी महाभियोगाच्या प्रस्तावाकडून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ट्रम्प यांनी ती बनवलेली आहे, अशी टीका अमेरिकन कनिष्ठ सभेच्या (काँग्रेसच्या) सभापती पेलोसी व वरिष्ठ सभेचे (सिनेटचे) विरोधी पक्षनेते शूमर यांनी केली. डेमॉक्रॅट व अमेरिकेतील बहुतेक प्रसारमाध्यमांनी तीच री ओढली आणि चीनवर टीका करणे चूक आहे, असे सांगितले. तेव्हा ‘ही साथ धोक्याची व खरी असून प्रसारमाध्यमेच खोटी आहेत’, असे ट्रम्प म्हणाले. पण याची बातमी देताना ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ व ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी सांगितले की, ‘या साथीत अर्थ नसून ती खोटी आहे, असे ट्रम्प म्हणतात!’ टीव्हीवर ट्रम्प यांचे ते भाषण ज्यांनी ऐकले, त्यांना ती बातमी विपर्यस्त करून दिली आहे, हे समजले. पण जगातील बहुतेकांनी तपास न करता अशीच विपर्यस्त बातमी दिली व त्यावर भाष्य केले. ट्रम्पविरोधक अजूनही तोच खोटा प्रचार करतात.

जानेवारी व फेब्रुवारीत बरेच लोक युरोपातून-विशेषत: इटलीतून अमेरिकेत आले आणि काही चीनमधून युरोपात किंवा तैवानला जाऊन तिथून अमेरिकेत आले. त्यातील काहींची विमानतळावर तपासणी केली नव्हती, त्यांना 14 दिवस विलगही ठेवले नव्हते. त्यामुळे अमेरिकेत ही साथ फोफावली. युरोपातून येथे येणाऱ्या विमानांवर 16 मार्चला ट्रम्प यांनी बंदी घातली. तेव्हाही डेमॉक्रॅट व बहुतेक प्रसारमाध्यमांनी विरोध केला. युरोपमधील नेतेही रागावले. डेमॉक्रॅट प्रतिनिधी प्रेसली यांनी तर विमाने येण्यावर बंदी घालण्याचा ट्रम्प यांना अधिकारच नाही व तो काढून घेतला पाहिजे, असा प्रस्तावच काँग्रेसमध्ये मांडला.

ट्रम्प यांनी चीनहून विमाने अमेरिकेत येण्यास बंदी घातल्याचे पाहून लगेच फेब्रुवारीच्या मध्यास ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनीही परदेशांतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली. शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांत चिनी विद्यार्थ्यांचे प्रमाण 40 टक्के आहे. सुट्टी संपून ही मुलेही तेव्हा चीनमधून ऑस्ट्रेलियात परत येणार होती, पण त्यांनाही येऊ दिले नाही. या बंदीमुळे ऑस्ट्रेलियात साथ पसरली नाही व फक्त 97 रुग्ण दगावले.

फेब्रुवारीत डेमॉक्रॅट पक्षाच्या अध्यक्षीय प्राथमिक निवडणुकीतील उमेदवारांच्या व ट्रम्प यांच्या प्रचार सभा चालूच होत्या. या रोगाकडे ट्रम्प यांच्याहीपेक्षा डेमॉक्रॅट दुर्लक्ष करीत होते. सर्व व्यवहार नेहमीप्रमाणेच चालू ठेवावेत, चायना टाऊनमध्ये सर्वांनी यावे- असे सांगत होते. सीडीसीच्या अहवालानुसार 24 फेब्रुवारीला अमेरिकेत फक्त 17 जणांना या साथीची बाधा झाली होती. पण महिनाभरात ही संख्या हजारोंनी वाढली. काँग्रेसमधील चिनीवंशीय डेमॉक्रॅट जुडी चू यांनी बजावले की, चीनमधून हा विषाणू आल्याचा आरोप करणे चूक आहे.

ट्रम्प यांनी समाजात दूरता शिस्त पाळण्याचा आदेश 16 मार्चला व टाळेबंदीचा आदेश 31 मार्चला दिला. अमेरिकेत कोट्यवधी लोकांना या साथीची बाधा होऊन लाखो रुग्ण त्यात बळी पडतील, असा अंदाज 29 मार्चला डॉ.फाउची यांनी वर्तविला. दूरता पाळल्यास अंदाजे 1 ते अडीच लाख लोक दगावतील, मात्र अंतर न पाळता व्यवहार चालू ठेवले तर मृतांची संख्या 15 ते 25 लाखांवर जाईल, असा इशारा तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.

ट्रम्प व त्यांच्या सरकारने या महासाथीला पायबंद घालण्यासाठी कोणते प्रतिबंधक उपाय योजणे परिणामकारक होतील, याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मार्गदर्शक पत्रिका प्रसिद्ध केली. परंतु अमेरिका हे संघराज्य असल्यामुळे प्रत्येक राज्याला, भागाला, गावाला स्थानिक परिस्थितीस योग्य अशी कोणती मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणायची व उपाययोजना करायची, हे ठरविण्याचे स्वतंत्र अधिकार घटनेने दिले आहेत. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या माहितीप्रमाणे 675 लोकांना या रोगाची बाधा झाल्याचे दिसल्याबरोबर कॅलिफोर्नियाचे राज्यपाल न्यूसम यांनी लगेच टाळेबंदी जाहीर करून दूरता पाळण्याचा आदेश दिल्यामुळे त्या राज्यात ही साथ जास्त वाढली नाही व कमी लोक दगावले. न्यूयॉर्कचे राज्यपाल कोमो यांनी मात्र 7000 लोकांना बाधा होईपर्यंत टाळेबंदी जाहीर न केल्यामुळे तेथील रुग्णसंख्या, हॉस्पिटलमध्ये व अतिदक्षता विभागात दाखल झालेल्यांची संख्या व मृतसंख्या अमेरिकेत सर्वाधिक आहेत. अर्थात जानेवारी-फेब्रुवारीत चीनमधून अमेरिकेत आलेल्या लोकांपैकी बरेच न्यूयॉर्क शहराच्या भागांत आले आणि तेथील दाट वस्ती, भुयारी रेल्वे, रेल्वे व बस यांमधील गर्दी यांमुळेही तिथे रुग्णसंख्या जास्त झाली.

हॉस्पिटले भरून जाऊन रोग्यांना दाखल करण्यास खाटा राहणार नाहीत, असा ओरडा खूप झाला. ट्रम्प यांनी नोकरशाहीच्या चाकोरीबाहेर जाऊन, आरमाराच्या सुसज्ज हॉस्पिटल असलेल्या दोन बोटींवर अनेक पटींनी अधिक रुग्ण दाखल करून घेता येतील, अशी व्यवस्था ताबडतोब करून घेतली आणि 2 हजार खाटांची ‘कम्फर्ट’ ही बोट न्यूयॉर्क शहराच्या बंदरात व ‘मर्सी’ ही बोट लॉस एन्जेलिसच्या बंदरात आणली. न्यूयॉर्क शहरातील जॅव्हिट्‌झ केन्द्रात हॉस्पिटल उभारण्याची व्यवस्थाही घाईघाईने केली. प्रत्यक्षात न्यूयॉर्कमध्ये कोट्यवधी लोक आजारी पडले नाहीत. 2 लाखांवर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले, पण खाटा कमी असल्यामुळे दाखल करता आले नाही असे कोठेही झाले नाही. दोन्ही बोटींचीही फारशी गरज पडली नाही.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने सीडीसीने केलेल्या चुकांवर प्रकाश टाकला आहे. फेब्रुवारीत सीडीसीने सांगितले की, त्यांच्याकडे विषाणूसाठी रुग्णांची तपासणी करण्याच्या चाचणीच्या सामग्रीचा भरपूर साठा आहे, तो पुरेसा होईल. मार्चमध्ये सीडीसीने ही सामग्री सरकारी हॉस्पिटलांच्या प्रयोगशाळांना पाठवली, पण यात काही जिन्नसच घालायचे राहिले असल्यामुळे त्यांचा उपयोग झाला नाही. नंतर अन्न व औषधनियंत्रण संस्थेने (एफडीए) काही खासगी प्रयोगशाळांनाही या चाचण्या करण्याची परवानगी दिली. पण मागणी खूप असल्यामुळे त्या मालाचा तुटवडा निर्माण झाला. निरुपयोगी सामग्री, सीडीसीच्या नियमांच्या जटिलतेमुळे लांबण व सरकारी प्रयोगशाळांपलीकडे क्षेत्र वाढवण्यास उशीर- असा सर्व गोंधळ सीडीसीने केला. त्यामुळे साथीस आळा घालणे आणखी कठीण झाले. चीनमधून परतल्यावर ज्यांना हा रोग झाल्याची लक्षणे आहेत, त्यांचीच फक्त चाचणी प्रथम करण्यात येत होती. नंतर चाचण्यांच्या सामग्रीचे उत्पादन वाढवून काही मार्गदर्शक तत्त्वांनुसार अधिक लोकांची चाचणी करण्यास सुरुवात झाली.

अँटिबॉडी कोणत्या व किती, हे बघण्यासाठी रक्ततपासणी करण्याची व्यवस्था आता खूप वाढवली आहे. यांतील कोणत्या प्रकारच्या अँटिबॉडी या रोगप्रतिकारक वा रोगप्रतिबंधक आहेत व त्यांची ही शक्ती किती काळ टिकते, याची माहिती हा रोग नवा असल्यामुळे अजून कोणालाच नाही. तपासण्या होऊन सर्व माहिती गोळा होईल, तेव्हा काही काळाने हे निष्कर्ष काढता येतील. अलीकडे कोमो यांनी सांगितले की, न्यूयॉर्क शहराच्या पाच भागांत काहींची रक्ततपासणी केल्यावर 25 टक्के लोकांत अँटिबॉडी असल्याचे आढळले आणि हे लोक लक्षणरहित होते. म्हणजे या विषाणूचा संसर्ग होऊन ते बरे झाले होते, पण संसर्गामुळे त्यांना काही त्रास झाला नाही व संसर्ग झाल्याचे समजलेसुद्धा नाही. याचा अर्थ- समाजात अनेकांना असा लक्षणरहित संसर्ग झाला असणार आणि हा विषाणू आतापर्यंत अंदाज केला होता त्यापेक्षा जास्त संसर्गजन्य असला, तरी अंदाजापेक्षा खूपच कमी घातक आहे. हे चांगले आहे.

हायड्रॉक्सिक्लोरोक्विन वा क्लोरोक्विन ही मलेरियासाठीची औषधे विषाणूग्रस्त रोग्यांना आवश्यक असतील तर डॉक्टरांनी देऊन त्यांचे प्राण वाचले तर चांगलेच, रोग्यांनी आपणहून मात्र ती घेऊ नयेत, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तेव्हा ट्रम्प हे डॉक्टर नसताना ही दुष्परिणाम होणारी औषधे कशी घ्यायला सांगतात, असा ओरडा प्रसारमाध्यमांनी केला. त्याच वेळी कोमो व इतर काही राज्यपाल याच औषधांचा साठा करून ती त्यांच्या राज्यांतील रोग्यांना गरज भासेल तेव्हा उपलब्ध असतील हे बघत होते. पण त्यांना याबद्दल प्रसारमाध्यमांनी एकदाही प्रश्न विचारला नाही. अर्थात ट्रम्प यांनी कोणत्याही औषधाचा प्रचार करणे चूक आहे. ते डॉक्टर नाहीत. पण एवढे लोक मृत्युमुखी पडत आहेत, तेव्हा कोणताही उपाय करून त्यांना वाचविता आले तर बघावे, असा उद्देश त्यामागे होता. कोणती औषधे कोणत्या रोग्याला केव्हा द्यायची, हे ठरवण्याचा अधिकार फक्त डॉक्टरांना आहे; पुढाऱ्यांना ते ठरवण्याचा अधिकार नाही, तेवढाच पत्रकारांना व इतरांनाही नाही. डॉक्टरांनी ती वापरून उपयोग झाला तर चांगले, असे केवळ ट्रम्प यांनी सांगितल्यामुळे प्रसारमाध्यमांनी विरोधासाठी विरोध करणे व काहींनी भलावण करणे, हे दोन्ही चूक आहे. या औषधाच्या कंपनीत ट्रम्प यांचे आर्थिक संबंध गुंतले आहेत, असेही आरोप काहींनी केले. चौकशी केल्यावर ते आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले.

देशभरात 1 एप्रिलपर्यंत 1 लाख 30 हजार श्वसनयंत्रे लागतील, असा अंदाज फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंटने (फिमा) वर्तविला होता. केंद्र सरकारकडे व संरक्षण खात्यात 16 हजार श्वसनयंत्रे होती. कोमो यांसारखे काही राज्यपाल श्वसनयंत्रे खूप कमी पडणार म्हणून सतत ओरडा करत होते; पण राज्यात कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती श्वसनयंत्रे आहेत, त्यातील किती तेव्हा वापरली जात आहेत व नंतर वापरली जातील, याची काहीही माहिती करून घेण्याची तसदी त्यांनी व हॉस्पिटलच्या प्रशासकांनी घेतली नव्हती. काही कोटी लोक आजारी पडून अजून चार दिवसांनी 40 हजार श्वसनयंत्रे न्यूयॉर्कमध्ये लागतील, ती उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्ण निधन पावतील, असा भीतिदायक प्रचार त्यांनी चालविला होता. प्रसारमाध्यमांनीही काही चौकशी न करता लगेच त्याबद्दल ट्रम्प यांना दोषी ठरवून श्वसनयंत्रांच्या तुटवड्यामुळे रोगी दगावल्यास ट्रम्प यांनी काही न केल्यामुळे तसे झाले आणि त्या रुग्णांच्या रक्ताने ट्रम्प यांचे हात माखले आहेत, असा निर्णय दिला. ट्रम्प यांचे जावई ज़ॅरेड कुशनर व डॉ.बर्क्स यांनी मग तो सर्व तपास तातडीने व बारकाईने केला आणि सरकार व खासगी संस्था यांनी सहकार्य करण्याची व श्वसनयंत्रांचे उत्पादन शीघ्र गतीने होऊन जिथे गरज असेल तिथे फिमातर्फे आवश्यक तो पुरवठा करण्याची योग्य व्यवस्था केली.

अमेरिका हे संघराज्य असल्यामुळे केंद्र सरकार आणीबाणीसाठी औषधे, श्वसनयंत्रे व इतर साधनांचा साठा करून ठेवत असले, तरी मुळात सर्व राज्यांनी, जिल्ह्यांनी व गावांनीसुद्धा स्वतंत्रपणे अशा आणीबाणीसाठी या सर्वांचा साठा कायम सज्ज ठेवणे हे त्यांचे कर्तव्य असते. पण ही साथ आल्यावर असे दिसले की, कोणाचीच अशी तयारी नव्हती. साठा कमी पडल्यास काय करायचे, एकमेकांत कसे सहकार्य करायचे, एका भागातून दुसरीकडे पुरवठा नेण्याची काय व्यवस्था करायची याची काहीच योजना नव्हती. ‘लॉस एंजेलिस टाइम्स’ व ‘ब्लूमबर्ग न्यूज’ने अशी माहिती दिली आहे की- दुसरे बुश अध्यक्ष असताना केंद्रीय साठ्यातील 10 टक्के एन-95 मास्क वापरण्यात आले होते, तेव्हा साठ्यातील ही तूट भरून काढण्यासाठी तेवढेच नवे आणून ठेवले गेले नाहीत. ओबामा अध्यक्ष असताना 2014 पर्यंत एन-95 मास्क, गाऊन वगैरेंचा 70 टक्के साठा संपला. साठ्यात 10 कोटी मास्क इत्यादींची भर घालण्याचा सल्ला तेव्हा देण्यात आला होता, पण तशी भर घालण्यात आली नाही. त्यामुळे आता श्वसनयंत्रांची व एन-95 मास्कची गरज लागल्यावर केवळ 20 टक्के साठा असल्याचे आढळले. त्यातील बहुतेक मास्क वाया गेलेले होते. हे काम राष्ट्राध्यक्षाचे नसून त्या खात्याच्या मुख्याच आहे. ते गेल्या 20 वर्षांत कोणीच केले नाही. आता ट्रम्प यांनी श्वसनयंत्रे तातडीने उत्पादन करण्याचा आदेश देऊन ते काम करून घेतले आहे व 1 लाख अधिक श्वसनयंत्रांचा साठा करण्यात आला आहे. इतर देशांनाही यातून मदत दिली जाईल. अनेक खासगी संस्था आता कोट्यवधी एन-95 मास्क तयार करीत आहेत. ही साथ वा दुसरी काही आपत्ती येऊन गरज लागली तर त्यांचा उपयोग अमेरिकेतच होईल. पण श्वसनयंत्रे कमी पडल्यास ट्रम्प दोषी असतील, असा डंका कालपर्यंत पिटणारे वार्ताहर आता विचारतात की, एवढ्या श्वसनयंत्रांची गरज काय? ब्लूमबर्ग 10 वर्षांपूर्वी न्यूयॉर्क शहराचे महापौर होते. तेव्हा श्वसनयंत्रे सुस्थितीत ठेवण्याचा खर्च फार येतो असे दिसल्यावर त्यांनी ती यंत्रे भंगारमध्ये विकून टाकली. त्यामुळे आता न्यूयॉर्कच्या साठ्यात श्वसनयंत्रे कमी होती आणि जी होती ती किती आहेत याचा कोणाला पत्ता नव्हता.

साथीमुळे लोक मृत्युमुखी पडत असताना लोकमत विरुद्ध जाऊ नये व चांगली बातमी देऊन लोकांचे मनोधैर्य वाढवावे, म्हणून ब्रिटिश सरकारने 4 एप्रिलला गाजावाजा करून घाईघाईने बीजिंग इऑनमेड या चिनी कंपनीची शांग्रिला-510 ही श्वसनयंत्रे आयात केली. ती सदोष होती. हॉस्पिटलमध्ये वापरल्यावर रोग्यांना अपाय होऊन ते दगावले. इऑनमेडला याबद्दल विचारले असता, त्यांनी उत्तरच दिले नाही. आणखी दुसऱ्या देशांतही त्यांनी ही यंत्रे विकली काय, याचेही उत्तर दिले नाही.

इटली, स्पेन, ब्रिटन व अनेक देशांनी चीनकडून घाईघाईने आयात केलेली विषाणू तपासणीची कोट्यवधी डॉलरची वैद्यकीय सामग्रीही बरीचशी सदोष निघाली. नेदरलँड व फिनलँडने आयात केलेले मास्क निकामी निघाले. सदोष सामग्रीचे पैसे चीनने परत करावेत, अशी मागणी ब्रिटनने केली आहे. दि. 25 एप्रिलपर्यंत 78 देशांनी व 6 आंतरराष्ट्रीय संघटनांनी विविध वैद्यकीय सामग्री व उपकरणे आयात करण्यासाठी चीनला 150 कोटी डॉलरची 192 कंत्राटे दिली. ‘‘साथीच्या संकटकाळाचा फायदा घेऊन परोपकारी तारणहार अशी आपली प्रतिमा निर्माण करायची, ‘औदार्याचे राजकारण’ व वस्तुस्थितीचा विपर्यास करून स्वत:ला अनुकूल असा प्रचार करायचा आणि आपण विश्वासार्ह व जबाबदार सहकारी आहोत अशी जगाची समजूत करून देऊन आपली शक्ती वाढवायची मोहीम चीनने चालविली आहे’’, याबद्दल युरोपियन संघाच्या परराष्ट्र धोरण समितीचे प्रमुख बोरेल व जगातील काहींनी आवाज उठवला आहे.

कोव्हिड 19 या नव्या रोगाची जगात कोणालाच माहिती नव्हती. अमेरिकेतील (व अनेक देशांतील) तज्ज्ञांचे या बाबतीत अज्ञान, चुकीचे आडाखे, सार्वजनिक आरोग्यसंस्थांनी केलेला गोंधळ, विलंब, चुकीचे मार्गदर्शन- अशा अनेक गोष्टी साथ वाढण्यास कारणीभूत झाल्या. गुप्तचर संस्था व प्रसारमाध्यमे यांनाही काही माहिती नव्हती. साथीचे गांभीर्य प्रथम कोणाच्या लक्षातच आले नाही. अमेरिकेतील अनेक मान्यवर संस्थांचे तसेच लंडनच्या इंपीरिअल कॉलेजचे आडाखे भरमसाट फुगलेले निघाले. त्यानुसार जगभर असंख्य लोकांना हा रोग होऊन कोट्यवधी लोक मृत्युमुखी पडणार होते. अमेरिकेत सव्वा कोटी ते 2 कोटी जीवितहानी होईल, असा अंदाज होता. साथ पसरून अधिकाधिक माहिती मिळू लागली, तेव्हा रोज ही नवी माहिती लक्षात घेऊन त्या पायावर सुधारित आडाखे बांधले गेले. ‘जा.आ. संघटना, नियाड, डॉ.फाउची, सीडीसी, फिमा, गुप्तचर संस्था (सीआयए), प्रसारमाध्यमे काय करीत होती?’ असा प्रश्न 29 एप्रिलच्या वार्ताहर परिषदेत कोमो यांनी विचारला आणि स्वत:चा काही दोष नसून ही साथ पसरल्याबद्दल या सर्वांना दोष दिला. प्रसार माध्यमांनी हे ऐकून घेतले, टीका केली नाही. पण त्याच वेळी हीच प्रसारमाध्यमे व डेमोक्रॅट हा सर्व दोष ट्रम्प यांच्या माथी मारत असतात. ट्रम्प यांनी सुरुवातीला हा फ्लूचा प्रकार असून लवकरच सर्व काही सुधारेल, अशी आशा प्रकट केली. पण चीनने खरी माहिती न दिल्यामुळे डॉ. फाउची वगैरे तज्ज्ञांचेही तेव्हा तसेच मत होते. कोणी आपल्या कार्यक्रमात बदल करण्याची गरज नाही, असे तेही सांगत होते. काही डॉक्टर जानेवारी व फेब्रुवारीत जमावाची खूप गर्दी होणारे कार्याम रद्द करा, असे सांगत होते. पण कोणी लक्ष दिले नाही.

चाचण्यांची सुरुवात करायला व युरोपातून येण्यास लोकांवर बंदी घालायला अमेरिकेने उशीर केला, यांमुळे फेब्रुवारीत साथ पसरली आणि जमावबंदी व दूरता शिस्तीचा आदेश मार्चच्या मध्यापर्यंत दिला नसल्याने ती आणखीच फोफावली, ही सीडीसीची चूक त्याच्या उपप्रमुख डॉ.शुचॅट यांनी 1 रोजी लेख लिहून कबुल केली. त्याच वेळी त्यांनी असेही सांगितले की- फेब्रुवारीतच आदेश दिला असता तरी लोकांनी पाळला असता असे नाही, कारण साथ पसरली नसल्याने तिचे गांभीर्य कोणाच्याच लक्षात आले नव्हते. सीडीसी, नियाड वगैरेंच्या सल्ल्यानुसार ट्रम्प सरकार धोरण ठरविते.

फेब्रुवारीत ‘न्यूयॉर्क टाइम्स’ व ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या चीनमधील वार्ताहरांना चीनने देशातून हाकलून दिले. साथ अमेरिकेत आल्यावर चीनमधील लोकांनी विजयानंद व्यक्त करून, अमेरिकेत ॲन्टिबायोटिक्स व औषधे निर्यात करू नयेत म्हणजे आणखी अमेरिकन दगावतील, असे चीनने त्यांच्या इंटरनेटवर टाकले होते. अमेरिकेत साथ असल्याबद्दल आनंद आणि जपानकडे आता या विषाणूची सहल सुखाने व्हावी, म्हणून शुभेच्छा व्यक्त करणाऱ्या पताका मार्चमध्ये चीनमधील काही हॉटेलांवर लावल्या होत्या, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वार्ताहराला आढळले. चीनमधील परदेशी लोकांना या काळात अतिशय वाईट वागणूक दिली जात असून एका व्यंग्यचित्रात सर्व परदेशी लोक कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचे दाखविले होते. आफ्रिकेतून आलेल्यांना जास्तच वाईट वागवले जात असल्याची तक्रार तेथील आफ्रिकी लोकांनी केली. अशा चीनची बाजू ट्रम्पद्वेषामुळे अमेरिकेतील प्रसारमाध्यमे व डेमॉक्रॅट घेतात.

हा विषाणू अमेरिकेने निर्माण केला व जगभर पसरविला, असे चीनच्या रेडिओवरून मध्य-पूर्वेतील देशांत गेले काही महिने रोज प्रक्षेपित केले जाते. पोलंड, सर्बिया वगैरे देशांत चीनचा रेडिओवरून खूप प्रचार चालतो, बॉट, ट्रोल, हेही वापरण्यात येतात. ‘अमेरिकेने मेरिलँडमधील लष्करी प्रयोगशाळेत हा विषाणू तयार केला असून लसणीचे पाणी, व्हिटॅमिन सी व एक प्रकारच्या चांदीच्या पाण्याने त्याचा नाश करता येतो; आयबुप्रेफेन हे औषध वापरल्यास मात्र तो उफाळतो’ अशा अफवा अमेरिकेत चीन पसरवीत असल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिली. चिनी सरकारचे पाठबळ असलेल्या अमेरिकेतील पाच प्रसारमाध्यम संस्थांची ‘परदेशी यंत्रणा’ अशी वर्गवारी करून फेब्रुवारीत त्यांना अधिक कडक नियम लागू केले गेले. काही दिवसांपूर्वी येथे अमेरिकेत अनेकांना फेसबुक, टि्वटर, व्हॉट्‌सॲप व मोबाईल फोनवरून संदेश आले की, ‘अमेरिकन सरकार या विषाणूचे निमित्त सांगून देशभरात नॅशनल गार्ड पाठवून आठवडाभर सर्व देशभर क्वारंटीन करणार आहेे.’ हे संदेश चीनच्या हस्तकांनी पाठविले होते, अशी बातमी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिली आहे. वावे या चिनी कंपनीची भागीदारी मालकी असलेल्या व दलाली करणाऱ्या लास वेगासमधील ‘पीपल्स व्हॉइस ऑफ लास वेगास’ या रेडिओ स्टेशनचे काम वावेचा प्रचार करणे हे आहे. ‘फिनिक्स रेडिओ’ ही ॲरिझोनातील कंपनीही चीनच्या मालकीची आहे. चनी सरकारी वृत्तसंस्थेने 4 मार्चला भाष्य केले की, या साथीसाठी केलेला त्याग व कार्याबद्दल जगाने चीनचे आभार मानणे योग्य होईल. गेली अनेक वर्षे अमेरिकेत फेन्टानिल व कोकेन या अमली पदार्थांची काळ्या बाजारात गुप्तपणे प्रचंड आयात होते. या व्यसनामुळे दर वर्षी लाखो लोक मरतात, संसार बरबाद होतात, प्रचंड आर्थिक नुकसान होते. हे अमली पदार्थ चीनमधून पद्धतशीरपणे पाठविले जातात.

चीनचा धोका माहिती असूनही ड्रोन बनवणाऱ्या चिनी कंपनीस न्यू जर्सीत लोक दूरता पाळतात की नाही, यावर आकाशातून लक्ष ठेवण्यासाठी कंत्राट दिले आहे. त्यामुळे चीनला आयतीच हेरगिरीची संधी मिळाली आहे. टाळेबंदी शिथिल केल्यावर उद्योग कसे परत चालू करायचे याच्या सल्ल्यासाठी कोमो यांनी चीन सरकारशी घनिष्ठ संबंध असलेल्या व चीनची दलाली करणाऱ्या मॅकिन्सी कंपनीला कंत्राट दिले.

‘नावात काय आहे?’, असा प्रश्न शेक्सपिअरची जुलिएट विचारते. परंतु शास्त्रीय परिभाषेत मात्र राजकारण, देशकालपरिस्थिती, मतप्रवाह कोणत्या दिशेने वाहतो, वगैरे कशाचेही दडपण येऊ न देता, केवळ वैज्ञानिक नियमांनुसार सर्व जीवजंतूंचे प्रकार-उपप्रकार यांचे वर्गीकरण व नामकरण ठराविक नियम पाळूनच करायचे, असे जगमान्य तत्त्व आहे. ज्या भागात त्या जंतूंचा प्रथम प्रादुर्भाव झाला, त्या भागाचे नाव त्या जंतूंच्या प्रकारास वा उपप्रकारास देणे, असा एक नियम आहे. इबोला, झिका ही विषाणूंची नावे आफ्रिकेतील ज्या भागांत त्यांचा उद्‌भव झाला, त्यांवरून दिली गेली. ‘मारबर्ग विषाणू’चे नाव जर्मनीतील त्या गावावरून दिले आहे. अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील लाइम या गावावरून ‘लाइम रोग’ असे नाव दिले आहे. या नामकरणांस कोणी कधी आक्षेप घेतला नाही. कोरोना विषाणू-19 चा उद्‌भव वुहानमध्ये होऊन मग तो सर्वत्र पसरला. त्यामुळे ‘वुहान विषाणू’ हे त्याचे नाव शास्त्रोक्त आहे. पण चीनने त्याला जोरदार आक्षेप घेऊन दडपण आणले आहे. हे नाव वंशवादी असून आशियाई वंशाच्या लोकांच्या भावना दुखावतात व जगात त्यांना त्रास दिला जातो, असा आरोप करायलाही चीनने कमी केले नाही. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली व जपान या जी-7 संघातील देशांनीही ‘वुहान विषाणू’ अशा नामकरणाच्या अमेरिकेच्या प्रस्तावास तो वंशवादी असल्याचा आक्षेप घेऊन विरोध केला. वंशवाद हे कारण सांगितले असले, तरी औषधे वगैरे अनेक बाबतींत हे देश (व अमेरिकाही) चीनवर अवलंबून असल्यामुळे त्यांचा पुरवठा ही साथ चालू असताना चीनने बंद करू नये, हे खरे कारण असावे. चीनकडून हा पुरवठा घेण्याच्या बदल्यात फ्रान्सने मोबाईल फोनच्या 5-जी साठी वावे कंपनीला काम द्यावे, अशी अट चीनने घातली. अमेरिकेतील चिनी लोक आता ही साथ आल्याबरोबर स्वत:ला चिनी न म्हणविता ‘आशियाचे’, असे म्हणायला लागले आणि आशियातून आलेल्या सर्वांनाच या वंशवादामुळे येथे त्रास होत असल्याचा डंका पिटू लागले. आशियातील देशांवर वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने चीनच्या योजना असतात. भारताभोवती जाळे पसरण्यासाठी चीनने पाकिस्तानात व श्रीलंकेतही पाय रोवले आहेत.

प्रसारमाध्यमे व डेमोक्रॅट या विषाणूस प्रथम ‘चिनी वा वुहान विषाणू’ संबोधत होते. पण ट्रम्प यांनी असे म्हणताच ‘हा वंशवाद आहे’, असा आरोप करून, ‘ही साथ चीनमधून आली, असे तुम्ही म्हणताच कसे’, असा प्रश्न या सर्वांनी विचारला. यास ‘ट्रम्प विषाणू’ म्हणावे, असेही ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये लिहिले होते. कोठुनी हे आले येथे, हे माहीत असूनही आपण फार पुरोगामी आहोत हे दाखवण्याचा अट्टाहास व ट्रम्पद्वेष यामुळे युरोप-अमेरिकेतील व जगभरातील अनेक डावे पुढारी, प्रसारमाध्यमे व भाष्यकार चीनच्या प्रचारमोहिमेत आपखुशीने सामील होऊन चीनला कुठल्याही प्रकारे दोष देणे हा गुन्हा आहे, तो ट्रम्प यांचा वंशवाद आहे, असे सांगत असतात. शास्त्रोक्त व सत्य काय यांची पर्वा करत नाहीत. चिनी कम्युनिस्ट प्रचारयंत्रणेचे हे यश आहे.

लाकडाच्या भल्या मोठ्या ट्रोजन वारूत ग्रीक सैनिक लपवून ओडिससने तो ट्रॉयमध्ये नेला आणि रात्री ट्रॉयचे लोक बेसावध असता हे सैनिक त्या घोड्याच्या पोटातून बाहेर आले, गावाबाहेर लपलेले ग्रीक सैन्यही आले आणि त्यांनी ट्रॉय काबीज केले- ही होमरने रंगवलेली कथा प्रसिद्ध आहे. वुहान विषाणू हा चीनने जग बेसावध असताना पाठवलेला ट्रोजन वारू आहे.

डॉ. निरुपमा व सुषमा गोविंद तळवलकर, अमेरिका

Share on Social Media

थेट सभागृहातून

वसुंधरादिनाचे अर्धशतक !

अतुल देऊळगावकर

आज कोरोनाकाळात कर्ब-उत्सर्जन कमी झाल्यामुळे दिल्लीसारख्याच ठिकाणी नाही, तर जगभर शुद्ध हवा मिळत आहे. जालंधरहून दीडशे किलोमीटर अंतरावरची हिमशिखरं जी पूर्वी कधीच दिसत नव्हती, ती आता दिसायला लागली आहेत. बाकी पक्षी किती वगैरे तुम्हाला माहितीच आहे. सगळ्यांना आता आनंद झालेला आहे. पण कोरोना येण्याआधीच्या काळात जगातल्या 30 गलिच्छ शहरांमध्ये भारतातील 22 आहेत. ह्या शहरांतील हवा आपल्याला गुदमरवून टाकणारी आहे, जिथे लहान मुले नीट जगू शकत नाहीत. जानेवारी महिन्यामध्ये वातावरण या संस्थेने मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कृत्रिम फुप्फुस लावले होते. ते तीन आठवड्यांत पूर्णपणे काळवंडून गेले होते. (1999 मध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरणयोद्धे अनिल अग्रवाल यांनी नैनितालच्या हवेतलं फुप्फुस कसं लालबुंद आहे आणि त्या काळातील दिल्लीच्या हवतलं फुप्फुस कसं काळं कुळकुळीत आहे, हे दाखवून दिलं होतं.

नमस्कार! आज वसुंधरादिवस. एप्रिल 2020- या निमित्ताने कोरोनाच्या काळात आपण आपापल्या घरात बसून एकमेकांशी संवाद साधत आहोत.

आजचा दिवस महत्त्वाचा का आहे? पन्नास वर्षांपासून म्हणजे गेले अर्धशतक हा वसुंधरा दिवस पाळला जातो, साजरा केला जातो. याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? आणि इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे? या काही गोष्टींबद्दल आपण आज इथे संवाद साधणार आहोत.

मुळामध्ये 22 एप्रिल 1970 रोजी वीस लाख लोक अमेरिकेमध्ये वसुंधरा दिवसासाठी जमा झाले, ते का? म्हणजे इतकी ऐतिहासिक गरज लोकांना का वाटली? तर, याचं मूळ एकोणीसशेसाठ ते सत्तरच्या दशकामध्ये आहे. हे दशक जगाला कलाटणी देणारं, अनेक अर्थांनी सर्वव्यापी असं दशक होतं. या दशकामध्ये स्त्रियांच्या हक्काची चळवळ अतिशय जोर धरत होती. समान नागरी कायद्याच्या (सिव्हिल राईट्‌स) कृष्णवर्णीयांच्या हक्काची चळवळ जोर धरत होती. मार्टिन ल्युथर किंग हे लाखो लोकांचा मोर्चा काढू शकत होते. लाखो लोकांसमोर त्यांची ऐतिहासिक भाषणे देत होते. त्याच वेळेला अमेरिकेत युद्धाला आणि अणुबाँबला कंटाळलेले शांततावादी लोक म्हणत होते की, आम्हाला शांतता हवी आहे. त्यामध्ये स्त्रिया व तरुण मुले मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत होती. आणखी अतिशय नवलाची घटना घडत होती. एकीकडे अमेरिका 1955 पासून 1975 पर्यंत गरीब नि:शस्त्र व्हिएतनामवर बॉम्बचे हल्ले करत होती, त्या वेळेला वॉटरगेट प्रकरण निघत होतं आणि सैनिकांच्या बंदुकांमध्ये महिला फुलं ठेवून‘ आम्हाला युद्ध नको, शांतता हवी’ हा संदेश पोचवत होत्या. आज माझ्या फेसबुक टाइमलाईनवर यातील काही कृष्णधवल छायाचित्रे टाकली आहेत. त्या काळाचा काहीसा अंदाज देणारी ती झलक आहे. या सर्व घटनांना तरुणांच्या बंडाची किंवा आंदोलनाची किनार आहे. ज्याला पुढे पर्यायी संस्कृती क्रांती (काऊंटर कल्चर रेवोल्युशन) असं संबोधन प्राप्त झालं. ती संस्कृतीच्या लोकशाहीकरणासाठीची घुसळण होती. त्याआधीच्या काळात संस्कृती ही धनिक, उच्चभ्रू व अभिजन यांच्यापुरतीच होती, ती रस्त्यावरच्या लोकांसाठी खुली झाली. याच काळामध्ये आपल्याकडे लिटिल मॅगझिनची चळवळ सुरू झाली, मोठमोठे चित्रकार रस्त्यावर उतरून चित्र काढू लागले, भींतींवर चित्र काढायला लागले. त्या काळात प.बंगालमध्ये बादल सरकार यांनी पथनाट्य चळवळ सुरू केली होती. आपल्याकडे दलित पँथर, युक्रांद या चळवळी जागतिक पातळीवरच्या युवकांच्या चळवळीच्या अभिव्यक्तीचा भाग होता. बीटल्स या काळातच आलं, ते कशामुळे? तर ऑपेरामध्ये जे उच्चभ्रू- धनिकांसाठी संगीताचे जलसे होतात-तसे आम्ही रस्त्यावर उतरून गिटार-बोंगो-कोंगो घेऊन स्वतंत्रतेची आमच्या आविष्काराची गाणी म्हणू, आम्ही दाढी वाढवू, आम्ही फाटके कपडे... जीन्स घालू- हे सगळं त्या दशकात सुरू झालं, म्हणून याला प्रतिसंस्कृती म्हटलं जातं. ते केवळ एक नकारात्मक बंड नव्हत; काय नको आणि काय हवं, कशाचा धिक्कार व कशाचा स्वीकार, हे त्यांना स्पष्ट होतं. तेव्हा वास्तुकलेपासून ते काव्यापर्यंत प्रत्येक जुन्या गोष्टीला आव्हान देऊन नवं काही तरी घडत होतं. आणि हे सगळे प्रवाह एकत्र आले ते पर्यावरणाच्या निमित्ताने...

अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे गॅलॉर्ड नेल्सन यांनी हा सार्वत्रिक असंतोष पर्यावरणीय कारणासाठी एकत्रित आणला. त्यांच्यासोबत डेनिस हा 26 वर्षांचा तरुण आला. त्याचे वडील कागद कारखान्यात काम करत होते आणि ते सांगत होते की, ‘आमच्या कारखान्यातून निघणारं कागदाचं पाणी हे नदीचं प्रदूषण करत आहे आणि त्याच्याविरोधात आपण काही तरी केलं पाहिजे.’ त्याचा साक्षीदार डेनिस याच्यावर परिणाम होत होता. याच काळात कॅलिफोर्नियात सांता बार्बराला एक खूप मोठी तेलगळती झाली आणि मासे मेले. तेव्हा सगळे हादरून गेले. पर्यावरणासाठी आपण काही तरी केलं पाहिजे, ही भावना तीव्र झाली.

पर्यावरणाची पहिल्यांदा जाणीव झाली कधी? सन 1962 मध्ये. राशेल कार्सनबार्इंच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाने जगाची विचार करण्याची दिशाच बदलून टाकली, म्हणून त्याला ऐतिहासिक-अभिजात म्हटलं जातं. ते पुस्तक म्हणजे पर्यावरण चळवळीची गीता, बायबल किंवा कुराण आहे. 1962 पूर्वी पर्यावरण, प्रदूषण या संज्ञा अस्तित्वात नव्हत्याच. सायलेंट स्प्रिंग म्हणजे मूक वसंत! दोन महायुद्धांमध्ये रोग नष्ट करण्यासाठी डीडीटीची भुकटी वापरली जात होती. त्यामुळे तिचा जनक पॉल म्युलर या रसायनशास्त्रज्ञाला नोबेल मिळालं होतं. रोगनियंत्रणासाठी ही डीडीटीची पावडर अत्यंत प्रभावी काम करत होती आणि हीच डीडीटी भुकटी कीटकनाशक म्हणून वापरायला लागले, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पिकावर त्याची फवारणी व्हायला लागली. तेव्हा ती पिकं खाऊन पक्षी पटापटा मरून पडायला लागले. हे कार्सनबाई 1960 मध्ये पाहत होत्या. त्यांना कर्करोग झाला होता, असं असूनदेखील त्या झटत होत्या. सगळीकडे जाऊन निरीक्षण करत होत्या की, हे नेमकं काय घडत आहे, वसंत ऋतू तर आलेला आहे? फुलं फुललेली आहेत, तरी पक्ष्यांचे आवाज का येत नाही? पक्ष्यांना कंठच फुटत नाही! किती क्रूर काळ असेल तो, म्हणून त्या म्हणाल्या, ‘हा मूक वसंत आहे.’ या पुस्तकानंतर जगाच्या असं लक्षात आलं की, आपण प्रदूषणासाठी काही केलं पाहिजे. मुलांच्या परीक्षा संपल्या होत्या, सुट्‌ट्यांचा काळ होता- म्हणून 22 एप्रिल ही तारीख निवडली गेली. या गोष्टीला आणखी एक बाजू आहे. 22 एप्रिल ही तारीख ब्लादिमीर लेनिन यांची जयंतीसुद्धा आहे.

विस्मरणात गेलेले लेनिन यांची आज 150 वी जयंती आहे. 1970 मध्ये ती शताब्दी होती. 1917 ला सोव्हिएत क्रांती झाली आणि 1924 मध्ये लेनिन वारले. या वर्षात लेनिन यांनी केलेलं काम पूर्णपणे वेगळं होतं. क्रांती झाल्यानंतर लेनिन यांनी निसर्गाशी करार जाहीर केला होता. त्यांनी निक्षून सांगितलं, ‘‘आमचा विकास हा निसर्गाला साथ घेऊन जाणारा आहे. निसर्गाची क्रूरपणे हत्या करून आम्ही विकास करणार नाही.’’ खंडप्राय सोव्हिएत युनियनमधील सर्व आदिवासी या धोरणामुळे आनंदून गेले होते. लेनिन यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, ‘‘जंगलाचं आणि आदिवासींचं आम्ही रक्षण करणार आहोत. कुठल्या भागात किती वृक्षतोड करायची, किती प्राणी मारायचे, हे आदिवासी ठरवतील.’’ यानंतर जंगलसंवर्धनाचे जितके कायदे झाले, त्या सगळ्यांनी लेनिन यांना त्याचं श्रेय अजिबात न देता केवळ वापर केलेला आहे. एकंदरीत या सगळ्या कारणांमुळे विल्सन आणि हेज यांना वाटत होतं की, आपण 22 एप्रिल हा दिवस निवडावा आणि त्याप्रमाणे 22 एप्रिल 1970 रोजी जवळजवळ 20 लाख अमेरिकेत जमले. या सर्व घटनांचा परिणाम म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने 1972 मध्ये स्टॉकहोम येथे भरवलेली पहिली जागतिक पर्यावरण परिषद! भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या त्यात सहभागी झाल्या होत्या. तेव्हा ‘जंगल नष्ट करणे हा धोका आहे; नुकत्याच मुक्त झालेल्या भारतासारख्या वसाहती जंगल नष्ट करून जगाचं पर्यावरण बिघडवत आहेत’, हा धोशा अमेरिकीने लावला, तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘‘गरिबी ही सर्वांत मोठी प्रदूषक आहे.’’ पुढे या प्रतिपादनाचा वापर अनेक गरीब देशांनी अनेक वेळा केला आहे.

वसुंधरादिन आणि जागतिक पर्यावरण परिषदेनंतरच अनेक कायदे अस्तित्वात येऊ लागले. दि. 5 जून 1974 पासून जागतिक पर्यावरणदिन साजरा होऊ लागला. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्या शीत युद्धामुळे 1972 ते 1992 या काळात जागतिक पर्यावरण परिषद होऊ शकली नाही. दुसरीकडे लेनिन गेल्यानंतर स्टालिन सत्तेवर आले. तेव्हापासून जगाच्या विकासाची रीत एकसारखीच झाली. भांडवलशाही देश किंवा नावाने साम्यवादी असू देत, सगळ्यांनी निसर्गाचा विनाश, निसर्गाचं प्रदूषण करूनच आपला विकास केलेला आहे.

दुसरी जागतिक पर्यावरण परिषद 1992 मध्ये झाली. त्यानंतर जागतिक जलदिन, जागतिक जैवविविधता दिन आणि जागतिक स्थानिक दिन म्हणजे आदिवासीदिन हे दिवस साजरे होऊ लागले. या काळामध्ये पर्यावरण -संवर्धनाचे कायदे तयार झाले व त्यात सुधारणा होत गेल्या. आज आपण 2020 मध्ये पन्नासावा वसुंधरा दिवस साजरा करताना या कोरोनाकाळात पर्यावरण विषयाची बरीच जागृती दिसत आहे. भारताकडे बघितले तर 2000 पूर्वी वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण हे सगळं काहीअंशी हळूहळू कमी होताना दिसत आहे कारखाने वाहनांच्या गुणवत्तेमेध्ये खूप सुधारणा झाली आहे व होत आहे. याचं श्रेय जागतिक वसुंधरादिनाला नक्कीच देता येईल.

या पार्श्वभूमीवर कोरोनाकडे पाहू.

गेल्या वर्षी ॲमेझॉन, ऑस्ट्रेलिया, सैबेरिया आणि इंडोनेशिया फक्त एवढ्या देशांतील जवळपास दोन कोटी हेक्टरवरील जंगलांना आगी लागल्या. जीवसृष्टीचा अभ्यास करणारी ‘वर्ल्ड वाइड लाइफ फंड’ संस्था सांगत आहे, ‘1970 पासून आजतागायत जवळजवळ 60 टक्के सरपटणारे प्राणी, मासे आणि सस्तन प्राणी संपूर्णतः नष्ट झालेले आहेत. दररोज जवळपास 5.5 प्रजाती नष्ट होत आहेत, म्हणजे एका वर्षाला 2000! हे सांगताना ती शाळेतील मुलगी ग्रेटा गहिवरत होती.’

जागतिक आरोग्य संघटनेने 600 पानांचा हवामानबदल आणि आरोग्य अहवाल 1992 मध्ये प्रसिद्ध केला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं, ‘माणसं जंगलावर आक्रमण करत आहेत. जंगलं आकुंचन पावत जातात तसे जंगलांतील प्राणी शहराकडे येत आहेत. जंगली प्राण्यांसोबत अनेक जीवाणू व विषाणूदेखील त्यांना कुठलाही त्रास न देता राहत असतात. मात्र ते विषाणू माणसाला त्रासदायक ठरतात.’ मागील 30 वर्षांतील सर्व मोठे आजार व साथी ह्या जंगलातून आलेल्या विषाणूंमुळे आल्या आहेत. माकडापासून आलेल्या विषाणूमुळे एड्‌स पसरला. त्यानंतरचे इबोला, सार्स, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू आणि आत्ताचा कोरोनासुद्धा- ही सगळे जंगलातून आलेल्या विषाणूची देणगी आहे.

कोरोना आणि हवामानबदल यांचाही जवळचा संबंध आहे. हवामानबदलासाठी जबाबदार आहे कर्बनउत्सर्जन! कार्बन संहितेची सुसह्य पातळी 350 पीपीएम (पाटर्‌स पर मिलियन) आहे. कोरोनापूर्व काळात ती 420 पर्यंत गेली होती. हे आपण थांबवलं नाही, तर असह्य तापमानवाढीमुळे आपली वाटचाल सहाव्या समूळ उच्चाटनाकडे (एक्सटिंक्शन) आहे. ह्या आधी सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर दुसरा ग्रह आदळून किंवा उल्कापात होऊन इथली जवळपास 80 टक्के जैवविविधता नष्ट झाली होती. त्या काळात डायनॉसोर नष्ट झाले होते. आता आपली वाटचाल त्याच दिशेने चालली आहे, असं शास्त्रज्ञ पुराव्यानिशी सांगत आहेत. कर्ब-उत्सर्जनातून झालेली तापमानवाढ हे त्याचं मुख्य कारण आहे. 1 अंश सेल्सियस तापमानवाढ झाल्याचे हाल आपण भोगत आहोत. 2 अंशांनी तापमान -वाढ झाली तर... आणि 6 अंश सेल्सिअसने जगाचे तापमान वाढलं तर... जगाचा विनाश कसा होईल, हे वैज्ञानिक आपल्याला सांगत होते आणि सांगत आहेत. हे लक्षात घेता, गेल्या वर्षी त्या ग्रेटा थुनबर्गच्या ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ आंदोलनासाठी जगातील 1.5 टक्के मुलं रस्त्यावर एकत्र आली होती. ती तळमळीने सांगत होती, ‘‘आपल्या जगाला आग लागली आहे, राहण्यासाठी दुसरा ग्रह उपलब्ध नाही आणि त्यामुळे आपली पृथ्वी- आपला ग्रह वाचवण्यासाठी आपण कर्ब उत्सर्जन अर्थव्यवस्थेकडून कर्बरहित हरित अर्थव्यवस्थेकडे जाणे आवश्यक आहे.’ ’त्यांचे कोणीही ऐकत नव्हतं. ग्रेटाला तर प्रचंड ट्रोल केलं गेलं. तिला न लेखून तिची अवहेलना केली गेली.

आणि आत्ता...

कोरोनाकाळात सगळेच पर्यावरणाबद्दल बोलत आहेत. दिल्लीत कधी नव्हे ते स्वच्छ आकाश दिसायला लागलं आहे. असं निळं स्वच्छ आकाश दिल्लीला कधी बघताच येत नव्हतं. हवेच्या गुणवत्ता निर्देशंकानुसार (एअर क्वालिटी इंडेक्स) 0 ते 50 निर्देशांकांची हवा ही आरोग्यास उत्तम असते. 51 ते 100 निर्देशकांच्या हवेत शारीरिक दृष्ट्या संवेदनशील व्यक्तींनाच त्रास होऊ शकतो. 101 ते 151 निर्देशांकात आजार येऊ शकतात. 151 ते 200 निर्देशांकात श्वसनाच्या आजाराची साथ पसरते. 201 ते 300 निर्देशांकांची हवा असल्यास शारीरिक दृष्ट्या संवेदनशील व्यक्तींनी घराबाहेरसुद्धा पडू नये, असं सांगितलं जातं. आणि 301 ते 500 निर्देशांकांची हवा असेल तर संचारबंदी करायला लागते आणि दिल्ली या वर्षी डिसेंबरमध्ये 900 ते 1000 निर्देशांक पार करून गेली होती. मुंबईमधील हवासुद्धा 300 च्या पुढे जात होती. प्रदूषित हवेमध्ये 2.5 मायकॉन आकाराचे सूक्ष्म घनकण असतात. (आपला केस साधारणपणे 50 मायक्रॉनचा असतो.) ते सूक्ष्म कण वातानुकूलन यंत्रणेतूनसुद्धा आपल्या नाकातून फुप्फुसापर्यंत जाऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे. या प्रदूषित हवेमुळे भारतात 12 लाख बळी जातात. आता प्रदूषित हवा जास्त आहे, तिथे कोरोनाचे बळी जास्त आहेत, असे अमेरिका व इंग्लंडमधील अनेक संशोधन-संस्थांचे निष्कर्ष आहेत.

आज कोरोनाकाळात कर्ब-उत्सर्जन कमी झाल्यामुळे दिल्लीसारख्याच ठिकाणी नाही, तर जगभर शुद्ध हवा मिळत आहे. जालंधरहून दीडशे किलोमीटर अंतरावरची हिमशिखरं जी पूर्वी कधीच दिसत नव्हती, ती आता दिसायला लागली आहेत. बाकी पक्षी किती वगैरे तुम्हाला माहितीच आहे. सगळ्यांना आता आनंद झालेला आहे. पण कोरोना येण्याआधीच्या काळात जगातल्या 30 गलिच्छ शहरांमध्ये भारतातील 22 आहेत. ह्या शहरांतील हवा आपल्याला गुदमरवून टाकणारी आहे, जिथे लहान मुले नीट जगू शकत नाहीत. जानेवारी महिन्यामध्ये वातावरण या संस्थेने मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कृत्रिम फुप्फुस लावले होते. ते तीन आठवड्यांत पूर्णपणे काळवंडून गेले होते. (1999 मध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरणयोद्धे अनिल अग्रवाल यांनी नैनितालच्या हवेतलं फुप्फुस कसं लालबुंद आहे आणि त्या काळातील दिल्लीच्या हवतलं फुप्फुस कसं काळं कुळकुळीत आहे, हे दाखवून दिलं होतं. त्या वेळेचे पंतप्रधान अटलबिहारीजी वाजपेयी यांच्यासमोर या प्रदूषणाचे सादरीकरण केलं होतं. अटलजींनी अतिशय मोठ्या मनाने 5000 लहान मुलांच्या मोर्चाचं निवेदन स्वीकारलं होतं. त्यानंतर डिझेलवर चालणारी वाहने नैसर्गिक वायूवर केली होती.) आता सर्वांना अतिशय शुद्ध हवा व स्वच्छ नद्यांचा आनंद होत आहे. पण प्रश्न असा आहे की, इथून पुढे म्हणजे कोरोनोत्तर कालखंडात काय? तर, याची दोन उत्तरे आहेत- कोणतीही गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळणार नाही, त्यासाठी आपल्याला आग्रही असलं पाहिजे. स्वतःच्या बाबतीत आणि इतरांच्या बाबतीतसुद्धा. म्हणजे सरकारच्या बाबतीत कोरोनानंतरचं जग आधीसारखं अजिबात असणार नाही. इसवी सनपूर्व आणि इसवी सननंतर, तसं आता कोरानापूर्व आणि कोरोनात्तर अशी मांडणी होईल. कोरोनोत्तर जगात अतिशय भीषण अशा आर्थिक मंदीला आपल्याला सामोरं जावं लागेल. खऱ्या अर्थाने क्रांतीसमान अशी प्रचंड उलथापालथ होणार आहे. मानवी जीवनात तीन क्रांत्या झाल्या आहेत. भटके जीवन स्थिर झालं ती शेती किंवा कृषिक्रांती, खेड्यातून शहराकडे आलो ती औद्योगिक क्रांती आणि नंतर ज्ञानाची महती सांगणारी माहिती क्रांती! पण आता कोरोनानं आपल्याला सर्व बाबतींत नव्याने विचार करायची वेळ आणली आहे.

आपली अर्थव्यवस्था टिकणारी नाही. ती शाश्वत नाही, अतिशय कचकडीची आहे, हे कोरोनाने दाखवून दिले आहे. अमेरिका हातघाईला आलेली आहे. अमेरिकेतील सुमारे 7.5 कोटी लोकांनी त्यांची बेरोजगारी जाहीर केलेली आहे. काल अमेरिकेत जेवण घेण्यासाठी गाड्यांची 15 किलोमीटर लांबीची रांग लागली होती. ‘आज सहा दिवसांनी आम्हाला ताजंतवानं जेवण मिळालेलं आहे’- असं ते सांगत होते. ही अमेरिकेची स्थिती... तर आपलं काय होईल?

यंदाचा पर्यावरणामधील नोबेल अशी ख्याती असलेला ‘टायलर पुरस्कार’ पवन सुखदेवजी यांना मिळाला आहे. स्विझर्लंडस्थित सुखदेव यांचं संशोधनच निसर्गाचं अदृश्य अर्थशास्त्र यावर आहे. आजपर्यंत सर्व पक्षांनी, सरकारांनी, विचारसरणींनी ‘विकास की पर्यावरण?’ ठरवताना निसर्गाची टवाळी व उपेक्षाच केली आहे, ते आता चालणार नाही. सुखदेव म्हणतात, ‘‘आरेमधील चारशे झाडे तोडली, त्यात विशेष काय? -हा प्रश्नच घातकी आहे, हा विचार अतिशय तात्पुरतं व तेवढ्यापुरता बघणारा आहे. अशी आपली जीवनशैली झाली आहे.’’ झाडं, जंगलं ही कितीही छोटी असू देत, त्याची स्वतःची एक पर्यावरणीय यंत्रणा असते. त्या झाडावर पक्ष्यांची घरटी, तिथले कीटक या सगळ्यांनी ही यंत्रणा तयार होते. ती आपल्यासाठी काम करत असते. जंगलामुळे ऑक्सिजन मिळतो, कर्ब वायू शोषला जातो. उष्णता शोषून लाटेचा प्रभाव (जंगलामुळे तुमचं तापमान तीन ते पाच अंशांनी कमी होऊ शकतं. याची खात्री करून घ्यायची, तर तुम्ही राहुरी कृषी विद्यापीठाच्या आवारात जा आणि बाहेर या; तुम्हाला तापमनातील फरक जाणवून येईल.) कमी होतो. पाणी मुरवून पुराचा धोका कमी होतो. शिवाय निसर्गसान्निध्य आनंद देतो. या सर्वांची किंमत काढता येते.

यंदा आपलं कुणाचं लक्ष गेलं नाही, पण या वर्षी अतिशय मोठी टोळधाड एकूण अठरा देशांमध्ये म्हणजे इराणपासून इथिओपियापर्यंत आली होती. या वर्षी चक्रीवादळांची संख्या वाढल्यामुळे वाळवंटी भागात नको तेवढं गवत उगवलं. ते गवत खायला तिथे पशू-पक्षी नव्हते, त्यामुळे तिथे टोळ वाढले आणि एका वेळेला जवळजवळ 20 अब्ज टोळ, 24 तासांतून 150 किलोमीटर प्रवास करून रस्त्यात येणारं सर्व उभं पिकं पूर्णपणे फस्त करत जात होते. पाकिस्तानपर्यंत ते येऊन गेले आहेत. आपल्या राजस्थानच्या काही भागात ते डोकावून गेले आहेत. असे धोके यापुढे वारंवार येणार आहेत. पर्यावरणामुळे येणाऱ्या रोगांचा, साथींचा, महामारींचा अभ्यास करणारे पर्यावरणीय रोगशास्त्रज्ञ म्हणतात, ‘‘कोरोना हे हिमनगाचं टोक आहे.’’ आता करायचं काय? संयुक्त राष्ट्रसंघाने सांगून ठेवलेलं आहे, ‘आपत्तीची जोखीम टाळण्यासाठी एक लाख खर्च केले, तर तुमचे आपत्तीच्या काळातील वीस लाख वाचत असतात.’

पर्यावरणाची ही दुरवस्था झाली, कारण आपण सगळ्यांनी त्याकडे डोळेझाक केली. माझा काय संबंध, म्हणून सोडून दिलं आहे. आता खरंच जर आपलं पुढच्या पिढीवर प्रेम असेल, तुमची मुले नीट जगावीत असं वाटत असेल, त्यांना शुद्ध हवा; पाणी मिळावं असं वाटत असेल, तर आपल्याला काय करणे भाग आहे, ते बघा-

आपली कार्यालये लांब नकोत. मुंबईत नरिमन पॉइंटला कार्यालय कशाला हवं? देशाच्या, राज्याच्या, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालयाची गरज काय? ही संकल्पना आता बदलायला हवी. घरातून काम करता येतं, हे आता सिद्ध झालंय. सगळ्या कंपन्यांनी तो बदल स्वीकारलाय. कार्यालयावरचा खर्च कमी करावा लागणार आहे.

प्रवासावरचा व वाहतुकीवरचा खर्च व प्रदूषण कमी करावा लागणार आहे.

कोरोनाच्या कुलूपबंदीमुळे जगात 2.2 अब्ज टन कर्ब उत्सर्जन कमी झालं आहे. गेल्या वर्षी 140 कोटी लोकांनी पर्यटन केलं होतं. त्यावर जगात नऊ ट्रिलियन डॉलर्स खर्ची पडले होते. अतिपर्यटनानंसुद्धा स्थानिक भागावर ताण पडतो, याचा आपण विचार करत नाही. सिमला असो व महाबळेश्वर तिथल्या रहिवशांना पाणी मिळणे कठीण होत आहे. ही उंचावरची ठिकाणे आहेत. त्यांना पाणी देण्यासाठी खूप ऊर्जा खर्च करावी लागते.

आता याचा एकत्रित विचार आपल्याला करावा लागणार आहे. विकास करताना पर्यावरणाला सोबत घेऊन कसं जाता येईल, याचा विचार करावा लागणार आहे.

मोहनदास करमचंद गांधी यांना निसर्गाचे अध्वर्यू म्हणतात. आज जगात सगळीकडे कार्बन पदचिन्हे व पर्यावरणीय पदचिन्हे कमी करण्यावर भर दिला जात आहे. सर्वांत जास्त कार्बन पदचिन्हे वाहतुकीमध्ये आहेत. ऑस्ट्रेलियातला गहू, मोझांबिकची तूर, अफगाणिस्तानचा कांदा आपल्याकडे येतो. गांधीजी म्हणायचे, ‘तुमच्या गरजा पंचक्रोशीतून भागवा.’ आता हे जगाचे ब्रीदवाक्य होत आहे.

हा प्रश्न जागतिक असला, तरी त्याला उत्तर स्थानिकच असते. स्थानिक मजबुतीकरण महत्त्वाचे. आपण जागतिक -जागतिक म्हणत स्थानिकतेला खूप दुबळं करून टाकलेलं आहे. आता आपल्याला आपल्या भागातच शक्य तेवढी पिके, भाज्या व फळे पिकवावी लागतील.

‘देवाला बळी वाघाचा -सिंहाचा चालत नाही, त्याला बकरीच लागते’, असं एक संस्कृत सुभाषित आहे. कारण ती दुबळी आहे. प्रत्येक आपत्तीमध्ये दुबळ्यांचाच जीव जातो. तेव्हा आपल्याला स्थानिकाला दुबळे करून चालणार नाही, हा या कोरोनाचा संदेश आहे. स्थानिक पर्यावरण जर आपल्याला मजबूत करता आलं तर, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत केलीच पाहिजे. आपल्याकडे प्रचंड वैभव आहे. संसर्गरहित स्थानिक बुद्धिमत्ता भरपूर आहे, जिला कधीही चालना मिळत नाही. बहुविधता प्रचंड आहे, जिचा उपयोग आपण करून घेत नाही. आपण आदिवासींना किंमत देत नाही. आपल्या देशात 11 कोटी आदिवासी आहेत. लाकूड, बांबू, लोखंड, कागद व मातीमधील आदिवासींची कारागिरी अद्वितीय आहे. या कलेचा आपण आदर केला नाही. परदेशातील अनेक शास्त्रज्ञ अनेक ज्ञानशाखांचा संगम करून निसर्ग-सान्निध्यातील कलांचा अभ्यास करीत आहेत. समाजशास्त्र, जीवशास्त्र, मेंदूशास्त्र, वास्तुकला यांचा संगम साधून विकासाचं नवं प्रतिमान तयार करीत आहेत. हरित इमरती, हरित शहरं यातून साकार होत आहेत. हे आपल्याकडेसुद्धा करणे आवश्यक आहे. हा विचार आपण कोरोनाच्या काळात करायला पाहिजे.

सातशे वर्षांपूर्वी नामदेवांनी ‘क्षण एक मना बैसोनि एकांतीं । विचारीं विश्रांति कोठें आहे।’ असा प्रश्न विचारला होता. आपण जर खरंच असा विचार केला तर- आपल्याला बदलता येईल, बदल घडवता येईल, बदलांचा आग्रह धरता येईल. मग आपली पुढची पिढी कदाचित म्हणेल, आमची मागची पिढी अगदीच मूर्ख नव्हती. धन्यवाद.

(दि. 22 एप्रिल -वसुंधरा दिनानिमित्त फेसबुकलाईव्हवरून केलेले भाषण)

अतुल देऊळगावकर, लातूर

Share on Social Media

मागोवा

कार्ल मार्क्स आणि आपला काळ

सुनील तांबे

अमर्त्य सेन, अभिजीत बॅनर्जी, ईस्टर डफ्लो, थॉमस पिकेटी, टोनी ॲटकिन्सन यापैकी कुणीही मार्क्सवादी वा समाजवादी नाहीत. विषमता आणि गरिबी यामुळे समाज नासून जातो, त्यामुळे विषमता अधिकाधिक कमी करण्यासाठी हे अर्थशास्त्रज्ञ उपाययोजना सुचवत आहेत. कोव्हिड 19 या विषाणूमुळे निर्माण झालेली जागतिक महामारी आणि पर्यावरणाचं संकट यामुळे भविष्यात या समस्या आपला पिच्छा पुरवणार आहेत. अर्थव्यवस्थेचा नव्याने विचार करावा लागणार आहे. रोजगार, आरोग्य आणि शिक्षण हे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील, असं या अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या अर्थशास्त्रज्ञांच्या प्रभावामुळे युनिव्हर्सल बेसिक इन्कम ही संकल्पना आता आकार घेऊ लागली आहे.

कोव्हिड 19 या विषाणूमुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या काळात कार्ल मार्क्सच्या विचारधनाबद्दल संपूर्ण जगात कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण झाली आहे. कारण औद्योगिक दृष्ट्या प्रगत देशांमध्ये सर्वाधिक गरिबी आहे, संपत्तीचं केंद्रीकरण मूठभरांच्या हाती झालं आहे- हे अनेक अभ्यासकांनी दाखवून दिलं आहे. गरिबीचं निर्मूलन कसं करता येईल आणि आर्थिक सामाजिक विषमता कमी कशी करता येईल, हा एकविसाव्या शतकातील जागतिक प्रश्न बनला आहे.

अभिजीत बॅनर्जी आणि ईस्टर डफ्लो यांना नोबेल पुरस्कार जाहीर होण्याच्या आधीपासून अनेक अर्थशास्त्रज्ञ या विषयाकडे लक्ष वेधत आहेत. ‘कॅपिटल इन द ट्वेंटीएथ सेंच्युरी’ या गाजलेल्या ग्रंथात थॉमस पिकेटी या फ्रेंच अर्थतज्ज्ञाने गेल्या अडीचशे वर्षांतील संपत्तीच्या केंद्रीकरणाचा आणि विषम वाटपाचा लेखाजोखा मांडला. हा ग्रंथ 2013 मध्ये प्रसिद्ध झाला. औद्योगिक दृष्ट्या विकसित देशांमधील भांडवलाचा परतावा त्या देशांमधील आर्थिक विकासापेक्षा सातत्याने अधिक राहिला आहे. त्यामुळे भविष्यात पराकोटीची आर्थिक विषमता निर्माण होईल, असा दावा या अर्थतज्ज्ञाने आपल्या ग्रंथात केला. संपत्तीवर जागतिक कर लावून न्याय्य वाटप करण्याचा उपाय त्याने सुचवला. थॉमस पिकेटीचा दुसरा ग्रंथ ‘कॅपिटल अँण्ड आयडिऑलॉजी’ 2020 मध्ये प्रकाशित झाला. विविध समाजांतील आर्थिक विषमतेचा ऐतिहासिक आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे.

अँथनी बार्न्स वा टोनी ॲटिक्सन ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञाने गरिबी आणि विषमता या विषयावर सुमारे चार दशकं संशोधन केलं. जागतिक बँकेच्या कमिशन ऑन ग्लोबल पॉवर्टीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 2013 ते 2016 या काळात कार्य केलं. या कमिशनवर अमर्त्य सेन यांचीही नियुक्ती करण्यात आली होती. गरिबीचं मोजमाप कसं करायचं आणि दारिद्र्यनिर्मूलनासाठी कोणती उपाययोजना करावी, या संबंधातील आंतरराष्ट्रीय संस्थांना शिफारसी करण्यासाठी या कमिशनची स्थापना झाली होती. ‘मेझरिंग पॉवर्टी अराऊंड द वर्ल्ड’ हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर मे 2019 मध्ये प्रकाशित झाला.

अमर्त्य सेन, अभिजीत बॅनर्जी, ईस्टर डफ्लो, थॉमस पिकेटी, टोनी ॲटकिन्सन यापैकी कुणीही मार्क्सवादी वा समाजवादी नाहीत. विषमता आणि गरिबी यामुळे समाज नासून जातो, त्यामुळे विषमता अधिकाधिक कमी करण्यासाठी हे अर्थशास्त्रज्ञ उपाययोजना सुचवत आहेत. कोव्हिड 19 या विषाणूमुळे निर्माण झालेली जागतिक महामारी आणि पर्यावरणाचं संकट यामुळे भविष्यात या समस्या आपला पिच्छा पुरवणार आहेत. अर्थव्यवस्थेचा नव्याने विचार करावा लागणार आहे. रोजगार, आरोग्य आणि शिक्षण हे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील, असं या अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या अर्थशास्त्रज्ञांच्या प्रभावामुळे युनिव्हर्सल बेसिक इन्कम ही संकल्पना आता आकार घेऊ लागली आहे.

या संदर्भात कार्ल मार्क्सच्या विचारधनाचा आढावा आपण घेणार आहोत. कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं मूलगामी विश्लेषण मार्क्सने केलं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था केवळ एका देशात नसते, तर ती जागतिक असते आणि त्यावरचं उत्तरही जागतिकच आहे, याकडे सर्वप्रथम मार्क्सने लक्ष वेधलं होतं, तेही 19 व्या शतकात. ‘जगातील कामगारांनो -एक व्हा’ अशी घोषणा कम्युनिस्ट मॅनिफेस्टोने दिली होती.

जर्मनीतील ट्रियर या शहरात 1818 मध्ये कार्ल मार्क्सचा जन्म झाला. त्याचे वडील वकील होते, परंतु ज्यू धर्मीयांना वकिली करण्यास मनाई असल्यने मार्क्सच्या जन्मानंतर त्याच्या वडिलांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला.

व्यवसायाच्या निवडीविषयी एका तरुणाचे हृद्‌गत (रिफ्लेक्शन्स ऑफ अ यंग मॅन ऑन चूझिंग अ प्रोफेशन) या शीर्षकाचा निबंध कार्ल मार्क्सने वयाच्या 17 व्या वर्षी (1835) लिहिला. त्यात तो म्हणतो- व्यवसाय निवडताना आपण इतरांच्या हाताखालचा एक सांगकाम्या होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या पसंतीच्या क्षेत्रात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिवाय ज्यात लोकसेवा करता येईल, असे क्षेत्र मिळवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. कवी वा विद्वान म्हणून एखाद्याला कितीही कीर्ती मिळो, लोकसेवेविना तो कधीही थोर ठरणार नाही. आपल्या बांधवांच्या सुखाकरता आपण झटलो नाही, तर आपले जीवन सार्थकी लागले असे होत नाही.

वयाच्या 17 व्या वर्षी लिहिलेल्या निबंधातील प्रत्येक शब्दाशी मार्क्स पुढील आयुष्यात प्रामाणिक राहिला. त्याने बॉन विद्यापीठात 1835 मध्ये प्रवेश घेतला. तिथे तो वर्षभरच होता. या काळात दारू पिऊन दंगामस्ती केली. भरपूर कर्ज केलं. द्वंद्वयुद्धात डोळ्याजवळ जखम करून घेतली. वडिलांनी त्याला बर्लिन विद्यापीठात दाखल केलं.

सागराच्या तळाशी बुडी मारून सुंदर व चमकदार मोती सूर्यप्रकाशात आणावेत, अशी महत्त्वाकांक्षा मी बाळगली आहे- असं त्याने वडिलांना लिहिलेल्या पत्रात (नोव्हेंबर 1837) म्हटलं. या काळात कम्युनिस्ट विचारधारेकडे मार्क्स ओढला गेला होता. जर्मनीत एका वर्तमानपत्राचा संपादक म्हणून त्याने काम केलं. परंतु त्याच्या विद्रोही पत्रकारितेमुळे त्याला जर्मनीचा त्याग करून फ्रान्समध्ये आश्रय घ्यावा लागला. तिथेही त्याने एक वर्तमानपत्र सुरू केलं, मात्र तिथूनही स्थलांतर करणं त्याला भाग पडलं. त्याने इंग्लडला आश्रय घेतला.

त्याने आणि फ्रेडरिक एंगल्सने कम्युनिस्ट जाहीरनामा 1848 मध्ये प्रसिद्ध केला. त्यानंतर जगाचे दोन भाग झाले- मार्क्सवादी आणि मार्क्सविरोधी. 1867 ते 1883 या काळात ‘दास कॅपिटल- क्रिटिक ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी’ हा ग्रंथ टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध झाला.तारुण्याचा काळ सोडला, तर विवाहानंतर कार्ल मार्क्सचं आयुष्य दारिद्र्यांत परंतु अखंड अभ्यासात गेलं.

औद्योगिक क्रांती ही एक प्रक्रिया होती. अठराव्या शतकातील ब्रिटनमध्ये ती परमोत्कर्षाला पोचली. जेम्स हारग्रीव्हजने 1764 मध्य स्पिनिंग जेनी बनवली, त्यामुळे पूर्वीपेक्षा आठपट सूत निघू लागलं. 1773 मध्ये उडत्या धोट्याचा शोध लावण्यात आला, तर 1785 मध्ये यंत्रमाग बनवण्यात आला. कापसातील सरकी काढणारं कॉटन जीन हे यंत्र 1793 मध्ये बनवण्यात आलं. अन्य उद्योगांतही याच काळात नवनवीन शोध लावण्यात आले. बर्मिंगहॅममध्ये कारागिरांनी धातुवस्तूंच्या निर्मितीचा उत्पादन खर्च कमी केला. लोखंड गाळण्याच्या कामी लाकडाऐवजी दगडी कोळशाचा उपयोग करण्यात येऊ लागला. परिणामी, पोलाद स्वस्त झालं आणि पोलाद कारखान्यांची कार्यक्षमता वाढली. बाष्पशक्तीने औद्योगिक क्रांतीस चालना दिली. त्यापूर्वी पाणी व वारा यांच्या शक्तीवर बहुतेक यंत्रे चालत होती. बाष्पशक्तीवरील विविध स्वयंचलित यंत्रं विकसित करण्यात आली. कच्च्या आणि पक्क्या मालाची वेगाने वाहतूक करण्यासाठी रेल्वे आणि आगबोटी सुरू झाल्या. बाष्पशक्ती ही औद्योगिक क्रांतीचं प्रतीक बनली.

उत्पादनतंत्रात आमूलाग्र परिवर्तन झालं. साधी अवजारं, स्नायुशक्ती आणि मानवी कौशल्य यांच्या योगे घरोघर होणारं उत्पादन ही मध्ययुगीन पद्धत होती. आता कारखान्यांमध्ये आणि कापडगिरण्यांत केंद्रीय पद्धतीने उत्पादन होऊ लागलं. त्यासाठी मजुरांची गरज होती. ती गरज पूर्ण करण्यासाठी जमीनदारीचे कायदे रद्द करावे लागले. त्यामुळे शेतीवर काम करणारे भूदास कारखान्यांमध्ये मजूर म्हणून काम करू लागले. इंग्लडमधील औद्योगिक क्रांतीचे लोण अल्पावधीत जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, जपान या देशांमध्ये पसरले. युरोपमध्ये शहरीकरणाने गती घेतली. भूदास म्हणजे वेठबिगार - ते भूस्वामींच्या शेतावर राबायचे. त्यांच्या वेतनाबाबत कोणताही करार नव्हता. ही सरंजामशाही व्यवस्था कोलमडून पडली. कामगार आणि कारखान्यांचे मालक यांच्यामध्ये मजुरी वा वेतनाबाबत करार व्हायचा. कामगार अल्प उत्पन्नावर राबायचे. बालकामगार मोठ्या प्रमाणावर होते. औद्योगिक क्रांतीनंतर संपत्तीच्या निर्मितीत अभूतपूर्व वाढ झाली, तिच्या निर्मितीचा वेगही वाढला. विषमता आणि दारिद्र्यातही पराकोटीची वाढ झाली. कामगारांच्या वस्त्या बकाल होत्या. त्यांचे कामाचे तास निश्चित नव्हते. त्यांना आरोग्यसेवा मिळत नव्हती. ह्याचं चित्रण चार्ल्स डिकन्सच्या कादंबऱ्यांमध्ये आपल्याला पाह्यला मिळतं. ‘कंडिशन्स ऑफ वर्किंग क्लास इन ग्रेट ब्रिटन’ या ग्रंथात फ्रेडरिक एंगल्सने त्याचा तपशीलवार आढावा घेतला आहे.

सरंजामशाही कोसळून एक नवा समाज निर्माण होत होता. विज्ञान आणि तंत्रज्ञान एका नव्या समाजरचनेला जन्म देत होतं. या नव्या समाजाची व्यवस्था लावण्यासाठी तत्त्वज्ञान, अर्थशास्त्रासह अन्य सामाजिक शास्त्रं पुढे सरसावली. ॲडम स्मिथ या उद्योजकाने भांडवलशाही अर्थव्यवस्थेची मांडणी केली. त्यानंतर रिकार्डो आणि अन्य अर्थशास्त्रज्ञांनी त्यामध्ये भर घातली. नफा कुठून होतो, या प्रश्नाचा वैज्ञानिक छडा लावण्याचा प्रयत्न मार्क्सने केला. त्यासाठी ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञांच्या योगदानावर त्याने आपला सिद्धांत बेतला.

भांडवलशाहीत पैसा हे केवळ चलन वा विनिमयाचं साधन नसतं. पैशाचा उपयोग भांडवल म्हणून केला जातो, म्हणजे भांडवलाचा उपयोग करून तुम्ही एका वस्तूचं रूपांतर दुसऱ्या वस्तूत करता. ॲडम स्मिथने यासंबंधात दोन घटक निश्चित केले. पहिला घटक होता यूज व्हॅल्यूचा आणि दुसरा घटक होता एक्सचेंज व्हॅल्यूचा. उत्पादित वस्तू ग्राहकाला किती सुख देते वा त्याच्यासाठी किती मूल्य निर्माण करते, याला म्हणायचं यूज व्हॅल्यू. एक्सचेंज व्हॅल्यू म्हणजे सदर वस्तू आपल्या उत्पादनासाठी किती श्रम विकत घेऊ शकते. या दोन घटकांच्या आधारे वस्तूची किंमत ठरते, असं ॲडम स्मिथने मांडलं.

एखाद्या वस्तूचं उत्पादन करायला लागणारे श्रम निश्चित असतील तर वस्तूची किंमत वेगवेगळी का असते, या प्रश्नाचं उत्तर स्मिथच्या सिद्धांतात नव्हतं. वस्तूच्या उत्पादनात इतरही अनेक घटकांचं योगदान असतं. उदाहरणार्थ : जमीन, भांडवल, इत्यादी. या प्रश्नांची उत्तरं देताना रिकार्डोने म्हटलं की, भूतकाळातील श्रमांतूनच भांडवलाची निर्मिती होते. हा धागा पकडून मार्क्सने ठासून मांडलं की, भूतकाळातल्या श्रमांवर म्हणजे श्रमांतून निर्माण झालेल्या भांडवलावर आजचे भांडवलदार मालकी स्थापित करतात. पैसे देऊन तुम्ही कच्चा माल खरेदी करता त्या वेळी पैशाची वा चलनाची भूमिका विनिमयाचं साधन नसून भांडवल ही आहे. भांडवल गुंतवणूक करून कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात केलं जातं. हा पक्का माल अधिक किमतीला विकला जातो. त्या उत्पादित वस्तूवर भांडवलाद्वारे पुन्हा प्रक्रिया करून त्यापेक्षा अधिक किमतीला नवी वस्तू विकता, अशी साखळी तयार होते. इथे मार्क्स दोन प्रश्न उपस्थित करतो. पहिला श्रमशक्ती विकत घेतली जाते, तर कच्च्या मालापेक्षा ती वेगळी का? आणि दुसरा-वस्तूच्या उत्पादनासाठी किती श्रमशक्ती लागली यावर वस्तूची किंमत ठरत असेल, तर उत्पादित वस्तूच्या किमतीपेक्षा श्रमाचं मूल्य कमी का... ?

हे प्रश्न उपस्थित करून मार्क्स सांगतो की, कामगाराचं वेतन निश्चित करताना त्याला जगण्यासाठी जेवढं कमीत कमी वेतन गरजेचं आहे, तेवढंच भांडवलदार त्याला देतो याचा अर्थ असा की- कामगार आठ तास काम करत असेल, तर त्यातल्या चार तासांच्या श्रमांतून तो जगण्यासाठी आवश्यक असणारे पैसे कमावतो. मात्र उरलेल्या चार तासांत तो जे काम करतो, त्यातून निर्माण होणारं मूल्य भांडवलदाराच्या खिशात जातं. याला मार्क्स सरप्लस व्हॅल्यू वा वरकड मूल्य म्हणतो. हाच भांडवलदाराचा नफा असतो. नफा म्हणजे शोषणाचं गोंडस रूप आहे.

चार तास काम करून कामगार जगण्यासाठी आवश्यक पैसे कमवत असेल, तर तो भांडवलदाराकडे का नोकरी करतो...? त्याचं उत्तर देताना मार्क्स सांगतो की- उत्पादन -साधनांद्वारेच चार तास श्रम करून जगण्याएवढे पैसे तो कमवू शकतो आणि उत्पादनसाधनांवर भांडवलदाराची मालकी असते. उत्पादनाची ही साधनं भूतकाळात केलेल्या श्रमांमधून तयार झालेली आहेत, म्हणजे वस्तुतः ती श्रमिकांच्याच मालकीची आहेत, असं स्पष्टीकरण मार्क्स देतो.

साहजिकच भांडवलदाराचा प्रयत्न असा असतो की -उत्पादनसाधनांमध्ये अधिकाधिक सुधारणा कराव्यात आणि उत्पादनाचा वेग व कार्यक्षमता वाढवावी, जेणेकरून कामगारांची संख्या व मजुरी कमी करता येईल. या कारणामुळे भांडवलदारी व्यवस्थेत भांडवलदार अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतात. त्यामुळे वर्गसंघर्ष अटळ ठरतो. भांडवलदार कितीही दयाळू असला वा कामगार कितीही कनवाळू असले, तरीही हा संघर्ष टाळता येत नाही. कारण भांडवली अर्थव्यवस्थेतील हा अंगभूत विरोध आहे. या वर्गसंघर्षातून भांडवली व्यवस्था कोसळून पडेल आणि उत्पादनसाधनांवर कामगारांची मालकी प्रस्थापित होईल की, असं भाकीत मार्क्सने केलं.

प्रत्यक्षात असं घडलं नाही. अभिजात ब्रिटिश अर्थशास्त्रावर मार्क्सने अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत रचला, तर मार्क्सच्या सिद्धांताला सामावून घेणारी भांडवलशाहीची मांडणी जॉन मेनार्ड केन्स या अर्थतज्ज्ञाने केली. गरिबांच्या हाती पैसे दिल्याशिवाय बाजारातील वस्तूंचा उठाव होणार नाही, त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. गरिबांना रोजगार देण्यासाठी कामं काढावीत. सरकारने हा पैसा अर्थातच श्रीमंतांवर कर लावून गोळा करावा, अशी मांडणी केन्सने केली.

मार्क्सला अभिप्रेत असलेलं औद्योगीकरण संपूर्ण जगात झालं नाही. कारण उत्पादन एवढं प्रचंड होतं की आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका या खंडांतील अनेक देशांमध्ये अमेरिका वा पश्चिम युरोप वा जपानसारखं औद्योगिकीकरण होण्याची शक्यताच नाही. चीन हा जगाचा कारखाना समजला जातो. चीनलाही नेमका हाच प्रश्न भेडसावतो आहे. मार्क्सच्या काळातील अवजड उद्योगांवर आधारित भांडवलशाही सध्या नाही. मार्क्सच्या भाकिताप्रमाणे भांडवलशाहीचा परमोत्कर्ष झालेल्या देशांत क्रांती झाली नाही. रशिया, चीन यांसारख्या मागास राष्ट्रांमध्ये क्रांत्या झाल्या, कारण मार्क्सच्या समग्र मांडणीचं आवाहन नैतिकतेला आहे. मार्क्सच्या मांडणीतील नैतिकता पुढील कल्पनांमधून स्पष्ट होते.

परात्मभाव

उत्पादक श्रम केवळ माणूसच करतो. या श्रमांमध्ये तो आपलं व्यक्तिमत्त्व ओततो आणि एक वस्तू तयार करतो. उदाहरणार्थ - एखादा कुंभार एक मडकं घडवतो, त्या वेळी तो त्या श्रमात तल्लीन झालेला असतो. सुडौल मडकं घडवल्याबद्दल त्याला मिळणारा मोबदला कितीही कमी वा अधिक असला, तरीही ते मडकं घडवण्याच्या श्रमात त्याला आनंद मिळतो. त्याला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती मिळते. आधुनिक कारखान्यातील श्रम तसे नसतात. हे श्रम तुम्हाला कोणतंही समाधान देत नाहीत. कारण तुमच्या श्रमातून एक संपूर्ण वस्तू निर्माण होत नाही. एका वस्तूचा छोटासा भागच तुम्ही तयार करता वा त्याच्या निर्मितीत तुमचा सहभाग असतो. तुम्ही तुमच्या श्रमापासून दुरावता. म्हणजे तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वापासून- अर्थात स्वतःपासून दुरावता. कारण आधुनिक कारखान्यात होणारं उत्पादन विशेषीकरणातून सिद्ध होतं. ‘मॉडर्न टाइम्स’ या चित्रपटातील दृश्यं आठवतात का...? त्यामध्ये याचं प्रत्ययकारी चित्रण चार्ली चॅप्लिनने केलं आहे.

या दुराव्याला इंग्रजी भाषेतला शब्द आहे एलिनिएशन, तर मार्क्सने वापरलेला जर्मन शब्द आहे एन्फ्रेमडुंग. आपण कोण आहोत आणि कोणतं काम करत आहोत, असा प्रश्न कुंभाराला पडत नाही; पण आधुनिक काळातील कामगाराला हा अस्तित्वाचा प्रश्न सतत छळत असतो.

असुरक्षितता

कुंभाराला पैसे कमी मिळत असतील, त्याचा उदरनिर्वाह कसाबसा होत असेल; पण आपल्याला या समाजात स्थान आहे, ही भावना त्याच्या जगण्याचा आधार असते. आधुनिक श्रमिकाला तो आधार नसतो. समाजाला आपली गरज आहे, ही अनुभूती त्याला मिळू शकत नाही. त्याला कामावरून केव्हाही कमी केलं जाऊ शकतं. नफा कमी झाला, नवं तंत्रज्ञान आलं, बाजारपेठेतली मागणी घटली- अशी कोणतीही कारणं असू शकतात. आपल्यापैकी कुणालाही आपण समाजासाठी काहीही योगदान करत नाही, ही भावना अस्वस्थ करणारी असते. आपण जिथे श्रम करतो, ज्या वस्तूंच्या उत्पादनात सहभागी होतो, ती यंत्रणा आपल्याला कधीही फेकून देऊ शकते; ही भावना आणि अनुभव कोणत्याही व्यक्तीला हादरा देणारा असतो. मुंबईतील गिरणी कामगार असोत की एमटीएनएलमधील कामगार-कर्मचारी-त्यांनी हा विदारक अनुभव घेतला आहे. कोव्हिड 19 या विषाणूच्या महामारीनंतर जाहीर झालेल्या टाळेबंदीत हजारो वा लाखो मजूर आपल्या गावी मिळेल त्या वाहनाने वा उपाशीपोटी हजारो किलोमीटर चालत जाऊ लागतात. ज्या शहराच्या उभारणीमध्ये आपण आपला घाम आणि रक्त गाळलं- त्या शहरात, त्या समाजात आपल्याला स्थान नाही, हा अनुभव त्यांना जिवंतपणे भाजून काढतो.

विषमता

भांडवलशाही व्यवस्थेत कामगारांना अत्यल्प मोबदला मिळतो, तर भांडवलदार अधिक श्रीमंत होतात. कमीत कमी वेतनावर कामगारांना राबवून घेतल्याशिवाय भांडवलदारी अर्थव्यवस्था टिकू शकत नाही, असं मार्क्स सांगतो. अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी भांडवलदार हे करतात. त्याला उद्देशून मार्क्स प्रिमिटिव्ह एक्युम्युलेशन- प्राथमिक वा मागास संचय ही संज्ञा वापरतो.

अस्थिर भांडवलशाही

भांडवलशाही व्यवस्था अस्थिर असते कारण या व्यवस्थेत प्रचंड उत्पादन होतं. मागणीपेक्षाही प्रचंड उत्पादन होतं आणि त्या उत्पादनाला ग्राहक नाहीत, अशी परिस्थिती ओढवते. यंत्रोत्पादनामुळे ही परिस्थिती निर्माण होते, कारण एवढं प्रचंड उत्पादन करण्यासाठी कमी कामगारांची गरज असते. त्यामुळे बेरोजगारी आणि गरिबी वाढते. वस्तुतः या उत्पादनपद्धतीची क्षमता एवढी प्रचंड आहे की, प्रत्येकाच्या सर्व गरजा, अन्न, वस्त्रं, निवारा, शिक्षण- आणि अन्य सुखंही ती पुरवू शकते. परंतु बेरोजगारी हा शाप समजला जातो, कारण भांडवलशाही व्यवस्थेमुळे संपत्तीचं केंद्रीकरण मूठभरांच्या हाती होतं आणि बहुसंख्य लोक दारिद्र्यात राहतात. वस्तुतः या संपत्तीचं न्याय्य वाटप झालं, तर सर्वांना सर्व वेळ काम करण्याची गरजच नाही. बेरोजगारी म्हणजे स्वातंत्र्य आहे, परंतु हे लोकांच्या अनुभवाला येत नाही; कारण भांडवलशाही समाजव्यवस्थेत संपत्तीचं न्याय्य वितरण होत नाही. संपत्तीचं न्याय्य वितरण झालं तर पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल, असा मार्क्सचा होरा होता.

भांडवलदारांसाठीही भांडवलशाही अनिष्ट

मार्क्सच्या दृष्टीतून भांडवलदार हे सैतान नाहीत. भांडवलदारी व्यवस्थेत कौटुंबिक संबंधांत तणाव, दडपशाही, चीड वा नाराजी असते. कारण भांडवलशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपले आर्थिक हितसंबंध प्यारे असतात. त्यामुळे विशुद्ध प्रेमाचा अनुभव कुणालाही येत नाही- अगदी भांडवलदारांनाही. कारण घरामध्ये अधिकाधिक वस्तूंचा संचय असावा यामध्येच आपलं सुख आहे, असं प्रत्येकाला वाटतं. या वृत्तीला मार्क्सने वापरलेली संज्ञा कमोडिटी फेटिशिझम. त्यामुळे सखोल संबंधांची जाण माणसांना होत नाही. मार्क्स म्हणतो, भांडवलशाही व्यवस्था प्रत्येक व्यक्तीला चिंताक्रांत बनवते. भांडवलशाही व्यवस्थेला अनुरूप बनवते. त्यामुळे लोक राजकीय दृष्ट्या आत्मसंतुष्ट बनतात. आपलं पतन झालेलं आहे, हे त्यांच्या ध्यानी येत नाही, ही मार्क्सची टीका आहे.

मार्क्सप्रणीत कम्युनिझम वा साम्यवाद

1948 मध्ये प्रकाशित झालेल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये मार्क्स आणि एंगल्स यांनी मिळून साम्यवादी समाजाचं चित्रं रेखाटलं आहे. खासगी मालकी आणि वारसाहक्काने मिळालेली संपत्ती यांना कम्युनिझम वा साम्यवादात स्थान नाही, असं ते सांगतात. भांडवलशाही उलथून टाकण्याची क्रांती झाल्यानंतर या ध्येयापर्यंत जाण्याचा टप्पा येईल. या प्रवासात आयकरात वाढ होईल, बँकिंग-कम्युनिकेशन (दूरसंचार) व वाहतूक यांच्यावर केंद्रीय नियंत्रण असेल, सर्वांना मोफत शिक्षण मिळेल असं चित्र ते रंगवतात. मार्क्सच्या मते, कम्युनिस्ट वा साम्यवादी व्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध गुणांचा विकास करायला संधी मिळेल. मी सकाळी शिकारीला जाईन, तर दुपारी नदीमध्ये गळ टाकून बसेन. संध्याकाळी गार्इंच्या दुधाची धार काढेन, रात्रीच्या जेवणानंतर समीक्षा वा टीका करायला बसेन. त्यासाठी मला शिकारी, मच्छीमार, गवळी वा टीकाकार होण्याची गरज नाही.

मार्क्सचं स्वप्नरंजन वा युटोपिया यांचा आधार त्याच्या मांडणीत आहे. एक क्षेत्र आहे माणसांच्या गरजांचं आणि दुसरं क्षेत्र असतं स्वातंत्र्याचं, असं मार्क्स बजावतो. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठी माणसंच नाही, तर पशूपक्षी हेही धडपड करतात. निसर्गाशी संघर्ष करून त्यांना आपलं अस्तित्व आणि त्याचं सातत्य राखावं लागतं. ते निसर्गाच्या शक्तींच्या अधीन असतात. त्यामुळे स्वातंत्र्याचं क्षेत्र त्यांच्या अनुभवात नसतं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत माणसं उत्पादक शक्तींच्या आधीन होतात आणि स्वातंत्र्य गमावून बसतात. उत्पादकशक्ती, उत्पादनाची साधनं आणि त्यातून निर्माण झालेल्या वस्तू माणसावर हुकूमत गाजवू लागतात. त्यामुळे माणूस आपलं स्वातंत्र्य गमावून बसतो. माणसाला दुःखं भोगू द्यातं, पण ती माणसांची दुःखं असावीत. अन्न, वस्त्र, निवारा यांच्या अभावाशी संघर्ष करावा लागणं, ही पशुपातळीवरची दुःख आहेत, असं मार्क्स सांगतो.

उत्पादनाच्या शक्ती, उत्पादनसाधनं आणि उत्पादित वस्तू यांच्या गदारोळात माणूस आपलं स्वातंत्र्य गमावून बसला आहे, याकडे युवाल नोह हरारीही लक्ष वेधतो. कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोटेक्नॉलॉजी व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या मीलनातून शासन आणि उद्योगसमूह वा कॉर्पोरेशन्स यांच्याकडे माणसाला नियंत्रित करण्याची अपार शक्ती केंद्रित झाली आहे, असा इशारा हरारी देतो.

श्रम आणि श्रमिक यांच्यातील परात्मभाव, आधुनिक श्रमांची व श्रमिकांची असुरक्षितता, पराकोटीची विषमता, भांडवलशाही व्यवस्थेमुळे होणारं भांडवलदारांचं नैतिक अधःपतन आणि भांडवलशाही व्यवस्थेची अस्थिरता या मार्क्सने मांडलेल्या बाबी आजही आपल्या अनुभवाला येतात. थॉमस पिकेटी असो की टोनी ॲटकिन्सन वा अमर्त्य सेन वा अभिजीत बॅनर्जी आणि ईस्टर डफ्लो किंवा युवाल नोह हरारी सर्वांच्या मते आपल्या पुढचे प्रश्न जागतिक आहेत आणि त्यावर जागतिक उत्तरंच शोधावी लागतील. अर्थात हे जागतिकीकरण मानवकेंद्रित असायला हवं. वित्तीय भांडवल आणि उद्योगसमूहांना लगाम घालणारं असायला हवं तरच निकोप मानवी समाजाची उभारणी शक्य आहे. मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर पोचली आहे, ही बाब कोरोनाची महामारी आणि पर्यावरणीय संकटाने अधोरेखित केली आहे.

सुनील तांबे, मुंबई

Share on Social Media

चिनी महासत्तेचा उदय : 19

तिआनमेननंतरची आव्हाने

सतीश बागल

जेव्हा जेव्हा चीनमध्ये एखाद्या ठिकाणी राजकीय बंडाळी वा उठाव होतो, त्या-त्या वेळी चीनमधील अनेक अशांत भागांमध्ये त्याची लागण होते. तिआनमेन प्रकरणावेळी 1989 मध्ये इतरही काही भागांत राजकीय उठाव व बंडाळी सुरू झाली. विशेषतः तिबेट व झिनझियांग या प्रांतातील उठाव हे तिबेटी व मुस्लिम उघूर यांचे होते आणि त्याला बऱ्याच वर्षांची पार्श्वभूमी आहे. हे उठाव जियांग झेमिन व त्यांच्या सरकारने निष्ठूरपणे मोडून काढले. विशेषतः तिबेटमधील अटकसत्रे व निदर्शाकांप्रति दाखविलेले क्रौर्य दीर्घकाळ स्मरणात राहील असे होते. दलाई लामा यांना 1989 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले होते. त्यामुळे तिबेटमधील बंडाळी व उठाव अधिक तीव्र स्वरूपाचे होते. जगभर दलाई लामांचा सत्कार, तर चीनमध्ये अगदी तिबेटमध्येही तिबेटींवर अत्याचार अशी परिस्थिती होती. झिनझियांग मधील मुस्लिम उघूर यांचा उठावही असाच निष्ठूरपणे मोडून काढण्यात आला.

तिआनमेनच्या रक्तरंजित मध्यंतराने अनेक गोष्टी ठप्प झाल्या. लष्करी बळाचा वापर करून चळवळ मोडून काढल्याने पक्ष व सरकारपासून विद्यार्थी, सर्वसामान्य लोक आणि बुद्धिमंत, विचारवंत हे सारे दूर गेले. आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनची चांगली शोभा झाली. पाश्चिमात्य देशांतील- विशेषतः अमेरिकेतील- जनमत चीनविरोधात गेले. निःशस्त्र विद्यार्थ्यांची निदर्शने लष्करी बळाने चिरडल्याने मानवी हक्कांचे उल्लंघन झाले, असे अमेरिका व जी-7 गटातील राष्ट्रे म्हणू लागली. चीनला मिळणारे विज्ञान-तंत्रज्ञानविषयक साह्य व मदत बंद करण्याचा विचार सुरू झाला. विदेशी गुंतवणुकीचा ओघ आटला. आर्थिक प्रगतीला खीळ बसली. पक्षांतर्गत राजकारणात दबा धरून असलेल्या कडव्या व डाव्या शक्ती प्रबळ झाल्या. बाजार प्रणीत अर्थव्यवस्थेचे टीकाकार आता अर्थव्यवस्था खुली करण्याच्या विरोधात तारस्वरात बोलू लागले. स्वतः डेंग हे पक्षात एकाकी पडल्यासारखे झाले. धीम्या गतीने अर्थव्यवस्था वाढावी असे म्हणणाराअर्थमंत्री चेन युन यांचा प्रशासनातील गट प्रबळ झाला. महत्त्वाचे म्हणजे 1989 नंतर आर्थिक विकास मंदावला व पुढील दोन-तीन वर्षे तो ठप्प झाला. दर वर्षी 8 ते 9 टक्क्यांनी वाढणारी अर्थव्यवस्था आता 3 ते 3.5 टक्के अशा कूर्मगतीने सरकू लागली. डेंग यांच्यापुढील अडचणी वाढल्या. मात्र डेंग यांना एक पुरते ठाऊक होते की- आपली आर्थिक प्रगती, विस्तारणारी बाजारपेठ व पाश्चिमात्य देशांबरोबर प्रस्थापित केलेले निकटचे संबंध या चीनच्या जमेच्या बाजू आहेत, त्यामुळे या अडचणी लवकर दूर होतील. अर्थव्यवस्था अधिक खुली करणे, आर्थिक विकासाचा वेग वाढविणे, भाववाढ रोखणे या सर्व बाबींकडे त्वरेने लक्ष देणे आवश्यक होते. हे जर केले नाही, तर चीनची व पक्षाची अनेक बाबतींत कोंडी होऊ शकते. तसेच जगभर अनेक साम्यवादी देशांमध्ये जो राजकीय गोंधळ व कम्युनिस्ट पक्षांची पीछेहाट होत होती, तशीच अवस्था चीनचीही होऊ शकेल. आर्थिक सुधारणा आणि उच्च विकासदर याबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे डेंग यांचे मत होते.

मेमध्ये पक्ष सरसचिव झाओ झियांग यांना पदच्युत करून त्यांच्या जागी जियांग झेमिन यांची नेमणूक झाली होती. दि. 23-24 जून रोजीच्या तेराव्या पार्टी काँग्रेसच्या चौथ्या अधिवेशनात या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. या वेळी जियांग झेमिन यांनी आर्थिक सुधारणा, अर्थव्यवस्था खुली करणे व आर्थिक वाढीला प्राधान्य देणे, या धोरणांचा जोरदार पुनरुच्चार केला आणि आपण डेंग यांच्या मार्गाने जाणार, हे ध्वनित केले. मात्र असे असले तरी त्या वेळचे वातावरण राष्ट्रीय अरिष्ट आल्यासारखे कमालीचे गंभीर होते. अर्थव्यवस्थेपेक्षा कम्युनिस्ट पक्ष व सरकार यांचे स्थैर्य सर्वांना महत्त्वाचे वाटत होते. विद्यार्थ्यांची आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या विचारवंतांची/बुद्धिमंतांची धरपकडही सुरू होती. डेंग यांनी या अधिवेशनात एक गोष्ट मात्र आवर्जून केली. दि. 4 जून 1989 च्या विद्यार्थी निदर्शकांवरील लष्करी कारवाईची पूर्ण जबाबदारी डेंग यांनी स्वीकारली. त्यामुळे जियांग यांच्या नव्या नेतृत्वावर भूतकाळातील कोणत्याही निर्णयांचे ओझे त्यांनी ठेवले नाही. जियांग हे नव्या पिढीचे नेते असल्याने त्यांना परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी योग्य ते सहकार्य मिळेल याची त्यांनी खबरदारी घेतली. याच अधिवेशनात सेन्ट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्षपद वगळता डेंग यांनी सर्व सत्ता जियांग झेमिन यांच्याकडे सुपूर्द केली. त्याच वर्षी पुढे नोव्हेंबरमध्ये पाचव्या अधिवेशनात तर मिलिटरी कमिशनचे अध्यक्षपदही त्यांनी जियांग यांच्याकडे देऊन टाकले आणि पूर्ण निवृत्ती स्वीकारली. जियांग झेमिन हे चिनी क्रांतीत सहभाग घेतलेले नेते नव्हते. ते 1949 नंतर पार्टीने वाढविलेले नेतृत्व होते. अतिशय हुषार व उत्तम विद्यापीठातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले जियांग यांना इंग्रजीचे तर ज्ञान होतेच, परंतु त्याशिवाय ते इतर परदेशी भाषाही बोलत असत. झाओ झियांग यांना बडतर्फ केल्यानंतर ज्या तातडीने जियांग झेमिन यांची नेमणूक करण्यात आली, ती पाहता अनेकांना-विशेषतः पक्षाबाहेरच्या लोकांना जियांग हे संक्रमणकाळातील तात्पुरते नेतृत्व असावे, असे वाटले. जियांग शांघायमध्ये असताना त्यांचे सहायक झेंग क्विंगहाँग (Quinghong) यांचे बीजिंगमधील अनेक नेत्यांशी वैयक्तिक संबंध होते. त्यांच्या मदतीने झेमिन यांनी बिजिंगमधील नोकरशाहीत व राजकारण्यांमध्ये लवकरच आपला उत्तम जम बसविला आणि आपली निवड सार्थ होती, हे दाखवून दिले. जियांग झेमिन यांना साथ देण्यासाठी पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीमध्ये Qiao Shi (किओ शी), पंतप्रधान ली पेंग व याओ यिलीन हे मध्यममार्गी व परंपरावादी सदस्य होते. याशिवाय सुधारणावादी ली रुइहान आणि साँग पिंग यांचाही समावेश होता.

डेंग सुधारणावादी असले तरी 1989 च्या तिआनमेन प्रकरणामुळे पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीत परंपरावादी व मध्यममार्गीय सदस्यांचे अधिक प्राबल्य ठेवावे लागले. त्यामुळे चेन युन यांचे पारडे जड झाले होते. या प्रकरणात डेंग हे पक्षात एकाकी पडल्याने सुरुवातीला जियांग झेमिन यांचा काटा चेन युन यांच्याकडे झुकलेला असे. जिभेवर आर्थिक सुधारणांची भाषा असली, तरीही कडवे डावे आणि अतिसावध चेन युन यांच्या वाढत्या दबावामुळे डेंगपासून जियांग झेमिन बरेच दूर होते. पुढे 1991 मध्ये पूर्णपणे निवृत्त झाल्यानंतरही डेंग आर्थिक सुधारणांसाठी खूपच सक्रिय झाले. त्यांच्या सुधारणा कार्यक्रमामुळे व त्या निमित्ताने त्यांच्या 1992 मधील दक्षिण चीनच्या दौऱ्यामुळे त्यांना इतकी प्रतिष्ठा प्राप्त झाली की, जियांग झेमिन हे परत डेंग यांच्याकडे वळू लागले. दरम्यानच्या काळात परिस्थिती पाहून डेंग यांनी सबुरीचे धोरण स्वीकारले. सप्टेंबर 1989 मध्ये ली त्सुंग दाओ (Lee Tsung Dao) हे चिनी वंशाचे अमेरिकन नोबेल पारितोषिकविजेते वैज्ञानिक चीन भेटीसाठी आले. त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी वार्तालाप करतानाच डेंग यांनी आपण निवृत्त होणार असे दर्शविले. मात्र तरीही 82 वर्षांहून अधिकच्या वयात समुद्रात पोहणारे डेंग अशा शीर्षकाचे छायाचित्र प्रसिद्ध करून, ‘आपण निवृत्त होत आहोत, मात्र आपली तब्येत उत्तम आहे’ आणि आवश्यकता भासल्यास आपण परत येऊन पुन्हा जोमाने काम करू शकतो, असाच संदेश डेंग यांनी दिला. 85 वर्षांहून अधिक वय असलेले डेंग दैनंदिन व इतर राजकारणातून निवृत्त होत होतेच. तरीसुद्धा तिआनमेन दुर्घटनेनंतरच्या तीन वर्षांत डेंग यांनी अर्थव्यवस्था खुली करणे, पाश्चिमात्य राष्ट्रांशी पूर्ववत्‌ संबंध निर्माण करणे आणि चीनला पुढील मार्गावर नेण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करणे या कामात स्वतःला झोकून दिले. महत्त्वाचे म्हणजे 1992 मध्ये आर्थिक सुधारणा व नव्या गुंतवणुका याबाबत नकारात्मक वातावरण असतानाही त्यांनी दक्षिण चीनचा महत्त्वपूर्ण दौरा करून शांघाय व इतर भागात आर्थिक विकासाला चालना दिली आणि चीनला महासत्तेच्या मार्गावर नेले. खरे तर डेंग यांनी निवृत्ती स्वीकारली होती आणि कोणतेही औपचारिक पद स्वतःकडे ठेवलेले नव्हते. तरीही जियांग झेमिन वा इतर नेत्यांना अवघडलेपण वाटू न देता, त्यांची कोणतीही अडचण न करता पुढील विकासाच्या कामासाठी त्यांनी आवश्यक ती वातावरणनिर्मिती केली, हे विशेष!

तिआनमेन दुर्घटनेवेळी जॉर्ज बुश (सीनिअर) हे अमेरिकेचे अध्यक्ष होते. दुर्घटना, अहिंसक निदर्शकांवर झालेला हल्ला, अतिरिक्त सैनिक दलाचा वापर यामुळे अमेरिकन जनतेत चीनविरोधी भावना निर्माण झाली. पुढे अमेरिका व पाश्चात्य देशांनी चीनची अनेक बाबतींत नाकेबंदी केली. त्यात चीनला शस्त्रास्त्रे व उच्च तंत्रज्ञान पुरविण्याबाबत घातलेल्या बंदीचाही समावेश होता. चिनी लष्कराने 1983 ते 1989 च्या सहा वर्षांच्या कालावधीत अमेरिकन सैन्यदलाबरोबर विमानवहन, नौकानयन, क्षेपणास्त्रे व टोर्पेडो यांचा वापर असणारे आणि आधुनिक युद्धतंत्राचा वापर अंतर्भूत असणारे अनेक संयुक्त कार्यक्रम केले होते. दोन्ही देशांच्या लष्कराच्या संयुक्त कवायती ही तर नित्याची बाब झाली होती. हे सारे कार्यक्रम, सराव, उच्च तंत्रज्ञानाचा वापर व प्रशिक्षण आता बंद झाले. तिआनमेन चौकातील घटना दुर्दैवी असली तरी ती चीनची अंतर्गत बाब होती असे चीनला वाटत होते; चीनची कम्युनिस्ट राजवटच उलथवून टाकण्याच्या उद्दिष्टाने विद्यार्थी निदर्शने करीत होते, अशा वेळी मानवी हक्कांपेक्षा देशाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे होते. ही घटना देशाच्या एकात्मतेवरचा हल्ला होता, म्हणूनच अमेरिकेने व इतर देशांनी त्याची दखल घेण्याचे कारण नव्हते, अशी भूमिका डेंग व त्यांच्या सरकारची होती. मात्र अमेरिकेला व पाश्चात्त्य देशांना तसे वाटत नव्हते. त्यांच्या दृष्टीने लोकशाही व स्वातंत्र्य यांच्या मागणीसाठी निःशस्त्र विद्यार्थ्यांनी केलेली चळवळ चीन सरकारने लष्कराच्या बळाने चिरडून टाकली होती. अशा तणावाच्या प्रसंगी अध्यक्ष जॉर्ज बुश (सीनिअर) यांनी डेंग यांच्याशी वैयक्तिक स्तरावर संपर्क साधून अमेरिकेची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र अमेरिका व चीनच्या इतर पाश्चिमात्य मित्रराष्ट्रांनी चीनविरोधात अशा कडक कारवाईचे संकेत दिल्यानंतर डेंग यांनीही वैयक्तिक स्तरावर मित्रराष्ट्रांशी व त्यांच्या प्रमुखांशी बोलणे टाळले. यामुळे अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांशी चीनचे संबंध खूपच ताणले गेले.

स्वत: बुश व डेंग यांचे वैयक्तिक स्तरावर संबंध अतिशय उत्तम होते. अमेरिका व चीन यांच्यात 1974-75 या दोन वर्षांत राजनैतिक संबंध निर्माण होण्याच्या कालावधीत, जॉर्ज बुश (सीनिअर) हे चीनमधील अमेरिकन दूतावासाचे प्रमुख होते. त्या वेळी झाऊ एन लाय आजारी असल्याने झाऊ यांच्याकडील परराष्ट्र विभागाचा कार्यभार डेंग यांच्याकडे होता. त्यामुळे डेंग व बुश यांच्यात जवळचे वैयक्तिक संबंध निर्माण झाले होते. तिआनमेन प्रकरणानंतर चीन व अमेरिका यांच्यातील संबंधांत कमालीचा तणाव आला असला, तरी चीनच्या नेत्यांशी जॉर्ज बुश अनौपचारिक संपर्कात असत. जून 1989 मध्ये जॉर्ज बुश यांनी स्वत: लिहिलेले खासगी पत्र डेंग यांच्याकडे वरिष्ठ अमेरिकन नेत्यांबरोबर डेंग यांना पाठविले. त्यात त्यांनी अमेरिकन सरकारने तिआनमेन प्रकरण इतक्या गंभीरतेने का घेतले, हे डेंग यांना कळकळीने समजावून सांगितले. लोकशाही व वैयक्तिक स्वातंत्र्य या मुद्द्यांवर अमेरिकन जनमत अतिशय संवेदनशील असते, म्हणूनच अमेरिकेची प्रतिक्रिया ही उद्धटपणाची व शहाजोगपणाची नसून अमेरिकन जनतेला अतिशय प्रिय असणारी मूल्ये व तत्त्वे यांच्याशी निगडित आहे. या प्रकरणी राष्ट्राध्यक्षाचे वैयक्तिक मत वेगळे असले, तरी अमेरिकेला चीनवर काही बंधने घालण्याची कडक कारवाई करणे भाग होते, असे त्यांनी डेंग यांना कळविले. त्यानंतर अमेरिकेने डेंग यांच्या विनंतीवरून नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायजर ब्रेंट स्नोक्राफ्ट (Brent Snowcraft) व उपमंत्री लॉरेन्स इगल्बी (Lawrence Eagleby) या वरिष्ठ नेत्यांना अगदी राजदूतावासाला विश्वासात न घेता, चीनमध्ये डेंग व वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी गुप्तपणे पाठविले. ‘‘दि. 4 जूनचा उठाव हा कम्युनिस्ट क्रांतीविरोधी होता. त्याचे उद्दिष्ट चीनची साम्यवादी सत्ता उलथवून टाकणे हे होते. अमेरिकेने व पाश्चात्त्य देशांनी चीनवर बंदी लादून चीनची राजवट उलथवून टाकणाऱ्या शक्तींना अधिक बलवान केले आहे. अमेरिकेची व अमेरिकन वृत्तपत्रांनी घेतलेली भूमिका ही चीनच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ आहे, असे आम्ही मानतो. वीस वर्षे लढून व 2 कोटी लोकांची आहुती देऊन मिळविलेली आमची ही क्रांतिकारी राजवट असून तिचे रक्षण करण्यासाठी कोणतेही युद्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत.’’ अशा पद्धतीने डेंगनी अमेरिकन प्रतिनिधींना सुनावले. त्यामुळे 1989 पासून पुढील तीन-चार वर्षे अमेरिका-चीन संबंध असेच तणावपूर्ण राहिले.

फ्रान्समध्ये 14 जुलै 1989 पासून सुरू झालेल्या जी-7 परिषदेने चीनच्या नाकेबंदीचा निर्णय घेतला. बंदीचा प्रश्नच नव्हता. किती कडकपणे बंदी घालता येईल, याबद्दल बरीच चर्चा झाली आणि बंदीबाबतचे निर्णयही झाले. त्यातही अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज बुश व जपानी पंतप्रधान सोसुके उनो (Sosuke Uno) यांनी फार कडक बंदी नको, असा सूर लावला. चिनी लोकांचे, देशाचे, विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशी बंदी घालू नये, असे त्याचे मत होते. 1989 ते 1993 या साडेतीन वर्षांत वरिष्ठ स्तरावरून चीन व अमेरिकेत संवाद नव्हता. उच्चस्तरीय औपचारिक संबंधच नव्हते. या वेळी अमेरिकेतर्फे हेन्री किसिंजर, निक्सन, जिमी कार्टर अशा एके काळी अमेरिकेतील उच्च पदावर काम केलेल्या नेत्यांना मुत्सद्द्यांना चीनमधील नेत्यांशी अनौपचारिक रीत्या संपर्क ठेवण्यासाठी मधून-मधून पाठविण्यात येत असे. त्यातून विचारांची व भूमिकांची थोडीफार कामचलाऊ देवाण-घेवाण होत असे. त्यात फँग लिझी प्रकरणाने हे संबंध आणखी तणावाचे झाले.

चीनमधील फँग लिझी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोल-शास्त्रज्ञ होते. ते कम्युनिस्ट पक्षाचे सभासदही होते. पक्षविरोधी कारवाईच्या आरोपावरून त्यांना 1957 मध्ये पक्षातून काढून टाकले गेले. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. माओंच्या मृत्यूनंतर चीनमधील विज्ञान-संशोधन संस्थांची पुनर्बांधणी व वैज्ञानिकांच्या पुनर्स्थापनेनंतर ते त्यांचे बुद्धिजीवी जीवन परत एकदा जगू लागले. मध्ये चीनभर विद्यार्थ्यांची 1987 जी निदर्शने झाली, त्यांना फँग लिझी यांचा आशीर्वाद होता. त्या वेळी केलेल्या भाषणांमध्ये ते या सरंजामी सरकारला धडा शिकविला पाहिजे, असे सतत म्हणत. त्यामुळे सरकारचे त्यांच्या हालचालींकडे बारीक लक्ष असे. तिआनमेन चौकातील निदर्शनांपूर्वी फेब्रुवारी 1989 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी चीनला भेट दिली होती. फँग लिझी यांनाही अमेरिकन दूतावासाने जॉर्ज बुश यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या भोजन-समारंभास आमंत्रित केले होते. ही बाब चिनी सरकारला बिलकुल रुचली नाही. मात्र शेवटी असे ठरले की, फँग लिझी यांना या समारंभात जॉर्ज बुश यांच्या फार जवळ फिरकू देऊ नये. ऐन वेळेला अर्थातच चिनी पोलिसांनी फँग लिझी यांची कार रस्त्यात अडवून त्यांना भोजन-समारंभाला जाऊ दिले नाही. चिनी सरकारने फँग लिझी यांचा जरा जास्तच धसका घेतला होता. फँग लिझी यांचा 1989 च्या तिआनमेन चौकातील निदर्शनांशी काहीही संबंध नव्हता. तरीही स्वातंत्र्य व लोकशाही याविषयीची त्यांची मते पाहता, त्यांनाही सरकारने जून 1989 नंतर लक्ष्य करण्यास सुरुवात केली. दि. 4 जून 1989 नंतर चीनमधील बुद्धिमंत आणि विचारवंतांची जी धरपकड सुरू झाली, त्यात फँग लिझी व त्यांच्या पत्नीच्या अटकेचेही वॉरंट निघाले. त्यावर त्यांनी व त्यांच्या पत्नीने तत्काळ अमेरिकन वकिलातीत आश्रय घेतला. अमेरिकन वकिलातीनेही त्यांच्या धोरणानुसार त्यांना आश्रय दिला. त्यामुळे या काळात चीन व अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण संबंधाचे फँग लिझी हे एक प्रतीक झाले. जाँर्ज बुश यांनी डेंग यांना पाठविलेल्या पत्रात फँग लिझी यांचा उल्लेख होता. अमेरिकेने चीनला असेही सुचवून पाहिले की, अशा परिस्थितीत फँग लिझीसारख्या अमेरिकन वकिलातीत आश्रय घेतलेल्या व्यक्तीला चीनने देशाबाहेर घालवून देणे श्रेयस्कर होईल. त्यामुळे हा प्रश्न सुटू शकणार होता.

नोव्हेंबर 1989 मध्ये किसिंजर यांनी चीनचा दौरा केला, त्या वेळी फँग लिझीचा मुद्दा हा चीनमधील वातावरण पाहून किसिंजर यांनी उपस्थित करावा, असे ठरले होते. भेटीच्या शेवटी किसिंजर यांनी फँग लिझीचा मुद्दा डेंग यांच्याकडे काढला. या खासगी बैठकीत किसिंजर यांनी डेंग यांना सुचविले की, चीनने फँग लिझीला चीनमधून हाकलून देणे व अमेरिकेने त्याला सुरक्षितपणे अमेरिकेत हलविणे, हे उत्तम. यामुळे अमेरिका व चीनमधील तणाव संपेल. डेंग यांना अमेरिकेकडून खात्री करून घ्यायची होती की, पुढे फँग लिझी अमेरिकेला जाऊन चीनची बदनामी तर करणार नाही! शेवटी डेंग याला तयार झाले. मात्र, त्यांनी अमेरिकेकडून इतरही काही बाबी कबूल करून घेतल्या. त्यात चीनविरोधात असलेल्या विज्ञान-तंत्रज्ञान साह्यविषयक विविध प्रकारच्या बंदी उठवाव्यात, अमेरिका-चीन सहकार्य दर्शविणारा एखादा प्रकल्प वा योजना घोषित करावी आणि अमेरिकेने चीनचे अध्यक्ष जियांग झेमिन यांना अमेरिकाभेटीचे आमंत्रण द्यावे, या बाबींचा समावेश होता. अशा प्रकारच्या पॅकेज डीलवर किसिंजर व डेंग यांच्यात प्राथमिक एकवाक्यता झाली. मात्र नोव्हेंबरमध्ये किसिंजर अमेरिकेत परतल्यावर यावर चर्चा सुरू असतानाच बर्लिन भिंत कोसळल्याची बातमी आली. पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या एकीकरणाची पूर्वतयारी सुरू झाली होती आणि चीन-अमेरिका संबंध व फँग लिझी प्रकरण तात्पुरते बाजूला पडले. बीजिंगमधील अमेरिकन दूतावासात फँग लिझी दांपत्य आश्रयास असणे, हा एक जिवंत बॉम्ब होता. त्यांचे काय करायचे, हे निश्चित होईपर्यंत अमेरिका-चीन संबंध तणावपूर्णच राहिले. शेवटी पॅकेज डीलमधील एक-एक बाब जून 1990 पासून पुढे आकार घेऊ लागली. जून 1990 मध्ये चीनने फँग लिझी यांना औपचारिक रीत्या चीनमधून बाहेर काढले आणि अमेरिकेने लिझी दांपत्याला अमेरिकेत नेले. अमेरिकेने चीनचे मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस परत केले. मग अमेरिका व चीन यांचज्यातील संबंध क्रमशः पूर्ववत्‌ होऊ लागले. चीनविरोधातील बहिष्कार व सॅक्शन्स मागे घेतली गेली आणि चीनने आंतरराष्ट्रीय समूहात पुन्हा पदार्पण केले. पुढे उशिरा का होईना, परंतु जियांग झेमिन यांचा अमेरिकन दौराही झाला. त्यानंतर दोन-तीन वर्षांत संबंध पूर्ववत्‌ होऊ लागले.

जेव्हा जेव्हा चीनमध्ये एखाद्या ठिकाणी राजकीय बंडाळी वा उठाव होतो, त्या-त्या वेळी चीनमधील अनेक अशांत भागांमध्ये त्याची लागण होते. तिआनमेन प्रकरणावेळी 1989 मध्ये इतरही काही भागांत राजकीय उठाव व बंडाळी सुरू झाली. विशेषतः तिबेट व झिनझियांग या प्रांतातील उठाव हे तिबेटी व मुस्लिम उघूर यांचे होते आणि त्याला बऱ्याच वर्षांची पार्श्वभूमी आहे. हे उठाव जियांग झेमिन व त्यांच्या सरकारने निष्ठूरपणे मोडून काढले. विशेषतः तिबेटमधील अटकसत्रे व निदर्शाकांप्रति दाखविलेले क्रौर्य दीर्घकाळ स्मरणात राहील असे होते. दलाई लामा यांना 1989 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले होते. त्यामुळे तिबेटमधील बंडाळी व उठाव अधिक तीव्र स्वरूपाचे होते. जगभर दलाई लामांचा सत्कार, तर चीनमध्ये अगदी तिबेटमध्येही- तिबेटींवर अत्याचार अशी परिस्थिती होती. झिनझियांगमधील मुस्लिम उघूर यांचा उठावही असाच निष्ठूरपणे मोडून काढण्यात आला.

याच काळात जगभरच्या कम्युनिस्ट राजवटींच्या पडझडीच्या बातम्या चीनमध्ये येत होत्या. तिआनमेन प्रकरणामुळे निर्माण झालेले नकारात्मक वातावरण या बातम्यांमुळे अधिकच काळजीचे होऊ लागले. विशेषत: पूर्व युरोपमधील रूमानियामधील घडामोडी व अध्यक्ष कॉकेस्क्यू (Ceausescu) यांना दिलेल्या देहांत शिक्षेचा चीनमधील पक्षनेत्यांना विशेष त्रास झाला. अमेरिकेबरोबर 1971 मध्ये संबंध सुरू होण्यापूर्वी चीनचा पाश्चिमात्य देशांशी असणारा सर्व संपर्क रूमानियामार्फत होत असे. म्हणून कम्युनिस्ट क्रांतीनंतर 1971 पर्यंत व त्यानंतरही रूमानिया व चीन यांचे संबंध फार निकटचे राहिले. विशेष म्हणजे, 1985 मध्ये रूमानियाचा ‘गोल्डन स्टार ऑफ सोशॅलिस्ट रिपब्लिक ऑफ रूमानिया’ हा सर्वोच्च नागरी किताब डेंग यांना देण्यात आला होता. चीन-रशियामधील संबंध 1989 मध्ये सुधारले व गोर्बाचेव्ह चीनभेटीसाठी आले, हेही रूमानियाने पडद्यामागून केलेल्या मदतीमुळे शक्य झाले होते! डिसेंबर 1989 पासून साम्यवादी देशांतील कम्युनिस्ट राजवटी जसजशा कोसळू लागल्या तसतशी डेंग यांनी सार्वजनिक जीवनातून माघारच घेतली.

कम्युनिस्ट राजवटींच्या पीछेहाटीच्या बातम्या वर्तमानपत्रातून देताना त्रोटकपणे, फारसे तपशील जाहीर न करता आणि त्यावर कोणतेही भाष्य न करता दिल्या जात. जणू त्याचा चीनशी काही संबंधच नाही! दि. 4 जूनला लष्कर तिआनमेन चौकात विद्यार्थी निदर्शकांवर निष्ठूर कारवाई करीत होते, तेव्हा पोलंडमध्ये सामान्य लोक नव्या लोकशाही राजवटीत सरकार निवडून देण्यासाठी मदत करीत होते. सप्टेंबर-ऑक्टोबर 1989 मध्ये पूर्व बर्लिनमधील हजारो लोक पश्चिम जर्मनीत आश्रय घेत होते, तेव्हा चीनची वर्तमानपत्रे पूर्व जर्मनीच्या सरकारचे कौतुक करीत होती, तेथील कम्युनिस्ट पक्षाचे अभिनंदन करीत होती. नोव्हेंबर 1990 मध्ये बर्लिनची भिंत कोसळून पडली व दोन्ही जर्मनीच्या एकत्रीकरणाचा विचार सुरू झाला. फेब्रुवारी 1990 मध्ये रशियन पार्लमेंटमध्ये कम्युनिस्ट पार्टीची एकाधिकारशाही कमी करून इतर पक्षांना कसे प्रतिनिधित्व देता येईल यावर चर्चा चालू होती. चीनने त्याबाबतची पूर्ण बातमीच ब्लॅक आउट केली.

जून 1989 नंतर चीनमधील अर्थव्यवस्था घसरणीला लागली होती. तत्पूर्वी 1980-89 या कालावधीमध्ये डेंग यांनी अर्थव्यवस्था खुली करण्याचे व परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचे धोरण आखले होते. त्यामुळे 1980 पासून ते 1989 पर्यंत अर्थव्यवस्था जोमाने वाढली. तरीही अतिजलद विकास व चलनवाढ यामुळे किमती वाढल्या. त्यामुळे सर्वत्र गोंधळ झाला. अर्थव्यवस्था अस्थिर झाली असल्याने काटकसर, खर्च कमी करणे व वित्तीय तूट कमी करणे, या उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे 1989 च्या सुरुवातीला अर्थव्यवस्था परत एकदा गतिमान होण्याची संधी चालून आली. मात्र तिआनमेन दुर्घटनेनंतर पाश्चिमात्य देशांनी चीनला अनेक मार्गांनी देण्यात येणाऱ्या मदतीवर- विशेषत: नवे व प्रगत तंत्रज्ञान देण्याबाबत- बंधने आणली. शिवाय परदेशी गुंतवणुकांचा ओघही कमी झाला. 1980 च्या दशकात 7 ते 10 टक्क्यांच्या आसपास राहिलेला आर्थिक विकासदर घसरून 3.9 टक्के इतका खाली आला. ग्रामीण भागातील 2 कोटी रोजगार1989-90 मध्ये कमी झाले.

कुंठित झालेली अर्थव्यवस्था गतिमान करणे आवश्यक होते. पूर्णपणे निवृत्ती स्वीकारलेले,, वृद्धत्वाने घेरलेले आणि 87 वर्षे वय असलेले डेंग झिओपेंग यांनी हे आव्हान स्वीकारले. तिआनमेन प्रकरणामुळे कोंडी झालेल्या, गोंधळलेल्या व आर्थिक सुधारणा टाळू पाहणाऱ्या सरकारला डेंग झिओपेंग यांनी दक्षिणेचा झंझावाती दौरा करून आर्थिक सुधारणांच्या मार्गावर नेले. चीनच्या आर्थिक सुधारणांचे हे दुसरे पर्व अतिशय निर्णायक ठरले.

डॉ. सतीश बागल, नाशिक

Share on Social Media

आदरांजली

एका अलक्षित सेवाव्रतीला अभिवादन !

सुरेश द्वादशीवार

बाळासाहेब सरोद्यांसारखी माणसे आपल्या शेजारी असतात, अवतीभवती असतात. त्यांच्या निगर्वी मौनामुळे ती स्वत:विषयी कधी काही सांगत नाहीत. आणि तसले काही ऐकून घेण्याची सवयही आपल्यातील अनेकांना नाही. मग त्यांचे सेवाकार्य, मूल्योपासना आणि समाजात राहूनही जपलेले निर्लेपपण असेच सार्वजनिक मौनात विरून जाते. प्रस्तुत लेखकाने त्यांना कधी उंची वा डोळ्यांत भरतील अशा कपड्यांत पाहिले नाही. माध्यमिकच नव्हे तर प्राथमिक शाळेतले साधे शिक्षक असावेत, तसे ते राहायचे आणि दिसायचे. मात्र अशाच माणसांच्या मूल्यनिष्ठा जबर असतात. कोणत्याही विषयावर आपली बाजू व म्हणणे सोडायला ती तयार नसतात. ती नम्र असतात, पण त्यांची निष्ठा ताठर असते. त्यांना ओळखणारे मग कधी त्यांच्या फारसे जवळ जात नाहीत आणि दूरच्यांना त्यांच्या सेवेशी वा निष्ठेशी काही घेणे-देणे नसते.

समाजसेवेला स्वार्थाचा स्पर्श नसला आणि ती मूल्यांच्या उपासनेसोबत होत असली, तर तिला निष्कलंकपणाची जोड व दर्जा येतो. आपण व आपला संसार सांभाळून आणि तो स्वत:च्या कष्टाने स्वयंपूर्ण करून समाजाच्या या मूल्यांच्या आराधनेमागे लागणारी माणसेच मग तो दर्जा मिळवू शकतात. समाजसेवेच्या नावाने आत्मसुख मिळविणे चांगले, पण त्याच मार्गाने स्वार्थपूजा साधणे वाईट. सध्याच्या ‘सेवाधर्मा’त अशी माणसे फार आहेत. लोकांना त्यांच्या कामाचा प्रचारकी व बाह्यांग भाग दिसतो. त्यावर ते लुब्धही असतात. त्या कामामागे जाऊन ते करणारी माणसे नेमकी कशी आहेत, याची चौकशी कुणी फारसे करीत नाहीत. आपल्या मराठी मुलुखात अशा किती सेवासंस्थांचे अलीकडे संस्थानात रूपांतर झाले आणि त्यातली संस्थानिक माणसेच समाजातील खऱ्या निष्कलंक माणसांना उपदेश करताना कशी दिसतात, याची असंख्य उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. माणसे बोलत नाहीत म्हणूनच अशा लोकांचे सेवाधर्म टिकले आहेत. अशा धर्मकार्यांना व सेवाधर्मांना, ते करणाऱ्यांच्या बँकांमधील रकमांची व त्यांनी जमविलेल्या इस्टेटीची चौकशी ना सरकार करते, ना सामाजिक कार्यकर्ते करतात. मग त्यांच्या सेवेतून स्वार्थसाधन बिनबोभाटपणे चालते आणि समाजालाही त्यांची शंका घ्यावीशी वाटत नाह. ‘आपल्यातला सेवाधर्म लोपत नाही’ असे उद्‌गार रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष रावसाहेब शिंदे यांनी त्याचमुळे काढले असावेत.

अशा दुटप्पी माणसांपासून वेगळे राहून मूल्यांची उपासना खऱ्या स्वधर्मासारखी करणारी आणि त्यासाठी स्वत:ला प्रसिद्धी व पैसा यापासून दूर ठेवणारी माणसे पाहिली की, उपरोक्त ढोंगांची चीड येते अन्‌ समाजाच्या सोशिक लबाडीचाही राग येतो. गांधीजींनी निर्माण केलेले आदर्श, विनोबांनी दाखविलेला मार्ग, साने गुरुजींनी आचरलेली सेवादृष्टी आणि समाजातील वंचितांच्या वर्गांचे प्रश्न निष्ठेने सोडविण्याचा ध्यास घेतलेली एकेकटी माणसेच मग खरी सेवाधर्मी वाटू लागतात. यवतमाळसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहून मेटिखेड्यात गरीब पोरांची एक शाळा चालविणारा, जयप्रकाशांच्या आणीबाणीविरोधी लढ्यात भाग घेऊन तिहारचा तुरुंगवास अनुभवणारा, आयुष्यभर साध्या वस्त्रात निर्लेप वृत्तीने जगणारा आणि आपल्या पश्चात घरासाठी फारसे काही न ठेवणारा बाळ सरोदे हा माणूस असा होता. त्यांचे दि. 16 जानेवारी 2020 ला निधन झाले तेव्हा असंख्य गरिबांना, दलित व वंचितांना पोरकेपणाची भावना आली. त्याचा नुसता सहवासही त्यांना प्रेरणादायी वाटत होता. ते तर सारेच घरचे माणूस गमावल्याच्या व्यथेने दु:खी झालेले दिसले. हा माणूस कधी सभा-समारंभात दिसला नाही, त्याने फारशी व्याख्याने दिली नाहीत, उपदेशाचा पाऊस पाडला नाही. सार्वजनिक कार्यक्रमातही कुठल्याही न दिसणाऱ्या जागी बसून सहभागी होणाऱ्या या माणसाचे खरे मोल त्याहीमुळे या समाजात कदाचित अलक्षित राहिले असेल.

वृत्तपत्रात बातमी नाही, त्याच्या कार्याचा वृत्तांत नाही, त्याचे छायाचित्र वा आणखी कोणती माहिती नाही. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सर्वसेवासंघातील, सर्वोदयी कार्यकर्त्यांतील व संस्थेतल्याही कोणाला ती द्यावीशी वाटली नाही. हे त्याच्या संस्कारामुळे झाले, की या लोकांच्या नाकर्त्या आळसामुळे? काही का असेना, बाळ सरोदे या जगातून मुकाट्याने गेला. एवढा की, तो गेल्याचे कुणाला फारसे कळलेही नाही. अशा किती माणसांचे ऋण आपल्या आयुष्यावर असेल आणि आपल्याला त्याची दखलही नसेल. समाजसेवा हे तसेही आपल्यातले एक उपेक्षित क्षेत्र आहे. त्यात चमकणारी माणसे नाहीत असे नाही. त्यासाठी ते करीत असलेली जाहिरातबाजीही साऱ्यांना कळते. पण त्यांच्याकडे देशातली धनवंत माणसे जातात, सरकार त्यांच्यावर पदव्यांची बरसात करते आणि कधी कधी अशा संस्थांशी आम्हीही जुळले आहोत असे सांगण्याचा अभिमान बाळगणारी उच्चभ्रू माणसे त्या संस्थांना भेटी देऊन एखादी यात्रा केल्याचे समाधान मिळवितात.

बाळासाहेब सरोद्यांसारखी माणसे आपल्या शेजारी असतात, अवतीभवती असतात. त्यांच्या निगर्वी मौनामुळे ती स्वत:विषयी कधी काही सांगत नाहीत. आणि तसले काही ऐकून घेण्याची सवयही आपल्यातील अनेकांना नाही. मग त्यांचे सेवाकार्य, मूल्योपासना आणि समाजात राहूनही जपलेले निर्लेपपण असेच सार्वजनिक मौनात विरून जाते. प्रस्तुत लेखकाने त्यांना कधी उंची वा डोळ्यांत भरतील अशा कपड्यांत पाहिले नाही. माध्यमिकच नव्हे तर प्राथमिक शाळेतले साधे शिक्षक असावेत, तसे ते राहायचे आणि दिसायचे. मात्र अशाच माणसांच्या मूल्यनिष्ठा जबर असतात. कोणत्याही विषयावर आपली बाजू व म्हणणे सोडायला ती तयार नसतात. ती नम्र असतात, पण त्यांची निष्ठा ताठर असते. त्यांना ओळखणारे मग कधी त्यांच्या फारसे जवळ जात नाहीत आणि दूरच्यांना त्यांच्या सेवेशी वा निष्ठेशी काही घेणे-देणे नसते.

समाजसेवकांचा एक आणखीही वर्ग आपल्यात आहे. त्याचीही अशा वेळी आठवण व्हावी. ही माणसे विदेशी संस्थांकडे अनुदानासाठी अर्ज करतात. असली-नसली कामे आपण करीत असल्याचे त्यात लिहितात आणि तिकडचे खुळे त्यांना पैसेही देतात. मग विदेशी पैशांवर यांची स्वदेशी सेवा ऐषारामात येथे चालत राहते. सरोद्यांसारखी सेवाभावी माणसे पाहिली की, या माणसांविषयीचा केवळ रागच मनात येत नाही, तिरस्कारही येतो.

यवतमाळ हा शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्यांचा जिल्हा आहे. ज्या कुटुंबातील कर्त्या माणसाने आत्मत्या केली, त्या कुटुंबाशी संपर्क साधणे, त्याला शासकीय व अन्य मदत मिळवून देणे आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्या संकटाच्या काळात त्यांच्या मागे धीराने उभे राहणे, हे काम त्यांनी कमालीच्या काळजीनिशी केले. शाळेतील गरीब मुलांना आर्थिक व अन्य मदत करण्यापासून वेश्यावस्तीत वाढलेल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही त्यांनी हाताळला. परिणामी, उच्चभ्रू वर्गात त्यांना स्नेही कमी मिळाले असले तरी समाजाच्या अखेरच्या पातळीवरील वर्गात त्यांना मिळालेली मान्यता मोठी होती. समाजात स्वत:ला हरवून टाकणे आणि ‘स्व’ बाजूला सारून त्याच्या खऱ्या गरजा भागवण्यासाठी परिश्रम करणे, हा त्यांच्या सेवाधर्माचा भाग होता. अलीकडच्या काळात सर्वसेवा संघ वा सर्वोदय यातील कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या लोक-संघर्षापासून फारकत घेतली. पुढे-पुढे तर त्यांच्यातील अनेकांना सेवाधर्माचाही विसर पडलेला दिसला. आपल्या संस्था-संघटनांचा हा नाकर्तेपणा बाळासाहेबांना अर्थातच आवडणारा नव्हता. परंतु तो बोलून दाखविणे व संबंधितांना दुखवून त्यांची चाललेली कामेही थांबविणे, हे त्यांच्या सुसंस्कृत मनाला जमणारे नव्हते. परिणामी, त्यांनी या संघटनांना आलेली मरगळ व्यथेसहित अनुभवली व पचविली.

प्रस्तुत लेखकाच्या आईची एक दरिद्री मावशी 1950 च्या दशकात दाईचे काम करायची. ते कामही भामरागडजवळच्या कसनसूर या माडिया आदिवासींच्या गावात. माडिया स्त्रीच्या बाळंतपणाची सूचना आली की, ती जंगलातून पायी निघायची. रात्र असेल तर आणखी एखादी स्त्री हाती जळते लाकूड घेऊन तिच्यासोबत जायची. अशी शेकडो बाळंतपणे जिवावर उदार होऊन तिने केली. पण तिला कोणी पद्मश्री दिली नाही वा राज्यस्तरीय सन्मानही दिला नाही. कारण तिच्यामागे कोणी नव्हते आणि सरकारी दाई होती. आपल्याकडे सरकारी नोकरांची सेवा दोनच वेळी गौरविली जाते. ती नक्षल्यांच्या गोळ्यांना बळी पडली तर किंवा सीमेवर लढताना त्यांना मरण आले तर. समाजाच्या सेवेसाठी आयुष्य झिजवून मृत्यू पत्करणाऱ्यांना कोण विचारतो? घरातली माणसेही मग ‘ती फुकट मेली’ असे म्हणून थांबतात.

वास्तव हे की, या एवढा सामाजिक कृतघ्नपणा दुसरा कोणता नाही आणि तो कृतघ्नपणा आहे याची कोणाच्या लेखी दखलही नाही. अशी माणसे तशीच दुर्लक्षित राहिली आणि गेली. बाळासाहेबांचे नशीब थोर म्हणून त्यांचे चिरंजीव ॲड. असीम सरोदे, मुलगी ॲड. स्मिता आणि तिचे यजमान संदेश सोबत होते. सौ.सरोदेही जवळ होत्या. शेजारची माणसे होती. त्यांनी यवतमाळात व मेटिखेड्यात काढलेल्या शाळांचे शिक्षक व कर्मचारी होते. सर्वोदयी या थोर नावाची माणसे काही आली नाहीत. ज्या सेवाग्रामात त्यांनी एवढे दिवस घालविले, तिथलेही कोणी आले नाही. तुरुंगातले सहकारी नाहीत, गांधी वा विनोबांच्या विचाराचेही कुणी नाही. काही माणसे विष पितच जगतात आणि ते पचवूनच शांत होतात.

‘नाही चिरा, नाही पणती’ हे शोकगीत बोरकरांनी अशाच माणसांसाठी लिहिले असेल. (त्या गीतातली करुणा किती जणांना अस्वस्थ करीत असेल आणि किती जणांना तिची चालच तेवढी भावत असेल?) आपण बहुधा सारेच संवेदनशून्य असतो. प्रस्तुत लेखकाचा संबंध आनंदवनाशीही राहिला. माणसे मोठ्या संख्येने येत. प्रतिभावंत, लेखक, गायक, कवी, वक्ते असे सारे. मात्र ते सारे जण बाबांना आणि तार्इंना भेटून परत जात. त्यातल्या कोणालाच तिथल्या कुष्ठरोग्याशी ओळख करून घ्यावी, असे वाटले नाही. ‘पैसे दिले की आपली सामाजिक जबाबदारी संपते’ हीच साऱ्यांची वृत्ती. हे दु:ख सांगता येत नाही आणि जो सांगेल तो साऱ्यांच्या टीकेचाच विषय होईल.

त्यामुळे गप्प राहायचे, बाळासाहेब सरोद्यांचे स्मरण करायचे. त्यांना मनोमन श्रद्धांजली वाहायची आणि चालू लागायचे. त्यांना तरी याहून जास्तीचे आणखी काय हवे होते?

सुरेश द्वादशीवार, चंद्रपूर

Share on Social Media