अमेरिकन अध्यक्षांचा आजार ही एक जागतिक घटना बनली आहे. अमेरिकन राज्यघटनेतील एका कच्च्या दुव्याचे केवढे गंभीर परिणाम जागतिक राजकारणावर होतात, ते पाहण्यासारखे आहे.
मोरोक्कोच्या राजाच्या स्वागतासाठी आयसेनहॉवर विमानतळावर स्वतः गेला होता. तेथून येतानाच त्याला थंडी वाजून आली. अनेक नामांकित डॉक्टर्स निदान करू लागले. पहिले 16 तास अमेरिकन अध्यक्ष कशाने आजारी आहेत, हे गुप्त ठेवण्यात आले. नंतर अध्यक्ष सेरेब्रल ऑक्लूजनने आजारी असल्याचे आणि त्यातून बरे होण्यासाठी त्यांना अनेक आठवड्यांची विश्रांती लागेल असे जाहीर केले.
याच सुमारास यूरोपमधल्या 14 देशांच्या राजधान्यातून नाटो परिषदेची तयारी चालू होती. 15 डिसेंबरला पॅरीस येथे भरणाऱ्या नाटोच्या परिषदेसाठी सभासद सरकारांचे प्रमुख उपस्थित रहाण्याचे ठरले होते. रशियाने स्पुटनिक क्षेत्रात मारलेल्या आघाडीमुळे या परिषदेला अतिशय महत्व होते. फ्रान्सला अॅटम बॉम्ब तयार करायचा आहे. इंग्लंड अमेरिकेने अवाढव्य पैसे खर्च करून त्याचा शोध लावलाच आहे. आता फ्रान्सने पहिल्यापासून शोध लावण्यासाठी खर्च करू नये, असे इंग्लंड अमेरिकेचे मत आहे. मोरोक्कोला लष्करी मदत देण्याचा इंग्लंड अमेरिकेचा निर्णयही फ्रान्सला बिलकुल मान्य नाही. अमेरिकन स्पुटनिकचा नुकताच अयशस्वी ठरलेला प्रयोग पाश्चात्य राष्ट्रातील अनेकाचे धैर्य खचण्यास कारणीभूत झाला आहे. या सर्व घटनांमुळे जगातील अनेक राष्ट्र नाटो परिषदेकडे डोळे लावून बसली होती. आयसेनहॉवर यांच्या आकस्मिक आजारामुळे परिषद होते की नाही, अशी शंका उपस्थित झाली होती.
तुर्कस्तानचे अध्यक्ष मेंडेरिस आजारी पडले तर जगातील इतर राष्ट्र हवालदिल होणार नाहीत. अमेरिकन अध्यक्षाच्या शिंका-खोकल्यावर मात्र अनेक राष्ट्राच्या राजधान्यात गंभीर चर्चा चालतात! आयसेनहॉवरचा आजार ही जागतिक महत्त्वाची घडामोड आहे, असे अॅडनॉर म्हणाला. एक फ्रेंच नेता म्हणाला: “प्रथम स्पुटनिक आणि आता हा आजार! परमेश्वर आमच्या बाजूचा राहिलेला दिसत नाही!”
अमेरिकेच्या घटनेच्या दृष्टीने अध्यक्षांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहेच शिवाय अमेरिकेच्या आजच्या जागतिक स्थानामुळेही त्याला विलक्षण महत्त्व आहे. स्वतंत्र लोकशाही राष्ट्राचे नेतृत्व आज अमेरिका करीत आहे. त्यामुळे अमेरिकेतील अध्यक्षीय पेचप्रसंग हा जगाच्या चर्चेचा विषय बनतो.
अमेरिकेच्या अध्यक्षासमोर (वय 67) आज तीन पर्याय आहेत. (1) स्वतःच्या प्रकृतीची काळजी असेल तर राजीनामा देणे. (2) निदान महत्त्वाच्या काही जबाबदाऱ्या उपाध्यक्षांवर सोपविणे. (3) मृत्यूची फिकीर न करता जगातील सर्वांत जास्त जबाबदारीचे काम सांभाळणे. सुदैवाने आयसेनहॉवरची प्रकृती सुधारली आणि तो नाटो परिषदेला जाऊ शकला. पण अमेरिकन घटनेतील अडचणी आणि अध्यक्षाच्या जीवघेण्या जबाबदाऱ्या कमी झालेल्या नाहीत.
1789 मध्ये अमेरिकेची घटना अमलात आली. तेव्हापासून अमेरिकेला 33 अध्यक्ष मिळाले. एकाही अध्यक्षाने आजपर्यंत राजीनामा दिलेला नाही! अध्यक्षाने राजीनामा दिला किंवा काही कारणामुळे तो काम करू शकत नसला किंवा त्याला काँग्रेसने काढून टाकले तर उरलेल्या मुदतीसाठी उपाध्यक्ष आपोआप अध्यक्ष होतो, असे अमेरिकन घटनेतील कलम आहे. अध्यक्ष निकोप असेल तर मात्र उपाध्यक्षाला कोणतेही महत्वाचे काम नसते. अमेरिकन कॉग्रेसच्या वरच्या सभागृहाचा सेनेटचा न बोलणारा निःपक्षपाती सभापती एवढेच त्याचे काम. निवडणुकीच्या वेळी जेव्हा राजकीय पक्ष अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी उमेदवार निवडतात त्या वेळी उपाध्यक्ष-उमेदवाराबद्दल फारशी काळजी घेण्यात येत नाही. कारण त्याला घटनेप्रमाणे काहीच काम नाही. आजपर्यंत ने उपाध्यक्ष अमेरिकेला लाभले त्यातील केवळ दोनच अध्यक्ष होण्याच्या योग्यतेचे होते. त्यांना तिकिट देताना पक्षातील काही गटांना खूष ठेवणे एवढाच हेतु असतो. आतापर्यंतच्या 33 अध्यक्षांपैकी 6 त्यांच्या मुदतीत मरण पावले. त्यामुळे 6 उपाध्यक्ष आपोआप अध्यक्ष बनले. ट्रुमनसारखा एखादा अपवाद सोडला तर बाकीचे विशेष योग्यतेचे नव्हते. अमेरिकन लोकांच्या हे कधीच लक्षात आली आहे. पण अमेरिकन घटनेत दुरुस्ती करणे अतिशय अवघड आहे. शिवाय संकट समोर येऊन ठेपले म्हणजे मग सर्व विचार करू लागतात. संकट टळले की घटना दुरुस्तीचा विचार बाजूला पडतो. याही वेळी आयसेनहॉवर आजारी पडल्यावर लोकांना रिचर्ड निक्सन (वय 44) हा अध्यक्ष होतो की काय अशी भीती वाटू लागली होती. आता संकट टळल्यानंतर काही दिवसांनी लोक पुन्हा सगळे विसरतील! आयसेनहॉवरचा तिसरा झटका त्यांना पुन्हा जागे करील! 170 वर्षे जे झाले नाही ते आज होईल अशी अपेक्षा कशी करावी?
याच संदर्भात भारतीय घटनेतील उपाध्यक्ष-अध्यक्ष संबंधाचा विचार केल्यास वावगे ठरणार नाही. आपला उपाध्यक्षही अध्यक्ष ठाकठीक असताना केवळ राज्यसभेचा सभापती एवढेच काम करतो. अध्यक्षांची जागा रिकामी झाल्यास तो तात्पुरता अध्यक्ष बनतो. सहा महिन्याच्या आत अध्यक्षपदाची नवी 5 वर्षे मुदतीसाठी निवडणूक होते. आणि तात्पुरता अध्यक्ष झालेला उपाध्यक्ष परत उपाध्यक्ष होतो.
अध्यक्षाची जागा रिकामी होण्याची संभाव्य कारणे तीनः (1) राजीनामा (2) मृत्यू (3) पार्लमेंटने घटनाभंगासाठी केलेली हकालपट्टी. आपल्या घटनेमध्येही अध्यक्षाला खूप मोठे अधिकार आहेत. त्याने मनात आणले तर घटनात्मक मार्गाने तो हुकूमशहा बनू शकतो. आणीबाणीच्या प्रसंगी तर अध्यक्षाला भयावह अधिकार आहेत. वैमार घटनेच्या 48व्या कलमांत जर्मन अध्यक्षाला नेमके असेच अधिकार होते! याच अधिकारांचा उपयोग करून हिटलर घटनाभंग न करता जर्मन हुकूमशहा बनला. अशा परिस्थितीत उपाध्यक्ष जर आपोआप अध्यक्ष बनेल तर ते राष्ट्राला फारसे उपकारक ठरणार नाही. अमेरिकन घटनेतील ही अडचण लक्षात घेऊन उपाध्यक्ष हा तात्पुरता अध्यक्ष होईल व नवी निवडणूक पूर्ण 5 वर्षांकरिता होईल (उरलेल्या मुदतीकरता नव्हे) अशी सोय आपल्या घटनेत करण्यात आली आहे.
अमेरिकन घननतेला हा दोष 1881 मध्ये प्रथम प्रकर्षाने ध्यानात आला. जेम्स गारफील्ड या अध्यक्षावर एका असंतुष्ट वकीलाने गोळ्या झाडल्या. 80 दिवस अध्यक्ष गंभीर आजारी होते. या दिवसात राज्यकारभार कोण चालविणार, असा प्रश्न पडला. अनेक गोंधळ झाले. 81व्या दिवशी गारफील्ड मृत्यू पावल्यानंतर उपाध्यक्ष अध्यक्ष झाला व हा पेचप्रसंग सुटला.
1919 मध्ये वुड्रो विल्सनला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्याच्या अध्यक्षीय मुदतीच्या 4 वर्षापैकी शेवटचे 17 महिने तो शारीरिकदृष्ट्या असमर्थ होता. तरी त्याने उपाध्यक्षावर काम सोपविले नाही. वॉरन हार्डिंग्ज या अध्यक्षाच्या बाबतीतही असेच घडले.
1777 मध्ये घटनासमितीमध्ये या विषयाला तोंड फोडण्याचा एका प्रतिनिधीने प्रयत्न केला. अमेरिकन घटनेच्या दुसऱ्या कलमात म्हटले आहे की: In case of the removal of the President from his office, or of his death, resignation or Inability to discharge the powers and duties of the said office, the same shall devolve on the Vice President ही inability किंवा असमर्थता कोण ठरवणार, अध्यक्ष स्वतः की काँग्रेस, की सुप्रीम कोर्ट, असा प्रश्न त्या प्रतिनिधीने विचारला. त्याला त्याही वेळी उत्तर मिळाले नाही आणि नंतरच्या 180 वर्षातही नाही घटनेतल्या या दोषामुळे दोन अडचणी उद्भवतात : (1) अध्यक्ष गंभीर आजारी पडला तर त्याच्या इच्छेशिवाय त्याचे काम कोणालाही करता येत नाही. सरकारची सर्व यंत्रणा बंद पडते आणि (2) ज्याला अध्यक्ष म्हणून निवडून दिलेले नाही असा एखादा अननुभवी अयोग्य माणूस आपोआप अध्यक्ष बनतो. या दोन्ही अडचणी फक्त अमेरिकन लोकांपुढेच नाहीत तर त्या जागतिक समस्या आहेत. आयसेनहॉवरच्या जागी निक्सन येणे हे ईडनच्या ऐवजी मॅकमिलन किंवा मोलेच्या ऐवजी गयार्ड येण्याइतके उपेक्षणीय नाही.
आयसेनहॉवरला हृदयविकाराचा पहिला झटका सप्टेंबर 1955 मध्ये आला. त्या वेळीच हा प्रश्न पुन्हा उद्भवला. तेव्हापासून आयसेनहॉवर निक्सनला तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला जगाच्या दौऱ्यावर पाठवण्यात आले, अनेक महत्त्वाची कामे त्याच्यावर सोपविण्यात आली, मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी त्याला कायम आमंत्रण असते.
आयसेनहॉवर जेव्हा दुसऱ्या मुदतीकरता निवडणुकीला उभा राहिला तेव्हा त्याच्या प्रकृतीकडे पाहून व काही बरे वाईट झाल्यास निक्सन डोक्यावर बसेल या भीतीने अनेकांनी स्टीव्हन्सनला मते दिली! निक्सनला लोकांनी अखेर निवडून दिले याचे कारण त्यांना आयसेनहॉवर हवा होता. आता आयसेनहॉवर फार तर निक्सनवर जबाबदाऱ्या सोपवू शकेल पण स्वतःची प्रतिष्ठा किंवा लोकप्रियता त्याला कशी देणार?
नाटो संघटनेतील इंग्लंड फ्रान्स आदि राष्ट्र अमेरिकेच्या किती बंधनात आहेत, तेही या वेळी स्पष्ट झाले. आयसेनहॉवरच्या आजारपणामुळे त्यांच्यापुढे गुंगापत्ती आली. परिषद रद्द करावी तर केवळ अमेरिकन अध्यक्षाच्या आजारपणामुळे इतकी महत्त्वाची परिषद रद्द करावी लागली, अशी टीका होणार! तुर्कस्तानचा अध्यक्ष मेंडरिस आजारी पडता तर परिषद पुढे ढकलली असती का, असा बिनतोड प्रश्न कोणीही विचारला असता. परिषद घ्यावी तर आयसेनहॉवरच्या जागी निक्सन हा उपाध्यक्ष येणार आणि सर्व पंतप्रधानांना व सरकारप्रमुखांना या उपप्रमुखांच्या बरोबरीने किंवा अध्यक्षतेखाली चर्चा करावी लागणार. आंतरराष्ट्रीय मानापमानाची सतत काळजी वाहणाऱ्या इंग्लंडने निक्सन आल्यास आमची हरकत नाही. आमचे पंतप्रधान येतील असे कळविले. हे मांडलिक वृत्तीचेच द्योतक नव्हे काय?
निक्सन प्रसिद्धीला आला तो मॅकार्थीचा उजवा हात म्हणून. अन-अमेरिकन अॅक्टिव्हिटी कमिटीत हिस या कम्युनिस्टाला शासन देण्यात निक्सनने पुढाकार घेतला होता. केवळ 11 वर्षे तो राजकीय क्षेत्रात काम करीत आहे. लोकप्रियता नाही, अनुभव नाही, वयाची परिपक्वता नाही असा हा उपाध्यक्ष की अध्यक्ष होईल हे सांगता येत नाही.
जगाच्या दौऱ्यावर असताना मागे तो म्हणाला की: India’s neutrality is immoral स्टीव्हन्सनविरुद्ध प्रचार करताना तो म्हणाला, ज्याला बायको सांभाळता येत नाही तो राष्ट्र काय सांभाळणार? (स्टीव्हन्सन घटस्फोटित आहे.) असा माणूस आयसेनहॉवरच्या जागी लोकशाही राष्ट्राचे नेतृत्व करू लागला तर अमेरिकन घटनेतला फार मोठा दोष जगाच्या माथी बसणार आहे.
Tags: US Constitution US President Eisenhower US Election अमेरिकन राज्यघटना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर अमेरिकन निवडणूक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या