माझ्या कारकिर्दीची सुरुवात तशी लवकरच सुरू झाली. खरं तर त्या काळातील साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखकांमध्ये मी सर्वांत तरुण लेखक होतो. माझ्याकडे वयाच्या परिपक्वतेचा आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या इंग्रजी शिक्षणाचा अभाव होता. त्यामुळे लोकांच्या तुच्छतापूर्वक प्रतिसाद आणि मर्यादित प्रोत्साहनातून आलेल्या एकांतात मला स्वातंत्र्य उपभोगायास मिळाले. हळूहळू मी वयाने मोठा झालो. अर्थात, त्यात माझे असे काही कर्तृत्व नाही. उपहास आणि क्वचित मिळणाऱ्या प्रोत्साहनातून हळूहळू मार्ग काढत मी अशा मान्यतेपर्यंत पोहोचलो जिथे कौतुक आणि टीकेचे प्रमाण जणू पृथ्वीवरील जमीन आणि पाण्याच्या प्रमाणासारखे होते.
भाग 1
मी तत्त्वज्ञ असल्यामुळे एका बैठकीस अर्धा तास उशिरा पोहोचलो असे माझ्याबद्दलचे एक निरीक्षण मी इथल्या एका वृत्तपत्रात नुकतेच वाचले. ही तक्रार फक्त त्या एका साध्या घटनेपुरती मर्यादित असती तर त्याबाबत मी समाधानकारक स्पष्टीकरण दिले असते. मात्र, ही तक्रार करताना लेखकाची भूमिका केवळ एक निरीक्षण नोंदवणे नसून, एकूणच माझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही ठोस समज करून देणारी जाणूनबुजून केलेली टिपण्णी होती असे मला असे वाटते. आधुनिक युगात मी पूर्णपणे कालबाह्य आहे हे त्यांचे मत मला अतिशय गंभीर वाटते. "दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हा कवी चंद्रप्रकाशात द्राक्षरसाच्या प्याल्यांसमवेत स्वप्ने रंगवत होते आणि तत्त्वज्ञ वेळ, काळ अशा तात्कालिक गोष्टींकडे दुर्लक्ष करीत होते त्या काळी मी जन्मलो असतो तर बरे झाले असते", असे ते म्हणाले.
हे वाचून मला थोडे आश्चर्य वाटले. अर्थात, काही काळ लोटल्यावर मला हे सारे हास्यास्पद वाटेल. माझ्या देशबांधवांकडून असे अनेक ताशेरे ऐकण्याची मला सवय आहे. शाळकरी वयात असल्यापासूनच मी फारच आधुनिक आहे, प्राचीन काळातील ज्ञानाचा मला विसर पडला आहे, त्यामुळे थोर भारतीय संस्कृतीमध्ये सामावण्याचा अधिकार मी गमावला आहे, अशी टीका माझ्यावर झाली आहे. तुम्हा सर्वांच्या मते, मी कालबाह्य झालो असल्याने निरुपयोगी आहे. तर आमच्या इथल्या लोकांसाठी मी अति आधुनिक असल्याने अप्रिय आहे. ह्यांपैकी काय खरे आहे हे मला ठाऊक नाही.
ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक डॉ. हू शिळ यांनी माझ्या जन्मकुंडलीवरून या चीनभेटीबद्दल काल काही भविष्य वर्तवले. त्या वेळच्या ग्रहांची स्थिती अभ्यासून माझ्या जन्माच्या वेळी कुठले ग्रह प्रभावशाली होते तसेच कुठले ग्रह नकारात्मक होते हे ते मांडू शकतील. ते मला हेही सांगू शकतील की, का बरं हा दुर्दैवी जीव आपल्या अतिपरिचित देशबांधवांकडून तसेच अनोळखी अपरिचितांकडूनही नेहमीच काळाच्या चुकीच्या किनाऱ्यावर भरकटलेला समजला जातो. माझ्याबद्दलचे असे गैरसमज पसरल्यामुळे माझ्या मित्रांनी मला तुमच्यापुढे थोडक्यात आत्मपरिचय करून देण्यास सांगितले आहे. जेणेकरून माझ्या कल्पना तुम्हाला फारच स्वप्नाळू, दुर्बोध अथवा गूढ वाटणार नाहीत.
माझा जन्म 1861 मध्ये झाला. ही तारीख ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाची नाही; परंतु ती बंगालच्या इतिहासातील एका महान काळाशी संबंधित आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, आमच्याकडे तीर्थक्षेत्रे नद्यांच्या संगमापाशी असतात. नद्यांना आम्ही जीवनदायिनी मानतो. नद्यांचा संगम म्हणजे आत्म्याचे परमात्याशी होणारे मिलन मानले जाते. माझा जन्म झाला तेव्हा आमच्या देशात तीन महत्त्वाच्या चळवळींचे प्रवाह एकत्र आले होते.
त्यांपैकी एक धार्मिक चळवळ होती. थोर विचारवंत आणि मानवतावादी नेते राजा राममोहन रॉय यांनी ती सुरू केली होती. हजारो वर्षांपासून केवळ दिखाऊ आणि भौतिक कर्मकांडाच्या गाळात रुतलेला आध्यात्मिक जीवनाचा मार्ग खुला करण्याचे क्रांतिकारी कार्य त्यांनी केले.
प्रत्येक परिवर्तनशील कल्पनेवर शंका उठवणाऱ्या पुराणमतवादी लोकांसोबत त्यांना जोरदार संघर्ष करावा लागला. भूतकाळाला चिकटून राहणारे लोक जुन्या परंपरेच्या प्राचीनतेचा दुराभिमान बाळगतात. त्यामुळेच जेव्हा एक सत्यवादी विद्वान व्यक्ती त्यांना आव्हान देते, तर्कशुद्ध विचार मांडते आणि प्रगतीचा मार्ग दाखवते तेव्हा हे लोक अस्वस्थ व संतप्त होतात. नवे विचार बदल आणतात. त्यांच्या सुरक्षित चौकटीला भिडणारे हे बदलांचे वारे त्यांना धोकादायक वाटतात.
माझ्या जन्माच्या वेळी, ह्या सर्व घडामोडी सुरू होत्या. मला हे सांगताना अतिशय अभिमान वाटतो की, माझे वडील त्या आंदोलनातील एक महत्त्वाचे नेते होते. आंदोलनापायी त्यांनी बहिष्कार सहन केला. समाजाकडून होणाऱ्या अपमानाला ते धैर्याने सामोरे गेले. माझ्या जन्माच्या वेळी नव्या मूल्यांच्या उदयाची घुसळण सुरू होती. ही मूल्ये नवीन वाटत असली तरी प्रत्यक्षात ती पुरातन होती. ज्या पुरातन गोष्टींचा अभिमान बाळगला जात होता त्यापेक्षाही ती कितीतरी प्राचीन होती.
त्याच वेळी, बंगालमध्ये साहित्यक्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची चळवळ सुरू होती. महान साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे ह्या अतिशय महत्त्वाच्या क्रांतीचे प्रणेते होते. वयाने बरेच ज्येष्ठ असूनही मला त्यांना भेटण्याचे भाग्य लाभले. आध्यात्मिक अभिव्यक्तीसारखी साहित्यिक अभिव्यक्तीही मुक्तपणे करता येणे आवश्यक आहे. परंतु, त्या काळी आमच्या साहित्यातील सर्जनशीलता पूर्णतः नष्ट झाली होती. आलंकारिक शैलीच्या साखळदंडामध्ये भाषेला जखडून ठेवले होते. अशा निर्जीव परिपूर्णतेला कवटाळून बसलेल्या रूढीवाद्यांच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस त्यांनी केले. त्यांच्या सर्जनशील जादुई स्पर्शानिशी शतकानुशतके निद्रावस्थेत असलेल्या साहित्याला अखेर जाग आली. भाषेवरील बोजड भार दूर झाला. कात टाकलेल्या साहित्याने सामर्थ्य आणि सौंदर्याची किती अप्रतिम झलक दाखवली !
याच सुमारास, माझ्या देशात आणखी एक मोठी चळवळ सुरू होती. तिला 'राष्ट्रीय चळवळ' म्हणून ओळखले जाते. हिचे रूप पूर्णपणे राजकीय नव्हते. लोकांना स्वतःचा आतला आवाज ओळखण्याची आणि ती ओळख ठामपणे मांडण्याची प्रेरणा ह्या चळवळीने दिली. पाश्चिमात्यांनी सतत केलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे बळ लोकांना मिळाले.
पाश्चिमात्य लोक बेमुर्वतपणे त्यांच्या आयुष्याशी साधर्म्य असलेल्या आणि नसलेल्या गोष्टींच्या आधारावर जगाची 'चांगली' आणि 'वाईट' अशी विभागणी करत आमचा अपमान करत होते. या तुच्छतापूर्वक वेगळेपणाच्या वागणुकीने आमच्या संस्कृतीला मोठी हानी पोहोचवली जात होती तसेच आमचे खच्चीकरण केले जात होते. ह्यामुळे आमच्या देशातील तरुणाईच्या मनात पूर्वजांकडून मिळालेल्या वारशाबद्दल अविश्वास निर्माण झाला. युरोपीय शिक्षकांसारखेच भारतीय विद्यार्थीही प्राचीन भारतीय चित्रकला आणि इतर कलाकृतींना हसू लागले.
आमच्याकडील शिक्षकांचे अलीकडे ह्याबाबतीत मतपरिवर्तन झाले असले तरी, विद्यार्थ्यांच्या मनात मात्र अजूनही निर्विवाद गुणवत्ता असलेल्या आमच्या उत्तम कला-परंपरांप्रति पूर्ण विश्वास नाही. फ्रेंच चित्रांच्या दर्जाहीन नकली, भडक आवृत्त्या, स्वस्त छापील तैलचित्रे आणि यांत्रिक अचूकता साधणारी ठरावीक साच्यातली चित्रे ह्यांची प्रशंसा ते दीर्घकाळ ऐकत आले आहेत. कदाचित, त्यामुळेच पूर्वेकडील कलाकृतींना तुच्छतापूर्वक नाकारणे हे त्यांना आजदेखील उच्चभ्रू लक्षण वाटते.
खरी मौलिकता ही वास्तवाच्या अंतःकरणातील मुलभूत ताल शोधण्यात नव्हे, तर परदेशांतील बटबटीत चित्रांतील भरलेले ओठ, रंगवलेले गाल आणि उघडी छाती यांत आहे असे आधुनिक भारतीय तरुण भक्तिभावाने म्हणतात. अज्ञानातून जन्माला आलेली ही नकारात्मक वृत्ती आमच्या संस्कृतीच्या इतर क्षेत्रांतही जोपासली गेली. प्रभावशाली लोकांकडून तरुण पिढीच्या मनावर केल्या जाणाऱ्या संमोहनाचा हा परिणाम होता.
मी जन्मलो तेव्हा लोकांमध्ये बंडाची भावना नुकतीच जागी झाली होती. काही जणांनी प्रवाहाला आव्हान द्यायला सुरुवातही केली होती. या चळवळीचे नेते माझ्या कुटुंबातच होते. लोकांची मने लोकांकडूनच होणाऱ्या अपमान व उपेक्षांकडून सुरक्षित राहावीत ह्यासाठी माझे सख्खे आणि चुलत भाऊ भक्कम उभे राहिले.
आपण अंधपणाने भूतकाळाला नकार देता कामा नये, हे राष्ट्रीय चळवळ सुरू होण्यामागील एक ध्येय होते. आपल्याला वैश्विक आणि शाश्वत असा पाया शोधायचा आहे. चिरंतन मूल्य असलेल्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे अशा हेतूने ही चळवळ उभी राहिली. ही प्रतिगामी नव्हे, तर क्रांतिकारी चळवळ होती. उधार घेतलेल्या गोष्टींमध्ये गर्व मानण्यास स्पष्ट नकार देण्याचे प्रचंड धैर्य तीत सामावले होते.
जोमाने सुरू असलेल्या ह्या तीनही आंदोलनांत माझ्या कुटुंबीयांनी सक्रिय सहभाग घेतला होता. धर्माविषयी आमची मते परंपरागत विचारांपेक्षा भिन्न असल्यामुळे आम्हाला समाजातून बहिष्कृत करण्यात आले. बहिष्कृत म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला. विचार आणि बुद्धीने स्वतंत्र जग आम्हाला उभे करायचे होते. नव्या जगाची मुळापासून बांधणी करायची होती. त्यासाठी भक्कम पाया शोधणे आवश्यक होते.
आपण पाया निर्माण करू शकत नसलो तरी त्यावर सुंदर बांधकाम करू शकतो. लोकांच्या अंतःकरणात दडलेला पाया शोधणे आणि जीवनाची नवीन सुरुवात करणे ह्या दोन गोष्टी एकाच वेळी करणे भाग होते. 'परिवर्तन हेच जीवन आहे', ह्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी बाह्य बदलांइतकेच अंतस्थ परिवर्तनही महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा, असे अर्थहीन बदल केवळ वादविवाद व संघर्ष निर्माण करतील.
माझा जन्म आणि बालपणीची जडणघडण तीन क्रांतिकारी चळवळींच्या वातावरणात झाली हे तुम्हाला मी मघाशीच सांगितले. ज्यांनी स्वतःचे जीवन स्वतः घडवले अशा कुटुंबात माझा जन्म झाला. त्यामुळे लहानपणापासूनच आत्म-अभिव्यक्तीसाठी अंतःकरणातून आलेल्या निकषांवर मी विश्वास ठेवला. माझ्या भावनांचे व विचारांचे माध्यम माझी मातृभाषाच होती. ती भाषा लोकांची असली, तरी माझ्या अंतःप्रेरणेनुसार मी तिला नव्याने घडवत गेलो.
कोणत्याही कवीने आपल्या अभिव्यक्तीसाठी तयार माध्यम वापरू नये. त्याच्याकडे स्वतःची बीजे असावीत आणि त्या बीजांसाठी सुपीक मातीही त्यानेच तयार करावी. प्रत्येक कवीची भाषा स्वतंत्र असते. भाषा तो नव्याने निर्माण करत नसला तरी त्याने केलेल्या भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण वापरातून ती घडत असते. भाषेला स्वतःच्या जीवनाचा जादुई स्पर्श दिला, तर ती आपल्या सर्जनाचे विशेष वाहन बनते.
मानवजातीच्या हृदयात काव्य दडलेले असते. आपल्या भावनांच्या परिपूर्ण अभिव्यक्तीसाठी मानवाकडे प्रत्येक युगात नव्याने त्याचे स्वतःचे होईल असे प्रवाही आणि लवचीक माध्यम हवे. सर्व प्राचीन भाषा काळाच्या ओघात बदलत गेल्या आहेत आणि आजही बदलत आहेत. परिवर्तनाला नकार देणाऱ्या भाषा शेवटी विचार व साहित्याची समृद्ध पिके देण्यास असमर्थ ठरतात. अशा भाषा कालांतराने लुप्त होतात. नियम जाचक असले तर मन एक तर नाइलाजाने त्या नियमांत स्वतःला बांधून घ्यायला तयार होते अथवा बंड करते. प्रत्येक क्रांती म्हणजे आतल्याचा बाहेरील आक्रमणाविरुद्धचा संघर्ष असतो.
या पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या इतिहासात एक महान अध्याय घडला. मानवाच्या अंतःकरणातील अदम्य शक्तीने अस्तित्वाच्या बंधनांना भेदून बाहेरचा मार्ग शोधला. कुठल्याही बाह्य शक्तीच्या प्रभावाखाली दबून जाणार नाही असे तिने विजयी आणि बंडखोर स्वरात जगाला सांगितले. त्या क्षणी ती दुर्बल भासत असली तरी हळूहळू तिने विजय मिळवला. आपल्या सामाजिक जीवनातसुद्धा असेच घडते. जेव्हा जेव्हा एखादी बाह्य व्यवस्था सत्ता केंद्रित करून आपल्या अंतः शक्तीला गुलाम बनवते तेव्हा तेव्हा क्रांती जन्माला येते.
जेव्हा एखादी यंत्रणा राजकीय, व्यापारी, शैक्षणिक किंवा धार्मिक क्षेत्रात शक्तिशाली बनते, तेव्हा ती लोकांच्या सर्जनशीलतेचे दमन करते. त्यांना अडवून आणि त्यांचे शोषण करून स्वतःची सत्ता अधिक बळकट करते. आज अशा बाह्य शक्तींची सत्तेवरची पकड झपाट्याने वाढत आहे. त्यात दडपल्या गेलेल्या मानवाच्या हृदयाचा आक्रोश हवेत घुमत आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी त्याचा झगडा सुरू आहे.
परिवर्तन घडण्यासाठी क्रांती आवश्यक आहे. त्यासाठी निंदा, गैरसमज आणि टीका सहन करण्याची तयारी लागते. आरामदायी जीवन आणि भौतिकवादाला प्राधान्य देणारे, परंपरेवर विश्वास ठेवणारे, रूढींना कवटाळून बसणारे लोक आधुनिक युगाचे नव्हे, तर मृत भूतकाळाचे वारसदार आहेत. त्या काळात मनापेक्षा शरीरबळ व आकाराला अधिक महत्त्व होते.
निव्वळ शारीरिक वर्चस्व हे यंत्रवत असते. आधुनिक यंत्रे फक्त देहाचे अतिरंजित रूप दाखवतात. आजची पिढी या प्रचंड शारीरिक सामर्थ्याच्या अति वाढलेल्या भौतिक शक्तीच्या प्रतीकांनी दिपून गेली आहे. आम्हालाही अशीच भावनाशून्य अजस्त्र साधने हवीत असे त्यांचे मागणे आहे. परंतु, त्यांना हे समजत नाही की, ते मन आणि विचारांची पायमल्ली करून फक्त विशाल देहाचा गौरव करणाऱ्या आदिम युगाकडे पुन्हा परत जात आहेत.
जगातील प्रत्येक महान मानवी चळवळ एखाद्या उच्च, तेजस्वी आदर्शाच्या प्रकाशातूनच जन्म घेते. तुमच्यापैकी काही जण म्हणतात की, हे तत्त्वज्ञान आता मृतप्राय झाले आहे आणि केवळ भौतिक शक्तीच्या आधारावर अवलंबून राहण्यावाचून पर्याय नाही. परंतु, तुम्ही मांडलेला सिद्धान्त फार पूर्वीच कालबाह्य झाला आहे असे माझे म्हणणे आहे. केवळ शारीरिक बळाने वर्चस्व सिद्ध करणे जेव्हा ह्या जगातून हद्दपार झाले आणि दुबळ्या माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि विचारांची अभिव्यक्ती जेव्हा महत्त्वाची मानली जाऊ लागली, तेव्हाच तो सिद्धान्त नाश पावला.
भौतिक गोष्टींचा हट्ट हा फार जुना आहे. मनुष्याची अभिव्यक्ती खऱ्या अर्थाने आधुनिक आहे. मी त्याच्याच बाजूने आहे, कारण मी आधुनिक आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी अशा कुटुंबात जन्मलो ज्यांनी बंड पुकारले होते, ज्यांचा आपल्या अंतःकरणातील आदर्शाशी असलेल्या निष्ठेवर विश्वास होता. मला नाकारण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. मात्र, एक क्रांतिकारक म्हणून अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा झेंडा तुमच्या भौतिक शक्ती आणि संचयाला पुजणाऱ्या
मंदिरात आणण्याचा मलाही अधिकार आहे.
भाग 2
दुसऱ्या देशात गेल्यावरही आपण आपुलकी शोधत राहतो. त्या देशातील लोकांच्या विशाल हृदयात आपल्याला ती सापडते. ज्यांच्याकडे मनाची श्रीमंती नाही ते परदेशी पाहुण्यांना आपल्या मनात आणि घरात जागा देऊ शकत नाहीत. जे प्रेमाने ओथंबलेले असतात तेच इतरांना आसरा देऊ शकतात.
ज्या भूमीवर पिढ्यान्पिढ्या बहरणाऱ्या वृक्षांनी नटलेले अरण्य असते, तिथली माती पाना-फुलांच्या झडीमुळे सुपीक आणि समृद्ध होते. तुमच्या प्राचीन संस्कृतीनेही मनाच्या मृदेला अशीच समृद्धी दिली आहे. माणुसकीचा ओलावा प्रत्येक गोष्टीला जिवंतपणा देतो आहे. मानवता आणि आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण असल्यामुळेच ही संस्कृती दीर्घकाळ टिकून राहिली आहे.
इतरही संस्कृती होऊन गेल्या. त्यांनी विचारांचे, आदर्शाचे आणि सौंदर्याचे भरघोस पीक दिले. मात्र, कालांतराने त्या नापीक झाल्या. परंतु, तुमच्या संस्कृतीची माती सुपीक असल्याने जीवनवृक्षाची मुळे इथल्या जमिनीत खोलवर रुजली आहेत. दूरवरून आलेल्या प्रवाशांना ती आपुलकीची छाया आणि फळे देते आहे. मीही ते अनुभवतो आहे. म्हणूनच मला खात्री आहे की, तुमचे साहित्य आणि तुमच्या इतर सर्व अभिव्यक्तींमध्येही या आतिथ्यशीलतेचा सखोल स्पर्श असणार. समाज हेच अभिव्यक्तीचे सर्वोच्च रूप आहे. तुमच्या आतिथ्याचा मधुर अमृतरस चाखायला मिळाल्यामुळे माझ्यासारख्या परक्या प्रवाशाला तुमच्या प्राचीन भूमीत घरच्यासारखे वाटते आहे.
आज दुपारी मी एका वर्तमानपत्रात वाचले की, 'सहृदय' ह्या शब्दाने तुमचे वर्णन केले जाते. त्याचा पुरावा मला सर्वत्र दिसतो आहे. मला मिळालेल्या अद्भुत स्वागताने मला तुमच्या कनवाळूपणाची खात्री पटली आहे.
मी तुमच्या काही कवितांच्या अनुवादांचे वाचन केले. तुमच्या साहित्याच्या गुणवैशिष्ट्यांनी मला मोहून टाकले. वैशिष्ट्यपूर्ण, स्वतंत्र आणि अन्य कोणाच्याही साहित्यापेक्षा वेगळे असे हे साहित्य आहे. पण, तुम्हासारख्या जाणकारांसमोर तुमच्या साहित्यावर बोलणे हा माझा उद्देश नाही.
मला तुम्हाला सांगायचे आहे ते माझ्या देशातील साहित्याच्या समस्येबद्दल. आमच्याकडेही एक काळ असा होता जेव्हा लवचीकपणा, जिवंतपणा नसलेली शास्त्रीय परंपरा साहित्यावर अधिराज्य गाजवत होती. परंतु, संस्कृत साहित्याचा प्रभाव केवळ विद्वानांपुरताच मर्यादित होता. लोकसाहित्यात त्याचे मूळ कधीच रुजले नाही. त्यामुळे एके काळी स्वतंत्र अस्तित्व असलेले आमचे प्राचीन लोकसाहित्य लोप पावले. भारताच्या अभिजात साहित्यात आपल्याला लोकांच्या हृदयात वाहणाऱ्या एका समांतर प्रवाहाच्या खुणा सापडतात. बोली भाषेतील साहित्यप्रवाहातून संस्कृत कवींना अनेकदा प्रेरणा मिळत असे. पण बोली भाषा सतत बदलत गेल्याने आणि त्या लेखी स्वरूपात नोंदल्या न गेल्याने त्यांपैकी अनेक काळाच्या ओघात लुप्त झाल्या.
तरीदेखील आमच्या काही आधुनिक प्रादेशिक भाषा टिकून राहिल्या. त्यांनी विपुल साहित्य निर्माण केले. येथे उपस्थित असेलेले आमचे मित्र प्राध्यापक क्षितीमोहन सेन ह्यांनी मध्ययुगीन भारतातील कवितेचा अभ्यास केला आहे. ते तुम्हाला तेराव्या ते सोळाव्या सतराव्या शतकांत भारतात होऊन गेलेल्या महान संतकवींबद्दल सांगू शकतील. त्यांच्या लिखाणामुळे माझी त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांतील आधुनिक विचार वाचून मी भारावून गेलो. जीवन आणि सौंदर्याबद्दलच्या खऱ्याखुऱ्या, प्रामाणिक भावनांनी परिपूर्ण असे हे लिखाण आहे. सर्व सच्च्या गोष्टी नेहमीच आधुनिक असतात आणि त्या कधीच कालबाह्य होत नाहीत.
भारतामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक भावना लोकांच्या मनाला सदैव जागी ठेवत आली आहे. आमच्या साधू-संतांचे खरे उद्दिष्ट हे उपेक्षित घटकांना आणि हलक्या मानल्या जाणाऱ्या जातींना आधार देणे हेच होते. त्यांच्या प्रेरणेतून जन्मलेली कविता विवेक, शहाणपणाने व सौंदर्याने नटलेली आहे. आमच्या बंगालमध्ये वैष्णव चळवळीने प्रेरित झालेल्या अशा जुन्या गीतांचा मोठा खजिना आहे.
मी एक कवी म्हणून उदयास येत होतो, तेव्हा आमच्या सुशिक्षित समाजातील लेखकांवर इंग्रजी साहित्याचा प्रभाव होता. माझे भाग्य असे की, तथाकथित प्रतिष्ठित कुटुंबातील मुलासाठी योग्य मानले जाणारे असे शाळा आणि कॉलेजचे औपचारिक शिक्षण मी घेतले नाही. त्या काळातील तरुण मनांवर राज्य करणाऱ्या प्रभावापासून मी पूर्णपणे मुक्त होतो असे नाही; परंतु औपचारिक शिक्षणापासून दूर राहिल्यामुळे अनुकरणाच्या चौकटीत मी अडकून पडलो नाही. काव्यनिर्मितीमध्ये मी वेगळी शब्दसंपदा आणि कल्पनाशक्तीचा वापर केल्यामुळे विद्वान समीक्षकांनी मला धारेवर धरले. बुद्धिमान लोकांनी माझी खिल्ली उडवली. प्रस्थापित ज्ञान आणि विचारांच्या विरोधातील बंडखोरीमुळे मी साहित्याच्या विश्वात बहिष्कृत ठरलो.
माझ्या कारकिर्दीची सुरुवात तशी लवकरच सुरू झाली. खरं तर त्या काळातील साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखकांमध्ये मी सर्वांत तरुण लेखक होतो. माझ्याकडे वयाच्या परिपक्वतेचा आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या इंग्रजी शिक्षणाचा अभाव होता. त्यामुळे लोकांच्या तुच्छतापूर्वक प्रतिसाद आणि मर्यादित प्रोत्साहनातून आलेल्या एकांतात मला स्वातंत्र्य उपभोगायास मिळाले. हळूहळू मी वयाने मोठा झालो. अर्थात, त्यात माझे असे काही कर्तृत्व नाही. उपहास आणि क्वचित मिळणाऱ्या प्रोत्साहनातून हळूहळू मार्ग काढत मी अशा मान्यतेपर्यंत पोहोचलो जिथे कौतुक आणि टीकेचे प्रमाण जणू पृथ्वीवरील जमीन आणि पाण्याच्या प्रमाणासारखे होते.
तुम्ही म्हणाल की, तरुणपणी माझ्याकडे इतके धाडस कुठून आले? बंगालमधील जुन्या वैष्णव कवितांशी झालेली लवकर ओळख हे त्यामागील एक कारण होते. त्या मुक्तछंद आणि मुक्त अभिव्यक्तीने परिपूर्ण होत्या. या कविता पुन्हा प्रकाशित झाल्या तेव्हा मी बहुधा अवघा बारा वर्षांचा होतो. मोठ्यांच्या टेबलांवरून मी त्या पुस्तकांच्या प्रती चोरून मिळवत असे. ह्यातून तरुण पिढीला चुकीचा संदेश मिळू नये म्हणून मी कबूल करतो की, माझ्या वयाच्या मुलाने तसे करणे योग्य नव्हते. परीक्षेचा अभ्यास करायचे सोडून भलत्या कविता वाचत बसणे चुकीचे होते. या गीतांपैकी बहुतांश रचना प्रणयरसपूर्ण होत्या आणि किशोरावस्थेत पाऊल ठेवणाऱ्या मुलासाठी त्या योग्य नव्हत्या. पण, त्यांच्या रूपसौंदर्यात आणि शब्दांच्या लयीत मी इतका गुंतून गेलो की, त्यातील मादक भावनेचा स्पर्श मला विचलित करू शकला नाही.
माझ्या साहित्यिक कारकिर्दीतील भटकंतीमागे आणखी एक कारण होते. माझे वडील उपनिषदांच्या शिकवणीवर आधारलेला, कठोर एकेश्वरवाद मांडणाऱ्या एका नव्या धार्मिक चळवळीचे नेते होते. बंगालमधील देशबांधवांच्या मते, ते ख्रिस्ती धर्मीयांइतकेच किंबहुना त्याहून अधिक वाईट होते. त्यामुळे आम्हाला पूर्णतः समाजबाह्य केले गेले. पण, कदाचित याचमुळे मी भूतकाळाचे अंधानुकरण करण्यापासून वाचलो.
माझ्या कुटुंबातील जवळपास प्रत्येक जण काही ना काही प्रकारची जन्मजात कौशल्ये घेऊन आला होता. कोणी चित्रकार होते, कोणी कवी तर कोणी संगीतकार. घरातील वातावरण सर्जनशीलतेच्या भावनेने भारलेले होते. मला अगदी बालपणापासूनच निसर्गसौंदर्याची खोल जाण होती, झाडांशी आणि ढगांशी माझे खास मैत्र जुळले होते आणि विविध ऋतूंच्या संगीतलहरींशी मी एकरूप होऊन गेलो होतो. त्याचबरोबर मी माणसांच्या दयाळूपणाप्रति विशेष संवेदनशील होतो. या सगळ्या भावनांना अभिव्यक्तीची आस होती आणि नैसर्गिकपणे मला त्या माझ्या स्वतःच्या पद्धतीने व्यक्त कराव्याशा वाटत होत्या. माझ्या तरल भावनांना प्रामाणिकपणे मांडण्याची मला ओढ होती. मात्र, त्यांच्या अभिव्यक्तीला परिपूर्ण रूप देण्याइतका मी परिपक्व नव्हतो.
त्यानंतर, माझ्या देशात माझे थोडे नाव झाले. अजूनही एका मोठ्या वर्गात विरोधाची लाट तीव्र आहे. काही जण म्हणतात की, माझी कविता परंपरांना धरून नाही. काहींना त्या दुर्बोध वाटतात, तर काहींना त्या अनुचित भासतात. मला माझ्या स्वतःच्या लोकांकडून कधीच संपूर्ण स्वीकृती मिळाली नाही. पण, ते माझ्यासाठी वरदानच ठरले. कारण निर्विवाद यशाइतके मनुष्याला भ्रष्ट करणारे दुसरे काहीही नाही.
ही माझ्या कारकिर्दीची कहाणी आहे. मला ती तुम्हाला माझ्या स्वतःच्या भाषेत, माझ्या स्वतःच्या काव्याद्वारे अधिक स्पष्टपणे सांगता आली असती तर बरे झाले असते. कधीतरी तेदेखील शक्य होईल. भाषा वाटतात तितक्या साध्या नसतात. परक्या, प्रतिस्पर्धी मध्यस्थीतून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्या आपली सर्वोत्तम संपत्ती सहज देत नाहीत. त्यांना तुम्हाला प्रत्यक्ष रिझवावे लागते, मनधरणी करावी लागते. कविता या सोने किंवा इतर भौतिक वस्तूंप्रमाणे हस्तांतरित करता येत नाहीत. मध्यस्थ कितीही कर्तव्यदक्ष आणि मेहनती असला तरी आपल्या प्रेयसीचे हास्य आणि कटाक्ष तुम्ही त्याच्या मार्फत मिळवू शकत नाही.
मी स्वतः युरोपीय भाषांच्या साहित्यातील सौंदर्यसंपत्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, भाषांतराच्या माध्यमातून तरुणपणी मी दांतेला समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी त्यात पूर्णपणे अपयशी ठरलो आणि तो प्रयत्न तिथेच थांबवणे मला योग्य वाटले. दांते माझ्यासाठी अगम्य राहिला.
मला जर्मन साहित्यदेखील जाणून घेण्याची इच्छा होती. हाइने यांची भाषांतरित पुस्तके वाचून मला जर्मन साहित्याच्या सौंदर्याची झलक पाहायला मिळाली. सुदैवाने, जर्मनीहून आलेल्या एका मिशनरी महिलेशी माझी भेट झाली. तिच्या मार्गदर्शनाखाली मी काही महिने मनापासून परिश्रम केले. चटकन शिकणे हा काही फारसा चांगला गुण नाही; पण मी तसा असल्यामुळे माझ्याकडे चिकाटी नव्हती. शब्दांच्या अर्थाचा अचूक अंदाज बांधण्याची चुकीची सवय मला होती. त्यामुळे माझ्या शिक्षिकेला मी भाषेवर जवळजवळ प्रभुत्व मिळवले आहे असे वाटत असले तरी, प्रत्यक्षात ते खरे नव्हते. तरीही झोपेत चालणाऱ्या माणसाने अनोळखी वाटा सहज पार कराव्यात तसा मी हाइने वाचून काढला आणि त्यातून मला प्रचंड आनंद मिळाला.
मग मी गटे वाचण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न करून पाहिला. थोड्या काळात मिळवलेल्या जर्मन भाषेच्या अल्प ज्ञानाच्या साहाय्याने मी 'फाउस्ट' वाचून काढले. मला वाटते की, मला त्या राजवाड्यात प्रवेश मिळाला. परंतु, तो प्रवेश सर्व दारांच्या किल्ल्या बाळगून असलेल्या व्यक्तीसारखा नाही, तर मोजक्या सर्वसाधारण खोल्यांत जाण्याची परवानगी मिळालेल्या, फारशी जवळीक नसलेल्या आगंतुक पाहुण्यासारखा होता. खरे सांगायचे झाले तर, मला गटे फारसा समजला नाही. अशाच प्रकारे, इतर अनेक महान तेजस्वी व्यक्तिमत्त्वे मला अनभिज्ञ राहिली आहेत.
यात काहीच वावगे नाही. तीर्थयात्रा केल्याशिवाय माणूस तीर्थस्थानापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनच, माझ्या मातृभाषेतील सत्य तुम्हाला अनुवादात सापडेल अशी अपेक्षा ठेवू नका. हृदय जिंकून तिचे सौंदर्य अनुभवण्यासाठी तुम्हाला स्वतःला तिच्याजवळ यायला लागेल आणि तिचे सौंदर्य शोधावे लागेल. तुम्ही अपुऱ्या पुराव्यावर विश्वास ठेवून मला कवी मानण्याचा प्रयत्न करत आहात. पुरेसा विश्वास नसल्याने तुम्ही त्याला बळ देण्यासाठी सोपे बाह्य पुरावे गोळा करत आहात. माझी सुंदर करडी दाढी पाहून मी कवी आहे ह्याची तुम्हाला खात्री पटली हे ऐकून मला आनंद झाला. पण जेव्हा तुम्ही मला माझ्या कवितांतील आवाजातून ओळखाल, तेव्हा मला खरे समाधान मिळेल.
मला आशा आहे की, यामुळे तुम्हाला कधी ना कधी बंगाली भाषा शिकायची इच्छा होईल. मी आशा करतो की, माझ्या समोर टिपण घेत असलेला कविमित्रही ह्याचा गांभीर्याने विचार करेल. मी त्याला माझ्या शिकवणीत सामील करेन आणि शक्य तितकी सारी मदत करेन. आता, मला तुम्हाला आमच्या कला चळवळीबद्दल काही सांगायचे आहे.
ही चळवळ माझ्या भाच्याने, अवनींद्रनाथाने सुरू केली आणि ती भरभराटीच्या दिशेने जात आहे. तिकडे बसलेले माझे महान कलाकार मित्र नंदलाल जर बोलायला तयार झाले तर ती चळवळ कशी अधिक सशक्त होत आहे आणि तिचा प्रभाव कसा दूरदूर पसरत आहे हे ते तुम्हाला सांगू शकतील.
संगीताबाबत बोलायचे झाले, तर मी स्वतःला काही प्रमाणात संगीतकार मानतो. आदर्श आणि परंपरागत शिष्टसंमत नियमांच्या चौकटी मोडणारी अनेक गाणी मी रचली आहेत. शास्त्रीय शिक्षणाचा अभाव असल्याने धाडसी प्रयत्न करणाऱ्या ह्या माणसाचा 'उद्धटपणा' पाहून सुसंस्कृत लोकांचा संताप होतो. पण तरीसुद्धा मी माझे काम पुढे नेत राहतो आणि देव माझ्या चुका माफ करतो कारण मी काय करतो आहे हे माझे मलाच माहीत नाही. कदाचित, कलाक्षेत्रात काम करण्याची हीच सर्वोत्तम पद्धत कृपया समजू नका. मी स्वतःचे न्यायबुद्धीने मूल्यांकन करू शकतो आणि नम्र असल्यामुळे स्वतः असावी. कारण लोक माझ्यावर टीका करतात; पण माझी गाणीही गातात. गाताना ते कधीकधी चुकतातही.
'मी अहंकारी आहे' असे त्या कार्याचे खुलेपणाने कौतुकही करू शकतो. सदोन्मीलित फुलांप्रमाणे माझ्या गाण्यांनी लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे हे मी संकोच न बाळगता म्हणतो. भविष्यातील पिढ्याही सुख-दुःखांत, सणा-समारंभांत माझी गाणी नक्की गातील. हेदेखील एक क्रांतिकारी कार्य आहे.
भाग 3
मला असे सांगण्यात आले आहे की, चीनला कधीही धर्माची आवश्यकता भासली नाही. मला यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते. लोक अनेकदा शेजाऱ्याच्या धर्माबद्दल आपल्या संकुचित पंथीय निकषांवरून मते बनवतात. मला इथे अधिक काळ राहता आले असते आणि चीनच्या हृदयातल्या गहिऱ्या तारा छेडून त्याच्या अंतःरात्म्याचे संगीत ऐकता आले असते तर अधिक चांगले झाले असते. दुर्दैवाने, माझा दौरा अल्प काळाचा आणि भरगच्च कार्यक्रमांनी भरलेला असल्यामुळे आपल्या साध्यासुध्या कृतीने देशाच्या परंपरांना जिवंत ठेवणाऱ्या इथल्या लोकांशी मला जवळून संवाद साधता आला नाही.
माझ्या स्वतःच्या धर्माबद्दल काही सांगण्याची मला विनंती करण्यात आली आहे. या विषयावर बोलायला मला नेहमी संकोच वाटतो. केवळ एका पंथात जन्माला आलो म्हणून मी अंधपणे तो धर्म अनुसरलेला नाही. मी अशा कुटुंबात जन्माला आलो ज्यांनी भारतीय उपनिषदांतील ऋषींच्या वचनांवर आधारित महान धर्माचे पुनरुज्जीवन करण्यास सुरुवात केली. परंतु, माझ्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे केवळ माझ्या आजूबाजूचे लोक ज्यावर विश्वास ठेवतात ती धार्मिक शिकवण मी स्वीकारणे शक्य नव्हते. माझ्या सर्व विश्वासू व्यक्ती त्यावर श्रद्धा ठेवतात म्हणून त्या धर्माचे पालन करण्यास मी माझ्या मनाला पटवू शकलो नाही.
एखाद्या ठरावीक धर्मग्रंथाच्या किंवा संघटित उपासक-समूहाच्या शिकवणीवर आधारलेल्या कोणत्याही पंथाच्या वर्चस्वापासून मुक्त अशा वातावरणात मी मोठा झालो. म्हणून धर्माबद्दल मला विचारले तर शास्त्रशुद्ध नियमांवर आधारित ठाम उत्तर देणे मला शक्य नाही.
चीनमध्ये आल्यापासून फक्त एकदाच मला माझ्या धार्मिक श्रद्धेबद्दल स्पष्टीकरण देण्याची मागणी केली गेली. एका विद्यापीठातील विद्यार्थ्याने मला मी देवावर विश्वास ठेवण्याची कारणे विचारली. मी त्याच्यासमोर युक्तिवाद मांडण्याचा प्रयत्न केला खरा; पण अनुभूती आणि युक्तिवाद ह्या दोन गोष्टी प्रकाशाचे आकलन आणि प्रकाशाच्या सिद्धान्ताप्रमाणे दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे माझ्या मांडणीत काही त्रुटी निघाली तरी त्याने माझ्या देवावरील विश्वासाची सत्यता नाकारली जात नाही. कारण त्याच्या वास्तविकतेचा पुरावा अनुभूतीत आहे. म्हणून मला प्रश्न विचारणाऱ्याला माझ्या अनुभूतीवर अविश्वास दाखवण्याचा आणि माझा युक्तिवाद नाकारण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा वेळी, अनेकांना पूज्य असलेल्या एखाद्या ग्रंथातील विचारांना माझ्या वैयक्तिक विधानापेक्षा अधिक मान्यता असेल. म्हणून धर्मोपदेश करण्याचा दावा मी करत नाही.
माझा धर्म मुळात कवीचा धर्म आहे. ज्या अदृश्य आणि अनामिक मार्गांनी मला संगीताची प्रेरणा मिळते, त्याच मार्गांनी मला धर्माची अनुभूती होते. माझे धार्मिक जीवन आणि काव्यजीवन जणू एका गूढ धाग्याने जोडलेले आहे. ते दोघे एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत हे मला खूप काळ माहीत नव्हते. मग अचानक असा एक दिवस उगवला, ज्या वेळी त्यांच्या संयोगाचा उलगडा माझ्यासमोर झाला.
त्या वेळी मी एका खेड्यात राहत होतो. तो दिवस नेहमीसारखाच होता. सकाळची नेहमीची कामे आटोपून अंघोळीला जाण्यापूर्वी मी खिडकीपाशी क्षणभर उभे राहून कोरड्या नदीपात्राच्या काठावर असलेल्या बाजारपेठेवर नजर टाकली. अचानक मला काही जाणवले आणि क्षणात माझ्या अनुभवांचे जग उजळून निघाले. आजवर तुटक व अस्पष्ट वाटणारे प्रसंग अर्थपूर्ण वाटू लागले. धुक्यात दिशाहीनपणे चाचपडत चाललेला मनुष्य अचानक स्वतःच्या घरासमोर येऊन उभा राहतो, तसे मला वाटून गेले.
माझ्या बालपणातील तो दिवस मला आठवला. बंगाली वर्णमाला शिकण्याच्या कष्टदायक प्रक्रियेनंतर मी शब्द जोडून पहिल्यांदाच एक सोपे वाक्य बनवले, 'पाऊस पडतो, पाने डोलतात'. त्या शब्दांनी डोळ्यांसमोर उभ्या केलेल्या दृश्याच्या आनंदाने मी रोमांचित झालो. निरर्थक तुकडे त्यांच्या विखुरलेल्या अस्तित्वापासून मुक्त झाले आणि त्यांच्या एकरूपतेने निर्माण केलेले दृश्य पाहून माझे मन आनंदित झाले. याच प्रकारे, गावातील त्या सकाळी माझ्या जीवनातील वस्तुस्थिती मला अचानक सत्याच्या प्रकाशात एकरूप झालेली जाणवली. ज्या गोष्टी मला भरकटलेल्या लाटांप्रमाणे वाटत होत्या, त्या अथांग सागराशी जोडलेल्या आहेत ह्याची मला जाणीव झाली. तेव्हापासून निसर्ग आणि माणसांसोबतच्या सर्व अनुभवांमध्ये आध्यात्मिक वास्तवाची मूलभूत सत्यता असते, यावर माझा विश्वास बसला.
त्या दिवशी मला जे उमगले, त्याकडे मी नकळत कसा प्रवास करत होतो हे सांगितले तर तुम्हाला माझे म्हणणे कळेल. मला कवितेची देणगी मिळाली आहे असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा कृपा करून मला गर्विष्ठ समजू नका. खोलवर भावनांना हळुवार प्रतिसाद देणारे अभिव्यक्तीचे साधन म्हणजे कविता. लहानपणापासूनच आसपासच्या नैसर्गिक आणि मानवी जगाबद्दल नेहमी जागरूक ठेवणारी संवेदनशीलता माझ्याकडे आहे.
आमच्या घराला लागून एक छोटीशी बाग होती. रोज सौंदर्याचे चमत्कार घडणारी ती बाग मला परीकथेतील भूमी वाटे. पहाटेच्या अंधूक प्रकाशात जवळजवळ रोजच मी घाईघाईने बिछान्यातून उठून बाहेर धाव घेई. कुंपणालगत रांगेने उभ्या असलेल्या नारळाच्या झावळ्यांमधून डोकावणाऱ्या पहिल्या गुलाबी प्रभातकिरणांचे स्वागत करी. गवतावरच्या दवबिंदूंना सकाळची पहिली झुळूक स्पर्शन गेली की, गवत चमकू लागे. आकाश जणू मला एखाद्या जवळच्या सख्यासारखी साद घाली. प्रकाशाने ओसंडून वाहणाऱ्या त्या शांत क्षणांचे माझे तन-मन अधाश्यासारखे प्राशन करी. मी एकही सकाळ चुकवत नसे. कारण प्रत्येक सकाळ माझ्यासाठी कंजूष माणसाच्या सोन्याहूनही अधिक मौल्यवान होती.
लहान मुलास सृष्टीच्या अद्भुत कोठारात सहज घेऊन जाणारे कुतूहल मला लाभले होते. माझा हा सहचर निसर्ग मला सारखीच साद घालत असे. त्यामुळे अभ्यासाकडे माझे पूर्ण दुर्लक्ष होई. अखेर वयाच्या तेराव्या वर्षी मला पुस्तकी धड्यांच्या दगडी भिंतीत कैद करू पाहणाऱ्या शिक्षणपद्धतीच्या पकडीतून मी स्वतःची सुटका करून घेतली.
ह्यातून कदाचित तुम्हाला माझ्या धर्माचा अर्थ समजेल. हे रसरशीत जग माझ्या आयुष्याशी अगदी निकट जोडलेले आहे. मला आठवते, एकदा एका वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्याने अगदी कौतुकाने मानवी श्वसननलिकेचा अवयव मला दाखवला. त्याच्या रचनेविषयी सांगून हाच सुंदर मानवी आवाजाचा स्रोत आहे हे त्याने मला पटवून द्यायचा प्रयत्न केला. मला त्याचा प्रचंड तिटकारा वाटला. मला कारागिराच्या कौशल्याचे कौतुक करायचे नव्हते, तर यांत्रिकतेला झाकून स्वरांच्या निर्मितीचे शब्दातीत सौंदर्य उलगडणाऱ्या कलाकाराच्या आनंदात रमायचे होते.
देवाला त्याच्या सर्जनाची नोंद शिलालेखांमध्ये कोरून ठेवण्यात स्वारस्य वाटत नाही. गवताच्या हिरवाईत, फुलांच्या सुगंधात, ढगांवरील रंगच्छटांच्या खेळात आणि झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यात उमटणारे आपले सौंदर्य पाहून त्याला कमालीचा आनंद वाटतो.
जसे तान्ह्या बाळाला आपल्या आईचे नाव किंवा रूप माहीत नसते तसे माझ्या हृदयाच्या तारा कोण छेडत आहे याबद्दल मला काही कल्पना नव्हती. माझ्या मनात नेहमीच एक गहन समाधानाची अनुभूती देणारी भावना होती. ती माझ्या अंतरंगात संवादाच्या जिवंत झऱ्यातून सर्व बाजूंनी वाहत होती.
माझ्या मनातील आजूबाजूच्या जगाबद्दलची जाणीव कधीच बोथट झाली नाही. ढगाचे फक्त ढग असणे आणि फुलांचे फक्त फूल असणे माझ्यासाठी पुरेसे होते. कारण ती माझ्याशी थेट संवाद साधत. मी त्यांच्याप्रति उदासीन राहू शकत नव्हतो. आजही मला तो क्षण स्पष्ट आठवतो. एका दुपारी शाळेतून परतताना मी गाडीतून उतरलो आणि पाहिले तर घरावरच्या आभाळात गडद पावसाळी ढग दाटून आले होते. त्यांची घनगर्द छाया आसमंतावर पसरली होती. ते विस्मयकारक दृश्य पाहून मला जो आनंद मिळाला त्यात मला जिवलग मित्राच्या प्रेमातून मिळणारा मोकळेपणा अनुभवास आला.
मी दुसऱ्या एका लेखात दिलेले एक उदाहरण येथे सांगतो. कल्पना करा की, एखादा परग्रहवासी पृथ्वीवर येतो आणि ग्रामोफोनवर मानवी आवाज ऐकतो. त्याच्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसणारी वस्तू म्हणजे ग्रामोफोनची फिरणारी चकती. तो यामागे दडलेल्या सत्याचा शोध घेऊ शकत नाही, म्हणून तो जिला स्पर्श करू शकतो आणि मापू शकतो अशा निर्जीव चकतीला अंतिम वैज्ञानिक सत्य मानेल. यंत्र मनाशी कसा संवाद साधू शकते ह्याचे त्याला आश्चर्य वाटेल. या रहस्याचा शोध घेत पुढे जाताना त्याची अचानक संगीतकाराशी भेट झाली तर त्याला उलगडेल की, संगीत हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे.
जे आपल्याला फक्त माहिती देते ते मोजमापांच्या भाषेत समजावता येते. परंतु, जे आपल्याला आनंद देते ते केवळ अणू-रेणूंच्या रचनेने समजावता येत नाही. या जगाच्या रचनेत कुठेतरी आपल्याला आनंद देण्याचा हेतू दिसून येतो. यावरून असे दिसून येते की, या विश्वात वस्तू आणि बल यांच्या पलीकडे व्यक्तिमत्त्वाच्या जादुई स्पर्शातून एक संदेश पोहोचत आहे. ह्या स्पर्शाचे विश्लेषण करता येत नाही, तर तो फक्त जाणवतो. आपण त्याचा पुरावा सिद्ध करू शकत नाही. जसा तो परग्रहवासी आपल्या सोबत्यांना दाखवू शकत नाही की, त्या फिरणाऱ्या चकतीमागे यंत्रामार्फत थेट हृदयाशी संवाद साधणारी एक अदृश्य व्यक्ती आहे.
गुलाब फक्त गुलाबी आणि मोहक असल्यामुळे सोन्यापेक्षा अधिक आनंद देतो का? त्या सोन्याने तुम्ही आयुष्याच्या सगळ्या गरजा भागवू शकता, हवे तितके गुलाब खरेदी करू शकता. कदाचित, तुम्ही एक गुलाबाचे फूल सोन्याच्या एका तुकड्यापेक्षा अधिक आनंद देते ही बाब सुरुवातीला नाकाराल. पण, लक्षात ठेवा, मी कृत्रिम मूल्यांविषयी बोलत नाही. जर आपल्याला सोन्याची वाळू असलेले वाळवंट पार करायला लागले तर त्या मृत कणांचा निर्दयी झगमगाट आपला थरकाप करेल आणि तेव्हा जर एखादा गुलाब नजरेस पडला तर जणू स्वर्गीय संगीत ऐकल्यासारखे वाटेल.
गुलाबातून मिळणाऱ्या आनंदाचा अंतिम अर्थ त्याच्या पाकळ्यांच्या गोलाईत नसतो. तसेच संगीताचा अंतिम आनंद ग्रामोफोनच्या फिरणाऱ्या चकतीत नसतो. आपण जाणतो की, गुलाबातून प्रेमाची भाषा हृदयापर्यंत पोहोचते. आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाब देतो कारण त्यात आधीच असा संदेश दडलेला असतो ज्याचे शब्दांच्या भाषेसारखे विश्लेषण करता येत नाही. गुलाबाच्या भेटीतून आपण प्रेमाची वैश्विक भाषा आपल्या अभिव्यक्तीसाठी वापरतो.
भारतातील वैष्णव धर्म हा प्रतीकांचा धर्म आहे. या धर्मात परमप्रेमीच्या हाती बासरी असते. ती वेगवेगळ्या छिद्रांतून निसर्गातील आणि मनुष्यामधील विविध सौंदर्यस्वर आळवते. हे स्वर आपल्याला खुणावतात. ते आपल्याला आत्मकेंद्री जीवनाच्या एकांतातून बाहेर पडून प्रेम आणि सत्याच्या प्रदेशात प्रवेश करण्यासाठी आवाहन करतात. आपण जन्मतः बहिरे असतो का? जगाच्या स्वार्थी मागण्यांनी, बाजारपेठेच्या गोंगाटाने आपले कान बहिरे झाले आहेत का? आपण त्या प्रियकराच्या हाकेकडे दुर्लक्ष करून भांडतो, चोऱ्या करतो, दुर्बलांचे शोषण करतो, जे इतरांच्या हक्काचे आहे ते ओरबाडून घेण्यात हुशारी समजतो आणि निळ्या आकाशातून झिरपणाऱ्या, पृथ्वीच्या कुशीतून उगम पावणाऱ्या त्या प्रेमाच्या प्रवाहाकडे पाठ फिरवून आपले जीवन उजाड वाळवंट बनवून टाकतो.
या वास्तवाच्या प्रदेशात, तुम्ही कारखान्याचे गुप्त दरवाजे उघडून यंत्रे ठेवलेल्या काळोख्या सभागृहात गेलात तर तुम्हाला तिथे उपयुक्त वस्तू मिळतील; पण अंतिम सत्य कधी गवसणार नाही. तेथे गरजेच्या असंख्य तथ्यांचे कोठार असले तरी त्यात समाधानाचा खजिना सापडणार नाही. पण, दुसऱ्या सभागृहात जिथे ऐक्याचे राज्य आहे, तिथे अस्तित्वाच्या अंतःकरणात परमप्रेमी वास करतो. जेव्हा तुम्ही तिथे पोहोचता, तेव्हा तुम्हाला लगेच जाणवते की, तुम्ही सत्यापर्यंत, अमरत्वापर्यंत आलात आणि तुम्हाला असा परमानंद मिळतो जो अंतिम असला तरी त्याला शेवट नाही.
फक्त तथ्यांच्या आणि शक्तीच्या शोधातून बाह्य जगताची माहिती मिळाली तरी तिच्या आंतरिक गुणांची जाणीव आपल्याला होत नाही. आनंद हाच सत्याचा खरा मापदंड आहे. त्यामुळे ज्या सत्याच्या चाहुलीने अंतःकरणातून आनंदाचा झरा वाहू लागतो ते परमसत्य आहे याची आपल्याला खात्री पटते. ठरावीक मते किंवा धारणा नव्हे तर हे परमसत्यच सर्व धर्माचा पाया आहे. ईथर तरंगांद्वारे आपण प्रकाशाला जाणून घेत नाही. पहाट झाली हे कोणा शास्त्रज्ञाने आपल्याला सांगावे लागत नाही. त्याचप्रमाणे प्रेम आणि चांगुलपणासोबत आलेले सत्य आपल्या अंतरंगाला आपोआप समजते. ते समजण्यासाठी धर्मगुरूंच्या प्रवचनांची वा विद्वानांच्या तात्त्विक चर्चाची गरज नसते.
मी तुमच्यासमोर आधीच कबूल केले आहे की, माझा धर्म हा कवीचा धर्म आहे. केवळ ज्ञानातून नव्हे तर माझ्या स्वतंत्र दृष्टीकोनातून मी धर्माकडे बघतो. वाईट काय आहे किंवा मृत्यूनंतर काय होते, याबद्दलच्या तुमच्या प्रश्नांना मी समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाही. तरीही मला खात्री आहे की, काही क्षण असे आले आहेत जेव्हा माझ्या हृदयाने अनंताला स्पर्श केला आहे आणि आनंदाच्या प्रकाशातून मला त्याची खोल जाणीव झाली आहे. उपनिषदांमध्ये असे म्हटले आहे की, आपले मन आणि वाणी परमसत्याच्या जाणिवेने गोंधळून जाते. पण, जी व्यक्ती आपल्या अंतरंगाला होणाऱ्या हर्षाने सत्याला ओळखते, ती सर्व शंका आणि भीतींपासून मुक्त होते.
रात्री आपण वस्तूंवर धडपडतो, त्यांच्या वेगळेपणाची आपल्याला तीव्र जाणीव होते. दिवसा मात्र त्यांना जोडून ठेवणारी एकरूपता आपल्याला दिसते. ज्याची अंतर्दृष्टी चेतनेच्या प्रकाशात न्हाऊन निघालेली असते, तो सर्व भेदांवर अधिराज्य गाजवणारे आध्यात्मिक ऐक्य ओळखतो. त्याचे मन मानवजगतातील भेदभावांवर ठेचकाळत नाही अथवा त्यालाच तो अंतिम सत्य मानत नाही. खरी शांती ही वरवरच्या उपाययोजनात नाही, तर सत्यात वास करणाऱ्या आंतरिक सुसंवादात असते हे त्याला कळून चुकते. आपल्याला वास्तवाशी असलेल्या आध्यात्मिक नात्याची शाश्वत खात्री देणारे सौंदर्य आपल्या प्रेमळ प्रतिसादातूनच पूर्णत्व पावू शकते हेदेखील त्याच्या लक्षात येते.
अनुवाद : सानिया कर्णिक
12 एप्रिल ते 29 मे 1924 हे दोन महिने रवींद्रनाथ टागोर यांनी चीनचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी इंग्रजीतून भाषणे दिली, त्यातील प्रमुख आठ भाषणांचे पुस्तक Talks in China या शीर्षकाखाली 1925 मध्ये प्रकाशित झाले. शंभर वर्षे झाली त्याला, त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आता (प्रथमच) येत आहे. तो दौरा आयोजित करणारे लियांग छिछाव यांनी टागोरांच्या चीन भेटीचे औचित्य सांगणारा एक दीर्घ लेख चिनी भाषेत लिहिला होता, त्याचा मराठी अनुवादही या पुस्तकात समाविष्ट केला आहे. हे सर्व अनुवाद सानिया कर्णिक या युवतीने केले आहेत. शिवाय, टागोरांचे एका बाजूला प्रचंड स्वागत आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड टीका असा तो दौरा होता. त्या वादसंवादांचा नेमका परामर्श घेणारा विस्तृत लेखही सानियाने या पुस्तकासाठी लिहिला आहे. असे हे दीडशे पानांचे पुस्तक 29 मे 2026 रोजी रोजी साधना प्रकाशनाकडून येत आहे. त्या पुस्तकातील टागोरांचे पहिले भाषण येथे प्रसिद्ध करीत आहोत.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या