डिजिटल अर्काईव्ह

चाळिसावे मराठी नाट्य संमेलन

स्थानिक कलावंतानी केलेल्या ‘करीन ती पूर्व’ या गंभीर नाटकाने प्रेक्षकांची खूप करमणूक केली! हौसेला मोल नाही इतकेच यासंबंधी पुरे! याचा वचपा निघाला दुसऱ्या दिवशी. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर या संस्थेने ‘उद्यांचा संसार’ हा अतिशय रेखीव प्रयोग सादर करून प्रेक्षकांकडून धन्यवाद मिळवले. महाराष्ट्राच्या नेहमींच्या शिरस्त्याप्रमाणे येथेही दुफळी असल्याचे समजले.

चाळिसावे मराठी नाट्यसंमेलन सातारा येथे दि. 28 व 29 डिसेंबर या दिवशी अत्यंत उत्साहाने साजरे झाले. खांडेकरांसारखा अधिकारी कर्णधार आणि उत्साही स्थानिक कार्यकर्ते यांचा मिलाफ झाल्यामुळे संमेलन यशस्वीपणे पार पडले. श्री. खांडेकर यांना अध्यक्ष निवडल्याबद्दल अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. त्यांचा आक्षेप असा की, हा मान वस्तुतः एखाद्या जुन्या थोर नटालाच दिला पाहिजे, ज्यांनी एका वेळी रंगभूमी गाजवली आहे अशा कलावंताना डावलून रंगभूमीशी प्रत्यक्ष संबंध नसलेल्या व्यक्तींना मानाच्या जागा देणे अन्याय्य आहे.
अर्थात् हा आक्षेप अगदीच चुकीचा आहे. नट म्हणजेच काही रंगभूमी नव्हे! नट हा रंगभूमीचा एक महत्त्वाचा घटक आहे इतकेच. नट, नाटककार, दिग्दर्शक, प्रेक्षक इत्यादी अनेक घटक एकत्र आले तरच नाट्यकला आणि रंगभूमी जिवंत राहू शकते. रंगभूमी जगवण्यासाठी ज्यांनी जन्मभर परिश्रम केले अशी डॉ. भालेरावांच्यासारखी माणसे, किंवा नाटक मंडळ्यांना आर्थिक साह्य देणारे राजे-रजवाडे हे काही स्वतः नट नव्हते. आणि व्यक्तीशः खांडेकरांच्या पुरते बोलायचे झाल्यास त्यांनी ‘मराठीचा नाट्यसंसार’ यासारखे श्रेय लिहून मराठी नाट्यकलेची जी सेवा केली आहे ती रंगभूमीवर जन्मभर भूमिका करणाऱ्या कोणत्याही नटाच्या सेवेहून कमी मोलाची नाही.
अडतिसावे संमेलन भरले बेळगावात. वस्तुतः महाराष्ट्राचा भाग असून अन्यायाने म्हैसूरमध्ये ढकलला गेलेला हा भाग तेव्हा स्फोटक बनला होता. त्या विशिष्ट राजकीय परिस्थितीत संमेलन बेळगावला होणे अत्यंत औचित्यपूर्ण होते. 39वे संमेलन झाले महाराष्ट्र म्हैसूरच्या दुसऱ्या सीमेवर सोलापुरात. पुढच्या संमेलनाचे प्रस्थान बृहन्महाराष्ट्रात हैदराबादला ठेवण्यात आलेले आहे. 40वे संमेलन मात्र मराठमोळ्या संस्कृतीच्या ऐन गाभ्यात भरले होते.
खांडेकरांचे अध्यक्षीय भाषण अत्यंत भरीव आणि अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण झाले. ‘नाटकावरील कर आणि नाट्यगृहे’ या नाट्यकलेच्या निकडीच्या प्रश्नांचा त्यांनी जिव्हाळेपाने ऊहापोह केला. करमणुकीच्या करामुळे नाट्यकलेचे कंबरडेच मोडले आहे आणि नाट्यगृहांचे चित्रपटगृहांत रूपांतर झाल्यामुळे नाट्यकलेला (कोल्हापूरच्या भोसले नाट्गृहासारखे काही अपवाद वगळल्यास) पाय टेकायला जागाच राहिली नाही. सरकारी प्रयत्नाने कोठे कोठे अनावृत नाट्यगृहे बांधली जात आहेत. पण ही नाट्यगृहे बहुधा जाणत्यांचा सल्ला घेतल्यावाचून बांधली जात असल्याने ती बांधताना गच्च प्रयोगाच्या सोयींचा फारसा विचार केलेला दिसत नाही. भरमसाट पैसा खर्च होऊनही त्यात अनेक उणीवा राहिल्या आहेत.
प्रत्येक नाट्यकलावंताने जुन्या नाट्य, वाङ्मयाचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे, ही खांडेकरांची सूचना प्रत्येकाने विचारांत घेतली पाहिजे. जुने तंत्र फारतर आज आपल्याला आवडणार नाही, पण त्या नाट्यवाङ्मयात जी काही शाश्वत मूल्ये आहेत त्यांची उपेक्षा करून चालणार नाही. नव्याचा अवलंब करताना जुन्याचा मागोवा घेणे अपरिहार्यच्च असते. नवे तंत्र हाताळत असताना क्वचित् प्रसंगी तंत्राचे प्रस्थ अधिक होत असून नाट्याची हानी होत आहे, हीही गोष्ट विसरून चालणार नाही.
खांडेकरांच्या भाषणातील काही मुद्दे विवाद्यही आहेत. संगीताने मराठी नाट्याची हानी झाली नाही, हा मुद्दा अनुभवाच्या कसोटीवर टिकण्यासारखा नाही. संगीत नाटके या अखेर मैफली ठरल्या आणि रसाऐवजीं गायकीच महत्त्वाची मानली जाऊ लागली. गाणी झाली प्रमुख आणि गद्य दुय्यम ठरले. त्याचप्रमाणे रंगभूमीला पूर्वीचे वैभव प्राप्त होण्यासाठी व नटांची परंपरा टिकण्यासाठी व्यावसायिक रंगभूमीची आवश्यकता आहे, ही मुद्दाही विवाद्य आहे. मराठी रंगभूमीला पूर्वीचे राजवैभव प्राप्त होणे ही गोष्ट आता शक्य कोटीतील वाटत नाही. आता नाटके व्हायची ती कंत्राटी स्वरूपाची. त्यांना खांडेकरांनी दिलेली ‘लग्न बडवण्याची’ उपमा अगदी यथार्थ आहे. तीच गोष्ट परंपरेची. रंगभूमी संपन्न होती तेव्हा तरी थोर थोर नटांनी खास परिश्रम घेऊन शिष्य निर्माण केले आहेत काय हे गवयांनी ज्याप्रमाणे शिष्यपरंपरा निर्माण केली तशी नटांनी केल्याची कितीशी उदाहरणे दाखवता येतील त्या बाबतीत हौशी नटच काहीतरी कामगिरी करीत आहेत
‘हौशी नट’ हे केवळ सरकारने ठेवलेल्या 2500 रुपयावर डोळा ठेवून कार्य करीत आहेत असे विधान परिषदेच्या एका जबाबदार कार्यकर्त्यांने मजजवळ केले. हौशी नट्यांना जर असे दूषण द्यावयाचे तर धंदेवाईक नट काय हातात तुळशीपत्र घेऊन कामे करीत होते? स्पर्धा काल-परवा आल्या. पण वर्षांनुवर्षे हौशी नट व नाट्यसंस्था रंगभूमीची सेवा करीत आहेत ती काय याच लालचीने! प्रा. भालबा केळकर, डॉ. आठवले, आत्माराम भेंडे, डॉ. श्रीराम लागू, दामू केंकरे इ. व्यक्ती व शेकडो संस्था काम करीत आहेत ते कोणत्या मोबदल्याच्या आशेने?
विषयनियमक समितीच्या बैठकीचे वातावरण दोन-तीन प्रश्नांवर चांगलेच तापले. घटना-दुरुस्तीच्या मुद्‌द्यावर तांत्रिक हरकत उपस्थित करण्यात आली, पण ती फेटाळली गेली. मा. कृष्णराव यांनी संगीतावर वाचलेला निबंध अत्यंत खुसखुशीत होता. स्वराप्रमाणेच मास्तर शब्दांतही रंग आणि ढंग भरू शकतात, याचा प्रत्यय श्रोत्यांना पावलोपावली येत होता.
स्थानिक कलावंतानी केलेल्या ‘करीन ती पूर्व’ या गंभीर नाटकाने प्रेक्षकांची खूप करमणूक केली! हौसेला मोल नाही इतकेच यासंबंधी पुरे! याचा वचपा निघाला दुसऱ्या दिवशी. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर या संस्थेने ‘उद्यांचा संसार’ हा अतिशय रेखीव प्रयोग सादर करून प्रेक्षकांकडून धन्यवाद मिळवले. महाराष्ट्राच्या नेहमींच्या शिरस्त्याप्रमाणे येथेही दुफळी असल्याचे समजले. संमेलनाची सूत्रे एका पक्षाने हलवली आणि दुसरा पक्ष तटस्थ राहिला. पण या दुसऱ्या पक्षाने खांडेकरांचा सत्कार करून परिषदेला 51 रुपयांची देणगी दिली आणि विरोधांतही एक नवीन आदर्श निर्माण केला.
 

Tags: Dramas Theater Arts Maharashtra Natya Vidya Mandir Marathi Theater Conference नाटके नाट्यकला महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर मराठी नाट्यसंमेलन weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी