एका तुकडीचे गटनायक एक विद्यार्थिप्रिय हेडमास्तर होते. त्या तुकडीला जेवण्या-खाण्याची अजिबात अडचण पडली नाही, कारण प्रत्येक गावात या शिक्षकाचे निदान पाच-दहा तरी विद्यार्थी निघायचेच. इतरांच्या तुकडींत सात-आठ तर शामराव बोधनकरांच्या तुकडींत तीन कार्यकर्ते आणि 22 विद्यार्थी होते. चाळीस मैलांची पदयात्रा करून या तुकडीने 11 गावात भूदानाचा संदेश सांगितला.
विनोबाजी मराठवाड्यात येण्यापूर्वी भूदान विचाराचा प्रसार शक्य तितक्या खेडेगावातून व्हावा म्हणून मराठवाड्याच्या पाचही जिल्ह्यातून शिबिरे, पदयात्रा, वाङ्मयविक्री वगैरे कार्य जोराने सुरू झाले आहे. गेल्या महिन्यात औंढा येथे शिबिर झाले. डिसेंबरच्या 24 आणि 25 तारखांना नांदेड येथील पीपल्स कॉलेजात शिबिर घेण्यात आले. सुमारे शंभर विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी या शिबिरात भाग घेतला. स्वामी रामानंद तीर्थ, निर्मला देशपांडे, अच्युतभाई देशपांडे, काका अत्रे यांनी भूदान, ग्रामदान व सर्वोदय विचारांचा परिचय करून दिला. राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या हस्ते शिबिराचे उद्धाटन व पदयात्रेचा समारोप झाला. 26, 27 आणि 28 या तीन दिवशी 75 कार्यकर्त्यांच्या 10 तुकड्यांनी 12 गावात भूदानाचा संदेश समजावून सांगितला. ‘सबै भूमि गोपाल की’ ही घोषणा वर्षभर स्मरणात रहावी यासाठी कॅलेंडर्स विकण्यात आली. सुमारे 100 रुपयांची भूदान वाङ्मयविक्री झाली व भूदान यशाचे 19 नवे वर्गणीदार झाले. प्रत्येक गावामध्ये एका ‘गीताप्रवचना’ने प्रवेश केला.
महिलांचे साह्य
या शिबिरासाठी नांदेड येथील महिलामंडळाने घरोघरी हिंडून पोळ्याभाकरी जमवून दिल्या. शिबिराचे चालक व शिबिरार्थी अनुभवी असल्याने शिस्त, वक्तशीरपणा वगैरेच्या दृष्टीने शिबिरात कमीपणा असला तरी बौद्धके व पदयात्रेसाठी विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह यामुळे शिबिर यशस्वी झाले, असे म्हणण्यास हरकत नाही. आयुर्वेद कॉलेजातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले पाहिजे, कारण त्यातील काही विद्यार्थी परीक्षा सोडून पदयात्रेत सामील झाले होते. गीत म्हणणारांची प्रथम उणीव होती. शेवटी श्री. शामराव बोधनकर यांनी गाणी सांगितली.
स्वामीजी म्हणाले, “माझा आणि शामरावांचा इतक्या वर्षाचा संबंध, पण शामरावांना गाणे म्हणताना आजच प्रथम पाहत आहे!” शामराव म्हणतात, “हा सारा त्या शिरूरचा प्रभाव!” शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मराठवाड्याचे सेवादल संघटक डॉ. बापूसाहेब काळदाते यांनीही काही गीताच्या चाली बसवून दिल्या. कार्यकर्त्यांच्या प्रत्येक तुकडीत एक कार्यकर्ता गाणे म्हणू शकणारा असेल, अशी व्यवस्था करण्यात आली.
जमा बाजू
तीन दिवस पदयात्रा झाल्यानंतर सर्व कार्यकर्ते पुन्हा शिबिरात जमा झाले. परस्परांच्या अनुभवांची देवाण-घेवाण झाली. बहुसंख्य लोकांना पदयात्रेचा अनुभव आयुष्यात प्रथमच आला होता. काही तुकड्यांना थोडा त्रास झाला तरी उत्साह मात्र सगळ्यांचाच वाढला. एक कार्यकर्ते प्रथम पदयात्रेत सामील होण्यास फारसे उत्सुक नव्हते; पण तीन दिवसांच्या पदयात्रेने काय जादू केली न कळे! आपले अनुभव सांगताना म्हणाले, “आता प्रत्येक शनिवार-रविवार भोवतालच्या खेड्यात गेले पाहिजे आणि विनोबा येण्यापूर्वी सगळा नांदेड जिल्हा भूदान विचाराने दुमदुमून टाकला पाहिजे.” एक कार्यकर्ते पूर्वी कम्युनिस्ट म्हणून व भूदानासंबंधी अश्रद्ध म्हणून प्रसिद्ध होते. पदयात्रेमुळे त्यांचे संपूर्ण जरी नसले तरी बरेच हृदयपरिवर्तन झाले आहे.
हरिजनांबद्दलची वृत्ती
सरकारने याच वेळी हरिजन सप्ताह साजरा करण्याचा आदेश दिला होता त्यामुळे गावो गाव वातावरण अगदी प्रक्षुब्ध दिसले. भूदानाची पदयात्रा आल्याबरोबर ‘हे हरिजन सप्ताहवाले आहे’ असे गृहीत धरून काही गावांनी त्यांना सहकार्य दिले नाही. त्यात प्रत्येक तुकडींत काही हरिजन विद्यार्थी होते. एकुर्क्याचे प्रकरण नुकतेच मुंबई असेंब्लीत गाजले आहे. एकुर्के एक नाही, अशी अनेक गावे आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे आगरकर, म. फुले वगैरेंनी हरिजन स्पृश्य हिंदूचे स्थान समान असावे, सामाजिक प्रगती व्हावी, यासाठी प्रयत्न केले तसे मराठवाड्यात दुर्दैवाने फारसे झाले नाहीत. हरिजन बुद्ध होत आहेत यामुळे तर खेडेगावात त्यांच्यावर अधिक राग काढला जातो! एक कार्यकर्ते नवबुद्धाचे समर्थन करू लागताच मुंडाशा-खालचे एक डोके म्हणाले, “यांची मनं न्हाईत सुद्ध आणि होत्यात बुद्ध!” काही गावात सरकारी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हरिजनांनी देवाच्या डोक्यावर पाणी घातले आणि सरकारी अधिकाऱ्यांची पाठ वळताच मरेस्तोवर मार खाल्ला! याच प्रकरणी काही गावात खून पडल्याच्याही बातम्या आहेत. याच वेळी पदयात्रा खेड्यापाड्यांत पोचल्या. हरिजन सप्ताह ‘साजरा’ करावा लागल्याने पाटील चिडलेला, स्पृश्य समाज क्षुब्ध झालेला आणि नवबुद्ध भयग्रस्त, अशा स्थितीत भूदानाची सभा कशीबशी पार पडली हेच सुदैव!
अर्थात् काही गावात याच्या अगदी उलट अनुभव आला तेथील नवबुद्ध ‘हरिजन’ या शब्दांबद्दल संतापले. हरिजन विद्यार्थी तुकडीत असल्याने एक-दोन तुकड्यांना काही गावात घरोघर भाकर मागून पारावर तुकडे मोडावे लागले. पश्चिम महाराष्ट्रातल्या खेड्यांपेक्षा इकडच्या खेड्यांची सामाजिक परिस्थिती फार मागासलेली आहे. आगरकर-फुले यांच्यासारखे लोक इकडे उत्पन्न झाले पाहिजेत. पण तसे होऊन तरी काय उपयोग म्हणा! कारण अशा अनेक समाजसुधारकाचे अनेक दशकाचे विधायक कार्य एक सार्वत्रिक निवडणूक नष्ट करू शकते!
स्त्रियांचे उपेक्षित जीवन
स्त्रियांच्याबद्दलही असाच अनुभव आला. डॉ. काळदाते म्हणाले की, प्रत्येक तुकडींत एक स्त्री असेल तर सभेला स्त्रिया येणे शक्य होईल, नाहीतर स्त्रिया काही तुमच्या सभेला येणार नाहीत. शिबिरासाठी खूप स्त्री कार्यकर्त्यां आल्या होत्या, पण पदयात्रेसाठी फक्त दोघी तयार झाल्या. मुसलमानी राजवटीमुळे व इतर अनेक गोष्टींमुळे कार्यकर्त्या स्त्रियांकडे पाहण्याचा मराठवाड्यांतल्या खेड्यांचा दृष्टिकोन फारसा उदारपणाचा नाही, एवढा अनुभव या पदयात्रेत आला. ‘असे असले तरीही स्त्री कार्यकर्त्यांना बरोबर घेऊनच आपण कार्य केले पाहिजे व लोकांनाही प्रगत दृष्टिकोनांतून विचार करण्यास शिकविले पाहिजे’ असे अच्युतभाई देशपांडे म्हणाले.
एका तुकडीचे गटनायक एक विद्यार्थिप्रिय हेडमास्तर होते. त्या तुकडीला जेवण्या-खाण्याची अजिबात अडचण पडली नाही, कारण प्रत्येक गावात या शिक्षकाचे निदान पाच-दहा तरी विद्यार्थी निघायचेच. इतरांच्या तुकडींत सात-आठ तर शामराव बोधनकरांच्या तुकडींत तीन कार्यकर्ते आणि 22 विद्यार्थी होते. चाळीस मैलांची पदयात्रा करून या तुकडीने 11 गावात भूदानाचा संदेश सांगितला. पीपल्स कॉलेजांतले 4 प्राध्यापकही पदयात्रेत होते. भूदानाचा विचार मराठीत आणि तोही ग्रामीण लोकांना समजणाऱ्या भाषेत त्यांना सांगण्याचा नवा अनुभव मिळाला.
पदयात्रा नव्हे, ज्ञानयात्रा
विविध गावात नाना प्रकारचे अनुभव आले. पदयात्रिकाच्या ज्ञानात खूप भर पडली. एका गावात एक प्रचंड तळे होते. त्यामुळे गावात पाणी भरपूर असे. दहा वर्षांपूर्वी तळ्याची भिंत पडली आणि पाणी वाहून गेले. तळ्याच्या जमिनीवर एका बड्या जमीनदाराने वैयक्तीक मालकी बसवून शेती करण्यास सुरुवात केली. वर्षाला त्याला त्या पासून 10,000 रुपये मिळतात म्हणे. गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य सुरू झाले. नारू, खरूज यामुळे सारे लोक त्रासून गेले आहेत. सगळे गाव एका बाजूला आणि जमीनदार दुसऱ्या बाजुला, पण जमीनदार सत्तारूढ पक्षाच्या सहानुभूतीमुळे गावाची रास्त मागणी धाब्यावर बसवतो. कायदेशीर तजवीज करण्याच्या निमित्ताने काही लोक पैसे जमवितात पण गेल्या 10 वर्षांत हा प्रश्न सुटला नाही! विशेष म्हणजे हे गाव एका मंत्र्याच्या मतदार संघात आहे आणि निवडून येण्यापूर्वी गावाला तळे मिळवून देण्यासाठी त्यांनी जाहीर वचन दिले होते. भूदानाच्या सभेची गावकऱ्यांनी उपेक्षाच केली. ‘असे मोप लोक येऊन आम्हाला सांगून गेल्यात; पर आमच्या तळ्याकरता मातर कोनी खटपट करत नाय’ असे वैतागाचे उद्गार अनेकांनी काढले. जमीनदाराच्या वाड्यात एक विहीर आहे, पण तो पाणी भरू देत नाही. पाण्यासाठी गावकऱ्यांना दोन मैल दूर जावे लागते!
मूलभूत शंका
दुसऱ्या एका सभेच्या नंतर लोकांना वक्त्यांनी सांगितले की, शंका असल्या तर विचारा. एक दरिद्री म्हातारा शेतावर जात होता. तो म्हणाला, “आम्हा गरीबांच्या माना कापा आणि नाल्यात द्या टाकून एवढेच तुम्ही करा म्हणजे सुटलो एकदाचे!” एका सभेत प्राध्यापक तावातावाने म्हणाले, “प्रत्येकाला निदान दोन तास तरी शेतावर कष्ट केलेच पाहिजेत. कष्ट केले नाहीत तर खायला मिळणार नाही. मलासुद्धा शेतात राबावे लागेल...” एक श्रोता म्हणाला, “हे काय कष्ट करणार? नांगर पाहिलाय का कधी?’
न सुटणारे प्रश्न
एका गावात एका महाराजांच्या मठात सभा भरली होती. मुसलमान वर येऊन बसले पण हरिजन दूर खाली बसले. त्यांना वर येऊन बसा म्हणण्याचे धैर्य तुकडीच्या नायकाला झाले नाही! एका तुकडींतल्या हरिजन विद्यार्थ्यांने आपली जात व तदनुषंगिक अपमानास्पद वागणूक टाळण्यासाठी खोटेंच नाव सांगितले. गटनायकालासुद्धा त्याने फसविले. योगायोगाने पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी गटनायकाला हे समजले. अशा परिस्थितीत गटनायकाने काय करावे?
एका तुकडींतल्या विद्यार्थ्यांने बागेतली रसरशीत लिंबे पळवून आणली. तुकडी नायकाने भूदानपदयात्रेत हे बरोबर नाही असे नीट समजावून सांगितले. लिंबे इतकी छान होती की, ती फेकून देववेनात म्हणून पिशवीत ठेवली. गावात सभा झाल्यानंतर पाटलाने जेवायला बोलावले. जेवण अर्थातच ओसरीवर. वरण इतके तिखट की, पिशवीतली लिंबे काढल्यावाचून गत्यंतर नव्हते! लिंबे चोरलेली होती तरी त्यांनी वरणांतले तिखट कमी केले!
हा खरा कायदा
पदयात्रेत एकही एकर जमीन मिळाली नाही, ग्रामदान तर दूरच! कारण विनोबांचे नाव काही गावे प्रथमच ऐकत होती. विचारप्रसार एवढाच फायदा या पदयात्रेमध्ये झाला. एका प्राध्यापकांना त्यांच्या व्याख्यानानंतर एका खेडुताने प्रश्न केला: “तुम्ही आम्हाला जमीन द्या म्हणून सांगता. तुमचा 30 रुपये पगार काढला तर कसे वाटेल तुम्हाला?” अशा प्रश्नामुळे आत्मनिरीक्षणाची संधी अनेकांना लाभली, हाही काही लहान-सहान फायदा नाही.
याच पदयात्रेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. या खेड्यात संयुक्त महाराष्ट्र की द्विभाषिक, याचा संबंधही नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा जर त्यांच्या जीवनात काही प्रत्यक्ष बदल घडून आला नाही, तर द्विभाषिक त्यांचे काय वाकडे करणार आहे! समिती म्हणते की संयुक्त महाराष्ट्राची मागणी साडेतीन कोटी मराठी जनतेची आहे आणि हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. पदयात्रेत दर्शन झालेल्या खेड्यांचे जीवनमरणाचे प्रश्न वेगळेच आहेत. त्यांना संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय आणि समिती कशासाठी, हेही माहीत नाही. हे अज्ञानमूलक असेल कदाचित्, पण आहे ही सत्य परिस्थिती आहे. काही गावात राजकीय पक्ष आहेत नाहीत असे नाही; पण त्यांचा पाया तात्विक मतभेद नसून वैयक्तीक झगडे
लेखन : प्रतिनिधी
प्रजासमाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने केरळातील कम्युनिस्ट सरकारच्या कारकीर्दीवर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत: केरळात नव्हे तर सर्व देशभर लोकशाही शाबूत राखण्यासाठी लोकशाही शक्तींना कार्यकारिणीने केलेले ऐक्याचे आवाहन महत्वाचे आहे. काँग्रेसी राजवटींच्या महासागरात केरळचे कम्युनिस्ट बेट निर्माण झाले तेव्हा साहजिकच त्याचे सर्व निरीक्षकांनी स्वागत केले. परंतु आपल्या नऊ महिन्याच्या कारकीर्दीत कम्युनिस्टांनी पद्धतशीररीत्या लोकशाहीची गळचेपी करणारी अनेक कृत्ये केली आहेत.
सरकारी राज्ययंत्रणा व पक्ष संघटना यांमधील अंतर कायम राखणे हे लोकशाहीचे महान् वैशिष्ट्य आहे. कम्युनिस्टांची तत्त्वनिष्ठा लोकशाहीवर नसल्यामुळे ते असे अंतर ठेवणे मूर्खपणाचे समजतात. केरळात त्यांनी सरकारी यंत्रणेचा वापर पक्ष. संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे भिन्न क्षेत्रातील सामर्थ्य वाढविण्यासाठी सर्रास करण्याचा धूमधडाका चालविला आहे. ‘कायदा व सुव्यवस्था’ राखण्यात पोलिस खात्यापेक्षा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचा हात अधिक आहे. त्यांच्या दहशतीमुळे आणि सरकारचे त्यांना उघड-उघड साहाय्य असल्यामुळे पोलीसखाते आपले शांतता रक्षणाचे काम निःपक्षपातीपणाने करू शकत नाही. यामुळे केरळात राजकीय असुरक्षिततेचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे.
कम्युनिस्ट मंत्री व मुखपत्रे या आरोपाचे खंडन करण्याऐवजी कायद्याने प्रस्थापित झालेल्या सरकारला उलथून पाडण्यासाठी विरोधी पक्षानी व्यूह रचला आहे, अशी संभावित ओरड करीत आहेत. लोकशाहीच्या राज्यांत विरोध होणारच; विरोधी शक्ती शांततेच्या मार्गांनी प्रस्थापित सरकार बदलण्याचा प्रयत्न करणारच! त्याबद्दल नंबुद्रिपादांना तक्रार करण्याचा काय अधिकार काँग्रेसची मंत्रिमंडळे ज्या राज्यात अधिकारारूढ आहेत तेथे कम्युनिस्टांनी विरोधाचे कार्य थोडेच बंद केले आहे? कम्युनिस्टांना इतर प्रांतात काँग्रेस राजवटीविरुद्ध गहजब करण्याचा जेवढा अधिकार पोचतो तेवढाच काँग्रेसला, प्रजा समाजवादी पक्षाला कम्युनिस्ट राजवटीविरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार पोचतो. पण विचाराने व वृत्तीने सर्वंकष सत्तेचे पक्षपाती असलेल्या कम्युनिस्टांना आपल्या राजवटीविरुद्ध ओरडणारे लोक जनताद्रोही व राष्ट्रद्रोही वाटतात. कम्युनिस्टांच्या या फसव्या अपप्रचाराला बळी पडण्याइतके भारतीय लोकमत असमंजस नाही. केरळातील लोकशाही वाचविण्यासाठी प्रजासमाजवादी पक्षाने केलेले ऐक्याचे अवाहन म्हणजे काँग्रेस व प्रजा समाजवादी पक्षाच्या एकजुटीचे अवाहन नव्हे. हे आवाहन लोकशाही शक्तींना आहे; जनतेला आहे. त्या आवाहनात जनतेच्या स्वातंत्र्यवादी आकांक्षावर विश्वास आहे. डॉ. लोहिया आणि त्यांच्या पोरकट साथींना हे आवाहन हास्यास्पद न वाटले तरच नवल! या भारताची लोकशाही, येथील समाजवादाची निर्मिती ही केवळ त्यांचीच इतिहासदत्त जबाबदारी आहे अशा भ्रमांत ते मश्गूल आहेत. आपल्या विक्षिप्त विधानांनी व कार्यक्रमाने एखादी शक्ती आसनमरण स्थितीत हातपाय झाडून जगण्याचा आभास निर्माण करीत असेल तर करू दे बिचारी!
भारतातील सर्व लोकशाहीवाद्यांना प्रजासमाजवादी पक्षाच्या आवाहनामुळे केरळमधील गंभीर परिस्थितीची जाणीव झाली आहे. पक्षाचे हे आवाहन अतिशय योग्य वेळी झाले असून कम्युनिस्टांचे अंतरंग उघडे करण्यात प्रजा समाजवाद्यांनी जी कामगिरी बजावली त्याबद्दल भारतीय लोकमत त्यांना सदैव दुवा देईल.
Tags: लोकशाही धोक्यात! Harijan Week Bapusaheb Kaldate no. Y. Eyes Bhudan Padayatra हरिजन सप्ताह बापूसाहेब काळदाते ना. य. डोळे आहेत. भूदान पदयात्रेमध्ये जनतेला ज्ञान होण्याऐवजी पदयात्रिकांना अधिक ज्ञान होते हेच खरे! Tag: भूदान पदयात्रा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या