पुणे येथे मुंबई राज्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अधिवेशन भरत आहे. खानदेशातील एक विख्यात मुख्याध्यापक श्री. ल.नी. छापेकर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांचा हा परिचय.
एखाद्या कुटुंबात प्रवेश करताच मनाला तेथील प्रसन्नतेचा, माधुर्याचा दरवळ एकदम मुग्ध करून टाकतो. तेथली स्वच्छता, टापटीप कुटुंबियांच्या सौंदर्यशील दृष्टीची साक्ष देत असते. तेथली नीटनेटक्या पोशाखातील हसरी बालके पुढे येतात, आपल्या मधुर, विनयशील चालचलणुकीने माता-पित्यांच्या जागरूक संगोपनशीलतेची व संस्कारितेची ग्वाही देतात पण मनाला ओढ लागते ती त्या सत्त्वशील, कर्तव्यदक्ष माता-पित्यांच्या दर्शनाची. हाच अनुभव काही विद्यामंदिरांतही येतो. शाळेचे आवार स्वच्छ असते. काचफलकात लावलेली विविध चित्रे व टांचणे जगाचे ‘ओझरते दर्शन’ घडवून जिज्ञासा प्रज्वलित करीत असतात, कोठे फलकावर एखाद्या सुविचाराचे सुबोध, काव्यमय विवरण केलेले असते, कोठे नव्या पुस्तकाचा परिचय असून त्याबद्दल उत्कंठा वाढविण्याचा प्रयत्न असतो, कोठे जागतिक घडामोडींची कुशल नोंद करून, शाळेच्या चार भिंतीतही जगाशी असलेला संबंध न कळत विद्यार्थ्यांवर बिंबवण्यात आलेला असतो. जिन्यावर, भिंतीवर, ‘अमूक करू नका, तमूक करू नका’ असे सुप्त आव्हान देणारे नकारात्मक फलक न दिसता ‘सौजन्य हा विनामूल्य मिळणारा अलंकार आहे’, ‘वाचनालयात शांतता तुम्हालाही हवीच असते’, ‘स्वच्छता म्हणजेच ईश्वरसांनिध्य’ अशी गोड, विधायक व मनलुभावक वचने झळकत असतात.
गणवेशातील विद्यार्थी तत्परतेने व चुणचुणीतपणे नवागताची गोंधळलेली मुद्रा ओळखून स्वयंस्फूर्तीने साहाय्याला पुढे सरसावतात. भीतीच्या पोटी निर्माण झालेल्या गंभीर शांततेत नव्हे, तर ज्ञानलालसेत रममाण झाल्यामुळे निर्माण झालेल्या प्रसन्न वातावरणात वर्गाचे काम चालू असते अशा ठिकाणी पाऊल टाकताच हा कुणाच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव, म्हणून मन चौकशी करू लागते. मुख्याध्यापकांना भेटायला उत्सुक होते आणि त्याच वेळी कुणीतरी अलगद खांद्यावर हात ठेवून स्निग्ध स्वराने विचारते, ‘काय, कशी काय आवडली ‘शाळा’ अशा वेळी जी धन्यता वाटेल, तीच आ.बं. हायस्कूल (चाळीसगाव) मध्ये 1944 साली प्रथम पाऊल टाकले तेव्हा वाटली. मनात एकच विचार आला, आरंभी वर्णन केलेल्या गृहाप्रमाणेच अशा शाळा दुर्मिळ आहेत. पण इथले बालक-शिक्षक-पालक किती भाग्यवान् आहेत!
श्री. ल.नी. ऊर्फ आण्णासाहेब छापेकर (पण त्यांच्या नावाला ‘साहेब’ उपाधी लावलेली त्यांना आडवत नाही) यांचे नाव महाराष्ट्रात अनेक नात्यांनी महशूर आहे. कोणाला प्राथमिक शाळेच्या पाठ्यपुस्तक संपादक समितीचे सदस्य म्हणून, कोणाला भाषा-व्याकरण-गणित इत्यादी पाठ्यपुस्तकाचे चतुर संपादक म्हणून, कोणाला राष्ट्रभाषा समितीच्या नियामक मंडळाचे सदस्य म्हणून, तर कोणाला पुणे विद्यापीठाच्या कोर्टाचे सदस्य म्हणून, कोणाला शहर समाजशिक्षण समितीचे सदस्य म्हणून, तर कोणाला बहिःशाल शिक्षणमालेचे एक वक्ते म्हणून, कोणाला माध्यमिक शिक्षणक्षेत्रातले विचारवंत म्हणून, तर कोणाला व्यायामक्षेत्रातील निष्णात खेळाडू व मार्गदर्शक म्हणून. पण खानदेशातील बहुसंख्य विद्यार्थीवर्ग त्यांना एकाच नात्याने ओळखतो व ते म्हणजे मातेच्या मायेने, पित्याच्या प्रेमाने मार्गदर्शन करणारे, कोणताही विषय अभिनव पद्धतीने रंजक बनवणारे, संभाषणकुशल, बहुश्रुत व प्रसन्न व्यक्तित्वाचे शिक्षक म्हणून. श्री. छापेकरांच्या कामाचा व्याप पाहून त्यांची स्नेहीमंडळी गोंधळून जातात की एवढ्या वेग-वेगळ्या समित्यांची कामे, त्यांच्या सभा, त्यासाठी प्रवास, आणि पुन्हा शाळेचे काम, नवनव्या योजनांचे संयोजन आणि अद्ययावत् वाचन हे अण्णांना जमते करे? त्यांना काही घरदार, खाणे, पिणे आहे की नाही?
श्री. छापेकरांच्या यशाचे रहस्य लहानपणापासूनच्या त्यांच्या कष्टाळू जीवन-प्रवृत्तींत आहे. गरीब कुटुंबात जन्म झाल्याने कष्टाचे बाळकडूच त्यांना मिळाले होते. पण अडी-अडचणींनी त्यांचा उत्साह मावळला नाही, आशावाद कोळपला नाही. याचे कारण वाचनाची संवय-सग्रंथांच्या वाचनाने झालेले संस्कार हेही असू शकेल. (आणि आजतागायत त्यांचे ते ‘व्यसन’ कायम आहे.)
इ.स. 1930 साली इतिहास व अर्थशास्त्र घेऊन ते मुंबई विद्यापीठाचे ‘स्नातक’ झाले. 36 साली इंग्रजी घेऊन नागपूर विद्यापीठाची एम्.ए. ची परीक्षा त्यांनी दिली आणि 39 साली बी.टी.च्या परीक्षेत ते सर्वप्रथम आले. आणि हे सर्व करीत असता खेळाचा छंद त्यांनी कधी सोडला नाही, हे विशेष लक्षात ठेवण्याजोगे आहे. व परीक्षेचे विषय इतिहास, अर्थशास्त्र; पण आज छापेकरांचा लौकिक आहे तो सुबोध सुंदर शैलीचे मराठीचे वक्ते व लेखक म्हणून. ‘मायबोली’ वरचे त्यांचे प्रेम विशेष आहे. त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा संसर्ग तर फार झटकन् लागतो.
वकिली, वैद्यकी, व्यापार असे समाजमान्य व वैभवदायक व्यवसाय वंशपरंपरा चालताना दिसतात, याचे आश्वर्य नाही वाटत. प्रतिष्ठेच्या आकाक्षांची बीजे भोवतालच्या वातावरणांतून नकळत रुजतात, तर कधी रुजविली जातात. पण शिक्षकांचा पेशा दुसऱ्या पिढीने, बापानंतर मुलाने स्वीकारल्याचे प्रायः आढळत नाही. (आजच्या पिढींत तर शिक्षक पिता देवाजवळ बहुधा एकच मागणे मागतो देवा, माझ्या मुलाला शिक्षक करू नको!’) बोलूनचालून दारिद्र्याचे वरदान हे, देवापरचे ‘अनामिक’ जीवन ते! पण श्री. अण्णा छापेकरांची शिक्षकाची ही चवथी पिढी आहे हे सांगितले तर विश्वास बसायचा नाही कुणाचा! आपल्या मुलाला शिक्षकी व्यवसायाबद्दल प्रेम व श्रद्धा निर्माण करणारे वडीलही आदर्श असले पाहिजेत, तसाच ते आदर्श जोपासणारा मुलगा बालपणापासून ध्येयवादाची दीक्षा घेतलेला, त्यागाचे पत्करलेला असला पाहिजे, हे उघड आहे. म्हणूनच सेन्सस ऑफिसमध्ये कर्तबगारी दाखवूनही सरकारी नोकरीचे ताट बाजूला सारले आणि खाजगी शिक्षणसंस्थेत आजीव सदस्यत्व त्यांनी स्वीकारले.
श्री. छापेकर यांनी मुख्याध्यापक या नात्याने विशेष लौकिक संपादिला आहे, याचे मर्म व्यक्ती व नेता या नात्याने त्यांच्या ठिकाणी जो अनेक गुणांचा मधुर मिलाफ झाला आहे, त्यात आहे. त्यांची राहणी साधी आहे. त्यांची वाणी विनयशील आहे. त्यांच्या संभाषणाला विनोदाची झालर आहे, आपली मते मांडण्यात ते निःसृद व निर्भिड आहेत. कश्चित् कुणाला त्यात अहंकाराची झांक दिसते, पण आत्मप्रत्ययाचा कणखरपणा असतो तो. शिवाय इतरांच्या मताला वाव द्यायची व नम्रपणे आपली मतभिन्नता व्यक्त करण्याची त्यांची सुजनता त्यांच्याबद्दल नेहमीच आत्मीयता निर्माण करते. ते स्वतः अति वक्तशीर व कर्तव्यदक्ष आहेत. इतर सहकाऱ्यानी तसेच असावे, अशी त्यांची अपेक्षा असते. कामाचा उरक-आटोप या बाबतीत रामदासी साक्षेप त्यांच्या ठायी आहे. आणि म्हणून अनेकदा सामान्य कार्यकर्त्याला कडवा सासूरवास नसला तरी त्यांचा प्रेमळ धाक वाटतोच. स्वदेशीवरची त्यांची अढळ निष्ठा आणि दीन-दलिताबद्दलचा क्रियाशील उमाळा ही त्यांच्या बद्दल आदर निर्माण करतात.
शिक्षक, मुख्याध्यापक, ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य, अनेक संस्थांचे संघटक व संचालक या नात्याने त्यांनी केलेले कार्य हे खरे त्यांचे जीवनसाफल्य आहे. शिक्षणक्षेत्रात महत्व असते हे नवनव्या कल्पना आत्मसात् करून, त्यांचे यशस्वी प्रयोग करून त्यातून काही परंपरा निर्माण करण्याचे. पण या मार्गात अडचणी कमी नसतात. गतानुगतिक पालक-शिक्षकांना नव्या कल्पना म्हणजे ‘वेड’ वाटतात. प्रयोग त्यांच्या लेखी ‘थेर’ ठरतात. मुख्याध्यापकाची कसोटी तेथेच असते. आपल्या सहकाऱ्यांचे केवळ दोष काढून यशस्वी लोकसंग्राहक बनता येत नसते. विद्यार्थिप्रिय मुख्याध्यापक आपल्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात सलतो; तर सहकाऱ्यांच्या तंत्राने चालणारा जुनाट, कर्मठ ठरतो. पण श्री. छापेकरांनी शिक्षक व विद्यार्थी या दोन्ही आपापल्या कौशल्याने सांभाळून आपल्या संस्थेच्या प्रगतीचा वेग वाढविला. विद्यार्थी स्वराज्यसभा, विद्यार्थी दिन, विद्यार्थी-शिबिरे, विद्यार्थी-प्रमुखांचे खास वर्ग, वाचनालयाचे विविध विभाग, सामाजिक सेवेची विविध योजना, विशेष म्हणजे वेगवेगळ्या विषयात नैपुण्य संपादन करता यावे म्हणून खास वर्ग, सोयी व मार्गदर्शन इत्यादी शैक्षणिक उपक्रम मोठ्या धडाडीने, आत्मविश्वासाने व निरलसतेने त्यांनी अंगावर घेतले व जिद्दीने तडीस नेले. कच्या शिक्षणाचा अर्थ एकाच शब्दात सांगता येतो. तो म्हणजे ‘संस्कार’ संस्कार साऱ्याच वातावरणातून सदैव घडत असतात. कुशल शैक्षणिक कार्यकर्ता आपल्याला हवे तसे वातावरण निर्माण करतो. त्याच वातावरणात विद्यार्थी कसे रमतील हे पाहतो आणि अशा रीतीने अनिष्ट वातावरणाच्या संस्कारांपासून विद्यार्थ्यांचा आपोआप बचाव होतो.
