Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

खताळदादांना अभिवादन

बी. जे. खताळ पाटील यांचे १६ सप्टेंबरला निधन झाले. मागील २६ मार्चला त्यांनी वयाची १०० वर्षे पूर्ण केली होती आणि महिनाभरापूर्वीपर्यंत ते तंदुरुस्त होते, मनाने आणि शरीरानेही.

वयाच्या पंचविशीत असताना त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ झाला, आणि वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. दरम्यानच्या चार दशकांत जवळपास पाव शतक ते महाराष्ट्र विधानसभेवर संगमनेर मतदारसंघातून निवडून गेले आणि त्यातील दोन दशके राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. अशा या राजकारणी माणसाने अखेरची तब्बल पस्तीस वर्षे पूर्णतः तंदुरुस्त असूनही, सक्रिय राजकारणापासून दूर राहणे पसंत केले हे मोठेच आश्चर्य म्हणावे लागेल.

साधनाशी त्यांचा संबंध मागील अडीच वर्षांपूर्वी आला. आप्पासाहेब सा. रे. पाटील स्मृतिनिमित्त जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाला, तेव्हा त्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्याचा योग आला. त्यानंतर साधना साप्ताहिक व प्रकाशनाची पुस्तके यांचे ते नियमित वाचक झाले. साधना कार्यालयात त्यांच्याशी संवादाचे दोन अनौपचारिक कार्यक्रमही दरम्यान घडवून आणता आले. एकदा विविध क्षेत्रांतील मान्यवरांसाठी आणि दुसऱ्यांदा पत्रकारांसाठी. दोन्ही वेळा ते दिलखुलास बोलले, त्यांची निरीक्षणे मार्मिक होती. अनुभवांची खोली व व्याप्ती अफाट असल्याचा प्रत्यय श्रोत्यांना आला. स्मरणशक्ती तल्लख असली आणि तरी गतकाळातील आठवणी सांगताना त्यांचे स्वत:वरील नियंत्रण सुटत नव्हते. वर्तमानाचे त्यांना केवळ चांगले भानच होते असे नाही, तर प्रचलित राजकीय-सामाजिक घडामोडींविषयी ते कमालीचे जागरूक होते.

एप्रिल २०१८ च्या त्या मुलाखतीत आणि एप्रिल २०१९ मध्ये त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली त्या निमित्ताने लिहिलेल्या संपादकीय लेखातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व कार्याची बऱ्यापैकी ओळख साधनाच्या वाचकांना झालेली आहे. त्यामुळे ती पुनरावृत्ती करण्याची येथे गरज नाही. तत्त्वनिष्ठ राजकारणी हे संबोधन गांभीर्याने वापरायचे ठरवले तर त्यात खताळ-पाटील यांचा समावेश करावाच लागेल, एवढे लक्षात घेतले म्हणजे पुरे. त्यांनी वयाच्या नव्वदीनंतर लेखन करायला सुरुवात केली आणि मग पाच-सात पुस्तके त्यांची लिहून झाली. त्या पुस्तकांतून त्यांच्या विचारांची दिशा ठळकपणे सूचित होत राहते, व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात नितीमूल्यांचे महत्त्व कमालीचे मानणारा हा माणूस होता, हे त्यातून पुन:पुन्हा अधोरेखित होते.

वयाच्या शंभरीत असताना त्यांनी लिहिलेल्या लेखांचे पुस्तक ‘माझे शिक्षक’ या नावाने आले तर गेल्याच महिन्यात त्यांनी लिहिलेल्या आठ छोट्या लेखांचे पुस्तक ‘वाळ्याची शाळा’ या नावाने आले, संतोष खेडलेकर यांनी ते प्रकाशित केले. पहिल्या पुस्तकात त्यांनी स्वतः अनौपचारिक शिक्षणाचे धडे ज्यांच्याकडून घेतले, अशा लहानथोर व्यक्तींविषयी लिहिले आहे.

दुसऱ्या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आजच्या समाजाच्या स्थितीगतीवर मार्मिक व संयत भाष्य करणारी आहे. या पुस्तकातून माणूस आणि प्राणी यांच्यातील साम्य दाखवत खताळदादा वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतात आणि त्यांच्या उत्तराची दिशा सूचित करतात. ती दिशा सर्वसाधारणतः अशी आहे, की बदल हा निसर्गनियम आहे. त्यामुळे इष्ट-अनिष्ट प्रक्रिया घडत राहणार, याचे भान ठेवून कार्यरत राहायला हवे. जय मिळत आहेत म्हणून कोणी उत्तेजित होऊ नये आणि पराजय वाट्याला येत आहेत म्हणून कोणी नाउमेद होऊ नये; काळ अफाट आहे, अनंत आहे. एका पूर्ण शतकाचा हा माणूस साक्षीदार होता, हे लक्षात घेतले तर वरील साध्याच सत्याचे गांभीर्य पुन्हा अधोरेखित होईल. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

Share on Social Media

जवाहरलाल नेहरू | २७

नेहरू : चीनपर्व (उत्तरार्ध)

सुरेश द्वादशीवार

दि. ८ सप्टेंबरला जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा ते ब्रिटिश कॉमनवेल्थच्या बैठकीला हजर होते. दरम्यान, चीनने हा हल्ला भारतानेच केला असल्याचा प्रचार सुरू केला. त्याला उत्तर देताना नेहरू म्हणाले, ‘‘तसे असते तर मी युद्धकाळात भारताबाहेर कसा राहिला असतो?’’ नेहरू ऑक्टोबरच्या आरंभी भारतात आले आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी सैन्याला ‘या स्थितीत तुम्हाला योग्य वाटेल ती कारवाई करा’ असा सरळ आदेश दिला. मात्र तोवर युद्ध पुढे गेले होते. कौल यांचे खोटेपण आणि मेनन यांची उद्दाम वागणूक त्यांच्या लक्षात आली होती. आपल्याला या कारवाईच्या गांभीर्याबद्दल साऱ्यांनी अंधारात ठेवले, हे त्यांच्या लक्षात आले होते. पण वेळ निघून गेली होती आणि देशाची लष्करी संदर्भातली स्थिती नेहरूंनाही कळत होती... देश युद्ध हरला होता आणि त्याच्या समाप्तीचा औपचारिकपणाच तेवढा शिल्लक होता.

चीनने २३ जानेवारी १९५९ रोजी भारताशी आपला सीमावाद असल्याचे प्रथमच जाहीर केले. चौ एन लाय यांचे त्याबाबतचे म्हणणे ‘भारत आणि चीन यांच्यातील सीमा आजवर कधी निश्चितच केली गेली नाही. आमच्या सरकारात त्याबाबत ऐतिहासिक म्हणावा असा कोणताही सीमाकरार नाही,’ असे होते. त्यातून त्यांनी १९१३ पासूनच्या सगळ्या घडामोडी, मॅकमहोन रेषेची आखणी, त्याविषयी तिबेट आणि ब्रिटिश सरकार यांच्या प्रतिनिधींनी केलेले करार व त्यावरचे शिक्कामोर्तब असे सारेच रद्द ठरविले. परिणामी, चीनविषयी नेहरूंनी बाळगलेला सारा विश्वासच कोलमडून पडला. चौ ने लिहिले, ‘मॅकमहोन रेषा ही ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी तिबेटचा प्रदेश ताब्यात घेण्यासाठी आखली. तिबेट व चीनमधील जनतेत तिच्याविषयी तेव्हाही रोष होता. आम्हाला ती कधी मान्य होणारीही नव्हती. आम्ही आजपर्यंत हा वाद उकरून काढला नाही, कारण आतापर्यंतचा काळ त्यासाठी पुरेसा पक्व नव्हता.’

आता चीनने त्याच्या आक्रमक भूमिका स्पष्ट केल्या होत्या. मॅकमहोन रेषेचा त्याने आजवर केलेला उच्चार हा केवळ वेळकाढूपणाचा, प्रत्यक्ष लढ्याच्या तयारीचा आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांत आपले वजन वाढविण्यासाठी होता, हेही नेहरूंसह तेव्हा साऱ्यांच्या लक्षात आले. ‘यापुढे दोन देशांत समझोता झालाच तर तो आमच्या अटींवर होईल’ असेही चौ यांनी एका पत्रातून नेहरूंना बजावले. त्याला दिलेल्या उत्तरात नेहरू म्हणतात, ‘मॅकमहोन रेषेचा जो भाग चीनला मान्य नाही, त्याविषयीच्या वाटाघाटी करता येतील. पण जो भाग वादातीत आहे, त्याविषयीची चर्चा नको.’ त्याच पत्रात नेहरू पुढे म्हणतात, ‘या चर्चेची सुरुवात होण्याआधी भारताच्या ज्या प्रदेशात चीनचे सैन्य आले आहे व त्याने बांधकाम चालविले आहे, ते तत्काळ थांबविले जावे आणि चीनने आपले सैन्य त्यातून मागे घ्यावे. अक्साई चीन हा भारताचा प्रदेश आहे. त्यातले तुमचे बांधकाम आम्ही मान्य करणार नाही. शिवाय त्यावरचा आमचा सार्वभौम अधिकारही आम्ही सोडणार नाही.’

त्यानंतर सहा महिन्यांनी तिबेटमध्ये घडलेल्या घटनांनी हे सारे चित्रच पालटले. दलाई लामांनी १९५९ मध्ये तिबेटच्या स्वातंत्र्याची एकतर्फी घोषणा केली व ल्हासा या राजधानीत बंड उभे केले. चीनने ते अतिशय क्रूरपणे मोडून काढले. त्या स्थितीत दलाई लामांना तिबेटमधून पलायन करण्याखेरीज मार्ग उरला नाही. आपल्या हजारो अनुयायांसोबत त्यांनी तवांगच्या बाजूने मॅकमहोन रेषा ओलांडून भारतात प्रवेश केला. भारताने त्यांना आश्रय देऊ नये, असा चीनचा आग्रह असतानाही नेहरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या वेळी भारतीय जनमतही दलाई लामांच्या बाजूने वळले होते. नेहरूंनी दलाई लामांना धर्मशाळा या हिमाचल प्रदेशातील प्रमुख शहराच्या मॅक्‌लिओड गंज या भागात जागा दिली. तिथे दलाई लामांनी त्यांचे अस्थायी सरकार स्थापन केले. या घटनेने पुढच्या वाटाघाटींचा मार्गच बंद केला. दलाई लामांच्या तेव्हाच्या घोषणेनुसार त्यांनी १९१३-१४ चा स्वातंत्र्यकाळ पुन्हा मिळविला होता व आपले अस्थायी सरकार हेच यापुढे तिबेटचे सरकार म्हणून मान्य केले जावे, असा आग्रहही त्यांनी त्या वेळी धरला होता. जगाने तो अर्थातच मान्य केला नाही. नेहरूंनी लामांना आश्रय दिला, पण त्यांच्या या सरकारला मान्यता दिली नाही. त्याच वेळी त्यांनी चीनचा निषेधही केला नाही. त्यांना ती त्या दोघातील संतुलनाची कारवाई वाटली. मात्र त्यापैकी कोणत्याही बाजूने त्यांचे आभार कधी मानले नाहीत.

चीनने भारताचे लोंगजू येथील लष्करी ठाणे २५ ऑगस्टला ताब्यात घेतले. भारताने ते आक्रमण असल्याचे घोषित केले. या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैनिकांत प्रथमच गोळबार झाला. लेहच्या विभागात गस्त घालणाऱ्या भारताच्या ७० जवानांच्या पथकावर २० ऑक्टोबरला चिनी सैनिकांनी गोळीबार करून त्यातील ९ जणांचा बळी घेतला. शिवाय १० जणांना त्यांनी ताब्यातही घेतले. या घटनांनी भारतीय जनतेतील चीनविषयीचा अविश्वास वाढला आणि दोन देशांतील मैत्र संपल्याचे नेहरूंनाही कळून चुकले. याच सुमारास भारतात आलेले अमेरिकेचे अध्यक्ष आयसेन हॉवर यांनी नेहरूंच्या स्वतंत्र परराष्ट्रीय धोरणाचे संसदेत तोंड भरून कौतुक केले व नेहरू सरकारला दिलासाही दिला. (या आधी त्यांचे परराष्ट्रमंत्री जॉन फास्टर डलेस हे भारताच्या स्वतंत्र धोरणावर ते अनैतिक असल्याची टीका करीत होते, हे येथे लक्षात घ्यायचे.) मात्र चीनची कुरापत याही काळात वाढतच गेली. तरीही चीन आपल्यावर खरेखुरे आक्रमण करील, असे नेहरूंना अखेरपर्यंत वाटले नाही. सबब लष्कराची तशी तयारीही त्यांच्या सरकारने केली नाही.

एक उघड पण सामान्यपणे न बोलली जाणारी बाब येथे स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. भारताच्या तुलनेत चीनचे लष्कर दहा पटींनी मोठे व त्याचे लढण्याचे सामर्थ्यही कित्येक पटींनी मोठे होते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्याच्या लष्करात दोन लाख ऐंशी हजार सैनिक होते, तर त्याच वेळी चीनच्या लाल सेनेत पस्तीस लाखांहून अधिक सैनिक होते. ते क्रांती जिंकलेले व युद्धसज्ज होते. भारतीय सैनिकांची युद्धाची सवय सुटली होती. शिवाय भारताच्या शस्त्रागारात तेव्हा पुरेशी शस्त्रेही नव्हती. याखेरीज युद्धाची भूमी चीनला सोईची, उंचीवरची तर भारताला गैरसोईची, पर्वत चढून जाण्याची होती. नेहरूंवर टीका करणाऱ्या अनेक विरोधी नेत्यांना नेहरूंनी ही स्थिती स्पष्ट करून सांगताना म्हटले, ‘‘चीनशी समोरासमोरचे युद्ध करणे म्हणजे आत्महत्येला आमंत्रण देणे आहे. आपल्या मुलांना बळी देणारा तो प्रकार ठरणार आहे.’’

नेहरू युद्ध टाळत होते, ते लांबवत होते आणि शक्य त्या तडजोडी करीत व प्रसंगी अपमान गिळत शांत राहिले, याचे कारण या वास्तवात शोधावे लागते. ते शांतिप्रिय असले तरी शरणागत नव्हते. मात्र वास्तवाची जाण त्यांना त्यांच्यावर असलेली देशाच्या पालकत्वाची जबाबदारी विसरू देत नव्हती.

चीनचे सामर्थ्य मोठे आणि त्याच्या लष्कराची क्षमता त्याच्या आक्रमकतेएवढीच टोकदार असताना भारताने त्याचे लष्करी बळ वाढविण्यासाठी या सबंध काळात फारसे काही केले नाही. आपण कितीही नेटाने आपले बळ वाढविले, तरी चीनच्या सामर्थ्याची बरोबरी आपण करू शकणार नाही, याची जाणीव हे याचे एक कारण; तर १९४७ मध्ये पाकिस्तानने काश्मीरमध्ये केलेल्या आक्रमणानंतर भारताचे सारे लक्षच पाकिस्तानशी असलेल्या शत्रुत्वावर केंद्रित राहिले, हे दुसरे. दरम्यान, पाकिस्तानने १९५० च्या मध्याला अमेरिकेशी लष्करी करार करून त्याचे बलाढ्य संरक्षक कवच मिळविले. भारताचा सारा भार मैत्री, शांतता व संयुक्त राष्ट्रसंघातील मैत्र यांच्या वाढीवर राहिला. त्याच वेळी १९५० मध्ये पाकिस्तान भारतावर पुन्हा एकवार हल्ला चढवील, अशी भीतीही लष्करी वर्तुळात वतर्विली जात होती. दुसरीकडे कोणत्याही शक्तिगटात सामील न होण्याच्या धोरणामुळे या परिसरात भारतावर एकाकी राहण्याची वेळ होती.

त्यातून देशाच्या संरक्षणमंत्रिपदावर आलेले सरदार बलदेवसिंग, एम.एच. पटेल, के.एम. काटजू आणि कृष्ण मेनन यांचे लष्करी वास्तवाविषयीचे अज्ञान मोठे होते. शिवाय त्यांच्यातील काहींचे लष्करप्रमुख जनरल करिअप्पा यांच्याशी मतभेदही होते. मेनन यांचा भर स्वत:ची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मोठी करण्यावर व राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध करण्यावर अधिक राहिला. या संबंध काळात गोपालस्वामी अय्यंगार हे एकच चांगले संरक्षणमत्री देशाला लाभले. मात्र त्यांना राजकारणाएवढेच सरकारातही फारसे वजन कधी लाभले नाही. मेनन यांना त्यांचा डावा विचार, त्या बळावर स्वत:ची प्रतिमा बनविण्याची प्रबळ इच्छा आणि सरकारात आपले वजन वाढविण्याची आकांक्षा यांनी एवढे पछाडले की, त्यांनी स्वत:च्या खात्याकडेही फारसे लक्ष कधी दिले नाही. चीन भारतावर हल्ला करील त्यांना असेही त्यांच्या मनाला असलेल्या डाव्या कलामुळे, कधी वाटले नाही. त्यामुळेच १९५९ मध्ये चिनी सैन्य लडाखमध्ये घुसले तेव्हा आपण आपल्या परदेश दौऱ्यावरून परत यावे, असेही मेनन यांना वाटले नाही. दुर्दैवाने या मेननविषयी नेहरूंनाच अखेरपर्यंत विश्वास वाटत आला. शेवटी मात्र त्यांना सरकारातून घालविण्याखेरीज त्यांच्याजवळ दुसरा पर्याय उरला नाही.

भारतीय सेना व तिची शस्त्रे यांची उभारणी १९५६ पर्यंत पाकिस्तानच्या सीमेवरच होत राहिली. पायदलाच्या सहापैकी तीन बटालियन्स काश्मिरात राहिल्या. त्यातही लेहमधील चीनच्या कुरबुरीकडे लक्ष पुरविण्याऐवजी सेनाधिकाऱ्यांचे लक्ष पाकिस्तानकडेच अधिक राहिले. एक आरमारी दस्ता अरबी समुद्रात तैनात होता. सैन्याचा एक भाग पूर्व सीमेवर, तर दुसरा नेफामध्ये राखला होता. चीनशी समोरासमोरचा सामना ही बाब अशक्यच नव्हे तर असाध्य वाटावी, असेच संरक्षण खाते व त्याचे मंत्री वागत होते आणि नेहरूंनाही चीनच्या वैराला युद्धाचे स्वरूप कधी येईल असे वाटले नव्हते. चीनशी आपण समोरासमोरची लढत देऊ शकत नाही, याची जाणीवही त्यांना सदैव होती. त्यामुळे चीनच्या आक्रमक व्यवहाराकडे शक्य तेवढे दुर्लक्ष करण्याखेरीज त्यांच्या समोरही दुसरा पर्याय नव्हता. लष्कर दुबळे आणि जगातला कोणताही सामर्थ्यशाली देश आपल्यासाठी चीनशी वैर घेण्याच्या अवस्थेत नसल्याची त्यांना पुरती जाणीवही होती. नेहरूंच्या भांबावलेल्या, द्विधा दिसणाऱ्या मानसिकतेवर टीका करणारी माणसे त्यांचा हा नाइलाज बहुधा लक्षात घेत नाहीत.

जनरल थिमय्या यांनी चीनच्या आक्रमकतेकडे लक्ष वेधणारे एक विस्तृत पत्र नेहरूंना या काळात लिहिले. पण मेनन यांनी थिमय्या यांनाच अमेरिकाधार्जिणे ठरवून त्यांच्यावर टीका केली. त्यावर थिमय्यांनी राजीनामा दिला आणि त्या राजीनाम्यात ‘मेनन हे कम्युनिस्टधार्जिणे आहेत’ अशी नोंद केली. या वेळी नेहरूंनी ‘थिमय्या यांच्या ज्ञानाचा भारत वापर करील’ असे म्हणून त्यांचे पत्रवजा टिपण अय्यंगारांकडे दिले. मात्र पुढे ते तसेच दुलर्क्षित राहिले. मेनन यांनी मग जनरल कौल यांच्या हाती लष्कराची सूत्रे सोपविण्याचा प्रयत्न केला व त्यात ते यशस्वीही झाले. या कौल यांच्या नेतृत्वातच भारत चीनशी लढताना पराभूत झाला, हे वास्तव आहे. मात्र या साऱ्याला सरकारातील सगळीच संबंधित माणसे जबाबदारही आहेत आणि त्यातून नाइलाजाचा फायदा दिला तरी नेहरूंची पूर्णपणे सुटका होणारी नाही.

या काळात चीनने त्याचा भारतविरोधी प्रचार टोकावर नेला. दि.११ जानेवारी १९६१ ला पाश्चात्त्य वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत चौ एन लाय म्हणाले, ‘‘भारत त्याचे सैन्य उत्तर सीमेवर जमवीत आहे आणि तिबेटला पुन्हा लष्करी प्रयत्नांनी ताब्यात घेण्याचा त्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.’’ जानेवारी ६१ मध्येच भारताच्या लष्करप्रमुखांनी सरकारला कळविले की, ‘सध्याच्या स्थितीत एका स्थानिक लढतीखेरीज आपण चीनला तोंड देऊ शकणार नाही.’ (भारताला चीन व पाकिस्तान यांच्याशी एकाच वेळी निकराचे युद्ध करावे लागल्यास भारताजवळची शस्त्रसामग्री अवघे दहा दिवस पुरेल एवढी आहे, अशी साक्ष भारतीय लष्कराच्या दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकाऱ्याने २०१८ मध्ये संसदेच्या समितीसमोर दिली, ही गोष्ट येथे लक्षात घेतली पाहिजे. निकराचे युद्ध याचा अर्थ ज्यात तीन दिवसांची युद्धसामग्री एकाच दिवशी खर्ची पडते, असे युद्ध. चीनशी लढत झाल्यास तीही आपण फार काळ चालवू शकणार नाही, ही गोष्ट याच अधिकाऱ्याने या साक्षीत सांगितली. जी गोष्ट २०१८ मध्ये भारताला जमणारी नव्हती, ती १९६२ मध्ये त्याला यशस्वी करता आली असती असे समजण्यातला भाबडेपणा अशा वेळी लक्षात घेतला पाहिजे.)

नेहरूंसमोरील प्रश्नात याच काळात नेपाळमधील राजकीय संघर्षाची भर पडली. एका शतकाहून अधिक काळ नेपाळ ‘सत्ताहीन’ राजपुरुषाच्या अधीन होता. जंग बहादूर राणा या त्याच्या सेनापतीने १८४८ मध्ये सारी सत्ता स्वत:कडे घेऊन राजाला नाममात्र बनविले होते. राजानेही राणाला देशाचे पंतप्रधानपद तहहयात व पुढे वंशपरंपरेने देऊ केले होते. त्यामुळे नेपाळचा प्रदेश राजाच्या नावावर, पण प्रत्यक्षात राणा कुटुंबाच्या ताब्यात होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून प्रेरणा घेतलेल्या नेपाळी तरुणांनी नेपाळ काँग्रेसची स्थापना करून त्या देशात लोकशाही व्यवस्थेसाठी चळवळ सुरू केली. त्या चळवळीला भारताने ब्रह्मदेशामार्फत शस्त्रबळ पुरविले. हजारो बंदुका बिहारमधूनही या तरुणांच्या हाती दिल्या.

नंतरच्या उठावात मात्र नेपाळचे राजे त्यांच्या राण्या व राजपुत्रांसह काठमांडूतील भारतीय वकिलातीच्या आश्रयाला गेले. तिथून त्यांना दिल्लीला आणायला भारताने विशेष विमान पाठविले. नंतरच्या काळात नेहरूंसोबत झालेल्या वाटाघातीत राजा, त्याचे कुटुंब, नेपाळ काँग्रेसचे प्रमुख बी. पी. कोईराला व राजपद यांच्यात एक समझोता होऊन त्या देशात पुन्हा राजपद रीतसर स्थापन झाले. या वेळी तेथील सत्ता राजा आणि नेपाळ काँग्रेसकडे दिली गेली. पुढे मात्र १५ डिसेंबर १९६० ला नेपाळच्या राजाने चीनशी सरळ संबंध जोडून देशाची सगळी सत्ताच आपल्या ताब्यात घेतली. संसद बरखास्त करून मंत्रिमंडळाला तुरुंगात टाकले. या घटनेने नेपाळ भारताकडून चीनच्या बाजूला गेलेला जगाला दिसला. प्रत्यक्षात नेपाळच्या राजसत्तेने भारताचा केलेला तो विश्वासघातही होता.

चीनने भारताच्या काश्मीरवरील अधिकाराला १९६१ मध्ये आव्हान देत त्याचे सैन्य लडाखच्या क्षेत्रात ७० किलोमीटरपर्यंत भारताच्या भूमीत आणले, तेव्हा ‘हवाई मदतीखेरीज चीनला रोखता येणार नाही,’ हे कौल यांनी सरकारला कळविले. मात्र उघड युद्ध नको म्हणून भारताने चीनशी अधिकाऱ्यांच्या पातळीवरील वाटाघाटीला त्याही वेळी सुरुवात केली. या वेळी झालेली चौ आणि नेहरू यांच्यातील बोलणीही निष्फळ ठरली. त्या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट १९६१ रोजी राज्यसभेत बोलताना नेहरू म्हणाले, ‘‘आम्हाला हिमालयात दीर्घकालीन लढाई करायची नाही. युद्धाचे परिणाम अनेक पिढ्यांना भोगावे लागतात. त्यामुळे शहाणपण आणि सामर्थ्य याच बळावर अशा स्थितीत पुढे जायचे असते. त्यासाठी घाईगर्दीचा निर्णय उपयोगी पडणारा नाही.’’

अधिकाऱ्यांच्या अहवालाने चीनचे समाधान होईल व अधिकाऱ्यांच्या पातळीवरील बोलण्यातून सगळा प्रश्न मिटेल, असेच त्या वेळी त्यांचे मत होते. नेहरूंच्या या भाषणाला राज्यसभेत अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. पं. हृदयनाथ कुंजरू यांनी या वेळी नेहरूंना धारेवर धरून ‘‘तुम्ही चीनचे मनसुबे सहजपणे घेत आहात. आपली लष्करी ताकद व तयारी याकडे दुर्लक्ष करून हा प्रश्न चर्चेने सुटेल, या भ्रमात आहात. देशाला शांतता हवी, पण ती आपले स्वत्व गमावून नको.’’ असे ऐकविले. या वेळेपर्यंत नेहरूंनाही चीनने चालविलेल्या विश्वासघाताची पुरती जाणीव झालीच होती.

सन १९६२ च्या निवडणुका समोर असताना नेहरूंनी चीनबाबत एखादी कठोर भूमिका जाहीरपणे घ्यावी, असे काँग्रेसला व देशालाही वाटत होते. ही भूमिका लष्करी असू शकणार नव्हती. नेहरूंनी ती भावनिक पातळीवर नेली. ‘हिमालय ही भारताची संस्कृती आहे. त्याचे भारतीयांच्या मनातील स्थान केवळ आदराचे नाही, तर वंदनीय आहे.’ ही भाषा देशात राजकीय शांतता प्रस्थापित करू शकली आणि भारतीयांची मने तोषवू शकली, तरी लष्करी वास्तव मात्र तिच्याहून वेगळे होते. ते सांगणारे अधिकारी एक तर गप्प बसविले गेले वा त्यांना दूर केले गेले. थिमय्या गेलेच होते. अक्साई चीनमधील चीनच्या आक्रमणाच्या वेळी तेथे असलेले जनरल ए.डी. वर्मा यांनी आपले वरिष्ठ अधिकारी जनरल पी.एन. थापर यांना पत्र लिहून ‘अक्साई चीनमधील स्थिती स्फोटक असून ती नेहरू संसदेत सांगतात त्याहून वेगळी आहे’, असे आपले मत त्यांना कळविले. त्यांना ते पत्र सरकारी कागदपत्रांत यायला हवे होते. मात्र थापर यांनी तसे करायला नकार दिला. वर्मांनी ते न ऐकल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल हरिनामसिंग थापर यांना आणले गेले. वर्मांनी राजीनामा दिला. पुढे नेहरूंच्या सूचनेवरून त्यांना त्यांची पेन्शनच तेवढी दिली गेली.

या वेळी सुरू असलेले भारतीय रस्त्यांचे बांधकाम लडाख व लेहपर्यंत पोहोचण्याआधीच चीनने त्याच्या रस्त्यांचे बांधकाम पूर्ण केले होते. तरीही भारतीय पथकांची तेथील संख्या चीनच्या तुलनेत नगण्यच होती. (१९६१ पर्यंत लष्कराचे साहित्य त्यांच्यापर्यंत गाढवांच्या पाठीवरून नेले जात होते, हे त्या वेळचे वास्तव.) दि. २ नोव्हेंबर १९६१ रोजी नेहरू, मेनन, थापर आणि कौल यांच्यासोबत गुप्तचर विभागाचे अधिकारी बी. मलिक यांची बैठक झाली. तीत मलिक यांनी ‘चीन आक्रमण करील व ज्या भागात भारतीय लष्कर नाही, तेथे तो प्रथम शिरकाव करील’ अशी माहिती नेहरूंना दिली. ती खरी होती. सामान्यपणे चीनही समोरासमोरची खडाखडी टाळत होता. त्यामुळे नेहरूंनी लागलीच सीमेवरील अधिकाऱ्यांना पत्र लिहून ‘सीमेवर मनुष्यविरहित जागा ठेवू नका. शक्य तेथे आपले जवान तैनात करा,’ असे आदेश पाठविले. त्याच पत्रात सीमेवरील चौक्यांजवळ काही अंतर राखून त्यांच्या मागे आपली पथकेही सज्ज ठेवा, असेही त्यांनी कळविले. या पथकांना ऐनवेळी चौक्यांच्या रक्षणासाठी पुढे होता आले पाहिजे याची व्यवस्था करा, असेही त्याच वेळी त्यांनी कळविले होते. या वेळी लष्करी अधिकाऱ्यांनी सीमेवर सतत गस्त घालावी, पण समोरासमोरचे युद्ध शक्यतोवर टाळावे असेही त्यांना सुचविण्यात आले.

मेनन यांनी मात्र नेहरूंच्या पश्चात ‘आघाडीवरील जवानांच्या मागे खडी पथके ठेवण्याची गरज नाही’ असे अधिकाऱ्यांना कळविले. चीन आतपर्यंत येणार नाही आणि सीमेवरच झुंज करील, हा त्यांचा विश्वास त्यांना संरक्षकपथकांची तयारी करू देत नव्हता. पुढच्या काळात मलिक यांनी त्यांच्या पुस्तकात व नंतरचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात मेनन यांचे हे आगाऊपण स्पष्टपणे कळविले आहे...

दरम्यान १९६२ ची निवडणूक काँग्रेसने जिंकल्याने नेहरूंसह साऱ्या पक्षातच आत्मविश्वासाचे वातावरण तयार झाले. त्या वातावरणात त्यांनी चीनने सीमाभागात बांधायला घेतलेले नवे रस्ते दुर्लक्षिले आणि चीनच्या कलकत्त्यातील दूतावासाने ‘आघाडीवरील भारतीय पथकांना संरक्षक पाठबळ नसल्याचे’ त्याच्या देशाला कळविले. परिणामी, आघाडीवरील पथके विरळ व अधिक अंतरावरची आणि थोडी होती. याउलट चीन रस्ते व अन्य साहित्यानिशी मोठे सैन्य घेऊन सीमेवर सज्ज झाला होता.

चीनने युद्धाची वेळही त्याला अनुकूल अशीच निवडली होती. जगाचे लक्ष त्या वेळी क्युबाच्या युद्धाकडे लागले होते. रशियाने आपली अण्वस्त्रे क्युबाच्या भूमीवर उभी केली होती. अमेरिका हा सारा देशच या अण्वस्त्रांच्या टप्प्यात येणारा होता. ‘रशियाने ही अण्वस्त्रे तत्काळ काढून घ्यावीत, अन्यथा आम्ही क्युबाची नाकेबंदी करू’ असा इशारा अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी रशियाला दिला होता. तेवढ्यावर न थांबता त्यांनी अमेरिकेच्या युद्धनौका क्युबाभोवती उभ्या केल्या होत्या. या युद्धनौकांचे कडे तोडण्यासाठी रशियाने त्याच्या अण्वस्त्रसज्ज युद्धनौका क्युबाच्या दिशेने रवाना केल्या. एका क्षणी रशिया आणि अमेरिका यांच्या युद्धनौका समोरासमोर व युद्धसज्ज स्थितीत उभ्या राहिल्या. जगाला तिसऱ्या महायुद्धाला आताच तोंड द्यावे लागेल, अशी भीती त्यामुळे साऱ्या जगात निर्माण झाली.

त्या युद्धात केनेडींसोबत लढायला निघालेल्या रशियाच्या ख्रुश्चेव्हला चीनचा रोष तेव्हा नको होता. रशियाची भारताशी असलेली मैत्री सर्वज्ञात असली तरी ती आपल्याला अडवू शकणार नाही, याचा विश्वास त्यामुळे चीनमध्ये निर्माण झाला. चीनने भारताचे त्या देशातील राजदूत टी.एन. कौल यांना ९ सप्टेंबर १९६२ या दिवशी तसे स्पष्टपणे सांगितलेही होते. आता चीनवर कोणतेही बंधन नव्हते आणि त्याचे सैन्य सज्ज होते. दि.८ सप्टेंबर १९६३ रोजी चीनच्या फौजा मॅकमहोन रेषा ओलांडून भारतीय सीमेत घुसल्या. जोवर त्यांना समर्थ विरोध झाला नाही तोवर त्या भारतीय प्रदेशात आतवर येतच राहिल्या. या वेळी इंग्लंडमध्ये असलेले नेहरू भारतात तत्काळ परतले. मेननही तेव्हा विदेश दौऱ्यावर होते. येता क्षणीच नेहरूंना साऱ्या संकटाची पूर्ण कल्पना आली. ‘साऱ्या शक्तिनिशी लढण्याचे आदेश’ या वेळी त्यांनी प्रथमच सैन्याला दिले. मात्र आपल्या शक्तीची त्यांना जाणीवही होती. नेहरूंनाही १२ सप्टेंबरला श्रीलंकेला जावे लागले. मात्र याही वेळी चीन यापुढे युद्ध चालविणार नाही, असे त्यांना वाटत होते.

प्रत्यक्षात हे युद्ध दहा दिवस चालले. त्यात भारतीय लष्कराला काही दिवसांतच मागे रेटून चीनने भारताचा १९ हजार चौरस मैलांचा प्रदेश ताब्यात घेतला. मात्र या काळाने देशाला मनाने खचविले. लष्कर व सरकार या दोन्हींवरचा त्याचा विश्वास कमी झाला. आसाममध्ये तर भीतीचेच वातावरण उभे झाले. ‘आसामला भारताशी जोडणारी अरुंद भूपट्टी चिनी सैन्याने ताब्यात घेतली, तर आपल्या प्रदेशाचे व पुढच्या नेफा, नागालँड, मणिपूर, मिझोराम व त्रिपुराचे काय?’ हा भेडसावणारा प्रश्न त्या प्रदेशात सारे एकमेकांना विचारू लागले. भारतीय सुरक्षेच्या व्यवस्थापनात त्या प्रदेशांचा विचार तेव्हा बहुधा अंतर्भूतही नसावा. त्या वेळी देशाला उद्देशून आकाशवाणीवर केलेल्या भाषणात नेहरू म्हणाले, ‘‘या वेळी माझे अंत:करण आसामच्या जनतेकडे धाव घेत आहे...’’ (या गोष्टीला बरेच दिवस लोटल्यानंतर १९८० च्या मार्च महिन्यात प्रस्तुत लेखकाने आसामला भेट दिली, त्या वेळी त्या भाषणावरील प्रतिक्रिया सांगताना तेथील एक ज्येष्ठ विचारवंत म्हणाले, ‘‘अंत:करण धाव घेते म्हणजे काय? तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे काय?’’)

हे असे का घडावे ? आपण दिलेल्या सूचना तंतोतंत अमलात येतील, हा नेहरूंचा विश्वास यासाठी नडला असावा; की काहीही झाले तरी चीन हा डाव्या विचाराचा देश भारतावर आक्रमण करणार नाही म्हणून आघाडीच्या पथकांना पाठीशी राहून पाठिंबा न देण्याच्या मेनन यांच्या धोरणामुळे हे घडले असावे ? मेनन कोणत्याही अधिकाऱ्याचा सल्ला सरळपणे ऐकून घेत नव्हते. उलट, सेनाधिकाऱ्यांच्या एका सभेत बोलताना ते म्हणाले, ‘‘सेनाधिकाऱ्यांनी या युद्धासाठी मन तयार केले नसावे, असे मी म्हणत नाही. पण त्यांच्याजवळ तसे मनच नसेल तर...’’

नेहरू निश्चिंतच असावेत. दि.८ सप्टेंबरला जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा ते ब्रिटिश कॉमनवेल्थच्या बैठकीला हजर होते. दरम्यान, चीनने हा हल्ला भारतानेच केला असल्याचा प्रचार सुरू केला. त्याला उत्तर देताना नेहरू म्हणाले, ‘‘तसे असते तर मी युद्धकाळात भारताबाहेर कसा राहिला असतो ?’’ नेहरू ऑक्टोबरच्या आरंभी भारतात आले आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी सैन्याला ‘या स्थितीत तुम्हाला योग्य वाटेल ती कारवाई करा’ असा सरळ आदेश दिला. मात्र तोवर युद्ध पुढे गेले होते. कौल यांचे खोटेपण आणि मेनन यांची उद्दाम वागणूक त्यांच्या लक्षात आली होती. आपल्याला या कारवाईच्या गांभीर्याबद्दल साऱ्यांनी अंधारात ठेवले, हे त्यांच्या लक्षात आले होते.

पण वेळ निघून गेली होती आणि देशाची लष्करी संदर्भातली स्थिती नेहरूंनाही कळत होती... देश युद्ध हरला होता आणि त्याच्या समाप्तीचा औपचारिकपणाच तेवढा शिल्लक होता. आसामातील दिग्‌बोई येथील तेलाचा तळ उडवून देण्याची योजना अखेरच्या क्षणी मागे घेतली गेली आणि त्याच वेळी तेजपूरला लाऊडस्पीकरवरून ‘तुमच्या जीवित व मालमत्तेच्या रक्षणाची हमी सरकार घेऊ शकणार नाही’ (असे कोणी तरी) ऐकविले होते.

मात्र दोनच दिवसांनी अमेरिकेचे अध्यक्ष केनडी यांनी चीन भारतावरील आक्रमण चालूच ठेवणार असेल, तर आम्हालाच त्याविरुद्ध कारवाई करावी लागेल, अशी स्पष्ट धमकी त्या देशाला दिली. त्यावर चीनने तत्काळ युद्धबंदी करून सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली. याच काळात कोरियाभोवती असलेला अमेरिकी नौसेनेचा पडाव केनेडींनी उठविला आणि तो भारताच्या मदतीला पाठविण्याचे आदेश दिले. दि.११ नोव्हेंबरला चीनने युद्धबंदी करून आपली सेना मॅकमहोन रेषेच्या मागे घ्यायला सुरुवात केली. पश्चिमेकडे त्याने २५०० चौरस मैलांचा प्रदेश ताब्यात ठेवून ६ हजार चौरस मैलांचा प्रदेश सोडून दिला.

चीनने माघार का घेतली, याविषयीचे अनेक तर्कवितर्क अजून केले जातात. भारताशी दीर्घ काळची लढाई करणे म्हणजे आपल्या सैन्याला लांबवर रसद पोहोचविणे कठीण होईल, हे त्याला जाणवले. त्याच वेळी अमेरिका व पाश्चात्त्य देश भारताच्या मदतीला येतील, हे त्याला दिसू लागले. शिवाय या युद्धाने भारताचे सरकार खचले तरी हा देश एकसंध बनविल्याचे त्याला दिसत होते. चीनचे सैन्य येताच भारतातले कामगार त्याच्या स्वागतासाठी पुढे येतील, हा भारतातील कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार खोटा असल्याचे त्याला दिसत होते. या साऱ्या कारणांमुळे चीनने माघार घेतली होती. या संदर्भात माओचे एक वचनही नोंदविण्याजोगे आहे. ‘जे मर्यादित युद्धाने साध्य होते, तेही कधी कधी पुरेसे असते. शिवाय माघार हीदेखील युद्धातली एक खेळीच आहे.’

लोकांचा मेननवरील संताप उफाळला होता. आता त्यांना कोणीही वाचवू शकणार नव्हते. नेहरूंचा राजीनामा मागणे तेव्हाही कोणाला शक्य नव्हते. संसदेला सामोरे जाण्याचे धाडसही मग मेनन दाखवू शकले नाहीत. पण नेहरूंना स्वत:च्या पराभवाचा बसलेला धक्काच एवढा मोठा होता की, ते त्यातून पुन्हा स्वत:ला सावरू शकले नाहीत. त्यांची शीर्षासने, प्राणायाम व योगही त्यांच्या मदतीला आला नाही. आहारातील बदल, जीवनशैलीतला वेगळेपणा त्यांना स्वस्थ करू शकला नाही. त्यांचा चेहरा निस्तेज होत गेला आणि डोळ्यांतील चमक कमी होत गेली. जनतेला जाणवले नसले आणि तिचे त्यांच्यावरील प्रेम कमी झाले नसले, तरी नेहरूंनाच एक निराधारपण जाणवू लागले होते.. त्यांचा शेवट जवळ येत होता.

सुरेश द्वादशीवार

नागपूर 440010

sdwadashiwar@gmail.com

Share on Social Media

मंच-21

फॉर्म, स्टॉर्म आणि... (उत्तरार्ध)

डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस

विवेकमंचाच्या चर्चेचा फायदा काय? यातून काय निष्पन्न होते ? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. प्रश्न रास्त आहे. पण जर फक्त चर्चाच होत असली, तरीही मागील चार वर्षे प्रत्येक रविवारी म्हणजे जवळजवळ सलग २०० रविवार हे व्यासपीठ सुरू राहिले आहे. याचा अर्थ काय? लोक फक्त चर्चा करण्यासाठी नव्हे तर व्यक्त होण्यासाठीही येत असतात. त्यांच्या मनातली खदखद, गोंधळ, प्रश्न, व्यथा व्यक्त करण्यासाठी त्यांना माध्यम हवंय. काही जण टि्वटर, फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर तो आधार शोधतात, तर काहींना तो पर्यायच नसतो वा ते माध्यम प्रभावी वाटत नाही. अशा वेळी विवेकमंचासारखा एखादा निर्मळसारख्या छोट्या गावात चालणारा उपक्रम कामी येतो. व्याख्यानाच्या कार्यक्रमात एखादाच वक्ता असतो आणि बाकी सारे श्रोते. विवेकमंचात सामान्य माणूस वक्ताही असतो ,आणि तोच श्रोतादेखील बनतो. या सभेसाठी आपण कोणतीही जाहिरात करत नाही, तरीही पंचक्रोशीतून बरेच लोक या सभेस येत असतात.

चर्चचे फादर मंचास भेट देण्यासाठी मंडळात येत आहेत ह्याची कल्पना ॲड. अनुप यांनी मंडळाच्या अध्यक्षांना अगोदर दिली होती. त्यामुळे संजयही सभेस आले होते. त्यांनी अध्यक्ष म्हणून विवेकमंचाची भूमिका विशद करताना म्हटले, ‘‘फादर, समाज विकास मंडळ ही एक प्रथितयश सामाजिक संस्था आहे. गेल्या ६० वर्षांपासून ही या समाजात कार्य करत आहे. महिला सक्षमीकरण, कलाक्रीडा, लायब्ररी, पतपेढी, मेडिकल फंड किंवा शैक्षणिक फंड असे विविध उपक्रम येथे कार्यरत आहेत. या उपक्रमांव्यतिरिक्त काही तरी नवे विचार पुढे यावेत आणि त्याचे एक मुक्त व्यासपीठ असावे- ज्याला कोणतेच बंधन नसेल, म्हणून या मंचाची आम्ही इथे स्थापना केली आहे. कारण पचविण्यास कितीही जड असल्या तरी वेगवेगळ्या क्रांतिकारी कल्पनांनीच हे जग पुढे जात असते. माझा मुलगा मला विचारायचा की, देवाचे देव कोण? देवाने जर जग निर्माण केले, तर त्याच्याही अगोदर कोणी तरी असायला हवे. त्यालाही कोणी तरी बनवलेले असायला पाहिजे. म्हणजे मुलांचे, आपले असे जे प्रश्न असतात, ते कुठे तरी बिनदिक्कत विचारले गेले पाहिजेत. त्यामुळे अशा कल्पना कोणतेही बंधन नसलेल्या खुल्या वातावरणात चर्चिल्या जाव्यात, म्हणून हा विवेकमंच आम्ही सुरू केलेला आहे आणि खूपच चांगल्या गोष्टी इथे घडत आहेत.

आता उदाहरणच द्यायचे झाले तर- एका सर्वसाधारण सभेमध्ये विवेकमंचावर चर्चा होत असताना एक मुद्दा असा पुढे आला की, ख्रिश्चन आणि हिंदू किंवा इतर धर्मीय समाज ह्यामध्ये सेतू बांधण्यासाठी आपण काय करू शकू? आणि त्या चर्चेतूनच या मागील दिवाळीत आम्ही ‘दीपावली संध्या’ हा येथील हिंदू व ख्रिस्ती धार्मिक भाविकांसाठी कार्यक्रम आयोजित केला. त्याला किती भरघोस प्रतिसाद मिळाला! दोन्ही समाजांतील मिळून ६०० माणसे या कार्यक्रमास उपस्थित राहिली. किती सुंदर तो कार्यक्रम झाला! दोन्ही समाज जवळ आले. हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षी करणार आहोत.’’

अशा तऱ्हेने फादरांनी विवेकमंचात स्वतः येऊन येथील सदस्यांशी संवाद साधला. ‘मला त्या ग्रुपमध्ये काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, उलट खरा धर्म समजून घेण्याचे त्यांचे प्रयत्न स्तुत्य आहेत’, असा फीडबॅक फादर जोएल परेरा यांनी बिशपला दिला, असे नंतर कळाले. विवेकमंचाविषयीचा विरोध हळूहळू कमी होत होता. अशातच काही महिने गेल्यावर एके दिवशी समाज विकास मंडळाशी सुरुवातीपासून निगडित असलेल्या सर्व आजी- माजी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा एक स्नेहमेळावा घेण्याचे ठरले. सर्व सदस्यांना या कार्यक्रमास आमंत्रित केले गेले. त्याचबरोबर विवेकमंचाचाही मंडळातील चौथा वर्धानपनदिन असल्याने तसेच विवेकमंचात येणारी मंडळीही मंडळाशी जोडली गेली असल्याने त्यांनाही या मेळाव्यासाठी निमंत्रित केले गेले.

विवेकमंचात प्रत्यक्ष सभेत प्रत्येक रविवारी येणे शक्य नसलेल्या पण व्हॉट्‌सॲप, फेसबुक या माध्यमातून विवेकमंचाशी व पर्यायाने मंडळाशी जोडल्या गेलेल्या सर्व सदस्यांना फोन करून या मेळाव्याची कल्पना दिली गेली. रॉयल, ग्रॅहम व इतर सदस्य जे सुरुवातीला मंचात यायचे, त्यांनाही मी या स्नेहमेळाव्यास येण्यासाठी फोन केला. पावन निर्मळकरांनाही फोन करण्याचा प्रयत्न केला, पण ते दुबईला परत गेलेले असल्याचे कळले.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी मंडळात तयारीसाठी गेलेलो असताना, मॅथ्यू क्रॅस्टो हे मंडळाच्या आवारात भेटले ‘‘स्नेहमेळावा फक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठीच होता. विवेकमंच ह्यामध्ये कसे आले इथे?’’ स्नेहमेळाव्याच्या बॅनरमधील ‘विवेकमंच’च्या नावाकडे अंगुलीनिर्देश करत ते म्हणाले.

‘‘अहो विवेकमंच आपल्या मंडळाचाच एक भाग आहे. विवेकमंचाचे सदस्य म्हणजे मंडळचेच सदस्य!’’ मी म्हणालो.

‘‘स्नेहमेळावाच्या कार्यक्रमात विवेकमंचाचं जास्त चालतेय असा लक्षात आलं, तर मी खुर्च्या स्टेजवर फेकून मारेन; लक्षात ठेवा.’’ असे म्हणत ते ताड्‌ताड्‌ जिना चढून पतपेढीत निघून गेले. माझ्या पोटात धस्स झालं. मंचाला मॅथ्यू क्रॅस्टो यांचा विरोध आहे, हे माहिती होतं. पण तो विरोध वैचारिक असेल, अशी मी अपेक्षा केली होती. तसेच एव्हाना यामागील चार वर्षांत मंडळातील गटबाजी, राजकारण याचा मला पुरेपूर अनुभव आलेला होता. पण चक्क खुर्च्या पुढे फेकून मारण्याची भाषा ऐकली आणि प्रथमतः मी ‘दहशत’ म्हणजे काय, ते अनुभवले. ताबडतोब मी पीटर व डिसोझासर यांच्या कानांवर ही बातमी घातली. कार्यक्रमास बरीच पाहुणेमंडळी येणार होती. उगाच सगळ्यांसमोर तमाशा नको होता. त्या रात्री मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी क्रॅस्टो यांच्या लुडबुडीपासून उगाच धोका नको म्हणून डिसोझासरांनी क्रॅस्टो ह्यांचे समवयस्क व मंडळात त्यांच्यापेक्षा जास्त योगदान दिलेले माजी अध्यक्ष व विवेकमंचाचे खंदे समर्थक जॉन आल्मेडा ह्यांना खास या मेळाव्यासाठी येण्यासाठी विनंती केली.

दुसऱ्या दिवशी १० मिनटे अगोदरच मी मंडळात पोहोचलो. सभागृहात आमंत्रित सदस्य हळूहळू येत होते, तर काही अगोदरच स्थानापन्न झालेले होते. किती लोक येतील आणि मॅथ्यू क्रॅस्टो आणखी काही गोंधळ तर घालणार नाही, या विवंचनेत मी पायऱ्या चढत मंडळाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहात पोहोचलो. तोच मी तिथे ग्रॅहमला तात्या व सॅबेस्टियन अंकल यांच्याबरोबर उभे राहून वार्तालाप करताना पाहिले आणि मला खूप आनंद झाला. तो नुकताच आलेला दिसत होता.

‘‘वेलकम बॅक ग्रॅहम! थँक्स फॉर कमिंग.’’ मी त्याच्या पाठीवर थाप देत म्हटले. ‘‘येस सर. हाऊ आर यू?’’ असे म्हणत आम्ही एकमेकांना आलिंगन दिले.

‘‘इथे बरेच नवे चेहरे दिसतायेत. आपल्या मंचात एवढे लोक रेग्युलर झालेत?’’

‘‘नाही रे, ह्यांना उलट मंचात रेग्युलर करायचंय, म्हणून बोलावलंय आपण!’’ मी हसत म्हटले.

‘‘यू नो व्हॉट- ही सगळी चर्चेस, मंदिरं, या मशिदी जेव्हा आपल्या मंचासारख्या खुल्या चर्चा करायला लागतील ना, तेव्हा हे जग खऱ्या अर्थाने बदलेल.’’

‘‘ॲग्री. काश, वो सुबह कब आयेगी!’’ ‘‘जैसे मेरे लाईफ में आ गयी.’’

‘‘हो रे, तुला मंचाची गरज अवघी सहा महिनेच लागली. बरं, ते आता आपण कार्यक्रमात बोलूच. मला सांग, तुझं म्युझिकचं कसं चालू आहे? आणि मम्मी-डॅडी कसे आहेत?’’

‘‘मम्मी-डॅडी आता मस्त शांत आहेत. त्यांना माझ्या प्रत्येक म्युझिक शोमध्ये मी पहिल्या रांगेत बसवतो. म्युझिकची दुनिया त्यांनाही आता आवडतेय. आणि करिअरही एकदम मस्त चाललंय.’’

‘‘आणि आम्हाला लग्नाला कधी बोलावतोयस?’’ ग्रॅहमच्या मम्मीचा काळजीयुक्त चेहरा आठवून मी विचारले.

‘‘बघू रे ते, करिअरचे सूर आता छानपैकी लागतायेत. होपफुली, लवकरच.. आपल्या सगळ्या मंचाला बोलवणार आहे मी...’’ असे हसत-हसत म्हणत तो खुर्चीत बसणार, इतक्यात ग्रॅहमने काही आठवल्यासारखे केले व मला म्हणाला, ‘‘अरे डेव्हिड, तुला एक सांगायचं राहूनच गेलं. रॉयलने आज सकाळी फोन केला होता मला. तो मला म्हणाला की, तू त्याला मागच्या आठवड्यत फोन केलेलास म्हणून. पण त्याला आज जमणार नाही. ते आपलं ‘कुपारी संस्कृती मंडळ’ आहे ना, ते जॉईन केलंय त्याने. आणि त्याची काही तरी आज मीटिंग आहे म्हणे. त्याने तुला मेसेज पास करायला सांगितले.’’ असे म्हणून दीपेश आणि नॉर्मन यांच्या बाजूला ग्रॅहम जाऊन बसला.

‘‘ओके. थँक्स फॉर टेलिंग.’’ असे म्हणत मी एक दीर्घश्वास घेतला.

मी संस्कृती मंडळातून मंचात आलो होतो, तर रॉयलचा प्रवास मात्र मंचातून संस्कृती मंडळापर्यंत उलट्या दिशेने होत होता. मंचाचे सदस्य, मंडळाचे कार्यकर्ते व इतर आमंत्रित हळूहळू जमत होते. आम्ही कार्यक्रम सुरू केला. मेळाव्याच्या पहिल्या सत्रात मंडळाचे अध्यक्ष संजय यांनी कार्यकर्त्यांनी मंडळाच्या पुढील प्रगतीसाठी आत्मपरीक्षण करणे कसे गरजेचे आहे, ह्याविषयी त्यांचे मत व्यक्त केले. पतपेढीचे अध्यक्ष शिरीष आल्मेडा यांनी समाजाचा वा संस्थेचा विकास करायचा असेल तर प्रथम व्यक्तिविकास करणे का महत्त्वाचे आहे, यासंबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मंडळाच्या विविध विभागांचा आढावा त्यांच्या विभागप्रमुखांनी घेतला.

उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी बंडू मास्तर आणि ॲलेक्स दोडती ह्यांनीही मंडळाच्या गतकाळातील अनुभव उपस्थितांबरोबर शेअर केले. चहापानाच्या सत्रात मंडळाशी विवेकमंचातर्फे जोडल्या गेलेल्या विविध कवीसिंगसर् यांनी आपापल्या कला सादर केल्या. यात प्रामुख्याने ग्रॅहम, रिमा पाटील, मॅक्सवेल आल्मेडा यांनी विविध गीते; तर रॉकी परेरा, फेलिक्स डाबरे, इग्नेशिअस निग्रेल, एडिसन डिसोझा यांनी कविता व गजल सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. दुसऱ्या व शेवटच्या सत्रात मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांसमोर विवेकमंचाच्या सदस्यांनी ‘मंचामुळे आपल्याला काय फायदा झाला?’ ह्याविषयी आपापले अनुभव कथन करण्याचे ठरले होते.

‘‘विवेकमंचाच्या चर्चेचा फायदा काय? यातून काय निष्पन्न होते? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. प्रश्न रास्त आहे. पण जर फक्त चर्चाच होत असली, तरीही मागील चार वर्षे प्रत्येक रविवारी म्हणजे जवळजवळ सलग २०० रविवार हे व्यासपीठ सुरू राहिले आहे. याचा अर्थ काय? लोक फक्त चर्चा करण्यासाठी नव्हे तर व्यक्त होण्यासाठीही येत असतात. त्यांच्या मनातली खदखद, गोंधळ, प्रश्न, व्यथा व्यक्त करण्यासाठी त्यांना माध्यम हवंय. काही जण टि्वटर, फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर तो आधार शोधतात, तर काहींना तो पर्यायच नसतो वा ते माध्यम प्रभावी वाटत नाही. अशा वेळी विवेकमंचासारखा एखादा निर्मळसारख्या छोट्या गावात चालणारा उपक्रम कामी येतो. व्याख्यानाच्या कार्यक्रमात एखादाच वक्ता असतो आणि बाकी सारे श्रोते. विवेकमंचात सामान्य माणूस वक्ताही असतो आणि तोच श्रोतादेखील बनतो. या सभेसाठी आपण कोणतीही जाहिरात करत नाही, तरीही पंचक्रोशीतून बरेच लोक या सभेस येत असतात. काही लोक तर त्यांच्या मनातली खदखद एकदा व्यक्त होऊन शांत झाली की, परत ते आपापल्या आयुष्यात गुडुप होतात. किती छान आहे हे! आज समाजकारणाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात समाज विकास मंडळासारख्या बऱ्याच संस्था आहेत. पण या सर्वांत समाज विकास मंडळ हे वेगळं ठरतं ते या विवेकमंचासारख्या मुक्त व्यासपीठाच्या उपक्रमामुळे.’’ विवेकमंच विभागप्रमुख म्हणून मी सुरुवात केली.

नंतर कॅलेट आपले अनुभव सांगण्यास पुढे आली. ‘‘एका मित्राला आपण जर १० रुपयांची भेटवस्तू दिली. तर तोही आपल्याला दहा रुपयांची भेट परतफेड म्हणून देतो. म्हणजे दोघांकडे शेवटी परत १० रुपयेच राहतात. पण आपण जेव्हा एक विचार मित्राबरोबर शेअर करतो व मित्रही जेव्हा त्याच्याकडील एक वेगळा विचार देतो, तेव्हा दोघांकडे दोन-दोन विचार उरतात. विवेकमंचामुळे अशा विविध नवनवीन विचारांच्या exchange मुळे आपण सगळेच श्रीमंत झालो.’’ पिवळ्या रंगाचा टॉप व जीन्स घातलेली कॅलेट नेहमीच्या आत्मविेशासाने आपले अनुभव कथन करत होती.

‘‘मी आणि डेव्हिड आम्ही दोघे खूप अगोदरपासून मित्र आहोत. आम्हाला नेहमी वेगवेगळ्या टॉपिक्सवर डिस्कशन करायला आवडायचे. ‘एक मंच आहे व तिथे खूप चांगली चर्चा चालते’ हे इनफॅक्ट मला त्यानेच सांगितलं आणि माझ्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या ग्रुपचा मी भाग झालो. होय, थोडा त्रास झाला मला; पण तो तेवढ्यापुरताच. येथे झालेल्या विविध चर्चांमुळे हळूहळू मनातील सर्व क्लाउड्‌स क्लीअर होत गेले व एक वेगळंच क्षितिज गवसलं. आयुष्यात काय करायचंय आणि त्यापेक्षा काय नाही करायचं, हे आता एकदम स्पष्ट दिसू लागलं...’’ ग्रॅहमनेही खूप उत्स्फूर्तपणे आपले विचार मांडले.

‘‘Pearls ribbons नेही जे शक्य झालं नसतं, ते books thoughts ने शक्य करून दाखवलं. आणि ते म्हणजे, आम्ही चौघी बहिणी या विवेकमंचामुळे खूपच क्लोज आलो. विवेकमंच is like a family now. एखादे काही चांगलं वाचलं किंवा ऐकलं, तर कधी एकदाचे मंचात येऊन सगळ्यांबरोबर ते मी शेअर करते, असे होते...!’’ गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली प्रसन्नवदनी फ्लोरी मंचामुळे तिला झालेला फायदा सांगत होती. मंचामुळे ती व सोनल या दोघा बहिणींचं कॅलेट व मितभाषी प्रिया या मैत्रिणींशी गहिरे नाते जुळले होते.

राम देशमुख त्यांचे म्हणणे मांडताना म्हणाले, ‘‘माझी मुलगी प्रिया ही कॅलेटची मैत्रीण. त्यामुळे विवेकमंच जेव्हा सुरू झाला, तेव्हा प्रिया मलाही या सभेत घेऊन आली. मला झालेला फायदा म्हणजे, दैनंदिन आयुष्यात आपण संसारी माणसं इतकी व्यग्र असतो की, बऱ्याच गोष्टींवर शांतपणे विचार करण्यास सवडच मिळत नाही. इतकी वर्षे मी करतोय ना, इतरही करतायत ना- म्हणून मीही करत जातो. पण मी जे करतोय ते काय व का करतोय- आणि त्याने मला आत्मिक समाधान मिळतेय का, हा कधी आपण विचारच करत नाही. पण ती शहानिशा विवेकमंचात आल्यापासून करावीशी वाटली.’’

ह्यांबरोबरच दीपेश, ॲड.व्हिन्सेंट, सुनीला ह्यांनीही आपापले अनुभव कथन केले. विवेकमंचाविषयी बिशपहाऊसला तक्रारींचे पत्र लिहिणारे मिंगेल डिमेलो हेही आमंत्रित होते व हजर होते. काही वादग्रस्त चर्चिले जात नाहीये, हे उमगताच मग ते मधेच कार्यक्रमातून उठून गेले! मंडळाच्या विेशस्त मंडळातील ज्येष्ठ नेते व कार्यकारिणीतील इतर सदस्यही शेवटपर्यंत या मेळाव्यास थांबले होते. खूपच हृद्य असा तो सोहळा रंगला.

‘ॲड.अनुप का बरं आले नाहीत?’ असा विचार मनात येतोय तोच त्यांना मी जिने चढत येताना पाहिले. ते काहीसे उशिरानेच सभेस येत होते. त्यांच्याबरोबर एक महिलाही दिसत होती. चालताना त्या महिलेच्या पायाला काही त्रास असल्याचे जाणवत होते. फिक्कट पांढऱ्या रंगाची साडी, केसांत माळलेला चाफा आणि चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा उत्साह. मंडळाचा जिना चढत येऊनही कसलीच वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. होय, त्या शीला डिक्रूझ होत्या. तीच ती धीरोदत्त स्त्री- जिने चर्चच्या दबावाला बळी न पडता व आपल्या विवेकाशी तडजोड न करता अपंगांची संस्था सिद्धहस्तपणे उभी केली होती. ॲड.अनुप हे तर शीला डिक्रूझ यांच्यावर बिशपांनी केलेल्या अन्यायामुळे कसे चर्चमधून बाहेर पडले होते ह्याविषयी त्यांच्याकडून बऱ्याचदा ऐकले होते. आज त्यांना प्रथमच भेटणे होत होते.

‘‘येथे जवळच आज शीला मॅडमचा कार्यक्रम होता तेव्हा मी त्यांना म्हटलं- येताना जमलं तर आमच्या मंचाच्या मेळाव्यातही चला म्हणून. थोडे तुमचे अनुभव आमच्या यंग लोकांबरोबर शेअर करा.’’ ॲड.अनुप यांनी सभागृहात येताच त्यांची ओळख करून देत म्हटले.

‘‘अनुप मंचाविषयी खूप सांगत असतो. सर्वांना नमस्कार!’’ असे म्हणत त्यांनी स्मितहास्य करत उपस्थितांना नमस्कार केला.

ॲड.अनुप यांच्या विनंतीवरून त्यांनी आपल्या संस्थेविषयी उपस्थितांना मग थोडक्यात माहिती दिली. त्यांच्याकडून त्यांच्या संस्थेची प्रगती ऐकून तर आम्ही थक्कच झालो. सुरुवातीला एका कॉन्व्हेंटमधील छोट्या खोलीपासून त्यांच्या संस्थेची सुरुवात झाली होती. वीस वर्षांनंतर या संस्थेचे दोन मजली स्वतंत्र इमारतीमध्ये रूपांतर झाले होते. अपंगांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, विविध वैद्यकीय शिबिरे भरविणे ह्यापासून ते अपंगांसाठी ठिकठिकाणी सहलींचे आयोजन करणे व त्यांच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम राबविणे अशा विविध उपक्रमांतून त्यांनी दिव्यांगांसाठी हक्काचे सर्वधर्मीय विरंगुळा केंद्र उपलब्ध करून दिले होते. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी, कसलीही तडजोड न करता प्रसंगी बलाढ्य चर्चला नकार देण्याची हिम्मत दाखवणाऱ्या त्या बाईकडे पाहून उर भरून येत होता. शीला डिक्रूझ ह्यांचे व्यक्तिमत्त्व पाहून मनात विचारांचे पांगळेपण घेऊन जगणारे आपण ‘सुदृढ’ खरे तर अपंग आहोत ह्याची जाणीव झाली.

‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ असे सूचक व्यक्तव्य करून बिशपबरोबरच्या ‘त्या’ वादाविषयी बोलणे मात्र त्यांनी टाळले. कारण बिशपांनी जरी येशूच्या सेवेचा संदेश बासनात गुंडाळून आपल्या सत्तेचा दुरुपयोग केलेला असला, तरी त्याच बिशपांचा रोष पत्करून शीला डिक्रूझ यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारी व्यक्तीही चर्चशीच निगडित होती. फादर डेनिसजी यांच्याविषयीचा आदर त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. फादर डेनिसजी हेही मंचाच्या ‘त्या’ वादग्रस्त कार्यक्रमाचे एक वक्ते होते. तेव्हा त्या फादरांना ऐकण्याचा योग आला होता.

‘‘फादर डेनिसजी हे माझे गुरू आहेत. त्यांच्यामुळेच माझ्या हातून हे सारे कार्य घडू शकले. अनुप मला बोलला की, तुम्ही अंधश्रद्धेच्या विरोधात कार्य करता म्हणून. त्यावरून आठवलं.’’ असे ॲड.अनुप यांच्याकडे पाहत त्या पुढे म्हणाल्या, ‘‘तीस वर्षांपूर्वी मी ज्या शाळेत शिकवत होते, तिथे फादर डेनिसजी एक अंधश्रद्धाविरोधी नाटकाच्या तालमी घेत होते. आपल्या ख्रिस्ती समाजातील अंधश्रद्धेविषयी ते नाटक होते. अपंग मुलीच्या प्रेमात पडलेल्या मुलाला समाजाचा कसा सामना करावा लागतो, अशी त्यात कथा होती, जी मुलगी अपंग मुलीची भूमिका करत होती तिला अपंग मुलगी कशी चालते हे दाखविण्यासाठी तालमीदरम्यान मला एक- दोनदा बोलाविले होते. पण ती मनासारखी अभिनय करत नव्हती. शेवटी मलाच त्या मुलीची भूमिका करण्याचा आग्रह होऊ लागला. सुरुवातीला माझ्या अपंगपणाचे प्रदर्शन मी सर्वांसमोर का मांडू, म्हणून मी मागे हटत होते; पण फादर डेनिसजी यांनी मात्र ‘तू तुझे अपंगपण स्वीकार. लोक हसत असतील तर हसू दे लोकांना’ असे म्हणून मला विचार कारावयास भाग पाडले. आणि मग ती भूमिका मी स्वीकारली.’’ शीला डिक्रूझ भावनिक झाल्या होत्या. ‘‘आम्ही त्या नाटकाचे ४० एक प्रयोग केले. माझ्या पहिल्या एंट्रीला प्रेक्षक हसत, मात्र नंतरच्या एंट्रीला ते रडत. त्या नाटकाने माझं वैगुण्य मला स्वीकारण्यास शिकवलं. मला वाटतं, त्या नाटकामुळेच मी माझा आहे तसा स्वीकार केला. आणि म्हणूनच माझ्या अपंग बांधवांसाठी मी हे छोटेसे कार्य करू शकले’’ कॅथरिन व तिच्या बाजूला कार्यक्रमाचा वृत्तांत लिहीत बसलेली सोनल आपले डोळे पुसताना दिसत होत्या. उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे उभे राहून व जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या कार्याला सलामी दिली. आपले मनोगत व्यक्त केल्यावर त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. ॲड.अनुप मग त्यांना परत घेऊन गेले.

माजी अध्यक्ष जॉन आल्मेडादेखील या स्नेहमेळाव्यासाठी आलेला आहे, हे पाहून मॅथ्यू क्रॅस्टो या कार्यक्रमाच्या जवळही फिरकले नाहीत आणि कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. एकूण ६० कार्यकर्ते या कार्यक्रमास हजर होते. विवेकमंचाचे संस्थापक डिसोझासर या सर्व सदस्यांचे मनोगत ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटलेली दिसत होती. निर्मळ या परिसरात हा छोटा का असेना, हा प्रयोग चार वर्षे अखंडपणे सुरू राहिला होता. डॉ.नरेन्द्र दाभोलकरांचे येथे येणे वाया गेले नव्हते.

मधे काही महिने गेले आणि मंडळाची वार्षिक सभा परत आली. मंडळाच्या सर्व विभागाचा वार्षिक आढावा घेण्यात येत होता. छापील वार्षिक अहवालाच्या पानांनुसार उपस्थितांची मते मागविण्यात येत होती. लायब्ररी, मेडिकल फंड, शिक्षण फंड, महिला मंडळ, कला-क्रीडा मंडळ असे करत-करत सभा विवेकमंचाचा अहवाल ज्या पानावर छापलेला होता, तिथे पोहोचली. मी दीर्घश्वास घेतला. जे काही प्रश्न येतील, त्याला मंचचा विभागप्रमुख म्हणून उत्तर देण्याच्या प्रयत्नामध्ये मी होतो. पण काय आश्चर्य... ‘चला, या पानावर कोणाला काही आक्षेप नसेल तर अहवालाच्या पुढच्या पानाकडे वळू या’ असे म्हणत चक्क पान उलटले गेले! समाज विकास मंडळात विवेकमंचाचे पान एकदाचे उलटले गेले होते! हुश्श : मी सुटकेचा निेशास टाकला. थोडक्यात form, storm नंतर विवेकमंच 'norm' या अवस्थेत पोहोचल्याची चिन्हे दिसू लागली होती.

त्यानंतर मंचाने इतरही काही कार्यक्रम राबविले. विशेष उल्लेख करायचा म्हणजे, शालेय मुलांसाठी वैज्ञानिक प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात मुलांना विज्ञानाशी निगडित त्यांच्या मनात येतील ते कोणतेही प्रश्न विचारण्याची मुभा देण्यात आली होती. डिसोझासर विज्ञानाचे शिक्षक असल्याने ते व खखड मधून शिक्षण घेतलेल्या दीपेश वझे ह्यांना केंद्रस्थानी ठेवून हा कार्यक्रम आखला गेला होता. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. परिसरातील इंग्रजी, मराठी माध्यमात जाणाऱ्या पांढरपेशा कुटुंबातील मुलांबरोबरच निर्मळ गावकुसाबाहेर राहणाऱ्या पाड्यांवरील आदिवासी मुलांनीही ह्याला गर्दी केली होती व बरेच प्रश्नही विचारले होते. एकूण ३५० मुलं या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमास हजर होती. ‘मनात जो काही प्रश्न आहे तो विचारा आणि व्यक्त व्हा’ हा विवेकमंचाच्या ध्येयाशी पूरक असलेला कार्यक्रमाचा ढाचा होता. दोन तासांच्या या कार्यक्रमात ७० मुलांनी आपल्या मनातील प्रश्न विचारले. बऱ्याच प्रश्नांची उत्तरे उपस्थित मुलांनीच दिली. मुलांची एवढी गर्दी मंडळाच्या कोणत्याच कार्यक्रमास जमली नव्हती. लहान मुलांची नस चांगली पकडली, म्हणून मंडळातील बऱ्याच लोकांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली आणि असे मुलांसाठीचे कार्यक्रम रिपीट करण्यावरही सगळ्यांचे एकमत झाले.

मंडळातील मंचाला असलेला विरोध हळूहळू मावळत होता. पण मंडळात जरी विवेकमंच आता स्थिरावला असला, तरी हा विचार मंडळाच्या बाहेर पडण्यास सज्ज झाला होता.

डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस,

वसई

danifm2001@gmail.com

Share on Social Media

नवे पुस्तक

‘संशोधक’ राजा भेटतो तेव्हा...

दिनेश पाटील

संस्थानिक असतानासुद्धा राष्ट्र पुनर्निर्माणाचा विचार आणि कृती करणारा हा राजा खऱ्या अर्थाने भारताचा सार्वकालीन ‘राष्ट्रीय नायक’ ठरतो. लोकांचे विचार, धोरण आणि कृती संतुलित ठेवण्यासाठी त्यांना धर्माचे तुलनात्मक शिक्षण देण्याचा आग्रह धरणारा हा भारतातील एकमेव विद्वान. पुरोहितांसाठी ‘दुष्ट देवदूत’ हे रूपक वापरणारा हा राजा निर्भीड होता. पुरोहितांच्या ज्ञानाची परीक्षा घेऊनच त्यांना धार्मिक विधी करण्याची परवानगी देण्याचा कायदा करणारा हा जगातील बहुधा पहिला शासक असावा. भारतात जेव्हा राजकीय स्वातंत्र्याचा प्रश्न स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी होता, तेव्हा राजकीय स्वातंत्र्याबरोबरच ‘अस्पृश्यतानिवारण’ हा विषय राष्ट्रीय प्रश्न म्हणून हाताळणारा हा पहिला राजा. आधुनिक भारतात एक राजकीय व्यवस्था म्हणून राज्याच्या मुख्य कार्यक्रमपत्रिकेवरील ‘मुलभूत कार्यक्रम’ हा दर्जा ‘अस्पृश्यतानिर्मूलन’ या प्रश्नाला देणारा पहिला राजा म्हणून सयाजीरावांच्या कामाची दखल घ्यावीच लागेल.

बाबा भांड यांनी- २०१३ मध्ये लिहिलेले ‘लोकपाल राजा सयाजीराव’ हे चरित्र वाचले. एवढा अफाट राजा महाराष्ट्रात जन्मला, तरी बसता-उठता पुरोगामित्वाचे ढोल वाजविणाऱ्या महाराष्ट्राच्या बौद्धिक वर्तुळात हा राजा ‘अस्पृश्य’ ठेवला गेला. ही बाब महाराष्ट्रातील सामाजिक संशोधकांवर येथून पुढे विेशास ठेवायचा नाही, असा संकल्प सोडण्यास भाग पाडणारी ठरली. मग सुरू झाला एका नव्या शोधाचा प्रवास. पुणे, शिवाजी विद्यापीठ, इंटरनेट अशा विविध मार्गांनी सयाजीरावांसंदर्भात मिळेल ते लागेल ते मोल देऊन मिळवण्याचा धडाका लावला. गेल्या सहा वर्षांत या शोधयात्रेने समृद्ध केले, आनंद दिला.

यामध्ये तीन वर्षांपूर्वी महाराणी चिमणाबाई यांनी लिहिलेला ’The Position of Women in Indian Life’ हा १९१२ मध्ये लंडनमधून प्रकाशित झालेला ग्रंथ Forgotten Books या संकेतस्थळावरून सापडला. तो लंडनहून मागवून घेतला. ज्या दिवशी तो हातात आला, त्या दिवशी झालेला आनंद शब्दातीत होता. आजवर कोणत्याही स्त्रीवादी लेखिकेने याचा संदर्भ घेतला नव्हता. कोण प्रकाशित करेल याचा विचार न करता बी.ए.ला शिकणाऱ्या सुरक्षा घोंगडे या विद्यार्थिनीला याचा अनुवाद करायला सांगितला. पुढे भांडसरांना हे सांगितल्यानंतर त्यांनी हा अनुवाद प्रकाशित करण्याची हमी दिली. त्यानंतर या निबंधाबाबत असेच झाले. हिंदी निबंध भांडसरांनी अनुवादासाठी पाठवून दिला आणि ‘मूळ इंग्रजी निबंध तुमचेच विद्यार्थी शोधून काढतील’ असा विेशासही व्यक्त केला. त्यांचा हा विेशास माझ्या जनता दरबारच्या ‘ब्लॅक पँथर्स’नी काही दिवसांतच खरा केला, त्या वेळी साक्षात सयाजीराव महाराज भेटल्याचा आनंद झाला. मला एक ‘संशोधक’ राजा भेटला. त्याचीच ही गोष्ट.

महाराजा सयाजीराव गायकवाड या आधुनिक भारतातील महान आणि विद्वान राजाने ११० वर्षांपूर्वी भारतातील सर्वांत मोठ्या प्रश्नावर The Indian Review मध्ये 'Depressed Classes' हा ऐतिहासिक दुर्मिळ निबंध लिहिला. एक भारतीय राजा विसाव्या शतकाच्या आरंभी अस्पृश्यतेसारख्या भारतातील अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नावर इंग्रजीत गंभीर लेखन करतो, ही बाब एकविसाव्या शतकात चमत्कार वाटावा अशीच आहे. भारतातील राजांची स्थिर झालेली प्रतिमा विचारात घेता, हा निबंध सयाजीरावांच्या दरबारातील एखाद्या विद्वानाने लिहिला असावा, असेच वाटेल. कोणत्याही रूढ चौकटीत न बसणाऱ्या सयाजीरावांच्या व्यक्तिमत्त्वाची वैचारिक बैठक भक्कम होती. या व्यासंगाला जगण्यातील वास्तवाचा आधार होता, डोळसपणे जगभ्रमंतीतून आलेली सृजनशील दृष्टी होती; आपली प्रजा ज्ञानी, सृजनशील आणि जागतिक दर्जाची व्हावी, ही तळमळसुद्धा होती. समाजशास्त्र ही ज्ञानशाखा भारतातील पदवी अभ्यासक्रमात प्रविष्ट होण्याअगोदर दहा वर्षे एक ‘देशी’ राजा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून असा निबंध लिहितो, हेच मुळात अलौकिक.

या निबंधाचा शोध पंडित श्रीराम शर्मा या सयाजीरावांच्या पहिल्या हिंदी चरित्रकारामुळे लागला. बडोद्यातून १९१५ मध्ये प्रकाशित झालेले ‘सयाजी चरितामृत’ या पंडित श्रीराम शर्मालिखित ग्रंथात या भाषणाचा हिंदी अनुवाद उपलब्ध आहे. सयाजीरावांच्या उपलब्ध मराठी १७, इंग्रजी ३ अशा एकूण २० चरित्रांपैकी कोणत्याही चरित्रामध्ये या निबंधाचा संदर्भ आलेला नाही. मात्र, १७९ पानांच्या संक्षिप्त परंतु अतिशय परिणामकारक एकमेव हिंदी चरित्रात हा ऐतिहासिक निबंध उपलब्ध आहे. १९०९ मध्ये प्रकाशित झालेला हा मूळ इंग्रजी निबंध शोधण्याची प्रेरणा या हिंदी चरित्रातील संदर्भामुळे मिळाली.

हा हिंदी चरित्रग्रंथ महाराजा सयाजीराव गायकवाड साधने प्रकाशन समितीचे संशोधन सहायक डॉ.राजेंद्र मगर यांना सापडला. ‘सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकल्पाचे’ प्रवर्तक मा.बाबा भांड यांनी अनुवादकास हा ग्रंथ उपलब्ध करून दिला. इतकेच नाही, तर हिंदी निबंधाचा मराठी अनुवाद करण्याची प्रेरणा आणि संधी दिली. मूळ इंग्रजी निबंध शोधण्यास प्रोत्साहन दिले. इंटरनेटमुळे ही शोधयात्रा सुलभ झाली. हिंदी अनुवादावरून मराठी अनुवाद केल्यानंतर मूळ इंग्रजी निबंध नॅशनल डिजिटल लायब्ररीच्या संकेतस्थळावर सापडला. हिंदी अनुवादात न आलेल्या मजकुराची भर घालून मूळ इंग्रजी निबंधाबरहुकूम सदरचा मराठी अनुवाद नव्याने केला. मूळ इंग्रजी निबंध जुन्या अक्षरजुळणीप्रमाणे असल्याने तसेच जुन्या इंग्रजीतील शब्दांचे अर्थ शोधून मूळ इंग्रजी निबंध नव्याने जुळवण्याच्या खडतर प्रक्रियेतून जाण्याचा नवा सृजनशील अनुभव ऊर्जादायी ठरला.

सयाजीराव गायकवाडांचा ‘अस्पृश्य जाती’ हा निबंध १९०९ मध्ये प्रकाशित झाला. या निबंधाची शब्दसंख्या ३९२६ इतकी होती. भारतात समाजशास्त्र, आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन, तुलनात्मक अभ्यासपद्धती, जागतिक घडामोडींच्या संदर्भात चर्चा या बाबी विद्वानांच्या मुख्य प्रवाही चर्चेत अपवादात्मक असताना या सर्व शिस्तबद्ध आणि शास्त्रीय चौकटीत या प्रश्नांची चर्चा त्यांनी केली आहे. अतिशय संतुलित तरीही परखड, त्याचप्रमाणे एक राष्ट्र म्हणून अस्पृश्यतेच्या प्रश्नाची चर्चा ही या निबंधाची वैशिष्ट्ये आहेत. अगदी संस्कृत संदर्भांचा आधार, धर्माची परिवर्तनशीलता, धर्मधारणांतील वैज्ञानिक दृष्टिकोन, पुरोहितशाहीचे अर्थकारण या बाबी निबंधात केंद्रस्थानी आहेत. अतिशय संवेदनशील बाबी हाताळत असतानासुद्धा चर्चा नकारात्मक न होता सकारात्मक झाली आहे. अगदी वर्णव्यवस्थेचा अंत करणारे गौतम बुद्धसुद्धा अस्पृश्यता नष्ट करण्याच्या प्रयत्नात कसे अपुरे ठरतात, याची चर्चा पुरातत्त्वशास्त्र आणि प्राच्यविद्या बाल्यावस्थेत असतानाच्या पार्श्वभूमीवर वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

हा निबंध तीन भागांत विभागलेला आहे. पहिला भाग अस्पृश्यतेच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीची चर्चा करतो. दुसरा भाग अस्पृश्यतेची व्याप्ती व स्वरूप यावर प्रकाश टाकतो, तर तिसरा भाग या प्रश्नाच्या सोडवणुकीचे उपाय व गरज अधोरेखित करतो. या निबंधाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक विषमतेचे वैश्विक संदर्भ यामध्ये आढळतात. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांसारख्या विदेशी संदर्भांची रेलचेल यामध्ये आढळते. जगभरातील वंशवाद आणि भारतातील अस्पृश्यता यांची स्थलकालसापेक्ष चर्चा स्वतंत्रपणे आणि देशीसंदर्भात कशी घडावी याचा हा निबंध म्हणजे वस्तुपाठ आहे. नव्या पिढीतील संशोधकांना संतुलित आणि सकारात्मक चर्चेचा उत्तम नमुना हा निबंध पुरवतो, ही या निबंधाची समकालीन प्रस्तुतता आहे. भारतीय धर्मशास्त्राची चर्चा संस्कृत ग्रंथापासून ते मध्ययुगीन संत तसेच आधुनिक काळातील अस्पृशोद्धाराचे कार्य करणाऱ्या विविध सुधारणा चळवळी यांचा नेमकेपणाने आढावा घेतला आहे. अगदी लोकसंख्येची आकडेवारीसुद्धा आधार म्हणून वापरली आहे सदर निबंधातील आशय आणि विश्लेषण विचारात घेता, हा समतावादी जातीय ऐक्याचा जाहीरनामा आहे.

संस्थानिक असतानासुद्धा राष्ट्र पुनर्निर्माणाचा विचार आणि कृती करणारा हा राजा खऱ्या अर्थाने भारताचा सार्वकालीन ‘राष्ट्रीय नायक’ ठरतो. लोकांचे विचार, धोरण आणि कृती संतुलित ठेवण्यासाठी त्यांना धर्माचे तुलनात्मक शिक्षण देण्याचा आग्रह धरणारा हा भारतातील एकमेव विद्वान. पुरोहितांसाठी ‘दुष्ट देवदूत’ हे रूपक वापरणारा हा राजा निर्भीड होता. पुरोहितांच्या ज्ञानाची परीक्षा घेऊनच त्यांना धार्मिक विधी करण्याची परवानगी देण्याचा कायदा करणारा हा जगातील बहुधा पहिला शासक असावा. भारतात जेव्हा राजकीय स्वातंत्र्याचा प्रश्न स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी होता, तेव्हा राजकीय स्वातंत्र्याबरोबरच ‘अस्पृश्यतानिवारण’ हा विषय राष्ट्रीय प्रश्न म्हणून हाताळणारा हा पहिला राजा.

आधुनिक भारतात एक राजकीय व्यवस्था म्हणून राज्याच्या मुख्य कार्यक्रमपत्रिकेवरील ‘मुलभूत कार्यक्रम’ हा दर्जा ‘अस्पृश्यतानिर्मूलन’ या प्रश्नाला देणारा पहिला राजा म्हणून सयाजीरावांच्या कामाची दखल घ्यावीच लागेल. वयाच्या १४व्या वर्षापासून मृत्यूपर्यंत अखंड ६२ वर्षे हा राजा या प्रश्नाला भिडत राहिला. राज्यकारभाराचा हीरकमहोत्सव १९३६मध्ये साजरा करताना खासगी फंडातून अस्पृश्यता उद्धारासाठी एक कोटीचा निधी राखून ठेवण्याचे दातृत्व हा त्यांच्या बांधिलकीचा पुरावा आहे. सयाजीरावांच्या या अद्वितीय कामाची दखल जगाला आता घ्यावी लागेल आणि भारताचा इतिहास नव्याने रचावा लागेल, ही जाणीव हा शोधनिबंध निर्माण करतो.

‘अस्पृश्यतायुक्त भारत’ हा राष्ट्रीय आत्महत्येकडे जाण्याचा मार्ग आहे, हा सिद्धांत हे या अद्वितीय शोधनिबंधाचे क्रांतिकारक योगदान आहे. या निबंधाच्या आधारे अधिक संशोधन झाले, तर भारतातील जातीय विषमतानिर्मूलनाचा नवा कृती कार्यक्रम तयार होईल. म्हणूनच हा निबंध जातिप्रश्नाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणून ठेवणे, ही नव्या पिढीची जबाबदारी राहील. तसेच आजही सयाजीरावांच्या या निबंधातील चिंतन सहिष्णू भारताचे अपूर्ण चित्र पूर्ण करण्यासाठी उपकारक ठरेल.

दिनेश पाटील

dineshpatil1942@gmail.com

(लेखक यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर येथे समाजशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.)

Share on Social Media

विज्ञान

आजचे वास्तव आणि वंचितांच्या मागण्या

हेमंत गोळे

पाणी आणि वीज यांचा किमान पुरवठा अल्प किमतीमध्ये करण्याचे दिल्ली येथील आप सरकारचे धोरण नैसर्गिक संपत्तीच्या किमान वाट्याच्या मागणीला पुष्टी देणारे आहे. माणसे अर्थव्यवस्थेमधून बेदखल होत आहेत, यावर चालत आलेला प्रचिलत मार्ग म्हणजे दुष्काळी कामे- रोजगार हमी कायदा- मनरेगा- हीच रेषा पुढे ओढून युनिव्हर्सल बेसिक इन्कम या कल्पनेपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. ही वाट तशी वहिवाटली गेलेली आहे. परंतु नैसर्गिकस्रोतांचे खासगीकरण ही समस्या तशी नवी. यावर इलाजही नवीनच शोधावे लागतील. युनिव्हर्सल बेसिक इन्कमप्रमाणेच किमान नैसर्गिक स्रोत हे प्रत्येक नागरिकाला कायदेशीर हक्क म्हणून मिळाले पाहिजेत. यापैकी जमीन या स्रोताच्या वाटणीचा उपहास करण्याची अर्थतज्ज्ञांमध्ये पद्धत आहे, परंतु जैवभाराचा पुनर्वापर आणि विज्ञानाधारित सघन शेती यांच्यामधून दिसणाऱ्या शक्यता ते विचारात घेत नाहीत.

औद्योगिक सभ्यतेकडून झालेला अपेक्षाभंग :

औद्योगिकीकरणाने मनुष्यजातीला एक आशा दाखविली होती. निरनिराळ्या रूपांमधील गुलामगिरी नष्ट होईल, सर्व माणसांना प्रगतीची समान संधी मिळेल- इत्यादी. युरोपमध्ये हे प्रत्यक्षात घडले; पण जे घडले, ते केवळ या नव्या सभ्यतेमुळे घडले नाही. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात झालेल्या स्थलांतरांचा याला मोठा हातभार लागलेला आहे, हे विसरता येणार नाही.

तसेच तिसऱ्या जगामधील असंख्य कारागिरांना बेकारीच्या खाईत सोडण्यास ही सभ्यता जिम्मेदार होती, हेही विसरता येणार नाही. औद्योगिक सभ्यता, तिची आर्थिक साधने (बँका, शेअर बाजार इ.) भारतात अवतरून सव्वाशे वर्षे तरी लोटली आहेत; पण अजूनही भारतामधील ४० टक्के लोक शेतीवरच अवलंबून आहेत. अमेरिकेशी तुलना केली तर असे दिसते की, तेथे केवळ ३ टक्के लोक शेती करतात.

उत्पादकांची ही प्रचंड संख्या, त्यांच्या व्यवसायांचे स्वरूप (विखुरलेल्या सूर्यप्रकाशावर अवलंबून असणारा व्यवसाय) त्यांना विस्कळीत ठेवतो. त्यामुळे बाजारपेठ हा त्यांच्यासाठी कायमच जुगार ठरतो. ग्रामीण भागांमधून नगरांकडे स्थलांतरित माणसांची अवस्थाही सुस्थिर नाही. मुख्यत्वेकरून डर्टी, डेंजरस आणि डिफिकल्ट कामे या स्थलांतरितांच्या वाट्याला येत आहेत. ही थ्रीडी म्हणजे डर्टी, डेंजरस आणि डिफिकल्ट कामे कोणाच्या वाट्याला येतात? याकडे लक्ष दिले तर समजून येते की, जुनी गुलामगिरी भारतात तरी संपलेली नाही.

औद्योगिक सभ्यता ही ऊर्जेच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. तिची दिशा स्वयंचलीकरणाकडे (ऑटोमेशन) आहे, त्यामुळे माणसांना रोजगार देण्याची तिची क्षमता उत्तरोत्तर कमी होत चालली आहे. माणसांच्या शक्तीची गरज खनिज ऊर्जेने भरून काढल्यामुळे हे शक्य होत आहे. याचा एक परिणाम म्हणजे गुलामांची गरज राहिलेली नाही. पण दुसरीकडे त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. रोजगारविरहित गुंतवणूक हे शब्द आता आपल्याला वारंवार ऐकायला मिळत आहेत. संपत्ती (म्हणजे उपभोग्य वस्तू आणि सेवा) निर्माण तर होते आहे, कधी नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते आहे; त्यासाठी आता मानवी श्रमशक्तीची गरज कमी-कमी होत चालली आहे. हे केवळ उद्योगांमध्येच घडत नाही, तर शेतीतदेखील घडत आहे. शेती उत्पादनामधील आवश्यक ऊर्जा आता माणसे व पाळीव प्राणी यांच्या श्रमशक्तीऐवजी खनिज तेलासारख्या संचित ऊर्जास्रोतांपासून मिळविली जात आहे. यामुळे असे कबूल करावे लागते आहे की, औद्योगिक सभ्यतेने दाखविलेल्या आशा फोल ठरत आहेत. ऐतिहासिक काळापासून जे मानवसमूह वंचित राहिलेले आहेत, त्यांच्यावर तसेच शेतकऱ्यांवर या परिस्थितीचा सर्वांत वाईट परिणाम होत आहे. रोजगाराच्या संधी नाकारल्यामुळे माणसे बेदखल होत आहेत.

औद्योगिक सभ्यतेमुळे अटळपणे होणारे केंद्रीकरण

औद्योगिक सभ्यतेचा दुसरा परिणाम म्हणजे नैसर्गिक संपत्तीचे केंद्रीकरण होते आहे. निसर्गाने पाण्याचे वाटप समान केलेले नाही, हे खरे आहे. समन्यायी पाणीवाटप हा त्यावरील इलाज आहे. सभ्यतेला सुरुवात झाली तेव्हापासून माणसे या उपायाचा अवलंब करीत आलेली आहेत. उदा. तमिळनाडूमधील ग्रँड ॲनिकट. तमिळनाडू हा काही विपुल पर्जन्याचे वरदान लाभलेला प्रदेश नाही. पश्चिम घाटमाथ्यावर पडणारा जलसंभार कावेरी नदीद्वारा तमिळनाडूमध्ये उपलब्ध होतो. अठराशे वर्षांपूर्वी चोल राजांनी त्यावर ॲनिकट म्हणजे बांध बांधला. यामुळे पाण्याचा साठा होत नाही, तर नदीमधून वाहणारे पुराचे पाणी बाजूंच्या कालव्यांमध्ये वळविता येते. या कालव्यांद्वारे हे पाणी पुन्हा मोठ्या शेतीक्षेत्रावर पसरविले जाते.

गेल्या वर्षी केरळ राज्यात महापूर आले, तसेच कर्नाटकच्या काही भागांतही आले होते. तमिळनाडूमध्ये पूर आले नाहीत, कारण कालव्यांच्या जाळ्यामुळे पाणी पसरविले गेले. कालव्यांमध्येच मोठ्या प्रमाणात पाणी सामावले गेले. पुरांपासून बचाव करण्यासाठी कालव्यांचे अतिप्रचंड जाळे निर्माण करण्यास चीनमध्ये दोनेक हजार वर्षांपासून सुरुवात झाली. आजमितीला हे जाळे दोन लाख मैल लांबीचे आहे. चीनमधील नद्यांच्या मैदानावर असे एकही शेत नाही की, ज्याच्या एका बाजूस तरी कालवा नाही. याच कालव्यांचा उपयोग वाहतुकीसाठी होतो. कालव्यांचा तळ खरवडून हा गाळ सतत शेतात पसरला जातो, त्यामुळे कालवे खुले राहतात.

ब्रिटिश काळात भारतात जे सिंचन प्रकल्प झाले, त्यांची या प्राचीन प्रकल्पांबरोबर तुलना करून बघावी. पाणी या नैसर्गिक स्रोताचा लाभ जास्तीत जास्त क्षेत्रावर पोहोचविण्यापेक्षा अतिशय मर्यादित क्षेत्राला त्याचा लाभ मिळवून देण्याचे धोरण होते, हे त्यामधून दिसून येईल. पाणी अशा तऱ्हेने केंद्रित केले, तर त्यावर ऊस तरी पिकतो किंवा शहर तरी वाढते. पश्चिम घाटमाथ्यावर पडून पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी विपुल आहे. तमिळनाडूमधील रामनाड संस्थानच्या दिवाणाने हे हेरले, पण हे पाणी पूर्वेकडे वळविण्याची कल्पना व्यवहार्य असली तरी ती अमलात आणणे त्यांना शक्य नव्हते, कारण हा घाटमाथा होता त्रावणकोर संस्थानमध्ये! ब्रिटिश सरकारने यात लक्ष घातल्यावर हे शक्य झाले.

घाटमाथ्यावर पडून वाहून जाणारे पाणी एक धरण आणि एक कालवा यांद्वारे पूर्वेकडील अवर्षणग्रस्त प्रदेशाकडे वळविण्यात आले. हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. यानंतर ३५-४० वर्षांनी टाटांनी टाटा जलविद्युत्‌ची कल्पना मांडली. नैसर्गिकरीत्या पूर्वेकडे वाहणारे पाणी ८० इंचांहून जास्त पाऊस पडणाऱ्या कोकणाकडे वळविणे आणि त्यावर ४५० मेगावॉट वीज निर्माण करणे, असे या योजनेचे स्वरूप आहे. उन्हाळ्यात एसी वापरामुळे मुंबई शहराचा विजेचा वापर वाढतो. हा वाढीव वापरदेखील ४५० मेगावॉटपेक्षा जास्त आहे. यासाठी किती पाणी वळविण्यात आले? फार नाही- फक्त ५२ अब्ज घनफूट.

पुणेपद्धतीने वापरले तरी पुण्याच्या तीनपट लोकसंख्येला पुरेल एवढे पाणी! त्यानंतर कोयना योजना झाली. या योजनेमुळेदेखील पूर्वेकडे वाहणारे पाणी पश्चिमेकडे वळविले गेले. किती पाणी वळविले गेले? सध्या ६७ अब्ज घनफूट. पुणे शहराच्या गरजेच्या चारपट! वीजनिर्मिती? १९५० मेगावॉट. टाटा आणि कोयना यांची एकित्रत जलविद्युत्‌निर्मिती राज्याच्या एकूण निर्मितीच्या फार तर 8 टक्के. आणि पाण्याचा वापर? ११९ अब्ज घनफूट आणि तेदेखील सर्वांत खात्रीचे अप्रदूषित पाणी. या योजना म्हणजे म्हणे भाग्यविधात्या योजना!

घाटांच्या पश्चिमेकडील कोकणात ८० इंच पाऊस पडतो, तर पूर्वेच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात १५ इंच. कित्येक दशकांपासून या प्रदेशामधील माणसांची पाण्याविना दैना उडत आहे. पण पूर्वेकडील लोकांचे हे हक्काचे पाणी सरकार परत करायला काही तयार नाही. टाटांच्या योजनांच्या अवजलावर बदलापूर, उल्हासनगर यांसारख्या नगरांचा म्हणे हक्क निर्माण झाला आहे. कोयनेचे अवजल तर सरकार मुंबईलाच नेऊ इच्छित आहे. या योजना मुलापेरियारच्या बरोबर उलट काम करणाऱ्या आहेत. घाटमाथ्यावर पडून चिंचोळ्या किनारपट्टीमधून कोणाच्याच उपयोगी न पडता समुद्रात वाहून जाणारे पाणी मुलापेरियरने अवर्षणग्रस्त प्रदेशाकडे वळविले, उपयोगास आणले. अवर्षणग्रस्त प्रदेशाला उपयोगी पडेल असे पाणी टाटा, कोयना योजना महामूर पाऊस पडणाऱ्या प्रदेशाकडे वळवितात. नदी म्हणजे पाणी या नैसर्गिक स्रोताचे निसर्गाने केलेले केंद्रीकरण!

सध्याची व्यवस्था याचे अजून केंद्रीकरण करू बघत आहे. सरकार लोकांना जणू सांगत आहे की- तुमची गावे, शेतीवाडी, सर्व काही सोडून (मुंबई, ठाणे, रायगड) मध्ये या! झोपडपट्‌ट्यांमध्ये राहा. जमीन वा तेथील निसर्गसंपत्तीवर शहरी जमीनदारांनी आधीच कब्जा केलेला आहे. शहरांत या, कष्ट करा आणि या शहरी जमीनदारांचे खिसे भरा! औद्योगिक सभ्यता आणि तिच्यामधून होणारी केंद्रित व्यवस्था चालण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते, जी संचित अशा खनिज साधनांपासूनच उपलब्ध होऊ शकते. माणसांच्या या केंद्रीकरणामुळे निर्वाहासाठी लागणाऱ्या ऊर्जेत प्रचंड वाढ झाली आहे. कारण अन्नाची निर्मिती आणि वापर एकमेकांपासून जास्त-जास्त दूर अंतरांवर होत जातो.

अमेरिकेसारख्या प्रगत देशात शेकडो मैलांच्या प्रवासात एकही शेत न भेटणे आणि मनुष्यवस्ती अतिशय विरळ असणाऱ्या प्रदेशांत मैलोगणती शेतांशिवाय काहीच नसणे, हे सर्रास अनुभवण्यास मिळते. शेतात तयार झालेले अन्न माणसांपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचा शेकडो मैलांचा प्रवास झालेला असतो. त्यासाठी आवश्यक ऊर्जा विरळ सूर्यप्रकाशामधून मिळविणे काही शक्य नाही. ती संचित अशा खनिज ऊर्जास्रोतांमधूनच मिळवावी लागते. केवळ ३ टक्के माणसांकडून अन्ननिर्मिती व्हायची असेल, तर त्यासाठी मोठमोठी यंत्रे लागतात आणि त्यांसाठी ऊर्जा लागते. ती ऊर्जा विरळ सूर्यप्रकाशापासून मिळविणे शक्य नाही. त्यासाठीही खनिज ऊर्जा वापरावीच लागते. याउलट बैल-घोड्यांवर आधारलेल्या शेतीमध्ये ही ऊर्जा सूर्यप्रकाशामधूनच मिळविली जाते. हे प्राणी अन्नासाठी माणसांशी स्पर्धा करीत नाहीत.

सौरऊर्जा वापरण्याची ही तावून-सुलाखून निघालेली पद्धत आणि आता निघालेला सौरविजेचा मार्ग- दोहोंचा प्रत्यक्ष वापर वा तुलना करून बघितली पाहिजे. अमेरिकन माणूस रस्त्याने केवळ चालला तरी त्यासाठी शरीराकडून ऊर्जा खर्च होते. ती ऊर्जा शरीर मिळवणार कोठून? तर, सेवन केलेल्या अन्नामधून. पण ते अन्न निर्माण करून त्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी बरीच ऊर्जा आधीच खर्च झालेली असते. याचा अर्थ असा की, अमेरिकन माणूस रस्त्याने चालला तर रस्त्याने चालणाऱ्या भारतीय माणसापेक्षा जास्त ऊर्जा खर्च होते. ‘गॉड्‌स मस्ट बी क्रेझी’ या सिनेमात कलहारी वाळवंटातील अश्मयुगीन माणसांचे दर्शन होते. त्यांचे अन्न निर्माण होण्यासाठी कणभरही खनिज ऊर्जा खर्च झालेली नसते. त्यामुळे त्यांच्याशी तुलना केली तर भारतीय माणसाचे साधे चालणे हे ऊर्जेच्या दृष्टीने फारच खर्चिक ठरते.

अमेरिकन माणूस रस्त्याने (अमेरिकेतील अन्न खाऊन) चालला, तर किती ऊर्जा खर्च होत असेल याचा अभ्यास झालेला आहे. निष्कर्ष असा आहे की, त्या माणसाने भल्या मोठ्या, जास्त अेशशक्तीच्या नमुनेदार अमेरिकन चारचाकीमधून प्रवास केला तर खर्च होणारी (पेट्रोलमधील) ऊर्जा चालण्यासाठी खर्च होणारे अन्न निर्माण करून त्याच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जी ऊर्जा खर्च झाली, तिच्यापेक्षा कमी असते. चारचाकीने प्रवास करणे हे चालण्यापेक्षा (ऊर्जेच्या बाबतीत) स्वस्त पडते. आपण कदाचित या बाबतीत अमेरिकेला गाठणार नाही, पण प्रवासाची दिशा तीच आहे.

नागरीकरणाला विरोध अजिबातच नाही; महा- नागरीकरणाला विरोध केलाच पाहिजे, कारण अशा वस्त्यांना तग धरून राहणे हे संचित अशा खनिज ऊर्जेशिवाय शक्य नाही. खनिज ऊर्जा नसताना भारतात शहरे होती. आतासारखी सलग आणि दाट वस्तीची नव्हती, तरीही ८ लाखांपर्यंत वस्तीची शहरे ब्रिटिशपूर्व भारतात होती. त्यांचा निर्वाह आतापेक्षा कमी ऊर्जेत चालत होता.

औद्योगिक सभ्यतेमुळे समाजामधील बहुजनांची दुरवस्था होते, त्यावरील इलाज :

समाजामधील बहुजनांना ना या अर्थव्यवस्थेत स्थान आहे, ना त्याच्याकडे जमीन अथवा पाणी यांसारखी साधने आहेत. काही जणांकडे जमीन आहे, पाणी नाही. या प्राप्त परिस्थितीमध्ये बहुजनांकडे काय उपाय आहे?

१. निरनिराळ्या प्रकारच्या नैसर्गिक संपत्तीमध्ये किमान वाटा मिळिवणे.

२. मानवनिर्मित संपत्तीमध्ये किमान वाटा मिळिवणे.

नैसर्गिक संपत्तीमध्ये वाटा मिळविणे म्हणजे किमान जमीन, त्यावरील अवकाश, सूर्यप्रकाश यांच्यामध्ये वाटा मिळविणे. किमान काही पाण्यावर हक्क मिळविणे. पाणी पंचायतचे विलासराव साळुंके यांनी भूमिहीनांचादेखील किमान पाण्यावर हक्क असल्याची भूमिका मांडली होती, याची येथे आठवण करून देणे आवश्यक आहे. जमीन, पाणी, अवकाश आणि सूर्यप्रकाश यांमधून स्वतःच्या परिवारासाठी आवश्यक ते अन्न मिळविणे. मानवनिर्मित संपत्तीमध्ये वाटा मिळविणे म्हणजे किमान आर्थिक उत्पन्नावर हक्क मिळविणे. त्यासाठी मनरेगासारखा रोजगारहमीचा मार्ग आहे. युनिव्हर्सल बेसिक इन्कम ही कल्पना आता चर्चेत आहे. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, या मागण्या काही तरी अवास्तव, भंपक मागण्या नाहीत. प्रगत देशांमध्ये ‘डोल’ म्हणून ओळखला जाणारा युनिव्हर्सल बेसिक इन्कम अस्तित्वात आहे आणि भारताची वाटचाल जर प्रगत देशांच्या पंक्तीला बसण्याच्या दिशेने चालू असेल, तर सक्तीच्या बेरोजगारीवरील त्यांनी स्वीकारलेल्या उपायासारखा कोणता तरी उपाय स्वीकारणे अटळ असेल.

पाणी आणि वीज यांचा किमान पुरवठा अल्प किमतीमध्ये करण्याचे दिल्ली येथील आप सरकारचे धोरण नैसर्गिक संपत्तीच्या किमान वाट्याच्या मागणीला पुष्टी देणारे आहे. माणसे अर्थव्यवस्थेमधून बेदखल होत आहेत, यावर चालत आलेला प्रचिलत मार्ग म्हणजे दुष्काळी कामे- रोजगार हमी कायदा- मनरेगा- हीच रेषा पुढे ओढून युनिव्हर्सल बेसिक इन्कम या कल्पनेपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. ही वाट तशी वहिवाटली गेलेली आहे. परंतु नैसर्गिकस्रोतांचे खासगीकरण ही समस्या तशी नवी. यावर इलाजही नवीनच शोधावे लागतील. युनिव्हर्सल बेसिक इन्कमप्रमाणेच किमान नैसर्गिक स्रोत हे प्रत्येक नागरिकाला कायदेशीर हक्क म्हणून मिळाले पाहिजेत. यापैकी जमीन या स्रोताच्या वाटणीचा उपहास करण्याची अर्थतज्ज्ञांमध्ये पद्धत आहे, परंतु जैवभाराचा पुनर्वापर आणि विज्ञानाधारित सघन शेती यांच्यामधून दिसणाऱ्या शक्यता ते विचारात घेत नाहीत. या शक्यता गेली सव्वाशे वर्षे तरी डोळस माणसांना निश्चितपणे दिसत आहेत. ‘फील्ड्‌स फॅक्टरीज अँड वर्क शॉप्स’ हे क्रोपोटकिनचे पुस्तक १८९९ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकात या नव्या शेतीच्या उत्पादकतेचे दर्शन त्याने घडविले आहे.

कारखाना आणि शेत या दोन्ही उत्पादनव्यवस्था आहेत. त्यांमध्ये फरक कोणता आहे? तर, प्रक्रियेवरील ताबा! कारखान्यांमधील उत्पादनात त्याबद्दल एक टोक गाठले गेले आहे, तर शेती रामभरोसे! शेतीमधील उत्पादनावर परिणाम घडिवणाऱ्या विविध घटकांबाबत आता विज्ञानामुळे आपल्याला बरीच जास्त माहिती मिळालेली आहे. मातीतील सूक्ष्म जीव, सूर्यप्रकाश, तापमान, वारा, कर्बद्विप्राणिल वायू या सर्व घटकांचा पिकांवर कसा परिणाम होतो, हे आता विज्ञानाने आपल्याला नेमकेपणे सांगितले आहे. या सर्व घटकांचा सुयोग्य वापर आणि तोही कमी पर्यावरणीय किंमतीत कसा करायचा, पूर्ण प्रक्रियेवरच ताबा मिळवून ती कारखान्यांमधील प्रक्रियेच्या जवळ कशी न्यायची- हे यापुढील आव्हान असणार आहे. यामधील शक्यता ज्ञानेेशर बोडके आणि पॉलि-हाऊस शेती करणारे त्यांच्या साथीदारांनी दाखवून दिल्या आहेत. श्री. अ. दाभोलकर यांनी केवळ दहा गुंठे जमिनीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या जोरावर पाच माणसांच्या कुटुंबाचे अन्न निर्माण होणे शक्य आहे असे मांडले, त्यालाही आता काही दशके लोटली आहेत.

मोहोळ तालुक्यामधील अंकोली या गावात वास्तव्य करणारे संशोधक अरुण देशपांडे आणि सुमंगला देशपांडे यांनी स्वानुभवामधून, एका कुटुंबाला निर्वाहासाठी किती निसर्गसंपत्ती आवश्यक आहे याचा ठोकताळा मांडला आहे. त्यानुसार एका कुटुंबाच्या अन्नविषयक गरजा भागविण्यासाठी २० गुंठे क्षेत्र म्हणजे त्यावरील सूर्यप्रकाश पुरेसा आहे. त्यासाठी चांगली सुपीक जमीनच पाहिजे, असेही नाही. या जमिनीवर पसरण्यासाठी १०० घनमीटर गाळ (धरणांत साठून धरणे निकामी करणारा), योग्य असे जंतूंचे विरजण- ज्याला ते मसाला माती म्हणतातअसले की कोणतीही जमीन सुपीक करता येते, असा त्यांचा अनुभव आहे. याच्या जोडीला हुकमी पाणी आवश्यक आहे. किती? देशपांडे याच्या मतानुसार वर्षाला २ हजार घनमीटर (म्हणजे वीस लाख लिटर). मात्र हे पाणी खात्रीचे असले पाहिजे. या वीस गुंठे जागेत एक जिओडेसिक घुमट असेल. त्यात संरक्षित बाग असेल आणि या घुमटामध्येच तीन मजली एक घर असेल. या घुमटाचा १० फूट उंचीपर्यंतचा भाग हा पारदर्शक प्लॅस्टिकने तर उर्वरित घुमट हा सफेद शेडनेटने आच्छादला असेल. यांमुळे जमिनीलगत वाहणाऱ्या उष्ण कोरड्या वाऱ्यापासून पिकांना संरक्षण मिळेल कर्बद्विप्राणिल वायू वाहून जाणार नाही. त्यावरील भागावर शेडनेट असेल. त्यामुळे सूर्यप्रकाशावर ताबा ठेवता येईल. पानमळ्यासारख्या बंदिस्त जागेमधील घर हे पानमळ्यासारखेच एअरकंडिशन्ड असेल.

यांच्या जोडीला, रोज दोन युनिट वीज आणि एक बैल तास जर प्रत्येक कुटुंबाला मिळाला, तर ते कुटुंब रामभरोसे अवस्थेमधून स्थिरतेमध्ये प्रवेश करू शकेल. इंटरनेट आणि टॅबलेट हे उपलब्ध असतील, तर या कुटुंबासाठी सर्व जगाची खिडकी उघडी असेल आणि दूरस्थ पद्धतीने (प्रात्यक्षिकविरहित का होईना ) कोणतेही शिक्षण घेणे या कुटुंबामधील कोणालाही शक्य होईल. यामधील पाण्याची मागणी फारच जास्त आहे, असे वाटते का? हे पाणी या कुटुंबासाठी आवश्यक ते सर्व अन्न निर्माण करण्यासाठी तसेच या कुटुंबाच्या पाण्याच्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी आहे. या आवश्यकतेपैकी जो काही भाग पावसामधून मिळेल तेवढा भाग या २० लाख लिटर्समधून कमी करायचा आहे.

स्वतःचे अन्न न पिकविणाऱ्या माणसाला स्वत:च्या पाण्याच्या वापराचे भान असतेच, असे नाही. स्वतःचा पाण्याचा प्रत्यक्ष वापर एवढाच तो लक्षात घेतो. पाच माणसांच्या शहरी कुटुंबाचा पाण्याचा प्रत्यक्ष वापर वर्षाकाठी २.५ लाख लिटर असू शकतो (माणशी रोज १३५ लिटर या हिशेबाने). यापेक्षा तो खूपच कमीही असू शकतो, कारण काही शहरांना तेवढे पाणी उपलब्धच होऊ शकत नाही. पण या कुटुंबाच्या अन्ननिर्मितीसाठी जे पाणी खर्च झाले, त्याचे बिल तर त्याच्याच नावावर फाडायला हवे ना! एखाद्या कुटुंबाच्या आहारात प्राणिजन्य पदार्थ जादा असतील, तर त्यासाठी जास्त पाणी खर्च झालेले असते. कपड्यांसाठी पाणी खर्च झालेले असते. रेशमी कपड्यांसाठी सुती कपड्यांपेक्षा बरेच जादा पाणी खर्च झालेले असते (रेशीम हा प्राणिजन्य पदार्थ). औष्णिक वीज निर्माण करण्यासाठी दर युनिटला 4.5 लिटर पाणी खर्च झालेले असते.

आपल्या गरजेच्या 80 टक्के खनिज तेल आपल्याला आयात करावे लागते . त्याखालोखालची मोठी आयात सोन्याची! या आयातीचा खर्च भागविण्यासाठी आपल्याला निर्यात करावी लागते. यामधील शेतमाल, मांस आदींच्या निर्यातीसाठी सर्वांत जास्त पाणी खर्च झालेले असते. पण यंत्रे, औषधे, माहिती तंत्रज्ञानामधील निर्यात यासाठीदेखील पाणी खर्च झालेले असतेच. भारताच्या निर्यातीद्वारे किती पाणी भारत निर्यात करतो? गेल्या वर्षीचा आकडा आहे ९५ घन किमी! उजनी जलाशयाची क्षमता आहे तीन घन किमीपेक्षा कमी. म्हणजे उजनी जलाशयाच्या ३२ पट पाणी भारतामधून निर्यात होते. जे लोक आयातीवर आधारलेली उत्पादने वापरतातउदा. पेट्रोल, प्लॅस्टिक, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू- त्यांच्या वापराच्या प्रमाणात, या निर्यात होणाऱ्या पाण्याचे बिल या कुटुंबांच्या नावे तर काढावे लागणार ना! यावरून हे स्पष्ट होईल की, कुटुंबासाठी वर्षाला २० लाख लिटर ही किमान मागणी आहे. कुटुंबाचा पाण्याचा वापर हा त्या कुटुंबाच्या एकूण उपभोगावर अवलंबून आहे. संरक्षित क्षेत्रामधील कामगार (महागाई भत्ता, ठरावीक काळाने मिळणारी पगारवाढ, पे कमिशने, वैद्यकीय खर्च, निवृत्तिवेतन), व्यावसायिक आदींचा पाण्याचा खर्च या २० लाख लिटरच्या किमान मागणीच्या अनेक पट असतो.

माती, पाणी, सूर्यप्रकाश यांव्यतिरिक्त या कुटुंबाला किमान काही रोख रकमेची गरज लागेल. त्यासाठी हे कुटुंब जर बाजारपेठेत उतरले, तर शेतकऱ्यांपेक्षा त्यांची अवस्था वेगळी होणार नाही. ज्ञानेश्वर बोडके यांना जशी हुकमी बाजारपेठ उपलब्ध आहे, तशी सर्वांना असेलच असे नाही. मनरेगा किंवा युनिव्हर्सल बेसिक इन्कम या मार्गांनी ही किमान गरज भागली की, हे कुटुंब सभ्यतेमध्ये प्रवेश करेल. अशा पाच-पंचवीस कुटुंबांच्या वाड्यां (उघडी + झाकलेली शेती = वाडी) ची एक वस्ती बनेल आणि कृषिआधारित उद्योग तसेच माहिती-तंत्रज्ञानक्षेत्रामधील सेवा पुरविणारी औद्योगिक वसाहत त्याभोवती उभी राहू शकेल.

पण देशपांडे पती-पत्नींचा विचार इथपर्यंतच थांबत नाही. स्त्री-पुरुषांमध्ये काही मूलभूत फरक आहे. बाळाला उदरात वाढविण्यापासून स्त्रीने ज्या खस्ता खाल्लेल्या असतात, त्यामधून स्त्री-पुरुषांची भिन्न मानसिकता तयार होते. स्त्रीची तिच्या कुटुंबाप्रतीची निष्ठा अतिशय दृढ असते. पुरुष एक वेळ पुढचा-मागचा विचार न करता सर्वस्व पणाला लावू शकतो/गमावू शकतो. स्त्री असा जुगार खेळत नाही. ‘कुपुत्र संभवतो, पण कुमाता संभवत नाही’ असे संस्कृतमध्ये वचन आहे, ते खरेच आहे. त्यामुळे या वाडीची- द्रौपदीच्या थाळीची मालकी स्त्रीकडेच असावी असा त्यांचा आग्रह आहे.

त्यांचे म्हणणे रास्त आहे, असे मला वाटते. समाजामधील या बेदखल कुटुंबांच्या अस्तित्वाबद्दलच्या विवंचना दूर केल्यावर त्याच्या सृजनशीलतेला खराखुरा बहर फुटेल. माणसे म्हणजे संकट नव्हे तर संपत्ती, हे खरेच आहे. पण केव्हा? तर, जगण्याच्या विवंचना दूर झाल्यानंतर! उद्याचे दोन हंडे पाणी कोठून आणायचे, उद्याचे जेवण कुठून यायचे- हे प्रश्न शिल्लक राहणार नाहीत, तेव्हा! यानंतर जी साधनसामग्री उपलब्ध राहील ती साधनसंपत्ती महासत्ता बनणे, विेशगुरू बनणे, पन्नास लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणे वगैरे स्वप्नांच्या पूर्तीसाठी वापरली जावी. वासरा-लेकरांच्या तोंडचे दूध काढून घेऊन गाभाऱ्यात ओतले तर गाभारा भरत नाही. सर्वांची क्षुधा- तृष्णा शांत करून उरलेल्या दुधावरच देव संतुष्ट होतो, हा पारंपरिक शहाणपणा आहे.

अर्थशास्त्रज्ञांच्या नादाने तो टाकून देऊ नये.

हेमंत गोळे

hemantgole1@gmail.com

Share on Social Media

वृत्तांत

महात्मा गांधी शक्य आहेत का?

समीर शेख

मुंबईतील के.सी. कॉलेजचा इतिहास विभाग आणि सेवाग्राम कलेक्टिव्ह यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘इज गांधी पॉसिबल?’ (गांधी शक्य आहेत का?) या दोन दिवसीय परिषदेतून ३० व ३१ ऑगस्ट 2019 रोजी महात्मा गांधीजींच्या अनेक अलक्षित पैलूंवर चर्चा करण्यात आली. ‘गांधी १५०’ निमित्त वर्षभरापासून आयोजित होत असलेल्या परिषदा, चर्चासत्रे यांमध्ये ‘गांधी शक्य आहेत का?’ ही बहुरूपी गांधींच्या व्यक्तिमत्वातील दुर्लिक्षित पैलूंचा, विचारांचा वेध घेणारी परिषद वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती विषयांमुळे आणि वक्त्यांमुळे. या परिषदेचे आयोजन करून गांधीजींची १५०वी जयंती खऱ्या अर्थाने साजरी केल्याबद्दल निमंत्रक डॉ.श्याम पाखरे आणि के.सी. कॉलेजचे गांधी अभ्यासकांनी आभार मानायला हवेत.

महात्मा गांधी यांच्या जयंतीला १५० वर्षे होत असल्यामुळे देशभर विविध कार्यक्रम, परिषदांची रेलचेल पाहायला मिळत आहे. गांधीजींविषयी जुजबी माहिती नाही, असा मनुष्य या देशात औषधालाही सापडणार नाही. त्यामुळे गांधीजींविषयीच्या अशा कार्यक्रमांची संख्या प्रचंड असली, तरी अनेकदा सर्वश्रुत आणि लोकप्रिय माहितीचाच पुनरुच्चार करण्यात बऱ्याच कार्यक्रमांचा वेळ खर्ची पडतो. त्यामुळे या ‘अशा परिषदांची फलनिष्पत्ती काय?’ असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

गांधीच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू असले, तरी बऱ्याचदा त्यातील अनेक अज्ञात आणि अलक्षित पैलूंकडे लक्ष देता यावे यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमधून ते साध्य होईलच याची शाश्वती नसते. मात्र या भाऊगर्दीतही काही कार्यक्रम व परिषदा अनेक कारणांमुळे वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. त्यात सहभागी होणाऱ्या मंडळींनाही गांधीजींविषयी नवीनच काही तरी हाती लागल्याचा आनंद होत असतो. ‘युरेका, युरेका’ म्हणतच ही मंडळी परिषदेतून बाहेर पडतात. ‘गांधी १५०’ निमित्ताने आयोजित केलेल्या अशाच दोन दिवसीय परिषदेला उपस्थित राहण्याची संधी आणि गांधीबाबाच्या व्यक्तिमत्त्वातील बहुविध पैलूंना समजावून घेण्याची संधी मिळाली.

निमित्त होते ३० आणि ३१ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईमधील प्रसिद्ध के.सी. कॉलेजच्या इतिहास विभागाने आणि सेवाग्राम कलेक्टिव्ह यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘इज गांधी पॉसिबल?’ (गांधी शक्य आहेत का?) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे. ‘द हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलिजिएट बोर्ड’ या 1921 मध्ये स्थापन झालेल्या संस्थेद्वारे फाळणीनंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात जवळपास अनेक शैक्षणिक संस्था उभारण्यात आल्या; आजच्या घडीला त्यांची संख्या २१ आहे. प्रसिद्ध समाजसेवक शेठ किशीनचंद चेल्लाराम (के.सी.) यांच्या देणगीतून उभे राहिलेले महाविद्यालय म्हणजे चर्चगेट येथील के.सी. कॉलेज.

या महाविद्यालयाच्या ‘सुंदरी आणि रमा वाटुमूल’ सभागृहात ‘इज गांधी पॉसिबल?’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. चारशे ते पाचशे लोक सहजपणे मावतील असे ते भव्य दुमजली सभागृह होते. उद्‌घाटन सत्राच्या आधीपासूनच सर्व जण (यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या साहजिकच अधिक होती) सभागृहात उपस्थित होते. परिषदेच्या उद्‌घाटनासाठी तिबेटी निर्वासित सरकारचे माजी पंतप्रधान समधोंग रिंगपोचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक आशिष नंदी हे मुख्य वक्ते होते. त्यांच्यासोबत सेवाग्राम कलेक्टिव्हचे डॉ.सुगन बरंठ, संस्थेचे पदाधिकारी आणि महाविद्यालयाच्या प्रा.डॉ. हेमलता बागला उपस्थित होत्या.

डॉ.बागला यांनी या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या, ‘‘देशात शांतता प्रस्थापित करावयाची असेल, तर विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांच्याच नव्हे तर अशा परिषदांच्या माध्यमातून ज्ञान मिळायला हवे.’’

सहभाग झालेल्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्याच ‘टेक-सॅव्ही’ भाषेत समजावून सांगत संस्थेचे ट्रस्टी अनिल हरीश यांनी गांधींचे आयुष्य आणि कर्तृत्व सोशल मीडियातील उदाहरणाद्वारे समजावून दिले. ते म्हणाले, ‘‘ज्याप्रमाणे आपण ख्रिस्तपूर्व काळ म्हणतो, तसे गांधी यांच्या काळाला आपण इंटरनेटपूर्व म्हणू. त्या काळात गांधीजींचे फेसबुक पेज असण्याचा प्रश्नच नव्हता, मात्र संपूर्ण विश्वच जणू त्यांचे फॉलोवर्स होते. त्यावर फेक अकाउंट्‌स नव्हते आणि कोट्यवधी लाइक्स होते, जे आजतागायत वाढतच आहेत.’’ साहजिकच या वाक्यावर तरुण विद्यार्थ्यांच्या टाळ्या पडल्या.

प्रमुख पाहुणे समधोंग रिंगपोचे यांनी मार्टिन ल्युथर किंगचे वाक्य उद्‌धृत करत इशारा दिला, ‘‘सध्या आपल्यासमोर अहिंसा की अस्तित्वाचा नाश हे (nonviolence and non-existence) हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत.’’ पुढे ते म्हणाले की ‘गांधी शक्य आहेत का?’ याऐवजी ‘गांधीना असे शक्य करून दाखवू’ यावर चर्चा करणे आवश्यक आहे. सर्वांचीच उत्सुकता लागून राहिली होती ती मुख्य वक्ते आशिष नंदी यांना ऐकण्याची. वृद्धापकाळाकडे झुकलेले नंदी यांनी बसूनच बोलणे पसंत केले आणि माईक समोर आल्यावर चांगले पाऊण तास बोलले. भाषणात सुसूत्रता नसली आणि बोलताना अनेकदा संदर्भ विसरत असले, तरी नंदी यांचे भाषण दर वेळीप्रमाणेच ‘चमचमीत’ झाले.

गांधींविषयी तीन दृष्टिकोन त्यांनी आपल्या भाषणात मांडले. गांधींच्या उद्याच्या पूर्वीच रवींद्रनाथांनी आपल्या साहित्यातून गांधींसारख्या महापुरुषाचा राजकीय पटलावर उदय होईल, याचे भाकीत केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी ‘रवींद्र साहित्याचे’ दाखले त्यांनी दिले. रवीन्द्रनाथांचे राष्ट्रवादाविषयीचे मत सांगतानाच त्यांनी राष्ट्रवाद आणि देशभक्ती यांच्यामधील फरक व अंतर समजावून सांगितले. परस्परांचा आदर, सहसंबंध आणि सामाईक गोष्टींचा सततचा शोध हीच भारतीय संस्कृती असल्याचे सांगत, भारतावर घोंगावनाऱ्या ‘मर्दानी राष्ट्रवादाचे’ धोके त्यांनी आपल्या भाषणातून पटवून दिले. महाराष्ट्रात बोलत असल्यामुळे सावरकरांचा उल्लेख करत असल्याचे त्यांनी सांगितले आणि सावरकरांच्या विचारधारेवर जहरी टीका केली.

नंदींच्या भाषणात साहित्याचे अनेक दाखले आले होते. तत्कालीन राजकीय विचारधारा, त्यामुळे तयार झालेली परिस्थिती यांवर त्यांनी दिलखुलास भाष्य केले होते. त्यातच पुढच्या सत्राचा विषय आणि पाहुणे पाहता, हे सत्रही ‘पोलिटिकली चार्ज्ड’ राहणार होते. ‘खरी भारतीय संस्कृती पुन्हा रुळावर आणण्यासाठी’ हा पहिल्या सत्राचा विषय होता. त्यात सहभागी झालेले अशोक वाजपेयी, मल्लिका साराभाई, प्रा. अपूर्वानंद आणि गणेश देवी हे आपल्या राजकीय-सामाजिक भूमिका व जाणिवांसाठी प्रसिद्ध असणारी मंडळी होती.

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी भारतीय संस्कृतीत विरोधी विचारांचा आदर करण्याच्या परंपरेचा उल्लेख केला. राजकीय व सामाजिक पटलावर खोटारडेपणाला जागा मिळाली असून तिथे सत्याची स्थापना करायला हवी, असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक सौहार्द हा गांधींच्या आयुष्यातील अविभाज्य घटक होता, त्यासाठीच ते लढले आणि प्राणार्पण केले याची आठवण त्यांनी या वेळी करून दिली. उपस्थितांनी पहिल्यांदाच इतकी सुंदर आणि अस्खलित हिंदी ऐकली असावी. सभागृहात ‘हिंग्लिश’ बोलणाऱ्यांची संख्या अधिक असूनही वाजपेयी यांच्या खुमासदार भाषणाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

प्रसिद्ध नृत्यांगना आणि समाजसेविका मल्लिका साराभाई पुढच्या वक्त्या होत्या. देशात हिंदीचा अवाजवी आग्रह धरला जातोय, मी मात्र जाणीवपूर्वक इंग्रजीतच बोलेन- असे म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. देशात धर्मांधता प्रचंड वाढली असून विरोधी विचार व्यक्त करणाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा नवा ट्रेंड आला आहे, काहींचे खूनही केले जात आहेत, असे त्या म्हणाल्या. ‘अमानवीय शक्तींना निर्भयपणे तोंड देण्याची शिकवण गांधींनी आपल्या अनुयायांना आयुष्यभर दिली. आपण स्वतःला त्यांचे अनुयायी म्हणत असू, तर या धर्मांध शक्तींचा मुकाबला निर्भयपणे केला पाहिजे.’ असे आवाहन करताना मल्लिका साराभाई कमालीच्या भावुक झाल्या होत्या.

दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते अपूर्वानंद यांनी तत्कालीन राजकीय परिस्थितीवर आसूड ओढले. देशातील मुस्लिम समाजातील चलबिचल त्यांनी उदाहरणांद्वारे समजावून सांगितली. जम्मू-काश्मीर व आसाममधील परिस्थिती पाहून इथे तुमच्यासमोर सुखासीनपणे बोलायला लाज वाटत असल्याचे दु:ख त्यांनी बोलून दाखवले. काश्मीरविषयी समाजात अतिशय टोकाची आणि एकतर्फी मते पाहायला मिळत असल्यामुळे कुणी तरी उठून घोषणाबाजी सुरू करेल की काय, अशी धास्ती त्यांचे भाषण संपेपर्यंत लागून राहिली होती. सभागृहात उपस्थितांमध्ये बहुसंख्य तरुण असूनही अपूर्वानंद यांना दिलेला सकारात्मक प्रतिसाद आश्चर्यचकित करणाराच होता.

सगळ्यात शेवटी बोलले ते ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवी. सुरुवातीपासूनच त्यांनी आपला हजरजबाबीपणा आणि व्यंग्यात्मक शैलीने उपस्थितांच्या मनावर ताबा मिळवला. मात्र भाषणाच्या शेवटी काही अस्वस्थ करणारे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. भाषणाचा शेवट करत ते म्हणाले, ‘‘जगभर हिटलरी प्रवृत्तींचा नाच सुरू असताना गांधीजी काय पडद्यामागे शांत बसून राहिले असते काय? जर आज हिटलर उदयास येऊ शकत असतील, तर गांधींचा व त्यांच्या विचारांचा उदय अशक्य कसा असेल? आज गांधी नक्कीच शक्य आहेत!’’

उपस्थितांकडून आलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन सत्राचा शेवट झाला. त्याला उपस्थितांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. ‘जनसामन्यांसाठी विज्ञान’ हे पहिल्या दिवसातील शेवटचे सत्र अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले. गांधींच्या काही अलक्षित पैलूंचा या सत्रात आढावा घेण्यात आला. विज्ञान आणि समाज यांचा ताळमेळ साधत लोकोपयोगी विज्ञानाचे द्वार खुले करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काही गणमान्य व्यक्ती, शास्त्रज्ञ या सत्रासाठी वक्ते म्हणून उपस्थित होते. सर्वांत आधी भाषण झाले ते डॉ. पी. आर. रवींद्र यांचे. विज्ञान आणि समाज यांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. गांधीजींचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानविषयक त्यांची मते आजवर दुर्लक्षितच राहिली, त्यामुळे गांधीजी विज्ञान व तंत्रज्ञानविरोधी होते- अशीच त्यांची प्रतिमा तयार झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गांधीजींविषयीचा हा गैरसमज दूर करणारे अनेक दाखले त्यांनी दिले. प्रत्येक उदाहरणागणिक उपस्थित आश्चर्यचकित झाल्यावाचून राहत नव्हते. लोकांनी शास्त्रज्ञ म्हणून माझी आठवण काढली तर ती मला सर्वांत जास्त आवडेल, असे गांधी म्हणाल्याचे त्यांनी या वेळी नोंदवले.

ते पुढे म्हणाले, ‘‘हुजेज नावाचा अंतराळवीर एकदा बनारस येथे आला होता. गांधीजी त्यांना जाऊन भेटले. आपल्या ‘नई तालीम’ या शिक्षण पद्धतीसाठी सोप्या भाषेत विज्ञानविषयक पुस्तके तयार करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन गांधीजींनी त्यांना केले होते. गांधी इतक्यावरच थांबले नाहीत. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनात त्यांनी विज्ञानावर हुजेज यांची दोन भाषणे ठेवली. ‘‘आज कुठला राजकीय पक्ष शास्त्रज्ञाला मंचावर बोलावेल का?’’ असा सवालही रवींद्र यांनी केला.

गांधीजींनी स्थापन केलेल्या ‘ऑल इंडिया व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशन’विषयीही पहिल्यांदाच सखोल माहिती मिळाली, ती रवींद्रांच्या भाषणामुळे. ‘तंत्रज्ञानाचा उपयोग गाव-खेड्यातील जनतेसाठी करता यावा याकरता ही संस्था स्थापन झाली होती. पी.सी रे, सी. व्ही. रमन, जगदीशचंद्र बोस यांसारख्या जगद्‌विख्यात शास्त्रज्ञांना या संस्थेच्या कामात गांधीजींनी सहभागी करून घेतले होते.’ रवींद्र यांनी गांधींची उलगडवून दाखवलेली विज्ञाननिष्ठा प्रत्येकासाठी नवीच होती.

जमनालाल बजाज पुरस्कारविजेते व फलटण येथील निंबकर शेतीविषयक संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ.अनिल राजवंशी यांनी प्रेझेंटेशनद्वारे ‘गांधीजी आणि तंत्रज्ञान’ यावर आपले विचार मांडले. गांधीजी आयुष्यभर संशोधक म्हणूनच राहिले, त्यातूनच त्यांनी चरख्यासारखे यंत्र लोकप्रिय केले आणि त्याला स्वावलंबनाचे साधन बनवले, असे ते या वेळी म्हणाले. गांधीजींनी दाखविलेल्या मार्गानेच जात आमची संस्था जगाच्या नकाशावर पोहोचली, गांधीजींच्या चरख्यापासून प्रेरणा घेत आम्ही तयार केलेले लॅन्टर्न (कंदिल) व स्टोव्ह यांना एकत्र करत लँटोव्हची निर्मिती केली आणि खेड्यापाड्यांपर्यंत उजेड पोहोचवल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.

डॉ.हेमलता बागला यांनी थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन याचे वाक्य उद्‌धृत करत ‘असा हाडा- मांसाचा माणूस पृथ्वीतलावर अस्तित्वात होता, यावर पुढच्या पिढ्यांचा विेशास बसणार नाही’ हे गांधींविषयीचे गौरवोद्गार काढले. गांधींनी आपल्या आत्मकथेचे नावच ‘माझे सत्याचे प्रयोग’ ठेवले होते; म्हणजेच आयुष्यभर प्रयोग करणारे ते एक शास्त्रज्ञच होते, असे त्या म्हणाल्या.

छत्तीसगडच्या कृषी आणि रोजगार मंत्रालयात सल्लागार असलेले डॉ. प्रदीप शर्मा म्हणाले, ‘‘गांधींचे विज्ञान म्हणजे छोट्या खेड्यात राबणाऱ्या शेतकऱ्याचे विज्ञान होते. आदिवासी जीवन आणि त्यांचे निसर्गाशी असलेले नाते उलगडून दाखवणारे ते विज्ञान होते. ६० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायपूरच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाला आजवर भाताच्या केवळ १२ ते १३ जाती तयार करता आल्या. मात्र छत्तीसगडमधील आदिवासींना भाताच्या जवळपास ३२,५०० जातींची माहिती होती, त्यापैकी तेवीस हजार जातींची नोंद झाली आहे. ‘खेड्यांकडे चला’ म्हणजे खेड्यातील लोकांकडे, आदिवासींकडे असलेल्या या पारंपरिक ज्ञानाचा फायदा करून घ्या, असे गांधींना सुचवायचे होते.’’ डॉ.शर्मा यांनी या वेळी आदिवासींच्या पारंपरिक ज्ञानाची दिलेली आणखी काही उदाहरणे ऐकून उपस्थित अवाक्‌ झाले नसतील, तर नवलच.

पुण्यातील आयसर या संस्थेचे माजी प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ डॉ.मिलिंद वाटवे यांनी तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे जगभर उभ्या राहिलेल्या समस्यांचा आढावा घेत सत्राचा शेवट केला. ‘‘गांधी आपल्या चुका मान्य करत आणि त्यातून शिकत असत. एखाद्या शास्त्रज्ञाला साजेसे असे अनेक पैलू गांधींच्या व्यक्तिमत्त्वात होते. आजच्या संशोधकांमध्ये हे गुण अभावानेच आढळतात. ते खऱ्या अर्थाने शास्त्रज्ञ होते.’’ असे वाटवे भाषणाच्या शेवटी म्हणाले.

यानंतर उपस्थितांनी पाहुण्यांना अनेक प्रश्न विचारत शंका-समाधान करून घेतले. दिवस मावळला तरी उपस्थितांमध्ये गांधींविषयी असलेला उत्साह आणि उत्सुकता मावळली नव्हती. दिवसाचा शेवट झाला तो गांधीजींच्या आश्रमात गायल्या जाणाऱ्या श्रवणीय भजनांनी. त्यासोबतच रवींद्रनाथांच्या कविता, सूफी संगीत आणि ख्रिश्चन संगीताने सभागृह भक्तिसंगीताने भरून गेले होते. आर्थिक प्रश्नांबाबत सर्वसामान्यांमध्ये कमालीची अनास्था आणि अज्ञान असल्याचे चित्र पाहायला मिळते. कदाचित म्हणूनच की काय, दुसऱ्या दिवशीच्या पहिल्याच सत्राचा विषय होता- ‘आर्थिक विकास आणि समृद्धी’ आणि त्यासाठी तब्बल तीन तास राखीव ठेवण्यात आले होते. या विषयाची सखोल माहिती असणारे प्राध्यापक, विचारवंत, क्रियाशील कार्यकर्ते व अर्थतज्ज्ञ या सत्रात बोलणार असल्यामुळे तीन तासही कमी पडतील की काय, अशी शंका वाटत होती.

सत्र बरोबर दहा वाजता सुरू झाले. आजही सभागृह उपस्थितांनी भरून गेले होते. सर्वप्रथम बोलल्या टाटा समाज विज्ञान संस्था (TISS) येथे प्राध्यापक असलेल्या डॉ.विभूती पटेल. ‘‘भोगवाद (hedonism) आणि उपभोक्तावाद यांच्यामुळे सामाजिक विषमतेची दरी आणखी वाढायला लागली आहे. अर्थव्यवस्था ही जनसामान्यांच्या लुटीचे माध्यम बनली आहे. केवळ गांधीवादाच्या आधारेच या संकटाचा मुकाबला करता येणे शक्य आहे. विकेंद्रीकरण आणि स्त्रीपुरुष समानता यांचा पुरस्कार करणाऱ्या आर्थिक योजनांचा गांधीजींनी नेहमीच आग्रह धरला होता.’’ असे म्हणत त्यांनी गांधीजींचे अर्थशास्त्र समजावून सांगण्याचा प्रयत्न या वेळी केला.

सामाजिक आणि आर्थिक समानतेचा मुद्दा पुढे घेऊन जात ग्राम-स्वराज संकल्पनेचे खंदे पुरस्कर्ते मोहन हिराभाई हिरालाल यांनी विनोबांच्या भूदान चळवळीची या वेळी आठवण करून दिली. गांधीजींची ग्राम-स्वराज संकल्पना समजावून सांगत त्यांनी गडचिरोलीतील मेंढालेखा या गावात यशस्वीपणे राबविलेल्या ‘दिल्लीत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार’ या प्रयोगाची माहिती दिली. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सहसचिव असलेले, मात्र ‘गांधी मला भेटला’ ही कविता प्रकाशित करून चर्चेत आलेले देविदास तुळजापूरकर यांनी आपल्या भाषणात बँकिंग क्षेत्रातील राष्ट्रीयीकरणपूर्व, राष्ट्रीयीकरणोत्तर आणि नवे आर्थिक धोरण अशा तीन युगांचा उल्लेख केला. ‘‘सर्वसामन्यांच्या जीवनात बँकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्याचे बँकिंग धोरण अधिकाधिक गांधीवादी म्हणजेच लोककल्याणकारी आणि पारदर्शी व्हायला हवे’’ असे ते या वेळी म्हणाले.

‘‘देशाचे स्वातंत्र्य गांधीजींचे अंतिम ध्येय नव्हते तर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचे ते एक साधन होते.’’ असे म्हणत ज्येष्ठ कृषी-अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. जागतिकीकरणामुळे आर्थिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. ‘‘शेतीच्या अशोशत पद्धती आणि सदोष आर्थिक धोरणांमुळे खेड्यापाड्यात राहणाऱ्या जनतेचा आर्थिक विकास होऊ शकला नाही. औद्योगिकीकरण करताना समतोल न राखला गेल्यामुळे ओल्या-सुक्या दुष्काळाचे दुष्टचक्र सुरू झाले आहे. स्मार्ट सिटीजपेक्षा स्मार्ट खेड्यांची आज जास्त गरज आहे.’’ असे डॉ. खांदेवाले भाषणाच्या शेवटी म्हणाले.

‘आर्थिक विकास आणि समृद्धी’ या सत्राचा शेवट झाला तो चेन्नईस्थित सी.के. प्रल्हाद संस्थेचे अध्यक्ष असलेल्या डॉ. झेवियर राज यांच्या भाषणाने. ‘‘जनतेचे रूपांतर अज्ञानी ग्राहकांमध्ये होऊ लागल्याने विधायक अर्थव्यवस्थादेखील विध्वंसक होऊ लागली आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शोशत आणि संतुलित विकासासाठी Gandhi -I म्हणजेच गांधी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची खरी गरज आहे.’’ असे म्हणत गांधी विचार आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न डॉ.झेवियर यांनी आपल्या भाषणातून केला.

तब्बल तीन तास चाललेल्या या चर्चासत्रानंतरही उपस्थितांचा उत्साह कमी झाला नव्हता. त्यांनी वक्त्यांना शेवटी अनेक प्रश्नही विचारले. ‘गांधी शक्य आहेत का?’ असा विषय असलेल्या या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप झाला तो ‘रामराज्य, शासनव्यवस्था आणि नागरी समाज’ या सध्या महत्त्वाच्या ठरलेल्या विषयाने. ज्येष्ठ राजकीय विचारवंत, ब्रिटनचे माजी खासदार व पद्मभूषणने सन्मानित भिकू पारेख या सत्राचे अध्यक्ष होते. त्यांच्यासमवेत मध्य प्रदेशाचे माजी सचिव, ज्येष्ठ विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ शरद्‌चंद्र बेहर, ज्येष्ठ गांधी-अभ्यासक आणि पॉप्युलर प्रकाशनाचे प्रमुख डॉ.रामदास भटकळ, गांधी पीस फाउंडेशनचे डॉ.एम.पी. मथाई आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील डॉ.अभिनय चंद्रचूड आदी मान्यवर या शेवटच्या सत्रासाठी वक्ते म्हणून उपस्थित होते.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससारख्या जगप्रसिद्ध संस्थेत एके काळी राज्यशास्त्राचे प्राध्यापक असणारे प्रा. भिकू पारेख यांनी राष्ट्रवाद, शासनव्यवस्था (nation-state), रामराज्य आणि नागरी समाज यांविषयी बोलताना गांधीजींना या संकल्पना कशा अभिप्रेत होत्या, हे उपस्थितांना समजावून सांगितले. ते म्हणाले, ‘‘गांधीजी शासनव्यवस्थेच्या (nation-state) विरोधात असले तरी राष्ट्रवादाचे समर्थक होते. त्यामुळे सामाजिक बंधुभाव आणि सामूहिक जबाबदारी वाढीस लागते, असे त्यांचे मत होते. पण गांधीजींचा राष्ट्रवाद अधिक खुला, नैतिक, आत्मचिकित्सक आणि विनयशील होता.’’ रामराज्य या संकल्पनेवर भाष्य करत पारेख शेवटी म्हणाले, ‘‘गांधीजींना अपेक्षित असणारे रामराज्य हे काही धर्मावर आधारलेले नव्हते. सत्यावर आधारलेले राज्य असा त्याचा मथितार्थ होता. लोकांनी अधिकाधिक स्वावलंबी होत आपले व्यवहार आपल्या ताब्यात घ्यावेत, ही गांधीजींच्या ‘हिंदस्वराज’ची कल्पना होती.’’

‘सुप्रीम व्हिस्पर्स’सारख्या पुस्तकांद्वारे भारतीय न्यायव्यवस्थेचे अंतरंग अतिशय प्रभावीपणे उलगडून दाखवणारे डॉ.अभिनव चंद्रचूड यांनी आपल्या भाषणातून भारतीय न्यायव्यवस्थेतील सुधारणांची गरज अनेक रंजक उदाहरणांद्वारे पटवून दिली. ‘‘भारतीय न्यायव्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख आणि स्वतंत्र करायची असेल, तर सध्या अस्तित्वात असणाऱ्या अनेक वसाहतवादी कायद्यांमध्ये सुधारणा आवश्यक आहे.’’ असे सांगत डॉ.चंद्रचूड यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

ज्येष्ठ विचारवंत आणि प्रकाशक डॉ.रामदास भटकळ यांनी सुशासनासाठी नागरी समाजाची आवश्यकता उपस्थितांना पटवून दिली. ‘‘गांधीजींचा लोकांच्या सदसद्‌विवेकावर विश्वास होता, त्यामुळे ते बहुसंख्याकवादी कधीच नव्हते. व्यक्तीच्या आणि समूहाच्या स्वावलंबनाचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला. सदसद्‌विवेकावर आधारलेल्या गांधीजींच्या शासनव्यवस्थेच्या संकल्पनेपासून आज आपण फारकत घेतली आहे.’’ याची आठवण डॉ.भटकळ यांनी आपल्या भाषणातून करून दिली.

गांधींच्या आदर्शांपासून आपण इतके दूर आलो आहोत की, ही तत्त्वे आज आपल्याला स्वप्नवत्‌ आणि अशक्यप्राय वाटू लागली आहेत, अशी खंत गांधी पीस फाउंडेशनचे डॉ.एम.पी.मथाई आपल्या भाषणातून व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘नागरी समाज हा शासनव्यवस्थेवर अंकुश ठेवणारा महत्त्वाचा घटक आहे. मात्र हा नागरी समाज आज आपली जबाबदारी उचलण्यास तयार नाही.’’ राजकीय पक्षांविषयी भाष्य करताना ते शेवटी म्हणाले, ‘‘राजकीय पक्षांना आपल्या आदर्शांचा विसर पडल्यामुळे त्यांच्यातील अंतर कमी होत असून त्यांच्यामध्ये आता फरकच करता येत नाही.’’

परिषदेचा शेवट ज्येष्ठ विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ शरद्‌चंद्र बेहर यांच्या भाषणाने झाला. गांधीजींच्या रामराज्याविषयी सत्राच्या सुरुवातीला भिकू पारेख यांनी मांडलेल्या विचारांना पुढे घेऊन जात बेहर म्हणाले, ‘‘रामराज्य म्हणजे गांधीजींना अपेक्षित असलेला नैतिकतेवर आधारलेल्या संस्कृतीचे प्रारूप होय.’’ भाषणाच्या शेवटी उपस्थितांना आवाहन करत बेहर म्हणाले, ‘‘वैविध्याने नटलेला समाज हे भारताचे वैशिष्ट्य टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, गांधीजींनी दाखवलेला मार्गच आपणासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.’’

मुंबईतील के.सी. कॉलेजचा इतिहास विभाग आणि सेवाग्राम कलेक्टिव्ह यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘इज गांधी पॉसिबल?’ (गांधी शक्य आहेत का?) या दोन दिवसीय परिषदेतून महात्मा गांधीजींच्या अनेक अलक्षित पैलूंवर चर्चा करण्यात आली. ‘गांधी १५०’ निमित्त वर्षभरापासून आयोजित होत असलेल्या परिषदा, चर्चासत्रे यांमध्ये ‘गांधी शक्य आहेत का?’ ही बहुरूपी गांधींच्या व्यक्तिमत्वातील दुर्लिक्षित पैलूंचा, विचारांचा वेध घेणारी परिषद वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती विषयांमुळे आणि वक्त्यांमुळे. या परिषदेचे आयोजन करून गांधीजींची १५० वी जयंती खऱ्या अर्थाने साजरी केल्याबद्दल निमंत्रक डॉ. श्याम पाखरे आणि के. सी. कॉलेजचे गांधी अभ्यासकांनी आभार मानायला हवेत.

समीर शेख,

पुणे

sameershaikh7989@gmail.com

Share on Social Media

नवे पुस्तक

एका जिद्दीची गोष्ट

छाया दातार -

प्रश्न येतो तो या दोन भिन्न संस्कृती एकमेकांना भिडतात तेव्हा काय रसायन तयार होते आणि त्यातून कशा तऱ्हेने स्फोट होऊ लागतात ते समजून घेण्याचा एक प्रयत्न सरिताच्या आत्मचरित्रातून दिसून येतो. सरिताच्या नजरेमध्ये, गेझमध्ये गरिबांसाठी काम करण्याचा मार्क्सवाद आहे, लोहियांची जातीभेद तोडण्याची उर्मी आहे आणि पुरुषसत्ता कशी काम करते ते सूक्ष्मपणे समजून घेण्यासाठी लागणारी स्त्रीवादी दृष्टीसुद्धा आहे. येथे केवळ ‘ऑनरकिलिंग’ किंवा ‘सन्मान जपण्यासाठी हत्या’ या आजकाल गाजत असलेल्या घटनांचा संदर्भ घेऊन कशी स्फोटक परिस्थिती अपरिहार्य होती असे म्हणून चालणार नाही. जातीभेदातून, उच्च नीच जातीच्या संकरातून जन्माला आलेले नाट्य इतके ढोबळ वर्णनही लागू पडत नाही.

‘हमरस्ता नाकारतांना’ हे सरिता आवाड यांचे आत्मचरित्र हे त्याच्या मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे ती त्या ‘काळाची’ गोष्ट आहे. आणि तो काळ उलथापालथीचा आहे. परिवर्तनाचा आहे. मीही त्याकाळाचीच घटक, पण सरितापेक्षा सात-आठ वर्षांनी मोठी. तरीही तिला भेटलेली अनेक मंडळी माझ्याही वर्तुळात आलेली होती आणि म्हणूनच हे आत्मचरित्र खूपच भावणारे आहे.

सरिताने वर्णन केलेल्या काही गोष्टी त्या काळात मीही उडतउडत ऐकल्याचे आठवतंय. पण भूतकाळात वळून बघतांना तिने ज्या परिपक्वतेने त्या घटनांचा अर्थ लावलाय, त्यावेळचे भावजीवन हाताळलंय त्याला तोड नाही. अभिनंदनाचा वर्षाव करावासा वाटतोय. तिच्या जीवनात मध्यमवर्गीय मुलीच्या जीवनात सहसा न आढळणाऱ्या नाट्यमय घटना तर आहेतच. पण ते सांगण्याची आणि त्यातून अर्थ काढण्याची, त्यांचे विश्लेषण करण्याची आणि त्यातून शिकण्यासारखे सार काढण्याची विलक्षण हातोटी सरितामध्ये आहे.

प्रसंग घडतांना ती विस्कटून गेली असणारच, पण जीवनातील अनेक विसंगती भूतकाळाकडे बघताना सुसह्य होतात आणि तो सल सतत न बाळगता नव्याने जीवन जगता येते हे ती सतत दाखवून देते. सरळ मोकळेपणी. त्यावेळी आलेल्या अडचणी, भावनांचे प्रक्षोभ प्रामाणिकपणे मांडत राहते. पण त्यात अडकून पडत नाही. पुन्हा नव्याने त्या व्यक्तीकडे पहायला तयार होते. हा तिचा स्वभावच या पुस्तकाला वजन प्राप्त करून देतो.

थोडक्यात सांगायचे झाले तर ही तिची आणि तिच्या आईची गोष्ट आहे. नवऱ्याचीही आहे, पण नवऱ्याचे व तिचे नातेसंबंधही आईच्या संदर्भातच विकसित झालेले आहेत. आईचा तिच्यावर प्रचंड प्रभाव आहे. किंबहुना तिची लेखनकलेची क्षमता, साहित्याची आवड ही आईमुळेच निर्माण झाली हे ती पुन्हा पुन्हा मान्य करते. आईने तिच्यावर संस्कार करण्यासाठी घेतलेले परिश्रम हे तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या उभारीसाठी खूप काही खतपाणी घालून गेले आहेत हेही ती मान्य करते. एवढ्या सगळ्या पार्श्वभूमीनंतर तिच्या आईचे नाव ऐकायला वाचक उत्सुक असणारच.

तिची आई म्हणजे माणूसच्या प्रसिद्ध लेखिका सुमती देवस्थळी. ज्यांनी लिहिलेली जागतिक किर्तीच्या लेखकांची चरित्रे बरीच गाजली. उदा. मला आठवतंय ते टॉलस्टॉयचे चरित्र. अतिशय भारावून लिहिलेले, टॉलस्टॉयच्या जीवनातील चढ उतार आणि त्याची मानसिकता तपासत तपासत त्याच्या व्यक्तीमत्वाचा शोध घेणाऱ्या वेधक शैलीचे कौतुक त्या काळी झालेले मला आठवतंय. गंमत म्हणजे हे आत्मचरित्र जसे सरिताचे आहे, तसे हे चरित्र सुमतीबाईंचेही आहे. मला माहीत नाही की कोणी त्यांचे चरित्र लिहिले आहे का किंवा त्यांनी आत्मचरित्र लिहिले आहे का. पण सरिता मूळांचा शोध घेत घेत तिच्या आजोळी, आईच्या माहेरी पोचलेली आहे. आणि आई समजून घेण्यासाठी तिला आजीच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घ्यावासा वाटू लागला आहे. आणि तिनेच म्हटल्याप्रमाणे तिला तिच्यातील आई गवसली, आजी सापडली. भूतकाळाशी दोस्ती करतांना त्यातल्या माणसांबरोबर ती पुन्हा जगली. मला तिच्या तपशीलवार लिखाणाचे फारच कौतुक वाटते. तो काळ उभा करणे, ब्राह्मणी घरातील संस्कारांचे दुवे कसे चिवटपणे आईला घेरून होते हे समजून यायला पहिल्या दोन प्रकरणांचा चांगला उपयोग होतो.

नवरा काहीसा ब्राह्मणी संस्कारात वाढलेला पण दलित किंवा नवबुद्ध पुरुष आहे आणि तिने एका बंडखोर वृत्तीने त्याला स्वीकारले आहे. आईच्या संस्कारांच्या पार्श्वभूमीवर ती जेव्हा स्वत:ला शोधण्याची धडपड करते आणि त्यावेळच्या उलथापालथीच्या लाटांवर आरुढ होऊन नवे विचार, नवी तत्त्वे, नवी मूल्ये यांचा स्वीकार करण्यासाठी सज्ज होते तेव्हा तिला रमेश आवाड भेटतो आणि त्याच्या अनेक पैलू असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची तिला भुरळ पडते. आणि मुख्य म्हणजे स्वीकारलेले जातीमुक्त समाजाचे मूल्य प्रत्यक्ष जगून दाखविण्याची जिगरही तिच्या अंगी बाणलेली असते. तिच्याबरोबर युक्रांद आणि समाज परिवर्तनासाठी झोकून देणारी अनेक इतरही मंडळी आहेत आणि त्यामुळे रमेशचे व तिचे प्रेम, त्यांचा विवाह हा सहज स्वीकारला जाईल याची तिला खात्री असते. म्हणजे आपण काही खास क्रांतिकारक करत आहोत असेही तिला कोठे जाणवलेले नसते.

ती आईला आपला निर्णय सांगते तेव्हाही आईला तो किती वेदनादायी होईल याची तिला कल्पनाही नसते. रमेश ज्ञानप्रबोधिनीमध्ये अप्पा पेंडसे यांच्या हाताखाली तयार झालेला. आईचे भाऊ, म्हणजेच सरिताचे मामा मामी जेथे रहायचे तेथेच अप्पा पेंडसे रहात असल्यामुळे रमेश त्या ठिकाणी आलेला तिने पाहिला होता. अतिशय शुद्ध मराठी बोलणारा, अफाट वाचन असणारा, आयआयटी मुंबई येथे शिकणारा हा तरुण तिला पुन्हा एकदा युक्रांदमध्ये जायला लागल्यावर भेटला आणि प्रेमाची ठिणगी पेटली. सरिताही टाटा सामाजिक संस्थेसारख्या समाजकार्य शिकविणाऱ्या आणि पुरोगामी वातावरणाची धुरा वागविणाऱ्या संस्थेमध्ये शिकलेली होती आणि समाजकार्य करण्याचे ध्येय स्वीकारून होती. अशा वातावरणामध्ये तिलाही आपण काही विशेष करत आहोत असे वाटले नसावे.

प्रश्न येतो तो या दोन भिन्न संस्कृती एकमेकांना भिडतात तेव्हा काय रसायन तयार होते आणि त्यातून कशा तऱ्हेने स्फोट होऊ लागतात ते समजून घेण्याचा एक प्रयत्न सरिताच्या आत्मचरित्रातून दिसून येतो. सरिताच्या नजरेमध्ये, गेझमध्ये गरिबांसाठी काम करण्याचा मार्क्सवाद आहे, लोहियांची जातीभेद तोडण्याची उर्मी आहे आणि पुरुषसत्ता कशी काम करते ते सूक्ष्मपणे समजून घेण्यासाठी लागणारी स्त्रीवादी दृष्टीसुद्धा आहे. येथे केवळ ‘ऑनरकिलिंग’ किंवा ‘सन्मान जपण्यासाठी हत्या’ या आजकाल गाजत असलेल्या घटनांचा संदर्भ घेऊन कशी स्फोटक परिस्थिती अपरिहार्य होती असे म्हणून चालणार नाही. जातीभेदातून, उच्च नीच जातीच्या संकरातून जन्माला आलेले नाट्य इतके ढोबळ वर्णनही लागू पडत नाही.

येथे सुमतीबाईंसारखी अतिशय बुद्धिमान, संवेदनाशील व्यक्तिमत्त्व असलेली आणि महाराष्ट्रात जिचा बराच गवगवा झालेला आहे, त्या काळच्या सर्व सार्वजनिक विचारवंतांनी ज्यांची वाखाणणी केलेली आहे अशा व्यक्तीमत्वाची बाई, किंवा आई आपल्या ब्राह्मणी संस्कारांनी सरिताच्या या निर्णयाला आव्हान देते आणि जन्मभर हे आव्हान टिकवून ठेवते आणि हे सरिताला कळत रहाते तिच्या मधून मधून येणाऱ्या बोचऱ्या टिप्पण्यांमधून. मधूनमधून आई म्हणून तिचे कौतुक करण्याची संवेदना जागृत होते. बाळंतपणाला ती आपणहून घेऊन येते. पण तिच्या एखाद्या वाक्यातूनसुद्धा ती बोच सरिताला सतत जाळीत रहाते. एक बुद्धिमान व्यक्तित्व असा कसा संकुचितपणा दाखविते, जन्मभर उभा दावा मांडू शकते हे सरिताला कळत नव्हते. आणि मला वाटते की आईची ही मानसिकता कशातून तयार झाली हा शोध घेण्याचा हा तिचा प्रयत्न आहे.

आई-वडिलांच्या नात्याचाही तिने उभा आडवा छेद घेतला आहे आणि त्यातूनही तिला आईच्या मनाची तडफड जाणवलेली आहे. त्या मानाने सासरी सरिताला फार त्रास सहन करावा लागला नाही असे दिसते. आपापल्या जातीचा अभिमान प्रत्येकाला असतोच आणि तो आडवा येतो हे ती जाणून होती. ‘अर्थाचा’ अभाव हाही तिच्या जीवनात बराच काळ रेंगाळला आणि त्यालाही तिने तोंड दिले. तिला रमेशकडून त्रास झाला तो टिपिकल पुरुषी स्वभावाचा. बायकोवर घेतल्या जाणाऱ्या संशयाचा. येथे पुरोगामी विचारांची बायको झेपणे खूप जणांना कठीण जाते. शिवाय त्यात ही ब्राह्मण बायको. वेगळ्या संस्कारातून आलेली हीही भावना प्रभावी असते. त्यामुळे सरिताला आलेला एकटेपणा. सतत कसली तरी परीक्षा चालू आणि त्या कसोटीला उतरले नाही तर स्फोट. अशा विलक्षण परिस्थितीतून ती जाते. आणि तरीही जिद्दीपणाने शेवटपर्यंत निभावते यातच या आत्मचरित्राचे यश साठविलेले आहे.

सरिताने सुरुवात आजी पासून केली आहे कारण तिला आईचा प्रतिष्ठेचा आग्रह कसा सुरू झाला आणि शेवटपर्यंत एवढा घट्ट कसा राहिला हे समजून घेण्याची इच्छा आहे. कारण तिच्या मते तिच्या आणि आईच्या नात्यात जो तीव्र अंतराय निर्माण झाला त्यामध्ये ही प्रतिष्ठेची भावना आड आली. त्यामुळेच शेवटपर्यंत दलित मुलाशी लग्न केल्याबद्दल तिला सरिताला क्षमा करावीसे वाटले नाही. म्हणूनच परांडेवाड्यातील परांडे आजीचा, आईच्या आईचा जीवन प्रवास तिने पहिल्या प्रकरणात समजून घेतला. आणि तिला समजून आलं की तिच्या आईमध्ये तिची आजी होती, तिचा अतिशय मोठा प्रभाव होता आणि तसाच प्रभाव तिच्यावर टाकण्याचा तिच्या आईचा प्रयत्न होता. आणि काही प्रमाणात तो झालाही होता.

ती सरिताच्या बाबतीत खूप पझेसिव्ह होती कारण तिला सुसंकृत करण्यासाठी तिने तिच्यावर खूप परिश्रम केले होते. लहानपणापासून अनेक गोष्टी पाठ करून घेतल्या होत्या. पुस्तके वाचून घेतली होती. तिच्यात तिची आईही उतरली होती. स्वतंत्र होण्याची वृत्ती, जग पहाण्याची, प्रसिद्धी मिळविण्याची, प्रतिष्ठा मिरविण्याची तिच्या आईची जिद्द तिने स्वत:च्या प्रयत्नाने पूर्ण केली. ती जिद्द वेगळ्या तऱ्हेने सरितामध्येही दिसून येते. परांडे आजीचे लग्न १३ वर्षांची असतांना ४२ वर्षांच्या तिजवराशी झालं. पाच मुले झाली. नवऱ्याच्या निवृत्तीनंतर हट्टाने त्या पुण्याला रहायला आल्या आणि मोठा बंगला बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले. घरात स्वयंपाकाला बाई, केरवारे करायला बाई अशा तोऱ्यात राहायल्या. जवळपासच्या जरा सुस्थितीतील ब्राह्मण बायकांबरोबर मैत्री करणे अशा प्रतिष्ठेच्या सर्व गोष्टी त्यांनी परवडत नसतांनाही आवर्जून केल्या. मुलांना शिकविणे हे त्यांचे खास ध्येय होते. सुमतीबाई म्हणजेच सरिताची आई ही शेवटची मुलगी नवऱ्याच्या निवृत्तीच्या काळात झाली, म्हणून जरा तिच्यावर राग पण तिने शिक्षणात प्रगती केली म्हटल्यावर तिचा अभिमान वाटू लागला.

सरिता वर्णन करते की, सदाशिव पेठेतील ब्राह्मण कुटंबातील वातावरणाचा तपशिल मी मुद्दामहून देते आहे. शुद्ध भाषेची लख्ख अस्मिता, सांस्कृतिक अभिमान, डिप्लोमॅटिक अबोला पांघरून मधाळ बोलणे, नात्या-गोत्यात रंगून गेलेले कुटुंब असं जातीय वैशिष्ट्यपूर्ण वातावरण मला लाभलं. आणि पुढे दलित मुलाशी लग्न केल्यावर तेथील कुटुंबाच्या वर्णनातून हा विरोधाभास प्रकर्षाने जाणवावा अशी सरिताची अपेक्षा आहे. अशा सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या आईच्या नशिबी मात्र अगदीच सामान्य दर्जाचा सामान्य कुवतीचा नवरा येतो आणि त्यातून तिची घुसमट सुरू होते.

नंतरची कहाणी तिच्या आईची आहे. तिचा निष्कर्ष असा दिसतो की आई जी पुढे शिकली, कॉलेजात गेली, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाली ती या पार्श्वभूमीवर. नवऱ्याने तिला आर्थिक स्थैर्यही फार दिले नाही आणि सामाजिक प्रतिष्ठाही दिली नाही. ती स्वयंभू निघाली. पुढे तिला अपघात होऊन तिची तब्येत कमकुवत झाली आणि घरात बसावे लागले. त्यातून तिच्या सर्जनशीलतेला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि प्रतिभेला बहर आला. महाराष्ट्रातील एक आघाडीची चरित्रकार म्हणून तिने नाव कमावले. पण जन्मभर तिने नवऱ्याकडे काहीशा तुच्छतेने पाहिले. आणि त्याच वेळी मुलांकडे आणि विशेषत: मुलीकडून खूप अपेक्षा ठेवल्या. त्यांच्यावर तिची स्वामित्वाची भावना तयार झाली. दलित मुलाशी लग्न या बातमीनेच तिच्या अपेक्षांचा चक्काचूर झाला. त्यातही रमेशने आय. आयटी.चे शिक्षण पूर्ण केले नाही, किंवा त्याला अपयश आले तेही तिला खूपच अपमानास्पद वाटले. याउलट सरिताच्या वडिलांची प्रतिक्रिया होती. सरिताचे वडिलांविषयीचे प्रकरणही छान झाले आहे. तिने कधीही त्यांना दूषणे दिली नाहीत. त्यांचे प्रेमही तिने समजून घेतले. ते कोणत्याच बाबतीत आततायी नव्हते.

पुढील प्रवास लग्नानंतरचा आहे, पण त्याबरोबर करिअर संबंधीही आहे. मला कौतुक वाटते ते प्रत्येक ठिकाणच्या नोकरीमध्ये आलेले अनुभव तिने अतिशय समतोलपणे पण चिकित्सकपणे नमूद केले आहेत. तिची डायरी ठेवण्याची संवय यासाठी फार उपयोगी पडली असावी. किती तरी तपशिलात जाऊन, नावे घेऊन ती बरीच काही निरीक्षणे नमूद करते आणि तरी ते कंटाळवाणे वाचन होत नाही. कारण त्यामध्ये तिची दृष्टी, तिची मूल्ये, तिचे लॉजिक सतत दिसून येते. मला कुतूहल होते ते याबद्दल की टाटा सामाजिक संस्थेमधून एम.ए. केलेली इतकी हुशार मुलगी, साहित्याची जाण असलेली, अनेक विचारवंताशी ओळख असलेली, आणि स्वत:च्या जोरावर मुंबईहून पुण्यासारख्या सांस्कृतिक ठिकाणी आपले नशिब अजमावयाला आलेली ही मुलगी पुढे बँकेच्या परीक्षा देऊन नोकरी करत आपले नीरस आणि काही प्रमाणात संघर्षमय जीवन जगण्यासाठी कशी तयार झाली?

लग्न होऊन संसार थाटल्यावर आर्थिक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी नवऱ्यानेही शेवटी परिवर्तनाच्या लढ्यातील भूमिका सोडून बँकेच्या परीक्षा देण्याचा मार्ग पत्करला आणि त्याच्यातील पुरोगामी पुरुष मागे पडला. सततच्या बदल्या, त्या त्या ठिकाणी आणि एकटे राहाणे याचाही त्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. शिवाय कुटुंबातील इतरही सभासदांचा आर्थिक भार त्याच्यावर होता. सरिता म्हणते तसे त्याला कुटुंबाचा, जातीचा आधारही वाटायचा. ती त्याची अस्मिताही होती. त्यांच्या दृष्टीने त्याची हीही नोकरी महत्त्वाची, अधिकाराची, मानाची होती. त्यांच्या आजूबाजूला एवढी शिकलेली मंडळीही नव्हती. शिवाय रमेशला सरिताच्या माहेरहून कधीही सन्मान मिळाला नाही, त्याचीही बोच त्याला होती. तिच्या प्रेमाची प्रचिती पाहण्यासाठी त्याने तिला अट घातली होती की, लग्न न करता तू माझ्याकडे राहायला आलीस तरच मी पुढे तुझ्याशी लग्न करीन. दलित मुलासाठी ब्राह्मण मुलगी काय करू शकते, याची कसोटी घेण्याचा तो प्रकार होता.

सरिता म्हणते की, मी माझे आयुष्य पणाला लावले होते. म्हणूनच पुढे रमेशचे व तिचे नाते नासल्यासारखे झालेले पाहून वाईट वाटते. साहित्याच्या आवडीने आणि परिवर्तनासाठी चाललेल्या संघर्षातील जोडीदार म्हणून एकमेकांना वरलेले हे दांपत्य जीवनाच्या वास्तवातील समस्यांना भिडतांना रोमान्स संपून एका नीरस, ओढग्रस्त सामान्य कुटुंबामध्ये परिवर्तित झाले आणि त्यामुळे तर सरिताची आई आणि ती यामधील अंतर अधिकच वाढले. अशा वेळी सरिताला आपली मदत लागेल, मानसिकरीत्या तरी, हे आईच्या लक्षातच येत नाही. याउलट आईचा तिच्याबाबतीतील अपेक्षाभंग ती पुन्हा पुन्हा दाखवून देत असे. त्याची अनेक उदाहरणे सरिता देते.

यातील काही शब्दप्रयोगांचे दाखले देणे आवश्यक आहे असे वाटते. त्या सरिताला पत्रही पाठवीत असत. तो काळच पत्रांचा होता. डायरी लिहिण्याचा होता. लग्नाचा निर्णय घेताना सरिताने एकदा स्प्ष्टीकरण दिले होते की, ‘माझे अस्तित्व स्वयंभू असावे असे मला वाटते.’ तो स्वयंभू शब्द त्यांना खूप लागला होता. सरिता वर्णन करते की त्या ‘घायाळ’ झाल्या होत्या. तिला पत्रे पाठविण्याची पुन:पुन्हा विनंती करत होत्या. रमेशशी लग्न करण्याच्या अट्टाहासाबद्दल त्या पुन्हा पुन्हा विनंती करतात की, मी काय करू म्हणजे तू या वासनांच्या आवेगी वादळातून वाचशील? त्या असेही म्हणतात, तुझ्या मनात गैरवासना आली. कदाचित आपल्या दोघींमधले संबंध फार उत्तम होते, म्हणूनच ते दृष्टावले अशीही हळहळही त्या व्यक्त करतात.

तिच्या पहिल्या गर्भारपणाच्या वेळी सरिता शेवटी आईकडे गेली, पण तेव्हाही आईचा रमेशबद्दलचा आकस संपलेला नव्हता. Why don't you ask him तो appear for UPSC exam? he can prove his intelligence there if at all he has got any. अशा तऱ्हेने तिरकस बोलून रमेशबद्दल असलेली कमीपणाची भावना ती पुन:पुन्हा प्रगट करत असे. आणि तरीदेखील सरिता पुन:पुन्हा आईच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असे, तिने किती दिलंय, तिने सांगितलेल्या पुस्तकांच्यामुळे माझे आयुष्य किती तऱ्हेने समृद्ध झालंय हे ती पुन:पुन्हा सांगत असते आणि तिला प्रश्न पडतो की, माझं रमेशशी लग्न झालंय ही वास्तवता सोडून तिला माझ्याशी संवादच करता येत नव्हता हे कसं? ती दोघींमधील नाते समजून घेताना म्हणते, ‘तू काळाच्या पडद्याआड गेलेल्या माणसांमध्ये रमलीस, त्यांना समजून घेतलंस. मी जिवंत माणसांमध्ये रमले, जिवंत माणसांना समजून घेता घेता स्वत: घडत गेले. हे कळलं का तुला?’

रमेशचा पुरुषीपणा तिने कसा स्वीकारला याचेही वर्णन ती लॉजिकली करते. आपल्या घरातील वडिलांचं स्थान दुबळं आहे, ही आपली कमतरता आहे, असं माझ्या मनावर ठसलं होतं. मग स्वाभविकपणं मी अशा पुरुषाची निवड केली, जो ‘पुरुषी’ होता. त्याचा अरेरावीकडे झुकणारा आत्मविश्वास, एक घाव चार-पाच तुकडे करण्याची आक्रमकता याचं मला आकर्षण वाटलं. ती पुढे जाऊन असेही म्हणते की, रमेशला तू आणि सर्वांनी जो विरोध केला, त्यातून आपल्या समाजातील जातीय विषमता मला ढळढळीत जाणवली. रमेशमुळे मला सुरक्षित घराबाहेरचे जे दर्शन घडले, त्याने मी बदलले. समतेचा आग्रह माझ्यात स्वाभाविक बिंबला.

पुढे ती आईला असेही म्हणते, ‘घटस्फोट न घेता विसंवादी लग्न तू नाखुशीने निभावलंस, कारण तुला माहेरची इभ्रत सांभाळायची होती. तुझं दु:ख, तडफड, यामुळे मी अस्वस्थ व्हायची त्याचबरोबर तुझ्या जातीय अस्मितेची चीड यायला लागली. तो काळ माझ्यासाठी आवेगी वादळाचा होता, पण तो तू म्हणालीस तसं वासनांच्या आवेगी वादळाचा नव्हता. तो मूल्यांचा होता. जीवन दृष्टीचा होता आणि त्या उत्पातातून मी एका विसंगतीला जन्म दिला. वैचारिक निष्ठा समतेच्या बाजूची, पुरुषप्रधानतेच्या विरोधातील; पण भावनिक ओढ मात्र वर्चस्व गाजविणाऱ्या पुरुषाची. हे खरं आणि तेही खरंच. माझे वैवाहिक आयुष्य म्हणजे याच संघर्षाचा वास्तव परिणाम होता.’ मला स्वत:ला सरिताचा हा कबुलीजबाव महत्त्वाचा वाटतो.

रमेशची भावनिक गुंतवणूक का आणि कशी झाली असावी याचा शोध घेताना तिने एका नेमक्या प्रश्नावर बोट ठेवले आहे. ती म्हणते की, ‘त्याच्या दृष्टीने त्याच्या हुशारीला समाजमान्यता मिळणे अतिशय महत्त्वाचे होते. या लग्नात कालांतराने माझ्या माहेरचा विरोध मावळेल आणि ब्राह्मण समाजात त्याच्या हुशारीला मान्यता मिळेल अशी आशा त्याला वाटत असावी. माझ्या माहेरहून पैशाची अपेक्षा त्याला कधीच नव्हती. पण आपुलकीचं वागणं, समाजमान्यता याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र प्रेमानं वागण्याचं मानसिक औदार्य त्याच्या अनुभवाला आलं नाही.’

पुन:पुन्हा सरिताचे कौतुक करावेसे वाटते की, किती समंजसपणे, किती प्रगल्भपणे तिने ‘हमरस्ता सोडतानाचा’ हा अनुभव समजून घेतला आहे.

छाया दातार,

पुणे

chhaya.datar1944@gmail.com

हमरस्ता नाकारतांना

सरिता आवाड

राजहंस प्रकाशन, पुणे

फोन : 020-24473459

पृष्ठे 287,

किंमत : 350 रुपये

Share on Social Media

प्रतिसाद

कोणे एके गावी हाथी आला तसे काहीसे झालेले दिसते

महाराष्ट्रातील पाणीप्रश्नाबाबत रत्नाकर पटवर्धन यांच्या (माझ्या लेखावर प्रतिक्रिया देणाऱ्या पत्रातील) मुद्यांविषयी थोडे काही. भूगर्भ जलपातळी ही भूगर्भजल या विज्ञान विषयातील एक संज्ञा आहे, तेव्हा ती बेसाल्टमध्ये वापरणे योग्य नाही हे पटवर्धन यांचे वैयक्तिक मत. ते शास्त्र म्हणून जगमान्य आणि सर्वत्र लागू असल्याने सर्वत्र लागू तसे बेसाल्टलाही लागू. त्याचा अर्थ म्हणजे भूपृष्ठापासून भूगर्भजल किती खोलीवर असा. भूगर्भजल (Ground Water) हे एक शास्त्र असून ते मी शिकवले आहे, शिकलो आहे, अगदी आयआयटी रूरकीत ते ही जलसंसाधन व्यवस्थापन (Water Resource Management) या विषयात एमटेक पदवी अभ्यासक्रमात. त्यामुळे माझ्या संकल्पना तरी तोकड्या नाहीत, लेखाची मर्यादा म्हणून तेवढ्यापुरते लिहिले.

सच्छिद्र खडक भूगर्भजलपुनर्भरण संदर्भात त्याची सच्छिद्रता भूगर्भातील जल पातळीपर्यंत जात असते असे गृहीत असते, तसे नसेल तर जो भाग सच्छिद्र नाही त्याला डाईक म्हणतात आणि त्यावर साठणाऱ्या भूगर्भजलाला पेअरचंद aquifer म्हणतात. या भूगर्भजल विज्ञान विषयातील अतिशय मूलभूत गोष्टी आहेत. जोपर्यंत ट्यूबवेल नव्हत्या, विहिरी खोल नव्हत्या, तोपर्यंत जास्तीत जास्त ५०-६० फुटापर्यंतच्या पाण्याचा उपसा व्हायचा, आजही या खोलीपेक्षा जास्त खोल विहीर खोदताना मजूर गुदमरून मृत्यमुखी पडल्याच्या घटना घडतात, नुकतीच लांजा इथे अशी घटना घडली. ही अवस्था होती तोपर्यंत भूगर्भजल या खोलीच्या पुढे वापरले जात नव्हते. पण नवीन तंत्रज्ञान आले आणि काही ठिकाणी आज ते ७०० फुटापर्यंत गेले. ज्याचे अनेक संदर्भ साधनाच्या आसाराम लोमटे यांनी लिहिलेल्या रिपोर्ताजमध्ये आले आहेत सविस्तर, ते भूगर्भजल म्हणजे हजारो वर्षांचे.

सरकारी प्रयोगाबद्धल आदर व्यक्तिसापेक्ष नसावा तर त्याच्या यशस्वीतेशी निगडित असावा. मी यशस्वी प्रयोगांची माहिती संदर्भासह दिली आहे. उल्लेख केलेला संदर्भग्रंथ पटवर्धन यांनी वाचला असता तर यदाकदाचित हे पत्र त्यांनी लिहिले नसते, अशी माझी खात्री आहे. माझा उद्देश भूगर्भातील जलपुनर्भरण नैसर्गिक होत नसेल तर कृत्रिमपणे करणे शक्य आहे, हे समजून सांगणे इतकाच होता, सगळे जलविज्ञान सांगणे हा नव्हता आणि ते एका लेखात शक्यही नाही. सबब पटवर्धन यांच्या इतर मुद्यांकडे मी दुर्लक्ष करतो. मूळ विज्ञान, त्यातील संकल्पना, व्याप्तीच माहीत नसेल तर त्याविषयीच्या वरवरच्या आणि चुकीच्या गोष्टीचे निरसन करण्यात मला अर्थ वाटत नाही.

नदी हाही तसाच व्यापक विषय. ती उगमापासून काही अंतरावर पाणी आत घेते, मग ती सपाट प्रदेशात उतरते, वाहून आणलेला गाळ आणि पाणी यामुळे जमीन सुपीक करते आणि समुद्राला मिळते. याच सुपीक प्रदेशात ती भूगर्भजल संपृक्त करते, गंगा नदीच्या उत्तराखंड या प्रदेशातील रुरकी जिल्ह्यात एका ट्यूबवेलवर ५०-५० हॉर्सपॉवरचे पंप आणि त्यावर शेकडो एकर सिंचित क्षेत्र माझ्या एम.टेक. अभ्यासात मी अभ्यासले आहे. मला त्या अंगाने नद्या भूगर्भजल पुनर्भरण करीत असतात असे म्हणायचे होते. पण पटवर्धन यांनी ते समजून न घेता, ते इंफ्लुइंट एफ्लूट यात अडकले, त्या नदी विज्ञान (रिव्हर इंजिनिअरिंग) या विषयातील काही संज्ञा आहेत. त्यावर एक स्वतंत्र लेख होईल. मी ऍटिट्यूड म्हणून नाही, तर पटवर्धन यांच्या लेखानिमित अजून काही माहिती वाचकांना होईल म्हणून लिहिले आणि काही वाचकांनी फोन करून तसे कळविल्याने माझा उद्देश सफल झाला याचे समाधान आहे.

‘कोणे एके गावी हाथी आला, कोणी पाय देखे तो म्हणे हाथी खांबा सारिखा, कोणी कान देखे तो म्हणे हाथी सुपा सारिखा’. असे एखाद्या विषयाच्या संदर्भात होते, तसे काहीसे पटवर्धन यांचे झाले आहे असे मला वाटते. पटवर्धन यांच्या शंकांचे निरसन आणि समाधान मात्र करू शकलो नाही ही खंत आहे.

सुखदेव काळे,

दापोली, (रत्नागिरी)

Share on Social Media