डिजिटल अर्काईव्ह

एक दीर्घ मुलाखत आणि एक दीर्घ लेख

मकरंद साठे यांची दीर्घ मुलाखत प्रस्तुत अंकात आहे. केवळ वाचन करताना सोयीचे जावे म्हणून ती दोन भागांत छापली आहे. त्यांची ओळख प्रामुख्याने नाटककार अशी आहे, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्याही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांनी लिहिलेला 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' हा त्रिखंडात्मक ग्रंथ तर मराठी ग्रंथ व्यवहाराच्या दृष्टीने विशेष गौरवास्पद भाग आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी दोन महत्त्वाच्या गंभीर वैचारिक पुस्तकांचे अनुवादही केले आहेत, ती दोन्ही पुस्तके साधना प्रकाशनाकडून आली आहेत.

प्रत्येक एक दीड महिन्यानंतर दीर्घ लेखांचा एक मिनी विशेष अंक हे साधना साप्ताहिकाचे गेल्या चार-पाच वर्षांतील महत्त्वाचे वैशिष्ट्य बनले आहे. म्हणजे असे काही लेखन चालत येते किंवा समाविष्ट करणे आवश्यक वाटते; ज्यावर अधिक समग्र मांडणी वाचकांच्या पुढे आणता येते. अर्थातच असे दीर्घ लेख वाचणे काही वाचकांच्या दृष्टीने थोडेसे जड असते. परंतु वर्षभरात साधनाचे 50 अंक येत असतील तर त्यातील पाच-सहा अंक अधिक गंभीर वैचारिक व दीर्घ लेखनाचे असणे नुसते साहजिक नाही, तर आवश्यक ठरते. कारण अशा प्रकारच्या लेखनासाठीची जागा माध्यमांतून दिवसेंदिवस कमी होत चाललेली तर आहेच, परंतु अशा प्रकारचा वाचकवर्गही मराठीतल्या खूपच कमी नियतकालिकांच्याकडे आहे. साहजिकच, असे लेखन चालत येणे किंवा मिळवता येणे, त्यासाठी वाचक मिळणे आणि त्या प्रकारचे लेखन प्रसिद्ध होण्याची गरजही असणे, या तिहेरी कारणांमुळे मिनी विशेषांक काढले जात आहेत. प्रस्तुत अंक असाच एक मिनी विशेषांक आहे.

संख्याशास्त्रज्ञ असलेल्या अनिल गोरे यांनी पूर्वी अधूनमधून काही लेखन विविध नियतकालिकांमधून केलेले आहे. मात्र गेल्या सहा-सात महिन्यांत त्यांचे विविध विषयांवर प्रसिद्ध झालेले साधनातील सात-आठ लेख, त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची व त्यांच्यातील अभ्यासक संशोधकाची व्याप्ती खोली अधोरेखित करणारी आहे, थक्क करणारी आहे. अशाच प्रकारे थक्क करणारा एक लेख प्रस्तुत अंकातही आहे. मागील दोन-तीन वर्षांत युद्ध आणि ड्रोन हा विषय चर्चेला अधिक येत आहे. परंतु या ड्रोनचा उद्गम कसा झाला इथपासून आता त्याचा वापर कसा होत आहे, इथपर्यंतची गोष्ट त्यांनी ललितरम्य पद्धतीने त्या लेखातून सांगितली आहे.

मकरंद साठे यांची दीर्घ मुलाखत प्रस्तुत अंकात आहे. केवळ वाचन करताना सोयीचे जावे म्हणून ती दोन भागांत छापली आहे. त्यांची ओळख प्रामुख्याने नाटककार अशी आहे, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्याही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांनी लिहिलेला 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' हा त्रिखंडात्मक ग्रंथ तर मराठी ग्रंथ व्यवहाराच्या दृष्टीने विशेष गौरवास्पद भाग आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी दोन महत्त्वाच्या गंभीर वैचारिक पुस्तकांचे अनुवादही केले आहेत, ती दोन्ही पुस्तके साधना प्रकाशनाकडून आली आहेत. त्यांनी लिहिलेले 'दलपतसिंग येती गावा' हे नाटक पंधरा वर्षांपूर्वी आले. ते अतुल पेठे यांनी ते दिग्दर्शित केले होते. किंबहुना ते नाटक जालना जिल्ह्यातील राजकुमार व संभाजी तांगडे आणि त्यांच्या मित्रांसोबत उभे केले होते. ती संपूर्ण प्रक्रिया रोचक होती. त्यामुळे ते नाटक व ती प्रक्रिया यावर साधना साप्ताहिकाने विशेषांक काढला होता. ते नाटक माहितीचा अधिकार कायदा कसा उदयाला आला, या संदर्भात होते. अर्थातच अरुणा रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या लढ्याची गोष्ट त्या नाटकात आली होती. ती नाट्यसंहिता व ती प्रक्रिया नंतर साधना प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने आली होती. एवढेच नाही तर त्यानंतर अरुणा रॉय यांनी लिहिलेल्या The RTI Story या पुस्तकाचा मराठी अनुवादही साधना प्रकाशनाकडून आला.

अशा या मकरंद साठे यांची या अंकातील मुलाखत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा व लेखनकार्याचा गाभा व आवाका दाखवणारी आहे. त्यामुळे, त्यांच्या विविध पुस्तकांकडे वाचकांचे लक्ष वेधले जाईल. ती पुस्तके अनेक दालने खुली करणारी आहेत. इतकी दीर्घ मुलाखत एकाच अंकात प्रसिद्ध करण्याचा खरा हेतू तो आहे!
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी