कार्यक्रमांत मी केवळ शास्त्रीय संगीतच गातो. आजोबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी मी 'मंदारमाला' या संगीत नाटकात काम केलं होतं, त्या वर्षभरात आम्ही त्याचे 35 प्रयोगसुद्धा केले. पण बैठक जमवून शास्त्रीय संगीत गाणं हाच माझा पिंड आहे, त्यामुळे ते मी त्या वर्षापुरतंच करायचं ठरवलं होतं आणि नंतर थांबवलं. काही ठिकाणी जिथे शास्त्रीय संगीत ऐकणारे दर्दी किंवा संगीताचे अभ्यासक असलेले श्रोते असतात, तिथे थोडे अनवट, अवघड, कमी गायले जाणारे राग सादर करतो, कारण त्या श्रोत्यांना फक्त संगीताचा आनंद घ्यायचा नसतो, तर त्यांना जे माहीत आहे, ते गायक कसं सादर करतो हे समजून घेण्याचा एक बौद्धिक आनंदसुद्धा हवा असतो.
प्रश्न : तुझ्या गाण्याची सुरुवात 'घरात गाणं आहे म्हणून' आपसूक झाली की, ही विचारपूर्वक केलेली निवड होती ?
- संगीतभूषण पं. राम मराठे हे माझे आजोबा, पं. मुकुंद मराठे माझे काका आणि पं. संजय मराठे माझे वडील. एवढा मोठा वारसा मला लाभला आहे, त्यामुळे जन्मापासून सातत्याने शास्त्रीय गाणं कानांवर पडतच होतं. आणि घरातली परंपरा राखायची म्हणून कधीतरी घरचे माझ्याकडून काहीशा बळजबरीनेच आजोबांची एक-दोन नाट्यपदं गाऊन घ्यायचे; पण प्रामाणिकपणे सांगायचं तर, घरात गाणं असलं तरी वयाच्या बाविसाव्या वर्षापर्यंत मी गाण्यात नव्हतो. मी तोपर्यंत कधीच बाबांजवळ बसून गाणं शिकलो नाही. मात्र, लहानपणी मी तबला शिकत होतो.
प्रश्न : म्हणजे तेव्हा गाण्यापेक्षा तबला जास्त आवडत होता, असं म्हणता येईल...
- खरं तर तसंही नाही. मी तबला शिकलो तो आईच्या आग्रहामुळे. माझ्या आईला लग्नाआधी गाण्याची पार्श्वभूमी नव्हती, पण लग्नानंतर तीसुद्धा बाबांकडून गाणं शिकली आणि मग पुढे गांधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय गायनाच्या सुरुवातीच्या काही परीक्षांसाठी लहान मुलांना गाणं शिकवायलाही लागली. मी तिच्याकडूनही शिकलो नाही. पण तिला फार वाटायचं की, मला लयीचं अंग चांगलं समजलं पाहिजे, कारण लय चांगली असली, तर गाणं चांगलं होतं. म्हणून तिने मला तबला शिकायला लावला. प्रभुघाटे म्हणून तबलाशिक्षक होते, त्यांच्याकडे बाळकडू घेतलं, मग माझे काका मुकुंद मराठे यांच्याकडे शिकायला लागलो, त्यानंतर मुकुंदराज देव यांच्याकडे आणि मग उस्ताद अल्लारखा खाँसाहेबांचे शिष्य गजाननराव राऊळ यांच्याकडे. त्या चौघांकडे मिळून मी 13-14 वर्ष तबला शिकलो आहे. सुरुवातीला भजनी मंडळांच्या कार्यक्रमांना, मग हळूहळू शास्त्रीय संगीताच्या मैफलींना मी साथही करायचो. तबल्यात मी मनापासून रस घेतला; पण तोही छंद म्हणून. आयुष्यभरासाठी त्याचाच ध्यास घेण्याइतका मी त्यात रमलो नाही.
प्रश्न : मग तू गाण्याकडे कधी आणि कसा वळलास?
- मी बॅचलर ऑफ आयटी ही पदवी घेतली आहे. कॉलेजला असताना मी एका बँडमध्ये होतो, त्यात तबला, ढोलकी, पखवाज किंवा त्यासारखी चर्मवाद्यं वाजवायचो आणि 'बॅक व्होकल्स' गायचो, म्हणजे बँडच्या मुख्य गायकाला साथ म्हणून आवश्यक तिथे माझा आवाज मिसळायचो. पण, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की, त्या मुख्य गायकापेक्षा मी जास्त चांगलं गाऊ शकतो. त्याबद्दल मी विचार केला तेव्हा जाणवलं की, लहानपणापासून माझ्याही नकळत गाण्याचे चांगले संस्कार माझ्यावर झालेले आहेत; आणि तालीम घेतलेली नसल्यामुळे माझा गळा जरी तयार नव्हता, तरी काय गायचं, ते कसं गायचं, हे मला आपोआप सुचत होतं.
त्या जाणिवेमुळे माझं मन बदललं. मी शास्त्रीय संगीत आवडीने आणि मुख्य म्हणजे समजुतीने ऐकायला लागलो. तेव्हा मी रात्री झोपण्यापूर्वी तास न् तास माझे आजोबा, कुमार गंधर्व यांचं गाणं ऐकायचो. त्याचा परिणाम असा झाला की, आपण गाणं शिकलं पाहिजे असं मला वाटायला लागलं. तसाही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला येईपर्यंत मला बँडमध्ये बॅक व्होकल्स गायचा किंवा आयटीमधलं जे शिकत होतो त्याचाही कंटाळा यायला लागला होता. आणि 'आपल्याला गायचं आहे' अशी एक ऊर्मी वाटायला लागलेली होती. मग मी बाबांना सांगितलं की, 'मला गाणं शिकायचं आहे.' त्यांचा सुरुवातीला विश्वासच बसला नाही. त्या वयातली माझी एक लहरच आहे असं त्यांना वाटलं, त्यामुळे त्यांनी माझं बोलणं फार काही गांभीर्याने मनावर घेतलं नाही. पण, या वेळी मला खरंच गाणं हवं होतं, म्हणून मी पुन्हा त्यांच्याशी बोललो. मला गंभीरपणे मनापासून गाणं शिकायचं आहे असं त्यांना पटवून दिलं आणि मग त्यांच्यासमोर बसून शिकायला लागलो.
प्रश्न : सुरुवात बाबांकडे झाली असली तरी रूढ अर्थाने 'त्यांचा शिष्य' म्हणून तुझी ओळख नाही. हा बदल कशामुळे घडला?
- काही महिने बाबांकडे शिकल्यानंतर बाबांनी स्वतःच मला सुचवलं की, मी बाहेर कोणाकडे तरी शिकलं पाहिजे. घरगुती वातावरणामुळे म्हणा, किंवा उशिरा शिकायला लागल्यामुळे म्हणा, ते माझ्याकडे शिष्य म्हणून बघण्यापेक्षा जास्त मुलगा म्हणूनच बघत होते आणि मीही त्यांच्याकडे बाबा म्हणूनच बघत होतो. गुरू-शिष्य म्हणून आमची केमिस्ट्री दोन्ही बाजूंनी फारशी जुळतच नव्हती.
मग मी पं. सुहास व्यास यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. त्यांचे वडील पं. सी. आर. व्यास आणि माझे आजोबा हे दोघे गुरुबंधू आणि जवळचे मित्र होते, त्यामुळे आमचा परिचय होता. त्यांच्या स्वतःच्या गाण्याविषयी मला आदर होता. शिवाय, दुसरीही एक गोष्ट होती, मी लहान असताना डोंबिवलीच्या 'चतुरंग प्रतिष्ठाण'तर्फे एकाच वेळी पन्नास ठिकाणी संगीताचे कार्यक्रम झाले होते, तेव्हा कोकणात झालेल्या कार्यक्रमांत मी आजोबांची नाट्यपदं गायलो होतो. सुहासकाकांनी माझं ते गाणं ऐकून बाबांना आवर्जून फोन केला आणि 'भाग्येश चांगला गातोय, त्याची तालीम करून घे', म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्याविषयी आधीपासूनच एक विशेष प्रेम माझ्या मनात होतं. म्हणून मी त्यांच्याकडे जायला लागलो.
एक-दीड वर्ष त्यांच्याकडे शिकलो असेन. पण त्या वेळी माझा आवाज फारच पातळ होता. त्यामुळे मी वरच्या पट्टीत गाऊ शकत होतो आणि ते मात्र अत्यंत धीर-गंभीर अशा खर्जात, खालच्या पट्टीत गायचे. ते शिकवायचे ते मला गाता यायचं नाही. मला माझी पट्टी सापडेना आणि ही अडचण लक्षात घेऊन त्यांनीच मला वेगळ्या गुरूंकडे शिकण्याचा सल्ला दिला.
मग योगायोगाने माझी ओळख पं. केदार बोडस (पं. नारायण बोडस यांचे चिरंजीव) यांच्याशी झाली. ते उत्तम गायक तर होतेच, पण भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचे खऱ्या अर्थाने विद्वान होते. डॉ. अशोक रानडे, बाबूराव रेळे यांच्याकडून त्यांनी सैद्धांतिक विद्याही घेतली होती. सुरुवातीला चार वर्षं पुण्यात राहून मी त्यांच्याकडे शिकलो आणि मग जेव्हा त्यांना कर्नाटक सरकारच्या 'गंगूबाई हनगल गुरुकुला'त गुरू म्हणून शिकवण्याचं निमंत्रण आलं, तेव्हा शिष्य म्हणून मीही त्यांच्यासोबत गेलो. चार वर्षं त्यांच्यासोबत तिथेही राहिलो आणि शिकलो.
त्यानंतर मी परत येऊन स्वतंत्रपणे कार्यक्रम सुरू केले आणि शिकवायलाही सुरुवात केली. गुरूंनी दिलेलं जे संचित आहे, ते या जन्माला पुरून उरणारं आहे, त्यांच्याकडून भरभरून मिळालेली विद्या आणि माझ्या आतून उत्स्फूर्तपणे आकाराला येणारी कला, यांची सांगड घालूनच मी काम करतो आहे.
प्रश्न : गुरुकुलातली शिकण्याची शिकवण्याची पद्धत काय होती?
- माझे गुरुजी पुण्यात असताना किंवा गुरुकुलातसुद्धा आमच्याकडून एक रुपयासुद्धा फी घेत नव्हते आणि ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ठरावीक वेळीच शिकवतील असंही नव्हतं. कधी पहाटे, कधी दिवसा, भर दुपारी, कधी रात्री उशिरापर्यंत असा आमचा रियाज चालायचा. कधी काही कारणाने 'आज तालीम नाही' असंही सांगायचे. त्यांना जेवढा वेळ असेल, आम्ही जेवढ्या तयारीने आणि जेवढ्या भुकेने ते जे देतील ते घेऊ, त्याप्रमाणे आमचे वर्ग रंगत जायचे.
आम्ही जरी तिघे चौघे त्यांच्यासमोर एकत्र बसलो तरी एका वेळी एकाचीच तालीम व्हायची. बाकीच्यांनी ऐकायला बसायचं, समजायचं; पण गाण्याची तालीम कायम गुरू आणि एक शिष्य अशाच 'सीना-पसीना' पद्धतीने व्हायची. अत्यंत मनस्वी, अवलिया व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं. त्यामुळे वेळेची, तासांची किंवा अभ्यासक्रमाची अशी चौकट त्यांनी कधीच स्वतःला किंवा आम्हाला घातलेली नव्हती. पण, त्यांचं गाणं, त्यांचा विचार आणि चौफेर अभ्यास या सगळ्याच गोष्टी ते आम्हाला सढळ हाताने देत गेले. त्यांच्याकडून विद्या घेताना 'दुबळी माझी झोळी' अशी आमची भावना असायची.
प्रश्न : तू तुझ्या शिष्यांना गाणं शिकवतोस, त्याची पद्धत कशी आहे?
- बऱ्याच अंशी माझ्या गुरूंसारखीच आहे. मी 'बॅच' पद्धतीने शिकवत नाही. माझ्याकडे पंधरा विद्यार्थी आहेत, त्यांपैकी पाच जण माझ्या घरी राहून माझ्याकडे शिकतात, एकीकडे त्यांचं कॉलेजशिक्षण किंवा अर्थार्जनासाठी शाळेत शिकवणं, कार्यक्रम करणं हेही सुरू असतं. मी त्यांना थांबवत नाही. गुरुकुलाचं एक वेगळं स्वरूप मी माझ्या परीने जपतो आहे.
मी एका वेळी एकाचीच तालीम घेतो. गाणाऱ्याच्या शेजारी ऐकायला इतर विद्यार्थी त्यांना वाटलं तर बसू शकतात, पण अनेक विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकच गोष्ट शिकवण्याचा 'क्लास' मी घेत नाही. 'सीना-पसीना' तालमीमुळे गुरू आणि शिष्य यांचं परस्परांसोबत एक वलय तयार होतं. त्या वलयात गुरूकडून शिष्याकडे केवळ कला किंवा विद्या नव्हे, तर एक ऊर्जाही संक्रमित होते आणि त्यामुळे दोघांचं तसं नातं हे विशेष असतं. आपल्याकडे गुरू-शिष्य परंपरेचं महत्त्व या वलयासाठीच आहे, असं मला वाटतं.
ज्यांना संगीत शिकण्याची खरोखर भूक आहे, अशाच लोकांना मी शिकवतो. त्यांना व्यावसायिक स्तरावर गायक व्हायची इच्छा असो व नसो. घर, संसार, जबाबदाऱ्या सोडून, झोकून देऊन दिवसाला बारा-बारा तास रियाज केला पाहिजे वगैरे कालबाह्य अपेक्षा मी करत नाही. पण, शिकण्याची भूक सच्ची असली पाहिजे, भुकेच्या वेळी खाणं नाही मिळालं तर जसे आपण अस्वस्थ होतो, तशी अस्वस्थता रोज गाण्यासाठी झाली पाहिजे, तशी गाण्याची असोशी वाटली पाहिजे, असा माझा कटाक्ष असतो.
'क्लास' आणि 'तालीम' यांच्यातला फरक गुरुजींनी माझ्या विचारांत पक्का बसवला आहे आणि म्हणूनच मी जाणीवपूर्वक माझ्या शिष्यांचा क्लास न घेता तालीम घेतो.
प्रश्न : तू आत्ता म्हणालास की, तू तुझ्या शिष्यांकडून दिवसाला बारा-बारा तास रियाज करण्याची कालबाह्य अपेक्षा करत नाहीस. हे जरा स्पष्ट करशील?
- पूर्वी कार्यक्रम ज्या जागांमध्ये व्हायचे तिथे माइक-लाउडस्पीकरची व्यवस्था असेलच याची शाश्वती नसायची. असले तरी त्या काळातली ध्वनिव्यवस्थासुद्धा कमी क्षमतेची असायची. कार्यक्रम मोकळ्या मैदानात मांडव घालून किंवा साध्या हॉलमध्ये असायचे. तिथलं अकॉस्टिक वेगळं असायचं. त्यामुळे आवाज, दमसास यांची वेगळ्या पद्धतीने घडण आवश्यक होती. आज ती गरज राहिलेली नाही.
आजकाल बहुतेक गाण्याचे कार्यक्रम मोठ्या नाट्यगृहात किंवा जाणीवपूर्वक अकॉस्टिक रचना केलेल्या ठिकाणी होतात, तिथे एसी असतो. आता माइक्स, ध्वनिवर्धक (amplifiers), ध्वनिक्षेपक (speakers) यांचा दर्जा खूप सुधारला आहे, डिजिटल साउंडच्या आधुनिक तंत्रज्ञानाने ध्वनिव्यवस्थेमध्ये खूप चांगले बदल घडवले आहेत. त्यामुळे आता शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचवणं हे उद्दिष्ट गायकाच्या रियाजाला आवश्यक राहिलेलं नाही. मात्र एसी, बंदिस्त जागा, यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने आवाजाची काळजी घेऊन गळा तयार करावा लागतो. आवाजाचा थ्रो कसा वापरायचा याचा विशेष अभ्यास करावा लागतो.
पूर्वी जेव्हा स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड व्हायचं तेव्हा एक कण्डेन्सर माइक असायचा, गायक वादक एकत्र बसून कार्यक्रम करायचे आणि रेकॉर्डिंग व्हायचं. आता प्रत्येक व्यक्तीसमोर दोन-दोन माइक असतात. त्यामुळे आपल्या क्षमतेच्या 20 ते 30 टक्के आवाज थ्रो केला तरी पुरतो. पण, मी किंवा वेंकटेश कुमार आमच्यासारख्या गायकांना तालीमच खुल्या आवाजाची मिळाली आहे. आमची प्रकृती आवाज कमी लावण्याची नाही. मग आम्ही माइकपासून लांब बसून गातो आणि माइकचं amplificationसुद्धा कमी ठेवतो.
आजकाल पूर्वीसारख्या रात्र-रात्र रंगणाऱ्या, पाच-पाच तास चालणाऱ्या मैफलीही नसतात. दोन ते जास्तीतजास्त तीन तासांचे कार्यक्रम असतात. त्यामुळे सलग खूप वेळ अथकपणे गायची वेळ गायकांवर येत नाही. याचीच दुसरी बाजू अशी की, मैफील सुरू झाल्यावर स्वर आळवून गळा तापवायलाही वेळ मिळत नसतो, पहिल्या क्षणापासून पूर्ण तयार असावं लागतं.
अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून थोडी वेगळ्या पद्धतीने तालीम करावी लागते.
प्रश्न : तू चारही घराण्यांची तालीम घेतली आहेस, ही एक विशेष गोष्ट आहे. त्याविषयी सांग...
- माझ्या आजोबांच्या गायकीतही घराण्यांची विविधता होतीच आणि माझ्या गुरुजींचा तर सर्वच घराण्यांचा व्यासंग होता, गाण्यातून ते मांडण्याची क्षमता होती, त्यामुळे ते आम्हाला सहजपणे मिळत गेलं. कर्नाटकात राहिल्यामुळे किराणा गायकी कानांवर खूप पडली; पण माझ्या गाण्यावर तिचा अजूनतरी फार प्रभाव पडलेला नाही.
घराण्यानुसार रागांची मांडणी थोडी बदलते, चलन बदलतं. चारी घराण्यांची शैली, त्यांचे महत्त्वाचे राग वेगवेगळे असतात. अशा प्रकारच्या तालमीमुळे सुरुवातीला थोडा गोंधळ उडू शकतो. आपण कशा पद्धतीने गावं हे ठरवणं अवघड होऊ शकतं. पण, सरावाने आपला आवाज, आपली आवड आणि आपली प्रकृती यांनुसार आपली वाट आपण निवडायला शिकतो. प्रत्येक रागासाठी किंवा प्रत्येक बंदिशीसाठी ही वाट वेगवेगळी असू शकते. त्यामुळे कलाकार म्हणून तुमची रेंज वाढते, तुमच्याकडे जास्त पर्याय उपलब्ध असतात आणि मग त्यातून तुम्हाला नवं सापडण्याची शक्यताही वाढते.
अर्थात, यासाठी तेवढं ऐकणं, तेवढा अभ्यास, तेवढा रियाज आणि तेवढा विचार हे सगळं करण्याची तुमची तयारी पाहिजे, ती नसेल तर सुरुवातीला गोंधळ उडतो, तिथेच कलाकार अडकून राहतात आणि एक तर गोंधळलेलेच राहतात किंवा कोणतीही एक चाकोरी निवडतात.
प्रश्न : तुझ्या कार्यक्रमांचं स्वरूप नेमकं कसं असतं?
- कार्यक्रमांत मी केवळ शास्त्रीय संगीतच गातो. आजोबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी मी 'मंदारमाला' या संगीत नाटकात काम केलं होतं, त्या वर्षभरात आम्ही त्याचे 35 प्रयोगसुद्धा केले. पण बैठक जमवून शास्त्रीय संगीत गाणं हाच माझा पिंड आहे, त्यामुळे ते मी त्या वर्षापुरतंच करायचं ठरवलं होतं आणि नंतर थांबवलं.
काही ठिकाणी जिथे शास्त्रीय संगीत ऐकणारे दर्दी किंवा संगीताचे अभ्यासक असलेले श्रोते असतात, तिथे थोडे अनवट, अवघड, कमी गायले जाणारे राग सादर करतो. कारण त्या श्रोत्यांना फक्त संगीताचा आनंद घ्यायचा नसतो, तर त्यांना जे माहीत आहे, ते गायक कसं सादर करतो हे समजून घेण्याचा एक बौद्धिक आनंदसुद्धा हवा असतो. त्यांची गायकांकडून 'अजून काहीतरी', 'वेगळं काहीतरी', 'नवं काहीतरी' ऐकण्याची अपेक्षा असते. घराण्याच्या, रागाच्या, तालांच्या चौकटीतलं आणि नवे प्रयोग केलेलं असं गाणं त्यांना समजत असतं.
जिथे श्रोते रसिक आहेत, पण फार जाणकार असतीलच असं नाही, तिथे मात्र मी शक्यतो ज्यांना 'आम राग' म्हणतात तेच गातो. कारण त्या प्रेक्षकांना या कार्यक्रमातून संगीतदृष्ट्या नवं काय मिळेल याची अपेक्षा नसते, तर निखळ आनंद मिळवण्याची अपेक्षा असते. भीमपलास, शुद्ध कल्याण, यमन, बागेश्री, मल्हार, सारंग, यांसारखे राग मैफलींत कायम सादर होत आलेले आहेत. त्यामुळे त्या रागांशी श्रोत्यांचंही एक ओळखीचं नातं तयार झालेलं असतं. ते ऐकताना त्यांना एक वेगळा आनंद मिळतो. ते राग जास्त लोकप्रिय झालेले असतात, एवढंच नव्हे, तर नव्या श्रोत्यांना शास्त्रीय संगीताकडे ओढून आणण्याची ताकद त्या रागांत असते.
बऱ्याच ठिकाणी दोन्ही प्रकारचे श्रोते असतात, मग आपण काय सादर करतो आहोत त्याचा समतोल साधून मी गातो. जशी गायकांची परंपरा असते तशी श्रोत्यांचीही असते. श्रोत्यांना पिढ्या न् पिढ्या हे राग ऐकायला आवडत आले आहेत आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे विद्या जाते, तेव्हाही लोकप्रिय राग आधी पोहोचवले जातात. अर्थातच, गायकही हे राग जास्त वेळा आणि जास्त तयारीने गातात. आणि म्हणून बाकीचे काही राग दुर्मीळ किंवा अनवट वाटतात. असं ते चक्रही आहे.
प्रश्न : मैफलीत काय गायचं याचं नियोजन तू कसं करतोस?
- आज काय गायचं हे मी आधीपासून ठरवलेलं नसतं. बऱ्याचदा मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यावर, तिथला माहोल पाहून, श्रोत्यांच्या आवडीचा, वयोगटाचा अंदाज घेतो आणि इथे आज काय रंगत येईल असे दोन तीन राग मला दिसायला लागतात, मग त्याचा विचार करता करता जो राग प्रकर्षाने गावासा वाटतो तो मी गातो. मैफलीचा वेळ किती आहे, श्रोत्यांचा मूड आणि माझं आतून येणारं गाणं यांनुसार मैफलीचं स्ट्रक्चर (रूपबंध) वेगवेगळं असतं. पारंपरिक पद्धतीने मांडणी करतोच असं नाही. याच्या अगदी उलट आधीपासून नियोजन आणि रियाज करून मैफील बांधणारेही कलाकार आहेत, आणि त्यांचं काही चूक आहे, असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण, मला असं वाटतं की, नियोजन करून फक्त अभ्यास करता येतो. तो करावाच लागतो, त्याला पर्याय नाही. अभ्यास हे कला सादर करण्याचं साधन आहे आणि प्रत्यक्ष कला मात्र उत्स्फूर्ततेतून येते, असं माझं मत आहे.
कधीकधी कार्यक्रमाचे आयोजक सांगतात की, आम्हाला विशिष्ट राग ऐकायचे आहेत, किंवा जोडराग ऐकायचे आहेत, किंवा नाट्यपदं ऐकायची आहेत. ते गाण्याचा प्रयत्न अवश्य करतो. पण एखाद्या वेळी असं होतं की, त्या ठिकाणी ते राग दिसत नाहीत, मग त्यांची माफी मागून जे आतून येतं आहे ते मी सादर करतो.
सध्या अनेक ठिकाणी असे कार्यक्रम असतात जिथे चार-पाच वेगवेगळे कलाकार मंचावर बसतात, प्रत्येकी एक-दोन बंदिशी किंवा पदं सादर करतात. अशा कार्यक्रमांत पैसेही पुष्कळ मिळतात, पण कलाकाराला गायल्याचं समाधान मात्र मिळत नाही. अशा कार्यक्रमांतलं गाणं मी टाळतो.
प्रश्न : गायकासाठी विद्या अधिक महत्त्वाची की, कला?
- विद्येचं महत्त्व नाकारणं शक्यच नाही, गायकाला आपण जे रागसंगीत गातो त्याचं ज्ञान असणं अत्यावश्यक आहे. माझं भाग्य आहे की, मला चारही घराण्यांची तालीम मिळाली. पण, केवळ ज्ञान आहे म्हणून कोणी गाऊ शकत नाही, त्यासाठी उपजत कला, सर्जनशीलता आणि प्रयोग करून पाहण्याची तयारी हेच लागतं. फार पूर्वी कोणालातरी उत्स्फूर्तपणे जे संगीत सुचलं असेल ती कला आहे आणि त्याच्याच आधारे रागसंगीताची विद्या विकसित होत गेलेली आहे. आज आपण त्या विद्येच्या आधारे शिकत शिकत आपल्या आतली कला विकसित करतो आहोत किंवा ते करणं अपेक्षित आहे, हे आपण विसरता कामा नये.
दुसरं म्हणजे आपण जेव्हा शिकत असतो, तेव्हा विशिष्ट घराण्याला चिकटून राहून शिकण्यापेक्षा एखाद्या मोठ्या कलाकाराचं अनुकरण करत करत जास्त शिकतो, सुरुवातीला थोडंसं अनुकरण केल्याशिवाय विद्या समजत नाही, असं मला वाटतं. त्या कलाकाराकडे पाहून आवाज लावणं, पट्टी, ताल, चलन यांचं गणित तुम्ही शिकत जाता आणि मनापासून अभ्यास करणाऱ्याला त्या कलाकाराचं अंतरंग समजायला लागतं. त्याचं गाणं असं का आहे, कसं आहे, याची समज येते. तो कलाकार जितका जास्त सर्जनशील असेल, तितका जास्त अनुभव तुम्ही कमावता; पण त्याच वेळी आपण म्हणजे तो कलाकार नाही, याचं भान येणं महत्त्वाचं ठरतं. ते आलं तरच त्याच्या प्रभावातून बाहेर पडून तुम्हाला स्वतःची सर्जनशीलता सापडू शकते.
शिवाय, त्या त्या कलाकाराच्या आजूबाजूच्या परिस्थितीचाही विचार करावा लागतो. पूर्वी तास न् तास मैफली चालायच्या, तेव्हा रागाचा विस्तार करणं, त्याच्या वेगवेगळ्या छटा दाखवणं हे वेगळ्या पद्धतीने होत होतं, वेगळ्या पद्धतीने करणं शक्य होतं. तेव्हाच्या गायकांची शैली, मैफील बांधण्याची पद्धत वेगळीच होती. आज मी तसंच्या तसं करायला गेलो तर श्रोत्यांना ते चालणार नाही.
थोडक्यात काय, तर कलाकाराला दुसऱ्याच्या अनुकरणाशिवाय सुरुवात करता येत नाही आणि त्याच प्रभावात कायम अडकून राहूनही चालत नाही. जेव्हा एखादा कलाकार विद्या आत्मसात करून त्यात स्वतःच्या आतल्या प्रेरणेने काहीतरी नवं घडवतो, स्वतःचं असं काहीतरी लोकांना देतो, तेव्हा तो जास्त मोठा होतो. 'अभ्यासक' आणि 'आस्वादक' अशा दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांचं प्रेम त्याला जास्त मिळतं. त्यामुळे विद्या ही मूलभूत गरज आहेच; मात्र माझ्या मते, कला ही काकणभर अधिक महत्त्वाची आहे. कला हा प्रवाह आहे, विद्येच्या मार्गाची त्याला गरज आहे; पण त्याच चौकटीत त्याला बंदिस्त करून ठेवता येत नाही, ठेवू नये.
प्रश्न : तालाचं आणि लयीचं अंग पक्कं असेल तर गाणं जास्त खुलेल म्हणून तुला आईने तबला शिकायला लावला. त्याचा तुला कसा फायदा झाला?
- लय-ताल म्हणजे गाण्यातला प्रवाहीपणा. तलावाच्या साचलेल्या पाण्यापेक्षा नदीचं वाहतं पाणी जसं जास्त सुखद वाटतं तसंच लयीला पक्कं असलेलं गाणं हे कानाला जास्त गोड वाटतं. ज्या गायकाचं तालाशी सख्य जुळलेलं असतं त्याला समेकडे लक्ष द्यावं लागत नाही. रागाचा विस्तार करून दाखवावा किंवा खुणेच्या ठिकाणी भेटायला यावं तसे ते सहज समेवर येतात. प्रत्येक आवर्तनाला विशिष्ट पद्धतीने समेवर येण्याचा त्यांचा अट्टाहास नसतो, पण तो प्रवाह बेतालही नसतो. मला तर वाटतं प्रत्येक गायकाला तबला आलाच पाहिजे.
प्रश्न : रागसंगीतात बंदिशीच्या शब्दांतून व्यक्त होणाऱ्या भावनांचं किंवा एका अर्थाने ज्याला आपण साहित्यपक्ष म्हणतो त्याचं स्थान काय असतं?
- माझ्या मते, खूप महत्त्वाचं स्थान असतं. प्रेक्षकांवर गायकाचा प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा त्या गाण्यातून भाव व्यक्त होतात आणि ऐकणाऱ्यांच्या मनाला हात घालतात. काही कलाकार 'अॅब्स्ट्रॅक्ट' प्रकारचं गातात. त्यांना भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते. त्यांच्या केवळ स्वरात तेवढी ताकद असते. पण, काही गायक शब्दांना महत्त्व देतात, शब्द हे भावना व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून वापरतात. त्यामुळे मला असं वाटतं की, त्या साहित्यपक्षालाही महत्त्व आहे. त्या शब्दांना साजेसे छंद, ताल आणि स्वर यांचा उपयोग करून सुंदर पद्धतीने संगीतातून भावना व्यक्त होऊ शकतात.
पूर्वी काही कलाकार साहित्यपक्षाला कमी महत्त्व देत होते, किंवा आपल्या घराण्याची बंदिश कुणी चोरू नये म्हणून मुद्दाम बोबडे शब्द गात होते. त्यामुळे आपल्याकडच्या अनेक बंदिशींत काही चुकलेले, काही घुसडलेले, काही न कळलेले असे शब्द होते. विष्णु दिगंबर पलुस्कर, भातखंडे, कुमार गंधर्वांचे गुरू बी. आर. देवधर, त्यांच्यानंतर स्वतः कुमार गंधर्व, चंद्रशेखर (बाबूराव) रेळे, किंवा आजच्या काळातलं नाव घ्यायचं तर केशवचैतन्य कुंटे यांनी बंदिशी मिळवून त्यांचं शुद्ध स्वरूप / पाठभेद आपल्यापुढे आणले आणि आजचे अनेक कलाकार शब्द समजून आणि त्या शब्दांच्या पलीकडचा अंतःस्थ रस समजून गाणं फार सुंदर पद्धतीने मांडतात.
प्रश्न : गाण्याचा रस शब्दांतून व्यक्त होणाऱ्या अर्थापलीकडचा असतो म्हणजे कसा?
- बंदिशीचा एक शाब्दिक अर्थ असतो आणि एक आत्मिक अर्थ असतो. आत्मिक अर्थ जसजसा आपल्याला कळत जातो तसतसं लक्षात येतं की, सगळ्या भावना करुणेशी जोडलेल्या आहेत. किशोरीताई म्हणायच्या की, करुणरस हा सर्व रसांचं मूळ आहे. करुणा आत नसेल तर कोणत्याच भावनेला उत्कटपणा येणार नाही. बंदिशीचा जसा एक रस असतो, तसा रागाचाही रस असतो. पण, एकाच रागात सर्व रसांच्या बंदिशी गाता येऊ शकतात कारण प्रत्येक कलाकाराला राग वेगळा दिसू शकतो. रूढार्थाने वीररसाचा मानल्या गेलेल्या रागातही शृंगाराची किंवा भक्तीची उत्तम बंदिश गाता येऊ शकेल असं एखाद्या गायकाला दिसू शकतं आणि तो तशी मांडणी करतो. मुळात रागाची प्रकृती सखोल पद्धतीने समजून घेतल्याशिवाय बंदिशीच्या रसाचं किंवा राग-बंदिश यांच्या एकत्रित प्रभावाचं आकलन होत नाही आणि त्यासाठी सातत्याने संगीताच्या साधनेत असावं लागतं.
प्रश्न : गायकाचा प्रभाव त्याच्या कार्यक्रमात दिसतो की रियाजात ?
- कार्यक्रम हा एखाद्या छान सजवलेल्या थाळीसारखा असतो. तिथे सगळं सजवलेलं, सुंदर केलेलं सादर केलं जातं. तिकीट काढून येणाऱ्या श्रोत्यांना तशी सजावट अपेक्षितसुद्धा असते. आणि अर्थातच जर मुळात अन्नाला चव नसेल, तर सजावट कितीही केली तरी निरुपयोगी ठरते, तसंच गाण्याचं आहे. गाण्यात सत्त्व असेल तरच कार्यक्रम खुलतो आणि ते गाण्यातलं सत्त्व साधनेत असतं. कलाकाराच्या कलेचं 'raw' स्वरूप पाहायचं असेल, तर ते साधनेत दिसतं, रियाजात दिसतं. त्याचा खुला आवाज, स्वर-तालावरची पकड हे घरीच दिसतं. पुढे जाऊन मी असंही म्हणेन की, साधनेत सातत्य असलं, तिची एक विशिष्ट उंची गाठली की, त्या कलाकाराचं गाणं सगळीकडे तितकंच खरं आणि सुंदर होतं.
प्रश्न : रागाची वेळ किंवा त्या रागातून व्यक्त होणाऱ्या भावना, यांची चौकट कशी ठरते?
- याला एकच एक उत्तर नाही. मला वाटतं की, विशिष्ट भावनेची अभिव्यक्ती अनेक वेळा विशिष्ट रागातून होत जाते. ठरावीक सुरावटी ऐकून मनात काय भावना निर्माण होतात याचे काही सामूहिक अनुभव घेत-घेत ठोकताळे बनतात आणि त्यातून ते ठरतं. मुळात भावना, करुणा यांचं महत्त्व असतं आणि त्यांच्याशी असोसिएशन होऊन हे ठोकताळे बसतात; पण म्हणजे एखादा राग करुणाप्रधान असेल, तर त्यातून आनंद व्यक्तच करता येत नाही असं अजिबात नाही, त्या भावनेने गावं लागतं.
प्रश्न : श्रोता म्हणून तुला कोणाचं गाणं आवडतं?
- ज्या गायकाचं गाणं ऐकताना मला त्यांच्या दुनियेत हरवायला होतं, ते सर्व जण मला आवडतात. मल्लिकार्जुन मन्सूर, राशिद खान, पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, माझे आजोबा पं. राम मराठे, कुमार गंधर्व, किशोरीताई आमोणकर, वीणाताई सहस्रबुद्धे ही काही नावं मी त्यात आवर्जून घेईन.
प्रश्न : आजपासून पन्नास वर्षांनी जेव्हा भाग्येश मराठे हे नाव घेतलं जाईल, तेव्हा लोकांना या नावाचा ठसा कसा दिसलेला तुला आवडेल?
- मी असा विचार करत नाही. आपण आपल्या काळाचे असतो. गैरसमज करून घेऊ नका; पण आज जी लहान मुलं गाणं शिकतायत, त्यांनी भीमसेन जोशी, कुमार गंधर्व यांचं रेकॉर्डेड गाणं कितीही ऐकलं, तरी त्यांच्या आजीआजोबांनी एका मैफलीत प्रत्यक्ष अनुभवलेल्या गाण्याची सर त्याला येणार नाही. त्यांना त्या गाण्याचा खरा प्रभाव काय होता हे नुसत्या वर्णनाने कळणार नाही. साहजिकच, ते कितीही महान गायक असले, तरी आज त्यांचा तसा प्रभाव पुन्हा अनुभवता येणार नाही. त्यामुळे आणखी पन्नास वर्षांनी कोण मला कसं लक्षात ठेवेल याचा विचार मी करतच नाही. मी आज आहे, मी आज गातो आहे, आज कार्यक्रम करतो आहे, तर त्या कार्यक्रमाच्या श्रोत्यांना मी किती आनंद देऊ शकतो हे मला महत्त्वाचं वाटतं. मला एखादा राग जसा दिसतो तसा तो उत्स्फूर्ततेने गाणं, लोकांना आनंद देणं आणि माझ्या विद्यार्थ्यांना ह्या पद्धतीने विचार करायला शिकवणं हाच माझा जास्तीतजास्त प्रयत्न असेल.
शब्दांकन : ऋचा मुळे
संवादक : विनय हर्डीकर
Mob. 8446554066
(युवा संगीतकारांच्या मुलाखती ही मालिका दीड वर्षांपूर्वी साधनात सुरू झाली. त्या मालिकेतील ही 15 वी मुलाखत आहे. या सर्व मुलाखती www. weeklysadhana.in या वेबसाईटवर वाचता येतील.)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या