समाजव्यवस्थेमध्ये सामाजिक व मालकी संबंधांचे स्वरूप ठरविण्याचे एक साधन म्हणून शासनसंस्थेचा व यंत्रणेचा उपयोग होतो. पण कम्युनिझमचे शासनयंत्रणेत ती शक्ती नाही. जरी कम्युनिस्ट देशातही सर्व गोष्टी शासनसंस्थेच्या नावे व कायद्याच्या आधारे केल्या जातात असा देखावा उभा केला जातो, तरी प्रत्यक्षात शासनसंस्थेच्या प्रत्येक कृतीमागे कम्युनिस्ट पार्टी व तिचे नोकरशहा यांचा हात असतो.
मिलोव्हन जिलास यांचे नाव आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या सर्व अभ्यासकांना आता चांगले परिचित आहे. त्यांच्या ‘द न्यू क्लास’ या नव्या पुस्तकाची मोठ्या आतुरतेने वाट पाहणारे अनेक लोक आढळतील. युगोस्लाव्हियामध्ये कम्युनिस्ट राजवट स्थापन करण्याच्या कामी व नंतर सोव्हिएट रशियाचे वर्चस्व झुगारून देण्यात टिटोच्या बरोबरीने भाग घेणारा हा नेता आज टिटोच्या तुरुंगात खितपत पडला आहे. युगोस्लाव्हियाने स्टालिनचे वर्चस्व अमान्य केले तेव्हा त्या देशामध्ये स्वातंत्र्याची प्रभात उगवली, असे मानणारे पुष्कळ लोक होते.
1953 साली रंगून येथे आशियाई समाजवाद्यांच्या परिषदेला युगोलाव्हियातर्फे जिलास यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आहे होते, तेव्हा जिलास बरोबर चर्चा करण्याची संधी मला मिळाली होती. युगोस्लाव्ह कम्युनिस्टांचा जर स्वातंत्र्यावर विश्वास आहे तर ते विरोधी पक्षसंघटना का होऊ देत नाहीत, असा एक प्रश्न मी विचारला होता. त्या वेळी जिलासने त्या प्रश्नाचे जे उत्तर दिले त्याने माझे समाधान झाले नव्हते. युगोस्लाव्हियामधील कामगार मंडळे (Workers’ Councils) ही विरोधी पक्षाचे काम पार पाडण्यास पुरेशी आहेत म्हणून तेथे विरोधी पक्षाची जरूर नाही, असे समर्थन जिलासनी केले होते. परंतु हे समर्थन करताना त्यांच्या बोलण्यात त्यांचा नेहमींचा आत्मविश्वास मला दिसून आला नाही. हे समर्थन त्यांचे त्यांनाच पटत नसावे, असे मला वाटले आणि माझ्या या कल्पनेची थोड्याच दिवसात प्रचीती आली. कारण युगोस्लाव्ह जनतेला अधिक राजकीय स्वातंत्र्य द्यावे, असे प्रतिपादन करणाऱ्या जिलासच्या काही लेखांचे निमित्त करून 1954 मध्ये त्यांना कम्युनिस्ट पक्षातून हाकलण्यात आले. त्यानंतर ते सतत आपल्या मतांचा प्रसार करीत आला आहेत. कम्युनिस्ट राजवटीवर त्यांनी अनेक प्रहार केले आहेत. काही काळ ते नजरकैदेत होते. पण त्या काळातही त्यांचे चिंतन व लेखन चालूच होते. या काळात कम्युनिस्ट राजवट व तत्त्वज्ञान यासंबंधी त्यांनी मूहग्राही विचार केला व त्यामधून त्यांचा नवा वर्ग हा अमूल्य ग्रंथ बाहेर पडला.
मुख्य दोष स्टालिनचा आहे काय?
कम्युनिस्ट तत्त्वज्ञान व राजवटी यासंबंधी टीका करणारे आजपर्यंत अनेक ग्रंथ व लेख प्रसिद्ध झाले आहेत. पण या सर्वापेक्षा जिलासच्या या ग्रंथाचे स्वरूप वेगळे आहे. आतापर्यंतच्या कम्युनिस्टविरोधी लेखकांनी एक तर स्वतःवर झालेल्या अन्यायाचे व छळाचे आपल्या ग्रंथांतून वर्णन केले होते किंवा केवळ स्टालिनच्या चुकीच्या धोरणामुळे कम्युनिझमला विकृत स्वरूप कसे आले, ते प्रतिपादन केले होते. स्टालिनवर हल्ले करणाऱ्या या लोकांना मार्क्स किंवा लेनिन यांच्या शिकवणुकीमध्ये काही चूक आहे ही गोष्ट मान्य नसावी, असे वाटते. पण जिलासने आपल्या या पुस्तकात कम्युनिझमच्या विकृतीचे मूळ थेट लेनिन आणि मार्क्स यांच्यापर्यंत येऊन पोचवले आहे.
स्टालिनने केलेले अत्याचार, गुलाम मजुरांच्या छावण्या, त्याने निर्माण केलेली वैचारिक गुलामगिरी वगैरे गोष्टी या काही स्टालिनच्या दुष्टपणामधून किंवा क्रूर स्वभावामधून निर्माण झालेल्या नसून एक विशिष्ट धोरण व तत्वज्ञान यांच्या सिद्धीसाठी वापरलेली ती साधने होती, असे जिलासचे म्हणणे आहे. या बाह्य गोष्टी सुधारल्या म्हणजे कम्युनिझममधले दोष नष्ट होतील हा सिद्धात त्यांना मान्य नाही. या बाह्य गोष्टी म्हणजे अंतर्गत रोगाची लक्षणे आहेत, असे सांगून या रोगाचे स्वरूप त्यांनी आपल्या या ग्रंथांत विशद केले आहे.
कम्युनिस्ट कारभारी नवा वर्गच
कम्युनिस्ट राजवट ही एका नव्या वर्गाची राजवट आहे आणि आतापर्यंत जगाच्या इतिहासात कोणत्याही वर्गाने मानवी जीवितावर मिळवला नव्हता इतका परिपूर्ण ताबा या वर्गाने हस्तगत केला आहे. हा वर्ग देखील अन्य समाजव्यवस्थेमधील सत्ताधारी वर्गाप्रमाणे समाजाच्या पिळवणुकीवरच जगत असतो असे, जिलासचे प्रतिपादन आहे. परंतु हा वर्ग कोणता? त्याचे वैशिष्ट्य काय? तो अस्तित्वात कसा आला त्याने समाजाचे शोषण कसे चालवले आहे? या प्रश्नांची उत्तरे जिलासच्या ह्या ग्रंथात सापडतील.
क्रांतीचे उद्दिष्ट
रशियामध्ये झालेल्या कम्युनिस्ट राज्य क्रांतीच्या अगोदर फ्रान्समध्ये किंवा ग्रेट ब्रिटनमध्ये ज्या राज्यक्रांत्या झाल्या त्यात आणि रशियन राज्यक्रांतीमध्ये एक मूलभूत फरक होता. फ्रान्स व ग्रेट ब्रिटनमध्ये नवा व्यापारी वर्ग उदयाला आलेला होता. औद्योगीकरण सुरू झाले होते, नवे मालकी संबंध प्रस्थापित होऊ लागले होते. पण जुनी राज्यव्यवस्था व जुने सामाजिक संबंध नव्या संबंधाच्या विकासाच्या आड येऊ लागले व म्हणून औद्योगीकरणाच्या व व्यापारी क्षेत्रातील ‘स्वातंत्र्या’च्या विकासासाठी फ्रान्समध्ये व ब्रिटनमध्ये ‘लोकशाही’ क्रांती घडून आली. या लोकशाही क्रांतीमध्येही हिंसा व अत्याचार यांचा वापर झाला. पण जुनी सत्ता मोडून पडल्याबरोबर अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या मार्गात हिंसा येते, असे आढळून आले व म्हणून फ्रान्सने आणि इंग्लंडने वैधानिक लोकशाहीचा अंगिकार केला. परंतु कम्युनिस्ट क्रांतीमध्ये प्रगतीसाठी हिंसेचे व अत्याचाराचे सातत्य टिकविणे जरूर झाले. जुन्या समाज-व्यवस्थेच्या पोटात उदयाला येऊ घातलेल्या वर्गाला प्रगतीची वाट मोकळी करून देणे एवढेच कम्युनिस्टपूर्व क्रांत्यांचे मर्यादित उद्दिष्ट होते. तर एक नवा वर्ग निर्माण करून नवे सामाजिक संबंध व नवा समाज स्थापणे हे कम्युनिस्ट क्रांतीने आपले उद्दिष्ट ठरवले.
रशियन क्रांतीचे स्वरूप
1917च्या रशियन राज्यक्रांतीमध्ये प्रथम कम्युनिस्टांबरोबर अन्य पुरोगामी व समाजवादी पक्षानीही भाग घेतला होता. झारच्या रशियामध्ये औद्योगीकरणाला उशीरा सुरुवात झाली होती आणि तेथे वजनदार असा देशी भांडवलदारांचा वर्ग नव्हता. परकीय भांडवलदारांना साहजिकच रशियामध्ये अनिर्बंध औद्योगीकरण नको होते. याच्या उलट रशियन कामगार वर्गाला औद्योगीकरणाची जरूर होती. रशियामध्ये औद्योगिक प्रगती करू शकेल असा देशी भांडवलदारांचा वर्ग नसल्यामुळे हे काम पार पडण्यासाठी नव्या वर्गाची गरज होती. भांडवलशाहीविरोधी व औद्योगीकरणाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षालाच हे काम शक्य होते व लेनिनने हे हाती घेतले. त्यासाठी त्याने जुने खाजगी मालकी संबंध मोडून खरे सामुदायिक मालकी संबंध निर्माण केले.
कारभाऱ्यांचा नवा भाग्यवान वर्ग
परंतु या नव्या सामुदायिक मालकी संबंधाचे स्वरूप समजून घेण्यासाठी ज्या शासनसंस्थेमार्फत हे नवे संबंध प्रस्थापित केले गेले त्या शासनसंस्थेचे स्वरूप व कार्य पद्धती समजावून घेतली पाहिजे. इतर समाजव्यवस्थेमध्ये सामाजिक व मालकी संबंधांचे स्वरूप ठरविण्याचे एक साधन म्हणून शासनसंस्थेचा व यंत्रणेचा उपयोग होतो. पण कम्युनिझमचे शासनयंत्रणेत ती शक्ती नाही. जरी कम्युनिस्ट देशातही सर्व गोष्टी शासनसंस्थेच्या नावे व कायद्याच्या आधारे केल्या जातात असा देखावा उभा केला जातो, तरी प्रत्यक्षात शासनसंस्थेच्या प्रत्येक कृतीमागे कम्युनिस्ट पार्टी व तिचे नोकरशहा यांचा हात असतो. कम्युनिस्ट पार्टीमधील सर्व सत्ताधारी नोकरशाही हीच खऱ्या अर्थाने सर्व राष्ट्रीय साधनसंपत्तीची वहिवाट आणि उपभोग घेत असते. या संपत्तीचे कायदेशीरदृष्ट्या जरी राष्ट्रीयीकरण झालेले असले तरी तिचे संपूर्ण नियंत्रण नोकरशाहीच्या हाती असते. राष्ट्रीय संपत्ती व उत्पादन यावर नोकरशाहीला जो अनियंत्रित ताबा मिळतो त्यामुळे कम्युनिस्ट नोकरशाहीला एक विशिष्ट स्थान प्राप्त होते व ही नोकरशाही हा विशेष हक्क व सवलती उपभोगणारा एक नवा वर्ग बनतो.
मालकीचा बुरखा
कम्युनिस्टांनी ‘सामुदायिक मालकी’च्या बुरख्याखाली आपले स्वरूप लपविण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात की, कम्युनिस्ट राजवटीमध्ये सर्व उत्पादनसाधनावर समाजाची मालकी असल्यामुळे तेथे वर्गच राहिलेले नाहीत. परंतु मालकीचा अर्थ काय? मालकीचे महत्व केवळ कायदेशीर मालकीमध्ये नसून उत्पादनसाधनावर नियंत्रण व त्यापासून मिळणारा फायदा ज्यांच्या हाती तेच खरे मालक. कम्युनिस्ट देशांमध्ये संपत्तीचे उत्पादन, नियंत्रण व वाटप ह्या सर्व गोष्टी नोकरशाहीच्या हाती असतात. म्हणजे कम्युनिस्ट राजवटीमध्ये एका नव्या प्रकारची मालकी व त्यावर आधारलेला नवा शोषक वर्ग निर्माण होतो व हा वर्ग म्हणजेच कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली चालणारी सर्वसत्ताधारी नोकरशाही.
शासकाची सवलतदारी
कम्युनिझमच्या पूर्वी जे सत्ताधारी किंवा शोषक वर्ग निर्माण झाले ते आर्थिक व सामाजिक जीवनाच्या विकासाला आवश्यक म्हणून पुढे आले. पण कम्युनिझममधल्या नव्या वर्गाला जुन्या व्यवस्थेत कसलाच आधार नसल्यामुळे या वर्गाची निर्मिती एका खास संघटनेमार्फत करावी लागली व ही खास संघटना म्हणजे पोलादी शिस्तीची कम्युनिस्ट पार्टी! नव्या वर्गाचे सभासद कोण, याची व्याख्या करणे कठिण असले तरी देशाची अर्थव्यवस्था व राज्यसत्ता यावरील अनिर्बंध नियंत्रणामुळे ज्यांना खास हक्क व विशेष सवलती मिळाल्या आहेत अशांचा हा नवा वर्ग बनतो. इतर समाजापेक्षा या नव्या वर्गाला मिळणाऱ्या सुखसोयींचे वर्णन जिलासने स्वानुभवाने दिले आहे: “Country homes, the best housing, furniture, and similar things were aquired; special quarters and exclusive rest homes were established for the highest bureaucracy, the elite of the new class, The Party Secretary and the Chief of the Police in some places not only became the highest authorities, but obtained the best housing, automobiles and similar evidence of privilege.” (पान 57)
नव्या वर्गाला अंगभूत असलेल्या उच्चपदस्थ नोकरशहांसाठी आणि पक्षातल्या वरील कार्यकर्त्यांसाठी विश्रामगृहे, उत्तम सुसज्ज घरे ताब्यात येण्यात आली. काही ठिकाणी खास त्या वर्गासाठी निवासस्थाने आणि विश्रामगृहे बांधण्यात आली. पक्षाचे सेक्रेटरी आणि पोलीस प्रमुख हे काही केवळ उच्च अधिकारीच राहिले नाहीत तर खास सवलतदारही बनले. त्यांच्या दिमतीला उत्तम मोटारगाड्या, राहण्यासाठी प्रशस्त महालही उपलब्ध करून देण्यात आले.
कम्युनिझम अशा प्रकारे भयंकर बनतो
या नव्या वर्गाच्या सुखसोयी राजकीय सत्तेवरील त्यांच्या अनिर्बंध नियंत्रणावर अवलंबून असल्यामुळे ही सत्ता अबाधितपणे आपल्या हाती राहावी म्हणून सर्व सूक्तासूक्त मार्गाचा अवलंब या वर्गाला करावा लागतो व त्यामुळेच कम्युनिस्ट हुकूमशाहीला भयानक स्वरूप प्राप्त होते. कम्युनिस्ट राजवटीमध्ये राजकीय सत्ता व संपत्तीची मालकी एकाच गटाच्या हाती असते. भांडवलशाहीमध्ये निदान या दोन्ही गोष्टी एकाच गटाच्या हाती तरी असत नाहीत. भांडवलशाहीमध्ये कायद्याच्या दृष्टीने मजूर व मालक बरोबरीचे मानले जातात, पण उत्पादनसाधनावरील मालकीमुळे मजुरांचे मालकवर्गाकडून शोषण होते. कम्युनिझममध्ये कायदेशीर दृष्ट्या सर्वजण संपत्तीचे मालक असतात, पण प्रत्यक्षात राजकीय सत्ता व म्हणून संपत्तीवरील नियंत्रण एका लहान गटाच्या हाती असते व तो वर्ग समाजाचे शोषण करतो.
आपली ही सत्ता व सामाजिक स्थान कायम ठेवण्यासाठी कम्युनिस्टांनी एकपक्षीय हुकूमशाहीची पद्धत अवलंबिली, असे प्रतिपादन करून ही हुकूमशाही पक्की करण्यासाठी व्यक्तीचे व्यक्तित्व नष्ट करण्यावर कम्युनिझममध्ये भर दिला जातो, या सर्वंकषशाहीचे चित्र जिलास यांनी पुढींलप्रमाणे रेखाटले आहे: The Communist State or the Govt, is working towards the complete impersonlisation of the Individual, the nation and even of its own representatives. It aspires to turn the entire state into a state of functionaries. It aspires to regulate and control, either directly or indirectly wages, housing conditions, and even intellutual activities. कम्युनिस्ट राज्य किंवा सरकार यांचा प्रयत्न व्यक्तींचे व्यक्तिमत्व नाहीसे व्हावे नव्हे राष्ट्राचे व स्वतःच्या प्रतिनिधीचेही वैशिष्ट्य नष्ट व्हावे असा असतो. सबंध राज्याला यंत्रोपकरणाचे स्वरूप देण्यासाठी त्यांची धडपड चालते. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गानी वेतन, निवारा आणि बौद्धिक चळवळी यांचे नियंत्रण करावे वा त्यावर निर्बंध लादावे अशी त्यांची मनिषा असते.” (पाने, 96-97)
ग्रंथाची दोन वैशिष्ट्ये
कम्युनिझम ही सर्वसामान्य समाजाच्या शोषणावर आधारलेली एक नवी वर्गवारी समाजरचना आहे. ह्या भाग्यवान् शासक वर्गाचे अस्तित्व टिकविण्यासाठी सर्वंकष हुकूमशाही हे साधन वापरण्यात येते. त्यासाठी देशाचे अर्थव्यवहार, राजकारण, साहित्य वगैरे सर्व गोष्टी नियंत्रित कशा केल्या जातात, याचे जिल्लासनी आपल्या ग्रंथात केलेले विवेचन अनुभवाधिष्ठित व मार्मिक आहे. जिलासच्या ग्रंथामधील दोन भाग अभिनव आहेत. एक म्हणजे या नव्या वर्गासंबंधी त्यांनी केलेले विश्लेषण आणि राष्ट्रीय कम्युनिझमवर त्याने टाकलेला प्रकाश. युगोस्लाव्हियाने प्रथम सोव्हिएटचे वर्चस्व झुगारल्यामुळे राष्ट्रीय कम्युनिझमसंबंधी बोलण्याचा जिलास यांचा अधिकार सर्वश्रेष्ठ आहे. राष्ट्रीय कम्युनिझम हे प्रगतीचे व कम्युनिस्टांमध्ये स्वातंत्र्यप्रेम निर्माण झाल्याचे द्योतक समजले जाते.
क्रुशेवने आपल्या विसाव्या काँग्रेसपुढील भाषणामध्ये ‘समाजवादाच्या भिन्न मार्गाचे तत्त्व’ व त्या मागीत पार्लमेंटचाही उपयोग करण्याची शक्यता बोलून दाखवल्यापासून राष्ट्रीय कम्युनिझमसंबंधी लोकाच्या मनात बऱ्याच अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. परंतु जिलासना ही गोष्ट शक्य वाटत नाही. विसाव्या काँग्रेसमध्ये स्टालिनची नालस्ती केल्यापासून मॉस्कोचे जागतिक कम्युनिझमचे एकमेव केंद्र हे महत्त्व कमी झाले आहे. एका अर्थाने युगोस्लाव्हिया, पोलंड वगैरे राष्ट्रांनी कमी अधिक प्रमाणात मॉस्कोचे आधिपत्य झुगारून दिले असले तरी त्यामुळे त्या राष्ट्रामधील अंतर्गत परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही. त्या राष्ट्रामध्ये अद्यापही कम्युनिस्ट नोकरशाहीचे अधिराज्य चालत आहे व सोव्हिएट रशियाबरोबरचे संबंध सुटल्यानंतर युगोस्लाव्हियात लोकशाहीचा विकास होईल किंवा लोकशाही समाजवाद व कम्युनिझममध्ये असलेले अंतर कमी करण्याच्या कामी युगोस्लाव्हियाचा उपयोग होईल अशी कल्पना होती. पण जिलासच्या मते ती फोल ठरली आहे. याचे कारण स्पष्ट करताना जिलास म्हणतात,
“कम्युनिस्ट व लोकशाही समाजवाद यामधला विरोध हा केवळ वेगवेगळ्या तत्वांवर आधारलेला नाही तत्वभेद हे विरोधाचे अगदी गौण कारण आहे या विरोधाचे खरे कारण म्हणजे या दोन पद्धतीमधील आर्थिक व बौद्धिक शक्तींना मिळालेल्या परस्परविरोधी दिशा हे आहे. 1903 साली रशियन सोशल डेमोक्रटिक पार्टीच्या दुसऱ्या काँग्रेसमध्ये पक्षाच्या सभासदत्वाचे स्वरूप, पक्षामधील सत्तेचे केंद्रीकरण व शिस्तीचे स्वरूप या यावर लेनिन आणि मॉर्टाव्ह यांमध्ये झालेल्या संघर्षाला फार महत्व आहे. लेनिन आणि मॉर्टाव्ह यांच्या लक्षातही हे महत्त्व आले नसेल. त्या संघर्षांबरोबर नुसत्या दोन चळवळीच नव्हे तर दोन सामाजिक पद्धतीची सुरुवात झाली.”
या उताऱ्यामध्ये राष्ट्रीय कम्युनिझममधील कमजोरीचे सार सामावलेले आहे. आज बरेच कम्युनिस्ट हे स्टालिन किंवा वेळप्रसंगी क्रुशेववरही टीका करतात. पण ते लेनिनला देव मानतात! आम्ही आमच्या पद्धतीने लेनिनची तत्वे अमलात आणीत आहोत, असे म्हणण्याचा प्रयास देशोदेशी कम्युनिस्टांनी सुरू केला आहे. परंतु या नव्या वर्गाची सुरुवात व या हुकूमशाहीचा पाया लेनिननेच घातला, असे सांगून जिलासनी कम्युनिझमच्या मुळावरच घाव घातला. लेनिनला ग्रेट ब्रिटन वगैरे पाश्चिमात्य राष्ट्रामधील समाजवादी चळवळीचे भवितव्य ओळखता आहे नाही, असे सांगून आपल्या क्रांतिकारक कल्पनांची अंमलबजावणी परिस्थितीनुरूप न करता त्यांना सर्वव्यापी स्वरूप देण्यात लेनिनने मोठी चूक केली, असे जिलासचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय कम्युनिझम ही फसवी कल्पना
राष्ट्रीय कम्युनिझम अशी काही गोष्टच असू शकत नाही, असे जिलासचे म्हणणे आहे. बिगर कम्युनिस्ट देशांमधील कम्युनिस्ट पक्षासमोर आज एक पेच उभा आहे. जर त्यांनी आपले मार्ग बदलले तर त्या पक्षाचे स्वरूपच पालटेल व जर मार्ग बदलले नाहीत तर त्यांची लोकप्रियता कमी होईल. या संघर्षामध्ये कम्युनिस्ट पक्षामध्ये दिलाई व फाटाफुटी निर्माण होण्याचा संभव आहे. राष्ट्रीय कम्युनिझम ही शब्दयोजनाच परस्परविसंगत आहे. राष्ट्रीय कम्युनिझम म्हणजे कम्युनिझमला उत्तरती कळा लागल्याचे लक्षण आहे, असे जिलासचे म्हणणे आहे.
कम्युनिझममध्ये स्वातंत्र्य असंभवनीय
राष्ट्रीय कम्युनिझममध्ये जनतेला काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळू शकते ही कल्पना आभासात्मक आहे. युगोस्लाव्हियामध्ये कामगार मंडळे व त्यांची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न कम्युनिस्ट पक्षाच्या हुकूमशाहीमुळे फोल ठरला. कारण जोपर्यंत कम्युनिस्ट हा एकच पक्ष अस्तित्वात आहे तोपर्यंत कामगार मंडळे कशी चालवावी ही गोष्टही कम्युनिस्ट पक्षामध्येच ठरू लागली व कामगार मंडळांना खरेखुरे स्वातंत्र्य मिळेनासे झाले. Without universal freedom, not even workers managment can be free (पान 68) [सर्वास स्वातंत्र्य दिल्याखेरीज कामगारांची व्यवस्था हीदेखील खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगू शकणार नाही.] असे जिलासचे अनुभवाअंती मत बनले आहे व म्हणून देशोदेशीचे कम्युनिस्ट जोपर्यंत सामान्य जनतेचे राजकीय स्वातंत्र्य मान्य करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामध्ये खरा बदल झाला, असे म्हणता येणार नाही, असा जिलासचा निष्कर्ष आहे.
थोर निर्लिप्त तत्त्वचिंतन
जिलास हा कम्युनिस्ट जगात लहानाचा मोठा झाला. त्याने तेथे वैभवाचे शिखर गाठले आणि शेवटी जेव्हा त्याला त्या पद्धती मधील दोषांचे दर्शन झाले तेव्हा स्थानाचा मोह सोडून व धोका पत्करून त्याने ते दोष जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. असे करताना त्यांना हाल सोसावे लागले तरी त्यांच्या लिखाणात कोठे कडवटपणा आढळत नाही. अगदी थंड डोक्याने व वास्तव दृष्टीने त्यांनी कम्युनिस्ट समाजपद्धतीचे विवेचन केले आहे. मार्क्सच्या तत्त्वज्ञानाच्या आचारे लेनिन्-स्टालिन व क्रुशेव वगैरेंनी आपले अधिराज्य बांधले. पण या लोकानी मार्क्सच्या विचारांचा अर्थ कसकसा बदलला ते त्यांच्या जीवनावरूनच जिलासनी दाखवले आहे. ते म्हणतात,
“Marx died a poor emigrant in Londan, but was valued by learned men and valued in the movement; Lenin died as the leader of one of great revolutions but died as the dictator, about whom a cult has already begun to form. When Stalin died he had already transformed himself into a God.”
“मार्क्स हा एक गरीब निर्वासित म्हणूनच मरण पावला. पण विद्वानांनी आणि चळवळीतील लोकांनी त्याची थोरवी मान्य केली होती. जगातील एका मोठ्या क्रांतीचा नेता म्हणून लेनिन मरण पावला. पण मरणापूर्वी तो हुकूमशहा बनलेला होता व त्याची व्यक्तिपूजा सुरू झाली होती. आणि स्टालिन जेव्हा मरण पावला तेव्हा तो तर साक्षात् देवच बनला होता!”
सामान्य कम्युनिस्टाचा प्रवास
त्याचबरोबर कम्युनिस्ट राजवटीमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या सामान्य सभासदाच्या भूमिकेमध्ये कसा बदल होत गेला तेही जिलासने मोठ्या विदारकपणे सांगितले आहे: “The internal monolithic cohesion is transformed into a unity of obedient councillors and robot bureaucrats.. During their climb to power, intolerance, security incomplete thinking, contorl of personal lifehierarchical rigidity and introversion, the nominal and neglected role of woman, opportunism, self-centredness, and outrage repress of the once existent high principles.
Honour, Sincerity, Sacrifice and Love of truth were once things that could be understood for their own sake; now, deliberate lies sycophaney, slander, deception and provocation gradually become the inevitable attendants of the dark, intolerant, and all-inclusive might of the new class.”
“अंतर्गत एकसुरी मिलाफातून आज्ञाधारक सभासद व यांत्रिकरीत्या वागणारी नोकरशाही यांची एकजूट घडून येते. हा नवा वर्ग सत्तारूढ होत असताना, असहिष्णुता, गुलामगिरी, कोते विचार, व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, उच्च-नीचतेची पोलादी चौकट, स्त्रियांची हलाखी, संधिसाधुपणा इत्यादी दुर्गुण पराकोटीला पोचतात आणि एका वेळची उदात्त तत्त्वे या दुर्गुणांखाली चिरडून जातात.... शील, तळमळ स्वार्थत्याग, सत्याचे प्रेम या गोष्टींचे स्वयंसिद्ध महत्व एका वेळी मानले जात होते; परंतु आता सत्याचा बुद्धिपुरःसर अपलाप, लाचारी, निंदा आणि फसवणूक या सर्व गोष्टीच ‘नव्या सत्ताचारी वर्गाच्या भीषण सर्वंकष सत्तेबरोबर अपरिहार्यपणे जीवन व्यापून टाकीत असतात.”
उपयुक्त विवेचन
जिलासनी आपल्या या ग्रंथामध्ये कम्युनिस्ट हुकूमशाहीच्या स्वरूपाचे केलेले विवेचन मूलभूत स्वरूपाचे आहे. त्याचप्रमाणे कम्युनिस्ट अत्याचाराचे तंत्र, अर्थव्यवहारामध्ये त्यांच्याकडून होणारी उधळपट्टी, मानसिक व बौद्धिक गुलामगिरी निर्माण करण्याचे त्यांचे मार्ग इत्यादीसंबंधीचे त्यांचे विवेचन अभ्यसनीय आहे. या ग्रंथामध्ये पाल्हाळ न लावता सूत्र रूपाने, पण मौलिक रीतीने त्यांनी आपले विचार मांडले आहेत. कम्युनिझमवर केवळ नकारात्मक किंया द्वेषात्मक टीका न करता त्या पद्धतीचे त्यांनी शास्त्रीय पद्धतीने केलेले विवेचन कम्युनिझमच्या सर्व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल.
Tags: Communist State Revolution Communist Philosophy Communist Regime Milovan Jilas The New Class Democratic Socialism कम्युनिस्ट राज्य क्रांती कम्युनिस्ट तत्त्वज्ञान कम्युनिस्ट राजवट मिलोव्हन जिलास द न्यू क्लास लोकशाही समाजवाद weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या