Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

प्रतिगामीत्वात स्पर्धा नको!

अखेर निकाल लागला. बाबरी मशीद होती ती जागा कोणाच्या मालकीची, या खटल्याचा निकाल लागला. 1949 पासून हा खटला न्यायालयात चालू होता. इ.स. 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ती 2.7 एकर जागा रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड या तीन दावेदारांना वाटप करण्यात येणार होती.

पण सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल फिरवला असून, ती संपूर्ण जागा रामलल्ला ट्रस्टची आहे, यावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र त्या जागेवर मंदिर बांधण्यासाठी नवीन ट्रस्ट स्थापन करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर टाकली आहे, आणि त्या ट्रस्टमध्ये निर्मोही आखाड्याचा प्रतिनिधी असावा असेही म्हटले आहे. शिवाय, सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत पाच एकर जागा मशीद बांधण्यासाठी देण्यात यावी असाही निर्णय दिला आहे.

तब्बल सत्तर वर्षांपासून हा खटला चालू होता, तीन पक्षकारांचे वारस वा प्रतिनिधी हा खटला लढवत आले होते. मात्र या खटल्याला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले ते 1987 नंतर, म्हणजे भाजप व त्यांच्या परिवारातील अन्य संस्था व संघटना यांनी आयोधेतील त्या जागेवर राम मंदिर उभारले जावे यासाठी आंदोलन उभारले तेव्हा. नंतरच्या पाच वर्षांत त्या आंदोलनाने उभा देश पेटवला, त्याची परिणती बाबरी मशीद पाडण्यात झाली. ती पाडली गेली तेव्हा त्या आंदोलनाचे प्रणेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते, ‘हा माझ्या आयुष्यातील अत्यंत दुःखद प्रसंग आहे.’ कारण ती मशीद सन्मानपूर्वक अन्यत्र हलवावी असे त्यांचे म्हणणे होते. ते प्राप्त परिस्थितीत शक्यच दिसत नव्हते. म्हणून त्या मागणीसाठी अयोध्येत कारसेवा या नावाखाली प्रचंड मोठा जनसमुदाय देशभरातून गोळा करण्यात आला. उग्र वातावरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम बाबरी मशीद पाडण्यात झाला.

‘उपस्थित जनसमुदायाच्या उत्स्फूर्त उद्रेकातून ते विध्वंसक कृत्य घडले’ असे अडवाणी व भाजप नेते सांगत आले आहेत. तो कट होता का, त्याची जबाबदारी कोणाची, त्यात कल्याणसिंह यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारचा हात होता का, त्याला नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची छुपी संमती होती का, याबाबतचा न्यायालयीन खटला स्वतंत्रपणे चालू आहे, त्याचा निकाल अद्याप आलेला नाही. पण एवढे मात्र खरे की, बाळासाहेब ठाकरे वगळता अन्य कोणत्याही मोठ्या पक्षाच्या मोठ्या नेत्याने बाबरी पाडल्याचे जाहीर समर्थन केले नव्हते. ठाकरेंनी मात्र ‘ते कृत्य करणारे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे’ असे जाहीर वक्तव्य केले होते.

बाबरी मशीद पाडली जाणे यासंदर्भातील निकालाची आता प्रतीक्षा आहे, कदाचित पुढील काही महिन्यांत तो येईल, कदाचित तो इतका लांबेल की तोपर्यंत राम मंदिर बांधून होईल. आताचा निकाल हा फक्त जागेची मालकी कोणाची यासंदर्भात होता आणि हा खटला सत्तर वर्षांपासून प्रलंबित होता. बाबरी पाडली जाणे हे दरम्यानच्या काळातील कृत्य होते. त्यासंदर्भात आताच्या निकालात ‘ते कृत्य बेकायदेशीर होते’ असा स्पष्ट निर्वाळा देण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर, ‘1949 मध्ये मशिदीच्या जागेत रामाची मूर्ती ठेवणे हे कृत्यही बेकायदेशीर होते,’ असाही निर्वाळा या निकालात आहे. त्यामुळेच बाबरी पाडली गेली नसती तर सर्वोच्च न्यायालयाने आता दिला तसाच निकाल दिला असता का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. म्हणजे बाबरीचे स्थानांतर करा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद त्या जागेवर असती तर दिला असता का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’, असेच येईल. कारण 1947 पूर्वी धार्मिक स्थळे ज्या अवस्थेत होती, त्यात बदल करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 1991 मध्ये दिला आहे, त्याला अपवाद केला होता तो केवळ बाबरी खटल्याचा. आणि तो निर्णय फिरवण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. त्यामुळे दोन शक्यता होत्या.

एक- 1991 चा निकाल बाबरी मशिदीलाही लागू होतो असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले असते. दुसरी- आतासारखा निकाल दिला असता तर तेव्हाच्या काँग्रेस सरकारने तो फिरवला असता. कारण परिस्थितीच तशी स्फोटक होताी. अशाच स्फोटक परिस्थितीमुळे शाहबानो पोटगी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल 1986 मध्ये राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने फिरवला होता. ‘त्याला प्रतिक्रिया म्हणून राम मंदिर उभारणीसाठीचे आंदोलन भाजपने 1987 मध्ये हाती घेतले’, असे अडवाणी यांनी (2008 मध्ये आलेल्या) आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे. याचा तात्त्विक अर्थ, ‘तुम्ही मुस्लिमांना मागास ठेवू इच्छिता काय, मग आम्ही पण हिंदूंना मागास ठेवू इच्छितो असा निघतो,’ म्हणजे प्रतिगामीत्वाच्या बाबतीत आम्ही हार मानणार नाही. याचा व्यावहारिक अर्थ, ‘शाहबानो प्रकरणातील निकाल फिरवून तुम्ही मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळवू पाहता काय, मग आम्ही राम मंदिराचे आंदोलन पेटवून हिंदूंची एकगठ्ठा मते मिळवू’ असा निघतो. म्हणजे सत्तेच्या राजकारणात आम्ही तुम्हाला मागे टाकू.

विशेष म्हणजे मागील तीन दशकांवर नजर टाकली तर लक्षात येईल, भाजपने काँग्रेसवर मात केली आहे, तात्त्विक व व्यावहारिक या दोन्ही बाबतीत. तर मुद्दा असा की, बाबरी मशीद पाडली गेली नसती, म्हणजे ती जागा रिकामी नसती तर सर्वोच्च न्यायालयाने आता दिला तसा निकाल दिला नसता. म्हणजे बदलत्या किंवा प्राप्त परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल आहे. अर्थात, ‘1947 पूर्वीच्या धार्मिक स्थळांमध्ये बदल करता येणार नाही’, हा 1991 चा निकालही बदलत्या किंवा प्राप्त परिस्थितीला समोर ठेवूनच दिला होता.

आणि आता संपूर्ण देशाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत फारशी खळखळ न करता केले आहे, त्याला कारणही बदलती परिस्थिती हेच आहे. ‘झाले तेवढे पुरे, नको आता लढे-भानगडी’ असा कंटाळा वा वैताग आणि ‘भाजप आता इतका सर्वव्यापी आहे की, फार काही हालचाल करण्यात अर्थ नाही’ अशी भीती वा दहशत, अशा दुहेरी भावनेचा पगडा आताच्या परिस्थितीवर आहे. मुख्य म्हणजे 1992 च्या आठवणी ताज्या असणाऱ्या पिढ्या आता वय वर्षे पन्नास ते ऐंशी यादरम्यान आहेत, आणि 1992 नंतर तारुण्यात पदार्पण केलेल्या पिढ्यांना मंदिर-मशीद वादाबाबत आस्था तरी नाही किंवा अज्ञान तरी आहे. पण एका मर्यादित अर्थाने हे चांगलेच आहे.

आता पुढे काय? तर मशीद होती त्या जागेवर भव्य राम मंदिर उभारले जाईल, कारण विटा व खांब यांच्यावर कोरीव काम करून सर्व पूर्वतयारी झालेली आहे. त्याबाबत हिंदू धर्माभिमानी लोकांकडून कमी-अधिक प्रमाणात जल्लोष होईल, त्या आंदोलनात सामील झालेल्यांना श्रमसाफल्याचा आनंद वाटेल, सीमारेषेवर असलेल्यांना आपला धर्म व संस्कृती यांचे वर्चस्व सिद्ध केले किंवा झालेल्या अन्यायाची भरपाई झाली याचे समाधान लाभेल.

दुसऱ्या बाजूला काय होईल? मुस्लिम समाजासाठी कार्यरत असलेल्या संस्था व संघटना यांच्याकडून काही लहान अपवाद वगळता तीव्र प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. शिवाय सर्वसामान्य मुस्लिम समाजात नाराजी आहे, निराशा आहे, अन्यायाची भावनाही काहीअंशी आहेच, पण सुटकेचा निश्वास त्या सर्वांहून मोठा आहे. मुख्य म्हणजे अयोध्येत अन्यत्र मिळणार असलेल्या पाच एकर जागेबाबत कसलाही उत्साह नाही. ‘ती जागा घेऊच नये’, इथपासून ‘त्या जागेवर मशिदीऐवजी शाळा, कॉलेज किंवा हॉस्पिटल उभारले जावे’ या प्रकारच्या प्रतिक्रिया येताहेत. अर्थातच तो आवाज क्षीण आहे, पण त्याला विरोध होत नाही हे लक्षणीय आहे. त्यामुळे जर हा क्षीण आवाजच मुख्य स्वर बनला आणि तिथे खरोखरच मशिदीच्याऐवजी इतर काही किंवा काहीच बनले नाही तर? तर ते एक महान पुरोगामी पाऊल ठरेल!

आम्ही प्रतिगामीत्वात स्पर्धा करू इच्छित नाही, असा त्याचा अर्थ निघेल. हे पाऊल मुस्लिम समाजाला आणि अर्थातच देशालाही आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी विशेष उपयुक्त ठरेल! यात एक शक्यता अशी आहे की, यामुळे बहुसंख्यांकवादाचा धोका आणखी वाढेल. पण तो धोका आजही कमी नाही. त्यामुळे अज्ञानाला ज्ञानाने छेदणे आणि अंधाराला प्रकाशाने भेदणे हीच खरी दीर्घकालीन रणनीती असू शकते, विनोबांच्या भाषेत यालाच ‘जशास तसे’ म्हणतात.

Share on Social Media

कालपरवा

गांधी घराण्याचे नाव आता पुरे!

रामचंद्र गुहा

आजचा काँग्रेस पक्ष उतरत्या काळातील मुघल सत्ताधीशांची आठवण करून देतो- राजवाड्यात विराजमान असलेले सम्राट व सम्राज्ञी, यांच्याभोवती सतत स्तुती करणाऱ्या राजदरबाऱ्यांचा असणारा कोंडाळा तर बाहेर मुघलांशी निष्ठावान असणारा प्रदेश दिवसागणिक आकुंचन पावत अस्तित्वहीन होऊ लागला होता. आज आपल्या समोरील काँग्रेसची परिस्थिती शोकात्म नसती तर नक्कीच हास्यास्पद वाटली असती. सारांश, जोवर काँग्रेस पक्षावर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणे आणखीच सोपे असणार आहे. इतकेच नाही तर, मोदींना सत्तेत टिकून राहणे आणि राजकीय चर्चेचा आखाडा आपल्या सोयीचा ठेवणेदेखील अतिशय सोपे जाणार आहे. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांना वाटत असेल की, त्यांचे राजकारणात कार्यरत राहणे हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे; परंतु खरे पाहता त्यांनी राजकारणातून संन्यास घेणे, हेच देशहिताचे ठरणार आहे.

महात्मा गांधींना एकूण चार मुले होती. स्वातंत्र्य चळवळीत या चौघांनीही तुरुंगवास भोगला. परंतु या चौघांनीही स्वतंत्र भारतात कोणतेही राजकीय पद धारण केले नाही. गांधींची ही सचोटी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना मात्र अंगी बाणवता आली नाही. जवाहरलाल नेहरूंची कन्या इंदिरा गांधी 1959 साली काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या, हे सर्वश्रुतच आहे. परंतु वल्लभभाई पटेलांच्या मुलाने आणि मुलीने आपल्या वडिलांच्या कर्तृत्वावर स्वार होत खासदारकी मिळवली होती, याची फारच थोड्यांना कल्पना असते.

याचप्रमाणे सी.राजगोपालचारी आणि गोविंद बल्लभ पंत यांच्या मुलांनीदेखील खासदारकी भूषवली होती. वारसाहक्काविषयीची गांधींची तत्त्वे स्वातंत्र्य चळवळीच्या इतर प्रमुख नेत्यांकडून दुर्दैवाने पाळली गेली नाहीत. आपल्या वैयक्तिक प्रभावाचा वापर करून आपल्या मुलाला किंवा मुलीला खासदार बनवणे हे झाले एक टोक. तर आपल्या कुटुंबीयांमार्फत पक्षाचे नियंत्रण करणे आणि त्यावर संपूर्ण पकड मिळवणे हे अर्थातच दुसरे टोक म्हणता येईल.

नेहरू, पटेल, राजाजी आणि पंत या सर्वांचे वर्तन कमी अधिक प्रमाणात घराणेशाहीचे द्योतक होते. पुढे 1975 मध्ये इंदिरा गांधींनी आपले पुत्र संजय गांधी यांची आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करून घराणेशाहीची परिसीमाच गाठली. पुढे संजय गांधींच्या अकाली मृत्यूनंतर त्यांनी आपल्या दुसऱ्या पुत्राला अर्थात राजीव गांधींना राजकारणात आणले आणि ‘जर काँग्रेस सत्तेत कायम राहिली तर माझ्यानंतर राजीव गांधी हेच देशाचे प्रधानमंत्री असतील’ असे स्पष्ट संकेत दिले. सोनिया गांधींना आपल्या सासूबार्इंविषयी अतिशय आदर होता. त्यांच्या स्मृतीचे जतन करण्यासाठी सोनियांनी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यामुळेच आणीबाणी विषयी काँग्रेसने माफी मागायला हवी असे त्यांना वाटत नाही; आणि आपल्या एकुलत्या मुलाने आपल्या पश्चात काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवावे या संबंधीही त्या कमालीच्या आग्रही होत्या. मात्र काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत असताना सलग दोन सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला अतिशय लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सोनियांच्या पुत्राने आपल्या विवेक-बुद्धीला जागून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीची निवड व्हावी असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. अशा परिस्थितीतही त्यांच्या मातोश्री (उतरती कळा लागलेल्या पक्षावरील सैल होत असलेली) गांधी घराण्याची पकड घट्ट करण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.

मी स्वतः काँग्रेसमधील गांधी घराण्याचा आजीवन टीकाकार राहिलो आहे. मात्र मला याचीदेखील कल्पना आहे की, गांधी घराण्याची पाठराखण करणारे सर्वच लोक व्यक्तिगत स्वार्थापायी त्यांची पाठराखण करत नाहीत. काहीजण या भावनेने गांधी घराण्याची पाठराखण करतात की, फक्त काँग्रेसच देशपातळीवर भाजपला आव्हान देऊ शकते. याचबरोबर त्यांचा असा दावा असतो की, फक्त नेहरू-गांधी घराणेच काँग्रेस पक्षाला एकसंध ठेवू शकते आणि त्यामुळेच पक्षावर या घराण्याचे वर्चस्व असणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे काही लोक याकडे लक्ष वेधतात की, ‘फक्त भाजपच नाही तर इतर पक्षांतील प्रमुख नेत्यांची मुले-मुली आमदार, खासदार आणि मंत्रीपदे भूषवतात, त्यामुळे घराणेशाहीसाठी, फक्त काँग्रस पक्षालाच लक्ष्य करणे योग्य नाही.’

मला मात्र वरील युक्तिवाद पटत नाही. कारण 1885 ते 1975 सालापर्यंत किंवा 1991 ते 1998 सालापर्यंत काँगेस पक्ष घराणेशाहीचा वाहक नव्हता. विशेष म्हणजे अध्यक्षपदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात सोनिया गांधी देखील काँग्रेस पक्ष एकसंध ठेवू शकलेल्या नाहीत. त्यामुळेच तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वायएसआर काँग्रेस या प्रादेशिक पक्षांचा उदय झाला आहे. या प्रादेशिक पक्षांकडे मिळून ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ म्हणवणाऱ्या पक्षाइतकेच खासदारांचे संख्याबळ आजतरी आहे. पण कुण्या पक्षाकडे घराणेशाहीचे वाहक असलेले काही खासदार असणे ही बाब, एका राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व पालकांकडून आपल्या मुलांकडे जाण्याच्या मानाने (लोकशाही राजकारणाची अवहेलना होण्याच्या दृष्टीने) अगदीच किरकोळ आहे.

काँग्रेसच्या तुलनेत भाजप कधीही घराणेशाहीचा पक्ष राहिलेला नाही. आणि हीच बाब या पक्षाची ताकददेखील आहे, ती मतदारांना या पक्षाकडे आकर्षितही करते. नरेंद्र मोदी ही पूर्णपणे स्वकर्तृत्वावर मोठी झालेली व्यक्ती आहे. राजकारणात त्यांच्यावर कोणाचाही वरदहस्त नव्हता. याउलट राहुल गांधी आज राजकारणात फक्त कुणाचा पुत्र, किंवा नातू किंवा कुणाचा पणतू असल्यामुळेच आहेत. हीच बाब नरेंद्र मोदींना राहुल गांधींपासून वेगळे ठरवते. अर्थातच, आपल्या विरोधकांच्या तुलनेत नरेंद्र मोदींकडे काही जमेच्या बाजू आहेत- उदा. इतरांच्या तुलनेत ते अधिक बुद्धिमान आहेत, ते अधिक कष्ट घेतात, त्यांना वक्तृत्व-शैली लाभली आहे आणि अनेक वर्षांचा प्रशासनाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. कोणतीही सुपरिचित पार्श्वभूमी नसणे- विशेष म्हणजे नामदार नसणे ही त्यांची जमेची बाजू आहे आणि इथे नमूद केलेले गुण त्यांचे पारडे आणखी मजबूत करतात. 1968 मध्ये सोनिया गांधी प्रथम भारतात आल्या, तेव्हा भारत देश जी हुजूर आणि श्रेष्ठ-कनिष्ठ या रचनेत जखडलेला होता. तुमचे वडील किंवा आजोबा कोण आहेत, या बाबी तेव्हा अतिशय महत्त्वाच्या होत्या. नंतरच्या पन्नास वर्षांत भारतातील सरंजामशाही वृत्ती अतिशय कमी झाली आहे. आता जनतेला तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा कोण होते यापेक्षा, तुमच्या कर्तृत्वामध्ये जास्त रस आहे. ही बाब फक्त राजकारणातच नाही तर खेळ, व्यापार व अन्य क्षेत्रांतदेखील तितक्याच सहजतेने लागू होते. मग एके काळी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या पक्षाची धुरा आजदेखील घराण्याच्या पाचव्या पिढीतील सदस्याकडेच का असावी, याचे आजच्या तरुण पिढीला आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही.

लुटियन्स दिल्लीच्या केंद्रस्थानी असल्यामुळे असेल, किंवा भोवती स्तुती करणाऱ्या चमच्यांचा कोंडाळा तयार झाल्यामुळे असेल, भारतीय जनतेच्या विचार करण्याच्या पद्धतीत झालेले अमुलाग्र बदल सोनिया गांधी टिपू शकलेल्या नाहीत. आता कळूनही उपयोग नाही, कारण वेळ कधीच निघून गेली आहे. हिंदुत्व किंवा विद्यमान सरकाराविषयी कसलीच सहानभूती नसलेली माझ्यासारखी एक व्यक्ती हे सर्व लिहिते आहे. कारण साडेपाच वर्षांच्या सत्ताकाळात नरेंद्र मोदींच्या शासनाने बहुसंख्यांकवादाला चालनाच दिली आहे, स्वायत सरकारी संस्थांचा पाया डळमळीत केला आहे, विज्ञान आणि विद्वतेवर हल्ला केला आणि अर्थव्यवस्थेचेही अतोनात नुकसान केले आहे. एका व्यक्तिमत्त्वाभोवती निर्माण झालेले वलय आणि निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान कार्यालयात एकवटणे हे प्रकार, हुकूमशाहीच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीचेच द्योतक आहेत. त्यामुळे आपल्या लोकशाही मूल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी व सामाजिक एकता पूर्वपदावर आणण्यासाठी एका मजबूत आणि विश्वासार्ह विरोधी पक्षाची तातडीने गरज आहे. परंतु सोनिया गांधी व त्यांची मुले ती गरज पूर्ण करू शकतील याची शक्यता अतिशय धूसर आहे.

मात्र भाजप हा काही अभेद्य असा पक्ष नाही. अलीकडील एक-दोन वर्षांत अनेक महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. सलग दोनदा सार्वत्रिक निवडणुका भाजपने जिंकल्या, कारण या निवडणुका मुळात अध्यक्षीय निवडणुकीत परावर्तीत झाल्या होत्या. शिवाय, नरेंद्र मोदी हे प्रमुख आव्हान जिच्यासमोर होते, ती व्यक्ती घराण्याच्या वारसा आणि राजकीय बुद्धिमत्तेचा अभाव या प्रमुख कारणांमुळे अगोदरच गलितगात्र झाली होती. राहुल यांनी चालवलेल्या निवडणूक प्रचारात आपल्याला याचीच झलक दिसली. रोजगार निर्माण करण्यात आलेले अपयश आणि कृषी क्षेत्रावर ओढवलेले संकट अशा मुद्यांवर पंतप्रधानांना घेरण्याऐवजी राहुल यांनी मोदींवर व्यक्तिगत भ्रष्टाचाराचा आरोप केला. एकूणच काँग्रेसची भूतकाळातील याबाबतची कामगिरी पाहता, हा मुद्दा मतदारांना आकर्षित करण्यापेक्षा काँग्रेसच्या अंगलटच येणार होता.

आजचा काँग्रेस पक्ष उतरत्या काळातील मुघल सत्ताधीशांची आठवण करून देतो. राजवाड्यात विराजमान असलेले सम्राट आणि सम्राज्ञी, यांच्याभोवती सतत स्तुती करणाऱ्या राजदरबाऱ्यांचा कोंडाळा तर बाहेर मुघलांशी निष्ठावान असणारा प्रदेश दिवसागणिक आकुंचन पावत अस्तित्वहीन होऊ लागला होता. आज आपल्या समोरील काँग्रेसची परिस्थिती शोकात्म नसती तर नक्कीच हास्यास्पद वाटली असती.

सारांश, जोवर काँग्रेस पक्षावर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणे आणखीच सोपे असणार आहे. इतकेच नाही तर, मोदींना सत्तेत टिकून राहणे आणि राजकीय चर्चेचा आखाडा आपल्या सोयीचा ठेवणेदेखील अतिशय सोपे जाणार आहे. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांना वाटत असेल की, त्यांचे राजकारणात कार्यरत राहणे हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे; परंतु खरे पाहता त्यांनी राजकारणातून संन्यास घेणे, हेच देशहिताचे ठरणार आहे.

(अनुवाद : साजिद इनामदार)

रामचंद्र गुहा, बेंगळुरू

Share on Social Media

दृष्टिक्षेप

नागड्यांचा भांगड

(या शीर्षकामुळे भांगडा या नृत्यप्रकाराचा अवमान होतो असे आम्हालाही वाटते, पण प्राप्त परिस्थितीवर संताप व्यक्त करण्यासाठी ते अपरिहार्य झाले आहे. क्षमस्व.)

