डिजिटल अर्काईव्ह

मुलांच्या दुनियेत फेरफटका ‘शंकर्स वीकली’चा कुमार विशेषांक परिचय

चार वर्षांच्या अतुल भाटियाने घोड्यावर बसलेल्या एका मुलीचे चित्र काढले आहे. नंतरच्या गटांत 5 वर्षाच्या अर्जता घोपच्या ‘खेडुत स्त्री’ला पहिले बक्षीस मिळाले आहे, सात वर्षांच्या अजित दे या कुमाराने ‘रुसलेली बहीण’ रेखाटली आहे. याखेरीज ‘कामगार’, ‘पाऊस’, ‘प्राणिसंग्रहालयात’, ‘प्रार्थनेची वेळ’, ‘उद्यानात, ‘वसंत ऋतु’ वगैरे चित्रेही पहिल्या क्रमांकाची आहेत.

पूर्वी आपल्या देशातून दूत सात समुद्र ओलांडून दूरवर जात. दुसऱ्या देशातून शिकण्याकरता जिज्ञासू लोक भारतात येत. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होत असे. पण हे सगळे किती त्रासाचे! कसल्याच सोयी नाहीत. जमिनीवरचा प्रवास पायी वा बैलगाडीने आणि पाण्यातला मार्ग कसल्यातरी होडग्यातून. मध्येच वादळ वगैरे होऊन होडी बुडाली की सगळेच खलास जिथल्या तिथे! पण तरीदेखील या साऱ्या अडचणीना तोंड देऊन आपले लोक जात-येत असत. आता तर सगळे इतके सोपे झालेले, शास्त्रज्ञांना वाटते की पृथ्वी मुठीत धरता येईल. इकडची खबर तिकडे जाते दोन मिनिटांत. जगाच्या ह्या टोकाच्या लोकांना त्या टोकाला काय चालले आहे, त्याची इत्यंभूत बातमी कळू शकते. शिवाय अगदी नुकतेच माणसाने आकाशाच्या पोकळीत जाण्याचे प्रयोग केले आहेत. अधांतरी विमानतळ बांधण्याच्या गोष्टी लोक बोलू लागले आहेत.
परदेशात जाणारे लोक तेथे जाऊन तिथल्या पुढाऱ्यांशी बोलतात, माहिती करून घेऊन, येतात. पण ते कोही लहान मुलांना कळण्याजोगे असत नाही. अन् सरकारही काही आपल्याला परदेशात तिथल्या लहान मुलांशी दोस्ती जमवण्याकरता पाठवीत नाही. तिथली मुलेही की इकडे आलेली आपण पाहिलेली नाहीत. मग आपण मुलांनी एकत्र यायचे तरी कसे? मोठ्यांनी अंतराळात सुद्धा जावे आणि मुलांनी मात्र....
पण एक होता कल्पक माणूस. हिंदुस्तानांतलाच. चित्रेही काढायचा नि लिहायचाही खूप. त्याने काढले एक साप्ताहिकः शंकर्स वीकली, त्याच्या स्वत:च्याच नावाचे हे साप्ताहिक! पण इंग्रजीत. सगळीकडे, सबंध जगात त्याचा प्रसार.
त्याला एक कल्पना सुचली. त्याने आपल्या साप्ताहिकाचा एक अंक खास मुला-मुलींकरता काढायचे ठरवले. साप्ताहिकातून कल्पना मांडून पाहिली. सगळ्या मुलांना विलक्षण आवडली! इंग्रजी तसे किती जणांना येणार? पण चित्रात भाषा आडवी येत नाही. मुलांच्या लेख चित्रासाठी पुष्कळ बक्षिसे ठेवून लेख-चित्रे मागवली! पहिले बक्षिस भारताच्या राष्ट्रपतीचे. नेहरूंना मुलांच्याबद्दल फार प्रेम. प्रत्येक गटांतले पहिले बक्षीस त्यांचे. सबंध जगातल्या मुलांनी त्या स्पर्धातून भाग घेतला. इंग्रजी समजत नसले तरी चित्रे तर आहेतच ना!
हा उपक्रम सुरू केल्याला आता 8 वर्षे होऊन गेली. 1957 साली आठवा विशेषांक निघाला.
एकंदर साठ देशातल्या मुलांनी या स्पर्धात भाग घेतला. लिखाण व चित्र मिळून 40 हजारांचा (अबब!) आकडा जमला. विशेषांक झाला म्हणून काय झाले? इतक्यांना कुठे जागा देणार? मग त्यातली चांगली चित्रे, चांगले लेख निवडून काढण्याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली. चित्राकरिता 14 लोकांची अन् लेखांकरिता 9 जणांची. वेगवेगळ्या देशातले लोक त्यात होते. त्यांनी जवळजवळ 450 चित्रांची निवड केली. 75 लेखही पण छापण्याकरिता बाजूला काढले.
मग वयाप्रमाणे मुलांचे गट पाडले. चित्रकारांमध्ये 5 वर्षाच्या खालचा 1 ला गट, 5 ते 6 दुसरा गट, 6 ते 7 तिसरा, 7 ते 8 चौथा असे एकेका वर्षाचे अंतर असलेले गट 16व्या वर्षा पर्यंत तयार केले, लेखकांमध्ये पाचाच्या खालचे कुणीच नाही. वरचे त्यांचेही गट चित्रकारांप्रमाणेच. त्यानंतर प्रत्येक गटातले चांगले चित्र व चांगला लेख यांची निवड झाली.
लेख म्हणजे निबंधच नव्हे-गोष्टी कविता, सगळे काही. जे जे लिहिले जाते ते ते. अभिमानाची गोष्ट म्हणजे यात आपल्या भारतानेच सर्वांत जास्त बक्षिसे पटकावली आहेत. इतर देशांमध्ये आयर्लँड, ऑस्ट्रेलिया व अमेरिका हे देश आहेत. सगळे लेख इंग्रजीत. पण आमच्याकडली छोटीशी मुलेसुद्धा किती छान इंग्रजी लिहू शकतात! लेखामध्ये सर्वांत उत्कृष्ट ठरलेल्या लेखाला उपराष्ट्रपतीचे सुवर्णपदक देण्यात येते. ते ऑस्ट्रेलियाच्या मारिते लॅपिन्स या तेरा वर्षांच्या मुलीने मिळवले आहे. ‘माझ्या एकटीचे जग’ असा त्या निबंधाचा विषय आहे. 
चित्रामध्ये 15 ते 16 वर्षाच्या गटातल्या एका मुलीने राष्ट्रपतीचे सुवर्णपदक मिळवले आहे. मुलीचे नाव ज्युडी लेकेन. वय 15 वर्षे. देश कॅनडा. चित्राचे नाव ‘निग्रो मुलगा.’ इतर गटांत पाच छोट्या भारतीय चित्रकारांना पहिली बक्षिसे मिळाली आहेत. रशिया, जपान, कॅनडा व तुर्कस्तान यांनीही पहिल्या बक्षिसांचा मान पटकावला आहे.9 ते 10 वयाच्या गटात कु. आशालता दास या मुलीने काढलेले ‘एक बंगाली लग्न’ हे चित्र अंकाच्या मुखपृष्ठावर आहे. भारतीय चित्रकारांमध्ये बंगाली सर्वांत जास्त व महाराष्ट्रीय कमी असे प्रमाण आहे.
चित्राचे विषयसुद्धा किती विविध आहेत. अगदी छोट्या गटात पहिले बक्षीस मिळवणाऱ्या चार वर्षांच्या अतुल भाटियाने घोड्यावर बसलेल्या एका मुलीचे चित्र काढले आहे. नंतरच्या गटांत 5 वर्षाच्या अर्जता घोपच्या ‘खेडुत स्त्री’ला पहिले बक्षीस मिळाले आहे, सात वर्षांच्या अजित दे या कुमाराने ‘रुसलेली बहीण’ रेखाटली आहे. याखेरीज ‘कामगार’, ‘पाऊस’, ‘प्राणिसंग्रहालयात’, ‘प्रार्थनेची वेळ’, ‘उद्यानात, ‘वसंत ऋतु’ वगैरे चित्रेही पहिल्या क्रमांकाची आहेत.
लेखांमध्ये अमेरिकेतील कॅट्रिना ब्युअर नोबल ह्या सात वर्षाच्या मुलीची गोष्ट छोटीशीच पण सुरेख आहे.
काही चित्रामध्ये आई-बापांची मदत मुलांनी घेतल्याची तक्रार संपादकानी केली आहे. चित्रे निवडताना ‘पावसाळे पाहून’ मिळवलेल्या ज्ञानाचा काही उपयोग झाला नसल्याची कबुली निवड समितीने दिली आहे. आणि या ‘पोरांच्या कलेचा’ प्रभाव बड्या चित्रकारांवरही पडला असल्याचे सांगितले आहे. युनेस्कोचे डायरेक्टर जनरल डॉ. ल्यूथर इव्हान्स यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, अशी चित्रे मोठ्या लोकांना पहायला देऊन आपण त्यांना आपल्या जादूच्या जगात यायला परवानगी देत असतों. ‘शंकर्स वीकली’चा हा खास कुमार अंक पाहिला की मुलांच्या दुनियेत फेरफटका करून आल्यासारखे वाटते.
साधनेनेही गेल्या वर्षीपासून कुमार अंकाची नवी प्रथा मराठी कुमारांसाठी सुरू केली आहे. त्या अंकालाही ‘शंकर्स वीकली’सारखे भव्य स्वरूप की तरी येईल, अशी आपण आशा करू या.
 

Tags: ** Children's Special Issue Shankar's Weekly बाल विशेषांक शंकर्स वीकली weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी