डिजिटल अर्काईव्ह

महाउत्पादनाचा विज्ञानसंप्रदाय जोवर मान्य करण्यात येईल तोवर भांडवलशाही व हुकूमशाही यांच्याच दुष्ट वर्तुळात राष्ट्राच्या गाड्याचे चाक फिरत राहील. भांडवलशाही आणि हुकुमशाही पद्धतीचा आधारच मुळी क्रौर्य हा असतो. त्यामुळे त्या पद्धतीत करूणांकित विज्ञान असंभव आहे. दोन्ही पद्धतीत मानवी जीवन कवडीमोल असते. रोजगाराची शाश्वती नसल्याने भांडवलशाहीत मानवी जीवन पायदळी तुडवले जाते, तर हुकूमशाहीत मानवाला उत्पादक पशुचे स्वरूप येते.

विज्ञान संशोधन दिवसेंदिवस खर्चिक, गुंतागुंतीचे आणि अवाढव्य बनते आहे. त्याच्या विकसित अवस्थेच्या ह्या अपरिहार्य गरजा आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अधिकाधिक अपहार झालेला शास्त्रज्ञांना पत्करावा लागतो. शासकाचे मिंधे बनूनच आज विज्ञान संशोधन करावे लागते. परिणामतः विज्ञानाची शक्ती आज शासनाच्या इच्छेप्रमाणे प्रवाहित होते. वैज्ञानिक निर्माण करतील त्या नव-नव्या शक्ती आपल्या राजकीय धोरणाच्या रथाला जुंपून तो रथ आपल्या महत्त्वाकांक्षाच्या दिशेकडे भरधाव नेता यावा, म्हणून शासक वैज्ञानिक संशोधनांसाठी भरमसाठ पैसा जगभर खर्च करतात. विज्ञान संशोधकाने निर्माण केलेल्या शक्ती शासकांना हव्या आहेत, पण त्या शक्तींच्या वापरासंबंधी वैज्ञानिकांनी दिलेल्या सूचना त्यांना आपल्या महत्त्वाकांक्षाच्या मार्गात अडथळा वाटतात. त्यामुळे जग आज आत्मविसर्जनाच्या कडेलोटाच्या सीमाबिंदूपाशी येऊन ठेपले आहे.
वैज्ञानिक शोधांमुळे अगतिकता
विज्ञान ही एक दिशाहीन प्रचंड शक्ती आहे. ती दिशाहीन आहे म्हणूनच ती पत्करण्यासारखीही आहे, कारण ती सत्कारणी लागण्याची त्यामुळेच संभाव्यता वाटते. याच दृष्टीने विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्याशिवाय जगाचे कल्याण होऊ शकणार नाही, असे विनोबाजी सतत सांगत असतात. किंबहुना विज्ञानाने आज आपल्या रौद्र शक्तींची जी अल्पस्वल्प झलक दाखवली आहे, त्यामुळेच अध्यात्माची त्याला जोड देणे अपरिहार्य झाले आहे. सर्वसामान्य जनता विज्ञानाच्या ह्या शक्तींनी विलक्षण भयचकित झाली आहे, अगतिक बनली आहे. प्रत्येक नवा वैज्ञानिक शोध हा सर्वसामान्य माणसाच्या स्वातंत्र्याचा अधिकाधिक अपहार करून त्याला त्या प्रमाणात अगतिक बनवीत असतो. जनतेच्या ह्या अगतिकतेतूनच वेगवेगळ्या तोंडावळ्याच्या सर्वंकष सत्ता जगात निर्माण झालेल्या दिसतात.
चाचण्यांची भीषणता
सर्वसामान्य लोकांना जगायचे असते, अधिकाधिक सुखाने जगायचे असते. सुख आणि समृद्धी निर्माण करण्याची शक्ती विज्ञानात आहे, हेही त्यांना उघड दिसते. परंतु ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे’ अशी स्थिती आज झाली आहे. रोगपरिहार, सुखसाधनांची वृद्धी, द्रुतगती वाहने हे विज्ञानाचे वरदान वाट्याला येत असतानाच सर्व जगाचा विनाश क्षणात करू शकतील अशा शस्त्रास्त्रांच्या निर्मितीचा शापही हैराण करीत असतो. हेड्रोजन बॉम्बचा वैरभावाने, आणूनबुजू‌न शत्रूची हानी करण्यासाठी अद्याप वापर झालेला नाही, पण त्याच्या चाचण्याच इतक्या भयंकर आहेत की, प्राणीजीवन बरबाद होऊन वंश खंडित होण्याची भीती शास्त्रज्ञांना वाटू लागली आहे.
अध्यात्माचे नियंत्रण हवे
ही संभाव्यता लक्षात घेऊन जगातील प्रमुख अशा शंभर शास्त्रज्ञांनी ह्या अतिसंहारक शस्त्रास्त्रांच्या चाचण्या त्वरित बंद कराव्या, अशी कळवळीची विनंती शासकांना केली होती. त्यावर शासकाचे उत्तर आहे: “आम्ही क्लीन बॉम्ब-निष्कंलक अस्त्रे बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत. निष्कलंक बॉम्ब म्हणजे ज्यामुळे फक्त अपेक्षित अशी मर्यादित भागात प्रचंड हानी करता येईल तो. त्यासाठी या चाचण्या आवश्यक आहेत. त्यामुळे किरणोत्सर्जी द्रव्यांचे जगात प्रमाण वाढले तरी आमच्या दिमतीला असलेले शास्त्रज्ञ अशी ग्वाही देत आहेत की, तसे भिण्याचे कारण नाही.” शासनांकित विज्ञानाचे हे प्रताप आहेत! अध्यात्माने विज्ञान नियंत्रित न झाले तर ते मानवी जीवनाच्या हानीलाच कारणीभूत होणार आहे.
शासनांकित विज्ञानाने हा अनर्थ
परवा मद्रासला भारतीय विज्ञान परिषदेच्या उद्‌द्घाटनप्रसंगी पं. नेहरूंनी भाषण करताना कळकळीने शास्त्रज्ञांना सांगितले की, ‘करुणांकित विज्ञानाशिवाय आता तरणोपाय नाही. करुणाभाव नसेल तर आपल्या जीवन विकासात काहीतरी उणीव राहिलेली आहे, असे मानावे लागेल.’ मानवासंबंधीच्या करुणा भावनेने नियंत्रित विज्ञान हे एखाद्या कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांच्या सुखाच्या वांछा पूर्ण करू शकेल. पण आज विज्ञान हे शासनांकित आहे. शासकांनी त्याला मांडलिकाच्या पदवीला आणून बसवले आहे. त्यामुळे विज्ञान कलुषित झाले आहे. विज्ञानाचा मूळ स्वभाव अनिर्बंध विश्वसंचाराचा. पण आज राष्ट्राच्या सीमांत त्याला आवळण्याचा खटाटोप चाललेला आहे. विज्ञानावरही आपापल्या राष्ट्रीयत्वाचे रंग चढवले जात आहेत. सत्य हे ज्याप्रमाणे निरुपाधिक असते त्याचप्रमाणे स्वभावतः विज्ञानही निरुपाधिकच असते, पण आज शासकाच्या कलाने आपली चाल ठेवण्याची वैज्ञानिकांना गरज वाटत असल्याने त्याचे स्वरूप शुद्ध राहिलेले नाही. विज्ञान करुणांकित झाले तर सृष्टीचे नंदनवन बनेल; परंतु विज्ञानाच्या क्षेत्रात मानवाने जी भरारी मारली आहे तेवढी विचार आणि भावनांच्या आकाशात मारलेही नाही. त्यामुळे प्रचंड शक्ती संकुचित जागेत जशी स्फोटक बनते तशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.
विनोबांचे प्रयत्न
प्रश्न आहे तो विज्ञान करुणांकित कसे होणार हा आजच्या विज्ञान संशोधनाचे स्वरूप लक्षात घेता ते शासनांकित राहणे अपरिहार्य दिसते. आणि शासनसंस्था महत्त्वाकांक्षेने ग्रस्त झालेल्या लोकांच्या हाती आहे, लोभ-भयाच्या पावलाने चालत आहे. जो वर तिचे आजचे स्वरूप बदलत नाही तोवर विज्ञान करूणांकित होण्याचा संभव नाही. शासनाचे स्वरूप बदलण्याला जोवर राज्यकर्ते तयार नाहीत; तोवर करुणांकित विज्ञान लाभणे दुरापास्तः आहे. विनोबांनी ही वस्तुस्थिती ओळखूनच शासनाचे स्वरूप बदलून राजकारणाच्या जागी लोककारणाची स्थापना करण्याचा भगीरथ प्रयत्न चालवला आहे. विज्ञानावर अध्यात्माची म्हणा, करुणेची म्हणा सत्ता प्रस्थापित करण्याचा तोच एक मार्ग आहे. पंडितजींनी आपल्या ह्या भाषणात विनोबांचा जो गौरवपूर्ण उल्लेख केला तो याच दृष्टीने यथार्थ वाटतो.
परदेशी उसनवारी नको
पंडितजीच्या उ‌द्घाटनप्रसंगीच्या या भाषणानंतर यंदाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष प्रा. ठाकरे यांनी आपल्या भाषणात जणु पंडितजींचे करूणांकित विज्ञानाचे हेच सूत्र पुढे चालवले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, परदेशातून आपण चालवलेली तंत्रमंत्रज्ञांची उसनवारी बंद करून स्वतंत्र भारतीय तंत्र टेक्नॉलॉजी आपण निर्माण केले पाहिजे. आज विज्ञानाबरोबरच अपरिहार्यपणे आपण पाश्चिमात्यांचे उत्पाद‌नतंत्रही उचलित आहोत. परदेशी पैसा, परदेशी यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञ आयात करून देश वैभवाला नेण्याची भव्य स्वप्ने रंगवली जात आहेत. भांडवलशाही आणि कम्युनिझम यांच्या उत्पादनतंत्रात इतके साम्य आहे की, रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशात उमेदवारांची भारतातून समानरूपाने रीप लागली आहे. सत्तागटापासून समांतर राहण्याच्या आमच्या परराष्ट्रीय धोरणाचा तो एक व्यक्त पुरावा आज बनला आहे. करुणांकित विज्ञानाच्या संदर्भात स्वतंत्र उत्पादनतंत्र निर्माण करण्याला एक खास महत्व आहे.
विज्ञान करुणांकित करा
विज्ञान हे असांप्रदायिक असते, पण मानवी संकुचितपणाने त्याचे ते स्वरूपही आज कलंकित झाले आहे. विज्ञान म्हणजे महा उत्पादन तंत्र असा भ्रम फैलायला आहे. महा उत्पादनाचे तंत्र स्वीकारले म्हणजे एक तर स्वातंत्र्याचा देखावा उभा करणारी उपासमार तरी पत्करावी लागते किंवा भाकरीची आशा लावणारा स्वातंत्र्याचा अपहार कबूल करावा लागतो. केंद्रित महाउत्पादन पद्धतीचे हे अपरिहार्य परिणाम आहेत. पण विज्ञान ही एक शक्ती आहे. तिचा उपयोग योजकाच्या बुद्धीप्रमाणे होऊ शकतो. अणुशक्तीने संहारक शस्त्रे बनवता येतात त्याचप्रमाणे रोगपरिहारी सोयीही निर्माण करता येतात. महाउत्पादनाचा विज्ञानसंप्रदाय जोवर मान्य करण्यात येईल तोवर भांडवलशाही व हुकूमशाही यांच्याच दुष्ट वर्तुळात राष्ट्राच्या गाड्याचे चाक फिरत राहील. भांडवलशाही आणि हुकुमशाही पद्धतीचा आधारच मुळी क्रौर्य हा असतो. त्यामुळे त्या पद्धतीत करूणांकित विज्ञान असंभव आहे. दोन्ही पद्धतीत मानवी जीवन कवडीमोल असते. रोजगाराची शाश्वती नसल्याने भांडवलशाहीत मानवी जीवन पायदळी तुडवले जाते, तर हुकूमशाहीत मानवाला उत्पादक पशुचे स्वरूप येते. महाउत्पादनाच्या विज्ञानसंप्रदायातून स्वतःची सोडवणूक केल्याशिवाय शासन करुणांकित ठरणार नाही आणि तोवर त्यांच्या अंकित असलेले आजचे विज्ञानही करुणाभावनेने कार्यशील बनणार नाही. राजकारणाला लोक कारणाचे स्वरूप येईल या दृष्टीने पावले टाकणे आणि विज्ञानाला महाउत्पादन तंत्राच्या फेऱ्यातून सोडवणे हेच विज्ञान करणांकित करण्याचे मार्ग आहेत.
लोककारण व अल्पप्रमाण उत्पादनतंत्र यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची तयारी नसेल तोवर हा संदेश वेदवचनांप्रमाणेच ग्रंथशोभेसाठी वा व्याख्यानात तोंडी लावण्यासाठी उपयोगी पडेल. अद्वैताचा उद्घोष होत असतानाच येथे अस्पृश्यता दृढमूल झाली. त्याच पद्धतीने करूणांकित विज्ञानाचा जर चालू असतानाच मानवतेचे सत्त्वहरण करणारी एकपक्षीय अधिसत्ता किंवा भांडवलशाही निर्माण होण्याचा धोका टाळावयाचा तर लोककारण आणि नवे अल्पप्रमाण उत्पादनतंत्र निर्माण करण्याच्या दिशेने विचारवंताची पावले पडली पाहिजेत. त्यांनी राज्यसत्ता आणि महाउत्पादन तंत्र या मार्गाची त्वरित वैभवशाली होण्याच्या भ्रमांतून सुटका करून घेतली पाहिजे.
 

Tags: Science Council Science Research विज्ञान परिषद विज्ञान संशोधन weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी