डिजिटल अर्काईव्ह

कुमार सप्तर्षी :  स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील युवकांचा सर्वांत मोठा नेता 

कुमार सप्तर्षांनी साठ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात अनेक चळवळी व आंदोलने केली, अनेक कार्यक्रम-उपक्रम राबवले. या संपूर्ण काळात तरुणाई हाच त्यांच्या विचार कार्याचा केंद्रबिंदू होता. तरुणाई मध्येच ते खऱ्या अर्थाने खुलत असत. मागील चार पिढ्यांतील तरुणाईचा त्यांनी सहजतेने स्वीकार केला होता. प्रत्येक नव्या पिढीशी ते उत्तम संवाद करू शकत होते. समाजसन्मुख जगण्यातच खरी समृद्धी आहे, हे तरुणाईला पटवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. काळ लोटला, परिस्थिती बदलत गेली, अनेक मर्यादा वाट्याला आल्या; पण ते निराश झालेत असे कधीच पाहायला मिळाले नाही. कोणत्याही काळातील तरुण पिढीबाबत ते नुसतेच आशावादी नव्हते तर, येणारी प्रत्येक नवी पिढी अधिक प्रगल्भ असते असाच त्यांचा ठाम विश्वास होता, सिद्धान्त होता. कारण आधीच्या पिढीच्या खांद्यावर बसूनच नवी पिढी सभोवताल न्याहाळत असते, हे त्यांचे त्यामागचे लॉजिक होते.

 

21 ऑगस्ट 1941 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन या गावात कुमार सप्तर्षी यांचा जन्म झाला. 18 जुलै 2026 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. जवळपास 85 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले, त्यातील 60 वर्षे सार्वजनिक कार्याची होती. त्याचे ढोबळमानाने चार भाग करता येतील. 1965 ते 75 हा पहिला कालखंड, युवक क्रांती दलाच्या झंजावाताचा. दुसरा भाग, 1975 ते 90 हा दीड दशकाचा संसदीय राजकारणाचा काळ. त्यानंतर, 1990 ते 2005 हा तिसरा कालखंड, सत्याग्रही विचारधारा हे मासिक चालवण्याचा आणि युवक क्रांती दलाचे पुनरुज्जीवन करण्याचा. 2005 नंतरची वीस वर्षे हा चौथा कालखंड, प्रामुख्याने गांधीभवनमार्फत केलेल्या कार्यक्रमांचा व राबवलेल्या उपक्रमांचा.

कुमार सप्तर्षी यांचे वडील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर होते.  कुटुंबात सुख समृद्धी होती, आर्थिक व वैचारिक या दोन्ही बाबतीत. त्यामुळे बालकुमार वयातील त्यांना ग्रामीण जीवनाचे दर्शन घडले. वाचन लेखनाचे संस्कार घरातूनच झाले. सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण नगर शहरात  झाले. नंतर बी.एससी. करण्यासाठी पुणे शहरात एस.पी. कॉलेजमध्ये आल्यावर त्यांच्या राजकीय-सामाजिक जाणिवांना धुमारे फुटले. त्यानंतर बीजे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस करायला गेले, तेव्हा बुद्धिमान तरुणाईशी संपर्क आला. तिथेच युथ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. अर्थातच तेव्हा ते समाजवादी आणि राष्ट्रसेवा दल नेत्यांच्या संपर्कात आले. त्यामध्ये एस.एम. जोशी प्रमुख होते. 1966 मध्ये बिहारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला, तेव्हा स्वयंसेवक म्हणून अनेक तुकड्या महाराष्ट्रातून गेल्या. त्यातील एका तुकडीचे नेतृत्व कुमार सप्तर्षी यांच्याकडे होते. त्या बिहार दौऱ्यानंतर अनेक तरुणांच्या पुढच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, त्यामध्ये कुमार सप्तर्षी व अनिल अवचट हे दोघे प्रमुख होते. नंतर लगेचच त्या दोघांनी इतर काही समविचारी मित्रांसोबत नोव्हेंबर 1967 मध्ये सिंहगडावर जाऊन 100 तरुण-तरुणींसह युवक क्रांती दलाची स्थापना केली. राम बापट, गं. बा. सरदार, वसंत पळशीकर, पु.ग. सहस्रबुद्धे इत्यादी विचारवंत त्या तरुणाईचे मार्गदर्शक होते. मार्क्सवादी, समाजवादी, गांधीवादी, राष्ट्रवादी अशा प्रवाहांचे ते प्रतिनिधी होते. त्यातून युक्रांद मधील तरुणांची वैचारिक बैठक आकाराला आली.

अर्थातच स्त्री-पुरुष समानता, जाती निर्मूलन, धर्मनिरपेक्षता आणि आर्थिक समानता ही चतुःसूत्री केंद्रस्थानी आली. त्यामध्ये तरुणाईचे प्रश्न मध्यवर्ती असणे साहजिक होते. कॉलेजातील फी वाढ, हॉस्टेलची व्यवस्था, मेसची अवस्था अशा प्रश्नांसाठी आंदोलने झाली. मात्र युक्रांदचे आंदोलन त्या प्रश्नांच्या कितीतरी पुढे गेले. जयप्रकाश नारायण हे त्या पिढीसाठी आयकॉन होते. अध्यात्म हे तरुणाईसाठीच आहे, हा त्यांचा विचार क्रांतिदर्शी होता. सप्तर्षी व सहकाऱ्यांनी तो स्वीकारला. त्यातूनच प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत, आर्थिक समानता आली पाहिजे, बंधुता विकसित झाली पाहिजे असा आग्रह बळावत गेला. त्यातूनच जाती निर्मूलनाचा,  स्त्री पुरुष समतेचा व धर्मनिरपेक्षतेचा कृतिकार्यकम पुढे आला. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करण्याला प्रोत्साहन दिले जाऊ लागले. ज्यांना ते शक्य नाही त्यांनी आपल्या मुलांच्या शाळेतील दाखल्यावर जात व धर्म नोंदवणार नाही अशी भूमिका घेतली. त्यातील काहींनी स्वतःच्या आडनावाचा त्याग केला. काहींनी आपल्या मुला-मुलींच्या नावात वडिलांसोबत आईचे नावही वापरायला सुरुवात केली. अनेकांनी आपले घर पत्नीच्या नावावर केले. आणि असे बरेच काही....

अशा पार्श्वभूमीवर, 1967 मध्ये स्थापन झालेल्या युवक क्रांती दलाने मोठा झंजावात निर्माण केला. व्याख्याने, चर्चासत्रे, वादसंवाद, शिबिरे असा प्रबोधनात्मक कार्यक्रम एका बाजूला. आणि निषेध सभा, रास्ता रोको, मोर्चा, घेराव असे संघर्षात्मक कार्यक्रम दुसऱ्या बाजूला. तेव्हा सप्तर्षीना तोलामोलाचे अनेक सहकारी लाभले. सर्वच जण पुढे सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिले असे नाही. त्यातील काही शिक्षण क्षेत्रात जाऊन तज्ज्ञ झाले, कोणी वकील-न्यायाधीश झाले, कोणी प्रशासनात अधिकारी झाले, कोणी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहिले, कोणी उद्योग-व्यापारात गेले. कोणी अभ्यास-संशोधनात रमले, कोणी नाटक-सिनेमातील कलाकार झाले, तर कोणी लेखक-साहित्यिक झाले. कोणी राजकारणात गेले, कोणी स्वयंसेवी संस्था स्थापन केल्या, तर कोणी आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयाच्या प्रश्नांच्या संदर्भात संघटना स्थापन केल्या. मात्र काही अपवाद वगळता त्या सर्वांनी युक्रांदची स्थापना मूल्ये जपली, वृद्धिंगत केली. कुठेही गेले तरी त्या सर्वांच्या मनात तारुण्याच्या काळात युक्रांदमध्ये होतो याचा अभिमान राहिला. त्यातील काहींची काही बाबतीत नाराजी होती, मात्र त्या सर्वांच्या मनात कुमार सप्तर्षी यांच्याविषयी आदरभाव कायम होता. त्यामुळेच, आजच्या महाराष्ट्रात 75 ते 85 या वयोगटातील लोकांचा सर्वे केला आणि  युक्रांदचे त्यांच्यावर केलेले व  आयुष्यभर पुरलेले संस्कार सांगताना ते थरारून जातील, कुमार सप्तर्षांना मनोमन सलाम करतील.

1975 च्या आणीबाणीच्या कालखंडात इतर अनेकांप्रमाणे सप्तर्षीही सत्याग्रह करून तुरुंगात गेले. पुणे येथील येरवडा तुरुंगात ते 19 महिने होते, तेव्हा ते वयाने 35 च्या आत बाहेर होते. त्या काळात त्यांच्या विचारांचे क्षितिज रुंदावले. तिथे त्यांना विविध पक्षांचे व विविध प्रवाहांचे रथी-महारथी संवाद व चर्चा करायला, जवळून अनुभवायला मिळाले. तेव्हा स्वातंत्र्य मिळून पाव शतक उलटले होते. लोकशाही सुरळीत चालेल असे वाटत असतानाच, 'अरे पुन्हा आयुष्याच्या , पेटवा मशाली' असा टप्पा आला होता. परिवर्तनासाठी प्रबोधन, रचना व संघर्ष ही त्रिसूत्री पुरेशी नाही याचे भान देणारा तो टप्पा होता. साहजिकच निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहून चालणार नाही, हा विचार सप्तर्षीच्या मनात बळावत गेला. इंदिरा गांधीना आंदोलन करून जेरीस आणता येईल, परंतु त्यांना निवडणुकीत पराभूत करायचे असेल तर सक्षम राजकीय पर्याय द्यावा लागेल, हे त्यांनाही मनोमन पटले. तोपर्यंत देशात कम्युनिस्ट, समाजवादी, जनसंघ हे तीन मुख्य प्रवाह व अन्य प्रादेशिक पक्ष होते आणि काँग्रेसमधून फुटलेले काही पक्ष व नेते होते. परंतु यापैकी कोणीही आणि कितीही दीर्घकाळ लढले तरी ते केंद्रीय सत्तेत येऊ शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले होते. याउलट सलग पाव शतक केंद्रीय सत्तेवर असल्यामुळे सर्व प्रकारच्या अनिष्ट प्रवृत्ती काँग्रेसमध्ये शिरजोर झाल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली पिढी व त्यांची मूल्ये बाजूला सरकवली जात होती. संजय गांधी आणि त्यांची पिढी सत्तारूढ होणार हे दिसू लागले होते. म्हणजे युवक क्रांती दलाची पिढी विधायक कार्याने पेटलेली असेल तर त्याच वयोगटातील काँग्रेसमधील संजय गांधीची पिढी सत्तेमुळे अंध व आक्रमक झालेली होती.

अशा पार्श्वभूमीवर युक्रांदमध्ये एक विंग संसदीय राजकारण करणारी म्हणजे निवडणुका लढणारी असावी, असा प्रवाह आकार घेऊ लागला. अर्थातच, सप्तर्षांना तसे मनोमन वाटू लागले. 1977 मध्ये आणीबाणी उठल्यावर, 'जनता पार्टी' या बॅनरखाली विविध पक्ष संघटना एकत्र येऊन इंदिरा गांधींना पराभूत करू शकले. तेव्हा, राजकीय सत्तेची ताकद सप्तर्षीच्या लक्षात आली. परंतु युक्रांद मधील अनेक तरुण त्यासाठी तयार नव्हते. युवक क्रांती दल राजकीय पक्षांपासून दूरच असावे अशी त्यांची पक्की धारणा होती. म्हणून सप्तर्षी व काही जण युवक क्रांती दलातून बाहेर पडले. संस्थापक अध्यक्ष असूनही नवीन युवक क्रांती दल स्थापन करणे किंवा मूळ संघटनेत फूट पाडणे, असे त्यांनी केले नाही. उर्वरित तरुण मित्रांनी पुढील दशकभर युवक क्रांती दल चालू ठेवले आणि नंतर विसर्जित केले. मात्र त्यानंतरचे दीड दशक सप्तर्षी सक्रिय राजकारणात राहिले. 1978 मध्ये ते जनता पार्टीत सहभागी झाले. अहमदनगर मतदारसंघातून आमदार झाले. मात्र ती विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्याने, त्यांचा आमदारकीचा कालावधी जेमतेम दोन-अडीच वर्षांचा होता. त्यानंतर सप्तर्षांनी जनता दलामार्फत दोनदा लोकसभा व एकदा विधानसभा निवडणुका लढवल्या. परंतु त्यात यश येणार नव्हतेच. 1990 नंतर तर राजकारण खूपच बदलत गेले, त्यात रममाण होणे सप्तर्षीना शक्य नव्हते. त्यामुळे,  प्रवाहपतित होण्यापेक्षा पुन्हा पक्षीय राजकारणाच्या  बाहेर राहून राजकीय-सामाजिक जीवनात हस्तक्षेप करत राहणे त्यांनी श्रेयस्कर मानले. वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यावरच त्यांचा तो निर्णय झाला.

त्यानंतर त्यांच्या सार्वजनिक आयुष्याचा तिसरा टप्पा आला. 1992 मध्ये त्यांनी 'सत्याग्रही विचारधारा' हे मासिक सुरू केले, पुढील दोन दशके ते मासिक मोठ्या ताकदीने चालवून नावारूपाला आणले. त्या काळात अनेक लोक सत्याग्रहीचे अंक फक्त त्यातील संपादकीय वाचण्यासाठी घेत. त्याच काळात सप्तर्षींनी प्रमुख वृत्तपत्रात सातत्याने लिहिले. त्या काळातील अनेक चळवळी, आंदोलनांतही ते सहभागी झाले. अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभाग हाही एक टप्पा येऊन गेला. वैचारिक वर्तुळात सप्तर्षीना या दोन दशकांत विशेष मान्यता मिळाली. 2001 मध्ये त्यांनी युवक क्रांती दलाचे पुनरुज्जीवन केले. तेव्हा ते साठीच्या टप्प्यावर आले होते, त्या काळातही ते तरुणाईला आकर्षित करू शकत होते, नव्या पिढ्या घडवण्यात योगदान देत होते.

चौथा टप्पा 2005 नंतरचा म्हणता येईल. सत्याग्रही विचारधारा मासिक व युवक क्रांती दल या दोन्हीला काही मर्यादा पडत होत्या. त्याला अनेक बाह्य कारणे होती. पण स्वतः सप्तर्षी वयाने पासष्टीमध्ये गेले तेव्हा, त्यांच्या दीर्घकाळच्या डायबिटीसने त्यांच्या फिरतीवर अनेक मर्यादा आणल्या. मात्र, त्याच दरम्यान कोथरूड पुणे येथील महात्मा गांधी स्मारक निधी (गांधीभवन) चे अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांचे निधन झाले. कुमार सप्तर्षी यांच्याकडे ते अध्यक्षपद आले. मग त्यांच्या विचार - कल्पनांना पुन्हा नव्याने धुमारे फुटले. त्यांनी जीव ओतायला सुरुवात केली आणि मरगळलेल्या गांधी भवन मध्ये जान येऊ लागली. पुन्हा एकदा चर्चासत्रे, व्याख्याने, शिबिरे यांचा धडाका सुरू झाला. गांधी भवन चैतन्याने फुलू लागले. पायाभूत सुविधा चांगल्या असल्यामुळे आणि संस्थेचा वारसाही भव्य दिव्य, त्यामुळे सप्तर्षीना या काळात अधिक स्वास्थ्य मिळाले. या काळात  ते धर्मांध शक्तींना विरोध करणारे  आणि लोकशाहीला बळकट करणारे कार्यक्रम-उपक्रम  राबवत राहिले. विविध क्षेत्रांतील लोकांना जोडत राहिले. राष्ट्रीय स्तरावरील लोकांना आमंत्रित करीत राहिले. मात्र या काळात सत्याग्रही मासिकाला फार वेळ देता येत नाही याची त्यांना खंत वाटत होती. त्यामुळे, अखेरपर्यंत ते सत्याग्रही विचारधाराला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्न करीत होते. अलीकडेच त्यांनी ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांना  सत्याग्रही विचारधारा चे कार्यकारी संपादक म्हणून बोलावले होते. सत्याग्रहीचे डिजिटल अर्काईव्ह करण्यासाठी मदत करण्याबद्दल ते प्रस्तुत संपादकाशी मागील दोन-तीन वर्षांत काही वेळा बोलले होते. अगदी मृत्यूपूर्वी पाचच दिवस आधी त्यांनी अनंत बागाईतकर यांच्यामार्फत निरोप दिला होता. येत्या आठवड्यात डॉक्टरांच्या घरी जाऊन मीटिंग करायचे आम्ही ठरवले होते. मात्र ती मीटिंग आता कधीच होणार नाही.

अशा या कुमार सप्तर्षांनी साठ वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात अनेक चळवळी व आंदोलने केली, अनेक कार्यक्रम-उपक्रम राबवले. या संपूर्ण काळात तरुणाई हाच त्यांच्या विचार कार्याचा केंद्रबिंदू होता. तरुणाई मध्येच ते खऱ्या अर्थाने खुलत असत. मागील चार पिढ्यांतील तरुणाईचा त्यांनी सहजतेने स्वीकार केला होता. प्रत्येक नव्या पिढीशी ते उत्तम संवाद करू शकत होते. समाजसन्मुख जगण्यातच खरी समृद्धी आहे, हे तरुणाईला पटवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. काळ लोटला, परिस्थिती बदलत गेली, अनेक मर्यादा वाट्याला आल्या; पण ते निराश झालेत असे कधीच पाहायला मिळाले नाही. कोणत्याही काळातील तरुण पिढीबाबत ते नुसतेच आशावादी नव्हते तर, येणारी प्रत्येक नवी पिढी अधिक प्रगल्भ असते असाच त्यांचा ठाम विश्वास होता, सिद्धान्त होता. कारण आधीच्या पिढीच्या खांद्यावर बसूनच नवी पिढी सभोवताल न्याहाळत असते, हे त्यांचे त्यामागचे लॉजिक होते.

18 जुलै रोजी त्यांचे निधन झाले, तेव्हा कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचे सर्वोच्च शिखर गाठले होते. तेव्हा डॉक्टर मनातल्या मनात म्हणाले असतील (कदाचित जवळच्या लोकांना म्हणाले असतील), आज मी तंदुरुस्त असतो तर दिल्लीत  जाऊन "बोल तरुणा... हल्ला बोल" ही घोषणा देऊन जंतर-मंतर दणाणून सोडले असते. आणि हे आंदोलन संपल्यावर अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांका, नेहा बोरा या चार तरुणांना गांधी भवनात बोलावून भव्य नागरी सत्कार करायचे नियोजनही त्यांनी मनातल्या मनात केले केले असेल. (सोनम वांगचुक यांना गेल्याच वर्षी त्यांनी गांधी भवनला बोलावले होते.) आता सप्तर्षी नाहीत, पण त्या तरुणांना बोलावून भव्य नागरी सत्कार करण्याचे काम गांधीभवनचे पुढील सूत्रधार निश्चित करतील.

स्वातंत्र्योत्तर 75 वर्षांत महाराष्ट्रात अनेक नेते होऊन गेले, अनेक तरुण होऊन गेले. पण तरुण असतानाही तरुणांचे नेते राहिलेले आणि रूढ अर्थाने तारुण्य संपल्यानंतरही तरुणांचे नेते म्हणून वावरणारे, आणि तसे म्हणवून घेण्यात अभिमान बाळगणारे कुमार सप्तर्षी एकमेव होते. त्यामुळे, 'स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील युवकांचा सर्वांत मोठा नेता' हे बिरूद त्यांना लावणे अपरिहार्य ठरते !
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके