डिजिटल अर्काईव्ह

अरुण शेवते यांच्या पन्नास वर्षांच्या कवितालेखनाच्या प्रवासाबद्दल आपण बोलणार आहोत. एका कवीने सातत्याने अर्धशतक कवितालेखन करावं, ही विशेष बाब आहे. ग्रंथाली प्रकाशनाकडून आलेला 'तळघर' हा डॉ. रणधीर शिंदे संपादित कवितासंग्रह अरुण शेवते या कवीची कविता कुठून निघून कुठे येऊन पोहोचलेली आहे, याची निदर्शक आहे. कवी म्हणून त्यांची 50 वर्षांतील भावनिक-मानसिक आंदोलनं, स्थित्यंतरं यांचा साक्षीदार आहे. ते सातत्याने कविता लिहीत राहिलेत; मात्र ती त्यांनी कुठल्याही मंचावरून गायली वा सादर केली नाही. 'तळघर' हा कवितासंग्रह एक समग्र कवी वाचकांच्या ओंजळीत ठेवतो, असं म्हणता येईल.

 

प्रश्न - कविता कशी उगवून आली? तो क्षण कुठला ?
- मी इयत्ता अकरावीत असेन त्या वेळेस. मी एकदा कॉलेजातून घरी परतत असताना, रस्त्यात एक कावळा मरून पडलेला पाहिला आणि मला वाटलं की, तो मेलेला कावळा जर बोलायला लागला तर काय बोलेल ? या विचारातून कविता सुचत गेली आणि 'कावळ्यांच्या कविता' हा कवितासंग्रह जन्माला आला. कावळा ही प्रतिमा आहे. कावळा आपल्याकडे, माणसांच्या समाजाकडे कसा पाहतो, हे जर तो सांगायला लागला तर काय सांगेल, यातून या कविता सुचल्या म्हणून या माझ्या पहिल्या संग्रहाला 'कावळ्यांच्या कविता' असं नाव दिलं.

प्रश्न - पण, अगोदरपासून कविता वाचनात होती? कवितेचे काही एक संस्कार पूर्वी झालेले होते का? की कविता लिहायला लागल्यानंतर जाणीवपूर्वक कवितांचं वाचन सुरू झालं ?
- मी इयत्ता दहावीपर्यंत पाठ्यपुस्तकातल्याच कविता वाचत होतो. तोपर्यंत मी कुठलेही, कुणाचेही संग्रह वाचले नव्हते. पण, माझा पहिला कवितासंग्रह लिहून झाल्यानंतर मात्र मी कविता डोळसपणे वाचायला सुरुवात केली. तोपर्यंत पाठ्यपुस्तकातल्याच कवितांचा अभ्यास मी केला; पण तेव्हापासून कवी आणि कवितांविषयी ओढ, उत्सुकता निर्माण झाली होती. अकरावीनंतर मात्र कवी गांभीर्याने वाचायला सुरुवात केली. मी नवे-जुने कवी वाचून काढले. कवी 'बी'पासून वाचन सुरू केलं आणि मग जेवढे कवी सापडत गेले तेवढे सगळे वाचत गेलो. काही संग्रह मी माझ्या वैयक्तिक पुस्तक संग्रहातही ठेवले.

प्रश्न - या प्रवासात आपली नाळ 'कवी' म्हणून कुठल्या कवीशी अधिक जुळते किंवा काही कवींशी अधिक घट्टपणे जुळते, असं ध्यानात आलं ?
- माझ्या कवितेचा प्रवास पाहिला तर ती सामाजिक कविता आहे, राजकीय कविता आहे आणि स्त्री-पुरुष नातेसंबंधांबद्दलची कविता आहे, असं लक्षात येईल; पण ती मांडताना तिची नाळ कुण्या कवीशी जुळलेली आहे असं मला वाटत नाही, हे मी नम्रपणे सांगू इच्छितो. माझी कविता माझी स्वतःची आहे. अर्थात, हे मी म्हणत नाही. ज्या समीक्षकांनी माझ्या संग्रहांबद्दल लिहिलेलं आहे, त्यात त्यांनी हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे. विजया राज्याध्यक्ष, नरहर कुरुंदकर, दिलीप चित्रे, द.भि. कुलकर्णी या साऱ्यांनी, 'ही शेवतेंची स्वतःची कविता आहे आणि तिच्यावर कुणाही कवीचे संस्कार नाहीत', असं भाष्य केलेलं आहे. मी काही बोलण्यापेक्षा हे त्यांनीच बोललेलं अधिक उत्तम.

प्रश्न - तुमची कविता भूमिका घेणारी आहे, मुखवटा न घेता स्वच्छपणे पुढे येणारी आहे, स्पष्ट, थेट, निडर आहे, ती विधान करण्यासाठी कचरत नाही; पण हे सारं करत असताना त्या कवितेत दुसऱ्या बाजूला नाजूकपणाही आहे. तो कुठून आला असावा, असं वाटतं?
- यात दोन गोष्टी आहेत, एक तर मी म्हणजे केवळ 'मी'च नाही, तर सर्वांना स्त्रीत्वाबद्दल आकर्षण असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीला आपण लहानपणापासून विविध नातेसंबंधांत पाहत असतो. त्यातली तरलता आपल्यात उतरत जात असते आणि मग अर्थातच ती कवितेतही झिरपत जाते.

प्रश्न - तुमच्या कवितेत स्त्री येते, स्त्रियांची विविध रूपं येतात आणि 'घर'ही येतं. घर आणि स्त्रिया या दोघांसंदर्भात असलेल्या बंधांकडे कसे बघता ?
- अनेकदा असं होतं की, मला प्रतिमा सुचत जातात, आईबद्दलची कविता आहे, त्यातली आई माझी स्वतःची आहे. माझी मुलगी शर्वरी तिच्याबद्दलच्या कविता आहेत. राधेचा पाऊस, सफिया बेगम, सई मालवणकर, कालिंदी... तर या सगळ्या स्त्री-प्रतिमांमधून मानवीयतेचाच शोध घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तेच घरांबद्दलही म्हणता येतं.

प्रश्न - माकड, घोडा, कावळा हे प्राणी तुमच्या कवितेत येतात. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे हे केवळ प्राणी नाहीत, तर त्या प्रतिमा आहेत. या प्रतिमा घेऊन समाजाबद्दल विधान कवितेतून करावं असं तुम्हाला केव्हा जाणवलं ?
- मी आठवी, नववी, दहावीत असताना गावी शिकायला होतो. त्या गावात देशमुख म्हणून गृहस्थ होते, त्यांचे उमदे घोडे रस्त्यांवरून जाताना मी पाहत होतो. नगरला माझं सगळं बालपण गेलं. सुट्टीत आजोळी यायचो त्या वेळी मी घोडा टांग्याला जुंपलेला पाहिला होता आणि आमच्या शेजारीच बाबू टांगेवाला राहायचा. तर माझ्यावर बालपणापासूनच घोड्याचा फार प्रभाव आहे आणि त्या घोड्याचं रूपांतर प्रतिमेत झालं. माझ्या कवितेत घोडा फक्त प्राणी म्हणून येत नाही, तर तो इतिहासाशी संवाद साधणारा, त्याच्याकडे सामंजस्यानं बघणारा आहे... अशी त्याची रूपं मला दिसली.

प्रश्न - तुम्ही गांधींच्या तीन माकडांची प्रतिमा वापरली. राजघाटाचे संदर्भ तुमच्या कवितांमध्ये येतात आणि त्यातून तुम्ही सामाजिक-राजकीय विधान करता. आजच्या काळात तर सारंच अवघड आणि अरुंद होऊन बसलेलं असताना कवी आणि कवितेने काय करावं असं तुम्हाला वाटतं ?
- समाजात वावरत असताना जी अस्वस्थता कवी अनुभवतो ती त्याच्या कवितेतदेखील झिरपते. आपलं व्यक्तिगत जीवन सुखी असलं, आपण खाऊन पिऊन सुखी असलो तरी समाज तसा नाही. समाजात जी अस्वस्थता आहे, राजकीय फक्त राजकीयच नाही, तर सगळ्याच क्षेत्रांत जे प्रदूषण होतं आहे, त्या प्रदूषणाचा थेट परिणाम कवीवर होत असतो. माझ्या कवितेत गांधींच्या तीन माकडांची प्रतिमा येते त्याचं कारण म्हणजे मला गांधींबद्दल खूप आत्मीयता वाटते आणि सबंध भारतात जे परिवर्तन झालं, ते गांधींमुळे मोठ्या प्रमाणावर झालं, असं मला वाटतं. वाङ्गयाचा आणि गांधींच्या एकंदर कर्तृत्वाचा माझ्यावर खोल परिणाम आहे. या तीन माकडांच्या दृष्टीकोनातून आज समाजाची काय अवस्था झालेली आहे, ते मी माझ्या 'राजघाट' या कवितेतून मांडलेले आहे.

प्रश्न - कविता ही कवीचं भावनिक आत्मचरित्र असतं असं म्हणता येईल का ?
- नाही. मला असं वाटतं की, कविता हे कवीचं केवळ भावनिक आत्मचरित्र असत नाही. आत्मचरित्रापल्याड ती कविता गेली तरच त्या कवितेचं महत्त्व असतं. ती केवळ आत्मचरित्रापुरतीच राहिली तर तिला मर्यादा येते. कविता ही कवीचं भावनिक आत्मचरित्र असण्यापेक्षा समाजाचंच ते एक आत्मचरित्र असतं, असं म्हटलं तर योग्य होईल.

प्रश्न - तुम्ही मुक्त छंदच प्रामुख्याने हाताळला. पण वृत्तबद्ध, छंदोबद्ध कवितांकडे कधी वळलात का? तशी कविता कधी लिहून पाहिली का ?
- नाही. मला वृत्तबद्ध, छंदोबद्ध कविता लिहून पाहावी, असं कधीही वाटलं नाही. मुक्त छंदच मला अधिक जवळचा राहिला. मुक्तपणे आपण त्यात लिहू शकतो, असं वाटलं. छंदोबद्ध कविता मी वाचल्या, मात्र तशा लिहिण्याचा कधी प्रयत्न केला नाही.

प्रश्न - तुमच्या कवितांत अनुभवांची, प्रतिमांची साखळी दिसते. कवितांतला आशय दुसऱ्या कविता पुढे नेतात. त्यात एक कथासूत्रही आहे. ही कथाकाव्य, साखळीकाव्य म्हणायची की हे अनुभवांचे तुकडे म्हणायचे ?
- विजयाबाई (राजाध्यक्ष) यांनी फार समर्पक नाव त्याला दिलेलं आहे. 'मालिका कविता'. मालिका कविता म्हणजे एका कवितेतून दुसरी कविता उलगडत जाते, दुसरीतून तिसरी कविता उलगडत जाते.

प्रश्न - पण, या मालिका कविता आपण लिहाव्यात, हे तुम्ही जाणीवपूर्वक ठरवलं की, ते घडत गेलं आणि मग ध्यानात आलं ?
- एखादी गोष्ट, एखादी प्रतिमा माझ्या मनात रुजली तर त्याचा सर्वांगीण विचार मी करतो. माझी तशी मनोवृत्ती आहे, स्वभाव आहे. आणि तोच कवितेतही आलेला आहे. एखादा लेखक, कवी आवडला तर मी त्याची सगळी पुस्तकं वाचतो, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तसंच माझ्या मनात जी प्रतिमा येते तिचाही मी सर्वांगीण विचार करतो. आपल्या अंतर्मनात जे रुजतं, उत्स्फूर्तपणे सुचतं ते मालिका कवितांमधून येतं म्हणून तो फॉर्म मला जास्त जवळचा वाटतो.

प्रश्न - अर्धशतकभर तुम्ही कविता लिहीत आलेला आहात. सोबतच कवितांची बदलत गेलेली रूपंही पाहत आलेला आहात. कवी म्हणून कवितांच्या बदलत गेलेल्या रूपांबद्दल तुमची कोणती निरीक्षणं आहेत ?
- मला अनेक कवी आवडतात. विशेषतः आरती प्रभू, ते माझे सगळ्यांत आवडते कवी आहेत. आणि बदलत गेलेली कविता म्हणत असाल तर वाङ्गयाचे जे विविध प्रवाह आहेत विशेषतः सामाजिक कविता, राजकीय कविता, निसर्ग कविता, दलित कविता हे सारे प्रवाह मी वाचत आलेलो आहे आणि मला या प्रत्येक प्रवाहाची स्वतंत्र वैशिष्ट्ये जाणवतात.

प्रश्न - या साऱ्या प्रवासात गद्यलेखन करावंसं वाटलं नाही ?
- मी नाममात्र गद्यलेखन केलेलं आहे. पण प्रामुख्याने माझं माध्यम कवितांचं आहे.

प्रश्न - अनुभवाचं कवितेत रूपांतर होत असतानाची तुमची प्रक्रिया सांगा. तुम्ही कवितांचा रियाज करता का ? जाणीवपूर्वक कविता लिहून बघता का? पुनर्लेखन करता का ?
- मालिका कविता वगळता अन्य कविता मी वेळोवेळी लिहिलेल्या आहेत. मालिका कविता सात ते आठ दिवसांच्या कालावधीत सुचतात. मग मी पुढे वर्षभर काही लिहीत नाही, म्हणजे मला सुचतच नाही. मालिका कविता लिहून झाल्यावर मी जगत असतो; पण त्या मालिका कविता सुचण्याचा कालावधी सात-आठ दिवसांचा असतो.

प्रश्न - या सात-आठ दिवसांच्या सुचण्याच्या दिवसांत कविता लगेच लिहिता का, की त्या मनात घोळत राहतात ?
- हो, मी लगेचच लिहितो. सुचत जात असतानाच लिहितो. एक वही घेतो आणि त्यावर जसं सुचत जाईल तसं लगेचच लिहीत जातो आणि ती मालिका कविता होते. विशेषतः रात्रीच्या वेळीच माझ्या कविता लिहिल्या गेल्या आहेत.

प्रश्न - कवीचा रियाज काय असावा? किंवा तुम्ही कवितेचा रियाज कसा करता ?
- कवितेचा रियाज असतो असं मला अजिबात वाटत नाही. रियाज गाण्याचा असतो. त्याचं असं आहे की, अनुभव आणि अभिव्यक्ती ही कवीजवळ एकत्रच येते आणि मग कवितेचा जन्म होतो. त्याला रियाज असू शकत नाही.

प्रश्न - पण, या अनुभव आणि अभिव्यक्तीसाठी कवीला काही पूर्वतयारी तर करावी लागत असेल ना?
- नाही. मला अजिबात असं वाटत नाही. माझं म्हणणं असं की, कविता ही उत्स्फूर्तपणे जन्माला येते आणि उत्स्फूर्तपणे जन्माला आलेली कविता मला जास्त आवडते. शिवाय, माझ्या स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्स्फूर्तपणा! एक व्यक्ती म्हणून, कवी म्हणून मला जे उत्स्फूर्तपणे सुचतं, तेच मला माझ्यापुरतं महत्त्वाचं वाटतं.

प्रश्न - तुम्ही कविता लिहिल्यानंतर पुनर्लेखनाचे संस्कार करता का?
- माझ्या बाबतीत असं होत नाही. मी एकदा कविता लिहिली... म्हणजे सुचत जात असतानाच लिहितो; पण ज्याला कारागिरी म्हणतात तशी कारागिरी मी करत नाही. अद्याप तरी केलेली नाही. त्या जशास सुचल्या तशाच कागदावर उमटत गेलेल्या आहेत.

प्रश्न - मनात एखाद्या अनुभवाचं रूप कवितेतून ज्या तीव्रपणे उमटलेलं असतं त्याच तीव्रतेने ते रूप कागदावरही उतरतं का ?
- समाजाच्या पद्धतीने बदलते किंवा समाजात ज्या पद्धतीने प्रदूषण होतं, ते प्रदूषण सांगायला किंवा मांडायला आपण कमी पडतो की काय असं वाटतं. इतक्या झपाट्याने प्रदूषण होत जातं. फक्त राजकीयच नाही म्हणत मी. सगळ्याच क्षेत्रांतलं प्रदूषण! ते कवीला उद्युक्त करतं. कारण प्रदूषणातूनच कविता निर्माण होते असं मला वाटतं. सामाजिक किंवा राजकीय प्रदूषणातूनच सामाजिक कविता जन्म घेते.

प्रश्न - गुलजारांनी तुम्हाला कवितेबाबतीत काही सूचना केल्या का?
- गुलजारांचा आणि माझा स्नेह हा व्यक्तिगत आहे. त्यांची माझी भेट होते तेव्हा त्या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते, मोकळा संवाद होतो. त्यांनी भारतातून 36 भाषांतल्या कविता निवडून संपादन केलं, त्यात माझ्या एका कवितेचा समावेश त्यांनी केलेला आहे, हीच माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे.

प्रश्न - तुम्ही संपादकही आहात. कवी आणि संपादक यांच्यात कधी संघर्ष होतो का? म्हणजे कविता लिहिताना संपादक करड्या नजरेनं बघत राहतो आणि संपादन करताना कविता सुचत राहते का ?
- असं अजिबात होत नाही. माझं संपादनही माझ्या कवितेसारखंच आहे. 'ऋतुरंग'चा प्रत्येक अंक एका विषयावर आधारित असतो. विषयांचे वेगवेगळे कोन मी तपासत राहतो. त्या विषयाच्या त्या कविता मालिका संपादनातून निर्माण होत राहतात, असे मी म्हणेन.

प्रश्न - मी विचारलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त तुम्हाला कवितांबद्दल काही निरीक्षणं नोंदवायची असतील तर तुम्ही ती नोंदवावीत.
- मला वाटतं की, चांगली कविता आपल्याकडून लिहून व्हावी. खरं तर असं प्रत्येक कवीलाच वाटतं. ती माझ्या हातून लिहून झाली की, नाही मला ठाऊक नाही; पण 20 एप्रिल 1981 रोजी मी एक कविता लिहिली ती अशी -

एवढेच
आयुष्यात एखादीच कविता छाताड फोडून बाहेर यावी
घोड्यांच्या स्वागताला देहाचे खोगीर व्हावे प्रकाशाच्या छावणीला सामोरे जाताना.

प्रत्येकाला संवादाचं माध्यम आयुष्यात हवं असतं. मला स्वतःला कविता हे माध्यम स्वसंवादासाठी आपलं वाटलं. कवीचा संवाद हा स्वतःशी असतो, त्याच्या अनुभवाशी असतो आणि समाजाशीही असतो. त्रिसूत्री संवाद. हा त्रिसूत्री संवाद मला करता आला याबद्दल मला कृतज्ञता वाटते, एवढंच.

संवादक : अक्षय शिंपी
Mob. 9819351789

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अरुण शेवते,  मुंबई ( 2 लेख )
shevatearun@gmail.com

1993 मध्ये "ऋतुरंग" हा दिवाळी अंक पहिल्यांदा प्रकाशित झाला , नंतरची तीन दशके तो नियमितपणे प्रकाशित होतो आहे. मराठी वाचन संस्कृतीच्या क्षेत्रात त्याने वैशिष्ट्यपूर्ण स्थान मिळवले आहे. त्या दिवाळी अंकाचे मालक, प्रकाशक व संपादक आहेत अरुण शेवते.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी