ता. 1 जानेवारी 1958 रोजी संस्थेने आपल्या आयुष्याची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. इतके कर्तबगार जीवन फार थोड्यांच्या वाट्याला येते.
नूतन मराठी विद्यालयाच्या वास्तूत प्रवेश करताना मन उदात्त विचारांनी भरून येते ते समोरच दिसणाऱ्या तीन महिरपींच्या मेघडंबरीत विराजमान झालेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या पुतळ्याकडे पाहून! पुतळ्याकडे पाहून वाटते की, या वास्तूने जणु आपल्या हृदयात ही स्फूर्तिदेवता कोरून ठेवली आहे. तसे पाहिले तर विष्णुशास्त्री चिपळूणकर हीच नूतन मराठी विद्यालयाची स्फूर्तिदेवता आहे. शास्त्रीबुवांच्या निबंधमालेच्या रूपाने वाहणाऱ्या स्फूर्तिगंगेत नूतन मराठी विद्यालयाच्या संस्थापकांनी सुस्नात होऊन नवचैतन्य, नवजीवन मिळविले. नू.म.वि.चे आद्य संस्थापक त्या वेळी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. विष्णुशास्त्री निबंधमाला लिहीत होते व ट्रेनिंग कॉलेजमधील ही मंडळी तिची पारायणे करीत होती. याच मंडळीत कृष्णाजी बळवंत डोंगरे, रामचंद्र गोपाळ देव, कृष्णाजीपंत उकिडवे, दामोदर सदाशिव करंबेळकर इत्यादी विद्यार्थी होते. हेच नू.म.वि.चे आद्य संस्थापक. शास्त्रीबुवांनी जे नवीन बाणेदार युग सुरू केले त्या युगाचे हे बिनीवरचे सैनिक होते. निबंधमालेने झपाटलेले, देशसेवेच्या स्वतंत्र मार्ग अवलंबण्याची दुर्दम्य मनिषा उरात बाळगलेले हे आघाडीचे वीर होते. ही सर्व मंडळी मुळात ती अगदी सामान्य माणसे. पण ध्येयवादित्वाने एक असामान्य कार्य करण्याचा संकल्प सोडून त्यांनी कार्याची मुहूर्तमेढ रोविली.
स्थापना
1 जानेवारी 1883 रोजी नू.म.वि. शाळा स्थापन केल्याचे त्यांनी जाहीर केले. ज्या वाड्यात न्यू. ई. स्कूल स्थापन झाले होते त्याच इतिहासप्रसिद्ध अशा मोरोबा दादा फडणिसांच्या वाड्यांत नूतन मराठी विद्यालयही सुरू झाले. शास्त्रीबुवांचे ज्ञानप्रसाराचे कार्य पुढे चालविण्याचे श्रेष्ठतर ध्येय संस्थापकांनी मनात बाळगले होते. ‘शिक्षण समाजाच्या अगदी खालच्या थरापर्यंत लोकात पसरावयाचे असेल तर ते इंग्रजीतून देऊन चालणार नाही, तर ते मातृभाषेतून दिले पाहिजे’ हे तत्त्व डोळ्यांपुढे ठेवून या मंडळींनी आपली वाटचाल सुरू केली. संस्थापकाच्या या कार्याला शुभेच्छा व्यक्त करताना ‘केसरी’ने म्हटले, “शास्त्रीबोवांचे महाराष्ट्र भाषेवर अनंत उपकार झाले आहेत. त्यांचे हे ‘मराठी’ विद्यालय योग्य स्मारक होईल.”
संख्या-वाढ तशीच अडचणीतही वाढ
आरंभाला सुमारे 80 विद्यार्थी शाळेला मिळाले, पण एका महिन्याच्या आतच ही संख्या 350 पर्यंत गेली. न्यू इं. स्कूलची मदत-शाळा म्हणून नू. म. विद्यालयाने काम करावे, अशी प्रारंभी कल्पना होती. मराठीतूनच शिक्षण देण्याचा आग्रह सुरुवातीस होता. पण मार्चपासून इंग्रजी शिकविण्यासही प्रारंभ झाला. 1884 मध्ये 425 व 1886 मध्ये 617 पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या वाढली. पण शाळेच्या वाढत्या व्यापाबरोबर अडचणीही वाढू लागल्या. आर्थिक ओढाताण प्रारंभापासूनच होती. मदतीची आशा होती, पण ती मदत मिळण्याची शक्यता दिसेना. सरकारी मदत न मिळण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्या वेळचे डायरेक्टर मि. चॅटफील्ड यांचा शाळेचे व्यवस्थापक श्री. दामूअण्णा कुलकर्णी यांच्यावरचा रोप. दामूअण्णांनी डायरेक्टरांच्या ऑफिसमधील नोकरी सोडून शाळेची वाट धरल्याने साहेब मजकुरांचा त्यांच्यावर रोष होता. तेव्हा सरकारी मदतीशिवाय शाळा चालविणे क्रममाप्त झाले.
ध्येयवाद हीच शिदोरी
1886 पासून पुणे म्युनिसिपालिटीने दरमहा 20 रुपयांची मदत देण्यास प्रारंभ केला! ही मदत अत्यल्प होती. शाळेच्या इमारतीचे भाडेदेखील त्या मदतीतून भागत नसे. त्या वेळचे व्यवस्थारक दामूअण्णा कुलकर्णी यांनी त्याही परिस्थितीत अत्यंत बाणेदारपणाने शाळेची सेवा बजाविली. “हा धंदा सोडून देऊन सरकारी नोकरी पत्करून आम्ही राहिलो असतो तर आमची द्रव्यासंबंधीची स्थिती आजला चांगली असती... परंतु स्वावलंबन करून, लोकांना आवडेल असे फायद्याचे शिक्षण मुलांना देऊन स्वदेशाचा एक अल्पसा भार यथाशक्ती व फारशी हाव न धरता मस्तकी वाहण्याचा जो आमच्या मंडळीचा हेतु तो सरकारी नोकरी धरून गावात पडून राहिल्याने निश्चित तडीस गेला नसता.” असे तेजस्वी उद्गार दामूअण्णांनी त्या वेळी काढले होते.
व्यापक कार्याचा संकल्प
दामूअण्णा कुलकर्णी हे शाळेच्या भागीदारांपैकी एक होते. शाळेचे पहिले तीन भागीदार म्हणजे उकिडवे, करंबेळकर व डोंगरे, त्यांना लवकरच कुलकर्णी व सिनकर येऊन मिळाले. 1887 अखेर एकूण नऊ भागीदार झाले. या नऊ व्यवस्थापक मंडळींनी व त्यांच्या हितचिंतकानी रविवार दि. 5 फेब्रुवारी 1888 रोजी एकत्र जमून मराठी शिक्षणाचा प्रसार करण्याकरिता एक मंडळी स्थापन करावी, असा ठराव केला व ल्या नुसार ‘मराठी शिक्षण प्रसारक मंडळी’ स्थापन झाली. मंडळीचे पहिले अध्यक्ष डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर होते.
त्यागाने पोषण
हा ‘नूतन तरु’ हळूहळू वाढत होता, पण अडचणीचे सावट त्याच्यावर दिसू लागले होते. ‘सरकारी मदत मिळेल’ असे आश्वासन 1883 मध्ये ना. गव्हर्नरांनी दिले होते. परंतु तशी मदत मिळण्याची चिन्हे दिसेनात. अशा परिस्थितीत संस्थापकांनी कधी पगार न घेऊन तर कधी अत्यल्प पगार घेऊन या नूतन तरूचे संवर्धन केले. निष्ठावंत शिक्षक या संस्थेत लाभले होते. त्यांनीही प्रसंगी मधुकरी मागून या संस्थेचे पोषण केले. त्यातच प्लेगचा कहर गुदरला. दोन-दोन चार-चार महिने शाळा बंद ठेवण्यात येऊ लागली. झोपड्यातून वा तंबूतून वर्ग भरविण्यात येऊ लागले. तरी पण शिक्षक व विद्यार्थी यांची संस्थेवरील निष्ठा अढळ राहिली. 1888 मध्ये इंग्रजी पाचवी इयत्ता निघाली होती. पण पुढील इयत्तांची सोय शाळेत नव्हती. अखेर विद्यार्थ्यांच्या आत्यंतिक आग्रहाने 1894 मध्ये 6 वी व 1895 मध्ये 7 वी इयत्ता काढण्यात आली. 1896 मध्ये शाळेची अकरा विद्यार्थांची पहिली तुकडी मॅट्रिक परीक्षेसाठी पाठविण्यात आली व या तुकडीने लोकप्रियतेचा व प्रतिष्ठेचा साज शाळेवर चढविला. अकराही विद्यार्थी उत्तीर्ण झाले व विद्यार्थी वि.स. घाटे यांचा इलाख्यांत पहिला क्रमांक आला व त्यास पहिली जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली. यशाच्या या रोकड्या प्रचीतीनेच जणु काय शाळेचे नाव 1902 मध्ये सरकारी मदती साठी नोंदविले गेले.
शाळेला स्थैर्य आले
1904 साली शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 1256 साली. संस्थापकाच्या मनात आता एक नवीनच ओढ निर्माण झाली. शाळेला स्वतःची जागा असावी व इमारत असावी, असा विचार सुरू झाला. आज नू.म.वि.च्या वास्तूंत चिपळूणकरांच्या पुतळ्याखाली डाव्या बाजूला तळाशी एक कोनशिला दिसते. 26 जून 1913 रोजी नामदार क्लॉड हिल यांच्या हस्ते ही कोनशिला बसवली आहे. 1915 साली या नव्या इमारतीत शाळा भरण्यापूर्वी शाळेला स्वतंत्र अशी इमारत नव्हती. अप्पा बळवंत चौकातील मोरोबा दादांचा वाडा, भटांचा वाडा व ग्राउंड अशा तीन ठिकाणी शाळा भरत असे. सध्याची इमारत ज्या जागेवर बांधली ती जागा मूळ खाजगीवाले यांची. एक एकर क्षेत्रफळ असलेली ही ऐतिहासिक व पवित्र भूमी नूतन मराठीला फार लाभदायक ठरली.
आज ही नूतन मराठीची वास्तु विविध शैक्षणिक उपक्रमांचे माहेर बनली आहे आणि त्याला कारण म्हणजे या उपक्रमांना प्रेरणा व चालना देणारे अनेक मुख्याध्यापक शाळेस लाभले हेच होय. श्री. वि.ग. आपटे, श्री. द.रा. घारपुरे, श्री. रा.प. सबनीस, श्री. द.बा. पोतदार, श्री. म.शं. गोडबोले, श्री. ना.ग. नारळकर, श्री. ब.में. बापट व विद्यमान मुख्याध्यापक श्री. वा.मा. दबडभाव या मुख्याध्यापकाचे कुशक मार्गदर्शन शाळेस मिळाले.
शैक्षणिक उपक्रमांचे माहेर
प्रत्यक्ष पद्धतीने इंग्रजी शिकविण्याचा उपक्रम प्रथम शाळेत करण्यात आला तेव्हा त्या वेळचे एक शाळा-तपासनीस मि. मार्च यांनी या उपक्रमाबद्दल प्रशंसा केली होती. पुढे विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे आपल्या प्रश्नाचा विचार करता यावा म्हणून स्वराज्य-सभा (Boys Republic) सुरू झाली. शाळेतील प्रत्येक बारीकसारीक व्यवस्थेत व व्यवहारात मराठीचा आग्रह धरण्यात येऊ लागला. इतिहास-भूगोल विषयांसाठी स्वतंत्र वर्गाची आवश्यकता प्रतिपादण्यात येऊ लागली; इतकेच नव्हे, तर तसा वर्गही काढण्यात आला. शिक्षकातून देखरेखनिसांची निवड करण्यात येऊन त्यांच्या सल्ल्याने व सहकार्याने शाळेचा अंतर्गत कारभार पाहण्यात येऊ लागला. 1935-26 या काळातही हिंदी, हस्तव्यवसाय, शारीरिक शिक्षण यासारखे विषय परीक्षेकरिता ठेवण्यात येऊ लागले.
नारळकरांचे नेतृत्व
शैक्षणिक उपक्रमांनी गजबजलेला काळ 1936 पासूनचा होता. प्रा. ना.ग. नारळकरांच्या नेतृत्वाखाली शाळेची झालेली प्रगती सर्वत्र स्तुतिपात्र ठरली. पाठ्यपुस्तकाखेरीज अवांतर पुस्तके वाचण्याची सोय शाळेकडून करण्यात आली. ‘ग्रंथ पेटी’ हे शाळेचे वैशिष्ट्य या काळात उदयास आले. प्रावीण्यफलक, ‘पहा आणि शिका’, आजचा सुविचार, ‘सल्ला-मसलत’ इ. प्रकारच्या फलकांनी शाळा फुलून गेली. उन्हाळ्याच्या सुटीतील वर्गामुळे शाळेची वास्तु बाराही महिने जागृत राहू लागली. ‘ऐच्छिक वर्गणी’ व ‘आवश्यक उपस्थिती’ या दंडकाने संमेलने साजरी होऊ लागली. ग्रामसेवेसाठी व श्रमदानासाठी शाळेतील विद्यार्थीची पथके शहराबाहेर धाव घेऊ लागली. व्यापारी शिक्षणासारखे विषय अभ्यासक्रमात डोकावू लागले आणि 17 मार्च रोजी चिपळूणकर पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी नव-नवीन घोषणा शाळाचालकांकडून कानावर पडू लागल्या. इंग्रजीप्रमाणे मराठीतही उत्तीर्ण होण्यास 40 टक्के गुण आवश्यक ठरविण्यात आले. तर विद्यार्थ्यांनी गटागटाने ग्रामोद्धाराचे कार्य केल्यास दर गटात 5 रुपयांची मदत शाळेकडून देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. उत्तर व दक्षिण हिंदुस्तानांत नू.म.वि.चे विद्यार्थी संचार करू लागले. विविध परीक्षांच्या अभ्यासात आनंद मानू लागले आणि ‘वरच्या दर्जाचा अभ्यास, निकोप शरीरप्रकृती, हरहुन्नरीपणा व एखादा छंद’ हे नूतन मराठीच्या विद्यार्थ्यांचे ब्रीदवचन बनले. नू. म. वि.ची ही सर्वांगीण प्रगती सरकारी प्रशंसेलाही पात्र ठरली. एका शाळाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात व्यक्त केलेले विचार फारच बोलके आहेत. ते अधिकारी लिहितात: “A great school, highly organized, efficiently conducted & intelligently supervised. It has gained immense popularity in the last few years and all roads in Poona literally lead to N. M. V. in June.”
विस्तार
नू.म.वि.ची मातृसंस्था जी शिक्षण प्रसारक मंडळी तिचाही विस्तार वाढत आहे. नूतन मराठी प्रशालेशिवाय नूतन मराठी मराठी शाळा, हरिभाई देवकरण हायस्कूल, मीमांसा विद्यालय, शारीरिक शिक्षण विद्यालय, एस्.डी.सी. इन्स्टिट्यूट, मूक व बधिर शिक्षण वर्ग, शिशुशाला इ. शाळा व पुणे (स.प. कॉलेज) व मुंबई येथील दोन महाविद्यालये (राम नारायण रुइया व पोदार कॉलेज) एवढा संस्थेचा गेल्या पाऊण शतकातील पसारा आहे.
Tags: Jagannath Shankarshet Ramakrishna Gopal Bhandarkar Marathi Education Prasarak Mandali No. m. Vs. Prashala Vishnu Shastri Chiplunkar जगन्नाथ शंकरशेट रामकृष्ण गोपाळ भांडारकर मराठी शिक्षण प्रसारक मंडळी नू. म. वि. प्रशाला विष्णुशास्त्री चिपळूणकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या