डिजिटल अर्काईव्ह

महात्मा गांधींचे अमेरिकन रेडिओवरचे पहिलेवहिले भाषण

रक्त सांडून माझ्या देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा, जर शक्य असेल तर, मी वैयक्तिकरीत्या युगानुयुगे वाट पाहणे पसंत करेन. जवळपास अखंड अशा पस्तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर, मला माझ्या हृदयात खोलवर डोकावून पाहता असे जाणवते की, जगाला या रक्तपाताचा प्राणांतिक शिणवटा आला आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग जग शोधतंय आणि कदाचित तो मार्ग दाखवणे हे प्राचीन भारतभूमीचेच काम आहे असा विश्वास मला वाटतो. त्यामुळे भारताच्या या प्रबळ स्वातंत्र्यलढ्यासाठी मनापासून पूर्ण सहकार्य देण्यासाठी या पृथ्वीतलावरच्या सर्व महान राष्ट्रांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात मला किंचितही संकोच वाटत नाही.

 

 

13 सप्टेंबर 1931 रोजी कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टीम (सीबीएस) या अमेरिकन रेडिओ नेटवर्कद्वारे महात्मा गांधींनी भाषण दिले, ज्याचे पूर्ण अमेरिका देशात थेट प्रसारण झाले. दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी लंडनमध्ये असताना गांधींनी अमेरिकेतील लोकांसाठी भारतीय स्वातंत्र्य चळवळीविषयी एक विशेष संदेश दिला, जो नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनी (एनबीसी) या दुसऱ्या अमेरिकन रेडिओवरही एकसाथ प्रसारित झाला. 1931 मध्ये गांधींनी केलेले हे रेडिओवरचे भाषण आंतरराष्ट्रीय प्रसारण सुरू झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळातील सर्वात संस्मरणीय घटनांपैकी एक मानले जाते. एप्रिल 1931 मध्ये म्हणजेच काही महिन्यांपूर्वी त्यांनी वार्तापटासाठी दिलेल्या ऐतिहासिक पहिल्या-वहिल्या टॉकी मुलाखतीप्रमाणे, गांधींनी पहिल्यांदाच मायक्रोफोनद्वारे हे भाषण दिलं ! त्यासाठी त्यांचा कसा पाठपुरावा करावा लागला आणि हे रेडिओ भाषण करण्यास त्यांना कसे राजी करावे लागले याची एक मनोरंजक कथा आहे. ट्रान्सअटलांटिक रेडिओ प्रसारणाचे प्रणेते सीझर सर्चिगर यांनी त्यांच्या 'हॅलो अमेरिका' या संस्मरणिकेत या प्रयत्नांची तपशीलवार माहिती दिली आहे.

गांधींची रेडिओ मुलाखत आयोजित करण्याची जबाबदारी सचिंगर यांच्यावर येऊन पडली होती. गांधींच्या लंडन भेटीच्या काही महिने आधी, ही मुलाखत मिळवण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबद्दल त्यांना एक चांगला सल्ला मिळाला प्रस्तावित भाषणाचा उद्देश गांधींना स्पष्टपणे सांगा; त्यांचा अहंकार गोंजारण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यांच्यात त्याचा लवलेशही नाही; कोणत्याही परिस्थितीत त्यांना पैसे देऊ करू नका; त्यांच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करू नका; आणि त्यांचं नाव अचूक लिहा. दरम्यान, सर्चिगर काम करत असलेल्या न्यूयॉर्कमधील 'कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टीम'च्या (सीबीएस) कार्यालयानं अमेरिकेतील भारतीय काँग्रेस प्रतिनिधींमार्फत गांधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आलं नाही.

त्यांचं प्रतिस्पर्धी रेडिओ नेटवर्क, 'नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनी'नं (एनबीसी) मात्र हुशारीनं काम केलं. गांधींना भेटण्यासाठी त्यांनी एक प्रतिनिधी पाठवला आणि हे डावपेच यशस्वी ठरले. गांधींनी प्रसारणाला सहमती तर दर्शवली, पण अमेरिकेतील सीबीएस या दुसऱ्या मोठ्या रेडिओ नेटवर्कबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती. यामुळे न डगमगता सर्चिगर यांनी म्युरियल लेस्टरच्या (गांधींच्या लंडनमधील यजमानीन बाई) बहिणीशी संपर्क साधला आणि लंडनमधील गांधींचं निवासस्थान असलेल्या किंग्सले हॉलमध्ये खास टेलिफोन लाइन आणि इतर उपकरणं बसवण्याची परवानगी मिळवली. सुदैवानं, गांधींच्या या रेडिओ प्रक्षेपणासाठी त्यांना ब्रिटिश सरकारमधील भारतमंत्री सर सॅम्युअल होअर यांचीही संमती मिळाली. खरं तर ही एक अतिशय संवेदनशील बाब होती, कारण ब्रिटिश भूमीवरून गांधींनी अमेरिकन जनतेशी थेट संवाद साधणं हे हे ब्रिटिश सरकारसाठी लाजिरवाणं ठरू शकलं असतं.

अखेर गांधी लंडनला पोहोचले त्या दिवशी म्हणजे 12 सप्टेंबर रोजी सर्चिगर यांना त्यांची भेट मिळवण्यात यश आलं आणि त्यांनी आपला प्रस्ताव मांडला. अमेरिकेतील प्रसारण-व्यवस्था आणि तिथल्या दोन प्रमुख प्रतिस्पर्धी 'चॅनल्स' बद्दल सर्विंगर यांनी दिलेलं स्पष्टीकरण गांधींनी ऐकून घेतलं. दोन स्वतंत्र प्रसारणं करायला ते तयार नव्हते, पण एकच प्रसारण त्यांनी वाटून घ्यावं, असं त्यांचं म्हणणं होतं... दोन्ही अमेरिकन रेडिओ प्रतिस्पर्धी आणि ते स्वतः अशी एक छोटीशी 'गोलमेज परिषद' व्हावी, असं गांधींनी सुचवलं. ही कल्पना प्रतिस्पर्धी प्रसारण कंपनीसमोर मांडली, तेव्हा त्यांनीही ती लगेच मान्य केली. 'व्वा! अमेरिकेत शांतता नांदते आहे तर. उत्तमच', अशी गांधींची प्रतिक्रिया होती. मात्र महात्म्यासमोर ग्वाही दिलेली असूनही, प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपापलं प्रसारण 'एक्सक्लुझिव्ह' म्हणून जाहीर करण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आणि तसं वृत्तमाध्यमांतही जाहीर केलं.

प्रसारणाच्या दिवशी एनबीसीनं वेगळ्या टेलिफोन लाइनसाठी अर्ज केला, पण वेळेअभावी ते शक्य नव्हतं. कोलंबियानं तर आधीच स्वतःची लाइन जोडली होती. 'आमच्या प्रसारणापूर्वी ती वापरली जाणार नसेल तरच' या अटीवर ट्रान्सअटलांटिक रेडिओ प्रसारणातल्या दिग्गज सचिंगर यांनी एनबीसीला ती वापरण्याची परवानगी दिली. पडद्यामागच्या या सगळ्या घडामोडींची गांधींना अर्थातच काही कल्पना नव्हती आणि रेकॉर्डिंगसाठी ते कधी नव्हे ते उशिरा पोहोचले. कारण... ते जेवणात मग्न होते ! 'ते वरच्या मजल्यावर शांतपणे, कसलीही चिंता न करता फळं आणि शेळीचं दूध घेत होते.' तेवढ्या वेळात प्रसारण सुरू झाले होते आणि वेळ निभावून नेण्यासाठी मिसेस लेस्टर यांनी किंग्सले हॉलचे कार्य तसेच गांधींची ओळख करून दिली. त्यानंतर मग ते नेहमीची खादीची शाल, पंचा आणि सँडल घालून हॉलमध्ये आले.

खरं तर गांधींनी यापूर्वी कधी मायक्रोफोन वापरला नव्हता. म्हणजे भारतीय श्रोत्यांसमोर ऐंप्लिफायरच्या माध्यमातून त्यांनी अनेक भाषणे दिली होती. पण मायक्रोफोनद्वारे पुढे हजर नसलेल्या श्रोत्यांना संबोधित करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. त्यामुळे रेडिओचे थेट प्रसारण सुरू झाले आहे आणि आपण त्यात सहभागी आहोत हे त्यांच्या लक्षात न आल्याने गांधींनी विचारले, 'मला या गोष्टीतून बोलायचे आहे का?' हे वाक्य अमेरिकेतल्या लाखो श्रोत्यांनी ऐकलं. इतक्या महत्त्वाच्या रेडिओ भाषणासाठी गांधींनी कोणतेही मुद्दे आधी ना तयार केले होते ना लिहिले होते. हॉलमधील सेंट फ्रान्सिस ऑफ असीसीच्या पुतळ्यासमोर हात जोडून, मान खाली झुकवून, काही सेकंद डोळे मिटून शांत बसले. आणि मग ते त्यांच्या साध्या पण सुंदर इंग्रजीत कुठेही न थांबता बोलत गेले आणि लाखो अमेरिकन लोकांना त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं ध्येय समजावून सांगितलं. सव्वीस मिनिटांच्या त्यांच्या भाषणात ते एकदाही अडखळले नाहीत किंवा शब्द शोधण्यासाठी त्यांना थांबावे लागले नाही. प्रसारणाची वेळ संपत आली तेव्हा लेस्टर बाईंनी चिठ्ठी सरकावून त्यांना थांबण्याचा इशारा केला, पण गांधींनी त्याकडे एक नजर टाकून आपले भाषण चालूच ठेवले.

हे प्रसारण घडवून आणणाऱ्या सर्चिगर यांनी गांधी कसे बोलले याचं वर्णन करताना म्हटलेः 

जवळपास अर्धा तास ते सावकाश आणि प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारत बोलले. त्यांचा बारीक आणि वरच्या पट्टीतला आवाज प्रसारणाच्या तांत्रिक प्रक्रियेत आपोआप किंचित खर्जात उतरत असे, पण तो स्पष्ट आणि स्थिर होता. त्यातूनच त्यांनी आपली 'अहिंसक' क्रांती उलगडून सांगितली: मला माझ्या हृदयाच्या अगदी आतून जाणवतं की, या जगाला रक्तपाताचा प्राणांतिक शिणवटा आला आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग जग शोधतंय आणि कदाचित या भुकेल्या जगाला तो मार्ग दाखवणं हे प्राचीन भारतभूमीचंच काम आहे असा विश्वास मला वाटतो.

भाषणाच्या सुरुवातीला जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती शेवटास झाली आणि भाषण संपल्यावर प्रसारण अजून चालू आहे आणि आपण आता लगेच पुढे काही बोलू नये हा संकेत माहीत नसल्यामुळे गांधी नकळत बोलून गेले, 'बरं, आता हे संपलं!' हे शब्दही श्रोत्यांनी ऐकले. हे भाषण अमेरिकेतल्या लाखो लोकांनी थेट ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी 'न्यूयॉर्क टाईम्स' या अग्रगण्य वर्तमानपत्राने पहिल्या पानावर त्याची बातमी तर छापलीच; पण पूर्ण भाषणदेखील प्रसिद्ध केले. एवढेच नव्हे तर तीन खंडांतल्या अनेक वर्तमानपत्रांनी त्या भाषणाचा पूर्ण खर्डा छापला. भाषण संपल्यावर गांधींनी कबूल केले की मायक्रोफोनद्वारे बोलायची त्यांची ही पहिलीच वेळ असल्याने ते थोडे नर्व्हस होते, पण त्यांच्या भाषणातून मात्र ते अजिबात जाणवले नाही. काही महिन्यांनंतर कोलंबिया ब्रॉडकास्ट सिस्टीमनं हे अत्यंत महत्त्वाचं भाषण पुन्हा प्रसारित केलं आणि म्हटलं, 'लंडनहून अमेरिकेला, भारताचे भाग्यविधाते महात्मा गांधी सध्याची राजकीय दुरवस्था या पुनर्प्रसारणात समजावून सांगत आहेत.' या भाषणाचं खरं महत्त्व सर्चिगर यांना पुरतं ठाऊक होतं. ते म्हणाले, 'यापूर्वी गांधींचे विचार इतक्या लोकांपर्यंत कधीही थेट पोहोचले नव्हते; त्यांना आतापर्यंत मिळालेला हा सर्वात मोठा श्रोतावर्ग होता.'

पुढच्याच महिन्यात न्यूयॉर्कमधील नॅशनल ब्रॉडकास्ट अथॉरिटीच्या 'रेडिओ डायजेस्ट'नं गांधींच्या रेडिओ प्रसारणावर 'इंडिया ऑन दि एअर' ही खास बातमी छापली. अशा त-हेनं गांधींचा आवाज चौफेर पोहोचत असताना भारताच्या अस्तित्वाची जाणीव अमेरिकेत कधी नव्हे इतकी ठळक झाली. अमेरिकन रेडिओवरील या भाषणानंतर तब्बल 16 वर्षांनी गांधी पुन्हा एकदा रेडिओवर बोलले. तो प्रसंग म्हणजे नोव्हेंबर 1947 मध्ये स्वतंत्र भारताच्या दिल्लीमधील आकाशवाणी स्टुडिओत जाऊन त्यांनी हिंदीमध्ये जवळपास 24 मिनिटे भाषण दिले. या वेळी भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितले की, रेडिओवर बोलण्याचा त्यांच्या आयुष्यातला हा दुसरा अनुभव आहे. लंडनमध्ये दिलेल्या भाषणाची आठवण करून देताना आपल्या नर्मविनोदी शैलीत ते बोलले. "मी तर या बाबतीत एक अडाणी माणूस आहे आणि अशा गोष्टींबाबत तुम्ही मला जंगली मानू शकता."

लंडनमधून दिलेल्या इंग्रजी भाषेतील मूळ भाषणाचा हा अनुवाद :

माझ्या मते, भारताविषयीच्या या गोलमेज परिषदेचे फलित केवळ फक्त भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी खूप महत्त्वाचे आहे. भारत हा एक जवळपास खंडप्राय देश आहे. जगाची एक पंचमांश लोकसंख्या त्यामध्ये विसावली आहे. सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी ती एक आहे. इथे दहा हजारांहून जास्त वर्षे चालत असलेल्या परंपरा आहेत आणि जगाला आश्चर्य वाटू शकेल अशी गोष्ट म्हणजे त्यातील काही अजूनही प्रचलित आहेत. खरे सांगायचे तर जसे इतर अनेक संस्कृती आणि संस्थांचे झाले आहे त्याप्रमाणे काळाच्या ओघात या संस्कृतीची शुद्धता कमी झाली आहे.

जर भारताला तिच्या प्राचीन भूतकाळाचा गौरव टिकवून ठेवायचा असेल, तर आपले स्वातंत्र्य प्राप्त करूनच हे साध्य होऊ शकेल. केवळ आम्ही भारतीय आमच्या मुक्ततेसाठी लढा देत आहोत यासाठी नव्हे, तर या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्या अद्वितीय साधनांचा वापर आम्ही करत आहोत त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या स्वातंत्र्यलढ्याकडे लागले आहे. प्राप्त इतिहासाच्या नोंदीनुसार बाकी इतर कोणत्याही जनसमूहाने असा वापर केल्याचे आढळून येत नाही.

हिंसा, रक्तपात किंवा सध्याची प्रचलित राजनैतिक साधने नव्हेत, तर केवळ शुद्ध सत्य आणि अहिंसा ही ती साधने होत. त्यामुळेच या रक्तहीन यशस्वी क्रांतीकडे जगाचे लक्ष वेधले जाणे ही आश्चर्याची बाब नव्हे. आतापर्यंत शक्तीचा वापर करून राष्ट्र लढली आहेत. त्यांच्या शत्रूवर त्यांनी पाशवी सूड घेतला आहे.

त्या महान देशांची राष्ट्रगीते तपासली तर या कथित शत्रूवर शाप उगवण्याची भाषा त्यात आपल्याला दिसते. शत्रूचा नाश करण्याची प्रतिज्ञा त्यात आहे आणि हा संहार करण्यासाठी दैवी मदत घेण्यातही त्यामध्ये अजिबात संकोच नाही. आम्ही भारतीयांनी मात्र याच्या उलट केले आहे. अखिल मानवी समाजाचे निर्वहन करणारा कायदा हा क्रूर शक्तीवर आधारित नसावा असे आम्हाला वाटते. असा कायदा हा मानवी प्रतिष्ठेशी विसंगत आहे.

रक्त सांडून माझ्या देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा, जर शक्य असेल तर, मी वैयक्तिकरीत्या युगानुयुगे वाट पाहणे पसंत करेन. जवळपास अखंड अशा पस्तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर, मला माझ्या हृदयात खोलवर डोकावून पाहता असे जाणवते की, जगाला या रक्तपाताचा प्राणांतिक शिणवटा आला आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग जग शोधतंय आणि कदाचित तो मार्ग दाखवणे हे प्राचीन भारतभूमीचेच काम आहे असा विश्वास मला वाटतो.

त्यामुळे भारताच्या या प्रबळ स्वातंत्र्यलढ्यासाठी मनापासून पूर्ण सहकार्य देण्यासाठी या पृथ्वीतलावरच्या सर्व महान राष्ट्रांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात मला किंचितही संकोच वाटत नाही. आपल्या देशाची प्रतिष्ठा आणि गौरव अबाधित राखण्यासाठी लाखो लोकांनी या लढ्यात सोसलेल्या यातना हा विचारच किती मननीय आणि जतन करण्याजोगा आहे.

या यातना म्हणजे स्व-शुद्धीकरण असे मी मानतो. स्वतःची दुर्बलता असेल तरच कोणी आपले स्वातंत्र्य गमावू शकतो अशी माझी पक्की धारणा आहे. या आमच्या दोषाची आणि कमकुवतपणाची मला खेदपूर्वक जाणीव आहे. या पृथ्वीवरचे सर्व प्रमुख धर्म भारतात अस्तित्वात आहेत, परंतु एकाच घरात आपण एकमेकांविरुद्ध विभागलेले आहोत असे अत्यंत नामुष्कीने कबूल करणे भाग आहे; आपण, हिंदू आणि मुसलमान एकमेकांच्या अंगावर धावून जात आहोत. यापेक्षाही अत्यंत घृणास्पद बाब म्हणजे, आपलेच भाऊबंद असलेल्या लाखो लोकांना स्पर्श करणे म्हणजे विटाळ आहे असे आपण हिंदू लोक समजतो. इथे मी कथितरीत्या अस्पृश्य लोकांविषयी बोलतो आहे.

स्वतंत्र होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कोणत्याही देशासाठी हा काही छोटा दोष नाही. अशा स्व-शुद्धीकरणातून हा अस्पृश्यतेचा कलंक दूर करणे आणि भारतभरातील वेगवेगळ्या पंथांचे आणि समुदायांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक वर्गांमध्ये एकता साधने हे या स्वातंत्र्य लढ्याचे एक मुख्य उद्दिष्ट आहे.

या बरोबरच आमच्या भूमीतून मद्यपानाचा शाप आम्हाला नष्ट करायचा आहे. चांगली बाब म्हणजे, या मादक पदार्थांचे व्यसन हे मुख्यतः कामगार आणि तत्सम वर्गांमधील खूप कमी लोकांपुरतेच मर्यादित आहे. सुदैवाने दारू आणि अमली पदार्थांचे सेवन इथे लाजिरवाणे मानले जाते. दारू पिणे आणि अमली पदार्थ घेणे हे स्त्री-पुरुषांमध्ये फॅशनेबल समजले जात नाही. असे असले तरी आमच्या समाजातून या वाईट गोष्टी नष्ट करण्याचा आमचा संघर्ष कठीणप्राय आहे.

इथे मला मनापासून अत्यंत खेदपूर्वक नमूद करायचे आहे की, सध्याच्या सरकारने या अपायकारक बाबीतून खूप मोठा म्हणजे जवळपास पंचवीस कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. परंतु, मी हे कृतज्ञतापूर्वक सांगू शकतो की, भारताच्या महिलांनी याच्या विरोधात पुढाकार घेऊन, दारूड्यांना आपले व्यसन सोडण्यासाठी आणि तितक्याच हिरिरीने दारू विक्रेत्यांविरुद्ध आपला आवाज उठवला आहे. या दोन्ही व्यसनांच्या नादी लागलेल्या लोकांवर त्याचा जोरदार परिणाम झाला आहे.

निदान या विषयात तरी राज्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले असते तर किती चांगले झाले असते असे म्हणायलाही मला वाव नाही. कोणत्याही कायद्याची मदत न घेता जर आम्हाला या बाबतीत सहकार्य मिळाले असते, तर मी ठामपणे सांगू शकतो की, नक्कीच सुधारणा घडून आमच्या भूमीतून मद्य आणि अमली पदार्थांचे उच्चाटन झाले असते.

या चळवळीत आमच्या देशाने रचनात्मक शक्तीचे बळ दाखवून दिले आहे. 1900 मैल लांब आणि 1500 मैल रुंद असलेल्या या भूप्रदेशातील 7 लाख गावांत पसरलेल्या लाखो अर्धपोटी लोकांसाठी ही विशेष बाब आहे. त्यांचा स्वतःचा कोणताही दोष नसताना वर्षातील जवळपास सहा महिने हातावर हात ठेवून रिकामे बसणे ही या साध्याभोळ्या गावकऱ्यांसाठी खूप कष्टप्रद गोष्ट आहे.

फार पूर्वीची गोष्ट नाही, पण अन्न आणि वस्त्र या माणसाच्या दोन प्राथमिक गरजांबाबत प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण होते. दुर्दैवाने ज्याचा उल्लेख मला करायचा नाही, अशा मार्गाने ईस्ट इंडिया कंपनीने इथला पूरक असा ग्रामोद्योग नष्ट केला आणि कोणत्याही आधुनिक यंत्रांना अजूनपर्यंत शक्य झाले नाही असे नाजूक कलाकुसरीचे धागे आपल्या कुशल बोटांनी विणून प्रसिद्ध झालेल्या लाखो सूत कातणाऱ्या लोकांना उद्ध्वस्त केले. अचानक एके दिवशी आपला मुख्य व्यवसायच गमावलाय असे या ग्रामीण विणकऱ्यांच्या बाबतीत झाले. त्या दिवसापासून भारत हा उत्तरोत्तर गरीब बनत आहे.

या बाबतीत कोणी काहीही म्हणो, पण ही एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे की, ईस्ट इंडिया कंपनी येण्याअगोदर, हे गावकरी काही स्वस्थ बसले नव्हते. पण सध्या कोणीही हे पाहू शकते की, त्यांचे हात आता रिकामे आहेत. त्यामुळे वर्षातील सहा महिने काम नसेल तर या खेडुतांची उपासमार होईल हे समजायला काही कष्ट करायची गरज नाही.

म्हणूनच, या लाखो अर्धपोटी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वातंत्र्य परत मिळवून त्यांना मृत्यूच्या दाढेतून वाचवण्यासाठी सकल जगाच्या सदसद्विवेक बुद्धीला मी आवाहन करत आहे.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रकाश भूपाल मगदूम,  मुंबई ( 1 लेख )
prakashmagdum@gmail.com

कला आणि चित्रपटांमध्ये रुची असलेले सनदी अधिकारी तसेच "The Mahatma on Celluloid' या इंग्रजी पुस्तकाचे लेखक आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके