Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

ढाले प्रकरणातील फुले आणि काटे

मागील अर्धशतकात सर्वाधिक गाजलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या मराठी लेखांची यादी करायची ठरवली तर पहिल्या दहा मध्ये समावेश करावा लागेल असा एक लेख साधना साप्ताहिकात 47 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हाच तो लेख. 15 ऑगस्ट 1972 च्या साधना अंकात तो प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाने साधनाच्या आत आणि बाहेर प्रचंड गदारोळ माजवला होता. इतका की, त्या एका लेखामुळेच केवळ राजा ढाले हे नाव अनेकांना माहीत झाले होते आणि साधना साप्ताहिकाचे नावही त्या एका लेखामुळेच केवळ अनेकांना माहीत झाले होते. त्याआधी आणि त्यानंतरही राजा ढाले यांचे लेखन साधनात प्रसिद्ध झाले नसावे. (क्वचित एखादा अपवाद असेल तर अर्काईवमध्ये शोधावे लागेल.) ‘तो लेख वाचायला मिळेल का, त्यात वादग्रस्त काय होते, त्यावेळी नेमके काय व कसे घडले, त्याचे परिणाम काय झाले’ हे व या प्रकारचे प्रश्न तेव्हापासून आतापर्यंत इतक्या वेळा व इतक्या विविध स्तरांतील लोकांकडून विचारले गेले आहेत, की त्यांची गणतीच करता येणार नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात राजा ढाले यांचे निधन झाले तेव्हा, त्यांच्यावर जे काही मृत्युलेख विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाले, त्यातील बहुतेकांमध्ये त्या लेखाचा उल्लेख होताच.

परिणामी, साधनाकडे पुन्हा एकदा चहुबाजूंनी मागणी/विचारणा सुरू झाली- ‘तो लेख वाचायला मिळेल का, तो लेख पुनर्मुद्रित कराल का?’ त्याचे आम्ही दिलेले उत्तर होते, दोनच पर्याय आहेत : तो लेख अंशतः संपादित करून (तीन-चार ठिकाणची मिळून आठ-दहा वाक्ये वगळून) प्रसिद्ध केला जाऊ शकतो किंवा अजिबात प्रकाशित केला जाऊ शकत नाही. म्हणजे त्यावेळी प्रसिद्ध झालेला लेख जसाच्या तसा आता पुनर्मुद्रित करणे हा पर्याय असूच शकत नाही! याचे कारण तो लेख भेदक असला आणि समाजाच्या मर्मावर घाव घालणारा असला तरी, त्यातील काही वाक्ये अशी आहेत की, त्यांच्यामुळेच केवळ साधनाचे त्यावेळचे संपादक यदुनाथ थत्ते, कार्यकारी संपादक अनिल अवचट आणि साधनाचे कार्यकारी विश्वस्त एस.एम. जोशी या तिघांनीही जाहीर माफी मागितली होती. एवढेच नव्हे तर, साधनातून ते माफीनामे प्रसिद्ध केले होते; संपादक व कार्यकारी संपादक यांनी तर राजीनामे दिले होते, ती सविस्तर लिहिलेली राजीनामा पत्रे नंतरच्या साधना अंकातून प्रसिद्धही झाली होती. अशी पार्श्वभूमी असताना (आज तो मूळ लेख किती वादग्रस्त वाटेल हा भाग बाजूला ठेवला तरी), तो लेख जसाच्या तसा पुनर्मुद्रित करताच येणार नाही. इतके सांगूनही कदाचित काहींना हे पटणार नाही, म्हणून त्यांनी प्रस्तुत अंकात पुनर्मुद्रित केलेले एस.एम., यदुनाथजी व अनिल अवचट यांचे लेखन काळजीपूर्वक वाचावे.

मात्र त्याआधी, खूपच कमी लोकांना माहीत असलेली त्या प्रकरणातील वस्तुस्थिती नीट लक्षात घ्यायला हवी; ती थोडक्यात पण नेमकेपणाने सांगण्याचा प्रयत्न इथे करीत आहोत.

भारतीय स्वातंत्र्याला 25 वर्षे पूर्ण होणे आणि साधना साप्ताहिकाने 25 व्या वर्षात पदार्पण करणे, असे दुहेरी औचित्य साधून ‘स्वतंत्र भारतातील दलितांची 25 वर्षे’ या विषयावरील तो विशेषांक होता. त्यावेळी यदुनाथजी वयाच्या पन्नाशीत होते आणि साधनाचे संपादक म्हणून दोन दशकांहून अधिक वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. सतत भ्रमंती करणारा संपादक, नवे विषय व नवे लेखक शोधणारा संपादक आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांना निर्भयपणे वाचा फोडणारा संपादक, अशी त्यांची ओळख गांभीर्याने वाचन-लेखन करणाऱ्या मराठी भाषकांना होती. त्यांच्याभोवती जे काही तडफदार तरुण वावरत होते, त्यातील एक अनिल अवचट. 1967 ते 72 या पाच वर्षांत या तरुणाने साधनात सातत्याने लिहिले होते आणि तळागाळातल्या/ उपेक्षित-शोषित समूहांचे जगणे-मरणे मोठ्या ताकदीने मांडले होते. यदुनाथ तसेही तरुणांवर विश्वास टाकणारेच होते आणि अनिल अवचट यांच्यावर तर त्यांचा जास्तच विश्वास होता. त्यामुळे ‘शिक्षित दलित तरुणांशी बोलून, त्यांना लिहिते करून, पाव शतकातील स्वातंत्र्याने त्यांना काय दिले,’ या विषयावर विशेषांक करण्याची अवचटांची कल्पना यदुनाथांनी उचलून धरली. अवचटांनी यासाठी सिद्धार्थ कॉलेज (मुंबई) आणि मिलिंद कॉलेज (औरंगाबाद) इथे बऱ्याच फेऱ्या मारल्या; डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ या मंत्राने मोहित झालेले तरुण तिथे मोठ्या प्रमाणात होते. तेथील वसतिगृहात राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या तरुणांशी रात्र रात्र संवाद साधून, राज्यभरात दलित समाजाची काय स्थिती आहे हे अवचटांनी जाणून घेतले होते. त्यातून ‘पाव शतकानंतरही स्वातंत्र्य त्यांच्या दाराशी आलेले नाही, त्यांची गुलामी संपलेली नाही, पदोपदी होणारी अवहेलना थांबलेली नाही,’ हा निष्कर्ष निघाला होता. शिवाय, त्याआधीच्या काही महिन्यांत, महाराष्ट्राच्या विविध भागांत दलितांवर होणाऱ्या भयानक अत्याचाराच्या बातम्यांनी कहर माजवला होता. संपूर्ण गावाने दलितांवर बहिष्कार टाकणे, त्यांना अमानुष मारहाण करणे, ते वापरत असलेल्या विहिरीत विष्टा टाकणे, त्यांच्या आया-बहिणीची नग्न धिंड काढणे, असे एक ना अनेक लाजीरवाणे प्रकार घडत होते. अस्पृश्यतेचे चटके तर सर्वत्र नित्याचेच होते. आणि म्हणून त्यांची कैफियत, त्यांच्या वाट्याला आलेली अवहेलना त्यांच्याच शब्दांत आग ओकणाऱ्या अभिव्यक्तीसह प्रसिद्ध करावी, असे त्यावेळी 28 वर्षांच्या कार्यकारी संपादकाला वाटणे साहजिक होते. शिवाय, त्यातील काही अधिक बंडखोर तरुणांनी ‘आमच्या व्यथा वेदना आम्ही लिहू तशा छापण्याची तुमची हिम्मत आहे का’ अशी चेतावणीही अवचटांना दिली होती.

या सर्व प्रक्रियेतून 52 पानांचा विशेषांक आकाराला आला. त्या अंकाचा प्रारंभ पाच महाविद्यालयीन तरुणांच्या आयुष्यातील अस्पृश्यतेच्या एकेका प्रसंगाने व दोन छोट्या कविता यांनी केला होता. त्यानंतर ‘बलुतं’ या आत्मकथनामुळे प्रसिद्धीला आलेल्या दया पवार यांचा अस्पृश्यतेचेच अनुभव सांगणारा तीन हजार शब्दांचा ‘विटाळ’ हा लेख होता. मग जगदीश करंजगावकर यांचा ‘वास्तवाला सामोरे जायला हवे’ हा राजकीय लेख आणि त्र्यंबक सपकाळे यांच्या तीन कविता होत्या. मग राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख होता. त्यानंतर अनुक्रमे लहान बहिणीचे उपकार कसे फेडू (भीमराव चिकटे), रूढींच्या निर्मूलनाचे नवे जंग (ल.बा. रायमाने), स्वतंत्र भारतातील माझी फरफट (वसंत नारायण जाधव), खेड्यातील हुरडा (विद्यासागर कांबळे), दलितांमधीलही आम्ही दलित (विजया पगारे), अस्पृश्यता आणि स्वातंत्र्य (दत्ता भगत), हे घ्या पुरावे (प्रल्हाद चेंदवणकर), माझे अनुभव (धनंजय गुडदे) हे आठ लेख होते. मग बांडगुळे तोडणारे अंकुर (लैला महाजन) ही कथा होती. आणि समारोपाला पुरुषार्थी लोकमानस ही आजची गरज (एस.एम.जोशी) व बावडा आघाडीवरील सामसूम (बाबा आढाव) या दोन ज्येष्ठांचे लेख होते. अंकाच्या दीर्घ संपादकीय लेखामध्ये यदुनाथांनी साधनाच्या 24 वर्षांच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकून, साने गुरुजींचा वारसा व वसा अधोरेखित केला होता. आणि अवचटांनी अंक काढण्यामागील भूमिका सांगणारे छोटे टिपण लिहिले होते (प्रस्तुत अंकात हे टिपण घेतले आहे).

हा विशेषांक जोडअंक होता. त्यानंतर आलेल्या 26 ऑगस्टच्या अंकात द.तु. दिघे व यशवंत भोसले या दोन वाचकांची पत्रे आहेत. ‘ग्राम्य भाषा व हलकट टीका’ या शीर्षकाच्या त्या पत्रात, राजा ढाले यांच्या लेखातील काही विधानांबद्दल तीव्र नापसंती आहे. त्यानंतर आलेल्या 2 सप्टेंबरच्या अंकात दुर्गा भागवत यांचे एस.एम.जोशी यांना पत्र आणि त्याच्या शेजारी एस.एम. यांचे पत्र आहे. ‘एस.एम. यांनी त्या लेखाचा जाहीर निषेध करावा किंवा कार्यकारी विश्वस्तपदाचा राजीनामा द्यावा’ असे दुर्गाबाई म्हणतात. तर ‘‘त्या लेखातील ‘त्या’ विधानांचा निषेध, ती छापली गेली यासाठी माफी आणि तरीही आवश्यकता असेल तर राजीनाम्याची तयारी’’ असे एस.एम. यांचे पत्र आहे. याशिवाय ग.प्र.प्रधान, भार्गव, सरोजिनी वैद्य, र.ग.पंडित, मुमताज रहिमतपुरे, भालचंद्र कोतकर यांची पत्रे आहेत. ढालेंच्या लेखावरच ही पत्रे आहेत. संपादकांनी राजीनामा द्यावा असे पत्र प्रधानसरांचे तर झालेल्या चुकीवर कठोर टीका इतर पत्रांमध्ये आहे. याच अंकात यदुनाथ व अवचट यांची राजीनामा पत्रे आहेत (प्रस्तुत अंकात ती दोन्ही पूर्ण दिली आहेत.)

त्यानंतर आलेल्या 9 सप्टेंबरच्या अंकात 22 पत्रे आहेत, त्यामध्ये मृणालिनी देसाई, अ.के.भागवत, शांतीलाल शाह इत्यादी मान्यवरांची पत्रे आहेत. त्यातील एक पत्र सात जणांच्या नावाने आहे. पत्रलेखकांमधील बहुतेकांनी तो विशेषांक उत्तम झाला आहे याबद्दल संपादकांचे अभिनंदन केले आहे, त्या लेखातील ती विधाने कमालीची निषेधार्ह असून संपादकांनी ती छापायला नको होती असे म्हटले आहे, मात्र संपादकांचे राजीनामे स्वीकारले जाऊ नयेत असेही म्हटले आहे. याच अंकात ‘तेजोभंगाचे पाप आम्ही करणार नाही!’ हा एस.एम. यांचा लेख आहे. वैचारिक स्पष्टता, प्रामाणिकता, पारदर्शकता आणि तर्कनिष्ठ व विवेकी भूमिका यांचा (ऑल टाईम) अप्रतिम नमुना म्हणून या लेखाचा उल्लेख करावा लागेल. याच अंकात ‘साने गुरुजींची साधना’ हा अनिल अवचट यांचा लेख आहे, त्यात दरम्यानच्या दोन आठवड्यांत साधनाच्या आवारात आलेल्या दोन मोर्चांची हकीगत चित्रमय व नाट्यमय शैलीत आली आहे. उपहास, उपरोध, निर्भयता, तेजस्विता व कारुण्य इतके सारे या लेखातून अनुभवता येते (एस.एम. व अवचट या दोघांचेही लेख प्रस्तुत अंकात पुनर्मुद्रित केले आहेत. एस.एम. यांचा हा लेख निवडक साधनाच्या संपादकीय खंडात समाविष्ट केलेला आहे, परंतु अवचटांचा हा लेख मात्र त्यांच्या आतापर्यंत आलेल्या दोन डझनाहून अधिक पुस्तकांत कुठेही समाविष्ट झालेला नाही.)

त्यानंतर आलेल्या 16 सप्टेंबरच्या अंकात एकूण 24 पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यात वसंत पळशीकर व दि.के. बेडेकर यांच्या प्रतिक्रिया स्वतंत्र लेख म्हणाव्यात इतक्या सविस्तर आहेत, न्यायप्रेमी या टोपणनावाने एक लेख आहे. दत्तो वामन पोतदार, किशोर पवार, नरहर कुरुंदकर, पन्नालाल सुराणा, हुसेन जमादार, यांच्यासह अन्य पत्रलेखकही नामवंत म्हणावेत असे आहेत. एक पत्र 41 मान्यवरांच्या नावांसह आले आहे. लीलाधर हेगडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना पाठवलेले पत्रही यात आहे. झाल्या प्रकाराबद्दल लेखक व संपादक यांच्यावर सरकार खटले दाखल करणार असल्याचे ऐकून, ‘तसे करणे का योग्य नाही’ हे सांगणारे ते पत्र आहे. आणि याच अंकात ‘ही चर्चा/वाद आता थांबवित आहोत,’ असे संपादकीय निवेदन आहे. या सर्व वाद-विवादात तीन-चार अपवाद वगळता कोणीही राजा ढाले यांच्या ‘त्या’ लेखातील त्या विधानांचे समर्थन केलेले नाही आणि दोन-तीन अपवाद वगळता कोणीही ‘संपादकांचे राजीनामे स्वीकारावेतच’ असे म्हटलेले नाही.

त्यावेळी महिनाभर चाललेले ते जाहीर वादविवाद हे साधनाच्या इतिहासातील ‘तीक्ष्ण काटे आणि त्यावर असलेली फुले’ असे प्रकरण होते. एस.एम., यदुनाथ व अवचट या तिघांनीही त्या प्रकरणात दाखवलेले धैर्य आणि ध्येयाप्रति राखलेली निष्ठा अशी अधोरेखित होते की, ‘आपण या परंपरेचे पाईक आहोत’ याचा आम्हाला अभिमान वाटतो. या प्रकरणात यदुनाथांच्या वाट्याला स्वकीयांकडून आणि परक्यांकडून जी अवहेलना आली आणि ती त्यांनी कर्तव्यनिष्ठेचा भाग मानली, यासाठी साधनाचे वाचक त्यांचे कायम ऋणी राहतील. ‘हे यदुनाथ होते तरी कोण,’ याची झलक नव्या वाचकांना दिसावी म्हणून, सुरेश द्वादशीवार यांचा दहा वर्षांपूर्वीचा लेख या अंकात पुनर्मुद्रित करीत आहोत. आणि वयाच्या 32 वर्षी तो लेख लिहिणारे राजा ढाले नावाचे रसायन कोणत्या संतापजनक परिस्थितीतून आकाराला आले होते, हे कळावे म्हणून ‘खेळ’ या नियतकालिकातील त्यांची मुलाखतही प्रस्तुत अंकात घेतली आहे.

एकंदरीत, हा सर्व अंक राजा ढाले प्रकरणाची पुनर्भेट असा झाला आहे, उत्खननातून तो आकाराला येत गेला. यातून धडा मिळतो तो हाच की, कोणत्याही शोषित समूहांची अभिव्यक्ती जहरी असणे स्वाभाविक, म्हणून त्याबद्दल आमजनतेने अधिक सहनशील व सहिष्णू होत जायला हवे आणि त्याचवेळी सामाजिक परिवर्तनासाठी लढणारांनी आपली अभिव्यक्ती करताना जबाबदारीचे भान ठेवायला हवे, तोल जाणार नाही याची काळजी घायला हवी. प्रस्तुत अंक वाचणाऱ्यांनाही हीच आग्रहाची विनंती आहे.

पुनर्भेट

काळा स्वातंत्र्यदिन (अंशत: संपादित)

राजा ढाले

आमचा आर्थिक स्तर सामान्य आहे. आणि भरीस भर म्हणून वरील तिन्ही वर्णांचा आम्हाला जातीय जाच सहन करावा लागतोय, तो वेगळाच. तेव्हा उद्या उठेल तो स्वतःला दलित म्हणेल नि आमच्या लढ्याची तीव्रता मारून टाकील. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःला दलित म्हणवून घेणं वेगळं आणि प्रत्यक्ष दलित-उपेक्षित म्हणून जगणं नि लढ्याला सामोरं जाणं वेगळं. ब्राह्मणांच्या बाईचा कासोटा ब्राह्मणगावात सोडला जात नाही, तो सोडला जातो बौद्ध स्त्रीचा. आणि याला शिक्षा काय तर एक महिना शिक्षा किंवा पन्नास रुपड्या दंड! म्हणजे राष्ट्रगीताचा अपमान केला तर- उठून उभा राहिला नाही तर- तीनशे रुपये दंड... आणि सोन्नागावच्या सोन्यासारख्या प्रत्यक्षातील हलत्या-बोलत्या स्त्रीचं पातळ फेडलं तर पन्नास रुपये दंड... पण राष्ट्र हे लोकांचं बनतं. मग त्यातल्या लोकांचं दुःख मोठं की राष्ट्राच्या प्रतीकाच्या अपमानाचं दुःख मोठं? मोठं काय? आमच्या अब्रूची किंमत एका पातळाच्या किमतीएवढी?

घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्र पण सुस्त मुंबईत काही घटना-घडामोडी घडताहेत! खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड होत आहे! उदाहरणार्थ- धरणे, मोर्चे, घेराव वगैरे मार्गांनी विद्यार्थ्यांची चळवळ रस्त्यावर येऊन अंग धरत आहे! विद्यार्थ्यांचा उद्रेक रूप घेत आहे! स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सवी उत्सव काळा दिवस पाळण्याचे ठरत आहे! मुंबई ही महाराष्ट्राची नि भारताचे हृदय आणि मेंदू आहे! म्हणून महाराष्ट्रात बौद्धांवर आणि हरिजन- गिरिजनांवर झालेल्या अन्यायाचा पहिला पडसाद मुंबईरूपी हृदयात उमटला! तिचे ठोके चुकले, उलट- सुलट झाले. मुंबईचे ठोके चुकले म्हणजे सबंध मुंबई जागी झाली नाही! वृत्तपत्रांनी जाग आणण्याचे कार्य केले. आणि मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात : मुंबईरूपी हृदयात जे कप्पे-चोरकप्पे आहेत, त्यापैकी दलित साहित्यिक हा कप्पा प्रथम जागा झाला. दरम्यान, बॅ.कांबळे यांचेही पत्रक निघाले. त्यानंतर युवक आघाडी स्थापन झाली. मुख्यमंत्र्यांच्या निवासावर धरणे धरले. लगेच युक्रांद जागी झाली. मनुस्मृती जाळली आणि तो गट युवक आघाडीला मिळाला. त्यांच्याबरोबर बहुसंख्येने बावड्याला आला. तसंच समाजवादी युवक सभा, राष्ट्र सेवादल यांचे प्रतिनिधी सामील झाले. नंतर मग ज्यांना हृदय व मेंदू आहे ते कवी व विद्यार्थी कार्यकर्ते जागे होऊन आणि सर्व डाव्या चळवळीतील तरुणांच्या उपसंघटना जाग्या होऊन विद्यार्थी संघर्ष समिती स्थापण्यात आली. मुंबई गर्जू लागली, बोलू लागली. आग ओकू लागली. कारण दरम्यान विधानसभेत गवळे-मोरे या बौद्ध तरुणांनी आग ओकली. मी म्हणेन सोलापूर गर्जत असेल तर मुंबई बरसत आहे, ओकत आहे!

2

दरम्यान, प्राध्यापक सदा कऱ्हाडे यांची ‘एका स्पृश्याची डायरी’ बाजारात आली. या कादंबरीत ब्राह्मण कसे अस्पृश्य ठरतात ते आर्थिक तत्त्वावर भर देऊन दाखवलं! म्हणजे धनवान ब्राह्मण गरीब ब्राह्मणांना अस्पृश्यांप्रमाणे वागणूक देतात! कादंबरी सामान्य, एकसुरी व भडक आहे; पण प्रतिपाद्य विषयातून हेच सिद्ध होते की, ब्राह्मण गटाचं आर्थिक तत्त्वावर दोन गटांत विभाजन झालंय. एक स्पृश्य : श्रीमंत ब्राह्मण. एक अस्पृश्य : गरीब ब्राह्मण. मी असं म्हणेन की, आजच्या मराठा समाजातही आर्थिक तत्त्वावर हे दोन म्हणजे स्पृश्य- अस्पृश्य गट आहेत! आणि तसेच वैश्य व शूद्र वर्गातही ते कमी-अधिक प्रमाणात अनुस्यूत आहेत! पण ब्राह्मणगाव किंवा बावडा प्रकरणी बौद्धांवर झालेल्या अन्यायात मुंबईतल्या त्याच लोकांची वस्ती असलेल्या, लेबर कॅम्पमधल्या दोन बौद्ध युवकांनीच प्रथम विधानसभेत आग का ओकली नि इतरांनी का नाही? याचे उत्तर ज्याचं जळतं त्यालाच कळतं. इतरांना याची आच लागतच नाही, म्हणून हे गप्प! नाही तर स्पृश्यांतल्या आर्थिक अस्पृश्यांनी याविरुद्ध आवाज उठवला असता- का उठवला नाही? कारण आर्थिक स्तरांनी हे जरी एका पातळीवर असले तरी, सामाजिक म्हणजेच जातीय पातळीवर हे उंच आहेत. प्रत्येक स्तरातल्या, वर्णातल्या आर्थिक अस्पृश्याला जातीय चौकट आडवी आली. म्हणून ती प्रथम मोडून टाकली पाहिजे. वरच्या स्तरातील अस्पृश्य आणि आम्ही एकाच पातळीवर असू, तर सामाजिक अर्थाने अस्पृश्य असणाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध हे सुरुवातीला का बोंबलले नाहीत? यांना फक्त आर्थिक समता हवी आहे, सामाजिक नको- असाच याचा अर्थ नाही काय? म्हणजे परदुःख शीतल!

मराठीतले ललित साहित्यिक नि विचारवंत ‘सखाराम बार्इंडर’च्या बाजूने बोंबा मारतात, पत्रकं काढतात! बौद्धांवरील अन्यायाबाबत हे का गप्प बसतात? की, चाललंय हे यांना मंजूर आहे? वेश्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्या. कारण ती समाजाची गरज भागवते, असं म्हणणाऱ्या भागवतबार्इंना वेश्यांना वेश्याच ठेवायचं आहे- हा यांचा ‘पतितोद्धार’... तर अशी ही माणसं आपमतलबी. मुंबईत मिश्र वस्ती असून विचाराने जाती- जातीत विभागलेली. कारण माटुंगा लेबर कॅम्पमधले गवळे-मोरे फक्त बौद्धांवरील अत्याचाराने पेटतात. हे का पेटत नाहीत? हे आमचे भाईबंद नाहीत, देशबंधू नाहीत. आम्ही का परके आहोत का? मग का वेगळे राष्ट्र मागू नये? आणि मुंबईत मिश्र वस्ती तर तितक्या प्रमाणात कुठे आहे? भेंडीबाजार, माहिम, बांद्रे वगैरे मुस्लिम वस्त्या सोडल्यास गिरगाव, दादर, डोंबिवली, ठाणे, विलेपार्ले इथे बहुसंख्याक कोणाची वस्ती आहे? आणि नायगाव, वरळी, डिलाईल रोड, वडाळा, बॉम्बे सेंट्रलचा काही भाग येथे बहुसंख्याक कोण आहेत? याच मिश्र वस्त्या का? मुंबईत जातीयता आहे ती अशी. आणि गिरगावातल्या आंतरजातीय प्रेमावर मृत्यू हाच तोडगा ठरतो, उबाळे प्रकरणी सिद्ध होते. हा जातीय सलोखा का?

3

हे सर्व प्रश्न आजच्या तरुण मनाला पडले आहेत,पटले आहेत, म्हणून तर सर्व जाती-धर्मांचे तरुण संघर्ष समिती बांधतात नि ‘गवळे-मोरे यांना सोडा’ म्हणून मोर्चा काढतात. आकाश-पाताळ एक करतात. जातिनिर्मूलन युवक परिषदेला हजारोने जमतात. गवळे-मोरे यांचा सत्कार करतात. पंचविसावा स्वातंत्र्यदिन काळादिन पाळायचा घाट घालतात. खरं तर स्वातंत्र्य मिळून 25 वर्षे झाली असे म्हटले जाते. पण या प्रजासत्ताक राज्यात आम्हाला- प्रजेला- सर्वसामान्य लोकांना स्वातंत्र्य कुठंय? ब्रिटिश राजवटीत आमच्यावर जसे हल्ले होत होते, तसेच स्वराज्यातही- ब्रिटिश गेल्यानंतरही- होत आहेत. याचा अर्थ ब्रिटिश राजवट गेली तरी ब्रिटिश करायचे तेच अत्याचार लोकशाही यंत्रणा करत आहे. मग अजूनही ब्रिटिशांचे राज्य आहे, असे लोकांना का वाटू नये? पारतंत्र्यात आहोत, असे का वाटू नये? काल लोक ब्रिटिशांविरुद्ध सत्याग्रह करत, लढत. आज आम्ही स्वतःच्याच सरकारविरुद्ध लढतोय. याचा अर्थ ही लोकशाही नाही. लोकांकडून लोकांसाठी लोकांनीच केलेले राज्य असे याचे स्वरूप कुठे आहे? असे असते तर मग हा असंतोष असता का लोकांमध्ये? लोकांना हवा असलेला संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी 105 हुतात्म्यांचे बलिदान द्यावे लागते, ही लोकशाही का? आणि हे बळी कोणी घेतले? ब्रिटिशांनी की स्वकीयांनी? एकूण परकीय राजसत्तेपेक्षा स्वकीय राजसत्ता अधिक घातक आहे! बरे, आम्ही निवडून दिलेले आमदार मत मागण्यासाठी आमच्या दारात येतात आणि आमच्या मागणीसाठी आम्ही विधानसभेच्या दारात तोंड वेंगाडत जावं, तर हे विधानसभेतून खाली उतरत नाहीत. भेटायला समोर येत नाहीत, पोलिसांना पुढे पाठवतात. तर हे कसले आमचे प्रतिनिधी? आणि हे काय आमचं दुःख थोडंच वेशीवर टांगणार आहेत? हे टांगणार नाहीत, हा अनुभव असल्यामुळेच गवळे-मोरे यांनी ही दुःखं-आग ओकून विधानसभेचे लक्ष खेचले ना? तरी त्यांना अटक. मग त्यांनी दुःख तरी कोणाला सांगायचं नि त्यांचा वाली तरी कोण?

बरं, या दोघांनी विधानसभेचा कसला हक्कभंग केला आणि विधानसभेला कसली बाधा आणली? अत्याचाराच्या प्रश्नावर लक्ष खेचून घेण्यासाठी विधानसभेच्या सज्जातील हवेत तोंडातलं रॉकेल ओतून त्याला काडी लावली, याने कोणाला इजा झाली? मग त्यांना का अटक? आणि विधानसभेचे नियम वेगळे का? ती काय आकाशातून पडली? ती लोकांनीच बनलेली आहे ना? लोकांचे दुःख वेशीवर टांगण्यासाठी आहे ना? मग निवडून दिलेले आमदार हे काम करत नाहीत म्हणून जर लोकांनी ते हातात घेतलं, वेशीवर टांगलं तर तो गुन्हा ठरतो. वा रे राजवट! आणि या अटकेबद्दल सर्वांचे एकमत. म्हणूनच आमचं एकमत झालंय की, आम्ही निवडून दिलेला आमदार केव्हाही परत घेऊ शकतो. नाही तर पाच वर्षे हे लडदू असेच खुर्च्या तापवणार, पेंगणार, झोपणार. आणि म्हणूनच आमची मागणी रास्त आहे, ती म्हणजे शंकराव पाटील राजीनामा द्या. एका माननीय मंत्राच्या गावी असं घडतं, याचा अर्थ या मंत्रिपदाने हे गाव शेफारून गेलंय, बौद्धांवर बहिष्कार लादतंय- आणि यात शंकररावांचे बंधू शहाजीराव हे प्रमुख आरोपी! शंकरराव खरेखुरे जनतेचे प्रतिनिधी असतील, तर त्यांच्या गावात हा प्रकार घडला नसता. गावातला अल्पसंख्याक गट असंतुष्ट आहे आणि एका जरी माणसावर अन्याय होत असेल, तर त्या-त्या प्रदेशातल्या आमदारांनी राजीनामा दिला पाहिजे. शंकरराव तो का देत नाहीत? मग हे कसलं रामराज्य!

4

आता अल्पसंख्याक-अल्पसंख्याक म्हणून स्वतःला पददलित म्हणवून घेणारा एक वर्ग म्हणजे ब्राह्मण. प्राध्यापक सदा कऱ्हाडे यांनी स्वतःला आर्थिक अस्पृश्य म्हणवून घेतल्यानंतर, लगेच महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘पुण्याहून’ या सदरात श्री.ज. जोशींनी ब्राह्मण वर्ग अल्पसंख्य म्हणून कोंबला; तर यांचं आणि दलितांचं दुःख सारखे आहे का? हे अल्पसंख्य म्हणून आज राज्य- कारभारावर नसतील, पण कालपर्यंत कोण होते? आणि शासकीय यंत्रणेत ऑफिसर कोण आहेत? बँकांत 80 टक्के कोण आहेत? आमचं दुःख अधिक गहिरं आहे. ते निव्वळ राज्यकर्ते, आम्ही नाही याचा खेद मानत नाहीत; कारण आम्ही अल्पसंख्य ही वस्तुस्थिती. सहकारात ब्राह्मणांसारखे आमचे लागेबांधे नाहीत. शिक्षण संस्थांमध्ये नाहीत. आमचा आर्थिक स्तर सामान्य आहे. आणि भरीस भर म्हणून वरील तिन्ही वर्णांचा आम्हाला जातीय जाच सहन करावा लागतोय, तो वेगळाच. तेव्हा उद्या उठेल तो स्वतःला दलित म्हणेल नि आमच्या लढ्याची तीव्रता मारून टाकील. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःला दलित म्हणवून घेणं वेगळं आणि प्रत्यक्ष दलित-उपेक्षित म्हणून जगणं नि लढ्याला सामोरं जाणं वेगळं. ब्राह्मणांच्या बाईचा कासोटा ब्राह्मणगावात सोडला जात नाही, तो सोडला जातो बौद्ध स्त्रीचा. आणि याला शिक्षा काय तर एक महिना शिक्षा किंवा पन्नास रुपड्या दंड! म्हणजे राष्ट्रगीताचा अपमान केला तर- उठून उभा राहिला नाही तर- तीनशे रुपये दंड... आणि सोन्नागावच्या सोन्यासारख्या प्रत्यक्षातील हलत्या- बोलत्या स्त्रीचं पातळ फेडलं तर पन्नास रुपये दंड... पण राष्ट्र हे लोकांचं बनतं. मग त्यातल्या लोकांचं दुःख मोठं की राष्ट्राच्या प्रतीकाच्या अपमानाचं दुःख मोठं? मोठं काय? आमच्या अब्रूची किंमत एका पातळाच्या किमतीएवढी? या गुन्ह्याला म्हणूनच राष्ट्रध्वजाच्या अपमानाला होणाऱ्या दंडापेक्षा जबर शिक्षा हवी आहे. नपेक्षा लोकांत राष्ट्रप्रेम राहणार आहे काय?

लोक म्हणतात की, साखर कारखान्याची मस्ती चढलेला जमीनदार वर्ग या अत्याचाराच्या मुळाशी आहे. मला हे पटत नाही. या अत्याचारामागे सबंध स्पृश्य वर्ग आहे. चातुर्वर्ण्याला मानणारा प्रत्येक गधडा आहे. ब्राह्मणगावच्या बायकांची लुगडी फेडायला सांगणारा धनगर काय साखर कारखानेवाला आहे? तर जमीनदाराबरोबरच वर्णव्यवस्थेच्या पाईकांचाही यात हात आहे. बरं, वर्णव्यवस्थेचा पाईक स्वतः तरी वर्णाश्रम धर्मानं नेमून दिलेली कार्ये करतो का? वृत्तपत्र वाचलं तर ब्राह्मणांची विहित कर्म सोडून व्यवसाय करणारे ब्राह्मण आहेत, तसंच क्षत्रियाचं लढण्याचं विहितकर्म सोडून, सैन्यात जायचं सोडून हा वर्ग वैश्य वृत्ती वाढवत आहे. साखर कारखान्यांच्या सौद्यात गुंतला आहे. वैश्याचंही यापेक्षा वेगळे नाही. स्वतःच चातुर्वण्याने नेमून दिलेली कामं टाळायची आणि दुसऱ्यांनी ती केली पाहिजेत, हा आग्रह धरायचा. मेलेली गुरं ओढा, नाही तर बहिष्कारहा काय प्रकार आहे? यांनी चातुर्वर्ण्याला संमत नसलेलं स्वातंत्र्य उपभोगायचं आणि आम्ही का नको? म्हणूनच बहिष्कार, अत्याचार हे आम्हाला गुलाम बनवू पाहणारे प्रकार आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणताहेत. आम्हाला या देशात स्वातंत्र्य नाही.

5

बरं, स्वतःला मराठे म्हणवणारे लोक तरी किती मुर्दाड! परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी (म्हणजेच महाराष्ट्र- पूर्वीचा) नि:क्षत्रिय केली असेल तर पृथ्वीवर हे क्षत्रिय आले कुठून?... तिसरं म्हणजे बिजज पुत्र आणि क्षेत्रज पुत्र, हे आर्यांचं लफडं. आपल्या क्षेत्रात जन्मला, आपल्या स्त्रीपोटी जन्मला म्हणून क्षेत्रज पुत्र. पण आपल्या बीजापासून न जन्मलेला अनौरस म्हणजे क्षेत्रिय : क्षत्रिय... जातीय संस्थेचा अंगीकार करताना आपण कुठल्या जातीत बसतो आणि कुणावर व का अन्याय करावा हे कळत नाही; त्यांचा अन्याय आंधळा आहे, रूढीगत आहे हे या नरपशूंना कळत नाही का? म्हणून चातुर्वर्ण्य तोडले पाहिजे. मुळापासून उखडलेच पाहिजे...

खरं म्हणजे महात्मा फुले यांच्यानंतर या देशात सुधारक झाले नि स्वातंत्र्यवीर झाले; पण फुल्यांना जे क्रांतिकारकत्व देता येतं, ते यांना देता येत नाही. फुल्यांनी हिंदू धर्माच्या पडेल रोगावर अचूक हात ठेवला, तर तिकडे दुर्लक्ष करून ही माणसं गीतारहस्य लिहीत बसली. आणि सुधारकांनी सकच्छ की विकच्छ यावर वाद माजवला. बालविवाहांना प्रतिबंध व विधवाविवाहाला मान्यता यासाठी हे लढले. फुले यांच्या आधीचे असून, हे अस्पृश्यतेविरुद्ध त्यांच्याप्रमाणे का लढले नाहीत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांनी- विशेषतः आगरकरांनी रूढीला जरूर धक्का दिला. पण त्या सुधारणा एक तर आमच्यासाठी नव्हत्या किंवा त्यांची चक्रं सतत प्रगतीच्या दिशेने फिरून आमच्यापर्यंत त्या आल्या नाहीत- कारण चातुर्वर्ण्य व्यवस्था.

आज पण जनावरांपेक्षा हीन वागणूक आम्हाला मिळते, याचा अर्थ एक तर आमच्यात किंवा स्पृश्य वर्गात तरी सुधारणा नाही. दुसरे म्हणजे, आपले मुख्यमंत्री काल-परवा आवाहन करते झाले की, लोकमान्यांच्याच निर्धाराने सामाजिक समतेसाठी लढून एकात्मता प्रस्थापित करू या. लोकमान्यांनी सामाजिक समतेसाठी निर्धाराने कधी झगडा दिला? उलट वेदोक्त प्रकरणात ते म्हणाले की, ‘शिवाजीच्या काळच्या मराठ्यांपेक्षा आजच्या मराठ्यांना जास्त हक्क मागायचा काय अधिकार आहे?’ हीच सामाजिक समता की तिच्याविरुद्धचे उदाहरण? तर त्यांना स्वराज्य हवं होतं, पण समता नको होती. म्हणून तर स्वातंत्र्यचळवळीत अर्धवट शिकलेले काही गुंड कोणत्याही गुन्ह्याखाली आत गेले आणि स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यसैनिक म्हणून बाहेर आले. त्यांची बौद्धिक कुवत ती देशाची बौद्धिक पातळी. त्या लोकांनी राज्य चालवायचे, मंत्रिपदे भोगायची आणि त्यांच्या हाताखाली विद्वानांनी राबायचं, हुकूम पाळायचे. हीच लोकशाही. अशा धामधुमीत 25 वर्षे निघून गेली. ना आगरकरांची सुधारणा आम्हाला सुधारून गेली, ना टिळकांचं स्वराज्य आम्हाला स्वातंत्र्य देऊन गेलं. आम्ही आंबेडकरांच्या मागे जाऊन सुधारलो, तर हे लोकच आम्हांवर बहिष्कार टाकून, आमच्या बायकांची अब्रू लुटतात. एकूण, आम्ही सुधारू नये, ही यांची इच्छा. आणि आम्ही सुधारणार, हा सबंध समाज बदलणार- हे आमचे ध्येयवाक्य! आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे लोक, त्यांना सांगू की- तुम्ही पण स्वतंत्र नाही. कारण तुम्ही मोर्चा काढाल तरी दंडुके बसणार. हे सरकार आपलं नाही. ब्रिटिश गेले, पण त्यांची प्रवृत्ती राज्यकर्त्यांमध्ये जिवंत आहे. म्हणून आपण स्वतंत्र आहोत, हे चूक. स्वतंत्र ते आहेत जे आपणाला गुलामासारखे वागवतात. मग गुलामीत स्वातंत्र्य कसलं?

(15 ऑगस्ट 1972 च्या साधना अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख अंशत: संपादित करून पुनर्मुद्रित करीत आहोत- संपादक)

पुनर्भेट

तेजोभंगाचे पाप आम्ही करणार नाही!

एस. एम. जोशी

श्री.राजा ढाले यांच्यासारख्या तरुणांच्याकडून घडलेल्या प्रमादाची जाणीव करून देऊन त्यांना अधिक तेजस्वी व कर्तृत्ववान बनवण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये हवे तेवढे आज नाही. ती किमया साने गुरुजीच करू शकले असते. आमच्या अंगी ती कर्तबगारी नाही म्हणून आम्ही इतरांच्या सुरात सूर मिळवावा आणि दलित समाजातील तरुणांचा त्यांना शिव्या देऊन तेजोभंग करावा काय? ते पाप आम्ही कधीही करणार नाही. ते कृत्य साने गुरुजींच्याशी बेइमानी करण्यासारखे आहे. त्यांच्या शिकवणीशी ते विसंगत आहे. तरीही राजा ढालेंसारख्या तरुणांना आम्ही नम्रपणे असे सांगू इच्छितो की, राष्ट्रध्वजाचे प्रचलित समाजव्यवस्थेशी आणि शासनाशी समीकरण बसवण्यामध्ये त्यांच्याकडून चूक होत आहे. राष्ट्रध्वज हे आमच्या ध्येयाचे प्रतीक आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्याचा तो मानबिंदू आहे. सामाजिक व आर्थिक समानतेवर आधारलेला जो नवा समाज आम्हाला निर्माण करावयाचा आहे, त्याचे ते प्रतीक आहे. प्रचलित शासनाचे ते प्रतीक नाही.

संपादकीय जबाबदारीतून निवृत्ती

यदुनाथ थत्ते

साधनेच्या स्वातंत्र्यदिन रौप्य महोत्सव विशेषांकात दलितांचे स्वातंत्र्य हा एक विभाग देण्यात आला होता त्या अंकात श्री राजा ढाले यांचा एक लेख असून त्यात राष्ट्रध्वज, लोकमान्य टिळक आणि श्रीमती दुर्गा भागवत यांच्याबद्दल अभद्र अशी विधाने आली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तिरंगी झेंड्याबद्दल मी परम आदर बाळगीत आलो. बेचाळीसच्या चळवळीत याच तिरंगी झेंड्याखाली इंग्रजी सत्तेविरुद्ध जी झुंज दिली गेली, त्यात माझाही खारीएवढा वाटा आहे. तोच तिरंगा स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज झाला याचा मी उरी अभिमान बाळगला. त्या राष्ट्रध्वजबद्दल अभद्र असे लिखाण माझ्या संपादकत्वाखाली निघत असलेल्या साधनेत दुर्दैवाने प्रसिद्ध झाले! राष्ट्रध्वज हे राष्ट्राच्या पुंजीभूत पुण्याईतून निर्माण झालेले प्रतीक असते. त्याचा शाब्दिक अधिक्षेप व अपमानदेखील होता कामा नये असे मला वाटते.

लोकमान्य टिळकांनी भारताला स्वराज्याचा मंत्र दिला, एवढेच नव्हे तर स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षणाचे तंत्रही दिले. त्यांच्या परिश्रमातून, त्यागातून आणि प्रतिभेतून स्वातंत्र्याची भावना देशात जोपासली गेली, ही गोष्ट माझ्यासारख्याला विसरणे शक्यच नाही.

श्रीमती दुर्गा भागवत यांच्याबद्दल त्याच अंकाच्या संपादकीयात गौरवपूर्ण लिहिले आहे. त्यांचा प्रगाढ व्यासंग, त्यांची समाजाभिमुख वृत्ती, साहित्याबद्दलची सखोल जाण यांचा मी चाहता आहे. त्यांचे ‘ऋतुचक्र’ साधनातून क्रमशः प्रसिद्ध झाले आणि मराठीला ललामभूत झाले, याचा मला अभिमान आहे. साहित्य अकादमीने त्यांच्या ‘पैस’ला पारितोषिक देऊन गौरवले तेव्हा साधनेत त्यांच्याविषयी आवर्जून प्रा.ग.प्र. प्रधान यांचा लेख प्रकाशित केला.

अशा स्थितीत वरील तीनही गोष्टीसंबंधी अभद्र विधाने एका लेखकाने करावी व ती संपादकीय संस्काराशिवाय तशीच प्रसिद्ध व्हावी, या गोष्टीमुळे वाचकांप्रमाणेच मीही अतिशय व्यथित झालो. अभद्रपणाबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याचे पहिले पाऊल लगेचच टाकले. पण तेवढ्याने झाल्या गोष्टीची भरपाई होणे शक्य नाही असे वाटत राहिले. साधना विश्वस्तांना मी माझा मनोदय कळवला की, झाल्या गोष्टीसाठी मी संपादक-मुद्रक-प्रकाशक या पदांतून मुक्त होऊ इच्छितो, कारण त्याबाबतची अंतिम जबाबदारी माझीच आहे आणि ती मी टाळू इच्छित नाही. झाल्या प्रकाराबद्दल अनुताप व्यक्त करण्याचा माझ्या आवाक्यातला मार्ग म्हणजे संपादकपदाचा राजीनामा देणे. माझा राजीनामा मी विश्वस्तांच्या हाती सुपूर्द केला आहे.

साने गुरुजींनी पाचारण केले म्हणून मी 1949 च्या जानेवारीत एस.एम. जोशी यांच्या साक्षीने साधनेत प्रविष्ट झालो. साने गुरुजींच्या वात्सल्यपूर्ण छत्रछायेत घालवलेला तो काळ हा माझ्या जीवनातील एक अनमोल ठेवा आहे. त्यानंतर रावसाहेब पटवर्धन आणि आचार्य जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वृत्तपत्र संपादनाचे धडे गिरवायला मिळाले. प्रा.वसंत बापट आणि सदानंद वर्दे यांची साथ-संगत सुरुवातीपासूनच राहिली. साधनेतील ही तेवीस वर्षे हा माझ्या जीवनातील कृतार्थतेचा काळ आहे. गेली जवळपास सतरा वर्षे संपादक-मुद्रक-प्रकाशक म्हणून माझे नाव साधनेच्या अखेरीस मुद्रांकित होत आले आहे. हा प्रकार न घडता तर साधना साप्ताहिकाशी जडलेला अनुबंध बहुधा तसाच कायम राहिला असता. साधनेच्या संपादक पदातून निवृत्त होण्याचा प्रसंग यातना देणारा असला तरी, सामाजिक मूल्यांचे जतन करण्यासाठी तसे करणे मला कर्तव्यरूप वाटते आणि म्हणून अतिशय व्यथित अंतःकरणाने मी राजीनामा देत आहे. झाल्या चुकीला जी काही सजा होईल ती प्रायश्चित्त म्हणून भोगण्याला माझ्या मनाची मी तयारी ठेवली आहे.

पण या सबबीसाठी दलितांच्या ज्या व्यथा वेदना व्यक्त झाल्या आहेत, त्यांची उपेक्षा होऊ नये. गेली तेवीस वर्षे साधनेच्या सर्व चाहत्यांनी व मित्रांनी जो जिव्हाळा आणि जे प्रेम दिले त्यातून उतराई होणे शक्य नाही. माझ्या जडणघडणीत साधनेचा वाटा मोठा आहे. थोरा-मोठ्यांचे साधनेशी जे नाते आहे, त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडल्या त्याचे समाधान आहे. चार-पाच प्रसंगी संपादकाची जबाबदारी पार पाडण्यात कसूर झाल्यामुळे वाचकांचा रागही ओढवला, पण त्यांचे प्रेम आणि विश्वास एवढा अथांग की त्यात सर्व राग आणि किल्मिष वाहून गेले. सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संपादकपदाचा राजीनामा मी विश्वास्तांकडे पाठवत आहे.

माझाही राजीनामा

अनिल अवचट

15 ऑगस्टच्या साधना अंकात दुर्गा भागवत यांचा वैयक्तिक उल्लेख राजा ढाले यांच्या लेखात आला आहे. तो अत्यंत गलिच्छ आणि अपमानास्पद आहे. या विभागाचे संपादन मी केले होते. सदर वाक्य माझ्या नजरेतून निसटले. त्या चुकीची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. त्याबद्दल दुर्गा भागवत यांना त्वरीत दिलगिरीचे पत्र मी पाठविले. मुंबईस त्यांना भेटायलाही गेलो, पण त्या तेव्हा पुण्याला आल्या होत्या. राष्ट्रध्वजाबद्दलचे वाक्य अवमान करण्याच्या हेतूने लिहिले असे मला वाटले नाही. जिवंत माणसांचे पावित्र्य हे मी सर्वश्रेष्ठ मानतो. पण त्या वाक्यातली अभिव्यक्ती बरी नव्हती. झाल्या प्रकारामुळे मी माझ्या साधनेतील संपादकीय विभागातील कामाचा राजीनामा देत आहे. मला साधनेनेच वाढविले. मी उतराई आहेच.

(2 सप्टेंबर 1972 च्या साधना अंकात हे राजीनामे प्रसिद्ध झाले आहेत.)

साधनाच्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिन विशेषांकातील काही मजकुरामुळे गेले कित्येक दिवस चांगलीच वावटळ उठवून दिली आहे! राजा ढाले यांच्या लेखातील राष्ट्रीय ध्वजाची अप्रतिष्ठा होईल अशा प्रकारची शब्दरचना माझ्या निदर्शनास आणण्यात आली, तेव्हा लगेच मी ‘साधना’चा कार्यकारी विश्वस्त या नात्याने घडलेल्या प्रमादाबद्दल जनतेची माफी मागितली. ‘साधना’चे संपादक श्री.यदुनाथ थत्ते यांनी देखील क्षमा मागितली. इतकेच नव्हे तर त्यांनी संपादकपदाचा राजीनामा देखील माझ्याकडे सादर केला. श्री.यदुनाथ थत्ते यांचा ‘साधना’शी अत्यंत घनिष्ट असा संबंध प्रारंभापासूनच आहे. साने गुरुजी हयात असताना देखील संपादकीय कामामध्ये गुरुजींचे ते उजवे हात होते. गुरुजींच्या पश्चात ‘साधना’च्या संपादनाची मुख्य जबाबदारी त्यांनीच पार पाडलेली आहे. आचार्य जावडेकर व रावसाहेब पटवर्धन हे संपादक होते त्या वेळी देखील, संपादनकार्याचा मुख्य भार यदुनाथांनाच उचलावा लागत असे. त्यांच्या राजीनाम्याचे काय करावयाचे, ते मी एकटा ठरवू शकत नाही. विश्वस्त मंडळाची बैठक घेऊनच त्यासंबंधीचा निर्णय घ्यावा लागेल. व्यक्तिश: मला असे वाटते की जो प्रमाद अनवधानाने घडला आहे, त्याचे परिमार्जन माफी मागितल्याने व्हायला पाहिजे.

बहुसंख्य हितचिंतकांची आणि ‘साधना’ वाचकांची जी शेकडो पत्रे आमच्याकडे आली आहेत, त्यांपैकी एखादा अपवाद सोडून सर्वांचे मत त्यांनी राजीनामा देऊ नये, असेच आहे. काही आक्रस्ताळी मंडळींनी राजीनाम्याचा आग्रह धरला असला किंवा राजीनाम्याचा पुरस्कार केला असला तरी, त्यांपैकी फारच थोडी मंडळी ‘साधना’च्या वाचकांपैकी किंवा हितचिंतकांपैकी आहेत. ज्या प्रमादाबद्दल यदुनाथ यांनी क्षमायाचना केली आहे, राजीनामा दिला आहे व कायद्यान्वये होणारी शिक्षा भोगायची तयारी दाखवली आहे, तो त्यांच्या अपरोक्ष घडलेला आहे. क्षमा मागण्याचे प्रसंग ‘साधना’वर वेळोवेळी येत नसतात. या साऱ्या गोष्टी लक्षात घेता या आक्रस्ताळी लोकांच्या आग्रहाला किती महत्त्व द्यायचे, ते ठरवले पाहिजे.

साने गुरुजींनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले त्या वेळेपासून श्री.थत्ते यांचा ‘साधना’शी अजोड ऋणानुबंध आहे. साने गुरुजींच्या इच्छा-आकांक्षांचे त्यांना जितके आकलन झालेले आहे, तितके आमच्यापैकी किती लोकांना झाले असेल, हे सांगणे अवघड आहे. गुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न त्यांनी ज्या पोटतिडिकीने आत्मसात केले आहे, तसे आत्मसात करणारी मंडळी फार थोडी. ते स्वप्न साकार करण्यासाठी ते आपली वाणी आणि लेखणी सतत राबवत असतात. त्यांच्या विशुद्ध चारित्र्याची ज्यांना ओळख आहे त्यांना सध्या चालू असलेल्या प्रकारामुळे विषाद वाटावा, हे स्वाभाविकच आहे. साने गुरुजींचा कळवळा दाखवत थत्ते यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरली जावी आणि त्यांची तिरडी बांधून तिचे दहन करण्याचा उपद्‌व्याप केला जावा, हे कशाचे लक्षण आहे? राष्ट्रध्वजाबद्दल श्री.थत्ते यांच्यापेक्षा अधिक प्रेम आपणाला आहे, असे या मंडळींना वाटते काय? हा शुद्ध दमदाटीचा प्रकार आहे. त्यांच्यापुढे गुडघे टेकण्याइतके कच्च्या दिलाचे यदुनाथ नाहीत, हे विरोधकांनी पक्के लक्षात ठेवावे.

‘साधना’च्याद्वारा गुरुजींना जे कार्य साधायचे होते, त्याचा आम्हांला कधीच विसर पडणार नाही. ‘जे का रंजले गांजले’ असेल त्याला पोटाशी कवटाळणाऱ्या साने गुरुजींनी, आजकाल स्वराज्यामध्ये दलित समाजावर जे अत्याचार होत आहेत, ते पाहिले असते तर त्यांनी काय केले असते याची आम्हाला कल्पना देखील करवत नाही! निश्चितच त्यांनी दलितांचीच बाजू उचलून धरली असती आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध ते प्राणपणाने लढले असते.

धडपडणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याकडून कितीही प्रमाद घडले तरी आईच्या अंत:करणाने त्यांना पाठीशी घालणे हा गुरुजींचा सहजधर्म होता. एकदा एका दलितवर्गीय तरुणाने त्यांना फसवले, तेव्हा गुरुजींच्या अवतीभोवती असणाऱ्या आम्हा मंडळींनी त्या तरुणावर कठोर टीका केली, पण गुरुजींना ते मुळीच रुचले नाही. त्यांना आमचा राग आला. ते म्हणायचे, ‘‘ही तरुण मंडळी अशा चुका करतात, याची मुख्य जबाबदारी आम्हा सुशिक्षितांची आहे. शेकडो वर्षे आम्ही त्यांना खातेऱ्यात दडपून ठेवले. त्यांच्याकडून सदाचाराची अथवा शिष्टाचाराची अपेक्षा करण्याचा आम्हांला काय अधिकार?’’ गांधीजी म्हणायचे, ‘‘त्यांना आमच्या तोंडावर थुंकण्याचा अधिकार आहे.’’ स्वराज्यामध्ये दलितवर्गावर होणाऱ्या अत्याचारांमुळे त्या समाजातील तरुण संतप्त झालेले पाहून गुरुजींना आनंदच झाला असता. त्यांच्या तोंडून वेडेविद्रे शब्द बाहेर पडले तरी त्यांना त्यांनी बोलू दिले असते, त्यांची तोंडे बंद केली नसती. त्यांचे वेडेविद्रे बोल देखील त्यांनी सुधारून घेतले असते. गेली कित्येक वर्षे ‘साधना’चे संपादक आणि विश्वस्त गुरुजींची ही परंपरा जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. त्या दृष्टीने काही प्रयोगही करत आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त काढलेला दलितांच्या दु:खांना वाचा फोडणारा विशेषांक हे त्याच दिशेने उचललेले एक पाऊल आहे.

स्वराज्यामध्ये होणाऱ्या अत्याचारांनी ज्यांची मने प्रक्षुब्ध झाली आहेत, अशा दलितवर्गीय तरुणांच्या भावनांचा आविष्कार त्यांच्या लेखांमधून झालेला आहे. त्यांची भाषा लब्धप्रतिष्ठित लोकांना अशिष्ट वाटेल, रुचणार नाही. परंतु भाषा सोज्वळ नाही म्हणून त्यांच्या दु:ख-संतापाचा आविष्कारच होऊ होऊ नये, असे आपण म्हणणार आहोत काय? त्यांची भाषा विशुद्ध कशी होईल याची चिंता, प्रतिष्ठित वर्गांनीच करायची आहे. परंतु तूर्त तरी त्यांच्या भावनांचा आविष्कार पूर्णत्वाने व्हावयाचा असेल तर त्यामध्ये थोडाफार गढूळपणा येणारच. त्याबद्दल आकांडतांडव करून भागणार नाही. प्रश्न आहे तो त्यांच्या प्रक्षुब्ध आणि संतप्त मनाला सांत्वना देण्याचा. त्यांची तोंडे बंद करून आपला कार्यभाग साधणार नाही. त्याने भाषा शुद्ध ठेवण्याचे समाधान लब्ध-प्रतिष्ठितांना लाभेल; परंतु समाजजीवनाचा प्रवाह मात्र अधिकाधिक गढूळ बनत जाईल. दु:ख संतापाचे रसायन समाजाच्या पोटात खदखदत राहील आणि मग त्याचा स्फोट अत्यंत किळसवाण्या पद्धतीने होऊ शकेल. ते नको असेल तर दलितांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत. तथाकथित उच्चवर्णीयांनी त्यांना दूर लोटण्याऐवजी जवळ केले पाहिजे. घटनेने त्यांना मिळालेल्या कायदेशीर हक्कांची पायमल्ली होता उपयोगी नाही. त्यांचे मागासलेपण लक्षात घेऊन त्यांना खास सवलती मिळाल्या पाहिजेत. तसे होईल तरच ते पुढारलेल्यांची बरोबरी कालांतराने करू शकतील. ही जबाबदारी केवळ शासनाची नाही, साऱ्या समाजाची आहे. याच दृष्टीने साने गुरुजी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरप्रवेशाच्या मोहिमेत सतत सांगत, की मला कायदेमंडळातील कायदा नको; हृदयाचा कायदा हवा आहे. दलितांना नोकरी वगैरेंच्या बाबत खास सवलती मिळतात म्हणून तक्रारी करीत राहणे, हा या उच्च समाजातील लोकांचा उद्योग होऊन बसला आहे! गांधीजी म्हणत, भंगी समाजातील एखादी भगिनी राष्ट्रपती होईल तेव्हा मला खरा आनंद होईल! गेल्या पंचवीस वर्षांमध्ये त्या दृष्टीने आम्ही काय दिवे लावले आहेत? स्वत: आपली जबाबदारी पार पाडायची नाही आणि दलितांच्या नावाने खडे फोडायचे, असा हा चावटपणा आता थांबलाच पाहिजे. राष्ट्रध्वजाचा खरा अर्थ काय आहे? ते कशाचे प्रतीक आहे, हे या आरडाओरडा करणाऱ्यांना माहीत असते, तर त्यांनी ही कोल्हेकुई केली नसती.

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही याच ध्वजाखाली लढलो. 26 जानेवारीला दर वर्षी स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली. वाटेल तितका त्याग करावा लागला तरी आम्ही तो करू, पण स्वातंत्र्य मिळवू; सर्व जाती- जमातीच्या लोकांना समानतेची वागणूक देऊ; त्यासाठी नवी समाजव्यवस्था निर्माण करू, अशी अभिवचने आम्ही जनतेला दिली. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये आम्ही दलितवर्गीयांना किती न्याय दिला? सत्याला साक्षी ठेवून बोलायचे झाले तर आम्हांला आमच्या कर्तव्यच्युतीबद्दल लाज वाटायला हवी! ज्या समाजामध्ये त्यांना माणुसकीने वागवले जात नाही, त्यांचा उपयोग नरबळी देण्यासाठी केला गेला तरी उच्चवर्णीयांमध्ये प्रक्षोभ निर्माण होत नाही; परंतु असल्या अमानुष अत्याचारामुळे एखाद्या तरुणाकडून रागाच्या भरात अभद्र शब्द बाहेर पडले, तर प्रचंड हलकल्लोळ मात्र माजतो, हे कशाचे लक्षण? ज्या समाजामध्ये कोट्यवधी लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधोपचाराबद्दल हमी नाही, इतकेच काय; परंतु ज्या दलित समाजातील स्त्रियांची अब्रू भर दिवसा लुटली जाते, अशा समाजव्यवस्थेबद्दल त्यांना आपुलकी का वाटावी? असल्या स्वराज्याचे प्रतीक जो राष्ट्रध्वज, त्याच्याबद्दल रागाच्या भरात अशिष्ट उद्‌गार काढल्याबद्दल आम्ही आकाशपाताळ एक करतो; राष्ट्रध्वजाच्या पावित्र्याचा हवाला देऊन गलिच्छ शिव्याशाप देऊ लागतो, याला काय म्हणावे? बहुसंख्य सवर्ण समाजाकडून जी पापे आणि अत्याचार प्रत्यक्ष घडत आहेत, त्याबद्दल त्यांना जाब कोण विचारणार?

श्री.राजा ढाले यांच्यासारख्या तरुणांच्याकडून घडलेल्या प्रमादाची जाणीव करून देऊन त्यांना अधिक तेजस्वी व कर्तृत्ववान बनवण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये हवे तेवढे आज नाही. ती किमया साने गुरुजीच करू शकले असते. आमच्या अंगी ती कर्तबगारी नाही म्हणून आम्ही इतरांच्या सुरात सूर मिळवावा आणि दलित समाजातील तरुणांचा त्यांना शिव्या देऊन तेजोभंग करावा काय? ते पाप आम्ही कधीही करणार नाही. ते कृत्य साने गुरुजींच्याशी बेइमानी करण्यासारखे आहे. त्यांच्या शिकवणीशी ते विसंगत आहे. तरीही राजा ढालेंसारख्या तरुणांना आम्ही नम्रपणे असे सांगू इच्छितो की, राष्ट्रध्वजाचे प्रचलित समाजव्यवस्थेशी आणि शासनाशी समीकरण बसवण्यामध्ये त्यांच्याकडून चूक होत आहे. राष्ट्रध्वज हे आमच्या ध्येयाचे प्रतीक आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्याचा तो मानबिंदू आहे. सामाजिक व आर्थिक समानतेवर आधारलेला जो नवा समाज आम्हाला निर्माण करावयाचा आहे, त्याचे ते प्रतीक आहे. प्रचलित शासनाचे ते प्रतीक नाही. देश स्वतंत्र झाला नव्हता, तेव्हापासून आम्ही त्याची पूजा बांधीत आलो. स्वातंत्र्याच्या काळात ज्या शौर्य, धैर्य, त्याग इत्यादी गुणांचा आविष्कार झाला, त्याचे रंग या ध्वजाला चढलेले आहेत. शेकडो लोकांनी या झेंड्याने प्रतीत होणाऱ्या ध्येयांसाठी आपल्या पंचप्राणांची आहुती दिली आहे; म्हणूनच आम्ही याला पवित्र मानतो. या झेंड्यासाठीच सर्व जातीजमातींच्या आपल्या हजारो जवानांनी 1962, 65 आणि 71 साली आपले रक्त सांडले, हे विसरून कसे चालेल?

त्या मानचिन्हाबद्दल अभद्र उद्‌गार काढणे, म्हणजे त्या वीरांचाच अवमान करण्यासारखे नाही काय? आम्हाला नम्रपणे असे सांगावयाचे आहे की, या ध्वजामुळे आम्हाला ज्या ध्येयाचा बोध होतो, त्या ध्येयाच्या सिद्धीसाठी आपण पुरुषार्थी बनून लढू या. तुमचा राग, तुमच्या भावना समजून घेण्याला आमची तयारी आहे; तरीपण तुम्हाला जे प्रत्यक्ष भोगावे लागत आहे, त्याची फार फार तर कल्पनाच आम्ही करू शकू. ‘ज्याचे जळे त्याला कळे’ हेच खरे आहे. अनुभूती आणि सहानुभूती यांच्यात काही अंतर राहणार, हे आम्ही जाणतो. पण म्हणूनच, ज्यांना समाजपरिवर्तनाची निकड आहे त्यांनी आपला राग अभद्रपणे व्यक्त करण्यामध्ये आपली शक्ती खर्ची घालू नये. ती जतन करून वाढविली पाहिजे, कारणी लावली पाहिजे. सवर्ण समाजामध्ये देखील दलितांशी समरस होणारे असंख्य लोक आहेत. त्यांना राष्ट्रीय ध्वजाबद्दल नितांत प्रेम आहे. त्यांची सहानुभूती अभद्र शब्दांनी गमवू नका. अन्याय तसाच चालू ठेवू मागणाऱ्यांना अशी फाटाफूट व्हायला हवी आहे. त्या दृष्टीने तुम्ही आपल्या संतापाचा आविष्कार करताना अभद्र शब्द वापरण्याचा मोह शक्य तितका आवरला पाहिजे. तसे केल्याने तुमच्या भावनांना पूर्ण अभिव्यक्ती कदाचित मिळणार नाही; परंतु क्रांतिकार्यातील व्यवहार लक्षात घेऊन, तुम्ही त्याबद्दल खंत मानू नये. साने गुरुजींची ‘साधना’ सदैव दलितांच्या पाठीशीच राहील. त्यांना अंतर देण्यापेक्षा ‘साधना’च्या जीवनाची समाप्ती झाली तरी चालेल. स्वातंत्र्योत्तर काळातील आपले जीवितकार्य ‘साधना’ला आता गवसले आहे. ते पार पाडण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू. मात्र तुमचे सहकार्य आम्हाला मिळाले पाहिजे.

(9 सप्टेंबर 1972 च्या अंकात कार्यकारी विश्वस्त एस.एम.जोशी यांनी लिहिलेला हा लेख आहे.)

पुनर्भेट

साने गुरुजींची साधना

अनिल अवचट

मग एस.एम.ला बोलायला दिले. ते दलित, महात्मा गांधी वगैरे बोलू लागताच, ‘अरे, याला बोलू देऊ नका. पोरांना ते पटलं तर घोटाळा होईल’, असे म्हणून गडबड आणि रेटारेटी सुरू झाली. पोलिसांनी पुढे येऊन मुलांना मागे रेटले. शेवटी शिष्टमंडळ वर न्यायचे आणि बोलणी करायची, असे ठरले. जाताना, ‘त्या एस.एम.ला आणखी थत्त्याला झेंड्यासमोर येऊन नाक घासायला लावा,’ अशी मागणी खालच्या पोरांनी केली. साधनाच्या हॉलमध्ये शब्दाशब्दी सुरू झाली. श्रीकांत शिरोळेनी सांगितले, ‘तुम्ही जे दलितबिलीत म्हणता, त्याचे इथे काही काढू नका. त्यांच्यासाठी आम्ही काय करायचे ते करू. राष्ट्रध्वजाचा अपमान झाला आहे, त्याचे काय? त्याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे.’ एस.एम. म्हणाले, ‘ती माफी यापूर्वीच मागितली आहे, हे तुम्हाला माहीत आहे काय?’ भीम बडदे आणि इतर काही म्हणाले, ‘नाही.’ एसेम म्हणाले, ‘तुम्ही वर्तमानपत्रेसुद्धा वाचत नाही, याला काय म्हणायचे?’

स्वतंत्र भारतातील दलितांची पंचवीस वर्षे

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ऊर्फ स्पृश्यस्तान निर्माण झाले. स्पृश्य लढले. त्यांचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले. अस्पृश्यांची लढाई तेव्हा संपली नव्हती. अजूनही संपली नाही. स्पृश्यांमध्येही दलितांची लढाई लढणारे लोक आहेत आणि दलितांतही दलितांची लढाई न लढणारे लोक आहेत.

दलित मंडळीतील काहींनी आपला स्वाभिमान सिद्ध करण्यासाठी गावातली त्यांच्या वाट्याची कामे आपण होऊन सोडली. उरलेल्यांचे धंदे नव्या औद्योगिक युगात साफ बसले. पर्यायाने एक तर शहरात बेकार भरती, नाही तर खेडेगावात शेतमजुरी करणे दलितांच्या कपाळी आले. एकंदरीत गावातल्या स्पृश्यांच्या पंजात दलित जास्तच अडकला. बौद्ध शिकले, पण बेकार राहिले. इतर दलित शिकलेच नाहीत. बौद्धांच्या नावाने खडे फोडीत राहिले. समाजात ब्राह्मणी संस्कृतीचा पगडा जबरदस्त आहे. बौद्ध तरुणही या प्रभावातून सुटले नाहीत. डॉ.आंबेडकरांनंतरचे नेतृत्व या प्रभावाचे द्योतक आहे. हा अंक स्पृश्य वाचकांसाठी आहे.

यातील सर्व लेख, (एस.एम. जोशी आणि बाबा आढाव वगळता) अस्पृश्य तरुणांनी लिहिलेले आहेत. स्वतंत्र भारतातली खास हवा त्यांनी प्यायलेली आहे. पंचवीस वर्षांत देशाने काय मिळवले, याविषयी अनेक अंक निघत आहेत. औद्योगिक प्रगती, हरित क्रांती, कुटुंब नियोजन इत्यादी विषयांवर सरकारी नौबती झडत आहेत. उत्तुंग इमारतींवर दिव्यांच्या माळा ओघळत आहेत. या सर्व उत्सवाकडे निराळ्या नजरातून पाहणारे असंख्य डोळे या भारतात आहेत याची आठवण व्हावी, हा या अंकाचा उद्देश. स्पृश्यांच्या रौप्यमहोत्सवी आनंदाचा विरस व्हावा ही विनंती.

अनिल अवचट

(15 ऑगस्ट 1972 च्या अंकात कार्यकारी संपादकाने लिहिलेले हे निवेदन आहे.)

साधनाचे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण झाले. भाषणे झाली. ‘नव्या स्वरूपाला घाबरू नका, त्याला वाव द्या.’ अशा सुरांची भाषणे झाली. 15 ऑगस्टच्या अंकाचे कौतुकही झाले. नव्या स्वरूपाचे एवढ्या लवकर रौद्र स्वरूप दिसेल, असे त्या वेळी बोलणाऱ्यांच्या आणि ऐकणाऱ्यांच्या मनातही आले नसेल.

कुठल्याही संस्थेचा रौप्यमहोत्सव आला की, ती संस्था वर्तमानपत्रांना प्रसिद्धीसाठी फोटो-ब्लॉक्ससह मजकूर पाठवीत असते. साधनाला तशी जरुरी पडली नाही. गेले आठ-दहा दिवस रोज चढत्या क्रमाने बातम्या, स्फुटे आणि आता अग्रलेख येत आहेत. सर्व जनतेला साधना नावाचे साप्ताहिक निघते किंवा काहींना ते अजून निघते अशी माहिती रौप्यमहोत्सवानिमित्त मिळाली, हे एक बरेच झाले. या श्रेयाचे मानकरी बरेच आहेत. तूर्त त्यासाठी भांडू नये, हे बरे.

एकंदर प्रसंगाने आपल्या लोकांमध्ये राष्ट्रभक्ती किती ओतप्रोत भरली आहे, हेही समजून आले. आता आपल्या देशाला परचक्राची अजिबात भीती नाही. झाल्या प्रसंगाने आपली शेजारी राष्ट्रेसुद्धा हादरून गेली आहेत. असो.

तर असे हे काही राष्ट्रभक्त तरुण रक्त पुण्यातल्या राहुल थेटरात दुपारी तीन वाजता जमले. त्या वेळेस योगायोगाने राजेश खन्नाचा ‘बावर्ची’ सिनेमा चालू होता. मग नाईलाजाने ते तरुण तिथे बसले. त्या सर्वांची तिकिटेही प्रेमापोटी एकाच माणसाने काढली म्हणतात. त्यांनी सिनेमा कसाबसा पाहिला. नंतर राष्ट्रगीत असते. त्याला उभे न राहता ते बाहेर पडले. केवढी अधीरता! बाहेर पडून त्यांच्या एकदम लक्षात आले की- ‘अरे, साधनात राष्ट्रध्वजाचा अपमान झालाय.’ साधना ही काय भानगड? प्रश्न गैरलागू. अपमान झालाय ना? बस्स. होळी करू. सळसळते तरुण रक्त राहुलसमोरच्या रस्त्यावरून वाहत शेतकी कॉलेज चौकात जाते. अंकाची होळी होते. होळी केली तो साधनाचा अंक होता, असे प्रमुख लोकांचे म्हणणे. पण तो प्रश्न दुय्यम. भावना महत्त्वाची. उद्या साधनावर मोर्चा न्यायचा- हा शेवटी निर्णय.

इकडे पुणे महानगरपालिका पाहा. त्यातले कर्तव्यदक्ष नगरपिते पाहा. अरेच्चा, साधना त्यांच्यापर्यंतही पोहोचली वाटते. काँग्रेसच्या शिवाजी मावळ्यांनी (पूर्वाश्रमी शिवसेना) तहकुबी मांडली. त्यावर भाषणे झडताहेत. ‘आमच्या राष्ट्रध्वजाचा अपमान? हात कलम केले पाहिजेत. चौकात फटके मारले पाहिजेत,’ इत्यादी. भाई वैद्य यांनी ‘हा राष्ट्रध्वजाचा अपमान नसून, दलित तरुणाने व्यक्त केलेली तिडीक आहे’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. पेपर्स गाजू लागले. आज तहकुबी. उद्या होळी. परवा मोर्चा.

मोर्चा गुडलकपाशी जमणार होता. तिथून साधनावर. साधनाच्या आयुष्यातील अभूतपूर्व प्रसंग. मागे लता-हमीद विवाहाच्या वेळी आला होता तेवढाच.

रंगीबेरंगी कपड्यांतली पोरे जमत होती. चलो यार, होळी करेंगे. कसली होळी? कसली कुणास ठावूक! काय घेणे आहे? चम्या म्हणतोय- ‘आपण त्याला शब्द दिलाय, जायला पाहिजे.’ हातात कडी, मनगटावर मोठे कातडी पट्टे. ‘जला दो, जला दो- साधना साप्ताहिक जला दो, यदुनाथ थत्त्याला शासन करा,’ इत्यादी.

मोर्चात दीड-दोनशे मंडळी. एकाला वाटले, साधना नटीनेच राष्ट्रध्वजाचा अपमान केला. तो म्हणाला, ‘सालं, काय नडलं होतं तिला असं करायचं? पण मग हा यदुनाथ थत्ते कोण? जाऊ दे. पुढं बघू काय होतंय ते.’

मोर्चा येणार हे पाहायला साधनासमोरही बरीच गर्दी जमली होती. साधनासमोर पोलीस चौकी आहे. कधी कधी तिथे कोणाला धरून आणले की, खिडकीतून बघायला थोडी गर्दी होते. बाकी एरवी नसते. किंवा समोर वीराचा मारुती आहे तिथे. पण आजची गर्दी वेगळीच. काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता. सायकलवर चालताना एक माणूस थांबला आणि ‘काय भानगड आहे?’ विचारू लागला. सांगितली. आणि विचारले, ‘तुम्हाला काय वाटलं होतं?’ तो म्हणाला, ‘मला वाटलं, काय मयत-बियत झालीये का काय!’

तिकडे मोर्चामध्ये मुलांनी तिरडी तयार केली होती. त्यावर पालथी टोपली, त्याभोवती सायकलचे जुने टायर, एक पोरगा उघडा होऊन डोक्याला रुमाल गुंडाळून चालला होता. त्याच्याभोवती पोरं नाचत होती. तिरडीच्या मागे दोन पोरं चपलांनी वारा घालत चालली होती. आजच्या अभिनव मोर्चाचा आनंद भन्नाटच. मॅटिनी बुडाली, दुःख वाटत नाही. गर्जत-गर्जत मोर्चा साधनापाशी आला. मोर्चात पुढाकार काँग्रेसचे तरुण कॉर्पोरेटर श्रीकांत शिरोळे, जयप्रकाश वाळके, श्री.कपोते आणि जनसंघ युवक आघाडीचे भीम बडदे यांचा. एमईएस कॉलेज आणि अभाविपचीही काही मंडळी दिसत होती. कपोते त्यात असणे साहजिकच, कारण ते पाषाणच्या नेहरू शिक्षण संस्थेच्या संकपाळचे उजवे हात. ट्रस्टी. त्यांना विचारले, ‘तुम्ही कसे काय यात?’ ते म्हणाले, ‘वा! आम्ही यात पहिल्यापासूनच.’ शिरोळे असणे हेही साहजिकच, कारण साधनातील काही लिखाण शिरोळेलाईनला विरोधी जाणारे.

मोर्चा येण्यापूर्वी पोलीस बऱ्याच संख्येने साधनाजवळ जमले होते. अगदी बोळात एक व्हॅन उभी होती. त्यात रायफलधारी पोलीस आणि अश्रुधुराच्या बाटल्या होत्या. तयारी जय्यत होती. एस.एम., यदुनाथ खाली येऊन थांबले होते. एक इन्स्पेक्टर एस.एम.ना म्हणाला, ‘दार लावून घ्या.’ एस.एम. म्हणाले, ‘नको. त्यांना यायचे असले तर खुशाल येऊ द्या. आम्हाला कसली भीती नाही.’

मोर्चा आला. घोषणा सुरू झाल्या. मोर्चाबरोबर दोन राष्ट्रध्वज काठीवर नाचवत आणले होते. ते उभे केले गेले. तिरडी पेटवली गेली. ‘यदुनाथ थत्त्याला खाली आणा,’ अशा घोषणा सुरू झाल्या. थत्ते त्यांच्यासमोरच उभे होते. पोरांना लोकांनी सांगितले की, ‘हे थत्ते.’ तेव्हा त्यांना पटले नाही. कारण घोषणा देऊन-देऊन थत्त्यांची जी इमेज त्यांच्या मनात तयार झाली होती, ती अशी नव्हती.

भाषणे सुरू झाली. ऐकायच्या मन:स्थितीत कोणी नव्हते. पण काही वेळाने भाषणे ऐकू येऊ लागली. श्रीकांत शिरोळे म्हणाले, ‘राष्ट्रध्वजासाठी आम्ही (स्वतःच्या छातीवर हात मारून) या छातीवर गोळ्या झेलल्या आहेत.’ माझ्या माहितीप्रमाणे सत्तेचाळीस साली शिरोळे चार वर्षांचे असतील! या चार वर्षांच्या लहानग्या मुलाने छातीवर गोळ्या झेलल्या असतील, तर त्याचे नाव कसे कुठे झाले नाही? छे, छे! ही चूक सुधारली पाहिजे. ताम्रपटाने भागायचे नाही, इंदिराजींनी त्यांना सुवर्णपटच दिला पाहिजे.

नंतर वाळके- ‘यांना चौकात फटके मारले पाहिजेत. शनिवारवाड्यावर नागवे केले पाहिजे. सरकारने यांना शासन केले नाही तर आम्ही यांना करू. साधना प्रेस आम्ही जाळून टाकू.’

नंतर भीम बडदे- हातात कातडी पट्टा. पीळदार शरीर. हात उभारून भाषण. ‘आमचा राष्ट्रध्वज? अपमान सहन करणार नाही. या झेंड्यासाठी झाशीच्या राणीने... (पुढे झाशीच्या राणीने काय केले हे आठवत नसावे) .. आपले तान्हे मूल रडत असताना लढाई केली.’ (काय हे! मूल रडत होते हा पॉइंट आजवरच्या इतिहासकारांच्या नजरेतून कसा सुटला? राष्ट्रभक्ती जरा कमीच पडते या लोकांची.)

मग एस.एम.ला बोलायला दिले. ते दलित, महात्मा गांधी वगैरे बोलू लागताच, ‘अरे, याला बोलू देऊ नका. पोरांना ते पटलं तर घोटाळा होईल’, असे म्हणून गडबड आणि रेटारेटी सुरू झाली. पोलिसांनी पुढे येऊन मुलांना मागे रेटले. शेवटी शिष्टमंडळ वर न्यायचे आणि बोलणी करायची, असे ठरले. जाताना, ‘त्या एस.एम.ला आणखी थत्त्याला झेंड्यासमोर येऊन नाक घासायला लावा,’ अशी मागणी खालच्या पोरांनी केली.

साधनाच्या हॉलमध्ये शब्दाशब्दी सुरू झाली. श्रीकांत शिरोळेनी सांगितले, ‘तुम्ही जे दलितबिलीत म्हणता, त्याचे इथे काही काढू नका. त्यांच्यासाठी आम्ही काय करायचे ते करू. राष्ट्रध्वजाचा अपमान झाला आहे, त्याचे काय? त्याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे.’ एस.एम. म्हणाले, ‘ती माफी यापूर्वीच मागितली आहे, हे तुम्हाला माहीत आहे काय?’ भीम बडदे आणि इतर काही म्हणाले, ‘नाही.’ एसेम म्हणाले, ‘तुम्ही वर्तमानपत्रेसुद्धा वाचत नाही, याला काय म्हणायचे?’

तेवढ्यात नरुभाऊ लिमये आले. तेव्हा भीम बडदे बोलत होते. ‘असा अपमान आम्ही सहन करणार नाही’ वगैरे. त्याला समजावले की, ‘कोणाला तू हे सांगतोस? एसेमना? अरे, त्यांनी या राष्ट्रध्वजासाठी काय केले, हे माहीत आहे का?’ तो म्हणाला, ‘माहीत आहे. पण म्हणूनच आम्ही म्हणतो की, हा अपमान त्यांनी का केला? आमच्या भावना तुम्हाला समजत नाहीत.’ नरुभाऊ म्हणाले, ‘या भावनाही आपल्याला एसेमनी शिकवल्यात.’ त्यावर भीम म्हणाला, ‘म्हणूनच म्हणतो की, हा अपमान त्यांनी काय म्हणून केला?’

एकंदरीत भीमाचे शरीरच ताठ होते असे नाही, तर डोकेही पीळदारच होते. ‘बरं, मग थत्त्यांनी तरी खाली येऊन झेंड्यापुढे साष्टांग नमस्कार घातला पाहिजे.’ नरुभाऊ म्हणाले, ‘हा त्यांचा अपमान आहे. आपण सर्वच जण खाली जाऊन झेंड्याला नमस्कार करू.’ जाताना एसेमनी शिरोळेला सांगितले की, गांधी म्हणतात की- ‘त्या अस्पृश्य लोकांवर आम्ही इतके जुलूम केले आहेत की, ते आमच्या तोंडावर थुंकले तरी आम्ही काही म्हणता कामा नये.’

शेवटी सर्व खाली गेले. खाली चुळबुळ. काहींच्या तोंडी- थत्त्यांना खाली बोलवा, वाटाघाटी कसल्या करता?

थत्ते पुढे जाताच रेटारेटी झाली. तिरडीची राख कुणी तरी त्यांच्या तोंडाला फासण्याचा प्रयत्न केला. त्याला श्रीकांत शिरोळेने अडविण्याचा प्रयत्नही केला. शिष्टमंडळातले नेते ओरडून सांगायचा प्रयत्न करीत होते. कोणी ऐकत नव्हते. यदुनाथ थत्ते यांनी राष्ट्रध्वजाला एकट्यानेच शिस्तीने प्रणाम केला. काहींनी सुटकेचा नि:श्वास सोडला. काहींना वाटले, राष्ट्रध्वजाला प्रणाम करण्यात गैर काहीच नाही. पण दांडगाईपुढे शरणागती अशा स्वरूपात प्रणाम केला गेला, असे कोणी म्हटले तर त्याचा प्रतिवाद करता येणे कठीण. तेवढ्यात कुणी तरी राष्ट्रगीत म्हटले. सर्व म्हणू लागले. संपल्यावर पांगापांग झाली.

एकंदरीत साधनात धमाल चालली होती. माफ्या, राजीनामे, खुलासे यांची खैरात चालली होती. कुणी म्हणाले, ‘आता आत्महत्याच कमी आहेत.’ रोज कुणी येऊन शिकवून जात असे. एक म्हणाले, ‘राजीनामे द्या. शास्त्रींचे कौतुक कशाला करता? दिलगिरी ही पळपुटेपणाची आहे.’ (शास्त्रींच्या राजीनाम्याने मोठा घोटाळा करून ठेवलाय. जरा कोणी चुकले की, हे उदाहरण देऊन राजीनाम्याची मागणी करता येते.) दुसरे म्हणाले, ‘राजीनामे का दिले? हा पळपुटेपणा आहे.’ या सगळ्यात राजा ढाले कुठे राहिला? पण तो पडला दलित. त्याला उघडपणे ठोकता येत नव्हते. ‘तो लेख खूप लिहील, तुम्ही कसा छापला?’ असे बहुतेकांचे म्हणणे असे.

दुर्गाबार्इंसंबंधीच्या विधानाचेही तेच. कोणी येऊन म्हणे, ‘अरे, या पोरांना (ढाले ग्रुपला) आईच्या मायेने ही बाई वागवते, तिच्याविषयी असे उद्‌गार?’ कोणी म्हणे- ‘काय बिघडले? भंग्याच्याविषयी बोलणाऱ्यांना आपण नाही का म्हणत- की स्वतः खराटा हाती धरून बघा आणि मग बोला.’

माझ्या दृष्टीने दुर्गाबार्इंना ‘वेश्या या वेश्याच राहायला हव्यात’ असे मुळात म्हणायचेच नाही. समाजात आज घटकेला वेश्या आहेत. त्या आमच्या समाजाची गरज भागवीत आहेत. त्यांना हीन समजू नका. त्यांना सोई उपलब्ध करून द्या- असे आहे. अनंत काळपर्यंत वेश्या व्यवस्था राहावी, असे त्यांनी कुठेही म्हटले नाही. पुन्हा दलित आणि वेश्या यांचेही काही समीकरण नाही. असे असता, ‘असे म्हणणाऱ्यांनी स्वतः धंदा का करू नये?’ असा एखाद्या समाजशास्त्रज्ञ स्त्रीला गप्प करणारा प्रश्न विचारणे अन्यायकारक आहे. त्या वाक्यात भागवतबाई असा उल्लेख असल्यामुळे दुर्गा भागवत असे पटकन्‌ ध्यानात आले नाही, म्हणून हा घोटाळा झाला. त्याबद्दल मी दिलगिरी मागितली आहेच.

राष्ट्रध्वजाविषयी कोणी शांतपणे विचार करायला तयार नव्हते. प्रतीके ही माणसांनी माणसांसाठी तयार केली आहेत. वरिष्ठ माणसांनी माणुसकी सोडली तर ज्याच्यावर पिढ्यान्‌पिढ्या जुलूम झाला आहे, त्यांनी त्यांच्या भाषेत निषेध नोंदविला तर काय गैर आहे, हेच कळत नाही. (ढाले आणि त्यांचे मित्र यांची हीच भाषा आहे, हे मला माहीत आहे. त्यांच्या दृष्टीने या शब्दाला आपल्याला वाटतो तितका भयंकरपणा नाही.) भाषा भडक आहे. पण तिच्यात ध्वजाचा अपमान करण्याचा हेतू नाही, असे वाटते. आणि दुसरे असे की, या अंकात या समाजाविषयी अस्पृश्य तरुण काय बोलतात, हेच दाखवायचे होते. दुर्गा भागवतांचा वैयक्तिक उल्लेख गाळायला हवा होता, हे समजू शकते. पण राष्ट्राविषयी आणि समाजाविषयी ते बोललेले आम्ही संपादित केले असते तर, तो दलितांवरचा आणखी एक अत्याचारच ठरला असता.

‘असे शब्द वापरून मूळ जे दुखणे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे, ते पोचत नाही. त्याबाबत दक्षता घ्यायला पाहिजे होती,’ असे त्यांचे म्हणणे होते. एस.एम. म्हणत होते की, ‘दलितांच्या अत्याचाराविरुद्ध लढणारे आणि राष्ट्रध्वजाला पवित्र मानणारे बरेच लोक आहेत, त्यांची आपण माफी मागितली पाहिजे.’ झाल्या प्रकाराला आपण संपादक म्हणून जबाबदार आहोत (जरी नैतिक दृष्ट्या मी जबाबदार असलो तरी), म्हणून यदुनाथजींनी राजीनामा दिला. दिला हा त्यांचा मोठेपणा. पण खऱ्या अर्थाने माझ्यासाठी त्यांना राजीनामा द्यावा लागला. हे मला बरे वाटेना, म्हणून मीही राजीनामा दिला.

अहिल्या आश्रमाचे आवार. इथून दलितांचा मोर्चा निघणार होता. परवाच्या काँग्रेस-जनसंघी मोर्चाच्या स्वरूपामुळे सर्वच जण खडबडून जागे झाले होते. पहिल्या-पहिल्यांदा साधनाविरुद्ध असलेली लोकांची मने आता अनुकूल होऊ लागली होती. एस.एम.सारख्यांना ही मवाली पोरे राष्ट्रध्वजाचे पावित्र्य शिकवतात, हे सर्वसाधारण माणसाला बरे वाटेना. दलित लोकांना तर असे वाटू लागले की, ‘साधना आपले साहित्य प्रसिद्ध करते आणि हे स्पृश्य लोक त्यावर दडपण आणतात.’ म्हणून त्यांनी साधनावर दलितांचा मोर्चा आणायचे जाहीर केले. विशेषतः ‘दडपणाला बळी पडू नका. थत्ते, अवचट यांचे राजीनामे स्वीकारू नका.’ मोर्चात दीड-दोनशे लोक. अरुण शेंडगे हा मातंग, तर जयदेव गायकवाड, सावंत आदी ‘प्रोग्रेसिव्ह स्टुडन्ट्‌स असोसिएशन’ नावाच्या बौद्ध तरुणांच्या संघटनेतले तरुण आणि महात्मा फुले हायस्कूलमधील मुले. शिवाय भीमराव पाटोळे हा मेहतर समाजातला समाजवादी पक्ष कार्यकर्ताही होता. दोन-चार मुलीही. परवासारखीच साधनासमोर गर्दी होती. पण परवाचा ताण नव्हता. कॉर्पोरेटर कल्याणकर, ठकसेन पाडळे आदी मंडळी मोर्चाची वाट पाहत उभी होती. शेवटी मोर्चा आला. त्याचे सभेत रूपांतर झाले. ‘हमारी साधना- नहीं जलेगी, साधना जलानेवाले- सामने आव’ इत्यादी आव्हाने-प्रतिआव्हानेही झाली. भीमराव पाटोळे बोलले की, ‘साधनास जाळायला याल तर आम्ही असंख्य दलित तरुण या चौकात आत्माहुती करायला तयार आहोत.’ कुणी म्हणाले, ‘यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद आहे.’ (मला कळले नाही. कदाचित त्याला स्पृश्य-स्पृश्येतर म्हणायचे असावे) वक्त्यांमध्ये बावडा, ब्राह्मणगाव, नागपूर अशा गावांची नावे हटकून येत. (आपले दुर्दैव असे की, ही यादी वाढतच चालली आहे) जयदेव गायकवाड नावाचा संतप्त बौद्ध तरुण भडकून बोलला, ‘ही साधना आमची आहे. आमचा आवाज उठवीत आहे. ती बंद करणारा जन्माला यायचाय,’ इत्यादी. मधेच ठकसेन पाडळे घुसले आणि बोलले, ‘परवा काँग्रेसवाल्यांची आणि त्यांच्या रांडाची पोरं इथे आली होती.’ सर्वांचे चेहरे असल्या भाषणामुळे पडले. पण थोडक्यात संपले ते बरे झाले. अरुण शेंडगे, अरुण लिमये हेही बोलले.

शेवटी एस.एम. उभे राहिले. ‘साधना ही दलितांचा आवाज उठवायला निघाली आहे. हा आवाज कोणी बंद पाडू शकणार नाही. तुम्ही तिरडी जाळाल, साधना प्रेस जाळाल; पण आमचे विचार तुम्ही जाळू शकणार नाही. एक वेळ साधना बंद पडली तरी चालेल, पण दलितांचा आवाज उठवण्याचे कार्य आम्ही सोडणार नाही.’ मग शेवटी त्यांनी घोषणा केली की, ‘संपादकांचे राजीनामे आम्ही स्वीकारणार नाही.’ यावर टाळ्यांचा कडकडाट. मग पोरांमधून यदुनाथ थत्त्यांची मागणी आली. तेही दोन शब्द बोलले. ‘आपण विश्वस्तांच्या म्हणण्याबाहेर नाही’ असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम संपला. आता सरकारने संपादक व लेखकावर गुन्हा दाखल केला असल्याची वार्ता वर्तमानपत्रात वाचण्यात आली असून, तूर्त पूर्णविराम दिला आहे.

अनिल अवचट, पुणे

aawachat@gmail.com

(9 सप्टेंबर 1972 च्या ‘साधना’ अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.)

पुनर्भेट

दुनाथ थत्ते

सुरेश द्वादशीवार

शस्त्रशक्तीच्या परिणामकारकतेचा मुद्दा आता अण्वस्त्रांनी निकालात काढला असल्यामुळे शस्त्रांनी प्रश्न सुटतात यावरचा माणसांचा विश्वास संपला आहे आणि शस्त्रांना फक्त शब्द हाच पर्याय उरला आहे. यदुनाथांची श्रद्धा अशी की शस्त्रशक्तीचा पर्याय होण्याचे सामर्थ्य शब्दशक्तीत आहे. पण ते सामर्थ्य सिद्ध व मान्य करायचे असेल तर शब्द वापरणाऱ्यांनी अधिक नम्र आणि सावध असले पाहिजे. शब्दसुद्धा तितकेच घातक आणि जीव घेणारे ठरू शकतात. हत्यारांचे भय शरीराला आणि इंद्रियांना असेल, शब्दाचे भय आत्म्याला आणि सनातनाला आहे. पायाखाली येणारे कीड- कीटकदेखील हतप्राय होऊ नये याची काळजी वाहणाऱ्या जैन श्रावकाची ही भूमिका आहे. आधुनिक भाषेत सांगायचे तर हे हृदयपरिवर्तनाचे आवाहन आहे. हृदयपरिवर्तनासाठी त्याला भावेल अशाच शब्दांत विचार यावा लागेल. शब्दांच्या आक्रस्ताळ्या आतषबाजीतून येणारे दीप्तिमान झोत आणि शब्दांच्या समईतून प्रगटणारा मंद प्रकाश या दोहोंचीही जातकुळी एकच. एक दिपवणारी, क्वचित भाजणारी तर दुसरी सातत्याने जीवन उजळणारी.

लहान मुलाने जेवढ्या उत्साहाने अडगळीत पडलेली खेळणी गोळा करावीत, तेवढ्याच जोमाने मिळेल तेथून गुणवत्ता शोधत हिंडण्याचे काम यदुनाथ थत्ते करीत. कर्तृत्व, प्रतिभा आणि मूल्यनिष्ठा या महत्तांएवढाच वाणी, लेखणी, कुंचला या गुणांचा सततचा शोध हे त्या फिरत्या माणसाचे कायमचे वेड होते.

कर्तृत्व आणि गुणवत्ता या लपणाऱ्या गोष्टी नाहीत. त्यांची दखल समाज घेतही असतो. मात्र समाजाची नजर त्याबाबत जरा जडच राहत आली आहे. त्यातून अलीकडच्या काळात या नजरेवर जातिधर्मांचे आणि पक्षविचारांचे रंगीबेरंगी चष्मे आले आहेत. त्यामुळे खूपशी गुणवत्ता बेदखल राहण्याचीच शक्यता वाढली आहे. त्यातून समाजाचे नेतृत्व करतो म्हणणाऱ्यांच्याही अहंता निबर असतात. आपल्याहून पुढे जाऊ शकणाऱ्यांना अनुल्लेखाने, बेदखलीने मारण्याची, पडद्याआड ठेवण्याची पराकाष्ठा या वर्गाकडून चालते. आपण एखाद्याला मोठे म्हटल्यानेच तो मोठा होतो, असा कुरूप आत्मविश्वास काहींच्या ठिकाणी असतो. मग ते तसे म्हणणे शक्यतो टाळत असतात.

नागपूरच्या एका जुन्या दैनिकाच्या थोर संपादकांनी विदर्भातल्या काही संस्था आणि व्यक्तींना आपल्या पत्रातून अजिबात उमटू न देण्याची आपल्या संपादकीय हयातीत शिकस्त केली होती. त्या काळात त्यांचेच वर्तानपत्र विदर्भात चालायचे. मग तेच नेते, तेच विचारवंत, तेच साहित्यिक आणि तेच कर्तृत्वसंपन्न पत्रकार. असे संपादकीय नमुने महाराष्ट्रभूने काही थोडे जन्माला घातले नाहीत. यदुनाथ हा या परंपरेला अपवाद असलेला विचारवंत, पत्रकार आणि कर्तृत्वसंपन्न लेखक होता. ‘तुमची आजवर किती पुस्तके प्रकाशित झाली?’ या माझ्या प्रश्नावर अत्यंत सहजगत्या यदुनाथ म्हणाले, ‘दीडेकशे असावीत.’ त्यात लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांपासून विचारवंतांना मार्गदर्शक ठरणाऱ्या ग्रंथांपर्यंतची पुस्तके होती. मुस्लिम प्रश्नापासून युवकांच्या चळवळींशी संबंध असणारी बरीच अप्रसिद्ध पुस्तकेही त्यात होती. मात्र या माणसाचा मोठा विशेष, माणसे शोधण्याचा, निवडण्याचा, जोडण्याचा आणि त्यांचे कर्तृत्व खुलवण्या-फुलवण्याचा होता. प्रसंगी मागे उभे राहून अशा माणसांची पाठराखण करण्याचाही होता.

महाराष्ट्राला आज ज्ञात असलेली आणि त्याच्या आदर व अभिमानाचा विषय झालेली किती माणसे यदुनाथांनी प्रथम समाजासमोर उभी केली, याची यादी करायची ठरविली तर ती फार मोठी असेल. सगळी श्रेये, ती आपली नव्हेत या वृत्तीने नाकारणाऱ्या यदुनाथांना ती मान्य होणारीही नसेल. थेट आनंदवन आणि बाबा आमटे यांच्यापासून ही यादी सुरू होते. नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई तीत येतात. शरणकुमार लिंबाळे, रझिया पटेल आणि त्यांच्या जोडीला परिवर्तनाच्या चळवळी रुजवत खेड्यापाड्यांत ठाण मांडून बसलेल्या शेकडो लहानमोठ्या कार्यकर्त्यांची नावेही तीत येतात. या यादीतल्या साऱ्यांच्या मनात यदुनाथांविषयीची कृतज्ञता होती. फक्त आपण असे काही केले आहे याचे यदुनाथांनाच स्मरण नव्हते.

अध्यात्माच्या सगळ्या साधनेचे लक्ष्य आपल्यातला ‘मी’ पुसून टाकणे हे आहे आणि अध्यात्माची कोणतीही साधना न करता आपल्यातला मी पुसून टाकणे यदुनाथांना जमले होते. कुणातही मिसळून जाऊन त्यांचे होणे ही सिद्धी त्यांना साधली होती. विचारवंतांसोबतची बैठक असो, नाही तर तरुण शिबिरार्थींचे एखादे चर्चासत्र असो, ते तिथे सर्वांचे आपले असत. चर्चा किंवा वाद करणाऱ्यांची एक नित्य अनुभवाला येणारी गंत अशी की चर्चा वा वादाचा विषय तीत खूपदा गौण होतो आणि त्यात भाग घेणाऱ्यांची व्यक्तिमत्त्वेच महत्त्वाची होतात. विषयाबाबतची आपली बाजू लढविण्यापेक्षा माणसांचा कल आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रभावीपण दुसऱ्यावर ठसविण्याकडे असतो. परिणामी चर्चेचा विषय हरवतो आणि व्यक्तिमत्त्वांचीच दंगल उभी होते. यदुनाथांशी वाद करावा असे ठरवून आलेल्या वा त्यांना वादात ओढू पाहणाऱ्या माणसांची याबाबत नेहमीच एक फसगत व्हायची. आपला वैचारिक आग्रह न सोडता यदुनाथ संथपणे बोलत असत. व्यक्तिगत खुमखुमी घेऊन येणाऱ्यांना मग वाद सुचत नसे. खूपदा येणारा अनुभव असा की वादाला म्हणून आलेला माणूस यदुनाथांचाच विचार वेगळ्या भाषेत त्यांना पटवून देताना दिसे आणि यदुनाथ तो शांतपणे ऐकून घेत असल्याचे पाहून आपण जिंकल्याचे समाधान घेऊन परतही जात असे. अशा वेळी आपल्या विचाराच्या स्वीकाराबरोबर विजयाचे समाधान त्याला मिळवून दिल्याचा संतोष ही यदुनाथांची जमेची बाजू असे. काही काळापूर्वी पुण्यातल्या समाजवादी सुधारकांवर टीका करणारा माझा एक लेख प्रकाशित झाला. त्यात या मंडळींनी महाराष्ट्रात एक फुकटची वैचारिक दहशत उभी केली असल्याचे मी म्हटले होते. यदुनाथ त्याच संप्रदायात वावरणारे. त्यांना त्या लेखाचा राग येईलसे वाटले होते. पण यदुनाथ भेटले तेव्हा शांतपणे म्हणाले, ‘जे थोडे असतात त्यांना दहशतीचाच मार्ग अनुसरावा लागतो.’

साने गुरुजी हे सगळ्या समाजवादी मंडळीचे श्रद्धेचे ठिकाण आहे. यदुनाथ तर गुरुजींच्या अतिशय निकट वावरलेले. गुरुजींच्या अखेरच्या काळात त्यांची साथसोबत केलेले. ‘इस्लामी संस्कृती’ या आपल्या पुस्तकात त्या संस्कृतीच्या सहिष्णुतेची आणि संपन्नतेची महती गुरुजींनी गायिली आहे. मुस्लिम इतिहासाचा अत्यंत चिकित्सक अभ्यास नरहर कुरुंदकरांनी केला होता. या इतिहासात वा संस्कृतीत सहिष्णुता कशी अभावाने आढळते याविषयीची त्यांची मते स्पष्ट होती. बहुधा या पुस्तकावरून यदुनाथांशी आपला वाद होणार ही अटकळ त्यांनी मनात बांधली होती. त्यांनी विषयाला तोंड फोडले. ‘इस्लामी संस्कृतीचं जे स्वरूप गुरुजी सांगतात ते इतिहास म्हणून खरं नाही.’ कुरुंदकरांना शांत करीत यदुनाथ म्हणाले, ‘ते स्वाभाविकच नाही काय? ऐतिहासिक सत्य निर्विकारपणे समजावून सांगणं हा गुरुजींचा पिंडच नव्हे. इस्लामी संस्कृती कशी आहे, यापेक्षा गुरुजींना ती कशी जाणवली याचंच चित्र त्या पुस्तकात उमटलं असणार!’ आपला सगळा आवेग अनाठायीच होता, हे कुरुंदकरांना जाणवले. साने गुरुजींविषयीची केवढीही गाढ श्रद्धा मनात असली तरी त्यांच्या संतमनाचे भाबडेपण आणि त्यामुळे त्याला येणाऱ्या मर्यादा यदुनाथांना अगोदरच ज्ञात होत्या. आपल्या श्रद्धास्थानाचे सामर्थ्य आणि दुबळेपण यांची डोळस जाणीव असणारे मन त्यांना लाभले होते. आपल्या मनात ज्यांच्याविषयी श्रद्धा आहे, त्या थोरांच्या मर्यादा लपवून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. मात्र त्याबाबत त्यांना कठोरही होता आले नाही. त्या मर्यादांच्या मागे असणाऱ्या भावनात्मक अडचणींची चिकित्सा करण्यावरच त्यांचा भर अधिक राहिला. अशा मर्यादांचे समर्थन करण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी कधी केला नाही.

यदुनाथांचा आणि आनंदवनाचा स्नेह अतिशय पुराणा होता. बाबा आमटे त्यांना आपल्या स्वप्नांचा सहोदर म्हणत. त्यांच्या सगळ्या योजना, प्रकल्पांत यदुनाथ आरंभापासून अखेरपर्यंत बरोबरीने भाग घेत. पण तिथेही आपले अस्तित्व पुसून टाकत ते सामान्य कार्यकर्त्याच्या भावनेने वावरत. आनंदवनाच्या एका मित्र मेळाव्याच्या वेळी प्राचार्य राम शेवाळकर आणि मी रात्रीचे गप्पा मारीत एका खोलीत बसलो होतो. बाजूलाच एक पाहुणे तोंडावर पांघरूण घेऊन गाढ झोपी गेलेले दिसत होते. मी जरा चेष्टेच्या सुरात शेवाळकरांना म्हणालो, ‘नानासाहेब, तो स्वप्नांचा सहोदर येऊन दाखल झाला बरं का.’

त्यावर त्या बाजूला झोपी गेलेल्या पाहुण्याने तोंडावरचे पांघरूण दूर करीत म्हटले, ‘हो, आणि तो जागाही आहे बरं का.’ आणि उडालेल्या हशात तेथले सगळे दिलखुलासपणे सामील झाले.

बाबा आमट्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि इम्फाल ते द्वारका अशा काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेत यदुनाथ तिच्या आखणीपासून यात्रेच्या सांगतेपर्यंत अग्रभागी होते. मात्र बाबांनी सरदार सरोवर प्रकरणात घेतलेली भूमिका त्यांना अमान्य होती. त्या भूमिकेला यदुनाथांनी जाहीरपणे विरोध करणे त्या दोघांच्याही जवळ असणाऱ्या कोणालाही आवडणारे नव्हते. या प्रकरणात धरणविरोधकांची केवळ एकच बाजू लोकांपुढे ठेवली जात आहे हे जाणवताच यदुनाथांनी सरदार सरोवर व्हावे, असे गुजराती लोकांना का वाटते हे सांगणारी एक प्रदीर्घ मुलाखतच मला दिली आणि तीत धरणविरोधकांचे सगळे युक्तिवाद उखडून टाकले. पण त्यांचा हा विरोध धरणाबाबतच्या भूमिकेएवढाच मर्यादित राहिला. पुढे एका कविश्रेष्ठाने जेव्हा बाबा आमट्यांनी सरदार सरोवराचा पिच्छा सोडून गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असा सल्ला जाहीररीत्या दिला तेव्हा त्याला उत्तर देताना यदुनाथांनी लिहिले, ‘सगळी कामे एकट्या बाबांनीच का करावीत? त्यांतली काही तुम्हीही का करू नयेत?’ वैचारिक भूमिकांबाबतचा हा संयम सांभाळणे अनेकांना अवघड होते. त्यासाठी आयुष्यभराच्या व्रतस्थतेचा रियाज लागतो. यदुनाथांनी आपल्या जन्मभराच्या भटकंतीत तो सांभाळला होता. नाही तर माणसांना नशेसारख्याच भूमिकाही चढत असतात. यदुनाथांना लोकप्रियताही कधी चढल्याचे कोणाला दिसले नाही. आक्रमक होणे ही त्यांची प्रकृती नव्हती. ठामपणा हा मात्र त्यांचा स्वभाव होता. त्या ठामपणाला प्रसन्नतेची जोड होती आणि त्या प्रसन्न ठामपणाचा संबंध विचारांशी होता, अहंतेशी नव्हता.

गाडीत भेटावे आणि एखाद्याशी ओळख व्हावी, पुढे तिचे ममत्वात रूपांतर व्हावे आणि आकस्मिक भेटलेला हा माणूस आपल्या आयुष्याचा भाग बनावा तसे यदुनाथ नकळत आयुष्यात येत आणि कायम मुक्कामाला राहत. त्या राहण्यात पाहूणपणाचा उपचार नसे. घरच्या माणसाचे आपलेपण असे. ‘तू खूप दिवसांत काही लिहिलं नाहीस’ असा मला तगादा करतानाच, ते माझ्या पत्नीला म्हणत, ‘काय करतो आताशा हा रिकाम्या वेळात? जरा त्याच्याकडून लिहून घे.’ नेमाने पत्र पाठवीत. मी उत्तराचा कंटाळा केला तरी त्यांची पत्रे येतच राहत. त्यातून सोबतीचा, पाठिंब्याचा दिलासा मिळत राही.

यदुनाथ थत्त्यांचे व्यक्तिमत्त्व गर्दीत हरवणारे होते. खादीच्या जाड्याभरड्या कपड्यातील हा साधा माणूस आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्नही करीत नसे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती कोणते तेजोवलय वा दीप्तिमान आभा नव्हती. आणीबाणीच्या परीक्षापर्वात त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाजूने जो एकाकी लढा दिला त्यामुळे त्यांच्याभोवती काही काळ असे वलय उभे राहिल्याचे महाराष्ट्राने पाहिले. आणीबाणीच्या दमनचक्रापुढे अनेक गर्जणाऱ्या तोफा थंड पडल्या. स्वातंत्र्य, समतेच्या नावाने एरव्ही भीमदेवी थाटात बोलणारे व लिहिणारे, आणीबाणीचे आणि त्या काळातील दमनाचे स्तुतिपाठक बनलेले महाराष्ट्राने पाहिले. विरोधक म्हणविणाऱ्यांनी तडजोडीच्या शहाण्या जागा शोधल्या आणि भल्याभल्यांनी शरणागतीची पांढरी निशाणे हलविली. या काळात तुरुंगाबाहेरच्या मुक्या निषेधाला वाचा देण्याचे काम साऱ्या मराठी मुलखात ज्या थोड्या माणसांनी केले त्यात यदुनाथ थत्ते साऱ्यांच्या पुढे होते.

हे करायला त्यांना कोणी सांगितले नाही. ते करणे हा त्यांचा प्रकृतिधर्म होता. आयुष्यभर जी ध्येये प्राणपणाने जपली, त्यांच्यावरच्या संकटाच्या वेळी उभारावयाचा संघर्षही प्राणपणानेच लढवावा लागतो. त्यासाठी व्यक्तिजीवनच नव्हे तर प्रसंगी संस्थांचे जीवनही धोक्यात घालावे लागते. ज्या संस्था ध्येयांसाठी जन्माला येतात त्या आपल्या मूळ प्रेरणांपायी खर्ची पडल्या तरी चालतील. मूळ ध्येयवाद वाऱ्यावर सोडून संस्था सांभाळणाऱ्यांनी मुत्सद्देगिरीची टिमकी मिरवायची असते, पराक्रमावर हक्क सांगायचा नसतो. ‘साधना’ साप्ताहिकाच्या प्रत्येक अंकावर त्या काळात बंदी यायची. सरकार जमानत म्हणून मोठी रक्कम मागायचे. स्वातंत्र्यावर मनापासून प्रेम करणारी माणसे ही रक्कम दर हप्त्याला यदुनाथांच्या स्वाधीन करीत. साधना बंद पडले तेव्हा ‘जनता’ सुरू झाले आणि ‘जनता’वर बंदी आली तेव्हा आणखी नवे नाव घेऊन ते पत्र पुन्हा प्रकाशित झाले. यदुनाथांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी जो लढा आणीबाणीत दिला त्याचा गौरव करताना पु.ल. म्हणाले, ‘संपादक म्हणून जे दिव्य लोकमान्यांनी केले तेच नंतरच्या काळात यदुनाथने पत्करले.’

यदुनाथांनी नंतर अल्पावधीत हे वलय मिटवून टाकले आणि सामान्य कार्यकर्त्यांत व आपल्यात येऊ पाहणारे अंतर प्रयत्नपूर्वक नाहीसे केले. असामान्यांच्या मोठेपणाचे आकर्षण त्यांनाही होतेच. असामान्य व्यक्तीविषयीचा श्रद्धाभावही त्यांच्या मनात होता. मात्र अनेक मोठ्या माणसांचा एक विशेष असा की त्यांचे मोठेपण इतरांना ओझ्यासारखे सतत वाहावे लागत असते. त्यांतल्या अनेकांना हे असे दुसऱ्यांच्या खांद्यावरच्या पालखीतून मिरवणे मानवतही असते. आपल्या मोठेपणाचे ओझे कोणालाही जाणवायला नको असेल तर ते अगोदर स्वतःच्या अंगावरून उतरून ठेवावे लागते. ते तसे उतरवून ठेवण्याची असामान्य कलाच यदुनाथांना अवगत होती. उपचाराचे अंतर एकदा संपले की यदुनाथ दूरचे राहत नसत आणि मग त्यांचे मोठेपणही उरत नसे. ते प्रत्येकाशी त्याच्या पातळीवरून बोलत आणि तसेच वागत. मग यदुनाथ सगळ्यांचे मित्र होत. साधना नावाच्या भारदस्त पत्राचा इतिहास घडविणारा संपादक, आंतरभारतीचा महत्त्वाचा आधार, महाराष्ट्रापासून मणिपूरपर्यंत पसरलेल्या शेकडो युवक चळवळींचा मार्गदर्शक प्रणेता आणि शेकडो पुस्तकांचा लेखक इ...इ.. सगळे विस्मृतीत जाई. फक्त यदुनाथच तेवढे मागे उरत.

यदुनाथ जेवढे साधे दिसत तेवढ्याच साधेपणी ते बोलत अन्‌ लिहीतही. त्यांच्या वाणीला आणि लेखणीला अलंकारांचा सोडा, साध्या तेल-पावडरीचाही सोस नव्हता. तरीही त्यांचे बोलणे प्रभावी होते. त्यांचा सहजसाधा शब्द थेट काळजापर्यंत जायचा. हा माणूस हातचे राखून बोलत वा लिहीत नव्हता. साधे पत्र लिहावे तेवढ्या साधेपणी पुस्तकाचा मजकूर ते लिहीत अन्‌ तेवढ्याच सहजपणे तो हातावेगळा करीत. पण साधेपणाच दुर्मिळ होत असलेल्या या काळात त्यांच्या या अलंकारशून्य सहजतेत निखळ माणुसकीचा साक्षात्कार व्हायचा आणि श्रोते त्यांच्या व्याख्यानात तल्लीन व्हायचे. त्यांनी सांगितलेले सारे ऐकायचे अन्‌ त्यांनी गायला सांगितले तर ते गायचेदेखील.

प्राथमिक शिक्षकांच्या एका राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्‌घाटन त्यांनी केले. अधिवेशनाच्या मंडपात पंधरा हजारांवर शिक्षक जमले होते. व्यासपीठावर मंत्री, अधिकारी, विचारवंत, समाजसेवक अशी गर्दी. यदुनाथांनी व्याख्यानाच्या मध्येच एक कोरस म्हणायला सुरुवात केली आणि सगळ्या अधिवेशनाला आपल्या मागून ते म्हणायला सांगितले. मला क्षणभर भीती वाटली. यदुनाथांचा आवाज गायकाचा नव्हता. त्याला गोडव्याचा फारसा स्पर्शही नव्हता. आपल्या सहजसाध्या आवाजात श्लोक म्हणावा तसे त्यांनी कोरस म्हटले आणि तिथल्या प्रत्येकाने ते त्यांच्या मागून म्हणत सारा मंडप दणाणून टाकला. एका शाळेच्या स्नेहसंमेलनात मुलांना उद्देशून ते म्हणाले, ‘भारत हा माझा देश आहे, असं रोज म्हणता ना? मग तो असा दरिद्री, अर्धपोटी आणि बेकार का, हे आपण स्वतःला विचारणार की नाही? सगळे भारतीय माझे बांधव म्हणता तर मग हा हिंदू, हा मुसलमान, हा दलित, हा उच्चवर्णीय असा प्रश्न आपल्याला पडतो की नाही?...’ ती सगळी चिमुकली प्रजा यदुनाथांच्या प्रश्नांनी अंतर्मुख आणि हतबल होऊन गेली. या कमावलेल्या, जोपासलेल्या विनम्र साधेपणामागे साधुगिरीचा सोस नव्हता. साऱ्यांना जवळचे वाटावे हाही हव्यास नव्हता. त्यामागे अत्यंत विचारपूर्वक स्वीकारलेली एक व्यापक बैठक होती. मानवी जीवनाचे अत्युच्च विकसन म्हणजे विचारांचे शासन होय, अशी यदुनाथांची धारणा होती. जेव्हा दंडशासनाची जागा विचारांचे शासन घेईल तेव्हा मानवी संस्कृती ही विकासाच्या सर्वोच्च अवस्थेला पोहोचलेली असेल. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची चिंता वाहणाऱ्यांना हे आवाहन सतत डोळ्यांसमोर ठेवावे लागेल. शस्त्रशक्तीच्या परिणामकारकतेचा मुद्दा आता अण्वस्त्रांनी निकालात काढला असल्यामुळे शस्त्रांनी प्रश्न सुटतात यावरचा माणसांचा विश्वास संपला आहे आणि शस्त्रांना फक्त शब्द हाच पर्याय उरला आहे.

यदुनाथांची श्रद्धा अशी की शस्त्रशक्तीचा पर्याय होण्याचे सामर्थ्य शब्दशक्तीत आहे. पण ते सामर्थ्य सिद्ध व मान्य करायचे असेल तर शब्द वापरणाऱ्यांनी अधिक नम्र आणि सावध असले पाहिजे. शब्दसुद्धा तितकेच घातक आणि जीव घेणारे ठरू शकतात. हत्यारांचे भय शरीराला आणि इंद्रियांना असेल, शब्दाचे भय आत्म्याला आणि सनातनाला आहे. पायाखाली येणारे कीड-कीटकदेखील हतप्राय होऊ नये याची काळजी वाहणाऱ्या जैन श्रावकाची ही भूमिका आहे. आधुनिक भाषेत सांगायचे तर हे हृदयपरिवर्तनाचे आवाहन आहे. हृदयपरिवर्तनासाठी त्याला भावेल अशाच शब्दांत विचार यावा लागेल. शब्दांच्या आक्रस्ताळ्या आतषबाजीतून येणारे दीप्तिमान झोत आणि शब्दांच्या समईतून प्रगटणारा मंद प्रकाश या दोहोंचीही जातकुळी एकच. एक दिपवणारी, क्वचित भाजणारी तर दुसरी सातत्याने जीवन उजळणारी, मंगलमय. रूसो म्हणाला होता, ‘तुमच्या एकाही शब्दाशी मी सहमत नसलो तरी तुमचे म्हणणे मांडण्याचा तुमचा अधिकार कायम रहावा म्हणून मी लढायला मागेपुढे पाहणार नाही.’ ही भूमिका वैज्ञानिक आहे आणि कोणताही वैज्ञानिक आपल्याला अंतिम सत्य गवसले असल्याचा दावा करीत नाही. आजची कल्पना हे उद्याचे सत्य ठरू शकते आणि आजचे सत्य हा सत्यशोधनाच्या मार्गावरील फक्त एक टप्पाच ठरू शकतो. सापेक्ष सत्याच्या आधारे प्रयोग करीत राहणे आणि प्रयोगांती नवे सत्य समोर आले तर त्याचा उमदेपणाने स्वीकार करणे ही वैज्ञानिक भूमिका आहे.

यदुनाथ विज्ञानाचे विद्यार्थी होते आणि विज्ञाननिष्ठा हे त्यांचे जीवनव्रत होते. ज्ञान हा अनंतकाळापर्यंत वाहणारा सनातन प्रवाह आहे. तो कोणत्याही ग्रंथापाशी थांबत नाही व गुरू केवढाही मोठा असला तरी तो ज्ञानाचा पूर्णविराम ठरत नाही, ही विज्ञाननिष्ठ मनाची भूमिका आहे. म्हणूनच ‘जगातील सगळी ग्रंथालये जाळून टाका; कारण सगळे ज्ञान कुराणात आले आहे,’ ही मागणी या मनाला जशी मान्य होणार नाही तसे ‘सगळे ज्ञान वेदांत आले असल्याने त्यावरच्या निष्ठाच तेवढ्या अंतिम सत्याप्रत नेणाऱ्या आहेत’ ही श्रद्धाही त्याला भावणारी नाही. व्यास आणि बुद्ध हे ज्ञानाचे पूर्णविराम नाहीत आणि मार्क्स आणि गांधींजवळही ज्ञानाचा प्रवाह थांबणारा नाही. आपल्या श्रद्धास्थानांना ज्ञानाचे अंतिम निकष मानून थांबणारे लोक ज्ञान वाढवीत नाहीत. आपापल्या श्रद्धास्थानांचे ते फक्त देव्हारे माजवीत असतात. त्यात ज्ञानोपासनेपेक्षा महंतगिरीच बलवत्तर असते. कोणताही विज्ञाननिष्ठ माणूस अशा महंतगिरीचा उपासक असणार नाही. गुलाल उधळला काय आणि नीळ उधळली काय, अखेर दोन्हींतल्या अंधश्रद्धेचे कूळ एकच असणार.

यदुनाथ थत्त्यांची विज्ञानोपासना अशी खणखणीत बुद्धिवादाच्या अधिष्ठानावर उभी होती. आठव्या शतकातल्या क्युरेश जमातीतले काही प्रश्न निकालात काढण्यासाठी सलिवुल्ला वसल्लम महंमद पैगंबर काही सुधारणा सुचवितात. तो काळ धर्माच्या भाषेत बोलणारा असल्यामुळे आपला विचार तो धर्माच्या परिभाषेत सांगतो आणि हाडामांसाच्या माणसाचे म्हणणे कुणी ऐकत नाही म्हणून हा विचार अल्लाने आपल्या दूतांकरवी माझ्यापर्यंत पोहोचविला असे म्हणतो व त्यातून इस्लामचा जन्म होतो. इसवी सन पूर्व सहाव्या शतकातल्या वैदिक धर्मातील हिंसाचाराला विरोध करण्यासाठी त्या हिंसे मागच्या प्रेरणांनाच सिद्धार्थ आव्हान देतो. हे आव्हान तेव्हाच्या धर्माच्या परिभाषेत येते. ते बुद्धमुखातून येते आणि नव्या धर्माचे प्रवर्तन सुरू होते.

तत्कालीन समाजाचे प्रश्न सोडविण्याचा तत्कालीन भाषेतून झालेला प्रयत्न हे सर्व धर्मांचे जन्मकारण आहे आणि तसेच ते समजून घेतले पाहिजे. विसाव्या शतकाचे निकष जसे पैगंबराच्या किंवा बुद्धाच्या काळाला लावता येत नाहीत तसे कुराण व स्मृतींच्या कायद्याच्या आधारे विसाव्या शतकातले प्रश्नही सोडविता येणार नाहीत. हा विज्ञाननिष्ठ बुद्धिवादातून साकारणारा सेक्युलॅरिझम आहे. यदुनाथ अशा सेक्युलर विचाराचे कृतिशील कार्यकर्ते होते. ‘एक गाव एक पाणवठा’ ही बाबा आढावांची चळवळ असेल किंवा मुस्लिम सुधारणावादाचा हमीद दलवार्इंचा भव्य प्रयत्न असेल, यदुनाथ अशा कामांचे दायित्व स्वतःहून शिरावर घेत आणि आपले काम म्हणून त्यासाठी झिजत. मात्र करड्या बुद्धिवादाने वा चिकित्सक सेक्युलॅरिझमने यदुनाथांना रूक्ष किंवा कोरडे बनविले नाही. जीवनातील ऋजुता आणि गोडवा यांच्याशी आपले नाते त्यांनी तेवढ्याच हळुवारपणे जपले. म्हणून लहान मुलांसाठी त्यांना समजेल, रुचेल, पचेल अशा भाषेत पुस्तके लिहिणे त्यांना जमले. साहित्य संमेलनांधून उद्याच्या या वाचकांचा म्हणजे बाल वाचकांचा विचार होत नाही याचा त्यांना राग यायचा आणि तरुण मुलामुलींच्या मनांची जपणूकही त्यांना साधायची.

बुद्धिवादाने त्यांना अश्रद्ध बनविले नाही, उलट त्यांच्या जीवनातील सगळ्या श्रद्धा बुद्धिवादाने डोळस केल्या. व्यक्तिपूजेचे स्तोम न माजविणारे ममत्व त्यांना साधले आणि त्या ममत्वाला आपल्या चिकित्साबुद्धीवर मात करू न देणारा आत्मसंयमही त्यांना जमला. मराठी बुद्धिवादाला अलिकडच्या काही दशकांत अहंतेचा विकार जडला आहे. इथला प्रत्येक बुद्धिवादी हा एक स्वतंत्र तिरशिंगराव आहे आणि इतरांकडे पुरेशा तुच्छतेने पाहणारा तुच्छतावादीही आहे. आपला बुद्धिवाद सतत गर्जून सांगणाऱ्या अनेकांची एक आणखीही गंमत असते. त्यांच्या बुद्धिवादात त्यांच्या स्वतःच्या बुद्धीखेरीज इतरांच्या बुद्धीला मान नसतो. अशी तापदायक माणसे आपल्या बुद्धीच्या बेटांवर एकेकटीच आरामात राहतात आणि इतर कोणी आपल्याजवळ येणार नाही अशी स्वतःच व्यवस्थाही करतात. यदुनाथांचा बुद्धिवाद असा स्वयंकेद्री नव्हता. मुळात त्यांचा प्रयासच स्वतःचे असे केंद्र मोडीत काढण्याचा होता. म्हणून त्यांचा बुद्धिवाद खुपणारा नव्हता, तो माणसे जोडणारा होता. यदुनाथांच्या पायात अखंड घुमणारे एक चक्रीवादळ होते. ते त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यांतून सतत घुमवीत होते. माणसे, प्रेरणा, संस्था आणि स्वप्ने दाखवीत होते. या देशाच्या भविष्याचे अंकुर जपत, फुलवत आणि वाढवत यदुनाथ देशाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्यापर्यंत अखंडपणे फिरत. त्यासाठी त्यांना बोलवावे लागत नसे. त्या अंकुरांचा सुवास थेट त्यांच्यापर्यंत निमंत्रणासारखा पोहोचत असे.

कोणत्याही ‘आदरणीय’ शब्दाच्या वाट्याला अवमूल्यनाखेरीज काही येऊ नये असा हा दुर्दैवी काळ आहे. या काळात मूल्यनिष्ठा हा खरे तर जाणकारांच्या कुचाळीचा आणि उपहासाचा विषय. अशा वेळी मूल्यांवरची ज्याची निष्ठा प्रामाणिक असेल त्याला दरक्षणी आपल्या सच्चाईची किंमत चुकवावी लागते आणि चुकवता आली नाही तर तिच्या कर्जाचे ओझे आयुष्यभर अंगावर वागवावे लागते. यदुनाथ थत्ते हा माणूस हे मोल चुकवीत होता आणि ते चुकविल्यानंतर त्याचा भार अभिमानाने ओढतही होता. अशा माणसाला कसलीही जाहिरात न करता अपरिग्रहाचे व्रत घ्यावे लागते आणि त्याची उपासनाही आयुष्यभर करावी लागते. यदुनाथांना आयुष्याच्या उत्तरार्धात घर मिळाले तेही पत्रकारांसाठी कॉलनी झाली त्यात. त्यातले श्रीमंतीचे एकमेव लक्षण त्यांच्याजवळच्या ग्रंथांच्या संग्रहाचे.

फिरत जगणे ही यदुनाथांची साधना. या साधनेचेच त्यांना वेड राहिले. त्यापुढे साध्याचा मोहदेखील त्यांना कधी थांबवू शकला नाही. ते ज्यांना श्रद्धास्थानी मानत त्या गांधींनीही म्हटले होते, ‘साधनांची काळजी करणेच तेवढे आपल्या हाती असते.’ माणसे जोडत हिंडणाऱ्या यदुनाथांची माणसे हीच मिळकत आणि श्रीमंती होती. त्यासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टांची माहिती ज्यांना आहे त्यांनाच तिचे मोल कळणारे आहे. मतभेद मान्य, पण मतभेद करणाऱ्या माणसाचा दुरावा अमान्य, असा हा ध्यास आहे. एखादे माणूस तुटले आणि दूर गेले की त्यातून येणारे रितेपण अशा माणसांना सतत छळत असते. शिवाय ही गोष्ट त्यांच्यापुरती मर्यादितही नसते. आपण आपल्या मानलेल्या माणसांनी एकमेकांपासून दूर झालेलेही त्यांना चालत नसते.

यदुनाथांना जीवनाची चांगली बाजूच तेवढी पाहता आली. माणसांचे विकार माणूस म्हणून क्षम्य असल्याचे मत त्यांनी अभ्यासपूर्वक बनवले होते. म्हणून महात्म्यांनाही क्षुद्र होताना पाहून त्यांना त्याचा धक्का बसत नसे. ‘अरे, शेवटी मोठा झाला तरी तो माणूसच’ असा त्यांचा अभिप्राय असे आणि ‘त्याचे विकार त्याच्यापाशी, तुला आणि मला त्याची चांगली बाजूच महत्त्वाची वाटली पाहिजे,’ हा वर उपदेश. जीवनाकडे पाहण्याचा विधायक वगैरे म्हणतात तो हाच दृष्टिकोन असावा. गांधी ज्याला सत्याग्रहाची साधना म्हणायचे तीही हीच असावी. त्यांच्यासोबत पंजाबच्या दहशतग्रस्त ग्रामीण भागातून फिरत असतानाची गोष्ट. अमृतसरजवळच्या तरणतारण या शिखांच्या पवित्र क्षेत्री त्यांचा मुक्काम होता. तेथे मी त्यांना भेटलो आणि मग फतेहाबाद, अमृतसर, वाघा, बियास, फिरोजपूर, होशियारपूर अशी आमची फिरस्ती सुरू झाली. प्रत्येक गावात अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराधांच्या कुटुंबात आम्ही जात होतो. त्यांचे सांत्वन करणे आमच्या ताकदीबाहेरचे होते. पण त्यांना मिळणारी सरकारी मदत वेळच्यावेळी आणि पुरेशी मिळते की नाही, त्यातल्या अडचणी कोणत्या याची माहिती आम्ही घेत होतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगत होतो. मला हा तात्पुरत्या मलमपट्टीचा व आमच्याच मानसिक समाधानाचा उपक्रम वाटत होता. त्यातून कोणताही मूळ प्रश्न निकाली निघत नाही असे वाटत होते. एकदा मी हे यदुनाथांना सांगितले तेव्हा ते शांतपणे म्हणाले, ‘जे प्रश्न सरकारांना सोडवता येत नाहीत ते आपल्या हाती निकालात निघावेत ही आकांक्षा बाळगणे हेच मुळात चुकीचे.’

मी म्हणालो, ‘मग आपल्या पायपिटीला अर्थ कोणता?’ यदुनाथ म्हणाले, ‘यातून आपण काही शिकलो की नाही? जे शिकलो ती उपलब्धी. आपल्या प्रयत्नांनी इतरांची जाण किती वाढते याहूनही आपली जाणीव विस्तारते की नाही हे पाहणे महत्त्वाचे.’

गांधी म्हणाले होते, ‘सत्याग्रह कोणाही विरुद्ध नसतो, कशाही विरुद्ध नसतो आणि काही मिळवायचे म्हणूनही नसतो. तो आत्मसामर्थ्य वाढविण्याचा मार्ग आहे.’ यदुनाथजींची आयुष्यभराची पायपीट ही गांधीजींचा असा सत्याग्रही होण्याची होती. याच दौऱ्यात एकदा मी त्यांना चेष्टेने विचारले, ‘पंजाबच्या भूीवर शहीद-बिहीद होण्याचं तर तुमच्या मनात नाही?’ त्यावर प्रसन्न हसत ते म्हणाले, ‘खुळा की काय, अरे आपल्यावर गोळी झाडायला अतिरेक्यांना वेडबिड लागलं का? आपली गोळी कोणावरही वाया दवडू नये एवढं त्यांना चांगलं समजतं!’

यदुनाथ फिरत राहिले. तरुणांना भेटत अन्‌ बोलत राहिले. मित्र जमवण्याचे व्यसन त्यांनी अखेरपर्यंत जोपासले. कोणतीही ठोकळेबाज विचारसरणी न सांगता ते स्वतंत्र विचारांचे मार्ग सांगत राहिले. माझ्या स्वभावापायी यदुनाथांसारखी माणसे नुसतीच जोडणे मला जमले नाही. पण मला अंतरलेली माणसे पुन्हा माझ्याजवळ आणण्यासाठी त्यांची झालेली घालमेल मी पाहिली आहे. आपल्या विस्तारलेल्या परिवारातली माणसे नेहमी भेटावीत, त्यांचे परस्पर सौहार्द कायम असावे आणि आपण जसे एखाद्याला प्रोत्साहनाने फुलवतो तसे त्यांनीही करावे ही त्यांची इच्छा असे.

एखाद्या लहानशा स्टेशनावर अंधाऱ्या रात्री गाडी थांबते. तिथल्या अपुऱ्या प्रकाशात हाती रॉकेलचा उंच दिवा घेऊन एक कामगार गाडीच्या चाकांवर ठोके देऊन जातो. त्याच्या एका हाती तेलाचा कॅन असतो. जिथे गरज असेल तिथे त्या कॅनमधले तेल घालत तो गाडीचा पुढला प्रवास सुखाचा करतो. यदुनाथ थत्त्यांची आठवण झाली की मला रात्रीच्या काळोखात गाडीच्या चाकांत तेल ओतणारा तो माणूस आठवतो. सगळ्या भविष्याची वाटचाल सोपी करणारी अशी माणसे हीच समाजाच्या निर्धास्तपणाची हमी असते आणि अशी माणसे आपल्याजवळची असणे हा आपल्याला लाभलेल्या आशीर्वादाचा भाग असतो. केव्हाही येणारा असा माणूस आपल्या मनातला सगळा कुंदपणा घालवणारा, त्यात प्रकाशकणांची पेरणी करणारा आणि आला तसाच नकळत निघून जाणारा असतो.

सुरेश द्वादशीवार, नागपूर

sdwadashiwar@gmail.com

(2010 मध्ये ‘तारांगण’ सदरात प्रसिद्ध झालेला हा लेख आहे.)

मुलाखत

1972 पर्यंतचे राजा ढाले

(संवादक : मनोहर जाधव, मंगेश नारायणराव काळे)

राजा ढाले

आणि नामदेवनं माझ्यावर आणलेली दुसरी बिलामत म्हणजे त्याच्या ‘गोलपीठा’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचा प्रसंग. घड्याळाचे काटे सहावर सरकले आणि तो प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला. ताडदेवचा ताटकळलेला रुसी मोदी हॉल अस्वस्थ झाला. मंचावर सगळे निमंत्रित भाष्यकार आणि अध्यक्ष उपस्थित होते. प्रकाशक नारायण आठवले आणि नामदेव ढसाळ, विजय तेंडुलकर यांची वाट पाहत होते. इतक्यात नामदेव ढसाळ मंचावरून उतरून थेट शेवटी बसलेल्या मी व गुर्जरापर्यंत आले. तशा सभागृहातल्या सगळ्या माना गर्रकन मागे वळल्या. नामदेव मला हाताला धरून उठवीत होता. आणि मी त्याला सांगत होतो की, मी नियोजित वक्ता नाही आणि मी वर येणार नाही. परंतु सभागृहातल्या सगळ्या नजरा माझ्यावर खिळल्यावर मला ऑकवर्ड वाटले आणि मी उठत उठत त्याला अट घातली की, मी सगळ्यात शेवटी बोलेन. नामदेवनं ते मान्य केलं आणि शेवटी भयानक नाट्य घडलं.

मनोहर जाधव : आपली ओळख एका वाक्यात सांगायची झाली तर काय सांगाल?

राजा ढाले : बुद्ध-कबीरापासून फुले-आंबेडकर यांच्यापर्यंत चालत आलेल्या मानव मुक्तीच्या लढ्यातील एक अत्यंत सामान्य, पण सचोटीने आणि अटीतटीने लढणारा मी एक सैनिक आहे.

जाधव : तुम्ही या चळवळीकडे कसे काय आलात?

ढाले : अहो, ते माझ्या रक्तातच आहे. हे माझे ‘ढाले’ हे आडनावच सांगेल. आणि ते मिलिटरीशी संबंधित आहे. ‘ढाले’ म्हणजे बिनीचा सैनिक. हे ‘ढाले’ प्राचीन काळी किल्ल्यात राहात असतं. आणि या गडकिल्ल्याचे अहोरात्र संरक्षण करीत असतं. आता ही ‘ढाल’ म्हणजे ढालतलवारीतली ढाल नव्हे तर किल्ल्यावर फडकणारा भला मोठा ध्वज. त्याचप्रमाणे युद्धाच्या आघाडीवर असा ध्वज घेऊन उभे असलेले लोक. मेलो तरी बेहत्तर, पण ध्वज खाली पडू देणार नाही हे त्यांचे ब्रीद. एक गडी घायाळ झाला की त्याची जागा दुसऱ्याने त्वरेने घ्यायची, पण ध्वज खाली पडू द्यायचा नाही. तो वरच्यावर झेलायचा. कारण ध्वज खाली पडणे हे पराभवाचे लक्षण होय. ते सगळे पहिल्या रांगेतले लोक म्हणजे ‘ढाले’

जाधव : आपण विद्यार्थीदशेपासून आंबेडकरी चळवळीत आहात..

ढाले : होय. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्राणज्योत अचानक मावळली. त्यांचे परिनिर्वाण झाले. त्यावेळी मी नववीत शिकत होतो. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही वरळीमधील विद्यार्थी वर्गाची संघटना स्थापन करून सभा आयोजित केली. तिचा संघटक व चिटणीस म्हणून मी तेव्हा चोख भूमिका बजावली. ती सभा मे 1957 मध्ये पार पडली आणि प्रचंड यशस्वी झाली. वरळीतल्या आंबेडकर मैदानात पार पडलेली दलित विद्यार्थ्यांची ही पहिला सभा आजही मला स्पष्ट आठवते. थोडक्यात, माझ्यातील कार्यकर्ता असा जागा झाला होता. प्रकट होत होता. परंतु कलेच्या वाटाही मी धुंडाळत होतो, चोखाळत होतो..

मंगेश नारायणराव काळे : हे तुमच्या कधी लक्षात आलं

ढाले : माझ्यातला हा सुप्त कार्यकर्ता प्रसंगवशात जागा होण्याआधी, माझ्यातला चित्रकार आणि कवी त्याआधी जागा झाला होता. त्याचं असं झालं की, जेव्हा मला काहीही कळत नव्हतं, अशा अबोध वयात माझं जन्मगांव आणि आई-वडिलांना सोडून माझ्या नवविवाहित चुलता-चुलती सोबत मुंबईला आलो. तेव्हा मी असेन जेमतेम चारपाच वर्षांचा. आता हे माझे चुलता-चुलती कोण?.. तर माझ्या मावशीचं म्हणजे माझ्या आईच्या सख्ख्या छोट्या बहिणीचं लग्न, माझ्या वडिलांच्या सख्ख्या भावाशी म्हणजेच ‘तात्यां’शी झालेलं होतं. माझ्या मावशीनं मुंबईला निघताना मला विचारलं, ‘चल, येतोस का मुंबईला?’ आणि मी मुंबईला आलो. माझ्या कवितेचा अंकुर माझ्या वडिलांकडून आलेला आहे, हे माझ्या वयाच्या विशीत कळलं, त्यांच्या कवितेचं बाड चुकून हाताला लागल्यानंतर. पण माझ्यात वसत असलेला चित्रकलेचा धागा कुठून आला याचा मी सतत विचार करतोय आणि बालपणातल्या विस्मृतीच्या अंधारात मी डोळे फाडून इतस्त:त शोधतोय, तेव्हा ते माझ्या मावशीच्या (Wall Paintings) भित्ती चित्रकलेपर्यंत घेऊन जातं. ती सारवलेल्या भिंतीवर वा जमिनीवर काचेच्या बांगड्याच्या रंगीत तुकड्यांच्या साहाय्याने तिच्या तरुणपणी भिंतीवर कुंड्या, फुले, मोर अशा विविध पण देखण्या आकृती अत्यंत एकाग्रचित्ताने आकारित असे. अगदी कागदावरही चित्र काढीत असे. प्रत्येक माणसात लपलेला असा आदिम चित्रकार असतोच. आणि या चित्रांचं नातं गुह्यचित्रांशी असतं. चित्रकला आणि कविता यांनी माझ्या व्यक्तिमत्वात अगदी लहानपणीच माझ्याही नकळत मागच्या दारानं प्रवेश केला. आणि बरं का सर.. माझ्या जीवनाची चित्तरकथाही त्याच काळात सुरू झाली.

जाधव : ती कशी काय?

ढाले : अहो, लहानपणीच मी चुलता-चुलतीबरोबर गावाकडून मुंबईला आलो.. आणि माझ्या माघारी 1947 साली माझी आई आणि 1949 साली माझे वडील वारले. मग माझ्या चुलत्याने माझी सगळी भावंडंही मुंबईला आणली. आई वारल्यावर आमच्या आळीवाड्यातल्या बायका माझं रुबाबदार रुपडं नि कपडे पाहून म्हणायच्या, ‘आई मरावी आन्‌ मावशी जगावी हे खरं हाय बग.’ आणि मला जवळ घेऊन रडायच्या.

जाधव : Never mind go on!! It happens like that!

ढाले : मी मुंबईला आल्यावर लहानपणापासून ते माध्यमिक शिक्षणापर्यंत वरळीला राहात होतो नि 1958ला वरळी सोडली, तरी मॅट्रीकच्या वर्षांपर्यंत वरळीशी संबंधित होतो. ही वरळी म्हणजे आंबेडकरी जनतेचा बालेकिल्ला होता. त्या वातावरणात मी श्वास घेत असल्यामुळे माझ्यामधला कार्यकर्ता आपोआप जागा होत गेला. तो जिवंत राहिला. मी चित्रकलेच्या प्रेमात तर होतोच, पण त्याचबरोबर साहित्य चळवळीकडे नकळत वाटचाल करीत होतो. त्याकाळी वरळी नाक्यावरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात होणाऱ्या चित्रकला स्पर्धेत ओळीनं सहा वर्षे पहिला येत असे. त्या स्पर्धेत वयाच्या दहाव्या वर्षांपासून सक्रीय झालो होतो. खरं तर ती स्पर्धा 12 ते 16 अशा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठीच खुली होती. त्यामुळे वरळीत माझं नाव चित्रकार म्हणू गाजू लागलं. वरळी बी.डी.डी. चाळीत 1948 पासून कार्यरत असलेल्या ‘दलित सेवक साहित्य संघा’च्या संपादकद्वय असलेल्या अडसूळ-रणपिसे या जोडीच्या ते कानावर गेलं. त्यांना वाटलं कोण हा माणूस आहे आणि मग ते दोघे मला शोधत हेन्सरोडवरील वरळी सोनापूरच्या स्मशानभूमी समोरील ‘पठाण चाळ’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या वसाहतीत येऊन धडकले. मला पाहिल्यावर टी. पी. अडसूळ म्हणाले, ‘आरं राजा ढाले म्हटल्यावर आमाला वाटलं की, कुणातरी भली थोरली वयानं पोक्त असामी असशील, पण असं भारदस्त नाव धारण करणारा एक हाफपँटीतला एवढासा पोरगा निघालास.’

मग त्यांनी माझं वळणदार अक्षर पाहिलं आणि वरळीच्या बी.डी. चाळीतल्या ‘60-35’ या पत्त्यावर बोलावून त्यांचं हस्तलिखित लिहिण्याचं काम सोपवलं. त्यातला एक लेख म्हणजे ‘कार्ल मार्क्स की गौतम बुद्ध’ या नावाचं डॉ.आंबेडकरांचं अत्यंत गाजलेलं खाटमांडूच्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेसमोर केलेलं ऐतिहासिक भाषण होतं. डॉ.आंबेडकरांचे आयुष्यातले ते अखेरचे भाषण असल्यामुळे 1956च्या 25 नोव्हेंबरचे हे भाषण मी 1957सालच्या सुरुवातीला अडसूळ यांच्या सांगण्यावरून हस्तलिखितासाठी लिहीत होतो. त्यावेळी पोस्टकार्डावर लिहून पाठवलेलं ‘पाऊलवाट’ हे बालगीत ‘नवशक्ती’ दैनिकात छापून आलेलं होतं. त्याच दरम्यान म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मक्रांतीनंतर उगवलेल्या पहिल्या बुद्धजयंतीदिनी बुद्धांच्या आगमनार्थ ‘फिरूनी एकदा’ ही कविता लिहिली होती आणि आणि ती 17 मे 1957च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. म्हणजे 1957 साली डॉ.आंबेडकर यांना आदरांजली वाहण्याच्या रूपात आंबेडकरी चळवळीत झालेला शिरकाव अडसूळ-रणपीसे यांच्या सान्निध्यातून झालेला माझा आमच्या साहित्यातील चळवळीतील प्रवेश आणि ‘प्रबुद्ध भारता’तून माझं लेखन छापून यायला तयार झालेली सुरुवात, हे सगळं एकदमच महिन्या-पंधरादिवसाच्या वा एका आठवड्याच्या अवधीत घडून येताना दिसेल. परंतु माझे हे पूर्वचरित्र कोणालाच माहीत नसल्याने किंवा अहंमन्यतेची टिमकी वाजवणाऱ्या आसपासच्या जगात मी कुणाला सांगू न शकल्यामुळे, माझ्याबद्दलची ही माहिती अन्य कुणाला असणार? म्हणजेच माझ्याबद्दल आपल्या पदरची माहिती पुरवणारेच जास्त असल्यामुळे या विषयावर विचारानं बोललो. पण अधिक नव्हे! मी त्याच काळात पलीकडच्या पठाण चाळीतील झोपडपट्टीतल्या लहान लहान मुलांचा वर्ग भरवून त्यांना शिकवित होतो आणि बुद्धजीवनासंबंधी एक कलापथक काढले होते. हे तर सांगता सांगता बाजूलाच राहिले.

जाधव : राजाभाऊ, आपण ज्या ‘दलित साहित्य संघा’चा उल्लेख केलात. त्याचं पुढं काय झालं? त्यांनीच पुढे दलित साहित्य संमेलन घेतलं होतं ना?

ढाले : नाही. या आधीच्या क्रमाने घडलेल्या काही गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत, तर या बाबतीत घडलेला इतिहासाचा विपर्यास होईल. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या साहित्याचे संवर्धन आणि निर्मिती करणारी साहित्य संस्था असावी, अशी 1948 च्या दरम्यान बाबासाहेबांची संकल्पना होती. त्याकाळी ‘जनता’ पत्रात कथा कविता लिहिणारे श्री. रणपिसे, टीपी अडसूळ या लोकांना ही आपली मनिषा त्यांनी बोलून दाखवली. पण म्हणजे नेमके काय करायचे हे त्या लोकांना कळेना. त्यातच हे सगळे समजावण्यासाठी बाबासाहेबांना वेळ नव्हता. म्हणून या संस्थेला या लोकांनी पहिले ओबड धोबड नाव दिले. ‘दलित साहित्य सेवक संघ’.

इसवी सन 1953 साली त्या नावातला ‘सेवक’ हा शब्द वगळला गेला आणि त्यावेळी किंवा त्यानंतर कधीतरी त्या नावाच्या सुरुवातीला ‘महाराष्ट्र’ शब्द येऊन बसला असावा. असे ‘महाराष्ट्र दलित साहित्य संघ’ इसवी सन 1958 सालच्या 2 मार्च रोजी जे ‘पहिले दलित साहित्य संमेलन’ मुंबईतल्या परेलच्या आर. एम. भट हायस्कूलमध्ये पार पडले ते याच लोकांनी व याच संस्थेने आयोजित केले होते. या संमेलनाचे स्टेजवर आणि सभागृहाबाहेर लावण्याचे सर्व बॅनर्स त्याकाळी मी आणि माझा परम मित्र चित्रकार दत्ता शेलार यांनी आदल्या दिवशी रात्रभर जागून केले होते. त्याचीच पुनरावृत्ती पुढच्या वर्षी पार पडलेल्या 1959 सालच्या साहित्य संमेलनात झाली. या आमच्या धडपडीचे प्रतिबिंब दुसऱ्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षांच्या भाषणात उमटले. स्वागताध्यक्ष प्राध्यापक यादवराव गांगुर्डे म्हणाले, हे साहित्य संमेलन राजा ढालेच्या कुंचल्याने सजले आहे.

जाधव : पहिल्या ‘दलित साहित्य संमेलना’तल्या अण्णाभाऊंच्या ‘रोल’बद्दल काही सांगा?

ढाले : अरे, ते राहूनच गेलं.. त्या ऐतिहासिक अशा पहिल्या दलित साहित्य संमेलनाचा इतिहास घडणार होता वेगळाच, परंतु ऐनवेळी तो घडला वेगळाच. त्या नियोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते आचार्य अत्रे. परंतु संमेलन अगदी तोंडावर येऊन ठेपलं असताना ऐनवेळी काहीतरी सबब सांगून त्यांनी आपलं अंग त्यातून काढून घेतलं. त्यावेळी आमची धावाधाव झाली. त्यात त्यावेळचा त्या संघातील दुसऱ्या फळीचा सर्वात तरुण तेजस्वी आणि तडफदार असा जनार्दन वाघमारे हा आमच्या संघटनेचा बिनीचा कार्यकर्ता आणि त्याच्या मागे मी व आमच्या शिष्टमंडळाचा नेता अण्णा रणपिसे असे तिघे म्हणून घाटकोपरच्या चिरागनगरमधील अण्णा भाऊंचे घर गाठले. तेव्हा रात्र झाली होती. कंदिलाच्या प्रकाशात घडलेला सर्व वृत्तांत गंभीरपणे अण्णांच्या कानावर घातल्यावर ते अस्वस्थ दिसले. खूप मिनतवारीने अण्णा भाऊंनी अखेर उद्‌घाटनाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि दुसऱ्या दिवशीच्या आपल्या ऐनवेळेच्या लिखित भाषणात ते गरजले, ‘अरे ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून, दलितांच्या तळहातावर तरलेली आहे.’ क्षणभरातच श्रोत्यांच्या मनात लख्ख प्रकाश पडला आणि त्या छोट्याशा सभागृहात अचानक टाळ्यांच्या असंख्य विजा कडकडून गेल्या. परंतु आज आमच्या कॉम्रेड मित्रांनी अण्णाभाऊंच्या वाक्याचे ‘भांडवल’ आणि ‘विकृतीकरण’ चालवले आहे. या वाक्यातील ‘दलित’ हा शब्द हुसकावून त्याजागेवर ते ‘कष्टकरी’ आणि ‘कामगारां’ची वर्णी लावत आहेत. याला काय म्हणावे? ‘कॉम्रेड? अरे तुम्ही अण्णा भाऊंचे मित्र असाल पण मालक नव्हे, कशासाठी त्यांच्या या वाक्याची मोडतोड आणि विडंबन? तुमचा हा वर्गलढा ‘दलितां’वरच का बेतलाय? अरे हे डोकं कुणाचं आहे? कम्युनिस्टांचं की बामणांचं?’ कारण पाश्चात्य जगातल्या कम्युनिझमनं 1989 सालीच गाशा गुंडाळला असताना हे आमच्यातच Divide and Rule या Policy चा वापर करून कोण Division करतंय?

जाधव : आता आपण साहित्यातल्या चळवळीकडे आणि पर्यायाने ‘लिटल मॅगझिन्सच्या चळवळीकडे वळूया का?

ढाले : हो चालेल.

जाधव : त्याबद्दल सांगा?

ढाले : मी 1960 साली कॉलेजविश्वात पाय ठेवला आणि माझं जगच बदललं. माझ्या जीवनाचं क्षितिज विस्तृत झालं. त्या आधी एक वर्षभर एसएससी बोर्डानं मला एकाच इयत्तेत कोंडून ठेवलं होतं. मी त्यातून सुटलो नि थेट सिद्धार्थ कॉलेजात दाखल झालो. तिथं मला पहिल्या वर्षाच्या वर्गात चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ विख्यात कवी आरती प्रभू भेटले. त्यांच्या शिक्षणात तब्बल अकरा वर्षाचा गॅप पडला होता. तेवढाच गॅप माझ्या आणि त्यांच्या वयात होता. तेही माझ्याच वर्गात होते आणि त्यांना मी त्यांच्या नव्या कविता मुखोद्गत असल्यामुळे समोर गाठ पडताच भडाभडा म्हणून दाखवल्या आणि ते अचंबित झाले. त्यांच्याशी मैत्र जुळल्यावर त्या क्रिकेटर आणि कवींनी गजबजलेल्या कॉलेजात माझी इतर कवींशी ओळख व्हायला वेळ लागला नाही. त्यात केशव मेश्राम, वसंत सावंत ही बडी कवी मंडळी आणि वसंत हुबळीकर, वसंत सोपारकर, सुधीर नांदगावकर, माधव अत्रे अशी बरीच साहित्यिक मंडळी भेटली. ही सगळी मंडळी नोकरी करून शिकणारी होती आणि सगळे विद्यार्थी बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला होते. कवी शांताराम नांदगावकर हे त्याआधीच्या बॅचचे विद्यार्थी होते, परंतु ही सगळी मंडळी कविसंमेलनाच्या दिवशी एकत्र येत. माझ्या पहिल्या वर्षीच्या कविसंमेलनात मंचावर बसलेल्या आरती प्रभूंनी, विद्यार्थी श्रोत्यांत बसलेल्या माझ्याकडे हातवारे करीत वर यायला खुणावले नि ते खरे न वाटून मी आसपासच्या मुलांकडे बावळटासारखा पाहात राहिलो. तेवढ्यात कुणीतरी मला हाताला धरून खेचले आणि माझा या साहित्यिक वर्तुळात प्रवेश झाला. आम्ही कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना वसंत गुर्जर रूपारेल सोडून आमच्या वर्गात दाखल झाला. त्याची नि माझी कायमची जोडी जमली. कॉलेजात शिकत असो-नसो जोडी मात्र कायम.

दरम्यानच्या काळात 1960च्या सुमारास ‘शब्द’ नावाच्या 1955पासून निघणाऱ्या कवितेला प्राधान्य देणाऱ्या चक्रमुद्रित नियतकालिकाचा अखेरचा अंक छापील स्वरूपात निघाला आणि मराठी साहित्यात एक खळबळ माजली. एक धरणीकंपासारखा धक्का बसला. अशोक शहाणे संपादित ‘शब्द’ या नियतकालिकाचा अखेरचा अंक एकीकडे नियतकालिकांच्या पद्धतीचा मुडदा पाडणारा अंक होता. दुसरीकडून पाहिलं तर तेच खरं मराठीतलं पहिलं अनियतकालिक होतं. याचं प्रतिक म्हणजे ‘शब्द’चा अंक पुन्हा निघाला नाही. कारण it is beginning has got end in itself. तर असं हे अनियतकालिकाचं जग ‘शब्द’च्या त्या अंकाच्या रूपात मला भेटायला आलं, तेव्हा तो अंक माझ्या हातात पाहून माझा साहित्यिक मित्र माधव अत्रे म्हणाला, ‘अरे, हा अशोक शहाणे फार भयंकर माणूस आहे. तू त्याच्या नादाला लागू नकोस.’ आणि पुढे त्याच्याच नादाला लागलो. पुढे वर्षभराने सुरू झालेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दैनिकाचे साहित्यविषयक पुरवणीचे संपादक असलेले शंकर सारडा यांना मी ‘असो’चा अंक द्यायला ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयात गेलो. तेव्हाही- ‘अहो, या लोकांच्या नादी आपले करिअर का खराब करताय?’ असा त्यांनी मला सल्ला दिला होता.

इकडं मधल्या वर्षभरात अशोकनं आधीपासून तोट्यात चाललेल्या ना. वि. काकतकरांच्या ‘रहस्यरंजन’ या रहस्यकथा छापणाऱ्या मासिकाचं एका उत्कृष्ट साहित्यविषयक नियतकालिकात तर रुपांतर केलेच, परंतु साईड बाय साईड काकतकरांनी दुर्गा भागवत यांना घेऊन ‘गंमतजंमत’ हे लहान मुलांचे मनोरंजन करणारे नमुनेदार मासिक काढले. त्याच दरम्यान सुविख्यात कवी विंदा करंदीकर यांनी ‘एटू लोकांचा देश’ या नावाचा लहान मुलांसाठी मोठ्यांच्या वेगळ्याच बालगीतांचा गुच्छ ‘मौज’च्या दिवाळी अंकात छापला होता. माझ्यातला बालक जागा होऊन, माझ्या डोळ्याच्या खिडकीत उभा हे सगळं सतर्कपणे टिपत होता.

हॅलो! पोपट भाय!.. तुमच्या गळ्यामध्ये टाय ओठावर लिपस्टिक भलतेच काय?

त्या दोन दिवसांत माझ्या सुप्त मनात झोपलेली 61 बालगीते माझ्या ओठावर आली, ती कागदावर उमटली. त्यातल्या निवडक बालगीतांचा एक बंच मी ‘गंमतजंमत’च्या पत्त्यावर पाठवला आणि काही महिने उलटल्यावर त्यांचा पाठलाग करत मी 37 वेस्टर्न इंडिया हाउस वर पोहोचलो तर काय? माझ्या कवितांची वही दुर्गाबाई भागवतांच्या समोरच्या टेबलावर पडली होती आणि तिला जोडलेल्या शेवटच्या दोन चार पानांपैकी एक कोरं पान टर्रकन फाडून आपल्या समोर येऊन बसलेल्या अभ्यागताला चिठ्ठी लिहून देत होत्या. त्यावर मी मनात खट्टू झालो. नंतर काही दिवसांनी कार्यालयात गेलो. आणि त्या बेवारस वहीकडे बोट दाखवून नाना काकतकरांना म्हणालो, ‘अहो, ती बालगीते छापणार आहात की नाही, नसाल तर ती वही मी घेऊन जातो.’ ते पटकन मान वर करून भांबावलेल्या नजरेने मजकडे पाहू लागले. ‘का? ती वही तुमची आहे? बसा.. बसा! काही चहा वगैरे.’

आणि मग त्यांच्या कार्यालयावर काही ना काही कारणाने कधी केशव मेश्राम बरोबर तर कधी चिं. त्र्यं. खानोलकरांबरोबर कधी एकटाच जात राहिलो. कारण तोपर्यंत माझे काकतकरांमार्फत अशोकशी, रघुशी सूर जुळत गेले होते आणि त्यांच्या कंपूपैकीच एक झालो होतो. एकदा मी नानांसमोर बसलो होतो. इतक्यात भला उंच नि धट्टाकट्टा माणूस खुर्चीत येऊन बसला. हातात पुस्तकाचे बंडल. इतक्यात ना. वि. काकतकर म्हणाले, ‘अरे ये ये! हा बघ तुझ्या कवितेची स्तुती करत असतो.’ नेमाड्यांनी माझ्याकडे चमकून पाहिलं. कोणती कविता?

‘पाठीशी भिंत तुझ्या/ वरती चिमण्यांचा खोपा.’

ती ‘रहस्यरंजन’च्या दिवाळी अंकातील, असं बोलून ते खो खो हसले आणि म्हणाले, हा हा ती तर आम्ही लिहिली होती. असं म्हणून त्यांनी मला टाळी दिली. मैत्री वाढली. पुढे 1964 साली मला नोकरी लागली आणि नानांच्या आणि अशोकच्या कृपेने माझा ‘आत्ता’चा फोल्डर अवघ्या वीस रुपयात पुण्यात छापून मुंबईत येता झाला. हे सांगताना जे सांगायचं ते राहून गेलं. मी माझ्या बालगीतांबद्दल विचारल्यानंतर दोन-चार महिन्यांतच ‘गंमतजंमत’च्या पहिल्या पानावर माझी बालगीते छापून येऊ लागली. पुढे ‘गंमतजंमत’ बंद पडलं. पण माझं बालगीतं लिहिणं बंद पडलेलं नाहीत. आजही माझ्याकडे जवळजवळ 300 बालगीतं पडून आहेत.

जाधव : ‘आत्ता’ बंद पडण्याचे कारण काय?

ढाले : अहो त्यावर आम्ही लिहिलं होतं, ‘वाट्टेल तेव्हा निघेल’. म्हणजे कधीही निघू शकतं. अगदी आजसुद्धा. पण त्याला चांगला मजकूर वेळोवेळी मिळायला नको का? तरीही त्यांचे मी सहा अंक काढल्याचे आठवते. त्यानंतर मी ‘तापसी’चा एक अंक काढला. त्यानंतर ‘येरू’चे दोन अंक काढले. त्यात 1969ला निघालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या ‘येरू’त मी ‘सत्यकथेची सत्यकथा’ हे ‘सत्यकथे’बद्दलचं स्फोटक समीक्षण लिहिलं व त्यांच्या खटाववाडीच्या गल्लीत जाऊन ‘सत्यकथे’चा ताजा अंक जाहीरपणे आम्ही जाळला. त्यामुळे हळूहळू उच्चभ्रू वाचकांतील ‘सत्यकथे’बद्दलची क्रेझ मावळत गेली आणि ‘सत्यकथा’ मासिक बंद पडलं.

काळे : तुमचा ‘येरू’मधील ‘सत्यकथेची सत्यकथा’ हा लेख प्रकाशित झाल्यावर तुम्ही दिल्लीला आलेल्या लघुअनियतकालिकांच्या संमेलनाला गेलात. या मागे काय भूमिका होती? तुम्हाला का जावसं वाटलं?

ढाले : हिंदीत ‘लिटल मॅगझिन्स’ना त्या काळात ‘लघुपत्रिकाएँ’ असं संबोधन होतं. दिल्लीत चालवल्या जाणाऱ्या ‘आवेश’ नावाच्या या एका लघुपत्रिकेचे संपादक असलेला हिंदीतला नवकवी, नवकथाकार नि नवकादंबरीकार म्हणून प्रख्यात असलेल्या रमेश बक्षीने भारतातल्या लघुपत्रिकांचे प्रदर्शन निमंत्रित व आयोजित केले होते आणि त्याचे निमंत्रण त्याने आम्हाला पाठविले होते. कारण त्याला मराठीतल्या या चळवळीची माहिती झाली होती म्हणा, अथवा आम्ही त्याचा हा अभिनव उपक्रम त्याकाळच्या वृत्तपत्रातून वाचला म्हणा. ‘आम्ही या प्रदर्शनात सहभागी होत आहोत,’ असं त्याला कळवलं. आता त्याच्या या उपक्रमात का सामील झालो? ह्याचं माझ्या परीनं मला वाटलेलं उत्तर असं की, भारतात फोफावलेली ‘लिटिल मॅगझिन’ची चळवळ प्रस्थापित साहित्य व्यवस्थेविरुद्धची लढाई होती. साहित्यातील प्रस्थापिततेचं एक प्रतीक म्हणजे माझ्या दृष्टीनं ‘सत्यकथा’ सुद्धा होती. म्हणून आम्ही ती जाळली होती. साहजिकच आम्ही ‘लिटिल मॅगझिन’चळवळीचे पुरस्कर्ते आणि प्रस्थापित साहित्य व्यवहाराच्या विरुद्ध उभे ठाकलेले लोक होतो. तेव्हा दिल्लीतल्या त्या ‘लिटिल मॅगझिन’च्या प्रदर्शनाला जाण्यात आमचं काही चुकलं, असं आजही आम्हाला वाटत नाही.

काळे : तुमच्या जाण्याबद्दल ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही.. मी भूमिकेबद्दल विचारलं

ढाले : याबाबत अधिक काही सांगायचं तर या पथकात वसंत गुर्जर, चंद्रकांत खोत, सतीश काळसेकर, प्रदीप नेरूरकर आणि मी असे पाच लोक होतो. दिल्लीत तेव्हा नुकतेच टीव्हीचे प्रसारण सुरू झाले होते. या प्रदर्शनाच्या बातमीत मी प्रथमच टीव्हीवर चमकलो होतो. कदाचित तो टीव्ही प्रक्षेपणाचा पहिला किंवा दुसरा दिवस असावा.

जाधव : दिल्लीत भरलेल्या लघुपत्रिकांच्या 1969च्या त्या प्रदर्शनाला आपण कसे गेलात, त्याविषयी थोडे सांगा. याविषयी गुरुनाथ धुरींनी काही लिहिलं होतं

ढाले : त्यावेळी आम्ही आम्हा पाच जणांचं राऊंड टूर तिकीट काढलं होतं. पंधरा दिवसांच्या प्रवासाचं. त्यात ठिकठिकाणी मुक्काम करत आम्ही दिल्ली गाठली. दिल्लीत उतरायचं कुठं हा प्रश्न होता. म्हणून गुरुनाथ धुरीचा पत्ता शोधत गेलो. सामान ठेवलं. रमेश बक्षीच्या पत्त्यावर जाऊन ‘आम्ही आलो’ असल्याचा निरोप दिला. प्रदर्शनाच्या दिवशी त्या हॉलमध्ये आमचं अगत्यानं स्वागत करणाऱ्या लोकांमध्ये हिंदी साहित्य विश्वातील प्रसिद्ध लेखक आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.श्याम परमार आणि त्यांची पीएचडीची विद्यार्थिनी असलेली त्यांची परमशिष्या मोना गुलाटी हे अग्रभागी होते. हिंदीतले डॉ.नामवरसिंह यांनी त्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले असावे. त्यांच्या अध्यक्षतेखाली मुद्राराक्षस आदी प्रसिद्ध लेखकांच्या भाषणांनी गुंफलेला एक परिसंवादही संपन्न झाला असावा, असे अंधुकपणे आठवते. पण स्पष्टपणे आठवतात त्या त्याकाळी दिल्लीत राहणाऱ्या प्रसिद्ध मराठी लेखिका वसुधा माने. प्रदर्शनस्थळी त्या आम्हाला शोधतच आल्या आणि प्रदर्शन संपल्यावर आमच्या चंबुगबाळ्यासहित आम्हाला आपल्या घरी मुक्कामाला घेऊन गेल्या. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या ‘अबकडइ’च्या संकलनात गुरुनाथ धुरी यांनी ‘अबकडइ’च्या दिवाळी 1981च्या अंकातला त्यांचा या बाबतीतला संदर्भ असलेला लेख पुनर्मुद्रित झालाय. त्यात माझ्याबद्दलची मनातली मळमळ ओकताना ते म्हणतात, ‘पण या क्रांतिकारी लोकांना हरिद्वारला जाण्याची तलफ आली. हरिद्वारला जाऊन ढालेंसहित या सर्व क्रांतिकारकांनी भक्तिभावाने गंगेत अंघोळी केल्या. तोवर मी त्यांनी सोडून ठेवलेली वस्त्रे सांभाळीत किनाऱ्यावरच बसून राहिलो.’

आता पहा, गुरुनाथ धुरींनी माझ्याबद्दल असं उपहासानं का लिहिलं? कारण ते ‘सत्यकथे’चे मान्यवर कवी होते आणि मी तर ‘सत्यकथा’ जाळली होती. त्याचीही मळमळ होती, आहे. माझ्याबरोबर असलेले माझे चारही सोबती धर्मानं हिंदू होते आणि त्यांच्यासोबत मीही होतो. ते करतील ते करण्यात माणुसकी होती आणि मी कुणा धर्माचा बांधील नाही- हे सांगणाऱ्या नि सत्याग्रह करणाऱ्यांपैकी मीही एक आहे. मग पाण्यात उतरण्याचा हक्क मी कसा नाकारीन? गुरुनाथांचं हे सगळं म्हणणं आणि वागणंच तर्कदुष्टपणाचं आहे आणि नेमकं तेच मांडणारा लेख संपादक सतीश काळसेकर यांनी ‘अबकडई’च्या सर्वोत्कृष्ट लेखनाच्या संकलनासाठी निवडावा? Is there any design behind it?

असा प्रश्न पडायचं कारण, या आमच्या दिल्ली प्रवासाची डायरी आमचे मित्र सतीश काळसेकर यांनीही लिहिली आहे. तिच्यातला काही भाग त्यानंतर कधीतरी एका मासिकात वा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला मी वाचला आहे. त्या अंकात नेमका तोच भाग त्यांनी छापला आहे, ज्यात त्यांनी मला भित्रा ठरवला आहे. ‘मिस्टर सतीश काळसेकर हे लक्षात ठेवा की, दलित पँथर ही लढाऊ संघटना, त्यानंतर स्थापन झाली. त्याआधी नव्हे.’ मी जर भित्रा असतो, तर मला हे कसं शक्य आहे वा असते? खरं तर दलित पँथरच्या लढाऊ इतिहासात पोलिसांशी समोरा-समोर टक्कर देणारा आणि प्रत्यक्ष रणांगणावर रक्त सांडणारा एकच माणूस आहे. तो म्हणजे राजा ढाले. दुसरे भगोडे होते. त्याचं महत्त्व वाढविण्यात तुम्ही सतत मदत केलीत. त्याला पुरोगामी ठरवलंत. पण आज तो कुठे आहे? ज्याच्यावर केवळ 27 केसेस सरकारने चळवळीच्या संदर्भात भरल्या. त्याचा गाजावाजा त्याने कधी 300 तर कधी 3000 सांगून आकडा वाढवत नेला आहे. माझ्यावर आधी 69 केसेस होत्या. ती संख्या आजमितीस 70 आहे. परंतु मी कधी बडेजाव मारलेला नाही. पण डाव्या चळवळीतल्या आपल्यासारख्या लोकांनी माझ्याविरुद्ध खोटेनाटे लिहून, त्याच कागदपत्राचा वापर करून आमच्यातल्या स्वतःला डावे समजणाऱ्या कुणा एका राहुल कोसंबीच्या हाताने ‘मुक्तशब्द’च्या दिवाळी अंकात लेख लिहून खऱ्याचं खोटं नि खोट्याचं खरं करत आहात ते का? खरं तर या ‘लिटिल मॅगझिन्स’च्या चळवळीची फलश्रुती हीच काय? लिटिल मॅगझिन्सच्या अंताला सुरुवात झाली ती 1969नंतर आम्ही दलित साहित्याच्या संकल्पनेत शिरल्यावर तुम्हाला वाटते, आम्ही तर सवर्ण आहोत मग आम्ही दलित कसे? कारण आपण जाती जवळ अडला होतात. मग मानवतावादाकडे येणार कसे? म्हणून तुम्ही आणि तुमचे विचारवंत मार्क्सवादाकडे पळालात. डाव्या चळवळीच्या आड लपलात. हे तुमचे पुरोगामित्व!

जाधव : हे सगळं विदारक आहे

काळे : 1969साली लिटल मॅगझिन्सची जी काय तथाकथित चळवळ होती ती दुभंगण्याकडे प्रवास करत असताना आपण काय केलंत?

ढाले : त्याच काळाच्या आसपास दलित साहित्याची संकल्पना ‘अस्मितादर्श’ नियतकालिकाच्या आधारे उभी राहू पाहत होती आणि दलित साहित्याच्या आधारे ‘अस्मितादर्श’ हे नियतकालिक नव्यानं उभं राहू पाहत होतं. त्या नियतकालिकाचा पहिला अंक डिसेंबर 1967 मध्ये ‘अस्मिता’ या नावाने निघाला होता. ते त्रैमासिक असून त्याचा दुसरा अंक ‘अस्मितादर्श’ या नावाने निघाला आणि पुढं तो त्याच नावानं निघू लागला. त्यावेळी त्याची सूत्रं डॉ. म. ना. वानखेडे यांच्या हाती होती. अंक निघत राहिले. चर्चेने जोर धरला. त्यातच 1968 सालच्या ‘मराठवाडा’ दिवाळी अंकात दलित साहित्याची संकल्पना उलगडणारी, या विषयीचा मूलगामी वेध घेणारी चर्चा प्रा. एम. बी. चिटणीस आदींच्या नेतृत्वाखाली झडू लागली. दरम्यानच्या काळात वरून पुरस्कार आणि आतून तिरस्कार हे संकल्पनेच्या विरोधकांनी सूत्र अवलंबिले. यात डाव्या विचारसरणीचे डॉ. सदा कऱ्हाडे आणि प्र. श्री. नेरुरकर यांचा या संकल्पनेला बेमालूम विरोध होता. तो ‘सत्यकथे’तून लेखरूपाने प्रकट झाला, तर ‘समाजप्रबोधन पत्रिके’तून लेख लिहून हेच काम उघडपणे वसंत पळशीकर यांनी चालविले होते. म्हटली तर ही ब्राह्मण लॉबी होती. म्हटली तर ही पुढे प्रगत साहित्य सभेचं गोंडस रूप घेऊ पाहणारी डाव्यांची दलित साहित्य चळवळीला आतून विरोध करणारी कारवाई होती. 1970 सालच्या अखेरीस तिचा दंभस्फोट करणारा एक खळबळजनक नि तर्कशुद्ध असा प्रदीर्घ लेख मी नामदेवच्या ‘विद्रोह’साठी लिहिला. तो प्रदीर्घ लेख छापण्याची ऐपत छदामही खिशात नसलेल्या नामदेव ढसाळांची नसल्यामुळे, मी अलिबागच्या चिंतामण वामन जोशी यांच्या मुद्रणालयातून छापून घेतला. हा त्याचा खरा इतिहास आहे. त्याच्या कव्हरवरचं चित्रही माझंच आहे. त्या लेखाचं नाव होतं, ‘दलित, दलित साहित्य, टिक्कोजी वगैरे वगैरे.’

