डिजिटल अर्काईव्ह

आंतरभारती : गीतांजलीचे मूलसूत्र

गीतांजलीत नैसर्गिक सौंदर्याला मनोमनी ग्रहण करण्याची कधीची तळमळ व्यक्त झाली आहे, त्याप्रमाणे समस्त मानवसमाजाचा आत्यंतिक प्रेमाने स्वीकार करण्याबद्दलची व्याकुळता तर जागोजाग प्रगट झाली आहे. रवींद्रनाथांच्या मानवप्रेमविषयक व्यापक अनुभूती अनुभवून वाचकाचे मनही स्नेहसिक्त होते.

जागतिक वाङ्मयात गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या गीतांजलीचे स्थान किती उच्च आहे, हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. गीतांजलीला 1913 सालच्या नोव्हेंबर महिन्यात नोबेल पारितोषिक मिळून भारतीय वाङ्मयाला जागतिक दर्जा प्राप्त झाला. विकृत दृष्टीचे साम्यवादी म्हणतात की, श्रेष्ठ काव्य म्हणून नव्हे, तर धार्मिक अफूची गोळी पुरवल्याबद्दल गीतांजलीला पूंजीवादी राष्ट्रांनी नोबेल पारितोषिक देऊन तिचा उदोउदो केला. या आक्षेपाला आज रशियाच योग्य उत्तर देत आहे. त्या देशात रवींद्र-काव्यग्रंथाच्या लक्षावधी प्रती खपत आहेत, लोकप्रिय होत आहेत. श्रेष्ठ मानवी मूल्यांबद्दल आदर बाळगणाऱ्या व्यक्तीला गीतांजलीतील गीता-गीतात पवित्र भावनांचा व पैलूदार विचार-रत्नांचा कलात्मक आविष्कार आढळल्यावाचून रहाणार नाही. या लेखात गीतांजलीतील मूळ अंतःप्रवाहाचे थोडेसे विवेचन यथाशक्ती करण्याचे योजिले आहे.
बालपणापासूनच रवींद्रनाथांची विचारसरणी उपनिषदांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाली होती. त्यामुळे शिवसुंदरस्वरूपी सत्याची आनंदाच्या योगाने प्राप्त होणारी सरस अनुभूती त्यांनी नवनवोन्मेषशाली प्रतिभेने आपल्या काव्यात जागोजाग आविष्कृत केली आहे. विश्वव्यापी सौंदर्याच्या मुळाशी जे आदिसत्य आहे, त्याच्याशी एकात्मतेची अनुभूती होणे कठिण आहे. तशी अनुभूती प्राप्त झाली नाही तोपर्यंत व्यक्तिजीवनांतील दुःख, अपूर्णता दूर होणार नाही. एकात्मतेच्या मार्गात सर्वांत मोठी अडचण आहे ती अहंकाराची. 
अहंकाराने दृष्टी कलुषित व संकुचित होत असल्यामुळे जीवनाचे मर्म आपल्याला कळत नाही. सर्व दुःखांचे कारण सुलसाधनांच्या अपूर्णतेपेक्षा जीवनाच्या तात्पर्यविषयक अज्ञानातच आहे, असे जे रवींद्रनाथांनी म्हटले ‘आहे, ते अक्षरशः खरे आहे. म्हणूनच अहंकारापासून मुक्ती म्हणजे आनंद. ‘रिलिजन ऑफ मॅन’ या ग्रंथांत रवींद्रनाथ म्हणतात, “As in the world of Art, so in the spiritual world, our soul waits for its freedom from the ego to reach that disinterested joy which is the source and goal of creation.”
अहंकार लोपल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विशुद्ध आनंदाच्या योगानेच चराचर विश्वाशी आपले परिपूर्ण प्रेमाचे नाते जोडले जाते. अहंकाराची शृंखला तोडून चराचर विधार्थी एकरूप होण्यासाठी, समरस होण्यासाठी कविमनाची जी धडपड चालली आहे, तिचाच कलात्मक आविष्कार गीतांजलीत आढळतो.
आमार माथा नत करे दाओ हे तोमार
चरण धूलार तले।
सकल अहंकार हे आभार
डुबाओ चोखेर जले।
हे प्रभो, आघात-वेदनांनी तू माझा अहंकार नष्ट करून आपल्या उदार चरणाशी माझे मस्तक नम्र कर. दुःख-वेद‌नांमुळे वहाणाऱ्या अश्रूजलांत माझा अहंकार विरून जाईल असे कर.
एका आमि अहंकारेर 
उच्च अचले-
पाषाणआसन धुलाय लुटाओ,
भांगो सबले ।
नामाओ नामाओ आमाय तोमार
चरणतले ।
हे, परमेश्वरा, अहंकाराच्या उच्च शिखरावर मी एकाकी उभा आहे. अहंकाराचे हे पापाणासारखे कठिण आसन तू छिन्नभिन्न कर, धूलिसात् कर, आणि मला तुझ्या उदार चरणांशी नम्र कर.
चराचर विश्वाला मनोमनी सादर ग्रहण करून गंभीर प्रेमःचा संबंध जोडण्याची कविला तळमळ लागली आहे.
एइ मोर साथ जेनो ए जीवन माझे 
तय आनंद महासंगीते बाजे । 
तोमार आकास, उदार बालोक धारा,
द्वार छोटो देखे फरना जेनो गो तारा, 
छय ऋतु जेनो सहज नृत्ये आशे 
अंतरे मोर नित्य नूतन साजे
प्रभो, माझी अशी आंतरिक इच्छा आहे की, विश्ववीणेच्या अखंड संकाराने जे वैचित्र्यपूर्ण संगीत प्रसूत होते, त्याच्या योगाने व्यक्त होणारे तुझे आनंददायी स्वरूप मला ह्या जीवांत अनुभवायला मिळावे तुझे मुक्त विशाल आकारा आणि उदार प्रकाश यांच्या प्रभावाने माझ्या जीवनातील संकुचितपणा व अज्ञानांधकार दूर व्हावा; आणि नित्यनवीन सौंदर्याने भूषित होणाऱ्या षड्ऋतुंनी माझ्या मनोमंचावर सहजस्फूर्त नृत्यात रममाण व्हावे.
एमनि करे चलते पथे
भबेर कुले
दुइ धारे जा फूल फुटे शब
निस रे तुले।
शगुलि तोर चेतनाते
गंधे तुलिस दिवस राते
प्रतिदिनटि जतन करे
भाग्य मानि
नेरे, ओ मन, नेरे आपन
प्राण टानि ।
सृष्टीतील रूपरसगंधांच्या त्रिवेणी प्रवाहाने आपले जीवन संपन्न होत असते, म्हणून हे मना, आपल्या चेतनेच्या दिव्यतेने या त्रिविध सौंदर्याचा आत्मीयतेने स्वीकार करून तू आपले जीवन परिपूर्ण करून घे.
गीतांजलीत नैसर्गिक सौंदर्याला मनोमनी ग्रहण करण्याची कधीची तळमळ व्यक्त झाली आहे, त्याप्रमाणे समस्त मानवसमाजाचा आत्यंतिक प्रेमाने स्वीकार करण्याबद्दलची व्याकुळता तर जागोजाग प्रगट झाली आहे. रवींद्रनाथांच्या मानवप्रेमविषयक व्यापक अनुभूती अनुभवून वाचकाचे मनही स्नेहसिक्त होते.
आमार एकता घरेर आवास भेंगे
विशाल भये
प्राणेर रथे बाहिर हते 
पारवो कबे? 
प्रवल येथे सवार माझे 
फिरयो येथे शकल काजे, 
हाटेर पधे तोमार शाथे
मिलन हवे, 
प्राणेर रथे बाहिर हते 
पारबो कबे?
माझ्या सीमाबद्ध व्यक्तित्वाची संकीर्णता दूर करून ह्या विशाल मानव समाजात मी प्राणप्राचुर्याच्या योगाने केव्हा बरे मुक्त संचार करू शकेन? अमर्याद आंतरिक प्रेमाने सर्वांमध्ये मिसळून जेव्हा मी माझे कर्मजीवन निःसंकोच मनाने जगू शकेन, तेव्हाच, हे प्रभो, तुझ्याशी माझे खरे मीलन होईल.
म्हणूनच देवालयाचे दार बंद करून आतील अंधारात बसून देवतापूजन करणाऱ्या भक्ताला कवि म्हणतात.
नयन मेले दे देखि तुइ चेये
देवता नाइ घरे ।
तिनि मेहेन जेधाय माटि भेगे
करडे चापा चाप-
पाथर भेंगे काटछे जेथाय पथः 
खाटले बारो मास
रोद्रे जले आछेन शवार शाथे, 
धुला ताँहार लेगेछे दुइ हाते,
ताँरइ मतन शुचि बहान छाडि
आय रे धुलार परे!
अरे, तू जरा शानचक्षु उघडून पहा, मग तुला आढळेल की, देवता, ह्या बंदिस्त देवालयांत नाही. उन्हा-पावसाची पर्वा न करता आपली कामे करणाऱ्या शेतकऱ्यात, श्रमजीवी मानातच खऱ्या देवतेचा वास आहे. त्या देवतेचे तुला दर्शन घ्यायचे असेल तर, अलिप्तपणा निर्माण करणारे सोवळे सोडून तुला धूळमातीच्या कर्मक्षेत्रातच उतरले पाहिजे.
अंधाऱ्या एकातात बसून केलेल्या कर्मठ पूजनाने खरी मुक्ती प्राप्त होणार नाही.
मुक्ती? ओरे, मुक्ती कोथाय पावि, 
मुक्ति कोधाय आछे । 
आपनि प्रभु सृष्टिबाँधन परे 
बाँधा शबार काछे ।
मुक्ती? अरे, कर्मठ अहंकाराच्या आत्मबंधनात तुला मुक्ती मिळणार कुठे? मुक्ती आहे कुठे? स्वतः परमेश्वरच सुट्टीचे बंधन स्वीकारून चराचर अस्तित्वात सामावला आहे.
मानवतेशी, पर्यायाने परमात्म्यांशी (जीवात्म्याचा) विच्छेद घडवून आणणाऱ्या अहंकाराचे ओसे कवीचा किती असह्य झाले आहे!
आर आमाय आमि निजेर शिरे
बडूबो ना।
आर निजेर द्वारे कांगाल इथे
रइबो ना ।
एह बोझा तोमार पाये फैले
बेरिये पढयो अवहेले 
कोनो खबर राखयो ना ओर,
कोनो राखबो कइबो ना। 
आमाय आमि निजेर शिरे
बइबो ना ।
माझ्या अहंकाराचे भारी ओझे मी यापुढे वहाणार नाही, आणि स्वतःच्या दाराशी स्वार्थी कंगालपणाही पत्करणार नाही. हे प्रभो, माझ्या अहंकाराचे ओझे तुझ्या चरणांशी समर्पण करून मी या उदार विश्वात मुक्त संचार करणार आहे.
असा संकल्प करणारे कविवर आपली नम्र, आंतरिक इच्छा व्यक्त करतात,
आमि चेथे आछि तोमंदिर शबापाने । 
स्थान दाओ मोरे शकलेर माझखाने। 
नीचे शब-नीचे ए धुलिर धरणीते 
जेधा आसनेर मूल्य ना हथ दिते, 
जेथा रेखा दिये भाग करा नेइ किछु, 
जेथा भेद नाइ माने आर अपमाने, 
स्थान दाओ शेधा शकलेर माझखाने ।
जिथे आसन प्राप्त करण्यासाठी मूल्य द्यावे लागत नाही, जिथे उच्च-नीचतेचा, मानअपमानाचा भेदभाव नाही, असे सहज प्राप्य स्थान मला धूलिधूसरित धरणीवरील सर्व साधारण मानवसमाजात प्राप्त व्हावे.
अहंकाराचा त्याग करून विश्वमीलनाच्या योगाने सच्चिदानंद परमात्म्याशी (जीवात्म्यान) एकात्मतेची अनुभूती प्राप्त करून घेणे हेच, माझ्या अल्पमतीप्रमाणे, गीतांजलीचे मूलसूत्र आहे.
अशी एकात्मतेची व्यापक अनुभूती प्राप्त होण्याची उत्कट इच्छा मनोमनी बाळगून कवि म्हणतात,
एमनि करे मुखोमुखी 
शामने तोमार थाका 
केवल मात्र तोमाते प्राण 
पूर्ण करे राखा! 
ए दया जे पेयेछे तार 
लाभेर सीमा नाइ
शकल लोभ से शरिये फेले 
तोमाय दिते ठाँइ।
हे प्रभो, तुझ्या विश्वव्यापी सच्चिदानंद स्वरूपाचे नेहमी दर्शन व्हावे व त्या निबिड अनुभूतीतच परिपूर्णता प्राप्त व्हावी, असा लाभ तुझ्या कृपेमुळेच मिळतो. हा अनुग्रह ज्याला लाभला, त्याला सर्व काही मिळाले. असा भाग्यवान तुझे अधिष्ठान प्राप्त करण्यासाठी इतर सर्व आकांक्षाचा त्याग करतो. 
विश्वप्रेमी, आनंदकामी कविवर प्रार्थना करतात,
अंतर मम विकशित करो 
अंतरतर हे।
निर्मल करो, उज्ज्वल करो, 
सुंदर करो हे।...... 
युक्त करो हे शबार शंगे, 
मुक्त करो हे बंध, 
संचार करो सकल करे 
शांत तोमार छंद । 
चरणपद्मे मम चिंत्त निःस्पंदित करो हे... 
अंतर एम विकशित करो
अंतरतर हे।
हे अंतर्यामी परमेश्वरा, अहंकाराने संकुचित झाल्या माझ्या मनाचा विकास कर. माझे मन निर्मळ, तेजस्वी व सुंदर असावे. चराचर विश्वाशी माझे यथार्थ मीलन घडवून आण. मला अंतबंधनांतून मुक्त कर. सर्व कामात तुझ्या कृपेने लाभणाऱ्या शांतीचा वास असावा तुझ्या चरणकमलांशी माझे मन नेहमी नम्र, एकाग्र व्हावे.
गीतांजलीमध्ये कवींद्र रवींद्रनाथांनी उपंनिषदाचे उदात्त तत्त्वज्ञान व वैष्णव संताचा भक्तीरस यांचा मधुर मिलाप साधून, तो अत्यंत कलात्मकतेने, प्रासादिक वाणीने जगाला सादर केला आहे. गीतांजली हे भारतीय संस्कृतीचे आधुनिक अमृतफळ आहे असे म्हणणे अयोग्य होणार नाही.
 

Tags: Bengali Literature Rabindranath Thakur Gitanjali S. G. Gogate बंगाली साहित्य रवींद्रनाथ ठाकूर गीतांजली श्री. ग. गोगटे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी