जेवणाचा प्रश्न लक्षात न येऊन त्यांनी फक्त राखालची चौकशी केली. त्यानं तापांतही जप केला हे सांगण्याचे नोरेन विसरून गेला होता. मायचा मुकेपणा ठाकुरांच्या नजरेतून सुटला नाही. ते तिला म्हणाले, “त्याच्या तब्येतीचं तुला अगदीच कसं हे नाही ग? काल खुशाल गंगातीरावर हुंदडायला गेला होता. आणि विचारले तर तुझी परवानगी होती असे सांगून मोकळा! त्याला को जाऊ दिलंस?
अवसेच्या काळोखाची घट्ट मिठी आसमंतावर अजून होती. कोंबड्याने बांग दिली. आपल्या लहानशा खोपटांतून माय जागी झाली. खरं म्हणजे ती झोपली नव्हतीच. नुकता कुठं डोळा लागत होता; रात्रीच्या भजनाचे सूर स्वप्नाचे रूप धारण करू लागले होते-तोच पहिला कोंबडा आरवला. मायला मग झोपणे शक्यच नव्हते. ओठांतल्या ओठांत प्रातःस्तवन सुरू झाले.
माय बाहेर आली. काळोखाची मिठी वातावरण दूर सारू लागले. तारवटलेल्या पापण्यांना सकाळवारा कोवळा स्पर्श करू लागला. आता सकाळ होणार, पूर्वेकडे तिची चाहूल लागत होती तशी मायनं घाईनं आपले लुगडे कासोटीला घेतलं अन् ‘जय जय गंगा माँ’ असा हळुवार नामघोष वायुलहीवर उधळीत ती चालू लागली.
गंगा चारच पावलांवर, माय तिथे पोचली अन् बोलक्या पाण्याकडे पाहत क्षणकाल उभी राहिली. मग केसांचा बुडा मोकळा करून तिनं हलके-हलके पाण्यात प्रवेश केला. पाणी थोडेसे उचंबळले. लहरीच्या नेहमींच्या शब्दात थोडासा खंड पडला. मग पुन्हा पूर्ववत्, माय म्हणजे जणु गंगेचीच एक लहर, ती गंगेत आल्यामुळे गंगेत फरक असा पडूच नये. मायच्या ओठातले मंत्र आणि जललहरींचा उद्घोष आता एकरूप झाला.
ऊबदार पाणी मायच्या अंगाभोवती लपेटले. हळूहळू ती त्या उबेशी व पाण्यातल्या पावित्र्याशी मिसळू लागली. अनंत कालापासून या गंगेसोबत आपण वाहत आहो, गंगा व आपण अशा दोन नाहीच, सागराच्या विशालतेकडे आपला कण-कण धावत आहे. त्या भव्यतेला भव्य करण्यासाठी, तिचा एक घटक म्हणूनच आपल्याला जायचे आहे... पण पुन्हा मायेने स्वतःला सावरले. तो दिव्य अनुभव मात्र काही केल्या तिथून हटेना. ओठ पुन्हा-पुन्हा म्हणू लागले, ‘चिदानंदरूपं शिवोऽहम् शिवोऽहम्’मायनं प्रयत्नांची शिकस्त केली पण ओठच काय, देहाचा कोणताही अणुरेणु त्या दिव्य अनुभवापासून ढळायला कबूल होईना. ओठांचा मंत्रघोष थांबला पण न उच्चारलेले शब्द कानांना पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागले, ‘चिदानंद रूपं शिवोऽदम् शिवोऽहम...’
बाह्यसंज्ञा घेण्यासाठी मग मायनं ठाकुर करीत तसा प्रयत्न करून पाहिला. भावसमाधी निर्विकल्पांत परिणत होऊ नये म्हणून एखादी वासना ते मनात घोटाळू देत. मल अमूक हवे, तमूक हवे-तंबाकू, जिलबी... काय वाटेल ते मनात ठेवून ते निर्विकल्याचा आवेश थोपवीत. मायनंही मग संसाराच्या निरनिराळ्या गोष्टी मनात आणून गंगामय होण्यापासून सुटका आरंभली.
“छोट्या नोरेनसाठी खिचडी हवी. राखालला कालपासून बरं नाही, तरी तो जपध्यान करील. पोर पुन्हा अशानं खाटल्या वर पडणार. त्याला आवरलं पाहिजे. अन् नोरेननं काल जातानाच ‘गरम दाल उद्यां हवी’ म्हणून हट्ट धरला होता...... एक ना दोन हजार विचार मायने भावावस्थेवर सोडले आणि अर्धवट बाह्यसंवेदनेत ती कशीबशी घाटावर आली.
आतापर्यंत कोंबड्यानं दुसरी बांग दिली. लगबगीनं वस्त्र बदलून माय देवळातल्या आपल्या खोपटाकडे निघाली. उजेड भरपूर होण्याआधी तिला तिथे पोचायला हवं होतं. या देवासारख्या नितळ तेजस्वी पावित्र्यावर लोकाच्या नजरा पडायला नको होत्या.
केस वाळायसाठी मोकळे ठेवून मायनं चूल पेटवली. छोट्या नोरेनच्या खिचडीसाठी येरझारा चालू होत्या. ठाकुरांसाठी दूध न्यायचं आणि लगेच खिचडीसमोर ठाण मांडायचं, या विचारानं तो जवळ-जवळ उड्या मारण्याच्या तयारीत होता. त्याही घाईत त्याची नजर दक्षिणेश्वराच्या त्या खोलीकडे होती. जरा काही वाजले की स्वारी घाबरीघुबरी होई. दूध तापवण्याच्या घाईतही नोरेनकडे मायचं लक्ष अधून-मधून जातच होते. दक्षिणेश्वरच्या बाजूने पावलांचा आवाज आला की नोरेन का दचकतो, ते तिला पुरतं ठाऊक होतं. ती आता त्याची गंमत करायच्या विचाराने त्याला म्हणाली, “असा काय कानोसा घेतोस? ते इथं आले नाहीत तरी तुझं खिचडी प्रकरण त्यांच्या कानावर जाणारच आहे.”
आता नोरेनच्या घाबरण्यानं सीमा सोडली. आपल्या ओठांतून निघणाऱ्या बुडबुड्या सारख्या शब्दांना आवरीत तो म्हणाला, “खरं की काय ग! तो लेकाचा राखाल जाऊन सांगणार असेल. पण त्यालाही सांभाळून ऐस म्हणावं. ठाकुरांनी शंभरदा मना केलं असताना एवढ्या तापांतही त्यानं जप केला आज. अन् म्हणतो कसा की, कोणाला सांगू नकोस. तू आता गंगेवरून यायचीस म्हणून गुपचूप पुन्हा खाटल्यावर जाऊन पडला आहे!”
नोरेनची गंमत केल्यामुळे आपल्याला राखालचा पराक्रम कळला या विचाराने मायला समाधान झाले. पण ते डोळ्यांतून लपवीत ती त्याला म्हणाली, “अरे राखालच्या चुकीला उघडे पाडल्याने तुझी खिचडी थोडीच झाकणार आहे! तुझी प्रकृती अशी यथातथा. आहार अगदी सांभाळून हवा, पण तू ऐकशील तर ना!”
माय म्हणजे नेहमींचा आधार पण तोही आता उलट लागला तेव्हा नोरेनला काहीतरी युक्ती काढणे भागच होते. दोनदा उकळी येऊनही चुलीवरून न उतरविलेल्या दुधाकडे पाहत नोरेननं मायला धमकी दिली, “बघ ग, बघ. इतकं दूध नको म्हणून तुला ठाकुरांनी हज्जारदा बजावलं. आटवून आटवून तू कळशीभराचं वाटीभर दूध कर. मग मी आहेच ठाकुरांना सांगायला.”
आता मात्र माय स्वतःच घाबरली, हट्ट म्हणजे नोरेनचा आणि ठाकुरांचा असा फरक इथं नाहीच. जास्त दूध तब्येतीला पेलत नाही असा एकदा ठाकुरांनी समज करून घेतला म्हणजे त्याचा ध्यासच व्हायचा. त्या परीस नोरेनला खिचडीची खंडणी देऊन गप्प करणं वाईट नव्हतं.
ठाकुरांनी दुधाचा पेला रिकामा करून खाली ठेवला. एवढंसे दूध प्यायला त्यांनी नाही म्हणता एक तास लावला होता. मायला ते अपेक्षित होतंच. अमावास्येच्या रात्री त्यांना अवस्था येते; महाकाली महाकालासवे रममाण झाल्याच्या कल्पनेत ते वेढले जातात. मग संकीर्तन भजन कशातच काही लक्ष नसतं.
आता सकाळ होऊनही त्यांची अवस्था गेलेली दिसत नव्हती.
दुधाचा पेला उचलता उचलता मायनं नोरेनला उद्देशून म्हटलं, “जेवायला काय करू.”
नोरेन स्वतःसाठी खाद्यपदार्थांची मली मोठी यादी सादर करण्याच्या विचारात होता. तेवढ्यात मायनं केलेली खूण त्याला उमगली आणि त्यानं ठाकुरांच्या पायाला स्पर्श करून त्यांना हालवले.
“महाराज, माय विचारते जेवायला काय करायचं!”
खडबडून जागे झाल्यासारखे ठाकुरांनी मग दचकून सभोवार पाहिले. हे लोक इथे कसे, ते मग त्यांच्या हळूहळू लक्षात येऊ लागले.
जेवणाचा प्रश्न लक्षात न येऊन त्यांनी फक्त राखालची चौकशी केली. त्यानं तापांतही जप केला हे सांगण्याचे नोरेन विसरून गेला होता. मायचा मुकेपणा ठाकुरांच्या नजरेतून सुटला नाही. ते तिला म्हणाले, “त्याच्या तब्येतीचं तुला अगदीच कसं हे नाही ग? काल खुशाल गंगातीरावर हुंदडायला गेला होता. आणि विचारले तर तुझी परवानगी होती असे सांगून मोकळा! त्याला को जाऊ दिलंस? पोर दिवसेंदिवस गंगेच्या प्रवाहासारखं उद्दाम होत आहे...”
ठाकूर अजूनही बोलले असते. पण तितक्यात त्यांच्या पायाला कळ आली. त्यांना ते लपवता आलं नाही. संकीर्तनात रात्री बेभान होऊन नाचले त्याचे हे फळ! माय पाय चेपायला पुढे झाली. नरेंद्राला पुढे होण्यासाठी ती सांगू लागली, “नोरेन, तू जा. गोपाल, मी तुला काय हवं ते देईन. मी येते तोवर.”
‘काय हवं ते म्हणजे ठाकुरांना न कळलेली ‘खिचडी’ पण नोरेनचे लक्ष सध्या व्यापक होऊ पाहत आहे. उजवीकडच्या कोपऱ्यातल्या कोऱ्या गाडग्याकडे त्यांचे लक्ष आहे. याचनापूर्ण डोळ्यांनी तो मायला त्या गाडग्याची जाणीव देऊ लागला. “काय आहे तिथं?” मायनं ठाकुरांच्या दिशेने प्रश्न केला.
“ते ना? ती मिठाई आहे. कोण्या व्यापाऱ्यानं प्रसाद ठेवला. पण तो माणूस बरा नाही. अग, माझ्या पायाला त्यानं स्पर्श केला तर पाय जळजळायला लागले. नोरेनला नको देऊ ती खायला. मोठा नोरेन आला की त्याला दे सगळी. तो जाणतो सारं.”
आता लहान्या नोरेनचा नाइलाज आहे. मायने मात्र त्याला दिलासा दिला, “दुपारी माधुबाबू येतील तेव्हा जिलेबी आणतील. आता जाई.”
मग माय ठाकुरांचे पाय चेपू लागली. अशीच एकदा ती पाय चेपत असतानाच प्रसंग तिला आाठवला. ठाकुरांना तिनं विचारलं होते, “तुमचे पाय कोण चेपत आहे!”
“ती काळी माता.” ते उत्तरले. त्या उत्तरानं त्यांच्या पति-पत्नीच्या ऐहिक नात्याचा खरा अर्थ स्पष्ट झाला होता. माय त्या आठवणीत सुखावून पाय चेपू लागली.
अन् इकडे ठाकूर पुन्हा-पुन्हा तिच्याकडे पाहून मनातल्या मनात म्हणत होते, “आमचा असा वेदान्ती संसार, ही माझी पत्नी, हजारो मुलांची निपुत्री माय!”
तिकडे देवळात जोरजोराने घंटा वाजत होती.
Tags: wonderful things parables Children's stories छान छान गोष्टी बोधकथा बालकथा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या