तरुणपणी मी मलेशियामध्ये पेनांग शहरात सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकवीत होतो. माझे विभागप्रमुख रत्नम. तमीळ. बायको स्वीडिश. मी त्यांच्याबरोबर ब्रिज खेळत असे. एकदा बाईंना विचारले, 'मॅडम, तुमचे मूल कोणत्या भाषेत बोलेल?' पित्याची मातृभाषा तमीळ, मातेची मातृभाषा स्वीडिश, दोघांची कार्यभाषा इंग्रजी, आजूबाजूच्या समाजाची मुख्य भाषा 'बहासा मलायु (मले)'. त्या म्हणाल्या, "सरळच आहे, मुलगा मले भाषेत बोलणार". मी विचारले 'का?' "अरे, त्याची आया मले भाषक. सगळे नोकर तसेच. बागेत, बाजारात तीच भाषा. तो मुलगा मले भाषेमध्ये immersed आहे. म्हणून तीच बोलणार. मोठा होईल तसा इंग्रजी भाषा बोलेल.
मी संख्याशास्त्रज्ञ आहे. आमच्या विषयाचे मूलतत्त्व असे की, कोणत्याही गटातल्या सर्व व्यक्ती अगदी सारख्या नसतात. आंब्याची पेटी आणली तर सगळी फळे सारखी नसतात. याला आम्ही म्हणतो विचलन. त्याचा गणिती अभ्यास करायचा. कधीकधी विचलन हवे असते. कधी नको असते. साडीच्या दुकानातल्या सगळ्या साड्या सारख्या असतील, म्हणजेच शून्य विचलन, तर काय होईल? दुकानदाराचे दिवाळे निघेल. बायकांना साड्यांमध्ये भरपूर विचलन हवे असते. उलट, कारखान्यातील उत्पादन विचलनमुक्त हवे. तुमच्या स्कूटरचा स्पार्क प्लग खराब झाला. तुम्ही दुसरा आणला. आधी बघितलेत का की, तुमच्या स्कूटरला तो बसेल की नाही? मनात शंका येत नाही. कारण त्या उत्पादनात विचलन नाही. असो.
एक उदाहरण म्हणून आपण 'महाराष्ट्रातल्या स्त्रिया' असा गट पाहू. या अर्थात सारख्या नसतात. कोणी बुटक्या, कोणी उंच. कोणी सुकड्या, कोणी टंच. कोणी रोड, कोणी लठ्ठ. कोणी हुशार, कोणी मठ्ठ. हे स्वाभाविक आहे. लोकसंख्या शास्त्रज्ञ या वेगवेगळ्या प्रकारांच्या प्रमाणाकडे बघतात. लठ्ठपणाचे प्रमाण फार झाले तर चिंता वाटायला हवी. वगैरे.
जगभरच्या लोकसंख्येमध्ये उंची आणि वजन यांबाबत कोणते ट्रेंड दिसत आहेत ?
गेल्या दोन-तीन पिढ्यांमध्ये चिनी तरुणांची उंची सरासरी 10 सीएमने वाढली आहे म्हणजे चार इंच. मोठाच फरक पडला आहे. कशामुळे? मुख्यतः उत्तम आहार आणि उत्तम आरोग्य व्यवस्था. तज्ज्ञांना वाटते की, आता आणखी फार वाढ होणार नाही. Genetic plateau गाठलेला आहे. वजनाचे काय? याच काळात वजने वाढू लागली. माणसे लठ्ठ झाली. आता लहान मुलेसुद्धा लठ्ठ होत आहेत. काही शहरी शाळांमध्ये तर अति लठ्ठ (obese) मुलांचे प्रमाण 30% इतके वाढले आहे. काळजी वाटण्यासारखी परिस्थिती आहे. कारण लठ्ठपणामुळे हृदयाचे रोग वाढतात, रक्तदाब वाढतो, डायबिटीस वाढतो. वजनामुळे सांधे थकतात. osteoarthritis. झोपेच्या समस्या वाढतात. वगैरे. आज चीनमधले 50% प्रौढ लठ्ठ आहेत. सुमारे 14 कोटी लोक डायबिटीसचा त्रास सहन करतात.
अमेरिकेमध्ये एक-दोन पिढ्यांपूर्वी सरासरी उंची 177 सेंटीमीटर म्हणजे 5 फूट 10 इंच इतकी झाली. वजने मात्र अजूनही वाढत आहेत. आज लठ्ठ लोकांचे प्रमाण 45% आहे. याच्यावर उपाय काय हेही ठाऊक आहे. आहारात सुधारणा. जंक फूड टाळणे. जीवनशैलीमध्ये पळण्यासारख्या व्यायामांना महत्त्वाचे स्थान देणे इत्यादी. अभ्यासकांच्या मते, सुखवस्तू वर्गामध्ये हे मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे बराच काळ अमेरिकेत गरीब लोक लठ्ठ आणि मध्यम वर्गीय सडपातळ, अशी परिस्थिती आहे.
1950 पर्यंत जपानी पुरुषांची उंची फार कमी होती. सध्या ती वाढून 172 सीएम झाली आहे. आश्चर्य म्हणजे जपानमधील लठ्ठपणाचे प्रमाण फार कमी आहे. 5%.
भारतात काय परिस्थिती आहे ? सुखवस्तू वर्गामध्ये सरासरी उंची 165 सीएम आहे. अजून वाढण्याला वाव आहे. ग्रामीण भागात गरिबीमुळे उंची आणखी कमी आहे. सधन वर्गामध्ये वजने वाढत आहेत. सुमारे 4 कोटी मुले लठ्ठ गटात पडतात. भारतीयांची शरीररचना थोडी वेगळी आहे. वजन वाढते तेव्हा निर्माण झालेला मेद बाहेर दिसण्याऐवजी आतील अवयवांवरती राहतो. म्हणून त्यांना वाढत्या वजनाचा त्रास लवकर सुरू होतो. तात्पर्य, भारतात कुपोषण आणि अतिपोषण अशा दोन्ही समस्या हातात हात घालून नांदत आहेत.
त्यांच्यावरचे उत्तर ज्ञात आहे. कुपोषण घालवायचे आहे? रोजगार हमी चालवा. लोकांच्या हातात पैसा येऊ द्या. ते पोटभर जेवतील. कुपोषण घटेल.
लठ्ठपणाचे काय ? मी डॉ.पां. वा. सुखात्मे यांचा शिष्य आहे. संख्याशास्त्र तज्ज्ञ असूनही त्यांची जागतिक कीर्ती 'कुपोषण तज्ज्ञ' म्हणून होती. ते एका वाक्यात उत्तर देत. 'आहाराबाबत परंपरेला मान द्या.' काय परंपरा आपली ? कोकणात भात आणि मासे, घाटावर झुणका भाकर. पंजाबात दाल रोटी. हे मुख्य जेवण. हे बारमास. हंगामाप्रमाणे काय बदलायाचे ? त्या त्या ठिकाणी त्या त्या हंगामात जो भाजीपाला, जी फळे बाजारात येतील ती खाण्यात असावीत. पावसाळ्यात पालेभाज्या, पडवळ, दोडके; हिवाळ्यात मटार इत्यादी. उन्हाळ्यात आंबे, फणस; हिवाळ्यात द्राक्षे. गोदामात साठवलेले, परदेशातून आयात केलेले, कारखान्यात भरपूर प्रक्रिया केलेले हे सर्व टाळा. पास्ता, पिझ्झा नको. वडापाव खा. विलायतची फळे नको. आपले पेरू, डाळिंब, सीताफळ खा. हंगामात उसाचा रस चांगला. खरे म्हणजे ऊस घेऊन दातांनी सोलून खावा. शक्य असेल तर हुरडा खा. भुईमुगाच्या शेंगा आणि असा अन्य मेवा खा. करवंदे खा. चॉकलेट टाळा.
जीवनशैली कशी असावी? शेतकऱ्यांसारखी. पहाटे उठा. काम करा. घाम गाळा. सूर्य डोक्यावर आल्यावर जेवा. थोडी डुलकी काढा. सणासुदीला गोडधोड खा. हौसमौज करा. लवकर झोपा. वगैरे.
हे बऱ्याच लोकांना आवडत नाही. कमीपणाचे वाटते. मग किंमत द्या. लठ्ठ व्हा.
'अहो, शहरात हे शक्य नाही. आमचे कामच बसण्याचे आहे.' बरोबर. पण तुम्ही जिमला जाता. पोहायला जाता. जात नसला तर जा. तेथील फी भरायची नसेल तर पहाटे पळायला जा. दोरीवरच्या उड्या मारा. शरीराला जिम अथवा तत्सम व्यवस्था आवश्यक आहे. माझी समजूत आहे की, हे सर्वांना पटते. जे हे करत नाहीत त्यांनासुद्धा आपण काय केले पाहिजे हे पक्के ठाऊक असते.
परीक्षेत नापास होणाऱ्या मुलांचे दोन गट असतात. एक गट असा ज्यांना तो अभ्यास झेपत नाही. त्याचे उत्तर म्हणजे कोर्स बदलणे. दुसरा गट असा की, जे आळशी आहेत. झोपलेल्या माणसाला जागे करता येते. झोपण्याचे सोंग घेतो त्याला काय करणार? तात्पर्य, शरीर आरोग्याच्या समस्या आणि त्यावर उपाय हा विषय बऱ्यापैकी समजलेला आहे.
आईबाप म्हणतात, 'आम्हाला पटले तरी मुलांना कसे पटवायचे ? ती जाहिराती बघतात, मित्रांच्या घरचे खाणेपिणे बघतात, त्यांना स्वाभाविकच आकर्षण वाटते. आम्हाला परवडले तरीसुद्धा त्यांचा हट्ट पुरवायचा नाही हे अवघड जाते'.
यावर उपाय सुचवतो. मुलांना सांगा 'आठवडाभर परंपरेचे जेवण. रविवारी तुमच्या हौशीचे जेवण'.
पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधले प्रोफेसर जगन्नाथ दीक्षित यांनी लठ्ठपणावर सोपा उपाय सांगितला आहे. त्याला लोकांनी 'दीक्षित डायट' असे 'विलायची' नाव दिले आहे. ते म्हणतात 'पोटभर जेवा, आवडीचे पदार्थ खा, मर्यादा राखून जेवा, दिवसातून दोनदा जेवा. बाकी चरू नका. अगदी गरज पडली तर बिन दुधाचा, बिन साखरेचा चहा प्या. एवढे कराल तर काही महिन्यांत वजनावर अनुकूल परिणाम होईल'. तसे दिसत आहे. पण, शिस्त पाळणे गरजेचे आहे. आणखी एक गंमत सांगतो. त्यांची सल्लामसलत ऐकणाऱ्या लोकांना फायदा तर झालाच. म्हणजे वजन घटविण्यात, पोटाचा घेर घटविण्यात. पण, अनपेक्षितपणे त्यांची शुगरसुद्धा नियंत्रणात आली. डायबिटीस नियंत्रणात आला. त्याचे औषध (मेटफार्मिन वगैरे) कमी करणे शक्य झाले. याला म्हणतात 'सेरेंडीपिटी'. अपघाताने लागलेला शोध. असो.
आता सांधा बदलू या. सध्याचे युग कोणते ? डिजिटल. प्रत्येकाकडे स्मार्टफोन. बहुतेकांकडे लॅपटॉप. घरोघर टीव्ही आणि इंटरनेट कनेक्शन. कोणी कोणाशी बोलत नाही. जो तो आपल्या फोनमध्ये डोके घालून बसतो.
भारतातच काय, जगभर ही साथ आली आहे. आज माणसे रोज सरासरी 4.5 तास इतका वेळ फोनवर घालवतात. व्हिडिओ गेम्स खेळतात. फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे सतत बघत राहतात. टिक टॉकचे वेड लागते. तशीच रील्स आपण करावी अशी अपार इच्छा होते. पोर्नोग्राफी बघतात. (या अतिशय गंभीर विषयावर सर्वांचे उत्तम प्रशिक्षण करणारे एक 'पॉपकॉर्न' नावाचे नाटक नुकतेच रंगभूमीवर आले आहे. शक्य झाले तर ते अवश्य पाहावे.) 15-20 टक्के मुलांना असले व्यसन बऱ्याच प्रमाणात लागले असावे असा अंदाज आहे. WHO या संस्थेने व्हिडिओ गेम खेळण्याचे व्यसन या गोष्टीला आता मानसिक आजाराच्या यादीत ठेवले आहे.
या डिजिटल एडिक्शनचा काय तोटा ? एक म्हणजे झोपेचे खोबरे होते. झोपणे, उठणे यांचा नेहमीचा दिनक्रम बिघडतो. याचा हलके हलके प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. डोळ्यांवर ताण येतो, काहींना डोकेदुखी येऊ शकते. मानदुखी, पाठदुखी, मनगट दुखी (carpal tunnel syndrome) असे विकार होऊ शकतात. बसून राहण्याचा काळ वाढतो. हालचाल घटते. आरोग्यदायी आहार आणि संबंधित सवयी मोडतात. एकांडेपणा वाढतो. उदासीनता (depression) येऊ शकते. स्वभाव चिडचिडा होतो. फोन, लॅपटॉप वगैरे मिळाले नाहीत तर जीव कासावीस होतो. कोणत्याही कामामध्ये एकाग्रचित्त करणे अवघड होते. नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता घटते. मित्र-मैत्रिणींशी, नातेवाइकांशी प्रत्यक्ष भेटून गप्पा करणे अवघड होऊन बसते. त्याऐवजी ई-मेल, मेसेजिंग हे करण्याचाच प्रयत्न होतो. अभ्यासात लक्ष लागत नाही. गणिते सोडविण्याची क्षमता घटते.
या सगळ्या गोष्टी स्वतःला समजतात. पालकांना दिसतात. दोघांना दिसत नाही; पण अधिक धोकादायक आहे असा कोणता परिणाम? तर मेंदूच्या विकासामध्ये अडचण. हाच मुद्दा आपण आता बोलणार आहोत. कारण याबाबत जाणीव जागृतीची गरज आहे. लोकांना याची तितकी कल्पना नाही.
विज्ञानक्षेत्रात या विषयावर भरपूर संशोधन चालू आहे. त्याचे सिंहावलोकन करणारा एक पेपर दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे. वाचकांपैकी ज्यांना खोलात शिरायचे आहे त्यांच्यासाठी याची लिंक देतो. तेथे इतर संशोधनांबद्दलसुद्धा संदर्भ दिलेले आहेत.
The Effects of Digital Addiction on Brain Function and Structure of Children and Adolescents: A Scoping Review PMC
भारतात परिस्थिती काय आहे, हे सांगणारे अनेक यूट्यूब व्हिडिओज असतील. एकीची लिंक देतो :
Economic Survey Flags Rising Digital Addiction Among Children And Youth | ON POINT | News9
बालक आणि कुमार वयामध्ये मेंदू विकसनशील असतो. अतिरेकी डिजिटल एडिक्शनमुळे या विकासात अडचणी निर्माण होतात. मेंदूच्या Prefrontal lobe या भागावर प्रतिकूल परिणाम होतो. मेंदूच्या EEG या ग्राफमध्ये काही अंशी या परिणामांचे चित्रण दिसू शकते. fMRI या तंत्राचा वापर करून शास्त्रज्ञांना दिसले की, frontal lobe या भागातील कनेक्शन बिघडतात. Caudate nucleus हा भाग आक्रसतो.
तात्पर्य असे की, मेंदूवर होणाऱ्या वाईट परिणामांचे ठोस पुरावे आहेत. या व्यसनामुळे मुले मठ्ठपणाकडे झुकतात. समाज जागा झाला नाही तर यातून मठ्ठपणाची साथ पसरणार आहे.
समजले. समस्या गंभीर आहे. काय उपाय ? आता मेंदूला आजार झाला म्हणाल्यावर उपाय अवघड असणार, महागडा असणार, मोठ्या इस्पितळाशिवाय कुठे होणार नाही, सुधारणेचा भरवसा देणार नाहीत. अशी चिंता आई-बाबांना वाटणे स्वाभाविक आहे.
या निबंधाचा उर्वरित भाग सांगतो की, उपाय सोपा आहे, तुमच्या हातात आहे, बिनाखर्चाचा आहे, त्याचा प्रभाव तुम्हाला डोळ्यांसमोर दिसणार. आणखी काय हवे ? इस्पितळात जाण्याची जरूर नाही. EEG, fMRI असले महागडे फोटो काढण्याची गरज नाही. मानसशास्त्रज्ञांकडे जाण्याची गरज नाही. असे मी ठासून सांगतो याचे कारण बहुतेक कुटुंबांमध्ये ही समस्या अतिरेकी टोकापर्यंत गेलेली नसते. ती तशी गेली तर मात्र तज्ज्ञ डॉक्टरांकडे अवश्य जावे. मी सांगत होतो तो उपाय बहुतांश कुटुंबांना first line of defence म्हणून करण्याजोगा आहे.
बरं. पुरे झाली प्रस्तावना. आता उपाय काय तो सांगून टाका. आणि तुम्ही यातले तज्ज्ञ कधीपासून झालात? तुम्हाला कोणी हा अधिकार दिला? हेपण सांगा.
मी यातला तज्ज्ञ नाही. तज्ज्ञांचे लिखाण वाचून मी सांगतो आहे. कोण तज्ज्ञ ? अनेक असतील. मी फक्त एका पुस्तकाचा संदर्भ देतो (2016) Deep Work: Rules for Focused Success in a Distracted World. By C. Newport, Professor of Computer Science at Georgetown University, USA.
विचार करा. एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा आपण काय करतो ? लस टोचून घेतो. त्याच्याशी लढण्यासाठी शरीराला शक्ती मिळावी म्हणून योग्य आहार-विहार घेतो. हेच तिथे करायचे आहे. मेंदूच्या रोगाची लस कोण देणार? सांगतो. आपण पिढ्यान्पिढ्या एका जुन्या पद्धतीने बाल संगोपन करीत आलो आहोत. त्यातील बऱ्याचशा पद्धती आज या मेंदूच्या विकारापासून रक्षण मिळण्यासाठी उपयुक्त आहेत. कोणत्या या पद्धती? प्रार्थना, पठण, पाढे, गोष्टी सांगणे, स्वयंपाक करणे, भेंड्या खेळणे, नकला करणे, नाटुकली करणे, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, उखाणे, पोवाडे, नाट्यवाचन, टिळक विद्यापीठासारख्या संस्थेच्या भाषा, गणित वगैरे परीक्षांना बसणे, सह्याद्री, हिमालय अशा ठिकाणी ट्रेकिंगला जाणे, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीसारख्या संस्थेच्या पक्षी निरीक्षण कार्यक्रमाला जाणे, नाचगाणे, चित्रकला अशा छंदवर्गांना जाणे. भजन-कीर्तन-प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमाला जाणे. वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करणे. आपल्या सोसायटीतल्या वृद्धांना मदत करणे. आपल्यापेक्षा लहान मुलांना त्यांच्या अडचणी सोडवून देणे. लहान मुलांच्या छोट्या सहली आयोजित करणे. त्यांना जत्रांना घेऊन जाणे. एक ना दोन. यादी हवी तेवढी मोठी करता येईल. आणि मला सांगा, यातलं काय अवघड आहे? आज मी पाहतो, पालक मुलांच्या क्लासेसवर प्रचंड रकमा खर्च करतात. मूल जणू सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तथाकथित अभ्यासामध्ये घाण्याला जुंपलेले. हे टाळा. वरच्या यादीमध्ये ज्या गोष्टी मुलाला आवडतील त्या करू द्या, नव्हे उत्तेजन द्या, नव्हे नव्हे; त्याला बरोबर न्या. एक लक्षात घ्या, जे तुम्ही टाळता ते मुले करणार नाहीत.
चला. औषधाचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले. आता तुम्ही विचारणार की खरेच याचा उपयोग होतो का? काय पुरावा आहे? प्रश्न रास्त आहेत. पुरावा थोडा तांत्रिक आहे. थोडासा प्रयत्न करतो. ज्याची उत्सुकता भागणार नाही त्यांनी संबंधित वाङ्मय वाचले पाहिजे.
मेंदूतल्या पेशींना म्हणतात न्यूरॉन. कोणतंही काम करत असताना त्या एकमेकीला विजेचे करंट पाठवतात. आपण मन लावून एखादी गोष्ट एकाग्रतेने करत असलो तर त्यांच्याशी संबंधित न्यूरॉन अधिक भक्कम होतात. याला तांत्रिक भाषेत 'मायलीनेशन' असे म्हणतात. जर 30 सेकंदाला तुम्ही वेगळा टिक टॉक व्हिडिओ बघत असाल तर हा फायदा होत नाही. उलट, वारंवार डोपॅमीन नामक रसायन निर्माण होऊन मेंदूची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता घटू लागते. व्यायामाने स्नायू भक्कम होतात की नाही? तसेच एकाग्र चित्ताने छंद /अभ्यास / सेवा कोणतीही गोष्ट केली तरी मेंदूची क्षमता वाढते. अशा कार्यक्रमांना सध्या 'Brain Gym' असे म्हणतात. शरीरासाठी तुम्ही जिममध्ये जाता का? मग मेंदूसाठी काय करता? त्याच्या जिममध्ये जाण्याची सुरुवात करा उद्यापासून. असा हा उपाय आहे. क्रोसिन घेतल्याने डोकेदुखी थांबते. अशा प्रकारचा झटपट परिणाम याने होणार नाही. वेगळ्या सवयी अंगी बाणवणे असे या उपायाचे स्वरूप आहे. तेव्हा अधीर व्हाल तर फसाल. टिकून राहाल तर जिंकाल.
माझ्या स्पष्टीकरण देण्याची ही मर्यादा. या उपायाचे सामर्थ्य असे की, प्रत्येकाच्या घरोघर अशा परंपरा आहेत. तुम्ही त्या कदाचित अडगळीत टाकल्या असतील. त्या काढा. झटकून साफ करा. त्यांना योग्य तो मान द्या. आणि पुढच्या पिढीला त्या परंपरा अनुसरण्याचा मंत्र द्या. तुमचे वेगवेगळे जातिधर्माचे मित्र असतील. त्यांपैकी प्रत्येकाच्या पारंपरिक समारंभांमध्ये जा. तेथे काय घडते पहा आणि त्याचा Brain Gym म्हणून प्रयोग होतो आहे का, असा विचार करा. कदाचित, त्यांतील एखादी परंपरा तुम्ही उचलून घेऊ शकता.
Brain Gym या व्यवस्थेसाठी अत्यंत अनुकूल व्यायाम म्हणजे नवी भाषा शिकणे. अलीकडे महाराष्ट्रात हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकावी का नाही, यावर (माझ्या मते) निरर्थक वाद झाले. तज्ज्ञांचे ठाम सांगणे आहे की, नवी भाषा शिकण्यामुळे मुलांच्या मेंदूचा अधिक विकास होतो. प्रश्न आहे तो परीक्षा वगैरे तपशिलाचा. परीक्षा टाळणे, अथवा अतिशय सोपी करणे दोन्ही सहज शक्य आहे. मुख्य फायदा भाषा शिकण्यातून आहे. मुले तीन भाषा सहज शिकू शकतात. फक्त आजूबाजूला त्या भाषा वापरण्याचे वातावरण हवे. हिंदी सिनेमा, टेलिव्हिजन सिरीयल, छायागीतसारखे कार्यक्रम असे वातावरण आपल्याकडे सहज उपलब्ध आहे. त्यांचा शिक्षणसाधने म्हणून उपयोग करणे एवढेच बाकी आहे.
तरुणपणी मी मलेशियामध्ये पेनांग शहरात सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकवीत होतो. माझे विभागप्रमुख रत्नम. तमीळ. बायको स्वीडिश. मी त्यांच्याबरोबर ब्रिज खेळत असे. एकदा बाईंना विचारले, 'मॅडम, तुमचे मूल कोणत्या भाषेत बोलेल?' पित्याची मातृभाषा तमीळ, मातेची मातृभाषा स्वीडिश, दोघांची कार्यभाषा इंग्रजी, आजूबाजूच्या समाजाची मुख्य भाषा 'बहासा मलायु (मले)'. त्या म्हणाल्या, "सरळच आहे, मुलगा मले भाषेत बोलणार". मी विचारले 'का?' "अरे, त्याची आया मले भाषक. सगळे नोकर तसेच. बागेत, बाजारात तीच भाषा. तो मुलगा मले भाषेमध्ये immersed आहे. म्हणून तीच बोलणार. मोठा होईल तसा इंग्रजी भाषा बोलेल. थोडेफार तमीळ बोलेल कारण भोवताली तमीळ भाषिक पुष्कळ आहेत. स्वीडिश बोलणार नाही. कारण जवळजवळ कोणीच ती बोलत नाही."
मुद्दा असा की, ज्या वातावरणात मुलगा immersed आहे त्यातील भाषा तो सहज शिकतो.
आपली मुले हिंदी गाणी गुणगुणतात. गब्बरसिंगचे डायलॉग बोलतात. ती सगळी हिंदी वातावरणात immersed आहेत. आणखी मदत करायची असेल तर हिंदीत subtitle केलेली छायागीतसारखी गाणी दाखवावीत. ही कल्पना 1996 मध्ये डॉक्टर ब्रिज कोठारी यांनी 'Indian Institute of Management Ahemadabad' येथे मांडली. अभ्यासात ती यशस्वी ठरली. केंद्र सरकारच्या शिक्षणखात्याने ती स्वीकारलेली आहे.
बहुसंख्य पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी भाषा चांगली यावी अशी इच्छा असते. त्याकरिता खटपट केली, शिकवणी लावली, इंग्रजी बातम्या ऐकणे आणि पाठोपाठ मराठी बातम्या ऐकणे असा परिपाठ घरात ठेवला आणि मुलाला त्याची चव लागली, तर डिजिटल एडिक्शन कमी करण्यास नक्की उपयोग होईल. हिंदी आधीच येत असेल तर फ्रेंच, जर्मन, अरबी, गुजराती कोणत्याही भाषेचा अभ्यास घ्या आणि मेंदूला भक्कम बनवा.
शेवटी एक महत्त्वाची बाब सांगतो. तुमच्या पुढच्या पिढीला वळण लावणे ही गोष्ट आउटसोर्स करता येत नाही. पूर्वी आई-बाप आपल्या मुलांना आपल्या व्यवसायात घेऊन जात आणि काम करता करता ते कौशल्य मुलाला शिकवीत. कुंभार आपल्या मुलाला कुंभारकाम शिकवी. सुतार आपल्या मुलाला सुतारकाम शिकवी. आता ते शक्य नाही. बरोबर? म्हणून तुम्हाला बाहेरच्या गुरूंची मदत घेतलीच पाहिजे. पण, तिचा परिणाम मर्यादित असतो. पाल्याने तुमच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालविला पाहिजे. तुम्हाला एकमेकांच्या संगतीमध्ये भरपूर आनंद मिळाला पाहिजे. असे घडेल तरच मुले या नव्या काळातल्या नव्या विषवल्लीपासून सुरक्षित राहू शकतील.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या