Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

सात पापकर्मांमुळेच सात आव्हाने कठीण !

गेल्या आठवड्यात, प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘सत्तर वर्षांनंतरही सात आव्हाने कायम !’ या शीर्षकाचा संपादकीय लेख लिहिला होता. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमधील आठ शब्द, देशासमोरील आठ आव्हाने अधोरेखित करतात असे त्यातील मध्यवर्ती प्रतिपादन आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता हेच ते आठ शब्द. त्यातील सार्वभौमत्व राखण्याचे आव्हान आपण बऱ्यापैकी परतावून लावले आहे; त्याबाबतचा धोका संपुष्टात आलेला नसला तरी, संपूर्ण देश पुन्हा एकदा साम्राज्यवादी शक्तींच्या अधिपत्याखाली जाईल अशी शक्यता आता नाही असा त्याचा अर्थ. मात्र उर्वरित सात आव्हानांबाबत आपण समाधानकारक स्थितीत अद्यापही आलेलो नाहीत. सत्तर वर्षांचा कालखंड कोणत्याही (विशेषत: भारतासारख्या सर्व दृष्टींनी अवाढव्य व गुंतागुंतीच्या) राष्ट्रासाठी फार मोठा नाही, तरीही ती सात आव्हाने सुसह्य होताना दिसत नाहीत ही चिंतेची बाब निश्चितच आहे.

त्यामुळे पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की, ही आव्हाने इतकी कठीण का भासतात ? याचे उत्तर महात्मा गांधी यांनी ठासून सांगितली त्या सात सामाजिक पातकांमध्ये दडलेली आहेत असे म्हणता येईल. गांधीजींनी त्यांच्या ‘यंग इंडिया’ या साप्ताहिकात 22 ऑक्टोबर 1925 च्या अंकात ही सात सामाजिक पातके (sevan social sins) पहिल्यांदा लिहिली. या सात पातकांची यादी पूर्वीही ब्रिटनमध्ये या ना त्या छोट्या बदलांसह मांडली गेली होती, मात्र भारतात आणि नंतर जगातही ही सात सामाजिक पातके चर्चिली गेली ती गांधीजींमुळेच !

ही सात सामाजिक पातके कोणती? चारित्र्याविना शिक्षण, कष्टाविना संपत्ती, तत्त्वहीन राजकारण, नीतीमत्तारहित व्यापार, मानवतेविना विज्ञान, विवेकहीन सुखोपभोग, त्यागरहित भक्ती. विशेष म्हणजे या सात सामाजिक पातकांची यादी ‘यंग इंडिया’मध्ये प्रसिध्द केल्यानंतर, त्याबाबतचे काहीही स्पष्टीकरण गांधीजींनी त्या अंकात दिले नाही आणि नंतरही त्याचा अधिक विस्ताराने ऊहापोह केल्याचे पुरावे आढळत नाहीत. मात्र ती यादी प्रसिध्द करताना गांधीजींनी एका वाक्यात भाष्य केले होते ते असे की, ‘‘ही पातके समजून घेणे पुरेसे नसून, ती हृदयात पाझरली पाहिजेत.’’ या वाक्यातील भाष्य नीट समजून घेतले तर लक्षात येईल, गांधीजींनी त्या सात सामाजिक पातकांचे अधिक स्पष्टीकरण का दिले नसावे ! एवढेच नाही तर, ते याकडे किती गांभीर्याने आणि व्यापक व सखोल अर्थाने पाहात होते याचा पुरावा म्हणजे ते एक वाक्य!

त्यानंतर 22 वर्षांच्या हयातीत गांधीजींनी ती यादी जशीच्या तशी अनेक लोकांना दिली, अनेक प्रार्थना सभांमधून वाचायला सांगितली. त्यातही एक प्रसंग तर अधिक संस्मरणीय म्हणावा असा त्यांच्या नातवाने (अरुण गांधी यांनी) सांगितला आहे. गांधीजी भारतात कायमचे वास्तव्य करायला 1915 मध्ये आल्यानंतर त्यांचे दक्षिण आफ्रिकेतील काम चालू ठेवण्यासाठी चिरंजीव मणिलाल कुटुंबीयांसह तिथेच थांबले होते. त्यांचे चिरंजीव अरुण गांधी हे वयाच्या बाराव्या वर्षी जवळपास वर्षभर (1946-47) गांधीजींसोबत भारतात राहिले होते. अकरा वर्षे वयाचा छोटा अरुण दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या व काळ्या मुलांकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात ज्या प्रकारचे आक्रमक रूप धारण करीत होता ते पाहता तो हाताबाहेर जाईल की काय, अशी भीती त्याच्या आई-वडिलांना वाटत होती आणि म्हणून त्यांनी बापूंच्या सहवासात राहण्यासाठी त्याला वर्षभरासाठी भारतात पाठवले होते. हा छोटा अरुण वर्षभरानंतर दक्षिण आफ्रिकेला परत जाण्यासाठी निघाला तेव्हा शेवटच्या क्षणी त्याच्या हातात बापूंनी जी चिठ्ठी सरकवली, तिच्यात याच सात सामाजिक पातकांची यादी होती.

त्या वर्षभरात बापूंच्या सहवासात राहून दक्षिण आफ्रिकेत परतलेला अरुण अंतर्बाह्य बदलून गेला होता. नंतर तिथेच पुढील दहा वर्षे वास्तव्य करून, तरुण अवस्थेतील अरुण भारतात आला. पुढील तीन दशके त्यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये पत्रकारिता केली. त्यानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. गांधीजींची मूलतत्त्वे प्रसारित करण्यासाठी त्यानंतर ते कार्यरत राहिले. सर्वाधिक तळाच्या घटकांसाठी किंवा ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासाठी ते काम करीत आहेत, यात सर्व काही आले. त्या एक वर्षांच्या वास्तव्याचा नेमका काय परिणाम त्यांच्यावर झाला, याची झलक दाखवणारी दोन छोटी इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ‘लीगसी ऑफ लव्ह’ आणि ‘गिफ्ट ऑफ अँगर.’ यातील पहिल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद साधना प्रकाशनाकडून गेल्या वर्षी ‘वारसा प्रेमाचा’ या नावाने आला आहे, त्याचे प्रकाशन अरुण गांधी यांच्याच हस्ते कोल्हापुरात केले. दुसऱ्या पुस्तकाचा अनुवाद येत्या 2 ऑक्टोबरला येत आहे. (दोन्ही पुस्तकांचे अनुवाद सोनाली नवांगुळ.)

बापूंचा वारसा सांगणाऱ्या अरुण गांधी यांना ती सात सामाजिक पातके सर्व समस्यांच्या मुळाशी आहेत असे आजही वाटते. एवढेच नाही तर, त्यात त्यांनी स्वत:च्या अनुभवानंतर आठव्या पातकाची भर त्या यादीत टाकली आहे. जबाबदारीशिवाय अधिकार (rights without responsibilities) हेच ते आठवे पातक. त्यांच्या मतानुसार हे पातक आजच्या काळात म्हणजे एकविसाव्या शतकाच्या पहिल्या-दुसऱ्या दशकात कधी नव्हे इतके वाढले आहे. अर्थातच, म.गांधींनी जसे सात पातकांचे स्पष्टीकरण देणे टाळले आहे, तसेच अरुण गांधी यांनीही आठव्या पातकाचे अधिक स्पष्टीकरण दिलेले नाही. याचा अर्थ हे आठवे पातकही केवळ विचाराच्या पातळीवर समजून घेणे पुरेसे नसून, तेसुध्दा हृदयात पाझरले पाहिजे!

आता या सात-आठ सामाजिक पातकांवर नजर टाकली आणि कोणते यातील सर्वाधिक नुकसान करणारे आहे, असा प्रश्न विचारला तर कोणाही व्यापक व सखोल विचार करणाऱ्या माणसाला पटकन्‌ उत्तर देता येणे अवघड जाईल. कारण ती परस्परांशी इतकी निगडित आहेत, की त्यांना अलग-अलग करताच येणार नाही. ती पूर्णत: एकजिनसी आहेत वा अविभाज्य आहेत असेही म्हणता येईल.

मात्र या सात सामाजिक पातकांची स्पष्टीकरणे वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक लहान-थोरांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातील एक मोठे उदाहरण म्हणजे 1990 मध्ये आलेल्या स्टिफन कोवे यांच्या ‘सेव्हन हॅबिट्‌स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ या पुस्तकातील सातवे प्रकरण. त्यात त्यांनी व्यक्तिगत व सार्वजनिक, नैसर्गिक की राजकीय- सामाजिक या मुद्यांना स्पर्श केलेला आहे. अलीकडच्या काळात विजय ग्रोवर या प्राध्यापकाने लिहिलेल्या निबंधात (पेपर) असे मांडण्याचा प्रयत्न केला आहे की, या सातपैकी चारित्र्याविना शिक्षण/ज्ञान (knowledge or education without character) हे पातक जास्त नुकसान करणारे आहे. एवढेच नाही तर, हे पातक कमी करता आले तरच उर्वरित सहा पातके कमी करण्याच्या दिशेने प्रगती करता येईल, असेही त्यांचे मध्यवर्ती प्रतिपादन आहे. अर्थातच, यावर बरीच मतमतांतरे व्यक्त होतील. मात्र त्या दिशेने अधिक काम करणे गरजेचे आहे, ते काम तुलनेने सोपे आहे, तसे करणे हा त्यातल्या त्यात जवळचा मार्ग ठरू शकतो याबाबत सर्वसाधारण सहमती होऊ शकेल.

मागील वर्षभर गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त अनेक प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम देशभर विविध संस्था व संघटना यांच्याकडून झाले आहेत. त्यामध्ये उत्सवप्रियता आणि अधिक मुळाशी जाण्याचा प्रयत्न कमी दिसला तरी त्यामुळे वातावरणनिर्मितीला चांगलाच उपयोग झाला. मात्र त्या सर्व प्रक्रियेत गांधीजींचा शिक्षणविषयक विचार फार कुठे प्रकर्षाने अधोरेखित झालेला नाही. शिक्षणाबाबत गांधीजींनी अधिक सविस्तर मांडणी केल्याचे दिसत नसले तरी, प्रत्यक्ष कामातून सिध्दांत विकसित करणे आणि सिध्दांतांमधून प्रत्यक्ष कामातील कौशल्य विकसित करणे, हा गाभाघटक मात्र पुढे घेऊन जाण्याची गरज पूर्वी कधी नव्हे इतकी आज जाणवते आहे. त्या गाभाघटकाला हात घातला, तर आणि तरच बेरोजगारीच्या समस्येला भिडता येईल. मग चारित्र्याविना शिक्षण/ज्ञान हे पापकर्म कमी होण्याच्या दिशेने पावले टाकता येतील. आणि मग उर्वरित सहा (अरुण गांधींनी सांगितलेले गृहित धरले तर सात) पापकर्मे कमी होऊ लागतील. गांधी 150 नंतर आलेल्या 30 जानेवारीच्या निमित्ताने संदेश घ्यायचा आहे तो हाच!

Share on Social Media

चिनी महासत्तेचा उदये : 6

संस्थांची पुनर्बांधणी

सतीश बागल

डेंग यांनी आर्थिक नियोजन, औद्योगिक उत्पादन, चीनमधील विज्ञान व संशोधन क्षेत्राचे पुनरुज्जीवन, उच्च शिक्षण व विद्यापीठे यातील सुधारणा सुरूच ठेवल्या. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान वैज्ञानिक, संशोधक, प्राध्यापक व विचारवंतांचा जास्त छळ झाला. अनेकांना ग्रामीण भागात कष्टाचे काम करण्यासाठी पाठवून देण्यात आले. काहींच्या नशिबी तुरुंगवास आला. या छळवादाला कंटाळून काहींनी आत्महत्या केली, तर अनेकांनी संशोधकाचा पेशा सोडला. चायनीज ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या आधिपत्याखाली 1965 मध्ये 100 हून अधिक विज्ञानसंशोधन संस्था व केंद्रे होती आणि एकूण 25 हजारांवर वैज्ञानिक होते. दहा वर्षांत फक्त 15 संशोधनसंस्था कार्यरत राहिल्या आणि त्यात 5 ते 6 हजार संशोधक शिल्लक राहिले. डेंग यांनी ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे या शिखर संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यास प्रारंभ केला व उदारमतवादी हु या ओबांग यांना या कामासाठी नियुक्त केले.

माओ यांनी 1971 ते 1974 या कालावधीत सुरुवातीला स्वतःच आणि 1973 नंतर डेंग यांच्या मदतीने सैन्यदलावर व सुरक्षायंत्रणेवर आपले पूर्ण नियंत्रण स्थापित केले. लिन बिआओ यांच्या मृत्यूनंतर 1971 मध्ये सावध होऊन माओंनी स्वतःच मध्य व दक्षिण चीनमधील सैन्यदलाच्या अत्यंत महत्त्वाच्या तळांना भेटी दिल्या. बिआओ व त्यांच्या साथीदारांना निष्प्रभ करण्यासाठी त्यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना घरी पाठविले वा त्यांना महत्त्वाच्या पदांवरून हटवून इतरत्र नेमले. सर्व नेत्यांना व अधिकाऱ्यांना अशा रीतीने कह्यात ठेवण्यात यश आल्यानंतर माओ यांनी सैन्यदलातील अधिकाऱ्यांवरील टीकेची धार बोथट केली. झाऊ यांच्यावर झालेल्या टीकेसंदर्भात हात झटकून माओंनी जियांग शिंग व आपल्या दोन महिला स्वीय सहायकांना जबाबदार धरले. टीका करण्यात जियांग शिंगने व तिच्या चौकडीने (गँग ऑफ फोर) मर्यादाभंग केला, असाही आरोप माओंनी केला. आपल्याला हवे तेव्हा एखाद्याला हाताशी धरून कुणाला तरी टार्गेट करावे आणि तो सरळ झाल्यावर यासाठी भलत्यालाच जबाबदार धरून आपण नामानिराळे राहावे, ही माओंची पध्दत होती. झाऊंवरील राजकीय टीका बोथट झाली असली, तरी त्यांच्या असाध्य कर्करोगाने त्यांच्यावर मात करण्यास सुरुवात केली.

दि. 1 जून 1974 ला झाओ हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिेयेसाठी दाखल झाले आणि नंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत बहुतांश काळ या इस्पितळात होते. तत्पूर्वी 1974 च्या सुरुवातीला डेंग व झाऊ परत एकत्र काम करू लागले. झाऊ यांना माहिती होते की, डेंग यांनी त्यांच्यावर जी टीका केली ती माओ यांच्या दबावाखाली होती. माओंच्या इच्छेप्रमाणे डेंग हे जियांग शिंगबरोबरही काम करू लागले; परंतु जसजसे झाऊ खंगत चालले तसतसे डेंग यांच्या अधिकारात वाढ होत गेली आणि त्यामुळे जियांग शिंग यांची अस्वस्थता वाढत गेली. माओ यांनी आपले स्वतःचे भाषण 1974 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात सादर करण्यासाठी डेंग यांची निवड केल्यानंतर डेंग यांचा पुढील रस्ता खऱ्या अर्थाने मोकळा झाला. मात्र त्यामुळे जियांग शिंगची अस्वस्थता आणखी वाढली. तैवानऐवजी चीनला संयुक्त राष्ट्रसंघाने 1971 मध्ये मान्यता देऊन चीनचा समावेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत केला. मात्र असे असले तरीही चीनला फारशी प्रतिष्ठा अद्यापही प्राप्त झालेली नव्हती. कोणत्याही चिनी नेत्याने 1971 पासून ते 1974 पर्यंत संयुक्त राष्ट्रसंघापुढे भाषण दिलेले नव्हते.

एप्रिल 1974 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघापुढे आंतरराष्ट्रीय भूमिका मांडण्याची संधी चीनला प्राप्त झाली. हे भाषण राष्ट्रसंघापुढे- जगातील सर्व देशांच्या वरिष्ठ प्रतिनिधींपुढे करण्याची संधी डेंग यांना मिळाली. या भाषणात प्रामुख्याने माओंचेच विचार होते. त्यात आर्थिक विकासावर भर होता. झाऊ यांची पाश्चात्त्य देशांबद्दलची व एकंदरीतच परराष्ट्र व्यवहाराची सौम्य भूमिका लक्षात घेऊन माओ यांनी हे काम डेंग यांच्याकडे सोपविले. या भाषणाचे वैशिष्ट्य असे की, 1970 च्या दशकापासून सुरू झालेले फर्स्ट वर्ल्ड, सेकंड वर्ल्ड, थर्ड वर्ल्ड हे शब्दप्रयोग प्रथमच या भाषणात झाले. आर्थिक विकासानुसार देशांचे वर्गीकरण दर्शविणारा भाषेचा वापर या भाषणापासून सुरू झाला. अमेरिका व रशियासह प्रगत देशांना फर्स्ट वर्ल्ड व मागासलेल्या देशांना थर्ड वर्ल्ड हा वापर माओ यांनी या भाषणात प्रथम केला. त्यामुळे देशांचे वर्गीकरण त्यांच्या साम्यवादी क्रांतीच्या बांधिलकीवरून करण्यापेक्षा त्यांच्या आर्थिक प्रगतीवरून करणे अधिक श्रेयस्कर, ही माओ यांची भूमिका महत्त्वाची. या भाषणाचा अर्थ असा होता की, पारंपरिक साम्यवादी विचारांमध्ये काहीही असले तरी प्रत्यक्षात रशिया व अमेरिका हे दोघेही साम्राज्यवादी असून सर्व देशांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला, तर अन्याय व आर्थिक शोषण थांबविण्यासाठी दुसऱ्या व तिसऱ्या जगातील विकसनशील देशांनी एकत्र येऊन साम्राज्यवादी शक्तींना रोखले पाहिजे. युनोला गेलेल्या शिष्टमंडळाचे औपचारिक नेतृत्व परराष्ट्रमंत्री गुनहुआ यांच्याकडे असले तरी प्रत्यक्ष सत्तेच्या उतरंडीत वरिष्ठ असणाऱ्यांत व युनोच्या आमसभेत भाषण करणारे डेंग यांच्याकडेच शिष्टमंडळाचे नेतृत्व होते. डेंग यांच्या युनोच्या आमसभेतील भाषणाला उत्तम प्रतिसाद लाभला. तिसऱ्या जगातील विकसनशील देशांचे नेतृत्व चीन करू शकेल असे वाटावे, इतके ते ओशासक भाषण होते. शिवाय हे भाषण देत असतांना डेंग यांनी चीनच्या जबाबदारीचा जो उल्लेख केला, तो सर्वांना भावणारा होता. जगातील अन्यायित व शोषित अशा तिसऱ्या जगतातील देशांशी संबंध ठेवताना चीन कोणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि जर चीनने असे केले तर तो समाजवादी असूनही साम्राज्यवादी म्हणून गणला जाईल व तो निभर्त्सनेस पात्र असेल. अशा देशाला भले तो चीन असला तरी, अस्तित्वात असण्याचा अधिकार राहणार नाही, या भावपूर्ण उल्लेखाने चीनने सर्वांची मने जिंकली.

हेन्री किसिंजर यांनी डेंग यांची या दौऱ्यादरम्यान भेट घेतली. त्याचबरोबर जॉर्ज बुश (सिनिअर) व इतर अनेक अमेरिकन नेत्यांनीही डेंग यांची भेट घेतली. किसिंजर यांनी एक मार्मिक निरीक्षण नोंदवून ठेवले आहे. त्यांच्या मते, माओ व झाऊ या दोघांच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट प्रामुख्याने चीनची सुरक्षितता होते. डेंग यांना मात्र परराष्ट्रधोरणाचे उद्दिष्ट चीनला अधिक स्थैर्य, आर्थिक प्रगती आणि आधुनिकीकरण करण्यास मदत व्हावी हे होते. हेन्री किसिंजर जेव्हा पुढे चीनला येत, तेव्हा ते डेंग यांना भेटत. त्यांचे संबंध शेवटपर्यंत उत्तम राहिले. मात्र या युनोच्या भेटीत डेंग यांचा स्पष्टवक्तेपणा किसिंजर यांना गोंधळात पडणारा होता. रशियाशी तह करण्यात व समझोता करार करण्यात अमेरिकेचा खूप फायदा चीनमुळे झाला आहे. चीनचा वापर करून रशियाशी अमेरिका चांगले संबंध ठेवू इच्छिते, हे चीनवर अन्यायकारक आहे, असे डेंग यांनी किसिंजर यांना ठणकावून सांगितले. रशिया मुळात अमेरिकाविरोधी आहे हे अमेरिकेने समजून घ्यावे, असा सल्लाही डेंग यांनी त्यांना दिला. आपण अमेरिकेबरोबर किती कणखरपणे बोलतो हे माओंना कळणार, हे माहीत असल्याने डेंग या भेटीत फारच कडक व आग्रही दिसले. स्वतःकडे 1978 नंतर सत्ता आल्यानंतर मात्र डेंग याबाबतीत खूप लवचिक राहिले. झाऊ यांचा विषय काढला की, डेंग गप्प होत, ही बाबही किसिंजर यांना खटकली. कन्फ्युशियसबद्दल बोलताना डेंग यांनी ‘कन्फ्युशियस प्रतिगामी व क्रांतीविरोधी तत्त्वाचा ऐतिहासिक प्रतिनिधी आहे’ असे उद्‌गार काढले. किसिंजर यांनी जेव्हा अशा ऐतिहासिक व्यक्तींचा संबंध प्रत्यक्षात कसा येतो, हे विचारले, तेव्हा डेंग यांनी कन्फ्युशियस हा प्रतिगामी शक्तींचे एक प्रतीक आहे आणि आजच्या अनेक नेत्यांना ते लागू पडते, असे उत्तर दिले. कन्फ्युशियसबद्दलचा संदर्भ हा अर्थातच माओ यांच्या प्रभावामुळे होता.

पुढे तियानमेन प्रकरणानंतर चिनी राज्यकर्त्यांना चीनमध्ये सामाजिक स्वास्थ्याचे व सौहार्दाचे वातावरण हवे होते. त्यामुळे 1992 नंतर याच प्रतिगामी कन्फ्युशियसचे पुनर्वसन करण्यात आले आणि आज कन्फ्युशियस चीनचा राष्ट्रीय तत्त्वज्ञ/विचारवंत आहे, तर त्याचा पुतळा तियानमेन चौकात दिमाखाने उभा आहे. (हा पुतळा 2010 मध्ये जवळच्याच राष्ट्रीय संग्रहालयात हलविण्यात आला आहे.) न्यूयॉर्क सोडण्यापूर्वी डेंग यांनी वॉल स्ट्रीटला भेट दिली. विशेषत: अमेरिकन भांडवलशाहीच्या मूळ प्रेरणा काय आहेत, तिची संस्थात्मक चौकट कशी असते याची त्यांनी माहिती घेतली. डेंग चीनला परतले, तेव्हा झाऊ यांची तब्येत आणखीनच खालावली होती. दि.4 ऑक्टोबर 1974 रोजी, माओंनी डेंगना प्रशासनात झाऊनंतरचे सर्वांत महत्त्वाचे पद- वरिष्ठ उपपंतप्रधानपद दिले. जियांग शिंग व वँग हाँगवेन यांनी या नेमणुकीला आडमार्गाने बराच विरोध केला. मात्र माओ बधले नाहीत. जियांग शिंग ही खूपच महत्त्वाकांक्षी आहे आणि आपल्यानंतर ती सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करील, हे माओ यांना माहीत होते. डेंग यांचे नवे प्रमोशनही तिला सहन होत नव्हते. तिने 15 दिवसांत काही तरी कारण काढून डेंगबाबत माओचे मत कलुषित करण्याचा प्रयत्न केला. फेंगकिनलून हे 10,000 टनी जहाज चीनने स्वत: बांधल्यानंतरही डेंग व झाऊ हे त्याहीपेक्षा जास्त क्षमतेचे जहाज पाश्चात्त्य देशांकडून विकत घेत आहेत आणि त्यावरून ते दोघे भांडवलशाही धार्जिणे आहेत, असा प्रचार तिने सुरू केला. खवळलेल्या डेंगने पॉलिट ब्युरोच्या बैठकीत सभात्याग करीत ‘मी वयाच्या 16 व्या वर्षी 50 वर्षांपूर्वी फ्रान्सला गेलो होतो, तेव्हा साध्या जहाजांचे वजनही 40,000 टन असे’, असा टोला त्यांनी जियांग शिंगला मारला. या बाबतीत चीन मागासलेला आहे, असेच त्यांनी ध्वनित केले. प्रकरण तापले आणि जियांग शिंग व वँग हाँगवेन यांनी डेंग यांच्या विरोधात आघाडी उघडली. मात्र माओ हे सारे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी उलट डेंग यांना सांस्कृतिक क्रांतीमध्ये झालेल्या पडझडीतून बाहेर पडण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

जानेवारी 1975 मध्ये झालेल्या नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये डेंग यांच्या सत्ता-परतीवर शिक्कामोर्तब झाले. उपपंतप्रधान, सेन्ट्रल मिलिटरी कमिशनचे उपाध्यक्ष, पक्षाचे तिसरे उपाध्यक्ष व पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीचे सदस्य इत्यादी पदे डेंग यांना देण्यात आली. माओ यांनी डेंग यांना अनेक वरिष्ठ पदे देऊन त्यांना कामाची मोठी संधी उपलब्ध करून दिली होती. मात्र तरुण अननुभवी 39 वर्षांच्या वँग हाँगवेन या जहाल पंथीयाला पक्षाचे उपाध्यक्ष करून त्यामार्फत डेंग यांच्यावर राजकीय अंकुशही ठेवला. इतर जहाल व कडव्या सदस्यांनाही सत्तेत वाटा दिला. शिवाय कम्युनिस्ट पक्षाची प्रचारयंत्रणा जियांग शिंग आणि तिच्या तीन सहकाऱ्यांकडे दिली. पक्षाचे वर्तमानपत्र पीपल्स डेली, पक्षाचे जर्नल रेड फ्लॅग इत्यादींवर जियांग शिंग हिचे नियंत्रण होते. सत्तावर्तुळात वरिष्ठ नेते जियांग शिंग आणि तिचे सहकारी यांना चौकडी असे संबोधित असत. प्रसारमाध्यमे व पक्षाच्या प्रचारयंत्रणेवर त्यांचे नियंत्रण असल्याने ज्याला त्रस्त करावयाचे असेल त्याच्याविरुध्द माध्यमातून व प्रचारयंत्रणेतून हल्ला चढविण्यात येई. त्यामुळे सारेच या चौकडीला घाबरत असत. 1965 नंतर 10 वर्षांनी प्रथमच भरणाऱ्या महत्त्वाच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसमध्ये कर्करोगाशी सामना करणाऱ्या झाऊ एन लाय यांचे भाषण झाले. ही त्यांची शेवटचीच काँग्रेस, शेवटचेच भाषण आणि त्यांचे सार्वजनिक जीवनातले शेवटचेच दर्शन! 5000 शब्दांचे छोटे भाषण वाचून दाखवितानाच झाऊ यांची दमछाक झाली. विकलांग झाऊ यांना या अवस्थेत पाहून अनेकांचे डोळे पाणावले. डेंग यांच्यापुढे सांस्कृतिक क्रांतीत रुतलेल्या प्रशासनाचा गाडा पुढे घेऊन जाण्याचे आव्हान होते. माओंच्या विचारांचा उद्‌घोष करीत-करीत प्रशासकीय सुधारणा करणे व सांस्कृतिक क्रांतीच्या पडझडीतून नवा चीन उभारणे, हा डेंग यांचा कार्यक्रम होता. चिनी अर्थव्यवस्था कुंठित झाली होती, नियोजन पूर्णत: असफल झाले होते, शेती उत्पादन कमालीचे घटले होते, कारखाने बंद तरी पडले होते किंवा उत्पादकता खूप घसरली होती, वाहतूक व्यवस्था मोडकळीस आली होती. विद्यापीठे ओस पडली होती. विशेषत: विचारवंत, बुध्दिमंत, प्राध्यापक, संशोधक, लेखक या साऱ्यांना माओंच्या छळवादाचा फटका बसला होता. त्यामुळे प्रशासनाची घडी नीट बसवीत असताना या बुध्दिमंतांचेही पुनर्वसन करणे व त्यांना दिलासा देणे आवश्यक होते.

डेंग यांनी प्रशासनाच्या, संस्थांच्या व व्यवस्थापनाच्या प्रत्येक स्तरावर जबाबदारीचे सामूहिक नेतृत्व निर्माण करण्यावर भर दिला. सरकारातील अनेक विभाग, संस्था, विद्यापीठे इत्यादींमध्ये अशा प्रकारे डेंग यांनी प्रशासनाची व संस्थांची घडी परत बसविली. सैन्यदलाचा वापर सांस्कृतिक क्रांतीच्या दरम्यान सातत्याने नागरी व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तेथील गोंधळ दडपून टाकण्यासाठी केल्याने लष्करात अनेक अनिष्ट प्रथा व पायंडे सुरू झाले होते. लष्कराला आवश्यक असणारे प्रशिक्षण, शस्त्रसज्जतेसाठी व कार्यक्षमतेसाठी करावयाचे कार्यक्रम, सराव ठप्प झाले होते. मिलिटरी ड्रील्स बंद झाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये अरेरावी, उद्धटपणा तर वाढला होताच; शिवाय नागरी प्रशासन व पक्षाचे राजकारण यांच्याशी सातत्याने संबंध आल्याने सैन्यदलाचे राजकीयीकरण होत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पडलेले तट व संघर्ष यामुळे सैन्यदलाच्या नीतिधैर्यावर परिणाम झाला होता. सैन्यदलाची बेसुमार वाढ झाली होती व आधुनिकीकरणाला खीळ बसली होती. सीएमसीचे सदस्य व पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीचे सदस्य मार्शल ये जियानयिंग यांच्या मदतीने डेंग यांनी सैन्यदलाच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम सुरू केला. त्यात आधुनिक शस्त्रास्त्रे, सुसज्जीकरण, सुरक्षिततेविषयीचे धोरण व स्ट्रॅटेजीज तसेच सैन्यदलाच्या पुनर्रचनेचाही समावेश केला. लिन बिआओ यांनी 25000 अधिकाऱ्यांविरुध्द सूडबुध्दिने व राजकीय हेतूने कारवाई सुरू केली होती. डेंग यांनी त्याची चौकशी करवून त्यातील अनेकांना सैन्यदलात परतीचा मार्ग उपलब्ध करून दिला. सैन्यदलातील सैनिकांची संख्या विनाकारण वाढलेली होती. ती कमी करण्यासाठी वस्तुनिष्ठ मानके, शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण, सुधारित तंत्रज्ञान व सुरक्षाविषयीचे धोरण यांची पुनर्बांधणी सुरू झाली. या Downsizing मुळे काही वर्षांतच लष्कराची कार्यक्षमता वाढू लागली, आधुनिकीकरण सुरू झाले व खर्च कमी झाला. निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना व जवानांना पक्ष, सरकारी विभाग, ग्रामीण भागातील कम्युन्समध्ये वा उद्योग इत्यादींमध्ये समावून घेण्यात आले. गुणवत्तावाढीसाठी प्रगत तंत्रज्ञान, युध्दतंत्रे व व्यापक प्रशिक्षणाचा वापर करण्यात आला. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान बंद झालेली लष्कराची 101 प्रशिक्षण केंद्रे पुनरुज्जीवित करण्यात आली. सीएमसी व पॉलिट ब्युरोमध्ये डेंग व मार्शल ये यांनी जहालांना काळजीपूर्वक लांब ठेवले. आण्विक कार्यक्रम व क्षेपणास्त्र कार्यक्रम राबविणाऱ्या दोन केंद्रांचे कामकाज अंतर्गत भांडणामुळे थंडावले होते. आयसीबीएम चाचण्यासुध्दा 1974 मध्ये अयशस्वी झाल्या होत्या. या दोन्ही केंद्रांचे काम डेंग यांनी सुरळीत केले. सांस्कृतिक क्रांतीच्या गोंधळात जी संस्थात्मक पडझड झाली, त्यात पायाभूत क्षेत्राचे खूप नुकसान झाले. पोलाद, कोळसा, वाहतूक इत्यादी क्षेत्रांतील वाढ थांबली होती.

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी डेंग यांनी ज्या प्रशासकीय सुधारणा हाती घेतल्या, त्यात रेल्वे प्रशासन महत्त्वाचे होते. मात्र सांस्कृतिक क्रांतीच्या कालखंडात वाहतूक व रेल्वेव्यवस्था जवळजवळ कोसळली होती. रेल्वे सुधारणांना सुरुवात करण्यासाठी डेंग यांनी वायव्य जीआंग्सू प्रांतात झुनहौ या महत्त्वाच्या जंक्शनची निवड केली. या केंद्रातून पूर्व-पश्चिम जाणारी लाँग हाय व उत्तर-दक्षिण वाहतूक करणारी जिन पू असे दोन रेल्वेमार्ग जात असत. या जंक्शनमधून 1975 पूर्वी रेल्वे कधीही वेळेवर जात नसत, तेथील माल कधीही वॅगन्समध्ये वेळेत भरला जात नसे, मालाची चोरी होत असे. अनास्था व गोंधळ यामुळे वाहतुकीचा वेगही कमी असे. स्थानिक रेल्वे बोर्डाचा कारभार अतिशय ढिसाळ व अकार्यक्षम होता आणि बोर्डाच्या प्रमुखाचे पद राजकीय होते. स्थानिक राजकीय संघर्षामुळे कामगारांमध्ये व व्यवस्थापनात दोन तट पडले होते. कामगार व कार्यकर्त्यांमध्ये सशस्त्र गुंडही असत. त्यांचे नियंत्रण तेथील गोडाऊन्सवरही असे. मालाच्या चोऱ्या ही एक नित्याची डोकेदुखी होती. तेथील गुंड कामगारांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच स्थानिक गुंडांनी अडकवून स्थानबध्द करून ठेवले. शेवटी सेनेची कुमक पाठवून स्थानिक गुंडांचा बंदोबस्त करण्यात आला. अशा प्राथमिक साफसफाईनंतर डेंग यांनी या क्षेत्रातील अनुभवी प्रशासक वान ली यांना रेल्वे मंत्री नेमले. त्यानंतर नानजिंग व जिआंग्सूमधील इतर रेल्वे केंद्रांमध्ये अशाच पध्दतीने सुधारणा करण्यात आल्या. तंत्रज्ञान व व्यवस्थापनशास्त्राचा योग्य वापर, गुंडगिरीचा बीमोड, कार्यक्षम पध्दतींचा अंगीकार इत्यादींचा वापर करून रेल्वेमध्ये उत्तम सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतर रेल्वेचे कोचेस, इंजिने व इतर रेल्वेला लागणाऱ्या साधनांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांकडे व फॅक्टरींकडे ते वळले. तिथेही कार्यक्षमता व उत्पादकता वाढविण्यासाठी अशाच उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे रेल्वे फॅक्टरी व कारखानेही सुरळीत उत्पादन देऊ लागले. डेंग यांचे प्रशासकीय सुधारणांचे झुनहौ मॉडेल चीनमध्ये प्रसिध्द झाले. आधी तेथील प्रशासनाला वेठीला धरणाऱ्या स्थानिक गुंडांचा व त्यांना संरक्षण देणाऱ्या राजकीय नेतृत्वाचा बंदोबस्त करायचा- या निर्णयासाठी प्रथम केंद्र सरकार व पक्षात योग्य ती सहमती निर्माण करायची. केंद्र सरकारकडून तज्ज्ञ मंडळी प्रश्न सोडविण्यासाठी पाठवायची आणि यथावकाश तंत्रज्ञान व व्यवस्थापन तंत्रे वापरून सुधारणा करावयाच्या. या अनुभवावरून त्यांनी कोळसा उत्पादन, पोलाद, वीजनिर्मिती, खते, हलक्या औद्योगिक मशिनरी उत्पादन इत्यादी अनेक क्षेत्रांत सुधारणांची सुरुवात केली. डेंग यांनी आर्थिक उत्पादन वा उत्पादकतेत जी वाढ घडवून आणली, ती बरीचशी प्रशासकीय सुधारणांच्या माध्यमातून. सर्वच उद्योग सरकारच्या मालकीचे होते. त्यांच्यात व स्थानिक पक्ष संघटनांमध्ये नेहमीच अंतर्गत संघर्ष सुरू असत. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान रेड गार्ड्‌सनी उच्छाद मांडला होता. या राजकीय घडामोडींचा उद्योगांवर व तेथील कर्मचाऱ्यांवर विपरीत परिणाम झाला होता. डेंग यांनी त्याची दखल घेऊन पक्ष व सरकार यांच्यातील अंतर नाहीसे करून, राजकीय संघर्ष टाळून उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न केला.

डेंग यांनी 1975 मध्ये आर्थिक विकासाचा ध्यास घेतलेला असतानाच वँग हाँगवेन यांच्यावरील माओंचा विेशास डळमळीत होऊ लागला. झिजियांग प्रांतात गटबाजी व अंतर्गत संघर्ष याचा परिणाम होऊन राजकीय बंडाळी आणि अस्थिरता निर्माण झाली होती. माओ यांनी वँग हाँगवेन यांना झिजियांगचा प्रश्न सोडविण्यासाठी तेथे पाठविले. ते त्यांना जमले नाही. वँग हाँगवेन हे स्वत:च अतिशय जहाल असल्याने त्यांना समन्वयवादी भूमिका घेणे जमत नव्हते. झिजियांगमधील राजकीय बंड व सुंदोपसुंदीवर उपाय म्हणून डेंग यांनी राजकीय सहमती निर्माण करून व केंद्रातून दबाव आणून राजकीय स्थैर्य निर्माण केले आणि अंतर्गत संघर्ष संपविला. रेल्वेच्या बाबतीत झुनहौमध्ये जे काम वान ली यांनी केले, तसेच काम झिजियांगमध्ये जी डेंगकुई यांनी केले. या ठिकाणीसुध्दा कम्युनिस्ट पक्ष व माओ दोघेही डेंग यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले. दरम्यानच्या काळात डेंग यांनी आर्थिक नियोजन, औद्योगिक उत्पादन, चीनमधील विज्ञान व संशोधन क्षेत्राचे पुनरुज्जीवन, उच्च शिक्षण व विद्यापीठे यातील सुधारणा सुरूच ठेवल्या. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान वैज्ञानिक, संशोधक, प्राध्यापक व विचारवंतांचा जास्त छळ झाला. अनेकांना ग्रामीण भागात कष्टाचे काम करण्यासाठी पाठवून देण्यात आले. काहींच्या नशिबी तुरुंगवास आला. या छळवादाला कंटाळून काहींनी आत्महत्या केली, तर अनेकांनी संशोधकाचा पेशा सोडला. चायनीज ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या आधिपत्याखाली 1965 मध्ये 100 हून अधिक विज्ञानसंशोधन संस्था व केंद्रे होती आणि एकूण 25 हजारांवर वैज्ञानिक होते. दहा वर्षांत फक्त 15 संशोधनसंस्था कार्यरत राहिल्या आणि त्यात 5 ते 6 हजार संशोधक शिल्लक राहिले. डेंग यांनी ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे या शिखर संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यास प्रारंभ केला, उदारमतवादी हु याओ बांग यांना या कामासाठी नियुक्त केले. प्रथम ॲकॅडेमीमधून कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकाऱ्यांना व प्रचार यंत्रणेला बाहेरचा रस्ता दाखविला गेला. त्यानंतर ग्रामीण भागात व इतरत्र श्रमदानासाठी पाठविलेल्या संशोधकांना व वैज्ञानिकांना त्यांच्या संस्थामध्ये परत पाठविण्याचे काम सुरू झाले.

सांस्कृतिक क्रांतीत होरपळून निघालेल्या वैज्ञानिक/संशोधकांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यासाठी खास योजना तयार केल्या, त्यांच्या निवासाची व्यवस्था केली, त्यांना खास सुविधा दिल्या. वैज्ञानिकांसाठी खास वातावरण तयार करण्यावर भर देण्यात आला. विशेषज्ञ व तज्ज्ञ निर्माण करण्यासाठी बुध्दिमान व होतकरू संशोधकांना अधिक सोई-सवलती देण्याचे धोरण तयार केले गेले. ॲकॅडेमीने विविध प्रकारच्या आधुनिकीकरणाच्या कार्यक्रमांना व धोरणांना पूरक ठरणारे संशोधन कार्यक्रम हाती घेतले. संगणक, लेसर्स, रिमोट सेन्सिंग, बायो-सायन्सेस, अणुशक्ती, पार्टिकल फिजिक्स यासाठी विशेष अग्रक्रम देण्यात आला. परंतु हे सारे माओ यांच्या राजकीय विचारांच्या चौकटीत बसविणे तसे अवघडच होते. विशेषतः विज्ञान व तंत्रज्ञान यांना समाजात एक स्वतंत्र व उच्च दर्जा देणे हे पारंपरिक कम्युनिस्ट विचारसरणीत बसत नव्हते. एखाद्या वर्गाला अशा खास सवलती देणे कम्युनिस्टांच्या वर्गसंघर्षाच्या संकल्पनेच्या विरुध्द होते. या सुधारणा- विशेषतः उच्च शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, संशोधन क्षेत्रातील सुधारणा व साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील काही घडामोडींमुळे जियांग शिंग व तिच्या चौकडीच्या हातात मोठे कोलीत मिळाल्यासारखे झाले आणि पुढे डेंग यांना फार मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागले.

डॉ. सतीश बागल, नाशिक

bagals89@gmail.com

Share on Social Media

चिंतन : 4

जगन्मिथ्या म्हणजे तरी काय?

सुरेश व्दादशीवार

आपल्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्यांची मानसिकता तरी सामूहिक असते की एकाकी? ‘लेह-लडाख भागात फिरत असताना तेथील खर्दुगला या खिंडीपर्यंत जाता आले. तेथे भेटलेला अमरावती जिल्ह्यातला आरमळ नावाचा एक सैनिक म्हणाला, ‘‘साहेब, कसले हे आयुष्य ! प्राणवायू नाही, राहायला उबेची जागा नाही. दिवसभर उभे राहायचे आणि उत्तरेकडच्या बर्फाळ मार्गावर नुसतीच नजर लावायची. यात कुठे घर आहे आणि घरची माणसे ? उभे राहणे अशक्य झाले की थंडगार तंबूत नुसतेच पडायचे आणि तुम्ही त्या विविध भारतीवर ऐकविलेली आमची स्तुतिपर गाणी ऐकायची. कशाचे जगणे आणि या जगण्यालाच देशभक्ती म्हणायचे !’’ त्याच्या देशभक्तीला नमन करण्याखेरीज आपण तरी काय करतो ? अशी ठिकाणे आपल्यालाही आपले निराधार व एकाकी असणेच जाणवून देतात की नाही?

धर्मासारख्याच विचारसरणीही माणसांना एकारलेपण व श्रध्दांतधपण आणत असतात. आपल्या श्रध्देएवढे खरे दुसरे काही नाही. इतरांचे असणे हे निव्वळ खोटेपण, उर्मटपण व माजोरेपण. ते एकदा उतरले वा उतरविले की, तेही आपल्याच सोबत येतील या व अशा श्रध्दा माणसांचे कळप बनवितात. जोवर ते कळपातले अस्तित्व मन व मेंदूचा ताबा घेते, तोवर ही माणसे त्यांचा एक निर्जीव भाग बनतात. हे निर्जीवपण निकोप वा निष्पाप मात्र नसते. ते माणसांना प्रसंगी हिंस्र आणि इतरांवर आपल्या श्रध्दा व मते लादायला लावते. तसे करताना ते युध्दालाही प्रवृत्त होतात. माणसांच्या जातीचा इतिहास अशा युध्दांचा आणि त्यात पडलेल्या बळींच्या कहाण्यांचा आहे. श्रध्दा व मते यांची ही बेहोशी दीर्घ काळ व कधी कधी पिढ्यान्‌पिढ्या टिकते. पण तिलाही एक आयुर्मान असते आणि ती कालांतराने कमी होत संपत जाते. (कधी तरी मग तिच्या प्रतिक्रियाही त्याच समूहातून उठू लागतात.)

ती बेहोशी व नशा उतरली की, मग त्यांना त्यांचे स्वतः असणेच निरर्थक वाटू लागते आणि आपण काहीच व कशाहीसाठी उरलो नाही, असे नैराश्य आणत असते. राजकारणात भूमिका घेणारी, धर्मकारणातले एकांगीपण अंगीकारलेली किंवा कुठल्याशा बुवा-बाबाच्या मागे लागून सेवेकरी बनलेली माणसे अशी असतात. त्यांचे तसे असणे कीव करायला लावणारे आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर आलेले निरर्थ जीणेही दयनीय असणारे. हे एकाकीपण त्यांनी ओढवून घेतलेले असते. त्याचे खोटे समर्थन करण्यातच मग त्यांची असली-नसली बुध्दिमत्ता खर्ची पडत असते. आजचा काळ धर्मांचे हे एकारलेपण संपण्याचा व त्यावर विवेकाची मातब्बरी होत असल्याचा आहे. जुने आंधळेपण जाऊन त्याची जागा डोळसपणाने घेतलेली आहे. आता प्रोग्राम्स संपले आहेत. शिया व सुन्नी यांच्यातील युध्दे थांबली आहेत. अस्पृश्यता व वर्णविव्देष हे गुन्हेगारीचे विषय झाले आहेत. या बदलांमुळे ज्यांच्या अधिकारांना फटका बसला, ती माणसे कधी कधी त्याच जुन्या व्यवस्थांच्या संरक्षणार्थ तटबंद्या उभारताना दिसतात. पण त्यांचे आयुष्य ओसरत असल्याचे त्यांनाही कुठे तरी जाणवतच असते.

वर्ग, समाज आणि कौटुंबिक परंपरा व्यक्तींना ‘त्यांना एकाकीपण येत असते वा कधी तरी मी म्हणून जगायला तयार राहावे लागते’ याची शिकवण देत नाहीत. किंबहुना, व्यक्तीचे वेगळे असणे- अगदी व्यक्ती असणे हीच बाब या संस्थांना मान्य नसते. त्यांना आपले संघटन त्या वेगळेपणाहून अधिक महत्त्वाचे व मोलाचे वाटते. त्याचमुळे मी, ‘मी’ म्हणूनही कोणी तरी आहे, हे अनेकांच्या बहुधा लक्षातच येत नाही.

या संदर्भात प्रस्तुत लेखकाच्याच एका कादंबरीतला प्रसंग सांगण्याजोगा. एका क्षणी तो तिला म्हणतो, ‘‘अगं, या प्रसिद्ध घराण्याची सून म्हणून, या उद्योगशील नवऱ्याची पत्नी म्हणून आणि तुझ्या त्या गोड मुलीची आई म्हणून जगत असतेस. तुझ्या डॉक्टरीचाही एक भार तुझ्यावर असावा. या साऱ्या तुझ्या भूमिका आहेत. त्यात तू आहेस. पण त्या म्हणजेच तू नाहीस. कधी तरी या भूमिकांतून बाहेर पड- काही क्षण, काही काळ आणि मग स्वतः होऊन जग. तू ‘तू’ हो.’’ त्यावर ती निराशपणे म्हणते, ‘‘मी ‘मी’ म्हणून काही आहे, हे मला कधी कळलेच नाही. या भूमिकांखेरीज मी काही खरोखरीच असते काय, की माणसांनी केवळ भूमिकाच जगायच्या असतात?’’

सारे पाहून, अनुभवून आणि जगूनही आपल्याच अभेद्य कोषात राहणे काहींना जमते. आपले ‘सामर्थ्य’ त्या कोषाआड राहून ते जगाला दाखवितात. मात्र प्रत्यक्षात हे कोष कमालीचे विसविशीत व कच्चेही असतात. त्यातही एक पायरी निखळली की, त्याचा सारा संभार कोसळतो. ही स्थिती इतरांहून त्यांनाच अधिक अस्वस्थ व व्यथित करणारी असते. आपले झाकलेले उघडेपण मग त्यांना प्रकाशात दिसू लागते. म्हणून ही माणसे नवनवे कोष स्वीकारतात. एक कोषाभोवती दुसरा, मग तिसरा- अशी त्याची तटबंदी करण्याचा प्रयत्न करतात. पण गुलालाची खूप जाड खोळ भोवती असतानाही आतली मूर्ती एकटी व एकाकीच असते. तशीच ही माणसेही एकाकी असतात. ज्यांना सांगावेसे वाटावे असे विश्वासाचे कोणी असत नाही आणि जे असतात ते आपले दुबळेपण व आपलेपण कोणत्या अर्थाने घेतील, याचा त्यांनाच विश्वास वाटत नसतो. खरे तर तो त्यांना स्वतःविषयी वाटणारा अविश्वासच असतो.

राजकारणात, समाजकारणात आणि अन्य सामाजिक क्षेत्रातच नव्हे, तर अशी एकाकी माणसे सर्वत्र असतात. त्यांना छेडायचे नसते, विचारायचे नसते. कधी कधी त्यांनाच या कोषातून बाहेर यावेसे वाटले, तर ते सहानुभूतीनेच नव्हे तर आपलेपणाने समजून घ्यावे लागते. ज्यांना असे खुलता येत नाही, ती माणसे सारे आयुष्य त्या अदृश्य खोळीआडच काढत असतात. बहुतेक माणसे अशीच असतात की याहून वेगळी- मोकळी किंवा हे कोषही यशस्वीपणे दडवता आलेली. त्यांची खोळ कुणी तरी काढली नाही, तर ती तशीच कायम राहते. ही माणसे क्वचित कधी उलगडल्यागत होतात. पण मग तो उलगडलेला भाग झपाट्याने मिटूनही टाकतात. मग पुढचे प्रश्न वा संवादच थांबतात. सार्वजनिक जीवनात जगणाऱ्यांची जर ही स्थिती, तर त्यात नसलेल्या अंगणबध्दांची अवस्था कशी असेल ? सायकॉलॉजिक कौन्सेलिंग करणाऱ्या एका महिलेने फार पूर्वी सांगितलेली ही गोष्ट आहे. तिच्याकडे येणाऱ्या बहुतेक स्त्रिया दर दिवशी नवऱ्याचा मार खायच्या. त्यातल्या काही बंडखोर आणि घटस्फोटाची भाषा बोलणाऱ्या, तर काही हे स्त्रीचे प्राक्तन व नवऱ्याचा अधिकार म्हणून गप्प राहणाऱ्या. अगदी जखमी होऊन रक्तबंबाळ होईपर्यंत मार खाणाऱ्या सुशिक्षित स्त्रियांचाही यात समावेश होता. बायकोला मारहाण करण्याआधी तिला विवस्त्र करणे व ती बाहेर जाऊ शकणार नाही, असा बंदोबस्त करणे- हाही त्यातल्या काही दुष्टांचा व्यवहार असतो... प्रस्तुत लेखकाच्या उपरोक्त कादंबरीत आलेली स्त्री एवढ्या दुष्टाव्याचा बळी नव्हती. तरीही तिचे कोंडलेपण सातत्याने जाणवणारे होते. एकदा तो तिला म्हणाला, ‘‘अगं, तुझ्या या घराला दारं आहेत.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘दारं आहेत, पण बाहेर जायचा रस्ता नाही.’’

‘माय फ्युडल लॉर्ड’ हे तेहमिना दुर्रानी हिचे आत्मचरित्र ज्यांनी वाचले, त्यांना स्त्रीची भीषण कहाणी या ठिकाणी आठवावी. कोणतेही कारण नसताना तिचा, पश्चिम पंजाबचा (पाकिस्तान) गव्हर्नर असलेला नवरा तिला रात्री दारू पिऊन मारायचा. तोच त्याचा छंद होता. या मारहाणीला कंटाळलेल्या त्याच्या पत्नीनेच मग नाइलाजाने त्याच्याशी एक करार केला. ‘मारहाणच करायची, तर खुशाल कर. पण चेहऱ्यावर व गळ्यावरती करू नकोस. कारण उद्या त्याचे व्रण इतरांना दिसतील.’ ही असहाय्यता, बेडी, तुरुंग संस्कारांचे बंधन, तिचे दुबळेपण, नात्याची प्रतिष्ठा, की एकूणच सगळ्या स्त्रीजीवनाची असहायता ?

हा प्रकार पुरुषांच्याही वाट्याला येणारा आहे. मात्र त्याची चर्चा होत नाही आणि त्यांचे कौन्सेलिंगचे वर्गही होत नाहीत. अशा वर्गात जाणे हा आपल्या कमीपणाचा भाग आहे आणि त्यातून आपले एकाकी व दुबळे असणे उघड होणार आहे, असे त्यातल्या अनेकांना वाटत असते. पूर्वीच्या गुलामांचे जगणे कसे होते, आपल्यातील गावकुसाबाहेरच्या माणसांची अवस्था कशी होती ? गुलामांना आत्मा नसतो, असे ॲरिस्टॉटलही म्हणाला. त्याला त्यांचे माणूस असणे मान्य नव्हते काय ? ते तसे नसेल, तर एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगात झालेल्या सर्वच पिढ्यांना ते मान्य नव्हते, असे म्हणावे लागेल. गुलामांचे बाजार केवळ आफ्रिकेत वा पाश्चात्त्य देशातच नव्हे, भारतासारख्या पौर्वात्य देशातही होते. मीना बाजार हाही त्याचाच एक चेहरा होता की नाही ? याही पुढे जाऊन मध्ययुगातील युध्दबंद्यांच्या कथा सांगता येतील. त्यांच्या तर लाखांनी कत्तली होत. त्यांच्या नावाने स्मृतिस्तंभ उभारणे वेगळे आणि त्यांचे त्या काळचे मन जाणून घेणे आणखी वेगळे. आपल्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्यांची मानसिकता तरी सामूहिक असते की एकाकी? ‘लेह-लडाख भागात फिरत असताना तेथील खर्दुगला या खिंडीपर्यंत जाता आले. तेथे भेटलेला अमरावती जिल्ह्यातला आरमळ नावाचा एक सैनिक म्हणाला, ‘‘साहेब, कसले हे आयुष्य ! प्राणवायू नाही, राहायला उबेची जागा नाही. दिवसभर उभे राहायचे आणि उत्तरेकडच्या बर्फाळ मार्गावर नुसतीच नजर लावायची. यात कुठे घर आहे आणि घरची माणसे ? उभे राहणे अशक्य झाले की थंडगार तंबूत नुसतेच पडायचे आणि तुम्ही त्या विविध भारतीवर ऐकविलेली आमची स्तुतिपर गाणी ऐकायची. कशाचे जगणे आणि या जगण्यालाच देशभक्ती म्हणायचे !’’ त्याच्या देशभक्तीला नमन करण्याखेरीज आपण तरी काय करतो ? अशी ठिकाणे आपल्यालाही आपले निराधार व एकाकी असणेच जाणवून देतात की नाही ? तात्पर्य- हिमालयावर असो वा त्याच्या तळाशी, त्या साऱ्याच जागी असे एकाकीपण पाहता येते.

हे एकाकीपण वा दुर्लक्षित असल्याचे जाणवणे फक्त व्यक्तींच्याच वाट्याला येते असे नाही, ते संस्था संघटनांच्याही प्राक्तनात असते. जरा डोळसपणे समाजाकडे पाहिले की, या संस्था संघटनांचे व त्यातील व्यक्तींचे असे एकटेपण स्पष्ट दिसू लागते. राजकीय कार्याचे वा समाजसेवेचे कंकण बांधून असलेल्या संस्था-संघटनांनाही समाजातील बदल व त्याची बदलणारी मानसिकता लक्षात घेता आली नाही की त्यांचेही असे होते. आजच्या सर्वोदयाची व गांधीवादी संघटनांची स्थिती अशी आहे. एकेकाळी अतिशय शक्तिशाली असलेल्या शेतकरी संघटनेचे अस्तित्वही आता शोधावे लागते. राज्या-राज्यांत अशा संपलेल्या वा संपत असलेल्या संघटनांची नावे येथे सांगता येतील. हेच प्राक्तन येत्या काही काळात रा. स्व. संघावरही येण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. सगळ्या विचारसरणी आणि तत्त्वज्ञानाचा शेवट होत असल्याचा हा काळ आहे, असे म्हटले जाते. कारण या सगळ्या गोष्टी समूहांच्या मानसिकतेवर म्हणजे श्रध्देवर उभ्या आहेत. आताच्या जगाची वाटचाल व्यक्तिस्वातंत्र्याच्या व व्यक्तीच्या स्वयंभू होण्याच्या दिशेने सुरू आहे. या काळात अशा संघटना व त्यांचे नेते कालबाह्यच होतील.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व लोकनेते यशवंतराव चव्हाण पुढे देशाचे संरक्षणमंत्री झाले. गृहमंत्री, अर्थमंत्री यांसारखी मोठी पदेही त्यांनी भूषविली. पण 1969 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या दुभंगात त्यांनी केलेली गटाची निवड (त्यांना नैतिक वाटत असली तरी) राजकीय दृष्ट्या चुकीची ठरली. ते संघटन काँग्रेसच्या बाजूने गेले आणि इंदिरा गांधींचा विजयी होणारा पक्ष त्यांना दूरचा झाला. पुढे इंदिरा गांधींनीच त्यांना दूर सारले. केंद्रीय मंत्र्याचे पद भूषविणाऱ्या त्या लोकनेत्याला एका आयोगाचे अध्यक्षपद दिले. त्यांचे अनुयायीही मग त्यांच्यापासून दूर झाले. एवढे की- दिल्लीत राहता येत नाही आणि महाराष्ट्रात येता येत नाही, अशी दारुण अवस्था त्यांच्या वाट्याला आली. त्या काळात वेणूतार्इंना लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात- ‘सारा दिवस रिकामा असतो. कधी तरी बाईसाहेबांचे बोलावणे येते तेव्हा जातो. त्यांना हवा तो सल्ला देतो आणि परत येतो. मग पुन्हा नव्या बोलावण्याची वाट पाहतो.’... त्यांचा शेवटही एकाकी झाला. महाराष्ट्राचा कोणताही पुढारी त्यांच्या जवळ नव्हता. त्यांचे शिष्योत्तमही तिकडे फिरकले नाहीत. हीच एकाकी स्थिती इतरही अनेक नेत्यांवर त्यांच्या पडत्या काळात आली. जॉर्ज फर्नांडिस त्यातलेच आणि आता असून नसलेले लालकृष्ण अडवाणी व मुरलीमनोहर जोशीही त्यातलेच. ते प्रकाश करात कुठे आहेत ? वसंतराव नाईकांचे काय झाले ? महाराष्ट्राच्या काही मुख्यमंत्र्यांची नावे तरी किती जणांच्या स्मरणात आहेत ? या माणसांचे एकाकीपण केवढे जीवघेणे असेल याची आता फक्त कल्पनाच करता येते. ज्यांनी सारे आयुष्य लोकांमध्ये राहून लोकांसाठी काढले, त्यांच्या वाट्याला हे एकाकीपण का यावे ? त्यांचे लोकनेतृत्व मग खरे मानायचे की अखेरच्या काळचे त्यांचे एकाकीपण ? की, जीवनातले हे चढ-उतार आपणच प्राक्तनाचे भाग मानायचे ?

आपल्या सामाजिक कृतज्ञतेचे अशा वेळी काय होते- ती खरोखरी असते की नसतेच ? आणि असली तरी ती त्या एकाकी व्यक्तींच्या मनाचे एकटेपण कुठे घालविते ? खोटी आश्वासने, तात्पुरता सहवास किंवा येणारी गोड पत्रे यांनी काही काळ हे एकाकीपण बाजूला जात असेल; पण तेवढा काळ संपला की, ते पुन्हा घेरून येतेच. बऱ्याचदा अशा भेटी व पत्रेही व्यक्तीचे एकाकीपण तिला जास्तीचे जाणवूनही देत असतात. मग यातले खरे काय आणि कायमचे काय ? एकाकीपण की सामाजिकता ? माणूस हा सामाजिक प्राणी आहे, असे ॲरिस्टॉटल म्हणाला. ते माणसाच्या समाजातील वावराबाबतचे व त्याच्या असलेल्या वा मानलेल्या मैत्रीच्या संबंधात खरे. पण या ॲरिस्टॉटललाही एकाकीपण अनुभवावे लागले. अगदी अलेक्झांडर हा त्याचा विद्यार्थी असतानाही त्याला विष पिऊन आत्महत्या करावीशी वाटली. सावरकरांना भक्त होते, विनोबांना अनुयायी होते. मग त्यांचे प्रायोपवेशन कशासाठी होते ? ही माणसे मोठी म्हणून त्यांची नावे घ्यायची. खरे तर हा अनुभव घेणारी व घेत असलेली माणसे घरोघरी दिसतात. इतरांच्या लेखी त्यांची दखलही नसते. असलीही तरी ती केवळ दयाभावाची वा उबगपणा स्पष्ट करणारी. ज्यांचे आजार वा व्यथा संपणारे नसतात, ज्यांचा तुरुंगवास मृत्यूपर्यंत चालणारा असतो आणि ज्यांचे जीवन-मरणाचे सारे मार्ग कुंठित झाले असतात; त्यांचे जगणे कसे असते? केवळ मृत्यू येत नाही म्हणूनच ही माणसे जगत असतात की नाही ? अनेकांना हे लिहिणेही दुष्टाव्याचे वाटेल. पण जीवन- मरणाच्या खऱ्या प्रश्नांची चर्चा आपण कधी करायची की नाही ? की, त्याकडे काणाडोळा करीत उगीच राजकारणाच्या वा आपल्याशी जराही संबंध नसणाऱ्या गोष्टींवरच निरर्थक बोलत राहायचे असते ?

तो सिसेरो तत्त्वज्ञानाला ‘बकवास व तोंडची वाफ दवडणारे शास्त्र’ असे म्हणाला. त्यातून काही साध्य होत नाही. तरीही स्वतःला बुध्दिमान म्हणवणारी माणसे त्यात आपली अक्कल व शक्ती खर्ची घालत असतात, असे त्याचे म्हणणे होते. जागतिक कीर्तीच्या त्या वक्त्याचे हे विधान ग्रीक तत्त्वज्ञांनी मनावर घेतले नाही; पण त्याचे सारेच बोलणे निरर्थक कसे म्हणता येईल ? वास्तव आणि वाफ यात काही वेगळेपण आहे की नाही ? की शंकराचार्य जगाला मिथ्या म्हणतात तेच खरे मानायचे असते ? दुर्दैव याचे की, ते खरे मानले नाही तर मग हाताशी काही उतरही नाही. असे ते आपले एकाकी असणेच... जग मिथ्या नाही, पण ज्याच्या वाट्याला एकाकीपण येते त्याच्या लेखी ते मिथ्याच असते की नाही...?

सुरेश द्वादशीवार, चंद्रपूर

sdwadashiwar@gmail.com

Share on Social Media

मागोवा

महात्मा गांधी आणि मराठी बालसाहित्य

मंगला वरखेडे

मौखिक बालवाङ्‌मयाचा वारसा सोडल्यास मराठीत स्वतंत्रपणे बालसाहित्य निर्मितीची परंपरा नव्हती. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी आमदानीत बालसाहित्य निर्मितीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. धार्मिक-नैतिक शिक्षणाच्या प्रेरणेतून त्या काळातले बरेचसे बालसाहित्य लिहिले गेले. विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत मराठीत पाश्चिमात्य बालसाहित्याचे भाषांतरपर्व सुरू होते. साहसी वीर नायक आणि अद्‌भुतरम्य कथानके ही या साहित्याची ठळक वैशिष्ट्ये होती. त्यात बरीचशी प्रवासवर्णने होती. टिळकयुगात भारतीय इतिहासातील वीरपुरुषांच्या चरित्रगाथांना बालसाहित्यात अग्रस्थान मिळाले. राष्ट्रीय अस्मितेचे संस्कार बालमनावर रुजविण्याच्या प्रेरणेतून हे साहित्य लिहिले गेले. 1920 नंतर भारताच्या राजकीय-सामाजिक जीवनात गांधीयुग अवतरले. स्वाभाविकच बालसाहित्यलेखनात कमी-अधिक प्रमाणात त्याच्या प्रभावखुणा दिसू लागल्या.

मराठी वाङ्‌मय इतिहासकारांच्या मते, दुसऱ्या महायुध्दापर्यंत गांधी विचारांचा एकूण मराठी साहित्यावर आणि पर्यायाने बालसाहित्यावरही फार लक्षणीय प्रभाव पडला आहे असे दिसत नाही. साहित्यात अपेक्षित असलेल्या संघर्षाला वा पौरुषाला आव्हान करण्याच्या संदर्भात गांधीवाद निरुपयोगी असल्याने ही साहित्यनिर्मिती झाली नसावी, असे प्रा. गो. म. कुलकर्णी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. बालसाहित्याच्या बाबतीतही हा निकष लागू पडतो. मुलांना परिकथा, अद्‌भुत व साहसकथांची आवड असते; परंतु गांधीवादी विचारांतून अद्‌भुत वा वीररसाला पूरक असे विषय मिळत नसल्याने गांधीविचारांवर अधिष्ठित बालसाहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात फारशी लक्षणीय कामगिरी झालेली दिसत नाही. कलासौंदर्यापेक्षा कृतिसौंदर्यावर भर देण्याची गांधीजींची भूमिका असल्याने गांधीवादाला कलासौंदर्याच्या क्षेत्रात फारसा अवकाश सापडला नसावा, असेही एक मत आहे. हे सारे लक्षात घेऊन मराठीतील गांधीवादी बालसाहित्याचा मागोवा घ्यावयाचा आहे. सत्यनिष्ठा, नैतिकता, आध्यात्मिकता, हृदयपरिवर्तन, चित्तशुध्दी, स्वच्छता, अहिंसा, साधनशुचिता, स्वातंत्र्य, समता, सर्वोदय ही गांधीविचारातील पायाभूत मूल्ये होती. बालवाङ्‌मयातून यापैकी कोणत्या मूल्यांची कशी पाठराखण झाली याचाही येथे तपास करावयाचा आहे.

चरित्रात्मक वाङ्‌मय : गांधीजींचे लोकविलक्षण चरित्र हा बऱ्याच बालसाहित्य लेखकांचा आस्थेचा विषय बनला असल्याचे दिसते. मराठी बालवाङ्‌मयात अनेक लेखकांनी गांधीजींची चरित्रकथा आपापल्या पध्दतीने कथन चरित्रवाङ्‌मयाचे दालन समृध्द केले आहे. अवंतिकाबाई गोखले यांनी 1918 मध्ये सर्वप्रथम महात्मा गांधींचे चरित्र लिहिले; त्याला लोकमान्य टिळकांनी प्रस्तावना लिहिली. हे चरित्र जरी बालसाहित्यात मोडत नसले, तरी ऐतिहासिक दृष्ट्या येथून पुढे गांधीजींचे चरित्र लिहिण्याची परंपरा सुरू झाली, म्हणून त्याची दखल घेणे आवश्यक आहे. चरित्रवाङ्‌मय हा लेखनप्रकार जसा प्रौढांना भावतो तसा तो कुमारांना आणि युवकांनाही भावतो. गांधीजींची जीवनकथा सांगण्याचे विविध आकृतिबंध गेल्या शंभर वर्षांत पुढे आले आहेत. एक आकृतिबंध ‘आठवणीं’चा आहे. गांधीजींच्या सहवासातील आपापल्या आठवणी सांगणाऱ्या प्रासंगिक अनुभवकथनांचा या गटात समावेश करावा लागेल. अशा आठवणीवजा निवडक चरित्रकथांची एक यादी माहितीस्तव इथे नोंदून ठेवली आहे.

ना. ग. गोरे : गांधीजींचे विविध दर्शन (1940) लुई फिशर (अनुवाद : स.बा.हुदलीकर) : गांधीजींच्या सहवासात एक आठवडा (1945) दादा धर्माधिकारी : सर्वामुखी गांधी (1946) बा. भ. बोरकर : आम्ही पाहिलेले गांधी (1950) (अनुवादित) सदाशिव धर्माधिकारी : ‘गांधीजींच्या आठवणी’ (1965) बाळकोबा भावे : ‘महात्माजींच्या सहवासातील काही आठवणी’ (1969) विठ्ठल कोतवाल : ‘गांधीजींच्या कृपाछत्राखाली’ (1969) नारायण कातगडे : ‘गांधीजींच्या सहवासात’ (1970) या गटातील लेखनात अर्थातच गांधीजींचे समग्र चरित्र कथन करण्यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील भावणाऱ्या पैलूंचे ललितरम्य भाषेत दर्शन घडविण्याला प्राधान्य दिले गेले आहे. उदा.- लुई फिशर यांच्या पुस्तकातून गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीचे चित्रण, गांधीजींची दिनचर्या, सफाईकामातला त्यांचा पुढाकार आणि विदेशी पाहुण्याला उकडलेल्या बटाट्यांचा पाहुणचार अशा विविध प्रसंगचित्रांतून बापूजींच्या आश्रमातील जीवनशैलीचे व लोककेंद्री नेतृत्वशैलीचे विशेष लक्षात येतात. ही चरित्रे प्रौढांना आणि मुलांनाही आवडतील अशा भाषेत लिहिली गेली आहेत.

गांधीजींच्या लोकसंग्रहाचे व लोकप्रियतेचे दर्शन घडविणारी क्षणचित्रे टिपणाऱ्या या पुस्तकांची निरूपणशैली ही कथनात्मक घाटाला जवळ जाणारी आहे. दुसरा गट गांधीजींची जीवनगाथा सांगणाऱ्या ‘बालचरित्रां’चा आहे. या दुसऱ्या गटात मोडणाऱ्या काही निवडक पुस्तकांची इथे नोंद केली आहे : गांधीजींचे विद्यार्थ्यांशी हितगुज : भाऊ धर्माधिकारी (1943) मंगलधाम : गोपीनाथ तळवलकर (1945) बापूजींच्या गोड गोष्टी : साने गुरुजी ( ) गांधीजींची गोष्ट : पांडुरंग श्रीधर आपटे (1949) बाल मोहन : भि. ल. कवडी (1950) गांधीजींचे विद्यार्थीजीवन : श्रीपाद जोशी (1956) गांधी व विद्यार्थी : द. वा. फडके (1960) मुलांचे गांधी : मारोतराव कन्नमवार (1963) बहुरूप गांधी : अनु बंदोपाध्याय (1964) अनुवाद : शोभा भागवत गांधीबाबा : कृ. गो. सूर्यवंशी (1963) असे होते गांधीजी : आनंद देशपांडे (1964) बापूजींचे जीवनप्रसंग : शांताबाई अत्रे (1966) गांधी जीवनदीपिका : राजा मंगळवेढेकर (1968) सत्याग्रही गांधीजी : पुरुषोत्तम गोखले (1968) असे होते गांधीजी : यशवंत जोशी (1969) असे होते बापू : गोपाळ किराणे (1969) असे होते बापूजी : सुमेरजी जैन (1969) असे होते आपले बापूजी : शिवाजी मराठे (1969) सत्याग्रही महात्मा गांधी : सुधाकर प्रभू (1970) मुलांचे बापू : लल्लुभाई मकनजी, अनु. शांताबाई अत्रे (2204) गांधीजींचे जगभरातले चाहते त्यांना पत्र लिहीत; सर्वांना त्यांचा पत्ता ठाऊक नसे. अशा वेळी हे चाहते ‘दि किंग ऑफ इंडिया’, ‘दि ग्रेट अहिंसा नोबल ऑफ इंडिया’, ‘हेड ऑफ काँग्रेस’, ‘लीडर इन इंडिया’ असले पत्ते लिहून ही पत्रे पोस्टात टाकत. एकाने तर कुठलेच नाव वा पत्ता न लिहिता गांधीजींचे चित्र काढून पत्र टाकले. गांधीजींची जगभर लोकप्रियता एवढी होती की, ही सर्व पत्रे गांधीजींना मिळत. अशा पत्रांचा एक आल्बम करून मुलांना गांधीजींची गोष्ट सांगण्याचा एक नमुनाही या बालचरित्रात पाहायला मिळाला. तिसरा गट ‘समग्र जीवनचरित्रां’चा करता येईल. महात्माजींची विलायत यात्रा : यदुनाथ थत्ते (1945) महात्मा गांधी : गोवर्धन पारीख (1949) राष्ट्रपिता गांधी : वामनराव जोशी (1955) महात्मा गांधी : शं. रा. देवळे (1965) राष्ट्रपिता महात्मा गांधी : नारायण अभ्यंकर (1967) राष्ट्रपिता गांधी : वसंत मंगळवेढेकर (1967) गांधी चरित्ररेखा : दा. न. शिखरे (1968) मोहनमाळ : द. गो. दसनूरकर (1969) म. गांधी : जीवन आणि शिक्षण : श्रीपाद जोशी (1969) म. गांधी : पद्माकर सावरकर (1969) गांधीजी : पु. ल. देशपांडे (1970) गांधीजींचे बृहत्‌ आत्मचरित्र : शंकरराव देव (संपा.) (1970) गांधीजींजवळ रसिकता होती. पशू, पक्षी, बालके, संगीत, निसर्ग इत्यादींबद्दल त्यांना आकर्षण होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अशाही काही पैलूंवर प्रकाश टाकणारी स्फुट कथने या प्रकारच्या चरित्रपर वाड्‌मयातून मुलांसाठी लिहिली गेली आहेत.

गांधीजींच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन गोष्टीरूप चरित्रलेखनाचीही एक लाट बालसाहित्यात आलेली दिसते. चौथा गट ‘चित्रात्मक चरित्रकथां’चा करावा लागेल. मुलांना चित्रकथापुस्तके वाचण्याची आवड असते. ‘चांदोबा’सारख्या मासिकाकडे आणि ‘व्यंग्यचित्रात्मक’ पुस्तकांकडे बालवाचक लवकर वळतो. गांधीजींची जीवनकथा अशा चित्रमालिकेतून देण्याचेही काही प्रयोग झालेत. त्यात छोट्या-छोट्या घटनाचित्रांची निवड व मांडणी या दृष्टीने दा. न. शिखरे यांची गांधी चित्रकथा (1968) आणि श्रीपाद सावंत व सुधाकर बादलकर यांच्या ‘चित्रमय गांधीकथा’ (1967) या पुस्तकांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागतो. याखेरीज गांधीजींची निवडक पत्रे संकलित करून मुलांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली गेली. 1947 मध्ये अप्पा पटवर्धन यांनी ‘गांधीजींची पत्रे’ हे संपादित पुस्तक प्रकाशित केले. पांडुरंग देशपांडे यांनी 1950 मध्ये ‘बापूंची पत्रे’ संकलित करून त्यांच्या आश्रमातील जीवनाचे पैलू प्रकाशात आणले. पाचवा गट पाठ्यपुस्तकांत समाविष्ट केल्या गेलेल्या ‘स्फुट चरित्रकथां’चा करता येईल. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे संस्कारक्षम पैलू विद्यार्थ्यांच्या वाचनात यावेत म्हणून त्यांच्या चरित्रातील काही स्फुट घटना-प्रसंगांची चिमूटभर कथने करणारे बालसाहित्य मराठीत विपुल प्रमाणात लिहिले गेले. उदा.- गांधीजींच्या विचारधारेतले ‘सत्य’ संकल्पनेचे महत्त्व त्यांना त्यांच्या बालपणात कसे गवसले याची कहाणी ‘नवयुग वाचनमाले’च्या चौथ्या पुस्तकात दिलेली आहे. बाल मोहनदास हरिश्चंद्राचे नाटक पाहायला गेले होते; त्या नाटकातील प्राणाची पर्वा न करता सत्यपालन करणाऱ्या हरिश्चंद्राच्या गोष्टीचा गांधीजींच्या मनावर कसा खोलवर ठसा उमटला याची हकिगत या पाठात कथन केली आहे. तसेच एखाद्या पुस्तकाचा संस्कार माणसाची आयुष्यभर सोबत कशी करतो आणि त्याच्या समग्र जीवनाची दिशा कशी बदलून टाकतो, याची कहाणी सातवीच्या पाठ्यपुस्तकात दिली आहे.

आफ्रिकेत हेन्री पोलक यांनी जॉन रस्किन यांचे ‘अन्टू धिस लास्ट’ हे पुस्तक गांधीजींना दिले. एका रात्रीत ते त्यांनी वाचून संपवले आणि त्यांना ‘सर्वोदया’च्या संकल्पनेने झपाटून टाकले. ‘सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण आहे’, वकील असो वा न्हावीसवारांच्या कामाचे मोल एकच आहे आणि अंगमेहनतीचे शेतकऱ्याचे जीवन हा जीवन जगण्याचा मूल्यात्मक आदर्श आहे, या संस्कारांची शिदोरी गांधीजींना या पुस्तकामुळे मिळाली. मुलांवर वाचनसंस्कारांचे महत्त्व बिंबविण्यासाठी अशा स्फुट कथनांचा निश्चित उपयोग होतो. अशा स्फुट चरित्रघटनांची आणखी काही उदाहरणे नमुन्यादाखल इथे सांगता येतील. कुठलेही काम हलके नसते, अशा विचाराचे महात्मा गांधी होते. हे त्यांनी स्वत:च्या आचरणातूनच दाखवून दिले होते. आफ्रिकेत असताना त्यांनी आपल्या लोकांचे शौचकूप साफ केले होते. ही गोष्ट अनेकांनी आपापल्या पध्दतीने कथन केली आहे. लुई फिशरने वर्ध्याला गांधीजींनी मुलाने रस्त्यावर केलेली विष्ठा उचलून बाजूला जमिनीत पुरल्याची हकिगत नमूद केलेली आहे. अनु. बंदोपाध्याय यांनी ‘बहुरूप गांधी’मध्ये गांधीजी कोणकोणती कामे करीत याचे बारकावे टिपणारे प्रसंग दिले आहेत. गहू निवडणे, दळण दळणे, शिवणकाम करणे, खाकरा तयार करणे, आश्रमातले मूल सांभाळणे अशा किती तरी प्रसंगांतून एखाद्या कुटुंबवत्सल गृहिणीला साजेल अशी गांधीजींची कर्मनिष्ठा त्यांनी चित्रित केली आहे. कृष्णराव भाऊराव बाबर हे साताऱ्याला जिल्हा लोकल बोर्डात शैक्षणिक पर्यवेक्षकाचे काम पाहत असत. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या पुरवणी वाचनाकरिता महात्माजींच्या जीवनातील काही स्फुट घटनांचे कथन करणाऱ्या गोष्टी लिहिल्या. त्यात त्यांनी आत्मप्रौढीपासून दूर असलेल्या व साधेपणाचा सन्मान करणाऱ्या गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे काही प्रसंग कथन केले आहेत.

एकदा न्यायालयात गांधीजींनी स्वत:चा धंदा शेती आणि विणकाम असल्याचे सांगून न्यायाधीशाला चकित केल्याचा प्रसंग वर्णन केला आहे. वास्तविक, गांधीजी काठेवाड संस्थानच्या दिवाणाचे चिरंजीव होते. विलायतेत उच्च शिक्षण घेऊन बॅरिस्टर झाले होते. तरीही या गोष्टीचा अभिमान न बाळगता ते सध्या आश्रमात जे काम करीत होते, ते लक्षात घेऊन त्यांनी न्यायाधीशाला आपला धंदा शेती व विणकामाचा असल्याचे सांगितले. यातून गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणातला थोरपणाचा पैलू कथन करणारी गोष्ट बाबरांनी मुलांसाठी लिहून टाकली. त्यांच्या साधेपणाचे कौतुक सांगणारी आणखी एक गोष्ट बाबरांनी पुरवणी वाचनात घातली. एकदा गांधीजी बैलगाडीतून निघाले होते. अंतर 20 मैलांचे होते. गाडीवानाने लवकर पोहोचण्याच्या इराद्याने बैलाला चाबूक मारून पळवायला सुरुवात केली. बैलाला चाबूक मारल्याचे पाहून गांधीजींना अतिशय वाईट वाटले. त्यांच्यातली भूतदया जागी झाली. गाडीतून उतरून ते थेट पायी चालत गेले. कृष्णराव बाबरांना याला समांतर अशी एक घटना बंगालातील साधू नागमहाशयांच्या जीवनात आढळली. आपण बैलांना भरपूर खाऊ घालून त्याच्याकडून तेवढेच कामही करून घेतो; त्यामुळे बैलाला चाबूक मारून अपेक्षित काम करवून घेण्यात कसले आले पाप, असला युक्तिवाद करणाऱ्या गाडीवानाचा प्रतिवाद करणारे नागमहाशय बैलांना मुळीच हाणणार नाही अशा अटीवरच बैलगाडीतून कलकत्त्याला जात. साधूवृत्तीची ही कथा आणि गांधीजींची हकिगत यांची जोडकथा बाबरांनी पुरवणी वाचनासाठी मुलांना उपलब्ध करून दिली.

(थोरांचा थोरपणा, 1931) ‘थोरांचा मोठेपणा’ ही गांधीचरित्रातली एक सूत्रप्रतिमाच बनून गेलेली दिसते. नौखालीहून माउंटबॅटनच्या भेटीला निघालेल्या गांधीजींसाठी मनूने 24 तासांचा लांब पल्ल्याचा प्रवास आणि गांधीजींची प्रकृती लक्षात घेऊन रेल्वेचा मोठा डबा आरक्षित केला. गाडीला खूप गर्दी होती. डब्याला लोंबकळून प्रवासी निरनिराळ्या डब्यांत घुसत होते. ते पाहून आपल्यासाठी मनूने मोठा डबा आरक्षित केल्याचे गांधीजींना पसंत पडले नाही. गांधीजींनी छोट्या डब्यात स्थलांतरित व्हायचे ठरविले. रेल्वे अधिकाऱ्याने गांधीजींना मोठ्या डब्यातच थांबायची विनंती केली व गरिबांसाठी आणखी एक स्वतंत्र डबा जोडायची तयारी दाखविली. मात्र गांधीजी रेल्वे अधिकाऱ्याला म्हणाले, ‘‘तुम्ही गाडीला आणखी एक डबा जोडाच; पण माझ्याही डब्यात उतारूंना बसवा.’’ गांधींनी सांगितल्याप्रमाणे रेल्वे अधिकाऱ्याला व्यवस्था करावी लागली. गांधीजींच्या या समभावाची कथा मुलांसाठी लिहिलेल्या चरित्रात दिमाखाने मिरवू लागली. (सुनीती कथामाला, भाग 5) सहावा गट गांधीजींच्या जीवनसरणीतून वेचलेल्या मूल्यसंस्कारांना साहित्यरूप देणाऱ्या ‘संस्कारगद्या’चा करता येईल. मुलांची जीवनशैली संस्कारित करणं हे बालसाहित्याचे आणि विशेषत: शालेय पाठ्यपुस्तकातील वेच्यांचे एक महत्त्वाचे ध्येय असते. त्यामुळे हे लेखन जरी महापुरुषांच्या चरित्रावर आधारित असले तरी त्याचा घाट इतिहासातील कालक्रमिक, घटनाप्रधान व वर्णनात्मक धाटणीचा राहत नाही. मुलांच्या रंजन-प्रबोधनाबरोबरच त्यांची वाङ्‌मयीन अभिरुची व व्यक्तित्वाची जडण-घडण यांचे पोषणमूल्य असणारे ललित लेखन हे बालसाहित्याचे वैशिष्ट्य असते.

कृ.भा. बाबर यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कारमूल्य असणारे बालसाहित्य जाणीवपूर्वक लिहिले आहे. नमुन्यादाखल त्यांच्या ‘आरसा’ या कथनपर घाटाच्या पुस्तकाची निवड केली आहे. मुलांना सतत आरशात डोकावून पाहण्याची हौस असते, ही दैनंदिन जीवनातली साधी घटना हा या लेखनाचा प्रारंभबिंदू आहे. आरशात आपली छबी सतत पाहण्यामागे मुलांची नार्सिसस वृत्ती- आत्मरतीची प्रेरणा- असते, हे मानसशास्त्रीय सत्य आहे. आपल्यातला अजागळपणा दूर करण्यासाठी आरशात पाहणे वाईट नसले तरी, आत्मरतीची ही प्रेरणा सातत्याने जोपासली गेली, तर विकृती निर्माण होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी बाबरांनी गांधीजींचा जीवनादर्श मुलांपर्यंत पोहोचविण्याचे काम या कलाकृतीच्या माध्यमातून केले आहे. ‘वेश असावा बावळा/ अंगी असाव्या नाना कळा’ या न्यायाने पोषाखी सुंदरतेपेक्षा आत्मिक गुणकौशल्यांच्या साधनेला महत्त्व देण्याचा विचार या पुस्तकातून बिंबवण्यात आला आहे. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वातील साधी राहणी, पण उच्च विचारसरणी, नियमित व्यायाम, साधा परंतु ताजा व सकस आहार, अपरिग्रह, दीर्घोद्योग, रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना व आत्मपरीक्षणाची सवय या गुणविशेषांचा संस्कार करणाऱ्या कथा-घटना यांच्या निवेदनातून हा कथनप्रवास चाललेला असतो. त्यात निर्व्यसनी व ब्रह्मचर्याचे व्रत आचरणाऱ्या शिष्य कचाची पौराणिक कथा आणि गांधीचरित्राची सांगड घालून मिथके, पुराणकथा यांच्या वाचनाची अभिरुची घडविणारी दृष्टीही दिली जाते. निरनिराळ्या लेखकांच्या बालसाहित्यात गांधीजींच्या चरित्रातील पोषाखाचा मूलबंध सातत्याने आवृत झालेला दिसतो.

आफ्रिकेत वकिली करताना आंग्ल वळणाचे टाय- कोट-सूट परिधान करणारे गांधीजी, दक्षिण आफ्रिकेतून परतल्यावर स्वीकारलेला काठेवाडी फेट्याचा पोषाख, खादीचे व्रत अंगीकारल्यावर फेटा जाऊन गांधी टोपीचा स्वीकार करतात. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यावर भारतभ्रमण करीत असताना अंगावर लज्जारक्षणापुरतेही वस्त्र परिधान करता येत नसलेल्या भारतातील गरिबीचे भीषण दर्शन त्यांना होते. त्यानंतर त्यांनी अंगरखा घालण्याचे सोडून दिले आणि साधा पंचा नेसून आयुष्यभर अर्धनग्न फकिराचे राहणीमान स्वीकारले. इंग्लंडच्या गोलमेज परिषदेत व व्हिक्टोरिया राणीच्या भेटीला जातानाही त्यांनी अंगात सदरा घातला नाही, ही हकिगत बालसाहित्याचा विषय झाली. यासंदर्भातली एक गोष्ट राजा मंगळवेढेकर यांनी अशी सांगितली आहे, ती सुबोधवाचनमालेच्या सातवीच्या पुस्तकात संग्रहित झाली आहे. एकदा बापूजी इंग्लंडच्या शाळेत गेले. ‘अंकल, अंकल’ म्हणत अनेक मुले त्यांच्याभोवती जमली. त्यातील एक मुलगा म्हणाला, ‘‘इतक्या थंडीत तुम्ही सदरा का घालत नाहीत?’’ त्यावर बापूजी म्हणाले, ‘‘माझ्याकडे सदरा नाही.’’ एक मुलगा चटकन म्हणाला, ‘‘मी आईकडून तुमच्यासाठी एक सदरा आणतो.’’ त्यावर गांधीजी म्हणाले, ‘‘मला एक सदरा कसा पुरेल?’’ मुलांनी विचारले, ‘‘किती हवेत ? दोन, चार, सहा?’’ बापूजी म्हणाले, ‘‘चाळीस कोटी. आमच्या देशात चाळीस कोटी लोकांना पुरेसे अन्नवस्त्र नसताना मी कसा काय सदरा घालू ?’’ सदऱ्याच्या कथेचा हा मूलबंध स्वीकारून या काळात ‘सुखी माणसाचा सदरा’ नामक निरनिराळ्या मिथककथा लिहिल्या गेलेल्या दिसतात.

वि.स.खांडेकर यांच्या ‘क्रौंचवध’ कादंबरीतील दिनकर गांधीजींच्या सहवासातील प्रसंगांचे वर्णन करताना ही गोष्ट सांगतो. साररूपाने सांगायचे तर- भौतिक सुखाच्या मागे लागण्यापेक्षा साध्या राहणीतले सौंदर्य, परदु:खाशी साहनुभाव अशा संस्कारांचे मूल्य घेऊन या कथा लिहिल्या गेल्या आहेत.

कथा-कादंबरी वाड्‌मय : गांधीजींच्या जीवनदर्शनातून प्रेरणा घेऊन चरित्रलेखनाखेरीज अन्य वाङ्‌मयप्रकारातही काही वैविध्यपूर्ण बालसाहित्य लेखनाचे प्रयोग झालेत. मात्र त्यांचे प्रमाण कमी आहे. बालसाहित्यात लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी मराठीत सकस साहित्यनिर्मिती केली आहे; मात्र त्यातले बहुतेक बालनायक हे साहसी, धडपडणारे वीर नायक आहेत. ताम्हणकरांचा शहरी भागातला खोडकर गोट्या, भा. रा. भागवतांचा पराक्रमी वीर फास्टर फेणे, दिलीप प्रभावळकरांचा बोक्या सातबंडे हे नायक खोडकर असले तरी गरिबांना, अडल्या-नडलेल्यांना मदत करणारे आहेत. परंतु या नायकांना थेट गांधीविचारधारेशी जोडता येईल, असे वाटत नाही. अर्थात असे असले, तरी गांधीविचारांना अनुसरणारे थोडेफार बालसाहित्य मराठीत लिहिले गेले आहे. गांधीविचारांनी भारलेले शांतिलाल भंडारी यांनी स्वाभिमानी व देशाभिमानी मुलांच्या गोष्टी लिहिल्या. त्यांचा बालनायक ‘टिल्लू’ हा देशभक्तीने भारलेला आहे. दुष्काळासारख्या आपत्तीत होरपळणाऱ्या माणसांचा आक्रोश आणि त्यांच्याविषयी निर्माण होणारी सहवेदना या विषयावरची ‘मालवते दीप’ ही शांतिलाल भंडारी यांची कादंबरी किशोर-कुमारवयीन मुलांच्या मनावर सामीलकीचा व सहवेदनेचा संस्कार घडविणारी आहे.

शरच्चंद्र टोंगो यांनी स्वदेशप्रीती, कर्तव्यपरायणता व मित्रप्रेमाची मूल्ये मनावर बिंबवणारी ‘कुमार’नामक कादंबरी लिहिली. यदुनाथ थत्ते यांनी गांधीजींच्या ग्रामोद्योगाच्या संकल्पनेचे महत्त्व आधोरेखित करणारी ‘संतू’ नामक गोष्ट लिहिली. या गोष्टीचा चरित्रनायक संतु हा कुंभाराचा मुलगा. घरात परंपरेने चालत आलेल्या कुंभारकामात तो प्रावीण्य संपादित करतो. स्वत:ची कल्पकता आणि कौशल्याच्या बळावर तो प्रत्येक सणावाराला माठ, रांजण, पणत्या, बैल, गणपती व नाना प्रकारची सौंदर्यसंपन्न अशी मातीची खेळणी बनवतो. श्रमातून सौंदर्यनिर्मितीचा आनंदही मिळवतो आणि आर्थिक स्वावलंबनही प्राप्त करून घेतो. कला, शिक्षण आणि जीवनमूल्यांची सांगड घालणारी ही कथा गांधीवादी विचारदर्शनाची प्रातिनिधिक कथा म्हणता येईल. गांधीजींचा शिक्षणविषयक दृष्टिकोन पुस्तकी शिक्षणापेक्षा व्यक्तीच्या अंगभूत अशा हस्तकौशल्यांवर भर देणारा होता. त्यांच्या बुनियादी शिक्षणप्रणालीचा हा दृष्टिकोन प्रशस्त करणारी आणखी एक कादंबरी ना. धों. ताम्हणकर यांनी लिहिली. ‘खडकावरला अंकुर’ या कादंबरीचा बालनायक नावाने पंडित असला तरी पुस्तकी विद्येत त्याला मुळीच गती नसते. त्याच्या अंगी साहस वा धाडस नसल्याने क्रीडा क्षेत्रात अथवा अंगमेहनतीच्या कामासाठी तो पात्र ठरत नाही. मात्र सूरांची त्याला जाण होती, गाण्याचा छंद होता. त्याच्यातल्या या सुप्त गुणाला वाव देणारे शिक्षण मिळताच तो संगीतक्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करू लागतो. खडकावरचा अंकुर फुलू लागतो.

पंडितच्या यशोगाथेचा हा प्रवास गांधीविचारातील शैक्षणिक धोरणाची प्रस्तुतता पटवून देण्याच्या दृष्टीने अतिशय परिणामकारक उतरला आहे. मागासलेल्या जातीत जन्माला आल्याने काही बिघडत नसते. स्वकर्तृत्वाने व श्रमसाधनेतून माणूस आपला श्रेणीबदल घडवून आणू शकतो व आपल्या ध्येयापर्यंत पोहोचून नवा इतिहास घडवू शकतो, अशा आशयाची मालती दांडेकर यांची ‘दगडातून देव’ ही कादंबरीही गांधीवादी बालसाहित्याचा उत्तम नमुना आहे. गोपाळराव कुलकर्णी यांच्या ‘मौनी सेवकराम’ या कादंबरीचा बालनायक गांधीजींच्या ग्रामसुधारणेच्या विचारांनी भारावलेला आहे. आपला गाव सुधारण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन त्याने गावाचा कायापालट कसा घडवून आणला याची एक उत्तम समाजकार्यकथा या कादंबरीतून लेखकाने शब्दबध्द केली आहे. ग्रामोध्दार, आदिवासींचे जीवन आणि पर्यावरण हे विषय श. रा. राणे यांनी ‘नाना जोगा’ आणि ‘परिवर्तन’ या कादंबऱ्यांतून हाताळले आहेत. खानदेशाच्या सातपुड्यातील आदिवासींच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्यातीलच आजी, भिंगऱ्यापावरा यासारख्या नि:स्वार्थी व्यक्ती पुढे सरसावतात व परिसराचा कायापालट घडवतात. हे आदिवासी डोंगरी वनस्पतींपासून रंग तयार करतात. महाकुच फुलांपासून निळा रंग, मंजिष्ठापासून तांबडा रंग, फणसापासून पिवळा रंग, तांदळाच्या पिठापासून पांढरा आणि कोळशापासून काळा रंग तयार करतात. झाडाच्या काड्यांचे ब्रश तयार करतात आणि या साधनातून चित्रे, पिशव्या, बटवे रंगवतात; मोटारीत ठेवण्यासाठी बाहुल्या, भिंतीवर टांगण्यासाठी वॉल हँगिंग बनवतात. स्थानिक आदिवासी कलेतून लघुउद्योग उभा करतात, मुंबईस प्रदर्शने लावून स्थानिक मालाला बाजारपेठ मिळवतात. आदिवासींचे दारिद्य्र संपते. ग्रामोद्योगातून स्वावलंबनाचा गांधीजींचा कित्ता गिरवला जातो.

अमळनेरला साने गुरुजींच्या कर्मभूमीत राहिलेले वा. रा. सोनार यांनी यातना भोगणारी दुबळी माणसे सद्‌गुणांचा आधार मिळाल्यावर दु:खावर मात करून कशी आनंदी बनतात, याविषयीच्या कथा लिहिल्या. ‘दुबळी माणसे’ नावानेच या कथांचा संग्रह प्रसिध्द झाला. भूतदयेचे मूल्य अनुसरून मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याची शिकवण देणाऱ्या बोधकथा म. वि. गोखले यांनी लिहिल्या. ‘मुक्यांच्या भावकथा’ या संग्रहातील प्राणिकथांतून मुक्या प्राण्यांमध्येही माणसासारख्या प्रेम, मैत्री, वात्सल्य, विरह, सूड अशा भावभावना कशा असतात याची घटनाचित्रे रंगविली आहेत. अस्पृश्यता निवारण, हिंदू-मुसलमान ऐक्य हा गांधीजींच्या जीवितकार्याचा एक महत्त्वाचा भाग होता. या विषयांची बाबा भांड यांनी ‘रंग नाही पाण्याला’, ‘देवगिरीचा हसन’, ‘धर्मा’ या कादंबऱ्यांतून उत्तम हाताळणी केली आहे. ‘देवगिरीचा हसन’मध्ये हिंदू-मुसलमानांतील ताणतणावांचे तपशीलवार चित्रण येते. मात्र जात वाईट नसते, माणसाची वृत्ती वाईट असते; तसेच पश्चात्तापाने वाईट प्रवृतीवर मात करता येते व आत्मशु्‌ध्दिचा मार्ग सापडतो, हा हृदयपरिवर्तनाचा प्रवास लंगड्या हसनच्या व्यक्तिरेखेतून उत्तमरीत्या चित्रित केला आहे. गांधीजींचे खरे वाङ्‌मयीन वारसदार म्हणून साने गुरुजींचेच नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांची ‘श्यामची आई’ आणि ‘श्याम’चे कादंबरी खंड यातून गांधीजींचा वारसा चालविणाऱ्या गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वातील ऋजुता, प्रेम, करुणा, वत्सलता, निसर्गाशी असलेले हृद्य नाते आणि मानव्याची मूल्यनिष्ठा अशा सर्व पैलूंचे पवित्र दर्शन घडते.

अस्पृश्यता निवारणासाठी देहविसर्जनाची तयारी करणाऱ्या, पंढरपूरच्या वाळवंटात मंदिरप्रवेशासाठी उपास करणाऱ्या साने गुरुजींचे बालजीवन कसे घडले याचा प्रत्यक्षदर्शी वृत्तांत म्हणजे श्यामची आई हे कादंबरीमय आत्मकथन. ज्या काळात अस्पृश्याची सावली पडली तरी स्नान करणारे लोक होते, त्याच काळात श्यामच्या आईने अस्पृश्य म्हातारीची खाली पडलेली मोळी उचलून तिच्या डोक्यावर घालण्यास सांगून समताभावाचा मूल्यसंस्कार केला. कुठलेही काम हलके नसते, श्रमसंस्कारा्‌तून स्वावलंबन साधता येते- अशा किती तरी संस्कारांची गाथा म्हणजे श्यामची आई!

नाट्यवाङ्‌मय : गांधीजींच्या विचारधारांना वाङ्‌मयीन रूप देऊन मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी नाट्यलेखनाचेही काही प्रयोग मराठी बालसाहित्यात झालेले दिसतात. गांधींच्या अस्पृश्योद्धाराच्या चळवळीचा विषय नाटकासाठी निवडला गेला. साने गुरुजी यांनी ‘अस्पृश्योध्दार’ नावाचेच नाटक लिहिले. ना. धों. ताम्हणकर यांनी ‘प्रसाद’नामक नाटिकेच्या माध्यमातून अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे वस्तुनिष्ठपणे पाहण्याची दृष्टी मुलांना मिळावी, या हेतूने हे बालनाट्य लिहिले गेले. शिवाशिवीच्या मुद्यावरून स्वच्छतेचे महत्त्व लक्षात आणून दिले जाते. मात्र त्याचबरोबर श्रीमंतांच्या बडेजावामुळे वंचित गटातील लोकांना आंधळेपणाने अस्पृश्य ठरविले जाते, यातली अन्यायाची बाजू नाटकातून सुस्पष्ट करण्यावर भर दिला जातो. वर्णजातीतून वा दारिद्य्रातू्‌न माणसांच्या वाट्याला येणारी हीनता चुकीची असून स्पृश्यास्पृश्य- भावापलीकडे असणारे माणुसकीचे मूल्य हेच शोशत सत्य असल्याचा संस्कार या नाटकातून यशस्वीपणे बिंबवला जातो. गरिबांना मदत करण्यासाठी पुढे येण्यातच खरा मानवधर्म आहे, हा गांधीविचार पुढे आणणारी ‘पारितोषिक’ नावाची नाटिकाही 1939 मध्ये ताम्हणकरांनी लिहिली होती. ‘खेड्याकडे चला’ या महात्मा गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद मिळून ग्रामोध्दाराच्या चळवळीत अनेक तरुणांनी स्वत:ला झोकून दिले. खेड्यातले जीवन साहित्यिकांचे आस्थाविषय बनले. भाऊ मांडवकर यांनी ‘खेड्याकडे चला’ या नावाचेच नाटक लिहिले. खेड्यातल्या लोकांच्या शहरवासीयांविषयीच्या समजुती, शहरातील लोकांच्या खेड्यातल्या जीवनाविषयीच्या समजुती यातील अपसमजांना दूर करण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे.

कविता : महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा, असहकार या तत्त्वप्रणालीला अनुसरणारे व प्रत्यक्ष स्वातंत्र्यलढ्यात आणि ग्रामोध्दाराच्या चळवळीत सहभागी होऊन गांधीविचारांसाठी जीवन समर्पित करणारे लेखक म्हणजे साने गुरुजी. गांधीजींची प्रार्थनेची संकल्पना साने गुरुजींच्या दैनंदिन कर्माचाही अविभाज्य भाग बनलेली होती. अमळनेरला थेट मुलांच्या छात्रालयात राहून त्यांनी मुलांवर संस्कार करणारे वाङ्‌मय निर्माण केले. खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे / जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पददलित /तया जाऊन उठवावे । सदा जे अति विकल, जयांना गांजति सकळ/ तया जाऊन हसवावे । कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे/ समस्तां बंधू मानावे । ही गांधीविचारांची शिकवण देणारी प्रार्थना शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या परिपाठाचा विषय झाली होती. ‘पत्री’ हा त्यांचा काव्यसंग्रह म्हणजे गांधीविचारांच्या प्रसारासाठी घेतल्या जाणाऱ्या शिबिरात आणि मेळ्यात म्हटली जाणारी गाणी होती.

आम्ही देवाचे मजूर । आम्ही देशाचे मजूर । आम्ही कष्ट करू भरपूर । आम्ही यत्न करू भरपूर । किंवा स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई । सुखवू प्रियतम भारतमाई। कळिकाळाला धक्के देऊ । मरणालाही मारून जाऊ।प्रताप आमुचा त्रिभुवन गाईल| यासारखी स्फूर्तिगीते त्यांनी लिहिली. वारा वदे कानामध्ये । गीत गाईन तुला । हस रे माझ्या मुला । चिमणी येऊन नाचून बागडून । काय म्हणे मला । चिवचिव करीन, चिंता हरीन । हस रे माझ्या मुला । यासारखी अंगाईगीताला जवळ जाणारी बाळगाणीही त्यांनी लिहिली.

गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’च्या आवाहनानंतर मराठीत जानपदगीतांचा एक नवा प्रवाह सुरू झाला. या प्रेरणेतून मुलांसाठीही काही काव्यरचना झाल्या. उदा., ग. ह. पाटील यांची गावच्या पिंपळाच्या पारावर भरणारी ‘पाखरांची शाळा’ ही कविता. ग. ल. ठोकळ यांची ‘खळ्यावर’, गोपीनाथांची ‘रानपाखरा’, केशवकुमारांची ‘आजीचे घड्याळ’ या कविता ग्रामजीवनाचे व खेड्यातल्या संस्कृतीचे हृदयंगम दर्शन घडवितात.

इतिकथन : आतापर्यंत गांधीजींच्या प्रभावातून प्रसिध्द झालेल्या मराठीतील निवडक बालसाहित्याचा मागोवा आपण घेतला. या आढाव्यातून हाती लागलेल्या निष्कर्षांचे व्यवस्थापन करताना गांधीविचार दर्शनाचा (बालसाहित्याच्या आशयसंघटनेवर व वाड्‌मयीन मूल्यधारणांवर) नेमका काय परिणाम झाला, हे साररूपाने लक्षात घ्यावयाचे आहे.

निर्मितिप्रक्रिया : बालसाहित्य लिहिणाऱ्या लेखकांपैकी बहुतांश लेखकांचा शिक्षकी पेशा होता. काही लेखक थेट स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. त्यामुळे शाळेत किंवा शिबिरात मुलांना गोष्टी सांगणे, मेळ्यासाठी पदे लिहिणे यातून ही साहित्यनिर्मिती झाली आहे. शालेय जीवनात आणि वयानुसार होणाऱ्या शारीर-मानसिक बदलांच्या संक्रमणकाळात मुलांची योग्य मानसिक घडण होण्यासाठी, त्यांच्यावर योग्य ते भावनिक, नैतिक संस्कार होण्यासाठी साहित्यनिर्मिती करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. मुलांच्या वाढसंगोपनातले शारीरिक, बौध्दिक, भावनिक, सामाजिक मुद्दे लक्षात घेऊन कथनविषयातील आशयाची संघटना बांधण्याचा या लेखकांनी प्रयत्न केला. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील विविध अवस्थांतरांचा व सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतल्या सर्व गुण-दोषांच्या परिणामांचे भान ठेवून त्यांनी आपल्या वाङ्‌मयाची निर्मिती केली आहे.

आशयघनता : बालसाहित्याची आशयघनता कशी तपासावी, हा एक कळीचा मुद्दा आहे. मात्र निवडलेल्या विषयाची आशयसंघटना बांधताना या लेखकांनी कोणकोणत्या परिमाणांचा विचार केला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. उदा. मुलांच्या वाढ-संगोपनातले पेचप्रसंग, समवयस्कां- सोबतचे संबंध, व्यक्तीची ‘आदर्श जीवना’ची संकल्पना, अंत:प्रेरणांचा व भावनांचा विचारप्रक्रियेतील वाटा, मिळालेला काळ कसा व्यतीत करावा याची निवड करण्याचे स्वातंत्र्य इत्यादी मुद्दे लक्षात घेतले आहेत.

नैतिकतेचा मुद्दा बालसाहित्यातील नैतिकता हा बराच सूक्ष्म चर्चेचा विषय आहे. एखाद्या गोष्टीसाठी शिक्षा करणे, दुर्लक्ष करणे अथवा चिकित्सक फेरतपासणी करून फेरमूल्यांकन करणे, याबाबतची निवड त्या-त्या समाजाच्या ऐतिहासिक अनुभवांच्या संचितातून होत असते. सांप्रदायिक मूल्ये आपल्या साहित्यातून पुढे न्यायची की नवी मूल्ये रचण्याची जोखीम पत्करायची, याचा निर्णय बालसाहित्यिकाला घ्यावा लागतो. मराठी बालसाहित्यिकांनी गांधी चरित्राच्या अनुषंगाने हरिश्चंद्राची सत्यपरायणता, शिष्य कचाच्या संयमित ब्रह्मचर्याचा व बलोपासनेचा नमुनादर्श अशा पुराणकथांशी सांगड घालून गांधीजींच्या नवमूल्य धारणांची पेरणी केली आहे. साने गुरुजींचे उदाहरण घेऊन सांगायचे तर गुरुजी भारतीय संस्कृतीच्या मूल्यदृष्टीचा आदर करतात; परंतु पारंपरिक रूढी-संप्रदायाच्या चौकटीत अडकून नैतिकतेचा विचार करीत नाहीत. गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाल्यामुळे ते ‘समताधिष्ठित, अहिंसक व प्रेममूलक सहयोगी जीवना’च्या व्यापक संदर्भात नैतिकतेची नवी व्याख्या करतात.

सामान्यत: बालपण, आजारपण, वार्धक्य या शारीर अवस्थांमध्ये परावलंबित्व असते. अशा वेळी आंतरवैयक्तिक संबंध कसे काम करतात यावरून नैतिक वर्तनाची कसोटी लागते. साने गुरुजी व अन्य बालसाहित्यिकांनी याबाबतीत बहुतेक ठिकाणी अहिंसा, करुणा, सुश्रूषा, परमतसहिष्णुता या मूल्यांची पाठराखण केली आहे.

निरूपणपद्धती : बालसाहित्याच्या कथनपध्दतीचा विस्ताराने आढावा घेण्याचे हे स्थळ नाही. मात्र बहुतांश चरित्रलेखनात वा कथाकथनात बालवाचकांच्या वाचनसवयी लक्षात घेऊन निरूपणाचे विविध प्रयोग करण्यात आले आहेत. काहींनी विहंगमावलोकन पध्दतीतून कालक्रम सोईने विचलित केला आहे, काहींनी माहिती आणि तपशिलाच्या पसाऱ्याला कमी न लेखता समग्रतेकडे जायला पसंती दिली. प्रतीके- मिथकांच्या माध्यमातून पूर्व वाङ्‌मयीन-सांस्कृतिक परंपरेशी नाते सांधीत कथाविषयाची आशयव्याप्ती वाढविण्याचाही काही लेखकांनी प्रयत्न केला आहे. सारांश- मराठीत गांधीविचारधारेला अनुसरणारे बालवाङ्‌मय संख्यात्मक दृष्ट्या विपुल नसले तरी, गुणात्मक दृष्ट्या प्रयोगशील व संस्कारशील आहे, असा निष्कर्ष काढता येतो. राष्ट्रपिता म्हणून विभूतिमत्वाचा गौरव करणारे जीवनचरित्र एवढ्या मर्यादित परिघात बालसाहित्यिकांनी गांधीचरित्राचा विषय हाताळलेला नाही. छोट्या-छोट्या स्फुट प्रसंगांतून मूल्यसंस्कार वेचता येतील, अशा चरित्रघटकांची निवड करून हे साहित्य लिहिले गेले आहे. चरित्रेतर अन्य ललित साहित्यही केवळ चमत्कृतीपूर्ण व रंजक घटना-प्रसंगांना महत्त्व न देता नैतिक मूल्य कथानके संरचित झाली आहेत. याही अर्थाने गांधीकेंद्री बालसाहित्याने आपले बाळबोध वळण ओलांडून नवी प्रयोगशील वाट चोखाळली आहे, असे म्हणता येईल.

डॉ.मंगला रमेश वरखेडे, नाशिक

‘साहित्य अकादमी’ आणि ‘राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज नागपूर विद्यापीठा’चे मराठी विभाग व ‘गांधी विचारधारा विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात दि. 15 सप्टेंबर 2019 रोजी वाचलेला हा निबंध आहे.

Share on Social Media

गांधींचे गारूड । 6

समर्पित धाकटी बहीण - मिली पोलॉक

संजीवनी खेर

हिंदुस्थानात आल्यावर मिलीने पाहिले की, गांधी अधिकाधिक लोकांत मिसळून कामं करताहेत. साधे कपडे, साधी राहणी. ही पूर्वीही होती, पण आता तिला ती फारच वेगळेपणाने जाणवू लागली. एखाद्या संतासारखे ते दिसू लागले होते. धर्म, पुनर्जन्म यांसारखे वादग्रस्त विषय असोत किंवा ब्रिटिशांना युध्दात मदत करायचे विषय असोत- दोघांचे दोन टोकांचे विचार होते. तिने गांधींना लिहिले होते, ‘असहकार असो वा इतर विषय असोत आपले विचार एकाच वाटेने जात नाहीत; पण ज्या ध्येयाच्या असोशीने आपण एकत्र आलो ती मात्र दोघांच्या हृदयात सारखीच तेवत राहील.’ राजकारण आणि समाजकारणातील गांधींची प्रतिष्ठा गगनाला भिडली, तरी ते तिला ‘भाई’ या स्वाक्षरीनेच लिहीत राहिले. गांधींच्या अंतापर्यंत दोघांत पत्रसंवाद सुरू राहिला. गांधींशी तिचे नाते हळुवार होते. ब्रिटिशांच्या अन्याय्य वागणुकीचे, शेतकऱ्यांवरील जुलमाचे वर्णन ते पत्रातून मिलीला कळवत होते.

एक कोवळी तमिळ सत्याग्रही

ट्रान्सवालमध्ये हजारोंनी तमिळ कामगार स्त्री-पुरुष अनेक वर्षांपासून राहत, कष्ट करत होते. येथे या गरीब कामगारांवर तीन पौडांचा कर लावला गेला होता. सतत ओळखपत्र जवळ बाळगावे लागत होते. लहान-सहान चुकांकरता कठोर शिक्षा होत होत्या. कर तर अन्याय्य होता. गांधीजींनी त्याविरुध्द जनमत तयार केले. हजार तमिळ खाणकामगार, हॉटेलातील कामगार, लहान-सहान वस्तूंचे विक्रेते, छोटे दुकानदार सत्याग्रहात सामील करून घेतले. अनेक तमिळ कुटुंबातील लहान-थोर सारेच या सत्याग्रहासाठी कायदा मोडायला तयार झाले. आई-वडील, आजी, मावश्या, जावई, काका-काकू प्रत्येकजण या कामासाठी झपाटल्यासारखे झाले होते. त्यांतील काही तरुण स्त्रिया जोहान्सबर्गला गेल्या. कडेवर मुलं होती, पण मनात, वाणीत धाडस होतं. त्यांनी रेल्वे, खाणी येथील लोकांना या कायद्याविररूध्द आवाज उठवायचे आवाहन केले. भाषणे करून लढ्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. 1910 चा काळ होता. तेव्हापासूनच सरकारने हा लढा समूळ नष्ट करायचा चंग बांधला. धरपकड व मारहाण करून तुरुंगात टाकून कठोर श्रमाची कामे करायला लावायला सुरुवात केली. कायद्याच्या विरोधात मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ लागले, त्यात कस्तुरबाही होत्या. या आंदोलनादरम्यान अनेक तमिळ तरुण गंभीर जखमी झाले, काही मरण पावले. त्यात एक पंधरा-सोळा वर्षांची थिलायदी वलीय्यमा मुदलीयार होती. तिचे आई-वडील व्यापारासाठी तमिळनाडूतील नागपट्टणमच्या थिलयादीहून आफ्रिकेत आले होते. स्वकीयांवरील अन्यायाने वलीय्यमा पेटून उठली, त्यासाठी जिवाची बाजी लावायला सिध्द झाली. ट्रान्सवाल येथील हाडे गोठवणाऱ्या थंडीत तरुणांना, वयस्कांना घरातून खेचून बाहेर काढून कामावर धाडले जाई. अंगावर धड कपडे नाहीत, डोक्यावर टोपी नाही, पायात बूटही नाहीत अशा अवस्थेत लोक थंडीने गारठूनच जात होते. काम करणं शक्य नव्हतं, त्यामुळे मारही बसत होता. पण लोक अद्‌भुत मनोधैर्याने कायद्याच्या विरोधात एकत्र झाले. वलीयम्मा आपली आई मंगलमबरोबर ट्रान्सवालहून नेताल येथे विनापरवाना सत्याग्रहासाठी गेली. ऑक्टो 1913 मध्ये तिला अटक होऊन, तीन महिन्यांची कठोर परिश्रमाची शिक्षा झाली. त्यात तो कोवळा जीव आजारी पडला. लवकर सुटकेकरता दयेचा अर्ज करायला तिने नकार दिला. सुटकेनंतर तिच्या आजारपणात तिला भेटायला गांधीजी गेले. तिच्याकडे पाहून त्यांना गहिवरून आले. तिच्या कपाळावर हात ठेवून ते म्हणाले, ‘काय दशा करून घेतली आहेस ? तुला हे केल्याबद्दल खेद नाही वाटत ?’ ती ठामपणे म्हणाली, ‘छे, मुळीच नाही. परत वेळ आली तर असेच वागेन, त्यात प्राण गेले तर देशासाठी ती माझी आहुती ठरेल.’ त्यानंतर चार-सहा दिवसांनी तिचे निधन झाले. ‘तुमच्या देशाला ध्वज कुठंय ?’ असं कुणी तिला म्हणालं, त्यावर तिने आपल्या साडीचा पदर फाडून तो अभिमानाने फडकवला. त्यातील केशरी, हिरवा, पांढरा रंग तिची आठवण म्हणून आज शिल्लक राहिले आहेत. गांधी म्हणाले, ‘मी हिला प्रेरित केलं म्हणणं ठीक नाही, तिनेच मला प्रेरित केलंय.’

गांधींशी अगदी बरोबरीच्या नात्याने वागणारी, प्रत्येक गोष्टीत स्वत:चे मत असणारी ही ब्रिटिश-स्कॉट स्त्री. मिली ग्रॅहम डाऊन्स- विवाहानंतरची पोलॉक- ही दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या खांद्याला खांदा लावून लढणारी निडर स्त्री होती. लंडनमध्ये ती ख्रिश्चन सोशॅलिस्ट असोसिएशनसाठी काम करीत होती. तिच्या आणि हेन्री पोलॉकच्या लग्नाला त्याच्या वडिलांची मिलीच्या नाजूक प्रकृतीमुळे परवानगी नव्हती. हेन्री पोलॉक तेव्हा द. आफ्रिकेत कार्यरत होता. वृत्तपत्रात काम करायचा. राजकारणात त्याला रस होता. गांधींच्या कामाशी सहमत होता. त्यांच्या कामात तो मदत करायचा. त्याला मिलीशी लग्न करायचे होते, पण त्यांना तिच्या प्रकृतीची काळजी वाटत होती. त्या दोघांना या लग्नापासून परावृत्त करायची गळ त्यांनी गांधींना घातली. तेव्हा हेन्रीच्या वडिलांना गांधींनी एक पत्र लिहिले, ‘हे दोघं एकेमकांवर प्रेम करतात. मिलीची तब्येत लंडनमध्ये ठीक नसली तरी इथे द. आफ्रिकेच्या स्वच्छ-मोकळ्या हवेत तिची तब्येत लवकर चांगली होईल. इथे तिच्यावर माया करणाऱ्यांच्या सहवासात ती ठणठणीत होईल.’ लंडनमध्ये मिलीने दादाभाई नौरोजींसारख्या निष्ठावान देशभक्ताला भेटून घ्यावं, शाकाहारी सोसायटीत जाऊन यावं, तेथील टॉलस्टॉय कॉलनीचे कामकाज तसेच विविध धर्मादाय संस्थांत कामं कशी चालतात याचा अभ्यास करावा, असा सल्ला गांधींनी तिला दिला.

मिली 1905 मध्ये जोहान्सबर्गला पोहोचली, तेव्हा हेन्रीला घ्यायला गांधी स्टेशनवर आले होते. गांधींबद्दल तिने ‘मि. गांधी- द मॅन’ या तिच्या पुस्तकात लिहिलंय, ‘एक मध्यम उंचीचा, कृश पण बालसदृश हसू असलेला, डोळ्यांत विलक्षण चमक असलेला माणूस हेन्रीसोबत आला होता.’ या माणसाच्या एकत्र कुटुंबात हे इंग्लिश जोडपं लग्नाच्या साध्या विधीनंतर (हेन्री पोलॉक ज्यू होता) राहू लागलं. त्याच सुमारास गांधींचा एक अनुयायी आपल्या अगदी अल्पवयीन बायकोसह तिथे आला. मिलीला ते पाहून धक्का बसला. ‘‘हे कसे चालते ? ही कसली पध्दत ?’’ तिने विचारलं. ‘‘याच चुकीच्या रूढींविरुध्द लढायचे आहे. ते पाळणारेही नकळत त्याचा बळी ठरलेले असतात.’’ मिलीला भारतीय मानसिकता कळायला सुरुवात झाली. गांधींनी आक्रमक विरोधीवजा सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. त्यावरून ते तिला समजावत, ‘‘हे मी कस्तुरकडून शिकलो. मी तिच्या मनाविरुध्द तिच्याकडून काही करून घेऊ शकत नाही. ती निग्रहाने, तिच्या शांत पध्दतीने विरोध करते. त्यातून मला या सत्याग्रहाची कल्पना सुचली.’’ असहकार नि सत्याग्रहामुळे गांधी आणि इतर अनुयायी तुरुंगात असले की, बाहेरची कामं करायला तिने ‘ट्रान्सवाल इंडियन वुमेन्स असोसिएशन’ स्थापन केली होती. लोकांना बरोबर ठेवायचे ते साधन होते. गांधींच्या घरी राहताना तिच्या लक्षात आलं की, त्यांची मुलं शाळेत न गेल्याने शिक्षणाची आबाळच होत होती. तिने त्यांना लिहायला वाचायला, गणिताचे व गद्य-पद्याचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. काही दिवसांनी ती आणि हेन्री पोलाक दोघे फिनिक्स येथील गांधींच्या कम्युनिटी लिव्हिंगच्या प्रयोगशील वसाहतीत जाऊन राहू लागले. तेथील अवस्था पाहून मिलीला आश्चर्य वाटले. किती ओकंबोकं ते वसतिस्थान ! ना पडदे, ना गालिचे, ना काही फर्निचर ! खाणंही जिवंत राहायला अत्यावश्यक असं नि तेवढंच !

हा प्रयोग हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागला. आरंभी तिने त्याबद्दल गांधींशी वाद घातला होता. हे घर वाटावे, म्हणून पडद्यांची मागणी केली होती. तिथे राहणारे लोक सतत कामात असत. स्वत:ची कामं स्वत:च करत. जगातील वेगवेगळ्या भागांतले, भिन्न धर्मांतले, अनेक वयांचे लोक कामं करत एकत्र जेवण करत. हाच तर कम्युनिटी लिव्हिंगचा प्रयोग होता. तिने या वसाहतीचे भीतिदायक चित्र पोलागांधी आणि इतर अनुयायी कच्या घरी कळवले होते. त्यानुसार इथे राहणे म्हणजे- आजूबाजूला कीटकांचे राज्य, दुधातदेखील मुंग्या सापडतात, कोळी इकडून तिकडे फिरत असतात, पाणी स्वच्छ म्हणावं का असं गढूळ असतं, अंघोळ नि इतर कामासाठी तट्ट्या लागलेला आडोसा, पाण्याचे एक टमरेल टांगलेले तेच अंघोळीला शॉवर म्हणून वापरले जाते... असे हे आंतरराष्ट्रीय वसतिस्थान आहे. तेथील लोकांनीच ते स्वच्छ ठेवणे अपेक्षित होते. ते नंतर तसे झालेदेखील. पण जेव्हा हे गांधींनी वाचले, तेव्हा ते म्हणाले, ‘‘होय, मिलीने जे लिहिले आहे त्यात मुळीच अतिशयोक्ती नाही.’’ तिला साधी राहणी पटली होती, पण इतक्या असुविधांमध्ये राहणे अवघड होते. तिला त्यांचे नैतिकतेने राहण्याचे विचार पूर्णपणे पटले होते. गांधींसारखा मायाळू दुसरा माणूस नाही. त्यांच्या प्रत्येक कृत्यात कमालीची पारदर्शकता असते. त्यांच्या वागण्यात पराकोटीची तत्त्वनिष्ठा असे, त्यामुळे इतर छटा ते लक्षात घेत नसत.

त्या दोघांत गांधींच्या अनेक तत्त्वांबद्दल चर्चा-वाद होत असत; मग आहार असेल, नैसर्गिक उपचार असेल, मुलांना शिस्त लावणे असेल. कधी तर कुणाचा जीव वाचत असेल तर खोटं बोलणं रास्त आहे, काही गोष्टी कुठवर ताणायच्या- अशा प्रकारचेही विषय असत. गांधी तिला आपली धाकटी बहीणच मानत नि ती त्यांना थोरला भाऊ समजत असे, ज्याच्याशी समपातळीवर ती बोलू शकत होती. त्यांच्या मते, ‘हिंदुस्तानात स्त्रियांना खूप मान असतो. वरवर ती पुरुषाहून दुय्यम असली तरी तिला देवी मानतात.’ यावर ती ताड्‌कन म्हणे- ‘‘एक तत्त्व म्हणून असेल, पण प्रत्यक्षात तिला फार कमी लेखतात. तिला युरोपियन स्त्रीसारखी मोकळीक कुठे असते?’’ ब्रह्मचर्य, मुलं याविषयींची त्यांची मतं तिला मुळीच मान्य नव्हती, तसे ती निक्षून सांगत असे. तिने आपल्या पुस्तकात नमूद केलंय की- ‘वाद घालायला गांधींना आवडायचे, कारण त्यामुळे त्यांना विरोधी मतं समजत. मिली ज्या पोटतिडिकीने मुद्दे मांडत असे, ते गांधींना आवडत असे आणि त्यातील तीव्रता नि सत्यांश जाणवत असे. मुलं होऊ देण्याबद्दल त्यांची मते विचित्र होती. मिलीच्या मते, विवाहानंतरची ती स्वाभाविक गोष्ट होती. पण फिनिक्समध्ये जेव्हा एखादं बाळ जन्माला येई, तेव्हा त्याला पाहायला आणि मातेला भेटायला गांधी जात असत तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून नवजाता विषयीची माया-प्रेम-कुतूहल ओतप्रोत भरलेले जाणवत असे.

आई या पदाविषयी ते उदात्त शब्दांत बोलत असत. एकूण स्त्री ज्या वेदनेतून जाते, त्याबद्दल त्यांच्या मनात आदर होता. स्त्रीविषयी, तिच्या कर्तृत्वाविषयी खूप अपेक्षा त्यांच्या हृदयात असत. त्या प्रत्यक्षात असतातच असे नाही, असे मिलीला वाटे. ते स्पष्टपणे अमूर्त, आदर्श आणि मानवी भावना यांत फरक करू शकत असत. त्यांच्यात मतभेद खूप होते, परंतु त्यातील अंतर्प्रवाह सारखाच असे. त्यामुळेच ही बहीण त्यांना आवडत असे. ते म्हणत, ‘‘तू अनेक नात्याने बांधलेली आहेस, पण माझ्यासाठी एक सच्ची बहीण आहेस; जिच्यावर मी ‘संपूर्ण विश्वास’ टाकू शकतो. तुझा आत्मविश्वास मला जाणवतो की, मतभेद असूनही तू दबत नाहीस. तुला काय हवंय ते सांग. आता तर आपण एकमेकांपासून दूर आहोत, आपण केव्हा भेटू, कोण जाणे ! मग माझी तक्रार काय आहे ? इथं अनेक सहप्रवासींसोबत असून, तू एका खोलीत असल्यागत माझ्या अगदी जवळ आहेस.’’ तर मिली पोलॉकला वाटे, गांधींच्या कल्पना व्यवहारात आणणं अशक्य कोटीतलं आहे. बऱ्याचदा त्यांच्या बोलण्यात सलगता नसते. पण आपल्या विचारांवर ते ठाम असत, बदलत नसत. मी फारच अडून बसले, तर हसून खांदे उडवून गप्प बसत. कामाच्या निमित्ताने ते हिंदुस्थानात परतले (1915). त्यानंतर दोघांचा पत्रव्यवहार सुरूच होता. तिनं विचारलं, ‘सगळे म्हणतात तसं तुम्हाला बापू म्हणू का ?’ त्यावर गांधी म्हणाले, ‘नको. बापू म्हटलं की, ती व्यक्ती स्वत:ची जबाबदारी वडिलांवर टाकून मोकळी होते. भाऊ वा भाई हे समानतेच्या पातळीवरचे आहेत. तेव्हा तू माझी लाडकी बहीण नि मी भाईच राहू दे. माझ्या विधवा बहिणीहून (वास्तविक ती माझं दैवत आहे) तू मला प्रिय आहेस. कारण वैचारिक दृष्टीने आम्हा दोघांत खूप अंतर आहे, जे तुझ्या- माझ्यात नाही.’

गांधी अधिक मोठ्या कामासाठी हिंदुस्थानला चालले होते. मिलीचे डोळ भरून येत होते. तिच्या पोटात खड्डा पडत होता. काही तरी हरवल्याची जाणीव जीव कुरतडत होती. वागणे-राहणे यात मिलीने फारसा बदल केला नव्हता, तशी ती हिंदुस्थानी झाली नव्हती. आपली ओळख कायम ठेवतच ती गांधीमय झाली होती. हिंदुस्थानातून येणाऱ्या मजुरांच्या हितासाठी हेन्री पोलॉक द. आफ्रिकेतच राहिला. गांधींना मदत करायला तो जेव्हा हिंदुस्थानात आला, तेव्हा मिली आणि त्यांची दोन मुलंही त्याच्यासोबत इथे आली. गांधींना भेटून दोन-तीन वर्षे झाली होती. यादरम्यान बरंच काही घडलं होतं. अहमदाबादला जाताना तिच्या मनात वादळ होतं की, ‘आता गांधी आपल्याशी कसे वागतील?’ हिंदुस्थानभर हिंडून त्यांनी देश जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता, ते आंतरराष्ट्रीयपेक्षा जास्त देशी वाटत होते. ती म्हणते, ‘मला वाटले होते की, आफ्रिकेत ते जसे माझे भाई होते तसे राहिले नसावेत. पण आश्चर्य म्हणजे, ते होते तसेच होते- प्रेमळ, करुणामय डोळ्यांचे.

माझ्या आयुष्यातील लहान-मोठ्या गोष्टींची त्यांना काळजी होती. त्यांची फकिरी मात्र अधिक ठळक झाली होती.’ एवढ्यात महायुध्द सुरू झालं आणि ती इथेच अडकली. गांधी चंपारणच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नात गुरफटले. ती दक्षिणेतील कोन्नूर हिलस्टेशनवर राहत होती. मुलं बरोबर होती. पण ब्रिटिश लोक त्यांच्याशी (गांधींशी असलेल्या जवळिकीमुळे) फटकूनच वागत होते. तिला लोकांच्या दु:खावर फुंकर घालायचे काम आवडायचे, पण आता तसे करता येणे शक्य नव्हते. तिने नि तिच्या नवऱ्याने गांधींची तरुण वयातील तडफ पाहिली होती. त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील कामाला आकार येताना, वृतपत्र चालवताना हेनरी पोलॉक हाडाचा पत्रकार होता- गांधींना या दोघांची मोलाची साथ मिळत होती. हिंदुस्थानात आल्यावर मिलीने पाहिले की, गांधी अधिकाधिक लोकांत मिसळून कामं करताहेत. साधे कपडे, साधी राहणी. ही पूर्वीही होती, पण आता तिला ती फारच वेगळेपणाने जाणवू लागली. एखाद्या संतासारखे ते दिसू लागले होते. धर्म, पुनर्जन्म यांसारखे वादग्रस्त विषय असोत किंवा ब्रिटिशांना युध्दात मदत करायचे विषय असोत दोघांचे दोन टोकांचे विचार होते. तिने गांधींना लिहिले होते, ‘असहकार असो वा इतर विषय असोत- आपले विचार एकाच वाटेने जात नाहीत; पण ज्या ध्येयाच्या असोशीने आपण एकत्र आलो ती मात्र दोघांच्या हृदयात सारखीच तेवत राहील.’ राजकारण आणि समाजकारणातील गांधींची प्रतिष्ठा गगनाला भिडली, तरी ते तिला ‘भाई’ या स्वाक्षरीनेच लिहीत राहिले.

गांधींच्या अंतापर्यंत दोघांत पत्रसंवाद सुरू राहिला. गांधींशी तिचे नाते हळुवार होते. ब्रिटिशांच्या अन्याय्य वागणुकीचे, शेतकऱ्यांवरील जुलमाचे वर्णन ते पत्रातून मिलीला कळवत होते. चंपारणमध्ये त्यांच्या दोन अनुयायी स्त्रिया तेथील लोकांना आरोग्य व साक्षरतेत मदत करीत आहेत, हे पत्रातून सांगत होते. ‘तुला या कामात आनंद मिळतो, तोपण सध्या तुला शक्य नाहीये. इंग्लंडला परतल्यावर मुलांतून मोकळी झालीस की तुझे आवडते काम नक्की कर.’ गांधींशी तिचे नाते कायम मैत्रीचे राहिले. दोघांमधील प्रेम आणि ओढीने त्यांना एकमेकांशी घट्ट बांधून ठेवले होते. गांधींच्या आयुष्याला दिशा देणारी अशी ही विदेशी स्त्री त्यांच्या जीवनात महत्त्वाची व्यक्ती होती. तसेच गांधींमुळे आपले भावविश्व-कार्यविश्व कसे बदलून गेले, याविषयीच्या तिच्या भावना तिने 1960 मध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करून जतन केल्या आहेत. तसेच ‘मि.गांधी- द मॅन’ या पुस्तकातही तिने आपल्या आठवणी नोंदवल्या आहेत.

संजीवनी खेर, मुंबई

sanjeevanikher@gmail.com

Share on Social Media

निमित्त

दारूमुक्त निवडणूक : गडचिरोलीतील यशस्वी प्रयोग

पराग मगर

21 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. 24 ला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि राज्याचे सत्ताकारणच बदललं. म्हणायला गेलं तर सर्वच पक्षांच्या पदरी थोडंथोडं सुख आलं. त्यानंतर जवळपास महिनाभर चाललेला सत्तेचा सारिपाट संबंध महाराष्ट्रासह देशाने उघड्या डोळ्यांनी पाहिला. राजकरणात असंही काही होऊ शकतं, हे लोकांना पटायला लागलं. नवनवीन ट्रेंड सेट झाले. याच निवडणुकीत दुर्लक्षित, मागास असे जे जे शब्द वापरण्यात येतात त्या- गडचिरोली जिल्ह्यानेही लोकशाही बळकट करणारा नवीन ट्रेंड सेट केला. हा प्रयोग होता निवडणूक दारुमुक्त करण्याचा. तो यशस्वीही झाला. पण मुख्य प्रवाहाच्या राजकारणात तोही दुर्लक्षित राहिला. हा प्रयोग समजावा यासाठी हा लेखनप्रपंच.....

गडचिरोली जिल्हा 12 तालुक्यांत, 1500 गावांमध्ये पसरलेला. या गावांमधील 20 दिवस, जवळपास 200 कार्यकर्त्यांना दिवस-रात्र केवळ एकच ध्यास- विधानसभा निवडणूक दारूमुक्त करायची. आणि या प्रयत्नांचे फलित म्हणजे किरकोळ प्रकार वगळता ती दारूमुक्त पार पडली. मतदारांना दारूचे आमिष दाखविण्याचे प्रकार घडले नाहीत. किंबहुना मतदारांनीच ते झिडकारून लावले. हा प्रयोग केवळ विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यापुरताच मर्यादित नव्हता तर ‘दारू आणि निवडणूक’ हे समीकरण तोडण्याचाही होता. या प्रयोगाची सुरुवात मार्च 2019 मधील लोकसभा निवडणुकीत झाली. सहा वर्षांच्या आंदोलनानंतर गडचिरोली जिल्ह्यात 1993 पासून शासकीय दारूबंदी आहे. पण पाहिजे तशी अंमलबजावणी होत नसल्याने ही दारूबंदी अनेक वर्षे केवळ कागदावरच राहिली. ती वास्तवात आणण्यासाठी 2016 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या समर्थनासह डॉ. अभय बंग यांनी मुक्तिपथ हा जिल्हाव्यापी प्रयोग सुरू केला. या अंतर्गत गावांतील दारूविक्री बंद करण्याचे प्रयोग लोकांच्या माध्यमातूनच केले जात आहेत. आज तब्बल 600 गावांनी दारूबंदी साध्य केली आहे. दारूविक्री थांबविण्याचे प्रयत्न करीत असताना काही ठळक गोष्टी समोर आल्या.

पहिली म्हणजे, आदिवासी बहुलता असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोहाच्या दारूला असलेली समाजमान्यता. लोक दारू पिण्याची संधी वारंवार शोधत असतात. पण जिल्ह्यात गावठी दारूसोबतच देशी आणि विदेशी दारूची चोरटी आयात काही प्रमाणात सुरू होती. ही दारू म्हणजे खिशाला मोठी झळ. त्यामुळे ती फुकटात मिळण्याची संधी पिणारे शोधत असतात. ही मानसिकता जिल्ह्यातील राजकारण्यांनी बरोबर ओळखली होती. निवडणुकीदरम्यान दारूचे आमिष देत लोकांचे मत मिळविण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू होता. दारू आणि निवडणूक असे समीकरण लोकांनीही सहज स्वीकारायला सुरुवात केली होती. पण डोके ठिकाणावर न ठेवता दारूच्या नशेत केलेले मतदानही योग्य कसे राहील ? तेही चुकणारच. ते सातत्याने चुकतच गेले. जिल्ह्याच्या विकासाची स्थिती पाहता ही बाब प्रकर्षाने जाणवते. एकदा दारू पाजणे आणि पाच वर्ष सत्ता उपभोगणे यात उमेदवारांचा फायदाच होता. पण होणारे सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक नुकसान भरून निघणारे नव्हते. या तीन वर्षांत मुक्तिपथ संघटनांच्या माध्यमातून दारूबंदीसाठी गावांनी, खास करून महिलांनी ठाम भूमिका घायला सुरुवात केली आहे.

निवडणूक आली की नवरा आयती दारू पिणार, चुकीचे मतदान करणार, बायका- मुलांना मारझोड करणार, या बाबी आता त्यांनाही पटणाऱ्या नव्हत्या. मुक्तिपथ कार्यकर्त्यांनी यासाठी गावागावात सभा घेत, हा प्रकार चुकीचा असल्याची जाणीव करून दिली. यामुळे एक गोष्ट घडली. लोकसभा निवडणूकच दारूमुक्त करण्याचा निर्धार गावसभांच्या माध्यमातून तब्बल 290 गावांनी एकमताने केला. ‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवारला नक्कीच पाडू’ असा गडचिरोली जिल्ह्यातील महिलांचा नारा राज्यातच नाही तर संपूर्ण देशात गाजला. सोबतच प्रमुख पाच उमेदवारांनीही ‘लोकसभा निवडणुकीत मी व माझा पक्ष दारूचा वापर करणार नाही’ असा संकल्प लिहून दिला. निवडणूक दारूमुक्त होण्यास यामुळे बळ मिळाले. लोकभावनेचा विजय झाला. काहीच महिन्यांत विधानसभा निवडणूक होती. लोकसभेपेक्षा ही निवडणूक जास्त व्यापक. आव्हानही मोठे होते. त्यामुळे एक पाऊल पुढे टाकत स्वातंत्र्यदिनाच्या पोर्शभूमीवर जिल्ह्यातील 287 गावांच्या 120 ग्रामसभांनी ‘निवडणुकीसाठी उभा राहणारा उमेदवारच दारूविक्रीबंदीचे समर्थन करणारा असावा व स्वतः दारू पिणारा नसावा. निवडणूकपूर्व काळात व मतदानाच्या दिवशी दारूचा वापर होणार नाही’ असे ठराव पारित करून ते सर्वच पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पाठविले. ‘दारूमुक्त गडचिरोली’ हे लोकांचे स्वप्न आहे. विधासभेसाठी सर्वच पक्षांनी आपापला उमेदवार देताना तो दारू न पिणारा व दारूबंदीचे समर्थक असेल याची काळजी घ्यावी, अशी मागणी लोकांनी केली. ‘दारू पिणाऱ्याला या निवडणुकीत उमेदवारी देऊ नका’ असे फलकच शहरांमध्ये लावण्यात आले. ‘आम्हाला उमेदवार कसा हवा’ हे सांगणारा गडचिरोली हा भारतातीलच नाही, तर जगातील बहुधा पहिलाच जिल्हा असावा.

20 सप्टेंबर 2019 रोजी निवडणुकीचा बिगुल वाजला. 21 ऑक्टोबरला मतदानाची तारीख निश्चित झाली. प्रमुख पक्षांची उमेदवारी जाहीर झाली. येथील लोकांची मागणी विचारात घेत सर्व पक्ष दारूमुक्त उमेदवारच उभे करतील याची शोशती तशी कमीच होती. त्यामुळे जनजागृती आणि दारूमुक्त निवडणुकीची लोकचळवळ आणखी तीव्र करणे गरजेचे होते. मुक्तिपथचे 40 कार्यकर्ते, सोबतीला सर्च संस्थेचे 30 कार्यकर्ते आणि गावांमधील शंभरावर आरोग्यदूत मिशन मोडमध्ये झपाटून कामाला लागले. विषय एकच- दारूमुक्त उमेदवार, दारूमुक्त निवडणूक. गावागावांत व शहरातील गल्लीबोळांमध्ये या संदर्भातील पोस्टर्स, स्टीकर्स लावून लोकांना याबाबतची माहिती देण्याचे व प्रबोधन करण्याचे काम सुरू केले. उमेदवारांच्या प्रचारापेक्षाही दुप्पट जोमाने कार्यकर्ते काम करीत होते. उमेदवार एखाद्या गावात प्रचारासाठी जाण्याच्या आधीच मुक्तिपथ कार्यकर्ते दारूमुक्त निवडणुकीचा संदेश देऊन आलेले असायचे. प्रशासनावरही या लोकभावनेचा दबाव कमालीचा वाढायला लागला. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या दारूवर पोलिसांची करडी नजर होती. वाहनांची कसून तपासणी करून कारवाया झाल्या. बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या रसदीवर घाव बसल्याने प्रचारादरम्यान दारूचा वापरच खंडित झाला.

गावठी दारूवर पायबंद घालण्यासाठी गावागावांतील संघटना तयार होत्याच. 500 पेक्षा जास्त गावांनी दारूमुक्त निवडणुकीचे ठराव गावांच्या सभेत घेतले. विशेष म्हणजे एखादा उमेदवार प्रचारासाठी गावात आला की, त्याच्या तोंडावरच गावसंघटनेच्या महिला जनजागृती रॅली सुरू करून, ‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नकीच पाडू’, ‘ज्याला दारूबंदी नको, तो आमदार आम्हाला नको’, अशा घोषणा द्यायच्या. परिणामी, गावातील पुरुषांना दारूचे आमिष देत मत मागण्याची हिंमतच उमेदवार करीत नव्हते. निवडणूक दारूमुक्त होण्यासाठी लिखित व कॅमेऱ्यासमोर जाहीर वचन देण्याचे आवाहनच डॉ. अभय बंग यांनी सर्व उमेदवारांना केले. प्रमुख नऊ उमेदवारांनी याला सहमती दर्शवीत ‘विधानसभा निवडणुकीत मी व माझा पक्ष मते मिळविण्यासाठी दारूचा वापर करणार नाही. मी गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचे समर्थन करतो. या निवडणुकीत निवडून आल्यास अथवा न आल्यास जिल्ह्यातील दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मी पूर्णपणे प्रयत्न करीन’, असे जाहीर वचन दिले. विशेष म्हणजे यात एके काळी दारूबंदीला विरोध करणाऱ्या उमेदवारांचाही समावेश होता. तर जनतेला कधीच वेळ न देणाऱ्या, स्वतः दारूच्या व्यवसायात गुंतलेल्या काही उमेदवारांनी संकल्पासाठी टाळाटाळही केली. प्रसिद्धी-माध्यमांतून उमेदवारांच्या या भूमिका लोकांना कळल्या. यातून त्यांच्यावरचा दबाव आणखी वाढत गेला. असे सर्व उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले. आरमोरी, गडचिरोली व अहेरी या तीन मतदारसंघांतून ही लढत होती. यातील अहेरी मतदारसंघातील भामरगड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा आणि अहेरी हे पाचही आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त तालुके. नक्षल्यांनी निवडणुकीवर बहिष्कार संदर्भातील पत्रकेही वाटली. याचा कुठलाही परिणाम मतदानावर व दारूमुक्त निवडणुकीच्या प्रचारावर झाला नाही. भामरगड तालुक्यात 64 गावांनी दारूमुक्त निवडणुकीचे ठराव घेतले. विशेष म्हणजे येथीलच एका प्रसिध्द उमेदवाराला ग्रामसंघाची बैठक घेऊन ‘तू दारू सोडलीस तरच आम्ही तुला मतदान करू’ असे ठणकावून सांगत ‘निवडणूक आणि दारू’ हा सहसंबंधच आदिवासींनी खोडून काढला.

एटापल्ली तालुक्यातील अनेक गावांमध्ये निवडणूक बहिष्कारासंदर्भातील पत्रके व लाल कपडावरील संदेशांना उत्तरे देत, कार्यकर्त्यांनी त्याच्याच शेजारी दारूमुक्त निवडणुकीचे संदेश लावले. ‘मतदान नक्की करा आणि दारू न पिता करा’, असा संदेश लोकांची ऊर्जा वाढविणारा ठरला. परिणामी, 77 गावांनी दारूमुक्त निवडणुकीचे ठराव घेत लोकसभेपेक्षाही जास्त संख्येने मतदान केले. विशेष म्हणजे 9 विक्रेत्यांवर पोलिसांनी आधीच धाड टाकल्याने इंग्लिश दारूचा थेंबही कुणाला मिळाला नाही. सिरोंचा तालुक्यातील 76 गावांनी या अभियानात पुढाकार घेतला. तालुका चमूने आधीच नियोजन करून 67 विक्रेत्यांची नावे पोलिसांना दिली होती. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. निवडणूक होऊ द्या, मग दारूबंदी करा असे सांगणारे स्थानिक महाभागही कार्यकर्त्यांना काही गावांत भेटले, पण गावातील महिलांनीच त्यांची तोंडे गप्प केली. आधी म्हटल्याप्रमाणे, उमेदवार गावात पोहोचण्यापूर्वी मुक्तिपथचे कार्यकर्ते दारूमुक्त निवडणुकीचे पत्रक घेऊन हजर व्हायचे. अशा वेळी निवडणुकीत आपण उभे की मुक्तिपथ, असा खजिल करणारा प्रश्न उमेदवारांना पडायचा. आरमोरी मतदारसंघात वडसा आणि कोरचीमार्गे भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांतून विदेशी दारू येण्याची शक्यता जास्त होती. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. वडसा येथे सहा दारूभट्‌ट्या आधीच सील करून 10 जणांना तडिपार करण्यात आले. याचा परिणाम दारूमुक्त निवडणुकीवर झाला. असे असले तरी चार ते पाच गावांमध्ये कुठे दारू तर कुठे दारूसाठी पैसा वाटण्याचे प्रकार घडल्याचे कानावर आले. दारूमुक्त निवडणुकीचे वचन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कोरचीच्या एका उमेदवाराने काही गावांमध्ये दारू वाटण्याचा प्रयत्नही केला. पण यातील बराच मोठा साठा पोलिसांनीच नष्ट केला. हा प्रकार वगळता संपूर्ण तालुक्यात पहिल्या क्रमांकावर दारूमुक्त निवडणूक हाच नारा प्रभावी होता.

आरमोरी हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुका. त्यामुळे मुक्तिपथ कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवसापासूनच जनजागृतीसोबतच दारू- विक्रेत्यांवरही करडी नजर ठेवली. सोबतीला पोलिसांचा बंदोबस्त असल्याने कुठेही दारू नव्हती. विशेष म्हणजे काही गावांनी ‘आम्हाला दारू तर नकोच, पण निवडणूकच नको’ अशी भूमिका घेतली. गडचिरोली आणि चामोर्शी हे दोन्ही तालुके या अभियानासाठी आव्हानात्मक होते. कारण दारूचे जाहीर समर्थन करणारा एक उमेदवार याच मतदारसंघातला. पण पोलिसांनी होमगार्ड पथकाच्या सहकार्याने धाडी टाकण्याचा सपाटाच लावला. दारूच्या प्रमुख तस्करांना ताब्यात घेतल्याने रसदीचा दोरच कापला गेला. काही उमेदवारांनी दारूमुक्त निवडणूक अभियानालाच आपला मुद्दा बनविला. या सर्वांचा परिणाम अभियानाची ताकद वाढण्यावर झाला. चामोर्शी तालुक्यात तर दारूमुक्त निवडणुकीच्या बॅनरवर तक्रार घेण्यापर्यंत मजल गेली. हा मुद्दा उमेदवारांना झोंबतोय हे यामुळे स्पष्ट झाले. पण ‘दारू पिणारा आमदार चालणार नाही’, असे सांगणाऱ्या सर्वाधिक रॅली याच तालुक्यात निघाल्या. महिलांच्या घोषणांनी उमेदवारांचाही थरकाप उडायचा. धानोरा तालुका तर अहिंसक कृतीसाठी प्रसिध्द. येथील महिलांनी जनजागृती रॅलीतून दारूड्या उमेदवारांवर आसूड उगारलाच पण धडाक्यात अहिंसक कृती केल्या. या सर्वांमध्ये काही गोष्टी खूपच सूचक घडल्या. अनेक रिक्षा, हातगाडी चालक, ऑटोचालक व्यावसायिक स्वतः या अभियानात सहभागी झाले. महाविद्यालयांमधील जवळपास 4 हजार विद्यार्थ्यांनी या प्रचारात पुढाकार घेत ‘पहिले मत दारुमुक्त गडचिरोलीसाठी’ असा संकल्प केला.

विधानसभा निवडणूक दारूमुक्त करणे हे एक मिशन होते. निवडून कोण येणार आणि कोण हरणार याच्याशी अभियानाचा संबंध नव्हता, दारूची पोर्शभूमी असलेल्या उमेदवारांनी मात्र ‘हा आमच्याविरोधातील प्रचार आहे’ अशा वावटळी उडवल्या. ‘आम्ही एका तत्त्वावर दारूमुक्त निवडणुकीचा प्रचार करत आहोत’ अशी मुक्तिपथ आणि ‘सर्च’ची भूमिका होती. या तत्त्वात एखादा उमेदवार बसत नसेल तर तो त्याचा दोष होता. निवडून आल्यास अथवा न आल्यास दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असल्याचे वचन उमेदवारांनी दिले आहे. आता ते पाळण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे निवडून आलेल्या तिन्ही आमदारांनी दारूबंदीच्या अंमलबजावणीचे वचन दिले आहे. वचन न देणारे ‘राजे’ आमदार पराभूत झाले आहेत. आता जनता व मुक्तिपथ या आमदारांना वचनपूर्ती मागत आहेत.

काय साध्य झाले?

राजकीय समीकरणे बदलत असतात, असे आपण नेहमीच ऐकतो. पण दारू आणि निवडणूक हे समीकरण तोडण्याचे महत्त्वाचे काम या प्रयोगाने केले. पाच वर्षांपूर्वी येथील लोकांना कुणी विचारले असते की, दारूशिवाय निवडणूक होऊ शकते का ? तर कदाचित लोकांनी ‘नाही’, असे उत्तर ठामपणे दिले असते. आज तेच लोक निवडणूक दारूशिवाय होऊ शकते हे मान्य करीत आहेत. त्यामुळे ‘दारू आणि निवडणूक’ हे पूर्वापार चालत आलेले समीकरण तोडण्याचे महत्त्वाचे काम या अभियानाने केले.

आम्ही काय मिळवले

गडचिरोली जिल्हा दारू आणि तंबाखूमुक्त करण्यासाठी सुरू झालेला, ‘मुक्तिपथ’ हा असा महाराष्ट्रातीलच नाही, तर भारतातील अभिनव जिल्हाव्यापी प्रयोग. येथे प्रत्येकजण कार्यकर्ता आहे. दारूबंदीसाठी तो सातत्याने कार्यरत असतो. एका विषयाला धरून सातत्याने काम केल्यास यश मिळते याचे आत्मभान या प्रयोगाने सर्वांना दिले. गावसंघटना सक्रिय झाल्या. महिलांची हिंमत वाढली. नेत्यांवर दबाव वाढला. पोलीस प्रशासन अधिक सक्रिय झाले. आणि महत्त्वाचे म्हणजे निवडणूक दारूमुक्त राहिली. निवडणुका यापुढेही अशाच होत राहाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच.

पराग मगर, गडचिरोली

parag_magar@searchforhealth.ngo

(‘सर्च’ या संस्थेच्या मुक्तिपथ अभियानात कार्यरत)

Share on Social Media

जगण्याचे भान : 5

आईला कसे विसरू?

डॉ. दिलीप शिंदे

‘‘मी तुला आईला विसरायला कुठे सांगतो आहे ? फक्त दुःख, विलाप करण्यासाठी आईची आठवण काढू नकोस. मनात काही तरी संकल्प कर आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आईची आठवण सतत काढत राहा. तुझ्या आईला वाचन-लेखनाची खूप आवड होती ना ? तूही ती आवड जोपास.’’ ‘‘माझी आई खूप धार्मिक वृत्तीची होती. सतत कसले ना कसले उपास-तापास करायची. दिवस- दिवस तोंडात पाण्याचा थेंबही घ्यायची नाही. आम्ही सर्व जण तिला खूप ओरडायचो. पण ती आमचे कोणाचे काही ऐकायची नाही आणि तरीही देवाने तिच्या बाबतीत असे का केले असेल?’’ पंकज व्याकूळ होऊन म्हणाला. ‘‘या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी कोणाकडेच नाही पंकज. पण त्या गंभीर अपघातातून तू आश्चर्यकारकरित्या वाचला आहेस, म्हणजे तुझे जगणे अजून संपलेले नाही. हे खरे आहे की, आता जगताना तुला आईचे प्रेम लाभणार नाही. पण तुला जगण्यासाठी आईकडून प्रेरणा घेण्यापासून तरी कोणी रोखू शकणार नाही ना ?’’ मी त्याची पाठ थोपटत म्हणालो.

पंकजने केक कापला. ‘‘गेट वेल सून पंकज...’’ असे म्हणत आम्ही सर्वांनी टाळ्या वाजवत त्याला शुभेच्छा दिल्या. काळेआजी मात्र नेहमीच्या सवयीने ‘‘हॅप्पी बर्थ डे टू यूऽ’’ म्हणत टाळ्या वाजवीत होत्या. ‘‘काळेआजी, आज त्याचा वाढदिवस कुठे आहे ? तो बरा होऊन घरी चालला आहे !’’ काळेआजींना अडवीत वनिता म्हणाली. ‘‘असू दे, वाढदिवसच म्हणायचा हा. पुनर्जन्मच आहे त्याचा.’’ त्याचे मामा वनिताला समजावीत म्हणाले. मी केकचा एक तुकडा कापून त्याला भरविला. त्याच्या पाठीवरून मायेनं हात फिरवीत त्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्याच्या मामांना आणि वडिलांना पुढे बोलावून त्याला केक भरवायला सांगितले. त्यानंतर वॉकरच्या मदतीने पंकज उठून उभा राहिला. त्याने सर्वांना हात जोडून नमस्कार केला. येथील काही आजी-आजोबांच्या बेडजवळ जाऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा निरोप घेतला. सर्व जण भावुक होऊन त्याला शुभेच्छा व आशीर्वाद देत होते. खरं तर संवेदना शुश्रूषा केंद्रातील आम्हा सर्वांसाठी हा एक खास प्रसंग होता.

आमच्याकडे प्रामुख्याने अंथरुणावर खिळलेले वृध्द सेवा-शुश्रूषेसाठी भरती होत असतात. त्यामुळे बरे होऊन स्वतःच्या पायांनी घरी चालत जाण्याचे प्रसंग फार कमी येत असतात. सर्वांचा निरोप घेऊन पंकज वॉकरच्या मदतीने त्याच्या मामांच्या गाडीत जाऊन बसला. त्याच्या मामांनी व वडिलांनी आम्हा सर्वांना धन्यवाद दिले. त्यांना टाटा-बाय बाय करून मी माझ्या केबिनमध्ये आलो. दोन महिन्यांपूर्वी संवेदना शुश्रूषा केंद्रात पंकज भरती झाला, तेव्हापासूनचा एक-एक प्रसंग मला आठवू लागला. त्याअगोदर त्याचे मामा येऊन चौकशी करून व त्याची सर्व पार्श्वभूी सांगून गेले होते. एका गंभीर अपघातात पंकजच्या खुब्याचे हाड मोडले होते. पंधरा-वीस दिवस तो एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्याचे ऑपरेशन झाले होते. पायाला प्लॅस्टर असल्यामुळे सेवा-शुश्रूषेसाठी त्याला आमच्याकडे भरती केले होते. पण त्याहून अधिक दुःखाची गोष्ट म्हणजे, त्या अपघातात त्याची आई गेली होती आणि ही गोष्ट त्याला अजून कळू दिली नव्हती. तो थोडाफार सावरल्यानंतर ही बातमी त्याला सांगायची, असे त्याच्या नातेवाइकांनी ठरविले होते. तोपर्यंत त्याच्या मामांनी त्याला ‘आई सिरीयस आहे आणि पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे’ असे सांगितले होते.

पंकजच्या आई शिक्षिका होत्या. त्यांना लेखनाची व कविता करण्याची आवड होती. ते सर्व जण देवदर्शनासाठी चालले होते. पंकज, त्याची आई, आजी आणि गाडीचा ड्रायव्हर असे सर्व जण मिळून स्वतःची गाडी घेऊन निघाले होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान पंकजला स्वतः गाडी चालविण्याचा मूड आला. त्याने ड्रायव्हरला तसे सांगून गाडी चालवायला घेतली आणि दुर्दैवाने काही वेळातच अपघात झाला. तेथील लोकांनी त्यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले, परंतु आईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्या वाचू शकल्या नाहीत. पंकजच्या खुब्याचे ऑपरेशन करण्यात आले होते. त्याची आजी आणि गाडीचा ड्रायव्हर यांना किरकोळ दुखापत झाली होती. पंकज स्वतः गाडी चालवीत असताना अपघात झाला असल्यामुळे तो हा धक्का कसा सहन करू शकेल, याची सर्वांना धास्ती वाटत होती. संवेदना शुश्रूषा केंद्रातील घरगुती वातावरणामुळे काही दिवसांतच तो इथे रुळला. तो तरुण असल्यामुळे येथील सिस्टर्स व मावश्यांकडून स्पंजिंग करून घेताना आणि डायपर बदलताना सुरुवातीला त्याला संकोच वाटायचा.

मी रोज सकाळी दहा-पंधरा मिनिटे त्याच्याशी गप्पा मारायचो. त्याच्या आवडीनुसार त्याला वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचायला द्यायचो. मी त्याला आग्रहाने नियमितपणे डायरीलेखनाची सवय लावली. त्याचे मामा रोज सायंकाळी त्याला भेटायला यायचे. तो प्रत्येक वेळी मामांना आईबद्दल विचारायचा. ‘आई खूप सिरियस आहे. बाबा तिच्याजवळ थांबले आहेत,’ असे सांगून मामा त्याची समजूत घालायचे. काही दिवसांनंतर तो बऱ्यापैकी सावरल्यावर आम्ही त्याला त्याच्या आईबाबत सांगण्याचा निर्णय घेतला. त्याचे मामा, वडील, काका असे सर्व जण मिळून आम्ही त्याच्या रूममध्ये गेलो. सर्वांना एकत्र येताना पाहून तो कावरा- बावरा झाला. ‘‘पंकज, तुला एक दुःखद बातमी सांगायची आहे. अपघातानंतर दोन-तीन दिवसांतच आई गेली आहे. तुला लगेच सांगू नका, असे तुझे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होते. तू त्रास न करून घेता ही गोष्ट आता स्वीकारायला हवीस.’’ त्याचे काका धीर एकवटून म्हणाले. पंकजने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. चेहरा दोन्ही हातांनी ओंजळीत झाकून घेतला. त्याच्या मामांनी पट्‌कन पुढे होऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवीत त्याला धीर दिला. तो त्यांच्या कुशीत शिरून स्फुंदत-स्फुंदत रडू लागला. थोड्या वेळाने तो शांत झाला. ‘‘तुम्ही मला लगेच का सांगितले नाही ? आईला जाऊन नक्की किती दिवस झाले?’’ त्याने आपल्या मामांकडे पाहत विचारले. ‘‘डॉक्टरांनीच आम्हाला तसे सांगितले होते.

आई तर गेली होती; तू बरा होणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते.’’ त्याचे मामा त्याला समजावीत म्हणाले. ‘‘माझ्यामुळे आई गेली मामाऽऽ’’ असे म्हणत तो पुन्हा हुंदके देत रडू लागला. ‘‘असा विचार मनात आणू नकोस पंकज. उलट, त्या अपघातातून तू वाचला आहेस. म्हणजे आईचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. तुला खंबीर व्हायला हवं.’’ त्याचे मामा त्याला धीर देत म्हणाले. त्याच्या नातेवाइकांना काही वेळ त्याच्यासोबत थांबायला सांगून मी ओपीडीत आलो. थोड्या वेळाने पंकजचे नातेवाईक पुन्हा मला भेटायला माझ्या केबिनमध्ये आले. ‘‘आजचा दिवस त्याचा मनावरचा ताण कमी होण्यासाठी काही औषध वगैरे देता का डॉक्टर ?’’ त्याच्या मामांनी मला विचारले. ‘‘मी रात्री राऊंडच्या वेळी त्याची मनःस्थिती पाहून ठरवितो, काळजी करू नका.’’ मी त्यांना समजावीत म्हणालो. त्यानंतर ते सर्वजण माझा निरोप घेऊन निघून गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे पंकजच्या रूममध्ये आलो. ‘‘गुड मॉर्निंग पंकज. कसा आहेस ? रात्री झोप व्यवस्थित लागली का ?’’ ‘‘हो, लागली थोडा वेळ.’’ तो चेहऱ्यावर उसने हसू आणत उदासपणे म्हणाला. ‘‘डॉक्टर, मला इथे भरती केले, तेव्हा माझी आई गेल्याचे तुम्हाला माहीत होते का ?’’ ‘‘हो, तुझ्या मामांनी मला कल्पना दिली होती.’’ ‘‘मग तुम्हीही मला इतके दिवस आईबद्दल का सांगितले नाहीत?’’ ‘‘तुझ्या नातेवाइकांनी तुझ्या भल्यासाठीच सांगितले नव्हते पंकज. या धक्क्यातून तुला आता हळूहळू सावरायला हवं.’’ ‘‘माझ्यामुळे आई गेली, ही अपराधी भावना मनाला सतत अस्वस्थ करते आहे डॉक्टर. मला आता जगावंसंच वाटत नाही.’’ तो उदासपणे म्हणाला. ‘‘असा निराश होऊ नकोस पंकज. निर्मिती व नष्ट होणे ही निसर्गाची निरंतर प्रक्रिया आहोत आणि आपण त्या प्रक्रियेचा केवळ एक छोटासा भाग आहे. आपणा सर्वांनाच दुःखावर मात करत वाट्याला आलेलं आयुष्य आनंदाने जगता यायला हवं. तुला हा अपघात विसरून नव्याने जगायला सुरुवात करायला हवी.’’ ‘‘पण आईला कसं विसरू डॉक्टर?’’ ‘‘मी तुला आईला विसरायला कुठे सांगतो आहे ? फक्त दुःख, विलाप करण्यासाठी आईची आठवण काढू नकोस. मनात काही तरी संकल्प कर आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आईची आठवण सतत काढत राहा. तुझ्या आईला वाचन-लेखनाची खूप आवड होती ना ? तूही ती आवड जोपास.’’ ‘‘माझी आई खूप धार्मिक वृत्तीची होती. सतत कसलेना कसले उपासतापास करायची. दिवस-दिवस तोंडात पाण्याचा थेंबही घ्यायची नाही. आम्ही सर्व जण तिला खूप ओरडायचो. पण ती आमचे कोणाचे काही ऐकायची नाही आणि तरीही देवाने तिच्या बाबतीत असे का केले असेल ?’’ पंकज व्याकूळ होऊन म्हणाला. ‘‘या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी कोणाकडेच नाही पंकज. पण त्या गंभीर अपघातातून तू आश्चर्यकारकरित्या वाचला आहेस, म्हणजे तुझे जगणे अजून संपलेले नाही. हे खरे आहे की, आता जगताना तुला आईचे प्रेम लाभणार नाही. पण तुला जगण्यासाठी आईकडून प्रेरणा घेण्यापासून तरी कोणी रोखू शकणार नाही ना ?’’ मी त्याची पाठ थोपटत म्हणालो.

मी रोज सकाळी नियमितपणे त्याच्याशी संवाद साधायचो. त्याने दिवसभर वाचलेल्या पुस्तकाबद्दल त्याच्याशी चर्चा करायचो. एके दिवशी त्याने मला त्याची डायरी वाचायला दिली. डायरीमध्ये त्याने आपल्या आईच्या आठवणींबद्दल लिहिले होते. तसेच काही संकल्पही केले होते. संवेदना शुश्रूषा केंद्रातील सर्व स्टाफही तो आनंदी राहावा म्हणून येता-जाता त्याच्याशी संवाद साधत राहायचा. त्याचे मामा व इतर नातेवाईकही नियमितपणे येऊन त्याची विचारपूस करून, त्याला बरे होण्यासाठी प्रोत्साहन देऊन जायचे. दीड महिन्यानंतर त्याच्या पायाचे प्लॅस्टर काढले. त्यानंतर त्याने नियमित व्यायाम व वॉकरच्या मदतीने चालायला सुरुवात केली. दैनंदिन विधीसाठी बाथरूमचा वापर करणे त्याला जमू लागले. त्याचा आत्मविश्वास वाढल्यानंतर त्याला घरी जायचे वेध लागले. मग त्याच्या मामांशी चर्चा करून त्याला घरी पाठवायचे ठरवले. तो घरी गेल्यानंतर सुरुवातीला त्याला आईची उणीव पदोपदी भासणार होती. त्यामुळे मी त्याला आम्ही ठरविल्याप्रमाणे आईच्या आठवणींपासून प्रेरणा घेत नियमितपणे डायरी लिहिण्याची आठवण करून दिली. त्याला स्वतःच्या पायावर उभे राहत चालत घरी जाताना पाहून आम्हाला खूप समाधान वाटले. पंकज आपल्या मामांसोबत निघून गेला. पण जाता- जाता त्याने नर्सिंग स्टाफला धन्यवाद देताना काढलेले उद्‌गार मी कधीही विसरू शकणार नाही. ‘‘तुम्ही सर्वांनी आईच्या मायेने माझी सेवा-शुश्रूषा केली आहे.’’ तो हात जोडून कृतज्ञतापूर्वक म्हणाला होता. तेव्हा नर्सिंग स्टाफपैकी अनेकांचे डोळे पाणावले होते. त्याचे हित चिंतणाऱ्या, भलं करणाऱ्या आणि मार्गदर्शन व प्रेरणा देणाऱ्या अनेकांच्या रूपाने त्याची आई त्याला सतत अशीच भेटत राहो.

डॉ. दिलीप शिंदे विश्रामबाग, सांगली

Share on Social Media

विशेष वृत्त

कोयत्यावरचं कोक

नंदू गुरव

शांतिनिकेतन म्हणजे माणसांचा खजिना. हजार तऱ्हेची हजार माणसं. प्रत्येक जण भारी. प्रत्येक जण शांतिनिकेतन प्रॉडक्ट. त्यातही आर. आर. आबांची बॅच म्हणजे अस्सल कार्यकर्त्यांची. उत्तम कांबळे याच बॅचचं प्रॉडक्ट. पत्रकार म्हणून ते आमच्या भावकीचे, पण माणूस म्हणूनही उत्तमराव लय भारी. शांतिनिकेतनमध्ये जेनवर बसून रात्रभर गप्पा मारणाऱ्या आणि परत भल्या पहाटे उठून घाम निघेस्तोवर मॉर्निंग वॉक करायला लावणाऱ्या कांबळेसरांचा सहवास मिळाला. या भेटी माझ्यासाठी अलिबाबाच्या गुहेची किल्ली सापडल्यासारख्या होत्या, आहेत. हा माणूस म्हणजे सॉफ्टवेअर. जगाच्या दहा-बारा वर्षे पुढं असलेला. नव्याची प्रचंड जिज्ञासा आणि त्याची नाळ जुन्याशी जोडायची तडफड. ही दोन टोकं जोडायच्या निमित्तानं त्यांच्या हातून जे-जे लिखाण झालं आहे, ते मेंदू जागता ठेवणारं तर आहेच, पण काळजाला हात घालणारंसुध्दा आहे. त्यांच्या खणखणीत भाषणाचं लीड काढताना तारांबळ उडणाऱ्या आमच्यासारख्यांना त्यांच्या लिखाणावर काही लिहिण्याइतका आवाका नाही, पण हजार निमित्तानं हा माणूस ओळखायचा प्रयत्न सुरू आहे.

सतत भटकंती, माणसं जोडायचा मोठा आवाका, प्रचंड जनसंपर्क, वाचन- लेखनासाठी ऊर फुटेस्तोवर फिल्डवर्क करायची तयारी आणि भेदक लिखाण करून त्याची जबाबदारी घ्यायची हिंमत या माणसात आहे. जग भाषणानं बदलत नाही, कविता लिहून बदलत नाही, पुस्तकं लिहून बदलत नाही. जग बदलण्यासाठी घाव घालावा लागतो असं अण्णाभाऊ सांगून गेले. ‘जग बदल घालूनी घाव’ असं सांगत त्यांच्या विचारांचा हा वारसदार 15 जानेवारीला थेट कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या माळावर, ऊसतोड महिलांच्या पालासमोर, हातात पेन घेऊन उभा होता. दुसऱ्या हातात पुस्तक होतं- कोयत्यावरचं कोक. मकरसंक्रांत होती. पाच वाजले होते. आम्ही दत्त कारखान्यावर चेअरमन गणपतरावदादांच्या केबिनमध्ये जमलो होतो. सोबत शांतिनिकेतनचे गौतम पाटील होते. मोहन पाटील, नीलम माणगावे, बाळ बाबर होते. मुलखावेगळा फोटोग्राफर आप्पा चौगुले अचानकच भेटला इथं. गप्पांना ऊत आला. वसंतदादा, सा. रे. पॉटील यांच्या आठवणी निघाल्या. मग सारी जण मिळून ऊसतोड्यांच्या पालावर जायला निघालो. तिकडं का जायचं समजेना. चौकशी केली तर मुळाशी उत्तम कांबळेच असल्याचं समजलं. या बहाद्दर लेखकानं आपल्या पुस्तकाचं प्रकाशन थेट ऊसतोड मजुरांच्या गाडी अड्ड्यावर आणि थेट ऊसतोड करणाऱ्या एका बाईच्या हस्तेच करायचं ठरवलं होतं. एकदा त्यांनी ठरवलं की संपलं. सारी तयारी झाली होती आणि गाड्या बाहेर पडल्या होत्या. दत्त कारखाना परिसर म्हणजे केरळचा भास. नारळाच्या बागाच बागा. हजार झाडांनी हिरवागार झालेला हा परिसर कारखान्याचा वाटतच नाही. गाड्या कारखाना सोडून मागच्या बाजूला वळल्या. कच्च्या रस्त्यानं वळणं घेत त्या पालावर आल्या.

दिवस कलत होता. आपल्या मळवटात गुलाल कुंकू भरलेल्या आया-बाया पालात बसून पोळ्या भाजत होत्या. कुणी गाणी म्हणत होत्या. बापय माणसं नुकतीच टेकली होती. पोरं किंचाळत होती. बैलं रवंथ करत बसली होती. दादा आले दादा आले म्हणत कार्यकर्ते गोळा झाले. खुर्च्या लावल्या गेल्या. माईकवर हॅलोहॅलो करून चेक करणं सुरू झालं. आया-बाया बाहेर डोकावायला लागल्या. पोरं गप झाली. माणसं खुर्च्यावर येऊन बसायला लागली. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी माईक ताब्यात घेतला आणि आया-बायांना हाक दिली. बायांनो, झालं असलं तर या लवकर. तुमच्यासाठीच थांबलाय कार्यक्रम... तशा आया-बाया यायला लागल्या. दादांनी पुरुषांना खुर्च्या सोडून मागं जायला सांगितलं आणि त्यांच्या जागी बायकांना बसायला सांगितलं, तसं बाया जाम खूश झाल्या. सारे पाहुणे खुर्च्यांवर बसले. मधली दादांजवळची खुर्ची रिकामीच होती. माझं लक्ष तिथंच. इथं कोण येणार आहे? आणि ती आली. सौ. देवशला रोहिदास घुगे. ऊसतोड करणारी बाई. साधी, सरळ पण करारी डोळ्याची. चार बुकं शिकलेली. धाडसी. आपल्यासोबत खुर्चीवर कोण माणसं बसली आहेत हे तिला माहीत नव्हतं असं नाही, पण ना घाबरणं ना दचकणं. ना खाली बघणं ना नर्व्हस होणं. देवशला प्रचंड कॉन्फिडन्सनं बसली होती. दादांसोबत बोलत होती. उत्तम कांबळेंच्या सवालांना उत्तरं देत होती. देवशलाच्याच हस्ते होणार होतं पुस्तक प्रकाशन.

उसाच्या पाल्यात बांधून आणलेलं पुस्तक देवशलानं हातात घेतलं. तेव्हा तिच्या हातात कोयता होता. त्यानं पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि मग तिच्या हातातला कोयता काढून घेत कांबळेसरांनी स्वत:चा पेन तिच्या हातात दिला. त्यानंतर देवशला जे काही बोलली ते अंगावर काटा आणणारं होतं. आपणाला वाटतं, माणूस शिकला म्हणजे लय शाणा झाला. पण अशा शाण्यांच्या कानाखाली वाजवणारी देवशला मी बघत होतो. ती खरं बोलत होती. मनातलं बोलत होती. मनमोकळं बोलत होती. आयाबायांचं आणि आपल्या पोराठोरांचं बोलत होती. ती कारखानदारीवर बोलत होती. पिळवल्या जाणाऱ्या ऊसांवर आणि माणसांवर बोलत होती. मध्येच गोड गळ्यानं गाणं म्हणत होती आणि धार लावल्या शब्दांनी जाब पण विचारत होती.

‘‘या सायेबांनी जे काय लिवलंय पुस्तक ते आपल्यासाठीच हाये. आपुन ऊस तोडतो यावरती सायेबांनी पुस्तक लिवलं. आपल्या ज्या काय अवस्था हुत्यात त्यावरती लिवलंय. आपून लहान बाळ घेऊन पाल्यात जातो. त्याला ऊसाच्या पाल्यावर कुठंबी टाकतो. ते रडत असतं, पर आपुन ते रडलं तरी पहात न्हाई. कारण आपली परिस्थिती नाजुक असती. आपुन पोटासाठी ऊसाच्या फडात आलेलो असतो. पर बायानो, आपली पोरंबी शिकु शकतेत. हितं दत्त कारखान्यावर सायेबानी पोरांसाठी साळा चालवली हाय तर मनानं, हैसतीनं आपलं बाळ तुमी साळत पाठवा. काय कराचं माझ्या बाळानं शिकुन ? ते कामाला जाईल असं चिन्हं नसाय पायजे. आपुनबी घर सोडून आलेलो असतो, तसं पोराला घर सोडून साळंत घाला. पुस्तक लिवणाऱ्या सायेबांना सांगायचाय की, तुमी आमच्यासाठी येवडं केलंत तर मी पाच मिनीटं तुमच्यासाठी उभा रायलं तर काय बिघडलं ? मी उभा राहणार...’’

आणि मग उत्तम कांबळे बोलले. नेहमीसारखं. बंदुकीच्या गोळीसारखं. ‘‘आपल्याला अजून कोक म्हणजे काय हेसुध्दा माहित नाही.

कोक म्हणजे गर्भाशयाची पिशवी. नाशिकला सकाळी-सकाळी दोघे भाऊ-बहीण माझ्या घरी आले होते. भाऊ म्हणाला, बहिणीचा कोक काढायचाय. कुणी वळकीचं डॉक्टर असतील तर सांगा स्वस्तातलं. मी म्हंटलं, का काढायचा कोक ? तर म्हणाला, ‘आवो, हिला तीन पोरं हायती अगोदरची. आता परत पाळी आली तर चार दिसाचं खाडं हुतं ना कामाचं. चार दिस रोजगार बुडतो. असं चार चार दिस करत सहा महिन्याचं अठरा वीस हजार रुपये झाले सायेब. असं चाललं तर मुकादमाकडची उचल कशी फेडायची आमी ? व्याज तर वाढत चाललं नुसतं. किती दिस हे कोक छळणार अजून ? ते काढूनच टाकलं एकदाचं तर रोजगार तरी भेटंल.’ बहीण खाली मान घालून बसली होती. म्हणाली, ‘आमच्यातल्या लय बायकांनी काढून टाकला ना कोक. काय करायचं ठिवून ?...’ माझ्या अंगावर काटा आला. मी म्हंटलं, कुठं केलं हे सगळं ? कुणी केलं ? तर म्हणाले, ‘दिसल त्या मार्गानं करत्यात बायका. परवडायला बी पायजे की... दोघं बोलत होती. ते ऐकूनच मन सुन्न होत होतं. काही सुचेचना. अस्वस्थता वाढायला लागली.

मग यावर मी सविस्तर लेख लिहिला. त्यावर मग शासनानं कमिटी नेमली. सरकारी आकडा बाहेर आला. तो होता 16 हजार. सरकारच्या आकडेवारीनुसार तब्बल 16 हजार बायकांनी कोक काढून फेकला होता. पण मला खात्री आहे की, हा आकडा 70 हजाराच्या घरात असणार. सरकारनं हुकूम काढला. सरकारला विचारल्याशिवाय कोक काढायचा नाही. सरकारी नोकरीत बायका असतात त्यांना बाळंतपणाची सहा सहा महिने रजा मिळते. जो बाळंत होत नाही त्या तिच्या नवऱ्याला पण रजा मिळते. त्या बायकांचा आणि ऊसतोडवाल्या बायकांचा कोक वेगळा आहे का? ऊनवारा- पाऊस सोसून या बायका बाळंत होतात. कितीतरी बायका ऊसाच्या फडात बाळंत होतात. कर्जासाठी बायकांना गर्भाशयाची पिशवी काढायची वेळ येते. त्याला हजारापासून सत्तर हजारापर्यंतचे दर सुरू आहेत. कितीतरी बायका यात दगावल्या. भाकरी बुडू नये म्हणून बायकांना गर्भाशय काढून जीवानीशी जायची वेळ येत असेल तर हा समाज सगळ्यात नालायक, विद्रूप, कुरुप समाज आहे. पोटासाठी त्यांना रजा पण घेता येत नाही. रजा राहिली, त्यांना किमान मासिक पाळीच्या काळातला चार दिवसांचा घरपोच पगार तरी द्यावा अशी आमची सरकारकडं पहिली मागणी आहे. यासाठी मंत्र्यांना पत्रे पाठवणार आहे. पाठपुरावा करणार आहे. पुढच्याच महिन्यात बीडमध्ये या मागणीसाठी मोठी सभा घेणार आहे. घाव घालूनच व्यवस्था बदलायची वेळ आली आहे.’’

शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे संचालक गौतमभाऊ पाटील आणि दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतरावदादा पाटील या दोघांनीही ‘या मागणीसाठी आम्ही सारे आपल्यासोबत आहोत’ असा शब्द दिला. ऊसतोड कामगारांसाठी काम करणाऱ्या दादा काळे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ आलं. आया-बायांनी कोयता बाजूला ठेवून तिळगुळ वाटायला सुरुवात केली. कार्यक्रम संपला.

दोन दिवसांनी अचानक विधान परिषद उपसभापतींचे सचिव रविंद्र खेबुडकर यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं, विधानपरिषदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदेसाहेबांनी ऊसतोड महिलांचे प्रश्न आणि त्यांचे गर्भाशय काढण्यासंदर्भात चौकशीसाठी एक समिती नेमली होती. आमदार नीलम गोऱ्हे या समितीच्या अध्यक्षा आहेत. या समितीनं खूप सभा घेतल्या. सोबत मी होतो. पालावरच्या ऊसतोड महिलांची जिंदगी पाहून खूप वाईट वाटलं. साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेबांनी याप्रश्नी खूप सकारात्मक भूमिका घेतली आणि अनेक निर्णय तात्काळ लागू केले. पुढच्या सीझनपासून हे बदल नक्की दिसतील. शेखर गायकवाडसर यांच्या निर्णयांमुळं ऊसतोड करणाऱ्या आया-बायांना माणूस म्हणून हक्क मिळतील. त्याचा अहवालही शासनाला सादर झाला आहे आणि महामंडळ स्थापन करायचा निर्णयही झाला आहे. खेबुडकर यांनी दिलेली ही बातमी खूप आनंदाची आहे. हा लेख लिहिता लिहिताच ती मिळाली. या निर्णयांची अंमलबजावणी मात्र तात्काळ व्हायला हवी.

नंदू गुरव, सांगली

Share on Social Media