वाघाची आणि हरिणाची शर्यत लागली. दोघे जण लपंडाव खेळणार होते म्हणा ना! बांधाला वाटले की, मी लपल्यावर कुणाला दिसणार नाही. हरिण म्हणाले : “छट्, तू कुठेही लपलास तरी मी हुडकून काढीन.”
वाघोबाला वाटलं, पाहू या हरणाची करामत. म्हणून तो झुडपात जाऊन लपला. पण हरिणाने त्याला लगेच शोधून काढलं. म्हणून वाघोबा रागावला, त्याचे डोळे लाल झाले. मिशा पिंजारल्या. “तू लपलास तर मीही तुला हुडकीन. त्यात काय मोठंसे?” असे त्यानं हरिणाला सांगितलं. “बरं आहे” म्हणून हरिण दडी मारून बसलं. ते काही केल्या वाघोबाला सापडेना. इकडे तिकडे, चहूकडे त्याने पाहिलं, पुष्कळ भटकून त्याचे पाय-दुखायला लागले, पण हरिण काही त्याला दिसेना. वाघोबा बिचारा थकून गेला. पायसुद्धा त्याच्याने उचलवेना, भूक लागली होती त्याला म्हणून त्याने थोडेसे ‘बदाम’ घेतले. ‘घरी जाऊन खाऊन येतो तुला हुडकायला म्हणून तो गेला. त्याच्या खाकेला होती पिशवी, तीत भरले बदाम.
घरी आल्यावर वाघोबाने आपल्या मुला-बाळांना, नोकरा-चाकरांना, त्यांच्या मुला-बाळांना, म्हाताऱ्या-कोताऱ्यांना, बोलावले. हरिणाला हुडकून काढायचंय, असं त्याना फर्मावलं आणि मला बदाम फोडून सोलून द्या रे कुणी तरी असे म्हणून तो आरामखुर्चीवर बसला. ल्याच्या नोकरांनी बदाम फोडायला सुरुवात केली पहिल्याच बदामांतून एक गोंडस कुत्र्याचं पिल्लू टुणकन् उडी मारून बाहेर आलं.
वाघाला होत्या चार बायका. एक होती आवडती. दुसरी बुबा, तिसरी फुंझी आणि चवथी लेबे. त्या आपसात भांडत. म्हणून वाघोबाने त्यांना वेगवेगळी घरे बांधून दिली होती. ते कुत्र्याचं पिल्लू घाबरून शिरलं आवडत्या बायकोच्या घरात. तिने त्याला मारून हाकलून लावले, म्हणून ते शिरलं बुंबाच्या घरात. तीही त्याला मारायला धावली, म्हणून बिचारे धापा टाकीत गेलं फुंझीकडं. पण तीदेखील तशीच दुष्ट होती. तिने त्याच्या पाठीत घातला बडगा मग ते केंकाटत चवथ्या घरात गेले. ही लेबे म्हणजे तर मोठी कर्कशा होती. तिनं त्या कुत्र्याचा प्राणच घेतला!
पण काय आश्चर्य पहा. त्या मेलेल्या कुत्र्यापासून एक सुंदर देखणी राजकन्या निघाली. तिला पहाताच वाघोबा आपलं काम विसरला आणि तिची विनवणी करू लागला. माझी पाचवी बायको होतेस का? म्हणून तिला विचारू लागला. तुला नवे वेगळं घर बांधून देतो, असंही त्यानं तिला सांगितलं.
ती राजकन्या मोठी वस्ताद दिसली. तिन विचारलं, “मी सांगेन ते ऐकशील ना!” वाघोबा म्हणालाः “ऐकेन की.”
राजकन्या म्हणाली, “आधी या चारी बायका मारून टाक. मला सवती नकोत कुणी.”
वाघोबानं चारी बायकांना ठार केलं. मग ती राजकन्या म्हणाली, “तुझ्या या एवढ्या नखांची मला भीती वाटते. मल्ला ओरखाडे काढशील की तू.”
असं म्हणायचा अवकाश, वाघोबानं नखं काढून टाकली. मग ती राजकन्या म्हणाली, “अग बाई मी पाहिलेच नव्हते हे बटबटीत घारे डोळे! मला नाही आडवत हे. त्यांनी तू माझ्याकडे पाहिलंस की मला भीतीच वाटते!”
वाघोबानं डोळेही काढून टाकले, तेव्हा तिचं लक्ष त्याच्या कानांकडे गेले. “कितीबाई विद्रूप कान हे. ते छाटलेच पाहिजेत असं तिनं फर्मावताच वाघोबानं आपले कान छाटले, मग तिनं त्याला पाय काटायला सांगितले, पाय काढून झाल्यावर दात उपटायला सांगितले आणि इतके सर्व होईपर्यंत वाघ अगदी मरायला टेकला!
इतक्यात ती राजकन्या नाहीशी झाली. तिच्याऐवजी ते हरिण तिथं उभं राहिलं आणि म्हणालं, “मी तुला हुडकून काढलं, तेव्हा तुला फार वाईट वाटलं, मला ते हुडकत होतास पण मी सापडलो नाही. तुझ्या मनातून मला ठार करायचं होतं. पण मी पहा तुला कसं युक्तीनं मारलं ते.”
असे म्हणून हरिण वाघाकडे पहात राहिलं. तेव्हापासून वाघ नेहमी हरिणाला मारण्यास टपलेला असतो. हरिणाचं आणि वाघाचं वैर असं सुरू झालं.
Tags: Parables Deer and Tiger Children's Tales बोधकथा हरिण आणि वाघ बालकथा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या