शिवाजी पार्कवर कुमारमहोत्सवच साजरा झाला. सकाळी कथामालांचे विविध खेळाचे सामने झाले. बाहेरच्या कथामाला सभासदांना दादरमधील कथामालेच्या सभासदांनी आपापल्या घरी जेवणा-खाणासाठी नेले आणि घराघरात कथामालेचा बंधुप्रेमाचा संदेश प्रत्यक्ष पोचवला. सायंकाळी दादर स्टेशनपासून कथामालेतील बालांची एक प्रचंड मिरवणूक निघून ती शिवाजी पार्कवर आली. शिवाजी पार्कला एखाद्या जिवंत बागेचे रूप आले. किती विविधता, प्रसन्नता त्या मुलांत होती!
साने गुरुजींचे एक स्मारक म्हणून लहान मुलांसाठी साने गुरुजी कथामाला स्थापन करण्याची कल्पना श्री. प्रकाश मोहाडीकर यांची. मुलांबद्दल गुरुजींना अनन्य असे प्रेम वाटे. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तपाचे’ हा त्यांचा जणू जीवनमंत्र होता. कथामालेची कलना लोकापुढे मांडून तिला मोहाडीकरांनी चालना दिली. आज महाराष्ट्रात उत्तरावर कथामाला चालू असून सुमारे 29,000 मुले त्यांचा लाभ घेतात. मुंबईतच तीस-चाळीस कथामाला चालू आहेत. या सर्व कथामालांतर्फे ता. 21 ते 25 डिसेंबरपर्यंत साने गुरुजी जयंतीनिमित्त भव्य कायक्रम योजण्यात आला होता. कथामालांच्या कामाला अधिक परिष्कृत, शास्त्रीय व व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीने ह्या वेळी विचार करण्यात आला.
कथानिवेदकाचे संमेलन
ता. 21 रोजी कथानिवेदकाचे संमेलन घेतले होते. 200 कथानिवेदक हजर होते. कथानिवेदनाच्या कामासंबंधी सर्व बाजूंनी विचार व्हावा हा उद्देश. कथाकथन प्रभावी व संस्कार करणारे कसे करता येईल, याबाबत चर्चा झाली. या चर्चेत 13 कथानिवेदकांनी भाग घेतला. या चर्चेत अनेकांनी कथामालेकडून आपल्या असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. कथामालेच्या कार्याच्या मर्यादाची अधिक जाणीव या चर्चात दिसावयाला हवी होती. कथानिवेदनांत व्यक्ती तितक्या प्रकृती स्वाभाविकताच असणार. कथाकथनात काही योजना असावी, ह्या दृष्टीने काही आखणी करता आली तर ते उपयुक्त ठरण्यासारखे आहे. कथांतही विविधता असली पाहिजे आणि त्यातून मुलांचे भावनात्मक शिक्षण झाले पाहिजे. आजच्या शिक्षणपद्धतीत भावना संस्कारित करण्याची योजना नाही, ही उणीव कथामालांनी भरून काढली पाहिजे. कथानिवेदकाच्या या चर्चेत बाह्य तंत्रावरच अधिक भर दिला गेला व प्रश्नाच्या मूळ गाभ्याला हात घातला गेला नाही, असे म्हणावे लागेल. कथांची निवड हाही एक महत्त्वाचाच मुद्दा आहे. कथावाचन आणि कथन यातला फरकही जितका स्पष्ट व्हायला हवा होता, तेवढा झाला नाही.
बालमानसशास्त्राचे महत्त्व
कथामालांच्या कार्याचा संबंध मुख्यतः मुलांशी येत असल्याने बालमानसशास्त्राचा विचार अपरिहार्यच ठरतो. ता. 22 रोजी या विषयावर एक परिसंवाद योजला होता. बालमानसशास्त्रासंबंधीच्या या चर्चेत पालकाच्या वागणुकीसंबंधी चर्चा होणे स्वाभाविकच होते. कारण पहिले संस्कार मुलांना त्यांच्याकडूनच मिळतात. मोठ्यांच्या वागणुकीतून मुलांमध्ये वेगवेगळे गंड निर्माण होतात व त्यामुळे काही मुले समाजाला उपद्रवकारी ठरतात. बालवाङ्मय, बालसंघटना व बालोद्योग या विषयांची चर्चा कु. मीरा सामंत यांनी उपस्थित केली. मुलांच्या कल्पना व कर्तृत्वशक्तीला स्वातंत्र्य देण्याचे महत्त्व त्यांनी प्रतिपादन केले. बालसाहित्य आणि क्रीडांगणे यातूनच राष्ट्राची नवी पिढी घडत असते, असे त्यांनी सांगितले. मुलांच्या अद्वेला किती महत्वाचे स्थान असते, याचाही त्यांनी उल्लेख केला. श्री. ग.बा. ताह्मणे यांनी बालमानसशास्त्राचे शिक्षण पालकांना अत्यावश्यक असल्याचे सांगितले. डेविड ससुन बालसुधार केंद्राचे अधिकारी श्री. लिमये, प्रा. चंद्रकुमार डांग, प्रा. चारुशीलाबाई गुप्ते यांनीही या परिसंवादात भाग घेतला. आदर्श बालसंस्था काढण्याचे प्रकाश मोहाडीकरांचे एक स्वप्न आहे. त्याचाही या वेळी उल्लेख झाला. मुलांच्यामध्ये वयपरत्वे निर्माण होणाऱ्या विविध भावनांसंबंधी चर्चा होणे आवश्यक होते. ही चर्चा कथामालांच्या संयोजनाच्या दृष्टीने फार उपयुक्त ठरली असती.
माताची पूरक चळवळ पाहिजे
‘साने गुरुजी कथामाला व बालकाची चळवळ’ या विषयावर ‘लोकमान्या’चे संपादक श्री. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ता. 23 रोजी चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी डॉ. म्हसकर यांनी माता-बालक संबंधाचा प्रश्न महत्वाचा असल्याने माताच्या प्रश्नाकडेही लक्ष देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. या दृष्टीने आपण स्वतः व आपली संस्था साह्य करण्याला तयार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. या चर्चेत डॉ. म्हसकरांनी मांडलेला मुद्दाच विशेष महत्त्वाचा होता. कथामालांचे कार्य मातापर्यंत पोचण्याची गरज त्यातून स्पष्ट झाली. माता ह्या मुलांच्या पहिल्या गुरू असतात आणि गर्भातही मुलांच्या पिंडावर संस्कार होत असतात ज्यामुळे मातांच्या शिक्षणाशिवाय कथामालांच्या कामात उणेपणा राहील, असे वाटणे स्वाभाविकच आहे. श्री. बालमुकुंद प्रभु यांनी याच दृष्टीने बालक चळवळीबरोबर पालक चळवळ सुरू करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. बालक चळवळीच्या इतर पैलूंसंबंधी मात्र विशेष चर्चा झाली नाही.
स्वरूपासंबंधी विचार
‘कथामालांचे स्वरूप व कार्य’ या विषयावर श्री. भाऊसाहेब रानडे यांच्या अध्यक्षतेखाली ता. 23 रोजी चर्चा झाली. सौ. लीलाताई पुरंदरे यांनी सर्व मुलांना आपल्यात समाविष्ट करून घेण्याची आकांक्षा कथामालेने धरावी, असे सांगितले. श्री. ताह्मणे यांनी विपरीत संस्कारांपासून मुळे वाचवण्याची कामगिरीही कथामालांनी केली पाहिजे, असे सांगितले. धान्य पेरण्याइतकेच तण उपटणेही शेतीच्या मशागतीच्या दृष्टीने आवश्यक असते. श्री. भाऊसाहेब रानडे यांनी कथामालेचे कार्य विस्तृत प्रमाणावर करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. विशेषतः जेथे संस्कारांची उणीव तेथे कथामालाचे लोण प्रथम पोचवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
साने गुरुजी जयंती
ता. 24 डिसेंबर हा गुरुजींचा जन्मदिन. त्या दिवशीचा कार्यक्रम बॅ. नाथ पै यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. गुरुजींच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या व कथामाला ही गुरुजींच्या स्मारकाची एक भव्योदात्त कल्पना आहे, कथामाला सर्वत्र निघाल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.
कुमारमहोत्सव
ता. 25 रोजी शिवाजी पार्कवर कुमारमहोत्सवच साजरा झाला. सकाळी कथामालांचे विविध खेळाचे सामने झाले. बाहेरच्या कथामाला सभासदांना दादरमधील कथामालेच्या सभासदांनी आपापल्या घरी जेवणा-खाणासाठी नेले आणि घराघरात कथामालेचा बंधुप्रेमाचा संदेश प्रत्यक्ष पोचवला. सायंकाळी दादर स्टेशनपासून कथामालेतील बालांची एक प्रचंड मिरवणूक निघून ती शिवाजी पार्कवर आली. शिवाजी पार्कला एखाद्या जिवंत बागेचे रूप आले. किती विविधता, प्रसन्नता त्या मुलांत होती! बॅ. नाथ पै यांनी गुरुजींना आदरांजली वाहिली व दादर स्मशानभूमींत गुरुजींचे अखेरचे पार्थिव अवशेष असल्याने या भागात साने गुरुजींचे एक भव्य स्मारक उभारले गेले पाहिजे, असे सांगितले.
लंडनमधील साने गुरुजी वसतिगृहाचीही त्यांनी माहिती दिली. ह्या वसतिगृहात दलित राष्ट्रातील विद्यार्थ्यांना अग्रहक्क दिला जातो. तेथे देश, जात, धर्म असा कोठलाही भेदभाव केला जात नाही. सर्वांना जवळ घेण्याचा गुरुजींचा संदेश होता. गुरुजींचे नाव या वसतिगृहामुळे आज जगभरच्या शिक्षणक्षेत्रात माहीत झाले आहे. गुरुजींचे जीवन म्हणजे ज्ञान-भक्ती कर्म यांचा पावन प्रवाह होता. समाजातून दुर्गुण जावेत व स्वातंत्र्योत्तर काळात सद्गुण वाढीला लागावे, अशी गुरुजींना तळमळ होती. आपल्या वात्सल्याने ते सद्गुणांची संथा देत होते, असे त्यांनी सांगितले.
मोहाडीकरांचे आणखी एक स्वप्न
महापौर दोंदे यांनी साने गुरुजी कथामाला चळवळ या स्वरूपात चालावी व ती चालकाची चळवळ न राहता मातांची चळवळ व्हावी, असे सांगितले, दादर विभार्गात गुरुजींची शैक्षणिक क्षेत्रातली स्वप्ने साकार करण्यासाठी साने गुरुजी विद्यामंदिर स्थापन करण्याची एक योजना श्री. प्रकाश मोहाडीकर यांनी आखली आहे. तिला ला. नाथ पै व महापौर दोदे यांनी आशीर्वाद दिला व उचित साह्याचे आश्वासन दिले. श्याम पाक्षिक बंद पडल्याबद्दलही नाथ पैंनी हळहळ व्यक्त केली.
पाच दिवसांचा हा साने गुरुजी जयंतीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने पार पडला.
Tags: Bhausaheb Ranade Sane Guruji Story Child Psychology Sane Guruji Sane Guruji Vidyamandir भाऊसाहेब रानडे साने गुरुजी कथामाला बालमानसशास्त्र साने गुरुजी साने गुरुजी विद्यामंदिर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या