1974-75 मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या संपूर्ण क्रांतीला या वर्षी 50 वर्षे झाली, पण त्यानंतर कुठलाही व्यापक संघर्ष झाला नाही. किरकोळ आंदोलने स्थानिक पातळीवर झालीत व काही होतही आहेत. सगळ्यात चिंताजनक समाजवादी व कम्युनिस्ट दोघांचेही काही सहकारी तर निराशेतून किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी सांप्रदायिक राजकारणात गेले, हेही कटू सत्य; पण खरे आहे. आपल्या चुका स्वीकारल्याशिवाय सुधारणा कशी करणार? अन्यथा आपणच तेलाच्या घाण्याला जुंपलेल्या बैलांसारखे घाण्याभोवती गोलगोल किती फिरत राहणार आहोत ?
2025 हे वर्ष संपण्यापूर्वीच शेवटच्या शंभर दिवसांत समाजवादी चळवळीच्या दुसऱ्या पिढीतील चार नामांकित कर्तृत्ववान ज्येष्ठ व्यक्ती एकामागोमाग एक आपल्यातून निघून गेल्या. प्रथम डॉ. जी. जी. परिख यांनी 2 ऑक्टोबर रोजी शंभरीत पदार्पण करत 100 व्या वर्षी देह ठेवला; त्यानंतर सच्चिदानंद सिन्हा, जे जवळपास शंभर वर्षांचे होणार होते; 93 वर्षीय पन्नालालजींचे आठवडाभरापूर्वी निधन; आणि आता डॉ. बाबा आढाव यांचा प्रवास संपला. आमच्यासारख्या तिसऱ्या पिढीतील लोकांसाठी आज खूप मोठी पोकळी निर्माण झाली असे वाटत आहे आणि ही भावना जीर्जीच्या जाण्यापासून तर आज बाबांच्या जाण्याच्या बातमीने मला काल रात्री धड झोप आलेली नाहीये. जवळपास माझ्या मनात रात्रभरापासून खालील आत्ममंथन सुरू झालेलं आहे जे ती व्यक्त करत आहे. यामध्ये मला कुणाचाही अधिक्षेप करायचा नसून, माझीच स्वतःच्या मनात चाललेली घालमेल मला व्यक्तिशः काय वाटत आहे ते तुम्हा सर्व समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी धडपड करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करायचं आहे.
आपल्या चारही वरिष्ठ सहकाऱ्यांनी आपल्याला दीर्घ काळ मिळालेल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण पाऊणशेपेक्षा जास्त वर्षे सर्व अर्थानी शोषणमुक्त, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि समतामूलक भारत घडविण्यासाठी आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठा काळ कार्यरत राहून ते आपल्यातून निघून गेले आहेत. डॉ. बाबा आढाव ज्यांचे वय 95 होते, त्यांना गेल्या आठवड्यापासून फुप्फुसांतील संसर्गामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण वयोमान जास्त असल्यामुळे उपचारांना यश आले नाही. त्यांचे काल रुग्णालयातच निधन झाले. आज सायंकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत कुठल्याही प्रकारचे कर्मकांड न करता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केला जाणार आहे.
माझा, बाबा आणि पन्नालालजी यांच्याशी व्यक्तिगत परिचय 1970 च्या दशकात झाला, जेव्हा मी अमरावती येथे महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात 'एक गाव, एक पाणवठा' आंदोलनात सहभागी झालो असताना झाला आहे. जवळपास 55 वर्षे हा संबंध अखंड राहिला. या दीर्घ नात्याचे प्रमुख कारण म्हणजे बाबांचे सार्वजनिक जीवन राष्ट्र सेवा दलातून सुरू झाले होते. तसेच बाबा आढाव, भाई वैद्य आणि पन्नालालजी तिघे जण राष्ट्र सेवा दलाच्या एकाच बॅचचे सहकारी मित्र होते. आणि त्यानंतर तिघेही संयुक्त समाजवादी पक्षाशी निगडित होते. पन्नालालजी तर प्रदीर्घ काळ सरचिटणीस राहिले होते. त्यांच्या निधनाच्या आठवड्याभरातच बाबांचेही जाणे हे राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी आंदोलनासाठी फार मोठे नुकसान आहे. डॉ. बाबा आढाव हे मेडिकल डॉक्टर होते तरी त्यांनी आपल्या आयुष्याचा सर्वांत मोठा हिस्सा सामाजिक विषमतेच्या हजारो वर्षे जुन्या आजारांवर उपचार करण्यात व्यतित केला. महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी व साने गुरुर्जीच्या प्रेरणेने जातिव्यवस्थेविरोधी समतामूलक समाज बनवण्यासाठी सुरुवातीचा संसदीय राजकारणाचा त्याग करून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जातिनिर्मूलनाच्या कार्यासाठी समर्पित राहू शकले; अन्यथा संसदीय राजकारण जात-धर्माच्या भोवती फिरत असताना ते करत असताना मुस्लीम सत्यशोधक समाज वा विषमता निर्मूलनाचे काम करणाऱ्याला कोण मते देणार आहेत ? तसेच पुण्यातील असंघटित क्षेत्रातील हमाल मापाडी व रिक्षाचालकांची संघटना तसेच कचरा गोळा करणाऱ्या वा घरकाम करणाऱ्या मोलकरणींची संघटना करून कुठले राजकीय करिअर आले? आणि या सगळ्या सर्वहारा वर्गातील लोकांनी पौष्टिक आहार करावा म्हणून 'कष्टाची भाकर' हा अभिनव कार्यक्रम राबविण्यापर्यंतच्या त्यांच्या कृतींनी राज्य सरकारलादेखील दखल घ्यावी लागली म्हणून शासनाच्या तर्फे 'झुणका भाकर केंद्रे' सुरू करावी लागली. त्याचप्रमाणे, 'एक गाव एक पाणवठा' हे आंदोलन नंतर शासनाच्या धोरणात रूपांतरित झाले. 'अन्याय घडो शेजारी की दुनियेच्या बाजारी, धावून तेथेही जाऊ आणि स्वातंत्र मंत्र हा गाऊ', या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील शेकडो वर्षे जुनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठी यल्लम्मा देवीच्या यात्रेच्या जागी बसून पुढाकार घेतला. तसेच राजस्थान हायकोर्टाच्या जयपूर येथील आवारात मनुस्मृतीचे जनक मनूच्या पुतळ्याच्या विरोधात जयपूर येथे जाऊन आंदोलन सुरू केले होते. तसेच छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी नामांतराच्या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. डॉ. राममनोहर लोहियांच्या तुरुंग, फावडे, व्होट या त्रिसूत्रीप्रमाणेच डॉ. बाबा आढावांनी आपल्या आयुष्यातील पाऊणशे वर्षे धडपड केली आहे. पण तरीही जातिवादी-धर्मांध शक्तीच वरचढ ठरत आहेत. हे मला आज बाबांच्या निधनाच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवत आहे. म्हणून मी आत्ममंथनपर लिहायला धजावत असून, यामध्ये कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही हे मी आधीच स्पष्ट करतो.
चारही ज्येष्ठ समाजवादी सहकाऱ्यांच्या निधनानंतर समाजवादी चळवळीच्या वर्तमान स्थितीविषयीचे चिंतन स्वाभाविक आहे. या सर्वांनी स्वातंत्र्योत्तर भारतात समाजवादी समाज स्थापण्यासाठी आपल्या हयातीत प्रचंड संघर्ष केला. परंतु आज आपण मागे वळून पाहिले, तर समाजवादी चळवळ फक्त स्मृतिदिन, जयंती-महोत्सव आणि शताब्दी कार्यक्रमांपुरतीच मर्यादित झाल्याचे दिसत आहे. याउलट, समाजवादाचे व सेक्युलरिझमचे वावडे असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्याने ना स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला, ना कुठल्याही सामाजिक प्रश्नांवर काम केले, तरीही शंभर वर्षांनंतर आज देशात सगळ्यात जास्त प्रभावी कसा झाला? हे किती भयंकर आहे? शंभर टक्के राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वर्गवर्णश्रेष्ठत्व असलेल्या समाजाचीच जपवणूक करणे हाच उद्देश असताना भारतातील बहुजन समाजदेखील त्यांच्या पालखीचे भोई झालेला आहे, हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. याच महिन्यात कानपूर येथे शंभर वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेची शताब्दी सुरू होत आहे. त्यांनीपण कष्टकऱ्यांच्या संघटना बांधून वेळोवेळी चळवळी केल्या आहेत. पण त्यांची पण सध्याची स्थिती काय आहे? आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठे उभा आहे? हे पाहिल्यावर किती वेदनादायी वास्तव आहे. मी या विषयावर स्वतंत्र लेखन करणार आहे.
आत्ता चारही जेष्ठ समाजवादी मित्रांच्या निधनाच्या नंतर आपल्या चळवळीची स्थिती तपासली, तर काय दिसते ? क्रांतिकारी परिस्थिती निर्माण होण्याची वेळ केव्हा येते? तर जेव्हा लोकांना अजूबाजूची परिस्थिती असह्य वाटायला लागते, तेव्हा लोक क्रांतीसाठी तयार असतात असे मानले जाते. पण आज काय दिसते आहे? ज्याप्रमाणे वेगवेगळ्या आजारांना फैलावणाऱ्या रोगजंतूंची देखील 'रोगप्रतिकारशक्ती' कालपरत्वे वाढत जाते व ते तग धरून आहेत. पाच वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना नाव असलेल्या रोगाचे उदाहरण अंगावर शहारे आणणारे आहे. तसेच बहुतेक देशांतील स्थिती बद्दलही दिसत आहे की एवढे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत, उदाहरणार्थ, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, कायदा-सुव्यवस्थेचे अधःपतन, जातीयता आणि धार्मिक ध्रुवीकरण आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जल-जंगल-जमीन व सर्व सरकारी उद्योग खाजगी उद्योगपतींना सोपविण्यात येत आहे. कामगारांच्या कायद्यातील बदल करत मालकधार्जिणे कायदे नुकतेच आणले असून आदिवासींना दिलेल्या कायदेशीर सुरक्षा कवच काढून त्यांच्या जमिनी उद्योगपतींना सोपविण्यात येत असूनही लोकांना त्याबद्दल आज फारसे काहीएक वाटत नाही, हे वास्तव आहे. एक वेळ अशी होती की, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारीला कंटाळून लोकांनी आंदोलने केली आहेत. अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर 2011-13 मध्ये वर्तमान सरकार यायला निमित्त झालेल्या तथाकथित जनलोकपाल आंदोलनातूनच वर्तमान सरकार निर्माण झाले आहे. पण लोकपाल विधेयक आणणे तर दूरच राहिले. उलट, पूर्वीच्या सरकारने केलेल्या विविध प्रकारच्या बदलांना कात्री लावणे सुरू आहे. लोकपाल विधेयक आणणे तर दूरच राहिले, चर्चेतूनदेखील बेदखल झाले आहे. सगळ्यात महत्त्वाचे पर्यावरणाच्या तरतुदींचा बट्ट्याबोळ करत तथाकथित विकासाच्या नावाखाली जे काही चालले आहे ते तसेच बेधडक करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने इलेक्शन कमिशनच आपल्या ताब्यात घेतलेले पाहून डॉ. बाबा आढावांच्या आयुष्याचा शेवटचा सत्याग्रह व त्यांनी केलेले एक आठवड्यापेक्षा जास्त काळाचे उपोषण केलेले आज मला प्रकर्षाने आठवत आहे. कारण त्यांच्या लक्षात आले होते की, आता देशातल्या लोकशाहीचेच अपहरण करण्यात आले असून, आत्ताच सरकारच पूर्णपणे निवडणुकीच्या नावाने फक्त एक फार्स करून स्थानापन्न झाले आहे. म्हणून त्यांनी आपल्या आयुष्यातील 95व्या वर्षीची सुरुवातच मुळी त्याविरुद्ध प्रतिकारासाठी त्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. पण ते तेवढ्यापुरतेच झाले. ही बाब मला अवर्जून लिहावीशी वाटत आहे. यातून जनमानसाचा कानोसा काय दिसतो? लोकांचा पाठिंबा कितपत होता ?
1974-75 मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या संपूर्ण क्रांतीला या वर्षी 50 वर्षे झाली, पण त्यानंतर कुठलाही व्यापक संघर्ष झाला नाही. किरकोळ आंदोलने स्थानिक पातळीवर झाली आहेत व काही होतपण आहेत. सगळ्यात चिंताजनक समाजवादी व कम्युनिस्ट दोघांचेही काही सहकारी तर निराशेतून किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी सांप्रदायिक राजकारणात गेले, हेही कटू सत्य; पण खरे आहे. आपल्या चुका स्वीकारल्याशिवाय सुधारणा कशी करणार? अन्यथा आपणच तेलाच्या घाण्याला जुंपलेल्या बैलांसारखे घाण्थाभोवती गोलगोल किती दिवस फिरत राहणार आहोत? आपल्या दिवंगत सहकाऱ्यांचे खरोखर स्मरण करायचे असेल तर आत्मपरीक्षण आणि त्यांच्या आदर्शानुसार पुन्हा कार्यारंभ. डॉ. बाबा आढावांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे सर्व बदलण्यासाठी दृढ संकल्प करू या. हीच योग्य श्रद्धांजली. क्रांतिकारी अभिवादन.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या