डिजिटल अर्काईव्ह

कोतवालवाडी त्या रात्री जागत होती

हुतात्मा भाई कोतवाल व हिरजी पाटील यांच्या स्मरणार्थ नेरळ येथील कोतवालवाडीत योजण्यात आलेल्या आदिवासी ठाकरांच्या एका धुंद अन् बेहोष नृत्याने ती रात्र रंगली होती.

अभिजात भारतीय लोककलेचे दर्शन घ्यायचे तर आपल्याला आदिवासींकडेच वळलेले पाहिजे. आदिवासी, मग तो भारताच्या कुठल्याही भागातला असो, नृत्याची त्याला गोडी असतेच आणि निसर्गाशी अनुबंध राखून आपले नृत्योत्सव गाजावाजा न करता ते वर्षानुवर्षे साजरेही करतात नृत्योत्सव हे त्यांच्या जीवनाचे अंगच बनले आहे. कुलाबा जिल्ह्यात आदिवासींची वसती भरपूर आहे. येथील ठाकुर जमातही नृत्यप्रेमी आहे. त्यांच्या नृत्य शैलीचा परिचय इतरांना फारसा झालेला नाही.
यंदा कोतवालवाडीच्या मंडळींनी एक नवा उपक्रम हुतात्मा भाई कोतवाल व हिरजी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुरू केला. ह्या आदिवासींना एकत्र जमवून त्या दिवशी त्यांच्या नृत्यस्पर्धाचे आयोजन करण्यात आले. भाई कोतवाल यांचे या आदिवासींशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या उत्कर्षांसाठी ते सतत प्रयत्न करीत होते. ते त्यांचे एक जीवितध्येय होते. बेचाळीसच्या क्रांतीत सिद्ध गडावर जर ते धारातीर्थी निधन न पावते तर स्वातंत्र्योत्तर काळात आपले सर्वस्व त्यांनी याच कार्याला लावले असते. त्यांच्या स्मरणार्थ कोतवालवाडीची स्थापना करून हेच कार्य त्यांचे सहकारी श्री. हरिभाऊ भडसावळे व अन्य मित्र करीत आहेत. कोतवालांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम योजण्यात त्यांनी फार औचित्य दाखवले.
आदिवासींचे सांगाडे पाहिले की, त्यांच्या दारिद्र्याची तीव्र जाणीव होते. परंतु नृत्याच्या वेळी हेच सांगाडे बेहोशीने घुमू लागतात तेव्हा पाहणारे थक्क होऊन जातात. आदिवासींना उपजीविकेचे किफायतशीर असे कोठलेच साधन नाही. शेतमजूर म्हणून तरी ते राबतात किंवा जंगलात तोडीच्या कामावर तरी जातात. जीवनात परमावधीची अशाश्वती असते. एका अर्थी त्यांना दुष्काळ आणि उपासमार कायमचीच असते. पण त्यातही भाद्रपद महिना हा अत्यंत हलाखीचा. पोटाची भूक विसरण्याला काहीतरी साधन लागते. नृत्य हे त्यांना सर्वदुःखारहारी औषध वाटते. सामूहिक नृत्ये या दिवसांत सर्वत्र नजरेस येतात. अर्थात् आजची दुःखे विसरण्याचा जसा हा मार्ग तसाच तो उद्याच्या आशांचे प्रसादचिन्हही आहे. पर्जन्यरूपाने देवाची जी कृपा पृथ्वीवर अवतरलेली असते, तीही त्यांच्यात चैतन्य निर्माण करते. शेती करणारांना सावकार आणि जंगलकामगारांना ठेकेदार हे अखंड वेटाळून बसलेले असतात. आजच्या निकडीच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना उद्यांचे भवितव्य विकावे लागत असते. नृत्योतवाने हा त्यांच्या भोवतीचा विळखाही जरा सैल झालासे त्यांना वाटते. नृत्य हे अशा अनेक धाग्यांनी त्यांच्या जीवनाशी निगडित झालेले आहे. भाद्रपदातील नृत्ये ही उद्यांच्या आनंदाचा विसावा असतात तर फाल्गुनांतील नृत्ये ही कृतज्ञतेतून संस्फूर्त होतात. ह्या काळात वाडीवाडीत घुंगुरांची छुमछुम आणि डफ-ढोलक्यांचे ताल घुमताना ऐकू येतात.
नृत्य हे आदिवासींच्या जीवनाचे एक अंग आहे. त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे. आदिवासींमध्ये स्त्री-पुरुषांची समानता असते. त्यांच्या नृत्यांच्या कार्यक्रमात स्त्री-पुरुष भेद नसतो. शहरी नृत्यांना कलातंत्राच्या बेड्या आणि साखळदंड असतात. त्यामुळे कापकूप करून नयनमनोहरी बनवलेल्या बंगल्याच्या आवारांतील बागेचे रूप त्यांना येते. पण येथे जंगलांतील वनराजीचे स्वच्छद, स्वैर सौंदर्य साकार झालेले दिसते. सामूहिक नृत्याची एकरूप आकृती असते पण त्यात व्यक्तींची वैशिष्ट्यही उत्तम रीतीने व्यक्त होतात. पाहून पाहूनच ही नृत्ये शिकली जातात त्यामुळे त्यांच्यात सांचेबंदपणा कमी असतो.
सडसडीत अंगकाठीचे, वर्णाने काळेसावळे आणि बुटके असे हे ठाकुर आहेत. नृत्यांतील त्यांचे विजेसारखे चापल्य आश्चर्यचकित करते, सामान्यतः त्यांच्या नेहमीच्या हालचालीवरून, चेहऱ्यांवरून अशी काही तडफ त्यांच्या अंगी असेल असे जाणवत नाही. पण एकदा का ढोल व डफ वाजू लागले की त्यांच्यांत जणू कुठून तरी शक्तीचा संचार होतो. अंगावर एक लंगोटी आणि कोपरी, जरा बऱ्यापैकी स्थिती असेल त्याच्या कंबरेला एक रंगीबेरंगी चौकोनी रुमाल आढळतो. गळ्यांतला ताईत आणि कंबरेची चांदीची साखळी हे त्यांचे आवडते दागिने!
हुतात्मा भाई कोतवाल व हिरजी पाटील यांच्या स्मरणार्थ यंदापासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा सर्वत्र प्रचार करणे जरा कठिणच होते कारण साक्षरांची संख्या अत्यल्प असल्याने बोलके ढलपे फारसे उपयोगी पडत नाहीत. कर्णोंपकर्णी या उपक्रमाची माहिती ह्या विभागात हळूहळू पसरेल आणि यात्राच्या सारखे स्वरूप पुढे येईल. पंढरपूरच्या वारीचे किंवा आळंदीच्या यात्रेचे जसे निमंत्रण द्यावे लागत नाही, तसेच येथेही पुढेमागे घडेल. एक परंपरा निर्माण होईल. यंदा पहिलेच वर्ष असल्याने भाग घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे फार मोठ्या संख्येने टोळ्या आलेल्या नव्हत्या. कोतवालवाडींत काही विशेष घडणार आहे, अशीही कल्पना येत नव्हती.
रात्र झाली. म्हणावे तसे चांद‌णे नव्हते. मळभ आले होते. साडेनऊचा सुमार झाला आणि ढोलक्यावर टिपरी पडली. एकदम सगळे वातावरण बदलले, चैतन्यमय झाले. आसपासच्या लोकांना हे निमंत्रणच होते. हळूहळू एक एक टोळी येऊन बसू लागली. मंडप छोटासाच होता. लोक पुरेसे जमल्यानंतर त्यांच्यांतल्याच एका टोळीप्रमुखाने आरती केली. नाचणारांची एक टोळी समोर आली. टोळीच्या म्होरक्याने सवाल-जबाबांची कल्पना लोकांना दिली. स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्यांना हे प्रश्न टाकलेले असतात. स्पर्धकांनी हे प्रश्न नाचताना गाऊन तोडायचे असतात. जे बरोबर प्रश्न तोडतील त्यांची जीत होते. ते ताबड्या जरीच्या पटक्याचे मानकरी बनतात. उत्तम नृत्य करणारांनाही मानाचा पटका देण्यात येतो.
यानंतर नृत्याला सुरुवात झाली. गुढग्यावर डोलकं घेऊन, ढोल बजावणारा तयार होतो. ढोलक्यावर सणसणीत थाप पडते व नृत्यांतील नमन सुरू होते. हे नमन सात देवतांना साधारणपणे असते. सुरुवातही आदरयुक्त असते. “पहिले नमन माझ्या गावच्या देवाला, दुसरे नमन माझ्या चंद्र-सूर्याला, तिसरं नमन माझ्या गुरुस्वामीला, चवर्ष नमन माझ्या धरतीमातेला, पाचवं नमन माझ्या पाची पांडवाला, साहाचे नमन माझ्या साही दिशांना, सातवं नमन बसल्या सभेला’, अशी अर्थपूर्ण सुरुवात करून नाचण्या-गाण्यास सुरुवात होते. गाण्याची सुरुवात अगदी सावकाश होते. त्यामुळे नाचणारांची पावलेही सावकाश पण मोठ्या शानमध्ये असतात. ढोलक्याचा ठेकाही त्याला अनुसरूनच असतो. हळूहळू लय वाढते व रंग चढत जातो. फेर घरलेले हे नर्तक चाळ बांधलेले उजवे पाय जरा जोरात उचलू लागतात. हातातील रंगी बेरंगी रुमाल फडफडू लागतात. मधेच टाळी वाजविली जाते. पाय एकदा बाहेरच्या अंगाला, एकदा आत असे पडू लागतात. नृत्यांतील कसरत, वैशिष्ट्यपूर्ण अंगविक्षेप, मुद्रा करून दाखविल्या जातात. कसरत म्हणण्याचे कारण अगदी तालावर ते दहीदंडीतल्या प्रमाणे मनोरे उभारतात किंवा एकमेकाच्या पायांमधून पळणे, बेडकासारख्या उड्या मारणे वगैरे प्रकार ठेक्यावर करून दाखवितात. हे चालू असतानाच पावले अधिक गतीने टाकली जातात. गाण्यातील लय वाढलेली असते.
ढोलक बजावणारा बेहोष झालेला असतो. सगळ्यांतच एकूण वेग वाढलेला असतो. शेवटी देवाला नमस्कार करून एक गाणे संपते. परत सावकाश पावले पडू लागतात ढोलकही मंद ठेका धरतो अशी एकामागून एक बरीचशी गाणी एक एक गट म्हणतो. दुसऱ्या गडाची गाणी वेगळी, ताल वेगळा, पावले टाकावयाची पद्धत वेगळी!
नृत्याबरोबर गाणे म्हणावयाची जशी चाल आहे त्याचप्रमाणे नाट्यही आढळते. ह्या नात्याच्या प्रकारात शिकारीशी संबंधित अशा गोष्टी अधिक आढळल्या. शिकार हा त्यांचा आवडता छंद. एकजण घोंगडी पांघरून रानडुकराचे सोंग घेता व बाकीचे शिकारी बनतात. रानडुकराचे सोंग घेतलेला जोरात इतरांवर चाल करतो व सर्वांची भंबेरी उडवून देतो. त्यातच एक जण विदूषकाचाही अविर्भाव करतो व प्रेक्षकांना खद‌खदून हसवितो. ह्या शिकारीप्रमाणे एकजण पेंढा वगैरे अंगावर लपेटून भेसूर पक्षी बनतो व इतरांवर हल्ला चढवतो. ग्रामीण भाषेतील विनोदावर ह्या नाट्यात विशेष भर दिलेला आढळतो.
ह्या स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी खूप दुरुनही लोक आले होते. एक गड तर 20 मैल चालून आलेला होता. त्यात आठ-दहा वर्षाच्या पोरापासून ते 50 वर्षांच्या वृद्धापर्यंतचे लोक आले होते. नाच करणारी मात्र सारी मुलेच होतो. एवढे चालून आल्यावरही ही फाटक्या अंगाची पोरे तासन् तास नाचू तरी कशी शकतात, ह्याचे नवल वाटल्या वाचून राहत नाही. ह्या मुलांना तर म्हणे कोणी नाचावयास शिकविलेलेही नाही. केवळ इतर नाच पाहूनच ही एवढी तालबद्ध नाचवयास शिकली आहेत! 7-8 वर्षाच्या एका पोराचे विशेषच कौतुक वाटले. तो कोठेही चुकत नव्हता. थकल्याचे चिन्ह त्याच्या आविर्भावात कोठे आढळत नव्हते. 
दिवस उजाडेपर्यंत नृत्याच्या कार्यक्रमात सर्व दंग होते. मग मात्र कोणी मानाचा पटका पटकावून तर कोणी झालेल्या कार्यक्रमावर चर्चा करीत आपापल्या घरी निघाले होते. कोतवालवाडी त्या रात्री जागत होती. ठाकुरांनी आपले अभिजात कौशल्य त्या ठिकाणी अत्यंत आदराने समूर्त केले होते. कोतवालवाडीच्या चालकांनी सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे. या कार्यक्रमासाठी श्री. शिरूभाऊ लिमये मुद्दाम हजर राहिले होते.
 

Tags: tribal dance Indian folk art Martyr Bhai Kotwal आदिवासी नृत्य भारतीय लोककला हुतात्मा भाई कोतवाल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी