Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

अमृतमहोत्सवाचे वेध लागलेत...

बारा वर्षांपूर्वी ‘साधना’ साप्ताहिकाच्या हीरकमहोत्सवाची समाप्ती झाली, त्यावेळी आयोजित केलेल्या समारंभाला (8 सप्टेंबर 2008) तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल व मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यावेळी साधना ट्रस्टचे विश्वस्त ग.प्र.प्रधान, आप्पासाहेब सा.रे.पाटील, मोहन धारिया, किशोर पवार, रा.ग.जाधव, नरेंद्र दाभोलकर हे सर्वजण ‘साधना’च्या अमृतमहोत्सवी वाटचालीची पायाभरणी पूर्ण झाली असे मानत होते. कारण त्याआधीच्या दोन-अडीच वर्षांत डॉ.दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली अनेक व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यक्रम, उपक्रम यांची रेलचेल झाली होती. निवडक साधना ग्रंथसंच आणि साप्ताहिकाची वेबसाईट हा भूतकाळाचा वारसा सांगणारा प्रकल्प त्याचवेळी पूर्णत्वास गेला होता, आणि वर्तमानासाठी अनेक योजना हाती घेतल्या होत्या किंवा नियोजनात होत्या. त्या आधारावर भविष्यातील वाटचाल सुसह्य होणार हे उघड होते.

आता ‘साधना’चे 72 वे वर्ष चालू आहे आणि अमृतमहोत्सवाचे वेध आम्हाला लागले आहेत. हीरकमहोत्सवाच्या समारोपाला उपस्थित होते ते वर उल्लेख केलेले ‘साधना’चे धुरीण आता हयात नाहीत. पण त्यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने व दिशेने ‘साधना’ची वाटचाल अधिक गतीमान होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी दोन सूत्रं महत्त्वाची ठरणार आहेत. एक- गुणात्मक व संख्यात्मक वाढ एकाच वेळी होत राहणे. दोन- ध्येयवाद व व्यावसायिक नीतीमूल्ये हातात हात घालून चालली पाहिजेत.

आता साधना ट्रस्टच्या वतीने साप्ताहिक, प्रकाशन, मीडिया सेंटर आणि कर्तव्य डिजिटल पोर्टल असे स्वतंत्र चार विभाग कार्यरत आहेत. प्रत्येक विभागातही उपविभाग चांगलेच आकार घेत आहेत. बालकुमार व युवा अंक, डिजिटल अर्काइव्ह ही त्याची दोन मोठी उदाहरणे आहेत. अन्य आघाड्यांवरही कार्यरत आहोतच. उदा. साप्ताहिकाचे वर्षभरातील पाच विशेषांक व तीन दिवाळी अंक पूर्णत: बहुरंगी असतात, पण उर्वरित अंक ब्लॅक ॲन्ड व्हाईट छपाईचे असतात, ते अंकही पुढील काळात बहुरंगी होतील. साधना प्रकाशनाच्या वतीने यापुढे दरवर्षी दहा-बारा पुस्तके प्रकाशित होत राहतील, त्यात तीन-चार तरी इंग्रजी किंवा अन्य भाषांतून आणलेली पुस्तके असतील.

या वर्षी बालकुमार व युवा अंकांच्या वितरण मोहिमेवर बराच परिणाम झाला. दुष्काळ, पूर, ऐनवेळी आलेल्या प्रेसच्या अडचणी, आर्थिक मंदी, विधानसभा निवडणुकीचा काळ आणि ‘साधना’ची टीम अनेक आघाड्यांवर कार्यरत असणे अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. पण पुढील वर्षी या पिछेहाटीची भरपाई केली जाईल. शिवाय, बालकुमार अंक महाराष्ट्रात आता इतका रूजला आहे की, शे-दोनशे प्रती अशा पद्धतीने होणारी नोंदणी फारसे प्रयास न करता, लाखभर प्रती इतकी होऊ शकते आहे. त्यामुळे जानेवारी 2021 पासून बालकुमार हे स्वतंत्र मासिक किंवा साप्ताहिकाची मासिक पुरवणी म्हणून देता येईल का, याचाही आम्ही विचार करीत आहोत.

याशिवाय, नवोदित लेखक व तरुण सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी ‘रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग सेंटर’ सुरू करण्याची योजनाही साधना ट्रस्टच्या विचाराधीन आहे. आणखी महत्त्वाचे म्हणजे 2021-22 हे ग.प्र.प्रधान, सदानंद वर्दे, वसंत बापट, आप्पासाहेब सा.रे.पाटील, यदुनाथ थत्ते यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने काही उपक्रमांचे नियोजन पुढील वर्षभरात आकाराला आलेले असेल. आणि 15 ऑगस्ट, 2022 पासून ‘साधना’चे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू होणार आहे.

अशा या ‘संधी’काळात ‘साधना’चा हा दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत ‘साधना’चे तीन दिवाळी अंक वाचकांना माहीत आहेत. बालकुमार व युवा हे दोन्ही अंक ‘क्लास’चा मजकूर ‘मास’पर्यंत पोचवण्यात यशस्वी ठरत आले आहेत. याच यशाची पुनरावृत्ती पुढील वर्षीपासून साधनाच्या मुख्य दिवाळी अंकांबाबतही करण्यासाठी आम्ही नियोजन करीत आहोत. अशा पार्श्वभूमीवर या दिवाळी अंकांकडे पाहिले जावे अशी अपेक्षा आहे.

प्रस्तुत अंकात आठ दीर्घ लेख आहेत आणि एक विशेष विभाग आहे. ‘चिवटी’ या मराठी सिनेमावर नऊ लेखांचा स्वतंत्र विभाग केला आहे, तो का? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्याला विशेष संपादकीय जोडले आहे. याशिवाय, ‘लकीर के इस तरफ’ या डॉक्युमेंटरी फिल्मची निर्माती-दिग्दर्शक शिल्पा बल्लाळ यांची मुलाखत हे या अंकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सत्यजित राय यांच्या ‘न झालेल्या विज्ञानपटाची कहाणी’ विजय पाडळकर यांनी लिहिली आहे. या तिन्हींमधून (दोन लेख व एक विभाग) सिनेमा व समाज यांच्यातील नात्याकडे कसे पाहिले जावे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न दिसतो आहे.

कैफी आझमी या गीतकाराची जन्मशताब्दी आणि जेम्स लव्हलॉक या वैज्ञानिकाने वयाची शंभर वर्षे पूर्ण करणे, या निमित्ताने लक्ष्मीकांत देशमुख व अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेले लेख कोणता मूल्यविचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, हे सूचित करणारे आहेत. जर्मनी : हिटलरच्या काळातला आणि जर्मनी : आजच्या काळातला, यासंदर्भात अनुक्रमे मीना कर्णिक व दत्ता नायक यांचे लेख, अनेक वाचकांना नवे दालन खुले करून देतील. अरुणा रॉय व सहकाऱ्यांनी प्रत्यक्षात माहिती अधिकाराची लढाई सुरू करण्यापूर्वी काय प्रकारची पायाभरणी केली होती, हे सांगणारा लेख, सामाजिक चळवळी अधिक गांभीर्याने करायच्या असतात याचे भान देतो. तर अनिल अवचट यांचा लेख समृद्धीतून निर्माण झालेल्या आपत्तीकडे लक्ष वेधणारा आहे.

असा हा वैचारिक दृष्टीने रेलचेल असलेला अंक वाचकांना सादर करीत आहोत. यातील काही लेख वाचायला थोडे कठीण वाटतील, पण वाचनाच्या बाबतीत सोप्याकडून अवघडाकडे आणि कमी गुंतागुंतीकडून अधिक गुंतागुंतीकडे असाच आपला प्रवास व्हायला हवा असो.

हा अंक आकाराला येण्यामध्ये अनेकांचे हातभार लागत असतात, त्यामुळे कोणाकोणाचा नामोल्लेख करणार! पण यावर्षी अनेक प्रकारची प्रतिकूल स्थिती असूनही हितचिंतकांनी चांगल्या प्रमाणात जाहिराती दिल्या याची कृतज्ञतापूर्वक नोंद करणे आवश्यक वाटते!

(या अंकानंतरचे तीन आठवडे साधना अंक प्रसिद्ध होणार नाहीत-संपादक)

एका विज्ञानपटाची नवलकहाणी

विजय पाडळकर

‘न्यूयॉर्क टाइम्स’चा प्रतिनिधी या संदर्भात राय यांची मुलाखत घेण्यास आला असता, त्यांनी बाकीच्या गोष्टींची चर्चा न करता फक्त चित्रपटाच्या आशयसूत्रांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘या चित्रपटात मला माणसाच्या आजच्या गरजा, पुरातन भारतीय परंपरा व भविष्यांतील अंतराळयुग या तीन वेगवेगळ्या शक्तींचा संघर्ष दाखवायचा आहे.’’ मात्र काही तरी, कुठे तरी फिसकटते आहे, असे राय यांना वाटू लागले. या बाबतीत एक गोष्ट त्यांना चांगलीच खटकली. हॉलीवुडमध्ये एके दिवशी कोलंबियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी रायना विचारले, ‘‘तुम्हाला या प्रकल्पात माईक विल्सन का हवा आहे? कोण आहे तो? तुम्ही त्याच्याबरोबर या कामात सहकारी का बनला आहात?’’ रायनी स्वत:ला हा प्रश्न विचारला, मात्र त्यांनाही त्याचे उत्तर देता आले नाही.

सत्यजित राय हे एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. चित्रपट दिग्दर्शक म्हणून ते जगप्रसिद्ध आहेतच; शिवाय ते आपल्या चित्रपटांच्या पटकथा स्वत:च लिहीत, काही चित्रपटांसाठी त्यांनी कविताही लिहिल्या, अनेक चित्रपटांना संगीतही दिले. ते उत्तम चित्रकार होते, आपल्या चित्रपटांची पोस्टर्स तेच तयार करीत, पात्रांच्या पोशाखांची व सेटची डिझाइन्स तयार करीत. चित्रपटाव्यतिरिक्त मुलांसाठी त्यांनी ‘संदेश’ नावाचे मासिक काढले, कथालेखन केले, मासिकासाठी चित्रे काढली. त्यांनी लिहिलेल्या रहस्यकथा व विज्ञानकथा अजूनही बंगालमध्ये लोकप्रिय आहेत. ते उत्तम वाचकही होते. त्यांचे काका-आजोबा कुलद रंजन यांनी अनुवादित केलेली ज्युल व्हर्नची Mysterious Island ही कादंबरी त्यांनी लहानपणी वाचली व त्यांना विज्ञानकथांच्या वाचनाची गोडी लागली. त्यांनी या संदर्भात लिहिले आहे, ’Addiction to this genre occurs either at adolescence or not at all. ’

‘संदेश’ हे मासिक मुळात सत्यजित यांच्या वडिलांनी सुरू केले होते. मात्र त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे ते बंद पडले. निर्माता-दिग्दर्शक म्हणून यश व नावलौकिक मिळाल्यावर सत्यजित यांनी 1961 मध्ये या मासिकाचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले. या मासिकातच त्यांची ‘बंकूबाबूर बोन्धू’ बंकूबाबूंचा मित्र ही कथा प्रकाशित झाली.

राय यांची ही ‘बंकूबाबूर बोन्धू’ कथा थोडक्यात अशी होती-

बंकूबाबू रागावलेले कुणीही कधीही पाहिले नव्हते. गेल्या वीस वर्षांपासून ते या खेड्यातील शाळेत भूगोल आणि बंगाली शिकवीत आहेत. किती तरी विद्यार्थी त्यांच्या हाताखालून, त्यांची थट्टा-मस्करी करीत, शिकून गेले. कधी मुले फळ्यावर त्यांचे विचित्र चित्र काढीत, कधी त्यांच्या खुर्चीला डिंक चिटकवीत, कधी कालीपूजेच्या वेळी त्यांचे लक्ष नसताना त्यांच्यामागे फटाके उडवीत... पण या व्रात्य मुलांकडे दुर्लक्ष करून बंकू बाबू आपले ध्यान हुशार मुलांवर केंद्रित करीत. घरी बोलावून त्यांना देशोदेशीच्या नवलकथा सांगणे बंकूबाबूंना फार आवडे.

सुटीच्या दिवशी बंकूबाबूंना गावचा मुखिया श्रीपती मजुमदार याच्याकडे खास बोलावणे असे. तेथे जे टोळके जमा झालेले असे, त्यांच्यासाठी बंकूबाबू हे मनोरंजनाचे मोठे साधन होते. ते त्यांची भरपूर चेष्टा तर करीतच, कधी त्यांच्या चपला तर कधी छत्री लपवून ठेवत. प्रत्येक वेळी बंकूबाबू ठरवीत की, यापुढे कधीच या बैठकीत जायचे नाही; पण श्रीपतीबाबूंचे बोलावणे आले की, भिडस्तपणामुळे, हा निर्धार पाळणे त्यांना शक्य होत नसे.

त्या दिवशी या बैठकीत उपग्रहाच्या संदर्भात चर्चा चालू होती. काही दिवसांपूर्वी आकाशात अनेकांना एक वेगळाच तेजस्वी प्रकाश दिसला होता. उपग्रहाबद्दल कुणालाच फारशी माहिती नव्हती, पण त्यामुळे त्याबद्दल वेगवेगळ्या कल्पना करण्याला तर कुणी मनाई केली नव्हती ना! एक जण म्हणाला, ‘‘ते एखादे परग्रहावरून आलेले यानही असू शकेल.’’ बंकूबाबू सहज म्हणाले, ‘‘आणि ते यान आपल्या येथे उतरले तर?’’

लोकांना लगेच त्यांची चेष्टा करण्यास विषय मिळाला. ‘‘वा बंकूबाबू, परग्रहावरील यान येथे उतरेल? या आपल्या खेडकुल्यात? लंडन, मॉस्को, न्यूयॉर्क किंवा कलकत्ता सोडून ते येथे येईल?’’

एक जण म्हणाला, ‘‘मला तर वाटते, ते पाश्चिमात्य देशातच उतरेल.’’

दुसरा म्हणाला, ‘‘मला तर बंकूबाबूचेच बरोबर वाटते. कारण त्या यानातील प्राण्यांना जर पृथ्वीवरील एखादा नमुना गोळा करायचा असेल, तर बंकूंपेक्षा चांगला नमुना त्यांना कोठे मिळेल?’’

तिसरा बंकूबाबूंच्या पाठीवर जोराने थाप मारीत म्हणाला, ‘‘त्यांच्या वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवायला हा अगदी योग्य नमुना आहे!’’

बंकूबाबू मुकाट्याने उठले. तरी जाताना एक जण म्हणालाच, ‘‘जपून जा. आज अमावास्या आहे. भुतांची रात्र...’’

बंकूबाबू घराकडे निघाले. हा रस्ता त्यांच्या सवयीचा होता, तरी थोडे अंतर चालून गेल्यानंतर त्यांना काहीसे वेगळे वाटू लागले. काही क्षणांत त्यांच्या ध्यानात आले की, नेहमी ऐकू येत ते बेडकांचे-कीटकांचे आवाज आज मुळीच ऐकू येत नाहीत. सगळे झोपलेत की काय? पलीकडल्या तलावाच्या पृष्ठभागावर त्यांना कसला तरी प्रकाश दिसला, जो शेजारच्या झाडांवरदेखील पडला होता. आता त्यांच्या कानांत एक वेगळाच आवाज घुमू लागला. जवळ गेल्यावर त्यांना दिसले की, तळ्यात एक प्रकाशमान वस्तू अर्धवट बुडालेल्या स्थितीत तरंगते आहे; तिच्यातून तो प्रकाश येतो आहे. एखाद्या सजीवाने श्वासोच्छ्‌वास करावा, तसा!

त्यांनी त्या वस्तूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जाणवले की, कुणा अदृश्य शक्तीने त्यांना जागच्या जागी जखडून टाकले आहे. त्यांच्यात कसलीही हालचाल करण्याची शक्ती उरलेली नाही. अकस्मात तो घुमणारा आवाज थांबला आणि एका अनोळखी भाषेत उच्चारलेले काही शब्द त्यांच्या कानांवर पडले. ही कोणती भाषा आहे, त्यांना कळेना.

आता त्यांना इंग्रजीत एक प्रश्न ऐकू आला. ‘‘तुम्ही कोण आहात?’’
‘‘मी बंकूबिहारी दत्त आहे सर’’ त्यांनी शक्य तितक्या अदबीने इंग्रजीत उत्तर दिले. ‘‘तुम्ही इंग्रज आहात?’’ ‘‘नाही. मी बंगाली आहे- बंगाली कायस्थ.’’ एका क्षणानंतर शुद्ध बंगालीत उच्चारलेले शब्द त्यांच्या कानी पडले, ‘‘नमस्कार.’’ पाठोपाठ त्या ‘वस्तू’मध्ये एक दरवाजा उघडला गेला व त्यांतून एक चमत्कारिक प्राणी बाहेर आला. तो बंकूबाबूंहून लहान आकाराचा, हडकुळा प्राणी होता. त्याचे डोके गोलाकार असून त्यावर डोळ्यांच्या जागी दोन मोठी छिद्रे होती व त्यांतून पिवळा प्रकाश बाहेर येत होता. त्याचे सारे शरीर एखाद्या गुलाबी धातूचे बनल्यासारखे होते. त्या प्राण्याने बंकूबाबूंना विचारले, ‘‘तुम्ही मानव आहात?’’

‘‘हो.’’ ‘‘मग ही पृथ्वी आहे का?’’ ‘‘हो.’’ ‘‘मला वाटलेच! माझ्या यानात काहीतरी बिघाड झाल्यामुळे ते इथे उतरले आहे. खरे तर मी प्लुटो ग्रहावर चाललो होतो.’’ तो प्राणी आणखी जवळ आला व त्याने बंकूबाबूंचे शरीर चाचपून पाहिले. नंतर तो म्हणाला, ‘‘माझे नाव अंग. मी क्रेनास नावाच्या ग्रहावर राहतो. मला वाटते, आम्ही तुमच्यापेक्षा खूपच पुढारलेलो आहोत.’’ बंकूबाबूंच्या चेहऱ्यावरचा अविश्वास त्या प्राण्याने ओळखला. तो म्हणाला, ‘‘मी ते सिद्ध करू शकतो. मला सांगा- तुम्हाला किती भाषा येतात?’’ ‘‘बंगाली, इंग्रजी आणि थोडी हिंदी.’’ ‘‘म्हणजे अडीच. मला चौदा हजार भाषा येतात. मी पंचवीस ग्रहांचा प्रवास केलेला आहे. बरे, तुमचे वय किती आहे?’’ ‘‘पन्नास.’’ ‘‘माझे वय आठशे तेहतीस आहे.’’ अंगने त्यांच्या हातातील एक स्फटिक बंकूबाबूंच्या हातात दिला. त्याला स्पर्श करताच त्यांच्या शरीराला एक लहानसा झटका बसला. ‘‘या स्फटिकाद्वारेच मी तुमची हालचाल बंद केली होती. मी तुम्हाला आणखी काही दाखवितो. मला सांगा- तुम्हाला कोणता देश, कोणते जग पाहावयाचे आहे?’’ भूगोल हा आवडीचा विषय असलेल्या बंकूबाबूंना अनेक देश पाहावयाचे होते. अर्थातच ते त्यांना अशक्य होते. ते म्हणाले, ‘‘मला उत्तर ध्रुवप्रदेश पाहावयाचा आहे.’’ अंगने त्यांच्या हातात दुर्बिणीसारखी एक वस्तू दिली आणि तिच्या एका बाजूकडून पाहण्यास सांगितले. क्षणात बंकूबाबूंना उत्तर ध्रुव समोर दिसू लागला. आजवर पुस्तकात वाचलेली ती दृश्ये पाहताना बंकूबाबूंचे भान हरपले. यानंतर अंगने त्यांना ब्राझीलचे जंगल दाखविले. मग तो म्हणाला, ‘‘आता तरी मी तुमच्याहून खूप पुढारलेला आहे, हे मान्य कराल?’’

‘‘होय. त्यांत काहीच शंका नाही.’’ ‘‘मी तुमचे अंग चाचपून पाहिले तेव्हा माझ्या ध्यानात आले की, माणूस म्हणून तुम्हाला मर्यादा आहेत; तरी तुमच्या मर्यादेत तुम्ही खूप चांगले आहात. तुमच्यांत कोणती उणीव आहे, माहीत आहे का? तुम्ही फार भिडस्त, गरीब स्वभावाचे व सहनशील आहात. म्हणून तुम्ही आयुष्यात फार काही मिळवू शकला नाहीत. तुम्हीच का -प्रत्येकाने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला पाहिजे, त्याचा प्रतिकार करायला पाहिजे. ठीक आहे. माझा मार्ग भटकल्यामुळे तुमची-माझी गाठ पडली, पण तुम्हाला भेटून मला आनंद झाला. मी आता जातो.’’

‘‘खरे तर मीच नशीबवान आहे. तुमची भेट झाली... नमस्कार.’’ बंकूबाबू असे बोलत आहेत तोवर अंग त्याच्या यानात गेला व त्याने ते चालू केले. क्षणात ते नजरेआडही झाले.

बंकूबाबू घरी कसे आले, त्यांना समजले नाही. त्यांना वाटले- आपण चालत नाही, आकाशात उडतो आहोत. हे सारे अकल्पनीय होते. महत्त्वाचे म्हणजे, पृथ्वीवरील कोट्यवधी लोकांमधून अंगने भेटण्यासाठी नेमकी त्यांची निवड केली होती. आज ते पृथ्वीवरील असे एकमेव व्यक्ती आहेत, ज्याला परग्रहावरील माणूस भेटला... दुसऱ्या दिवशी रविवार होता. मुखियाच्या घरी नेहमीप्रमाणे बैठक भरली होती. पण बंकूबाबू अजून आले नव्हते.

एक जण म्हणाला, ‘‘आज बंकूला का उशीर झाला आहे?’’ दुसरा म्हणाला, ‘‘तो आज काय येतो! काल आपण त्याची चांगलीच खेचली होती.’’ श्रीपती म्हणाले, ‘‘पण त्याच्याशिवाय मजा नाही. तो आला नाही की करमत नाही. राम कन्हाय, तुम्ही जाऊन त्याला घेऊन या बरे.’’

त्यांचे बोलणे संपत नाही तोपर्यंत बैठकीत बंकूबाबूंनी प्रवेश केला. जणू एक वादळच दिवाणखान्यात आले. आल्या-आल्या त्यांनी सुमारे एक मिनिटभर गडगडाटी हास्य केले. असे हास्य या माणसांनी कधीच ऐकले नव्हते. हसणे थांबल्यानंतर बंकूबाबू स्पष्ट आवाजात म्हणाले, ‘‘दोस्तहो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, या बैठकीत येण्याचा माझा हा शेवटचा दिवस आहे. मी येथे आलो ते तुम्हाला काही सांगण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे- तुम्ही सगळे इथे, तुम्हाला न कळणाऱ्या गोष्टींबद्दल अतिशय मूर्खासारखी बडबड करीत असता. दुसरे म्हणजे- या वयात कुणाच्या चपला, छत्री लपवून ठेवणे अतिशय बालिशपणाचे आहे. आणि श्रीपतीबाबू, तुम्ही येथील मुखिया आहात. असल्या टवाळखोरांसोबत कुटाळक्या करणे तुम्हाला शोभत नाही.’’

आपले बोलणे संपल्यावर बंकूबाबूंनी चक्रवर्तीच्या पाठीवर इतक्या जोरात थाप मारली की, त्याचा श्वास अडकला. नंतर ते जसे आले तसेच वेगाने बाहेर पडले. राम कन्हाय हे सारे पाहून एवढा आश्चर्यचकित झाला की, त्याच्या हातातील चहाचा कप निसटून खाली पडला आणि त्यातील चहा त्याच्या व इतरांच्या अंगावर उडाला.

000

ही कथा अतिशय लोकप्रिय झाली. यानंतर सत्यजितनी ‘प्रोफेसर शंकू’ या नावाचे पात्र निर्माण करून विज्ञानकथांची एक मालिकाच लिहिण्यास सुरुवात केली. या संदर्भात आपले ज्ञान अद्ययावत राहावे म्हणून वेगवेगळी वैज्ञानिक मासिके, ’National Geographic’ सारखी मासिके काळजीपूर्वक वाचण्यास त्यांनी प्रारंभ केला. शिवाय समकालीन जागतिक विज्ञानकथाकार काय लिहितात, तेदेखील वाचण्यास सुरुवात केली. ‘या अभ्यासाशिवाय उत्तम विज्ञानकथा लिहिता येत नाही’, असे त्यांनी लिहिले आहे.

कलकत्त्याला 26 जानेवारी, 1966 रोजी जो भारतातील पहिला ’Science Fiction Cine Club’ स्थापन झाला, त्याचे अध्यक्ष सत्यजित राय हेच होते. या क्लबविषयी राय यांनी जगप्रसिद्ध विज्ञानकथालेखक आर्थर सी. क्लार्क यांना पत्र लिहून कळविले. येथून दोघांचा नियमित पत्रव्यवहार सुरू झाला.

काही दिवसांनी राय लंडनला गेले असता, त्यांची व क्लार्क यांची भेट झाली. या भेटीत राय यांनी त्यांना ही कथा थोडक्यात सांगितली आणि तिच्यात काही भर घालून तिच्यावर एक चित्रपट तयार करण्याचा आपला मनसुबादेखील बोलून दाखविला. क्लार्क यांना ती आवडली आणि कोलंबिया येथे परत गेल्यावर त्यांनी त्यांचा एक मित्र माईक विल्सन याला तिच्याबद्दल सांगितले.

हा माईक विल्सन मोठा हरहुन्नरी माणूस होता. तो चित्रपटलेखक, दिग्दर्शक व निर्माता तर होताच, पण त्याचे वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांशी संबंधदेखील होते. माईकने लगेच सत्यजित यांना पत्र लिहून या प्रकल्पात आपल्याला रस असल्याचे कळविले. पुढे, 1980 मध्ये राय यांनी या सगळ्या घटनांवर ’The ordeals of the Alien’ या नावाचा दीर्घ लेख लिहिला. त्यांत ते लिहितात, ‘जेव्हा असा माणूस तुम्हाला पत्र लिहून सांगतो की, तो तुमच्याबरोबर काम करण्यासाठी उजवा हातदेखील कापून देण्यास तयार आहे, तेव्हा तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतोच.’

राय यांनी माईकला पत्र लिहून कळविले की- काही तुरळक नोंदींशिवाय त्यांच्याजवळ अधिक काही नाही, तेव्हा तो सरळ कलकत्त्याला येऊन बसला व त्यांना पटकथा पूर्ण करण्याचा आग्रह करू लागला. पटकथा लिहिताना आपल्याला त्यांच्यासोबत राहू द्यावे, अशीही विनंती त्याने केली. मी फक्त शेजारी बसून राहीन आणि तुमच्यासाठी कॉफी बनवीन, असे तो म्हणाला. सत्यजितनी लिहिले आहे, ‘त्याने कॉफी तर बनविली नाहीच, पण आपल्या चमत्कारिक कल्पना तो माझ्यावर फेकत राहिला.’

राय यांनी आपली मूळ कथा कुमार वाचकांसाठी लिहिली होती. आता त्यांना हा चित्रपट सर्व वयाच्या प्रेक्षकांसाठी तयार करावयाचा होता. शिवाय त्या कथेची मांडणी बरीचशी सुबोध होती आणि तिच्यात जीवनविषयक चिंतन नव्हते, जे आतापावेतो राय यांच्या चित्रपटाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य बनले होते. यासाठी त्यांनी आपली कथा पूर्णपणे बदलून टाकली.

राय यांच्या पटकथेची सुरुवातच परग्रहावरून आलेले यान बंगालमधील एका खेडेगावातील तळ्यात पडते येथून होते. त्यांनी या चित्रपटासाठी एक बंगाली नाव ठरविले होते. आपल्या पटकथेतून त्यांनी मूळ कथेतील बंकूबाबू हे पात्रच काढून टाकले. या यानातील जीवाचे नाव त्यांनी ‘एलियन’ असे ठेवले. या जीवाची व त्या खेड्यातील हबा नावाच्या मुलाची मैत्री होते.

एलियनचे वर्णन राय यांनी असे केले आहे-‘एलियन हे पुराणकथेतील ठेंगू माणूस व दुष्काळी भागातला, उपासमार झालेला आधुनिक मुलगा यांचे मिश्रण आहे.’ त्याचे डोके खूप मोठे आहे, हात-पाय बारीक. तो पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी, माहीत नाही. त्याच्याकडे पाहिल्यावर प्रथम जाणवतो तो त्याचा निष्पापपणा. त्याच्यात फार मोठी शक्ती असेल किंवा कुटिलपणा असेल, असे वाटत नाही. राय यांचे विेश्व ‘पापरहित’ आहे असे म्हटले जाते, त्याचा हा आणखी एक पुरावा.

मात्र असे काही तरी तळ्यात दिसते आहे, ही बातमी आसपास पसरायला वेळ लागत नाही. गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे बोअरवेल खोदण्यासाठी गगनलाल बाजोरिया नावाचा एक मारवाडी आपली आधुनिक यंत्रे घेऊन आलेला असतो. जो डेवलिन नावाचा या क्षेत्रातील कुशल अमेरिकन इंजिनिअरही त्या भागात असतो. शिवाय ही यंत्रे घेऊन बाजोरिया काय करणार आहे याचा मागोवा घेण्यासाठी मोहन नावाचा एक वार्ताहरदेखील कलकत्त्याहून येथे आला आहे. यानाच्या येण्याची ही एक नवीच आश्चर्यजनक घटना या तिघांनाही त्यांतून उद्‌भवलेल्या परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहावयास भाग पाडते. बाजोरियाला वाटते की, तळ्यातून एक स्वयंभू मंदिर अर्धवट बाहेर आले आहे. या तळ्यातील पाणी उपसून ते मंदिर पूर्ण बाहेर काढायचे, त्याचा जीर्णोद्धार करायचा, तळ्यात सर्वत्र संगमरवरी फरशी बसवायची, हे एक नवे तीर्थस्थान म्हणून विकसित करावयाचे आणि तेथे ‘जीर्णोद्धार व सुशोभन- गगनलाल बाजोरिया’ अशी पाटी लावायची- असे स्वप्न तो पाहू लागतो.

यानात बसून एलियन हे सारे न्याहाळतो आहे. रात्रीच्या वेळी सारे मानवप्राणी निघून गेल्यावर तो यानाबाहेर येतो व कमळाच्या पाकळ्यांवर पाय देत तळ्यातून जमिनीवर जातो. हा प्राणी जितका चमत्कारिक आहे, तितकेच त्याचे वागणेही निराळेच आहे. त्याला आजूबाजूच्या या नव्या जगाबद्दल एक बालसुलभ कुतूहल आहे. त्याच्याजवळ अनेक शक्ती आहेत, पण त्यांचा उपयोग तो नाना गमतीजमती करण्यासाठी करतो. तो एका लहान झुडुपाकडे पाहत असताना त्याचे डोळे पिवळ्या प्रकाशाने चमकतात आणि त्या झाडाला फुले येतात. आपल्या या करामतीचे त्यालाच हसू येते. एक फूल तोंडात टाकून चघळत असताना त्याला मुंग्यांचे एक वारूळ दिसते. तो बोटाने त्या मुंग्यांना डिवचतो. त्या इकडे-तिकडे पळू लागतात. एलियनच्या डोळ्यांतून आता निळा प्रकाश येऊ लागतो. त्याला मुंग्यांचे ‘बोलणे’ ऐकू येऊ लागते. मग त्याला आंब्याच्या झाडाभोवती चमकणारे काजवे दिसतात. तो झाडाची फांदी हलवितो. काजवे त्याच्याभोवती फेर धरून नाचू लागतात.

एलियनला आता एक गरीब मुलगा झोपडीत झोपलेला दिसतो. त्याच्या डोळ्यांतील प्रकाश जांभळा होतो आणि त्याला त्या मुलाच्या मेंदूतील घडामोडी कळतात. हबा झोपेत स्वप्न पाहतो आहे. एलियन त्या स्वप्नाचा भाग बनतो. ते दोघे जण आनंदाने नाचू-गाऊ लागतात.

हबाला झोपडीत सोडून एलियन बाहेर येतो. त्याला सुकलेले भाताचे एक शेत दिसते. त्याच्या डोळ्यांतून पिवळा प्रकाश बाहेर पडतो. रोपे पुन्हा तरारून ताजीतवानी होतात.

सकाळी जेव्हा गावकरी हे शेत पाहतात, तेव्हा त्यांच्या आश्चर्याला सीमा उरत नाही. आता तळ्यातून एक मंदिर वर आल्याची बातमी सगळीकडे पसरते. त्या मंदिरामुळे अनेक चमत्कार होत आहेत, अशी लोकांची धारणा बनते. पाणी उपसण्याच्या कामी बाजोरियाला जो डेवलिनची मदत हवी आहे, तसेच या कामाला प्रसिद्धी न देण्यासाठी मोहनचीही. मोहनने सध्या तरी वर्तमानपत्रात या घटनेबद्दल काही लिहू नये, म्हणून बाजोरिया त्याला विनंती करतो. जो डेवलिन याला मंदिर वगैरेची कल्पना पटत नाही. तो तर्काने विचार करणारा आहे, शिवाय अमेरिकन आहे. असल्या गोष्टीवर त्याचा विेशास नाही.

या ठिकाणी सत्यजित राय यांनी बाजोरियाच्या तोंडी एक अत्यंत महत्त्वाचे वाक्य टाकले आहे. तो म्हणतो, ‘‘व्यवसाय आणि धर्म हे जगातील सर्वांत विलक्षण असे कॉकटेल आहे- चमत्कार घडविणारे, अतिशय प्रभावी, असामान्य कॉकटेल!’’

मुलांसाठीच्या कथेतून एक विचारघन चित्रपट निर्माण करताना राय कोणत्या दिशेने विचार करीत होते, हे आता लक्षात येते. माणसे ‘चमत्कारांना’ कशी सामोरी जातात, जे आपल्याला आकलन होत नाही त्याच्याकडे पाहताना माणसाच्या मूळ प्रवृत्तीचा कल कसा स्वार्थ साधण्याकडे असतो, इकडे ते आपले लक्ष वेधतात. सामान्य माणसाच्या दृष्टीने अनुभवाचा अर्थ वगैरे शोधणे या दुय्यम गोष्टी. पुढे एका प्रसंगात बाजोरिया कलकत्त्याहून आलेल्या वार्ताहराला म्हणतो, ‘‘हे मंदिर विलक्षण वेगळे आहे याची मला खात्री आहे, कारण प्राचीन मंदिरांचा मी अभ्यास केलेला आहे. अनेक मंदिरांचा मी जीर्णोद्धार केला आहे.’’

वार्ताहर म्हणतो की, त्याला प्राचीन मंदिरांचे असे रूप बिघडविणे पटत नाही. तेव्हा बाजोरिया म्हणतो, ‘‘मग काय ही मंदिरे तशीच नष्ट होऊ द्यायची?’’

या बोलण्याला एक व्यक्तिगत व सामाजिक संदर्भ आहे. त्या काळात प्रसिद्ध उद्योगपती बिर्ला यांनी बंगालमधील अनेक मंदिरांची ‘जीर्णोद्धार’ या नावाखाली डागडुजी केली होती आणि तसे करताना आधुनिक स्थापत्याची त्यांत भेसळ केली होती. राय यांना हे मुळीच आवडलेले नव्हते.

दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण झाला नाही, पण हे बीज राय यांच्या मनात तसेच राहिले व पुढे ‘गणशत्रू’ तयार करताना इब्सेनच्या मूळ नाटकात त्यांनी ‘धार्मिक भावना व व्यवसाय’ यांच्या कॉकटेलची अप्रतिम भर घातली.

बाजोरियाला डेवलिन म्हणतो, ‘‘पाणी काढण्यासाठी तुम्हाला माझी मदत कशाला हवी? ते काम तुमचे मजूरही करू शकतील.’’ खरे तर बाजोरियाला डेवलिनची मदत दुसऱ्याच कामासाठी हवी असते. तो म्हणतो, ‘‘ते काम माझे मजूरच करतील. तुम्ही फक्त तुमच्याजवळची बंदूक घेऊन माझ्यासोबत राहायचे.’’ ‘‘बंदूक घेऊन?’’ ‘‘हो. सर्वांना दिसेल अशी. तुम्हाला ठाऊक नाही इकडले लोक कसे आहेत ते. तो पाहा, तो वर आलेला भाग कसा चकाकतो आहे! माझी खात्री आहे, मंदिराचे शिखर शुद्ध सोन्याचे आहे. हे जर लोकांना समजले, तर कुदळ- फावडी घेऊन ते मंदिरावर आणि शस्त्रे घेऊन आपल्यावर तुटून पडतील!’’

बिजोरिया डेवलिनला बरीच रक्कम देण्याचे आमिषही दाखवितो. शेवटी डेवलिन तयार होतो. मात्र आता वार्ताहराच्या मनात शंका निर्माण होते. त्याला आठवते- दोन दिवसांपूर्वी आकाशात एक विलक्षण प्रकाशरेषा फिरताना अनेकांनी पाहिली होती. तो रशिया किंवा अमेरिकेचा उपग्रह असावा, अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली होती. हे ‘मंदिर’ म्हणजे तो उपग्रहच तर नसावा? किंवा हे दुसऱ्याच कुणा ग्रहावरून आलेले यान तर नसेल? डेवलिन त्याची चेष्टा करीत म्हणतो, ‘‘अशा कल्पना करण्यासाठी तुला पगार मिळतो का?’’ ‘‘हे जे चमत्कार घडताहेत ना, त्यामुळे माझी खात्री झाली आहे.’’ दुसऱ्या दिवशी बाजोरिया त्याचे मजूर घेऊन तळ्याजवळ येतो. डेवलिन, मोहन तेथे आलेले आहेतच. त्या वेळी मोहन आपली ‘परग्रहावरील यानाची’ कल्पना बाजोरियाला सांगतो. बाजोरिया त्याला वेड्यात काढतो. पण डेवलिनलाही आता मोहनच्या बोलण्यात तथ्य वाटू लागते. तो अचानक तळ्यात उडी मारतो व पोहत ‘मंदिरा’जवळ जातो. त्याला दिसते की, त्या आकृतीच्या आतून एक प्रकारचा प्रकाश येतो आहे व ती थरथरते आहे. तो झपाट्याने परत येतो व म्हणतो, ‘‘सरकारी सूत्रांना ताबडतोब कळवा. हे परग्रहावरील यान आहे व ते धोकादायक असू शकते.’’

तेवढ्यात त्यांना दिसते, ती वस्तू हळूहळू तळ्यातून वर येते आहे. डेवलिन बंदूक उचलून त्या वस्तूवर गोळीबार करतो. तिला काहीच इजा होत नाही. आता यानाचा अंतर्भाग आपल्याला दिसतो. आत एलियन ‘बुद्ध-मुद्रेत’ बसला आहे. त्याच्यासोबत हबा आहे आणि भोवती कमळाची फुले, बेडूक, एक साप, एक बुलबुल, एक खार आणि काही काजवे आहेत. हे मित्र त्याने गोळा केलेले आहेत. सारे जण एक मधुर गीत गात आहेत. हळूहळू संगीत थांबते. यानाच्या भोवती हिरवा प्रकाश दिसू लागतो व क्षणार्धात यान अदृश्य होते.

राय यांची पटकथा ‘विज्ञान’ किंवा ‘चमत्कार’ यांच्या तपशिलात न जाता माणसाच्या त्यांच्या संदर्भातील प्रतिक्रियांवर अधिक लक्ष केंद्रित करते. सामाजिक चित्रपटातील ‘तत्त्वचिंतक’ राय येथेही आपल्याला भेटतात. एलियन हे नेहमी दुष्ट व घातक असतात; ते पृथ्वीवर राज्य करण्यासाठी येतात वगैरे नेहमीच्या कल्पनांत राय यांना रस नाही. एलियनजवळ एक बालसुलभ निरागसता आहे. हबाच केवळ त्याचा मित्र बनतो; कारण जो निरागस असतो तोच ‘सृष्टी-रहस्याच्या’ जवळ जाऊ शकतो, यावर राय यांची श्रद्धा आहे. पटकथेत या निरागसतेचे अतिशय काव्यात्म वर्णन राय यांनी केले आहे. हा चित्रपट तयार झाला असता, तर याला किती अप्रतिम दृश्यरूप राय यांनी दिले असते याची आता आपण केवळ कल्पनाच करू शकतो. 00

पंधराएक दिवसांत पटकथेचा पहिला खर्डा तयार झाला. हा चित्रपट इंग्रजी व बंगाली अशा दोन भाषांत बनवावा, अशी कल्पना राय यांच्या मनात आली. या नव्या कथेत मारवाडी व्यापाऱ्याचे जे प्रमुख पात्र होते, ते त्या काळचा लोकप्रिय अभिनेता पीटर सेलर्स याने करावे, अशी राय यांची इच्छा होती. कारण त्याच्या नावावर परदेशात वितरक मिळाले असते. माईक म्हणाला, ‘‘ते होऊन जाईल.’’ त्याने सेलर्सच्या एजंटला पत्र लिहिले. त्यावर सेलर्सचे पत्र आले की, कल्पना त्याला आवडली आहे, पुढील गोष्टी भेटीअंती ठरवू. यानंतर एप्रिल 1967 मध्ये राय माईकसोबत पॅरिसला जाऊन सेलर्सला भेटले. त्याच्याशी चर्चा करताना रायनी त्याला विचारले, ‘‘तुम्ही माझे चित्रपट पाहिले आहेत का?’’

त्याने सत्यजित यांची ख्याती ऐकली होती, पण सिनेमे पाहिलेले नव्हते. तो म्हणाला, ‘‘नाही. पण जोनाथन मिलरने तुमच्याबद्दल खात्री दिली आहे आणि ती मला पुरेशी आहे.’’

पण रायना ते पुरेसे वाटत नव्हते. त्यांनी लंडनहून ‘चारुलता’ची प्रिंट मागविली व सेलर्सला दाखविली. तो अतिशय प्रभावित झाला व म्हणाला, ‘‘तुमचे अभिनेते माझ्यापेक्षा चांगले काम करतात. तुम्हाला मी कशाला हवा आहे?’’ पण तो कशासाठी हवा होता, ते त्यालाही माहीत होते व रायनाही. सेलर्सने या चित्रपटात काम करण्याचे मान्य केले.

आता या सिनेमाला भांडवल मिळविण्यासाठी माईक हॉलिवुडला गेला व राय कलकत्त्याला परतले. काही दिवसांनी माईकचा निरोप आला की, कोलंबिया ही प्रख्यात निर्मिती संस्था या प्रकल्पात भांडवल गुंतविण्यास तयार आहे. शिवाय चित्रपट कसा बनवायचा याचे पूर्ण स्वातंत्र्य राय यांना राहील. त्याने हेही कळविले की, चित्रपटातील एका अमेरिकनाची भूमिका करण्यासाठी मार्लन ब्रान्डो व स्टीव्ह मेक्वीन दोघेही उत्सुक आहेत. त्याच्या पत्रामुळे राय यांचा उत्साह वाढला व ते नवी आशा घेऊन हॉलीवुडला गेले. तेथे गेल्यावर त्यांनी पाहिले, माईकने एका आलिशान हॉटेलात त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी आश्चर्य व्यक्त केले तेव्हा माईक म्हणाला, ‘‘काळजी करू नका मास्टर, कोलंबियाने खर्चासाठी बराच ॲडव्हान्स मंजूर केला आहे.’’

या सुमारास सेलर्सही हॉलिवुडमध्येच होता. त्याची व राय यांची पुन्हा एकदा भेट झाली. या भेटीत सेलर्स म्हणाला, ‘‘काही दिवसांपूर्वी एका भारतीय ज्योतिषाने मला सांगितले होते की, एका भारतीय दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मला मिळणार आहे. ते खरे ठरले.’’

‘अपु या सिनेमाच्या तीन मालिकेमुळे राय यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. अशा दिग्दर्शकाचा हॉलिवुडच्या सहकार्याने चित्रपट निर्माण करण्याचा प्रकल्पही एव्हाना एक मोठी बातमी बनली होती. हॉलिवुडमधील अनेक वर्तमानपत्रांनी तिला ठळक प्रसिद्धी दिली. दि.12 जून, 67 रोजी Los Angeles Times ने या संदर्भात लिहिले, ‘बुडालेला खजिना, विज्ञानकथा, पीटर सेलर्स यांपैकी एकही गोष्ट सत्यजित राय यांच्या चित्रपटाचा घटक असू शकेल, असे वाटत नाही; तरी हे सत्य आहे. राय यांचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट कोलंबियासाठी ’Alien’ या नावाने भारतात चित्रित केला जाईल. सेलर्स हा श्रेष्ठ भारतीय दिग्दर्शकाबरोबर काम करणारा पहिला मोठा पाश्चात्त्य अभिनेता ठरेल. तो या चित्रपटात एका श्रीमंत बंगाली उद्योगपतीची भूमिका करणार आहे.’

‘बुडालेला खजिना’ हे शब्द बातमी लिहिणाऱ्याने माईक विल्सन याच्या संदर्भात लिहिले होते. माईकला समुद्रात खोलवर जाण्याची आवड होती आणि पाच वर्षांपूर्वी त्याला लंकेजवळच्या समुद्रात चांदीच्या नाण्यांचा मोठा साठा सापडला होता. या बातमीत ‘माईक या चित्रपटाची निर्मिती करणार आहे’ असाही उल्लेख होता. हा चित्रपट ही एक अर्थाचे अनेक पदर असलेली दृष्टांत कथा असेल व तिला सामाजिक, धार्मिक व तात्त्विक पैलू असतील, असेही बातमीत लिहिले होते. माईक हा अतिशय कुशल असा व्यवहारी व्यावसायिक होता. त्याने आपले जाळे पद्धतशीरपणे फेकावयास सुरुवात केली होती. मात्र राय यांना अजून हे समजायचे होते.

सेलर्सने या संदर्भात अजून लेखी करार केला नव्हता; परंतु त्यानेदेखील काही वर्तमानपत्रांना मुलाखती देताना आपण राय यांच्याबरोबर काम करीत आहो, अशी कबुली दिली होती.

‘न्यूयॉर्क टाइम्स’चा प्रतिनिधी या संदर्भात राय यांची मुलाखत घेण्यास आला असता, त्यांनी बाकीच्या गोष्टींची चर्चा न करता फक्त चित्रपटाच्या आशयसूत्रांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘या चित्रपटात मला माणसाच्या आजच्या गरजा, पुरातन भारतीय परंपरा व भविष्यांतील अंतराळयुग या तीन वेगवेगळ्या शक्तींचा संघर्ष दाखवायचा आहे.’’

मात्र काही तरी, कुठे तरी फिसकटते आहे, असे राय यांना वाटू लागले. या बाबतीत एक गोष्ट त्यांना चांगलीच खटकली. हॉलिवुडमध्ये एके दिवशी कोलंबियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी रायना विचारले, ‘‘तुम्हाला या प्रकल्पात माईक विल्सन का हवा आहे? कोण आहे तो? तुम्ही त्याच्याबरोबर या कामात सहकारी का बनला आहात?’’ रायनी स्वत:ला हा प्रश्न विचारला, मात्र त्यांनाही त्याचे उत्तर देता आले नाही.

एके दिवशी हॉटेलमधील माईकच्या खोलीत त्यांना काही कागद टाईप करून ठेवलेले आढळले. त्यांनी ते पाहिले तेव्हा त्यांना दिसले की, त्यांनी लिहिलेल्या पटकथेच्या पहिल्या ड्राफ्टच्या अनेक प्रती माईकने काढून ठेवल्या होत्या आणि त्यांवर ठळक अक्षरांत ‘Copyright Mike Wilson and Satyajit Ray’ असे लिहिले होते. राय चक्रावले. पटकथा लेखनात माईक याचा तर काहीही सहभाग नव्हता व त्याचे नाव टाकण्याचा असा अधिकार रायनी त्याला कधीच दिला नव्हता. त्यांनी माईकला विचारल्यावर सारवासारव करीत तो म्हणाला, ‘‘मास्टर, एकापेक्षा दोन डोकी केव्हाही चांगली असतात.’’

या संदर्भात राय आणि आर्थिक व्यवहारांचे अज्ञान याबद्दल थोडे सांगावयास हवे. राय यांना आर्थिक व्यवहार मुळीच कळत नसत. त्यांचे तिकडे लक्षही नसे. त्यांचे सर्व व्यवहार अनिलबाबू नावाचे त्यांचे सहायक पाहत. राय यांच्या व्यक्तिगत खर्चाचा हिशेबही तेच ठेवत. एकदा राय यांना नवे घर भाड्याने घ्यायचे होते; तेव्हा जुन्या घराचे भाडे आपण किती भरतो व नव्या घराचे भाडे परवडेल किंवा नाही, याबद्दल त्यांना काहीच सांगता आले नव्हते. ही गोष्ट अनिलबाबूंना विचार, असे त्यांनी पत्नीला सांगितले. लेखी करार, देणे घेणे या बाबतीत ते पूर्णपणे अनभिज्ञ होते. शिवाय इतरांवर चटकन विेशास टाकण्याचा त्यांचा स्वभाव होता. म्हणून माईक विल्सन काय करतो आहे, हे त्यांच्या ध्यानात आले नाही.

भारतात आल्यावर या प्रकल्पासंदर्भात पुढे बरेच दिवस काहीच घडले नाही. राय यांना आता चिंता वाटू लागली. मात्र काही दिवसांनी त्यांना सेलर्सचे एक पत्र आले. त्यात चित्रपटाबद्दल काही नव्हते, परंतु सेलर्सने ‘पाथेर पांचाली’बद्दलची त्याची प्रतिक्रिया त्यांना एक कविता लिहून कळविली होती. त्याने आपल्या काही मित्रांना हा चित्रपट दाखविण्यासाठी बोलाविले होते. त्या संदर्भात त्याने लिहिले-

‘‘I could say to my friends the evening of that day Is the film of a Trilogy And is called ‘‘Pather Panchali’’ In which there is a scene of two children in a field of barley Watching a train go by Under an azure sky So beautiful you feel that want to die.’’

‘Alien’ ची म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. अशात आणखी एक अनपेक्षित घटना घडली. कोलंबिया USAने हा प्रकल्प कोलंबिया UKकडे वर्ग केला. आता नव्याने बोलणी करण्यासाठी राय यांना लंडनला जावे लागले. माईकही तेथे आला. या वेळीही त्याने राय यांची व्यवस्था आलिशान हॉटेलात केली होती. त्याच्या स्वभावाचा आणखी एक नमुना राय यांना पाहावयास मिळाला. कोलंबियाच्या अधिकाऱ्यांवर त्याचा मुळीच विश्वास नव्हता. म्हणून तो ज्या वेळी त्यांना भेटे, त्या वेळी त्यांचे बोलणे तो गुपचूप रेकोर्ड करू लागला. हे रायना आवडले नाही. कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनाही माईकचा संशय येऊ लागला होता. तो जवळ नसताना एकदा त्यांनी रायना स्पष्ट विचारले, ‘‘पटकथालेखनासाठी तुम्हाला देण्यासाठी आम्ही 10000 डॉलर ॲडव्हान्स रक्कम माईकजवळ दिली होती, ती तुम्हाला मिळाली का?’’

रायना तर अशी काहीच रक्कम मिळाली नव्हती. म्हणजे माईक त्यांच्या पैशावर उंची हॉटेलमध्ये मजा करीत होता. रायनी माईकला विचारले तेव्हा तो म्हणाला की, लंडनचे अधिकारी खोटारडे आहेत. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना खरी माहिती आहे.

लंडनहून परतताना कारमध्ये बसून विमानतळावर जाताना माईकने काही पेपर रायसमोर ठेवले व त्यावर सही करण्याची विनंती केली. हे कसले पेपर आहेत, असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘मला सिनेमासंदर्भात अनेक लोकांशी व्यवहार करावे लागतात. तुम्ही आणि मी पार्टनर आहोत असे या पेपरमध्ये लिहिले आहे.’’ आता सत्यजित बरेच सावध झाले होते. ते म्हणाले, ‘‘हे पेपर कलकत्त्याला पाठवून द्या. मग पाहू.’’

नंतर हे पेपर त्यांच्याकडे कधीच आले नाहीत. भारतात आल्यावर त्यांना कोलंबियाकडून 26 मार्च, 1968 या तारखेचे एक दीर्घ पत्र आले. त्यांनी कळविले होते की- माईक याने ‘इंडस इंटरनॅशनल प्रॉडक्शन’ नावाची कंपनी स्थापन करून तिच्याकडे ‘सत्यजित व त्याने’ लिहिलेल्या कथेचे हक्क आहेत, असे सांगितले होते. त्यासाठी कोलंबियाने त्याला 15000 डॉलर ॲडव्हान्स दिला होता. या गोष्टीचा जाब व हिशेब राय यांनी माईककडेच मागावा.

यानंतर 18 एप्रिल, 68 रोजी त्यांनी रायना आणखी एक पत्र लिहिले. त्यांत लिहिले होते की, माईकने कोलंबियाकडून विविध कारणांसाठी 48800 डॉलर उचलले असून त्याचा हिशेब त्याने दिलेला नाही. कोलंबियाने असेही सांगितले की, अजून ते राय यांच्याबरोबर चित्रपट निर्माण करण्यात सहभागी होऊ इच्छितात; मात्र त्यासाठी राय यांनी लिहून द्यायला हवे की, या पटकथेशी माईक याचा काहीही संबंध नाही. पटकथेच्या ड्राफ्टवर दोघांचे नाव असल्यामुळे राय तसे करू शकत नव्हते. त्यांनी माईकला पत्र लिहून या प्रकल्पापासून दूर होण्यास सांगितले. आता मात्र माईकने त्याचे खरे रूप दाखविले. त्याने राय यांनाच ‘चोर’ व खोटारडा’ ठरविले आणि कोणत्याही परिस्थितीत पटकथेवरील हक्क सोडणार नाही, असे कळविले. त्याने या बाबतीत सेलर्सला काय कळविले, कुणास ठाऊक; कारण 21 जून, 68 रोजी सेलर्सने रायना पत्र लिहिले, ‘तुमच्या चित्रपटातील माझी भूमिका तुम्हाला पूर्ण वाटत असेल, पण मला तसे वाटत नाही. अशी अपूर्ण भूमिका करण्यात मला स्वारस्य नाही.’

आता हा प्रकल्प रद्द झाल्यातच जमा होता. अशा परिस्थितीतही राय यांची विनोदबुद्धी शाबूत होती. त्यांनी पीटरला त्याच्याच शैलीने कवितेच्या रूपात एक पत्र लिहिले-

‘Dear Peter, if you wanted a bigger part You should told me right at the start, By disclosing it at this juncture You have surely punctured The Alien balloon Which I dare say will now be grounded soon Causing a great deal of dismay To Satyajit Ray.’

सेलर्सकडून काहीच उत्तर आले नाही. नंतर काही दिवसांनी अनपेक्षितपणे आर्थर सी.क्लार्क यांच्याकडून रायना एक पत्र आले. त्यांनी लिहिले होते, ‘माईकने त्याच्या डोक्याचे मुंडण केले आहे व तो जंगलात जाऊन ध्यानधारणा करतो आहे.’

त्यानंतर काही दिवसांनी माईक विल्सनची एक चिट्ठी रायना मिळाली. तिच्यात लिहिलेले होते- ‘प्रिय रावणा, सीतेला तूच ठेवून घे. ती तुझीच आहे. तिला सांभाळ, तिला व जगाला आनंदी कर.’

उपसंहार :

सत्यजित राय यांच्या दृष्टीने हा अध्याय आता संपला होता. ते आता आपल्या नव्या चित्रपटाकडे वळले. राय यांची चरित्रकार मारी सेटन हिने ’Portrait od a Director’ या ग्रंथात त्यांच्याविषयी एक फार अप्रतिम टिपण्णी केली आहे. ती म्हणते, ‘राय यांच्याबद्दल सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे- ’his capacity never to dwell upon his trobles or difficulties. He remains serene.’

पण ही पटकथा राय यांचा पिच्छा असा सोडणार नव्हती. त्यांनी अशी पटकथा लिहिली आहे, हे आतापावेतो चित्रपटविश्वातील अनेकांना माहिती झाले होते. अधून- मधून कुणी निर्माता त्यांना या कथेबद्दल विचारी. सॅनफ्रान्सिस्को येथील एका वकिलाने त्यांना या कथेवर चित्रपट तयार करण्यासाठी फायनान्स करण्यास तयार असल्याचे 1980 मध्ये कळविले. दि.7 जून, 81 रोजी इला दत्त या वार्ताहराला मुलाखत देताना ही गोष्ट राय यांनी सांगितली. मात्र अजून काही लेखी करार झाला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘या कथेवर नव्याने थोडे काम करावे लागेल. ही कथा मी बारा वर्षांपूर्वी लिहिलेली असल्यामुळे तिच्यात त्या काळाचे बरेच संदर्भ आहेत. ते बदलून त्यांत समकालीन संदर्भ टाकणे गरजेचे आहे. शिवाय इतक्या वर्षांत स्पेशल इफेक्ट चित्रित करण्याच्या तंत्रात प्रचंड प्रगती झालेली असल्यामुळे त्यांचा उपयोगही करून घ्यावा लागेल.’’ परंतु या नव्या घटनांतूनदेखील काहीच निष्पन्न झाले नाही.

आणि अचानक एके दिवशी बातमी आली की, 11 जून, 1982 रोजी स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा ‘E.T.’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो प्रचंड लोकप्रिय बनला आहे व टीकाकारांनीही त्याचे खूप कौतुक केले आहे. परग्रहावरून आलेला एक जीव आणि पृथ्वीवरील दहा वर्षांचा एक मुलगा यांच्या मैत्रीची कहाणी स्पिलबर्ग याने या चित्रपटात सांगितली होती. त्या वर्षीच्या हिवाळ्यात आर्थर सी.क्लार्क यांनी हा चित्रपट पाहिला, तेव्हा त्यात व राय यांच्या ’The Alien’ च्या पटकथेत अनेक साम्यस्थळे त्यांना जाणवली. त्या कथेतील काही प्रसंगांचा स्पिलबर्ग याने उपयोग करून घेतला आहे, याबद्दल त्यांच्या मनात शंका उरली नाही. त्यांनी फोन करून ही गोष्ट राय यांच्या कानांवर घातली. राय यांनी ’E.T.’ पाहिल्यावर त्यांचेही हेच मत पडले. फेब्रुवारी 1983 मध्ये ‘इंडिया टुडे’ला मुलाखत देताना ते म्हणाले की, माझ्या चित्रपटाची पटकथा बारा वर्षांपूर्वी हॉलीवुडमध्ये सर्वत्र फिरत होती. ’E.T.’would not have been possible without my script.’

या मुलाखतीत राय असेही म्हणाले की, क्लार्क यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितले की, हे प्रकरण असेच सोडून देणे योग्य नव्हे; या संदर्भात स्पिलबर्गवर कल्पनाचौर्याची केस दाखल करायला हवी. राय यांची ही मुलाखत असीम छाब्रा नावाच्या एका भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने वाचली. राय आणि स्पिलबर्ग या दोघांचाही चाहता असलेला असीम त्या वेळी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जर्नालिझमचा कोर्स करीत होता. या बातमीत त्याला एक ‘स्टोरी’ सापडली. त्याने राय, स्पिलबर्ग व क्लार्क तिघांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात त्याच्या एका मित्राने बारा वर्षांपूर्वीच्या राय यांच्या पटकथेची एक प्रत त्याला उपलब्ध करून दिली. ती वाचल्यावर असीमलाही तिच्यात व स्पिलबर्गच्या सिनेमात अनेक साम्यस्थळे आढळली. एक म्हणजे, दोन्हीमध्ये परग्रहावरून आलेल्या जीवाची व पृथ्वीवरील लहान मुलाची मैत्री दाखविली होती. दोन्ही जीवांचे दृश्यरूप जवळजवळ सारखे होते. दोन्ही जीवांजवळ जखमा बऱ्या करण्याची शक्ती होती. सुकलेली झाडे दोघेही फुलवू शकत.

स्पिलबर्गने असीमच्या पत्राला उत्तर दिले नाही. मात्र वर्तमानपत्रात जेव्हा या गोष्टीची चर्चा सुरू झाली, तेव्हा त्याने आपल्यावरील आरोप फेटाळत सांगितले की, ज्या वेळी राय यांची पटकथा अमेरिकत फिरत होती त्या वेळी तो शाळेत शिकत होता. परंतु ‘Star Weekend Magazine’ ने त्याचा हा दावा फेटाळून लावला. त्यांनी सिद्ध केले की, त्या वेळी स्पिलबर्ग हायस्कूल पास करून हॉलीवुडमध्ये सिनेमाच्या क्षेत्रात धडपडत होता. स्पिलबर्ग याचा मित्र, प्रख्यात दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसी यानेही सत्यजित यांच्या दाव्यात तथ्य असल्याचे मत मांडले. ‘I have not qualms in admitting that Spielberg’s E.T. was influenced by Ray’s Alien. Even Sir Richard Attenborough pointed this to me.’

असा सर्व गदारोळ उठला असताना क्लार्क यांनी अचानक आपले मत बदलले. त्यांनी रायना पत्र लिहून कळविले, ‘स्पिलबर्ग याच्यावर केस करावी, असे मी म्हटल्याचे मला आठवत नाही!’ या पत्रात ते पुढे लिहितात, In any case, for God’s sake, don’t get involved with lawyers.

या पत्रामुळे राय यांचा या प्रकरणातील रस संपला. असीमला फोनवर दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘‘मी यासंदर्भात माझ्या वकिलांशी चर्चा केली आहे आणि त्यांचे मत पडले की, कायदेशीर कारवाई करण्यात अर्थ नाही. एक तर स्पिलबर्गने फक्त माझी कल्पना घेतली आहे व त्यांत खूप बदल केले आहेत. दुसरे म्हणजे, येथे भारतात बसून या गोष्टीचा पाठपुरावा करणे शक्य नाही. आर्थिकदृष्ट्या ते अवघड तर आहेच, शिवाय मी सध्या जो चित्रपट निर्माण करतो आहे त्यांत विनाकारण अडथळा येईल.’’ मग काहीसे उदास होऊन ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत माझ्या मनात त्या कल्पनेवर चित्रपट निर्माण करण्याची इच्छा होती, पण आता ती मला कायमची सोडून द्यावी लागणार आहे. कारण आता जरी मी तो चित्रपट काढला, तर लोक म्हणतील- मी स्पिलबर्गच्या कल्पनेची चोरी केली!’’

एका मनस्वी कलावंताच्या मनातले एक स्वप्न अशा प्रकारे कायमचे विरून गेले. या साऱ्या घटनामालिकेला एक रुपेरी किनार आहे. राय आणि स्पिलबर्ग यांच्यातील मतभेदांमुळे दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल कटुता निर्माण झाली नाही. राय यांनी ‘स्पिलबर्ग हा एक चांगला दिग्दर्शक आहे’ असे उद्‌गार त्याच्याबद्दल नेहमीच काढले. आणि राय यांना जेव्हा ऑनररी ऑस्कर देण्याच्या प्रस्तावावर विचार चालू होता, त्या वेळी त्याला पाठिंबा देऊन त्याचा पाठपुरावा करणारे जे चार दिग्दर्शक होते, त्यांपैकी एक स्पिलबर्ग होता!

विजय पाडळकर, पुणे

vvpadalkar@gmail.com

‘आयडिया ऑफ इंडिया’चा प्रभावी भाष्यकार

लक्ष्मीकांत देशमुख

नव्या लेखक-कवींनी कैफींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांची अर्थपूर्ण कालातीत, व आजही प्रासंगिक असलेली शायरी आणि तिच्यातील पुरोगामी व मानवतावादी आशय समजून घेतला, तर त्यांचं साहित्य केवळ समृद्धच नाही तर सखोल होईल. ते सामान्यजनांचं कदाचित होऊन जाईल आणि वाचकही भावसंपन्न होतील. प्रेमचंदांनी म्हटल्याप्रमाणं प्रगतिशील लेखक चळवळीनं ‘खुबसूरती का मैय्यार बदलना होगा’ म्हणजेच सौंदर्याची परिभाषा बदलली पाहिजे.

‘मेरी आवाज सुनोऽ प्यार का राज सुनोऽऽ’

‘नौनिहाल’ चित्रपटातलं हे गीत कैफी आझमी यांची सिग्नेचर ट्यून म्हणावी असं आहे. जेव्हा जेव्हा मी हे गीत ऐकतो व त्यांची समग्र शायरी आठवतो, तेव्हा मला म्हणावंसं वाटतं- खास करून आजच्या विपरीत परिस्थितीत भारतीयांना सांगावसं वाटतं की- ‘होय, हा आवाज ऐकला पाहिजे. तुम्ही, आम्ही- साऱ्या भारतीयांनी. कारण हा आवाज, हा स्वर व हे शब्द प्रेमाचे आहेत, भाईचाऱ्याचे आहेत. गरीब कामगार आणि शेतकऱ्यांना आत्मबल देणारे आहेत. ज्यांचं रोजचं जगणं जीवन-मरणाचा संघर्ष बनला आहे; त्यांच्याकडे प्रेम व करुणेनं पहावं, असं आवाहन करणारा आवाज आहे.’ मुख्य म्हणजे ‘आयडिया ऑफ इंडिया’ भारत-संकल्पनेचा तो प्रभावी उद्‌गार आहे.

2019-20 हे कैफींच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. ते साधारणपणे 1940 ते 1990 या पन्नास वर्षांत सातत्यानं लिहीत होते आणि प्रगतिशील लेखक चळवळीचे भाष्यकार म्हणून पुरोगामी व मानवतावादी जीवनमूल्यांची पेरणी व वाढवणी करत होते. उर्दू साहित्यातला ‘आवारा सज्दे’ करणारा इन्किलाबी- क्रांतिकारी शायर म्हणून त्यांना नावाजलं गेलं. विसाव्या शतकातील भारतीय साहित्याचे (जरी ते उर्दूमध्ये लिहीत असले तरी, कारण उर्दूही भारतात जन्मलेली व अल्पावधीत प्रभावी साहित्यनिर्मिती करू लागलेली भाषा आहे) एक प्रमुख शीर्षस्थ कवी-शायर होते. त्यांची समाजातील गरीब व वंचित-पीडित घटकाशी अव्याभिचारी बांधिलकी होती. स्त्री, शेतकरी व कामगार हे त्यांच्या मानवी आस्थेचे व म्हणून काव्याचे प्रधान घटक होते; तर हिंदू व मुस्लिम संस्कृतीच्या मनोहारी मिलाफातून निर्माण झालेल्या साझी विरासत (गंगा-जमनी तहजीब आणि तिच्या विकास व जतनासाठी आवश्यक असणाऱ्या हिंदू-मुस्लिम एकतेचे) कौमी एकतेचे ते जीती-जागती मिसाल होते!

तत्त्वज्ञ विचार देतात, ते बुद्धीला पटतात. पण केवळ बौद्धिकतेनं कृती घडत नाही, त्यासाठी तो विचार मानवी संवेदनेनं मनाला भिडला पाहिजे; तरच काही कृती होऊन इष्ट बदल होऊ शकतात. म्हणून तत्त्ववेत्त्यापेक्षा कलावंत मोठे व महत्त्वाचे असतात. आणि ज्या कलावंतात तत्त्वज्ञ व विचारधारेचा बुद्धिगम्य व मनोज्ञ संगम असतो, तो कलावंत जनतेचा होतो. कैफी हे कबीरपरंपरतेले असेच एक मोठे कवी होते. भारताचा आत्मा हा विविधतेतील एकतेमध्ये आहे, हे त्यांनी ओळखलं होतं.

कैफींचं हे वेगळेपण अलीकडे पुन्हा एकदा प्रकर्षानं जाणवलं. ती तारीख होती- 20 जानेवारी, 2019. स्थळ- मुंबईचं शिवाजी मंदिर नाट्यगृह. आणि कार्यक्रम होता, ‘चला, एकत्र येऊ या!’

यवतमाळच्या साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांना आधी उद्‌घाटनाचे प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण देऊन नंतर ते रद्द केल्यामुळे संमेलनाला व महाराष्ट्राच्या सहिष्णू उदारमतवादी परंपरेला लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी राज्यातील लेखक-कलावंतांनी एकत्र येऊन तो कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात नयनतारा सहगल यांना साऱ्यांनी उभं राहत टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली. त्यामुळे काही अंशी का होईना, महाराष्ट्राला व साहित्य संमेलनाला लागलेला अनुदारतेचा व असभ्यतेचा कलंक धुऊन निघाला, अशी माझी भावना त्या कार्यक्रमात सहभागी असताना झाली होती. कारण मी नव्या अध्यक्षांना सूत्रे देताना त्यावर माझ्या परीनं परखड भाष्य केलं होतं!

या कार्यक्रमात मला कैफी आझमींची आठवण सातत्यानं येत होती. त्याचं कारण नयनतारा सहगल यांनी व्यक्त केलेले विचार कैफी डॉक्टराईन या सिद्धांताशी मिळते-जुळते होते. नयततारा सहलगनी आपल्या भाषणात ‘हिंदू राष्ट्राला स्पष्ट नकार देत बहुधार्मिकता हा गाभा असलेली सहिष्णू स्वरूपाची हिंदोस्तानियन किंवा भारतीयत्व अबाधित राखलं पाहिजे’ असे विचार मांडले होते. आणि याचसाठी तर कैफी आझमी आयुष्यभर आपली कला वापरत होते, लेखणी झिजवत होते.

दि.14 जानेवारी हा कैफी आझमींचा जन्म दिवस. जन्मतारखेवरून एकदम माझ्या मनात एक लोभस गमतीचा विचार चमकून गेला. चौदा जानेवारी हा हिंदूंचा संक्रांतीचा सण. संक्रांत म्हणज गोड बोलण्याचा व तिळगुळाने तोंड गोड करण्याचा दिवस. हिंदू व मुस्लिम समाजात प्रेम व भाईचाराची स्निग्ध गोडी असावी, असं कैफी आझमींना सदैव वाटायचं. त्यामुळं संक्रांतीचा दिवस त्यांचा जन्मदिवस असणं, हा हिंदुस्थानच्या गंगा-जमनी म्हणजेच बहुधार्मिक-बहुसांस्कृतिक संस्कृतीसाठी नियतीनं कदाचित दिलेला शुभ संकेत आहे... नेहरूंनी जसा नियतीशी करार केला होता, तसाच भावोत्कट असा करार कैफींनीही केला होता. तो म्हणजे, ‘A tryst with multi religious culture’- अर्थात कौमी एकतेचा करार कैफींनी आयुष्यभर अव्यभिचारी निष्ठेनं पाळला.

आज धार्मिक विद्वेषाच्या विखारी वातावरणात मनामनांत संशय, भीती व सूडाच्या भावना भडकत असताना आणि माणसामाणसांत धर्म, खाणं-पिणं, पोषाख, प्रार्थना-उपासनेवरून भिंती पडत असताना कैफी आझमींनी आपल्या शायरीतून व कृतीने ज्या आधुनिक पुरोगामी मूल्यांचा पुरस्कार केला; त्यासाठी आपली साहित्यकला वापरली, त्याची प्रासंगिकता आजही कायम आहे. पण भारतीय साहित्यकलेला, चित्रपटसृष्टीला आणि पुरोगामी विचारांना त्यांनी जे योगदान दिलं आहे; त्याचं उर्दू भाषाविश्व वगळता अन्य भाषिक साहित्य व कलांनी मोल जाणलं आहे, असं वाटत नाही. मराठी साहित्यातही कैफींवरील काही फुटकळ लेख सोडले तर त्यांच्या शायरीचा व ध्येयासक्त जीवनाचा समग्रतेने वेध घेतलेला दिसत नाही.

मी कैफींना विसाव्या शतकातला एक श्रेष्ठ उर्दू शायर मानतो. मीच कशाला- साहित्याचे जाणकार त्यांचं निर्विवाद शीर्षस्थान निःसंदिग्धपणे मानतात. त्यांची विपुल काव्यसंपदा, चित्रपटकथा, पटकथा, संवाद व गीतलेखन, त्यांनी प्रगतीशील लेखक चळवळ आणि इप्टाद्वारे कलेच्या माध्यमातून आम आदमीचा आवाज होणं, आणि मुशायरा, जलसे, व्याख्याने व सार्वजनिक कार्यक्रमांतून वाणीद्वारे पुरोगामी मूल्यांची पेरणी करत समाजप्रबोधन करणं... हे पाहिलं की, त्यांचे जावई जावेद अख्तर यांनी म्हटल्याप्रमाणे कैफी खरोखरच एक ‘अजीब आदमी’ होते... कैफींचं श्रेष्ठत्व सांगताना ते म्हणतात,

‘‘अजीब आदमी था वो

मुहब्बतों का गीत था, बगावतोंका राग था

कभी वो सिर्फ फूल था, कभी वो सिर्फ आग था

आदमी अजीब था वो...’’

त्यांचं वेगळेपण- अजीबपण कशात होतं? हे जावेद अख्तर पुढे या शब्दांत प्रकट करतात-

‘‘वो मुफलिसोंसे कहता था

कि दिन बदल भी सकते हैं

वो जबिरोंसे कहता था

तुम्हारे सरपे सोने का जो ताज है

कभी पिघल भी सकता है ...

वो ख्वाबसे कहता था

के तुझको सच करूँगा मैं

वो जिंदगी से कहता था

कि तुझको सजाऊँगा मैं

वो आदमी से कहता था

कि आदमी से प्यार कर...

उजड रही है ये जमीं

कुछ अब इसका सिंगार कर!

अजीब आदमी था वो...’’

एकमेकांवर प्रेम करावं व गुण्यागोविंदानं एकत्र राहावं, ही तर साधी-सरळ मानवी संस्कृती आहे. तसेच ती माणसांची जगण्याची सहज प्रेरणा असते. पण धर्म आणि हिंसेच्या जहरी कॉकटेलातून निर्माण झालेला कडवा (अ)धर्मप्रेरित दहशतवाद, जागतिकीकरणातून आलेला चंगळवाद, माणुसकीचा त्या प्रमाणात झालेला ऱ्हास आणि दमनकारी राज्ययंत्रणेची असहिष्णुता, काळाचे काटे उलटे फिरवत भूतकाळातील अनिष्ट प्रथा-परंपरांचं केलं जाणारं पुनरुज्जीवन... यामुळे जावेद अख्तर यांच्या शब्दांत कैफींचा ध्यास की, ‘वो आदमी से कहता था कि आदमी से प्यार कर’ आज माणूसजात विसरून चाललीय की काय, असं वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर कैफींची शायरी खरा प्रकाश दाखवणारी आहे.

कैफी आझमींचा एक अजरामर शेर आहे,

‘‘प्यार का जश्न नई तरह मनाना होगा

गम किसी दिल में सही, गम को मिटाना होगा’’

हे तर त्यांचं मनापासून स्वीकारलेलं जगण्याचं तत्त्वज्ञान होतं व ते तसे जगलेही. शेतकरी-कामगारांचं दुःख, गरिबी व अभावाचं जगणं, स्त्रीचं दुःख- आणि कट्टर धर्मांधांनी धर्म-जातींत पाडलेली फूट... ही सारी मिटवले जाऊन प्रेमाचा जश्न नव्या पद्धतीनं साजरा केला पाहिजे, हे त्यांच्या शायरीचं प्राणतत्त्व होतं!

फाळणीचा आघात आणि आई- वडिलांचं पाकिस्तानला निघून जाण्याचं दुःखं पचवूनही त्यांची हिंदू-मुस्लिम एकतेवरची श्रद्धा कायम होती, अगदी बाबरी मशिदीच्या पतनानंतर व शेवटच्या काळातील गुजरातच्या नरसंहारानंतरही! त्याबाबतच्या बातम्या टीव्हीवर पाहत अंथरुणावर खिळलेले आजारी व विकलांग कैफी आसवं ढाळायचे. तरीही ते कधी कडवट झाले नाहीत. कारण भारताची परंपरा सहिष्णू आहे आणि या दंगली, हे खून-खराबे प्रासंगिक व अपवादात्मक असतात, यावरची त्यांची श्रद्धा कधी कमी झाली नाही.

ते हाडाचे कम्युनिस्ट होते. पण गांधींच्या दोन विचारांचे ते प्रामाणिक व डोळस पुरस्कर्ते होते, असं नेमकेपणानं म्हणता येईल. एक म्हणजे- अंत्योदय ही गांधींची कल्पना होती- शेवटच्या गरीब माणसाचे अश्रू पुसणे. ती कैफींच्या ‘गम किसी दिल से सही, गम को मिटाना होगा’ या विचारांशी मिळती-जुळती आहे. किंबहुना, कैफींना हा शेर अंत्योदयाच्या तत्त्वज्ञानातून तर स्फुरला नसेल? (अर्थात ही माझी कविकल्पना समजा...) दुसरी गोष्ट म्हणजे- कौमी एकता व धार्मिक सद्‌भाव. कैफींची ‘साँप’ ही गाजलेली कविता हाच विचार अत्यंत जोरकसपणे मांडते. ते धर्मांधतेच्या जहराला सापाची उपमा देत म्हणतात : जेव्हा विज्ञान पैशांचं-अर्थाचं दास झालं आणि विद्या व ज्ञानावरचा विश्वास उडाला, तेव्हा या धर्मांधतेच्या सापाला नवजीवन मिळालं. ‘यावर उपाय काय?’ असा प्रश्न उपस्थित करीत ते शेवटी लिहितात,

‘‘ये हिंदू नहीं है मुसलमाँ नही

ये दोनो के मगज और खूँ चाटता है

बने जब ये हिंदू मुसलमाँ इन्साँ

उस दिन ये कंबख्त मर जायेगा!’’

पण हा धर्मांतधतेचा साप आजही जिवंत आहे. तो कंबख्त मरावा म्हणून, महात्मा गांधींनी हिंदू-मुस्लिम ऐक्य घडून यावं म्हणून फाळणीच्या हिंसामय वातावरणात उपोषण केलं, नौखालीची पदयात्रा केली आणि पाकिस्तानातही ते कौमी (धार्मिक) शांतता प्रस्थापित करण्यासाठी जाणार होते. कैफी या बाबतीत कट्टर कम्युनिस्ट असूनही त्यांचे पट्टशिष्य शोभतात.

कैफींनी सर्वधर्म समभाव (किंवा फादर फ्रान्सिस दिब्रिटो वापरतात तो अधिक सोपा शब्द सर्वधर्म मैत्रीभाव) व विशुद्ध मानवतेचा दृष्टिकोन दिला, तसाच दोन्ही धर्मांतील धर्मांधतेचा कडक व प्रभावी निषेधही केला. त्यांच्या दोन नज्म ‘सोमनाथ’ व ‘दूसरा वनवास’ या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. ‘सोमनाथ’ ही कैफींची नज्म बुतशिकनी म्हणजे मूर्तिभंजनावर विश्वास ठेवणाऱ्या कट्टर धर्मांध मुस्लिमांवर आसुडासारखी कडाडणारी आहे. त्याची सुरुवात करताना ते लिहितात,

‘‘बुतशिकन कोई कहींसे भी ना आने पाये

हमने कुछ बुत अभी सीने में सजा रख्खे है

अपनी यादोंमे बसा रक्खे है...’’

अर्थात, मूर्तिभंजन करणारे कुठूनही येता कामा नयेत, कारण आम्ही आमच्या हृदयात (अर्थातच ईश्वराची) मूर्ती प्रस्थापित केली आहे. हा संदर्भ गुजरातच्या सोमनाथ मंदिरावर सतरा वेळा स्वारी करून महंमद गझनीनं केलेल्या मूर्तिभंजनाचा आहे, हे सहज लक्षात येते. अशा कविता उर्दूमध्ये काय हिंदीमध्ये काय किंवा अन्य भारतीय भाषेत काय कमीच आहेत. म्हणजे नसल्यासारख्या आहेत. इस्लामला निषिद्ध वाटणाऱ्या देवाच्या मूर्तीबाबत मांडलेला एवढा गहिरा विचार कैफींच्या धर्मनिरपेक्षतेचे लखलखते उदाहरण आहे. म्हणून तर ते पुढे धाडसानं लिहितात-

‘‘वहशते-बुतशिकनी देख के हैरान हूँ मैं’

बुत परस्ती तेरा शेवा है कि इन्साँ हूँ मै।’’

(अर्थात- मूर्तिभंजनाची कृती पाहून मी हैराण आहे, कारण मूर्तिपूजा माझी सवय-आदत आहे. कारण मी माणूस आहे.)

आजच्या काळात कैफींनी मुस्लिम मोहल्ल्यात किंवा उरसाच्या प्रसंगी होणाऱ्या मुशायऱ्यात ‘सोमनाथ’ कविता वाचली असती, तर त्यांच्यावर काय प्रसंग ओढवला असता याचा विचारही न केलेला बरा. ते एका अर्थानं संत कबीराच्या परंपरेतले अवध भूमीचे जनकवी आहेत. म्हणून ते निर्भयपणे लिहू शकतात की- ‘‘तुम बनाओ तो खुदा बनाओ कैसा?

अपने जैसा बनाया तो कयामत होगी

प्यार होगा, न जमाने में मोहब्बत होगी

दुष्मनी होगी, अदावत होगी

हमसे उसकी इबादत न होगी!’’

कैफींनी आधी त्यांना जन्मानं चिकटलेल्या धर्मातील धर्मांधांवर कोरडे ओढले, म्हणून मग त्यांना बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर (रामाला दुसरा वनवास मिळाला अशी कल्पना करून) लिहिलेल्या ‘दूसरा वनवास’ कवितेद्वारे धर्मांध हिंदूंच्याही डोळ्यांत जळजळीत अंजन घालू शकले. ज्या दिवशी बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली, त्या दिवशी वनवास संपवून भगवान श्रीराम परत आले आहेत, अशी कवितेची सुरुवात करून अयोध्येत जमा झालेली गर्दी पाहून ते चकित होतात.

‘‘छः दिसंबर को सिरीराम ने सोचा होगा

इतने दिवाने कहाँ से मेरे घर मे आये?’’

कारसेवकांनी आणलेल्या विटांना कैफींनी ‘शाकाहारी खंजर’ अशी सार्थ उपमा दिली आणि ते पत्थर बाबरच्या दिशेनं भिरकावले, पण श्रीरामाच्या डोक्याला लागून ते जखमी झाले... असं कैफी मोठ्या ताकदीनं मशीद विध्वंसाचं वर्णन करतात. त्यानंतर श्रीराम शरयू नदीमध्ये पाय धुण्यासाठी जातात आणि काय होतं, हे असं वर्णतात...

‘‘पाँव सरयू में अभी रामने धोये भी न थे

कि नजर आए वहाँ खून के गहरे धब्बे

पाँव धोये बिना सरयू के किनारे से उठे

राम ये कहते हुए अपने दुआरे से उठे

राजधानी की फिजां आयी नहीं सार मुझे

छः दिसंबर को मिला दूसरा वनवास मुझे!’’

कैफी हे केवळ ड्रॉइंग रूम आर्मचेअर कलावंत नव्हते, तर कम्युनिस्ट पार्टीच्या कामगारसंघटनेत पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते होते. त्यामुळे शरीराचा डावा भाग पूर्णपणे लकवाग्रस्त असतानाही बाबरी मशिदीच्या विध्वंसापूर्वी व्हीलचेअरवरून त्यांनी कानपूर ते अयोध्या या प्रोग्रेसिव्ह रायटर्स मूव्हमेंटने काढलेल्या शांतिमार्चमध्ये भाग घेत दोन्ही धर्मीयांना शांततेचं आवाहन केलं होतं. जीवनाच्या अंतिम पर्वात ‘नसिम’ चित्रपटात वृद्ध आजोबांचं बहारदार काम करून बाबरी विध्वंसापूर्वीच्या वर्ष-सहा महिन्यांतील असंख्य मुस्लिम माणसांची खदखद, भीती व नाकारले जाण्याची भावना व्यक्त केली आणि सुजाण प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केलं.

जावेद अख्तर म्हणतात : तसा हा खरंच ‘अजीब आदमी’ होता. त्यांचा ‘अजबपणा’ किंवा वेगळेपणा काय, कसा व किती सांगावा? काही किस्से सांगतो, वानगीदाखल.

पहिला किस्सा ‘तमस’फेम भीष्म सहानी यांनी एका लेखात वर्णिला आहे.

कैफी, सरदार जाफरी, भीष्म सहानी, इस्मत चुगताई आदी सर्व जण मुंबईत मोमिनपुऱ्यात ‘कम्यून’मध्ये 1940च्या दशकात एकत्र राहायचे. तेव्हा कैफींचं लग्न नुकतंच झालं होतं आणि कम्युनिस्ट पार्टी प्रत्येकाला (फुलटाईम वर्कर असल्यामुळे) दरमहा चाळीस रुपये मानधन द्यायची. ते पैसे दुसऱ्या महायुद्धामुळे भडकलेल्या महागाईत पुरे पडायचे नाहीत, म्हणून त्यांना रेडिओवर कार्यक्रम करून वरकमाई करावी लागायची.

एकदा दहा-बारा जण मिळून रेडिओ स्टेशनला एका नाटकाच्या डबिंगच्या कामासाठी पायी निघाले होते. सर्वांचीच पादत्राणे झिजलेली. पण त्या दिवशी कैफी आझमींच्या पायांत नवे काळे पंप-शू होते. साऱ्यांनी त्यांना त्यावरून बरंच छेडलं. पण कैफी नव्या बुटांमुळे बालसुलभ आनंदात होते. काही वेळानं मित्रांना समजलं की, त्यांना हे बूट कामगारांनी भेट म्हणून दिले आहेत.

हा रहस्यस्फोट करीत कैफी म्हणाले, ‘‘जानते हो यह किसने दिये है? एक मजदूर बस्तीके मजदूरोंने. हम उनके यहाँ शेर-गझल सुनाने गये थे. उन्होंने हमारे शेर सुनकर हमे गले लगाया और फिर जूतोंका ये जोडा नजर किया.’’

पादत्राणे बनवणारे चर्मकारही कैफींच्या शायरीवर फिदा होते व त्यांना आपला हमदर्द मानत होते. खरा प्रसंग भीष्म सहानीने कथन करीत पुढे असंही लिहिलंय की,

‘यह सुनकर हम लोग सचमुच चुप हो गये और बडी श्रद्धासे उन जूतों की ओर देखने लगे, जो अब जूते न रहकर हमारी नजरमें एक बहुत बडा खिताब (सन्मान) लग रहा था, जिससे हमारे एक साथीको सन्मानित किया गया था. और सच मानिये तो वह सन्मानही था. मेहनतकश जनता के शायर को मजदूरोंनेही सन्मानित किया था. यह तोहफा उन्हीं की इस पहचान और मोहब्बत की निशानी थी. फिर क्यों न उन्हे पहनकर कैफी इठला उठला कर चलता!’

दुसरी आठवण कैफींची पत्नी शौकत आझमी यांनी ‘कैफी और मै’ या पुस्तकात वर्णिली आहे. कैफींना 1972 मध्ये अर्धांगवायूचा झटका आला आणि ते ब्रीच कँडी या मुंबईच्या दवाखान्यात ॲडमिट होते. त्यांना विलक्षण त्रास होत होता. पण तशाही अवस्थेत त्यांना ‘धमाका’ नावाची नज्म सुचली, ती त्यांनी अडखळत्या स्वरात सांगितली आणि शमा झैदीने (आजची प्रसिद्ध लेखिका) लिहून घेतली. ही नज्म पुस्तकात छापताना ‘धमाका’ शीर्षकाखाली कंसात ‘चारू मुजुमदार की यादमें’ असं लिहिलेलं आहे. चारू मुजुमदार हा हिंसक नक्षलवादी चळवळीचा प्रवर्तक. त्याचा मृत्यू 24 जुलै, 1972 रोजी झाला. त्याच्या मृत्यूपूर्वी काही महिने आधी ‘धमाका’ ही कविता कैफींनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये असताना लिहून नक्षली हिंसेची आणि त्याद्वारे सर्वहारा वर्गाची राजवट स्थापण्याबाबतची व्यर्थता नेमकेपणानं व्यक्त केली होती. म्हणजे ते कम्युनिस्ट असले, तरी मानवी हक्कांबाबत जागरूक होते व लोकशाही मानणारे होते. शायरी हा त्यांचा श्वास होता आणि शरीर विकलांगतेतही अगदी शेवटपर्यंत ही सखी त्यांच्या जवळ होती- ताजी व तल्लख!

तिसरा किस्सा शबाना आझमींनी कैफींच्या प्रिय कन्येनं- कथित केला आहे, तो असा- बालपणापासून शबाना आपल्या अब्बांची शायर म्हणून असणारी लोकप्रियता आणि मैफिल जिंकण्याची हातोटी जाणून होती. ते जेव्हा केव्हा मुशायऱ्याहून मध्यरात्री घरी परतायचे, तेव्हा शबाना त्यांना मुशायरा कसा झाला, हे उत्सुकतेनं विचारायची. ते म्हणायचे, ‘ठीक था.’ एकदा तिनं मुशायऱ्याचा अनुभव तपशिलानं सांगण्याचा आग्रह केला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘छिछोरे लोग अपनी तारीफ करते है. जिस दिन मुशायरे में मै बुरा पेश करूँगा, उस दिन आने के बाद बताऊँगा.’’ अर्थात अशी वेळ कधी आली नाही, हे सांगण्याची गरज नाही.

कैफी आझमींच्या खिशात कम्युनिस्ट पार्टीचा बिल्ला असायचा. मरतानाही तो होता, एवढी त्यांची पक्षावर व पक्षाच्या विचारधारेवर श्रद्धा होती. याबाबत शबानाची मोठी रोमांचक आठवण आहे, ती त्यांच्या शब्दांत अशी :

‘मैने जब इस दुनिया में आँखे खोली तो जो पहला रंग मैने देखा था, वो था लाल. मै अपने बचपनमें अपने माँ- बापके साथ रेड फ्लॅग हॉल में रहती थी, जहाँ बाहर की दरवाजेपर एक बडासा लाल रंग का झंडा लहराता था. जरासी बडी हुई तो बताया गया की, लाल रंग मजदूरोंका रंग है. ‘मेरा बचपन या तो अपनी माँ के साथ पृथ्वी थिएटर के ग्रुप (शौकत संसाराला हातभार म्हणून पृथ्वीराज कपूरांच्या नाटक कंपनीत काम करायची.) के साथ या अपने बाप के साथ मजदूर किसानों के जलसे में गुजरा. मदनपुरा ये बंबई की इक बस्ती है, जहाँ मै अब्बा के साथ ऐसे जलसों में जाती थी. हर तरफ लाल झंडे, गुंजते हुए नारे और अन्याय के खिलाफ शायरी और फिर गुंजता हुआ नारा- इन्किलाब झिंदाबाद!’

प्रगतिशील लेखक चळवळीमध्ये सारे डाव्या पुरोगामी विचारांचे असले तरी कैफी व सरदार अली जाफरी वगळता अन्य बाकीचे म्हणजे रूहिर, मजरूह, कृष्ण चंदर आदी काही कट्टर कम्युनिस्ट नव्हते. पण कैफींच्या पक्षावरील अव्यभिचारी निष्ठेची कमाल पाहा. एका मुलाखतीमध्ये संजीव चौहानांनी ‘जिंदगी की आरजू क्या है?’ असा प्रश्न त्यांना विचारला, तेव्हा ते ताड्‌कन म्हणाले,

‘‘मै गुलाम हिंदुस्थान में पैदा हुआ था, अब आझाद हिंदुस्थानमे जी रहा हूँ. और सोशॅलिस्ट हिंदुस्थान में मरने की तमन्ना है!’’

अर्थात त्यांची ही तमन्ना काही पूर्ण झाली नाही. भारतीय संविधानात समाजवाद हा शब्द असला, तरी 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेनं यू-टर्न घेत जागतिकीकरणाची व बाजारी अर्थकारणाची कास धरली. परिणामी कुठलाही पक्ष उघडपणे बोलत नसला तरी भारतानं समाजवादाला मूठमाती दिलीय, हे स्पष्ट दिसतं. त्यामुळे गरिबी मिटवणारा वा श्रीमंत-गरिबांतली दरी हटवणारा समाजवाद दूर-दूर कुठंही नव्हता. आता तर समाजवाद शब्द उच्चारलाही जात नाही.

कैफी आझमींचं निधन 10 मे, 2002 रोजी झालं. त्यापूर्वी मार्च 2002 मध्ये झालेली गुजरातची भीषण दंगल त्यांनी टीव्हीवर आसवे ढाळत पाहिली. या दंगलीत मुसलमानांचा नरसंहार झाला आणि स्त्रियांवर बलात्कार- अत्याचार फार क्रूरपणे करण्यात आले. हा पाक इन्सान जन्नतच्या (मुस्लिम धर्मश्रद्धेप्रमाणे पण कैफी संदेहवादी किंवा नास्तिकच होते.) वाटेवर असताना प्राण जाण्यापूर्वी आणि नजर मिटण्यापूर्वी त्यांना कौमी एकतेची चिता पाहावी लागली होती... त्या वेळी कदाचित पूर्वी लिहिलेला हा आपलाच शेर उदास होऊन स्वतःशीच ते पुटपुटले असतील का?

‘‘मै ढूँढता हूं जिसे वह जहां नहीं मिलता

नयी जमीं नया आसमाँ नहीं मिलता.

वह तेग मिल गयी जिससे हुआ है कत्ल मेरा

किसी के हात का उस पर निशाँ नहीं मिलता’’

हा कत्ल कैफींच्या कौमी एकतेवर असणाऱ्या स्वप्नांचा व विश्वासाचा होता... समाजवादाला तिलांजली देत गरिबांना वाऱ्यावर सोडून दिल्यामुळे ‘हर दिल का गम मिटाना होगा’ या प्रगतिशील लेखक चळवळीतील तत्त्वज्ञानाचा आणि जीवन-मूल्यांचा खून होता.

ज्यांच्या तलवारीनं खून झाला, ती आपल्याच माणसांच्या हातात आहे, ही विदारक जाणीव कैफींना जीवनाच्या शेवटच्या दशकात- नेमकेपणानं सांगायचं झालं तर, बाबरी मशिदीचा विध्वंसाचा काळ 1992 ते गुजरात दंगलींच्या 2002 च्या दशकात- झाली होती. त्यामुळे त्यांना किती वेदना होत असणार, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.

पण कैफींच्या शायरीला सत्याचा पाया आहे, चिरंतनतेचा स्पर्श आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेला विचार- उद्या- भविष्यात माणसांना पुन्हा जागवणार आणि त्या दिशेनं मानवाची वाटचाल होणार, हे नक्की. तेवढे सामर्थ्य व तेवढा कालातीतपणा त्यांच्या शायरीत आहे. भविष्यात क्रांती होईल, हा कैफींचा विश्वास शेवटपर्यंत कायम होता. पण त्याची मशाल आता नव्या पिढीनं घेतली पाहिजे, असं सांगताना कैफी लिहितात,

‘‘कोई तो सूद चुकाए कोई तो जिम्मा ले

उस इन्किलाब का जो आज तक उधार सा है।’’

1930-40 च्या दशकातील प्रगतिशील लेखक चळवळ- जिचे कैफी आझमी बिनीचे शिलेदार होते- ती प्रामुख्याने उर्दू व हिंदी भाषेत प्रभावी होती. मराठीतले अण्णा भाऊ साठे हे या चळवळीशी जोडलेले एकमेव लेखक-शाहीर होते. पण त्यांचा अपवाद वगळता मराठी साहित्यक्षेत्र या पुरोगामी व जनवादी चळवळीकडे दुर्लक्ष करीत ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला?’ असा लुटपुटीचा वाद निरर्थकपणे खेळत राहिले आणि प्रायः रंजनवाद व काही प्रमाणात रूपवाद-सौंदर्यवाद या वर्तुळातच घुटमळत राहिले. ज्या 1930 ते 50 च्या तीन दशकांच्या कालखंडात प्रगतिशील लेखक चळवळ प्रभावी होती आणि तिनं उर्दू-हिंदी साहित्याला नवे सामाजिक परिमाण दिले, त्या काळात मराठी साहित्य हे रंजनवादी व अभिजनवादीच राहिले. पुढे प्रथम दलित, मग ग्रामीण व स्त्रीवादी साहित्यानं कोंडी फोडली, हा भाग वेगळा.

आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रगतिशील साहित्य चळवळ काही प्रमाणात कार्यरत झाली आहे. आणि मुख्य म्हणजे, एकूण भारतीय साहित्याने बऱ्याच व्यापक प्रमाणात प्रगतिशील चळवळीचं सारतत्त्व अंगीकारलं आहे. पण तरीही चळवळ म्हणून ती देशभरात सर्वत्र थंडावलेली असल्यामुळे, बहुसंख्यांच्या लेखनातला पुरोगामी आशय हा एक तर ‘तुम’ म्हणून येतो वा प्रचारकी होतो. त्यामुळे तो बराचसा निसटून जातो वा पातळ होतो. त्यामुळे या चळवळीचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे.

या पार्श्वभूमीवर नव्या लेखक-कवींनी कैफींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांची अर्थपूर्ण, कालातीत, व आजही प्रासंगिक असलेली शायरी आणि तिच्यातील पुरोगामी व मानवतावादी आशय समजून घेतला, तर त्यांचं साहित्य केवळ समृद्धच नाही तर सखोल होईल. ते कदाचित सामान्यजनांचं होऊन जाईल आणि वाचकही भावसंपन्न होतील. प्रेमचंदांनी म्हटल्याप्रमाणं प्रगतिशील लेखक चळवळीनं ‘खुबसूरती का मेयार बदलना होगा’ म्हणजेच सौंदर्याची परिभाषा बदलली पाहिजे. ती कशी व्यापक आणि जनसामान्यांच्या दुःख-वेदनेला स्वर देत नवे ‘ॲस्थेटिक रूप धारण करते’ हे कैफींनी दाखवून दिलं आहे, ते आजच्या काळात अभ्यासण्याची नितांत गरज आहे.

कैफी आझमी जाऊन आता सोळा-सतरा वर्षं झाली आहेत, पण ते आजही वाचकांच्या- खासकरून उर्दू वाचकांच्या मनात वसलेले आहेत. जावेद अख्तर यांच्या शब्दांत कैफींचं चिरंजीवीत्व व आम आदमीप्रति असणारी त्यांची आत्मीयता अशी सांगता येईल-

‘‘वो जिंदगी के सारे गम, तमाम दुख

हर इक सितम से कहता था

मै तुमसे जीत जाऊँगा ... वो आँख जिनमें ख्वाब है

वे दिल है जिसमे आरजू

वो बाजू जिनमें है ताकत

वो होंट जिनमें लफ्ज है

रहूँगा इनके दरमियाँ

के जब मै बीत जाऊँगा!’’

आणि मग कैफींच्या आजच्या चाहत्यांनाही कवी सतेंद्र कुमार ‘जानकी कुटीर’ (कैफी आझमी को याद करते हुए) या कवितेत शेवटी म्हणतात तसंच वाटेल आणि कदाचित पुढे-मागे ‘इन्कलाब’चा ‘जिम्मा’ घ्यायला तरुण पिढी पुढे येईल.

‘‘राजमहलों से दूर गाँवों में दिख रहे है परिवर्तन

मजवां गाँव में हो रहे है नये परिवर्तन’

वे जान गये है कहीं है राक्षस के प्राण

भलेही उन लोगों को नहीं हो रहा है विश्वास

लेकिन राक्षस की अंतिम चीख उन तक जल्दही पहुँचेगी.

तब ‘जानकी निवास’ में होगा नया जश्न

जानकी की आँखो मे होंगे खुशी के आँसू

एक नयी अयोध्या बसने लगेगी उनके अंदर

खत्म होगा राम का ‘दूसरा बनवास’

राम रहीम जीजस गायेंगे, नाचेंगे

और कबीर अपने एक तारे पर

छेडेंगे अपनी तान-

‘मोकों कहाँ ढूंढे बंदे, मै तो तेरे पास में

न मै देवल, ना मै मस्जिद, न काबे कैलास में...’’

मग हुडकायला निघाल्यावर हवा असणारा ‘जहाँ’ मिळेल, नवी जमीन, नवे आकाश मिळेल... आणि एक दिवस ‘प्यार का जश्न’ नव्या पद्धतीने ‘मनवला’ जाईल, माणसाचे ‘गम’ मिटले जातील...

लक्ष्मीकांत देशमुख, पुणे Laxmikant05@yahoo.co.in

लढ्याचा प्रारंभ : देवडुंगरी गावात

अरुणा रॉय

गावात स्थायिक होणं आमच्यासाठी सोपं नव्हतं. आमच्या प्रत्येक कृतीवर पाळत ठेवली जात होती, त्यातून रोज काही तरी नवं नाट्य व ताण उद्भवण्याची टांगती तलवार डोक्यावर असायची. माहितीविषयक अधिकाराच्या कहाणीत हा सगळा तपशील सांगण्याची काय गरज आहे, असं कोणी विचारू शकतं. पण खुल्या पुस्तकाप्रमाणे मोकळं जीवन जगणाऱ्या लोकांचा संदर्भ समजून घेणं इथे प्रस्तुत ठरेल. कारण, प्राथमिक माहिती अत्यावश्यक असते, या त्यांच्या दैनंदिन जीवनातील आकलनामधूनच माहितीच्या अधिकाराची मागणी पुढे आली. ग्रामीण भागांमधील सर्वसाधारण आकलन असं असतं की- शहरी व भारताच्या अधिक संपन्न भागांमधील लोक बहुतेकदा ‘शोषण’ करण्यासाठीच गावांकडे येतात आणि भौतिक व मानवी संसाधनं हिरावून नेतात.

देवडुंगरीमध्ये बांबूच्या झुडपांनी वेढलेल्या धुळकट वाटांलगत एका मातीच्या घरात 1987 मध्ये या सगळ्याची सुरुवात झाली. मजदूर किसान शक्ती संघटनेची स्थापना होण्याच्या तीन वर्षं आधीची ही गोष्ट आहे. माहिती अधिकारासंदर्भातील चर्चेला आकार देणाऱ्या घटना व संवादांना त्या खोपट्याने निवारा दिला आणि हे घरच पुढील घटनाक्रमासंबंधीचं एक ठोस विधान, एक प्रतीक व मूक साक्षीदार बनून गेलं. ब्यावरमध्ये 1996 मध्ये माहिती अधिकाराच्या मागणीसाठी निदर्शनं करणाऱ्या गटामध्ये सहभागी झालेले इंडियन एक्स्प्रेसचे माजी संपादक अजित भट्टाचारजी लिहितात-

राजस्थानच्या दुर्गम भागात असलेलं देवडुंगरी हे नमुनेदार गाव थंडगार व खडकाळ अरवली डोंगररांगांच्या उतारावर वसलेलं आहे. तिथल्या डोंगराच्या माथ्यावर एक लहानसं मंदिर आहे. इथली काळी माती अगदी रखरखीत आहे. पाण्याची मोठीच वानवा असल्यामुळे थोड्या-थोडक्या पाण्याला अमूल्य मानलं जातं. इथे खोल विहिरींमधून पाणी काढतात नि खडकाळ मातीमध्ये खणलेल्या खळग्यांमध्ये ते साठवलं जातं. हा परिसर अगदी रखरखीत असला, तरी त्यात विलक्षण चैतन्यशीलताही आहे. धान्याची पिवळसर शेतं आणि प्रत्येक शेताला घातलेलं दगडी कुंपण, यांमुळे या तपकिरी भूप्रदेशाला भौमितिक आकृतिबंधाचं रूप आलं आहे. खडकाळ जमिनीवर उपजीविका करण्यासाठी इथले लोक पाठ मोडेपर्यंत कष्ट करत आले आहेत, असं दीर्घ इतिहासाचं प्रातिनिधिक चित्र या आकृतिबंधाद्वारे दृश्यमान होतं.

गावातलं जगणं साधं असतं. घर आणि कामाचं ठिकाण यातल्या सीमा अस्पष्ट असतात. लाकूड कापताना, स्वयंपाक करताना, झाडू मारताना आणि जेवताना महत्त्वाचे संवाद व वादविवाद होतात. कधी मधेच कोणी शेजारी आला तर त्यामुळे बोलणं अर्धवट राहातं, कधी जेवण वाढायच्या गोंधळातच संभाव्य पर्यायांविषयी मनात आलेलं थेट व्यक्त केलं जातं, कधी भांडी घासताना असहमतीचे मुद्दे मांडले जातात; त्यावर आणखी चर्चेची व तोडगा काढण्याची गरज असते. या सतत सुरू असलेल्या चर्चेमध्ये चिकित्सक मर्मदृष्टींची बीजं सामावलेली असतात.

राजस्थान सुंदर आहे. इथे शुष्क तपकिरी व धुळकट धुक्याच्या वातावरणामध्ये नेत्रदीपक सौंदर्य लपलेलं पाहायला मिळतं. राजस्थानच्या मध्य भागात राहणाऱ्या लोकांचा भवताल अरवली पर्वतरांगांनी व्यापला असून भारतातील सर्वांत जुनी पर्वतरांग अशी अरवलीची ओळख आहे. प्राचीन अवशेष शोधण्यात रुची असलेल्यांना इथे आजही अतिशय जुन्या स्मृतिखुणा वागवणारे जीवाश्म सापडू शकतात. आता हे सगळे अवशेष खणून काढले जात आहेत, इमारती व इतर बांधकामांसाठी सगळ्या टेकड्या खोदण्याचं काम सुरू आहे. जयपूर-दिल्ली महामार्गावरही हे दृष्टीस पडतं.

आम्ही (निखिल डे, शंकर सिंग, त्यांची पत्नी अंशी व मी) 1987 मध्ये देवडुंगरीत आमच्या कामाची सुरुवात केली. चौकडिया खेड्यातील हग्गू व जैत सिंग यांनी आम्हाला त्यांच्या घरामध्ये जागा दिली.

या प्रदेशामध्ये सरंजामशाहीच्या खुणा अजूनही दिसतात. इथलं जगणं कष्टप्रद आहे, सुपीक जमीन अभावानेच आढळते आणि अधून-मधून दुष्काळ पडत राहिल्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट होते. या जमिनीत उगवणाऱ्या पिकावर अवलंबून असलेले बहुतांश लोक रात्री भुकेल्या पोटीच झोपी जातात. सरंजामशाहीचं युग इतिहासजमा झालं असलं, तरी सामाजिक विषमता व प्रशासकीय अन्याय इथे अजूनही टिकून आहे. या सगळ्या वातावरणातही इथल्या लोकांची सचोटीची वागणूक, रंगीबेरंगी कपडे, मोहक गाणी, विलक्षण मिथ्यककथा, बोलीभाषा व हसत-खेळत संवाद साधण्याची वृत्ती, यांमुळे या प्रदेशातील पारंपरिक संस्कृती जिवंत आहे. सतत वाहणारा चैतन्याचा प्रवाह त्यांच्या हसण्यात पाहायला मिळतो. बदल घडवण्याची इच्छा व सामर्थ्य इथे टिकून आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 40 वर्षांनी- 1987 मध्ये अतिशय भिन्न पार्श्वभूमी असलेल्या तीन व्यक्ती देवडुंगरीमध्ये राहण्यासाठी व काम करण्यासाठी आल्या. यांपैकी अरुणा रॉय यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला होता. दूरदृष्टी व अनन्यसाधारण संवादकौशल्य लाभलेले शंकर सिंग हे राजस्थानचेच रहिवासी होते. तर, अमेरिकेतील महाविद्यालयात शिक्षण घेणारे निखिल डे तिथल्या चंगळवादी जीवनशैलीचा उबग येऊन नुकतेच भारतात परतले होते- निखिल यांचे वडील भारतीय हवाई दलामध्ये एअरमार्शल पदावर कार्यरत होते. या तिघांनी गावातील दगड-मातीची एक झोपडी भाड्याने घेतली. अजमेर-भीम महामार्गाला लागून एक कच्चा रस्ता या गावापर्यंत येतो. अजूनही तिथं हे खोपटं उभं आहे. त्यांनी गावातील इतर शेजाऱ्यांसारखंच राहायला सुरुवात केली. ते जमिनीवरच झोपायचे, विहिरीतून पाणी काढून आणायचे, बादल्या डोक्यावरून वाहून न्यायचे, चुलीवर चपात्या नि डाळ शिजवायचे, स्वतःचे कपडे नि भांडी स्वतःच धुवायचे. खोपट्याशेजारची शेळ्यांची जागा त्यांनी स्वयंपाकघर आणि मोरी म्हणून वापरायला सुरुवात केली. संडास बाहेरच्या बाजूला होता.

या तिघांचीही पार्श्वभूमी आणि अनुभवविश्व परस्परांहून अतिशय भिन्न होतं. तिघांमध्ये अरुणा वयाने सर्वांत मोठ्या होत्या, तर निखिल सर्वांत तरुण. अरुणा यांनी सात वर्षं भारतीय प्रशासकीय सेवेत काम केलं होतं. त्यापूर्वी दिल्लीतील इंद्रप्रस्थ महिला महाविद्यालयात काही काळ त्यांनी इंग्रजी वाङ्‌मयाचं अध्यापन केलं. त्या स्वतः याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी. कालांतराने, 1975 मध्ये त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आणि राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात ग्रामीण भागांमधील गरिबांसोबत करणाऱ्या ‘सोशल वर्क अँड रिसर्च सेंटर’ (एसडब्ल्यूआरसी) या ग्रामीण स्वयंसेवी संस्थेमध्ये त्या दाखल झाल्या. एसडब्ल्यूआरसीमधील नऊ वर्षांच्या कामानंतर 1983 मध्ये अरुणा यांनी दुर्गम गावात जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला. मूलभूत राजकीय व लोकशाही अधिकार वापरण्यासाठी लोकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही दिशा निवडली.

याच दरम्यान, अरुणा व शंकर यांची पहिल्यांदा भेट झाली. गावांमधील शोषण, गरिबी व विषमता याबद्दल दोघांनाही आस्था वाटत असल्याने त्यांची लगेचच मैत्री जुळली. शंकर यांनी प्रौढ साक्षरतेसंबंधी काम सुरू केलं होतं. अनेक आस्थेवाईक ग्रामीण तरुणांप्रमाणे त्यांनाही ग्रामीण राजकारणाची अंगभूत जाण होती. प्रत्येक वैयक्तिक समस्या व्यापक राजकीय संदर्भात पाहण्याची प्रगल्भता त्यांच्यामध्ये होती. शिवाय, स्वतःच्या दृष्टिकोनाची विविध मार्गांनी अभिव्यक्ती करणं शंकर यांना सहज शक्य व्हायचं. त्यांच्या या अतुलनीय संवादकौशल्याची भुरळ अरुणा यांना पडली.

शंकर उपस्थित असतील तिथे औदासीन्य आसपासही कधीच फिरकत नसे. अगदी टीका करत असतानाही ते हसत-खेळत स्वतःचं म्हणणं मांडत. त्यांच्या असण्यानेच वातावरणात चैतन्य निर्माण होत असल्यामुळे त्यांची लोकप्रियताही वाढली. अरुणा व शंकर यांच्यात अनेक प्रश्नांवर सातत्याने वादविवाद होत असत. लिंगभावाच्या प्रश्नावर तर दोघांच्या दृष्टिकोनांमध्ये प्रचंड तफावत होती. शिवाय, भारतासारख्या प्रचंड श्रेणीबद्ध समाजातील जात व धर्माशी निगडित सूक्ष्म विषमतांकडे पाहण्याची दोघांची दृष्टीही भिन्न होती. शब्दार्थ, नाट्य तंत्रज्ञान, नाटकांसाठीची विषयसूत्रं- या विषयांवर त्यांचा शब्दच्छल सुरू असायचा. लोकप्रियता हा चांगल्या नाटकाचा एकमेव निकष असू शकत नाही, समता व न्याय ही मूल्यं नाकारल्याची भरपाई वा त्याचं समर्थन टाळ्या कमावण्यातून होत नाही- असे युक्तिवाद केले जात. अशा वादसंवादांमुळे दोघांनाही काम करण्यात उत्साह वाटायचा.

अजमेर जिल्ह्यातील हरमाडा पंचायत क्षेत्रात अरुणा यांची मैत्रीण नौरती यांनी 1981 मध्ये किमान वेतनाच्या मुद्यावर पहिला संप पुकारला, त्यामध्येही शंकर व अरुणा एकत्र सहभागी झाले होते. कठपुतळ्या आणि विनोदबुद्धी ही त्यांची नेहमीची अस्त्रं सोबत घेऊन शंकर तिथे आले, त्यामुळे संपातील वैरभाव सौम्य होण्याला मदत झाली. यादरम्यान, अरुणा व शंकर यांच्या मैत्रीप्रवासाला आणखी एक खास वळण मिळालं. राजस्थानातच 1983 मध्ये या दोघांची निखिलशी गाठ पडली. तेव्हा ते वीस वर्षांचे होते. उत्कृष्ट शैक्षणिक कारकीर्द सुरू असताना अखेरच्या क्षणी त्यांनी अमेरिकेतील पदवी अभ्यासक्रमाला सोडचिठ्ठी दिली. एका बुद्धिमान, सरळ-साध्या व ‘चांगल्या’ विद्यार्थ्याने महाविद्यालयीन शिक्षण असं का सोडावं, हे न कळल्यामुळे त्यांचे आई-वडील गोंधळून गेले. अमेरिकेतील आजूबाजूचं वातावरण आणि आपल्या लोकांना मदत करण्याची उत्कट इच्छा, यातील वाढता तुटलेपणा असह्य झाल्याने निखिल यांनी अमेरिका सोडून परत यायचा निर्णय घेतला. त्यांना लोकांच्या राजकारणाचा भाग व्हायचं होतं.

शंकर यांच्या मिश्कीलपणाकडे व असाधारण निसर्गदत्त कौशल्यांकडे निखिल आकर्षित झाले. शंकर व अरुणा यांच्याकडून आणखी शिकायची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. दरम्यान, अरुणा व निखिल यांची मैत्री झाली होती. अखेरीस, जगण्याविषयी आणि कामाविषयी आपली स्वप्नं सारखीच असल्याचा साक्षात्कार तिघांना झाला.

ग्रामीण भारतातील कामाची सुरुवात करण्यासाठी एखादी संघटना व संदर्भबिंदू शोधण्याच्या प्रयत्नात ते मध्य प्रदेशातील झबुआ इथे गेले. विविध कारणांमुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही, पण त्यांनी शोध सुरू ठेवला. राजकीय विचारसरण्या, तत्त्वं व जीवनशैलीशी जोडलेली विशिष्ट मूल्यं यांमध्ये सामाइकता असलेला अनुरूप मित्रपरिवार ही त्यांची पहिली गरज तर पूर्ण झाली होती. लोकशाही संस्थांची भूमिका आणि नागरिक म्हणून आपल्याला असलेले अधिकार लोकांनी समजून घेण्याची गरज आहे, या मुद्यावर तिघांचंही एकमत झालं. आपण काम करत असलेल्या संघटनेचं स्वरूप व रचना लोकांच्या साथीने विकसित व्हायला हव्यात, असं त्यांचं ठाम मत होतं.

भारतामध्ये असं राजकीय कार्य पक्षीय व्यवस्थेच्या बाहेर राहून करता येणं शक्य आहे. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण व इतर अनेकांनी अशा कामाची परंपरा पाडलेली आहे. केवळ सत्ताधाऱ्यांचा रंग बदलल्याने स्वातंत्र्य मिळत नाही. भूक, अस्पृश्यता, गरिबी व हिंसा यांपासून स्वातंत्र्य मिळवायचं असेल, तर पारंपरिक सामाजिक भेदभावाच्या प्रथांविरोधात टिकाऊ लोकचळवळ आवश्यक आहे. डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांनी आकार दिलेल्या राज्यघटनेतील अधिकार कृतीत आणण्यासाठी लोकांमध्ये चेतनाजागृती गरजेची आहे, अशी तिघांचीही धारणा होती. शेवटी, शंकर यांच्या लोटियाना गावापासून जवळच असलेल्या देवडुंगरीमध्ये कामाला सुरुवात करण्याचं त्यांनी ठरवलं. देवडुंगरी 35 किलोमीटर दूर असलं, तरी शंकर यांचे अनेक नातलग व त्यांच्या समुदायातील लोक तिथे राहत होते. शंकर यांची पत्नी अंशी यांच्यासाठी ते गरजेचं होतं- त्यांना स्वतःच्या परिसरात व सहजपणे जगता येईल अशा सामाजिक वातावरणात राहायचं होतं.

किमान प्रतिष्ठा असलेलं जीवन, समान वेतन, शालेय शिक्षण, आरोग्यसुविधा आणि काही लोकांना स्वाभाविक सहजतेने मिळणाऱ्या इतर गोष्टी मिळवायच्या असतील, तर गरिबांना कामाची गरज असते. कायद्यानुसार ते समान असतात. पण गरिबांना तुच्छतेने विषम वागणूक सर्वत्र मिळते. सरकार, राजकीय व्यवस्था आणि जातिव्यवस्थेने विभागलेला समाज या सर्व स्तरांवर ते विषमता भोगतात. न्याय व समता असलेलं जग त्यांच्यासाठी स्वप्नापुरतंच उरतं. या पार्श्वभूमीवर, प्रायोगिक स्तरावर सुरू झालेला शंकर, अंशी, निखिल व अरुणा यांचा प्रवास अजूनही सुरू आहे.

ग्रामसमुदायामध्ये भाड्याने किंवा अगदी विकत घेण्यासाठी जागा मिळवणं सोपं नसतं. शंकर यांनी राहण्यासाठी घर शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांची चुलत बहीण हग्गूने तिच्या मालकीच्या वापरात नसलेल्या एका झोपडीत राहायची परवानगी या चौघांना दिली. लग्नाआधी हग्गू तिथे राहत होती. घट्ट नात्यांनी बांधलेल्या समुदायात प्रवेश करणं सर्वसाधारणतः अतिशय अवघड जातं, पण शंकर ‘भाऊ’ असल्यामुळे हा प्रवेश तुलनेने सहज झाला. या नात्यामुळेच अरुणा व निखिल यांना सुरुवातीच्या काळात लोकांशी ओळखी करून घेणं सोपं झालं.

देवडुंगरी गाव राजसमंद जिल्ह्यात आहे. दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आठवरील भीम या लहानशा शहरापासून देवडुंगरी आठ किलोमीटरवर आहे. त्या झोपडीरूपी घराला वैयक्तिक व राजकीय स्तरावर विलक्षण मूल्य प्राप्त झालं आहे. बाहेरून परत आल्यावर आम्हाला आश्वस्त करणारी ती जागा. साधेपणा व सामुदायिकता ही मूल्यं जपत जगण्याच्या प्रयत्नाला आश्रय देणारी जागा. आमचे दलित समुदायातील शेजारी व अल्पभूधारक शेतकरी मोहनजी यांनी केलेल्या प्रवाही मांडणीतून माहिती अधिकाराच्या संघर्षाने आकार घेतला, तोही याच जागेत. हक्काचं वेतन मागितल्यावर गरिबांवर अधिकारी संस्थांकडून खोटेपणाचा आरोप केला जातो, यासंबंधीची मांडणी मोहनजींनी केली. ते म्हणाले, ‘‘त्यांच्याकडच्या नोंदी आमच्या हातात येत नाहीत, तोपर्यंत आम्ही खोटारडेच ठरत राहू.’’ माहिती अधिकारासाठीच्या संघर्षाला महत्त्वाचं वळण देणारे हे उद्‌गार होते. भ्रष्टाचार व सत्तेचा मनमानी वापर यांच्या विरोधातील साधन म्हणून पारदर्शकतेची भूमिका किती तर्कशुद्ध व कळीची असते, हे मोहनजींच्या साध्या विधानातून स्पष्ट झालं.

माहिती अधिकारासाठी मजदूर किसान शक्ती संघटनेने सुरू केलेल्या संघर्षाला या घरातील चर्चा व युक्तिवादांनी ठोस रूप दिलं. 00

लोकांसोबत राहणं अनेक कारणांसाठी महत्त्वाचं होतं आणि आहे. आपल्या जगण्याच्या मर्यादांमध्ये लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. कोणत्याही संघटनेच्या कामाचं मूल्यमापन लोकांच्या नजरेतून करणं आवश्यक असतं. काम व मूल्यं वाटून घेण्याचा हा एक चांगला व्यवहार्य मार्ग होता. देवडुंगरीमध्ये येण्यापूर्वी राजस्थानच्या ग्रामीण भागात नऊ वर्षं काम करताना अरुणा यांनी हा धडा घेतला होता. शंकर तर या समजुतीसोबतच लहानाचे मोठे झाले.

देवडुंगरीला भेट देणाऱ्या अगदी सुरुवातीच्या लोकांपैकी एक होत्या रजनी बक्षी. मुक्त पत्रकार व मजदूर किसान शक्ती संघटनेची अगदी जवळची मैत्रीण असलेल्या रजनी अनेकदा इथल्या घराला भेट देत आणि कुटुंबातल्या एक होऊन तिथे राहत. या चळवळीच्या प्रारंभिक वर्षांची नोंद करणारं लेखन त्यांनी केलं. देवडुंगरीला अनेकदा भेट दिल्यामुळे त्यांच्या या लेखनाला सेंद्रिय स्वरूप प्राप्त झालं.

देवडुंगरी : डांबरी रस्त्याकडेचं जीवन

अरवली पर्वतरांगांच्या उत्तरेकडील टोकाला, थोडं अंतर राखल्यासारखी एक बुटकी टेकडी आहे, त्यावर दगड- मातीचं एक लहानसं मंदिर उभं आहे. इथून जाणारा मार्ग बहुधा प्राचीन काळापासून वर्दळीचाच असावा आणि तेव्हापासून या मंदिरातील ग्रामदेवता त्या वाटेच्या राखणदाराप्रमाणे पहारा देत उभी आहे...

माथ्यावर लहानं मंदिर असलेल्या या बुटक्या टेकडीच्या- देवडोंगराच्या- सावलीत देवडुंगरी हे गाव आहे. या उजाड टेकडीच्या उतारावरच, गावाच्या पूर्व टोकावर एक असाधारण कुटुंब राहतं. त्यांचं दगड-मातीचं घर विविध प्रकारच्या पाहुण्यांचं स्वागत करत असतं. शेजारी राहणारा एखादा इसम इथल्या स्वयंपाकघरात सारवलेल्या जमिनीवर बसून राज्याच्या राजधानीतून आलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जेवताना दिसतो. कधी मुंबईहून आलेला एखादा पत्रकार किंवा शेजारच्या जिल्ह्यातला सीमान्त शेतकरीही त्यांच्यासोबत जेवत असतो. या घरातील कष्ट आणि हास्यकल्लोळात मीही अनेकदा सहभागी झाले आहे. या घरात केर काढणं किंवा शेळीला चारा घालणं, यांसारखी रुक्ष घरगुती कामं करत असताना मला अनेकदा बापू कुटीची आठवण झाली. पण हे साधर्म्य नोंदवणं अवघड आहे. बापू कुटी आणि इतिहास घडवणाऱ्या तिथल्या व्यक्तिमत्त्वाशी तुलना केली, तर देवडुंगरीतल्या माझ्या यजमानांना शरमल्यासारखं होईल. ते केवळ नैसर्गिकरीत्या साध्या पद्धतीने जगण्याचा व काम करण्याचा प्रयत्न करत होते.

या संदर्भात भट्टाचारजी लिहितात

ते घर आणि तिथल्या वातावरणामुळे लोक देवडुंगरीकडे आकर्षित होऊ लागले. साधी जीवनशैली राखत असतानाच जगभरातील बदलाच्या संकल्पनांना सामावून घेणाऱ्या या घरामधील व्यक्तींशी आपल्या समस्यांबाबत चर्चा करण्याकरिता शेजारच्या गावांमधले लोकही इथे येत असत. भारतातील नागरी अभिजनवर्गातून आलेल्या आपल्या दोन साथीदारांची स्वप्नं ग्रामीण वास्तवाशी जोडण्याचं काम शंकर सिंग यांनी केलं. त्यांचा जन्म इथल्याच जवळच्या एका गावातील होता. नवनवीन संकल्पना गावाच्या भाषेत गाण्यांमध्ये, नाटकांमध्ये व कठपुतळ्यांच्या अरुणा रॉय, तरुण वयातच समाजकार्याला प्रारंभ सादरीकरणामध्ये गुंफण्याची क्षमता शंकर यांच्याकडे होती. त्यामुळे भाषेची मर्यादा सहज ओलांडली जात असे. वंशपरंपरागत सामाजिक अन्यायाचा प्रतिकार कसा करायचा, यावर संध्याकाळच्या चर्चांमध्ये अधिकाधिक लक्ष केंद्रित केलं जात होतं.

देवडुंगरीतील हा परिवार वरकरणी मुख्य प्रवाही जगण्यापासून वेगळा पडला आहे, या धारणेमुळे त्यांच्या मित्र-मैत्रिणींना व सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांना कुतूहल तरी वाटायचं किंवा चिंता तरी वाटायची. गरिबी आणि विषमता यांचा अनुभव घेत जगत असताना त्याबद्दल खुल्या स्वरूपाची चर्चा केल्यामुळे बाहेरच्या जगाशी दुवे टिकून राहिले. देवडुंगरीमध्ये जाणं अवघड होतं. कोणताही लोहमार्ग तिथून जात नव्हता किंवा जवळ काही विमानतळही नव्हता. उदयपूर ते अजमेर यांना जोडणाऱ्या मुख्य महामार्गाला लागून असलेल्या या गावात फक्त रस्त्यानेच पोचणं शक्य होतं. राष्ट्रीय महामार्ग-8 हा उर्वरित भारताचं एक प्रातिनिधिक चित्रच होता. अनेक भपकेदार बस, कार, क्रेन, मालवाहू गाड्या व विविध आकारांतील ट्रक देवडुंगरीवरून पुढे जात आणि या विचित्र तंत्रज्ञानाकडे गावकरी अचंबित नजरेने पाहत. विख्यात पत्रकार व माजी संपादक अजित भट्टाचारजी व प्रभाष जोशी आमचे मित्र होते. देवडुंगरीच्या पहिल्या भेटीचा अनुभव प्रभाष जोशी यांनी त्यांच्या खास मोकळ्याढाकळ्या शैलीत नोंदवला आहे:

खूप पूर्वी सेवाग्राममधील बापू कुटीमध्ये जाताना माझ्या मनात जशा भावना उमटल्या होत्या, तसाच अनुभव देवडुंगरीमध्ये पहिल्यांदा जाताना मला आला!

आपल्याला प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत बहुतेक स्थळं आपल्यासाठी केवळ नावापुरती अस्तित्वात असतात. भीम व देवडुंगरी यांच्याबाबतीत माझी हीच स्थिती होती. पण एकदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये- 1 मे रोजी सूर्य आकाशात तळपत असताना मी जीपने तिथे गेलो. सूर्य अरवली डोंगरांवर आग ओकत होता आणि खाणकामामुळे जमीन विद्रूप झाली होती. जीपच्या काचांवरून सूर्यकिरणं प्रतिबिंबित होत असल्यामुळे डोळे चरचरायला लागले. पण बाहेर लोक भर उन्हात काम करतच होते- घरबांधणी, खाणकाम आणि माती व दगड काढणं, अशी कामं सुरू होती.

त्या रात्री आम्ही भीमहून देवडुंगरीला आलो. पोळी- भाजी खाल्ली. अरुणाने चुलीवर पोळ्या केल्या. बाहेर सारवलेल्या ओटीवर आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, तेव्हा गुलमोहर आणि बोगनवेल झाडांच्या मधून सूर्य उगवताना दिसला... देवडुंगरी- गुर्जरांचं दैवत असलेले देवनारायणजी यांच्या मंदिरामुळे या ठिकाणाच्या नावात ‘देव’ शब्द आला आणि डोंगरांच्या अस्तित्वामुळे ‘डुंगरी’ ही जोड मिळाली. घरांप्रमाणे मंदिराचं बांधकामही मातीचं होतं आणि जमीन व भिंती नीट सारवलेल्या होत्या. या घराशेजारीच खोपट्यात अंघोळीची सोय होती आणि सांडपाणी बांबूच्या वनात सोडलं जात होतं... परसदारात संडास होता- तीही मातीची झोपडीच होती... स्वच्छ, नेटकी व दुर्गंधी नसलेली... फाइव्ह स्टार हॉटेलांपेक्षाही इथल्या सोई चांगल्या होत्या!

आमचा मित्रपरिवार या सगळ्याबद्दल साशंक होता. त्यांना हा खटाटोप स्वप्नाळू वृत्तीचा भासत होता. शेळीला घराच्याच आवारात ठेवून भरपूर खाऊ-पिऊ घातल्यावर ती देशी प्रजातीच्या शेळ्यांहून अधिक दूध देत होती, हा घटकही त्या स्वप्नवत चित्रामध्ये भर टाकत होता! साधं राहणीमान, शेळी- हे सगळं आदर्श ग्रामजीवनाचा भ्रम अनुभवण्यासाठी सुरू आहे, अशी त्यांची धारणा झाली होती. त्यांच्या सुरुवातीच्या प्रतिक्रियांमधून हा शंकासूर डोकावतही होता- ‘तुम्ही पुन्हा आपल्या सभ्य संस्कृतीमध्ये माघारी आलात, तर त्याचं काही आम्हाला आश्चर्य वाटणार नाही!’

या सगळ्या प्रयोगातून काही निष्पन्न होईल की नाही, याबद्दल सुरुवातीला काही कल्पनाही नव्हती. त्या दिवसांची आठवण शंकर सांगतात :

देवडुंगरी हे लहानसं खेडं आहे, जेमतेम 15 ते 20 उंबऱ्यांची तिथली वस्ती. त्यातच स्वयंपाकघर असलेलं एक लहानसं मातीचं घर आम्हाला राहाण्यासाठी मिळालं... या घरामध्ये काही दुरुस्ती करण्यात व अदलाबदल करण्यात आमचे पहिले काही दिवस गेले. अरुणा, निखिल, अंशी आणि मी 1987 पासून तिथे राहायला लागलो. कामाची सुरुवात कशी करायची याची काहीच कल्पना आम्हाला नव्हती. पण काय करायचं नाही, हे मात्र आम्हाला माहीत होतं. निधीपुरवठा लागेल असे प्रकल्प उभारायचा किंवा संस्था चालवायचा प्रयत्न आम्ही करणार नव्हतो.

जयपूरस्थित विकास अध्ययन संस्थेच्या देखरेखीखाली आम्ही किमान वेतनाविषयी अभ्यास करत होतो. आणि त्यातून आम्हाला स्वतःच्या उपजीविकेसाठी गरजेइतकं किमान वेतन मिळत होतं. हा अभ्यास करत असतानाच आम्ही जवळपासच्या गावांमध्ये जाऊन छोट्या-छोट्या बैठका घ्यायला सुरुवात केली. आम्ही व्यक्तिगत पातळीवरही लोकांशी संवाद साधला. लोकांसोबत एका समुदायात राहणं आणि त्यांच्या दैनंदिन जगण्यामध्ये सहभागी होणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे साध्या, नेहमीच्या कृतीतून सातत्याने प्रश्न उपस्थित करण्याची संधी आम्हाला मिळाली.

या सततच्या संवादातून प्रचलित मूल्यांना आव्हान दिलं गेलं आणि त्यांमध्ये बदलही घडत गेला. सुरुवातीला त्यांनी लिंगभावावर आधारित भूमिकांसंबंधी वाद उपस्थित केले, चर्चा घडवल्या. पुरुषांनी डोक्यावरून पाणी वाहून आणणं, सार्वजनिक ठिकाणी भांडी धुणं, अस्पृश्यता, एकाच भांड्यातून पाणी पिणं, एकाच विहिरीतून पाणी घेणं, स्वच्छता व आरोग्याचे मुद्दे, सामाजिक संवादप्रक्रियांचे नियम, आदर दाखवणं व समारंभातील विधी यांमधील भेद- हे सगळे विषय वादचर्चेसाठी घेतले गेले आणि काही वेळा त्यासंबंधी असहमतीही दिसून आली. एकाच पातळीवर बसणं, किंवा पाहुणे म्हणून आलेल्या सर्व वर्गांतील लोकांना सारखंच अन्न वाढणं- यांसारख्या मुद्यांवर काही जण चिडले, काहींनी टीका केली, तर काहींना याचा अचंबा वाटला. नव्याने गावात दाखल झालेल्या या मंडळींनी हे नियम धुडकावले आणि समता व मानवता यांना अग्रक्रम दिला. त्यामुळे त्यांना क्वचित प्रसंगी संभाव्य हिंसक परिस्थितीला तोंड द्यावं लागलं आणि त्यावर तोडगा काढावा लागला.

रोजच्या जगण्यातील संघर्ष हाताळत असताना लोकांना विचार व कृती यांमधील तफावत भरून काढायला मदत होते. आपण काय केलं किंवा काय केलं नाही, याची दैनंदिन पातळीवर चिकित्सा करणं महत्त्वाचं ठरतं.

लोकांना जाणून घेताना...

वरकरणी सुस्थितीतील भारतीय व्यक्ती अशा विपरीत परिस्थितीमध्ये राहण्याची जोखीम पत्करत असतील, तर त्यांचा हेतू शोषण करण्याचाच असतो; याशिवाय वेगळा काही उद्देश त्यांच्या कृतीमागे असू शकेल, याची कल्पनाही ग्रामीण भारतामध्ये करता येत नाही. शहरातील भौतिक सुख सोडून कष्टप्रद (संडास, कायमचा पाणीपुरवठा वा वीज यांचा अभाव असलेल्या) परिस्थितीत राहायला जाण्याचा निर्णय सहज-सोपा नव्हता. आम्ही देवडुंगरीला आल्यावर वर्षभरानंतर संडास बांधला गेला. आमचे मित्र अनिल बोर्डिया यांनी दिलेल्या देणगीतून हे बांधकाम झालं. लोकांना जे समोर दिसत होतं, त्यावरून त्यांनी सुरुवातीला प्रश्न विचारले : ‘हे लोक खाणकाम सुरू करायला आलेत, की मजूर जमवायला आलेले कंत्राटदार आहेत?’ प्रतिष्ठितपणाचा शिक्का घेऊन न आलेल्या लोकांवर कोणी विश्वास का ठेवावा? त्यामुळे प्रत्येकाने आपापलं डोकं लढवलं.

गावात फारसं काही लपवता येत नाही. भारतीय गावं एका खुल्या चौकटीमध्ये राहतात. रात्र सोडता बाकीचा वेळ घराची दारं उघडीच ठेवली जातात आणि कोणाला आत प्रवेश नाकारला, तर संशय घेतला जातो. घरातली मंडळी काही तरी लपवू पाहतायत, असाही अर्थ त्यातून काढला जाण्याची शक्यता असते. त्यातून कुतूहलाची पातळी वाढत जाते आणि शेवटी फाजील चौकसपणा दाखवला जातो. त्यामुळे आम्ही थोडं सामान घरात नेलं तेव्हा त्याकडे शेजार-पाजारच्यांचं काटेकोर लक्ष होतं. बरेच अंदाज बांधले गेले. श्रीमंत वर्गाशी संबंध दाखवणारं कोणतंही खास फर्निचर आमच्या सामानात नव्हतं. दोन लोखंडी पलंग आणले होते, त्यांचे पाय अतिशय छोटे होते. हे विचित्र पलंग बघायला अनेक लोक येऊन गेले. गावात नव्यानं आलेली मंडळी कशी राहातायंत, हे बघायला काही जण घरी फेरफटका मारून गेले. लोकांनी विविध गोष्टी गृहित धरलेल्या होत्या. पण बहुतेकसे लोक कुतूहल म्हणून आले. अनेक लोक कामाची संधी शोधण्यासाठीही भेटून गेले. आपण सैन्यातील जवान आहोत, अशी घोषणा करत दुर्ग सिंग आले. या गरीब-बिचाऱ्या, भरकटलेल्या मानवांकडे त्यांनी तुच्छ कटाक्षही टाकला.

निखिल, अरुणा, शंकर व अंशी यांनी सगळी कामं स्वतः केली. विहिरीतून पाणी आणण्यापासून ते जेवण शिजवणं आणि घर झाडणं... सगळंच काम त्यांनी आपापसात वाटून घेतलं. दुधाची वानवा होती, त्यामुळे एक शेळी आणली. पण प्राण्यांचं लहान मुलांसारखंच असतं. आई होऊन त्यांचा सांभाळ करावा लागतो, त्यामुळे एक व्यक्ती कायम घरात असणं गरजेचं बनलं. नागोदाजी यांच्या विहिरीतून पाणी आणलं जात असे. सर्व जण याच विहिरीतून पाणी घेऊन जात, पण दलितांनी आपल्या मडक्याला हात लावलेला मात्र कोणाला चालत नसे. हा पारंपरिक ढोंगीपणा तिथे प्रचलित होता. शंकर यांच्या मुलीने स्वतःचं पाण्याने भरलेलं मडकं उचलण्यासाठी नागोदाजीकडे मदत मागितली, तेव्हा सगळ्यांनी विरोधाचा जोरदार आवाज उठवला. सगळं गाव आमच्या घरापाशी जमलं आणि घरातल्यांना जोरदार शिव्या घातल्या. शेवटी अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिल्यावर गर्दी पांगली.

पण सगळेच विरोध करत होते, असंही नाही. अनेक जण मोकळेपणाने भेटायला आले. अनेकांनी आमच्याशी चांगली मैत्रीही केली. समता व भेदभाव या तत्त्वांच्या बाबतीत कोणतीही तडजोड शक्य नव्हती, पण त्या व्यतिरिक्त मात्र कोणत्याही मुद्यावर मतभेद मांडून वादविवाद करण्याला पूर्ण मोकळीक होती. सावकाराकडून पैसे उधार घेण्याची पद्धत, अंत्यसंस्काराशी निगडित विधींमुळे गरिबांना करावा लागणारा अवाजवी खर्च व अखेरीस त्यांच्यावर वाढणारा कर्जाचा बोजा, जातीशी निगडित निषिद्ध गोष्टी व अर्थातच लिंगभावात्मक पूर्वग्रह, खाली-वर बसण्याशी संबंधित श्रेणीव्यवस्था, स्त्रियांसाठीची घुंगट प्रथा आणि इतर अनेक सामाजिक व राजकीय प्रश्नांवर चर्चा होऊ लागल्या. बदलाची कक्षा हळूहळू निश्चित होऊ लागली.

या सर्व अनुमानबांधणीच्या काळात लाल सिंग यांचं आगमन झालं. निखिल व अरुणा त्यासंबंधी सांगतात :

साधारण 12 किलोमीटरवर असलेल्या सोहनगढमध्ये लाल सिंग राहत होते. एकदा देवडुंगरीमध्ये नातेवाइकांना भेटायला आले असताना त्यांनी जैत सिंगच्या घरात बस्तान बसवलेल्या विचित्र लोकांबद्दलची बातमी ऐकली. या लोकांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ते घरात आले. पूर्वी ते पोलीस हवालदार होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी कनिष्ठ पदांवरील सहकाऱ्यांना हरकाम्यासारखं वागवतात, याविरोधात कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं; त्यात लाल सिंगही सहभागी झाले. निदर्शनं करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. इतर सहकारी न्यायालयात दाद मागण्यासाठी गेले, पण लाल सिंग त्यांच्या गावी परत आले. विविध कारणांमुळे त्यांनी न्यायालयात न जाण्याचा निर्णय घेतला. आधीच पोलीस दलामधील भ्रष्टाचाराला ते कंटाळले होते, त्यामुळे ‘तिथे काम करायचंच नाही’, असं त्यांनी ठरवून टाकलं.

आमच्या घराला लागून शेळ्यांसाठीच्या दोन पडव्या होत्या, त्यांची पुनर्बांधणी करून ती खोली आम्हाला स्वयंपाकघर म्हणून वापरायची होती. या कामाला गवंडी माणूस लागणार होता. लाल सिंग अगदी सचोटीने हे काम करतील, अशी शिफारस करण्यात आली. शिवाय, आमच्याप्रमाणे त्यांनाही प्रामाणिकपणाचा ‘वेडगळ’ सोस आहे, त्यामुळे त्यांचं नि आमचं (अरुणा, शंकर व निखिल) चांगलं जमेल, असंही शिफारसकर्त्याने हसत-हसत सांगितलं. लाल सिंग माणूस म्हणून असामान्य होते, पण गवंडीकामातलं त्यांचं कौशल्य अगदीच सामान्य असल्याचं नंतर उघड झालं. नव्याने बांधलेलं स्वयंपाकघर पहिल्याच पावसात जलमय झालं. अंशी व अरुणा यांनी अख्खी संध्याकाळ राबून स्वयंपाघरात घुसलेलं पाणी बाहेर लोटलं. राजस्थानात आधीच खूप कमी पाऊस पडतो, त्यातही ही अवस्था झाल्यावर नवं बांधकामच खराब असल्याचं स्पष्ट झालं. पण लाल सिंग यांच्यासोबतच्या घट्ट मैत्रीचा पाया या काळात रचला गेला आणि पुढे संघटनाबांधणीची पायाभरणीही यात झाली.

लाल सिंग कायम न्याय्यच भूमिका घेतील, असा त्यांच्या समुदायाचा ठाम विश्वास होता, त्यामुळे त्यांच्या गावातील वादांमध्ये मध्यस्थी करायला त्यांना निमंत्रित केलं जात असे. वास्तविक, ही नेतृत्वाची धुरा त्यांनी अनिच्छेनेच स्वीकारली होती. साधेपणाने राहणारे लाल सिंग बुद्धिमान, कनवाळू व निर्भीड होते.

मोट सिंग हेसुद्धा अनेकदा घरी येत असत. आजारपणामुळे त्यांना बाहेरगावी जाऊन काम शोधणं शक्य नव्हतं, त्यामुळे ते देवडुंगरीमध्येच राहत. गवंडीकामाची सरकारी नोकरी मिळालेल्या मोजक्या लोकांमध्ये गावातील राम सिंग यांचा समावेश होता आणि मोट सिंग हे त्यांचेच भाऊ असूनही त्यांना कायम गरिबीला सामोरं जावं लागत होतं. मोट सिंग हे बुद्धिमान व मिश्किल व्यक्तिमत्त्व होतं. प्रत्येक गावात कथाकथनाचं विलक्षण कौशल्य असलेली मोट सिंग यांच्यासारखी मोजकी मंडळी असतात, त्यांना विसरणं कधीच शक्य होत नाही. अशी माणसं एखाद्या दंतकथेतून अवतरल्यासारखी वाटतात.

देवडुंगरीतील नव्या कार्यकर्त्यांविषयी मोट सिंग यांना कुतूहल होतं आणि संवाद साधण्यासाठी ते उत्सुक होते. आपल्याकडच्या कहाण्या या नवख्या मंडळींना भुरळ घालतील, हेही त्यांना माहीत होतं. गावातले लोक तसेही या कहाण्यांशी परिचित होते, त्यामुळे मोट सिंग यांनी कुशल संवादकाचा चाणाक्षपणा दाखवत आपले श्रोते हेरले. आमचा गट खाणकामासाठी आलेला नाही, हे त्यांना लवकरच कळलं. कामगारांविषयी आमची आस्था पाहून अंदाज बांधण्याइतकं चातुर्य मोट सिंग यांच्यात होतंच. आम्ही काही व्यावसायिक कामासाठी आलेलो नाही, हेही स्पष्ट होतं. शिवाय, अस्पृश्यतेला असलेला आमचा विरोध गावात अस्वस्थता निर्माण करणारा ठरला होता. या पार्श्वभूमीवर, मोट सिंग यांनी आम्हाला सांगण्यासाठी गोष्टीची काळजीपूर्वक निवड केली. त्या कहाणीचा अमीट ठसा चळवळीतील सुरुवातीच्या सहकाऱ्यांवर उमटलेला आहे. दुष्काळ, प्रतिष्ठा, गरिबी, भूक व हताशा यांच्यासंदर्भातील ती वस्तुस्थितीदर्शक रूपककथा होती :

कोनवाश्यावरचं मडकं

खूप पूर्वी राजस्थानात महाभयंकर दुष्काळ पडला होता. तेव्हा, एका गावातलं सात जणांचं कुटुंब प्रचंड संकटात सापडलं होतं. या कुटुंबात आई-वडील आणि पाच मुलं होती. त्यांच्या विहिरी सुकून गेल्या. त्यांच्या शेतांमध्ये काहीच उगवत नव्हतं. अगदी लहानसहान फळं नि पानंही खाऊन संपली. गाई-गुरं एक तर मरून तरी गेली, नाही तर त्यांना दैवाच्या भरवशावर सोडून देण्यात आलं. रोजगाराचं काहीही साधनं नव्हतं, त्यामुळे आई-वडिलांनी कामाच्या शोधात निघायचं ठरवलं. काम मिळालं, तर पैसा मिळेल आणि पैसा असेल, तर अन्न विकत तरी घेता येईल.

घर सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या मातीच्या घरामध्ये कोनवाश्याला एक लहानसं मडकं टांगून ठेवलं. ‘या मडक्यात धान्य आहे. आम्ही घरी परतल्यावर ते शिजवू, मग सगळे मिळून जेवू,’ असं त्यांनी मुलांना सांगितलं. मुलं वाट बघत राहिली. कित्येक महिने झाले. मुलं थकून गेली, पण त्या छोट्या ‘मडक्या’मुळे त्यांची आशा टिकून राहिली होती.

बऱ्याच दिवसांनी आई-वडील परत आले, पण त्यांना काहीच काम मिळालं नाही. मुलांप्रमाणेच त्यांचीही हाडं वर आली होती. ‘आता मडकं खाली काढू या’, मुलांनी आक्रोश केला. आईने मडकं खाली काढलं. ते रिकामं होतं. भयानक धक्का बसून मुलं मरण पावली. आशा संपल्यावर हताशा विळखा घालते आणि जगणं हातातून निसटत जातं. आशा संपणं म्हणजेच अंत...

मोट सिंग म्हणाले, सरकार स्वतःच्या इमारतीच्या कोनवाश्यावर आपल्यासाठी मडकं टांगून ठेवतं. पण ते रिकामं आहे, हे शहाण्यासुरत्यांना समजत असतं. अस्तित्वात राहण्यासाठी झगडणारे लोक मात्र ते मडकं भरलं असेल यावर विश्वास ठेवून राहतात. असंच जगणं सुरू राहतं. सरकारी आश्वासनं अशीच असतात. यावर तुम्ही काय उपाय कराल? त्यांचा हा प्रश्न निश्चितपणे गंभीर आव्हान देणारा होता!

क्षयरोगाच्या रूपात गरिबीने मोट सिंग यांच्यावर आणखी एक आघात केला होता. भारतभरातील इतर लाखो लोकांप्रमाणे त्यांनाही या आजारामुळे संथपणे अकाली मृत्यू आला.

अनेक लोक मरण पावतात, कित्येक जण अगदी लहान वयातच मृत्युमुखी पडतात. स्थलांतर आत्मपीडेसारखं असतं. शहरांमधलं जगणं अतिशय कठोर असतं. त्यात भर म्हणून तिथे आजार आणि तुटलेपण पाचवीला पुजलेलं असतं. सामाजिक आधार मिळत नाही. लोक अगदी निर्दयपणे वागले नाहीत, तरी अलिप्तपणे राहतात. पोलीस दलात किंवा सैन्यात रुजू झालेले अनेक तरुणही परत येताना कोणता ना कोणता आजार सोबत घेऊनच येतात. त्यामुळे अखेरीस औषधोपचारांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाचा बोजा वाढतो, त्यासाठी कर्ज काढलं जातं नि त्याच अवस्थेत ते प्राण सोडतात.

एखाद्या समुदायात कामासाठी आल्यावर स्थिरस्थावर होण्यासाठी कितीही कालावधी घालवावा लागू शकतो. आधी समपातळीवरून मैत्री जोडावी लागते, तसं केल्यावर लोकांना विश्वास वाटू लागतो; पण एवढं करूनही सुरुवातीचे दिवस तापदायक होण्याची शक्यता असते. कोणताही मुद्दा संभाव्य वादाला कारण ठरू शकतो. अशा वेळी मतैक्य साधायचं असेल तर, समोरच्याचं म्हणणं संयमाने ऐकून घेणं, हे पहिलं पाऊल असायला हवं. देवडुंगरीतील नवागतांना हा टप्पा तुलनेने वेगाने पार करता आला. शंकर व अंशी यांचं गावातल्या काहींशी असलेलं नातं आणि बोलीभाषा व संस्कृती यांतून आलेला सहजपणा, या गोष्टी आम्हाला पूरक ठरल्या. आमची भेट घ्यायला आलेल्या अनेक स्थानिक लोकांनाही सर्वांसाठी सामाइक असलेल्या मडक्यातूनच पाणी घ्यावं लागलं आणि सगळ्यांना एकाच पातळीवर बसावं लागलं. सामाजिक संवादप्रक्रियेबाबत परंपरेने आखून दिलेल्या व कठोरपणे टिकवलेल्या त्यांच्या नियमांना आव्हान देणारी ही परिस्थिती होती. त्यामुळे सातत्याने घर्षण होत राहायचं, काही वेळा त्यातून मोठमोठ्या आवाजात वादविवादही झडायचे. देवडुंगरीतील आमचं कुटुंब मात्र ठाम होतं. या सगळ्याचा सर्वाधिक फटका अंशी यांना बसला. परंपरा मोडल्याबद्दल संतप्त झालेल्या बायका सांस्कृतिक दृष्ट्या अंशीच्या सर्वांत जवळच्या होत्या.

आमची भेट घ्यायला केवळ वयस्क लोकच आले असं नाही, अनेक तरुण व कुमारवयीन मुलंही आम्हाला भेटत होते; त्यातील नारायण व देविलाल अनेकदा येऊ लागले. ही अगदी असाधारण जोडगोळी होती. जातीने सर्वत्र भेदभावाच्या सीमा आखलेल्या समाजात त्यांची जोडी लक्षणीय होती. गावातील नवख्या कार्यकर्त्यांची भेट घ्यायला ते आले. एनएच-8 वरून होणारी वाहतूक ज्या संस्कृतीचे नुसते धावते संकेत द्यायची, त्या संस्कृतीतून ही मंडळी गावात आलेली दिसत होती. या घरातले लोक काहीशी अकादमिक भाषाही बोलताना दिसतात. अनेकदा पेचप्रसंगात ही मंडळी इंग्रजीतही बोलून जातात. आपला तर इंग्रजीशी छत्तीसचा आकडा!... असा विचार करत नारायण व देविलाल आमच्या घरी येऊ लागले.

जयपूरस्थित विकास अध्ययन संस्थेसाठी अरुणा, निखिल व शंकर यांनी 1990 मध्ये एक अहवाल तयार केला होता, त्यात या संदर्भात पुढील वर्णन येतं :

कालू एका कारखान्यात कामाला होता, पण तिथल्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे यंत्र हाताळताना अपघात झाला नि त्यात कालूला एक हात गमवावा लागला. मग तो गावी परत आला. नावापुरती नुकसानभरपाई देऊन त्याला घरी पाठवण्यात आलं. देविलाल कालूपेक्षा दोन वर्षांनी मोठा. आमच्यापेक्षाही लहान झोपडीत ते राहायचे. दोघेही दलित आणि गरीब होते. एकदा कर्जासाठी त्यांनी जमीन गहाण ठेवली नि कर्जाची परतफेड शक्य न झाल्याने त्यांना जमिनीवर पाणी सोडावं लागलं. त्यांच्या घरावर भुकेचं सावट सतत असायचं.

देविदास अभ्यासात हुशार होता. सगळे अडथळे पार करून तो शाळेत जायचा. तिथली त्याची कामगिरीही चांगली होती. आठवीत असताना त्याला जिल्ह्यातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून दोन हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे त्याला शिक्षण सुरू ठेवता आलं. पण एवढी असामान्य शैक्षणिक कामगिरी करत असतानाही उपजीविकेसाठी त्याला भिलवाडामधील एका कारखान्यात नोकरी करावी लागत होती. शिष्यवृत्ती जाहीर झाल्यावर तो मुख्याध्यापकांकडे गेला. पण आपल्याला शिष्यवृत्तीबद्दल काहीच माहिती नसल्याचं ते म्हणाले. तरी, देविलालने आपली बाजू लावून धरली, तेव्हा मुख्याध्यापक त्याची बोळवण करताना म्हणाले, ‘हां, थोडे पैसे माझ्यापर्यंत आलेले; पण तू इथे नव्हतास, म्हणून मी ते परत केले.’

कालूला कारखान्याच्या मालकाकडून अशाच तुसड्या सुरात उत्तर मिळालं होतं. तर, शिष्यवृत्ती मिळूनही पैसे हातात आले नाहीत, पण देविलालने अभ्यास सुरू ठेवला. शाळेबाहेरून अभ्यास करून त्याने दहावीची परीक्षा दिली. या सगळ्या काळात त्याने कारखान्यात कामगार म्हणून आणि शेतमजूर म्हणून काम सुरूच ठेवलं होतं.

नारायणचं आणि त्याचे वडील राम सिंग यांचं पटायचं नाही. शंकर नि त्याच्या मित्रपरिवारातल्या मंडळींची आस्थेवाईक वृत्ती राम सिंग यांना कौतुकास्पद वाटत होती. पण आपल्या मुलामध्ये आपण इतकी गुंतवणूक केलेली असताना त्याने अशा कार्यकर्तेगिरीत पडू नये, असं त्यांचं मत होतं. तरीही, नारायण आमच्या घरी येतच राहिला आणि शेवटी आमचा मित्र व साथीदार बनला. आमच्या झोपडीत तरुणांची ये-जा सारखी सुरू असायची. त्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बाहेरून देवडुंगरीला भेट द्यायला आलेले लोक तरुणांची ही वर्दळ पाहून भारावून जात. स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी गावातले तरुण-तरुणी इतक्या निर्धाराने काम करतायत, हे पाहून त्यांच्या आशा पल्लवित व्हायच्या. त्या काळात देवडुंगरीला भेट देऊन गेलेल्या रजनी बक्षी यांनी बापू कुटीमध्ये अशीच भावना व्यक्त केली आहे :

नारायणला कार्यकर्त्यांचा हा दृष्टिकोन मान्य होता. पण संघटनाबांधणीपासून अंतर राखणारी त्याच्या काकांची वृत्ती त्याला पटत नव्हती. आता सर्वपरिचित झालेल्या नव्या शेजाऱ्यांसोबत वावरण्यात नारायणला आनंद वाटायचा. त्याचा मित्र देविलालप्रमाणेच नारायणलाही स्वतःच्या स्वप्नांचं प्रतिबिंब त्या गुलमोहराजवळच्या घरात पडलेलं दिसलं. त्या घरात मांडले जाणारे विचार व तिथल्या कृती त्याच्या स्वप्नाशी मिळत्या-जुळत्या होत्या. त्यामुळे त्याचा चुलतभाऊ- म्हणजे मोट सिंग यांचा मुलगा- गाव सोडून गेला, तसा मार्ग न पत्करण्याचा निर्णय नारायणने घेतला. त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं, त्यासाठी वेळप्रसंगी अभ्यासात निखिलची मदत घेतली...

थोड्याच काळात देविलाल व नारायण अनेक लहान- मोठी कामं एकत्र करू लागले. पण देविलालसोबतची आपली वाढती मैत्री आई-वडिलांना पटत नसल्याचं नारायणच्या लक्षात आलं. आई-वडिलांच्या मते, त्या दोघांची मैत्री एका मर्यादेपर्यंत ठीक होती, पण देविलालसोबत खाणं-पिणं मात्र त्यांच्या लेखी अस्वीकारार्ह होतं. नारायणचे वडील राम सिंग यांच्या हातात बऱ्यापैकी सत्ता होती आणि देवडुंगरीमध्ये त्यांचा प्रभाव होता. आपल्या मुलाने मूलभूत नियम मोडणं त्यांना अमान्य होतं. त्यामुळे त्यांनी नारायणला हे सगळं काम सोडून देण्याची विनंती केली. वडिलांचं सगळं बोलणं संयमाने ऐकून घेणं नारायणला भाग होतं. काही वेळा तो वडिलांना समजावण्याचा प्रयत्नही करायचा. बदलत्या काळानुसार बदलणं का आवश्यक आहे, ते सांगायचा. शेवटी, नारायणने त्याला योग्य वाटत होतं तेच काम सुरू ठेवलं.

राष्ट्रीय महामार्गाला लागून काही घरं दिसत राहतात. भीम हे देवडुंगरीपासून सर्वांत जवळचं शहर आहे, तिथून येताना महामार्गापासून नैर्ऋत्येला वळलं की, देविलालचं घर लागतं. आमच्या झोपडीमधूनही घरांचा तो लहानसा समूह दिसायचा. परंपरेने दलितांची घरं गावाच्या परिघावर असतात. जातीनुसार घरं बांधली जातात आणि त्या-त्या जातीच्या वाड्या ठरलेल्या असतात. अगदी आजही बहुतांश ठिकाणी ही पद्धत रूढ आहे. काही बदल निश्चितपणे झालेत. उदाहरणार्थ- दलित मुलं आता शाळेत जातात, परंतु शाळेतही जातीच्या चिरफळ्या ठळकपणे टिकून आहेत. ही जातीय विभागणीची पद्धत उचित गतीने बदलली नाही. भारतभरात ग्रामीण भागांतील अनेक शाळांमध्ये दलितांसाठी पाण्याची वेगळी मडकी असतात आणि त्यांना वर्गातही वेगळं बसवलं जातं.

दरम्यान, 1987 मध्ये राजस्थानने अलीकडच्या काळातील सर्वांत भीषण दुष्काळ अनुभवला. देवडुंगरीमध्ये आम्ही राहायला आलो, तेच वर्ष या दुष्काळाचं ठरलं. मजदूर किसान शक्ती संघटनेच्या रोजनिशीतील एक नोंद अशी आहे :

राजस्थानातील देवडुंगरी गावामध्ये 1987 मध्ये आमच्या कामाला सुरुवात झाली. त्या वर्षी या प्रदेशामध्ये तीव्र दुष्काळ पडला होता आणि स्थानिक लोकांना काम मिळण्याची व वेतनाची गंभीर चिंता भेडसावत होती. मग आम्ही याच मुद्यांवर लक्ष केंद्रित केलं. जवळच्या प्रश्नाला हाताळणं महत्त्वाचं ठरतं. शेतमजूर व कामगारांच्या तातडीच्या व्यथांसंदर्भातही असं काम उपयोगी होतं. विकासातील आपला वाटा मागून घेण्यासाठी कामगारांना संघटित करायचं असेल, तर दीर्घकालीन परिप्रेक्ष्यातूनही अशा स्वरूपाचं काम उपयुक्त ठरतं...

भुकेचे गंभीर पडसाद आसपास उमटू लागले. दुष्काळी कामांसाठी कामगार म्हणून नाव नोंदवण्यासाठी लोकांमध्ये मारामारी घडल्याचे प्रसंगही आले. प्रत्येकाला काम हवं होतं, भिक्षा नको होती किंवा अगदी मोफत शिधाही नको होता. अनेकदा विशिष्ट जातीतल्या लोकांना जमिनीचा व कामाचा हक्क नाकारला जातो. मग त्यांना भीक मागण्याव्यतिरिक्त दुसरा काही मार्गच उरत नाही. अनुसूचित जातींच्या यादीत येणाऱ्या कंजरांवर हीच परिस्थिती ओढवली. अशा जातींमधील लोकांना साधारण दोन दशकांननंतर ‘महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियमा’च्या माध्यमातून आत्मसन्मान परत मिळवता आला, हेही इथे नमूद करायला हवं. तर, 1987च्या दुष्काळासंबंधी मजदूर किसान शक्ती संघटनेच्या रोजनिशीत पुढील नोंद आढळते :

दुष्काळादरम्यान लोकांची अवस्था कशी आहे, हे तपासण्यासाठी नियोजन आयोगाने 1987 मध्ये राजस्थानात एक प्रतिनिधी गट पाठवला. हा गट उदयपूरला आलाय आणि आमच्या गावावरून पुढे अजमेरला जाणार आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली. आम्ही त्या गटाला आमच्या गावात थांबण्याची विनंती केली. नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. सी. एच. हनुमंत राव हे त्या गटाचे अध्यक्ष होते. नियोजन आयोगाचे सल्लागार बंकर संजित रॉय हेसुद्धा त्या गटाचे सदस्य होते. त्यांनी या भागात थांबा घेऊन लोकांना भेटण्याचं मान्य केलं. आम्ही पंचक्रोशीतील्या अनेक गावांमध्ये चालत गेलो आणि लोकांना या महत्त्वाच्या संधीची माहिती दिली. त्यांनी देवडुंगरीत यावं आणि या नियोजन आयोगाच्या प्रतिनिधींना भेटावं, असं सांगितलं. त्या दिवशी आमच्या झोपडीबाहेर सुमारे पाचशे लोक जमले होते. नियोजन आयोगाचे प्रतिनिधी आले, तेव्हा या लोकांनी काम देण्याची मागणी केली आणि दुष्काळी कामं मिळण्यासाठी हजेरीपटावर नावं नोंदवून घ्यावीत, अशीही विनंती केली. या वेळी प्रतिनिधींना आणि आम्हालाही धक्का बसेल अशी एक घटना घडली. अन्नासंबंधीच्या प्रश्नांना उत्तर देताना एका बाईने तिच्याकडची सूळकाट्यापासून तयार केलेली चपाती काढून दाखवली. दुष्काळाच्या अगदी टोकाच्या परिस्थितीत पोट भरण्यासाठी असं अन्न शिजवलं जातं. लोकेतिहासाच्या दस्तावेजांमध्ये अशा पदार्थाची नोंद झालेली आहे. त्या बाईच्या या कृतीनंतर सगळेच हादरले. नियोजन आयोगाचे प्रतिनिधीसुद्धा अस्वस्थ झाले. त्यांच्यासमोर जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक आश्वासनं दिली. दुष्काळी कामांसंबंधीचा मोबदला लवकरात लवकर दिला जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

आम्ही दिलेली साधी भात-आमटी डॉ.हनुमंत राव यांनी खाल्ली आणि स्वतःचं ताट धुऊन ठेवलं. गाव भयचकित झालं. देवडुंगरीतल्या आमच्या घरी प्रत्येक जण स्वतःचं उष्टं ताट स्वतःच धूत असे.

जैत सिंग व हग्गू यांचं ते मातीचं खोपटं मजदूर किसान शक्ती संघटनेच्या लोककथनाचा भाग झालं आहे. मागे वळून पाहताना या घरातील परिवाराचे सदस्य म्हणतात :

हग्गू व जैत सिंग यांनी ते घर आम्हाला आमचं म्हणून राजस्थानमधील लढाऊ कार्यकर्त्यांसोबत अरुणा रॉय वापरायची मुभा दिली, हे मोठेच उपकार होते. पण आम्ही आमच्या पद्धतीने, समतेचं तत्त्व मानून, जातीय भेदभाव न करता तिथे राहायला लागलो; तेव्हा आम्हाला लोकांचा रोष पत्करावा लागला. सर्व जातींतील लोक एकाच मडक्यातलं पाणी पितायत, यावर अनेकांनी आक्षेप घेतला. नारायण व देविलाल हे आमचे चांगले मित्र होते. ते आमच्यासोबत जेवा-खायलाही एकत्र असत. हे बघून गावकरी अस्वस्थ झाले आणि प्रचंड संतापले. मोहनजी, चुन्नीबाई व खीमू ही दलित मंडळी आमच्या स्वयंपाकघरातही येत. त्यामुळे निषेधाचे सूर तीव्र होत गेले. देविलालची एका रावत व्यक्तीकडे गहाण ठेवलेली जमीन सोडवल्यावर तर लोकांच्या संतापाचा भडका उडाला. आम्हाला घरात राहायला दिल्याबद्दल जैत सिंग यांना लोकांनी जातीतून बहिष्कृत केलं. परंतु, जैत सिंग या दबावाला बळी पडले नाहीत आणि काही काळाने त्यांनी घर आम्हाला विकलं. आता या घटना इतिहासाचा भाग आहेत आणि आता आम्ही अधिक सौहार्दाने राहतो. पूर्वीप्रमाणे आमच्या जगण्याच्या पद्धतीवर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत नाहीत. अनेक सामाजिक निर्बंधांमध्येही बदल घडले आहेत.

घराच्या आवाराची जमीन असू दे किंवा शेतजमीन; तिथे राहणाऱ्यांची वा कसणाऱ्यांची सातत्यपूर्ण उपस्थिती हळूहळू बळकट होत जाते आणि जमिनीवरचे अनुल्लंघनीय दावे तयार होतात. खरं तर, देवडुंगरीसारख्या नापीक प्रदेशात शेतीमधून फारसा काही लाभ होत नाही, परंतु ग्रामीण भारतामध्ये जातीय व वर्गीय भेदांचा निर्देश करणारा एक महत्त्वाचा घटक जमीनमालकी हा आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी जमीन अमूल्य असते आणि त्यांना त्यातून आवश्यक सुरक्षितताही लाभते. कितीही कमी आकारमानाची जमीन असो- त्यातून संबंधित व्यक्तीला त्या समुदायाचा वैध सदस्य असल्याचा अधिकार प्राप्त होतो, शिवाय वारसाहक्क प्रस्थापित होतात आणि सांस्कृतिक महत्त्वाचे इतरही अनेक लाभ त्यातून होतात.

या संदर्भात रूप सिंग यांचं उदाहरण इथे नोंदवता येईल. त्यांना मोसमी स्थलांतर करावं लागायचं. ते म्हणतात, ‘भूमिहीन असलेल्यांपेक्षा माझं चांगलं चाललं होतं. त्यांची अवस्था अगदीच बिकट होते. अल्पभूधारणा स्थैर्याची भावना मिळवून देते. पैसे हवे असतील तर ती जमीन गहाण ठेवता येते. शिवाय, छोटं पीक घेतलं तर एकंदरीत किमान तीन महिन्यांसाठी तरी भुकेपासून संरक्षण लाभतं.’ तुलनेने चांगल्या परिस्थितीत असणाऱ्यांना (पण या ‘सुस्थिती’ची तुलना इतर ठिकाणच्या मोठ्या जमीनदारांशी अजिबातच करता येणार नाही) गहाणखत व खंडणी एवढेच गुंतवणुकीचे मर्यादित पर्याय उपलब्ध असतात. त्यांच्या कल्पकतेला या पर्यायांचा विळखाच बसलेला असतो. सत्ता राबवण्याचं व स्वतःचं स्थान सुरक्षित ठेवण्याचं ते एक साधन बनतं. सावकारीचा पूरक व्यवसाय सुरू ठेवल्यामुळे या सुस्थितीतल्या मंडळींना स्वतःकडची सत्ता टिकवता येते.

या पार्श्वभूमीवर, गावात स्थायिक होणं आमच्यासाठी सोपं नव्हतं. आमच्या प्रत्येक कृतीवर पाळत ठेवली जात होती, त्यातून रोज काही तरी नवं नाट्य व ताण उद्भवण्याची टांगती तलवार डोक्यावर असायची. माहितीविषयक अधिकाराच्या कहाणीत हा सगळा तपशील सांगण्याची काय गरज आहे, असं कोणी विचारू शकतं. पण खुल्या पुस्तकाप्रमाणे मोकळं जीवन जगणाऱ्या लोकांचा संदर्भ समजून घेणं इथे प्रस्तुत ठरेल. कारण, प्राथमिक माहिती अत्यावश्यक असते, या त्यांच्या दैनंदिन जीवनातील आकलनामधूनच माहितीच्या अधिकाराची मागणी पुढे आली. ग्रामीण भागांमधील सर्वसाधारण आकलन असं असतं की- शहरी व भारताच्या अधिक संपन्न भागांमधील लोक बहुतेकदा ‘शोषण’ करण्यासाठीच गावांकडे येतात आणि भौतिक व मानवी संसाधनं हिरावून नेतात. त्यानंतर मागे केवळ आर्थिक, भौतिक व भावनिक भग्नावशेष उरतात आणि हे सगळं निस्तारण्यात पुढची अनेक वर्षं जातात. बाहेरच्या लोकांमध्ये कंत्राटदार असतात, खाणकामासाठी आलेले असतात किंवा स्वस्तात कामगारांचा वापर करणारे, जमीन ताब्यात घ्यायला आलेले आणि अनेकांना आजारी, कंगाल व कर्जबाजारी अवस्थेत ठेवून परत जाणारे लोक असतात.

अनुवाद : अवधूत डोंगरे

‘द आरटीआय स्टोरी’ हे अरुणा रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक रोली बुक्स, दिल्ली यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद अवधूत डोंगरे यांनी केला असून, जानेवारी 2020 मध्ये हे पुस्तक साधना प्रकाशनाकडून येत आहे. त्या पुस्तकातील हे पहिले प्रकरण.

  • संपादक, साधना

‘लकीर के इस तरफ’ची कहाणी

शिल्पा बल्लाळ

आठवीत असताना अँटी-रिझर्व्हेशन मूव्हमेंटमध्ये मी होते. आम्ही भोपाळला होतो आणि मंडल कमिशनला विरोध करण्यासाठी ज्याने स्वतःला जाळून घेतलं, तो राजीव गोस्वामी माझा आदर्श होता. तेव्हा मला वाटायचं की, ‘खरंच किती अन्याय होतोय ब्राह्मणांवर! मिळतं त्यांना जास्त, तर ठीक आहे ना! त्यात काय गैर आहे?’ आणखी एक विशेष म्हणजे, मला त्या बाबरी मशिदीपाशी जाऊन माझ्या हाताने हातोडा मारून त्या डोमची एक तरी वीट पाडायची होती! तिथे राम मंदिर झालंच पाहिजे, या मताची मी होते. आणि हे सगळं करण्याला माझ्या घरून खूप पाठिंबा होता. कदाचित त्यामुळेही माझं खूप कौतुक झालं असावं.

नर्मदा बचाव आंदोलनाविषयी आपल्याला तुकड्या- तुकड्यांतच माहिती असते. काहींनी तर हा विषय ऑप्शनला टाकलेला असतो. याची दोन महत्त्वाची कारणे. एक म्हणजे- हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे किंवा तसं दिसतं तरी. दुसरं म्हणजे, तुम्हाला-आम्हाला यात करण्यासारखं काही नाही, असं अनेकांना वाटतं. म्हणजे जे काही व्हायचं किंवा करायचं आहे ते सरकार, न्यायालये आणि आंदोलनकर्ते यांनीच करायचं आहे, असा तयार झालेला भल्याभल्याचा समज! कधी कधी आंदोलनकर्त्यांकडून, माध्यमांकडून त्याबाबतचा वैताग त्याच त्या पद्धतीने व्यक्त झाल्याने बहुतांश लोकांनी कान व डोळे बंद केलेले असतात. परिणामी नर्मदा बचाव आंदोलनाचं रूप किती मोठं आहे? तिथल्या धरणांविषयीची वस्तुस्थिती काय आहे? नेमकी किती गावं अफेक्टेड आहेत? परिस्थिती किती आणि कशी कठीण आहे? आणि जे काही सुरू आहे त्याचं पुढे काय होणार आहे?... वगैरे. याबद्दल तपशीलवार माहिती सर्वसामान्य लोकांकडे नसते. त्यामुळे या विषयावर अभ्यास करून आणि प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन बनवलेली एखादी फिल्म महत्त्वाचं माध्यम ठरू शकते. ‘लकीर के इस तरफ’ या फिल्मने नर्मदा बचाव आंदोलनाच्या बाबतीत हे सिद्ध केलं आहे.

आंदोलन-चळवळ यांसारख्या विषयावर एखादी फिल्म आहे, असं आपण ऐकतो; तेव्हा आपण हे गृहीत धरतो की, ती फिल्म थोडी लाऊड असणार. त्यात अवजड आणि कठीण शब्दांचा मारा केलेला असणार. गोष्टी ‘बढा- चढाकर’ सांगितल्या गेल्या असणार. आपल्याला जे माहिती आहे तेच तिथे ऐकायला-बघायला मिळणार... वगैरे. मात्र या सगळ्याच्या उलट ‘लकीर के इस तरफ’ ही फिल्म आहे! या फिल्मच्या संवादात किंवा निवेदनात वापरले गेलेले शब्द आणि भाष्य कमालीचे सौम्य असूनही वास्तव ठामपणे मांडणारे आहेत. त्यामुळे ही फिल्म 98 टक्के लोकांसाठी अतिशय इफेक्टिव्ह ठरते. इतकी अनास्था, राजकीय- सामाजिक परिस्थिती, सभोवतालचं वातावरण आणि त्रास प्रत्यक्ष अनुभवूनसुद्धा या फिल्ममध्ये कुठेही मोठी विशेषणे वापरलेली नाहीत आणि म्हणूनच या फिल्मची कन्व्हिन्सिंग पॉवर जास्त आहे. या फिल्मवर टीका करणे कोणालाही बरेच अवघड जाणार आहे. कारण टीका कशावर करणार? जे काही वास्तव आहे, ते अजिबात वाढवून-चढवून न सांगता प्रत्यक्ष आहे तसं या फिल्मद्वारे प्रेक्षकांसमोर मांडले आहे. ही फिल्म पुढे सरकते तसे या सगळ्या वास्तवासोबत येणारे प्रश्न अगदी नम्रपणे, पण ठामपणे प्रेक्षकांसमोर उभे राहतात. म्हणूनच ही फिल्म प्रेक्षकांना विचार करायला लावणारी आहे.

आणि म्हणूनच ‘लकीर के इस तरफ’ची लेखिका, दिग्दर्शिका, कॅमेरामन, निवेदिका अशी ‘सबकुछ’ असलेल्या शिल्पा बल्लाळची ही मुलाखत. यातला पहिला टप्पा म्हणजे, शिल्पाचा या फिल्मपर्यंत पोहोचण्याचा प्रवास. दुसरा टप्पा, मनात फिल्म करायचा विचार आल्यानंतर फिल्ममेकिंगची प्रोसेस- म्हणजेच स्क्रिप्ट लिहिणे, शूटिंग, एडिटिंग वगैरे. आणि तिसरा टप्पा म्हणजे, फिल्म रिलीज झाल्यानंतरचे अनुभव. असे तीन टप्पे लक्षात ठेवून ही मुलाखत घेतली आहे. एका अर्थाने ‘अ शॉर्ट आटोबायोग्राफी ऑफ शिल्पा बल्लाळ विथ रेफरन्स टू धिस फिल्म’!

प्रश्न - लहानपणापासून तुला मिळालेलं सभोवतालचं वातावरण, त्यानुसार झालेली जडण-घडण आणि आज तू जे काही करते आहेस, हे सर्व लक्षात घेता, स्वत:बद्दल तू काय सांगशील?

शिल्पा बल्लाळ - आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा आपली जडण-घडण होण्याशी संबंध असतो, यावर माझासुद्धा विेश्वास आहे. माझ्या शिक्षणाची सुरुवात नागपूरच्या एका मराठी शाळेतून झाली. नंतर बदली होऊन आम्ही भोपाळला गेलो तिथे मला ‘हिंदी माध्यमाच्या शाळेपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू या’ असा माझ्या आईचा आग्रह होता. तेव्हा मुलाला इंग्रजी माध्यमात आणि मुलीला मराठी किंवा हिंदी माध्यमात टाकण्याची पद्धत होती, त्यामुळे आईने धरलेल्या आग्रहाचं मला आता आश्चर्य वाटतं. पण मराठी माध्यमातून अचानक इंग्रजी माध्यमात आल्यामुळे माझ्यात जरासा न्यूनगंड तयार झाला होता. या अचानक झालेल्या बदलामुळे कधी कधी मला शंका वाटायची की- हे सगळं नवीन जे काही आहे, ते मला जमेल की नाही?

पण आमचं घराणं अत्यंत सुशिक्षित होतं. आजी- आजोबा प्रचंड शिकलेले होते. आजीसुद्धा नोकरी करायची. माझ्या आईचे आई-वडील आणि वडिलांचे आई-वडील असे माझे चौघे आजी-आजोबा कवी होते. त्यांचे कवितासंग्रहसुद्धा प्रकाशित झाले आहेत. म्हणून लहानपणापासून मी कविता करू लागले याचं खूप कौतुक झालं. त्यामुळे खूप लहानपणापासून मी भारी आहे, असंच वाटत राहायचं आणि म्हणून कॉन्फिडन्स व ओव्हर- कॉन्फिडन्स या दोन्हीमध्ये मी आलटून-पालटून असायची. वयाच्या नवव्या वर्षी माझ्या कवितांच्या वाचनाचे कार्यक्रम वगैरे व्हायचे! माझे पणजोबा स्वातंत्र्यलढ्यात होते. ते असहकार चळवळीत काँग्रेसतर्फे काम करत असताना तुरुंगात गेले होते. मात्र आजोबांचे विचार पणजोबांच्या एकदम विरुद्ध होते. पणजोबा आणि आजोबा यांच्यात राजकीय व वैचारिक पातळीवर प्रचंड कॉन्फ्लिक्ट होता. जसा आत्ता माझ्यात आणि माझ्या पालकांमध्ये आहे. आमची फॅमिली अत्यंत राईट विंग आहे. म्हणजे अगदी हार्डकोअर आरएसएसचे विचार असणारी फॅमिली आहे, असंही म्हणायला हरकत नाही.

प्रश्न - ही पार्श्वभूमी लक्षात घेता, तुझे विचार नेमके कसे घडत व बदलत गेले हे सविस्तर ऐकायला आवडेल.

खरं सांगायचं झालं, तर मी दुर्गावाहिनीत वगैरे गेले असते- इतक्या मिलिटंट विचारांची होते. त्यामुळे कधी कधी आश्चर्य वाटतं की, माझी भाषा इतकी शांततापूर्ण कशी झाली? अर्थातच त्याचं क्रेडिट मी माझ्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या माणसांना देते. अत्यंत मिलिटंट स्वभावाची मी होते. तेव्हाच्या माझ्या कविता इतक्या उग्र आहेत आणि आता त्याची खूप लाज वाटते. नथुराम गोडसेंचं कौतुक करणारी एक कविता आहे. ती कविता केली याचा आज मला अत्यंत गिल्ट आहे, कारण गांधींना मारलं ते कसं बरं झालं या आशयाची ती कविता आहे. पण तरीसुद्धा मी ती ठेवली आहे; कारण जर मी भरकटले, तर त्या कवितेमुळे लाज वाटून का होईना परत जागेवर येईन असं वाटतं.

आठवीत असताना अँटी-रिझर्व्हेशन मूव्हमेंटमध्ये मी होते. आम्ही भोपाळला होतो आणि मंडल कमिशनला विरोध करण्यासाठी ज्याने स्वतःला जाळून घेतलं, तो राजीव गोस्वामी माझा आदर्श होता. तेव्हा मला वाटायचं की, ‘खरंच किती अन्याय होतोय ब्राह्मणांवर! मिळतं त्यांना जास्त, तर ठीक आहे ना! त्यात काय गैर आहे?’ आणखी एक विशेष म्हणजे, मला त्या बाबरी मशिदीपाशी जाऊन माझ्या हाताने हातोडा मारून त्या डोमची एक तरी वीट पाडायची होती! तिथे राम मंदिर झालंच पाहिजे, या मताची मी होते. आणि हे सगळं करण्याला माझ्या घरून खूप पाठिंबा होता. कदाचित त्यामुळेही माझं खूप कौतुक झालं असावं. कारण त्या सगळ्या मिलिटंट आणि उग्र विचारधारेला मी कवितेमध्ये उतरवत होते. माझं चालणं-बोलणं तसंच होतं. शाळेत ज्या काही वादविवाद स्पर्धांमध्ये किंवा इतर स्पर्धेत बोलायचे, तिथेसुद्धा असेच उग्र विचार मांडायचे.

आमच्या लहानपणी ‘चाणक्य’ नावाची एक टी.व्ही. सिरियल चालू होती. तेव्हा आजी-आजोबांनी मला एक पत्र लिहिलं होतं की, ‘अशा प्रकारची एखादी कलाकृती तूसुद्धा तयार करू शकतेस. तुझ्यात ती प्रतिभा आहे.’ तेव्हा मला कुठे तरी असं स्ट्राइक झालं असावं की, असं काही तरी आपण करायला पाहिजे. त्यामुळे एखादी लार्ज स्केल फिल्म आपण करूया, असा ओव्हर-कॉन्फिडन्स घेऊनच मी फिरत होते. दुसऱ्या बाजूला शिक्षण सुरू होते. सायन्सला असल्याने तर मेडिकलला जायलाच पाहिजे, असं आसपासचं वातावरण होतं. मला मार्कही खूप चांगले मिळत गेले, त्यामुळे भीती अशी होती की, मला मेडिकलला ॲडमिशन मिळणार. त्यामुळे काळजी वाटत होती की, माझं जे सिनेमा बनवायचं स्वप्न आहे, ते अर्धवट राहणार. आपल्याला एक मोठी फिल्म करायचीच आहे, हे डोक्यात कुठे तरी होतं. पण मला त्यातली काहीही अक्कल नव्हती. फिल्म डायरेक्शन म्हणजे काय, त्यासाठी काय करावं लागतं? काय शिकावं लागतं? याबद्दल किंचितही माहिती नव्हती; पण काही तरी भारी आपल्याला करायचं आहे, इतकं नक्की होतं.

थँकफुली, माझ्या बाबांची बदली बडोद्याला झाली आणि माझं मेडिकलची ॲडमिशन वगैरे सगळं कॅन्सल झालं. तिथून पुढे मनात असं खूप यायचं की, आपण गावांमध्ये जाऊन काही तरी काम करणार आहोत. वस्तुत: गावाचा आणि माझा फारसा संबंध आलेला नाही. कारण पूर्ण काळ मी शहरात राहिलेली व्यक्ती आहे. आजी मध्य प्रदेशमध्ये छिंदवाडा नावाच्या गावात असल्याने माझा जन्म तिथला आहे. गावाचं तेवढं एक कनेक्शन मात्र माझ्या वर्तमानासोबत कुठे तरी आहे, असं मला वाटतं. ही गोष्ट मी फिल्ममध्येसुद्धा घेणार होते. पण या फिल्मच्या स्क्रिप्टचा टोन तसा नव्हता म्हणून ते वगळलं. तर लहानपणी मामाच्या गावाला जेव्हा मी जायचे, तेव्हा तिथे अहिर व गोंड हे आदिवासी शेतात आणि घरात काम करायला यायचे. मला वाटायचं की, ही माणसे खूपच इंटरेस्टिंग आहेत. जरी त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. नागपूरहून जेव्हा आम्ही तिकडे जायचो, तेव्हा घाटातून त्यांची घरे दिसायची. त्या छोट्या-छोट्या झोपड्या वगैरे. मला ‘आदिवासी’ या गोष्टीचं आज खूपच आकर्षण आहे. याचं कारण कदाचित हेसुद्धा असेल की, मी लहानपणापासून आदिवासींबद्दल खूप उलट ऐकत आलेली आहे. म्हणजे जसे की- आदिवासी चोर असतात, ते अप्रामाणिक असतात, त्यांच्याशी फार जवळीक साधू नये, ते आपल्यासाठी राबण्याकरताच असतात वगैरे.

माझ्या विचारात परिवर्तन होण्याचं आणखी एक स्ट्राँग कारण म्हणजे, वेगवेगळ्या जातींच्या व्यक्तींशी मैत्री होणं! यामुळेही माझ्या विचारांच्या कक्षा रुंदावायला मदत झाली. दरम्यान खूप वेगवेगळी कामं मी करून बघत होते. म्हणजे विविध एनजीओमध्ये नोकरी करणे, ट्रान्सलेशनची कामे करणे, मध्येच न्यूज रिडिंग करणे वगैरे. मात्र काहीच वर्षांत मी एनजीओमार्फत फिल्डवर्क करणे, ट्रेनिंग देणे, त्याचं डॉक्युमेंटेशन बघणे यामध्ये रमले. अनेक ठिकाणी काम करताना माझे वाद-विवादसुद्धा झाले, काही वाद तर अगदी लीगल ॲक्शन होईपर्यंत गेले. कारण मला कुठल्याही चुकीच्या कागदावर सही करणे किंवा समोरच्या व्यक्तीवर अन्याय होईल असं काम करून घेणे कधीच मान्य नव्हते.

त्यात एक भयंकर प्रथा अशी होती की, आमच्या घरी काम करणारी आजोबांच्या वयाची आदिवासी माणसंही आमच्या सर्वांच्या पाया पडायची. ही गोष्ट खूप लहान असल्यापासून मला खटकायला लागली होती. आपल्याला तर असे शिकवले आहे की, आपण मोठ्यांच्या पाया पडत असतो. मग ही मोठी माणसं लहान मुलांच्याही पाया का पडतात? सातवी-आठवीपर्यंत याबद्दल काही बोलण्याची माझी हिंमत नव्हती. ते पाया पडायला आले की, मी मागे सरकायचे. नंतर एकदा असं झालं की- एक वयस्कर गृहस्थ होते, ज्यांनी मला पाया पडून नमस्कार केला; तेव्हा मीही त्यांना तसाच नमस्कार केला. त्यामुळे आमच्या घरचे सगळे असे शॉक्ड झाले की, काय करते ही मुलगी! तेव्हा मग मी सगळ्यांना सांगितलं की- ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांनी मला नमस्कार केला तर मीही करणार. यावर मला घरातल्यांनी खूप समजवलं की, त्यांनी पाया पडून नमस्कार केला की, त्यांना बरं वाटत असतं वगैरे...

पण मला काही ते पटेना! म्हणजे नमस्कार करून, वाकून कसं बरं वाटेल कुणाला? आपण घरातल्या उरलेल्या वस्तू वा पदार्थ कोणाला तरी देऊन टाकतो, ते घ्यायला कसं छान वाटेल त्यांना? असे प्रश्न पडायचे. आमच्या घरी काम करणाऱ्या महिलांसाठी अक्षरश: चहाचे वेगळे कप असायचे. लहानपणी आपल्याला अजिबात कल्पना नसते की, हे सगळं काय आहे? जे आहे ते आहे, असंच करायचं असतं, हेच सांगितलं जातं- तेच आपण करतही असतो. शिवाय लहान असल्यामुळे आपल्यावर फार विचार करायची वेळ कधी येत नाही किंवा येऊ दिली जात नाही. मी बारावीमध्ये गेल्यानंतर मात्र असं वाटायला लागलं की, आता मला त्यांच्याच कपात चहा प्यायचा आहे आणि असा कसा आई वेगळा कप ठेवते... वगैरे. पण घरातलं वातावरण असं होतं की, इतकं वाटूनसुद्धा माझी कधी तसं वागायची हिंमत झाली नाही.

पुढे असं झालं की, सायन्स हा अत्यंत आवडीचा भाग असल्याने मी झूलॉजीमध्ये बीएस्सी केलं. त्यानंतर एमएस्सी करण्याची वेळ आली, तेव्हा मनात विचार आला की, आपण एमएस्सी केलं तर आपल्या घरचे लोक लगेच लग्न करून टाकतील. मग कुठे तरी स्वयंपाक करत बस, कुणाच्या तरी पुढे-पुढे करत बस- हे करावे लागेल. हे काही माझ्या बुद्धीला पटत नव्हतं. त्यातल्या त्यात एक बरं होतं की, घरातून शिक्षणाला सगळ्यांचा सपोर्ट होता. कुणी तरी सांगतलं की, एमबीए कर. पण त्यामध्ये गणित असल्यामुळे मी त्यासाठी तयार नव्हते. माझ्या वडिलांचं म्हणणं होतं की, तू एचआर व्हायला हवंस. मग एकाने सुचवलं की, तू एमएसडब्ल्यूचा कोर्स कर, त्यामध्ये गणित नसतं आणि त्यातून तुला एचआरसुद्धा होता येईल. आणि मग माझा एमएसडब्ल्यूचा प्रवास 1996 मध्ये सुरू झाला. हा खरा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट म्हणता येईल. तिथून माझा खऱ्या अर्थाने एकूण समाजाबद्दलचा अभ्यास आणि चिकित्सा सुरू झाली. जसंजसं वास्तव लक्षात येत गेलं तसंतसं माझ्या विचारांमध्ये बदल होत गेले.

प्रश्न - रिझर्व्हेशन कसं चुकीचं आहे, बाबरी मशीद पाडून राममंदिर कसं झालंच पाहिजे, गांधीजी अहिंसेबद्दल जे सांगतात तो बावळटपणा आहे... अशा मिलिटंट असण्याच्या मुख्य तीन लक्षणांपासून ते ‘लकीर के इस तरफ’ ही फिल्म बनवून, ठामपणे मिलिटंट विचारधारेविरुद्ध मत मांडण्यापर्यंतचा तुझा हा प्रवास धाडसी आहे, असं म्हणायला हरकत नाही. तर, आदिवासी आयुष्याबद्दल तुला लहानपणापासून आकर्षण होतं, असं तू सांगितलं आहेस. हा प्रवास पुढे इतका फोकस्ड आणि ठाम कसा होत गेला?

मी जसं आधी सांगितलं की- छिंदवाडा हे आमच्या मामाचं गाव होतं, तिथे पातालकोट नावाची एक अत्यंत फेमस जागा आहे. तिथे तामिया नावाचं एक जंगल आहे. त्या जंगलात आम्ही लहानपणी जायचो. रूडयार्ड किपलिंगचा जो मोगली आहे, तो तिथल्या करमाजिरी नावाच्या जागी सापडला होता, अशी एक कल्पित कथा आहे. हे लहानपणापासून आम्ही ऐकलेलं होतं. त्यामुळे आम्ही तिथे सतत जायचो आणि लहान मुलांच्या मनात जसे विचार येतात तसे आमच्या मनात यायचे की- मोगली आपल्याला सापडला तर... वगैरे.

तेव्हापासूनच मी मनात अशा गोष्टी रचायचे आणि खूप लिहूनही ठेवायचे. तिथली पातालकोट ही जागा म्हणजे एक मोठी दरी आहे. साधारण सात किलोमीटर इतकी त्रिज्या असलेला तो भाग आहे. लहानपणी आम्हाला सांगितलं जायचं की, तिथे पंचवीस गावं आहेत आणि ती खूप खोलवर, खाली आहेत. तिथली माणसं फक्त मीठ व कापड घ्यायला वर येतात. त्यांना आपली भाषा येत नाही. त्यांच्याजवळ तीर- कमान असतात, आपण त्यांच्यापासून सांभाळून राहायला हवं. आपण त्यांच्याजवळ गेलो, तर ते आपल्याला मारतात किंवा लुटतात. या अशा गोष्टी लहानपणी मी ऐकल्या होत्या. कदाचित त्यामुळेच मला त्या लोकांबद्दलची आणि एकदा तरी त्यांना बघायची भयंकर क्युरिऑसिटी होती.

गंमत म्हणजे आमच्या घरी जे लोक येतात तेच हे आदिवासी असतात, हे मला माहीत नव्हतं. मला वाटायचं की, हे नोकर असतात, आणि आदिवासी म्हणजे जे पातालकोटमध्ये राहतात, ते. तर माझी फार इच्छा होती की, एक तरी आदिवासी मला त्या पातालकोटमधून वर येताना दिसावा. एमएसडब्ल्यूनंतर माझी प्लेसमेंट रूरल भागात झाली, तेव्हा हा फरक हळूहळू लक्षात यायला लागला. एमएसडब्ल्यू करत असताना गगन सेठी नावाचे एक गृहस्थ आले होते. त्यांनी आम्हाला एकीकडे इंडस्ट्रीमध्ये जाऊन व्हाइस प्रेसिडेंटपर्यंत पोहोचणे, भरपूर पैसे कमावणे आणि दुसरीकडे एखादी एनजीओ जॉईन करून ग्राउंड लेव्हलला काम करून गरजेपुरते पैसे व समाधान मिळवणे यातला फरक सांगितला होता, जो मला पटला होता. त्यामुळे माझ्या नोकरीच्या प्रवासाची सुरुवात एका छोट्याशा गावापासून झाली. त्या पहिल्या नोकरीपासून (आता बावीस वर्षे झाली) घराबाहेर आहे. विशेष म्हणजे माझ्या परिवाराने याला कधीही विरोध केला नाही. आमच्या घरातलं वातावरण शिस्तीचं असलं तरी, त्यामुळे आमचे हाल वगैरे होत होते असं काही नाही.

माझ्या विचारात परिवर्तन होण्याचं आणखी एक स्ट्राँग कारण म्हणजे, वेगवेगळ्या जातींच्या व्यक्तींशी मैत्री होणं! यामुळेही माझ्या विचारांच्या कक्षा रुंदावायला मदत झाली. दरम्यान खूप वेगवेगळी कामं मी करून बघत होते. म्हणजे विविध एनजीओमध्ये नोकरी करणे, ट्रान्सलेशनची कामे करणे, मध्येच न्यूज रिडिंग करणे वगैरे. मात्र काहीच वर्षांत मी एनजीओमार्फत फिल्डवर्क करणे, ट्रेनिंग देणे, त्याचं डॉक्युमेंटेशन बघणे यामध्ये रमले. अनेक ठिकाणी काम करताना माझे वाद-विवादसुद्धा झाले, काही वाद तर अगदी लीगल ॲक्शन होईपर्यंत गेले. कारण मला कुठल्याही चुकीच्या कागदावर सही करणे किंवा समोरच्या व्यक्तीवर अन्याय होईल असं काम करून घेणे कधीच मान्य नव्हते.

तसंही ठराविक काळानंतर नोकरीत तुम्ही वरच्या पोझिशनवर जायला लागता, तसतसा फिल्डशी आणि लोकांशी संबंध कमी होत जातो. त्यामुळे पुढे नोकरी करण्याची माझी अजिबात इच्छा राहिली नव्हती. काही तरी वेगळं करायचं होतं. म्हणजे असं काही तरी- ज्यात प्रवास असेल, वेगवेगळ्या लोकांना भेटणं असेल वगैरे. तरी यादरम्यान गाव आणि आदिवासी यांच्याशी निगडित काही ना काही कामे मी करत होते, असं आता इथे सांगताना माझ्या लक्षात येतंय.

प्रश्न - लहानपणापासूनच तुझं स्वप्न होतं की, तुला एक मोठी फिल्म बनवायची आहे. मात्र तुझं त्यात प्रशिक्षण झालेलं नव्हतं. या फिल्ममेकिंगची तुला पुन्हा आठवण कधी झाली आणि मग पुढे तू त्याचं काय केलंस?

जसं मी आधी सांगितलं की- नोकरी करायची नाही, हे ठरवल्यानंतर मी घरी डिक्लेअर केलं की, मी पुण्याला चालली आहे. हे ऐकून घरच्यांना फार आनंद झाला. त्याचं कारण असं की, त्यांना वाटलं होतं- जर पुण्याला गेली तर हिला कोणी तरी मराठी मुलगा लग्नासाठी तिथे मिळेल. अर्थात त्याआधी जसं एखाद्या नवख्या माणसाला वाटावं तसंच मला सुरुवातीला वाटलं की, मी मुंबईला जावं आणि संजय लीला भन्साळींसारख्या कमर्शियल फिल्म कराव्यात. कारण तोपर्यंत माझा ओव्हर-कॉन्फिडन्स टिकूनच होता, पण मुंबईत माझ्या परिचयाचं कोणीही नव्हतं. त्यामुळे माझा मावसभाऊ पुण्यामध्ये होता, त्याच्याशी याबद्दल चर्चा केली. तो इंजिनिअर आहे, त्याने त्याच्या मेसवर वगैरे चौकशी करून एका व्यक्तीचा नंबर मिळवला. ती व्यक्ती म्हणजे वीरेंद्र वळसंगकर- जो फिल्मएडिटर आहे. मी वीरेंद्रना फोन केला तेव्हा ते मला म्हणाले की, ‘जेव्हा तुम्ही पुण्यात याल तेव्हा भेटा. मी त्यांना म्हटलं की, तेव्हा-जेव्हा नाही- मी आज रात्री पुण्याच्या बसमध्ये बसते आहे आणि उद्या तुम्हाला भेटते.’ ते ठीक आहे म्हणाले. आम्ही भेटलो आणि त्यांनी मला तीन ऑप्शन सांगितले. जयू नचिकेत पटवर्धन, अमोल पालेकर आणि सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर. सुमित्रा भावे (त्यांना आम्ही मावशी म्हणतो) यांचंदेखील एमएसडब्ल्यू झालेलं आहे. म्हणून मी तिथेच ठरवलं, आपण सुमित्रा भावेंसोबत काम करायचं. मग सुनील सुकथनकर यांना कॉल केला.

‘देवराई’ सिनेमाचं पोस्ट प्रॉडक्शन सुरू आहे, त्यामुळे नेक्स्ट प्रोजेक्टबद्दल विचार सुरू झाला की, तुला कळवू- असं नम्रपणे त्यांनी मला सांगितलं. मी अक्षरश: दर दिवसाआड त्यांना फोन करत होते. मग मला सुमित्रा भावेंचा निरोप आला की, भेटायला ये. मी रिझ्यूमे वगैरे घेऊन गेले होते. तर मला कळलं की, फिल्म लाईनमध्ये असं काही नसतं. सुमित्रामावशीने मला तेव्हा सांगितलं की, तू मोठ्या पोस्टवरून आली आहेस, पण या क्षेत्रात पडेल ते काम करावं लागतं, तुला ते जमेल का? मी त्यांना खात्रीशीर ‘हो’ म्हणाले.

‘बाधा’ नावाची एक फिल्म त्या करत होत्या, त्यांना असिस्टंट डिरेक्टर म्हणून मी व समीर शिपूरकर जॉईन झालो. तिथे माझी समीर शिपूरकरशी पहिली ओळख झाली आणि हळूहळू पुढे आमची घट्ट मैत्री झाली. ‘बाधा’नंतर किर्लोस्करांची एक डॉक्युमेंटरी केली. त्याच्या एडिटिंगमध्ये मी थोडासा हातभार लावला होता. त्यानंतर सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांनी ‘नितळ’ नावाची फिल्म केली. त्यात मी असिस्टंट डिरेक्टर होते. मग मला वाटलं की, आपण आता मुंबईला जायला हवं. त्याचवेळी समीरने मला विचारलं की, तो पाबळच्या विज्ञान आश्रमावर एक डॉक्युमेंटरी करतोय, तर त्यात मला काम करायला आवडेल का? आणि मी त्याला ‘हो’ म्हणाले. एकूणच माझा फिल्मसंबंधीचा प्रवास असा सुरू झाला.

प्रश्न - विविध संस्था, संघाटना, व्यक्ती वा आंदोलन यासंदर्भात फिल्म बनवल्या जातात आणि तशा काही फिल्म्स तू बनवल्या आहेस. त्याबद्दलचा तुझा अनुभव काय आहे?

खऱ्या अर्थाने सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा संघटना, आंदोलन यांच्याशी माझा पुण्यात येईपर्यंत काहीही संबंध नव्हता. पुण्यात असताना ‘नितळ’ या सिनेमाच्या शूटिंगच्या आधी उत्पल व.बा. आणि असीम सरोदे यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत एक निरोप आला होता. तो असा की, नर्मदा घाटीमध्ये काही व्हॉलिंटियरची गरज आहे. तुला जाता येणार आहे का? तेव्हा मी म्हटलं की, ही एक मोठी ॲपॉर्च्युनिटी आहे आणि गेले.

तिथे आम्ही काही गावांमध्ये गेलो आणि सलग तीन दिवस तिकडे राहिलो. पहिल्या दिवशी आम्ही मेधाताई पाटकर यांच्यासोबत एका सभेला जाणार होतो, तेव्हा अचानक एका कामासाठी त्यांना मुंबईला जावं लागलं. म्हणून त्यांनी आम्हाला विचारलं की, आपल्या सभेसाठी मी जाऊ शकत नाही, तुम्ही जाणार का? तेव्हा थोड्या वेळासाठी मी शॉक्ड झाले होते. मला असं वाटलं की- चक्क मेधातार्इंना असं वाटतंय की, आपली काही तरी जबाबदारी आहे आणि आपणही तिथे जाऊ शकतो. पुढे काही वर्षांनंतर मला कळालं की, तिथली आंदोलनाची पद्धतच आहे की- जे कोणी पाहुणे येतात, त्यांना सगळ्यांशी बोलायला लावतात. आम्ही होतो तेव्हा तीन-चार दिवसात रात्री-अपरात्री काही गावांमध्ये सभा घेण्यात आल्या. सर्व लोक एकमेकांना हे सांगत होते की, आपण आता बुडणार आहोत.

हे मी पंधरा वर्षांपूर्वीचं सांगते आहे. मला अजूनही ते चित्र डोळ्यांसमोर स्पष्ट दिसतंय- बडवानीमधलं जुनं ऑफिस आणि ती छोटीशी वाहणारी नर्मदा. तीन दिवस तिथे राहून आम्ही पुण्याला परत आलो आणि आपापल्या कामाला लागलो. इतकाच काय तो माझा आंदोलनाशी संबंध. त्यानंतर अगदी माझ्या डोक्यात त्याबद्दल काही विचार होता वगैरे, असेही नाही. मात्र मेधा पाटकर असं नाव कुठेही ऐकलं किंवा वाचलं की, माझं लक्ष तिकडे वेधलं जायचं आणि मग मला वाटायचं की, याबद्दल आपण अधिक वाचूया किंवा तिथे जाऊया. तर मेधातार्इंची आणि आपली ओळख व्हावी, अशी खूप प्रामाणिक इच्छा होती, इतकंच.

त्यानंतर मग आधी सांगितलं तसं समीर आणि मी मिळून विज्ञान आश्रमवर डॉक्युमेंटरी खूप मन लावून बनवली. तरीसुद्धा अगदी युनिसेफतर्फे छत्तीसगडला दंतेवाडामध्ये बनवलेली फिल्म आणि आत्ताची ‘लकीर के इस तरफ’ ही फिल्म बनवेपर्यंत हे माध्यम आपल्या खूप हातात आलेलं आहे, असं मला वाटत नव्हतं. या प्रवासात समीर शिपूरकर याचं एक प्रगल्भ मित्र म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. मी पुण्यात कोणतीही बॅकग्राऊंड न घेता आले होते. यातली एक गंमत मला सांगायला आवडेल. ‘बाधा’ सिनेमाच्या निमित्ताने जेव्हा आम्ही रेकी करण्यासाठी फिरत होतो, तेव्हा समीर बरंच काय-काय बोलत होता. त्यात नाटक आणि डॉक्टर लागू असे रेफरन्सेस देत होता. म्हणून मी खूप जेन्युइनली त्याला विचारलं की, कोण डॉक्टर लागू? तर तो म्हणाला, ‘अगं, डॉक्टर श्रीराम लागू.’ त्यावर मी त्याला म्हणाले, ‘हो, पण श्रीराम लागूंचा आणि नाटकाचा काय संबंध आहे?’ म्हणजे इतकं अज्ञान घेऊन मी पुण्यात आले होते! त्यावर समीरकडे खरं तर कितीतरी ऑप्शन होते. म्हणजे माझी खिल्ली उडवणं किंवा ‘इतकं पण तुला माहिती नाही का?’ असं विचारणं. पण नाही. तो प्रत्येक वेळी, ‘ठीक आहे, मी सांगतो म्हणत’ शांतपणे मला सगळं समजून सांगायचा.

लहानपणी मी रणजित देसार्इंचं ‘श्रीमान योगी’ वाचलं होतं. त्यानंतर कट टू डायरेक्ट मी जे मराठी पुस्तक वाचलं ते म्हणजे, मिलिंद बोकीलसर यांनी लिहिलेलं ‘उदकाचिया आर्ती’. त्यातूनच खरं तर मला मेधातार्इंची ओळख झाली होती. पण त्यातलं रागिणी नावाचं जे पात्र आहे, त्याचा कुठे तरी मेधातार्इंशी संबंध असावा, हे कळायला मला दहा वर्षे लागली. आणि आता ‘लकीर के इस तरफ’ पाहिल्यानंतर बोकीलसरांचा मला ई-मेल आला होता. त्यांना उत्तर लिहिताना मला खूप आनंद झाला की, त्यांच्यामुळे खरं तर सगळ्यात प्रथम मला मेधातार्इंची ओळख झाली होती. आणि लाइफ कम्स टू फुल सर्कल, असं मला तेव्हा वाटून गेलं.

प्रश्न - सामाजिक विषय आणि त्यातलं वास्तव मांडण्यासाठी फिल्म हे एक प्रभावी माध्यम ठरू शकतं, हे तुझ्या लक्षात कधी आणि कसं आलं? त्याबद्दलचे तुझे अनुभव काय आहेत?

समीर शिपूरकर आणि मी-दोघांनी विज्ञान आश्रमची डॉक्युमेंट्री बनवली आणि ती सगळ्यांना दाखवली, तेव्हा त्याचा खरा इम्पॅक्ट आमच्या लक्षात आला. त्यांनीच केलेलं काम फिल्ममधून बघताना त्या लोकांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. म्हणजे तिथे आम्हाला इम्पॅक्ट थेट दिसत होता. तशा अर्थाने स्वतंत्रपणे केलेली ती आमची पहिलीच फिल्म असल्याने, आमच्या काही गोष्टी ठरल्या होत्या. एक तर, जो काही फीडबॅक येईल तो शांतपणे स्वीकारायचा. तिथल्या तिथे कुणाशीही वाद करायचा नाही. कारण लोक आम्हाला काहीही सांगायचे. उदा- हे शीर्षक तुम्ही बदला, म्हणजे अशा दोन बायका जात्यावर दळण दळताना दाखवा आणि त्या जात्यामधून असं टायटल व शब्द बाहेर आले, असं दाखवा... वगैरे. अशा गोष्टींनासुद्धा आम्ही नम्रपणे ‘हो, विचार करू’ अशी उत्तरे दिली आहेत.

पुढे आम्ही ग.प्र. प्रधानसर यांच्यावर एक डॉक्युमेंटरी केली. प्रधानसरांना जेव्हा आम्ही ती प्रत्यक्ष दाखवायला गेलो होतो, तेव्हाचा त्यांच्यासोबतचा अनुभव फार वेगळा होता. त्यांच्यातला साधेपणा, त्यांच्यातली कमिटमेंट प्रत्यक्ष बघणं खूप काही शिकवणारं होतं. ती डॉक्युमेंटरी रिलीज करायच्या वेळी प्रधानसरांची तब्येत अत्यंत बिघडली होती. आम्ही हॉस्पिटलबाहेर उभे राहून त्यांचा त्रास बघत होतो. ते पाहून मनात सारखा विचार यायचा- आपण नेमकं काय करू शकतो, यांचा त्रास कमी करण्यासाठी? आणि तेव्हाच आम्हाला काही माध्यमांचे फोन यायला लागले होते की, ‘तुम्ही प्रधानसरांवर एक डॉक्युमेंटरी बनवलेली आहे आणि त्यांची प्रकृती आता गंभीरच आहे तर आम्हाला ती आमच्या चॅनेलवर दाखवायला मिळेल का?’ वगैरे. त्यावर समीर खूप चिडला होता की, किमान माणुसकी दाखवा- ते अजून जिवंत आहेत. पुढे प्रधानसरांची प्रकृती सुधारली आणि त्यांच्याच हस्ते त्या डॉक्युमेंटरीचं उद्‌घाटन झालं.

त्यानंतर असीम सरोदे आणि रमा सरोदे यांच्यासोबत ‘न्यायनिवारा’ नावाची फिल्म मी स्वतंत्रपणे केली. एकटीने केलेली माझी पहिली फिल्म. या फिल्ममध्ये मी खूप वेगळे मॉड्यूल वापरले. उदाहरणार्थ- कठपुतळी, गोष्टी, रोल प्ले, इंटरव्ह्यू, गाणी वगैरे. या फिल्मला गिरीश कुलकर्णी आणि अश्विनी गिरी यांनी नरेशन दिलेलं आहे. यानंतर ‘बाएफ’साठी केलेली बचत गटाची फिल्म आणि त्यानंतर ज्योती मुंगसे नावाची एक व्यक्ती मला भेटली, तिच्या संस्थेसाठी एक फिल्म केली. तिला हृदयरोग होता आणि दोन महिन्यांपूर्वी ती गेली. पण हे सगळं असूनही ती प्रचंड काम करायची. या संपूर्ण प्रवासात मला असं सारखं जाणवत राहिलं की, आपण खूपच रडे आहोत. आपल्याकडे एवढं सगळं नीट आहे, आपण धडधाकट आहोत... लहानपणी काही वाईट घडलेलं नाही, उपासमार वगैरे झालेली नाही; आई-वडील मारत नव्हते, तरीसुद्धा आपण कशासाठी इतके रडतो? आणि कशाचं इतकं दुःख करत बसतो?

तर या अशा फिल्ममेकिंगच्या प्रवासात अनेक लोकांना भेटून मला स्वतःला जाणवायला लागलं की, आपण थोडं थांबून आपलं एकूण आयुष्य व जगण्यातच बदल करायला पाहिजे. आयुष्यानेही मला तशी संधी लवकरच दिली. 2014 मध्ये एका मोठ्या आजारामुळे मी अगदीच एका जागेवर होते. पण त्यातून मी लवकर बाहेर आले. माझ्याभोवती माझ्यावर खरंच प्रेम करणारी आणि विश्वास ठेवणारी मित्रमंडळी होती म्हणून.

प्रश्न - नर्मदा बचाव आंदोलन मध्यवर्ती ठेवून ‘लकीर के इस तरफ’ फिल्म तू करावीस हे कसं घडलं? आणि त्याचबरोबर, या फिल्मची संकल्पना नेमकी कशी मनात आली, याबद्दलही आम्हाला सांग.

‘युनिसेफ’मध्ये अनेक वर्षे काम केलेल्या विजया चौहान यांच्याशी माझा परिचय होता. माझं काम त्यांना माहीत होतं. म्हणूनच त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाचा महत्त्वाचा भाग असलेल्या जीवनशाळांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी मला विचारलं. ती नर्मदेत जाण्याची मोठी संधी वाटली आणि मी ‘हो’ म्हणाले. तेव्हा जावदेवाडीच्या नव्या वसाहतीमध्ये मेधातार्इंची मीटिंग होती, तिथेच आम्ही त्यांना भेटलो. शिक्षकांसोबतही बोललो आणि काही चर्चा झाल्या. त्यावेळी मी सोबत कॅमेरा नेला नव्हता आणि फिल्म वगैरे करायचं, असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. मी पूर्णपणे ‘जीवनशाळा’ हे नेमकं काय प्रकरण आहे, हे समजून घेण्यात रमले होते. कारण ते मला खूप वेगळं वाटत होतं.

मला वाटत होतं की, आपण फार मुख्य प्रवाहातल्या लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे, यांना काय देणार? म्हणजे तिथे राहिल्यानंतर लक्षात आलं होतं की, या इतक्या समंजस समाजाला आपण काय ट्रेनिंग देणार? आणि का? फक्त आपण शहरातून आलो आहोत म्हणून? आणि हा इतका प्रगल्भ समाज- जिथे पंचवीस वर्षांपासून इतकी सुंदर व्यवस्था आधीच आहे, तिथे आपण अजून काय सांगणार आहोत? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात गर्दी करत होते. सारखं वाटत होतं की, कोणत्याही आदिवासी समाजाला शहरातील लोकांनी काही शिकवायला जाऊ नये. ते जसे जगतात तसं त्यांना जगू द्यावं, कारण ते आपल्यापेक्षा फार पुढे गेलेले आहेत आणि आपल्याहून कैक पटींनी प्रगल्भ आहेत. (उदा.- घोटुलसारखी गोंड समाजाची समाजव्यवस्था. याबद्दल पुढे कधी तरी मी नक्की काही तरी मांडेन.)

त्यानंतर निरोप आला की, दि.2 ऑगस्ट, 2018 रोजी मनीबेलीच्या संघर्षाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत, तर तुम्हीसुद्धा या. नेमका त्या दिवशी खूप पाऊस झाला. बस वगैरे कॅन्सल झाल्या. तेथील सुहासतार्इंनी मला सांगितलं होतं, ‘तू जरा मेधातार्इंशी बोलून घे.’ मला वाटलं की- थेट मेधातार्इंना त्रास देण्यापेक्षा इतर कुणी तरी असेलच की त्यांच्याआधी बोलणारं, तर त्यांच्याशी बोलता येईल. त्यावर सुहासताई म्हणाल्या की- नाही, असं काही नाहीये; तू मेधातार्इंशी थेट बोलू शकते. मी पाहिलं- मेधाताई अक्षरशः प्रत्येक फोन घेतात, अगदी कुठलाही आणि कोणाचाही असो. फक्त त्या मीटिंगमध्ये असल्या की, त्यांचा फोन तिथल्या कुणाकडेही असतो. जो काही फोन येईल त्याचा निरोप घ्यायचा, तो लिहून ठेवायचा आणि नंतर मेधातार्इंना ते सांगायचं. त्या लोकांना कॉलबॅक करतात. (या सगळ्यात मेधाताई हा एक स्वतंत्र विषय आहे. ही फिल्म करताना कुठे तरी माझ्या डोक्यात होतं की, एक सेक्शन ‘24 घंटे मेधा पाटकर के साथ’. पण नंतर असं लक्षात आलं की, मेधातार्इंना जितकं कमीत कमी आपण फिल्ममध्ये ठेवू तितकं त्या फिल्ममध्ये जास्तीत जास्त असतील. आणि तसंच घडलं. माझ्याकडे खरं तर मेधातार्इंचे सहा ते सात तासांचे इंटरव्यू शूट केलेले आहेत. पण नंतर समीरशी बोलल्यावरं लक्षात आलं, ‘ती भाषाच आपण या फिल्ममध्ये घ्यायला नको.’ त्यामुळे मेधातार्इंचा एकही इंटरव्ह्यू आपण या फिल्ममध्ये घ्यायला नको. )

तर झालं असं की, मी पहिल्यांदा घाटीत आले ती मेधातार्इंसोबत. आम्ही एका मोटारबोटीतून जात होतो, तेव्हा त्या पाण्यावरून जाताना मेधाताई असं सांगत होत्या की- ‘आता आपण ज्याच्यावरून जात आहोत, त्याच्याखाली चिमलखेडी नावाचं गाव आहे... आता आपण ज्यावरून जातोय, त्याच्याखाली मुखडी गाव आहे!’ मला ते फारच भयंकर वाटलं. म्हणजे गावंच्या गावं पाण्याखाली आहेत! आणि तिथे मला हे प्रकर्षाने जाणवलं की, हे इतरांना कसं कळेल? जे घाटीत येतील, त्यांनाच ते माहिती होईल. आणि त्याक्षणी मला वाटून गेलं की, आपण यासाठी काही तरी तरी केलं पाहिजे. पण तेव्हासुद्धा ‘फिल्म’ असं काही स्पेसिफिक माझ्या डोक्यात नव्हतं.

तर झालं असं की, मी पहिल्यांदा घाटीत आले ती मेधातार्इंसोबत. आम्ही एका मोटारबोटीतून जात होतो, तेव्हा त्या पाण्यावरून जाताना मेधाताई असं सांगत होत्या की- ‘आता आपण ज्याच्यावरून जात आहोत, त्याच्याखाली चिमलखेडी नावाचं गाव आहे... आता आपण ज्यावरून जातोय, त्याच्याखाली मुखडी गाव आहे!’ मला ते फारच भयंकर वाटलं. म्हणजे गावंच्या गावं पाण्याखाली आहेत! आणि तिथे मला हे प्रकर्षाने जाणवलं की, हे इतरांना कसं कळेल? जे घाटीत येतील, त्यांनाच ते माहिती होईल. आणि त्याक्षणी मला वाटून गेलं की, आपण यासाठी काही तरी तरी केलं पाहिजे. पण तेव्हासुद्धा ‘फिल्म’ असं काही स्पेसिफिक माझ्या डोक्यात नव्हतं.

दुसऱ्यांदा घाटीत आले, तेव्हा मात्र कॅमेरा सोबत घेऊनच आले होते. कदाचित माझ्या मनात फिल्मचा विचार आतमध्ये कुठे तरी तयार झालेला असावा. बोटीतून जाताना एका ताईने मोठ्याने आवाज दिला की- ‘बोट तिकडे घ्याऽऽ बोट तिकडे घ्याऽऽ’ आणि म्हणून आम्ही सगळे त्या दिशेने बघायला लागलो. तर, दुरून डोंगरावरून एक निळी रेष सरकताना आम्हाला दिसली. संपूर्ण हिरव्या पटलावर अशी एक निळी रेष... आणि ते काही तरी अद्‌भुत होतं. ती रेष म्हणजे या जीवनशाळेत शिकणाऱ्या निळा गणवेश घातलेल्या मुलांची रांग! कदाचित तोच क्षण होता की, जिथे मला वाटलं की- हे सगळं आपण इतरांसमोर मांडलं पाहिजे. त्या क्षणी मी फिल्मचा पहिला शॉट शूट केला. यातही ‘लाइफ कम्स टू फुल सर्कल’ याचा अनुभव आला.

आंदोलनाची सुरुवात मणिबेलीवरून झाली होती आणि सर्वोच्च टप्पा होता तो केवडिया- जिथे सरदार पटेल यांचा पुतळा उभा केला आहे. मी पहिल्यांदा मणिबेलीतच आले आणि या संपूर्ण शूटिंगदरम्यान मनाने मेधातार्इंसोबत मी पूर्ण काळ होते आणि शूटिंग शेवटाकडे येत असताना त्या मला म्हणाल्या, ‘मी आज केवडियाला चालली आहे.’ मला असं झालं की, ‘अरे बापरे! याचा अर्थ, आपल्या फिल्मचा शेवटचा शॉट जिथे घ्यायचा होता, तो तिथेच मिळणार आहे.’ मेधाताई मीटिंगला गेल्यानंतर तिथलाच एक मुलगा मदतीला घेऊन मी पुढे निघाले. ‘तो सरदार पटेल यांचा पुतळा कुठून पूर्ण दिसतो का?’ असं मी त्याला विचारल्यावर ‘एका डोंगरावरून तो दिसतो’ असं तो म्हणाला. आम्ही त्या डोंगरावर गेलो. तो पुतळा एकदम माझ्यासमोर प्रकट झाल्यासारखा आला आणि मला असं झालं की, ‘बाप रे! हे? यासाठी? हे तर असं झालं की- लम्हों ने खता की है और सदियों सजा पायी!’ म्हणजे या एका पुतळ्यासाठी इतका आटापिटा? हे सगळे लोक बुडवले गेले आणि अजून बुडवले जाणार, ते केवळ हा एक पुतळा बघण्यासाठी? आणि ते सगळे पुतळा बघणारे लोक पलीकडून येणार, म्हणजे त्यांना या इकडचं काहीच माहिती नसणार! आणि तिथेच ठरवलं की, माझ्या फिल्मचा शेवटचा शॉट म्हणजे सरदार पटेल यांचा पुतळा आणि सुरुवातीचा शॉट म्हणजे ‘जीवनशाळे’च्या मुलांची निळी रेष- असंच असेल! ‘लकीर के इस तरफ’चं बीज हे असं रूजलं.

प्रश्न - आता आपल्याला फिल्म करायची आहे, अशी जाणीव झाल्यानंतर ‘लकीर के इस तरफ’ या फिल्म बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल तू काय सांगशील?

फिल्म बनविण्याच्या प्रक्रियेबद्दल मी बोलतेच, पण त्याआधी एक किस्सा सांगते. मी ही अशी फिल्म करणार आणि त्यातून आदिवासींची बाजू मांडणार म्हटल्यावर कोणी म्हणेल, ‘म्हणजे तुला असं म्हणायचंय का की, आदिवासी लोकांचं काही चुकत नाही? आणि ते एकदम बरोबरच आहेत, त्यांच्यावरच फक्त अन्याय होतो?’ यावर मला उल्का महाजन यांचे एक वाक्य आठवले- ‘वंचित लोकांसाठी खरंच काम करायचं असेल, तर सर्वांत पहिले त्यांच्या पहिल्या शंभर चुका माफ करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. मग 101 व्या चुकीबद्दल काय करायचे, ते बघू या.’ आणि हे वाक्य अगदी खरं आहे, असं मला वाटतं. दलितांच्या बाबतीत जसे आत्ता म्हटले जाते की, ते फार अग्रेसिव्ह झालेत. मान्य आहे; पण ब्राह्मणांनी त्यांना काय कमी त्रास दिलाय का? आदिवासी असे वागतात, दलित असे वागतात, महिला अशा वागतात; हे आपण नुसतं बोलतो. पण ते असे का वागतात, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्याबद्दल विनाकारण राग धरून ठेवायला नको.

आणखी एक उदाहरण सांगते- मी पुण्यात असताना बेरोजगार होते, तेव्हा काम शोधण्यासाठी नाबार्डच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे एक गृहस्थ होते. त्यांना मी सांगितलं की, मी बचत गटासोबत काम केलेलं आहे आणि मला त्यासंदर्भात एखादी फिल्म करायला आवडेल. ते मला म्हणाले, नाव काय तुमचं? मी म्हणाले, शिल्पा... पूर्ण नाव काय? ...शिल्पा बल्लाळ....बल्लाळ? मी म्हणाले, हो. ...नाही, काही काम नाही आमच्याकडे, असं सरळ त्यांनी मला सांगून टाकलं. मी त्यांना म्हटलं, अहो सर, माझं ऐकून तर घ्या. ...नाही, मला आता वेळ नाही. तुम्ही या आता. अगदी खरं सांगते, मला अजिबात राग आला नाही. उलट माझ्या मनात विचार आला की, बरोबर आहे. माझ्या पूर्वजांनी यांना किती वाईट ट्रीटमेंट दिलेली असणार आहे, ज्यामुळे आज हे असं वागतात! अपमान करण्याची आणि विषमतेची काय लेव्हल असेल तेव्हा! ‘आमच्या घरासमोरून जाताना चप्पल घालायची नाही, आमच्या घरात यायचं नाही, तुमची सावली पडली तरी आम्ही अंघोळ करणार, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही...’ बाप रे!! आणि काही ठिकाणी तर अजूनही हे सुरू आहे. मग आपण का यांना समजून घेऊन यांचीसुद्धा बाजू मांडू नये?

अशी ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता, अनेक निर्णय कटाक्षाने घेत ही फिल्म तयार करण्यात आलेली आहे. पहिला ठाम निर्णय हा घेतला होता की, फिल्ममध्ये एकही गोष्ट फिक्शनल किंवा ठरवून डायरेक्ट केलेली नकोय. ही फिल्म जितकी सत्य आणि आहे ते वास्तव थेट दाखवणारी असेल, तितकी ती मला जे सांगायचे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून पुढचा निर्णय हा होता की, या फिल्मला डायरेक्शन नसणार! याचा अर्थ असा की- कुणी काय बोलायचं, कसा अभिनय करायचा असं काहीही कोणालाही कधीच सांगितलं जाणार नाही. या फिल्मला सुरुवातीला कोणताही स्क्रीन प्ले नसणार! ज्या काही भेटीमध्ये मी नर्मदा घाटीत जाणार आहे, तेव्हा दोन गोष्टी प्रामुख्याने करणार, असं ठरवलं. एक म्हणजे- शक्य होईल तितक्या वेळा मेधाताई असतील तिथे त्यांच्याबरोबर माझा कॅमेरा घेऊन जाणं. त्यांना डिस्टर्ब न करता, आणि फिल्म करतेय असा कुठेही उल्लेख न करता मला जे फूटेज हवं आहे ते गुपचूप घेत राहणं. अर्थातच परवानगी घेऊन.

आणि दुसरं असं की, तिथल्या काही लोकांचे इंटरव्ह्यू घेत राहणं. हे सगळं फूटेज जमा झाल्यानंतर एडिटिंग करताना मात्र आपण या फिल्मला व्यवस्थित फ्लो येईल असं डायरेक्ट करू या, हे ठरलं होतं. म्हणजे, फिल्ममध्ये कोणता शॉट आधी लावायचा, काय नंतर घ्यायचं, या फिल्मला काय निवेदन लिहायचं वगैरे. फिल्ममध्ये जे निवेदन वापरलेलं आहे तो माझा निवेदनाचा सतरावा ड्राफ्ट आहे! आणि गंमत म्हणजे, पहिल्या ड्राफ्टचा व याचा कुठेही संबंध नाही. पहिला ड्राफ्ट अगदीच वेगळा होता, डेव्हलप होत-होत या ड्राफ्टपर्यंत फिल्म आली.

बऱ्याचदा कॅमेऱ्याच्या लाईटसाठी आणि इतर टेक्निकल गोष्टींसाठी बोलणाऱ्याला खूप गाईड करत राहावं लागतं. माझ्यासाठी ते बोलत असलेले कंटेंट महत्त्वाचे असल्यामुळे मी टेक्निकल गोष्टींसाठी त्यांना कुठेही डिस्टर्ब केलं नाही. आपण एका डेमोक्रॅटिक पद्धतीने चालत आलेल्या पस्तीस वर्षांच्या संघर्षावर फिल्म बनवत आहोत; ती बनवताना आपणसुद्धा त्यातले तत्त्व पाळावे, अशा अर्थाने ती फिल्म बनत गेली आहे. यापूर्वीच्या फिल्म्सना तरी काही स्ट्रक्चर आम्ही करायचो. पण ही माझी पहिली फिल्म आहे- जी मी अशा पद्धतीने केली आणि ज्यात मी निवेदन वापरलं आहे.

स्त्रीच्या आवाजात निवेदन पाहिजे, हे आमचं आधीच ठरलं होतं; मात्र ते मी करेन असं काही ठरलेलं नव्हतं. सुरुवातीला काही जणांनी मला सांगितलं, आपण स्वरा भास्करच्या आवाजात ते करू या. ती अशा विषयांवर बोलण्यासाठी चांगली आहे वगैरे. यावर मी म्हणाले, पण यामुळेच तर तिच्यावर एक लेबल लागलेलं आहे. उदा. ‘अच्छा, स्वरा भास्कर आहे का? हो, मग ती याच्या-त्याच्या विरुद्ध बोलणारच!’ त्यामुळे असे पूर्वग्रह होऊन त्याचा कदाचित फिल्मवर परिणाम होऊ शकतो. तसं मला आता कोणीच ओळखत नाही, माझ्याबद्दल कोणतेही पूर्वग्रह नाहीत. त्यात मला निवेदनासाठीचा जो एक स्ट्रक्चर्ड आवाज असतो, तो नको होता. मग त्या निवेदनाचा आशय आणि आवाज यातला एकजिनसीपणा येण्यासाठी ते मीच करावं, असं ठरलं. फिल्मचा पुढचा महत्त्वाचा निर्णय असा होता की, यात कोणताही बाहेरचा तयार केलेला साऊंड घ्यायचा नव्हता. जे काही आपण वापरू, ते सर्व घाटीतील असलं पाहिजे, हे आधीच ठरलेलं होतं. ते तसंच केलेलं आहे. पार्थ उमराणी हा पुण्यातला संगीतकार आहे. या फिल्ममध्ये ‘मां रेवा थारो पानी निर्मल, कलकल बेहतो जायें रे’ हे गाणं आहे, हे पारंपरिक, सुप्रसिद्ध गाणं पार्थने मला त्याच्या आवाजात, संगीतासह पुन्हा कंपोज करून दिलं. हेच फक्त बाहेरचं गाणं आहे. बाकी सर्व गाण्यांना घाटी लोकांचं संगीत व आवाज आहे. इतर गाणी घाटीतल्या माणसांनी तयार केलेली आणि गायलेली आहेत. या फार छोट्या-छोट्या गोष्टी आहेत; पण फिल्मच्या इम्पॅक्टसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, असं मला वाटतं.

फिल्म करायची हे जरी कन्फर्म केलेलं असलं, तरी ती मी कशी मांडणार आहे, याबद्दल मी आत्तापर्यंत साशंक होते. कारण तीस-पस्तीस वर्षांचे आंदोलन काही मिनिटांच्या फिल्ममधून दाखवायचं, हे मोठं चॅलेंजच म्हणायला लागेल. कारण त्याचा डेटाच तेवढा आहे. खरं तर आपली माध्यमं जे आपल्याला सांगतात आणि जी सत्य परिस्थितीची आहे, याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. रिसर्च हा माझा खूप आवडीचा विषय आहे. त्यामुळे यातही मी तेच केलं आहे. मेधाताई स्वतः एक रिसर्चर आहेत, असं मला वाटतं. मी पहिल्यांदा बडवानीला गेले, तेव्हा मी त्यांचं सगळं उपलब्ध असलेलं मटेरियल घेऊन वाचायला बसले होते. त्यातली प्रत्येक गोष्ट समजून घेतली. या सगळ्या अभ्यासानंतर माझं ठरलं की- खूप जास्त डिटेल्स आणि टेक्निकल गोष्टी आपल्याला मांडायच्या नाहीत. लोकांसाठी ते जड आणि कंटाळवाणं होईल. त्यामुळे विशेष महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याच फिल्ममध्ये मांडल्या गेल्या पाहिजेत. त्यानुसार तशा गोष्टींचे मी रेकॉर्ड करून ठेवले. उदाहरणार्थ- काही फोटो काढून ठेवले, काही महत्त्वाचे रिपोर्ट वाचून त्यातल्या नोंदी करून ठेवल्या... वगैरे.

तशी ‘लकीर के इस तरफ’ ही माझी अकरावी फिल्म आहे. तरीही मगाशी सांगितलं तसं, ही एकमेव फिल्म आहे, ज्यात कोणतंही स्क्रिप्ट तयार नव्हतं. मी सहजगत्या शूटिंग करत गेले. कारण इतकं मोठं आंदोलन संपूर्ण समजून घेऊन, त्याचा आराखडा आखून, स्क्रिप्ट लिहून, त्यानुसार सगळे शूटिंग व एडिटिंग करून मग ती फिल्म रिलीज करणं- हे फार कृत्रिम झालं असतं. आता मला खूप समाधान वाटतं की, मी यातलं काहीही केलं नाही, त्यामुळे जी गावं आज बुडिताखाली गेलीत, त्यांचं निदान वेळेत चित्रीकरण होऊ शकलं. कारण असं की, आता 31 ऑगस्ट 2019 रोजी पुन्हा घाटीत जाऊन आले; तेव्हा जी गावं या फिल्ममध्ये दाखवलेली आहेत, ती सगळी आता पाण्याखाली गेली आहेत! एक तर- फिल्म मेकर म्हणून मला तिथलं काहीही फूटेज घेता आलं नसतं. दुसरं म्हणजे- ती गावं पाण्याखाली गेल्यावर तिथलं वास्तव कुणाला कधीच कळालंही नसतं कदाचित.

या फिल्ममध्ये जगदीशभार्इंची मुलाखत घेतलेली आहे. त्यात ते म्हणतात, ‘ये तो अब कुदरत की मेहरबानी है कि दो साल से बारिश नहीं हुई है... वरना हमारा क्या हाल होता?’ इथे मला असं वाटलं की - शेतकऱ्यांच्या देशात एक शेतकरी हे म्हणतो की- बरं झालं, दोन वर्षे पाऊस नाही पडला; नाही तर आमचे काय हाल झाले असते? म्हणजे विकासाच्या नावाखाली आपण सगळं कुठे आणून ठेवलंय? या वर्षी पाऊस झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटलं की, तिथलेच आत्ताचे शॉट्‌स करावेत. म्हणजे ‘बारिश नहीं थी’ तेव्हा काय परिस्थिती होती ते आपण फिल्ममध्ये दाखवले आहे आणि ‘बारिश हो गई तो हमारा क्या हाल होगा?’ तर आता असे हाल झालेले आहेत! पुढे मी जेव्हा घाटीत जात होते तेव्हा तिथल्या लोकांनी मला प्रचंड सहकार्य केलं. ते स्वतःहून सांगायचे की, ‘अच्छा, फिर इस बारे में आपने उनसे बात की क्या? आपको उधर जाना चाहिए और परिस्थिती देखनी चाहिये’ वगैरे.

या फिल्मसाठीच्या दौऱ्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर- मी पहिल्यांदा मणिबेलीला गेले 2 ऑगस्ट, 2018 रोजी. तेव्हा माझं ठरलं की, फिल्म करायची. तेव्हाच मी हेही ठरवलं होतं की, मला स्वातंत्र्य दिवसाचं फुटेज हवं. आदिवासी तो दिवस साजरा करतात ही थीम माझ्या डोक्यात आधीपासून होती. स्पष्टच सांगायचं तर, ते बघताना इतरांना शरम वाटली पाहिजे, अशा प्रकारचे व्हिज्युअल मला हवे होते. ते या अर्थाने की, इतका त्यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने अन्याय होऊनसुद्धा ते लोक देशाच्या झेंड्यावर, संविधानावर आणि लोकशाहीवर विेशास ठेवून आहेत! हे शॉट मिळविण्यासाठी आम्ही मध्य प्रदेशमधील भादल ही जागा निवडली. 15 ऑगस्ट होता तरी ऊन फार होतं. काळजी होती की, माझा कॅमेरा अत्यंत सामान्य असल्याने फार दूरचे डोंगर आणि जवळचे दृश्य एकाच लेन्समधून कव्हर होणं तांत्रिकदृष्ट्या जवळपास अशक्यच होतं.

या पहिल्याच ट्रीपमध्ये माझी खूप दमछाक झाली होती. मेधाताई तर एकदम झपाझप चालत डोंगर-दऱ्यातून पुढे पोहोचत होत्या आणि मी माझ्या दोन बॅगा घेऊन त्यांना फॉलो करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. अगदी एक शॉट या डोंगरावरून, तर दुसरा शॉट दुसऱ्या डोंगरावरून- अशी माझी गंमत सुरू होती. तिथे वेगवेगळे अँगल्स मिळवणं आणि तेही कुणाला काहीही करायला न सांगता, हे फार महत्त्वाचं होतं. (कारण आधीच ठरवलं होतं की, कोणाला काहीही करायला लावायचं नाही.) त्या वातावरणात जे घडतंय ते आपल्याला टिपता आलं, तर ठीक. तिथल्या लोकांशी बोलणे, त्यांचे ऐकून घेणे हेही करायचं होतं.

गोखरू सोलंकी नावाचे एक गृहस्थ या फिल्ममध्ये बोलले आहेत. आम्ही गावात गेलो तेव्हा शाळेच्या काही मुलांसमोर ते बोलत होते. ते मुलांना सांगताहेत, ‘ये हमारा गाव आहे, हमारा मकान है और हमारा हक है... और इसके लिए सरकार से झगडा किस तरह शांततापूर्ण करना है...’ वगैरे. मी सरळ कॅमेरा घेऊन तिथेच बसले आणि त्यांचं झाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारायला लागले. त्यांनी मला उत्तरं द्यायला सुरुवात केली. आमचा संवाद होईपर्यंत माझ्यामागे 70 ते 80 मुलं-मुली शांततेत बसून ऐकत होते. या मुलांना कोणीही तसं सांगितलं नव्हतं. नंतर मला इतर अनेक अनुभव त्या मुलांबरोबर आले. मला जाणवलं की, अनेक महत्त्वाची मानवी मूल्यं त्यांच्यात टिकून आहेत.

असे खूप लोक होते ज्यांचे इंटरव्ह्यू घेण्यासारखे होते, पण इतकं करणं शक्य नव्हतं. ते वापरणार कुठे आणि कसं? म्हणून मी काही मुद्दे ठरवले आणि त्याबद्दल कुणाशी बोलायचं तसे इंटरव्ह्यू घेत गेले. प्रत्येकाला त्याच्याच भाषेत बोलू द्यायचं. माझं हिंदी, मराठी आणि गुजराती हे कॉम्बिनेशन व्यवस्थित असल्यामुळे मला त्यांची पावरी व भिलाली भाषा पूर्ण कळत होती. या फिल्मला पूर्ण सबटायटलींग राधिका मूर्ती या माझ्या मैत्रिणीने केले आहे. इतर माध्यमं किंवा इतर फिल्ममधून सतत समोर आलेलं आहे ते सगळं पुन्हा पुन्हा दाखवणं टाळायचं होतं. तरी मला फार कात्री लावता आली नाही. कारण त्यात काही खरंच चांगली व्यक्त होणारी माणसं आहेत. त्यांना टाळणं फिल्मसाठी मारक ठरलं असतं. उदा.- नूरजी. या सगळ्या लोकांचा मोठा अनुभव आहे, त्या अनुभवातून ते बोलतात म्हणून ते महत्त्वाचं होतं.

ऑगस्टनंतर सप्टेंबर 2018 ला म्हणजे नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादरम्यान तिथे गेले. तेव्हा तिथे मेधाताई आणि इतर आंदोलनकर्ते जल सत्याग्रह करणार होते. एका व्यक्तीचा इगो सांभाळण्यासाठी इतके लोक, गावं पाण्याखाली बुडवली जातात याविरोधात ते बोलत होते. ते सगळं मी शूट केलं. त्याच काळात त्यांची इंदूरला जाणारी रॅली निघणार होती. ती शूटिंग केली. ऑक्टोबरमध्ये शूटिंग करण्यासाठी तिथे गेले नाही, कारण तो एरिया प्रचंड तापतो आणि कॅमेऱ्यामध्ये गोष्टी टिपणं कठीण होऊन जातं. फिल्मच्या फॉरमॅटबाबतीत सगळे लाँगशॉट घ्यायचे असं माझं ठरलेलं होतं. कारण तो एरिया जसा आहे तसा दिसला पाहिजे. त्यामुळे कदाचित जे लोक ही केवळ एक फिल्म म्हणून बघतील, ते अशी टीका करू शकतात की, यात फार कमी क्लोज शॉट आहेत. मला असं वाटतं की, क्लोज शॉट हे फार इन्टिमेट गोष्टींचे घ्यावेत. त्यामुळे ज्या गोष्टी फार पर्सनल अशा आहेत, त्यांचे मी क्लोज शॉट घेतले.

मग नोव्हेंबर 2018 ते मार्च 2019 पर्यंत शूटिंगच्या निमित्ताने माझ्या घाटीत फेऱ्या होत राहिल्या. खरं तर 26 जानेवारी, 2019 पर्यंत फिल्म पूर्ण करायची, असं माझं ठरलेलं होतं, पण तिथले लोक म्हणाले की, बालमेळावा आणि होळी या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे फिल्ममध्ये घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून पुढचा वेळ द्यायचं ठरवलं. जे- जे राहिलं असं एडिटिंग करताना जाणवलं, ते घेण्यासाठी मी पुन्हा घाटीत गेले. उदाहरणार्थ- वसाहतीचे अंडर- कन्स्ट्रक्शनचे फूटेज माझ्याकडे काहीच नव्हतं. ते मिळवलं. आर्थिक गोष्टींचा विचार केला, तर माझ्या मित्रमंडळींनी थोडीफार मदत केली आणि कमीत कमी खर्चात हे करण्याचा प्रयत्न केला. या फिल्मचं टायटलसुद्धा फार विचारपूर्वक दिलेलं आहे.

एडिटिंग करत असताना सारखं वाटायचं की, आपलं हे राहिलं ते राहिलं, आपण हे घेऊ शकतो ते घेऊ शकतो. त्यामुळे मी सतत बदल करत होते. पण एका पॉइंटला स्वतःला समजावलं की, हा विषय खरंच इतका मोठा आहे की, ही फिल्म कधीच संपणार नाही. त्यामुळे कुठे तरी थांबवायला लागेल. शेवटी ‘सारे जहाँ से अच्छा’ या इक्बाल यांनी लिहिलेल्या गीताची धून घ्यायची ठरलं. इतर गाणी तर सगळी घाटीतली ओरिजनल मिळत गेली, ती मी रेकॉर्ड करत होते. आणि तीच वापरली आहेत. एडिटिंग करताना किती तरी वेळा आम्हीच रडलो! सुरुवातीलाच एका ठिकाणी ती आदिवासी मुले एकत्र उभी राहून ‘भारतीय प्रजासत्ताकदिनाचा विजय असो’ असं म्हणतात, तेव्हा मला खूपच भरून यायचं.

फिल्मच्या फ्लोमध्ये काय काय कव्हर झालं होतं, हे मी बघत होते. आंदोलन आणि त्याची कारणे, नर्मदा घाटीचा व तिथल्या धरणांचा नेमका प्रश्न, पुनर्वसनाचे प्रश्न, नव्या झालेल्या वसाहती आणि तिथली परिस्थिती, जीवनशाळा, बालमेळा, होळी, आदिवासींचे व मेधातार्इंचे इंटरव्ह्यू हे सगळं मिळालं होतं. त्यानंतर मेधाताई म्हणाल्या की, ‘तुम्ही भरुचला जाऊन आला का? तिथली नदी पूर्णपणे कोरडी झालेली आहे. तिथल्या लोकांची मुलाखत घेतली पाहिजे.’ मग मे 2019 मध्ये रणरणत्या उन्हात भरुचला गेले. तिथली काही मासेमार माणसं भेटली आणि आंदोलनातील दोन-चार कार्यकर्ते. ते मला सगळं दाखवत होते.

पिवळा टी-शर्टवाला एक माणूस फिल्ममध्ये दिसतो आणि बोलतो. तो खरं तर तिथे अचानक आला होता. त्यांच्यात झालेला जो संवाद आहे, तो वास्तव आहे. असं बोला किंवा असा प्रश्न विचारा, असं त्यांना सांगितलेलं नाही. शेवटी जेव्हा त्याला आम्ही सांगितलं की, ‘आम्ही अशी फिल्म करतोय आणि त्यासाठी हे शूटिंग केलं; पण त्यात तुमचा चेहरा किंवा नाव आम्ही घेणार नाही. कारण तुमची परवानगी घेतली नव्हती.’ त्यावर तो म्हणाला की, ‘असं काही नाही. तुम्ही मला पण बोलायला लावू शकता. मला त्यांचं म्हणणं पटलं. मी इथे नर्मदामातेचे दर्शन करायला आलो होतो, पण इथे तर नर्मदाच नाहीये!’ तो पुढे हेही म्हणाला की, ‘दहा वर्षांपूर्वी आलो होतो तेव्हा तिथे वर उभा राहून नर्मदामातेचे दर्शन केले होते.’ तेव्हा मला असं वाटलं की, जर प्रोसेसने माणसांचं मतपरिवर्तन होणार असेल, तर नक्कीच ही फिल्म लोकांपर्यंत पोहोचेल.

मध्य प्रदेशच्या भाजप सरकारने नर्मदा घाटीतल्या लोकांना 31 जुलै, 2017 रोजी सांगितलं होतं की, आत्ताच्या आत्ता गावं खाली करा. तेव्हा पुनर्वसन पूर्ण झालेलं नव्हतं. टीन शेडमध्ये तुम्ही राहायला जा, असं सांगण्यात आलेलं होतं. पाऊस नसल्यामुळे, सर्व म्हणाले की, आम्ही नाही जाणार. त्यामुळे दर 31 जुलै ते साजरा करतात. आमच्या घरातून जबरदस्तीने आम्हाला बाहेर नाही काढू शकले, त्यानंतर 2018 च्या 31 जुलैला तिथे सेलिब्रेट करण्यासाठी एक मोठी सभा भरवली गेली, तशीच 2019 मध्येही. सगळं विलक्षण होतं. खूप जोरात पाऊस पडत होता. ही सभा बडवानीच्या मुख्य चौकात ठेवली होती. शक्य तेवढा मांडव घातलेला होता, त्यात सगळ्या महिला बसलेल्या होत्या. मांडवाच्या बाहेर सगळे पुरुष भर पावसात सभा होईपर्यंत सहा तास बसलेले होते. इतकी स्ट्राँग लीडरशिप मी आत्ताच्या काळात दुसरी पाहिलेली नाहीये. पाऊस सुरू झाला तेव्हा थोडी चलबिचल झाली होती. तर मेधाताई माईकवरून इतकंच म्हणाल्या, हम पानी से ही तो टकरा रहे है... तो फिर पानी से क्या डरना? जो जहाँ है वहीं बैठ जाये... ये जमीन हमारे लिये हि है... आणि हे ऐकल्याबरोबर तिथल्या चिखलात लोक तसेच्या तसे बसले, हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे. ते हेसुद्धा म्हणतात, ‘मेधाताई नसत्या तर आम्ही जिवंतच नसतो कदाचित. आम्हाला कधीच बुडवून मारलं असतं.’

एडिटिंग करत असताना सारखं वाटायचं की, आपलं हे राहिलं ते राहिलं, आपण हे घेऊ शकतो ते घेऊ शकतो. त्यामुळे मी सतत बदल करत होते. पण एका पॉइंटला स्वतःला समजावलं की, हा विषय खरंच इतका मोठा आहे की, ही फिल्म कधीच संपणार नाही. त्यामुळे कुठे तरी थांबवायला लागेल. शेवटी ‘सारे जहाँ से अच्छा’ या इक्बाल यांनी लिहिलेल्या गीताची धून घ्यायची ठरलं. इतर गाणी तर सगळी घाटीतली ओरिजनल मिळत गेली, ती मी रेकॉर्ड करत होते. आणि तीच वापरली आहेत. एडिटिंग करताना किती तरी वेळा आम्हीच रडलो! सुरुवातीलाच एका ठिकाणी ती आदिवासी मुले एकत्र उभी राहून ‘भारतीय प्रजासत्ताकदिनाचा विजय असो’ असं म्हणतात, तेव्हा मला खूपच भरून यायचं. कारण एकीकडे आपण (आपल्या सोईसाठी त्या आदिवासी बांधवांना जबरदस्तीने त्याग करायला लावतो, स्वतःच्या घरातून बेघर करतो) जे संविधानाच्या अगदी विरुद्ध आहे आणि तरीसुद्धा ही मुलं ‘प्रजासत्ताकदिनाचा विजय असो’ असं म्हणत भारताच्या झेंड्याला नमन करतात! कुठून येतो इतका विश्वास आणि नम्रता?... असो. अशा प्रकारे फिल्म पूर्णवेळ त्या निळ्या रेषेत दिसणाऱ्या मुलांभोवतीच होती.

प्रश्न - फिल्म रिलीज झाल्यानंतर तुला काय प्रतिक्रिया आल्या? एकूण अनुभव कसा आहे?

फिल्मला लोकांनी खूप सपोर्ट केला. अनेक लोक स्वतःहून पुढाकार घेऊन, खर्च करून त्याचे शो ठेवत आहेत. मला सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट द्यायचं आहे, आमची मैत्रीण स्वप्नाली अरुणा चंद्रकांत हिला! फिल्मचा पहिला ड्राफ्ट करत होते, तेव्हा ती म्हणाली होती की, ‘या फिल्मचा पहिला शो मी करणार.’ फिल्म पूर्ण झाल्यावर ती स्वतःहून आली आणि तिने ती आठवण करून दिली. या फिल्मच्या पहिल्या शोची सगळी तयारी तिने केली. दि. 30 जून, 2019 रोजी फिल्म रिलीज झाली. पुढे आमची मीटिंग झाली, तेव्हा असं ठरलं की आपला मुख्य उद्देश काय आहे? तर, या आंदोलनाविषयी लोकांनी बोलावं आणि त्यांनी त्याला सपोर्ट करावा. मग असं ठरलं की, फिल्म दाखवणे, एकमेकांना इंट्रोड्यूस करणं आणि चर्चा. त्यासाठी दोन प्रकारच्या लिस्ट करू या. एक लिस्ट शो आयोजित करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी तर दुसरी- आंदोलनाला सपोर्ट करू इच्छितात त्यांच्यासाठी. याच्यावर खूप चर्चा आणि चेष्टासुद्धा झाली.

माझे मित्र म्हणाले की, ‘हो-हो लोक तर तुटून पडणारेत लिस्टमध्ये नाव लिहायला! वगैरे.’ पण तसंच झालं! आम्ही त्याचे फोटो काढले आणि चिडवणाऱ्या मित्रांना ते दाखवले. माझ्या मित्रांच्या मदतीशिवाय ही फिल्म शक्य नव्हती. राधिका मूर्तीने तिची एडिटिंग सिस्टिम मला सहा महिन्यांसाठी देऊन टाकली होती. संपदा देशपांडे हिने न कंटाळता आतापर्यंतच्या तीस शोज्‌चे पोस्टर्स बनवले आहेत. आणि नूपुर नानल हिने तिचा महागडा रेकॉर्डर, नरेशन रेकॉर्ड करायला मला दिला होता.

खरं तर मला सुरुवातीपासून दोन गोष्टी क्लिअर होत्या. एक- ही फिल्म इमोशनली अपील झाली पाहिजे. दोन- ती मध्यमवर्गीय सर्वसामान्य लोकांना अपील झाली पाहिजे. कारण त्यांच्याबरोबर जास्त काम करण्याची गरज आहे. बदल आपल्या घरापासून सुरू होतो म्हणतात ना, तसं काहीसं. उदा- माझे नातेवाईक! साधारण माझ्या विचारात बदल झाल्यापासून माझ्या नातेवाइकांनी प्रश्न सुरू केले, ‘मेधा पाटकर? त्या मेधा पाटकरच्या बाजूची आहेस का तू?’ मी त्यांना उत्तर देते, ‘हो, मी त्यांच्या बाजूची आहे, म्हणजेच मी लोकांच्या बाजूची आहे.’ मग यावर साधारण टिपिकल उत्तर येतात, अरे, ती मेधा पाटकर फॉरेन फंडिंग घेते, तुला काय माहिती? वगैरे.

फिल्म रिलीज झाल्यानंतरचा एक किस्सा आहे. गांधी भवनला शो झाला आणि तिथे एक गृहस्थ प्रश्न विचारायला उभे राहिले. ते म्हणाले की, ‘मी आत्ता विकिपीडिया आणि इंटरनेटवर बघितलं की मेधा पाटकर यांना फॉरेन फंड मिळतात. त्या बाई सगळं खोटं बोलतात. तुम्ही जे काय सगळे सांगता त्यातलंही काही खरं नाही.’ मी अगदी शांतपणे त्यांना उत्तर दिलं, ‘सर, तुमची माहिती जरा कमी पडते आहे. मी तुमच्या लिस्टमध्ये माहिती ॲड करते. जो काही पैसा येतो ना, त्या मेधा पाटकर स्वतःसाठी घेतात आणि स्वतःसाठी वापरतात, असं तुम्ही ॲड करून टाका तुमच्या यादीमध्ये! आणि गरीब वगैरे असण्याचं हे मेधा पाटकरांचं नाटक आहे!! हे सगळं लिहून घ्या, विकिपीडियाला ॲड करा!’ अर्थात तिथे असलेल्या सगळ्यांना कळालं की, हा टोमणा आहे. पण त्या गृहस्थांना तो टोमणा कळला असेल तर बरं आहे! पण इतरांनी त्या काकांना बरंच ऐकवलं, अहो, तुम्ही विकिपीडिया आणि व्हाट्‌सअपसारख्या गोष्टीवरती विश्वास ठेवून बोलणार आहात का?

तुम्ही जरा नीट बघितलं तर मी सर्व मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न ऑलरेडी केलेला आहे. त्यात म्हटलेलं आहे की- ‘सोशल मीडियावाले लोग’ किंवा ‘एक दिवसात घाटीत जाऊन ॲडव्हेंचर टूर करून किंवा ट्रेकिंग करून तुम्हाला तिथली खरी परिस्थिती नाही कळणार.’ खरंच, हे स्क्रिप्ट मला माझ्याच माणसांनी दिलेलं आहे, असं मी मानते. कारण मी जेव्हा अहमदाबादला, शूट करायला गेले होते, तेव्हा माझ्या एका मैत्रिणीचा नवरा मला म्हणाला, ‘‘अभी तो हम वहाँ पर जा कर आए... मछली को खिलाने जाते है ना हम उधर... आप बता रहे हो उतने प्रॉब्लेम तो नही लगते वहाँ पर...’’ मी त्यांना विचारलं, ‘‘कहां जां कर आए और किनसे मिले?’’ तर ते म्हणाले, ‘‘वो जों कॅनॉल के किनारे किसान है ना, वो तो कह रहे थे यहां कोई प्रॉब्लेम नही है... पानी मिलता है...’’ त्यांना विचारलं, ‘‘त्यांना ऑफिशियली पाणी मिळतं का?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘वो तो नही पता. मगर वो ले लेते है वहाँ से.’’ त्यावर मी त्यांना समजावलं की, वही तो! वह लोग चोरी करते हैं ऐसा सरकार बोलती है... त्यावर ते पटकन म्हणाले, हां, वह तो चोरी हुई ना! उनका थोड़ी है पानी? मी जास्त आर्ग्युमेंट न करता इतकंच बोलले, यही तो प्रॉब्लेम है ना! पुढे मी हे सगळं स्क्रिप्टमध्ये घेतलं की, एक दिवसात तिथे जाऊन-येऊन पिकनिक करून तुम्हाला तिथले प्रश्न कळणार नाही.

हे स्क्रिप्ट मला लोकांनी दिलं म्हणण्याचं दुसरं कारण असं की, माझ्या घरातली माणसं ही भयानक भक्तगण आहेत. आंदोलन किंवा न्याय किंवा लोकांची बाजू याबद्दल प्रचंड नकारात्मकता आमच्याकडे आहे. त्यामुळे मला काहीही बोलायची सोयच नाही, असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे माझी आई एकदा म्हणाली, ‘तू असं सगळं का टाकतेस फेसबुकवरती? काय गरज आहे?’ त्यावर मी तिला म्हणाले, ‘तुला तर माहिती आहे ना, मी तर शहाणी नाहीच? मी सुरुवातीपासून अशीच आहे. जे पटतं ते मी मांडते.’ त्यावर आई म्हणाली, ‘अगं, पण त्यामुळे तुला उद्या कुणी काही केलं तर? काही प्रॉब्लेम तुला झाला तर?’ मी पटकन आईला म्हणाले, ‘आई, मला काही तरी प्रॉब्लेम होईल किंवा होऊ शकतो, हाच खरा प्रॉब्लेम आहे ना? आपण एक डेमोक्रॅटिक देश आहोत आणि आपल्याला आपली मतं मांडण्याची मोकळीक असलीच पाहिजे. तुम्हालाच भीती वाटते की तुम्ही ज्यांना इतके मानतात, ते लोकं तुमच्या मुलीला काही तरी करू शकतील; तर करू दे ना मग!’ असं सगळं पर्सनल लेव्हललासुद्धा सुरू आहे.

काही प्रश्नांची माझी उत्तरेसुद्धा फिल्म रिलीज झाल्यानंतर लोकांनी विचारण्याच्या आधीच तयार होती. मला शंभर टक्के माहिती होतं की फिल्म पाहिल्यानंतर मला हे नक्की विचारलं जाणार की- ‘तुम्ही एकच बाजू मांडली, दुसरी बाजू का नाही मांडली?’ माझे उत्तर असे की, ‘मी लहानपणापासून दुसरी बाजू ऐकत आणि बघत आले आहे. ती अनेक वेळा मांडलीसुद्धा आहे. पण ही बाजू कधीच मांडली गेलेली नव्हती. आज मला तशी संधी मिळत असेल, तर मी ती नक्की घेणार.’ काही लोकांनी खूप आर्ग्युमेंट केलं की, ‘तरीसुद्धा पाण्याखाली चाललेले गाव, आता पूर्ण बुडालेले असेल. तुम्ही ती बाजू मांडली पाहिजे.’ त्यांना मी सरळ सांगितलं की, ‘तुम्ही त्या बाजूचे आहात का? मग तुम्ही ती बाजू मांडा. आपण दोन्ही बाजू एकत्र बघू या आणि हेही बघू या की, त्याचं पुढे काय होतंय ते.’

मला असं वाटतं की, पस्तीस वर्षांची लढाई आणि तरीही न बदललेली परिस्थिती याबद्दल ही फिल्म आहे. पुढे हळूहळू शो वाढत गेलेले आहेत. कोल्हापूर, सांगली, नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा, हैदराबाद शहरांमध्ये आता शो सुरू आहेत. त्यामुळे जितक्या लोकांपर्यंत ही फिल्म पोहोचेल तितक्याच जास्तीत जास्त लोकांना होपफुली हा मुद्दा कळेल की- ‘आज भलेही हे आपल्या बाबतीत होत नाही, पण जर हे असंच सुरू राहिलं तर ही परिस्थिती आपल्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही. आपण जागे होण्याची गरज आहे.’ इथे मला सर्वेश्वरदयाल सक्सेना यांच्या कवितेतील काही ओळी सांगाव्याशा वाटतात

देश कागज पर बना

नक्शा नहीं होता

कि एक हिस्से के फट जाने पर

बाकी हिस्से उसी तरह साबुत बने रहें

और नदियाँ, पर्वत, शहर, गांव

वैसे ही अपनी-अपनी जगह दिखें

अनमने रहें।

यदि तुम यह नहीं मानते

तो मुझे तुम्हारे साथ नहीं रहना है।

यदि तुम्हारे घर के

एक कमरे में आग लगी ह ो तो क्या तुम दूसरे कमरे में सो सकते हो?

यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाशें सड़ रहीं हों

तो क्या तुम दूसरे कमरे में प्रार्थना कर सकते हो?

यदि हाँ, तो मुझे तुम से कुछ नहीं कहना है।

मुलाखत व शब्दांकन : दिपाली अवकाळे

प्रयोगासाठी संपर्क : शिल्पा बल्लाळ, पुणे shilpaballal@gmail.com

विशेष संपादकीय

चिवटी’वर स्वतंत्र विभाग कशासाठी?

नाटक व चित्रपट ही माध्यमे समाजमनावर किती प्रभाव टाकतात आणि परिवर्तनाला किती हातभार लावू शकतात, हा कायम मतभिन्नतेचा व वादविवादाचा विषय राहिला आहे. त्यामुळे कलेसाठी कला की जीवनासाठी कला अशा दोन प्रवाहांचे प्रतिनिधी सर्व काळातील ओपिनियन मेकर वर्गामध्ये राहिले आहेत. त्यांचे प्रमाण स्थळ, काळ व परिस्थिती यानुसार वेगवेगळे राहिले आहे. मात्र एका प्रवाहाच्या पुरस्कर्त्यांनी दुसऱ्या प्रवाहात प्रवेश केला असे क्वचितच घडले आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘साधना’ने मात्र ‘जीवनासाठी कला’ याच बाजूचा पुरस्कार सातत्याने चालू ठेवला आहे. वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक म्हणूनच ‘साधना’ चालवायचे असल्याने असे होत आले असावे. त्यामुळेच कदाचित अशा भूमिका मध्यवर्ती असलेले लोक ‘साधना’च्या केंद्रस्थानी येत राहिले असावेत.

मागील दशकभराच्या ‘साधना’ अंकांवर ओझरती नजर टाकली तरी हे सहज लक्षात येईल. त्यातील एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणून ‘दलपतसिंग येती गावा’ या नाटकाचा उल्लेख करता येईल. माहितीचा अधिकार देणारा कायदा राजस्थानातील देवडुंगरी या गावात कसा उगम पावला, त्याची रोचक कहाणी सांगणारे ते नाटक दहा वर्षांपूर्वी आले, तेव्हा ‘साधना’ने त्यावर एक पूर्ण विशेषांक काढला होता. मकरंद साठे यांचे लेखन व अतुल पेठे यांचे दिग्दर्शन असलेले ते नाटक होते. गंमत म्हणजे ते नाटक बसवले गेले ते एका अफलातून प्रक्रियेतून आणि ती प्रक्रिया घडली जालना जिल्ह्यातील जांब समर्थ या गावात. त्या प्रक्रियेचा व त्या नाटकाचा एक नायक म्हणून राजकुमार तांगडे या तरुणाकडे पाहावे लागते. ते नाटक पंचवीस प्रयोगानंतर थांबले, त्यामुळे विस्मरणात गेले. त्यानंतर राजकुमार मध्यवर्ती असलेल्या ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाने विक्रमाचे अनेक उच्चांक मोडले.

आता राजकुमारचे लेखन व दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट आला आहे, ‘चिवटी’ हे त्याचे नाव. दोन तासांचा हा मराठी चित्रपट फेब्रुवारी 2020 मध्ये सिनेमागृहांतून प्रदर्शित होणार आहे. मात्र या दिवाळीपूर्वी होणाऱ्या ‘मामि’ (मुंबई ॲकॅडेमी ऑफ द मूव्हिंग इमेज) फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यासाठी त्याची निवड झाली आहे, तिथे त्याचे तीन शो होणार आहेत. त्यावेळी आणि त्यानंतर त्याची जोरदार तारीफ होईल अशी अपेक्षा आहे. आणि समजा नाही झाली तरी, तसे होणे आवश्यक आहे / होते, हे अधोरिखित करण्यासाठी ‘साधना’च्या या दिवाळी अंकात 40 पानांचा स्वतंत्र विभाग ‘चिवटी’वर केला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा त्यावर ‘साधना’चा एक विशेषांक करायचा, असे त्याचे शूटिंग चालू होते तेव्हाच ठरवले होते. तो काही भावनेवर आधारलेला निर्णय नव्हता, तर या विषयाचे महत्त्व आणि त्यात धारदार आशय ओतला जाणार याची खात्री यातून तो निर्णय आला होता.

वस्तुतः चार वर्षांपूर्वी या चित्रपटाच्या निर्मितीला प्रारंभ झाला आणि दोन वर्षांपूर्वी तो जवळपास पूर्ण झाला. त्यानंतरची दोन वर्षे तो रखडला, ते केवळ आर्थिक कारणामुळे. अलीकडच्या काळात चित्रपट यशस्वी होण्यासाठी पोस्ट प्रॉडक्शनला जवळपास निर्मितीइतकाचा किंबहुना अधिक खर्च येत असतो आणि तोच करता येत नसल्याने हा चित्रपट प्रदर्शित होणे लांबले होते.

अशी परिस्थिती चित्रपटसृष्टीला अजिबात नवी नाही. पण ‘चिवटी’ पाहून बाहेर पडलेल्या संवेदनशील प्रेक्षकांना जर तो दोन वर्षे उशीरा प्रदर्शित होण्याचे हे कारण कळले, तर त्यांच्या अस्वस्थतेत कमालीची भर पडेल. ‘चिवटी’च्या निर्मितीप्रक्रियेची कहाणी कळली तर महाराष्ट्राच्या नेतृत्त्वाची व दातृत्वाची लाज वाटेल आणि आपण त्याचाच भाग आहोत या जाणिवेतून शरमेने मान खाली घालावीशी वाटेल. मात्र त्याबरोबरच आणखी एक घडेल, ऊसतोड कामगारांची व कोरडवाहू शेतकऱ्यांची फाटकी समजली जाणारी ही तरुण मुले-मुली काय प्रकारचे साहस करून वा आयुष्याचा डाव पणाला लावून लढू शकतात, याचीही झलक पाहायला मिळेल. अभिनय, लेखन, दिग्दर्शन इथपर्यंत ही झलक कालपरवापर्यंत पाहायला मिळाली आहे. पण सिनेमानिर्मितीच्या क्षेत्रातही ही पोरं ज्या प्रकारे धडका मारताहेत ते पहिले की, खडक फोडून पाणी काढणे या प्रकारची ही जिद्द आहे याची प्रचिती येईल. इथे हाराकिरी दिसत नाही हे केवढे सौंदर्य!

संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या अभिमानाचे जे काही मानबिंदू आहेत त्यातील एक आहे सहकार चळवळ आणि त्यातही सामर्थ्याचे प्रतीक म्हणून दाखवले जातात ते जवळपास दोनशे साखर कारखाने. सत्तेचे आगार म्हणूनच ते ओळखले जातात. अशा कारखान्यांवर महाराष्ट्राच्या दुष्काळी टापूतून व कोरडवाहू क्षेत्रातून लक्षावधी माणसे ऊसतोड मजूर म्हणून येतात. वर्षातील अर्धा काळ ते आपापल्या गावात असतात अर्ध्या-मुर्ध्या घरात आणि अर्धा काळ कारखान्यावर असतात उसाच्या पाचरटातून उभारलेल्या कोपीत. या अर्धवट स्थलांतरामुळे त्यांचे पोटाचे प्रश्न तेवढ्यापुरते सुटत राहतात, पण मागच्या पिढीतील म्हाताऱ्या माणसांची आणि पुढच्या पिढीतील बछड्यांची ससेहोलपट करण्याच्या बदल्यातच!

तर अशा या ऊसतोड कामगारांच्या जीवनावरील ‘चिवटी’ हा चित्रपट आहे. गावातील अर्धे वर्ष म्हणजे चित्रपटाचा पूर्वार्ध आणि कारखान्यावरचे अर्धे वर्ष म्हणजे मध्यंतरानंतरचा उत्तरार्ध. हा चित्रपट पाहून अशीच भावना मनात येऊ शकते की, कारखान्यावर आलेल्या या माणसांच्या शरीरातील रस काढून घेतला जातो आणि त्यांना चिपाडे बनवून गावाकडे पाठवले जाते. त्यांना खिसे भरून पाठवले जाते असेही म्हणता येईल, पण ते कशासाठी तर त्यांनी पुढील वर्षी शरीरात रस गोळा करून आणावा यासाठी!

हे वाचून भल्याभल्यांचा असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की, उसतोड कामगारांच्या या परिस्थितीला साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकरी तेवढे जबाबदार आहेत. पण तसे समजणे म्हणजे वस्तुस्थितीपासून पळ काढणे किंवा व्यवस्थेचे अतिसुलभीकरण करणे! समग्र विचार केला तर लक्षात येईल, सर्वच घटक या परिस्थितीला कमी-अधिक प्रमाणात जबाबदार आहेत आणि म्हणूनच कदाचित कोणालाच त्याचे सोयरसुतक नसावे. पण ‘चिवटी’ एवढ्यावर थांबत नाही, ऊसतोड मजूर आणि त्यांचे जीवन यांचे चित्रीकरण करणारा हा सिनेमा प्रत्येक शोषित समाजाच्या व्यथावेदनांची आठवण करून देतो आणि सर्व प्रकारच्या शोषकांकडे जळजळीत कटाक्ष टाकतो. तो कटाक्ष किंचितसा का होईना आपल्याकडेही आहे, अशी भावना तो संवेदनशील प्रेक्षकांच्या मनात निर्माण करू शकतो. आणि म्हणून स्वतःची परीक्षा घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी हा सिनेमा पाहायलाच हवा.

- संपादक, साधना

‘चिवटी’मागच्या गोष्टी

राजकुमार तांगडे

इथलं समाजकारण, राजकारण, अर्थकारण, सामाजिक स्तर... एकमेकांचा गुंता पक्का करून आधी मी गोष्ट पक्की करून घेतली. मला त्यात टिपिकल हीरो नको होता. ‘नुस्ता कोयता गरगर फिरवला की, माणसाचं मुंडकं तोडावं असं काही तरी...’ उसाच्या ओळीच्या ओळी एका झटक्यात तोडायच्या नव्हत्या. त्या खरंच कष्टानं तोडणारेच पाहिजे होते. मला अख्खा समूहच एकजीव हवा होता. तो रंगमळाच्या रूपानं जवळच होता. अवती-भवतीची माणसंच मजूर असल्यानं मला त्या वेदना चांगल्या माहीत, त्यामुळे मला रिसर्च करायला कुठं चंद्रावर, मंगळावर जायचं नव्हतंच किंवा तासन्‌ तास लायब्ररीत जाऊन त्यांच्या कष्टाचा अभ्यासही करायचा नव्हता. अनुभवविश्वात ते एखाद्या गाडीच्या शोरूमसारखं तयार होत होतं, बस्स.

‘चिवटी’ हा सिनेमा फेस्टिव्हलसाठी पाठवला, आणि जीव भांड्यात पडला. ताकदीचा अंदाज न घेता उचललेलं शिवधनुष्य कसं कसं पेललं, ते सगळंच झरझर नजरेसमोर आलं.तसा मी नाटकवाला. ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकामुळे परिचयात थोडी भर पडली. नाटक वगळता सिनेमाशी माझा संबंध फार तर अभिनयापुरताच. मीच लिहिलेल्या ‘आकडा’ या एकांकिकेवर नंदू माधव सरांनी एक शॉर्टफिल्म केली. एकांकिकेत मीच काम केलेलं असल्याने त्यांनी मलाच त्या फिल्ममध्ये लीड म्हणून घेतलं. एरवी नाटकातील त्या भूमिकेसाठी तीन-चार ठिकाणी मला बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार मिळाला. पण फिल्ममध्ये काम करताना माझी पुरती दमछाक झाली. प्रत्येक शॉटला मी जरा बोलायचो आणि थोडी माती खायचो. शेवटी कसंबसं शूटिंग पूर्ण केलं आणि एकदाचं ठरवलं की, इथून पुढे सिनेमाच्या नादी लागायचंच नाही... पण कसा कुणास ठाऊक, ‘देऊळ’ सिनेमा करताना उमेश कुलकर्णीच्या तावडीत सापडलो आणि परत एकदा पिळून निघालो! तिथं तर करडी गाय माझ्यापेक्षा भारी भरली. वन टेक ओके देऊन पळून गेली. माझे मात्र सहा वेळा रि-टेक झाले. पुन्हा एकदा ठरवलं- आपण आपल्या इज्जतीचा पंचनामा पुन्हा नाही करून घ्यायचा, आता फक्त नाटकच!

असं म्हणत-म्हणत ‘तुकाराम’, ‘नागरिक’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, या चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका कराव्याच लागल्या. मधे-मधे लेखन चालूच होतं. या भूमिका करत असताना कुठं तरी वाटायचं, आपणही एखादा सिनेमा लिहावा. तसा चार-दोनदा प्रयत्नही केला; पण मी ज्या दिग्दर्शकासाठी सिनेमा लिहायचो, त्याला तो आवडायचाच नाही. मग मी थोडा नाराज झालो. एकीकडे माझं नाट्यलेखन स्वीकारलं जातं, तर दुसरीकडे सिनेमा आवडत नाही. मग असं वाटलं की, प्रॉब्लेम त्यांच्या ‘आवडण्या’पेक्षा जर ‘कळण्या’चा असेल तर? आपल्याला जे सांगायचं आहे, ते जर त्यांना कळतच नसेल तर, आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोचणार कसं? त्यांना आवडो न आवडो- लोकांना काय वाटतं, हे कुठं आपल्याला माहीत आहे? आपण थेट लोकांपर्यंत जायला पाहिजे. पण सिनेमा ही गोष्ट इतकी सोपी नाही. वावरात पेरता-पेरता एखाद्या पाट्याला जर मूठभर बी कमी पडलं, तर ते मिळवण्याचीसुद्धा आपली मार्केटमध्ये पत नाही आणि आपल्याला सिनेमा करायला कोण सांगणार! नाही तर उगी आपला शिवा व्हायचा...

गेवराईला शाळेत जाताना वाटेत लागणाऱ्या कब्रस्तानमध्ये ॲक्शन म्हणून शिवा एकटाच फाईट खेळायचा. शाळेतून परत आलो, तरी त्याचं पॅकअप व्हायचं नाही. नंतर कळलं, त्याला सिनेमानं हे झालं होतं... त्यामुळं सिनेमाचा विषय डोक्यात घेऊन उगीच मेंदूत अनावश्यक गर्दी करूच नये, म्हणून मी तो विषय बाजूला ढकलला. पण मधे-मधे एक विषय घेऊन एका मित्रासोबत चर्चा चालू होतीच. त्यानं तो विषय मला लिहायला सांगितला. पण मी त्याला सांगितलं, ‘‘भाऊ, मला दुसऱ्याच्या इथं औत हानायचा लै कंटाळा आलाय. जे काही करीन ते स्वतःच करीन.’’ तर तो लगेच तयार झाला. मला कळत होतं, तोही आपल्यासारखाच. ‘खिशात नाही आना अन्‌ चलो जालना!’ पण म्हटलं- चला, या निमित्तानं लिहून तरी होईल. आणि मी लिहायला लागलो.

मी अगदी सकाळीसकाळीच दुकान उघडून बसावं तसं वही घेऊन लिहायला बसू लागलो. गोष्ट आवडीची आणि माझ्या विचाराशी जुळणारी असल्यानं मी अगदीच मन लावून लिहू लागलो. पण बिनपावसाचे उन्हाळखरडे तरी किती घालावेत, म्हणून मी लिखाणाचा स्पीड थोडा कमीच केला. एके दिवशी लिहीत असतानाच संजय बिंगलेंचा फोन आला, ‘‘सर, भेटायला यायलो.’’ आणि ते चक्क निर्माता अजिनाथ ढाकणेंना घेऊन आले. तसं पाहता क्षणी मन बसावं असं व्यक्तिमत्त्व अजिनाथचं नाही. माझ्यासारखंच... पाहिल्यापाहिल्या भावना न बसणारंच...

माझा मित्र हर्षाची चार वर्षांची जिवी नावाची गोड मुलगी जेव्हा भारतात आली, तेव्हा मी तिला कुतूहलाने भेटायला गेलो. हर्षाने तिला माझा परिचय रायटर म्हणून करून दिला. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर ‘हाऊ पॉसिबल?’ म्हणताना जे भाव तरंगले, ते अजूनही जसेच्या तसे माझ्या डोळ्यांसमोर तरळत आहेत. त्यामुळे कुणावरही संशय घेताना मी स्वतःला आरशात पाहतो.

ऊसतोड मजुरावर सिनेमा करायचं खूळ डोक्यात घेऊन अजिनाथ आणि संजय अख्खा महाराष्ट्र पायाखाली घालून इथपर्यंत आले होते. त्यांना ऊसतोड मजुरांवरच सिनेमा करायचा होता. एक-दोन कादंबऱ्याही पिशवीत टाकून आणल्या होत्याच. त्यासोबत ओव्हरफ्लो कॉन्फिडन्सही घेऊन आले होते. मराठीतले मोठमोठे देव (दिग्दर्शक) पाहून आलेला माणूस माझ्यावर विश्वास ठेवतो, यात मला थोडी शंका होतीच. ते आपल्याला खिशात घालतील असं अजिनाथला वाटत होतं, की यांना विषयातलं काय कळतं असं वाटत होतं- कुणास ठाऊक? पण त्या सगळ्यांना सोडून ते माझ्याकडं आले, म्हणून मी त्यांना सावध प्रश्न विचारला, ‘‘तुम्हाला मी काय करावं, असं वाटतं?’’

त्याचं एक कारण असं होतं की, मी स्वतः ऊसतोड मजूर जरी नसलो तरी एक शेतकरी होतो, हे माझ्या ‘बोलण्या-चालण्या’वरून त्यांना लगेच जाणवलं. त्यात बाकीच्या लोकांनी त्यांना सांगितलं होतं की, ‘तुम्ही तुमचं बजेट सांगा; आम्ही तुम्हाला तो बनवून देऊ.’ पण रेडिमेड घर विकत घेण्यापेक्षा बांधून घेण्यात कुणालाही जास्त आनंद मिळतो, कारण रचना आपल्या मनासारखी करता येते. शिवाय याआधी ते ज्यांच्याकडे गेले होते, ते सगळे शहरी असल्याने विषयाला किती न्याय देतील हा संशय त्यांना होता, एवढं खरं. एवढं फिरून ते माझ्याकडे आलेले असल्यामुळं मी त्यांना प्रश्न विचारला, ‘‘माझ्याकडून काय अपेक्षा आहेत?’’ तर ते लगेच म्हणाले, ‘‘सर्वच!’’ मी थोडा सरकून बसलो. माझ्यासमोर त्यांनी पुस्तकं टाकली. मी धावती नजर टाकली. पण नजर थांबावी असं एकही पुस्तक मला त्यात दिसलं नाही.

एखादी गोष्ट मला आवडली नाही तरी ती अपायकारक नसेल तर मी सांगत नाही की, ती मला आवडलेली नाही. पण ते मोठ्या विश्वासाने ‘त्याच पुस्तकावर सिनेमा करायचा’ म्हणून आले होते. अजिनाथने तोपर्यंत माझं नाटक किंवा लेखन काहीच पाहिलेलं नव्हतं. त्यामुळं मी संभाला बोलावून घेतलं. प्रकरण माझ्या आवाक्यापलीकडे वाटलं, तर मी संभाला बोलावतो. तो तसा बेधडक. संभाजी (तांगडे) आला; त्यानं रंगरूप पाहिलं, पुस्तक पाहिलं आणि म्हणाला, ‘‘आम्हाला गोष्ट आवडली तरच आम्ही हे करू. नाही तरी आमचं काही तरी करायचं चाललंच होतं.’’

तोपर्यंत बोलता-बोलता मी अजिनाथला क्रिएटिव्हमधलं स्वातंत्र्य अगोदरच मागून घेतलं. ज्याच्यासाठी गांधीबाबासारख्यांनी आयुष्य खर्ची घातलं, तेच मला निर्माता म्हणून अजिनाथनं पहिल्याच शब्दांत दिलं. ‘‘मी व्यवहारात हस्तक्षेप करणार नाही, तुम्ही क्रिएटिव्ह कामात करायचा नाही.’’ आणि आमचं जमलं! संभानं आणि मी हेही तपासलं की, या पठ्‌ठ्याला हीरो- गिरो तर व्हायचं नाही ना? तसं काही जाणवलं नाही. मग मी त्यांना जालन्यातलेच माजी आमदार डॉ.नारायणराव मुंढे यांची एक कादंबरी सांगितली. त्यात एक प्रश्न हृदयभेदक होता. त्या प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवून गोष्ट रचायची ठरली आणि मी लेखनाला सुरुवात केली.

गोष्ट ऊसतोड मजुराची करण्यापेक्षा साखरेची केली तर जास्त व्यापक होईल, असं संभानं सुचवलं. साखर प्रत्येकाच्या आयुष्यात येते. ऊसतोड मजूर ज्याने पाहिलेला नाही, त्याने साखर तरी नक्कीच पाहिलेली असते. गोड साखर तयार करण्याचा प्रवास किती कडवट आहे, हे त्यात महत्त्वाचं दिग्दर्शक राजकुमार तांगडे आणि निर्माते अजिनाथ ढाकणे होतं. फक्त ऊसतोड मजूरच नाही तर शेतकरी, राजकारणी, सामान्य माणसं- हे सगळं चक्रच त्यात आलं पाहिजे, अशी लेखनाला सुरुवात केली. नाटकात काम करणारी मुलं अवती-भवती होतीच. त्यांना नजरेसमोर ठेवूनच लिहायला सुरुवात झाली. लेखनाचा अनुभव होताच. लिहून होत होतं. ‘पण पुढे?’ म्हणजे दिग्दर्शन कसं करायचं? म्हणजे दंड-बैठका काढल्या, दूध प्यायलो-पचवलं- इथवर ठीक आहे; पण समोरच्या गड्याला पाडायला डावपेच तर यायला पाहिजेत ना!

माझा दिग्दर्शनाचा अनुभव शून्य होता. अजिनाथने ‘संत भगवानबाबा’ नावाचा सिनेमा पूर्वी काढला होता. पण तो झाला निर्मितीचा अनुभव; दिग्दर्शनाचं काय त्यात? मग काय करायचं? सिनेमा कसा करतात ते कुणाला विचारायचं? मार्गदर्शन कुणाचं घ्यायचं? अवती-भवती सिनेमाची जाण असणारं तर सोडा, सिनेमाबद्दल माहिती असणारंसुद्धा कुणी नव्हतं. जेवढा दूर स्वर्ग, तेवढाच दूर आमच्यासाठी सिनेमा! कल्पनेच्या पलीकडे. कारण माझ्या घरच्यांचा सोडाच, पण आमच्या आडनावाच्या लोकांचासुध्दा सिनेमाशी कुठंच संबंध लागणार नाही. आमचा संबंध असलाच तर फक्त हंगामी प्रेक्षकापुरताच.

‘हरहर महादेव’ हा मी पाहिलेला आयुष्यातला पहिला सिनेमा. तो आमच्या जांबाच्या जत्रेत आईच्या मांडीवर झोपून मी पाहिला, असं ती सांगते. त्यानंतर एकदा वडिलांबरोबर मामाच्या गावाला जात असताना वाटेत माजलगावमध्ये मुक्काम पडला. तेव्हा ते कुठल्या तरी सिनेमाला घेऊन गेले होते. पण त्याचं आत्ता काहीच आठवत नाही. पुन्हा एकदा यात्रेत आपण ‘संतोषीमाता’ पाहिला, असं ताईने सांगितलेलं. तेवढंच आठवणीत. मनावर प्रभाव पडावा असा- ‘जागतिक’ नाही म्हणता येणार, पण धार्मिक असल्यानं- ‘ब्रह्मांडातील ग्रेट सिनेमा’ कुठलाच पाहण्यात नव्हता. एवढा पक्का पाया असणारा माणूस सिनेमाचं दिग्दर्शन करायला निघाला.

दिग्दर्शन मीच करावं, हे अजिनाथचंदेखील मत; पण माझा अनुभव शून्य. लेखनाच्या बाबतीत मी गोष्ट मारून नेली होती. म्हणजे कुठलंच ॲकॅडमिक न शिकता मी आणि ‘शिवाजी’सारखं नाटक लिहिलं, ते उत्स्फूर्तच. आता दिग्दर्शन करायला उतरलोय. कसोटी लागणार ती कल्पकतेची, एवढं निश्चितच होतं. जसं डॉक्टरी पेशात डिग्री असल्याशिवाय रुग्णावर उपचार करता येत नाहीत. डिग्री नसताना उपचार केले, तर त्याला बोगस डॉक्टर म्हणतात. तसं समाजमाध्यमाचं नाही. आपल्याला वाटलं की- आपल्यात क्षमता आहे, तर आपण त्यात काम करू शकतो. रूग्णसेवेत फाजील आत्मविेशास कामाचा नसतो, कारण आपण माणसाच्या जिवाशी खेळत असतो. तुम्हाला प्रमाणपत्र नसेल, तर माणसाची चिरफाड करायचा अधिकार मुळीच नाही. हां.. पण माध्यमातून समाजाची चिरफाड करायला मात्र तुम्हाला औपचारिक शिक्षणाची अट नसते. त्यामुळेच मी हा सिनेमा दिग्दर्शित करायचा निर्णय घेतला.

पण मला याचं पूर्ण भान होतं की, रुग्णसेवेइतकंच गंभीर असतं व्यवस्थेचं ऑपरेशन. डॉक्टरच्या चुकीच्या ट्रीटमेंटचा परिणाम फक्त एका व्यक्तीवर, कुटुंबावर होतो; पण एका कलावंताच्या चुकीचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो. त्यामुळे हे न शिकता जरी केलं, तरी समाजभान न बाळगता मात्र मुळीच केलं नाही आणि ते करताही येत नाही. याचं कारण असं- काम केल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र समाजाकडून घ्यावंच लागतं. ते आता मला तुम्ही देणार आहात!

इथलं समाजकारण, राजकारण, अर्थकारण, सामाजिक स्तर... एकमेकांचा गुंता पक्का करून आधी मी गोष्ट पक्की करून घेतली. मला त्यात टिपिकल हीरो नको होता. ‘नुस्ता कोयता गरगर फिरवला की, माणसाचं मुंडकं तोडावं असं काही तरी...’ उसाच्या ओळीच्या ओळी एका झटक्यात तोडायच्या नव्हत्या. त्या खरंच कष्टानं तोडणारेच पाहिजे होते. मला अख्खा समूहच एकजीव हवा होता. तो रंगमळाच्या रूपानं जवळच होता. माझ्या अवती-भवतीची माणसंच मजूर असल्यानं मला त्या वेदना चांगल्या माहीत. माझे काही मित्रही तोडणीला जातात. त्यामुळे मला रिसर्च करायला कुठं चंद्रावर, मंगळावर जायचं नव्हतंच किंवा तासन्‌ तास लायब्ररीत जाऊन त्यांच्या कष्टाचा अभ्यासही करायचा नव्हता. माझ्या अनुभवविश्वात ते एखाद्या गाडीच्या शोरूमसारखं तयार होत होतं, बस्स. जशी गाडी स्टार्ट करताच माणूस ब्रेक वगैरे चेक करतो तसं जगणं तपासलं, त्यात स्वानुभवाची फोडणी टाकली की, तयार होणार होतं- ॲक्टर आणि दिग्दर्शकाकडून.

मी नवा असल्यानं माझ्यात अभिनेत्याला ऊस तोडायचा अभिनय करायला लावायचं कसब नव्हतंच. मला तंत्रापेक्षा विचाराची जास्त काळजी असते. तंत्र चुकलं तरी चालेल, पण विचार चुकता कामा नये. तंत्रात चुकला तर दिग्दर्शक जिम्मेदार- जो मी नाहीच; पण विचारात चुकलो तर मी जिम्मेदार- जो मी आहेच. तंत्र हे शिकून मिळवता येतं, पण विचार हे जगल्याशिवाय कलाकृतीत उतरतच नाही. माझ्या जगण्याचं प्रतिबिंब त्यात पडणार असल्यानं तयारी सुरू केली.

मी काही ऊसतोड मजूर कुटुंबातला नाही. पण त्या कुटुंबाशी नातं असणारा आहेच, म्हणून नव्यानं संवाद साधायला आम्ही एक दौराच काढला. त्यात संभा, अश्विनी आणि आमच्या रंगमळाची मैत्रीण वीणा जामकर- आम्ही सगळ्यांनीच भाग घेतला. आम्हाला त्यांच्या मनातलं काढून घ्यायचं होतं. उद्या जर सिनेमा तयार झाला आणि एखाद्या ऊसतोड मजुराने पाहिला, तर त्याच्यावर ‘हा मी नव्हेच’ असं म्हणायची वेळ येऊ नये. त्याचं, त्याच्या समस्यांचं, सुख-दुःखाचं, प्रश्नांचं प्रतिबिंब त्याला त्याच्यात दिसलंच पाहिजे, म्हणून हा खटाटोप. वीणाशी व अश्विनीशी महिला दिलखुलास बोलत; तर आमच्याशी पुरुष व वयस्कर महिला छान शेअर करत.

भेटीगाठी, जगणं पाहत, न्याहाळत, ताडून-पडताळून बघत फिरत असताना कधी कधी लोक आम्हाला सरकारी पथक समजून रिॲक्ट व्हायचे. कधी ‘आमच्याकडं बघा’ म्हणायचे, तर कधी आपल्याला काय काय सुविधा हव्या आहेत त्याची यादीच वाचून दाखवायचे. अशीच एकाने लेखी दिलेली लिस्टच मी माझ्या काही मागण्या टाकून सिनेमातील एका सीनमध्ये कामगारनेत्याच्या मागे बॅनर करूनच लावली. एकूण, यांच्या समाजाकडून, सरकारकडून असणाऱ्या अपेक्षा कळत गेल्या. त्यातून अनेक कॅरेक्टर्स मिळाली.

आम्ही बीडमधला आष्टी, पाटोदा, शिरूरसह निर्माते कैलास सानप व अजिनाथचा गाव परिसर पिंजून काढला. त्यांचं अन्‌ आमचं कल्चर, दुःख, जगणं जरी एक असलं तरी आमची बोली एक नव्हती. बऱ्याच शब्दांत खूप फरक होता. सिनेमाला भाषा महत्त्वाची असते- मग बीडची वापरायची की जालन्याची? प्रश्न तिथंच सुरू झाला. चुट्टी, चुईटी का चिवटी? कुठे चुईटी म्हणतात, तर कुठे चिवटी म्हणतात. अर्थ तोच. ऊस खाऊन फेकून दिलेला भाग. प्रश्न पुन्हा तोच- लोकांना कळेल का? पुन्हा विचार केला, लोक आपल्यापेक्षा तर नक्कीच हुशार आहेत.

मला आठवतो देव-देवतेतर माझ्या पाहण्यात आलेला पहिला सिनेमा. नेमकीच दादाची दहावीची परीक्षा झाली आणि मी पाचवीत असताना आमच्या जांबाच्या यात्रेत सिनेमा पाहायला घरून निघालो. शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याजवळ आलो. तो मला मशिदीजवळच्या बोळीतून घेऊन चालला असता मी त्याच्या हाताला धरून ओढत म्हटलं, ‘‘तिकडं टेकडीवरच्या टाकीला नगं. तिथं दीड रुपाय तिकीट आहे. इकडं मारोती मळ्यात आबाच्या टाकीला पांडवप्रतापला एक रुपायचं तिकीट.. आपुन इकडं जाऊ...’’ मी त्याला सगळ्या वाटंनं सांगत होतो ‘‘दादा, ते हिंदीत हाई, मला समजत नाही.’’ दादा मला तसंच पुढं रेटत घेऊन आला. म्हटला, ‘‘तू चल. तू नीट ध्यान देऊन पाह्यला तर कळंन.’’ तिथं होता ‘कानून मेरी मुठ्ठीमें है’ नावाचा सिनेमा. कुणाचा वगैरे काहीच माहीत नव्हतं, तरी पाहिला. विशेष म्हणजे, मला भाषा येत नसतानाही मन लावून पाहिल्यानं मला तो सिनेमा खरंच समजला. तेव्हाच हे शिकलो की, चित्राची स्वतःची एक भाषा असते. ती कळली की, सिनेमा तुम्हाला आपोआप कळतो.

सिनेमात भाषेपेक्षा जगणं महत्त्वाचं असतं. ते मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पारगाव असो का पॅरिस- माणसाच्या दुःखाचा हुंकार एकाच जागेवाटे निघतो. दु:खाची एकच बोली आहे, ती डोळ्यांतून डोळ्यांना कळते. चेहऱ्यावर दिसते. फक्त ते कनेक्ट होण्यासाठी प्रेक्षकाच्या मेंदूला हृदयाची अर्थिंग मिळायला हवी आणि ती बोलीतून पोचते. म्हणून मी नीट व्यक्त होण्यासाठी माझी स्वतःची बोली निवडली...

सिनेमा करताना फक्त ऊसतोड मजूर-मजूर करायचंच नाही. ते काही आईच्या पोटातून येतानाच कोयता हातात घेऊन येत नाहीत, तर ते आधी माणूस असतात. पण ज्यामुळे ते त्या मार्गाला जातात, ती कारणं नेमकी काय असतात, त्यांचा शोध सिनेमात घ्यायचा. आणि तो समाजाला पटला पाहिजे, हा आग्रह मनाशीच होता. त्याचा अनुभवही मी या सिनेमाच्या चालू प्रोसेसमध्येच घेतला. माझा एक मित्र सुनील मजूर-कम-शेतकरी. लहानपणापासून आमच्यासोबत. आमच्या नाटकाच्या तालमीला रोज येणारा. ज्यांना उशीर झाला, त्यांना बोलवून आणणारा. तालमीच्या ठिकाणी लाईट लावायचं काम त्याचंच. मनानंच दूध आणून चहा करून पाजायचं काम तो करायचा. नंतर शेतकरी संघटनेत काम करताना पुढेच. पॅम्पलेट वाटणं असो की, अगदी उपोषणात-मोर्चात नाही तर आंदोलनात माझ्यासोबत जेलमध्ये- सगळीकडं सोबत. एवढंच काय, कापसाचं गाठोडं डोक्यावर घेऊन तीन-तीन किलोमीटर फाट्यावर दोघं विकायला जाताना पण संगंच.

पुढं त्यानं टमटम घेतली. आम्ही अगदी ‘शिवाजी अंडरग्राऊड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकाला जाताना- येताना तो आम्हाला आणून-नेऊन सोडणार. उत्साही तर इतका की, एकदा आम्हाला त्या टमटमध्ये प्रयोगाला पुण्याला (375 कि.मी.) घेऊन जाण्याची तयारी केली! इतका कष्टाळू... पण ह्या पठ्‌ठ्याला त्याच्या रिक्षाला जर कोणी टमटम म्हटलं की, राग यायचा. तो आम्हाला दरडावून सांगायचा, ‘‘टमटम-रिक्षा म्हणून तुम्ही मही इज्जत नका घालत जाऊ.. गाडी म्हणीत जा...’’ इतका स्वाभिमानी. ‘चिवटी’तही त्यानं छोटा रोल केला. पंधरा दिवस सेटवरच होता. तसा तो अंगठेछाप, पण थम्ब सिस्टीम येण्यापूर्वीपासूनच तो कुणाला बोलू देत नव्हता. सगळं गाव त्याला मंत्री म्हणतं, एवढा हुशार. पण सततच्या दुष्काळानं गेल्या वर्षी त्यालाही गाव सोडून ऊसतोडीला जावं लागलं.

सुनील ऊसतोडीला गेल्याचं मला दोन महिन्यांनी कळलं. मी त्याला फोन लावला. मी म्हटलं, ‘‘का गेलास?’’ तर तो म्हणाला, ‘‘तुम्हाला माहिती नाही व्हय?’’ मला त्याच्या जाण्याचं कारण खरंच माहिती नसल्यानं मी त्याला म्हटलं, ‘‘सुनील, मला खरंच माहिती नाही, तू का गेलास ते...’’ तो जरा चिडूनच बोलला, ‘‘एवढा सिनेमा केला राव अन्‌ म्हणता माहिती नाही!’’ माझी मलाच चूक कळली. त्याच्या ऊसतोडणीला जाण्याचं मी व्यक्तिगत निमित्त का शोधत होतो... नंतर मी आठ- पंधरा दिवसांनी त्याला फोन करायचो. एकदा पंढरपूरजवळ नाटकाचा शो होता. त्या निमित्तानं तो मला तिथं भेटायला आला. मला एकट्याला गाठून माझ्याजवळ येऊन, हातात हात धरून म्हणाला, ‘‘राजाभाऊ... लई अवघड हे राव... हे तुम्ही मांडलं तसंच मह्या आयुष्यात घडायलंय... कालच एका जणानं त्याच्या रानात गेलोत म्हणून आम्हाला उठाबस्या घालायला लावल्या... मला कसंतरीच झालं.’’

मी काही वाल्मीकी नाही. मी लिहिलं आणि त्यांच्या आयुष्यात घडायलं.. खरं तर त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी मी लिहिल्या, त्या पुन्हा घडू नयेत म्हणून... कारण त्यांचंही सुनीलसारखंच एक विश्व असतं. कोळसा कामगार, मिल कामगार, ऊसतोड कामगार. तो एक व्यवसाय आहे. त्यात कोळसा, ऊस, कापड बाजूला काढलं की, उरतो कामगार आणि काम बाजूला काढलं की, दिसतो आपल्यासारखाच माणूस. नातं जपणारा, राजकारण करणारा, हेवे-दावे, आपुलकी, माणुसकी, स्पर्धा.. सगळं आपल्यासारखंच. त्यांचंही एक विश्व असतं, गाव असतं, मान असतो, सन्मान असतो.

सुनील माझ्या गावातल्या मानकरी कुटुंबातला. बैलपोळ्याचं तोरण असो की होळीची पूजा, पालखीचा मान त्याच्याच घराला.. जगरूपी जंगलातलं तेही एक झाड असतं- फळा-फुला-पानांबरोबर टांगलेल्या खोप्याचंही. पण जेव्हा कामानिमित्त गावच्या गाव स्थलांतर करतं, तेव्हा सालोसाल वाढलेलं एखादं झाडं उपटून दुसरीकडं लावताना कातळातून पाताळात गेलेल्या मुळ्यांबरोबरच त्यांचा स्वाभिमानही त्याच जुन्या गावाच्या मातीत तुटून जागेवरच कुजून पडतो आणि माणसासारख्या माणसाला सुनीलसारख्या मानकऱ्याला देश बदलला की, ‘गबाळे’ म्हटलं जातं... हेही सिनेमात आलं पाहिजे. आपल्या समाजाला त्यांनाच उलटतपासणीत प्रश्न विचारण्याचा किंवा शहाणपणा शिकवण्याचा अधिकार नाही. की, तिकडे गेल्यानंतर असं काय आभाळ कोसळतं? जगण्यासाठी तर कष्ट कुणालाही करावेच लागतात. नाही तर मग हे सगळं सोडावं ना? त्यांना कोण जा म्हणतं? या सगळ्यांची उत्तरं आपल्याला हवी असतील, तर त्यांचं जगणं आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण प्रत्येक जणच ते काही अनुभवू शकत नाही; म्हणून माझ्यासारख्याचं कर्तव्य आहे की, कलाकृतीतून त्यांच्या जगण्याची अनुभूती आपल्या सगळ्यांना देणं. त्यातून आपल्याला उत्तरं आपोआप मिळतील. अशासाठी मला गोष्ट सांगायचीय.

मला एकानं खूप गंभीरपणे सल्ला दिला, ‘‘राजकुमार, तू जो विषय निवडलायस ना, तो असा वैश्विक नाही रे... फार तर तुमच्या मराठवाड्यातल्या- त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यातल्या, त्यातल्या त्यात काही तालुक्यांतल्या काही गावांचा... त्यातही काही लोकांचा. म्हणजे तुमचा तालुका ऊसतोड मजुरांचा आहे म्हणून तिथला तहसीलदार नाही जात ऊस तोडायला. ग्रामसेवक, शिक्षक, कापड दुकानदार ही मंडळी नाही जात. हा विषय जगानं का बघायचा? मी का बघू हा विषय? तू असा एखादा विषय निवड ना, जो पूर्ण जगाला कवेत घेईल.’’

मी क्षणभर शांत झालो आणि बोललो, ‘‘मी तुझ्या घरी आलो, तर तू काय करशील?’’ ‘‘बसायला सांगेन. पाणी विचारीन.’’

‘‘आणि तुझ्या माठात पाणी नसेल तर?’’

‘‘का नाही, हे विचारीन.’’

‘‘तुझ्या घरच्यांनी सांगितलं, ‘आलंच नाही...’ तर?’’

‘‘दुसरीकडून आणीन.’’

‘‘दुसरीकडे नसेल तर.’’

‘‘मी नगरपालिकेला फोन करेन, जाब विचारेन.’’

‘‘ते म्हणले, शहरातच नाही तर?’’

‘‘धरण, नदी असं करत-करत पावसापर्यंत जाईन.’’

‘‘तुला पाणी नाही मिळालं तर तू शोधत-शोधत पावसापर्यंत जाशील. तसंच तुझ्या जेवणात आणि जीवनात गोडी आणणाऱ्या साखरेच्या शोधात जायला पाहिजेस ना? ज्यानं तुला थेट काहीच दिलं नाही, जो कुठे आहेच का नाही, माहीत नाही- त्या देवाच्या शोधात निघतोस. वा रे माणूस... आणि ज्यानं तुला खरोखर हे सगळं दिलंय... एवढी सेवा दिली, त्याचा नाही शोध घेणार? आपण सेवादात्याला विसरतो. त्याची प्रतारणा करतो. मला नाही ते करायचं. माझा बाप-आई सेवा दाता आहेत. त्यांची वेदना मला माहिती आहे, म्हणून मला करायचंय हे.’’ परत माझं नेहमीचं एक वाक्य त्याला सुनावलं, ‘‘मी कुणाची करमणूक करायला जन्मलेलो नाही; पण माझ्या कामातून कुणाची करमणूक होत असेल, तर त्याला माझी हरकत नाही.’’

हा सिनेमा करत असताना मला एक जाणवलं- ऊसतोड मजुराचं जगणं पाहायला सहज, लिहायला सोपं; पण जगायला खडतर, तेवढंच दाखवायला खर्चिकही. आपल्या डोळ्याला सहज दिसणारी आणि नेहमी घडणारी एक घटना मी त्यात लिहिली. ‘रस्त्यावरून जाताना ऊसतोड मजुरांचा ट्रक रस्त्याच्या खाली पलटी झालेला दिसतो. त्यात संसार अस्ताव्यस्त पांगलेला दिसतो.’ पण नंतर त्या कल्पनेचा मलाच त्रास झाला, म्हणून मी ते कॅन्सल केलं. त्यांची वेदना सांगताना निर्मात्याला वेदना होतात, हे क्षणभर विसरूनच गेलो होतो. एका दृश्यात एक पात्र ते कुठे उभं आहे, हे फोनवरून समोरच्याला सांगतं. तेव्हा ‘जग कुठल्या भ्रमात जगतं, हा संदेश द्यायचा म्हणून कॅमेरा अमुक-अमुक ठिकाणी शोध घेत येतो’ हे मी सहज लिहिलं. मला त्यात प्रेक्षकांना चकवा पण द्यायचा होता. म्हणून मी दोन ओळींत लिहिलं- आपल्याला नद्या-नाले, डोंगरकडा, समुद्र दिसतो; पण ते दृश्यात उतरायला किमान आठ दिवस शूट करायला लागणार होते. मी सढळ हाताने लिहीत गेलो, तेव्हा मला कुणी अडवलं नाही.

असंच होतं. त्यांच्या आयुष्यातही मोठमोठ्या घटना घडतात, पण कुणीच त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. एरवी आपण माणुसकी पावलोपावली जपतो. एखादी शाळा रोडवर असेल, तर दहा-वीस मीटर आधीच बोर्ड लावतो- ‘पुढे शाळा आहे. वाहने सावकाश चालवा.’ त्यात आपण गतिरोधकही टाकतो. आपली मुलं जरी त्या शाळेत शिकत नसली तरी आपण काळजीपूर्वक गाडी चालवतो, कारण ते आपलं भविष्य आहे. तशी काळजी आपण वर्तमानाची घेत नाही. ज्याला आपण कधीच पाहिलेलं नाही, त्या ईश्वराला आपण क्रेडिट आणि धन्यवाद देतो, ‘तुझ्या कृपेनेच हे सर्व मिळाले!’ आणि ओरिजनल ज्या सेवादात्याने आपल्या आयुष्यात व तोंडात गोडवा निर्माण केला, त्याला नका का सन्मान देईनात; पण अवमानाचा धनी ठेवू नये, याची जाणीव आपण ठेवत नाही. हेच मला या सिनेमातून हसतखेळत सांगायचं आहे.

निर्मात्यानं मला लिहायला कधीच आडकाठी आणली नाही. लिहिताना बजेटचा विचार जर केला, तर सिनेमाच लिहून होणार नाही. ‘तुम्ही मोकळेपणानं लिहा’ असं सांगणारे निर्माते अजिनाथ आणि कैलास सानप हे तसे टिपिकल निर्माते नव्हतेच. पंचविशी-तिशीतली सामान्य शेतकरी कुटुंबातली मुलं. अजिनाथ तर स्वतः ऊसतोड मजुराचा मुलगा. खरं तर हे वय प्रेमाबिमात झपाटलेलं, हीरोगिरीने पछाडलेलं असतं. दादा-भाऊंचा भक्त होण्याचं, कानाला मोबाईल लावून एक तंगडं वर करून हात हलवत अभिवादन करणारा फोटो मार्केटच्या गावाच्या चौकात लावायचा कसा याचा विचार करणारं, कुठं तरी टपरीवर उभा राहून ‘बस का भावा..’ म्हणत समोरच्याला टाळी द्यायचं... कैलास सानप तर अशाच वयात निर्माता झाला, ज्या वयात समोरच्याला इंप्रेस करायला जे आपल्याजवळ नाही तेही दाखवायची तयारी असते. पण हा पठ्‌ठ्या निर्माता आहे, हे अर्धा सिनेमा होईस्तोवर मलाच माहिती नव्हतं. तो अगदी स्पॉटबॉयचंही काम करायचा. मला त्याचा कामसू स्वभाव आणि प्रामाणिकपणा खूप आवडला. मग आमची छान गट्टी झाली आणि नंतर मला धक्काच बसला. हा तेविशीतला छोकरासुद्धा एक निर्माता आहे! या मुलांना असलेलं सामाजिक भान कशातून आलं, हे मी कुतूहलाने आजही शोधतोय.

मी संहिता लिहिताना माझं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आकलन कुवतीप्रमाणे त्यात पेरलं खरं; पण ती संहिता पुढे मला सिनेमा करायला साथ देणाऱ्या माझ्या त्या सहकाऱ्यांनाही ऐकवायची होती, ज्यांना शेती-मातीबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यातल्या काही जणांनी तर आयुष्यात ऊसही खाल्ला असेल की नाही, अशी शंका होती. (मी ‘रसवंतीवरचा रस’ म्हणत नाही) त्यांना उसाची, ऊसतोड मजुराची गोष्ट सांगायची; तीही आवडली पाहिजे, तरच उपयोग. बरं, मला ‘निर्मात्याला गोष्ट आवडेल का?’ ही शंकाच नव्हती. पण तंत्रज्ञ मंडळींना मात्र याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यात प्रामुख्यानं होते, डीओपी देवेंद्र गोलतकर. देवाला मी ‘नागरिक’पासून मानतो, कारण अतिशय प्रामाणिक माणूस. त्यात शांत. मला शांत माणसं आवडतात. पण हुशार. त्यामुळे मी देवाला अगोदरच टिपून ठेवलं होतं. माझे सहकारी निवडण्याचा अधिकारही मलाच होता.

मी आयुष्यात कधी कुणाला पटवायचा प्रयत्न नाही केला- अगदी त्या देवालासुद्धा. पण ‘या’ देवाला पटवायचं म्हणून खूप सराव केला. तो खूप निरखून-पारखून काम करतो, हे माहिती होतंच. त्याला गोष्ट आवडली तर तो नाही म्हणणार नाही, याची मला खात्री होतीच. पण ती आवडावी म्हणून गोष्ट सांगायचा नीट सराव केला, तो असा –

मी पहिला बंदिस्त टाकीवरचा सिनेमा जालन्यात पाहिला, तो सातवीत असताना. आमच्या सरांबरोबर जिल्हा पातळीवर विज्ञान प्रदर्शनात निवड झाल्यानं गेलो होतो, तेव्हा. तिथंही सरांना मी म्हटलं, ‘‘सर, पिक्चर नगं.. मला फोटो काढायचा...’’ पण सर मला आणि माझा वर्गमित्र उद्धव खाडेला पिक्चरला घेऊन गेले. तेही दोन विरुद्ध एक मतानं ठरल्यानं. उद्धव पिक्चरच्या गाण्याचा शौकिन. त्यानं अगदी चौथीत असतानाच ऐन प्रार्थनेच्या वेळी ‘तंदाना तंदाना तानधिन तंदाना’ हे गाणं म्हणून मार खाल्ला होता. तो अजूनही तसाच आहे. त्याचं सलून आहे. तो आजही जावळापासून ते दशक्रियाविधीचे केस एकाच मूडमध्ये कापतो. (त्याच्याच नावाचं एक पात्र मी ‘चिवटी’त घेतलं.) असा हाडाचा शौकिन असल्यानं त्याचं मत सरांच्या पारड्यात पडलं. तिथं आम्ही पिक्चर पाहिला तो सुनील दत्त यांचा ‘मंगलदादा’. सुनील दत्त खासदार आहेत, हे सरांनी सांगितल्यावर आणखी अप्रूप वाटलं. पुढं बरेच दिवस मी संधी मिळेल तेव्हा त्या पिक्चरची स्टोरी उद्धवच्या साथीनं मित्रांना सांगत होतो. त्यामुळं मला बऱ्यापैकी स्टोरी टेलिंगचा सराव झाला. ‘मंगलदादा’च्या दिग्दर्शकापेक्षा जास्त वेळा ती स्टोरी मी मित्रांना सांगितली असेल. तो अनुभव आत्ता कामी आला.

मी देवेंद्रला चार-पाच तास साभिनय गोष्ट ऐकवली. देवाला ती छान दिसली. देवानं शेवटाबद्दल सुचवलं. एखादा माणूस तयार होत असेल, तर आपण काहीही ‘हो’च म्हणतो. बस्स्‌- तसंच झालं. मी देवाला म्हटलं, ‘‘हो! आपण करू...’’ मला देवाला निवडताना आणखी एका गोष्टीचं भान होतं. आपण तंत्र शिकलेलो नाही. आपल्याला किमान तंत्रात बसवणारे सहकारी पाहिजेत. देवा एफटीआयआयचा विद्यार्थी. तंत्रवाले अडाण्यांना खूप चांगलं सांभाळून नेतात, याचा अनुभव मी दोन महिन्यांपूर्वी मंत्रालयात घेतला होता. मी एका कामानिमित्त मंत्रालयात गेलो होतो. एक अल्पशिक्षित नाही म्हणता येणार, पण शाळेतच न गेलेले मंत्री महोदय ‘प्रति आणि प्रेषक यातला फरक’ आपल्या पीएकडून समजून घेत होते. मला कौतुक वाटलं. त्यांची शिकण्याची जिद्द अजूनही संपलेली नव्हती. विशेष म्हणजे, ते आम्हाला लाजले नाहीत. त्यांना कदाचित असंही वाटलं असेल की, हे यांनाही येत नसावं. आपल्यामुळे तेही शिकतील. पी.ए. बिचारे अदबीनं वाकून कानात सांगत होते.

मीही मग त्यांचा आदर्श घेऊन माझे पाच डिपार्टंमेंटचे सहकारी एफटीआयआयचे निवडले. आर्ट डिरेक्टर- तृप्ती चव्हाण. साऊंड- महावीर साबन्नावार, आदित्य. एडिटर- गोरक्ष खांदे, तर ॲक्टर म्हणून खास एनएसडीचे मिलिंद शिंदे, खुद्द मास्तर डॉ. दिलीप घारे, शंभू पाटील, योगेश शिरसाट, भगवान मेदनकर आणि संभासहित आमचा रंगमळा. रंगमळाला तर पाहायचंच काम नव्हतं. आपल्या घरी लग्न असल्यासारखेच सगळे झटत होते. त्यामुळं माझं काम खूप हलकं होत होतं. सिनेमा बनवायला खूप पेशन्स लागतात, याचा अनुभव लहानपणीच घेतला होता. तसा हा माझा लौकिक अर्थाने पहिला, पण खरं तर दुसरा सिनेमा...

लहानपणी जत्रेत मी एक सिनेमा बनवून पाहिला होता. काहीही तयार व्हायला वातावरणच लागतं- अगदी दळणातले किडे असोत की पावसाळ्यातले पंखांचे घोडे! ज्याचा-त्याचा मोसम असतो. तसा यात्रेच्या हंगामातच आमच्याकडे सिनेमाचा ज्वर चढायचा. माझी काही मोठी चुलत भावंडं मला कधी-कधी राजेश खन्ना म्हणायची. खन्ना, कपूर ही मला दादा, अप्पा, भाऊसारखी टोपणनावं वाटायची. इतकंच काय- नव्या साड्यांच्या, पातळांच्या पॅकिंगवर जेव्हा श्रीदेवीचा फोटो आला, तेव्हा मला वाटलं- हिच्या डोक्यावर मुकुट घालायचा विसरला असेल, म्हणून मी पेनानं तिच्या डोक्यावर मुकुट काढला. तीच कल्पकता चिवटी करताना माझ्या उपयोगाला आली. (अशोक देवकर जेव्हा सीनसाठी उभा राहिला, तेव्हा याच्या हातात दुधाचा कॅन आणि मेळवणीचं टोपलं पाहिजे, असं वाटलं.)

यात्रेतल्या सिनेमात आमचं दर वर्षी वर्कशॉपच व्हायचं. संध्याकाळी पिक्चर संपला की, जणू काय आम्हाला प्रोजक्ट दिलाय, असं डोक्यात घोळायचं. यात्रेत एक दुकान यायचं. पंधरा पैशाला पुंगळी. ज्या नावाची पुंगळी निघेल, ती वस्तू तो दुकानदार द्यायचा. त्यात मोठमोठ्या वस्तू ठेवलेल्या असायच्या. घड्याळ, गाडी, विमान, फोटो. माझा मित्र घडीच्या आशेने ते खेळण्यासाठी थांबला, तर त्याला फिल्मचं एक बंडल लागलं. त्यात पंचवीस फिल्म होत्या. मी ‘बघू दे’ म्हणून त्याच्या हातातून घेतलं. त्याच्यात वेगवेगळ्या हीरो-हिरोईनचे चित्र. मी पटकन खाली खेळायला बसलो. पण मला फिल्मऐवजी नको असलेल्या गोष्टी मिळाल्या. मी त्या दुकानदाराला म्हटलं, ‘‘मला याच्याऐवजी त्या फिल्म द्या.’’ तर तो खऊट माणूस माझ्यावर वसकला. मग मी माझ्या त्या मित्राला म्हटलं, ‘‘मला त्या फिल्म दे,’’ तर त्याला दुकानदार आणि माझ्यातल्या संवादाने आपल्या हातात कोहिनूर-गिहिनूर लागला असं वाटलं की काय, कुणास ठाऊक? तो मला फिल्म द्यायला तयार नव्हता. सेम अनुभव आम्हाला चिवटीच्या एका लोकेशनच्या वेळी बीडला आला. एका व्यक्तीचं घर पसंत पडलं, पण तो शूटिंग म्हटल्यावर देईना. त्याला आमच्याकडून घर विकत मिळेल इतक्या पैशाची अपेक्षा होती. लहानपणी त्या फिल्मवाल्या मित्रानं असंच केलं होतं. मग मी त्याला दोन वस्तू देऊन त्यातल्या अर्ध्या फिल्म घेतल्या.

यात्रेतून आणलेल्या त्या फिल्ममधलं सगळं मोठ्या पडद्यावर बघायचं होतं. त्यात मी शॉर्ट झालेला बल्ब शोधायला लागलो. खरं तर आई फुटलेला- शॉर्ट झालेला बल्ब घरात ठेवणं सोडा, साधं उकिरड्यावरसुद्धा कधीच टाकून देत नव्हती; खत शेतात नेताना काच हाता-पायात घुसतात म्हणून. मग बल्बचा ठरलेला विसर्जन पॉइंट म्हणजे कायमच्या दुष्काळानं बेरोजगार झालेली नदी. मी शोधतशोधत नदीकडं गेलो. तिथं मात्र मला हवे तसे बल्ब मिळाले. मी त्यांना सन्मानाने घरी आणलं. त्यांचं काळं डांबर काढलं. त्यात पाणी भरलं. मी त्याला फिल्म लावून पाहिली, पण मला हवा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि मी अंधाराच्या शोधात लागलो. घरातले दोन आरसे गोळा केले. त्यातला एक फुटलेला असल्यानं माझं काम अगदीच सोप्पं झालं. मी त्यांना चौकटमुक्त केल्यानं प्रत्येक जण स्वतंत्र झाला.

तेव्हाचे हे आरसे म्हणजे माझे सहकारी, तेही असेच पाच-सात होते आणि मी माझ्या सोईनं सूर्याचं ऊन माळवदावरून खोलीत नेण्याचा प्रयत्न सुरू केला. पण एक टप्पा आरसा कमी पडत होता. काय करावं, सुचत नव्हतं. आपल्याकडं उपलब्ध आहेत त्याच्यातल्याच एका तुकड्याचे दोन करावेत का, असं वाटलं पण पुन्हा धस्सं झालं. असा मुद्दाम गुन्हा करण्याइतपत धाडसी मी कधीच नव्हतो. मी आरशाच्या स्टेप बदलल्या आणि आहे त्या उपलब्ध तुकड्यांत सूर्याचा प्रकाश खोलीत आणला. ही गोष्ट एका दिवसात झाली असं नाही, तर अख्खा उन्हाळाभर हाच कार्यक्रम चालला.

तेव्हा तरी आई होती ओरडायला, ‘उन्हात खेळू नका’ म्हणायला. पण चिवटीच्या वेळी आम्हाला कुणाचाच धाक नव्हता. दुष्काळी मराठवाडा दाखवायचा म्हटल्यावर, मराठवाड्याची जानपहचान असणारा उन्हाळा- तोही ‘मे’मधला. त्यात माळरानात, म्हणजे सूर्याचं तापमान. तव्यावर पापड भाजावा अशी माणसं भाजत होती. खास करून मुंबईहून आलेली टीम. डिरेक्शन टीमचा हेड सूरज हा खासा मुंबईहून आलेला गोरागोमटा, पण आमच्यात राहून तोही आमच्यासारखाच झाला. त्याला आम्ही गमतीने म्हणायचो, ‘तू जर घरी गेलास तर आई विचारेल, कोन चाहीए?’ कदाचित इंग्रजही उन्हाच्या भीतीपोटीच मराठवाड्यात आले नसतील. इथं राहिले तर तिकडचे यांना काळे समजायला लागतील! अशा वातावरणात काम सुरू होतं. वातावरण सगळं भारलेलं आणि भाळलेलं.

बीड परिसरात पहिल्यांदाच शूट होतंय आणि तेही आपलीच मुलं करताहेत म्हटल्यावर सहकार्याला सीमाच नव्हती. सिनेमात लग्नाचा एक सीन होता. वंजारवाडीला शूट होतं. गावात आम्ही आदल्या दिवशी सांगितलं, ‘‘उद्या लग्नाचा सीन आहे, तर तुम्ही वऱ्हाडी म्हणून पाहिजे आहात.’’ दुसऱ्या दिवशी सकाळी कॉल टाइमला टीम पोचली तर तोपर्यंत शे-दोनशे माणसांचं वऱ्हाड अगदी गोवर्धन मुहूर्ताला रेडी...! लग्नाचं शूट दोन दिवस चाललं. किमान दोन हजार लोक तरी या सोहळ्याला हजर असतील- अगदी सजून. त्यात कुतूहल या गोष्टीचं की, एक ताई नवऱ्या मुलाला आतओवाळणीही घेऊन आली होती. ती बिचारी मंडपाच्या दारातून दिवसभर हटलीच नाही. तेच जर एखादा ॲक्टर असेल, तर थोडाही विलंब लागायला की लगेच विचारणार, ‘माझं झालं का? मी जाऊ का?’ किंवा ‘माझं नसताना मला का बोलावलं.’ तिथे ना तर कमर्शिलपणा होता, ना चमकण्याची हौस होती.

कमालीचं सहकार्य त्या भागातली माणसं करत होती. एक प्रसंग मला कमालीचा हलवून गेला. वंजारवाडीत शूट चालू होतं. सिंकसाऊंड असल्याने टेकच्या वेळी सगळ्यांना गप्प बसवलं जायचं. अगदी दुसऱ्या गल्लीत काही चाललं असलं, तरी ते शांत व्हायचे. असाच एकदा सीन सुरू असताना एक ताई तिच्या छोट्या लेकराला मांडीवर घेऊन दारातूनच शूट पाहत होती- माझ्या मॉनिटरच्या अगदी हाकेच्या अंतरावरून. मधेच तिचं बाळ रडायलं, तसा बाऊन्सरने ‘सायलेन्सऽऽ’ म्हणून मोठ्याने आवाज दिला. तसा तो आवाज बंद झाला. माझ्या मनात काय आलं, कुणास ठाऊक की- हा आवाज एकदम बंद झाला कसा? म्हणून मी त्या दिशेला सहज वळून पाहिलं, तर तिचा हात बाळाच्या तोंडावर होता! मी ओरडलो, ‘‘तोंड सोडऽ’’. एरवी सेटवर एकदम शांत असणारा मी एवढा कुणावर ओरडलो, म्हणून सगळेच बघायले. कुणाच्याच लक्षात येईना. पण त्या ताईनं माझ्याकडं पाहिलं आणि ते बाळ पुन्हा रडायला लागलं. मग मी ते शांत होईस्तोवर थांबलो.

बीड परिसरात शूट चालू असताना एक सात-आठ वर्षांचा मुलगा रोज शूटला यायचा. पहिले दोन-तीन दिवस तो शूट पाहण्यात गुंगला. नंतर तो माझ्याकडे मॉनिटरजवळ येऊन बसायला लागला. सुरुवातीला बाऊन्सर त्याला तिकडे येऊ देत नव्हते, पण माझं लक्ष गेल्यावर मग मी ‘त्याला येऊ द्या’ म्हणून सांगितलं. मला तो वेगवेगळे प्रश्न विचारायचा. मला अगोदर वाटलं, तो याच गावचा असेल. नंतर कळलं, तो माजलगावहून यायचा. त्याला विचारलं, ‘‘कुणाबरोबर आलास?’’ तर तो म्हणाला, ‘‘आपल्याच बरोबर.’’ दुसरे आलेले म्हणाले शूटिंग पाहायला? तर म्हणाला, ‘‘नाही, काम करायला आलो.’’ जेवणाची वेळ झाली तेव्हा त्याला मी ‘जेवायला चल’ म्हटलं तर तो म्हणाला, ‘‘डब्बा सोबत आणलाय’’ आणि खरंच ‘लंचब्रेक’ म्हणताच त्याचा डब्बा घेऊन एक मुलगा आला. तो थोडा मोठा होता. त्याच्याकडे चौकशी केली असता असं कळलं, त्या छोकऱ्याच्या तैनातीत एक स्कॉर्पिओ, दोन माणसं होती. ती त्याला रोज शूटला घेऊन यायची. पॅकअप झालं की, घेऊन जायची.

मला त्याच्या आई- वडिलांचं कौतुक वाटलं. नाही तर आपला बाप थोडं काही वेगळं करायचं म्हटलं तर डायरेक्ट ‘भिकं मागतान’ म्हणून शाप देऊन मोकळा होणार. मी त्याला सांगून त्याच्या आई- वडील दोघांनाही शूटवर बोलवलं आणि त्या छोट्या राज जगतापला एका सीनमध्ये घेतलं.

बीड परिसर आपलाच असल्यानं मजा यायची. काम जरी मराठवाड्यात करत असलो, तरी वेळ बंबई टाइम. वेळ इतका पाळून की, मी शाळेत असताना प्रार्थनेवेळी कायम गैरहजर, पण शूटच्या वेळी पहिल्याच दिवशी कॉल टाइम चारचा होता. मी पहाटे तीन अठ्ठावनला हॉटेलच्या खाली. त्यात तारा जुळणं म्हणजे काय असतं, याचा प्रत्यय मला आणि गोलतकरांना आला. ते हॉटेलच्या वरच्या मजल्यावर राहायचे आणि मी खालच्या. पहिल्या दिवशी मी पहाटे तयार होऊन दरवाजा उघडला, तर गोलतकर समोरून जात होते. दुसऱ्या दिवशीही सेम तसंच. दरवाजा उघडला, गोलतकर हजर आणि तिसऱ्या दिवशीही दरवाजा उघडला तर ते पायऱ्याच उतरताना दिसताच तेवढ्या पहाटे आम्ही दोघेही हसायला लागलो.

डिरेक्शन टीममधली मुलं भारी होती. मी लगान टीमच जमा केलेली. माझ्यासहित सगळी अडाण्याची फौज. पण प्रचंड हुशार. सगळे वेगवेगळ्या विषयांचे उच्चशिक्षित. जगातलं काही माहीत नाही, असं नाहीच. वेशभूषाकार गीता गोडबोले तशा आमच्यात सगळ्याच बाबतीत सिनिअर. पण मॅडम कशा बेमालूम मिसळल्या, ते कळलंच नाही. एखादा सहकारी साखर कारखाना उभारावा, तसं आम्हाला चिवटीसाठी सगळ्यांचं सहकार्य.

शूट सुरू होण्यापुर्वी मला निर्माता अजिनाथची भाषाच कळेना. नीट कम्युनिकेशन होईना. म्हणून मला अडचण निर्माण व्हायची वेळ आली, तेव्हा संदेश भंडारेसर खास पुण्याहून येऊन सेटवरच हजर राहिले आणि आमच्यातील भाषेची अडचण दूर झाली. काम सुरळीत सुरू झालं. खरं तर कुठलंही काम सलग सुरू राहिलं तर सोपं जातं, पण सिनेमाचं तसं नाही. आपल्याला वेगवेगळे मोसम दाखवायचे असल्यानं वेगवेगळ्या मोसमाची वाट पाहावी लागली. त्यात ऊसतोडणीचा हंगाम हा गरजेचाच. पण कारखाना कसा मिळवावा, या विवंचनेत असतानाच ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पेसरांची आठवण झाली. पुढे सर म्हणजे आमच्यासाठी संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्गच ठरले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, लेखणीचा अवघा महाराष्ट्र चाहता. त्यांनी आमची लोकेशन पाहणीच्या निमित्तानं टूरच काढली. अवघा पश्चिम महाराष्ट्रच नाही, तर कर्नाटक फिरवला आणि पसंतीक्रम देण्यास सांगितलं.

मला परत तेच वाटलं- नुसतं लोकेशनच नाही, तर विचारही जुळले पाहिजेत. म्हणून मी सा.रे.पाटलांच्या विचारांनी दरवळलेला आणि गणपतरावदादा पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या दत्त कारखान्याची निवड केली. सरांच्या शब्दावर दादांनी आमच्या कल्पनेच्याही पलीकडे लाखोंचं मोल फिक्कं पडावं असं काम केलं. दादांसारखा सहकारातला निर्मळ माणूस माझी काही मतं बदलायला कारणीभूत ठरला. दत्तच्या कॅन्टीनची बेसन- भाकरी माझ्यासारख्या सामान्य माणसाला बोलावून घेऊन आवडीने खाऊ घातली. तेव्हाच लक्षात आलं, या मातीत सहकाराच्या गंगेला खांडडोह का नाहीत; ती अव्याहत का वाहते!

सुट्टीत मामाच्या गावाला गेल्यावर आपण जसे हुंदडायचो- बस! तसंच चिवटीचं सेकंड शेड्यूल आम्ही शिरोळच्या दत्त कारखान्यावर केलं. शेड्यूलच्या नेमके आधी चार दिवस नोटबंदी लागली होती. पण आमच्यावर त्याचा शून्य परिणाम होता. म्हणजे आमच्याजवळ बंडलं येऊन पडली असं नाही, पण आम्हाला भक्कम पाठबळ होतं. आम्हाला कारखान्यानं सगळंच उपलब्ध करून दिलं होतं. आम्ही वीस दिवस तिथं शूट केलं... तिथली माणसं खूप मायाळू. शेखर कलगी हे आमच्या व्यवस्थेसाठी दादांनी खास आमच्याकडे पाठवले. शेखर कलाकार. स्वतःचा आर्केस्ट्रा. आमची पत म्हणजे शिरगुप्पेसर आणि शेखर सावलीसारखे आमच्यासोबत म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांच्या सावलीतच हे सगळं केलं.

सिनेमा तीन टप्प्यांत पूर्ण झाला. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पाच महिन्यांचं अंतर. तिसऱ्या टप्प्यात तब्बल दोन वर्षांचं अंतर. महापुरानं दुथडी वाहणारी एखादी नदी भेदताना ऐन धारेत दम कोता पडावा, तशी अवस्था आमच्या अनुभवशून्य टीमची झाली. निर्माता आजिनाथ आणि कैलासची पुरती दमछाक झाली. मी झीरो क्रेडिटचा. मंदिर झालं, फक्त मूर्तीला पैसे नाहीत म्हणून रखडलं. शिरगुप्पेसर आणखी जोमानं कामाला लागले. आम्हाला चार ठिकाणी घेऊन गेले. पण मजुराचा विषय म्हटल्यावर कुणीच करायला धजत नव्हतं. ती त्यांची पैशाची गणितं मांडत. रिकव्हरीचं बोलत. समाज रिकव्हरीचं बघतो. मला का कुणास ठाऊक, पण वाटायचं- बालाजीच्या झोळीत गुप्त दान टाकताना हा विचार सुटतो. सिनेमाची टीम संयम ठेवून होती. हितचिंतक प्रयत्न करत होते. आम्ही जे काही हातात अर्धवट होतं, ते लोकांना दाखवत फिरायचो. कैलास सानपनं तर सिनेमासाठी गाव सोडलं आणि सिनेमा दाखवत, कुठे काही होतंय का ते पाहत फिरायला सुरुवात केली. आम्ही एवढ्या तणावातही हँसी-मजाकमध्ये म्हणायचो - ऊसतोड मजुरांचे प्रश्न मांडताना आपण आपल्यापुढं प्रश्न उभा करून बसलो! इतके पैसे खर्चून जर ऊसतोड मजुरांचा पक्ष काढला असता, तर त्यांचे प्रश्न नका का सुटायनात; आपल्यासमोर तर प्रश्न उभे नसतेच राहिले, उलट आपल्या पुढच्या पिढ्यांचे प्रश्न सुटले असते.

शेवटी काही तरी हालचाल करावी म्हणून आम्ही पुन्हा प्रयत्न केले. अजिनाथने नरेंद्र भिडेंचा डॉन स्टुडिओ गाठला आणि एमजेएम भिडेसरांना सिनेमा आवडला. त्यांनी विषयासाठी आम्हाला बऱ्याच सवलती बहाल केल्या. सरांनीच त्याचं पार्श्वगीतही केलं आणि इकडे एमजेएममध्ये सिनेमाशी संबंधित स्कूल उघडलंय. तिथे शिव कदम काम करतात. गेल्या वर्षी मला एक शॉर्टफिल्म करायची होती, त्यासाठी प्रदीपदादा मला एमजेएमचे सचिव अंकुशराव कदमसरांकडे घेऊन गेले. ‘शिवाजी अंडर ग्राऊंड’मुळे मला ते ओळखत होते. मी त्यांच्याकडे सकाळी अकराला गेलो. तीनदा चहा, एकदा नाश्ता आणि एकदा जेवण होईपर्यंत- म्हणजे आम्ही साडेसहा वाजेपर्यंत बसलो. मला त्यांना शॉटफिल्मला मदत मागता आली नाही. बाहेर आल्यावर प्रदीपदादा खूप चिडले माझ्यावर. पण पुन्हा म्हणाले, ‘‘मला वाटत होतं, मी म्हणू का? पण माझाही तोच प्रॉब्लेम!’’

शेवटी बाहेर पडताना काम चालू असलेलं डिपार्टमेंट शिवने दाखवलं आणि म्हणाला, ‘‘आता लवकरच इथे पूर्ण सिनेमा बनणार, इथे सगळं अव्हेलेबल असणार.’’ मी तेवढंच कुठं तरी डोक्यात घेऊन गेलो आणि परत आलो, ते शिवला भेटायला. शिवने कदमसरांकडे नेलं. मी दिसताच ते म्हणाले, ‘‘आम्ही तुम्हाला शोधतो आणि तुम्ही पुढे पळता!’’ हा त्यांचा मोठेपणा. मी विषय त्यांच्या कानावर घातला आणि म्हटलं, ‘‘थोडं शूट बाकी आहे. डिपार्टमेंटची मदत हवी. शेवटचा दरवाजा म्हणून आलोय.’’ ते म्हणाले, ‘‘पहिला का नाही’’ आणि त्यांनी सांगितलं, ‘‘यांना हवी ती मदत करा.’’ शूट पूर्ण झालं.

विनायक पवारने लिहिलेल्या लावणीला शकुंतला नगरकरांसारख्या अनुभवी कसलेल्या कलावंताने कोरिओग्राफ केलं, तर बेला शेंडेच्या आवाजात आशुतोष वाघमारे यांनी संगीतबद्ध केलं. शीतल साठेचा काळजाला चिरणारा आवाज सिनेमाची उंची वाढवताना काळजात खोल घुसतो. उमेश घेवरीकर आणि डॉ.सूरज अर्दड यांसारखे मदतीचे खूप सारे हात लागल्याने बुडत्याला काडीचा आधार मिळाला. आमच्या रंगमळ्याची मैत्रीण प्राची पिंगळेने सबटायटलला मदत केली आणि सिनेमा पूर्ण झालाय.

पहिलाच बॉल बाउंड्रीपार म्हणावं, तसं पहिली एंट्री ‘मामि’ला पाठवली आणि त्यांचा मेल आला,Congratulations. मला इंग्रजी नीट वाचता येत नसल्यानं खात्रीसाठी देवेंद्रला मेसेज फॉरवर्ड केला आणि कळलं, आपली निवड ‘मामि’च्या इंडिया स्टोरी डिपार्टमेंटला झाली. डिक्लेअर होईपर्यंत कुणाला सांगायचं नाही म्हणाले. तरी कुणालाच नको सांगू म्हणू-म्हणू पाच-पंचवीस जणांना सांगितलं... कधी कधी स्वतःचंच स्वतःला कुतूहल वाटतं, तर कधीकधी हसू येतं. त्यासाठी स्वतःकडं पाहायला वेळ द्यावा लागतो. मात्र स्वतःत गुंतायचं नसतं. आज या ‘चिवटी’च्या निमित्तानं सहज क्षणभर स्वतःकडं पाहावं वाटलं तर.

एक वेळ... आमचं सिनेमा पाहायचं ठिकाण पहिलं- जत्रा आणि दुसरं- फिरती टुरिंग टॉकीज. सिनेमा पाहण्यापेक्षा जास्त आकर्षण तो कसा बनत असेल याचं होतं. लहानपणी तर हे लोक रिळात कसे शिरले असतील... रथ, गाड्या, घोडे, बैल, आपल्यासारखी छोटी-छोटी मुलं... त्यांना पिक्चर संपल्यावर त्या रिळात राहायला करमत असेल का... आता काय करत असतील... म्हणून सकाळीच उठून टॉकिजकडं गेलो होतो. सकाळी-सकाळी पडद्यावर असल्यानं काहीच दिसलं नाही. मग त्यांच्या राहुटीत डोकावून पाहिलं- तर रात्रभर जागून तिकीट विकणारे, भोंगा घेऊन अनाऊन्समेंट करणारे- सगळेच गाढ झोपलेले दिसले. मग एकानं सांगितलं की, हे सगळं शूटिंगच्या वेळी एकदाच जमवावं लागतं. परत हे घेऊन गावोगावी फिरायची गरज नसते. तिथेच कुणी तरी मला एक कटलेली फिल्म दाखवली. नंतर कळलं, हे फोटोसारखच असतं. मग मी ते शोधण्याचा प्रयत्न केला.

आमच्या जांबाच्याच जत्रेत मला त्या फिल्मचं वेडच लागलं. पिक्चरची टाकी उठून गेल्यानंतर काढलेल्या रीळ शोधायला मी यात्रेत गेलो. पण तिथं माझ्या अगोदरच बरेच भावी दिग्दर्शक ते आधीच गोळा करत होते. मी जरा जास्तच बारकाईने पाहिल्याने अर्धवट मातीत पुरल्या गेलेल्या चार- दोन फिल्म सापडल्या. पण मी तिथं हे शिकलो की- सिनेमाला नुसता ध्यासच असून भागत नाही, तर सूक्ष्म नजरही लागते. लोकांच्या नजरेतून सुटलेलं आपण शोधून लोकांच्या नजरेत आणायचं असतं, तेही तुमच्या मातीतलं. कदाचित त्या मातीतली फिल्म उचलायला मला थोडीही शंका, शरम वाटली नाही; म्हणूनच कदाचित ‘चिवटी’सारखा मातीतला विषय हाताळताना मनाला संकोच वाटला नाही....

राजकुमार तांगडे

Rajkumar.tangade@gmail.com

मनातली खदखद लोकांपर्यंत पोहोचवायची आहे!

अजिनाथ ढाकणे

माणूस सापडत नाही म्हणून हा विषय मी क्लोज करणार होतो. पण मला तो विषय पोहोचवायचा होता. राजकुमारसरांना विषय सांगितला. तिथे एकदम उलट अनुभव आला. पाच सिनेमे करणाऱ्या लेखक-दिग्दर्शकांकडून आलेले प्रश्न आणि राजकुमार यांनी दाखवलेली तळमळ अगदीच विरुद्ध होते. ते म्हणाले, ‘मी शेतकरी आहे. मला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांविषयी जाण आहे, पण संपूर्ण माहिती नाही. अभ्यास करून लिहायला वेळ लागेल. लिखाणाचं स्वातंत्र्य लागेल. पटत असेल तर आपण नक्की करू. मी फक्त लिहून देईन.’

प्रश्न - ऊसतोडणी या विषयावर अशा प्रकारचा सिनेमा तयार व्हावा, तो कुणीतरी दिग्दर्शित करावा, तो सिनेमा त्या ताकदीचा व्हावा त्यासाठी आपण आपला वेळ, पैसा, श्रम यांची गुंतवणूक करावी हा विचार कुठून आला? कसं आहे, किती तरी लोकांना वाटतं की- सिनेमा बनवावा, पण तो विचार काही काळानं विरून जातो किंवा प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर, त्यातले अडचणीचे डोंगर पाहिल्यानंतर भले-भले माघार घेतात. तर हा प्रबळ विचार कुठून आला? प्रेरणा कुठून आली?

अजिनाथ ढाकणे - प्रेरणा म्हणाल तर स्वतःचंच जीवन. ग्रामीण भागातील हाल-अपेष्टा समोर दिसत होत्या, माझ्याही जीवनात होत्या. त्यासाठी कोणी तरी काही करावं असं वाटत होतं. ते करण्यासाठी प्रभावी माध्यम पाहिजे. शेतकरी, उसतोडणी कामगारांच्या समस्या लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे वाटलं की सिनेमा हे माध्यम सर्वार्थाने योग्य आहे.

प्रश्न - सिनेमा करावा हा विचार तुमच्या मनात पहिल्यांदा कधी आला?

2013 च्या दरम्यान. याआधी मी एक संतपट केला होता- ‘संत भगवानबाबा’. तो करताना वाटलं की आपल्या समाजाचा प्रश्नही कुणी तरी मांडला पाहिजे. आपणच तो मांडू असं तेव्हा वाटलं नव्हतं, पण कोणीही तो मांडताना दिसला नाही. मित्रांमध्ये सतत चर्चा व्हायची- आपण या विषयावर काही तरी करूया, अशा विचारातून मी हा सिनेमा करण्याचं धाडसी पाऊल उचललं.

प्रश्न - मुळात सिनेमाची आवडच कशी निर्माण झाली? आणि सिनेमाचा प्रोड्यूसर व्हावं, सिनेमा बनवावा हे बीज कुठे, कधी पडलं होतं?

नाटक-सिनेमाची लहानपणापासून आवड होती. गॅदरिंगमध्ये वगैरे भाग घ्यायचो. नाट्यशास्त्र किंवा सिनेमा याचं वेगळं शिक्षण घेतलेलं नाही, पण आवड होती.

प्रश्न - तुम्हाला याआधी कुठले सिनेमे भावलेले होते?

मला ‘भारतीय’ सिनेमा आवडतो. कॉलेजमध्ये असताना ‘गदर’ आवडला होता. त्यानंतर अमिताभ बच्चनचा ‘बागबान’. फार गांभीर्याने सिनेमा कधी पाहिला नाही. कॉलेजमध्ये वगैरे असताना हौस-मौज म्हणूनच सिनेमे पाहिले. अलीकडचा ‘दंगल’ सिनेमा आवडला. मराठीतील फॅन्ड्री, तानी, कोर्ट, किल्ला, ख्वाडा, मुळशी पॅटर्न हे सिनेमे बऱ्यापैकी आवडले. बाहेर काम नसेल तर मी विनाकारण भटकत नाही, टीव्हीवर सिनेमे बघत बसतो.

प्रश्न - तुमच्या व्यक्तिगत जडणघडणीविषयी थोडं सांगा ना...

माझा जन्म शेतकरी कुटुंबातला. ऊसतोड कामगार कुटुंब. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातलं बावी हे माझं गाव. पूर्ण ग्रामीण परिसर, उद्योग व्यवसायाला तिथे वाव नाही. कंपन्या पोहोचलेल्या नाहीत. कोरडवाहू शेती असलेला दुष्काळी पट्टा आहे. त्या भागातील खूप लोक ऊसतोडणीला जातात. त्यांचे हाल लहानपणापासून पाहिलेले. वयाच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी मी ऊसाच्या फडातच दिवस काढलेले आहेत. आई- वडील ऊसतोडणीला जायचे. त्यामुळे त्या परिस्थितीची जाणीव होती. गरीब कुटुंबातील असल्यामुळे शिक्षणासाठी शहरात जाता आलं नाही. ग्रामीण भागातच शिकत होतो. शिक्षणाचाही फारसा परिणाम माझ्यावर झाला नव्हता.

शिक्षण पूर्ण होताना घरच्यांची अपेक्षा असते की, मुलाने काही तरी कमवावं, घराला हातभार लागला पाहिजे. 2002 मध्ये मी बारावी झालो. बारावीपर्यंत टक्केवारी फारच कमी. कंपनीत काम करण्यासाठी 2003 मध्ये पुण्याला आलो. त्यादरम्यान ग्रॅज्युएशन चालू ठेवलं. दहा महिने पुण्यात काम आणि दोन महिने परीक्षेसाठी गावी जायचं. पुणे शहरात ओळखीचं, नातेवाईक किंवा मित्रकंपनी कोणीच नव्हतं. या शहरात खाणं-पिणं- राहणं हा कळीचा मुद्दा असतो. मी अशी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, जी खायलाही देईल आणि राहण्याची व्यवस्थाही करेल, दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील. मग कोथरूडमध्ये एआरएआय कंपनीमध्ये सेक्युरिटी गार्डची पहिली नोकरी केली. पाटोद्याला 2005 मध्ये पीव्हीपी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मग मोठं काही तरी करावं, या उद्देशाने चाकण, वाघोली, हिंजेवडी, तळेगाव इत्यादी ठिकाणी कामे केली. शेवटी रांजणगावला एका कंपनीत काम करताना 2009 मध्ये आर्थिक मंदी आली. परमनंट होण्यासाठी एक महिना राहिला होता आणि मला कंपनीतून काढलं.

कंपनीत परमनंट होऊन काम करण्याचं माझं स्वप्न भंगलं. नुकतंच लग्नही ठरलेलं होतं. कंपनीत मुलगा परमनंट होणार, या अपेक्षेनं मुलीकडच्यांनी लग्न ठरवलं होतं. त्यांना फसवलं जाऊ नये म्हणून मी मुलीकडच्यांना कल्पना दिली की, ‘माझी नोकरी गेली. तुम्हाला मुलगी द्यायची की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा.’ मुलीलासुद्धा सांगितलं, पुढे तिचा स्वप्नभंग होऊ नये. पण ती म्हणाली, ‘नाही. आता आपलं जमलंय. आपण लग्न करायचं. पुढं जे काय दिवस येतील ते आपण मिळून काय ते करू.’ आयुष्यात येणाऱ्या सहचारिणीनं मी झिरो असताना दाखवलेला हा विश्वास होता. 2009 मध्ये लग्न झालं.

गावाकडं जशी पोरं फिरत असतात, तसा मीही चार-सहा महिने फिरत होतो. शासकीय नोकरी मिळू शकत नव्हती. ग्रॅज्युएशन असं बाहेरनं केलेलं. नोकरी मिळत नव्हती. अशा वेळी व्यवसाय हा एकच पर्याय होता. नंतर मी पुणे ते जालना सळई-स्टील ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. माझे मेहुणे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होते, त्यांची मदत झाली. दिवस-रात्र खूप मन लावून काम केलं, व्यवसाय वाढवला. मग तो जो काही तरी नवीन करण्याचा किडा वळवळत होता त्यानं डोकं वर काढलं.

मित्रकंपनीचं मत पडलं की, भगवानबाबांना आपल्याकडे सगळे मानतात, त्यावर एक चित्रपट करू या. पैसे किती लागतील याचा आढावा घेतला. विसेक लाखात पिक्चर होणार होता. तेवढे माझ्याकडे होते. पण एकट्याने नको करायला- कारण आपल्याला त्यामधली काहीच माहिती नाही. म्हणून दोन साथीदारांना बरोबर घेतलं. भगवानबाबांचं चरित्र आत्तापर्यंत कधीही पडद्यावर आलेलं नाही म्हणून ते केलं. आधी झालेला विषय करायचा नव्हताच. नवीन काही तरी करायचं होतं. तो दोन तास चाळीस मिनिटांचा सिनेमा होता. भरत डोंगरे यांनी दिग्दर्शन केलं. लोकांचा रिस्पॉन्स चांगला होता.

वीस लाखात सिनेमा थिएटरात जाणं शक्य नव्हतं. आम्ही त्याची डीव्हीडी तयार केली. सिनेमा बनताना सिनेमा कसा करायचा, तो कसा पोचवायचा हे कळत नव्हतं. सिनेमा पूर्ण झाल्यावरही ते समजलेलं नव्हतं. पण त्या डीव्हीडी घेऊन आम्ही गावोगावी फिरायला लागलो, तेव्हा कळलं की याचं आकर्षण आपल्यामध्ये किती आहे. डीव्हीडी वाटपातून, लोकांच्या प्रतिसादातून आणि सिनेमा किती लोकांपर्यंत पोहोचतो या जाणिवेतून या माध्यमाची ताकद आणि आवाका समजला. लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय आपण यातून हाताळू शकतो असं वाटलं.

प्रश्न - ऊसतोड कामगारांवर सिनेमा करायचा आहे ठरलं, पण मग पुढे हा विचार कसा साकारत गेला?

सिनेमा बनवण्याएवढा मी सक्षम नव्हतो. त्यातला जाणकार माणूस शोधणं गरजेचं होतं. मी आणि माझा संजय भिंगले हा मित्र तीन-चार महिने महाराष्ट्रभरात बारा-पंधरा लेखक दिग्दर्शकांना भेटलो. त्यांनी पूर्वी किमान पाच तरी सिनेमे केलेले असावेत अशी अटच होती आमची. आता असं म्हणणं योग्य की अयोग्य हे मला माहीत नाही, पण माझ्या विचारापर्यंत पोहोचणारा कोणी मला त्या काळात भेटला नाही. सिनेमा बनवण्याचा निर्णय माझा होता आणि मलाच तो सार्थ करायचा होता. म्हणून त्या सर्व लेखक-दिग्दर्शकांना नाकारलं. त्यांची प्रतिक्रिया अशी असायची की, ‘ठीक आहे ऊसतोडणी हा विषय करू या. तुमचं बजेट किती आहे?’, मी म्हणायचो, ‘तीस-चाळीस लाखांपर्यंत आहे.’ (आम्ही ‘चिवटी’ची सुरुवात केली तेव्हा राजकुमार यांनाही तीस लाखांचं बजेट सांगितलेलं. दीड कोटी घालूनही तो पूर्ण झाला नाही हा भाग नंतरचा.)

बजेट मी प्रत्येकाला सांगायचो, ते करूया म्हणायचे. पण त्या विषयाचं गांभीर्य मला त्यांच्यात दिसायचं नाही. आमच्या शेजारच्या गावी संजय भिंगले म्हणून पत्रकार आहेत. भगवानबाबा हा सिनेमा करताना आमची ओळख झाली. ऊसतोडणीवर सिनेमा करायचा हे मी त्यांना बोललो. तेव्हा त्यांनी सांगितलं की ‘एक माणूस आहे- राजकुमार तांगडे. त्याला या विषयाची चांगली समज आहे, पण त्यानं याआधी सिनेमाच केलेला नाही.’ त्यांचं नाटक खूप चालतं. मी आधी त्यांचं नाव ऐकलेलं नव्हतं, नाटक पाहिलेलं नव्हतं. त्यांना भेटायला गेलो.

माणूस सापडत नाही म्हणून हा विषय मी क्लोज करणार होतो. पण मला तो विषय पोहोचवायचा होता. राजकुमारसरांना विषय सांगितला. तिथे एकदम उलट अनुभव आला. पाच सिनेमे करणाऱ्या लेखक-दिग्दर्शकांकडून आलेले प्रश्न आणि राजकुमार यांनी दाखवलेली तळमळ अगदीच विरुद्ध होते. ते म्हणाले, ‘मी शेतकरी आहे. मला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांविषयी जाण आहे, पण संपूर्ण माहिती नाही. अभ्यास करून लिहायला मला वेळ लागेल. लिखाणाचं स्वातंत्र्य लागेल. पटत असेल तर आपण नक्की करू. मी फक्त लिहून देईन.’

त्यांनी आमच्याकडून दोन महिने मागून घेतले. पण सहा महिने काही लिहून दिलंच नाही. आधी दीड महिना त्यांनी आम्हाला नुसतं फिरवलं. ऊसतोड कामगार कसा असतो, त्या लोकांचे विचार कसे असतात हे बघत मुलाखती घेत आम्ही फिरत होतो. महिलांचे प्रश्न आम्हाला विचारता येणार नाहीत म्हणून, अश्विनी भालेकर या राजकुमार तांगडे यांच्या सहकारी आमच्याबरोबर फिरत होत्या. त्या दीड महिन्यानंतर त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. तेव्हा दुष्काळ होता. त्याचा फायदा घेऊन, ‘पंकजा मुंडे यांनी आम्हाला पाठवलं आहे, आम्ही सर्वे करून तुम्हाला मदत करणार आहे’ असं सांगून आम्ही लोकांना भेटत होतो आणि माहिती काढत होतो. राजकुमार म्हणायचे की, ‘मी आधी सिनेमाच केलेला नाही त्यामुळे मला येत नाही.’ पण का कोणास ठाऊक मला त्यांच्याविषयी कॉन्फिडन्स होता. त्यांच्या प्रगल्भतेविषयी विश्वास होता.

प्रश्न - राजकुमारने दिग्दर्शन करायचं हे तर ठरलं. यापुढच्या प्रवासाबद्दल सांगा.

लिखाण पूर्ण होईपर्यंत त्यांना माहिती नव्हतं की आपल्यालाच दिग्दर्शन करायचं आहे. आम्हीही माणूस शोधतच होतो, पण मनासारखा माणूस मिळत नव्हता. रीडिंगच्या वेळी त्यांना सांगितलं की, आता तुम्हालाच दिग्दर्शन करायचं आहे. मग आमच्यामध्ये एक अलिखित करार झाला, लेखन-दिग्दर्शनात मी हस्तक्षेप करायचा नाही आणि आर्थिक व्यवहारात त्यांनी मध्यस्थी करायची नाही. त्यांनी फक्त नावं सुचवायची. समजा त्यांनी संभाजी तांगडेचं नाव सुचवलं तर त्याला किती पैसे द्यायचे हे आम्ही ठरवणार. त्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करायचा नाही. आमचा व्यवहार जमला नाही तर त्यांनी नवा पर्यायही द्यायचा. असे एका भूमिकेसाठी त्यांनी चार-चार पर्याय द्यायचे.

पण प्रत्यक्षात आम्हाला पर्यायांची गरजच पडली नाही. कलाकार आणि तंत्रज्ञ दोन्ही त्यांनीच निवडले. लोकेशनही त्यांनी लिहितानाच सांगितले होते. मी दोन ओळीत त्यांना विषय सांगितला होता आणि त्यांनी त्याची फुलवून दोन हजार पानं केली होती. त्यामुळे दोघांनाही विषयाची माहिती होती. आम्ही सिनेमा करताना दुष्काळच होता आणि तो आमच्या कामी आला असेही म्हणता येईल. तीन वर्षांचा तो दुष्काळ भीषण होता. पहिलं वीस-बावीस दिवसांचं शूट बीड जिल्ह्यातच केलं. बीडजवळ जरुड गाव, गेवराई तालुक्यातलं साठेवाडी हे गाव, शिरूर तालुक्यातील निमगाव व वरगणवाडी अशा तीन चार गावात शूट केलं. अर्ध वर्ष कामगार गावी राहतो, ते अर्ध शूटिंग बीड जिल्हा केंद्रस्थानी ठेवून तीस- चाळीस किलोमीटर परिसरात केलं. त्यांचं उरलेलं अर्ध वर्ष कारखान्यावर जातं, ते अर्ध शूटिंग इकडे जयसिंगपूरला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या आजूबाजूच्या परिसरात केलं.

प्रश्न - हे सगळं करताना अर्थकारण वाढत कसं गेलं आणि जुळत कसं गेलं?

आर्थिक अडचणी खूप आल्या. लिहून पूर्ण झाल्या झाल्याच दिग्दर्शन करायचे ठरले तेव्हा राजकुमारसरांनी सांगितले होते की, ‘एक कोटी तरी आपल्याला पाहिजेत. त्याशिवाय आपल्याला जो विषय मांडायचा आहे तो आपण चांगला मांडू शकणार नाही.’ तेवढे पैसे आपण हातात घेऊ आणि मग शूटिंगला जाऊ असं आम्ही ठरवलं. पण तेवढे पैसे नव्हते. मग मी माणूस शोधायला लागलो. एक-दोन महिने शोधूनही मला मनासारखा माणूस मिळत नव्हता. संजय भिंगले आणि मी वर्षभरापासून या सिनेमासाठी फिरत होतो. तरी गावात-तालुक्यात कोणालाही आम्ही सिनेमा करतोय हे सांगितलं नव्हतं. फक्त घरच्या लोकांना माहीत होतं. कथा लिहून झाली तरीही माणूस शोधत होतो.

दरम्यान कैलास सानपशी माझी ओळख व्यवसायाच्या संदर्भाने झाली होती. तेव्हा त्याला सांगितलं की, ‘असा असा मी सिनेमा करतोय आणि त्यासाठी माणूस शोधतोय. आपली कोणी मित्रकंपनी, पाहुणेमंडळी असतील तर मला 50 लाखांची गरज आहे.’ त्याने मला लगेच प्रतिसाद दिला नाही. पण दोन तीनच दिवसांत त्याने माझ्या बरोबरीने हिंडायला सुरुवात केली. त्यादरम्यान मी माणूसही शोधत होतो, राजकुमार यांच्याबरोबर कथेचे सिटींगसुद्धा सुरू होते, त्यांचा अभ्यासही सुरू होता. कलाकारही हवे होते, तेही शोधत होतो. माझ्याच नातेवाईकांना घेऊन सिनेमा करण्याचा ठप्पा मला नको होता. दोघांच्या सहमतीने कलाकार निवडत होतो. त्या काळात महिनाभर सगळं सोडून कैलास माझ्याबरोबर फिरत होता. मग म्हणाला, ‘मी या सिनेमामध्ये आलो तर चालेल का?’ मी त्याला विचारलं की, ‘सगळ्यात आधी मी तुला विचारलं होतं. महिनाभरापासून माझी वणवण बघत आहेस. माझ्याबरोबर फिरतोय. मला माणूस मिळतच नसताना बघत का थांबलास?’ तो म्हणालो, ‘या क्षेत्रात यावं, सिनेमा काढावा असं कधीही डोक्यातही नव्हतं. पण तुमच्याबरोबर फिरताना तुमची तळमळ पाहिली. या विषयाचं गांभीर्य कळलं. हा विषय पोहोचायला पाहिजे असं वाटलं. आपल्या दोघांच्या मनात एकच खदखद आहे. ती खदखद मलाही लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. इतके पैसे मी देऊ शकतो, मग आपण दुसरा माणूस कशासाठी शोधायचा?’

14 मे, 2016 रोजी शूटिंग सुरू झालं. त्याआधी वर्षभरापासून यावर काम सुरू होतं. वर्षभरापूर्वी मी राजकुमारना भेटलो तेव्हा मला खूप घाई होती. दोन महिन्यात कथा लिहून हवी होती. चालू दुष्काळामध्ये शूटिंग पूर्ण व्हावं असं वाटत होतं. ऑगस्ट 2015 मध्ये मी राजकुमारना टोकन दिलं. कारण याआधीचा त्यांचा अनुभव चांगला नव्हता. चार लोकांनी सांगितलं म्हणून यांनी अभ्यास करून लिहिलं, पण त्यांनी पैसाही दिला नाही आणि सिनेमाही केला नाही. राजकुमार यांनीही माझी परीक्षा घेतली असेलच.

प्रश्न - राजकुमारना तुम्ही सांगितलं की, तुम्हीच दिग्दर्शन करायचं आहे. त्याआधी तुम्ही स्क्रिप्ट पूर्ण वाचलं होतं का?

दोन-तीन टप्प्यांमध्ये स्क्रिप्टचं वाचन झालं. शेवटचा टप्पा वाचून व्हायचा होता. ‘मागे फिरा पतंगांनो’ या नारायणराव मुंडे यांच्या कादंबरीवरून प्रेरित आमची स्क्रिप्ट आहे. आधारित असं नाही म्हणता येणार, पण प्रेरित. पारगावमधील बाळासाहेब गर्कळ यांची ‘उचल’ कादंबरी डोक्यात होती. सिनेमाला ‘उचल’ नाव द्यायचं असंही डोक्यात होतं. मी ते महामंडळात रजिस्टरसुद्धा करून घेतलं होतं. ती कादंबरी राजकुमारनी वाचली आणि म्हणाले, ‘यामध्ये सिनेमा करावा असं मला वाटत नाही’. कादंबरी तीच पाहिजे असं नव्हतं, पण विषय तोच करायचा होता. राजकुमार यांनी काही कादंबऱ्या वाचल्या. ते स्वतः दीड-दोन महिने माहिती घेत फिरत होते. खूप अभ्यास करत होते. त्यांची तळमळ पाहून वाटलं की त्यांनीच दिग्दर्शन करावं.

प्रश्न - आता सिनेमा पूर्ण झालेला आहे. तुम्ही समाधानी आहात का सिनेमाविषयी? तो प्रभावी पद्धतीने मांडला गेलेला आहे असं तुम्हाला वाटतंय का?

सिनेमाच्या बाबतीत मी संपूर्ण समाधानी आहे. त्रास झाल्याचं नैराश्य आहे, पण असमाधानी नाही. सिनेमा सुरू केला त्यावेळी एक कोटीपेक्षा एक रुपयाही जास्त लावणार नाही हे मी क्लिअर केलं होतं. पण फर्स्ट शेड्युल आमचं नव्वद लाखापर्यंत गेलं. तेव्हाच त्याचा आवाका लक्षात आला. मला सिनेमा एक कोटीमध्ये करायचा होता. तुम्हाला विषय माहिती आहे, माझी ताकद माहिती आहे त्यानुसारच तुम्ही सिनेमाचा आवाका ठरवायला हवा होता असं तेव्हा वाटत होतं. म्हणून फर्स्ट शेड्युल झालं तेव्हा असं वाटलं की, आता आपण काय करणार.

मग सेकंड शेड्युल सुरू करण्याआधी आम्ही आर्थिक गुंतवणुकीसाठी पुढचा माणूस शोधायला लागलो. पण आम्ही राजकुमारना दोष दिला नाही, कारण आम्ही त्यांच्या कामावर खूप खूश होतो. आम्ही जितक्या सहानुभूतीने कलाकार तंत्रज्ञांचा विचार केला आणि वागलो तितक्या सहानुभूतीने ते आमच्याशी वागले नाहीत ही खंत राहील. बाकी त्यांच्याविषयी राग, द्वेष नाही. काम अत्यंत उत्तम झालेलं आहे. राजकुमार यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मला ज्या कळकळीने हा विषय पोहोचवायचा होता, त्याहूनही एक पाऊल पुढे जाऊन राजकुमार यांनी तो विषय मांडलेला आहे.

प्रश्न - ‘चिवटी’ला कोणाकोणाच्या मदतीचे हात लागले?

अनेकांचे. सेकंड शेड्यूलसाठी आम्हाला साखर कारखाना हवा होता. राजा शिरगुप्पेसरांच्या शब्दावर जयसिंगपूरचा दत्त शिरोळ सहकारी साखर कारखाना शूटसाठी उपलब्ध झाला. या कारखान्याचे चेअरमन गणपतदादा पाटील यांना ऊसकामगारांच्या प्रश्नांची जाण आहे. शूट संपेपर्यंत रोज शिरगुप्पेसर सेटवर येऊन बसायचे. संजय भिंगले हा माणूस माझ्यासोबत महाराष्ट्रभर हिंडला, हा विषय आपण करूच, हा विश्वास या मित्राने दिला. मध्यंतरी हा सिनेमा रखडला होता, तेव्हा विनोद शिरसाठ यांनी केलेल्या इतर मदतीपेक्षा त्यांनी दिलेले मानसिक बळ आम्हाला इथपर्यंत उपयुक्त ठरलं. आणखीही अशी काही नावे सांगता येतील ऊसकामगारांबाबत तळमळ असणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांनी मिळून केलेला हा सिनेमा आहे. त्यामुळे ‘चिवटी’च्या अख्या टीमचं नाव घ्यावं लागेल. कलाकार, तंत्रज्ञ तर आहेतच पण अनेक बाबतीत सिनेमाच्या कामात अनेकांनी याला हातभार लावला; या सर्वांच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते.

प्रश्न - या काळात व्यवसायाकडे तुम्ही कितपत लक्ष देऊ शकलात?

खूपच दुर्लक्ष झालेलं आहे. सत्य परिस्थिती मी तुम्हाला न सांगितलेली बरी. ऊसतोड लोकांचा प्रश्न समाजापर्यंत पोचवण्याच्या नादात आपण कुठे हरवलोय हेच आता कळत नाही. इतकं आर्थिक नुकसान झालेलं आहे.

प्रश्न - मग सिनेमाच्या या काळात घरची आघाडी सांभाळायला कोण होतं?

स्वतःसोबत सहचारिणी.

(शब्दांकन: मृद्‌गंधा दीक्षित)

अजिनाथ ढाकणे ajinathdhakane1@gmail.com

समाजाचे प्रश्न समाजापर्यंत पोहोचवणे, अंगलट आले...

कैलास सानप

चित्रपट हा फक्त बीड, शिरूर, पारगाव या लोकांना दिसणार नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राला दिसणार. त्यामुळे मला हे माध्यम प्रभावी वाटलं. चित्रपटाशी निगडित बाकी काही मला येत नव्हतं. विचार केला, हा शेतकऱ्यांचा विषय आहे. तर शेतीशी निगडित व्यवसाय करून आपण जे कमावलं ते पुन्हा शेतकऱ्यांचाच प्रश्न मांडण्यासाठी वापरावं. माझ्यामध्ये प्रचंड पॉझिटिव्हिटी आहे. हा विषय आपल्याला टोकाला घेऊन जायचाय, एवढं ठरवलं होतं. फर्स्ट शेड्युल झालं आणि आम्ही शून्यावर आलो. आमचं सगळं बजेट संपलं होतं.

प्रश्न - आज ‘मामि’मध्ये ‘चिवटी’ प्रदर्शित होतोय. तुम्ही या सिनेमामध्ये कसे सामील झालात? यातील तुमच्या वैयक्तिक प्रवासाविषयी सांगा.

कैलास - 2015 च्या आधी माझी आणि अजिनाथदादांची ओळखच नव्हती. आम्ही आमच्या कामानिमित्ताने भेटलो. घाटशिळ पारगाव, तालुका शिरूर, जि.बीड हे माझं गाव. मी शेतीचा लहानपणापासून फॅन. तुम्ही विचारण्याआधीच सांगतो, वयाच्या 28 वर्षांत मी एकही सिनेमा थिएटरला पाहिलेला नाही किंवा टीव्हीवरदेखील संपूर्ण सलग बसून पाहिलेला नाही. सिनेमाचं आणि आपलं काहीच नातं नाही, शेत एके शेत.

लहानपणापासून व्यापार-व्यवसाय-शेती याभोवतीच विचार करायचो. अगदी आठ-नऊ वर्षांचा असताना मी घरची लिंबं घेऊन बाजारात जायचो, त्यासोबत काहीतरी घेऊन एकत्र विकायचो. घरच्यांना काही तरी मदत करावी असं वाटायचं. तेरा-चौदा वर्षांचा झालो त्यावेळी शेतीमधलंही बऱ्यापैकी कळायला लागलं होतं. घरच्यांचे हालही समजत होते. कापूस वेचणीत मी एक्सपर्ट होतो. 110 किलो कापूस एका दिवसात वेचायचो. आमच्या गावात कापसासाठी लागणारे खते, बियाण्याचे एकच दुकान होते. ते दुकानदार 80 टक्के शेतकऱ्यांना उधारीवर बियाणं-खतं वगैरे द्यायचे. उधारीवर तीन टक्के व्याज लावायचे. व्याज तर घ्यायचेच वर कापूस, तूर जे काही पीक असेल त्याचा दरही त्यांच्याच मनाप्रमाणे ठरायचा. मार्केटमध्ये पाच हजार रुपये क्विंटल कापूस असेल तर घाटशिळ पारगावमध्ये 4500 रुपयांचा असायचा. दुसरा व्यापारी पारगावमधून कापूस घ्यायचा नाही. मी दिवसभर कंबरेची आग होईपर्यंत कापूस वेचलेला असायचा. वर ही फसवेगिरी पाहायचो. काळजावर बाण मारल्यासारखं व्हायचं. मी काही बोलायला गेलो तर वडील रागवायचे. ‘ती मोठे माणसं आहेत, बोलू नको.’ असे म्हणायचे.

शेती-शिक्षण असं कॉम्बो करत 2009 मध्ये माझी बारावी झाली. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं होतं. 2013 मध्ये मी कृषिसाहित्य विक्री याच क्षेत्रात उतरायचा प्रयत्न केला. 2011 मध्ये माझ्या ताईचं लग्न मी ठरवलं. शेतीक्षेत्रातीलेच दाजी बघितले. यात माझा स्वार्थ होता असंही म्हणता येईल. 2013 मध्ये मी त्यांना म्हटलं की, ‘मी असा असा व्यवसाय करायचा म्हणतोय, माझे जेवढे जवळचे रिलेटिव्ह आहेत, त्यांचाच कापूस घेऊन मी तुमच्याकडं पोहोचतो.’

इथून मी सुरुवात केली. गावानं मला एवढा सपोर्ट दिला की, मी कल्पनाच करू शकत नव्हतो. दोनेक वर्षात गुजरातला दोनशे ट्रक कापूस गावातून मी पाठवला. सुरुवातीला माझ्याकडे पन्नास हजार रुपयेही नव्हते. तरीही पाच-पाच लाखाचा कापूस लोक माझ्याकडे घालत होते आणि एका शब्दांनी पैशाचे विचारत नव्हते. पण चार दिवसांत पैसे देतो असं सांगून दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरी जाऊन मी पैसे द्यायचो. त्यांनी खूप विश्वास दाखवला. मी बरेच उद्योग करायचो. फर्टिलायझर, बी-बियाणं या कंपन्यांच्या लोकांना गावात आणायचो, त्यांच्याकडून बेसिक माहिती घ्यायचो. मग 2014 मध्ये कृषी उत्पादनांचं दुकान सुरू केलं. आधीच्या दुकानदाराला वाटलं, आता आपल्या बत्त्या गुल झाल्या. पण त्याचं चार पिढ्यांचं कमावून झालेलं होतं आणि मी मात्र शून्यातून सुरुवात केली होती. माझ्या दुकानात लोकांना संपूर्ण स्वातंत्र्य होतं, घरचं दुकान असल्यासारखं.

मग आधुनिक शेती सुरू केली. डाळिंब लावले. पुढे जाऊन ग्रुपशेती करणं हाही माझा प्लॅन होता. माझं संपूर्ण कुटुंब शेतकरी आहे. काका, मामा, चुलते सगळे शेतकरी आहेत. चुलतेवगैरे ऊस- तोडणीला जाणारे. ऊसतोड कामगार आणि शेतकरी हा वेगळा विषय नाही. जे शेतकरी सहा महिने ऊसतोडणीला जाणार तेच शेतकरी सहा महिने गावात असणार, मागं लहान मुलं ठेवून ते जाणार. ती लहान मुलं कापूस उचलणार. सगळे एकमेकांशी निगडित. अजिनाथदादांच्या आणि माझ्या गावात बारा किलोमीटरचं अंतर आहे. 2015 मध्ये त्यांचं पोकलेन आमच्याकडे गाळ काढण्यासाठी आलं होतं. तेव्हा दुष्काळच होता. मला माझ्या डाळिंबाच्या पाण्यासाठी शेततळं खोदायचं होतं. त्यासाठी डोंगराच्या कडेला बसून आम्ही चर्चा करत होतो. त्यांनी मला सिनेमाचा विषय सांगितला, तेव्हा मला वाटलं आपल्याला काहीतरी स्पेशल करावसं वाटतंय ते हेच. माझी तेव्हा तेवढी कॅपॅबिलिटी नव्हती, पण हिम्मत केली. चित्रपटाविषयी मला काहीच माहिती नव्हती.

अजिनाथ : ‘चिवटी’च्या शूटिंगच्या फर्स्ट शेड्युलला कोणाला माहितीच नव्हतं की, हा प्रोड्यूसर आहे. आम्ही असं मुद्दाम ठरवलं होतं की, प्रोड्यूसर म्हणून मी एकटाच पुढे जाईन. एकट्याच्या शब्दाला मान येतो. दोघे असतील तर लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करतात.

कैलास : मी सेटवर स्पॉटबॉय वगैरे पोरासोरां- मध्येच असायचो. प्रोड्युसर आहे असा मी दिसतच नाही म्हणे. माझे हावभाव, बोलणं एकदम पोरसवदा वाटतं. ते कधी बदलेल काय माहिती.

अजिनाथ : राजकुमार तांगडेनाही माहिती नव्हतं सुरुवातीला, हा प्रोड्युसर आहे हे. त्यांनी स्वतःहून याला एक छोटा रोल ऑफर केला.

कैलास : चित्रपट हा फक्त बीड, शिरूर, पारगाव या लोकांना दिसणार नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राला दिसणार. त्यामुळे मला हे माध्यम प्रभावी वाटलं. चित्रपटाशी निगडित बाकी काही मला येत नव्हतं. विचार केला, हा शेतकऱ्यांचा विषय आहे. तर शेतीशी निगडित व्यवसाय करून आपण जे कमावलं ते पुन्हा शेतकऱ्यांचाच प्रश्न मांडण्यासाठी वापरावं. माझ्यामध्ये प्रचंड पॉझिटिव्हिटी आहे. हा विषय आपल्याला टोकाला घेऊन जायचाय, एवढं ठरवलं होतं. फर्स्ट शेड्युल झालं आणि आम्ही शून्यावर आलो. आमचं सगळं बजेट संपलं होतं. नोव्हेंबर 2016 मध्ये दुसरं शेड्युल लागलं. तोपर्यंत प्रोड्यूसर मिळेल असं आश्वासन एका बऱ्यापैकी मोठ्या माणसानं दिलेलं होतं. त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला होता. पण सेकंड शेड्युल सुरू झालं. आठ दिवस झाले तरी त्यांच्याकडून पैसे येईनात. तो माणूस आम्हाला फसवेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. 20 नोव्हेंबरला कोल्हापूरला शूट सुरू झालेलं. तीस तारखेपर्यंतही पैसे आलेले नव्हते आणि पुढे येणारही नव्हते.

आठ नोव्हेंबरला नोटबंदी झालेली. मी निर्णय घेऊन गावी परत गेलो. खूप प्रामाणिकपणे सांगतो, लोकांना फसवण्याचा माझा उद्देश नव्हता. गद्दारी करावी असं नव्हतं. तिकडे कापूस घेणं चालू होतं. नोव्हेंबर-डिसेंबरला कापूस घेतला जातो. नोटबंदीमुळे नवीन नोटा मिळत नव्हत्या. तेव्हा 4700 रुपये दर होता. पुढच्या महिन्यात तो 5000 झाला असता. पण लोकांना माहिती होतं, माझं सिनेमाचं काम चालू आहे. मला पैशांची गरज असेल म्हणून, त्यांनी स्वतःहून 4700 रुपये दर असताना तो कापूस घातला. तो गावातल्या लोकांचा कापूस विकून मी पंधरा दिवसांमध्ये 40- 45 लाख रुपये उभे केले. ते सेटवर आणले. मी त्यांच्या कापसाचे पैसे सिनेमात नेले. त्यांना फसवण्याचा उद्देश नव्हता. (पण आता आठवण झाली की, खूप गिल्ट येतो. मी त्यांच्यासाठी धडपडत होतो, त्यांच्या मनात राज करत होतो. आणि आता त्यांच्या नजरेतून उतरलो.) 2017 च्या मार्चपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही मला काहीही विचारलं नाही. ज्याचा चार लाखाचा कापूस होता तोसुद्धा माझ्याकडे खर्चाला दोन-तीन हजारापेक्षा जास्त पैसे मागत नव्हता. आमचं जाहिरातीचं प्लॅनिंग झालं होतं. ते पैसे दहा पंधरा दिवसात येतील आणि मग कापसाचे पैसे देता येतील असं डोक्यात होतं.

अजिनाथ : हे जाहिरातीचं आम्ही काही हवेत बोलत नव्हतो. फर्स्ट शेड्युलच्या वेळेस आम्ही जाहिरातींसाठी माणूस शोधला होता. मुंबईच्या एका कंपनीशी ॲग्रीमेंट केलं होतं. त्यांनी सात-आठ जाहिराती आणल्या. दिग्दर्शकाला कुठलीही कल्पना न येता, डिस्टर्ब न करता जाहिरातदारांना हवे ते शॉर्ट करून घेतले. ते पेमेंट आम्हाला पंधरा दिवसात मिळणार होतं. मग पारगावच्या शेतकऱ्यांना ते आम्ही देणार होतो.

कैलास : आम्ही शोधलेला तिसरा प्रोड्युसर पैसे देत नव्हता, जाहिरातींचे पैसे यायला अजून वेळ होता. शूट सुरू झालेलं होतं. अशा वेळी आपल्या गावचे लोक आपलेच आहेत, ते कापूस घालायला तयार आहेत, असा विचार करून आम्ही ते केलं. दहा-पंधरा दिवसांत पैसे फिरवण्याचा आमचा प्लॅन होता. पण लोकांच्या प्रश्नासाठी उभा राहिलो, ज्या लोकांचा प्रश्न दाखवण्यासाठी सिनेमा केला, त्याच सिनेमामुळे त्या लोकांना फसवलं की काय असं वाटतंय. या गिल्टमधून 2017 च्या जूनमध्ये मी पारगावचा चौक सोडला. शेतीतून आलेले पैसे लोकांना शेतीतच इन्व्हेस्ट करण्यासाठी लागतात. पण त्या वेळेला मी पैसे देऊ शकत नव्हतो. माझं चौकात दुकान होतं, त्यामुळे 80 वर्षांच्या म्हाताऱ्यापासून शाळेतल्या मुलापर्यंत सगळे तिथे माझे मित्र होते. त्यामुळे मी गाव अजून सोडलेलं आहे. हळूहळू आम्ही ते पैसे फेडतोय. खूप लोकांचे पैसे देऊनही झालेत. काही लोकांचे राहिलेत. पण एकाही माणसांनं अजूनही मला वाकडा शब्द वापरलेला नाही. मी कोणाचा रुपया ठेवणार नाही. सगळे फेडीन.

मी महाराष्ट्र फिरलो, पण खरंच घाटशिळ पारगावसारखे चांगले लोक आणि इतकं चांगलं गाव मी पाहिले नाही. खूप अभिमान आहे, मला माझ्या गावाचा. पहिल्या शेड्युलच्या वेळी टाकलेले पैसेसुद्धा माझ्याकडे तयार नव्हते. तेव्हाच मुळात मी जमीन गुंतवून पैसे टाकले होते. एवढ्या कष्टातून आई- वडिलांनी जमीन घेतलेली. मी ती सावकाराकडे ठेवून त्यातून पैसे उभे केले. पहिल्या एक कोटीच्या शेड्युलमध्येच ते पैसे संपले. मला वाटत होतं की, मी दुकानातून ते कव्हर करू शकेन. पण आता दुकानही ठप्प आहे. पूर्वी लोकांना चार दिवसांत पैसे देत होतो. आता चार वर्षांत देईन. पण देऊ शकलो नाही तर माझं पारगाव कायमचं सुटेल.

कैलास : आमचं शूटिंगचं बजेट दीड कोटीपर्यंत गेलं. सिनेमा पूर्ण झाला आणि परत रुतून बसला. पोस्ट प्रॉडक्शन आता तीन महिन्यांपूर्वी पूर्ण झालं. मधली दोन-अडीच वर्षे काहीच घडलं नाही. आम्ही खूप लोकांना भेटत मिटिंग करत हिंडत होतो. आम्ही फक्त हार्डडिस्क सांभाळत होतो आणि मीटिंगा करत होतो. गाडीतलं पेट्रोल सोडून काही चालत नव्हतं.

प्रश्न : घरच्यांचं काय म्हणणं होतं या दरम्यान?

कैलास : घरच्यांच्या सपोर्टविषयी तर शब्दात कसं सांगावं, मला कळत नाही. देव हा फॅक्टर माझ्या आयुष्यात नाही. मी देवाच्या पाया पडत नाही. माझ्या घरचे- भाऊ, वहिनी हेच मला देव वाटतात. भावाला एक मुलगा आणि मुलगी. भाऊ शेती बघतो. माझं लग्न झालेलं नाही. या ‘चिवटी’च्या पायातच अजून लग्न झालेलं नाही. लोक म्हणायचे, ‘घराचा देव्हारा करून टाकला, सगळी नुकसानी केली.’ भाऊ आणि वहिनीला माहेरचे लोक सांगायचे, वाटणी करून घ्यावी. वहिनीला आणि तिच्या घरच्यांना गावात खूप टॉर्चर झालं. ‘तो पोरगा स्वतःबरोबर तुमचंही सगळं घालवेल, तुमच्या लेकीला काही उरणार नाही’ असं म्हणायचे. पण भाऊ-भावजय एकदम ग्रेट. त्यांनी असं काही केलं नाही. भाऊ मला कधीतरी बोलतो, ‘ते आटप लवकर, संपव ते काम’, पण वाहिनी काही बोलत नाही. मला ती आईच्या जागी आहे.

मी सकाळी चार वाजता जाणार असेल तर ती चार वाजता माझ्या कपड्यांना इस्त्री करून देते. माफ करा मी खूपच भावनिक झालो. पण वहिनी माझ्यासाठी जेवढं करते, तो माझ्यासाठी अत्यंत भावनिकतेचा विषय आहे. हे साठलेलं रडू कधी तरी बाहेर पडणारच होतं. आणि या कामामुळे वैजीनाथ सानप, अंबादास खेडकर, माऊली खेडकर, तुकाराम खेडकर या चार मित्रांचा सिंहाचा वाटा आहे. विशेष म्हणजे माझे मेहुणे संपत ढाकणे यांनी खूप सांभाळून घेतले मला. ऊसतोड समाजाचा प्रश्न समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न किती अंगलट आलाय हे तुमच्या लक्षात येईल.

अजिनाथ : कुठलंही ऐतिहासिक कार्य करायचं असेल तर घरातील लोकांच्या सपोर्टशिवाय ते शक्य नसतं. कैलास : अजूनही घरचे लोक एक शब्दही बोलत नाहीत. याचं मला आश्चर्य वाटतं.

अजिनाथ : मला वाटतं त्यांनी तुझा इतिहास बघितलेला आहे. तुझा उद्देश वाईट नाही याची त्यांना खात्री आहे. एखादा माणूस चुकू शकतो, असा काही तरी धाडसी निर्णय घेऊ शकतो आणि त्याच्यात फसतो, अडकतो, उत्साहाच्या भरात आवाक्या- बाहेरचं काम घेऊ शकतो, असं त्यांना वाटत असेल. पण चांगल्याच हेतूने केलं असंही ते म्हणत असतील.

मुलाखतकार : तुझी स्टोरी ही म्हटलं तर गावाची स्टोरी आहे; एखाद्या गावातून एखादं नेतृत्व कसं वर येऊ शकतं, एखाद्यामध्ये अशी ऊर्जा असेल तर सभोवतालातून त्याला कसा सपोर्ट मिळतो. तसं पाहिलं तर प्रत्येक गावात असा कोणीतरी फसवणारा दुकानदार आहे, पण त्याच्याविरुद्ध कोणी पुढे येत नाही. तुझ्यासारखा जो पुढे येतो त्याला गावातले लोक खूप सपोर्ट करतात. कारण त्यांना हे व्हायला हवं असतं, पण कोण करणार हा प्रश्न असतो.

कैलास : खरं आहे, माझा हाच अनुभव आहे.

(शब्दांकन: मृद्‌गंधा दीक्षित)

कैलास सानप

kailassanap11@gmail.com

हा समूहवेदनेला वाचा फोडणारा सिनेमा आहे!

अश्विनी भालेकर

काही काही अनुभव एवढे सुंदर असतात, रसरशीत असतात की- त्यावर आपण भरभरून बोलू शकतो, पण ते शब्दांत बांधणे कठीण होऊन बसते. कारण मी काही प्रचलित अर्थाने लेखक नाही आणि लेखक होणे एवढे सोपेसुद्धा नाही. परंतु काही आठवणी-स्मृती अशा असतात की, त्यांना लिहून ठेवलं तर त्या दीर्घ काळ आनंद देतात. त्या लिहिण्याचा व त्याला दीर्घकालीन आनंदाचा ठेवा बनवण्याचा हा तोडकामोडका प्रयत्न करत आहे.

‘चिवटी’ या चित्रपटाची मी सक्रिय साक्षीदार आहे. हा चित्रपट बनताना मी सगळ्या प्रवासात काया-वाचा-मनाने सोबत होते. हा प्रवास खूपदा ऊर्जा देणारा होता. या सिनेमाची प्रक्रिया मी खूप एन्जॉय केली. ती स्मरणात राहण्याचे कारण म्हणजे, तो सिनेमा आणि त्याचे मेकिंग. या सिनेमाचे मेकिंग इतर सिनेमासारखे नाही, खूप वेगळे आहे. खूपच अनौपचारिक, खेळीमेळीत हा सिनेमा बनवण्यात आला आहे. जसं की- ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे आमचं नाटक सर्व प्रचलित नाटकांपेक्षा वेगळं होतं, तसंच चिवटी या सिनेमाचंही आहे.

या सिनेमाची गोष्टच ‘हीरो’ आहे. ही प्रचलित कुटुंबकथा नाही, हा समूहवेदनेला वाचा फोडणारा सिनेमा आहे. मला त्याच कारणासाठी खूप आनंद होतोय की, या सिनेमाच्या अगदी सुरुवातीपासून मी राजकुमार तांगडेसरांबरोबर आहे. सिनेमाच्या स्क्रिप्ट रायटिंगसाठी त्यांना जो डेटा लागत होता, त्यासाठी ते खूप अभ्यास करत होते; परंतु काही गोष्टींचा उलगडा कामगार लोकांमध्ये जाऊन, त्या लोकांशी बोलूनच होणार होता. त्या कामगारांचे जगणे, अनुभव, वेदना जाणून घेणं आत्यंतिक गरजेचं होतं. त्यासाठी थेट गावामध्ये जाऊन मुलं, स्त्रिया, पुरुष यांच्याशी आम्ही बोललो आणि डेटा मिळवला. त्यांचे जगणे समजून घेतले. घरादारापासून परागंदा होण्याच्या दुखऱ्या जखमांच्या व्यथा जाणून घेतल्या.

ए.सी.मध्ये बसून शेतकऱ्यांचे, मजुरांचे, स्त्रियांचे प्रश्न मांडणारा हा सिनेमा नाही. आयत्या स्क्रिप्टवर रेषा ओढून तयार झालेल्या सिनेमाच्या पठडीत हा सिनेमा बसत नाही. त्यासाठी सर आणि आम्ही थेट उसाच्या फडात उतरलो. ऊसतोड कामगारांबरोबर बोलून, त्यांचं ऐकून, त्या गावांमध्ये प्रत्यक्ष राहून हे स्क्रिप्ट तांगडेसरांनी लिहिले आहे. माझ्याकडे ऊसतोड कामगार स्त्रियांची माहिती मिळवायची जबाबदारी होती. आम्ही बऱ्याच गावांमध्ये जाऊन स्त्रियांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न, त्यांचे दुःख जाणून घेतले. त्या कामगार स्त्रियांच्या जगण्याचा कडेलोट करणाऱ्या काही घटना, प्रसंग अगदी मन हेलावून टाकणारे आहेत. ते प्रसंग सिनेमातही पाहायला मिळतील.

‘चिवटी’तील बरेचसे कलाकार नवोदित आहेत. मुली तर सर्व जणी नव्या आहेत आणि त्यांची निवड करण्याचे आमचे अनुभवदेखील मजेशीर आहेत. एका कॅरेक्टरसाठी आम्ही बऱ्याच ऑडिशन घेतल्या. कॅरेक्टरमध्ये तंतोतंत बसणारी मुलगी मिळत नव्हती. माझा भाऊ साखर कारखान्यात नोकरीला आहे, तिथे आम्ही सहजच गेलो होतो. माझ्या वहिनीनं तिथली एक मुलगी सुचवली. वहिनी म्हणाली, ‘‘ताई, एक मुलगी आहे, तिला अभिनयाची खूप आवड आहे. सोबत सरही आले आहेत, तर भेटा एकदा त्या मुलीला.’’ मग आम्ही देवकी खरात या मुलीला तिच्या घरी भेटलो. सरांना कॅरेक्टरसाठी जशी मुलगी अपेक्षित होती, अगदी तशीच ती होती. सरांनी तिची ऑडिशन घेतली. पण चित्रपटक्षेत्रात काम करायला सुरुवातीला ज्या अडचणी मला आल्या, त्याच अडचणी तिलाही आल्या. तिचे वडील चित्रपटात काम करू देण्यासाठी अनुकूल नव्हते. त्यांची खूप मनधरणी करावी लागली. ते त्यांच्या नकारावर ठाम होते. मी कायम तिच्यासोबत असणार आहे, असे तिच्या वडिलांना आश्वासनही दिले. शिवाय राजकुमारसर, संभाजीसरांच्या मुलीसुद्धा काम करणार आहेत- हे सांगितले मग तिच्या वडिलांनी होकार दिला.

सिनेमागृहात जाऊन सिनेमा कधीच न पाहिलेली देवकी एका सुंदर सिनेमाचा भाग झाली. त्यानंतर असेच काही खरेखुरे कॅरेक्टर आम्हाला हवे होते. त्याच शोधादरम्यान टिपिकल राजस्थानी मुलगी सीमा भेटली. सरांना अपेक्षित कामही या सगळ्या मुलींनी केले. ‘शिवाजी’नंतर तांगडेसर काही तरी नवं करण्याच्या प्रयत्नात होते. त्यातूनच त्यांनी सिनेमा करायचं निश्चित केलं. त्याचा मला प्रचंड आनंद झाला. कारण ते जे लिहितात त्यात गावमातीचे प्रश्न, गावपातळीवरील जनमानस, बेरकी स्वभावाची माणसं तंतोतंत उतरतात, हे माहिती होतं. समाजाकडे, समाजातील प्रश्नांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हादरवून सोडतो.

‘चिवटी’ माझ्यासाठी अत्यानंद देणारी फिल्म यासाठी आहे की, या फिल्ममध्ये मी अभिनयाबरोबरच सहायक दिग्दर्शक म्हणूनसुद्धा काम केलं आहे. जेव्हा आम्ही रिसर्च करत फिरत होतो, तेव्हाच तांगडेसरांच्या लक्षात आलं की, अश्विनी असिस्ट करू शकेल. त्याचं कारण हे नव्हतं की, मला त्यातलं फारसं काही येत होतं. तांत्रिक गोष्टींबाबत माझी पाटीही कोरीच होती. त्यांनी मला सोबत घेण्याचे खरे कारण हे होते की, मी कुटुंबातली सदस्य असल्यामुळे ते नीट रागावू शकणार होते. भरपूर राबवून घेऊ शकणार होते. त्यांनी जेव्हा माझ्यावर ही जबाबदारी टाकली, तेव्हा मी मागचा-पुढचा विचार न करता तत्काळ होकार दिला. त्यामागे माझाही स्वार्थ होता. जर आपण सरांना असिस्ट केलं, तर आपण जास्तीत जास्त वेळ सेटवर राहू शकू. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतील. केवळ अभिनय करणं असलं, तर तेवढ्यापुरते आपण सेटवर येतो. बाकी वेळ हॉटेलवर रिकामा दवडतो. त्यापेक्षा हे उत्तम, म्हणून मी असिस्ट करायला सहर्ष तयार झाले.

‘चिवटी’चं स्क्रिप्ट लिहून तयार होतं. मी तांगडेसरांना असिस्ट करणार, हेही निश्चित झालं होतं. पण त्यांना तांत्रिक जाण असणाऱ्या चांगल्या असिस्ट टीमची गरज होती. त्या दृष्टीने शोधही चालू होता. काही लोक ॲप्रोचही झाले. त्यांचा त्यातील तांत्रिक अभ्यासही चांगला होता. ‘गोष्ट’ मात्र त्यांना शून्य कळत होती. या नव्या असिस्ट टीमचा भर सूचना देण्यावरच अधिक होता. त्यांनी तो नादच सोडला आणि स्वतःच्या आजूबाजूला असलेल्या लोकांची निवड असिस्ट म्हणून केली. माझ्यासहित हे सर्व जण पहिल्यांदा सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणारे होते. यात आमचा मित्र सूरज खरात या असिस्ट टीममध्ये जॉईन झाला. सूरजने या आधी एक शॉर्ट फिल्म केली होती, त्यासाठी त्याला काही ॲवॉर्डही मिळालेले आहेत. सद्दाम शेख हा सर्वांशी अगदी आदराने बोलणारा मुलगा, ड्रामाचा विद्यार्थी. चंद्रकांत कढरे हा तर सिनेमाशी काहीच संबंध नसलेला, पण प्रचंड अभ्यासू होता. त्याला सरांनी सहेतुक सोबत घेतले. चंद्रकांतच्या बाबतीत सर म्हणायचे की, ‘हा आपली कन्टिन्युटी अशा पद्धतीने पाहील की, त्यात चुका कमी असतील.’ आमच्यासोबत नितीन गायकवाड नावाचा मित्र होता, जो ललित कला शाखेचा विद्यार्थी आहे. त्यानंतर सुहास मुंढे, कार्तिक तांगडे अशी आमची वेगवेगळी खासियत असणाऱ्या सहायक दिग्दर्शकांची टीम तयार झाली.

आमच्या टीमला सरांनी क्रमवारी ठरवून दिली नव्हती, की हा फर्स्ट ए.डी. अन्‌ हा लास्ट ए.डी. वगैरे. जो-तो आपापली कामं चोख करण्याचा प्रयत्न करीत असे. कुठलेही काम सेटवर सांगितलं गेलं, तर ही मंडळी त्वरित करायची. नंतर आम्हाला बरीच अशी कामं माहिती झाली जी प्रॉडक्शनची होती, तरीही आम्ही ती कामं करायचो. आमची मैत्रीण अन्‌ ‘चिवटी’ची आर्ट डायरेक्टर तृप्ती चव्हाण यावरून नेहमी हसायची. अशा पद्धतीने आमच्या या नव्या टीमने काम केलं. कामांची आम्ही कधीच विभागणी केली नाही. सगळे जण सगळीच कामं अगदी नेटाने, सहर्षपणे करत राहिलो. शेवटपर्यंत आमच्यात जिम्मेदारी कोणाची, अशी कॅटेगरीच पडली नाही.

आम्ही 2016 च्या मे महिन्यामध्ये 47-48 डिग्री तापमान असताना बीड जिल्ह्यातील गावांमध्ये चित्रीकरणाच्या पहिल्या शेड्यूलची सुरुवात केली. त्या रखरखत्या उन्हात आम्ही झपाटल्यासारखे शूट करत होतो. कामाची धुंदी एवढी होती की, त्यातून ऊनसुद्धा जाणवत नव्हतं. म्हणजे उन्हाचा चपाटा होताच, याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नव्हता. माझी तर भलतीच मज्जा यायची. एकीकडे- ए.डी.च्या टीमसोबत सर्वांच्या अगोदर सेटवर हजर राहावं लागायचं. माझा सीन लागला की, लगेच आर्टिस्ट म्हणून उभं ठाकावं लागे. आर्टिस्ट आहे तोपर्यंत ठीक असायचं, पण पुन्हा सीन संपला की कोणी तरी येऊन ‘ए.डी.ऽऽ’ म्हणूनच माझ्यावर हमखास ओरडणार. पण ते ओरडणं गोड आणि प्रेमळ होतं. आमचे रंगमळावाले तर मुद्दाम मला त्रास द्यायचे. वरतून ‘तू ए.डी. कशाला झालीस?’ म्हणून माझी खेचत राहायचे. त्यात संभाजी तांगडेसर तर माझी भारीच मज्जा घ्यायचे.

‘चिवटी’मध्ये माझं पात्र हे ऊसतोड मजूर स्त्रीचे आहे. त्यात दलित वस्तीची नेताही. कोणालाही तोंडावर बेधडक बोलणारी, पुरोगामी अशी ती व्यक्तिरेखा आहे. सुंदरा असं तिचं नाव. या रोलच्या तयारीसाठी मी जेव्हा रेकी करत होते, तेव्हा खूप स्त्रियांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि सुंदरासारखी महिलाही मला यादरम्यान भेटली. त्याचा बराच फायदा मला या पात्रासाठी झाला.

‘चिवटी’पूर्वी काही सिनेमांमध्ये छोटे-छोटे रोल केले आहेत, पण तेवढ्या वेळेपुरतेच सेटवर जाणे व्हायचे. ‘चिवटी’च्या रूपाने मात्र मोठी फिल्म अनुभवायला मिळाली. तांत्रिक गोष्टींशी आपला तसा काही संबंध येत नसतो; परंतु ‘चिवटी’च्या निमित्ताने सिनेमाचा बराच तांत्रिक भागही नीट समजून घेता आला, जवळून अनुभवता आला. देवेंद्र गोलतकरसर आणि आमच्या टीमची खूपच गट्टी जमली. त्यांनी गोष्टी खूप सोप्या करून सांगितल्या. त्याचा फायदा आता दुसऱ्या सेटवर काम करताना नेहमी होतो. या सिनेमामध्ये दिग्गज कलावंत आहेत- मिलिंद शिंदे, संभाजी तांगडे, योगेश शिरसाट.

आणि विशेष म्हणजे आमचे निर्माते हे कोणी गडगंज संपत्तीवाले प्रस्थापित निर्माते नसून ऊसतोड कामगाराचा एक मुलगा आहेत, तर दुसरे शेतकरी. त्यांनी हे जगणं खूप जवळून अनुभवले आहे, तर राजकुमार तांगडेसरांसहित सर्व कलाकार शेती- मातीशी निगडित असणारे आहेत. ‘चिवटी’त बरेच नवोदित कलाकारही आहेत, त्यामुळे जुन्या-नव्यांची चांगली भट्टी जमून आली आहे. गेली सतत तीन-चार वर्षे या सिनेमावर आम्ही काम करत आहोत. तीन तास निवांत बसून, विरंगुळा म्हणून पाहावयाचा हा सिनेमा नसून हे एक धगधगतं वास्तव आहे. चित्रपटात चित्रबद्ध झालेला ऊसतोड कामगारांचा जीवनानुभव माणसाला हेलावून सोडतो. हा भोगवटा आहे ऊसतोड कामगारांच्या अनेक पिढ्यांचा. हे दुखणं आहे या कामगारजमातीचं. त्यामुळे या सिनेमाकडे आम्ही केवळ सिनेमा म्हणून पाहू शकत नाही.

आम्ही काही नाईट शिफ्ट केल्या होत्या, म्हणून संपूर्ण टीमने एक ऑफ घेतला. सरांनी आम्हाला आवर्जून आराम करायला सांगितलं होतं. परंतु ते वातावरणच एवढं भारावलेलं होतं की, आराममधला ‘आ’सुद्धा कुणी तोंडातून काढला नाही. आम्ही नाश्ता उरकून नरसोबाचीवाडी येथील तीन नद्यांचा संगम पाहण्याकरता निघालो. तेव्हा पाणी कमीच होतं. मी उत्साहानं पाण्यात उतरत होते, पण अचानक माझा पाय निसटला आणि पायऱ्यांवरून घरंगळत खाली पडले. माझ्या डाव्या पायाला छोटंसं फ्रॅक्चर झालं. सोबतच्या सर्वांची माझ्यामुळे मज्जाच झाली. ‘हुंदडू नका’ म्हणून सरांनी तंबी दिली होती, पुढे सीन आहेत याची जाणीवही करून दिली होती; पण योगायोगाने पुढचे दोन दिवस माझा सीन नव्हता म्हणून जमलं.

दुसऱ्या दिवशी सरांना माझ्या अपघाताचं माहिती झाल्यावर त्यांनी मला हॉटेलवर जाऊन आराम करायला सांगितले. हॉटेलला मी गेले खरी, पण माझा सगळा जीव सेटवर लागलेला होता. सकाळीच सेटवर जायची सवय लागली होती, त्यामुळे मला हॉटेलमध्ये अजिबात करमेना. मी तसाच पाय घेऊन सेटवर गेले आणि पूर्ण दिवस तिकडेच थांबले. आमच्यासाठी ते वातावरण एवढं ऊर्जादायी होतं की- पिळलेलं, मुरगळलेलं, मोडलेलं, आजारी पडलेलं त्या काळात कुणीच मनावर घेतलं नाही.

सहायक दिग्दर्शक म्हणून काम करताना मला बऱ्याच लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं; कारण मी जे गाव पाहत आले, जगत आले, ज्या गावात राहते तेथील माणसं, तेथील संस्कृती, त्यांचं राहणीमान मला खूप जवळून माहीत आहे. आपले लोक पेहराव घालतात अगदी तसेच कपडे असावेत, जसे तोडके- मोडके दागिने असतात तेच दागिने आपल्या पात्रांच्या अंगावर असावेत- असा सरांचा आग्रह होता. आणि ते तसेच आहेत का, हे पाहणं ही माझी जिम्मेदारी होती. मग मी जेव्हा आमच्या कलाकारांना हे सांगायला जात असे- तेव्हा त्यांना राग यायचा. जसे की- वास्तविक ऊसतोड मजूर स्त्री गळ्यात कधीच लांब मंगळसूत्र घालू शकत नाही, कारण ते तिच्या कामाला अडसर ठरतं. ती कधीच नीटनेटकी वेणी घालू शकत नाही, कारण तिच्याकडे तितका वेळच नसतो. मी हे कलाकारांच्या लक्षात आणून दिले. त्यावर मतभेद व्हायचे. पण हे मतभेद अगदी थोडा वेळच असायचे.

एके दिवशी आम्ही उसाच्या फडातून कारखान्याला गाड्या घेऊन जातो, असा सीन होता. सीनप्रमाणे एकामागोमाग आठ-दहा गाड्या घेऊन आम्ही निघालो. थोडं पुढे आल्यावर मी ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीत एक पिशवी दिसली (म्हणजे त्या गाड्या लोकांच्या भरून चालेल्या होत्या, आमचे कॅरेक्टर त्यात बसवले होते) तर, ती पिशवी मी उघडली. त्यात बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा माझ्या हाती लागला. मी त्यांची परवानगी न घेताच भाकरी खायला सुरुवात केली. इतर गाड्यांवर जे कलाकार होते, त्यांनीही मूळ गाडीवानाच्या भाकरी सोडून खायला सुरुवात केली. सीन एकदम जिवंत रूपात शूट झाला. विशेष म्हणजे, त्या भाकरी त्या लोकांनी खाऊन उरलेल्या होत्या, तरीही आम्ही भाकरीवर रपटा लावला.

माझी मैत्री कुणासोबतही खूप लवकर होते- विशेषतः कोणत्याही वयोगटातील लोकांबरोबर होते. आम्ही जिथे शूट करत होतो- ती कारखान्यावरच्या कामगारांची वस्ती होती. त्यांच्या खोप्यांमध्ये शूट चालले होते. सगळा दिवस तिथेच जायचा. मग माझी तिथल्या एका स्त्रीशी ओळख झाली. तिचं नाव किस्किंदा. मी तिला किस्किंदावहिनी म्हणत असे. त्या मला रोज त्यांच्या वेळेनुसार जेवायला बोलवत. आमच्यासाठी बनणारं सेटवरचं जेवण मी त्यांना देत असे अन्‌ त्यांनी चुलीवर बनवलेली गरम भाकरी, ठेचा, भाजी मी खात असे. त्या वहिनींनी आम्हाला खूप मदत केली. त्या वस्तीवरचं शूट संपून लोकेशनचं पॅकअप झाल्यावर मला एकदम गहिवरून आलं.

चिवटी या सिनेमाशी मी जोडली गेल्याने मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. शिकण्याबरोबरच भरभरून जगता आले. या सिनेमाने मला समृद्ध केले. असे पुन: पुन्हा जगता यायला हवे. हा सिनेमा आता तयार आहे. ‘मामि’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याची निवडही झाली आहे. ‘मामि’मध्ये निवड होणे ही आमच्यासाठी खूपच आनंद देणारी बाब आहे. प्रेक्षकांनाही हा सिनेमा खूप आवडेल, अशी अपेक्षा आहे.

अश्विनी भालेकर

हा सिनेमा आपल्याला सवय असलेला नक्कीच नाही!

शंभू पाटील

मी तसा हौशी रंगभूमीवर काम करणारा, जळगाव या निमशहरी गावामध्ये नाटक करणारा माणूस आहे. फिल्ममध्ये काम करण्याचा अनुभव नाही. पण सिनेमा हा नेहमीच आस्थेचा विषय राहिला आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक यांच्याशी चांगली मैत्री असल्याने, या माध्यमातल्या अनेक गोष्टी माहीत आहेत. सर्व प्रकारचे सिनेमे बघत असल्यामुळे उत्तम सिनेमा काय असतो, हे निदान समजतं तरी. जगभरातले सिनेमा बघितलेले असल्यामुळे मराठी सिनेमाची मर्यादा (मराठीचं प्रेम गृहीत धरूनसुद्धा) कळते.

या पार्श्वभूमीवर, नाटक या माध्यमातला दिग्दर्शक सिनेमा कसा करेल, याची शंका मनात होतीच. अर्थात, राजकुमार तांगडे म्हणजे कृषिजनसंस्कृती परंपरेतून आलेली नम्रता आहेच, तसा ठाम पण आहे. समोरच्याचं ऐकून घेण्याची सवय आहे. साधेपण आहे, पण आपल्याला काय करायचंय हे पक्कं माहीत असलेला माणूस आहे. यामुळेच तो आवडतो.

शूटिंगसाठी बीडला पोचलो, माझा रोल तसा छोटासाच. आमदाराचं कॅरेक्टर. बीडच्या 45 डिग्रीमध्ये उघड्या माळरानावर दिवसभर शूटिंग होतं. सतत नाटकात काम केलेल्या माणसाला शूटिंग हा तसा त्रासदायक वाटणारा प्रकार आहे. पण दिग्दर्शक म्हणून राजकुमार अत्यंत शांततेने व संयमाने हाताळत होता. त्याच्यासोबत त्याचा डीओपी गोलतकर हादेखील असाच शांत, परफेक्शनचा आग्रही असलेला माणूस. या दोघांमधलं सामंजस्य बघण्यासारखं होतं. सर्व सहकारी हे काही ॲक्टर, तर काही नॉनॲक्टर. या सगळ्यांचं मिळून जे काही सुरू होतं, त्यातून एक गोष्ट मात्र लक्षात येत होती. ती म्हणजे- हा नियमितपणे आपण बघतो, तसा किंवा आपल्याला सवय असलेला सिनेमा नक्कीच नाही. काही तरी वेगळं होणार, केवळ वास्तववादी सिनेमा इतकंच त्याचं स्वरूप असणार नाही. वास्तववाद हा त्याच्या मुळाशी आहेच, ऊसतोड कामगार व तत्सम लोकांच्या जगण्यावरचा सिनेमा हे त्याचं वेगळेपण आहेच; सिनेमाची भाषा, सिनेमाची एकूण ट्रीटमेंट, दिग्दर्शकाचा या माध्यमाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि या फिल्मचं व्याकरण हे परस्परविरोधी होतं. इथेच काही तरी वेगळी गंमत होऊ शकते.

राजकुमारचे कृषिपरंपरेतले अनुभव आणि त्याची खेड्यामधली अस्सल अभिनेत्यांची टीम या सगळ्यांच्या मिश्रणातून तयार होणारा एक माहौल- मातीशी जोडला गेलेला अनुभव- असं सिनेमाच्या शूटिंगमध्ये कळत होतं. थोडक्यात सांगायचं तर, या संपूर्ण फिल्मला मातीचा वास होता. अर्थात आपल्याला असं वाटतं, पण प्रत्यक्ष फिल्म बघितल्यानंतरच फिल्म काय असेल, हे कळतं. मी अजूनही फिल्म बघितलेली नाही; पण या एकूण तीन दिवसांच्या शेड्युलमध्ये मला आपण वेगळ्या फिल्ममध्ये काम करतो आहोत, हे नक्की जाणवत होतं.

मराठी चित्रपटांचे कौतुक करताना सर्वच लोक मराठी चित्रपटाला कथानक असतं, असं कौतुकाने बोलत असतात. मराठी चित्रपटाची कथा ही जर त्याची ताकद असेल, तर तीच त्याची मर्यादाही आहे. गोष्ट महत्त्वाची; पण केवळ गोष्टीसाठी हे माध्यम नाही, तर त्यातील असंख्य गोष्टींसाठी ते आहे. यामुळे ‘चिवटी’ची गोष्ट सलग नाही किंवा गोष्ट सांगायची म्हणून फिल्म नाही, हे राजकुमारचे म्हणणे मला आवडले. जे सांगायचं, जे म्हणायचं त्यातला अंतर्विरोध असेल किंवा एकूणच आपल्या समकालीन स्थितीचं दर्शन असेल असं काही या चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर आणणं हे मला वेगळं वाटलं.

माझा रोल आमदाराचा असल्याने चाराछावणीला भेट देणारा सीन मला करायचा होता. चाराछावणी नावाची गोष्ट तशी मी कधीच बघितली नव्हती. दुष्काळात गुराढोरांना चारा देण्यासाठी अन्नछत्र आल्यासारखं सरकार चाराछावणी उभारतं. या चाराछावणीमध्ये तिथली गुरंढोरं, माणसं या सगळ्यांचे मिळून तयार होणारे वातावरण आणि त्यात आमदाराचा प्रवेश होतो.

या सर्वच गोष्टी मला नव्या होत्या. मुळात जगण्याच्या पातळीवरती आपल्या मर्यादा इतक्या आहेत की, सत्ता नावाची गोष्ट काय ते आपल्याला कळत नाही. सत्ता हा शब्द सतत वापरून आपण गुळगुळीत केलेला आहे. शब्द कळतो, पण सत्ता म्हणजे काय हे खरंच आपल्याला कळत नाही. शरद पवार हे शरद पवार असतात, म्हणजे काय? मोदी हे मोदी असतात, म्हणजे काय? याची पुसटशीही जाणीव आपल्याला होत नाही. अशा वेळी चाराछावणीला आमदार म्हणून भेट देणे आणि आपल्या येण्यामुळे चाराछावणीतील बदललेलं वातावरण, माणसांची धावपळ किंवा माणसांचे प्रश्न घेऊन येणारी माणसं, त्यांची धावपळ, त्यांची लगबग आणि कोणाच्याही येण्याने काहीही फरक न पडलेली गाईगुरे- हा फरक फारच मस्त होता. त्यांचं पोषण व्हावं म्हणून एखाद्या अनाथाश्रमासारखं गुरांना उघड्यावरती ठेवलेलं आहे. चाराछावणी आणि निर्वासितांची छावणी यात तसा दर्जात्मक फरक काय? इथे राहणारी गुरं आणि त्यांचे मालक यांच्यात फरक काय? आता हे सगळं फिल्ममध्ये कसे दिसेल? माहीत नाही. पण अशा वेगळ्या दृश्यांनी हा सिनेमा सजलेला असेल.

चेहरा नसलेल्या माणसांची गोष्ट दाखवण्याचे धाडस म्हणजे हा सिनेमा आहे. आपल्या जगण्याच्या परिघावरदेखील ज्यांना स्थान नाही, अशा लोकांना फिल्मच्या केंद्रस्थानी आणून त्यांचं जगणं दाखवण्याचा प्रयत्न समांतर चित्रपटांनी अनेक वेळा केला आहे. आता समांतर आणि व्यावसायिक असा भेद नाही. अनेक विषयांवर अनेक नवे दिग्दर्शक नवनवीन पद्धतीने सिनेमा करत असतात. पण तरी ऊसतोड कामगार हा चित्रपटाचा विषय बनवणे, हे कोणत्याही काळात धाडसाचंच काम आहे.

चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक हे कोणत्या अडचणीतून गेले आणि त्यांनी काय सोसलं आहे, काय अनुभवले याचा मी अप्रत्यक्ष साक्षीदार आहे. मराठवाड्यातल्या रखरखत्या उन्हात केवळ माती नाही, तर माणसंही भाजून निघतात. त्यांचं भाजणं किंवा जळणं हे केवळ नैसर्गिक नाही, तर तो व्यवस्थेचाही एक भाग आहे. हे जसं जगण्याच्या पातळीवर नियमितपणे घडतंय, तसंच या फिल्मच्या पातळीवरही घडलं आहे. कृषिसंस्कृतीचा माणूस हार मानत नाही, एक वर्ष नाही पिकलं म्हणून दुसऱ्या वर्षी तो पेरत नाही असं घडत नाही. त्याला या पराभवाची सवय आहे. त्याच पराभवाच्या परंपरेत अनेक नकार पचवत, सगळ्या संकटांवर मात करत फिल्म पूर्ण झाली. या फिल्मची ‘मामि’मध्ये निवड झाली आहे; अजून काय हवं?

शंभू पाटील

(हॅशटॅग : साप्ताहिक साधना, साधना दिवाळी अंक 2019, हा सिनेमा आपल्याला सवय असलेला नक्कीच नाही!, शंभू पाटील, चिवटी, सिनेमा, मराठवाडा, ऊसतोडकामगार, साखर कारखाना, चित्रपट, weekly Sadhana, Sadhana Diwali issue 2019, Ha cinema aaplyala savayicha asalela nakkich nahi!, Shambhu Patil, Chiwati, cinema, Marathwada, sugarcane labourers, Sugar factory, film)

संवाद कमी, दृश्य जास्त हे याचे शक्तिस्थान!

दिलीप घारे

या व्यवस्थेनं ऊसतोड कामगारांच्या आयुष्यातील जीवनसत्त्व, रस शोषून घेतल्यावर उरते ती चिवटी. मी या विचारानंच अस्वस्थ झालो. हा चित्रपट जिथं ऊसतोड कामगार जास्त आहेत, त्या बीड जिल्ह्यातील गावात चित्रित झालाय. या प्रश्नाची भयावहता-दाहकता तीव्रपणे समोर येते. गावंच्या गावं जेव्हा ऊसतोडीसाठी बाहेर पडतात, तेव्हा गावात फक्त म्हातारी माणसं आणि लहान मुलं असतात. अशा वेळी ही म्हातारी माणसं चिंताग्रस्त असहाय वाटतात. गावं बकाल, भयावह वाटतात. अंगावर काटा येतो हे दृश्य पाहून. ऊसतोड कामगारच नव्हे, तर कुठल्याही कामगारांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचं काम चिवटी हा चित्रपट प्रभावीपणे करतो.

स.भु.महाविद्यालय औरंगाबाद येथून नाट्यशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणून निवृत्त झालो आणि ठरवलं- आता सेकंड इनिंग सुरू करायची. ही सेकंड इनिंग कुणाबरोबर सुरू करायची, हेही ठरवून टाकलं होतं. त्यातील काही नावं- अरविंद जगताप, कमलेश महाजन, राजकुमार तांगडे, मंदार देवस्थळी, परेश मोकाशी, सतीश राजवाडे, विनोद लव्हेकर आदी. विनोदाने मित्रांना म्हणायचो की, सेकंड इनिंग कुणाबरोबर सुरू करावी, हे भारतात दोघांनाच कळालंय. एक- अमिताभ बच्चन आणि दोन डॉ.दिलीप घारे. माझा प्रवासही त्याच दिशेनं सुरू झाला. ज्यांना नाटक-सिनेमाच्या ग्लॅमरपेक्षा ग्रामरची ओढ आहे, अशाच माणसांबरोबर काम करायचं ठरवलं होतं. वर नमूद केलेली सर्व मंडळी आशय- विषय-भाषा-मांडणी यात वेगळेपण जपणारी आहेत. नाटक असो वा चित्रपट- सर्व घटकांचं कंपनांत रूपांतर करून अनुभूती देणारी आहेत.

तो दिवस आला, राजकुमार तांगडेशी माझी भेट झाली. खरं वास्तव लिहिणारा हा लेखक आहे. चिमटे काढत, सालटी काढत अंतर्मुख करायला लावणारा आहे. ग्रामीण भाषेची नाळ तुटू न देता, त्यातील गोडवा व अस्सलपण जपण्याचं कसब त्याला जमलेलं आहे. अशा रंगकर्मीसोबत काम करण्याचा योग आला. राजकुमार सिनेमा करतोय, असं कानांवर आलं होतं. ‘चिवटी’ या नावापासूनच कुतूहलही निर्माण झालं होतं. मला आठवतंय- राजकुमारची आणि माझी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात अचानक भेट झाली आणि त्यानं मला विचारलं, ‘‘सर, एक सिनेमा करतोय. काम करणार का?’’ मी खूश झालो. कारण रंगभूमीवर तसेच चित्रपटात आवडणारी जी मोजकी मंडळी आहेत, त्यांत राजकुमारचा क्रमांक खूप वरचा आहे. मी क्षणाचाही विलंब न लावता ‘हो’ म्हटलं. विषय आणि भूमिकेबद्दल विचारलं, तर म्हणाला, ‘‘ऊसतोड कामगाराशी संबंधित विषय आहे.’’ मी मधेच शंका उपस्थित केली, ‘‘कामगार आणि मी? बघ हं.’’ तर तो विश्वासानं म्हणाला, ‘‘हा खूप वयस्क शेतकरी आहे. वय झालेली मंडळी ऊसतोडीसाठी जात नाहीत.

दुसरी गोष्ट- फावल्या वेळात दुकानावर बसत असल्याने वजन वाढलेलं आहे, बी.पी. व शुगर आहे. वारकरी संप्रदायाचा माणूस असल्यामुळं भजन-कीर्तनाची आवड आहे. गावात पाराकडं फेरफटका मारणं, समाजकार्याची आवड- असं गावाकडचे अण्णाटाइप कॅरेक्टर आहे.’’ माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या आणि मी होकार दिला.

‘चिवटी’ या नावाच्या प्रेमातच पडलो. उसाच्या वरचं रसहीन कव्हर म्हणजे चिवटी. उसातील सगळा रस काढून घेतल्यानंतर उरते ती चिवटी. या व्यवस्थेनं ऊसतोड कामगारांच्या आयुष्यातील जीवनसत्त्व, रस शोषून घेतल्यावर उरते ती चिवटी. मी या विचारानंच अस्वस्थ झालो. हा चित्रपट जिथं ऊसतोड कामगार जास्त आहेत, त्या बीड जिल्ह्यातील गावात चित्रित झालाय. या प्रश्नाची भयावहता-दाहकता तीव्रपणे समोर येते. गावंच्या गावं जेव्हा ऊसतोडीसाठी बाहेर पडतात, तेव्हा गावात फक्त म्हातारी माणसं आणि लहान मुलं असतात. अशा वेळी ही म्हातारी माणसं चिंताग्रस्त असहाय वाटतात. गावं बकाल, भयावह वाटतात. अंगावर काटा येतो हे दृश्य पाहून. ऊसतोड कामगारच नव्हे, तर कुठल्याही कामगारांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचं काम चिवटी हा चित्रपट प्रभावीपणे करतो.

गाव, गावातील माणसं, नमुने, सामाजिक पर्यावरण, संबंध, स्वार्थ, हेवे-दावे अशा सगळ्याच गोष्टी परिणामकारकतेनं या सिनेमात मांडल्या आहेत. गावातील बारीक-सारीक व्यवहार देवेंद्र गोलतकरांचा कॅमेरा परिणामकारकतेनं दाखवतो. आणखी प्रभावित करणारी बाब म्हणजे- सिनेमासाठी गावांची केलेली निवड. माणसांचे नमुने, भाषा, भाषेतील वैविध्य, ग्रामीण भाषेतील सहजता, लय, गोडवा आणि पटकथा-संवाद. एका बाजूला माहिती देणारे त्याचे संवाद व्यवस्थेवर प्रभावी भाष्यही करतात. या चित्रपटात संवाद कमी आहेत, दृश्य जास्त बोलतात. हे या चित्रपटाचे शक्तिस्थान आहे.

चित्रपट हा छायाचित्रणकलेचा विकास आहे; नाटक किंवा अभिनयाचा नव्हे, हा विचार ‘चिवटी’ अधोरेखित करतो. सिनेमासाठी लोकेशन्स अशी निवडली आहेत की, ती केवळ पार्श्वभूमी न वाटता जे म्हणायचंय त्याचा अविभाज्य भाग होऊन जातात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे- या चित्रपटासाठी निवडलेली सर्व मंडळी ग्रामीण पार्श्वभूमी असलेली, भाषेतील लय व गोडवा माहिती असल्यामुळे वर्षानुवर्षे त्याच गावात राहतात, असा विश्वास वाटतो. सर्व कलावंतांची भाषा, शारीरभाषा, व्यवहार खरेखुरे वाटतात.

राजकुमारची काम करण्याची शैलीही अनौपचारिक असल्यामुळे दडपण आलेच नाही. तो सीनही छान समजावून सांगायचा. ग्रामीण जीवनाचा तसेच ग्रामीण व्यवहाराचा त्याचा सूक्ष्म अभ्यास आहे, हे सतत जाणवत राहायचं. खूप खोलात जाऊन अभ्यास करून त्यानं हा सिनेमा लिहिलाय आणि बनवलाय. मला खात्री आहे, हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या चांगल्या प्रातिनिधिक सिनेमांपैकी एक असेल. मला एक माणूस म्हणून आणि कलावंत म्हणून समृद्ध केलंय या ‘चिवटी’नं. आयुष्यभर मी शिक्षक राहिलो, पण या सिनेमात आज्ञाधारक विद्यार्थी म्हणूनच योगदान दिलंय. आपल्या मातीचा सुगंध असणाऱ्या अशा चित्रपटाचा मी एक भाग आहे, याचा मला कायम अभिमान वाटत राहील.

दिलीप घारे dilipghare@gamil.com

भूमिकेत शिरायचा विचारच मनात आला नाही...

कल्पना जगताप

‘चिवटी’ चित्रपटाने खूप प्रश्न निर्माण केलेत डोक्यात. अजूनही ती लहान मुलं, राब-राब राबणाऱ्या बायका, धारदार ऊसाच्या पात्याच्या कितीतरी जखमा अंगावर सोसत ऊस तोडत असतात. रात्री चक्क डोक्यावर बॅटऱ्या लावून ऊस तोडला जातो. दिवसा ऊसात जायची भीती वाटावी तिथे रात्रीसुद्धा ऊसतोडणी चालू असते. विंचू, साप यांची भीती असतेच, पण घाबरून सांगणार कुणाला अशी परिस्थिती. तसंच चालत राहायचं. राबत राहायचं. भूमिकेत शिरणे वगैरे गोष्टीचा विचारसुद्धा मनात आला नाही.

‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकामुळे राजकुमार तांगडे एक शैलीदार आणि अभ्यासू लेखक म्हणून माहिती होते. नाट्यशास्त्राची पदवी घेताना मी याच नाटकावर प्रबंध सादर केला होता. त्यामुळे त्यांनीच लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ‘चिवटी’ या चित्रपटात अभिनय करायची संधी मिळाली याचा विशेष आनंद होत होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण चित्रपटाचा विषय. ‘चिवटी’ म्हणजे ऊसाशी संबंधित काही असेल हे माहिती होतं, पण ऊसतोड कामगारांची परिस्थिती एवढी भयंकर असेल याची जाणीव नव्हती.

‘चिवटी’ सिनेमा उसतोड कामगारांच्या प्रश्नावर फक्त भाष्य करत नाही, त्यांचे वास्तव आपल्या डोळ्यासमोर आणतो. चित्रपटाची संहिता वाचतानाच अंगावर काटा आला होता. आपल्याला अभिनय करायचाय याचा विसर पडला होता. कारण आपल्या आसपास माणसं एवढं अवघड जीवन जगत असतात, हे कधी जाणवलं नव्हतं. विषय ऊसतोड कामगारांचा असल्याने बीड, जालना, कोल्हापूर अशा भागात चित्रीकरण झालं. शेत, कारखाना अशा ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शक्य तेवढं वास्तव चित्रीकरण करण्याचा प्रयत्न या चित्रपटात केलाय. कामगारांचे जग, त्यांची जीवनशैली याचं वास्तव आणि बारकाईने केलेलं चित्रण आहे. राजकुमार तांगडे, दिलीप घारेसर यांच्यामुळे आपण एका चांगल्या टीमसोबत काम करतोय हा आनंद होता. पण जसजशा ऊसतोड कामगार स्त्रियांच्या भेटी होत गेल्या, त्यांच्या समस्या कळत गेल्या, तसतसा प्रचंड अस्वस्थपणा वाढू लागला. भूमिकेसाठी विशेष तयारी करायचा प्रश्नच नव्हता. ते सगळं डोळ्यांनी दिसत होतं, आपणच ते भोगतोय असं वाटत होतं. पहाटे तीनपासून दिवस सुरू होतो ऊसतोड कामगारांचा. रात्रीच करून ठेवलेली न्याहारी सकाळी सोबत घेऊन ते गाडी भरायला, ऊसतोडीला निघतात. बैलगाडी, ट्रक, ऊसाच्या मोळ्या बांधून भरतात. मग बाकी गोष्टी. पुन्हा काम. यादरम्यान त्यांची लहान मुलं झोपडीतच राहतात. हे सगळं त्यांच्याशी भेटून-बोलून कळत होतं. एक नऊ वर्षांची मुलगी आपल्या दीड- दोन वर्षांच्या भावाला सांभाळत होती. तिच्याशी बोलताना लक्षात आलं की, आई-वडील इकडे असल्यामुळे तिला शाळाच नव्हती. भावाला सांभाळायला ती सतत सोबत फिरत असते. एवढीशी मुलं, पण केवढी जबाबदारी आलीय त्यांच्यावर. वर्षानुवर्षे, पिढ्यान्‌पिढ्या हेच चालू आहे. कुणी त्यांच्या आयुष्याची दखलसुद्धा घेत नाही. एवढी हुशार चुणचुणीत पोरं, शाळेत गेली तर किती उज्ज्वल भविष्य असेल त्यांचं. पण...

‘चिवटी’ चित्रपटाने खूप प्रश्न निर्माण केलेत डोक्यात. अजूनही ती लहान मुलं, राब-राब राबणाऱ्या बायका, धारदार ऊसाच्या पात्याच्या कितीतरी जखमा अंगावर सोसत ऊस तोडत असतात. रात्री चक्क डोक्यावर बॅटऱ्या लावून ऊस तोडला जातो. दिवसा ऊसात जायची भीती वाटावी तिथे रात्रीसुद्धा ऊसतोडणी चालू असते. विंचू, साप यांची भीती असतेच, पण घाबरून सांगणार कुणाला अशी परिस्थिती. तसंच चालत राहायचं. राबत राहायचं. भूमिकेत शिरणे वगैरे गोष्टीचा विचारसुद्धा मनात आला नाही. ही सगळी कृत्रिम भाषा झाली. समोर एवढे दुखाचे डोंगर दिसत असताना आपण आपल्या भूमिकेचा काय विचार करणार? सगळं आपोआप खरंखरं दिसत गेलं. अस्वस्थ करत गेलं. खरा खरा ऊस तोडताना जाणवत गेलं, जगणं किती कठीण आहे. आणि तेच सगळ्या कलाकारांच्या बाबतीत घडत गेलं. सगळे एकरूप झाले होते त्या जगाशी.

राजकुमार तांगडे यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. त्यांनी लेखक म्हणून अर्धं काम आधीच करून ठेवलेलं होतं. चित्रपट कागदावर वाचतानाच दिसत होता. तसातसा तो उतरत गेला. छायाचित्रण पण खूप दर्जेदार आहे. एकूण सगळ्या टीमने ऊसतोड कामगारांची वास्तव कहाणी जगासमोर आणण्यासाठी घेतलेले कष्ट लवकरच बघायला मिळताहेत हे महत्त्वाचं. हा सिनेमा जगासमोर येणं महत्त्वाचं आहे. कारण हा विषय जास्तीत जास्त लोकांसमोर गेला पाहिजे. अशा महत्त्वपूर्ण विषयावरच्या सिनेमाचा आपण एक छोटा भाग आहोत याचं समाधान आहे.

कल्पना जगताप

Kalpanajagtap13@gmail.com

लोक ओळखत नव्हते, हे शूटिंगवाले की ऊसतोड मजूर?

किशोर उढाण

मी काम केले नसून राजकुमारसरांनी माझ्याकडून करून घेतले. सेटवरचे वातावरण खूप मजेचे असायचे. सगळे हसत-खेळत राहायचे. मुळात मी ऊसउत्पादक शेतकरी असल्याने ऊसतोड़ कामगार जवळून पाहिलेले होते, ते कसे ऊस तोड़तात, ऊस गाडीत कसा भरतात, उसाचे वाढे कसे विकतात... म्हणून मी जे पाहतो, ते करताना खूप मजा आली. दुसऱ्या शेड्यूलमध्ये सिनेमाचं शूट कोल्हापूरजवळ शिरोळच्या परिसरात होतं. तेथील दत्त सहकारी साखर कारखाना, ऊसतोड कामगार यांच्यात आम्ही एवढे मिसळून गेलो होतो की- ज्या वेळेस आम्ही फडात जायचो त्या वेळेस आम्हाला कोणी ओळखत नव्हते, की हे शूटिंगवाले आहेत की खरंच ऊसतोड मजूर!

‘चिवटी’ हा माझा पहिला सिनेमा. या पहिल्या सिनेमात खूप काही शिकलो. मी मराठी सिनेमाचा खूप मोठा चाहता आहे. आमचे एक शिक्षक नेहमी म्हणायचे- एक चांगला सिनेमा पाहणे म्हणजे एक चांगली कादंबरी वाचल्यासारखे आहे. सिनेमा चांगला असावा, म्हणून मी नेहमी सिनेमा पाहतो. विशेष म्हणजे मराठी सिनेमे खूप आशयप्रधान असतात, म्हणून आवडतात. मराठी सिनेमा, नाटक यांचा तसा माझा प्रेक्षक म्हणून संबंध आहे. त्यामुळे सिनेमा पाहायचो; पण सिनेमात काम करायला मिळेल, असे कधी वाटले नाही.

मी आमच्या गावात गणपती उत्सवात नाटक करायचो. गावात स्टेज नसल्यामुळे गावच्या वेशीत फक्त पाठीमागचा पड़दा लावून नाटक करायचो. नाटकाची आवड़ असल्यामुळे नाटक- सिनेमाविषयी पेपरमध्ये वाचायचो. मराठी रंगभूमीवर 2012 मध्ये ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाविषयी वाचले. त्यात जालना येथील शेतकरी कलाकार आहेत, असे समजले. मग मी औरंगाबादला हे नाटक पाहिले ते खूप आवडले. तिथून मला अभिनयाची आवड़ निर्माण झाली. या नाटकाचे लेखक राजकुमार तांगडेसर याच्या संपर्कात आलो. ‘चिवटी’ सिनेमाचं कास्टिंग चालू होतं.

आजही तो दिवस आठवतो. दि. 28 एप्रिल, 2016 रोजी सरांचा फोन आला की, तुला सिनेमात काम करायचं आहे. मला हे सगळं स्वप्न असल्यासारखंच वाटत होतं आणि दड़पणही होतं. सरांनी आपल्याला संधी दिली आहे, आपल्याला जमेल का? पण ते म्हणायचे, ‘‘तू चांगलं करशील. चांगली संधी आहे, जीव लावून कर.’’ मी ठरवले होते, जे सर सांगतील तेवढेच करायचे.

दि.14 मे, 2016 रोजी ‘चिवटी’ सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं. त्या दिवशी शूटिंगचा शुभारंभ आणि त्याच दिवशी दिवसभर माझे सीन लागले होते. सीन दोघांत होता- माझ्यासोबत देवकी खरात होती. तिचाही पहिलाच सिनेमा. आम्ही दोघेही नवखे होतो. शुभारंभासाठी खूप लोक आले होते. पहिला सीन बीड जिल्ह्यातील जरुड या गावात डोंगरावर होता. खेड्यात शूटिंग बघायला खूप लोक येतात. मीही कॅमेरा, साउंड हे प्रथमच बघत होतो. त्यांच्यासारखाच होतो. काही लोक मला येऊन बेस्ट ऑफ लक देत होते, तसतसे मला टेंशन येत होते. मी पूर्णपणे घाबरलो होतो.

राजकुमारसरांनी ओळखले, मग मला समजावून सांगितले, ‘‘समोरच्या गर्दीकडे लक्ष देऊ नकोस, तू तुझ्या डायलॉगवर लक्ष दे. तुझ्यासमोर कोणीही नाही, असे समजून काम कर.’’ साउंड रोलिंग, कॅमेरा रोलिंग, ॲक्शन... हे मी पहिल्यांदा ऐकत होतो. माझ्या आयुष्यातला पहिला सीन मी पाच टेकमध्ये दिला. त्यानंतर हळूहळू काम करत गेलो. ‘चिवटी’च्या सेटवर प्रा. दिलीप घारेसर, संभाजी तांगडेसर, यांच्यासोबत सीन करताना दड़पण यायचे. त्यांनी खूप मार्गदर्शन केले. घाबरू नको, असं राजकुमारसर म्हणायचे. जमतंय, तुला जमतंय, असे म्हणून त्यांनी माझ्याकडून काम करून घेतले.

आजपर्यंत मी खूप ऐकले होते- सेटवर ॲक्टरला नाही जमले तर डायरेक्टर खूप ओरडतात, अपमान करतात. पण ‘चिवटी’च्या सेटवर जवळपास 50-60 दिवस आम्ही होतो, सर कोणालाच ओरडले नाहीत. याउलट ज्या-ज्या वेळेस अडचण आली, त्या-त्या वेळेस तांगडेसरांनी जवळ घेऊन मनातली भीती घालवली आणि प्रोत्साहन दिले. म्हणूनच म्हणतो, मी काम केले नसून राजकुमारसरांनी माझ्याकडून करून घेतले. सेटवरचे वातावरण खूप मजेचे असायचे. सगळे हसत-खेळत राहायचे. मुळात मी ऊसउत्पादक शेतकरी असल्याने ऊसतोड कामगार जवळून पाहिलेले होते, ते कसे ऊस तोडतात, ऊस गाडीत कसा भरतात, उसाचे वाढे कसे विकतात... म्हणून मी जे पाहतो, ते करताना खूप मजा आली.

दुसऱ्या शेड्यूलमध्ये सिनेमाचं शूट कोल्हापूरजवळ शिरोळच्या परिसरात होतं. तेथील दत्त सहकारी साखर कारखाना, ऊसतोड कामगार यांच्यात आम्ही एवढे मिसळून गेलो होतो की- ज्या वेळेस आम्ही फडात जायचो त्या वेळेस आम्हाला कोणी ओळखत नव्हते, की हे शूटिंगवाले आहेत की खरंच ऊसतोड मजूर! सिनेमाचे निर्माते अजिनाथ ढाकणेसर, कैलास सानप, सगळे कलाकार आमचे कॅमेरावाले गोलतकरसर, कॉस्च्युमवाल्या गोडबोले मॅडम, लाइटवाले, आर्टवाले, अगदी आमचे स्पॉटदादा असतील- आम्ही सगळे हसून-खेळून राहिलो. एका कुटुंबासारखे राहिलो. आजही आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. आज सिनेमाचं नाव जरी काढलं, तरी ‘चिवटी’ सेटवरच्या आठवणी ताज्या होतात.

किशोर उढाण

गीतलेखनासाठी ‘चिवटी’ तीन वेळा पाहिला, तिन्ही वेळा रडलो...

विनायक पवार

मी आत्तापर्यंत गीतलेखनाची गरज म्हणून ‘चिवटी’ तीन वेळा पाहिला आहे. तिन्ही वेळा रडलो. दिग्दर्शक आणि निर्मात्याचं नातं काय असतं, याची व्याख्याच तांगडे आणि ढाकणे यांनी सिद्ध केली आहे. मी या चित्रपटाचा भाग बनू शकलो, याचा मला अभिमान आहे. एक विलक्षण अनुभव देईल असा ‘चिवटी’ तयार झालेला आहे. जागतिक पटलावर मराठी झेंडा फडकविण्यासाठी नवे विषय हाताळणाऱ्या कलावंतांना आपण पाठबळ द्यायला हवं. एका अलक्षित मोठ्या वर्गाचं जगणं समजून घेण्याची संधी ‘चिवटी’ देणार आहे.

ऊसतोड ही संकल्पना माझ्यात खोल रुतून बसलेली आहे. रस्त्याने जाणाऱ्या ऊसाच्या गाड्या पाहिल्या तरी मी गहिवरतो... मला माझा भूतकाळ आठवतो. मी पोटात असताना आई ऊसतोड करीत होती. अगदी 2004 पर्यंत आई-बाबांची ऊसतोड सुरू होती. त्यामुळे हा विषय पडद्यावर यावा, असं मला खूप वाटायचं. समाजातील कामगार आणि इतर ही वर्गवारी स्पष्ट आहे. सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे मराठवाड्यातील दहा-पंधरा एकरवालाही दिवाळीला उचल घेतो. गुराढोरांसह कारखान्याची वाट धरतो. शाळेत असणाऱ्या चिमण्यांचा हात सोडवून काळजावर दगड ठेवणाऱ्या अनेक आया मी पाहिल्या आहेत. ती रडापड अजूनही माझ्या कानांत घुमते. कारखाना परिसरात या कामगारांच्या वाट्याला येणारी दमदाटी, अपमान या सगळ्यांशी माझी घट्ट ओळख आहे. ही पाचटाची चाळ कुणी हौसेखातर बांधत नाही. आतड्यांच्या आवाजावर नाचणे ही विचित्र शरणागती आहे.

अनेक महत्त्वाच्या विषयांपासून आपला मराठी चित्रपट अद्याप दूर आहे. असंभवतेच्या भोवऱ्यात तो गटांगळ्या खातोय. खरा मातीतला चित्रपट यायला सुरुवात झालीये. पण ‘माझ्या चित्रपटाने व्यावसायिक शिखरे निर्माण करायला हवीत,’ या अपेक्षेने निर्मातामंडळी झपाटली आहेत. जो पेरतो त्यांनी उगवण्याची आस बाळगावी यात गैर असं काही नाही. कारण फक्त भूमिकेसाठी आयुष्य पणाला लावायला हा काही हरिश्चंद्राचा काळ नाही. मात्र चांगला सिनेमा करण्याच्या नादात लोकप्रिय सिनेमा तयार होतो, हे दुर्दैव.

व्यावसायिक मंडळी याला जबाबदार आहेत. प्रेक्षक म्हणून बदलत्या अभिरुचीच्या शेवाळावरून चालणाऱ्या सामान्य माणसाचाही यात दोष आहे. हा माणूस बसवर दगड मारतो, जाती-धर्मासाठी दुकाने जाळतो, सिनेमा बघायलाही जातो. याला वाटतं- तो बघतो त्या चित्रपटाच्या नायकाने एका फाइटमध्ये दहा जण लोळवावेत. त्यातील नायिकेने कपडे थोडेच आणि पारदर्शक घालावेत. छान द्व्यर्थी विनोद असावेत. एका मध्यमवर्गीय नेणिवेला झेपेल असा संघर्ष त्यात असावा व शेवटी नायकाचा विजय व्हावा- ही त्याची चित्रपटाची व्याख्या आहे. आपला आजचा चित्रपट बदलत्या आणि सपक अभिरुचीचे अपत्य आहे. समाज आणि कलांचा जनकजन्य संबंध आहे. समाजाच्या मनोभूमिकेला कलावंत बळी पडतो, पण कलावंताच्या समंजस मांडणीमुळे समाजाच्या मनोभूमिकेत बदल घडू शकतो.

तर, माझा मित्र संतोष दहिवाळचा फोन आला. तेव्हा मी इचलकरंजीला नोकरीनिमित्त होतो. म्हणाला, ‘‘अरे, आम्ही शिरोळला आहोत. राजकुमार तांगडे ‘चिवटी’ नावाचा सिनेमा करीत आहेत.’’ मनात वाटलं- ‘चिवटी’ जर ऊसतोड कामगारांवर असेल आणि राजकुमार तांगडे दिग्दर्शक असेल, तर यात आपली गाणी असावीत.’

मी लोकेशनवर पोहोचलो. तांगडेसरांनी खूप छान स्वागत केलं. ‘गाणं वाजू द्या’चा उल्लेख करून युनिटशी ओळख करून दिली. शूटिंग सुरू झालं. आम्ही बराच वेळ थांबलो. शूटिंग थांबलं. राजकुमार तांगडेंना बोलायचं माझं धाडस झालं नाही. संतोषला विचारलं, ‘‘गाणी कोण लिहितोय ‘चिवटी’ची?’’ तो म्हणाला, ‘‘सिनेमात गाणीच नाहीत.’’ मनात म्हटलं- जाऊ दे, गाणीच नाहीत म्हटल्यावर विषय संपला. इचलकरंजीला परत आलो. माझ्यासाठी ‘चिवटी’ प्रकरण संपलं होतं.

दि.26 किंवा 27 एप्रिल, 2019 चा दिवस. जरा उशिरानेच म्हणजे दुपारी कॉलेजमधून बाहेर पडताना मोबाईल वाजला. तिकडून आवाज, ‘‘सर, नमस्कार... ‘चिवटी’चा निर्माता ढाकणे. ‘चिवटी’साठी गाणं हवंय.’’ मी शॉक्ड. ‘आंधळा मागतो एक डोळा’ असं झालं मला. मोबाईल चालू होता, पण पुढील बोलणं मला कळतच नव्हतं. त्यांनी नंतर ठेवला. मी बायकोला फोन केला. विष्णू पाटीलला फोन केला. तो म्हणाला, ‘‘कोर्टात आहे, नंतर बोलतो.’’ मी म्हटलं, ‘‘बोलू नकोस, फक्त ऐकून घे. ‘चिवटी’साठी गाणं लिहायचंय.’’ मला खूप आनंद झाला होता. दोन कारणं होती. एक तर- सिनेमाचा विषय आणि दुसरं- तो राजकुमार तांगडे करीत आहेत.

दरम्यान, माझी इचलकरंजीहून पेणला बदली झाली. अजिनाथ ढाकणे, कैलास सानप, तांगडेसर येऊन गेले. गीतलेखन सुरू झालं. मी मूळचा नाटकवाला असल्याने दिग्दर्शकाचे समाधान महत्त्वाचे मानतो. एक लावणी लिहिली. काही प्राध्यापक मित्रांना ऐकवली. त्यांना ती आवडली. त्यांनी छान दाद दिली. तांगडेसर, ढाकणेसरांना ही लावणी खूप आवडली. ‘एका नजरेने लुटला गाव’... संगीत आशुतोष वाघमारे यांनी दिले. बेला शेंडे यांचा आवाज लाभला आहे.

मी आत्तापर्यंत गीतलेखनाची गरज म्हणून ‘चिवटी’ तीन वेळा पाहिला आहे. तिन्ही वेळा रडलो. दिग्दर्शक आणि निर्मात्याचं नातं काय असावं, याची व्याख्याच तांगडे आणि ढाकणे यांनी सिद्ध केली आहे. मी या चित्रपटाचा भाग बनू शकलो, याचा मला अभिमान आहे. एक विलक्षण अनुभव देईल असा ‘चिवटी’ तयार झालेला आहे. एका अलक्षित मोठ्या वर्गाचं जगणं समजून घेण्याची संधी ‘चिवटी’ देणार आहे.

विनायक पवार

viky2196@gmail.com

मीठ फुटले हो

अनिल अवचट

class="color5">दादांच्या जमिनीचा एक भाग क्षारपड, नापिक होता. तिथंही रोपं पडून होती. काही दिवसांनी पाहतो तो एक रोप चांगले फोफावल्यासारखे वाढलेले. दादांना आश्चर्य वाटले. त्याच प्रजातीचे दुसरे झाड घेऊन दुसऱ्या क्षारपड जमिनीत लावले. तिथेही तसेच ते फोफावले. मग काय, युरेका, युरेकाच झाले. निलगिरी झाडाचे. खांबासारखे दहा फूट लांबीचे खोड हाती येते. पुढे फुटत राहतात आणि उत्पन्न घेत रहायचे. घरे, झोपड्या बांधतात, फर्निचर करतात. हवे तेवढे उपयोग ऑस्ट्रेलियामध्ये अख्खे विद्यापीठ त्यामध्ये केलंय.

खारपड जमिनींची समस्या इतकी मोठी असेल असे वाटले नव्हते, पण महाराष्ट्रात काही ठिकाणी फिरलो, तेव्हा नुकसानीचा आकार किती अवाढव्य आहे हे जाणवले. खारपडला कोणी क्षारपड म्हणतात, अर्थ तोच क्षारांमुळे पडिक झालेली जमीन. आता जमिनीत तर क्षार हवेतच ना, नाही तर रोप उगवेल कसे, झाड जगेल कसे? मग त्याच क्षारांनी जमीन नापीक होते? मरते?

अशा नापीक जमिनी पाहत गेलो तेव्हा हादरलोच. गाडीतून बागायती भागातून चाललेलो. हिरवीगार ऊसाची शेती, कधी केळीची, कधी आणखी कशाची. आणि नंतर उजाड भाग सुरू झाला. कुठे गेली ती संपन्न शेती? मधेच कुठे हा दुष्काळी भाग आला? ही शेतीही एके काळी संपन्नच होती. आज तिचे असे रूपडे झाले आहे. मैलोन्‌मैल उजाड जमीन, पीक नसलेली, पुसटसा हिरवा रंग नाही. मग कोठे गेले ते शेतकरी? काय झाले त्याचे?

हे सगळे हळूहळू झालेय. एका रात्रीत झाले नाही. बहुतेक जमिनी ऊसाखालच्या. त्या ऊसाचा उतारा (साखरेचे प्रमाण) कमी कमी होत चालला ही पहिली खूण. पण सगळ्याचंच असे होतेय, म्हणून गाफील राहिलेत. आता कोल्हापूरच्या जमिनी चांगल्या, संपन्न शेती. तिथला उताराही कमी होतोय. पण कर्नाटकातला बॉर्डरचा ऊस चांगला उतारा देतोय. का? तर तिथं आता नुकतं पाणी मिळालंय. जमिनी अजून खराब व्हायच्यात. तिथेही काही वर्षांत हेच होणार.

सांगणाऱ्याने सहज सांगितले, पण केवढी भयंकर भविष्यवाणी होती ती. आता महाराष्ट्रात काही ठिकाणी तर पांढऱ्या रंगाची शेतं लांबून दिसतात. इतकं मीठ- मीठ म्हणजे नेहमीचं, सोडियम क्लोराइड आणि मॅग्नेशियम सल्फर. हे आम्हा मेडिकलच्या अभ्यासात होतं. मॅगसल्फ हे त्या काळचं जुलाब होण्यासाठीचं औषध. इथं हे मीठ विहिरीत, तळ्यात, पाण्यात. पिण्यातही तेच. त्यामुळे बऱ्याच जणांना पोटाचे विकार. छोट्याशा गावात भरपूर डॉक्टर्स, दवाखाने. विहिरीचे पाणी मचूळ. याचा अर्थ क्षार त्यात उतरलेत.

सगळं सुरू झालं ऊसातून. जमिनीचा प्रकार न पाहता लागवड सुरू. आता ऊस हे गवत आहे. गवताला भरड जमीन चालते. काळी कसदार, खोलवर थर असलेली जमीन कशी चालेल? पण तीही ऊसाखाली आणली गेली आणि एका मोठ्या आपत्तीची सुरुवात झाली. हा एका कुणाचा दोष नाही. अनेकांचे हात लागलेला हा गुन्हा आहे. सरकार आहे, पाटबंधारे खाते आहे आणि स्वत: शेतकरीही आहे, पण जमीन खारपड होते कशी? म्हणजे ती आधी तशी नसते? ती अशी बदलायला का माणसाचा कपडाबिपडा आहे काय? सांगतो सांगतो.

शेतीला पाणी देतो- मग पाणी कॅनॉलचं असो की विहिरीचं, पण एरवी आपण देतोच ना पाणी. त्यात विशेष काय? पाणी नाही दिलं तर पीक येणार कसं? हो हो, थांबा थोडे. तर पिकाला/जमिनीला जेव्हा जास्त पाणी सोडले की, हा प्रश्न निर्माण होतो. उलट पाणी हे जीवन आहे, पाण्यावर सर्व सृष्टी फुलली आहे, तर एरवी पाणी वरच्या थरापुरतंचं दिलं तर दुष्परिणाम होत नाही. पिकाची मुळं त्याच थरात असतात, पण त्यापेक्षा जास्त पाणी दिलं तर पाणी झिरपत झिरपत खाली जातं, जाता जाता जमिनीतील क्षार त्या पाण्यात विरघळले जातात. पाणी खाली जाऊन खडकासारख्या कठीण थराला जाऊन थांबतं.

सीझन बदलला, शेतात पीक नाही, जमिनीतील भेगा-भोगातून उष्णता खाली जमिनीत शिरते, खालचं पाणी बाष्पीभवन होऊन वरवर येते, अगदी थेट वरच्या थरापर्यंत. तिथे उन्हाने पाणी उडून जाते, वाफ होते. पण तशी वाफ क्षारांची होत नाही. पाणी जाते, क्षार तसेच उरतात. जमिनीच्या पृष्ठभागावर. त्याला खेड्यातले लोक म्हणतात- ‘मीठ फुटलं!’ आता ही जमीन पिकाऊ राहिली नाही. आता ही पडीकच. मग नांगरणी बंद. सगळं बंद. बापरे, शेतकऱ्याच्या जीवनातील काय प्रसंग आहे हो हा. बापजाद्यांपासून चालत आलेली, कुटुंब जगवलेली जमीन.... किंवा दागिने विकून, कर्ज काढून बागायती भागात विकत घेतलेली जमीन, कुठं गेली गुंतवणूक? आता कर्जबाजारी जीवन. त्यातनं काही दु:खद प्रसंग...

पाणी म्हणजे सर्वस्व, सगळं काही. हा भ्रम सगळीकडेच पसरलाय. तर शेतकऱ्यातही असणारच तो. कोरडवाहू भागातही विहीर त्याच्याकडे तो जरा मालदार शेतकरी. पाटाचं पाणी जिथं आलं, तिथं तर सुजलाम्‌, सुफलाम. पण आपण आपल्या बाल्कनीतल्या कुंडीत बघतो ना, जास्त पाणी दिलं की, पानं माना टाकतात. झाड अर्धमेलं होतं, दोन-तीन वेळा पाणी दिलं नाही, की पेशंटची तब्बेत सुधारते. पाण्यासाठी राजकारण केवढं. धरणाची साइट ठरवताना दिग्गजांची केवढी ओढाओढी- मग पुढं कॅनॉल कुठून न्यायचा, यावर मारामारी, लठ्ठालठी. हे कशासाठी? तर पाणी पहिजे. म्हणजे एकदम श्रीमंत.

नुसत्या पाण्यावर पिकं येत नसतात, हे आम्हाला उशीरा समजलं. आमचे प्रा.भागवतराव धोंडेसर म्हणत होते, ‘पाणी मोजून द्या.’ मोजून कसं द्यायचं? पाणी आलं की, शेतात भरून द्यायचं. चार बांधात पाणी. तुडुंब भरलं की, ‘चित्ती असो द्यावे समाधान’ मग पुढचं स्वप्न साखर कारखान्यावर हुकूमत- धोंडेसर म्हणायचे, ‘जमिनीचा वरचा सहा इंचाचा थर भिजेल इतकंच पाणी द्या.’ पण कोणी ऐकलं नाही. ते म्हणत, ‘जमिनीची जास्त हलवा हलवी करूच नका. लोखंडी नांगर जास्त खोल जायला लागले, तेव्हा जमिनीचं उत्पन्न घटलं होतं.’

असंच एक लागलेलं वेड म्हणजे लेव्हलिंगचं. जमिनीचं खूप पैसे खर्चून एकदा लेव्हलींग केलं की, स्वप्न पाहायला मोकळा. पण त्याने वरून पडणाऱ्या पाण्याच्या वाटाच बुजवून टाकल्यात. पाणी साठायला लागलं. मग तो मघाचा हाहाकार. शेतकरी लेव्हलिंग का करतो? त्याच्या जमिनीचा एखादा कोपरा, बाजू सखल असते. पावसाळ्यात बांधामुळे तिथं पाणी साठतं. तिथं पीक येऊ शकत नाही, जमीन वाया जाते.

हीच गत पूर्वापार नाले, ओहोळ-ओढ्यांची. शेताच्या कडेने ओहोळ, नाला जात असेल तर दरवर्षी थोडी भर थोडे आक्रमण करून जमीन वाढवायची. दोन्हीकडचे शेतकरी यात. त्यामुळे तंटा नाही, पण सगळ्यात नाल्याचा गळा आवळला जातो आणि तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरून दिसेनासा होतो. शेतकऱ्यांची जमिनीची भूकही खरी, आणि नाल्याचा मृत्यूचा खरा. असे नाले, ओहोळ गेल्याने असं काय नुकसात होत हो? साधा ओहोळ हो. ती काय बारमाही नदी थोडीच? त्याचा आता काय फायदा असणार? आपण शाळेपासून जलचक्र शिकत आलेलो. तुकडोजीबाबा म्हणतात-

‘सागर से उठा, बादल बनकर बादल से फुटा तू जल होकर कभी नहर बने नदियाँ ये लहरी तेरे भिन्न स्वरूप, तू एकही है।’

साधा ओहोळही इथं महत्त्वाचा. सगळ्या पृथ्वीला उंचसखलपणा आहे. गंगा-यमुनेचं गाळाचं खोरं सोडलं, तर उतार आहेतच. काही ठिकाणी कडे प्रपात असतील, काही ठिकाणी डोळ्यांना लक्षात न येणारे उतार असतात. ‘कंटूर्स’ असतील. पाणी वाहत असते, वाहता वाहता पाणी वाहून जायला ती स्वत:ची अशी निचरा व्यवस्था असते, म्हणून लेव्हलिंगचा (न झेपणारा) खर्च करायचा. बुलडोझर आणायचा म्हटलं, तर जिल्ह्याच्या, तालुक्याच्या गावाहून येणार. गावात येऊन चालणार नाही, तर खबदाडात, नीट रस्ता नसलेल्या त्या याच्या शेतापर्यंत ते कसं आणत असतील हे आश्चर्यच. पण तो शेतकरी जमिनीच्या इंचा- इंचाचा भुकेला असतो. बांधावर आंब्याचे झाड असले की, तेही लोक तोडतात. कारण त्याचा पानपसारा मोठा. त्याच्या सावलीत येणारं पीक खुरटतं.

पाणी हे जीवन आहे, पाण्यावर सर्व सृष्टी फुलली आहे, तर एरवी पाणी वरच्या थरापुरतंचं दिलं तर दुष्परिणाम होत नाही. पिकाची मुळं त्याच थरात असतात, पण त्यापेक्षा जास्त पाणी दिलं तर पाणी झिरपत झिरपत खाली जातं, जाता जाता जमिनीतील क्षार त्या पाण्यात विरघळले जातात. पाणी खाली जाऊन खडकासारख्या कठीण थराला जाऊन थांबतं.सीझन बदलला, शेतात पीक नाही, जमिनीतील भेगा-भोगातून उष्णता खाली जमिनीत शिरते, खालचं पाणी बाष्पीभवन होऊन वरवर येते, अगदी थेट वरच्या थरापर्यंत. तिथे उन्हाने पाणी उडून जाते, वाफ होते. पण तशी वाफ क्षारांची होत नाही. पाणी जाते, क्षार तसेच उरतात. जमिनीच्या पृष्ठभागावर. त्याला खेड्यातले लोक म्हणतात- ‘मीठ फुटलं!’ आता ही जमीन पिकाऊ राहिली नाही. आता ही पडिकच. मग नांगरणी बंद. सगळं बंद.

पाणी उताराकडे वाहतं, उतार नसेल तर पाणी थांबतं, साठतं. धोंडेसर म्हणायचे, ‘जमिनीचा लोएस्ट पॉर्इंट (सखल बिंदू) काढायची सोपी युक्ती त्या भागातून वाहणाऱ्या नदी- नाल्याचा तळ. ही निचराव्यवस्था मोडीत काढल्यामुळे हा खारपडीचा प्रश्न उद्‌भवलाय. खेड्यातच काय शहरातही यामुळे प्रश्न निर्माण झालाय. इथेही जमिनीची भूक, पण ती इमारती बांधण्यासाठी. राजकारण्यांना, बिल्डर्सना लागलेली. नाले, ओहोळ पक्के बुजवून टाकले. पण खूप पाऊस झाला की पाणी इंगा दाखवतंय. काही वर्षांपूर्वी मुंबईला मिठी नदीचं सर्वत्र नाव आलं. त्याआधी हे नावही ऐकलं नव्हतं. आता महापुराचा हाहाकार. सर्वच महानगरांना फटका बसलाय. गरीब वस्त्या तर दरवर्षीच बुडतात. पण जास्त पावसात उच्चवर्गीय सोसायट्यांमध्ये पाणी शिरतं. तेव्हा आम्हाला जाग येते.

हेच पाण्याचे निचरामार्ग व्यवस्थित असते, तर नुकसानीला आळा बसला असता. काहीतरी हाती लागले असते. गरिबांची धुळधाण नसती झाली. खेड्यातही लेव्हलिंग, आक्रमणे करणारे कोण? तर ज्यांच्यात ताकद असते ते शेतकरी किंवा कर्ज काढू शकणारे. आता सगळ्यांच्याच जमिनी गेल्या.

यावर एक साधा सरळ मार्ग म्हणजे शेतात चर काढणे. त्यामुळे पाणी वाहून जाईल आणि जमिनीचा पोत सुधारेल ही कल्पना. पण चर कुणाच्या शेतातून! माझ्याच का, त्यांच्याच का नको? या भावा-भावांची भांडणं, गावातले तर राजकीय गट सगळे येतात. शिवाय हे निचरा झालेले पाणी न्यायचे कुठे? आपल्या बांधावर तर सोडता येत नाही. ते जवळच्या ओढ्यापर्यंत न्यावे लागते. त्यासाठी जवळपास ओढा असावा लागतो. लेव्हलिंग लाटेमुळे तोही दुर्मिळ. ओढ्यापर्यंत चर न्यायचा तर तो अनेकांच्या शेतातून न्यावा लागणार. तितक्या शेतकऱ्यांची संमती मिळवायला हवी. अशा चरांचा खारपडग्रस्त सर्वच शेतकऱ्यांना फायदा मिळणार. बहुतेकांना हे कळतं, पण एखादा आडमुठा निघाला की काम थांबते.

सांगलीला प्रा.डॉ.जुगळे हे इकॉमॉमिक्सचे प्रोफेसर. या विषयाचा अभ्यास केलाय. त्यांच्याबरोबर त्या खारपड भागात फिरलो. बरोबर त्यांचे दोन-तीन विद्यार्थीही. जास्त फटका बसलेला भाग म्हणजे डिग्रज. पण आम्ही कसाही कुठेही प्रवास केला. उपायांच्या अंगाने. कुठे चर पाडलेले होते, ते पाहायला गेलो. पाच फूट रूंदीचे आणि तीन-चार फूट खोलीचे ते चर. लांबूनच त्यांनी एका हिरव्या झुडपांच्या रेषेकडे बोट दाखवले. जवळ गेलो, तर तीन-चार फूट रुंद आणि दोन-तीन फूट खोल असा लांबच लांब चर होता. त्यात पानकणसांची झुडुपे माजलेली. पाणी अधूनमधून चुळूक बुळूक साठलेले. जुगळे म्हणाले, पानकणसे माजतात, मग पाण्याचा प्रवाह खुंटतो. पाणी वाहतं असतं तर उपयोग.

पाणी वाहतं राहायला चरामध्ये सौम्य उतार ठेवायला हवा होता तसा ठेवला गेलाय की नाही कोण जाणे. आजूबाजूला अशी हिरवी झुडुपी रांग लांबूनच दिसायची. की समजायचे, तो एक चर आहे. जवळ जाऊन पाहावे तर तशीच माजलेली पानकणसे आणि पाण्याची साठलेली छोटी डबकी. प्रयोग फसलेला पाहात होतो. त्या माजलेल्या पानकणसाचा उपयोग नाही, असे बरोबरचे शेतकरी सांगत होते.

कुठल्या एका गावाला सरकारने मोठा चर खणायला घेतला होता तो बघायला गेलो. तो इतका मोठा की, धरणाचा कॅनॉल जसा, शेतकऱ्यांची खूपच जमीन त्याखाली जाणार होती. इतका रूंद आणि खोल, की लायनिंग केल्याशिवाय कडा आता ढासळणार होता. आणि लायनिंग केल्यावर झिरपून पाणी आत येणार कसे? सगळाच प्रश्न.

कोल्हापूर जवळच्या एका गावात डॉक्टरांची शेती आहे. त्यांनी त्यांच्या जमिनीखाली चार-पाच फूट खोल, आणि वर चार-पाच फूट अंतरावर चर खणले. त्यात भोके पाडलेले सिमेंटचे फूटभर व्यासाचे चक्क पाईप टाकलेले. त्यामुळे निचरा होऊन शेतात पीक होते, पण कसे? तर लाटालाटांचे. जिथं खाली पाईप आहे, त्यावर पीक तयार केले. बाजूला कमी उंचीचेही पीक होते हे विशेष. पण हा फार म्हणजे फारच खर्चिक उपाय. शिवाय किती वर्षे टिकेल माहीत नाही. पाईपची भोके चिखलाने, क्षारांनी बुजली, तर ती स्वच्छ कशी करणार हा मोठा प्रश्न, पण डॉक्टरांचे कौतुक की, त्यांनी प्रश्नाला असा हात घातला.

थोडक्यात, जमिनीच्या आत सुधारणा केली तर यशस्वी होत नव्हती. जी करायची ती वरूनच, म्हणजे पिके घेऊनच. पण पिके घेणार कशी? नाशिकला राहणारे निफाडचे शेतकरीमित्र विनायकरावांना (पाटील) माझी जाणून घेण्याची धडपड समजली. त्यांचा फोन आला, ‘बाबा, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तयार आहे, ये पाहायला!’ त्या आधी काही प्रयोग झाले होते. भाताची विशिष्ट जात क्षारपड जमिनीत चांगली येते, असे आढळले. कोणी ठिबक सिंचनने शेती करून बघितली, पण ठिबकमधून जे पाणी देणार ते क्षारयुक्त नसले पाहिजे, थोड्याच काळात ठिबकच्या नळ्यांची भोके बुजून जातात, ब्लॉक होतात, ती एक मोठीच समस्या असते.

यानंतर विनायकदादांची निलगिरी आली. दादा माझे बऱ्याच वर्षांचे मित्र. त्यांच्यावर मी लेखही लिहिला आहे. तो संग्रहितही झाला आहे. नाशिकला गेलो की, अरुण ठाकूर किंवा दादा ही माझी उतरायची ठिकाणे. त्यांनी त्यांची निलगिरी शेती निफाडजवळच्या त्यांच्या गावी नेऊन दाखवली होती. याच सुमारास, त्यानंतर हा शोध लागला.

इतर बऱ्याच शोधांसारखी याही शोधाची कथा आश्चर्यकारकच. ते सगळीकडे फिरून (त्यात काही गुजरातेतल्या कालिदास शहांसारखे शेतकरी, काही संशोधन संस्था) निलगिरीची सरळ वाढणारे, पुष्ट होणारे झाड शोधत. त्यापासून निघालेली रोपं आणत. त्यातून अधिक चांगल्या वाणांची निलगिरीची झाडे हाती लागत. एकदा अशीच काही रोपे उरली. जमीन संपलेली. मग ती टाकूनही देता येईनात. दादांच्या जमिनीचा एक भाग क्षारपड, नापिक होता. तिथंही रोपं पडून होती. काही दिवसांनी पाहतो तो एक रोप चांगले फोफावल्यासारखे वाढलेले. दादांना आश्चर्य वाटले. त्याच प्रजातीचे दुसरे झाड घेऊन दुसऱ्या क्षारपड जमिनीत लावले. तिथेही तसेच ते फोफावले. मग काय, युरेका, युरेकाच झाले. निलगिरी झाडाचे. खांबासारखे दहा फूट लांबीचे खोड हाती येते. पुढे फुटत राहतात आणि उत्पन्न घेत राहायचे. घरे, झोपड्या बांधतात, फर्निचर करतात. हवे तेवढे उपयोग ऑस्ट्रेलियामध्ये अख्खे विद्यापीठ त्यामध्ये केलंय. खांब, फर्निचरसुद्धा.

दादांच्या हिशोबी स्वभावाप्रमाणे त्यांनी किती झाडे, किती उत्पन्न, वाहतूक खर्च वगैरे काटेकोर पद्धतीने हिशोब ठेवलाय. प्रसिद्धही केलाय. परदेशात त्यांना सल्ला द्यायला, लागवडीसाठी बोलावतात. दादा यशस्वी करून येतात. रस्त्याच्या कडेला वाढणारी वेडीबाभळ, दादांनी शिष्यांकरवी तिची चक्क लागवड केली. छाटणी करीत राहिले, खोडे थोडे मोठे झाल्यावर तोडून कोळसा केला.

नंतर कोल्हापूरच्या अलीकडे शिरोळ विभागात मोठा प्रयत्न सुरू झाला. दत्त साखर कारखान्याचे गणपतराव पाटील यांनी पाच हजार एकर जमिनीवर प्रकल्प उभा केलेला आहे. उभा नव्हे जमिनीखाली अशाच सछिद्र पाइपलाईनचे जाळे टाकले आहे. ते सगळे पाणी नदीपर्यंत नेऊन सोडले आहे. शेतकऱ्यांना एकरी लाख रुपये खर्च येणार असून एकूण खर्च 50 कोटींचा असणार आहे.

गणपतरावांच्या उत्तरापेक्षा दादांचे उत्तर माझ्या वृत्तीशी जुळणार आहे, त्यात फारसा खर्च नाही. त्याला इंजिनियर तंत्रज्ञांची गरज नाही. तो शेती जन्मभर करत आलेला आहे. आता निलगिरीची शेती. ही शेती करून काही वर्षांत जमीन आधीसारखी होणार आहे. क्षार हळूहळू कमी होत जाणार आहेत.

दादांची उत्तरे शोधली पण ती उचलली गेली नाहीत. काय म्हणावे? ऊस सर्वत्र लावला जाऊ लागला, काही शहाणी माणसे सांगत होती, ही जमीन ऊसाची नाही. त्यांचं कोणी ऐकलं नाही. बुलडोझर शेतात फिरू लागले. धोंडेसर सांगत होते, ‘हे घातक आहे,’ त्याच्याकडे कोण लक्ष देणार? सर सांगत होते मोजून पाणी द्या, मोजायला कुणाला वेळ आहे?

आता दादांनी एक उत्तर हाती ठेवले. तरी जसे उचलले जायला हवे होते तसे गेले नाही. नाहीतर एव्हाना त्या भागात निलगिरीची जंगले दिसायला हवी होती. पण असेही इतिहासात घडते, शोध लागून पडून राहतो. नंतर दहा-वीस, तीन-चाळीस वर्षांनी कुणाचे तरी लक्ष गेले, आणि त्याने तो शोध उचलला. हे अगदी जीव वाचवणाऱ्या औषधांबाबतही. तसेच दादांच्या निलगिरीच्या शोधाचे कुणी चीज करणारा निघेल, आणि या समस्येचं संधी रूपांतर करेल, हीच आशा.

अनिल अवचट, पुणे

aawachat@gmail.com

स्वयंभू वैज्ञानिक : जेम्स लव्हलॉक

अतुल देऊळगावकर

या सर्व वास्तवाची जाण असलेले लव्हलॉक यांचा भविष्यवेध ते गंभीरपणे मांडत आहेत की, संपूर्ण मानवजातीची फिरकी घेत आहेत, हे ते स्वत:च सांगू शकतील. त्यांनी 2006 मध्ये- ‘‘2040 मध्ये लंडनचा पाऊण भाग पाण्याखाली असेल.’’ असे भाकीत व्यक्त केले. त्यावर पत्रकारांनी त्यांना ‘अतिशय निराशावादी व नकारात्मक’ असे म्हटले. त्यावर लव्हलॉक म्हणाले, ‘‘नाही. मी सकारात्मक व आशावादी आहे. 2040 ला अजूनही 34 वर्षे बाकी आहेत, तोपर्यंत जीवनाचा आनंद घेतलाच पाहिजे.’’

प्रचंड निधी असलेली सुसज्ज प्रयोगशाळा, मदतनीस, सहकारी यांतील प्रत्येक बाब जेवढी अधिक होते त्याप्रमाणात संशोधनाची व्याप्ती वाढत जाते, असा हा काळ आहे. त्यामुळे आपल्या राहत्या घरातूनच वैज्ञानिक संशोधन ही कल्पना कालबाह्य वाटते. तरीही जेम्स इफ्रम लव्हलॉक हे आयुष्यभर एकांतात, एकहाती व स्वतंत्रपणे संशोधन करीत राहिले. भविष्याचा वेध घेत राहिले आणि त्याची दखल जगाला घ्यावी लागली. दि.26 जुलै, 2019 रोजी डॉ.जेम्स लव्हलॉक यांनी वयाची शताब्दी साजरी केली.

इंग्लंडच्या लेचवर्थ शहरातील कष्टकरी कुटुंबात जेम्स यांचा जन्म झाला. तिथे उदरनिर्वाह करताना येणाऱ्या अडचणी वाढू लागल्यावर त्यांचे वडील टॉम व आई नेल यांनी लंडनला स्थलांतर केले. बर्कबेक महाविद्यालयात जेम्स रसायनशास्त्र शिकू लागले आणि संध्याकाळी छायाचित्रण कंपनीत (फोटोग्राफी फर्म) काम करू लागले. नंतर त्यांना मँचेस्टर विद्यापीठात प्रवेश मिळाला. तिथे पेशींमधील केंद्रकाम्ल व सहविकर (कोएंझाइम) यावरील संशोधनासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित प्रो.अलेक्झांडर टोड हे अध्यापन करीत होते. त्यांचा जेम्स यांच्यावर प्रभाव पडला. या काळातच ते क्वेकर विचारांकडे आकर्षित झाले.

क्वेकर ही ख्रिश्चन धर्मातील उदारमतवादी चळवळ! सतराव्या शतकात जॉर्ज फॉक्सने (1624-91) या पंथाची स्थापना केली होती. वयाच्या 19 व्या वर्षीच जॉर्जला ख्रिश्चन धर्मातील विचार आणि आचारातील भयंकर दरीने अस्वस्थ करून टाकलं होतं. ‘शेजाऱ्यावर प्रेम करा’ ही शिकवण देणारे धर्मप्रसाराच्या नावाखाली कत्तली का करतात? अमीर-उमराव, गुलाम हा भेद येशूने केला की आपण? चर्च हे एकमेव पवित्र ठिकाण; बाकीच्या जागा?’ जॉर्जच्या अशा यक्षप्रश्नांना कोणीही समाधानकारक उत्तरे देऊ शकत नव्हते. तो इंग्लंडभर अनेक पाद्र्यांना चार वर्षं भेटला. त्यांना हा झेपेनासा झाल्यावर ‘या भुताला’ पोप, बिशप, आर्चबिशप यांच्यापर्यंत नेण्यात आलं. वयाने मोठ्या व समाजातील उच्च स्थानाच्या महनीय व्यक्तींना थेट प्रश्न विचारताना सळसळत्या तारुण्यातील, प्रामाणिकपणानं ओथंबलेल्या जॉर्जला यत्किंचित भीती वाटत नव्हती आणि त्याच्या शंकादेखील फिटत नव्हत्या. अखेरीस शेवटी त्यानं या सगळ्यांचा नाद सोडला.

आपले तुकोबा आणि जॉर्ज हे समकालीनच नाही, तर समविचारी आहेत. ‘येशूचे विचारच आपल्या साथीला आहेत, ते खरे गुरू. मग पाद्र्यांसारख्या मध्यस्थाची गरज काय? भक्ती अंतर्मनातून येते, तिचं प्रदर्शन कशासाठी? सर्व प्राणि- मात्रांमध्ये तोच आत्मा आहे. उच्च-नीचता येशूने ठरवली नाही. कुठल्याही कारणाने मनुष्याचा वध करणं समर्थनीय कसं ठरतं? युद्धासारखी ओंगळ, बीभत्स कृत्यं थांबवली पाहिजेत’, असा जॉर्ज हा तुकारामासारखाच रोखठोक आहे. या काळात जॉर्जला काही समविचारी मित्र मिळत गेले. दर रविवारी चर्चमध्ये प्रार्थना म्हणण्याची ख्रिश्चन प्रथा आहे. जॉर्ज आणि मित्र कुठलंही ठिकाण निवडून तिथं मौन धारण करू लागले. ते झाडाखाली एकमेकांच्या सत्कृत्यांची विचारपूस, देवाण-घेवाण करायचे. हे आक्रित पाहून सनातनी हादरून गेले. त्या अहिंसक हल्ल्याला तोंड देण्यासाठी त्या वेळी सगळे कायदे सनातन्यांच्या बाजूनेच होते.

धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात गुंफूनच राज्य करायच्या. सरकारने जॉर्जवर वयाच्या 26 व्या वर्षी खटला भरला. धर्मद्रोहाचा आरोप ठेवण्यात आल्याने कुठलीही शिक्षा होऊ शकली असती. न्यायाधीश बेनेटने जॉर्जचे सगळे अपराध वाचून दाखवत त्याला कुत्सितपणे विचारलं, ‘‘तू आता काय बचाव करणार?’’ यावर जॉर्ज त्वेषाने म्हणाला, ‘‘खरे पाखंडी तुम्हीच आहात. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी येशूचे वाटेल तसे अर्थ काढत आहात. या संकुचितपणातून काही क्षण बाजूला होऊन, सदसद्‌विवेकबुद्धी असल्यास स्वत:शी प्रामाणिक राहून स्वत:लाच विचारा. तुम्हाला येशूच्या वचनांचा आत्मा समजला, तर स्वत:च्या भीषण वर्तनाचं वास्तव समजून तुम्ही कंपित व्हाल.’’ बेनेट उपहासाने म्हणाला, ‘‘अरे तूच थरथरा कापत आहेस. कंपणाऱ्या (क्वेकर), थरथरणाऱ्या, तुझी ही बकवास आहे!’’

बेनेटने ‘क्वेकर’ ही दिलेली शिवी जॉर्ज आणि त्याच्या मित्रांनी उपाधीसारखी स्वीकारली. न्यायाधीशांनी जॉर्जला तुरुंगवास ठोठावला. शिक्षा भोगून बाहेर आल्यावर इंग्लंड-अमेरिकेत जॉर्ज समविचारी मित्र गाठत गेला. त्याला मिळणारा पाठिंबा वाढत चाललेला पाहून कर्मठ ख्रिश्चन खवळून गेले. क्वेकरांची ही घोडदौड रोखण्यासाठी बोस्टनमध्ये चार क्वेकरांना जाहीर फाशी देण्यात आली. 15,000 क्वेकरांवर खटले भरण्यात आले. तरीही दर आठवड्याला, महिन्याला एकदा क्वेकर-भेटी चालू राहिल्या. क्वेकरांनी समाजातील उच्चभ्रूंच्या चालीरीतींना सुरुंग लावले. त्या काळी अमीर, सरदार वा उच्चपदस्थांची भेट घेताना गुडघ्यातून वाकणं व त्यांच्या सन्मानार्थ हॅट काढणं या पद्धती होत्या. क्वेकरनी या प्रथा बंद केल्या. वारंवार शपथा घेणं, धूम्रपान-मद्यपान करणं, या प्रतिष्ठितपणाच्या सर्व संकल्पनांना जोरदार तडे देण्याचं आणि तथाकथित सभ्यपणाचे सारे संकेत बाजूला सारण्याचं कार्य क्वेकरांनी केलं. प्रस्थापितांना त्यांची बंडखोरी असह्य झाली. त्यांनी क्वेकरांना नोकऱ्या नाकारल्या. तरीही आत्मा हा श्रेष्ठ मानून, साधी राहणी पसंत करणाऱ्या क्वेकरांची संख्या कमी होत नव्हती. तुरुंगांमध्ये क्वेकर-सभासदांचा अतोनात छळ झाल्याने 1689 मध्ये 450 क्वेकर मरण पावले.

जॉर्ज फॉक्सने चर्च ऑफ इंग्लंडच्या अधिसत्तेला, प्युरिटन पंथाला नाकारून स्वत:चा ‘द रिलिजिअस सोसायटी ऑफ फ्रेंड्‌स’ या नावाने पंथ निर्माण केला. तरीही ते क्वेकर म्हणूनच ओळखले जायचे. पुढे अठराव्या शतकात त्यांना आदराने ‘फ्रेंड्‌स-समाजमित्र’ हे संबोधन प्राप्त झालं. गुलामगिरीची प्रथा मोडण्याचं काम क्वेकरांनी केलं. स्वत:च्या घरातील दासांची मुक्तता त्यांनी केली. अपंग, जखमींची सेवा करण्यात कित्येक क्वेकरांनी आयुष्य वेचलं. अठराव्या शतकातील सर्व विचारवंतांनी जॉर्ज फॉक्स व क्वेकर पंथाविषयी कमालीचा आदर दाखवला. 19 व्या शतकातील सगळ्या युद्धकाळात सैनिकांच्या शुश्रूषेसाठी क्वेकर धावून गेले. जागतिक राजकारणामुळे ‘रेड क्रॉस’ला बंदी असेल तिथेही क्वेकर पोहोचत होते. क्वेकरांच्या ‘तुम्ही बंदूक चालवा, आम्ही जीवन देण्यासाठी झटू’ या व्रतामुळे त्यांना ‘सत्यमित्र’ व ‘प्रकाशपुत्र’ असे सन्मान लाभले.

ख्रिस्ती समाजात त्यांची संख्या कमी असूनही त्यांना फार मोठी प्रतिष्ठा आली. त्यांच्या वागण्याचा समाजाला धाक वाटू लागला. ‘ब्रिटिश फ्रेंड्‌स सर्व्हिस’ आणि ‘अमेरिकन फ्रेंड्‌स सर्व्हिस’ या क्वेकरच्या प्रातिनिधिक संस्थांना 1947 मध्ये शांततेचा नोबेल बहाल करून त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला. आपल्याकडील प्रतिभावंत वास्तुशिल्पी लॉरी बेकर, अभिनेते बेन किंग्जले, दिग्दर्शक डेव्हिड लीन आणि कॅडबरी उद्योगाचे अध्वर्यू जॉर्ज कॅडबरी हे क्वेकर विचारसरणीचे होते.

संपूर्ण हयातभर ‘एकला चलो रे’ म्हणत विज्ञान संशोधनात रमलेले जेम्स लव्हलॉक यांच्या जीवनपटातून व कार्यातून या क्वेकर विचारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. जेम्स यांना शिकत असतानाच वैद्यकीय संशोधन परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्यांना सैनिकांच्या भाजलेल्या जखमांवर उत्तम उपायांचा शोध घ्यावयाचा होता. त्या काळी असे प्रयोग करण्यासाठी भूल दिलेल्या सशांना भाजले जायचे. नंतर त्यावर उपचार केले जायचे. जेम्स यांनी त्याला थेट नकार देऊन टाकला आणि ते स्वत: असह्य व अतीव वेदना सहन करीत किरणोत्सारी उष्णतेला सामोरे गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विद्यार्थ्यांना लष्करात भरती होणे बंधनकारक होते. जेम्स यांना तर युद्धभूमीवर जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. ते टाळाटाळ करीत असताना त्यांची गरज वैद्यकीय संशोधनात अधिक आहे, असे सरकारला वाटले आणि त्यांना हायसे वाटले.

जेम्स यांना 1948 मध्ये ‘लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन’मधून वैद्यकीय शाखेतील डॉक्टरेट मिळाली आणि ते लंडनमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रीसर्च’मध्ये संशोधक म्हणून रुजू झाले. या काळात त्यांनी प्रयोगात वापरल्या जाणाऱ्या उंदरांना शून्यापेक्षा कमी तापमानात नेऊन पुन्हा जिवंत केले. यातून कोणत्या अवयवांवर कसा परिणाम होतो, हे जेम्स यांनी सांगितले. या प्रयोगातील निष्कर्षांचा निम्नतापी विज्ञानाला (क्रायोजेनिक), तसेच कृत्रिम गर्भधारणेसाठी खूप उपयोग झाला. (या काळात स्टिफन हॉकिंग यांचे वडील फ्रँक हॉकिंग हे परजीवी विज्ञानावर पॅरॅसायटॉलॉजी- संशोधन करीत होते. लव्हलॉक आणि फ्रँक यांची मैत्री होती. त्यामुळे त्यांनी लहानग्या स्टिफनला खेळवले आहे.)

रॉकफेलर फाउंडेशनची पाठ्यवृत्ती 1954 मध्ये मिळवून जेम्स हे अमेरिकेच्या बोस्टनमधील हार्वर्ड युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमध्ये दाखल झाले. नंतर ते ह्युस्टन येथील बेलर विद्यापीठात रसायनशास्त्राचे अध्यापन करू लागले. तिथे त्यांना रासायनिक विश्लेषण करण्यासाठी वायूंमधील वर्णलेख (गॅस क्रोमॅटोग्राफ) समजून घेणे आवश्यक होते. त्या काळातील प्रचलित उपकरणांनी ते जमत नव्हते. जेम्स त्यांच्या खोलात गेले आणि आयनीभवन (आयोनाझेशन) करून इलेक्ट्रॉनपर्यंत जाण्यात त्यांनी यश मिळवले. त्यांनी संवेदनशील (सेन्सिटिव्ह) इलेक्ट्रॉन हस्तगत व शोधक यंत्र (इलेक्ट्रॉन कॅप्चर डिटेक्टर) तयार केले. त्याचा राशेल कार्सन यांना कमालीचा उपयोग झाला. वनस्पतीवर फवारलेले रसायन हे डी.डी.टी. हेच आहे, हे सिद्ध करण्यासाठी कार्सन यांना इलेक्ट्रॉन कॅप्चर डिटेक्टरची मदत झाली. मातेच्या दुधात व पेंग्विनच्या मांसामध्ये डी.डी.टी.चे अंश आहेत, हा निष्कर्ष ‘सायलेंट स्प्रिंग’मध्ये मांडला गेला आणि त्याला विज्ञानाचा भक्कम आधार असल्यामुळे हे दावे कोणत्याही वैज्ञानिक संस्थेलासुद्धा नाकारता आले नाहीत. त्यामुळे पर्यावरणीय विचार रुजण्यास विज्ञानाचा कुठलाही अडसर आला नाही.

जेम्स यांनी 1971 मध्ये वातावरणातील वायूंचा अभ्यास करून क्लोरोफ्लुरोकार्बन (CFC) चे प्रमाण वाढत असल्याचा इशारा दिला होता. 1974 मध्ये मारिओ मोलिना व फ्रँक रोलँड या वैज्ञानिकांना, अंटार्क्टिकावरील वातावरणात ओझोनच्या थराला भगदाड पडत असल्याचे जाणवले होते. त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी जेम्स यांचा ‘इलेक्ट्रॉन कॅप्चर डिटेक्टर’ उपयोगी आला. क्लोरोफ्लुरोकार्बनमुळे हे भगदाड पडत असल्याचे सिद्ध झाले. दि.26 ऑगस्ट, 1987 रोजी माँट्रियल येथे जगातील 197 देशांनी ओझोन थराचा विध्वंस करणाऱ्या क्लोरोफ्लुरोकार्बन रसायनांना हद्दपार करण्याचा निर्धार केला.

क्लोरिन, फ्लोरिन व कार्बन (CFC) यांच्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय संयुगास ‘फ्रीऑन’ असेही म्हणतात. अमेरिकेतील ‘ड्यु पाँट’ या बलाढ्य कंपनीकडे ‘फ्रीऑन’चे स्वामित्व हक्क होते. 1930 पासून जगभरातील शीतकपाट व वातानुकूल यंत्रणेत या संयुगाचा वापर केला जात होता. जागतिक मक्तेदारीला हादरा बसणार असल्यामुळे ‘ड्यु पाँट’ने माँट्रियल करारात अडथळे आणण्याचे अनेक खटाटोप केले. त्यांनी ‘जबाबदार क्लोरोफ्लुरोकार्बन उद्योगांची आघाडी’ उघडली. अमेरिकेतील सिनेटसमोर ‘‘क्लोरोफ्लुरोकार्बन आणि ओझोन थर यांचा कार्यकारणभाव अजूनही सिद्ध झालेला नाही. हे भ्रामक विज्ञान आहे.’’ असा हल्ला चढवला.

परंतु त्याच वेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण प्रकल्प संस्थेने (UNEP) ओझोन थर कमी होण्याविषयीचे पुरावे सादर केले. ‘ओझोन कमी होण्यामुळे अमेरिकेतील 28 कोटी लोकांना त्वचेचे कर्करोग व 4.5 कोटींना मोतीबिंदू होऊ शकतील,’ असा अहवाल सादर केला. यामुळे ‘ड्यु पाँट’ला पाय मागे खेचावे लागले आणि क्लोरोफ्लुरोकार्बनच्या अंताचा आरंभ झाला. ओझोनच्या थराला पडलेले भगदाड हळूहळू बुजू लागले आहे, हे अनेक निरीक्षणांतून सिद्ध होत गेले. तेव्हा या वेळी विख्यात दैनिक ‘द गार्डियन’ने लव्हलॉक यांचा, ‘मानवजात देऊ शकेल त्या सर्व सन्मानांचे मानकरी असू शकतील असे प्रेषित!’ असा गौरव केला होता. याच काळात लव्हलॉक यांच्या वायूविषयक संशोधनामुळे वैद्यकीय विज्ञानातील रक्ताचे गोठणे, हवेचे निर्जंतुकीकरण, श्वसनाचे विकार यांवरील संशोधन व उपचार यांना चालना मिळाली.

सोविएत युनियनने 1957 मध्ये ‘स्पुटनिक’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला. त्याला उत्तर म्हणून अमेरिकेने 1958 मध्ये ‘नासा ’(नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) या संस्थेची स्थापना करून उपग्रह व चांद्रमोहीम हाती घेतली. जेम्स यांच्या इलेक्ट्रॉन हस्तगत व शोधक यंत्राची ख्याती ऐकून ‘नासा’ने 1961 साली चंद्रावरील मातीचा अभ्यास करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले.

पुढे काही दिवसांतच ‘नासा’ने त्यांच्यावर ‘मंगळावर सजीवसृष्टी आहे काय?’ या शोधमोहिमेचीही जबाबदारी सोपवली तेव्हा, कोणत्याही बाबीकडे पाहताना पठडीतील विचार बाजूला सारणारे जेम्स त्या वेळी म्हणाले, ‘‘कोणत्याही ग्रहावरील वातावरणाची पाहणी करण्यासाठी मानवाला तिथे धाडण्याची काहीही गरज नाही, तसेच तिथली माती तपासण्याचीही आवश्यकता नाही. समजा,पृथ्वीची पाहणी करण्यासाठी कोणी आले आणि ते अंटार्क्टिकावर अथवा सहारच्या वाळवंटात उतरले, तर सभोवतालचा परिसर पाहून त्यांचे पृथ्वीविषयी होणारे आकलन हे समग्र असेल काय? ग्रहाच्या समग्र आकलनाकरिता तेथील वातावरण समजून घेतले पाहिजे.’’

ग्रह मृत आहे की सजीव, हे समजून घेण्यासाठी त्यांनी काही भौतिक व रासायनिक तपासण्या घेण्याचे ठरवले. जेम्स यांनी मंगळ ग्रहाचा अवरक्त दूरदर्शक दुर्बिणीच्या (इन्फ्रा रेड टेलिस्कोप) साह्याने अभ्यास केला. त्यांना मंगळ व शुक्र या ग्रहांवर वायूंचा रासायनिक समतोल (इक्विलिब्रियम) आढळला. याचा अर्थ तिथे कुठलाही सजीव नाही. ग्रहावर सजीवसृष्टी असेल, तर वातावरणातील वायूंचा तोल व रासायनिक रचना (कॉम्पोझिशन) बदलून जाईल. पृथ्वी, मंगळ व शुक्र यांच्यावरील वातावरणाच्या अभ्यासाचे श्रेय जेम्स यांनाच जाते. मंगळ व शुक्र यांच्यावरील वातावरण हे समतोलाच्या जवळपास आहे, परंतु पृथ्वीवर वायूंचा असमतोल असून कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण अधिक आहे. मुबलक नायट्रोजन, ऑक्सिजन व मिथेन हे मृत ग्रहावर आढळणे शक्य नाही. त्यामुळे एके काळी मंगळ व शुक्र हे सजीव असतीलही; मात्र मंगळावर सध्या जीव नाही आणि तो ग्रह मृतवत्‌ आहे, असा निष्कर्ष त्यांनी तेव्हा काढला होता.

1962 मध्ये आलेल्या ‘सायलेंट स्प्रिंग’ने जगाला खाड्‌कन जाग आणून पर्यावरणीय भान आणले. या काळातच जेम्स यांना वातावरणातील कर्ब वायूंचे वाढते प्रमाण आणि त्याचे दुष्परिणाम याचा अंदाज आला होता. 1965 मध्ये ‘नासा’ने 2000 या वर्षी जगासमोरील महत्त्वाच्या समस्या कोणत्या असतील, याचा वेध घेण्याचे ठरवले. (त्या वेळी त्यांना अण्वस्त्रे हीच जगास धोक्यात आणतील असे वाटत होते.) त्या वेळी जेम्स यांनी ‘‘संपूर्ण जग हे पर्यावरणीय संकटांच्या खाईत असेल व त्यावेळी पर्यावरणीय समस्या हेच आव्हान असेल. त्यामुळे मानवजातीचे सर्व आडाखे व गणिते चुकतील’’, असे सांगून टाकले होते. तेव्हापासूनच त्यांना ‘विलक्षण द्रष्टा वैज्ञानिक’ आणि ‘पर्यावरणीय विचारवंत’ अशी ख्याती लाभली. पर्यावरण पत्रकार व लेखक जॉर्ज मॉनिबॉट म्हणतात, ‘‘जगाला तापमानवाढ ही संकल्पना लव्हलॉक यांच्यामुळेच समजली. त्यांच्यामुळे पृथ्वी आणि पर्यावरण यांचे व्यापक आकलन होऊ शकले.’’

साम्यवादी सोविएत युनियनच्या स्थापनेपासूनच त्यांच्यात आणि भांडवलशाही अमेरिका यांच्यात संघर्ष जाणवत होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर या दोन्ही देशांनी त्यांच्या अधिपत्याखालील देश वाढवून आपापला साम्राज्यविस्तार चालू केला. यातूनच शीत- युद्धाचा (19 ऑक्टोबर, 1945 रोजी जॉर्ज ऑर्वेल यांनी ‘तुम्ही आणि अणुबाँब’ या निबंधात ‘कोल्ड वॉर’ ही संज्ञा मांडली) आरंभ झाला. 1985 मध्ये सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी शस्त्रस्पर्धा थांबवून अण्वस्त्र निकामी करण्यास सुरुवात केली. तेव्हा शीत युद्धाच्या अंताचा आरंभ झाला आणि 1991 ला सोव्हिएत युनियनच कोसळल्यावर शीत युद्ध समाप्त झाले.

सुमारे 40 वर्षं चाललेल्या शीत युद्धाच्या काळातच जगाचे नागरीकरण वाढत गेले. साम्यवादी व भांडवलशाही या दोन्ही विचारांनी ‘निसर्गाला अंकित करून विकास’ घडवला. युद्धसज्जतेसाठीच अवकाश संशोधन, अणुउर्जा, संगणक या तंत्रज्ञानातील शोधमोहिमा चालू होत्या. या काळातच जगभर निसर्गाच्या मनमुराद विध्वंसाचा पाया घातला गेला आणि त्यामध्ये भांडवलशाही व साम्यवादी दोन्ही विचारसरणी एकाच दिशेने प्रवास करू लागल्या. वसाहतीतून मुक्त झालेल्या अनेक नव्या देशांनी हाच कित्ता गिरवला. या वास्तवाची लव्हलॉक यांना स्पष्ट जाणीव होती आणि काळाच्या आधीच पर्यावरणाच्या उपेक्षेचे परिणाम काय व कसे होतील, हे त्यांनी ओळखले होते.

सूक्ष्म निरीक्षणशक्ती व चाकोरी सोडून विचार करण्याची सवय यांमुळे जेम्स यांचं विचारविश्व वेगळंच राहिलं. पृथ्वीवरील वायूंच्या आवरणाचा अभ्यास करीत असताना त्यांना पृथ्वीची अनेक वैशिष्ट्ये नव्याने जाणवली. तीन लाख कोटी आकाशगंगा आणि त्यामधील 100 अब्ज तारे अशा अथांग विश्वाची 13.8 अब्ज वर्षांपूर्वी निर्मिती झाली. पृथ्वीची जन्म हा 4.5 अब्ज वर्षांपूर्वीचा, तर त्यावरील जीवोत्पत्ती ही 3.7 अब्ज वर्षांपूर्वीची मानण्यात येते. आपले पूर्वज होमोसेपियन हे 3 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. अब्जावधी वर्षं वयाच्या या पृथ्वीवर अनेक उत्पात घडून गेले. (74,000 वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून फारच थोडी मानवजात वाचू शकली होती) कित्येक वेळा वातावरणातील कोणत्या तरी वायूंचं प्रमाण वाढलं वा कमी झालं, तरी पृथ्वीवरील जीवसृष्टी का टिकून राहिली? पृथ्वीवरील जैवभारामुळे (बायोमास) वातावरणातील वायूंचं संतुलन टिकून असेल काय? अनेक वैज्ञानिक या रहस्याचा शोध घेत आहेत. जेम्स यांनी वातावरणासोबतच जीवावरण (बायोस्फिअर) व जलावरण (हायड्रोस्फिअर) यांचा अभ्यास करून त्यामधील वायूंच्या चक्राचा अन्वय लावला.

पृथ्वीवरील जिवोत्पत्तीपासून आजवर सूर्याकडून येणाऱ्या ऊर्जेत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली, तरीही पृथ्वीचं तापमान त्याप्रमाणात वाढलं नाही. ते बऱ्यापैकी स्थिर राहिलं. पृथ्वीवरील वातावरणात 79 टक्के नायट्रोजन, 20.7 टक्के ऑक्सिजन व 0.3 टक्के कार्बनडाय ऑक्साइड आहे. ऑक्सिजन हा अतिशय क्रियाशील आहे. वातावरण व पृथ्वीच्या कवचातील इतर वायू व खनिज यांच्याशी ऑक्सिजनचा संयोग घडून येत नाही. मिथेनचे स्वतंत्र अंश का दिसावेत? ऑक्सिजन जवळ येताच मिथेनचं ज्वलन होणे साहजिक आहे, परंतु ते होत नाही. थोडक्यात, वायूंचं असंतुलन होत नाही. हे वायूंचं संतुलन कसं साधलं जात असेल? पृथ्वीवरील सागरांची क्षारयुक्तता (खारेपण- सॅलिनिटी) ही दीर्घ काळापासून 3.4 टक्क्यांवर स्थिर आहे. हे संतुलनसुद्धा गूढच आहे.

या साऱ्या वास्तवाचा विचार करून जेम्स लव्हलॉक यांनी 1972 मध्ये ‘गाया’ सिद्धांत मांडला. ग्रीक संकल्पनेत पृथ्वीदेवता ‘गाया’ ही स्वयंपूर्ण व स्वयंशासित मानली जाते. त्यांनी ‘‘संपूर्ण पृथ्वी हीच एक स्वयं नियंत्रण (सेल्फ रेग्युलेशन) करू शकणारी सजीव संस्था (लिव्हिंग ऑर्गेनिझम) आहे. त्यामध्ये भौतिक, रासायनिक, जैविक आणि मानव हे घटक आहेत. या सर्वांमधील जटिल आंतरक्रिया व त्यांना मिळणारा प्रतिसाद यातून पृथ्वीवरील समतोल साधला जातो.’’ अशी मांडणी केली. ते गाया ही संज्ञा भावनिक वा धार्मिक अर्थाने वापरत नाहीत. हा जिवंत प्राणी नाही, हे वारंवार स्पष्ट करतात. पृथ्वीकडे समग्र दृष्टीने पाहावं. ती एक एकसंध सजीव संघटन आहे, असा आपला समज व्यापक व स्पष्ट व्हावा आणि पृथ्वीवर होणारे बदल लक्षात यावेत, यासाठी ते गाया हे रूपक वापरतात.

अमेरिकेने 1958 मध्ये ‘नासा ’(नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) या संस्थेची स्थापना करून उपग्रह व चांद्रमोहीम हाती घेतली. जेम्स यांच्या इलेक्ट्रॉन हस्तगत व शोधक यंत्राची ख्याती ऐकून ‘नासा’ने 1961 साली चंद्रावरील मातीचा अभ्यास करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. पुढे काही दिवसांतच ‘नासा’ने त्यांच्यावर ‘मंगळावर सजीवसृष्टी आहे काय?’ या शोधमोहिमेचीही जबाबदारी सोपवली तेव्हा, कोणत्याही बाबीकडे पाहताना पठडीतील विचार बाजूला सारणारे जेम्स त्या वेळी म्हणाले, ‘‘कोणत्याही ग्रहावरील वातवारणाची पाहणी करण्यासाठी मानवाला तिथे धाडण्याची काहीही गरज नाही‘‘.

यावर जगातील अनेक जीवशास्त्रज्ञांनी कडाडून टीका केली. त्यांच्या स्वदेशातील- ब्रिटनमधील वैज्ञानिक जगताने त्यांना अजिबात पाठिंबा दिला नाही. परंतु काळाच्या ओघात त्यांच्या गाया सिद्धांताला मानणारेही वाढत गेले. काही पर्यावरणशास्त्रज्ञांनी (इकॉलॉजिस्ट) गाया ही संकल्पना स्वीकारून मांडणी चालू केली. परंतु लव्हलॉक यांच्या पर्यावरणाच्या चिंतनाला जग अतिशय गंभीरपणेच घेत होते. ‘‘गाया ही संतुलन साधत असली तरी मानवी हस्तक्षेपामुळे गाया धोक्यात आली आहे. हवामानबदलास मानवी हस्तक्षेपच जबाबदार आहे. सुधारणा करण्याची वेळ निघून गेली आहे. जगाने 1970 च्या दशकातच योग्य पावले उचलणे आवश्यक होते. आता वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी निसर्गाचा विनाशही लक्षणीय वेगाने होत आहे. मानवच पृथ्वीचा सूड(‘रिव्हेंज ऑफ गाया’) घेत आहे’’, असे त्यांनी बजावून ठेवले होते.

त्या वेळीच ते म्हणाले होते, ‘‘थोड्या अंतरावरील धोका ओळखून वागण्याचं शहाणपण जगाने कधी दाखवलं आहे? हवामान-बदलाच्या महासंकटाच्या तावडीत असूनही आपलं वर्तन बदलत नाही. वाळवंटीकरण सोपं व वननिर्माण महाकठीण आहे. महामूर्ख मानवजातीला हवामानबदल रोखणं शक्य नाही.’’ त्यांनी पर्यावरणीय संकटाचे स्वरूप अतिशय नेमकेपणाने सांगून ठेवलं आहे. ‘‘पर्यावरणाचं स्वरूप जागतिक असून त्याचं आव्हान मात्र सामाजिक व राजकीय आहे. पृथ्वी नामक अवकाशनौकेला भगदाड पडलं असल्याची खात्री सर्वांना झाल्यामुळे वरचेवर सर्वत्र पळापळ चालू झाली आहे. काही जण जागतिक पातळीवरील उपायांचा पाठपुरावा करीत आहेत, तर काही जण हवामानबदलाच्या समायोजनासाठी स्थानिक बुद्धिमत्तेच्या संपदेचा उपयोग करीत आहेत. आपला समाज काळानुरूप सुसंस्कृत व जबाबदार होत नसल्यामुळे संपूर्ण पृथ्वी धोक्यात आली आहे.’’

भविष्याचा वेध घेताना त्यांनी 2005 मध्ये भाकीतही केले आहे- ‘‘2040 मध्ये दुष्काळ, महापूर व चक्रिवादळाचे थैमान असेल. संपूर्ण युरोप उष्णतेच्या लाटेत होरपळून निघेल. कोट्यवधींना स्थलांतर करणे अनिवार्य असेल. समुद्रकिनाऱ्यावरची शहरं पाण्याने भरून जातील. 2100 पर्यंत 80 टक्के मानवजात नष्ट होईल.’’ त्यांच्या मते, ‘‘पर्यावरणातील सुधारणा करण्याची वेळ निघून गेली आहे. कर्ब उत्सर्जनात कपात, वनांची निर्मिती हे प्रयत्न 1970 च्या दशकात सुरू केले असते, तर आज ही अवस्था ओढवली नसती.’’ तर 2010 मध्ये लव्हलॉक म्हणाले, ‘‘हवामानबदल हे महायुद्ध वा परग्रहावरून होणारा हल्ला यांच्यापेक्षा महाभयंकर आव्हान आपल्या समोर आदळले आहे. युद्धाप्रमाणे आताही काही काळ लोकशाहीचे संकेत बाजूला ठेवून कृती करण्याची निकड आहे.’’

जेम्स यांना अनेक वादांना सामोरे जावे लागले, तरीही त्यांनी त्यांची मांडणी सोडली नाही. ते काळाच्या पुढे असल्यामुळे पर्यावरणीय समस्या व हवामानबदल यांचा अंदाज त्यांना 1960 च्या दशकातच आला होता. यानंतर पर्यावरणास पूरक व घातक कृतींविषयीचे वाद सुरू झाले. लव्हलॉक यांनी अणुऊर्जेला व जनुकीय तंत्रज्ञानाला पाठिंबा दिला, तेव्हा पर्यावरणक्षेत्रातील वैज्ञानिकांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी त्यांचा निषेध केला. ते म्हणाले, ‘‘कोळसा जाळण्याने कर्ब उत्सर्जन वाढते, त्यामुळे औष्णिक ऊर्जा बाद. हवामानबदलाच्या काळात अवर्षणाचे धोके असताना जलविद्युत्‌ प्रकल्पांची हमी देता येत नाही. सौर वा पवन ऊर्जा जगाची गरज भागविण्यास असमर्थ आहेत. अणुऊर्जा ही एकमेव खात्रीदायक वीज देऊ शकते. तिला सुरक्षेच्या कारणावरून नाकारण्यात अर्थ नाही. तसेच हवामानबदलाच्या काळातील सर्व अनिश्चितता लक्षात घेऊन अब्जावधींची भूक भागविण्यासाठी जनुकीय तंत्रज्ञान आवश्यक आहे.’’

ब्रिटनमधील सॅलिसबरीजवळील बॉवरचॉक नामक खेड्यात, निसर्गाच्या सान्निध्यात एकांतवासप्रिय लव्हलॉक शांत आयुष्य व्यतित करीत असतात. त्यांचे विचार ऐकण्यासाठी अनेक पत्रकार त्यांच्याकडे जात असतात. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीविषयी ते म्हणतात, ‘‘विचार करताना तार्किकता व रेषीयता (लिनियारिटी) यांच्या पलीकडे जाऊन अंत:प्रेरणा व अंतर्ज्ञान यातूनही आकलन होऊ शकते.’’ वैज्ञानिक संशोधन हे एकट्याने करण्यासारखे आहे काय, असे विचारल्यावर ते मिस्किलपणे हसून ‘‘कलावंत, कवी वा साहित्यिक यांनी त्यांच्या घरातूनच काम केल्यास कोणालाही वावगे वाटत नाही; परंतु वैज्ञानिकाला मात्र मोठमोठ्या प्रयोगशाळांतूनच काम करावे लागते, असा समज दृढ आहे. घरी राहून 25 वर्षं स्वतंत्रपणे संशोधन करणारा मी एकमेव असू शकेन, परंतु असं करायला काही हरकत नसावी’’ असं उत्तर देतात.

‘त्यांना संशोधनाकरिता निधी कसा पुरत होता?’ असं विचारल्यावर ते म्हणतात, ‘‘एक तर गरजा कमी व त्यातून काटकसर करणं अंगवळणी पडलं आहे. स्वामित्वधनातून येणारी रक्कम पुरवायची.’’ सध्याच्या विज्ञान जगताविषयी, ‘‘विज्ञानाच्या शाखांमध्ये कप्पे, सीमा वा मर्यादा नाहीत. स्वत:चे नियंत्रण टिकविण्यासाठी प्राध्यापकांनी विज्ञानाला कप्पेबंद केलं आहे. विज्ञान हे तज्ज्ञांचे गट व कोंडाळे यांच्या हातात गेलं आहे. त्यांना त्यांच्या कामाचा अभिमानही वाटत असतो. परंतु ते कधीही ठाम का नसतात? त्यांना जगाचं समग्र भान का येत नाही?’’ असे ते विचारतात.

वयाची शंभरी साजरी करताना डॉ.लव्हलॉक यांनी ‘नोव्हासीन- द कमिंग एज ऑफ हायपरइंटलिजन्स’ या नव्या पुस्तकाची वाचकांना भेट दिली आहे. प्रत्येक काळाच्या वैशिष्ट्यांनुसार विद्वान त्याचे नामकरण करीत असतात. 3.4 अब्ज वर्षांपूर्वी प्रकाश संश्लेषण करू शकणारा जीवाणू निर्माण झाला. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी मानव शेती करू लागला. शेतीच्या शोधामुळे भटके जीवन स्थिर करणारी मानवी जीवनातील ती पहिली क्रांती होती. या काळात माणूस सौर ऊर्जेपासून मिळालेले अन्न ग्रहण करू लागला. त्यानंतर त्याला सौरऊर्जा साठविलेला कोळसा हा उपयोगी असल्याचे लक्षात आले. 1712 मध्ये थॉमस न्यूकमन यांनी कोळसा जाळून पाण्याची वाफ केली व वाफेच्या दाबाने दट्ट्याची (पिस्टन) हालचाल करणारे इंजिन तयार केलं आणि औद्योगिक क्रांतीचा पाया रचला. या घटनेपासून मानवी युग (अँथ्रोपोसिन) सुरू झालं. (1980 मध्ये पर्यावरणशास्त्रज्ञ युजिन स्टोर्मर यांनी मानवी युग ही संज्ञा तयार केली) औद्योगिक क्रांतीमुळे अतिश्रीमंत आणि अतिगरीब वर्ग निर्माण झाले. तसेच निसर्गावरील दुष्परिणाम वाढण्यास आरंभ झाला. काळाच्या ओघात त्याचं गतिवर्धन होत गेलं.

लव्हलॉक यांच्या मते, ‘‘औद्योगिक क्रांतीच्या 300 वर्षांच्या काळात आपला गतिवर्धकावरील (ॲक्सलरेटर) पाय हा तसाच ठेवलेला होता. अशा वाईट मानवी युगाचा अंत होऊन येथून पुढे निसर्गास न छळणाऱ्या, चांगल्या मानवी युगाचा आरंभ होणार आहे. मानवाचे उत्क्रांत रूप घेणाऱ्या संगणकीय मानवामुळे (सायबोर्ग) सौरऊर्जेचे थेट माहितीमध्ये व त्याचे रूपांतर ज्ञानामध्ये होणार आहे.’’ या नव्या युगाकरता लव्हलॉक यांनी ‘नोव्हासीन’ ही नवी संज्ञा निर्माण केली आहे.

1960 मध्ये मॅनेफ्रेड क्लायन्स आणि नाथन क्लिने यांनी परग्रहावरील पर्यावरणातसुद्धा सहज वावर करू शकेल, अशा अतिमानवाची कल्पना मांडली होती. सायबरनेटिक्स ऑर्गनिझम- सायबोर्ग म्हणजे मानव व यंत्र यांचा संयोग! लव्हलॉक यांना वाटतं, ‘‘आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उत्कर्षामुळे मानव आणि प्रगत संगणक यांच्या संयोगातून अतीव बुद्धिमान अतिमानव (सायबोर्ग) तयार होईल. ते आपल्यापेक्षा 10,000 पट वेगाने विचार करू शकतील. त्यांच्याकडे जाणीव व विवेक असेल. उत्क्रांतीमधील ही प्रगत प्रजाती असेल. नैसर्गिक निवडीतून उत्क्रांती होते, हे डार्विनने सांगितले होते. त्यामध्ये उत्परिवर्तनला (म्युटेशन) महत्त्व होते. हे उत्परिवर्तन कधी घातकही असे. यापुढे अतिमानवांमुळे उत्क्रांतीमध्ये उद्देशपूर्ण व वेगवान निवड होईल. स्वयं अभियांत्रिकीचं (सेल्फ इंजिनिअरिंग) वरदान लाभल्यामुळे पृथ्वीवरील तापमानाचे संतुलन राखण्याचं चोख भान त्यांच्याकडे असेल. त्यांना पृथ्वीवरील सेंद्रिय संपदेचं महत्त्व सांगण्याची गरजच असणार नाही. त्यांचा कार्यकारणभाव हा अधिक काटेकोर असल्यामुळे ते निसर्गाचा विध्वंस करणार नाहीत.’’

थोडक्यात, मागील काही वर्षांत अनेक शास्त्रज्ञ ‘जीवसृष्टीचा नायनाट, सिव्हिलायझेशनचा अंत’ होण्याची भाकितं करीत आहेत. खुद्द लव्हलॉकदेखील असाच भविष्यवेध करीत होते. आता मात्र ते अतिमानवामुळे पृथ्वी वाचेल, अशी विज्ञान-कल्पित कादंबरीसारखी (सायन्स फिक्शन) मांडणी करीत आहेत. वास्तविक, विज्ञानाच्या कल्पित कादंबऱ्यांनी जगाचे भविष्य सुखी (युटोपिया) व भयप्रद (डिस्टापिया) दोन्ही पद्धतीने रंगविलेलं आहे. तंत्रज्ञान हे कायमच सत्तेच्या हातात असल्यामुळे आजवर त्याचा सत्तेसाठी उपयोग झाला आहे.

20 वर्षांपूर्वी ‘संगणक व जैव तंत्रज्ञान यांच्या युगामुळे एकविसावं शतक हे अधिक आरामदायी असेल. अन्नधान्याची समस्याच शिल्लक राहणार नाही.’ अशी अनेक भाकितं केली होती. आजचं वास्तव आपण अनुभवत आहोतच. एकविसावं शतक हे अनेक अंतर्विरोध घेऊन आलं आहे. हे शतक पर्यावरणाचं आहे, तसाच पर्यावरणविध्वंसाचं आहे. हवामानबदलाची पुष्टी करणारं आणि त्यालाच नाकारण्यासाठीच्या मोहिमांना अर्थसाह्य करणारं आहे. ‘भूगोलाचा अंत’ वाटावा असं तंत्रज्ञान जगभर पसरल्यामुळे जग एकवटणारं आहे, तसंच त्याच तंत्रामुळे संकुचित विचारांतून जग विखंडित करणारं आहे. टोकाच्या व्यक्तिवादी जीवनशैलीचं आणि आत्मघातकी हल्ल्यासाठी जीवावर उदार झालेल्या व्यक्तींचं आहे. उदार व सहिष्णू विचारांच्या पीछेहाटीचं आणि संकुचिततेच्या उदात्तीकरणाचं आहे.

या सर्व वास्तवाची जाण असलेले लव्हलॉक यांचा भविष्यवेध ते गंभीरपणे मांडत आहेत की, संपूर्ण मानवजातीची फिरकी घेत आहेत, हे ते स्वत:च सांगू शकतील. त्यांनी 2006 मध्ये- ‘‘2040 मध्ये लंडनचा पाऊण भाग पाण्याखाली असेल.’’ असं भाकीत व्यक्त केले. त्यावर पत्रकारांनी त्यांना ‘अतिशय निराशावादी व नकारात्मक’ असं म्हटलं. त्यावर लव्हलॉक म्हणाले, ‘‘नाही. मी सकारात्मक व आशावादी आहे. 2040 ला अजूनही 34 वर्षे बाकी आहेत, तोपर्यंत जीवनाचा आनंद घेतलाच पाहिजे.’’ असाच भाव ‘नोव्हासीन’चा आहे का; की त्यांना आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आशावादी दृष्टी द्यावयाची आहे? अथवा त्यांना खरोखरीच अतिमानव हे अधिक सुंसस्कृत, विवेकी व मूल्यनिष्ठ असतील- मानवाचे ते उत्क्रांत रूप असेल, याची खात्री विज्ञानाच्या वाटचालीतून पटली आहे? ते समजून घेण्यासाठी त्यांच्या पुढील मुलाखतीची, लेखाची वा पुस्तकाची वाट पाहावी लागेल.

अतुल देऊळगावकर, लातूर

atul.deulgaonkar@gmail.com

मृत्यूची वेटिंग रूम

मीना कर्णिक

टेरेझिन. प्रागपासून तासाभराच्या अंतरावर असलेलं एक गाव. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझींनी त्याचा ट्रान्झिट कॅम्पसारखा वापर केला. वेगवेगळ्या छळछावण्यांमध्ये नेण्यात येणाऱ्या ज्यूंना काही काळ इथे ठेवलं जायचं. पण मृत्यूच्या या वेटिंग रूमवरही मृत्यूचं सावट होतंच. जवळपास 33 हजार ज्यू इथे मृत्युमुखी पडले, त्या टेरेझिनची ही कहाणी...

संगीताचा तो कार्यक्रम संपला, तेव्हा सभागृह स्तब्ध होतं. नुकत्याच ऐकलेल्या अद्वितीय संगीताचा तर तो परिणाम होताच, पण केवळ तेवढंच कारण नव्हतं. या संगीताची निर्मिती टेरेझिनच्या छळछावणीत झालेली होती, हे सत्य एक क्षणही मनातून पुसलं गेलेलं नव्हतं. लंडनच्या या कॉन्सर्टमध्ये हेल्गा वायझोव्हा-हॉसकोव्हा नावाची कलावंत हजर होती. टेरेझिन आणि ऑश्विट्‌झच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पचा भयानक अनुभव तिने घेतलेला होता आणि त्यातून ती वाचली होती. कार्यक्रम संपल्यानंतर प्रश्नोत्तरांसाठी ती स्टेजवर आली. आणि तिला कोणी तरी विचारलं, ‘‘टेरेझिनमध्ये कधी बाळ जन्माला आलं होतं का?’ ’

‘‘होय, ज्या दिवशी ऑश्विट्‌झहून आम्हाला टेरेझिनमध्ये आणण्यात आलं, त्याच दिवशी तिथे एका बाळाचा जन्म झाल्याचं आम्हाला कळलं. एका जर्मन सैनिकाने डॉक्टर शोधून आणला होता. त्या बाळाचं पुढे काय झालं, माहीत नाही.’’ तेवढ्यात सभागृहामधली एक बाई उभी राहिली आणि म्हणाली, ‘‘मी सांगू का? ते बाळ म्हणजे मी होते!’’

दि. 5 एप्रिल, 2013च्या ‘द गार्डियन’मधल्या एड व्हलियामी यांच्या लेखाची ही सुरुवात वाचताना अंगावर सरसरून काटा आला होता. त्या बाईचं नाव होतं इव्हा क्लार्क. त्यांचं वय तेव्हा 67 वर्षांचं होतं. आपल्या आईबरोबर- ॲन्का बर्गमन यांच्याबरोबर त्या केंब्रिजला राहत होत्या. आईचं वय होतं 96. एड व्हलियामी यांनी नंतर इव्हा आणि ॲन्का या मायलेकींची मुलाखत घेतली, ज्यात टेरेझिनमधल्या अनुभवांचा अर्थातच समावेश होता.

टेरेझिन. प्रागपासून साधारण तासाभराच्या अंतरावर असलेलं एक टुमदार गाव. चेक भाषेत या गावाला टेरेझिन, तर जर्मनमध्ये ‘थेरेसिनस्टॅड्‌ट’ म्हणतात. आमची बस टेरेझिनला पोचली, तेव्हा हवेत एक सुखद गारवा होता. भोवतालचा हिरवागार निसर्ग गावाच्या सौंदर्यात भर घालत होता. नुकताच पाऊस भुरभुरून गेल्याने ओल्या झालेल्या रस्त्यावरून चालताना टेरेझिनच्या काळ्याकुट्ट इतिहासाची सावलीही जाणवत नव्हती. त्या कुप्रसिद्ध तुरुंगाच्या दिशेने आम्ही चालू लागलो तेव्हाही मनावर कसलं सावट नव्हतं. कारण शेवटी, टेरेझिन ही काही प्रत्यक्ष छळछावणी नव्हती. ज्या ज्यूंना ऑश्विट्‌झला किंवा इतर छळछावण्यांमध्ये न्यायचं, त्यांच्यासाठी नाझींनी तयार केलेला हा ट्रान्झिट कॅम्प होता. आजवर आपण ऐकलेल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधल्या भयानक गोष्टी इथे घडल्या नव्हत्या, असं वाटत असल्यामुळे असेल किंवा टेरेझिनविषयी फारशी माहिती नसल्यामुळे असेल; पण आपल्यासमोर इतिहासाची कोणती पानं उलगडणार आहेत याची पुसटशीही जाणीव मनात नव्हती.

‘आरबाईट माख फ्रे’

गेस्टॅपो पोलीस प्रिझनच्या गेटवर लिहिलेली जर्मन भाषेतली ही तीन अक्षरं.

सोबतच्या गाईडने त्यांचा अर्थ सांगितला, ‘वर्क सेट्‌स यू फ्री’- काम तुम्हाला मुक्ती देतं. ‘‘ही स्लोगन नाझींच्या अनेक कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्सच्या प्रवेशद्वारावर लावलेली होती. बायबलमधल्या ‘वारहाईट माख फ्रे- ट्रूथ विल फ्री यू’ या वाक्‌प्रचारावरून नाझींनी हा वाक्यप्रयोग केला.’’ सोबत माहितीही पुरवली. ‘‘जर्मनीमध्ये 1930 च्या बेकारीने परिसीमा गाठलेली असताना ‘आरबाईट माख फ्रे’ हे शब्द खूप लोकप्रिय झाले होते. पुढे ज्यूंना अत्यंत अमानवी परिस्थितीत, अनेकदा मरेपर्यंत काम करायला लावताना नाझी अधिकाऱ्यांनी याच शब्दांचा वापर केला. एक प्रकारे त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार होता.’’ गाईड देत असलेली माहिती ऐकत आम्ही त्या गेटमधून आत शिरलो.

पुढचे काही तास मी एका वेगळ्या जगात होते.

हे जग अंधाराचं होतं.

प्रचंड घुसमट करणारं होतं.

अंगावर शहारे आणणारं होतं.

इथे ऐकू येणाऱ्या क्रौर्याच्या कहाण्या कोणत्याही छळछावणीइतक्याच भयंकर होत्या. गॅस चेंबर्स नसले तरी माणसाच्या आयुष्याकडे पाहण्याची तुच्छता तीच होती.

लांबच लांब कॉरिडोअर्स. लहान-लहान खोल्या. कुठे तरी उंचावर एखादी खिडकी. काही वेळा तीही नाही. खोली मोठी असेल, तर अनेक छोट्या-छोट्या लाकडी पलंगांची गर्दी. एकावर एक बांधलेले बंक बेड्‌स. तिथेच बेसिन आणि टॉयलेट. दुसऱ्या एका बाजूला बायकांसाठीच्या खोल्या. त्याही अशाच.

हा टेरेझिनचा स्मॉल फोर्ट्रेस- छोटा किल्ला. चारही बाजूंनी तारांचं कुंपण. काही वेळा एका माणसालाही श्वास घेताना कोंडल्यासारखं वाटेल अशी परिस्थिती. आमची गाईड एकेका खोलीत नेत टेरेझिनचा इतिहास सांगत होती. भिंतीवर लावलेल्या फोटोंमागच्या कहाण्या सांगत होती. मुलांनी काढलेल्या चित्रांमागचे अर्थ समजावून देत होती. पळून जाणाऱ्या, ज्यूंना ज्या टॉवरवरून गोळी घालून मारलं जायचं तो टॉवर दाखवत होती. टेरेझिनमध्ये मृत्यू पावलेल्या ज्यूंच्या कबरींकडे नेताना त्यांतले अनेक मृत्यू का झाले, याची माहिती देत होती. दुसरं महायुद्ध संपल्यानंतरही टेरेझिनमध्ये असलेल्या ज्यूंचं नष्टचर्य कसं संपलं नाही, ते सांगत होती. त्या कहाण्या, तो इतिहास काही काळ जणू काही जिवंत होऊन आमच्यासमोर उलगडत होता. आम्हाला अस्वस्थ करत होता. इतिहास नुसताच ऐकायचा नसतो, शिकायचा नसतो; कानांआड करायचा नसतो, तर त्यापासून काही तरी बोध घ्यायचा असतो, भविष्याकडे बघण्याची दृष्टी त्यातून मिळवायची असते याची जाणीव मला होत होती.

टेरेझिनच्या या इतिहासाचे दोन भाग आहेत. पहिला- अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात दुसऱ्या सम्राट जोसेफने या गावात एक तटबंदी उभारायचा निर्णय घेतला तो. आणि दुसरा भाग- अर्थातच, नाझींनी टेरेझिनचा वापर करायचं ठरवलं, तो.

एल्ब आणि ओहारा नद्यांच्या संगमावर दुसरा सम्राट जोसेफ याने एक किल्ला बांधायचं ठरवलं. पर्शिया आणि ऑस्ट्रिया यांच्यातल्या अनेक युद्धांच्या अनुभवानंतर शत्रूला आपल्या राज्यात प्रवेश करण्यापासूनच रोखता यावं, हा त्यामागचा हेतू होता. सलग दहा वर्षं हे बांधकाम चालू होतं. एक मुख्य किल्ला, एक छोटा किल्ला आणि नव्या व जुन्या ओहारा नदीच्या मधे एक तटबंदी. ही तटबंदी साधीसुधी नव्हती. त्यात मोठमोठे बुरुज होते, संरक्षणासाठी बांधलेल्या भव्य भिंती होत्या, नदीचं पाणी आत शिरू नये म्हणून निर्माण केलेले खड्डे होते आणि भुयारी मार्गही होते.

राजाच्या आईचं नाव होतं मारिया थेरेसा. आईच्या स्मरणार्थ राजाने या संपूर्ण गावाचं नाव ठेवलं- थेरेसिनस्टॅड्‌ट म्हणजेच टेरेझिन.

गंमत म्हणजे, या किल्ल्यांचा किंवा तटबंदीचा प्रत्यक्ष युद्धात कधीही वापर झाला नाही. कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचा प्रतिकार करू शकेल असं हे बांधकाम होतं, पण त्याचा वापरच न झाल्याने हळूहळू या संपूर्ण भागाकडेच दुर्लक्ष होऊ लागलं. अखेर हा किल्ला रिकामा करण्यात आला आणि टेरेझिन म्हणजे संरक्षणासाठी ठेवलेल्या शिबंदीचं गाव बनलं.

एकोणिसाव्या शतकामध्ये गुन्हेगारांच्या सुधारगृहासाठी इथल्या छोट्या किल्ल्याचा वापर होऊ लागला. पहिल्या महायुद्धातही सारायेवोच्या खुन्यांसकट हॅब्सबर्ग राजघराण्याच्या अनेक शत्रूंची रवानगी इथे करण्यात आली होती. ऑस्ट्रिया-हंगेरीने या गावाचा आपल्या लष्कराचा तळ म्हणून वापर केला, तर 1918मध्ये चेकोस्लोव्हाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढची तब्बल वीस वर्षं या किल्ल्याचा उपयोग लष्करी तुरुंग म्हणून केला गेला.

1938च्या सप्टेंबरमध्ये झालेल्या म्युनिच करारानंतर जर्मनीने चेकोस्लोव्हाकियातल्या जर्मन भाषा बोलणाऱ्या प्रांतावर ताबा सांगितला. पण थेरेसिनस्टॅड्‌ट चेकोस्लोव्हाकियातच राहिलं असलं, तरी 15 मार्च, 1939 या दिवशी जर्मनीने चेक भूमीवर हल्ला करून हा भाग आपल्या ताब्यात घेतला. मात्र, टेरेझिनकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं ते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात.

जून 1940मध्ये टेरेझिनचा छोटा किल्ला प्राग गेस्टॅपोंनी वापरायला सुरुवात केली. आजूबाजूचा भाग लष्करी तळ बनला. साडेतीन हजार सैनिक तिथे राहत होते आणि त्यांच्या दिमतीसाठी सुमारे तेवढ्याच नागरिकांची सोय करण्यात आली होती. मग पुढची काही वर्षं चेकच्या भूमीवर दडपशाहीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना, इतर देशांमधल्या विरोधकांना इथे आणलं जाऊ लागलं. खुद्द गावाचं रूपांतर एका घेट्टोमध्ये झालं ते 1941च्या नोव्हेंबर महिन्यात. पहिल्या बॅचमध्ये साधारण साडेतीनशे तरुण ज्यू इथे आले. मागाहून येणाऱ्या ज्यूंसाठी गाव वसवणं हे त्यांचं काम होतं. त्यानंतर आलेल्या ज्यूंना आपलं सगळं सामान नाझी अधिकाऱ्यांच्या सुपूर्द करावं लागायचं. 50 किलो वजनाचं सामान ते स्वत:जवळ बाळगू शकत होते. मात्र बॉशोविट्‌झ रेल्वे स्टेशनपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या टेरेझिनपर्यंत त्यांना हे सामान उचलून पायी जावं लागे. त्यापैकी वय झालेले अनेक जण वाटेतच मरण पावले. जे टेरेझिनला पोचले, त्यांची नोंदणी झाली आणि त्यांच्याकडचं सर्व सामान काढून घेण्यात आलं.

त्या आधी ऑक्टोबर महिन्यात राईश मेन सिक्युरिटी ऑफिसर (आरएसएचए) जर्मनी आणि ऑस्ट्रियातल्या ज्यूंना पूर्व युरोपातल्या नाझींच्या ताब्यात असलेल्या घेट्टोजमध्ये घेऊन जाण्यासंबंधी चर्चा करत असताना टेरेझिनचा या कामासाठी वापर करण्याची सूचना पहिल्यांदा मांडण्यात आली होती. ॲडॉल्फ आईकमन, हान्स गन्थर, ऱ्हाईनहार्ड हेड्रिच यांसारख्या आरएसएचएशी संबंधित मोठ्या हस्ती या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. हेन्रिक यॉकेल या एसएस वॉर्डरवर टेरेझिनच्या प्रशासनाची जबाबदारी देण्यात आली होती. पर्यायाने स्मॉल फोर्ट्रेसमध्ये घडलेल्या सर्व गुन्ह्यांची जबाबदारीही त्याचीच म्हणायला हवी.

सुरुवातीला बोहेमिया आणि मोराव्हियातले ज्यू आले, त्यांच्या पाठोपाठ राईशमधले- जर्मनी व ऑस्ट्रियामधले आणि मग डच, डॅनिश तसंच इतर सर्व देशांमधून ज्यूंना इथे आणलं जाऊ लागलं. टेरेझिनच्या जवळच असलेल्या लिटोमेरिस गावात फ्लोझेनबर्ग कॉन्सन्ट्रेशन कॅम्पची शाखा उघडण्यात आली. या गावांमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या बांधकामांसाठी पकडून आणलेल्या ज्यूंचा मजूर म्हणून वापर व्हायला लागला.

दि.20 जानेवारी, 1942 या दिवशी एका कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं की, ‘राईशमधल्या 65 आणि त्याहून जास्त वय असलेल्या ज्यूंसाठी, तसंच पहिल्या महायुद्धात जखमी झालेल्या ज्यू सैनिकांसाठी टेरेझिनमध्ये घरं बांधण्यात येतील.’

टेरेझिनने नाझींचे दोन हेतू साध्य केले. ज्या ज्यूंना पुढे छळछावण्यांमध्ये पाठवायचं त्यांच्यासाठी ट्रान्झिटची, काही काळ थांबायची जागा म्हणून टेरेझिनचा उपयोग करण्याचं ठरलं; त्याचबरोबर ‘समाजातल्या काही मान्यवर आणि प्रस्थापित वयस्क ज्यूंसाठी निवृत्तीनंतर निवांत जगण्याचं ठिकाण’ म्हणून आपण ही जागा वापरणार आहोत, असंही जाहीर केलं. या वय झालेल्या किंवा अपंग झालेल्या ज्यूंना मजुरीची कामं देता येणार नव्हती. त्यामुळे टेरेझिनचा ट्रान्झिटचा मूळ हेतू जगासमोर येणार नव्हता. आपलं पाप लपवण्यासाठी नाझींनी दिलेला हा मुलामा होता, हे बराच काळ बाहेरच्या जगाच्या लक्षातही आलं नाही.

कालांतराने टेरेझिनमध्ये काही मान्यवर ज्यूसुद्धा आणले गेले. त्यांना थेट मारून टाकलं असतं, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा बोलबाला होण्याची शक्यता होती. त्यापेक्षा टेरेझिन हे एक निवांत ठिकाण आहे, असं सांगून नाझींनी अनेक ज्यू कलावंतांना टेरेझिनमध्ये खोटी घरं विकत घेतल्याचे करार करायला लावले, भाड्याचे पैसे दिल्याच्या रिसिट बनवल्या आणि या ज्यूंना आपली आयुष्यभराची सगळी मिळकत सरकारच्या ताब्यात द्यायला लावली. नाझींनी काही ज्यूंची समिती बनवली आणि त्यांनी टेरेझिनचं प्रशासन सांभाळावं, असं ठरवलं. जर्मन अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी होत नसली, तरी सुरुवातीच्या काळात या समितीच्या बैठका होत. सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन- स्वयं प्रशासन असं गोंडस नावही त्यासाठी देण्यात आलं होतं.

1940 ते 1945 या पाच वर्षांच्या दरम्यान तीस देशांमधले सुमारे दोन लाखांहून अधिक लोक टेरेझिन आणि लिटोमेरिसमध्ये आणले गेले. यापैकी सुमारे 33 हजार माणसांचा इथे मृत्यू झाला. त्यातले बहुतेक ज्यू हे आजारी पडून किंवा उपाशी राहिल्यामुळे मृत्युमुखी पडले. आणखी 90 हजार लोक टेरेझिन सोडल्यानंतर ऑश्विट्‌झची छळछावणी, तुरुंग अशा इतर ठिकाणी मरण पावले.

‘‘हे फर्स्ट कोर्टयार्ड. इथे कैद्यांची हजेरी घेतली जायची. आणि इथे पुढे दिसताहेत ते सॉलिटरी सेल्स. गंभीर गुन्हे ज्यांच्यावर आहेत किंवा ज्यांनी लोकांमध्ये मिसळू नये असं वाटतंय, त्यांना या खोल्यांमध्ये कोंडून ठेवलं जायचं. बहुतेक वेळा पूर्ण नग्न करून. बऱ्याचदा त्यांना खायला दिलं जायचं नाही, त्यांचा छळ केला जायचा. या खोल्यांमध्ये धड उजेडही नाही, हे तुमच्या लक्षात आलंच असेल!’’ गाईडचं माहिती देणं चालू होतं.

त्या सॉलिटरी सेल्सच्या बाजूलाच एक छोटीशी जागा होती. त्या जागेचा उपयोगही कैद्यांचा छळ करण्यासाठी केला जायचा. मुळातच अर्धपोटी असलेले हे कैदी त्या छळाचा असा किती काळ सामना करू शकणार होते? किल्ल्यातल्या अकरा बरॅक्समध्ये ज्यूंच्या राहण्याची सोय होती, तर इतर नागरिक गावात बांधलेल्या घरांमध्ये राहत होते. किल्ल्यात राहणाऱ्या ज्यूंना गावात राहणाऱ्यांमध्ये मिसळण्याची परवानगी नव्हती, कोणी तसा टेरेझिनमध्ये मरण पावलेल्या प्रयत्न केलाच, तर त्याला किंवा तिला अत्यंत कठोर शिक्षा केली जायची.

टेरेझिनमधून ज्यूंची पहिली बॅच निघाली ती 9 जानेवारी, 1942 या दिवशी- रिगा घेट्टोच्या दिशेने. रिगाला जाणाऱ्या ज्यूंना आपण कुठे चाललोय, ते सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर कधीही कोणत्याही बॅचला त्यांची रवानगी कुठे होणार आहे याची कल्पना दिली गेली नाही. पूर्वेच्या दिशेने त्यांना नेण्यात येणार आहे, इतकंच त्यांच्या फॉर्म्सवर लिहिलं जायचं. टेरेझिनच्या छोट्या किल्ल्यातल्या तुरुंगात कुटुंबंच्या कुटुंबं आणण्यात आली होती. एका कुटुंबातून साधारणपणे एकाच व्यक्तीची निवड केली जायची.

बाहेरून येणाऱ्या ज्यूंची संख्या जशी वाढू लागली तसा बिगर ज्यू चेक नागरिकांना गावाबाहेर निघून जाण्याचा सल्ला देण्यात आला. अशा रीतीने संपूर्ण टेरेझिनमध्ये बिगर ज्यू नागरिक राहणार नाही याची काळजी जाणीवपूर्वक घेतली गेली. मग हे गाव बाहेरच्या नागरिकांसाठी बंदच केलं गेलं.

टेरेझिनमध्ये 1942 मध्ये एक लाखाहून जास्त ज्यू आले. कैद्यांची संख्या वाढू लागली तसतशी खोल्यांमधली गर्दी वाढली. पाण्याची कमतरता भासू लागली. जिथे राहायचं तिथेच नैसर्गिक विधी करायचे, स्वाभाविकच स्वच्छता राखणं कठीण होऊ लागलं. रोगांची लागण होऊ लागली. आणि आधीच अर्धपोटी राहणाऱ्या कैद्यांमधली प्रतिकारशक्ती कमी झालेली असल्यामुळे आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत भर पडू लागली. आजारी आहे म्हणून कामाला सुट्टी मिळण्याचीही शक्यता नसायचीच. परिणाम एकच- मृत्यू!

1942च्या सप्टेंबर महिन्यात 3941 ज्यू मरण पावले. एवढ्या लोकांना पुरण्याचं काम काही सोपं नव्हतं. त्यामुळे कित्येक दिवस त्यांची प्रेतं तशीच पडून होती. शवपेट्या घेऊन जाणारे मजूर रोजच्या रोज दिसू लागले. ही गर्दी कमी करण्यासाठी वीसेक हजार वयस्क ज्यूंना टेरेझिनमधून बाहेर काढण्यात आलं आणि सर्वच्या सर्व जणांना छळछावण्यांमध्ये पाठवण्यात आलं. या एका वर्षात 42 हजार ज्यू टेरेझिनमधून बाहेर पाठवले गेले. यापैकी केवळ 356 जण वाचले, अशी नोंद आहे.

कैद्याचं वय काय, त्याची समाजातली प्रतिष्ठा किती यावर तो कोणत्या कॅम्पमध्ये ठेवला जाणार, हे ठरत असे. सर्वसाधारणपणे एका डॉरमेटरीमध्ये साठेक कैदी असत. जे कैदी कुठून तरी ओळख काढत, वशिला लावत, त्यांच्या खोलीत कमी गर्दी असे, तर डॅनिश ज्यूंना खासगी अपार्टमेंट्‌सही देण्यात आली होती. मात्र सगळ्यांच्याच खाण्या-पिण्यावर बंधनं होती.

65 पेक्षा जास्त वय असलेल्यांकडून काम करवून घेता यायचं नाही किंवा त्यांना आवश्यक त्या वेगाने काम करता यायचं नाही, म्हणून त्यांना अन्नही कमी दिलं जायचं. त्यांच्यापेक्षा मजुरी करणाऱ्यांना थोडं जास्त खायला मिळत असे. या कैद्यांना आठवड्याला सरासरी सत्तरेक तास शारीरिक परिश्रमाचं काम करावं लागायचं. तुरुंगात झालेल्या मृत्यूंपैकी नव्वद टक्क्यांहून जास्त मृत्यू हे साठीच्या वरच्या कैद्यांचे होत. ज्या वृद्धांना टेरेझिनमधून बाहेर पाठवण्यात आलं नाही, ते सगळे टेरेझिनमध्येच उपासमारीने मृत्यू पावले. बायकांचं काम स्वाभाविकपणे जेवण बनवणं, साफसफाई करणं, नर्सिंग करणं, भाज्या पिकवणं हे असे.

किल्ल्यात चौथ्या कोर्टयार्डच्या, चौथ्या आवाराच्या बांधकामाला 1943-44 मध्ये सुरुवात झाली. इथल्या कैद्यांनी या भागाचं नाव ठेवलं होतं, ‘स्मॉल फोर्ट्रेसेस ग्रेव्ह’. कारण इथल्याच एका भिंतीलगत नाझी अधिकाऱ्यांनी एका फासाची सोय केलेली होती. भिंतीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्यूंना इथेच गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होतं. इथल्या सगळ्या कैद्यांच्या आयुष्यावर नाझी अधिकाऱ्यांची सत्ता होती. कोणत्याही लहान गुन्ह्यासाठी ते फाशीची सजा सुनावू शकत होते आणि त्यांना प्रश्न विचारणारं कुणीही नव्हतं.

‘‘टेरेझिनच्या संगीताविषयी आम्ही ऐकलंय, त्याबद्दल काही सांगू शकाल?’’ आमच्या ग्रुपमधल्या एका परदेशी बाईने आमच्या गाईडला प्रश्न केला. तिच्यापाशी अर्थातच खूप माहिती होती.

‘‘टेरेझिनमध्ये खूप साऱ्या कलावंतांना आणण्यात आलं होतं. सगळेच काही छोट्या किल्ल्यातल्या बरॅक्समध्ये राहत नव्हते. मुळात टेरेझिन हे निवृत्तीनंतर ज्यूंसाठी आनंदाने जगण्याचं ठिकाण आहे, असं नाझींना जगासमोर दाखवायचं होतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात इथे खूप सारे ज्यू कलावंत आले. बहुसंख्य चेकोस्लोव्हाकियातूनच आणले गेले होते. संगीतकार, चित्रकार, चित्रपट दिग्दर्शक तसंच तत्त्वज्ञ, विचारवंतही होते. यामधले काही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे होते. यातल्या अनेकांना चांगल्या घरांमध्ये ठेवण्यात आलं होतं. या कलावंतांकडून तेव्हा संगीताची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. इथे त्यांनी आपले कार्यक्रम केले. कैद्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं जायचं.

‘‘कॅरेल स्वेन्क, गिडॉन क्लाईन, राफेल शॅश्टर असे अनेक संगीतकार टेरेझिनमध्ये होते. स्वेन्कचं ‘टेरेझिन मार्च’ हे गाणं म्हणजे कॅम्पमधल्या कैद्यांचं समरगीत बनलं होतं. शॅश्टरने 150 ज्यूंना घेऊन 1943 मध्ये वेरदी या जगप्रसिद्ध ऑपेराकाराच्या सोळा रचना सादर केल्या होत्या. त्या ऐकण्यासाठी जर्मनीचे लष्करी अधिकारी आणि नाझी अधिकाऱ्यांबरोबर इतर कैदीही होते. जे मोकळेपणाने बोलता येत नाही, ते सगळं या रचनांमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. काही संगीतकारांनी जॅझच्या रचना केल्या, काहींनी ऑपेरा लिहिले. ‘’

‘‘चित्रकारांना नाझींच्या आदेशानुसार प्रचारकी चित्रं काढण्याचे आदेश होते. पण लिओ हास, ऑटो उंगार, पेत्र किन अशांसारख्या अनेक चित्रकारांनी टेरेझिनमधल्या परिस्थितीचं दर्शन घडवणारी चित्रं काढली आणि ती बाहेर स्मगल करण्याचा प्रयत्न केला. काही वेळा तो यशस्वी झाला, काही वेळा नाही. पकडलेल्यांचे छोट्या किल्ल्यात खूप हाल केले गेले. इथे तुम्ही बघताय त्यातली काही चित्रं इथल्या चित्रकारांनी, इथे राहणाऱ्या लहान मुलांनी काढलेली आहेत. युद्ध संपल्यानंतर बऱ्याच काळाने ती सापडली.’’

‘‘मुलांसाठीही शाळा होत्या. नाझींच्या दडपशाहीखाली असल्याच्या काळात टेरेझिनमध्ये पंधराएक हजार मुलं आली-गेली. कालांतराने यातल्या प्रत्येकाला छळछावणीत पाठवण्यात आलं आणि त्यापैकी नव्वद टक्क्यांहून जास्त मुलं त्यात मरण पावली. जून 1942मध्ये टेरेझिनमधल्या चेक नागरिकांना बाहेर पाठवण्यात आलं. त्या आधी लहान मुलं आपल्या आई-वडिलांबरोबर त्यांच्या बरॅक्समध्ये राहत होती. त्यांच्यावर दिवसभर कोणीही नजर ठेवून नसे. मात्र, टेरेझिनमधून सर्वसामान्य रहिवासी पूर्णपणे बाहेर गेल्यानंतर रिकाम्या झालेल्या काही घरांमध्ये मुलांना ठेवलं गेलं. कॅम्पमधल्या कठीण परिस्थितीपासून त्यांना थोडं दूर असू द्यावं, असा त्यामागचा हेतू होता का- माहीत नाही; पण एकेका घरात दोनेकशे मुलं असायची. त्या सगळ्यांची भाषा एक नव्हती. मुलगे वेगळे आणि मुली वेगळ्या राहत. वयानुसार त्यांचे गट केले गेले होते.

निदान वरकरणी तरी सगळं कसं छान आहे, असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. रेड क्रॉसने टेरेझिनला भेट दिली, तेव्हा हा आभास त्यांनाही वस्तुस्थितीची जाणीव करून देऊ शकला नाही.’’

डेन्मार्कचा राजा दहावा ख्रिस्तियान याने 1943 मध्ये टेरेझिनचं इन्स्पेक्शन करण्याची मागणी केली. त्याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात 466 डॅनिश ज्यूंची टेरेझिनला रवानगी करण्यात आली होती. त्यांची स्थिती कशी आहे, हे राजाला पाहायचं होतं. त्याने पाठवलेल्या समितीमध्ये आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसचे स्वित्झर्लंडमधले दोन प्रतिनिधी आणि डेन्मार्क सरकारचे दोन प्रतिनिधी अशा चार जणांचा समावेश होता. ‘टेरेझिनमध्ये ज्यूंना तुरुंगात ठेवलं गेलंय, तिथून त्यांची रवनागी छळछावण्यांमध्ये होतेय’ अशी कुणकुण तोवर बाहेरच्या जगाला लागली होती. या सर्व अफवा आहेत असं सिद्ध करायचं तर ही चांगली संधी आहे, असं नाझींना वाटलं. त्यामुळे त्यांनी राजाच्या या मागणीला होकार दिला.

टेरेझिनमधले जर्मन लोक ताबडतोब कामाला लागले. हे गाव कसं सुंदर दिसेल, हे पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. गावातले रस्ते साफ झाले. खोटी दुकानं आणि कॅफेटेरिया बांधले गेले. टेरेझिनमध्ये ज्यूंची गर्दी झालीये असं वाटू नये, म्हणून अनेकांना ऑश्विट्‌झच्या छळछावणीत पाठवून देण्यात आलं. ज्या चेक ज्यूंकडून बांधकाम आणि साफसफाईची कामं करवून घेण्यात आली होती, त्यांचीही रवानगी ऑश्विट्‌झला करण्यात आली.

दि.23 जून, 1944 या दिवशी हे इन्स्पेक्शन करण्यात आलं. समितीतल्या चार सभासदांच्या स्वागतासाठी ॲडॉल्फ आईकमन हजर होता. त्याच्या जोडीला प्रागमधल्या नाझी हेडक्वार्टर्समधले अनेक अधिकारी आणि बर्लिनमधले उच्चपदस्थही आलेले होते.

एका लिमोझिनमधून या सभासदांचा प्रवास सुरू झाला. रेड क्रॉसने ज्या डॅनिश ज्यूंना भेटी दिल्या, ते नव्याने पेंटिंग केलेल्या खोल्यांमध्ये राहत होते. एका खोलीत फार फार तर तिघे जण. त्यानंतर या चौघांना टेरेझिनची सैर करवण्यात आली. गंमत म्हणजे, रेड क्रॉसच्या या लोकांपैकी एकानेही जर्मन अधिकारी नेत असलेल्या मार्गापेक्षा दुसऱ्या मार्गावरून जाऊन बघू या, असं सुचवलंही नाही. वाटेत भेटलेल्या ज्यूंना जर्मन प्रश्न विचारत होते. काय उत्तर द्यायचं, हे अर्थातच त्यांना आधीच सांगून ठेवलेलं होतं. रेड क्रॉसमधल्या कोणी थेट प्रश्न विचारला, तर त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. रेड क्रॉसवाल्यांनी टेरेझिनमध्ये एकूण आठ तास घालवले.

लहान मुलांच्या फुटबॉल मॅचचं आयोजन या प्रसंगी केलेलं होतं. राफेल शॅश्टरकडून नाझींनी रेक्वियम- म्हणजे मृतात्म्यांच्या शांतीसाठी म्हणायची प्रार्थना- सादर करवून घेतली. आपलंच मरणगीत ज्यू गात आहेत, अशी त्यांची खासगीत थट्टाही करण्यात आली, असं म्हणतात. दि.16 ऑक्टोबर, 1944 या दिवशी राफेल शॅश्टरना ऑश्विट्‌झला पाठवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी गॅस चेंबरमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

जर्मनांनी उभ्या केलेल्या आभासाचा परिणाम म्हणून रेड क्रॉससमोर टेरेझिनविषयी एक सकारात्मक चित्र निर्माण करण्यात जर्मन यशस्वी ठरले. त्याच उत्साहामध्ये त्यांनी टेरेझिनवर एक प्रचारकी सिनेमा करायचा निर्णय घेतला. जर्मन ज्यू असलेला कर्ट गेरॉन नावाचा अनुभवी दिग्दर्शक आणि नट टेरेझिनच्या तुरुंगात होता. त्याच्यावर आणि चेक दिग्दर्शक कॅरेल पेसिनी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. टेरेझिन म्हणजे भूतलावरचा स्वर्ग आहे, असं दाखवणाऱ्या या सिनेमामध्ये तिथल्या कैद्यांनीच भूमिका केल्या होत्या. अकरा दिवस सिनेमाचं शूटिंग चाललं आणि त्यानंतर दिग्दर्शकासकट सगळ्यांना ऑश्विट्‌झला पाठवण्यात आलं. दि.28 ऑक्टोबर, 1944ला गेरॉनचा गॅस चेंबरमध्ये मृत्यू झाला.

‘द फ्युरर गिव्हज्‌ अ व्हिलेज टु द ज्यूज’ या नावाने हा सिनेमा प्रसिद्ध असला, तरी जर्मन भाषेमध्ये हे शीर्षक ‘थेरेसिनस्टॅड्‌ट आईन डॉक्युमेंटरफिल्म ऑ देम ज्युडीशेन’ असं होतं, ज्याचं इंग्लिश भाषांतर आहे- टेरेझिन : अ डॉक्युमेंटरी फिल्म ऑफ द ज्युईश रिसेटलमेंट. सिनेमा काही ठिकाणी दाखवण्यात आला, पण प्रचारासाठी त्याचा उपयोग करता आला नाही; कारण तोपर्यंत युद्धच संपलं होतं. ही संपूर्ण डॉक्युमेंटरी आज उपलब्ध नाही, पण त्याचं थोडंसं फूटेज खराब होण्यापासून वाचलंय.

दि.8 मे, 1945. सोव्हिएत रशियाचे रणगाडे टेरेझिनमध्ये घुसले. रेड आर्मीने नाझी जर्मनीला हरवून हे गाव अधिकृतरीत्या आता आपल्या ताब्यात घेतलं होतं. मात्र, त्यांचं स्वागत करण्याच्या मन:स्थितीत टेरेझिन नव्हतं. काही लोक रस्त्यावर आनंदाने उतरले होते. काही आपल्या खिडक्यांमधून रशियन सैन्याला हात दाखवत होते. पण त्याहीपेक्षा किती तरी जास्त माणसं टायफॉईडने आजारी पडलेली होती. मृत्यूशी झुंज देत होती. नाझींपासून सुटका झालेल्या अनेकांची लढाई संपलेली नव्हती.

टेरेझिन आणि शेजारच्या लिटोमेरिसमध्ये 1945 च्या एप्रिल महिन्यात टायफस या आजाराची साथ आली. हा एक संसर्गजन्य आजार असतो. डोकेदुखी, ताप, गुंगी येणे ही त्याची लक्षणं. उवा किंवा उंदराच्या अंगावरची पिसू यांतून त्याची लागण होते. ती झपाट्याने पसरते आणि माणसांचा बळी घेते.

एव्हाना नाझींच्या पराभवाची चाहूल टेरेझिनला लागली होती. दि.4 मेपासून चेक डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, कार्यकर्ते टेरेझिनमध्ये दाखल होऊ लागले. नाझींची शेवटची बॅच त्याच्या दुसऱ्या दिवशी टेरेझिनमधून निघून गेली.

छोट्या किल्ल्यातल्या बरॅक्सचं रूपांतर आता हॉस्पिटलमध्ये झालं होतं. चौथ्या कोर्टयार्डमधल्या कैद्यांना सर्वांत जास्त लागण झालेली होती. अनेकांचा आजार बरा न होण्याच्या स्तराला गेला होता. हळूहळू इथल्या रुग्णांना गावातल्या इतर जागांवर हलवण्यात आलं. गावामध्ये पाच तात्पुरती हॉस्पिटल्स उभारण्यात आलेली होती. साथीची लागण झाल्याची बातमी पसरली आणि टेरेझिनमध्ये मदतीचा ओघ चहूबाजूंनी सुरू झाला. तरीही या आजाराने शेकडो कैद्यांचे, डझनभर डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे बळी घेतलेच.

टेरेझिनमध्ये बळी गेलेल्या ज्यूंच्या थडग्यांच्या जमिनीवर आज एक स्मारक उभं आहे. नीटनेटकं कापलेलं हिरवंगार गवत, प्रत्येक थडग्यावर ठेवलेली रंगीत फुलं, जिथे शक्य तिथे नाव आणि जन्म-मृत्यूची नोंद.

आपल्या नजीकच्या इतिहासातला तो भयानक काळ टेरेझिनने जपून ठेवलाय, जतन केलाय. चेक कवी यारोस्लाव सायफेर्ट आपल्या ‘मृतांसाठी’ या कवितेत म्हणतो – स्मशानांमधलं स्मशान, कोण सांगू शकेल दोघांमधला फरक,

इथल्या मृत चेहऱ्यांना काळाने केव्हाच पुसून टाकलंय.

साक्षी, हृदयाला चरे पाडणाऱ्या आणि भीषण,

या गडद नासक्या जागी आम्ही नेल्या त्या आमच्याबरोबर

वाऱ्याचं घोंगावणं आणि रात्र

थडग्यांच्या टोकांवर तेवढंच काय ते बसून राहील

गवताचा एक तुकडा, कडवट तण

आणि मग मे महिन्यात फुलतील फुलं...

टेरेझिनहून परत येताना मन विषण्ण झालं होतं. ज्यूंवरच्या या अत्याचारांच्या कहाण्या अशा प्रकारे अनुभवल्यानंतर, अनेकदा सिनेमांमधून बघितल्यानंतर आणि त्याविषयी वाचल्यानंतर प्रत्येक वेळी माझ्या मनात येतो तोच विचार याही वेळी होता.

हुकूमशहाच्या हिंसेचा एवढा टोकाचा अनुभव घेतलेले ज्यू आज शोषकाच्या भूमिकेत कसे आहेत? इतिहासाकडून ते नेमकं काय शिकले आहेत? गाझा-पट्टीतल्या शाळांवर, हॉस्पिटल्सवर ताकदवान बंदुकांचा आणि बॉम्बचा मारा करताना त्यांच्या मनात नेमके काय विचार येत असतील? शस्त्रास्त्रांची निर्यात करण्यात आघाडीवर असलेला इस्राईल या शस्त्रास्त्रांच्या वापरामुळे देशांना, देशातल्या लोकांना कोणती किंमत मोजावी लागते याविषयी कणभरही संवेदनशील कसा नाही? ताकद ही नेहमी दमन करण्यासाठी असते, या विचारापर्यंतचा त्यांचा प्रवास कधी आणि कसा झाला? कशी मिळतील या प्रश्नांची उत्तरं?

मीना कर्णिक, मुंबई

meenakarnik@gmail.com

काळाचे जबरदस्त भान असलेली जर्मनी

दत्ता दामोदर नायक

परिटघडीचे बर्लिन शहर संध्याकाळचे 7 वाजले किंवा वीकएन्डचा शुक्रवार आला की, आपली घडी विस्कटून टाकते. थोडेसे हात-पाय सैल करते. उच्छृंखल होते. रंगेल होते. अशा वेळी बर्लिनच्या रेस्टॉरंटचा फेरफटका मारणे, ही एक आनंदयात्रा आहे. बर्लिन हे जेवढे जर्मन शहर आहे तेवढेच कॉस्मोपॉलिटन शहर आहे. तिथे अस्सल जर्मन पद्धतीचे, कॉन्टिनेण्टल, इटालियन, ग्रीक, थाय, चायनीज, मेडिटेरिनियन, इंडियन, मेक्सिकन, जापनीज असे सर्व प्रकारचे जेवण मिळते. रोस्टेड, ग्रिल्ड, फ्राइड, तन्दूर या प्रकारांतील पोर्क, बीफ, चिकन, टर्की, फिश इथे उपलब्ध असतात. मांसाच्या मानाने माशांचे खूप कमी प्रकार मला इथल्या मेनूत आढळले.

जर्मनी हा काळाचे जबरदस्त भान असलेला देश आहे. जर्मनी एकाच वेळी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळात वावरतो. गौतम बुद्धाची सजगता आपल्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे कालभान विसरून वर्तमानकाळात- तेही वर्तमानकाळातील चालू क्षणात- जगायला शिकवते. जर्मनीचे कालभान बुद्धाच्या सजगतेला शीर्षासन घालणारे आहे. जर्मनीत इतिहासाची घनदाट सावली, वर्तमानकाळाची ताजी उन्हे आणि भविष्यातले जलगर्भ ढग यांचा संगम झालेला दिसतो.

वाहत्या ऱ्हाईन नदीत आपले प्रतिबिंब पाहणारे मध्ययुगीन किल्ले जर्मनीने सांभाळून ठेवले आहेत. नाझींचा इतिहास क्रूर असला, तरी त्याच्या पाऊलखुणा जर्मनीने पुसल्या नाहीत. देशाला दुभंग करणारी बर्लिन भिंत जर्मनीने पूर्णपणे पाडली नाही. भावी पिढीला आठवण राहावी म्हणून काही मीटरपर्यंतची भिंत राखून ठेवली आहे. म्युनिच, फ्रँकफर्टसारख्या जर्मन शहरांत जुना आणि नवा असा शहराचा विभाग आहे. सेले, न्युरेनबर्ग, रोथेनबर्ग यासारखी अनेक जर्मन गावे मध्ययुगीन साखरझोपेतून अजून जागी झालेली नाहीत. आपल्या पुरातन लाकडी घरांचे वास्तुशिल्प जर्मनीने नाटकांतील पडद्यांप्रमाणे गावागावांत टांगून ठेवले आहे. भूतकाळ म्हणजे वर्तमानकाळाचाच थोडा मागे रखडलेला भाग, असे जर्मनी मानत असावा.

जर्मनीचा वर्तमानकाळ त्याच्या मार्केटमधून, मॉल्समधून, बार्स आणि ताव्हेर्नमधून, रेस्टॉरंटमधून वाहतो आहे. मुळात जर्मन लोकांचा स्वभाव मनमोकळा, हसतमुख, आनंदी आहे. ‘जॉय दी व्हिवेर’- जीवनातला आनंद लुटा- हे त्याचे जीवनतत्त्वज्ञान आहे. त्यामुळे दिवसभर भरपूर काम करावे, संध्याकाळी आणि आठवड्याअखेर मौजमजा करावी, असा त्यांचा शिरस्ता आहे. बिअर हे जर्मन लोकांचे आवडते पेय आहे. जर्मनीतले दर माणशी बिअर पिण्याचे वार्षिक प्रमाण 100 लिटर्स आहे. जर्मन माणूस दूध क्वचित पितो, तो भरपूर कॉफी पितो. त्यामुळे ‘नीरक्षीरविवेक’ या संज्ञेला जर्मनीत अर्थ नाही. तिथे ‘नीर बि(अ)र’ ही संज्ञा वापरावी लागेल.

जर्मन माणसाला मांसाहार आवडतो. प्रत्येक जर्मन माणूस वर्षाला 60 किलो मांस फस्त करतो. त्याच्या आहारात ब्रेड, सॅलेड्‌स आणि बटाट्याचे विविध प्रकार यांचा समावेश असतो. आपल्या जिव्हालौल्यामुळे जर्मन माणसे आरोग्याची फारशी काळजी घेत नाहीत. त्यामुळे लठ्ठपणा ही जर्मन समाजाला सतावणारी समस्या आहे, पण त्याची फारशी पर्वा ते करतात, असे दिसत नाही. येथील लोकांची एकूण जीवनशैली पाहिली की, जसा काही भविष्यकाळ नाहीच, अशा थाटात ते वावरतात. कदाचित जर्मन माणसाच्या मते, भविष्यकाळ हा वर्तमानकाळाचेच विस्तारित- ‘लिनियर’ रूप असावे.

भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यात वावरणाऱ्या जर्मनीला भविष्यकाळाचेही तेवढेच जागृत कालभान आहे. जर्मनी हा विज्ञाननिष्ठ, प्रगमनशील देश आहे. इथली विद्यापीठे आणि औद्योगिक आस्थापना यांच्या प्रयोगशाळा भविष्यकालीन संशोधनात गुंतलेल्या आहेत. त्यात त्यांनी कोट्यवधी युरोंची गुंतवणूक केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रमानव, सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने, मानवरहित विमाने, जेनेटिकली मॉडिफाइड कृषिपिके, मानवी जेनेटिक्सचे नकाशे अशा क्षेत्रांत प्रचंड संशोधन करण्यात आघाडी घेतली आहे. विजेची उपकरणे, यंत्रे, वाहने, विमानाची इंजिने, औषधे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे या औद्योगिक उत्पादनांतील आपली जागतिक मक्तेदारी सोडायची जर्मनीची तयारी नाही. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, फॉक्स व्हॅगन, सिमेन्स, सॅप यासारख्या जगविख्यात जर्मन कंपन्या भविष्यकाळातील आर्थिक आलेखांचे विश्लेषण करून, सृजनशीलतेचा उपयोग करून आपल्या उत्पादनात यथायोग्य बदल करण्यात मग्न आहेत.

जर्मनीच्या कालभानात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीन काळांव्यतिरिक्त अन्य दोन काळांचे भान आहे. एक भूतकाळापूर्वीचाही अज्ञात काळ- ज्याला इतिहासकार म्हणतात, ‘इतिहासाच्या व्हॉल्युम वनपूर्वीचा व्हॉल्युम झीरो, अर्थात इतिहासाच्या पहिल्या खंडापूर्वीचा शून्य खंड!’ जर्मनीचा ज्ञात इतिहास रोमन साम्राज्याच्या जर्मनीवरच्या विजयापासून सुरू होतो. त्यापूर्वीचा जर्मनीचा इतिहास काय होता, याची जर्मनीला उत्सुकता आहे. जर्मनीच्या जबरदस्त कालभानांतला त्यापुढचा काळ म्हणजे कल्पनेतल्या भविष्यकाळाच्याही पुढचा अज्ञात काळ. जर्मनीच्या, जगाच्या-विश्वाच्या अंतापर्यंतचा काळ. जर्मनीने एकाच वेळी हे पंचकालभान जागृत ठेवले आहे. ही कला आणि हे शास्त्र जर्मनीने कसे साधले, हे गूढच आहे. पण काळाची सापेक्षता उलगडून दाखवणारा अल्बर्ट आइन्स्टाईन ज्या मातीत जन्मला, त्या मातीच्या गुणसूत्रांतच हे कालभान सजलेले असावे!

फ्रँकफर्ट हे जर्मनीतले महत्त्वाचे शहर आहे. येथील विमानतळ हे जर्मनीचेच नव्हे, तर युरोपचे हवाई जंक्शन आहे. इथून दर वर्षी 7 कोटी प्रवासी प्रवास करतात, 20 लाख टन मालाची उलाढाल होते. येत्या काही वर्षांत हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात क्रांतीच होणार आहे. विमानाच्या धावपट्‌ट्या सध्या सरळ रेषेत असतात. त्या लंबगोलाकृती असाव्यात, असा एक विचार पुढे आला आहे. लंबगोलाकृती धावपट्‌ट्यांमुळे विमानतळाची उत्पादकता वाढणार आहे. अर्थात दर दिवशी विमानतळावरून उडणाऱ्या व उतरणाऱ्या विमानांची संख्या वाढणार आहे.

भविष्यकाळात माल घेऊन जाणारी विमाने विनापायलट उडू लागतील. त्यानंतर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात एकच पायलट असेल. कालांतराने प्रवासी विमानेही स्वयंचलित होऊन विनापायलट उडतील. यामुळे कोट्यवधी युरो किंवा डॉलर्सची बचत होईल. ॲमेझॉन, वॉलमार्टसारख्या कंपन्या माल घरपोच देण्यासाठी ड्रोन्सचा उपयोग करतील. ड्रोन्सचा वापर औषधे पोचवण्यासाठीही होईल. हेरगिरीसाठी होईल. तेहरानसारख्या शहरात वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने श्रीमंत लोक ॲम्ब्युलन्समधून प्रवास करतात. आता अशा शहरातून एअर टॅक्सीज उडू लागतील. लांब पल्ल्याचा प्रवास कमी वेळात करण्यासाठी जलद उडणारी मोठ्या क्षमतेची विमाने उपलब्ध होतील. ‘टेस्ला’चे ॲलन मस्क यांच्या योजनेप्रमाणे पर्यटक म्हणून आपल्याला अंतराळयानातून परग्रहावर जाता येईल.

ब्रेग्झिटनंतर लंडन शहराचे महत्त्व बँकिंग, इन्शुअरन्स, डेरिव्हेटिव्हज, शेअर्स या सर्व क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तरोत्तर कमी होत जाईल. लंडनची जागा घेण्यासाठी पॅरिस, ॲमस्टरडॅम आणि फ्रँकफर्ट या तीन शहरांत स्पर्धा असली तरी भू-राजकीय दृष्टीने जर्मनीतले फ्रँकफर्ट शहर ही स्पर्धा जिंकेल, अशी चिन्हे दिसतात. तसे झाले तर फ्रँकफर्ट शहराची वाढ भूमिती श्रेणीने होईल.

फ्रँकफर्ट शहराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या शहरात दर वर्षी अनेक औद्योगिक जत्रा भरतात. त्यासाठी या शहरात अनेक मोकळी मैदाने, हॉल्स, स्टेडियम्स असे संसाधन आहे. औद्योगिक जत्रांना अनेक उद्योजक व व्यापारी भेट देतात. त्यामुळे हॉटेल्स व रेस्टॉरंट्‌स यांच्या व्यवसायाला वाव मिळतो.

फ्रँकफर्ट शहरात रोमेल नावाचा जुन्या शहराचा भाग आहे. तिथून जवळच माईन नदी वाहते. इथे रोमन लोक व्यापारासाठी यायचे. रोमेल स्क्वेअरमध्ये एक पुरातन कॅथेड्रल आहे. जुन्या इमारती आहेत. रेस्टॉरंट्‌स आणि सोव्हिनीर शॉप्स्‌ आहेत. इथूनच आम्ही ‘हॉप ऑन-हॉप ऑफ’ बसने टूर घेऊन फ्रँकफर्ट शहराचा फेरफटका मारून आलो. इथल्या एका बँकेने आपल्या जुन्या इमारतींना ‘डेबिट’ आणि ‘क्रेडिट’ अशी समर्पक नावे दिली आहेत. फ्रँकफर्ट शहरात जर्मन कवी आणि विचारवंत गटे यांच्या नावाने स्थापलेले विद्यापीठ आहे. ‘Knowledge is not enough. We must apply. Will is not enough. We must do.’ हे गटेचे उद्‌गार सुप्रसिद्ध आहेत. केवळ सैद्धांतिक ज्ञानाला काही अर्थ नाही; सैद्धांतिक ज्ञानाकडून उपयोजित ज्ञानाकडे आपण गेले पाहिजे, हा गटेचा उपदेश जर्मनी विसरली नाही.

याउलट ज्ञान आणि उपयोजन याकडे भारताचे दुर्लक्ष झाल्यामुळे मध्ययुगानंतर भारताची दुर्दशा झाली. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा त्याला ‘Head and hand axis’ म्हणत. भारतातल्या जातिसंस्थेमुळे मेंदू आणि हात यातला हा अक्ष कधीच सांधला गेला नाही. सैद्धांतिक ज्ञानाची मक्तेदारी ब्राह्मणांनी आपल्याकडे ठेवली. उपयोजित ज्ञान बलुतेदारांकडे आणि शेतकऱ्यांचे शूद्रांकडे राहिले. त्यांच्यापर्यंत सैद्धांतिक ज्ञान पोचलेच नाही.

‘हॉप ऑन-हॉप ऑफ’ टूरनंतर आम्ही माईन नदीतून बोट क्रूझ केली आणि फ्रँकफर्ट शहराचे वेगळे दर्शन घेतले. ॲपल वाईन ही इथली खासियत आहे. आम्ही ॲपल वाईन मागवली, पण आम्हाला ती फारशी आवडली नाही. मग आम्ही एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये पीटा ब्रेड, हमूस, फलाफल असे स्वादिष्ट जेवण घेतले.

‘ग्रीन सॉस’ हे फ्रँकफर्टचे खास वैशिष्ट्य आहे, असे आम्हाला सांगण्यात आले. ग्रीन सॉस म्हणजे सात प्रकारचे हर्बस् आणि कच्चे अंडे घालून केलेले हिरवे सॉस. हे ग्रीन सॉस चिकन, पोर्क, बीफ, फिश याबरोबर दिले जाते. ज्या रेस्टॉरंटमध्ये ग्रीन सॉस दिले जाते अशा जर्मन रेस्टॉरंटमध्ये जाण्याचे आम्ही रात्री ठरवले. वॅगनर नावाचे हे जर्मन रेस्टॉरंट एका जुन्या घरात थोडा बदल करून उघडण्यात आले होते.

तो शनिवारचा दिवस होता. त्यामुळे रेस्टॉरंट लोकांनी खच्चून भरले होते. लोक बिअर, वाईन पिण्यात मग्न होते. सिगरेट पीत जोरात गप्पागोष्टी चालल्या होत्या. वातावरण धुंद होते. आम्ही कशीबशी जागा पटकावली. मेनूकार्ड मागवले. ग्रीन सॉसबरोबर बीफ, पोर्क व अदर असे शीर्षक असलेले पदार्थ होते. आम्ही ‘अदर’मधला व्हेल नावाचा मासा मागवला. तो फारच लुसलुशीत व रुचकर होता. ग्रीन सॉस हे आपल्याकडच्या नारळाच्या हिरव्या चटणीसारखे होते आणि ग्रीन सॉस व डीप फ्राय केलेले व्हेल यांचे मिश्रण फारच स्वादिष्ट होते. आम्ही आमच्या हॉटेलवर परतलो व चांगले रेस्टॉरंट सुचवल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि व्हियेल नावाचा रुचकर मासा ग्रीन सॉसबरोबर खाल्ल्याचे त्यांना सांगितले. ते हसत म्हणाले, ‘‘व्हियेल हा मासा नाही, ते वासराचे मंद शिजवलेले मांस आहे आणि जर्मनीतला तो लोकप्रिय पदार्थ आहे.’’

फ्रँकफर्टहून ट्रेनने आम्ही हॅडलबर्गला आलो. हॅडलबर्ग हा नेकार या संथपणे वाहणाऱ्या नदीकिनारी असलेला गाव आहे. या गावात नदीकिनारीच असलेल्या एका बुटिक हॉटेलात आम्ही वास्तव्य केले. हा गावही तसा बुटिकच होता. युनेस्कोने त्याला हेरिटेज गावाचा दर्जा दिला होता. हॉटेलच्या खोलीची खिडकी उघडली- मंद गतीने वाहणारे नेकार नदीचे पात्र, त्या नदीवरचा पादचारी पूल, पूल संपल्यानंतर उभारलेले दगडी आर्च, त्यानंतर सुरू होणारा गाव, गावातील लाल कौलारू घरे, होली घोस्ट चर्चचे त्रिकोणाकृती छप्पर आणि डोंगरावरच्या हॅडलबर्ग किल्ल्याचा दर्शनी भाग... खिडकीसमोर एखादे रंगीत चित्र टांगावे तसे ते दृश्य आमच्यासमोर होते.

गाव जवळच होते. आम्ही पायीच निघालो. पावसाचा शिडकावा होऊन गेला होता. वातावरणात सुखद गारवा होता. नेकार नदीच्या पादचारी पुलावर पर्यटकांची वर्दळ होती. पूल संपून, आर्च ओलांडून गावात शिरताना एका मांजराचे पितळी शिल्प लक्ष वेधत होते. नैसर्गिक सौंदर्याबरोबरच असे कृत्रिम ‘फोटो पॉइंट्‌स’ निर्माण करणे हे युरोपमधल्या शहरांचे आणि गावांचे एक वैशिष्ट्य आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सोव्हिनीर्सची दुकाने आणि रेस्टॉरंटस्‌ होती. आम्ही होली घोस्ट चर्चपर्यंत चालत गेलो. या चर्चमध्ये छप्परापासून लोंबकळत येणारा झुलता क्रॉस टांगला होता. असा झुलता क्रॉस मी गोव्यासह भारतातल्या किंवा विदेशांतल्या अन्य चर्चमध्ये कधीच पाहिला नव्हता.

आम्ही हॅडलबर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी फनीकूलर नावाच्या ट्रेनमध्ये बसलो. सुमारे 45 अंशांच्या चढणीवरून जाणाऱ्या ट्रेनमधून आम्ही दहा मिनिटांत किल्ल्यावर पोचलो. किल्ल्यावर दिसणारे हॅडलबर्ग गावाचे विहंगम दृश्य अतिशय सुंदर होते. मार्क ट्वेन हॅडलबर्गला आला होता, तेव्हा इथे किल्ल्याच्याही वर डोंगरावरील एका हॉटेलात तीन महिने राहिला होता. हॅडलबर्गच्या तो अक्षरशः प्रेमात पडला होता. खोलीतून रात्री हॅडलबर्गचे दिसणाऱ्या दृश्याचे वर्णन त्याने ‘आकाशातून दूधगंगाच खाली यावी’ असे केले आहे. मार्क ट्वेन म्हणतो, ‘In the evening Heidelberg became a fallen milky way…its intricate cobwebs of streets jewelled with twinkling lights.’

मार्क ट्वेन हॅडलबर्गच्या परिसरात मनसोक्त फिरला होता. ‘वसंत ऋतूतल्या या देशातल्या निसर्गसौंदर्याला परिसीमा नाही,’ असे त्याचे मत बनले होते. मार्क ट्वेनचे ते शब्द अक्षरशः खरे आहेत याची अनुभूती मी घेतली होती. फ्रँकफर्टहून हॅडलबर्गला ट्रेनने येताना मी जर्मनीचा निसर्ग पाहत होतो. तो जुलै महिना होता. समर सीझन म्हणजे वसंत ऋतू होता. हिरवी कुरणे, पिवळी उन्हे, निळे आकाश, निवळशंख-आरस्पानी-शुभ्रधवल पाण्याने खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि लाल कौलांची लाकडी रंगीत घरे...!

मार्क ट्वेनला जर्मन भाषा शिकायची होती, पण प्रयत्न करूनही त्याला ही भाषा शिकता आली नाही. ‘जर्मन भाषेला कोणतेच ताळतंत्र नाही. जिभेला ती अवघड आहे आणि समजायला कठीण आहे,’ असे त्याने वैतागून लिहिले आहे.

हॅडलबर्ग किल्ला अंशतः भग्नावस्थेत आहे. पण आपले जुने वैभव त्याने राखण्याचा प्रयत्न केला आहे. या किल्ल्यात एक फार्मसी म्युझियम आहे. त्यात वाईनचे प्रचंड बॅरेल सांभाळून ठेवले आहे. फनीकूलरमधून आम्ही खाली आलो. सोव्हिनीर शॉपमध्ये आम्ही दोन बाहुल्या आणि जर्मन हॅट्‌स विकत घेतल्या. एका दुकानात आम्हाला सफरचंदाच्या चिप्स दिसल्या. सफरचंदे विकल्यानंतर जी उरतात, ती पिकून त्यांची नासाडी होऊ नये म्हणून त्यांचा रस, जॅम, वाईन करतात हे मला माहीत होते. पण सफरचंदाच्या चिप्स मी प्रथमच पाहत होतो. खरं म्हणजे, खात होतो.

हॅडलबर्ग हे पर्यटनस्थळ आहे तसेच ते शैक्षणिक केंद्र आहे. इथे विस्पात विद्यापीठ आहे. त्यात देश-विदेशांतले विद्यार्थी शिक्षण घेतात.

हॅडलबर्गला अनेक वर्षांचा इतिहास असावा. आम्ही दुपारचे जेवण घेण्यासाठी गोल्डन हॅक्स नावाच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, तेव्हा त्याच्या दारावर त्याच्या स्थापनेचे वर्ष 1717 हे होते, म्हणजे सुमारे 300 वर्षांपासून हे रेस्टॉरंट अव्याहत चालू आहे.

युरोपमधल्या हॉटेल्समध्ये ब्रेकफास्ट घेणे हा अनोखा अनुभव असतो. बहुधा इथल्या हॉटेल्समध्ये बुफे ब्रेकफास्ट असतो, पण हॅडलबर्गमध्ये आम्ही राहत असलेले हॉटेल बुटिक असल्याने तिथला ब्रेकफास्ट पर्सनलाइज्ड होता. सकाळी हवा सुखद असल्याने चांगलीच भूक लागली होती. सुरुवातीला थंडगार मोसंब्याचा गोड रस देऊन आमचे स्वागत करण्यात आले. मग आमच्यापुढे आकर्षक थ्री टायर ट्रे ठेवण्यात आले. त्याच्या वरच्या ट्रेमध्ये द्राक्षे, अननस, कलिंगड, पपया ही ताजी फळे आणि खजूर, बदाम, अक्रोड, ख्रिसमिस हा सुका मेवा होता. दुसऱ्या ट्रेमध्ये मशरूम्स, चेरी टोमॅटो, लेट्यूस, रोस्टेट पोटॅटो आणि स्ट्रॉबेरी दह्याचा बाऊल होता. तिसऱ्या ट्रेमध्ये जॅम, बटर, चीज, बेकन, सलामी सॉसेजीस यांची रेलचेल होती. शेजारी व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड, गार्लिक ब्रेड, फ्रँच ब्रेड यांची परडी आणून ठेवली होती.

ताज्या थंडगार दुधात सुका मेवा घालून कॉर्नफ्लेक्सबरोबर ते संपवल्यावर ताजी फळे, मशरूम्स, सॅलेड्‌स, रोस्टेड पोटॅटो यावर ताव मारायचा. स्ट्रॉबेरी दह्याचा स्वादिष्ट बाऊल हलकेच संपवायचा. कुरकुरीत ब्रेडबरोबर बटर, जॅम, चीज, सलामी सॉसेजीस यांचा आवडीप्रमाणे आस्वाद घ्यायचा. मग ‘एग मेड टू ऑर्डर’ घेण्यासाठी वेटर तत्परतेने हजर होतो. ऑम्लेटची ऑर्डर द्यायची. कांदा, टोमॅटो, मशरूम, चीज कच्च्या अंड्यात घालून ते कसे घुसळले जाते यावर ऑम्लेट कसे बनते ते अवलंबून असते. ऑम्लेट करणे ही एक कला असते. थोड्याच वेळात आलेले गरम फसफशीत ऑम्लेट टोमॅटो केचप, टोबेस्को सॉस किंवा मायनीजबरोबर ब्रेड स्लाईस चघळत आरामात फस्त करायचे. मग कडक कडवट कॉफीचे घोट घेत ब्रेकफास्ट संपवायचा.

हॅडलबर्गहून आम्ही क्लोन शहरात आलो. क्लोन शहर तेथील पुरातन कॅथेड्रलसाठी प्रसिद्ध आहे. 1248 मध्ये बांधायला सुरुवात केलेले हे कॅथेड्रल बांधून पूर्ण व्हायला 632 वर्षे लागली. ते 1880 मध्ये खुले झाले. दुसऱ्या महायुद्धात विमानातून या कॅथेड्रलची सुंदर वास्तू पाहून मित्र राष्ट्राच्या वैमानिकांनी त्यावर बॉम्ब टाकले नाहीत. या कॅथेड्रलमधले दोन टॉवर्स हे वास्तुशिल्पाच्या व्याकरणातील उद्‌गारचिन्हासारखे दिसतात. या कॅथेड्रलमधील रंगीत स्टेन ग्लासेस त्याचे सौंदर्य शतगुणित करतात.

क्लोन शहराजवळून ऱ्हाईन नदी वाहते. 800 किलोमीटर्स लांबीची ही नदी स्वित्झर्लंड, जर्मनी व हॉलंड या देशांतून वाहत समुद्राला जाऊन मिळते. जर्मनीच्या भेटीत ऱ्हाईन नदीतून जलसफर केलीच पाहिजे. या नदीच्या काठावर छोटी-छोटी निसर्गरम्य खेडी आहेत. नदीला कालवे आहेत. काही खेड्यांत जाण्यासाठी रस्ते नाहीत. पोस्टमनला या कालव्यातून होडीतून पत्रे द्यायला जावे लागते. डोंगराच्या उतारावर द्राक्षांचे, काकडीचे मळे आहेत. इथल्या स्त्रिया रंगीत वेष घालून पर्यटकांना ताज्या काकड्या विकतात. ऱ्हाईनच्या काठावरील सुपीक जमिनीत मका, गहू, बटाटा, दुधीभोपळा, शुगरबीट (ज्यापासून साखर केली जाते), सूर्यफुले, तेलबिया यांची शेती केली जाते. याशिवाय दुग्धव्यवसाय व पशुपालन यांचा जोडधंदा शेतकरी करतात.

ऱ्हाईन नदीतून जलसफर करताना तिच्या काठावरील डोंगरकड्यावरील मध्ययुगीन किल्ले पाहत जाणे, हा एक अनुभवण्याचा भाग असतो. पुढे ऱ्हाईन नदी ब्लॅक फॉरेस्टमधून जाते. इथल्या घनदाट जंगलात सूर्याची किरणेही पोचत नाहीत, म्हणून या जंगलाला ब्लॅक फॉरेस्ट म्हणतात. इथले ककु क्लॉक आणि ब्लॅक फॉरेस्ट केक प्रसिद्ध आहेत. स्वयंचलित घड्याळे जगभर विख्यात होण्यापूर्वी इथली यांत्रिक ककु क्लॉक्स जगभर पसरली. आजही सोव्हिनीर म्हणून पर्यटक ती विकत घेतात. फ्रेश क्रीम आणि फ्रेश स्ट्रॉबेरीचा थर असलेला गोड चॉकलेट ब्लॅक फॉरेस्ट केक आबालवृद्धांना आवडतो.

ऱ्हाईनच्या तीरावरील ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ देणाऱ्या एका कॉटेजमध्ये आम्ही रात्रीचा मुक्काम केला. ही कॉटेज एका वृद्ध जर्मन बाईच्या मालकीची होती. तिने आम्हाला रात्रीचे जेवणही दिले. वाईन, मशरूम सूप, सॅलेड, मॅश्‌ड पोटॅटो आणि ग्रील्ड चिकन असे साधे पण रुचकर जेवण जेवून आम्ही तृप्त झालो. खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिले ऱ्हाईन वाहते की थांबली आहे, झोपली आहे, असा प्रश्न पडला. सगळीकडे निवांतपणा होता. नितांत शांतता होती. ब्लॅक फॉरेस्ट गडद काळोखात गुरफटून गेले होते. आभाळामध्ये तारे नव्हते. सगळीकडे काळोख होता आणि शांतता होती.

दुसऱ्या दिवशी आम्ही हॅनोवर शहरात पोचलो. हॅनोवर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर एका छोट्या ओढ्याच्या किनाऱ्यावर लोंढे नावाचे खेडे आहे. तिथे माझा मित्र अजित मळकर्णेकर आणि त्याची जर्मन पत्नी डॉडिस राहते. तिथे आम्ही दोन दिवस मुक्काम केला. 60 च्या दशकात ध्येयवादाने भारून जाऊन अजित आपल्या गोव्यातल्या घरातून पळून गेला आणि थेट बाबा आमटेंच्या सोमनाथ प्रकल्पात दाखल झाला. तिथेच जर्मनीच्या स्वयंसेवी संस्थेतर्फे डॉरिसही आली होती. बाबा आमटेंनी तेव्हा ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’ या प्रकल्पाचे सूतोवाच केले होते. महाराष्ट्र सरकारने त्यांना जमीनही दिली होती. अजित आणि डॉरिस त्या प्रकल्पात काम करू लागले. पण हा प्रकल्प रेंगाळत गेला आणि अजित व डॉरिसचा भ्रमनिरास झाला. डॉरिस जर्मनीला परतली. तिने अजितलाही तिथे बोलावले. अजित तिथे जर्मन भाषा शिकला. अजितने जर्मनीत आपले शिक्षण पूर्ण केले. अजित आणि डॉरिस यथावकाश विवाहबद्ध झाले. त्यांना अनिल, अशोक व आरती अशी तीन मुले झाली.

कालांतराने अजित व डॉरिस गोव्याला परत आले. धारबांदोड्याला त्यांनी काही एकर जमीन घेऊन शेती केली. पुढे डॉरिसची आई वृद्ध झाल्यामुळे ती जर्मनीत गेली. आता डॉरिस जर्मनीत स्थलांतरितांना जर्मन भाषा शिकवते. अजित वर्षातले काही महिने जर्मनीत असतो. जर्मनीत असताना तो जर्मन लोकांसाठी भारतीय शाकाहारी पदार्थ व अन्य पदार्थ बनवण्याचे कोर्सेस घेतो. गोव्यात असताना तो शेती करतो. त्यांची मुले मात्र गोव्यातच स्थायिक झाली आहेत.

डॉरिस आणि अजितकडे संध्याकाळी शॅम्पेन किंवा वाईन पित, ब्रुशेटा-क्रॉस्टिनीसारखे ॲन्टीपास्ता खात आणि मग सावकाश सॅलेड्‌स, भात, कधी नारळाच्या रसात केलेली चिकन करी तर कधी बीफ खिमा यांचा आस्वाद घेत गप्पांचा फड रंगत असे. डॉरिसने मला जर्मनीबद्‌दल भरपूर माहिती दिली. जर्मनीत आज 1 कोटी 60 लाख स्थलांतरित आहेत. जर्मनीच्या 8 कोटी लोकसंख्येच्या तुलनेत या स्थलांतरितांचे प्रमाण 20 टक्के आहे. बहुतेक आफ्रिकेच्या देशांतून येणाऱ्या या स्थलांतरितांना जर्मनीने आपल्या देशात सामावून घेतले. यामागे जर्मनीची उदारमतवादी भूमिका जेवढी आहे, तेवढीच व्यवहारवादी भूमिकाही आहे. जर्मनीच्या वाढत्या औद्योगिक वाढीला या मानवी बळाची गरज आहे; हा त्यातला कळीचा मुद्दा आहे. असे असले तरी जर्मनीच्या एकूण उदारमतवादी भूमिकेमुळे हा देश इस्लामी दहशतवादापासून दूर राहिला आहे. दुर्दैवाने आता या स्थलांतरितांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या राजकीय पक्षांनाही जर्मनीत पाठिंबा मिळू लागला आहे. जर्मनीतल्या ख्रिश्चन लोकसंख्येपैकी निम्मे कॅथॉलिक आणि निम्मे प्रोटेस्टंट आहेत. जर्मनीत अजूनही गर्भपाताला कायद्याने बंदी आहे.

डॉरिस शिक्षणक्षेत्रात असल्यामुळे तिने मला जर्मन ॲप्रेंटिस स्कीमबद्दल माहिती दिली. जर्मनीत शालेय शिक्षण संपल्यावर ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे सैद्धांतिक शिक्षण घ्यायचे नसते, त्या विद्यार्थ्यांना व्यापारी किंवा औद्योगिक आस्थापनांत किमान पाच वर्षे ॲप्रेंटिस म्हणून काम करणे अनिवार्य असते. या पाच वर्षांत विद्यार्थी आपल्याला हवी ती व्यावसायिक, तांत्रिक, औद्योगिक, व्यवस्थापकीय कौशल्ये शिकून घेतात. आस्थापना त्यांना ठरावीक भत्ता देतात. कार्यकाल संपल्यावर त्याच आस्थापनांत विद्यार्थ्यांना भरती होता येते किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो.

जर्मनीने कचऱ्याची समस्या कशी यशस्वीपणे सोडवली आहे, त्याची माहिती अजितने मला दिली. कचऱ्यापासून वीज निर्मितीचे तंत्र जर्मनीने विकसित केले आहे. कुठल्याच जर्मन शहरात वा गावात, साठलेला कचरा दिसत नाही. प्रत्येक जर्मन घर ओला, सेंद्रिय कचरा व असेंद्रिय कचरा वेगळा ठेवते. सेंद्रिय कचऱ्यापासून खत करतात, असेंद्रिय कचऱ्यापासून वीजनिर्मिती होते. या प्रकल्पाला जर्मनीतला कचरा कमी पडतो, म्हणून इटलीतून कचऱ्याची आयात केली जाते.

डॉरिस व अजितबरोबर सुशांता आणि मी हॅनोवर शहराचा फेरफटका मारून आलो. हॅनोवर शहर लायन नदीच्या किनाऱ्यावर आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लोकांना रोजगार मिळावा म्हणून या शहरात एक प्रचंड तळे खोदण्यात आले. हे तळे खोदून काढलेली माती तिथे रस्ते बांधण्यासाठी वापरण्यात आली. हॅनोवर शहरातून जाणारा कालवा ॲमस्टरडॅम शहरापर्यंत जातो, असे मला सांगण्यात आले. हॅनोवरमध्ये भरपूर मोकळ्या जागा व बागा आहेत. सगळ्यात मोठे शहरी जंगल वसलेले शहर म्हणून हॅनोवर प्रसिद्ध आहे. या शहराच्या मध्यवर्ती चौकात रंगीत स्ट्रीट आर्टस किंवा स्ट्रीट फर्निचर करून या शहराचे सौंदर्य वृद्धिंगत केले आहे.

हॅनोवर शहर इसवी सन 38 मध्ये रोमन राजाने वसवले. हॅनोवरच्या राजाने 1714 पासून 100 वर्षे इंग्लंडवर राज्य केले. त्याचा सूड म्हणून दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने हॅनोवर शहरावर धुंवाधार बॉम्बवर्षाव करून अर्धेअधिक शहर उद्‌ध्वस्त केले. डॉरिसने आम्हाला शहरातले उद्‌ध्वस्त चर्च दाखवले. त्याचा दर्शनी भाग पूर्णपणे कोसळला होता. आतील एकच भिंत शाबूत होती. त्यावर एक क्रॉस प्रतीकात्मक रीतीने उभारला होता. हॅनोवर शहराच्या टाऊनहॉलची वास्तू आकर्षक आहे. या शहरातील आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे इथल्या रस्त्यावरील रेड थ्रेड लाईन. या लाल रेषेवरून चालत गेल्यास शहरातील सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहता येतात.

हॅनोवर शहराच्या सभोवतालच्या सुपीक जमिनीत शेती केली जाते. इथे नदीकाठची जमीन शेतकऱ्यांना भाड्याने दिली जाते. इथे शेतकरी छोटी गार्डन हाठसेस करून राहतात. बटाटे, दुधीभोपळा यासारखी पिके काढून पोट भरतात. इथले शेतकरी बटाट्याच्या बॅगा शेताच्या कडेला ठेवतात. त्यांची किंमत पाहून ग्राहक शेजारच्या टोपलीत युरो टाकतात. कोणीच फसवणूक करत नाही.

दुसऱ्या दिवशी डॉरिसला कामाला जायचे असल्यामुळे अजितबरोबर आम्ही लोंढेपासून 40 किलोमीटर्स अंतरावर असलेल्या सेले गावात गेलो. या गावात सुमारे 400 पुरातन रंगीत लाकडी घरे आहेत. सगळ्या घरांचा दर्शनी भाग मॉड्युलर म्हणजे एकसारखा आहे पण रंगरंगोटी वेगळी आहे. पांढरा सोडून इतर सर्व रंगांत-काळ्या, पिवळ्या, निळ्या, हिरव्या, गुलाबी रंगांत- ही लाकडी घरे रंगवलेली आहेत. या चौकोनी किंवा आयताकृती घरांच्या छपरांकडे वळणारा भाग त्रिकोणाकृती आहे. या भागात परत वेगवेगळ्या रंगांत चौकोनी खिडक्यांची चित्रे त्रिमितीचा भास व्हावा अशा पद्धतीने रंगवलेली आहेत. घराच्या खालच्या भागात रिटेल शॉप किंवा रेस्टॉरंट आणि वर कोणाचे तरी वास्तव्य. अन्यथा, वरचा भाग बंद, अशी स्थिती आहे.

ही 16 व्या शतकातली घरे काळजीपूर्वक जतन करून ठेवली आहेत. सर्वांत जुने म्हणजे 1536 मधील सुमारे 500 वर्षांचे घरही अस्तित्वात आहे. एका घराचे वैशिष्ट्य म्हणजे या घराची खिडकी उघडते आणि संगीताच्या तालावर घरातील बाहुल्या खिडकीतील बाल्कनीत येऊन काही मिनिटे नाच करून घरात परत जातात व खिडकी बंद होते. सेले गावात कॅथेड्रलची सुबक वास्तू आहे. पांढऱ्या व गुलाबी रंगात दर्शनी भाग रंगवलेला राजवाडा आहे.

डॉरिस आणि अजितचा निरोप घेऊन आम्ही लोंढे गावातून हॅनोवरला आलो आणि तिथून ट्रेनने अडीच तासांच्या प्रवासानंतर बर्लिनला पोचलो. बर्लिन ही जर्मनीची राजधानी. बर्लिनची लोकसंख्या सुमारे 35 लाख आहे. स्प्री नदीच्या काठी वसलेले बर्लिन हे परीटघडीचे शहर आहे. युक्लीडच्या द्विमितीय भूमितीच्या कोष्टकात कटिबद्ध केलेले हे शहर आहे. या शहराच्या रचनेत कसलीच कमनीयता नाही, रमणीयता नाही. बर्लिन हे पुरुषी शहर आहे. इथे सगळे लष्करी शिस्तीचे आहे. काही शहरे नर्तिकेच्या पदन्यासाप्रमाणे नाचत असतात; बर्लिन सैनिकांच्या कवायतीसारखे संचलन करते, असा भास होतो.

चार घोड्यांच्या रथावर आरूढ घोडेस्वाराचे शिल्प असलेले ब्रेडनबर्गर गेट हा बर्लिन शहराचा गुरुत्वमध्य आहे. हे गेट रात्रीच्या काळोखात रंगीत दिव्यांनी लखलखीत उजळून जाते, तेव्हा पाहिले की, पॅरिसच्या शॉ झालिझेसारखे सुरेख दिसते. त्याच्या उजवीकडे होलोकास्ट म्युझियम आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझींनी ज्यू लोकांचे जे हत्याकांड केले, त्याला प्रतीकात्मक श्रद्धांजली वाहण्यासाठी खाली अंडरग्राऊंड असलेल्या होलोकास्ट म्युझियमच्या वर आयताकृती काँक्रीटचे 2711 क्युबिकल्स उभारले आहेत. होलोकास्ट म्युझियममध्ये फोटो, चित्रे व भरपूर माहिती यांच्या साह्याने 1939 ते 1945 या सहा वर्षांच्या काळात जर्मनी व इतर युरोपीय देशांत हिटलर व त्याच्या नाझी सैनिकांनी ज्यू लोकांचा जो अनन्वित छळ केला व त्यांची निर्घृण हत्या केली, त्याचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. अन्यथा मनमोकळा, हसतमुख, दिलखुलास वागणारा जर्मन माणूस एका क्रूर हुकूमशहाच्या नादी लागून एवढा वेडापिसा कसा झाला आणि सहृदयता, करुणा, सामंजस्य या मानवी भावना चिरडून क्रौर्याची परिसीमा कशी गाठू शकला, हे एक गूढच आहे!

होलोकास्ट म्युझियममध्ये मृत्यूला सामोरे जाताना आईचे दूध पिणाऱ्या निरागस बालकाचे फोटो आहेत. मुलांपासून ताटातूट झाल्यामुळे आक्रोश करणाऱ्या मातेचे फोटो आहेत. हतबल झालेल्या वृद्धांचे करुण डोळे कॅमेऱ्याने टिपले आहेत. मरण्यापूर्वी आपल्या भावना आपल्या नातेवाईकांना, मित्रांना कळाव्यात म्हणून काही जणांनी पोस्टकार्डे लिहिली, ती त्यांच्या नातेवाईकांना- मित्रांना मिळालीच नाहीत. पण ज्यांना मिळाली, त्यांनी सांभाळून ठेवली. आज ती होलोकास्ट म्युझियमच्या भिंतीवर आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरात ज्यू लोकांनी उभारलेले अशा प्रकारचे होलोकास्ट म्युझियम मी पाहिले आहे, पण जर्मनीने आपल्याच राजधानीत उजळ माथ्याने आपले कौर्य मान्य करत अशा प्रकारचे होलोकास्ट म्युझियम उभारावे, यात या देशाचे मोठेपण आहे!

दि.13 ऑगस्ट, 1961 हा दिवस बर्लिन शहराच्या डायरीत अतिशय दुर्दैवी म्हणून नोंदवला गेला होता. कारण त्या दिवशी शहराचे विभाजन झाले. शहराचेच नाही तर 155 किलोमीटर्स लांबीची आणि 4 मीटर उंचीची बर्लिन वॉल (भिंत) बांधून देशाचेही पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी असे दोन देशांत विभाजन झाले. 38 वर्षांनंतर 9 नोव्हेंबर, 1989 रोजी बर्लिन वॉल रीतसर मोडण्यात आली आणि पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकीकरण झाले. पण बर्लिनची भिंत पूर्णपणे नामशेष करण्यात आली नाही. कटू इतिहासाची स्मृती जागृत राहावी, म्हणून काही मीटर्स लांबीपर्यंतचा शहरातला तिचा भाग जतन करून ठेवला आहे. बर्लिन शहराच्या पांढऱ्या त्वचेवरची जखम बुजली आहे, पण जखमेवरची लाल खपली शहराने जपून ठेवली आहे. तिथूनच जरा पुढे ‘चेक पॉइंट चार्ली’ हे स्थळ आहे. तिथे अजूनही दोन गणवेषधारी अमेरिकन पोलीस उभे असतात. याच स्थळावरून पश्चिम जर्मनीतून पूर्व जर्मनीत आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी प्रवेश करत असत.

बर्लिनजवळून वाहत असलेल्या स्प्री नदीच्या उपफाट्यामुळे शहरात छोटी-छोटी घरे निर्माण झाली आहेत. अशाच एका बेटाचे नामकरण म्युझियम आयलँड असे करण्यात आले आहे. कारण या बेटावर अनेक म्युझियम्स आहेत. आम्ही यातील दोन म्युझियम्सना भेट दिली. त्यात इजिप्शियन, इस्लामिक, भारतीय, रोमन, ग्रीक शिल्पे व चित्रे होती. सध्या जगभरातल्या- विशेषतः पुढारलेल्या राष्ट्रांतल्या म्युझियम्सपुढे एक यक्षप्रश्न उभा आहे. बहुतेक म्युझियम्समधली शिल्पे, चित्रे, नाणी, दस्तऐवज हा जेत्या राष्ट्रांनी पराभूत देशातून पळवून आणून आपल्या राष्ट्राच्या म्युझियममध्ये ठेवला आहे. हा मौल्यवान ठेवा आपल्याला परत करावा, अशी मागणी जित राष्ट्रे करत आहेत. जित राष्ट्रांकडे हा ठेवा सांभाळून ठेवण्यासाठी आवश्यक संसाधनबळ नाही, असा जेत्या राष्ट्रांचा दावा आहे. क्वचित काही राष्ट्रांनी मात्र काही शिल्पे, चित्रे जित राष्ट्रांना परत दिली आहेत. भारताचा कोहिनूर हिरा व मयूरासन इंग्लंडकडे आहे, पण ते परत करण्याची इंग्लंडची तयारी नाही!

बर्लिनमध्ये मी तीन दिवस होतो. तिथल्या पुस्तकांच्या दुकानांत बहुतेक जर्मन पुस्तकांचाच भरणा होता. इंग्रजी पुस्तके तुरळकच होती. त्यामुळे माझी निराशा झाली. कुठल्या जर्मन लेखकाची पुस्तके जास्तीत जास्त खपतात, असा प्रश्न मी तिथल्या विक्रेतीला विचारला; तेव्हा सर्वाधिक खपाच्या जर्मन लेखकांत तिने सुप्रसिद्ध जर्मन मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉमचे नाव सांगितले. ते ऐकून मला फार आनंद झाला, कारण एरिक फ्रॉम हा माझाही फार आवडता लेखक आहे. त्याची The fear of freedom, To have or to be, The art of living आणि The sane society ही चारही पुस्तके सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने वाचलीच पाहिजेत, असे माझे मत आहे. माणसे वेड्यासारखी, अविवेकी का वागतात? अख्खा समाजच वेडा का होतो? लोकांच्या झुंडीच्या झुंडी हुकूमशहाच्या नादी का लागतात? सार्वजनिक दंगली व हिंसा का होतात? आपण सारे विवेकी कसे बनू? समाज शहाणा कसा बनेल? हे प्रश्न विचारून त्याची उत्तरे एरिक फ्रॉमने शोधली आणि ती शोधताना एक नवे सामाजिक तत्वज्ञान मांडले.

स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मानवी मूल्य आहे, असे एरिक फ्रॉम मानतो. मी जिवंत आहे (आय ॲम), मला काय हवे ते ठरवायचे स्वातंत्र्य आहे (आय वॉन्ट) आणि काय हवे ते कसे मिळवायचे, ते ठरवायचे स्वातंत्र्य मला आहे (आय चूज)- असे स्वातंत्र्याचे तीन आयाम असतात. स्वातंत्र्य हा मानवी इच्छेचा उत्सव (सेलिब्रेशन ऑफ ह्युमन विल) असतो. स्वातंत्र्य दोन प्रकारचे असते. ‘फ्रीडम फ्रॉम’ म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीपासून स्वातंत्र्य आणि ‘फ्रीडम टू’ म्हणजे काहीही करायचे स्वातंत्र्य. आपल्याला पहिल्या प्रकारचे स्वातंत्र्य हवे असते. दुसऱ्या स्वातंत्र्याची आपल्याला भीती वाटते. त्यामुळे आपण आपल्या इच्छेप्रमाणे वागण्याचे, हवा तो निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य घेताना घाबरतो. यामुळे आपली उत्स्फूर्तता आटून जाते. आपली मने बोथट बनतात. आपण एकाकी पडतो. मग आपण आपले स्वातंत्र्य गहाण ठेवतो. कोणी देवधर्म, अध्यात्म याच्या नादी लागतो, तर कोणी फॅसिस्ट राष्ट्रवादाच्या किंवा हुकूमशहाच्या मागे धावतो. वैयक्तिक पातळीवर आपण भित्रे असतो, पण सार्वजनिक दंगलीत भाग घेऊन हिंसा करताना आपल्याला आसुरी आनंद मिळतो.

आपल्याला भयप्रद वाटणारे एकाकीपण टाळण्यासाठी आपण चंगळवादाचा आधार घेतो. आपले व्यक्तिमत्त्व म्हणजे आपल्या आंतरिक गुणांचे प्रतिबिंब असायला हवे. याला ‘बिइंग मोड’ म्हणतात, पण तो सोडून आपण मालकी हक्काच्या ‘हॅविंग मोड’मध्ये जातो. ‘पझेसिव्ह’ होतो. आपण ‘टू हॅव’ आणि ‘टू बी’ यामधून ‘टू बी’ची निवड करायला हवी. माणूस म्हणजे जीव नसलेली वस्तू (कमॉडिटी) नव्हे आणि नाते (रिलेशन) म्हणजे व्यवहार (ट्रान्सेक्शन) नव्हे, हा विवेक आपण ठेवला पाहिजे. ज्या माणसाचे स्वतःबरोबरचे नाते निरोगी-निरामय असते, त्याचेच इतरांबरोबरचे संबंध सुदृढ असतात. एरिक फ्रॉर्मच्या पुस्तकांच्या वाचनामुळे माझे मानसिक आरोग्य संतुलित व्हायला फार मोठी मदत झाली आहे, हे प्रांजळपणे सांगितले पाहिजे. त्यामुळे जर्मनीत एरिक फ्रॉर्मची पुस्तके अजूनही आवडीने वाचली जातात याचा मला आनंद झाला.

परिटघडीचे बर्लिन शहर संध्याकाळचे 7 वाजले किंवा वीकएन्डचा शुक्रवार आला की, आपली घडी विस्कटून टाकते. थोडेसे हात-पाय सैल करते. उच्छृंखल होते. रंगेल होते. अशा वेळी बर्लिनच्या रेस्टॉरंटचा फेरफटका मारणे, ही एक आनंदयात्रा आहे. बर्लिन हे जेवढे जर्मन शहर आहे तेवढेच कॉस्मोपॉलिटन शहर आहे. तिथे अस्सल जर्मन पद्धतीचे, कॉन्टिनेण्टल, इटालियन, ग्रीक, थाय, चायनीज, मेडिटेरिनियन, इंडियन, मेक्सिकन, जापनीज असे सर्व प्रकारचे जेवण मिळते. रोस्टेड, ग्रिल्ड, फ्राइड, तन्दूर या प्रकारांतील पोर्क, बीफ, चिकन, टर्की, फिश इथे उपलब्ध असतात. मांसाच्या मानाने माशांचे खूप कमी प्रकार मला इथल्या मेनूत आढळले.

इंग्लंडमध्ये फिश अँड चिप्स हा लोकप्रिय पदार्थ आहे. तो जर्मनीत फारशा रेस्टॉरंटमध्ये मिळत नाही. ट्राउट, सालमन यासारखे अमेरिका किंवा युरोपच्या अन्य देशांत मिळणारे मासे इथे क्वचितच मिळतात. बिअर आणि वाइनपुढे स्कॉच व्हिस्की निस्तेज पडते. आम्ही त्या रात्री 1840 नावाच्या रेस्टॉरंटची निवड केली. हे रेस्टॉरंट ट्रम स्टेशनच्या जवळच होते. त्यामुळे तिथे खूप गर्दी होती. आम्ही ड्रॉट बिअर आणि रोस्टेड टर्कीची ऑर्डर दिली. भरपूर सॅलेड व फ्रेंच फ्राइजबरोबर रोस्टेड टर्की आली. एक जर्मन माणूस बिअरचे एक-दोन मग्ज रिचवत जी डिश हलकेच संपवतो, ती खाता-खाता सुशांताची आणि माझी पुरेवाट झाली.

बर्लिनहून पोटसडॅम शहर तासाभराच्या अंतरावर आहे. या शहरातील एका रम्य डोंगरावर फ्रेडरिक द ग्रेट या जर्मन राजाचा राजवाडा आहे. राजवाड्यासमोर सुंदर बाग आहे. ही बाग टेरेस गार्डन- म्हणजे पायऱ्या-पायऱ्यांनी जमिनीची मशागत करून केलेली आहे. टेरेस गार्डनचा उभा दर्शनी भाग हिरव्या वेलींनी हिरवाकंच झालेला आहे. त्यामुळे बागेत अगदी खाली जाऊन राजवाड्याकडे पाहिले की, हा निळ्या छताचा, पिवळ्या रंगाचा राजवाडा या हिरव्या रंगाच्या वेलींच्या रंगसंगतीत सुरेख दिसतो.

फ्रेडरिक द ग्रेट हा तत्त्ववेत्ता राजा होता. त्याला या राजवाड्यात तात्त्विक विचारांवर चर्चा करत, चिंतन-मनन करत वेळ घालवायचा होता. त्याचे निमंत्रण स्वीकारून सुप्रसिद्ध फ्रेंच तत्त्ववेत्ता व्हॉल्तेर हादेखील या राजवाड्यात काही दिवस राहून गेला होता. फ्रेडरिक द ग्रेटने आपल्या राजवाड्याचे नाव सॅनसोई असे ठेवले होते. सॅनसोई याला कोंकणीतला प्रतिशब्द म्हणजे ‘सुशेगाद.’ अर्थात निवांतपणे, कोणत्याही दगदगीशिवाय, त्रासाशिवाय आराम करायचे स्थळ. राजवाड्याच्या डाव्या बाजूला फ्रेडरिक द ग्रेटचे थडगे आहे. आम्ही त्याला भेट दिली- तेव्हा थडग्यावर असलेला बटाट्यांचा ढीग आम्ही पाहिला. आमच्या गाईडने खुलासा केला- फ्रेडरिक द ग्रेट हा प्रजाहितदक्ष राजा होता. परिसरातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी योग्य असे कृषिपीक म्हणजे बटाटे, असे त्याच्या लक्षात आले आणि त्याने शेतकऱ्यांना बटाटे लावण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. म्हणून आजही सभोवतालच्या खेड्यांतील शेतकरी फ्रेडरिक द ग्रेटच्या थडग्यावर आपल्या बटाट्याच्या पिकांतील पहिले बटाटे वाहतात.

बटाट्याचे पीक पेरू या दक्षिण अमेरिकेतील देशांतून युरोपमध्ये आले. हे कंदमूळ असल्यामुळे सुरुवातीला गरीब लोकच ते खाऊ लागले. मध्यमवर्गीय व श्रीमंत लोकांनी बटाटा आणि बटाट्यापासून करण्यात येणारे पदार्थ खावेत म्हणून बटाट्याचे प्रयत्नपूर्वक मार्केटिंग करावे लागले. आज बटाट्याशिवाय जर्मनी किंवा युरोप-अमेरिकेतील जेवण बनूच शकणार नाही. प्रत्येक पदार्थात किंवा पदार्थाबरोबर बटाटा पाहिजे. रोस्टेट पोटॅटो, मॅश्‌ड पोटॅटो, फ्रेंच फ्राइज असे बटाट्याचे विविध प्रकार. आपण तांदूळ किंवा गव्हातून जसे कार्बोहायड्रेट्‌स घेतो, तसे पाश्चात्त्य लोक बटाट्यातून घेतात.

पोटसडॅम शहरात डच क्वार्टर्स आहेत. तिथे डच पद्धतीची घरे आहेत. इथल्या नदीवरच्या पुलाला स्पाय ब्रिज म्हणतात. बहुधा दुसऱ्या महायुद्धात या पुलावर हेर भेटत असावेत, म्हणून या पुलाला हे नाव पडले असावे. पोटसडॅम शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर वाटाघाटीसाठी मित्र राष्ट्रांनी बर्लिनऐवजी या निवांत शहराची निवड केली.

बर्लिन शहर जर्मनीच्या उत्तर भागात आहे. तिथून आम्ही ट्रेनने जर्मनीच्या दक्षिणेकडील बावारिया या नितांत सुंदर प्रदेशात आलो. न्युरेनबर्ग हा असाच एक नमुनेदार जर्मन गाव. या गावातल्या डोंगरावर एक मध्ययुगीन किल्ला आहे. गावात पुरातन कॅथेड्रल आणि रंगीत लाकडी घरे आहेत. गावातून संथपणे वाहणारा नदीचा कालवा आणि त्यावर कंठहारासारखे शोभणारे साकव आहेत. नाही म्हटले तरी, या गावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या गावातल्या रेस्टॉरंट्‌समध्ये मिळणारी ‘ग्रिल्ड सॉसेज विथ सॅलेड’ ही डिश. ही या गावाची सिग्नेचर डिश आहे. दुपारी थंडगार बिअरचे घुटके घेत, भाज्यांचे सॅलेड- त्यावर शिंपडलेल्या सॉसच्या ड्रेसिंगबरोबर खात हे ग्रिल्ड सॉसेजीस खाणे, हा मजेदार अनुभव आहे.

वर्षाचे अकरा महिने सुशेगाद असलेला हा गाव ख्रिसमसच्या सणाची चाहूल लागली की, डिसेंबरच्या महिन्यात खडबडून जागा होतो. सगळीकडे हिमवृष्टी झालेली असते, पण लोकांच्या उत्साहाला पालवी फुटते. घरे, दुकाने, रेस्टॉरंट्‌स नटून-थटून ख्रिसमसच्या सणाची वाट पाहतात. लहान मुले आणि तरुण-तरुणी रंगीत कपडे घालून कॅरोल्स म्हणत रस्तोरस्ती फिरू लागतात. शेवटी एकदाचा ख्रिसमस येतो. त्या दिवशी स्नोफॉल झाला, तर सगळ्यांना अत्यानंद होतो. खुशीत व्हाईट ख्रिसमस साजरा केला जातो.

न्युरेनबर्गहून आम्ही रोथेनबर्गला आलो. टावर नदीच्या काठी वसलेला हा सुरेख जर्मन गाव. स्टेशनवरून आम्ही चालत गावात गेलो. आर्च ओलांडल्यानंतर जुना गाव सुरू झाला. सेलेप्रमाणे इथे जुन्या वास्तुशिल्पाची रंगीत लाकडी घरे जतन करून ठेवली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली एकसारखी दिसणारी, पण वेगवेगळ्या रंगांची लाकडी घरे- त्याचे सामूहिक चित्र- त्याचा वेगळा ठसा मनात उमटत होता. कित्येक वर्षे या घरांना आधुनिकतेने स्पर्श केलेला नव्हता. काळाने कुठल्याही बदलापासून त्यांना दूर ठेवले होते. त्यामुळे या घरांचे कौमार्य- व्हर्जिनिटी ताजी, टवटवीत होती.

रोथेनबर्ग गाव खेळण्यांची राजधानी मानली जाते. गावात खेळण्यांची असंख्य दुकाने होती. देवळात जाताना आपण चप्पल बाहेर ठेवतो, तसे आपण खेळण्यांच्या दुकानात प्रवेश करताना आपले वय बाहेर ठेवले पाहिजे. मुलांची खेळणी बनवणाऱ्यांना त्यांचे मानसशास्त्र माहीत असावे लागते. मुले स्पर्शाला आसुसलेली असतात. त्यामुळे खेळण्यांच्या दुकानात उबदार स्पर्श देणारी अस्वले, कुत्रे, मांजरे होती. ही सॉफ्ट टॉईज मुलांना आवडतात. त्याशिवाय मुलांना सहवास हवा असतो. विदेशात लहानपणीच आई-वडील मुलांना वेगळ्या खोलीत झोपवतात. मुलांना एकट्याने झोपायची भीती वाटते. तेव्हा हे टेडी बेअर, हे कुत्रे, ही मांजरे त्यांचे दोस्त बनतात. मग वेगवेगळे रंग, रंगीत पेन्सिली, रंगीत चित्रे, रंगीत बाहुल्या, रंगीत टी-शर्टस यांतून मुलांना रंगांची ओळख होते. नंतर आवाज- पक्ष्यांचा किलबिलाट, चिमण्यांच्या चिवचिवाट, मांजराची म्यांव म्यांव, कुत्र्यांचे भो भो, माणसाप्रमाणे बोलणारे पोपट हे मुलांना बेहद्द आवडतात.

हे पाहा ख्रिसमसच्या खेळण्यांचे खास दुकान. तिथे केवढे वेगवेगळ्या आकाराचे सांताक्लॉज, केवढे ख्रिसमस ट्रीज, रेनडीयर्सचे रथ, वेगवेगळे रंगीबेरंगी ख्रिसमस लॅम्पस, ख्रिसमससाठी केलेल्या खास बॅगा... आणि हे दुकान प्लेमोबिल्सचे. रोथनबर्गने प्लेमोबिल्स नावाचा खास खेळण्याचा ब्रँड निर्माण केलेला आहे. या ब्रँडखाली वेगवेगळी खेळणी हा गाव तयार करतो. गावात विकतो. निर्यात करतो. जगभरचे खेळण्यांचे मार्केट कोट्यवधी युरो किंवा डॉलर्सचे आहे. जर्मनीतल्या रोथेनबर्ग गावाने त्यातला छोटा वाटा आपल्यासाठी राखून ठेवला आहे.

रोथेनबर्ग गावात पायपीट करून आम्ही बरेच थकलो होतो. त्यामुळे एका मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये जाऊन शॅम्पेनचे घुटके घेऊन ताजेतवाने झालो. तिथे कसाडा म्हणजे बटाट्याची पेस्ट घातलेला पराठ्यासारखा पदार्थ आणि चिकन बुरीटो म्हणजे चिकन फ्रँकीसारखा पदार्थ मागवला. दोन्ही पदार्थ रुचकर होते.

रोथेनबर्गहून दोन-तीन ट्रेन्स बदलून आम्ही फुसेनला आलो. फुसेनच्या डोंगरावर राजा लुडविकचा राजवाडा आहे. राजवाड्याकडे जाण्यासाठी घोडागाडी, शटलबस आणि पायी चालणे असे तीन पर्याय होते. घोडागाडी आणि शटलबस यांच्यासमोर मोठ्या रांगा असल्याने आम्हाला पायी चालत जावे लागणार, असे दिसत होते. पण आमच्या सुदैवाने आम्हाला शटलबस मिळाली. डोंगराची चढण या वयात पायी चालून जाणे आम्हाला अशक्य होते, हे बसने जाताना आमच्या लक्षात आले.

फुसेनच्या किल्ल्याचा पाया डोंगराच्या भरभक्कम खडकावर रचला होता. किल्ला तीन मजली होता. त्याचा दर्शनी भाग फारच सुंदर होता. किल्ला पाहताना राजा लुडविकच्या सौंदर्यदृष्टीची कल्पना येत होती. खरं म्हणजे, हे किल्ला आणि राजवाडा या दोन संकल्पनांचे मिश्रण होते. राजा लुडविकने हा किल्ला कोणाही वास्तुशिल्प तज्ज्ञाकडून बांधून घेतला नव्हता, तर रिचर्ड व्हॅगनर नावाच्या नाटकाच्या स्टेज डिझायनरकडून त्याची आखणी केली होती. त्यामुळे किल्ल्याची सजावट नेपथ्यसदृश होती आणि किल्ल्यात भरपूर रंगीत चित्रे होती. पांढरा शुभ्र हंस हा राजा लुडविकचा आवडता पक्षी होता. त्यामुळे या शुभ्र धवल पक्ष्याची तळ्यात पोहतानाची चित्रे किल्ल्यातील भिंतीवर चित्रांकित केली होती. त्याशिवाय पूर्णाकृती हंसाची शिल्पे राजवाड्यात होती. फुसेनच्या किल्ल्याच्या खिडकीतून फुसेन गावातल्या निळ्या तळ्याचे व सभोवतालच्या हिरव्या निसर्गाचे दर्शन घडत होते.

फुसेनहून आमचा जर्मनीतला शेवटचा थांबा होता म्युनिच शहर. जर्मनीतले सर्वाधिक उत्पन्न असलेले लोक ज्या शहरात जास्तीत जास्त आहेत ते शहर- अशी या शहराची ख्याती आहे. त्याशिवाय बीएमडब्ल्यू या सुप्रसिद्ध गाड्यांचा कारखाना याच शहरात आहे. ‘द अल्टिमेट ड्रायव्हिंग मशिन’ या स्लोगनने विकल्या जाणाऱ्या या दर्जेदार व महाग गाड्या आता दंतकथा बनल्या आहेत.

ऑक्टोबर महिन्यात भरल्या जाणाऱ्या ऑक्टोबर फेस्त नावाच्या बिअर फेस्टिव्हलमुळे म्युनिच शहर जगभर ओळखले जाते. या महोत्सवाला 60 लाख पर्यटक भेट देतात. या बिअर महोत्सवात 5 लाख लिटर्स बिअर प्यायली जाते. 1810 च्या ऑक्टोबर महिन्यापासून या उत्सवाची सुरुवात झाली. या महिन्यात राजा लुडविक-1 आणि राजकन्या तेरेझा यांचे लग्न झाले. या लग्नाचा टोस्ट म्हणून बिअरचा पेला उंचावल्यानंतर जी पार्टी झाली, ती 16 दिवस चालली. त्यानंतर लोकांच्या आग्रहामुळे दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात अशा पाटर्या होऊ लागल्या. आता म्युनिचचा मेयर ऑक्टोबर फेस्ताचे उद्‌घाटन करतो आणि सुंदर वेष घातलेल्या तरुणी परेड करीत या महोत्सवाचा जयघोष करतात.

1972 मध्ये म्युनिच शहरात ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या. पण पॅलेस्टाईन दहशतवाद्यांनी दोन इस्रायली खेळाडूंचा खून केला आणि नऊ इस्रायली खेळाडूंना ओलीस ठेवले. त्यांची सुटका होण्यापूर्वी त्यांना ठार मारले. त्यामुळे म्युनिच ऑलिम्पिकची सांगता शोकमय वातावरणात झाली.

लॉन टेनिस आणि फुटबॉल खेळात जर्मनी अग्रेसर आहे. 1985 साली 17 वर्षांच्या बोरिस बेकर या जर्मन तरुणाने विम्बल्डन स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्याने अनेक ग्रॅँड स्लॅम केले. असाच विक्रम जर्मन खेळाडू स्टेफी ग्राफनेही केला. जर्मनीने 1954, 74, 90 आणि 2014 असा फुटबॉलचा वर्ल्ड कप चार वेळा जिंकला.

म्युनिच शहराचा जुन्या म्युनिचचा मरिना प्लाझा हा भाग प्रेक्षणीय आहे. बावारियाचा ड्यूक हेन्री याने 12 व्या शतकात मरिना प्लाझाची स्थापना केली. जर्मनीने 1638 मध्ये स्वीडनशी 30 वर्षे प्रदीर्घ युद्ध करून विजय मिळवला, तेव्हा मरिना प्लाझात गोल्डन गेट हा सेंट मेरीचा खांब उभारण्यात आला. इथेच गॉथिक पद्धतीच्या वास्तुशिल्पात बांधलेला टाऊनहॉल आहे. दुपारी बारा वाजता टाऊनहॉलच्या खिडक्या उघडून धनगरांच्या बाहुल्या संगीताच्या तालावर नाचत-नाचत बाहेर येतात. ते पाहायला शेकडो पर्यटक मरिना प्लाझात झुंबड करतात.

मरिना प्लाझाजवळच फार्मस् मार्केट आहे. तिथे सर्व प्रकारची ताजी फळे व भाज्या मिळतात. त्यापुढे Eataly नावाचा सर्व इटालियन खाद्यपदार्थ मिळणारा मॉल आहे. Eataly हा शब्द दोन अर्थाने या मॉलने फार समर्पकपणे वापरला आहे.

जर्मनीत अनेक शहरांत आम्ही पायी फिरलो. इथले लोक शहरात फिरायला सायकलींचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करतात. हॉप ऑन-हॉप ऑफ बस हेदेखील पर्यटकांसाठी सोईस्कर वाहन आहे. इथले टॅक्सीवाले जर्मन गाड्याच वापरतात. मर्सिडिज, बीएमडब्ल्यू किंवा फॉक्स व्हॅगन. फॉक्स व्हॅगन याचा जर्मन भाषेतील शब्दशः अर्थ- लोकांची गाडी. हिटलर सत्तेवर असताना त्याला लोकांना परवडेल अशी गाडी हवी होती. त्यातून फॉक्स व्हॅगन बिल्हस ही गाडी बाजारात आली. ती दिसायला कुरूप होती. पण ती छोटी गाडी हिट झाली. कारण उपयोगितेच्या दृष्टीने ती चांगली होती. आता जर्मन उद्योजक गाड्या, यंत्रे, ग्राहकोपयोगी वस्तू यांचे उत्पादन करतात. केवळ उपयोगितेचाच विचार करत नाहीत, तर सौंदर्यदृष्टीचाही विचार करतात.

जर्मनीच्या संपूर्ण प्रवासात मी एकच जर्मन शब्द शिकू शकलो. तो म्हणजे- डानके. त्याचा अर्थ धन्यवाद किंवा थँक यू. या शब्दाची आपल्याला नेहमीच गरज पडते. अजित मळकर्णेकरची मदत घेऊन मी जर्मन भाषा आणि संस्कृत भाषा यांचे अनन्य नाते शोधण्याचा प्रयत्न केला. कारण भारतात आलेले आर्य आणि आर्यवंशीय जर्मन लोक यांचे पूर्वज एकच असले पाहिजेत. कधी तरी त्यांची भाषा एकच असली पाहिजे. जर्मन आणि संस्कृत भाषेतील साधर्म्य दाखवणारे अनेक शब्द आम्हाला सापडले. उदाहरणार्थ : भ्राता Bruden, माता Mutter, नाम Name, मन्त्री Minister, चारित्र्य Character वगैरे.

म्युनिचहून भारतात परतण्यासाठी लुफ्तान्झाच्या विमानात मी बसलो, तेव्हा लुफ्तान्झा (Luftanaza) या शब्दाकडे माझे लक्ष गेले. मग माझ्या लक्षात आले- अरे, हा तर लुफ्त हंस आहे... उडणारा, तरंगणारा हंस आहे!

दत्ता दामोदर नायक, गोवा

kdnaik@gmail.com