डिजिटल अर्काईव्ह

समाजसुधारक समाजाला आव्हान देतो तेव्हा त्याला कोणी हुतात्मा म्हणून गौरवत नाही. किंबहुना त्याच्याशी कोणी मैत्रीही करायला जात नाही. त्याचा तिरस्कार केला जातो आणि त्याच्यापासून अंतर राखलं जातं. पण राजकीय देशभक्त शासनव्यवस्थेला आव्हान देतो तेव्हा त्याला संपूर्ण समाज पाठिंबा देतो. त्याची प्रशंसा केली जाते, कौतुक केलं जातं आणि त्याला तारणहार मानून आदरस्थान बहाल केलं जातं. तर, एकट्याने लढणारा समाजसुधारक आणि पाठीराख्यांच्या विशाल समूहाच्या आधाराने लढणारा राजकीय देशभक्त, यांच्यातलं जास्त धाडसी कोण ? रानड्यांनी समाजसुधारणेचं कार्य हाती घेऊन धाडस दाखवलं, हे नाकारणं करंटेपणाचं ठरेल. खरंतर, रानड्यांनी अत्युच्च पातळीवरचं धाडस दाखवलं.

या निमंत्रणाचा मला फारसा आनंद झालेला नाही, हे स्पष्टपणे सांगायला हवं. आजच्या औचित्याला मी न्याय देऊ शकणार नाही, याची मला चिंता आहे. मागच्या वर्षी मुंबईत रानड्यांची जन्मशताब्दी साजरी झाली तेव्हा, सन्माननीय श्रीनिवास शास्त्री यांचं व्याख्यान ठेवण्यात आलं. या विषयावर बोलण्यासाठी त्यांची निवड अनेक अर्थांनी योग्यच होती. त्यांच्या आयुष्याचा काही काळ ते रानडे यांचे समकालीन राहिले. त्यांनी रानड्यांना जवळून पाहिलं आणि रानड्यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते. रानड्यांचं मूल्यमापन करण्याची आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्यांची तुलना करण्याची संधी शास्त्रींना मिळाली. व्यक्तिगत संपर्कातून येणाऱ्या जवळिकीमुळे त्यांना रानड्यांविषयीची स्वतःची मतं आत्मविश्वासाने मांडता आली. तसंच, श्रोत्यांना एखादा किस्सा सांगून रानड्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणंही त्यांना शक्य झालं. मला मात्र यातलं काहीच करता येणार नाही.

रानड्यांशी असणारा माझा संबंध अगदीच किरकोळ म्हणावा असा आहे. मी त्यांना कधी पाहिलंही नाही. त्यांच्याविषयीच्या केवळ दोनच घटना मला आठवतात. यातील पहिली घटना त्यांच्या मृत्यूसंदर्भातली आहे. मी सातारा हायस्कुलात पहिलीमध्ये शिकत होतो. तेव्हा, 16 जानेवारी 1901 रोजी शाळेला सुट्टी देण्यात आली. आज शाळा का नाही, असं आम्ही विचारलं तेव्हा रानड्यांचं निधन झाल्यामुळे शाळेला सुट्टी जाहीर झाल्याचं सांगण्यात आलं. त्या वेळी माझं वय नऊ वर्षं होतं. रानड्यांविषयी मला काहीही ठाऊक नव्हतं; ते कोण होते, त्यांनी काय केलं, याबद्दल काहीही माहिती नव्हती. इतर मुलांप्रमाणे मलाही शाळेला सुट्टी मिळाल्याचा आनंद झाला आणि कोणाचं निधन झालंय हे जाणून घेण्याची फिकीर वाटली नाही. एकदा मी माझ्या वडिलांकडची जुनी कागदपत्रं तपासत होतो, तेव्हा मला एक कागद सापडला. महार समुदायातील कमिशण्ड आणि नॉन-कमिशण्ड लष्करी अधिकाऱ्यांनी भारत सरकारकडे पाठवलेला तो अर्ज असल्याचं कळत होतं. लष्करातील महारांची भरती बंद करणारा आदेश 1892 साली देण्यात आला, त्या विरोधातील हा अर्ज होता. मी यासंबंधी आणखी चौकशी केल्यावर कळलं की, अन्यायाने संतापलेल्या महारांच्या तक्रारीचं निवारण व्हावं याकरता मदत म्हणून रानड्यांनी या अर्जाचा मसुदा तयार केला, त्याची ती प्रत होती.

या दोन घटनांव्यतिरिक्त रानड्यांची इतर कोणतीच आठवण माझ्यापाशी नाही. त्यांच्याविषयीची माझी जाण ही पूर्णपणे व्यक्तिनिरपेक्ष स्वरूपाची आहे. त्यांच्या कामाविषयी मी केलेलं वाचन आणि त्यांच्याबद्दल इतरांनी सांगितलेल्या गोष्टी, यांमधून ही जाण आली. त्यामुळे रानड्यांच्या व्यक्तिगत स्वभावासंदर्भातील रोचक किंवा मार्गदर्शनपर असं काही मला सांगता येणार नाही. रानडे त्यांच्या काळातील सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून कसे होते आणि आजच्या भारतीय राजकारणातील त्यांचं स्थान काय, याबद्दल विचार मांडण्याचा माझा प्रयत्न आहे.

2

रानड्यांचे मित्र न कचरता त्यांचं वर्णन थोर माणूस म्हणून करतात, तर इतर काही जण तितक्याच आग्रहाने रानड्यांना थोर माणसाचं स्थान नाकारतात, हे तुम्हाला माहीतच आहे. मग यातील सत्याचा पक्ष कोणता ? या प्रश्नाचा विचार करण्याआधी मुळात, इतिहास म्हणजे थोर माणसांचं चरित्र असतं का, हा प्रश्न विचारात घ्यायला हवा, असं मला वाटतं. हा प्रश्न प्रस्तुत ठरणारा आहे आणि महत्त्वाचाही आहे. थोर माणसं इतिहास घडवत नसतील तर मग चित्रपटांतील तारेतारकांइतकीच त्यांची दखल घेऊन भागेल! पण तसं नसतं. या संदर्भात निरनिराळी मतं मांडली जातात. एखादा माणूस कितीही थोर असला तरी तो त्याच्या काळाची निर्मिती असतो -काळाने त्याला पुढे आणलं, काळाने सर्व काही केलं, त्या माणसाने काही केलं नाही, असं प्रतिपादन काही जण करतात. या मताची पाठराखण करणारे इतिहासाचा चुकीचा अर्थ लावतात, असं मला वाटतं. ऐतिहासिक बदलांच्या कारणांसंदर्भातही तीन भिन्न मतप्रवाह आहेत. ऑगस्टीन पंथामधून पुढे आलेला इतिहासाचा एक सिद्धान्त आहे. या सिद्धान्तानुसार, इतिहास म्हणजे दैवी योजनेची अंमलबजावणी तेवढी आहे, आणि अंतिम निवाड्याच्या दिवशी ही दैवी योजना पूर्णत्वास जाईल, तोवर मानवतेने युद्ध व दुःख यांमधून वाट काढत चालत राहावं. बकल यांच्या मतानुसार, भूगोल व भौतिकी यांच्याद्वारे इतिहास घडतो." या संदर्भातील तिसरा मतप्रवाह कार्ल मार्क्सच्या मांडणीतून पुढे आला. मार्क्सच्या मते, इतिहास ही आर्थिक शक्तींची निष्पत्ती असते. 12 

इतिहास म्हणजे थोर माणसांचं चरित्र असतं, हे यांपैकी कोणालाही मान्य नाही. किंबहुना, इतिहासाच्या जडणघडणीत ते माणसाला काही स्थानच देत नाहीत." धर्मशास्त्री सोडले तर इतर कोणी इतिहासाच्या ऑगस्टीनपंथीय सिद्धान्ताचा स्वीकार करत नाही. बकल व मार्क्स यांच्या म्हणण्यात काहीएक सत्यांश असला तरी त्यांची मतं पूर्ण सत्य मांडणारी नाहीत. व्यक्तिनिरपेक्ष शक्तीच सर्व काही करतात आणि माणूस हा इतिहासाच्या जडणघडणीमधील प्रस्तुत ठरणारा घटकच नाही, हे त्यांचं प्रतिपादन अगदीच चुकीचं आहे. व्यक्तिनिरपेक्ष शक्ती हा इतिहासामधील एक निर्णायक घटक असतो, हे खरं आहेच; पण व्यक्तिनिरपेक्ष शक्तींचा परिणाम माणसावर अवलंबून असतो, हेही तितकंच खरं आहे. गारगोटीचे दगड सर्वत्र अस्तित्वात असतीलच असं नाही. पण असे दगड असतील तिथे दोन दगड एकमेकांवर घासून आग निर्माण करण्यासाठी माणूस गरजेचा असतो. बिया सर्वत्र सापडतील असं नाही. पण बिया असतील त्या ठिकाणी त्यांना भरडून त्यातून पोषक व चविष्ट पीठ तयार करण्यासाठी आणि शेतीचा पाया घालण्यासाठी माणूस गरजेचा असतो. अनेक ठिकाणी खनिजं सापडत नाहीत. पण खनिजं अस्तित्वात असतील अशा ठिकाणी त्यांच्या माध्यमातून अवजारं व यंत्र तयार करून सभ्यता व संस्कृती यांची पायाभरणी करण्यासाठी माणूस गरजेचा असतो.

सामाजिक शक्तींचा दाखला इथे विचारात घेऊ. अनेक शोकात्म परिस्थिती उद्भवत असतात. थेयर यांनी थिओडर रूझवेल्ट यांच्या चरित्रामध्ये अशा एका परिस्थितीचं वर्णन केलं आहे, ते असं :

"प्रत्येक पंथ, पक्ष वा संस्था एका विशिष्ट काळाच्या टप्प्यावर आल्यानंतर त्यांची वाढ थांबते, त्यांची गात्रं ताठर होतात. अशा संस्थांमधील तरुण माणसांना नवीन कल्पना सुचेनाशा होतात, आणि वृद्ध माणसांना स्वप्नं पडेनाशी होतात. मग संबंधित पंथ, पक्ष वा संस्था भूतकाळाच्या आधाराने जगतात आणि तोच भूतकाळ टिकवून ठेवण्यासाठी अटीतटीचा प्रयत्न करतात. राजकारणात अश्मीभवनाची ही प्रक्रिया येऊन ठेपली की आपण तिला स्थितिवाद म्हणतो. आपल्या धमन्या आक्रसल्याचं स्थितिवादी माणसाला कळतच नाही, त्यामुळे त्याला उपचारांचीही गरज वाटत नाही. एखादा वृद्ध मनुष्य जीर्ण आरामखुर्चीत मागे रेलून बसतो, तसा स्थितिवादी माणूस बदललेल्या नवीन परिस्थितीशी जुळवून घेता न आल्यामुळे भूतकाळावर विसंबून राहतो. "14

याहून निराळ्या प्रकारची एक परिस्थिती असते. त्यात ऱ्हास नव्हे तर विध्वंस होतो. अशा परिस्थितीच्या शक्यता संकटकाळात कायमच अस्तित्वात असतात. जुने मार्ग, जुन्या सवयी आणि जुने विचार समाजाला आधार देऊन पुढे नेण्यासाठी अपयशी ठरलेले असतात. नवीन मार्ग, सवयी व विचार शोधल्याशिवाय टिकून राहणं शक्य उरलेलं नसतं. कोणत्याही समाजाचा प्रवास सुरळीत नसतो. प्रत्येक समाजाला -हासाच्या कालखंडांमधून आणि विध्वंसाच्या शक्यतांमधून वाट काढावी लागते. 15 काही समाज यात टिकून राहतात, काही नष्ट होतात, आणि काही कुंठितावस्थेत जाऊन हासशील होतात. हे का घडतं? काही समाज टिकून राहतात, त्यामागचं कारण काय? कार्लाइलने याचं एक उत्तर दिलं आहे. तो त्याच्या खास शैलीत लिहितो :

"कोणत्याही काळात पुरेसा थोर, पुरेसा ज्ञानी आणि पुरेसा चांगला माणूस हजर असेल, तर त्या काळाचा विध्वंस होण्याची शक्यता नाही. संबंधित काळात काय आवश्यक आहे याची खरीखुरी पारख करण्याची शहाणीव अस्तित्वात असेल, आणि योग्य मार्गाने पुढे जाण्यासाठीचा निर्भीडपणा असेल, तर कोणत्याही काळात विनाशापासून वाचणं शक्य आहे. " 16

इतिहासाच्या जडणघडणीमध्ये माणसाला कोणतंही स्थान न देणाऱ्या मंडळींना कार्लाइलच्या या विधानातून निर्णायक उत्तर मिळतं, असं मला वाटतं. यातील पेचप्रसंगावर निराळ्या मार्गाचा शोध घेऊन उपाय करता येऊ शकतो. नवीन मार्ग सापडला नाही तर समाजाचा ऱ्हास होतो. काळ कदाचित काही नवीन मार्ग सुचवेल. पण योग्य मार्गाच्या दिशेने पाऊल टाकणं हे काही काळाचं कार्य नसतं. हे कार्य माणूस करतो. त्यामुळे माणूस हा इतिहासाच्या जडणघडणीमधील एक घटक असतोच, आणि व्यक्तिनिरपेक्ष किंवा सामाजिक स्वरूपाच्या पर्यावरणातील शक्ती या जडणघडणीच्या आरंभाला कारणीभूत ठरत असतील तरी तिची अंतिम निष्पत्ती केवळ या शक्तींच्या आधारे ठरत नाही.

3

कोणाला 'थोर माणूस' म्हणता येईल? अलेक्झांडर", अॅटिला, सीझर आणि तैमूरलंग 20 यांसारख्या लष्करी विभूतींबाबतीत या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड नाही. लष्करी कर्तृत्व गाजवणारी माणसं युगप्रवर्तक असतात आणि त्यांच्यामुळे विशाल स्थित्यंतरं घडतात. ते स्वतःच्या दणदणीत विजयांच्या बळावर त्यांच्या समकालीनांना चकित करतात, दिपवून टाकतात. त्यांची थोरवी गायली जाण्याआधीच ते थोर झालेले असतात. हरणांच्या कळपात सिंहाचं जे स्थान असतं, तसं माणसांमध्ये या लष्करी विभूतींचं स्थान असतं. पण मानवतेच्या इतिहासावरील त्यांचा शाश्वत परिणाम खूपच लहानसा असतो, हेही तितकंच खरं आहे. त्यांच्या मुलुखविजयांचा संकोच होत जातो. अगदी नेपोलियनसारख्या थोर सेनाधिकाऱ्याबाबतीतसुद्धा हे दिसतं. त्याने अनेक मुलुखांवर विजय मिळवला, पण त्याच्या अखेरच्या काळात फ्रान्सचा आकार आधीपेक्षा लहान झालेला होता. दुरून पाहिलं असता, हे विजयाचे दाखले जगाच्या वाटचालीतील आवश्यक पण केवळ तात्कालिक घटनांसारखे वाटतात. लष्करी विभूतींचा त्यांच्या समाजाच्या स्वभाववृत्तीवर काही शाश्वत ठसा उमटत नाही. त्यांची कारकीर्द आणि त्यांच्या धारणा यांविषयीचे तपशील रोचक असू शकतात, पण समाजावर त्याचा परिणाम होत नाही, आणि एकंदर समाजात परिवर्तन घडण्याकरता किंवा त्यात उचित बदल घडवण्याकरता आवश्यक घटक यातून मिळत नाही.

वरील प्रश्न सेनाधिकारी नसलेल्या व्यक्तीबाबतीत विचारल्यावर त्याचं उत्तर देणं अवघड असतं. कारण, अशा वेळी प्रश्नाचं उत्तर देताना कोणत्या कसोट्या लावणार, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो; आणि निरनिराळ्या लोकांच्या निरनिराळ्या कसोट्या असतात.

विभूतिपूजेचा प्रमुख उद्गाता कार्लाइल याने या संदर्भातील एक कसोटी पुढीलप्रमाणे मांडली :

"निखळ सचोटी हा थोर माणसाच्या स्वभावाचा मूलभूत गुण आहे, असं मला वाटतं... एखादं कार्य करण्यासाठी पुरेशी ताकद नसेलही तरी त्यासाठीची योग्य कळकळ मनात असेल तर तो माणूस प्रामाणिक आहे, असं मी म्हणेन. प्रामाणिकपणा, खोलवरचा आणि अगदी अस्सल प्रामाणिकपणा हे विभूतीस्थानी पोचलेल्या सर्व माणसांचं पहिलं वैशिष्ट्य असतं. "22

कार्लाइलने प्रामाणिकपणाची त्याची कसोटी अर्थातच अचूक शब्दांमध्ये नोंदवली आहे. प्रामाणिकपणाची कल्पना मांडत असताना तो वाचकांना त्या संदर्भात इशाराही देतो :

"स्वतःहूनच स्वतःला प्रामाणिक म्हणवणाऱ्या प्रामाणिकपणाबद्दल मी बोलत नाहीये. अजिबातच नाही. ती अगदीच क्षुल्लक गोष्ट असते उथळ, बढाईखोर, जाणीवपूर्वक राखलेला प्रामाणिकपणा, हा बहुतांश वेळा अहंकारातून येतो. थोर माणसाचा प्रामाणिकपणा असा असतो की तो स्वतः त्याबद्दल बोलू शकत नाही, त्याला त्याची जाणीव नसते. उलट, मला वाटतं, त्याला अप्रामाणिकपणाची जाणीव असते. अन्यथा, एखादा माणूस अगदी अल्प काळासाठी तरी सत्याशी अचूक बांधिलकी राखणारं वर्तन करू शकेल का? थोर माणूस स्वतःच्या प्रामाणिक असण्याची बढाई मारत नाही. तो स्वतःच्या प्रामाणिकपणाविषयी चकार शब्द काढत नाही. उलट, मी तर म्हणेन की, त्याचा प्रामाणिकपणा व्यक्तीशः त्याच्यावर अवलंबूनच नसतो; त्याला प्रामाणिक असण्यावाचून काही गत्यंतरच नसतं! "23

लॉर्ड रोझबेरीने थोर सेनाधिकारी आणि तितकाच थोर प्रशासक असलेल्या नेपोलियनविषयी बोलताना दुसरी एक कसोटी मांडली आहे. नेपोलियन थोर होता का, या प्रश्नाचं उत्तर देताना रोझबेरी म्हणतो :

"नैतिक गुणांचा बुद्धिमत्तेशी झालेला संयोग म्हणजे 'थोरवी' असेल, तर नेपोलियन निश्चितपणे थोर नव्हता. पण असामान्यत्व आणि श्रेष्ठत्व, या अंगाने तो थोर होता, याबाबत कोणतीही शंका नाही. थोरवीचा अर्थ, प्राबल्यासाठीची उपजत ताकद किंवा मानवतेच्या पलीकडची काहीतरी मानवी शक्ती, असा असेल, तर नेपोलियन निश्चितपणे थोर होता. प्रतिभेची अवर्णनीय चमक त्याच्यात होतीच, शिवाय त्याच्या व्यक्तिमत्वात झालेला बुद्धिमत्ता आणि ऊर्जा यांचा संयोग अतुलनीय, किंबहुना अनुल्लंघनीय ठरला. "24

याहून निराळी, तिसरी कसोटी तत्त्वज्ञांनी सुचवलेली आहे. अधिक अचूकपणे बोलायचं तर, मानवी व्यवहाराला दैवी मार्गदर्शन लाभलेलं असतं, असं मानणाऱ्यांनी सुचवलेली ही कसोटी आहे. थोर माणूस म्हणजे काय, याबद्दलची त्यांची वेगळी संकल्पना आहे. त्यांच्या मताचं सार रोझबेरीने नोंदवलं आहे, त्याचा सारांश असा थोर माणूस या जगात एक महान नैसर्गिक किंवा पारलौकिक शक्ती म्हणून अवतरतो. तो समाजावर चाबूक चालवतो, समाजाची साफसफाई करतो आणि समाजाला योग्य मार्गाच्या दिशेने नेतो. 25 त्याचं विशाल कार्य अंशतः सकारात्मक आणि मुख्यत्वे नकारात्मक असलं, तरी सर्वार्थाने सामाजिक पुनरुत्थानाशीच संबंधित असतं.

वरीलपैकी कोणती कसोटी खरी मानावी? माझ्या मते, या सर्व कसोट्या अंशतः खऱ्या आहेत आणि कोणतीही कसोटी पूर्णत्व लाभलेली नाही. प्रामाणिकपणा ही थोर माणसाची कसोटी असायलाच हवी. क्लेमान्सो एकदा म्हणाला होता की, बहुसंख्य मुत्सद्दी हे गुंड असतात. मुत्सद्दी थोर माणसं असतीलच असं नाही. क्लेमान्सो यांनी अनुभवलेल्या मुत्सद्द्यांमध्ये निश्चितपणे प्रामाणिकपणाचा अभाव राहिला असेल, त्यामुळे त्यांनी असं मत व्यक्त केलं. पण त्याव्यतिरिक्तसुद्धा प्रामाणिकपणा ही थोर माणूस असण्याची प्राथमिक किंवा एकमेव कसोटी मानायला कोणी तयार होणार नाही. कारण, प्रामाणिकपणा पुरेसा नसतो. थोर माणसामध्ये प्रामाणिकपणा असायला हवाच. प्रामाणिपणा हा सर्व नैतिक गुणांचा समुच्चय असतो आणि असा समुच्चय नसेल तर संबंधित माणसाला थोर म्हणता येणार नाही. पण माणूस थोर ठरण्यासाठी त्याच्याकडे निव्वळ प्रामाणिकपणापलीकडचं काहीतरी असावं लागतं. एखादा माणूस प्रामाणिक असेलही, पण त्याच वेळी तो मूर्खही असू शकतो, आणि मूर्ख माणूस हा थोर माणसाच्या पूर्णपणे विरुद्ध टोकाला असतो.

एखादा माणूस समाजाला संकटकाळामध्ये वाचवण्यासाठीचा मार्ग शोधतो म्हणून थोर ठरतो. पण त्याला हा मार्ग कशामुळे शोधता येतो? त्याला हे केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर करणं शक्य आहे. बुद्धी हेच तेज असतं. दुसऱ्या कशाचाही इथे उपयोग होत नाही. प्रामाणिकपणा आणि बुद्धिमत्ता यांच्या संयोगाविना कोणताही माणूस थोर होऊ शकत नाही, हे उघड आहे. पण थोर माणूस होण्यासाठी हे पुरेसं आहे का? या टप्प्यावर आपण दिग्गज व्यक्ती आणि थोर माणूस यांच्यात भेद करायला हवा, असं मला वाटतं. थोर माणूस हा दिग्गज व्यक्तीपेक्षा बराच निराळा असतो, असं मला ठामपणे वाटतं. प्रामाणिकपणा आणि बुद्धिमत्ता असेल तर तेवढ्या बळावर संबंधित व्यक्ती तिच्या सहमानवांच्या तुलनेत दिग्गज ठरू शकते. पण एवढ्याच बळावर त्याला थोर माणसाची प्रतिष्ठा लाभणार नाही. केवळ दिग्गज असणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक काहीतरी थोर माणसात असतं. ते काय असेल? इथे थोर माणसाची तत्त्वज्ञांनी केलेली व्याख्या विचारात घेणं महत्त्वाचं ठरतं. थोर माणसाची प्रेरणा सामाजिक हितकारकतेमधून यायला हवी आणि त्याने समाजावर चाबूक चालवायला हवा, समाजाची साफसफाई करायला हवी. हे घटक दिग्गज व्यक्ती व थोर माणूस यांच्यातील भेद स्पष्ट करतात, आणि थोर माणसाच्या महद्कार्याला यातूनच आदर-सन्मान लाभतो.

4

रानडे थोर माणूस होते का? प्रत्यक्ष शारीरिक पातळीवर ते मोठे होतेच. त्यांचा विशाल देह लक्षात घेता त्यांना 'महाकाय महोदय' असं संबोधता आलं असतं -कार्डिनल वाइजमन यांना त्यांच्या आयरिश सेवकाने आदराने 'यूअर एमिनन्स' (सन्मान्य महोदय) असं संबोधणं अपेक्षित होतं, पण उच्चार चुकल्यामुळे तो त्यांना 'यूअर इम्मेन्स' (महाकाय महोदय) असं म्हणाला आणि वाइजमन यांच्या विशाल देहाशी ते जुळणारंही होतं. तो प्रसंग इथे आठवतो." रानडे आशावादी वृत्तीचे, सौहार्दाने वागणारे आणि अष्टावधानी होते. सर्व नैतिक गुणांचा समुच्चय असणारा प्रामाणिकपणा त्यांच्यात होता आणि हा प्रामाणिकपणा कार्लाइलने नमूद केलंय त्या प्रकारचा होता. त्यात जाणीवपूर्वक 'बढाईखोर प्रामाणिकपणा'चा लवलेश नव्हता. रानड्यांचा प्रामाणिकपणा स्वाभाविक होता, त्यांच्या स्थायिभावाचं ते वैशिष्ट्य होतं, तो त्यांचा दाखवण्यापुरता पवित्रा नव्हता. त्यांचा केवळ देह विशाल होता असं नाही, तर त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची बुद्धिमत्ता हेसुद्धा विशाल होतं.

रानड्यांची बुद्धिमत्ता अत्युच्च कोटीतील होती, यावर कोणी शंका घेऊ शकणार नाही. ते उच्च न्यायालयात वकील आणि न्यायाधीश होते, पण तेवढ्यापुरतं त्यांचं कार्य मर्यादित नव्हतं; ते अव्वल दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ होते, अव्वल दर्जाचे इतिहासकार होते, अव्वल दर्जाचे शिक्षणतज्ज्ञ होते, आणि अव्वल दर्जाचे ईश्वरोपासक होते. रानडे राजकारणी नव्हते. हे बहुधा चांगलंच झालं. ते राजकारणी असते तर कदाचित थोर माणूस झाले नसते. अब्राहम लिंकन यांनी राजकारण्यांविषयी म्हटलं आहे की, "लोकांच्या हितसंबंधांपलीकडे राजकारणी लोकांचे काही हितसंबंध असतात, आणि या राजकारण्यांचा-त्यातील बहुसंख्यांचा प्रामाणिकपणाशी दुरान्वयेही संबंध नसतो. "2" रानडे राजकारणी नसले तरी राजकारणाचे मर्मज्ञ अभ्यासक होते. त्यांच्या ज्ञानाची व्याप्ती आणि त्यांच्या समंजसपणाचा व दूरदृष्टीचा आवाका पाहिला, तर भारताच्या इतिहासात त्यांच्या तोडीचा इतर कोणी माणूस सापडणं अवघड आहे. त्यांनी सर्वच विषयांना स्पर्श केला आणि त्या-त्या विषयात मूलगामी ज्ञान प्राप्त केलं. अवाढव्य वाचन करणारे रानडे सर्वार्थाने विद्वान होते. केवळ त्यांच्या काळाचं परिमाण लावून नव्हे तर कोणत्याही काळाचं परिमाण लावलं तरी ते थोरच ठरतात. मी आधी म्हटल्याप्रमाणे, प्रामाणिकपणा आणि बुद्धिमत्ता हे गुण सुटेसुटे असतील किंवा केवळ हेच दोन गुण संयोगाने असतील तर तेवढ्यामुळे काही कोणी थोर माणूस होत नाही. रानड्यांकडे या दोन गुणांव्यतिरिक्त इतर काही गुणच नसते, तर त्यांना थोर म्हणता आलं नसतं.

रानड्यांनी सामाजिक उद्देशाने केलेलं कार्य आणि त्या सामाजिक कार्याचा मार्ग, हा त्यांची थोरवी ठरवण्याचा आधार असायला हवा. याबाबतीत कोणतीही शंका नाही. रानडे हे इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ किंवा शिक्षणतज्ज्ञ म्हणून कमी, आणि समाजसुधारक म्हणून जास्त ओळखले जातात. त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे समाजसुधारणेचं अथक अभियानच होतं. त्यांनी समाजसुधारक म्हणून अंगीकारलेल्या भूमिकेवर त्यांची थोरवी आधारलेली आहे. दूरदृष्टी आणि धाडस या समाजसुधारकाकडे असायला हव्यात अशा दोन्ही गोष्टी रानड्यांकडे होत्या. त्यांच्या जीवनकाळातील परिस्थितीचा विचार करता त्यांच्या धाडसाइतकीच त्यांची दूरदृष्टीसुद्धा मोलाची ठरते. त्यांनी प्रेषिताकडे असते तशी दूरदृष्टी साध्य केली (इथे मी 'प्रेषित' हा शब्द ज्यू धर्मातील परंपरेच्या अर्थाने वापरतो आहे), ही बाब त्यांच्या काळाचा विचार करता आश्चर्यकारकच वाटते. मराठ्यांचं साम्राज्य संपुष्टात आणणारी खडकीची लढाई झाल्यानंतर 24 वर्षांनी, 1842 साली रानडे जन्माला आले. मराठा साम्राज्याचा पाडाव निरनिराळ्या लोकांच्या मनात निरनिराळ्या भावना निर्माण करणारा होता. नातूंसारखे काही लोक मूळ घटना घडण्याआधीच त्यात शत्रूचे साथीदार म्हणून सहभागी झाले. काहींनी घटना घडल्यानंतर त्यात सहभाग घेतला. त्यांना ब्राह्मण पेशव्यांची जुलमी राजवट संपुष्टात आल्याचा आनंद झाला. पण महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना या घटनेचा धक्का बसला, यात काही शंका नाही. संपूर्ण भारत परक्या टोळीच्या आक्रमणाखाली आला आणि देशातील लोकसमूह एक-एक करून या टोळीसमोर पराभूत होऊ लागले, तेव्हा महाराष्ट्रातील या छोट्या कोपऱ्यातल्या एका भरभक्कम वंशाच्या लोकांमध्ये मात्र स्वातंत्र्याची जाणीव टिकून होती. त्यांनी एकेका इंचासाठी लढा देऊन मैलोन्-मैल स्वातंत्र्याचा प्रदेश प्रस्थापित केला होता. ब्रिटिशांच्या मुलुखविजयामुळे या लोकांकडील सर्वांत मूल्यवान गोष्ट नष्ट झाली. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील विचारविश्व किती गोंधळून गेलं असेल, याची आपण कल्पना करू शकतो. त्यांना क्षितिजावर केवळ अंधार दिसत होता. इतक्या मोठ्या संकटावरची स्वाभाविक प्रतिक्रिया कोणती असू शकते ? अपरिहार्य गोष्ट घडत असताना त्यापुढे निमूट राहणं, हात टेकणं आणि शरण जाणं, याहून निराळं काय करता येईल? रानड्यांनी यावर कोणती प्रतिक्रिया दिली? त्यांची प्रतिक्रिया अतिशय निराळी होती. पाडाव झालेल्यांनी पुन्हा उभं राहायला हवं, अशी आशा त्यांच्या मनात होती. या आशेला आधार देणारा नवीन श्रद्धाविचार त्यांनी विकसित केला. हा विचार त्यांच्याच शब्दात उद्धृत करतो. ते म्हणाले :

"माझ्या धारणांमधील दोन तत्त्वांवर माझी पूर्ण श्रद्धा आहे. आपला हा देश खरी आश्वासक भूमी लाभलेला असून आपल्या वंशावर ईश्वरी कृपादृष्टी झालेली आहे. "32

आशा आणि आत्मविश्वास यांचा हा नवीन ईश्वरी संदेश स्पष्टपणे मांडून ते थांबले नाहीत. ही आशा प्रत्यक्षात कशी उतरवायची, या प्रश्नावर त्यांनी बरंच विचारमंथन केलं. देशाच्या घसरणीमागील कारणांचं निष्पक्षपातीपणे विश्लेषण करणं, ही अर्थातच पहिली निकड होती. ही घसरण हिंदू समाजव्यवस्थेतील काही उणिवांमुळे झाली असून या उणिवा दूर केल्याशिवाय आपल्या मनातील आशादायी चित्र प्रत्यक्षात उतरणार नाही, असं रानड्यांना जाणवलं. त्यामुळे नवीन ईश्वरी संदेशासोबतच कर्तव्याची जाणीव होणंही आवश्यक होतं. हिंदू समाजात सुधारणा करणं, हा या कर्तव्याचा भाग होता. त्यामुळे समाजसुधारणा हे रानड्यांच्या जीवनातील एक प्रमुख उद्दिष्ट झालं. त्यांनी समाजसुधारणांचा ध्यास घेऊन अशा सुधारणांना चालना देण्यासाठी शक्य ते सर्व काही केलं. बैठका घेणं, अभियानं चालवणं, व्याख्यानं व प्रवचनं देणं, लेख लिहिणं, मुलाखती देणं, पत्रव्यवहार करणं- ही त्यांची कामाची पद्धत होती आणि हे काम त्यांनी अथक उत्साहाने पार पाडलं. त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या, अनेक नियतकालिकं सुरू केली, पण याने त्यांचं समाधान झालं नाही. त्यांना समाजसुधारणांच्या कार्याला चालना देण्याकरता अधिक शाश्वत, अधिक पद्धतशीर असं काहीतरी हवं होतं. त्यामुळे त्यांनी 'सोशल कॉन्फरन्स' ही अखिल भारतीय पातळीवरची संघटना स्थापन केली." ही सामाजिक परिषद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संलग्न राहून कार्यरत होती. सामाजिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी दर वर्षी सामाजिक परिषद भरत असे. रानडे या वार्षिक अधिवेशनांना एखाद्या यात्रेप्रमाणे न चुकता हजर राहिले आणि त्याद्वारे त्यांनी सामाजिक सुधारणांच्या कार्याला चालना दिली.

समाजसुधारणेच्या कार्याला चालना देताना रानड्यांनी प्रचंड धाडस दाखवलं. आजच्या पिढीचे अनेक लोक या दाव्यावर कदाचित हसतील. आज भारतामध्ये तुरुंगात जाणं हे हौतात्म्याचं कृत्य ठरतं. हे कृत्य देशभक्तीचं आणि धाडसाचं मानलं जातं. कुणाच्या खिजगणतीतही आले नसते असे अनेक बदमाश लोक अखेरचा आधार शोधत राजकारणात शिरले आणि तुरुंगात जाऊन हुतात्मा ठरले. त्यांना मिळणारी प्रसिद्धी विस्मयकारक वाटावी अशीच आहे. टिळकांना आणि त्यांच्या काळातील लोकांना ज्या त-हेचा कष्टप्रद तुरुंगवास अनुभवावा लागला, तसे कष्ट आताही तुरुंगात भोगावे लागत असते, तर या मंडळींविषयीची ही धारणा काही प्रमाणात वाजवी म्हणता आली असती. पण आज तुरुंगवासामध्ये धडकी भरवणारं काहीही उरलेलं नाही. प्रत्यक्षात हा केवळ स्थानबद्धतेचा प्रकार असतो. आता राजकीय कैद्यांना गुन्हेगार म्हणून वागवलं जात नाही. त्यांना वेगळ्या वर्गात ठेवलं जातं. त्यांना कोणतेही कष्ट सहन करावे लागत नाहीत, प्रतिष्ठा गमवावी लागत नाही आणि त्यांचे कोणत्याही त-हेचे हाल होत नाहीत. 35 अशा तुरुंगवासासाठी अजिबात धाडसाची गरज नाही.

शासनव्यवस्थेपेक्षाही समाज एखाद्या व्यक्तीविरोधात बऱ्याच मोठ्या प्रमाणात जुलूमशाही व दडपशाही करू शकतो, हे बहुतांश लोकांच्या ध्यानात येत नाही. शासनव्यवस्थेपेक्षाही समाजाकडे दडपणुकीची खूप विस्तृत साधनं उपलब्ध असतात आणि त्यांची व्याप्ती मोठी असते, तसंच ती अधिक परिणामकारक असतात. व्याप्ती आणि कठोरपणा या निकषांवर शासकीय दंडसंहितेमधील कोणत्या शिक्षेची तुलना सामाजिक बहिष्काराशी करता येईल? समाजाला आव्हान देऊन स्वतःला बहिष्कृत करून घेणारा समाजसुधारक आणि शासनव्यवस्थेला आव्हान देऊन काही महिन्यांचा वा काही वर्षांचा तुरुंगवास ओढवून घेणारा राजकीय कैदी, यांच्यातलं अधिक धाडसी कोण? समाजसुधारक आणि राजकीय देशभक्त यांनी दाखवलेल्या धाडसाची तुलना करत असताना आणखी एका भेदाकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. समाजसुधारक समाजाला आव्हान देतो तेव्हा त्याला कोणी हुतात्मा म्हणून गौरवत नाही. किंबहुना त्याच्याशी कोणी मैत्रीही करायला जात नाही. त्याचा तिरस्कार केला जातो आणि त्याच्यापासून अंतर राखलं जातं. पण राजकीय देशभक्त शासनव्यवस्थेला आव्हान देतो तेव्हा त्याला संपूर्ण समाज पाठिंबा देतो. त्याची प्रशंसा केली जाते, कौतुक केलं जातं आणि त्याला तारणहार मानून आदरस्थान बहाल केलं जातं. तर, एकट्याने लढणारा समाजसुधारक आणि पाठीराख्यांच्या विशाल समूहाच्या आधाराने लढणारा राजकीय देशभक्त, यांच्यातलं जास्त धाडसी कोण? रानड्यांनी समाजसुधारणेचं कार्य हाती घेऊन धाडस दाखवलं, हे नाकारणं करंटेपणाचं ठरेल. खरंतर, रानड्यांनी अत्युच्च पातळीवरचं धाडस दाखवलं. त्यांच्या काळात अगदी हिणकस व अनैतिक प्रकारच्या सामाजिक व धार्मिक प्रथांनाही पवित्र मानलं जात असे, हे इथे लक्षात घ्यायला हवं. या प्रथांच्या दैवी व नैतिक आधाराबाबत प्रश्न वा शंका उपस्थित केल्यास अशा प्रश्नकर्त्यावर पाखंडीपणाचा आरोप होई. इतकंच नव्हे तर त्या माणसाने समाजाला कधीच सहन होणार नाही असं धर्मविडंबन व पावित्र्यभंग केल्याचं मानलं जात असे.

5

रानड्यांसमोरचा समाजसुधारणेचा मार्ग सहजसोपा नव्हता. या मार्गात अनेक अडथळे होते. त्यांना ज्या लोकांना सुधारायचं होतं त्यांच्या धारणा प्राचीन गतकाळामध्ये खोलवर रुजलेल्या होत्या. आपले पूर्वज सर्वांत ज्ञानी व सर्वांत उदात्त वृत्तीचे होते, आणि आपण घडवलेली समाजव्यवस्थाच सर्वांत आदर्श आहे, असा त्यांचा समज होता. रानड्यांना हिंदू समाजात दिसणाऱ्या लांच्छनास्पद व चुकीच्या गोष्टी इतर लोकांना मात्र स्वतःच्या धर्मातील अत्यंत पवित्र आज्ञा वाटत होत्या. त्या काळच्या सर्वसामान्य माणसांची वृत्ती ही अशी होती.

भाषांतर : अवधूत डोंगरे


न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या 101 व्या जयंतीदिनी, 18 जानेवारी 1943 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे येथे 'रानडे, गांधी अँड जीना' या विषयावर पुणे येथे डेक्कन सभेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्याख्यान दिले. त्या व्याख्यानाचे नव्याने भाषांतर करून, त्यातील व्यक्ती, संस्था, घटना, प्रसंग, संज्ञा, संकल्पना यांच्या संदर्भातील टिपा असे पुस्तक अवधूत डोंगरे यांनी तयार केले आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक 14 एप्रिल 2026 रोजी, साधना प्रकाशनाकडून येत आहे. त्यानिमित्ताने डॉ. आंबेडकर यांच्या भाषणातील सुरुवातीचा एकपंचमांश भाग इथे प्रसिद्ध करीत आहोत. या अंकातील मजकुरात 5 ते 35 हे आकडे असलेल्या टीपा आहेत, त्या पुस्तकातच वाचता येतील.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( 10 लेख )

स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी