Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

‘गांधी 150’ची समाप्ती

2 ऑक्टोबर 1869 ते 30 जानेवारी 1948 असे 78 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या महात्मा गांधी यांचे 150 वे जयंतीवर्ष येत्या 2 ऑक्टोबरला संपत आहे. आपल्या हयातीत 32 वर्षे आणि मृत्यूनंतर 72 वर्षे या महात्म्याने भारतातील प्रचंड मोठ्या जनसमूहावर अधिराज्य गाजवले आहे. 1920 मध्ये ‘टिळक पर्व’ संपले आणि ‘गांधी युग’ सुरू झाले, यावर बहुतांश इतिहासकारांचे एकमत आहे. याचाच अर्थ मागील पूर्ण शतकभर मो.क.गांधी हा माणूस देशाच्या विचारविश्वाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. गंमत म्हणजे या शतकात सर्वाधिक टीका, टिंगल-टवाळी व वैचारिक विरोधही याच माणसाच्या वाट्याला आला आहे. डाव्या व उजव्या प्रवाहांतील कडव्यांनी तर गांधींना कायम शत्रूस्थानी मानले आहे, गांधींच्या नावावर अनेक अपराध नोंदवले आहेत.

अन्य लहान-मोठ्या प्रवाहांनीही गांधींना या ना त्या कारणाने कमी-अधिक प्रमाणात विरोध केलेला आहे. ही प्रक्रिया पुढेही चालूच राहणार आहे, आणखी किमान 50 वर्षे तरी हा महात्मा भारतीय जनमानसाच्या केंद्रस्थानी राहणार आहे. म्हणजे गांधींची द्विजन्मशताब्दी (2069 मध्ये) येईल तोपर्यंत तरी!

कारणे तीन आहेत. एक- गांधींचा प्रभाव सांगणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था, संघटना भारतात आणि जगभरातही आहेत; विविध वयोगटातल्या आहेत आणि त्यात तरुणाईची संख्या लक्षणीय आहे. दुसरे कारण- गांधींनी हात घातला ते प्रश्न वा समस्या (विज्ञान-तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी) आणखी किमान अर्धशतकभर जिवंत राहणारच आहेत. तिसरे कारण- समजा आणखी एखादा महात्मा जन्माला आला किंवा आलेला आहे असे मानले तरी, देशभर व जगभर या प्रकारचा व इतक्या तीव्रतेचा प्रभाव निर्माण होण्यासाठी त्याला अर्धशतकाचा कालखंड तरी जावाच लागणार आहे. त्यामुळे गांधींची 200 वी जयंतीही देशात व विदेशात 150 इतकीच कदाचित अधिक मोठ्या प्रमाणात साजरी करावी लागेल.

वस्तुत: तसे होणे किंवा करावे लागणे हे गांधींना (ते हयात असते तर) मानवले नसते. कारण ‘स्वातंत्र्य’ मिळाले तरी ‘स्वराज्य’ येण्यासाठी लढत राहिले पाहिजे, हेच त्यांचे जीवनध्येय होते. आणि त्यांना अभिप्रेत असलेले स्वराज्य तर अद्याप दृष्टिपथातही नाही. अशा पार्श्वभूमीवर साजरे झालेल्या ‘गांधी 150’ च्या निमित्ताने साधना प्रकाशनाकडून गांधी या विषयावर पाच पुस्तके आली आहेत. त्यातील ‘गांधी आणि त्यांचे टीकाकार’ हे सुरेश द्वादशीवार यांचे पुस्तक गांधींजींविषयी अनेक गैरसमज दूर करण्यास विशेष मदत करू शकणारे आहे. गेल्याच महिन्यात प्रकाशित झालेला लुई फिशरलिखित गांधी चरित्राचा मराठी अनुवाद, गांधींचे जीवन आणि त्यांचा कार्यकाळ समजून घेण्यास उपयुक्त ठरणारा आहे. जानेवारीत आलेले ‘प्रेमाचा वारसा’ हे पुस्तक अरुण गांधी (मणिलाल यांचे चिरंजीव) यांच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे, एका बारा वर्षांच्या मुलाच्या/नातवाच्या नजरेतून गांधी असे त्याचे सर्वसाधारण स्वरूप आहे. मागील 2 ऑक्टोबरला प्रकाशित केलेल्या ‘चले जाव’ या छोट्या पुस्तकात 8 ऑगस्ट 1942 च्या त्या ऐतिहासिक ठरावावरील गांधी-नेहरू-पटेल-आझाद या चौघांची भाषणे आहेत, हे असे पुस्तक आहे जे फक्त मराठीत उपलब्ध आहे. आणि ‘गांधी 150’ ला प्रारंभ होण्यापूर्वी यशवंत सुमंत यांचे ‘म.गांधी : काही अलक्षित पैलू’ हे पुस्तक आणले, ते त्याच्या नावाप्रमाणेच आहे.

गेल्या वर्षभरात गांधीविचारांचे इतके आयाम पुढे आले आहेत, येत आहेत आणि इतक्या आयामांवर विचार व पुनर्विचार होत आहे की, त्यांची गणतीच नाही. या प्रक्रियेत अनेक लहान-थोर व्यक्ती-संस्था-संघटना सहभागी होत आहेत. त्या प्रक्रियेला गती देण्यासाठी साधनाकडून दरवर्षी एखादे तरी चांगले पुस्तक वा लेखमाला येत राहील!

कालपरवा

गांधी विरोधकांचा पंथ निर्माण करताना

रामचंद्र गुहा

आजच्या काळातील उन्मादित हिंदू तरुणांना या व्यक्तिमत्त्वांच्या आपापसातील गुंतागुंतीच्या संबंधाविषयी माहिती नसते, अथवा त्यांना याची कदरदेखील नसते. त्यांना या खुलाशाने काहीच फरक पडत नाही की, वैचारिक दृष्ट्या सावरकर हे बोस यांच्या खूप उजवीकडे होते आणि भगतसिंग यांच्या तुलनेत तर सावरकर अतिशय उजवे होते. ज्या तीन व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्याची अभाविप एकत्रितपणे स्थापना करू इच्छिते त्या तिघांच्यापैकी सावरकर यांचा गांधी विरोध हा अधिक मुरलेला आणि जास्त काळ चाललेला होता या गोष्टीकडे त्यांचे लक्ष नसते. त्यांच्यासाठी हीच बाब पुरेशी असते की, आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यात बोस आणि भगतसिंग यांचेदेखील गांधींसोबत मतभेद निर्माण झाले होते. हिंदूमधील कट्टर उजव्या शक्तींना बोस आणि भगतसिंग यांच्याविषयी आता सुटलेले प्रेमाचे उमाळे हे काही त्यांच्या कार्याची महती उशिरा सुचल्यामुळे आलेले शहाणपण मुळीच नाही. तर हे प्रेम महात्मा गांधींविषयी त्यांना असलेल्या आत्यंतिक द्वेषातून आलेले आहे.

दिल्ली विद्यापीठात मी शिक्षण घेतले आहे, तेथे मागील महिन्यात एक वाद उफाळून आला. वादाचे कारण होते तेथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) त्यांना आदर्श असलेल्या हिंदुत्वाचे प्रणेते विनायक दामोदर सावरकर यांचा अर्ध-पुतळा, सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंग यांच्या अर्धपुतळ्यांच्या समवेत स्थापन करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी ज्यांना इतिहासाचे आकलन होते त्यांनी हे दर्शवण्याचा प्रयत्न केला की, सावरकरांच्या समवेत ज्या दोन देशभक्तांचा पुतळा अभाविपने स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता, ती दोनही व्यक्तिमत्त्वे वैचारिक दृष्ट्या सावरकरांच्या अगदी विरुद्ध होती. बोस हे डाव्या विचारसरणीचे काँग्रेसी व्यक्तिमत्त्व होते, तर भगतसिंग क्रांतिकारी मार्क्सवादी विचारसरणीचे होते. त्यामुळेच टीका करणाऱ्यांनी या वेळी असा प्रश्न केला की, मग कोणत्या आधारावर या दोघांना सांप्रदायिक विचारसरणी असलेल्या सावरकरांच्या समवेत स्थापित करण्यात येत आहे?

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित त्यांना वैचारिक चर्चेपेक्षा घोषणाबाजी करण्यातच जास्त रस होता. परंतु उजव्या शक्तींकडून डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न फक्त दिल्ली विद्यापीठात झाला असे नाही. मागील काही वर्षांपासून असे प्रकार सर्वत्र घडताना आपण पाहत आहोत. स्वतः पंतप्रधानदेखील फक्त बंगालमधेच नव्हे, तर इतर ठिकाणीसुद्धा सुभाषचंद्र बोस यांच्या नावाचा सतत उल्लेख करत असतात. त्यांनी आपल्या नेहमीच्या- बडेजाव मिरवण्याच्या पद्धतीने मोठा गाजावाजा करत भारतीय पुराभिलेखागारातील सुभाषचंद्र बोस यांच्यावरील कागदपत्रांचा मोठा संग्रह खुला केला. अर्थात ही गोष्ट वेगळी की, खुल्या केलेल्या या संग्रहामधून कोणतीच नवीन बाब समोर आलेली नाही.

पंतप्रधानांप्रमाणेच इतर भाजप नेतेही ब्रिटिशांच्या विरोधातील स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिल्याबद्दल भगतसिंग यांची प्रशंसा करत असतात. कदाचित याची कारणमीमांसा अशी केली जाऊ शकते की, अभाविपने वि.दा. सावरकरांना आपलेसे करणे यातदेखील ऐतिहासिक दृष्ट्या विसंगती आहे. कारण 1930 च्या दशकात सावरकर हिंदू महासभेशी संलग्न होते. त्यावेळी हिंदू महासभा स्वतःला संघापेक्षा वरचढ मानत असे. परंतु या दोन संघटनांच्या स्पर्धेपलीकडे पाहिल्यास, अभाविपच्या कृतीमध्ये वैचारिक दृष्ट्या बरीच समसमानता आहे. कारण भारत हा मुख्यत्वे हिंदूंचे आणि फक्त हिंदूंनीच चालवावे असे राष्ट्र, या सिद्धांताचे सावरकर एक अतिशय प्रभावशाली पुरस्कर्ते होते. तर दुसरीकडे भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस दोघेही हिंदू बहुसंख्यांकवादाचे अतिशय कट्टर विरोधक होते.

भगतसिंग एक मार्क्सवादी विचारक होते, ज्यांचा यावर विश्वास होता की मानवाची प्रमुख ओळख त्याच्या समाजातील वर्गीय संरचनेमधील स्थानावरून निश्चित होते. हिंदू-मुस्लिम अथवा सवर्ण-दलित या अस्मितांपेक्षा भगतसिंगांना कामगार आणि शेतकरी अधिक जवळचे होते. त्यांची संघटना ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी (एच.एस.आर.ए)मध्ये हिंदू, मुस्लिम, पारसी, शीख अशा सर्वच धर्मांतील कार्यकर्ते होते. सुभाषचंद्र बोस यांनी तर आपली उभी हयात अतिशय एकनिष्ठतेने धार्मिक सलोख्याचा पुरस्कार करण्यात व्यतीत केली. काँग्रेसचे अध्यक्ष व आझाद हिंद सेनेचे प्रमुख म्हणून त्यांनी अशा स्वतंत्र भारतासाठी लढा दिला ज्यामध्ये हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये कसलाही भेदभाव केला जाणार नव्हता. बोस व भगतसिंग यांच्यामधील आणि हिंदुत्ववाद्यांच्यामधील वैचारिक अंतराचा विचार करता, या दोन स्वातंत्र्यसेनानींना हिंदुत्ववादी लोक आपलेसे कसे करू शकतात?

एक कारण तर असे आहे की, दुर्दैवाने या दोनही देशभक्तांची त्यांच्या वैचारिक सहकाऱ्यांनी उपेक्षा केली आहे. आपल्या राजनैतिक आयुष्याचा बहुतेक भाग बोस हे खंदे काँग्रेस कार्यकर्ते होते; त्यांनी स्थापन केलेली आझाद हिंद सेनादेखील (त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास) स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहाचाच एक ‘फॉरवर्ड ब्लॉक’ होता. परंतु इंदिरा गांधींच्या काँग्रेसनेच इतर अनेक महान काँग्रेसजनांची जशी उपेक्षा केली, तसेच त्यांनी बोस यांनादेखील दुर्लक्षित करून नाकारले. अगदी याचप्रकारे मार्क्सवादी असलेल्या भगतसिंग यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप), पक्षीय प्रतीकांमध्ये स्थान नाही. कारण भगतसिंग यांची एचएसआरए ही संघटना मूळच्या अविभाजित भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न नव्हती. माकप एकीकडे लेनिन आणि स्टॅलिन यांना वरचे स्थान देईल, मात्र भारताच्या एका अस्सल मार्क्सवाद्याला मात्र दुर्लक्षित करेल. या दोन देशभक्तांना नाकारण्याच्या डाव्यांच्या आणि काँग्रेसच्या या अतिशय लाजिरवाण्या कृतीमुळे अभाविपला सोयीस्करपणे या सेक्युलर व समाजवादी विचारांच्या व्यक्तिमत्त्वांना आपलेसे करून त्यांच्याप्रती खोटा आदर करणे सोपे झाले आहे.

या दोन व्यक्ती आज असत्या तर त्यांनी हिंदुत्वाचा आणि त्यांच्या कृतींचा धिक्कारच केला असता. परंतु आणखीन दोन कारणे आहेत, ज्यामुळे अभाविपने बोस आणि भगतसिंग यांच्यासमवेत सावरकरांना स्थापित करण्याचा निर्णय घेतला असणार! पहिले कारण म्हणजे, या तिघांचेही यावर एकमत होते की, वसाहतिक पारतंत्र्यातून भारताला मुक्त करण्यासाठी अहिंसेपेक्षा हिंसेचा मार्ग स्वीकारणे अधिक श्रेयस्कर ठरेल. दुसरे कारण म्हणजे, आपल्या कारकिर्दीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या तिघांचेही गांधीसोबत मतभेद झाले होते. हे सर्वश्रुत आहे की, सावरकर हे गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे वैचारिक गुरू होते. तसे पाहता सावरकरांच्या गांधीद्वेष करण्याला एक वैयक्तिक किनारदेखील होती. कस्तुरबा गांधी यांचा तुरुंगात मृत्यू झाल्यावर त्यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या फंडाला आर्थिक मदत न करण्याचा सल्ला सावरकरांनी आपल्या अनुयायांना दिला होता. याच्या उलट भगतसिंग यांचा गांधींना असलेला विरोध सांप्रदायिक कारणांमुळे नसून, मार्क्सवादी विचारधारेच्या म्हणजेच वैचारिक मतभेदांमधून आलेला होता.

बोस यांचे महात्मा गांधी यांच्यासमवेतचे संबंध हे तर अधिक गुंतागुंतीचे होते. काँग्रेसपासून फारकत घेतल्यानंतरदेखील ते गांधींचा आदरच करत होते. आझाद हिंद सेनेच्या स्थापनेनंतर सार्वजनिकपणे गांधींना पहिल्यांदा ‘राष्ट्रपिता’ म्हणून गौरवणारेदेखील सुभाषचंद्र बोसच होते. आजच्या काळातील उन्मादित हिंदू तरुणांना या व्यक्तिमत्त्वांच्या आपापसातील गुंतागुंतीच्या संबंधाविषयी माहिती नसते, अथवा त्यांना याची कदरदेखील नसते. त्यांना या खुलाशाने काहीच फरक पडत नाही की, वैचारिक दृष्ट्या सावरकर हे बोस यांच्या खूप उजवीकडे होते आणि भगतसिंग यांच्या तुलनेत तर सावरकर अतिशय उजवे होते.

ज्या तीन व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्याची अभाविप एकत्रितपणे स्थापना करू इच्छिते, त्या तिघांच्यापैकी सावरकर यांचा गांधीविरोध हा अधिक मुरलेला आणि जास्त काळ चाललेला होता या गोष्टीकडे त्यांचे लक्ष नसते. त्यांच्यासाठी हीच बाब पुरेशी असते की, आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यात बोस आणि भगतसिंग यांचेदेखील गांधींसोबत मतभेद निर्माण झाले होते. आजच्या क्रोधीत हिंदू नवयुवकांना वसाहतिक पारतंत्र्याविरोधात वापरण्यात आलेले अहिंसेचे अस्त्र म्हणजे अतिशय सौम्य, कमजोर आणि स्त्री-सुलभ प्रतिक्रिया वाटते. ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाला आपल्या प्रजासत्ताक राष्ट्रात हिंदूंप्रमाणेच समान हक्क असायला हवेत याची कल्पनादेखील त्यांना सहन होत नाही. धार्मिक सलोख्यासाठी गांधींसारखी एक व्यक्ती आपले बलिदान देण्यास तयार होते, ही बाब त्यांच्यासाठी ‘वास्तवापासून गांधी किती दूर होते’ याचे परिमाण असते, त्यामुळेच त्यांचा वारसा पूर्णता नाकारण्याची मानसिकता या तरुणाईमध्ये तयार होते.

हिंदूमधील कट्टर उजव्या शक्तींना बोस आणि भगतसिंग यांच्याविषयी आता सुटलेले प्रेमाचे उमाळे हे काही त्यांच्या कार्याची महती उशिरा सुचल्यामुळे आलेले शहाणपण नाही. तर हे प्रेम महात्मा गांधींविषयी त्यांच्या मनात असलेल्या आत्यंतिक द्वेषातून आलेले आहे. राष्ट्रपित्याची नाचक्की करण्यासाठी त्यांना जर शक्य झाले तर ते कुणाचाही, कशाचाही (आणि अगदी स्थळ-काळ याचे भान न ठेवता) वापर करू शकतात आणि करतातदेखील!

(अनुवाद: साजिद इनामदार)

रामचंद्र गुहा, बेंगळुरू

निमित्त

जश्न आणि प्रश्न

सुनीती सु. र.

एका आठवड्यानंतर म्हणजे 9 सप्टेंबरला भोपाळ येथे सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह पुनर्वसनाचे कार्य व वेळापत्रक निश्चित करण्यासहच्या बैठकीचे आश्वासन घेऊनच मेधातार्इंनी उपोषण मागे घेतले. ती बैठक नंतर इंदूर येथे झाली. दि.9 सप्टेंबरला हजारो विस्थापितांनी इंदूरमधील नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक मारून व तिथेच ठिय्या देऊन सर्व निर्णयांचे तपशील ठरवूनच पूर्ण केली. उपोषणकाळात मेधातार्इंची तब्येत फार झपाट्याने ढासळत गेली. खोऱ्यातील स्त्री-पुरुषांना त्यांच्यासाठी कासावीस होताना मी बघत होते. या लढाईत गेली 35 वर्षे लढलेले अगदी ज्येष्ठ पुरुष कार्यकर्तेदेखील, ‘आम्ही बुडालो तरी चालेल, मेधातार्इंचा जीव वाचवा-’ असे घळघळा रडत म्हणत होते... तेव्हा ही तपश्चर्या काय असते याचाही अनुभव येत होता.

‘नर्मदेचे पाणी चढते आहे आणि बुडित येऊ घातले आहे’ अशा बातम्या ऑगस्ट महिन्यात येऊ लागल्या, तेव्हाच काळजी व अस्वस्थता वाटायला लागली होती. नुकताच कृष्णेच्या खोऱ्यात, सांगली-कोल्हापूर भागात आलेला महापूर आणि त्याने केलेला हाहाकार अनुभवला होता. सांगली-कोल्हापूरमधील पूर हा जितका अतिवृष्टीमुळे आलेला होता तितकाच या अतिवृष्टीबाबत बेफिकीर राहिलेल्या शासकीय यंत्रणांच्या ढिसाळ कारभाराचा परिणाम होता. कृष्णा खोऱ्यातील धरणे भरण्याच्या एकात्मिक वेळापत्रकाचे नियोजन करण्यापासून ते पूर आल्यास करावयाच्या आपत्ती- निवारणाच्या तयारीचा अभाव यामुळे त्या पुराचे गांभीर्य आणि हानी अतोनात वाढली. या साऱ्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील नर्मदेतही काहीशी हीच स्थिती निर्माण झाली आहे, याकडे तेथील नर्मदा बचाओ आंदोलनाच्या दीर्घ काळच्या लढ्याशी परिचित असलेल्या महाराष्ट्राचेही काहीसे दुर्लक्षच झाले. अगदी महाराष्ट्रातल्या नर्मदा बचाओ आंदोलनाच्या साथींचेही!

नर्मदा खोऱ्यात पावसाळा सुरू होण्याआधीपासूनच या संभाव्य बुडिताबाबतची अस्वस्थता आणि त्याला तोंड देण्याची तयारीही सुरू होती. पण तोंड द्यायचे म्हणजे तरी काय? तात्पुरत्या पुरात तात्पुरते स्थलांतर करून जीवित आणि वित्तहानी टाळण्याचा प्रयत्न व तसे नियोजन- असे या संकटाचे स्वरूपच नव्हते; तर पुनर्वसनाच्या खोट्या आकडेवारीच्या आधारे प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करून धरण पूर्ण करण्याचा व त्यात पाणीही भरण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मिळवणाऱ्या सरकारांच्या आपल्याच नागरिकांप्रति असलेल्या अनास्थेला व निर्ममतेला तोंड द्यायचे होते. ‘31 जुलै 2017 पर्यंत उरलेल्या सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण करा आणि पाणी भरा’ असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 8 फेब्रुवारी 2017 रोजी दिला होता, तो तत्कालीन मध्य प्रदेश सरकारने दिलेल्या ‘झीरो बॅलन्स’- म्हणजे सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले आहे आणि आता कोणीही बाकी नाही- अशा तद्दन खोट्या शपथपत्राच्या आधारे.

आंदोलनाच्या वकिलांनी त्याचा प्रतिवाद केला; परंतु त्यावर, उर्वरित प्रकल्पग्रस्तांना जमिनीऐवजी प्रत्येकी 60 लाख रुपये नुकसानभरपाई देऊन पुनर्वसन पूर्ण करण्यासह धरणात पाणी भरण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला, त्या वेळीही त्याची असंभाव्यता आंदोलनाला पूर्णपणे माहीत होती. म्हणूनच 2017 च्या पावसाळ्यातही मोठा संघर्ष उभा राहिला. सत्याग्रहामध्ये उपोषणाचे अंतिम अस्त्र उगारावे लागले. तरीही त्या उपोषणाकडे पूर्ण दुर्लक्ष करून संवादाऐवजी बळाचा वापर करत उपोषणकर्त्यांना अटक करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील ‘सर्वांचे पुनर्वसन करून’ या पूर्वार्धाकडे डोळेझाक करत ‘31 जुलैला पाणी भरा’ या उत्तरार्धाची अंमलबजावणी करण्याच्या तयारीला त्या वेळी भारतीय जनता पक्ष या एकाच पक्षाच्या हाती असलेली गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व राजस्थान ही राज्य सरकारे आणि केंद्र सरकार मोठ्या उत्साहाने लागले.

नर्मदा नियंत्रण प्राधिकरण (Narmada Control Authority) हे याच संबंधित सरकारांच्या प्रतिनिधींच्या नियंत्रणात असल्यामुळे आंदोलनाच्या विरोधाला न जुमानता 17 सप्टेंबर 2017 ला म्हणजे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी धरणाचे उद्‌घाटन करण्यात आले. मोदींनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवलेल्या या धरणाच्या उद्‌घाटनाला संबंधित अन्य तीन राज्यांमधील मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत, तसेच धरण 138.68 मीटर्सपर्यंत पूर्ण भरण्याची हिंमत त्या वेळी तरी केली नाही; गुजरातमधीलही 1100 प्रकल्पग्रस्त निदर्शकांना ताब्यात घेत, पण उद्‌घाटनाचा जश्न झालाच!

‘तुमचं धरण - आमचं मरण’ या न्यायानेच हे सर्व घडवले गेलेही 2017 ची गोष्ट. मधे 2018 हे वर्ष गेले. मध्य प्रदेशात सत्तांतर होऊन काँग्रेसचे सरकार आले. पुन्हा एकदा पावसाळा, पुन्हा एकदा बुडिताचे संकट, पुन्हा एकदा राहिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आग्रह, त्यासाठी धरणी, मोर्चे, निदर्शने, जाब विचारणे. पण सरकार बदलले तरी सरकारी यंत्रणा त्याच असतात. त्या आपल्या गतीने चालत राहतात. फरक इतकाच पडला की, मागील 15 वर्षांत मध्य प्रदेशातल्या भाजप सरकारने आंदोलनाला आणि नर्मदा खोऱ्यातील आपलेच नागरिक असलेल्या विस्थापितांना कसलीही दाद दिली नव्हती; उलट मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व सर्वोच्च न्यायालयात दिलेली खोटी शपथपत्रे यांद्वारे त्यांची फसवणूकच केली होती, ती स्थिती आता काहीशी पालटली होती. आताचे काँग्रेसचे सरकार किमान संवादाला तरी तयार होते, आपली जबाबदारी मान्य तरी करत होते आणि आपल्या गतीने का होईना, काही प्रतिसाद देत होते. शिवाय 2018 मध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले, धरण भरले नाही; परिणामी बुडितही फारसे झाले नाही आणि नर्मदा खोऱ्याला एका वर्षापुरते का होईना, जीवदान मिळाले होते.

या एका वर्षात पुनर्वसनाचे राहिलेले काम पूर्ण करणे ही मध्य प्रदेशचीही जबाबदारी होती. जमिनीच्या बदल्यात ज्यांना देय आहे, अशा सर्व प्रकल्पग्रस्तांना त्यांच्यात्यांच्या अधिकारानुसार 60 लाख, 15 लाख किंवा 5.80 लाख रुपयांची नुकसानभरपाई देणे; पुनर्वसनस्थळांवर पर्यायी गावठाणनिर्मिती करून तेथे नागरी सुविधांसह घरप्लॉट्‌सचे वाटप करून आपली घरे बांधण्यासाठी पुरेसा वेळ देऊन प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर त्या ठिकाणी करणे- एवढे किमान होणे आवश्यक होते. परंतु तयार झालेल्या पुनर्वसनस्थळी काय स्थिती आहे? त्यापैकी अनेक ठिकाणी ना पेयजलाची सोय, ना गुरे चारण्याची. ना ड्रेनेज व्यवस्था, ना स्मशान! आता तर त्यातीलही काही बुडितात आली आहेत!

अद्याप घरप्लॉट न मिळालेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी मध्य प्रदेश सरकारने केवळ काही पत्र्याच्या 12 बाय 12 फुटांच्या शेड्‌स उभ्या केल्या, तात्पुरती व्यवस्था म्हणून. निमाडमधील समृद्ध शेती, गुरेढोरे असा बारदाना असलेल्या शेतकऱ्यांनी कसे राहावे 12 बाय 12 फुटांमध्ये? आणि तेही अनिश्चित काळ? कारण एकदा अशा रीतीने त्यांना उठवले गेले की, मग सारेच रामभरोसे- हा अनुभव तर सार्वत्रिक. त्यामुळे संडास-बाथरूमचीही सोय नसलेल्या त्यापत्र्याच्या शेड्‌समध्ये जाण्यास शेतकऱ्यांनी नकार देणे हे अत्यंत स्वाभाविक होते. अशा रीतीने नुकसानभरपाई आणि/ किंवा घरप्लॉट न मिळालेली थोडी-थोडकी नव्हेत, तर आंदोलनाच्या अंदाजाप्रमाणे सुमारे 32000 कुटुंबे खोऱ्यात होती- त्यातील बहुसंख्य मध्य प्रदेशातील 178 गावांमध्ये, तर काही शे महाराष्ट्रातल्या आदिवासी भागात. म्हणजे सुमारे दीड लाख लोक!

अशा स्थितीत या वर्षीचा पावसाळा पुढ्यात आला. दरम्यानच्या काळात धरणाच्या आणखी अनेक प्रतिकूल बाबीही पुढे आल्या होत्या, ज्यांच्या शक्यता आंदोलन मागील 35 वर्षे साधार मांडत होते. जसे- पावसाळ्यानंतर नर्मदा- जी एक प्रचंड मोठा प्रवाह असलेली, अनेक उपनद्या मिळणारी, बारमाही वाहणारी नदी ठिकठिकाणी कोरडी पडली. इतकी की, ती पायी चालत ओलांडता येऊ लागली. दुसऱ्या बाजूला, अत्यंत वेगाने आणि शेकडो मुखांनी समुद्राला मिळणारी नर्मदा सरदार सरोवराने अडवल्यामुळे तिच्या वाटेने समुद्रच आत घुसण्याची प्रक्रिया सुरू झाली. तोही थोडाथोडका नव्हे, तर तब्बल 70-80 किलोमीटर्सपर्यंत. नर्मदा जिथे समुद्राला मिळते तिथे राहिली केवळ दलदल. उलट, समुद्रच आत आल्याने सर्व जमीन खारवटली. परिणामी, समुद्राकाठच्या मच्छीमार व शेतकऱ्यांचा रोजगारच हरवण्याची स्थिती निर्माण झाली. सरदार सरोवर धरणामुळे होणारे प्रत्यक्ष विस्थापन सुमारे अडीच लाख मानले गेले, तर या नव्या संकटामुळे विस्थापित होऊ घातलेल्यांची संख्या 7 ते 8 लाख इतकी ठरेल!

तिसरीकडे कॅनॉल्स पूर्ण झालेले नसल्यामुळे अभावग्रस्त क्षेत्राला पाणी जाण्याऐवजी ते जाऊ लागले अदानी, अंबानी, टाटा, कोका-कोला अशा कापॉरेट्‌सकडे. जलाशयातील जेमतेम 20 ते 25 टक्केच पाणी गुजरात सरकारकडून प्रत्यक्षात वापरले जात आहे; दावा केलेल्या सर्व 10000 गावांपर्यंत पेयजल पोहोचत नाही, विजेचा तर पत्ताच नाही- हा मुद्दादेखील आंदोलनाने दीर्घकाळ उठवला होता. चौथीकडे, सरदार पटेलांचा महत्त्वाकांक्षी पुतळा व त्याभोवतालचे पर्यटन यासाठी तब्बल 72 आदिवासी गावांचा बळी देण्याचे घाटले गेले. या साऱ्या वास्तवासह यंदाचा पावसाळा पुढ्यात आला होता. हे सर्व पर्यावरणीय व अन्य मुद्दे आंदोलनाने दीर्घ काळ उपस्थित केलेलेच होते. परंतु पावसाळा पुढ्यात आला असताना एकच मुद्दा उरतो, तो म्हणजे- बुडित थोपवणे आणि बुडितात येणारे जनजीवन वाचवणे. आंदोलनाने तेच केले.

दि.31 जुलै रोजी नर्मदा खोऱ्यातील हजारो लोकांनी आणि देशभरातील साथींनी एकत्र येऊन, 139 मीटर्सपर्यंत पाणी भरण्याचा हट्टाग्रह सोडून देण्याचे आवाहन गुजरात व केंद्र सरकारला करत, ‘बिनापुनर्वसन आपण उठणार नाही’ असा निर्धार व्यक्त केला. यामध्ये मध्य प्रदेशातील नर्मदा व तिच्या उपनद्यांवरील बर्गी, महेश्वर, ओंकारेश्वर, जोबट अशा अन्य धरणांतील धरणग्रस्तही सामील झाले होते. सौराष्ट्रमधून आलेल्या गुजरातचे माजी पर्यावरणमंत्री प्रवीणसिंह जाडेजा यांनी, ‘गुजरातच्या कच्छ-सौराष्ट्राच्या नावावर बांधल्या गेलेल्या सरदार सरोवराबाबत नर्मदा बचाओ आंदोलनाने उठवलेला प्रत्येक प्रश्न आज खरा ठरला आहे,’ असे म्हणत गुजरातच्या वतीने आंदोलनाची माफी मागितली. बिनापुनर्वसन, अन्याय्य बुडिताविरोधात अहिंसक मार्गाने लढण्याचे रणशिंग या वेळी फुंकण्यात आले.

दुसरीकडे गुजरात सरकारने धरणात पाणी भरण्याचा चंग बांधला होता. दि.30 सप्टेंबरपर्यंत 137.72 व 15 ऑक्टोबरपर्यंत धरण पूर्ण भरण्याचे त्यांचे वेळापत्रक होते. म्हणजेच या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचे त्यांचे नियोजन होते. मध्यप्रदेश सरकारने 76 गावांमधील 6000 कुटुंबे (प्रत्यक्षात 178 गावांतील 32000 कुटुंबे- जो आकडा पुढे त्यांनी मान्य केला) पुनर्वसनाशिवाय बुडितात असल्याचे निवेदन दिले होते, त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. पाणी चढत-चढत 133 मीटर्सपर्यंत पोहोचले आणि चिखलदा, निसरपूर, अवलदा, भादल, जांगरवा अशी गावे बुडितात आली; कडमाळ, खापरखेडा, एकलबारा, करोंदिया अशा गावांचे संपर्क तुटले. चुकीच्या बॅक वॉटर लेव्हल्समुळे बुडिताबाहेर दाखवलेल्या गावांमध्येही बुडित आले. काही मृत्यूही झाले तेव्हा, 25 ऑगस्ट रोजी, राखी पौर्णिमेच्या दिवशी स्थानिक परंपरेप्रमाणे नर्मदा नदीला राखी बांधून छोटा बडदा या गावी साखळी उपोषणासह सत्याग्रहास सुरवात करण्यात आली.

पुराच्या पाण्याचे नागरी जीवनाला वेढणे स्लो पॉयझनिंगसारखे असते. हळूहळू भिनत जाणे किंवा मेधातार्इंनी म्हटल्याप्रमाणे ‘हलाल’ पद्धतीने मारल्या जाणाऱ्या प्राण्यासारखे! गुजरातचे 204 जलाशय जुलै- ऑगस्टमध्ये 100 टक्के भरलेले असताना सरदार सरोवरात पूर्ण क्षमतेने पाणी साठवण्याची खरोखर गरज नव्हती. तेदेखील लाखो लोक बुडित क्षेत्रात असताना आणि मध्य प्रदेशमधील वरच्या भागातील धरणेही तेथील पावसामुळे पूर्ण भरल्याने सरदार सरोवरात पाणी सोडणे मध्य प्रदेशसाठी अनिवार्य ठरलेले असताना! जुलै- ऑगस्टमध्ये सरदार सरोवरातून पाणी सोडणे नियमितपणे चालू ठेवले असते, तर जलाशय 122 मीटर्सवर ठेवणे अगदी सहज शक्य होते. परंतु गुजरात सरकार व त्यांचे बोलवते धनी- जे गुजरातचे नव्हेत तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत आणि केवळ गुजरातच्याच नव्हे तर मध्य प्रदेशसह संपूर्ण देशातील नागरिकांचे जीवित व जीविका यांचे संरक्षण करणे, ही त्यांची (नैतिक सोडा, किमान) सांविधानिक जबाबदारी आहे- यांनी धरणाचे दरवाजे अतिशय थंडपणे बंद केले व ही जलहत्या घडवून आणली.

धरणाचे दरवाजे बंदच राहिले आणि पाणी चढतच राहिले तेव्हा, लोकशाही प्रक्रियेतले सर्व दरवाजे ठोठावून झाल्यानंतर सत्याग्रही आंदोलकांसाठी स्वत:चे प्राण पणाला लावण्याशिवाय दुसरा कुठला मार्ग राहतो? मेधातार्इंनी तोच अनुसरला. साखळी उपोषण म्हणून 25 तारखेला सुरू केलेले उपोषण त्यांनी बेमुदत सुरू केले. मेधाताई आजारातून उठल्या होत्या. अंगात ताप घेऊन त्या खोऱ्यात फिरत होत्या, सरकारशी बोलत होत्या. तापाचा अशक्तपणा भरून आलेला असतानाच त्यांचे बेमुदत उपोषण सुरू झाले, तसे त्यांचे देशभरातले सारेच साथी चरकले. अशा वेळी नेत्याने अचानक घेतलेला इतका मोठा निर्णय म्हणून नाराजीही व्यक्त होते. बेमुदत उपोषणाचा आधी इशाराही दिलेला नसताना हे उपोषण सुरू होणे हे आम्हा सर्वांसाठीच काळजीचे आणि अनपेक्षित होते.

मी तिथे- छोटा बडद्याला पोहोचले ते अशाच काळजीच्या व काहीशा नाराजीच्या मन:स्थितीत. मात्र संपूर्ण घाट बुडालेला, कडेच्या मंदिरातही पाणी घुसलेले आणि सत्याग्रहस्थळापासून जेमतेम दहा फुटापर्यंत आलेले पाणी पाहिल्यानंतर, पाणी रोखायला स्वत:च्या शरीराचाच बांध घालणाऱ्या पुराणातल्या आरुणीच्या गोष्टीप्रमाणे, चढते पाणी थोपवायचे तर तेवढा एकच पर्याय अजमावणे आवश्यक होते, हे लक्षातही आले. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत पाणीपातळीही स्थिरावली होती, असे तिथल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. गावागावात हाहाकार होता. घरे बुडत होती... शेते तर आधीच बुडलेली होती... रस्ते तुटले होते... मध्य प्रदेश सरकारने घराघरांतून लोकांना हुसकावून बाहेर काढून पत्र्याच्या शेड्‌समध्ये आणून टाकले होते. तिथे ना पाण्याची, ना खाण्याची व्यवस्था... गुरांचे काय करायचे, हा प्रश्न होता.... तरीही गावागावांतून स्त्रिया आणि पुरुष सत्याग्रहस्थळी येऊन पोहोचत होते. तितक्याच ताकदीने, ऊर्जेने आणि आशेनेही तेच नारे दुहरवत होते- ‘रहने दो हमें जीने दो- माँ नर्मदा को बहने दो।, नर्मदा घाटी करे पुकार - डूबे नही मानव अधिकार!’

उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी फोनवर मेधातार्इंशी चर्चा केली, आश्वासन दिले. पण आश्वासने तर सतत मिळत असतात. शिवाय पाणी भरत असताना गावे बुडत राहण्याचे काय करणार, तेव्हा धरण न भरण्याचाच आग्रह मध्य प्रदेश सरकारने गुजरात व केंद्र सरकारकडे तसेच नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाकडे धरावा आणि मध्य प्रदेशातील पुनर्वसन पूर्ण करण्यासाठी पुढील वर्षभराची मुदत मिळवावी व त्या कालावधीत हे उर्वरित पुनर्वसन पूर्ण करावे अशी साधी मागणी आंदोलनाने त्यांच्यापुढे ठेवली होती. सरदार सरोवराच्या मध्य प्रदेशमधील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गुजरात सरकारने 1857 कोटी रुपये देणे आहे; सरदार सरोवरातून अपेक्षित वीजनिर्मिती न झाल्यामुळे आणि मध्य प्रदेशला विजेचा देय वाटा न मिळाल्यामुळे गुजरात सरकारकडून घेण्याची भरपाई आहे, हे सर्व मुद्देही त्यामध्ये होतेच. परंतु तातडी होती ती पुनर्वसन पूर्ण होईपर्यंत धरण न भरण्याची. त्यातला पूर्वार्ध जरी मध्य प्रदेशची जबाबदारी होती तरी उत्तरार्ध सर्वस्वी मोदींच्या हाती होता, हे आंदोलनही जाणत होतेच!

त्यामुळेच काही ठोस आश्वासन लेखी मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणे शक्यच नव्हते. तरीही, मागील शिवराजसिंह सरकारच्या तुलनेत कमलनाथ सरकारकडून खूपच तत्पर व सकारात्मक प्रतिसाद मिळाला, असेच म्हणायला हवे. उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन हे सत्याग्रहस्थळी आले. त्यांनी आंदोलनाच्या सर्व मागण्या योग्य आहेत व आपण त्या पूर्ण करण्यासाठी बांधिल आहोत, हे स्पष्ट केले. राज्याचे पर्यटनमंत्री असलेले स्थानिक आमदार सुरेंद्रसिंह बघेल यांना आंदोलनाच्या प्रत्येक परीक्षेच्या घडीला धावून येताना मागील काही वर्षांपासून पाहिलेले होते. ते या वेळी परदेशी गेलेले होते, परंतु त्यांनी आपल्या भावना व्यक्त करणारे व जबाबदारी पूर्ण करण्याचे आश्वासन देणारे व्हिडिओ निवेदन पाठवले. दिग्विजयसिंह यांनी फोनवर मेधातार्इंशी बोलणे केले. विविध प्रशासकीय अधिकारी सातत्याने येत होते, चिंता व्यक्त करत होते.

शासन-प्रशासनातील लोकप्रतिनिधी- अधिकारी आले की, धरणग्रस्त आणि कार्यकर्त्यांच्याही भावनांचा उद्रेक होत होता- आलेले बुडित आणि मेधातार्इंचे उपोषण या दोन्ही ताणांतून आलेला- परंतु तोही संयमित व अहिंसक लढ्याला शोभेसाच होता. बडवानीच्या नर्मदा खोरे विकास प्राधिकरणा (NVDA) च्या कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेलेल्या, परंतु तिथले सर्व अधिकारी पळून गेलेले पाहून त्या कार्यालयात पाणी आणि चिखल टाकून आपला राग व्यक्त करणाऱ्या खोऱ्यातल्या युवकांनीही ही कृती करत असताना कार्यालयातल्या फर्निचरची मोडतोड होणार नाही वा कुठल्याही कागदपत्राला धक्का लागणार नाही याची दक्षता घेतली होती.

संपूर्ण खोऱ्यातून शेकडो बाइक्सने काढलेली रॅली गावागावांत पोहोचली आणि तेथील स्थिती जाणून घेतानाच तेथील उद्‌ध्वस्त झालेल्या लोकांचे सांत्वन व साथही देऊन गेली. नर्मदेच्या आंदोलनावर ‘लकीर के इस तरफ-’ ही फिल्म तयार करणाऱ्या शिल्पा बल्लाळने सुनील सुकथनकर यांच्यासह तिथे पोहोचून परिस्थितीचे चित्रण केले व पाण्याने वेढलेल्या गावांची काय स्थिती आहे, हे समाजमाध्यमांतून अनेकांपर्यंत पोहोचवले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मेधातार्इंच्या उपोषणादरम्यान पाणी 134 ते 134.5 मीटर्सपर्यंत थांबले. मध्य प्रदेशचे निवृत्त मुख्य सचिव व सातत्याने लोकांसोबत राहिलेले आंदोलनाचे मित्रही असलेले शरद्‌चंद्र बेहर हे नर्मदा खोरे विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांसह उपोषणाच्या नवव्या दिवशी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पत्र घेऊन उपोषणस्थळी पोहोचले. कमलनाथ यांचे पत्र स्वयंस्पष्ट होते.

तरीही, एकेका मुद्यावर सविस्तर चर्चा व ठोस आश्वासनानंतरच (त्यात एक महत्त्वाचा मुद्दा बुडितातली गावे व कुटुंबसंख्येचाही होता- मध्य प्रदेशने आधी जाहीर केलेला 76 गावे व 6000 कुटुंबे हा केवळ एका जिल्ह्याचा आकडा आहे आणि प्रत्यक्षात तो 178 गावे व 32000 कुटुंबे इतका आहे, हे नर्मदा खोरे विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. नोकरशाहीला माणसांचे जगणे हा केवळ आकड्यांचा खेळ वाटतो आणि किती बेपर्वाईने त्याकडे पाहिले जाते, याचे हे एक उदाहरणच होते! असो. म्हणूनच तर एकेका मुद्यावर लावून धरून निर्णय करवून घ्यावे लागतात!) एका आठवड्यानंतर म्हणजे 9 सप्टेंबरला भोपाळ येथे सर्व संबंधित अधिकाऱ्यांसह पुनर्वसनाचे कार्य व वेळापत्रक निश्चित करण्यासहच्या बैठकीचे आश्वासन घेऊनच मेधातार्इंनी उपोषण मागे घेतले.

ती बैठक नंतर इंदूर येथे झाली. दि.9 सप्टेंबरला हजारो विस्थापितांनी इंदूरमधील नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक मारून व तिथेच ठिय्या देऊन सर्व निर्णयांचे तपशील ठरवूनच पूर्ण केली. उपोषणकाळात मेधातार्इंची तब्येत फार झपाट्याने ढासळत गेली. खोऱ्यातील स्त्री-पुरुषांना त्यांच्यासाठी कासावीस होताना मी बघत होते. या लढाईत गेली 35 वर्षे लढलेले अगदी ज्येष्ठ पुरुष कार्यकर्तेदेखील, ‘आम्ही बुडालो तरी चालेल, मेधातार्इंचा जीव वाचवा-’ असे घळघळा रडत म्हणत होते... तेव्हा ही तपश्चर्या काय असते याचाही अनुभव येत होता.

एखादे आंदोलन इतका दीर्घ काळ, इतके सशक्तपणे आणि शांततामय, सांविधानिक मार्गांची कास न सोडता चालू शकते, पुढे जाऊ शकते, प्रश्नांची तड लावू शकते- तेदेखील इतक्या निर्मम, बेजबाबदारच नव्हे तर बेरहम सत्ताधाऱ्यांच्या पुढ्यात उभे ठाकून; या समकालीन इतिहासाच्या आपण साक्षीदार- साथीदार आहोत, या भावनेनेच मन भरून येते. हेदेखील इथे सांगायला हवे की, देशातल्या या महत्त्वाकांक्षी व महाकाय प्रकल्पात 15000+ कुटुंबांचे जमिनीला जमीन देऊन पुनर्वसन, ज्यांना जमिनीला जमीन देणे सरकारला शक्य नाही त्यांना देय पाच एकर जमिनीच्या बदल्यात प्रत्येकी 60 लाख रुपये नुकसानभरपाई, भूमिहीनालाही 5.80 लाख रुपये नुकसानभरपाई व सर्व प्रकल्पग्रस्तांचे पर्यायी गावठाणांमध्ये भूखंड व नागरी सुविधांसह पुनर्वसन हे सर्व आंदोलनामुळेच मिळाले आहे. नाही तर, इतर अनेक धरणे व अन्य प्रकल्पांमधल्या विस्थापितांप्रमाणेच या अडीच लाख लोकांचा पत्ताही या देशाला लागला नसता!

त्याशिवाय धरणाच्या लाभ-हानीचे व विकासनीतीचे जे मुद्दे या आंदोलनाने उपस्थित केले आणि लावून धरले, ते सर्व खरे तर ठरलेलेच आहेत; परंतु त्यांवर आज-ना उद्या इथल्या व्यवस्थेला व समाजालाही विचार करावाच लागणार आहे. आंदोलनाचे यशापयश त्यावरही मोजायला हवे ना!

शेवटी एक हृद्य प्रसंग सांगते आणि थांबते. मेधातार्इंनी उपोषण मागे घेतल्यानंतर, आपले धरण भरण्याचे वेळापत्रक अधिक वेगाने पुढे नेत गुजरात सरकारने धरणात पाणी भरले. उपोषणानंतर दवाखान्यात जबरदस्तीने दाखल केलेल्या आणि दोन दिवस आयसीयू व त्यानंतर एखादा दिवस साध्या निगराणीखाली डांबल्या गेलेल्या मेधाताई उपोषणाच्या चौथ्या दिवशी बाहेर पडल्या ते वाढत्या बुडिताचा सामना करणाऱ्या गावांत, टिन शेड्‌समध्ये कोंबल्या गेलेल्या विस्थापितांमध्ये. दरम्यान, आणखी तब्बल 4 मीटर्स पाण्याची भिंत उभी झाली होती, सारे जनजीवन कवेत घेत. चिखलदा येथील चौकातला गांधीजींचा पुतळाही जलमग्न झाला होता. आंदोलनाचे ते प्रेरणास्थान राहिलेले आहे. मेधातार्इंच्या उपस्थितीत, बोटी लावून तो पुतळा तेथील लोकांनी पाण्याबाहेर काढला आणि धरणाचे पाणी पोहोचणार नाही अशा उंचीवर पुर्न:स्थापित केला. त्या वेळी तो बैठा, छोटासा, कृश पुतळा त्यांचेच अनुयायी सरदार पटेल यांच्या सरकारी पुतळ्याहून किती तरी भव्य वाटला...

गांधीजींच्या दीडशेव्या जन्मवर्षी त्यांच्या सत्याग्रही संघर्षाला या आंदोलनाहून मोठी मानवंदना आणखी कोणती असू शकेल?

सुनीती सु. र.

sunitisr@gmail.com

निमित्त

‘दोन मित्र’ची कहाणी

भारत सासणे

साधना साप्ताहिकाच्या इ.स.2000 च्या दिवाळी अंकात ‘दोन मित्र’ ही छोटी कादंबरी प्रसिद्ध झाली होती. तिला थोड्याच पण चांगल्या वाचकांच्या पसंतीची पावती मिळाली होती. विशेष म्हणजे कादंबरी वाचनासाठी फारसा वेळ देऊ न शकणाऱ्या व ‘फिक्शन’मध्ये कमी रुची असणाऱ्या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना ती कादंबरी विशेष भावली होती. ती कादंबरी नंतर मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई यांच्याकडून पुस्तकरूपाने आली, आता ती कादंबरी इंग्रजीत आली आहे. विलास साळुंके यांनी अनुवाद केला असून ‘इंकिंग इनोव्हेशन्स’ने ती प्रकाशित केली आहे. या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन 30 सप्टेंबर 2019 रोजी, पत्रकार भवन, पुणे येथे कुमार केतकर यांच्या हस्ते होत आहे. त्या निमित्ताने ‘दोन मित्र’ची कहाणी सांगणारा लेख पुनर्मुद्रित करीत आहोत. - संपादक

1 ‘दोन मित्र’ कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर ती लगेच आणि मोठ्या प्रमाणात वाचली गेली असेल, असं नाही. मात्र या कादंबरीबद्दल प्रतिक्रिया हळूहळू येत राहिल्या. अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया हाती येण्यासाठी लेखकाला वाट पाहावी लागते. ‘दोन मित्र’बद्दल चांगलं लिहून यायला लागलं, तेव्हा काही थोड्यांना ही कादंबरी चांगली आणि महत्त्वाची वाटते आहे, असं लक्षात यायला लागलं; तरीही या कादंबरीचा वेगळेपणा (तसा तो असल्यास) जाणकारांना जाणवला असेल की नाही, याबद्दल शंका येत राहिली. ‘दोन मित्र’चं प्रकाशन मुंबईला झालं. त्या दिवशी पाऊस पडत होता. कमीच श्रोते उपस्थित होते. विजया राजाध्यक्ष आणि अरुण साधू प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. किशोर कदम आणि अन्य सहकलाकारांनी कादंबरीच्या काही भागाचं वाचन केलं.

अरुण साधू म्हणाले की, ‘जर हा विषय त्यांना सापडला असता, तर त्यांनी समाजाच्या चेहऱ्यावर आणि छाती-पोटावर त्वेषाने ठोसे मारले असते. सासणे यांनी समाजाच्या चेहऱ्यावर ओरखडे-बोचकारेच काढलेले आहेत. हा विषय अधिक आक्रमक पद्धतीने मांडण्याची गरज होती आणि मी (त्यांनी) तो तसा मांडला असता.’

विजया राजाध्यक्ष यांनी ‘दोन मित्र’वर नंतर ललितमध्ये एक परीक्षणही लिहिलं. त्यांना ही कादंबरी आवडली होती. ‘दोन मित्र’वर चित्रपट निघू शकेल, असं निळू फुले यांना वाटलं. काहीएक आयोजनानंतर त्यांच्याबरोबर चर्चाही झाल्या. चित्रपटनिर्मिती त्यांनाच करायची होती, पण ते काळाच्या पडद्याआड गेले. चित्रपट निघाला नाही. भालचंद्र नेमाडे यांनी दूरध्वनीवरून मला असं सांगितलं की, त्यांना कादंबरी आवडली आहे; मात्र कादंबरीच्या शेवटाबद्दल त्यांना शंका आहे.

कादंबरीचा शेवट जसा केला आहे, तसा करणं ही लेखक म्हणून माझी अनिवार्यता होती. आज ना उद्या समाज पक्व होईल आणि जात-वर्ग इत्यादी बंधनं नष्ट होऊन परस्परांबद्दल मित्रभाव निर्माण होईल, अशा प्रकारचं स्वप्न जपणं लेखक या नात्यानं मला आवश्यक वाटलं. आपण चांगल्या दिवसांच्या येण्याची फक्त वाटच पाहू शकत असतो आणि तसे ते येतील, अशी अपेक्षा बाळगू शकतो. नसता, त्याव्यतिरिक्त, निव्वळ वास्तव मांडणं हा लेखकाचा काही एकमेव हेतू असत नाही. रत्नाकर मतकरींनी मला दीर्घ पत्र लिहून कादंबरी आवडल्याचं सांगितलं. ‘समाजाचा कुरूप चेहरा’ दाखवल्याबद्दल त्यांनी माझं अभिनंदन केलं. याच सुमाराला व त्या आधी ‘राहीच्या स्वप्नांचा उलगडा’ ही माझी कादंबरी प्रकाशित झाली होती. मी ‘सौंदर्यवादाच्या सापळ्या’मध्ये अडकतो आहे, अशी चिंता व्यक्त करून ‘काव्यमय शैलीतील अमूर्त आणि अबोध पातळीवर’ जाणाऱ्या माझ्या कादंबरीलेखनाच्या प्रयासावर त्यांनी एका लेखातून टीका केली होती. व्यर्थ सौंदर्यवादाच्या ‘सापळ्या’त न अडकता मी वास्तव मांडावं, अशी त्यांची सूचना होती. ‘दोन मित्र’ त्यांना आवडली आणि ‘दोन मित्र’मुळे, मला वाटतं, मी पुन्हा ‘वास्तववादी लेखकांच्या गटा’त समाविष्ट झालो.

तुम्ही समाजातील एखाद्या घटकाच्या विरोधात लिहिता, तुम्ही वाभाडे काढता, चाबकाचे फटकारे मारता, आक्रमक भाषा वापरता; तेव्हा तुम्हाला समजून घेणं अवघड नसतं. तुम्ही मारलेले ठोसे योग्यच आहेत, असं बहुतेकांना वाटलेलं असतं. तुम्ही समंजस, मानवतावादी, सगळ्यांना समजून घेण्याची अशी भूमिका घेतली; तर तुमचं लेखन प्रभावी असूनदेखील ‘असली भूमिका’ अनेकांना मान्य न होण्याचा धोका असतो. हा धोका ‘दोन मित्र’च्या निमित्ताने मी घेतला.

2 ‘दोन मित्र’ ही दोन मित्रांची कथा आहे, पण या दोघांची कथा ‘तिसरा मित्र’ सांगतो आहे. हा तिसरा मित्र वयस्कर, कदाचित कुरूप, धर्मांतरित ख्रिश्चन असा आहे. हा लेखकही आहे आणि म्हणून त्याच्याजवळ निवेदनाची आस्था आहे व शैलीही आहे. मुख्य म्हणजे, तो शहाणा आणि समंजस असा म्हातारा माणूस आहे. ही एका गावाची कहाणी. पंचवीस वर्षांपूर्वीचं कोणतंही एखादं गाव नजरेसमोर आणलं तरी चालेल. सायकलचा जमाना. शांत, लयबद्ध असं जीवन जगणारा समाज. या गावाचा (म्हणजे कोणत्याही गावाचा) गेल्या पंचवीस वर्षांतला बदलता चेहरा या कादंबरीत आपल्याला दिसतो. बदलतं राजकारण, समाजकारण, अर्थकारण, जातीची-धर्माची बदलती समीकरणे, बदलते संबंध व बदलती नाती, बदलता माणूस यांचं एक सलग रेखाचित्र या कादंबरीत दिसतं.

एक मित्र उच्चवर्णीय आहे, दुसरा बहुजन समाजातला आहे. दोघांची घरं त्यांच्या-त्यांच्या जातिनिहाय विभागलेल्या गल्ल्यांमध्ये आहेत. यांची मैत्री अनेक वर्षांची आणि समाजाला आदर्शवत्‌ अशी आहे. बुचकळ्यात टाकणारी पण आहे. भोवताली जे बदल होतात, त्या बदलांना हे ‘दोन मित्र’ सामोरे जातायत. एक चिथावणीखोर व्याख्यान आणि घडवून आणलेली दंगल. त्या व्याख्यानाला उत्तर म्हणून घडवून आणलेलं दुसरं व्याख्यान आणि पुन्हा दंगल. यामुळे भरडला जाणारा सामान्य माणूस. या दंगलीला लाभलेली धर्मांधतेची झालर आणि पुन्हा हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर अशा दंगली.

कादंबरीतील गाव ढवळून निघालं आहे. जो-तो एकमेकांच्या विरोधात उभा आहे, हातामध्ये शस्त्र घेऊन. बाहेरून आलेल्या ‘धूर्त शक्ती’ विष पेरतात आणि निघून जातात. उरतो तो स्थानिक सामान्य माणूसच. ज्या शिंप्यांचं दुकान जाळलेलं असतं, त्याच्याकडे पुन्हा कपडे शिवायला जायचं असतं. ज्या चांभाराचं दुकान लुटलेलं असतं, त्याच्याकडे उद्या चप्पल शिवायला जायचं असतं. तरीही सामान्य माणूस द्वेषही करतोय, हिंसाचारही करतोय आणि एकमेकांचं संरक्षणही करतो. उदा.- महामहोपाध्यायांना मशिदीमध्ये आश्रय घ्यावा लागणं इत्यादी. आणि सफाईचं काम करणाऱ्या (एका अर्थाने तत्कालीन अस्पृश्य) वर्गानं उच्चवर्णीयांना दिलेलं संरक्षण. या सगळ्या संगत आणि विसंगत बाबी ‘तिसरा मित्र’ दोन मित्रांच्या कहाणीच्या अनुषंगाने सांगत गेला आहे. समाजाच्या दांभिक वर्तनावर या कादंबरीत काही पात्रं उघड आणि तीव्र असं भाष्य करतात.

मात्र कादंबरीचा ‘स्व-स्वर’ उच्च आणि कर्कश असा नाही. कादंबरीला काही संवादी आणि समंजस असं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. फसगत इथंच झाली असावी. म्हटलं तर टीका आहे, दांभिकतेच्या फुग्याला टाचणी पण लावलेली आहे, म्हटलं तर आक्षेप घेतलेला आहे; परंतु कुणा एकाची बाजू घेतलेली नाही. कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं नाही. वास्तव सांगितलंय, पण ते कुणाच्या बाजूनं किंवा कुणाच्या विरोधातलं वास्तव नाही. कादंबरी समजून घेण्याची नेमकी अडचण इथं झाली असावी.

3 आमची जगण्याची मुळं स्थानिक पातळीवर घट्ट होत असताना ‘राष्ट्रीय राजकारण’ सांगायला ‘बाहेरची मंडळी’ आमच्याकडे येऊ लागली; तोपर्यंत शांत गावातून आम्ही शांतपणे जगत आलो होतो.‘ऋतुंभरा’ काय म्हणतेय, हे आम्हाला माहीत नव्हतं सहसा. यांनी ‘कॅसेट्‌स’ आणल्या आणि ऐकवल्या. कादंबरीतल्या ब्राह्मण आळीतली मूठभर उच्चवर्णीय मंडळी चकित होऊन ऐकत राहिली. घराघरांतून कॅसेट ऐकवली जातेय आणि हे सामूहिक श्रवण आहे. तुम्ही ज्याला ‘राष्ट्रध्वज’ म्हणता, तो तर केवळ कापडाचा तुकडा आहे; त्याबद्दल कसला अभिमान- तिचं म्हणणं. तिचं असंही म्हणणं की, हिंदूंच्या घरात कुत्रा शिरला तर हाकलायला आमच्याकडे घरात काठीही नसते; ‘त्यांच्या’कडे मात्र तलवारी आहेत. आम्ही आमचा बचाव स्वत:च करणार आहोत की नाही, तिचं विचारणं- विस्फोटकपणे विचारणं. कादंबरीत नाही, पण नंतर बाबरी मशीद पाडली, तेव्हा या ऋतुंभरानं उमा भारतीला आनंदानं घट्ट मिठी मारल्याचं आपल्याला आता ज्ञात आहे. द्वेष आम्हाला यांनी शिकवला. ते गेले आणि इकडे दंगली झाल्या. कादंबरीतल्या (आणि तत्कालीन कोणत्याही) गावात दंगली नव्हत्या अशा. असा द्वेष नव्हता. बुखारी काय म्हणतोय, हे आम्हाला माहीत नव्हतं. ‘त्यांनी’ ऐकवलं, सांगितलं. त्यांनी कॅसेट्‌सही आणल्या. स्थानिक मुसलमानांना उर्दू येत नाही. हे गोरेगोमटे ‘मोगलवंशीय’ म्हणवणारे शैलीदार उर्दूतून बोलणारे इथे आले; त्यांनी द्वेष शिकवला. कादंबरीत हे सगळं आलं आहे.

दुश्चिन्हाचे पडसाद आणि ग्रहणाची सावली कादंबरीत हळूहळू पसरते, पसरत राहते. छोटंसं गाव. छोटेसे वर्ग त्यातले. पिढ्यान्‌पिढ्या एकत्र राहिलेले. पण आता सगळेच संशयाच्या छायेखाली आहेत. कर्फ्यू त्यांनी अनुभवलाय पहिल्यांदाच. कुठे तरी रागही खदखदतोय. तणावाच्या त्या परिस्थितीत अस्वस्थ होऊन ‘निवेदक तिसरा मित्र’ आपल्या ख्रिश्चन वस्तीत फिरत राहतो, चर्च आणि भोवतालच्या घरांमधून. तरुण ‘तयारीनं’ बसलेले दिसतात त्याला. ‘आपल्यावरही हल्ला होऊ शकेल’, असं त्यांचं म्हणणं. कादंबरीचा निवेदक कपाळाला हात लावून विचारतो, ‘त्यांची शिवसेना, मग आता तुमची येशूसेना का?’ या समंजस आणि तटस्थ अशा ‘माणूसवादी’ म्हाताऱ्यावरही एका अज्ञात व्यक्तीकडून हल्ला होतोच. समंजस माणूस कोणाला नकोच असतो; गांधीही नको होता.

दंगलीच्या निमित्तानं कादंबरीत काही चिंतन येतं. निवेदक स्वत: लेखक आहे. मनोहर आणि कानिफनाथ हे त्याचे दोन मित्र त्याला गमतीने ‘रद्दीवाला’ म्हणतात. निवेदकच लेखक असल्याने थोडं चिंतन मांडण्याची ‘सोय’ झाली आहे. नसता; असं चिंतन, असं संभाषण कृत्रिम वाटलं असतं.

4 ‘आंतरजातीय लग्न’ हा त्या काळातला समाजाला गडबडवून टाकणारा मुद्दा. आताच्या आधुनिक काळातही आंतरजातीय लग्नाला तितकीशी मान्यता नसते. कादंबरीत ‘हे आंतरजातीय लग्नाचं आनुषंगिक प्रकरण’ हळूहळू मांडलं जातं. पण त्यामुळे सनातन्यांना जाग येते. ‘अभिमानवादी’ अकारण जागृत होऊन दोन्ही मित्रांवर दबाव टाकू लागतात. जातीतले म्होरके एकत्र येऊन जाब विचारतात आणि दोन मित्र अस्वस्थ होऊन जातात. कादंबरीच्या अखेरीस ‘आंतरजातीय लग्नाची अशक्यता’ दोन्ही घरांतून समजलेली असतेच, पण मुलगीसुद्धा ‘समंजसपणे’ वस्तुस्थितीचा स्वीकार करते. कर्मठ कोण आणि समंजस कोण, या मुद्यावर येऊन कादंबरीत एक वर्तुळ पूर्ण होतं. आज नाही तर उद्याचे दिवस चांगले असतील, असा आशावाद अखेरीस मांडलेला आहे. तो मांडावा लागणारच होता. लेखकाला त्याव्यतिरिक्त तरणोपाय नसतो.

5 गुणिजनांनी ही कादंबरी आवडल्याचं सांगितलं. पण ‘दोन मित्र’वर व्हावी तेवढी चर्चा झालेली नाही, असं वाटत असतानाच ‘अक्षरमानव’ या संस्थेनं या कादंबरीवर एकदिवसीय चर्चासत्र पुण्यामध्ये आयोजित केलं. वेगवेगळे अभ्यासक या चर्चासत्रातून या कादंबरीच्या विविध अंगांवर प्रकाश टाकणार होते. मी अपेक्षेनं गेलो. निळू फुलेसुद्धा मुद्दाम आले होते. बहुतेक वक्त्यांचा सूर आक्रमक आणि समाजघटकांच्या विरोधातला असा होता. त्यामुळे मला अपेक्षित नसलेले तट-गट निर्माण झाले. आपण कादंबरीला आणि कादंबरीच्या लेखनाला ‘वर्गवारी’मध्ये ढकलण्याची घाई करतो. कादंबरी दलितसंवेदनांना स्पष्ट करणारी आहे की दलितविरोधी आहे, कादंबरी उच्चवर्णीयांच्या विरोधात आहे की समर्थन करणारी आहे- इत्यादी प्रश्न आपल्याला पडतात.

कारण तसे ते पडावेत, अशीच व्यवस्था आपण करून ठेवलीय. मग उपलब्ध पद्धतीचा आधार घेऊन या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. ‘दोन मित्र’ची प्रकृती काय आहे, हे नीटसं स्पष्ट होत नसल्यामुळे ‘दोन मित्र’वर कोणताही शिक्का बसला नाही, हे या कादंबरीचं नशीबच. पण त्यामुळे या कादंबरीकडे ‘आविर्भाववाद्यांनी’ फारसं लक्ष दिलं नाही आणि ‘कलावाद्यां’नीसुद्धा लक्ष दिलं नाही. चर्चासत्रानंतर मी थोडासा निराश झालो. ‘दोन मित्र’ ही कादंबरी मैत्री या ‘सोल्यूशन’कडे बोट दाखवत राहिली आणि यात आपल्यावर प्रच्छन्न टीका आहे, चिमटे आहेत असं ज्यांना वाटलं; त्यांनी कादंबरीची प्रशंसा केली नाही. पण समाजाला पक्व चेहरा मिळेल आज ना उद्या, उद्या चांगले सोनेरी दिवस येतील- अशी आशा करणं चुकीचं नसतं. ही कादंबरी तशी आशा करते, भाबडेपणाचा दोष पत्करून.

दंगलीनंतर, विद्वेषाच्या सामाजिक स्फोटानंतर दोन मित्र उंच टेकडीवर जाऊन बसतात. खंत करतात. त्यांच्यावर आलेल्या दडपणाबद्दल रुसतात, रागवतात. ‘तुम्ही आम्हा दोघांना समाजातून कसले बहिष्कृत करता, आम्हीच तुम्हाला बहिष्कृत करतो’ असं म्हणतात. मग एक जाहीरनामा लिहून घेतात. हा जाहीरनामा अनेक वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेला असतो. हे सगळं ‘तिसरा मित्र’ आपल्याला सांगतो आहे. भोवताली घडणाऱ्या घटनांबाबतचं चिंतन संथपणे व तटस्थपणे मांडतो आहे. त्याच्या घरातून, मोडक्या खिडकीच्या चौकटीतून बदलतं गाव, बदलता समाज दिसत असतो. ‘निवेदक तिसरा मित्र’ बदलता समाज पाहत राहतो. मात्र, त्याला प्रयत्न करूनही ती मोडकी खिडकी दुरुस्त करता येत नाही.

कादंबरीत उपहास असला, टीका असली; तरी कादंबरी कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या बाजूनं अशी उभी राहत नाही. त्यामुळे कादंबरीची फार प्रशंसाही झाली नाही व कादंबरीवर टीकाही झाली नाही. तुम्हाला संयत लिहायचं असेल, तर असंच होईल याची जाणीव ठेवावी लागते. ‘दोन मित्र’ कादंबरी मी लिहिली, तेव्हा मला ‘मैत्री’ या मूल्याच्या अनुषंगानं काही कोटेशन्स पाहिजे होती. ती शोधत असताना मला ‘द बुद्धा अँड हिज धम्म’ या पुस्तकातील काही कोटेशन्स सापडली. महात्मा बुद्धानं ‘मैत्री’ या मूल्याविषयी म्हटलं आहे की : ‘मैत्री म्हणजे असिल जीवजातीसंबंधी प्रेम; मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे- मैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्याद असावा, विचार भव्य व अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा. मैत्री म्हणजे अंत:करणाची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्य कृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, ती प्रज्वलित होते.’

अडीच हजार वर्षांपूर्वी एका महामानवानं ‘मैत्री’ या अमूर्त संकल्पनेबाबत असे विलक्षण विचार नोंदवून ठेवलेले आहेत, हे पाहून मी चकित झालो. ही कोटेशन्स मी ‘दोन मित्र’ या कादंबरीच्या सुरुवातीला सन्मानानं वापरली. ही कादंबरी वाचून या कादंबरीचे योग्य असं मूल्यमापन केव्हा तरी केलं जाईल, अशी आशा मी बाळगून आहे. कारण चांगल्या दिवसांची आपण वाट पाहू शकत असतो आणि तशी ती आपल्याला पाहायची असते.

भारत सासणे, पुणे

bjsasne@yahoo.co.in

नवे पुस्तक

‘अनमेकिंग ऑफ इंडिया’ची अस्वस्थ करणारी कादंबरी

लक्ष्मीकांत देशमुख

या कादंबरीला तथाकथित कलात्मकतेचे निकष लावण्यात फारसा मतलब नाही. त्या चष्म्यातून पाहिलं तर, प्रभाकर व सर्जी ही पात्रं केवळ साक्षीदार स्वरूपात कादंबरीत वावरत असतात. कादंबरीला सुसूत्र असं कथानक नाही, प्रामुख्याने चर्चा व वृत्तपत्रीय संदर्भांतून काळं- करडं वास्तव मांडलं जातं... हे कादंबरीवर घेता येणारे आक्षेप तसे चुकीचे नाहीत. पण नयनतारा सहगल यांनी जी रिपोर्ताज शैली कादंबरीत वापरली आहे आणि त्याला जे प्रवाही, चपखल भाषेच्या माध्यमातून कलात्मक ललित रूप दिलं आहे, ते अनुभवताना वाचक सुन्न होतो... हेच कादंबरीचं यश आहे. सौंदर्यवाद्यांचा समाचार घेताना 1930 च्या दशकात प्रेमचंदांनी म्हटलं होतं की, ‘आम्हाला सौंदर्याची परिभाषा बदलायची आहे.’ त्याच धर्तीवर नयनतारा सहगल यांच्या या कादंबरीचं समीक्षण करताना कलात्मकतेच्या मोजपट्ट्या बाजूस ठेवून लेखकाला जाणवणारं सत्य हीच कलात्मकता, या दृष्टीने विचार केला पाहिजे.

‘द फेट ऑफ बटरफ्लाईज्‌’ ही अलीकडेच प्रकाशित झालेली नयनतारा सहगल यांची लघुकादंबरी (नॉव्हेला) अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण कलाकृती आहे. त्याचं पहिलं कारण आहे- त्यांनी कलावंत म्हणून घेतलेली ठाम भूमिका. 2016 मध्ये दाभोलकर, पानसरे प्रभृती विचारवंतांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ त्यांनी आपला साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला होता; त्या वेळी त्यांनी जी कारणं दिली होती आणि देशातल्या विखारी वातावणाबद्दल चिंता व्यक्त केली होती, त्याचं स्पष्ट प्रतिबिंब ही कादंबरी वाचताना पानोपानी जाणवतं. दुसरं कारण म्हणजे- त्यांनी या कादंबरीच्या प्रकाशनानिमित्त ज्या विविध मुलाखती दिल्या, त्या वेळी त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं : ‘ We are at urgent moment, cross road & our's is a world where cruelty has become casual.’ त्या अनुषंगानं आज देशाचा प्रवास हा ‘अनमेकिंग ऑफ इंडिया’चा उलट्या दिशेने, मागील काही वर्षांत ‘यू टर्न’ घेत चालला आहे, तो चित्रित करणारी ही कादंबरी आहे.

नयनतारा सहगल यांनी वास्तव-कल्पित आणि भूत-वर्तमान व संभाव्य भविष्याची सरमिसळ कलात्मकतेनं करीत एक जोरकस विधान- स्टेटमेंट केलं आहे. तसं भूमिकायुक्त लिखाण भारतीय साहित्यात अभावानंच वाचायला मिळतं, त्यामुळेही ही कादंबरी 2019 ची महत्त्वाची साहित्यकृती ठरते. नयनतारा सहगल गेली पन्नास वर्षे कादंबऱ्या व ललितेतर साहित्य लिहीत आहेत. त्यांनी एक फार मोठा कालखंड पाहिला आहे. दुसरे महायुद्ध, भारताचे स्वातंत्र्य, लोकशाहीचा घातला गेलेला पाया, संविधानाची निर्मिती, विविध संस्थांद्वारे ‘मेकिंग ऑफ इंडिया’चा सुरू झालेला प्रवास, मग सुरू झालेली मूल्यांची घसरण, वाढता भ्रष्टाचार आणि सेक्युलॅरिझमला फासला जाणारा हरताळ, इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी, 1992 नंतर बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर मुस्लिमांची झालेली घुसमट व कोंडी आणि नरेंद्र मोदींच्या कालखंडात ठळकपणे दृढ झालेलं विद्वेषावर आधारित धार्मिक राजकारण आणि सांविधानिक संस्था व मूल्यांचा ऱ्हास...

या साऱ्या भारताच्या वाटचालीच्या नयनतारा सहगल या डोळस निरीक्षक आहेत आणि प्रतिभेच्या बळावर त्याचं कादंबरीत रूपांतर करणाऱ्या समर्थ लेखिका पण आहेत. त्यांच्या पन्नास ते सत्तरच्या दशकातील ‘ए टाइम टुबी हॅपी’, ‘धिस टाइम ऑफ मॉर्निंग’ आणि ‘स्टॉमर्स इन चंदिगड’मधून सांविधानिक तत्त्वज्ञानाप्रमाणे सुरू असलेला ‘मेकिंग ऑफ इंडिया’चा प्रवास त्यांनी रेखाटला आहे. या कादंबऱ्यांतील पात्रे लोकशाहीवादी व उच्च नैतिक मूल्ये मानणारी आहेत. त्यानंतर आलेली त्यांची ‘रिच लाईक अस’ ही साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरची आणि एका अर्थाने ‘अनमेकिंग ऑफ इंडिया’चा सुरू झालेल्या प्रवासाची कहाणी कथन करणारी आहे.

अलीकडे दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली त्यांची कादंबरी ‘व्हेन मून शाईन बाय डे’- जी मुस्लिम समाजाची (स्पष्ट उल्लेख नसला तरी गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवरची) झालेली कोंडी आणि पूर्ण समाजाला परिघाबाहेर करण्याची भूमिका स्पष्ट करणारी आहे. ती व प्रस्तुतची ‘द फेट ऑफ बटरफ्लाईज्‌’ या दोन कादंबऱ्या एकत्रित वाचल्या तर ‘अनमेकिंग ऑफ इंडिया’चा चिंता वाटणारा वेगवान प्रवास त्यातून प्रकट झाला आहे. कटू आणि मानवतेला उद्‌ध्वस्त करणाऱ्या प्रश्नांना कलावंतांनी साहित्यातून निर्दयी प्रामाणिकतेनं भिडलं पाहिजे, अशी जी अपेक्षा व्यक्त केली जाते- त्या कसोटीला ही ताजी कादंबरी शंभर टक्के उतरते, हे नि:संशय!

या कादंबरीचं कथानक काहीसं गुंतागुंतीचं व विस्कळीत आहे. त्यात एक सलग व स्पष्ट असं संघटित कथानक नाही, तर आजच्या अस्वस्थ वर्तमानाच्या साक्षी ठरणाऱ्या व प्रतिक्रिया देणाऱ्या पात्रांचं चरित्रचित्रण- असं कादंबरीचं स्वरूप आहे. किंबहुना, असं म्हणता येईल की- नयनतारा सहगल यांना जे म्हणायचं आहे, सांगायचं आहे, ते सांगण्यासाठी काहीशा सैल बांधणीचा फॉर्म त्यांनी स्वीकारला असून त्यांच्या विचारांचे वाहक असणारे प्रभाकर व सर्जी या दोन पात्रांच्या नजरेतून सध्या देशात जे काही घडत आहे, त्याचे साक्षीदार दाखवत सहगल यांनी ललित अंगाने ‘स्लाईस ऑफ लाईफ’- वास्तवाचा एक तुकडा लालित्याची जोड देत मांडला आहे. म्हणून वाचताना वाचकांना ही कांदबरी देशातील अलीकडच्या अनेक दु:खद व निर्घृण घटनांची आठवण करून देते!

ही कादंबरी प्रामुख्याने ज्याच्या नजरेतून उलगडली जाते, तो प्रभाकर हा राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि आज देशात जे हिंसेचं वातावरण आहे, त्याचा तो साक्षीदार आहे व काही प्रमाणात बळी पण. अल्पसंख्याकांप्रति बदलत जाणाऱ्या एकतर्फी सामाजिक नियमाने प्रभाकर अस्वस्थ होतो. जिच्यावर तो आकृष्ट झाला आहे, त्या कटरिनाच्या माध्यमातून निर्घृण धार्मिक दंगलीला बळी पडणाऱ्या आणि सामूहिक बलात्कार सोसाव्या लागणाऱ्या मुस्लिम स्त्रीच्या झालेल्या कोंडीचा तो सहवेदनेनं अनुभव घेतो.

‘ते’ आणि ‘आम्ही’ असा अधिकाधिक ठळक होत जाणारा भेद त्याच्यातला राज्यशास्त्राचा प्राध्यापक बारकाईनं टिपत जातो. त्याच्या सान्निध्यात आलेल्या एका बड्या रेस्टॉरंटचा मालक प्रल्हाद आणि त्याचा पार्टनर फ्रान्सिस- ज्यांनी उघडपणे समलिंगी विवाह केला आहे- त्यांचं हॉटेल संस्कृतिपूजक उद्‌ध्वस्त करतात व त्यांना मारहाण करतात. त्यापूर्वी पार्टीत नृत्य करताना आपलं प्रेम सापडलेला, प्रल्हादचे काहीसे तत्त्वज्ञानपर उद्‌गार ’‘Love knows no safe haven in time like these, we are told but the times are grim, the times are unbearably tragic, and so, my friends- let us dance!!’ आठवून, प्रभाकर कमालीचा उद्विग्न होतो. पण काही करू शकत नाही.

प्रभाकरचा कबाब आणि रुमाली रोटीसाठी आवडता एक ढाबा असतो. त्याचा कुक रफिक हा एक दिवस अचानक नाहीसा होतो. लोपेज हा त्याचा मित्र प्रभाकरला म्हणतो, ‘‘जोवर गाईचं नाही हे स्पष्ट होत नाही, तोवर मी मटण खाणार नाही. ‘काऊ कमिशनर’ (कादंबरीतला शब्दप्रयोग आहे) सर्व हिंडून तपासणी करीत आहेत, म्हणून मी आता शाकाहारी व्हायचं ठरवलं आहे. कारण मला भीती वाटते की, कुणी तरी घरात येऊन माझा फ्रीज तपासून साठवलेले मटण हे मटण नाही तर बीफ आहे, असं जाहीर करेल. आणि नको, त्यापेक्षा मटण सोडलेलं बरं.’’ आणि तो प्रभाकरसोबत त्या ढाब्यावर कबाबऐवजी लिम्का पिऊन उठतो... हा प्रसंग ज्या तटस्थपणे कोरड्या भाषेत सहगल यांनी वर्णिला आहे, त्यामागची तप्त धग वाचकांना जाणवल्याखेरीज राहत नाही.

प्रभाकर विद्यापीठातून एकदा घरी जाताना रस्त्यावर स्कल कॅप असलेला पूर्ण नग्नावस्थेतील मरून पडलेला एक माणूस पाहतो व त्याच्या शेजारी असलेली रक्ताळलेली कुऱ्हाड नजरेस पडते... या दोन वाक्यांत शब्दबद्ध केलेल्या घटनेची छाया पूर्ण कादंबरीवर पडलेली वाचकांना पानोपानी जाणवत राहते. कादंबरीचं मुखपृष्ठही हाच प्रसंग सूचित करणारं आहे.

शस्त्रास्त्रांचा वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्या रशियन सर्जीच्या माध्यमातून व त्याच्या प्रभाकरशी होणाऱ्या चर्चेतून नयनतारा सहगल नाझी जर्मनीच्या द्वितीय महायुद्धाचे संदर्भ चपखलपणे देत, देशात आज त्याच पद्धतीचा फॅसिझम फोफावत आहे, हे सूचित करतात. आणि मग पुढील- माझ्या मते, महत्त्वाचं स्टेटमेंट करणारं लोपेज व प्रभाकरचं- संभाषण येतं, ते असं आहे : ‘‘बहुसंख्य माणसं ही साधी छोटी माणसं असतात. जे घडतं त्यात ते प्रवाहपतिताप्रमाणे वाहत जातात. कारण त्यांना आपला जीव व काम गमवायचा नसतो.’’ या लोपेजच्या नाझी जर्मनीच्या संदर्भातील विधानाला दुजोरा देत प्रभाकर म्हणतो, ‘‘सर्वत्रच बहुसंख्य माणसं- युरोपातली किंवा अन्य कोणत्याही देशातील घ्या- आम्हाला केवळ शांततेत जगू देण्यासाठी मोकळं सोडा, एवढंच म्हणतात. आणि ते असं म्हणून फार काही मागत नाहीत.’’

पण साधं शांततामय जगणंही धार्मिक उन्माद आणि कंठाळी राष्ट्रवादाच्या काळात जगात कुठेही सामान्य माणसाच्या वाट्याला येत नाही, हे दरदरून घाम फोडणारं आणि थंडगार विषाप्रमाणे दंश करीत झोंबणारं सत्य नयनतारा सहगल यांनी तेवढ्याच थंड पण परिणामकारकपणे मांडलं आहे. या कादंबरीला तथाकथित कलात्मकतेचे निकष लावण्यात फारसा मतलब नाही. त्या चष्म्यातून पाहिलं तर, प्रभाकर व सर्जी ही पात्रं केवळ साक्षीदार स्वरूपात कादंबरीत वावरत असतात. कादंबरीला सुसूत्र असं कथानक नाही, प्रामुख्याने चर्चा व वृत्तपत्रीय संदर्भांतून काळं-करडं वास्तव मांडलं जातं... हे कादंबरीवर घेता येणारे आक्षेप तसे चुकीचे नाहीत. पण नयनतारा सहगल यांनी जी रिपोर्ताज शैली कादंबरीत वापरली आहे आणि त्याला जे प्रवाही, चपखल भाषेच्या माध्यमातून कलात्मक ललित रूप दिलं आहे, ते अनुभवताना वाचक सुन्न होतो... हेच कादंबरीचं यश आहे.

सौंदर्यवाद्यांचा समाचार घेताना 1930 च्या दशकात प्रेमचंदांनी म्हटलं होतं की, ‘आम्हाला सौंदर्याची परिभाषा बदलायची आहे.’ त्याच धर्तीवर नयनतारा सहगल यांच्या या कादंबरीचं समीक्षण करताना कलात्मकतेच्या मोजपट्ट्या बाजूस ठेवून लेखकाला जाणवणारं सत्य हीच कलात्मकता, या दृष्टीने विचार केला पाहिजे. मला तसं करताना असं वाटलं की, टोनी मोरिसननं म्हटल्याप्रमाणे- जे कलावंत अराजकतेच्या कालखंडात शब्द वा कलेला अर्थ प्रदान करतात, त्यांना जपले पाहिजे-ऐकले पाहिजे. नयनतारा सहगल यांची ही कादंबरी म्हणूनच आवडली नाही, पटली नाही तरी वाचली पाहिजे... कारण वर्तमान सत्याकडे व काळजी वाटणाऱ्या भविष्याकडे पाठ फिरवू नये, म्हणून!

लक्ष्मीकांत देशमुख, पुणे 411016

THE FATE OF BUTTERFLIES By - Nayantara Sahgal Speaking Tiger Publisher Pvt. Ltd. New Dehli. Pages – 144, Price – Rs. 450/-

जवाहरलाल नेहरू । 28

जवाहरलाल

सुरेश द्वादशीवार

नेहरूंना विज्ञानात रुची होती. भाभा ॲटोमिक कमिशनचे ते अध्यक्ष होते. वैज्ञानिक व तंत्रज्ञांना भेटायला आणि त्यांच्याशी नव्या संशोधनाविषयी बोलायला त्यांना आवडायचे. बोर्ड ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचेही ते अध्यक्ष होते. या दोन्ही कामांत ते समरसून भाग घेत. ‘‘भारताला औद्योगिक प्रगतीखेरीज दुसरा पर्याय नाही. अवजड उद्योग उभारणाऱ्या यंत्रणा त्यासाठी त्याला येथेच उभ्या केल्या पाहिजेत.’’ असे ते म्हणत आणि तशा त्यांनी त्या उभारल्याही. देशभरात प्रयोगशाळांची उभारणी त्यांच्या हातून झाली. दिल्लीची नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, पुण्याची नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आणि जमशेदपूरची नॅशनल मेटॅलर्जिकल लॅबोरेटरी त्यांच्याच हातची. याखेरीज कृषिक्षेत्र, औद्योगिक संशोधन, रसायने, औषधी द्रव्ये (मलेरिया व कॅन्सरसारख्या आजारांवरील औषधांचे संशोधन), काच व चिनी मातीचे उद्योग एवढा त्यांच्या उभारणीचा आवाका होता.

सारे आयुष्य समाज आणि देशासोबत राहूनही नेहरू मनाने एकटे व एकाकीच राहिले. हे एकटेपण त्यांना त्यांच्या आयुष्याएवढेच मनाने, ज्ञानाने, स्वतंत्र विचार करण्याच्या पद्धतीने, तो विचार परखडपणे सांगण्याच्या स्वभावाने आणि त्यांना लाभलेल्या उंचीने दिले. गांधीजींचा खून झाला, तेव्हा त्यांच्या एका इंग्रज मित्राने लिहिले, ‘नेहरू आज केवढे एकटे झाले असतील!’ त्याचा जिव्हाळा खरा असला तरी त्याचा प्रश्न चुकीचा होता. नेहरू आजन्म एकटे व एकाकी होते. त्यांना सहकारी होते, नातेवाईक होते, नेते आणि अनुयायी होते. चाहते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य लोक होते. पण तेवढ्या साऱ्यांत राहूनही त्यांचे एकटे असणे कायम होते. माणसे सामान्यपणे एकटीच असतात (ती तसे सांगत नसली तरी), पण नेहरूंचे एकटेपण परिस्थितीने लादलेले आणि त्यांनी नकळत स्वीकारलेले होते. अशा माणसांना मग त्यांचा विचार हाच अखेरचा व अंतिम असेही वाटू लागते. नेहरूंना सल्ला चालत असे. कोणत्याही प्रश्नाबाबतचा निर्णय हा त्यांचा स्वतःचा असे.

‘हा अर्धे वाक्य भाऊ म्हणून बोलतो, पण त्या वाक्याचा पुढचा भाग भावाचा नसतो; तो देशाच्या पंतप्रधानाचा असतो.’ हे त्यांच्याविषयी त्यांच्या बहिणीनेच लिहिलेले वाक्य आहे. एकाच क्षणी अनेक भूमिका समरसून पार पाडण्याच्या प्रयत्नात असा दुभंग येतो. ऐकणाऱ्याला तो कळतो, बोलणाऱ्याला मात्र तसे वाटत नाही. सदैव स्वतःच्या विचारात, चिंतनात वा विवंचनेत गुंतलेली अनेक माणसे असतात. नेहरू त्यातले होते. पण त्या साऱ्यांहून वेगळे आणि उंच होते. त्यांच्या विवंचना व्यक्तिगत नव्हत्या, त्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयही होत्या. त्यांना राजकीय, सामाजिक, आर्थिक व गरिबांसंबंधीच्या आस्थांचे वलय होते.

त्यांचे एकाकीपण दर वेळी काही तरी नवे जन्माला घालत होते आणि ते नेहमीच समाजोपयोगी ठरणारे होते. आपल्या आत्मचरित्रात गांधीजींविषयी लिहिताना ते म्हणतात, ‘त्यांची मते पक्की आणि ठरलेली असतात. इतरांचे म्हणणे ते कमालीच्या शांतपणे ऐकतात. ते सांगणाऱ्यालाही तसेच वाटत असते. प्रत्यक्षात मात्र तो एका बंद दरवाज्याशी बोलत असतो. इतर सांगतात व गांधी ऐकतात. मात्र खरे गांधी त्यांना करायचे तेच करतात.’ (ही टीका नेहरूंनाही लागू व्हावी, अशीच काहीशी आहे.) ॲरिस्टॉटलचे असमाधान कुणाच्याही समाधानाहून श्रेष्ठ असते; कारण ते तत्त्वज्ञान जन्माला घालते, असे म्हटले जाते, नेहरू त्यातले होते.

वडिलांशी- मोतीलालजींशी त्यांचे फारसे जुळत नसे. गांधीजींशी त्यांचे टोकाचे मतभेद होते. गांधीजींशी 1917 मध्ये झालेल्या पहिल्याच भेटीत गांधींनी त्यांना आपले ‘हिंद स्वराज’ हे पुस्तक वाचायला दिले. ते थोड्याच अवधीत वाचून झाल्यावर गांधीजींनी त्यांना विचारले, ‘‘यातल्या आर्थिक विचारांबद्दल (ग्रामोद्योग, हस्तव्यवसाय, गृहोद्योग इत्यादींबद्दल तुम्हाला काय वाटते?’’ नेहरूंचे उत्तर ‘‘हे विचार मला जराही पटणारे नाहीत.’’ असे होते. पुढे 1941 मध्ये त्यांना आपला वारसदार नेमण्याआधी गांधीजींनी त्यांना नेमका तोच प्रश्न पुन्हा विचारला, ‘‘एवढ्या वर्षांत माझ्या आर्थिक विचारांबद्दलचे तुमचे मत काही बदलले की नाही?’’ नेहरू म्हणाले, ‘‘जराही नाही. उलट, मला माझे आक्षेप आता अधिक महत्त्वाचे व खरे वाटू लागले आहेत.’’ नेहरू औद्योगिकीकरण, समाजवाद आदींचे पुरस्कर्ते होते. गांधीजींना लघुउद्योग व ग्रामोद्योगात अधिक रस होता. त्यानंतरही गांधींनी त्यांना आपला वारसदार म्हणून घोषित केले, हे गांधींचे मोठेपण आणि नेहरूंच्या द्रष्टेपणाची होत गेलेली जाणीव सांगणारी बाब आहे.

सुभाष त्यांचे स्नेही होते. त्यांचा स्नेह 1919 पासून 1939 पर्यंतची वीस वर्षे टिकला. पण फॅसिझमसोबत जाण्याच्या सुभाषबाबूंच्या भूमिकेपासून ते वेगळे झाले. पटेल, राजेंद्रबाबू व मौलाना हे त्यांचे सहकारी होते; पण त्यांच्यात मैत्र असे कधी आढळले नाही. नेहरू त्यांच्या कुटुंबातही एकटेच होते. बारावे वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पाठीवर कुणी भाऊ वा बहीण जन्माला आली नव्हती. विजयालक्ष्मींचा जन्म त्यांच्या नंतर बारा वर्षांनी झालेला. घरातल्या दाया, नोकर आणि वडिलांनी आणलेले पाश्चात्त्य शिक्षक यांच्यासोबत ते वाढले. मुबारक अली या नावाचा मेजर डोमो हा त्यांचा त्या काळातला जिव्हाळ्याचा मित्र बनला. तो त्यांना इतिहासातल्या कथा सांगायचा.

नंतरची बारा वर्षे ते इंग्लंडमध्ये घर व देश यापासून दूर व तुटलेलेच होते. इंग्लंडमध्ये शिकत असतानाही ते वर्गातील इतर सहाध्यायींपासून वेगळेच राहिले. ‘इथले सारे विद्यार्थी टेनिस आणि क्रिकेट याखेरीज काही बोलत नाहीत. त्यांना त्याहून वेगळे काही समजतही नाही.’ ही गोष्ट त्यांनी मोतीलालजींना पत्रातूनच कळवली. नेहरूंना राजकारण, तत्त्वज्ञान, लोकजीवन व समाजकारण यात रस होता. मुलींचा प्रश्न मनात यायचा, पण तो फार काळ राहायचा नाही. ‘कदाचित मला त्यात फारसा रस नसावाही.’ ही त्यांचीच नोंद. इंग्लंडहून परतताच ते सार्वजनिक जीवनात आले. खासगी आयुष्य त्यांना हवेसे होते, पण ते त्यांच्या वाट्याला कधी आले नाही.

त्यांचा विवाह आई- वडिलांनी ठरविला. ते कमला कौल हिच्याशी 1917 मध्ये विवाहबद्ध झाले. 19 महिन्यांनी त्यांच्या कन्येचा- इंदिराचा जन्म झाला. त्याच वेळी कमला नेहरूंना क्षयाची बाधा असल्याचेही उघडकीला आले. परिणामी, त्यांच्या वाट्याला आलेला संसारधर्म अवघी दोन-अडीच वर्षेच टिकला. नंतरचा काळ कमला इस्पितळात किंवा घरी अंथरुणावर आणि नेहरू तुरुंगात किंवा आंदोलनात गुंतलेले.. ‘‘पंतप्रधानपदाची जबाबदारी अंगावर घेतलेल्या माणसाला संवेदनशील राहता येत नाही.’’ हे नेहरूंनी एका अमेरिकन वार्ताहराला ऐकविलेले त्यांचे मत. हे खरे असले तरी माणूस हा संवेदनशील प्राणी आहे आणि संवेदना मागे सारायच्या आणि नुसतेच कोरडे राहायचे असे एखाद्याने ठरविले, तरी ते किती काळ? मोतीलालजी गेले. आई गेली. कमला गेली. अखेर गांधी गेले.

त्यांच्या संवेदनांचा बांध फक्त गांधींच्या निधनाच्या वेळीच तुटलेला दिसला. सरदार समोर येताच ते त्यांच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडत असल्याचे जगाला दिसले. एरवी त्यांचा हसतमुख व प्रसन्न चेहराच देशाने सदैव पाहिला. त्यांना राग यायचा. ते संतापायचे. धाडसी असल्याने दंगलखोरांच्या गर्दीत घुसून त्यांच्या हातची हत्यारे हिसकावून घ्यायचे. मनाने खंबीर, पण दीर्घ खोलवर शांत.

काहींनी त्यांच्यावर ते आंग्लाळलेल्या भारतीयांवर जास्तीचा विश्वास ठेवत असल्याची टीका केली होती. त्यांच्या भोवतीच्या लोकांत तशी माणसे होतीही. पण ही टीका फारशी खरी नाही. त्यांच्या जवळच्या माणसांत आरंभी रणजित पंडित होते. पुढे गोपालस्वामी अय्यंगार, मौलाना आझाद, गोविंद वल्लभ पंत, रफी अहमद किडवई यांचाही समावेश होता. राष्ट्रपती डॉ.राधाकृष्णन्‌ यांचा सल्लाही ते प्रसंगी घेत. मात्र त्यांना देशी व साधी माणसेही जवळची वाटत. समाजमन हे ज्ञात्यांहूनही सत्याच्या अधिक जवळ असते, अशी त्यांची धारणा होती. मात्र माणसे आंग्लाळलेली असोत वा देशी- कोणत्याही प्रश्नाबाबतचा त्यांचा निर्णय ‘त्यांचा’च स्वतःचा असे.

माणसांची त्यांना असलेली पारख अनेकदा चुकायची, असे म्हटले जाते. मेननबाबत ते खरेही ठरले. मेनन यांच्याशी त्यांची मैत्री स्वातंत्र्यपूर्व काळातली होती. स्पेनमध्ये फॅसिस्टांचा हैदोस सुरू असताना नेहरूंनी मेननसोबत त्या देशाला भेटही दिली होती. शिवाय मेनन हे अतिशय चांगले वक्ते व रचनाकारही होते. नेहरूंच्या विचारांना तात्त्विक बैठक देऊन ते परिणामकारकरीत्या मांडण्याची शैली त्यांना आत्मसात होती. शिवाय त्यांना जगातही मान होता. मात्र त्यांचा चीनविषयीचा दृष्टिकोन व लष्कराबाबतची बेपर्वाई नेहरूंना अडचणीत आणणारी ठरली. सरदार पटेलांना अधिक आयुष्य लाभले असते, तर ते नेहरूंना काही बजावू शकले असते आणि माणसांची खरी जाणही त्यांना देऊ शकले असते. मात्र सरदारांच्या पश्चात नेहरूंना अधिकारवाणीने सांगणारे दुसरा कोणी उरले नाही.

स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या पर्वात देशाचे राष्ट्रीय नेतृत्व करू शकणारे अनेक नेते काँग्रेसमध्ये असले तरी त्यांतील गांधीजी, नेहरू वा पटेल या तिघांनाच अखिल भारतीय पातळीवरची मान्यता होती. राजेंद्रबाबूंना बिहारचे, राजाजींना दक्षिणेचे, तर मौलानांना राष्ट्रीय मुस्लिमांचे पाठबळ होते. सुभाषबाबूंचा मृत्यू झाला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सहाच महिन्यांनी (30 जानेवारी 1948) गांधीजींचा खून झाला, तर दोनच वर्षांनी (15 डिसेंबर 1950) सरदारही हे जग सोडून गेले. त्यानंतर नेहरूंच्या बरोबरीचा वा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा दुसरा कोणताही बरोबरीचा नेता काँग्रेसमध्ये राहिला नाही. नंतरचे त्यांच्यावरचे नियंत्रण फक्त भारतीय जनतेचे राहिले. तोपर्यंत त्यांच्यातील पक्षनेत्याचे रूपांतर लोकनेत्यातही झाले होते.

साऱ्या राष्ट्रीय प्रश्नांची व त्यांच्या बऱ्या-वाईट उत्तरांची जबाबदारी 1948 पर्यंत गांधीजींवर येणारी होती. त्यासाठी कोणी पटेल व नेहरूंना दोष देत नव्हते. ही सारी जबाबदारी 1950 नंतर तिच्या बऱ्या-वाईट परिणामांसकट एकट्या नेहरूंवर आली. कौतुकाएवढेच ते मग जीवघेण्या टीकेचेही हक्कदार बनले. त्यांच्या टीकाकारांनीही इतरांच्या चुका मग त्यांच्या नावावर चढविल्या. इतरांचे चांगले निर्णयही मग त्यांच्या नावावर चढले. म्युरिएल लेस्टर ही गांधीजींची इंग्लंडमधली यजमान होती. त्यांच्या मृत्यूनंतर तिने नेहरूंना एकदा विचारले, ‘‘गांधीजींच्या पश्चात त्यांच्या नेतृत्वाची धुरा कोणाच्या खांद्यावर येईल?’’ नेहरू म्हणाले, ‘‘कोणाही एकावर नाही.. आम्हा साऱ्यांवर- या देशावरही.’’

एक गोष्ट मात्र तेव्हा आणि आताही खरी असलेली. त्यांच्या टीकाकारांपैकी हिंदुत्ववाद्यांनी त्यांचा आणि त्यांच्या सेक्युलर भूमिकेचा सर्वाधिक राग केला. ‘गांधींऐवजी आम्ही नेहरूंनाच मारायला हवे होते’, हे त्यांच्यातील एकाचे अलीकडचे उद्‌गार याची साक्ष देणारे. समाजवाद्यांनी नेहरूंचा रागाएवढाच द्वेषही केला. स्वतःला समाजवादी म्हणविणारे नेहरू समाजवादी नाहीतच. समाजवादाचा मुखवटा घेतलेला तो ढोंगी व सत्तेसोबत राहू इच्छिणारा इसम आहे, हे त्यांचे नेहरूंविषयीचे म्हणणे. ‘‘तुम्ही भांडवलदारांच्या मदतीने समाजवाद आणू इच्छिता आणि ती बाबच अशक्य कोटीतील आहे’’ हे खुद्द जयप्रकाशांनीच त्यांना तोंडावर ऐकविले.

समाजवाद्यांनी नेहरूंचा रागच केला नाही, तर त्यांचा द्वेष, तिरस्कार असे सारे केले. ‘या पहाडाला मी भेग पाडूनच दाखवेन.’ ही त्यांच्याबाबत केलेली लोहियांची प्रतिज्ञा. काँग्रेस वर्किंग कमिटीत फाळणीच्या बाजूने मत देणाऱ्या या लोहियांनी पुढे मात्र ‘फाळणीचे गुन्हेगार’ म्हणून नेहरू व पटेलांना दोष देणारे पुस्तक लिहिण्याचा विक्रमही केला.

काही जणांना नेहरूंविषयी अकारणच(?) एक राग होता. काही वर्षांपूर्वी देशातील एका इंग्रजी नियतकालिकाने विसाव्या शतकात भारतात झालेल्या शंभर श्रेष्ठ व्यक्तींची निवड करण्याची विनंती देशातील अनेक जाणकारांना केली. त्यातल्या एका पत्रकार महिलेने त्या यादीत नेहरूंचे नाव घालायला जो विरोध केला, त्याची नोंद या नियतकालिकानेच करून ठेवली आहे. त्यासाठी तिने पुढे केलेली कारणे जेवढी चमत्कारिक तेवढीच अनाकलनीयही आहेत. ‘पक्ष्यांच्या थव्यातील एकटा गरुड’ असे एका समाजवाद्याने त्यांचे केलेले वर्णन यथार्थ आहे. फार काळपर्यंत ते त्यांच्या प्रतिमेला चिकटूनही राहिले आहे.

नेहरू स्वतःचे मन सहसा कुणाजवळ मोकळे करीत नसत. हव्या त्या प्रश्नावर हव्या त्या व्यक्तीचा वा व्यक्तिसमूहाचा ते सल्ला घेत. नंतर त्यावर चिंतन करून ते आपल्या निर्णयावर येत. कोणताही सल्लागार, सहकारी वा मंत्री त्यांना गृहीत धरू शकत नसे. भारतीय माणसांना सारे तयार, आयते व समोर हवे असते- ही त्यांची सवय ठाऊक असलेले नेहरू प्रत्येक गोष्ट तिच्या अखेरच्या तपशिलापर्यंत स्वतःच पूर्ण करीत. जी कामे सहकाऱ्यांवर सोपविता येतील, तीही बहुधा तेच करीत. मग तेच डॉक्टर, तेच शल्यविशारद, तेच नर्स आणि तेच त्यांचे शुश्रूषाकर्ते असे सारे होते. परिणामी, अनेकदा लहानसहान कामातही त्यांचा फार वेळ जायचा. कोणत्याही ‘परफेक्शनिस्ट’ माणसाला असावी तशी ही सवय आहे.

नेहरू कमालीचे विनम्रही होते. आलेल्या माणसाचे म्हणणे ऐकून घेणारे व त्यांना आपले मत समजावून सांगणारे. हैदराबादच्या डॉ.न.गो. राजुरकरांनी त्यांच्यावर प्रबंध लिहिला. त्यासाठी त्यांनी त्यांच्या तीन मुलाखती तीन मूर्ती भवनात घेतल्या. प्रत्येक मुलाखतीनंतर राजुरकरांना दारापर्यंतच नव्हे, तर त्यांच्या वाहनापर्यंत पोहोचवायला स्वतः नेहरू जात. सामान्य माणसे, शेतकरी, कामगार, जुने सत्याग्रही व दूरदूरून येणारे शेकडो लोक यांना ते कधी कंटाळत नसत. सारख्याच जिव्हाळ्याने त्यांना भेटून ते त्यांची विचारपूस करीत.

सारे नेहरू कुटुंबच सौंदर्यशाली होते. त्यातून नेहरूंचे देखणेपण साऱ्यांना खिळवून ठेवणारे होते. नेहरूंच्या नेतृत्वाच्या अनेक गुणांपैकी त्यांचे देखणेपण हा एक गुण होता, असे त्यांच्या टीकाकारांनीही लिहून ठेवले आहे. ‘जगातील पहिल्या पाच देखण्या पुरुषांत मी नेहरूंची निवड करीन’, हे मेरलिन मन्रोचे त्यांच्याविषयीचे सुभाषित. काँग्रेसच्या एका अधिवेशनात नेहरूंभोवती तरुण मुलींनी मोठा घोळका केला व तेही त्यांच्याशी बोलण्यात गढून गेले. ते दृश्य दुरून पाहणाऱ्या सरोजिनी नायडू त्यांना ओरडून म्हणाल्या, ‘‘जवाहरऽ अरे, ती डोक्यावरची टोपी जरा काढ. या मुलींना तू त्यांच्याचएवढा वाटतोस!’’

एके काळी देविका राणी या सुस्वरूप नटीशीही त्यांचे नाव जुळले होते. पण त्यांच्या आईने त्यांना त्याविषयी खडसावून विचारले, तेव्हा ते खरे नसल्याची कबुली त्यांनीच स्वरूपादेवींना दिली. चीनचे सर्वेसर्वा चँग कै शेक यांच्या सुस्वरूप पत्नी मादाम शेक यांच्याशीही अनेकांनी नेहरूंचे नाव जुळविले. लॉर्ड माऊंटबॅटन यांची पत्नी एडविना व पुढे सरोजिनी नायडूंची कन्या पद्‌मजा यांच्याशीही त्यांचे नाव जुळविले गेले. त्यातले तथ्य त्या संबंधितांनाच ठाऊक.

स्त्रियांनी प्रेम करावे, हा तसा अभिमानाचा व कौतुकाचा विषय. आपला समाजही दुटप्पी विचारांचा आहे. आपल्याला एक-पत्नीव्रती रामही प्रिय आणि सोळा हजारांवर बायका असताना एक राधा जपणारा कृष्णही प्रिय. मात्र लेडी माऊंटबॅटनबाबतच्या त्यांच्या संबंधांना फार व नको तशी प्रसिद्धी दिली गेली. नुकत्याच दिवंगत झालेल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने नेहरू व एडविना या विषयावर त्याची लेखणी नको तेवढी झिजविली. एअर इंडियाचे एक विमान नेहरूंचे पत्र घेऊन ते तिला पोहोचवायचे आणि परतणारे विमान तिचे उत्तर नेहरूंना आणून द्यायचे- हे लिहिण्यापर्यंत त्या इसमाची मजल गेली. एअर इंडिया ही कंपनी तेवढ्याचसाठी स्थापन झाली, एवढेच लिहायचे त्याने बाकी ठेवले.

पुढे एकदा या पत्रकारासोबत एका व्यासपीठावर भाषण करण्याचा प्रसंग आला. नंतरच्या जेवणाच्या वेळी प्रस्तुत लेखकाने त्यांना ‘तुमचा नेहरूद्वेष एवढा टोकाचा कसा?’ असा प्रश्न विचारला. मात्र त्याचे उत्तर येण्याआधीच तेथे असलेल्या त्यांच्या पत्नी भडकून म्हणाल्या, ‘‘भाईसाहाब, इस आदमी को नेहरू कभी समझेही नहीं। उन्हे गालियाँ देने बगैर कुछ कियाही नहीं।’’ त्यावर सारा प्रश्नच मिटला. नेहरूंविषयीचे असे समज अनेकांच्या मनात आहेत व काहींच्या मनात ते जाणीवपूर्वक पेरले गेलेही आहेत.

सरदार पटेल व नेहरूंचे मतभेद आर्थिक मुद्यावर, नेहरूंच्या समाजवादाविषयीच्या आग्रहावर आणि मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम करण्याच्या त्यांच्या हक्कासंबंधीचे होते. शिवाय नेहरूंचा उतावीळपणाही त्या गंभीर प्रकृतीच्या नेत्याला फारसा आवडणारा नव्हता. मात्र त्यांच्यातल्या मतभेदांनी मनभेदांचे स्वरूप कधी घेतले नाही. दोघांचाही परस्परांच्या देशनिष्ठेवर व गांधीजींवरील श्रद्धेवर विश्वास होता. सरदारांची कन्या मणिबेन यांनी दुर्गादास या पत्रकाराने संपादित केलेल्या सरदारांच्या पत्रसंग्रहाला एक प्रस्तावना लिहिली आहे. तीत त्या म्हणतात, ‘खूपदा सरदार नेहरूंच्या तीन मूर्ती भवनावर रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी चर्चा करीत. मग नेहरू म्हणत, ‘‘चला आता उशीर झाला. मी तुम्हाला तुमच्या बंगल्यापर्यंत नेऊन सोडतो.’’ मग ते बोलतच आमच्या बंगल्यावर येत. तिथल्या व्हरांड्यात बसूनही त्यांची चर्चा चालूच राही. त्यांना काय हवे-नको ते मी बघे. मग आणखी उशीर झाला की सरदार नेहरूंना म्हणत, ‘‘रात्र फार झाली. आता मीच तुम्हाला सोडायला येतो.’’ मग ते दोघेही तीन मूर्ती भवनापर्यंत पायी जात आणि सरदार बहुधा मग रात्रीचे तिेथेच थांबत.’

मोठ्यांचे मतभेद समजायलाही मोठे मन लागते. आपल्या मनाच्या फूटपट्‌ट्या घेऊन गांधी, नेहरू किंवा पटेलांची मने मोजण्याचा आचरटपणा कोणी करू नये, एवढेच येथे नोंदवायचे. आणीबाणीत तुरुंगात असताना या नेत्यांची मने सांगणारा एक हृद्य प्रसंग अनंतराव भालेरावांनी सांगितला. हैदराबाद संस्थानाचा पाडाव झाल्यानंतर नेहरू, पटेल व मौलाना हे तीनही नेते औरंगाबादला आले. तोपर्यंत भारतीय सैन्याने केलेल्या अन्यायाच्या कहाण्या सर्वत्र होते. औरंगाबादहून बिदरला ते पोहोचले, तेव्हा तेथील मुस्लिम महिलांचा एक मोठा मोर्चा रडत-भेकत त्यांना भेटायला सर्किट हाऊसवर आला. मौलाना सरळ त्यांच्यात जाऊन त्यांच्यावरील अन्यायाच्या कथा ऐकू लागले. त्यातल्या कोणाचा नवरा, तर कोणाचा मुलगा पोलिसांकरवी मारला गेला होता. काही स्त्रियांनी त्यांच्यावरील बलात्काराच्या कहाण्याही सांगितल्या. तेव्हा नेहरूही बाहेर आले होते. मौलाना त्यांच्यावर संतापून म्हणाले, ‘‘कशाचे सरकार आणि कशाचे स्वातंत्र्य? आपल्याच मुला-मुलींवर अत्याचार करणारे सैनिक आपले असतील, तर ते सारे बडतर्फ केले पाहिजेत.’’

नेहरू त्यांच्या जवळ जाऊन आणि त्यांना शांत करून म्हणाले, ‘‘मौलानासाहेब, ही सुरुवात आहे. आपल्याला पुढेही असे अनेक प्रसंग पाहायचे आहेत. एवढ्यावरच आपले मत आपण बनवू नये.’’ मग त्यांनीही मौलानांप्रमाणेच त्या स्त्रियांचे सांत्वन करीत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या वेळेपर्यंत आत असलेले सरदार एकच मिनिट बाहेर आले आणि ‘युद्ध म्हटले की, असे होणारच’ असा भाव चेहऱ्यावर प्रगट करून पुन्हा आत गेले.

पुढच्या मुक्कामावर हिंदू स्त्रियांचा असाच मोठा जत्था त्यांना भेटायला आला आणि त्यांच्यावर रझाकारांनी केलेले अत्याचार त्या सांगू लागल्या. त्यांच्यापैकी काहींवर बलात्कार झाले होते, तर काहींची मुले दगडावर आपटून मारली गेली होती. मौलाना येथेही गहिवरले. त्यातल्या अनेकींना जवळ घेऊन ते म्हणाले, ‘‘कशाचा देश आणि कशाचा धर्म? कुराण हे सांगत नाही आणि वेदांचेही असे म्हणणे नाही. माणूस हाच सैतान व राक्षस होत असतो.’’ याही वेळी बाहेर आलेल्या नेहरूंना ‘‘सैन्यातील गुन्हेगारांना शासन करा’’ असे ते ओरडून म्हणाले. नेहरूंनी येथेही त्यांना शांत करीत त्या स्त्रियांचे सांत्वन केले... सरदार याही वेळी पूर्वीसारखेच काही क्षण बाहेर येऊन आत गेले. त्यांनी दोन्ही ठिकाणी कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. अशा वेळी या तिघांचे स्वभाव परस्परभिन्न मानायचे, की परस्परपूरक?

पटेल व अन्य नेत्यांच्या तुलनेत काहींनी नेहरूंना भाबडे ठरविले आहे. मात्र हा आरोप खरा नाही. ते कमालीचे सतर्क, सावध आणि एकाच वेळी अनेक प्रश्नांचा विचार करतानाही त्यातल्या प्रत्येकाबाबत ते कमालीचे जागरूक असत. त्यांची एक आठवण पाकिस्तानच्या एका माजी परराष्ट्रमंत्र्याने आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष श्रीनगरला चर्चेसाठी यायचे होते. तिच्या पूर्वतयारीला हा मंत्री अगोदरच तिथे आला होता. नेहरू स्वतःच भारताचे परराष्ट्रमंत्री असल्याने तेही मग श्रीनगरमध्ये दाखल झाले होते. सायंकाळच्या वेळी ते दोघेही खुल्या मोटारीतून श्रीनगरच्या परिसरात फिरायला निघाले. त्या वेळी स्वाभाविकच त्या मंत्र्याने नेहरूंजवळ काश्मीरचा विषय काढला. त्यावर त्यांना थांबवत नेहरू म्हणाले,

‘‘तुम्हाला काश्मीरचा इतिहास ठाऊक आहे?’’

मग ते कश्यपऋषींपासून काश्मीरचा इतिहास त्याला सांगू लागले. त्यांचे वीस मिनिटांचे भाषण पूर्ण होण्याआधीच वैतागलेला तो मंत्री म्हणाला, ‘‘पण मि.नेहरू, मला काश्मीरविषयी तुमच्याशी बोलायचे आहे.’’

‘‘तेच तर मी सांगतो. ते धरण बघा- केवढे सुंदर आहे! असे पाणी वाहताना मला जगात अन्यत्र कुठे दिसत नाही.’’

‘‘बट मि. नेहरू...’’ तो मंत्री म्हणाला.

‘‘आता ते गुलाबांचे ताटवे बघा. एवढे तांबडे गुलाब तुम्हाला कुठे पाहता येतील?’’

त्यावर त्या मंत्र्याने नेहरूंचे दोन्ही हात हाती घेऊन म्हटले, ‘‘मी म्हणतो, तुम्ही आम्हाला काश्मीर द्यायला तयार नाहीत. कारण तुमचे वडील आणि पूर्वज काश्मिरातून आले आहेत.’’

त्यावर जराही विलंब न लावता नेहरू म्हणाले, ‘‘पण मी तुम्हाला लाहोर मागत नाही. माझी आई लाहोरहून आली आहे.’’

पुढे त्या परराष्ट्रमंत्र्याने आपल्या आत्मचरित्रात लिहिले, ‘नेहरू हा हाती न लागणारा व काहीसा चावट माणूस आहे.’

वयाची सत्तरी गाठेपर्यंत नेहरूंची प्रकृती उत्तम व ठणठणीत होती. त्यांचे शरीरस्वास्थ्य व मानसिक प्राबल्य कायम होते. दिवसाच्या चोवीस तासांपैकी अठरा तास त्यांच्या कामांनी व्यापलेले असायचे. पहाटे जरा उशिरा उठून ते प्रथम शीर्षासन व प्राणायाम करायचे. नंतर ऑफिसात आलेली पत्रे, तारा व फायली बघायचे. त्याच काळात ते मुलाखती द्यायचे. पत्रकारांना वेळ द्यायचे. कधी भाषणे द्यायचे, तर कधी काही कार्यक्रमांसाठीही वेळ काढायचे. संसदेच्या अधिवेशनाला ते सारा वेळ हजर असायचे. अधिकारी व विदेशी प्रतिनिधींच्या भेटी घ्यायचे. मंत्रिमंडळाच्या बैठका असायच्या. शिवाय पंतप्रधान म्हणून येणाऱ्या इतरही जबाबदाऱ्या असायच्या. वेळ मिळाला की ते काही काळ घोड्यावरून रपेट करायचे, तर कधी तीन मूर्ती भवनातील पोहण्याच्या तलावात वेळ काढायचे. रात्री एक वाजेपर्यंत काम करून व काही काळ वाचन करून मगच ते झोपायचे. त्यांच्या वाचनात विज्ञान, तत्त्वज्ञान, राजकारण व कविता अधिक असायच्या.

त्यांना विज्ञानात रुची होती. भाभा ॲटोमिक कमिशनचे ते अध्यक्ष होते. वैज्ञानिक व तंत्रज्ञांना भेटायला व त्यांच्याशी नव्या संशोधनाविषयी बोलायला त्यांना आवडायचे. बोर्ड ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचेही ते अध्यक्ष होते. या दोन्ही कामात ते समरसून भाग घेत. ‘‘भारताला औद्योगिक प्रगतीखेरीज दुसरा पर्याय नाही. अवजड उद्योग उभारणाऱ्या यंत्रणा त्यासाठी त्याला येथेच उभ्या केल्या पाहिजेत.’’ असे ते म्हणत आणि तशा त्यांनी त्या उभारल्याही. देशभरात प्रयोगशाळांची उभारणी त्यांच्या हातून झाली. दिल्लीची नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, पुण्याची नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आणि जमशेदपूरची नॅशनल मेटॅलर्जिकल लॅबोरेटरी त्यांच्याच हातची. याखेरीज कृषिक्षेत्र, औद्योगिक संशोधन, रसायने, औषधी द्रव्ये (मलेरिया व कॅन्सरसारख्या आजारांवरील औषधांचे संशोधन), काच व चिनी मातीचे उद्योग एवढा त्यांच्या उभारणीचा आवाका होता.

अणुशक्तीची आराधना व संशोधनही त्यांनीच देशात सुरू केले. त्यासाठी मुंबई आणि कलकत्त्याला संशोधन संस्था उभारल्या. ट्रॉम्बे येथील युरेनियम प्रकल्पही त्यांचाच. त्रावणकोर व कोचीनमधील मोझनाईनचे उद्योगही त्यांनी उभारले. थुंबाचे क्षेपणास्त्र केंद्रही त्यांच्याच हातचे. नेहरू स्वतःला सक्रिय आदर्श समजत. तशीच त्यांची दृष्टी व विचारांची बैठक होती. तिला भारताचा पाया होता. एका भेटीत शेजारी बसलेल्या पाश्चात्त्य इसमाने त्यांना विचारले, ‘‘या बदलत्या जगात काय करावे, हाच सर्वांत मोठा प्रश्न आहे.’’ नेहरूंनी उत्तर दिले, ‘‘आम्हा भारतीयांना तो प्रश्न पडत नाही. आमचा प्रश्न आम्हाला काय व्हायचे आहे हा असतो. यापुढे कदाचित आम्हालाही काय करायचे, हा प्रश्न पडेल.’’

अनेकांना समजून घेणे, विरोधकांना दाद देणे व दुसऱ्या बाजूचा विचार करणे यामुळे त्यांचा निर्णय बऱ्याचदा विलंबाने यायचा. पण तो येण्याआधी ते साऱ्या बाजूंचा सखोल विचार करूनच आपल्या निर्णयाप्रत यायचे. इंग्लंडचे एक पंतप्रधान चेंबरलेन यांना त्यांचे पूर्वसुरी लॉईड जॉर्ज म्हणाले होते, ‘‘कोणताही निर्णय घेण्याआधी पक्ष आपल्या सोबत राहील याची काळजी घेत चला.’’ नेहरूंना तो प्रश्न गांधीजी व सरदार असेपर्यंत कधी पडला नाही. पक्षाबाबत ते निश्चिंत असत. त्याची जबाबदारी गांधी व पटेलांवर असे. पटेलांच्या पश्चात मात्र त्यांना साराच भार स्वतःवर घ्यावा लागला. मात्र तोपर्यंत वातावरण एवढे बदलले की, त्यांनी पक्षावर अवलंबून राहण्याऐवजी पक्षच त्यांच्यावर विसंबून राहू लागला..

एकदाच राजेंद्रबाबूंशी झालेल्या मतभेदांच्या वेळी (हिंदू कोड बिलाबाबत) ते राजीनामा द्यायला निघाले होते. परंतु आपला प्रत्यक्ष अधिकार व राष्ट्रपतींची नामधारी जागा यांचा विचार मनात येताच त्यांनी तो निर्णय बदलला. पुढल्या साऱ्या निर्णयांत मग ते ठाम व निश्चल राहिले. त्यावर कुणाची छाप नव्हती. ते ऐकायचे साऱ्यांचे, पण करायचे मनाचे. त्याही स्थितीत पक्ष व सरकारवर त्यांचे नियंत्रण कायम होते.

ते अतिशय चांगले सूत कातायचे. त्यांचे कपडे व राहणी कमालीची टापटिपीची होती. टोकदार टोपी, शोभेशी अचकन व चुडीदार असा त्यांचा स्वच्छ व नेटका पोषाख असायचा. अचकनच्या एका बटणात ते गुलाबाचे फूल लावायचे. आपली छायाचित्रे व प्रतिमा यांची ते काळजी घेत. त्यांना संगीताची आवड होती, निसर्गाचे प्रेम होते. त्यांच्या बागेत पक्षी व काही चांगले पशू होते. तीत दोन पांडा ठेवले असायचे. नेहरू त्यांना रोज भेटायचे. मुलांना त्यांच्या बागेत त्यांच्या जन्मदिवशी प्रवेश मिळायचा. मग ते मुलांत मिसळायचे आणि रमायचे. काश्मिरातली फुले, नद्या, पर्वतराजी या गोष्टी त्यांना सुखवायच्या. गंगेविषयी त्यांना अपार प्रेम होते. शिवाय इतर ज्ञानाहून त्यांना असलेली तत्त्वज्ञान व इतिहास यांची जाण मोठी होती. डॉ. राधाकृष्णन हेही त्यांच्या सखोल ज्ञानाने भारावायचे. ‘त्याला सगळ्या विषयातले सगळे चांगले समजते’, हा त्यांचा नेहरूंविषयीचा अभिप्राय.

नेहरू फारसे चांगले वक्ते नव्हते. त्यांच्या सभांना लाखोंच्या संख्येने लोक येत आणि त्यांचे बोलणे ऐकत. नेहरूंच्या वक्तृत्वाचे एक वैशिष्ट्य हे की, श्रोत्यांमध्ये बसलेल्या प्रत्येकाला ते केवळ आपल्याशी बोलत आहेत, असे वाटायचे. तसे वाटणे हे जबर वक्तृत्वाहून जास्तीचे परिणामकारकही असायचे. त्यांना वर्तमानपत्रांचे आकर्षण होते. त्यातून ते कमालीचे आक्रमक व तेजस्वी लिखाण करायचे. ते वाचकांच्या मनाच्या तळापर्यंत जाणारे असायचे. ‘नॅशनल हेरॉल्ड’ या त्यांनी स्थापन केलेल्या वृत्तपत्राचा पहिला अग्रलेख त्यांनी सप्टेंबर 38 मध्ये प्राग येथे लिहिला. ‘भिऊन लिहू नका’ हे त्यांचे पत्रकार व लेखकांना सांगणे होते. आपण पत्रकार व्हावे, ही नेहरूंची इच्छा जुनीच होती. त्यांनी त्यासाठी 1919 मध्येच मोतीलालजींना ‘इन्डिपेन्डंट’ हे वृत्तपत्र अलाहाबादेतून काढायला लावले. तिथे पूर्वी प्रकाशित होणारे ‘लीडर’ हे मवाळांचे पत्र मोतीलालजींनाही आवडणारे नव्हते. त्याचा प्रतिकार म्हणून त्यांनीही नेहरूंच्या या इच्छेला मान्यता दिली. मात्र ते पत्र दोन वर्षे कसेबसे चालून बंद पडले.

त्या तुलनेत गांधीजी हे स्वतःला पत्रकार म्हणायचे ते अधिक रास्त होते. ते सातत्याने लिहायचे आणि त्यांनी जे लिहिले, ते त्यांच्या साप्ताहिकांसोबतच जगभरच्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध व्हायचे. ‘माझ्यावर दोन व्यक्तींचा प्रभाव फार मोठा होता. एक माझे वडील मोतीलालजी आणि दुसरे बापू. मी मात्र त्यातून मुक्त होण्याचा- ‘मी’ होण्याचा प्रयत्न आयुष्यभर करीत राहिलो.’ गांधींचा ग्रामस्वराज्याचा व लघुउद्योगाचा आग्रह, त्यांचा समाजवादाला असलेला विरोध आणि त्यांची विश्वस्त कल्पना नेहरूंच्या समाजवादी निष्ठांशी जुळणारी नव्हती. ते समाजवाद बोलायचे. पक्षात तसे ठराव करायचे. आपला विचार गांधीजींसह पक्षातील इतर कोणत्याही वरिष्ठाला मान्य होणारा नाही, हे ते जाणून होते. पण गांधीजींवरील श्रद्धा त्यांना संघटनेशी जोडून ठेवणारी होती.

संघटनेत जुनी माणसे आहेत तोवर आपल्याला आपला विचार कधी पुढे रेटता येणार नाही, हे त्यांना कळत होते. शिवाय गांधी आणि समाजवाद यातील सांधाही त्यांना सापडत नव्हता. कामगार आणि उद्योगपती यांच्यातील समन्वयही त्यांना जमणारा नव्हता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी सरदार पटेलांनी घालून दिलेला एक निर्बंध त्यांनी त्याचमुळे मान्य केला होता.

पाच वर्षांपर्यंत खासगी उद्योगांवर व उद्योगपतींवर निर्बंध आणायचे नाहीत आणि कामगारांच्या वर्गालाही त्यांच्या विरुद्ध प्रोत्साहन द्यायचे नाही- हा सरदारांचा आग्रह होता. 1955 मध्ये गांधी नव्हते, सरदारही नव्हते आणि नेहरूंना त्यांचा मार्ग मोकळा होता. त्याच वेळी त्यांना गांधी आणि मार्क्स यांच्या विचारधारांमधील सांधेजोडही सापडला. खासगी मालमत्ता काढून घेताना तिचा मोबदला (सरकार ठरवील तो) मालकांना द्यायचा, हा तो सांधा होता. मग तसे भूसुधार कायदे नेहरूंनी केले.

उद्योगपतींवर जास्तीचे करभार लावून त्यांच्या संपत्तीचा वाटा कामगारांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. मालकांचा वर्ग विश्वस्तांच्या भावनेने कामगार व समाजाकडे पाहील, ही बाब त्यांना मान्यच होणारी नव्हती. हे काम लोकशाही सरकारचे कायदेच करू शकतील, असे ते म्हणत. तसे कायदे 1955 पासून त्यांनी अनेकांचा रोष पत्करून अमलात आणले. राजेंद्रबाबू नाराज होते, राजाजी दूर गेले होते; पण नेहरूंनी शांत राहून एक मर्यादित व संयमित समाजवाद देशात आणला. त्यावर समाजवादीही प्रसन्न नव्हते. मात्र नेहरूंना विरोध करण्याएवढी ताकद त्यांच्यात वा आणखी कोणात नव्हती.

नेहरूंच्या नेतृत्वाचा काळ खऱ्या अर्थाने 1950 नंतर आला व त्यांनी तो सहजपणे स्वीकारला. पुढल्या काळात त्यांच्या वाट्याला यशाचे फार मोठे माप आले. मात्र अपयशांनीही त्यांची पाठ सोडली नाही. तरीही सारी राजकीय गोळाबेरीज मांडली की ध्यानात येते, नेहरूंची उपलब्धी त्यांच्या अपश्रेयांहून मोठी होती. आजचा भारत, त्याने सर्व क्षेत्रांत केलेली प्रगती व लोकशाही संस्थापन ही या देशाला नेहरूंची देणगी आहे. ‘भारताचे खरे भाग्यविधाते’ ही त्यांची जगानेही राखलेली ओळख आहे.

सुरेश द्वादशीवार, नागपूर

sdwadashiwar@gmail.com

(ऑक्टोबर 2018 पासून साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध होत असलेली ‘जवाहरलाल नेहरू’ ही लेखमाला या लेखासोबतच समाप्त होत आहे. या लेखमालेला सर्व स्तरांतील वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 14 नोव्हेंबर 2019 रोजी, ही संपूर्ण लेखमाला साधना प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने येत आहे. - संपादक)

मंच-22 ...

नॉर्म पण?

डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस

तत्क्षणी फादरांच्या दांभिकपणापेक्षा त्या 15 सुशिक्षित लोकांचा मूकपणा मला क्रूर वाटला. तसेच मला जाणीव झाली की, मी काही वेगवेगळ्या विषयांवर मुक्तपणे मते मांडण्याची मुभा असलेल्या विवेकमंचात नव्हतो; तर काहीही प्रश्न न विचारता, धर्मगुरू सांगेल ती पूर्व दिशा पाळणाऱ्या मेंढरांत होतो! ‘मेंढरू’ हे चर्चचे सर्वांत आवडते प्रतीक. सर्वांनी मेंढरांसारखे असावे, जास्त प्रश्न न विचारता मेंढपाळांच्या आज्ञेत राहावे- हा विचार चर्च नेणिवेच्या पातळीवर प्रत्येक भाविकाच्या मनावर बिंबवीत असते. एका बाजूला येशूच्या चित्राबाजूला बरीच मेंढरे दाखवून, येशूला मेंढपाळ असे भावनिकरीत्या सुचविले जाते आणि मग फादरांचे बॉस, बिशप म्हणजे आपले सर्वांचे मेंढपाळ- असे म्हणून जसे येशूचे ऐकले असते तसेच ह्यांचेही ऐका, असा सुप्त संदेश मनावर बिंबविला जातो.

एव्हाना परिसरातील चर्चमध्ये फादर बेंजामिन ह्यांची अचानक दुसऱ्या पॅरिशमध्ये जून महिन्यात बदली झाली आणि त्यांच्या जागी दुसरे फादर डॉ.पायस हे आले. महिनाभर काहीसा कामात व्यग्र असल्याने मी काही चर्चला गेलो नव्हतो. त्यामुळे नव्या फादरांशी माझी अद्याप भेट झाली नव्हती. मी चर्चच्या वार्षिक अंकाच्या संपादक मंडळात होतो. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होणाऱ्या त्या अंकांसाठी काम जुलैपासून सुरू होत असे. त्यामुळे महिन्याभरातच संपादक मंडळाच्या सभेनिमित्ताने त्यांची मला पहिली ओळख झाली; तेही त्यांना न भेटताच!

चर्चचे प्रमुख धर्मगुरू असल्याने वार्षिक अंकाच्या प्रमुख संपादकपदावर साहजिकच त्यांचे असणे आलेच. संपादक म्हणून त्यांच्याकडून संपादक मंडळाच्या सभेची पहिली घोषणा अपेक्षित होती. पण फादर या पॅरिशमध्ये नवे आहेत, तेव्हा आपणच पुढाकार घेऊन सभा लावू या असा विचार करत आमच्या संपादक मंडळातील एक नेहमीच्या महिला सदस्य गीता हिने ‘वार्षिक अंकानिमिताने संपादक मंडळाची पहिली सभा रात्री 8.00 वाजता चर्च कार्यालयामध्ये संपन्न होईल. कृपया सर्वांनी हजर राहावे’ म्हणून सर्वांना फोन केला. अर्थात फादर पायस ह्यांनाही त्याची पूर्वसूचना दिली गेली.

चर्चच्या पहिल्या माळ्यावर फादरांच्या निवासस्थानाला लागूनच चर्चचे कार्यालय आहे. सर्व जण रात्री आठ वाजता आपापली सर्व कामे आटोपून संपादक मंडळाच्या या पहिल्या सभेसाठी जमले. काही जण तडक ऑफिसमधून चर्चला या सभेसाठी आलेले होते. आठ होऊन गेले. 10 मिनिटे उलटली. सव्वाआठ झाले. फादरांचा काही पत्ता नव्हता. ते कदाचित विसरले असतील व कुठे बाहेर गेले असतील, म्हणून आतमध्ये चौकशी केली; तेव्हा कळलं, फादर नुकतेच जेवून त्यांच्या खोलीत गेलेले आहेत. फादरांच्या खोलीत इमर्जन्सी बेल असते. तेव्हा आम्ही ती बेलही वाजवली. तरीही आतमधून कोणताच प्रतिसाद नव्हता. आता परत-परत फादरांना डिस्टर्ब्‌ नको, तसेच जे वेळ काढून आलेले आहेत त्यांचाही वेळ वाया जायला नको; म्हणून आम्ही आमची पहिली सभा त्यांच्या अनुपस्थितीत घेतली. उपस्थित सर्व आठ सदस्य नेहमीचेच होते. त्यामुळे नेहमीच्या जबाबदाऱ्यांचे वाटप आम्ही आमच्यात केले. सभा झाल्यावर त्याच रात्री सभेचा वृत्तांत मी संपादक मंडळाच्या व्हाट्‌सअप ग्रुपवर सगळ्यांबरोबर शेअर केला. त्या ग्रुपवर फादरही होते. वृत्तांताच्या शेवटी मी एक नोट लिहिली, ‘प्रमुख फादर अनुपस्थित असल्याने काही महत्त्वाचे विषय चर्चिले जाऊ शकले नाहीत. त्यामुळे या आठवड्यातच पुढची सभा लावावी.’

दुसऱ्या दिवशी सकाळी मी फादरांना आदल्या रात्रीच्या सभेची कल्पना देण्यासाठी चर्चवर गेलो. नवे फादर चर्चच्या आवारात येरझाऱ्या घालताना दिसत होते. उंच, गोरे पान, भारदस्त असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. मी त्यांना माझी ओळख दिली आणि रात्रीच्या सभेची त्यांना कल्पना दिली. ते चर्चमध्ये बाजूच्या खोलीत उपस्थित असूनही सभेस का आले नाहीत, म्हणून मी त्यांना त्याचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘सभेची कल्पना मला खूपच उशिरा देण्यात आली. मी या चर्चचा प्रमुख धर्मगुरू आहे. माझ्यावर बरीच जबाबदारी असते. 15 दिवस अगोदर माझी अपॉइंटमेंट घ्यायला हवी होती. अशा शॉर्ट नोटिसवर मी येऊ शकत नाही.’’ त्यांच्या या उत्तराने मला आश्चर्य वाटले व काहीसे वाईटही वाटले.

संपादक म्हणून पहिली सभा लावणे ही त्यांची जबाबदारी होती. सभेस इतर सदस्य त्यांचे घरकाम व इतर कामकाज आटोपून वेळेवर उपस्थित राहिले होते. हा अंक चर्चमधून जरी प्रकाशित होत असला, तरी परिसरातून या स्थानिक अंकावरील प्रेमामुळे कित्येक सदस्य दर वर्षी, कितीही काम असो, पण वर्षाच्या या वेळी दोन महिने जरूर वेळ काढत असतात. परंतु फादरांचे जणू ते आमचे मायबाप मालक आणि आम्ही त्यांचे सेवक आहोत असेच काहीसे वागणे होते. 15 दिवस अगोदर कल्पना द्यायला हवी हे जरी मान्य केले, तरी ते तसं त्या महिला सदस्याला तेव्हाच सांगू शकले असते, किंवा निवासस्थानाच्या खोलीला लागूनच असलेल्या ऑफिसमध्ये आम्ही थांबलेलो असताना निरोप पाठवून ‘आज मला वेळ नाही’ असेही ते सांगू शकले असते. इतर 8 सदस्यांचा त्यामुळे वेळही वाचला असता. पण ‘आम्ही कोण म्हणून पुसशी..’ असेच काहीसे मला त्यांचे वर्तन वाटले.

मी तिथून माघारी फिरतोय तोच त्यांचे शब्द परत कानावर पडले,

‘‘आणि तुम्ही असे व्हाट्‌सअपवर ‘फादर अनुपस्थित होते’ असे ग्रुपवर टाकू नका. लोकांपुढे चुकीचा संदेश जातो.’’

‘‘पण मी काही खोटं तर बोललो नव्हतो. तुम्ही उपस्थित नव्हताच सभेला.’’

‘‘तू तरुण आहेस, तुला माहीत नसेल, पण नेहमी खरं- खरं बोलणं चांगलं नसतं. कधी कधी खोटंही बोलावं लागतं.’’

त्यांच्या चेहऱ्यावरील भाव धूर्त राजकारण्याचे वाटत होते. मला हे विधान ऐकून धक्काच बसला. खातरजमा करण्यासाठी त्यांना मी परत विचारलं,

‘‘फादर, तुम्ही हे बोलताय, खरं बोलणं चांगलं नसतं म्हणून?’’

‘‘होय, मीच बोलतोय. कारण लोकांवर आपण विश्वास नाही ठेवू शकत. आपलीच माणसं आपल्या पाठीत खंजीर खुपसू शकतात.’’

त्यांचा आवाज आता चढलेला होता.

‘‘लोक म्हणजे कोण? दर वर्षी विनास्वार्थ मदत करणारी व्हॅाट्‌सॲप ग्रुपवरील उणीपुरी 8 माणसे? आणि ‘विश्वास ठेवायचा नाही’ हे फादर तुम्ही सांगताय?’’

‘‘हो, मीच सांगतोय. विश्वास कधीच मेला पानिपतच्या लढाईत. लोक विश्वासघातकी असतात.’’

‘लोकांवर विश्वास ठेवायचा नाही? मग 2000 वर्षांपूर्वी आलेल्या येशूवर हे स्वतः किती विश्वास ठेवत असतील बरे?’ मनात प्रश्न उमटून गेला. इतक्या नकारार्थी विचारांच्या या फादरांबरोबर का काम करा? ह्यातून बाहेर पडू या- असा विचार आला. पण स्वतः डॉक्टरेट ही पदवी नावापुढे लावणारी ही curious केस आहे तरी काय, म्हणून मी थांबायचे ठरविले. नंतरच्या काही दिवसांत या फादरांविषयी बरेच कानांवर आले. महिनाही येथे येऊन न झालेल्या या फादरांनी, ‘सर्वांनी आपापल्या वार्षिक उत्पन्नाचा अमुक-अमुक भाग चर्चच्या फंडमध्ये या वेळेअगोदर जमा करायचा’ असे म्हणे आदेश दिले होते आणि तशी वसुली करण्यासही सुरुवात झाली होती. तसेच फादरांसाठी स्वयंपाक व इतर घरकामासाठी कित्येक वर्षांपासून चर्चमध्ये कार्यरत असलेल्या मनोज या गरीब मुलाची त्यांनी अचानक हकालपट्टी केली होती व त्याच्या जागी एका मदतनीसाऐवजी दोन नव्या मुलांची भरती केली होती. ‘मी कोणाच्या घरी भेटीसाठी येणार नाही; मला तुमचे बंगले, श्रीमंती नाही पाहायची,’ असे भर चर्चमध्ये उच्चारून त्यांनी गावभेटीस जाणे नाकारले होते आणि स्वतः मात्र श्रीमंती थाटात राहत होते.

चर्चचे कंपाउंड अधिक उंच करावे म्हणून त्यांनी घाट घातला होता आणि सर्वांनी देणग्या द्याव्यात म्हणून रोज चर्चमधून घोषणा चालू केल्या होत्या. ‘‘हे तर आपल्या चर्चचे प्रमुख धर्मगुरू नाहीत, तर ‘चीफ फायनान्शिअल ऑफिसर’ आहेत.’’ माझ्या एका मित्राने या फादरांविषयी माझ्याकडे बोलताना म्हटले. त्याच आठवड्यात संपादक मंडळाची दुसरी सभा लागली. या वेळेला चर्चमधून सभेची घोषणा झाल्यामुळे बरेच नवे सदस्यही उपस्थित होते. फादरांच्या खुर्चीला लागूनच परिसरातील एक धनाढ्य बिल्डर गोन्साल्विस बसलेले दिसत होते. त्यांना फादरांनीच या सभेस बोलावलं होतं. या सभेसाठी अंकाच्या मजकूर विभागाबरोबरच जाहिरातविभागही उपस्थित होता. जवळजवळ 15-16 जण त्या सभेस हजर होते. ‘‘सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर महान आहे. त्याला अशक्य असे काहीच नाही. आज या संपादकीय कामाचा शुभारंभ करताना आपण त्याची विशेष अशी कृपा मागू या. देवदूत आणि महादूत आपणा सर्वांसाठी पवित्र आत्म्याच्या वर्षावाचा जयघोष करीत आहेत.’’ आलेल्‌या... अशी काहीशा मोठ्या व कडक आवाजात त्यांनी प्रार्थना करून सभेला सुरुवात केली.

अंकासाठी कोण संपादक असेल, कोण सहसंपादक, जाहिरातप्रमुख असेल... संपादक, कार्यकारी संपादक, सचिव, प्रकाशक म्हणजे काय वगैरे वगैरे सांगत फादरांनी पहिली 15-20 मिनिटे खर्ची घातली. आणि मग ‘‘...श्री.गोन्साल्विस ह्यांना मी बोलावलं आहे. त्यांचे भरपूर कॉन्टॅक्ट्‌स आहेत. जाहिरात विभागासाठी त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. जेवढ्या मिळविता येतील तेवढ्या जाहिराती आपण मिळवायच्या आहेत.’’ असे म्हणून अप्रत्यक्षरीत्या चर्चसाठी पैसा कसा महत्त्वाचा आहे, हे ते ठासून सांगू लागले. त्याच बोलण्याच्या ओघात जाहिरात विभागाची प्रमुख म्हणून गेली कित्येक वर्षे चोख काम पाहणाऱ्या शैला या महिलेकडे पाहत ते म्हणाले, ‘‘जाहिरात विभागात त्यांचं नाव प्रथम असेल, मग इतरांची नावं. अर्थात अंकासंबंधी त्यांना काही काम सांगायचे नाही, ते इतर सदस्यांनी पाहावे.’’ अर्धा तास झाला तरी मूळ कामापेक्षा कोणाचे नाव कुठे आले पाहिजे आणि जाहिरातीपासून जास्तीत जास्त पैसा कसा गोळा करता येईल, याभोवतीच त्यांचे बोलणे चालू होते.

चर्चमध्ये दर वर्षी नेटाने आपले योगदान दिलेल्या गरीब शैलाचा चेहरा पडलेला दिसत होता. इतर उपस्थितही कंटाळलेले दिसत होते.

‘‘फादर... कोणाचं नाव पुढे, कोणाचं शेवटला, हे जरा नंतर घेतलं तर बरं होईल. आपण एक टीम म्हणून इथे काम करतो.’’ मी माझं मत मांडत म्हटले.

‘‘नाही. ते महत्त्वाचं आहे. एक प्रोसेस पाळली गेली पाहिजे. ज्याच्या-त्याच्या कुवतीप्रमाणे पदं दिली गेली पाहिजेत.’’ त्यांचा आडमुठेपणा जाणवत होता.

‘‘आपण सर्व जण देवाची मुलं. देवासमोर आपण सर्व समान आहोत, असे तुम्ही या चर्चमध्ये आजच सकाळी मिस्सामध्ये प्रवचनात सांगितलं. पण तुमची येथील कृती मात्र काही वेगळेच सांगतेय, असं नाही वाटत तुम्हाला?’’ मला हा दांभिकपणा असह्य झाला होता.

‘‘मी संपादक आहे. अंतिम शब्द माझा राहील. तुम्हाला माझे विचार पटत नसतील, तर तुम्ही इथून निघून जाऊ शकता.’’ त्यांचे हे तडकाफडकी उत्तर ऐकून मला धक्काच बसला.

‘‘तुम्ही खूपच वैयक्तिक पातळीवर जाताय. चर्च म्हणजे माझी किंवा तुमची खासगी मालमत्ता नाही. हा अंक, हे चर्च सर्वांचे आहे. तुम्ही मला ‘इथून निघ’ असे कसे म्हणू शकता? आपल्या इथे लोकशाही आहे. मला माझे विचार मांडण्याचा अधिकार आहे.’’ मला आता हे सर्व असह्य झाले होते.

‘‘हे चर्च आहे, भारताचे पार्लमेंट नाही. व्हॅटिकनने दिलेले चर्चचे काही नियम असतात. मी येथील चर्चचा प्रमुख आहे.’’

‘माझंच खरं, मी सांगेन ती पूर्व दिशा’ असा फादरांचा हेकेखोरपणा स्पष्टपणे दिसत होता. मी अपेक्षेने इतर उपस्थित 15 सदस्यांकडे पहिले. संपादक मंडळाच्या सभेसाठी चांगले वाचन असणारे, लिहिणारे, शाळेत शिकवणारे अशा बऱ्याच सुशिक्षित व्यक्ती त्या सभेस हजर होत्या. कोणी तरी फादरांपुढे- मग ते कोणाच्याही बाजूने का असेना- काही तरी बोलेल, असे मला वाटले. पण कोणीही एक चकार शब्द काढला नाही. माझ्या बाजूला बसलेल्या एका बाईने फक्त तोंडावर बोट ठेवून ‘जाऊ दे, उगाच शब्दाला शब्द वाढतोय’ म्हणत इशारा केला, एवढेच. तत्क्षणी फादरांच्या दांभिकपणापेक्षा त्या 15 सुशिक्षित लोकांचा मूकपणा मला क्रूर वाटला.

तसेच मला जाणीव झाली की, मी काही वेगवेगळ्या विषयांवर मुक्तपणे मते मांडण्याची मुभा असलेल्या विवेकमंचात नव्हतो; तर काहीही प्रश्न न विचारता, धर्मगुरू सांगेल ती पूर्व दिशा पाळणाऱ्या मेंढरांत होतो! ‘मेंढरू’ हे चर्चचे सर्वांत आवडते प्रतीक. सर्वांनी मेंढरांसारखे असावे, जास्त प्रश्न न विचारता मेंढपाळांच्या आज्ञेत राहावे- हा विचार चर्च नेणिवेच्या पातळीवर प्रत्येक भाविकाच्या मनावर बिंबवीत असते. एका बाजूला येशूच्या चित्रात बाजूला बरीच मेंढरे दाखवून, येशूला मेंढपाळ असे भावनिकरीत्या सुचविले जाते आणि मग फादरांचे बॉस, बिशप म्हणजे आपले सर्वांचे मेंढपाळ- असे म्हणून जसे येशूचे ऐकले असते तसेच ह्यांचेही ऐका, असा सुप्त संदेश मनावर बिंबविला जातो.

चर्चमध्ये ज्या विविध संघटना आहेत व त्यामार्फत जे कार्य चालते, त्यामागे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे खूप मोठे योगदान असते. ‘चर्च म्हणजे आपल्या देवाचे घर’, ‘आपल्या परिसरातील चर्च म्हणजे आपले हक्काचे’ ही भावना जनमानसात असते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा बिलकुल तोटा नसतो. तसेच गर्दी व पैसा सहज जमत असल्याने येथे कार्य करणेही तुलनेने सोपे असते. पण येथील कार्यकर्त्यांचे जर निरीक्षण केले, तर यातील काही जण खरोखर सामाजिक कळकळीपोटी या संघटनेत आपले योगदान देत असतात. काही जण नीरस आयुष्यात काही तरी socializing हवे, तसेच त्या निमित्ताने चार ओळखी व्हाव्यात म्हणून येत असतात. आणि शेवटची आणखी जी एक जमात असते, ती या संघटनेत कार्यरत असते ती फक्त चर्चमध्ये लोकांसमोर फादरांबरोबर मिरविण्यास मिळते म्हणून! आणि हेच लोक फादरांच्या मागे-मागे करणे, सभेमध्ये फादरांची बाजू- मग ती कितीही चुकीची असो- उचलून धरणे, असे प्रकार करत असतात. त्याचे बक्षीस त्यांना विविध संघटनांमध्ये विविध पदे देऊन किंवा इतर लोकांपुढे सन्मान करून, दिले जाते.

गेल्या चार वर्षांपासून मी विवेकमंचात इतर काही सदस्यांचे फादरांबाबतचे चांगले-वाईट अनुभव ऐकत होतो. मलाही अगोदर चर्चचे दोष दिसले होते, फादरांचेही अवगुण दिसले होते. पण येथील चर्चमध्ये अगोदर आलेल्या धर्मगुरूंबाबत प्रत्यक्ष तसा अनुभव आलेला नव्हता. पण ह्या वेळेला मात्र कडेलोट झाला होता. फादरांचा दांभिकपणा मी फर्स्ट हॅन्ड अनुभवत होतो. ज्या धर्मगुरूने 30 हून अधिक वर्षे चर्चमध्ये ‘गरिबांची सेवा’ आणि समानतेची प्रवचने दिली आहेत, त्यांचे हे वागणे ‘असतात एखादे फादर असे, म्हणून काय सगळ्यांनाच बोल लावायचे?’ असे ‘व्यक्तिदोष’ म्हणून खचितच दुर्लक्ष करण्यासारखे नव्हते. चर्चबाबतीत आज जे काही चुकीचे आहे, त्या सर्वांचे ते मला एक प्रतीक वाटले.

नंतर विचार केला, श्रीमंतांशी अंगलट करणारे व धर्मसत्तेपासून आलेल्या शक्तीचे असे ओंगळ प्रदर्शन दाखवणारे फादर पायस काही पहिलेच धर्मगुरू नसतील. काही सन्माननीय अपवाद वगळता, बरेच धर्मगुरू कितीही मधाळ प्रवचने देत असले तरी प्रत्यक्षात गोड बोलून श्रीमंतांना चतुरपणे आपल्या जवळच ठेवत असतात. किंबहुना, सत्कार्याचा आव आणून केला जाणारा हा दांभिकपणा पूर्वापारपासून चर्चमध्ये चालत आलेला आहे. कदाचित फादर पायस ह्यांना त्या श्रीमंतांशी लगट करण्याची वा ‘माझे तेच खरे’ या हुकूमशाहीची इतकी सवय झाली आहे की, ते आता मुखवटा न चढवताच हवे तसे बिनदिक्कतपणे वागत असावेत. त्यांनी सत्कार्याचा मुखवटा न वापरल्याने खऱ्या चेहऱ्याचे त्यांनी आज मला दर्शन घडवले होते. त्या बाबतीत मी या फादरांचा ऋणी राहील!

‘करशील जे गरिबांसाठी, होईल ते माझ्यासाठी’ असे येशूच्या वचनावर आधारित एक सुंदर गीत चर्चमध्ये गायलं जातं. आज मात्र, ‘करशील जे श्रीमंतासाठी, होईल ते माझ्यासाठी’ असंच काहीसं फादरांचं वागणं अनुभवण्यास मिळालं होतं. सभेनंतर चर्चबाहेर आल्यावर बाहेर पाहतो तर ढगांचा जोरात गडगडाट होऊन मुसळधार पाऊस सुरू झाला होता. आजूबाजूला ढगाळलेले वातावरण आहे, वारा वाहत आहे ह्याची सभेत वेगळ्याच वादळात हरवलेल्या मला चाहूलच लागली नव्हती. आम्ही चर्चच्या आडोशाला खाली उभे होतो. सभेतील काही लोक माझ्या बाजूला जमले. ‘‘अरे, हे फादर असेच आहेत. तू इतकं मनाला लावून घेऊ नकोस.’’

‘‘हे काय आज आहेत, उद्या नाहीत. आपण इथेच राहणार आहोत. हा आपला अंक आहे. इतकी वर्षे आपण संपादन करत आहोत.’’

‘‘आपण चर्चमध्ये येशूसाठी येतो, या फादरांसाठी नाही!’’

मला त्या सर्वांना सांगावेसे वाटत होते, ‘पण सभेत तुम्ही सर्व जण गप्प का राहिलात? पाचामुखी परमेश्वर ह्याची ताकद तुम्हाला माहीत नाही का? आपण तर 15 जण होतो. सभेमध्ये अशा फादरांना जाब विचारणारा कोणी नसतो म्हणून ह्यांचे फावते, हे तुम्हाला माहीत नसावे?’

ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, सुसाट वारा व त्याच जोमाने धबधब्यासारखा कोसळणारा पाऊस या सर्वांत लागलेली शर्यत काही थांबण्याचे नाव घेत नव्हती. माझ्याही मनात एक वेगळं वादळ घोंघावत होतंच. त्यामुळे मी तो मुसळधार पाऊस थांबण्याची वाट न पाहता चर्चच्या आवारात ठेवलेली माझी बाइक घेण्यासाठी पार्किंगच्या आवारात आलो. आज चर्चमधून बाहेर पडताना मन खूपच विषण्ण झाले होते. फादरांचा मुखवट्या पलीकडचा दांभिक खरा चेहरा पाहिला होता आणि त्याहीपेक्षा अपेक्षाभंग म्हणजे, त्या 15 लोकांचे मूक राहणे.

हा आपल्या भारतीय शिक्षणव्यवस्थेचा दोष असेल का? प्रश्न विचारणे, आपले मत बिनदिक्कत व्यक्त करणे, ह्याला आपल्या शिक्षणामध्ये कधीच महत्त्व नव्हतं. चूप राहणं किंवा दिलेली उत्तरं पाठ करणं, हाच आपल्या शिक्षणव्यवस्थेचा आणि त्यामुळे पर्यायी आयुष्याचाही भाग झाला असेल का? त्या क्षणी मला ॲड.अनुप डिसोझा ह्यांची आठवण आली. ते जणू माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत होते. मी तर चर्चमध्ये फक्त वार्षिक अंकाच्या, संपादनाच्या कामासारख्या तुलनेने निरुपद्रवी कामानिमित्त वर्षातून फार-फार तर महिना-दोन महिनाभर कार्यरत असणारा. पण त्यांनी तर वसई पातळीवर चर्चची आर्थिक, सांपत्तिक अशी अत्यंत गोपनीय बाजू पाहिली होती. मग ती बाजू किती काळी असेल आणि त्यांनी किती किती मुखवट्यांआडचे ढोंगी चेहरे पहिले असतील अन्‌ त्यांचा किती मोठा अपेक्षाभंग झाला असेल ह्याची मला कल्पनाच करवली नाही. चर्चला काही ही बाजू नवी नाही. नवे कार्यकर्ते येतात, त्यापैकी काही जण चर्चमध्ये धार्मिकतेच्या बुरख्याआडून चाललेला हा पैशाचा व्यापार पाहतात. काही तसेच चूप राहतात, तर काही चर्चमधून बाहेर पडतात. मग त्यांच्या जागी नवे कार्यकर्ते येतात आणि चर्चचे काम असेच अखंडितपणे सुरू राहते. ...

पावसाची रिपरिप अजूनही चालूच होती. चेहऱ्यावरील पावसाचे पाणी हाताने दूर करून मी त्या ओल्या काळोखी आकाशाकडे डोळे बंद करून काही क्षण पाहिले, एक दीर्घ श्वास घेतला व बाईक सुरू केली. विवेकमंचाचा विचार ‘समाज विकास मंडळा’त ‘फॉर्म’ आणि ‘स्टॉर्म’ या अवस्थेतून ‘नॉर्म’ अवस्थेत आला म्हणून मी सुटकेचा निःश्वास टाकला होता खरा, पण खरा प्रवास आता कुठे सुरू झाला होता! या प्रसंगाने मला आता चौथी आणि शेवटची पातळी ‘परफॉर्म’ या अवस्थेत आणून सोडले होते.

डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस, वसई

danifm2001@gmail.com

(आय.टी.क्षेत्रात इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या डॅनिअलकडून गेल्या वर्षी ‘मंच’ या पुस्तकाचे बाड प्रकाशनासाठी साधनाकडे आले होते. ते वाचल्यावर पहिली जाणीव ही झाली की, या तरुण लेखकाकडून आलेले अनुभवविश्व व विचारविश्व, मराठी लेखन व साहित्य व्यवहाराला फारसे परिचित नाही. म्हणून ‘मंच’ हे आधी लेखमाला स्वरूपात साप्ताहिकातून आणि नंतर पुस्तकरूपाने आणायचे असा निर्णय घेतला, तो अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाला. सर्व स्तरांतील वाचकांचा चांगला प्रतिसाद या लेखमालेला मिळाला. अर्थातच काही वेळा नाराजीचे सूरही उमटले, अशा प्रकारच्या लेखनात ते स्वाभाविक असते. डिसेंबर 2019 मध्ये ‘मंच’ हे पुस्तक साधना प्रकाशनाकडून येईल. - संपादक)

नवे पुस्तक

वृद्धत्व आनंदी कसे करावे

डॉ. दिलीप शिंदे

‘वृद्धत्व आनंदी कसे करावे’ हे अरुण गोडबोले यांनी संपादित केलेले पुस्तक वाचताना मला बत्तीस ज्येष्ठांच्या जीवनानुभवांनी व विचारांनी भरलेले आयते ताटच हाती गवसल्याचा आनंद झाला. प्रेम, विश्वास व सुरक्षितता या कौटुंबिक मूल्यांचे जतन करत अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची आस्थापूर्वक सेवाशुश्रूषा ही भूमिका उराशी बाळगून आम्ही सांगली येथे तीन वर्षांपूर्वी ‘संवेदना शुश्रूषा केंद्र’ सुरू केले आहे. हा उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा मला साधना साप्ताहिकातून ‘वृद्धांचे भावविश्व आणि आपली सामाजिक जबाबदारी’ या विषयावरील ‘चिखलाचे पाय’ ही लेखमाला लिहिताना मिळाली आहे. आत्तापर्यंत दीडशेहून अधिक वृद्ध माता-पित्यांची सेवाशुश्रूषा करण्याची संधी आम्हाला लाभली असून, या निमित्ताने ज्येष्ठांच्या अनुभवाचे बोल पुढच्या पिढीचे जगणे समृद्ध करण्यासाठी किती मोलाचे असतात याची जाणीव झाली आहे. त्यामुळे ‘वृद्धत्व आनंदी कसे करावे’ हा लेखसंग्रह मला अधिक भावला.

हा लेखसंग्रह केवळ वृद्धांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच उपयुक्त व मार्गदर्शक आहे. यातील विविध लेखांतून आरोग्य, कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक अशा विविध पैलूंवर लेखकांनी आपापल्या परीने युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत. आज देशातील ज्येष्ठांची संख्या सुमारे आठ टक्के इतकी आहे. नोकरी वा व्यवसायातून निवृत्त झालेली ही मंडळी आपले नंतरचे आयुष्य आपापल्या परीने सुखी व आनंदी करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा ज्येष्ठांना व्यक्त होण्यासाठी संधी मिळावी, म्हणून सातारा येथील अरुण गोडबोले हे गेल्या चार वर्षांपासून ‘कौशिक ज्येष्ठ नागरिक लेखन स्पर्धा’ आयोजित करीत असतात. त्यामध्ये महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरीलही ज्येष्ठांचा सहभाग असतो. या वर्षीच्या चौथ्या स्पर्धेसाठी त्यांनी ‘वृद्धत्व आनंदी कसे करावे’ हा विषय निवडला होता आणि त्याला ज्येष्ठांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यातील निवडक लेख व काही मान्यवरांचे निमंत्रित लेख मिळून हा लेखसंग्रह प्रकाशित केला आहे.

या पुस्तकाच्या पहिल्याच लेखात शारदा शिंत्रे यांनी म्हटल्याप्रमाणे आनंदी वृद्धत्वाची तयारी ऐन तारुण्यापासूनच करायला हवी, कारण शेवटी आपले जगणे आनंदी असेल तरच वृद्धत्वही आपोआपच आनंदी होते. त्यामुळे या पुस्तकाचे शीर्षक जरी ‘वृद्धत्व आनंदी कसे करावे’ असे असले, तरी यातील तपशील मात्र ‘जगणे आनंदी कसे करावे’ या विषयीच दिशादर्शन करतो.

डॉ.अनिमिष चव्हाण यांनी म्हातारपण म्हणजे ‘महातारे’ पण असा भावार्थ सांगत, म्हातारपण कसं असावं हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते याची जाणीव करून दिली आहे. ‘महातारे’ पण म्हणजे प्रकाशाचे बेट किंवा उजेडाचा ठेवा. थोडक्यात, म्हातारपण म्हणजे आपल्या जगण्याचा अर्क असतो. आयुष्यातील समाधान अनुभवण्याची क्षमता या वयात वाढलेली असते, हे आपले निरीक्षण नोंदवताना त्यांनी वैज्ञानिकांच्या मते या क्षमतांची कशी उलटी कमान बनते, हे सांगितले आहे. तारुण्यात आणि वृद्धत्वात आयुष्याचा आनंद घेण्याच्या क्षमता मूलतः जास्त असतात, तर वयाच्या तिशीपासून पासष्टीपर्यंत त्या कमी होतात. कारण जीवन जगतानाचा या मुख्य धबडग्याच्या काळात बहुतांश माणसांच्या स्वतःच्या अंतःकरणातील निखळ आनंदाशी संवाद कमी होतो. पण उतारवयात मनुष्य पुन्हा नव्याने तरुण होतो. शिवाय अनुभवांच्या शिदोरीनेही तो तरुणांपेक्षा संपन्न बनलेला असतो.

सत्ता, संपत्ती, सोबत आणि स्वास्थ्य यांच्या वजाबाकीच्या कल्पनेनं माणसाला म्हातारपणाचे भय वाटते. पण वाढत्या वयात ही वजाबाकी होणारच, हे मनस्वीपणे मान्य करून अनावश्यक आकांक्षा संपून योग्य गरजा तेवढ्याच उरणे हे उमजून घ्यायला हवे, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला आहे. गोवर्धन बजाज यांनी पिकलेलं फळ आणि पिकलेलं पान यातील फरक विशद करून वृद्धत्वाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचे महत्त्व पटवून दिले आहे. तर, डॉ.अरविंद नवरे यांनी ‘दुसऱ्याला आनंदी करा आणि स्वतः आनंदी व्हा’ हे वृद्धत्व आनंदी करण्याचे गुपित सांगितले आहे.

अरुण गोडबोले यांनी ज्येष्ठांसाठी आर्थिक नियोजनाचे महत्त्व सांगताना तुकारामांच्या उपदेशाप्रमाणे सन्मार्गाने पैसे मिळवावेत व सत्कृत्यासाठी खर्च करावेत, असा कानमंत्र दिला आहे. मान्यवरांच्या निमंत्रित लेखांमध्ये ज्येष्ठ संशोधक व लेखक डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर यांचाही लेख या संग्रहात आहे. दिवसातील चोवीस तास ज्याला कमी पडतात, तो तरुण आणि चोवीस तास ज्याला खायला उठतात, तो म्हातारा- अशी त्यांनी तरुणपण व म्हातारपणाची व्याख्या सांगितली आहे. तसेच सत्तर ते नव्वद वयोगटातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन स्वतः आनंद घेत इतरांना आनंद देण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधण्याची गरज व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या जागतिक आनंद निर्देशांक अहवालानुसार 156 देशांच्या यादीत भारताचे स्थान 133 वे आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यामध्ये सतत घसरण सुरू असून, नवल म्हणजे आपला शेजारी पाकिस्तान चक्क 75 व्या स्थानावर आहे. आनंदाच्या बाबतीत भारताचे स्थान एवढे खाली असण्यामागे लोकसंख्या, प्रचंड वाढलेल्या अपेक्षा आणि सतत सहानुभूती मिळवण्याची सवय, ही कारणे सांगितली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्याकडे वृद्धांच्या शारीरिक आरोग्याबाबत जेवढी सजगता दाखवली जाते, तेवढी मानसिक आरोग्याबाबत दाखवली जात नाही. जीवशास्त्रीय बदलामुंळे आणि पेशींच्या ऱ्हासामुळे वृद्धापकाळामध्ये स्मृती कमी होत जाते. झोपेचे प्रमाणही कमी होत जाते. त्यामुळे काही वेळा ते चिडचिडे, हट्टी व बडबड करणारे बनतात. अशा वेळी कुटुंबातील सदस्यांनी त्यांची मनःस्थिती समजून घेऊन त्यांच्याशी आपुलकीने वागायला हवे.

एजवेल फाउंडेशनच्या अलीकडच्या एका सर्व्हेनुसार सध्या भारतातील 43 टक्के वृद्ध मानसिक आजाराने त्रस्त असून 25 ते 30 टक्के वृद्धांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागते आहे. माणसाच्या आयुष्यातील सर्वांत मोठे ओझे कोणते असेल, तर वाहून न्यायला त्यांच्या खांद्यावर कोणतेही ओझे नसणे. प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी काही तरी निमित्त हवे असते. वृद्धापकाळामध्ये ते हळूहळू हरवत जाते. त्यामुळे वृद्धांना नैराश्य आणि एकलकोंडेपणाला तोंड द्यावे लागते. या दोन्ही गोष्टींचा विचार करता, अशी पुस्तके सामाजिक स्वास्थ्यासाठी मोलाची भूमिका बजावू शकतात. म्हणून या पुस्तकाचे आपण मनःपूर्वक स्वागत करायला हवे.

डॉ. दिलीप शिंदे, सांगली

वृद्धत्व आनंदी कसे जगावे

संपादक : अरुण गोडबोले

प्रकाशक : कौशिक प्रकाशन, सातारा

प्रतिसाद

माझा मित्र ‘बाबा’

दि.14 सप्टेंबरच्या ‘साधना’ अंकात सदा डुम्बरे यांची अनिल अवचट यांच्यावरील लेखांच्या पुस्तकाची प्रस्तावना वाचली आणि मला मी चार वर्षांपूर्वी 2015 मार्चला अनाहूतपणे ‘बाबा’ला धाडलेल्या ई-मेलची आठवण झाली. 50 वर्षांपूर्वी त्याची-माझी पहिली भेट झाली, ती एक 30 वर्षांची तरुण वाचक आणि 25 वर्षांचा तरुण लेखक यांची भेट होती. आणि मग अशाच नात्यातून आम्ही भेटत राहिलो. माझ्यासारख्या आपल्या हजारो वाचकांना बाबाने सामाजिक जाणीव दिली आणि जीवनाचा मार्ग दाखविला.

वाटले, साधनाच्या वाचकांना हा माझा उपद्‌व्याप आवडेल म्हणून ती मेल माझा मित्र ‘बाबा’ धाडीत आहे. (दुसऱ्याच दिवशी उलट मेलमध्ये ‘बाबा’ लिहिता झाला- ‘‘प्रिय प्रभा, किती छान लिहितेस! ओळखीचं माणूस आणि ओळख लागत नाही, अशी अवस्था झाली आहे माझी...’’ आणि सोबत मोबा.नं. पण दिला होता.)

याची माझी खूप जुनी ओळख. मी याला प्रथम भेटले ते कॉलेजात असताना, तेही त्याच्या पुस्तकातून- ‘पूर्णियाच्या प्रदेशा’तून बिहारमधील जमीनदारांच्या, कायदा आपल्या हातात घेणाऱ्या खासगी सेनेबद्दल वाचून असहाय शेतमजुरांबद्दल अनुकंपा तर दांडग्या व पिळवणूक करणाऱ्या जमीनदाराबद्दल चीड निर्माण झाली. माझ्या या मित्राने मला कित्येक दृष्टिआडच्या सृष्टीत नेले. फोडणीत हळद घालताना मला हळदीकाम करणाऱ्यांचे भाजलेले हात दिसू लागले. कधी गर्दच्या विळख्यात सापडलेली असहाय तरुणाई भेटली. अमेरिकेच्या टोलेजंग इमारतींचे गोडवे आपण नेहमीच ऐकतो; परंतु गरम इंजिनाच्या खोबडीत लपून, जीवावर उदार होऊन अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या काळ्या immigrant ची गोष्ट त्याच्या ‘अमेरिका, अमेरिका’मध्येच वाचायला मिळाली.

माझं मन बऱ्याच अंशी माझ्या या मित्राने असं संवेदनशील बनविलं. कालांतराने मीही संसारात पडले. मुले झाली आणि मला ह्याच्या अनुभव शेअर करण्याचा फायदा होऊ लागला. चांगले दही लागणे हे विरजण दुधात नीट मिसळण्यावर कसे अवलंबून आहे, भाजीची चव ती कशी छान मिळून येण्यात आहे- अशा अनेक छोट्या-छोट्या टिप्स मला या मित्राकडून मिळाल्या. एक साधी छोट्यांची गोष्ट, पण ती सांगता न येणाऱ्याला ह्याने बाप बनायला चक्क नालायक ठरविले. मुलांना चित्र काढायला एक भिंत आरक्षित ठेवणारा, त्यांना आम जनतेच्या शाळेत घालणारा हा बाप आणि आपल्या सुनंदाला हर प्रकारे समजून घेऊन मदत करणारा नवरा, घरच्या नोकरांना मदतनीस म्हणून सहृदयतेने वागविणारा घरमालक : माझ्यातील पालक, पत्नी अन्‌ घरवालीला घडवू लागला.

फुटलेली प्रश्नपत्रिका वर्गमित्राने देऊ केली असता ती बघायचे नाकारणारी त्याची मुलगी मला एक विश्वास देऊन गेली की, याने दाखविलेल्या रस्त्याने गेले तर माझी मुले पण सुसंस्कृत होतील. आणि माझा हा विश्वास सार्थ ठरला. दिल्लीला फिल्म फेस्टिव्हलदरम्यान बसमधून शेवटी उतरणारी प्रवासी होती माझी मुलगी. तिला त्रास देऊ बघणाऱ्या क्लीनरच्या कचाट्यातून ती पळाली. दुसऱ्या दिवशी झाल्या प्रकाराची चौकशी करणाऱ्या समितीपुढे तिने सांगितले, ‘त्याला चांगली समज देऊन सोडावे. त्याला शिक्षा देऊन एका गुन्हेगाराला जन्म देऊ नका.’ हा झाला एक प्रसंग.

दुसरा प्रसंग आहे माझा मुलगा बारावी शिकत असतानाचा. डिसेंबर 1984 च्या भोपाळ दुर्घटनेत जेव्हा सगळे तिथून दूर पळत होते, तेव्हा आपला अभ्यास बाजूला सारून तो Ham Radio Operator म्हणून मदत करण्यास धावला. माझा विश्वास बळावला. माझी मुले एक ‘सच्चा इन्सान’ बनली, याचा मला सार्थ अभिमान वाटला. अजूनही माझ्या निवृत्तीच्या काळात माझ्या या मित्राकडून मी काही ना काही शिकत असते. त्याचे ते पुणे (आता सावित्रीबाई फुले) विद्यापीठ परिसरात फिरणे. किडे-मुंग्यांच्या विश्वात रमणे, दगड-धोंड्यांत रस घेणे हे मला एक शिकवून गेले की, आयुष्यात बोअर होण्यासारखे किंवा जीवनाला विटण्यासारखे काही असत नाही.

जन्म मुंबईत गेल्यानंतर गेली काही वर्षे मी अधून-मधून कोकणातील गावी रमू लागले. निवृत्तीनंतर मी डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या मार्गदर्शनाखाली अंनिसमधे काम करू लागले, त्यांच्या प्रेमादराला पात्र झाले. हा माझा मित्र डॉक्टरांचा इतक्या जवळचा मित्र आहे, हे मला ते गेल्यावरच कळले. आपल्याला सर्वांनी ‘ए बाबा’ असे एकेरीत संबोधणे त्याला आवडते, हे मी जाणून आहे.

प्रभा पुरोहित, मुंबई

नाकर्तेपणा आणि धोरणशून्यता यावर शिक्कामोर्तब!

साधनामधील ‘अर्थवास्तवाचे उथळ आकलन नको’ हे (दि. 14 सप्टेंबर) अभय टिळक यांनी लिहिलेले संपादकीय वाचले. त्यात आजच्या घडीला देशाला भेडसावणाऱ्या आर्थिक मंदीच्या पदराचे अनेक कंगोरे उलगडले असले तरी, सांप्रत ‘देशावर दाटलेले मंदीचे काळे ढग’ या परिप्रेक्ष्यात मोदी सरकार संवेदनशील आहे का? या प्रश्नाला प्रथम भिडावे लागेल.

काश्मीरशी निगडित अनुच्छेद 370 कलमांतील तरतुदींचा राष्ट्रीय ज्वर आणि राजकीय धुरळा कमी होऊन देशातील आर्थिक मंदीसदृश वातावरणाचे चटके जवळपास सर्वच क्षेत्रांना बसायला लागले आहेत. मोदी सरकारच्या कथित 2.0 राजवटीतील पहिल्या तिमाहीत देशाचा विकासदर 5 टक्के नोंदवला गेला असून, तो मोदी सरकारच्या गेल्या साडेपाच वर्षांच्या, तर देशातील मागील अठरा वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर जीडीपी मोजण्याची प्रमाणके आणि निकष बदलण्यात आले. आकडेवारी चुकीच्या पद्धतीने गोळा केल्यामुळे भारताचा वास्तव विकासदर मोदी सरकार दाखवत आहे तेवढा खरोखरच आहे का, असा आक्षेप अनेक अर्थविषयक अभ्यासकांनी उपस्थित केला होता.

आता तर तो 5 टक्क्यांपर्यंत घसरला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मजबूत सरकार म्हणजे राजकीय पातळीवर स्थैर्य, म्हणजेच पर्यायाने देशाची जलद गतीने विकासाकडे वाटचाल- असा जो काही बालिश राजकीय व आर्थिक (गैर)समज गेली पाच-सहा वर्षे देशात सत्ताधारी भाजपकडून हेतुपूर्वक पसरवला जात आहे, त्या समजाला यामुळे यथायोग्य सुरूंग लागला आहे.

देशांतर्गत मंदीसाठी मोदी सरकार व त्यांचे समर्थक आंतरराष्ट्रीय घडामोडींना जबाबदार धरत आहेत. पण हे समस्येचे सुलभीकरण करणे असून, देशवासीयांची दिशाभूल करणारेदेखील आहे. कारण 2008 मध्ये अवाढव्य लेहमन ब्रदर्स बँकेच्या पतनानंतर सबप्राईम क्रायसिस- मंदीच्या त्सुनामीतून- जागतिक पातळीवर तावून-सुलाखून निघालेल्या दोन प्रमुख अर्थव्यवस्था म्हणजे भारत आणि चीन. त्यामुळे देशातील आजच्या मंदीला आंतरराष्ट्रीय घडामोडी हे एकमेव कारण नसून, सरकारची आर्थिक धोरणांतील गोंधळावस्था हे मुख्य कारण आहे.

नेहमीच लोकानुयय करणाऱ्या सरकारला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो, हे वैश्विक सत्य मोदी सरकारने रिझर्व्ह बॅकेतील आपत्कालीन निधीपैकी 1.76 लाख कोटी निधीवर डल्ला मारून अधोरेखित केले आहे. जीडीपीची वाढ किंवा विकासदर हा कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा प्रमुख निदर्शक असतो. यावर देशाची अंतर्गत आणि जागतिक पत ठरत असते. तसेच मध्यवर्ती बँका विकासदरावर विसंबूनच आपल्या व्याजदरात वाढ किंवा कपात करत असतात. परदेशी गुंतवणूकदारांसाठी एखादा देश गुंतवणूक करण्यास योग्य आहे की अयोग्य, हे सदर देशाच्या विकासदरातूनच ढोबळ मानाने स्पष्ट होत असते.

जीडीपी वाढीसाठी ज्या महत्त्वाच्या निर्देशांकांचा आधार घेतला जातो, त्या आठ निकषांपैकी पाच म्हणजेच निम्यांहून अधिक क्षेत्रांतील निर्देशांकांत आज देश उतार व अनुत्साह अनुभवत आहे. देशाचा विकासदर हा केवळ देशाच्या प्रतिष्ठेचा निर्देशक नसतो, तर तो अर्थव्यवस्थेचा शक्तिमापकदेखील असतो. मनमोहनसिंग सरकारच्या दुसऱ्या सत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाने डॉलरसमोर मान टाकली (58-60 रुपये प्रतिडॉलर), तेव्हा मोदींनी याचा संबंध थेट देशाच्या घसरत्या विकासदराशी जोडत याचा वापर मनमोहनसिंग यांच्या पुरुषत्वाशी आणि देशाच्या इभ्रतेशी-अस्मितेशी बेमालूमपणे सरमिसळ करण्यात केला होता.

आज रुपयांची डॉलरसमोर (प्रतिडॉलर 72 रुपये) घसरगुंडी उडाली आहे, यावर मोदी काही ‘मन की बात’ करणार का? तर्काला तिलांजली देऊन देशवासीयांनी ‘अच्छे दिन’ची स्वप्ने आणखी किती दिवस रंगवत राहायची? मध्यंतरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाहन क्षेत्रातील मंदीमागे उबर-ओला जबाबदार असल्याचे अतार्किक वक्तव्य केले होते. मग बांधकामक्षेत्रातील मंदीमागे प्रधानमंत्री आवास योजना (2022 पर्यंत 390 शहरांत 22 लाख घरे निर्माण केली जातील, या आशयाची जाहिरात) जबाबदार आहे, असे समजायचे का?

देशाचा विकास निर्देशांक मोजण्याच्या आठ निकषांपैकी पाच म्हणजेच निम्म्याहून अधिक क्षेत्रांत घसरण नोंदवली गेली आहे; तिथे तर उबर-ओला नाही ना? देशातील मंदीमागे सरकारची आर्थिक धोरणे- जसे की नोटाबंदी, सदोष जीएसटी करप्रणाली, कर, दहशतवाद, बिघडत चाललेले देशांतर्गत उद्योगस्नेही वातावरण इत्यादी कारणे जबाबदार आहेत. आपल्या अपयशामुळे किंवा नाकर्तेपणामुळे ओढवलेल्या परिस्थितीसाठी आपण जेव्हा इतरांना जबाबदार धरत दोष देतो, तेव्हा एक प्रकारे आपण आपला नाकर्तेपणा आणि धोरणशून्यतेवर शिक्कामोर्तब करत असतो, हे संबंधितांनी सदोदित लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक सुधारणा आक्रमकपणे राबवाव्या लागतात. तसेच यास्तव सर्वप्रथम राजकीय फायद्याचा बळी द्यावा लागतो आणि यासाठी सरकारची तयारी आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. अन्यथा, देशवासीयांसाठी आहेच राष्ट्रवाद आणि धार्मिक अस्मितांचा रतीब.

बाळकृष्ण शिंदे, पुणे

उजर नव्हे उजूर?

दि. 14 ऑगस्टच्या अंकातील सुरेश द्वादशीवार यांचा नेहरूंवरील ‘काश्मीरचा लढा’ हा लेख वाचत होतो. त्यामध्ये त्यांनी पान 10 वरच्या पहिल्या परिच्छेदात वापरलेल्या ‘उजर’ या फार कमी वापरात असलेल्या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले. सध्या अनुवाद आणि संपादनाचे काम सुरू असल्याने मराठी, इंग्लिश आणि उर्दू शब्दकोशाशी इतर वेळेपेक्षा जरा जास्तच संबंध येतोय. त्यामुळे कुतूहल म्हणून या शब्दाचा मागोवा घेतला. तसे वाक्य वाचताना त्या शब्दाचा अर्थ मला लागला होता, पण वा. गो. आपटेकृत मराठी शब्दरत्नाकर मध्ये शोध घेतला तेव्हा ‘उजर’ या शब्दाचा उत्कर्ष असा अर्थ आढळला. आणि उजूर या शब्दाचे आक्षेप, सबब (तुका 3010), काम आणि हक्क असे अर्थ आढळले. द्वादशीवारांच्या वाक्यात हक्क हा पर्यायी शब्द आपला सहज वाचता येतो, त्यामुळे तिथे उजर नव्हे उजूर हा शब्द योग्य आहे, हे लक्षात आले.

हा शोध घेताना मजा आली. वापरात नसलेल्या पण आगळ्या शब्दाकडे या निमित्ताने माझे लक्ष गेले. मला वाटतं, द्वादशीवारांनी तो कदाचित योग्य लिहिलाही असेल, एकदा सहज म्हणून तपासून पाहावे.

शेखर देशमुख, मुंबई

पूर्वीचे वास्तव लोकांपर्यंत पोहोचलेले नसते!

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा ‘विवेकवाद’ हा लेख फारच वाचनीय आहे. अंनिस वार्तापत्र मासिक असो किंवा साधना असो, मी दाभोलकरांचे लेख पहिल्यांदा वाचत असे. मलासुद्धा प्रश्न पडतात, आपण कोण? आपण काय करणार? पण आपल्यावर आपण प्रयोग करू शकतो, त्यामुळे निराशा येत नाही. माझ्या जीवनात निराशा झाल्यास मी डॉ.दाभोलकरांना पत्र पाठवीत असे, त्याचे उत्तर ते आवर्जून देत असत, त्यामुळे माझी निराशा निघून जात असे.

याच अंकात दुसरा लेख रामचंद्र गुहा यांचा ‘मोदींकडून नेहरूंची नक्कल आणि वाजपेयींची फसवणूक’. सर्व बाजू मला समजल्या. पूर्वीच्या सरकारांनी काय केले, या बाजू समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मीडियाचा वापर होणे गरजेचे आहे. आपल्यावर, आपल्या मुलांवर ती वेळ येऊ नये असे हा लेख वाचताना वाटते. समाजात लोक चर्चा करताना सरकारची तारीफ करताना दिसतात, पण पूर्वीचे वास्तव लोकांपर्यंत पोहोचलेले नसते आणि तरीही ते त्यांवर प्रतिक्रिया देतात.

गोवर्धन किसन गरड, बार्शी, जि.सोलापूर,/span>

मोलाची भूमिका घेणारे पुस्तक

गेल्या आठ ते दहा दिवसांच्या शोधानंतर ‘विज्ञान व समाज’ हे पुस्तक हाती आले. साधना प्रकाशनाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अप्रतिम पुस्तक आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यासाठी या पुस्तकाने खूप मोलाची भूमिका घेतली आहे. अशीच अगणित पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी साधना प्रकाशनाला अगणित शुभेच्छा.

कामराज चाळक, गेवराई, जि. बीड