Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

लोग साथ आते गए और करवाँँ बनता गया !

‘कहाणी माहिती अधिकाराची’ या पुस्तकात 1987 ते 2005 असा अठरा वर्षांचा प्रवास नोंदवला आहे. प्रवासाचा पहिला टप्पा आश्चर्य व उत्साह यांनी भारलेल्या अवस्थेत 2005 मध्ये संपला. मजदूर किसान शक्ती संघटनेची ऊर्जा, चिकाटी, आनंद, निग्रह व आत्मविेशास यांमध्ये मात्र काही घट झालेली नाही. दर वर्षी सुमारे साठ ते ऐंशी लाख लोक माहिती अधिकार कायदा वापरत असल्याचा अंदाज आहे, त्या सर्वांमध्ये ही मूल्यं उतरलेली आहेत. कायद्याची वाट मोकळी करण्यासाठी मजदूर किसान शक्ती संघटनेने एनसीपीआरआयच्या साथीने संघर्ष केला, मसुदे तयार केले, विचारप्रक्रियेला चालना दिली, नियोजन केलं, चर्चा घडवली आणि गाणीही गायली. माहितीचा अधिकार हे केवळ भ्रष्टाचाराशी लढण्यासाठीचं अस्त्र नाही, तर त्याहून बरंच काही त्यातून साधलं जाईल, असं प्रतिपादन संघटनेने सातत्याने केलं. सत्तेच्या मनमानी वापराविरोधातील हा एक मूलभूत व परिवर्तनक्षम अधिकार आहे, हे हळूहळू स्पष्ट झालंच. इतक्या वर्षांच्या संघर्षामधून, आंदोलनामधून ऊर्जेचा मोठा प्रवाह वाहत होता आणि हजारो लोकांनी या प्रवाहामध्ये योगदान दिलं. आम्ही कुठेही गेलो की, लोक आमच्याशी येऊन संवाद साधतात आणि माहिती अधिकार कायद्याने त्यांना कसं बळ मिळालं याची कहाणी सांगतात. जाणून घेण्याचा अधिकार जगण्यासाठी इतका मूलभूत आहे!

प्रभाष जोशी यांनी जनसत्तामधील एका अग्रलेखात (1996) लिहिल्यानुसार, ‘माहितीचा अधिकार हा जगण्याचा अधिकार आहे.’ शासनव्यवहारापलीकडे जाणारी ही गोष्ट आहे. माहितीच्या अधिकाराचा तर्कविस्तार लोकशाही अधिकारांमध्ये होतो, त्यातून शांतता प्रस्थापित व्हायला मदत होते आणि राष्ट्रीय सीमांपल्याड जाणारे अनेक मुद्दे या प्रवासामध्ये हाताळले जातात. आणखी पुढे गेल्यावर अस्तित्वशोधाशीही हे तत्त्व जोडलं जातं. प्रवासाचा पहिला टप्पा संपत असतानाच पुढील प्रवासाचा आरंभ झाला. यातून काही नवे प्रश्न व आव्हानं उभी राहिली. पुन्हा एकदा नकारात्मकतेवर मात करण्यासाठी दीर्घ लढा द्यावा लागणार होता. कायदानिर्मितीदरम्यान शक्य न झालेल्या कुरापती अंमलबजावणीच्या वेळी करण्याचा प्रयत्न छुप्या हितसंबंधी अभिजनांनी सुरू केला. भारतीय उपखंडामध्ये ‘प्रश्न विचारण्याचा अधिकार’ पवित्र स्थानी मानला जायला हवा. विषमतेपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित करून बुध्दीप्रामाण्याला चालना देणाऱ्या बुध्दासारख्या विचारकाची ही भूमी आहे. पण इथेही प्रभुत्वसत्ता व नियंत्रणाची आकांक्षा वरचढ ठरली. सातत्याने आव्हान मिळालं नाही तर सर्वच संस्था सत्ताकेंद्रीकरणाला बळी पडतात. लोकशाही संस्था याला अपवाद नाहीत. ‘सत्ता भ्रष्टाचाराला वाव देते आणि सर्वंकष सत्ता सर्वंकष भ्रष्टाचाराला वाव देते’ ही म्हण पिढ्यान्‌पिढ्यांच्या लोकज्ञानातून निपजली आहे. माहितीवरील नियंत्रण व ज्ञानावरील प्रभुत्वसत्ता (हेजिमनी) ही अशाच सर्वंकष सत्तेची उदाहरणं आहेत. जुलूमशहा, हुकूमशहा आणि विषमतेवर व सत्ताकेंद्रीकरणावर विेशास ठेवणाऱ्यांच्या दृष्टीने प्रश्न विचारण्याचा अधिकार म्हणजे ‘अब्रह्मण्यम्‌’!

आपल्या देशाला ही परिस्थिती चांगलीच माहीत आहे. समता, सहभाव व स्वातंत्र्य ही लोकशाहीची अंगभूत तत्त्वं आहेत आणि ती सांप्रदायिक हितसंबंधांसाठी संकुचित केली जाऊ नयेत, याची तजवीज सातत्याने करावी लागते. इतर सर्व संस्थांप्रमाणे लोकशाहीलासुध्दे कार्यक्षमतेने व न्यायाने कामकाज चालवण्यासाठी कायमस्वरूपी दक्षतेची गरज असते. माहितीचा अधिकार हे या प्रक्रियेतील ताकदीचं साधन ठरू शकतं. प्रश्न विचारण्याच्या अधिकारामध्ये सत्तेची सामाइक वाटणीही अंतर्भूत आहे. न्यायाची वैश्विक तत्त्वं आणि भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली सार्वजनिक नीतिमत्तेची तत्त्वं पाळून सत्तेच्या सामाइक वाटणीची ही प्रक्रिया आहे. शासनव्यवहारासंबंधीचे प्रश्न ऐकून घ्यायचं मान्य केलं की, त्यांची उत्तरं द्यावी लागतात. त्यामुळेच अशा प्रश्नांकडे लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया! शासनव्यवस्था भयग्रस्ततेने पाहते. तर्कशुध्द व तत्त्वनिष्ठ उत्तरं मिळण्यासाठी ही सगळी प्रक्रिया बुध्दिप्रामाण्यवादी असावी लागेल. राज्यसंस्थेने दिलेल्या कायदेशीर हमींची अंमलबजावणी सत्यान्वेषी असेल, तरच हे सगळं शक्य होतं. जगभरातील सर्व संस्कृतींमध्ये प्रश्न विचारण्यामागचा तर्कविचार स्वीकारलेला आहे. अशा वेळी प्रश्न विचारण्याच्या कृतीला वैधता मिळवून देण्यासाठी युक्तिवाद करावे लागणं दुर्दैवी आहे. रोमिला थापर यांनी 2014 मध्ये दिलेल्या निखिल चक्रवर्ती स्मृतिव्याख्यानाचं शीर्षक ‘टू क्वेश्चन ऑर नॉट टू क्वेश्चन? दॅ ट इज द क्वेश्चन’ असं होतं. अनुत्तरदायी सत्तेच्या वाढत्या प्रभुत्वसत्तेचं स्वरूप बंधनं घालणारं आहे, हा मुद्दा त्यांनी व्याख्यानात नमूद केला. या पोर्शभूमीवर माहितीचा अधिकार वापरणं प्रश्न विचारण्याला बळ पुरवणारं ठरतं. या पुस्तकाचा शेवट लाल सिंग यांच्या शब्दांनी होणं आवश्यक आहे. सोहनगढपासून देवडुंगरीपर्यंत व नंतरही ते चळवळीसोबत कायम होते आणि जमिनीवरील वास्तवाशी त्यांचं नातं कायम दृढ राहिलं. अरुणा, शंकर व निखिल यांना मजदूर किसान शक्ती संघटनेचे प्रतिनिधी म्हणून 2000 च्या सुरुवातीला एचसीएम लोकप्रशासन संस्थेमध्ये निमंत्रित करण्यात आलं होतं.

भ्रष्टाचार व माहितीचा अधिकार यासंबंधी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा हा कार्यक्रम होता. नेहमीप्रमाणे संघटनेचे इतरही कार्यकर्ते या वेळी सोबत आले. यांमध्ये लाल सिंग व नारायणही होतेच. निमंत्रितांपैकी ‘अधिक महत्त्वाच्या’ व्यक्तींना प्रत्येकी दहा मिनिटं बोलायला देण्यात आलं, तर लाल सिंग व नारायण यांनी तीनच मिनिटांमध्ये बोलणं आटोपण्याची सूचना आयोजकांनी केली. थोड्याच मिनिटांमध्ये जेवणाची वेळ होणार असल्यामुळे आयोजक अधीर झाले होते. या वेळी लाल सिंग म्हणाले : ‘मुझे तीन मिनट नहीं चाहिये. मै अपनी बात एक मिनट में रख दूँगा... हम सोचते है की, सूचना का अधिकार हमे नहीं मिले तो क्या हम जियेंगे या नहीं जियेंगे... आप सोचते हैं की, सूचना का अधिकार मिल जाये तो आप की कुर्सी रहेगी या नहीं रहेगी... मगर दोस्तों, हम सबको मिलकर सोचना चाहिये की क्या ये देश रहेगा या नहीं रहेगा?’ सत्तेच्या सामाइक वाटणीचा अवकाश कायमच वादग्रस्त राहिलेला आहे. भ्रष्टाचार व सत्तेच्या मनमानी वापराबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुमारे साठ माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी जीव गमावला आहे. दस्तावेज व पुरावे यांच्या आधारे त्यांनी उघडकीस आणलेलं सत्य दडपण्यासाठी या कार्यकर्त्यांची हत्या झाली. हे लढे अजूनही सुरू आहेत. या सगळ्या वातावरणात आता माहितीच्या अधिकाराची हमी नागरिकांना मिळालेली आहे. जागतिक माहिती अधिकार क्रमवारीमध्ये भारतीय कायद्याला तिसरं स्थान देण्यात आलं होतं. काही देशांनी नुकतेच माहिती अधिकार कायदे केले, तेव्हा त्यांना इतर देशांमध्ये आधीच झालेल्या कायद्यांचा अभ्यास करून अधिक चांगला कायदा करणं शक्य झालं; परिणामी, भारताचं जागतिक क्रमवारीतील स्थान चौथ्या क्रमांकावर आलं. परंतु, माहितीच्या अधिकारासाठी भारताने अनुभवलेली सामूहिक लोकचळवळ मात्र अतुलनीय आहे. सत्तारचना कितीही प्रतिकार करत असल्या तरी, शासनव्यवहारामध्ये आता पारदर्शकता व उत्तरदायित्व पाळणं अत्यावश्यक झालेलं आहे. त्याचप्रमाणे भारताने ‘जागले अधिनियम’, ‘तक्रार निवारण’ व ‘उत्तरदायित्व’ असेही कायदे करून पुढील पावलं टाकली आहेत.

समता व अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांची हमी राज्यघटनेने दिली असली, तरी ही तत्त्वं वारंवार पायदळी तुडवली जातात; त्यातून कायद्याच्या राज्याला व मूलभूत लोकशाही अधिकारांना धोका निर्माण होतो. सत्याचा शोध चिकाटीने घेत राहिलं, तर प्रश्न विचारण्याची प्रक्रियाही टिकून राहील. सत्याचे सूर कुठे ना कुठे उमटतच राहतील आणि त्यांना प्रतिसादही मिळत राहील. माहितीचा अधिकार वापरल्याने यातील काही सुरांना अधिक बळकटी प्राप्त होईल. भारतातील सर्व लोकचळवळी माहितीचा अधिकार वापरतात. सर्वांनी अधिकाधिक पारदर्शकतेचीच मागणी केलेली आहे. सर्व बुध्दिमान सर्वसामान्य भारतीयांनी शासनव्यवहारातील फसवेगिरी उघडकीस आणण्याचा निर्धार केल्यावर माहिती अधिकाराचं शस्त्र प्रत्यक्षात आलं. सत्यमेव जयते!

अरुणा रॉय (अनुवाद : अवधूत डोंगरे)

(गेल्या आठवड्यात प्रसिध्द झालेल्या ‘कहाणी माहिती अधिकाराची’ या पुस्तकातील हे समारोपाचे प्रकरण जाणीवपूर्वक संपादकीय जागेवर प्रसिध्द करीत आहोत.- संपादक)

Share on Social Media

न्यायदेवतेच्या (न लिहिलेल्या) डायरीतून

मुहाजिर है... मगर हम एक दुनिया छोड आए है। (पूर्वार्ध)

प्रतापसिंह साळुंके

निवडणुकीत अगोदर सत्तेत असलेल्या व्यक्ती, पक्ष यांचा पराभव होऊन वेगळ्या व्यक्ती वा पक्ष सत्तेत येऊ शकतो; म्हणजेच त्या क्षमतेचे कायमचे हस्तांतर होत नसते, तर तात्पुरते होत असते. त्यामुळे ती क्षमता योग्य रीतीने वापरली नसेल तर लोक त्याविरोधात उभे राहणे हे कायद्याच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अयोग्य ठरत नाही. कारण अंतिम सत्ता ही लोकांचीच असते. एक प्रशासकीय सोय म्हणून कायदे बनविण्याची क्षमता वा अधिकार हा कायदे मंडळाकडे वा संसदेकडे दिलेला असतो. अर्थात प्रत्येक वेळी अशा प्रकारे तो कायदा पसंत आहे की नाही हे थेट लोकांना विचारणे प्रशासकीय दृष्ट्या अडचणीचे असले, तरी काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये लोकांना तो कायदा पसंत नसेल, तर त्याविरोधात आपले मतप्रदर्शन करण्याचा लोकांचा अधिकार अबाधित असतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

दि. 12 डिसेंबर 2019 रोजी नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 च्या राजपत्रात प्रसिध्द झाला आणि भारतीय लोकशाहीचा प्रवास धर्मनिरपेक्षतेकडून बहुसंख्याकवादी व्यवस्थेकडे होतोय की काय, या प्रश्नाने अनेकांना अस्वस्थ केले. याची सुरुवात 2014 मध्ये म्हणजे, भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आल्यापासून झाली, असा काहींचा (गैर)समज असल्यास तो दूर करणे गरजेचे ठरते. याची सुरुवात अगदी भारतीय संविधान ज्या वेळी लिहिले जात होते, त्या वेळेपासून झाली. संविधानसभेत अल्पसंख्याकाचे मूलभूत अधिकार काय असावेत याची चर्चा सुरू झाल्यावर कट्टर हिंदुत्ववादी विचार मानणाऱ्या सदस्यांचे मत काय होते, हे पाहणे गरजेचे ठरते. त्यांच्या मांडणीतील मुख्य सूर असा होता की- संख्येने हिंदू बहुसंख्याक असल्याने भारताच्या राजकीय, प्रशासनिक, सामाजिक, आर्थिक बाबींमध्ये हिंदूंना प्राधान्य मिळाले पाहिजे आणि इतर धर्मीयांनी हिंदूंनी त्यांना दिलेल्या(?) परिघात गुण्यागोविंदाने नांदले पाहिजे. अशी अपेक्षा(?) काही वेळा आडवळणाने, तर कधी स्पष्टपणे व्यक्त केली जात होती.

थोडे स्पष्टच सांगायचे तर- अल्पसंख्याकांनी- म्हणजे खरे तर मुस्लिमांनी- या देशात दुय्यम नागरिक बनून राहिले पाहिजे, कारण ते भारतात अल्पसंख्याक आहेत. याचाच एक भाग म्हणून हे सदस्य अशी मांडणी करत होते की, भारतीय अल्पसंख्याकांचे मूलभूत अधिकार आपण तोपर्यंत ठरवायला नकोत जोपर्यंत आपल्या शेजारील राष्ट्राची- म्हणजे पाकिस्तानची राज्यघटना लिहून पूर्ण होत नाही. विशेषतः त्यातील अल्पसंख्याकांचे मूलभूत अधिकार काय आहेत, हे पाहून ‘जशास तसे’ या न्यायाने आपणही वागून ‘तेवढेच’ अधिकार भारतातील अल्पसंख्याकांना दिले पाहिजेत, अशी मुत्सद्दी(?) मागणी संविधानसभेत झाली होती. आपण पाकिस्तानचे संविधान लिहून पूर्ण होण्याच्या घटनेची वाट पाहत थांबलो नाही ते बरे झाले, कारण सर्वमान्य (खरे तर जास्तीत जास्त लोकांना मान्य असणारे असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल, कारण त्यानंतरही पाकिस्तानात संविधानाच्या स्वीकारार्हतेवरून वादंग उठतच राहिले) असे संविधान लिहायला पाकिस्तानात वर्ष 1973 उजाडावे लागले.

पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर मग पाकिस्तानच्या संविधान लिहिण्याच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप मिळाले. आपण सर्व भारतीय भाग्यवान होतो की, असा आततायी, टोकाचा विचार मांडणारे आणि त्यावर विेशास ठेवणारे सदस्य त्या वेळच्या संविधानसभेत अल्पमतात होते. पण असे म्हणतात की, ‘एके काळचा अल्पमतातील विचार कालांतराने बहुमताचा भाग बनू शकतो.’ याचा प्रत्यय आणि आठवण येण्याचे कारण म्हणजे, संसदेच्या दोनही सभागृहांनी आणि राष्ट्रपतींनी ज्या कायद्याला नुकतीच मंजुरी दिली तो कायदा म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा 2019. ज्या एका धर्माला आपल्या कार्यकक्षेतून काही कारणांमुळे (खरे तर ठरवून, हटकून, हेतुपुरस्पर, बेमालूमपणे असे मला म्हणायचे आहे, पण कायद्याच्या चौकटीत असे गृहीत धरलेले असते की, संसदेने बनविलेला- काय गंमत आहे पाहा, फसविणे यालाही मराठीत प्रतिशब्द ‘बनविणे’ असाच आहे! कायदा जोपर्यंत एखादे सक्षम न्यायालय असांविधानिक ठरावीत नाही तोपर्यंत तो कायदा सांविधानिक आहे असेच समजले जाते.) वगळले आहे, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यावर स्थगिती (अंतरिम निर्णय) द्यायला नकार दिला आणि केंद्र सरकारने याबाबाबत आपले म्हणणे प्रतिज्ञापत्र दाखल करून मांडण्याचे आदेश दिले आहेत.

संसदेने बनविलेला कायदा हा लोकांचा आवाज असतो, असे म्हटले जाते. कारण या सभागृहात निवडून आलेले लोक हे लोकांमधून निवडून आलेले असतात. त्यामुळे लोकांचे हित कशात सामावले आहे, हे त्यांना ठाऊक असते, असे गृहीत धरलेले असते. जे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत शक्य झाले नव्हते, ते सत्तर वर्षांनी शक्य झाले. जो विचार कट्टरतावादी, अल्प लोकांचा वा अतिशय लहान गटाचा विचार म्हटला जायचा, तो आता बहुमताचा आधार असलेला विचार बनतो; मूळ प्रवाहाचा विचार बनतो, याला एका वेगळ्या अर्थाने काव्यात्मक न्याय म्हणायचे का? भारतीय नागरिकत्व कायदा 1955 हा खरे तर काही पहिल्यांदाच दुरुस्त होत नाही. 2019 ची दुरुस्ती पकडून हा कायदा एकूण सहा वेळा दुरुस्त झाला आहे. हा कायदा 1955 मध्ये बनल्यानंतर 1986, 1992, 2003, 2005, 2015 व आता 2019 मध्ये हा कायदा दुरुस्त केला आहे. 2016 ते जानेवारी 2019 या कालावधीत या कायद्यातील प्रस्तावित बदलांचे मसुदे वेळोवेळी बदलले गेले. पण काही महिन्यांतच पुढे लोकसभा विसर्जित झाल्यामुळे व राज्यसभेत पुरेसे बहुमत नसल्यामुळे या कायद्यातील प्रस्तावित दुरुस्ती पुढे ढकलली गेली. एवढ्या वेळेला फारसा गाजावाजा न होता दुरुस्त होणारा कायदा या वेळी दुरुस्त होताना इतका गहजब होण्याचे कारण काय याचा विचार करता, त्याची बीजे सापडतात ती त्याच्या तार्किक दृष्ट्या अतार्किक अशा तरतुदींमध्ये. धर्माच्या आधारावर केल्या जाणाऱ्या भेदभावामध्ये, राजकीय सोईनुसार बदललेल्या व्याख्येमध्ये, पूर्वग्रहदूषित दृष्टीने केलेल्या कृत्रिम-चुकीच्या वर्गीकरणामध्ये. 2019 ची दुरुस्ती समजून घेण्यापूर्वी 1955 चा हा कायदा काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. ब्रिटिशकालीन भारत हा इंग्रजांची वसाहत म्हणून अस्तित्व संपुष्टात येऊन जेव्हा एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपली वाटचाल सुरू करत होता, त्याच वेळी फाळणीची भळभळती जीवघेणी जखम आपल्याला सहन करावी लागली. या फाळणीचे पितृत्व कुणाचे, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले गेले. काही उच्चरवात, तर काही कुजबुजत्या स्वरूपात या घटनेचे अन्वयार्थ लावत राहिले!

असे म्हटले जाते की, विजयाचे श्रेय घ्यायला अनेक जण पुढे येतात, पण पराभवाचे अपश्रेय घ्यायला कुणीच तयार नसते. त्यामुळे पराभव अनाथ असतो, त्याचे पितृत्व घ्यायची कुणाचीच तयारी नसते. त्याच धर्तीवर या फाळणीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरण्याची अहमहमिका त्यांचे राजकीय विरोधक, इतिहासाचे अभ्यासक, भाष्यकार यांच्यामध्ये लागलेली पाहायला मिळते. खरे तर एखाद्या घटनेचे वेगवेगळे पदर, प्रवास, अंतःप्रवाह, वाद-प्रतिवाद समजून घ्यायची सामान्य माणसाची क्षमता अतिशय सखोल असूही शकते; पण अभ्यासकांना, राजकीय पंडितांना उगाचच असे वाटते की, त्याच्याठायी ही क्षमता नाही. मग सुरुवात होते ती घटनेच्या अतिसुलभीकरणाची. एखाद्या घटनेची व्यामिश्रता उकलून सांगण्यापेक्षा आपल्याला सोईची असणारी भूमिका- मग तिला सत्य, तथ्य, इतिहास, विश्लेषण अशा वेगवेगळ्या वेष्टनांमध्ये गुंडाळून- सर्वसामान्यांच्या माथी मारली जाते. फाळणी धार्मिक आधारावर झाली, हे असेच एक व्यमिश्र घटनेचे अतिसुलभीकरणाचे एक लोकप्रिय रूप. खरे तर पाकिस्तानची निर्मिती धार्मिक आधारावर होऊनही अनेक मुस्लिमांनी पाकिस्तानात न जाता भारतात राहणे पसंत केले.

पाकिस्तानातील मुस्लिमांच्या संख्येपेक्षा भारतात राहणाऱ्या मुस्लिमांची संख्या अधिक असावी यातच सगळे आले, असे मला वाटते. जे काही मुस्लिम पाकिस्तानात बॅरिस्टर मुहंमद अली जीना यांच्या ओशासनांवर विेशास ठेवून गेले होते, त्यांच्यापैकी अनेकांचा भ्रमनिरास झाल्यामुळे ते परत भारतात आले होते. अनेक हिंदूंची शेतीवाडी, व्यवसाय, स्नेह यामुळे त्यांचा जो भूभाग पाकिस्तानात गेला, त्यासोबत पाकिस्तानात जाणे पसंद केले. त्यामुळे फाळणी धार्मिक आधारावर झाली आणि पाकिस्तानात फक्त मुस्लिम व भारतात फक्त हिंदू राहिले, अशी मांडणी करणे अत्यंत बाळबोध आणि सत्याचा अपलाप करणारे आहे. त्याचमुळे नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 धार्मिक निकषांवर आधारित बनविण्याचे समर्थन करणे ही याच अतिसुलभीकरणाची पुढची कडी ठरते. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 हा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केल्यापासून माध्यमांमध्ये त्याविषयीचा मजकूर ओसंडून वाहतो आहे. या कायद्याच्या विरोधात आणि समर्थनार्थ भरभरून लिहिले जात आहे. यामध्ये वैचारिक गंभीर विश्लेषणापेक्षा पक्षीय भूमिका आणि अहमहमिका यांचीच सरशी होताना दिसली.

खरे तर सर्वसामान्य नागरिक आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत काहीसा अनभिज्ञ असतो. भारताचे इतर देशांशी संबंध कसे आहेत, ते कसे असावेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत नेमके काय बोलले जातेय- याविषयी सर्वसामान्य लोक सहसा उदासीन असतात वा फारसे सक्रियपणे या चर्चेत पडत नाहीत. पण नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 मात्र या गृहीतकाला अपवाद ठरला आहे. या विषयाबाबत लोकांमध्ये एक प्रकारची सजगता आलेली पाहायला मिळते. केंद्र सरकारने आणि सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या ‘बोलक्या प्रवक्त्यांनी’ कितीही गोड शब्दांत हा कायदा कुणाचेही नागरिकत्व काढून घेण्यासाठी बनविलेला नाही, असे उच्चरवाने सांगतले असले तरी, लोक काही ते मानायला तयार नाहीत. मुख्य प्रवाहातील माध्यमांमधून या कायद्याच्या समर्थनार्थ जे सांगितले जातेय आणि प्रत्यक्षात जे चित्र आहे, ते लोक स्वतः पडताळून पाहत आहेत. या कायद्याच्या विरोधात भूमिका घेतलेल्या राजकीय पक्षांपेक्षा सर्वसामान्य नागरिकांचा जोर अधिक असल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले, तरी ते अपवादानेच घडले. देशभरात लोक या कायद्याविरोधात शांतपणे निदर्शने करताना दिसले. हा कायदा ही केवळ एक सुरुवात असेल. भारतातील सर्वधर्मीय शांततामय सहजीवनासमोर या कायद्याने गंभीर प्रश्न उभे केल्याची भावना लोकांमध्ये पाहायला मिळाली. सहसा तरुण पिढी सामाजिक आंदोलनापासून फटकून राहते, असा अनुभव असताना, कुठल्याही पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता नसलेला तरुण या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला.

या कायद्याच्या विरोधातील आंदोलनाच्या निमित्ताने तरुणांमधील, सर्वसामान्यांमधील ही सजगता पाहायला मिळणे ओशासक आहे. खरे तर माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे मानले जाते. पण लोकशाहीचा पाचवा स्तंभही असतो, तो म्हणजे सजग नागरिक. आपले हक्क आणि कर्तव्ये यांबाबत सजग असलेला नागरिक सहभागात्मक लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असतो. तो सजग आणि सक्रिय असल्याचे पाहायला मिळणे, हे लोकशाही जिवंत असल्याचे निदर्शक आहे. कायदा करण्याची क्षमता हा त्यासाठीचा अंतिम निकष असू शकत नाही; तर त्या कायद्याचे न्यायपूर्ण असणेही तो करण्याच्या क्षमतेइतकेच- किंबहुना, थोडे अधिक महत्त्वाचे असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले. कायदा करण्याची क्षमता महत्त्वाची की, कायद्याचे न्यायपूर्ण असणे- हे त्या कायद्याची वैधता तपासताना महत्त्वाचे ठरते. यावर कायद्याच्या तत्त्वज्ञांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे पाहायला मिळते. अगोदरचा मतप्रवाह हा राजकीय तत्त्वज्ञ थॉमस हॉब्जने प्रभावित केलेला होता. एकदा लोकांनी आपली कायदे बनविण्याची क्षमता लोकप्रतिनिधींकडे हस्तांतरित केल्यावर लोकांकडे कसलाही अधिकार उरत नाही- मग भले तो कायदा अन्यायकारक, दुजाभाव करणारा, मनमानी करण्यास मुभा देणारा, अतिशय चुकीचा असला तरी त्याबाबत लोक काही करू शकत नाहीत. याचे कारण त्यांनी कायदा बनविण्याची क्षमता लोकप्रतिनिधींकडे हस्तांतरित केल्यानंतर त्या कायद्याला आहे तसे स्वीकारण्यावाचून लोकांकडे काही गत्यंतर नसते. साधारण अशी मांडणी या मतप्रणालीत व्यक्त केली होती.

या मतप्रवाहाला न्यायविषयक तत्त्वज्ञानाचा आधार असण्यापेक्षा, एकदा सक्षम सभागृहाने कायदा बनविल्यानंतर तो सर्वांनी पाळण्यामध्येच व्यवहार्यता असल्याने, ‘व्यावहारिक सोय’ हा आधार असल्याचे पाहायला मिळते. पण या मतप्रणालीचा प्रतिवाद करणारी मतप्रणाली अधिक प्रभावी बनत गेली, ती म्हणजे जॉन लॉकची मतप्रणाली. लोकांनी कायदे बनविण्याची क्षमता हस्तांतरित केली, याचा अर्थ- ज्याच्याकडे क्षमता हस्तांतरित केली आहे त्याच्यापेक्षा जो हस्तांतरित करतो तो अधिक प्रभावशाली ठरतो. जर हस्तांतरित केलेली क्षमता योग्य रीतीने वापरली नसेल, तर जो हस्तांतरित करतो त्याच्याकडे ती क्षमता परत घेण्याचा अधिकार असतोच. त्यामुळेच सार्वत्रिक निवडणुकीत लोक मतदान करून कायदे बनविण्याची क्षमता कुणाकडे हस्तांतरित करायची याचा निर्णय ठरावीक अंतराने घेत असतात. निवडणुकीत अगोदर सत्तेत असलेल्या व्यक्ती, पक्ष यांचा पराभव होऊन वेगळ्या व्यक्ती वा पक्ष सत्तेत येऊ शकतो; म्हणजेच त्या क्षमतेचे कायमचे हस्तांतर होत नसते, तर तात्पुरते होत असते. त्यामुळे ती क्षमता योग्य रीतीने वापरली नसेल तर लोक त्याविरोधात उभे राहणे हे कायद्याच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अयोग्य ठरत नाही. कारण अंतिम सत्ता ही लोकांचीच असते. एक प्रशासकीय सोय म्हणून कायदे बनविण्याची क्षमता वा अधिकार हा कायदे मंडळाकडे वा संसदेकडे दिलेला असतो. अर्थात प्रत्येक वेळी अशा प्रकारे तो कायदा पसंत आहे की नाही हे थेट लोकांना विचारणे प्रशासकीय दृष्ट्या अडचणीचे असले, तरी काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये लोकांना तो कायदा पसंत नसेल, तर त्याविरोधात आपले मतप्रदर्शन करण्याचा लोकांचा अधिकार अबाधित असतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 संमत होत असताना संसदेच्या दोन्ही सभागृहांत काही सदस्यांनी या दुरुस्तीवर तीव्र आक्षेप घेतले होते. त्यामुळे संख्याशात्राच्या क्लृप्त्या वापरून जरी ते विधेयक संमत झाले असले, तरी त्याचा पुढील प्रवास सोपा असणार नाही, याची जाणीव केंद्र सरकारला असल्यामुळेच मुख्य प्रवाहातील प्रसार- माध्यमांमध्ये या कायद्याच्या समर्थनार्थ भूमिका मांडली गेली. त्यापैकी दोन प्रातिनिधिक लेखांचा प्रामुख्याने विचार करू शकतो. पहिला लेख आहे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी दैनिक लोकसत्तामध्ये लिहिलेला ‘दोन सहस्रकांच्या परंपंरेचे पालन’ (दि. 17 डिसेंबर). या लेखात त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. पहिला मुद्दा आहे- नागरिकत्व सुधारणा कायदा 2019. हा नागरिकत्व देण्यासाठी आहे, कुणाचे नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही. दुसरा मुद्दा आहे- इमिग्रंट्‌स (एक्सपल्शन फ्रॉम आसाम) (अउढ) ॲक्ट 1950. हा कायदा हिंदू, बौध्द, ख्रिश्चन, शीख या अल्पसंख्याक स्थलांतरितांना लागू होणार नाही, असे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्पष्ट केले होते, त्या वेळचे अपूर्ण काम आता या 2019 च्या कायद्याने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तिसरा मुद्दा आहे- भारत आणि पाकिस्तानची फाळणी ही धार्मिक आधारावर झाली, त्यामुळे आता नागरिकत्व देताना धर्म हा निकष लावला तर ते अयोग्य ठरत नाही.

दुसरा लेख आहे संसद सदस्य व माजी कायदा व न्यायमंत्री डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचा ‘द हिंदू’मधील ‘अ प्रिमॅच्युअर डिनाउन्समेंट ऑफ द सिटिझनशिप ॲक्ट’ (21 डिसेंबर 2019). या लेखात त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत. पहिला मुद्दा- गेल्या सत्तर वर्षांत पाकिस्तान, बांगलादेश वा अफगाणिस्तानमधून एकाही मुस्लिम वा ज्यू व्यक्तीने भारतात प्रवेश केला नाही. दुसरा मुद्दा- पाकिस्तान, बांगलादेश वा अफगाणिस्तान- मधील मुस्लिम हे ती मुस्लिमबहुल राष्ट्रे असल्यामुळे इतर देशांतील अल्पसंख्याकांच्या तुलनेत समान पातळीवर असू शकत नाहीत. तिसरा मुद्दा- हिंदुत्व हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाशी विसंगत तत्त्व नाही. या दोन्ही लेखांचे तसेच कायद्याचे समर्थन करण्यासाठी संसदेत व संसदेबाहेर केंद्र सरकारकडून जी भूमिका मांडली गेली, त्याचा प्रतिवाद करणारे लिखाण मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी ‘द हिंदू’मध्ये ‘टाइम टू डिफेन्ड इंडियाज सेक्युलॅरिझम ’ (दि.18 डिसेंबर 2019) मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 ला प्रमुख तीन मुद्यांच्या आधारे विरोध केला आहे. एक- हा कायदा संविधानाचे कलम 5 ते 11 या नागरिकत्वाच्या तरतुदींशी तसेच कलम 14 आणि 21 शी विसंगत आहे. कलम 14 समानतेचा, तर कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करते.

यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, कलम 14 व 21 यात वापरलेला शब्द ‘व्यक्ती’ असा आहे, ‘नागरिक’ असा नाही. त्यामुळे या दोन्ही तरतुदी नागरिकांपुरत्या मर्यादित न ठेवता त्या नागरिक नसलेल्या व्यक्तींनाही उपलब्ध करून देण्यापाठीमागे हे अधिकार भारतीय भूमीवर असणाऱ्या सर्व व्यक्तींना देण्यात यावेत अशीच संविधाननिर्मात्यांची भूमिका असावी, या गृहीतकाला दुजोरा मिळतो. दुसरा मुद्दा- हा कायदा दुजाभाव करणारा आणि समाजामध्ये दुफळी निर्माण करणारा आहे. तिसरा मुद्दा- हा कायदा हिंदू या बहुसंख्याक समुदायाचे राजकारण आणि तत्त्वज्ञान अल्पसंख्याकांवर लादतो आहे. भारतीय संविधानाची तत्त्वे या कायद्याने धोक्यात आणली असून संविधान आणि लोकशाहीवर विेशास असणाऱ्या कुणालाही यावर मौन बाळगून शांत बसणे शक्य होणार नाही, असे आवाहनही ते करतात. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात वकील असणारे गौतम भाटिया व आंतरराष्ट्रीय कायद्यात वकिली करणाऱ्या प्रिया पिलाई यांनी ‘द हिंदू’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत काही महत्त्वाच्या मुद्यांना स्पर्श केला आहे

(दि.27 डिसेंबर 2019). पहिला मुद्दा- भारताने जरी निर्वासितांशी संबंधातील कुठल्याही आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी केली नसली, तरी स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्रांनी निर्वासितांच्या बाबतीत पाळावयाचे आंतरराष्ट्रीय संकेत हे अशा प्रसंगी निर्वासितांच्या हिताला बाधा येऊ नये, याची काळजी घ्यायला सांगतात. असे संकेत पाळणे व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून गरजेचे मानले गेले आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय करार न केल्याचे तांत्रिक कारण पुढे करता येणार नसल्याचे नमूद करतात. दुसरा मुद्दा- आंतरराष्ट्रीय कायद्यातील ‘नॉन रेफाऊलमेंट’ म्हणजे शरणार्थी वा निर्वासित यांना जबरदस्तीने त्यांच्या मूळ देशात परत न पाठवण्याचे तत्त्व. याचे तार्किक कारण हे आहे की, निर्वासित वा शरणार्थींना त्यांच्या देशात छळाचा वा जीविताचा धोका असल्यामुळेच तर ते त्यांचा मूळ देश सोडून दुसऱ्या देशात आश्रयाला आलेले असतात. अशा लोकांना त्यांच्या मूळ देशात पाठविणे म्हणजे त्यांचा जीव धोक्यात घालणेच आहे. त्यामुळे अशा लोकांना जबरदस्तीने त्यांच्या मूळ देशात न पाठविण्याचे आंतरराष्ट्रीय तत्त्व न पाळण्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या मानवतावादी प्रतिमेला तडा जाणार आहे.

तिसरा मुद्दा- संसदेचे कायदा बनविण्याचे अधिकार हे अनिर्बंध नसून प्रत्येक सार्वभौम व स्वतंत्र राष्ट्र अनेक आंतरराष्ट्रीय करारांचे संकेत व निर्बंधांमुळे मन मानेल त्या पध्दतीने राष्ट्रीय पातळीवरचे कायदे बनवू शकत नाही. संसदेला जरी कायदा बनविण्याचे अधिकार असले तरी ‘अधिकार’ आणि ‘अनिर्बंध अधिकार’ यात संसदेने गल्लत करता कामा नये. आता कुठलाही देश- अगदी जिथे हुकूमशाही आहे असा देशसुध्दा- मनमानी करू शकत नाही, कारण परस्परावलंबन व परस्परसहकार्य या तत्त्वांवरच आंतरराष्ट्रीय संबंध आधारलेले आहेत. कुठलाही देश हे सगळे निर्बंध झुगारून फार काळ आंतरराष्ट्रीय समूहापासून फटकून राहू शकेल अशी परिस्थिती नाही. नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदवहीमध्ये ज्यांना आपले नागरिकत्व सिध्द करता येणार नाही किंवा नागरिकत्व सुधारणा कायद्यात ज्यांना नागरिकत्व मिळणार नाही, त्यांचे भवितव्य काय असेल याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून अद्यापपर्यंत मिळालेले नाही. यावर विचारलेल्या प्रश्नांना संसदेत व संसदेबाहेर मोघम उत्तरे मिळालेली आहेत. त्यातच वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानबध्द छावण्यांसाठी राज्य सरकारांनी जागा उपलब्ध करून द्यावी व लागणाऱ्या आवश्यक बाबींची तरतूद करावी, याविषयीचा काही पत्रव्यवहार झाल्याचे वृत्त काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिध्द झाल्याने अल्पसंख्याक समाजाच्या मनात चलबिचल सुरू आहे. यामुळे कट्टरतावादी गट मनोमन सुखावलेला असला तरी धर्मनिरपेक्ष भारतासाठी हे धोक्याचे वळण आहे, याची जाणीव लोकशाही तत्त्वांवर निष्ठा असणाऱ्या सजग नागरिकांनी ठेवणे खूप गरजेचे आहे. अन्यथा, आपल्या देशातील लोकशाहीची पडझड आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचे शल्य आयुष्यभर अस्वस्थ करत राहील.

पाकिस्तान कट्टरतावादाच्या वाटेने गेला आणि त्याने स्वतःचे खूप नुकसान करून घेतले. भारतातही कट्टरतावादी शक्ती प्रबळ होऊन ज्या वेळी अयोध्येतील बाबरी मशिदीचा ढाचा दि.6 डिसेंबर 1992 रोजी त्यांनी उव्दस्त केला, त्या वेळी भारतही पाकिस्तानच्या वाटेने जात असल्याचे पाहून फहमिदा रियाज यांनी लिहिलेल्या ओळी आजच्या परिस्थितीतही चपखलपणे लागू पडतात...

‘‘तुम बिल्कुल हम जैसे निकले अब तक कहाँ छिपे थे भाई वो मूरखता, वो घामडपन जिसमे हमने सदी गँवाई
आखिर पहुँची व्दार तुम्हारे अरे बधाई, बहुत बधाई। क्या हमने दुर्दशा बनाई कुछ भी तुमको नजर न आयी?
कल दुख से सोचा करती थी सोच के बहुत हँसी आज आयी तुम बिल्कुल हम जैसे निकले।’’

(उत्तरार्ध पुढील अंकात)

प्रा. डॉ. प्रतापसिंह भीमसेन साळुंके

1982prataps@gmail.com

मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे

Share on Social Media

चिनी महासत्तेचा उदय : 4

सांस्कृतिक क्रांतीचे अरिष्ट

सतीश बागल

जिआंगझी येथील विजनवासात डेंग एकटे होते खरे; परंतु कोंडी झालेल्या, पुढील मार्ग धूसर असलेल्या आणि चांगले काही करावयाची इच्छा असणाऱ्या मुत्सद्दी राजकारण्यांना असे एकलेपण महत्त्वाचे वाटते. अशा शांततेत अस्तित्वाबद्दल व पुढील वाटचालीबद्दल चिंतन होऊ शकते आणि पुढील पावले कशी टाकायची, याचे भान येऊ शकते. जिआंगझी येथील विजनवासातील डेंग यांचे चिंतन महत्त्वाचे होते. चीनचे महत्त्वाचे प्रश्न हे केवळ माओंच्या सैध्दांतिक व क्रांतिकारी मार्गाने, झुंडशाहीने वा अधिक साम्यवादी विचाराने सुटणार नाहीत; तर त्यासाठी अनेक वेगळे उपाय योजिले पाहिजेत, या विचारापर्यंत ते आले. शिवाय केवळ माओंना विरोध करूनही हा प्रश्न सुटणार नाही, हेही त्यांना मनोमन उमगले होते. माओ अतिशय लोकप्रिय तर होतेच, परंतु त्यांची जनमानसावरील मोहिनी ओसरलेली नव्हती.

चीनमधील पहिल्या पंचवार्षिक योजनेची आखणी व समाजवादी पध्दतीची पुनर्बांधणी यात डेंग यांचा मोठा वाटा होता. उद्योगाचे राष्ट्रीयीकरण, सामूहिक शेती योजना, छोट्या उद्योगधंद्याचे सामूहिकीकरण इत्यादी अनेक मूलभूत रचनात्मक कार्यक्रमांत ते गढून गेले. तत्कालीन वित्तमंत्री बो यिबो हे भांडवलशाहीधार्जिणे असून ते अनावश्यक कर सवलती देत आहेत, असे माओंचे 1953 मध्ये मत झाले. त्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले आणि त्यांच्या जागी डेंग यांची नेमणूक करण्यात आली. त्याच वर्षी पंचवार्षिक योजनेची सुरुवात होऊन प्रत्येक प्रांतात प्रत्यक्ष करआकारणी किती करावी, अन्नधान्य उत्पादन किती घ्यावे यासंबंधीची व इतर उद्दिष्टे ठरविण्याचे काम सुरू झाले. पंचवार्षिक योजनेत सामूहिक निर्णयप्रक्रियेने उद्दिष्टे ठरविली जात असली आणि माओ व झाओ यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतले जात असले, तरी डेंग यांना या प्रक्रियेची चांगली माहिती झाली.

माओ व झाऊ यांच्याकडून डेंग यांना बरेच काही शिकावयास मिळाले. आर्थिक प्रश्न सोडविताना प्रामुख्याने मूलभूत राजकीय चौकट कशी विचारात घ्यावी, सर्व आर्थिक उद्दिष्टे व सामाजिक अजेंड्याशेवटी राजकीय अजेंड्याबरोबर व पार्टीच्या धोरणाबरोबर कशी निगडित करावीत, सैध्दांतिक बाबतीत कम्युनिस्ट पक्षाच्या चौकटीत राहताना कोणत्या मूळ गोष्टीबाबत कितपत तडजोड करावी, कोणत्या बाबतीत अशी तडजोड करणे धोक्याचे आहे- अशा अनेक बाबींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण या काळात झाले. मोठे निर्णय कसे घेतले जातात याचे प्रशिक्षण त्यांना प्रत्यक्ष माओ व झाओ यांच्याकडून मिळाले. डेंग यांनी 1980 नंतर अनेक आर्थिक सुधारणा केल्या, त्या वेळी हा अनुभव कामी आला. पुढे झाऊ एन्‌ लाय यांच्या मार्गदर्शनाखाली ते परराष्ट्र मंत्रालयाचेही काम पाहू लागले. शिवाय पार्टीचे जनरल सेक्रेटरी म्हणून 1956 ते 1966 या दहा वर्षांत इतर कम्युनिस्ट देशांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आले. चीनमधील अत्युच्च राजकीय वर्तुळात ते लीलया वावरू लागले. सप्टेंबर 1956 मध्ये अत्यंत महत्त्वाची आठवी पार्टी काँग्रेस भरली होती. तिच्यात राष्ट्रउभारणीबाबतच्या अनेक धोरणांचा, ध्येयांचा व भविष्यकाळाचा वेध घेणाऱ्या व्हिजनचा समावेश होता.

पार्टीचे जनरल सेक्रेटरी म्हणून डेंग यांचा या काँग्रेसमधील सहभाग मोठा होता. माओ, लिऊ शाओची, झाऊ एन्‌ लाय, झु डे आणि चेन युन यांच्याबरोबरच डेंग यांनाही पॉलिट ब्युरोचे सदस्य करून घेतले गेले. डेंग 1957 मध्ये माओंबरोबर सोव्हिएत युनियनमध्ये गेले होते, तेव्हा माओंनी त्यांचे बरेच कौतुक केले. रशियाचे महत्त्वाचे सिध्दांतकार मिखाईल सुस्लाव्ह यांना माओ म्हणाले- See, that little man there? He is highly intelligent and has a great future ahead. क्रुश्चेव्ह यांनीही नमूद करून ठेवले आहे की, वरिष्ठ नेतृत्वापैकी डेंग यांच्याबाबत माओ यांना फार मोठ्या अपेक्षा होत्या. Let a hundred flowers bloom and a hundred schools of thought contend या मोहिमेत 1957 मध्ये अनेक बुध्दीमंत व इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी माओंवर कडवट टीका करणे सुरू केले. या मोहिमेत कम्युनिस्ट पक्षावर व सरकारवर इतकी टीका होईल याची कल्पना माओंना नव्हती. त्यावर प्रत्युत्तर म्हणून माओंनी बुध्दिमंत व उजवे विचारवंत यांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली आणि या सर्व विचारवंत व बुध्दिमंतांचा समाचार घेण्यासाठी डेंग यांनाच नेमले. या मोहिमेत पाच लाखांहून अधिक बुध्दिमंत व विचारवंतांना क्रांतीचे शत्रू ठरविले गेले. सुरुवातीला डेंग यांनी पक्ष कार्यकर्त्यांना या टीकेकडे दुर्लक्ष करावयास सांगितले होते. मात्र त्यांचा समाचार घेण्याची जबाबदारी माओंनी डेंग यांच्यावर टाकल्याने डेंग यांनीही या विचारवंत-बुध्दिमंतांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली, अनेकांना तुरुंगात डांबले व देशोधडीला लावले. या मोहिमेत चीनमधील अनेक शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, प्राध्यापक, संशोधक व लेखक यांचे करिअर नुसते उध्वस्तच झाले नाही; तर ते ज्या संस्थांमध्ये काम करीत होते, त्या संस्थांचेही अपरिमित नुकसान झाले.

जे मूठभर बुध्दिमंत राहिले, ते कम्युनिस्ट पक्षापासून व नेत्यांपासून दूर गेले. माओंच्या काळातील बुध्दिमंतांची पिछेहाट व त्यांची ससेहोलपट ही आधुनिक चीनमधील सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना होती. पुढे माओंनी ग्रेट लीप फॉरवर्ड कार्यक्रमांतर्गत जलद आर्थिक विकास साधण्यासाठी अनेक अर्थहीन धोरणे जुलमी पध्दतीने राबविली. त्यावर टीका करण्यासाठी, अथवा जाब विचारण्यासाठी बुध्दिमंतवर्गच शिल्लक राहिला नाही. माओंच्या या धोरणामुळे मोठी मनुष्यहानी झाली. माओंनी डेंग यांच्या मदतीने बुध्दिमंतांची छळवणूक केली, याची मोठी जबाबदारी डेंग यांच्यावरही येते. चीनमधील विचारवंतांनी व बुध्दिमंतांनी डेंग यांना याबद्दल कधीही माफ केले नाही. पुढे 1978 मध्ये हातात सत्ता आल्यानंतर डेंग यांनी अर्थव्यवस्था खुली करून माओंच्या सांस्कृतिक क्रांतीत भरडल्या गेलेल्या चिनी जनतेला थोडासा दिलासा दिलाही; मात्र स्वातंत्र्य, लोकशाही व राजकीय सुधारणा या मुद्यांवर त्यांनी चिनी जनतेची निराशाच केली. पुढे तिआनमेन प्रकरणात 1989 मध्ये वयाच्या 84 वर्षीही विद्यार्थ्यांची निदर्शने लष्करी बळाने निष्ठुरपणे मोडून काढीत त्यांनी बुध्दिमंतांची त्यांच्याबद्दलची टीका खरी होती, हेच दाखविले!

पुढे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून माओंनी जलद, ग्रामीण व औद्योगिक विकास साध्य करण्यासाठी ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’, ही सामाजिक व आर्थिक चळवळ एखाद्या राजकीय क्रांतीच्या आवेशात सुरू केली. यात अनेक बाबींचा समावेश होता. मोठे उद्योग, व्यापार व शेती यांचे राष्ट्रीयीकरण झालेले होतेच; ते चालविण्यासाठी मोठ्या को-ऑपरेटिव्ह संस्था निर्माण केल्या गेल्या. सामूहिक शेतीच्या प्रयोगासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून धेण्यात आल्या आणि त्या सामूहिकरीत्या कसण्यासाठी कम्युन्सची निर्मिती करण्यात आली. या सर्वांमुळे प्रचंड सामाजिक व आर्थिक उलथापालथ झाली व जुन्या संस्था नष्ट होऊन सामूहिक वा सहकारी तत्त्वावर नव्या संस्था सुरू करण्याचा प्रयत्न झाला. त्यात अनेक प्रश्न निर्माण झाले. खासगी मालमत्ता ही संकल्पनाच नाहीशी झाल्याने उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला, कारण जास्त उत्पादन झाले तरीही ते उत्पादकाला मिळणार नव्हतेच; मग उत्पादन जास्त का करा, असा प्रश्न होता!

ग्रामीण भागात शेतीचे अधिक उत्पादन घेऊन, त्यात बरीच बचत करून उर्वरित उत्पादन निर्यात करून वा विकून आलेला निधी औद्योगिकीकरणासाठी भांडवल म्हणून वापरायचा- अशी ही संकल्पना होती. उत्पादनच मुळातच कमी झाल्याने व अन्नधान्याचा वापर मोठा असल्याने तसे झाले नाही. मात्र अन्नधान्याच्या विक्रीवरच मर्यादा आल्याने अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला. या मोहिमेदरम्यान औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असणारे लोखंड व पोलाद हे ग्रामीण भागात लहान-लहान फाउंड्रीज (किंवा भट्‌ट्यां)मधून निर्माण करण्याची संकल्पनाही शेवटी प्रत्यक्षात आली नाही. गावातल्या अशा फाउंड्रीजमध्ये वितळविण्यासाठी कच्चे लोखंड उपलब्ध नसल्याने नांगर व शेतीच्या इतर लोखंडी अवजारांचा वापर करून भट्ट्या सुरू ठेवल्या. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या अवजारांची प्रचंड कमतरता भासू लागली. त्याचा शेती उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. शिवाय सिंचनव्यवस्था उभारण्यात आलेल्या अपयशामुळे शेतीसाठी पाण्याची कमतरता भासू लागली व अन्नधान्याचे उत्पादन खूप कमी झाले.

या दुष्काळात उपासमारीने 1.8 कोटी लोक मृत्युमुखी पडले, असे आकडेवारी सांगते. काही पाश्चिमात्य अभ्यासकांच्या मते- ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ कार्यक्रमातील अपयशामुळे आलेला दुष्काळ व उपासमारीत जवळजवळ 4.5 कोटी लोक मृत्युमुखी पडले. माओंवर टीका करणाऱ्या बुध्देमंतांना व विचारवंतांना देशोधडीला लावले असल्याने माओंवर व त्यांच्या या योजनांवर टीका करण्यासाठी बुध्दिमंत वा विरोधक कोणीही नव्हते. डेंग यांना माओंची धोरणे व निर्णय चुकीचे वाटत होते. मात्र त्यांनी ते माओंच्या नजरेस आणण्याचे वा विरोध करण्याचे टाळले. क्रांती मोर्चा व नागरी युध्दादरम्यान माओ यांचे बरेचसे निर्णय योग्य ठरले होते, त्यामुळेही असेल किंवा माओच्या निर्णयांना विरोध करण्याचे धाडसही तेव्हा त्यांना झाले नसेल. मात्र हे खरे की, अतिशय वरिष्ठ व जबाबदार पदावर असूनही डेंग यांनी माओ यांच्या नजरेस हे भयाण वास्तव आणले नाही की, विरोधही केला नाही. 1959 च्या उन्हाळी सुट्टीत ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ कार्यक्रम सुरू केल्यानंतर एका वर्षाने डेंग बिलियर्ड्‌स खेळताना पडले आणि पायाला झालेल्या दुखापतीमुळे काही महिने त्यांनी कामावर जाणे टाळले. काहींना असे वाटते की, अशा गोंधळाच्या व चुकीच्या निर्णयांच्या कालावधीत डेंग यांनी कामापासून लांब राहून या निर्णयाचा भागीदार होण्याचे टाळले!

रजेहून परतल्यानंतर मात्र डेंग यांच्या कामाच्या पध्दतीमध्ये फरक दिसून आला. माओंकडे जाणे, त्यांच्याकडून आदेश घेणे त्यांनी कमी केले. स्वत:च्या स्तरावरच निर्णय घेऊन होणारे नुकसान ते टाळू लागले. उद्योग, शेती, व्यापार अशा अनेक क्षेत्रांत 1960-61 पासून डेंग हे वास्तववादी निर्णय घेऊ लागले आणि ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’ कार्यक्रमातून होणारे नुकसान व मनुष्यहानी टाळण्याचा ते प्रयत्न करू लागले. महत्त्वाचे म्हणजे, या वेळेपासून डेंग हे माओंपासून दूर होऊ लागले. बैठकीतही ते माओंपासून लांब अंतरावर, मागे बसत व त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नसत. आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत रशियाकडून चीनला फारसे स्वातंत्र्य मिळत नाही, ही चीनची तक्रार या काळात वाढीस लागली. पुढील दहा वर्षांत तर चीनला रशियाकडून त्यांच्या उत्तर सीमेवर खूपच असुरक्षित वाटू लागले. या काळात डेंग यांनी आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत रशियाबरोबर रोखठोक भूमिका घेऊन, रशियाच्या प्रभावापासून दूर राहून स्वतंत्र भूमिका घेण्यास सुरुवात केली. याबाबत डेंग यांच्यावर माओ खूष असत, कारण रशियातील साम्यवादी सिध्दांताचे प्रवक्ते मिखाईल सुस्लाव्ह यांच्याशी डेंग रोखठोक बोलत व त्यांना सडेतोड उत्तर देत.

डेंग यांच्या रशियाविरोधी भूमिकेचे माओ यांना इतके कौतुक होते की, जुलै 1963 मध्ये रशियाच्या मिखाईल सुस्लाव्ह यांच्याशी दोन हात करून मॉस्कोहून बीजिंगला परतणाऱ्या डेंग यांचे स्वागत व कौतुक करण्यासाठी ते एअरपोर्टवर गेले होते. ऑक्टोबर 1964 मध्ये रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतर्गत उठाव करून पदच्युत केले. या घटनेने अस्वस्थ झालेल्या माओंना अधिकच असुरक्षित वाटू लागले. आपले सहकारी आपले ऐकत नाहीत, ही माओ यांची तक्रार होतीच. त्यापूर्वी ग्रेट लीप फॉरवर्ड या फसलेल्या कार्यक्रमामुळे माओ यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका होत असे. माओंचे महत्त्वाचे सहकारी ली शाओकी यांनी 1962 मध्ये एका प्रसंगी सात हजार अधिकाऱ्यांसमोर ग्रेट लीप फॉरवर्डच्या अपयशाबद्दल माओंना दोष दिला होता. वास्तविक या कार्यक्रमात सुरुवातीला ली शाओकी हेही माओंबरोबर होतेच. या प्रसंगापासूनच ली शाओकी यांना डच्चू देण्याचे माओ यांच्या मनात होते. माओ अस्वस्थ अशासाठीही होते की, डेंग हेही या काळात ली शाओकी यांच्याबरोबरच असत. अस्वस्थ झालेल्या माओंना इतके असुरक्षित वाटू लागले की, आपल्या विरोधात उभे राहणाऱ्या व बोलणाऱ्या नेत्यांना ते पक्षविरोधी, राष्ट्रविरोधी, भांडवलशाहीचे हस्तक व क्रांतीचे शत्रू मानू लागले. त्यांनी 1965 मध्ये त्यांच्या पत्नीला- जियांग शिंगला आपल्या विरोधात जाणाऱ्या नेत्यांवर तीव्र टीका करण्याचे संकेतच दिले. त्यानंतर माओंविरोधात थोडेही बोलणाऱ्या, विरोध करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी सुरू झाली.

माओंनी 1966 मध्ये कल्चरल रेव्होल्युशन वा सांस्कृतिक क्रांतीची सुरुवात केली. पार्टीच्या अधिकारपदी असणाऱ्या ज्या व्यक्ती भांडवलशाहीवादी आहेत, त्यांना त्रस्त करून धडा शिकवायचा आणि माओंशी वैयक्तिक निष्ठा वाहावयास लावयाच्या असे सांस्कृतिक क्रांतीचे ध्येय होते. यात ‘भांडवलशाहीविरोधी वा क्रांतीविरोधी नेते म्हणजे स्वतंत्रपणे वागणारे व माओंना विरोध करणारे नेते असा सरळ अर्थ होता. जे यानंतरही माओंशी जमवून घेत नसत, त्यांना माओंच्या विचारांचे प्रशिक्षण देण्यासाठी वा शिक्षा म्हणून ग्रामीण भागात सक्त मजुरी करण्यास पाठविण्यात येत असे. ली शाओकी आणि डेंग या दोघांवर 1966 मध्ये प्रथम वर्तमानपत्रांतून हल्ले सुरू झाले. पुढे रेड गाडर्‌सचेही तीव्र हल्ले या नेत्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवरही सुरू झाले. त्या वेळी डेंग यांनाही लक्ष्य करण्यात आले. ली शाओकी हे पक्षाचे उपाध्यक्ष होते व माओंचे वारसदार म्हणून ओळखले जात. मात्र या काळात त्यांना सर्व पदांवरून हटविण्यात आले. रेड गाडर्‌सकडून त्यांना नुसतीच अपमानास्पद वागणूक मिळाली नाही, तर त्यांना मारहाणीपर्यंत व दुखापत होईपर्यंत गोष्टी गेल्या. घरी नजरकैदेत असताना व तब्येत गंभीर असतानाही हल्ले सुरू राहिले आणि त्यांना औषधोपचार मिळाले नाहीत. त्यांची पत्नी तुरुंगात असताना अशाच अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. डेंग यांनाही लक्ष्य करणे सुरू झाले. त्यांना लक्ष्य करण्याचे माओंचे उद्दिष्ट हे त्यांना केवळ आपल्या बाजूला वळवून त्यांचे समर्थन प्राप्त करणे एवढेच होते. डेंग व त्यांची पत्नी यांनाही 1967 मध्ये बीजिंगमधील झौंगनहाई येथील घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले. झौंगनहाईमध्ये पक्षातील व सरकारमधील वरिष्ठ नेते-अधिकारी यांची निवासस्थाने होती. त्यांच्या मुलांनाही त्यांच्यापासून लांब, ग्रामीण भागात काम करण्यासाठी पाठवून देण्यात आले.

माओ अशा रीतीने डेंग यांना जणू आपल्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी दबाव आणून धडाच शिकवीत होते, असे दिसते. डेंग यांच्या पूर्वीच्या क्रांती काळातील व पोलिटिकल कॉमिसार असलेल्या काळातील काही घटनांची चौकशी करण्यासाठी खास पथक 1968 मध्ये निर्माण करण्यात आले. कुओमिंग टांगबरोबरच्या युद्धाच्या वेळी डेंग हे सैन्यदलापासून लांब गेले आणि नंतर सैन्यदल सोडून शांघायला परत आले होते. त्यांचे तेव्हाचे साथीदार पेंग देहुआई यांनाही माओंनी टीकेचे लक्ष्य केले होते. त्यांचीही खोलवर चौकशी सुरू केली होती. या चौकशीचा भाग म्हणून डेंग यांना वयाच्या आठव्या वर्षांपासूनच्या सर्व आठवणी लिहून काढावयास सांगितले गेले. माओंना विरोध करणाऱ्या इतर पक्षनेत्यांना व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना शिक्षा म्हणून ग्रामीण भागात पाठविण्यात आले. झु डे आणि डाँग बिऊ यांना ग्वांडुगला, ये जिनयिंग यांना यांना हुनानला तर चेन युन, वँग झेन व डेंग जिआंगझी प्रांतातील विविध भागांत पाठविण्यात आले. ऑक्टोबर 1969 मध्ये डेंग, त्यांची पत्नी झुओ लिन आणि डेंग त्यांची सावत्र आई झिया बोगेन या तिघांना बीजिंगहून जिआंगझी प्रांतातील नाचांग या महत्त्वाच्या शहरात आणण्यात आले.

हे शहर चिनी साम्यवादी चळवळीच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे, कारण तेथे 1926 मध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीचा (झङअ) जन्म झाला. हे शहर पीएलएचे मोठे लष्करी केंद्र होते. येथे रेड गाडर्‌सचा प्रभाव चालत नसल्याने डेंग बऱ्यापैकी सुरक्षित होते. या विजनवासानंतर डेंग यांच्यात सुधारणा होऊन त्यांच्या निष्ठा माओंच्या चरणी राहतील, अशी खात्री माओ व त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना होती. नांचांग येथे डेंग एकूण साडेतीन वर्षे होते. हा काळ डेंग यांच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरला. कुटुंबीयांबरोबर सुखदु: खाचे क्षण तर त्यांनी घालविलेच; शिवाय पुढील वाटचालीबाबत त्यांचे चिंतनही झाले. रेड गाडर्‌स व सांस्कृतिक क्रांतीच्या ओंगळवाण्या झुंडशाहीपासून दूर व सैन्यदलाच्या सुरक्षित वातावरणात राहायला मिळाले, हीही जमेची एक बाजू होती. नांचांग येथे डेंग पती-पत्नींचा दिवस सकाळी 6.30 ला सुरू होत असे. तंदुरुस्त राहण्यासाठी डेंग मुद्दाम थंड पाण्याने अंघोळ करीत. सकाळी एक-दीड तास दोघा पती-पत्नींना स्थानिक पक्षाच्या देखरेखीखाली माओंच्या विचारांचा व साहित्याचा सक्तीने अभ्यास करावा लागे. सकाळच्या नाश्त्यानंतर डेंग पतीपत्नी घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ट्रॅक्टरदुरुस्तीच्या वर्कशॉपमध्ये तीन-चार तासांच्या कामासाठी जात. डेंग यांना तिथे मशिनिस्टचे काम दिले होते. ते काम ते दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत करीत. घरी त्यांची सावत्र आई झिया बोगेन स्वयंपाक व घरकाम करीत असे. दुपारचे जेवण झाल्यानंतर डेंग व त्यांची पत्नी वाचनात वेळ घालवीत असत. चिनी दर्जेदार पुस्तके, कादंबऱ्या, त्याचप्रमाणे रशियन व फ्रेंच अनुवादित साहित्य हे दोघांच्या आवडीचे विषय होते. याशिवाय रेडिओवरून बातम्या व इतर कार्यक्रम ऐकण्याची सोय होती. रात्री डेंग झोपी जाण्यापूर्वीही वाचन करीत असत. पुढे त्यांची मुलेही तिथे रहावयास आली आणि डेंग कुटुंबीय नांचांगमध्ये बऱ्यापैकी स्थिरावले.

ट्रॅक्टर वर्कशॉपमधील कामाव्यतिरिक्त डेंग व त्यांची पत्नी हे घराच्या सभोवती असणाऱ्या बागेतही काम करीत. तिथे भाज्यांचे उत्पादन घेत. खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी डेंग कुटुंबीय अनेक प्रकारची काटकसर करीत. भरपूर धूम्रपान करणारे व चवीने वाईन घेणारे डेंग यांनी या चैनीवरील खर्च आटोक्यात ठेवला. डेंग कुटुंबीय एकत्र जरी आले तरी अजूनही दुर्दैवाने त्यांची पाठ सोडली नव्हती. ज्याप्रमाणे डेंग यांच्याविरूध्द रेड गाडर्‌सनी सातत्याने टीका करून व इतर मार्गाने त्यांना त्रास दिला, त्याहीपेक्षा जास्त त्रास त्यांच्या मुलांना दिला. धाकदपटशा, गुंडगिरी व झुंडशाही आणि अनेकदा मारहाण व इजा पोहोचविणे या मार्गांनी रेड गाडर्‌स डेंग यांच्या मुलांना सातत्याने त्रास देत व वडिलांविरुध्द माहिती काढण्याचा प्रयत्न करीत. पुफांग हा डेंग यांचा सगळ्यात धाकटा मुलगा. त्याच्यावर तर रेड गार्ड्‌सनी जीवघेणा हल्लाही केला. अशाच एका प्रसंगी अशा हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करीत असताना तो घराच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडला आणि जबर जखमी झाला. त्याच्या पाठीच्या कण्याला जबरदस्त दुखापत होऊन त्याचा कमरेखालील भाग कायमचा अधू झाला. तो डेंग यांचा मुलगा असल्याने आणि डेंग व त्यांचे कुटुंबीय रेड गाडर्‌सच्या हिट लिस्टवर असल्याने पुफांगवर इस्पितळातील डॉक्टरांनी इलाज करण्यात हयगय केली. पुढे पुफांगची काळजी डेंग यांची मुले आळीपाळीने घेत. अखेर डेंग यांच्या इतर मुलांनी इस्पितळात काळजी घेतल्यामुळे पुफांग कसा तरी बचावला.

अनेक विनंत्या व मिनतवाऱ्या केल्यानंतर त्याला जखमी व विकलांग अवस्थेत जिआंगझी येथे डेंग यांच्याकडे जाऊ देण्यात आले. तेथे डेंग स्वत: मुलाची काळजी घेत. त्याला बिछान्यावर हलताही येत नसल्याने त्याची पूर्ण शुश्रूषा, स्वच्छता व इतर कामे डेंग स्वत: करीत. हळूहळू डेंग यांची सारी मुले जिआंगझी येथे किंवा तेथील आजूबाजूच्या परिसरात आली. त्या मुलांनाही ग्रामीण भागात शेतीसंबंधीच्या कार्यक्रमात काम करावे लागे. मात्र त्याच प्रांतात असल्याने महिन्यात वा आठवड्यातही मुले घरी परतू शकत. जिआंगझी येथील विजनवासात डेंग एकटे होते खरे; परंतु कोंडी झालेल्या, पुढील मार्ग धूसर असलेल्या आणि चांगले काही करावयाची इच्छा असणाऱ्या मुत्सद्दी राजकारण्यांना असे एकलेपण महत्त्वाचे वाटते. अशा शांततेत अस्तित्वाबद्दल व पुढील वाटचालीबद्दल चिंतन होऊ शकते आणि पुढील पावले कशी टाकायची, याचे भान येऊ शकते. जिआंगझी येथील विजनवासातील डेंग यांचे चिंतन महत्त्वाचे होते. चीनचे महत्त्वाचे प्रश्न हे केवळ माओंच्या सैध्दांतिक व क्रांतिकारी मार्गाने, झुंडशाहीने वा अधिक साम्यवादी विचाराने सुटणार नाहीत; तर त्यासाठी अनेक वेगळे उपाय योजिले पाहिजेत, या विचारापर्यंत ते आले.

शिवाय केवळ माओंना विरोध करूनही हा प्रश्न सुटणार नाही, हेही त्यांना मनोमन उमगले होते. माओ अतिशय लोकप्रिय तर होतेच, परंतु त्यांची जनमानसावरील मोहिनी ओसरलेली नव्हती. शिवाय प्रशासनावर त्यांची घट्ट पकड होती. क्रुश्चेव्ह यांनी स्टालिनवर 1956 मध्ये कडवट टीका केल्याने कम्युनिस्ट पक्षात व शासनव्यवस्थेत उडालेला गोंधळ त्यांनी पाहिला होता. तेव्हापासून रशियन राज्यव्यवस्था कमकुवत झालेलीही त्यांनी पाहिली होती. अशा परिस्थितीत माओंच्या विचारांच्या चौकटीतच, परंतु त्या विचारांचा थोडा वेगळा अर्थ लावून काही सुधारणा राबवून लोकांचे राहणीमान उंचावणे शक्य आहे का, याची ते सातत्याने चाचपणी करीत. पंचवार्षिक योजनेंतर्गत कार्यक्रमांसाठी झाऊ एन्‌ लाय यांनी चार प्रमुख क्षेत्रांमध्ये शेती, उद्योगधंदे, संरक्षण आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान, आधुनिकीकरण करण्याचे ठरविले होते. झाऊ एन्‌ लाय यांच्या सनदशीर मार्गाने जाऊन चार महत्त्वाच्या क्षेत्रांत आधुनिकीकरण करून चीनची कोंडी फोडली पाहिजे इथपर्यंत हे चिंतन चाले. डेंग हे भावनाप्रधान व संवेदनशील असले, तरी आपल्या भावना ते सहजपणे प्रदर्शित करत नसत. खडतर आयुष्य व प्रमाणाबाहेर काम यामुळे अनेक वर्षे ते झोपेच्या गोळ्या घेत. जिआंगझी येथे आल्यानंतर त्यांच्या झोपेच्या गोळ्या बंद झाल्या, शिवाय त्यांची प्रकृती सुधारली व वजनही कमी झाले. आपण लवकरच बीजिंगला जाऊ व जोमाने काम सुरू करू, अशी आशा डेंग यांच्या मनात मूळ धरू लागली.

डॉ. सतीश बागल, नाशिक

bagals89@gmail.com

Share on Social Media

अभीष्टचिंतन

डॉ. जी. जी. पारीख नाबाद 95

सुनील तांबे

जनता केंद्र, ताडदेव इथे जीजींचा 95 वा वाढदिवस अनौपचारिकपणे साजरा करण्यात आला. मधू मोहिते, विजया चौहान, सोनल यांनी या कामी पुढाकार घेतला. या प्रसंगी जीजींनी केलेलं केलेलं प्रकट चिंतन पुढीलप्रमाणे- गांधीजींच्या पूर्वीची काँग्रेस आणि देश मी पाहिला होता. त्या वेळी विधवा- विवाहाची चर्चा घरामध्ये होत नसे, अस्पृश्यता- निर्मूलनाची चर्चाही घरात होत नसे. गांधीजींमुळे आम्ही हे विचार आत्मसात केले. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत होते; परंतु घटना परिषदेत ज्यावर मतैक्य झालं, त्यानुसारच राज्यघटना बनली. आंबेडकरांनाही काही आग्रह सोडावे लागले. आम्ही मार्क्सवादी होतो; परंतु डॉ. राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांनी आम्हाला शिकवणूक दिली की, युरोपातला समाजवाद आणि भारतातला समाजवाद वेगळा आहे. वेगळा असायला हवा. मार्क्सवादी विचारानुसार समाजव्यवस्था चारित्र्य घडवते. गांधीजी आणि समाजवादी नेत्यांनी आम्हाला सांगितलं की, आपण समाजवादी चारित्र्य घडवायचं असतं.

समाजवादी आंदोलनातील सर्व मोहरे काळाच्या पडद्याआड गेले आहेत, मात्र वयाच्या 95 व्या वर्षीही जीजींनी मैदान सोडलेलं नाही. फोन, आयपॅड, ई-मेल, भेटीगाठी यांव्दारे नव्या-जुन्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय करतात. बैठका, उपोषणं, धरणं, मोर्चे यांना आवर्जून हजेरी लावतात. चौकार वा षटकार ठोकता येत नाहीत, मात्र 1942 ते 2020 एवढा प्रदीर्घ काळ त्यांनी एक बाजू लावून धरली आहे. चौफेर फटकेबाजी करण्याची जबाबदारी असणाऱ्या नव्या पिढीला सध्याच्या कठीण काळात जीजींचा आधार वाटतो. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात कामगार आणि शेतकरी वर्गाने संघटितरीत्या सहभाग घ्यायला हवा, जेणेकरून समाजवादी क्रांतीचा मार्ग सुकर होईल- या धारणेतून जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, युसुफ मेहेरअली, अरुणा असफअली आदींनी 1934 मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. फेबियन समाजवादी, फ्रेंच समाजवादी, मार्क्सच्या विचारधारेला प्राधान्य देणारे आणि गांधीवादी असे विविध विचारप्रवाह काँग्रेस समाजवादी पक्षात होते. जवाहरलाल नेहरूंना काँग्रेसमधील या गटाबद्दल विशेष आत्मीयता होती. डॉ.लोहिया, जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव हे गांधींजींच्याही निकट होते- मतभेद व मतभिन्नतेसह. दि. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनाला हजर राहण्यासाठी गांधीजी वर्ध्याहून आले. व्हीटी स्टेशनवर त्यांचं स्वागत केलं मुंबईचे महापौर युसुफ मेहेरअली यांनी. ब्रिटिश सरकारला निर्वाणीचा इशारा देणाऱ्या चपखल घोषणेचा मी विचार करतो आहे, असं गांधीजी युसुफ मेहेरअलींना म्हणाले. क्षणाचाही विलंब न लावता मेहेरअली उत्तरले- ‘क्विट इंडिया’ (भारत छोडो)! गांधींजीना ही घोषणा पसंत पडली.

दिनांक 8 ऑगस्टच्या अधिवेशनात काँग्रेसने ‘छोडो भारत’ ठराव पारित केला. या वेळी केलेल्या भाषणात गांधीजींनी ‘करा व मरा’ हा मंत्र देशवासीयांना दिला. ब्रिटिश सरकारला या ठरावाची कुणकुण लागली होतीच, त्यामुळे सर्व काँग्रेस नेत्यांना त्याच दिवशी अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी दि. 9 ऑगस्ट रोजी, काँग्रेस अधिवेशनात एकही वरिष्ठ नेता नव्हता. त्या वेळी अरुणा असफअली यांनी तिरंगा ध्वज फडकवला आणि ऑगस्ट क्रांतीची ठिणगी पडली. पोलिसांनी लाठीमार, गोळीबार केला. परंतु अरुणा असफअली विद्युतवेगाने नाहीशा झाल्या. काँग्रेस समाजवादी पक्षाचे सदस्य असलेले जीजी त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते. स्वातंत्र्य आंदोलनात जीजींनीही कारावास घडला. सन 1942 ते 2019 प्रत्येक ऑगस्ट क्रांतिदिनी ऑगस्ट क्रांती मैदानावर हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी जीजी जातात. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व नोंदणी यांच्याविरोधात दि. 9 डिसेंबर 2019 रोजी ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या ऐतिहासिक निदर्शनांमध्येही जीजी सहभागी झाले होते.

1942 च्या क्रांतिदिनालाही लोकशक्तीचं एवढं विराट दर्शन घडलं नाही, असं ते म्हणाले. गुणवंत गुणीलाल पारीख ऊर्फ जीजी यांचा जन्म 1924 चा. मुंबईच्या जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयातून ते एमबीबीएस झाले. मुंबईतच त्यांनी प्रॅक्टीस सुरू केली. सकाळ-संध्याकाळ दवाखाना आणि उरलेल्या वेळात समाजवादी चळवळीत राजकीय-सामाजिक कार्य असा त्यांचा दिनक्रम होता. सामाजिक कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबीय यांच्यावर मोफत उपचार, इतर रुग्णांना माफक शुल्कामध्ये आरोग्यसेवा हा त्यांचा बाणा राहिला. हजारो सामाजिक कार्यकर्त्यांना हस्ते-परहस्ते आर्थिक साह्य केलं. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या संबंधांतून हजारो कार्यकर्त्यांना आरोग्यविषयक सेवा मोफत पुरवल्या. त्याशिवाय कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग, अन्य राजकीय कार्यांत ते बुडून गेलेले असायचे. सहा फूट उंची. मितभाषी. पेशंट असो की राजकीय कार्यकर्ता- कुणाचंही बोलणं अतिशय लक्षपूर्वक ऐकणं, त्यातही टीका शांतपणे ऐकणं हे जीजींचं वैशिष्ट्य. ते शांत आणि दृढपणे बोलायचे. कोणतीही टीका, सूचना, कार्यक्रम वा कृती वा निर्णय- मग तो त्यांचा असो वा संघटना वा अन्य कुणाचा- त्याचा समाजवादी मूल्यांशी वा चारित्र्याशी असलेला संबंध काय आहे, याची उकल करून सांगणं हे त्यांचं वैशिष्ट्य.

एखादी व्यक्ती पाच टक्के समाजवादी असेल तर ती दहा टक्के समाजवादी बनावी, यासाठी कोणत्या ना कोणत्या कार्यात गुंतवा. दहा टक्के समाजवादी असलेली व्यक्ती वीस टक्के समाजवादी कशी होईल, यासाठी कार्यात गुंतवा. कोणत्याही व्यक्तीला वर्गशत्रू-हितशत्रू म्हणून जाहीर करू नका, अशी जीजींची कार्यशैली आहे. त्यामुळे सुखवस्तू समाजाशी असलेली नाळ त्यांनी कधीही तोडली नाही. जीजींनी गॉसिप वा कुचाळक्या चुकूनही केल्याचं मला स्मरत नाही. मंगलाबेन या त्यांच्या पत्नी. त्या शांतिनिकेतनच्या विद्यार्थी. त्याही त्यांना जीजी असंच संबोधत. मंगलाबेनमुळे त्यांच्या घराला सौंदर्याचा साज चढला होता. त्या संयुक्त महाराष्ट्रच्या आंदोलनात होत्या. समाजवादी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची निवड करण्यात आली. जीजींची मुलगी सोनल. भारतातील समाजवादी आंदोलन हा तिचा अभ्यासाचा विषय. युसुफ मेहेरअली सेंटरच्या कार्यातही तिचा सहभाग आहे. 30 जानेवारी 2019 रोजी जीजींनी वयाची 95 वर्षं पूर्ण केली.

वयोमानानुसार दृष्टी मंदावली आहे. कानाला यंत्र लावल्याशिवाय ऐकू येत नाही. चालताना काठीचा आधार घ्यावा लागतो. मात्र समाजवादी क्रांतीच्या प्रतिज्ञेवर हा भीष्माचार्य आजही अविचल आहे. जीजी मूळचे कच्छचे. कच्छ आणि मुंबईचं नातं प्राचीन आहे. बहुतेक कच्छी लोक नशीब काढायला मुंबईत येतात. मुंबई हीच कच्छी लोकांची राजधानी मानली जाते. त्यामुळेच जीजींना मराठी भाषा व महाराष्ट्र परका नाही. मुंबई हीच जीजींची कार्यभूमी. मात्र जीजींच्या कार्याचा पैस राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राहिला. काश्मीरपासून कन्याकुमारी आणि गुवाहाटीपासून कच्छपर्यंतच्या विविध प्रवाहांमध्ये व घटकांमध्ये काम करणाऱ्या समाजवादी कार्यकर्त्यांशी त्यांचे आजही संबंध आहेत. ‘जनता वीकली’ हे इंग्रजी साप्ताहिक काँग्रेस समाजवादी पक्षाचं मुखपत्र होतं. अच्युतराव पटवर्धन यांनी ते 1946 मध्ये सुरू केलं. आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, युसुफ मेहेरअली, अशोक मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली या साप्ताहिकाचं कार्य सुरू झालं. अरुणा असफअली, पुरुषोत्तम त्रिकमदास, रोहित दवे, नानासाहेब गोरे, ह. कृ. परांजपे, जे.डी. सेठी, प्रेम भसीन, मधू दंडवते, सुरेंद्र मोहन यांनी या साप्ताहिकाची संपादकीय धुरा सांभाळली होती. हे साप्ताहिक पूर्वी नवी दिल्लीतून निघत असे. अच्युतराव पटवर्धन या साप्ताहिकाचे 1949 मध्ये संपादक झाल्यावर या साप्ताहिकाचं कार्यालय मुंबईला आलं. अपोलो बंदर येथील नॅशनल हाऊस इमारतीतील एक गाळा अच्युतरावांनी मिळवला आणि तिथून या साप्ताहिकाचा कारभार सुरू झाला. जहांगीर आर्ट सोसायटीसमोर वे साईड इन नावाचं रेस्टॉरंट होतं. मी, युसुफ मेहेरअली, जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया जनता वीकलीच्या कार्यालयातून कॉफी प्यायला या रेस्टॉरंटमध्ये जायचो, असं अच्युतराव पटवर्धनांनी मला 1992 मध्ये सांगितल्याचं स्मरतं. पुढे या साप्ताहिकाचा कारभार प्रजा समाजवादी पक्षाकडे गेला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने या साप्ताहिकाची जबाबदारी जीजींवर सोपवली. ती जबाबदारी आजही जीजी निभावत आहेत.

ऑगस्ट क्रांतीला 1992 मध्ये 50 वर्षं पूर्ण झाली. त्या वेळी छोडो भारत आंदोलनात सहभागी झालेल्या श्रीलंकेतील समाजवादी नेत्यांना जीजींनी ‘जनता वीकली’च्या कार्यालयात चर्चेसाठी बोलावलं होतं. श्रीलंकेतील विविध प्रश्न, तमिळींची समस्या, भारतश्रीलंका संबंध, समाजवादी भूमिका इत्यादी विषयांवर या नेत्यांनी आपले विचार मांडले. हे समाजवादी नेते श्रीलंकेच्या राजकारणात सक्रिय होते. श्रीलंका, म्यानमार आणि भारतातील समाजवाद्यांनी एशियन सोशॅलिस्ट कॉन्फरन्स स्थापन केली होती. या संघटनेच्या कार्यासाठी मधू लिमये काही काळ रंगूनमध्ये होते. आँग सान या म्यानमारच्या स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्याने ही परिषद स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. आँग सान सू की ही त्यांची मुलगी. असो. सांगायचा मुद्दा असा की, भारत सरकारच्या लुक ईस्ट या आजच्या धोरणाची वा सार्कची पायाभरणीची दिशा भारतीय समाजवाद्यांनी खूप पूर्वी दाखवली होती. हा इतिहास केवळ जतनच नाही तर जिवंत करण्याची धडपड जीजी आजही करत असतात.

काश्मीर प्रश्नावरील समाजवाद्यांची भूमिका आणि कार्य या विषयावरील दस्तावेज त्यांनी मला नुकतेच वाचायला दिले. युसुफ मेहेरअली अभ्यास केंद्राची स्थापना जीजींनी 1961 मध्ये केली. त्याचं रूपांतर पुढे युसुफ मेहेरअली केंद्रामध्ये झालं. भारतात समाजवादी क्रांती यशस्वी होण्यासाठी ग्रामीण भागात आमूलाग्र परिवर्तन गरजेचं आहे, या धारणेनुसार जीजींनी पनवेलजवळ असणाऱ्या ‘तारा’ या गावामध्ये युसुफ मेहरअल्ली सेंटरमार्फत वैद्यकीय सेवेचं केंद्र सुरू केलं. मुंबईतील अनेक डॉक्टर्स या कामामध्ये जोडले गेले. वैद्यकीय सेवेसोबतच सौर ऊर्जा, शालेय शिक्षण, शेतीचे प्रयोग यांची भर पडत गेली. त्यासाठी जीजी व त्यांचे सहकारी देशातील आणि राज्यातील विविध भागांत गेले. विविध प्रयोगांची माहिती घेतली. विविध तज्ज्ञांना युसुफ मेहेरअली सेंटरमध्ये निमंत्रित केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प सुरू केले. सुस्मृत श्रीपाद दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीचे प्रयोगही युसुफ मेहेरअली केंद्राने सुरू केले. समाजवादी पक्ष, कामगार चळवळ यांच्याशी जीजींचा निकटचा संबंध होता. त्यांची पत्नी मंगलाबेन संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही सहभागी झाली होती. गोवा मुक्ती आंदोलनातही जीजींचा अप्रत्यक्ष संबंध होता.

आणीबाणीच्या काळात जीजींना बडोदा डायनामाइट केसमध्ये गोवण्यात आलं. वस्तुतः जीजींचा त्या प्रकरणाशी दूरान्वयानेही संबंध नव्हता, हे पन्नालाल सुराणा यांनी एका लेखात नोंदवलं आहे. मात्र जीजींनी यासंबंधात जाहीर भाष्य कधीही केलं नाही. जनता केंद्र, ताडदेव इथे जीजींचा 95 वा वाढदिवस अनौपचारिकपणे साजरा करण्यात आला. मधू मोहिते, विजया चौहान, सोनल यांनी या कामी पुढाकार घेतला. या प्रसंगी जीजींनी केलेलं केलेलं प्रकट चिंतन पुढीलप्रमाणे- गांधीजींच्या पूर्वीची काँग्रेस आणि देश मी पाहिला होता. त्या वेळी विधवाविवाहाची चर्चा घरामध्ये होत नसे, अस्पृश्यता निर्मूलनाची चर्चाही होत नसे. गांधीजींमुळे आम्ही हे विचार आत्मसात केले. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत होते; परंतु घटना परिषदेत ज्यावर मतैक्य झालं, त्यानुसारच राज्यघटना बनली. आंबेडकरांनाही काही आग्रह सोडावे लागले. आम्ही मार्क्सवादी होतो; परंतु डॉ. राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांनी आम्हाला शिकवणूक दिली की, युरोपातला आणि भारतातला समाजवाद वेगळा आहे. वेगळा असायला हवा.

मार्क्सवादी विचारानुसार समाजव्यवस्था चारित्र्य घडवते. गांधीजी आणि समाजवादी नेत्यांनी आम्हाला सांगितलं की, आपण समाजवादी चारित्र्य घडवायचं असतं. ‘आपण माणूस आहोत म्हणून संपूर्ण मानवजातीशी आपण जोडलेले आहोत. देश, वंश, धर्म, जात ही आपली ओळख नाही’, असं नाथ पै खासगी चर्चेतही वारंवार सांगत. ही शिकवण आम्हाला लोहिया आणि जेपी यांनी दिली. आम्ही पाहिलेलं स्वतंत्र भारताचं स्वप्न वेगळं होतं, ते आज भंग पावलं आहे. त्याचे तुकडे-तुकडे झाले आहेत. हे आम्ही का रोखू शकलो नाही, याचा मी विचार करतोय. मला वाटतं, आम्ही निवडणुकीच्या राजकारणात नको तेवढे गुंतलो. समाजवादी चारित्र्य त्यामुळे झाकोळलं गेलं. पहिल्या निवडणुकांमध्ये (1952-55) भ्रष्टाचार हा मुद्दा नव्हता; पण त्यानंतर निवडणुकीसाठी पैसे गोळा करणं, म्हणजे काळा पैसा आणणं ही बाब सामान्य बनली. निवडणुकीसाठी धर्म, जात यांचा उपयोग करणंही गरजेचं झालं. समाजवादी काही काळ याविरोधात होते, परंतु यथावकाश तेही धारेला लागले. मी निवडणुकांच्या राजकारणाच्या विरोधात नाही, परंतु केवळ निवडणुकांच्या राजकारणातून समाजवादी चारित्र्य निर्माण होत नाही. सत्ता उच्चवर्णीयांच्या हाती आहे, अन्य मागासवर्गीय आणि दलितांच्या हाती ती जायला हवी, यासाठी आपण लढायला हवं- अशी लोहिया व जयप्रकाश यांची शिकवण होती, परंतु लोहियांनी केवळ निवडणुकीच्या राजकारणाची कास धरली.

सुधारित नागरिकत्वाचा कायदा, लोकसंख्यानोंदणी, नागरिकत्व नोंदणी हे विषय आज ऐरणीवर आले आहेत. त्यामुळे राज्यघटनाच धोक्यात आली आहे. हा विषय केवळ मुसलमानांचा नाही, सर्व भारतीयांचा आहे. त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, दलित, भटके-विमुक्त आणि आदिवासीही भरडले जाणार आहेत. भारतातील बेरोजगारी आणि दारिद्य्राची समस्या, विशेषतः ग्रामीण भागातील; आजही सुमारे 50 टक्के लोकसंख्येची उपजीविका शेतीवर आहे- औद्योगिकीकरण सोडवू शकत नाही. एक छोटा वर्ग कॉप्युटर सायन्स शिकून नोकऱ्या मिळवू शकतो, परंतु औद्योगिकीकरणाला मर्यादा आहेत. त्यामुळे गांधीजींचा, समाजवाद्यांचा सामाजिक व आर्थिक कार्यक्रम आजही रिलेव्हंट आहे. जागतिक भांडवलशाहीमुळे आज ग्लोबल वार्मिंग आणि तदनुषंगिक अशा समस्या निर्माण झाल्या आहेत की, मानवाचं अस्तित्व 2040 वा 2050 मध्ये राहील की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मेधा पाटकर आणि अनेक साथी पर्यायी विकासनीतीचा विचार मांडत असतात, त्यासाठी संघर्षही करत असतात. तेच समाजवादी विचारांचं भविष्य आहेत.

सुनील तांबे, मुंबई

suniltambe07@gmail.com

Share on Social Media

साहित्य-संस्कृती

मराठी नाट्यरसिकांना ‘किंग लिअर’पेक्षा ‘नटसम्राट’ का भावला असावा?

आ. श्री. केतकर

मग नटसम्राटलाच मराठी प्रेक्षकांनी का पसंती दिली असावी, असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणून चटकन ध्यानात येतो, या दोन नाटकांतील मुख्य पात्रे म्हणजे लिअर आणि बेलवलकर यांच्या अवकाशाचा फरक. लिअर हा एका देशाचा राजा आहे, तर बेलवलकर हे रंगभूमीवरील सम्राट. अर्थातच लिअरचा आवाका मोठा तर नटसम्राटाचा मर्यादित असणे साहजिक आहे. दुसरे असे की- किंग लिअरमध्ये ग्लॉस्टरचे दुय्यम, पण तसे समांतर कथानक आहे. त्यामुळे ते नाटक पाच अंकी आहे. तीन अंकांच्या नटसम्राटमध्ये मात्र तसे नाही. लिअरमध्ये लिअर आणि ग्लॉस्टर दोघांचाही कटू अनुभव आहे, तर नटसम्राटमध्ये बेलवलकरांचा. लिअरबरोबर केंट आणि विदूषक असले, तरी ते त्याचे नोकरच आहेत. उलट बेलवलकरांबरोबर त्यांची पत्नी आहे. तीच त्यांचा आधार आणि काळजीवाहक आहे.

गेल्या वर्षअखेरीला, 23 डिसेंबरला ‘नटसम्राट’ या नाटकाने पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले, तरीही मराठी नाट्यरसिकांतील या नाटकाबाबतचे आकर्षण कायम आहे. वि. वा. शिरवाडकर यांनी ‘किंग लिअर’ या शेक्सपिअरच्या नाटकावरून प्रेरणा घेऊन हे नाटक साकार केले, याबाबत दुमत नाही. त्यामुळेच ‘किंग लिअर’ आणि मराठी प्रेक्षक यांचा सूर फारसा का जुळला नाही आणि नटसम्राटाबरोबर तो बेमालूमपणे का जुळला, असा प्रश्न पडतो. कारण मराठीमध्येही ‘किंग लिअर’चे रंगमंचावर सादरीकरण क्वचितच झाले होते. बहुधा स्पर्धेमध्येच भुताडिया यांनी केले होते. लिअर हा राजा आहे, तर गणपतराव बेलवलकर रंगभूमीवरील नटसम्राट. दोघे आता आपल्या त्या मानाच्या स्थानावर नाहीत, कारण लिअरने राज्याची वाटणी दोन मुलींमध्ये केलेली आहे; तर निवृत्त नटसम्राटाचा सत्कार होतो आहे आणि त्याने सत्काराचे वेळी मिळालेली रक्कम, तसेच आपली सारी संपत्ती आपल्या मुलाला व मुलीला देऊन टाकली आहे. म्हणजे आता दोघांकडेही आपले असे काहीही राहिलेले नाही. पण येथेच मुख्य फरक आहे. नटसम्राटाबरोबर त्याची बायको कावेरी- जिला तो सरकार म्हणतो, ती- आहे. लिअरबरोबर मात्र फक्त त्याचा फूल (विदूषक) आहे. केंट हा लिअरचा खरा भक्तही राजाने हाकलून दिले तरी, वेश पालटून त्याच्याबरोबर आहे. आपण बापावर किती प्रेम करतो, हे रंगवून सांगणाऱ्या ज्या दोन मुलींमध्ये लिअरने राज्य वाटले (आणि धाकटीने मात्र तसे खोटे बोलण्यास नकार दिल्याने तिला बेदखल केले), त्यातील मोठी गॉनरिल त्याला त्याचा लवाजमा कमी करायला सांगते, ते मान्य न केल्याने तो दुसऱ्या मुलीकडे रीगनकडे जायला निघतो, पण ती तर त्याला लवाजमा आणखीच कमी करायला सांगते. ते मान्य नसल्याने तो भरकटत असतो.

नटसम्राट बेलवलकरही काही काळ मुलाबरोबर राहतात. तिथे त्यांच्या नाटकाच्या सवयींमुळे- म्हणजे नातीसाठी, म्हणजे त्यांच्या लाडक्या ठमीसाठी- मोठ्या आवाजात बोलणे, प्रेमाने लबाड-ढालगज-गधडी असे म्हटले, तरी त्या शब्दांना शिव्या समजले जाते. त्यावरून त्यांना खडसावण्यात येते. त्याशिवायही बरेच काही ऐकवले जाते. यात त्यांच्या मुलाची भूमिका दुय्यम असते; कटू बोलण्याचे काम सून शारदाच पार पाडत असते, तो फक्त अधून-मधून दुजोरा देत आपण तिच्या बाजूचेच असल्याचे दाखवून देत असतो. कावेरी त्यांना तिथून बाहेर पडण्याचा आग्रह करते. बेलवलकर म्हणतात : कुठे जाणार सरकार? मी तर असा लुळा पांगळा. त्यावर ती विचारते : माझ्यावर भरवसा नाही का? ते म्हणतात : तुमच्यावरच्या भरवशाशिवाय काय शिल्लक राहिलंय माझ्याजवळ? ती ‘आपण नलूकडे जाऊ, राहीनगरला’, पहाटेच्या गाडीनं म्हणून सांगते. त्यावर ते : ‘आणि आजची रात्र?’ असा प्रश्न करतात. त्याच्या उत्तरातच कावेरीचे मन आणि बेलवलकरांवरचे प्रेम प्रकट होते. ती म्हणते : स्टेशनवर काढू; रस्त्यावर झाडाखाली राहू; पण इथं नाही. तुमचा अपमान एखादे वेळी तुम्ही सहन कराल, पण मी नाही करायची.

नंतर मुलीकडेही चोरीचा संशय घेतल्यामुळे, आधार देणाऱ्या पत्नीच्या निधनानंतर भ्रमिष्ट झाल्याने ते तिथूनही बाहेर पडतात. लिअरला असा आधारही नाही, त्यामुळे दिलासाही नाही. राजवाड्याबाहेर पडण्याचा निर्णय त्याचा त्यानेच घेतल्याने तो बाहेर पडला आहे. तो बाहेर पडल्यावर त्याच्या मुली गॉनरिल आणि रीगन त्याच्या स्वभावाबाबत बोलतात. ‘कॉर्डिलियावर त्यांचे सर्वाधिक प्रेम होते, तिलाच त्यांनी अविचाराने टाकून दिले आहे. तो कदाचित त्यांचा म्हातारचळ म्हणता येईल. पण एरवीही स्वतः काय करतो आहोत, हे कळण्याची त्यांची कुवत बेताचीच होती,’ असे रीगन म्हणते. त्यावर गॉनरिलही ‘अगदी उभारीच्या काळातही त्यांचा स्वभाव अतिरेकी होता आणि आता त्याच्या जोडीला या व्याधिग्रस्त आणि शीघ्रसंतापी वयाबरोबर येणारा दुर्दम्य असा हट्टीपणा आपण गृहीत धरला पाहिजे,’ असे सांगते. आणि नंतर ‘आता आहेत त्याच स्थितीत ते अधिकार गाजवू लागले, तर त्यांनी नुकताच केलेला तो सत्तात्याग हा आपल्याला अपायकारक ठरायचा, म्हणून आपणच काही तरी केलेच पाहिजे आणि तेही तापलेले आहे, तोवरच’ असे म्हणते. बेलवलकर कावेरीसह त्यांच्या लाडक्या कोकराकडेम्हणजे मुलीकडे येतात. तिथेही त्यांचे नाट्यप्रेम आणि गणपतराव जोशांवरील भक्ती आड येते. कारण ते गणपतरावांबद्दल एकही उणा शब्द ऐकून घेण्यास तयार नसतात अन्‌ जावयाच्या साहेबाला घराबाहेर जायला सांगतात.

नाटकप्रेमी विठोबा हाच तिथे काही प्रमाणात दिलासा असतो, जसा लिअरला विदूषकाचा. पण बाहेरची भजी खाणे, पसारा करणे अशा सवयींनी त्यांना घराबाहेर आउटहाऊसमध्ये हलवले जाते. कावेरी आजारी पडते. पण तिथे गेल्यावरही त्यांच्यावर चोरी केल्याचा संशय मुलगी घेते आणि त्यांना नाही, तर कावेरीला हा अपमान असह्य होतो. त्या धक्क्याने ती मरण पावते. एकाकी आणि काहीसे भ्रमिष्ट बेलवलकर गावी म्हणजे मोरवाडीला जायला निघतात; तर लिअर मुलींच्या अटी अमान्य असल्याने जायला निघतो. इथून नंतर मात्र लिअर आणि बेलवलकरांचा प्रवास अन्‌ वादळासारखे प्रसंग हे खूपसे सारखे आहेत. कॉर्डिलिया त्यांची अवस्था कळल्यानंतर फौजांसह त्यांच्या शोधात असते. तसेच बेलवलकरांची मुलेही त्यांचा शोध घेत असतात. दोन्ही नाटकांत शोध पूर्ण होतात, पण अपेक्षित सुखद शेवट मात्र होत नाही. मग नटसम्राटलाच मराठी प्रेक्षकांनी का पसंती दिली असावी, असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणून चटकन ध्यानात येतो, या दोन नाटकांतील मुख्य पात्रे म्हणजे लिअर आणि बेलवलकर यांच्या अवकाशाचा फरक.

लिअर हा एका देशाचा राजा आहे, तर बेलवलकर हे रंगभूमीवरील सम्राट. अर्थातच लिअरचा आवाका मोठा तर नटसम्राटाचा मर्यादित असणे साहजिक आहे. दुसरे असे की- किंग लिअरमध्ये ग्लॉस्टरचे दुय्यम, पण तसे समांतर कथानक आहे. त्यामुळे ते नाटक पाच अंकी आहे. तीन अंकांच्या नटसम्राटमध्ये मात्र तसे नाही. लिअरमध्ये लिअर आणि ग्लॉस्टर दोघांचाही कटू अनुभव आहे, तर नटसम्राटमध्ये बेलवलकरांचा. लिअरबरोबर केंट आणि विदूषक असले, तरी ते त्याचे नोकरच आहेत. उलट बेलवलकरांबरोबर त्यांची पत्नी आहे. तीच त्यांचा आधार आणि काळजीवाहक आहे. लिअरने मोठ्या मुलींना राज्य देऊन धाकटीला बाहेर काढल्यावर, ‘राजा तू करतो आहेस, ते अनिष्ट आहे’, असा इशारा देऊन केंटने भविष्याची सूचना दिली आहे; तर कावेरीनेही त्यांनी मुलांना सारे काही देऊन टाकल्यावर त्यांना ‘माणसं वाईट नसली तरी म्हातारपण वाईट असतं. पुढचं वाढलेलं ताट द्यावं, पण बसायचा पाट देऊ नये माणसानं’ असे सुनावले होते. (तेव्हाच खरे तर पुढे काय होणार, याची सूचना दोन्ही नाटककारांनी दिली आहे.) पण राजा केंटला हाकलून देतो व नंतरही स्वतः होऊन राजवाडा सोडतो, पण बेलवलकर मात्र कावेरीबरोबरच मुलाकडे राहतात. हाच मुख्य फरक आहे. कारण कावेरी ही बेलवलकरांचा आधार आहे. तेच म्हणतात की, ती म्हणजे त्यांच्यासारख्या गलबताचे बंदर आहे. विसाव्यासाठी येण्याचे ठिकाण आहे. त्यांचे सारे काही समजून घेणारी आणि त्यांची जिवापाड काळजी घेणारी आहे.

उलट, केंट व विदूषक आणि काही प्रमाणात ग्लॉस्टरही लिअरची काळजी घेणारे आहेत; पण पत्नीप्रमाणे ते त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणारे असले, तरी प्रसंगी दटावू शकणारे नाहीत. तो हक्क जो कावेरीला आहे, तो त्यांना नाही. इथेच या नाटकांची वाट वेगळी होते. नटसम्राट हे बऱ्याच प्रमाणात कौटुंबिक स्वरूपाचे होते (आणि मराठी प्रेक्षकांची कौटुंबिक नाटकांची आवड वारंवार सिध्द झाली आहे- अगदी ती नाटके पूर्ण मेलोड्रामा असली तरी!) नटसम्राटमध्ये दुसऱ्या अंकाच्या पहिल्या प्रवेशाच्या सुरुवातीचा आणि तिसऱ्या प्रवेशातील कावेरीबरोबरचे बेलवलकरांचे संवाद त्या दोघांमधील बंधाची कल्पना देऊन जातात. त्यात थट्टा-विनोद, थोडा प्रेमालाप, लटका रुसवा- फुगवा आहे आणि त्याबरोबरच एक-दुसऱ्याबद्दल वाटणारी काळजी स्पष्ट करणारे, तसेच कावेरीचा समजूतदारपणा, त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात बेलवलकरांचे कावेरीवर असणारे अवलंबित्वही दाखवणारे आहे. पहिल्या प्रवेशात तिची मुलीवरची माया स्पष्ट दिसते. स्टेशनवर त्यांना घेण्यासाठी कोणीच आलेले नाही, हे पाहून बेलवलकर त्रागा करतात तेव्हा ती समजावते : असं व्हायचं नाही. काही तरी गोंधळ झाला असला पाहिजे- तुम्हाला पाणी हवंय ना? उगीचच उन्हामध्ये तापत उभे राहिलात. आणि त्यांना पाणी देऊन म्हणते : रात्री डोकं ठणकायला लागलं तर... मग बेलवलकर तिचं वाक्य पुरं करतात : दाबून देणार नाही. हे करणार नाही, ते करणार नाही. पृथ्वीच्या आरंभापासून बायकांचे ब्रीदवाक्य आहे हे...

तिसऱ्या अंकात त्यांना घराबाहेर आउटहाऊसमध्ये ठेवले जाते, तेव्हा कावेरी म्हणते : आपण इथं राहू नये, असं वाटतंय मला. बेलवलकर विचारतात : आणि जायचं कुठं? तेव्हा ती सांगते : आपण आपल्या गावी जाऊन राहू. मोरवाडीला. ते विचारतात : तुला त्रास होतोय कावेरी? तेव्हा ती म्हणते : तुम्हाला कळत नाही का? पण बेलवलकर सांगतात : मुलं वाजवीपेक्षा जास्त सभ्य आहेत. मनात काही आलं तरी ती बाहेर बोलत नाहीत. आपणही आपल्याला काही कळतच नाही असं दाखवावं आणि हाताला लागेल ती फांदी घेऊन लोंबकळत राहावं, यातच शहाणपण आहे. तेव्हा ती स्पष्टपणे सांगते : नको. या अवस्थेत माझी तब्येत कधी सुधारायची नाही. आणि नंतर त्यांना समजावते : आपण दूर झालो, वाडीला जाऊन राहिलो, तर त्यांच्या मायेला पारखं होण्याचा प्रसंग यायचा नाही. प्रेम टिकायलादेखील माणसं जरा दूरच असावी लागतात. त्यावर ते म्हणतात : तुमचं म्हणणं बरोबर आहे.... नली, माझं कोकरू, नाचत-बागडत येईल माहेरी आपल्याकडे... मग नंदा आणि शारदाही येतील माझ्या ठमीला घेऊन. माझ्या मनातून, सरकार... ठमी जातच नाही... बस, ठरलं. वाडीला जायचं. नशीब की, वाडीतलं घरटं आपण कुणाला देऊन टाकलं नाही. पण आता त्याची काय दशा झाली असेल, कुणास ठाऊक! त्यावर कावेरी म्हणते : त्याची काळजी नको. हे घर सुटलं ना की, माझा बिछानाही सुटेल. मी माझ्या हातानं भिंती लिंपून काढेन, जमीन सारवीन, रंगदेखील मीच देईन. एकदा कमरेला पदर बांधला की, खोपट्याचाही राजमहाल करीन मी. आपण मात्र मधे-मधे लुडबूड करायची नाही, की माझ्या अंगावर ओरडायचं नाही- आधीच सांगून ठेवते! आणि पैशाची गोष्ट निघताच आपण चंद्रहार विकून आलेले पैसे ट्रंकेत ठेवले आहेत, असे सांगते.

मग बेलवलकर म्हणतात : एक शेत आहे अजून. त्यावर ती म्हणते : मग शेतीची अवजारं घेऊ, बैल घेऊ. आणि मग .. तुम्ही स्वतः शेतकरी व्हायचं... ते या कल्पनेने सुखावतात आणि मग त्यावर तिथे गेल्यावर काय काय करायचे यावर त्यांचे बोलणे होते. त्यातच ते तिला सांगतात की- बायको मैत्रीण असू शकते, असतेही. पण मैत्रिणीपेक्षाही आई अधिक असते. दिवाणखाना कमी असतो, पण देऊळ जास्त असते. आकाश कमी असते, पण पृथ्वी अधिक असते. थोडक्यात, बायको हे बंदर असतं कावेरी, नवरा नावाच्या गलबतासाठी... गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो, पराजयाचं सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं. अशी आहे बंदराची महती- म्हणजे बायकोची- म्हणजेच तुझी. त्यांच्या या संवादातूनच लिअर आणि त्यांच्यातला फरक स्पष्ट होतो. कारण बेलवलकरांच्या गलबताला भरकटलं तरी बंदर आहे, लिअरचं गलबत भरकटलेलं असलं तरी त्याला असं बंदर नाही. त्यामुळेच कावेरीच्या निधनानंतर त्यांचे- नटसम्राटाचे भ्रमिष्ट आणि सैरभैर होणे, हे ओढूनताणून आणलेले न वाटता स्वाभाविक वाटते. त्यापूर्वी त्यांच्यावर मुलीनेच घेतलेला चोरीचा संशय आणि ती करत असलेले त्याचे समर्थन यामुळे सात्त्विक संताप आलेले बेलवलकर म्हणतात : मी पैसे चोरले? सरकार, तिला माहीत आहे- माझ्या क्रोधाला पाय नाहीत, हात नाहीत, लुळा पांगळा आहे तो. वडाऱ्यांनी अर्धवट चिरलेलल्या डुकराचं धड नुसतं- गटारात तडफडणारं!

मी पैसे चोरले? नाही सरकार, मी रागावणार नाही. काय उपयोग आहे त्याचा? मी रागावणार नाही, पण तुम्हाला सांगून ठेवतो, मी रडणारही नाही. डोळ्यांत आसवं जमायला लागली तरी खिळे मारून डोळ्यांच्या खाचा करीन संभाजीसारख्या. पण तुझ्यासारख्या आळईसमोर रडणार नाही. मी पैसे चोरले? मी पैसे चोरले? आणि त्यावर मुलगी बेभानपणे ‘होऽहोऽ तुम्ही चोरले!’ असे म्हणून हाताने डोके दाबून निघून जाते. त्यानंतर बेलवलकर म्हणतात : मी चोर आहे! (छातीवर हात आदळत) मी चोर आहे! मी अप्पा बेलवलकर, नटसम्राट, लक्षावधीची मालमत्ता गुलाल- बुक्क्याप्रमाणे ज्यानं उधळून दिली, तो हा गणपतराव बेलवलकर चोर ठरला- आपल्या पोरांच्या घरांमध्ये! परमेश्वरा, मी इतर सारं काही सहन केलं असतं- पण हे... त्यांचे हे शब्द ऐकताच आजारी कावेरी भिंतीचा, कॉटचा आधार घेत त्यांच्या जवळ येते आणि ‘ऐकलंत का?’ असे विचारते. त्यावर बेलवलकर क्षीण स्वरात ‘काय म्हणतेस?’ असा प्रश्न करतात. आणि मग कावेरी म्हणते : सारी दुनिया आपल्यासाठी संपली आहे आता. आपण दोघंच उरलो आहोत. आपण दोघंच. एकमेकांसाठी. माझ्या गळ्याची शपथ आहे, मी सांगीन ते ऐकायचं. तेव्हा ते म्हणतात : काहीच समजत नाही, सरकार. आणि मग कावेरी त्यांना म्हणते : माझ्या काळजाच्या चिंध्या होताहेत. पण मी जगणार आहे- तुमच्यासाठी. मी बरी असते तर एक क्षणभरही हे सहन केलं नसतं. नंदाच्या घरातून बाहेर पडले तशी तुम्हाला घेऊन या क्षणाला बाहेर पडले असते. पण या आजारामुळे मी अगतिक झाले आहे, लाचार झाले आहे.

मला माझा भरवसा वाटत नाही. म्हणून सांगते, ऐकताहात ना? आजची रात्र इथे काढू. कोणाला तरी बरोबर घेऊन उद्या सकाळीच आपण मोरवाडीला जाऊ. मी बंगल्यात जाऊन येते. एकदा तिला स्पष्ट विचारते, काय तुझ्या मनात आहे म्हणून. आम्ही घर सोडायला तयार आहोत, पण असा अभद्र शिक्का आमच्या कपाळावर मारू नकोस... मी पायांवर डोकं ठेवून तिची विनवणी करीन. बये, तुझ्याजवळ कधी काही मागितलं नाही, पुढेही मागणार नाही. पण आज पदर पसरते तुझ्यापुढे. एखादा माणूस बरोबर दे आणि आम्हाला मोरवाडीपर्यंत पोचवण्याची व्यवस्था कर. आम्ही आमची थेरडी थोबाडं तुझ्या संसारात पुन्हा कदापिही दाखवणार नाही. पण तुम्ही बसायचं इथं! माझी शपथ आहे. डोकं फिरवून घ्यायचं नाही. मला थोडं बरं वाटलं ना, म्हणजे मी वाटेल तेवढे आयाससायास करीन. मोरवाडीला गेल्यावर सुखा-समाधानाचं देऊळ उभं करीन माझ्या देवासाठी. हे सारं अमंगळ स्वप्न आपण विसरून जाऊ. माझी कूस वांझ राहिली, असंच मी समजते. आपली साथ आहे, तोपर्यंत कशाचीही पर्वा नाही मला.

मी मनानं खचले नाही. तुमचा आधार मिळाला, तर कुठल्याही वादळवाऱ्यात दगडासारखी उभी राहीन- कुठल्याही काळोखातून तुमच्यासाठी रस्ता काढीन. पण माझं एवढं ऐकायचं- तुम्ही शांत राहायला हवं- ऐकाल ना? नाटकातील तिच्या या पहिल्याच दीर्घ संवादातून कावेरीची जिद्द प्रकर्षाने प्रकट होते. ती आजारी आहे आणि तरीही मुलीचे घर सोडून जायचा आग्रह करत आहे, कारण चोरीचा आरोप तिला असह्य झाला आहे. आणि नंतरही खरोखरच काय झाले आहे हे कळल्यावर अगतिकपणे सांगते : माझं ऐकायचं. ते विचारतात : काय सांगणार आहेस? ती सांगते : मुलीचा गैरसमज झाला. पण पोरीचा जीव बावरून गेला होता. आपले हाराचे पैसे ट्रंकेमध्ये होते. तिला या पैशांचं काहीच माहीत नव्हतं. तिला वाटलं... पण त्यांच्या संतापचा पुन्हा उद्रेक होतो. मुलगी धावत जाऊन त्यांच्या पायावर हात ठेवत व ‘अप्पा’ मी चुकले! मला क्षमा करा, अप्पा, तुमच्या या कोकराला क्षमा करा!’ तसे म्हणते तेव्हा पुन्हा त्यांचा संयम संपतो आणि ते म्हणतात : खबरदार चांडाळणी, त्या शब्दांचा उच्चार करशील तर! माझं एक लाडकं कोकरू होतं. होतं, पण आता कुठं आहे ते? माझा भ्रम होता तो. गोजिरवाण्या कोकरासारखी मुलगी होती. एक सशासारखा मुलगा होता. पण खरं म्हणजे ते माझे कोणीच नव्हते. आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पाहा- ते सांगतील, कोणीही कोणाचं नसतं.

अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यानं पृथ्वीवरच्या मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं की, आम्ही बाप झालो- आई झालो. पण खोटं सगळं खोटं! आपण फक्त जिने असतो, फक्त जिने! आणि ते खुर्चीवर कोसळतात. तेव्हा कावेरी उठून त्यांच्याकडे येण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणते : माझं एकदा ऐकायचं- मला आता हे सहन होत नाही- छातीत कळ येते आहे- पण- आजची रात्र इथं काढायला हवी. उद्या सकाळीच आपण मोरवाडीला जाऊ- मी खचले नाही- मी तिथं तुमच्यासाठी- तुमच्यासाठी- आई गं! असं म्हणत कोसळते तेव्हा ते ‘सरकारऽऽ सरकारऽऽ’ असं ओरडत तिच्याकडे जातात. पण ती तेव्हाच गेलेली असते, हे नंतरच्या अंकाच्या सुरुवातीला कळते. नंतरच्या तिसऱ्या अंकातील दुसऱ्या प्रवेशापासून पुढे सारे नाटकच बेलवलकरांचे आहे. लिअरप्रमाणे भटकताना ते म्हणतात : घर देता का घर, एका तुफानाला कुणी घर देता का घर...? आणि शेवटी : तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैलीमधली भेट नको. एक हवं लहान घर, पंख मिटून राहण्यासाठी... एक हवी आरामखुर्ची, तुफानाला बसण्यासाठी... आणि विसरू नका बाबांनो, एक तुळशीवृंदावन हवं, मागच्या अंगणात- सरकारसाठी!

सरकारऽ सरकारऽऽ यातूनच त्यांची अगतिकता स्पष्ट होते. कावेरीविना ते असहाय बनले आहेत हे कळते आणि कावेरीचे महत्त्व आपोआपच अधोरेखित होते. हाच या दोन नाटकांतला जाणवण्याजोगा फरक आहे. कारण लिअरला आधार देण्यासाठी कॉर्डिलिया आलेली आहे, पण पराभवानंतर दोघेही अटकेत आहेत आणि तिथेच तिचा अंत होतो. त्यानंतर बेलवलकरांना आधार देतो बूट पॉलिश करणारा राजा. लिअरला ज्याप्रमाणे केंटचा आहे, तसा. पण विठोबाने त्यांना शोधून काढल्यावर सांगतो की, सर्व मंडळी येत आहेत. तेव्हा ते विचारतात : सर्व? विठोबा उत्तरतो : होय, सर्व. मग ते विचारतात : ठमीसुध्दा? तेव्हा तो हो म्हणतो आणि सांगतो : नाही म्हटल्यावर आकांत केला पोरीनं आणि आधीच जाऊन बसली गाडीत. (ठमीच्या रूपाने नाटकात कौटुंबिक जिव्हाळा आणि वात्सल्याचाही शिडकावा आहे.) त्यावर ते म्हणतात : आणि- आणि खरं सांग, सरकार... माझी कावेरीही आहे त्यांच्याबरोबर? तेव्हा तो डोळे पुसताच म्हणतात : तू रडतो आहेस हो- मला आठवलं- कावेरी जिवंत नाही. कॉर्डिलियासारखी मेली आहे ती. परमेश्वरा, घोड्याला, उंदराला जिवंत राहता येतं आणि माझ्या कावेरीला मात्र नाही- ती आता कधीच परत येणार नाही! कधीच नाही! कधीच नाही! आणि शेवटी मुलगी विचारते : तुमच्या कोकरावरचा तुमचा राग अजून गेला नाही? त्यावर ते सांगतात : रागालोभाची किल्मिषं आता माझ्या मनात शिल्लकच राहिली नाहीत.. मी कोणावरही रागावलो नाही. चैत्रातली सोनेरी सकाळ माझ्या अंगातून झिरपते आहे.

नव्या नाटकाचा पडदा वर जायची वेळ आहे ही. तिसरी घंटा वाजते आहे. धुपाचा सुवास हवेत दाटला आहे. ऑर्गनवरून नांदीचे सूर ऐकू येत आहेत... आणि माझी नटी तर आगंतुकपणे अगोदरच स्टेजवर जाऊन बसली आहे- माझी वाट पाहत. राजानं मला सांगितलं आहे, हे थिएटर आहे म्हणून. (लिअरलाही कॉर्डिलियाने सांगितले आहे की तुम्ही फ्रान्समध्ये नाही, तुमच्याच भूमीवर आहात.) बस, आणखी काय हवं? राजा, माझ्याजवळ ये बाळ. ठमे, तूही ये भवाने. (दोघांना जवळ घेतात) नटाजवळ शेवट शिल्लक राहते ते फक्त नाटकच. कर्णानं आपला सोन्याचा दात काढून दिला; मी नाटकाशिवाय काय देणार तुम्हाला? मुलगा त्यांना घरी यायला सांगतो तेव्हा रागावून ते म्हणतात : दूर व्हा! मी सांगतो, दूर व्हा. या प्रार्थना निरर्थक आहेत. दया दाखवा म्हणून हा ज्यूलियस सीझर कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया दाखवत नाही. त्याच्या अढळपदाला तोड नाही... ते पाहा मारेकऱ्यांनी आपल्या कट्यारी उपसल्या आहेत, मला- ज्यूलियस सीझरला मारण्यासाठी. मला चहूबाजूंनी घेरलंय त्यांनी. तो मारेकरी ओरडतोय- मारा, मारा कट्यारी चालवा- (स्वतःच्या छातीवर कट्यारी मारल्याचा आविर्भाव करतात) चालवा कट्यारी! (धडपडत पुढे जातात.) ओह! (एक कट्यार लागल्याचा अभिनय करीत) कोण- कोण - ब्रूटस तूसुधध्दा? - मग मर - सीझर मर - (खाली कोसळतात. सगळे धावतात.) राजा धावत जाऊन, ‘बाबाऽ असे म्हणून त्यांच्याजवळ बसतो, तेव्हा ते म्हणतात : असं नाटक असतं- राजा- असं- आणि पडदा पडतो.

नटसम्राट बेलवलकरांचा मृत्यू लिअरप्रमाणे मंचावर प्रत्यक्ष न दाखवता (ते खाली कोसळतात आणि नंतर ‘असं नाटक असतं, राजा, असं नाटक असतं...’ असं म्हणतात.) फक्त सूचित केला आहे, (तोही त्यांची मुले, नात इ. सर्व जण आजूबाजूला असताना.) कदाचित म्हणूनच हा शेवट अधिक परिणामकारक झाला असावा. कारण तिन्ही मुली आणि लिअरच्या मृत्यूनंतरही किंग लिअरमध्ये एडगर अन्‌ केंटचे संवाद आहेत. किंग लिअर पाहिल्यावर ध्यानात राहतो लिअर, मात्र नटसम्राट पाहिल्यावर नटसम्राटांएवढीच कावेरीही लक्षात राहते!

आ. श्री. केतकर

(संदर्भ आणि आधार : नटसम्राट : वि. वा. शिरवाडकर आणि राजा लिअर : विंदा करंदीकर)

Share on Social Media

दृष्टिक्षेप

21 लेसन्स फॉर 21 सेंच्युरी युवाल नोहा हरारी (गुगल मुलाखत)

नीलांबरी जोशी

हरारीनं कोणत्या स्वरूपाच्या नोकऱ्या वाढतील, त्याचाही ऊहापोह केला आहे. उदाहरणार्थ- डॉक्टर्सच्या नोकऱ्या किंवा व्यवसाय संपेल हे खरं असलं, तरी नवी औषधं आणि शस्त्रक्रियेच्या पध्दती शोधणं ही संशोधनाची कामं खूप वाढतील. पण या नव्या नोकऱ्यांमध्ये विशिष्ट कौशल्यं आणि नैपुण्याची गरज असेल. कामाच्या बाबतीतल्या अशा बदलांना प्रत्येक माणसाला भावनिक/मानसिक पातळीवर तोंड देणं त्रासदायक ठरेल. यावर उपाय म्हणून माणूस- एआय यांनी एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं ठरेल. औषधांपासून ते ध्यानधारणेपर्यंत अनेक तंत्रं तो ताण कमी करण्यासाठी वापरावी लागतील, असं हरारी सुचवतो. हरारीनं मांडलेली दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे- पर्सनलायझेशन सर्च आणि त्यातून अटेंशन इकॉनॉमीला मिळणारी चालना.

समजा, दोन लहान मुलांना चेंडूशी खेळताना भान राहिलं नाही आणि ती चेंडूच्या मागे रस्त्यावर धावत आली, तेव्हाच तिथून एक स्वयंचलित मोटारगाडी चालली आहे. गाडीचा मालक मागच्या सीटवर शांतपणे झोपला आहे. जर स्वयंचलित गाडीनं त्या दोन मुलांना वाचवण्यासाठी अचानक बाजूच्या लेनमध्ये गाडी घुसवली, तर समोरून येणाऱ्या ट्रकला ती गाडी धडकेल. गाडीचा मालक तत्काळ गतप्राण होईल. जर गाडी त्याच लेनमधून जात राहिली, तर ती दोन मुलं मरण पावतील. अशा वेळी स्वयंचलित गाडी चालवण्यासाठी त्या गाडीला कृत्रिम बुध्दीमत्ता वापरून जो अल्गॉरिदम प्रोग्राम करून द्यायचा आहे, तो कोणता द्यावा? गाडीच्या मालकाचा जीव वाचेल असा, का त्या मुलांचा जीव वाचेल असा? कृत्रिम बुध्दीमत्ता हा आजच्या जगातल्या परवलीचा शब्द झाला आहे. युवाल नोहा हरारी या प्रसिध्द लेखकानं याच कृत्रिम बुध्दीमत्तेचे संभाव्य फायदे-तोटे सांगताना एका मुलाखतीत हे उदाहरण दिलं आहे. गुगलमधल्या एका अधिकाऱ्यानं हरारीची घेतलेली ही मुलाखत यु-ट्यूबवर उपलब्ध आहे.

हरारीनं ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहासातली डॉक्टरेट मिळवली आहे. तो जेरुसलेममधल्या विद्यापीठात इतिहास या विषयाचा प्राध्यापक आहे. बिल गेट्‌सपासून बराक ओबामांपर्यंत त्याचा फॅन क्लब आहे. हरारीनं मुलाखतीत मांडलेल्या मोटारगाडीबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर एलॉन मस्क या उद्योजकाला स्वयंचलित गाड्या तयार करताना शोधावं लागलं होतं. त्यासाठी 2015 मध्ये त्यानं काही लोकांच्या मतांची चाचपणी केली होती. ते करताना पादचाऱ्यांना मारून टाकणारी आणि मालकाला वाचवणारी गाडी बनवावी; का पादचारी वाचले पाहिजेत, मग मालक मरण पावला तरी चालेल अशी गाडी तयार करावी- असा प्रश्न त्यानं निवडक लोकांना विचारला. जर अशी परिस्थिती आली तर पादचाऱ्यांना वाचवावं, मग गाडीचा मालक मृत्युमुखी पडला तरी चालेल, असं त्यातल्या अनेक जणांनी उत्तर दिलं. पण ‘प्रत्यक्षात गाडी घ्यायची वेळ आली, तर कोणती घ्याल?’ असा प्रश्न विचारल्यावर मात्र ‘जी मालकाला वाचवेल, तीच गाडी विकत घेऊ’ असं सांगितलं.

एकूणच अनेकांची नैतिक, धार्मिक, राजकीय गोष्टींबद्दलची आदर्श विचारसरणी आणीबाणीच्या प्रसंगात वागताना मात्र तितकीशी आदर्श राहत नाही, हे हरारीनं आपल्या ‘21 लेसन्स फॉर 21 सेंच्युरी’ या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे. आजच्या ग्राहककेंद्रित अर्थव्यवस्थेत मस्कची टेस्ला ही कंपनी स्वयंचलित मोटारगाड्यांची कदाचित दोन प्रकारची मॉडेल्स तयार करेल. त्यातून ग्राहकाला योग्य वाटेल ते मॉडेल तो विकत घेईल, असं हरारी पुढे म्हणतो. ‘सेपियन्स’ या आपल्या पहिल्या पुस्तकात हरारीनं मानवजातीच्या इतिहासाचं अत्यंत मर्मभेदी विश्लेषण केलं होतं. ‘होमो ड्युस’ या त्यानंतरच्या पुस्तकात हरारीनं मानवाच्या भवितव्याचा वेध घ्यायचा प्रयत्न केला होता. या दोन्ही पुस्तकांचे 45 भाषांमध्ये अनुवाद होऊन 1.2 कोटी प्रती आजवर अनेक देशांमधल्या लोकांपर्यंत पोचल्या आहेत. ‘21 लेसन्स फॉर 21 सेंच्युरी’ हे पुस्तक आपण का लिहिलं, यावर हरारीनं लिहिलेलं मनोगत विचारांना चालना देणारं आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या जगात निश्चित अशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे- अनिश्चितता. कृत्रिम बुध्दिमत्ता आणि त्यावर आधारित यंत्रमानव यामुळे वाढणारी बेरोजगारी, बदललेल्या कामांच्या स्वरूपाबाबत अनिश्चितता, दहशतवाद किंवा पर्यावरणातले बदल यामुळे सतत मृत्यूची टांगती तलवार, आर्थिक-राजकीय- सामाजिक-सांस्कृतिक समजुतींना अकस्मात धक्के देणारे बदल हे सतत चालू आहे. पण मुळात या बदलांची सामान्य लोकांना अजिबात कल्पना नसते. त्या अज्ञानाची हरारी दोन कारणं देतो. यापैकी पहिलं कारण म्हणजे, अनेकांना हे ज्ञान मिळवणं शक्यच नसतं. मुंबईच्या झोपडपट्टीत दोन मुलांच्या दोन वेळेच्या घासासाठी झगडणारी माऊली; मध्य समुद्रात भरकटलेले आणि आपल्याला पडाव टाकायला हक्काचा जमिनीचा तुकडा कुठे दिसतो आहे का, हे शोधणारे निर्वासित, अपघातात जखमी होऊन इस्पितळात शेवटचा शोस घेण्याची धडपड करणारा जीव यांच्यापुढे जागतिक तापमानवाढ किंवा लोकशाहीची मूलतत्त्वं याचा विचार करण्यापेक्षा खूप गंभीर समस्या आहेत.

अशा लोकांना शिकवण्यासाठी माझ्या पुस्तकात कोणतेच धडे नाहीत; उलट दुर्दम्य इच्छाशक्ती मीच त्यांच्याकडून शिकेन, असं हरारी म्हणतो. पण ज्यांना आपल्या भोवताली काय चाललं आहे त्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी वेळेची गुंतवणूक करण्याची इच्छा आणि सवय नाही, त्यांच्याबद्दल मात्र हरारीनं असे उद्‌गार काढले आहेत; आपल्याला त्याहून खूप महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात. आपल्याला आपल्या कामावर जायचं असतं, मुलांना वाढवायचं असतं किंवा पालकांचा सांभाळ करायचा असतो. इतिहास मात्र आपल्याला सवलत देऊ शकत नाही. तुम्ही गैरहजर असलात तरी मानवतेचं भवितव्य ठरत जातंच. पण त्याचे परिणाम मात्र तुम्हाला सगळ्यांनाच भोगावे लागतात. प्रत्येकानं दिवसातून थोडा वेळ तरी आजूबाजूच्या घटनांकडे सजगपणे पाहावं, बदल घडवून आणणारी काही तरी कृती करावी- असं हरारीनं सुचवलं आहे. तुमची एक कृती काय घडवू शकते याचं ‘मी टू’ चळवळ हे उत्तम उदाहरण आहे. मिलानो या अमेरिकन महिलेलं 15 ऑक्टोबर 2017 रोजी मी टू हा हॅशटॅग वापरून टि्वट केलं.

दिवसभरात 2 लाख महिलांनी तो हॅशटॅग टि्वटवर वापरला. त्याच विषयावर फेसबुकवर 24 तासांत 47 लाख लोकांनी 1.20 कोटी पोस्ट टाकल्या होत्या. जगभरातल्या कोट्यावधी स्त्रियांनी यानंतर कामाच्या ठिकाणी आपल्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडली. जगाबद्दलच्या अज्ञानाचं हरारीनं मांडलेलं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, नॉलेज इल्युजन. उदाहरणार्थ, एका ग्रुपमध्ये ‘पेन कसं चालतं?’ हे विचारलं. तेव्हा जवळपास सगळ्यांना आपण ते सांगू शकू, याबद्दल आत्मविेशास वाटत होता. पण त्या प्रक्रियेबद्दल सविस्तर सांगा, असं म्हटल्यावर अनेक जणांना ते माहिती नव्हतं असं लक्षात आलं. स्टीव्हन स्लोमन आणि फिलीप फर्नबाक या मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या दोन संशोधकांनी या प्रकाराला ‘द नॉलेज इल्युजन’ असं नाव दिलं आहे. आज जगात सभोवताली काय चाललं आहे, त्याबद्दलचं आपलं अपुरं ज्ञान किंवा पुरेपूर अज्ञान कोणी मान्य करत नाही. इतर सर्वांकडचं ज्ञान आपलंच आहे, असं आपण मानून चालतो. त्यामुळे निर्माण होणारं नॉलेज इल्युजन कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या विषयांची ओळख हरारीनं या पुस्तकात करून दिली आहे.

पुस्तकाच्या तंत्रज्ञानाबाबतची आव्हानं, या पहिल्या भागात भ्रमनिरास, काम, स्वातंत्र्य, समानता; राजकारण- विषयक दुसऱ्या भागात समूह, सिव्हिलायझेशन, राष्ट्रवाद, धर्म, स्थलांतरित; नाऊमेदी आणि आशा या तिसऱ्या भागात दहशतवाद, युध्द विनम्रता, देव, सहिष्णुता; सत्य या चौथ्या भागात अज्ञान, न्याय, पोस्ट ट्रूथ, सायन्स फिक्शन आणि लवचिकता या पाचव्या भागात शिक्षण, अस्तित्वाचा अर्थ व ध्यानधारणा अशी एकूण 21 प्रकरणं आहेत. या पुस्तकातले सगळेच विषय महत्त्वाचे आहेत. पण कृत्रिम बुध्दिमत्ता- आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होणारी बेरोजगारी हा विषय अनेकांच्या जिव्हाळ्याचा आहे. यंत्रांना कृत्रिमपणे हुशार बनवायच्या प्रयत्नांना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)’ असं म्हटलं जातं. माणूस ज्या प्रकारे शिकतो, जसा विचार करतो आणि जशी आपली बुध्दिमत्ता वापरतो; तसंच कॉम्प्युटरचा वापर करून त्याला माणसासारखा विचार करायला लावणं, हे एआयचं तत्त्व आहे.

यंत्रमानवाची (रोबोट) संकल्पना एआयवर आधारलेली आहे. यंत्रमानवाला संगणकीय भाषेत सूचना दिल्यानंतर तो त्या सूचना पार पाडतो. एआय आता वैद्यक, पत्रकारिता, वैज्ञानिक संशोधन, वकिली अशा सर्व क्षेत्रांत पोचलं आहे. त्यामुळे वैमानिक असो, विक्रेता असो, वकील असो वा आर्थिक सल्लागार असो; बेरोजगारीची टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. सिटी बँकेनं ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीनं यंत्रमानवांमुळे कोणाकोणाचे रोजगार जाऊ शकतील यावर तयार केलेल्या अहवालानुसार, इंग्लंडमधले 35 टक्के रोजगार मानवाकडून यंत्रमानव हिसकावून घेतील. अमेरिकेमध्ये हे प्रमाण 47 टक्के असू शकतं. तसंच भारतातल्या 69 टक्के इतक्या नोकऱ्यांवर यंत्रमानवांमुळे गदा येईल. हरारीनं कोणत्या स्वरूपाच्या नोकऱ्या वाढतील, त्याचाही ऊहापोह केला आहे. उदाहरणार्थ- डॉक्टर्सच्या नोकऱ्या किंवा व्यवसाय संपेल हे खरं असलं, तरी नवी औषधं आणि शस्त्रक्रियेच्या पध्दती शोधणं ही संशोधनाची कामं खूप वाढतील. पण या नव्या नोकऱ्यांमध्ये विशिष्ट कौशल्यं आणि नैपुण्याची गरज असेल. कामाच्या बाबतीतल्या अशा बदलांना प्रत्येक माणसाला भावनिक/ मानसिक पातळीवर तोंड देणं त्रासदायक ठरेल. यावर उपाय म्हणून माणूस-एआय यांनी एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं ठरेल. औषधांपासून ते ध्यानधारणेपर्यंत अनेक तंत्रं तो ताण कमी करण्यासाठी वापरावी लागतील, असं हरारी सुचवतो.

हरारीनं मांडलेली दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे पर्सनलायझेशन सर्च आणि त्यातून अटेंशन इकॉनॉमीला मिळणारी चालना. शेतीप्रधान अर्थव्यवस्थेकडून औद्योगिक अर्थव्यवस्थेकडे आपण वाटचाल केली. नंतरच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा महापूर लोकांवर कोसळायला लागला. त्या माहितीकडे लोकांचं जाणारं लक्ष हे संसाधन बनलं. माहिती दिवसेंदिवस वाढत गेली आणि लक्ष हे संसाधन दुर्मिळ होत गेलं. हे लोकांचं लक्ष वेधून घेऊन पैसे कमावणारी ती अटेंशन इकॉनॉमी. वेबसाईट्‌सवर माणसाचं अटेंशन-लक्ष हे आता एक महत्त्वाचं संसाधन झालं आहे. जगाची लोकसंख्या 700 कोटींच्या आसपास असल्यामुळे ते संसाधन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. इंटरनेट 1990 मध्ये जेव्हा ग्राहककेंद्रित झालं, तेव्हा अटेंशन इकॉनॉमीचं मॉडेल ऑनलाईन कसं वापरता येईल यावर तज्ज्ञ कामाला लागले. गुगलची उलाढाल 2000 च्या दशकात 2300 कोटी डॉलर्सची होती. आज वीस वर्षांनंतर गुगल ही अमेरिकेतली दुसऱ्या क्रमांकावरची कंपनी आहे. तिची उलाढाल 80000 कोटी डॉलर्सची आहे. त्या तुलनेत पाहायला गेलं तर एक्झॉनमोबिल या तेल खणणाऱ्या कंपनीची उलाढाल फक्त 23700 कोटी डॉलर्स आहे. थोडक्यात, तेल खणण्यापेक्षा इंटरनेटवर लोकांचे डोळे कशाकडे किती वेळ लक्ष देतात ती मिनिटं खणून काढणं आज जास्त नफा मिळवून देतंय!

या कंपन्या हे साध्य करताना परवलीचे दोन शब्द वापरतात. ते शब्द म्हणजे पर्सनलाइज्ड सर्च आणि त्यामधून तयार झालेले फिल्टर बबल्स. हे सगळं नेमकं काय आहे, याचं उदाहरणच पाहू. ‘कुत्रा पाळणं योग्य/चांगलं आहे का ?’ असा सर्च गुगलला देऊन बघा. मग कुत्रा पाळणं किती चांगलं आहे, कुत्रा पाळण्याचं तंत्र काय आहे, वगैरे रिझल्ट्‌स गुगल दाखवेल. त्यानंतर लगेचच कुत्रा पाळणं हा दुष्टपणा आहे का?’ असा सर्च द्या. त्यानंतर ‘कुत्रा किंवा इतर प्राणी पाळणं किती आणि कसं दुष्टपणाचं आहे यावर रिझल्ट्‌स येतील. अशा प्रकारे तुमच्या मनाचा कल ओळखून गुगल तुम्हाला वेगवेगळी वेबपेजेस दाखवतं. ही झाली पर्सनलाइज्ड सर्च. पर्यावरणाची हानी या विषयावरचे निकालही पर्यावरणावर सामाजिक काम करणाऱ्या माणसाला आणि तेल कंपनीच्या अधिकाऱ्याला वेगवेगळे दिसतात. याच प्रकारे आपल्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आदर्शांना/आवडी-निवडींना अनुसरून इंटरनेटवर अनेक वेबसाईटस आपल्याला रिझल्ट्‌स दाखवतात. असं कसं होतं? याचं उत्तर आहे फिल्टर बबल्स..!

फिल्टर बबल हा शब्द एलि पॅरिसर यानं 2011 मध्ये प्रथम वापरला होता. जो माणूस इंटरनेट वापरत असतो त्याचं ठिकाण, तो कोणत्या गोष्टींवर क्लिक करून त्या गोष्टी जास्तीत जास्त वेळा पाहतो (उदा.- स्त्रिया दागिने आणि पुरुष मोटारगाड्या) आणि तो कोणकोणत्या गोष्टी सर्च करतो (उदा.- शिवाजीमहाराज, डोनाल्ड ट्रंप, गोवा, पॅरिस, मिसळ असं काहीही) अशा अनेक गोष्टींवरून असंख्य वेबसाईट्‌स माहिती गोळा करतात. त्यावर अल्गॉरिदम्स लिहितात. त्यावरून त्या माणसापुरतं त्याचं वैयक्तिक विेश तयार करून त्याच्या आवडीच्या वस्तू त्याच्यासमोर आणल्या जातात. हे सगळं करून गुगलला काय मिळतं? तर, इंटरनेट वापरणाऱ्याची जितकी नेमकी आणि अचूक वैयक्तिक माहिती मिळवली जाईल तितक्या जास्त योग्य जाहिराती वेबसाईट्‌स त्याला दाखवू शकतात. इंटरनेट वापरणारा माणूस ऑनलाईन वस्तू विकत घेण्याची शक्यता त्यातून वाढत जाते. उदा.- ॲमेझॉन प्रत्येक ग्राहकाची आवड- निवड ओळखून त्याच्यासमोर ती विशिष्ट गोष्ट ठेवतं. त्यासाठी तुम्ही तुमच्या सर्वांत जवळच्या विेशासू मित्रालाही सांगत नसाल इतकी माहिती ही पर्सनलाइज्ड सर्च गोळा करते. उदाहरणार्थ- डिप्रेशन हा एक शब्द जर तुम्ही डिक्शनरी डॉट. कॉमला शोधलात, तर औषधं पुरवणारी वेबसाईट लगोलग तुम्हाला अँटिडिप्रेसंटची जाहिरात दाखवायला लागते.

आता आपल्यापर्यंत कोणते ई-मेल्स पोचावेत, आपल्याला जोडीदार कसा मिळावा, आपण कोणत्या रेस्टॉरंट्‌समध्ये जावं- हे सगळं या वेबसाईटवरच्या कंपन्या ठरवतात. अल्गॉरिदम्स आता जाहिराती दाखवण्याबाबत निर्णय घेता-घेता आपल्या आयुष्याचं सुकाणूच हातात घ्यायला लागले आहेत. यामुळेच गुगलनं आपलं तंत्रज्ञान मानवाच्या सुरक्षेसाठी वापरावं, पण उत्पादनं विकण्यासाठी या तंत्रज्ञानाचा गैरवापर करू नये- असं मत या मुलाखतीच्या शेवटी हरारीनं मांडलं आहे. समकालीन समस्यांची जाणीव करून घेण्यासाठी ही मुलाखत पाहणं ही पहिली पायरी ठरेल.

मुलाखतीची लिंक https://www.youtube.com watch?v=Bw9PšZXWDJU

नीलांबरी जोशी

neelambari.joshigmail.com

Share on Social Media

गांधींचे गारूड । 5

दृढनिश्चयी अवंतिकाबाई गोखले

संजीवनी खेर

अवंतिकाबार्इंनी स्त्रियांना एकत्र करण्यासाठी हिंद महिला संघाची स्थापना 1930 मध्ये केली. चाळी-चाळीत जाऊन त्यांनी राष्ट्रकार्यासाठी स्त्रियांना प्रवृत्त केले. ‘राष्ट्रकार्य आणि स्त्रिया’ या विषयावर त्यांना अनेक संस्था भाषणाला बोलावत. स्त्रियांचे सबलीकरण, देशकार्यात त्यांचा सहभाग यांवर बार्इंचा भर असे. काही काळ त्या हिंद महिला संघाचे साप्ताहिक चालवत होत्या. त्या अध्यक्ष म्हणून 31 वर्षे काम करीत होत्या. स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून संस्थेत त्यांना शिवणकाम, नर्सिंग, सूतकताई, आरोग्याचे, हिंदी भाषेचे प्रशिक्षण देऊन तयार केले. त्यामुळेच पुढे देशकार्यातील चळवळीत स्त्रिया धडाडीने उतरू लागल्या. हजारोंच्या सभेपुढे अवंतिकाबाई मराठी व इंग्रजीत अस्खलितपणे निर्भयपणे जोरदार भाषणं करीत. अनेक पुढारी, गांधी, टिळक यांच्यासमोर त्या भाषणं करीत. ते ऐकून टिळक उत्फूर्तपणे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची सरोजिनी आता तयार झालीय!’’

गांधीजींच्या प्रभावाखाली आलेली आणि त्यांचे पहिले चरित्र लिहिणारी अवंतिकाबाई गोखले ही मराठी स्त्री. ती कमालीच्या धडाडीने काम करणारी, हाडाची कार्यकर्ती होती. साधी राहणी, स्पष्टवक्तेपणा, काटेकोर नियोजन, करारीपणा, निर्भयता हे गुण तिच्या अंगी बालपणापासूनच बिंबलेले होते. पारंपरिक वातावरणात वाढलेली ही स्त्री. इंदूरचे गुड्‌स क्लार्क विष्णुपंत जोशींच्या सात मुलींमधली एक. पैसे कमावण्याची संधी असून चुकीच्या मार्गाने त्यांनी कधी एक पैदेखील कमावली नाही. त्यांच्या नि:स्पृहपणाचा दरारा गहू, भांग, अफूच्या व्यापाऱ्यांवर होता. रीतीनुसार कृष्णाचे (माहेरचे नाव) वयाच्या नवव्या वर्षी मॅट्रिकमध्ये शिकणारे बबनराव गोखलेंशी लग्न झाले. घरी मोठा बारदाना. एकत्र कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळायला सासूने शिकवले. बबनराव हुशार होते, पुरोगामी विचारांचे होते. ते इंजिनिअर झाले नि त्यांना मँचेस्टरला मोठ्या पदाची नोकरी मिळाली. जाताना बबनरावांनी दोन रुपयांची पाटी आणून बायकोच्या हाती दिली नि बजावले, ‘‘इंग्रजी लिहिता-बोलता आलं पाहिजे, नाही तर मड्डम आणेन!’’ त्याचा अर्थ अवंतिकेला कळला नाही, पण सासूला बरोबर कळला.

घरातल्या लोकांकडूनच त्या इंग्रजी शिकल्या. इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित, शिक्षित घरातील स्त्रिया मिडवाइफरीची, गरिबांना मदत करत. असे आपल्या पत्नीने करावे, असे बबनरावांना वाटे. अवंतिकाबाई जेव्हा एका हॉस्पिटलमध्ये गेल्या, तेव्हा तेथील डॉक्टर म्हणाले, ‘‘हे काम हिंदू स्त्रिया करू शकणार नाहीत.’’ साहजिकच बार्इंनी विरोध केला. त्याच वेळी देवीची साथ पसरली. तेव्हा डॉक्टर खवटपणे म्हणाले, ‘‘आता कराल काम?’’ ते कामही 20 वर्षांच्या या तरुणीने जिद्दीने केले. बडोद्याला यंत्रसामग्रीचा कारखाना पतीने सुरू केला होता. तिथे अवंतिकाबार्इंनी कामगारांच्या मुलांकरिता आदर्शवत्‌ सोय केली. पतीच्या अनुपस्थितीत कारखान्याचे काम त्या पाहत. महाराजांनी ह्याचे कौतुक केले होते. तेथे असताना डायनामाईटच्या स्फोटात पतीचा हात तुटला. ऑपरेशनच्या वेळी स्वत: उभ्या राहून त्यांनी डॉक्टरांना मदत केली. अगोदरच्या एका अपघातात दुसऱ्या हाताची बोटं गेली होती, पण त्यांनी धीराने त्यांची सेवा-शुश्रूषा जन्मभर केली.

मुंबईला परत येऊन पतीने विदेशातून यंत्रसामग्री मिळवून त्याच्या सुट्या भागाच्या विक्रीचा व्यवसाय केला, तो चांगला चालला. यादरम्यान अवंतिकाबार्इंच्या जीवनात एक नवे वळण आले. इचलकरंजीच्या राणीला सोबत म्हणून इंग्लंडला जायचा योग आला. तो अनुभव त्यांना खूप काही देऊन गेला. त्यांनी तेथील अनेक संस्थांना भेटी दिल्या. मँचेस्टर, बर्मिंगहॅम, लंडन येथील जिथे जिथे बबनराव राहत होते, त्या-त्या कुटुंबांच्या घरी गेल्या. त्यांच्याशी असलेली मैत्री पक्की केली. तेथील स्त्रियांचा धीटपणा त्यांना भावला- जो त्यांच्यातही भरपूर होताच, त्याला दुजोरा मिळाला. कुणाच्या सोबतीची वाट न पाहता त्या एकट्या फिरल्या. समाजोपयोगी काम करणाऱ्या अभिजन स्त्रियांची धार्मिक वृत्तीने काम करायची जिध्द पाहून अपल्या देशात अशा प्रकारच्या नि:स्वार्थ बुध्दिने काम करायची प्रबळ इच्छा त्यांना हिंदुस्थानला परत आल्यावर स्वस्थ बसू देईना.

‘भारत सेवक समाजा’चे देवधरसर यांच्या मार्गदर्शना- खाली त्यांनी काम सुरू केले. समाजसेवेत त्यांनी अनेक नवनव्या कल्पना राबवणे सुरू केले. कामगारवस्तीत जाऊन तेथील स्त्रियांना स्वच्छतेचे धडे देणे, साक्षर करणे, बालसंगोपन या आज अगदी सामान्य वाटणाऱ्या पण 1913 मध्ये अगदीच अनोख्या कृती होत्या. याच काळात दक्षिण आफ्रिकेतून गांधी परतले होते. तोवर ते महात्मा झालेले नव्हते. लोकांशी फारशा ओळखी नव्हत्या. पण त्यांच्या कामाचा डंका इथे वाजू लागला होता. नामदार श्रीनिवास शास्त्रींनी साबरमतीला गेलेल्या गोखले दांपत्याची ओळख गांधींशी करून दिली. या माणसात काही वेगळेच तेज आहे, अशी बार्इंची खात्री झाली. बार्इंमधील धमक गांधींनी ओळखली. ‘मला काम करायचे आहे’ एवढ्या एका वाक्याने त्यांचे जीवन बदलले. काही दिवसांतच ‘गांधींनी तुम्हाला चंपारणमध्ये जाऊन काम करायला सांगितले आहे,’ असा निरोप ठक्करबाप्पांनी दिला. कल्पना करा- तेव्हाची परिस्थिती, ब्रिटिशांच्या जुलमाने पिचलेला मजूर शेतकरी, कुणी त्यांना मदत करायला नाही... कमालीचे दारिद्य्र, अज्ञान, राहण्याची व्यवस्था शून्य... पाणी, अन्न कशाची धड शाश्वती नाही... कुणीही व्यवस्था तयार करून दिलेली नाही. स्वत:चा मार्ग स्वत: तयार करायचा होता. कुणाच्या आधारावर त्या तिथे पोहोचल्या होत्या? काय करायचे, कसे करायचे? आखणी आपणच करायची. नुकतीच तोंडओळख झालेल्या एका माणसाच्या शब्दावर त्या तिथे पोहोचल्या होत्या. डगमगतील त्या अवंतिकाबाई कसल्या!

त्या कंबर कसून कामाला लागल्या. मोतिहारी गावात काम करायचे ठरवले, कारण हे काम देशाचे होते. येताना बरोबर एरंडेल, क्विनाईन, मूठभर औषधं घेऊन गेल्या होत्या. समोर समस्या आ वासून उभ्या होत्या. जुजबी झोपडं बांधून अगोदर रोग्यांची सेवा सुरू केली. चंपारणमध्ये नीळ उत्पादनासाठी शेतकऱ्यांवर सरकारने दडपण आणून त्यांचा छळ चालवला होता. आधीच पिचलेले शेतकरी अधिकच मेटाकुटीला आले होते. दुसरे कुठले पीक घेऊ दिले जात नव्हते. दलाल कमी भावात नीळ विकत घेत. गांधींचे नाव ऐकून एक गरीब शेतकरी काँग्रेसच्या संमेलनात त्यांना भेटला नि चंपारणला येऊन मदत करायची विनंती केली. गांधींनी अगोदर सर्व समस्या समजावून घेतली. दलालांशीदेखील सविस्तर बोलले. त्या वेळी जगातील 80 टक्के नीळ तिथे पिकत होती. तिथून जगभर निर्यात होत होती. त्याचा फायदा फक्त दलालांना होत होता, शेतकरी मात्र उपाशी राहत होते. ‘तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न काय कळणार? या लोकांच्या भानगडीत तुम्ही पडू नका, त्यांचं ते बघून घतील’- असे सल्ले मिळाले. त्यांनी वकिली सल्ला घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते साध्या गरिबांना बरोबर नेत असत. कुठल्या जातीचे आहेत, कोण जाणे! म्हणून त्यांना बाहेरच बसवले जाई. हे सारे गांधींचे मन टिपून घेत होते. आपण फक्त प्रश्न समजून घेतोय, असं ते म्हणत होते.

लोक एकत्र येऊ लागले. सरकार व दलालांनी गांधी व शेतकऱ्यांच्या मुसक्या बांधायची तयारी चालवली. पण गांधींनी आपला मुद्दा सोडला नाही. प्रवेशबंदी लादली गेली. आफ्रिकेत बदनाम(?) झालेला हा माणूस इथं डेंजरस ठरेल, म्हणून त्यांना अटक करून न्यायालयात उभं केलं. आपली बाजू मांडून, लगेच ‘मला शिक्षा करा,’ असे गांधी म्हणू लागले. लोकांनी असा आरोपी प्रथमच पाहिला होता. पण तेवढ्यात गव्हर्नरसाहेबांनी ‘गांधींना सोडून द्या’ असा आदेश पाठवला. एका वेळी अनेक गोष्टी हाताळायची त्यांची हातोटी होती. राजेंद्रप्रसाद हे मोठ्या प्रासादतुल्य बंगल्यात राहत. तिथे या कामासाठी येणाऱ्या बिहारी वकिलांनी आपापल्या जातीचे स्वयंपाकी आणले होते. गांधींनी ‘सर्वांचा स्वयंपाक एकत्र करावा’ असं सुचवलं नि तसं झालं. राजेंद्रप्रसादांनी लिहून ठेवलंय की, आयुष्यात पहिल्यांदा ते इतरांनी शिजवलेले अन्न जेवले होते. हे सारे अवंतिकाबार्इंना समजले होते. चंपारणच्या सत्याग्रहामध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या सत्याग्रही तुकडीत आनंदी वैशंपायन व अवंतिकाबाई गोखले या दोन महिला होत्या. बिहारमध्ये फिरून त्यांनी महिलांना आरोग्याचे धडे दिले. मुलींच्या शिक्षणाकरिता प्रचार केला. बडहरवा गावी मुलींची शाळा काढली. मुलींच्या शाळेला पुरुषांबरोबर स्त्रियांचाही विरोध होता. लिहिणे, वाचणे व त्यांच्यामध्ये स्वदेशप्रेम निर्माण करण्याचे अवघड काम अवंतिकाबार्इंनी केले. चंपारणमध्ये राहणे म्हणजे यातील जे-जे शक्य आहे ते-ते करणे हे त्यांच्या मनाने घेतले. त्यांनी गांधींचे मराठी भाषेतले पहिले चरित्र लिहायला (चंपारणमध्ये राहताना) सुरुवात केली. त्याला टिळकांनी प्रस्तावना लिहिली आहे. अवंतिकाबार्इंनी सुरू केलेल्या कामाचे उद्‌घाटन गांधींनी केले आणि पुढे चळवळीच्या कामाला लगेच निघून गेले.

बार्इंच्या कामाला पाहता-पाहता वेग आला. तिथल्या लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवले. त्यांना औषधं देऊन बरे केले. त्यामुळे त्यांना या माताजींचा विेशास वाटू लागला. पडद्याच्या कडक गोशात राहणाऱ्या लेकी-सुनांना खुल्या हवेत श्वास घ्यायला परवानगी मिळू लागली. बाई सुंदर गात (आणि व्हायोलिन वाजवत) बायांना जमवून दोहे म्हणत, देशप्रेमाच्या कथा सांगत. त्यांच्या अंगात कीर्तनकला होती, तिचा वापर त्यांनी व्यवहारातले शहाणपण शिकवण्यासाठी सहजपणे करून यश मिळवले. घरातले पुरुष बिनदिक्कत, माताजींच्या हवाली बायकांना करू लागले. त्यांच्या व्याख्यानांना गर्दी होऊ लागली. गर्दी पाहून पोलीस पाळत ठेवू लागले. रामनवमीच्या सभेत त्या दमदार बोलल्या, पण पोलीस काय रिपोर्ट करणार? आपल्याला जे काम स्त्रियांकडून करवून घ्यायचं आहे त्यासाठी ही कार्यकर्ती अगदी योग्य आहे, असे गांधींचे म्हणणे होते. कडक सोवळ्यात घरी वावरणारी ही ब्राह्मण स्त्री- विचार पटला म्हणून गरीब, अस्पृश्यांच्या वस्तीत काम करू लागली. त्या काळाचा नि समाजाचा विचार करता, हे मोठे धाडसाचे पाऊल होते.

स्त्रियांमध्ये शिक्षण व स्वातंत्र्याची आस निर्माण करणं, आपणदेखील या महान कार्यात सहभागी होऊ शकतो याचा विेशास निर्माण करणं गरजेचं होतं. अवंतिकाबार्इंनी ते यशस्वीपणे केलं. त्यांच्या प्रेरणेने 1930-32 च्या मिठाच्या सत्याग्रहात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला. तसेच फैजपूरच्या काँग्रेसच्या संमेलनात महाराष्ट्रातील स्त्रियांनी भाग घेऊन आपले महत्त्व जाणवून दिले, त्यामागे बार्इंचीच प्रेरणा होती. तिथे बार्इंनी खादीच्या विक्रीचा उच्चांक केला. बार्इंनी स्त्रियांना एकत्र करण्यासाठी हिंद महिला संघाची स्थापना 1930 मध्ये केली. चाळी-चाळीत जाऊन त्यांनी राष्ट्रकार्यासाठी स्त्रियांना प्रवृत्त केले. ‘राष्ट्रकार्य आणि स्त्रिया’ या विषयावर त्यांना अनेक संस्था भाषणाला बोलावत. स्त्रियांचे सबलीकरण, देशकार्यात त्यांचा सहभाग यांवर बार्इंचा भर असे. काही काळ त्या हिंद महिला संघाचे साप्ताहिक चालवत होत्या. त्या अध्यक्ष म्हणून 31 वर्षे काम करीत होत्या.

स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून त्यांना शिवणकाम, नर्सिंग, सूतकताई, आरोग्याचे, हिंदी भाषेचे प्रशिक्षण संस्थेत देऊन तयार केले. त्यामुळेच पुढे देशकार्यातील चळवळीत स्त्रिया धडाडीने उतरू लागल्या, अन्यायाविरुध्द आवाज उठवू लागल्या. गिरगावकर प्रतिष्ठित स्त्रिया त्यांच्याबरोबर आंदोलनात आपला ठसा उमटवू लागल्या. हजारोंच्या सभेपुढे अवंतिकाबाई मराठी व इंग्रजीत अस्खलितपणे निर्भयपणे जोरदार भाषणं करीत. अनेक पुढारी, गांधी, टिळक यांच्यासमोर त्या भाषणं करीत. ते ऐकून टिळक उत्फूर्तपणे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची सरोजिनी आता तयार झालीय.’’ हिंद महिला समाजात त्यांनी सूतकताईचे वर्ग सुरू केले. पन्नासेक बायका शिकायला येत. त्यांच्या लक्षात आलं की, सूत तयार करून पुन्हा दुसऱ्यांवरच कापडासाठी अवलंबून राहावं लागत असे. मग त्यांनी दोन हातमाग चालवणाऱ्यांना मुंबईला बोलावून घतलं. गांधीजींच्या दर वाढदिवसाला त्या धोतरजोडी पाठवत असत. गांधीजी गमतीने म्हणत, ‘‘अविबेनने मला आता सवयच लावली आहे. त्यांनी जर मला धोतरं पाठवली नाहीत, तर मला लंगोटी लावूनच राहावं लागेल!’’ ‘‘हे सारं चालू आहे, पण तुमच्या अविबेन स्वत: कुठे खादी वापरतात?’’ असं सरोजिनीने गांधींना म्हणताच ते उत्तरले, ‘‘माझी अविबेन विचारांची पक्की आहे. तिला खादी पटली, तर ती नक्कीच वापरेल.’’ आणि तसेच झाले. कुणी तरी अवंतिकाबार्इंना एक तलम सुती खादीची साडी दिली. ती हाताळून त्या म्हणाल्या, ‘‘खादी इतकी मऊ नि तलम असू शकते’’ बस्स! त्यानंतर त्यांनी जन्मभर खादीच वापरली.

स्वत: रोज तीन तास सूतकताई करीत. त्यांचा मुंबई महापालिकेमध्ये 1923 मध्ये प्रवेश झाला. त्यांचा स्वच्छ कारभार, फक्त लोकहिताचा विचार करून काम करणं पाहून तत्कालीन अध्यक्ष म्हणाले, ‘‘अहो, सर्व जण स्वत:ची कामं करवून घ्यायला कधी ना कधी माझ्याकडे येतात. तुम्हीच एक अशा आहात की, ‘असे काम आणत नाही.’’ बार्इंनी हसून विषय टाळला. मुंबई महानगरपालिकेने स्त्रियांचा मताधिकार व निवडणुका लढविण्याचा अधिकार 1922 मध्ये मान्य केला. त्या कायद्याप्रमाणे झालेल्या निवडणुकीत सरोजिनी नायडू, बच्चूबेन लोटवाला, हॅडगिव्हसन व अवंतिकाबाई अशा चार स्त्रिया निवडून आल्या. त्यात अवंतिकाबार्इंना प्रचंड मते मिळाली, परंतु काही तांत्रिक कारणामुळे त्यांची निवड रध्द झाली. बार्इंना असलेला प्रचंड पाठिंबा व त्यांचे सामाजिक कार्य लक्षात घेऊन दि.1 एप्रिल 1923 रोजी महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यत्व मिळाले. त्या 1931 पर्यंत सातत्याने त्यांना स्वीकृत सदस्य होत्या.

आपल्या मतदारसंघातील प्रश्न व ठराव मांडून त्यांनी महापालिका दणाणून सोडली. आरोग्य व शिक्षण ही दोन खाती बार्इंच्या जिव्हाळ्याची. शाळेच्या आसपास अनारोग्यकारक खाद्य-पेये विकली जाऊ नयेत, चौपाटीवर बसून हवा खावी, पदार्थ खाऊन कागद-द्रोण वगैरे टाकून वाळू खराब करू नये- अशा प्रकारचे ठराव त्यांनी मांडले. सभागृहात त्या मराठीतूनच बोलत. त्यांची भाषणे व युक्तिवाद विचारप्रवृत्त करणारे असत, म्हणून अध्यक्षांनी त्यांना इंग्रजीत भाषण करायची विनंती केली. त्यांचे इंग्रजी फर्डे होते, ऐकत राहावेसे वाटे, असे अनेकांनी नोंदवले आहे. त्या कमिटीच्या मीटिंगला त्यांना भत्ता मिळे. ‘तो घेणार नाही’ असे सांगताच वल्लभभाई पटेलांनी सांगितले की, तसे करता येणार नाही. ते पैसे घेऊन तुम्ही दुसऱ्या चांगल्या कामाला दान करा. महापौरपदासाठी 1928 मध्ये त्यांचे नाव सुचविले गेले. दुसरे नाव होते मुंबईतील प्रसिध्द डॉ. गोपाळराव देशमुख यांचे. बार्इंच्या मते, डॉक्टर सर्वतोपरी योग्य उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी आपण या पदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले. नाही तर 1928 मध्येच मुंबईला पहिली महिला महापौर मिळाली असती.

महानगरपालिकेत कर्मचारी व सदस्य यांना खादी घालणे काही कारणाने शक्य नसेल तर त्यांनी स्वदेशी कपडे वापरावेत, हा ठराव त्यांनी पास करून घेतला. हे त्यांचे महापालिकेचे शेवटचे योगदान. दि.26 ऑक्टोबर 1930 रोजी पोलीस कमिशनरचा हुकूम मोडून बार्इंनी मुंबईच्या आझाद मैदानावर झेंडावंदन केले. या वेळी चौपाटीवर निदर्शनं केली. मोठ्या संख्येने लोक जमले होते. एका लहान मुलीच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी मुली व बायकांवर जोरदार लाठीमार सुरू केला, घोडस्वार अंगावर घातले. पोरींची डोकी फुटली, पण हातातला झेंडा कुणी खाली पडू दिला नाही. रात्रीच्या वेळी बायकांना पकडून जंगलात सोडून दिलं. या साऱ्यांचा कार्यकर्त्यांना खूप मनस्ताप झाला. अवंतिकाबार्इंना अटक झाली. ‘मी एका पवित्र कार्यासाठी कारागृहात जात आहे’, हीच त्यांची भावना होती.

ही कामं चालू असतानाच बबनरावांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा गांधीजींनी त्यांना स्पष्ट सांगितले की- आता फक्त पतीकडेच लक्ष द्यायचे, बाकी कामं इतरांवर सोपवा. त्यांनी आपल्या सेवेने पतीला बरे केले. पण त्यांना स्वत:ला कर्करोगाचे निदान झाले नि त्यांची प्रकृती झपाट्याने ढासळू लागली. बार्इंच्या आजाराचे वृत्त कळताच गांधीजींनी त्यांना धीर देणारे नि उल्हासित करणारे पत्र लिहिले. पण त्यानंतर गांधींजीचीच हत्या झाली. याचा धक्का त्यांना बसला. अवंतिकाबार्इंना भ्रम होऊ लागला की, गांधीजी आपल्याला बोलावत आहेत. पतीलाही त्या म्हणू लागल्या- ‘चला, आता दोघंही त्यांच्याकडे जाऊ या.’ गांधीजींच्या या पहिल्या भारतीय कार्यकर्तीचा 25 मार्च 1948 रोजी मृत्यू झाला. अखेरपर्यंत त्या विधायक कार्यात मग्न राहिल्या.

संजीवनी खेर

sanjeevanikher@gmail.com

Share on Social Media

प्रास्ताविक

भाषा : स्त्रियांची आणि स्त्रियांविषयीची

अपर्णा दीक्षित

अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष यांनी स्त्रियांबद्दल अत्यंत अवमानकारक आणि हिणकस अशा भाषेचा वापर एकदा एका खासगी संभाषणात केला. त्याचे रेकॉर्डिंग जेव्हा समोर आले तेव्हा मुक्त जगातल्या सर्वांत ताकदवान व्यक्तीने असं बोललेलं- वागलेलं चालणारच नाही, असं वाटून अचंबाही व्यक्त करण्यात आला. मात्र ‘अरे, ते तर काय ङेलज्ञशी Locker room talk होतं’ असं म्हणून अचंबित झालेल्यांचे आवाज, प्रतिकार दुबळे करण्यात आले. इथे दोन मुद्दे उपस्थित होतात. स्त्रियांबद्दल असे अवमानकारक बोलणाऱ्या व्यक्तीकडे अशा प्रकारे संस्थात्मक सत्ता एकवटू देणे ठीक वाटणाऱ्या समाजाचा आपण भाग आहोत. दुसरं म्हणजे- अशा प्रकारे पुरुषांबद्दल, त्यांच्या शरीरांबद्दल हिणकस, अपमानकारक उद्‌गार सत्तेतल्या एखाद्या स्त्रीने काढल्यास निव्वळ त्याला Locker room talk म्हणून सोडून दिलं जाईल का?

हा पेंगुळलेला, अबोल ज्वालामुखीसुध्दा

कधीच उघड करत नाही,

त्याच्या गहिऱ्या पोटात दडलेले

तप्त-ज्वलंत मनसुबे.

त्या ज्वालामुखीकडे बोट दाखवून,

ईश्वरानी चार समजुतीचे बोल-

पटवून दिले तिलाही.

म्हणाला- अगं, जर निसर्गाची रचनाच आहे

घुमेपणाची, तर,

आश्वासक संयमानं तुझं ऐकणारा साथी-भागीदार नाहीच मिळाला कधीच, कुठे,

तर बिघडले कुठे?

तेव्हापासून-

ती मूकपणे सुनावते आहे,

संबंध जगाला,

त्यातल्या प्रत्येक शब्द-अपशब्दाला,

घुमेपणाचं गुपित पांघरून.

तसं म्हणा कोणतंच गुपित, गुपित राहत नाही-

अमरत्वाच्या मूक इच्छेशिवाय.

स्वैर भाषांतर : मूळ - एमिली डिकिन्सन Reticence स्त्रियांची भाषा आणि संस्कृती यांच्यातली गुंतागुंत किती नेमकेपणाने मांडते आहे कवयित्री!

संस्कृतीच्या हस्तक्षेपाआधीही स्त्री-पुरुषातील काही फरक जैविक, नैसर्गिक आहेत. मग निसर्गाकडून, त्यातल्या स्वाभाविक फरकाकडून संस्कृती तर प्रेरणा घेणारच- असं वाटायला लावणारी ही कविता शेवटाकडे मात्र वेगळेच वळण घेते. ‘ती’ हे फरक सहज स्वीकारू शकणार नाही, तर ईश्वराला ते पटवून द्यावे लागत आहे. आणि अशा नैसर्गिक फरकांचं अवाजवी ‘मूकपण’ ती सहन करते आहे. हा मुद्दा अत्यंत प्रभावी आणि नेमकेपणाने कविता मांडून जाते, तेव्हा आपल्या परिसरातल्या-भवतालच्या किती तरी स्त्रियांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अशा मावश्या, माम्या, आया- ज्यांनी दुखरं वाटणारं असं दुय्यमत्व नात्यांमध्ये, समाजामध्ये सहज आपलंसं केलंच आहे. मात्र यामध्ये एक महत्त्वाचं अंग या सगळ्या स्त्रियांनी स्वत:च्या भाषेवर, भाषिक अभिव्यक्तीवर ‘समजूतदार’पणे मर्यादा घालून घेणे हेही आहे. या समजूतदारपणाला दोन बाजू आहेत. एक म्हणजे- वर म्हटल्याप्रमाणे, समाजाला (मुख्यत: कुटुंबातल्या पुरुषांना) रुचेल-पटेल अशाच शब्दांचा, भाषेचा उपयोग करणे; तसेच मुळातूनच स्वत:च्या व्यक्त होण्यावर बंधनं घालून घेणे. दुसरे म्हणजे- आपल्याबद्दल (स्वत:बद्दल किंवा एकूण सगळ्याच स्त्रियांबद्दल) वापरल्या जाणाऱ्या भाषेत कितीही हिंसा असली, अवहेलना असली तरी ‘ही जगाची रीतच आहे’ असे मानून त्याकडे दुर्लक्ष करणे आणि त्याचबरोबर पुरुषांच्या भाषेतून कुठल्याही प्रकारे व्यक्त होण्याला फारसे आव्हान न देणे.

वर मांडलेल्या दोन्ही भाषिक प्रयोगांशी थोडक्यात ओळख करून घेऊ या. स्त्रिया खरोखरच अशी बंधनं मानतात का? खरं तर स्त्रियांकडे बडबड्या, बोलताना पुरुषांपेक्षा जास्त उत्साही असणाऱ्या म्हणून कायम पाहिलं जातं. ते बऱ्याच प्रमाणात खरंही आहे. असं का होतं, याला मात्र अनेक कारणं आहेत. इंग्रजी भाषेचा अभ्यास करणाऱ्या भाषाशास्त्रज्ञांनी याबद्दल अभ्यास करताना म्हटलं आहे की, पुरुष आपला विचार बेधडकपणे मांडतात आणि म्हणून त्यांच्या विधानांमध्ये ठामपणा (भाषिक) दिसतो. उदा. एखादा सिनेमा आवडल्यास This is a great movie असं विधान पुरुष करताना दिसतात. तर स्त्रिया ऐकणाऱ्याला आपले म्हणणे पटले आहे की नाही, हे पाहण्यासाठी विधानार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नांकित प्रयोग जोडून घेतात. उदा. This is a great movie, isn't it? या प्रश्नांकित वाक्यामागे बोलणाऱ्याची अनिश्चितता, त्याचा भित्रेपणा, नमते घ्यायची वृत्ती दिसते. जो मुद्दा प्रश्न विचारतानाचा आहे, तोच उत्तर द्यायच्या वेळीही दिसून येतो. ‘किती वाजता भेटू या?’ असा प्रश्न जर एखाद्या व्यक्तीने विचारला, तर पुरुष उत्तर देताना बहुतेकदा स्वत:च्या सोईची ठाम वेळ/वार सांगतात- ‘4 वाजता’ किंवा ‘येत्या सोमवारी 5 वाजता’ असं. मात्र आपण सांगतो आहोत ती वेळ विचारणाऱ्याला सोईची असेल का नाही, हे विचार मनात येऊन स्त्रिया बहुतेकदा ‘4 च्या आसपास’ / ‘सोमवारी संध्याकाळी’ असे उत्तर देतात आणि प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीची सोय पाहणेही आपलेच काम आहे असे समजतात.

पुरुषांना आज्ञार्थी भाषेत बोलण्याची सवय असते आणि तसे ते एक प्रकारच्या सहजतेने करत असतात. ‘बाहेर जाताना दार ओढून घ्या’ अशी आज्ञा पुरुष सहज करतात. अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या प्रसंगात- विशेषत: समोरची व्यक्ती पुरुष असेल (हुद्याने, वयाने कनिष्ठ असेल तरीही) तर आज्ञात्मक बोलणे टाळतात. बोलायची गरज भासल्यास ‘बाहेर जाताना दार ओढून घ्याल का?’, ‘बाहेर जाताना दार ओढून घ्याल का प्लीज?’ अशा प्रकारे विनंतीवजा आणि शिवाय प्रश्नार्थक स्वरूपात व्यक्त होतात. यामागचे निव्वळ समाजशास्त्रीय संदर्भ बघितले तर- जे वर्तन, जी भाषा पुरुषांचे मूल्यमापन करताना ठामपणा, आत्मविश्वास अशा मूल्यांत होते; त्याचेच स्त्रियांच्या बाबतीत मूल्यमापन करताना रूप बदलते. तशाच प्रकारचा आत्मविश्वास, ज्ञान असणाऱ्या स्त्रीने तशी पुरुषासारखीच भाषा वापरल्यास तिला ‘फारच वरचष्मा’ दाखवणारी, इतरांची दखल न घेणारी असे संबोधले जाते. अशा प्रकारचा फरक जगभरात विविध स्त्रियांच्या भाषेच्या संबंधात केला जातो. अर्थात प्रत्यक्ष सत्ता वापरून घेण्याची संधी ज्या स्त्रियांना मिळाली आहे, त्यांची ही गत आहे.

परंपरा, कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे ज्या स्त्रियांचे अनुभवविश्व संकुचित केले गेले असेल किंवा त्यांच्या वैयक्तिक निर्णयामुळे तसे झाले असेल, तर स्त्री-पुरुषांच्या भाषेतील दरी अधिक काटेकोरपणे जपली जाते. हा झाला पहिला भाग- स्त्रियांच्या भाषिक अभिव्यक्ती वेगळ्या असण्याचा, ज्याला धरून या लेखमालिकेतल्या इतर काही भागांमध्येही आपण चर्चा करणार आहोत. दुसरा मुद्दा- जेव्हा स्त्रियांबद्दल बोललं जातं, त्या भाषेचा. बहुतांश वेळी भाषा स्त्रियांप्रति सहिष्णु नसते, असं दिसून येतं. याचं अगदी ठळक उदाहरण म्हणजे, भाषेतील शिव्यांची वैशिष्ट्ये. स्त्रिया, स्त्रीचं शरीर यांची विटंबना करणाऱ्या शिव्यांची संख्या मोठी असते. मात्र त्याविषयीचे समाजशास्त्रीय विश्लेषण पुष्कळ गुंतागुंतीचं आहे. त्याबद्दल सविस्तर पुन्हा कधी. मात्र स्त्रीच्या वाटेला भाषिक अवहेलना जास्त मोठ्या प्रमाणात येते, हे निश्चित. जो मुद्दा शिव्यांच्या बाबतीत फार टोकाचा होतो, त्याची इतर कमी तीव्र परंतु अत्यंत हानिकारक रूपं आपल्याला आसपास कायम पाहायला मिळतात. इंग्रजीमध्ये Locker room talk अशा संज्ञेखाली पुरुष असभ्य भाषा वापरणारच, ही धारणा पुढे येते. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष यांनी स्त्रियांबद्दल अत्यंत अवमानकारक आणि हिणकस अशा भाषेचा वापर एकदा एका खासगी संभाषणात केला. त्याचे रेकॉर्डिंग जेव्हा समोर आले तेव्हा मुक्त जगातल्या सर्वांत ताकदवान व्यक्तीने असं बोललेलं-वागलेलं चालणारच नाही, असं वाटून अचंबाही व्यक्त करण्यात आला. मात्र ‘अरे, ते तर काय ङेलज्ञशी Locker room talk होतं’ असं म्हणून अचंबित झालेल्यांचे आवाज, प्रतिकार दुबळे करण्यात आले. इथे दोन मुद्दे उपस्थित होतात.

स्त्रियांबद्दल असे अवमानकारक बोलणाऱ्या व्यक्तीकडे अशा प्रकारे संस्थात्मक सत्ता एकवटू देणे ठीक वाटणाऱ्या समाजाचा आपण भाग आहोत. दुसरं म्हणजे- अशा प्रकारे पुरुषांबद्दल, त्यांच्या शरीरांबद्दल हिणकस, अपमानकारक उद्‌गार सत्तेतल्या एखाद्या स्त्रीने काढल्यास निव्वळ त्याला Locker room talk म्हणून सोडून दिलं जाईल का? तर, या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असं आहे. मुळात Locker room talk या संज्ञेतच ‘केवळ पुरुषांनी वापरायची अधिक मोकळीढाकळी भाषा’ असा अर्थ अभिप्रेत आहे. पुरुषांना आपसात व्यक्त होण्यासाठी अशा ‘वेगळ्या भाषेची’ (जिच्यात मुळातच कुठलीतरी भाषिक, काल्पनिक हिंसा आहे) गरज भासावी आणि स्त्रियांना अशी भाषिक संधीच नसावी, हे दोन्ही दुर्दैवी नाही का? याचेच भारतात घडलेले एक उदाहरण पाहा.

ऑगस्ट 2017 मध्ये प्रायव्हसीच्या विधेयकाची चर्चा सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर केली जात होती. चर्चा लांबत गेली आणि काहीशी कंटाळवाणी झाली. तेव्हा ॲडिशनल सॉलिसिटर जनरल श्री. तुषार मेहता आपल्या बोलण्याची सुरुवात करताना म्हणाले, (मूळ इंग्रजीत) ‘‘माझी अवस्था प्रख्यात हॉलीवुड अभिनेत्री एलिझाबेथ टेलरच्या सातव्या नवऱ्यासारखी झाली आहे. काय करायचं हे मला ठाऊक आहे, मात्र ते अधिक रंजक कसं करावं, हे मला कळत नाहीये.’’ यावर जोरदार हशा पिकला. प्रकरण इथेच न थांबता, जस्टिस नरिमन यात सामील होत, ज्या वकिलांची अजून बोलायची पाळी आली नाही त्यांच्याकडे निर्देश करून म्हणाले, ‘‘आठव्या आणि नवव्यांचं काय मग?’’ यावरही उपस्थितांनी हसून ‘दाद’ दिली. या घटनेचा वृत्तांत जेव्हा वर्तमानपत्रांमध्ये छापून आला, तेव्हाच्या इंग्रजी वर्तमानपत्रांमधले मथळे असे होते - 'A Humorous marriage of wit and pertinence' (इकॉनॉमिक्स टाइम्स, 2 ऑगस्ट 2017) 'At privacy hearing in SC, ASG says he is Like Liz Taylor's 7th husband, judge asks about 8th.' (द इंडियन एक्स्प्रेस, 2 ऑगस्ट 2017) या सगळ्याची चर्चा करण्याआधीच कुणाला वाटेल की, ‘हा तर विनोद आहे’, ‘वाखाणण्याजोगी चतुराई आहे’, ‘वातावरणातला ताण कमी करायचा प्रयत्न आहे’. यातलं नेमकं काय बरोबर आहे- सरळ-साधा विनोद की अजून काही ? तर लिंगभेदाचे अभ्यासक म्हणतील की, genderreversed परिस्थितीत पण हा विनोद ठरेल का, हे तपासून पाहावे. समजा, जर एएसजी स्त्री असती (स्वतंत्र भारतात आजवर तीनच बायकांची/स्त्रियांची एएसजी म्हणून नेमणूक झाली, याचीही नोंद घ्यायला हवी.) आणि असाच समांतर विनोद अशाच परिस्थितीत त्या व्यक्तीने/स्त्रीने केला असता तर? उदा.- ‘मला आता किशोरकुमारच्या चौथ्या बायकोसारखे वाटते आहे... ते’ या टिंबांमध्ये सामावणारे कुणी स्त्री भर सभेत विनोद म्हणून का होईना, बोलू शकेल? जर या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेल, तर हे Casual Sexism चे उदाहरण ठरते आणि तसं आढळल्यास मूळ पुरुषाच्या वक्तव्याचेही विश्लेषण करणे अपरिहार्य ठरते. वृत्तपत्रातल्या बातम्याचे वर दिलेले मथळे पाहिले की, इंग्रजीतल्या Locker room talk चा अर्थ त्यातून लगेच जाणवतो. सुप्रीम कोर्टामध्ये/देशातल्या सर्वोच्च न्यायालयात, जिथे मूलभूत हक्कांची चर्चा घडत आहे, अशा ठिकाणी या वक्तव्यांना जेव्हा विनोदाचा दर्जा मिळतो आणि मनमोकळा हशा होतो; तेव्हा पुरुषांच्या या आक्रमक भाषिक उपयोगांना अधिकाधिक अधिमान्यता मिळत जाते.

सर्वांत महत्त्वाच्या, उच्च योग्यतेच्या संस्थांमध्ये पुरुषांचे काय बोलणे वा भाष्य ‘ठीक आहे’ याच्या कक्षा चुकीच्या दिशेने रुंदावतात. शिवाय जेव्हा सत्तेतले पुरुष अशा भाषिक मर्यादा ओलांडतात, तेव्हा तितकी सत्ता नसणाऱ्या- एकूणातच सगळ्याच पुरुषांची भीड चेपते. मग वर्तमानपत्रातून या प्रसंगांचं वर्णन Light moments (IE), a chuckle असे केले जाते. अशा पदांबरोबर जो सन्मान-जी प्रतिष्ठा जोडलेली असते, ती अशा घटनांनंतरही जेव्हा अबाधित राहते; किंबहुना, काकणभर सरस ठरते, तेव्हाची गुंतागुंत सहज न सुटणारी होते. स्त्रियांबद्दलच्या आणि स्त्रियांच्या स्वत:च्या भाषेविषयीसुध्दा असे अनेक विषय, मुद्दे आहेत. काही वेळेस ते गंभीर आणि त्वरीत दखल घ्यावी असे असतात, तर इतर काही वेळेस आपल्या मनावर-समाजमनावर रंजक भाष्य करणारे असतात. या दोन्ही बाजूंना आलटून-पालटून स्पर्श करत ही लेखमाला पुढे जात राहील. एमिली डिकिन्सन म्हणते तसं ‘जगातल्या स्त्रियांनी जे अभिव्यक्तीतलं मूकपण जपलं आहे’ त्याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न!

अपर्णा दीक्षित, पुणे.

(हे सदर पुढील वर्षभर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या अंकात प्रसिद्ध होईल.)

Share on Social Media

मंच

मनोगत

डॅनिअल मस्करणीस

ही लेखमाला सत्य घटनांवर आधारित आहे, यात आलेली पात्रेही खरीखुरी आहेत. अर्थात त्या व्यक्तींचे वर्णन मी त्यांना जसे पाहिले, अनुभवले त्यावर आधारित आहे. परंतु त्यामुळे ते परिपूर्ण असेलच असे नाही, हेही प्रांजळपणे इथे नमूद करावेसे वाटते. आज धर्म हा कळीचा मुद्दा बनलाय. आपल्या भावना चटकन दुखावल्या जातायेत. तू माझ्या धर्माविषयी काही वाईट बोलू नको, मीही बोलणार नाही ही सोईस्कर भूमिका आपण सोडून दिली पाहिजे. धर्मातील कर्मकांडाचा पगडा, प्रभाव जर कमी करायचा असेल तर आज एक नवीन भूमिका अंगिकारण्याची गरज आहे. ‘मी माझ्या धर्मातील काही खटकणाऱ्या गोष्टी सांगतो, तू तुला तुझ्या धर्मातील खटकलेल्या काही बाबी सांग’ असे म्हणून आपण तरुणांनी आज एका नवीन संवादाला सुरुवात करणे गरजेचे आहे.

मी खरे तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेला एक संगणक अभियंता. कोणत्या तरी सामाजिक कार्यात भाग घेऊन आपलं छोटेखानी का असेना एक सामाजिक जीवन बनवावं असं मनोमनी इच्छिणारा. त्यामुळेच मी कधी फेसबुकवर लॉगिन करून सोशल होऊ पाहायचो तर कधी बोलीभाषेच्या संवर्धनासाठी जाऊ पहायचो. कधी संस्कृतीरक्षणात भाग घ्यायचो, तर कधी स्थानिक सामाजिक मंडळातही उपस्थिती लावायचो. पण या कशातच माझे मन रमले नाही. आणि अशातच एके दिवशी ‘ती’ घटना घडली. ती घटना माझ्या आयुष्यात किती दूरगामी परिणाम घडवून आणणार आहे, याची मला तेव्हा कल्पना नव्हती. ती घटना म्हणजे ‘डॉ नरेंद्र दाभोलकर’ यांची दिवसाढवळ्या झालेली हत्या. अपघाताने मी परिसरातील एका विवेकवादी ग्रुपच्या संपर्कात आलो. याअगोदर विविध उपक्रमात चटकन ‘बोअर’ होणारा, मी, इथे मात्र रेंगाळलो व नंतर रमलो. येथील चर्चेमुळे हळूहळू माझ्या विचारांच्या कक्षा रूंदावू लागल्या. विविध मतांची तपासणी या विवेकवादी ग्रुपमुळे मला करावीशी वाटली. कधीकधी उत्तरं मिळाल्याच्या समाधानापेक्षा, वारंवार प्रश्न विचारण्याचे कुतूहलही जागृत असणे तेवढेच महत्त्वाचे असते हे हळूहळू उमजू लागले. विवेकी विचार ऐकणे, ते आवडणे, ते मनास पटणे व हळूहळू नेणिवेच्या पातळीवर झिरपून ते कृतीत उतरविणे असा माझ्यातील सूक्ष्म बदल मला जाणवत होता. हा बदल लिखाणाच्या माध्यमातून टिपावा आणि विवेकी विचाराचा हा आनंद इतरांसोबतही वाटावा असं वाटू लागलं आणि यातच या पुस्तकाची बीजे रोवली गेली.

जे काही आपल्याला आपल्या मर्यादित दृष्टीने जाणवलंय, उमजलंय ते मनापासून, कोणाचीही पर्वा न करता, हवं तसं आणि मुख्य म्हणजे आपणा स्वतःला वाचावं वाटेल असं लिहावंसं वाटलं. लिहिण्यास वर्ष-दीड वर्ष वेळ घेऊन एप्रिल 2018 मध्ये ड्राफ्ट फायनल केला. त्याच एप्रिल महिन्यात ‘साधना’च्या पुण्याच्या कार्यालयात पहिल्या-वहिल्या पुस्तकाचे बाड घेऊन मी गेलो. साधना साप्ताहिकाच्या व इतर कामात इतके व्यग्र असूनही संपादक, विनोद शिरसाठ यांनी 15 दिवसात संपूर्ण ड्राफ्ट एकहाती वाचून भेटण्यासाठी बोलावलं. हे लिखाण ‘साधना साप्ताहिकात’ प्रथम लेखमालिकेच्या स्वरूपात व नंतर पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याची कल्पना त्यांनी मांडली व तात्काळ जून महिन्यापासून ‘मंच’ ही लेखमाला सुरू झालीही. लेखमाला अगोदर प्रकाशित करण्यासंबंधीची विनोदसरांची कल्पना अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरली. महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरूनही वाचकांचा भरभरून प्रतिसाद ‘मंच’ या लेखमालेला लाभला. प्रतिक्रियेचा अक्षरशः पाऊस पडला.

‘साधना’चा वाचक वर्ग किती चोखंदळ आहे याचीही प्रचिती यानिमित्ताने मला आली. तेव्हा सर्वप्रथम मी विनोदसरांचे ‘साधना’ हे व्यासपीठ माझ्यासारख्या नवलेखकाला उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानू इच्छितो. या पुस्तकाचे सुरुवातीचे हस्तलिखित वाचून अमूल्य सूचना, प्रतिक्रिया देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक वीणा गवाणकर, स्टॅन्ली गोन्साल्विस, जीवन विकास मंडळाच्या ‘विवेकमंच’ या विभागाचे फ्रान्सिस आल्मेडा व ॲड.अतुल आल्मेडा; माझ्या मराठीच्या शिक्षिका लुईझा डिसोजा तसेच पत्नी अर्लिना मस्करणीस या सर्वांचा मी खूप ऋणी आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यस्त करिअर, दर आठवड्याचा मुंबई-पुणे प्रवासाचा व्याप व कुटुंब सांभाळून पुस्तक लिहिण्यासाठी वेळ कसा काढावा या विवंचनेत मी पडलो नाही आणि याचे कारण माझे प्रेरणास्थान, माझे मम्मी-पप्पा. इतकी वर्षे मुंबईला रोज तीन-चार तास प्रवास करून त्यांनी मन लावून सरकारी नोकरी केली आणि घरस संसाराबरोबर परसदारातील शेतीही तेवढ्याच मेहनतीने, जिव्हाळ्याने फुलविली. मला तर फक्त कुदळ- फावड्याऐवजी पेनच काय ते हातात घ्यायचं होतं!

लिखाणासाठी मला हवी असलेली स्पेस प्रेमाने उपलब्ध करून दिल्याबद्दल माझी सुविद्य पत्नी अर्लिना हिचेही आभार मानावे तितके थोडेच आहेत. मुखपृष्ठ करणारे गिरीश सहस्रबुद्धे व निर्मिती व्यवस्थापक सुरेश माने, साधना परिवारातील सर्व सदस्य व प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्या सर्व हितचिंतकांचेही खास आभार. ही लेखमाला सत्य घटनांवर आधारित आहे, यात आलेली पात्रेही खरीखुरी आहेत. अर्थात त्या व्यक्तींचे वर्णन मी त्यांना जसे पाहिले, अनुभवले त्यावर आधारित आहे. परंतु त्यामुळे ते परिपूर्ण असेलच असे नाही, हेही प्रांजळपणे इथे नमूद करावेसे वाटते. आज धर्म हा कळीचा मुद्दा बनलाय. आपल्या भावना चटकन दुखावल्या जातायेत. तू माझ्या धर्माविषयी काही वाईट बोलू नको, मीही बोलणार नाही ही सोईस्कर भूमिका आपण सोडून दिली पाहिजे. धर्मातील कर्मकांडाचा पगडा, प्रभाव जर कमी करायचा असेल तर आज एक नवीन भूमिका अंगिकारण्याची गरज आहे.

‘मी माझ्या धर्मातील काही खटकणाऱ्या गोष्टी सांगतो, तू तुला तुझ्या धर्मातील खटकलेल्या काही बाबी सांग’ असे म्हणून आपण तरुणांनी आज एका नवीन संवादाला सुरुवात करणे गरजेचे आहे. पुरोगामी महाराष्ट्रात व एकंदरीतच भारतभूमीत धर्मचिकित्सेचा आवाज अधिक प्रबळ होण्यासाठी लोकशाही मार्गाने धर्माशी निगडित विविध मतप्रवाह बिनदिक्कतपणे चर्चिले जाणे गरजेचे आहे. वसईतील, ‘निर्मळ’ या ख्रिस्तीबहुल गावात सुरू झालेल्या एका स्थानिक पातळीवरच्या उपक्रमाचा हा लेखाजोगा वाचकांना त्या दिशेने विचारप्रवृत्त करेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.

डॅनिअल मस्करणीस, वसई

danifm2001@gmail.com

(मागील वर्षभर साधना साप्ताहिकातून ‘मंच’ ही लेखमाला प्रसिद्ध झाली. अनोखा विषय व तितकीच अनोखी लेखनशैली यामुळे वाचकप्रिय ठरलेल्या या लेखमालेचे पुस्तक 25 जानेवारी 2020 रोजी, वसई, जि.पालघर येथे कुमार केतकर यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. त्या पुस्तकाला लेखकाने लिहिलेले हे मनोगत.)

Share on Social Media