डिजिटल अर्काईव्ह

26 फेब्रुवारी 2026 : विरामचिन्हे दिवस

या वर्षी पहिला विरामचिन्हे दिवस साजरा करण्याचे आवाहन करताना (त्याची पार्श्वभूमी तयार व्हावी म्हणून), प्रस्तुत साधना अंकात थॉमस कँडी यांची 'विरामचिन्हांची परिभाषा' ही संपूर्ण पुस्तिका प्रसिद्ध करीत आहोत. शिवाय "थॉमस कँडी : कालखंड व कर्तृत्व" हा डॉ. प्रदीप कर्णिक यांचा विस्तृत लेख प्रसिद्ध करीत आहोत. डॉ. प्रदीप कर्णिक हे मुंबई येथील मराठी संशोधन मंडळाचे भूतपूर्व संचालक आहेत. मराठी भाषा व वाङ्मय यातील संशोधन आणि मराठी ग्रंथ व्यवहार या क्षेत्रांमधील त्यांचा अधिकार मोठा आहे. त्यामुळे, येत्या 26 फेब्रुवारीला "थॉमस कँडी यांचे मराठी भाषेला योगदान" या विषयावर त्यांचे व्याख्यानही पुणे येथे आयोजित केले आहे.

"एकोणिसाव्या शतकात मराठी गद्याच्या बाबतीत युरोपियन लोकांनी फार मोठी कामगिरी केलेली आहे. मोल्सवर्थ याने मराठी-इंग्रजी कोशाची रचना करून मराठी भाषेचा पायाच घातला असे म्हणावयास हरकत नाही. अशासारखा कोश कोणत्याही इतर देशी भाषेत त्याकाळी झाला नाही. अद्यापि या कोशाचे महत्त्व कमी झालेले नाही. कँडीचा इंग्रजी-मराठी कोशही उपयुक्त आहेच. परंतु कँडीने मराठी भाषेला नियमबद्धता व एकरूपता आणून दिली, ही त्याची मोठीच कामगिरी होय. बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यासारख्यांच्याही मराठी लिखाणातील चुका दाखवून कँडीने त्यांना एके काळी सळो की पळो करून सोडले होते. पंडित परशुरामतात्या गोडबोले यांच्या 'मृच्छकटिक' व 'कादंबरीसार' या ग्रंथांतील मराठीचे दोषही त्याने काढले आहेत.

'बालबोध' मासिकाचे संपादक सुप्रसिद्ध मराठी लेखक विनायक कोंडदेव ओक हे विविध ज्ञानविस्तारात (1905 मधील पहिल्या अंकात) लिहितात, 'मी प्रांजळपणे आणि मोठ्या कृतज्ञ भावाने कबूल करितो की, मला मराठी लिहिण्यास मेजर कँडीसाहेबांनी शिकविले. वास्तविक पाहिले असता, त्यांचे प्रत्यक्ष दर्शन मला कधीच झाले नाही. परंतु त्यांचे जे अभिप्राय लेख पाहण्यास शाळा खात्याच्या अधिकाऱ्यांनी मजकडे पाठविले, त्यावरून पुष्कळ चांगल्या सूचना मला मिळाल्या आणि माझ्या चुका कळल्या.' सरकारी आश्रय मिळविण्याकरिता कँडीची खुशामत म्हणून ओक यांनी हा मजकूर लिहिलेला नसून, कँडीच्या निधनानंतर कित्येक वर्षांनी हा ऋणनिर्देश केलेला आहे, हे अवश्य लक्षात ठेवले पाहिजे. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या चरित्रात त्यांचे बंधू लक्ष्मणराव यांनी एके ठिकाणी कँडीचा निर्देश 'महाराष्ट्रभाषागुरु' असा केलेला आढळतो."

अनंत काकबा प्रियोळकर (श्री. म. पिंगे लिखित, "युरोपिअनांचा मराठी अभ्यास व सेवा" या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून. मराठी संशोधन मंडळाच्या सहकार्याने व्हीनस प्रकाशन, पुणे, पहिली आवृत्ती 1960)

वरील परिच्छेदात ज्यांचा उल्लेख 'महाराष्ट्रभाषागुरु' असा झाला आहे, त्या मेजर थॉमस कँडी यांचा जन्म 13 डिसेंबर 1804 रोजी इंग्लंडमध्ये झाला. ऑक्सफर्डमधील शाळेत शिक्षण झाल्यावर ते वयाच्या सोळाव्या वर्षी (1820 मध्ये) लष्करात भरती होऊन भारतात आले. मराठी व हिंदी या भाषा त्यांनी इंग्लंडमध्ये असतानाच शिकायला सुरुवात केली की भारतात आल्यावर, हे कळावयास मार्ग नाही. पण भारतात आल्यावर दोनच वर्षांनी त्यांनी मोल्सवर्थ यांना मराठी-इंग्रजी शब्दकोश निर्मितीसाठी सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर काही काळ मोल्सवर्थसोबत, काही काळ लष्करात आणि आजारी पडल्यावर तीन वर्षे इंग्लंडमध्ये अशी त्यांची सात-आठ वर्षे गेली. मात्र 1831 पासून ते मृत्यूपर्यंत म्हणजे 1877 पर्यंत, तब्बल 45 वर्षे त्यांनी मराठी भाषेसाठी कोष निर्मिती, लेखन, संपादन, भाषांतर व व्याकरण या प्रकारच्या कामात खर्च केली. त्या साडेचार दशकांत ते किती वेळा इंग्लंडला जाऊन आले, हे तपशील उपलब्ध नाहीत. अखेर 26 फेब्रुवारी 1877 रोजी महाराष्ट्राच्या मातीतच महाबळेश्वर येथे त्यांचे निधन झाले, तिथेच त्यांचे दफन करण्यात आले. आता 26 फेब्रुवारी 2026 रोजी, त्यांचे 150 वे स्मृती वर्ष सुरू होत आहे. त्या निमित्ताने त्यांचे स्मरण करायला हवे, किंबहुना वर्षातून एकदा तरी स्मरण व्हायला हवे. त्यासाठी एक चांगले निमित्त मिळते आहे. 

गेली अनेक वर्षे, 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो. त्याला जोडून येणारा थॉमस कँडीचा 26 फेब्रुवारी हा स्मृतिदिवस यापुढे 'विरामचिन्हे दिवस' म्हणून साजरा करता येईल. थॉमस कँडी यांनी 1850 मध्ये 'विरामचिन्हांची परिभाषा' ही छोटी पुस्तिका लिहिली आणि प्रकाशित केली, त्यालाही आता 175 वर्षे झाली आहेत. मराठी भाषेत विरामचिन्हे कुठे, कधी व कशी वापरावीत हे अचूकपणे सांगणारी ती पहिली नियमावली आहे. अर्थातच, ती पुस्तिका लिहिण्याच्या आधीपासून ते स्वतः मराठी लेखनात व संपादनात विरामचिन्हांचा वापर करीत होते, त्यासाठी आग्रह धरत होते. तेव्हा मराठीत अशी विरामचिन्हे वापरणारे फार कमी लोक होते, त्यातही चुकीचा वापर करणारे जास्त होते. 1805 मध्ये विल्यम कॅरे यांनी कलकत्त्याजवळील श्रीरामपूर येथे पहिले मराठी पुस्तक छापले, त्यात विरामचिन्हे नव्हती. त्यानंतरच्या अर्धशतकात फार थोडी मराठी पुस्तके छापली गेली, त्यातील बहुतांश पुस्तकांत विरामचिन्हे नव्हती. आणि त्यापूर्वीचे मराठी लेखन प्रामुख्याने संत, पंत व तंत या तीन प्रकारांतील तरी होते किंवा महानुभाव वाङ्गय होते. त्या सर्व लेखनात दंडक किंवा विसर्ग होते, विरामचिन्हे नव्हती. त्यामुळे, मराठी भाषेला विरामचिन्हे बहाल करणारा माणूस म्हणून थॉमस कँडीचे नाव घ्यावे लागते. साहजिकच, त्यांचा स्मृतिदिवस विरामचिन्हे दिवस म्हणून साजरा करणे हा केवळ कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाग नसेल, तर मराठी भाषेच्या आजच्या अवस्थेबद्दल व अनास्थेबद्दल होत असलेल्या सार्वजनिक चर्चेत एक निरूपद्रवी व सकारात्मक हस्तक्षेप ठरेल.

या वर्षी पहिला विरामचिन्हे दिवस साजरा करण्याचे आवाहन करताना (त्याची पार्श्वभूमी तयार व्हावी म्हणून), प्रस्तुत साधना अंकात थॉमस कँडी यांची 'विरामचिन्हांची परिभाषा' ही संपूर्ण पुस्तिका प्रसिद्ध करीत आहोत. शिवाय "थॉमस कँडी : कालखंड व कर्तृत्व" हा डॉ. प्रदीप कर्णिक यांचा विस्तृत लेख प्रसिद्ध करीत आहोत. डॉ. प्रदीप कर्णिक हे मुंबई येथील मराठी संशोधन मंडळाचे भूतपूर्व संचालक आहेत. मराठी भाषा व वाङ्मय यातील संशोधन आणि मराठी ग्रंथ व्यवहार या क्षेत्रांमधील त्यांचा अधिकार मोठा आहे. त्यामुळे, येत्या 26 फेब्रुवारीला "थॉमस कँडी यांचे मराठी भाषेला योगदान" या विषयावर त्यांचे व्याख्यानही पुणे येथे आयोजित केले आहे. त्यावेळी, ज्येष्ठ इतिहास संशोधक राजा दीक्षित हे अध्यक्षस्थानी असतील. ते विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्याचे एक वेगळे महत्त्व आहे. विरामचिन्हे दिवस साजरा करण्यासंदर्भात त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत.

या व्यतिरिक्त महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद), मुंबई मराठी साहित्य संघ (मुंबई) आणि विदर्भ साहित्य संघ (नागपूर) या चार प्रमुख साहित्य संस्थांनाही विरामचिन्हे दिवस साजरा करण्यासाठी आवाहन करीत आहोत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजी-माजी अध्यक्षांनाही तसे आवाहन करीत आहोत. आणि अर्थातच, महाराष्ट्रातील अन्य लहान-मोठ्या साहित्य संस्था, विद्यापीठे व शाळा महाविद्यालये, प्रकाशन संस्था व ग्रंथालये यांनाही हे आवाहन आहेच !

वस्तुतः, 26 फेब्रुवारी हा विरामचिन्हे दिवस म्हणून साजरा करावा, अशी सूचना प्रस्तुत संपादकाने यापूर्वी काही विद्यापीठांमध्ये मराठी भाषादिनाच्या कार्यक्रमात केली होती, पण तसा आग्रह धरला नव्हता आणि त्यासाठी साधनामार्फत काहीही केलेले नव्हते. मात्र, आता तसे जाणीवपूर्वक करण्यासाठी अगदी अलीकडे आलेला डॉ. नीळकंठ रथ यांचा एक मार्मिक इ-मेल कारणीभूत ठरला आहे. त्यांनी असे लिहिले की, "साधनात स्वल्पविराम व अर्धविराम वापरताना काही वेळा गल्लत होते, त्या संदर्भात आपण बोलणार होतो; पण ती वेळ कधीच आली नाही. मात्र आता तशा भेटीची गरज नाही. थॉमस कँडीने लिहिलेली 1850 ची 'विरामचिन्हांची परिभाषा' ही छोटी पुस्तिका माझे चिरंजीव सत्यजित यांच्यामार्फत माझ्याकडे आली आहे, ती तुम्हाला पाठवतो आहे. ती पुस्तिका तुमच्या सहकाऱ्यांना द्या आणि शक्य असेल तर साधना अंकातही छापा."

आता 95 वर्षांचे असलेले अर्थतज्ञ नीळकंठ रथ वयाच्या विशीत असताना (1949 मध्ये) ओडिशातून महाराष्ट्रात आले. त्यानंतर इथेच शिकले, अध्यापन व संशोधन यात कार्यरत राहिले. मागील 75 वर्षे ते मराठी मातीत रुजले आहेत, रमले आहेत आणि अखेरचा श्वासही इथेच घेणार आहेत. त्यांच्याशी अधून-मधून आपला देश व समाज यांच्या स्थितीगतीबद्दल संवाद करणे हा एक उच्च दर्जाचा आनंद असतो. ते मागील सात दशकांपासून साधनाचे नियमित वाचकही आहेत. त्यांनी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" हे पुस्तक फार पूर्वीच ओडिया भाषेमध्ये अनुवादित केले आहे. तर अगदी अलीकडे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या "वैदिक संस्कृतीचा विकास" हा हजार पानांचा ग्रंथ ओडियामध्ये अनुवादित केलेला आहे. ते मराठी उत्तम वाचतात व बोलतात, पण मराठीत लिहू शकत नाहीत. मराठी भाषेच्या विरामचिन्हांच्या वापराबद्दलची त्यांची ती तक्रार पुन्हा आल्यावर, विरामचिन्हे दिवस साजरा करण्याची प्रस्तुत संपादकाची पूर्वीची इच्छा पुन्हा उफाळून आली. म्हणून, गुगल सर्च केले तर कँडी साहेबांचा 150 वा स्मृतीदिन तोंडावर आल्याचे दिसले. अर्थातच डॉ. रथ यांनाही विरामचिन्हे दिवस ही कल्पना आवडली. मग डॉ. प्रदीप कर्णिक यांना सांगितले, त्यांनीही त्या कल्पनेला पाठिंबा दिला.

दरम्यान आणखी एक योगायोग घडला. 1955 मध्ये 'युरोपिअनांचा मराठीचा अभ्यास व सेवा' या विषयावर अ.का. प्रियोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. प्रबंध लिहिणाऱ्या श्री. म. पिंगे यांचे चिरंजीव हर्ष पिंगे हे साधना कार्यालयात आले आणि वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ दर वर्षी एखादे व्याख्यान आयोजित करता येईल का, अशी विचारणा त्यांनी केली. त्यासाठी आवश्यक तो खर्च करण्याची इच्छाही व्यक्त केली. विशेष म्हणजे, ते भेटायला आले तेव्हा 'युरोपिअनांचा मराठीचा अभ्यास व सेवा' हे दीर्घकाळ आऊट ऑफ प्रिंट असलेले पुस्तक आमच्या हाताशीच होते. कारण मराठी भाषा अभ्यासक विश्वनाथ खैरे यांचा ग्रंथसंग्रह अलीकडेच एका ग्रंथालयाकडे सुपूर्द करण्यासाठी त्यांना मदत करताना, त्यातील तीन-चारच पुस्तके आम्ही ठेवून घेतली, त्यामधील हे एक पुस्तक. श्री.म. पिंगे हे औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाचे पहिल्या तुकडीतील मराठीचे प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवडलेले. सहाजिकच, हर्ष पिंगे यांची ती सूचना या वर्षासाठी तरी स्वीकारली आणि श्री.म. पिंगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "मेजर थॉमस कँडी यांचे मराठी भाषेतील योगदान" या विषयावर डॉ. प्रदीप कर्णिक यांचे व्याख्यान आयोजित करायचे ठरवले. अर्थातच, आजही कँडी यांच्यासंदर्भात कोणालाही लिहायचे - बोलायचे असेल तर श्री.म.पिंगे यांचा तो ग्रंथ आधाराला घ्यावाच लागतो, कारण त्यात कँडी यांच्यावर तब्बल 40 पानांचा लेख आहे. सध्या तरी केवळ त्याच पुस्तकात थॉमस कँडी यांचा एक छोटा फोटो दिसतो आहे, तोच AI मार्फत सुस्पष्ट व मोठा करून या अंकात वापरला आहे.

आता कोणाच्याही मनात हा प्रश्न येईल की, विरामचिन्हे दिवस साजरा करायचा म्हणजे नेमके काय (काय) करायचे ? 'स्काय इज द लिमिट' असेच त्याबाबत म्हणता येईल. उदाहरणार्थ मुळात विरामचिन्हांचा उगम कुठे व कसा झाला? मुद्रण तंत्रज्ञान आल्यावर विरामचिन्हांची गरज कशी व किती भासू लागली? विविध भाषांमध्ये विरामचिन्हे आहेत का, असतील तर कोणती? विरामचिन्हे नव्हती तेव्हा मराठी भाषेतील लेखन कसे होते ? बोलण्यात, ऐकण्यात, लिहिण्यात, वाचण्यात विरामचिन्हे (नीट) वापरली नाहीत तर काय अडचणी येतात? सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांमध्ये 'प्रश्नचिन्ह' या विरामचिन्हाचा दुरुपयोग करून सनसनाटी बातम्या कशा दिल्या जातात ? प्रशासनात शेरे लिहिताना प्रश्नचिन्ह व उद्‌गारचिन्ह यांची चलाख अदलाबदल करून कसे घोळ घातले जातात ? इत्यादी अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने अनेकविध छोटे-मोठे उपक्रम विविध स्तरावर करता येतील. भाषेच्या विकासासाठी, किमान बिघाड रोखण्यासाठी त्यांचा उपयोगच होईल. ज्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो त्या कवी कुसुमाग्रज यांचे 'विरामचिन्हे' या नावाचे एक पुस्तक आहे. "आयुष्याच्या वाटचालीत जिथे थांबलो, थबकलो त्या व्यक्तींच्या संदर्भातील त्या कथा आहेत," असे त्यांनीच त्यासंदर्भात म्हटले आहे. आणि मराठीतील प्रख्यात साहित्य समीक्षक रा.ग. जाधव म्हणायचे, "चांगली माणसे विरामचिन्हांचे तज्ज्ञ असतात." साहजिकच, त्या दोघांनीही विरामचिन्हे दिवस साजरा करण्याची कल्पना उचलून धरली असती !
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी