अखेरच्या वर्षाचे चार-पाच विद्यार्थी कॅन्व्हासवर काम करताना पाहायला मिळाले. समोरच्या खांबाला रेलून एक तरुण मुलगा उभा होता. प्रत्येक कॅन्व्हासवर त्या मॉडेलचं चित्र किती वेगवेगळ्या शैलींत आकाराला येतंय ते मी पाहत होतो. मॉडेल एकच नि त्याची केवढी निरनिराळी नि बहुपेडी इंटरप्रिटेशन्स. एक चित्र दुसऱ्यासारखं नाही. 'एक दिल और सौ अफसाने'. खरंच. आपलीच चार-पाच चित्रं पाहून त्या तरुण मॉडेल मुलाला काय वाटलं असेल? काम संपलं नि तो तरुण सटासटा बाहेर सटकला. आपली वेगवेगळी रूपं आपण पाहावीत असं त्याला अजिबात वाटलं नाही. अंगवळणी पडलं असणार. शिवाय, पैशाची गरज. मॉडेलना एका खेपेचे हजार-बाराशे मिळतात. चित्रकार विद्यार्थ्यांनीदेखील एका क्षणात त्या मॉडेलला आपल्या सिस्टिममधून डिलीट करून टाकलं. उद्या कुणी दुसरा मॉडेल असेल.
अलीकडेच जे. जे. स्कूल कला महाविद्यालयात जाणं झालं. एका प्रकल्पासंबंधी बैठक होती. कला विद्यालयाचा सगळा परिसर शांत नि सुशेगाद. खूप झाडं. बा. भ. बोरकरांच्या शब्दांत सांगायचं झालं तर 'रुखावळ'. वृक्षांसाठी बोरकरांनी हा शब्द वापरलाय. रुखावळ. किती सुरेख.
आजूबाजूकडे शांतता. नि गार वारे. 'अचेतनांचा हुरूप शीतल / सचेतनांचा भास कोवळा' असं मर्डेकरांनी एका कवितेत म्हटलंय. ते पहाटेचं वर्णन करताहेत. जे.जे.त पहाट आणि सूर्यास्त असा फरक नसावा. सगळीकडे रेषा, ठिपके नि रंग.
खूप मागे जे.जे.त तीनेक वेळा जिद्दू कृष्णमूर्तीना ऐकायला गेलो होतो. ही बहुधा 1974-75 ची गोष्ट. कृष्णमूर्ती मागच्या लाल कट्ट्यावर बसून बोलायचे. संथखोल स्वरात. आपला मुद्दा स्पष्ट करताना मध्येच 'धिस इज व्हॉट आय हॅव टू से, सर' किंवा 'धिस इज नॉट द वे, सर' असं म्हणायचे. चेहऱ्यावरच्य मऊ सुरकुत्यांवरून एक प्रशांत स्मित घरंगळत खाली उतरायचं. नि जे.जे. स्कूलच्या वृद्ध शरीरावर नवी तकाकी चढायची.
'ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होऊनी अनावर' पुन्हा बोरकर.
परवा जे.जे.चा लाल कट्टा पुन्हा पाहिला. कट्टा मस्त ध्यान लावून बसला होता. आत्मभानानं तेजाळत होता. आजूबाजूची झाडं लाल कट्ट्याला मुजरा करत होती. वारा चवऱ्या ढाळत होता.
आजदेखील कृष्णमूर्तीचे अनुयायी अधूनमधून जे.जे.त पेंटिंग विभागाच्या कॉन्फरन्स सभागृहात जमतात, असं चित्रकलेचे अध्यापक प्रफुल्ल सातोकर सांगत होते.
कृष्णमूर्तीची तेव्हा माझ्यावर मोहिनी पडली होती. माझं सोडा माझा एक, वयानं माझ्याहून पंधरा-सोळा वर्ष मोठा मित्र तेव्हा मेटॅफिजिक्सच्या मागे पागल झाला होता नि ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास करत होता. तो तर कृष्णमूर्तीचं जे. जे. तलं एकही प्रवचन चुकवत नसे.
एकदा दुपारी तीन वाजता कृष्णमूर्ती बोलायला बसले. बाहेर टळटळीत उन्ह. एप्रिलचा महिना. माझा मित्र दीडेक तास उन्हात उभा होता. म्हणाला, "अरे, उभा जन्म उन्हात जाळण्याची हिंमत असेल तर नि तरंच कृष्णमूर्तीच्या नादी लागावं".
कृष्णजींच्या नादी लागलेली अनेक लेकरं आता कुठं असतील?
वर्ष 1975. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप बराच चिघळला होता. जे.जे.त परीक्षा होत्या. इंटरची परीक्षा देऊन मी घरी माश्या मारत बसलो होतो. सकाळी 'टाइम्स' वाचायचा नि संध्याकाळी 'टाइम्स'चं किचकट शब्दकोडं सोडवायचं.
एकदा शिवाजी मंदिरात गेलो. दामूकाकांना (विख्यात दिग्दर्शक-अभिनेता दामू केंकरे) भेटायला.
"काय करतोएस ?"
"काही नाही," मी म्हणालो.
"उद्या सकाळी जे.जे.ला ये."
गेलो.
पर्यवेक्षकाचं काम मिळालं. टेंपरवारी. मुलांना प्रश्नपरीक्षा वाटायच्या. परीक्षा संपेपर्यंत पोरांवर सुपरवायझरी करायची. पाण्याचा ग्लास भरून द्यायचा, कॉपीबहाद्दरांना पकडून डीनच्या हपिसात आणून सोडायचं. हे मात्र मोठ्या धैर्याचं काम. माझं वय साडे एकोणीस. पण पोरांनी बदतमीजी नाही केली. चोख वागले.
पंधरा दिवसांचे चारशे रुपये मिळाले. मी मोहम्मद अली रोडला गेलो नि एक फालुदा हादडला.
जे.जे. तच डॉ. गजानन मंगेश रेगेंशी ओळख झाली. रेगे हे जाहिरात क्षेत्रातलं मोठं नाव नि ते दामूकाकांचे मित्र. माझं स्मरण मला दगा देत नसेल तर 'एशियन पेंट्स'च्या विख्यात 'गड्डू' या बोधचिन्हाचे ते जनक. अर्ध्या चड्डीतला सहा-एक वर्षांचा चुणचुणीत मुलगा, त्याच्या हातात रंगकुंचला, असं ते चित्र आर. के. लक्ष्मण यांनी रेखाटलं होतं.
पु.लं.चे भाऊ रमाकांत देशपांडे तेव्हा जे.जे.त प्राध्यापक होते. छायाचित्रकलेचे एक जितकर म्हणून प्राध्यापक होते; आडदांड नि उंचेपुरे. कडक शिस्तीचे जितकर छपरी मिश्यांमुळे उग्र दिसायचे. नि तोच त्यांचा उद्देश होता.
जे.जे.चे डीन प्रल्हाद अनंत धोंड, संभाजी कदम, चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांच्यामुळे साठोत्तरी मराठी माणसाला जे.जे.चं मोठेपण समजू आलं. धोंडसरांचं 'रापण' हे आत्मचरित्र एकदम टॉप. ते वाचलं अन् जे. जे. स्कूल आणि चित्रकलेची मला गोडी लागली.
जे.जे.त मराठी माणसाची वट आहे याचा आनंद वाटला. संभाजी कदम 'मौज'च्या दिवाळी अंकात संस्कृती नि कला या विषयांचा उत्तम ऊहापोह करायचे. प्रफुल्लाबाय तर चैतन्याचा धिप्पाड गिरसप्पा. चित्रकलेबरोबरच गायन नि अभिनयातही त्या निपुण. निगर्वी, निर्मळ मनाच्या.
आठवणींच्या कितीतरी रंगच्छटा
कॉफी पिता पिता स्नेहल तांबुलवाडीकर, प्रफुल्ल सातोकर, विजय सकपाळ ही शिक्षक मंडळी चित्रकलेवर, चित्रकारांवर बोलताहेत. आम्ही ऐकतोय मी आणि रमेश ओझा. रावसाहेब धुरंधर, भूपेन खक्कर, विवान सुंदरम, कृष्णम्माचारी बोस, अतुल दोडिया, नयना कनोडिया या दादा मंडळींच्या आठवणींत आम्ही रंगलोय.
प्रा. सातोकर आम्हांला परिसर दाखवतात. माहिती सांगतात. एका मोठ्या दालनात सर जमशेटजी जीजीभॉय यांचा भव्य पुतळा आहे. भिंतीवर नाना जगन्नाथ शंकरशेट यांचं रावसाहेब धुरंधर शैलीतलं भारदस्त तैलचित्र. जे.जे. ची मूळ जमीन नाना शंकरशेट यांची. दानशूर व्यापारी सर जमशेटजींमुळे जे.जे.ची वास्तू ऐटीत उभी आहे.
जे.जे.ची संध्याकाळ आस्ते आस्ते काळसर होतेय. कला विभागासमोरच्या बागेत बरेचसे ज्येष्ठ नागरिक शांतपणे झाडांची चित्रं रेखाटताहेत. एक तरुण अध्यापक त्यांना रेषांची वळणं कशी फिरवायची ते सांगतोय.
वर्षाचे सात महिने जे. जे. तर्फे नागरिकांना चित्रकलेचे धडे दिले जातात: लँडस्केप, पेंटिंग, मेटल, पॉटरी, सिरॅमिक वगैरे. रीतसर वर्ग भरतात. आठवड्यातून दोन दिवस हौशी चित्रकार कुंचला, रंग वगैरे आपला मालअसबाब घेऊन बागेत जेठा मारून बसतात. एक वृद्ध महिला व्हीलचेअरवर बसल्या बसल्या रेषांचा प्रवास कॅन्व्हासवर चितारतेय. ते पाहून छान वाटलं कॅन्व्हासला, त्या बाईंना आणि मला.
कलेमुळे सगळीकडे आनंद तुडुंब भरून राहतो
विख्यात इंग्रजी लेखक ('जंगल बुक'वाला) रडियार्ड किपलिंग 1865 मध्ये जे.जे. स्कूल परिसरात जन्मला. त्याचे वडील जॉन लॉकवुड किपलिंग हे जे.जे.चे प्राचार्य होते. रडियार्डनं पहिल्यांदा 'ट्यँहा' केलं ती मूळ वास्तू पाडून नवा बंगला बांधण्यात आला. ते जे.जे.च्या प्राचार्यांचं निवासस्थान. बंगल्याच्या परिसरात किपलिंगचं भूत फिरतं, अशी भुमका मागे एकदा उठली होती. खरं-खोटं त्या भुतालाच ठाऊक. बंगला दुरून पाहिला.
अखेरच्या वर्षाचे चार-पाच विद्यार्थी कॅन्व्हासवर काम करताना पाहायला मिळाले. समोरच्या खांबाला रेलून एक तरुण मुलगा उभा होता. प्रत्येक कॅन्व्हासवर त्या मॉडेलचं चित्र किती वेगवेगळ्या शैलींत आकाराला येतंय ते मी पाहत होतो. मॉडेल एकच नि त्याची केवढी निरनिराळी नि बहुपेडी इंटरप्रिटेशन्स. एक चित्र दुसऱ्यासारखं नाही. 'एक दिल और सौ अफसाने'. खरंच.
मागे एकदा मी 'आज दिनांक' सायंदैनिकात लेखिका, कला समीक्षक शांता गोखल्यांवर लिहिलं. ते बाईंच्या वाचनात आलं. म्हणाल्या, "आपल्याला खूप माणसं लांबून वा जवळून पाहत असतात नि प्रत्येकाला आपल्याविषयी काहीतरी वाटत असतं. जर सगळ्यांनी ते लिहून काढलं तर आपली चांगलीच करमणूक होईल. तुझा लेख वाचून माझं असं झालं. ही मीच की काय असं वाटलं".
आपलीच चार-पाच चित्रं पाहून त्या तरुण मॉडेल मुलाला काय वाटलं असेल ?
काम संपलं नि तो तरुण सटासटा बाहेर सटकला. आपली वेगवेगळी रूपं आपण पाहावीत असं त्याला अजिबात वाटलं नाही. अंगवळणी पडलं असणार. शिवाय, पैशाची गरज. मॉडेलना एका खेपेचे हजार-बाराशे मिळतात. चित्रकार विद्यार्थ्यांनीदेखील एका क्षणात त्या मॉडेलला आपल्या सिस्टिममधून डिलीट करून टाकलं. उद्या कुणी दुसरा मॉडेल असेल.
बरीच म्हणजे बरीच तरुण मुलं-मुली चित्र काढण्यात, मातीकाम करण्यात गढून गेलेली. "महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले पुष्कळ विद्यार्थी जे.जे.त शिकायला येतात. हे आम्हाला आश्वासक वाटतं," असं पेंटिंग विभागाचे अधिव्याख्याता विजय सकपाळ म्हणाले.
शादाब काझी हा पंचविशीच्या आत-बाहेरचा तरुण चित्रकार. मूळचा अहमदनगरचा. तिथं मराठी शाळेत मॅट्रिकपर्यंत शिकला नि पेंटिंगसाठी जे.जे.त दाखल झाला. यंदाचं त्याचं अखेरचं वर्षं.
"पुढे काय करणार?"
"सर, पेंटिंगच करणार."
जे.जे.ची वास्तू म्हणाली, "तुझं भलं होवो, मुला". बाजूच्या रडयार्ड किपलिंगच्या बंगल्यावर सतरंगी झळाळी चढली.
साल्वादोर दाली संतापला की
दाली हा सरियॅलिस्टिक शैलीतला खूप मोठा चित्रकार. विलक्षण मनस्वी नि तापट. वयाच्या ऐंशीव्या वर्षी तो स्पेन शहरातल्या आपल्या राहत्या घरी भाजला. खाटेला लागूनच एक बटण होतं. वापर वापर वापरल्यामुळे ते बिघडलं. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली नि दाली जखमी झाला. लगेचच मोठ्या हॉस्पिटलात त्याला नेण्यात आलं. जगभरात खळबळ माजली.
हॉस्पिटलच्या बाहेर कला-वार्ताहर नि छायाचित्रकारांचा हीऽऽऽ तोबा गर्दी. खूप मोठा चित्रकार तो. रोज दीडशेएक पेपरवाले नि टी. व्ही. वाले हॉस्पिटलच्या बाहेर डेरा टाकून बसलेले.
रोज संध्याकाळी हॉस्पिटलचे अधीक्षक प्रेसवाल्यांना एक छोटेखानी निवेदन वाचून दाखवायचे : 'श्री. साल्वादोर दाली यांची प्रकृती स्थिर आहे. ते औषधोपचाराला योग्य तो प्रतिसाद देताहेत'.
बस्स.
रोज हेच निवेदन. प्रश्नोत्तरं नाहीत. नुसतं निवेदन. प्रेसवाले रात्रंदिवस पहारा देत असायचे.
असे दोन-अडीच महिने गेले.
तर एक दिवस ते अधीक्षक आले नि म्हणाले की, 'दालींची तब्येत सुधारतेय'. दुसऱ्या दिवशी तर अधीक्षकांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा. 'दालींची तब्येत झपाट्यानं सुधारतेय'.
दोन दिवसांनंतर अधीक्षकांनी बातमी आणली की, 'दाली आता नॉर्मलवर आलेत बरं'.
'कशावरून?' एका वार्ताहरानं विचारलं.
"त्याचं असं आहे की, आज न्याहारीची थाळी घेऊन आलेल्या नोकरावर दाली जाम संतापले. त्यांना न्याहारी बिलकूल आवडली नाही. त्यांनी पाण्याचा ग्लास फोडला, थाळी, काटे चमचे भिरकावून दिले. नि नोकराला शिव्या घातल्या".
"याचा त्यांच्या तब्येतीशी काय संबंध?"
"मित्रा, दाली संतापले की, ते नॉर्मल आहेत असं समजावं", अधीक्षक हसत हसत म्हणाला.
- ही बातमी वाचा. एकेकदा आयुष्य किती काळ्याकुट्ट रंगात बरबटलेलं असतं.
बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातलं झाझीहाट नावाचं इवलुसं गाव. सकाळची वेळ. एक छोटा मुलगा बारा-तेरा वर्षांचा कोवळा. शिकवणीला चालला होता. मागून एक भरधाव मालवाहू गाडी आली. मुलाला उडवलं. तो जागीच ठार झाला. सगळीकडे एकच कल्ला उडाला.
गावकरी घटनास्थळी आले. गाडीत ताजे मासे आहेत हे समजल्यावर जो तो भराभर मासे गोळा करू लागला. पलीकडे मुलगा मरून पडलाय. त्याचे आई-वडील धाय मोकलून रडताहेत.
गावकरी मासे लुटताहेत.
('द टाइम्स ऑफ इंडिया', मुंबई आवृत्ती, दिनांक 17 जानेवारी, 2026, पान नंबर 13.)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या