विनय हर्डीकर

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मी लोकांना गमतीने विचारायचो की, मी निवडणुकीला उभा राहिलो तर तुम्ही मला मत देणार की नाही? तर ते म्हणायचे, तुम्हाला दिलं तर मत वाया जाईल. कारण तुम्ही तर निवडून येणार नाही आणि आम्हाला मत वाया घालवायचं नाही! मग आता, ‘माझं मत मी वाया न घालवता तुला दिलं आहे आणि तुला राज्य केलं पाहिजे’, ही जाणीव गेली कुठे? आपण दिलेलं मत वाया गेलं, असं या वेळी मतदारांना का वाटत नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे. एवढ्या-तेवढ्या कारणाने ओपिनियन पोल घेणारे प्रसारमाध्यमांतले वीर मेले काय सगळे? निकालानंतर सगळे तोंडावर आपटल्यामुळे ते सध्या वरमलेले असतील. मतदारांचा कौल काय आहे, मतदारांचं मानस काय आहे... आता त्यातला एकही नुसत्या मुलाखती घेत फिरतानाही कुठे दिसत नाही.

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा विचार आपल्याला दोन टप्प्यांत करावा लागेल. दि.21 ऑक्टोबरला मतदान झालं, तर 25 तारखेला संध्याकाळपर्यंत सगळे निकाल जाहीर झाले. त्यानंतर आठवडाभर निकालांची जी चर्चा चालली होती, त्यामध्ये असं दिसत होतं की, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. मात्र त्यांची सूज मतदारांनी उतरवलेली आहे. त्यांना 250 जागांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात 161 जागा त्यांना मिळाल्या. लोकांच्या लक्षात आलं नाही की, मागच्या वेळी वेगळं लढून जेवढ्या जागा मिळाल्या होत्या, जवळपास तेवढ्याच जागा महायुतीला एकत्र लढून मिळालेल्या आहेत. दोन्ही काँग्रेस पक्षांची स्थिती थोडी सुधारलेली दिसली. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीची चर्चा लोक गंभीरपणे करायला लागले होते, परंतु त्यांनाही आता फारसं यश मिळालं नाही. शरद पवार शिंगं मोडून वासरांमध्ये आले आणि त्यांनी चांगलं यश मिळवलं, याच्याकडेच सगळ्यांचं लक्ष होतं. महाराष्ट्रात बहुतांश पत्रकार पवारांचे स्तुतिपाठक असतातच. त्यामुळे, ‘शरद पवारांचं पुनरागमन’ ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती.

नेहमीप्रमाणे प्रचारामध्ये हीन पातळी गाठली गेली, निर्लज्जपणे पक्षांतरं झाली. त्यामुळे या निवडणुकीच्या वेळी मी मतदानावर बहिष्कार टाकला होता आणि तशी जाहीर भूमिकाही घेतली होती. उद्धव ठाकरेंनी (कुठल्या संदर्भात ते आठवत नाही) म्हटलं होतं की, हे निकाल सगळ्यांना धडा शिकवून जातील. आणि पुन्हा एकदा, लोकशाही ही एक लेव्हलिंग प्रोसेस आहे- मतदार सुजाण असतात आणि ते सगळ्यांना धडा शिकवतात, आपापली जागा दाखवून देतात- असे सगळे मुद्दे चर्चेत येत होते. मोदींचा प्रभाव कमी झाला, वाढला, की आहे तेवढाच राहिला, हा मुद्दाही चर्चेत होता. पण इथल्या निवडणुकांवरून मोदींचा राष्ट्रीय स्तरावरील प्रभाव ठरवणे योग्य नाही, असं माझं मत आहे. परंतु आपली राजकीय विश्लेषणाची सगळी पद्धतच एका चौकटीत अडकलेली आहे. त्या चौकटीला धरून सगळ्या प्रतिक्रिया होत्या.

मध्ये दिवाळी होती आणि भाजपने धूर्तपणे आमदारांची बैठकच दिवाळीनंतर घ्यायची, असं जाहीर करून टाकलं. त्यामुळे भाजप-शिवसेनेत थोडीशी धुसफूस होईल आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन सरकार शपथ घेईल, असे अंदाज होते. शिवसेनेने महायुतीच्या किंवा भाजपच्या खिरीत मोळा घालेपर्यंत ही सगळी रूढ चर्चा विश्लेषकांमध्ये व सर्वसामान्य मतदारांमध्ये चाललेली होती. पण मुख्यमंत्रिपदाच्या बाबतीत शिवसेनेने जो पवित्रा घेतला, त्याने भाजपही गांगरून गेला आणि इतर पक्षांच्या (मुख्यतः राष्ट्रवादी व काँग्रेस आणि शिवसेनेचे निवडून आलेले बंडखोर अपक्ष उमेदवार) आशा पल्लवित झाल्या.

मग सुजाण मतदारांनी सगळ्या राजकीय पक्षांना धडा शिकवला म्हणणारे विश्लेषकसुद्धा ‘आता महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात’ अशी भाषा बोलू लागले. मग शिवसेनेने थोडं भावनात्मक अपील निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे, या गोष्टी आपल्या लोकशाहीतून जेवढ्या लवकर जातील तेवढं चांगलं. कारण उद्धव ठाकरेंनी बाळ ठाकरेंना वचन दिलं होतं, याचा मतदारांशी आणि महाराष्ट्राच्या चांगल्या-वाईटाशी काहीही संबंध नाही. परंतु आपण कुणी तरी महाभारतातले नायक- खलनायक असल्यासारखा ‘त्या वेळी मी प्रतिज्ञा केली होती आणि काहीही करून ती मला पूर्ण केली पाहिजे’ असला आचरट पवित्रा उद्धव ठाकरेंनी घेतला.

दुसरं असं की, त्यांनी निवडणुकीआधी अशी भूमिका घेतली होती की, आम्हाला काय देणार, ते लिहून द्या. मात्र भाजपने काहीही लिहून दिलेलं नव्हतं, हे उघड आहे. पुढे शिवसेनेने असं म्हटलं की, चर्चेत जेवढं कबूल केलं होतं, तेवढं तरी आम्हाला मिळालंच पाहिजे. चर्चेत अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद कबूल केलं होतं. तिसऱ्या बाजूला भाजपने, विशेषतः मुख्यमंत्र्यांनीच उतावळेपणाने जाहीर करून टाकलं होतं की, शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद द्यायला आम्ही तयार आहोत आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मुख्यमंत्रिपद आमच्याकडेच राहील. इथे खास संघपद्धतीने शिवसेनेला अमित शहा आणि मंडळींनी घोळात घेतलेलं आहे. उद्धव ठाकरे जे क्लेम करत आहेत की, ‘आम्हाला वचन दिलं होतं’ त्याविषयी (मी संघाची स्ट्रॅटेजी आतून पाहिलेली असल्यामुळे) मला असं वाटतं की, त्यांनी नकार दिलेला नव्हता; असं असणार. ‘पहले इलेक्शन होने दो, रिजल्ट आने दो, उसके बाद देखेंगे...’ असं काही तरी बोलणं झालं असावं. असं मोघम बोलण्यामध्ये ही मंडळी फार पटाईत आहेत. आणि असं होणार, ही शक्यता गृहीत धरल्यामुळेच शिवसेना त्यांच्याकडे सतत लेखी आश्वासन मागत होती. ते काही त्यांनी दिलं नाही.

देशातली इतर राज्ये आणि महाराष्ट्र यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे- जो या सगळ्या चर्चेत कुठेच आलेला नाही. तो असा की, महाराष्ट्रात सेक्युलर पक्ष विभागलेला आहे आणि ज्याला जातीयवादी किंवा हिंदुत्ववादी म्हणायची पद्धत आहे, तोही विभागलेला आहे. सेक्युलर पक्षातही काँग्रेससारखा एक मवाळ पक्ष आहे आणि दुसरा आक्रमक व हिकमती व ज्याच्यापुढे चाणक्याने मान खाली घालावी असा शरद पवारांसारखा राजकीय गुरू मिळालेला राष्ट्रवादी पक्ष आहे. इकडे दुसऱ्या गटातही जिथे तिथे आडदांडपणा आणि ब्लॅकमेलिंग करणं, हीच ताकद असणारा शिवसेनेसारखा पक्ष आहे. शिवसेनेचा आडमुठेपणा काही आजचा नाही. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्या वेळी दर महिन्याला बाळ ठाकरे काही तरी हट्ट धरायचे. मग प्रमोद महाजन दिल्लीहून येणार, ठाकऱ्यांचं आणि त्याचं संगनमत/गुफ्तगू होणार, मग सुहास्यवदनाने दोघेही फोटो देणार! (मी प्रमोदला म्हटलं की, एक बाळ ठाकरे आणि ममता, समता व जयललिता या तीन बायका तुला म्हातारा करून टाकणार!)

तर हे सगळं जुनंच आहे. भाजप-शिवसेना हे पहिल्यापासूनच ‘ट्रबल्ड मॅरेज’ आहे. आता कुणी दुजोरा देणार नाही, पण मनोहर जोशींनी शपथ घेतल्यानंतर वर्ष-दीड वर्षात शिवसेनेचा एक कार्यकर्ता चाकू घेऊन मंत्रालयात अण्णा डांगेंच्या ऑफिसमध्ये गेलेला होता- अमुक एक काम करणार की नाही, हे विचारण्यासाठी! ही नागपूरमध्ये घडलेली घटना. अण्णा डांगे तिथून उठले आणि सरळ मनोहर जोशींकडे गेले. त्यांना म्हणाले, ‘‘मी तर राजीनामा देतोच आहे, पण माझ्या पक्षालाही सल्ला देणार आहे की, ही युती आपण मोडू या.’’ त्या वेळी दादा-बाबा करून त्यांना थांबवलं गेलं. त्यामुळे ‘टांग अडाना’ ही शिवसेनेची नेहमीची पद्धत आहे. त्यांना विचार नाही, चारित्र्याची किंमत नाही, शिवाय कुठल्या गोष्टीचा विधिनिषेधही नाही. त्यामुळे काहीही करून विधान भवनावर भगवा फडकला की, शिवसेनेचं समाधान होणार आहे. त्यांना संजय राऊतांसारखे संपादकही मिळालेले आहेत. शिवसेना ही मुळातच नकारात्मक भावनांवर उभी राहिलेली फळी आहे. संयुक्त महाराष्ट्र मिळाला, पण महाराष्ट्र होता तिथेच राहिला; शहरांतील, विशेषतः मुंबईतील महाराष्ट्रीयांच्या न्यूनगंडावर ते काम करत आहेत. त्यामुळेच बाबरी मशीद पाडली तेव्हा, ‘ती शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे’ असं विधान ठाकऱ्यांनी केलं. ती पाडली संघाच्या लोकांनी, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ‘न्यूसन्स व्हॅल्यू’ आणि ‘रिअल व्हॅल्यू’ यांच्यातला फरक शिवसेनेला कधी कळलाच नाही, त्यामुळे डावपेचांचं राजकारण त्यांना करताच येत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस, दिल्लीची काँग्रेस किंवा भाजप हे मुरलेले, व्यापक राष्ट्रीय आणि वैचारिक पाया असलेले पक्ष आहेत. त्याप्रमाणे ते वागतात की नाही, हा भाग वेगळा! पण वैचारिक म्हणून काय बोलायचं, गोलमाल म्हणून काय बोलायचं, हे त्यांना नीट जमतं. शिवसेनेने हे सगळंच बिघडवून टाकलं. इतर राज्यांत पाहिलं तर काँग्रेस-भाजप असं ध्रुवीकरण किंवा काँग्रेस-भाजप- एखादा सशक्त प्रादेशिक पक्ष असं समीकरण दिसतं. चौरंगी चित्र फक्त महाराष्ट्रात आहे. त्यामुळे कर्नाटकात काय झालं किंवा इतर कुठे काय झालं, हा प्रकार महाराष्ट्राच्या विश्लेषणासाठी चालणार नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणाचं विश्लेषण आपल्याला वेगळ्या प्रकारेच करावं लागेल. इथून पुढे हे चार पक्ष राहणार आणि महाराष्ट्रात coalition politics, आघाडी किंवा युती अशा प्रकारचंच राजकारण होणार! त्याच्यात वंचित बहुजन आघाडीचा पाचवा रंग आलेला आहे. बिगरशिवसेना, बिगरभाजप उमेदवार त्यांच्यामुळे आताच्या निवडणुकीत 32 ठिकाणी पडलेले आहेत. त्यातले काही फार थोड्या फरकाने पडले, असंही आपल्याला दिसतं. मतदानाची आकडेवारी बघितली तर त्यामध्ये फार विश्लेषण करण्यासारखं काही वाटत नाही. भाजप-शिवसेना मिळून 42 टक्के, दोन्ही काँग्रेस मिळून 34 टक्के आणि इतर 24 टक्के अशी मतांची टक्केवारी आहे. याचा अर्थ असा की, शरद पवार आणि मंडळींनी जर वंचित आणि मंडळींचं म्हणणं ऐकून घेतलं असतं, त्यांच्यासाठी वाजवी जागा सोडल्या असत्या, तर त्यांनी पाडलेल्या 32 उमेदवारांपैकी 16 तरी निवडून येऊ शकले असते. ते 16 निवडून येण्याने दोन्ही काँग्रेसचं बळ वाढलं असतं आणि त्याच्या बदल्यात ते जे मतदारसंघ मागत होते ते जर त्यांना दिले असते; तर कदाचित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे साधारण 120-130 जागांपर्यंत पोहोचू शकले असते. माझा हिशेब असा की, आत्ता दोन्ही काँग्रेसचे मिळून 100 आहेत, त्या पराभूत 32 पैकी निम्मे म्हणजे 16 धरले आणि त्याबदल्यात वंचितचे जिंकतील असे उमेदवार धरले, तर साधारण आकडा 130 च्या पुढे जातो. म्हणजे हे सत्तेच्या जवळ आले असते.

शरद पवारांच्या मुत्सद्देगिरीचं भयंकर कौतुक चाललं आहे. एवढं वय होऊनही ते सगळीकडे फिरले, साताऱ्यात एकदा चिंब भिजले... वगैरे! (तरण्यांचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे?) पण त्यांनासुद्धा वंचित बहुजन आघाडीची ताकद किती आहे याचा अंदाज आला नाही, याचा हा स्पष्ट पुरावा आहे. त्याला थोडा बाळासाहेब आंबेडकरांचा स्वभावही कारणीभूत आहे. बाळासाहेबांशी चर्चा करताच येत नाही. तुम्ही त्यांना कितीही उलट-सुलट सांगा; त्यांचं जे ठरलेलं असेल तेच ते बोलत राहतात, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यांना जर म्हटलं की, मला तुमच्याशी अमुक विषयावर बोलायचं आहे, चर्चा करायला येऊ का? तर कधीही त्यांचा होकार नसतो. (हा कदाचित त्यांचा माझ्याबद्दलचा पूर्वग्रहही असू शकेल.) कार्यकर्त्यांशी, सहकाऱ्यांशी मिळून-मिसळून बाळासाहेब चर्चा करतात, असा रिपोर्ट मला तरी अजून मिळालेला नाही. त्यामुळे जसं काँग्रेस-राष्ट्रवादीला हे शिकावं लागेल की, समाजातील इतर घटकांच्या आशा-आकांक्षांना आपण मान दिला पाहिजे; तसंच सगळे 288 उमेदवार उभे करण्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांनी व्यवहारवादी भूमिका घेतली असती, तर कदाचित महायुतीला तिथेच झटका बसला असता. मग पुढला मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिवसेनेचा, ही चर्चाच थांबली असती. कारण हे साधारण 130-32 पर्यंत गेले असते तर उरलेल्या 27 पैकी काहींची संख्या कमी झाली असती आणि (कुणाला तरी abstain करायला लावून) सरकार आलं असतं. परंतु तिथे राजकीय भविष्यवेध घेण्यामध्ये शरद पवार कमी पडले आणि अजूनही त्यातून त्यांनी धडा घेतलेला दिसत नाही.

आता प्रश्न असा की, यातून पुढे काय होणार? काही लोकांनी असं सुचवलं आहे की, ही महायुती मोडून टाका आणि सरळ पुन्हा निवडणुका घ्या. पण पुन्हा निवडणुका घेऊन हेच उमेदवार येणार असतील, तर त्या निवडणुकांना फारसा अर्थ राहणार नाही. दुसरा मुद्दा खर्चाचा आहे. आत्तापर्यंत झालेल्या विश्लेषणात कुणीही निवडणुकीमध्ये किती पैसा उधळण्यात आला आहे, याची चर्चा केलेली नाही. बातमी अशी आहे की, लातूर जिल्ह्यात दोन देशमुखांनी दोन मतदारसंघांत शंभर कोटींपेक्षा जास्त खर्च केला. कोकणातील खेड मतदारसंघात 50 ते 60 कोटींच्यावर खर्च झाला. निवडणूक प्रचाराची पद्धत निवडणूक आयोगाने अशी बसवलेली आहे की, दृश्य प्रचार फारसा नसतो. त्यामुळे त्यावर फार खर्च होत नाही. मग खर्च कुठे होतो? मतदारांना देण्यामध्ये हे पैसे खर्च होतात. सहज हिशेब केला, एका मतदाराला एका मतासाठी एक हजार रुपये दिले तर एका कोटीत दहा हजार माणसे मावतात. हा एका उमेदवाराचा हिशोब आहे. यामध्ये कुणीही मागे राहिलेलं नाही. अशा प्रकारे जो खर्च झालेला आहे, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. (एक प्रश्न असाही विचारता येईल की, तीन वर्षांपूर्वी नोटाबंदी लागू करून देशातला काळा पैसा नष्ट केला, या भाजप सरकारच्या दाव्याला काय अर्थ राहतो? एवढा काळा पैसा पुन्हा कुठून जमा झाला?)

शेषन यांनी निवडणूक आयोगाच्या तरतुदी कठोरपणे लागू केल्या आणि निवडणुकीच्या काळात होणारं शहरांचं विद्रूपीकरण थांबवलं. तेव्हाही मी म्हटलं होतं की, याने पैसा कसा थांबवणार? दुसरं असं की, निवडणुकांचं दृश्य स्वरूप बदलल्यामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले. पण तेही मतदारच होते, त्यामुळे रोजगारापेक्षा त्यांना थेट रोख रक्कम मिळाली असेल, तर ती त्यांनी घेतलीही असेल. पण पैशाचा वापर थांबवण्यामध्ये आपण पूर्णपणे अयशस्वी ठरलो आहोत. त्यामुळेच आता पुन्हा लगेच निवडणुका कुणालाही नको आहेत.

लोकसत्तेच्या आमच्या संपादक मित्रांनी असं म्हटलं आहे की, लोकशाहीचं भलं होणार असेल तर पुन्हा एकदा निवडणुकीचा खर्च काही फार मोठा नाही. पण निवडणुकीचा खर्च उमेदवारांनी करायचा आहे आणि त्यांची झोळी तर बऱ्यापैकी रिकामी झाली असेल. शिवाय मतदारही त्यांच्याकडून शिकलेले आहेत, त्यामुळे ते म्हणतील, तेव्हाचं मत तेव्हा; आता नवे पैसे द्या! अशा परिस्थितीमध्ये लगेच निवडणूक होणार नाही. याला समांतर उदाहरण म्हणजे चंद्रशेखर यांचं पंतप्रधान होणं. त्यांच्याइतका प्रभावी राजकारणी अडचणीच्या परिस्थितीत पंतप्रधान झाला. व्ही.पी. सिंहांचं सरकार अकरा महिन्यांत पडलं होतं. देशाची आर्थिक परिस्थिती इतकी खालावलेली होती की, फॉरेन एक्सचेंजचा तुटवडा निर्माण झाला होता. दोनशे टन सोनं लंडनच्या बँकेत नेऊन ठेवावं लागलं होतं. अशा परिस्थितीत सगळ्यांनाच निवडणूक टाळायची होती, म्हणून चंद्रशेखर चार-साडेचार महिने पंतप्रधान झाले. तसंच जर अगदी व्हायचं असेल, तर काँग्रेसच्या 45 माणसांचा प्रतिनिधी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल आणि ज्या वेळी त्याच्या कुबड्या लोक काढून घेतील, त्या वेळी सरकार व कदाचित विधानसभा बरखास्त होईल, ही एक शक्यता आहे. (मग भले शरदराव ‘आम्ही तीन पक्ष मिळून पाच वर्षं स्थिर सरकार’ असं म्हणोत. ‘साठी बुद्धी नाठी’ हे आम्हाला माहिती आहे.)

पवारांनी पहिल्यांदा असंही म्हटलं की, मी शिवसेनेसोबत जाणार नाही आणि आता म्हणताहेत की, शिवसेनेला आम्ही पाठिंबा देऊ. त्यांना शिवसेनेचा चंद्रशेखर तर करायचा नाही? तुम्हाला मुख्यमंत्रिपद हवंच असेल तर घ्या आणि कायमचे बदनाम व्हा! ‘यांच्या हट्टामुळे महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक घ्यावी लागली’ हा मुद्दा त्या वेळी शिवसेनेच्या विरुद्ध त्यांना अगदी नक्की वापरता येईल. पण ते हास्यास्पद असेल. व्ही.पी. सिंहांच्या नंतर चंद्रशेखरांचंही सरकार पडलं, तेव्हा त्या दोघांनी संसदेत एकमेकांना कडकडून मिठी मारली- एकदाची कटकट गेली म्हणून! तेव्हा अशा प्रकारचा मुख्यमंत्री शिवसेनेला मिळू शकतो. मग त्या वेळी बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणायचं असेल ते म्हणेल. त्यामुळे तातडीने निवडणूक हा पर्याय नाही. दीर्घकालीन राष्ट्रपती राजवट ही लोकशाहीची चेष्टा आहे. उघडी-वाघडी सत्तास्पर्धा राजकारणात ‘डर्टी गेम’ म्हणून ओळखली जाते; मात्र राजकारणात ‘सदसद्‌विवेकाचा स्वर’ अशीही संकल्पना आहे. सखेद आश्चर्य याचं वाटतं की, महायुतीमध्ये असा एकही आमदार नसावा, जो आपल्या पक्षनेतृत्वाला म्हणेल, ‘सरकार स्थापन करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे; नेतृत्वाचं भांडण वाढवून आपण जनतेचा विश्वासघात करतो आहोत!’ हे सगळे आमदार काय आपापल्या पक्षाचे वेठबिगार गुलाम आहेत? आता हे खरं म्हणजे मतदारांचं आणि प्रसारमाध्यमांचं काम आहे. त्यांनी जाब विचारायला हवा. तुम्ही युती करून मतं घेतलेली आहेत, त्यामुळे तुम्ही सरकार स्थापन केलंच पाहिजे- असं ठणकवायला हवं. मला याचं आश्चर्य आणि वाईटही वाटतं की, ‘आमची फसवणूक झाली’ अशी भावनाच मतदारांमध्ये नाही. ‘शरद पवार काय आयडिया लढवतील? सोनिया गांधी आणि शरद पवारांची काय चर्चा झाली असेल? अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांचं बोलणं नक्की काय झालं होतं? नमो आणि उद्धव काही तोडपाणी करतील का?’ असल्या चर्चांमध्ये त्यांना रस आहे.

मतदान हे पवित्र कर्तव्य न मानणारा, मताला क्रयवस्तू समजणारा मतदार त्याची मतं विकतो, हे दिसतंच आहे. पण हे गणंग त्यांच्याच मतांमुळे निवडून आले आहेत ना? गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मी लोकांना गम्मतीने विचारायचो की, मी निवडणुकीला उभा राहिलो तर तुम्ही मला मत देणार की नाही? तर ते म्हणायचे, तुम्हाला दिलं तर मत वाया जाईल. कारण तुम्ही तर निवडून येणार नाही आणि आम्हाला मत वाया घालवायचं नाही! मग आता, ‘माझं मत मी वाया न घालवता तुला दिलं आहे आणि तुला राज्य केलं पाहिजे’, ही जाणीव गेली कुठे? आपण दिलेलं मत वाया गेलं, असं या वेळी मतदारांना का वाटत नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे. एवढ्या-तेवढ्या कारणाने ओपिनियन पोल घेणारे प्रसारमाध्यमांतले वीर मेले काय सगळे? निकालानंतर सगळे तोंडावर आपटल्यामुळे ते सध्या वरमलेले असतील. पण निवडणुकीच्या आधी नुसती भरमार होती. मतदारांचा कौल काय आहे, मतदारांचं मानस काय आहे... आता त्यातला एकही नुसत्या मुलाखती घेत फिरतानाही कुठे दिसत नाही.

शिवसेनेने ज्या वेळी हे समीकरण बिघडवलं, त्या वेळी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये त्यांनी मुलाखती घेतल्या. अरे, निवडणुका महाराष्ट्रातल्या आहेत, तर महाराष्ट्रात मुलाखती घ्या ना! मी अनेक लोकांना म्हटलं की, आपण एक मोर्चा काढू या. पण कुणी यायला तयार नाही. ‘आता आपण निवडून दिलंच आहे त्यांना; हे असं थोडं पुढे-मागे चालायचंच’ अशी लोकांची वृत्ती आहे. खरं म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यालयासमोर लोकांनी जाऊन बसलं पाहिजे. आग्रह धरला पाहिजे की, ‘तुम्ही शपथ घ्या, मंत्रिमंडळ तयार करा. कारण आघाडीपेक्षा तुम्ही बरा कारभार कराल, या आशेवरती आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे.’ पण ती हिंमत किंवा आस्था मतदारांमध्ये राहिलेली नाही! एकदा मतदान केलं की मतदार मजा बघायला तयार होऊन बसतात.

साधनाचा हा अंक वाचकांच्या हातात पडेल तेव्हाही हा तिढा निर्णायकरीत्या सुटलेला नसेल. सुटलाच तरी तो शॉर्टटर्मसाठीच सुटलेला असेल. कदाचित शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं बाय रोटेशन मुख्यमंत्रिपदही ते ठरवतील. पण हे सगळं चालू असताना भाजपवाले गप्प थोडेच बसतील? स्वतःला एवढा शिस्तबद्ध पक्ष मानणाऱ्या शिवसेनेचे आमदार जर एका हॉटेलात कोंडून ठेवावे लागत असतील, तर ते काय लायकीचे आहेत आणि किती किमतीला विकले जाऊ शकतील, हे अगदी मूर्खालाही कळण्यासारखं आहे. अजून एक असं दिसतं की, या वेळी सगळ्याच पक्षांची मतं कमी झालेली आहेत आणि ती वंचित बहुजन आघाडी व बंडखोर यांच्यात- ‘इतर’मध्ये वाटली गेली आहेत. त्यातली बंडखोरांना मिळालेली मतं म्हणजे त्या-त्या पक्षांनाच मिळालेली मतं आहेत. आज ना उद्या ते बंडखोर स्वगृही जातीलच. काँग्रेसबद्दल मी नेहमी असं म्हणतो की, काँग्रेस जरासंधाच्या धडासारखी आहे. कितीही तुकडे करा; ते परत येऊन जुळतात. मनोमीलन समारंभ होतात, सगळे एकमेकांना मिठ्या मारतात. त्या बाबतीत ते सगळे पोचलेले आहेत.

शरद पवारांची खरी कसोटी केव्हा लागेल? उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येतो म्हणतील तेव्हा! त्या वेळेला मग कोण कुणाची कॉलर टाईट करतं, ते कळेल. कारण पवारांनीच सांगितलं आहे, जनतेला पक्षांतर पसंत नाही. मग शरदराव, तुम्ही काय केलंत आजपर्यंत? तुम्ही पक्षांतर नाही केलंत, फक्त प्रत्येक वेळी नवा पक्ष काढला! ‘डिव्हाईन जस्टिस’ असा असतो की, शरद पवारांनी जे यशवंतरावांसोबत केलं; तेच त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त म्हातारपणात करावं लागलं. ज्यांनी सल्ला द्यायचा आणि विजयोत्सव साजरा करायला जायचं, त्यांना गावोगाव फिरावं लागलं. हीच परिस्थिती शरद पवारांनी यशवंतरावांवर 1983-84 मध्ये आणली होती. नाक मुठीत धरून शालिनीताई पाटलांचा प्रचार यशवंतराव करत होते. इतक्या सच्छिल माणसावर अशा उमेदवार बाईचा प्रचार करण्याची वेळ यावी? केवढी नामुष्की! शरद पवारांनाही उमेदवार कसा आहे, काय आहे, हे न पाहता तेच करावं लागलं.

महाराष्ट्रातल्या या घोळाचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होईल? मुंबईमुळे राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं स्थान राजकारणापेक्षा अर्थकारणात मोठं आहे. त्याला काही धक्का लागणार नाही. महाराष्ट्रातील उलथापालथीमुळे शेअर बाजारात फार उलाढाल झालेली नाही. नरेंद्र मोदी करिष्म्याचं काय? नरेंद्र मोदींची प्रतिमा काही केवळ महाराष्ट्रावर अवलंबून नाही. ती मुख्यतः हिंदी पट्‌ट्यामध्ये आहे आणि भाजपची सध्या दोन प्रकारची रणनीती सुरू आहे. मोदी-शहांनी एकमेकांमध्ये काम विभागून घेतलेलं आहे. देशांतर्गत विकासाचे आणि राजकीय बांधणीचे प्रश्न अमित शहांकडे सोपवलेले आहेत. पाच वर्षांपासून मोदींचं परदेशप्रवासाचं व्यसन हाताबाहेर गेलेलं आहे. गडी भारतात येतो आणि बॅग भरून पुन्हा कुठल्या तरी देशात निघून जातो, यात काहीही फरक पडलेला नाही. दर वेळी परराष्ट्र व्यवहारमंत्री सोबत जात नाहीत, यातही फरक पडलेला नाही. ‘केल्याने देशाटन’ स्वतःमध्ये अजून चातुर्य येईल, या आशेवर पंतप्रधान असावेत. त्यामध्ये ‘भारताची प्रतिमा जगात उंचावणे’ हा मोठा हेतू आहे. म्हणजे काय, ते त्यांनीच एकदा नीट सांगावं. मी बराच विचार केला, उदयनराजेसारखा- माणूस भाजपला का हवा होता? तिथे मला हे उलगडलं. राज्यामध्ये भाजपचं राजकारण विकासाची भाषा बोलण्याचं आहे; देशपातळीवर मात्र त्यांचा अजेंडा पूर्णपणे वेगळा आहे. मुस्लिम समाजाच्या सगळ्या विशेष सवलती कमी-कमी करत न्यायच्या आणि एके दिवशी कॉमन सिव्हिल कोड आणायचा, हा अजेंडा आता स्पष्ट दिसतो आहे. याची सुरुवात ट्रिपल तलाकपासून झाली. 370 कलम ही त्यातली दुसरी पायरी होती. तिसरी पायरी म्हणजे हा राममंदिराचा लोंबकळत पडलेला प्रश्न होता. तिथे भाजपचं सुदैव म्हणा किंवा कोर्टाला लोकक्षोभाची (र्िीलश्रळलर् ेीींलीू /र् ेीीींरसश) भीती वाटली की, हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला नाही तर भाजप किंवा त्यांच्या परिवारातील संघटना दंगली घडवून आणतील; त्यासाठीच इतक्या पोलीस बंदोबस्ताचं नाटक केलं होतं? किंवा कोर्ट आपल्याला हवा तो निर्णय देणार आहे, हे माहीत होतं?

तसंच पाकिस्तानचं कार्ड सतत वापरत राहणं हे दुसरं तंत्र. पठाणकोट आणि राफेल प्रकरण झाल्यावर खरं तर हे सरकार कोसळायला हवं होतं. पण त्यानंतर पुलवामा झालं आणि यांना फार मोठा पाठिंबा मिळाला. आता बाबरी मशिदीचा निकाल त्यांच्या बाजूने लागलेलाच आहे. याच्यापुढचा मुद्दा म्हणजे कॉमन सिव्हिल कोडचा प्रश्न जर ते निकालात काढू शकले, तर अजून दोन निवडणुका तरी हिंदूंचं मत त्यांनाच जाईल. सध्या एनडीएचे लोकसभेत 340 ते 345 सदस्य असतील, दोन-तृतीयांश बहुमतासाठी आणखी 20 जण लागतील. त्यामुळे तो गाठण्यासाठी उदयनराजेसुद्धा चालतील, पण काही करून भाजपला लोकसभेमध्ये ही शक्ती मिळवायची आहे. कुठल्याच देशामध्ये कुठलाही समाज किंवा कुठलाही प्रदेश यांना विशेषाधिकार असता कामा नये, हे तत्त्वतः मान्य होण्यासारखं आहे. पण एकदा एनडीएची संसदेत दोन-तृतीयांश संख्या झाली की, हे उरलेल्या राज्यघटनेशी काय नसते उद्योग करतील, याची धास्ती आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकांसंदर्भात हा विषय फारसा महत्त्वाचा नसला तरीही सगळ्याच राज्यांमध्ये त्यांचं आता जास्तीत जास्त खासदार मिळवणं हे कारस्थान आहे, असं आपल्याला दिसेल. येत्या चार-सहा महिन्यांत काही राज्यांत निवडणुका आहेतच. त्याही वेळेला हेच बघायला मिळेल.

विधानसभेत ताकद निर्माण करण्याचं एक महत्त्व असं असतं की, त्यामुळे राज्यसभेतली ताकद वाढते. राज्यसभेतले प्रतिनिधी विधानसभेतून निवडून जातात. मोदींनी या महाराष्ट्र प्रकरणात लक्षच घातलेलं नाही. अमित शहांनी जाहीर करून टाकलं की, ‘मी शिवसेनेला असं काही आश्वासन दिलंच नव्हतं’, त्यामुळे ते मोकळे झाले. त्यांच्या दृष्टीने तो फारसा महत्त्वाचा मुद्दा नाही. आता महाराष्ट्रातली सत्ता आली काय, गेली काय! त्यांना पार्लमेंटमधली ताकद वाढवायची आहे. पुढल्या वर्षी राज्यसभा निवडणुका होतील, तेव्हा महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे शंभर आमदार आहेतच. विधान परिषदेतही आहेत. त्यामुळे भाजपचे जे महाराष्ट्रातून ठरलेले राज्यसभा उमेदवार आहेत, ते निवडून येतीलच. त्यामुळे त्यांचं लक्ष इतर राज्यांतील निवडणुकांवर जास्त असणार, जिथून राज्यसभेतील संख्या वाढवता येईल. एनडीएची संख्या वाढावी म्हणून जिथे जिथे लोकसभेची पोटनिवडणूक असेल, तिथे तिथे आपला माणूस निवडून आणायचा प्रयत्न ते करतील. असं हे सगळं चित्र आता तरी आहे.

इथे महाराष्ट्रातील मतदारांना खूप काही करता येईल. एकत्र येता येईल, बैठका घेता येतील, स्वाक्षऱ्यांची मोहीम घेता येईल, मूकमोर्चे काढता येतील, वेगवेगळ्या प्रकारांनी निषेध व्यक्त करता येईल. पण तसं करण्यामध्ये मतदारांना खरोखर किती आस्था आहे? (सहज आठवण झाली, दहा वर्षांपूर्वी याच महिन्यात मी साधनात असाच लेख लिहिला होता (साधना, 14 नोव्हेंबर 2009) मात्र त्या वेळी आरोपीच्या पिंजऱ्यात काँग्रेस- आघाडी होती. निवडणूक निकालानंतर फक्त मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली होती, पण खातेवाटपाचा घोळ संपत नव्हता. राष्ट्रपती राजवट नसली तरी राज्यात सरकार असून नसल्यासारखं होतं. तेव्हा शरद पवार आणि कंपनीने आता फार डिंग मारू नये.)

(शब्दांकन : सुहास पाटील)

विनय हर्डीकर, पुणे

Share on Social Media

चिंतन

एकाकीपणाचे पिशाच!

सुरेश द्वादशीवार

धर्मांनी स्त्रियांनाच स्वातंत्र्य नाकारले असे नाही, त्यांनी ते पुरुषांनाही नाकारले. स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही चेटकीण असते व प्रत्येकच चेटकीण वध्य असते, असे ख्रिस्ती चर्चने म्हटले. तेच इतर धर्मांनी वेगवेगळ्या स्वरूपात सांगितले. इस्लामने स्त्रीला बुरखा घालायला लावून तिला एकटेपणीही बंदिवान केले. हिंदू धर्मात स्त्री ‘पापाची खाण’ ठरवली गेली. त्याच वेळी या सर्व धर्मांनी पुरुषाचाही स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार नाकारला. तर्क करा, पण तो वेदानुकूलच करा- असे हिंदू धर्माने सांगितले. इस्लामने कुराणाहून वेगळा विचार ही कुफरत ठरविली, तर बायबलहून वेगळा विचार धर्मविरोधी व निषिद्ध असल्याचे ख्रिश्चन धर्माने सांगितले. जिथे स्वतंत्र विचाराचे व बुद्धीचे स्वातंत्र्य नाकारले जाते, तिथे व्यक्तीचे एकाकीपण कोण लक्षात घेईल आणि त्यावर समाजाने धर्म व संस्कृतीच्या नावाने टाकलेली बंधने कोण नाकारील?

व्यक्ती- मग ती पुरुष असो वा स्त्री- खऱ्या अर्थाने एकटी व एकाकीच असते. जन्माला येताना असते तशी जातानाही ती एकटीच असते. आई-वडील असतात, बहीण-भाऊ, पत्नी-मुले आणि मित्र व नातेवाईक. पण ते सारे तिच्या नेपथ्याचा भाग असतात. त्यात असतानाही त्याचे दूरत्व जाणवते. त्यातून बाहेर पडले की मग तर त्याचे स्मरणही राहत नाही. व्यक्ती ही फक्त तिची असते आणि तिच्यातच असते. नाटक पाहावे, सिनेमा पाहावा, गाणे ऐकावे किंवा एखादे पुस्तक वाचताना त्यात रंगून जावे- हा तिच्या जीवनाचा भाग नसतो. तो सारा तिच्या स्वतःचे एकाकीपण हरवण्याच्या प्रयत्नाचा भाग असतो. त्यात कधी यशस्वी होता येते, तर कधी अपयश येते. पण ते तसे होत असणे हाही एक तात्कालिक भाग असतो. तो आयुष्याचा भाग नसतो.

हे एकाकीपण व्यक्तीला आत्मभानासोबत लाभत असते. हे भान जसे वाढते तसे त्याचे एकाकी असणेही वाढते. आत्मभान हे जसे समाजभान जागे करते, तसे व त्याच वेळी त्यापासूनचे स्वतःचे वेगळेपणही जाणवून देते. हे वेगळेपण व एकाकीपण समाजधारणेला फारसे पोषक नसल्याने ते संपविण्याचा वा त्याला आळा घालण्याचा प्रयत्न समाजाकडूनही होतच असतो. या एकाकीपणावरील मार्ग तत्त्वज्ञांना सांगता आले नाहीत. पाश्चात्त्य आणि पौर्वात्य असे सारेच तत्त्वज्ञ त्यात येतात. धर्म येतात, जग आणि सभोवारचे पर्यावरण येते; पण तो सारा आयुष्याला दिलासा देणारा वा तो दिल्याचे भासविणारा भाग असतो.

आस्तिक्याची कल्पना व्यक्तीला ‘नसलेल्या व अनुभवाला न येणाऱ्या’ ईश्वराशी जोडते, तर नास्तिक्य तिला स्थळ-काळाशी जोडते. पण ते जुळणे मानसिक वा भावनिक पातळीवर राहते आणि त्याचा अनुभवही अल्पकाळ टिकणारा असतो. ईश्वराशी एकरूप होणे वा मोक्ष पावणे या साऱ्या कविता आहेत. त्यांचा सत्याशी वा वास्तवाशी संबंध नाही.

नदीच्या पात्रात किंवा वाळवंटात वाळूचे कण असतात. ते खूप असले वा समुद्रात दिसले तरी त्यांचा परस्परसंबंध नसतो. सिमेंट किंवा मातीत जुळविले गेले की, ते एकत्र येतात; पण एकत्र असले तरी एकेकटे व एकाकीच राहतात. झाडाच्या पानांचे तसे नाही. ती एकमेकांना लगडलेली असतात व त्यांच्यात एकच जीवनरस वाहत असतो. त्यांचे रंग व रूप परस्परभिन्न असते. एकाच डहाळीवरची पाने वेगवेगळ्या रूपात व आकारात दिसतात, पण त्यांचे आतून एक असणे स्पष्ट असते व ते जाणवते. व्यक्तींचे तसे नाही. एकाच कुटुंबात, वंशात, वर्णात, जातीत, धर्मात वा देशात असली, तरी ती सर्वस्वी वेगळी असतात. माणसांमध्येही- मग ती कोणत्याही देशाची, धर्माची वा वर्णाची असोत- एकच जीवनरस वाहतो, असे पौर्वात्य तत्त्वज्ञ सांगतात. तो जीवनरस म्हणजेच आत्मतत्त्व किंवा परमात्मभाव. पण झाडाचे एक पान तोडले की, ते कोमेजायला लागते. व्यक्तीचे वेगळेपण तिला कोमेजून टाकत नाही. झाडाची फांदी तोडली की, ती निर्जीव होते. माणसे तुटतात, समाज तुटतात वा देश तुटतात; तेव्हा त्यांचे वेगवेगळे भाग निर्जीव होत नाहीत. हेच व्यक्तीबाबतही खरे असते. वाळूचा कण जसा केव्हाही सारखा असतो; कालमानापरत्वे तो तुटेल वा झिजेल, पण त्याचे वाळूचा कण असणे कायम राहते. व्यक्तींचेही या कणासारखे आहे. ती वयोमानापरत्वे बदलेल, पण व्यक्ती म्हणून तिचे स्वतंत्र व वेगळे असणे आणि एकाकी असणेही कायम असते.

एक सर्वस्वी वेगळे उदाहरण पाण्याचे आहे. पाणी एकात्म व एकजीव असते. ते एकत्र मिसळले की मिसळते व वेगळे केले तरी त्याचा गुणधर्म ते सोडत नाही. पण पाणी ही बाबच सर्वस्वी वेगळी आहे. ती एकत्र असली, समुद्रात असली, सरोवरात वा विहिरी आणि भांड्यात असली, तरी ती एकच असते. तिच्या साऱ्या गुणधर्मानिशी तीच असते. ती वेगळी करता येत नाही, केली तरी तिची ओल कायम राहते. वाळू आणि पाणी यातला हा फरक आहे. वाळूचे कण वेगळे असतात, पाण्याचे थेंब एकजीव असतात. त्यांना वेगळे करता आले तरी त्यांचे एकरूप असणे कायम असते. हवेचा गुणधर्मही हाच आहे. तीही कप्पाबंद केली, तरी तिच्या मूळ धर्मापासून वेगळी होत नाही.

माणूस- स्त्री वा पुरुष यांचे स्वभावधर्मच त्यांना दूर ठेवतात. एकत्र आले तरी ते एक होत नाहीत आणि एक झाले असे म्हटले तरी ते तसे राहत नाहीत. देह, मन, बुद्धी (मानलाच तर आत्मा) ही त्यांची सारी अंगे स्वतंत्र असतात. गर्दीतही त्यांचे ते वेगळेपण कायम असते. मित्रांत ते काही काळ विसरता येते, कलेत रमले की हरवता येते; पण तो संदर्भ संपला की, माणसे पुन्हा एकटी व एकाकीच होतात. एका लोकप्रिय पंतप्रधानांसोबत खासगीत बोलत असताना त्यांना प्रस्तुत लेखकाने प्रश्न विचारला, ‘‘ज्याचा सर्वाधिक परिणाम मनावर राहिला, असा आयुष्यातला प्रसंग कोणता?’’

‘‘प्रसंग नाही,’’

ते म्हणाले, ‘‘अनुभव.’’

'‘माझ्या सभांना लाखोंच्या संख्येने लोक येतात. भाषणात रंगतात, टाळ्या वाजवतात. क्षणभर मलाही ते माझे विश्व वाटू लागते. पण एखाद्या क्षणी मनात येते, मी यांचा आहे, पण यांच्यातले माझे कोण आहेत? त्या क्षणी मला माझे एकाकीपण कधी नव्हे तेवढे जाणवते.’’

पंतप्रधान वाळूचा कण नव्हते, ते हिमालय होते. त्यांचा अनुभव हा असेल, तर बाकीच्यांचा अनुभव कसा असेल? माणसे बोलत नाहीत, कारण त्यांना आपली लोकमान्यता आणि लोकप्रियता मिरवायला आवडते. नव्हे, तो त्यांच्या जगण्याचाच भाग असतो. पण स्वतःलाही ती खरवडून पाहत असतील वा तसे त्यांना पाहता येत असेल, तर त्यांनाही त्यांचे ‘एकाकी नागवेपण’ (याला शॉपेन हॉवर नेकेड लोन्लीनेस म्हणायचा) कसे दिसत असेल? पत्नी, मुले, कुटुंब यातले आपले कोण, एकाकीपणात सहभागी होणारे किती आणि त्यांचेच ते वाळूचे कण किती?

हे एकाकीपण आत्मकेंद्रीपणातून येत असेल काय? इतरांविषयीच्या तुच्छतेतून, दुराव्यातून, समाजाविषयीच्या वा एकूणच माणसांविषयीच्या दुष्टाव्यातून? की, ते उपजत असते? जन्मतःच रडणारे मूल आपण एका सुरक्षित कोषातून बाहेर आल्याच्या जाणिवेने टाहो फोडत असेल काय? आई-बाप, कुटुंब आणि अवतीभवतीचा परिसर हे सारे सवयीने जवळचे होतात काय? त्या परिवाराखेरीज ते मूल इतरांत राहिले आणि वाढले, तर तो दुसरा परिवारही त्याला त्याचा वाटतो की नाही? माणसे वाढतात, मोठी होतात; पण दुरावलेले सुरक्षितपण त्यांना पुन:पुन्हा खुणावते व आठवते काय? एरिक फ्रॉम तसे म्हणतोही. खरा प्रश्न या एकाकी अवस्थेत माणसे सुखी व आनंदी असतात काय, हा आहे. आनंद वा दुःख या सापेक्ष बाबी इतर घटकांवर अवलंबून असतात, की फक्त स्वतःवर? यातले काहीही खरे मानले, तरी एकाकीपणाचे अस्तित्व असिद्ध होत नाही आणि ते नाकारण्याचा खोटेपणा टिकतही नाही.

बौद्ध तंत्रामध्ये विपश्यना हा मनोनिग्रहाचा एक प्रकार आहे. बौद्ध तत्त्वज्ञान जगाचे सातत्य वा अभंगत्व सांगत नाही. प्रत्येक क्षण दुसऱ्याहून वेगळा असतो. एखादी ज्योत तेवत असते तेव्हा या क्षणीची तिची वात, तेल व तेज या एकाच क्षणापुरते असते. पुढचे जळणे नव्या क्षणाचे असते. काळाच्या अगम्य व प्रचंड वेगामुळे आपल्याला या क्षणांचे वेगळेपण जाणवत नाही, हे आपले अज्ञान आहे. विपश्यना सांगते, दोन क्षणांमधील अंतरावर चित्त केंद्रित करा. हा क्षण कधी निर्वाताचा वा अभावाचा वाटेल, पण तोच खरा ज्ञानाच्या साक्षात्काराचा क्षण असतो. त्यावरची दृष्टी एकदा प्रबळ झाली की, ते त्या अंतराचा काळ व अवधी वाढवीत जाते. हा अवधी जेवढा मोठा असेल तेवढी हे तंत्र आत्मसात करणारी व्यक्ती ज्ञानी व समर्थ होते. विपश्यनेचे हे स्वरूप एका अतिशय उच्च पातळीवरील एकाकीपणाच्या ज्ञानाचे आहे. ते तत्त्वज्ञांच्या स्तरावरचे आहे. येथे ज्याचा विचार करायचा ते, सामान्यजनांच्या एकाकी वृत्तीचे व अनुभवाचे आहे. ही माणसे विपश्यना करीत नाहीत वा प्राणायामातील अखंडपणाचा आत्मसाक्षात्कार अनुभवणारी वा तशी इच्छा बाळगणारी नसतात. परंपरेने वाट्याला आणलेले आयुष्य जगत असतात. त्यातील संस्थांमध्ये राहत असतात. या संस्थांनी दिलेली नाती जोपासत असतात. समाज त्यातून निर्माण होतो.

पण परंपरा असो वा संस्था, आणि नाती असोत वा समाज- माणसाचे एकटेपण कायमच असते. त्याला आतून जाणवणारे एकाकीपण यातून संपत नाही. मग या एकाकीपणाचे मूळ शोधत फार मागे, इतिहासात, इतिहासपूर्व काळात- अगदी आदिमानवाच्या जगात जावे लागते. त्याचे परस्परांवर अवलंबून राहणे हा त्याच्या गरजेचा भाग होता की एकाकीपण घालवण्याचा? एकाकीपण घालविण्याचा मानला तरी ते तेव्हाही खरोखरीच गेले वा जात होते काय? जगभरची तत्त्वज्ञाने, धर्मविचार, संस्कृती आणि समाजधुरीण आपल्यावर जो संस्कार बिंबवतात; तो समाजात राहण्याचा, समाजधर्म सांभाळण्याचा, समाजाच्या उत्कर्षासाठी झटण्याचा व प्रसंगी त्यासाठी प्राणार्पण करण्याचा. करायचे ते समाजासाठी, जगायचे ते समाजासाठी आणि मरायचे तेही समाजासाठी.

प्लेटो म्हणतो, ‘समाजावाचून व्यक्तीला अस्तित्व नाही, श्रेय नाही आणि जीवनही नाही. समाजाची परिपूर्णता हेच माणसांचे व व्यक्ती-जीवनाचे साध्य व सार्थक आहे. ते साध्य करणे हेच त्याचे प्रयोजन आहे...’ जरा खोलात जाऊन विचार केला की, ही विचारांची सारी परंपराच एकांगी व एकारलेली वाटू लागते. ती व्यक्तीचे स्वतंत्र अस्तित्व विचारात घेणे सोडा, ते ध्यानातही घेत नाही. माणूस स्वतंत्र असतो, तो परस्परांहून वेगळा असतो आणि त्यातल्या प्रत्येकाचे एक स्वतःचे विश्व असते- ही बाब या विचारपरंपरेच्या गावीही नसते. (मागासलेल्या आदिम जमातींमध्ये व्यक्ती ही समाजाचा घटक म्हणूनच जगत असते व तेवढीच तिची मान्यता असते. त्याहून वेगळे जगण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती ताबडतोब समाजबाह्य व बहिष्कृत होते.)

शॉपेन हॉवर म्हणतो, ‘बिट्‌विन वन ॲन्ड नन देअर इज इन्फिनिटी.’ मात्र हा तत्त्वज्ञ या परंपरेला मान्यच होणारा नसतो. त्याचा ज्या काळाने गौरव केला, त्या काळाला व्यक्तीच्या स्वातंत्र्याची थोडीफार जाण आली होती. खरे तर ती जाण पूर्वीही होती. माणसे आपसात लढत होती. त्यांच्यात वाद होते. धर्म अमान्य करणारे चार्वाकासारखे पंथ जगातही सर्वत्र होते. पण राजसत्ता, धर्मसत्ता व अर्थसत्ता हे सारे बलशाली समूह विरोधात असल्याने त्यांची दखल तेव्हा कोणी घेतली नाही किंवा त्यांचा नायनाट करण्याचाच या समूहांनी प्रयत्न केला. मध्ययुगानेही त्यांचा आवाज ऐकला नाही.

ग्रीकांचे तत्त्वज्ञान व्यक्तीची बाजू घेणारे होते, पण ते ॲरिस्टॉटलसोबत संपले. भारतात चार्वाकांचे ग्रंथ शिल्लक राहू दिले गेले नाहीत आणि ख्रिस्ती व इस्लाम धर्माच्या उदयानंतर युरोप व अन्यत्रही धर्म हेच सत्य आणि त्याविषयीचा संशय हे पाप ठरले. शिवाय ते मृत्युदंडाला पात्रही ठरले. ही स्थिती व्यक्तीच्या स्वातंत्र्यापर्यंत व त्यातही तिच्या एकाकीपणापर्यंत व्यक्तीलाच पोहोचू देणारी नव्हती. जगातले धर्म स्त्रियांना स्वातंत्र्य देत नाहीत, असे नेहमीच म्हटले जाते.

धर्मांनी स्त्रियांनाच स्वातंत्र्य नाकारले असे नाही, त्यांनी ते पुरुषांनाही नाकारले. स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही चेटकीण असते व प्रत्येकच चेटकीण वध्य असते, असे ख्रिस्ती चर्चने म्हटले. तेच इतर धर्मांनी वेगवेगळ्या स्वरूपात सांगितले. इस्लामने स्त्रीला बुरखा घालायला लावून तिला एकटेपणीही बंदिवान केले. हिंदू धर्मात स्त्री ‘पापाची खाण’ ठरवली गेली. मात्र त्याच वेळी या सर्व धर्मांनी पुरुषाचाही स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार नाकारला. तर्क करा, पण तो वेदानुकूलच करा- असे हिंदू धर्माने सांगितले. इस्लामने कुराणाहून वेगळा विचार ही कुफरत ठरविली, तर बायबलहून वेगळा विचार धर्मविरोधी व निषिद्ध असल्याचे ख्रिश्चन धर्माने सांगितले. जिथे स्वतंत्र विचाराचे व बुद्धीचे स्वातंत्र्य नाकारले जाते, तिथे व्यक्तीचे एकाकीपण कोण लक्षात घेईल आणि त्यावर समाजाने धर्म व संस्कृतीच्या नावाने टाकलेली बंधने कोण नाकारील?

एकीकडे समाज व संस्कृती या गोष्टी व्यक्तीचे जीवन प्रगल्भ व समृद्ध बनवायला निर्माण होतात, असे सांगितले जाते. मात्र त्याच वेळी या व्यवस्था व्यक्ती- जीवनावरचे निर्बंध फारसे विचारात घेत नाहीत आणि चर्चेतही आणत नाहीत. स्पष्टच सांगायचे तर, संस्कृती हीच मुळी निसर्गविरोधी आहे. नैसर्गिक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी, त्यांना ‘योग्य’ ते वळण देण्यासाठी- म्हणजेच, त्यांना नियम व निर्बंधांनी जखडून ठेवण्यासाठीच ती अस्तित्वात येते. मानवी जीवनाला स्वस्थता, शांतता व व्यवस्था लाभावी म्हणून संस्कृती येते, हे थोडेफार मान्य करूनही मानवी जीवन व्यवस्थित करण्यासाठी ती माणसांना त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्ती नाकारायला सांगते; हे खरे की नाही? या सांगण्यालाच संस्कार हे गोंडस नाव आहे. या संस्काराने व्यवस्था राखली हे खरे, पण त्याने व्यक्तीला व्यक्ती म्हणून जगू वा वागू दिले नाही. तिचे एकाकीपण तिला अनुभवू दिले नाही आणि त्यातले तिचे स्वातंत्र्यही तिच्या वाट्याला येऊ दिले नाही.

आजच्या जगातला मानवी जीवनातला सर्वांत मोठा संघर्षही हाच आहे. निसर्ग आणि नैसर्गिक प्रवृत्ती विरुद्ध संस्कृती व तिने लादलेली बंधने हे आताचे या संघर्षाचे स्वरूप आहे. हा संघर्ष विधायक पद्धतीने समजून घेणारी माणसेही अत्यल्पसंख्य व थोडी आहेत. संस्कृती व धर्मासारख्या समूहकेंद्री व समूहलक्ष्यी व्यवस्था झुंडी उभ्या करतात. व्यक्तीला झुंड होता येत नाही. त्यामुळे संस्कृतीचे निर्बंध नेहमीच फारशा आनंदाने स्वीकारले जातात असे नाही. पुष्कळदा ते नाइलाज म्हणूनही स्वीकारावे लागतात. जगभरच्या प्रतिभावंतांची नेमकी आजची ओरड हीच आहे.

निसर्गाने माणूस नावाचे जनावर जन्माला घातले. संस्कृती व धर्मादिकांनी त्याचे उच्चतर मानवात रूपांतर केले, असे म्हटले जाते; ते काही अंशी खरे आहे. पण हे मानवीकरण करताना या संस्कृतीने माणसाचे किती निसर्गाधिकार हिरावले?

विचार आणि तर्क ही व्यक्तीला मिळालेली नियतीची देणगी आहे. मात्र समाज व संस्कृतीला तिचेच वावडे आहे. विचार व तर्क या माणसांना खऱ्या अर्थाने समृद्ध व प्रगल्भ बनवणाऱ्या गोष्टी या व्यवस्थांनी हिरावल्या आहेत की नाहीत? धर्म वा संस्कृती यांना तर्क मान्य नसतो. त्यांना श्रद्धा हव्या असतात आणि श्रद्धा स्थितिवादी, तर तर्क माणसाचा अभिक्रम जागविणारा असतो. याचे भान एकविसाव्या शतकात जागवावेच लागणार आहे. श्रद्धा गर्दी जमवतात, तर तर्क माणसाला एकाकी बनवितो. पण प्लेटो म्हणाला तसे, गर्दीला फक्त तिचे मन असते. तिचा बुद्धी वा तर्काशी संबंध नसतो. तर्क व्यक्तीला उंचीवर नेतो. ही उंची जसजशी वाढते तसे व्यक्तीचे एकाकीपणही वाढते. अखेर, शिखरावर फारच थोडी व अपुरी जागा असते. पृथ्वी (भूमी), आप (जल), तेज (प्रकाश), वायू (हवा) आणि आकाश (अंतर) या पंचमहाभूतांनी मिळून या सृष्टीची निर्मिती केली, असे आपली परंपरा मानते. यातले आकाश हे महाभूत प्रत्यक्षात नसल्याने वा अनुभवसिद्ध नसल्याने चार्वाकांनी नाकारले. मात्र त्यांनाही अगोदरची चार भूते मान्य आहेत. ही सारी भूते ईश्वरी संयोगाने एकत्र येतात आणि त्यातून सृष्टी व मानवी जीवन यांचा जन्म होतो, असे परंपरा मानते.

चार्वाकांच्या मते, यातील पहिल्या चार भूतांच्या संघातातून (हे काहीसे बिग बँग थिअरीसारखे आहे) या गोष्टी जन्माला येतात. या चार महाभूतांचे अस्तित्व व कर्तृत्वही आता जगन्मान्य झाले आहे. धर्माने नसले तरी विज्ञानाने ते मान्य केले आहे. या चार अनुभवसिद्ध भूतांमध्ये जोवर संयोग वा संघात घडून येत नाही, तेव्हा ती कशी व कोणत्या अवस्थेत असतील? भूमी हे मुळातच जडतत्त्व आहे आणि ते स्थिर आहे. जल प्रवाही आहे आणि ते सातत्याने वाहते राहणारे आहे. तेज हे बुद्धी व ज्ञान जागविणारे आहे. वायू तर नुसता वाहताच नाही, तर जाणवणारा आणि जीवनदाता व जीवनरक्षक आहे. यातले कोणते तत्त्व श्रद्धेला जन्म देणारे आहे? ही महाभूते तरी सारखी वा समान गुणधर्म असणारी आहेत काय?

अभ्यासकांना व विचारवंतांना ती परस्परपूरक मानता येतील, पण तो सारा मानण्याचा व समजून घेण्याचा प्रकार आहे. भूमी आणि तेज यात साधर्म्य कोणते? आणि प्रकाश व वायूतही एकात्म म्हणावे असे काय असते? निर्मितीचे हे मूळच जर असे परस्परभिन्न असेल आणि समानधर्मी नसेल, तर तिने निर्माण केलेली सृष्टी व मानवही तसा कसा असेल? सृष्टीची अनेक रूपे आपण पाहतो, तशी ती माणसांचीही पाहतो. पण एकच माणूस त्याच्या पुरता तरी एक वा एकात्म असतो काय? की, ती अनेकांची गर्दी असते? व्यक्ती किती रूपांत, स्वभावात आणि वर्तनात प्रगट होते? त्यातले एक प्रगटन दुसऱ्यासारखे असते काय? बहुधा नसते. एखादी व्यक्ती कधी तरी अशी वागते व बोलते की, ती मुळातली हीच काय, असा प्रश्न संबंधितांना पडतो. या स्थितीचे मूळ केवळ संस्कारात आहे की निर्मितीच्या प्रक्रियेतच ते दडले आहे? (पंचमहाभूतांचा सिद्धांत डोळ्यांसमोर ठेवून केलेले हे विवेचन आहे, हे अर्थातच वाचकांच्या लक्षात यावे.) माणसांच्या जीवनातला समाजधर्म, व्यक्तिधर्म आणि त्यांच्या वाट्याला अटळपणे येणारे एकाकीपण यांचा संबंध या प्रकाराशी जोडता येईल काय? साधे आजचे मानसशास्त्र वा समाजशास्त्र या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही. ही शास्त्रे पुढचे वास्तव पाहतात आणि स्वीकारतात. त्याच्या विश्लेषणात वा मूळ कार्यकारणभावात जात नाहीत. आपणही त्यात शिरण्याचे फारसे कारण नाही. येथे अनुभवाला येणाऱ्या व त्यापायी दुःखी (वा अपवादाने सुखी) होणाऱ्या व्यक्तींच्या मनोभूमिकांचा विचार करायचा आहे. मात्र अंधारच जाचक होतो. तहानेने व्याकूळ व्हावे लागते. वाऱ्यावाचून आपण हवालदिल होतो. आणि पृथ्वी? ती तर दर क्षणी नवी रूपे दाखविते, सुखविते आणि दुखवीतदेखील असते.

या महाभूतांतले प्रत्येकच भूत मानवी जीवनाचा प्रत्यक्ष भाग म्हणून असे अनुभवता येते. त्यांनीच मानवी व सृष्टी-जीवनाचे अवकाश भरून काढलेले असते. ते तसे असल्याचे आपण अनुभवतही असतो. या स्थितीत व्यक्तीच्या वाट्याला येते ते एकाकीपण का व कशामुळे? अवतीभवती आपल्याचसारखी व आपलीच माणसे असतात. ती परिचित असतात. त्यांच्याशी संवाद असतो. त्यातल्या काहींशी तर ‘शब्देविण संवादही’ राखता येतो. मग तरीही माणसे हातचे राखून का वागतात? बोलतात, पण सांगत काहीच नाहीत. किंवा न सांगण्यासाठीच बोलत राहतात. हे वागणे दडविण्यासाठी असते, की आपले सुख-दुःख केवळ आपल्यापुरते राखावे या वृत्तीतून येते? असे करण्यामागे अपराधगंड असतो काय? स्वतःविषयीच्या उच्च व भ्रामक कल्पना असतात काय? की, पुढची माणसे आपल्याशी जोडून घेण्याच्या योग्यतेची नाहीत, ही भावना त्यात असते?

कवितांमध्ये आकाशाचे रंग असतात. फुलांचे गंध असतात. सौंदर्याची मोहक वर्णने असतात. ती कवीच्या अनुभवातून आलेली असतात, की निव्वळ कल्पनेतून? वाट्याला कधीही न आलेले सौंदर्याचे सुख आपण अनुभवलेच आहे, अशी कविता लिहिणारे मोठे कवी एवढ्यात होऊन गेले. हे त्यांच्या लिखाणातले अनुभव त्यांच्या स्वप्नातले वा भावविश्वातले होते. त्यातले काहीही खरे नव्हते. एकाकी असताना वा तसे त्याला सभोवतीच्या लोकांनी ‘ठेवले’ असताना तो हे का लिहीत होता? आपल्या तशा ठेवलेल्या अवस्थेची जाणीव असतानाही त्याच्या कविता एवढ्या भावमधूर व खऱ्या वाटाव्यात अशा का येत होत्या? खोट्याला खरे बनविण्याची ही देण त्याच्या एकाकीपणाची, की त्यावर उगविलेल्या सूडाची?

आणखीही एक कथा पती-पत्नी असलेल्या दोन प्रतिभावंतांची. दोघेही लिहितात. अतिशय सूक्ष्मतर वाटावे असे त्यांचे लिखाण असते. त्याला प्रतिभेची उंचीही मोठी असते. अनेक दिवसांच्या मैत्रीनंतर त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तो कवी, तीही कवयित्री. शिवाय गंभीर लेखनातही ते होते. पण त्यांचा परस्परांशी असलेला संवाद एकतर्फी होता. तो बोलायचा आणि ती ऐकायची किंवा चिडायची. आणि ती बोलली की, हा गप्प व चिडलेला. अशा वेळी ते आकाश, रंग, फुले, बागा कुठे गेलेल्या असतात? दोन समांतर आयुष्ये न भेटताच चालत राहावीत, आपापली दिशा धरून आणि तसेच सरळ चालत जाऊन आयुष्याच्या शेवटापर्यंत एकमेकांना कधी भेटलीच नाहीत. ती अजून आहेत आणि तशीच आहेत. सर्व पातळ्यांवर सारखेपण असताना माणसे अशी एकेकटी व एकाकी का असतात?

‘आमचे परस्परांशी सारेच जुळते’ असे म्हणणारी व सहभागाची जाहिरात करणारी माणसे खरी असतात, की त्यातल्या कोणा एकाची संपूर्ण शरणागती त्याला कारण असते? मिळते-जुळते घेणे, चर्चा, समन्वय आणि एकाकीपण घालवून समूहशील, कुटुंबवत्सल वा सहचरस्नेही किती जण असतात? आणि असले तरी एकाकीपणाचे पिशाच त्यांना सोडत असते काय? आपल्या एकांतात ते त्यांना जाणवते की नाही? आणि जाणवत असेल; तर त्याचे कारण वेगळे असणे, स्वतंत्र असणे, आत्मकेंद्री असणे की आपण दुर्लक्षित होत असल्याची जाणीव त्याला वा तिला होत असते, हे आहे?

येथवर सामान्य माणसांचा विचार झाला. जी माणसे सैन्यात असतात, ज्या स्त्रिया कधी काळी जनानखान्यात जगायच्या, रानावनात किंवा पर्वतराजींच्या आश्रयाने धर्मश्रद्ध ऋषी वा मुनी असायचे; त्यांचे प्रश्न आणखी वेगळे असतात. आम्हाला एकाकीपण जाणवत नाही, आम्ही सदैव परमेश्वराच्या वा अन्य कोणाच्या प्रेमाच्या आश्रयात वा सान्निध्यात राहतो, असे सांगणारी माणसे खरेच बोलत असतात की स्वतःची फसवणूक लपवीत असतात? खूप नेते पाहिले. विद्वत्‌जनांचा अनुभव घेतला. नट पाहिले आणि ज्यांना कधीतरी पहावे असे वाटावे अशा लावण्यवती. आणि हो- समाजसुधारक, सेवाभावी आणि लोकसेवकही पाहिले. साऱ्या महाराष्ट्राने माथ्यावर घेतलेले एक समाजसेवक त्यांच्याच संस्थेत, घरात, कुटुंबात आणि लोकांतही कसे एकाकी असत आणि मग स्वतःवरच वैतागत, हेही अनुभवले आहे. वेळ घालवावा, नवे अनुभव घ्यावेत किंवा नव्या विषयांच्या सान्निध्यात जावे; असे माणसांना केवळ नवेपणाची आवड असते म्हणून वाटते, जुन्याचा कंटाळा आला म्हणून, की एकाकीपण विसरता येत नाही म्हणून? आयुष्यात अटळपणे कराव्या लागलेल्या वा इच्छा म्हणून केलेल्या गोष्टींचे वैयर्थ्य ध्यानात आल्याने माणसे अशा एकाकीपणाजवळ जातात काय? त्या गोष्टी करतानाचा वेळ वाया गेला म्हणून नव्हे, तर त्या करण्यातच काही अर्थ नव्हता, म्हणूनही असे होते? एकाकीपण ही केवळ मानसिकता असते काय? की, ते त्याहून खरे व मुलभूत वास्तव असते?

माणसांना आधार लागतो. तो असला तरी त्यांना कुणी तरी सोबत व हाताशी आहे असे वाटते. तो आधार असला वा गेला तर त्याच्या वाट्याला येते ते एकाकीपण जरा वेगळे असले, तरी तशा एकूणच एकाकी मानसिकतेचा तो भाग असतो. यावर उपाय सांगणारे शास्त्र कोणते? मानसशास्त्र, धर्मशास्त्र, लहरीपण की एकाकीपणाशी समझोता करण्याची मानसिकता? एक प्रकार याहून वाईट व दुःखद आहे. दीर्घ काळ आजारी असलेली, फार काळ वृद्धत्व जगणारी किंवा कधी काळी वाट्याला आलेले वैधव्य वा विधुरपण सांभाळणारीही माणसे असतात. त्यांच्या एकाकी कळांची कल्पना कशी करायची? की, तो समाजाचा विषयच नव्हे? आपल्या व जगभरच्या ऋषी-मुनी व धर्ममार्तंडांची खरी चरित्रे व त्यांच्यावर झालेले मानसशास्त्रीय संशोधन या प्रयत्नातले अपयशही दाखवते. महात्म्यांची कथा अशी, तर सामान्य त्यात कुठे असतात? अशा वेळी मनात निराशा येत नाही. आशा उरत नाही. असते ते एक अनुत्तरित तटस्थपण. ज्या प्रश्नांना उत्तरे नसतात वा ज्यांची उत्तरे शतकांनाही सापडत नाहीत व आणखीही काही शतके सापडायची नाहीत; त्यांच्यासोबत जगणे, त्यांच्याशी जुळविणे वा शक्यतोवर त्यांचा जाच होणार नाही असे राहणे, एवढेच मग हाती उरते.

एक शक्यता आणखीही. वाट्याला आलेले वा येणारे एकाकीपण हेच आपले खरे रूप असते काय? तेच आपले खरेपण असते काय? तसे असेल तर ते स्वीकारणे आणि त्याची जाणवणारी वा दिसणारी उंची गाठणे, हाही एक पर्याय असतो. तो पहिल्याहून अधिक चांगलाही असण्याचा संभव असतो. एकाकीपणाला काही जण पिशाच म्हणतात, तर काहींच्या मते एकाकीपण हे वरदान आहे. त्याला पिशाच म्हणणाऱ्यांचे सांगणे असे की- त्यामुळे माणसे एकारतात; एककल्ली, एकांगी व हेकेखोर होतात. अहंमन्य होऊन इतरांना तुच्छ लेखतात. स्वतःत नसलेल्या क्षमता ती पाहू लागतात व त्यांचा खोटा बडिवारही मिरवू लागतात. तर त्याला वरदान म्हणणाऱ्यांचे मत असे की- त्यामुळे व्यक्तीचे मन अधिक प्रगल्भ, व्यापक व मोठे होते. त्यात सूक्ष्मतर विचारांची क्षमता येते. बुद्धीएवढीच त्यांची प्रज्ञा शक्तिशाली होते आणि व्यक्ती पूर्वीहून सर्वच अर्थांनी उंच होते. समाजात वावरल्याने, मिसळल्याने व त्याच्याशी एकरूप झाल्याने व्यक्तीला नेतृत्व लाभेल, लोकप्रियता लाभेल; पण त्याची बौद्धिक उंची ऐकीव ज्ञानाहून अधिक मोठी होणार नाही.

एकाकीपणातला विचार व्यक्तीला आतून एकहाती उंच करीत नेतो. त्याला समाजाच्या कुबड्या लागत नाहीत. फक्त ते जगणाऱ्याला जाणवू मात्र नये. ते जाणवले की जाचक होते. ते जाणवू न देणे हीच निरहंकारी वृत्ती आहे. तिलाच बहुधा निःसंगपण म्हणत असावेत. जाणीव ही अभाव सांगणारी, तर नेणीव ही समृद्धी नकळत जाणवून देणारी बाब आहे. अखेर त्याविषयीचे खरे स्वरूप एकाकीपणाकडे बघण्याच्या व ते स्वीकारण्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे. एक गोष्ट मात्र खरी- ते पूर्णपणे अनिष्ट वा इष्ट ठरविणे, ही बाब चुकीची आहे.

सुरेश द्वादशीवार, नागपूर

Share on Social Media

व्यक्तिवेध

प्रतापराव : सर्वांगी सुंदर

सदा डुम्बरे

कोणताही खडखडाट न होता, संपबिंप न होता ‘सकाळ’ने रूळ बदलला. गाडीचा वेग वाढला, पण कोणाला भोवळ आली नाही. प्रतापराव मालक नाही झाले; चालक झाले, नेते झाले. सध्याच्या ब्रँडिंगच्या जमान्यात प्रतिमानिर्मिती महत्त्वाची झाली आहे. तिथे वास्तवापेक्षा समजच अनेकदा महत्त्वाची ठरते. प्रतापरावांनी हे रिॲलिटी आणि परसेप्शनमधील अंतर मिटवले ते त्यांच्या अंगी असलेल्या गुणवत्तेमुळे. विेशासार्हता वृत्तपत्रांचा सर्वांत मोठा गुण. प्रतापरावांनी ती प्राप्त केली. ‘सकाळ’ची मालकी रास्त आणि पात्र व्यक्तीच्या हाती गेली, हे जनमानसात मान्य झाले. हा सर्वांत अवघड टप्पा होता. अडथळ्यांचीच शर्यत होती. कायदेशीर लढाईपेक्षा ती गुंतागुंतीची होती. ती त्यांनी जिंकली होती. ‘सकाळ’च्या विस्तारासाठी आणि विकासासाठी त्यामुळे नवा हुरूप आला.

‘सकाळ’कार डॉ. नानासाहेब परुळेकर यांचे 8 जानेवारी 1973 रोजी निधन झाले. आपल्या निधनानंतर ‘सकाळ’ची व्यवस्थापकीय संरचना कशी असावी, हे त्यांनी आपल्या इच्छापत्रात स्पष्टपणे नमूद केले होते. ‘सकाळ’ची मालकी खासगी असली, तरी मूलतः ती एक सामाजिक संस्था आहे आणि आपल्या निधनानंतरही वृत्तपत्र म्हणून ‘सकाळ’ केवळ टिकलाच पाहिजे असे नव्हे तर वाढला पाहिजे, ही त्यांची मनोधारणा होती.

नानासाहेब हाडाचे पत्रकार होते. पत्रकारिता त्यांची जीवननिष्ठा होती. इतर अनेक क्षेत्रांतील संधी नाकारून त्यांनी आपले जीवन ‘सकाळ’ला आणि त्याला अनुसरून पत्रकारितेला वाहिले होते. ते उच्चविद्याविभूषित होते. अमेरिकेतील प्रख्यात कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. आणि पीएच.डी. पदव्या प्राप्त केल्या होत्या. विख्यात तत्त्वज्ञ डॉ.जॉन ड्युई हे त्यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक प्राध्यापक. साडेपाच वर्षे ते शिक्षणासाठी अमेरिकेत होते. स्वदेशी परत येताना सहा महिने युरोपमध्ये फिरून आलेले. अमेरिकेतील वास्तव्यात ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’ व इतरत्र ते लेखन करीत. येतानाच पुण्यात स्वतःचे वृत्तपत्र सुरू करण्याचा त्यांचा निर्धार झाला होता.

तत्कालीन मराठी वृत्तपत्रसृष्टीत अशा प्रकृतीचा दुसरा संपादक नव्हता. ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या राष्ट्रीय महत्त्वाच्या वृत्तसंस्थेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता आणि तिच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे होते. तिचे ते दोन वेळा अध्यक्ष होते. ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी) या वृत्तपत्रव्यवसायात कळीचे स्थान असलेल्या संस्थेचे अध्यक्ष, प्रेस कौन्सिलचे सदस्य, इंडियन ॲन्ड ईस्टर्न न्यूजपेपर सोसायटीचे (सध्या आयएनएस) अध्यक्ष इंडियन लँग्वेज न्यूजपेपर असोसिएशनचे (इल्ना) अध्यक्ष, अशा राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या संस्थांच्या व्यवस्थापनात एवढा सन्मान मिळविणारा त्यांच्या समकालीन एकही मराठी संपादक आणि मालक नव्हता. परुळेकरांचे पत्रकारितेकडे पाहण्याचे परिप्रेक्ष्य व्यापक होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचे साधकबाधक विवेचन करणारे लेखन ‘सकाळ’मध्ये प्रकाशित होत असे. त्यासाठी ते अशा समस्याग्रस्त देशांचा अभ्यासदौरा करीत आणि वृत्तमालिका लिहीत. परदेशात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ‘सकाळ’चे अर्धवेळ बातमीदार किंवा ज्याला इंग्रजीत ‘स्ट्रिंगर’ म्हणत, ते असत. ‘सकाळ’ने भाषिक आणि प्रादेशिक मर्यादा वारंवार ओलांडल्याचे दिसते.

वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्याचे स्वातंत्र्य जपले पाहिजे, यासाठी प्राइस पेजशेड्यूलसारख्या प्रकरणात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. जे काम टाइम्स वगैरेंसारख्या मोठ्या भांडवलदारी वृत्तपत्रसमूहांनी (त्याला त्या काळी ‘ज्यूट’ प्रेस असेही निर्भर्त्सनादर्शक नामाभिधान मिळाले होते.) करायचे, कारण त्यात त्यांचेच हितसंबंध मुख्यत्वे अडकले होते; त्यासाठी नानासाहेबांनी लढा दिला आणि जिंकलाही.

नानासाहेब अखंड चार दशके ‘सकाळ’च्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात वावरत होते. त्यांच्या या निःस्पृह सामाजिक योगदानाची दखल सरकारबरोबरच समाजानेही घेतली. ‘पद्मभूषण’ हा राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाला. पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट- डी.लिट. देऊन त्यांचा गौरव केला. पत्रकारितेतील कामगिरीसाठी राष्ट्रीय पातळीवरील दुर्गा-रतन पुरस्कारही त्यांना मिळाला. नानासाहेबांचे समाजातील हे स्थान आणि ‘सकाळ’मधील एकछत्री अंमल लक्षात घेतला, तर त्यांच्या निधनानंतर संस्थेत केवढी मोठी पोकळी निर्माण झाली असेल याची कल्पना आपण करू शकतो. कुटुंबासाठी भरघोस आर्थिक तरतूद करून आणि ‘सकाळ’मध्ये संचालक म्हणून असलेले त्यांचे स्थान कायम ठेवूनही व्यावसायिक दृष्ट्या ‘सकाळ’ चालविण्याची जबाबदारी मात्र त्यांनी विश्वस्तांकडे सोपविली होती. डॉ.बानू कोयाजी त्यातील प्रमुख.

बानूबाई वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व. त्यांच्या नेतृत्वाखाली के.ई.एम. या पुण्यातील हॉस्पिटलचा मोठा विस्तार झाला. कुटुंबनियोजन आणि लोकसंख्यानियंत्रण या क्षेत्रात त्यांनी केलेले काम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही नावाजले गेले. केंद्र सरकारच्या त्या सल्लागार होत्या. पद्मभूषण सन्मान आणि मॅगसेसे ॲवॉर्ड यांच्या त्या मानकरी. नानासाहेबांच्या निधनानंतर तर ‘सकाळ’ची धुरा सांभाळण्याची जोखीम त्यांच्यावर येऊन पडली. परुळेकरांच्या शिस्तीत तयार झालेली ‘सकाळ’ची टीम बरोबर घेऊन एका तपाच्या तपश्चर्येत त्यांनी ‘सकाळ’चे जनमानसातील स्थान कायम टिकविले. तत्कालीन संपादक श्री.ग. मुणगेकर यांचे या काळातील योगदान कळीचे होते. परुळेकरांनंतर ‘सकाळ’चे काय होणार, अशी चिंता वाटणाऱ्या मराठी समाजाला त्यांनी आश्वस्त केले होते. ‘मुंबई सकाळ’ने मुळे धरली होती. मुंबईच्या प्रकृतीला साजेसा माधव गडकरींसारखा आक्रमक संपादक तिथे नव्याने आला होता.

‘सकाळ’ने 1980 मध्ये स्थानिक वृत्तपत्रांच्या प्रचंड विरोधाला सामोरे जात ‘कोल्हापूर’मध्ये स्वतंत्र आवृत्ती सुरू करून दक्षिण महाराष्ट्रात जोमदार पदार्पण केले होते. राज्यातील एक अग्रेसर वृत्तपत्र म्हणून ‘सकाळ’ने आपले स्थान पक्के केले होते. फेब्रुवारी 1985 मध्ये संपादक मुणगेकरांचे हृदयविकाराने अचानक निधन झाले. बानूबाई सत्तरीकडे सरकत होत्या. नानासाहेबांनी आपल्याकडे सोपविलेला ‘सकाळ’चा वारसा सुरक्षित हातात सोपविण्याची वेळ आली आहे, हे त्यांनी ओळखले.

मला आठवते, 1985 च्या उत्तरार्धात त्यांनी एके दिवशी मला सकाळी साडेसात वाजताच त्यांच्या निवासस्थानी येण्याचा निरोप दिला. एरवी त्या ‘सकाळ’मध्येच भेटत असत. के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये एका छोट्या इमारतीत पहिल्या मजल्यावर त्या राहत असत. लिफ्टनेच त्या घरात प्रवेश करावा लागे. मी पहिल्यांदाच तिथे जात होतो. माझ्यासमोर चहा आला. माझी उत्सुकता न ताणता त्यांनी सरळ विषयाला हात घातला. गेली दहा-बारा वर्षे लीला (परुळेकर) बरोबर काम करणं कसं अशक्य झालंय, हे त्यांनी थोडक्यात सांगितलं. के.ई.एम.चं विस्तारीकरण व इतर जबाबदाऱ्यांमुळे आपण ‘सकाळ’साठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. ‘सकाळ’साठी नव्या छपाई यंत्रांची व एकंदरीतच आधुनिकीकरणासाठी नव्याने मोठी गुंतवणूक करणे स्पर्धेत टिकण्यासाठी कसे आवश्यक आहे वगैरे बोलून झाल्यावर ‘सकाळ’ची मालकी अंशतः पवारांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी तो आश्चर्याचा धक्काच होता.

आत्तापर्यंत ‘सकाळ’ राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांपासून जाणीवपूर्वक दूर राहिला असताना ‘सकाळ’च्या संचालक मंडळाचा हा निर्णय अनाकलनीय होता. या हस्तांतराची समाजात काय प्रतिक्रिया उमटेल, याविषयी त्यांना माझे मूल्यमापन हवे होते. ‘सकाळ’ची मालकी केवळ एका प्रभावशाली राजकीय घराण्याकडेच जाणार होती असे नव्हे, तर त्याला काही प्रमाणात जातीय रंगाचेही अस्तर होते. श्री. शरद पवार त्या वेळी मंत्री किंवा मुख्यमंत्री नव्हते, विरोधी पक्षात होते. तरीही फार प्रभावशाली होते. सत्तेचा गैरवापर करून त्यांनी ‘सकाळ’वर कब्जा मिळविला, असाही आरोप झाला असता. आपण या निर्णयापर्यंत कसे आलो, त्याची पार्श्वभूमी बानूबार्इंनी विशद केली.

नामवंत उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर हे नानासाहेब परुळेकरांचे चांगले स्नेही होते. यमूताई किर्लोस्कर ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या अध्यक्ष होत्या. किर्लोस्कर घराण्याला मराठी समाजमनात मोठ्या आदराचे स्थान होते. किर्लोस्करांनी ‘सकाळ’ घ्यावा, असा प्रस्ताव घेऊन आपण शंतनुरावांकडे गेलो तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली, ते बानूबार्इंनी सांगितले. त्याचा सारांश असा : ‘‘बानू, प्रश्न पैशांचा नाही. कोटीभर रुपये मी केव्हाही गुंतवू शकतो. (हस्तांतरित होणाऱ्या शेअर्सचे बाजारमूल्य तेव्हा 85 लाखांच्या जवळपास होते.) परंतु मग सकाळ हा नानासाहेबांचा सकाळ राहणार नाही. ते एका भांडवलदाराचे पत्र होईल. ‘सकाळ’ची स्वतंत्र, इंडिपेंडंट पेपर म्हणून असलेली ओळख पुसली जाईल. तसे व्हावे असे नानासाहेबांचा ‘मित्र’ म्हणून मला आवडणार नाही.’’ किर्लोस्करांनी अर्थातच प्रस्ताव नाकारला.

जळगावमधून दोन आणि कोल्हापुरातून एक असे आणखी तीन प्रस्ताव होते. बानूबार्इंना ते मान्य नव्हते. ‘सकाळ’ची मालकी ‘मराठी’ माणसाकडेच राहावी, ज्यांचे ‘स्टेक्स’ सर्वपरीने महाराष्ट्रात गुंतलेले आहेत आणि पुढील अनेक वर्षे ‘सकाळ’ सांभाळण्याची ज्यांची कुवत आहे त्यांच्याकडे ती जावी, याबाबत बानूबाई ठाम होत्या. त्यांच्या दृष्टीने हा काही केवळ आर्थिक व्यवहार नव्हता. त्या काही ‘डील’ करायला, पैसे कमवायला बाजारात उभ्या नव्हत्या. ‘सकाळ’ म्हणजे नानासाहेबांचा जीव होता. तो सांभाळण्याचा शब्द बानूबार्इंनी दिला होता. कुटुंबीयांना डावलून नानासाहेबांनी त्यासाठी कार्यवाहक म्हणून बानूबार्इंची निवड केली होती. आपल्यावर असलेल्या जबाबदारीची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्याचा भाग म्हणून त्यांनी स्वतःहून पवारांना आमंत्रित केले होते, या व्यवहारात जाणीवपूर्वक गोवले होते. या निर्णयावर कोर्टबाजी होणार, हे त्यांनी गृहीत धरले असणार.

प्रतापराव पवार ‘सकाळ’मध्ये कसे आले त्याची ही पार्श्वभूमी. ती माहीत असल्याशिवाय त्यांच्या ‘सकाळ’मधील कामगिरीचे, त्यांच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करता येणार नाही, म्हणून हा संदर्भ जरा सविस्तरपणे नोंदविला आहे, एवढेच. अर्थात हे माझे व्हर्शन. कथन किंवा आकलन म्हणा हवे तर. त्या काळात दर मंगळवारी ‘सकाळ’च्या संपादकीय विभागाची साप्ताहिक बैठक असे. सरव्यवस्थापकांपासून इतर विभागांतील अधिकारीही त्यासाठी उपस्थित असत. कार्यकारी संचालक म्हणून डॉ.बानू कोयाजीही त्यासाठी आवर्जून येत. एके दिवशी त्या प्रतापराव पवारांसोबत बैठकीत आल्या. प्रतापरावांची ओळख सर्वांना करून दिली. सत्तांतरावर औपचारिक शिक्कामोर्तब झाल्याचे आम्हाला समजले. चांगले सहा फूट उंच, सडपातळ, गोरेपान आणि सुटाबुटात असल्याने रुबाबदार दिसणाऱ्या प्रतापरावांनी पहिल्याच बैठकीत फारसे न बोलताही आपली छाप पाडली. फर्स्ट इंप्रेशन वगैरे जे काही म्हणतात, ते उत्तम होते. ‘‘...विशाल सह्याद्री’ या दैनिकातील व्यवस्थापकीय कामाचा आपला अगदीच नाममात्र अनुभव वगळता वर्तमानपत्राच्या कामाशी आपण परिचित नाही, सगळ्या गोष्टी तुमच्याकडूनच शिकायच्या आहेत-’’ असं अगदी ‘लो की’ संभाषण करून बानूबार्इंसमवेत ते आतल्या खोलीत लुप्त झाले.

मराठी वृत्तपत्रसृष्टीतील ‘सकाळ’च्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानाची त्यांना अर्थातच कल्पना असणार. लीलातार्इंबरोबर संघर्ष करायचा की समेट, हा त्यांच्यापुढचा यक्षप्रश्न असणार. कामगार आणि कर्मचाऱ्यांची सहानुभूती लीलातार्इंकडे होती. संचालकांमधील वादाचे प्रतिबिंब कामगारांशी वागताना त्यांच्या वर्तनात दिसत नसे. मादाम परुळेकर ‘सकाळ’मध्ये प्रसंगपरत्वेच येत. परंतु लीलाताई सर्वांशी मिळून-मिसळून वागत. मालकीणबार्इंचा तोरा त्यांच्या वागण्यात नसे. याच कर्मचाऱ्यांकडून आणि कामगारवर्गांकडून प्रतापरावांना काम करून घ्यायचे होते. कायदेशीर लढाई, (पवार) प्रतिमेची लढाई आणि कामाची लढाई अशा तीन आघाड्यांवर एकाच वेळी त्यांना उभे राहायचे होते.

आव्हान अवघड होते, परंतु प्रतापरावांची त्याला तयारी असावी. लहानपणापासून त्यांच्या आईने जाणीवपूर्वक केलेल्या कार्यसंस्कृतीच्या संस्कारांचा ठसा त्यांच्या मनावर दृढ झाल्याचा उल्लेख त्यांनी अनेकदा केला आहे. पिलानीच्या बिर्ला इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअरिंग केल्यानंतर ते नोकरीच्या मागे लागले नाहीत. त्यांचे मोठे बंधू माधवराव पवार यांच्याबरोबर ते स्वमालकीच्या ‘अजय मेटॅकेम’मध्ये काम करू लागले. विशिष्ट प्रकारची औद्योगिक रसायने तयार करणारा हा एक लघुद्योग होता; परंतु त्याचे ग्राहक भारतभर होते. उद्योग चालविणे म्हणजे काय, उद्यमशीलता म्हणजे काय, हे बाजारात उभे राहून ते शिकले होते. त्याचे तंत्र आणि मंत्रही. उद्योग उभारणीत किती विविध गोष्टींचे भान ठेवावे लागते, अडचणी येतात आणि येणारच; परंतु त्याचा मुकाबला कसा करायचा, सामना कसा करायचा, त्यातून मार्ग कसा काढायचा, हे अनुभवानेच शिकावे लागते. किंमत चुकविल्याशिवाय शहाणपण येत नाही, हे त्यांना माहीत होते आणि त्यासाठी त्यांची तयारी होती. ‘सकाळ’मधील प्रतापरावांच्या पदार्पणाआधी ते किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनीच्या संचालक मंडळात होते. शंतनुराव किर्लोस्कर कसे काम करतात; उत्पादनाबरोबर, व्यावसायिक गुणवत्तेबरोबर नैतिकता, नीतिमूल्य यांचं भान किती महत्त्वाचं असतं, हे त्यांच्या निरीक्षणातून सुटलं नसणार.

प्रतापरावांबरोबर मी पंचवीस वर्षं काम केलं. माझ्या समजुतीप्रमाणे आमच्यात एक स्नेहाचं, आदराचं, विश्वासाचं वैशिष्ट्यपूर्ण नातं प्रस्थापित झालं होतं. तरीही ते स्वतःसंबंधी फारसं कधी बोलत नसत, असं मी निश्चित म्हणू शकतो. ‘मी’पासून ते नेहमीच दूर असत. नवनव्या गोष्टी सातत्याने शिकण्याची, आत्मसात करण्याची त्यांची तयारी असे, उत्सुकता असे. आपल्या व्यवसायात त्यांचा कसा उपयोग करून घेता येईल याचे तीव्र भान त्यांना असे. बोलणं कमी, काम जास्त हेच त्यांचं सूत्र असे. कृतिशीलता हे त्यांचं व्यवच्छेदक लक्षण आहे. ते मितभाषी आणि अल्पाक्षरी आहेत. मोठमोठी भाषणं त्यांना जमत नाहीत. मुद्याचं मोजकं बोलणं, सम्यक्‌ बोलणं त्यांच्या प्रकृतीला मानवतं. त्यांचं बोलणंही असं की, जणू मराठीतील सर्व व्यंजनं अल्पप्राण आहेत आणि सगळे उच्चार निभृत आहेत. आपल्या कार्यशैलीने त्यांनी फार अल्प काळात ‘सकाळ’मध्ये सर्वांना आपलेसे केले. त्यांनी सुरुवात केली ती ‘चमको’ कामांनी नाही. त्यात नेत्रदीपक, झगमगाटी काही नव्हतं.

आज आश्चर्य वाटेल, परंतु त्यांनी पहिल्यांदा हात घातला ‘वेस्ट मॅनेजमेंट’ला. छपाई करताना वाया जाणाऱ्या कागदाच्या प्रमाणापासून. न्यूजप्रिंट आजही महाग आहे, तेव्हाही महागच होता. वाया जाणाऱ्या न्यूजप्रिंटचं मान्यताप्राप्त प्रमाण आहे. छपाईयंत्र कसं चालविलं जातं, किती ब्रेक्स होतात वगैरे अनेक कारणं त्यात असतात. कामगार, फोरमन आणि इंजिनिअरांबरोबर उभे राहून, त्यांना टप्प्याटप्प्याने उद्दिष्ट देऊन त्यांनी आपला हेतू साध्य केला. काटकसर आणि कार्यक्षमता दोन्ही कमाल मर्यादेपर्यंत खेचल्या. न्यूजप्रिंटमधील बचत म्हणजे तोट्यात घट नव्हे, तर नफ्यात वाढ आणि अनुषंगाने वाढीव पगार हे सूत्र कामगारांच्या पचनी पडलं. एवढंही करून काही न्यूजप्रिंट वाया जाणारच. विद्यार्थी सहायक समितीचे ते अध्यक्ष आहेत. तेथील मुलांना ‘कमवा व शिका’ योजनेत काम उपलब्ध करून देऊन वाया गेलेल्या या फाळ्यापासून लिहिण्यासाठी पॅड्‌स तयार करण्याचं तंत्र त्यांनी वापरलं. विद्यार्थ्यांना थोडा रोजगार आणि कागदाचा सदुपयोग. तिथून ते वळले न्यूजप्रिंटच्या इन्व्हेंटरीकडे. कागदाचा पुरवठा अनेकदा सुरळीत नसे. म्हणून मिळेल तेव्हा व तेवढा न्यूजप्रिंट विकत घ्यायचा आणि गोडाऊनमध्ये साठवून ठेवायचा, ही प्रचलित पद्धत. गोडाऊनचे भाडे आणि पेपर खरेदीसाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जावरचे व्याज असा दुहेरी भुर्दंड. टंचाईच्या टांगत्या तलवारीने पर्चेसच्या माणसांची मानसिकताच अशी घडली होती.

प्रतापरावांनी सप्लायर चेन ओलांडून थेट उत्पादकांशी वाटाघाटी करून पंधरा दिवसांची गरज भागेल एवढाच न्यूजप्रिंटचा साठा करावा लागेल असं वेळापत्रक बसवलं. पुन्हा बचत. ट्रकमधून रिळं उतरवून घेताना दणादण आपटली तर न्यूजप्रिंट खराब होतो आणि मशिनवर वारंवार तुटतो. झालं ‘लोडर’ लोकांचं प्रशिक्षण. नंतर मोर्चा वळवला शाईकडे. शाईच्या गुणवत्तेवर छपाईची गुणवत्ता. औद्योगिक रसायनांचा उद्योग ते स्वतःच करीत असल्याने त्यांच्याकडे याचं विषयज्ञान होतंच. सगळ्या स्तरांवर पाठपुरावा करून दर्जेदार शाई रास्त किमतीत मिळविण्यात ते यशस्वी झाले. वृत्तपत्रातील मजकूर छापण्यासाठी टंकासाठी जो ‘पॉइंट साइज’ वापरला जातो, त्या प्रयोगात तर माझाही सहभाग होता. ‘बारा पॉइंट’ हा मान्यताप्राप्त साइज होता. ऑफसेट मशिनवर उत्तम कागद आणि उत्तम शाई वापरून केलेल्या सुबक मुद्रणामुळे, वाचकांच्या डोळ्यांवर ताण न येताही पॉइंट साइज कमी केला तर त्याच पानावर जास्त मजकूर मावू शकेल, हे गृहीत धरून आम्ही विविध ‘डमी’ पाने तयार केली आणि साडेअकरा पॉइंटवर स्थिरावलो. हा बदल वाचकांच्याही लक्षात आला नाही आणि प्रत्येक पानावर चार-पाच टक्के अधिक मजकूर जाऊ लागला. ही अगदी सुरुवातीची उदाहरणं आहेत; परंतु प्रतापरावांच्या कार्यशैलीचा परिचय करून देणारी, आज ज्याला आपण व्यवसायातील ‘इनोव्हेशन’ असा पारिभाषिक शब्द वापरतो त्याची ‘सकाळ’मधील सुरुवात कशी झाली ते स्पष्ट करणारी आहेत. त्याचा परिणाम असा झाला की, नंतर कामगारांनीच ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. एक सर्जनशील, स्पर्धात्मक वातावरण तयार झालं. त्याचंच पर्यवसान पुढे क्वॉलिटी सर्कलमध्ये झालं. तंत्रज्ञान बदललं, हॉटमेटल ते कोल्डप्रेसपर्यंत प्रवास झाला, पण ‘सकाळ’मधील एकाही कामगारावर बेकारीचं संकट ओढवलं नाही. सर्वांनी आपापल्या विभागात आवश्यक असलेलं नवं तंत्रज्ञान शिकून घेतलं- नव्हे, त्यात ते पारंगत झाले. कोणताही खडखडाट न होता, संपबिंप न होता ‘सकाळ’ने रूळ बदलला. गाडीचा वेग वाढला, पण कोणाला भोवळ आली नाही. प्रतापराव मालक नाही झाले; चालक झाले, नेते झाले. सध्याच्या ब्रँडिंगच्या जमान्यात प्रतिमानिर्मिती महत्त्वाची झाली आहे. तिथे वास्तवापेक्षा समजच अनेकदा महत्त्वाची ठरते. प्रतापरावांनी हे रिॲलिटी आणि परसेप्शनमधील अंतर मिटवले ते त्यांच्या अंगी असलेल्या गुणवत्तेमुळे. विेशासार्हता वृत्तपत्रांचा सर्वांत मोठा गुण. प्रतापरावांनी ती प्राप्त केली. ‘सकाळ’ची मालकी रास्त आणि पात्र व्यक्तीच्या हाती गेली, हे जनमानसात मान्य झाले. हा सर्वांत अवघड टप्पा होता. अडथळ्यांचीच शर्यत होती. कायदेशीर लढाईपेक्षा ती गुंतागुंतीची होती. ती त्यांनी जिंकली होती. ‘सकाळ’च्या विस्तारासाठी आणि विकासासाठी त्यामुळे नवा हुरूप आला.

पुणे-मुंबई- कोल्हापूर या आवृत्त्यांत नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर अशी भर पडत गेली. एके काळी पुण्याचे मुखपत्र असलेला ‘सकाळ’ महाराष्ट्रातील एक प्रमुख, आघाडीचे पत्र म्हणून प्रस्थापित झाला. याच काळात इतर काही वृत्तपत्रांची वाताहत होताना दिसत होती. परुळेकरांनंतर ‘सकाळ’चे काय होणार, याचे उत्तर खपाच्या दहा लाखांच्या आकड्याने दिले होते. सध्याच्या बाजारकेंद्री व्यवस्थेत आकडेच सर्व काही बोलतात; मग ते खपाचे असोत, उलाढालीचे असोत, की नफ्याचे. ‘हे उद्दिष्ट गाठले नाही तर आपण मरू; स्पर्धक आपल्याला खाऊन टाकतील,’ असं वाक्य प्रतापरावांच्या तोंडी नेहमी असे. ते वस्तुस्थितीचे निदर्शकच होते. मी इथे ‘प्रतिस्पर्धी’ किंवा ‘स्पर्धक’ असे म्हणतो; प्रतापरावांच्या शब्दकोशात त्यासाठी एक ठणठणीत शब्द होता, एवढाच काय तो फरक.

इथेच एक गोष्ट आवर्जून नोंदवली पाहिजे. विकास आणि वाढीची नवनवी शिखरे पादाक्रांत करताना प्रतापरावांनी एक पथ्य नेहमी सांभाळले. हा पेपर पवारांचा आहे, असे त्यांनी कधी वाटू दिले नाही. ‘पवार’ शब्दात अनुस्यूत असलेल्या अर्थांच्या सर्व छटा इथे मला अभिप्रेत आहेत. एकदा अनौपचारिक संभाषणात ‘कन्फेशन’ म्हणता येईल असे एक विधान त्यांनी केल्याचे माझ्या अजून स्मरणात आहे. ते म्हणाले होते, ‘‘शरदरावांना मी पुरेशी मदत करू शकलो नाही, याची खंत माझ्या मनात आहे.’’ त्याचे स्पष्टीकरण मी विचारले नाही. माझ्या अल्पमतीप्रमाणेच अर्थांतरण करून मी गप्प राहिलो. संस्था मोठी होणे म्हणजे संस्थेतील लोक मोठे होणे यावर प्रतापरावांचा दृढ विश्वास होता. सर्वसाधारण कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व्हावे यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. ज्यांची कामगिरी आश्वासक होती त्यांना कामाच्या अधिक जबाबदाऱ्या दिल्या, पदोन्नती दिली, कार्यालयीन कार्यक्रमात त्यांना पारितोषिके दिली. महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्यांनी जग पाहिले पाहिजे, अनुभवले पाहिजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर वृत्तपत्रक्षेत्रात कुठले नवे प्रवाह येताहेत, तंत्रज्ञान कसे बदलते आहे, व्यवस्थापनक्षेत्रात कुठल्या नवनवीन पद्धती स्वीकारल्या जाताहेत याचा अभ्यास करून त्यातील आपण काय घेऊ शकतो, याचे नियोजन केले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता.

ते स्वतः अनेक निमित्ताने परदेश प्रवास करीतच; परंतु आपल्या अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांना त्यांनी एकदा नव्हे, अनेकदा परदेशात जाण्याची संधी दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रे, कार्यशाळा, परिषदा आणि प्रदर्शने यांना उपस्थित राहिलेल्या ‘सकाळ’च्या कर्मचाऱ्यांची संख्या त्या काळी तरी उच्चांकी होती- बहुधा देशातील वृत्तपत्रांमध्ये सर्वाधिक. अनेकांचा पहिला परदेशप्रवासच यानिमित्ताने झाला. प्रतापराव त्यांना सर्व प्रकारची मदत करीत.

अर्थात परत आल्यानंतर प्रत्येकाला प्रवासात शिकून आलेल्या नव्या गोष्टींचे सादरीकरण करावे लागे, गटचर्चेत मांडणी करावी लागे. निरंतर शिक्षणाचाच हा भाग होता. कामाची जबाबदारी देण्याबरोबरच त्यासाठी आवश्यक असलेले स्वातंत्र्य देण्यात ते कुचराई करीत नसत. ‘सकाळ’च्या सर्वच संपादकांच्या स्वातंत्र्याचा त्यांनी कधी अनादर केला नाही. इतर वृत्तपत्रांत एवढे स्वातंत्र्य मिळणे दुरापास्तच. जबाबदारी ही स्वातंत्र्याची दुसरी बाजू. या स्वातंत्र्याचा काही जणांनी गैरफायदा घेतला, हे त्यांना दिसत होते; परंतु आपल्या मूळ भूमिकेपासून ते विचलित झाले नाहीत.

पत्रकारितेतील माझ्या कामगिरीचे जेव्हा मी स्वतःसाठी मूल्यमापन करतो, तेव्हा मला मिळालेल्या आणि मी घेतलेल्या स्वातंत्र्याचा वाटा फार मोठा आहे, याच निष्कर्षापर्यंत मी येतो. माझ्या प्रसंगपरत्वे केलेल्या लेखन/ भाषणात आणि पुस्तकांच्या मनोगतात त्याचे श्रेय प्रतापरावांना देण्यात मी कधी अनमान केला नाही. माझ्या संपादकीय कारकिर्दीत एक ब्रॅन्ड म्हणून ‘साप्ताहिक सकाळ’ला मिळालेल्या मान्यतेत प्रतापरावांचा पाठिंबा मला नेहमीच गृहीत धरता आला, एवढं आमचं नातं विश्वासाचं होतं.

शक्यता आहे की, इतर अनेकांनाही प्रतापरावांशी आपले ‘खास’ नाते आहे असे वाटत असेल. तसे ते असेल तर त्याचा अर्थ एवढाच की, प्रतापरावांचे व्यक्तिमत्त्व मैत्रभावाने संपृक्त आहे. लीलातार्इंनी हे ओळखले असते, तर ‘सकाळ’चा विकास अधिक वेगाने झाला असता. माझी ही भावना भाबडी असली तरी प्रामाणिक आहे. पहिल्या पिढीतील उद्योजक म्हणून प्रतापराव स्वबळावर उभे राहिले, हे खरेच; पण त्यांच्यातील सामाजिक उद्यमशीलतेला मात्र कौटुंबिक वारसा आहे. पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे जैविक नाते आहे. विद्यार्थी सहायक समिती, पुणे अंधशाळा, बालग्राम, पुणे बालकल्याण संस्था या संस्थांमध्ये कार्यक्रमानिमित्त त्यांच्याबरोबरच मला जाता आले. त्यांच्याकडे असलेल्या व्यावसायिक शिस्तीची प्रचिती तिथेही येते. उद्योगांशी संबंधित इतर संस्थांचेही ते पदाधिकारी आहेत. मराठा चेंबरचे ते अध्यक्ष होते. माझ्या समजुतीप्रमाणे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजचा नामविस्तार आणि कार्यविस्तारही ते अध्यक्ष असतानाच झाला. ‘ॲग्रिकल्चर’ची भर त्यात पडली. कृषी-औद्योगिक समाजाचं स्वप्न महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलं आणि नंतर वसंतदादा पाटील व शरदराव पवार यांनी त्याचा कृतिप्रवण पुरस्कार केला. मराठा चेंबरने नावातील बदलाने हीच वस्तुस्थिती ठळकपणे अधोरेखित केली.

शरद पवारांच्या राजकारणात समाजकारणाचा समावेश असतोच; परंतु राजकारणाचे पारडे जड आहे. आता तर पवार घराण्यातील तिसरी पिढीही राजकारणात प्रवेश करती झाली आहे. प्रतापरावांचा पिंड मात्र वेगळा आहे. राजकारण त्यांच्या प्रकृतीला मानवणारे नाही. त्या बैठकीत ते बसत नाहीत. याचं कारण ते उद्योजक असले आणि समाजसेवेशी संबंधित अनेक संस्थांचे नेतृत्व करीत असले, तरी ते फार ‘खासगी’ आहेत. एका अर्थाने इंग्रज. आपण आणि आपले काम, त्यात ते समाधानी असतात. या समाजाबद्दल त्यांची काही निश्चित धारणा आहे. परिवर्तन झाले पाहिजे असे त्यांना तीव्रपणे वाटतेही; पण त्याच्या मार्गांबद्दल, पद्धतींबाबत त्यांचे मतभेद आहेत. त्याची तर्कमीमांसा ते करतात. वृत्तपत्रातही राजकारण फार वरचढ होता कामा नये, जीवनातील इतर क्षेत्रेही महत्त्वाची आहेत, असे त्यांना वाटते. अर्थात ही काही त्यांनी मला एखाद्या मुलाखतीत सांगितलेली, केलेली विधाने नाहीत. पाव शतकाच्या त्यांच्या सहवासातून काढलेले ते माझे आपले निष्कर्ष आहेत. गेल्या दशकात आमच्या भेटी दुर्मिळ झाल्या आहेत. या काळात जग फार वेगाने बदलले, माणसे बदलली आणि मूल्येही. ‘सकाळ’ही बदलला. मग प्रतापरावांनीच बदलू नये, असे मी कसे म्हणणार? परंतु 1985 ते 2010 या पंचवीस वर्षांतील प्रतापराव आणि भारतीवहिनी निखालसपणे ‘सर्वांगी सुंदर’ होते, हे माझे मत मात्र मलाच प्रिय आहे.

सदा डुम्बरे, पुणे

(गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या ‘अमृतअनुभव’ या पुस्तकातून हा लेख घेतला आहे.)

Share on Social Media

कार्य-कर्ते

ही उडूनी फुलपाखरे नभात चालली कुठे

प्रशांत खुंटे

दरम्यान, संस्थेने अपंगांच्या समस्यांसाठी कामांना सुरुवात केली. संगीताने या कामात आघाडी घेतली. अपंगांना समाजाकडून मिळणारी वागणूक ती पाहत होती. त्याच प्रकारच्या अवहेलनेचा तिलाही अनुभव होता. त्यामुळे सहवेदनेतून तिने असंख्य अपंगांच्या भेटी घेतल्या. खेडी पिंजून काढली. या प्रयत्नांमधून चार जिल्ह्यांमध्ये संघटनेचं जाळं विणलं गेलं. अंध, अस्थिव्यंग, मतिमंद, कुष्ठरुग्ण अशा जीवनाला कंटाळलेल्यांना संघटनेचा आधार मिळाला. घरकुले, चाकाची गाडी, कुबड्या अशी मदत संघटनेद्वारे मिळवून देण्यात संगीताने खूप कष्ट घेतले. आज लोक तिला ‘संगीता मॅडम’ या नावाने ओळखतात. गरीब विकलांगांसोबत या संगीताला नेहमीच पाहणाऱ्या सरकारी कचेरीतील लोकांना वाटतं, ‘या बाई अपंगांकडून योजना मिळवून देण्याचं कमिशन घेत असतील.’ एका शासकीय कर्मचाऱ्याने अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.

‘‘चकणी, लंगडी, थोट्या, पांगळ्या या शब्दांचा कधी कधी राग येतो; पण या रागाला चांगलं वळण कसं द्यायचं, हे मला आता कळलंय.’’ संगीता सांगतात.

‘‘अपंगांवरचा अन्याय पाहून माझ्यावरच अन्याय होतोय, असं मला वाटतं. पूर्वी मी अशी नव्हते. पूर्वी वाटायचं- कुणी अपमान केला, टोमणा मारला तर गप्प बसावं. सहन करावं. स्वत:ला कोंडून घ्यावं. पण आता तसं होत नाही...’’ गडचिरोलीतल्या शासकीय अधिकाऱ्यांना विकलांगांच्या समस्यांची जाण करून देता-देता संगीतामध्ये एक प्रकारचा धीटपणा आला. संगीता रूढार्थाने अपंग नाही, पण त्वचेवरील कोडामुळे अपंगांना जशा अवहेलना सहन कराव्या लागतात, तसेच अपमान तिनेही सहन केलेत. त्यामुळे पूर्वी ही मुलगी अत्यंत बुजरी होती. आरशात स्वत:शी बोलणंही तिला जमत नसे. पण ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेचे डॉ.सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांनी तिच्यावर अपंग संघटनेची जबाबदारी टाकली नि न्यूनगंड, संकोच व भीतीची वल्कलं गळून वेगळीच संगीता जन्माला आली... आता संगीताकडे स्वत:मध्ये झालेल्या आरपार बदलांचे अनेक किस्से आहेत.

‘जनकल्याण अपंग संघटना’ सदस्यांच्या वर्गणीवर कार्यरत आहे. सदस्य 51 रुपये सभासद फी आणि 20 रुपये वार्षिक वर्गणी देतात. या रक्कमेतून संघटना विविध कार्यक्रमांचं आयोजन करते. संघटनेने प्रत्येक तालुक्यात ‘अपंग व्यक्ती मार्गदर्शन केंद्रं’ही उभारलीत. या केंद्रांची जबाबदारी अपंगांनी स्वत:च घेतलीय. संघटनेमार्फत अपंगांचे बचतगट स्थापन झालेत. बचतगटांच्या फेडरेशनही कार्यरत आहेत. संघटनेचे सदस्य जुन्या साड्यांपासून सुंदर डोअर मॅट्‌सही विणतात. त्यातून उदरनिर्वाहाचं एक साधनही उपलब्ध झालंय.

संघटनेचा हा व्यापक जनतळ संगीताच्या लोकसंग्रहामुळे उभा राहिलाय. संस्थेने 2001 मध्ये एक सर्वेक्षण केलेलं. तेव्हा 25 गावांत केवळ 121 विकलांगांच्या मुलाखती शक्य झाल्या होत्या. पण सर्वेक्षणातून हाती आलेली आकडेवारी धक्कादायक होती. सर्वेक्षण झालेल्या 121 पैकी केवळ पाच जणांकडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र व दोघांनाच बसपास सवलत मिळत होती. याचा अर्थ नव्वद टक्क्यांहून जास्त विकलांगांची ना शासनाकडे नोंद होती, ना त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळत होता. याचसाठी विकलांग प्रमाणपत्र मिळवण्यातील अडथळे दूर करणे, पेन्शन योजना व बसपास मिळवून देता- देता संगीताने अनेक विकलांगांना त्यांच्या हक्कांसाठी उभं केलं. त्यांचे प्रश्न त्यांना मांडू व सोडवू दिले. म्हणूनच चार जिल्ह्यांमध्ये संघटनेचा विस्तार होऊन हजारो विकलांग स्वावलंबनाकडे वळले. हे संगीता तुमडेंचं योगदान किंवा उलट या संघटनेनं संगीतालाही स्वयंस्फूर्त बनवलं, हे या संघटनेचं तिच्या आयुष्याला मिळालेलं योगदान असंही म्हणता येईल...

अलीकडेच वडसा भागातील शंकरपूर ग्रामपंचायतीत घटना आहे. बीडीओ, ग्रामसेवक आणि सरपंच यांना अपंग संघटनेच्या महिला सदस्याने विचारलं, ‘‘ग्रामपंचायतीने गावातल्या अपंगांसाठी 5 टक्के निधी खर्च करायला हवा. तुम्ही तो कुठं खर्च केलात?’’ उत्तर मिळालं, ‘‘आम्ही दोन-तीनचाकी सायकली आणल्या, अपंग मतदारांना मतदान केंद्रावर सोडायला!’’ पुन्हा प्रतिप्रश्न, ‘‘तुम्ही आमची गरज विचारली का? आमच्या परवानगीशिवाय कसा काय खर्च केलात?’’ एक अपंग बाई प्रश्न विचारते म्हणजे काय? बीडीओ काही बोलेचनात. मग त्या सदस्य महिलेने संगीतांना फोन लावला. आता बीडीओंशी संगीता बोलल्या, ‘‘सर, तुम्ही दोन सायकली सोळा हजारांत विकत घेतल्या, असं समजलंय. बाजारात तीनचाकी सायकलींची किंमत काय आहे?’’ हा प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. त्यानंतर इतर ग्रामपंचायतींनी अपंग कल्याण निधीचं नियोजन कसं केलं, याचा वृत्तांत सांगितला गेला.

सरपंच व अधिकाऱ्यांसाठी हा अनुभव नवा होता. आतापर्यंत हे प्रश्न कुणी विचारलेच नव्हते. आणखी एक प्रसंग नोंदवण्यासारखा आहे. संघटनेने सुरू केलेल्या अपंग साह्य केंद्रात एकदा एक समस्या पटलावर आली. अपंगांना शासनाकडून पेन्शन मिळते. या योजनेतून मिळणारी रक्कम दर तिमाहीत बँक खात्यात जमा होते. ही रक्कम तुटपुंजी असली, तरी निराधार अपंगांकरिता तो बहुमूल्य आधार असतो. त्यामुळे अनेक अपंग या रकमेसाठी बँकेत रांगा लावतात. त्यांची असहायता बँक कर्मचाऱ्यांना कळतेच असं नाही. कढोली येथील बँकेत असेच एक उर्मट बँक कर्मचारी होते. कुणी विकलांग पेन्शनच्या पैशांसाठी दिसला की, का कोण जाणे- त्यांचा पारा चढायचा. हा माणूस अपंगांना वाट्टेल ते सुनवायचा. खेटे घालायला लावायचा. संघटनेसमोर हा प्रश्न आल्यानंतर संगीताने त्या कर्मचाऱ्याच्या वागणुकीचा निषेध नोंदवणारं निवेदन तयार केलं. सहा गावांतील 42 अपंगांनी या निवेदनावर सह्या केल्या. ते निवेदन घेऊन संगीता तहसील कार्यालयात गेल्या. सोबत संघटनेचे सदस्यही होते. सर्वांनी त्या बँक कर्मचाऱ्याने दिलेल्या वागणुकीचे अनुभव सांगितले. एक-दोन नाही, तर अनेक अनुभव ऐकून तहसीलदारही अवाक्‌ झाले. तहसीलदारांनी तातडीने त्या कर्मचाऱ्याला बोलावलं. संघटनेच्या सदस्यांचा गराडा नि संगीतातार्इंचा चेहरा पाहून तो गृहस्थ एकदम नरम झाला. ‘‘कामाच्या व्यापात एखादा शब्द बोललो असेल, तर माफ करा!’’ अशी विनवणी करू लागला. ‘‘पुन्हा असं घडणार नाही!’’ अशी कबुली त्याने दिली. संगीता त्या गृहस्थाला म्हणाल्या, ‘‘ज्यांच्याशी तुम्ही वाईट वागलात, त्यांनाच हे सांगा!’’ त्या माणसाने सर्वांची जाहीर माफी मागितली. त्यानंतर कढोलीच्या बँकेत विकलांगांना अगत्याने सेवा मिळू लागल्या.

अन्य एका प्रसंगात जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनकडून विनयशीलतेचा अनुभव संघटनेने कमावला, तोही संगीताने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे! अपंगत्वाचं प्रमाणपत्र सिव्हिल सर्जनमार्फत मिळतं. त्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या होतात. त्या करायला विविध तज्ज्ञ हॉस्पिटलमध्ये असणं अपेक्षित आहे. या प्रमाण-पत्राशिवाय अपंगांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या प्रमाणपत्राला खूपच महत्त्व आहे. पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेकदा तज्ज्ञ भेटत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी चकरा माराव्या लागतात. एकेकट्या विकलांगांना तपासणं, आवश्यक चाचण्या करणं हे काम डॉक्टरांनाही इतर रुग्णसेवेत काहीसं तसदीचं वाटतं. हल्ली ऑनलाईन प्रमाणपत्रं काढतात. त्यामुळे प्रक्रिया थोडी सोपी झाली असली, तरी डॉक्टरमंडळींचा उत्साह या कामात जेमतेमच असतो. या समस्येवर मार्ग काढत संघटनेने ठरावीक दिवशी विकलांगांना एकत्र करून हॉस्पिटलमध्ये नेण्याची प्रथा पाडली, ज्यामुळे डॉक्टर व विकलांग दोघांचाही वेळ वाचतो.

एके दिवशी चार गावांतील 13 विकलांगांना घेऊन संगीता सिव्हिल रुग्णालयात गेल्या. हॉस्पिटलचं अंतर या विकलांगांच्या गावांपासून साधारणत: 70 किमी आहे. त्यामुळे गाडीभाडे वाचवण्यासाठी सामाईक गाडी केलेली. त्यासाठी सर्वांनी वर्गणी काढलेली. या तेरा व्यक्तींमध्ये दोन मतिमंद- म्हणजे पूर्णत: बेरोजगार होते. बाकी अंध व अस्थिव्यंगांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची होती. प्रमाणपत्र मिळाल्यास यांना पेन्शन व अन्य योजनांचा लाभ मिळणं शक्य होतं. मोठ्या आशेने ही मंडळी सिव्हिल हॉस्पिटलला आली. पण तिथे तज्ज्ञ डॉक्टरच नव्हते. जे डॉक्टर होते, ते म्हणाले, ‘‘उद्या पुन्हा या!’’ डॉक्टरांच्या या उत्तरावर संगीताने थोडा विचार केला. खरे तर या प्रसंगात सगळे संतापलेले, निराश झालेले. मोठ्या जिकिरीने गाडी-भाड्यासाठी केलेला खर्च वाया जाणार होता. डॉक्टरांच्या उत्तरापुढे सर्व जण हताश झालेले. पण संगीताने शांतपणे एक युक्ती सांगितली. सगळे तेरा विकलांग त्या डॉक्टरांकडे गेले. मंडळींनी डॉक्टरांना छोटासा घेराव घातला आणि सांगितलं, ‘‘आज रात्री आम्ही इथंच मुक्काम करतो; तुमच्या घराबाहेर!’’ डॉक्टर गोंधळले. त्यांना उशिरा का होईना, या मंडळींची परिस्थिती लक्षात आली. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी येण्यासाठी वाहन द्यायचं कबूल केलं. डॉक्टरांच्या विनंतीनुसार सर्व जण परतले. रात्र संस्थेच्या कार्यालयात काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी पाठवलेली उपजिल्हा रुग्णालयाची गाडी या मंडळींसाठी हजर होती. एरवी कुणी विकलांगांच्या अशा समस्येची दखल घेतली असती?

असे प्रसंग विकलांगांच्या आयुष्यात क्वचितच घडतात. एरवी समाजाकडे या मंडळींना देण्यासाठी दया व उपहासाशिवाय फारसं काही नाही. संगीताच्या वाट्यालाही हेच आलं होतं. संगीताचा मूळ स्वभाव खेळकर, धीट. पण वयाच्या दहाव्या वर्षी तिच्या ओठांवर नि चेहऱ्यावर सफेद डाग उमटू लागले. या डागांनी तिचं अवघं अस्तित्वच काळवंडून टाकलं. संगीता लहान होती, तेव्हा तिने आजीकडे आग्रह धरून गोंदवून घेतलेलं. आजीकडे गोंदवणाराला द्यायला पैसे नव्हते. पण नातीचा हट्ट पुरवण्यासाठी तिने गोंदवणाराला तांदूळ दिले. त्या मोबदल्यात त्याने संगीताच्या कपाळावर नि हातांवर छोटंसं नक्षीकाम केलं. संगीताला मात्र आदिवासी महिलांसारखं मोठ्ठं मोठ्ठं गोंदवून हवं होतं. गोंदताना होणारी आग, नंतर येणारी सूज, दु:ख याचीही त्या वेळी तिला तमा नव्हती. या हट्टापायी तिने वडिलांची बोलणीही खाल्ली. शाळेतही हिनं स्वत:चं आपलं नाव नोंदवून घेतलेलं. संगीता म्हणते, ‘‘त्या काळी शिक्षक पोरं गोळा करायला येत. पण शाळेच्या भीतीमुळं पालक व मुलं जात नसत. माझं वय कमी होतं, पण मला शाळेची हौस. म्हणून मी हट्ट धरला. मग चौथ्या वर्षातच मला शाळेत घातलं गेलं.’’ संगीताचा एक चुलतभाऊ तिच्या वर्गात होता. तो अभ्यासात कच्चा होता. त्यामुळे त्याला नेहमीच छड्या बसत. तेव्हा ही छोटी मुलगी शिक्षकांना सांगायची, ‘‘गुरुजी, त्याच्यावरच्या छड्या मला द्या, त्याचा अभ्यास मी करते...’’

एवढी ही धीट मुलगी, पण त्वचेवरील पांढऱ्या डागांनी मात्र नंतर झाकोळून गेली. त्वचेखालील पापुद्र्यात मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पांढरे डाग येतात. हळूहळू ते सर्वांगावर पसरतात. विशेषत: गडद कांतीवर हे डाग खूप विरूप दिसतात. सूर्यप्रकाशाने अंगावर चट्टे उठणं किंवा शरीराची लाही होणं हा त्रास पीडितांना सोसावा लागतो. पण त्याहीपेक्षा भयानक त्रास म्हणजे लोकांच्या नजरा, शेरे- ताशेरे नि तुसडी वागणूक.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, लोकसंख्येतील किमान 5 टक्के लोक या समस्येने ग्रस्त असतात. अलीकडे या समस्येवर मोठ्या प्रमाणात जनजागृतीही झालीय. कोड समस्याग्रस्तांचे स्वमदत गटही शहरांमध्ये आहेत, पण गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात अजूनही तितकीशी जागृती नाही. संगीताचं ‘राखी’ हे एक छोटंसं खेडं. तिथे तर डॉक्टरांचीही सुविधा नव्हती. सुरुवातीला डाग दिसू लागल्यावर कुटुंबीयांनी या मुलीलाच दटावलं. ‘‘अंगणवाडीतल्या गोड खाऊमुळं डाग येतात, ते खायचं बंद कर’’ अशी ताकीद दिली गेली. अर्थात तो गैरसमज होता. वडिलांनी वैदूंचे उपचारही केले. छोट्या संगीताने आठवड्यातले चार वार चार देवतांचे उपास केले. पण सगळं निष्फळ! डाग वाढू लागले तसतसं ‘तुझ्याशी कोण लग्न करणार?’ हे वाक्य या लहान मुलीच्या कानांवर वरचेवर पडू लागलं. त्याच काळात मनावर कायमचा चरा उमटवणारी घटना घडली. संगीताच्या थोरल्या भावाला बाळ झालं. बारशाला आत्याच्या हातात लेकरू देण्याची पद्धत आहे. या छोट्या मुलीला त्या घटनेचं खूप कुतूहल होतं. ‘छोट्या बाळाची, मी छोटी आत्या’ अशी बालसुलभ भावना तिच्या मनात असावी. तिला छोट्या मुलांशी खेळायला आवडतही होतं. पण भावाने तिला स्पष्टच सांगितलं, ‘‘तू बाळाला हात लावायचा नाहीस! तुझा आजार त्याला होईल!!’’

बारशासाठी दहा किमी. दूरच्या गावी पायी जायचं होतं, तरीही ही मुलगी उत्साहात होती. पण भावाच्या सूचनेमुळं ती खचून गेली. हिरमुसली. खूप रडली. नंतर नाखुशीने बारशाला गेली. पण तिने त्या बाळाला स्पर्श मात्र केला नाही. तिची नाराजी लपली नाही. तिचा रडवेला चेहरा पाहून नंतर सगळे भावावर चिडले, पण त्या घटनेचा व्हायचा तो परिणाम होऊन गेला होता.

नंतरच्या काळात इतरही थोरल्या भावंडांची लग्नं झाली. घरात आई-वडिलांच्या सोबतीला उरले संगीता व तिचा एक धाकटा भाऊ माणिक. हा माणिक थोडा ‘मंद’ होता. गार्इंना रवंथ करताना पाहून तो म्हणायचा, ‘‘गाय मला चिडवण्यासाठी तोंड वाकडं करते.’’ बैलांना लघवी करताना पाहून म्हणायचा, ‘‘बैलाचं पोट फुटलं, बैल मरणार!’’ मग तो रडायचा. विकलांग माणसाचं जगणं संगीता तेव्हा पाहत होती. पण तिला ते नीटसं कळतही नव्हतं. माणिक शाळेत जात नसे. गावभर फिरून चित्रं असलेले कागद तो गोळा करायचा. गावात एका कुटुंबाकडे टीव्ही होता. टीव्ही पाहायला मिळावा म्हणून तो त्या कुटुंबाचं सरपण फोडून द्यायचा. पाणी भरायचा. भांडी घासायचा. माणिकच्या मंदबुद्धीचा लोक असा गैरफायदा घेत. पण हे शोषण त्या काळात संगीताला कळत नव्हतं कारण टीव्ही पाहायला मिळावा म्हणून संगीता व तिच्या मैत्रिणीही अशीच कामं करायच्या. त्यामुळे माणिकचं वागणं सामान्यच वाटत होतं. अशा या माणिकचं लग्न पायाने अधू असलेल्या एका मुलीशी लावून दिलं गेलं. यथावकाश माणिकला अपत्य झालं. त्यानंतर ती मुलगी बाळाला घेऊन माहेरी गेली, ती पुन्हा यायचं नाव घेईना. तिला आणण्यासाठी माणिकला पाठवलं गेलं. पण सासुरवाडीत त्याला खूपच वाईट वागणूक मिळत होती. तो काही दिवस तिकडे राहिला. तिथेच त्याला काही तरी आजार झाला. अत्यंत खंगलेल्या अवस्थेत एकदा माणिक परतला. आता त्याचा जगण्यातला रस संपला होता. एकदा तो ‘थोरल्या बहिणीला भेटून येतो’ असं सांगून गेला. तिकडून परतताना तो नदीच्या घोटाभर पाण्यात पडलेला आढळला. लोकांना वाटलं, ‘दारूडा आहे!’ नंतर कुणी तरी त्याला ओळखलं. तोवर त्याची प्राणज्योत मालवली होती. माणिकचा हा करुण मृत्यू संगीताच्या मनावर ठसा उमटवून गेला असावा. लोक आपल्यालाही अशीच दुय्यम वागणूक देतात, हा अनुभव तिला होताच. त्यामुळे कदाचित तिने शिक्षणाचा ध्यास घेतला. या काळात संगीता स्वत:ला कोंडून घेऊन रडत राहायची. ‘आपलं कसं होणार?’ ही चिंता तेव्हा या चिमुरड्या जिवाला सतावत होती. कातडीवरचे डाग दिवसेंदिवस पाय पसरत होते. ‘अशी कातडी सोलून तरी ठेवता येईल का?’ असे प्रश्न तिला पडत. त्यांची उत्तरे नसल्याने ती गुमसुम होऊन केवळ शाळेची एक-एक पायरी चढत राहिली.

संगीताचं नववीपर्यंतचं शिक्षण वसतिगृहात झालं. तिथे सडलेली भाजी मिळायची. छत गळायचं. पण सगळे त्रास सहन करून ती शिकली. पर्यायच नव्हता. कारण गरिबी आणि ‘आपलं कसं होणार?’ या प्रश्नाची कातडीखाली चाललेली सरपट सतत सोबतीला होती. ‘आपण शिकलो तरच धडगत आहे’ असं नकळत मनावर बिंबलं असावं. त्यामुळे संगीता 49 टक्के गुण मिळवून एसएसएसी झाली. राखी गावातून दहावी उत्तीर्ण झालेली ही पहिली मुलगी. सर्वांना अप्रूप वाटलं. ‘पोरगी हुशार आहे!’ असं सगळे म्हणू लागले. नंतर संगीताने कॉलेजला प्रवेश घेतला. कॉलेजात जायला तिच्याकडे धड कपडेही नव्हते. इतर मुली तिच्या गरिबीची चेष्टा करत. त्यामुळे वडिलांनी मोलमजुरी करून तिला सलवार शिवायला पैसे दिले. गावात सलवार घालणारीही ही पहिलीच मुलगी.

संगीता सांगते, ‘‘तेव्हा खेड्यातल्या लोकांना वाटायचं की, सलवार फक्त मुसलमान मुलीच घालतात.’’ पण शिक्षण घ्यायचं तर स्वस्तातले का असेना, धड कपडे वापरणं अत्यंत गरजेचं होतं. या दोन सलवारींच्या सोबतीनं संगीताने बी.ए. केलं. पण पुढे काय, हा यक्षप्रश्न होता. तेव्हा एम.ए. केल्यावर शिक्षक होता येईल, या आशेवर संगीता पोस्ट ग्रॅज्युएट झाली. एम.ए. करून ती गावी परतली. आता आई-वडील अधिकच थकले होते. त्यांना शेतीची कामं होत नव्हती. त्यामुळे संगीताने गावात मोलमजुरी करायचं ठरवलं. एका शेतकऱ्याकडे ती मोलमजुरीला गेलीही, पण तिची त्वचा सूर्यप्रकाशाला संवेदनशील असल्याने उलटाच परिणाम झाला. उन्हाच्या तापाने तिची कातडी लाल झाली आणि ती भोवळ येऊन पडली. शेतमालक संगीताच्या वडिलांवरच संतापला. लोक तसंही तिच्या वडिलांना नावं ठेवू लागलेच होते. ‘मुलीचं लग्न न करता तिच्या पैशांवर जगायचा यांचा बेत आहे!’ असे टोमणे लोक देत. संगीताला वडिलांचं दु:ख कळत होतं. ते नको म्हणत असतानाही संगीता मोलमजुरीचा प्रयत्न करतच होती. एकदा ती रोजगार हमीच्या कामावरही गेली. तिथे संगीताचे वर्गमित्रही होते, पण ते शाळेतले. संगीता कॉलेज शिकून आलेली. त्यामुळे गावातल्या या शाळादोस्तांनी तिला ते काम करू दिलं नाही. दरम्यानच्या काळात तिने सरकारी नोकरी मिळवण्याचेही प्रयत्न केले. ते अनुभवही खच्चीकरणात भर घालणारेच होते. राखी गावातच पोस्टमास्तरची जागा निघाली. संगीताला मुलाखतीचं पत्रही आलेलं. पण मुलाखतीच्या वेळी, ‘मुलींना नोकरी दिली, तर त्या लग्न करून जातील,’ असं मुलाखत घेणाऱ्यानेच सुनावलं. लग्नाचा प्रश्न आधीच संगीताच्या डोक्याचा भुगा करत होता, त्या प्रश्नाला बगल देण्यासाठीच तर नोकरीचे प्रयत्न ती करत होती; आणि चांगल्या गावातल्या सरकारी नोकरीची संधी ‘ही मुलगी लग्न करून जाईल’ या सबबीखालीच नाकारली गेली. वाईट्ट गोष्ट!

नोकरीसाठी आणखीही एक-दोन प्रयत्न करून झाले होते. पण जिथे जाईल तिथे अंगावरचे डाग आणि एवढी मोठी झाली तरी अविवाहित असल्याने रोखलेल्या नजरा संगीताला सतावत. वडील संगीताला ‘तू लग्न कर!’ असं सारखं सुचवत होते. सफेद डाग या समस्येला अपंगत्व मानलं जात नाही. पण विकलांगांना रोजगारात मिळणारा दुजाभाव संगीतालाही तिच्या पांढऱ्या रंगामुळे सहन करावा लागला, असं म्हणता येईल. कायद्यानुसार शासकीय व खासगी नोकऱ्यांमध्ये विकलांगांना 5 टक्के आरक्षण आहे. पण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (आयएलओ)च्या आकडेवारीनुसार 73 टक्क्यांहून अधिक विकलांग अजूनही रोजगारांच्या कक्षेत नाहीत. विशिष्ट शारीरिक लक्षणांमुळे रोजगारांच्या बाहेर फेकलं जाण्याचा अनुभव संगीताच्याही अनुभवाला येत होता. एक तर मुलगी, त्यात कोड असलेली! तिला नोकरी कशी द्यायची?- असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्यांना पडला नि त्यांनी संगीताला नोकरीतून बाद ठरवलं.

आता लग्नाचा विचार करून पाहण्याशिवाय तिला गत्यंतरच नव्हतं. संगीताने कुठे कुठे मोलमजुरी करून थोडी बचत केली होती, त्यातले दोन हजार रुपये तिने वडिलांना दिले. स्थळं पाहायला गावोगावी जावं लागतं. त्यासाठीची ही खर्ची होती. वडिलांनी सहा स्थळं पाहिली. त्यातल्या तिघांनी उत्तरच दिलं नाही. दोघांनी ‘मुलीला कोड आहे’ असं स्पष्ट सांगून नकार दिला. एक मुलगा पाहायला आला. हा सहावी शिकलेला, संगीता डबल ग्रॅज्युएट. अगदीच विजोड स्थळ. या मुलग्याने घरी येऊन पाहुणचार घेतला आणि वर तोंड करून म्हणाला, ‘‘आम्ही पाहायला आलो म्हणजे मुलगी पसंत आहे, असं नाही!’’ बाकी स्थळांच्या तुलनेत याचं वर्तन उद्धटपणाचा कळस गाठणारं. हा पाचवी पास पुरुषोत्तम कोडामुळे दगड झालेल्या अहल्येला जणू पावन करायला आलेला, नि पदस्पर्श न करताच गेला!

लग्नाच्या सौद्यांमध्ये ही अवहेलना तथाकथित ‘व्यंग’पीडित मुलींच्या सर्रास वाट्याला येते. अशा अनुभवांमुळे संगीता सातत्याने खचत होती. आयुष्याला दिशाच सापडत नव्हती. अशा सैरभैर काळात संगीता ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेच्या कार्यकर्त्यांना दिसली. संस्थेच्या एक कार्यकर्त्या गावात आलेल्या. त्यांनी संगीताला नोकरीची ऑफर दिली. संगीताने लगेच होकार दिला. गाव सोडून ती कुरखेड्याला आली. त्या काळातला एक अनुभव आहे. संगीता सांगते, ‘‘शुभदातार्इंनी माझ्यावर वैरागड तालुक्यातल्या गावांची जबाबदारी दिली. मी एकटी पहिल्यांदाच त्या भागातल्या गावात गेले. आठ दिवस एका कार्यकर्तीच्या घरी राहिले. गावबैठकीत माझी ओळख लोकांना करून देण्यात आली. मला नवी ओळख मिळाली. त्या आनंदात आता मी दुसऱ्या गावी जायला तयार झाले. एकटीच नाक्यावरच्या बसस्टॉपवर आले. बराच वेळ तिथं कुणीही नव्हतं. गाडीही येईना. कंटाळले. मला भाकरोंडीला जायचं होतं. खूप उशिरा एक भाकरोंडीची पाटी असलेली एसटी आली. मी गाडीत बसले. गाडीत ड्रायव्हर- कंडक्टरशिवाय कुणीच नव्हतं. खूप वेळ गाडीत मी उलट- सुलट विचार करत बसलेले. नंतर पाहिलं, मला जायचंय त्याच्या भलत्याच दिशेला गाडी चाललीय. रडायलाच आलं. ‘मला भाकरोंडीला जायचंय गाडी कुठं चाललीय?’ असं विचारल्यावर कंडक्टरने सांगितलं, ‘ही रांगी भाकरोंडीची गाडी आहे, तुला भान्सी भाकरोंडीला जायचंय वाटतं...?’ नंतर त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मला जायचं होतं, त्या वाटेवर चांगुलपणानं सोडलं.’’

गडचिरोली हा नक्षलप्रभावित भाग. अशा संवेदनशील कार्यक्षेत्रातील लोकांचा चांगुलपणा न्याहाळत संगीता निडर कार्यकर्ती बनत गेली. संस्थेत सुरुवातीचे काही दिवस ती गोंधळलेल्या अवस्थेत होती. पण या वळणावर संगीताला तिच्यातलं स्वत्व गवसायला सुरुवात झाली. संस्थेचं पहिलंच शिबिर मेंढालेखा या देवाजी तोफा यांच्या गावात होतं. तिथे पुण्यातून आलेल्या कार्यकर्त्या संगीताने पाहिल्या. त्यांचा आत्मविश्वास तिला भावला. घर पती-पत्नीच्या नावावर करण्याची मोहीम, ग्रामसभेत महिलांचा सहभाग, शाळेतील दाखल्यावर आईचंही नाव नोंदवणे या नवीनच कल्पना या कार्यशाळेत संगीताने ऐकल्या. पुढे या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दोन-तीन वर्षे संगीताने जीवतोड मेहनत घेतली. खेड्यापाड्यात, फिरली. गावसभा घेतल्या. सरकारी अधिकाऱ्यांशी बोलायचं धाडस मिळवलं. या प्रक्रियेत संगीताला तिच्यातली बालपणातली धाडसी, बोलकी मुलगी पुन्हा भेटली.

या काळातलाही एक मासलेवाईक प्रसंग आहे. संगीता एका गावातून जात होती. पानठेल्यावर उनाड पोरांचं टोळकं थांबलेलं. त्यातल्या कुणी तरी संगीताकडे पाहून शीळ घातली. एकाने शेरा मारला, ‘‘आमच्यासाठी नाही का काही योजना?’’ अशी छेडछाड सहन करून मुली खालमानेनं निघून जातात, असाच या मुलांचा अनुभव असावा. पण संगीता थांबली. वळून त्या मुलाला तिने बोलावलं. ‘‘तुला योजनेची माहिती हवीय? मग गावसभेत ये.’’ असं सांगितल्यावर ते पोरगं थंडच झालं. पण तो मुलगा सभेला आला. नंतर तो संगीताला नेहमीच आदराने नमस्कार वगैरे करू लागला. दरम्यान, संस्थेने अपंगांच्या समस्यांसाठी कामांना सुरुवात केली.

संगीताने या कामात आघाडी घेतली. अपंगांना समाजाकडून मिळणारी वागणूक ती पाहत होती. त्याच प्रकारच्या अवहेलनेचा तिलाही अनुभव होता. त्यामुळे सहवेदनेतून तिने असंख्य अपंगांच्या भेटी घेतल्या. खेडी पिंजून काढली. या प्रयत्नांमधून चार जिल्ह्यांमध्ये संघटनेचं जाळं विणलं गेलं. अंध, अस्थिव्यंग, मतिमंद, कुष्ठरुग्ण अशा जीवनाला कंटाळलेल्यांना संघटनेचा आधार मिळाला. कुणाला घरकुल मिळवून दे, कुणाला चाकाची गाडी, कुणाला कुबड्या अशी अनेक प्रकारची मदत संघटनेद्वारे मिळवून देण्यात संगीताने खूप कष्ट घेतले. आज लोक तिला ‘संगीता मॅडम’ या नावाने ओळखतात. गरीब विकलांगांसोबत या संगीताला नेहमीच पाहणाऱ्या सरकारी कचेरीतील लोकांना वाटतं, ‘या बाई अपंगांकडून योजना मिळवून देण्याचं कमिशन घेत असतील.’ एका शासकीय कर्मचाऱ्याने अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. तो विकलांगांच्या गराड्यात येऊन म्हणाला, ‘‘मॅडम, या ना- चहा घेऊ!’’ संगीता त्याला म्हणाल्या, ‘‘या सगळ्यांना चहा पाजणार का? मी यांच्यासोबत आहे.’’ तो मनुष्य निमूट गेला. संघटनेकडे आलेला समस्याग्रस्त विकलांग असो, की अन्य कुणी- कुणाकडून चहादेखील न घेण्याचं व्रत संगीता पाळते. अशा लहानसहान प्रसंगांतूनच तिने लोकांचा विश्वास कमावलाय. त्यामुळेच राष्ट्रीय विकलांगदिन, ब्रेल जयंती अशा कार्यक्रमांना संगीताच्या आमंत्रणाला मान देत बीडीओ, आमदार-खासदार वगैरे मान्यवरही आवर्जून येतात. फोनवर तिच्या समस्या सुटतात.

आता संगीता चाळिशीत आहे. जनकल्याण अपंग संघटनेतच तिला तिचे जीवलग मिळालेत. संगीता म्हणते, ‘‘कधी कधी आजारपणात आपल्याला हवं-नको विचारणारं कुणी असावं, असं वाटतं. पण तसे तर किती तरी माझे लोक गावोगाव आहेत! ते करतात माझी विचारपूस, तेवढी पुरे!’’ वडिलांनी मृत्यूपूर्वी आपल्या हिश्श्याची जमीन संगीताच्या नावे केली. संगीताने स्वत:च्या हिमतीवर गावात एक घर बांधलय. वडील हयात होते, तोवर मुलगा करणार नाही अशी तिने त्यांची सेवा केली. म्हाताऱ्या आईचं हवं-नकोही तीच पाहते. संगीता म्हणते, ‘‘मला शाळेत असताना एक कविता आवडायची- ‘असे कसे सुने, सुने मला उदास वाटे, ही उडूनी फुलपाखरे नभात चालली कुठे...?’ दु:ख-निराशा घेऊन संघटनेकडे आलेले विकलांग आनंदाने उड्या मारत घरी जात असतील, तेव्हा या काव्यपंक्तीतला उत्तरार्ध संगीताच्या नजरेपुढे तरळत असेल काय?

प्रशांत खुंटे

(संगीता तुमडे, चेल. 94042 27714)

Share on Social Media

गांधींचे गारूड

असा हा, असे त्याचे मायाजाल!!

संजीवनी खेर

फक्त गांधींबद्दल लिहून, वाचून त्यांच्या विचारांचा समाजावर स्त्रियांवर काय परिणाम झाला याचा अंदाज येणार नाही. विदेशी स्त्रियांत गर्भश्रीमंत, उच्च शिक्षित, चळवळीत काम करणाऱ्या तरुण स्त्रिया या क्रांतिकारक विचार-आचाराने प्रभावित होऊन आपले सर्वस्व भारतातील कामासाठी वेचायला सिद्ध झाल्या होत्या. त्यातील प्रत्येकीची सामाजिक, आर्थिक, राजकीय, वैचारिक पार्श्व भूमी वेगवेगळी होती. पण एक मात्र खरं कीसाऱ् या जणी गांधींच्या विचारांनी, त्यांच्या कामाने भारावल्या होत्या. घरदार, आपला सांस्कृतिक परिवेश सोडून, आपलं सर्वस्व पणाला लावून भारतात आल्या. त्यातील अनेक जणी तर गांधींच्या व्यक्तिमत्त्वाने झपाटल्या होत्या, जणू आवेगी प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्या भोवती सतत राहण्याच्या मोहात पडल्या होत्या. त्यांच्याकरता वाटेल ते करायला सज्ज होत्या.

गांधी हा माणूस समजावून घ्यायचा म्हटलं तर महाकर्मकठीण, म्हटलं तर अगदी सोपा. काय होतं तरी काय त्याच्यात? ना 56 इंच छाती, ना महागडी वस्त्रप्रावरणं, ना देखणं व्यक्तिमत्त्व, ना कुठलं पद, ना घोडंगाड्यांचा रुबाब, ना कुठलंही सत्तेचं वलय, ना थोर परिवाराचं पाठबळ. एक सामान्यसा दिसणारा, हाडकुळा, छातीच्या फासळ्या मोजता येतील अशी अंगकाठी. चार पोरं पदरी असलेला. साधी दिसणारी, गुजराती साडीतली बायको. असा त्याचा ‘सीव्ही’. पण प्रचंड चुंबकीय शक्ती असलेला माणूस. जो-जो त्याच्या सहवासात येई, त्याचे विचार ऐके, त्याच्याबद्दल वाचे तो त्याच्याकडे खेचला जाई. गरीब ते गर्भश्रीमंत, स्त्री-पुरुष, तरुण, वयस्क, देशी- विदेशी- कुणीही त्याच्या कचाट्यातून सुटत नसे.

आज दिडशे वर्षे झाली. अक्षरश: शेकडो पुस्तकं त्याच्यावर त्याला समजून घ्यायला देश-विदेशात लिहिली गेली. हातात सापडतो-सापडतो असं वाटला, तरी तो बराचसा सुटलेलाच असतो. कुणी भारावलेला, कुणी भक्त, कुणी चिकित्सक, कुणी अनुयायी, कुणी प्रेमात आकंठ बुडलेला/ली व्यक्ती, कुणी अभ्यासू, कुणी प्रचंड द्वेष्टा नि खुनशी, कुणी गोरा, कुणी काळा, कुणी देशी, कुणी विदेशी. सगळ्यांकडे मिस्किलपणे हसत बघणारा. सगळ्यांना मोहनदास करमचंद गांधी या तद्दन ग्लॅमर नसलेल्या नावाची, त्याच्या कामाची बाधा झालेली दिसतेय. काय गारूड केलं त्याने की, महासत्ता त्याच्या सत्याग्रहापुढे हतबल झाली? तो उपाशी राहिला, तर अख्ख्या देशाच्या घशाखाली घास उतरत नव्हता. इतरांचे क्लेष कमी व्हावेत म्हणून हा माणूस स्वत:ला क्लेष करून घेत होता. तो हट्टी होता, पण व्यवहारी होता. तो गरिबांचा कैवारी होता, श्रीमंतांचा मित्र होता. शत्रूंचाही हितचिंतक होता. कुणाशीही पंगा (आजचा शब्द) घ्यायला तो मागेपुढे पाहत नसे. कुठल्याही क्षणी तुरुंगात जावे लागेल असे काम तो करीत होता!

आजच्या भाषेत ‘भाई’ होता. कारण लोकांचे प्रश्न सोडवायला तो मदत करत होता. लोकांच्या मनातून भीती घालवायला मदत करत होता. तो शक्तिशाली होता, कारण तो शस्त्रच वापरत नव्हता. त्याचे शस्त्र होते सेवा, नैतिकता नि निर्भयता. याला समजायचे म्हणजे कुठल्या अंगाने? कोणते काम जाणायचे? एकेक समजायला एकेक जन्म जाईल. केवळ अस्पृश्यतानिवारण घ्या, खादी घ्या हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न घ्या, देशाचे राजकारण घ्या, वा समाजकारण, खेडी-सुधार, आहार-विहार, आचारशुद्धता घ्या, धार्मिक शिक्षण घ्या- प्रत्येक बाबतीत या माणसाचे विचार जगावेगळे होते. तसं म्हटलं तर वेगळे नव्हतेही, पण ते प्रत्यक्षात आणायची जिद्द त्याच्यात होती. सत्यनिष्ठा, निसर्गप्रेम, अहिंसेचे पालन... कोणत्या कामाबद्दल समजून घ्यायचे? त्याच्या एका शब्दाखातर स्त्रिया, पुरुष घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यसंग्रामात उडी घ्यायला सज्ज होत. त्याचे निर्मळ हसणे एखाद्या लहान मुलासारखे होते.

लक्षाधीश घरच्या पडदानशीन स्त्रिया जाड्याभरड्या खादीच्या साड्या नेसून समाजसेवेत उतरू लागल्या. ओटीवरही न येणाऱ्या स्त्रिया चुलीपुढून उठून थेट राजकारणाच्या व्यासपीठावर जाऊ लागल्या. काय ही जादू घडत होती? हा जादूगार काही त्यांना सुखासीन, चकचकीत जीवनाची स्वप्नं दाखवत नव्हता. चैनीची चटक लावत नव्हता. उलट तो त्यांना सदाचार, साधी राहणी, साधं अन्न घेण्याचं माहात्म्य सांगत होता. पण एक अलौकिक नि कधीही कुणाही नेत्याने न दाखवलेलं स्वप्न तो दाखवत होता. त्यासाठी ह्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या, अशिक्षित-अल्पवस्त्रांकित स्त्रियांचाही सहभाग त्या स्वप्नपूर्तीत मागत होता. पारतंत्र्याच्या बेडीतला गरीब माणूस नव्या उमेदीने त्याच्याबरोबर लढ्याला उभं राहण्याचं धैर्य एकवटून तुरुंगवास भोगायला तयार झाला. ह्या लढ्यात सामान्य माणूस कुणा उद्धारकर्त्याची वाट पाहत नव्हता, तर त्यात तो स्वत:ही कर्ता होऊ पाहत होता. हेच अकल्पित स्वप्न त्याला खुणावत होतं.

हे सामर्थ्य होतं गांधीनामक मंत्राचं. जो साऱ्यांचेच जीवन एका भव्य स्वप्नाच्या दिशने नेऊ पाहत होता. परिपूर्तीचं कुठलंही आमिष नव्हतं, आयतं काही मिळणार नव्हतं. स्वत:च्या मनाचा निग्रह, सत्यनिष्ठा, स्वार्थत्यागाची तयारी एवढ्याच सामग्रीवर ही नि:शस्त्रांची सेना पाहता-पाहता रणात उतरत गेली. केवळ ब्रिटिशांपासून मुक्तता हे ध्येय नव्हतं, तर आपल्या समाजजीवनातील आपणच करीत असलेले अन्याय दूर केल्याखेरीज ह्या मुक्तीला पूर्तता नाही, हे त्याचे समजावणे होते. या माणसाने आपली ही अन्यायाविरुद्धची लढाई दक्षिण आफ्रिकेतून सुरू केली. तेथील भारतीयांवरील अन्यायाची कल्पना येऊन त्याविरुद्ध अहिंसक मार्गाने लढा देण्याचा अनोखा प्रयोग त्याने सुरू केला. अशा नि:शस्त्रांचा सामना करायची रक्तपिपासू सत्ताधाऱ्यांना सवयच नव्हती. त्यातून तो सत्तेच्या विवेकाला साद घालत होता. ‘शत्रूवरही प्रेम करू’ ही ख्रिस्ती लोकांना परिचित पंक्ती तो आळवत होता. तिथे भारतीय स्त्रियांच्या मंगळसूत्रालाच सरकारने हात घातला होता.

त्यावर गांधींनी भारतीय स्त्रियांना सांगितले की, याचा प्रतिकार तुम्हीच तुमच्या पद्धतीने करा. ‘‘आम्ही काय करणार? आम्ही अबला, जगाचा शून्य अनुभव!’’ त्यातूनच अबलांचे शस्त्र धारदार बनत गेले. ख्रिस्तीपद्धतीने न झालेले विवाह हे वैध नाहीत, त्यामुळे त्या स्त्रियांना पत्नी म्हणून मान्यता नाही, त्या ठेवलेल्या स्त्रिया नि त्यांची मुलं ही अनौरस!! हे सारे कल्पनेच्या पलीकडचे भीषण सत्य समोर आले. नि साऱ्या भारतीय स्त्रिया- हिंदू, मुस्लिम, पारशी- आपला विवाह, धर्मसंस्कार याच्या समर्थनार्थ एकत्र आल्या. आणि दुसरी एक शक्तिशाली गांधी (कस्तुरबा) उभी राहिली. एक नवी स्त्रीशक्ती झळाळून तळपू लागली. पतीच्या मागे चालणारी, लाजाळू; फक्त मुलंबाळं, स्वयंपाकपाणी नि सेवा करणारी स्त्री सामर्थ्यवान राजकीय सत्तेला आव्हान द्यायला पेटून पुढे आली. जगाने आजवर कधीच न पाहिलेल्या सत्याग्रहाच्या शस्त्राने सरकारविरोधात बंड करून आपले म्हणणे पटवून देण्याचा हा अजब मार्ग तेथील स्त्रियांनी दाखवला. त्यासाठी कायद्याच्या विरोधात निदर्शनं केल्याच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगला.

कस्तुरबा ही जगातील पहिली सत्याग्रही महिला ठरली. तेथील निकृष्ट अन्न, राहण्याची वाईट व्यवस्था नि कठोर श्रम याचा त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला; ज्यामुळे पुढे जन्मभर त्रास सोसावा लागला, पण नीतिधैर्य कणभरही उणावले नाही. स्त्रियांमधील असीम ताकदीची कल्पना गांधींना होतीच. सत्याग्रह आणि असहकार या दोन गोष्टी कस्तुरबांकडून शिकल्याचे गांधींनी नमूद केले आहे. स्त्रियांत आत्मबल, त्यागाची शक्ती भरपूर असते. ती जर राष्ट्रकार्याला वापरली तर चमत्कार होईल, अशी त्यांना खात्री होती. त्यांचे लोकांना आवाहन असे ते त्यांच्यातील नैतिकतेला, तारतम्याला, सहृदयतेला, विवेकाला! ते जे बोलत ते लोकांना पटे, कारण सर्वसामान्यांना कष्टानेच पैसा मिळवायचा असे, सदाचारानेच जीवन कंठायचे असे. गांधींना द.आफ्रिकेत स्त्री सहकारी मिळाल्या. युरोपात गेल्यावर तिथे त्यांच्या विचाराने भारून त्यांच्या आश्रमात यायला सज्ज झालेल्या अनेक जणी आहेत.

ब्रिटनमध्ये स्त्रियांनी मतदानाच्या हक्कासाठी चालवलेल्या लढ्याने ते भारावून गेले होते. सुशिक्षित, उच्च घराण्यातल्या तरुण स्त्रिया तेथील संसदेत आपल्या हक्कासाठी ज्या प्रखरपणे लढत होत्या, तशाच प्रकारे आपल्याकडील स्त्रियांनी घराबाहेर पडून सत्तेच्या डोळ्याला डोळा भिडवला पाहिजे, असे त्यांना तीव्रतेने वाटले. पुढे भारतात तर अनेक स्त्रियांनी आपले जीवनच गांधीविचाराने घालवायचे व्रत घेतले. फक्त गांधींबद्दल लिहून, वाचून त्यांच्या विचारांचा समाजावर स्त्रियांवर काय परिणाम झाला याचा अंदाज येणार नाही.

विदेशी स्त्रियांत गर्भश्रीमंत, उच्च शिक्षित, चळवळीत काम करणाऱ्या तरुण स्त्रिया या क्रांतिकारक विचार-आचाराने प्रभावित होऊन आपले सर्वस्व भारतातील कामासाठी वेचायला सिद्ध झाल्या होत्या. त्यातील प्रत्येकीची सामाजिक, आर्थिक, राजकीय, वैचारिक पार्श्वभूमी वेगवेगळी होती. पण एक मात्र खरं की- साऱ्या जणी गांधींच्या विचारांनी, त्यांच्या कामाने भारावल्या होत्या. घरदार, आपला सांस्कृतिक परिवेश सोडून, आपलं सर्वस्व पणाला लावून भारतात आल्या. त्यातील अनेक जणी तर गांधींच्या व्यक्तिमत्त्वाने झपाटल्या होत्या, जणू आवेगी प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्या भोवती सतत राहण्याच्या मोहात पडल्या होत्या. त्यांच्याकरता वाटेल ते करायला सज्ज होत्या. या सर्व जणींना गांधींनी कसे वागवले, क्वचित स्वत:ला कसे वाचवले हे जाणून घेणे- एखाद्या सनसनाटी कादंबरीचा भाग होईल. अविश्वसनीय वाटाव्यात अशा या घटना नि त्यातील खऱ्या अर्थाने महानायकाने या साऱ्या अक्षरश: हजारो राजकीय व्यक्तींना, घटनांच्या केंद्रस्थानी असताना कसे विधायकतेकडे वळवले, हे जाणून घेणे जरुरीचे आहे.

विशेषत: स्त्रियांना आपल्या अत्यंत खासगी गोष्टीही सांगायला गांधी ही व्यक्ती का विश्वसनीय वाटत होती? कुणाला ही व्यक्ती येशूसारखी वाटे, करुणासागर, तर कुणाला नि:संग फकीर वाटे, कुणाला आपली आई वाटे तर कुणाला बापू! तर कुणाला तो परधार्जिणा वाटो, कुणाला काही वाटो, तो होता निव्वळ असंभव-संभव करणारा सामान्यांचा गांधीबाबा. त्यांच्या संपर्काने आमूलाग्र बदललेल्या विदेशी-देशी स्त्रियांचे आयुष्य कसे झपाटल्यागत बदलत गेले हे समजले, तर आपल्या जीवनातील क्षुद्र गळून पडायला मदत होईल. इथे तशी ढोबळ यादी जरी पाहिली तरी आपण थक्क होतो, कारण शेवटी ह्या माणसाचा नि त्याने केलेल्या प्रभावाचा थांग लागणे अशक्य आहे असे वाटते! -सोंजा श्लेशिंग, नील्ला नागिनी, मॅडेलिन स्लेड, म्युरिअल लेस्टर, कॅथरिन मेयो, मार्गारेट स्पिगेल, पॅट्रेशिया केंडल, मार्गारेट बर्के, ॲन मेरी पीटरसन, मेरी चेस्ली, अन्टोनेट मिरबेल, एलन होरूप अशा अनेक जणी. त्यांतील काही महायुद्धात होरपळलेल्या, काही आध्यात्मिकतेच्या प्रेमाने, काही शाकाहार, ब्रह्मचर्य, त्याग, खादी, अस्पृश्योद्धार, प्रार्थनेचे सामर्थ्य अशा अनेक वास्तव आणि गूढ संकल्पनांनी भारताबद्दलच्या ओढीने इथे खेचत आल्या.

काही टिकल्या, काहींना इथले हवामान झेपले नाही नि परत गेल्या. पण स्वदेशात त्यांनी गांधीविचाराने अनेक संस्था सुरू केल्या. गांधींचा त्यांच्यापैकी बहुतेकींशी पत्रव्यवहार सुरू राहिला. अनेकींनी आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली. त्यामुळे गांधींचा काळ नि त्यांच्या विचारांचा ठसा देशी-विदेशी स्त्रियांवर कसा उमटला, हे कळायला मदत झाली. ह्या सर्वांचा धांडोळा घेताना वेगळेच, आज स्वप्नवत्‌ वाटावे असे विेश मनासमोर साकारत गेले. खूप आव्हान वाटले. आज दिडशे वर्षे उलटली तरी हा माणूस का वाचावासा वाटतो?

जग खूप बदलले आहे, वैज्ञानिक प्रगतीने जगण्याचा वेग खूप वाढला आहे. सारेच स्वकेंद्रित झाले आहेत. तोही वेगळ्या अर्थाने स्वकेंद्रित होता, पण ते केंद्र त्याने बहुजन सुखाय वाढवत नेले. त्याचे प्रभावक्षेत्र अकल्पनीय दिशांनी पसरले. आज सुखाच्या कल्पना अफाट झाल्यात. निसर्गावर विजय मिळवण्याच्या ध्यासापायी साऱ्या सृष्टीचे संतुलनच बिघडलेय. म्हणूनच आज त्याचा अपरिग्रहाचा (असंग्रहाचा) विचार, गरजेपुरतेच निसर्गातून घ्या- हे सांगणे जगातील अनेक तरुणांना आकर्षित करतंय (त्यांनी ‘मिलिमलॅस्टिक’ चळवळ सुरू करून तसे जीवन अंगीकारलेय).

गांधींनी मांडलेले वैयक्तिक आणि सामाजिक नीतिमत्तेबद्दलचे विचार आज अधिकच खरे वाटू लागले आहेत, आचरायला अवघड वाटू लागलेत; कारण दरम्यानच्या काळात आपण सुखसोर्इंना चटावलो आहोत. मागे जाणं शक्य नाही, पण मागे वळून पाहता तर येईल? म्हटलं, पाहू या, त्या काळातल्या स्त्रियांनी ही विचारांची सुनामी कशी झेलली? तेव्हाच्या समाजाचा उभा-आडवा छेद घेतला, तर काय दिसते? एकीकडे मध्यमवर्गातली स्त्री निर्भय बनली, तर दुसरीकडे गर्भश्रीमंत स्त्री धडाडीने रस्त्यावर उतरून घोषणा देऊन तुरुंगात जाण्यात गौरव मानू लागली. काय होता हा जादूटोण्याचा प्रभाव? राजकुमारी अमृतकौर, रेहाना तय्यबजी, प्रेमा कंटक, निर्मला देशपांडे, सरोजिनी नायडू अशा देशी ललना या वादळात उतरल्या.

एक ना अनेक जणींचे आयुष्य ह्या माणसाच्या विचारांनी पार बदलले. साऱ्या जणींना त्यांचे सर्वच विचार वा आचार पटत होते असे नाही. बहुतेकींनी कडाडून विरोध केला, चक्क भांडण केलं; पण त्यांची साथ सोडली नाही. त्यातला जो विचार आचरणात आणता येणं जमेल, पटेल ते मात्र निष्ठेने केलं. त्या साऱ्या जणींनी अनेक विधायक कार्ये इथे नि विदेशात उभी केली.

संजीवनी खेर, मुंबई

गांधीजी आणि त्यांच्या संपर्कात, सहवासात आलेल्या स्त्रिया ही मध्यवर्ती कल्पना समोर ठेवून हे लिहिले जाणारे सदर पुढील दहा महिने (महिन्यातून दोन वेळा) प्रसिद्ध होत राहील.- संपादक

Share on Social Media