उत्कृष्ट मानसशास्त्री व ध्येयशील व्यक्तीच उत्कृष्ट शिक्षणशास्त्रज्ञ बनते. विद्यार्थ्यांच्या मनाची तिला पारख असते. सामाजिक नवआदर्शाची तिला जाणीव असते. श्री. छापेकर हे अशा संस्कार घडवणाऱ्या कुशल संघटक शिक्षण-शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. आरंभी चित्रित केलेले वातावरण हा सारा त्यांच्या मौलिक दृष्टीचा व निरलस प्रयत्नांचा सफल परिपाक आहे. आज पंचवीस वर्षे वेगवेगळे प्रयोग करूनही त्यांच्या प्रयोगशीलतेची हौस कमी झालेली नाही. त्यांच्या बुद्धीचा तजेला पाहिला की तिच्या नवनवोन्मेषशालित्वाची साक्ष पटते.
मोठ्या झाडांच्या सावलीत लहान झाडे वाढत नसतात. मुलांवरील मायेची झालर वेळीच आवरती घेतली नाही तर ती पांगळी बनतात, असे म्हणतात. लिकरगसने स्पार्टी साठी कायदे केले व तो अदृश्य झाला. पण असा अनासक्त कर्मयोग कितीकांना साधतो? श्री. छापेकरांनी चाळीसगावचे विद्यालय नावारूपास आणले; शालेय व्यवस्थेत अनुभव घेण्याची संधी देऊन तेथील शिक्षकवर्ग कार्यक्षम केला आणि अखेर शाळा कायम शिक्षकांच्या स्वाधीन करून ते जळगावळला आपल्या मायसंस्थेत परत गेले.
जळगावचे हायस्कूलही जणू त्यांच्या सेवेची वाट पाहात होते. चाळीसगावच्या वीस वर्षाच्या प्रयोगाचा अर्क सार्वजनिक हायस्कूलला एकाच वर्षांत लाभला. ‘आहे नवे नवे पाणी’ असे सर्वांना वाटू लागले. एकाच वर्षांत नवनव्या उपक्रमांनी शाळेचे जीवन त्यांनी कसे गजबजून टाकले हे पाहावयाचे असेल, तर त्यांची गतसालची शालेय दैनंदिनी-तिचे ‘ओझरते दर्शन’ पाहावे.
पण अण्णा छापेकरांबद्दल त्यांच्या चाहत्यांची एक तक्रार आहे, कुरकुर आहे. विद्यार्थ्यांसाठी ते जेवढे लिहितात, तेवढे ते शिक्षकबंधूसाठी लिहीत नाहीत. त्यांनी लहान विद्यार्थ्यांना ‘उसना मेवा’ घरोघर पोचविला. ‘शालेय स्वराज्या’ची कल्पना गोष्टीरूपाने त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. साने गुरुजींचा ‘स्मृतिसुगंध’ कण कण गोळा करून दरवळत ठेवला. शाळेत विद्यार्थ्यांसाठी नित्य नियमाने लिहिलेल्या सुविचारांतून ‘जीवन विकास’ व ‘विकासाच्या वाटा’ दाखविल्या. पण हे सारे अपुरे-अधुरे वाटते. मुख्याध्यापक या नात्याने आलेल्या विविध अनुभवांचे समृद्ध भांडार त्यांच्याजवळ आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपली लाजाळू व संकोचशील मने त्यांच्याजवळ खुली केली आहेत. अनेक शिक्षणतज्ज्ञांचे व आचार्यांचे विचार त्यांनी आत्मसात् केले आहेत. या सर्वांचे सार अण्णांनी आता ‘अक्षरबद्ध’ करायला हवे, महाराष्ट्राच्या शैक्षणिक साहित्यात भर घालायला हवी, अशी त्यांच्या मित्रांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
आज मुंबई राज्यातील मुख्याध्यापक संघाच्या फेडरेशनच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपद विभूषिण्याचा त्यांना लाभलेला मान, म्हणजे एक प्रकारे त्यांच्या कर्तृत्वाला ‘रजत महोत्सव’च आहे. हा मान त्यांच्या पुढील कर्तृत्वाची मुहूर्तमेढ ठरो, अशी शुभकामना. कारण ‘क्लेशः फलेनही पुनर्नषता विधते.’
Tags: Annasaheb Chappekar Principals' Union Convention G.V. Akolkar L. Ni. Chappekar आण्णासाहेब छापेकर मुख्याध्यापक संघाचे अधिवेशन ग.वि. अकोलकर ल. नी. छापेकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या