Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

मुस्लिम सत्यशोधकांची चहू बाजूंनी कोंडी

15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केले तेव्हा साधनाचे कार्यालय मुंबई शहरात होते, 1956 मध्ये ते पुणे शहरात हलवण्यात आले. त्या आठ वर्षांत साधनाच्या भावी वाटचालीची भक्कम पायाभरणी झाली, ती साने गुरुजी, आचार्य जावडेकर व रावसाहेब पटवर्धन या तीन संपादकांच्या काळात. त्यानंतरचे पाव शतक यदुनाथ थत्ते साधनाचे संपादक होते आणि तो काळ खऱ्या अर्थाने साधनाचे उत्कर्ष पर्व म्हणता येईल. कारण विविध क्षेत्रांतील व्यक्ती, संस्था, संघटना यांना बळ पुरवण्याचे काम त्या काळात मोठ्या प्रमाणात घडून आले. त्या काळात ज्या व्यक्तींना व त्यांच्या कार्याला साधनाने सतत व जोरदार पाठिंबा दिला, त्यातले एक प्रमुख नाव म्हणजे हमीद दलवाई.

1958 मध्ये साधनाने कुमार विशेषांक प्रकाशित करायला सुरुवात केली, त्या पहिल्याच अंकात ‘आहमद’ या शीर्षकाची कथा प्रसिद्ध झाली. त्या कथेच्या शेवटी आहमद नावाच्या शालाबाह्य मुलाने, अगदीच असह्य झाल्यावर पळायचे थांबवून, जिवाच्या आकांताने सर्व शक्ती एकवटून दगड उचलले आणि (त्याची टिंगलटवाळी करणाऱ्या) शाळेतील मुलांच्या दिशेने भिरकावले. सुन्न करून सोडणारा तो शेवट! ती कथा वाचणाऱ्या कोणाही वाचकाला ते दगड आपल्याच दिशेने आले असे वाटले असणार, आजही वाटेल. त्या कथेचे लेखक होते हमीद दलवाई, तेव्हा वय वर्षे पंचवीस. त्यानंतरची वीस वर्षे तो लेखक व त्याचे कार्य आणि साधना यांचे घट्ट नाते राहिले.

हमीद दलवाई यांना आयुष्य मिळाले अवघे 45 वर्षे. त्यातील 25 वर्षे सार्वजनिक म्हणावे असे, त्यातील अर्धा कालखंड ललित लेखक म्हणून तर अर्धा कालखंड वैचारिक लेखन व मुस्लिम समाजसुधारणा. 1966 हे वर्ष त्यांच्यासाठी टर्निंग पॉर्इंट म्हणावे असे होते. त्या वर्षी चार महत्त्वाच्या घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. पहिली- ‘इंधन’ या नावाजलेल्या व वादग्रस्तही ठरलेल्या कादंबरीचे लेखक म्हणून ते प्रसिद्धीला आले, दुसरी- सात तलाकपीडित मुस्लिम महिलांचा ऐतिहासिक ठरलेला मोर्चा त्यांनी मुंबईत मंत्रालयावर काढला, तिसरी- ‘मराठा’मधील उपसंपादक ही नोकरी सोडून पूर्णवेळ सामाजिक काम करायला त्यांनी सुरुवात केली, चौथी- कोल्हापूर येथील कोरगावकर ट्रस्टकडून फेलोशीप मिळवून भारतभ्रमण करायला प्रारंभ केला. त्यानंतरची दहा वर्षे म्हणजे दलवाई नावाचा झंझावात. त्या दशकात त्यांनी काय नाही केले? मूलगामी व विचारप्रवर्तक म्हणावे असे अनेक लेख लिहिले, वादळी म्हणावीत अशी शेकडो भाषणे केली, थोर-थोर विद्वानांशी वादविवाद केले, जीर्ण पुराणमतवाद्यांना टक्कर दिली, अनेक परिषदा आयोजित केल्या, शिबिरे भरवली, मोर्चे- आंदोलने केली. महाराष्ट्र पिंजून काढला, देशातला बराच भूप्रदेश पायाखालून घातला, विदेशातही घोडदौड करण्याची आकांक्षा बाळगली. 1976 मध्ये अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याला दोनशे वर्षे पूर्ण झाली, तेव्हा अमेरिका व युरोप चा दौरा केला. आणि त्यानंतरच्या वर्षी मृत्यू आला. त्यामुळे एक झंझावात अकाली संपुष्टात आला.

दलवाई यांनी मांडलेला विचार, घेतलेल्या भूमिका आणि प्रत्यक्ष रणांगणात उतरून केलेले कार्य हे सारे एकमेवाद्वितीय आहे. भारताच्या इतिहासात असे उदाहरण अद्याप नाही, जागतिक इतिहासात शोधावे लागेल. तो विचार, त्या भूमिका व ते कार्य काय स्वरूपाचे होते? मुस्लिम समाजातील सुधारणा हे त्याचे मध्यवर्ती केंद्र होते, मुस्लिम मूलतत्त्ववाद हे त्यांचे लक्ष्य होते. पण मूलतः तो लढा शोषणाच्या व अन्यायाच्या विरोधात होता, समतेच्या व मानवतेच्या बाजूने होता. तो सारा आटापिटा हे राष्ट्र एकात्म व्हावे, आधुनिक व्हावे, धर्मनिरपेक्ष व्हावे यासाठी होता.

अशा या हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना 22 मार्च 1970 रोजी केली, स्थापनेची सभा साधना कार्यालयाच्या आंतरभारती सभागृहात झाली. मंडळाच्या स्थापनेनंतर दलवार्इंना केवळ सात वर्षांचे आयुष्य लाभले, पण त्या दशकभरात त्यांनी इतकी पायाभरणी केली होती की, त्यानंतरचे दशकभर त्यांच्या अनुयायांनी तो लढा मोठ्या हिकमतीने चालू ठेवला. मात्र 1986 हे वर्ष त्या सर्वांचे खच्चीकरण करणारे ठरले, शहाबानो या महिलेला पोटगी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राजीव गांधी सरकारने संसदेत कायदा करून रद्दबातल ठरवला. तो प्रकार संपूर्ण देशासाठी प्रचंड मोठा आघात होता. त्यानंतर देशाच्या एकूणच राजकारणाला किती मोठी कलाटणी मिळाली, याबाबत आतापर्यंत खूप बोलले/लिहिले गेले आहे. पण त्या निर्णयाचा सर्वाधिक फटका ज्या संस्था-संघटनांना बसला, त्यात अग्रभागी होते मुस्लिम सत्यशोधक मंडळ. त्यानंतर मंडळाचा सूर हरवला, कार्यकर्ते सैरभैर झाले, समर्थक निराशेच्या गर्तेत अडकले. पुढील तीन दशके मंडळाचे काम चालू राहिले, पण तो झंझावात पुन्हा निर्माण झालेला नाही, अद्यापही! आता ते मंडळ 50 वर्षांचे झाले आहे, त्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष 22 मार्च 2020 रोजी संपत आहे.

अर्थातच, हमीद दलवाई यांच्याबरोबर काम करणारे वा त्यांची साथसंगत करणारे बहुतांश लोक आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत, काही आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर आहेत, काहींनी त्या विचारांची साथसंगत सोडलेली आहे. मात्र मंडळाचे विद्यमान कार्यकर्ते व हितचिंतक स्वतंत्रपणे वा एकत्रितपणे शक्य तेवढे प्रयत्न करीत आहेत. पण मुळात अपुरी साधने व आर्थिक बळाचा अभाव यामुळे त्यांना अनेक मर्यादा येत आहेत. मात्र ‘या मर्यादा एकवेळ परवडल्या, पण चहूबाजूंनी होणारी कोंडी नको’ अशी त्यांची अवस्था आहे. ही कोंडी कमालीची त्रासदायक आहे, त्यांनी समाजविन्मुखच व्हावे अशी आहे. या कोंडीमुळेच मुख्यत: नवे कार्यकर्ते त्यांच्याकडे येण्याला मर्यादा पडत आहेत. या कोंडीच्या चार बाजू कशा आहेत?

साहजिकच पहिली बाजू अडवली आहे, ज्या मुस्लिम समाजासाठी हे सत्यशोधक काम करतात त्या समाजातील पुराणमतवाद्यांनी! ‘हे सत्यशोधक देव आणि धर्म नाकारणारे आहेत,’ असा त्यांचा अपप्रचार आहे. जुन्या व जाचक रूढी-परंपरांना कवटाळून बसलेल्या या लोकांकडून सत्यशोधकांंवर काही टीका जाणूनबुजून, तर काही टीका अजाणतेपणातून होत असते. आपले हितसंबंध जपण्यासाठी व कमजोर घटकांचे शोषण करून स्वत:चे वर्चस्व राखण्यासाठी हे काही जणांकडून घडते. मात्र उर्वरित जनता अज्ञानाच्या व धर्माच्या नावाखाली अडकलेल्या बेड्यांमधून बाहेर पडलेली नसल्याने, मुस्लिम सत्यशोधकांकडे पाखंडी म्हणूनच पाहते; त्यांना शत्रूस्थानीच मानते. साहजिकच, मुस्लिम सत्यशोधकांना समर्थन तर सोडाच, जागोजागी कडवा विरोध करत राहते.

सत्यशोधकांची दुसरी बाजू अडवली आहे, या देशातील बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाने. मुळात हिंदू समाजातील बहुतांश लोकांच्या मनात मुस्लिम समाजाविषयी या ना त्या प्रकारचा राग, द्वेष, वा दुरावा आहे. त्याचे कारण काहींच्या मनावर इतिहासाचे ओझे आहे, काहींच्या मनात तो राग-द्वेष लहानपणापासूनच्या संस्कारातून पेरला गेलेला आहे. काहींच्या मनात तो सभोवतालच्या घटकांकडून होत असलेल्या विखारी प्रचारामुळे आहे, काहींच्या मनात स्वत:च्या अनुभवांचा चुकीचा अर्थ लावण्यातून तो राग द्वेष आहे. तर उर्वरितांच्या मनात दुरावा आहे, सामाजिक व सांस्कृतिक अभिसरण न घडण्यातून म्हणजे प्रत्यक्ष संबंध-संपर्क न येण्यातून किंवा कमी प्रमाणात येण्यातून! परिणामी सर्वसामान्य हिंदू लोक, धर्मपरायण हिंदू लोक, धर्मनिष्ठ हिंदू लोक, हिंदुत्ववादी लोक आणि धर्मांध हिंदू लोक या सर्वच घटकांकडून मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडे ‘अखेर मुस्लिमच’ अशा पद्धतीने पाहिले जाते. अर्थातच वरीलपैकी काही घटकांना मुस्लिम सत्यशोधक मंडळाविषयी थोडीबहुत सहानुभूती वाटत असते; पण त्याचे मुख्य कारण हे मंडळ मुस्लिम मूलतत्ववादावर टीका करते म्हणून, मुस्लिम समाजातील रूढी-परंपरांवर प्रहार करीत असते म्हणून! मात्र हेच सत्यशोधक जेव्हा हिंदू समाजातील रूढी-परंपरा यांच्यावर किंवा तिथेही स्त्रियांचे व दलितांचे होत असलेले शोषण याबद्दल बोलायला लागतात, तेव्हा हिंदूंमधील सुधारणावाद्यांनाही ते फारसे रूचत नाही, कडव्यांचे तर विचारायलाच नको. म्हणजे हिंदूंमधील बहुतांश लोक मुस्लिम सत्यशोधकांकडे ‘काट्याने काटा काढणे’ अशा पद्धतीने बघत असतात, त्यापलीकडे या सत्यशोधकांची तमा त्यांना अजिबात नसते.

मुस्लिम सत्यशोधकांची तिसरी बाजू अडवली आहे, त्यांना पाठिंबा, मदत व साथसंगत करणाऱ्या उदारमतवादी, पुरोगामी वा सुधारणावादी लोकांकडून. यांच्यात अनेक प्रकारचे गट-तट आहेत, पण त्यांच्या भूमिकांना तीन प्रमुख आयाम आहेत. एक- काहींना वाटते की, मुस्लिम सत्यशोधक मंडळ ज्या प्रकारची भूमिका घेते, त्यामुळे धर्माचा पगडा असलेला मुस्लिम समाज आपल्यापासून दूर जाईल. तर काहींना वाटते की, स्वधर्मावर टीका करणाऱ्या सत्यशोधक मंडळाच्या भूमिकांचा गैरफायदा हिंदुत्ववादी शक्ती उचलतील आणि मग मंडळाला जे हवे त्याच्या नेमके उलट घडेल. तिसरा आयाम असणाराही एक वर्ग आहे, त्यांच्या मतांनुसार धर्म ही अतिशय गंभीर व जटिल बाब आहे; तिला हात न घालता शिक्षण, बेरोजगारी असे विषय हाताळूनच मुस्लिम समाजाला सुधारणांच्या दिशेने सरकवता येईल. वरील तीनही आयाम असणाऱ्या लोकांच्या भूमिका स्थूल मानाने बरोबर आहेत आणि त्यांच्या आक्षेपांमध्ये वा त्यांना वाटणाऱ्या भीतीमध्येही तथ्य काही प्रमाणात आहे. मात्र त्या आधारावर हे लोक मुस्लिम सत्यशोधकांवर ज्या प्रकारचा दबाव कळत-नकळत निर्माण करतात, त्याचा परिणाम या सत्यशोधकांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी होऊन जाते. त्यातही विशेष हे आहे की, धर्मनिष्ठ हिंदू वा हिंदुत्ववादी समजल्या जाणाऱ्या व्यक्ती-संस्था-संघटना यांच्याशी जरा कुठे संबंध आला किंवा संवाद झाला की, या सत्यशोधकांकडे संशयी नजरेने पाहिले जाते, ‘हे शत्रूच्या कळपात जातील किंवा शत्रू यांचा गैरफायदा उठवतील’ अशी काहीशी ती समजूत असते. आणि बरोबर याच्या उलट हिंदुत्ववाद्यांमधील उदारमतवादी समर्थक वा सहानुभूतीदार वागत असतात, त्यांच्या उक्ती-कृतीला या सत्यशोधकांनी ‘हो’ म्हणावे अशी अपेक्षा बाळगून असतात.

सत्यशोधकांची चौथी बाजू अडवली जाते सरकारकडून व प्रशासनाकडून. कोणतेही सरकार मग ते राज्यांतील असो वा केूंद्रातील आणि कोणत्याही पक्षाचे असो (डाव्या, उजव्या, मधल्या), ते या सत्यशोधकांपासून चार हात दूर राहणे पसंत करतात. ‘हे सत्यशोधक इतके अल्पसंख्य आहेत की, यांचा आपल्याला सत्ता मिळविण्यासाठी काही फायदा नाही’ अशी ती भावना. पण एक वेळ ही भावना परवडली अशी त्यांची दुसरी भावना असते. ती अशी की, या सुधारणावाद्यांशी संपर्क संवाद ठेवणे म्हणजे सर्वसामान्य वा धर्मश्रद्ध मुस्लिम समाज (जो आपला मतदार आहे वा होऊ शकतो) आपल्यापासून दुरावेल! म्हणजे एकदा सरकार दरबारी अशी मानसिकता असेल तर मुस्लिम सत्यशोधकांच्या वाट्याला प्रशासनाच्या स्तरावर बेपर्वाई, बेफिकिरी व असहकार येणार यात विशेष ते काय! या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे, मुस्लिम समाजातील सुधारणांसाठी काही कायदे करायचे असतील वा काही पुरोगामी पावले टाकणारे कार्यक्रम-उपक्रम राबवण्याची मागणी करायची असेल तर, सरकार व प्रशासन यांच्याकडून चालढकल वा साफ दुर्लक्ष केले जाते. तरीही या सत्यशोधकांनी आग्रह धरलाच तर, ‘तुमच्या या मागण्यांना तुमच्या समाजातून पाठिंबा नाही, तो तयार झाला की आम्ही हे करू’ असे निर्लज्ज उत्तर अजिजीच्या सुरात दिले जाते. दाता व याचक असे काहीसे स्वरूप त्याला प्राप्त होते. वस्तुत: असे म्हणून आपण समोरच्यांचा तर सोडाच, देशाचाही अवमान करीत आहोत हे त्यांच्या गावीही नसते.

तर अशा प्रकारे मुस्लिम सत्यशोधकांची चहूबाजूंनी होत आलेली कोंडी आहे. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी खुष्कीचा म्हणावा असा मार्ग दिसत नाही. परिणामी या सत्यशोधकांचे प्रभावक्षेत्र वाढत नाही. मात्र वरील परिस्थिती लक्षात घेता, मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे, देशपातळीवर तरी अनन्यसाधारण आहे.

तरीही प्रश्न उरतोच, या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी काही उपाय आहेत का? अर्थातच दीर्घकाळच्या जटिल परिस्थितीतून निर्माण झालेली ही कोंडी असल्याने, सोपी उत्तरे त्यासाठी असणार नाहीत. मात्र एक लक्षात घेतले पाहिजे की, ही कोंडी हमीद दलवाई यांनाही होतीच! त्यांनी त्यातून धडका मारून झंझावात कसा निर्माण केला हे समजून घेतले, तर काही एक वाट प्राप्त परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी दिसू शकेल. बौद्धिक व नैतिक बळ गोळा करणे, संघटनशक्ती वाढवणे आणि विरोधकांच्या टीकेला व समर्थकांच्या आक्षेपांना तोडीस तोड उत्तरे देण्यासाठी वाद-विवादाची तयारी ठेवणे, प्रसंगी किंमत चुकवण्याची तयारी असणे हीच ती वाट! अर्थातच, यासाठी नि:स्पृह वृत्ती अंगी बाणवावी लागेल. ते सर्व करण्यासाठी मुस्लिम सत्यशोधकांना बळ मिळो अशी प्रार्थना! आणि त्यासाठी त्यांना मोकळा श्वास व खुले अवकाश मिळू द्यावे अशी (सर्व प्रकारच्या) हिंतचिंतकांना आग्रहाची विनंती!

Share on Social Media

मुलाखत

जीवाची बाजी लावून लढेन!

सय्यदभाई

22 मार्च 1970 रोजी हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली, त्या घटनेला आता 50 वर्षे झाली आहेत. या निमित्ताने मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा.शमसुद्दीन तांबोळी यांनी मंडळाच्या अर्धशतकी वाटचालीचा घेतलेला मागोवा, साधनाच्या मागील पाच अंकांतून क्रमश: प्रसिद्ध केला आहे. या अंकात मंडळाचे माजी अध्यक्ष आणि दलवार्इंच्या विचाराने अर्धशतकभर कार्यरत असलेले सय्यदभाई यांची दीर्घ मुलाखत प्रसिद्ध करीत आहोत. डिसेंबर महिन्यात सय्यदभार्इंना चतुरंग प्रतिष्ठान, मुंबई यांचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला गेला आणि 26 मार्चला त्यांना पद्मश्री सन्मान प्रदान केला जाणार आहे. त्यामुळे या मुलाखतीचे औचित्य विशेष आहे.

प्रश्न - सय्यदभाई, नमस्ते. तुम्ही आता वयाच्या 84 च्या टप्प्यावर आहात. आणि पुण्याच्या एका टोकापासून साधनाच्या कार्यालयात स्वतः कार चालवत (रस्त्यावरची गर्दी बाजूला सारत) आलेला आहात. तुमच्या या ऊर्जेचं रहस्य काय? आणि ही ऊर्जा सामाजिक कामासाठी खर्च करण्याची तुमची इच्छादेखील इतका दीर्घ काळ टिकून राहिली आहे, त्याचंही रहस्य काय?

ती माझी भूक आहे! पोटाच्या भुकेसाठी मनुष्य जसा धडपडत असतो, तसं ‘समाज बदलला पाहिजे (म्हणजे केवळ मुस्लिम समाजच असं नाही), माणसांतलं माणूसपण उभं केलं पाहिजे’ ही भूक मला स्वस्थ बसू देत नाही. समाजाचे आपण देणेकरी लागतो, असं मला नेहमी वाटतं. काही तरी ऊर्मी असेल, ध्यास असेल तर मनुष्य आकाशातदेखील जाऊ शकतो. समाज किती पारदर्शक असायचा तेवढा असो; मला माझ्यात जास्तीत जास्त पारदर्शकता कशी आणता येईल, असा विचार करतो. स्वतः न केलेल्या गोष्टी इतरांना सांगण्याचा नैतिक अधिकार मला नाही, असंच मी मानतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची सुरुवात मी स्वतःपासून करतो.

कार चालवणं वगैरे किरकोळ गोष्टी आहेत. मी घरून माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी जायला निघतो; तेव्हा एखादा मनुष्य घाईघाईने जाताना दिसला, तर त्याच्याजवळ कार थांबवतो आणि त्याला विचारतो की- ‘मी अमुक ठिकाणी चाललोय, तुम्हाला वाटेत सोडलं तर चालेल का?’ सुरुवातीला तो मनुष्य दचकतो. पण मग पुरुष असला तर शेजारी बसतो, बाईमाणूस असेल तर मागे. मग त्यांना मी वाटेत सोडतो. कधीकधी ड्रायव्हर सोबत असला तरी, त्याला मागे बसवून मी कार चालवतो. पुष्कळ लोकांना कौतुक वाटतं त्याचं! पण या गोष्टी किरकोळ आहेत.

प्रश्न - आता बोलताना तीन गोष्टी तुम्ही सांगितल्या- ऊर्मी, अस्वस्थता आणि ध्यास! ध्यास हा काही तरी उदात्त हेतूंसाठी असतो. अस्वस्थता ही सभोवतालच्या परिस्थितीविषयीच्या असमाधानातून आलेली असते आणि ऊर्मी ही ती अस्वस्थता घालवण्याठीची आंतरिक ऊर्जा असते. या पद्धतीने तुम्ही गेली पन्नास वर्षं काम करत आहात आणि या पन्नास वर्षांच्या टप्प्यानंतर ‘शिरपेचात मानाचे तुरे’ म्हणावेत असे दोन सन्मान तुम्हाला मिळालेत. डिसेंबरमध्ये मुंबईतल्या चतुरंग प्रतिष्ठानचा ‘जीवनगौरव’, हा तीन लाख रुपयांच्या रकमेचा पुरस्कार (रकमेचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे, अजूनही आपल्याकडे रक्कम मोठी असेल तरच तो पुरस्कार मोठा आहे, हे लोकांना पटतं. ‘मानाचा’ वगैरे शब्द वापरून गुळगुळीत झालेेत!) तुम्हाला प्रदान केला गेला. आणि त्यापाठोपाठ केंद्र सरकारचा ‘पद्मश्री’ हा किताब तुम्हाला जाहीर झालेला आहे, जो या महिन्याच्या अखेरीस राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जाईल. अर्धशतकभर काम केल्यानंतर असा सन्मान होतोय, तर आता तुमच्या मनातली नेमकी भावना काय आहे?

हे सन्मान आणि पुरस्कार ही माझ्या कामाची पोचपावती आहे, असं मी मानतो. संघटनेची भूमिका, तिची उद्दिष्टं यांच्या दिशेने जाण्यासाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे. आणि असे जे-जे काम करत पुढे जातील, त्यांना लोक नक्की सलाम करतील. असं काम करणारी आमच्या संघटनेत अनेक माणसं होती, त्यांतलाच मी एक आहे. मोकळेपणाने सांगतो- मला दुःख या गोष्टीचं आहे की, वजीर पटेलसारखा मनुष्य आमच्या संघटनेतून निघून गेला; सतत पुरोगामी विचार करणारा, तसं लिखाण करणारा बेन्नूरसारखा विचारवंत निघून गेला. का? तर त्यांना दलवाईची मांडणी मान्य नव्हती. माझं म्हणणं असं की, जी काही मतभिन्नता असेल त्यावर आपण बसून बोलू या ना! तुम्हाला दलवार्इंचं काय मान्य नाही?

माझ्याबाबतीत सांगायचं तर, दलवार्इंसारखा मनुष्य मी आयुष्यात पहिला नाही. उद्दिष्टांशी तडजोड दलवार्इंनी कधीच केली नाही. गांधीवादी होते ते. आडवळणाचा, अधिक लांबचा रस्ता असला तरी आपल्याला जिथे पोचायचं आहे, तिथे आपण पोचलंच पाहिजे आणि एकटा उरलो तरी शेवटपर्यंत हे काम करीन- हा जो दलवार्इंच्या व्यक्तिमत्त्वामधला भाग होता, तोच माझ्यात खोल रुतलाय. समोरचा माणूस काय करतो याच्याशी मला देणं-घेणं नाही. जे करणं योग्य आहे ते मी केलं पाहिजे, असं मला वाटतं.

त्यामुळे स्वतःचा एक छोटा कारखाना चालवून मी संघटनेचं काम करत आलो. माझं घर काही मी कुणाच्या भरवशावर सोडलेलं नाही. असं स्वतःचं घर स्वतः सांभाळून काम केलंत की, त्याचं एक वेगळं समाधान असतं. मी काही चुकीचं करत नाही, याची कल्पना असल्यामुळे माझ्या घरचंही कुणी काही म्हणत नाही. माझ्या कारखान्याचं ऑफिस मोठं आहे. तिथे अनेक जण आपापले प्रश्न घेऊन चर्चेसाठी येतात. एका बाजूला कारखान्याचं काम आणि दुसरीकडे येणाऱ्या लोकांच्या भेटीगाठी- असं माझं सध्या चाललेलं असतं.

प्रश्न - तुम्हाला पद्मश्री जाहीर झाली, तेव्हा घरातले लोक, नातेवाईक, मित्रमंडळी यांना आनंद होणं स्वाभाविकच. पण सभोवतालच्या अनेकांना ‘अशा प्रकारचा एक माणूस आपल्यात आहे, तो अजूनही काम करतोय आणि त्याला आता पद्मश्री मिळाली,’ असं नव्यानेच माहीत झालं. तर पुरस्कार मिळाल्यानंतर मुस्लिम समाजातून, वैचारिक विरोधकांकडून तुम्हाला ज्या प्रतिक्रिया आल्या, त्या काय स्वरूपाच्या होत्या?

लोकांना बरं वाटलं की, हा इतकी वर्षं अजूनही काम करतोय... मला स्वतःला काय वाटलं, ते सांगतो. मी नेहमी स्वतःशी बोलून स्वतःला तपासून घेत असतो. शासन भाजपचं आहे, आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे कुठल्या तरी पक्षाचं सरकार येणारच. भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षाचं सरकार असतं आणि माझ्या कामासाठी त्यांनी पुरस्कार दिला असता, तर तो मी घेतलाच असता ना? आताचा हा पुरस्कार काही त्यांनी माझ्याकडून मतं मागण्यासाठी दिलेला नाही.

काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा आम्ही राजीव गांधींना भेटायला गेलो होतो. त्यांच्याशी दीड तास चर्चा झाली; पण एका शब्दानेही ते म्हणाले नाहीत की, मुस्लिमांना न्याय मिळाला पाहिजे. तलाकपीडित महिलांच्या प्रश्नांना त्यांनी दिलेल्या उत्तरांत मला गुर्मी दिसत होती. एका मुलीने त्यांना विचारलं की, ‘तुम्ही आम्हाला किलोमीटरचे दगड समजता का? कधीही वापरावं फेकून द्यावं..?’ पण सगळ्यावर त्यांचं उत्तर हेच होतं की, ‘नहीं, हम इससे अच्छा कानून लायेंगे.’

आता भाजपचं सरकार आलेलं आहे. या सरकारच्या काही कामांबद्दल, उद्दिष्टांबद्दल माझे मतभेद आहेत. पण महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या आमच्या संघटनेला त्यांचा पाठिंबा आहे, असं मला जाणवतं. तीन तलाक बंद होण्यासाठी कायदा व्हावा, म्हणून 2017 या वर्षी पार्लमेंटमध्ये आम्ही पंतप्रधानांना भेटलो (माझ्यासोबत चार सहकारीही होते.) आम्ही त्यांना निवेदन दिलं. त्यांना म्हटलं की, ‘समतेवर आधारित समान नागरी कायदा करा.’ ते म्हणाले, ‘टप्प्याटप्प्याने करू.’ भेटीची वेळ पाच मिनिटांची होती. पण ते आमच्याशी पंधरा मिनिटं बोलले. आमच्याबरोबर फोटो काढला. आमचे काही लोक म्हणतात की, ‘पंतप्रधान आपल्या विचारांच्या विरोधी पक्षाचे आहेत, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही.’ मग काय करणार तुम्ही? सध्या सत्ता त्यांची आहे. आपली सत्ता आहे का? असती तर आम्ही तुमच्याकडे आलो असतो ना? 1978 मध्ये जनता पक्षाची सत्ता असताना तुमच्याकडे आलोच होतो आम्ही. ‘तुमचं करू हो, काय घाई आहे...? आत्ता तर आम्ही आलो आहोत-’ अशी भाषा होती तेव्हा. आम्हाला वाटलं होतं की, आता मंडळाच्या मागण्या आधी मार्गी लागतील, पण तेव्हा मंडळ शेवटच्या नंबरवर गेलं.

प्रश्न - 1970 ला मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली. जनता पक्षाचं सरकार 1977 ला आलं. त्या वेळी हमीदभाई त्यांच्या शेवटच्या आजारपणात होते. मात्र मंडळाने तोपर्यंतच्या पाच-सहा वर्षांत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही खूप कार्यक्रम-उपक्रम केलेले होते. त्यामुळे तुमच्या मनात त्या वेळी असं होतं का, की जनता पक्षाचं सरकार आल्यामुळे मंडळाचं काम राष्ट्रीय स्तरावर जाईल, आपलं काम पोहोचेल? पण त्या वेळी तुमचा भ्रमनिरास झाला किंवा तुमच्या आशा फलद्रूप झाल्या नाहीत, असं म्हणायचं का?

मोठ्या प्रमाणावर भ्रमनिरास झाला. फेकले गेलो आम्ही. हमीदभाई आजारी असतानाही उद्दिष्टं गाठण्यासाठी मंडळाची जी धडपड चालू होती, तिला असा प्रतिसाद मिळाल्यामुळे धक्का बसला. अजूनही ते माझ्या डोक्यात आहे खरं! म्हणजे विरोधी पक्षात असताना ‘जोरात चालू द्या, सय्यदभाई, आम्ही पाठीशी आहोत!’ अशी भाषा आणि सत्तेत आल्यानंतर ‘करू या की! काय घाई आहे?’ अशी भाषा. इथे नाशिकला जनता पक्षाचा फार मोठा मेळावा झाला होता. खूप आलिशान तक्के, गालिचे असा सरंजाम होता. नेहमी साध्या खुर्चीवर बसणारी आपली माणसं! तिथे कुणी तरी मला म्हणाले, ‘तुमचं एकतारी भजन आहे. तेच ते बोलता तुम्ही.’ मी म्हटलं, एवढंच तर आहे आमच्याकडे. आणि मला काही कुठली सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा नको आहे. पुरुष बदलला पाहिजे. मुस्लिम महिलांना माणूस म्हणून न्याय मिळाला पाहिजे. तलाक देण्यापूर्वी तिची मर्जी विचारली गेली पाहिजे. दोघांच्या वादात निकाल देणारा तिसरा असला पाहिजे. हे सगळं कायद्यात नाही. त्यासाठीच आलो आहोत आम्ही इथे. आता आपली सत्ता आलेली आहे. तुम्ही करू शकता हे. ते म्हणाले, ‘पण हे सगळं आमच्या एकट्याच्या हातात नाही.’ दलवाई समाजवादी विचारसरणीचे होते, मीही आहे. पण तेव्हा मात्र अशी उत्तरं देऊन त्यांनी आम्हाला नामोहरम केलं.

प्रश्न - म्हणजे 1977 मध्ये पहिल्यांदा तुम्हाला नामोहरम झाल्याची भावना आली. 1985-86 मध्ये राजीव गांधींच्या काळात, शहाबानो प्रकरण घडलं तेव्हाही तुमचा भ्रमनिरास झाला. याचा अर्थ ‘आपले’ म्हणणारा जनता पक्ष आणि मुख्य प्रवाहातील प्रचंड बलशाली असा ‘काँग्रेस’ यांच्याकडून झालेला भ्रमनिरास, यामुळे तुमची मनःस्थिती दु:खी होती. आणि आता मुस्लिम समाजाविषयी अशा प्रकारची सुधारणावादी भावना भाजप नेतृत्वाच्या मनात आहे, असा तुमचा अंदाज आहे का?

असा अनुभव आहे! नाही तर आम्हाला भेटीसाठी पंधरा मिनिटं देण्याचा काय संबंध होता? काय बोलत होतो आम्ही असं? आमचं म्हणणं त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. त्यात काही दिखावा होता, असंही मला वाटलं नाही. मोदींच्या राजकारणात अनेक दोष असतील आणि त्यांना राजकीय विरोधही असू शकेल, पण आम्ही त्यासाठी तिथे गेलोच नव्हतो. ‘तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, तुम्हाला कायदा करता येणं शक्य आहे, तुम्ही तो करावा-’ या मागणीसाठी आम्ही गेलो होतो. त्यांच्याशी आम्ही समान नागरी कायद्याविषयी बोललो, तलाकच्या प्रश्नाबद्दल बोललो. आमच्या आणखीही काही अपेक्षा आहेत त्यांच्याकडून. पण असं म्हटल्यावर आमच्या काही लोकांना राग येतो. ते म्हणतात, ‘त्यांच्याकडून अपेक्षा कसल्या करता?’ पण आता आपण सत्तेत नाही, आणि होतो तेव्हा काय झालं ते मी पाहिलं आहे. त्याही वेळेला प्रत्येकाने मला हेच सांगितलं की, ‘तुम्ही घाई फार करता!’

अर्थात, या सगळ्याने मी कधीही निराश झालो नाही. माझं म्हणणं साधं आहे- लग्न करताना मुलीला विचारून केलं जातं आणि सोडताना मात्र विचारावं लागत नाही. (तसा कायदाच नसल्यामुळे) अशाने बाई निराधार होते, रस्त्यावर येते, तिचा निकाह पुन्हा होत नाही. हा काय प्रकार आहे? आपल्याकडे लोकशाही आहे ना? शरियतमधला गुन्हेगारी कायदा आज पाळला जातो का? नाही! त्याऐवजी ब्रिटिशांनी लागू केलेला क्रिमिनल कोड लागू होतो. चोरी केल्याबद्दल कुणाचे हात-पाय नाही कापले जात. मग तलाकसाठीच तेवढा जुना कायदा का? मला आणि मंडळाला विरोध करणाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं.

आणि हो, या कारणासाठी मी धर्मांतर करणार नाही. कारण धर्मापेक्षा मी माणुसकी मोठी मानतो. आम्ही जन्माने मुसलमान असलो, तरी आम्हाला या देशात माणूस म्हणूनच राहायचं आहे. आता या सरकारचे अनेक दोष असतील, त्यांच्याशी आमचे अनेक बाबतीत मतभेद असतील; मुस्लिम राज्यकर्ते, मुस्लिम आयडिऑलॉजी यांवर त्यांचाही राग असेल; पण माझ्या समाजाचं जे हे सगळं दुखणं मी त्यांच्याकडे घेऊन गेलो आहे, ते बरं होतंय की नाही, हे पाहणं चुकीचं आहे का?

प्रश्न - आता बोलताना दोन सरकारांचा अनुभव तुम्ही पहिल्यांदा सांगितलात. आणि मग विद्यमान सरकारबद्दल बोललात. तुम्ही करत असलेल्या धडपडीला या सरकारचा पाठिंबा आहे, असं तुमच्या बोलण्यातून दिसतं. मात्र सुरुवातीला तुम्ही असंही म्हणालात की, पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्ष यांच्याशी माझे काही वैचारिक मतभेदही आहेत; मात्र त्यांचं जे चांगलं काम आहे, तिथे मी त्यांचं स्वागत करतो, त्यांचा सन्मान स्वीकारतो. तर गेले अडीच महिने देशभर चर्चेत आहे, नागरिकत्व सुधारणा कायदा. त्याविषयी सरकार असं म्हणतं आहे की, ‘आम्ही केलेला कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, काढून घेण्यासाठी नाही.’ पण ही वास्तवाची एकच बाजू आहे. त्याची खरी दुसरी बाजू ही आहे की, हा कायदा नागरिकत्व नाकारणाराही आहे आणि ते नागरिकत्व धर्माच्या आधारावर नाकारणारा आहे. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतं आहे. हे भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेला छेद देणारं आहे, असं रॅशनल म्हटले जाणारे माझ्यासारखे अनेक लोक मानतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं?

भारतातील मुस्लिम समाज हा बाहेरून आलेला नाही. तो काही अरबांची, मुघलांची किंवा अफगाणांची अवलाद नाही. त्यांचे पूर्वज हिंदूच होते. ते दलित होते. गावामध्ये त्यांच्या झोपड्या होत्या. पण त्यांनीच बांधलेल्या विहिरींतील पाणी इथल्या उच्चवर्णीयांनी त्यांना पिऊ दिलं नाही; त्यांनीच बांधलेल्या रस्त्यावरून त्यांना जाऊ दिलं नाही. याला कंटाळून त्यांनी धर्मांतरं केली. मी अनेकांशी या विषयावर चर्चा केलेली आहे. त्यामुळे दलित समाजातच मला माझे पूर्वज दिसतात. आमची सगळी वंशावळ आम्ही कुठून आणणार आता? त्यामुळे या सरकारला माझं म्हणणं आहे की, तुम्ही पुन्हा नका काही उकरून काढू; तरच हा भिन्नधर्मीयांचा देश अधिक मजबूत राहील.

‘इथे आम्हाला आमच्या पद्धतीने राहता येत नाही,’ असं म्हणणारी माणसं पाकिस्तानच्या निर्मितीनंतर केव्हाच पलीकडे गेली. आता जे राहिलेले आहेत, ते कट्टर भारतीय असून राज्यघटना मानणारे आहेत. त्यांनी अन्यत्र कुठे जायचा प्रश्नच येत नाही. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने उपासना करण्याचा अधिकार घटनेने दिलेलाच आहे आणि कुणाची उपासना कुणाला डोईजड होण्याचं कारणच नाही. बाहेरच्या कुणाला घ्यायलाही आमची काही हरकत नाही. पण त्यांच्यासाठी आम्हाला परत इथून घालवणार?

प्रश्न - ‘पद्मश्री’ मिळाल्यामुळे यापुढे तुम्हाला सरकारी पातळीवर विशेष मानसन्मान असणार आहे. तर, अशा प्रकारची काही विनंती तुम्ही सरकारकडे करणार आहात का? की- मी ज्या समाजात राहतो आहे त्या समाजात या कायद्याविषयी भीती आहे, त्यामुळे सरकारने योग्य तो बदल करावा...

आमच्या मनात भीती नाही. पण अशी काही तरी सक्ती करू नये, ही आमची भूमिका आहे. ही आमची मातृभूमी आहे. आम्ही कुठेही जाणार नाही. तसंच असतं तर फाळणीच्याच वेळी पाकिस्तानात गेलो असतो ना! उलट 1970 मध्ये मी पाकिस्तानात गेलो होतो तेव्हा तिथे मी हे सांगितलं की, ‘तुम्ही देश तोडलात आणि आता तुमच्या पापाची फळं आम्ही भोगतोय... पाकिस्तानी म्हणवून घेऊन.’

प्रश्न - ‘या कायद्यामुळे आपण हद्दपार होण्याची शक्यता आहे किंवा आपलं नागरिकत्व ग्राह्य धरलं जाणार नाही’ अशी भावना सर्वसामान्य मुस्लिम समाजाच्या मनात तुम्हाला दिसते का?

अशी काही भीती मला दिसत नाही. लोकांचे कागदपत्रं जमवण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण चार पिढ्यांच्या मागची कागदपत्रं कुठून देणार? ते रेकॉर्ड कुणाकडे आहे?

प्रश्न - ‘बाहेरून येणाऱ्या सर्वांना नागरिकत्व द्या’, अशी मागणी या कायद्याला विरोध करणाऱ्यांपैकी कुणाचीही नाही. नागरिकत्व देण्यासाठी काय निकष लावायचे ते तुम्ही लावा. पण त्यासाठी धर्म हा निकष लावू नका, अशी ती भूमिका आहे. आपलंही म्हणणं असंच आहे का?

हो, अगदी बरोबर. या देशातला इस्लाम भारतीय आहे. अरबस्तानातील नाही. त्यामुळे धर्माच्या आधारावर सरकारने असा फरक करू नये.

प्रश्न - यातही सूक्ष्म फरक असा आहे की, बाहेरून येणाऱ्या सर्वांना नागरिकत्व द्या- बाहेरच्या मुस्लिमांनाही द्या- असं म्हणणारा एक वर्ग असू शकेल, जो खरं तर दृश्य रूपात फारसा नाही. पण माझ्यासारख्या अनेकांचं म्हणणं असं की, बाहेरून येणाऱ्या बेकायदेशीर निर्वासितांपैकी कुणालाच नागरिकत्व नाही दिलं तरी चालेल; पण द्यायचेच असेल तर त्यासाठी धर्म, जात, भाषा, लिंग हे निकष लावता कामा नये. संविधानाच्या चौकटीत राहून इतर जे काही निकष लावायचे असतील, ते तुम्ही लावा.

हा सगळाच विषय आसाममधल्या स्थलांतरितांच्या प्रश्नामुळे आलेला आहे. बांगलादेश कंगाल आहे. त्यामुळे तिकडून येणाऱ्या घुसघोरांचा प्रश्न जुना आहे. पण त्यांच्यासाठी हे घटनाबाह्य निकष लावून इथले- जे माझ्यासारखे जन्माने व धर्माने मुसलमान आहेत, पण स्वतःला भारतीय मानणारे आहेत, त्यांना तुम्ही बाहेर काढू नये.

प्रश्न - तुमच्या या उत्तरांतून मला असं दिसतंय की, बाहेरून येणाऱ्या निर्वासित अल्पसंख्य वा मुस्लिम लोकांचं काय होईल, यापेक्षा तुम्हाला जास्त चिंता आहे ती इथल्या मुस्लिमांची, त्यांच्या नागरिकत्वाबाबत शंका घेतली जाण्याची.

हो! बाहेरच्यांचं काय करायचं, ते तुम्ही ठरवा. पण आम्ही जे भारतीय मुसलमान आहोत, त्यांना असे काही तरी निकष लावून बाहेर काढू नका.

प्रश्न - कदाचित या प्रश्नाचा व्यावहारिक बाबीपेक्षा तात्त्विक बाजूने अधिक विचार आम्ही करतो. पण तुमच्या बोलण्यातून असं दिसतं की, ही भीती व्यावहारिक स्तरावर जास्त गंभीर आहे आणि या सगळ्याला तुमचा विरोध अधिक कडवा आहे.

खरं तर ही भीती नाही. फाळणीनंतर इथे जे मुसलमान राहिले त्यांतूनच अब्दुल हमीद निर्माण झाला, हमीद दलवाई निर्माण झाले, आणखी अनेक रथी-महारथी निर्माण झाले. त्यांनी कुठे देशाशी गद्दारी केली आहे का? त्यांचेच निकष मी लावणार ना? आमच्यात काय असे दोष यांना वाटले की, आम्हाला बाहेर काढण्याशिवाय यांना पर्याय नाही? सय्यदभाई हा रस्त्यावरचा मामुली कार्यकर्ता आहे, पण तो कडवा राष्ट्रवादी आहे. ‘वंदे मातरम्‌’ एकदा नाही, हजारदा बोलू आम्ही. जावेद अख्तर तर राज्यसभेमध्ये म्हणाले. वंदे मातरमचा उर्दू अर्थ आहे मादर ए वतन तुझे सलाम. हे म्हणायला मुस्लिमांचा विरोध नाहीच. हा वाद त्यांच्या माथी मारण्यात आला आहे. आम्ही नमाजात सजदा करतो तो जमिनीवर माथा टेकवूनच. माँ तुझे सलाम हे लोकप्रिय गाणं ए आर रहमानचेच आहे.त्याबद्दल इकडे आम्हाला ठोकायचं काय कारण आहे? राष्ट्रवादाबद्दल आमचं काही वेडंवाकडं म्हणणं नाही.

प्रश्न - हेच तुमचं म्हणणं सत्ताधारी पक्ष आणि विद्यमान सरकार यांना अधिक ठासून सांगणं गरजेचं आहे असं तुमचे मित्र, सहकारी, साथी यांना वाटतं. तुमच्याकडून ते अलीकडच्या काळात- दोन सन्मान मिळाल्यानंतर- मांडलं गेलंय का?

माझ्या ज्या अनेक मुलाखती झाल्या तिथे मी हेच मांडलंय. धर्माचे काही तरी निकष लावून मुस्लिमांना बाहेर काढणे, हा कशावरचाच उपाय असू शकत नाही. फाळणीच्या वेळचं काही तरी आता उकरून काढण्याची अजिबात गरज नाही. आजचा मुसलमान कुठे कमी पडतो, ते तुम्ही दाखवा ना. सत्यशोधक चळवळ ही 100 टक्के राष्ट्रीय चळवळ आहे. मुस्लिम समाजात काम करायचे म्हणून मुस्लिम सत्यशोधक.

प्रश्न - तुमच्या भूमिका इतक्या ठाम आहेत आणि गेली पन्नास वर्षे तुम्ही एका ध्यासाने व ध्येयनिष्ठेने काम करत आहात. पण दोन महिन्यांपूर्वी जीवनगौरव पुरस्कार तर तुम्हाला काहीसे विरोधी विचार असणाऱ्या ट्रस्टकडून- संस्थेकडून दिला गेलेला आहे...

तो पुरस्कार घेतलेल्यांची यादी पाहिली तर असं दिसेल की, बऱ्याच नामांकित समाजवाद्यांनाही तो दिलेला आहे. आणि मला पुढे जायचं आहे, माझी संघटना पुढे न्यायची आहे. पन्नास वर्षं मी इथे काढली आहेत. नाही तर वजीर गेले, बेन्नूर गेले तसा मीही गेलो असतो ना?

प्रश्न - तुम्हाला ‘जीवनगौरव’ आणि ‘पद्मश्री’ यांचं स्वागत अनेक लोकांकडून झालं; मात्र ‘तुमचे’ चळवळीतील मित्र, सहकारी, साथी यांच्याकडून ते पुरेसं झालं नाही किंवा हातचं राखून झालं. कुजबुज स्वरूपाची टीकाही तुमच्यावर झाली. त्याची काही खंत तुमच्या मनात आहे?

अजिबात नाही! प्रत्येकाची आपापली मतं असतात. पंतप्रधान मोदींना आम्ही भेटायला गेलो, तेव्हाही अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मी सगळ्यांचं ऐकून वागणारा माणूस आहे. शत्रूकडूनही एखादा चांगला गुण घ्यायचा प्रयत्न मी करतो. त्यामुळे प्रत्येक वेळी आम्हाला अशी फूटपट्टी लावून काहीच निष्पन्न होणार नाही.

प्रश्न - पण तुमच्या मनात असा विचार आला नाही का की- पन्नास वर्षं माझं काम, माझा विचार, इतकं सगळं उघड-उघड समोर आहे; तरीही आपली माणसं शंका घेत आहेत. त्याची खंत तुम्हाला खरंच वाटली नाही?

नाही! हे यापूर्वीही अनेकदा घडलेलं आहे. फार रथी-महारथींनी मला संघटनेतून काढून टाकण्याचाही प्रयत्न केलेला आहे. पण जोपर्यंत मी माझ्याशी प्रामाणिक आहे तोपर्यंत हा प्रश्नच येत नाही. आणि मी अशा लोकांना शत्रू वगैरे मानत नाही, तेही संघटनेतलेच आहेत. आपली काही राजकीय संघटना नाही, परिवर्तनवादी संघटना आहे. तिथे कुठले डावपेच असता कामा नयेत. काही वेगळे मुद्दे असतील, वाद असतील तर त्यांवर बसून चर्चा करता येईल. डावपेचांमुळे संघटना वाढत नाही, उलट कमकुवत होते.

लोक मला माझी पदवी विचारतात. तेव्हा मी सांगतो, बी.पी. आणि एम.एस.एम.! लोक म्हणतात, ही कोणती पदवी? तर बी.पी. म्हणजे भारत पेन्सिल कारखाना, तिथे मी तात्या मराठेंकडे बरीच वर्षं काम केलं. आणि एम.एस.एम. म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळ, दलवार्इंना भेटलेला पहिला माणूस मीच. अर्थात, ही काही फार अभिमानाची गोष्ट नाही. माझ्या बहिणीचा प्रश्न मी त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो.

भाई वैद्यांकडे 1968 मध्ये आमची भेट झाली. भाई म्हणाले, ‘माझ्याकडे हमीद येणार आहे. तू त्याच्याशी बोल.’ दलवार्इंना मी सांगितलं, ‘माझ्या बहिणीला तिच्या नवऱ्याने सोडून दिलेलं आहे, त्याची माझ्या मनाला मोठी जखम झालेली आहे. तोंडी तलाकने पुरुषांना जे अधिकचे अधिकार दिले आहेत, ते कमी करायला पाहिजेत. नवरा आणि बायको या दोघांच्या वादात निर्णय करणारा तिसरा असला पाहिजे. असं हे सगळं कायद्यात यावं, म्हणून मी धडपडतो आहे. तुम्ही मला मार्गदर्शन करा.’

हमीदभार्इंच्या आधीही मी पाच-पन्नास लोकांना भेटलेलो होतो. सगळे मला म्हणत की, ‘हा प्रश्न धार्मिक आहे. कशाला त्याला हात घालता तुम्ही?’ मुल्ला-मौलवींकडे गेलो तर ते म्हणायचे, ये अल्लाह की मर्जी है, पण हमीदभाई मला म्हणाले, ‘तुमची तळमळ मी समजू शकतो. आणि मार्गदर्शन वगैरे नाही, आपण बरोबरच काम करू.’

प्रश्न - तुमची आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाची जी भूमिका आहे ती पाहून मला असं वाटतं की, हे सर्व मुस्लिम सत्यशोधक एक प्रकारच्या कोंडीमध्ये अडकलेत की काय? ती कोंडी चार बाजूंनी होत असावी, असं मला दिसतंय. एक- ज्या समाजासाठी तुम्ही काम करता त्या समाजातलेच लोक म्हणतात की, ‘हे धर्मद्रोही आहेत.’ (ही तक्रार अगदी पहिल्यापासून आहे.) दुसरी अशी की- कितीही सुधारणावादी विचार तुम्ही मांडले तरी हिंदुत्ववादी तुमच्याकडे अखेर मुस्लिम म्हणूनच बघतात. तिसऱ्या बाजूला- तुमचे पुरोगामी मित्र (तुम्ही हिंदुत्ववाद्यांच्या व्यासपीठावर जाता का, त्यांच्याशी तुम्ही किती संबंध ठेवता यावरून) तुमच्या पुरोगामित्वाची चाचपणी सतत करताना दिसतात. आणि चौथी बाजू म्हणजे, कोणत्याही सरकारकडे तुम्ही गेलात- मग ते केंद्रातलं असो किंवा राज्यातलं- तर ते असं म्हणतात की, समाजातून तुम्हाला पाठिंबा असेल आणि समाजातूनच मागणी आली असेल, तर आम्ही कायदा करू...’

चौथा मुद्दा काँग्रेस असेपर्यंत होता, आता तसं नाही! काँग्रेसच्या काळात दिल्लीला राहून अनेक खासदारांकडे मी गेलो आहे. नजमा हेपतुल्लांकडेही आम्ही गेलो होतो. त्यांनी तर सगळ्या पुरुषांना बाहेरच हाकललं होतं.

प्रश्न - विद्यमान पंतप्रधानांना तीन वर्षांपूर्वी तुम्ही भेटलात. तीन तलाक संबंधात मंडळाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यासाठी. तुमचं पाच जणांचं शिष्टमंडळ होतं. तेव्हा तेही तुम्हाला म्हणाले होते की, ‘तुमच्या सगळ्या मागण्या मला मान्य आहेत; पण तुमच्या समाजातून त्याला अजून पाठिंबा नाही, थोडं थांबायला पाहिजे.’

ते म्हणाले की, तुमचं निवेदन मी पाहतो.. आणि पुढे म्हणाले, एक-एक करके बदलेंगे हम. समाजाच्या पाठिंब्याचा विषय त्यांनी काढला नव्हता. ‘तुम्ही जे मागताय ते योग्य की अयोग्य, याचा विचार करून आम्ही निर्णय घेऊ’ असंच त्यांना म्हणायचं होतं, असं मला वाटतं.

प्रश्न - म्हणजे कोंडी करणाऱ्या ज्या चार बाजूंचा उल्लेख मी केला- त्यातल्या तीन बाजूंनी म्हणजे मुस्लिम धर्मीयांच्या बाजूने, हिंदूंच्या बाजूने आणि पुरोगाम्यांच्या बाजूने कोंडी आहे; पण विद्यमान केंद्र सरकारच्या बाजूने मात्र तितकी कोंडी आता नाही, असं तुम्हाला वाटतं?

माझा अनुभव तरी तसा आहे.

प्रश्न - यावरून असा निष्कर्ष काढायचा का की, बदलांसाठी किंवा सुधारणांसाठी अनुकूल मुस्लिम मानस तयार केलं; तर आताचं सरकार त्याला पाठबळ देईल, नवीन कायदे करील, सुधारणांना पूरक भूमिका घेईल?

कायदे करण्यासाठी तो प्रश्न न्याय्य आहे की नाही, एवढंच सरकारने बघितलं पाहिजे. त्यासाठी लोक जमा व्हायला पाहिजेत, असंच काही नाही. आणि मतांसाठी राजकीय लोक कोणत्याही स्तराला जातात. वास्तविक राजीव गांधींच्या वेळेला शहाबानो प्रकरणात आमच्या लोकांनी हेही केलेलं आहे. त्या वेळी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संपूर्ण देशभरात दोन-दोन लाखांचे मोर्चे काढले. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ही एन.जी.ओ. आहे.

दि.22 मार्च 1970 ला ‘सत्यशोधक’ची स्थापना झाली. दि.25 व 26 डिसेंबर 1971 ला पुण्यात पहिली महिला परिषद दलवार्इंनी घेतली. सामाजिक न्याय मिळावा म्हणून मुस्लिम महिलांची ती जगातली पहिलीच परिषद असावी. दोनशे लोक त्यांत होते. त्यातल्या निम्म्या महिला होत्या. तिथे महिलांच्या प्रश्नांवर आम्ही पहिल्यांदा बोललो. त्याची बातमी जगभर गेली. आणि त्याचा राग येऊनच काहींनी मुस्लिम पर्सनल लॉ प्रोटेक्शन कमिटी पुण्याला बनवली. ती नंतर राष्ट्रीय पातळीवरची झाली. ती कशासाठी होती? तर, ‘मुस्लिम सत्यशोधक’ला विरोध करण्यासाठी. पुढे-पुढे, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हे महिलांचे प्रश्न घेत नाही म्हणून त्यातल्या महिला निघून गेल्या आणि त्यांनी मुस्लिम महिला बोर्ड काढलं. त्यानंतर शिया निघून गेले, त्यांनी शिया मुस्लिम लॉ बोर्ड काढलं. आता मूळ मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डात फक्त सुन्नी आहेत आणि सगळ्यांचा अड्डा लखनौला आहे.

मुस्लिम समाजात एकतर्फी तलाक देणाऱ्याला कायद्याने शिक्षा नव्हती. एवढंच नाही तर कुणाकडून नुसत्या चिठ्ठीवर लिहून किंवा तोंडी निरोप पाठवला तरी तलाक होत असे. या सगळ्यालाच विरोध केल्यामुळे आमच्यावर मुस्लिम समाजातील पुरुषांचा प्रचंड राग होता.

प्रश्न - तुमच्या बहिणीच्या तलाकची तुमच्या मनावर खूप खोलवर जखम राहिली आणि ती अद्यापपर्यंतही आहे; 1985च्या दरम्यान शहाबानो प्रकरणात जे काही घडलं, ती जखमसुद्धा तुमच्या मनात खोलवर आहे, असं दिसतं. तर मुस्लिम समाजातील ज्या प्रतिगामी शक्ती 1985च्या दरम्यान होत्या- ज्यांचा उल्लेख तुम्ही आता केलात- त्यांची धार कितपत बोथट झाली आहे, असं तुम्हाला वाटतं?

ते फार गडबडले आहेत. विद्यमान केंद्र सरकार जे नवे राजकीय कायदे आणत आहे, सी.ए.ए. वगैरे... त्यामुळे त्यांची झोप उडालेली आहे. सामाजिक बदलांची आत्ता वेळ नाही, असं ते एका बाजूला म्हणतात आणि मुस्लिम महिलांना न्याय देण्याच्या बाबतीत ‘कुराणातला कायदाच तुम्ही मानला पाहिजे,’ असंही म्हणतात. इस्लामी कायद्यातले पुरुषांचे सगळे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत, अशीच त्यांची भूमिका आहे.

प्रश्न - मुस्लिम समाजातील प्रतिगामी शक्ती अस्वस्थ होणं, त्यांच्या विरोधाची धार कमी होणं- हेही आता घडलेलं दिसतं. पण अशा परिस्थितीमध्ये तुमचा विचार, सत्यशोधक मंडळाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अनुकूलता आहे, असं तुम्हाला वाटतं का? जुनी पिढी थकली, पण नवी पिढी आता फ्रेश पद्धतीने विचार करते आहे, असं काही वातावरण तयार होताना दिसतंय?

नवी पिढी काय विषय घेऊन पुढे येते, यावर ते अवलंबून आहे. नुसतीच मीटिंग घेतली, चर्चा झाली, भाषण ठेवलं, वक्ता चांगला बोलला, प्रश्न जबरदस्त विचारले, नंतर चहा घेतला, वडापाव खाल्ला- यातून काही होणार नाही. नवे विषय निवडून घ्यावे लागतील. त्यांच्यासाठी गाडून घ्यावं लागेल. आणि मुळात स्वतःपासून सुरुवात करावी लागेल.

मी एकतर्फी तलाकच्या प्रश्नासाठी हेच केलं होतं. त्यामुळे माझ्यावर फार टीकाही झाली की, मी तलाकशिवाय अन्य काही बोलत नाही. पण हमीदभार्इंकडे मी तेवढ्यासाठीच गेलो होतो. माझ्या बहिणीच्या वाट्याला जे आलं, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी काम करायचं ठरवलं होतं. बहिणीने पुढे शिवणकाम करून एकटीने तिचं घर चालवलं. तिची दोन मुलं शिकली-सवरली, मोठी झाली. चार वर्षांपूर्वी बहीणही वारली. पण माझी ती जखम अजूनही भरलेली नाही. मी हे तलाकचं काम थांबवावं म्हणून मला अनेकांनी आमिषंही दाखवली. म्हणाले, ‘तुम ये सब छोड दो सय्यदभाई, हम तुमको लीडर बनाएंगे!’ पण त्यांना मी म्हटलं की, ‘याने एकतर्फी तलाक थांबणार आहे का?’ आणि लीडर व्हायचा विचार तर मी स्वप्नातसुद्धा केलेला नव्हता.

प्रश्न - यापुढच्या टप्प्यावर मुस्लिम सत्यशोधक मंडळाने काय करायला हवं, असं तुम्हाला वाटतं?

मंडळाचं नेतृत्व चांगलं आहे. शमसुद्दीन तांबोळी अध्यक्ष म्हणून फार चांगलं काम करत आहेत. मंडळाने काहीएक दिशा ठरवावी, तरुणांना सोबत घ्यावं. यापेक्षा वेगळं काय सांगणार? सगळे सुशिक्षित आहेत. दहा-वीस वर्षं प्रत्येकानेच संघटनेत काढलेली आहेत. त्यांचं त्यांना ठरवू देत. राष्ट्रवादाला बाधा येणार नाही, असे समाजहिताचे निर्णय त्यांनी घ्यावेत आणि त्यानुसार काम करावं. एखाद्या राजकीय संघटनेत दहा शिपाई हाताखाली असतात, पण आमच्यासारख्या सामाजिक संघटनेत खुर्च्या मांडण्यापासून भाषण करण्यापर्यंत सगळीच कामं कार्यकर्त्यांना करावी लागतात. सगळ्या परिवर्तनवादी संघटनांचं स्वरूप असंच असतं. ते बदलण्याच्या भानगडीत न पडता, जमेल तेवढं काम करायचं असतं.

तलाकचा प्रश्न आज देशभर गेलेला आहे. तलाकविरोधी महिला परिषद आम्ही देशपातळीवर घेतली होती. रोज अर्धा तास बसायचं, तलाकविषयी महिलांना मार्गदर्शन करायचं- असं करत-करत देशभरात 25 ठिकाणी महिला मदतकेंद्रे सुरू केली. आमच्या केेंद्रांना मिळणारा प्रतिसाद पाहून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही महिला कौन्सिलिंग सेंटर सुरू केले.

मी काय काय करू शकतो याचा विचार स्वतःच्या मनाशी करून प्रत्येकाने आपापलं काम ठरवावं. परवाच मी कुणाला तरी म्हटलं की, माझ्यानंतर तलाकचं काम करू शकेल असा वजीर एक होता, आणखीही एक-दोन लोक होते.

तात्या मराठेंकडे मी कामाला होतो. ते समाजवादी होते. त्यांच्याकडे मला पगार कमी होता. पण नोकरी करतच संघटनेच्या कामांसाठी बाहेर फिरायला परवानगी होती. तात्या स्वातंत्र्यसैनिक होते, पण ते पेन्शन घेत नव्हते. त्यांचाच आदर्श अजूनही माझ्यासमोर आहे.

तर मंडळाने यापुढे मुस्लिम समाजाविषयी असलेले (किंवा जाणीवपूर्वक पसरवले जात असलेले) गैरसमज दूर करण्यासाठी काम करावे. मुस्लिम समाजात परिवर्तनवादी विचार कसे वाढतील यासाठी प्रयत्न करावेत.

प्रश्न - पन्नास वर्षांपूर्वी साधनाच्या याच सभागृहात मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली (इमारत जुनी होती, पण जागा हीच होती.) त्या वेळी कायद्यात रूपांतर व्हावं अशा ज्या काही चार-पाच मागण्या मंडळाने सरकारकडे केल्या होत्या, त्यामध्ये एक होती- एकतर्फी तलाकला बंदी असावी. दुसरी- बहुपत्नीत्वबंदी कायदा. तिसरी- मूल दत्तक घेण्याची परवानगी देणारा कायदा. आणि चौथी- सगळ्यात महत्त्वाचा किंवा अखेरचा म्हणता येईल असा समान नागरी कायदा. तर आता तुम्हाला या तीन-चार कायद्यांच्या बाबतीत पुढचं काय चित्र दिसतं?

संघटनांनी पुढे येऊन काम केलं, तर हेही होईल. तुम्ही काहीही म्हणा, पण आताच्या पंतप्रधानांनी दहा लोकांना विचारलं नाही. जे योग्य वाटलं, ते काम करून टाकलं. ‘सरकारने न्याय देणारे कायदे केले पाहिजेत’ अशी नुसतीच अपेक्षा तुम्ही कशी काय ठेवता? त्यासाठी कुठलं सरकार आहे याकडे न पाहता, त्यांना भेटा ना तुम्ही. तांबोळी अतिशय धडपडणारा कार्यकर्ता आहे. त्याला सोबत घेऊन फिरलोय मी. त्याच्या आधीच्यांसोबतही फिरलोय. सहवासातून जेवढं शिकता येतं, तेवढं पुस्तकातून शिकता येत नाही. त्यामुळे मीही सगळं सोडून दलवार्इंच्या मागे फिरायचो. तसं आज ज्यांच्याकडे नेतृत्व आहे, त्यांनी निवडक दहा-बारा कार्यकर्ते घेऊन, एखादा विषय घेऊन काम करावं.

तलाकचाच विषय सगळ्यांनी घ्यावा, असं नाही; इतरही अनेक विषय आहेत. तलाकसारख्या विषयात काम करायला पोटतिडीक लागते. आजही एखादी तलाकपीडित बाई माझ्यासमोर आली तर, तिच्यात मला माझी बहीण दिसते. माझी सून शाहीन परवा एके ठिकाणी कार्यक्रमात म्हणाली, ‘मी लग्न करून या घरात आले त्या क्षणी या घरची मुलगी झाले आणि माझा नवरा इथला जावई!’ ती कर्तृत्ववान आहे. मी राहतो त्या सोसायटीतले सगळे तिला झाशीची राणीच म्हणतात. तिला स्कूटर चालवताना पाहून काही लोक मला सांगत आले- ‘अरे, तुम्हारी बिटिया स्कूटर पे जा राही थी... तुमने छोडा कैसे उसे?’ मी म्हटलं, ‘तुमच्या पोटात का दुखतं? तुमच्या मुलीला, सुनेला जाऊन विचारा.. तुला स्कूटर शिकायला आवडेल का? सून म्हणजे पायाची चप्पल वाटते का तुम्हाला! मोलकरीण म्हणूनच आणता तिला तुम्ही घरात...’ पुढे शाहीन कार चालवायला लागली, तेव्हाही हाच सगळा प्रकार!

प्रत्येक बाईला काही शिकायचं असतं, तिच्यात क्षमता असते; सहनशीलता तर जबरदस्तच असते. ती पुरुषापेक्षा दहापट जास्त काम करू शकते. पण तिला संधीच द्यायची नाही, हे बरोबर नाही. मुलांचं रक्षण तिने करायचं, स्वतःच्या शीलाचं रक्षण करायचं, धर्माचंही रक्षण करायचं; सगळं बाईने करायचं आणि पुरुष उधळत राहणार फक्त! आपल्या समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ही पुरुषी मानसिकता बदलली पाहिजे. घरातल्या कामांना पुरुषांनीही हातभार लावला पाहिजे. आणि समान नागरी कायद्याविषयी बोलाचं झालं तर, समान गुन्हेगारी कायद्याने जर धर्म बुडत नाही, तर तो समतावादी समान नागरी कायद्याने कसा काय बुडेल?

प्रश्न - वरील प्रश्नाला एक छोटा उपप्रश्न असा की, तिहेरी तलाकबंदीचा जो कायदा गेल्या वर्षी झाला आहे, त्याचं समर्थन करणाऱ्या काही लोकांचं असं मत आहे की- ‘त्यातली शिक्षेची तरतूद, फौजदारी गुन्हा हे इतकं कठोर नसायला पाहिजे होतं. त्याचा दुरुपयोग होईल.’ याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

त्यांचं म्हणणं खरं असू शकेल. मी काही सगळा कायदा जाणणारा वकील नाही. पण गुन्हेगाराला वचक बसावा म्हणून तीन वर्षांची शिक्षा सांगितली असणार. याबाबत माझं काही पंतप्रधान मोदींशी बोलणं झालेलं नाही. पण ज्यांना असं वाटत असेल, त्यांनी ते सरकारकडे घेऊन जावं. (मी स्वतः कारखाना चालवलेला आहे आणि माझ्या हाताखाली 50 कामगार होते. त्यामुळे पुस्तकापेक्षा मी माणूस चांगला वाचू शकतो.) तुम्ही इथून लाख म्हणाल की, ‘ती शिक्षा काढून टाका.’ पण तलाक देणाऱ्या माणसाला वचक काय मग? तरीही ज्यांना-ज्यांना असं वाटतं की, मुस्लिम कायद्यात आणखी बदल व्हावेत किंवा ही तीन वर्षांची शिक्षा जास्त आहे; त्यांनी पंतप्रधानांशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. ते भाजपचे आहेत वगैरे सबबी उपयोगाच्या नाहीत. ते लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत. तेव्हा त्यांच्याशी स्वतः बोलायचं नाही आणि उलट मीही बोलू नये असं सांगायचं, हे बरोबर नाही. संवाद ही सुधारणेची पहिली पायरी आहे. त्यासाठी त्यांची वेळ मिळवावी. मलाही हे धडपडूनच करावं लागलं आहे.

इथला सामान्य मुस्लिम कडवा भारतीय आहे. तो स्वतःला हिंदुस्थानीच मानतो आणि आम हिंदूसारखाच तोही आपल्या कामाशी इमान ठेवून जगणारा आहे. हिंदू-मुस्लिम सगळे एकमेकांच्या उत्सवांत एकत्र असतात. त्यामुळे सामान्य मुस्लिम समाजावर माझा भरवसा आहे. पण त्याला फूस लावणाऱ्या पुढाऱ्यांवर मात्र नाही. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून पंतप्रधान मोदींशी बोलण्याचा प्रयत्न आतापर्यंत का झालेला नाही? हे सरकारदेखील लोकशाही मार्गानेच निवडून आलेलं आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांवर तुम्ही विश्वास ठेवा आणि पुढच्या वेळी तुम्हाला निवडून कसं येता येईल, यासाठी प्रयत्न करा. अजूनही आपल्याकडे लोकशाही आहे.

जमाते इस्लामीची स्थापना 1920 ला झाली आणि रा.स्व.संघाची 1925 ला झाली. उद्या समजा, जमाते इस्लामीची सत्ता इथे आली- ज्यांना मुस्लिम राष्ट्र उभं करायचं आहे- तर ते काय करतील? सेक्युलर कायदे मान्य करतील का? त्यांच्या पद्धतीनेच ते कायद्यांना वळण द्यायचा प्रयत्न करणार ना? पण तसं चालणार नाही, अशीच तर आमची भूमिका आहे. त्यामुळे संघाची भूमिका काहीही असली तरी व्यवहारात त्यांना अनेक तडजोडी कराव्याच लागतील! धर्मात सगळी उत्तरं नाहीत. विज्ञान आणि बुद्धिप्रामाण्यवाद यातच सगळं काही आहे, हे त्यांनाही मान्य करावं लागेल. हमीदभाई याबाबत फार छान म्हणायचे की- ‘माणसांनी निर्माण केलेला धर्म मला मान्य नाही, कारण तो तुम्ही तुमच्या सोयीने तयार केलेला आहे.’ आता नवीन हमीद दलवाई निर्माण होणार नाहीत, मात्र त्यांचे विचार दगडावरची रेघ बनून राहतील.

प्रश्न - ‘दगडावरची पेरणी’ हे तुमचं पुस्तक मराठीतलं माईलस्टोन म्हणावं असं आहे. मराठीतली जी काही एकमेवाद्वितीय पुस्तकं आहेत, त्यांमध्ये त्याचा निश्चितच समावेश होईल. आणि जसजसा काळ पुढे जाईल, तसतसं वाचकांच्या मनावर ते विलक्षण गारूड करून राहील. मराठीत असे काही लोक होऊन गेले की, ज्यांच्या आयुष्यावर एकच पुस्तक आलं पण ते माईलस्टोन ठरलं- उदा.लक्ष्मीबाई टिळकांचं ‘स्मृतिचित्रे’, रमाबाई रानड्याचं ‘आमच्या आठवणी’. आत्मकथनात आणखी किती तरी नावं घेता येतील. तुमचं पुस्तक त्यांपैकीच एक आहे. ते आता पाच-सहा भाषांमध्ये गेलं आहे. काळ पुढे जाईल तसं ते भारतातल्या अन्य भाषांमध्येही जाईल.

‘दगडावरची पेरणी’ हे माझं पुस्तक मी अभ्यास करून लिहिलेलं नाही. ते कार्यकथन आहे. धक्के खात-खातच मी शिकत गेलेलो आहे. जो क्लीनरचा मेकॅनिक आणि मेकॅनिकचा इंजिनिअर होतो, त्याला इंजिनाची रेघन्‌ रेघ माहीत असते. तसं ते माझ्या अनुभवातून आलेलं लिखाण आहे. त्याचं उर्दू भाषांतर मीच केलं आहे. इंग्रजी, कन्नड, आसामी, बंगाली, मल्याळी भाषांत त्याचे अनुवाद झालेले आहेत.

प्रश्न - हमीद दलवार्इंचीही सर्व पुस्तकं आता मराठीत नव्याने उपलब्ध झाली आहेत. इंग्रजी, हिंदीमध्ये ती अनुवादित होत आहेत. पुढच्या काही काळात अन्य भारतीय भाषांमध्ये ती जातील. त्यामुळे आपण अशी अपेक्षा बाळगू की, आणखी 12 वर्षांनंतर दलवार्इंची जन्मशताब्दी येईल, त्या वेळी तुम्ही 96 वर्षांचे असाल, कार्यरत असाल आणि मीही साधनेचा संपादक म्हणून इथे असेन. त्या वेळी आपण पुन्हा दीर्घ मुलाखत करू आणि या तपामध्ये काय काय घडलं याचा आढावा घेऊ. असो. पुढील कामासाठी तुम्हाला शुभेच्छा!

एकूणच मी फार मोठं काम केलं, असं काही नाही. पण माझी कामाची भूक अजून संपतच नाही. मरेपर्यंत हेच काम करणार आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी झालो ते संघटना चालवायला काही तरी पद लागतं म्हणून. पण मी जीव तोडून इथे काम केलेलं आहे आणि जे कोणी काम करतील, त्यांच्या पाठीशी एक हजार टक्के उभा राहीन. गोंधळ घालण्याचं काम मात्र अजिबात करणार नाही. संघटनेला धक्का लागू नये म्हणून, मी जीवाची बाजी लावून लढेन.

(मुलाखत : विनोद शिरसाठ, शब्दांकन : सुहास पाटील)

सय्यदभाई, पुणे

Share on Social Media

डॉक्युमेंटरी : 3

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके...!

रवींद्रनाथ टागोर डॉक्युमेंटरी - सत्यजित रे

नीलांबरी जोशी

या डॉक्युमेंटरीला भारतात राष्ट्रपती सुवर्णकमळ, लोकार्नो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं गोल्डन सील आणि उरुग्वेमधलं मानाचं माँटव्हिडिओ फिल्म फेस्टिव्हलमधलं पारितोषिक मिळालं होतं. एखादं चांगलं पुस्तक किंवा लेख आपल्याला अनेकानेक लेख, पुस्तकं वाचायला किंवा काही चित्रपट पाहायला उद्युक्त करतो, तसं ही डॉक्युमेंटरी रवींद्रनाथ यांच्याबद्दल पुढच्या अभ्यासाला चालना देते. कोणत्याही उत्तम कलाकृतीचं काम आपल्याला जास्त विचारप्रवृत्त करणं हे असतं. या अर्थानं ही डॉक्युमेंटरी आपल्या देशातल्या एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबद्दल विविधांगी विचार करायला भाग पाडते. शेवटी बा.भ. बोरकर यांची ही कविता आठवल्यावाचून राहत नाही...!

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके,

चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा,

अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा...

त्या दोघांनीही भारताचे नाव जागतिक पातळीवर पोचवले. दोघेही आंतरराष्ट्रीय मानसन्मानाचे धनी. एकाला साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेलं, तर दुसऱ्याला चित्रपटांच्या दुनियेतले प्रतिष्ठेचे ऑस्कर पारितोषिक. दोघेही ब्राह्मो समाज या हिंदू धर्मातल्या पंथानुसार मार्गक्रमण करणारे. दोघांचंही अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. एक महान साहित्यिक, कवी, गीतकार, नाटककार, संगीतकार, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, क्रांतिकारी आणि चित्रकार. दुसरा महान दिग्दर्शक, पटकथालेखक, लेखक, कवी, कॅलिग्राफर आणि संगीतकार. दोघंही बंगाली बाबू..! हे दोघं म्हणजे अर्थातच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि सत्यजित रे.

बहुविध क्षेत्रांत जो तज्ज्ञ असतो, त्याला रेनासान्स मॅन म्हटलं जातं. मेटॅफिजिक्स, कविता, भौतिकशास्त्र, तर्कशास्त्र, संगीत, नाट्य, प्रशासन, राजकारण, जीवशास्त्र, एथिक्स आणि प्राणिशास्त्र अशा अनेक विषयांवर अभ्यास व लिखाण करणारा ॲरिस्टॉटल; मोनालिसा किंवा द लास्ट सपर या चित्रांमुळे जगद्‌विख्यात असलेला आणि हेलिकॉप्टर, सौरऊर्जा, कॅल्क्युलेटर, भूगर्भशास्त्रातली टेक्टॉनिक्स अशा निरनिराळ्या कल्पना सोळाव्या शतकात मांडणारा लिओनार्दो दा विंची हा फ्लोरेन्समधला चित्रकार- अशी रेनासान्स मॅनची अनेक उदाहरणं इतिहासात सापडतात.

भारतातला रेनासान्स मॅन म्हणजे रवींद्रनाथ टागोर. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, लघुकथा, निबंध, प्रवासवर्णनं, नाटकं, कविता, दोन हजारांपेक्षा जास्त गाणी यातून भारतातले साहित्य, संगीत आणि समग्र कलाविश्वाचा चेहरामोहराच बदलून गेला. त्यांची 200 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतले ते खंदे कार्यकर्ते होते. त्यांच्या मृत्यूला जवळपास 60 वर्षे उलटून गेल्यानंतरही कलकत्त्यामध्ये टागोरांच्या प्रतिमा सर्वत्र दिसतात. त्यांची गाणी प्रत्येक चौकात ऐकू येतात. पुस्तकांच्या दुकानात त्यांच्या पुस्तकांचा स्वतंत्र विभाग असतो. आजही जगातला कोणताही बंगाली माणूस त्यांचे ऐकून वा उच्चारून भावुक होतो. टागोरांच्या शांतिनिकेतनमध्येच सत्यजित रे हे चित्रकला शिकले. नंतरच्या काळात त्यांची चित्रं-रेखाचित्रं हजारो कलाकारांना प्रेरित करून गेली. सत्यजित रे यांच्या विचारांवर टागोरांच्या विचारांचा विलक्षण पगडा होता. आपल्या आयुष्यात 36 चित्रपट काढणारे सत्यजित रे यांनी टागोरांच्या साहित्यावर एकूण पाच चित्रपट काढले.

आपल्या चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीची जगाला ओळख करून देणारे रे यांनी आपल्या एका डॉक्युमेंटरीमधल्या सुरुवातीच्या 10 ते 12 मिनिटांबद्दल ‘मोस्ट मूव्हिंग अँड पॉवरफुल थिंग्ज दॅट आय हॅव प्रोड्युस्ड’ असे उद्‌गार काढले होते. ती डॉक्युमेंटरी म्हणजे रवींद्रनाथ टागोर...! रवींद्रनाथ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 1961 मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहावरून सत्यजित रे यांनी ही डॉक्युमेंटरी काढली होती. रवींद्रनाथ टागोर यांची जडण-घडण, त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी, त्यांच्या आयुष्यावर प्रभाव पडलेल्या गोष्टी, माणसं- असं सगळं आपल्यासमोर या डॉक्युमेंटरीतून एखाद्या नादमधुर कवितेसारखंच उलगडत जातं.

या 54 मिनिटांच्या कृष्ण-धवल डॉक्युमेंटरीच्या पहिल्या दृश्यात रवींद्रनाथांच्या शवयात्रेला लोटलेला जनसमुदाय दिसतो. हा माणूस शब्द, संगीत व कविता, कल्पना आणि आदर्श यांचा वारसा मागे सोडून गेला आहे. आत्ताच्या आणि भावी पिढ्यांसाठी तो आपल्याला प्रेरणादायी आहे, अशा अर्थाची वाक्यं पार्श्वभूमीवर ऐकू येतात. तो आवाज प्रत्यक्ष सत्यजित रे यांचाच आहे.

डॉक्युमेंटरीत यानंतरच्या दृश्यांमध्ये टागोर कुटुंबाची कुटुंबरेषा दिसते. आठव्या शतकापासून बंगालमध्ये स्थायिक झालेलं टागोर कुटुंब मूळचं कनौजचं होतं. द्वारकानाथ टागोर हे रवींद्रनाथांचे आजोबा. त्यांचा मोठा मुलगा देवेंद्रनाथ हे रवींद्रनाथांचे वडील. देवेंद्रनाथांच्या चौदा मुलांमधला रवींद्रनाथ म्हणजे रवी हा सर्वांत धाकटा मुलगा. टागोरांचं कुटुंब प्रतिष्ठित आणि समाजात अनेक कारणांनी मान्यता पावलेलं होतं. देवेंद्रनाथ स्वत: लंडनमध्ये जात-येत असत. ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांच्याशी त्यांचे स्नेहसंबंध होते.

देवेंद्रनाथांच्या 14 मुलांमधले अनेक जण लेखक, चित्रकार आणि संगीतकार होते. द्विजेंद्रनाथ हा रवींद्रनाथांचा सर्वांत मोठा भाऊ कवी होता. ज्योतिरिंद्रनाथ नाटककार, संगीतकार होते. स्वर्णकुमारी देवी ही रवींद्रनाथांची बहीण. ती भारतातली पहिली स्त्री-कादंबरीकार होती. एकूण, टागोरांचं घर हे अनेक कलांचं दालन होतं. नाटकं, संगीताचे जलसे घरात चालत. आम्ही सगळेच लिहीत, गात, वाचत, अभिनय करत. स्वत:मधलं सगळं सर्वांगानं व्यक्त होत असायचं, असं प्रत्यक्ष रवींद्रनाथांनीच बालपणाबद्दल लिहून ठेवलं आहे.

सत्यजित रे यांनी या डॉक्युमेंटरीत काही प्रसंग नाट्यमयरीत्या वापरले आहेत. त्यापैकी एका प्रसंगात शाळेत अत्यंत भकास, एकाकी बसलेला लहानगा रवी दिसतो. त्याला समोर मास्तर जे शिकवत असतात, त्यात काडीचा रस नसतो. वर्गाच्या खिडकीबाहेरचा निसर्ग त्याला खुणावत असतो. त्यामुळे अनेक शाळा बदलूनही रवींद्रनाथांची कोणत्याच शाळेशी नाळ जुळली नाही.

अखेरीस ते घरीच शिकले. हेमेंद्रनाथ या त्यांच्या भावानं त्यांना इतर विषयांबरोबर कुस्ती, पोहणं अशा गोष्टीही आवर्जून शिकवल्या. त्या शिकण्यातून व बुद्धिमान भावंडांच्या सहवासामुळे लहानपणापासूनच बुद्धिझम, संस्कृत काव्य, इंग्रजी साहित्य, सूफी आणि बंगाली बाऊल परंपरा या सगळ्यातून रवींद्रनाथांनी प्रेरणा घेतली होती. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून किशोरवयातच ते कविता आणि नाटकं लिहीत होते. तेराव्या वर्षी त्यांनी लिहिलेली कविता एका मासिकात छापूनही आली होती.

यादरम्यान वडिलांबरोबर डलहौसी आणि नंतर अमृतसर या दोन्ही ठिकाणी फिरत असताना कालिदासाच्या नाटकांपासून इतिहासापर्यंत अनेक गोष्टींचा रवींद्रनाथांनी अभ्यास केला. ते या डॉक्युमेंटरीत उत्तमरीत्या पाहायला मिळतं.

वयाच्या सतराव्या वर्षी रवींद्रनाथ लंडनला गेले. त्यांनी बॅरिस्टर व्हावं, अशी देवेंद्रनाथ यांची इच्छा होती. पण त्या शिक्षणातही रवींद्रनाथ रमले नाहीत. शेक्सपिअरची नाटकं आणि पाश्चात्त्य संगीत यांचा अभ्यास करून वकिलीचं शिक्षण पुरं न करताच ते कलकत्त्याला परतले. त्या सुमारास त्यांनी ‘वाल्मीकी प्रतिभा’ हे नाटक लिहिलं. या नाटकाला त्यांनी दिलेलं संगीत हे पाश्वात्त्य आणि भारतीय रागसंगीतावर आधारित होतं. यातली वाल्मीकीची भूमिकाही त्यांनी स्वत: केली होती.

वयाच्या 22 व्या वर्षी 1883 मध्ये रवींद्रनाथांचं मृणालिनीदेवी यांच्याशी लग्न झालं. ते 1901 मध्ये आपली दोन मुलं आणि पत्नी यांच्याबरोबर शांतिनिकेतन या ठिकाणी राहायला गेले.

पारंपरिक शिक्षणपद्धतीचा त्यांनी घेतलेला धसका, आपल्या मुलांना योग्य शिक्षण मिळावं ही इच्छा आणि उपनिषदांवरून प्रेरणा घेऊन त्यांनी शांतिनिकेतन या ठिकाणी शाळा सुरू करायचं ठरवलं. या शाळेसाठी पैसे जमवताना त्यांनी काही पुस्तकांचे हक्क आणि बायकोचे दागिने विकले होते. शिक्षणाच्या बाबतीत आपण जे सहन केलं ते पुढच्या पिढ्यांना सहन करायला लागू नये असं वाटून, त्याबद्दल कळवळीनं विचार करून, त्यावर कृती करून आपल्याच आयुष्यात ही भव्य-दिव्य स्वप्नवत्‌ शाळा रवींद्रनाथांनी उभी केली. शांतिनिकेतनमध्ये शाळा सुरू करताना ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, हा त्यांचा प्रमुख हेतू होता. पुढची 30 वर्षं त्यांनी ही शाळा नावारूपाला आणण्यासाठी अपार कष्ट घेतले. सत्यजित रे, अमर्त्य सेन आणि इंदिरा गांधी हे शांतिनिकेतनमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांपैकी आहेत.

मात्र याच काळात रवींद्रनाथांची बायको, दोन मुलं आणि कादंबरीदेवी ही त्यांच्या भावाची बायको असे सर्व जण मरण पावले. रवींद्रनाथांनी तेव्हा आपल्या सगळ्या भावना कवितांमधून व्यक्त केल्या.

रवींद्रनाथांच्या या कवितांचा इंग्रजी अनुवाद 1912 मध्ये विल्यम रॉथेनस्टाईनच्या हातात पडला. रॉथेनस्टाईन हा चित्रकार आणि कलाविषयक लिखाण करणारा इंग्लंडमधला समीक्षक होता. टागोरांच्या कवितांनी तो कमालीचा प्रभावित झाला. त्यानं त्या कविता डब्ल्यू.बी. यीट्‌स या महान कवीला पाठवल्या. यीट्‌स त्या कवितांमध्ये कित्येक दिवस बुडून गेला होता. आपल्या कवितांसाठी टागोरांकडून प्रेरणा घेतल्याचं पत्रही यीट्‌सनं रॉथेनस्टाईनला पाठवलं होतं. तोपर्यंत टागोर भारतात प्रसिद्ध असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर ते कोणाला फारसे ठाऊक नव्हते. मात्र 1913 मध्ये ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं आणि त्यांचं नाव जगभर पोचलं. त्यांना 1915 मध्ये लंडनमधला मानाचा सर हा किताबही मिळाला.

रवींद्रनाथांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना 1918 मध्ये केली. आपली नोबेल पारितोषिकाची सर्व रक्कम त्यांनी विश्वनिकेतनच्या उभारणीसाठी दिली. यावर पु.ल. देशपांडे यांनी ‘वंगचित्रे’ या पुस्तकात अप्रतिम लिहिलं आहे. ते म्हणतात : कसली धुंदी घेऊन जगली ही माणसे? त्या त्यागाचीच धुंदी. नव्या निर्मितीची, नव्या प्रयोगांची. स्वत: गुरुदेवांनी नोबेल प्राईझची लक्षावधी रुपयांची रक्कम ‘इदम न मम’ या भावनेने आश्रमार्पणामस्तु केली. सहकाऱ्यांनी आपापल्या जीवनाच्या आहुती टाकल्या. या साऱ्यांनी डोळ्यांपुढे उभी केलेली स्वप्नेच एवढी मोठी होती की, ती प्रत्यक्षात आणायला कुबेराचे भांडार अपुरे पडले असते. आकाशातल्या नक्षत्रांपासून ते नूपुरांच्या झणत्कारापर्यंत विपुल समग्रतेचा साक्षात्कार घडवून घेऊन इथला प्रत्येक छात्र आणि छात्री जीवनात आपली आयुष्यनौका लोटायला समर्थ करून पाठवू, असा संकल्प सोडून हे सारे ऋषी त्या तपोवनात सज्ज झाले होते. ऋषी नित्यनूतन प्रयोगात दंग असतात. वृद्ध विचारांना ते आलिंगन देऊन बसत नाहीत आणि नव्या विचारांच्या पदाघातांना भीत नाहीत. यौवनाची आव्हाने स्वीकारीत असतात. काल त्यांना जखडून ठेवत नाही, उद्या भेडसावीत नाही आणि आजकडे ते निर्भय डोळ्यांनी पाहतात.

शांतिनिकेतन व विश्वभारती या दोन शिक्षणसंस्थांसाठी देणग्या गोळा करताना रवींद्रनाथांनी जगप्रवास केला होता. आपल्या अखंड भ्रमंतीत टागोर तेव्हा रोमाँ रोलाँ या विचारवंताला, चार्ली चॅप्लिन या कलावंताला आणि अल्बर्ट आइन्स्टाईन या बुद्धिवंताला भेटले होते. टागोर हे विचारवंत कवी होते, आइन्स्टाईन कविवृत्तीचा विचारवंत होता. दिमित्री मेरिआनऑफ यानं आइन्स्टाईन आणि रवींद्रनाथ ही दोन ग्रहांची भेट असल्याचं म्हटलं होतं.

कलकत्त्यात संशोधनात गढून गेलेले जगदीशचंद्र बोस यांच्याशीही तेव्हा रवींद्रनाथांचा स्नेह होता. भारतात तेव्हा चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीतही रवींद्रनाथ सक्रिय होते. लॉर्ड कर्झनच्या बंगालच्या फाळणीच्या तत्त्वांना त्यांचा सक्त विरोध होता. इतकंच नव्हे तर, 1919 च्या जालियनवाला बागेच्या हत्याकांडानंतर त्यांनी सर हा किताब परत करून टाकला होता. डॉक्युमेंटरीत हा भाग चित्रं, वृत्तांकनं आणि रेखाटनं यांच्या साह्यानं दाखवला आहे.

यानंतरच्या काळात व्हिक्टोरिया कांपो या मैत्रिणीला त्यांनी आपली काही रेखाटनं दाखवल्यावर तिनं विचारलं, ‘तू चित्रं का काढत नाहीस?’ तेव्हा चित्रकलेचं शिक्षण अजिबात घेतलेलं नसताना वयाच्या 67 व्या वर्षी रवींद्रनाथांनी चित्रं काढायला सुरुवात केली. पुढच्या 13 वर्षांत त्यांनी 3000 पेक्षा जास्त चित्रं काढली. रवींद्रनाथ शेवटच्या काही वर्षांमध्ये शांतिनिकेतन सोडून लहानपणी राहिले होते त्या जोरासांकोमधल्या घरात येऊन राहिले होते. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी युरोपमधला वाढता हिंसाचार पाहिला. वयाच्या 80 व्या वर्षीदेखील त्यांनी फॅसिझमविरोधात आवाज उठवला. आत्मकेंद्री राजकारण आणि राष्ट्रवाद कोणत्याही संस्कृतीला घातक ठरू शकतो, असं त्यांचं मत होतं.

त्यांनी 1941 मध्ये ‘क्रायसिस इन सिव्हिलायझेशन’ हा निबंध लिहिला होता. त्यातल्याच एका भागातल्या ओळींनी या डॉक्युमेंटरीचा शेवट होतो. रवींद्रनाथ लिहितात- ‘भोवती मला संस्कृतीची लक्तरं दिसतात. सगळं भकास झालेलं दिसतं. पण माणसाच्या माणूसपणावरचा माझा विश्वास संपवण्याचं पाप मी करणार नाही. हे भयचक्र संपेल, वातावरण परत एकदा त्यागासारख्या उदात्त भावनांनी भरून जाईल आणि इतिहासात एक नवं प्रकरण सुरू होईल याची मला खात्री आहे. कदाचित ज्या दिशेला सूर्य उगवतो, त्या पूर्वेकडच्या देशांमधूनच नवी पहाट जन्मेल. आपला मानवतावादाचा वारसा सर्व अडथळे ओलांडून परत एकदा मानवजात चोखाळेल. तो दिवस लवकरच उगवेल...!’

‘पथेर पांचाली’ हा सत्यजित रे यांचा चित्रपट पाहिल्यानंतर अकिरा कुरोसावा या महान दिग्दर्शकानं ‘माझ्या मनातली खळबळ मी कधीच विसरणार नाही’ असे उद्‌गार काढले होते. सत्यजित रे यांची रवींद्रनाथांवरची डॉक्युमेंटरीदेखील प्रेक्षकांच्या मनावर तितकाच उत्कट परिणाम घडवून आणते. टागोरांचा जीवनपट एका तासाच्या डॉक्युमेंटरीत इतक्या समर्थपणे फक्त सत्यजित रेच उलगडून दाखवू शकतात. डॉक्युमेंटरी कशी असावी, कॅमेरा कसा वापरावा, डॉक्युमेंटरीचा वेग कसा राखावा, आवाजाचा वापर, त्यातला भारदस्तपणा, प्रत्येक दृश्यासाठी चपखल बसणारं शब्दवर्णन, पार्श्वसंगीत... या डॉक्युमेंटरीतील सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटरीत अभ्यासण्याजोग्या आहेतच. महत्त्वाचं म्हणजे ही रवींद्रनाथांचा प्रचार करत नाही.

या डॉक्युमेंटरीला भारतात राष्ट्रपती सुवर्णकमळ, लोकार्नो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं गोल्डन सील आणि उरुग्वेमधलं मानाचं माँटव्हिडिओ फिल्म फेस्टिव्हलमधलं पारितोषिक मिळालं होतं.

एखादं चांगलं पुस्तक किंवा लेख आपल्याला अनेकानेक लेख, पुस्तकं वाचायला किंवा काही चित्रपट पाहायला उद्युक्त करतो, तसं ही डॉक्युमेंटरी रवींद्रनाथ यांच्याबद्दल पुढच्या अभ्यासाला चालना देते. कोणत्याही उत्तम कलाकृतीचं काम आपल्याला जास्त विचारप्रवृत्त करणं हे असतं. या अर्थानं ही डॉक्युमेंटरी आपल्या देशातल्या एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबद्दल विविधांगी विचार करायला भाग पाडते. शेवटी बा.भ. बोरकर यांची ही कविता आठवल्यावाचून राहत नाही...!

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके,

चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा,

अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा...

डॉक्युमेंटरीची युट्यूब लिंक https:// www.youtube.com/watch?v=ZKI1a7w9tmU

नीलांबरी जोशी, पुणे

neelambari.joshi@gmail.com

Share on Social Media

चनी महासत्तेचा उदय : 13

आर्थिक विकासासाठी परराष्ट्र धोरण

सतीश बागल

चीनच्या भावी प्रगतीत अमेरिकेचे जे साह्य चीनला मिळाले, त्यात डेंग यांच्या दौऱ्याचा फार मोठा वाटा होता. अमेरिकेमधून चीनमध्ये अनेक उद्योजक व गुंतवणूकदार चीनला भेटी देऊ लागले आणि अमेरिकन भांडवल मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये येऊ लागले. भांडवलाबरोबर प्रगत तंत्रज्ञान व व्यवस्थापन-शास्त्रातील तंत्रेही येऊ लागली. पुढे वर्ल्ड बँकेनेही चीनबरोबर काम करण्यास सुरुवात केली आणि आर्थिक विकासासाठी नवनवीन स्ट्रॅटेजी तयार होऊ लागल्या. चीनमधून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊ लागले व अशा विद्यार्थ्यांची संख्या खूपच वाढली. 1980 पासून 2005 पर्यंत जवळजवळ 10 लाख विद्यार्थी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आले. त्यापैकी साडेतीन ते चार लाख विद्यार्थी उच्च पूर्ण करून चीनमध्ये परतले. या विद्यार्थ्यांनी चीनमधील विद्यापीठे व उच्च शिक्षणाच्या संस्थांना पुढे नेऊन त्यांची गुणवत्ता वाढविली.

डेंग यांनी 1978 मध्ये आर्थिक सुधारणांची पूर्वतयारी करण्यासाठी अमेरिका व जपान या आर्थिक दृष्ट्या प्रबळ सत्तांशी जवळचे संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला. वित्तीय भांडवल, गुंतवणूक, उच्च दर्जाचे तंत्रज्ञान, प्रभावी व्यवस्थापन तंत्र याबाबतीत हे दोन्ही देश पुढारलेले होते. त्यांची मदत घेऊन, अर्थव्यवस्था खुली करून चीनचा वेगाने आर्थिक विकास त्यांना करायचा होता. डेंग यांनी 1978 ते 1980 या काळात अमेरिका, जपान, युरोपीय देश, दक्षिण कोरिया, हाँगकाँग इत्यादी देशांशी कुशलतेने उत्तम संबंध प्रस्थापित केले. तसेच या देशांना भेटी देऊन त्यांच्याकडून कशा प्रकारचे सहकार्य व साह्य अपेक्षित आहे, हे स्पष्ट केले.

डेंग यांची ऑक्टोबर 1978 मधील दहा दिवसांची जपानभेट ऐतिहासिक स्वरूपाची होती. 1894-95 मधील चीन व जपान यांच्यातील युद्धात चीनला नमवून जपानने चीनकडून तैवान (फार्मोसा) बळकावला होता. शिवाय 1930 च्या दशकात मांचुरिया पादाक्रांत करून चीनवर मोठे आक्रमण केले होते. पुढे दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी सैन्याने चिनी जनतेवर क्रूर अत्याचारही केले. हे सारे चिनी लोक विसरू शकत नव्हते. मात्र बदलत्या आधुनिक काळात हे सर्व विसरून जपानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून सहकार्य घ्यावे, असे डेंग यांना वाटत असे. दुसऱ्या बाजूला अमेरिका व जपान या दोन्ही देशांना सोव्हिएत युनियनच्या वाढत्या प्रभावामुळे चीनला सोव्हिएत युनियनपासून तोडणे आवश्यक वाटत होते. माओ व जपानचे पंतप्रधान टनाका काकुई (Tanaka Kakuei) यांनी 1972 मध्ये चीन व जपानमधील संबंध सुरळीत करण्याकरता ‘शांती आणि मैत्री करार’ करण्याचे प्रयत्न केले होते; मात्र हा करार रखडला होता. त्यानंतर हे संबंध आणखी दृढ होण्यासाठी दोन्ही बाजूने सहा वर्षांत काहीही हालचाल झाली नाही. या दोन्ही देशांतील सागरी प्रदेशावर दोन्ही देशांनी वर्चस्व (hegemony) ठेवू नयेच; परंतु कोणत्याही इतर सत्तेने वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यास दोन्ही देशांनी त्याला विरोध करावा, ही चीनची सूचना जपानला अडचणीची वाटत होती. कारण त्यामुळे सोव्हिएत युनियनला विरोध केल्यासारखे झाले असते. जपानला सोव्हिएत युनियनबरोबर 1976 मध्ये तणावपूर्ण संबंध ठेवणे परवडण्यासारखे नव्हते. मात्र 1977-78 या कालावधीत तत्कालीन पंतप्रधान टाकेओ फुकुडा यांनी याबाबत खास प्रयत्न करून यासंबंधातील कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. शेवटी जुलै 1978 मध्ये डेंग यांनी या करारात जपानला हवी असणारी सवलत देऊ केली. यापूर्वी इतर देशांशी केलेल्या पूर्वीच्या करारांना या कराराने बाधा येणार नाही, अशी तरतूद जपान-चीन यांच्यातील करारात समाविष्ट केल्याने जपानची अडचण दूर झाली. डेंग यांनी ही सवलत देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, व्हिएतनाम व चीन यांच्यातील संघर्ष 1978 मध्ये टोकाला गेला होता आणि व्हिएतनामला धडा शिकविणे हे डेंग यांना अत्यावश्यक वाटत होते. या दृष्टीने जपानशी मैत्रीपूर्ण करार करणे चीनच्या दृष्टीने हितावह होते. या करारावर चीनमध्ये स्वाक्षऱ्या झाल्यावर डेंग यांनी दहा दिवसांचा जपान दौरा केला.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अर्धशतकात जपानला भेट देणाऱ्या तीन परदेशी पाहुण्यांचे जपानमध्ये फार कौतुक झाले. मार्शल प्लॅनमुळे उभारी घेत असलेल्या जपानला 1960 मध्ये जॉन केनेडी यांचे भाऊ रॉबर्ट केनेडी यांनी भेट दिली होती. त्यांचे आकर्षक व उमदे व्यक्तिमत्त्व आणि तरुण व सर्वसामान्य जनता यांच्याशी जवळचा संवाद साधण्याची हातोटी यामुळे जपानी लोक मोहरून गेले होते. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष किम डे जुंग यांनीही 1998 मध्ये जपानच्या जनतेशी असेच जवळचे नाते निर्माण केले होते. डेंग यांनीही 1978 मध्ये अशाच पद्धतीने जपानी जनतेची मने जिंकली आणि चीन व जपान यांच्यातील संबंधांतील एक नवा अध्याय सुरू केला. घराघरात टीव्ही असणाऱ्या जपानी जनतेला संयत आणि प्रामाणिक डेंग आश्वासक वाटले. चीनची प्राचीन संस्कृती व बौद्ध धर्म जपानसाठी प्रेरणादायी आहेत, असा जपानच्या नेत्यांचा व जनतेचा सूर होता. आपल्या प्रभावी भाषणाने डेंग यांनी जपानी जनतेला आपलेसे केले. ‘‘मी तीन बाबींसाठी जपानमध्ये आलो आहे. शांतता व मैत्रीपूर्ण करारावर सही करण्यासाठी; अनेक जपानी मित्रांनी दोन्ही देशांतील संबंध दृढ करण्यासाठी अविरत कष्ट घेतले आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी; प्राचीन काळात एक्स फ्यु हा चीनमधून जपानमध्ये अमृत कुंभ आणण्यासाठी आला होता, त्याची आठवण जागविण्यासाठी. आज मीही अमृत कुंभ घेण्यासाठी जपानमध्ये आलो आहे.’’ या शब्दांनी त्यांनी चीन व जपान यांच्यातील संबंध वेगळ्या उंचीवर नेले. हा अमृत कुंभ म्हणजे अर्थातच आधुनिकीकरणाचे मंत्र आणि तंत्र, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. दोन्ही देशांतील दीर्घकालीन द्वेष व त्यामुळे आलेली राजकीय ताठरता या भेटीमुळे नाहीशी झाली. जपानी नेत्यांनी डेंग यांच्याकडे गतकाळातील चुकांची, क्रौर्याची व हिंसाचाराची कबुली देऊन माफी तर मागितलीच; पण चीनचे राहणीमान वाढविण्यासाठी सहकार्यही देऊ केले. डेंग यांनीही मोकळ्या मनाने जपानी जनतेच्या या भावनेचा आदर करीत ‘झाले-गेले गंगेला मिळाले’, या भावनेने चीन व जपान यांच्या संबंधात मैत्रीपूर्ण अध्याय लिहिण्याचे सूतोवाच केले. जपानमध्ये डेंग यांनी निसान मोटारकार व इतर आधुनिक कारखान्यांना भेटी देऊन तेथील उत्पादनपद्धती पाहिल्या. जपानमधील सार्वजनिक वाहतूकव्यवस्था व लोकोपयोगी सेवांची त्यांनी पाहणी केली. टोकियो ते क्योटोदरम्यान बुलेट ट्रेनने प्रवास केला. जपानमधील बंदरे, मेकॅनाइज्ड स्टील फॅक्टरीज, टेलिव्हिजन व आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचे कारखान्यांना भेटी दिल्या.

डेंग यांच्या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याबरोबर आधुनिक सिनेचित्रण करणारे तंत्रज्ञ व चित्रण करणारी सामग्री असे. जपानमधील आधुनिक कारखाने, तंत्रज्ञान, चीनशी सहकार्यास उत्सुक असणारे कार्यक्षम जपानी लोक या प्रतिमा चीनमध्ये प्रसृत केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम चीनमधील लोकांवर व पक्षातील कार्यकर्त्यांवर होईल आणि आर्थिक विकासाचे नवे पर्व सुरू करण्याच्या दृष्टीने या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील, असा डेंगना विश्वास होता. चीनमधील राष्ट्रबांधणीच्या कामात जपानमधील उद्योगविश्वाला महत्त्वाची संधीही दिसत होती. त्यामुळे चीन-जपान यांच्यातील संबंध दोन्ही देशांच्या दृष्टीने फायदेशीर होते. पुढील वीस वर्षांत चीनने जपानकडून तंत्रज्ञान, व्यवस्थापनशास्त्र, कारखानदारी, गुणवत्ता वाढण्यासाठीचे कार्यक्रम, निर्यातीसाठी परदेशी बाजारपेठा काबीज करण्याची तंत्रे, मार्केट डोळ्यांसमोर ठेवून उत्पादन करण्याच्या शास्त्रीय पद्धती इत्यादी अनेक गोष्टी आत्मसात केल्या. डेंग यांचा जपान दौरा सर्वार्थाने यशस्वी ठरला.

याच काळात डेंग यांनी अमेरिकेबरोबरचे संबंध घनिष्ठ केले आणि चीनचे आधुनिकीकरण अधिक सुकर झाले. रिचर्ड निक्सन आणि हेन्री किसिंजर यांनी 1972 मध्ये चीनला भेट देऊन चीनबरोबर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर हे संबंध फारसे दृढ झाले नाहीत, कारण माओ सातत्याने ‘अमेरिका सोव्हिएत युनियनशी जवळचे संबंध ठेवीत आहे’ असा आरोप करीत असत. शिवाय रिचर्ड निक्सन अमेरिकेला परतल्यानंतर वॉटरगेट प्रकरण सुरू झाले. अमेरिकन राजकारण ढवळून निघाले आणि अमेरिकन राजकारण्यांचे चीनकडील लक्ष कमी झाले. चीनमध्येही नेतृत्वबदल, माओंचा मृत्यू यामुळे चीनचेही अमेरिकेकडील लक्ष कमी झाले. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे एक मिशन कार्यालय बीजिंगमध्ये होते, त्याला राजनैतिक दर्जा नव्हता. कारण दोन्ही देशांमध्ये अनेक विषयांवर ऐक्य नव्हते. अमेरिकेचे सोव्हिएत युनियन व तैवान यांच्याशी असणारे संबंध हे कळीचे मुद्दे होते. डेंग यांचा हुआ गुओफेंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये 1977 मध्ये समावेश झाल्याने अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारण्याबाबत परत लक्ष देण्यात सुरुवात केली. याच काळात अमेरिकेतही नेतृत्वबदल होऊन जिमी कार्टर अध्यक्ष झाले. त्यांनाही चीनबरोबरचे संबंध पूर्ववत्‌ करावयाचे होते. त्यांचे परराष्ट्रमंत्री सायरस व्हान्स यांना मात्र सोव्हिएत युनियनबरोबरची SALT (Strategic Arms Limitations Talks) बोलणी प्रथम करावीत, असे वाटत होते.

शेवटी जिमी कार्टर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झिबेग्न्‌यू ब्रेझेन्स्की यांच्या पुढाकाराने अमेरिका-चीन बोलणी 1977 मध्ये सुरू झाली. चीनचे दोन प्रमुख मुद्दे होते. अमेरिकेकडून विज्ञान, तंत्रज्ञान व अर्थविषयक साह्य चीनला घ्यावयाचे होते; मात्र तैवान (फार्मोसा) बाबत चीन कोणतीही तडजोड करण्यास तयार नव्हता. अमेरिका व चीन यांच्यात राजनैतिक संबंध निर्माण व्हावयाचे असतील तर अमेरिकेला तैवानबरोबर संबंध ठेवता येणार नाहीत, हे स्पष्ट होते. शिवाय अमेरिकेने चीन आणि तैवान यांच्या एकीकरणासाठी मदत करावी, अशी चीनची मागणी होती. ही मागणी अमेरिकेला मान्य होण्यासारखी नव्हती. अमेरिकेत काँग्रेस व सिनेटमध्ये तैवानची मोठी लॉबी होती. अमेरिका व तैवान यांच्यात 1954 मध्ये झालेल्या करारानुसार अमेरिका-तैवान यांच्यातील संबंध फारच जवळचे होते. त्यानुसार अमेरिकेकडून तैवानला नियमित शास्त्रपुरवठा होत असे. तैवान मुद्दा चीनच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा होता, कारण तो कम्युनिस्ट चीनच्या अस्तित्वाचा आणि चिनी जनतेच्या अस्मितेचा प्रश्न होता. तैवानला कोणतीही वैधता देणे याचा अर्थ स्वतःच्या अस्तित्वावर अविश्वास दाखविण्यासारखे होते.

दुसरा मुद्दा सोव्हिएत युनियनबाबतचा होता. सोव्हिएत युनियनबरोबर अमेरिकेने फार जवळचे संबंध ठेवू नयेत, असे चीनला वाटत होते. चीनच्या दक्षिणेस व्हिएतनाम व उत्तरेस सोव्हिएत युनियन यांच्यामुळे चीनला घेरल्यासारखे व असुरक्षित वाटत होते. त्यात दक्षिण व उत्तर व्हिएतनाम यांचे एकीकरण झाल्यानंतर व्हिएतनाम व सोव्हिएत युनियन बरेच जवळ आले आणि चीन व व्हिएतनाम यांच्यात तणावपूर्ण संबंध निर्माण झाले. SALT मुळे (Strategic Arms Limitation Talks) अमेरिका व सोव्हिएत युनियन एकत्र येत होते, ते चीनला नको होते. जेव्हा 1978 नंतर व्हिएतनाम व चीनमधील संबंध तणावपूर्ण झाले, तेव्हा चीनला अमेरिकेबरोबर जवळचे संबंध ठेवणे आवश्यक झाले. या तणावपूर्ण वातावरणात शेवटी डेंगना तैवानच्या मुद्यावर बरेच नमते घ्यावे लागले आणि चीन व अमेरिकेत समझोता घडून आला. दि.6 डिसेंबर 1978 रोजी याची घोषणा करून अमेरिका व चीन यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. चीनशी राजनैतिक संबंध स्थापन करीत असताना अमेरिकेला तैवानबरोबरचे संबंध औपचारिक रीत्या संपवावे लागले. मात्र असे असले तरी अमेरिकेने तैवानबरोबरचे संबंध प्रत्यक्षात इतर मार्गांनी सुरूच ठेवले. या संबंधांना वैधता देण्यासाठी अमेरिकन काँग्रेसच्या प्रतिनिधींनी ‘तैवान रिलेशन्स ॲक्ट 1979’ हा कायदा जिमी कार्टर यांच्या नाकावर टिच्चून पास करून घेतला. हा कायदा एप्रिल 1979 मध्ये पास झाला तरी तो पूर्वलक्ष्यी प्रभावाने दि.1 जानेवारी 1979 पासून अमलात आणण्याची काळजीदेखील काँग्रेसने घेतली. तैवानबरोबर मैत्री निभावण्याच्या अमेरिकेच्या या पद्धतीने डेंग अर्थातच खूप खवळले; मात्र व्हिएतनाम प्रकरणाने त्यांचा नाइलाज झाला.

यानंतर दीड महिन्यातच दि.28 जानेवारी 1979 ते 5 फेब्रुवारी 1979 या काळात डेंग यांनी अमेरिकेचा दौरा सपत्नीक केला. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेच्या महत्त्वाच्या मुत्सद्यांशी व अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध प्रस्थापित केले आणि चीनसाठी अमेरिकेकडून विविध बाबतींत सहकार्य प्राप्त केले. कम्युनिस्ट असूनही आर्थिक विकास, खुली अर्थव्यवस्था व भांडवलशाही देशांबरोबर सहकार्य इत्यादी बाबतींत डेंग उत्सुक होते- ही बाब अमेरिकन लोकांना, राज्यकर्त्यांना व माध्यमांना भावली. शिवाय चीनच्या प्राचीन संस्कृतीबद्दल उत्सुकता असल्याने डेंग अमेरिकेत जिथे जात तिथे त्यांचे उत्तम स्वागत होई. ह्युस्टन येथे नासामधील अवकाश संशोधन केंद्राला भेट दिल्यावर ते प्रभावित झाले. ह्युस्टनमधील खनिजतेल उत्खननाचे तंत्रज्ञान, सिॲटल येथील बोर्इंग विमानांची फॅक्टरी आणि ॲटलांटामधील फोर्ड मोटारींचा कारखाना यांना त्यांनी भेट दिली.

कार्टर यांच्याशी बोलणी करताना डेंग यांनी सोव्हिएत विस्तारवादाला चीन व अमेरिका यांनी एकत्र विरोध करण्याचा मुद्दा काढला. व्हिएतनाम पूर्वेकडील क्युबा आहे, अशी सुरुवात करून डेंग यांनी कार्टर यांना खासगी बैठकीत येत्या काही काळात चीन व्हिएतनामला चांगला धडा शिकविणार, असे स्पष्ट सांगितले. व्हिएतनामला रोखले नाही तर रशिया व व्हिएतनाम पूर्व आशियात प्रबळ होऊन आशियाची शांती नष्ट होईल, असे डेंग यांना वाटत असे. कार्टर यांनी डेंग यांना या हल्ल्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, असे कार्टर यांनी त्यांच्या रोजनिशीत लिहून ठेवले असले तरी, असे काही झाल्यास ते अमेरिकेच्या पथ्यावर पडणारे होते. अमेरिकेच्या भेटीनंतर चीनने व्हिएतनामवर हल्ला केला तर त्याचा विपरीत अर्थ रशिया काढील; तसेच प्रथम हल्ला केल्याने चीन हल्लेखोर आहे, असे समजले जाईल, असे कार्टर यांनी डेंग यांच्या नजरेस आणले. मात्र व्हिएतनामला धडा शिकवून चिनी सैन्य तत्काळ परत येईल, त्यामुळे काही प्रश्न निर्माण होणार नाहीत, असे आश्वासन डेंग यांनी कार्टर यांना दिले. कार्टर यांनी मात्र डेंग यांची पाठ वळताच रशियाला याबाबत माहिती दिली.

विविध प्रकारचे तंत्रज्ञान, विज्ञान यांच्या साह्याबाबत डेंग यांनी अमेरिकेकडे मागणी केलीच; याशिवाय दर वर्षी चिनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत विज्ञान, तंत्रज्ञान व इतर उच्च शिक्षणासाठी पाठविण्यासाठीही डेंग यांनी कार्टर यांचे मन वळविले. याशिवाय चीन व अमेरिका यांच्यात व्यापारी संबंध प्रस्थापित करणे आवश्यक होते. यात एक अडचण अशी होती की, 1974 मध्ये अमेरिकेच्या काँग्रेसने कायद्यात जॅक्सन-वाणिक सुधारणा करून कम्युनिस्ट देशांना अमेरिकेशी व्यापारी संबंध ठेवताना महत्त्वाची अट ठेवली होती. त्या देशांनी त्यांच्या नागरिकांना देश सोडून इतरत्र वास्तव्यास जायचे असेल (Emigration)तर अशा बाबतींत परवानगी दिलीच पाहिजे, अशी अट होती. असे धोरण कम्युनिस्ट देशांचे असेल, तरच अमेरिकेबरोबर ते व्यापार करू शकत. काँग्रेस भेटीच्या वेळी काँग्रेसच्या सदस्यांनी डेंग यांना चीन अशा बाहेर वास्तव्यास जाणाऱ्या लोकांना परवानगी देते का, असे विचारले. डेंग यांनी हसत-हसत ‘तुमच्याकडे किती लोकांना पाठवून देऊ? दहा लाख की पन्नास लाख?’ असे गमतीने विचारल्यावर हा मुद्दा काँग्रेस सदस्यांनी सोडून दिला आणि चीनला या अटीतून सूट देऊन टाकली.

फिलाडेल्फियामधील टेम्पल विद्यापीठाने डेंग यांना ऑनररी डिग्रीने सन्मानित केले तेव्हा, डेंग यांनी अमेरिकन विद्यापीठांतील विचारस्वातंत्र्याचा गौरव करीत हा सन्मान कम्युनिस्ट विचारांचा आहे, असे भाषणात नमूद केले. मात्र चीनमध्ये परतताच अगदी याच वर्षात त्यांनी सांकृतिक क्रांती संपुष्टात आल्यानंतर बहरणाऱ्या अभिव्यक्ती-स्वातंत्र्याला चापही लावला.

चीनच्या भावी प्रगतीत अमेरिकेचे जे साह्य चीनला मिळाले, त्यात डेंग यांच्या दौऱ्याचा फार मोठा वाटा होता. अमेरिकेमधून चीनमध्ये अनेक उद्योजक व गुंतवणूकदार चीनला भेटी देऊ लागले आणि अमेरिकन भांडवल मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये येऊ लागले. भांडवलाबरोबर प्रगत तंत्रज्ञान व व्यवस्थापन-शास्त्रातील तंत्रेही येऊ लागली. पुढे वर्ल्ड बँकेनेही चीनबरोबर काम करण्यास सुरुवात केली आणि आर्थिक विकासासाठी नवनवीन स्ट्रॅटेजी तयार होऊ लागल्या. चीनमधून विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर जाऊ लागले व अशा विद्यार्थ्यांची संख्या खूपच वाढली. 1980 पासून 2005 पर्यंत जवळ-जवळ 10 लाख विद्यार्थी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आले. त्यापैकी जवळजवळ साडेतीन ते चार लाख विद्यार्थी चीनला परतले. या विद्यार्थ्यांनी चीनमधील विद्यापीठे व उच्च शिक्षणाच्या संस्थांना पुढे नेऊन त्यांची गुणवत्ता वाढविली. चीनमधील अनेक विद्यापीठे व संस्था 2005 नंतर जागतिक दर्जाच्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आज चीनने विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, अवकाश संशोधन, संगणक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयांत जागतिक तोडीचे संशोधन चालविले आहे; त्याचा पाया अमेरिकेने दिलेल्या मदतीमध्ये होता. त्याचा थेट संबंध डेंग यांच्या यशस्वी दौऱ्याशी होता.

डेंग यांनी 1978 मध्ये आशियातील म्यानमार, नेपाळ, मलेशिया, सिंगापूर, थायलंड व उत्तर कोरिया या देशांचेही दौरे केले. आशिया खंडातील या देशांचा तातडीने दौरा करण्याचे कारण थोडे वेगळे होते. अमेरिकेने व्हिएतनाम युद्धातून 1973 मध्ये अंग काढून घेतले. त्यानंतर 1975 मध्ये उत्तर व दक्षिण व्हिएतनाम या दोन देशांचे एकीकरण होऊन एकसंध व्हिएतनाम जन्मास आला. व्हिएतनाम व सोव्हिएट युनियन यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध पूर्वीपासून होते. व्हिएतनामने 1975 नंतर नव्याने राष्ट्रबांधणी करण्यासाठी रशिया व चीन दोघांकडे अधिक मदत मागितली. देशामधील राजकीय रस्सीखेच, नेतृत्वातील बदल व अस्थिरता यामुळे चीनने व्हिएतनामकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे चीन व व्हिएतनाम यांच्या संबंधात अंतर पडत गेले. शिवाय दोन्ही देशांमध्ये सीमारेषेवरून वाद होताच. त्यामुळे सोव्हिएत युनियन व व्हिएतनाम हे उत्तरोत्तर अधिक जवळ येत चालले होते. अमेरिकेने माघार घेतल्यानंतर त्यांच्या मोठ्या आरमाराच्या वापरासाठी बांधलेली आधुनिक बंदरे व्हिएतनामकडे आली होती. व्हिएतनामला प्राप्त होणाऱ्या मदतीच्या बदल्यात व्हिएतनामने रशियाला या बंदरांचा वापर करण्यास परवानगी दिली. व्हिएतनामने चीनच्या शेजारी असलेला लाओस गिळंकृत केला होता, शिवाय कंबोडियाविरुद्ध युद्धाची जय्यत तयारी सुरू केली होती. सप्टेंबर 1978 मध्ये व्हिएतनामने कंबोडियावर हवाई हल्ले सुरू केले होते. दक्षिण व उत्तर व्हिएतनाम यांचे एकीकरण झाल्यानंतर सरकारने महत्त्वाच्या उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला. व्हिएतनाममध्ये चिनी वंशाचे अंदाजे 20 लाख लोक राहात होते; त्यातील बरेचसे छोटे-मोठे व्यापारी व उद्योजक होते. त्यांचा या राष्ट्रीयीकरणाला विरोध होता. या विरोधामुळे व्हिएतनाम सरकारने या मूळच्या चिनी वंशाच्या लोकांवर कारवाई सुरू करून त्यांच्यावर अनेक बंधने आणली. एक लाखावर चीनवंशीय व्हिएतनाम सोडून चीनकडे यावयास निघाले. एकंदरीतच चीन व व्हिएतनाम यांच्यातील संबंध फारच ताणले गेले होते. व्हिएतनामला धडा शिकवावा, असे डेंग यांना तीव्रपणे वाटू लागले. मात्र तसे करण्यापूर्वी चीन व व्हिएतनामशेजारच्या देशांत जाऊन त्यांची भूमिका समजावून घेऊन त्यांना व्हिएतनामबद्दल चीनची भूमिका समजावून सांगावी, असे डेंग यांना वाटत होते. म्हणूनच त्यांनी 1978 मध्ये थायलंड, मलेशिया, सिंगापूर, ब्रह्मदेश, नेपाळ या सर्व देशांचा दौरा केला.

फेब्रुवारी 1979 मध्ये डेंग यांनी व्हिएतनामवर अचानक हल्ला करून व्हिएतनामचे मनसुबे धुळीस मिळविले. एक महिना चाललेल्या या युद्धात चीनने व्हिएतनामची पाच प्रमुख शहरे जलदगतीने काबीज केली आणि तितक्याच त्वरेने व्हिएतनामला ‘धडा’ शिकवून चिनी सैन्यदल माघार घेऊन त्यांच्या नेहमीच्या नियंत्रणरेषेपलीकडे जाऊन थांबले. रशियाने व व्हिएतनामने चीनच्या वाटेला जाऊ नये, असा इशारा या युद्धाने दिला. या युद्धामुळे रशियावर चांगला वचक बसला व दक्षिण-पूर्व आशियामध्ये रशियाला प्रवेश बंद झाला. यानंतर चीन व रशिया यातील संबंध बऱ्यापैकी स्थिरावले. ऑक्टोबर/नोव्हेंबर 1979 मध्ये सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानात सैन्य पाठविले तेव्हा, हे सैन्य मागे घ्यावे अशी जोरदार मागणी चीन करू शकला. चीनच्या या भूमिकेमुळे चीन व अमेरिका यांच्यात सैन्यदल सुरक्षेविषयक सहकार्याबाबत अनेक बाबतींत जवळीक निर्माण झाली. शिवाय डेंग यांच्या खुल्या आर्थिक धोरणामुळे पुढे-पुढे अमेरिका व चीन यातील संबंध दृढ झाले. एकंदरीत, डेंग यांनी चीनच्या आर्थिक विकासासाठी, सुरक्षेसाठी उत्तम आंतरराष्ट्रीय वातावरण तयार केले. डेंग यांनी व्हिएतनामशी केलेल्या युद्धामुळे थायलंडसारख्या ASEAN (Association of South East Nations) मधील देशांची व्हिएतनामबद्दलची भीती कमी झाली व चीनबद्दल त्यांना विश्वास वाटू लागला.

याच वेळी डेंग यांनी अमेरिकेबरोबर सुरक्षाविषयक सहकार्याचे धोरण आखण्यात सुरुवात केली व त्याचे तपशीलही जाहीर केले. त्यामुळे आशियातील चीनचे वर्चस्व मोठ्या प्रमाणावर वाढले. व्हिएतनाममधील मोक्याच्या बंदरांचा सुरक्षाविषयक कारणांसाठी सोव्हिएत युनियन वापर करणार, हे जाणून डेंग यांनी अमेरिकन तेलसंशोधन कंपनी अर्लोला (ARLO) 1979 मध्ये व्हिएतनाम व चीनचे हैनान बेट यातील समुद्राच्या भूगर्भातील तेलसंशोधन करण्यास पाचारण केले. व्हिएतनाममधून माघार घेत असतानाच हा करार झाला, हे महत्त्वाचे. बीजिंग विमानतळावर रशियन एअरोफ्लोटची विमाने ज्या भागात उतरत, त्याच भागात अमेरिकन विमाने उतरण्यास परवानगी दिली. रशियामधील अण्वस्त्रांच्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी विशेष प्रकारची यंत्रसामग्री घेऊन अमेरिकन विमाने तेथे उतरत. ही बाबही चीनने रशियाला अप्रत्यक्षपणे स्पष्ट करून त्यांच्यावर दबाव आणला होता. चीनचे अमेरिकेबरोबरचे सुरक्षा सहकार्य असेच होते. त्यात कोणत्याही प्रकारच्या कराराने बांधून घेतले नसले, तरी त्यात आधुनिक यंत्रसामग्री, काँप्युटर्स इत्यादींचा पुरवठा करण्याबाबतचा समावेश होता. अमेरिकेने चीनला सुरक्षाविषयक शस्त्रास्त्रे व यंत्रसामग्री सढळ हाताने पुरवावी, यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करीत होता. यादरम्यान अमेरिकन व चिनी सैन्यदलांनी परस्परांशी उत्तम संपर्क स्थापन केला होता, तसेच संयुक्त कवायती व इतर सहकार्याचे कार्यक्रमही ते करीत.

याशिवाय डेंग यांनी सैन्यदलाच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम तयार केला होता. मात्र सोव्हिएत आक्रमणाची भीती कमी झाल्यावर, अमेरिकेकडून सुरक्षा सहकार्य सुरू झाल्यावर व व्हिएतनाम युद्ध संपल्यावर डेंग यांनी सैन्यदलाच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम 10 वर्षांनी पुढे ढकलला आणि आर्थिक विकास, शिक्षण, संशोधन, औद्योगिकीकरण व शेतीच्या आधुनिकीकरणाकडे जास्त लक्ष दिले.

डॉ. सतीश बागल, नाशिक

bagals89@gmail.com

Share on Social Media

भाषा : स्त्रियांची/स्त्रियांविषयीची

निषेधाची भाषा

अपर्णा दीक्षित

स्त्रियांना कायम पुरुषांच्या संदर्भात पाहिल्याने येणारे दुय्यमत्वसुद्धा या विधानातून जाणवते. त्या जणू, कठपुतळ्या आहेत. हे मुळातूनच किती अपमानकारक आहे. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्या हिंदू अगर इतर कोणत्याही स्त्रीबद्दल असे उद्‌गार कधी ऐकयला मिळतात का? असे ऐकायला मिळाले आहे का की, स्त्रियांना इंग्रजांचा सामना करायला पाठवून पुरुष भित्रेपणा दाखवत होते? जेल भरो आंदोलनात स्त्रियांचे तुरुंग भरले जाण्याचे असे विवेचन कधीही ऐकायला मिळत नाही. स्त्रियांना नागरिक म्हणून व्यवस्थेच्या लेखी किती आदर मिळतो हे या उदाहरणामधून दिसतं. भाजपचे खासदार परवेश वर्मा हे असंही म्हणाले की, शाहीन बाग असंच चालू राहिलं तर ते तुमच्या घरांमध्ये घुसून तुमच्या बहिणींवर, मुलींवर बलात्कार करतील. त्यांना मारून टाकतील. निषेध व्यक्त करणं हा संविधानाने दिलेला हक्क आहे.

मार्च महिना स्त्रियांच्या इतिहासाचा महिना (Women's History Month) म्हणून ओळखला जातो आणि आठ मार्च जागतिक महिलादिन म्हणून साजरा केला जातो. या साजरेपणाला शोभेल अशा गिफ्ट्‌स, सवलती, हॉटेलांमधले नाविन्यपूर्ण मेन्यू, ग्रीटिंग कार्ड अशा सगळ्याची रेलचेल या निमित्ताने दिसून येते. याच्या जोडीला नव्या सौंदर्य-प्रसाधनांची रेलचेल, स्त्रीत्वाच्या-मातृत्वाच्या शक्तीचा जागर असंही दिसतं. मात्र हा जागतिक महिला दिन या सगळ्याचा उत्सव तर नाहीच नाही; किंबहुना, वर दिलेल्या सगळ्याविरुद्ध केल्या गेलेल्या बंडखोरीचा इतिहास आठवण्याचा दिवस आहे. तो वर्धापन दिवस किंवा सण नाही, तर स्मरण दिवस (Observance) आहे. स्त्रियांनी अपरिमित कष्ट घेऊन, चळवळी उभारून स्वत:साठी समान कायदे, मतदानाचे हक्क या आणि अशा कित्येक महत्त्वाच्या निर्णयांना समतेची दिशा दिली. या दिवशी या सगळ्या लढ्यात आपण कुठवर येऊन पोहोचलो, अजून कुठे कामाची आणि लढ्याची गरज आहे यावर विचार व्हायला हवा. म्हणूनच जागतिक महिलादिनाच्या शुभेच्छा देणं किंवा 'Happy women's day' म्हणणं एक पाऊल पुढे जरूर आहे; मात्र पुरेसे नक्की नाही. या निमित्ताने आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. खपेल त्या सगळ्यासाठी वस्तू बाजार पुरवत असतो. उदाहरणार्थ, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला विविध आकारातले झेंडे, तर व्हॅलेंटाईन डेसाठी लाल गुलाबाची फुलं. भारतात ‘साजरा’ होणारा जागतिक महिलादिनसुद्धा याच रांगेत जाऊन बसला आहे. जवळ-जवळ डझनभर देशांमध्ये जागतिक महिलादिनाचे महत्त्व ओळखून सुटी देण्यात येते, मात्र तिथल्या अनेक स्त्रियांना त्याचं फार अप्रूप वाटेना झालंय. याचं कारण त्यांना फुलं, ग्रीटिंग कार्ड तर मिळताहेत; मात्र सुटीचा दिवस असल्याने घरी मेजवानीचा आणखी वेळखाऊ स्वयंपाक करण्यात त्यांचा सगळा दिवस खर्च होतोय. अशी सुटी असणं एकीकडे आश्वासक आहे; तर दुसरीकडे ती सुटी अशी स्वयंपाकघरात घालवावी लागणं ळीेपळलरश्र आहे, विरोधाभास आहे.

वर म्हटल्याप्रमाणं हक्कांसाठीचा लढा हा स्त्रियांकरता नवा नाही. स्त्रिया स्वत:च्या हक्कांसाठी तर लढतच आल्या आहेत; मात्र त्यांच्या या संघर्षाला, प्रतिकाराला अनेक पैलू आहेत. कॅरी चॅपमन आणि जेन अडम्स यांनी अमेरिकेत Women's Peace Party ची स्थापना 1915 मध्ये केली, ज्याचं रूपांतर पुढे जाऊन Women's International League for Peace and Freedom ?या मध्ये झालं. पहिल्या फळीतलं जे स्त्रियांचं नेतृत्व होतं, त्या बहुतेक जणींना असं वाटत होतं की- स्त्रिया या नवीन मनुष्य जन्माला घालणाऱ्या, जन्मदात्या आहेत. यामुळे त्यांच्याकडे निर्मिती आणि जतनाची एक विशेष क्षमता आहे. या साऱ्या जबाबदारीतून त्यांनी आई, आजी या भूमिकांमधून 1920 च्या दरम्यान नि:शस्त्रीकरणाचा हक्क मागण्यासाठी लढा दिला. जग पहिल्या महायुद्धातून सावरत असताना साऱ्या जगाला या स्त्रियांनी शस्त्रवापरावर निर्बंध आणि बंदी असणं हा हक्क असल्याची जाणीव करून दिली. या स्त्रियांनार् unpatriotic - देशभक्ती नसणाऱ्या असं म्हणून अमेरिकेत नावंही ठेवली गेली.

मात्र साठच्या दशकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतलं चित्र बदललं. 15 जानेवारी 1968 रोजी विशेष बदललं. या दिवशी 5000 स्त्री कार्यकर्त्या वॉशिंग्टन डी.सी. मध्ये जमल्या आणि व्हिएतनाम युद्धातल्या सैनिकांना परत बोलावण्याची आणि व्हिएतनाम युद्धाचा निषेध करणारी प्रदर्शनं केली. यात पारंपारिकरीत्या आया आणि बहिणी या रुपात सामील झालेल्या स्त्रिया तर होत्याच. त्यांच्यातच वेगळं मत असणाऱ्या स्त्रियाही होत्या. त्यांनी असं म्हटलं की- पत्नी, आई, आजी, शोक व्यक्त करणाऱ्या-आसवं गाळणाऱ्या अशा स्वरूपात स्त्रिया जेव्हा वारंवार पुढे येतात; तेव्हा त्यातून दुर्बलता, राजकीय अक्षमता ठळक होते. या स्त्रियांनी असं खुलं आवाहन केलं की- त्यांचा आवाज केवळ नागरिक म्हणून ऐकला जावा, आया म्हणून नाही. इतकंच नाही, तर या पारंपारिक स्त्रीत्वाच्या प्रतीकांना (मेकअपचे साहित्य, हेअरस्प्रे , स्टॉकींग) झुगारून देणाऱ्या अनेक कृती केल्या गेल्या. या वेळेस Don't cry, RESIST! असे फलक झळकवले गेले. पुरुषांच्या संदर्भात कुणी तरी (बहीण, आई, आजी) असं बंड करणं पुरेसं नाही असं या तरुण पिढीतल्या स्त्रियांचं म्हणणं होतं. याचबरोबर पुरुष जेव्हा आयुष्यातल्या इतर कक्षांत सत्ता गाजवून स्त्रियांवर विविध बंधनं आणत आहेत अशा वेळेस त्या सगळ्या बंधनांची प्रतीकं ओळखली जावीत असाही हेतू त्यामागे होता. स्त्री-पुरुषांमधल्या फरकाचे कौतुक करण्याचे दिवस आता सरले आहेत आणि त्यांच्यातला सारखेपणा (बुद्धीचा, माणूसपणाचा) दाखवून देण्याचे दिवस आता आहेत, असंही या तरुण पिढीतल्या स्त्रियांना वाटत होतं.

सन 2000 पासून मात्र जागतिक शांततेसाठी काम करणाऱ्या स्त्री-कार्यकर्त्यांनी हक्कांच्या चर्चेची भाषाच बदलली. जागतिक व्यासपीठांवरून स्त्रियांचे हक्क हे मानवी हक्कच असल्याचे समीकरण तयार झाले. स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराला नव्याने आव्हान देण्यात आलं आणि सैन्यावर होणारा खर्च, सैन्यवाद याला स्त्रिया नव्या जोमाने विरोध करू लागल्या.

व्हिएतनाम युद्धाला झालेल्या विरोधावेळी जे पारंपरिक स्त्रीत्वाचं प्रतीकात्मक दफन करण्यात आलं, त्यातून जगभरातल्या स्त्रियांना युद्ध, अमानुष प्रशासकीय निर्णय, सैन्याचा अतिरेकी वापर या सगळ्यांविरुद्ध व्यक्ती म्हणून, व नागरिक म्हणून निषेध नोंदवण्याचं बळ मिळालं. मानवी हक्कांच्या भाषेने स्त्रियांना त्यांची प्रतिष्ठा मिळवून दिली.

भारतामध्ये अनेकींनी समाज सुधारणेचे काम जोमाने हाती घेऊन यशस्वीपणे बदलाच्या प्रक्रियेत एकोणिसाव्या शतकापासूनच भर घातली होती. मग त्या स्त्री-पुरुष तुलना लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे असोत किंवा स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात अग्रेसर सावित्रीबाई असोत किंवा मुस्लिम स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल काम केलेल्या फातिमा शेख असोत. आणि ही नावं तर फक्त महाराष्ट्रातील आहेत. भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळीपासून स्त्रियांचा निषेध, मोर्चे, उपोषणे यातला सहभाग लक्षणीय राहिला आहे. अर्थात त्या लढ्याला ‘आपण’ (भारतीय) विरुद्ध ‘ते’ (इंग्रज) असं परिमाण होतं. मात्र स्वातंत्र्यानंतरही स्त्रियांनी आंदोलने, चळवळी चालवल्या. 1973 मधली चिपको चळवळ आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. कुडनकुलम इथल्या अणुऊर्जा निर्मिती प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाची अलीकडच्या काळात जी चर्चा ऐकयला मिळाली त्याची सुरुवात 1980 च्या दशकात स्त्रियांनी केली आणि 20 वर्षांहून अधिक काळ त्या आपली बाजू मांडत राहिल्या. 1984 मध्ये भोपाळमध्ये युनिअन कार्बाईड दुर्घटनेनंतर एकत्र येऊन स्थापन केलेली Bhopal Group for Information and Action ही स्त्रियांच्या नेतृत्वाखाली आकाराला आलेली चळवळ आज 35 वर्षांनंतरही सक्रीय मदत करते आहे. 1985 मध्ये मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या नर्मदा बचाओ चळवळीविषयी खूप लिहिलं-बोललं गेलं आहे. जागतिक स्तरावर दिवसेंदिवस वाढणारे स्त्री-नेतृत्व आणि भारतीय स्त्रियांचा विविध लढ्यातला भाग या सगळ्याचं बळ सध्या शाहीन बागच्या स्त्रियांच्यामध्ये दिसून येतं. स्त्रियांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे लोकशाहीतलं निषेधाचं (protests), विसंगतीच्या सूराचं (voices of dissent) महत्त्व आणखी प्रकर्षानं जाणवतं. स्त्रियांच्या निषेधाच्या सामर्थ्याची दखल देशातल्या सर्वोच्च न्यायालयाला घ्यावी लागली. अर्थात सर्वसामान्यांच्या मनात या स्त्रियांविषयी, या निषेधाविषयी पुष्कळ अपमानकारक, उलट-सुलट बोललं गेलंच. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये एका जाहीर सभेत पुढील व्यक्तव्य केलं- ‘या एका ठराविक समूहाचे पुरुष भित्रे आहेत, जे स्वत: नुसते बसून आहेत आणि स्त्रियांना व मुलांना कायद्याचा निषेध करण्यासाठी पाठवताहेत.’ हा ठराविक समूह म्हणजे मुस्लिम धर्म आहे आणि त्या पुरुषांवर थेट आणि मुस्लिम स्त्रियांवर आडून केलेला हा हल्ला आहे. या एका विधानातून स्त्रियांविषयी किती तरी सूचित केलं जात आहे. एक म्हणजे, स्त्रिया स्वत: ठरवून काही करत नाहीत आणि करत नाहीयेत, तर त्यांना पुरुषांनी ‘पाठवलेले’ आहे. ज्या घरात स्त्रिया रस्त्यावर उतरून राजकीय भूमिका घेताहेत, तिथले पुरुष भित्रे आहेत. स्त्रियांना कायम पुरुषांच्या संदर्भात पाहिल्याने येणारे दुय्यमत्वसुद्धा या विधानातून जाणवते. त्या जणू, कठपुतळ्या आहेत. हे मुळातूनच किती अपमानकारक आहे. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्या हिंदू अगर इतर कोणत्याही स्त्रीबद्दल असे उद्‌गार कधी ऐकयला मिळतात का? असे ऐकायला मिळाले आहे का की, स्त्रियांना इंग्रजांचा सामना करायला पाठवून पुरुष भित्रेपणा दाखवत होते? जेल भरो आंदोलनात स्त्रियांचे तुरुंग भरले जाण्याचे असे विवेचन कधीही ऐकायला मिळत नाही. स्त्रियांना नागरिक म्हणून व्यवस्थेच्या लेखी किती आदर मिळतो हे या उदाहरणामधून दिसतं. भाजपचे खासदार परवेश वर्मा हे असंही म्हणाले की, शाहीन बाग असंच चालू राहिलं तर ते तुमच्या घरांमध्ये घुसून तुमच्या बहिणींवर, मुलींवर बलात्कार करतील. त्यांना मारून टाकतील. निषेध व्यक्त करणं हा संविधानाने दिलेला हक्क आहे. तो हक्क काही स्त्रिया बजावताहेत म्हणून इतर स्त्रियांची इज्जत धोक्यात येईल, असं विधान म्हणजे सामुदायिक हिंसा तर आहेच आहे; त्याचबरोबर स्त्रियांवरील हिंसा हे एक वर्चस्व स्थापन करण्याचे माध्यम आहे, या संकल्पनेला पुष्टी देणारंही आहे. स्त्रियांचा थेट अनादर करणारं असं हे विधान आहे.

या सगळ्या कोलाहलात काही सजग, विचारपूर्ण आवाजही आहेत. मुंबईतल्या एकत्रितपणे सुधारित नागरी कायदा (CAA) चा निषेध, मोर्चांमध्ये सामील असणाऱ्या स्त्रीवादी संघटनांनी एकत्रितपणे दिलेला शेजारील पानावरील संदेश पाहायला हवा.

हा संदेश सोशल मीडियावर अनेक काळ दिसत होता. या संदेशातून आंदोलने, मोर्चे, चळवळी या सगळ्या बदलाच्या प्रक्रियांमधल्या भाषेच्या वापरावर चर्चा घडवून आणली आहे. स्त्रियांबरोबरच इतर सर्व लिंगभावांबद्दल भाषेचा वापर सजगतेने करण्याविषयीचे हे मुद्दे आवर्जून पाहावेत असे आहेत.

जेव्हा कुणाचा अपमान करायचा असतो तेव्हा अनेकदा त्या व्यक्तीची आणि विशेषत: पुरुषाची तुलना स्त्रीबरोबर किंवा तृतीयपंथी व्यक्तीबरोबर केली जाते. भाषेतल्या स्त्रीलिंगी शब्दांकडे खऱ्या स्त्री सारखंच दुय्यमत्व आलं आहे. पुरुष स्त्रीसारखा असणे हा अपमान आहे मात्र स्त्री पुरुषासारखी असणे ही (काही अपवाद वगळता) अभिमानाची बाब मानली जाते. म्हणूनच घरकाम करणारा नवरा-बायकोच्या ताटाखालचं मांजर असतो, तर युद्धभूमी गाजवणारी ‘खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी’ पासून पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका वठवणारी राणी मुखर्जी पण ‘मर्दानी’ असावी लागते. सामाजिक भाषाशास्त्र असंही सांगतं की, बहुतेक भाषांमध्ये अपमानकारक शब्दांची यादी स्त्रियांसाठी भली मोठी असते, पुरुषांसाठी अवमानकारक शब्द तुलनेने थोडेच असतात. ‘वेश्या’, ‘बाजारबसवी’, ‘गावभवानी’, ‘छिनाल’, ‘राख’, ‘कुलटा’, ‘रांड’ हे आणि असे आणखी कित्येक शब्द सापडतील. नाही म्हणायला ‘छक्का’, ‘हिजडा’ हे आणि असे काही शब्द पुरुषवाचक अवमान दर्शवतात. मात्र पुरुषांचा अपमान खरं तर त्यांची तृतीयपंथी व्यक्ती (हिजडा) किंवा स्त्रियांशी (बायल्या) केलेल्या तुलनेत आहे. म्हणजे हा पुरुष सोडून इतरांना नाकारला गेलेला अवकाश नाही का? म्हणून जेव्हा काही हीन दर्शवायचे असते तेव्हा या सगळ्या भाषिक हिंसेचा (बांगड्या भरणे, वांझ/षंढ असणे ) हुकमी वापर करता येतो.

निषेध, मोर्चे या निमित्ताने भाषेची जडण-घडण आपल्या डोळ्यांसमोर होते आहे. स्त्रिया काय बोलताहेत, काय भाषा-प्रतीकं वापरताहेत हे जवळून, डोळसपणे पाहायला हवं आहे. त्याचबरोबर स्त्रियांविषयी काय आणि कसं बोललं जात आहे, याकडे कठोरपणे पाहायला हवंय. स्त्रियांना, तसेच सर्वच व्यक्तींना (LGBTQIA) आणि त्या निमित्ताने भाषेला अधिक आदराने, प्रगल्भतेने वागणूक देण्याची ही संधी आहे.

आवाहन

सामाजिक कार्यकर्ते, कॉम्रेड आणि मित्र-मैत्रिणींनो,

सध्याचा काळ खरोखरी ऐतिहासिक आहेत. विविध राजकीय-सामाजिक संस्था सुधारित नागरी कायदा (CAA), NPR, NRC तसेच पोलिसांनी आणि राज्यसंस्थेने चालवलेल्या दडपशाहीविरुद्ध एकत्रितपणे आवाज मिसळून लढत आहेत. आपण आपली एकी टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र अनेकदा अशी भाषणे आणि विधाने ऐकायला मिळतात, ज्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, स्त्रिया आणि तृतीयपंथी व्यक्तींबद्दल अपमानाचे, त्यांना दुय्यम लेखणारे उद्‌गार काढले जातात. या सर्व काळात, मुळातच पुरुषप्रधान आणि पूर्वग्रह बाळगणाऱ्या आपल्या समाजात असेही घडले आहे की, मोर्चांदरम्यान आणि सोशल मीडियावर स्त्रियांना इतर मीडियाकडून, राजकीय पक्षांकडून विविध प्रकारची अवहेलना सहन करावी लागत आहेत.

जेव्हा जेव्हा आपल्याला जातीय किंवा धार्मिक पूर्वग्रह अधिक बळकट करणारी अशी विधानं ऐकायला मिळतील, तेव्हा ती देखील सर्वांच्या नजरेस आणून द्यायला हवीत.

या लढ्यात आपण सारे सोबत आहोत आणि अशी विधानं आपल्या एकीत फूट पाडतात, मग वेगवेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दरी पडते. तसेच, अशा विधानांमधून पुरुषी मानसिकता अधिक बळकट होत जाते आणि पुरुषी वर्चस्वाची संस्कृती पुन्हा नव्याने जन्म घेते. अशी मानसिकता समाजात आणि अनेक चळवळींमध्येही दुर्दैवाने अनेकदा दिसून येते.

अशी काही विधाने म्हणजे -

  1. हे सगळे तर षंढ आहेत.

  2. हे तर नामर्द आहेत.

  3. आम्ही यांच्यासारखे हिजडे नाहीत.

  4. काय बांगड्या भरल्यात का हातात?

  5. यांना बांगड्या पाठवा.

  6. साल्यांना....

  7. स्त्रीच्या नात्याच्या संदर्भात विधानं- जसं की, विधवांच्या बाबतीत अवमानकारक बोलणे.

या सगळ्यातून पुरुषप्रधान मानसिकता दिसून येते. आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि आपली चळवळ न्याय, समानता, स्वातंत्र्य या मूल्यांनी अधिक बळकट केली पाहिजे.

या सगळ्याकडे कृपया टीका म्हणून बघू नये. सर्वांच्या समान प्रतिष्ठेसाठी जागतिक स्तरावर चाललेल्या प्रयत्नांचा आणि चुकीच्या वृत्तींविरुद्धच्या लढ्याचा एक भाग आहे. जर ‘जैसे थे’ मनोवृत्ती आपल्या मनांमधून हटली नाही, तर आपण याच ‘जैसे थे’विरुद्धचा लढा यशस्वी करू शकणार नाही.

या आवाहनामागील मूळ विचार आपण सारे समजून घ्याल, अशी मनापासून अपेक्षा आहे. आणि जेव्हा आपल्याच संस्था व्यासपीठांवर, चळवळींमध्ये अशा प्रवृत्ती दिसून येतात ज्याविरुद्ध आपण लढत आहोत; तेव्हा त्याबद्दल आम्ही मोकळेपणे व्यक्त होत आहेत.

मोर्चात सहभागी असणारी स्त्रीवादी लोकं, मुंबई

अपर्णा दीक्षित, पुणे

Share on Social Media

नवे पुस्तक

मनोविष्लेषणात्मक प्रवाहातील नव्या मानदंडाची कादंबरी

साईनाथ पाचारणे

स्वप्नतंत्रात आणि कलाकृतीच्या रचनातंत्रात साम्य आहे का? फ्रॉईडच्या स्वप्नरंजन सूत्राच्या अंगाने कादंबरीचे मनोविश्लेषण तंत्र पाहिले तर मनापासून पटू लागते की- ‘पिपिलिका मुक्तिधाम’ ही कादंबरी लेखकाच्या कल्पनाविश्वाची निर्मिती आहे. स्वप्न म्हणजे साहित्यकृती नाही, तरीही कादंबरीचे मर्म समजावून घेण्यासाठी लेखकाचे जीवन समजावून घेतले पाहिजे. लेखकाचे बालपण आळंदीत गेले आहे, त्यांच्या मनावर बालपणीच्या घटनांचे परिणाम झाले आहेत; म्हणूनच जीवनातील घटना आणि साहित्यातील घटना यांचे एकसूत्री नाते संपूर्ण कादंबरीत जाणवत राहते. बालपणीची अप्रकट स्वप्ने जणू त्यांच्या रचनेत प्रकट स्वरूपात रूपांतरित झाली आहे. ‘आमचा घंटानाद’ यासारखी संपूर्ण प्रकरणे आळंदी या क्षेत्राशी निगडित आहेत, म्हणूनच संपूर्ण कादंबरीवर फ्रॉईडच्या मनोविश्लेषण तंत्राचा प्रभाव जाणवत राहतो.

कोणतीही कलाकृती ही काळाची तरी असते किंवा मानवी संबंधांची तरी असते, हे सूत्र कोणत्याही काळात नाकारले जाऊ शकत नाही. मानवी संबंधांवर कलाकृती लिहायची असेल; तर खोटे मुखवटे घालण्यास नकार देत, पात्रांच्या चित्रीकरणातून खरे मानवी चेहरे वाचवण्याचे कठीण काम लेखकाला करावे लागते. तेथे मनोविश्लेषण-पद्धतीला फार वाव नसतो. पण काळाची कादंबरी असेल, तर काळाचे सत्य तिच्यात उतरण्यासाठी मनोविश्लेषणात्मक पद्धत खूप उपयोगी पडते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे, ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेली प्राध्यापक बाळासाहेब लबडे यांची ‘पिपिलिका मुक्तिधाम’ ही कादंबरी... कादंबरी पूर्णपणे मनोविश्लेषणात्मक आहे... तशीच ती संज्ञाप्रवाही आहे... या कादंबरीत कथानक संरचनेची पूर्णपणे मोडतोड करून तिचा एक नवा आकृतिबंध उदयाला आणला आहे, तो सामान्य वाचकांच्या आकलनाच्या पूर्णपणे पलीकडचा आहे. सरळपणे कथानक वाचण्याची सवय असलेल्या वाचकांना ही कादंबरी वाचताना डोक्याला मुंग्या येतील... नव्हे, त्या कडकडून चावतील.

कारण या कादंबरीत सांगितल्याप्रमाणे मुंग्यांचे मुखवटे घालून खरे मानवी चेहरे वाचण्याचे कठीण काम लेखकाने केले आहे... ही कादंबरी मानवी संबंधांवर आधारित नाही, तर मनोविश्लेषणात्मक पद्धतीने काळावर केलेले भाष्य आहे... हे भाष्य करण्यासाठी लेखकाने मुंगीचे मनोविश्लेषणात्मक मिथक वापरले आहे. या कादंबरीत पात्रे आहेत त्या चार मुंग्या... निवेदक मुंगी... लाल मुंगी... काळी मुंगी आणि तांबडी मुंगी... वारुळातून बाहेर पडून त्या निघाल्या आहेत मुक्तीच्या शोधात. म्हणून या कादंबरीला नाव दिले आहे ‘पिपिलिका मुक्तिधाम’. पिपिलिका म्हणजे मुंगी... तो संस्कृत भाषेतील शब्द आहे.

ही कादंबरी एकूण 23 उपशीर्षकांमध्ये विभागलेली आहे. ‘जगण्याच्या तळाशी’ या उपशीर्षकापासून सुरू झालेली मुंग्यांची मोक्ष यात्रा ‘मौन्यमुखी निळा धरियली’ या अखेरच्या उपशीर्षकापर्यंत येऊन थांबली आहे. त्यामुळे या कादंबरीचा कॅनव्हास विस्तृत आणि बहुरंगी झाला आहे.

काळ आणि मानवी संबंध हे कोणत्याही कलाकृती लेखनाचे सूत्र पाहता, ही कादंबरी काळाचा संदर्भ टिपण्याकडे जास्त प्रमाणात झुकली आहे. मागील दोन वर्षांत देशात जे-जे घडून गेले आहे, त्या सगळ्यांवर निवेदक मुंगीने मनोविश्लेषणात्मक पद्धतीने संज्ञाप्रवाही भाषेत भाष्य केले आहे. मराठा आरक्षणासाठी निघालेले मोर्चे, 370 वे कलम आणि जेएनयूमधील चळवळ या अचेतन महाविस्फोटक घटनांवर केलेले भाष्य नेहमीच्या पठडीत न मांडता चिंतनात्मक पद्धतीतून मुंगीच्या मनोविश्लेषणातून आपल्याला सुचेल त्या फॉर्ममधून लेखकाने मांडले आहे.

या कादंबरीचा परिप्रेक्ष्य सिग्मंड फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाच्या विचारातून जाणून घ्यायचा असेल; तर ही कादंबरी आपल्या युगाची उपज आहे, तरी या जगाच्या सीमा ओलांडून ती अचेतन जगाचे विचार प्रकट करण्याचे सामर्थ्य दाखवते. एकीकडे ती एकविसाव्या शतकावर भाष्य करते, तर दुसरीकडे वैज्ञानिक निश्चयवाद आणि जीवनशक्तिवाद प्रभावीपणे मांडते. अशा प्रकारचे कादंबरी-लेखन इंग्रजीमध्ये जॉर्ज ऑरवेल यांनी आपल्या ‘ॲनिमल फॉर्म’मध्ये डुक्कर या प्राण्याचे व मराठीमध्ये व्यंकटेश माडगूळकर यांनी आपल्या ‘सत्तांतर’ कादंबरीत वानरांचे मिथक वापरून केले आहे. त्यातून मानवी स्वभावाची संगती-विसंगती मनोविश्लेषणपद्धतीने प्रस्थापित केली आहे आणि दोन्ही लेखक त्यात कमालीचे यशस्वी झाले आहेत.

या कादंबरीत मुंग्यांचे मिथक वापरले आहे... हे जग जणू मुंग्यांनी भरलेले आहे आणि त्यांचे एकमेकींशी चालणारे व्यवहार लेखकाने बारकाईने अभ्यास करून चितारले आहेत. या मुंग्यांच्या जगातले काही नियम आहेत- एकीला अन्न मिळाले की, ते दुसरीला सांगणे. शत्रू दिसला की, सगळ्या जणींनी त्याच्यावर तुटून पडणे.

तरीही ‘आम्ही’ या सर्वनामी मुंग्या... मुंग्यांच्या जगातील कोणतेच नियम स्वतःवर लादून घेत नाहीत (संदर्भ- जगण्याच्या तळाशी, प्रकरण पहिले). जीवनातील आवश्यकतेनुसार या मुंग्यांनी स्वतःला लवचिक बनवले आहे. त्या सतत मुक्तीच्या शोधात वाटेल तिकडे फिरत असतात. कधी क्रिकेट खेळतात, कधी देहूला जातात- कधी आळंदीला जातात. या सगळ्यांवर निवेदक मुंगी मनोविश्लेषणात्मक भाष्य करत असते. हे भाष्य अतिसामान्य अचेतन विषयावर चेतनेचे नियम लादून करीत असते. हे भाष्य चन्या-मन्या बोरे विकणाऱ्यावर... भंगार गोळा करणाऱ्यावर... बँड पथकावर असते. निवेदक मुंगीला पाण्यातील माशांवर, बेडकावर बोलायचे आहे आणि मनातील खदखद व्यक्त करायची आहे, कारण खदखद म्हणजे पहिला पाऊस....

या खदखदीतून कुणीही सुटत नाही. ही खदखद धर्मावर भाष्य करते. त्यातून जैन तत्त्वज्ञान, मुस्लिम तत्त्वज्ञान... ख्रिश्चन आणि बौद्ध तत्त्वज्ञानही सुटत नाही. हे सगळे विवेचन करताना प्रा.बाळासाहेब लबडे यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. अभ्यास करून माहितीचे प्रचंड स्रोत गोळा केले आहेत. विविध भाषांचा खुबीने वापर केला आहे. प्रत्येक उपशीर्षकामध्ये साहित्यातले वेगवेगळे फॉर्म वापरले आहेत. ऋचा, स्तोत्र, लोककथा, पोवाडा, भारूड, आख्यान यांचा वापर केला आहे. प्रस्तावनेत शंकर विभुते यांनी म्हटल्याप्रमाणे- मराठी साहित्यात एकाच लेखकाने एकाच कलाकृतीत वापरलेले इतके फॉर्म तुम्हाला अन्यत्र दिसणार नाहीत, म्हणून ही कादंबरी आजच्या युगाची उपज असली तरी साहित्याच्या सीमारेषा ओलांडून मौलिक विचार प्रकट करणारी आहे

बुद्धी आणि तर्कावर आधारित या कादंबरीतील मुंग्या कधी स्वैरपणे, तर कधी परकायाप्रवेश करून जीवन-दर्शनावर मनोविश्लेषणात्मक भाष्य करतात. प्रकरण सतरामध्ये ‘आमचा घंटानाद’ या प्रकरणात- त्या म्हणतात, ‘आम्ही चौघी बायकांचे चार डोळे झालो. मी कौशी झाले. मलाच टीव्ही म्हणायला लागले.’ या मुंग्या केवळ बुद्धीनुसार चालत नाहीत, तर कधी कधी काही शक्ती त्यांना चालवतात, असे दिसते.

फ्रॉईडची मुक्त संपर्कपद्धत पिपीलीका मुक्तीधाम या कादंबरीत विस्ताराने जाणवत राहते. या पद्धतीत मन:तत्त्व व्यक्तीला ज्याप्रमाणे प्रेरित केले जाते. आणि जो विचार किंवा त्याच्याशी संलग्नित शब्द किंवा स्मृतीचे जुने तुकडे अचानक त्याच्या मनातून बाहेर काढून ती व्यक्ती तो विचार व्यक्त करते, त्या पद्धतीने मुंग्यांच्या निवेदनातून कादंबरीतील प्रासंगिक तुकडे व्यक्त झाले आहेत. मनोविश्लेषणपद्धतीने जणू मुंगीच्या अव्यक्त अंतर्मनाला चावी दिली आहे. या माध्यमातून मुंगीचे मन:तत्त्व खूपशी माहिती सांगून जाते. या कादंबरीतील निवेदक मुंगी आपल्या स्मृतीच्या तुकड्यांतून नवे जग वाचकांच्या डोळ्यांपुढे उभे करते. तिच्या तोंडून कुठेही लेखक व्यक्त होत आहे, असे जाणवत नाही. हे या कादंबरीचे यश आहे.

कादंबरीतील निवेदक मुंगी आत्मपरीक्षणाचा आधार घेते, मग मनात दडलेली काही तथ्ये शोधून काढते व त्यांचे विश्लेषण करते. म्हणजे निरीक्षण... परीक्षण... विश्लेषण... आणि विवेचन- या चतु:सूत्रीतून निवेदन करीत पुढे सरकते. हे विवेचन कधी तिरकस, कधी उपहासात्मक, तर कधी निर्भीडपणे केलेले आहे.

निवेदक मुंगीचे हे मनोविश्लेषण म्हणजे एक दीर्घ बौद्धिक यात्रा आहे, असे वाटत राहते. वेगवेगळ्या अभिव्यक्तींच्या फॉर्ममधून आणि वेगवेगळ्या भाषांतून प्रवास करीत राहते. मनन आणि चिंतन यांचा एक गूढ तात्त्विक दस्तावेज घेऊन वैज्ञानिक अंगाने व्यक्त होण्याचा अवघड प्रयास करते.

या कादंबरीत निवेदक मुंगी एखाद्या घटनेसंदर्भात आपली पूरक किंवा विरोधी मते नोंदवताना दिसते. चेतन आणि अचेतन या दोन्ही अवस्थांत रमणारे तिचे मन अज्ञात, अस्ताव्यस्त आणि अगम्य प्रदेशात भरकटल्यागत दिसते. ते संघटित राहत नाही. ज्या प्रवृत्ती वास्तविक परिस्थितीला अनुरूप असतात, त्याने तिचे मन संतुष्ट होते. ज्या परिस्थितीने संतुष्टी होत नाही, ती परिस्थिती तिच्या मनात दाबली जाते. या दमित इच्छा-आकांक्षा अचेतन अवस्थेत सक्रिय होतात, त्यामुळे निवेदक मुंगीच्या निवेदनाचा स्तर सतत बदलत राहतो किंवा लेखकाने तो सतत बदलत ठेवला आहे. हासुद्धा लेखकाच्या प्रयोगाचा एक भाग आहे.

कादंबरीचे निवेदन ‘आम्ही’ या समूह निश्चेतणातून सुरू होते. चारही मुंग्या एक होऊन बोलू लागतात, त्यातून त्यांचे एक सामूहिक मन तयार झाले आहे आणि ते बोलू लागले आहे. मधेच हे निवेदन प्रथमपुरुषी होते, तर कधी ते तृतीयपुरुषी होते. कादंबरीतील सगळ्या उपशीर्षकांमध्ये असे निवेदनाचे प्रकार बदलत राहतात. त्यातून अर्थाचे एक वलय तयार होते. एका वयातून दुसरे वलय आणि एका अर्थातून दुसरा अर्थ तयार होतो. त्यातून समूहाचा एक व्यापक अर्थ संपूर्ण कादंबरीत जाणवत राहतो. हे अर्थ-परिवर्तन आणि स्वर-परिवर्तन इतके स्वभाविक आहे की, खूप वेळाने जाणीव होते की- निवेदक मुंगी आत्ता जो प्रसंग सांगत होती, तो प्रसंग गायब झाला आहे आणि दुसऱ्या अर्थाचा दुसरा प्रसंग सुरू झाला आहे. त्यामुळे एकाच प्रसंगातून अनेक अर्थ किंवा अनेक प्रसंगांतून एकच अर्थ निघत जातो. असे प्रयोग फक्त पाश्चिमात्य कादंबऱ्यांत पाहायला मिळतात. मराठी साहित्यात बहुधा ही पहिलीच कादंबरी अशी असावी की, ज्यामध्ये लेखकाने महत्प्रयासाने असा प्रयोग करून दाखविला आहे किंवा लेखकाच्या हाती असा प्रयोगक्षण अचानकपणे आलेला असावा- ज्याला प्रेरित क्षण म्हणतात- ज्यामुळे लेखक अशा प्रकारे कादंबरी लिहायला प्रवृत्त झाला आहे (खरं म्हणजे ज्याला आपण प्रेरित क्षण म्हणतो, ती लेखनप्रक्रिया नेहमी कठोर परिश्रमाने प्राप्त झालेली असते, जी या कादंबरीत जाणवत राहते).

निवेदक मुंगीच्या बदलत्या भाषिक फ्यूजनमुळे व फॉर्मपरिवर्तनामुळे कादंबरीच्या गतिपरिवर्तनात विशिष्ट प्रकारची रंजकता आणि वाचनीयता आली आहे. हे भाषिक फ्यूजन फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाच्या खूप जवळ जाते. समूहमनाच्या भाषिक नियमांचे उल्लंघन करून लेखकाने एक वेगळी भाषा तयार केली आहे. सामूहिक मनाच्या मानसिकतेची मोडतोड वाक्यांची, अर्थांची मोडतोड... करून प्रत्येक फॉर्ममध्ये निवेदक मुंगी साहित्यिक फॉर्मचीसुद्धा मोडतोड करीत जाते, तरीही कादंबरीवरील वाचकांची पकड सुटत नाही. कारण या कादंबरी-निवेदनात लालित्य आहे, उपहास आहे, विरोध आहे, विसंगती आहे. लेखकाने टिपलेले अनुभव आणि वापरलेली भाषा वाचकांना खिळवून ठेवते. त्यासाठी लेखकाने वेगवेगळ्या भाषांचा बारकाईने अभ्यास करून आपले अनुभव मांडलेले आहेत. हे या कादंबरीचे बलस्थान आहे.

स्वप्नतंत्रात आणि कलाकृतीच्या रचनातंत्रात साम्य आहे का- अशा फ्रॉईडच्या स्वप्नरंजन सूत्राच्या अंगाने कादंबरीचे मनोविश्लेषण तंत्र पाहिले, तर मनापासून पटू लागते की- पिपिलिका मुक्तिधाम ही कादंबरी लेखकाच्या कल्पनाविश्वाची निर्मिती आहे. स्वप्न म्हणजे साहित्यकृती नाही, तरीही कादंबरीचे मर्म समजावून घेण्यासाठी लेखकाचे जीवन समजावून घेतले पाहिजे. लेखकाचे बालपण आळंदीत गेले आहे, त्यांच्या मनावर बालपणीच्या घटनांचे परिणाम झाले आहेत, म्हणूनच जीवनातील घटना आणि साहित्यातील घटना यांचे एकसूत्री नाते संपूर्ण कादंबरीत जाणवत राहते. बालपणीची अप्रकट स्वप्ने जणू त्यांच्या रचनेत प्रकट स्वरूपात रूपांतरित झाली आहेत. ‘आमचा घंटानाद’ यासारखी संपूर्ण प्रकरणे आळंदी या क्षेत्राशी निगडित आहेत, म्हणूनच संपूर्ण कादंबरीवर फ्रॉईडच्या मनोविश्लेषण तंत्राचा प्रभाव जाणवत राहतो.

आगामी काळात ही मनोविश्लेषणात्मक कादंबरी मराठी साहित्यात नव्या मानदंडाने एक मैलाचा दगड ठरणार आहे, हे नक्की.

प्रा. साईनाथ पाचारणे, राजगुरुनगर, जि.पुणे

Share on Social Media

चर्चामंथन

समतल खेळपट्टीसाठी

जॉन लँचेस्टर

दावोसमध्ये दर वर्षी मोठे भांडवलदार व जागतिक अर्थव्यवस्थेचे चालक यांचे संमेलन भरते. या वर्षी त्या संमेलनात वाढत्या विषमतेवर काळजी व्यक्त केली गेली. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चा अहवाल नोंदवतो की, विषमतेचा प्रश्न धोकादायक आणि विषारी पातळी गाठून पुढे झेपावतो आहे. आज शांघाय ते सॅन फ्रॅन्सिस्को याचीच चर्चा आहे.

मोठ्या अर्थव्यवस्था चाचपडत का होईना, (2008 च्या) अर्थविषयक संकटाबाहेर पडत आहेत. त्यासाठीच्या उपाययोजनांचा खरा लाभ मात्र आधीच श्रीमंत असलेल्यांना मिळतो आहे. यूएसएमधील सर्वांत श्रीमंत 0.1 टक्का लोकांची संचित संपत्ती तळातल्या 90 टक्के लोकांच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. तेथे प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांची (1978) वेतने प्रातिनिधिक कामगारांच्या वेतनांच्या तीसपट असत, आज ते प्रमाण 312 पटींवर गेले आहे. आज यूएसए जगातील सर्वांत श्रीमंत व प्रबळ राष्ट्र आहे; तेथील आयुर्मान (expectancy of life at birth) घटते आहे, कारण गरीब लोक श्रीमंतांपेक्षा सुमारे पंधरा वर्षे कमी जगताहेत. यातून अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका येथील समाजामध्ये वैफल्याचा भाव जागतो आहे आणि तो समाज राष्ट्रवादी व जनवादी पक्षांना निवडून देत आहे. सन 2017 व 2018 च्या दावोस परिषदा (ज्या भांडवली अर्थरचनेचा ‘गड्डा’ असतात) ‘बाजारपेठी भांडवलवादात मूलभूत सुधारणांची गरज’ असल्याचे सांगत आहेत. हे सर्वथा अनपेक्षित आहे.

अशी स्थिती भांडवलवादाला नवी नाही. सामाजिक व लोकशाही दबावांप्रमाणे बदलणे, ही त्या वादाची पारंपरिक ताकद आहे. एकोणिसाव्या शतकात उजव्या पक्षांनी कामगार संघटना आणि सामाजिक विमा योजना स्वीकारल्या (जे बाजारपेठी मूल्यांशी फटकून होते); आज मात्र भांडवलवादी विचारवंत व राजकारणी मुक्त बाजारपेठेला सार्वभौम मानून ‘अर्थव्यवस्थांना नैतिक परिमाणही हवे’, हे नाकारताहेत. विषमता वाढल्याने भांडवलवादाचा नैतिक पायाच खचतो आहे. बहुतांश प्रजाजनांना जास्त सुखकर आयुष्य घालवण्याच्या संधी भांडवलवाद देतो. हाच त्या वादाचा नैतिक पाया असू शकतो. तशी खात्री जर नसेल, तर भांडवलवादाचे समर्थन कसे करता येईल? आज एक जनमतचाचणी (गॅलप पोल) सांगते की- 45 टक्के अमेरिकन तरुणांचे भांडवलवादाविषयी चांगले मत आहे. दोनच वर्षांपूर्वी हे प्रमाण 57 टक्के होते. ही परिस्थिती एकाच वेळी ‘जैसे थे’ही आहे आणि स्फोटकही. कोणतेच सत्ताधीश प्रश्न सोडवायला खरे बदलाचे प्रयत्न करत नाहीत, हे झाले जैसे थे. नागरिक मात्र काळजीत, अस्वस्थतेत, असुरक्षित अवस्थेत, म्हणजेच स्फोटक स्थितीत आहेत.

यातच समाजावर मोठा आघात करणारे कृत्रिम प्रज्ञा ऊर्फ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऊर्फ AI तंत्रज्ञान अनेक उत्पादनतंत्रे आणि सेवा पुरवण्याची तंत्रे मानवविरहित, स्वयंचलित करत आहेत. हे रोजगारावर- आजच्या समाजाच्या सर्वांत दुबळ्या अंगावर मोठाले परिणाम करेल. विषमता असुरक्षिततेच्या भावनेवर धडकेल. एकीकडे रोजी-रोटीला मुकलेले कोट्यवधी लोक, तर दुसरीकडे ‘मी जिंकलो’ म्हणणारे मूठभर- यामुळे समाजाला एकत्र, एकसंध ठेवणे अशक्य होईल.

काही क्षेत्रांत स्वयंचलित प्रणालींचे परिणाम आजच जाणवू लागले आहेत. या शतकाच्या पहिल्या दशकातच ऐंशी लाख अमेरिकन कारखान्यांतील कामगारांनी नोकऱ्या गमावल्या. यापेक्षा वेगळे अनेकानेक ‘रोजगार’ स्वयंचलित यंत्रे व त्यांची मदत घेणाऱ्या प्रणाली करू लागतील. अमेरिकेत आज अठरा लाख ट्रक-ड्रायव्हर्स आणि पस्तीस लाख कॅशियर्स आहेत. स्वयंचलनाला AI ची जोड मिळणे ‘युगप्रवर्तक’ परिणाम घडवेल.

‘आजच्या स्वयंचलित व्यवस्थांची सुधारित आवृत्ती’ असा AI चा विचार करून भागणार नाही. वाफेच्या इंजिनानंतर विजेवर जसे बरेच विविध उत्पादन करता येते तसेच AI हे ‘सामान्य तंत्रज्ञान’, जनरल-पर्पज तंत्रज्ञान आहे. ही तंत्रे मानवी व्यवहारांच्या सांदीकोपऱ्यांपर्यंत पोचून सामाजिक-आर्थिक रचनाच बदलून टाकतात. डेमिस इसाबिस सांगतो, ‘काहींना AI चे परिणाम औद्योगिक क्रांतीच्या दर्जाचे असतील असे वाटते, तर काहींना त्याहून वरच्या पातळीचे असतील असे वाटते.’ इसाबिस हा ‘डीप माइंड’ या गुगलच्या छत्राखालील कंपनीचा सहसंस्थापक आहे. ती कंपनी मशीन लर्निंग (AI!) वर आधारित ॲप्स घडवते, अत्युच्च दर्जाचे.

(आज 1. वाफेची इंजिने, 2. वीज, 3. साध्या स्वयंचलित प्रणाली व 4. AI - आधारित प्रणाली यांना औद्योगिक क्रांतीचे चार टप्पे मानतात. औद्योगिक क्रांती ऊर्फ इंडस्ट्रियल रेव्होल्युशनचे हे चार IR-1, IR-2, IR-3 आणि IR-4 या आद्याक्षरांनी ओळखले जातात.)

AI चे परिणाम समाजाने हाताळण्यात वा ‘झेलण्यात’ वेळ किंवा वेग ही कळीची बाब असते. जसे, इ.स.1900 मध्ये 38 टक्के अमेरिकन शेती करत, 25 टक्के उद्योगांमध्ये होते (आणि उरलेले 37.7 टक्के सेवाक्षेत्रात होते). आज 1.5 टक्का माणसे शेतीवर जगतात. 7.9 टक्के कारखान्यांत काम करतात (उरलेले 80.6 टक्के सेवाक्षेत्रात आहेत). पण हे बदल सुमारे सव्वाशे वर्षांत पाच पिढ्यांवर होत गेले. दर वेळी एका प्रकारच्या पेशातून ‘मोकळे’ झालेले लोक इतर पेशांत सामावले जायला वेळ मिळत असे. सन 1900 चे सेवाक्षेत्र 2.4 कोटींचे होते, जे आज 15 कोटींना रोजगार देते. आजच्या सेवाक्षेत्रातील बहुतेक पेशे गेल्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वातच नव्हते. आपला अनुभव सांगतो की, पुरेसा वेळ मिळाला तर आपण समाज म्हणून हे बदल पचवू शकतो. आपल्याकडे आज वेळ आहे का?

कोणत्या वयाची व्यक्ती किती वय ‘गाठेल’ याच्या शक्यता ठरवता येतात. आज ब्रिटनमध्ये जन्माला येणारी मुलगी शंभर वर्षांचे वय गाठेल, ही शक्यता आज ऐंशीव्या वर्षांत असलेल्या ‘ब्रिटनी’च्या शंभरीपेक्षा जास्त आहे. आता पूर्ण शतक जगणाऱ्या व्यक्तीचे कार्यरत आयुष्य किती असेल आणि ते एकाच एका पेशात असेल का, या प्रश्नांचा विचार करा. बहुधा एकच व्यक्ती दीर्घायुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे पेशे स्वीकारेल. हे स्वीकारल्याशिवाय आपल्याला सामोरे येणारे जग, त्यातले कामाचे स्वरूप समजणारच नाही.

व्यक्ती म्हणून आपल्याला नव्या जगासाठी कशी तयारी करावी लागेल, ते (काहीसे) स्पष्ट आहे. कामे बदलत राहतील आणि दर वेळी नवी कौशल्ये शिकावी लागतील. सगळे आयुष्यच असे नवनव्या शिक्षणाचे, तयारीचे, सरावाचे असेल. त्यासाठी शिकावे कसे, हे शिकावे लागेल. ते सोपे नसेल. त्यासाठी वृत्तींमध्ये लवचिकपणा, बदलांना सामोरे जायची तयारी लागेल; तेही सोपे नसेल. शिक्षण-प्रशिक्षण-पुनर्प्रशिक्षण करण्याची सोयही लागेल. तरी सुट्या व्यक्तींनी काय करायचे ते ठरवणे (तुलनेने) सोपे असेल. समाजाचे चित्र आकलणे सोपे नाही. ते अस्थिरतेचे चित्र असेल. सामाजिक आणि राजकीय इतिहास सांगतो की, माणसांना अस्थिरतेबद्दल घृणा, hate वाटते. हे एक तत्त्व आज आपण नव्याने शिकत आहोत.

व्यक्ती (रोजगार घेणारे), कॉर्पोरेट्‌स (रोजगार देणारे) आणि सरकार (नियंत्रण करणारे) यांच्या संबंधांचा नव्याने विचार करावा लागणार आहे. येल विश्वविद्यालयाचा समाजशास्त्री जेकब हॅकर याने ग्रेट रिस्क-शिफ्ट- महान साहसी-बदल असा एक शब्दप्रयोग घडवला, जो मी उसना घेतो. कलाकार (नट-नट्या, गायक-वादक) जसे एकेक काम संपवत नव्या ‘गिग’ची वाट बघतात, तसे आज अनेक व्यक्तींना करावे लागत आहे. आजवर हे मुख्यतः कॉर्पोरेट्‌सना करावे लागे, जे आज व्यक्तींनाही करावे लागत आहे.

त्याचबरोबर सकल राष्ट्रीय उत्पादन- जीडीपीत कॉर्पोरेट्‌सचा हिस्सा वाढतो आहे, तर कामगारांचा हिस्सा घटतो आहे. नफे वाढताहेत, तर वेतने घटताहेत. आणि हे ‘योगायोगा’ने होत नाही आहे. पण सर्वच व्यक्तींना साहसी-बदल झेपत नाहीत. त्यांना सामाजिक सुरक्षा कवचाची गरज पडेल. ते बेकारी-भत्ता या स्वरूपाचे नको, तर कामाला आधार देणारे हवे. कर्मचारी, कंपन्या आणि सरकार यांना मिळून एक नवे कल्याणकारी राज्य- वेल्फेअर स्टेट घडवावे लागेल. त्यात सतत शिक्षण घेण्याची गरज असेल याची दखल घ्यावी लागेल.

देशांतर्गत विषमतेला सामोरे जावे लागेल. त्यावर उपाय शोधण्यात सरकारची अर्थविषयक भूमिका केंद्रस्थानी असेल. सरकारला खांदे उडवून निष्क्रिय राहता येणार नाही, ही आजच्या जनवादी निवडणुकांमधून मतदारांनी दिलेली सूचना आहे. विषमता आमच्या नियंत्रणापलीकडे आहे, हे स्पष्टीकरण वा ही सबब सरकार देऊ शकणार नाही. बाजारपेठ विषमता आटोक्यात आणू शकत नाही. लोक, कॉर्पोरेट्‌स व सरकार यांना एकत्रपणे करांची रचना बदलूनच विषमता सौम्य करता येते.

AI क्रांतीच्या रचनाकारांमध्येही काहींना हे मान्य आहे. यॅन लेकुन हा डीप लर्निंग प्रणालींच्या आघाडीच्या शिलेदारांपैकी आहे. तो आज फेसबुकचा AI प्रमुख आहे. तंत्रज्ञानामुळे वाढणारी विषमता या विषयावर तो अनेक अर्थतज्ज्ञांशी बोलत असतो. चर्चांचा निष्कर्ष तो सांगतो. ‘सर्वांनाच सरकारने कर-आकारणीतून संपत्ती आणि उत्पन्नाचे (जास्त समन्यायी) वितरण करून हवे आहे.’ (मुक्त बाजारपेठी अर्थतज्ज्ञ हे नाकारतात.)

बाजारपेठ जास्त सक्रिय करायला हवी. यूएसएने एकाधिकारविरोधी अँटाय-ट्रस्ट व तसले कायदे कित्येक वर्षे वापरलेलेच नाहीत. केबल टीव्ही, विमानसेवा, ऑनलाईन जाहिरातींपासून शेतीपर्यंत अनेक क्षेत्रांत आज कॉर्पोरेटक्षेत्राचे, सत्तेचे विघातक एकत्रीकरण झाले आहे; ते यामुळेच. अर्थव्यवस्थेचे मोठाले भाग आज रॉबर बॅरन्सच्या (पुंड-धनिकांच्या) हातात गेले आहेत. कॉर्पोरेट नफे उफाळताहेत आणि वेतने गोठल्यासारखी झाली आहेत. कामगारांना भांडवली व्यवस्थेवर विश्वास ठेवायची कारणे उरलेलीच नाहीत.

हे असेच चालू राहिले, तर ‘विनर टेक्स ऑल’; म्हणजे एक पक्षच सारे ‘घेतो’, तर दुसरा कंठशोष करत राहतो- अशी स्थिती येईल. काही क्षेत्रे डेटासेन्सिटिव्ह, विदा-हळवी आहेत. त्यांमधले कळीचे शोध लावणाऱ्या AI कंपन्या ती क्षेत्रे बळकावतील. त्यांचे नफे आणि समभागांच्या किमती प्रचंड वाढतील. सोबतच त्यातून अनेकानेक रोजगारसंधी नष्ट होतील. स्वयंचलित कार्स, ड्रायव्हरलेस कार्स हे क्षेत्र अशा टप्प्यावर आहे. दोनेक वर्षांत तो प्रकार प्रत्यक्ष वापरात येईल.

आजच अशा ‘कलां’मुळे- ट्रेंड्‌समळे काही कंपन्या काही दशके अकल्पनीय श्रीमंत झाल्या आहेत; त्यांचे काय करायचे? हिशेबनिशी युक्त्या-प्रयुक्त्या वापरून, आपल्या देशांबाहेर (ऑफ-शोअर) आपल्या कंपन्यांची नोंदणी करून या कंपन्या नफ्यांवरचे करभार चुकवताहेत. ज्या समाजांमध्ये राहून या कंपन्या हे करताहेत, त्यांना त्या कर देत नाहीत; उलट त्या समाजापासून सत्य लपवताहेत. त्या भविष्याची गोड-गुलाबी स्वप्ने दाखवणारे थिंक-टँक्स उभारताहेत. ते सोडून सध्याच्या आपल्या परिसरातील आयुष्यांचा विचार या कंपन्यांनी करायला हवा.

नागरिकांना आयुष्यभर गरज पडेल ते शिक्षण देणे, जास्तीत जास्त न्याय्य होत जाणारी करव्यवस्था घडवणे, कॉर्पोरेट्‌सना आज दिले जाणारे संरक्षण जरा हलके करणे; हे सारे सरकारने करायला हवे. त्यासाठी सरकार-जनता-कंपन्या अशी भागीदारी रचावी लागेल. या अपेक्षांमधले- आशांमधले सर्वांत भोळसट, सर्वांत अकल्पनीय वाटणारे अंग म्हणजे (तिन्ही भागीदारांपैकी) अभिजनांची नवी मूल्ये स्वीकारण्याचे.

अभिजनांना नव्या रचनेत जबरदस्तीने सामील केले जायला नको असेल, तर त्यांनी स्वतःला बदलायला हवे. AI तंत्रज्ञानाची लाट सामावून घेणे, हे आजच्या भांडवलवादापुढचे सर्वांत मोठे आव्हान आहे.

काहींना नव्या वातावरणाशी जुळते घेण्याची, नवी कौशल्ये आत्मसात करण्याची संधीच मिळणार नाही. त्यांच्यापाशी नव्या जगाला उपयुक्त अशी कौशल्ये नसतील, सुरक्षितताही नसेल. ते निरुपयोगी- ‘यूजलेस’ असतील. सगळे जग AI च्या निर्मम, निष्ठुर नियंत्रणात जाईल आणि आजच्या जनवादी चळवळी सौम्य वाटाव्यात, अशा कृती तंत्रप्रगत विकसित देश करतील.

जॉन लँचेस्टर

‘टाइम’ मॅगझिनच्या 4-14 फेब्रुवारी 2019 च्या अंकातील ‘लेव्हलिंग द प्लेइंग फील्ड’ या लेखाचे हे भाषांतर. लेखक जॉन लँचेस्टर विचारवंत व साहित्यिक आहे. भांडवलवादात नीतिमूल्ये असायलाच हवीत हे वारंवार ठसवणे, हा लँचेस्टरचा लक्षणगुण आहे. तितपत ‘डावेपणा’ सोडला, तर तो पारंपरिक ब्रिटिश उदारमतवादी आहे!

नंदा खरे, नागपूर

nandakhare46@gmail.com

Share on Social Media

प्रतिसाद

दोन मानसिकता : पुराणमतवादी आणि पुरुषसत्ताक

‘महायज्ञ आणि शपथग्रहण’ हे संपादकीय (दि. 14 मार्च) वाचले. संपादकीयात दोन घटनांचा उल्लेख आहे. या दोन्ही घटना पुरोगामी विचारांचा म्हणवणाऱ्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाण्या आहेत, तरीदेखील यांची पुरेशी दखल ना माध्यमांतून घेतली गेली ना समाजघटकांकडून. साधना ने ती घेणे साधनाच्या सामाजिक उत्तरदायित्वा आणि वैचारिक घुसळणीनिरूपच म्हणावे लागेल. पहिली घटना म्हणजे, विद्यार्थी धार्मिक व्हायला हवेत, पर्यावरणाचे संतुलन आणि वातावरणाचे शुद्धीकरण घडून विद्यार्थ्यांभोवती सुरक्षा कवच तयार होईल या हेतूने ‘द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी’ अशी ओळख सांगणाऱ्या पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात विद्यार्थ्यांवर धर्मसंस्कार व्हावेत म्हणून दहा दिवसांचा ‘अती रूद्र महायज्ञ’ आयोजित करण्यात आला. दुसरी घटना, अमरावतीतील विद्यार्थींनींकडून ‘प्रेमविवाह न करण्याची शपथग्रहण’ करून घेणे.

व्यक्तींची शैक्षणिक- सांपत्तिक स्थिती जस जशी सुधारत जाते तस तसे त्यांच्या वैचारिक अधिष्ठानाला ग्रहण लागत जाते की काय? असा प्रश्न उपस्थित होण्याइतपत स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या समाज घटकाचे वर्तन असते याची प्रचिती या ‘महायज्ञ’ घटनेच्या निमित्ताने आली आहे. आधीच धार्मिक संस्कार, प्रथा, परंपरा आणि अस्मितांच्या संमोहनाखाली राहून एका पिढीने आपले न भरून येणारे नुकसान करून घेतले असताना नवपिढीला याच खाईत लोटले जाणे खेदजनक आहे. यातही विद्येचे माहेरघर अशी शेखी मिरवणाऱ्या पुणे शहरात असा प्रकार घडत असेल तर ‘पुणे तिथे शहाणपण उणे’ असे म्हणायची वेळ आली आहे.

विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ घेण्यास लावणे या घटनेतून तर वैचारिक दिवाळखोरीचे जाहीर प्रदर्शनच घडले आहे. हिंगणघाट येथील एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून उच्चविद्याविभूषित महिलेला पेट्रोल टाकून पेटवून दिले, ही या शपथग्रहण घटनेमागील पार्श्वभूमीवर आहे आणि ते समस्येचे सुलभीकरण करणेदेखील आहे. कोणत्याही देशातील प्रश्नांच्या समस्येचे मूळ हे तेथील संस्कृतीत शोधावे लागेल. म्हणूनच महिलांवरील अत्याचार असोत किंवा हत्येच्या समाजाकडून मर्यादा महिलांवरच लादल्या जात आहेत. मग कधी मुलींनी स्कर्ट, जीन घालू नये असे म्हणत तथाकथित संस्कृती रक्षकांकडून ‘सातच्या आत घरात’चा आग धरला जात आहे. घटनाकार डॉ.आंबेडकर यांनी समाजात जाती-धर्म नष्ट करायच्या असतील तर आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहाचा आग्रह धरला होता आणि आपल्या आयुष्यात आचरणातही आणला होता. आंतरजातीय तसेच आंतरधर्मीय विवाह हे बहुतांश प्रेमविवाहच असतात. त्यामुळे प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणे म्हणजे जाती-धर्म निर्मूलनाच्या कामात खोडा घालण्यासारखे आहे. सदर पत्रलेखकाने आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे, अशा अनेक जोडप्यांवर हे अन्यायकारक व त्यांची अवहेलना करणारे आहे असे वाटते. सरतेशेवटी प्रेम करणे अथवा न करणे ही काय ठरवून करण्यासारखी गोष्ट आहे का? उत्कट, तारुण्यसुलभ भावनांना बंदिस्त करू पाहणारे असे या भूमंडळी कोण आहे?

‘बेटी नहीं तो माँ नही, माँ नहीं तो बेटा नहीं’ हा अपर्णा दीक्षित याचा लेख वाचला. (29 फेब्रु. 1920) सहायक आयुक्त कार्यालय, औंध, पुणे यांच्या वतीने रस्त्याकडेच्या भिंतींवर रंगवलेला ‘बेटी नहीं तो माँ नही, माँ नहीं तो बेटा नहीं’ हा संदेश कळत न कळत समाजातील पुरुषी मानसिकताच दर्शवितो. आपण स्वतःला कितीही सुसंस्कृत व आधुनिक समजत असलो तरी आपला महिलांकडे बघण्याचा एकूणच सामाजिक, कौटुंबिक, राजकीय आणि वैयक्तिक या चारही परिघात बघण्याचा दृष्टीकोन ‘स्त्री म्हणजे अपत्य जन्मास घालायचा कारखाना’ असाच संकुचित असल्याचे अधोरेखित करत आहे. आपल्या तथाकथित उदात्त संस्कृतीने स्त्रीला ‘अनंत काळाची माता’ बनवून चूल आणि मूल या जोखडात अडखवून ठेवले आहेच. विवाहसंस्था निर्माण करून सगळ्या जबाबदाऱ्या स्त्रीवर ढकलून देत आपल्या रागलोभ, विषय वासना तृप्ती आणि वंशवाढीसाठीच स्त्रीचा जन्म झाला आहे, असा समज समाजाने करून घेतला आहे. पुरुषसत्ताक मानसिकतेतून पुरुषांनी स्त्रीला दुय्यम ठरवण्यात आपली नको तेवढी शक्ती खर्ची केली आहे.

बाळकृष्ण शिंदे, पुणे

Share on Social Media