या लेखातच सर्वप्रथम निग्रो जमाती आणि दलित जमाती यांच्या जीवनातील आणि गुलामगिरीतील साम्य मी दाखवून दिले आहे. मराठवाड्यातील कुणा जनार्दन वाघमारेने नव्हे. या लेखात मी निग्रोंच्या मुक्ती चळवळीचा आलेख काढताना प्रा. अनंत काणेकरांच्या एका लेखाचा अपवाद करता, मीच सर्वप्रथम ‘ब्लॅक पँथर’ या चळवळीचा उल्लेख केला आहे. कुणा नथुखैऱ्याने नव्हे. ‘पँथर’ आपल्या दबलेल्या पावलानं दलित जगतात वावरू लागला तो इथून. तो अंक दिनांक 11 फेब्रुवारी 1971 रोजी महाड येथे संपन्न होणाऱ्या महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषदेच्या अधिवेशनात प्रकाशित झाला होता.

काळे : तर ‘ब्लॅक पँथर’चं काय?

ढाले : 1968 साली अमेरिकेत‘ब्लॅक पॅँथर’ची चळवळ सुरू झाली. अमेरिकेतील निग्रोंना स्वतःला ‘ब्लॅक’ म्हणवून घेणं अधिक उचित वाटतं. कारण ‘निग्रो’ हा वंशवाचक शब्द आहे. तर ‘ब्लॅक’ हा कलरवाचक शब्द आहे आणि निग्रो या शब्दापासून अमेरिकेतील गोऱ्यांनी त्यांच्यासाठी ‘निगर’ हा तुच्छतावाचक शब्द प्रचारात आणलेला आहे. अमेरिकेत राहणारे आणि ‘रेड इंडियन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तिथल्या वसाहतकारी आदिम जमाती पलीकडे पसरलेले गोऱ्या रंगाचे नववसाहतकार हे जसे अनेक देशांतून आलेले विविध वंशाचे ‘व्हाईट’ आहेत, तसेच विविध देशांतून आणि विविध पार्श्वभूमीतून आलेले आम्ही लोक ‘ब्लॅक’ आहोत हे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे हा अमेरिकेतील वंशभेदाचा लढा आहे. असं म्हणणं त्यांना अधिक व्यापक आणि सयुक्तिक वाटतं. म्हणून ते स्वतःला ‘ब्लॅक’ म्हणवून घेतात आणि स्वतःच्या साहित्याला ‘ब्लॅक लिटरेचर’, स्वतःच्या काव्याला ‘ब्लॅक पोएट्री’ असं संबोधतात. असं मला त्या विषयाकडे वळल्यावर अभ्यासाअंती आढळून आलं.

परंतु मी या विषयाकडे कसा वळलो? त्याविषयीची एक गंमत सांगतो. फोर्टमधल्या पी. एम. रोडवरील 37 वेस्टर्न इंडिया हाऊसमधल्या ‘रहस्यरंजन’च्या कार्यालयात वा त्यासमोरच्या रस्त्यापलीकडील सेलर रेस्टॉरंटमधील मधूनमधून घडणाऱ्या गप्पांच्या अड्‌ड्यावर अशोक शहाणे, रघू दंडवते, भाऊ पाध्ये, कधीकधी ‘एक शून्य बाजीराव’च्या स्वगतात रमलेला/रंगलेला माधव वाटवे, मधूनच भालचंद्र नेमाडे, अधून मधून अरुण कोलटकर असे लोक उगवत असत. त्यात मीही डोकावत असे. एकवेळ गप्पांच्या ओघात अशोक म्हणाला, ‘अरे, जमिनीचा एक इंच जाडीचा सुपीक थर निर्माण व्हायला सुमारे चारशे वर्षं लागतात.’ आणि मी हडबडलो. ‘आयला ह्याला हे ज्ञान कुठून प्राप्त होतं?’ त्याकाळी मी रद्दीतली मासिकं, पुस्तकं धुंडाळत असायचो. अशाच एका चाळणीत मला ‘टाईम’ या अमेरिकन साप्ताहिकात नव्यानंच येत असलेल्या एलेश्रेसू या टॉपिकचा शोध लागला. मग त्याच्या आसपासच ‘ब्लॅक पँथर’च्या अमेरिकेतील शूट आऊटच्या भानगडीबद्दल, पोलिसांच्या त्यांच्याबद्दलच्या सक्त कारवायांबद्दल नि पँथर्सच्या बळी जाण्याबद्दल आणि त्यांच्यावरील न्यायालयीन ‘ट्रायल्स’बद्दलचे रकाने ‘टाईम’मधून येऊ लागले. पाठोपाठ मी ‘न्यूजवीक’ही त्यासाठी घेऊ लागलो. तो काळ होता 1968 व त्यानंतरचा. त्या काळात धीरेधीरे पँथरची धीमी पावलं माझ्या मनात उमटू लागली, वाजू लागली. त्यातच देशभर दलितांवर होणाऱ्या भयभीषण अत्याचारांची हृदयद्रावक कहाणी आकडेवारीतून सांगणारा 1969-70चा एलिया पेरूमल कमिशनचा रिपोर्ट बाहेर आला आणि मी प्रचंड अस्वस्थ झालो. आणि या अत्याचारांच्या मुळावर प्राणांतिक घाव घालावा असं मला वाटू लागलं. यातूनच पुढे पँथर ही चळवळ जन्माला आली. पण हा पँथर दलित कसा असेल? हा पँथर ‘दलितत्त्वा’चा अर्धांगवायू झालेला अथवा लकवा मारलेला कसा असू शकेल? या पॉइंटवर मी अडलो होतो. परंतु हा सारासार विवेक न उरलेल्या दोघांनी, माझ्याकडून ऐकलेल्या ब्लॅक पँथर बद्दलच्या ऐकीव माहितीवर विसंबून माझ्या गैरहजेरीत माझ्या अपरोक्ष त्यांनी दलित पँथर या संघटनेची घोषणा केली व पहिले कार्यकारी मंडळही ‘नवाकाळ’ मधून जाहीर केले. त्याचा इतरत्र एका पुस्तिकेत मी साधार ऊहापोह केलेला आहेच. (पहा दलित-पँथर, वस्तुस्थिती आणि विपर्यास- राजा ढाले)

आज ते दोघे कुणाच्या वळचणींना अंगाचं मुटकुळं करून पडलेले दिसतील आणि आपणाला प्रश्न पडेल की हेच का ते एकेकाळचे ‘पँथर’ आणि ‘पँथर’चे संस्थापक. खरं तर, नामदेव ढसाळ आणि माझा परिचय 1970 ला झाला. माझ्या ऑफिसमधले एक सहकारी भीमराव शिरवाळे यांची कथा ‘सत्यकथे’च्या फेब्रुवारी 1970च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. त्यांनी ती मला वाचायला दिली. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ती मी वाचली व पाठ थोपटली. त्यानंच मला त्या अंकातील नामदेव ढसाळांची कविताही वाचायला सांगितली व तोही आपलाच आहे असं मला सांगितलं. ती ‘मशिदीच्या वाटेवरून’ नावाची ‘सत्यकथे’तून प्रसिद्ध झालेली कविता होती. म्हणजे मी जी ‘सत्यकथे’च्या उंच मिनाराची वाट नाकारली होती, त्याच वाटेवरून हे वाट चुकलेले फकीर चालले होते. त्यांना माहितच नसावे की आदल्याच वर्षी मी ‘सत्यकथे’ची होळी केली आहे, किंवा त्या होळीचा एक चांगला परिणाम म्हणून त्यांच्या कथा कवितांची वर्णी ‘सत्यकथे’त लागली आहे. परंतु मी ‘सत्यकथा’जाळली आहे, हे कळल्यावर त्यांच्या मनात एक सुप्त इसाळ वा असूया निर्माण झाली असावी आणि ती पहिल्यापासूनच त्यांच्या मनात दबा धरून असावी आणि माझ्याविरुद्ध सतत काम करीत असावी.

खरं तर ‘दलित’ या शब्दाला माझा तात्विक विरोध असताना, या बाबूराव बागुलांच्या तत्कालीन शिष्याने ‘दलित पँथर’ हे अडनिडे नाव जाहीर करण्यात बाजी मारली. परंतु जेव्हा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आपला अग्रलेख या नावावर आगपाखड करून लिहिला, तेव्हा त्या ‘दलित’ या शब्दात लपलेल्या विरोधाभासावर तर्कशुद्ध भाष्य करण्यासाठी नामदेव ढसाळ पुढे आले नाहीत. आले ते राजा ढाले आणि त्यांनी या बोलघेवड्यांना चारी मुंड्या चीत केले. कारण मित्र संकटात आल्यावर लपून बसणारा मी नाही. मी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेले ते टोलेजंग उत्तर कोण विसरेल? आणि नामदेवनं माझ्यावर आणलेली दुसरी बिलामत म्हणजे त्याच्या ‘गोलपीठा’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचा प्रसंग. घड्याळाचे काटे सहावर सरकले आणि तो प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला..ताडदेवचा ताटकळलेला रुसी मोदी हॉल अस्वस्थ झाला. मंचावर सगळे निमंत्रित भाष्यकार आणि अध्यक्ष उपस्थित होते. प्रकाशक नारायण आठवले आणि नामदेव ढसाळ, विजय तेंडुलकर यांची वाट पाहत होते. इतक्यात नामदेव ढसाळ मंचावरून उतरून थेट शेवटी बसलेल्या मी व गुर्जरापर्यंत आले. तशा सभागृहातल्या सगळ्या माना गर्रकन मागे वळल्या. नामदेव मला हाताला धरून उठवीत होता. आणि मी त्याला सांगत होतो की, मी नियोजित वक्ता नाही आणि मी वर येणार नाही. परंतु सभागृहातल्या सगळ्या नजरा माझ्यावर खिळल्यावर मला ऑकवर्ड वाटले आणि मी उठत उठत त्याला अट घातली की, मी सगळ्यात शेवटी बोलेन. नामदेवनं ते मान्य केलं आणि शेवटी भयानक नाट्य घडलं. माझ्या आधी सदा कऱ्हाडे, दुर्गा भागवत प्रभृती चार-पाच वक्ते बोलून झाल्यावर मी बोलायला उभा राहिलो. ‘महाराचं गाणं आणि बामणाचं लिवणं’ या म्हणीपासून मी लोकसाहित्याच्या प्रांगणात शिरलो आणि दैवतशास्त्र आदी दोन-तीन ज्ञानशाखातलं दुर्गाबार्इंना काहीही येत नाही हे सोदाहरण स्पष्ट केलं. तसं सभागृहासकट दुर्गाबाईही अवाक्‌ झाल्या. त्यांची मान होकारार्थी हलू लागली. डोळ्यातून टिपं गळू लागली. समोर बसलेले माझे मित्र अशोक शहाणे, रघू दंडवते, भाऊ पाध्ये आदी हा प्रकार आ वासून पाहतच राहिले आणि त्यातच मी दुर्गाबार्इंवर अखेरचा हल्ला चढवला आणि म्हणालो की, ‘कवितेतले यांना काहीच कळत नाही.’ त्यानंतर प्रकाशकावर मी घसरलो. तो बाहेरच उभा होता. त्याला आतली गडबड ऐकू गेली, परंतु दरवाजात तुडुंब गर्दी असल्यामुळे तो बाहेरूनच ओरडू लागला, ‘ए भाषण बंद करा! त्यांना बोलू देऊ नका!’ हे ऐकल्याबरोबर आमचा सर्वात मागे बसलेला होस्टेलियर मित्र लतिफ खाटिक लोकांच्या अंगावरून पुढे पळत आला आणि म्हणाला ‘भाषण झालेच पाहिजे, कोण बंद पाडतंय ते बघू. समोर येऊन बोला.’ त्या जनसंमर्दासमोर नारायण आठवले यांचा आवाज गडप झाला. पुन्हा पाच-दहा मिनिटं मी बोललो आणि थांबलो. खाली उतरलो नि बाहेर पडण्यासाठी दरवाजाकडे चाललो तर अभिनंदन करण्यासाठी माझ्यावर गर्दीचा लोंढा तुटून पडला.

इतक्यात त्या गर्दीतून वाट काढत प्र.श्री. नेरुरकर माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ‘अरे बाई एकट्याच डायसवर बसून रडत आहेत. चल त्यांची माफी माग.’ इतक्यात माझ्या बाजूला उभा असलेला भाऊ पाध्ये उसळून म्हणाला, ‘माफी कशासाठी? बार्इंना सांगा की त्यानं उभ्या केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, माफी कसली.’ या माझ्या अडेलतट्टू वागण्यावर संतापून, त्यानंतर महिन्या पंधरा दिवसांतच ‘साधना’ साप्ताहिकातून प्रकाशित झालेल्या माझ्या ‘काळा स्वातंत्र्यदिन’ या लेखाविरुद्ध ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये निषेधाचं पत्र लिहून दुर्गा भागवतांनी माझ्याविरुद्ध ‘राष्ट्रध्वजाचा अपमान केला म्हणून’ काहूर उठविलं. परंतु दुर्गाबार्इंच्या शाब्दिक ठोक्यांनी ज्याच्या कवितेची नौका त्यादिवशी कायमची रसातळाला जाणारी ती त्याची डगमगती नैया मी माझ्या शब्दाच्या धारेने उद्धरली होती, तो नामदेव ढसाळ कुठल्याही प्रकारचा बंडखोर नाही. उलट तो पावलोपावली व्यवस्थेला नि सर्वांना शरण जाणारा मनुष्य आहे. काही लोक चळवळी जगतात, काही लोक चळवळीवर जगतात, असं हे ‘पँथरचं जग’ आहे.

डॉ. मनोहर जाधव, पुणे

मंगेश नारायणराव काळे, पुणे

(‘खेळ’ या नियतकालिकाचा एप्रिल ते सप्टेंबर 2012 हा राजा ढाले विशेषांक होता, त्यात प्रसिद्ध झालेली ही मुलाखत आहे. या मुलाखतीचा उत्तरार्ध मात्र शब्दांकन न झाल्याने अद्याप प्रसिद्ध झालेला नाही.)

अभिवादन

साहेब नसलेला राजा माणूस

मनोहर जाधव

हायस्कूलमध्ये असताना मी राजा ढालेंना पाहिलं आणि ऐकलं. नावाप्रमाणेच ढाले यांचे व्यक्तिमत्त्व राजबिंडे होते. आत्मविश्वासानं मुद्देसूद बोलणारी त्यांची छबी माझ्या लक्षात आहे. त्यावेळी ते कलकत्ता पान खात असत. पान खाण्याची पद्धत मोहवणारी. त्यांचं अनुकरण म्हणून असेल, नंतरच्या काळात आम्ही मित्रमंडळीही कलकत्ता पान खायला लागलो होतो. अगदी अलीकडे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आले होते, तेव्हा हा किस्सा मी त्यांना सांगितला. ते हसले. म्हणाले, ‘‘मी पान खाणं कधीच सोडलं.’’

हायस्कूलमध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात मी शिकलो. तिथं त्यांचं चळवळीनिमित्त जाणं येणं होतं. माझे वडील रेल्वेत अधिकारी होते आणि भुसावळ डिव्हिजनच्या एस. सी.एस.टी. असोशिएशनचे जनरल सेक्रेटरी होते. ते अनेक कार्यक्रमाचं आयोजन करीत. आंबेडकर जयंती तर जोरात असायची. जणू एक आनंद सोहळा. त्याच काळात ढालेंचं भाषण ऐकलेलं. तेव्हा दलित पँथरमधून बाहेर पडून त्यांनी ‘मास मुव्हमेंट’ ही संघटना स्थापन केलेली. परंतु संघटनेला महाराष्ट्रभर स्वीकृती लाभली नाही. मुंबईत काही ठिकाणी, नाशिक शहर, नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा अशा काही ठिकाणी या संघटनेची मजबूत पॉकेटस्‌ होती. नंतर वडिलांची बदली भुसावळच्या पुढे सावदा रेल्वे स्टेशनवर झाली. तेव्हा मी नुकताच कॉलेजला जाऊ लागलो होतो. मी त्या परिसरात ‘मास मुव्हमेंट’ची शाखा सुरू केली. त्याची बरीच चर्चा त्यावेळी झाली. त्या परिसरातील पोलीस स्टेशनने मला एकदा बोलावून माझी चौकशीही केली होती. ‘काही गडबड गोंधळ करू नका’ असं तिथल्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं होतं. मी कॉलेजमधला मुलगा. मला त्यावेळी फार काही समजलं नाही. पण नंतरच्या काळात ते अधिकारी असं का बोलले असावेत, तेही ध्यानात आलं.

राजा ढाले उत्तम चित्रकार आणि कवी होते. ‘सत्यकथा’ आणि ‘भगवद्‌गीता’ त्यांनी जाळली हे जाणकारांना ठावूकच आहे. त्यामागे त्यांची निश्चित अशी भूमिका होती. काहींना त्यात विसंगती वाटते. भुसावळला रत्नाकर गणवीर नावाचे रेल्वेत अधिकारी होते. ते माझ्या वडिलांचे मित्र. त्यांनी प्रॉव्हिडंड फंडाच्या रकमेचे कर्ज काढून ‘बहिष्कृत भारतातील अग्रलेख’, ‘बहिष्कृत भारतातील स्फुट लेख’, ‘महाड चवदार तळ्याचा संग्राम’ अशी पुस्तके स्वतः संपादित करून स्वखर्चाने प्रसिद्ध केली होती. ‘अग्रलेखा’च्या पुस्तकाचं मुखपृष्ठ राजा ढालेंनी केलं होतं, हे मला लख्ख आठवतं. ढालेंचं अक्षर अतिशय वळणदार आणि सुरेख होतं. साधं पत्रं जरी त्यांनी लिहिलं तरी त्यात देखणी कलात्मकता असे. डॉ.गंगाधर पानतावणेंना त्यांनी लिहिलेली अनेक पत्र पानतावणेसरांनी मला दाखवली होती.

सार्वजनिक जीवनातील राजकीय-सामाजिक चळवळीत सक्रीय आणि स्वतंत्र भूमिका असलेल्या राजा ढालेंकडे वाङ्‌मयीन संशोधनाची विलक्षण जाण होती. अलिकडे त्यांचा विठ्ठलासंबंधीचा संशोधनपर लेख प्रसिद्ध झाल्यावर मी फोन करून त्यांना म्हटलं, ‘‘मराठीत संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध होऊ शकला असता.’’ त्यावेळी ते उद्‌गारले, ‘‘आपण कायम प्रस्थापितांच्या विरोधात आहोत. त्यामुळे आपण आपली भूमिका वेगळ्या व्यासपीठावर मांडली पाहिजे.’’ ढाले यांनी अनेक पुस्तकांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या आहेत. या प्रस्तावनांमुळे त्या त्या पुस्तकांचे मोल वाढले हे खरेच आहे, पण त्या पुस्तकांना प्रस्तावना ढालेंनी का लिहिल्या असाव्यात, हेही आपल्या लक्षात येतं. म्हणजे मुळात पुस्तकांमध्ये गुणवत्ता होती हे चाणाक्ष ढालेंना पक्के ठाऊक होते. योगीराज वाघमारे यांच्या ‘गुडदाणी’ या कथासंग्रहाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना जिज्ञासूंनी आवर्जून वाचावी. बाबुराव बागूल यांची ‘विद्रोह’ आणि योगीराज वाघमारे यांची ‘उद्रेक’ या दोन कथांचे तुलनात्मक विश्लेषण नवे मूलभूत आकलन मांडणारे आहे.

‘खेळ’ नियतकालिकाचे संपादक प्रसिद्ध कवी मंगेश नारायणराव काळे हे माझे जुने मित्र. त्यांनी ‘खेळ’च्या राजा ढाले विशेषांकाचं संपादन करण्याचा प्रस्ताव ठेवला. अर्थातच मी होकार दिला. राजा ढालेंनी यासाठी आनंदाने संमती दिली. प्रत्यक्ष बोलताना माझ्या लक्षात आलं की, या विशेषांकामुळे त्यांना समाधान लाभलं होतं. दोन दिवस ढाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अतिथीगृहात मुक्कामाला होते. या संधीचा फायदा घेऊन मराठी विभागात त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं. त्याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. दोन्ही दिवस मी आणि मंगेशराव काही सत्रं ठरवून त्यांच्याशी केलेल्या गप्पा ध्वनिमुद्रित करीत होतो. यातूनच त्यांची मुलाखत आकाराला आली. ती ‘खेळ’च्या विशेषांकात छापली. अनेक मान्यवरांनी ढाले यांच्या लेखनासंबंधी आणि कार्यासंबंधी त्या अंकात लेखन केलं.

राजा ढाले यांच्यासोबत मला काही चर्चासत्रांत, प्रकाशन समारंभात सहभागी होता आले. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात ते अध्यक्ष होते. आधीच्या वक्त्यांनी केलेली भाषणे ते काळजीपूर्वक ऐकत. नंतर आपल्या भाषणात ते त्याबद्दल तिखट टिप्पणी करत. बोलताना निर्भिडपणे मांडणी करत. स्पष्टवक्तेपणा असा की ज्याचा मुद्दा खोडला त्या व्यक्तीला तो फटकळपणा वाटत असे. माणसं दुखावत, पण ढालेंना त्याची तमा नव्हती. तो त्यांचा स्वभावच होता. लेखन असो वा भाषण ते तुटून पडत, तर्काधिष्ठित विश्लेषण करीत. त्यात व्यक्तिद्वेष नसायचा, चर्चेला घेतलेल्या विषयाचा नवा पैलू असायचा. महाराष्ट्रातील भल्याभल्यांना याचा अनुभव आलेला आहे.

1995 मध्ये खडकी (पुणे) येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘दलित साहित्य’ या संज्ञेला नाकारून ‘फुले-आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य’ या पर्यायी संज्ञेचा पुरस्कार केला होता. त्यांच्या या भूमिकेबद्दल अनेक मान्यवरांनी त्या काळात मतभिन्नता नोंदवली होती. याचा परिणाम दलित साहित्य प्रवाहाबद्दलची चर्चा नव्यानं ऐरणीवर आली होती.

ढाले यांचा पिंड कार्यकर्त्याचा तसाच लेखक- संशोधकाचाही. सार्वजनिक जीवनातून वेळ काढून त्यांनी लेखन-संशोधन केलं असतं तर ते अधिक मूलगामी स्वरूपाचं काम झालं असतं.

प्रसिद्ध कवी त्र्यंबक सपकाळे एकदा गप्पा मारताना सहज बोलून गेले. ‘‘ढालेंविषयी तुमचे काही बरे वाईट मत असेल ते असो, पण तो माणूस विकला गेला नाही. चळवळीला बाधा येईल अशा तडजोडी त्यांनी केल्या नाहीत.’’ सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या किती लोकांबद्दल असा अभिप्राय आज ऐकायला मिळेल? चळवळीतील लहान-मोठे कार्यकर्ते राजा ढाले यांना ढालेसाहेब म्हणत असत. आता तर राजकीय-सामाजिक चळवळीतील सर्वच ज्येष्ठांना ‘साहेब’ म्हणण्याची पद्धत आहे. विशेषतः राजकीय सत्तेत जे असतात ते तर ‘साहेब’च असतात. पण कधीही राजकीय सत्तेत नसणाऱ्या ढालेंना लोकं जेव्हा साहेब म्हणत, तेव्हा रूढार्थाने साहेब नसलेला हा राजामाणूस आहे असं मला वाटत असे.

डॉ. मनोहर जाधव, पुणे

manohar2013@gmail.com