डिजिटल अर्काईव्ह

रवींद्रनाथांच्या चीन भेटीवरील पुस्तक

हे पुस्तक अनेक वाचकांना चीन, रवींद्रनाथ आणि अनुवाद या तीनही क्षेत्रांत नवी जुनी दालने खुली करून देणारे ठरेल असा विश्वास वाटतो ! रवींद्रनाथ टागोर यांनी 1924 मध्ये हा चीन दौरा केला तेव्हा ते वयाच्या साठीत होते, जगभर प्रसिद्धीला आलेले होते. कारण 1913 मध्ये त्यांना साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यामुळे, त्यांच्या अनेक पुस्तकांचे अनुवाद विविध भाषांमध्ये झालेले होते. चिनी व जपानी भाषेतसुद्धा. सलग 50 दिवसांचा हा चीन दौरा होता. चीनमध्ये त्यांनी विविध ठिकाणी अनेक लहान-मोठी भाषणे दिली. त्यातील सात विषयांवरील भाषणांचं संकलन करून तयार झालेले हे पुस्तक आहे. त्यामध्ये, पहिले भाषण आत्मचरित्रात्मक आहे, दुसरे भाषण प्रिय आयोजकांना उद्देशून आहे. तिसरे भाषण विद्यार्थी मित्रांना तर चौथे भाषण शिक्षकांना उद्देशून आहे. पाचवे भाषण संस्कृती व प्रगती यांचा परामर्श घेणारे आहे, तर सहावे भाषण सत्य या संकल्पने वरील आहे. सातवे भाषण निरोप घेताना या विषयावर आहे.

 

'भारत आणि भारताचे शेजारी' या विषयावर साधना साप्ताहिकाचा विशेषांक करायचे 2008 मध्ये ठरले, तेव्हा मनीषा टिकेकर यांच्याकडे त्या अंकाचे अतिथी संपादकपद सोपवले गेले होते. भारताच्या शेजारी राष्ट्रांच्या राज्यसंस्था व त्यांचे भारताशी असलेले संबंध ही त्या अंकाची मध्यवर्ती कल्पना होती. पण त्या निमित्ताने त्या-त्या देशातील समाज, भाषा, साहित्य व संस्कृती यांनाही स्पर्श होणार होता. तेव्हा प्रस्तुत लेखक साधनाचा युवा संपादक या नात्याने त्या प्रक्रियेत सहभागी झाला होता. त्या वेळी प्रकर्षाने लक्षात आलेला मुद्दा हा होता की, चीनविषयी लेखन करणारे खूपच कमी लोक भारतात आहेत आणि महाराष्ट्रात व मराठीत तर जवळपास नाहीतच. वस्तुतः भारताचा सर्वांत महत्त्वाचा शेजारी देश चीन आहे. ते बलाढ्य राष्ट्र आहे, भारतापेक्षा भूभाग जास्त आहे, भारतापेक्षा अधिक लोकसंख्या आहे. भारतीय संस्कृती प्रमाणेच चिनी संस्कृतीचाही इतिहास पाच हजार वर्षांचा आहे. तरीही त्या देशाविषयी भारतात व महाराष्ट्रात पुरेसे अभ्यासक नाहीत याचे आश्चर्य वाटले होते. तेव्हापासून चीनविषयी काही वेगळे व महत्त्वाचे मिळाले तर ते प्राधान्याने प्रसिद्ध करावे हा विचार मनात कायम राहिला.

2013 मध्ये रामचंद्र गुहा यांनी 'कॅरेवान' या इंग्रजी मासिकासाठी लिहिलेला दीर्घ लेख साधनाकडे पाठवला आणि 'शक्य असेल तर अनुवाद करून साधनात प्रसिद्ध करावा' असे कळवले. त्यांनी नुकतीच चीनला भेट दिली होती आणि त्या भेटीत त्यांना चीन कसा दिसला, हे त्या लेखात मांडले होते. लेख उत्तम होता, वाचनीय होता आणि चीनविषयीचे कुतूहल वाढवणारा होता. त्यामुळे तो लेख कुमुद करकरे यांच्याकडून अनुवाद करून घेतला. पण तो शब्दसंख्येच्या दृष्टीने इतका मोठा होता की, त्यासाठी साधना अंकाची अर्धी पाने द्यावी लागणार होती. त्यामुळे, मनात असा विचार आला की, चीनविषयी आणखी एक किंवा दोन दीर्घ लेख मिळाले तर संपूर्ण अंक चीनविषयी होऊन जाईल. तसा शोध घेत असताना, संकल्प गुर्जर या फर्ग्युसन कॉलेजमधील तरुण मित्राने 'Talks in China' या इंग्रजी पुस्तकाविषयी सांगितले. 1924 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी चीनला भेट दिली, तेव्हा त्यांनी तिथे केलेल्या भाषणांचे संकलन असलेले ते छोटे पुस्तक आहे. ते पुस्तक मागवले. त्यात विविध विषयांवरील सात भाषणे होती. त्यातील एका भाषणाचा अनुवाद सुमन ओक यांच्याकडून करून घेतला. आणि मग जून 2013 मधील एक संपूर्ण अंक, राम गुहा यांचा तो लेख आणि रवींद्रनाथ टागोर यांचे एक भाषण असा मिनी विशेषांक काढला. त्यानंतर चीनविषयी अधून मधून छोटे-मोठे लेख प्रसिद्ध करता आले.

2020 मध्ये, सतीश बागल यांनी 'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक लिहून पूर्ण केले आणि 'साधना प्रकाशनामार्फत ते येऊ शकेल का' अशी विचारणा केली. त्यांचे ते अभ्यासपूर्ण व सुबोध शैलीतील पुस्तक पाहून वाटले, हा ऐवज आधी साधना अंकातून क्रमशः प्रसिद्ध करावा आणि नंतर साधना प्रकाशनाकडून पुस्तक रूपाने आणावा. त्याप्रमाणे केले. 2022 मध्ये ते पुस्तक आले. मात्र त्याच वेळी 'Talks in China' या पुस्तकाची पुन्हा आठवण झाली. कारण टागोरांच्या त्या भेटीला लवकरच शंभर वर्षे पूर्ण होणार होती. त्यामुळे, योग्य व्यक्तीकडून त्या पुस्तकाचा अनुवाद करून घ्यावा, असा विचार मनात घोळू लागला. त्यानंतर काहीच महिन्यांनी सानिया कर्णिक या युवतीची ओळख झाली. मूळची पुणेकर असलेली सानिया चीनमध्ये बीजिंग लँग्वेज अँड कल्चर युनिव्हर्सिटीत ट्रान्सलेशन स्टडीज या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. तिने मुंबई विद्यापीठातून चिनी भाषेत पदवीचे शिक्षण घेत असताना चिनी भाषेच्या जागतिक स्पर्धेत भाग घेतला. त्या स्पर्धेत भारतातून प्रथम क्रमांक मिळाला, म्हणून तिला आठ दिवस चीन भेटीची संधी मिळाली होती. त्या भेटीचा अनुभव सांगणारा तिचा लेख इतका रोचक होता की, साधना युवा दिवाळी अंक 2024 मध्ये मुखपृष्ठ कथा म्हणून प्रसिद्ध केला. त्या स्पर्धेनंतर लगेचच तिने बीजिंग युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला होता, तिथे तिला भेटलेल्या वेगवेगळ्या चार खंडांतील चार मैत्रिणींच्या संदर्भातील लेख लिहिला होता, तो त्या वर्षीच्या साधना मुख्य दिवाळी अंकात प्रसिद्ध केला. त्यानंतरच्या वर्षभरात तिने चीनमध्ये केलेल्या प्रवासावर आधारित पाच लेख लिहिले, तेही साधना अंकांतून प्रसिद्ध झाले. त्या सर्व लेखांतून तिची चिनी भाषा, साहित्य व संस्कृती या संदर्भातील आकलन क्षमता अधोरेखित झाली.

2025 च्या दिवाळी सुट्टीत ती भारतात आली, तेव्हा तिला 'Talks in China' या पुस्तकाबद्दल सांगितले. पुस्तक आवडले तर तिने त्याचा अनुवाद करावा असे सुचवले. ती ट्रान्सलेशन स्टडीज मध्ये शिक्षण घेत असल्याने, त्याकडे तिने एक प्रकल्प म्हणूनही पाहायला हरकत नाही असेही सांगितले. तिने ते चांगलेच मनावर घेतले. लवकरच एक-दोन प्रकरणे अनुवाद करून पाठवली. तेव्हा तिला ग. प्र. प्रधान संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने अभ्यासवृत्ती प्रदान करायचा निर्णय झाला. पुढील चार महिन्यांत तिने टागोरांच्या सातही भाषणांच्या अनुवादाचे काम संपवले. टागोरांना चीन भेटीचे आमंत्रण देणारे लियांग छिछाव यांच्या स्वागतपर भाषणाचा इंग्रजी अनुवाद त्या पुस्तकात आहे. तो अनुवाद आणि मूळ चिनी भाषेतील ते भाषण यात तफावत आढळली म्हणून, तिने मूळ चिनी भाषेतून ते मराठीत आणले. त्या संदर्भात टिपाही लिहिल्या.

दरम्यान तिने टागोरांच्या त्या चीन भेटीच्या संदर्भात बरीच माहिती जमवली होती, ती अभ्यास संशोधनाच्या पातळीवर जाणारी होती. तेव्हा तिच्याकडून हेही कळले की, टागोरांच्या त्या भेटीला चीनमध्ये विरोधही झाला होता. 'Tagore go back' असे फलकही झळकले होते. मग तिला सांगितले, त्या भेटीच्या निमित्ताने झालेले वादसंवाद किंवा मतमतांतरे यांवर एक दीर्घ लेख आवश्यक आहे. तिने ते काम इतके उत्तम केले की, ती क्विक लर्नर आहे हे लक्षात आले. त्या वर्षभरात तिची वैचारिक वाढ झपाट्याने झाली याचा पुरावा त्या लेखातून मिळाला. त्याच शोध प्रक्रियेतून तिला टागोरांच्या चीन दौऱ्याची रूपरेषा चिनी भाषेत मिळाली. आणि टागोरांनी चीन भेटीवर आधारित लिहिलेली बंगाली भाषेतील कविताही मिळाली. तो सर्व पूरक मजकूर तिने मराठीत आणला. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर टागोरांचे चीन भेटीतील एखादे छायाचित्र असावे असा विचार सुरुवातीपासून आमच्या मनात होता. त्यातील एक आकर्षक छायाचित्र निवडले. तिने ते पाहिले तेव्हा त्यातील सर्वच व्यक्तींचा परिचय करून देणारे एक टिपण लिहिले.

अशाप्रकारे, हे पुस्तक म्हणजे 'Talks in China' या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद तर आहेच, पण सुरुवातीला व शेवटी लहान-मोठी परिशिष्टे आहेत. त्यामुळे, हे पुस्तक एक प्रकारचे संपादनही आहे. टागोरांच्या त्या चीन भेटीला शंभर वर्षे पूर्ण झाली असताना आलेले हे पुस्तक, मराठीत अनुवाद झालेल्या साहित्यात मोलाची भर टाकणारे ठरेल. हे पुस्तक आकाराला येत असतानाचा बहुतांश काळ सानिया चीनमध्ये होती, त्यामुळे तिच्याशी संपर्क करणे आणि मजकुराच्या दुरुस्त्या करून घेणे, या प्रक्रियेत तिचे वडील जयदीप कर्णिक यांची मदत होत राहिली. पुस्तक तयार होत असताना साधनाचे सहकारी सुरेश माने, आरती सुमित, सुदाम सानप यांची वेगवेगळ्या प्रकारे मदत झाली. आणि अर्थातच पुस्तकाची आकर्षक मांडणी व सजावट करण्यासाठी गिरीश सहस्त्रबुद्धे होतेच ! वरील सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !

या पुस्तकाचे प्रकाशन सतीश बागल यांच्या हस्ते करावेसे वाटणे साहजिक होते. त्याचप्रमाणे, जर्मन भाषेच्या अभ्यासक नीती बडवे यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावणेही सहज घडले. त्यांनी जर्मनी व अन्य देशांत केलेले प्रवास व अनुभव सांगणारे लेखन दोन वर्षांपूर्वी साधनात प्रसिद्ध झाले, नंतर ते साधना प्रकाशनाकडून पुस्तक रूपाने आले. त्यांनी सानियाचे साधनातील सर्व लेख वाचले होते आणि त्यांना त्या लेखनाचे विशेष कौतुकही वाटले होते. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून 'अंतर्नाद' या वाङ्गयीन नियतकालिकाचे संपादक राहिलेल्या भानू काळे यांना निमंत्रित केले आहे. कारण, त्यांना टागोरांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आणि आवाका यांचा चांगला परिचय आहे, त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी अंतर्नादचा रवींद्रनाथ टागोर विशेषांक काढला होता.

सारांश, हे पुस्तक अनेक वाचकांना चीन, रवींद्रनाथ आणि अनुवाद या तीनही क्षेत्रांत नवी जुनी दालने खुली करून देणारे ठरेल असा विश्वास वाटतो ! रवींद्रनाथ टागोर यांनी 1924 मध्ये हा चीन दौरा केला तेव्हा ते वयाच्या साठीत होते, जगभर प्रसिद्धीला आलेले होते. कारण 1913 मध्ये त्यांना साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यामुळे, त्यांच्या अनेक पुस्तकांचे अनुवाद विविध भाषांमध्ये झालेले होते. चिनी व जपानी भाषेतसुद्धा. सलग 50 दिवसांचा हा चीन दौरा होता. चीनमध्ये त्यांनी विविध ठिकाणी अनेक लहान-मोठी भाषणे दिली. त्यातील सात विषयांवरील भाषणांचं संकलन करून तयार झालेले हे पुस्तक आहे. त्यामध्ये, पहिले भाषण आत्मचरित्रात्मक आहे, दुसरे भाषण प्रिय आयोजकांना उद्देशून आहे. तिसरे भाषण विद्यार्थी मित्रांना तर चौथे भाषण शिक्षकांना उद्देशून आहे. पाचवे भाषण संस्कृती व प्रगती यांचा परामर्श घेणारे आहे, तर सहावे भाषण सत्य या संकल्पने वरील आहे. सातवे भाषण निरोप घेताना या विषयावर आहे.

चीनमध्ये जाऊन इंग्रजीमध्ये भाषणे करायची असल्याने या भाषणांची पूर्वतयारी केली असल्याचे टागोरांनी त्यांच्या पहिल्या भाषणात स्पष्ट केले आहे. साहजिकच, टागोरांचे जीवनविषयक चिंतन या पुस्तकात येऊन गेले आहे. पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल असे त्यांच्याकडे तेव्हा पाहिले जात होते. साहजिकच, आधुनिकता व प्राचीनता आणि कला, संस्कृती व विज्ञान यांच्या उंबरठ्यावरील तत्त्वज्ञ अशीही त्यांची ओळख सांगितली जात होती. चीनमध्ये तेव्हा कम्युनिस्ट क्रांतीचे वारे वाहू लागले होते, आणि टागोर तर शांतीची व अहिंसेची भाषा बोलत होते. त्यामुळे, त्यांच्या त्या चीन दौऱ्याला ठिकठिकाणी विरोध झाला होता. तो विरोध त्यांच्या संवेदनशील मनाने टिपला होता, त्याचा उल्लेख या पुस्तकातील पहिल्या भाषणाच्या सुरुवातीला दिसतो आणि शेवटच्या भाषणात समारोपालाही दिसतो. अगदी त्यांना जुनाट व कालबाह्य संबोधले जाण्यापर्यंत काहींनी मजल मारली होती. म्हणजे विरोधाची छाया त्या संपूर्ण दौऱ्यावर होती. त्यामुळे, या पुस्तकातील टागोरांचे चिंतन विशेष महत्त्वाचे आहे. आणि या दौऱ्यानंतर तिथूनच ते जपान दौऱ्यावर रवाना झाले, त्यामुळे, जपानमध्ये काय घडले हे समजून घेणेही रोचक ठरणार आहे. त्या संदर्भात पुढे कधी तरी.!
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके