Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

किमान समान 99.5 वर्षांत

व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी सर्वेक्षण वा संशोधन करून लिहिलेल्या विविध अहवालांविषयी नियमितपणे पण त्रोटक स्वरूपात आपल्या कानावर काही ना काही पडत असते. सरकारने नियुक्त केलेल्या समित्या व आयोग यांनी केलेल्या अहवालांच्या बातम्याही अधूनमधून येतच असतात. काही अहवाल अतिरंजित असतात, तर काहींमध्ये अतिसुलभीकरण केलेले असते. काही अहवाल आकडेवारीच्या जंजाळात अडकलेले असतात, काहींमध्ये क्लिष्टपणा काठोकाठ भरलेला असतो. त्यामुळे त्या त्या क्षेत्रांतील विशेष तज्ज्ञ व जाणकार व्यक्तींच्या पलीकडे त्या अहवालांची दखल घेतली जात नाही. मात्र काही अहवालांनी सरकारी धोरणांना कलाटणी दिलेली आहे, काही अहवालांनी समाजमन बदलण्यासाठी मोठा प्रभाव टाकलेला आहे.

असाच एक अहवाल गेल्या महिन्यात प्रकाशित झाला आहे. स्वित्झर्लंड येथील दावोस इथे दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदा होत असतात आणि त्यात जगभरातील बहुतांश राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी होत असतात. त्यासंदर्भातील वृत्तांत दरवर्षी येतात आणि जगभरात काही दिवस तरी हलचल माजवून जातात. तर या फोरमच्या वतीने 2020 चा ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. जगातील 153 देशांचा अभ्यास करून हा अहवाल लिहिला गेला आहे. जगभरात स्त्री-पुरुष यांना समान संधी मिळण्याबाबत काय स्थिती आहे, यावर या अहवालात कवडसे टाकले आहेत. हा अहवाल तयार करताना केलेल्या सर्वेक्षणासाठी व संशोधनासाठी चार प्रमुख घटक मध्यवर्ती ठेवले गेले आहेत. शिक्षण, आरोग्य, अर्थकारण व राजकारण हीच ती चार क्षेत्रे.

अर्थातच, स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत फक्त आकडेवारीच्या स्तरांवर विचार केल्यास काय चित्र दिसते, एवढ्यापुरताच हा अहवाल मर्यादित आहे. म्हणजे स्त्री-पुरुष समतेची वाटचाल तर खूप दूरची आहेच, पण आकडेवारीच्या स्तरावर सारखेपणा येण्यासाठी किंवा स्त्री-पुरुषांचे सर्व क्षेत्रांतील मिळून एकूण प्रमाण समान होण्यासाठी (सध्याचा ट्रेंड पाहता) किती काळ लागेल, यावर केवळ हा अहवाल प्रकाशझोत टाकतो. त्यातून निघणारा अंतिम निष्कर्ष असा की, ते प्रमाण समान होण्यासाठी आणखी 99.5 वर्षे लागणार आहेत. म्हणजे आणखी शंभर वर्षांनी जगभरात ते प्रमाण सारखे असेल. अर्थात, काही देशांत ते त्याआधी होईल, काही देशांत त्याला त्याहून अधिक वर्षे लागतील.

मात्र अहवालातील सर्वाधिक आशादायक बाब अशी आहे की, शिक्षणाच्या क्षेत्रात स्त्री-पुरुषांची संख्या सारखी होण्याचा टप्पा पुढील 12 वर्षांत गाठला जाणार आहे. सध्याच जगातील 40 देशांनी ते प्रमाण ओलांडलेले आहे. पुढील 12 वर्षांत आणखी काही देश ते प्रमाण गाठतील किंवा ओलांडतील, काही देशांना त्याहून अधिक काळ लागेल; पण जागतिक स्तरावर मात्र शिक्षणात स्त्री-पुरुष प्रमाण 50:50 झालेले असेल. (आज ते प्रमाण 44:56 असे आहे.) जवळपास असाच प्रकार आरोग्याच्या क्षेत्रातही दिसतो आहे, असे त्यासंदर्भातील आकडेवारी पाहिल्यावर दिसते; म्हणजे दुसरी समाधानकारक बाब ती आहे. (शिक्षणाच्या क्षेत्रांत 40, तर आरोग्याच्या क्षेत्रांत 48 देशांनी ही समानता गाठली आहे.)

मात्र अर्थकारण व राजकारण या दोन क्षेत्रांत ती समानता येण्यासाठीचे आव्हान खूप मोठे आहे. अर्थकारणाच्या क्षेत्रात आज ती समानता केवळ 58 टक्के आहे. आजही जगात 72 देश असे आहेत, जिथे स्त्रियांना बँकेत खाते उघडता येत नाही. म्हणजे अर्थकारणाच्या क्षेत्रात स्त्री-पुरुषांचे प्रमाण समसमान होण्यासाठी सध्याच्या ट्रेंडनुसार विचार केला तर 257 वर्षे लागणार आहेत. याची दोन प्रमुख कारणे त्या अहवालात नोंदवलेली आहेत. एक- चाकोरीध्द कामात स्त्रियांना गुंतवले जाते, भरपूर वेतन मिळणाऱ्या जागांवर स्त्रियांचे प्रमाण खूपच कमी आहे (स्त्रिया आपापल्या घरात जे काम करतात, त्याची गणती अर्थकारणाच्या क्षेत्रात केली जात नाही). दुसरे कारण- आवश्यक त्या सुविधा व भांडवल यांचा अभाव असल्याने स्त्रियांचे अर्थकारणाच्या क्षेत्रांतील एकूण प्रमाण कमी आहे. या अहवालात लहान-मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर स्त्रियांचे प्रमाण किती आहे, यासंदर्भात जगातील 153 देशांचे तीन गटांत वर्गीकरण केले आहे. पहिला गट असा आहे- जिथे ते प्रमाण एकतृतीयांश आहे, दुसऱ्या गटात ते प्रमाण एकपंचमांश आहे आणि तिसऱ्या गटात ते प्रमाण एकदशांश आहे. (भारत कोणत्या गटात आहे, अर्थातच तिसऱ्या).

राजकीय क्षेत्रात काय स्थिती आहे? अर्थकारणापेक्षा जरा बरी आहे. जगभरातील एकूण राष्ट्रांचा विचार करता, विधिमंडळ व संसदेत स्त्रियांचे प्रमाण 25 टक्के आहे आणि मंत्रिपदांचा विचार केला तर ते प्रमाण 21 टक्के आहे. सध्याचा ट्रेंड लक्षात घेतला तर ते प्रमाण समसमान होण्यासाठी आणखी 95 वर्षे लागणार आहेत. अर्थातच, काही देशांमध्ये ती समानता त्यापेक्षा कमी वर्षांत गाठली/ओलांडली जाईल. काही देशांमध्ये मात्र 95 पेक्षा अधिक वर्षे ती समानता येण्यासाठी लागतील. राजकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदांवरील प्रतिनिधीत्व करण्यात स्त्रियांचा सहभाग अत्यल्प असणे ही स्त्री-पुरुष समानतेच्या मार्गातील मोठी समस्या आहे, असे हा अहवाल सांगतो. (कारण शिक्षण, आरोग्य व अर्थकारण या तिन्ही क्षेत्रांवर त्याचा परिणाम होत असतो.) मागील 50 वर्षांचा विचार करता, 85 देश असे आहेत, जिथे राष्ट्रप्रमुख म्हणून स्त्री येऊ शकलेली नाही (अर्थातच, अमेरिकेसाठी ही सर्वाधिक लाजीरवाणी बाब आहे.)

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा हा अहवाल पावणेतीनशे पानांचा आहे. सुरुवातीच्या काही पानांमध्ये अहवाल तयार करण्याची प्रक्रिया आणि निरीक्षणे व निष्कर्ष आहेत. ही स्थिती बदलली जाण्यासाठी काय केले जायला हवे, यासाठी आग्रही सूचना आहेत. आणि मग जगभरातील 153 देशांच्या संदर्भातील आकडेवारींचे आलेख व तक्ते आहे, हा भाग जरा क्लिष्ट वा नीरस वाटणे साहजिक आहे; पण ज्याने त्याने आपापल्या देशाची स्थिती पाहिली तरी पुरेसे होईल. सुरुवातीलाच सर्व देशांची (एकूण चार क्षेत्रांचा विचार करून) क्रमवारी दिली आहे, भारताचा क्रमांक 112 वा आहे.

स्त्री-पुरुष समानतेतील दरी भरून काढण्यासाठी (केवळ आकडेवारीतील) या अहवालातील दोन प्रमुख सूचना अशा आहेत. 1. राजकीय क्षेत्रात व अर्थकारणाच्या क्षेत्रांत स्त्रियांचे प्रमाण जाणीवपूर्वक वाढवले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते कायदे सरकारने केले पाहिजेत आणि धोरण आखणाऱ्यांनी ते प्रमाण वाढेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. 2. औपचारिक शिक्षणामध्ये असलेली दरी तर भरून काढली पाहिजेच (त्याबाबत चांगली म्हणावी अशी स्थिती सध्या आहे), मात्र स्त्रियांना खासगी क्षेत्रांत काम करण्यासाठी अधिक संधी देऊन, त्यांच्यात अधिक कौशल्ये विकसित होतील या आघाडीवर जास्त प्रयत्न करायला हवेत. ही दरी कमी करण्यासाठी विविध सरकारे-प्रशासन आणि उद्योगक्षेत्र यांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. या दोन्हीला जोडणारा मध्यवर्ती मुद्दा असा आहे की, ही दरी कमी करण्यासाठी रोलमॉडेल इफेक्ट जास्त महत्त्वाची भूमिका बजावतो, असेही हा अहवाल सांगतो.

या अहवालाच्या प्रास्ताविकात असे म्हटले आहे की, ‘नवे कायदे करून वा असलेले सुधारून आणि सांस्कृतिक-सामाजिक दृष्टिकोनांत बदलांसाठी प्रयत्नशील राहून स्त्री-पुरुष समानता गाठता येईल. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील लहान-मोठ्या संस्था-संघटना यांनी स्वत:पासून बदल करायला हवेत. त्यामुळे दावोस येथे ज्या परिषदा होतात, तिथे आता स्त्रियांचे जे काही प्रतिनिधीत्व असते, त्याचे प्रमाण आगामी दशकभरात दुप्पट होईल, असा प्रयत्न आम्ही करू.’ गंमत म्हणजे सध्या ते प्रमाण किती आहे हे या अहवालात दिलेले नाही; त्यामुळे दुप्पट करून ते किती टक्के होईल हे कळावयास मार्ग नाही. म्हणजे तिथे ते प्रमाण समसमान होण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील हा आकडा गुलदस्त्यातच आहे!

Share on Social Media

मुलाखत

माझ्या कवितेतील

स्त्रिया बिनचेहऱ्याच्या आहेत!

(दासू वैद्य यांनी घेतलेली मुलाखत)

अनुराधा पाटील

कधी तरी एका मुलाखतीत ‘मी स्त्रीवादी कवयित्री नाही’ असं सांगितलंही होतं. अर्थात ते थोडंसं कॅज्युअलही होतं. पण स्त्रीवादी कवयित्री ज्या पद्धतीने लिहितात, ज्या पध्दतीने मांडणी करतात; त्या पद्धतीने मी लिहीत नाही. लिहिते मी स्त्रियांबद्दलच. पण माझ्या कवितेत येणाऱ्या स्त्रिया बिनचेहऱ्याच्या आहेत. पुरुषांच्या संदर्भात माझ्या कवितेतली स्त्री उभी राहत नाही. लिंगभेद गृहीत धरून, विषमता गृहीत धरून स्त्रीवादी कविता वाढली आणि मोठी झाली. स्त्री-पुरुष नात्यांचे असंख्य कंगोरे घेतले, बऱ्याचदा ढोबळही घेतले. त्या अर्थाने मी माझ्या कवितेतील पुरुषाकडेही बघत नाही. लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन स्त्री-पुरुषातलं नातं जे मला दिसतं, त्यातले जे अनुभव किंवा एक जगणं आहे- त्याच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून, एक बाई म्हणून तो माझ्याकडं कसं बघतो- त्याच्या नोंदी मी घेते. हे कवी म्हणून माझं मत आहे.

साधारणपणे 1991-92 चा काळ. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात सगळ्याच शाखेचे आम्ही विद्यार्थी राहत होतो. कलाशाखा आणि विज्ञानशाखा यांच्यात हलकं-भारी असा नकळत भेद केला जायचा. कलाशाखा आणि त्यात भर म्हणजे आम्ही नाटकवाले. अभ्यासू विज्ञानवाल्यांच्या दृष्टीने आम्ही ‘नाटके.’ अर्थात हे सारं गमतीत चालायचं. अशा वातावरणात एका विज्ञानाच्या स्कॉलर मित्रानं माझ्याकडं ‘महत्त्वाचं काम आहे’ असं म्हटल्यावर मला सुखद धक्का बसला. दुसऱ्या दिवशी तो मित्र माझ्या खोलीत आला. स्वत:च आतून दार लावून घेतलं. काही न बोलता खिशातून घडी केलेला एक कागद काढला नि मला वाचायला दिला. उत्सुकतेनं मी वाचला. ते चक्क एक सुंदर प्रेमपत्र होतं.

माझ्यापर्यंत यायचं कारण म्हणजे, ते पत्र मराठीत होतं, शिवाय काव्यात्म भाषेत लिहिलेलं होतं. अत्यंत विश्वासानं आणि कुणालाही काही न सांगण्याच्या बोलीवर त्यानं त्याची प्रेमकथा सांगितली. ते पत्र वाचून तो खूप भारावून गेला होता. मीही इमानदारीनं त्याला मदत केली. म्हणजे काव्यात्म पत्रोत्तर लिहिण्यासाठी हातभार लावला. त्यांचे सूर जुळलेही. प्रेमकहाणी बहरलीही. पण घरच्यांच्या घरंदाज विरोधामुळे ती प्रेमकहाणी अधुरीच राहिली.

नमनाला घडाभर तेल जाळताना हा प्रसंग सांगण्याचं कारण म्हणजे, त्या विज्ञानशाखेतल्या मुलीनं लिहिलेल्या प्रेमपत्रात अनुराधा पाटलांच्या अनेक कवितांच्या ओळी उद्‌धृत केल्या होत्या. अशा वेळी ‘कवयित्रीचं नाव देऊन श्रेय द्यायचं असतं’, हा संकेतही त्या मुलीला माहीत नसेल. किंवा त्या कवितांच्या ओळी म्हणजे तिला स्वत:चंच मनोगत वाटलं असावं. ते काहीही असो; पण त्या काव्यात्म भाषेमुळं आमचा स्कॉलर मित्र पुरता विरघळला होता.

हा महाविद्यालयीन जीवनातला प्रसंग आरंभी सांगण्यामागे एक हेतू आहे. तीसेक वर्षांपासून ते आज फेसबुक, व्हाट्‌सॲपच्या जमान्यापर्यंत तरुण वाचकांत अनुराधा पाटील यांचं गारूड आहे. त्याचबरोबरीने या कवितेला समीक्षकांनीही गौरविले आहे. बऱ्याचदा समीक्षकांनी उचलून धरलेले कवी वाचकांच्या पचनी पडत नाहीत आणि वाचकांना भावलेली कविता समीक्षकांच्या लेखी कविताच नसते. अनुराधा पाटील यांची कविता त्या अर्थाने ‘क्लास’ आणि ‘मास’ या दोन्ही पातळ्यांवर गौरवान्वित झाली आहे.

अनुराधा पाटील यांचे काव्यलेखन 1970 च्या आसपास सुरू झाले. त्यांची पहिली कविता मराठवाडा साहित्य परिषदेच्या ‘प्रतिष्ठान’मध्ये 1972 मध्ये छापून आली. म्हणजे गेली जवळपास पन्नास वर्षे त्या व्रतस्थपणे कविता लिहितायत. या पन्नास वर्षांत त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहे. ‘दिगंत’ (1981), ‘तरीही’ (1985), ‘दिवसेंदिवस’ (1992), ‘वाळूच्या पात्रांत मांडलेला खेळ’ (2005) आणि ‘कदाचित अजूनही’ (2017). या संग्रहांतून प्रामुख्याने आत्मपर कविता आलेली आहे. या कवितेचा केंद्रबिंदू विशेषत्वाने स्त्रीच राहिलेली आहे. वेगवेगळ्या पिढ्यांतील समीक्षकांना दखल घ्यायला लावणारी ही कविता अनेक विद्यापीठीय अभ्यासक्रमांत समाविष्ट झालेली आहे. त्यांच्या कवितांचे हिंदी, इंग्रजी, उर्दू, उडिया, पंजाबी, गुजराती, राजस्थानी इत्यादी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.

कुठल्याही सवंग मोहाला बळी न पडता, निष्ठेनं केलेल्या या कवितालेखनाचा अनेक स्तरांवर गौरव झालेला आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, बहिणाबाई प्रतिष्ठान, मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र फाउंडेशन अशा अनेक पुरस्कारांत मानाचा तुरा खोवणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला गेल्या महिन्यात जाहीर झालेला आहे. आणि दुधात साखर म्हणजे गेल्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारही त्यांना घोषित झाला आहे. या प्रतिष्ठेच्या दोन्ही पुरस्कारांचे वितरण याच महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेली ही मुलाखत...

प्रश्न - अनुराधाबाई, सर्वप्रथम मन:पूर्वक अभिनंदन. आपल्या ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणि दुधात साखर म्हणजे, महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारही नुकताच घोषित झालाय. हा चांगल्या कवितेचा सन्मान आहे, तद्वतच आपल्या व्रतस्थ काव्य-लेखनाचा गौरव आहे. या दोन्ही पुरस्कारांचं वितरण याच महिन्यात होत आहे. या प्रसंगी तुमच्या भावना काय आहेत?

धन्यवाद. साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यापासून आत्तापर्यंत लेखक, कवी, पत्रकार, स्नेही अशा सर्व स्तरांतल्या लोकांनी (मला वाटतं, तुम्हीही) केलेली कॉमेंट आधी तुम्हाला सांगते, ‘तुम्हाला हा पुरस्कार मिळाला हे छान झालं, पण हा पुरस्कार तुम्हाला थोडा उशिरा मिळाला.’ गंमत अशी की, इतरांचं ऐकता-ऐकता मीसुध्दा कोणाला तरी सांगितलं की, ‘हो बाबा, थोडा उशिराच मिळाला.’ पण पुरस्कार मिळाल्याचा काळ लोटल्यावर आत्ता मी जेव्हा विचार करते की, खरोखरच उशीर झालाय का? यासाठी थोडं मागं वळून पाहिल्यावर मला असं वाटलं की, तसं नाही म्हणता येणार. तशी बरीच कारणं आहेत, पण त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे यापूर्वी ज्यांना हा पुरस्कार मिळायला पाहिजे होता, अशी बरीच त्या योग्यतेची नावं सुटलेली आहेत. ती नावं तुम्हालाही माहीत आहेत, मला तर नीटच माहीत आहेत.

आता त्या नावांची पुनरावृत्ती नको करायला. पण बरेच असे कवी-लेखक आहेत की, ज्यांना तो मिळाला नाही आणि ज्यांना खूप तरुण वयातच मिळाला, असेही काही लोक आहेत. साहित्य अकादमीचा नियम नाही, पण असा एक संकेत होता. लेखकाला वयाच्या पन्नास-साठ वर्षांनंतरच हा पुरस्कार दिला गेला. मध्ये काही दलित साहित्यलेखनाचा अपवाद आहे. याशिवाय आणखी दोन-तीन नावं आहेत. पण साधारणपणे साठीनंतरच हा पुरस्कार मिळताना मी पाहत आले. मग हा पुरस्कार मला उशिरा मिळाला, असे सगळे का म्हणतायत, असा मला प्रश्न पडला.

अगदी साहित्य अकादमीच्या सेक्रेटरींचा मला फोन आला तेव्हा ही बातमी सांगताना आणि अभिनंदन करताना तेही म्हणाले, ‘तुम्हाला तो पूर्वीच मिळायला पाहिजे होता. तरी पण ठिकय, चांगलं झालं.’ हे सगळ्यांचं ऐकताना असं वाटतं- कदाचित स्वत:चं कौतुक करून घेतल्यासारखं वाटेल, पण सांगितलं पाहिजे- माझ्या समकालीन लिहिणाऱ्यांमध्ये माझं थोडं अधिक नाव होतं. मी घरी बसूनच लिहीत राहिले, तरी माझं नाव चर्चेत राहिलं. कविता अभ्यासक्रमात आल्या. त्यामुळे मी बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत होते. हा पुरस्कार आता मिळाला; आम्हाला वाटलं, तो आधीच मिळालाय. अशी ती विस्मयाची, आश्चर्याची प्रतिक्रिया होती. कौतुकाची पण होती. त्याचा मला आनंदच आहे. सार्वजनिक कार्यक्रमात आणि संपर्कात नसताना अनेकांनी उत्स्फूर्तपणे आनंद व्यक्त केला. त्यात माझा सन्मानच आहे. या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञ आहे.

प्रश्न - प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणीचा काळ फार महत्त्वाचा असतो. कारण त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्व जडण-घडणीवर होत असतो. महात्मा गांधी हा माणूस फार दुराग्रही/हट्टी होता, असं म्हटलं जातं, आणि त्याचं एक कारण त्यांच्या बालपणीच्या कर्मठ वातावरणाचा परिणाम, असं सांगितलं जातं. प्रसिध्द दिग्दर्शक हिचकॉक यांच्या भयपटनिर्मितीचं मूळ हे त्यांच्या बालपणातच दडलेलं आहे; ‘कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कोणासाठी रक्त ओकून’ या आरती प्रभूंच्या ओळीतील नकारात्मक सूरामागे त्यांचं बालपणच आहे, असं बोललं जात असतं. तशी तुमची कविता समजावून घेताना तुमच्या बालपणाविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे.

खेड्यात गेलेल्या माझ्या बालपणाविषयी सांगण्याआधी तुम्ही जी उदाहरणं सांगितलीत, त्याविषयी मी बोलू इच्छिते. महात्मा गांधींचं तुम्ही जे उदाहरण सांगितलं आणि त्यांच्या कर्मठ वैष्णव कुटुंबाचा जो उल्लेख केलात, त्याचा निश्चितच परिणाम होत असतो. बालपणीच्या वातावरणाचा परिणाम पुढे चालून व्यक्तीच्या सत्त्वभावावर होतो, हेही बरोबर आहे. त्यातून त्याची सुटका होत नाही. हिचकॉकचं उदाहरण असेल, आरती प्रभूंचं उदाहरण असेल... यात आरती प्रभू पुढे कवी झाले म्हणून हे उदाहरण आपल्यासमोर आलं. समजा ते कवी नसते, तर त्यांना ती घुसमट जाणवली असती; पण आपल्यासमोर आली नसती.

गांधीजींच्या हट्टीपणाबद्दल आपण खूप ठिकाणी वाचतो. गांधीजी ऐकत नव्हते, म्हणजे काय? तर, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असायचे. बऱ्याचदा त्यांनी भूमिकाही बदलल्यात, नाही असं नाही. पण जसजसं माणसाला यश मिळत जातं. त्या यशामुळंसुध्दा हट्टीपणा येतो. मग गांधी असोत की वल्लभभाई पटेल असोत; यश तुम्हाला बदलवतं. ते तुम्हाला हट्टी करतं. माणसं मोठी होतात तसतशी ती हट्टी आणि एककल्ली होतात. तिथं बऱ्याचदा लहानपणाचाच संदर्भ असेल, असंही नाही. पण बालपणातूनच खूप गाठी मनात पडत जातात आणि माणूस घडत जातो. त्याच्या उत्तरायुष्यात त्याचा मोठा प्रभाव राहतो. हिचकॉकचं उदाहरण तुम्ही फार सुंदर सांगितलंत. हिचकॉकचे सिनेमे मी फार कमी पाहिले आहेत. पण माणसाला वाटणारी भीती आणि भूक या मूलभूत भावना आहेत.

आता माझं लहानपण घेतलं, तर माझ्या लहानपणात असा तर काही प्रसंग नाही. कुठल्याही चारचौघांतल्या मुलांसारखं माझं लहानपण होतं. पण मी खेड्यात वाढले, जळगाव जिल्ह्यातील एका लहानशा गावात. खेड्यात वाढण्याचा म्हणून एक भाग असतो. आता तुम्हाला खेडं माहीतच असेल. साधारणत: साठच्या दशकात लहानच मुलगी होते मी. खेड्यात मुलींना वाढवायची एक विशिष्ट मानसिकता असते. आजही ती खूप बदलली आहे, असं नाही. आज आम्ही वर्तमानात जगताना आधुनिक आहोत का, पुरोगामी आहोत का- असा प्रश्न शहरी लोकांबद्दल पडतो, पण खेड्यातल्यांबद्दल तरी वाद नाही. म्हणजे काळाबरोबर कपडेलत्ते बदलले, भांडीकुंडी बदलली; पण विचार तसेच आहेत. माझ्या काळात तर ते फार कर्मठ होते. म्हणजे मुलगी वाढवायचं माझ्या एकट्या घराचं ते शास्त्र नव्हतं, तर सगळ्याच घरांत तेच वातावरण होतं.

मुलगी म्हणून मी अतिशय बंधनात वाढले. पण मला असं काही सांगता येणार नाही की, मी खूप हट्टी होते, बंडखोर होते. पण काही गोष्टी मला आवडायच्या नाहीत. उदाहरणार्थ- विश्वास असो वा नसो, काही गोष्टी करायला लावल्या जातात. म्हणजे उपवास असेल, देवाला हात जोडणं असेल- ते मी करायचे. पण मला ते कुठं तरी त्रासदायक वाटायचं. हे आधुनिकतेशी निगडित नव्हतं. सगळ्यांसारखी पाप-पुण्य याबद्दल भीती वाटायची. पण तरीसुध्दा तो मला दिसत का नाही? मला सांगत का नाही? मला आनंद व्हायचा, तर मी बाप्पाला हात जोडायचे. पण मला त्रास व्हायचा. मला अंधाराची भीती वाटते किंवा फलाण्याची भीती वाटते; तेव्हा तो देव कुठं असतो, असा एक प्रश्न मला कायम पडायचा.

तेव्हा तो आम्हाला मदत का नाही करत, असं वाटायचं. त्यामुळे तो नसेलच, असं वाटायचं. भटजीने पूजा सांगणे, व्रत करणे हा आमच्या घरात नसला तरी भोवताली असणारा ब्राह्मणी संस्कार होताच. कारण खेड्यातसुध्दा बहुजनांची परंपरा ही बरीचशी ब्राह्मणीवर्गावरच अवलंबून असल्यामुळं आणि त्यांनीच रुळवलेली मानसिकता घेत असल्यामुळं व्रत-वैकल्यं मी करायचे. त्यामागे चांगला नवरा मिळणं, ही भविष्यातील तापदायक गोष्ट होती. व्रतवैकल्यं करतानाही ही छोटीशी बंडखोरी मी माझ्या मनाशी दीर्घ काळ जपली. पुढं कळत्या वयात या गोष्टींना ओलांडून मी पुढं गेले. अगदी माझा मुलगा गेला, त्याही काळात मला कुठलाही मानसिक-भावनिक आधार नसताना, बौध्दिक आधाराच्या बळावर टिकण्याचा प्रयत्न करत असताना- मला आठवत नाही की मी मंदिरात गेले, प्रार्थना केली किंवा माझ्याच बाबतीत असं का घडलं, असंही नाही म्हटलं. पण यातून दीर्घ काळ बाहेर नाही आले, हा एक अनुभव जमेला आहे.

दुसरा एक अनुभव आहे. माझ्या कवितेतही त्याचे बऱ्याचदा उल्लेख येतात. पत्र्यावर पडणाऱ्या पावसाचा आवाज किंवा एकूणच पावसाचा आवाज मला कायम बालपणाशी जोडतो. त्याचं कारण असं होतं- आमचं कुटुंब कोरडवाहू शेतकऱ्याचं. आई-वडील घरची शेती करून शेतमजुरी करायचे. त्यामुळे खेड्यापाड्यांत दारिद्र्याचा आणि दैन्याचा भाग होता, तो आमच्याही घरात होता. पावसाने जर झड लावली, तर आमच्या घरात आठ-आठ दिवस तेलाचा थेंबही नसायचा. पीठ नाही, तेल नाही, कधी अमुक नाही. अशा वेळी आई भाज्या उकडून द्यायची आम्हाला. यात आईला भीती वाटायची- झड थांबली नाही, तर मजुरी कशी मिळणार? मजुरी नाही मिळाली तर लेकरांना काय खाऊ घालणार? आईला वाटणारी भीती आमच्यावरही पसरायची. ही जगण्याची भीती, असुरक्षिततेची भीती, आई-वडील रडतात त्याची भीती पावसाशी नकळत जोडली गेली. त्यामुळे आजही पाऊस पडताना ही भीती जाणवते. आजही रात्री-बेरात्री मी पाऊस ऐकते, तेव्हा मी माझ्या त्या भूतकाळाशी जोडली जाते. तुम्ही उपस्थित केलेला बालपणाचा प्रश्न खरोखरच प्रभाव पाडणारा आहे.

प्रश्न - गोदावरी नदी कितीही दूरपर्यंत वाहत गेली, तिची अनेक रूपं डोळ्यांत साठवली; तरी त्र्यंबकेश्वराच्या डोंगरात जाऊन गोदावरीचा उगम पाहण्याची उत्सुकता असतेच. तुमच्या कविता वाचत-वाचत आम्ही मोठे झालो, लिहायला लागलो. तेव्हापासून तुमच्या सर्जनाबद्दल अप्रूप आणि उत्सुकता आहे. तर, या सर्जनाचा साक्षात्कार कसा झाला? पहिली कविता केव्हा लिहिली? पहिली कविता कोणती?

पहिली कविता फारशी आठवत नाही. पण शाळकरी वयात असताना प्रथम कुठल्या तरी पक्षावर काही तरी दोन ओळी लिहिल्या होत्या. मुळात मला वाचायला खूप आवडायचं. त्याआधी मला शाळेतच घालायचं की नाही, हा प्रश्न होता. त्या काळात खेड्यात मुलीला शिकवण्याची फार इच्छाच नसायची. पण शहरात राहणाऱ्या माझ्या मामाने आईला समजावून सांगितल्यामुळे मला शाळेत घालण्यात आलं. इतर मुलांपेक्षा मी लवकर वाचायला-लिहायला शिकले. मला वाचायला यायला लागलं आणि माझ्या डोक्याला- मेंदूला पाय फुटले. मग मला सापडेल ते मी वाचायची. खेड्यात काही पेपर नव्हते, वाचायला काही नव्हतं. शेतकऱ्याचं घर होतं. पुस्तकं असण्याचं काही कारण नव्हतं. पण दुकानातून पुडीला बांधून आलेला कागद असेल, दुसरा कुठला कागद असेल- तोही मी वाचायचे.

मला वाचायला फार आवडत होतं, हे मला नीटपणानं आठवतंय. शिवाय खेड्यात पोथीवाचन, भारूडं, सप्ताह, मावंद, कीर्तन अशा वातावरणात मी वाढले. माझे वडील स्वत: भारूड चांगलं म्हणायचे. मला शब्दांचा, सूरांचा आणि तालाचा वेगळा नाद होता. आजही वाद्य खूप कळत नाही, पण किशोरी आमोणकर मला खूप आवडतात. त्यातले राग कळत नाहीत; मात्र त्यातला जो एक सूर असतो, तो आपोआप मनापर्यंत पोहोचायचा. त्या काळात अशी पदं म्हणणारे, गाणं म्हणणारे खूप असायचे. बायकांच्याही खूप गोष्टी असतात. म्हणजे भुलाबाई असेल, भजन, आखाजी, दिवाळी, लग्नाची गाणी असतील; मी आपली कायम तिथं खांब धरून उभी असायची, ते सगळं ऐकायची. यातून पुढं काही सुचण्याला मदत झाली.

पाठ्यपुस्तकं मला खूप आवडायची. त्या शब्दांचं, तालासुरांचं पूर्वसंचित म्हणून मी काही लिहिण्याचा प्रयत्न केला. कविता लिहिण्याचाच मी प्रयत्न केला, गद्य लिहिण्याचा नाही. सुरुवातीला लिहिलेल्या कविता वहीत लिहून लपवून ठेवायचे. कदाचित एखाद्या खेड्यातल्या माणसाशीच माझं लग्न झालं असतं, तर त्या कविता तशाच राहिल्या असत्या. पुढं कविताच जन्माला आली नसती. मराठीचा प्राध्यापक असणाऱ्या माणसाशी माझं लग्न झाल्यामुळं माझ्या कवितांना बाहेरचा प्रकाश दिसला. ती सारी ठाले-पाटलांचीच देणगी आहे मला. आमचं लग्न ठरलं, तेव्हा मी त्यांना पत्र लिहिलं. त्यात एक कविता पाठवली होती. त्यांना ते पत्र फार आवडलं. त्यांनी पत्र लिहून मला विचारलं, ‘ही एकच कविता आहे का? अजून किती कविता आहेत? अजून काय लिहितेस?’ यावर त्यांना माझ्या थोड्याशा लेखनाची कल्पना दिली. घरात कुणी लिहू देत नव्हतं. याउलट, लग्न झाल्यावर माझ्या लेखनावर त्यांनी निगराणी ठेवली. सूचना केल्या. प्रोत्साहन दिलं.

आज मला करंदीकरांच्या नावाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ मिळालाय, पण करंदीकरांसंदर्भातील महत्त्वाची आठवण लग्न झाल्यानंतरची आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा चांगली कविता वाचली, ती करंदीकरांची. ‘मृद्‌गंध’ हा करंदीकरांचा संग्रह तेव्हा अभ्यासक्रमाला होता. ठाले-पाटील तो शिकवायचे. मला प्रथम तो कवितासंग्रह ठाले-पाटलांनी अलगद माझ्या हातात एखादी ठेव ठेवावी, तसा दिला. करंदीकरांच्या कविता नंतरही मी दीर्घ काळ वाचत होते. पण सुदैवाने माझ्या लेखनावर त्यांचा प्रभाव पडला नाही. कवितेचं सर्जन सांगताना हे उत्तर शक्यतेच्या खूप जवळ जाणारं आहे. तुम्हीही कवी आहात. त्यामुळे जाणताच- ‘कविता का लिहिली? कविताच का लिहिली?’ या प्रश्नाचं उत्तर चिमटीत येत नाही, हेच खरं.

प्रश्न - वयाच्या अठराव्या वर्षापासून तुम्ही कविता लिहिताय. ‘प्रतिष्ठान’मध्ये तुमची पहिली कविता 1972 मध्ये छापून आली. म्हणजे साधारणपणे गेली पन्नास वर्षं तुमचं कवितालेखन व्रतस्थपणे सुरू आहे. या पन्नास वर्षांत महत्त्वाचे असे पाच कवितासंग्रह तुम्ही वाचकांच्या हाती दिले आहेत. आपल्या प्रत्येक कृतीमागं काही तरी संदर्भ असतात. तुमच्याच ओळी आहेत –

‘जगण्यावर जडलेला

जीवघेणा लोभ

सुटता सुटत नाही

म्हणून मी करते

हे पांढऱ्यावर काळं

एवढंच’

जीवघेणा लोभ जडलेल्या जगण्याची सृजनसूत्रे काय सांगता येतील?

‘प्रतिष्ठान’ मध्ये 1972 ला माझी पहिली कविता छापून आली. तेव्हा सुधीर रसाळ संपादक होते. त्यांचा आणि प्रतिष्ठानचा एक वेगळाच दबदबा होता. कवितालेखनाच्या पन्नास वर्षांचा विचार करायचा तर, थोडा तांत्रिक अंगाने खुलासा करते. माझं लग्न 1971 ला झालं. पहिली कविता 1972 ला छापून आली. नंतर चार-पाच वर्षं मी काहीच लिहिलं नाही. पुन्हा किरकोळ-किरकोळ असं काही लिहिलं. ते घरात पडून राहिलं. कुठं छापून आलं नाही. मात्र तुलनात्मक दृष्ट्या 1977-78 नंतर माझं लिखाण गांभीर्यानं सुरू झालं. तेव्हा मला फारसा अनुभव नव्हता. कोणी काही सुख-दु:ख सांगतंय, त्याचा परिणाम माझ्यावर खूप व्हायचा. त्या 17-18 वर्षांच्या वयात माझ्या अनुभवाचं असं खूप काही नव्हतं. ‘दिगंत’ कवितासंग्रह ज्या काळात आला, त्यातल्या बऱ्याचशा कविता बऱ्या आहेत, असं मला वाटतं. पण एक कवी म्हणून आज मला त्या तशा वाटत नाहीत. त्यात बराच तुटकपणा जाणवतो.

आत्मप्रौढीचा दोष पत्करून सांगते, ‘तरीही’ या दुसऱ्या कवितासंग्रहात मला माझी भाषा सापडली. कविता हा तसा भाषिक प्रयोग आहे. भाषेच्या अंगानेच कविता ओळखली जाईल. माणसं वेगवेगळी असली तरी अनुभव सारखेच असतात. (राग, लोभ, प्रेम, तीव्रता, उद्‌ध्वस्ततेचे अनुभव) मग तुम्ही वेगळे कधी व्हाल, तर तुमच्या भाषेने. तुमच्या भाषेत सांगाल तेव्हा. हे मला कळलं, ‘तरीही’च्या काळात. या काळात मी जाणीवपूर्वक बदलले. तुम्ही जगण्याच्या सृजनसूत्रांचा उल्लेख केलात. अनेकांजवळ व्यक्त होण्यासाठी अनेक माध्यमं असतात. माझ्याजवळ मात्र पांढऱ्यावर काळं करण्याशिवाय दुसरं माध्यम नाही. पण हे सांगायलासुध्दा पन्नास वर्षे जावी लागली.

माणसाचा जीवित राहण्याचा धागा खूप चिवट असतो. बऱ्याचदा जगण्यासारखं काहीच उरत नाही, तरी माणसं जगण्याला कवटाळून असतात. जगण्याला आपण फेकून देत नाही. जेव्हा खूपच असह्य होतं, तेव्हा फेकतो. आज आपल्यापुढं शेतकऱ्यांचं उदाहरण आहे. हा जो जगण्याला जोडलेला धागा आहे, तो महत्त्वाचा असतो. सृजनाची ऊर्मी महत्त्वाची असते. कविता हा माणसांच्या दु:खाचा पहिला उद्‌गार आहे. तुम्ही कथा लिहा, चित्र काढा, गाणं म्हणा, नृत्य करा- ही सर्व सृजनसूत्रं आहेत. व्यक्त होण्यासाठीची कोणतीही कला तुमच्या जगण्याशी जोडली जाते, त्या अर्थाने पांढऱ्यावर काळं करण्याचा धागा मी जोडला आहे.

प्रश्न - जुन्या-नव्या समीक्षकांनी आपल्या कवितेवर भरभरून लिहिलं आहे. त्यात डॉ. वसंत पाटणकरांच्या एका निरीक्षणाकडे लक्ष वेधायचे आहे. त्यांच्या मते, ‘अनुराधाबार्इंची कविता मुख्यत्वे स्त्रीविषयक असूनही स्त्रीवादी कवितेशी तिचे फारसे नाते नाही.’ अशा स्त्रीवादी म्हणवल्या जाणाऱ्या कवितेकडे तुम्ही कसं पाहता? तुमचा स्त्रीवाद काय आहे?

बरोबर आहे तुमचा प्रश्न. कधी तरी एका मुलाखतीत ‘मी स्त्रीवादी कवयित्री नाही’ असं सांगितलंही होतं. अर्थात ते थोडंसं कॅज्युअलही होतं. पण स्त्रीवादी कवयित्री ज्या पध्दतीने लिहितात, ज्या पध्दतीने मांडणी करतात; त्या पध्दतीने मी लिहीत नाही. लिहिते मी स्त्रियांबद्दलच. पण माझ्या कवितेत येणाऱ्या स्त्रिया बिनचेहऱ्याच्या आहेत. पुरुषांच्या संदर्भात माझ्या कवितेतली स्त्री उभी राहत नाही. लिंगभेद गृहीत धरून, विषमता गृहीत धरून स्त्रीवादी कविता वाढली आणि मोठी झाली. स्त्री-पुरुष नात्यांचे असंख्य कंगोरे घेतले, बऱ्याचदा ढोबळही घेतले. त्या अर्थाने मी माझ्या कवितेतील पुरुषाकडेही बघत नाही. लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन स्त्री-पुरुषातलं नातं जे मला दिसतं, त्यातले जे अनुभव किंवा एक जगणं आहे- त्याच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून, एक बाई म्हणून तो माझ्याकडं कसं बघतो- त्याच्या नोंदी मी घेते. हे कवी म्हणून माझं मत आहे.

माझ्या कवितेतील बाया बिनचेहऱ्याच्या आहेत, कारण त्या परंपरेशी संघर्ष करीत नाहीत. त्या उभ्या आहेत. त्या जगण्याशी संघर्ष करतात. त्यांची लढाई त्या लढतात, पण त्या पुरुषांच्या विरोधात उभं राहून लढत नाहीत. आहे त्या गोष्टी स्वीकारून, त्याच्यासह किंवा त्याच्याशिवाय त्या आयुष्याला तोंड देतात. त्या अर्थाने माझी कविता स्त्रीवादी नाही.

साधारणपणे 1975 चं वर्ष स्त्रीवादाचं म्हणून घोषित झालं. आपल्याकडेही त्या अनुषंगाने जाग आली. पण तुम्हाला बाहेरच्या जगाचा काही अनुभवच नसेल, त्यापध्दतीचे संघर्ष नसतील किंवा तुम्ही एखाद्या चळवळीशी जोडले गेलेले नसाल, तर तुम्हाला ही बौध्दिक जाग थोडी उशिराने येते; जसं माझं झालं. मी ज्या खेड्याच्या पार्श्वभूमीतून आले, तिथे स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती किंवा स्त्रियांचं काही स्वतंत्र जग असतं, स्वतंत्र स्पेस असते- असं कुणी मानणारं नव्हतं. कारण खेड्यातलं सगळं जगणं सामूहिक पध्दतीचं असतं. एकत्र कुटुंबपध्दत सगळे एकमेकांवर अवलंबून असतात. तिथलं शोषण करणारा व शोषित हे सारे (बाई किंवा पुरुष) एकच असतात. या चौकटीत वाढल्यामुळे व वयाची सोळा-सतरा वर्षं खेड्यात गेल्यामुळं, ज्या वयात या जाणिवा तीव्रतर होतात, जी बौध्दिक आणि मानसिक समज येते; मला वाटतं, त्या काळात ती मला आली नाही.

आणीबाणी 1975 ला आली, तेव्हा ही भयानक गोष्ट आहे, हेही मला कळलं नव्हतं. या सगळ्या जाणिवा मला उशिरा कळल्या, त्या मी उशिरा स्वीकारल्या; तरी माझ्या कविता समजूतदार असतात. स्त्रीवादी पध्दतीने, खूप आक्रमक पध्दतीने माझी मांडणी नसते. मला ती करता येत नाही आणि आजच्या प्रौढ वयात मला ती करावीशी वाटत नाही. माझा एक वेगळा प्रवास होता. तो मी माझ्या पध्दतीने केला.

आजच्या थोड्या कवयित्री 1975 नंतर लिहायला लागल्या. मल्लिका अमरशेख तर आधीच लिहीत होत्या. तिची महानगरीय जाणीवही तीव्र होती. माझ्या काळात अरुणा ढेरे लिहीत होत्या. माझ्या आधी मला सीनिअर असलेल्या रजनी परुळेकर आणि प्रभा गणोरकर लिहीत होत्या. त्यांच्याही कवितेत स्त्रिया होत्या. पण त्यांनाही आपण स्त्रीवादी म्हणणार नाही. एकप्रकारे मी त्यांचं पाहूनही पुढं आले. नंतर प्रज्ञा पवार, नीरजा आल्या. त्या बऱ्याचशा स्त्रीवादी कवयित्री आहेत. पण त्याचा एक दुष्परिणाम असा झाला की, एक चौकटच तयार झाली.

मग पुढच्या सगळ्याच नव्या-जुन्या, छोट्या-मोठ्या कवयित्रींनी तो फॉरमॅट तसाच उचलला. त्यामुळं काय झालं की- आजच्या कवितेत खूप आक्रोश आहे, आक्रस्ताळेपणा आहे. स्त्री-पुरुष नात्याला केवळ लिंगभेदाची, विषमतेवर आधारितच बाजू नाहीये. त्या चौकटीपलीकडे जाऊन स्त्री-पुरुष नात्यामध्ये ज्या असंख्य छटा असतात, त्याचा विचारच झालेला नाही. फक्त लिंगभेदातूनच पाहिलं गेल्यामुळं आताच्या सर्व कविता मला सारख्या वाटतात. त्या अर्थाने मात्र मी स्त्रीवादी नाहीय.

प्रश्न - नव्याने सायकल शिकणारा प्रत्येक जण पडत-धडपडतच शिकतो. तसा प्रत्येक नवा कवी/कवयित्री आरंभी अनुकरणाचा नाही तर प्रभावाचा तरी ठेपा घेऊन पुढे जाते. आजही आपल्याकडे भालचंद्र नेमाडे, ग्रेस, अरुण कोलटकर, विठ्ठल वाघ, इंद्रजित भालेराव यांच्या अनुकरणातून लिहिली गेलेली विपुल कविता सापडते. तुमच्या पहिल्या ‘दिगंत’ कवितासंग्रहातही ग्रेसाळलेल्या (ग्रेसचं अनुकरण करणाऱ्या) कविता सापडतात. या अनुकरणाकडे तुम्ही कसं पाहता? ‘तरीही’ या दुसऱ्या कवितासंग्रहातच तुम्हाला कवयित्री म्हणून स्वत:चा चेहरा सापडलेला आहे. हा प्रभाव घालवण्यासाठी तुम्ही काही जाणीवपूर्वक प्रयत्न केले का?

तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे. ‘दिगंत’च्या काळात मी नवोदितच होते ना! विशी-बाविशीच्या काळात हातात जे मिळालं ते मी वाचायचे. अर्थात मी संपूर्ण करंदीकरही वाचला, पण करंदीकरांचा माझ्यावर काहीच प्रभाव झाला नाही. कदाचित ते शिवधनुष्य पेलायला मला अवघड वाटलं असेल. मी ग्रेस पहिल्यांदा वाचला. ग्रेसचं एक वैशिष्ट्यही आहे की, विशी-बाविशीच्या वयात ते तुमच्यावर गारूड करतं. त्यांचे शब्द आणि कविताच नाही, तर त्यांचं गद्यसुध्दा तुम्हाला भारावून टाकतं. कारण तो एक गूढाचा आणि रोमँटिक असण्याचा भाग असतो. तुमच्या मनात स्त्री-पुरुषाच्या ज्या काही कल्पना असतात- बऱ्याचदा तर त्या कल्पनाच असतात, प्रत्यक्ष काही नसतंच- त्या कल्पनांना ग्रेसचं लेखन खतपाणी घालतं.

प्रभावित होण्याच्या वयात मी ग्रेस वाचला. नादाचं, शब्दाचं, सूरांचं तसं आधीपासूनच मला वेड होतं. गेयपध्दतीच्या ग्रेसच्या ज्या कविता होत्या, गझल टाईप ज्या कविता होत्या; त्या मला खूप आवडायच्या. मग मी तसं लिहून पाहायचा प्रयत्न करायची. हा जो प्रभाव आहे तो हळूहळू कमी होत जातो, आपण वाढत जाऊ तसे. काही लेखकांच्या बाबतीत तसं घडतही नाही. म्हणजे त्याची वाढ होतही नाही. त्यांची कारणं त्याच्याजवळ असतील. माझ्या सुदैवाने ग्रेसच्या प्रभावातून मी खूप लवकर बाहेर पडले. पण माझ्यावर ग्रेसचा प्रभाव खूप होता. इतरांचं अनुकरण करणं योग्य नाही, हे कळण्याइतकी समज मला नव्हती. मला ती समज थोडी उशिरा आली. तोपर्यंत ‘दिगंत’ प्रकाशित झाला होता.

‘दिगंत’नंतर थोडं थांबून मी ज्या काही कविता लिहिल्या, ज्या ‘तरीही’त आहेत; तेव्हा माझ्या लक्षात आलं की, आपण हे असं काही लिहिलं पाहिजे. त्या काळात मी अस्वस्थ होते. कारण माझी जमीन, माझी भूमी मला हवी होती. पण मला ते सापडत नव्हतं, मला ते कळत नव्हतं. ते मला हळूहळू कळलं. त्यात मी काही फार मोठं घडवलं असं नाही, पण ते कळलं. माझ्यापाशी एक भाषा आहे. आशयाच्या अंगानेही मला काही वेगळं सांगायचं आहे. रूढ अर्थाने प्रेमकविता मी लिहिली नाही. प्रेमाच्या गारूडातून बाहेर पडल्यावर नंतर जो एक सहज भाग असतो- माझ्या बऱ्याच कवितांत तर शारीर भावच नाही. त्या काळात शरद्‌चंद्र आणि बंगाली कादंबऱ्यांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. इंद्रियविरहित प्रेमाची तीव्रता मला आकर्षून घेत होती.

आजच्या वयात अतिशय शांतपणे मी तुम्हाला सांगू इच्छिते की, अपवाद सोडला तर बायकांचं प्रेम बऱ्याचदा काल्पनिकच राहून जातं. मनातला प्रियकर हा मनातच राहतो. तुमच्या वातावरणाची, तुमच्या समाजाची ती चौकट असते. पण कुणीतरी एक व्यक्ती संवाद करायला लागते- जसा संवाद मीरेनं केला, जनाबाईने केला. आता तो भिन्नलिंगीच का लागतो, हेही विचार करण्यासारखं आहे. माझ्या कवितेतील ‘तो’ आणि ‘ती’चा संवाद अशा प्रकारचा आहे. माझ्या मते, प्रेम हा स्वत:लाच शोधण्याचा एक भाग असतो. म्हणून माझ्या कविता रूढ अर्थाने प्रेमकविता नसल्या, तरी प्रेमाबद्दल खूप काही आर्ततेनं सांगतात.

प्रश्न - मीरेनं आणि जनाबाईनं केलेल्या ‘प्लेटॉनिक’ प्रेमाचा संदर्भ तुम्ही दिलात. ‘तो’ आणि ‘ती’ मुळात अस्तित्वातच नसतात, यावरून एक संदर्भ सांगण्याचा मोह मला होतोय. ना. घ. देशपांडे यांनी वेगळी आणि महत्त्वाची प्रेमकविता लिहिली. शेवटापर्यंत दर वर्षी ‘मौजे’च्या दिवाळी अंकात त्यांची ताजी टवटवीत प्रेमकविता प्रकाशित व्हायची. त्या काळात मी जालन्याला होतो. तिथून मी आणि कवी बलवंत धोंगडे मुद्दाम ना. घं.ना भेटायला मेहकरला जायचो. एका भेटीत मी नाघंना थेट प्रश्न केला होता. तेव्हा त्यांचं वय होतं एक्याण्णव. ऐकू कमी यायचं. कानाशी मोठ्या आवाजात मी त्यांना विचारलं, ‘एवढ्या वयात अजूनही ताजी टवटवीत प्रेमकविता कशी काय लिहिता येते?’ चेहऱ्यावरचं मंद हसू उलगडत नाघ म्हणाले, ‘कारण प्रेयसीच नाही!’ हे उत्तर म्हणजे ना. घ. देशपांडे यांच्या प्रेमकवितांचं गुपित होतं, जे तुमच्या उत्तराशी खूपच जुळणारं आहे.

पुन्हा प्रश्नाकडं वळू या. तुमच्या कवितेत सामाजिक-राजकीय संघर्षाचे संदर्भ ठळकपणे आढळत नाहीत. ‘कदाचित अजूनही’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमात तुमची प्रकट मुलाखत ऐकताना माझ्यासारखेच अनेक जण थक्क झाले. तुमचं सामाजिक-राजकीय प्रश्नाचं आकलन नेमकेपणानं मुलाखतीत प्रकट झालेलं होतं. एरवीही तुमच्याशी संवाद साधताना तुमच्या सामाजिक-राजकीय जाणिवा प्रखर आहेत, हे जाणवतं. या जाणिवा कवितेत मात्र ठळकपणे उतरत नाहीत. यामागची कारणं काय असतील?

तुमचं हेही निरीक्षण बरोबर आहे. अगदी राजकीय नाही- पण सामाजिक म्हणून ज्या काही जाणिवा असतात, त्या माझ्या काही कवितांमध्ये आहेत. अर्थात तीव्रतर नाहीत. त्याचं ठोस कारण खरं तर मलाही नीट सांगता येणार नाही. लिहिण्याच्या प्रक्रियेत या गोष्टी कदाचित बिनमहत्त्वाच्या होत असतील किंवा मनाला जी एक सवय आहे, बाकीच्या गोष्टींचा विचार करण्याची- या मला बाह्य गोष्टी वाटतात. त्या लिखाणात यायला काहीच हरकत नाही, हे बरोबर; किंबहुना, त्या अधिक तीव्रतेने यायला पाहिजेत. पण या जाणिवा ज्या विशी-बाविशीच्या वयात तीव्र असतात, ते वय ओलांडून मी खूप पुढे आलेली आहे. त्या वयात मी या जाणिवांवर कधी विचार केला नाही.

तरुण वयात माणसं विद्रोही असतात. त्यांची मतं टोकाला नेणारी असतात. बऱ्याचदा एकांगी पण असतात. आणि त्यातून ते लिखाण येतं. नामदेव ढसाळ असतील, मुक्तिबोध असतील- यांच्या राजकीय जाणिवा ठळक आहेत. राजकीय जाणिवा माझ्या बोलण्यात असल्या तरी लिखाणात नाहीत, हे जरी खरं असलं तरी; माझं एक निरीक्षण असं सांगतंय की, त्या आम्हा सगळ्याच कवयित्रींच्या लिखाणात नाहीयेत. राजकीय भूमिका असतील, पण राजकीय जाणिवा मला कुणाच्या कवितेत आढळल्या नाहीत. तर, त्याचं कारण मग आपल्या सामाजिक व्यवस्थेत आहे का? आपल्या विचारपरंपरेत आहे का? खरं तर आम्हाला कुणी अडवलं नसतं. अडवण्याचा एक काळ होता. पण नंतर आम्ही ते का लिहिलं नाही, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि आत्ता तरी त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत.

प्रश्न - कवीला ‘तुम्ही असं का लिहीत नाही? तसंच का लिहिता?’ असे प्रश्न विचारू शकत नाही. पण तुमचं सामाजिक-राजकीय आकलन परिपक्व असूनही त्याचं प्रतिबिंब तुमच्या कवितेत का पडलं नसेल, या उत्सुकतेपोटी हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकारच्या राजकीय-सामाजिक जाणिवा मांडणं, ते बंडखोरीचं वय ओलांडून पुढं आल्यामुळे मला ते मांडणं ढोबळही वाटतं. आंतरिक सांगण्याचा जो भाग माझ्यात आहे, त्याची आता चाकोरी बदलून, लिखाण बदलून लिहिणं मला बिनमहत्त्वाचं वाटेल. एवढ्या उपर समजा मी राजकीय जाणिवांचं आज काही मांडलं, तर ते मला थोडं हास्यास्पद वाटेल. विशी-पंचविशीच्या मुलांसारखं मला मांडता येणार नाही. माझा बौध्दिक आणि वैचारिक भाग आहे, त्यात तुम्ही म्हणता त्या गोष्टी आहेत; त्यापेक्षाही तीव्रतर आहेत. आता बाहेर सगळीकडेच बोलण्याची बंदी असल्यामुळं आणि वेगळं काही बोलला की, देशद्रोहीच ठरत असल्यामुळं तो भाग सोडून देऊ या. तरीही मी ठामपणे बोलते, पण लिहिण्यात मात्र तीव्रतेने येत नाही.

असं म्हणताना मी एक सांगेन, प्रत्येक विचार करणाऱ्याला व्यवस्थेच्या विरोधात उभं राहावं लागतं. तशा सामाजिक संदर्भाच्या कविता माझ्या नव्या कवितासंग्रहात (कदाचित अजूनही) आहेत. कदाचित इथून पुढं मी काही लिहीन, पण लिहिनच याची खात्री नाही. तुम्ही काय अन्‌ मी काय, कवी असं काही सांगू शकत नाही की, मी लिहिनच. मी राहीनच, हे तर कुणाला सांगता येत नाही. त्यामुळे कदाचित पुढं अशा प्रकारचं मी लिहिनही.

प्रश्न - ‘कदाचित अजूनही’ या संग्रहात ‘दिवस’ नावाची फार सुंदर कविता आहे. त्यातल्या चार ओळी पाहू या.

‘कवितेशी काही देणं ना घेणं

असा हा भवताल

आणि आपल्याला आतच ठेवून

बुजवली गेलेली काटेकोर

तळघराची दारं’

वाच्यार्थ्यानं आणि लक्ष्यार्थानं या ओळींचा विचार करता येतो. आतल्या घुसमटीबरोबरच ‘कवितेशी काही देणं ना घेणं, असा हा भवताल’ म्हटल्यावर एकूणच अनास्था जाणवू लागते. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. इंग्रजी माध्यमात शिकणारी आपली नवी पिढी. वाचनच कमी होणं. मराठी कवितेला पुढे वाचक कसा मिळेल, म्हणजे साहित्यसंस्कृती धोक्यात आलीय का- असे अनेक प्रश्न फेर धरू लागतात. मराठी पुस्तकांची एक आवृत्ती संपायला किती तरी दिवस जावे लागतात. ‘सत्यकथे’पासून अंक बंद पडण्याची एक परंपरा निर्माण झालीय. मागील वर्षभराच्या कालावधीत ‘अक्षरधारा’चा अंक बंद पडला. याबाबतीत...

मी आधी तुम्हाला कवितेबद्दल सांगेन. ‘कवितेशी काही देणं ना घेणं, असा हा भवताल’ याबद्दल तुम्हीच सांगितलंत. एकूणच साहित्यसंस्कृतीबद्दल काही देणं-घेणं असलेला आपला समाज नाही. आपला समाज विशिष्ट जगरहाटीशी बांधलेला, भौतिक सुखांशी जोडलेला. त्याच्या सुखाच्या, चंगळवादाच्या कल्पनाही खूप वेगळ्या आहेत. साहित्य आणि सृजनाशी जोडलेलं असं आपलं जग नाही. त्यात फार थोडे लोक असतात. या भोवतालातल्या तळघरात ठेवून दारं बुजवली गेली. मला माझ्या ध्येयापर्यंत, सृजनात्मक जाणिवांपर्यंत हेतुत: नसलं तरी निर्हेतुकसुध्दा जाऊ देण्यात येत नाही. या भोवतालाची दारं बुजवून टाकली आहेत. घुसमट अटळ आहे. तरीही आम्ही का व्यक्त होतो? खरं तर या भोवतालात साहित्य, संस्कृती, अभिव्यक्ती आज सुरक्षित नाही. तरी मी का लिहिते? आम्ही समाजप्रबोधन करतो का? समाजाला शिकवतो का? चमकण्यासाठी मी लिहिते का? तर, सांगण्याची तीव्रता आणि संवादाची निकड महत्त्वाची असते.

राहिला मुद्दा मराठी काहीच न वाचणाऱ्यांचा. इंग्रजी वाचणाऱ्यांचा भाषा टिकवण्याचाच मुद्दा असेल, तर इंग्रजी वाचणारे आणि लिहिणारे मराठी भाषा टिकवणार नाहीत. तुम्ही, आम्ही, मजूर, शेतकरी- सर्वसामान्य माणूस जो साहित्याशी जोडलेला नाही पण इंग्रजीशीही जोडलेला नाही, तोच मराठी भाषा टिकवतो आणि टिकवेलही. काळाचा रेटा खूप मोठा आहे. उद्या भविष्यात हे सर्व उरेल का? आपल्याला दिसतंच आहे. पण ते उरावं, अशी तुमची-माझी इच्छा आहे. तिच्यावर माझं नियंत्रण नाही. पण मुलं इंग्रजी माध्यमातून शिकतायत, तर चुकीचं काही करत नाहीत. ते व्यवहाराला आणि भोवतालाला धरून चालले आहेत. पण त्यातून आपल्याला जाणवणारी खंत खरी आहे. कवी-लेखक बदलाची भाषा करतात. कवी-लेखकांमुळे क्रांती होते, असं मला वाटत नाही. पण आम्ही कवी-लेखक क्रांतीच्या दिशेने लोकांना नेऊ शकतो. त्यांनी तसं जावं अशी इच्छा बाळगतो.

नियतकालिकं बंद पाडण्यास आपण सारेच जबाबदार आहोत. मुलं जर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेली, तरी त्या मुलांच्या मराठीची जबाबदारी घरात आई-वडिलांनी घ्यावी. माझ्या मुलाला मराठी आलीच पाहिजे, ही गोष्ट सक्तीची असावी. मराठी माध्यमं बंद पडतायत त्याला सरकार, आपण आणि मराठीचे प्राध्यापक जबाबदार आहेत. प्राध्यापक असूनसुध्दा अंक विकत घेत नाहीत. मराठीच्या प्राध्यापकांच्या घरात आज दहा पुस्तकं सापडत नसतील, तर आपण किती करंटे आहोत याचा विचार आपणच नीट केला पाहिजे. कायम कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडणं बरोबर नाही. बऱ्याच काळापासून मला असे खूप प्राध्यापक माहितीयत की- जाऊन एक तास घेतला तर घ्यायचा, नाही तर म्हशी पाळायच्या, दुधाचे धंदे करायचे, प्लॉटिंगचे धंदे करायचे. भरपूर पगार असतानादेखील हे उद्योग आहेत. त्यांचं काय करायचं? कार्यक्रमात एखाद्या पाहुण्याची नीट ओळख करून देता येत नसेल, तर हा प्राध्यापक कसा झाला?

आज तर ते फेसबुक आणि व्हाट्‌सॲप काय काय सुरूय. मी त्यात नाहीये. पण मला कुणा-कुणाकडून कळतं. यानं त्याच्या कवितेला लाईक करायचं, त्यानं याच्या कवितेला लाईक करायचं- यातून खूप सुमार गोष्टी पुढं येतात. हे त्याच्यातच खूश आहेत. हे बरोबर नाही. एखादी गोष्ट कुणाला आवडली नाही असं सांगितलं, तर तो नाराज होतो. ‘आवडलं नाही’ असं म्हणायचंच नाही. टीकाच करायची नाही. खरं बोलायचंच नाहीये. ही मानसिकता बनलीय. आणि समीक्षकही फुटाण्यांसारखी गोष्ट झालेलीये- गंभीर नाहीयेत. उभयपक्षी कारभार आहे ना हा? भाषा बुडीत खाती जमा होण्यासाठी आपल्या सगळ्यांचाच हातभार आहे. अर्थात इतक्या लवकर भाषा बुडणार नाही. पण एवढंच समाधान आहे की, ते पाहायला माझ्यासारखी व्यक्ती असणार नाही.

प्रश्न - डॉ. सुधीर रसाळांनी तुमच्या काव्यलेखना-बद्दल एक मत नोंदवलेलं आहे. ‘जाणिवांचा पट मर्यादित असूनही कवितेचा ताजेपणा टिकून आहे.’ याशिवाय मर्यादित जाणिवांच्या बाबतीत तर संपूर्ण स्त्री-कवितेबद्दलच डॉ.वसंत पाटणकरांनी एक व्याप्त विधान केलेलं आहे. त्यांच्या मते, ‘एकूणच स्त्री-कवितेचे अनुभवविश्व मर्यादित आहे. शिवाय स्त्री-कवितेचे प्रयोगशीलतेशी खूपच कमी नाते आहे.’ एक कवयित्री म्हणून व कवितेच्या वाचक-अभ्यासक म्हणून याबद्दल काय सांगाल?

दोन वेगळ्या पिढ्यांतल्या समीक्षकांनी त्यांची मतं नोंदवलेली आहेत. मी म्हणेन की, त्यांचं निरीक्षण बरोबर आहे. माझ्या कवितेबद्दलचंही बरोबर आहे आणि स्त्री-कवितेचंही बरोबर आहे. एक कवयित्री म्हणून, एक वाचक म्हणून हे मान्य केलं तर, ते असं का आहे याचा खोलात जाऊन विचार करावा लागेल. अशी विधानं करायला चमकदार आहेत. ती चांगली पण आहेत. पण असं जेव्हा बायांच्या बाबतीत किंवा स्त्री-कवितेबाबत घडतं, तेव्हा त्या घडण्यामागं काय काय आहे, हे बघायला हवं. बायका किती बंदिस्त चौकटीत राहत होत्या, त्या चौकटी त्यांना मोडता आल्या का? मोडू शकल्या नाहीत, तर का मोडू शकल्या नाहीत? समाजाचा उघड आणि सुप्त असा दबाव बायकांवर असतो, तो त्या झुगारू शकतात का? झुगारू शकत नसतील तर का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या सांस्कृतिक परंपरेत, आपल्या मानसिकतेत म्हणजे पुरुषी मानसिकतेत आहेत.

या दोन ज्येष्ठ समीक्षकांना कुठल्याही उपरोधाने प्रश्न न विचारता मी जरा वेगळ्या अंगाने जाईन. स्वातंत्र्य ही देण्याची गोष्ट नसूनही विचारते- इथं स्त्रियांना कोणतं स्वातंत्र्य दिलं जातं? या संदर्भात मी एक दुर्दैवी उदाहरण सांगते. ज्या कवयित्रीनं हा अनुभव सांगितला, ती पुढच्या पिढीची आहे. शहरात राहणारी- संदर्भ आहे म्हणून सांगते, ब्राह्मण कुटुंबातली आहे. ब्राह्मण कुटुंबात आज बरंच उदार वातावरण आहे. कर्वेंच्या काळाइतकं नसलं तरी, या कवयित्रीचं दु:ख दुर्दैवी आहे. नावासमोर ‘सौ’ लावत नाही, नवऱ्याचं नाव लावत नाही, म्हणून तिला घरातून त्रास दिला जायचा. आताच्या काळात सौ. लावलं नाही, नवऱ्याचं नावं लिहिलं नाही, तर बिघडलं कुठं? बाईचं स्वतंत्र नाव का लिहिता येऊ नये? या चौकटी झुगारणं सगळ्यांना जमलं नाही. ज्यांनी झुगारल्या, त्यांची अशी कोणती दखल मराठी कवितेने घेतली? आपापल्या चौकटीत राहूनही अनेक कवयित्रींनी चांगलं काम केलं. यांना हे जमलं नाही, त्यांना ते जमलं नाही- असं म्हणणं, हीसुध्दा पुरुषसत्ताक चौकटच आहे. काय जमेल आणि काय जमणार नाही, यामागं पुन्हा एकदा पुरुषच उभे असतात. त्यामुळे स्त्री-कवितेचा सहृदयतेनं विचार केला, तर ती मला आनंदाची गोष्ट वाटेल.

प्रश्न - प्रयोगशीलतेबद्दल मला उत्सुकता आहे. बालपणी तुमची श्रवणभक्ती खूप झाली. श्रवणसंस्कार झाले. कारण भजन, कीर्तन, आखाजी, लग्नाची गाणी, दु:खाची गाणी ऐकतच तुम्ही मोठ्या झालात. तरीही कविता-लेखनात अशा रचनाप्रकारांचा तुम्ही फारसा उपयोग केलेला दिसत नाही. तुमची बहुतांश कविता मुक्तछंदातच आहे. यामागची कारणं काय असतील?

त्या प्रकारची प्रयोगशीलता माझ्या कवितेत नाही. आशयाच्या अंगाने स्त्री-पुरुष लैंगिकता असे आधुनिक विषयही माझ्या कवितेत येत नाहीत. छंदात-वृत्तात लिहिण्यासाठी एक अभ्यास लागतो. शिवाय मी ज्या पार्श्वभूमीतून आले, तिथं संस्कृत भाषा असणं शक्य नव्हतं. त्या काळात ती काही लोकांचीच भाषा होती. छंद-वृत्त माझ्यापर्यंत आले नाहीत. पण काही रचना मी अभंग, ओवी प्रकारात केल्या आहेत. कारण अभंग, ओव्या माझ्या कानांवर लहानपणापासून पडत होत्या.

प्रश्न - तुमचं वाचन चौफेर आहे. हे सर्व वाचताना किंवा कविता लिहीत असताना कवितेशिवाय दुसरा कुठला ‘फॉर्म’ लेखनासाठी वापरावा वाटला नाही का?

कवितेला पर्याय म्हणून किंवा कवितेत सांगणं अपुरं वाटतं म्हणून, मला दुसरं काही लिहावं वाटलं नाही. पण कवितेशिवाय म्हणाल तर, मी दहा-बारा कथा लिहिल्या आहेत. त्या छापूनही आल्या. मात्र त्यात काही वेगळेपण आहे, असं मलाच वाटलं नाही. असाच मी कादंबरीही विचार केला होता. एक मोठा पट मला त्यात उलगडायचा होता. पण मुळात मी फार आळशी व्यक्ती आहे. एकाच कादंबरीचं नेमाडेंनी चारदा पुनर्लेखन केलं, हे मी ऐकूनच घाबरले. कारण ते मी करू शकत नाही. कवितेवर मात्र मी मन:पूर्वक काम करते. दहा वेळा फेअर करते. कवितेचा मला कंटाळा येत नाही. गद्य लिहिण्याची मला फार असोशी नाही.

कविता लिहिणं पुरेसं वाटायचं नाही, तेव्हा मी स्वत:ला पत्र लिहायचे. ते व्यक्त होण्याचं एक साधन होतं. मी स्वत:ला सतत पत्र लिहायचे. कारण दोन-तीन नातेवाईक सोडले तर मला मित्र-मैत्रिणी नव्हत्या. मी दीर्घ काळ एकटी राहत आलेली व्यक्ती आहे. माझा एकटेपणा मला भावतो, आवडतो. तशी स्वत:ला लिहिलेली शंभर-दोनशे पत्रं होती, जी मी नंतर फाडून टाकली. कदाचित ती पत्रं आज छापली असती, तर वेगळं पुस्तकही झालं असतं.

प्रश्न - तुमची स्वत:च स्वत:ला लिहिलेली पत्रं ही भन्नाट कल्पना आहे. ती पत्रं तुम्ही फाडून टाकल्यामुळं आम्ही एका वेगळ्या पुस्तकाला मुकलो. पण स्वत:ला पत्र लिहिण्यातील एकटेपणातून महेश एलकुंचवारांच्या ‘वाडा चिरेबंदी’ त्रिनाट्य धारेतील चंदूकाका मला आठवला. मोठ्या वाड्यात सगळ्यांचं करता-करता स्वत: तसाच राहून गेलेला चंदुकाका गावाबाहेरच्या तळ्यावर जाऊन माशांना चुरमुरे-फुटाणे टाकतो. त्या माशांशी चक्क बोलतो किंवा तेंडुलकरांच्या ‘सखाराम बार्इंडर’मधील मुंगळ्यांशी बोलणारी लक्ष्मी आठवली.

समारोपात आता मला तुमच्या वाचनाबद्दल सांगा. तुमच्या चौफेर वाचनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.

माझ्या वाचनाला शिस्त नाही. मी कधी जॉब केला नाही, त्यामुळं वाचन नेमकं नाही. खरं तर वाचन ही मला गरजेची आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट वाटते. वाचन नसेल, तर मला करमूच शकत नाही. मी उभीच राहू शकत नाही. त्यामुळं मी नेमकं नाही वाचू शकत. मी दर्जेदार, अभिजात असंही वाचते; पण दुसऱ्या बाजूला मराठी साहित्यात गौण समजलं जातं, असंही वाचते. नारायण धारप, अनुवादित शेरलॉक होम्स, ॲगॉथा ख्रिस्ती, रहस्यकथा असं सारखं वाचत राहते. वाचनातून माझी अस्वस्थता कमी होते. बंगालीही खूप वाचलंय. इंग्रजी येत नसल्यामुळे अनुवादित वाचते. मात्र मी समीक्षा कमी वाचते. ती मला कंटाळा आणते. ती माझी कमतरता आहे. कवितेची पुस्तकं तुलनेने सगळ्यात जास्त वाचते. मला भेट आलेला कुणाचाही कवितासंग्रह वाचते. ती माझी जबाबदारी वाटते मला.

आमचे काही मित्र ‘हा फालतू कचरा का वाचता?’ असं विचारतातही. पण मला तसं नाही वाटत. त्या नव्या लिखाणाकडे इतकं तुच्छतेनं पाहावं, असं मला वाटत नाही. बऱ्याचदा त्यात काही सापडत नाही. पण ते वाचणं, ते समजावून घेणं मला महत्त्वाचं वाटतं. मराठीत एरवीही खूपच कविता लिहिली जातेय. पण चांगली कविता थोडीच आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे- माझ्या वाचनात सातत्य असते, पण दिशा नसते.

अनुराधा पाटील, औरंगाबाद : मो. 0240-2321546

दासू वैद्य, औरंगाबाद : Mob. 9834920861

(मुखपृष्ठावरील व या लेखातील छायाचित्रे : श्रीपाद पदे, औरंगाबाद)

Share on Social Media

गांधींचे गारूड । 8

विक्षिप्त खुशालचेंडू निल्ला कुक

संजीवनी खेर

गांधींनी तिच्यासाठी काय काय केलं? तिच्या अस्थिर मनाला सावरायला त्यांनी उपोषण केलं. जेव्हा सगळे जण सांगत होते की, असं करू नका, तरी ‘तिच्यावर चांगला परिणाम होईल म्हणून मी माझ्या उपवासाने तिचे हृदय-परिवर्तन करीन. अर्थात तेच एक कारण नाहीय माझ्या उपवासाचे. तरुणांना हे कळलं पाहिजे की, हरिजनांसाठी काम करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. नीला सुधारली तर तरुणांना मोठा धडा मिळेल की, सार्वजनिक क्षेत्रात काम करताना स्वत:चे चारित्र्य स्वच्छ असायला हवं. नीला हे करून दाखवेल. तिला अधिक आत्मसामर्थ्य मिळावे, यासाठी हा प्रयत्न आहे.’ तिच्या पत्रातून हे लख्ख कळत होते की, तिचा स्वत:वरचा ताबा सुटत चालला होता. ठरवे एक नि हातून घडे वेगळेच. गांधीजींच्या हे लक्षात आले होते, तरी ते तिला समजावण्याचा प्रयत्न करीत राहिले. तिच्या वागण्याचा दोष तिला न देता तिला सुधारायची संधी दिली पाहिजे, असे त्यांचे मत होते.

कसल्या, कुठल्या-कुठल्या स्त्रिया गांधीजींच्या कामाकडे आकर्षित होऊन हिंदुस्थानात येत असत. त्यांची कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आपल्याहून संपूर्णत: भिन्न असूनही त्या इथे का येत? गांधींच्या कामाशी, व्यक्तिमत्त्वाशी नाते जोडत, हाल-अपेष्टा सोसत इथे का राहत असत- हे एक रहस्यच आहे. अमेरिकेत एका स्वछंद वातावरणात, कलावंत-साहित्यिक- नाट्य-व्यवसायी घरात वाढलेली, ग्रीकनाट्यात रमलेली निल्ला क्रॅम कुक इथे येते काय, विविध धार्मिक संस्थांत घुसून गूढ गुरूंच्या नादाला लागते काय! पोटच्या पोराकडे लक्ष द्यायला तिला वेळ नसे, पण प्रेमप्रकरणात रमत असे. स्वत:चीच परीक्षा घेत इथल्या गूढवादी मठांच्या संपर्कात राहून भलती धाडसं करीत असे. थोडक्यात, ही त्या शतकातली हिप्पी होती. मनात येईल ते करायचे, राहायचे, खायचे, भटकायचे- कशालाच ताळतंत्र नाही. गुलछबू, खुशालचेंडू व्यक्तिमत्त्व.

असे असून एक होतं की, ती प्रचंड ऊर्जावान होती. नाटक, साहित्य, (अनेक नाटकं तिने बसवली, त्यात कामं केली, जगभरातील वृत्तपत्रांत तिचे कौतुक छापून आले- एक प्रकारे ती सेलिब्रेटी होती) पत्रकारिता, ग्रीकनाट्य यात तिला रस नि गती होती. आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात तिने दुसऱ्या महायुध्दाच्या काळात धैर्याने बातमीदारी केली. स्वत:चे निर्णय स्वत:च्या हिमतीवर घेत होती. कुणावर अवलंबून राहणं तिला पसंत नसे. अशी ही निल्ला इथे आली, तेव्हा विशीत असलेली तरुणी होती. गांधींच्या कडक शिस्तीच्या आश्रमव्यवस्थेत ती कशी काय बसणार होती? नि तिथे किती टिकणार होती?

अशा या एक प्रकारच्या अतरंगी तरुणीलाही गांधींचा स्नेह लाभतो, ते आपल्या प्रचंड कामाच्या व्यापात तिला मानसिक-आध्यात्मिक आधार देतात, तिची काळजी करतात, तिच्या स्वैर वागण्याने चिंतित होतात, तिला मार्गावर आणण्यासाठी धडपडतात... का? विदेशी आहे म्हणून? छे! एकदा कुणालाही आपलं म्हटलं की, बापूंच्या मनात आप-पर भाव राहत नसे. ती मुलगी आपली जबाबदारी आहे, या कल्पनेने ते तिच्याशी वागत. ह्या हिप्पी मुलीने त्यांना अनेकदा संकटात टाकलं. कुठे तरी अचानक निघून जाणं, कुणाबरोबरही राहणं ह्याला काही धरबंधच नव्हता. आपलं स्रैण वागणं ती लगेच कबूल करी, त्यात लपवाछपवी नसे. सुधारण्याचा निश्चय करी, पण तो फार टिकत नसे. इथले अनेक गूढ संप्रदाय तिला प्रचंड आकर्षित करीत. इथली देवळं, गुरू यांच्या प्रभावाखाली ती वाहावत जात असताना बापूंना दिसत होती; तर ते स्वस्थ कसे बसू शकणार होते?

तर अशी ही निल्ला-नागिनी कुक. तिने 1932-33 मध्ये गांधीजींना पत्र लिहिलं. तेव्हा ती बंगलोरमध्ये राहत होती. तिथे तिच्या प्रेमळ (?) स्वभावानुसार ती म्हैसूरच्या महाराजाच्या प्रेमात आकंठ बुडाली. तोही तिच्या सौंदर्यावर भाळला होता. तेव्हाच रामस्वामी नावाच्या तिच्याहून तरुण असलेल्या तरुणाशी तिची मैत्री जुळली. तिथे अस्पृस्यांना मंदिरप्रवेश द्यावा, यासाठी चळवळ सुरू झाली होती. ती त्यात सामील झाली. तिच्या देखण्या रूपावर नि ह्या कामावर अनेक जण लुब्ध झाले होते. रस्ते झाड, संडास साफ कर, चळवळ कर- ह्यात तिला वेगळं काही करायची झिंग अनुभवायला येत होती.

ह्या कामाबद्दल तिने गांधीजींना लिहिले. त्यानंतर तिने आश्रमात यायची इच्छा व्यक्त केली. त्याअगोदर स्वत:ला शुद्ध करायचं ठरवलं. म्हणजे काय तर- ‘खरं बोलायचं.’ आता तिच्या स्वच्छंदी, वैषयिक जीवनाबद्दल लिहिणं हे गांधीजींच्या अशरीरी प्रेमाहून सर्वथा भिन्न होतं. पण तिने ‘आपण केवळ महाराजांच्या पैशांवर डोळा ठेवून प्रेम करत होतो,’ राजघराण्यात प्रवेश मिळावा म्हणून सारं करत होतो. हे कबूल केलं! म्हणजे, ती हे सारं सोडून देणार होती? तिच्या मनात तिथलं तत्त्वज्ञान, ग्रीक साहित्यातील नायक-नायिका, हिंदू मिथकं यांचा प्रचंड गोंधळ होता. स्वत:ला ती गोपी समजत होती. कृष्णाच्या शोधात होती.

गांधींना अशा पतितांबद्दल खास आस्था होती. त्यांना आपण योग्य मार्गावर आणू शकू, असं वाटत होतं. तिच्या पत्रात तिने गांधींना आपला मुलगा म्हटले. ह्या संबोधनाने ते चक्रावले. तिच्याबद्दल महादेवभाई देसाई, वल्लभभाई पटेल यांच्याकडून सावधानतेचा इशारा आला होता. बापूंच्या नावाचा ती गैरवापर करतेय, असा त्यांचा दावा होता. सर्वांनीच तिचा स्वैराचार, पैशाचा गैरव्यवहार, आपल्या मुलाविषयीचा निष्काळजीपणा या सर्वांविषयी लिहिले होते. म्हैसूरच्या दिवाणानेही ही मुलगी फार विश्वास ठेवण्यायोग्य नसल्याचे आणि जरी ती ‘खरं बोलते’, असे सांगत असली तरी फार चंचल आहे नि बेभरवशाची असल्याचे नमूद केले. त्यामुळे गांधीजीदेखील आपण तिला कितपत मार्गावर आणू शकू, याबद्दल साशंक झाले.

एक विदेशी तरुणी अस्पृश्यतेच्या कामात स्वत:ला झोकून देऊ इच्छितेय, ही एकच बाब त्यांना महत्त्वाची वाटत होती. आपला हिस्टेरिया, बेबंधपणा, बेदरकारपणा त्यागून जर ती वठणीवर आली, तर इतर तरुणांसाठी एक उदाहरण होईलसे वाटत होते. म्हणतेय तशी सर्वस्वाने हरिजन वस्तीत जाऊन राहिली, अगदी कमीत कमी पैशांत राहू लागली. ‘जरूर तर भीक मागून राहीन, पण हरिजनांसाठी काम करीन’ असं म्हणत ती काम तर करत होतीच; प्रश्न होता तिच्या चारित्र्याचा! त्याची कुणीच हमी देत नव्हते, अगदी ती स्वत:ही. गांधीजींनी तिला लिहिलं की, ते तिला आपली मुलगी मानायला तयार आहेत, जर ती बदलायला तयार असेल तर. पण दरम्यान ती ‘आध्यात्मिक पती’ची भाषा करू लागली. गांधीजींच्या शब्दकोशात ह्या शब्दाला काही अर्थ नव्हता. स्वत:च्या स्खलनशीलतेवर तिचा ताबा नव्हता. सतत कुणाच्या तरी प्रेमात ती गुरफटत असे. दुसरीकडे तिला हे जाणवत असे की, जे करतेय ते बरोबर नाही. आपल्याला एका उच्च दर्जाच्या, संतपदाला गेलेल्या व्यक्तीकडून मार्गदशन हवंय; एक सत्त्वशील आयुष्य जगायचं आहे.

म्हणूनच तर तिने आपल्या आईकडे वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदुस्थानात जाण्याचा हट्ट केला होता. हिंदू धर्मातले विचार वाचून इथले मंत्र-तंत्र, पुनर्जन्म, आध्यात्मिक अनुभव यांबद्दल तिला प्रचंड आकर्षण निर्माण झाले होते. एका बाजूला ती तीव्र अशा भावनिक तुफानात राहायची, दुसरीकडे तिची खुशालचेंडू वृत्ती उसळ्या मारायची. एक प्रकारे तिचा कल जबाबदारीरहित जीवनाकडे होता. भाषा, नाट्य, खासकरून ग्रीक नाट्यात तिला गम्य होते. तिचे युरोपियन नि पौर्वात्य भाषांवर प्रेम होते. त्या भाषा तिला येत होत्या, काहींमध्ये ती वाकबगार होती. ग्रीसला जाऊन शिष्यवृत्ती मिळवून त्यात करिअर करायचा विचार होता. खरं तर तेच तिचे क्षेत्र होतं.

दरम्यान, तिनं वयाच्या 16 व्या वर्षी एका ग्रीक नाटककाराशी लग्न केलं, एक मुलगा झाला. पण अशा अस्थिर मनाच्या मुलीला हे लग्न फार काळ निभावता आले नाही. या साऱ्या वैचारिक गोंधळाचं कारण तिचे ‘जीन्स’ होते. वडिलांनाही कलांत रस नि निपुणता होती. धरसोड वृत्तीही त्यांच्याकडूनच तिच्यात आली. अमेरिकेत त्यांनी नाट्यक्षेत्रात खूप नाव कमावले. नाटक कंपन्या काढल्या, वृत्तपत्रातून लेखन केलं. सौंदर्यासक्ती होतीच, त्यामुळे ते अनेक ठिकाणी हिंडले. ती स्वछंदी, थोडी बेदरकारवृत्ती निल्लात आली होती. या देशाची माती चुंबून तिने इथे आल्यावरच ‘आपण आयुष्य सर्वार्थाने जगू’ अशी समजूत करून घेतली.

तिने हिंदुस्थानात आल्यावर आपलं नाव ‘नीला’ केलं. नीला नागिनीदेवी हा तिचा (निळ्या नागदेवतेचा) हिंदुस्थानी अवतार. एका संभ्रमित नि भारलेल्या अवस्थेतच ही देखणी विदेशी तरुणी अनेक तरुणांना स्वत:भोवती गुंगवत होती. एकीकडे इथल्या पवित्र ग्रंथांचा अभ्यास तिने केला. साधी राहू लागली, शाकाहारी झाली, सूत कातू लागली. पुनर्जन्मातही असेच काही घडले असावे, असे तिला वाटत होते. ह्याच विचारसरणीतून आपला जन्म सार्थकी लागेल, याची तिला खात्री होती. इथे आल्यावर वृंदावनात जाऊन ती हाती जपमाळ घेऊन कृष्णाच्या शोधात फिरत राहिली. अनेक नियम स्वत:साठी करत राहिली. आपल्याला अनेक गूढ साक्षात्कार होतात, संदेश मिळतात, असे तिला वाटत होते. स्वामीजींना भेटत, मंदिरात जात राहिली. ह्या साऱ्यांत तिला पटलेले किती नि एक चूस म्हणून करायच्या बाबी किती, हे सांगणं कठीण होतं. हा काळ 1935-39 चा आहे.

हे सगळं वाचल्यावर वाचकाला वाटेल की, अशा स्त्रीबद्दल कशाला लिहिताय? गांधीजींनी तरी तिला का थारा दिला? त्यांनी तिला सुधारायची संधी दिली, तिच्यासाठी चिंतित राहिले. तिचे वागणे चंचल आहे, वाहावत जाते; पण मनाने ती निर्मळ आहे, अशी त्यांची भावना होती. ह्या तरुणीला तिच्या वागण्याच्या तऱ्हा माहिती असूनही आश्रमात प्रेमा कंटकच्या छत्राखाली ठेवायचा प्रयत्न का केला? तिला गांधीजींबरोबर काम करायचे होते. त्यांचे विचार तिला लोभावत होते. त्यांची पत्रे वाचली की लक्षात येते की, जीव ओतून ती अस्पृश्य वस्तीत काम करत होती. ह्या लोकांनी जीवनात वर यावं, त्यांना समाजाने सामावून घ्यावं, याकरता धडपडत होती. इतरांना ह्या कामात गुंतवून घेत होती. पण तिचे चित्त स्थिर नव्हते.

गांधींनी सांगितलेले मौन, साधे खाणे, सर्वांसह साबरमती वा वर्ध्यात राहणे हे काही काळ तर तिने केले. प्रेमा कंटक तिच्यावर नजर ठेवून होत्या. तिला हे सारे झेपत नाहीय, गुदमर होतेय असे वाटले, तर तिला तिथून मोकळं करावं, असंही गांधीजींनी सांगून ठेवलं होतं. तिला बालपणी न मिळालेले प्रेम, आपुलकी, आस्था सर्वार्थाने तिला तिथे मिळत होती.

पण तिथेही तिचे मन गांधींकडे येणाऱ्या डॉक्टरांकडे आकर्षित होत होतं. आश्रमात ती आपणहून खाण्याचे प्रयोग करीत होती. जसे- फक्त द्राक्षं खाऊन राहायचे, इत्यादी. त्यात तिची प्रकृती ढासळली. मलेरियाने ग्रासले. औषधं घेतली नाहीत. गांधीजी तुरुंगात होते. सुटून आल्यावर आपली कामं आटोपून तिची चौकशी नि शुश्रूषा करायला येत असत. अचानक काहीही कारण नसताना गांधींनी चित्तशुध्दिसाठी उपोषण करायचा निर्णय घेतला. सर्वांनाच काळजी वाटू लागली. ह्यामागे नीला आणि आणखी काहींचे वागणे असावे, अशी शंका होती. ती गांधींनी नाकारली नाही, पण तेवढे एकच कारण नाही, असेही ते म्हणाले.

आश्रमात राहताना नीला तक्रार करे की- प्रार्थनेला जाताना दारं बंद करणं, फाटकाला कुलूप घालणं हे चुकीचं आहे. कुणाकडे काही अधिकच्या वस्तू नाहीत, तर मग चोरी कशाची होणार? कुणी पांघरूण वा उबदार कपडे चोरले तर त्याला त्याची गरज अधिक आहे, असे समजायला हवे. नाही तर गीता वाचून उपयोग काय? खरं तर तिथली शिस्त तिला आवडत नव्हती.

तिच्या मनात सतत चलबिचल होत असे. स्वत:चे मन शांत होत नाही, असे ती कबूलही करीत असे; पण त्यावरचा उपाय तिला जमत नसे वा उन्मादी अवस्थेत ती काहीही करीत असे. ती म्हणजे आश्रमवासीयांवर बोजा तर टाकत नाहीये ना, असे विचार गांधीजींच्या मनात येऊ लागले. तिच्या कामासाठी बंगलोरला गेली, तरी तिचे कुणाशी पटनासे झाले होते. तिथे जाऊन ती तब्येत खराब करूनच येत असे. तिला कामात रस होता, पण ते नेटाने करण्याची तिची वृत्ती नव्हती. गांधीजींनी तिला अनेक पत्रं लिहून समजावले होते. ते जणू तिचे मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर झाले होते. तिने वेडेवाकडे वागू नये, कामावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला ते तिला देत असत. तिने आपले डोक्यावरील केस काढून टाकले होते, त्यामुळे ती एखाद्या साधूसारखी दिसे. कपडेही जाडेभरडे घाली. इथे तर घरातही कपडे घालावे लागतात, अशी तिची तक्रार असे!!

तिने आपली सैरभैर अवस्था, उतावीळपणा, भावनिक संतुलन गमावण्याची शक्यताही बोलून दाखवली होती. बंगलोरमधील तिच्या स्वैर वागण्यातून तिला दिवस गेले असल्याची शक्यता तिने गांधींना बोलून दाखवली होती. हिला सरळ-साध्या मुलीसारखे वागायला लावणे किती अशक्य आहे, याची जाणीव त्यांना होत होती. कधी तरी ती भूतकाळ विसरून, स्वच्छ मनाने चारित्र्यसंपन्न जीवन जगेल, याची आशा मावळली होती. तरीही गांधींनी प्रयत्न सोडले नाहीत.

तिच्या मुलाचीही काळजी घेतली, त्याच्या शिक्षणाची व्यवस्था लावली. पण एक दिवस वर्ध्याच्या आश्रमातून अचानक ती नाहीशी झाली. सर्वत्र शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. ती आणि तिचा मुलगा सिरिओस दोघेही वृंदावनात होते. तिथे तिच्या पायात विषारी काटा गेल्याने तिला मिशनरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. पण मग ब्रिटिश सरकारने त्या दोघांना (एक गोरी तरुणी सर्व गोऱ्या स्त्रियांबद्दल वाईट मत पसरवू शकते म्हणून) अमेरिकेत न्यूयॉर्कला पाठवले. गांधींच्या मते, तिला मनोरुग्णालयात ठेवायला हवे होते.

तिने बोटीवर एका आजारी तरुणाला बरं वाटावं म्हणून ‘मी तुझ्याशी लग्न करीन’ असे म्हटले आणि त्याच्याशी लग्न केले (सत्यवचन प्रेम!). हे असे भावनेच्या भरात घेतलेले निर्णय टिकणार कसे? काही काळातच तिने घटस्फोट घेतला. ती 1939 मध्ये युरोपात गेली. तिथे लिबर्टी या साहित्यिक मासिकासाठी वार्ताहार म्हणून काम केले. ग्रीसमध्ये जेव्हा दुसरे महायुध्द भडकले, तेव्हा अल्बानियाच्या आघाडीवरून तिने अमेरिकन नि ग्रीक वृत्तपत्रांसाठी वार्तांकन केले. ग्रीसहून ती तुर्कस्तानला गेली. सांस्कृतिक सहायक म्हणून काम केलं. याच काळात तिने डायरेक्टर जनरल- कला, म्हणून इराणी मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागात काम केले. नाट्य नि संगीताच्या पुनरुज्जीवनाचे काम केले. अखेर ती अमेरिकेला परत गेली.

तिथे तिने अनेक ग्रीक नाटकांतून कामं केली. नंतर तिचा मुलगा सिरिओस आणि त्याची पत्नी व तीन नातवंडांसह ती व्हिएन्नात राहत होती. तिने कुराणाचा इंग्रजीत अनुवाद केला. ‘माय रोड टू इंडिया’ हे पुस्तक लिहिलं. अमेरिकेतूनही तिने गांधींना ‘मी परत येऊ का? कारण सत्य मला फक्त तुमच्या सहवासातच सापडले होते’ असे पत्र पाठवले होते. त्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘कधीही ये.’

गांधींनी तिच्यासाठी काय काय केलं? तिच्या अस्थिर मनाला सावरायला त्यांनी उपोषण केलं; जेव्हा सगळे सांगत होते की, असं करू नका. तरी ‘तिच्यावर चांगला परिणाम होईल म्हणून मी माझ्या उपवासाने तिचे हृदयपरिवर्तन करीन. अर्थात तेच एक कारण नाहीय माझ्या उपवासाचे. तरुणांना हे कळलं पाहिजे की, हरिजनांसाठी काम करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. नीला सुधारली तर तरुणांना मोठा धडा मिळेल की, सार्वजनिक क्षेत्रात काम करताना स्वत:चे चारित्र्य स्वच्छ असायला हवं. नीला हे करून दाखवेल. तिला अधिक आत्मसामर्थ्य मिळावे, यासाठी हा प्रयत्न आहे.’ तिच्या पत्रातून हे लख्ख कळत होते की, तिचा स्वत:वरचा ताबा सुटत चालला होता. ठरवे एक नि हातून घडे वेगळेच. गांधीजींच्या हे लक्षात आले होते, तरी ते तिला समजावण्याचा प्रयत्न करीत राहिले. तिच्या वागण्याचा दोष न देता तिला सुधारायची संधी दिली पाहिजे, असे त्यांचे मत होते.

अशी ही म्हटलं तर विचित्र, म्हटलं तर मानसिकरीत्या असंतुलित तरुणी इथे जणू एक वैद्यकीय उपचार म्हणून गांधींच्या वर्तुळात येते... वेगळ्याच जगातली ही कलावंत, हळुवार मनाची तरुणी गांधींच्या विचाराने भारावते... काम करते; पण जो संयम तिच्या रक्तातच नव्हता, तो पाळताना पाय घसरत जातो. मात्र, अखेर तिला तिच्या कलेतच सत्य सापडले असावे.

संजीवनी खेर, मुंबई

sanjeevanikher@gmail.com

Share on Social Media

नवे ऋतुचक्र । 3

मार्च वसंत विलास

विश्वास वसेकर

अमुक एका झाडावर प्रेम करा, हे सांगण्यापेक्षा अमुक एका झाडावर प्रेम करू नका- हे सांगणे मला जिवावर येते. महाराष्ट्रात मधुमालती म्हणून ओळखली जाणारी वेल त्यापैकी एक आहे. तिच्यावर प्रेम करू नका, असं मला सांगायचंय. पण प्रेम आंधळ असतं, हेही खरं आहे. या झाडाला रंगूनचा वेल किंवा बारमासी म्हणतात. मालतीची फुलं अशी असतात का? अशी दिसतात का? मधुमालती म्हणताना तुम्हाला यात मालती दिसलीच नाही, तरी तिला हे नाव? बरं, मालती हे अत्यंत सुगंधी असं फूल आहे. तुम्ही मधुमालती म्हणता, त्याला कुठे आहे सुगंध? म्हणजेच प्रेम करणाऱ्यांना धड काही दिसत नाही, तसंच त्याचा धड वासही घेता येत नाही. याचा अर्थ तुमचं प्रेम नुसतं आंधळंच नाही, तर ‘सर्दुलं’सुद्धा आहे. तर ही तुमची तथाकथित मधुमालती किंवा मालती नसून रंगूनचा वेल किंवा बारमासी आहे. वनस्पतीशास्त्रीय नाव कॉमब्रेटम इंडिकम असून पानांच्या कक्षात फुलांचे खाली लोंबणारे तुरे येतात.

मार्च महिना वसंत ॠतूच्या बहराचा आणि कहराचा. खरे तर त्यालाच ‘वसंतात्मा’ म्हटले पाहिजे. माणसाच्या शरीराचं दर सात वर्षांनी नूतनीकरण होतं, असं म्हणतात. वसंत ॠतू तर झाडांचं नूतनीकरण प्रतिवर्षी करून टाकतो. कात टाकलेल्या सापाच्या शरीराचं नवं चकाकतं, सळसळतं चैतन्यदायी रूप जसं डोळ्यांना सुखावून टाकतं, तशी वसंतात झाडं नवनवोन्मेषानं फुलून येतात. सर्जनशील असणं हे माणसाचं आणि झाडाचं समान वैशिष्ट्य आहे. माणसाला फुलांची आवड, ओढ का असते? कवी ग्रेस म्हणतात- माणसाच्या मेंदूलाच वसंतनाद असतो, म्हणून तो मोगऱ्याची मागणी करतो.

15 फेबु्रवारी ते 15 मार्च या काळातला वसंत पूर्ववसंत असतो. उरलेला वसंत हा उत्तरवसंत. पूर्ववसंत हा आंब्याच्या फुलांचा, पळसाचा तर उत्तर वसंत हा अमलतास आणि गुलमोहराच्या भडक फुलांचा. पूर्ववसंत हा सुगंधोत्सव असतो, तर उत्तरवसंत हा रूपोत्सव.

फळांचा राजा आंबा आणि आंब्यांचा राजा हापूस. भारतात आहेत तितकी आंब्यांची झाडं दुसऱ्या कोणत्याही देशात नाहीत. संस्कृत कवींना आंब्याच्या रसापेक्षा गंध अधिक प्रिय आहे. आम्रमंजिरीच्या दर्शनाने व सुगंधाने स्त्री-पुरुषांच्या अंगी उन्माद संचारतो (असे म्हणतात), म्हणून कामदेव असणाऱ्या मदनाच्या पंचबाणात (म्हणजे पाच फुलांत) आम्रमंजिरीला स्थान मिळाले आहे. गुप्त काळामध्ये मद्य सुगंधित करण्यासाठी आम्रमंजिरीचा उपयोग केला जात असे. आंब्याची कोवळी पाने व मोहोर कलशात घालून शुभ शकुनासाठी समोर ठेवण्याची प्रथा मध्ययुगात प्रचलित होती. अजूनही मंगल कलशात त्यांची योजना केलेली असते.

निसर्गोत्सव पुस्तकात आम्रमोहोराचे बहारदार वर्णन येते. ‘मोहोराचे तुरे किती भरदार, लांब, डौलदार फुलांच्या भाराने लवलेले दिसत. त्यांचे नाजूक तांबूस देठ व पांढरी बारीक-बारीक फुले पहिल्याने हिरवट, मागून पांढरी, पिवळी व काळसर होऊन गळणारी. तांबड्या दांड्यांच्या कैऱ्यांचे बारीक-बारीक मणी चिकटलेले किती मजेदार दिसत आहेत! मोहाराबरोबरच काही ठिकाणी नवी तांबूस-अंजिरी पालवी वाऱ्याबरोबर डुलत आहे. घरात बसून आमरसाचे भुरके मारण्याइतकेच नखशिखान्त मोहोरलेला आंबा पाहणे तेवढेच सुखावह असते, याचे भान किती जणांना असते?

आंब्यावर आणि आमरसावर प्रेम करण्यासाठी किंवा करू इच्छिणाऱ्यांसाठी गो.वि. करंदीकर नावाच्या गुरुजींनी एक चिमुकली मार्गदर्शिका (गाईड) लिहिली आहे. पॉप्युलर नावाच्या दुकानात ती मिळते. आमरस सेवन करणाऱ्यांना त्यांच्याही पुढे जाऊन माझा एक रानटी पण वैज्ञानिक सल्ला आहे. पोळीचा तुकडा रसात बुडवून तो बिलकुल आवाज होऊ न देता खाणे अवैज्ञानिक आहे. हाताच्या खोल्या करून फुर्रफुर्र आवाज करतच तो खाल्ला पाहिजे. माझे आजोबा सगळ्यांच्या वाट्यांमध्ये किंवा द्रोणात रस वाढून झाला की म्हणायचे, ‘पोरं हो, आता लावा घोडे पव्हणीला!’ की आम्ही मोठ्याने फुर्रफुर्र आवाज करत तो संपवायचो. शास्त्र हे आहे की, आपल्या जिभेच्या मध्यभागी काही ग्रंथी असतात, केवळ या पद्धतीने रस खाल्ला तरच त्या स्रवतात! लक्षात ठेवा.

भारतीय संस्कृतीची तोंडओळख करून देताना एका लेखकाने कोकिळा व्रताविषयी फार छान लिहिले आहे. दर अठरा वर्षांनी हे कोकिळाव्रत येते. त्या वर्षी आंब्याची रोपे घरोघरी आणून कुंडीत लावतात. घरातील गृहिणींच्या संख्येत त्या रोपांची संख्या असते. प्रत्येक गृहिणी त्या रोपाची महिनाभर पूजा करते व त्यानंतर ते रोप घराभोवती किंवा शेतात लावण्यात येते. महिनाभराच्या सान्निध्यामुळे प्रत्येक गृहिणीत त्या रोपाविषयी एक प्रकारची आपुलकी, जिव्हाळा निर्माण झालेला असतो. त्यामुळे त्या रोपांचे काळजीपूर्वक जतन केले जाते. त्या आंब्याच्या रोपाचे अठरा वर्षांनी वृक्षात रूपांतर होऊन फलधारणा होते आणि त्या पुढच्या पिढीस त्याची फळे चाखावयास मिळतात.

आपण मदनाला कामदेव केले आणि त्याचे शर म्हणजे बाण हे फुलांना केले. मदनाचे पाच बाण आहेत- पंचशर. अरविंद (लाल कमळ), अशोक, आम्रमंजिरी, जाईचे फूल किंवा मोगरा आणि नीलकमळ. ह्या पाचही फुलांना मार्च महिन्यात बहर येतो. म्हणून ‘वसंतात्मा’ असा गौरव जर कोणाचा करावयाचा असेल, तर तो मार्च महिन्याचाच करावा लागेल. या मदनपारध्याने समाधीत मग्न असणाऱ्या शंकरालाही कामातुर केले, तिथे तुमची-आमची काय कथा! फुलं माणसांतला मदन जागवतात. वसंत ॠतूत याचा कहर होतो.

अशोकाचे दोन प्रकार आहेत. त्यातला खोटा किंवा हिरवा अशोक हा उंचच्या उंच वाढणारा ‘मास्ट ट्री’ आपल्याला बहुधा माहीत असतो. त्याला वसंतात फुलं येत नाहीत. वसंतात फुलणारा अशोक हा सीता-अशोक. आधी लाल रंगाचे त्याचे फुलोरे (पुष्पबंध) पानांच्या बगलेत येतात; नंतर त्यावर प्रथम पिवळसर, नंतर नारंगी व शेवटी लाल दिसणारी फुले येतात. ती मदनाच्या ‘पंचशरां’पैकी एक! अशोकाची पाने लांब, अणकुचीदार, शोभिवंत, कुरळी व नाजूक असतात. म्हणून सुंदरीच्या बोटांना त्याची उपमा देतात. प्राचीन वाङ्‌मयातील दोहद संकेतानुसार सुंदरीने लत्ताप्रहार केल्याशिवाय अशोकाला फुलेच येत नाहीत. बहरलेला, फुललेला हा वृक्ष पाहणे हा एक नवलनयनोत्सवच असतो.

बा.भ. बोरकर प्रेयसीला सुचवितात- आकळू ॠतू गात्रांनी. आपण सदासर्वकाळ हा प्रयोग करत राहिलं पाहिजे. कडुनिंबाच्या झाडावर वसंत ॠतू सगळ्या संवेदनांच्या दारांतून आकळून घेऊ या. मार्चमध्ये त्याला आलेली नवपल्लवी डोळे भरून पाहा. ती नव्याने डोळ्यांत उतरते, तेव्हा फारच सुंदर दिसते. तांब्याच्या किंवा ब्राँझ धातूच्या रंगाची ती आहे. तिच्यावर हळुवार हात फिरवून पाहा. काही दिवसांत ती हिरवी होणार आहे. पानं लांबट, टोकदार, वाकड्या वळलेल्या करवती कडांची आहेत. गुढी पाडव्याच्या सुमारास पानांच्या बेचक्यात अतिशय बारीक, पिवळसर पांढऱ्या फुलांचे तुरे येतात. एखाद्या सुवर्णकाराने नाजूक कर्णफुले घडवावीत अशी ती असतात. कवी गुलजार यांचं अत्यंत आवडतं असं शैलेंद्रांनी लिहिलेलं गाणं आता ऐका-

मिला है किसी का झुमका

ठंडे ठंडे हरे हरे नीम तले...

पाडव्याला उभारलेल्या गुढीला सजवण्यासाठी लिंबाची पुष्पवंत डहाळी वापरतात. त्यामुळे गुढी अतिशय देखणी अन्‌ शोभिवंत दिसते. गुढी उभारून झाली. पाडव्याचे पुरणवरणाचे किंवा श्रीखंडाचे जेवण. तत्पूर्वी हिंग, चिंच, गूळ आणि कडुनिंबाच्या फुलोऱ्याचे तयार केलेले पंचामृत चाखून पाहा. पुढचे वर्षभर आजार होणार नाही. जूनमध्ये लिंबोळ्या पिकतील तेव्हा त्या आंब्यासारख्या माचून आणि नंतर चाखून पाहा. तारुण्यात कितीही रागीट आणि कडू असलेला माणूस- बहिणाबाई म्हणते म्हातारपणी ‘गोड’ होतो कसा...

कडू निंबोणी शेवटी

पिकीसनी गोड झाली

रूप, रस, स्पर्श या संवेदना तृप्त झाल्या; आता जरा दूर- आणखी दूर कडुनिंबाच्या झाडावरून वारा येईल, अशा जागी थांबून अनुभवा. जगातली लाखो अत्तरं. ज्याच्यावर कुर्बान करावीत, असा एका मंद-मधुर, अनवट सुगंध... एका झाडातून एवढ्या प्रचंड प्रमाणात सुगंधाची निर्मिती करेल, असं दुसरं कोणतंही झाड नाही. पुष्पपरायण माणसाला हा वसंत ॠतू वेडा करून टाकतो. एक हजार वर्षांपूर्वी लिहिलेली ही चिनी कविता काय म्हणते बघा-

मी जर असतो एखादे झाड

एखादी कळी, एखादं पान

तरीही या वसंत ॠतूची सौम्य सुंदरता

जाणवली असती मला

मग मी तर आहे जिवंत माणूस

नवल कसले यात-

जर मी झालो हर्षाने बेभान, उन्मत्त?

होय फुलांनो, झालोय मी बेभान, उन्मत्त. आपले दोन्ही बाहू पसरून निमंत्रित करतोय तुम्हाला. या, ॠतुराज वसंत दाखल झाले आहेत. आता तुम्ही वेळ नका लावू! मी कोण आहे विचारता? सांगू?

मी रंगवतीचा भुलवा

मी गंधवतीचा फुलवा

मी शब्दवतीचा झुलवा

तुज बाहतसें

ओऽ होऽ! याऽ या, मि.नागकेशर. नागचाफा तुम्हालाच म्हणतात ना? तुमचं शास्त्रीय नाव मेसुआ फेरिया आहे. होय ना? अहो, तुम्हाला कल्पना आहे का- रंग-रूप आणि गंध या दोन्ही निकषांवर भारतातलं सर्वांत सुंदर फुलझाड तुम्ही आहात! तुमची पांढरी सुवासिक फुलं पाहणाऱ्याला वेड लावतात. तुमच्या फुलांच्या मध्यभागी जो पिवळ्या पुष्केसराचा गुच्छ असतो ना, त्यामुळं तुमचं सौंदर्य अनुपम झालं आहे. तुमची कोवळी पालवी वरच्या अंगाला गर्द किरमिजी आणि खालच्या अंगाकडून चंदेरी शुभ्र असते. तुम्हाला खास भारतीय वृक्ष म्हणून गौरविताना आम्हाला धन्य वाटते.

एखाद्या फुलाला मानपत्र द्यायची वेळ आली, तर हा छोटा लेखक निश्चितपणे तुम्हाला देईल. विल्यम जोन्स हे नाव तुम्ही कधी ऐकलंत का? भारतातल्या पहिल्या पिढीतले ते आंग्ल प्राच्यविद्याविशारद. जोन्सनी भारतीय वनश्री सृष्टीवर विलक्षण प्रेम केले. बरं का नागकेशरसर, आपल्या पुस्तकात त्यांनी असं लिहून ठेवलं आहे, ‘मी जगातल्या बहुतेक देशांतली उत्तमोत्तम फुले पाहिली. पण आकार, रंग, सौंदर्य आणि सुगंध या चारही बाबतींत नागकेशराच्या फुलांची बरोबरी करील असे फूल मी अद्याप पाहिलेले नाही.’ बघा पुष्पराज, आता आम्हाला आमचे कामधंदे सोडून तुम्हाला शोधत कोकण, बेळगाव, कारवारचा प्रदेश याच महिन्यात पालथा घालावा लागणार. एरवी औषधांत, काळ्या मसाल्यात तुम्ही भेटता ते रसनेच्या भाषेत. जोन्सनना जसे दिसलात, भावलात, तो अनुभव आम्हाला घ्यायचा आहे.

‘माझ्या गोव्याच्या भूमीत, चाफा पानावीन फुले’ असे बोरकर ज्या चाफ्याविषयी लिहितात, तो खुरचाफा असला पाहिजे. त्यालाच पांढरा चाफा म्हणून संबोधतात. त्याचे झाड खूप वाढते. लांबट पानांना त्यांच्या लांबीइतकी शीर असते. खोड वेडेवाकडे वाढते. अनाग्रही झाड आहे बिचारे. एखादी छोटी फांदी मातीत खुपसून थोडे पाणी दिले की, कुठेही वाढायला लागते. मार्चमध्ये हा ‘पानावीन’ फुलतो. गोव्यातच काय, कुठल्याही देवळात तो हमखास सापडेल. म्हणून याचे एक नाव ‘टेम्पल ट्री’ असेही आहे. फ्लुमेरिया ॲक्युटिफोलिया असे त्याचे शास्त्रीय नाव असून, हा मेक्सिकोतून आलेला वृक्ष आता भारतभर आढळतो. वसंत ॠतूत प्रामुख्याने फुलणारा कवठी चाफा दाट हिरव्या पानांचा सदाहरित वृक्ष आहे.

त्याची फुलं पिवळसर पांढऱ्या रंगाची असून फांद्यांच्या टोकाकडे एकेकटी येतात. सगळ्यात सुंदर आणि भारीचा चाफा आहे सोनचाफा. त्याचे फूल एक रुपयाला मिळते. मंद पिवळ्यापासून गडद सोनेरी रंगापर्यंत याच्या अनेक छटा आहेत. सोनचाफ्याला आपण ऑगस्ट महिन्यात पुन्हा भेटणार आहोत. भारतीय मनाला चाफ्याचे विलक्षण आकर्षण आहे, एवढे मात्र खरे. म्हणून तर मुलीचं नाव चंपा असतं. आपण माणसांना नाव देऊन फार कमी फुलांचा गौरव करतो, नाही का?

खिरणी या नितांत सुंदर झाडाशी माझे पिढीजात भांडण आहे. जशी आमराई, जांबवाडी असते, तशी खिरणीची प्रचंड संख्येची एकत्रित झाडं जहागिरीचा भाग म्हणून आम्हाला मिळाली होती. पण सहा पिढ्यांपासून आमची वाटणी मिळाली नाही. एरवी मला आमच्या खिरण्यांचा केवढा अभिमान वाटला असता! क्षीर म्हणजे खीर, दुधाची खीर. खिरीसारख्या गोडवा या फळांना असतो आणि ती मार्चमध्ये येतात. ही फळं नाही, पण वाटणीचे दुःख मला दर मार्चमध्ये खायला येतं. जाऊ द्या!

खिरणीचं झाड आंबा, बकुळ आणि चिकू या तिन्ही झाडांची एकत्रित आठवण करून देणारं सदाहरित झाड आहे. पावसाळा संपता-संपता त्याला फुलं येतात आणि हिवाळ्यात खारकी बोरांसारखी फळं लागतात. सुरुवातीला हिरवी असणारी ही फळं मार्चमध्ये पिवळी होतात. खाण्याजोगी होतात. जिंतूरला आमच्या वाट्याची खिरणीची झाडं आता माझा चिरदाह झाली आहेत.

बकुळीची फुलं कुणाला आवडत नाहीत? मार्चमध्ये बकुळ फुलायला लागते. तिची फुलं सुगंधी असून टिकाऊही असतात. फुलं वाळतात, पण कुजत नाहीत. वाळलेल्या फुलांनाही गंध येतो. ती ज्या मातीत उभी आहे, तिच्याखालची मातीही गंधवती झालेली असते. या फुलांचा एकंदर देखावा केसाळ असतो, म्हणून संपूर्ण झाडालाच केसरवृक्ष म्हणतात. तिची खाली गळून पडणारी फुलं म्हणजे केवळ केसर आणि केसरकल्पांची मंडले असतात. ती माळा करण्यासाठी सोयीची असतात. बकुळफुलांचा उपयोग मद्य सुगंधी करण्यासाठी प्राचीन काळात करीत असत. बकुळाच्या प्रदलापासून अत्तर निघते पावसाळ्यातही बकुळीला फुले येत राहतात. ती वसंत ग्रीष्मातल्यापेक्षा कमी असतात, एवढेच.

इंदिरा संतांची ‘लयवेल्हाळ’ नावाची कविता बकुळीवर आहे. त्या कवितेच्या सुरुवातीला त्यांनी बकुळीसाठी ‘ओवळी’ हा शब्द वापरला होता. ओवळी हे बकुळीचं कोकणी नाव. जिची फुले ओवायला येतात, ती ओवळी! बकुळीच्या वृक्षाखाली सकाळ-संध्याकाळ मुली फुले वेचतात आणि केळीच्या सोपटाच्या दोऱ्यात ओवून त्यांचे ‘वळेसर’ करतात. ओवळीचा सर याचेच संक्षिप्त रूप वळेसर हे झाले असावे, असे इंदिरा संतांना वाटते. महाकवी कालिदासाचं हे सर्वांत आवडतं फूल. पार्वतीच्या कमरेभोवती जी मेखला होती ती सोन्या-चांदीची नव्हती, ती होती बकुळफुलांची. कामदेव मदनाच्या धनुष्याची प्रत्यंचा बकुळफुलांची होती.

सेवाग्रामला महात्मा गांधींनी लावलेला एक पिंपळ आहे, त्याच्या शेजारी कस्तुरबांनी लावलेली बकुळ उभी आहे. शाहीर अमरशेखांनी ‘आपल्या समाधीवर बकुळीचे झाड लावावे’ असे लिहून ठेवले होते. बकुळीबद्दल गो.नी.दां.शी बोलताना त्यांनी बकुळीला हिंदीत ‘मौलश्री’ असे नाव असल्याचे सांगितल्यावर त्या नावाच्या व्यंजनेवर मी बेहद्द खूष झालो. बकुळीच्या फुलांची नाजूक रचना पाहताना मला तिचं इवलेपण आणि नक्षीदारपणा निसर्गाने जणू सुवर्णकारांसाठी आव्हान म्हणूनच तयार करून ठेवलाय, असे वाटायचे. बायकोला बकुळहार करू शकलो, याचा मला केवढा आनंद झाला! विशेषत: त्याला ‘मॅचिंग’ आणलेली, बकुळपुष्पांची कर्णफुले कसली गोड दिसत होती! खरोखर वनस्पतीसृष्टीतले बकुळीचे अस्तित्व लाजबाब आहे.

सिल्व्हर ओक मी पहिल्यांदा पाहिला चिखलदऱ्याच्या बागेत. हे महाशय ऑस्ट्रेलियाचे. एकोणिसाव्या शतेकाच्या उत्तरार्धात तो भारतात आला आणि सर्वत्र पसरला. त्याची ओळख पटते पानांवरून. पाने संयुक्त प्रकारची, 20 ते 30 सेंमी लांबीची, पिसाच्या आकाराची आणि सुंदर घडणीची असतात. याची पाने बारा महिने दिसतात. मार्चमध्ये पानझड होणे आणि लगेचच नवी पाने येणे हे कधी घडून गेले, कळतही नाही. धुळीने माखलेल्या शहरात याच्या पानांचे सौंदर्य कळत नाही. पाचगणीला भरपूर म्हणजे 25-30 मीटर वाढलेले सिल्व्हर ओक दिसतील. एरवी सिल्व्हर ओकची फुलं कधीच दिसत नाहीत. डॉ.सुनीला रेड्डींना एकदाच महाबळेश्वरला अनपेक्षितपणे दिसली अन्‌ त्या हरखून गेल्या.

‘शंभर-दोनशे छोटी फुलं असलेले हे वीतभर लांबीचे तुरे म्हणजे निसर्गाच्या अदाकारीचा उत्तम नमुना. मातकट चॉकलेटी देठांवर असलेल्या पिवळट हिरव्या रंगाच्या कळ्या, त्या कळ्या उमलल्यावर दिसणारी स्वल्पविरामा-सारखी पिवळी फुलं, इवल्याशा नखुल्याएवढ्या चॉकलेटी दोन पाकळ्या अन्‌ बरोबर मध्यात अडकलेला पिवळा स्त्री-केसर; दोन इवले हिरवे ठिपके खाली-वरती बीजकोश अन्‌ त्याच्या देठाचे. फुलं उमलता-उमलता त्या चॉकलेटी पाकळ्यांच्या मिठीतून पिवळा केसर आपली हळुवारपणे सुटका कधी करून घेतो अन्‌ त्या पंखुडिया विरहाने कधी गळून पडतात, ते कळतच नाही. मातकट देठावर तो पिवळा, दोन हिरवे ठिपके असलेला केशराचा गुच्छसुध्दा खुबसूरत दिसतो.

शंकासुर हे एक आवडते, दिसायला सुंदर ठिबक-ठाकडे झाड आहे. गुलमोहराची छोटी आवृत्ती वाटावी अशी त्याची फुलं. त्यातून मोराच्या तुऱ्यासारखे पुंकेसर ऐटीत बाहेर येतात, म्हणून त्याचे एक नाव ‘पिकॉक फ्लॉवर’ असेही आहे. मार्च आणि सप्टेंबर असा दोनदा त्याला बहर येत असला, तरी आपल्या रंगवैभवाने मिरवणारी ही फुलं वर्षभर दिसतात.

असं म्हणतात की, ब्राझील या देशाने जगाला तीन महान गोष्टी दिल्या- फुटबॉल, कॉफी आणि जॅकरँडा. निळ्या रंगाची फुलं एकूणच कमी. जॅकरँडा आपल्याकडे निळाई घेऊन आला. हे छानच झाले. आपण त्याला नीलमोहोर हे नाव देऊन अजून आपलंसं केलं. गुलमोहोर किंवा शंकासुराइतका अजून तो सर्वत्र झाला नाही, पण पुण्यात खूप आहे. म्हणून तर पुण्यातील वसंत बापटांनी त्याच्यावर पूर्ण कविता लिहिली. मात्र ती पुण्यापुरतीच खरी आहे.

जॅकरँडा जॅकरँडा

वाट भरून, घाट भरून

बागांमध्ये जागा धरून

इथे तिथे जिथे तिथे

वळणावरून फिरून फिरून

खूप खूप जॅकरँडा...

देविकाराणी या अभिनेत्रीने रशियाहून येताना एका सुगंधी झाडांची रोपं आणून त्यांची बंगळुरू भागात लागवड केली. बरसेरा त्याचे नाव. बंगळुरूहून 1970 च्या नंतर बरसेराची काही रोपं पुण्यात आली. त्यापैकी एक झाड पुणे विद्यापीठात आहे. तेही सर्वत्र व्हावे, ही इच्छा. कारण गुग्गळ, सालईप्रमाणे सुगंधी द्रव्य देणाऱ्या ‘धूपकूळ’ या फॅमिलीत त्याचा समावेश होतो. धन्यवाद देविकाराणी!

कॉपर पॉड किंवा पेल्टोफोरम हा पिवळ्या फुलांचा वृक्ष आला श्रीलंकेतून आणि सगळीकडे खूप-खूप झाला आहे. उंच आणि मोठा वाढणारा हा अनाग्रही वृक्ष वसंत ॠतूत नवी पालवी येते तेव्हा फारच सुंदर दिसतो. त्याला लोखंडाच्या गंजाच्या रंगासारख्या शेंगा येतात, म्हणून याच्या नावाला ‘फेरूजीनियस’ लागले. मार्चमध्ये आलेल्या पिवळ्या फुलांचा बहर मेअखेरपर्यंत चालतो. इतकेच नाही, तर जुलै-ऑगस्टमध्ये पुन्हा छोटा बहर येतो. तशी तर वर्षभर काही पिवळी फुलं याच्यावर दिसतातच. डोळ्याला बरे दिसण्याखेरीज कोणताही चांगला गुण यात नाही.

पांढरा कुडा या औषधी वनस्पतीला मार्चमध्ये फुले येण्यास आरंभ होतो आणि हा बहर जुलैपर्यंत चालू राहतो. शुभ्र आणि सुवासिक अशी त्याची फुले गुच्छानेच येतात, संस्कृतात त्याला कुटज असे नाव आहे. सातवीण, करवंद, कण्हेर यांच्या कुळामध्ये त्याचा समावेश होतो. काळा कुडाही असतो.

कढी, पोहे, आमटी किंवा भाजीच्या कुठल्याही फोडणीत ज्याची सुगंधीत पानं वापरतात, तो कढीपत्ता कुणाला माहीत नाही? बिचारा! पण पदार्थांना त्याने एकदा स्वाद आणून दिला की, ताटातून किंवा वाटीतून तो बाजूला काढला जातो. बागेत कढीपत्ता लावण्याचा प्रयोग मी चारही घरांत केला आहे. आणताना सुगंधी असल्याची नीट खात्री करूनच तो लावावा, कारण काहींना मुळीच सुगंध नसतो. वसंत ॠतूत त्याला फुले येतात. पावसाळ्यात मोठ्या झाडाच्या पायथ्याशी कोवळी-कोवळी अनेक रोपे उगवतात. कढीपत्त्याला कढीनिंब असेही म्हणतात.

रानपांगारा हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आढळणारा वृक्ष मार्चमध्ये जेव्हा फुलांच्या ऐन बहरात असतो, तेव्हा आपले डोळे त्याला टाळू शकत नाहीत. परिचित पांगाऱ्यापेक्षा रानपांगाऱ्याच्या फुलांचा रंग जास्त भडक आणि तेजस्वी असतो. दोन-तीन फुलांच्या गुच्छाने दाटीवाटीने ही फुले फांद्यांवर येतात. हा अस्सल भारतीय वृक्ष शोभा वाढविणारा असल्याने मोठ्या प्रमाणात त्याची लागवड व्हायला हवी.

अमुक एका झाडावर प्रेम करा, हे सांगण्यापेक्षा अमुक एका झाडावर प्रेम करू नका- हे सांगणे मला जिवावर येते. महाराष्ट्रात मधुमालती म्हणून ओळखली जाणारी वेल त्यापैकी एक आहे. तिच्यावर प्रेम करू नका, असं मला सांगायचंय. पण प्रेम आंधळ असतं, हेही खरं आहे. या झाडाला रंगूनचा वेल किंवा बारमासी म्हणतात. मालतीची फुलं अशी असतात का? अशी दिसतात का? मधुमालती म्हणताना तुम्हाला यात मालती दिसलीच नाही, तरी तिला हे नाव? बरं, मालती हे अत्यंत सुगंधी असं फूल आहे. तुम्ही मधुमालती म्हणता, त्याला कुठे आहे सुगंध? म्हणजेच प्रेम करणाऱ्यांना धड काही दिसत नाही, तसंच त्याचा धड वासही घेता येत नाही. याचा अर्थ तुमचं प्रेम नुसतं आंधळंच नाही, तर ‘सर्दुलं’सुध्दा आहे. तर ही तुमची तथाकथित मधुमालती किंवा मालती नसून रंगूनचा वेल किंवा बारमासी आहे.

वनस्पतीशास्त्रीय नाव कॉमब्रेटम इंडिकम असून पानांच्या कक्षात फुलांचे खाली लोंबणारे तुरे येतात. बहुधा खऱ्या मधुमालतीला आपण पावसाळ्यात भेटणार आहोत. तिचे वनस्पतीशास्त्रीय नाव ॲगॅनोस्मा सायमोझा आहे. बंगालमधून घेऊन याना तिची रोपं. या मालतीचं ‘मधु-मालती’ हे रवींद्रनाथ टागोरांनी केलं असावं. या नावानं त्यांची छान कविता मराठीतसुध्दा अनुवादित आहे. ती कविता वाचून आपण या नावाच्याच प्रेमात पडलो आणि भलत्याच वेलीला मधुमालती म्हणत राहिलो. अगदी डॉ.शरदिनी डहाणूकर यांच्याकडूनसुध्दा ही चूक होत राहिली. असो.

जिला मधुमालती समजून मी तिच्यावर प्रेम केलं, कविता लिहिल्या, कवितेत प्रतिमा म्हणून आणले; ती मधुमालती नाही, हा धक्का माझ्यासाठी मोठा होता. पण एवढ्यावर तो थांबला नाही, आणखी एक धक्का बसला. म्हणजे हे कसे झाले? तर-

‘‘बाळू, तुला एवढं घाबरून थरथरायला काय झालं?’’

‘‘मी ज्याला साप समजून काठीने मारायला गेलो तर ती दोरी निघाली.’’

‘‘ठीक आहे ना, मग थरथरा कापतोस कशासाठी?’’

‘‘मी काठी समजून मारायला घेतली, तो साप निघाला!’’

म्हणजे असं की, बंगालमधला महावेल मालती- ॲगॅनोस्मा सायनोझा- हीसुध्दा खरी मधुमालती नाही आणि टागोरांनी लिहिलेली कविता तिच्यावरची नाही. वैताग साला! थांबवायचा का शोध खऱ्या मधुमालतीचा? का जाऊ या, या गुलबकावलीपर्यंत? ठीक आहे, तुम्ही म्हणता तर जाऊ या. खऱ्या-खुऱ्या मधुमालतीकडे. महाकवी कालिदास जिच्या प्रेमात पडला, अभिज्ञान शकुंतलम्‌मध्ये जिचं भावोत्कट असं सौंदर्यदर्शन कालिदास घडवतो आणि कालिदासानं जिला ‘वसंतदूती’ हे बिरूद बहाल केलंय, ती मधुमालती.

कालिदासाने दिलेलं वसंतदूती हे नाव अगदी अन्वर्थक आहे, कारण मधुमालतीला फेब्रुवारीत फुलं यायला लागतात. वसंत ॠतूच्या आगमनासोबतच ती हळूहळू बहरायला लागते. हा वेल प्रचंड मोठा वाढणारा, भरपूर पसरणारा आणि बहुवर्षायू असा महावेल आहे. त्याचा बुंधा पंधरा ते पंचवीस सेंमी एवढा वाढू शकतो आणि एखाद्या वृक्षाचे वाटावे असे त्याचे लाकूड असते. सदाहरित असा हा महावेल फुलतो, तेव्हा दूरपर्यंत सगळ्या आसमंतात त्याचा सुगंध दरवळतो. फुलं पांढरट पिवळी दिसतात याचे कारण, पाच पाकळ्यांपैकी एक थोडी लहान पण पिवळसर रंगाची असते. या वेलीचे शास्त्रीय नाव Hiptage benghalensis असे आहे. ॠतूसंहाराच्या वि.वा. भिडे यांनी केलेल्या मराठी भाषांतरात मात्र हे नाव Aganosma Caryophyllata Don. Apocynacege असं दिलं असून ‘ॠतुसंहार’च्या सर्ग 2-24 आणि 3-18,19 मध्ये या वेलीचा उल्लेख आला आहे. सबंध देशभर- विशेषत: हिमालयाच्या पायथ्याच्या शिवालिक पर्वतापासून सह्याद्रीच्या जंगलापर्यंत हा महावेल सापडतो- मधुमालती.

पळसवेल नावाचा महावेल मार्चमध्ये फुलतो. त्याची फुले रंग आणि रूपाने पळसासारखीच असतात, म्हणून याचे संस्कृतात नाव लतापलाश असे आहे. उन्हाळ्यात त्याला शेंगा येतात, त्या शेंगांना पळसपापड्या म्हणतात. उत्तर कोकण आणि पुणे जिल्ह्यातील मुळशी भागातल्या जंगलांमध्ये आढळणारा पळसवेल एकंदरीत दुर्मिळच म्हणावा लागेल. पेंटकूळ, येकेल किंवा गरुडवेल नावाच्या महावेलाला याच काळात मोहोरासारखी असंख्य तांबूस, लवयुक्त फुले येतात. मूळ दक्षिण अमेरिकेतल्या उष्ण कटिबंधातून आलेला पोपटवेल किंवा बदकवेल मार्च ते ऑगस्ट या काळात बहरतो. अतिशय सुंदर आणि मोठी फुले असल्याने त्याला बागेत मुद्दाम लावतात.

वाघाटी किंवा गोविंदफळ नावाचा महावेल आठवतो. आषाढी एकादशीचे पारणे सोडताना- का कुणास ठाऊक- त्याच्या फळाची भाजी आवर्जून केली जाते. कुंपणावर ही वेल वाढलेली मी पाहिली आहे. आणखी एक वेल तारेच्या काटेरी जाळीपेक्षा भक्कम कुंपण असलेली लक्षात आहे. ती म्हणजे सागरगोटा. त्याच्या फळाला गजगे म्हणतात आणि मुली त्यांचा छान खेळ खेळतात. काटेरी डबी (पेटी) ठेवल्यासारखे हे गजगे वेलीवर येतात. सुरक्षित अंतर ठेवून, हा वेल जरूर पाहण्यासारखा आहे. अनंतवेल, उक्षी, मंडवेल, वतनवेल, सोनजाई याही वेलींना मार्चमध्ये फुले येतात.

बी.रघुनाथ माझे लाडके कवी. त्यांच्या एका कवितेवर कृष्णकमळ कसलं छान उगवलंय पाहा-

कृष्णकमळ जणू रात उमलली

प्रीत आपुली तिलाही कळली

कोमल तमतंतूंनी बघते

आपुले तुटले अंतर जुळवुनी

कृष्णकमळाच्या पाकळ्यांत जे केस असतात, त्यांचा रंगही काळसर असतो. त्यांना कोमलतम तंतू म्हणणे किती सुंदर आहे! इंग्रजीत पॅशन फ्लॉवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वेलीच्या भारतात एकूण सहा जाती आहेत. त्यांतली एक वन्य असून तिला पांढरी फुले येतात आणि त्यांना किंचित दुर्गंध येतो. उर्वरीत सर्व जाती उपवन्य आहेत. तणाव्याच्या साह्याने आधारांवर चढणारे कृष्णकमळ बागेत, मांडवावर, कमानीवर किंवा घराच्या काही भागावर चढवितात. कृष्णकमळाची फुले मोठी, आकर्षक, व्दिलिंगी, नियमित अशी असतात. फुलात पाच परिदले असतात. प्रदलांना खाली-वर आयाळ असते. या आयाळीला पुष्कळ केस तंतुमय असतात. वसंतात सुरुवात होत असली तरी कृष्णकमळाला पावसाळ्यात अधिक फुले येतात. गंध तर सुंदर असतोच.

कमळ या फुलाइतके सौंदर्य जगात कुठेही नाही. उगीच नाही सौंदर्यप्रेमी भारताने त्याला आपले राष्ट्रीय फूल बनविले! कमळाला वर्षातून तीन वेळा फुलं येतात. म्हणून आपल्या ॠतुचक्रात त्याचा गौरव आपण कमीत कमी तीन लेखांत करणार आहोत. कमळफुलाचे आयुष्य तीन वर्षांचे असते, तर कमळाचे बी हजारो वर्षे टिकते.

मदनाचा बाण असलेले- कामशर- सुगंधित असलेच पाहिजेत. लाल रंगाची कमळं विशेष सुगंधित असतात. निळ्या रंगाची कमळे- नीलोत्पलदेखील सुगंधी असतात. नीलकमळाने मध सुगंधित करतात आणि नील कन्दोट्टाने जल सुगंधित होते, असे गाथा सप्तशतीत (अनुक्रमे गाथा 534 व 622) म्हटले आहे. गाथा सप्तशतीत कमलपुष्पांइतके उल्लेख दुसऱ्या कोणत्याही फुलांच्या वाट्याला आले नाहीत.

कमळाच्या सुगंधाचे फार सूक्ष्म आकलन महाकवी कालिदासाला होते. ‘मेघदूत’मधील एका श्लोकात ‘प्रत्युषेषु स्फुटितकमला मोदमैत्रीकषाय:’ असे वर्णन येते. शांता शेळके या रसिकतेचा परमोत्कर्ष. त्यांनी या ओळीचे आकलन ‘उमलत्या कमळांचा कडवट, गोड स्वाद ही मुखचुंबनाची सुगंधी रुची’ या शब्दांत केले आहे.

दुर्गा भागवतांनी ‘भावमुद्रा’मध्ये एक जुनी कथा सांगितली आहे- वेदकाळाची. उषेच्या लग्नप्रसंगी देवांनी भूमीतल्या गंधातला अर्क काढून तो कमळांत भरला आणि ती अभिनव भेट तिला दिली. कमळाच्या गंधाला निखळ मधुर गंध असे कुणीही म्हणत नाही, तर त्या गंधाच्या कडवट छटेचा उल्लेख प्रत्येक जण करतो. हेच कमळगंधाचे वैशिष्ट्य आहे, असे म्हणता येईल. या अनोख्या गंधाच्या निर्मितीचे श्रेय मात्र कवी ब्रह्मदेवाला देतात.

सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पित:

तत्र सौरभनिर्माणे चतुरश्चतुराननं

अर्थ- कोणताही कुशल कारागीर सुवर्णाची आकर्षक कमळे तयार करू शकेल. ती लोकांना मोह पाडतील. पण ताज्या सोनकळ्यांमध्ये अंगचा सुगंध पेरून ठेवण्याची किमया फक्त ब्रह्मदेवाजवळ असते. कोणत्याही कारागिराची ती ऐपत नाही.

आपल्या कवितेतून ‘पृथ्वीचे प्रेमगीत’सारखी भव्य रूपकं निर्माण करावीत फक्त कुसुमाग्रजांनी. त्यांचे हे रूपक कमलामुळे मला आवडते.

आकाशाच्या सरोवरात

पृथ्वीचे हे विराट कमलपुष्प उमललेले आहे

आणि तो भ्रमरचंद्र

आपले रुपेरी पंख पालवून

त्या कमलाभोवती अखंड गुंजारव

करीत आहे

त्या कमळाच्या पाकळीवर

एक सुंदर दवबिंदू पडला आहे-

त्याचे नाव जीवन.

प्रा. विश्वास वसेकर, पुणे

Share on Social Media

चिनी महासत्तेचा उदय : 10

साम्यवादाकडून बाजारपेठेकडे

सतीश बागल

माओंच्या मृत्यूनंतर हुआ गुओफेंग व डेंग यांच्यात बंद दराआड सत्तेची रस्सीखेच सुरू असताना ही लोकशाहीची भिंत मात्र राजकीय स्वातंत्र्य, मानवी हक्क, लोकांच्या वाढत्या आकांक्षा- अशा अनेक मागण्यांनी व रंगांनी अक्षरशः फुलून येत होती. सांस्कृतिक क्रांती संपल्यानंतर व माओंच्या मृत्यूनंतर लोकांच्या कथनांना एक वेगळा बहर येत होता. वैयक्तिक अडचणी, त्या काळात झालेली ससेहोलपट, उद्‌ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या कहाण्या, राजकीय नेत्यांना जबाबदार धरणारी आरोपपत्रे, अधिक स्वातंत्र्याची व लोकशाहीची मागणी करणारी निवेदने- अशी अनेक प्रकारची कथने आणि मागण्या या लोकशाही भिंतीवर दिसू लागल्या. माओंच्या ग्रेट लीप फॉरवर्ड, सांस्कृतिक क्रांती इत्यादी जीवघेण्या कार्यक्रमांतून व जुलमी राजवटीतून बाहेर पडून चिनी समाज सजग, संवेदनशील व अभिव्यक्त होऊ लागल्याचे हे लक्षण होते. अभिव्यक्तीच्या या बहरामध्ये माओंबद्दलची नकारार्थी भावना आणि डेंग व सुधारणावादी यांच्याबद्दल चांगली भावना व्यक्त होत होती.

डेंग यांच्या अध्यक्षतेखाली चीनच्या आधुनिकी-करणासाठी असलेल्या समितीची (Forum on Principles to Guide Four Modernizations) बैठक दि.6 जुलै ते 9 सप्टेंबरदरम्यान झाली. सकाळी अधिवेशनात चर्चा, दुपारी प्रत्यक्ष काम व निर्णय असे कामकाज चाले. शेती, उद्योग, विज्ञान/तंत्रज्ञान व सैन्यदल या चार क्षेत्रांत आधुनिकीकरण कसे करावे, यासंबंधी ही बैठक होती. बाजारपेठा, विकेंद्रीकरण, किमती, परदेश व्यापार, तपशीलवार नियोजन व व्यवस्थापन/अंमलबजावणी यांचा विचार करीत आणि अडचणींतून मार्ग काढीत कामकाज चाले. शासकीय नियंत्रण जाऊ न देता परदेश व्यापार व आयातीचा खर्च कसा भागवायचा, त्यासाठी पेट्रोलियम-कोळसा कसा निर्यात करायचा, इत्यादी अनेक विषयांवर चर्चा होत असे.

1978 हे वर्ष डेंग यांच्या ध्येयधोरणांचा पाया घालणारे ठरले. या वर्षात चिनी शिष्टमंडळांनी परदेशी भेटी देऊन भविष्यकाळातील आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची मानसिक तयारी केली. डेंग यांनी विज्ञान-तंत्रज्ञान यातील संशोधनकामाला चालना देणारी पावले उचलली. उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविणारे धोरण आखून आधुनिक व बलाढ्य चीनचा पाया रचला आणि उद्योग व सैन्यदलाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने निवडक राज्य सरकारे व सैन्यदल यांना प्रोत्साहन दिले.

क्रांती व बदल याबाबत माओ यांचे एक ऐतिहासिक महत्त्वाचे भाषण आहे. त्यात त्यांनी असे म्हटले की, ‘प्रेअरी वा गवताळ प्रदेशात वणवा पेटण्यासाठी जशी केवळ एक ठिणगी पुरेशी असते, तव्दतच बदल होण्यासाठीही क्रांतीची एक ठिणगी पुरेशी ठरते.’ या भाषणाचा संदर्भ देऊन डेंग यांनी आर्थिक व इतर सुधारणांची ठिणगी 1977 व 1978 मध्ये कशी पाडली याचे वर्णन त्यांचे सुधारणावादी सहकारी हु याओबांग यांनी केले आहे. डेंग जिथे-जिथे जात तिथे ते पक्षाच्या स्थानिक नेत्यांना, अधिकाऱ्यांना पक्षाच्या जुन्या विचारांच्या चौकटीतून बाहेर पडून आर्थिक प्रश्नांना अधिक खुलेपणाने सामोरे जाण्यास उद्युक्त करीत. भाषणात समाजवाद हे दारिद्य्र जोपासणारे तत्त्वज्ञान नाही, तसेच समाजवादी विचारसरणीतही भांडवलशाहीची अनेक तंत्रे व मंत्र वापरून राहणीमान सुधारता येते, असे ठासून सांगत. माओंच्या विचारांच्या चौकटीत भांडवलशाहीचे तत्त्वज्ञान बसवून ते येणाऱ्या बदलाचे स्वरूप तेथील नेते व अधिकारी यांना समजावून सांगत. तीन बदके असणारा शेतकरी समाजवादी व पाच बदके असणारा शेतकरी भांडवलशाहीवादी- हे म्हणणे योग्य नाही, असेही ते म्हणत! तरुणपणी रशियात असताना त्यांनी ‘न्यू इकॉनॉमिक पॉलिसी’अंतर्गत छोटे उद्योगधंदे, कारखाने व काही औद्योगिक संस्था यांना मर्यादित प्रमाणात दिलेले स्वातंत्र्य आणि त्यासाठी असणारी मर्यादित बाजारपेठ हे सारे पाहिले होते. भांडवलशाहीतील काही तंत्र व मंत्र वापरून समाजवादी व्यवस्थेतही उत्पादकता वाढविता येते, हेही पाहिले होते. त्याचा उपयोग करून लोकांचे राहणीमान उंचावता येईल, असा त्यांचा विश्वास होता.

ही सर्व भाषणे व विचार अर्थातच माओ आणि हुआ गुओफेंग यांच्या विचारांच्या विरोधात असल्याने त्याचे प्रतिध्वनी बीजिंगमध्ये सारखे उमटत असत. डेंग यांची हुआ गुओफेंग व माओ यांच्यावर टीका करण्याची पध्दत अत्यंत संयमित, विचारपूर्वक व तपशीलवार असे. मार्क्सिझम-लेनिनिझम (Marxism-Leninism) हे एक ढोबळ फ्रेमवर्क आहे. त्यात माओ यांनी चीनमधील परिस्थितीनुसार थोडा बदल केला. हा बदल परिस्थितीसापेक्ष होता. उदा.- Marxism-Leninism मध्ये शहरांना ग्रामीण भागातून वेढले जाणे अथवा प्रथम ग्रामीण भाग व नंतर शहरी/नागरी भाग असा क्रम अपेक्षित नाही. परंतु चीनमधील तत्कालीन परिस्थितीनुसार (फार मोठा ग्रामीण भाग आणि तुलनेने कमी नागरी केंद्रे व शहरे) माओ यांनी ती स्ट्रॅटेजी वापरली. चीनशी व्यापार करण्यास वा पुरवठा करण्यास कोणी तयार नव्हते, म्हणून परदेश व्यापाराविरूध्द माओ उभे राहिले. मात्र आता तशी परिस्थिती नाही, असे डेंग सांगत.

नोव्हेंबर 1977 मध्ये डेंग यांनी ग्वानडाँग (र्ॠीरपवेपस) प्रांताचा दौरा केला व त्यादरम्यान आढावा घेऊन ग्वांगझौजवळील प्रदेशाचा आर्थिक विकास कसा करता येईल त्यावर खुली चर्चा केली; त्यानंतरच तेथील स्पेशल इकॉनॉमिक झोन (डएन) प्रकल्पास चालना मिळाली. फेब्रुवारी 1978 मध्ये सिचुआन येथे त्यांनी झाओ झियांग (नहरे नहळूरपस) यांच्याशी ग्रामीण व नागरी भागात काय सुधारणा करता येतील, त्यासंबंधीच्या सूचना स्थानिक पक्षाला व सरकारला दिल्या. त्यादरम्यान त्यानंतर ईशान्य चीनच्या दौऱ्याबाबतही त्यांनी अशाच पध्दतीने पुढे येणाऱ्या खुल्या अर्थव्यवस्थेचे सूतोवाच केले.

चीनमधील विविध भागांत व प्रांतांमध्ये अर्थव्यवस्था खुली करण्याबाबत पक्षातील व सरकारमधील नेत्यांची व अधिकाऱ्यांची मानसिक तयारी (1978 या वर्षात) करीत असताना, त्यांचा हुआ गुओफेंग यांच्याशी सत्तासंघर्ष हा बंद दराआड पक्षाच्या विविध बैठकांमध्ये निर्णायकी अवस्थेत पोहोचला होता. ‘सेंट्रल पार्टी वर्क कॉन्फरन्स’मध्ये धोरणे, कार्यक्रम व नियोजन याबद्दल तपशीलवार चर्चा होते; ती कॉन्फरन्स नोव्हेंबरमध्ये झाली. वास्तविक पाहता, ही चर्चा ‘फोर मॉडर्नायझेशन’ कार्यक्रमांतर्गतच्या शेती विभागाच्या नियोजनाची व अंमलबजावणी प्रकल्पाची होती. मात्र झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय वातावरणामुळे ही चर्चा अधिक व्यापक व राजकीय स्वरूपाची होईल, असे दिसत होते.

माओंच्या हयातीत तर अशी चर्चा करण्याचे स्वातंत्र्यच नव्हते. त्यामुळे सर्वत्र मोठा उत्साह संचारला होता. ही बैठक दोन कार्यक्रमांसाठी असली, तरी ऐन मोक्याच्या वेळी बैठकीला कलाटणी मिळाली व कामकाज वेगळ्याच दिशेने सुरू झाले. हुआ गुओफेंग यांचे प्रमुख सल्लागार मार्शल ये यांना या बदलाची चाहूल लागली होती. दि.11 व 25 नोव्हेंबरदरम्यानच्या या परिषदेतील तांत्रिक व आर्थिक स्वरूपाच्या बाबी बाजूला राहिल्या व परिषदेचा झोत राजकीय बाबींवर आला. पक्षातील, सैन्यदलातील, प्रादेशिक सरकारे व प्रादेशिक पक्ष संघटनांतील मिळून 210 प्रतिनिधी या परिषदेत उपस्थित होते. माओंच्या मृत्यूनंतर माओ व त्याच्या विचारांविरुध्द आणि त्याच्या जवळच्या, साथ देणाऱ्या नेत्यांविरुध्द वातावरण तापलेले होतेच. Two Whatevers या लेखांवरही लोक नाराज होते.

सांस्कृतिक क्रांती व त्यापूर्वी चीनची व्यवस्था बिघडली होती, याची जबाबदारी माओ यांच्यावर टाकावी, असे म्हणणाराही एक वर्ग होता. पण माओंचे चीनच्या व्यवस्थेतील महत्त्वाचे स्थान लक्षात घेता, असे करणे कोणालाही शक्य नव्हते. माओंच्या वारसावर हा राग व्यक्त होणे वा हुआ गुओफेंग यांना टार्गेट करणे, मात्र सुरू झाले. त्यामुळे गुओफेंग व वँग डाँगझिंग (Wang Dongxing) यांच्यावरील हल्ले अधिक तीव्र होत चालले.

परिषदेतील आर्थिक व तांत्रिकविषयक चर्चेला जसजसा राजकीय रंग चढू लागला, तसतसा जुन्या बाबी व अन्याय्य प्रकरणांचा व माओंच्या जवळच्या व्यक्तींचा उल्लेख होऊ लागला; त्यात त्यांची जबाबदारी निश्चित करण्याबाबत मागणी होऊ लागली. डेंग यांचे जवळचे सहकारी हु याओबांग व वँग ली यांनी माओकालीन कम्युन्सच्या रचनेवर व त्यातील वैगुण्यावर बोट ठेवीत टीकास्त्र सोडून वातावरण तापवून टाकले. माओ यांचे सुरक्षा सल्लागार कांग शेंग यांनी माओंच्या सांगण्यावरून अनेक नेत्यांना व व्यक्तींना यमसदनास पाठविले होते. त्या प्रकरणांची मरणोत्तर चौकशी करून त्यांची निर्भर्त्सना करावी, अशीही एक मागणी होती. त्यातच अत्यंत प्रभावशाली अशा बीजिंग पार्टी समितीने 5 एप्रिलची निदर्शने मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट-माओवादी क्रांतिविचारांशी पूर्णपणे सुसंगत होती व त्याचाच एक भाग होता, असे घोषित करण्याचा ठराव दाखल केला.

हुआ गुओफेंग यांनी सपशेल माघार घेत सर्व बाबींना तत्काळ मान्यता दिली आणि पूर्वीच्या अनेक निर्णयांशी असहमती दर्शवीत असे निर्णय रद्दबातल ठरविले. कहर म्हणजे, यासंबंधीचा ठराव मंजूर झाल्याची बातमी प्रत्यक्ष ठराव मांडण्यापूर्वीच वर्तमानपत्रातून आली. झपाट्याने विरुद्ध वाहणाऱ्या राजकीय वाऱ्यांबरोबर पाठ वळवून विरोधकांशी जमवून घेण्याचा हुआ यांचा हा प्रयत्न केविलवाणा होता. बदलणाऱ्या काळाची पावले समजण्यातच ते कमी पडले. मात्र हुआ हे माओंच्या विचाराचे प्रतिनिधी व वारस आहेत, ही बाब आता स्पष्ट झाली. वँग डाँगझिंग यांनी तर स्वत:हून लेखी आत्मनिर्भर्त्सना करून घेतली. तिसऱ्या प्लेनमच्या शेवटी हुआ व वँग डाँगझिंग यांना पॉलिट ब्युरोमध्ये तात्पुरते ठेवण्यात आले. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांना पॉलिट ब्युरो व पक्षातील महत्त्वाच्या पदांवरून हटविण्यात आले.

पॉलिट ब्युरोमधील डेंग यांच्या समर्थकांत वाढ झाली. डेंग यांचे सहकारी अर्थतज्ज्ञ चेन युन आणि सुधारणावादी वँग झेन पॉलिट ब्युरोमध्ये आले. त्यामुळे डेंग यांचा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा आला. एकंदरीतच गुओफेंग हे नामधारी अध्यक्ष राहिले. खऱ्या अर्थाने डेंग यांना सत्तेत सहभागी करून घेण्यात आले आणि ते सर्वेसर्वा झाले. शिवाय मार्शल ये यांनी सर्व सत्ता एकहाती एकवटू नये, याची काळजी घेतली. अर्थविषयक सुधारणा करणारे चेन युन यांचा दर्जा डेंग यांच्याइतकाच ठेवला होता. ही सामूहिक नेतृत्वाची पध्दत पुढे बरीच स्थिरावली.

बीजिंगमध्ये मध्यवर्ती सरकारची महत्त्वाची कार्यालये असलेल्या झौंगनहायमध्ये (Zhonganhay) तिसऱ्या महाअधिवेशनाची अशी नाट्यमय रीत्या सांगता होत असताना तिथून 500 मीटर अंतरावर असलेली लोकशाही भिंत (झिदान) अधिकाधिक सक्रिय होऊन राजकीय स्वातंत्र्याची मागणी करीत होती. चीनमध्ये परंपरेने गावागावांतून सरकार व जनता यांच्यात संपर्क ठेवण्यासाठी सार्वजनिक जागांचा वापर करण्यात येत असे. लोकांना द्यावयाच्या सूचना, मार्गदर्शन तत्त्वे इत्यादी सर्व सार्वजनिक जागेत नोटीसबोर्डावरून कळवीत असत. लोकांच्या तक्रारी व सूचनाही अशाच जागांमधून सरकारकडे जात. तिआनमेन चौकाला लागून असणारी हजारो फूट लांबीची व 12 फूट उंचीची भिंत ही पारंपरिक चिनी राज्यव्यवस्थेतील लोकांना समजून घेण्याची व समजावून देण्याची एक महत्त्वाची संस्था आहे. तिला झिदान किंवा Democracy Wall (लोकशाहीची भिंत) असे म्हणत.

झौंगनहाय (Zhonganhay) येथे नोव्हेंबर-डिसेंबर 1978 मध्ये पार्टी वर्क कॉन्फरन्स व तिसऱ्या अधिवेशनात चिनी कम्युनिस्ट पक्ष गुंतलेला असतानाच सामान्य लोकांमध्ये वेगळीच जागृती होत होती. माओंच्या मृत्यूनंतर हुआ गुओफेंग व डेंग यांच्यात बंद दरवाजाआड सत्तेची रस्सीखेच सुरू असताना ही लोकशाहीची भिंत मात्र राजकीय स्वातंत्र्य, मानवी हक्क, लोकांच्या वाढत्या आकांक्षा- अशा अनेक मागण्यांनी व रंगांनी अक्षरशः फुलून येत होती. सांस्कृतिक क्रांती संपल्यानंतर व माओंच्या मृत्यूनंतर लोकांच्या कथनांना एक वेगळा बहर येत होता. वैयक्तिक अडचणी, त्या काळात झालेली ससेहोलपट, उद्‌ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या कहाण्या, राजकीय नेत्यांना जबाबदार धरणारी आरोपपत्रे, अधिक स्वातंत्र्याची व लोकशाहीची मागणी करणारी निवेदने- अशी अनेक प्रकारची कथने आणि मागण्या या लोकशाही भिंतीवर दिसू लागल्या.

माओंच्या ग्रेट लीप फॉरवर्ड, सांस्कृतिक क्रांती इत्यादी जीवघेण्या कार्यक्रमांतून व जुलमी राजवटीतून बाहेर पडून चिनी समाज सजग, संवेदनशील व अभिव्यक्त होऊ लागल्याचे हे लक्षण होते. अभिव्यक्तीच्या या बहरामध्ये माओंबद्दलची नकारार्थी भावना आणि डेंग व सुधारणावादी यांच्याबद्दल चांगली भावना व्यक्त होत होती. विचारवंत, बुद्धिमंत व मध्यमवर्गीयांना अधिकाधिक स्वातंत्र्य व पाश्चात्त्य पध्दतीची राजकीय लोकशाही हवी होती.

सुरुवातीला तरी लोकशाही व लोकांना अधिक स्वातंत्र्य देण्याबद्दल डेंग खुलेपणाने विचार करीत होते. त्यांच्या 1979 मधील अमेरिका दौऱ्यानंतर मात्र लोकशाही व अधिक खुलेपणा याबद्दलची सर्वसामान्य जनतेची मागणी अधिक तीव्र झाली होती. या परिस्थितीत अधिक स्वातंत्र्याची मागणी मान्य केल्यास कदाचित गोंधळ होऊन त्यातून अराजकता येऊ शकते, असे डेंग यांना वाटू लागले. सप्टेंबर 1978 पासून चीनमध्ये स्वातंत्र्याची मागणी लोकांमध्ये जोर धरू लागली होती. सप्टेंबरमध्ये युथ लीग या संस्थेच्या जर्नल/नियतकालिकांतील अनेक लेख लोकशाही भिंतीवर दिसू लागले. ही संस्था पक्षाशी संबंधित होती. पक्षातील तरुण व उदयोन्मुख नेतृत्वाचे प्रशिक्षण या संस्थेत होत असे.

सांस्कृतिक क्रांतीदरम्यान बंद पडलेल्या या मासिकातील लेख आता इतके टोकाचे होते की, ‘अधिक राजकीय स्वातंत्र्य हवे,’ या मागणीबरोबर सांस्कृतिक क्रांती व माओंचे विचार यांच्यावर टीका करणारे लेखही यायला लागले. सांस्कृतिक क्रांतीत ग्रेट लीप फॉरवर्ड इत्यादी चळवळींमध्ये चिनी जनतेवर जे अन्याय झाले, जी संकटे आली; त्यास माओंना जबाबदार का धरू नये, अशा आशयाचे लेखही ‘लोकशाही भिंती’वर दिसू लागले. लोकशाही भिंतीवर (Xidan Wall) ज्याप्रमाणे सामान्य लोकांची गर्दी असे, त्याचप्रमाणे परदेशी पत्रकार व टुरिस्टही असत. त्यांच्यामार्फत या बातम्या हाँगकाँग व इतर देशांतही जाऊ लागल्या.

अमेरिकेन पत्रकार रॉबर्ट नोव्हाक व कॅनेडियन पत्रकार जॉन फ्रेझर यांच्यामार्फत बातम्या नुसत्या बाहेरच जात नसत, तर त्या भिंतीजवळ पाश्चिमात्त्य देशात लोकशाही कसे काम करते व तेथे सर्वसामान्य माणसाच्या मानवी हक्कांचे रक्षण कसे होते, याबद्दलची माहितीही लोकांना कळत असे. पुढे-पुढे तर ‘चायना ह्युमन राईट्‌स असोशिएशन’ नावाच्या संस्थेने पुढे जाऊन लोकशाही भिंतीवर लोकशाही, स्वातंत्र्य व मानवी हक्क यांचा 19 कलमी जाहीरनामाच प्रसिध्द करून टाकला. तिआनमेन चौकातून संतप्त विद्यार्थ्यांचा एक मोठा मोर्चा झाँगनहाय येथील कार्यालयावर व त्या परिसरात राहणाऱ्या वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांवर चाल करून गेला.

त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. वे जिंगशॉ ह्या प्राणी संग्रहालयात काम करणाऱ्या तरुण नेत्याने तर चीन सरकारने त्यांच्या फोर मॉडर्नायझेशन प्रकल्पात लोकशाहीचाही अंतर्भाव करावा, अशी संकल्पना हुशारीने मांडली. याला जागतिक मीडियाने बरेच कव्हरेज देऊन चीन सरकारची पंचाईत केली. स्वातंत्र्याची मागणी इतकी तीव्र झाली की, डेंग यांना काही तरी ठोस पावले उचलणे भाग होते. या काळात बुद्धिमंतांच्या विरोधात जाणे, हे डेंग यांना परवडले नसते. तरीही त्यांनी माओ, माओंचे विचार, क्रांती, पक्ष या साऱ्यांविरुद्ध बोलण्यास बंदी घातली.

दरम्यानच्या काळात, डिसेंबर 1978 मध्ये तिसऱ्या खुल्या अधिवेशनापूर्वी स्वातंत्र्य किती असावे, प्रचार विभागाचे कार्य माओंनंतरच्या काळात कसे चालावे- विशेषत: अधिक स्वातंत्र्य व अधिक खुलपेणा असावा, या मागणीच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी एक तात्त्विक परिषद (Conference on Theoretical principles) बोलविण्यात यावी, असे हुआ गुओंफेंग व मार्शल ये यांना वाटले. आर्थिक बाबतीतही पक्षात बऱ्यापैकी सहमती जमून येत असल्याने राजकीय स्वातंत्र्य, खुलेपणा, इत्यादी बाबतींतही काही मते अजमावून पाहावीत, असे मार्शल ये यांना वाटत होते. म्हणूनच 18 जानेवारी ते 15 मे 1979 दरम्यान पक्षाचा प्रचार विभाग व Chinese Academy of Social Sciences यांनी संयुक्तपणे ही परिषद आयोजित केली. प्रचार विभागाचे प्रमुख हु याओबांग होते.

पक्षाच्या प्रचार विभागाला 30 वर्षे पूर्ण झाली, हा योग साधून आणि यापुढे चारकलमी आधुनिकीकरणासंदर्भात प्रचार विभागाचे पुढील धोरण व दिशा काय असावी, हेही प्रयोजन होते. या परिषदेला एकूण 160 प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक वरिष्ठ नेते व सैद्धांतिक तत्त्वज्ञ या परिषदेत हजर होते. Xidan भोवती हजेरी लावणारे निदर्शक व परिषदेचे सदस्य या साऱ्यांनाच अधिक स्वातंत्र्य हवे होते. या परिषदेत सुधारणावादी/उदारमतवाद्यांची सरशी होत होती; परंतु विरोधाभास असा होता की, उदारमतवाद्यांची सरशी होते म्हणावे, तर त्यांची विरोधकांवर मात करण्याची पद्धत काही विशेष उदारमतवादी नव्हती.

Two Whatevers लिहिणारा पीपल्स डेलीचा तत्कालीन संपादक वू लेंगक्सी (Wu Lengxi) याला आत्म-निर्भत्सना (self-criticism) करण्यास सांगण्यात आले व त्यांनीही त्याचे कारण देऊन आत्म-निर्भर्त्सना (self-criticism) करून घेतली. उपसंपादक वॅन रुओशुई (थरप र्ठीेीर्हीळ) याने माओंवर टीका करीत त्यांच्या पूर्ण कालखंडावर प्रश्नचिन्ह उभे केले. या परिषदेतील भाषणांची इतिवृत्ते वरिष्ठ नेत्यांनी पाहिली, तेव्हा लोकांना-तरुणांना अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य हे पुढे सर्व शासनव्यवस्था, समाज व देश यांना कमकुवत करेल, त्यामुळे देशाची प्रगती होणार नाही, असे त्यांना वाटले.

चेन युन व ली झियानिन यांनाही प्रकरण हाताबाहेर जाते आहे असे वाटले. कडवे व काँझर्व्हेटिव्ह माओवादीही सावध झाले आणि डेंग व हु याओबांग यांच्यावरील टीका वाढू लागली. अमेरिकेची भेट आटोपल्यानंतर व व्हिएतनाम युद्धानंतर उसंत मिळाल्यावर 16 मार्चला डेंग यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले. हु किओमो आणि हु याओबांग यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी 30 मार्च 1979 रोजी या विषयावर भाषण दिले. त्यात त्यांनी महत्त्वाच्या चार तत्त्वांचा उल्लेख केला. समाजवादाचे तत्त्वज्ञान आणि कामगारवर्गाच्या हुकूमशाहीबाबत (dictatorship of proletariat) तडजोड नाही. कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व अबाधित राहिलेच पाहिजे आणि चौथे म्हणजे मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट तत्त्वज्ञान व माओ यांचे विचार पक्षाच्या केंद्रभागी असतील.

या चतु:सूत्रीनुसारच सरकार व पक्षाची पुढील वाटचाल होईल, हे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय स्वातंत्र्य आणि पक्षाचे व सरकारचे नियंत्रण यामध्ये समतोल ठेवला पाहिजे; तो ठेवला नाही, तर चीनमध्ये अराजक माजेल. बुद्धिमंतांना फारसे न दुखावता डेंग यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. डेंग यांच्या दृष्टीने राजकीय स्वातंत्र्य व सुधारणा यापेक्षाही आर्थिक सुधारणा महत्त्वाच्या होत्या. स्वातंत्र्य व सरकारी नियंत्रण यातील रस्सीखेच 1989 पर्यंत सुरूच राहिली. तिआनमेन चौकातील विद्यार्थ्यांची चळवळ 1989 मध्ये दडपून टाकली, तेव्हा हा समतोल बऱ्यापैकी बिघडला.

डेंग यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना आर्थिक प्रगती हवी होती, लोकांचे राहणीमान उंचावायला हवे होते आणि त्यासाठी अर्थव्यवस्था खुली करण्याची त्यांची तयारी होती. आर्थिक प्रगतीसाठी व भांडवलशाहीचे काही तंत्र-मंत्र वापरण्यास आणि त्यासाठी काही कामचलाऊ स्वातंत्र्य देण्यास ते तयार होते. मात्र राजकीय विचारांत कम्युनिस्ट तत्त्वज्ञान व कम्युनिस्ट पक्ष यांचे वर्चस्व केंद्रभागी राहणार होते. राजकीय स्वातंत्र्य, लोकशाही याबद्दल डेंग अजिबात विचार करणार नव्हते. डेंग यांचा हा पर्याय ही एक तडजोड होती. बुद्धिमंत खूश नव्हते, मात्र त्यांना माओंपेक्षा डेंग खूपच मवाळ व स्वीकारार्ह वाटले. बुद्धिमंत मध्यमवर्गाने त्यांच्या सुधारणावादी धोरणांना पाठिंबा दिला. मात्र खासगीत ते सरकारच्या एकाधिकारशाहीचा निषेध करीत. किंबहुना या बाबतीत डेंग यांनी देशातील बुद्धिमंतांची निराशाच केली.

डेंग यांना त्याची जाणीव होती. 1978 ते 1989 पर्यंत डेंग यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने आणि पक्षाने अनेक आर्थिक सुधारणा राबविल्या, अर्थव्यवस्था खुली करून आर्थिक विकास घडवून आणला आणि लोकांचे राहणीमान वाढू लागले. काही समूहांवर त्याचे काही विपरित परिणामही दिसू लागले. त्याबाबत मते व्यक्त करण्याचे वा निषेध करण्याचे स्वातंत्र्य मात्र नव्हते. 1989 पर्यंत चीनमध्ये स्वातंत्र्य आणि नियंत्रण यांच्या सीमारेषेवरील रस्सीखेच व तेथील तणाव जाणवत राहिला. 1989 मध्ये या तणावाने स्फोटक स्वरूप धारण केले.

डॉ. सतीश बागल, नाशिक

Share on Social Media

गावोगावचे दीपस्तंभ

डॉ. रवींद्र हर्षे : डॉक्टर नव्हे, पथदर्शक मित्र!

दत्तप्रसाद दाभोळकर

‘हा धंदा नाही, व्यवसायही नाही; हा आमचा धर्म आहे.’ असे म्हणत रुग्णसेवेत असलेल्या डॉ. नावंधरांवरच सविस्तर लिहिणार होतो. पण तोपर्यंत डॉ.रवींद्र हर्षे अचानक समोर आले. कारण डॉ.नावंधर अजून साठीच्या आसपास आहेत आणि डॉ.हर्षेंचा अमृतमहोत्सव सातारकरांनी नुकताच साजरा केला. यात तसे खास काही नाही, पण त्याच वेळी आमच्या वयाचा आमचा मित्र अण्णा देशपांडे याचा रौप्यमहोत्सव आम्ही डॉ.हर्षेंच्या अध्यक्षतेखाली साजरा केला. डॉ.हर्षेंबद्दल ऐकून होतो. अधेमधे या ना त्या कारणाने ओझरता भेटतही होतो. मात्र मित्राचा हा अनोखा रौप्यमहोत्सव साजरा करायला जमलेले आम्ही पंधरा-वीस मित्र आणि अध्यक्षमूर्ती डॉ.हर्षे. मला ही संधी त्यांना मित्रांसमोर बोलते करायला चांगली वाटली. वेळ अगदी योग्य. कारण आम्ही सारेच मित्र (डॉ.हर्षे धरून) तरंगणारे नव्हे; पण अधेमधे आनंदाच्या प्रसंगी थोडे तरंगणे वाईट नाही तर चांगलेच, असे मानणारे- शरीराला आणि मनाला तरतरी देणारे.

नरेंद्र तसा कमीच भेटायचा. कायम आपली धावपळ, भ्रमंती. मात्र भेटला की गप्पा भरभरून व्हायच्या. मात्र त्यात साधना कमीच असायची. विनोदही तसा कमीच भेटतो. मात्र भेटला की, अगदी भरभरून गप्पा. आणि त्याच्या गप्पांत फक्त साधना. त्याच्याशी गप्पा मारताना आम्हा दोघांना जवळजवळ एकाच वेळी एक विषय सुचला. भोवतालचे वातावरण घुसमटणारे आहे. नैराश्यपूर्ण आणि थोडेफार काळोखीही. केवळ राजकारणात नाही, तर प्रत्येक क्षेत्रात अशीच परिस्थिती आहे. अशा वेळी प्रत्येक गावात काही माणसे दीपस्तंभाप्रमाणे उभी आहेत. आपण त्यांना समजावून घेतले पाहिजे, गावोगावच्या सजग कार्यकर्त्यांनी अशा माणसांचा प्रेरणादायी प्रवास समजावून दिला पाहिजे.

विनोद म्हणाला, ‘पहिला लेख तुम्ही लिहावयास हवा.’ विचारात पडलो. तीस वर्षांपूर्वीचा हा एक प्रसंग डोळ्यांसमोर आला. मी त्या वेळी पन्नास वर्षांचा होतो. हे फार अडनिडे वय. माणूस धड तरुण नसतो आणि धड म्हाताराही नसतो! डॉक्टरांच्या दृष्टीने या वयाचा माणूस फार योग्य सावज व्हायची शक्यता! हे मत माझे नाही, माझा मित्र डॉ.रवी बापटचे. मला त्या वेळी महाराष्ट्रातल्या एका प्रख्यात डॉक्टरने ‘बायपास सर्जरी’ त्वरित करायला सांगितले. मी घाबरलो, तयारी करायला लागलो. हे कळल्यावर रवी बापटने मला फोनवरून खडसावले. म्हणाला, ‘‘एक-दोन महिन्यांपूर्वी आपण दोघे एकत्रितपणे महाराष्ट्रातील डोंगर-कडे चढलोय. तू अगदी ठणठणीत आहेस.

तो डॉक्टर माझा विद्यार्थीच आहे, पण त्याला ड्रायव्हर चालवत असलेली मर्सिडीज गाडी लागते. तू आणि मी आपापल्या जुन्या अँबॅसेडर स्वत:च चालवत असतो. गाडी विकून पैसे गोळा करून त्याच्या जाळ्यात अडकू नकोस. मी तुला वचननामा देतो- पुढील दहा वर्षांत तुझ्या हृदयाला कोणताही धोका नाही!’’ मी मग अर्थातच शस्त्रक्रिया करण्याच्या भानगडीत पडलो नाही.

भारतभर आणि तसे जगभर भरपूर हिंडून मी सतरा वर्षांपूर्वी सातारला कायमचा स्थायिक होण्यासाठी आलो. आल्यावर मला लगेच लघवीचा त्रास सुरू झाला. पुण्यातील प्रख्यात डॉक्टर्सनी मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करायला सांगितले, शस्त्रक्रिया पोट फाडून की बाहेरून किरणे वापरून, एवढेच ठरवायचे. यातील काय करावे, हे विचारायला सातारचे प्रख्यात मूत्ररोगतज्ज्ञ डॉ.नावंधर यांच्याकडे गेलो. त्यांनी तपासले, अहवाल पाहिले आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला शस्त्रक्रियेची गरजच नाही. साधी सुंता करू या आणि रोगजंतूविनाशक काही गोळ्या घ्या.’’ आता सतरा वर्षे झालीत, मला लघवीचा कोणताही त्रास नाही.

‘हा धंदा नाही, व्यवसायही नाही; हा आमचा धर्म आहे.’ असे म्हणत रुग्णसेवेत असलेल्या डॉ.नावंधरांवरच सविस्तर लिहिणार होतो. पण तोपर्यंत डॉ.रवींद्र हर्षे अचानक समोर आले. कारण डॉ.नावंधर अजून साठीच्या आसपास आहेत आणि डॉ.हर्षेंचा अमृतमहोत्सव सातारकरांनी नुकताच साजरा केला. यात तसे खास काही नाही, पण त्याच वेळी आमच्या वयाचा आमचा मित्र अण्णा देशपांडे याचा रौप्यमहोत्सव आम्ही डॉ.हर्षेंच्या अध्यक्षतेखाली साजरा केला.

डॉ.हर्षेंबद्दल ऐकून होतो. अधेमधे या ना त्या कारणाने ओझरता भेटतही होतो. मात्र मित्राचा हा अनोखा रौप्यमहोत्सव साजरा करायला जमलेले आम्ही पंधरा-वीस मित्र आणि अध्यक्षमूर्ती डॉ.हर्षे. मला ही संधी त्यांना मित्रांसमोर बोलते करायला चांगली वाटली. वेळ अगदी योग्य. कारण आम्ही सारेच मित्र (डॉ.हर्षे धरून) तरंगणारे नव्हे; पण अधेमधे आनंदाच्या प्रसंगी थोडे तरंगणे वाईट नाही तर चांगलेच, असे मानणारे- शरीराला आणि मनाला तरतरी देणारे.

मी म्हटले, ‘‘डॉक्टर, मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करू नका, फक्तच गोळ्याच घ्या असे म्हणणारा डॉक्टर मोठाच. पण त्याच्यावर असलेली जबाबदारी तशी मर्यादित. कारण उद्या त्रास फार वाढला, तर रोगी ऑपरेशन करायला मोकळा. मात्र हार्टसर्जरीची गरज नाही असे ठामपणे सांगणारे तुम्ही आणि रवी बापट म्हणजे थोर माणसे. रवी बापटांवरचे संस्कार महाराष्ट्राला माहीत आहेत; तुमचे बालपण, तुमच्यावरील संस्कार, तुमचे वैद्यकीय कार्य समजून घ्यायचंय.’’

डॉक्टर म्हणाले, ‘‘शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्र कोणत्या स्थित्यंतरातून जात होता, मुले-मुली कशी घडत होती, हे आजच्या मुलांनाच काय, तरुणांना पण माहीत नाही. माझे पणजोबा कडवे सनातनी. पुण्यात एका पेठेतून निघून पाठीमागच्या दुसऱ्या पेठेत निघतो, असा प्रचंड वाडा. पण माझ्या आजोबांना वाचन आणि चिंतन करताना ख्रिश्चन धर्म पटला. त्यांनी धर्मांतर केले. ख्रिश्चन झाले. रेव्हरंड ना.वा.टिळक वगैरे मित्र. प्रशस्त वाडा सोडून छोट्या चाळीत राहायला लागले. माझ्या वडिलांना प्रश्न पडला- माझा धर्म कोणता? त्यांनी सरळ पत्र पाठवून हा प्रश्न महात्मा गांधींना विचारला. महात्माजींनी त्यांना स्वहस्तक्षरात पोस्टकार्ड पाठवले.

ते पोस्टकार्ड वडिलांनी फ्रेम करून घरात लावले होते. पानशेतच्या पुरात ते वाहून गेले, पण ते पत्र वाचलेले काही जण आजही हयात आहेत. गांधींनी लिहिले होते, ‘तुझा धर्म तू स्वीकारायचा आहेस. सर्व धर्मांचा अभ्यास कर, योग्य वाटणारा धर्म स्वीकार. मात्र कोणताही धर्म न मानणारी, पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसेही आपल्याभोवती असतात, हे समजून घे.’ नंतर विवेकानंद वाचताना मला जाणवले की, विवेकानंदांनी पण नेमके हेच सांगितले आहे. या अशा मोकळ्या वातावरणात गीता, ज्ञानेश्वरी, ख्रिस्त पुराण, येशूच्या कथा (हे आजोबांनीच लिहिलेले पुस्तक) यांच्या सहवासात मी व माझे भाऊ-बहीण वाढलो. मला एक धाकटा भाऊ राजन हर्षे, बहीण वैजयंती पंडित.’’

मी डॉक्टरांना मधेच थांबवले. म्हटले, ‘‘तुमचा भाऊ व बहीण यांची नावे ऐकून होतो. त्यांचे कामही थोडे फार माहीत आहे. पण ते तुमचे भाऊ-बहीण आहेत, हे माहीत नव्हते. त्यामागची ही कौटुंबिक पार्श्वभूमी माहीत नव्हती. तुमची बहीण अर्थशास्त्रज्ञ आहे, अनेक मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहे. डॉ.राजन हर्षे यांचे काम तर खूपच मोठे आहे, मात्र ते महाराष्ट्राला फारसे माहीत नाहीत. बनारस हिंदू विद्यापीठ आणि अलाहाबाद विद्यापीठ ही उत्तरेतीलच नव्हे तर भारतातही अग्रक्रमात येणारी विद्यापीठे. एकही मराठी माणूस या विद्यापीठांचा कुलगुरू झालेला नव्हता.

गुरुदेव रानडे काही काळ या विद्यापीठात होते, पण त्यांनाही कुलगुरुपद हुलकावणी देऊन गेलंय. मात्र डॉ.राजन हर्षे- ज्यांनी आपले शिक्षण जेएनयूमधून पुरे केलेय ते- अलाहाबाद विद्यापीठाचे सलग पाच वर्षे कुलगुरू होते, ही गोष्ट सांगण्यासारखी आहे. कारण या विद्यापीठांमधील राजकीय हस्तक्षेप आणि उग्र विद्यार्थी आंदोलने यांमुळे गेल्या वीस वर्षांत दुसऱ्या कोणत्याही कुलगुरूंचा तेथे एक-दीड वर्षांपेक्षा अधिक निभाव लागलेला नाही. याचे श्रेय डॉ.राजन हर्षेही यांच्या विलक्षण प्रशासकीय कौशल्याला जाते. खरे तर मी त्यांच्यावर सविस्तर लिहिणार होतो. पण साधनाचे लेखक संकल्प गुर्जर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केलाय, ते सविस्तर लिहू शकतील म्हणून थांबलो. तर मनात येणारा प्रश्न- समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र असे विषय सोडून तुम्हाला डॉक्टर व्हावेसे का वाटले?’’

डॉक्टर म्हणाले, ‘‘तसे काही खास कारण सांगता येणार नाही. त्या वेळचे शिक्षण फार स्वस्त होते. मुंबई सोडून महाराष्ट्रात बी.जे.मेडिकल कॉलेज हे एकच वैद्यकीय महाविद्यालय होते, तेही पुण्यात होते. सहजपणे प्रवेश मिळत होता म्हणून 1962 मध्ये मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला. आपण आजारी माणसांची सेवा करू शकू, ही एक तरल भावना मनात असेल; पण खरे तर कोणत्याही माध्यमातून तुम्ही समाजाच्या उपयोगी पडू शकाल असे संस्कार होते. एम.बी.बी.एस. झालो, नंतर एम.डी. पण झालो.

‘‘मी पुण्याऐवजी साताराला आलो याला एक कारण आहे. माझ्या आईचे वडील म्हणजे सातारचे त्या वेळचे प्रख्यात डॉक्टर. सातारला येऊन प्रॅक्टिस करणारे ते पहिले एम.बी.बी.एस. डॉक्टर होते. मात्र आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचा संगम व्हावा म्हणून त्यांनी सातारला आर्यांग्ल महाविद्यालय स्थापन केले. आयुर्वेद अर्कशाळेची निर्मिती केली. चिरमुलेंनी सुरू केलेली सातारची विमा कंपनी आणि हिंगणे शिक्षणसंस्थेची कन्याशाळा सुरू करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्यामुळे सातारा शहराबद्दलचे एक आकर्षण मला होते, पण मी माझा दवाखाना मात्र वेगळा सुरू केला. येथील सरकारी हॉस्पिटलमध्येही जाणे-येणे सुरू केले. त्या वेळचे वातावरण वेगळे होते.

सरकारी हॉस्पिटलेही खूप चांगली होती, सेवाभावी होती. ज्यांनी रवी बापट यांनी लिहिलेले ‘केईएम वॉर्ड नंबर पाच’ हे आत्मचरित्र वाचले असेल, त्यांना याची कल्पना असेल. आयुष्य सरळ, संथ आणि सुंदर होते. डॉक्टरने सायकलने वा पायी जाणे हा रिवाज होता. स्कूटर लांबूनही खुणावत नव्हती.’’

मी संवादाचा धागा तोडला. म्हटले, ‘‘डॉक्टर तुम्ही परकाया प्रवेश करता, असे तुमचे अनेक पेशंट म्हणतात.’’ डॉक्टर हसले. म्हणाले, ‘‘मी पण ते ऐकलंय. पण डॉक्टरलाच नव्हे तर प्रत्येकाला समोरच्या माणसाशी वाद घालताना हे जमायला हवे. तुम्ही क्षणभर स्वत:ला विसरून त्या रोग्याच्या ठिकाणी स्वत:ला उभे करा. त्याच्या आर्थिक, पारिवारिक, सांस्कृतिक आणि शारीरिक समस्या क्षणभर तरी तुमच्याच होतात. मग मी समोरच्या रोग्याला त्याच्या समस्येवर असलेले वेगवेगळे पर्याय समजावून सांगतो. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करतानाही माणसे दगावलीत. खुद्द डॉ.नीतू मांडके अँजिओप्लास्टी करताना गेलेत. बायपास सर्जरी केलेल्या आणि ती नाकारलेल्या रुग्णांपैकी किती जातात, किती तगतात- ही आकडेवारी धूसर आहे, असे मला वाटते.

आम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा फक्त ईसीजी होता, स्ट्रेस-स्ट्रेन ईसीजीसुद्धा माहीत नव्हता, बायपास सर्जरी तर ऐकलीही नव्हती. हे सर्व सांगतो आणि शांतपणे निर्णय घ्यायला रुग्णाला सांगतो. त्यामुळे ‘बायपास सर्जरी करू नका’ असे मी सांगितलेली किमान शंभर माणसे सातारा शहराच्या अवतीभोवती असतील, असे माझ्याबद्दल बोलताना एक जण म्हणाले, ते अतिशयोक्तीचे नाही. तीन महिन्यांपूर्वी माझा अमृतमहोत्सव सातारा येथे साजरा केल्यावर मी एक उपक्रम सुरू केलाय. गेले तीन महिने 90 वर्षांवरील किती माणसे आऊट डोअर पेशंट म्हणून माझ्याकडे येतायत यांची नोंदणी करतोय.

असे दरमहा सरासरी 40 रुग्ण आहेत. फार पूर्वी ‘बायपास वगैरे करू नका’ असे सांगितलेली खेड्यातील माणसे योग्य आहार, शेतातील छान श्रम यांच्या जोरावर ठणठणीत दिसतात. ही माणसे कधी एकटी येतात, कधी आधारासाठी नातू किंवा पणतू असतो. मला वाटते, हे सर्वच आजारांबाबत आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम, मानसिक संतुलन यामुळे ‘क्रॉनिक ल्युकेमिया’ (पांढऱ्या पेशींचा कॅन्सर) यातून वाचलेली दहा-बारा माणसे साताऱ्यात आहेत, ती तुमच्या माहितीचीही आहेत. त्यांना असला काही आजार होता किंवा आहे याचीही कल्पना तुम्हाला नाही.

‘‘डॉक्टर म्हणून मी आणि माझे काही सहकारी डॉक्टर मित्र आणखीही काही गोष्टी करतो. ‘जेनेरिक मेडिसिन’ ही संकल्पनासुद्धा मोठ्या औषधी कंपन्यांनी आज हास्यास्पद ठरवली आहे. याच कंपन्या ही ‘जेनेरिक मेडिसिन’ बनवतात. फार कमी किंमत न ठेवता. याबाबत डॉक्टरांनी सजग असले पाहिजे. परवाच माझ्याकडे एक वृद्ध दांपत्य आले होते. पुरुषाला मधुमेह, पण तो औषधे घेणे थांबवणार म्हणत होता, कारण त्याला डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांची किंमत दरमहा पाच हजार रुपये होत होती. मी त्यांच्याबरोबर बसलो. महिन्याला केवळ चारशे रुपये लागतील आणि त्याला मधुमेहाचा त्रास होणार नाही अशी औषधे लिहून दिली.’’

मी म्हटले, डॉक्टर, ‘‘या अशा बातम्या उडत-उडत गावभर फिरत असतात, त्या सर्वांनाच आशादायक वाटतात; पण त्याचबरोबर डॉक्टर म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’, डॉक्टर म्हणजे फार महागड्या टेस्ट कारण नसताना करायला लावणारे, ही प्रतिमा समाजमानसात तयार झाली आहे. हे असे का होतेय?’’

डॉक्टर थोडे गंभीर झाले. म्हणाले- ‘‘कट प्रॅक्टिस आहे, ती घृणास्पद आहे. पण ती सार्वत्रिक आहे, असे मला किमान सातारा शहराबद्दल वाटत नाही. पण ती होऊ नये असे वाटत असेल, तर त्यामागच्या कारणांचीही सर्व स्तरांवर शांतपणे चर्चा व्हावयास हवी. सर्वच मानवी समाज चंगळवादात गुंतत चाललाय, हे त्यामागचे कारण नाही. मला वाटते, चार प्रमुख कारणे आहेत, आणखीही असतील.

‘‘खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची गरज आहे, की वैद्यकीय शिक्षण ही सरकारचीच जबाबदारी आहे, ही चर्चा बाजूला ठेवली तरी; आज खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षण प्रचंड महाग आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे शिक्षण मागासवर्गीयांच्या आवाक्याबाहेरचे आहे. ‘खाउजा’पूर्वी परिस्थिती वेगळी होती. माझ्या मुलीने 1990 मध्ये सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. आज खरेही वाटणार नाही, वसतिगृहातील राहणे आणि महाविद्यालयाची फी म्हणून पहिल्या वर्षी मला अकराशे चाळीस रुपये भरावे लागले. आज प्रचंड पैसे खर्च करून मुले डॉक्टर बनतात. त्यातून शहरी मानसिकता एवढी वाढली आहे की, शहरात सर्दी-पडसे झाले तरी एमबीबीएस डॉक्टर चालत नाहीत आणि एम.डी.,एम.एस. होण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतात.’’

‘‘हे केवळ इथेच थांबत नाही. तपासण्याची अत्याधुनिक साधने आली आहेत. ती गरजेची आहेत, मात्र त्यांच्या किमती कोटीच्या कोटी उड्डाणे अशा आहेत. सातारला आम्ही काही डॉक्टर मित्रांनी मिळवून अशी उपकरणे विकत घेतली. घर तारण ठेवून बँकेतून कर्जे काढली. त्याचा संपूर्ण अहवाल माझ्याकडे आहे, तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. मात्र त्यातून ही उपकरणे काही वर्षांत कालबाह्य होतात. आपले अडकलेले पैसे तरी मोकळे व्हावेत म्हणून आपल्या भोवतालच्या डॉक्टर्सना ‘ही वापरा, पैसे घ्या, कट घ्या’ ही कटकट सुरू होते. त्यातून एकदा ही उपकरणे वापरण्याची सवय लागली की, आपण रोग्याला तपासले पाहिजे, त्याच्याशी बोलले पाहिजे- हेच डॉक्टर विसरून जातात.

‘‘रोटी-कपडा-मकान या मानवी समाजाच्या मूलभूत गरजा आहेत, असे आपण नेहमी म्हणतो. पण शिक्षण आणि वैद्यकीय सेवा या मानवी समाजासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी आहेत. वैद्यकीय क्षेत्राबद्दल बोलावयाचे तर वैद्यकीय शिक्षण मोठ्या प्रमाणात व परवडणारे हवे. ती शासनाची वा सेवाभावी सामाजिक संस्थांची जबाबदारी हवी. ज्या भावनेने डेक्कन एज्युकेशन सोसायटी वा रयत शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, ती सामाजिक बांधिलकी यामागे हवी. वैद्यकीय पदवी मिळाल्यावर ग्रामीण भागात किमान दहा वर्षे सेवा देण्याचे बंधन हवे. त्याची अंमलबजावणी करण्याची कुवत असलेले प्रशासकीय कौशल्य हवे.

अगदी आजही गावात जसे शासकीय रुग्णालय असते, त्याप्रमाणे तपासणी करणारी अतिमहाग उपकरणे स्वस्त दरात सहज उपलब्ध करून देणारी शासकीय सेवाकेंद्रे हवीत. एके काळी डॉक्टर हा घराच्या व समाजाच्या दृष्टीनेही देव होता, आज तो राक्षस बनतोय. हे असे का होतेय? मला वाटते, आजचे वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय व्यवसाय व व्यवस्था यावर व्यापक विचारमंथनाची गरज आहे.’’

मी म्हटले, ‘‘डॉक्टर, थोडे विषयांतर. शेवटचा प्रश्न- सातारचे लोक सांगतात- सातारला व्यवसाय करायला आलात तेव्हा तुम्ही कडवे कम्युनिस्ट होता. नगरपालिकेच्या निवडणुकीत आपले कॉम्रेड मित्र पडणार, हे नक्की माहिती असूनही तुम्ही घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करायचात, तर आज तुम्ही ज्ञानेश्वरीवर प्रवचने देता. हा एवढा बदल कसा झाला?’’

डॉक्टर हसले. म्हणाले- ‘‘हा बदल नाही, खरं तर त्या वेळीही मी कडवा कम्युनिस्ट नव्हतो. कुठल्याच पक्षाचा साधा सभासदही नव्हतो. पण मी तेव्हा आणि आजही आतून व बाहेरूनही अगदी अंतर्बाह्य समाजवादी आहे. समाजवादाची माझी जाणीव धर्मग्रंथ अधिक समृद्ध करतात, असे मला वाटते.’’

दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा

Share on Social Media