डिजिटल अर्काईव्ह

छोंगछिंगचं चित्र काढायचं असेल कागद उभा धरून सर्वांत आधी भरपूर डोंगर काढायला लागतील. मग डोंगरांना झाकून टाकणाऱ्या उंचच उंच इमारती, त्यांच्या बाजूला भरपूर चढ-उतार असलेले रस्ते, रस्त्यांच्या बाजूला निळ्या-जांभळ्या फुलांनी बहरलेली नीलमोहराची झाडं. रस्ते आणि इमारती ह्यांच्या फटीत कधीच न संपणाऱ्या अगणित पायऱ्या काढताना हात अगदी भरून येईल. मात्र खांद्यावर बांबूच्या कावडीमध्ये लालभडक चेरी आणि केशरी पीच घेऊन जाणारे काका ह्याच पायऱ्यांवरून सरसर चढतील उतरतील. पायऱ्यांवरुन समोर नजर टाकली तर यांगत्से नदीचं पात्र आणि त्यावरचे दिव्यांनी झगमगणारे पूलही दिसतील. दिव्यांच्या उजेडाने डोळे दिपून जातील.

छोंगछिंग म्हणजे बीजिंग, थिएनचिन, शांघाय आणि छोंगछिंग ह्या चीनमधल्या चार थेट केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या म्युनिसिपल सिटीजपैकी एक शहर. माझ्या व्हिएतनामी मैत्रिणीच्या मते, छोंगछिंग म्हणजे एकदम ड्रीम सिटी. त्यामुळे आम्ही आठ दिवसांच्या दक्षिण चीनच्या दौऱ्याची सुरुवात छोंगछिंगपासून केली. दक्षिण चीनमधील महत्त्वाचं आर्थिक केंद्र असलेलं छोंगछिंग तिबेटचं पठार आणि यांगत्से नदीचं दक्षिणेकडील खोरं ह्यांच्यामध्ये वसलं आहे. ते बीजिंगपासून 1500 कि.मी. दूर असून बुलेट ट्रेनने जायला जवळपास दहा तास लागतात. पण गंमत म्हणजे विमानाचं तिकीट बुलेट ट्रेनपेक्षा स्वस्त असल्याने आम्ही एअर चायनाने पावणे तीन तासांतच छोंगछिंगला पोहोचलो.

छोंगछिंगचा 76 टक्के प्रदेश डोंगराळ आहे. त्यामुळे त्याला 'डोंगरातलं शहर' असंच म्हणतात. छोंगछिंगच्या ह्या टोपण नावाची आम्हाला अगदी पोहोचल्या पोहोचल्याच प्रचिती आली. विमानतळावरून मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी आम्ही अगणित जिने चढलो आणि उतरलो. मेट्रोच्या खिडकीतूनही चिक्कार डोंगर दिसले. डोंगरातले रस्ते इतके वर-खाली होते की, मोबाईलवरच्या दिशादर्शक अ‍ॅपनेही गोंधळून जावं. छोंगछिंगचे रस्ते चालण्यासाठी नव्हेत तर चढण्या-उतरण्यासाठीच बनलेत. छोंगछिंगकर इतर व्यायाम न करताही सडपातळ राहतील अशी ह्या रस्त्यांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे.

मेट्रोने छोंगछिंग शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लिबरेशन मॉन्युमेंटला पोहोचलो तेव्हा इथली हवा बीजिंगसारखी कोरडी नसून चांगलीच दमट आहे हे जाणवलं. लिबरेशन मॉन्युमेंट म्हणजे 1945 मध्ये बांधलेलं, दुसऱ्या महायुद्धातील चिनी सैन्याचं जपानवरील विजयाचं स्मारक. ह्या स्मारकाच्या चहूबाजूला प्रसिद्ध ब्रँड्सची शोरूम्स, मॉल्स, दुकानं आणि रेस्टॉरंट्सची चहलपहल होती. बुधवार दुपार असूनही लोकांची पुष्कळच वर्दळ होती. आम्ही बुक केलेलं हॉटेल लिबरेशन मॉन्युमेंटपासून चालत पाच मिनिटांवर एका टोलेजंग इमारतीच्या सातव्या मजल्यावर होतं. पाठीवरच्या बॅगा रूममध्ये ठेवून आम्ही लगेचच फिरायला निघालो. लिफ्ट यायला भरपूर वेळ लागत असल्याने सरळ जिने उतरायला सुरुवात केली.

आमच्या छोंगछिंग दर्शनची सुरुवात 'पायी स्ट्रीट' (Bayi Street) नावाच्या खाऊगल्लीपासून झाली. गल्ल्यांमध्ये एकाला एक लागून ओळीने विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकानं होती. सगळेच पदार्थ एकदम लालेलाल दिसत होते. आम्ही एक प्रकारचे झणझणीत न्यूडल्स आणि कोळंबी खाल्ली. मग तोंडाची आग कमी व्हावी म्हणून फ्रूट आईस जेली विकत घेतली. छोंगछिंगमध्ये सशाचं मांस फेमस आहे. पायी स्ट्रीटच्या दुकानातलं सशाचं डोकं, सशाची तंगडी, भाजलेला अख्खा ससा वगैरे पदार्थांचं मी लांबूनच दर्शन घेतलं.

पेट पूजा करून झाल्यावर पुढचा मुक्काम होता 'हुक्कांग असेम्ब्ली हॉल'. शहराच्या मध्यवर्ती भागात राहण्याचा फायदा म्हणजे जवळपास सगळ्या प्रेक्षणीय स्थळांना पायी जाता येत होतं. गल्ली बोळांतून पायी फिरल्याने नवीन जागेशी आपोआपच जवळीक वाटायला लागली. रस्त्यांवरून उतरताना आम्हाला छोंगछिंगकरांची निवांत जीवनशैली पाहायला मिळाली. रस्त्याबाजूच्या दुकानांसमोर काही लहान टेबलं आणि स्टुलं मांडली होती. तिथे डोक्यावरचे केस विरळ झालेल्या काका मंडळींच्या गटाचा पत्त्यांचा डाव रंगला होता. अजून पुढे चालत गेलो तर रस्त्याच्या कडेला खुर्च्छा टाकून बसलेल्या मावश्यांचा गट दिसला. हिरव्या, पिवळ्या रंगाचे गुडघ्यापर्यंतचे झगे घातलेल्या मावश्या लोकरीच्या विणकामात तल्लीन झालेल्या होत्या.

'हुक्वांग असेम्ब्ली हॉल' ला जाण्यासाठी आम्ही रस्ता ओलांडून पुलापाशी गेलो आणि तिथून लिफ्टने आठ मजले खाली उतरल्यावर, अतिशय कलात्मक असा पिवळ्या भिंती आणि काळ्या छप्परांच्या कौलारू वास्तूंचा समूह अखेर आमच्या आय-लेव्हलला आला. पंचवीस युआनचं तिकीट काढून आत गेलो. समोरच चिनी मायथॉलॉजीमधल्या 'यु द ग्रेट' नावाच्या राजाचं मंदिर होतं. मंदिराच्या दोन्ही बाजूंना वर जाणारे जिने होते. जिन्यांवरून वर गेलो तर एक ऑपेरा थिएटर दिसलं. त्याच्यासमोर प्रेक्षकांसाठी टेबलं आणि बाकडी ठेवली होती. हा 'हुक्वांग असेम्ब्ली हॉल' म्हणजे 1759 मध्ये बांधलेला, म्हणजेच जवळपास 265 वर्ष जुना कम्युनिटी हॉल. त्या काळी युद्ध आणि नैसर्गिक आपत्तींमुळे छोंगछिंगची लोकसंख्या झपाट्याने घटली होती. त्यामुळे राज्यकर्ते इतर भागातल्या लोकांना छोंगछिंगमध्ये स्थलांतर करण्यासाठी आवाहन करत होते. हुपेई, हुनान, कांगतोंग, क्वांगशी ह्या प्रदेशातून इथे अनेक लोक स्थलांतरित झाले. त्या स्थलांतरित लोकांनी एकत्र भेटण्यासाठी, व्यापाराबद्दल चर्चा करण्यासाठी, मनोरंजनासाठी म्हणून 'हुक्वांग असेम्ब्ली हॉल'ची वास्तू बांधली गेली. इथली देवळं, ऑपेरा थिएटर, मीटिंगसाठीच्या खोल्या, बागा वगैरे छान जतन करून ठेवलेलं आहे. त्यासोबतच इतिहासातील स्थलांतराबद्दलची माहिती देणारं छोटंसं संग्रहालयही बांधलं आहे.

आम्ही त्या ऐतिहासिक जागेतून बाहेर पडलो आणि पुन्हा गगनचुंबी इमारतींच्या जंगलात शिरलो. त्या रस्त्यांवरून चालताना आपण फारच छोटेसे आहोत असं वाटत होतं. 20... 30... 40! इमारतींचे मजले मोजताना माझी मान भरून आली. इमारतींच्या घोळक्यातच आम्हाला छोंगछिंगमधील अत्याधुनिक स्थापत्यशैलीचं प्रतीक असलेली रॅफल्स सिटी दिसली. 350 मीटर उंच अशा आठ टोलेजंगी इमारतींचा हा समूह प्रसिद्ध स्थापत्यकार मोश सफदी (Moshe Safdie) ह्यांची निर्मिती आहे. 300 मीटर लांबीचा स्काय ब्रीज रॅफल्स सिटीच्या चार टॉवर्सना जोडतो, त्यामुळे तिला हॉरिझॉटल स्कायस्क्रेपर असंही म्हणतात. हा हॉरिझॉटल स्कायस्क्रेपर यांगत्से आणि च्यालिंग नदीच्या संगमाशी वसलेला असल्याने त्याच्यावरून आजूबाजूचं दृश्य फार सुंदर दिसतं म्हणे. पण नदीचं दृश्य पाहण्यासाठी आम्ही त्यापेक्षा स्वस्त आणि जास्त रोमांचकारी असणाऱ्या यांगत्से नदीवरच्या रोपवेची निवड केली.

1166 मीटर अंतर पार करून नदीच्या पलीकडे जाणाऱ्या ह्या रोपवेमध्ये बसण्यासाठी संध्याकाळची वेळ अगदी परफेक्ट होती. नुकताच सूर्यास्त होऊन गेल्याने आम्हाला जाताना आणि येताना दिवसाचं आणि रात्रीचं वेगवेगळं छोंगछिंग बघता येणार होतं. रोपवेचा डबा माझ्या कल्पनेपेक्षा बराच मोठा होता आणि त्यात एकाच वेळी 50-60 माणसं चढली. ह्या रोपवेमध्ये बसायचं नसून उभं राहायचं होतं. बाहेरचं दृश्य नीट पाहता यावं म्हणून मी खिडकीच्या काचेपाशी उभी राहिले. सुरुवातीला रोपवेच्या दोन्ही बाजूला उंचच उंच इमारती होत्या. त्यांच्यामध्ये अधांतरी तरंगताना जरा भीतीच वाटली. खाली दूरवर रस्ता, त्यावरच्या गाड्या आणि रस्त्याकडेची हिरवीगार झाडं दिसत होती. रस्ता संपला आणि लगेच खाली यांगत्से नदीचं पात्र दिसू लागलं. निळ्याशार आकाशाकडे बघायला आता मान वरती करून पाहावं लागत नव्हतं. आकाश सोनेरी गुलाबी व्हायला लागलं होतं. त्याच्यावर पांढऱ्या ब्रशचे फटकारे ओढावेत तसे ढग ऐसपैस पसरले होते. पलीकडच्या किनाऱ्यावरही उंच इमारती आणि त्यांच्या मागे लागूनच इमारती ठेंगण्या वाटाव्यात असे मोठाले डोंगर दिसू लागले. पाच मिनिटांतच आम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर उतरलो.

नदीच्या ह्या बाजूला विशेष काही नव्हतं. आम्ही रस्ता ओलांडून समोरच्या खाऊगल्लीमध्ये शिरलो. ही गल्ली म्हणजे वरवर चढत जाणाऱ्या पायऱ्याच होत्या. फारच सामसूम होती इथे. एका गाळ्यावर उसाचा रस विकायला होता. मला एकदम आमच्या घरच्या कोपऱ्यावरच्या उसाच्या गुन्हाळ्याची आठवण आली. तिथले पांढरा सदरा, धोतर आणि गांधी टोपीतले मामा मला बघताच 'चांगुणा' म्हणून हाक मारत. मस्त लिंबू पिळून मसाला टाकलेल्या रसाचा जम्बो ग्लास तोंडाला लावून घटाघटा पिताना मशिनवरच्या घुंगरांची किणकिण कानावर पडे. नॉस्टॅल्जिक झाल्याने एक ग्लास रसाची ऑर्डर दिली खरी, पण तिथल्या घट्ट अंबाडा घातलेल्या आणि तोंडाला मास्क लावलेल्या मावशीने प्लास्टिकच्या ग्लासमध्ये रसाच्या नावाखाली जे गोडमिच्च साखरेचं पाणी प्यायला दिलं, त्याने माझी अगदी घोर निराशा झाली.

नदी परत ओलांडून जाण्यासाठी आम्ही पुन्हा भल्यामोठ्या रांगेत उभे राहिलो. तब्बल दोन तासांनी आमचा नंबर लागला. ह्या वेळी मी दुसऱ्या बाजूच्या खिडकीपाशी उभी राहिले. समोर दिसणारा यांगत्से नदीवरचा पूल लाल आणि सोनेरी दिव्यांनी उजळून निघाला होता. नदीच्या पाण्यात दिव्यांनी झगमगणाऱ्या तीन मजली मोठ्या बोटी तरंगत होत्या. पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर आम्ही रात्रीचं जेवण म्हणून पुन्हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या ठेल्यावरच्या झणझणीत न्यूडल्स खाल्लया. मग तिखट लागलं म्हणून कलिंगडाची मोठी फोडही खाल्ली. रस्त्याच्या बाजूलाच कलर पेन्सिलने कार्टूनसारखं पोट्रेट चित्र काढून देणारी एक ताई बसली होती. व्हिएतनामी मैत्रिणीने हौसेने तिच्याकडून आमच्या दोघींचं चित्र काढून घेतलं.

आमचा आजचा शेवटचा मुक्काम होता 'होंगया तोंग' (Hongya Dong). ही जागा म्हणजे डोंगराच्या उतारावर बांधलेल्या तिरप्या इमारती, दुकानं, रेस्टॉरंट, घरांचा समूह. होंगया तोंग एकदम टिपिकल पर्यटकांना आकर्षित करणारी जागा आहे. त्याच्या आत काही विशेष बघण्यासारखं नाही. पण रात्री इथल्या सगळ्या कौलारू इमारतींची छपरं पिवळ्या निऑन लाईट्सने उजळून निघतात. तेव्हा त्या झगमगणाऱ्या वास्तूचं दृश्य अगदी हायो मियाझाकीच्या 'स्पिरीटेड अवे' नावाच्या जपानी अॅनिमेटेड सिनेमातल्या जादुई नगरीसारखं दिसतं.

हे संपूर्ण दृश्य लांबून बघण्यासाठी आम्ही मघाशी रोपवेमधून बघितलेल्या लाल रंगाच्या छिएनसमन ब्रिजवर गेलो. मला एरवी फार झगमगाटाचं अप्रूप वाटत नसलं, तरी 'स्पिरीटेड अवे' चित्रपटाचा संदर्भ दिल्याने 'होंगया तोंग' खरंच खूप जादुई आणि रहस्यमय वाटू लागलं. त्या जादुई नगरीकडे टक लावून पाहताना अचानक सगळे दिवे घालवले गेले. 'होंगया तोंग' क्षणार्धात अंधारात गडप झालं. ते जणू आम्हाला सांगत होतं, "भरपूर पायपीट केलीत पोरींनो. हॉटेलवर जाऊन विश्रांती घ्यायची वेळ झाली."

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही छोंगछिंगचं खास आकर्षण असलेली बिल्डींगमधून जाणारी ट्रेन पाहायला निघालो! ही ट्रेन म्हणजे लिचपा (Liziba) स्टेशनला जाणारी दोन नंबर लाईनवरची मोनोरेल. ट्रेन खरंच बिल्डींगमधून आरपार जाते का? खात्री करून घेण्यासाठी आम्ही मोनोरेलमध्ये बसूनच निघालो. ही मोनोरेल म्हणजे खास पर्यटकांसाठी बनवलेली नसून दैनंदिन दळणवळणासाठीची मेट्रोच होती. नदीला समांतर असलेल्या ब्रीजवरून जाणारी रेल्वे 'लिचपा स्टेशन' अशी हिरव्या रंगातली अक्षरं असलेल्या बिल्डींगमध्ये घुसली. चीनमधल्या कोणत्याही सामान्य स्टेशनसारखंच स्टेशन दिसत होतं हे. फक्त त्याच्या दोन्ही बाजूंना ट्रेन येण्यासाठी आणि जाण्यासाठी मोठी भगदाडं होती.

खालच्या रस्त्यावरून हे दृश्य कसं दिसतं हे पाहण्यासाठी आम्ही जिने उतरत निघालो. उतरताना प्रत्येक मजल्यावर भरपूर दुकानं होती. पांडाचे छोटे सॉफ्ट टॉईज, किचेन्स, फ्रीज मॅग्नेट्स, बॅगा, पोस्ट कार्ड्स, वह्या, शोभेचे दागिने वगैरे भेटवस्तूंची एकदम रेलचेल होती. बरेच मजले खाली उतरल्यावर अखेर आम्ही रस्त्याला लागलो. रस्ता ओलांडून गेल्यावर पलीकडे कुंपण घातलेली खास मोकळी जागा होती, पर्यटकांना बिल्डींगमधून जाणाऱ्या ट्रेनचं दृश्य बघता यावं आणि त्यासोबत फोटो घेता यावेत ह्यासाठी. इथून पाहिलं तर समोरच्या 19 मजल्यांच्या इमारतीमध्ये सहा, सात आणि आठ हे तीन मजले लिचपा स्टेशनचे होते. त्याच्या खालच्या मजल्यांवर दुकानं तर वरच्या मजल्यांवर रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स होता. आमच्या डोळ्यासमोरच पुढची मेट्रो बिल्डींगमधल्या स्टेशनमध्ये शिरली. जादुई नगरीमधलं आणखी एक विलक्षण दृश्य ! वरती राहणाऱ्या लोकांना ट्रेन आली की कंपनं जाणवत असतील ? आवाजाचा त्रास होत असेल का? बिल्डिंगमध्ये स्टेशन बांधलं की स्टेशनभोवती बिल्डींग बांधली असेल?

बिल्डींगमध्ये शिरणाऱ्या त्या ट्रेनकडे बघताना भरपूर प्रश्न पडले.

रस्त्याबाजूच्या ह्या छोट्या जागेतही छत्र्या विकणारे काका, हेअरस्टाईल करून देणाऱ्या ताया, गळ्यात कॅमेरा घेऊन फिरणारे दादा वगैरे चिक्कार छोटे बिझनेसमन होते. मैत्रीण फारच हौशी असल्याने लगेच कॅमेरावाल्या दादांकडून फोटो काढून घेणं आलं. "आपल्या मोबाईलमध्ये तितके छान नाही येत गं", ती म्हणाली. लगेच दोघींनी केसांमध्ये रंगीत दोरे गुंफून बारीक वेण्यांची हेअरस्टाईल करून घेतली. कॅमेरामन दादाने लगेच मला पांढऱ्या काड्यांचा स्टायलिश गॉगल घालायला दिला. मी ट्रेन यायची वाट पाहायला लागले तर दादाने लगेच 'इकडे बघ, अशी पोझ दे' वगैरे म्हणत फोटो काढायला सुरुवातही केली. दोन-तीन पोझ देऊन लगेचच मी कंटाळले आणि मैत्रिणीला जागा करून दिली. तिने कॅमेरामनला चिक्कार सूचना देत, गॉगल घालून, हातात चायनीज पंखा घेऊन वगैरे वेगवेगळ्या पोझ देत भरपूर फोटो काढून घेतले. कॅमेरावाल्या दादाने मग आम्हाला त्याने काढलेल्या फोटोंपैकी एक-एक चांगला फोटो निवडायला सांगितला आणि 'थोड्या वेळात एडीट करून पाठवतो' म्हणाला.

जरा भूक लागली म्हणून आम्ही दोघी लिचपा स्टेशनच्या बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये शिरलो. तिथे आम्ही 'छोंगछिंग श्याओमिएन' नावाचे न्यूडल्स खाल्ले. हे म्हणजे पिवळे वाटाणे, शेंगदाणे, कांदापात वगैरे घातलेले लाल रंगाच्या सूपमधले न्यूडल्स. युनिव्हर्सिटीच्या कॅन्टीनमध्ये मी हे बरेचदा खाल्ले होते. पण ज्याच्या नावातच छोंगछिंग आहे तो पदार्थ छोंगछिंगला आल्यावर खाल्लाच पाहिजे नं. कॅन्टीनपेक्षा इथल्या न्यूडल्सची चव खूपच चांगली होती. न्यूडल्स खाता खाता मघाच्या दादाने एडिट करून पाठवलेले फोटो बघितले. दादाने फोटोमध्ये माझ्या त्वचेचा रंग चायनीज ब्युटी स्टैंडर्डनुसार शक्य तितका पांढराफटक करायचा प्रयत्न केला होता. फोटोशॉप करून फोटोतल्या रिकाम्या रुळांवर ट्रेनही आणली होती. त्यामुळे तो फोटो जरा गमतीशीर वाटत असला, तरी चायनीज फोटो एडिटिंग स्किल्सचा नमुना म्हणून तो जपून ठेवायला हरकत नाही म्हटलं.

खाऊन झाल्यावर आम्ही 'थ्री गॉर्जेस म्युझियम'ला गेलो. चीनमधला श्री गॉर्जेस डॅम म्हणजे जगातलं सगळ्यात जास्त जलविद्युत निर्मिती करणारं धरण आहे. यांगत्से नदीच्या छ्युथांग, वु आणि शिलिंग ह्या तीन गॉर्जेसवर जेव्हा हे अवाढव्य धरण बांधलं, तेव्हा त्याखाली जवळपास सहाशे किलोमीटर वर्ग जमिनीसोबत धरणग्रस्त गावं, शहरं आणि अनेक पुरातत्वीय जागाही पाण्याखाली गेल्या. 2005 मध्ये छोंगछिंगमध्ये बांधलेल्या श्री गॉर्जेस म्युझियममध्ये ह्या जागांमधील महत्त्वाच्या पुरातन वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. म्युझियमचा करड्या रंगाचा बाह्याकार धरणाच्या भिंतीसारखा दिसतो, आणि त्याच्या पुढ्यातली भलीमोठी चकचकीत निळी काच यांगत्से नदीवरच्या ह्या धरणाचं पाणी दर्शवते.

चार मजल्यांच्या ह्या अवाढव्य म्युझियममध्ये प्रवेश मोफत होता. प्रवेशद्वारापाशी पर्यटकांच्या बॅगा ठेवायची आणि पॉवर बँक्सचीही सोय होती. संग्रहालयं फिरण्यात फारसा इंटरेस्ट नसलेली माझी व्हिएतनामी मैत्रीण पहिल्या मजल्यावर माझी वाट पाहत बसून राहिली आणि मी म्युझियम पाहायला निघाले. म्युझियमची दालनं चार प्रमुख विषयांवर आधारलेली होती 'श्री गॉर्जेसची आश्चर्य', 'पुरातन पायु संस्कृती (Bayu -ह्या प्रदेशातील एका पुरातन संस्कृतीचं नाव)', 'छोंगछिंग शहराचा विकास' आणि 'जपान विरोधी लढ्याचे दिवस'. प्रत्येक दालनामध्ये भरपूर वस्तू, प्रतिकृती ठेवल्या होत्या, चिक्कार माहिती लिहिली होती. डायनासोर फॉसिल्स आणि श्री गॉर्जेस डॅमची माहिती सांगणारा 360 डिग्री पॅनॉरॅमिक सिनेमाही होता. म्युझियमच्या समोरच छोंगछिंगचा पीपल्स असेम्ब्ली हॉल होता. ह्या असेम्ब्ली हॉलची इमारत म्हणजे बीजिंगमधील सुप्रसिद्ध टेम्पल ऑफ हेवनची प्रतिकृती होती. मात्र त्याच्या छताच्या कौलांचा रंग निळ्याऐवजी मोरपिशी हिरवा होता. पीपल्स असेम्ब्ली हॉलच्या इमारतीसमोर फोटो काढून आम्ही पुढे निघालो.

चीनमधील प्रत्येक शहरामध्ये त्या शहराची पेहचान असलेला असा एखादा कल्चर स्ट्रीट असतो. दिव्यांनी सजवलेला असा रस्ता कधीकधी खरोखरच प्राचीन असतो किंवा पारंपरिक वास्तूंची प्रतिकृती आणि भरपूर खाण्याची दुकानं असलेला असतो. छोंगछिंगमधला असा रस्ता म्हणजे अगदी छोंगछिंगला साजेशा डोंगर नगरीतील पायवाटा. छोंगछिंगच्या 'शानछंग पुताव' ह्या प्रेक्षणीय स्थळाचा अर्थ खरंच 'माउंटन सिटी वॉकवे' असा होतो. चढणीच्या रस्त्याने चालत आम्ही शानछंग पुतावच्या दिशेने निघालो. वर वर जाणारे नागमोडी वळणाचे बोळ चढणीला दगडी पायऱ्यांनी जोडलेले होते. गल्लल्यांच्या दोन्ही बाजूंना उंच पण थोड्याशा जुनाट दिसणाऱ्या इमारती आणि दगडी भिंतींची घरं होती. घराबाहेरच्या कठड्यावर काही आज्या गप्पा मारत बसल्या होत्या. त्या आमचं निरीक्षण करतायत हे समजून आम्ही त्यांच्याकडे बघून हसलो. "सुंदर मुलींनो, छोंगछिंगला मजा करायला आलात काय?" गप्पिष्ट आज्यांनी लगेच संवाद सुरू केला. "ही मुलगी तर केवढुशी आहे. सोळा सतरा वर्षांची असेल", एक आजी माझ्याकडे बोट दाखवत म्हणाली. व्हिएतनामी मैत्रिणीला चिनी मुलगी समजून त्या अगदी मोकळेपणाने गप्पा मारायला लागल्या. त्यांच्या बोलीभाषेचा हेल कानांना किती गोड वाटला.

ज्यांना चालायचा कंटाळा येतो अशांनी छोंगछिंगला यायचं धाडस करू नये असं म्हणतात, त्यात काही गैर नाही, ह्याची जाणीव आम्हाला पदोपदी होत होती. माउंटन सिटी वॉकवेला खरंच अगणित पायऱ्या होत्या. मला मात्र त्या चढायला जाम मजा येत होती. थोड्या वेळाने दमून गेल्याने व्हिएतनामी मैत्रीण गल्लीतल्या एका कॅफेमध्ये जाऊन बसली. आता लोकांची राहती घरं मागे पडून पर्यटकांना फिरण्यासाठी बनवलेला असा लाकडी पायऱ्यांचा रस्ता सुरू झाला होता. लाकडी पायऱ्यांच्या कडेला लाल केशरी चिनी कंदील लटकवले होते. वर चढत गेल्यावर बांबूचं बन लागलं, एक पडकं फ्रेंच चर्च आणि आणखी काही जुन्या दगडी वास्तूंचे अवशेष दिसले. डोंगराच्या टोकाशी पोहोचल्यावर बर्ड्स आय व्ह्यूने छोंगछिंग न्याहाळता येत होतं. यांगत्से नदीचं पात्र, त्यावरचे पूल, पलीकडील डोंगरांवरील इमारती, अलीकडील डेरेदार झाडं, झाडांच्या सावलीतले रस्ते, रस्त्यांवरून धावणाऱ्या गाड्या, डोंगरावरील लाकडी पायऱ्या आणि दरीतल्या रस्त्यांमधली पोकळी भरणाऱ्या गुलाबी जांभळ्या बोगनवेली, सगळं काही एका नजरेत डोळ्यांसमोर साकार होत होतं. अवघ्या दोन दिवसांत आम्ही छोंगछिंगला किती वेगवेगळ्या अँगल्समधून पाहिल होतं. रस्त्यांवरून चालताना मान वर करून, केबलवेने इमारतींमधून अधांतरी तरंगताना, पुलावरची ट्रेन बिल्डींगमध्ये घुसत असताना, आणि आता डोंगरावरून खाली नजर घालताना दिसणारं छोंगछिंग बघून एखादा सिनेमा बघत असल्यासारखाच जादुई फील येत होता.

छोंगछिंगला पोट भरून न्याहाळल्यानंतर आता पेट पूजा करायची वेळ झाली होती. छोंगछिंगला डोंगरातलं शहर म्हणतात, तसंच त्याचं आणखी एक टोपण नाव म्हणजे 'हॉटपॉट कॅपिटल ऑफ चायना'. त्यामुळे छोंगछिंगला गेल्यावर तिथला फेमस हॉटपॉट खाल्लाच पाहिजे. आम्ही रेडनोट नावाच्या अॅपवर एका हॉटपॉट रेस्टॉरंटचे रेटिंग बघून त्याच्या शोधात निघालो. पण आमच्या मोबाईलवरच्या मॅपला ती जागा काही केल्या सापडेना. दोनदा गोल गोल चकरा मारून झाल्यावर आम्ही अखेर पोलीस दादांची मदत घ्यायचं ठरवलं. गंमत म्हणजे पोलीस दादांना रेस्टॉरंटचा रस्ता विचारल्यावर ते आपणहूनच म्हणाले, "तिथला हॉटपॉट काही एवढा खास नाही. इंटरनेटवर उगीच नाव झालंय त्याचं इतकंच. मी तुम्हाला आणखी चांगली जागा सुचवतो. तिथे तुम्हाला अस्सल छोंगछिंगकरांना आवडतो तसा हॉटपॉट खायला मिळेल." आम्ही संमती दर्शवल्यावर पोलीस दादांनी आम्हाला रस्ता ओलांडायला मदत केली आणि मग हाताने रस्ता दाखवून ते पुन्हा ड्युटीवर गेले.

हॉटपॉट म्हणजे चायनीज लोकांचा अगदी जिव्हाळ्याचा पदार्थ. त्याला चिनी भाषेत 'हुओकुओ' असं म्हणतात. टेबलाच्या मध्यभागी एक वर्तुळाकार भांडं असतं, त्याच्याखाली सतत शेगडी चालू असते. भांड्यातलं सूप त्यामध्ये अखंड उकळत राहतं. थोडं सपक, कमी तिखट, झणझणीत, आंबटगोड अशा कोणत्या चवीचं सूप हवं ते आपण स्वतः निवडू शकतो. भांड्याला छोटे कप्पेही असतात. त्यामुळे त्यात एकाच वेळी दोन किंवा चार चवींचं सूपदेखील शिजू शकतं. त्यांनतर कोबी, मशरूम, बटाटा, मका, कमळकंद, लेट्यूस अशा वेगवेगळ्या भाज्या, न्यूडल्स, क्वेल पक्ष्याची अंडी, चिकन, पोर्क, बीफ, मच्छी, मटणाचे पातळ काप वगैरे आवडतील ते पदार्थ मागवायचे. चॉपस्टिक्सने थोडे थोडे घेऊन भांड्यात सोडायचे आणि
शिजायची वाट पाहायची. व्यवस्थित शिजले आहेत असं वाटलं की पुन्हा चॉपस्टिक्सनेच त्यांना उचलायचं आणि बाउलमध्ये आपण स्वतःसाठी बनवून घेतलेल्या सेसमी पेस्ट, चिली ऑईल, सोया सॉस, मिरचीचा ठेचा, चिकन खिमा वगैरे एकत्र करून बनवलेल्या सॉसमध्ये बुडवून गरमागरम खायचं. टेबलाभोवती एकत्र बसून, मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारत आरामात हॉटपॉटचा आस्वाद घ्यायला खूप मजा येते.

हॉटपॉट ह्या पदार्थाचा उगम छोंगछिंगमध्ये झाला, असं म्हणतात. इथल्या हॉटपॉटची खासियत म्हणजे झणझणीतपणा. इथल्या सूपमध्ये पाणी कमी आणि बीफ फॅट ऑईल, काळीमिरी, लाल मिरच्या जास्त असतात. हॉटेलमधली वेटरचं काम करणारी मावशी आम्हा परदेशी पाहुण्यांना पाहून जाम खुश झाली. पोलीस दादांनी म्हटल्याप्रमाणे ही जागा टुरिस्टना फारशी माहिती नसून स्थानिकांचाच अड्डा होता. मावशीने आम्हाला सवय नसेल म्हणून अर्ध भांडं तिखट सूप आणि अर्ध भांडं प्लेन सूप घ्यायला सुचवलं. तिखट सूपसुद्धा अगदी कमी कमी कमी तिखट सांगते म्हणाली. पण छोंगछिंगकरांच्या मते अगदी कमी तिखट असलेल्या त्या हॉटपॉटने आमची वाट लावली. गरमागरम तिखट वाफेने कपाळाला घाम सुटला, नाक गळायला लागलं, 'नम्बिंग स्पाईसी' चवीने ओठ झोंबायला लागले. पण त्याची चव इतकी भारी होती की, आम्ही दोघींनी मनसोक्त ताव मारला. मी आतापर्यंत चायनामध्ये खाल्लेला बेस्ट हॉटपॉट होता तो.

छोंगछिंगच्या डोंगराळ रस्त्यांनी आमची पुरती दमछाक करून टाकली. न संपणाऱ्या पायऱ्यांनी जबरदस्तीचा 'वेट लॉस' घडवला. गगनचुंबी इमारतींनी मान दुखवली, तर गर्दीच्या अधांतरी रोपवेने आणि बिल्डिंगमधून आरपार जाणाऱ्या मोनोरेलने डोळ्यांसमोर घेरी आणली. तिखटजाळ जेवणाने तोंडाची आग केली, डोळ्यांत पाणी आणलं आणि पोटातही गडबड करून टाकली. दोन दिवसांची छोंगछिंग सफर म्हणजे अगदी इंटेन्स अफेअर होतं. हे सारे अनुभव इतके तीव्र होते की, ते अगदी मनात खोलवर जाऊन बसले. इतकं सारं होऊनही छोंगछिंग जाम आवडलं. किंवा कदाचित इतकं सारं झालं म्हणूनच जास्त आवडलं? काहीही म्हणा. छोंगछिंगने आमच्यावर जादू करून टाकली, हे खरं!

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सानिया कर्णिक ( 9 लेख )

भाषा अभ्यासक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी